PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १११ ते १२०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त १११ (इंद्रसूक्त)

ऋषी - अष्टादंष्ट्र वैरूप : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


मनी॑षिणः॒ प्र भ॑रध्वं मनी॒षां यथा॑-यथा म॒तयः॒ सन्ति॑ नृ॒णाम् ।
इन्द्रं॑ स॒त्यैरेर॑यामा कृ॒तेभिः॒ स हि वी॒रो गि॑र्वण॒स्युर्विदा॑नः ॥ १॥

मनीषिणः प्र भरध्वं मनीषां यथायथा मतयः सन्ति नृणां
इन्द्रं सत्यैः आ ईरयाम कृतेभिः सः हि वीरः गिर्वणस्युः विदानः ॥ १ ॥

मननपूर्वक स्तवन करणार्‍या भक्तांनो तुमचे मननीय कवन देवाला अर्पण करा. ज्या कवीची जशी प्रतिभा चालेल तशी तो कवने करील; आम्ही मात्र सत्कर्माने-सत्यकर्मानेंच इंद्राला आमच्याकडे आकर्षण करून घेऊं. तो शूरवीर स्तवनप्रिय आणि ज्ञानाने पूर्ण आहे १.


ऋ॒तस्य॒ हि सद॑सो धी॒तिरद्यौ॒त् सं गा॑र्ष्टे॒यो वृ॑ष॒भो गोभि॑रानट् ।
उद॑तिष्ठत् तवि॒षेणा॒ रवे॑ण म॒हान्ति॑ चि॒त् सं वि॑व्याचा॒ रजां॑सि ॥ २ ॥

ऋतस्य हि सदसः धीतिः अद्यौत् सं गाऋष्टेयः वृषभः गोभिः आनट्
उत् अतिष्ठत् तविषेण रवेण महान्ति चित् सं विव्याच रजांसि ॥ २ ॥

आमची ध्यानप्रयुक्त स्तुति सनातन सत्याच्या गृहांतच उद्योतित झाली. (त्या स्तुतीमुळे) नूतन प्रसूत धेनूच्या वृषभाने आपल्या प्रकाशरूप धेनूसह आकाश व्याप्त करून टाकले आणि मोठा भीषण निनाद करून उभा राहून त्याने विस्तृत रजोलोक आक्रमण केले २.


इन्द्रः॒ किल॒ श्रुत्या॑ अ॒स्य वे॑द॒ स हि जि॒ष्णुः प॑थि॒कृत् सूर्या॑य ।
आन् मेनां॑ कृ॒ण्वन्न् अच्यु॑तो॒ भुव॒द्गोः पति॑र्दि॒वः स॑न॒जा अप्र॑तीतः ॥ ३ ॥

इन्द्रः किल श्रुत्यै अस्य वेद सः हि जिष्णुः पथि-कृत् सूर्याय
आत् मेनां कृण्वन् अच्युतः भुवत् गोः पतिः दिवः सन-जाः अप्रति-इतः ॥ ३ ॥

ह्या कवनाचे श्रवण भक्तांना कसे कसे करवावे ते इंद्रच जाणतो. तोच सर्व विजयी आहे. त्यानेच सूर्याला त्याचा मार्ग आंखून दिला, तो स्वभावत: अचल-अढळ असूनहि त्याने ही मनोहर "मेना" (पृथ्वी) उत्पन्न केली. तो द्युलोकाचा आणि प्रकाशधेनूचा तो स्वामी अनादि असून त्याचा प्रतिकार कोणीहि करणे शक्य नाही ३.


इन्द्रो॑ म॒ह्ना म॑ह॒तो अ॑र्ण॒वस्य॑ व्र॒तामि॑ना॒दङ्गि॑रोभिर्गृणा॒नः ।
पु॒रूणि॑ चि॒न् नि त॑ताना॒ रजां॑सि दा॒धार॒ यो ध॒रुणं॑ स॒त्यता॑ता ॥ ४ ॥

इन्द्रः मह्ना महतः अर्णवस्य व्रता अमिनात् अङ्गिरः-भिः गृणानः
पुरूणि चित् नि ततान रजांसि दाधार यः धरुणं सत्य-ताता ॥ ४ ॥

अंगिरा ऋषींनी स्तुति केल्यामुळे प्रसन्न हो‍ऊन इंद्राने आपल्या तेजाच्या प्रभावाने महासागराच्या वर्तनाचे नियम ठरवून टाकले, असंख्य रजोलोक विस्तारून दिले आणि आपल्या सत्याच्या शक्तीने सर्वांचा आधार (जो सूर्य) त्याला धारण केले ४.


इन्द्रो॑ दि॒वः प्र॑ति॒मानं॑ पृथि॒व्या विश्वा॑ वेद॒ सव॑ना॒ हन्ति॒ शुष्ण॑म् ।
म॒हीं चि॒द्द्यां आत॑नो॒त् सूर्ये॑ण चा॒स्कम्भ॑ चि॒त् कम्भ॑नेन॒ स्कभी॑यान् ॥ ५ ॥

इन्द्रः दिवः प्रति-मानं पृथिव्याः विश्वा वेद सवना हन्ति शुष्णं
महीं चित् द्यां आ अतनोत् सूर्येण चास्कम्भ चित् कम्भनेन स्कभीयान् ॥ ५ ॥

इंद्र हा द्युलोकाचा आणि पृथ्वीचाहि आदर्श आहे; तो भक्तांच्या यच्चयावत्‌ सोमसवनांचा स्वीकार करून शुष्ण राक्षसाला ठार करतो. त्यानेच ही विस्तीर्ण पृथ्वी आणि सूर्यासह हा तारागण निर्माण केला आणि त्या सर्वांना आधार देऊन सांवरून धरले. कारण सर्वांपेक्षा दृढ असा आधार तोच आहे ५.


वज्रे॑ण॒ हि वृ॑त्र॒हा वृ॒त्रं अस्त॒रदे॑वस्य॒ शूशु॑वानस्य मा॒याः ।
वि धृ॑ष्णो॒ अत्र॑ धृष॒ता ज॑घ॒न्थाथा॑भवो मघवन् बा॒ह्वोजाः ॥ ६ ॥

वज्रेण हि वृत्र-हा वृत्रं अस्तः अदेवस्य शूशुवानस्य मायाः
वि धृष्णो इति अत्र धृषता जघन्थ अथ अभवः मघ-वन् बाह्वु-ओजाः ॥ ६ ॥

तूं वृत्रनाशकाने वज्राचा प्रहार करून वृत्राला मारून दूर फेकून दिलेस आणि देवाला न मानणारे माजलेले जे नास्तिक त्यांचे सर्व कपटजाल तूं हाणून पाडलेस. हे शत्रुधर्षका, तूं अचाट धाडसाने ह्याच ठिकाणी शत्रूला ठार केलेस, म्हणूनच हे भगवंता तुझी ओजस्विता तुझ्या बाहूमध्ये अतिशय साठविली आहे असा तुझा चोहोंकडे लौकिक झाला ६.


सच॑न्त॒ यदु॒षसः॒ सूर्ये॑ण चि॒त्रां अ॑स्य के॒तवो॒ रां अ॑विन्दन् ।
आ यन् नक्ष॑त्रं॒ ददृ॑शे दि॒वो न पुन॑र्य॒तो नकि॑र॒द्धा नु वे॑द ॥ ७ ॥

सचन्त यत् उषसः सूर्येण चित्रां अस्य केतवः रां अविन्दन्
आ यत् नक्षत्रं ददृशे दिवः न पुनः यतः नकिः अद्धा नु वेद ॥ ७ ॥

जेव्हां उषादेवी सूर्याशी संलग्न असते तेव्हां ह्याचे अनेक वर्णांचे किरण अद्‍भुत शोभा धारण करितात. आणि जेव्हां द्युलोकाचे नक्षत्र म्हणजे सूर्य हा उदय पवतो तेव्हां तो पूर्वेकडे कोठून कसा येतो हे मात्र वास्तविक रीतीने कोणास (फारसें) माहीत असत नाही ७.


दू॒रं किल॑ प्रथ॒मा ज॑ग्मुरासां॒ इन्द्र॑स्य॒ याः प्र॑स॒वे स॒स्रुरापः॑ ।
क्व स्वि॒दग्रं॒ क्व बु॒ध्न आ॑सां॒ आपो॒ मध्यं॒ क्व वो नू॒नं अन्तः॑ ॥ ८ ॥

दूरं किल प्रथमाः जग्मुः आसां इन्द्रस्य याः प्र-सवे सस्रुः आपः
क्व स्वित् अग्रं क्व बुध्नः आसां आपः मध्यं क्व वः नूनं अन्तः ॥ ८ ॥

इंद्राच्या प्रेरणेने ज्या दिव्य नद्या भूमीवर वाहूं लागल्या, त्यांच्यामध्ये ज्या नद्या वरिष्ठ होत्या त्या केव्हांच लांब दूर वहात गेल्या; पण त्यांचा मूळ उगम कोठे आणि त्यांचा शेवट कोठे हे सांगू शकतो ? आणि खरोखरच हे आपोदेवींनो तुमचा उगम कोठे आणि मध्य कोठे, आणि शेवटचा भाग अग्रभाग कोणता हे आतां तुम्ही तरी सांगा.


सृ॒जः सिन्धू॒ँरहि॑ना जग्रसा॒नाँ आदिदे॒ताः प्र वि॑विज्रे ज॒वेन॑ ।
मुमु॑क्षमाणा उ॒त या मु॑मु॒च्रेऽ॒धेदे॒ता न र॑मन्ते॒ निति॑क्ताः ॥ ९ ॥

सृजः सिन्धून् अहिना जग्रसानान् आत् इत् एताः प्र विविज्रे जवेन
मुमुक्षमाणाः उत याः मुमुच्रे अध इत् एताः न रमन्ते नि-तिक्ताः ॥ ९ ॥

ज्या ज्या महानद्यांना अहिभुजंगाने ग्रासून टाकले होते त्याच नद्या तत्काळ जोराने उसळतच वेगाने दूर झटकल्या. कांही बंधमुक्त झाल्या, आणि ज्या कांही सुटण्याच्या बेतात होत्या त्या सर्वच अगदी निर्मळ स्वच्छ झाल्या. तथापि त्या इकडे तिकडे मात्र गमत राहिल्या नाहीत ९.


स॒ध्रीचीः॒ सिन्धुं॑ उश॒तीरि॑वायन् स॒नाज् जा॒र आ॑रि॒तः पू॒र्भिदा॑साम् ।
अस्तं॒ आ ते॒ पार्थि॑वा॒ वसू॑न्य॒स्मे ज॑ग्मुः सू॒नृता॑ इन्द्र पू॒र्वीः ॥ १० ॥

सध्रीचीः सिन्धुं उशतीः-इव आयन् सनात् जारः आरितः पूः-भित् आसां
अस्तं आ ते पार्थिवा वसूनि अस्मे इति जग्मुः सूनृताः इन्द्र पूर्वीः ॥ १० ॥

(मग त्या गेल्या तरी कोठे ?) तर विरहोत्कण्ठित युवतीप्रमाणे सागराला कडकडून भेटण्यासाठी त्याच्याकडे धांवल्या. कारण तोच त्यांचा मूळ प्रियकर, आणि शत्रुनगरांचा विध्वंस करणारा इंद्र हा त्यांचा प्रेरक स्वामी, म्हणून तर हे पृथ्वीवरील सर्व प्रकारचे ऐश्वर्यनिधि आमच्या गृहाकडे आलेच म्हणा; कारण हे इंद्रा, आमच्या सत्यार्थपूर्ण अशा बहुत स्तुति तुझ्या गृहाकडे गेल्या आहेत. १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११२ (इंद्रसूक्त)

ऋषी - अष्टादंष्ट्र वैरूप : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


इन्द्र॒ पिब॑ प्रतिका॒मं सु॒तस्य॑ प्रातःसा॒वस्तव॒ हि पू॒र्वपी॑तिः ।
हर्ष॑स्व॒ हन्त॑वे शूर॒ शत्रू॑न् उ॒क्थेभि॑ष् टे वी॒र्याख्प् प्र ब्र॑वाम ॥ १॥

इन्द्र पिब प्रति-कामं सुतस्य प्रातः-सावः तव हि पूर्व-पीतिः
हर्षस्व हन्तवे शूर शत्रून् उक्थेभिः ते वीर्या प्र ब्रवाम ॥ १ ॥

इंद्रा, ह्या सोमरसाचे तूं यथेच्छ प्राशन कर. हा रस प्रात:काळीच पिळून सिद्ध केला आहे. कारण प्रथमप्राशनाचा अधिकार तुझा आहे. तर हे वीरा, शत्रूंचा नि:पात करण्याकरतां तू हर्षनिर्भर हो आणि तुझ्या पराक्रमाचे पोवाडे उक्थांच्या योगाने गाण्याचे कार्य आमच्याकडे येऊं दे १.


