PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १५१ ते १६०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५१ (श्रद्धासूक्त)

ऋषी - श्रद्धा कामायनी : देवता - श्रद्धा : छंद - अनुष्टुभ्


श्र॒द्धया॒ग्निः सं इ॑ध्यते श्र॒द्धया॑ हूयते ह॒विः ।
श्र॒द्धां भग॑स्य मू॒र्धनि॒ वच॒सा वे॑दयामसि ॥ १ ॥

श्रद्धया अग्निः सं इध्यते श्रद्धया हूयते हविः
श्रद्धां भगस्य मूर्धनि वचसा आ वेदयामसि ॥ १ ॥

अग्नि (यथायोग्यपणे) प्रज्वलित होतो तो श्रद्धेनेच होतो. आणि हविर्भागहि पण (यथायोग्यपणे अर्पावयाचा तो) श्रद्धेनेच अर्पण होतो. कोणाचे केवढेंहि भाग्य असले तरी "श्रद्धा" त्या भाग्याच्या शिरोभागीच आहे हे आम्ही (अधिकृत) वाणीने सर्वांना निवेदन करतो १.


प्रि॒यं श्र॑द्धे॒ दद॑तः प्रि॒यं श्र॑द्धे॒ दिदा॑सतः ।
प्रि॒यं भो॒जेषु॒ यज्व॑स्व् इ॒दं म॑ उदि॒तं कृ॑धि ॥ २ ॥

प्रियं श्रद्धे ददतः प्रियं श्रद्धे दिदासतः
प्रियं भोजेषु यज्वसु इदं मे उदितं कृधि ॥ २ ॥

हे श्रद्धे, जो दान करतो त्याचे तूं प्रियच करतेस (त्याला जें इष्ट तेंच तूं करतेस,) तसेंच दान करण्याची ज्याची इच्छा आहे, त्याचेहि हे श्रधे, तूं प्रियच करतेस; तर यज्ञ करण्यार्‍या ह्या उदार पुरुषांना प्रिय असें जे मी सांगितले तेंहि तूं पूर्ण कर २.


यथा॑ दे॒वा असु॑रेषु श्र॒द्धां उ॒ग्रेषु॑ चक्रि॒रे ।
ए॒वं भो॒जेषु॒ यज्व॑स्व् अ॒स्माकं॑ उदि॒तं कृ॑धि ॥ ३ ॥

यथा देवाः असुरेषु श्रद्धां उग्रेषु चक्रिरे
एवं भोजेषु यज्व-सु अस्माकं उदितं कृधि ॥ ३ ॥

ज्याप्रमाणे (न्याय) निष्ठुर आणि आत्मबलाढ्य अशा महाविभूतिंवर स्वत: देवांनीच श्रद्धा ठेवली, (तशीच आम्हींहि ठेवतो); तर यज्ञ करणारे जे हे उदार यज्ञकर्ते त्यांच्याविषयीचे आमचे मागणे तूं पूर्ण कर ३.


श्र॒द्धां दे॒वा यज॑माना वा॒युगो॑पा॒ उपा॑सते ।
श्र॒द्धां हृ॑द॒य्य१याकू॑त्या श्र॒द्धया॑ विन्दते॒ वसु॑ ॥ ४ ॥

श्रद्धां देवाः यजमानाः वायु-गोपाः उप आसते
श्रद्धां हृदय्यया आकूत्या श्रद्धया विन्दते वसु ॥ ४ ॥

देव आणि वायूने रक्षण केलेले जे यज्ञकर्ते (यजमान) ते श्रद्धेची उपासना करतात. (पण एक गोष्ट ध्यानात धरली पाहिजे ती ही कीं) अशी उपासना ते अंत:करणाच्या अगदी दृढ निश्चयाने करितात; आणि मग जे उत्कृष्ट अभीष्ट ते श्रद्धेने प्राप्त होते ४.


श्र॒द्धां प्रा॒तर्ह॑वामहे श्र॒द्धां म॒ध्यंदि॑नं॒ परि॑ ।
श्र॒द्धां सूर्य॑स्य नि॒म्रुचि॒ श्रद्धे॒ श्रद्धा॑पये॒ह नः॑ ॥ ५ ॥

श्रद्धां प्रातः हवामहे श्रद्धां मध्यन्दिनं परि
श्रद्धां सूर्यस्य नि-म्रुचि श्रद्धे श्रत् धापय इह नः ॥ ५ ॥

प्रात:काळी आम्ही "श्रद्धेला" हांक मारतो, माध्याह्न काळींहि पण "श्रद्धे"लाच पाचारण करितो; आणि सूर्यास्ताच्या वेळीं देखील श्रद्धेचा धांवा करतो; तर हे श्रद्धे, तूं आमच्यामध्ये "श्रद्धा"च उत्पन्न कर ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५२ (इंद्रसूक्त)

ऋषी - शास भारद्वाज : देवता - इंद्र : छंद - अनुष्टुभ्


शा॒स इ॒त्था म॒हाँ अ॑स्यमित्रखा॒दो अद्‌भु॑तः ।
न यस्य॑ ह॒न्यते॒ सखा॒ न जीय॑ते॒ कदा॑ च॒न ॥ १॥

शासः इत्था महान् असि अमित्र-खादः अद्भुतः
न यस्य हन्यते सखा न जीयते कदा चन ॥ १ ॥

विश्वाचा श्रेष्ठ असा शास्ता तूं ह्याकरितां झाला आहेस, की आमचे जे शत्रु आहेत त्यांचा तूं आश्चर्यकारक रीतीने पार फडशा उडवितोस; म्हणून तुझा आवडता जो भक्त तो कोणाकडूनहि मारला जात नाही किंवा त्याला कोणी केव्हांहि जिंकू शकत नाही. १.


