|
ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १६१ ते १७० ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६१ (यक्ष्मनाशनसूक्त) ऋषी - यक्ष्मनाशन प्राजापत्य : देवता - राजक्ष्मघ्न इंद्राग्नी : छंद - अनुष्टुभ् , त्रिष्टुभ्
मु॒ञ्चामि॑ त्वा ह॒विषा॒ जीव॑नाय॒ कं अ॑ज्ञातय॒क्ष्मादु॒त रा॑जय॒क्ष्मात् ।
मुचामि त्वा हविषा जीवनाय कं अजात-यक्ष्मात् उत राज-यक्ष्मात्
(देवाला हविर्भाग अर्पण करून) तूं सुखाने जगावेस म्हणून हा पहा मी तुला राजयक्ष्मा-व्याधीपासूनच नव्हे, तर ज्याचे निदान करितां येत नाही अशाहि दुसर्या व्याधीपासून तुला सोडवितो; ह्या पुरुषाला रोगरूप नक्राने जरी ग्रस्त केलेले असले, तरी हे इन्द्राग्निहो, तुम्ही त्याला रोगमुक्त करा १.
यदि॑ क्षि॒तायु॒र्यदि॑ वा॒ परे॑तो॒ यदि॑ मृ॒त्योर॑न्ति॒कं नीत ए॒व ।
यदि क्षित-आयुः यदि वा पराइतः यदि मृत्योः अन्तिकं नि-इतः एव
ह्याचे आयुष्य जरी संपले असले, किंवा जरी तो बहुतेक मृत होण्याच्या पंथाला लागला असला, तरी अशाहि आपत्तीच्या तावडीतून हा पहा मी त्याला परत ओढून आणतो आणि त्याने शंभर वर्षे जगावे इतकी त्याच्या ठिकाणी शक्ति उत्पन्न करितो २.
स॒ह॒स्रा॒क्षेण॑ श॒तशा॑रदेन श॒तायु॑षा ह॒विषाहा॑र्षं एनम् ।
सहस्र-अक्षेण शत-शारदेन शत-आयुषा हविषा आ अहार्षं एनं
ज्याची दृष्टि हजारो प्रकारची आहे, (हजारो पटीने सूक्ष्म आहे) ज्याच्या योगाने शंभर वर्षेपर्यंत पूर्ण आयुष्य प्राप्त होते अशा प्रकारच्या हविर्भागाच्या सामर्थ्याने मी ह्या (पुरुषा)ला मी(आरोग्याच्या स्थितींत) आणले आहे. आयुष्याची शंभर वर्षेपर्यंत इन्द्राने त्याला यच्चयावत् दु:खाच्या आणि संकटाच्या पार सुखरूप न्यावे अशा हेतूने मी त्याला रोगमुक्त स्थितींत आणले आहे ३.
श॒तं जी॑व श॒रदो॒ वर्ध॑मानः श॒तं हे॑म॒न्ताञ् छ॒तं उ॑ वस॒न्तान् ।
शतं जीव शरदः वर्धमानः शतं हेमन्तान् शतं ओं इति वसन्तान्
तूं शंभर शरद्ऋतू-शंभर हेमंत ऋतू आणि शंभर वसंत ऋतूंपर्यंत जीवमान रहा-तूं उत्तरोत्तर उत्कर्ष पाव. कारण, इन्द्र, अग्नि आणि बृहस्पति ह्यांनी ज्याच्या योगाने मानवाला शंभर वर्षेपर्यंत आयुष्य लाभते अशा हविर्भागाने (प्रसन्न होऊन) तुला शंभर वर्षाचे पूर्णायुष्य पुन्हां दिले आहे ४.
आहा॑र्षं॒ त्वावि॑दं त्वा॒ पुन॒रागाः॑ पुनर्नव ।
आ अहार्षं त्वा अविदं त्वा पुनः आ अगाः पुनः-नव
मीं तुला (आरोग्य स्थितींत) आणले आहे; तुझी सर्व परिस्थिति जाणली आहे. पुन: नवीन देह धारण करणार्या पुरुषा, तूंहि आतां (उत्तम स्थितींत) पुन: आला आहेस; हे पूर्णारोग्ययुक्ता, तुझी चक्षुरादिक सर्व इन्द्रिये, किंबहुना तुझे पुढील आयुष्यसुध्दां मी पूर्ण जाणले आहे. ५.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६२ (गर्भिणी-गर्भरक्षक राक्षोघ्नसूक्त) ऋषी - राक्षोघ्न ब्राह्म : देवता - गर्भरक्षण : छंद - अनुष्टुभ्
ब्रह्म॑णा॒ग्निः सं॑विदा॒नो र॑क्षो॒हा बा॑धतां इ॒तः ।
ब्रह्मणा अग्निः साम्-विदानः रक्षः-हा बाधतां इतः
अग्नि हा सर्व स्थिति उत्तम रीतीने जाणणारा आणि राक्षसांचा नाश करणारा आहे. तर जो कांही दुष्ट रोग की ज्याचे नांवसुध्दां भयंकर आहे, आणि तुझ्या गर्भाशयांत ज्याने ठाण दिले आहे, आणि त्या दुष्ट रोगाला, (अग्नि हा) आपण केलेल्या प्रार्थनेच्या योगाने त्या स्थानांतून पार नष्ट करो १.