यस्ते॒ रथो॒ मन॑सो॒ जवी॑या॒न् एन्द्र॒ तेन॑ सोम॒पेया॑य याहि ।
तूयं॒ आ ते॒ हर॑यः॒ प्र द्र॑वन्तु॒ येभि॒र्यासि॒ वृष॑भि॒र्मन्द॑मानः ॥ २ ॥

यः ते रथः मनसः जवीयान् आ इन्द्र तेन सोम-पेयाय याहि
तूयं आ ते हरयः प्र द्रवन्तु येभिः यासि वृष-भिः मन्दमानः ॥ २ ॥

मनापेक्षांहि वेगवान्‌ असा जो तुझा रथ त्यांत आरूढ हो‍ऊन हे इंद्रा, तूं सोमरस प्राशनार्थ आगमन कर. तुझे हरिद्वर्ण अश्व तुजला दौडतच घेऊन येवोत; कारण तेच दणदणीत अश्व जोडून तूं हर्षोद्रेकाने भक्ताकडे जातोस २.


हरि॑त्वता॒ वर्च॑सा॒ सूर्य॑स्य॒ श्रेष्ठै॑ रू॒पैस्त॒न्वं स्पर्शयस्व ।
अ॒स्माभि॑रिन्द्र॒ सखि॑भिर्हुवा॒नः स॑ध्रीची॒नो मा॑दयस्वा नि॒षद्य॑ ॥ ३ ॥

हरित्वता वर्चसा सूर्यस्य श्रेष्ठैः रूपैः तन्वं स्पर्शयस्व
अस्माभिः इन्द्र सखि-भिः हुवानः सध्रीचीनः मादयस्व नि-सद्य ॥ ३ ॥

सूर्याच्य हरिद्वर्ण तेजोभराने आणि उत्कृष्ट प्रतीच्या सौष्ठवाने आमचे शरीर पूर्णपणे युक्त कर. हे इंद्रा, आम्ही तुझ्या मित्रगणासहवर्तमान तुजला पाचारण केले आहे. तर आमच्याकडे लक्ष देऊन आणि आसनावर अधिष्ठित हो‍ऊन हृष्टचित्त हो ३.


यस्य॒ त्यत् ते॑ महि॒मानं॒ मदे॑ष्व् इ॒मे म॒ही रोद॑सी॒ नावि॑विक्ताम् ।
तदोक॒ आ हरि॑भिरिन्द्र यु॒क्तैः प्रि॒येभि॑र्याहि प्रि॒यं अन्नं॒ अच्छ॑ ॥ ४ ॥

यस्य त्यत् ते महिमानं मदेषु इमे इति मही इति रोदसी इति न अविविक्तां
तत् ओकः आ हरि-भिः इन्द्र युक्तैः प्रियेभिः याहि प्र् इयं अन्नं अच्च ॥ ४ ॥

तूं हर्षनिर्भर झालास म्हणजे ज्या प्रसंगाचा जो अपूर्व महिमा तो ह्या विशाल द्यावा-पृथिवीना देखील आकलन हो‍ऊं शकत नाही. पण त्या रसाचे ते जे यज्ञगृहरूप मंदिर तेथे हे इंद्रा, तूं आपले आवडते हरिदश्व जोडून तुला प्रिय असा जो हविर्भाग तो सेवन करण्यासाठी आगमन कर ४.


यस्य॒ शश्व॑त् पपि॒वाँ इ॑न्द्र॒ शत्रू॑न् अनानुकृ॒त्या रण्या॑ च॒कर्थ॑ ।
स ते॒ पुरं॑धिं॒ तवि॑षीं इयर्ति॒ स ते॒ मदा॑य सु॒त इ॑न्द्र॒ सोमः॑ ॥ ५ ॥

यस्य शश्वत् पपि-वान् इन्द्र शत्रून् अननु-कृत्या रण्या चकर्थ
सः ते पुरम्-धिं तविषीं इयर्ति सः ते मदाय सुतः इन्द्र सोमः ॥ ५ ॥

हे इंद्रा, ज्या रसाचा तूं वारंवार आस्वाद घेतलास आणि आपल्या अप्रतिकार्य शस्त्राने तूं शत्रूंना अगदी अतुलनीय पराक्रमाने पार धुळीस मिळविलेस तो हा रस त्या तुझ्या धाडसी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतो, म्हणूनच तूं हर्षोत्फुल्ल होण्यासाठी आम्ही तो पिळून सिद्ध केला आहे ५.


इ॒दं ते॒ पात्रं॒ सन॑वित्तं इन्द्र॒ पिबा॒ सोमं॑ ए॒ना श॑तक्रतो ।
पू॒र्ण आ॑हा॒वो म॑दि॒रस्य॒ मध्वो॒ यं विश्व॒ इद॑भि॒हर्य॑न्ति दे॒वाः ॥ ६ ॥

इदं ते पात्रं सन-वित्तं इन्द्र पिब सोमं एना शतक्रतो इतिशत-क्रतो
पूर्णः आहावः मदिरस्य मध्वः यं विश्वे इत् अभि--हर्यन्ति देवाः ॥ ६ ॥

हे तुझे सोमप्राशनाचे पात्र, ते आम्ही अगोदरच आणून ठेविले आहे; तर हे अमितपराक्रमा इंद्रा, ह्या पात्रानेच तूं सोमरस प्राशन कर. हर्षोत्फुल्ल करणार्‍या मधुर रसाने हा चषक आम्ही कांठोकाठ भरून ठेवला आहे, आणि तो रस इतका रुचकर आहे की सर्व दिव्य विबुध देखील त्याच्यासाठी उत्कंठित झालेले असतात ६.


वि हि त्वां इ॑न्द्र पुरु॒धा जना॑सो हि॒तप्र॑यसो वृषभ॒ ह्वय॑न्ते ।
अ॒स्माकं॑ ते॒ मधु॑मत्तमानी॒मा भु॑व॒न् सव॑ना॒ तेषु॑ हर्य ॥ ७ ॥

वि हि त्वां इन्द्र पुरुधा जनासः हित-प्रयसः वृषभ ह्वयन्ते
अस्माकं ते मधुमत्-तमानि इमा भुवन् सवना तेषु हर्य ॥ ७ ॥

हे इंद्रा, हे वीरोत्तमा, भक्तजन तुझ्या ठिकाणी प्रेम ठेऊन तुजला परोपरीने निरनिराळ्या ठिकाणी पाचारण करीत असतात. तुझ्यासाठी आम्ही पिळलेले हे सोमरस अत्यंत मधुर बनले आहेत. तर त्यांच्याविषयी तूं आपली आवड प्रकट कर ७.


प्र त॑ इन्द्र पू॒र्व्याणि॒ प्र नू॒नं वी॒र्या वोचं प्रथ॒मा कृ॒तानि॑ ।
स॒ती॒नम॑न्युरश्रथायो॒ अद्रिं॑ सुवेद॒नां अ॑कृणो॒र्ब्रह्म॑णे॒ गाम् ॥ ८ ॥

प्र ते इन्द्र पूर्व्याणि प्र नूनं वीर्या वोचं प्रथमा कृतानि
सतीन-मन्युः अश्रथयः अद्रिं सु-वेदनां अकृणोः ब्रह्मणे गाम् ॥ ८ ॥

हे इंद्रा, तूं अगदी प्रथम, अगदी पुरातन काळी जे जे पराक्रम केलेस, ते मी आज देखील सर्वांना कथन केले आहेत. तुला क्रोध येतो, पण तो तुझ्या स्वाधीन आहे म्हणूनच तूं पर्वताचा आणि मेघाचा भेद केलास आणि तुझ्या भक्ताला प्रकाशधेनूंचा (आणि ज्ञानाचा) लाभ सहजगत्या करून दिलास ८.


नि षु सी॑द गणपते ग॒णेषु॒ त्वां आ॑हु॒र्विप्र॑तमं कवी॒नाम् ।
न ऋ॒ते त्वत् क्रि॑यते॒ किं च॒नारे म॒हां अ॒र्कं म॑घवञ् चि॒त्रं अ॑र्च ॥ ९ ॥

नि सु सीद गण-पते गणेषु त्वां आहुः विप्र-तमं कवीनां
न ऋते त्वत् क्रियते किं चन आरे महां अर्कं मघ-वन् चित्रं अर्च ॥ ९ ॥

तर हे लोकसमाज आणि देवसमाज यांच्या अधिपते देवा, तूं आपल्या भक्तमण्डळामध्ये विराजमान हो. कविमध्ये तूंच अत्यंत ज्ञानी आणि प्रतिभावान्‌ असेंच सर्व म्हणतात. येथे जवळ असो किंवा कोठेंहि दूर असो, तुझ्यावांचून कोणतेहि कृत्य घडूं शकत नाही, म्हणूनच भगवंता, आपले अपूर्व "अर्क" स्तवन आम्हांकडून म्हटले जाईल असे कर ९.


अ॒भि॒ख्या नो॑ मघव॒न् नाध॑माना॒न् सखे॑ बो॒धि व॑सुपते॒ सखी॑नाम् ।
रणं॑ कृधि रणकृत् सत्यशु॒ष्माभ॑क्ते चि॒दा भ॑जा रा॒ये अ॒स्मान् ॥ १० ॥

अभि-ख्या नः मघ-वन् नाधमानान् सखे बोधि वसु-पते सखीनां
रणं कृधि रण-कृत् सत्य-शुष्म अभक्ते चित् आ भज राये अस्मान् ॥ १० ॥

भगवंता, तुझी करुणा भाकणारे जे आम्ही भक्त, त्यांच्याकडे कृपाकटाक्षाने पहा. हे दिव्यनिधीच्या प्रभो, मित्रामध्येहि जिव्हाळ्याचा मित्र तूंच आहेस; तर तूंच आमची आठवण ठेव. हे समर वीरा, तूं युद्ध कर; तुझे बळ सत्यच असते (ते कधीहि धोका देत नाही) तर जे वैभव आम्हांला अजून प्राप्त झाले नाही, त्याचा आम्हांस लाभ करून दे १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११३ (इंद्रसूक्त)

ऋषी - अष्टादंष्ट्र वैरूप : देवता - इंद्र : छंद - १० - त्रिष्टुभ् , अवशिष्ट जगती


तं अ॑स्य॒ द्यावा॑पृथि॒वी सचे॑तसा॒ विश्वे॑भिर्दे॒वैरनु॒ शुष्मं॑ आवताम् ।
यदैत् कृ॑ण्वा॒नो म॑हि॒मानं॑ इन्द्रि॒यं पी॒त्वी सोम॑स्य॒ क्रतु॑माँ अवर्धत ॥ १॥

तं अस्य द्यावापृथिवी इति स-चेतसा विश्वेभिः देवैः अनु शुष्मं आवतां
यत् ऐत् कृण्वानः महिमानं इन्द्रियं पीत्वी सोमस्य क्रतु-मान् अवर्धत ॥ १ ॥

ज्यांच्या ठिकाणी चेतनायुक्त अशा असंख्य प्राण्यांची वस्ती आहे अशा द्यावापृथिवी ह्या देखील सकल दिव्यगणांसह इंद्राच्या अलौकिक प्रखरतेचे अतिशय कौतुक करितात. आपला प्रभाव आणि आपले ईश्वरी सामर्थ्य लोकांच्या दृष्टोत्पत्तीस आणतां आणतांनाच तो प्रकट झाला, आणि त्याच वेळी त्या पराक्रमशाली देवाने सोमरसाचे प्राशन केले आणि हर्षाने वृद्धिंगत झाला १.