स्व॒स्ति॒दा वि॒शस्पति॑र्वृत्र॒हा वि॑मृ॒धो व॒शी ।
वृषेन्द्रः॑ पु॒र ए॑तु नः सोम॒पा अ॑भयंक॒रः ॥ २ ॥

स्वस्ति-दाः विशः पतिः वृत्र-हा वि-मृधः वशी
वृषा इन्द्रः पुरः एतु नः सोम-पाः अभयम्-करः ॥ २ ॥

इन्द्र हा कल्याणप्रद आहे लोक-समाजाचा नाथ आहे वृत्राला ठार मारणारा त्याचप्रमाणे युद्ध करणार्‍या योद्ध्‌यांना आपल्या कह्यांत ठेवणारा आहे, तर असा हा वीरधुरीण इन्द्र आमचा मार्गदर्शक होवो. तो सोमप्रिय इन्द्र भक्तांना कधींहि भयंकर वाटत नाही. २.


वि रक्षो॒ वि मृधो॑ जहि॒ वि वृ॒त्रस्य॒ हनू॑ रुज ।
वि म॒न्युं इ॑न्द्र वृत्रहन्न् अ॒मित्र॑स्याभि॒दास॑तः ॥ ३ ॥

वि रक्षः वि मृधः जहि वि वृत्रस्य हनूइति रुज
वि मन्युं इन्द्र वृत्र-हन् अमित्रस्य अभि-दासतः ॥ ३ ॥

राक्षसांना मारून टाक, आणि वृत्राचा जबडा उखळून टाक. हे वृत्रनाशना इन्द्रा, जो आमचा नाश करण्यासाठी टपलेला असतो, अशा आमच्या शत्रूचा जोष होता की नव्हता असा करून टाक. ३.


वि न॑ इन्द्र॒ मृधो॑ जहि नी॒चा य॑च्छ पृतन्य॒तः ।
यो अ॒स्माँ अ॑भि॒दास॒त्यध॑रं गमया॒ तमः॑ ॥ ४ ॥

वि नः इन्द्र मृधः जहि नीचा यच्च पृतन्यतः
यः अस्मान् अभि-दासति अधरं गमय तमः ॥ ४ ॥

इन्द्रा, आमच्याशी युद्ध करणार्‍याचा नि:पात कर; आमच्यावर सैन्यासह चाल करून येणार्‍यांना धुळीस मिळव, जो आमचा घात करण्याला टपला असेल त्या तमोमय मनाच्या दुष्टाला खाली दडपून टाक. ४.


अपे॑न्द्र द्विष॒तो मनोऽ॑प॒ जिज्या॑सतो व॒धम् ।
वि म॒न्योः शर्म॑ यच्छ॒ वरी॑यो यवया व॒धम् ॥ ५ ॥

अप इन्द्र द्विषतः मनः अप जिज्यासतः वधं
वि मन्योः शर्म यच्च वरीयः यवय वधम् ॥ ५ ॥

आमचा द्वेष करणार्‍याचे मन दुसरीकडे फिरव, आमचा घात करूं पाहणाराचे आणि तसेंच त्याच्या हत्याराचे तुकडे उडव; प्रबलांच्या रोषापासून बचाव व्हावा म्हणून आम्हांला तुझा उत्कृष्ट सुखकारक आश्रय दे आणि (शत्रूचे) हत्यार मोडून त्याचे तुकडे करून फेकून दे. ५.


सत्संगधारा - ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५३ (इंद्रसूक्त)

ऋषी - इंद्रमातृ देवभगिनी : देवता - इंद्र : छंद - गायत्री


ई॒ङ्खय॑न्तीरप॒स्युव॒ इन्द्रं॑ जा॒तं उपा॑सते ।
भे॒जा॒नासः॑ सु॒वीर्य॑म् ॥ १॥

ईङ्खयन्तीः अपस्युवः इन्द्रं जातं उप आसते
भेजानासः सु-वीर्यम् ॥ १ ॥

आपल्या कार्यामध्ये तत्पर राहून इकडे तिकडे लगबगीने धांवणार्‍या आणि त्या महावीर्यशाली इन्द्राच्या सेवेसाठी उत्सुक अशा भक्तांच्या श्रेणि इन्द्र प्रकट होतांच त्याची सेवा करू लागल्या. १.


त्वं इ॑न्द्र॒ बला॒दधि॒ सह॑सो जा॒त ओज॑सः ।
त्वं वृ॑ष॒न् वृषेद॑सि ॥ २ ॥

त्वं इन्द्र बलात् अधि सहसः जातः ओजसः
त्व वृषन् वृषा इत् असि ॥ २ ॥

हे इन्द्रा, शत्रूंना दडपून टाकणारे बल ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी असेल, त्या सर्वांच्या बलापेक्षां आणि ओजस्वितेपेक्षां तूं वरचढ आहेस. हे बीरा तू खरोखरच वीरधुरीण आहेस. २.


