PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १०१ ते ११०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०१ (ऋत्विजस्तुतिसूक्त)

ऋषी - बुध सौम्य : देवता - विश्वेदेव अथवा ऋत्विज
छंद - ४, ६, गायत्री; ५ बृहती; ९, १२ जगती; अवशिष्ट – त्रिष्टुभ्


उद्बु॑ध्यध्वं॒ सम॑नसः सखायः॒ सं अ॒ग्निं इ॑न्ध्वं ब॒हवः॒ सनी॑ळाः ।
द॒धि॒क्रां अ॒ग्निं उ॒षसं॑ च दे॒वीं इन्द्रा॑व॒तोऽ॑वसे॒ नि ह्व॑ये वः ॥ १॥

उत् बुध्यध्वं स-मनसः सखायः सं अग्निं इन्ध्वं बहवः स-नीळाः
दधि-कृआं अग्निं उषसं च देवीं इन्द्र-वतः अवसे नि ह्वये वः ॥ १ ॥

एक विचाराने चालणार्‍या मित्रांनो, उठा, जागृत व्हा. तुम्ही पुष्कळ अहां आणि एकत्रच राहतां; तर अग्नीला प्रज्वलित करा; कारण दधिक्रा वीर, अग्नि, उषादेवी आणि इंद्ररक्षित अशा ज्या दिव्य विभूति त्या सर्वांना तुम्हांवर कृपा करावी म्हणून त्यांना मी पाचारण करितों १.


म॒न्द्रा कृ॑णुध्वं॒ धिय॒ आ त॑नुध्वं॒ नावं॑ अरित्र॒पर॑णीं कृणुध्वम् ।
इष्कृ॑णुध्वं॒ आयु॒धारं॑ कृणुध्वं॒ प्राञ्चं॑ य॒ज्ञं प्र ण॑यता सखायः ॥ २ ॥

मन्द्रा कृणुध्वं धियः आ तनुध्वं नावं अरित्र-परणीं कृणुध्वं
इष्कृणुध्वं आयुधा अरं कृणुध्वं प्राचं यजं प्र नयत सखायः ॥ २ ॥

आमच्या बुद्धि उल्लसित करा, प्रतिभा सर्वगामी करा. उपासनारूप नौकेला वल्ही, सुकाणूं इत्यादि साधनांनी सज्ज करा. आयुधें घांसून पुसून तयार ठेवा. एवंच, मित्रांनो, हा आपला यज्ञ सिद्धीला जाईल अशी योजना करा २.


यु॒नक्त॒ सीरा॒ वि यु॒गा त॑नुध्वं कृ॒ते योनौ॑ वपते॒ह बीज॑म् ।
गि॒रा च॑ श्रु॒ष्टिः सभ॑रा॒ अस॑न् नो॒ नेदी॑य॒ इत् सृ॒ण्यः प॒क्वं एया॑त् ॥ ३ ॥

युनक्त सीरा वि युगा तनुध्वं कृते योनौ वपत इह बीजं
गिरा च श्रुष्टिः स-भराः असत् नः नेदीयः इत् सृण्यः पक्वं आ इयात् ॥ ३ ॥

नांगर जोडून तयार ठेवा, बैलांची जुपी करून त्यांना ओळीने उभे करा आणि ज्या ज्या ठिकाणी नांगराने जमीनीला घळ पाडली आहे, त्या ठिकाणी बीं पेरा. आमच्या प्रार्थनेने आमचे पीक भरभक्कम होणारच आणि मग पीक अगदी लागास आले म्हणजे मग कणसाला विळा लावा ३.


सीरा॑ युञ्जन्ति क॒वयो॑ यु॒गा वि त॑न्वते॒ पृथ॑क् ।
धीरा॑ दे॒वेषु॑ सुम्न॒या ॥ ४ ॥

सीरा युजन्ति कवयः युगा वि तन्वते पृथक्
धीराः देवेषु सुम्न-या ॥ ४ ॥

ह्याप्रमाणे नांगर जोडून तयार झाले; यज्ञाची सिद्धता झाली; कविजनांनी काव्ययुगुलकें निरनिराळी रचली आणि भक्तियुक्त बुद्धिमान्‌ यजमानांनी स्वकल्याणाच्या इच्छेने देवांच्या ठिकाणी ती अर्पण केली ४.


निरा॑हा॒वान् कृ॑णोतन॒ सं व॑र॒त्रा द॑धातन ।
सि॒ञ्चाम॑हा अव॒तं उ॒द्रिणं॑ व॒यं सु॒षेकं॒ अनु॑पक्षितम् ॥ ५ ॥

निः आहावान् कृणोतन सं वरत्राः दधातन
सिचामहै अवतं उद्रिणं वयं सु-सेकं अनुप-क्षितम् ॥ ५ ॥

आतां पहा बैलांना पाणी पिण्यासाठी थारोळी करा; रहाट-मोटेची तयाची करा. ही जी विहीर, पाण्याने तुडुंब भरलेली, सहज उपसतां येण्यासारखी आणि मुळीच न आटणारी आहे, तिच्यांतून आपण भरपूर पाणी उपसून काढूं ५.


इष्कृ॑ताहावं अव॒तं सु॑वर॒त्रं सु॑षेच॒नम् ।
उ॒द्रिणं॑ सिञ्चे॒ अक्षि॑तम् ॥ ६ ॥

इष्कृत-आहावं अवतं सु-वरत्रं सु-सेचनं
उद्रिणं सिचे अक्षितम् ॥ ६ ॥

झाले, थारोळी केली; विहिरीवर मोट बसविली, आणि ह्या सहज उपसल्या जाणार्‍या न आटणार्‍या भरगच्च पाण्याच्या विहिरीतून आम्ही पाणी उपसूं लागलो ६.


प्री॒णी॒ताश्वा॑न् हि॒तं ज॑याथ स्वस्ति॒वाहं॒ रथं॒ इत् कृ॑णुध्वम् ।
द्रोणा॑हावं अव॒तं अश्म॑चक्रं॒ अंस॑त्रकोशं सिञ्चता नृ॒पाण॑म् ॥ ७ ॥

प्रीणीत अश्वान् हितं जयाथ स्वस्ति-वाहं रथं इत् कृणुध्वं
द्रोण-आहावं अवतं अश्म-चक्रं अंसत्र-कोशं सिचत नृ-पानम् ॥ ७ ॥

आतां रथाच्या अश्वांना संतुष्ट करा; आपले हित साधून घ्या आणि यशस्वी रथ जोडून त्याला विजयशाली करा. युद्ध आणि यज्ञ हे एखाद्या विहिरीप्रमाणे आहेत. तेथे (=यज्ञांत) पाण्यासाठी द्रोणपात्र लागते. तीच (यज्ञातील) विहीर; तसेंच योध्याच्या अंगावरील चिलखतावर बांधलेली ढाल हेच पाणी ओढण्याचे "अश्म" (झाडाच्या) लाकडाचे चाक; वीराच्या विजयाचे द्योतक जे पेय तेच विहिरीतून उपसलेले उदक समजा. ७.


व्र॒जं कृ॑णुध्वं॒ स हि वो॑ नृ॒पाणो॒ वर्म॑ सीव्यध्वं बहु॒ला पृ॒थूनि॑ ।
पुरः॑ कृणुध्वं॒ आय॑सी॒रधृ॑ष्टा॒ मा वः॑ सुस्रोच् चम॒सो दृंह॑ता॒ तम् ॥ ८ ॥

व्रजं कृणुध्वं सः हि वः नृ-पानः वर्म सीव्यध्वं बहुला पृथूनि
पुरः कृणुध्वं आयसीः अधृष्टाः मा वः सुस्रोत् चमसः दृंहत तम् ॥ ८ ॥

धेनूंची आवारे आणि ज्ञानदानाची आलये स्थापन करा. तुम्हा वीरांना विजयश्री मिळाल्याबद्दलचे जे सन्माननीय पेय ते हेच. तुम्ही तुमची भव्य विशाल चिलखतें दुरुस्त करून ठेवा, लोखंडाप्रमाणे मजबूत, विस्तीर्ण आणि शत्रूंच्या हल्ल्यांना दाद न देणारी अशी मार्‍याची ठिकाणे जय्यत ठेवा. पण त्याचप्रमाणे देवाप्रीत्यर्थ आपण करावयाच्या सोमरसाचा चषकसुद्धां उत्तम असूं द्या, तो गळका असूं देऊं नका. चांगला जाड भक्कम पाहून ठेवा ८.


आ वो॒ धियं॑ य॒ज्ञियां॑ वर्त ऊ॒तये॒ देवा॑ दे॒वीं य॑ज॒तां य॒ज्ञियां॑ इ॒ह ।
सा नो॑ दुहीय॒द्यव॑सेव ग॒त्वी स॒हस्र॑धारा॒ पय॑सा म॒ही गौः ॥ ९ ॥

आ वः धियं यजियां वर्ते ऊतये देवाः देवीं यजतां यजियां इह
सा नः दुहीयत् यवसाइव गत्वी सहस्र-धारा पयसा मही गौः ॥ ९ ॥

देवांनो, यज्ञाने प्रसन्न होणारी, यज्ञार्ह, आणि पवित्र अशी जी तुमची दिव्य अनुग्रहबुद्धि, तिलाच मी आमच्या संरक्षणासाठी आमच्याकडे वळवितो. म्हणजे यथेच्छ तृणभक्षण करून राहणारी धेनु जशी विपुल दुग्धधारा सोडते, त्याप्रमाणे तुमची उदार अनुग्रहबुद्धिसुद्धां सहस्त्रावधि धारांनी पाझरणार्‍या प्रसाद-दुग्धाचा पान्हा खासच सोडील ९.


आ तू षि॑ञ्च॒ हरिं॑ ईं॒ द्रोरु॒पस्थे॒ वाशी॑भिस्तक्षताश्म॒न्मयी॑भिः ।
परि॑ ष्वजध्वं॒ दश॑ क॒क्ष्याभिरु॒भे धुरौ॒ प्रति॒ वह्निं॑ युनक्त ॥ १० ॥

आ तु सिच हरिं ईं द्रोः उप-स्थे वाशीभिः तक्षत अश्मन्-मयीभिः
परि स्वजध्वं दश कक्ष्याभिः उभे इति धुरौ प्रति वह्निं युनक्त ॥ १० ॥

काष्ठाच्या बनविलेल्या द्रोणपात्रामध्ये हरिद्वर्ण सोमाचा रस ओतून ठेवा; ऋत्विजांनो ती द्रोणपात्रें तुम्ही पोलादाच्या हत्यारांनी तयार करा, आणि दहा पट्टे ठिकठिकाणी लावून अश्वाला बांधावे त्याप्रमाणे दहा अंगुलींनी सोमवल्ली घट्ट पिळून रस काढा आणि दोन्ही धुरा मिळून सोमपल्लव हा एकच वाहक (वारू) जोडून ठेवा १०.


उ॒भे धुरौ॒ वह्नि॑रा॒पिब्द॑मानोऽ॒न्तर्योने॑व चरति द्वि॒जानिः॑ ।
वन॒स्पतिं॒ वन॒ आस्था॑पयध्वं॒ नि षू द॑धिध्वं॒ अख॑नन्त॒ उत्स॑म् ॥ ११॥

उभे इति धुरौ वह्निः आपिब्दमानः अन्तः योनाइव चरति द्वि-जानिः
वनस्पतिं वने आ अस्थापयध्वं नि सु दधिध्वं अखनन्तः उत्सम् ॥ ११ ॥

अशा रीतीने दोन्ही धुरांना एकच वाहक जोडला तर तो मोठ्याने ओरडेल आणि दोन बायकांच्या दादल्याची जी दुरवस्था होते त्याप्रमाणे तोहि दोन्ही जोखडांच्यामध्ये मोठ्या तारांबळीनेच चालेल, म्हणून सोम वनस्पतीला तुम्ही आपल्या उपवनामध्येच लावून ठेवा म्हणजे झरा खणण्याचे परिश्रम न घेतां देखील अमृताचा झरा तुमच्या हाती ये‍ईल ११.


कपृ॑न्नरः कपृ॒थं उद्द॑धातन चो॒दय॑त खु॒दत॒ वाज॑सातये ।
नि॒ष्टि॒ग्र्यः पु॒त्रं आ च्या॑वयो॒तय॒ इन्द्रं॑ स॒बाध॑ इ॒ह सोम॑पीतये ॥ १२ ॥

कपृत् नरः कपृथं उत् दधातन चोदयत खुदत वाज-सातये
निष्टिग्र्यः पुत्रं आ च्यावय ऊतये इन्द्रं स-बाधः इह सोम-पीतये ॥ १२ ॥

ऋत्विजांनो खरे सुख हेच; आणि तेच सुख तुम्ही आपलेसे करा; सोमवल्लीला बहर येऊं द्या. मग सत्वप्राप्तीकरतां त्याला इकडे आणा; तसेंच निष्टिग्नीच्या पुत्राला विजयप्राप्तीसाठी आपलासा करा, संकटकाळी तुमचे रक्षण व्हावे म्हणून तुम्ही इंद्राला सोमप्राशनार्थ पाचारण कराच १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०२ (मुद्‌गल – इंद्र संवादसूक्त)

ऋश मुद्गृल भर्म्यश्व : देवता - इंद्र अथवा द्रुघण
छंद - १, ३, १२ बृहती; अवशिष्ट – त्रिष्टुभ्


प्र ते॒ रथं॑ मिथू॒कृतं॒ इन्द्रो॑ऽवतु धृष्णु॒या ।
अ॒स्मिन्न् आ॒जौ पु॑रुहूत श्र॒वाय्ये॑ धनभ॒क्षेषु॑ नोऽव ॥ १॥

प्र ते रथं मिथु-कृतं इन्द्रः अवतु धृष्णु-या
अस्मिन् आजौ पुरु-हूत श्रवाय्ये धन-भक्षेषु नः अव ॥ १ ॥

तुमचा रथ जरी दुप्पटीने बळकट केला असला तरी एकंदरीने पाहिले तरी तो असहाय्यच आहे म्हणून इंद्र त्याचे आवेशाने रक्षण करो; हे सकलजनस्तुता देवा, हा जो संग्राम आता उपस्थित झाला आहे त्यापासून कीर्ति लाभेल; पण अशी अनेक युद्धें आमच्या द्रव्याचा चुराडा उडवितील म्हणून अशी युद्धे करणे भाग पडले तर त्या सर्व युद्धांमध्ये आमचे संरक्षण करून आम्हांस यशस्वी कर १.


उत् स्म॒ वातो॑ वहति॒ वासो॑ऽस्या॒ अधि॑रथं॒ यदज॑यत् स॒हस्र॑म् ।
र॒थीर॑भून् मुद्ग॒लानी॒ गवि॑ष्टौ॒ भरे॑ कृ॒तं व्यचेदिन्द्रसे॒ना ॥ २ ॥

उत् स्म वातः वहति वासः अस्याः अधि-रथं यत् अजयत् सहस्रं
रथीः अभूत् मुद्गलानी गविष्टौ भरे कृतं वि अचेत् इन्द्र-सेना ॥ २ ॥

प्रख्यात योद्धा जो "मुद्‍गल" त्याची स्त्री "मुद्‌गलानी" ही त्याच्या जवळच रथांत बसली असतां वार्‍याने तिचा पदर सारखा उडत होता, पण मुद्‌गलीनीने तिकडे लक्ष न देतां भूमि आणि धेनू ह्यांच्यासाठी चाललेल्या युद्धांत रथी हो‍ऊन व पुढे सरून तिने हजारो सैनिकांचा पाडाव केला, तेव्हां इंद्रानेच युद्धामध्ये आपल्या सहाय्यासाठी सेना पाठविली होती हे तिला कळले २.