तं अ॑स्य॒ विष्णु॑र्महि॒मानं॒ ओज॑सां॒शुं द॑ध॒न्वान् मधु॑नो॒ वि र॑प्शते ।
दे॒वेभि॒रिन्द्रो॑ म॒घवा॑ स॒याव॑भिर्वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अ॑भव॒द्वरे॑ण्यः ॥ २ ॥

तं अस्य विष्णुः महिमानं ओजसा अंशुं दधन्वान् मधुनः वि रप्शते
देवेभिः इन्द्रः मघ-वा सयाव-भिः वृत्रं जघन्वान् अभवत् वरेण्यः ॥ २ ॥

ह्या इंद्राचा अद्‍भुत महिमा, मधुर रसाने पूर्ण असा सोमपल्लव हातांत धारण करणार्‍या विष्णूने आपल्या तेजस्वितेच्या योगाने अतिशय प्रसृत केला. कारण आपल्या दिव्यगणांसह संचार करणार्‍या भगवान्‌ इंद्राने वृत्राला ठार केले आणि ह्याच महत्कृत्यामुळे तो सर्वश्रेष्ठ ठरला २.


वृ॒त्रेण॒ यदहि॑ना॒ बिभ्र॒दायु॑धा स॒मस्थि॑था यु॒धये॒ शंसं॑ आ॒विदे॑ ।
विश्वे॑ ते॒ अत्र॑ म॒रुतः॑ स॒ह त्मनाव॑र्धन्न् उग्र महि॒मानं॑ इन्द्रि॒यम् ॥ ३ ॥

वृत्रेण यत् अहिना बिभ्रत् आयुधा सम्-अस्थिथाः युधये शंसं आविदे
विश्वे ते अत्र मरुतः सह त्मना अवर्धन् उग्र महिमानं इन्द्रियम् ॥ ३ ॥

जेव्हां भुजंगाचे रूप धारण करणार्‍या वृत्राशी युद्ध करण्याकरतां आणि आपले यशोगान भक्तांकडून करविण्याकरिता तूं हातात आयुधे घेऊन शत्रूसमोर उभा राहिलास, त्या वेळेस ह्या ठिकाणीच तुझ्या सर्व मरुत्‌गणांनी आपण हो‍ऊन, हे शत्रुभयंकरा, तुज इंद्राच्या ईश्वरी सामर्थ्याचा महिमा वृद्धिंगत केला ३.


ज॒ज्ञा॒न ए॒व व्यबाधत॒ स्पृधः॒ प्राप॑श्यद्वी॒रो अ॒भि पौंस्यं॒ रण॑म् ।
अवृ॑श्च॒दद्रिं॒ अव॑ स॒स्यदः॑ सृज॒दस्त॑भ्ना॒न् नाकं॑ स्वप॒स्यया॑ पृ॒थुम् ॥ ४ ॥

जजानः एव वि अबाधत स्पृधः प्र अपश्यत् वीरः अभि पैंस्यं रणं
अवृश्चत् अद्रिं अव स-स्यदः सृजत् अस्तभ्नात् नाकं सु-अपस्यया पृथुम् ॥ ४ ॥

प्रकट झाल्याबरोबर त्याने शत्रूवर हल्ला चढविला; त्या सूर वीराने उपस्थित झालेल्या तुमुल युद्धाकडे, आपल्या पराक्र्माकडे, आपला पराक्रम कसा यशस्वी होईल ह्याकडे लक्ष पुरविले, पर्वताचा आणि मेघाचा भेद करून जलौघांना खाली वहाण्यास मोकळे सोडून दिले, आणि आपल्या चातुर्यपूर्ण कृतीने विस्तीर्ण नक्षत्रलोक त्याने स्थिर केला ४.


आदिन्द्रः॑ स॒त्रा तवि॑षीरपत्यत॒ वरी॑यो॒ द्यावा॑पृथि॒वी अ॑बाधत ।
अवा॑भरद्धृषि॒तो वज्रं॑ आय॒सं शेवं॑ मि॒त्राय॒ वरु॑णाय दा॒शुषे॑ ॥ ५ ॥

आत् इन्द्रः सत्रा तविषीः अपत्यत वरीयः द्यावापृथिवी इति अबाधत
अव अभरत् धृषितः वज्रं आयसं शेवं मित्राय वरुणाय दाशुषे ॥ ५ ॥

ह्याप्रमाणे इंद्र हा तत्काळ प्रतापशालित्वाचा अधिपति ठरला; त्याच्या जबर तेजाने द्यावापृथिवींना देखील त्रास हो‍ऊं लागला, तेव्हां थडीचा प्रसंग असूनहि त्याने आपले पोलादी वज्र खाली ठेविले आणि जगन्मित्राला, वरुणाला आणि [प्रार्थना आणि हविर्भाग] अर्पण करणार्‍या भक्ताचे चित्त स्वस्थ केले ५.


इन्द्र॒स्यात्र॒ तवि॑षीभ्यो विर॒प्शिन॑ ऋघाय॒तो अ॑रंहयन्त म॒न्यवे॑ ।
वृ॒त्रं यदु॒ग्रो व्यवृ॑श्च॒दोज॑सा॒पो बिभ्र॑तं॒ तम॑सा॒ परी॑वृतम् ॥ ६ ॥

इन्द्रस्य अत्र तविषीभ्यः वि-रप्शिनः ऋघायतः अरंहयन्त मन्यवे
वृत्रं यत् उग्रः वि अवृश्चत् ओजसा अपः बिभ्रतं तमसा परि-वृतम् ॥ ६ ॥

दिवोदकांना चोहोंकडून अंधारांत कोंडून धरणार्‍या वृत्राला जेव्हां भयंकर इंद्राने येथे पृथ्वीवरच आपल्या ओजस्वितेने ठार केले, तेव्हां क्रोधाने संतप्त झालेल्या इंद्राचा दणदणणारा प्रचंड त्वेष पाहून सर्व प्राणी भयाने पळून गेले ६.


या वी॒र्याणि प्रथ॒मानि॒ कर्त्वा॑ महि॒त्वेभि॒र्यत॑मानौ समी॒यतुः॑ ।
ध्वा॒न्तं तमोऽ॑व दध्वसे ह॒त इन्द्रो॑ म॒ह्ना पू॒र्वहू॑ताव् अपत्यत ॥ ७ ॥

या वीर्याणि प्रथमानि कर्त्वा महि-त्वेभिः यतमानौ सम्-ईयतुः
ध्वान्तं तमः अव दध्वसे हतः इन्द्रः मह्ना पूर्व-हूतौ अपत्यत ॥ ७ ॥

जे जे पराक्रम आपल्या मोठेपणाच्या वीरश्रीने उभयतांना प्रथम करून दाखवावयाचे होते ते दाखविण्यासाठी इंद्र आणि वृत्र हे एकमेकांशी झुंजले. पण इंद्राने वृत्राला ठार मारतांच जगावरील निबिड अंधकार तत्काळ नष्ट झाला; आणि आपल्याच परक्रमाने अगदी प्रथम पाचारण करण्याला योग्य अशा सर्व दिव्य विभूतींचा इंद्र हाच अधिपति झाला ७.


विश्वे॑ दे॒वासो॒ अध॒ वृष्ण्या॑नि॒ तेऽ॑वर्धय॒न् सोम॑वत्या वच॒स्यया॑ ।
र॒द्धं वृ॒त्रं अहिं॒ इन्द्र॑स्य॒ हन्म॑ना॒ग्निर्न जम्भै॑स्तृ॒ष्व् अन्नं॑ आवयत् ॥ ८ ॥

विश्वे देवासः अध वृष्ण्यानि ते अवर्धयन् सोम-वत्या वचस्यया
रद्धं वृत्रं अहिं इन्द्रस्य हन्मना अग्निः न जम्भैः तृषु अन्नं आवयत् ॥ ८ ॥

नंतर सोमरसाने स्फुरलेल्या पद्यांनी सर्व दिव्यजनांनी त्याच्या वीर्यशालित्वाची प्रशंसा केली. कारण अग्नि जसा आपल्या ज्वालांनी तृणादिक सहज भस्म करितो, त्याप्रमाणे भुजंग रूपधर उन्मत्त वृत्राला इंद्राच्या वज्राने पार खाऊन टाकले होते ८.


भूरि॒ दक्षे॑भिर्वच॒नेभि॒रृक्व॑भिः स॒ख्येभिः॑ स॒ख्यानि॒ प्र वो॑चत ।
इन्द्रो॒ धुनिं॑ च॒ चुमु॑रिं च द॒म्भय॑ञ् छ्रद्धामन॒स्या शृ॑णुते द॒भीत॑ये ॥ ९ ॥

भूरि दक्षेभिः वचनेभिः ऋक्व-भिः सख्येभिः सख्यानि प्र वोचत
इन्द्रः धुनिं च चुमुरिं च दम्भयन् श्रद्धामनस्या शृणुते दभीतये ॥ ९ ॥

तर आता मित्रत्वाला योग्य अशा स्तवनांनी प्रतिभाचातुर्यदर्शक ऋक्‌स्तुतींनी देवाच्या भक्तांविषयीच्या जिव्हाळ्याचा अतिशय जयजयकार करा. कारण, धुनि, चुमुर, इत्यादि दुष्टांचा नाश करून दभीतिनामक भक्ताच्या श्रद्धायुक्त अंत:करणामुळे त्याची कवने इंद्राने अगदी लक्ष देऊन ऐकली ९.