त्वं इ॑न्द्रासि वृत्र॒हा व्य१न्तरि॑क्षं अतिरः ।
उद्द्यां अ॑स्तभ्ना॒ ओज॑सा ॥ ३ ॥

त्वं इन्द्र असि वृत्र-हा वि अन्तरिक्षं अतिरः
उत् द्यां अस्तभ्नाः ओजसा ॥ ३ ॥

हे इंद्रा, वृत्राला ठार मारणारा तूंच आहेस. अन्तरिक्षाला तूं पसरून दिलेस आणि नक्षत्रमंडलाला तूंच स्थिर केलेस. ३.


त्वं इ॑न्द्र स॒जोष॑सं अ॒र्कं बि॑भर्षि बा॒ह्वोः ।
वज्रं॒ शिशा॑न॒ ओज॑सा ॥ ४ ॥

त्वं इन्द्र स-जोषसं अर्कं बिभर्षि बाह्वोः
वज्रं शिशानः ओजसा ॥ ४ ॥

इन्द्रा, आपल्याविषयीचे प्रेमळ अर्कस्तोत्र जसे तूं (हृदयांत) वागवतोस, त्याप्रमाणे तेजाने लकलकणारे असे वज्रहि तूं आपल्या भुजदण्डावर वागवतोस. ४


त्वं इ॑न्द्राभि॒भूर॑सि॒ विश्वा॑ जा॒तान्योज॑सा ।
स विश्वा॒ भुव॒ आभ॑वः ॥ ५ ॥

त्वं इन्द्र अभि-भूः असि विश्वा जातानि ओजसा
सः विश्वा भुवः आ अभवः ॥ ५ ॥

जें जें कांही उत्पन्न झालेले आहे त्या सर्वांना तूं आपल्या तेजाने पराभूत केलेस आणि असा तूं सर्व भुवनाला पुरून उरला आहेस. ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५४ (मृतगती-प्रार्थना, पालुपदसूक्त)

ऋषी - यमी वैवस्वती : देवता - भाववृत्त : छंद - अनुष्टुभ्


सोम॒ एके॑भ्यः पवते घृ॒तं एक॒ उपा॑सते ।
येभ्यो॒ मधु॑ प्र॒धाव॑ति॒ तांश्चि॑दे॒वापि॑ गच्छतात् ॥ १॥

सोमः एकेभ्यः पवते घृतं एके उप आसते
येभ्यः मधु प्र-धावति तान् चित् एव अपि गच्चतात् ॥ १ ॥

कांही विभूतींच्या प्रित्यर्थ येथे सोमरसाचा पावन प्रवाह वाहात असतो. दुसर्‍या कांही विभूति घृताहुतींची अपेक्षा करतात. तर कांही दिव्यजन असे आहेत की त्यांच्यासाठी मध अर्पण होत असतो. तर हा (पुण्यशील प्राणी) त्या (मधुप्रियविभूति) कडेच जावो. १.


तप॑सा॒ ये अ॑नाधृ॒ष्यास्तप॑सा॒ ये स्वर्य॒युः ।
तपो॒ ये च॑क्रि॒रे मह॒स्तांश्चि॑दे॒वापि॑ गच्छतात् ॥ २ ॥

तपसा ये आनाधृष्याः तपसा ये स्वः ययुः
तपः ये चक्रिरे महः तान् चित् एव अपि गच्चतात् ॥ २ ॥

जे आपल्या तपोबलाने अप्रतिहत झाले आहेत, जे तपाच्या योगाने स्वर्गाला गेले आहेत आणि ज्यांनी प्रखर तपच केले त्यांच्याकडेच हा गमन करो. २.


ये युध्य॑न्ते प्र॒धने॑षु॒ शूरा॑सो॒ ये त॑नू॒त्यजः॑ ।
ये वा॑ स॒हस्र॑दक्षिणा॒स्तांश्चि॑दे॒वापि॑ गच्छतात् ॥ ३ ॥

ये युध्यन्ते प्र-धनेषु शूरासः ये तनू-त्यजः
ये वा सहस्र-दक्षिणाः तान् चित् एव अपि गच्चतात् ॥ ३ ॥

जे युद्धामध्ये झुंजत असतात, जे शूर वीर युद्धांत आपले देह अर्पण करितात, अथवा जे यज्ञांत सहस्रावधि दाने देतात अशांना जो लोक प्राप्त होतो, तेथेच हा गमन करो. ३.


ये चि॒त् पूर्व॑ ऋत॒साप॑ ऋ॒तावा॑न ऋता॒वृधः॑ ।
पि॒तॄन् तप॑स्वतो यम॒ तांश्चि॑दे॒वापि॑ गच्छतात् ॥ ४ ॥

ये चित् पूर्वे ऋत-सापः ऋत-वानः ऋता-वृधः
पितॄन् तपस्वतः यम तान् चित् एव अपि गच्चतात् ॥ ४ ॥

पूर्वीच्या काळी ज्यांनी सद्धर्माचे आचरण केले, ज्यांना धर्मच प्रिय होता आणि ज्यांनी सद्धर्माचा उत्कर्ष केला (आणि धर्माचरणाने जे उत्कर्ष पावले) त्या तपोनिष्ठ पितरांकडे, हे यमा, त्यांच्याकडे हा (प्राणी) गमन करो. ४.