अ॒न्तर्य॑च्छ॒ जिघां॑सतो॒ वज्रं॑ इन्द्राभि॒दास॑तः ।
दास॑स्य वा मघव॒न्न् आर्य॑स्य वा सनु॒तर्य॑वया व॒धम् ॥ ३ ॥

अन्तः यच्च जिघांसतः वज्रं इन्द्र अभि-दासतः
दासस्य वा मघ-वन् आर्यस्य वा सनुतः यवय वधम् ॥ ३ ॥

तेव्हां तिने अशी प्रार्थना केली की हे इंद्रा, आमच्यावर आज जे शत्रु चाल करून आम्हांस ठार करूं पाहत आहेत, त्यांच्याच सैन्यावर तूं आपले वज्र फेंक. हे भगवंता हे आमचे शत्रु अनार्य आहेत; त्यांत आपणांस आर्य म्हणविणारेहि आहेत; पण त्या सर्वांवर तू कोनास न दिसतां आपले मारक अस्त्र जोराने फेंक ३.


उ॒द्नो ह्र॒दं अ॑पिब॒ज् जर्हृ॑षाणः॒ कूटं॑ स्म तृं॒हद॒भिमा॑तिं एति ।
प्र मु॒ष्कभा॑रः॒ श्रव॑ इ॒च्छमा॑नोऽजि॒रं बा॒हू अ॑भर॒त् सिषा॑सन् ॥ ४ ॥

उद्नः ह्रदं अपिबत् जर्हृषाणः कूटं स्म तृंहत् अभि-मातिं एति
प्र मुष्क-भारः श्रवः इच्चमानः अजिरं बाहू इति अभरत् सिसासन् ॥ ४ ॥

[मुद्‌गल सैन्याच्या आघाडीला एक पुष्ट बैल चालविला होता] त्या बैलाने जोषांत येऊन पाण्याचा एक मोठा हौदच पिऊन फस्त केला आणि शिंगांनी वाटेतील उंचवटे उकरून तो शत्रुसैन्यांत घुसून गेला; तो जणो जय मिळविण्याकरतांच की काय आपल्या वीर्य भाराचा आवेश दाखवून प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव करण्याच्या इर्षेने चौखूर उडत रणांगणांवर धांवत सुटला ४.


न्यक्रन्दयन्न् उप॒यन्त॑ एनं॒ अमे॑हयन् वृष॒भं मध्य॑ आ॒जेः ।
तेन॒ सूभ॑र्वं श॒तव॑त् स॒हस्रं॒ गवां॒ मुद्ग॑लः प्र॒धने॑ जिगाय ॥ ५ ॥

नि अक्रन्दयन् उप-यन्तः एनं अमेहयन् वृषभं मध्ये आजेः
तेन सूभर्वं शत-वत् सहस्रं गवां मुद्गलः प्र-धने जिगाय ॥ ५ ॥

तेव्हा मुद्‌गलाच्या सैन्याने ह्या वृषभाच्या बरोबर धांवत जाऊन युद्ध चालू असतांनाच शत्रूसैन्याला खूप ठोकून ओरडावया लाविले आणि त्यांची अगदी गाळण उडवून दिली, आणि त्याच जोरदार वृषभाला पुढें घालून मुद्‌गलाने त्या युद्धांत शेकडोच नव्हे, पण हजारो पुष्ट धेनूंचे खिल्लार जिंकून आणले ५.


क॒कर्द॑वे वृष॒भो यु॒क्त आ॑सी॒दवा॑वची॒त् सार॑थिरस्य के॒शी ।
दुधे॑र्यु॒क्तस्य॒ द्रव॑तः स॒हान॑स ऋ॒च्छन्ति॑ ष्मा नि॒ष्पदो॑ मुद्ग॒लानी॑म् ॥ ६ ॥

कर्क-देवे वृषभः आसीत् अवावचीत् सारथिः अस्य केशी
दुधेः युक्तस्य द्रवतः सह अनसा ऋच्चन्ति स्म निः-पदः मुद्गलानीम् ॥ ६ ॥

मग त्या बैलाला एका गाडीच्या जुवाला जुंपला आणि त्या गाडीवर केस बांधलेला असा सारथि तो (कोण तर) स्वत: मुद्‌गलानीच होती ६.


उ॒त प्र॒धिं उद॑हन्न् अस्य वि॒द्वान् उपा॑युन॒ग् वंस॑गं॒ अत्र॒ शिक्ष॑न् ।
इन्द्र॒ उदा॑व॒त् पतिं॒ अघ्न्या॑नां॒ अरं॑हत॒ पद्या॑भिः क॒कुद्मा॑न् ॥ ७ ॥

उत प्र-धिं उत् अहन् अस्य विद्वान् उप अयुनक् वंसगं अत्र शिक्षन्
इन्द्रः उत् आवत् पतिं अघ्न्यानां अरंहत पद्याभिः ककुत्-मान् ॥ ७ ॥

ती मोठ्याने ओरडून तो गाडा जोराने पुढे पळवीत चालली, तेव्हां तो बैलच बेफाम हो‍ऊन जुंपलेला गाडा ओढीत भलतीकडे भटकला तेव्हां त्याच्या खुरांनी उधळलेल्या धुळीने मुद्‌गलानीचे अंग अगदी भरून गेले. इतक्यात चाकाची धांव आणि जोखडाची खुंटी निसटून पडली हे पाहून स्वत: इंद्राने बैल थांबवून त्याला पुन: नीट जोडले; याप्रमाणे इंद्राने त्या गोप्रतिपालक राजाचे रक्षण केले आणि तो वृषभहि मग सरळ मार्गाने जोराने धांवत चालला ७.


शु॒नं अ॑ष्ट्रा॒व्यचरत् कप॒र्दी व॑र॒त्रायां॒ दार्व् आ॒नह्य॑मानः ।
नृ॒म्णानि॑ कृ॒ण्वन् ब॒हवे॒ जना॑य॒ गाः प॑स्पशा॒नस्तवि॑षीरधत्त ॥ ८ ॥

शुनं अष्ट्रावी अचरत् कपर्दी वरत्रायां दारु आनह्यमानः
नृम्नानि कृण्वन् बहवे जनाय गाः पस्पशानः तविषीः अधत्त ॥ ८ ॥

पराणीने टोचतांच तो झुपकेदार केसांचा बैल ऐटीने दौडत चालला होता खरा; पण ह्या वेळी बैठकीच्या आडवटाला एक भले मोठे दांडके बांधले होते; (आणि योगायोग असा की) त्याच्या हजारो प्रजाजनासाठी त्याने अचाट पराक्रम गाजवून आणि धेनूंना हस्तगत कारून विजयबल संपादन केले ८.


इ॒मं तं प॑श्य वृष॒भस्य॒ युञ्जं॒ काष्ठा॑या॒ मध्ये॑ द्रुघ॒णं शया॑नम् ।
येन॑ जि॒गाय॑ श॒तव॑त् स॒हस्रं॒ गवां॒ मुद्ग॑लः पृत॒नाज्ये॑षु ॥ ९ ॥

इमं तं पश्य वृषभस्य युजं काष्ठायाः मध्ये द्रु-घणं शयानं
येन जिगाय सत-वत् सहस्रं गवां मुद्गलः पृतनाज्येषु ॥ ९ ॥

हे पहा जे दांडके बैलाच्या शेजारीच आडवटावर ठेऊन बांधले होते ते ! ते बांधल्यामुळेच (जणो) युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये मुद्‌गलाला शेंकडोच काय पण हजारो धेनूंचे खिल्लार जिंकून घेता आले ९.


आ॒रे अ॒घा को न्व् ऐ॒त्था द॑दर्श॒ यं यु॒ञ्जन्ति॒ तं व् आ स्था॑पयन्ति ।
नास्मै॒ तृणं॒ नोद॒कं आ भ॑र॒न्त्युत्त॑रो धु॒रो व॑हति प्र॒देदि॑शत् ॥ १० ॥

आरे अघा कः नु इत्था ददर्श यं युजन्ति तं ओं इति आ स्थापयन्ति
न अस्मै तृणं न उदकं आ भरन्ति उत्-तरः धुरः वहति प्र-देदिशत् ॥ १० ॥

अरे बापरे ! अशी नवलाची गोष्ट कोणी पाहिली काय कीं ज्याला गाडीला जुंपताच त्याला अगदी स्वस्थ बसवितात; हलू देत नाहीत आणि जुवाला जुंपले तरी त्याला गवतहि घालीत आणि पाणी देखील पाजीत नाहीत. [असा कोण तर तो घण;] असा तो धुरेला बांधलेला घण(=मुद्‌गल) जोखड तर वाहातोच पण यशाचा मार्गहि दाखवितो (हाच चमत्कार !) १०.


प॒रि॒वृ॒क्तेव॑ पति॒विद्यं॑ आन॒ट् पीप्या॑ना॒ कूच॑क्रेणेव सि॒ञ्चन् ।
ए॒षै॒ष्या चिद्र॒थ्या जयेम सुम॒ङ्गलं॒ सिन॑वदस्तु सा॒तम् ॥ ११॥

परिवृक्ताइव पति-विद्यं आनट् पीप्याना कूचक्रेण-इव सिचन्
एष-एष्या चित् रथ्या जयेम सु-मङ्गलं सिन-वत् अस्तु सातम् ॥ ११ ॥

एखाद्या टाकलेल्या स्त्रीला तिचा पति अचानक लाभावा किंवा पुष्ट पयोधर भाराने ताठरल्यामुळे (स्त्रीला पान्हा फुटून दूध) वाहूं लागावे, किंवा चाकाने पाणी ओढून टंच फुगलेल्या मोटेतून पाणी रिचवावे त्याप्रमाणे हे झाले. ईर्ष्येने कार्य करणार्‍या ह्या मुद्‌गलानीच्या प्रमुखत्वानेहि आपण जय मिळवू असे सैनिकांना वाटूं लागले; म्हणून त्यांचे यश चन्द्राप्रमाणे निष्कलंक आणि मंगलप्रद असो ११.


त्वं विश्व॑स्य॒ जग॑त॒श्चक्षु॑रिन्द्रासि॒ चक्षु॑षः ।
वृषा॒ यदा॒जिं वृष॑णा॒ सिषा॑ससि चो॒दय॒न् वध्रि॑णा यु॒जा ॥ १२ ॥

त्वं विश्वस्य जगतः चक्षुः इन्द्र असि चक्षुषः
वृषा यत् आजिं वृषणा सिसाससि चोदयन् वध्रिणा युजा ॥ १२ ॥

हे इंद्रा, सर्व जगताचा जरी नेत्र तूंच आहेस, कारण कसलेहि धडेल घोडे जरी रथाला जोडले, तरी धुरेला बांधलेल्या घणासारखा एका निर्जीव वस्तूलाहि तूं शूराच्या हाती देऊन त्याला युद्धांत जय मिळवून देतोस १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०३ (इंद्रसूक्त)

ऋषी - अप्रतिरथ ऐंद्र : देवता - ४ – बृहस्पति; १२ – अप्वादेवी; १३ – मरुत् अथवा इंद्र; अवशिष्ट – इंद्र
छंद - १३ – अनुष्टुभ् ; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


आ॒शुः शिशा॑नो वृष॒भो न भी॒मो घ॑नाघ॒नः क्षोभ॑णश्चर्षणी॒नाम् ।
सं॒क्रन्द॑नोऽनिमि॒ष ए॑कवी॒रः श॒तं सेना॑ अजयत् सा॒कं इन्द्रः॑ ॥ १॥

आशुः शिशानः वृषभः न भीमः घनाघनः क्षोभणः चर्षणीनां
सम्-क्रन्दनः अनि-मिषः एक-वीरः शतं सेनाः अजयत् साकं इन्द्रः ॥ १ ॥

वीरपुंगव इंद्र असा आहे की एखादा भयंकर वृषभ शिंगे घांसतो त्याप्रमाणे तो आपले वज्र घांसून झगझगीत ठेवतो, त्या कारणाने अतिशय त्वरेने शस्त्रांचा खणखणाट उडवून सैनिकांना वीरश्रीचा क्षोभ उत्पन्न होईल असे करितो; आणि वीर्यप्रकर्षाने गर्जना करून क्षणभरहि विश्रांति न घेतां युद्ध चालवितो, असा तो इंद्र अद्वितीय वीर आहे म्हणूनच तो शत्रूंचे शेकडो सेनासमूह एकाच वेळी धुळीस मिळवून देतो १.


सं॒क्रन्द॑नेनानिमि॒षेण॑ जि॒ष्णुना॑ युत्का॒रेण॑ दुश्च्यव॒नेन॑ धृ॒ष्णुना॑ ।
तदिन्द्रे॑ण जयत॒ तत् स॑हध्वं॒ युधो॑ नर॒ इषु॑हस्तेन॒ वृष्णा॑ ॥ २ ॥

सम्-क्रन्दनेन अनि-मिषेण जिष्णुना युत्-कारेण दुः-च्यवनेन धृष्णुना
तत् इन्द्रेण जयत तत् सहध्वं युधः नरः इषु-हस्तेन वृष्णा ॥ २ ॥

विक्राळ गर्जना करणारा, भक्तांचे हित साधण्यात यत्किंचित्‌ डोळेझांक न करणारा, युद्धांत सदैव विजयच मिळविणारा, युद्धामध्ये ज्याला अणुमात्र माघार घ्यावयास लावणे कोणालाच शक्य होणार नाही असा जो धैर्यसागर इंद्र त्याच्याच सहाय्याने शूर मित्रांनो तुम्ही जय मिळवा; हे युद्धकुशल वीरांनो ह्या शरहस्त वीराग्रणी देवाच्या सहाय्याने शत्रूंच्या योद्ध्‍यांना चिरडून टाका २.


स इषु॑हस्तैः॒ स नि॑ष॒ङ्गिभि॑र्व॒शी संस्र॑ष्टा॒ स युध॒ इन्द्रो॑ ग॒णेन॑ ।
सं॒सृ॒ष्ट॒जित् सो॑म॒पा बा॑हुश॒र्ध्यु१ग्रध॑न्वा॒ प्रति॑हिताभि॒रस्ता॑ ॥ ३ ॥

सः इषु-हस्तैः सः निषङ्गि-भिः वशी सम्-स्रष्टा सः युधः इन्द्रः गणेन
संसृष्ट-जित् सोम-पाः बाहु-शर्धी उग्र-धन्वा प्रति-हिताभिः अस्ता ॥ ३ ॥

चाप, भाते, बाण वागविणार्‍या सैनिकांच्या हातूनच तो शत्रूला कह्यांत आणतो. महायोद्धा इंद्र हा मरुत्‌गणाच्या योगाने आपल्या युद्धोत्सुक भक्तांना एकत्र करितो; पण एकत्र झालेल्या शत्रुसैन्याला मात्र पराजित करितो. त्याचे भुजदंड हेच सैन्याच्या ठिकाणी आहेत, त्याने धनुष्य घेतले असतां तो दिसण्यात देखील भयानक वाटतो; मग अचूक शरसन्धान करतो हे सांगावयासच पाहिजे काय ? ३.