यस्ते॒ गर्भं॒ अमी॑वा दु॒र्णामा॒ योनिं॑ आ॒शये॑ ।
यः ते गर्भं अमीवा दुः-नामा योनिं आशये
जो भयंकर रोग तुझ्या गर्भाषयांत ठाणे देऊन राहिला आहे त्या रोगाला तुझे मांस खाणार्या त्या रोगाला-अग्निदेव हा आम्ही केलेल्या प्रार्थनांच्या योगाने पार नष्ट करून टाकील २.
यस्ते॒ हन्ति॑ प॒तय॑न्तं निष॒त्स्नुं यः स॑रीसृ॒पम् ।
यः ते हन्ति पतयन्तं नि-सत्स्नुं यः सरीसृपं
तुझा गर्भ आपल्या ठिकानी जाऊन पडत असतां, किंवा आपल्या ठिकाणीच व्यवस्थित असतां, त्या सरपटणार्या गर्भांकुरालाच जो मारून टाकतो किंवा तुझा गर्भ उदराबाहेर आल्यावरहि जो कोणी दुष्ट राक्षस त्याचा घात करूं पाहतो, त्याचा पहा आतांच्या आत्तां आम्ही पार उच्छेद करून टाकतो ३.
यस्त॑ ऊ॒रू वि॒हर॑त्यन्त॒रा दम्प॑ती॒ शये॑ ।
यः ते ऊरू इति वि-हरति अन्तरा दम्पती इतिदम्-पती शये
तुम्ही पतिपत्नी निद्रावश असतां जो रोग तुझ्या मांड्यांच्या ठिकाणी व्याधि उत्पन्न करून त्या वांकड्या करितो, किंवा जो तुझ्या गर्भाशयांतील आतील भागाला बिलगून गर्भाला प्रतिबंध करतो, त्या दुष्ट रोगाचा पहा आम्ही आतां समूळ उच्छेद करून टाकतो ४.
यस्त्वा॒ भ्राता॒ पति॑र्भू॒त्वा जा॒रो भू॒त्वा नि॒पद्य॑ते ।
यः त्वा भ्राता पतिः भूत्वा जारः भूत्वा नि-पद्यते
(ही झाली रोगांची गोष्ट) पण जो कोणी दुष्ट मनुष्य तुझा भाऊ म्हणून किंवा पालक म्हणून किंवा तुझ्यावर प्रेम करणारा प्रेमी म्हणून तुझ्यावरच हल्ल करितो किंवा तुझ्या मानगुटीस बसतो आणि तुझ्या मुलांलेकरांचा जीव घेऊं पाहतो त्या दुष्ट समंधाला देखील आम्ही आतां पार गाडून टाकतो ५.
यस्त्वा॒ स्वप्ने॑न॒ तम॑सा मोहयि॒त्वा नि॒पद्य॑ते ।
यः त्वा स्वप्नेन तमसा मोहयित्वा नि-पद्यते
तसेंच जो पिशाच स्वप्न पाडून, किंवा तुझ्या डोळ्यांपुढे अंधारी आणून तुला भ्रांति उत्पन्न करतो; किंवा तुझ्या मानगुटीस बसतो, आणि तुझ्या मुलांलेकरांचा जीव घेऊं पाहतो त्या दुष्ट समंधाला देखील आम्ही पहा आतांच्या आत्तां ठार मारतो ६.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६३ (रोगनाशनाचे पालुपदसूक्त) ऋषी - वित्रि काश्यप : देवता - यक्ष्मनाश-रोगनाश : छंद - अनुष्टुभ्
अ॒क्षीभ्यां॑ ते॒ नासि॑काभ्यां॒ कर्णा॑भ्यां॒ छुबु॑का॒दधि॑ ।
अक्षीभ्यां ते नासिकाभ्यां कर्णाभ्यां चुबुकात् अधि
तुझे दोन्ही नेत्र आणि तसेंच नाक, कान आणि हनुवटी (इत्यादि) शरीरावयवांच्या ठिकाणी जो कांहि यक्ष्मरोग (म्हणजे दुर्धर व्याधि) जडलेला असेल, किंवा तुझे मस्तक, त्यांतील मेन्दू आणि जिव्हा ह्यांच्यामध्ये जो कांही व्याधि असेल, त्याचा मी समूळ उच्छेद करून टाकतो १.