स॒हस्र॑णीथाः क॒वयो॒ ये गो॑पा॒यन्ति॒ सूर्य॑म् ।
ऋषी॒न् तप॑स्वतो यम तपो॒जाँ अपि॑ गच्छतात् ॥ ५ ॥

सहस्र-नीथाः कवयः ये गोपायन्ति सूर्यं
ऋषीन् तपस्वतः यम तपः-जान् अपि गच्चतात् ॥ ५ ॥

जे प्रतिभासंपन्न ज्ञानी सहस्त्रावधि प्रकारांच्या मार्गांनी सूर्याच्या उपासनेचे पालन करितात, त्या तपोनिष्ठ ऋषींकडेच (त्याच तप:प्रभावी महात्म्यांकडे) हे यमा, हा (प्राणी) गमन करो. ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५५ (अश्रीनाशनसूक्त)

ऋषी - शिरिम्बिठ भारद्वाज : देवता - १-४ - अलक्ष्मीघ्न २-३ - बह्मस्पति; ५ - विश्वेदेव : छंद - अनुष्टुभ्


अरा॑यि॒ काणे॒ विक॑टे गि॒रिं ग॑च्छ सदान्वे ।
शि॒रिम्बि॑ठस्य॒ सत्व॑भि॒स्तेभि॑ष् ट्वा चातयामसि ॥ १॥

अरायि काणे वि-कटे गिरिं गच्च सदान्वे
शिरिम्बिठस्य सत्व-भिः तेभिः त्वा चातयामसि ॥ १ ॥

हे दुर्भगे, डोळे तिरकस करून पाहणारी, लंगड्या पायाची आणि सदासर्वदा भेसूर आवाज काढणारी अशा हे दुर्भगे, चल चालती हो. गिरिकंदरांत जा. येथून काळे कर. शिरिंबिठाच्या प्रभावशाली तेजाने आम्ही आतां तुला हाकलून देणारच. १.


च॒त्तो इ॒तश्च॒त्तामुतः॒ सर्वा॑ भ्रू॒णान्या॒रुषी॑ ।
अ॒रा॒य्यं ब्रह्मणस्पते॒ तीक्ष्ण॑शृण्गोदृ॒षन्न् इ॑हि ॥ २ ॥

चत्तो इति इतः चत्ता अमुतः सर्वा भ्रूणान्यि आरुषी
अराय्यं ब्रह्मणः पते तीक्ष्ण-शृङ्ग उत्-ऋषन् इहि ॥ २ ॥

-तुझे येथून उच्चाटन करणार आणि तेथूनहि उच्चटन करणार. गर्भांतील अंकुराप्रमाने कोंवळ्या बालकांना हे दुष्टे, तूं मारून टाकतेस काय ? थांब, आता तुझे पार निर्दलनच करतो. हे तीक्ष्ण आयुधांच्या ब्रह्मणस्पते देवा, तूं या दुष्ट नीच अशायीला भोसकून ठार करून पुढे जा. २.


अ॒दो यद्दारु॒ प्लव॑ते॒ सिन्धोः॑ पा॒रे अ॑पूरु॒षम् ।
तदा र॑भस्व दुर्हणो॒ तेन॑ गच्छ परस्त॒रम् ॥ ३ ॥

अदः यत् दारु प्लवते सिन्धोः पारे अपुरुषं
तत् आ रभस्व दुर्हनो इतिदुः-हनो तेन गच्च परः-तरम् ॥ ३ ॥

-तो पहा एक लांकडाचा ओंडका समुद्राच्या त्या बाजूकडे तरंगत आहे, त्याच्यावर कोणी मनुष्य नाही, तर दुष्टे दुर्भगे (तुला जीव बचावून जावयाचे असेल तर) त्या ओंड्यक्याला बिलग आणि समुद्राच्या पलीकडे चालती हो कशी. ३.


यद्ध॒ प्राची॒रज॑ग॒न्तोरो॑ मण्डूरधाणिकीः ।
ह॒ता इन्द्र॑स्य॒ शत्र॑वः॒ सर्वे॑ बुद्बु॒दया॑शवः ॥ ४ ॥

यत् ह प्राचीः अजगन्त उरः मण्डूर-धाणिकीः
हताः इन्द्रस्य शत्रवः सर्वे बुद्बुद-याशवः ॥ ४ ॥

तुम्ही छाती काढून गुरगुरत ऐटीने पुढे चालल्या आहांत; पण (ध्यानांत धरा की) इन्द्राच्या सर्व शत्रूंची चैनबाजी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाने तत्काळ नष्ट झाली आणि ते अगदी ठार मारले गेले. ४.


