|
ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १७१ ते १८० ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७१ (इंद्रसूक्त) ऋषी - इट भार्गव : देवता - इंद्र : छंद - गायत्री
त्वं त्यं इ॒टतो॒ रथं॒ इन्द्र॒ प्रावः॑ सु॒ताव॑तः ।
त्वं त्यं इटतः रथं इन्द्र प्र आवः सुत-वतः
हे इन्द्रा, "इटत्" नांवाचा भक्त सोमयाजी होता म्हणून त्याच्या रथाचे रक्षण तूं युद्धामध्ये केलेस; आणि सोमार्पण करणार्या त्या भक्ताची हांक ऐकून धांवलास १.
त्वं म॒खस्य॒ दोध॑तः॒ शिरोऽ॑व त्व॒चो भ॑रः ।
त्वं मखस्य दोधतः शिरः अव त्वचः भरः
त्याचा शत्रु जो मख नांवाचा होता, तो अंगावर धांवून आला असतां त्याचे मस्तक त्यावरील त्वचेसह म्हणजे शिरस्त्राणासह तोडून खाली पाडलेंस आणि सोम अर्पण करणार्या भक्ताचे अशा रीतीने सहाय्य करून स्वगृही गमन केलेस २.
त्वं त्यं इ॑न्द्र॒ मर्त्यं॑ आस्त्रबु॒ध्नाय॑ वे॒न्यम् ।
त्वं त्यं इन्द्र मर्त्यं आस्त्र-बुध्नाय वेन्यं
हे इन्द्रा, तूं त्या मर्त्य मानवाला, त्या वेनाच्या पुत्रालाहि, मननशील आस्त्रबुध्नासाठी त्याचा स्वत:चा ताठा अगदी सोडून द्यावयास लाविले ३.
त्वं त्यं इ॑न्द्र॒ सूर्यं॑ प॒श्चा सन्तं॑ पु॒रस्कृ॑धि ।
त्वं त्यं इन्द्र सूर्यं पश्चा सन्तं पुरः कृधि
इन्द्रा, जो हा सूर्य आतां आमच्या पाठीकडे पश्चिमेस अस्तास गेला आहे, त्याला आमच्या समोर पूर्वेस आण, तो देवांनाहि आतां दृश्य नाही; तर त्याला त्यांच्या स्वाधीन कर ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७२ (उषासूक्त) ऋषी - संवर्त आंगिरस : देवता - उषा : छंद - द्विपदा विराज्
आ या॑हि॒ वन॑सा स॒ह गावः॑ सचन्त वर्त॒निं यदूध॑भिः ॥ १॥
आ याहि वनसा सह गावः सचन्त वर्तनिं यत् ऊध-भिः ॥ १ ॥
हे उषे, तूं आपल्या मनोल्हादी वैभवानिशी आगमन कर. ह्या पहा प्रकाशकिरणरूप तुझ्या धेनू आपल्या मार्गाने चालूं लागल्या; त्यांचे आचळ अथवा सड पहा कसे दुधाने टंच फुगलेले आहेत १.
आ या॑हि॒ वस्व्या॑ धि॒या मंहि॑ष्ठो जार॒यन्म॑खः सु॒दानु॑भिः ॥ २ ॥
आ याहि वस्व्या धिया मंहिष्ठः जारयत्-मखः सुदानु-भिः ॥ २ ॥
उषे, तूं उत्तमोत्तम वरदाने देण्याची आपली नेहमीची बुद्धि धरून इकडे आगमन कर. हा पहा तुझा ’जारयन् मख’ नांवाचा भक्त त्याच्या शेकडो प्रकारच्या देणग्यांच्या योगाने दानशूर ठरला आहे २.