बृह॑स्पते॒ परि॑ दीया॒ रथे॑न रक्षो॒हामित्रा॑ँ अप॒बाध॑मानः ।
प्र॒भ॒ञ्जन् सेनाः॑ प्रमृ॒णो यु॒धा जय॑न्न् अ॒स्माकं॑ एध्यवि॒ता रथा॑नाम् ॥ ४ ॥

बृहस्पते परि दीय रथेन रक्षः-हा अमित्रान् अप-बाधमानः
प्र-भजन् सेनाः प्र-मृणः युधा जयन् अस्माकं एधि अविता रथानाम् ॥ ४ ॥

हे प्रार्थनांनी प्रसन्न होणार्‍या प्रभो (बृहस्पते=इंद्रा) तूं आपल्या रथांत आरोहण करून भोंवताली संचार कर; तू राक्षसांचा नि:पात करणारा आहेस. आमच्याशी वैर करणार्‍यांचाहि तूं समूळ नाश करतोस; शत्रुसैन्याची पार धूळधाण उडवून त्यांना ठार करून तूं युद्धांत विजय मिळवितोस, तर आमच्याहि रथारूढ वीरांचा तूं रक्षणकर्ता हो ४.


ब॒ल॒वि॒ज्ञा॒य स्थवि॑रः॒ प्रवी॑रः॒ सह॑स्वान् वा॒जी सह॑मान उ॒ग्रः ।
अ॒भिवी॑रो अ॒भिस॑त्वा सहो॒जा जैत्रं॑ इन्द्र॒ रथं॒ आ ति॑ष्ठ गो॒वित् ॥ ५ ॥

बल-विजायः स्थविरः प्र-वीरः सहस्वान् वाजी सहमानः उग्रः
अभि-वीरः अभि-सत्वा सहः-जाः जैत्रं इन्द्र रथं आ तिष्ठ गो--वित् ॥ ५ ॥

तुझ्या अतुल बलावरूनच लोक तुजला तात्काळ ओळखतात, तूं पुराणपुरुष सकल वीरांमध्ये श्रेष्ठ, शत्रूंना सह पादाक्रांत करणारा, सत्याढ्य वीर, दुष्टांचे दमन करणारा, भीषण, असा देव आहेस. सर्व दृष्टींनी तूं सत्त्वबलाढ्य आणि दुर्दम्य सामर्थ्याचा उद्‌गम आहेस. तर हे इंद्रा, गो-संपन्न प्रदेश जिंकणारा असा तूं आता आपल्या विजयशाली रथावर आरोहण कर ५.


गो॒त्र॒भिदं॑ गो॒विदं॒ वज्र॑बाहुं॒ जय॑न्तं॒ अज्म॑ प्रमृ॒णन्तं॒ ओज॑सा ।
इ॒मं स॑जाता॒ अनु॑ वीरयध्वं॒ इन्द्रं॑ सखायो॒ अनु॒ सं र॑भध्वम् ॥ ६ ॥

गोत्र-भिदं गो--विदं वज्र-बाहुं जयन्तं अज्म प्र-मृणन्तं ओजसा
इमं स-जाताः अनु वीरयध्वं इन्द्रं सखायः अनु सं रभध्वम् ॥ ६ ॥

कोंडल्या गेलेल्या (ज्ञानधेनू आणि प्रकाश) धेनूंना त्यांचे बंधन तोडून त्यांना मुक्त करणारा, त्या प्रकाशधेनू भक्तांच्या हस्तगत करून देणारा वज्राप्रमाणे दुर्निवार, बाहुबलाने मण्डित, युद्धामध्ये नेहमी विजय संपादन करणारा आणि शत्रूंचा आपल्या ओजस्वितेने नायनाट करणारा जो इंद्र त्याच्याच वीर्यशालित्वाचे अनुकरण हे वीरबान्धवहो तुम्ही शक्य तितके करा; त्याच्याकडे दृष्टि ठेवून, मित्रांनो तुम्ही आपले धैर्य आणि आवेश प्रकट करा ६.


अ॒भि गो॒त्राणि॒ सह॑सा॒ गाह॑मानोऽद॒यो वी॒रः श॒तम॑न्यु॒रिन्द्रः॑ ।
दु॒श्च्य॒व॒नः पृ॑तना॒षाळ् अ॑यु॒ध्योऽ॒स्माकं॒ सेना॑ अवतु॒ प्र यु॒त्सु ॥ ७ ॥

अभि गोत्राणि सहसा गाहमानः अदयः वीरः शत-मन्युः इन्द्रः
दुः-च्यवनः पृतनाषाट् अयुध्यः अस्माकं सेनाः अवतु प्र युत्-सु ॥ ७ ॥

धेनूंच्या प्रतिबंध स्थानांमध्ये जो धडाक्याने घुसतो, जो दुष्टांवर कधी दया करीत नाही, ज्याचा क्रोध (कोणाच्या क्रोधापेक्षा) शतपटीने तीव्र आहे असा वीर हा इंद्र होय. युद्धामध्ये माघार घेण्याचे तर नांवच नको; पण शत्रुसैन्याचा मात्र तो धुव्वा उडवितो, त्याच्याशी युद्ध करण्याची कोणाचीहि प्राज्ञा नाही; असा जो हा इंद्र तो युद्धामध्ये आमच्या सैन्याचे रक्षण करो ७.


इन्द्र॑ आसां ने॒ता बृह॒स्पति॒र्दक्षि॑णा य॒ज्ञः पु॒र ए॑तु॒ सोमः॑ ।
दे॒व॒से॒नानां॑ अभिभञ्जती॒नां जय॑न्तीनां म॒रुतो॑ य॒न्त्वग्र॑म् ॥ ८ ॥

इन्द्रः आसां नेता बृहस्पतिः दक्षिणा यजः पुरः एतु सोमः
देव-सेनानां अभि-भजतीनां जयन्तीनां मरुतः यन्तु अग्रम् ॥ ८ ॥

प्रार्थेनेचा प्रभू इंद्र हाच आमच्या सैन्याचा धुरीण असो, त्याच्याबरोबर दक्षिणाधेनू, यज्ञ आणि सोम हेहि पुढे जावोत. देवाच्या कार्यासाठी युद्ध करणार्‍या ज्या सेना असतात त्या शत्रूंचा निखालस मोड करून विजयी होतात; अशा सेनेच्या आघाडीला मरुत्‌हि असोत ८.


इन्द्र॑स्य॒ वृष्णो॒ वरु॑णस्य॒ राज्ञ॑ आदि॒त्यानां॑ म॒रुतां॒ शर्ध॑ उ॒ग्रम् ।
म॒हाम॑नसां भुवनच्य॒वानां॒ घोषो॑ दे॒वानां॒ जय॑तां॒ उद॑स्थात् ॥ ९ ॥

इन्द्रस्य वृष्णः वरुणस्य राजः आदित्यानां मरुतां शर्धः उग्रं
महामनसां भुवन-च्यवानां घोषः देवानां जयतां उत् अस्थात् ॥ ९ ॥

हे आमचे सैन्य म्हणजे त्या वीरधुरंधर इंद्राचे सैन्य किंवा राजा वरुणाचे, किंवा आदित्यांचे अथवा मरुतांचे कां म्हणाना, पण हे सैन्य शत्रूंना भयंकरच वाटेल, म्हणून थोर मनाचे, परंतु पराक्रमाने सर्व भुवनांना हालवून सोडणारे जे दिव्य विबुध त्यांच्या जयघोषाचा हा निनाद पहा आकाशमण्डल भेदून वर गेला ९.


उद्ध॑र्षय मघव॒न्न् आयु॑धा॒न्युत् सत्व॑नां माम॒कानां॒ मनां॑सि ।
उद्वृ॑त्रहन् वा॒जिनां॒ वाजि॑ना॒न्युद्रथा॑नां॒ जय॑तां यन्तु॒ घोषाः॑ ॥ १० ॥

उत् हर्षय मघ-वन् आयुधानि उत् सत्वनां मामकानां मनांसि
उत् वृत्र-हन् वाजिनां वाजिनानि उत् रथानां जयतां यन्तु घोषाः ॥ १० ॥

हे भगवन्ता, आपली आयुधे परजवून सरसाव, सत्वबलाने युक्त असलेल्या आमच्या सैनिकांची मने आवेशाने भरून सोड. हे वज्रधरा, अश्ववीरांची मनेंहि रणोत्सुक कर आणि आमच्या रथांच्या चाकांचा ध्वनि आमच्या भावी यशश्रीचा जयघोष ठरेल असे कर १०.


अ॒स्माकं॒ इन्द्रः॒ समृ॑तेषु ध्व॒जेष्व् अ॒स्माकं॒ या इष॑व॒स्ता ज॑यन्तु ।
अ॒स्माकं॑ वी॒रा उत्त॑रे भवन्त्व॒स्माँ उ॑ देवा अवता॒ हवे॑षु ॥ ११॥

अस्माकं इन्द्रः सम्-ऋतेषु ध्वजेषु अस्माकं याः इषवः ताः जयन्तु
अस्माकं वीराः उत्-तरे भवन्तु अस्मान् ओं इति देवाः अवत हवेषु ॥ ११ ॥

आमच्या सैन्याचे ध्वज शत्रुसैन्यांमध्ये मिसळून गेले म्हणजे इंद्र त्यांच्या जवळ संरक्षणार्थ राहा. आमच्या सैनिकांनी सोडलेले बाण शत्रूंची शिरे छाटून विजयी होवोत; आमचेच वीर उत्कृष्ट ठरोत, त्यांचीच सरशी होवो, आणि ह्या संग्रामप्रसंगी दिव्य विबुध आमच्याच बाजूला असोत ११.


अ॒मीषां॑ चि॒त्तं प्र॑तिलो॒भय॑न्ती गृहा॒णाङ्गा॑न्यप्वे॒ परे॑हि ।
अ॒भि प्रेहि॒ निर्द॑ह हृ॒त्सु शोकै॑र॒न्धेना॒मित्रा॒स्तम॑सा सचन्ताम् ॥ १२ ॥

अमीषां चित्तं प्रति-लोभयन्ती गृहाण अङ्गानि अप्वे परा इहि
अभि प्र इहि निः दह हृत्-सु शोकैः अन्धेन अमित्राः तमसा सचन्ताम् ॥ १२ ॥

हे आपत्ते, आमच्या शत्रूंची मने बावरून टाकून तूं त्यांच्यावर कोसळणारच आहेस तर तू त्यांची शरीरेंहि लुली कर आणि त्यांना चोहोंकडून घेरून तूं त्यांची अंत:करणे शोकाने करपून टाक आणि मग जा. अशा रीतीने आमच्याशी वैर धरणारे जे दुष्ट ते स्वत:च (हाल अपेष्टेच्या) अंधकारांत सपशेल बुडून जावोत १२.


प्रेता॒ जय॑ता नर॒ इन्द्रो॑ वः॒ शर्म॑ यच्छतु ।
उ॒ग्रा वः॑ सन्तु बा॒हवो॑ऽनाधृ॒ष्या यथास॑थ ॥ १३ ॥

प्र इत जयत नरः इन्द्रः वः शर्म यच्चतु
उग्राः वः सन्तु बाहवः अनाधृष्याः यथा असथ ॥ १३ ॥

वीर सैनिकांनो पुढे चाल करा. इंद्र तुम्हाला संभाळून घे‍ईल. तुमचे भुजदण्ड शत्रूला भयंकर वाटतील, म्हणजे त्या भीतीमुळे तुमच्यावर हल्ला करण्याची त्यांना छाती होणार नाही १३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०४ (इंद्रसूक्त)

ऋषी - अष्टक वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


असा॑वि॒ सोमः॑ पुरुहूत॒ तुभ्यं॒ हरि॑भ्यां य॒ज्ञं उप॑ याहि॒ तूय॑म् ।
तुभ्यं॒ गिरो॒ विप्र॑वीरा इया॒ना द॑धन्वि॒र इ॑न्द्र॒ पिबा॑ सु॒तस्य॑ ॥ १॥

असावि सोमः पुरु-हूत तुभ्यं हरि-भ्यां यजं उप याहि तूयं
तुभ्यं गिरः विप्र-वीराः इयानाः दधन्विरे इन्द्र पिब सुतस्य ॥ १ ॥

हे सर्वजनस्तुता देवा हा पहा सोमरस तुझ्यासाठी पिळून ठेविला आहे; तर तूं हरिद्वर्ण अश्व जोडून येथे सत्वर ये; आमचे वीर्यशाली स्तोतृजन तुझे स्तवन करून प्रार्थना करीत करीत तुझ्या सेवेसाठी निघाले आहेत, तर हे इंद्रा त्यांच्या सोमरसाचा आस्वाद घे १.


अ॒प्सु धू॒तस्य॑ हरिवः॒ पिबे॒ह नृभिः॑ सु॒तस्य॑ ज॒ठरं॑ पृणस्व ।
मि॒मि॒क्षुर्यं अद्र॑य इन्द्र॒ तुभ्यं॒ तेभि॑र्वर्धस्व॒ मदं॑ उक्थवाहः ॥ २ ॥

अप्-सु धूतस्य हरि-वः पिब इह नृ-भिः सुतस्य जठरं पृणस्व
मिमिक्षुः यं अद्रयः इन्द्र तुभ्यं तेभिः वर्धस्व मदं उक्थ-वाहः ॥ २ ॥

हा सोमपल्लव पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा रस काढला आहे तर हे हरिदश्वा तो प्राशन करून आपले जठर तृप्तीने पूर्ण कर. इंद्रा, हा रस तुझ्यासाठी ग्राव्यांनीच एकत्र घोटून मिसळलेला आहे, तर उक्थ स्तोत्रांनी भक्तांकडे येणार्‍या देवा, तूं त्या सोमरसांनी संतुष्ट हो २.


प्रोग्रां पी॒तिं वृष्ण॑ इयर्मि स॒त्यां प्र॒यै सु॒तस्य॑ हर्यश्व॒ तुभ्य॑म् ।
इन्द्र॒ धेना॑भिरि॒ह मा॑दयस्व धी॒भिर्विश्वा॑भिः॒ शच्या॑ गृणा॒नः ॥ ३ ॥

प्र उग्रां पीतिं वृष्णे इयर्मि सत्यां प्र-यै सुतस्य हरि-अश्व तुभ्यं
इन्द्र धेनाभिः इह मादयस्व धीभिः विश्वाभिः शच्या गृणानः ॥ ३ ॥

हे वीर धुरीणा, तुझ्यासाठीच हा सोमरस खरोखरच फार तीक्ष्ण बनवून हे हरिदश्वा तुजपुढे ठेविला आहे; तर आमच्या स्तुतिघोषाने तूं येथे हृष्ट हो. आम्ही आमच्या सर्व बुद्धिमत्तेने आणि शक्तींनी प्रयत्‍न करून तुझे स्तवन केले आहे ३.


ऊ॒ती श॑चीव॒स्तव॑ वी॒र्येण॒ वयो॒ दधा॑ना उ॒शिज॑ ऋत॒ज्ञाः ।
प्र॒जाव॑दिन्द्र॒ मनु॑षो दुरो॒णे त॒स्थुर्गृ॒णन्तः॑ सध॒माद्या॑सः ॥ ४ ॥

ऊती शची-वः तव वीर्येण वयः दधानाः उशिजः ऋत-जाः
प्रजावत् इन्द्र मनुषः दुरोणे तस्थुः गृणन्तः सध-माद्यासः ॥ ४ ॥

हे सर्व शक्तिमन्ता, तुझ्याच संरक्षणामुळे आणि वीर्यशालित्वामुळे तुझ्यासाठी उत्सुक झालेल्या तारुण्ययुक्त भक्तांना सत्यधर्माचे ज्ञान झाले; म्हणून हे इंद्रा पुत्रपौत्र प्रजा यांच्यासह तेहि हृष्ट होतात आणि मनूच्या यज्ञगृहांत तुझे यशोगायन करीत असतात ४.