ग्री॒वाभ्य॑स्त उ॒ष्णिहा॑भ्यः॒ कीक॑साभ्यो अनू॒क्यात् ।
ग्रीवाभ्यः ते उष्णिहाभ्यः कीकसाभ्यः अनूक्यात्
तुझा गळा, तसेंच मानेचा स्नायु, छातीची लवचिक हाडे, पाठीचा कणा, त्याच्या आंतील भाग, त्याचप्रमाणे स्कन्ध (म्हणजे खांदे) त्यांचा मांसल भाग म्हणजे भुजवटा, तसेच त्या खांद्यांचा पृष्टभाग आणि भुजदण्ड ह्या सर्वांच्यामधील सर्व व्याधींचा पार नाश करून टाकतो २.
आ॒न्त्रेभ्य॑स्ते॒ गुदा॑भ्यो वनि॒ष्ठोर्हृद॑या॒दधि॑ ।
आन्त्रेभ्यः ते गुदाभ्यः वनिष्ठोः हृदयात् अधि
तुझ्या पोटांतील आंतडी, गुह्यस्थान, स्थूलान्त्र, हृदयप्रदेश, दोन्ही मूत्रपिण्ड, तसेंच बृहत् यकृत् व आंतड्यांजवळील प्लीहादिक मांसपिण्ड ह्यांच्यातील यच्चयावत् रोगांचा अगदी नि:पात करून टाकतों ३.
ऊ॒रुभ्यां॑ ते अष्ठी॒वद्भ्यां॒ पार्ष्णि॑भ्यां॒ प्रप॑दाभ्याम् ।
ऊरु-भ्यां ते अष्ठीवत्-भ्यां पार्ष्णि-भ्यां प्र-पदाभ्यां
त्याचप्रमाणे तुझ्या दोनी मांड्या, गुडघ्यांच्या वाट्या, टांचा, आणि पावले ह्यांना जडलेला कोणाताहि रोग; तसेंच नितंबभाग, कटिप्रदेश आणि जांगाड ह्यांच्याहिमध्ये भिनलेले एकंदर व्याधि अगदी होते की नव्हते असे करून टाकतो ४.
मेह॑नाद्वनं॒कर॑णा॒ल् लोम॑भ्यस्ते न॒खेभ्यः॑ ।
मेहनात् वनम्-करणात् लोम-भ्यः ते नखेभ्यः
तद्वतच (मेहन म्हणजे) मूत्रमार्ग आणि बस्तिभाग तसाच केशयुक्त भाग आणि नखे इत्यादि सर्व अवयवांमध्ये जरी हा रोग असेल, तरी त्याला अगदी पार नष्ट करून टाकतो ५.
अङ्गा॑द्-अङ्गा॒ल्लोम्नो॑-लोम्नो जा॒तं पर्व॑णि-पर्वणि ।
अङ्गात्-अङ्गात् लोम्नः-लोम्नः जातं पर्वणि-पर्वणि
प्रत्येक अवयव अवयवांत, केसा-केसांत, सांध्यान् सांध्यात जो जो रोग असेल, त्या त्या सर्व व्याधींचे शरीरांतून पहा समूळ उच्चाटन करून टाकतो ६.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६४ (दुःस्वप्ननाशनसूक्त)
ऋषी - प्रचेतस् आंगिरस : देवता - दुःस्वप्ननाशन :
अपे॑हि मनसस्प॒तेऽ॑प क्राम प॒रश्च॑र ।
अप इहि मनसः पते अप क्राम परः चर
मनाच्या चालका, जा बाबा, दूर जा; बाजूला सर, अगदी लांब चालता हो; आणि तेथूनच दृष्टि फेंकून माझ्या अवदशेला सांग की, जिवंत मनुष्याच्या मनाचे ढंग नाना प्रकारचे असणारच (आणि म्हणूनच तुझें फांवते) १.
भ॒द्रं वै वरं॑ वृणते भ॒द्रं यु॑ञ्जन्ति॒ दक्षि॑णम् ।
भद्रं वै वरं वृणते भद्रं युजन्ति दक्षिणं
त्याला (मनुष्याला) जे कांही पाहिजे असते ते उत्तमच हवे असते; जी जी वस्त्सु योग्य म्हणजे त्याच्या मनाजोगती दिसेल, तीच तो आपलीशी करतो. मग त्याच्यावर यमाची कां वक्रदृष्टि असेना. पण ती कल्याणप्रद व्हावी असा मात्र त्याचा प्रयत्न असतो. ह्याप्रमाणे जिवंत मनुष्याचे मन सर्वत्र धांवतच असते, (सर्व इच्छित वस्तूंच्या ठिकाणी ते खिळून राहते २.