पि॒तु॒भृतो॒ न तन्तुं॒ इत् सु॒दान॑वः॒ प्रति॑ दध्मो॒ यजा॑मसि ॥ ३ ॥
पितु-भृतः न तन्तुं इत् सु-दानवः प्रति दध्मः यजामसि ॥ ३ ॥
आम्ही अन्नसेवन करितो, तसेच अन्नदानहि करितो. म्हणून तोच तन्तु (=तीच पद्धति) आम्ही दानशील असल्याने तशीच पुढे चालवून देवांप्रीत्यर्थ)यजन करितो ३.
उ॒षा अप॒ स्वसु॒स्तमः॒ सं व॑र्तयति वर्त॒निं सु॑जा॒तता॑ ॥ ४ ॥
उषाः अप स्वसुः तमः सं वर्तयति वर्तनिं सु-जातता ॥ ४ ॥
उषेची जी भगिनी रात्र, तिने पसरून दिलेला अन्धकार उषा बाजूला सारते आणि आपल्या अभिजातपणाने जगताचा मार्ग मोकळा करिते ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७३ (अभिषिक्त रास्तुतिसूक्त) ऋषी - ध्रुव आंगिरस : देवता - राजस्तुती : छंद - अनुष्टुभ्
आ त्वा॑हार्षं अ॒न्तरे॑धि ध्रु॒वस्ति॒ष्ठावि॑चाचलिः ।
आ त्वा अहार्षं अन्तः एधि ध्रुवः तिष्ठ अवि-चाचलिः
हे राजा, राष्ट्राच्या हितासाठी आम्ही तुजला पसंत करून जनते)ढे आणला आहे. तर आतां येथे ह्याच राज्यावर अगदी ठाम स्थिर रहा, कोणतीहि चलबिचल होऊं देऊं नको. तुझ्या सर्व प्रजाजनांना तूं राज्यावर पाहिजे आहेस असे वाटो; आणि तुझ्यावरील निष्ठेपासून तुझे प्रजाजन कधींहि न ढळोत १.
इ॒हैवैधि॒ माप॑ च्योष्ठाः॒ पर्व॑त इ॒वावि॑चाचलिः ।
इह एव एधि मा अप च्योष्ठाः पर्वतः-इव अवि-चाचलिः
येथेंच ठाम रहा. अगदी केसाइतकासुद्धां कर्तव्यापासून ढळूं नको; पर्वताप्रमाणे दॄढ अढळ रहा. इन्द्राप्रमाणे पक्का स्थिर रहा, आणि राष्ट्राचे धारण पालन कर २.
इ॒मं इन्द्रो॑ अदीधरद्ध्रु॒वं ध्रु॒वेण॑ ह॒विषा॑ ।
इमं इन्द्रः अदीधरत् ध्रुवं ध्रुवेण हविषा तस्मै
निश्चित निधानाने ठरलेला हविर्भाग अर्पण केल्यामुळे इन्द्राने ह्या राजाला राज्यावर पक्केपणी स्थिर केले, त्याला सोमानेहि संमति दिली आणि ब्राह्मणस्पतीनेहि अनुमति दिली ३.
ध्रु॒वा द्यौर्ध्रु॒वा पृ॑थि॒वी ध्रु॒वासः॒ पर्व॑ता इ॒मे ।
ध्रुवा द्यौः ध्रुवा पृथिवी ध्रुवासः पर्वताः इमे
हे तारकामंडित आकाश जसे स्थिर आहे आणि जशी पृथिवी ही देखील ठाम ध्रुवाभिमुख आहे; आणि तिच्यावरील पर्वतहि जसे अचल आहेत, किंबहुना हे सर्व जगत् देखील जसे निश्चित टिकणारे आहे, तसाच हा राजा देखील राज्यावर पक्का टिकून राहो ४.
ध्रु॒वं ते॒ राजा॒ वरु॑णो ध्रु॒वं दे॒वो बृह॒स्पतिः॑ ।
ध्रुवं ते राजा वरुणः ध्रुवं देवः बृहस्पतिः
हे राजा, तुझ्या हितासाठी राजा वरुणहि ठाम उभा राहिला आहे; तसाच बृहस्पति देवहि अगदी सज्ज आहे; म्हणून इन्द्र आणि अग्नि देखील तुझे राष्ट्र टिकवून धरोत ५.