प्रणी॑तिभिष् टे हर्यश्व सु॒ष्टोः सु॑षु॒म्नस्य॑ पुरु॒रुचो॒ जना॑सः ।
मंहि॑ष्ठां ऊ॒तिं वि॒तिरे॒ दधा॑ना स्तो॒तार॑ इन्द्र॒ तव॑ सू॒नृता॑भिः ॥ ५ ॥

प्रनीति-भिः ते हरि-अश्व सु-स्तोः सुसुम्नस्य पुरु-रुचः जनासः
मंहिष्ठां ऊतिं वि-तिरे दधानाः स्तोतारः इन्द्र तव सूनृताभिः ॥ ५ ॥

हे हरिदश्वा इंद्रा, तूं जो अत्यंत अचल, आनंदपूर्ण आणि अत्युज्वल आहेस, त्या तुझ्या अनुशासनांना अनुसरून सर्व मनुष्यें वागतात आणि सर्व स्तोतृजन आपल्या उद्धारासाठी, हे इंद्रा, तुझ्या लोकोत्तर संरक्षणावर तुझ्या सत्यमधुर अभिवचनांवर विसंबून राहातात ५.


उप॒ ब्रह्मा॑णि हरिवो॒ हरि॑भ्यां॒ सोम॑स्य याहि पी॒तये॑ सु॒तस्य॑ ।
इन्द्र॑ त्वा य॒ज्ञः क्षम॑माणं आनड् दा॒श्वाँ अ॑स्यध्व॒रस्य॑ प्रके॒तः ॥ ६ ॥

उप ब्रह्माणि हरि-वः हरि-भ्यां सोमस्य याहि पीतये सुतस्य
इन्द्र त्वा यजः क्षममाणं आनट् दाश्वान् असि अध्वरस्य प्र-केतः ॥ ६ ॥

हे हरिदश्वा इंद्रा, तूं आपल्या हरिद्वर्ण अश्वांसह आमच्या प्रार्थनांना अनुलक्षून आगमन कर. आम्ही पिळून सिद्ध केलेला सोमरस प्राशन करण्याकरतां आगमन कर. हे इंद्रा, तूं जो क्षमाशील त्या तुला आमचा यज्ञ जाऊन पोहोंचतो; कारण भक्तांना अभिष्ट वरदान देणारा असा तूंच अध्वर यागाचा ज्ञाता आणि प्रवर्तक आहेस ६.


स॒हस्र॑वाजं अभिमाति॒षाहं॑ सु॒तेर॑णं म॒घवा॑नं सुवृ॒क्तिम् ।
उप॑ भूषन्ति॒ गिरो॒ अप्र॑तीतं॒ इन्द्रं॑ नम॒स्या ज॑रि॒तुः प॑नन्त ॥ ७ ॥

सहस्र-वाजं अभिमाति-सहं सुते--रणं मघ-वानं सु-वृक्तिं
उप भूषन्ति गिरः अप्रति-इतं इन्द्रं नमस्याः जरितुः पनन्त ॥ ७ ॥

ज्याची सत्त्वसामर्थ्याची वैभवे अगणित आहेत, घातकी दुष्टांचा जो चुराडा उडवितो, जो सोमरसाने तल्लीन होतो, अशा त्या दिव्यैश्वर्यमंडित देवाच्या सेवेला माझ्या प्रेमपूर्ण स्तुति नम्रपणे सादर असतात. ज्याचा प्रतिकार करणे अशक्य अशा इंद्राचे यशस्तवन कविजनांच्या प्रणिपातांनी होते ७.


स॒प्तापो॑ दे॒वीः सु॒रणा॒ अमृ॑क्ता॒ याभिः॒ सिन्धुं॒ अत॑र इन्द्र पू॒र्भित् ।
न॒व॒तिं स्रो॒त्या नव॑ च॒ स्रव॑न्तीर्दे॒वेभ्यो॑ गा॒तुं मनु॑षे च विन्दः ॥ ८ ॥

सप्त आपः देवीः सु-रणाः अमृक्ताः याभिः सिन्धुं अतरः इन्द्र पूः-भित्
नवतिं स्रोत्याः नव च स्रवन्तीः देवेभ्यः गातुं मनुषे च विन्दः ॥ ८ ॥

रमणीय आणि निष्कलंक अशा ज्या सात पूज्य (पवित्र) नद्या-हे इंद्रा, शत्रूची नगरे फोडून ज्यांच्या जलौघांनी तूं सागर भरून सोडलास त्या नद्या, आणि त्याचप्रमाणे वेगाने वहाणारे नव्व्याण्णव जलनिर्झर हे सर्व तूं दिव्यविबुधांसाठी हस्तगेत केलेस आणि मानवांसाठी (न्यायनीतिचा) मार्ग आंखून दिलास ८.


अ॒पो म॒हीर॒भिश॑स्तेरमु॒ञ्चोऽ॑जागरा॒स्व् अधि॑ दे॒व एकः॑ ।
इन्द्र॒ यास्त्वं वृ॑त्र॒तूर्ये॑ च॒कर्थ॒ ताभि॑र्वि॒श्वायु॑स्त॒न्वं पुपुष्याः ॥ ९ ॥

अपः महीः अभि-शस्तेः अमुचः अजागः आसु अधि देवः एकः
इन्द्र याः त्वं वृत्र-तूर्ये चकर्थ ताभिः विश्व-आयुः तन्वं पुपुष्याः ॥ ९ ॥

ह्या सर्व महानद्यांना तूं त्या पातकी राक्षसाच्या तावडीतून सोडविलेस, आणि त्या मोकळ्या झाल्या असतांहि (सर्वांचा) एकच देव जो तूं त्याने जागरूक राहून त्या जलांवर सतत दृष्टि ठेविली. ह्याप्रमाणे इंद्रा, वृत्र-युद्धांमध्ये जी उदके तूं जिंकलीस, त्यांच्या योगाने तूं सर्व विश्वाचे आयुष्य आणि शरीरे ह्यांचे पोषण केलेस ९.


वी॒रेण्यः॒ क्रतु॒रिन्द्रः॑ सुश॒स्तिरु॒तापि॒ धेना॑ पुरुहू॒तं ई॑ट्टे ।
आर्द॑यद्वृ॒त्रं अकृ॑णोदुलो॒कं स॑सा॒हे श॒क्रः पृत॑ना अभि॒ष्टिः ॥ १० ॥

वीरेण्यः क्रतुः इन्द्रः सु-शस्तिः उत अपि धेना पुरु-हूतं ईटे
आदर्यत् वृत्रं अकृणोत् ओं इति लोकं ससहे शक्रः पृतनाः अभिष्टिः ॥ १० ॥

इंद्र हा वीरांमध्ये श्रेष्ठ, अद्‍भुत पराक्रमी अत्यंत कर्तृत्वशाली आणि उत्कृष्ट स्तोत्रांचा विषय होय. ज्याचा धांवा सर्व लोक करितात अशा त्या देवाकडेच कविजनांच्या स्तवनवाणी वळतात. त्याने वृत्राला फाडून टाकले आणि भूलोक हा प्रकाशासाठी मोकळा केला. सर्वसमर्थ इंद्राने दुष्ट शत्रूच्या सैन्याचा कोंडमारा करून त्याचा नाश केला १०.


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑नं॒ इन्द्रं॑ अ॒स्मिन् भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्तं॑ उ॒ग्रं ऊ॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ ११॥

शुनं हुवेम मघ-वानं इन्द्रं अस्मिन् भरे नृ-तमं वाज-सातौ
शृण्वन्तं उग्रं ऊतये समत्-सु घ्नन्तं वृत्राणि सम्-जितं धनानाम् ॥ ११ ॥

सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून दिव्यैश्वर्यसंपन्न शूर श्रेष्ठ जो इंद्र त्याचा धांवा ह्या सत्वसंग्रामाच्या प्रसंगी आम्ही करीत आहो; आमची प्रार्थना तो ऐकून घेतो. तो(दुष्टांना) भयंकर वाटतो. युद्धांत अधार्मिकाम्चा नाश करतो आणि भक्तांना विजयश्री मिळवून देतो ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०५ (इंद्रसूक्त)

ऋषी - दुर्मित्र कौत्स अथवा सुमित्र कौत्स : देवता - इंद्र
छंद - १ – गायत्री अथवा उष्णिह; २, ७ पिपीलिकमध्या; ११ – त्रिष्टुब् ; अवशिष्ट - उष्णिह


क॒दा व॑सो स्तो॒त्रं हर्य॑त॒ आव॑ श्म॒शा रु॑ध॒द्वाः ।
दी॒र्घं सु॒तं वा॒ताप्या॑य ॥ १॥

कदा वसो इति स्तोत्रं हर्यते आ अव श्मशा रुधत् वारितिवाः
दीर्घं सुतं वाताप्याय ॥ १ ॥

दिव्यनिधिधारका इंद्रा, (आमच्या) स्तोत्राचा तूं प्रेमाने केव्हां स्वीकार करणार ? (जलाचे) हे सर्व प्रवाह अडले आहेत, ते मोकळे कर. सोमरस पिळून किती तरी वेळ झाला आहे, त्यांत उदक मिसळा; ’वातप्य’ मिश्रणाचा खोळंबा झाला आहे १.


हरी॒ यस्य॑ सु॒युजा॒ विव्र॑ता॒ वेरर्व॒न्तानु॒ शेपा॑ ।
उ॒भा र॒जी न के॒शिना॒ पति॒र्दन् ॥ २ ॥

हरी इति यस्य सु-युजा वि-व्रता वेः अर्वन्ता अनु शेपा
उभा रजी इति न केशिना पतिः दन् ॥ २ ॥

ज्या इंद्राचे हरिद्वर्ण अश्व चांगले सुयंत्र जाणारे (पण एखाद वेळी) सैरावैरा धांवत पक्ष्याप्रमाणे अप्रतिरुध दौडतात, त्या उभयतांच्या आयाळाचे आणि पुच्छाचे केंस तर रजोगोलाप्रमाणे झुबकेदार दिसतात आणि त्यांचा प्रभू (इंद्र तर) पाहिजे ते वरदान देणारा आहे २.


अप॒ योरिन्द्रः॒ पाप॑ज॒ आ मर्तो॒ न श॑श्रमा॒णो बि॑भी॒वान् ।
शु॒भे यद्यु॑यु॒जे तवि॑षीवान् ॥ ३ ॥

अप योः इन्द्रः पापजे आ मर्तः न शश्रमाणः बिभीवान्
शुभे यत् युयुजे तविषी-वान् ॥ ३ ॥

पातकापासून ज्या वासना (ज्या वृत्ति) उद्भवतात, त्यांचा नाश इंद्र करितो; कारण मर्त्य (मानव) हा असा आहे की त्याला परिश्रम नकोत, शिवाय, तो भित्राहि आहे. परंतु असाच मनुष्य जर शुभ कार्याला प्रवृत्त होईल, तर तो मोठा धैर्यशाली होईल ३.


सचा॒योरिन्द्र॒श्चर्कृ॑ष॒ आँ उ॑पान॒सः स॑प॒र्यन् ।
न॒दयो॒र्विव्र॑तयोः॒ शूर॒ इन्द्रः॑ ॥ ४ ॥

सचा आयोः इन्द्रः चर्कृषे आ उपानसः सपर्यन्
नदयोः वि-व्रतयोः शूरः इन्द्रः ॥ ४ ॥

परंतु इंद्र हाहि (असा आहे की) भक्ताने सेवा केली की त्याच्या आयुष्याचा गाडा डुरकण्या फोडणार्‍या नाठाळांच्या मधून सुद्धा ज्याचा त्याने सहज ओढावा. अशी व्यवस्था करणारा शूर श्रेष्ठ (कोण तर) इंद्र हाच ४.


अधि॒ यस्त॒स्थौ केश॑वन्ता॒ व्यच॑स्वन्ता॒ न पु॒ष्ट्यै ।
व॒नोति॒ शिप्रा॑भ्यां शि॒प्रिणी॑वान् ॥ ५ ॥

अधि यः तस्थौ केष-वन्ता व्यचस्वन्ता न पुष्ट्यै
वनोति शिप्राभ्यां शिप्रिणी-वान् ॥ ५ ॥

भरपूर आयाळ असलेल्या आणि चोहोंकडे धांवणार्‍या अश्वांवर जो सर्वांच्या पोषण कार्यासाठीच जणों आरूढ होतो, तो जोड शिरस्त्राणे धारण करणारा इंद्र आपल्या जिरेटोपाच्य दोन फुन्नेदार तुर्‍यांनी प्रतिस्पर्ध्यांना आव्हानच देतो ५.


प्रास्तौ॑दृ॒ष्वौजा॑ ऋ॒ष्वेभि॑स्त॒तक्ष॒ शूरः॒ शव॑सा ।
ऋ॒भुर्न क्रतु॑भिर्मात॒रिश्वा॑ ॥ ६ ॥

प्र अस्तौत् ऋष्व-ओजाः ऋष्वेभिः ततक्ष शूरः शवसा
ऋभुः न क्रतु-भिः मातरिश्वा ॥ ६ ॥

पण भक्ताने त्याचे स्तवन केले तेव्हां त्या उत्फुल्लतेजस्क देवाने, त्या शूर इंद्राने, त्या उत्कट बलाढ्य अशा मातरिश्वरूपधर इंद्राने उदात्तचारित्र्य भक्तासह ऋभूप्रमाणेच आपल्याच कर्तृत्वशक्तीने वज्र निर्माण करून ते झगझगीत तयार केले ६.


वज्रं॒ यश्च॒क्रे सु॒हना॑य॒ दस्य॑वे हिरीम॒शो हिरी॑मान् ।
अरु॑तहनु॒रद्‌भु॑तं॒ न रजः॑ ॥ ७ ॥

वज्रं यः चक्रे सु-हनाय दस्यवे हिरीमशः हरीमान्
अरुत-हनुः अद्भुतं न रजः ॥ ७ ॥

अधार्मिक दुष्टाला सहज ठार मारतां यावे म्हणून जे वज्र त्याने निर्माण केले, ते अनेक वर्णांच्या अंतरिक्षाप्रमाणे आश्चर्योत्पादक होते. आणि इंद्र हा अद्भूतरूपधर, अद्भूत सामर्थ्यवान‌, आणि अप्रतिहत कर्तृत्ववान्‌ असल्यामुळेच तो ते वज्र बनवूं शकला ७.


अव॑ नो वृजि॒ना शि॑शीह्यृ॒चा व॑नेमा॒नृचः॑ ।
नाब्र॑ह्मा य॒ज्ञ ऋध॒ग् जोष॑ति॒ त्वे ॥ ८ ॥

अव नः वृजिना शिशीहि ऋचा वनेम अनृचः
न अब्रह्मा यजः ऋधक् जोषति त्वे इति ॥ ८ ॥

हे देवा, आमच्या पातकांना आमच्या अंत:करणापासून घांसून काढून त्या पातकांचा नाश कर. ऋक्‌स्तोत्राने स्तवन करूनच ऋक्‌स्तवन न करणार्‍या लोकांवर आम्ही जय मिळवूं असे कर कारण ब्रह्मस्तवनांवांचून कोणताहि यज्ञ तुजला केव्हांहि मान्य होत नाही ८.