परी॒मे गां अ॑नेषत॒ पर्य॒ग्निं अ॑हृषत ।
दे॒वेष्व॑क्रत॒ श्रवः॒ क इ॒माँ आ द॑धर्षति ॥ ५ ॥

परि इमे गां अनेषत परि अग्निं अहृषत
देवेषु अक्रत श्रवः कः इमान् आ दधर्षति ॥ ५ ॥

-(जे इन्द्राचे भक्त होते, त्या) भक्तांनी गाय (वांचवून) आणली, भूमि जिंकून घेतली, यज्ञासाठी अग्नि चोहोंकडे यथायोग्य रीतीने फिरविला आणि दिव्यजनांमध्ये (अग्नीचे) यश प्रसृत केले, तर अशा भक्तांवर कोण चढाई करूं शकेल. ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५६ (अग्निसूक्त)

ऋषी - केतु आग्नेय : देवता - अग्नि : छंद - गायत्री


अ॒ग्निं हि॑न्वन्तु नो॒ धियः॒ सप्तिं॑ आ॒शुं इ॑वा॒जिषु॑ ।
तेन॑ जेष्म॒ धनं॑-धनम् ॥ १॥

अग्निं हिन्वन्तु नः धियः सप्तिं आशुम्-इव आजिषु
तेन जेष्म धनम्-धनम् ॥ १ ॥

युद्धामध्ये जसा युद्धोत्सुक वेगवान्‌ अश्व भर धौशाने पुढे सोडतात, त्याप्रमाणे आम्ही केलेल्या ध्यानपूर्वक स्तुति अग्नीला हलवून येथे घेऊन येवोत; कारण त्या योगानेच आम्ही प्रत्येक झटापटीत यशस्वी हो‍ऊं १.


यया॒ गा आ॒करा॑महे॒ सेन॑याग्ने॒ तवो॒त्या ।
तां नो॑ हिन्व म॒घत्त॑ये ॥ २ ॥

यया गाः आकरामहे सेनया अग्ने तव ऊत्या
तां नः हिन्व मघत्तये ॥ २ ॥

-ज्या ध्यानभक्तीच्या योगाने तुझ्या सहाय्याच्या जोरावर, आम्ही आमच्या सेनेच्या बलाने तुझ्या धेनूंना आमच्या हस्तगत करून घेतले, तशाच ध्यान भक्तीकडे आमची प्रेरणा कर. आम्ही तुझा वरप्रसाद मिळवावा आणि इतरांना (योग्य) देणगी द्यावी म्हणून प्रेरणा कर २.


आग्ने॑ स्थू॒रं र॒यिं भ॑र पृ॒थुं गोम॑न्तं अ॒श्विन॑म् ।
अ॒ङ्धि खं व॒र्तया॑ प॒णिम् ॥ ३ ॥

आ अग्ने स्थूरं रयिं भर पृथुं गो--मन्तं अश्विनं
अङ्धि खं वर्तय पणिम् ॥ ३ ॥

-अग्नि आम्हांला असे ऐश्वर्य दे की ते अचल, विशाल (प्रकाश) धेनुयुक्त आणि अश्वयुक्त असे असेल आणि त्याकरितां हे देवा, तूं अन्तराळ (पर्जन्याने) आणि कंजूषांची बुद्धि पालटून ते औदार्याने भरगच्च करून टाक ३.


अग्ने॒ नक्ष॑त्रं अ॒जरं॒ आ सूर्यं॑ रोहयो दि॒वि ।
दध॒ज्ज्योति॒र्जने॑भ्यः ॥ ४ ॥

अग्ने नक्षत्रं अजरं आ सूर्यं रोहयः दिवि
दधत् ज्योतिः जनेभ्यः ॥ ४ ॥

हे अग्नि, जो स्वत: अजरामर नक्षत्ररूप आहे असा सूर्य तूंच आकाशांत स्थापन केलास; आणि सर्व मनुष्यांना प्रकाश मिळेल असें केलेस ४.


अग्ने॑ के॒तुर्वि॒शां अ॑सि॒ प्रेष्ठः॒ श्रेष्ठ॑ उपस्थ॒सत् ।
बोधा॑ स्तो॒त्रे वयो॒ दध॑त् ॥ ५ ॥

अग्ने केतुः विशां असि प्रेष्ठः श्रेष्ठः उपस्थ-सत्
बोध स्तोत्रे वयः दधत् ॥ ५ ॥

हे अग्नि, तूं मनुष्यमात्राचा अत्यंत प्रियकर आणि वरिष्ठ असा प्रकाशध्वजच आहेस. तर स्वस्थानी अधिष्टित हो‍ऊन आणि स्तोतृजनांच्या अंत:करणांत उत्साह उत्पन्न करून तूं आमची सेवा मान्य करून घे ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५७ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - भुवन आप्त्य अथवा साधन भौवन : देवता - विश्वेदेव : छंद - द्विपदा, अनुष्टुभ्


इ॒मा नु कं॒ भुव॑ना सीषधा॒मेन्द्र॑श्च॒ विश्वे॑ च दे॒वाः ॥ १॥

इमा नु कं भुवना सीसधाम इन्द्रः च विश्वे च देवाः ॥ १ ॥

ही सर्व भुवने आम्ही सहज संपादन करूं; कारण इन्द्र आणि विश्वदेव हे आतां आमचे आहेत १.


य॒ज्ञं च॑ नस्त॒न्वं च प्र॒जां चा॑दि॒त्यैरिन्द्रः॑ स॒ह ची॑क्.ल्पाति ॥ २ ॥

यजं च नः तन्वं च प्र-जां च आदित्यैः इन्द्रः सह चीक्‌ऌपाति ॥ २ ॥

आमचा यज्ञ, आमचा देह, आमचे पुत्र आणि प्रजा ह्यांना इन्द्र हा आदित्यांसह येऊन परिपूर्णता आणो २.