त्वं पु॒रूण्या भ॑रा॒ स्वश्व्या॒ येभि॒र्मंसै॑ नि॒वच॑नानि॒ शंस॑न् ।
सु॒गेभि॒र्विश्वा॑ दुरि॒ता त॑रेम वि॒दो षु ण॑ उर्वि॒या गा॒धं अ॒द्य ॥ १० ॥

त्वं पुरूणि आ भर सु-अश्व्या येभिः मंसै नि-वचनानि शंसन्
सु-गेभिः विश्वा दुः-इता तरेम विदः सु नः उर्विया गाधं अद्य ॥ १० ॥

तर देवा, तूं उत्तम अश्वांनी संपन्न असे सर्व प्रकारचे ऐश्वर्य आम्हांस अर्पण कर, म्हणजे तुझी स्तवने चालू असतांना आमची आठवण लोकांना होईल. सर्व संकटांच्या ओघांतून आम्ही सहज तरून जाऊ आणि आम्हांला हा विस्तीर्ण ओघ आज अगदी उथळ होईल १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११४ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - सध्र वैरूप अथवा धर्म तापस : देवता - विश्वेदेव : छंद - ४ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


घ॒र्मा सम॑न्ता त्रि॒वृतं॒ व्यापतु॒स्तयो॒र्जुष्टिं॑ मात॒रिश्वा॑ जगाम ।
दि॒वस्पयो॒ दिधि॑षाणा अवेषन् वि॒दुर्दे॒वाः स॒हसा॑मानं अ॒र्कम् ॥ १॥

घर्मा सम्-अन्ता त्रि-वृतं वि आपतुः तयोः जुष्टिं मातरिश्वा जगाम
दि वः पयः दिधिषाणाः अवेषन् विदुः देवाः सह-सामानं अर्कम् ॥ १ ॥

धर्माच्या (म्हणजे तप्त तेजाच्या) दोन्ही शक्तींनी तिन्ही (वस्तुतत्वें) व्यापून टाकली आणि वायुरूपाने संचार करणारा मातरिश्वा त्यांच्या संतोषाकरतां त्यांच्यांत मिसळला. आकाशांतील उदकाला धारण करणारे मेघ देखील स्वस्थानापन्न झाले; ह्याप्रमाणे दिव्यविबुधांना "साम" आणि "अर्क" ह्यांचा लाभ एकदम झाला १.


ति॒स्रो दे॒ष्ट्राय॒ निरृ॑ती॒रुपा॑सते दीर्घ॒श्रुतो॒ वि हि जा॒नन्ति॒ वह्न॑यः ।
तासां॒ नि चि॑क्युः क॒वयो॑ नि॒दानं॒ परे॑षु॒ या गुह्ये॑षु व्र॒तेषु॑ ॥ २ ॥

तिस्रः देष्ट्राय निः-ऋतीः उप आसते दीर्घ-श्रुतः वि हि जानन्ति वह्नयः
तासां नि चिक्युः कवयः नि-दानं परेषु याः गुह्येषु व्रतेषु ॥ २ ॥

दातृश्रेष्ठाच्या आज्ञेनुसार तिघीजणी निर्‌ऋतीच्या जवळ राहून तिच्यावर आणि तिच्या धोरणावर लक्ष ठेवतात. दूरदर्शी आणि सुविख्यात भक्तांना हे सर्व माहीतच असते. तसेंच ह्या सर्वांचे जे आदिकारण तेहि ज्ञानी जनांना स्पष्टपणे कळते आणि ज्या ज्या उच्च आणि गूढ प्रवृत्ति उदात्त आचरणाच्या मुळाशी असतात, त्यांचेहि ज्ञान त्यांना असते २.


चतु॑ष्कपर्दा युव॒तिः सु॒पेशा॑ घृ॒तप्र॑तीका व॒युना॑नि वस्ते ।
तस्यां॑ सुप॒र्णा वृष॑णा॒ नि षे॑दतु॒र्यत्र॑ दे॒वा द॑धि॒रे भा॑ग॒धेय॑म् ॥ ३ ॥

चतुः-कपर्दा युवतिः सु-पेशाः घृत-प्रतीका वयुनानि वस्ते
तस्यां सु-पर्णा वृषणा नि सेदतुः यत्र देवाः दधिरे भाग-धेयम् ॥ ३ ॥

एक तरुणी जी अतिशय रूपवती, तिची वेणी चार पेडांची आहे; अंगकांति तर नवनीताप्रमाणे तुळतुळीत कोमल; ती तरुणी रुपेंहि नाना प्रकारची धारण करिते, आणि सर्व प्रकारची विद्याहि तिला अवगत आहे. अशा त्या तरुणीच्या जवळ दोन वीर्यशाली पक्षी-जेथे दिव्य जनांना त्यांचे हविर्भाग प्राप्त होतात तेथेच-विराजमान झालेले असतात-त्याच ठिकाणी दिव्यविबुध मानवांच्या सुखदु:खांचा वांटाहि ठरवितात ३.


एकः॑ सुप॒र्णः स स॑मु॒द्रं आ वि॑वेश॒ स इ॒दं विश्वं॒ भुव॑नं॒ वि च॑ष्टे ।
तं पाके॑न॒ मन॑सापश्यं॒ अन्ति॑त॒स्तं मा॒ता रे॑ळ्हि॒ स उ॑ रेळ्हि मा॒तर॑म् ॥ ४ ॥

एकः सु-पर्णः सः समुद्रं आ विवेश सः इदं विश्वं भुवनं वि चष्टे
तं पाकेन मनसा अपश्यं अन्तितः तं माता रेळ्हि सः ओं इति रेळ्हि मातरम् ॥ ४ ॥

पण त्यांतला एक पक्षी तर समुद्रांतच शिरला आनि तेथूनच तो ह्या अखिल विश्वाचे निरीक्षण करतो; म्हणून शुद्ध पवित्र मनाने त्या पक्ष्याला तो माझ्या अगदी जवळ (अंत:करणांतच) असल्याचे मी पाहिले. तेथे सर्व जगताची माता त्याला कुरवाळीत असते आणि तोहि पण मातेला घट्ट चिकटून चाटीत असतो ४.


सु॒प॒र्णं विप्राः॑ क॒वयो॒ वचो॑भि॒रेकं॒ सन्तं॑ बहु॒धा क॑ल्पयन्ति ।
छन्दां॑सि च॒ दध॑तो अध्व॒रेषु॒ ग्रहा॒न् सोम॑स्य मिमते॒ द्वाद॑श ॥ ५ ॥

सु-पर्णं विप्रा कवयः वचः-भिः एकं सन्तं बहुधा कल्पयन्ति
छंन्दांसि च दधतः अध्वरेषु ग्रहान् सोमस्य मिमते द्वादश ॥ ५ ॥

वास्तविक पाहतां तो पक्षी एकच; पण ज्ञानी कवींनी जी कवने केली, त्यात तो अनेक स्वरूपांचा बनलेला आहे असे त्यांनी वर्णन केले. हे एकच उदाहरण नव्हे, तर जे छंद आहेत, त्यांचेहि त्यांनी अध्वर यागासाठी अनेक प्रकार बनविले, तसेच सोमरसाचे चषकहि बारा ठरविले ५.


ष॒ट्त्रिं॒शांश्च॑ च॒तुरः॑ क॒ल्पय॑न्त॒श् छन्दां॑सि च॒ दध॑त आद्वाद॒शम् ।
य॒ज्ञं वि॒माय॑ क॒वयो॑ मनी॒ष ऋ॑क्सा॒माभ्यां॒ प्र रथं॑ वर्तयन्ति ॥ ६ ॥

षट्-त्रिंशान् च चतुरः कल्पयन्तः चन्दांसि च दधतः आद्वादशं
यजं वि-माय कवयः मनीषा ऋक्-सामाभ्यां प्र रथं वर्तयन्ति ॥ ६ ॥

(अशाच त्यांनी आणखीहि कांही गोष्टी केल्या त्या अशा की) एकाच यज्ञाच्या त्यांनी छत्तीस आणि चार पद्धति केल्या; मुख्य छंदांची संख्या बारापर्यंत वाढविली. ह्याप्रमाणे आपल्या बुद्धिमत्तेने ज्ञानी ऋषींनी यज्ञाची अंगे निश्चित केली आणि त्याला अनुसरून ते ऋषि यज्ञरूप रथ ऋक्‌ आणि साम ह्या दोन चाकांच्या योगाने चालवीत असतात ६.


चतु॑र्दशा॒न्ये म॑हि॒मानो॑ अस्य॒ तं धीरा॑ वा॒चा प्र ण॑यन्ति स॒प्त ।
आप्ना॑नं ती॒र्थं क इ॒ह प्र वो॑च॒द्येन॑ प॒था प्र॒पिब॑न्ते सु॒तस्य॑ ॥ ७ ॥

चतुः-दश अन्ये महिमानः अस्य तं धीराः वाचा प्र नयन्ति सप्त
आप्नानं तीर्थं कः इह प्र वोचत् येन पथा प्र-पिबन्ते सुतस्य ॥ ७ ॥

यज्ञाचा आणि तसाच परमात्म्याचा महिमा चौदा प्रकारचा आहे. त्याची ओळख उत्कृष्ट प्रज्ञावान्‌ जे सात ऋषि आपल्या वाणीने करून देतात. म्हणूनच त्यांच्यावांचून "आप्नान" तीर्थाचे महत्त्व आपल्याला कोणी सांगितले असते काय ? ह्याच आप्नानाच्या मार्गाने पुण्यशील पुरुष सोमरसाचा आस्वाद घेतात ७.


स॒ह॒स्र॒धा प॑ञ्चद॒शान्यु॒क्था याव॒द्द्यावा॑पृथि॒वी ताव॒दित् तत् ।
स॒ह॒स्र॒धा म॑हि॒मानः॑ स॒हस्रं॒ याव॒द्ब्रह्म॒ विष्ठि॑तं॒ ताव॑ती॒ वाक् ॥ ८ ॥

सहस्रधा पच-दशानि उक्था यावत् द्यावापृथिवी इति तावत् इत् तत्
सहस्रधा महिमानः सहस्रं यावत् ब्रह्म वि--स्थितं तावती वाक् ॥ ८ ॥

उक्थस्तवने पंधरा म्हणून पण म्हणण्याची पद्धति सहस्त्रावधि; म्हणजे जशा द्यावापृथिवी अमर्याद तशी उक्थेंहि असंख्य; भगवंताची श्रेष्ठ कृत्ये हजारो पण त्या प्रत्येकाचे प्रकार अगणित. आणि जितक्या प्रकारांनी ब्रह्म (प्रत्यक्ष दृष्टीला) सर्वत्र अनेक प्रकारचे भासते तशीच स्थिती वाचेचीहि आहे ८.


कश् छन्द॑सां॒ योगं॒ आ वे॑द॒ धीरः॒ को धिष्ण्यां॒ प्रति॒ वाचं॑ पपाद ।
कं ऋ॒त्विजां॑ अष्ट॒मं शूरं॑ आहु॒र्हरी॒ इन्द्र॑स्य॒ नि चि॑काय॒ कः स्वि॑त् ॥ ९ ॥

कः चन्दसां योगं आ वेद धीरः कः धिष्ण्यां प्रति वाचं पपाद
कं ऋत्विजां अष्टमं शूरं आहुः हरी इति इन्द्रस्य नि चिकाय कः स्वित् ॥ ९ ॥

वृत्तांचे योग म्हणजे त्यांचे एकीकरण अथवा जुळणी कसे करावे हे कोणत्या ज्ञात्याला कळले ? केवळ प्रज्ञागम्य अशा वाचेचे रहस्य कोणाला अवगत झाले ते कोणी प्रतिपादन केले ? ऋत्विजांतील आठवा शूर ऋत्विज्‌ तो कोणता ? आणि इंद्राचे हरिद्वर्ण अश्व कोणते ते तरी कोण जाणतो ? ९.