यदा॒शसा॑ निः॒शसा॑भि॒शसो॑पारि॒म जाग्र॑तो॒ यत् स्व॒पन्तः॑ ।
यत् आशसा निः-शसा अभि-शसा उप-आरिम जाग्रतः यत् स्वपन्तः
त्याच्या आकांक्षा, त्याच्या निराशा, त्याच्या आशेवर होनारे आघात ह्या सर्वांचा त्याला अनुभव येतोच. (म्हणून प्रार्थना हीच कीं) आम्ही जागे असूं किंवा निद्रित असूं; कोणात्याहि अवस्थेंत आमच्याकडून जें कांही घाणेरडे किंवा दुष्कृत्य घडले असेल, त्याचा दोष अग्नि हा आमच्यापासून दूर करो ३.
यदि॑न्द्र ब्रह्मणस्पतेऽभिद्रो॒हं चरा॑मसि ।
यत् इन्द्र ब्रह्मणः पते अभि-द्रोहं चरामसि
हे इन्द्रा, हे ब्रह्मणस्पति, जेव्हां जेव्हां आम्ही मनामध्ये द्वेषबुध्दि बाळगून वर्तन करूं, आणि जे कांही पापकर्म आमच्या हातून होईल, तेव्हां महाज्ञानी जो आंगिरस तो द्वेष्ट्यांच्या आघातापासून आमचे मुक्तता करो ४.
अजै॑ष्मा॒द्यास॑नाम॒ चाभू॒माना॑गसो व॒यम् ।
अजैष्म अद्य असनाम च अभूम अनागसः वयं
पहा, आज आम्ही वाणी तर जिंकली; आमचे उद्दिष्ट आम्ही साध्य केले आणि आमचा निरपराधपणा सिध्द केला. तथापि जागेपणी किंवा झोपेमध्ये जी कांही दुर्वास्ना आमच्या मनांत छपून राहिली असेल, ती पातकी वासना आमच्या शत्रूकडे जावो, आमचा जे द्वेष करीत असतील, त्यांच्याकडे जावो (तिचा दुष्परिणाम) त्यांना भोगावा लातो ५.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६५ (कपोतशांतिसूक्त) ऋषी - कपोत नैर्ऋत : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्
देवाः॑ क॒पोत॑ इषि॒तो यदि॒च्छन् दू॒तो निरृ॑त्या इ॒दं आ॑ज॒गाम॑ ।
देवाः कपोतः इषितः यत् इच्चन् दूतः निः-ऋत्याः इदं आजगाम
विबुधांनो, जो कपोतपक्षी आमच्या (घारा)कडे (कोणी तरी) जो धाडून दिला त्यांत कांही तरी हेतु आहे. तो अवनतीचा दूत अशा दृष्टीने इकडे आला आहे म्हणून त्याला अनुलक्षून आम्ही (देवांचे) अर्कस्तोत्र म्हणूं आणि त्याच्या अमंगलत्वाचे निराकरण करूं; म्हणजे तो आमच्या लोकांना आणि पश्वादिकांना कल्याणप्रदच होईल १.
शि॒वः क॒पोत॑ इषि॒तो नो॑ अस्त्वना॒गा दे॑वाः शकु॒नो गृ॒हेषु॑ ।
शिवः कपोतः इषितः नः अस्तु अनागाः देवाः शकुनः गृहेषु
(जो हा) कपोत आमचेकडे कोणी तरी सोडून दिला आहे, तो आअम्हांला मंगलप्रदच होणार. देवांनो, हा पक्षी आमच्या घरांच्या आंत (येऊन)हि आम्हांला कल्याणकरच होवो. स्तवनप्रिय अग्नि आमचा हविर्भाग ग्रहण करो; म्हणजे त्यायोगाने कपोताच्या दोन पंखांचे, (पंखयुक्त) जे हत्यार ते आम्हांपासून दूर राहील (आमच्याकडे येणार नाही) २.
हे॒तिः प॒क्षिणी॒ न द॑भात्य॒स्मान् आ॒ष्ट्र्यां प॒दं कृ॑णुते अग्नि॒धाने॑ ।
हेतिः पक्षिणी न दभाति अस्मान् आष्ट्र्यां पदं कृणुते अग्नि-धाने
त्याचे पंखरूपी जे हत्यार (बाणाप्रमाणे) आहे त्याची बाधा आम्हांस न होवो. त्याचे पीस अग्निकुण्डाजवळ आष्ट्रीमध्ये (म्हणजे मन्थन काष्टामध्ये) जरी पडले असले तरी ते तेथेच पडून राहो. याप्रमाणे आमच्या धेनूंना आणि सहायक लोकांना तो पक्षी कल्याणकारकच होतो; आणि देवांनो, हा कपोतपक्षी आमचा कांहीएक घातपात न करो ३.