आ॒दि॒त्यैरिन्द्रः॒ सग॑णो म॒रुद्‌भि॑र॒स्माकं॑ भूत्ववि॒ता त॒नूना॑म् ॥ ३ ॥

आदित्यैः इन्द्रः स-गणः मरुत्-भिः अस्माकं भूतु अविता तनूनाम् ॥ ३ ॥

आपल्या मरुतांसह, अनुयायांसह इन्द्र येथे आगमन करून आम्हां सर्वांच्या देवांचा प्रतिपालक होवो ३.


ह॒त्वाय॑ दे॒वा असु॑रा॒न् यदाय॑न् दे॒वा दे॑व॒त्वं अ॑भि॒रक्ष॑माणाः ॥ ४ ॥

हत्वाय देवाः असुरान् यत् आयन् देवाः देव-त्वं अभि-रक्षमाणाः ॥ ४ ॥

स्वत:ला असुर म्हणविणार्‍या राक्षसांना देवांनी मारून टाकून जेव्हां ते परत आले, तेव्हांच ते आपल्या देवत्वांचे रक्षण करूं शकले ४.


प्र॒त्यञ्चं॑ अ॒र्कं अ॑नय॒ञ् छची॑भि॒रादित् स्व॒धां इ॑षि॒रां पर्य॑पश्यन् ॥ ५ ॥

प्रत्यचं अर्कं अनयन् शचीभिः आत् इत् स्वधां इषिरां परि अपश्यन् ॥ ५ ॥

तसेंच त्यांनी आपल्या दैवी शक्तींनी भक्तांच्या अर्कस्तोत्रांना योग्य वळण लाविले आणि नंतर त्यांनी आपल्या स्वत;च्या उत्साहवर्ध (आवेशपूर्ण) पद्धतीकडे लक्ष पुरविले ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५८ (सूर्यसूक्त)

ऋषी - चक्षु सौर्य : देवता - सूर्य : छंद - स्वराज, गायत्री


सूर्यो॑ नो दि॒वस्पा॑तु॒ वातो॑ अ॒न्तरि॑क्षात् ।
अ॒ग्निर्नः॒ पार्थि॑वेभ्यः ॥ १॥

सूर्यः नः दिवः पातु वातः अन्तरिक्षात्
अग्निः नः पार्थिवेभ्यः ॥ १ ॥

आकाशांत असतां तेथूनच आमचे रक्षण करो; तसाच वायु हा अन्तरिक्षांतून रक्षण करो आणि अग्नि हाहि भूप्रदेशांतून रक्षण करो १.


जोषा॑ सवित॒र्यस्य॑ ते॒ हरः॑ श॒तं स॒वाँ अर्ह॑ति ।
पा॒हि नो॑ दि॒द्युतः॒ पत॑न्त्याः ॥ २ ॥

जोष सवितः यस्य ते हरः शतं सवान् अर्हति
पाहि नः दिद्युतः पतन्त्याः ॥ २ ॥

हे जगत्‌प्रेरका सवितृदेवा, तूं प्रसन्न हो; ज्या तुझ्या तेजाच्या समूहासाठी शेकडो सोमसवने केली तरी कमीच, असा तूं भूमीवर कोसळणार्‍या विद्युल्लतेपासून आमचे रक्षण कर २.


चक्षु॑र्नो दे॒वः स॑वि॒ता चक्षु॑र्न उ॒त पर्व॑तः ।
चक्षु॑र्धा॒ता द॑धातु नः ॥ ३ ॥

चक्षुः नः देवः सविता चक्षुः नः उत पर्वतः
चक्षुः धाता दधातु नः ॥ ३ ॥

जगत्‌प्रेरक सविता आम्हांला उत्कृष्टपणे पाहूं शकेल असा (ज्ञान) नेत्र देवो ३.


चक्षु॑र्नो धेहि॒ चक्षु॑षे॒ चक्षु॑र्वि॒ख्यै त॒नूभ्यः॑ ।
सं चे॒दं वि च॑ पश्येम ॥ ४ ॥

चक्षुः नः धेहि चक्षुषे चक्षुः वि-ख्यै तनूभ्यः
सं च इदं वि च पश्येम ॥ ४ ॥

आम्ही विवेकाने निरखून पहावे म्हणूनच आम्हांला असा नेत्र दे. आम्ही विशिष्ट तर्‍हेने सूक्ष्म विचाराने पाहावे म्हणून आम्हां सर्वांच्या देहांच्या ठिकाणी ज्ञानदृष्टि ठेव, म्हणजे आम्ही हे सर्व जगत्‌ योग्य दृष्टीने पाहूं आणि स्वानुभवाने जाणून घेऊं ४.


सु॒सं॒दृशं॑ त्वा व॒यं प्रति॑ पश्येम सूर्य ।
वि प॑श्येम नृ॒चक्ष॑सः ॥ ५ ॥

सु-सन्दृशं त्वा वयं प्रति पश्येम सूर्य
वि पश्येम नृ-चक्षसः ॥ ५ ॥

हे सूर्या, तूं अत्यंत दर्शनीय आहेस आणि आम्ही जरी मानवी नेत्रांनी पाहणारे असलो, तरी तुजला येथे योग्य रीतीन अवलोकन करावे असें तू कर ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५९ (सपत्नी नाशनसूक्त)

ऋषी - शची पौलोमी : देवता - आत्मस्तुती : छंद - अनुष्टुभ्


उद॒सौ सूर्यो॑ अगा॒दुद॒यं मा॑म॒को भगः॑ ।
अ॒हं तद्वि॑द्व॒ला पतिं॑ अ॒भ्यसाक्षि विषास॒हिः ॥ १॥

उत् असौ सूर्यः अगात् उत् अयं मामकः भगः
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः ॥ १ ॥

हा पहा सूर्य जसा उदय पावला, तसे माझे दैवहि उघडले हे मी जाणूनच आपल्या पतीला पूर्णपणे वश केले. मी त्याची स्त्री आहे; तरी पण त्याला आतां मी अगदी माझ्या मुठीत ठेवणारी अशी आहे १.