ध्रु॒वं ध्रु॒वेण॑ ह॒विषा॒भि सोमं॑ मृशामसि ।
ध्रुवं ध्रुवेण हविषा अभि सोमं मृशामसि
स्थैर्यप्रद हविर्भाग स्थिरप्रसाद सोमाला अर्पण करून त्याला प्रसन्न करू, म्हणजे इन्द्र हा असे करील की तुझे एकनिष्ठ प्रजाजन तुलाच सतत करभार देत राहतील ६.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७४ (अभिषिक्त रास्तुतिसूक्त) ऋषी - अभीवर्त आंगिरस : देवता - राजस्तुती : छंद - अनुष्टुभ्
अ॒भी॒व॒र्तेन॑ ह॒विषा॒ येनेन्द्रो॑ अभिवावृ॒ते ।
अभि-वर्तेन हविषा येन इन्द्रः अभि-ववृते
सर्वतोपरी वर्चस्व प्राप्त करून देणार्या हविर्भागाच्या अर्पणाने प्रसन्न होऊन इन्द्राने विजय संपादन केला, अशा हविर्दानाने हे ब्रह्मणस्पते, आम्हांस राष्ट्रांसाठी विजयशाली कर १.
अ॒भि॒वृत्य॑ स॒पत्ना॑न् अ॒भि या नो॒ अरा॑तयः ।
अभि-वृत्य स-पत्नान् अभि याः नः अरातयः
त्याकरितां तू प्रथमच विरोधकांना घेरून पादाक्रान्त कर, जे धर्मविरोधी असतील त्यांनाहि चोहि बाजूंनी जेरीस आण; आणि जे सैन्यानिशी तुझ्यावर प्रत्यक्ष चढाई करतील, त्यांना एकदम खाली दडपून टाक; तसेंच जो द्वेषाने उगाच उपद्रव देत असेल त्याचीहि तीच अवस्था कर २.
अ॒भि त्वा॑ दे॒वः स॑वि॒ताभि सोमो॑ अवीवृतत् ।
अभि त्वा देवः सविता अभि सोमः अवीवृतत्
हे राजा, सवितादेव तुझे चोहोंबाजूंनी रक्षण करो; तसाच सोमहि रक्षण करो; आणि सृष्टीतील सर्व शक्ति देखील तुझ्या पाठीवर, तूं जेणेकरून विजयी होशील अशा रीतीने तुझे सहाय्य करोत ३.
येनेन्द्रो॑ ह॒विषा॑ कृ॒त्व्यभ॑वद्द्यु॒म्न्युत्त॒मः ।
येन इन्द्रः हविषा कृत्वी अभवत् द्युम्नी उत्-तमः
ज्या प्रकारचा हवि अर्पण झाल्याने इन्द्राने कर्तबगारी गाजविली, त्याने स्वत:चे तेज प्रकट केले आणि तो सर्वोत्कृष्ट ठरला; तोच मार्ग हे देवांनो, मीहि अनुसरला, म्हणून मलाहि आतां कोणी शत्रु उरला नाही ४.
अ॒स॒प॒त्नः स॑पत्न॒हाभिरा॑ष्ट्रो विषास॒हिः ।
असपत्नः सपत्न-हा अभि-राष्ट्रः वि-ससहिः
मी शत्रूंना ठार केले, कोणीहि शिल्लक ठेविला नाही; आणि सर्वांवर वर्चस्व ठेऊन राष्ट्राचे सर्व प्रकाराने संरक्षण करीत आहे. अशा रीतीने ह्या सर्व भूतांवर सत्ता चालवून मी आपल्या प्रजाजनांचा खर्याखुर्या अर्थाने राजा झालो आहे ५.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७५ (उर्ध्वग्रावन्सूक्त) ऋषी - ऊर्ध्वगावन् अर्बुदि सर्प : देवता - ग्रावन् : छंद - गायत्री
प्र वो॑ ग्रावाणः सवि॒ता दे॒वः सु॑वतु॒ धर्म॑णा ।
प्र वः ग्रावाणः सविता देवः सुवतु धर्मणा
हे ग्राव्यांनो, सविता देव तुम्हांला यज्ञकार्यासाठी कर्तव्योन्मुख करीलच; पण तुम्हीहि त्या धुरेला स्वत:ला जोडून घेऊन सोमरस पिळून सिद्ध करा १.