यदुलू॑को॒ वद॑ति मो॒घं ए॒तद्यत् क॒पोतः॑ प॒दं अ॒ग्नौ कृ॒णोति॑ ।
यत् उलूकः वदति मोघं एतत् यत् कपोतः पदं अग्नौ कृणोति
घुबड ओरडत असले तरी ते व्यर्थ ठरो; अथवा हा कपोत जरी अग्निकुण्डाच्या (कठड्या)वर बसला, तरी त्यामुळा आमची कांहीसुध्दां हानि न होवो आणि हा कपोत ज्याचा दूत म्हणून आमच्याकडे पाठविलेला आहे त्या यमाला, त्या मृत्यूलाच हा आमचा प्रणिपात असो ४.
ऋ॒चा क॒पोतं॑ नुदत प्र॒णोदं॒ इषं॒ मद॑न्तः॒ परि॒ गां न॑यध्वम् ।
ऋचा कपोतं नुदत प्र-नोदं इषं मदन्तः परि गां नयध्वं
आतां ऋग्मंत्राचे पठण करून त्या किअपोताला बाहेर हुसकून लावा; त्याला हाकलून तर द्याच आणि उत्साहाने प्रसन्नान्त:करणपूर्वक धेनूंना (इच्छित स्थली) घेऊन चला; आतां सर्व संकटांचा परिहार होवो आणि त्वरेने भरारी मारणारा हा पक्षी आमच्यामध्ये जोमदारपणा शिल्लक ठेवूनच दूर उंच उडून जावो ५.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६६ शत्रुनाशनसूक्त)
ऋषी - ऋषभ वैराज अथवा शाक्वर : देवता - शत्रुनाशन :
ऋ॒ष॒भं मा॑ समा॒नानां॑ स॒पत्ना॑नां विषास॒हिम् ।
ऋषभं मा समानानां स-पत्नानां वि-ससहिं
जे माझ्या बरोबरीचे असतील, त्यामधे (हे देवा) मला अग्रेसर होऊं दे आणि जे माझ्याशी स्पर्धा करतील, माझ्यावर मात करण्याचा प्रयत्न करतील त्यांना मी दडपून टाकीन असे कर; तसेंच शत्रूंचा तर माज्या हातून नि:पात होऊनच मी सर्व सत्ताधीश आणि ज्ञानरूप धेनूंचा अधिपति होईन असे कर १.
अ॒हं अ॑स्मि सपत्न॒हेन्द्र॑ इ॒वारि॑ष्टो॒ अक्ष॑तः ।
अहं अस्मि सपत्न-हा इन्द्रः-इव अरिष्टः अक्षतः
मी माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा नाश केला आहे; आतां इन्द्राप्रमाने मी अप्रतिहत व्हावे, कोणाकडूनहि माझा घात होऊं नये (अशी माझी इच्छा असणारच); पहाक हे माझे सर्व शत्रु येथे माझ्या पायाजवळ हतवीर्य होऊन पडलेले आहेत २.
अत्रै॒व वोऽ॑पि नह्याम्यु॒भे आर्त्नी॑ इव॒ ज्यया॑ ।
अत्र एव वः अपि नह्यामि उभे इति आत्नीरिवेत्यात्नीर्-इव ज्यया
धनुष्याच्या दोरीने त्याचे दोन्ही टोकें ताणून बांधावी त्याप्रमाने ह्याच ठिकाणी मी तुम्हां सर्वांना डांबून ठेवतो. आणि अहो वाचस्पति, तुम्ही त्यांना अशी तंबी द्या की ते माझ्यापुढे इत:पर अगदी नम्रपणाने बोलतील ३.
अ॒भि॒भूर॒हं आग॑मं वि॒श्वक॑र्मेण॒ धाम्ना॑ ।
अभि-भूः अहं आ अगमं विश्व-कर्मेण धाम्ना
सर्वांचा पराभव करणारा असा जो विजयी वीर तो मी-सर्व कांही घडवून आणणार्या अशा माझ्या अंगच्या तेजस्वी सामर्थ्याने आलो आहे; आणि तुमच्या शरीरावरच केवळ नव्हे, तर तुमचे विचार, तुमच्या कार्यपध्दति आणि तुमचे समाज ह्या सर्वांवर मी आपला पगडा आतां ठाम बसविला आहे ४.