भूम्या॒ अन्तं॒ पर्येके॑ चरन्ति॒ रथ॑स्य धू॒र्षु यु॒क्तासो॑ अस्थुः ।
श्रम॑स्य दा॒यं वि भ॑जन्त्येभ्यो य॒दा य॒मो भव॑ति ह॒र्म्ये हि॒तः ॥ १० ॥

भूम्याः अन्तं परि एके चरन्ति रथस्य धूः-सु युक्तासः अस्थुः
श्रमस्य दायं वि भजन्ति एभ्यः यदा यमः भवति हर्म्ये हितः ॥ १० ॥

खरा प्रकार असा की ते अश्व त्याच्याच रथाच्या धुरेला जोडलेले असतात आणि तेच पृथ्वीच्या सीमेभोंवती परिभ्रमण करितात. त्या सर्वांचा नियामक "यम" (ईश्वर) जेव्हां आपल्या प्रासादांत विराजमान होतो, त्या वेळेस श्रमाचे फल, श्रमपूर्वक केलेल्या प्रयत्‍नांचे फल ह्यांच्यापासून प्राप्त होते १०.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११५ (अग्निसूक्त)

ऋषी - उपस्तुत वार्ष्टिहव्य : देवता - अग्नि : छंद - ८ - त्रिष्टुभ्, ९ - शक्वरी, अवशिष्ट - जगती


चि॒त्र इच् छिशो॒स्तरु॑णस्य व॒क्षथो॒ न यो मा॒तरा॑व् अ॒प्येति॒ धात॑वे ।
अ॒नू॒धा यदि॒ जीज॑न॒दधा॑ च॒ नु व॒वक्ष॑ स॒द्यो महि॑ दू॒त्य१ं चर॑न् ॥ १॥

चित्रः इत् शिशोः तरुणस्य वक्षथः न यः मातरौ अपि-एति धातवे
अनूधाः यदि जीजनत् अधा च नु ववक्ष सद्यः महि दूत्यं चरन् ॥ १ ॥

लहान (म्हटला तर लहान) आणि (तरुण म्हटला तर) तरुण असा जो एक पुरुष त्याच्या वर्धनाचा प्रकार म्हणजे एक आश्चर्यच. (ती तर्‍हा अशी अद्‍भुत आहे की) त्याच्या माता दोन; पण त्या दोघींकडेहि स्तनपान करण्यासाठी तो कधी गेला नाही आणि जात नाही; त्याच्या जननींना स्तनच नसून त्यांनी त्याला जन्म दिला असे म्हणावे तर तो तत्काळ वृद्धिंगत कसा झाला; आणि पुढे श्रेष्ठ असे जे देवांचे प्रतिनिधित्व ते पत्करून ते कार्य तरी तो कसा पार पाडूं लागला १.


अ॒ग्निर्ह॒ नाम॑ धायि॒ दन्न् अ॒पस्त॑मः॒ सं यो वना॑ यु॒वते॒ भस्म॑ना द॒ता ।
अ॒भि॒प्र॒मुरा॑ जु॒ह्वा स्वध्व॒र इ॒नो न प्रोथ॑मानो॒ यव॑से॒ वृषा॑ ॥ २ ॥

अग्निः ह नाम धायि दन् अपः-तमः सं यः वना युवते भस्मना दता
अभि-प्रमुरा जुह्वा सु-अध्वरः इनः न प्रोथमानः यवसे वृषा ॥ २ ॥

असा पुरुष कोण म्हणाल, तर त्याचे नांव अग्नि; तो उदार आहे, तो सत्कृत्यांत अगदी मग्न झालेला असतो आणि आपल्या ज्वालारूप दाढांनी अरण्येंसुद्धां भस्म करून टाकतो. भक्तांचा अध्वरयाग तो आपल्या सर्वसंस्पर्शी ज्वालांनी सिद्धीस नेतो; तो आमचा प्रभु आहे आणि हिरव्यागार तृणाला जसा एकदा तुंद वृषभ हाच मालक, त्याप्रमाणे तो आम्हां भक्तांचा प्रभु आहे २.


तं वो॒ विं न द्रु॒षदं॑ दे॒वं अन्ध॑स॒ इन्दुं॒ प्रोथ॑न्तं प्र॒वप॑न्तं अर्ण॒वम् ।
आ॒सा वह्निं॒ न शो॒चिषा॑ विर॒प्शिनं॒ महि॑व्रतं॒ न स॒रज॑न्तं॒ अध्व॑नः ॥ ३ ॥

तं वः विं न द्रु-सदं देवं अन्धसः इन्दुं प्रोथन्तं प्र-वपन्तं अर्णवं
आसा वह्निं न शोचिषा वि-रप्शिनं महि-व्रतं न सरजन्तं अध्वनः ॥ ३ ॥

त्याच्याप्रीत्यर्थ तुम्ही स्तवन करा, पक्षी जसा झाडाच्या खांदीवर बसतो, त्याप्रमाणे जो देदीप्यमान अग्नि समित काष्ठावर आरूढ होतो, त्याच्याप्रीत्यर्थ सोमरसरूप मधुर पेय पात्रांत ओता; पण तें ओतले जात असतां असा ध्वनि उमटतो की जसा जलकल्लोळच खळबळला आहे, तो ज्वालारूप मुखाने हविर्भाग ग्रहण करून, सिंहनाद करतो आणि आपले श्रेष्ठ कार्य असें समजून भक्तांचा मार्ग सुगम करतो ३.


वि यस्य॑ ते ज्रयसा॒नस्या॑जर॒ धक्षो॒र्न वाताः॒ परि॒ सन्त्यच्यु॑ताः ।
आ र॒ण्वासो॒ युयु॑धयो॒ न स॑त्व॒नं त्रि॒तं न॑शन्त॒ प्र शि॒षन्त॑ इ॒ष्टये॑ ॥ ४ ॥

वि यस्य ते ज्रयसानस्य अजर धक्षोः न वाताः परि सन्ति अच्युताः
आ रण्वासः युयुधयः न सत्वनं त्रितं नशन्त प्र शिषन्तः इष्टये ॥ ४ ॥

तूं एकदा झपाट्याने सर्वत्र पसरलास आणि हे वार्धक्यरहिता, तुझ्या ज्वालेचा लोळ एकदा कां वाढला, म्हणजे वारा कितीही अनिवार सुटला, तरी तुला तो आवरूं शकत नाही. समरकर्मात ज्यांना आनंद वाटतो असे वीर आपल्या तेजस्वी सेनानायकाची आज्ञा ऐकण्याकरतां धांवतात, त्याप्रमाणे भक्तजन आपल्या कल्याणासाठी तुझी सेवा करण्याच्या हेतूने तूं त्रित (तारक) म्हणून तुझ्याकडे येतात ४.


स इद॒ग्निः कण्व॑तमः॒ कण्व॑सखा॒र्यः पर॒स्यान्त॑रस्य॒ तरु॑षः ।
अ॒ग्निः पा॑तु गृण॒तो अ॒ग्निः सू॒रीन् अ॒ग्निर्द॑दातु॒ तेषां॒ अवो॑ नः ॥ ५ ॥

सः इत् अग्निः कण्व-तमः कण्व-सखा अर्यः परस्य अन्तरस्य तरुषः
अग्निः पातु गृणतः अग्निः सूरीन् अग्निः ददातु तेषां अवः नः ॥ ५ ॥

तो अग्निच आम्हां कण्वांमध्ये श्रेष्ठ, आम्हां कण्वकुलोत्पन्नांचा सखा आहे. शत्रूशी झुंज करणारा वीर जवळ असो की दूर असो, अग्नि हा अशा वीराचा प्रभु आहे; म्हणून अग्नि स्तोत्रकर्त्याचे संरक्षण करो; अग्नि आमच्या धुरीणांचे रक्षण करो; आणि अग्नि त्यांच्यावर जशी कृपा करील, तशीच आम्हांवरहि करो ५.


वा॒जिन्त॑माय॒ सह्य॑से सुपित्र्य तृ॒षु च्यवा॑नो॒ अनु॑ जा॒तवे॑दसे ।
अ॒नु॒द्रे चि॒द्यो धृ॑ष॒ता वरं॑ स॒ते म॒हिन्त॑माय॒ धन्व॒नेद॑विष्य॒ते ॥ ६ ॥

वाजिन्-तमाय सह्यसे सु-पित्र्य तृषु च्यवानः अनु जात-वेदसे
अनुद्रे चित् यः धृषता वरं सते महिन्-तमाय धन्वना इत् अविष्यते ॥ ६ ॥

हे उत्तमोत्तम पित्या अग्ने, तूं जो अत्यंत सत्त्वबलाढ्य, शत्रुमर्दन आणि सकल वस्तु जाणणारा, त्या तुझा मी च्यवान ऋषि तत्काळ अनुयायी झालो आहे; आणि ज्या ठिकाणी उदकाचा लेशहि नाही अशा विस्तीर्ण मैदानांत धडाक्यासरशी जो वृष्टिरूप वरदान देऊन रक्षण करतो, त्या श्रेष्ठतम भक्तरक्षक अग्नीचा मी अनुयायी आहे ६.


ए॒वाग्निर्मर्तैः॑ स॒ह सू॒रिभि॒र्वसु॑ ष्टवे॒ सह॑सः सू॒नरो॒ नृभिः॑ ।
मि॒त्रासो॒ न ये सुधि॑ता ऋता॒यवो॒ द्यावो॒ न द्यु॒म्नैर॒भि सन्ति॒ मानु॑षान् ॥ ७ ॥

एव अग्निः मर्तैः सह सूरि-भिः वसुः स्तवे सहसः सूनरः नृ-भिः
मित्रासः न ये सु-धिताः ऋत-यवः द्यावः न द्युम्नैः अभि सन्ति मानुषान् ॥ ७ ॥

याप्रमाणे आम्हां मर्त्य मानवांसह आमचे जे धुरीण त्यांनी अग्नीचे स्तवन केले; दर्पदलन सामर्थ्यामध्ये प्रकट होणारा शूर श्रेष्ठ जो अग्नि, त्याचे स्तवन शूर पुरुषांकडूनहि तसेच होत असते; हे सर्व आम्हांला उत्कृष्ट मित्राप्रमाणे आहेत आणि ते सत्य धर्माप्रमाणे वागण्यास तत्पर असतात; म्हणून आकाशस्थ तेजोगोल आपल्या प्रकाशाने डोळे दिपवितात त्याप्रमाणे हे शूर पुरुषहि आपल्या उदात्र आचरणाने सर्व मनुष्यांवर छाप बसवितात ७.


ऊर्जो॑ नपात् सहसाव॒न्न् इति॑ त्वोपस्तु॒तस्य॑ वन्दते॒ वृषा॒ वाक् ।
त्वां स्तो॑षाम॒ त्वया॑ सु॒वीरा॒ द्राघी॑य॒ आयुः॑ प्रत॒रं दधा॑नाः ॥ ८ ॥

ऊर्जः नपात् सहसावन् इति त्वा उप-स्तुतस्य वन्दते वृषा वाक्
त्वां स्तोषाम त्वया सु-वीराः द्राघीयः आयुः प्र-तरं दधानाः ॥ ८ ॥

हे ओजस्वितेच्या अधिपते, हे शत्रुमर्दना, ह्याप्रमाणे "उपस्तुत" नांवाच्या भक्ताची वीरवृत्तीची वाणी तुझे स्तवन करीत असते, त्याप्रमाणे आम्हीहि तुझे स्तवन करूं आणि तुझ्याच कृपेने उत्तमोत्तम वीर हो‍ऊं आणि दीर्घायुष्याचाहि उपभोग घेऊं ८.