ग्रावा॑णो॒ अप॑ दु॒च्छुनां॒ अप॑ सेधत दुर्म॒तिम् ।
ग्रावाणः अप दुच्चुनां अप सेधत दुः-मतिं
ग्राव्यांनो, सर्व आपत्तीचा नाश करा, कुबुद्धि विलयास न्या; आणि प्रकाशरूप धेनु आम्हांला औषधाप्रमाणे आरोग्यप्रद होतील असे करा २.
ग्रावा॑ण॒ उप॑रे॒ष्व् आ म॑ही॒यन्ते॑ स॒जोष॑सः ।
ग्रावाणः उपरेषु आ महीयन्ते स-जोषसः
ग्राव्यांनो, तुम्ही एकचित्ताने एकदमच वरखाली होत असतां तुमची थोरवी अनुभवास येते. कारण वीर्यशाली इन्द्रासाठी तुम्ही वीर्यशाली असाच रस पिळून सिद्ध करितां ३.
ग्रावा॑णः सवि॒ता नु वो॑ दे॒वः सु॑वतु॒ धर्म॑णा ।
ग्रावाणः सविता नु वः देवः सुवतु धर्मणा
ग्राव्यांनो, सवितादेव तुम्हांला धर्मकार्यासाठीच सोमसवन करण्याची इच्छा करणार्या यजमानांसाठीच रस पिळण्याची प्रेरणा करो ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७६ (ऋभु अग्निसूक्त) ऋषी - सूनु आर्भव : देवता - १ - ऋभु; अवशिष्ट - अग्नि : छंद - २ - गायत्री; अवशिष्ट - अनुष्टुभ्
प्र सू॒नव॑ ऋभू॒णां बृ॒हन् न॑वन्त वृ॒जना॑ ।
प्र सूनवः ऋभूणां बृहत् नवन्त वृजना
ऋभूंच्या पराक्रमाची महती आमच्या पुत्रांनीहि मन:पूर्वक वर्णन केली. कारण सर्वांना पोटभर अन्न मिळावे आणि प्राणिमात्र तृप्त व्हावे म्हणूनच त्यांनी सर्व पृथ्वीवर आपली सत्ता स्थापन केली; आणि बालक जसे मातेला स्तनपान करण्यासाठी जवळ ओढते त्याप्रमाणे त्यांनी धेनूंना जवळ बाळगले १.
प्र दे॒वं दे॒व्या धि॒या भर॑ता जा॒तवे॑दसम् ।
प्र देवं देव्या धिया भरत जात-वेदसं
देवांची सेवा करण्याच्या बुद्धीनेच तुम्ही सर्व वस्तु जाणणार्या अग्नीला हविर्भाग अर्पण करा; म्हणजे आमचा हविर्भाग अग्नि दिव्यजनांकडे तत्काल पोहोंचवून देईल २.
अ॒यं उ॒ ष्य प्र दे॑व॒युर्होता॑ य॒ज्ञाय॑ नीयते ।
अयं ओं इति स्यः प्र देव-युः होता यजाय नीयते
हा पहा देवप्रिय अग्नि; तो यज्ञसंपादक म्हणून त्याला यज्ञकार्यासाठी वेदीकडे घेऊन जात आहेत. तोच आमचा मनोरथ सर्व प्रकाराने परिपूर्ण करणारा आहे. कारण हा तेज:संपन्न अग्नि आपण होऊनच सर्व कांही पाहून ठेऊन लक्षांत घेतो ३.