यो॒ग॒क्षे॒मं व॑ आ॒दाया॒हं भू॑यासं उत्त॒म आ वो॑ मू॒र्धानं॑ अक्रमीम् ।
योग-क्षेमं वः आदाय अहं भूयासं उत्-तमः आ वः मूर्धानं अक्रमीं
तुमचे सर्व वित्त आणि जीवित माझ्याच हाती आहे, आणि ते स्वाधीन ठेवूनच मी माझ्हे स्थान अत्युच्च ठेवूं शकेन असे होवो; तसेंच प्रसंगी तुमच्या डोक्यावरहि मला पाय द्यावा लागेल, आणि पाण्यातील बेडून जसें केंकाटतात, पाण्यांतूनच जे जसे रेंकतात, त्याप्रमाणे माझ्या पायाखाली केंकाटण्याची पाळी तुम्हांवर यील (म्हणून सांभाळून वागा) ५.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६७ (इंद्रसूक्त) ऋषी - विश्वामित्र गाथिन् आणि जमदग्नि : देवता - ३ - सोम, वरुणादि देवता; अवशिष्ट - इंद्र : छंद - जगती
तुभ्ये॒दं इ॑न्द्र॒ परि॑ षिच्यते॒ मधु॒ त्वं सु॒तस्य॑ क॒लश॑स्य राजसि ।
तुभ्य इदं इन्द्र परि सिच्यते मधु त्वं सुतस्य कलशस्य राजस् इ
हे इन्द्रा, हा मधुर सोमरस तुझ्याप्रीत्यर्थ पिळला आहे. तो रस ज्यामध्ये ओतून ठेवला आहे, त्या कलशाचा अधिपति तूंच आहेस. तर शूर वीरांनी जे परिपूर्ण आहे, असे ऐश्वर्य तूं आम्हांस अर्पन कर; कारण तूंहि तप करून (भयंकर कष्ट करूनच) स्वर्गीय प्रकाश जिंकून घेतलास १.
स्व॒र्जितं॒ महि॑ मन्दा॒नं अन्ध॑सो॒ हवा॑महे॒ परि॑ श॒क्रं सु॒ताँ उप॑ ।
स्वः-जितं महि मन्दानं अन्धसः हवामहे परि शक्रं सुतान् उप
-स्वर्गीय प्रकाश जिंकणारा, मधुर रसाने अत्यंत हृष्ट होणारा असा जो सर्वसमर्थ इन्द्र त्याला रसप्राशनार्थ आम्ही पाचारण करितो. इन्द्रा, येथे ह्या आमच्या यज्ञाकडे लक्ष ठेव आणि इकडे आगमन कर. शत्रूंचा अगदी मोड करून टाकणारा अशा तुज भगवन्ताचीच विनवणी आम्ही करीत असत
सोम॑स्य॒ राज्ञो॒ वरु॑णस्य॒ धर्म॑णि॒ बृह॒स्पते॒रनु॑मत्या उ॒ शर्म॑णि ।
सोमस्य राजः वरुणस्य धर्मणि बृहस्पतेः अनु-मत्याः ओं इति शर्मणि
सोम, राजा वरुण आणि बृहस्पति ह्यांच्या धर्मराज्यांमध्ये म्हणजे त्यांच्या अनुमतीच्या आश्रयाखाली आणि भगवन्ता इन्द्रा, तुझ्याच भजनांत दंग होऊन, हे जगत्कर्त्या, हे नानाविध सृष्टिकर्त्या देवा, मी तुझा प्रसाद म्हणून हा रस प्राशन केला आहे ३.
प्रसू॑तो भ॒क्षं अ॑करं च॒राव् अपि॒ स्तोमं॑ चे॒मं प्र॑थ॒मः सू॒रिरुन् मृ॑जे ।
प्र-सूतः भक्षं अकरं चरौ अपि स्तोमं च इमं प्रथमः सूरिः उत् मृजे
तुझ्या प्रेरणेनेच मी प्रसाद ग्रहण केला; चरुप;ऐकीहि (कांही अंश) घेतला, आणि यज्ञांतील मुख्य किंवा धुरिण म्हणून मी हे स्तोत्र तुजला अर्पण केले; पण हे विश्वामित्रा, हे जमदग्निहो, प्राशन करण्यायोग्य अशा त्या सोमरसाचा कलश घेऊन त्याच वेळी मी तुमच्या गृही तुम्हांकडे आलो होतो ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६८ (वायुसूक्त) ऋषी - अनिल वातायन : देवता - वायु : छंद - त्रिष्टुभ्
वात॑स्य॒ नु म॑हि॒मानं॒ रथ॑स्य रु॒जन्न् ए॑ति स्त॒नय॑न्न् अस्य॒ घोषः॑ ।
वातस्य नु महिमानं रथस्य रुजन् एति स्तनयन् अस्य घोषः
आतां वेगाने धांवणार्या वायूच्या रथाची थोरवी (किती म्हणून वर्णावी?); तो रथ धांवत असतां (वाटेत येणार्या) कोणत्याहि वस्तूला फोडून टाकतो आणि असें होत असतें तेव्हां त्या रथाचा निनाद दूरवर ऐकूं जातो; तो आकाशालाहि भेदून जातो, तसेंच दशदिशा धूसर करून टाकतो आणि पृथ्वीवर धुमश्चक्री घालतांना जिकडे तिकडे धुरळा उडवून देतो १.