ऊ॒र्ध्वा यत् ते॑ त्रे॒तिनी॒ भूद्य॒ज्ञस्य॑ धू॒र्षु सद्म॑न् ।
स॒जूर्नावं॒ स्वय॑शसं॒ सचा॒योः ॥ ९ ॥

ऊर्ध्वा यत् ते त्रेतिनी भूत् यजस्य धूः-सु सद्मन्
स-जूः नावं स्व-यशसं सचा आयोः ॥ ९ ॥

त्रेताग्नींनी (तीन प्रकारच्या अग्नींनी) पुरस्कृत असलेले यज्ञकर्म तुझ्याप्रीत्यर्थ चालू असते, तेव्हां यज्ञाच्या अग्रस्थानावर, यज्ञाच्या सदनांत तू प्रसन्नांत:करणाने वास करतोस; आणि तुझ्याच यशाने मंडित अशा यज्ञनौकेमध्ये तूं भक्तासह आरूढ होतोस ९.


श्रि॒ये ते॒ पृश्नि॑रुप॒सेच॑नी भूच् छ्रि॒ये दर्वि॑ररे॒पाः ।
यया॒ स्वे पात्रे॑ सि॒ञ्चस॒ उत् ॥ १० ॥

श्रिये ते पृश्निः उप-सेचनी भूत् श्रिये दर्विः अरेपाः
यया स्वे पात्रे सिचसे उत् ॥ १० ॥

विपुल दुग्ध देणारी पृश्नि धेनू तुझ्या वैभवासाठीच कार्य करिते. पवित्र जी यज्ञदर्वी (पळी), ती देखील तुझ्याच यशश्रीसाठी आहुति अर्पण करिते; कारण त्याच दर्वीने तू चमसामध्ये सोमरस ओततोस १०.


श॒तं वा॒ यद॑सुर्य॒ प्रति॑ त्वा सुमि॒त्र इ॒त्थास्तौ॑द्दुर्मि॒त्र इ॒त्थास्तौ॑त् ।
आवो॒ यद्द॑स्यु॒हत्ये॑ कुत्सपु॒त्रं प्रावो॒ यद्द॑स्यु॒हत्ये॑ कुत्सव॒त्सम् ॥ ११॥

शतं वा यत् असुर्य प्रति त्वा सु-मित्रः इत्था अस्तौत् दुः-मित्रः इत्था अस्तौत्
आवः यत् दस्यु-हत्ये कुत्स-पुत्रं प्र आवः यत् दस्यु-हत्ये कुत्स-वत्सम् ॥ ११ ॥

हे इश्वरा, याप्रमाणे सुमित्राने तुझे स्तवन शेकडो वेळा केले तसेंच ते दुर्मित्रानेहि शेकडो वेळा केले आहे. कारण अधार्मिक शत्रूंचा नाश करण्याकरिता तूं कुत्साच्या पुत्राला सहाय केलेस, अधार्मिकांचा नाश करण्यासाठी तू कुत्साच्या बाळकाचे रक्षणहि केलेस ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०६ (अश्विनीकुमारांचे गूढसूक्त )

ऋषी - भूतांश काश्यप : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


उ॒भा उ॑ नू॒नं तदिद॑र्थयेथे॒ वि त॑न्वाथे॒ धियो॒ वस्त्रा॒पसे॑व ।
स॒ध्री॒ची॒ना यात॑वे॒ प्रें अ॑जीगः सु॒दिने॑व॒ पृक्ष॒ आ तं॑सयेथे ॥ १॥

उभौ ओं इति नूनं तत् इत् अर्थयेथेइति वि तन्वाथेइति धियः वस्त्रा अपसाइव
सध्रीचीना यातवे प्र ईं अजीगः सुदिनाइव पृक्षः आ तंसयेथेइति ॥ १ ॥

खरोखर असे वाटतें की तुम्हा उभयतांची अपेक्षा अशीच आहे की कुशल विणकर ज्याप्रमाणे आपले सणंग चांगले लांबरूंद तयार करतो, त्याप्रमाणे भक्ताची प्रतिभा त्या अपेक्षेला सर्व विषयस्पर्शी करावी आणि तुम्ही त्या महत्कार्याच्या मार्गाला लागावे यासाठीच त्या अपेक्षेला जागृत केले ना ? (असे आहे तर) आजच्या शुभ दिवशी तुम्ही आपले सामर्थ्यच प्रदर्शित करीत आहां १.


उ॒ष्टारे॑व॒ फर्व॑रेषु श्रयेथे प्रायो॒गेव॒ श्वात्र्या॒ शासु॒रेथः॑ ।
दू॒तेव॒ हि ष्ठो य॒शसा॒ जने॑षु॒ माप॑ स्थातं महि॒षेवा॑व॒पाना॑त् ॥ २ ॥

उष्टाराइव फर्वरेषु श्रयेथे इति प्रायोगाइव श्वात्र्या शासुः आ इथः
दूताइव हि स्थः यशसा जनेषु मा अप स्थातं महिषाइव अव-पानात् ॥ २ ॥

उंट जसा निर्जल प्रदेशांतून सहज धांवतो, किंवा गाडीला जोडलेले अश्व जसे जोराने धांवतात, तशाच [किंवा त्याहिपेक्षां जास्त] वेगाने तुम्ही स्तोतृ जनांच्या कवनाकडे धांवत जातां; सर्व जनतेचे यशस्वी मार्गदर्शक (दूत) तुम्ही आहांत, आणि तुम्ही जरी अतिशय श्रेष्ठ आहां, तरी एखाद्या भक्ताचा सोमरस क्षुल्लक आहे अशा समजुतीने त्यापासून दूर राहूं नका २.


सा॒कं॒युजा॑ शकु॒नस्ये॑व प॒क्षा प॒श्वेव॑ चि॒त्रा यजु॒रा ग॑मिष्टम् ।
अ॒ग्निरि॑व देव॒योर्दी॑दि॒वांसा॒ परि॑ज्मानेव यजथः पुरु॒त्रा ॥ ३ ॥

साकम्-युजा शकुनस्य-इव पक्षा पश्वाइव चित्रा यजुः आ गमिष्टं
अग्निः-इव देव-योः दीदि-वांसा परिज्मानाइव यजथः पुरु-त्रा ॥ ३ ॥

पक्ष्याचे दोन्ही पंख सारखेच फडफडत रहावे त्याप्रमाणे वेगाने दौडतच एखाद्या अद्‍भुत पशूसह तुम्ही आमच्या यज्ञासाठी आगमन करा. देवसेवा रत यजमानाच्या अग्नीप्रमाणे तुम्ही प्रदीप्त असतां आणि सर्वत्र जाणार्‍या ऋत्विजाप्रमाणे तुम्हींहि सर्व ठिकाणी जाऊन भक्ताचे यज्ञकर्म पूर्ण करतां ३.


आ॒पी वो॑ अ॒स्मे पि॒तरे॑व पु॒त्रोग्रेव॑ रु॒चा नृ॒पती॑व तु॒र्यै ।
इर्ये॑व पु॒ष्ट्यै कि॒रणे॑व भु॒ज्यै श्रु॑ष्टी॒वाने॑व॒ हवं॒ आ ग॑मिष्टम् ॥ ४ ॥

आपी इति वः अस्मे इति पितराइव पुत्रा उग्राइव रुचा नृपतीइवेतिनृपती-इव तुर्यै
इर्याइव पुष्ट्यै किरणाइव भुज्यै श्रुष्टीवानाइव हवं आ गमिष्टम् ॥ ४ ॥

तुम्ही सर्वांचेच आप्त, पण पुत्राला जसे आईबाप त्याप्रमाणे तुम्ही आहांत; (शत्रूवर) चाल करण्यास निघालेल्या राजाप्रमाणे तुम्ही तेजाने कठोर दिसतां, आणि पुष्टतेला जसा पौष्टिक पदार्थ (किंवा व्यायाम), उबेला जसा प्रकाश, त्याप्रमाणे तुम्ही हांकेला "ओ" म्हणण्याला आमची प्रार्थना कारण होते. तर आतां आगमन कराच ४.


वंस॑गेव पूष॒र्या शि॒म्बाता॑ मि॒त्रेव॑ ऋ॒ता श॒तरा॒ शात॑पन्ता ।
वाजे॑वो॒च्चा वय॑सा घर्म्ये॒ष्ठा मेषे॑वे॒षा स॑प॒र्याख्प् पुरी॑षा ॥ ५ ॥

वंसगाइव पूषर्या शिम्बाता मित्राइव ऋता शतरा शातपन्ता
वाजाइव उच्चा वयसा घर्म्ये--स्था मेषाइव इषा सपर्या पुरीषा ॥ ५ ॥

दोन पुष्ट वृषभ (किंवा वीरपुंगव) जसे सुखप्रद, अथवा दोन मित्र जसे शतपटीने संतोषवर्धक, अथवा न्यायाचा उपदेश जसा सहस्त्रपटीने आनंददायक, त्याप्रमाणे तारुण्याने सळसळणारे तुम्ही उभयतां सत्वाढ्य वीर उंच आकाशांत (किंवा ज्या आसनावर) आरूढ होतां आणि दोन तुंद एडके बाळगणार्‍याप्रमाणे तुम्ही (धकाधकीमध्ये) सन्मानच पावतां ५.


सृ॒ण्येव ज॒र्भरी॑ तु॒र्फरी॑तू नैतो॒शेव॑ तु॒र्फरी॑ पर्फ॒रीका॑ ।
उ॒द॒न्य॒जेव॒ जेम॑ना मदे॒रू ता मे॑ ज॒राय्व् अ॒जरं॑ म॒रायु॑ ॥ ६ ॥

सृण्याइव जर्भरी इति तुर्फरीतूइति नैतोशाइव तुर्फरी इति पर्फरीका
उदन्यजा इव जेमना मदेरू इति ता मे जरायु अजरं मरायु ॥ ६ ॥

मस्त हत्तीला जसा अंकुश, त्याप्रमाणे तुम्ही दुष्टाला वठणीवर आणतां, नाही तर नितोशाप्रमाणे त्याचा फडशाच उडवितां, त्याची सर्वतोपरी दुर्दशा करून टाकतां; उदकामध्ये जसे रत्न सांपडावे, त्याप्रमाणे तुम्ही अमोल आहांत, मदपरिहारक आहांत. आणि म्हातारपणामुळे अगदी थकलेला कोणी असला तरी त्याला तुम्ही तरुण करतां आणि मरू घातलेल्यांनाहि पण तसा धडधाकट करतां ६.


प॒ज्रेव॒ चर्च॑रं॒ जारं॑ म॒रायु॒ क्षद्मे॒वार्थे॑षु तर्तरीथ उग्रा ।
ऋ॒भू नाप॑त् खरम॒ज्रा ख॒रज्रु॑र्वा॒युर्न प॑र्फरत् क्षयद्रयी॒णाम् ॥ ७ ॥

पज्राइव चर्चरं जारं मरायु क्षद्म-इव अर्थेषु तर्तरीथः उग्रा
ऋभू इति न आपत् खरमज्रा खर-ज्रुः वायुः न पर्फरत् क्षयत् रयीणाम् ॥ ७ ॥

डळमळणार्‍याला तुम्ही खंबीर करतां, तसेंच जरठाला, मरगळलेल्याला दणकट करण्याच्या कार्यात, हे शत्रुभीषण देवांनो, तुम्ही ती बाजू किती तरी झटपट उरकतां; हे अत्यंत शुद्ध देवांनो निरपवाद पवित्रपणा ऋभूंनाहि प्राप्त झाला नसेल; तथापि तुमचा शुद्ध आणि त्वरित संचार वायूप्रमाणे भर्रभर्र सर्वत्र होतो; पण तो इच्छित धनानेहि पूर्ण असतो ७.


घ॒र्मेव॒ मधु॑ ज॒ठरे॑ स॒नेरू॒ भगे॑विता तु॒र्फरी॒ फारि॒वार॑म् ।
प॒त॒रेव॑ चच॒रा च॒न्द्रनि॑र्णि॒ङ् मनऋ॑ङ्गा मन॒न्याख्प् न जग्मी॑ ॥ ८ ॥

घर्माइव मधु जठरे सनेरूइति भगे--अविता तुर्फरी इति फारिवा अरं पतरा इव चचरा चन्द्र-निर्निक् मनः-ऋङ्गा मनन्या न जग्मी इति ॥ ८ ॥

धर्मापात्रांत जसे दूध त्याप्रमाणे भक्ताच्या अंत:करणांत मधाचे माधुर्य उत्पन्न होण्याकरतां; भक्ताला दैव अनुकूल व्हावे, त्याला ऐश्वर्य लाभावे अशा दृष्टीने त्याच्यावर कृपा करतां, तुर्फरी, फारिया इत्यादि आयुधें घेऊन शत्रूवर चाल करतां, तुम्ही पक्ष्याप्रमाणे चंचल आहां; पण चन्द्राप्रमाणे आल्हाददायकहि आहां. शरीराच्या सौंदर्यापेक्षां मनाचेंच भूषण तुम्हाला आवडते, म्हणूनचे तुम्ही भक्तांचा अत्यंत मननीय असा स्तुतिविषय झाला आहां; कारण तुम्हीं भक्तांकडे अतिशय त्वरेने येतां ८.


बृ॒हन्ते॑व ग॒म्भरे॑षु प्रति॒ष्ठां पादे॑व गा॒धं तर॑ते विदाथः ।
कर्णे॑व॒ शासु॒रनु॒ हि स्मरा॒थोऽं॑शेव नो भजतं चि॒त्रं अप्नः॑ ॥ ९ ॥

बृहन्ताइव गम्भरेषु प्रति-स्थां पादाइव गाधं तरते विदाथः
कर्णा इव शासुः अनु हि स्मराथः अंशाइव नः भजतं चित्रं अप्नः ॥ ९ ॥

अडचण कितीहि बिकट, त्रासदायक प्रसंग कितीहि गंभीर असो; उथळ पाण्यांतून जसे सहज चालत जावे, त्याप्रमाणे आपले स्थान कसे स्थिर करावे ते तुम्हाला माहित आहेच; पण ते तुम्ही भक्ताला विदित करून देता आणि आमच्या आश्चर्योत्पादक यज्ञकर्मामध्ये अंशभागी होतां ९.


आ॒र॒ङ्ग॒रेव॒ मध्व् एर॑येथे सार॒घेव॒ गवि॑ नी॒चीन॑बारे ।
की॒नारे॑व॒ स्वेदं॑ आसिष्विदा॒ना क्षामे॑वो॒र्जा सू॑यव॒सात् स॑चेथे ॥ १० ॥

आरङ्गराइव मधु आ ईरयेथेइति सारघाइव गवि नीचीन-बारे
कीनारा इव स्वेदं आसिस्विदाना क्षाम-इव ऊर्जा सुयवस-अत् सचेथेइतिस् ॥ १० ॥

गूढ गुंजन करणार्‍या भृंगाप्रमाणे किंवा मधुमक्षिकेप्रमाणे तुम्ही धेनूच्या उघड्या कासेंत देखील मधुर दुग्ध ठेवितां, आणि जसा एखादा काबाडी कष्ट करून घामाघुम होतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्याकरतां परिश्रम घेतां, आणि खंगलेली गाय पौष्टिक चारा घालून धष्टपुष्ट करा, त्याप्रमाणे भक्ताच्या आशेला समृद्धीची जोड देता १०.