अ॒यं अ॒ग्निरु॑रुष्यत्य॒मृता॑दिव॒ जन्म॑नः ।
अयं अग्निः उरुष्यति अमृतात्-इव जन्मनः
हा पहा अग्नि जणों अमृतापासूनच उत्पन्न झाला असल्याने आम्हांला तो दु:खमुक्त करीलच करील; अमर जे देव त्यांच्या कोपापासूनहि बचाव करील. कारण कोणी कसाहि बलाढ्य असो, त्याला दडपून टाकण्याची शक्ति अग्नीला आहे; आणि मनुष्यप्राण्याचे हित व्हावे अशासाठीच तर तो प्रकट झाला आहे ४.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७७ (आत्मानुभवसूक्त) ऋषी - पतंग प्राजापत्य : देवता - मायाभेद : छंद - १ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्
प॒तं॒गं अ॒क्तं असु॑रस्य मा॒यया॑ हृ॒दा प॑श्यन्ति॒ मन॑सा विप॒श्चितः॑ ।
पतङ्गं अक्तं असुरस्य मायया हृदा पश्यन्ति मनसा विपः-चितः
हा पतंग, म्हणजे परमात्मरूप पक्षी, आपल्या ईश्वरी मायेने, अतर्क्य शक्तीने व्याप्त असल्याने, जे उत्तम ज्ञानी आहेत ते त्याला केवळ आपल्या हृदयाच्या संवेदनेने युक्त अशा मनानेच ओळखतात; कवि (म्हणजे जे गूढ कल्पनातरंगांत निमग्न) असतात तेहि ह्या (विश्वरूपी) समुद्राच्या उदरांतच त्याला पाहतात; आणि जे विधाते, म्हणजे स्वानुभवी आहेत ते मात्र त्याच्या प्रकाशस्थानाच्या प्राप्तीची इच्छा धरितात १.
प॒तं॒गो वाचं॒ मन॑सा बिभर्ति॒ तां ग॑न्ध॒र्वोऽवद॒द्गर्भे॑ अ॒न्तः ।
पतङ्गः वाचं मनसा बिभर्ति तान् गन्धर्वः अवदत् गर्भे अन्तर् इति
हा पक्षी ज्या दिव्य वाणीला आपल्या मनांतच गुप्तठेवतो तीच वाणी गन्धर्व हा गर्भांतच असला म्हणजे जन्मला नसला तरी बोलू शकतो. अशा त्या तेजोमय, स्वर्गप्रापक अशा मननप्रवृत्तीला गूढ विज्ञानी कवि हे अबाधित सद्धर्माच्या स्थानामध्ये जतन करून ठेवतात २.
अप॑श्यं गो॒पां अनि॑पद्यमानं॒ आ च॒ परा॑ च प॒थिभि॒श्चर॑न्तम् ।
अपश्यं गोपां अनि-पद्यमानं आ च परा च पथि-भिः चरन्तं
अशा पक्ष्याचे व्यक्त स्वरूप ज्या प्रकाशधेनू त्यांचा प्रतिपालक जो सूर्य तो केव्हांहि आकाशांतून खाली न घरसतांच पूर्वेकडून येतांना आणि आपल्या मार्गानेंच पश्चिमेकडे मागे जातांना मी नेहमी पहात आलो आहे. तो कधी कधी एकाच वर्णाच्या किरणांचे वस्त्र परिधान करतो, तर कधी कधी अनेक वर्णांच्या किरणांचेहि परिधान करितो; आणि सर्व भुवनांतून मोठ्या आढ्यतेने संचार करीत जातो ३.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७८ (तार्क्ष्यसूक्त) ऋषी - अरिष्टनेमि तार्क्ष्य : देवता - तार्क्ष्य : छंद - त्रिष्टुभ्
त्यं ऊ॒ षु वा॒जिनं॑ दे॒वजू॑तं स॒हावा॑नं तरु॒तारं॒ रथा॑नाम् ।
त्यं ओं इति सु वाजिनं देव-जूतं सह-वानं तरु-तारं रथानां
हा तो दिव्यविबुधांनी पाठविलेला शत्रुनाशक आणि शेंकडो रथ जिंकणारा झुंजार योद्धा; ह्याच्या स्वत:च्या रथाचा आंस कधी मोडत नाही, अगदी अभंग राहतो, अशा रथांतून युद्ध करून हा शत्रुसैन्याला फार झटपट पिटाळून लावतो. असा हा, शीघ्र वेगवान् जो "तार्क्ष्य" नांवाचा वीर त्याला आम्ही येथे आमच्या कल्याणार्थ पाचारण करितो १.