इति॑ त्वाग्ने वृष्टि॒हव्य॑स्य पु॒त्रा उ॑पस्तु॒तास॒ ऋष॑योऽवोचन् ।
तांश्च॑ पा॒हि गृ॑ण॒तश्च॑ सू॒रीन् वष॒ड् वष॒ळ् इत्यू॒र्ध्वासो॑ अनक्ष॒न् नमो॒ नम॒ इत्यू॒र्ध्वासो॑ अनक्षन् ॥ ९ ॥

इति त्वा अग्ने वृष्टि-हव्यस्य पुत्राः उप-स्तुतासः ऋषयः अवोचन्
तान् च पाहि गृणतः च सूरीन् वषट् वषट् इति ऊर्ध्वासः अनक्षन् नमः नमः इति ऊर्ध्वासः अनक्षन् ॥ ९ ॥

हे अग्ने, वृष्टिहव्याचे पुत्र "उपस्तुत" ऋषि यांनी तुझी अशीच स्तुति केली आहे; तर स्तुतिकर्त्या ऋषीचे तूं रक्षण कर आणि आमच्या यजमानांचेहि कर. उठून उभे राहून "वषट्‌" "वषट्‌" असा घोष करीत ते तुझ्याकडे येत आहेत आणि उभे राहूनच प्रणिपात करून "नमोनम:" अशी गर्जना करीत ते नम्र हो‍ऊन तुझ्याकडे येत आहेत. ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११६ (इंद्रसूक्त)

ऋषी - अग्नियुत अथवा अग्नियूप स्थौर : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


पिबा॒ सोमं॑ मह॒त इ॑न्द्रि॒याय॒ पिबा॑ वृ॒त्राय॒ हन्त॑वे शविष्ठ ।
पिब॑ रा॒ये शव॑से हू॒यमा॑नः॒ पिब॒ मध्व॑स्तृ॒पदि॒न्द्रा वृ॑षस्व ॥ १॥

पिब सोमं महते इन्द्रियाय पिब वृत्राय हन्तवे शविष्ठ
पिब राये शवसे हूयमानः पिब मध्वः तृपत् इन्द्र आ वृषस्व ॥ १ ॥

तुझे श्रेष्ठ इंद्रत्व (म्हणजे ईश्वरी सामर्थ्य) दाखविण्याकरिता तूं सोमरस प्राशन कर, हे अत्युत्कृत बलाढ्या वृत्राचा नाश करण्याकरतां सोमरस प्राशन कर; आम्ही (दिव्य) वैभवाच्या आणि बलप्रकर्षाच्या प्राप्तीकरतां तुजला पाचारण करीत आहो; तर हे इंद्रा, मधूर सोमरसाचा तृप्ति होईपर्यंत आस्वाद घे १.


अ॒स्य पि॑ब क्षु॒मतः॒ प्रस्थि॑त॒स्येन्द्र॒ सोम॑स्य॒ वरं॒ आ सु॒तस्य॑ ।
स्व॒स्ति॒दा मन॑सा मादयस्वार्वाची॒नो रे॒वते॒ सौभ॑गाय ॥ २ ॥

अस्य पिब क्षु-मतः प्र-स्थितस्य इन्द्र सोमस्य वरं आ सुतस्य
स्वस्ति-दाः मनसा मादयस्व अर्वाचीनः रेवते सौभगाय ॥ २ ॥

हा सामर्थ्यप्रद रस तुझ्यापुढे आणला आहे; तर तो प्राशन कर. हे इंद्रा, पुळून उत्तम तर्‍हेने बनविलेल्या ह्या सोमरसाचा यथेच्छ आस्वाद घे. तूं आमचे कल्याण करणारा आहेस, म्हणून तूं हर्षनिर्भर हो आणि आमच्या वैभवाषी आणि सद्भाव्यासाठी आपली दृष्टि आमच्याकडे वळीव २.


म॒मत्तु॑ त्वा दि॒व्यः सोम॑ इन्द्र म॒मत्तु॒ यः सू॒यते॒ पार्थि॑वेषु ।
म॒मत्तु॒ येन॒ वरि॑वश्च॒कर्थ॑ म॒मत्तु॒ येन॑ निरि॒णासि॒ शत्रू॑न् ॥ ३ ॥

ममत्तु त्वा दिव्यः सोमः इन्द्र ममत्तु यः सूयते पार्थिवेषु
ममत्तु येन वरि-वः चकर्थ ममत्तु येन नि-रिणासि शत्रून् ॥ ३ ॥

हा दिव्य सोमरस तुजला हर्षोत्फुल्ल करो. इंद्रा, आम्हां भूलोकनिवासी जनांमध्ये जो पिळला जाऊन तयार होतो, अशाच सोमरसाने तूं प्रसन्न हो. ज्याच्या प्राशनाने तूं भक्तांना)उज्जत केलेस, तो तुला उल्लसित करो. ज्याच्या आवेशामध्ये तूं शत्रूंचा उच्छेद करतोस, तो रस तुजला तल्लीन करो ३.


आ द्वि॒बर्हा॑ अमि॒नो या॒त्व् इन्द्रो॒ वृषा॒ हरि॑भ्यां॒ परि॑षिक्तं॒ अन्धः॑ ।
गव्या सु॒तस्य॒ प्रभृ॑तस्य॒ मध्वः॑ स॒त्रा खेदां॑ अरुश॒हा वृ॑षस्व ॥ ४ ॥

आ द्वि-बर्हाः अमिनः यातु इन्द्रः वृषा हरि-भ्यां परि-सिक्तं अन्धः
गवि आ सुतस्य प्र-भृतस्य मध्वः सत्रा खेदां अरुश-हा वृषस्व ॥ ४ ॥

दोनी जगतांवर सत्ता चालविणारा, अप्रतिहत आणि पराक्रमशाली इंद्रा हा चषकामध्ये ओतलेल्या मधुर पेयाकडे आपल्या हरिद्वर्ण अश्वांसह प्राप्त होतो. गोदुग्धामध्ये मिसळून अर्पण केलेल्या ह्या मधुर रसाचे हे इंद्रा, प्राशन कर. शत्रुविध्वंसक असा तूं आपल्या आयुधांनाहि तो रस यथेच्छ प्राशन करूं दे ४.


नि ति॒ग्मानि॑ भ्रा॒शय॒न् भ्राश्या॒न्यव॑ स्थि॒रा त॑नुहि यातु॒जूना॑म् ।
उ॒ग्राय॑ ते॒ सहो॒ बलं॑ ददामि प्र॒तीत्या॒ शत्रू॑न् विग॒देषु॑ वृश्च ॥ ५ ॥

नि तिग्मानि भ्राशयन् भ्राश्यानि अव स्थिरा तनुहि यातु-जूनां
उग्राय ते सहः बलं ददामि प्रति-इत्य शत्रून् वि-गदेषु वृश्च ॥ ५ ॥

तुझी तेजस्वी तीक्ष्ण झगझगीत आयुधे पाजळून दुष्ट मायावी जादुगारांची अभेद्य नगरें तूं उलथून पाड. तूं शत्रुभीषण आहेसच; पण तुला देखील हा धर्षक आणि प्रबल रस अर्पण करतो; तर समरामध्ये शत्रूंना घेऊन त्यांचा उच्छेद कर ५.


व्य१र्य इ॑न्द्र तनुहि॒ श्रवां॒स्योज॑ स्थि॒रेव॒ धन्व॑नोऽ॒भिमा॑तीः ।
अ॒स्म॒द्र्यग् वावृधा॒नः सहो॑भि॒रनि॑भृष्टस्त॒न्वं वावृधस्व ॥ ६ ॥

वि अर्यः इन्द्र तनुहि श्रवांसि ओजः स्थिराइव धन्वनः अभि-मातीः
अस्मद्र्यक् ववृधानः सहः-भिः अनि-भृष्टः तन्वं ववृधस्व ॥ ६ ॥

इंद्रा, आमचा स्वामी तूं आहेस, तर आपला लौकिक आणि तेजस्विता चोहोंकडे पसरून दे. शत्रु आपले ठिकाण पक्के धरून बसले आहेत असे जे दिसत असले, तरी त्यांचा हल्ला तूं आपल्या धनुष्याने उखडून टाक. आपल्या प्रतापाने वृद्धिंगत झालेला तूं आमच्याकडे वळ आणि अजिंक्यपणाने आलेले आपले वैशिष्ट्य वृद्धिंगत कर ६.


इ॒दं ह॒विर्म॑घव॒न् तुभ्यं॑ रा॒तं प्रति॑ सम्रा॒ळ् अहृ॑णानो गृभाय ।
तुभ्यं॑ सु॒तो म॑घव॒न् तुभ्यं॑ प॒क्वोऽ॒द्धीन्द्र॒ पिब॑ च॒ प्रस्थि॑तस्य ॥ ७ ॥

इदं हविः मघ-वन् तुभ्यं रातं प्रति सम्-राट् अहृणानः गृभाय
तुभ्यं सुतः मघ-वन् तुभ्यं पक्वः अद्धि इन्द्र पिब च प्र-स्थ् इतस्य ॥ ७ ॥

भगवंता हा हविर्भाग तुजला अर्पण केला आहे. तूंच विश्वाचा चक्रवर्ती आहेस. तरी रोष न धरिता त्या हवीचा स्वीकार करच. भगवंता, हा रस तुझ्याप्रीत्यर्थ पिळला आहे. तुझ्यासाठी नैवद्य पक्व केला आहे; तर तो ग्रहण कर आणि इंद्रा, अर्पण केलेला हा रस प्राशन करा ७.


अ॒द्धीदि॑न्द्र॒ प्रस्थि॑ते॒मा ह॒वींषि॒ चनो॑ दधिष्व पच॒तोत सोम॑म् ।
प्रय॑स्वन्तः॒ प्रति॑ हर्यामसि त्वा स॒त्याः स॑न्तु॒ यज॑मानस्य॒ कामाः॑ ॥ ८ ॥

अद्धि इन्द्र प्र-स्थिता इमा हवींषि चनः दधिष्व पचता उत सोमं
प्रयस्वन्तः प्रति हर्यामसि त्वा सत्याः सन्तु यजमानस्य कामाः ॥ ८ ॥

हे इंद्रा, तुझ्यापुढे ठेवेलेले हे हविर्भाग तूं ग्रहण कर, तशीच दुसरी पक्वान्ने आणि सोमरस सिद्ध केले आहेत त्यांचाहि स्वीकार कर. आम्ही भक्तीच्या तळमळीने तुझ्यावर प्रेम ठेवीत आहो; तर आमच्या यजमानाचे मनोरथ सत्य होवोत ८.


प्रेन्द्रा॒ग्निभ्यां॑ सुवच॒स्यां इ॑यर्मि॒ सिन्धा॑व् इव॒ प्रेर॑यं॒ नावं॑ अ॒र्कैः ।
अया॑ इव॒ परि॑ चरन्ति दे॒वा ये अ॒स्मभ्यं॑ धन॒दा उ॒द्‌भिद॑श्च ॥ ९ ॥

प्र इन्द्राग्नि-भ्यां सु-वचस्यां इयर्मि सिन्धौ-इव प्र ईरयं नावं अर्कैः
अयाः-इव परि चरन्ति देवाः ये अस्मभ्यं धन-दाः उत्-भिदः च ॥ ९ ॥

ह्याप्रमाणे इंद्र आणि अग्नि ह्यांच्याकडे मी उत्कृष्ट कवने सादर करीत आहे. ज्याप्रमाणे विस्तीर्ण नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये अर्कस्तोत्राने प्रार्थना करून नौका हाकारावी, त्याप्रमाणे अर्कस्तवनांसह मी आपली कवने देवाकडे पोहोचवीत आहे; त्या योगाने उद्यम व्यापृत मानवांप्रमाणे दिव्य विभूति देखील आमच्या सन्निध संचार करितात; तेच विभूति आम्हांला धन देणारे जणों द्रव्यनिर्झरच होत ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११७ (भिक्षुसूक्त)

ऋषी - भिक्षु आंगिरस : देवता - धनान्नदान : छंद - १-२ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


न वा उ॑ दे॒वाः क्षुधं॒ इद्व॒धं द॑दुरु॒ताशि॑तं॒ उप॑ गच्छन्ति मृ॒त्यवः॑ ।
उ॒तो र॒यिः पृ॑ण॒तो नोप॑ दस्यत्यु॒तापृ॑णन् मर्डि॒तारं॒ न वि॑न्दते ॥ १॥

न वै ओं इति देवाः क्षुधं इत् वधं ददुः उत आशितं उप गच्चन्ति मृत्यवः
उतो इति रयिः पृणतः न उप दस्यति उत अपृणन् मर्डितारं न विन्दते ॥ १ ॥

मनुष्याला क्षुधेमुळे, उपासमारीने मृत्यु यावा हा हेतु दिव्यविबुधांनी ठरविलेला खास नव्हे. चापून अन्न खाणारे लोक देखील मृत्युमुखांत पडतात हे आपण पाहतोच; एवंच खच्चून अन्न खाणार्‍याला मृत्यु येत नाही असे नव्हे; आणि हे लक्षांत ठेवावे की क्षुधिताला अन्नदानाने संतुष्ट केल्याने कोणाचीहि संपत्ति नष्ट होत नाही, पण जो क्षुधिताला अन्न देऊन संतुष्ट करीत नाही त्याला संकट काळी किंवा परलोकी उपयोगी पडणारा कोणीही भेटणार नाही १.