ऋ॒ध्याम॒ स्तोमं॑ सनु॒याम॒ वाजं॒ आ नो॒ मन्त्रं॑ स॒रथे॒होप॑ यातम् ।
यशो॒ न प॒क्वं मधु॒ गोष्व् अ॒न्तरा भू॒तांशो॑ अ॒श्विनोः॒ कामं॑ अप्राः ॥ ११॥

ऋध्याम स्तोमं सनुयाम वाजं आ नः मन्त्रं स-रथा इह उप यातं
यशः न पक्वं मधु गोषु अन्तः आ भूत-अंशः अश्विनोः कामं अप्राः ॥ ११ ॥

तर मित्रांनो) चला, स्तोत्रकलाप सतत वाढत असा म्हणूं या, आम्हांला सत्त्वयुक्त विजयप्राप्ति करून घ्यावयाची आहे; तर आमच्या मननयुक्त स्तोत्रांकडे लक्ष द्या आणि रथ जोडून झटपट आगमन करा. धेनूच्या कासेत तुम्ही परिपक्व मधुर दुग्ध ठेवतां हे कृति तुमच्या परिपूर्ण यशाला योग्य अशीच आहे; म्हणूनच आम्हा भूतांशाची अश्वीदेवाच्या दर्शनाचे इच्छा पूर्ण झाली आहे ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०७ (दक्षिणासूक्त)

ऋषी - दिव्य आंगिरस अथवा दक्षिणा प्राजापत्य : देवता - दक्षिणा अथवा दातृ
छंद - ४ – जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


आ॒विर॑भू॒न् महि॒ माघो॑नं एषां॒ विश्वं॑ जी॒वं तम॑सो॒ निर॑मोचि ।
महि॒ ज्योतिः॑ पि॒तृभि॑र्द॒त्तं आगा॑दु॒रुः पन्था॒ दक्षि॑णाया अदर्शि ॥ १॥

आविः अभूत् महि माघोनं एषां विश्वं जीवं तमसः निः अमोचि
महि ज्योतिः पितृ-भिः दत्तं आ अगात् उरुः पन्थाः दक्षिणायाः अदर्शि ॥ १ ॥

पहा दिव्य विभूतींचे हे ऐश्वर्य कसें प्रकट झाले आहे ! त्यामुळे प्राणिमात्रांसुद्धा सर्व स्थावरजंगम वस्तु अंधकारांतून मुक्त झाल्या, पितरांनी आम्हांसाठी दिलेले सूर्यरूप महत्तेज प्रादुर्भूत झाले आणि यज्ञपूर्तीसाठी द्यावयाच्या दक्षिणेचा थोर महिमा आमच्या दृष्टिपुढे उभा राहिला १.


उ॒च्चा दि॒वि दक्षि॑णावन्तो अस्थु॒र्ये अ॑श्व॒दाः स॒ह ते सूर्ये॑ण ।
हि॒र॒ण्य॒दा अ॑मृत॒त्वं भ॑जन्ते वासो॒दाः सो॑म॒ प्र ति॑रन्त॒ आयुः॑ ॥ २ ॥

उच्चा दिवि दक्षिणावन्तः अस्थुः ये अश्व-दाः सह ते सूर्येण
हिरण्य-दाः अमृत-त्वं भजन्ते वासः-दाः सोम प्र तिरन्ते आयुः ॥ २ ॥

जे यज्ञपूर्तिसाठी दक्षिणा देतात ते यजमान अत्युच्च अशा स्वर्गलोकी वास करितात; जे अश्वदान करितात ते सूर्यासह आकाशात संचार करू शकतात आणि जे वस्त्रदान करितात ते आपल्या आणि इतरांच्याहि आयुष्याची वृद्धि करू शकतात २.


दैवी॑ पू॒र्तिर्दक्षि॑णा देवय॒ज्या न क॑वा॒रिभ्यो॑ न॒हि ते पृ॒णन्ति॑ ।
अथा॒ नरः॒ प्रय॑तदक्षिणासोऽवद्यभि॒या ब॒हवः॑ पृणन्ति ॥ ३ ॥

दैवी पूर्तिः दक्षिणा देव-यज्या न कव-अरिभ्यः नहि ते पृणन्ति
अथ नरः प्रयत-दक्षिणासः अवद्य-भिया बहवः पृणन्ति ॥ ३ ॥

देवाप्रीत्यर्थ केलेल्या यज्ञांत दिली जाणारी दक्षिणा ही दैवी वृत्तीची पूर्णता होय; अशी पूर्तता क्षुद्रवृत्तीच्या कंजुषाच्या हातून व्हावयाची नाही. कारण एक तर ते मुळी यज्ञच करीत नाहीत किंवा इतर प्रकारानेहि देवाला संतुष्टच करीत नाहीत; जे खरे भक्त असतात तेच दक्षिणा देण्यास पुढे सरसावतात; बाकी पुष्कळ असेच की ते लोकनिंदेच्या भयानेच यज्ञ करितात ३.


श॒तधा॑रं वा॒युं अ॒र्कं स्व॒र्विदं॑ नृ॒चक्ष॑स॒स्ते अ॒भि च॑क्षते ह॒विः ।
ये पृ॒णन्ति॒ प्र च॒ यच्छ॑न्ति संग॒मे ते दक्षि॑णां दुहते स॒प्तमा॑तरम् ॥ ४ ॥

शत-धारं वायुं अर्कं स्वः-विदं नृ-चक्षसः ते अभि चक्षते हविः
ये पृणन्ति प्र च यच्चन्ति सम्-गमे ते दक्षिणां दुहते सप्त-मातरम् ॥ ४ ॥

उदार पुरुषाला योग्य अशी ज्यांची दृष्टि असते ते असेंच समजतात की यज्ञामध्ये अर्पण केलेली आहुति ही सहस्त्रधारांच्या प्रवाहाने पूर्ण असा वायु, किंवा दिव्य प्रकाशाचा दाता अथवा स्वर्ग लोक प्रापक असा सूर्यच आहे, अशा श्रद्धेनेच ते पाहतात. तसेंच यज्ञपुरुषाला जे संतुष्ट करितात आणि जे यज्ञसभेमध्ये विद्वानांना द्रव्य अर्पण करितात, ते जिला सात माता आहेत अशी जी दक्षिणारूप धेनू तिचे दोहन करितात (म्हणजे आपल्य इच्छितरूप दुग्ध प्राप्त करून घेतात) ४.


दक्षि॑णावान् प्रथ॒मो हू॒त ए॑ति॒ दक्षि॑णावान् ग्राम॒णीरग्रं॑ एति ।
तं ए॒व म॑न्ये नृ॒पतिं॒ जना॑नां॒ यः प्र॑थ॒मो दक्षि॑णां आवि॒वाय॑ ॥ ५ ॥

दक्षिणावान् प्रथमः हूतः एति दक्षिणावान् ग्राम-नीः अग्रं एति
तं एव मन्ये नृ-पतिं जनानां यः प्रथमः दक्षिणां आविवाय ॥ ५ ॥

जो दक्षिणा अर्पण करितो, च्याचेच नांव (लोकांच्या मुखीं) प्रथम येते. जो दक्षिणा अर्पण करि, तोच आपल्या ग्रामामध्ये पुढारी हो‍ऊन श्रेष्ठ पदवी पावतो; ज्याने दक्षिणा भरपूर दिली आणि आतांहि देतो, तोच पुरुष जनतेचा राजा आहे असे मी समजतो ५.


तं ए॒व ऋषिं॒ तं उ॑ ब्र॒ह्माणं॑ आहुर्यज्ञ॒न्यं साम॒गां उ॑क्थ॒शास॑म् ।
स शु॒क्रस्य॑ त॒न्वो वेद ति॒स्रो यः प्र॑थ॒मो दक्षि॑णया र॒राध॑ ॥ ६ ॥

तं एव ऋषिं तं ओं इति ब्रह्माणं आहुः यज-न्यं साम-गां उक्थ-शासं
सः शुक्रस्य तन्वः वेद तिस्रः यः प्रथमः दक्षिणया रराध ॥ ६ ॥

त्यालाच सर्वजण ऋषि (राजर्षि) म्हणतात; त्यालाच ब्रह्मा म्हणजे यज्ञाचार्य म्हणतात. सामसूक्तांचे गायन करणारा यज्ञधुरीण तोच. जो दक्षिणादानाने ऋत्विजांना पहिल्याने संतुष्ट करितो तोच शुक्राच्या तिन्ही शुभ्र तेजाचे रहस्य जाणतो ६.


दक्षि॒णाश्वं॒ दक्षि॑णा॒ गां द॑दाति॒ दक्षि॑णा च॒न्द्रं उ॒त यद्धिर॑ण्यम् ।
दक्षि॒णान्नं॑ वनुते॒ यो न॑ आ॒त्मा दक्षि॑णां॒ वर्म॑ कृणुते विजा॒नन् ॥ ७ ॥

दक्षिणा अश्वं दक्षिणा गां ददाति दक्षिणा चन्द्रं उत यत् हिरण्यं
दक्षिणा अन्नं वनुते यः नः आत्मा दक्षिणां वर्म कृणुते वि-जानन् ॥ ७ ॥

दक्षिणा हीच यजमानाला अश्व मिळवून देते, धेनु देते, आल्हादप्रद वस्तु किंवा सुवर्ण पाहिजे असेल तर तें सुद्धां "दक्षिणा" हीच प्राप्त करून देते. आन पाहिजे असेल तर तेंहि "दक्षिणा" देऊं शकते, आणि आपला जो आत्मा आहे तो देखील "दक्षिणे"चे महत्त्व जाणून तिला आपले चिलखतच बनवितो ७.


न भो॒जा म॑म्रु॒र्न न्य॒र्थं ई॑यु॒र्न रि॑ष्यन्ति॒ न व्य॑थन्ते ह भो॒जाः ।
इ॒दं यद्विश्वं॒ भुव॑नं॒ स्वश्चै॒तत् सर्वं॒ दक्षि॑णैभ्यो ददाति ॥ ८ ॥

न भोजाः मम्रुः न नि-अर्थं ईयुः न रिष्यन्ति न व्यथन्ते ह भोजाः
इदं यत् विश्वं भुवनं स्वः च एतत् सर्वं दक्षिणा एभ्यः ददाति ॥ ८ ॥

जे दानशूर असतात त्यांना कधीच मृत्यु येत नाही (ते कीर्तिरूपाने अमर होतात) अथवा त्यांची कधी दुर्दशा होत नाही, त्यांचे हाल होत नाहीत, जे दातृत्वशाली असतात त्यांना कसली बाधा (व्यथा) होत नाही. हे जे विश्व आहे ते, त्याचप्रमाणे जो स्वर्गीय प्रकाश म्हणून आहे तो-म्हणजे सर्व कांही "दक्षिणा" ही औदार्यशाली पुरुषांना प्राप्त करून देते ८.


भो॒जा जि॑ग्युः सुर॒भिं योनिं॒ अग्रे॑ भो॒जा जि॑ग्युर्व॒ध्व१ं या सु॒वासाः॑ ।
भो॒जा जि॑ग्युरन्तः॒पेयं॒ सुरा॑या भो॒जा जि॑ग्यु॒र्ये अहू॑ताः प्र॒यन्ति॑ ॥ ९ ॥

भोजाः जिग्युः सुरभिं योनिं अग्रे भोजाः जिग्युः वध्वं या सु-वासाः
भोजाः जिग्युः अन्तः-पेयं सुरायाः भोजाः जिग्युः ये अहूताः प्र-यन्ति ॥ ९ ॥

सुगंधाने दरवळणारा असा (स्वर्ग) लोक (किंवा प्रत्यक्ष कामधेनू ह्या वस्तू) जे दानशील असतात ते सर्वांच्या अगोदर प्राप्त करून घेतात. वस्त्रालंकारांनी नटलेल्या रुपवती तरुणी ह्यांना देखील दानशाली पुरुषच आपल्याशा करू शकतात. जे दानशाली असतात, ते मद्याचाहि अगदी आंतल्या आनंदाचे पेय अर्थात्‌ (मद्यापेक्षां उत्कृष्ट असें जे पेय) अमृत ते जिंकून प्राशन करितात; आणि जे कोणी शत्रु विनाकारण कोणावर हल्ला चढवितात त्यांचा नायनाट दानशालि भक्तच करू शकतात ९.


भो॒जायाश्वं॒ सं मृ॑जन्त्या॒शुं भो॒जाया॑स्ते क॒न्याख्प् शुम्भ॑माना ।
भो॒जस्ये॒दं पु॑ष्क॒रिणी॑व॒ वेश्म॒ परि॑ष्कृतं देवमा॒नेव॑ चि॒त्रम् ॥ १० ॥

भोजाय अश्वं सं मृजन्ति आशुं भोजाय आस्ते कन्या शुम्भमाना
भोजस्य इदं पुष्करिणी-इव वेश्म परि-कृतं देवमानाइव चित्रम् ॥ १० ॥

(लोकसुद्धां) दानशूरांसाठीच वेगवान्‌ असा अश्व सजवून आणतात. (लावण्यवती) कुमारिका नटून थटून दानशूरांनाच सामोर्‍या जातात. कमलपुष्पांनी परिपूर्ण अशा जलाशयांनी युक्त अशी मंदिरे उदार पुरुषांनाच प्राप्त होतात; ती इतकी सुशोभित की जणो काय देवांची निवासस्थानेंच १०.


भो॒जं अश्वाः॑ सुष्ठु॒वाहो॑ वहन्ति सु॒वृद्रथो॑ वर्तते॒ दक्षि॑णायाः ।
भो॒जं दे॑वासोऽवता॒ भरे॑षु भो॒जः शत्रू॑न् समनी॒केषु॒ जेता॑ ॥ ११॥

भोजं अश्वाः सुष्ठु-वाहः वहन्ति सु-वृत् रथः वर्तते दक्षिणायाः
भोजं देवासः अवत भरेषु भोजः शत्रून् सम्-अनीकेषु जेता ॥ ११ ॥

मग औदार्यशाली पुरुष हे ऐटीने चालणार्‍या त्या घोड्यावर स्वार हो‍ऊन फिरतात; खुद्द "दक्षिणे"चा त्वरित गतिरथच त्यांच्यासाठी जोडून अगदी सज्ज असतो; तर देवांनो तुम्ही युद्धांमध्ये अशा उदारचरित पुरुषांचे रक्षण करा. म्हणजे तो दानशूर योद्धा कोणत्याहि तुमुल संग्रामांत शत्रूंना पादाक्रांतच करील ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०८ (सरमा-पणि-संवादसूक्त)

ऋषी - पणि आणि सरमा देवशुनी : देवता - २, ४, ६, ८, १०, ११ सरमा; अवशिष्ट पणि : छंद - त्रिष्टुभ्


किं इ॒च्छन्ती॑ स॒रमा॒ प्रेदं आ॑नड् दू॒रे ह्यध्वा॒ जगु॑रिः परा॒चैः ।
कास्मेहि॑तिः॒ का परि॑तक्म्यासीत् क॒थं र॒साया॑ अतरः॒ पयां॑सि ॥ १॥

किं इच्चन्ती सरमा प्र इदं आनट् दूरे हि अध्वा जगुरिः पराचैः
का अस्मे--हितिः का परि-तक्म्या आसीत् कथं रसायाः अतरः पयांसि ॥ १ ॥

कोणता उद्देश मनांत धरून ही सरमा ह्या ठिकाणी आली असावी बरे ? कारण हा लांबलचक अगदी न संपणारा चढणीचा रस्ता तोंडाला अगदी फेंसच आणतो. तर (सरमे) तुझे आमच्याशी कोणते महत्त्वाचे काम आहे ? तुझ्यावर कोणते संकट कोसळले आहे ? ह्या रसा नदीचे अफाट पात्र तूं कशी तरून आलीस ? १.