इन्द्र॑स्येव रा॒तिं आ॒जोहु॑वानाः स्व॒स्तये॒ नावं॑ इ॒वा रु॑हेम ।
इन्द्रस्य-इव रातिं आजोहुवानाः स्वस्तये नावम्-इव आ रुहेम
हा वीर आम्हांला इन्द्राची जणों काय एक देणगीच आहे; त्या कारणाने त्याला आम्ही आमचेकडे येण्याविषयी वारंवार विनंति करितो. नौकेमध्ये बसून पैलतीर गाठावे त्याप्रमाणे आमचे कल्याण व्हावे म्हणून पाचारण करीत असतो. हे पृथ्वी, आकाशहो, तुम्ही फार विस्तीर्ण, अवाढव्य, अमर्याद आहांत; कोणी आला काय आणि गेला काय त्याची तुम्हांला दादहि नसते. इतके तुम्ही निर्वेध निश्चिंत असतां, त्याप्रमाणे आम्ही देखील सुरक्षित राहू असे करा २.
स॒द्यश्चि॒द्यः शव॑सा॒ पञ्च॑ कृ॒ष्टीः सूर्य॑ इव॒ ज्योति॑षा॒पस्त॒तान॑ ।
सद्यः चित् यः शवसा पच कृष्टीः सूर्यः-इव ज्योतिषा अपः ततान
सूर्य आपल्या प्रकाशाने मेघ मंडळांत उदके भरून देतो त्याप्रमाणे जो आपल्या धडाक्याने पांचहि समाजांना कार्योद्युक्त करतो; असा तो तार्क्ष्य शेकडोच काय पण सहस्त्रावधि विजय संपादन करून घेतो. सुंदर तरुणीचा कटाक्षरूपी बाणांचा मारा कोणी परतवूं शकत नाही. त्याप्रमाणे ह्याच्या प्रत्यक्ष बाणांच्या धडाक्यापुढेंही कोणी तग धरूं शकत नाही ३.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १७९ (इंद्रसूक्त)
ऋषी - १ - शिबि औशिनर; २ - काशिराज प्रतर्दन; ३ - वसुमन रौहिदश्व
उत् ति॑ष्ठ॒ताव॑ पश्य॒तेन्द्र॑स्य भा॒गं ऋ॒त्विय॑म् ।
उत् तिष्ठत अव पश्यत इन्द्रस्य भागं ऋत्वियं
चला उठा, ह्या वेळी इन्द्राला अर्पण करण्याचा हविर्भाग सिद्ध आहे की नाही ते नीट पहा. तो चांगला पक्व झाला असेल तर तो ताबडतोब अर्पण करा, पण पक्व झाला नसेल तर मात्र तुम्ही चूक केलीत (असेंच ठरेल) १.