य आ॒ध्राय॑ चकमा॒नाय॑ पि॒त्वोऽ॑न्नवा॒न् सन् र॑फि॒तायो॑पज॒ग्मुषे॑ ।
स्थि॒रं मनः॑ कृणु॒ते सेव॑ते पु॒रोतो चि॒त् स म॑र्डि॒तारं॒ न वि॑न्दते ॥ २ ॥

यः आध्राय चकमानाय पित्वः अन्न-वान् सन् रफिताय उप-जग्मुषे
स्थिरं मनः कृणुते सेवते पुरा उतो इति चित् सः मर्डितारं न विन्दते ॥ २ ॥

ध्यानांत ठेवा की क्षुधेने त्रस्त झालेला अन्नार्थी याचक दाराशी येऊन अन्न मागत असतां त्याला कांहीही न देतां मन कठोर करून त्याच्यासमक्ष जो कोणी खुशाल भोजन करीत बसतो त्याचा अधोगतीपासून उद्धार करणारा कोणीही भेटणार नाही २.


स इद्‌भो॒जो यो गृ॒हवे॒ ददा॒त्यन्न॑कामाय॒ चर॑ते कृ॒शाय॑ ।
अरं॑ अस्मै भवति॒ याम॑हूता उ॒ताप॒रीषु॑ कृणुते॒ सखा॑यम् ॥ ३ ॥

सः इत् भोजः यः गृहवे ददाति अन्न-कामाय चरते कृशाय
अरं अस्मै भवति याम-हूतौ उत अपरीषु कृणुते सखायम् ॥ ३ ॥

जो याचक अन्नार्थी असून अन्नासाठी फिरत असतोहि आणि क्षुधेमुळे क्षीण झालेला असतो अशा याचकाला जो अन्न देतो तोच खरा उदार. सर्व प्रकारचे यज्ञ त्यानेच पूर्ण केले असे समजा; इतकेंच नव्हे, तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या अन्नदात्याने आपल्यास एक जिवलग सहायकर्ताच जोडला असे समजा ३.


न स सखा॒ यो न ददा॑ति॒ सख्ये॑ सचा॒भुवे॒ सच॑मानाय पि॒त्वः ।
अपा॑स्मा॒त् प्रेया॒न् न तदोको॑ अस्ति पृ॒णन्तं॑ अ॒न्यं अर॑णं चिदिच्छेत् ॥ ४ ॥

न सः सखा यः न ददाति सख्ये सचाभुवे सचमानाय पित्वः
अप अस्मात् प्र इयात् न तत् ओकः अस्ति पृणन्तं अन्यं अरणं चित् इच्चेत् ॥ ४ ॥

आपल्याकडे नेहमी येणार्‍या आणि आपल्या जवळ नेहमी असणार्‍या मित्रालाहि जो मनुष्य योग्य प्रसंगी भोजनास बोलावीत नाही तो त्या मित्राचा मित्रच नव्हे; अशा निकृष्ट वृत्तीच्या मनुष्यापासून दूर राहावे; त्याचे जे घर ते गृहस्थ धर्म आचरणाचे घरच नव्हे असे समजून मित्रवर्गाला जो भोजनास बोलवीत असेल आणि क्षुधिताला अन्न देऊन संतुष्ट करीत असेल असा दुसरा कोणी तिर्‍हाईत देखील मित्र करावा ४.


पृ॒णी॒यादिन् नाध॑मानाय॒ तव्या॒न् द्राघी॑यांसं॒ अनु॑ पश्येत॒ पन्था॑म् ।
ओ हि वर्त॑न्ते॒ रथ्ये॑व च॒क्रान्यम्-अ॑न्यं॒ उप॑ तिष्ठन्त॒ रायः॑ ॥ ५ ॥

पृणीयात् इत् नाधमानाय तव्यान् द्राघीयांसं अनु पश्येत पन्थां
ओ इति हि वर्तन्ते रथ्याइव चक्रा अन्यम्-अन्यं उप तिष्ठन्त रायः ॥ ५ ॥

संपत्तिमान्‌ मनुष्याने हे करावे की मित्र आणि जे कोणी क्षुधार्त याचक असतील, त्यांचा अन्नदानाने संतोष करावा; कारण मार्ग दूरचा परंतु हितकर असेल तर त्याचा मार्गाकडे दृष्टि द्यावी. रथाची चाके रथ पुढे जात असतां क्षणभर येथे, तर दुसर्‍या क्षणी दुसर्‍याच ठिकाणी याप्रमाणे फिरत जातात, त्याप्रमाणे संपत्ति ही देखील आज ह्याच्यापाशी, तर उद्या दुसर्‍याचपाशी, अशा रीतीने फिरत राहते ५.


मोघं॒ अन्नं॑ विन्दते॒ अप्र॑चेताः स॒त्यं ब्र॑वीमि व॒ध इत् स तस्य॑ ।
नार्य॒मणं॒ पुष्य॑ति॒ नो सखा॑यं॒ केव॑लाघो भवति केवला॒दी ॥ ६ ॥

मोघं अन्नं विन्दते अप्र-चेताः सत्यं ब्रवीमि वधः इत् सः तस्य
न अर्यमणं पुष्यति नो इति सखायं केवल-अघः भवति केवल-आदी ॥ ६ ॥

(ह्याप्रमाणे जो वागत नाही) त्या मूर्खाने अन्न मिळविण्याचे श्रम व्यर्थ घेतले. मी खरोखर असेच म्हणतो की अशा मूर्खाने मिळविलेले अन्न हे अन्नच नव्हे तर तो त्याचा प्रत्यक्ष मृत्यूच आहे. कारण याचक रूपाने येणार्‍या अर्यमादिकांना जो अन्नसमर्पण करून प्रसन्न करीत नाही आणि मित्रांनाहि संतुष्ट करीत नाही, जो ते अन्न एकटाच (बकाबक) खात बसतो तो स्वत: एकटाच महापातकी ठरेल ६.


कृ॒षन्न् इत् फाल॒ आशि॑तं कृणोति॒ यन्न् अध्वा॑नं॒ अप॑ वृङ्क्ते च॒रित्रैः॑ ।
वद॑न् ब्र॒ह्माव॑दतो॒ वनी॑यान् पृ॒णन्न् आ॒पिरपृ॑णन्तं अ॒भि ष्या॑त् ॥ ७ ॥

कृषन् इत् फालः आशितं कृणोति यन् अध्वानं अप वृङ्क्ते चरित्रैः
वदन् ब्रह्मा अवदतः वनीयान् पृणन् आपिः अपृणन्तं अभि स्यात् ॥ ७ ॥

नांगरण्याचे श्रम घेण्यानेच नांगराचा फाळ हा आपणास तृप्तिदायक धान्यादिक पदार्थ देतो. त्याचप्रमाणे परोपकारी मनुष्य आपल्या परिश्रमाने, -आपल्या सत्कृत्यांनी-इतरांना मार्ग आंखून देतो. विद्वान्‌ परंतु कांही न बोलणार्‍या मुखस्तंभापेक्षां आपल्या विद्येचा उपयोग शिकवून करून देणाराच श्रेष्ठ होय. तो दानधर्म न करणार्‍या कंजूषांचा हटकून पराभव करील ७.


एक॑पा॒द्‌भूयो॑ द्वि॒पदो॒ वि च॑क्रमे द्वि॒पात् त्रि॒पादं॑ अ॒भ्येति प॒श्चात् ।
चतु॑ष्पादेति द्वि॒पदां॑ अभिस्व॒रे स॒म्पश्य॑न् प॒ङ्क्तीरु॑प॒तिष्ठ॑मानः ॥ ८ ॥

एक-पात् भूयः द्वि-पदः वि चक्रमे द्वि-पात् त्रि-पादं अभि एति पश्चात्
चतुः-पात् एति द्वि-पदां अभि-स्वरे सम्-पश्यन् पङ्क्तीः उप-तिष्ठमानः ॥ ८ ॥

ज्याला एकच पाय आहे तो (उभा राहूं न शकणारा बालक) उद्यां दोन पायांनी चालणारांना गांठील, आणि दोन पायांनी चालणारा हा तीन पायांनी (म्हणजे सत्कृत्य काठीचा आधार घेऊन) जाणारांच्या स्थितीला पोहोंचेल. त्याचप्रमाणे चतुष्पाद देखील द्विपाद मनुष्यांचा शब्द ऐकून आणि आपआपले समुदाय पाहून उठून मनुष्यांचे अनुकरण करून चालतात ८.


स॒मौ चि॒द्धस्तौ॒ न स॒मं वि॑विष्टः सम्मा॒तरा॑ चि॒न् न स॒मं दु॑हाते ।
य॒मयो॑श्चि॒न् न स॒मा वी॒र्याणि ज्ञा॒ती चि॒त् सन्तौ॒ न स॒मं पृ॑णीतः ॥ ९ ॥

समौ चित् हस्तौ न समं विविष्टः सम्-मातरा चित् न समं दुहातेइति
यमयोः चित् न समा वीर्याणि जाती इति चित् सन्तौ न समं पृणीतः ॥ ९ ॥

(हा असा व्यवहारच आहे की) आपले दोन्ही हात सारखे खरे; पण ते सारखेच काम करूं शकत नाहीत. माता जरी दोन असल्या, तरी दोघीना पान्हा सारखा असत नाही. एकाच आईला झालेली जुळी भावंडे, पण त्यांची सुद्धां कर्तबगारी एकसारखी नसते. त्याचप्रमाणे एकाच चांगल्या कुलांत जरी अनेकांचा जन्म झाला, तरी ते सर्व सारख्याच अंत:करणाचे नसतात ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११८ (राक्षोघ्न अग्निसूक्त)

ऋषी - उरूक्षय आमहीयव : देवता - राक्षोघ्न अग्नि : छंद - गायत्री


अग्ने॒ हंसि॒ न्य१त्रिणं॒ दीद्य॒न् मर्त्ये॒ष्व् आ ।
स्वे क्षये॑ शुचिव्रत ॥ १॥

अग्ने हंसि नि अत्रिणं दीद्यत् मर्त्येषु आ
स्वे क्षये शुचि-व्रत ॥ १ ॥

अग्निदेवा, आम्हा मानवांमध्ये आमच्या यज्ञगृहांत प्रज्वलित हो‍ऊन मनुष्यभक्षक राक्षसाला ठार मारून टाकतोस. याप्रमाणे हे पवित्र बिरुदे वागविणार्‍या देवा, तुझ्या स्वत:च्या गृहांतहि तुझा हाच क्रम आहे १.