सं प्रेर॑ते॒ अनु॒ वात॑स्य वि॒ष्ठा ऐनं॑ गच्छन्ति॒ सम॑नं॒ न योषाः॑ ।
सं प्र ईरते अनु वातस्य वि-स्थाः आ एनं गच्चन्ति समनं न योषाः
ज्या ज्या वस्तु विशेश रीतीने स्थिर नसतात त्या आणि विशेष प्रकाराने स्थिर असतात त्याहि वायूच्या धोरणानेच हलत राहतात. जणों काय समारंभामध्ये मिरविणार्या युवतीच! अशा वस्तूंना (केव्हां केव्हां) बरोबर घेऊन वायुमहाराज रथांतून जातात; कारण ते ह्या भुवनाचे राजे आहेत २.
अ॒न्तरि॑क्षे प॒थिभि॒रीय॑मानो॒ न नि वि॑शते कत॒मच् च॒नाहः॑ ।
अन्तरिक्षे पथि-भिः ईयमानः न नि विशते कतमत् चन अहरिति
अन्तरिक्षामध्ये आपल्या मार्गांनी जात असतां हा वायु एक दिवस देखील कधीं विश्रांति घेत नाही. याप्रमाणेच हा उदकांच सखाच आहे. (कारण उदकामध्ये वायूच हालचाल उत्पन्न करतो.) सृष्टीमध्ये प्रथम उत्पत्ति वायूची; सत्यस्वरूप तोच; पण खरे पाहिलें तर तो कोठे उत्पन्न झाला आणि कोठून आला ते कांहीच समजत नाही ३.
आ॒त्मा दे॒वानां॒ भुव॑नस्य॒ गर्भो॑ यथाव॒शं च॑रति दे॒व ए॒षः ।
आत्मा देवानां भुवनस्य गर्भः यथावशं चरति देवः एषः
हा दिव्य विबुधांचा आत्मा म्हणजे श्वासोच्छवास आहे; सृष्टीचे बीज आहे. हा देवरूप वायु आपल्या इच्छेप्र्माणे वाटेल तिकडे संचार करतो. तसाच त्याचा निनाद मात्र सर्वत्र ऐकूं येतो. पण त्याचे रूप कोणालाहि दिसत नाही; तर अशा वायुदेवाला आपण हविर्भाग अर्पण करून त्याची सेवा करूं या ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६९ (गोसूक्त) ऋषी - शबर काक्षिवत : देवता - गो : छंद - त्रिष्टुभ्
म॒यो॒भूर्वातो॑ अ॒भि वा॑तू॒स्रा ऊर्ज॑स्वती॒रोष॑धी॒रा रि॑शन्ताम् ।
मयः-भूः वातः अभि वातु उस्राः ऊर्जस्वतीः ओषधीः आ रिशन्तां
कल्याणकर वायु, प्रकाशरूप धेनूच्या सन्मुख होऊन त्याच दिशेने वाहत राहो. ओजस्विता उत्पन्न करणार्या औषधीचा धेनु आस्वाद घेवोत; प्राणिमात्रांना पुष्टि देणार्या आणि त्यांचा जीव प्रसन्न करणार्या उदकांचे प्राशन प्राणिमात्र करोत. आपल्या पायांनी हिण्डून दुसर्यास सहाय्य करणार्या या सर्व धेनूंवर, हे रुद्रा, तूं दया कर १.
याः सरू॑पा॒ विरू॑पा॒ एक॑रूपा॒ यासां॑ अ॒ग्निरिष्ट्या॒ नामा॑नि॒ वेद॑ ।
याः स-रूपाः वि-रूपाः एक-रूपाः यासां अग्निः इष्ट्या नामानि वेद
ह्या ज्या धेनू सारख्याच रूपाच्या, भिन्न भिन्न स्वरूपाच्या किंवा अगदी एकाच स्वरूपाचा आहेत, आणि ज्यांची नांवे त्यांना योग्य अशा यज्ञांवरून पडली असतात, पण जी सर्व नांवे अग्नीच जाणतो; तथापि ज्यांची सर्व व्यवस्था आंगिरसांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर घडवून आणली, (म्हणजे ज्यांना आंगिरसांनी बन्धमुक्त केले) त्या धेनूंसाठी, हे पर्जन्या, तूं वृष्टिरूप असा उत्कृष्ट सुखाश्रय अर्पण कर २.
या दे॒वेषु॑ त॒न्व१ं ऐर॑यन्त॒ यासां॒ सोमो॒ विश्वा॑ रू॒पाणि॒ वेद॑ ।
याः देवेषु तन्वं ऐरयन्त यासां सोमः विश्वा रूपाणि वेद
ज्यांनी आपल्य शरीर देवकार्याकडे लाविले, ज्यांच्या सर्व स्वरूपांचे (वास्तविक) ज्ञान सोमालाच असतेम अशा त्या (स्वर्गीय) धेनु आमच्यासाठी दुग्धभाराने परिपूर्ण भरून जाऊन आम्हांला त्यांनी प्रजावान् (संततियुक्त)हि केले; तर इन्द्रा, अशा धेनूंना आमच्या गृहांत प्रविष्ट कर ३.