अ॒हं के॒तुर॒हं मू॒र्धाहं उ॒ग्रा वि॒वाच॑नी ।
ममेदनु॒ क्रतुं॒ पतिः॑ सेहा॒नाया॑ उ॒पाच॑रेत् ॥ २ ॥

अहं केतुः अहं मूर्धा अहं उग्रा वि-वाचनी
मम इत् अनु क्रतुं पतिः सेहानायाः उप-आचरेत् ॥ २ ॥

मी माझ्या घराण्याचे भूषण आहे, मीच मस्तक आहे, पण मी कडक स्वभावाची आहे असेच मी इतरांकडून वदविते. माझ्याच कृत्याला पति अनुमोदन देतो आणि मी दुसर्‍यावर छाप ठेवणारी असल्याने तो माझ्याच धोरणाने वागतो २.


मम॑ पु॒त्राः श॑त्रु॒हणोऽ॑थो मे दुहि॒ता वि॒राट् ।
उ॒ताहं अ॑स्मि संज॒या पत्यौ॑ मे॒ श्लोक॑ उत्त॒मः ॥ ३ ॥

मम पुत्राः शत्रु-हनः अथो इति मे दुहिता विराट्
उत अहं अस्मि सम्-जया पत्यौ मे श्लोकः उत्-तमः ॥ ३ ॥

इकडे माझे पुत्र शत्रूंचा फडशा उडवितात; तर माझी कन्या चक्रवर्तिनीच झाली; आणि मीहि विजयिनि हो‍ऊन आपल्या पतीचा उत्कृष्ट लौकिक केला ३.


येनेन्द्रो॑ ह॒विषा॑ कृ॒त्व्यभ॑वद्द्यु॒म्न्युत्त॒मः ।
इ॒दं तद॑क्रि देवा असप॒त्ना किला॑भुवम् ॥ ४ ॥

येन इन्द्रः हविषा कृत्वी अभवत् द्युम्नी उत्-तमः
इदं तत् अक्रि देवाः असपत्ना किल अभुवम् ॥ ४ ॥

इन्द्र हा ओजस्वी आणि सर्वश्रेष्ठ आहे; पण ज्या प्रकारचा हविर्भाग अर्पण केल्याने तो भक्तांचे कार्य करूं लागला (त्याने आपले कर्तृत्व पूर्ण केले) तेच वज्र हे देवांनो, मी केले आहे आणि आज मी सपत्नीरहित झाले आहे ४.


अ॒स॒प॒त्ना स॑पत्न॒घ्नी जय॑न्त्यभि॒भूव॑री ।
आवृ॑क्षं अ॒न्यासां॒ वर्चो॒ राधो॒ अस्थे॑यसां इव ॥ ५ ॥

असपत्ना सपत्न-घ्नी जयन्ती अभि-भूवरी
आ अवृक्षं अन्यासां वर्चः राधः अस्थेयसाम्-इव ॥ ५ ॥

मी आतां सपत्नीविरहित आहे, सपत्नींना नाहीसे करूं शकेन. मीच विजयशालिनी आणि प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करणारी आहे. निराधार दुबळयांचे द्रव्य जसे हिरावून न्यावे त्याप्रमाणे इतर स्त्रियांचा वर्चष्मा मीच नाहीसा केला ५.


सं अ॑जैषं इ॒मा अ॒हं स॒पत्नी॑रभि॒भूव॑री ।
यथा॒हं अ॒स्य वी॒रस्य॑ वि॒राजा॑नि॒ जन॑स्य च ॥ ६ ॥

सं अजैषं इमाः अहं स-पत्नीः अभि-भूवरी
यथा अहं अस्य वीरस्य वि-राजानि जनस्य च ॥ ६ ॥

ह्या माझ्या सर्व सवतींवर मी विजय मिळविला, कारण मी प्रतिस्पर्ध्यांचा पाडावच करणारी आहे; माझा पति वीर आहे; तरी त्याच्यावरहि मी जसा अधिकार चालविते मग तसाच इतर लोकांवर चालविते यांत काय आश्चर्य. ६


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६० (इंद्रसूक्त)

ऋषी - पूरण वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


ती॒व्रस्या॒भिव॑यसो अ॒स्य पा॑हि सर्वर॒था वि हरी॑ इ॒ह मु॑ञ्च ।
इन्द्र॒ मा त्वा॒ यज॑मानासो अ॒न्ये नि री॑रम॒न् तुभ्यं॑ इ॒मे सु॒तासः॑ ॥ १॥

तीव्रस्य अभि-वयसः अस्य पाहि सर्व-रथा वि हरी इति इह मुच
इन्द्र मा त्वा यजमानासः अन्ये नि रीरमन् तुभ्यं इमे सुतासः ॥ १ ॥

त्या तीक्ष्ण आणि आवेश उत्पन्न करणार्‍या सोमरासाचे प्राशन कर; आणि एकसारखे रथास जोडलेले हे तुझे हरित्‌किरणाश्व येथे मोकळे सोड. हे सोमरस तुझ्या प्रीत्यर्थ पिळलेले आहेत, तर हे इन्द्रा, दुसरे कोणीहि यज्ञकर्ते यजमान तुला तेथेच गुंतवून न ठेवोत १.