इन्द्र॑स्य दू॒तीरि॑षि॒ता च॑रामि म॒ह इ॒च्छन्ती॑ पणयो नि॒धीन् वः॑ ।
अ॒ति॒ष्कदो॑ भि॒यसा॒ तन् न॑ आव॒त् तथा॑ र॒साया॑ अतरं॒ पयां॑सि ॥ २ ॥

इन्द्रस्य दूतीः इषिता चरामि महः इच्चन्ती पणयः नि-धीन् वः
अति-स्कदः भियसा तं नः आवत् तथा रसायाः अतरं पयांसि ॥ २ ॥

मी इंद्राचे दूतकार्य करणारी (आहे) आणि त्याच्या आज्ञेनेच मी येथपर्यंत आले आणि पणिनो, हेतु हा की प्रकाशधेनूंचा जो मोठा महनीय समूह तुमच्या हाती आहे, तो स्वाधीन करून घ्यावा. ह्या कार्याचा बिघाड होईल ह्या भीतीमूळेच त्या नदीच्या ओघाने आमच्यावर कृपा केली म्हणाना ? आणि रसा नदीचे अफाट पाणी मी (सहज) तरून आले २.


की॒दृङ् इन्द्रः॑ सरमे॒ का दृ॑शी॒का यस्ये॒दं दू॒तीरस॑रः परा॒कात् ।
आ च॒ गच्छा॑न् मि॒त्रं ए॑ना दधा॒माथा॒ गवां॒ गोप॑तिर्नो भवाति ॥ ३ ॥

कीदृक् इन्द्रः सरमे का दृशीका यस्य इदं दूतीः असरः पराकात्
आ च गच्चात् मित्रं एन दधाम अथ गवां गो--पतिः नः भवाति ॥ ३ ॥

(असे काय ?) तर सरमे, ज्याचे दूतकार्य करण्यासाठी तू फार लांबून येथवर आलीस, तो तुझा इंद्र आहे तरी कसा ? त्याची दृष्टि कशी आहे [त्याचे विचार काय आहेत] ते तर सांग; तुझा इंद्र येणार असेल तर ये‍ईना खुशाल-(त्याचे आमचे जमले आणि) आम्ही त्याला मित्र समजूं शकलो तर तोहि आमच्यातील एकच हो‍ऊन धेनूंचा मालक होईल ३.


नाहं तं वे॑द॒ दभ्यं॒ दभ॒त् स यस्ये॒दं दू॒तीरस॑रं परा॒कात् ।
न तं गू॑हन्ति स्र॒वतो॑ गभी॒रा ह॒ता इन्द्रे॑ण पणयः शयध्वे ॥ ४ ॥

न अहं तं वेद दभ्यं दभत् सः यस्य इदं दूतीः असरं पराकात्
न तं गूहन्ति स्रवतः गभीराः हताः इन्द्रेण पणयः शयध्वे ॥ ४ ॥

ज्याचे दूतकार्य करण्याकरिता मी फार दूरच्या लोकाहून येथे आले, तो इंद्र कसा आहे ते मला समजलेच नाही. मला इतकेच कळते की ज्यांना शिक्षा करणे हेच योग्य, त्यांनाच तो शिक्षा करितो. नद्या कितीका खोल अथांग असेनात, त्या त्याला बुडवू शकत नाहीत; पण अधार्मिक पणिंनो (मला वाटते की) तुम्हीच इंद्राच्या हातून मारले जाऊन जमिनीवर लोळाल ४.


इ॒मा गावः॑ सरमे॒ या ऐच्छः॒ परि॑ दि॒वो अन्ता॑न् सुभगे॒ पत॑न्ती ।
कस्त॑ एना॒ अव॑ सृजा॒दयु॑ध्व्यु॒तास्माकं॒ आयु॑धा सन्ति ति॒ग्मा ॥ ५ ॥

इमाः गावः सरमे याः ऐच्चः परि दिवः अन्तान् सु-भगे पतन्ती
कः ते एनाः अव सृजात् अयुध्वी उत अस्माकं आयुधा सन्ति तिग्मा ॥ ५ ॥

हे सरमे, ज्या धेनू तुला पाहिजेत त्या ह्या पहा येथे आहेत. आणि बये, तूं मात्र आकाशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत उगाच वणवण करीत हिंडलीस. ह्या तुझ्या धेनूंना कोण सोडविणार आहे ? बिचारी तूं तर अबला, युद्धाला अगदी नालायक; आणि असे पहा, ही आमची हत्यारे (उगाच नाहीत,) ती फार जलाल आहेत बरे ? [म्हणून अशा भानगडीत पडूं नको] ५.


अ॒से॒न्या वः॑ पणयो॒ वचां॑स्यनिष॒व्यास्त॒न्वः सन्तु पा॒पीः ।
अधृ॑ष्टो व॒ एत॒वा अ॑स्तु॒ पन्था॒ बृह॒स्पति॑र्व उभ॒या न मृ॑ळात् ॥ ६ ॥

असेन्याः वः पणयः वचांम्सि अनिषव्याः तन्वः सन्तु पापीः
अधृष्टः वः एतवै अस्तु पन्थाः बृहस्पतिः वः उभया न मृळात् ॥ ६ ॥

पणिनो, तुमची ही बडबड तुमच्या शिपाई बाण्याला अगदी शोभत नाही. तुमची पातकी शरीरें (इतरांच्या) बाणांना अभेद्य असली तरी असोत, किंवा तुमच्या ह्या ठिकाणाकडे जाणार्‍या मार्गावर पाऊल टाकण्याचेहि धाडस कोणाला नसले तर नसो; पण सर्व बुद्धींचा प्रभू जो इंद्र, तो तुमच्या दोन्ही गोष्टींची क्षिति बाळगीत नाही ६.


अ॒यं नि॒धिः स॑रमे॒ अद्रि॑बुध्नो॒ गोभि॒रश्वे॑भि॒र्वसु॑भि॒र्न्यृष्टः ।
रक्ष॑न्ति॒ तं प॒णयो॒ ये सु॑गो॒पा रेकु॑ प॒दं अल॑कं॒ आ ज॑गन्थ ॥ ७ ॥

अयं नि-धिः सरमे अद्रि-बुध्नः गोभिः अश्वेभिः वसु-भिः नि-ऋष्टः
रक्षन्ति तं पणयः ये सु-गोपाः रेकु पदं अलकं आ जगन्थ ॥ ७ ॥

(असे काय) पण सरमे, (हे तुला कोठे माहित आहे की) आमचा हा जो निधि आहे तो पर्वताच्या बुडांशी असलेल्या गुहेत अगदी गुप्त आहे; त्यामध्ये धेनू आहेतच; पण अश्व आणि दुसर्‍या उत्कृष्ट वस्तु ह्यांचीसुद्धां रेलचेल आहे; आणि रक्षण करण्याच्या कामांत कुशल जे आम्ही पणि, ते त्या निधीचे रक्षण करीत आहोत. म्हणून म्हणतो की ह्या भलत्याच ठिकाणी येण्याचे श्रम व्यर्थ घेतलेस ७.


एह ग॑म॒न्न् ऋष॑यः॒ सोम॑शिता अ॒यास्यो॒ अङ्गि॑रसो॒ नव॑ग्वाः ।
त ए॒तं ऊ॒र्वं वि भ॑जन्त॒ गोनां॒ अथै॒तद्वचः॑ प॒णयो॒ वम॒न्न् इत् ॥ ८ ॥

आ इह गामन् ऋषयः सोम-शिताः अयास्यः अङ्गिरसः नव-ग्वाः
ते एतं ऊर्वं वि भजन्त गोनां अथ एतत् वचः पणयः वमन् इत् ॥ ८ ॥

[काय येथे कोणी येऊं शकत नाही म्हणतां ? खोटी गोष्ट] सोमप्राशन केल्याने तेजस्वी झालेले ऋषि पूर्वी येथे आलेले होते-ते कोण तर अत्यंत कार्यतत्पर असे अयास्य आंगिरस आणि नवम्ब हे येथे आले होते त्यांनी ह्या (प्रकाश) धेनूच्या समूहाचा कांही भाग हस्तगत केलाच होता; तर तुम्ही ’पणि’ आतां हे जे काय बोलला ते वमनाप्रमाणे कांही तरी बकलां झाले ८.


ए॒वा च॒ त्वं स॑रम आज॒गन्थ॒ प्रबा॑धिता॒ सह॑सा॒ दैव्ये॑न ।
स्वसा॑रं त्वा कृणवै॒ मा पुन॑र्गा॒ अप॑ ते॒ गवां॑ सुभगे भजाम ॥ ९ ॥

एव च त्वं सरमे आजगन्थ प्र-बाधिता सहसा दैव्येन
स्वसारं त्वा कृणवै मा पुनः गाः अप ते गवां सु-भगे भजाम ॥ ९ ॥

बरें ते असो; (राहिले आमचे बोलणे !) पण सरमे (त्या देवाच्या तेजाने तूं दबून गेल्यामुळे जरी तुला येथपर्यंत येणे भाग पडले असले, तरी (हरकत नाही) आम्ही तुला आपली बहीण समजूं (तूं येथे खुशाल रहा) परत जाऊच नको आणि आपण एकत्र मिळून ह्या प्रकाशधेनूंपासून मिळणारा लाभ भोगूं ९.


नाहं वे॑द भ्रातृ॒त्वं नो स्व॑सृ॒त्वं इन्द्रो॑ विदु॒रङ्गि॑रसश्च घो॒राः ।
गोका॑मा मे अच्छदय॒न् यदायं॒ अपात॑ इत पणयो॒ वरी॑यः ॥ १० ॥

न अहं वेद भ्रातृ-त्वं नो इति स्वसृ-त्वं इन्द्रः विदुः अङ्गिरसः च घोराः
गो--कामाः मे अच्चदयन् यत् आयं अप अतः इत पणयः वरीयः ॥ १० ॥

(पणीनो) मला तुमचा तो भाऊपणा नको आणि ते बहिणीचे नातेहि नको, मी ते कांही जाणत नाही ह्या गोष्टी एक इंद्राला कळतात किंवा पराक्रमांत भयंकर असे जे आंगिरस त्यांना कळतात. त्या आंगिरसानाच प्रकाशधेनूंची फार इच्छा हे; त्यांनीच मला आग्रह केला म्हणून मी आले. तर आतां पणींनो, हे ठिकाण सोडून तुम्हांला जितके दूर जाता ये‍ईल तितके जा १०.


दू॒रं इ॑त पणयो॒ वरी॑य॒ उद्गावो॑ यन्तु मिन॒तीरृ॒तेन॑ ।
बृह॒स्पति॒र्या अवि॑न्द॒न् निगू॑ळ्हाः॒ सोमो॒ ग्रावा॑ण॒ ऋष॑यश्च॒ विप्राः॑ ॥ ११॥

दूरं इत पणयः वरीयः उत् गावः यन्तु मिनतीः ऋतेन
बृहस्पतिः याः अविन्दत् नि-गूळ्हाः सोमः ग्रावानः ऋषयः च विप्राः ॥ ११ ॥

म्हणून पणीनो, फिरून सांगते की तुम्ही येथून धडपणे चालते व्हा कसे ? आणि तुम्ही अडकवून ठेवलेल्या प्रकाशधेनूंना सद्धर्माच्या प्रभावाने झटकन्‌ बाहेर येऊं द्या. तुम्ही ज्या धेनूना दडवून ठेवल्या आहे त्या येथे आहेत हे त्या बुद्धिनायकाला तर कळलेच आहे; पण सोमग्रावे, ऋषि आणि प्रार्थनातत्पर भक्त ह्या सर्वांनाच ते माहित झाले आहे म्हणून तुमचा निधि त्यांनी हस्तगत केलाच असे समजा ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०९ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - जुहु ब्रह्मजाया आथवा उर्ध्नाभन् ब्रह्म : देवता - विश्वेदेव
छंद - ६-७ - अनुष्टुभ् ; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


तेऽवदन् प्रथ॒मा ब्र॑ह्मकिल्बि॒षेऽ॑कूपारः सलि॒लो मा॑त॒रिश्वा॑ ।
वी॒ळुह॑रा॒स्तप॑ उ॒ग्रो म॑यो॒भूरापो॑ दे॒वीः प्र॑थम॒जा ऋ॒तेन॑ ॥ १॥

ते अवदन् प्रथमाः ब्रह्म-किल्बिषे अकूपारः सलिलः मातरिश्वा
वीळु-हराः तपः उग्रः मयः-भूः आपः देवीः प्रथम-जाः ऋतेन ॥ १ ॥

एका प्रार्थनातत्पर भक्तावर जो अनर्थ कोसळला, त्या संबंधाची वार्ता प्रथम सांगितली ती ह्यांनी; आणि ते कोण म्हणाल, तर अमर्याद समुद्र, अंतरिक्षांतील वायु, अंधकार नष्ट करणारे प्रभावी तेज, उग्र परंतु हितप्रद असे तप आणि दिव्य उदकें हे जे सनातन सत्यापासून प्रथम उत्पन्न झाले त्यांनी सांगितली १.


सोमो॒ राजा॑ प्रथ॒मो ब्र॑ह्मजा॒यां पुनः॒ प्राय॑च्छ॒दहृ॑णीयमानः ।
अ॒न्व॒र्ति॒ता वरु॑णो मि॒त्र आ॑सीद॒ग्निर्होता॑ हस्त॒गृह्या नि॑नाय ॥ २ ॥

सोमः राजा प्रथमः ब्रह्म-जायां पुनरिति प्र अयच्चत् अहृणीयमानः
अनु-अर्तिता वरुणः मित्रः आसीत् अग्निः होता हस्त-गृह्य आ निनाय ॥ २ ॥

राजा सोमाने यत्किंचित्‌हि क्रोध किंवा विरोध न करतां प्रथम त्या विप्रपत्नीला परत देवांच्या स्वाधीन केले. हें सत्कृत्य वरुण आणि मित्र ह्यांनी घडवून आणिले, आणि यज्ञहोता अग्नि ह्याने त्या स्त्रीला हाती धरून पुढे आणले २.


हस्ते॑नै॒व ग्रा॒ह्य आ॒धिर॑स्या ब्रह्मजा॒येयं इति॒ चेदवो॑चन् ।
न दू॒ताय॑ प्र॒ह्ये तस्थ ए॒षा तथा॑ रा॒ष्ट्रं गु॑पि॒तं क्ष॒त्रिय॑स्य ॥ ३ ॥

हस्तेन एव ग्राह्यः आधिः अस्याः ब्रह्म-जाया इयं इति च इत् अवोचत्
न दूताय प्र-ह्ये तस्थे एषा तथा राष्ट्रं गुपितं क्षत्रियस्य ॥ ३ ॥

त्यावेळेस ते दिव्य विभूति हेंच म्हणाले की ही विप्रपत्नी आहे म्हणून हिला जी मानसिक व्यथा झाली आहे ती तिच्या पतीने तिला हाती धरून तिचा स्वीकार केल्यानेच नाहीशी होणार आहे. असे असल्याने तिला पोहोंचविण्यास आलेल्या दूताबरोबर ती घरी गेली नाही. पण तिला परत आणल्याने तेथील क्षत्रिय राजाचे राज्य न्यायी वर्तनामुळे सुरक्षित झाले ३.