श्रा॒तं ह॒विरो ष्व् ऐ॑न्द्र॒ प्र या॑हि ज॒गाम॒ सूरो॒ अध्व॑नो॒ विम॑ध्यम् ।
शृआतं हविः ओ इति सु इन्द्र प्र याहि जगाम सूरः अध्वनः वि-मध्यं
छे ! छे ! असें कसें होईल ? हा पहा हविर्भाग पक्व झाला आहे. बरें तर इन्द्रा सत्वर ये. सूर्यसुद्धां आपल्या आकाशांतील मार्गाच्या मधोमध येऊन ठेपला देखील. म्हणून ह्या मध्याह्न सवनाचे वेळी भक्तजन तुजला अर्पण करावयाचा जो हविर्भाग तो पुढे ठेवून तुझी वाट पाहात आहेत. सर्व लोकसमाजाचा अधिपति येत आहे असे कळतांच घरांतील कर्ता पुरुष जसा त्याची वाट पाहात उभा राहतो त्याप्रमाणे भक्तजन तुझी मार्गप्रतीक्षा करीत आहेत २.
श्रा॒तं म॑न्य॒ ऊध॑नि श्रा॒तं अ॒ग्नौ सुश्रा॑तं मन्ये॒ तदृ॒तं नवी॑यः ।
श्रातं मन्ये ऊधनि श्रातं अग्नौ सु-श्रातं मन्ये तत् ऋतं नवीयः
हा हवि एकदाच केलेला नव्हे; प्रथम तो धेनूच्या कासेंत असतांनाच पक्व झाला, नंतर अग्निवरही पुन: तापवून झाला; याप्रमाणे हा ताजा हविर्भाग चांगला पक्व झाला आहे हे खास. तर हा मध्याह्न सवनाच्या वेळी तूं ह्या दधियुक्त हवीचा आस्वाद घे. त्याचे प्राशन कर. हे वज्रधरा तूं शेकडो भक्तांचे हित साधून देऊनच प्रसन्नचित्त होतोस ३.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १८० (इंद्रसूक्त) ऋषी - जय ऐंद्र : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
प्र स॑साहिषे पुरुहूत॒ शत्रू॒ञ् ज्येष्ठ॑स्ते॒ शुष्म॑ इ॒ह रा॒तिर॑स्तु ।
प्र ससहिषे पुरु-हूत शत्रून् ज्येष्ठः ते शुष्मः इह रातिः अस्तु
सकल जनसविता इन्द्रा, तूं शत्रूंना अगदी पार चिरडून टाकतोसच. तुझे शत्रुशोषक बल फारच प्रचंड आहे, पण तुझा प्रसाद आम्हांस येथेंच प्राप्त होवो. इन्द्रा तूं आपल्या उजव्या हाताने आम्हांस जी धने उत्कृष्ट असतील तीच दे. कारण वैभवाने ओतप्रोत भरलेल्या नद्यांचा अधिपति तूंच आहेस १.
मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः प॑रा॒वत॒ आ ज॑गन्था॒ पर॑स्याः ।
मृगः न भीमः कुचरः गिरि-स्थाः परावतः आ जगन्थ परस्याः
भयानक सिंहाप्रमाणे तूं अगदी दुर्गम अशा स्थानांतून संचार करीत उंच पर्वतावरच वास करितोस. अगदी दूरच्या लोकांच्याही पलीकडे जे तुझे स्थान आहे तेथून तूं येथे आला आहेस, तर शत्रूवर त्वरेने जाऊन आदळणारे तुझे झगझगीत वज्र घांसून तयार ठेव, आणि त्या वज्राने आमच्या शत्रूंवर प्रहार करून त्यांचा चुराडा करून टाक २.
इन्द्र॑ क्ष॒त्रं अ॒भि वा॒मं ओजोऽ॑जायथा वृषभ चर्षणी॒नाम् ।
इन्द्र क्षत्रं अभि वामं ओजः अजायथाः वृषभ चर्षणीनां
हे इन्द्रा, सर्वोत्कृष्ट ओजस्विता आणि योद्ध्याचे आणि प्रभुत्वाचे बल तुझ्या अंगात आहे म्हणूनच तर हे मानव जातीच्या धुरीणा, तूं अवतीर्ण झाला आहेस; तर सज्जनांचा द्रोह करणारे जे दुष्ट आहेत त्यांचा नाश कर आणि दिव्य विबुधांना हा लोक देखील प्रशस्त वाटेल असे कर ३.
ॐ तत् सत् |