तुभ्यं॑ सु॒तास्तुभ्यं॑ उ॒ सोत्वा॑स॒स्त्वां गिरः॒ श्वात्र्या॒ आ ह्व॑यन्ति ।
इन्द्रे॒दं अ॒द्य सव॑नं जुषा॒णो विश्व॑स्य वि॒द्वाँ इ॒ह पा॑हि॒ सोम॑म् ॥ २ ॥

तुभ्यं सुताः तुभ्यं ओं इति सोत्वासः त्वां गिरः श्वात्र्याः आ ह्वयन्ति
इन्द्र इदं अद्य सवनं जुषाणः विश्वस्य विद्वान् इह पाहि सोमम् ॥ २ ॥

हे जे रस अगोदर पिळलेले आहेत ते तर तुझ्यासाठी पिळलेले आहेतच; पणे हे आम्ही पुढेंहि पिळूं ते देखील तुझ्याच प्रीत्यर्थ पिळणार आहोत; आमच्या अन्त:करणाच्या तळमळीने आम्ही म्हटलेल्या स्तुतिच तुजला पाचारण करीत आहेत; तर हा आजच्या सोमसवनाचा स्वीकार करून, हे सर्वज्ञ देवा, येथे येऊन सोमरस प्राशन कर २.


य उ॑श॒ता मन॑सा॒ सोमं॑ अस्मै सर्वहृ॒दा दे॒वका॑मः सु॒नोति॑ ।
न गा इन्द्र॒स्तस्य॒ परा॑ ददाति प्रश॒स्तं इच् चारुं॑ अस्मै कृणोति ॥ ३ ॥

यः उशता मनसा सोमं अस्मै सर्व-हृदा देव-कामः सुनोति
न गाः इन्द्रः तस्य परा ददाति प्र-शस्तं इत् चारुं अस्मै कृणोति ॥ ३ ॥

उत्सुक मनाने, सर्वात्म-भावाने देवाच्या ठिकाणी मन एकाग्र करणारा जो उपासक ह्या इन्द्राप्रीत्यर्थ सोमरस पिळून सिद्ध करतो, त्याच्या (इच्छारूप) धेनूंना इन्द्र कधीच दूर लोटीत नाहीच, पण अशा उपासकाचे जे अभीष्ट असेल ते प्रशस्त आणि उत्कृष्ट रीतीन घडवून आणतो ३.


अनु॑स्पष्टो भवत्ये॒षो अ॑स्य॒ यो अ॑स्मै रे॒वान् न सु॒नोति॒ सोम॑म् ।
निर॑र॒त्नौ म॒घवा॒ तं द॑धाति ब्रह्म॒द्विषो॑ ह॒न्त्यना॑नुदिष्टः ॥ ४ ॥

अनु-स्पष्टः भवति एषः अस्य यः अस्मै रेवान् न सुनोति सोमं
निः अरत्नौ मघ-वा तं दधाति ब्रह्म-द्विषः हन्ति अननु-दिष्टः ॥ ४ ॥

धनवान नसतांहि जो उपासक इन्द्राप्रीत्यर्थ सोमरस पिळतो त्याच्या नेत्रांना देव प्रत्यक्ष दर्शन देतो. तो भगवान इन्द्र त्या भक्ताला त्याच्या मनगटाला धरून चालवितो आणि (शत्रूंना ठार कर अशी) जरी त्याने प्रार्थना केलेली नसली तरी तो वेदांतील ज्ञानाचा द्वेष करणार्‍या दुष्टांचा नाशच करितो ४.


अ॒श्वा॒यन्तो॑ ग॒व्यन्तो॑ वा॒जय॑न्तो॒ हवा॑महे॒ त्वोप॑गन्त॒वा उ॑ ।
आ॒भूष॑न्तस्ते सुम॒तौ नवा॑यां व॒यं इ॑न्द्र त्वा शु॒नं हु॑वेम ॥ ५ ॥

अश्वयन्तः गव्यन्तः वाजयन्तः हवामहे त्वा उप-गन्तवै ओं इति
आभूषन्तः ते सु-मतौ नवायां वयं इन्द्र त्वा शुनं हुवेम ॥ ५ ॥

आम्हांला (बुद्धिचापल्यरूप) अश्वांची इच्छा आहे, (ज्ञान) धेनूंची आहे त्याचप्रमाणे सत्वपराक्रमाचीहि आहे, तर त्याकरितां आणि तुझ्या सन्निध राहण्यासाठी आम्ही तुझा धांवा करीत आहो. तुझ्या अपूर्व वात्सल्यबुद्धीच्या आश्रयाखाली आम्ही राहूं म्हणतो म्हणूनच हे इन्द्रा, तूं जो मंगलमय त्या तुझा आम्ही धांवा करीत असतो ५.


ॐ तत् सत्


GO TOP