दे॒वा ए॒तस्यां॑ अवदन्त॒ पूर्वे॑ सप्तऋ॒षय॒स्तप॑से॒ ये नि॑षे॒दुः ।
भी॒मा जा॒या ब्रा॑ह्म॒णस्योप॑नीता दु॒र्धां द॑धाति पर॒मे व्योमन् ॥ ४ ॥

देवाः एतस्यां अवदन्त पूर्वे सप्त-ऋषयः तपसे ये नि-सेदुः
भीमा जाया ब्राह्मणस्य उप-नीता दुः-धां दधाति परमे वि-ओमन् ॥ ४ ॥

देव आणि तपश्चर्येस बसलेले सप्तर्षि ह्यांनी तिला उद्देशून असे उद्‌गार काढले की ही विप्रस्त्री फारच तीव्र स्वभावाची आहे; हिला अगदी उच्च स्वर्गांत नेले तरी तेथें सुद्धा ती आपला भीषण प्रभाव गाजवील ४.


ब्र॒ह्म॒चा॒री च॑रति॒ वेवि॑ष॒द्विषः॒ स दे॒वानां॑ भव॒त्येकं॒ अङ्ग॑म् ।
तेन॑ जा॒यां अन्व् अ॑विन्द॒द्बृह॒स्पतिः॒ सोमे॑न नी॒तां जु॒ह्व१ं न दे॑वाः ॥ ५ ॥

ब्रह्म-चारी चरति वेविषत् विषः सः देवानां भवति एकं अङ्गं
तेन जायां अनु अविन्दत् बृहस्पतिः सोमेन नीतां जुह्वं न देवाः ॥ ५ ॥

जो ब्रह्मचर्याने वागतो (म्हणजे प्रार्थना आणि तप ह्यांत निमग्न राहतो) तो सर्वव्यापी कर्तव्यांत गढून गेलेला असतो. तो देवांपैकीच एक होतो; आणि म्हणूनच देवांना ज्याप्रमाणे "जुहू" (स्रुचा) मिळाली, त्याप्रमाणे बृहस्पतीला त्याची सोमाने नेलेली पत्नी परत मिळाली ५.


पुन॒र्वै दे॒वा अ॑ददुः॒ पुन॑र्मनु॒ष्या उ॒त ।
राजा॑नः स॒त्यं कृ॑ण्वा॒ना ब्र॑ह्मजा॒यां पुन॑र्ददुः ॥ ६ ॥

पुनः वै देवाः अददुः पुनः मनुष्याः उत
राजानः सत्यं कृण्वानाः ब्रह्म-जायां पुनः ददुः ॥ ६ ॥

तिला देवांनीच परत दिली; मनुष्यांनी (म्हणजे समाजाने) हि दिली, म्हणूनच न्यायाने वागणारे जे राजे असतात, ते धर्माने विवाहित झालेल्या स्त्रीला कोणी नेले असतां तिला परत आणून देतातच ६.


पु॒न॒र्दाय॑ ब्रह्मजा॒यां कृ॒त्वी दे॒वैर्नि॑किल्बि॒षम् ।
ऊर्जं॑ पृथि॒व्या भ॒क्त्वायो॑रुगा॒यं उपा॑सते ॥ ७ ॥

पुनः-दाय ब्रह्म-जायां कृत्वी देवैः नि-किल्बिषं
ऊर्जं पृथिव्याः भक्त्वाय उरु-गायं उप आसते ॥ ७ ॥

ह्याप्रमाणे धर्माने विवाहबद्ध झालेल्या स्त्रीला पतीकडे परत पोहोंचवून देवानी एका पातकाचे निरसन केले, त्यामुळेच पृथिवीतील उर्जस्वितेचा (सत्त्वांशाचा) उपभोग घेऊन जनता नेहमी सर्व्यापी ईश्वाराची उपासना करूं शकते ७.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११० (आप्रीसूक्त)

ऋषी - जमदग्नि भार्गव अथवा राम जामदग्न्य : देवाअ - आप्रीदेवतासमूह : छंद - त्रिष्टुभ्


समि॑द्धो अ॒द्य मनु॑षो दुरो॒णे दे॒वो दे॒वान् य॑जसि जातवेदः ।
आ च॒ वह॑ मित्रमहश्चिकि॒त्वान् त्वं दू॒तः क॒विर॑सि॒ प्रचे॑ताः ॥ १॥

सम्-इद्धः अद्य मनुषः दुरोणे देवः देवान् यजसि जात-वेदः
आ च वह मित्र-महः चिकित्वान् त्वं दूतः कविः असि प्र-चेताः ॥ १ ॥

वस्तुजात जाणणार्‍या अग्नि, तूं देव असल्याने आम्हां मानवांच्या यज्ञगृही आज प्रज्वलित हो‍ऊन दिव्यजनांचे यजन करितोस; तर हे सुखकर-दीप्ते देवा, तू त्यांना येथे घेऊन ये. कारण तू ज्ञानी आहेस. तू आमचा प्रतिनिधि आहेस, काव्यप्रेरक आहेस (फार काय) तूं सर्वज्ञच आहेस १.


तनू॑नपात् प॒थ ऋ॒तस्य॒ याना॒न् मध्वा॑ सम॒ञ्जन् स्व॑दया सुजिह्व ।
मन्मा॑नि धी॒भिरु॒त य॒ज्ञं ऋ॒न्धन् दे॑व॒त्रा च॑ कृणुह्यध्व॒रं नः॑ ॥ २ ॥

तनू-नपात् पथः ऋतस्य यानान् मध्वा सम्-अजन् स्वदय सु-जिह्व
मन्मानि धीभिः उत यजं ऋन्धन् देव-त्रा च कृणुहि अध्वरं नः ॥ २ ॥

हे तूनपात्‌ अग्ने, सनातन धर्माचे मार्ग आणि पद्धति ह्यांना, हे सुशोभित ज्वालेच्या अग्ने, तूं मधुररसाने स्वादिष्ट कर, आणि आमच्या मननीय प्रार्थना आणि यज्ञ ह्यांना प्रतिभेने अलंकृत करून आमचा अध्वर याग दिव्य विबुधांकडे पोहोंचेल असे कर २.


आ॒जुह्वा॑न॒ ईड्यो॒ वन्द्य॒श्चा या॑ह्यग्ने॒ वसु॑भिः स॒जोषाः॑ ।
त्वं दे॒वानां॑ असि यह्व॒ होता॒ स ए॑नान् यक्षीषि॒तो यजी॑यान् ॥ ३ ॥

आजुह्वानः ईड्यः वन्द्यः च आ याहि अग्ने वसु-भिः स-जोषाः
त्वं देवानां असि यह्व होता सः एतान् यक्षि इषितः यजीयान् ॥ ३ ॥

हे अग्ने, तुला आमचे निमंत्रण आहेच. तूं पूज्य आणि वंद्य आहेस; तर प्रसन्न हो‍ऊन दिव्य निधींसह येथे आगमन कर. हे महाप्रबला, तूंच देवांचा होता आहेस, यज्ञार्हहि आहेस; म्हणून आमच्या प्रार्थनेने प्रेरित हो‍ऊन ह्या दिव्य विभूतींना संतुष्ट कर ३.


प्रा॒चीनं॑ ब॒र्हिः प्र॒दिशा॑ पृथि॒व्या वस्तो॑र॒स्या वृ॑ज्यते॒ अग्रे॒ अह्ना॑म् ।
व्यु प्रथते वित॒रं वरी॑यो दे॒वेभ्यो॒ अदि॑तये स्यो॒नम् ॥ ४ ॥

प्राचीनं बर्हिः प्र-दिशा पृथिव्याः वस्तोः अस्याः वृज्यते अग्रे अह्नां
वि ओं इति प्रथते वि-तरं वरीयः देवेभ्यः अदितये स्योनम् ॥ ४ ॥

पहा, हे कुशासन आम्ही पूर्वेकडे-पृथिवीच्या मुख्य दिशेकडे अंथरले आहे. कारण दिवस उगवतांच ह्या प्रकाशवती उषेसाठी सुद्धां ते राखून ठेवावे लागते, ते आसन विस्तीर्ण असून उत्तम विभूषित आहे. ते अदिति आणि दिव्य विबुध ह्यांना फारच आनंदप्रद वाटतें ४.


व्यच॑स्वतीरुर्वि॒या वि श्र॑यन्तां॒ पति॑भ्यो॒ न जन॑यः॒ शुम्भ॑मानाः ।
देवी॑र्द्वारो बृहतीर्विश्वमिन्वा दे॒वेभ्यो॑ भवत सुप्राय॒णाः ॥ ५ ॥

व्यचस्वतीः उर्विया वि श्रयन्तां पति-भ्यः न जनयः शुम्भमानाः
देवीः द्वारः बृहतीः विश्वम्-इन्वाः देवेभ्यः भवत सुप्र-अयणाः ॥ ५ ॥

स्त्रिया जशा आपल्या पतीला प्रसन्न ठेवण्यासाठी अलंकारांनी सुशोभित होतात, त्याप्रमाणे उत्तम भूषणांनी भूषित अशा श्रेष्ठ द्वारदेवी (यज्ञमंदिराची प्रश्स्त द्वारें) दिव्य विबुधांसाठी विस्तृतपणे उघडोत. द्वारदेवींनो तुम्ही सर्वांनाच प्रसन्न ठेवता; तर दिव्य विभूतींना तर तुम्ही अतिशय आनंद देणारच ५.


आ सु॒ष्वय॑न्ती यज॒ते उपा॑के उ॒षासा॒नक्ता॑ सदतां॒ नि योनौ॑ ।
दि॒व्ये योष॑णे बृह॒ती सु॑रु॒क्मे अधि॒ श्रियं॑ शुक्र॒पिशं॒ दधा॑ने ॥ ६ ॥

आ सुस्वयन्ती इति यजते इति उपाके इति उषसानक्ता सदतां नि योनौ
दिव्ये योषणेइति बृहती इति सुरुक्मे इतिसु-रुक्मे अधि श्रियं शुक्र-पिशं दधाने ॥ ६ ॥

सर्वांना निद्रासुखाचा अनुभव देणार्‍या पूज्य आणि परस्परांशी अगदी संलग्न अशा रात्रे-आणि उषा ह्या आसनावर आरोहण करोत. त्या दिव्य तरुणी श्रेष्ठ आणि सुवर्णाप्रमाणे तेज:पुंज असून आपल्या तेजस्वी शुभ्र शरीराला अधिकच तेजस्विता आणतात ६.


दैव्या॒ होता॑रा प्रथ॒मा सु॒वाचा॒ मिमा॑ना य॒ज्ञं मनु॑षो॒ यज॑ध्यै ।
प्र॒चो॒दय॑न्ता वि॒दथे॑षु का॒रू प्रा॒चीनं॒ ज्योतिः॑ प्र॒दिशा॑ दि॒शन्ता॑ ॥ ७ ॥

दैव्या होतारा प्रथमा सु-वाचा मिमाना यजं मनुषः यजध्यै
प्र-चोदयन्ता विदथेषु कारू इति प्राचीनं ज्योतिः प्र-दिशा दिशन्ता ॥ ७ ॥

आतां सर्वांच्या आधींचे ते दोन दिव्य यज्ञसंपादक, ते मनोहर भाषण करणारे, आणि आम्हां मानवांचा यज्ञ व्यवस्थितपणे तडीस नेणारे यज्ञहोते (आम्हांसाठी) यजन करोत; ते कवि असून यज्ञसभेमध्ये मनुष्यांना प्रेरणा करून योग्य दिशेकडे पाहाण्यास लावतात आणि पूर्वेकडील तेजोमण्डल निदर्शनास आणतात ७.


आ नो॑ य॒ज्ञं भार॑ती॒ तूयं॑ ए॒त्व् इळा॑ मनु॒ष्वदि॒ह चे॒तय॑न्ती ।
ति॒स्रो दे॒वीर्ब॒र्हिरेदं स्यो॒नं सर॑स्वती॒ स्वप॑सः सदन्तु ॥ ८ ॥

आ नः यजं भारती तूयं एतु इळा मनुष्वत् इह चेतयन्ती
तिस्रः देवीः बर्हिः आ इदं स्योनं सरस्वती सु-अपसः सदन्तु ॥ ८ ॥

भारती इळा आणि सरस्वती ह्या देवी मनुष्याप्रमाणे रूपे धारण केली पाहिजेत हे जाणून आमच्या यज्ञाकडे त्वरित आगमन करोत. आणि तिन्ही देवी सुंदर स्वरूपाने आविर्भूत हो‍ऊन ह्या सुखकारक कुशासनावर आरोहण करोत ८.


य इ॒मे द्यावा॑पृथि॒वी जनि॑त्री रू॒पैरपिं॑श॒द्‌भुव॑नानि॒ विश्वा॑ ।
तं अ॒द्य हो॑तरिषि॒तो यजी॑यान् दे॒वं त्वष्टा॑रं इ॒ह य॑क्षि वि॒द्वान् ॥ ९ ॥

यः इमे इति द्यावापृथिवी इति जनित्री इति रूपैः अपिंशत् भुवनानि विश्वा
तं अद्य होतः इषितः यजीयान् देवं त्वष्टारं इह यक्षि विद्वान् ॥ ९ ॥

जगाची मातापितरे-म्हणजे ज्यानी नानाप्रकारच्या प्राणिरूप शरीरांनी सर्व भुवनांना सुशोभित केले, त्या द्यावापृथिवींना देखील ज्याने निर्माण केले त्या पवित्र पूज्य सृष्टिकर्त्याला (त्वष्ट्याला) हे यज्ञसंपादका अग्ने, आमच्या भक्तीने प्रसन्न हो‍ऊन तू आज संतुष्ट कर. कारण तू स्वत: यज्ञयोग्य आहेसच ९.


उ॒पाव॑सृज॒ त्मन्या॑ सम॒ञ्जन् दे॒वानां॒ पाथ॑ ऋतु॒था ह॒वींषि॑ ।
वन॒स्पतिः॑ शमि॒ता दे॒वो अ॒ग्निः स्वद॑न्तु ह॒व्यं मधु॑ना घृ॒तेन॑ ॥ १० ॥

उप-अवसृज त्मन्या सम्-अजन् देवानां पाथः ऋतु-था हवींषि
वनस्पतिः शमिता देवः अग्निः स्वदन्तु हव्यं मधुना घृतेन ॥ १० ॥

हे ऋत्विजा, तू आपण हो‍ऊन देवांना अर्पण करण्याचे पदार्थ (=नैवद्य) तसेच हविर्भाग घृताने आर्द्र करून योग्यकाली त्यांना समर्पण कर. त्याचप्रमाणे (पशूचा) यूप, शमिता आणि अग्नि हेहि त्यांचा हविर्भाग घृताने आणि मधाने युक्त करून त्यांचा आस्वाद घेवोत १०.


स॒द्यो जा॒तो व्यमिमीत य॒ज्ञं अ॒ग्निर्दे॒वानां॑ अभवत् पुरो॒गाः ।
अ॒स्य होतुः॑ प्र॒दिश्यृ॒तस्य॑ वा॒चि स्वाहा॑कृतं ह॒विर॑दन्तु दे॒वाः ॥ ११॥

सद्यः जातः वि अमिमीत यजं अग्निः देवानां अभवत् पुरः-गाः
अस्य होतुः प्र-दिशि ऋतस्य वाचि स्वाहाकृतं हविः अदन्तु देवाः ॥ ११ ॥

अग्नीने एकदम प्रकट हो‍ऊन यज्ञ यथायोग्य रीतीने तडीस नेला आणि आपण स्वत: दिव्यजनांचा अग्रेसर झाला. असे झाल्याकारणाने ह्या यज्ञसंपादक अग्नीच्या मार्गदर्शकत्वाने आणि सनातन धर्माच्या बोधाने "स्वाहा" शब्दाने पवित्र केलेला हविर्भाग दिव्यविबुध ग्रहण करोत ११.


ॐ तत् सत्


GO TOP