प्र॒जाप॑ति॒र्मह्यं॑ ए॒ता ररा॑णो॒ विश्वै॑र्दे॒वैः पि॒तृभिः॑ संविदा॒नः ।
प्रजापतिः मह्यं एताः रराणः विश्वैः देवैः पितृ-भिः सम्-विदानः
हे प्रजापाते, तूं ह्या धेनू मला अर्पण केल्यावर हे वरदान अखिल विबुधांना, आणि पितरांनाहि तूं विदित करणारच; अशा ह्या धेनूंना त्या कल्याणप्रद आहेत आणि आमच्या गृहांमध्ये त्यांना तूं प्रविष्ट करून दिले आहेस म्हणून आतां त्यांच्या आणि आमच्याहि प्रजेशी आमचा सहवास घडेल ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७० (सूर्यसूक्त) ऋषी - विभ्राज् सौर्य : देवता - सूर्य : छंद - ४ - आस्तारपंक्ति; अवशिष्ट - जगती
वि॒भ्राड् बृ॒हत् पि॑बतु सो॒म्यं मध्व् आयु॒र्दध॑द्य॒ज्ञप॑ता॒व् अवि॑ह्रुतम् ।
वि-भ्राट् बृहत् पिबतु सोम्यं मधु आयुः दधत् यज-पतौ अवि-हुतं
हा तेजोराशि सूर्य, अत्यंत मधुर असे हे सोमपेय प्राशन करो; कारण जे कधी कमी होणार नाही असे आयुष्य यज्ञकर्त्या यजमानाला हा अर्पण करितो; (ईश्वराच्या) प्रेरक शक्तीने ह्याला गति प्राप्त होते; त्यामुळे हा आपण होऊन सर्वांचे रक्षण करितो आणि प्राण्यांचे पावन करून नानाविध प्रकारांनी आपल्य तेज प्रकट करतो १.
वि॒भ्राड् बृ॒हत् सुभृ॑तं वाज॒सात॑मं॒ धर्म॑न् दि॒वो ध॒रुणे॑ स॒त्यं अर्पि॑तम् ।
वि-भ्राट् बृहत् सु-भृतं वाज-सातमं धर्मं दिवः धरुणे सत्यं अर्पितं
हा पहा तेजोराशि सूर्य; ह्याने उत्कृष्ट सत्त्वसामर्थ्य प्राप्त करून देणार्या श्रेष्ठ सत्याचाच संचय करून त्याने सर्वाधार जे आकाश त्याच्या सर्वांना आधारभूत अशा अबाधित नियमांमध्ये सांठवून ठेविले. म्हणून हा शत्रुनाशक तसाच तमोनाहकहि ठरला; आणि हा असुरांचा नाशक, त्याचप्रमाने भक्तांच्या प्रतिस्पर्ध्यांचाहि नाश करणारा असल्याने दस्यूंचा अगदी पार नायनाट करणारा अशा प्रकारचा प्रकाश हा उत्पन्न करतो २.
इ॒दं श्रेष्ठं॒ ज्योति॑षां॒ ज्योति॑रुत्त॒मं वि॑श्व॒जिद्ध॑न॒जिदु॑च्यते बृ॒हत् ।
इदं श्रेष्ठं ज्योतिषां ज्योतिः उत्-तमं विश्व-जित् धन-जित् उच्यते बृहत्
सर्व प्रकारच्या प्रकाशगोलांमध्ये हाच तेजोमूर्ति सूर्य उत्कृष्ट आहे; म्हणूनच ह्याला सर्वविजयी, आणि उत्तमोत्तम धनंजय असें म्हणतात. सर्व जगाला प्रकाशाने भरून टाकून स्वत: प्रकाशपूर्ण असणारा असा हा सूर्यच धर्शनयोग्य आहे; अक्षय तेजस्विता आणि शतूंना दडपणारे सामर्थ्य ह्यांचा अचाट विस्तार हाच करतो ३.
वि॒भ्राज॒ञ् ज्योति॑षा॒ स्व१रग॑च्छो रोच॒नं दि॒वः ।
वि-भ्राजं ज्योतिषा स्वः अगच्चः रोचनं दिवः
आपल्या तेजाने विशेषच प्रकाशणार्या ह्या सूर्याने आकाशाची जी झळाळी किंवा दिव्य तेज तेच आपलेले केले; आणि म्हणूनच ही सर्व भुवने त्याने आपल्या सर्व कार्यक्षम शक्तीने आणि सर्वगामी सामर्थ्याने परिपूर्ण भरून सोडली ४.
ॐ तत् सत् |