उत् ति॑ष्ठसि॒ स्वाहुतो घृ॒तानि॒ प्रति॑ मोदसे ।
यत् त्वा॒ स्रुचः॑ स॒मस्थि॑रन् ॥ २ ॥

उत् तिष्ठसि सु-आहुतः घृतानि प्रति मोदसे
यत् त्वा स्रुचः सम्-अस्थिरन् ॥ २ ॥

उत्तम रीतीने तुला घृताहुति पोहोंचली म्हणजे एकदम उठून उभा राहतोस; कारण घृताने तुजला अत्यानंद होतो आणि स्त्रुचा तुझ्या सेवेत तत्पर असतात २.


स आहु॑तो॒ वि रो॑चतेऽ॒ग्निरी॒ळेन्यो॑ गि॒रा ।
स्रु॒चा प्रती॑कं अज्यते ॥ ३ ॥

सः आहुतः वि रोचते अग्निः ईळेन्यः गिरा
स्रुचा प्रतीकं अज्यते ॥ ३ ॥

याप्रमाणे अग्नि हा आहुतींनी उत्तम प्रकारे संतुष्ट झाला म्हणजे तो परमस्तुत्य देव देदिप्यमान दिसतो आणि त्या वेळी त्याच्या ज्वालारूप शरीराला स्तुतिकलाप आणि घृतपूर्ण स्रुचा ह्या उद्वर्तन करितात ३.


घृ॒तेना॒ग्निः सं अ॑ज्यते॒ मधु॑प्रतीक॒ आहु॑तः ।
रोच॑मानो वि॒भाव॑सुः ॥ ४ ॥

घृतेन अग्निः सं अज्यते मधु-प्रतीकः आहुतः
रोचमानः विभावसुः ॥ ४ ॥

घृताने आणि आहुतीने संतुष्ट झालेल्या अग्नीला भक्तजन उद्वर्तन करितात, तेव्हां त्याची कान्ति माधुर्याने उल्लसित असते आणि तो प्रकाशनिधि अधिकच उज्ज्वल दिसतो ४.


जर॑माणः॒ सं इ॑ध्यसे दे॒वेभ्यो॑ हव्यवाहन ।
तं त्वा॑ हवन्त॒ मर्त्याः॑ ॥ ५ ॥

जरमाणः सं इध्यसे देवेभ्यः हव्य-वाहन
तं त्वा हवन्त मर्त्याः ॥ ५ ॥

हविर्वाहका अग्निदेवा, तुझी स्तुति (भक्तांकडून) झाली म्हणजे दिव्यजनासाठी तू प्रदीप्त होतोस आणि त्याच वेळी मर्त्य भक्तजन तुजला हविर्भाग अर्पण करितात ५.


तं म॑र्ता॒ अम॑र्त्यं घृ॒तेना॒ग्निं स॑पर्यत ।
अदा॑भ्यं गृ॒हप॑तिम् ॥ ६ ॥

तं मर्ताः अमर्त्यं घृतेन अग्निं सपर्यत
अदाभ्यं गृह-पतिम् ॥ ६ ॥

मर्त्य मानवांनो, मृत्य्रहित जो अग्नि, त्याचे घृताहुतींनी अर्चन कराल. ज्याला कोणी फसवूं शकत नाही आणि जो यज्ञमंदिराचा स्वामी आहे, त्याची सेवा करा ६.


अदा॑भ्येन शो॒चिषाग्ने॒ रक्ष॒स्त्वं द॑ह ।
गो॒पा ऋ॒तस्य॑ दीदिहि ॥ ७ ॥

अदाभ्येन शोचिषा अग्ने रक्षः त्वं दह
गोपाः ऋतस्य दीदिहि ॥ ७ ॥

अगदी अप्रतिकार्य अशा तुझ्या ज्वालांनी हे अग्ने, राक्षसांना जाळून खाक कर; आणि सनातन धर्माचा रक्षक म्हणून आपल्या तेजाने प्रकाशित हो ७.


स त्वं अ॑ग्ने॒ प्रती॑केन॒ प्रत्यो॑ष यातुधा॒न्यः ।
उ॒रु॒क्षये॑षु॒ दीद्य॑त् ॥ ८ ॥

सः त्वं अग्ने प्रतीकेन प्रति ओष यातु-धान्यः
उरु-क्षयेषु दीद्यत् ॥ ८ ॥

तर असा तूं ह्या विस्तीर्ण यज्ञमंदिरांत देदीप्यमान हो‍ऊन, हे अग्ने, आपल्या ज्वालांच्या लोलाने दुष्ट जादूगारांची राखरांगोळी कर ८.


तं त्वा॑ गी॒र्भिरु॑रु॒क्षया॑ हव्य॒वाहं॒ सं ई॑धिरे ।
यजि॑ष्ठं॒ मानु॑षे॒ जने॑ ॥ ९ ॥

तं त्वा गीः-भिः उरु-क्षयाः हव्य-वाहं सं ईधिरे
यजिष्ठं मानुषे जने ॥ ९ ॥

तूं जो हविर्वाहक अग्नि, त्या तुला ह्या विस्तृत यज्ञभूमिचे जे स्वामी त्यांनी स्तवनकलापांनी प्रज्वलित केले आहे; कारण ह्या मानवी जगांत अत्यंत पूज्य असा तूंच आहेस ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ११९ (इंद्रसोमपानाचे पालुपदसूक्त)

ऋषी - लब ऐंद्र : देवता : अत्मस्तुती : छंद - गायत्री


वा इति॑ मे॒ मनो॒ गां अश्वं॑ सनुयां॒ इति॑ ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ १॥

इति वै इति मे मनः गां अश्वं सनुयां इति
कुवित् सोमस्य अपां इति ॥ १ ॥

होय; असेंच, माझे मन अगदी असेच सांगते की प्रकाश धेनू आणि बुद्धिरूप अश्व हे मी भक्तांना जिंकून द्यावे कारण त्यांनी मला अर्पण केलेला सोमरस मी प्राशन केला नाही काय ? १.


प्र वाता॑ इव॒ दोध॑त॒ उन् मा॑ पी॒ता अ॑यंसत ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ २ ॥

प्र वाताः-इव दोधतः उत् मा पीताः अयंसत
कुवित् सोमस्य अपां इति ॥ २ ॥

वायु जसा वृक्ष गदगदां हलवितो त्याप्रमाणे जे सोमरस मी प्राशन केले त्यांनी मला हलवून उद्युक्त केले आणि त्यासाठीच मी भक्तांचा सोमरस प्राशन केला नाही कय ? २.


उन् मा॑ पी॒ता अ॑यंसत॒ रथं॒ अश्वा॑ इवा॒शवः॑ ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ३ ॥

उत् मा पीताः अयंसत रथं अश्वाः-इव आशवः
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ३ ॥

मी प्राशन केलेले सोमरस, झपाट्याने धांवणारे अश्व ज्याप्रमाणे रथाला जागेवरून पुढे नेतात, त्याप्रमाणे मला भक्तकार्याकडे नेत आहेत. (ठीक आहे.) त्याकरतांच तर मी सोमरस प्राशन केला आहे ना ? ३.


उप॑ मा म॒तिर॑स्थित वा॒श्रा पु॒त्रं इ॑व प्रि॒यम् ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ४ ॥

उप मा मतिः अस्थित वाश्रा पुत्रम्-इव प्रियं
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ४ ॥

माझी वात्सल्यबुद्धि सुद्धां, पान्हावलेली धेनू जशी हंबरत आपल्या लाडक्या वासराला जाऊन बिलगते, त्याप्रमाणे भक्ताकडे धांवून गेली; कारण त्यांचा सोमरस मी प्राशन केला नाही काय ? ४.


अ॒हं तष्टे॑व व॒न्धुरं॒ पर्य॑चामि हृ॒दा म॒तिम् ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ५ ॥

अहं तष्टाइव वन्धुरं परि अचामि हृदा मतिं
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ५ ॥

सुतार जसा रथ उत्कृष्ट बनवून सजवितो त्याप्रमाणे भक्ताने मननपूर्वक अर्पिलेली स्तुति मी आपल्या अंत:करणानेच सर्व प्रकारे सजवून घेतो; कारण हेच की मी त्यांचा सोमरस प्राशन केलेला नसतो काय ? ५.


न॒हि मे॑ अक्षि॒पच् च॒नाच्छा॑न्त्सुः॒ पञ्च॑ कृ॒ष्टयः॑ ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ६ ॥

नहि मे अक्षिपत् चन अच्चान्त्सुः पच कृष्टयः
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ६ ॥

लोकांचे पांचहि समाज हे माझ्या डोळ्यांवर बसलेल्या बारीक कणाची सुद्धा बरोबरी करणार नाहीत. तथापि त्याचे रक्षण केले पाहिजेच; कारण त्यांचा सोमरस मी प्राशन केला नाही काय ? ६.


न॒हि मे॒ रोद॑सी उ॒भे अ॒न्यं प॒क्षं च॒न प्रति॑ ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ७ ॥

नहि मे रोदसी इति उभे इति अन्यं पक्षं चन प्रति
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ७ ॥

आकाश आणि पृथिवी हे होन्ही लोक देखील माझ्या नखाची सुद्धां सर पावणार नाहित पण त्यांना सांभाळून घेतले पाहिजे; कारण भक्तांचा सोमरस मी प्राशन केला नाही काय ? ७.


अ॒भि द्यां म॑हि॒ना भु॑वं अ॒भीख्प् मां पृ॑थि॒वीं म॒हीम् ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ८ ॥

अभि द्यां महिना भुवं अभि इमां पृथिवीं महीं
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ८ ॥

मी आपल्या प्रभावाने नक्षत्रलोक आणि ही विस्तीर्ण पृथिवी ह्या दोहोंनाहि व्यापून उरलोंच; कारण भक्तांचा सोमरस मी प्राशन केला नाही काय ? ८.


हन्ता॒हं पृ॑थि॒वीं इ॒मां नि द॑धानी॒ह वे॒ह वा॑ ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ९ ॥

हन्त अहं पृथिवीं इमां नि दधानि इह वा इह वा
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ९ ॥

इतकेंच काय, पण ह्या वेळी मला असे वाटते की ह्या पृथ्वीला येथे ठेऊं, किंवा तिकडे लांब ठेऊन देऊं ? कारण मी भक्तांचा सोमरस प्राशन केला नाही काय ? ९.


ओ॒षं इत् पृ॑थि॒वीं अ॒हं ज॒ङ्घना॑नी॒ह वे॒ह वा॑ ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ १० ॥

ओषं इत् पृथिवीं अहं जङ्घनानि इह वा इह वा
कुवित् सोमस्य अपां इति ॥ १० ॥

अरे, ही पृथ्वी म्हणजे कोणत्या झाडाचा पाला ? तिला इकडे फेंकून दे‍ईन किंवा तिकडे भिरकावून दे‍ईन; कारण मी भक्तांचा सोमरस प्राशन केला नाही काय ? १०.


दि॒वि मे॑ अ॒न्यः प॒क्षोऽ॒धो अ॒न्यं अ॑चीकृषम् ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ ११॥

दिवि मे अन्यः पक्षः अधः अन्यं अचीकृषं
कुवित् सोमस्य अपां इति ॥ ११ ॥

मी आपला एक पंख वर आकाशांत उभारला आहे आणि दुसरा पंख हा असा खाली खेंचून घेतला आहे; कारण मी भक्तांचा सोमरस प्राशन केला नाही काय ? ११.


अ॒हं अ॑स्मि महाम॒होऽभिन॒भ्यं उदी॑षितः ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ १२ ॥

अहं अस्मि महामहः / अभि-नभ्यं उत्-आषितः
कुवित् सोमस्य अपां इति ॥ १२ ॥

तेजस्वी वस्तूमध्ये अत्यंत तेजस्वी जो सूर्य तोच मी, आकाशाच्या मध्यभागी उंच जाऊन तळपत राहिलो आहे. कारण भक्तांचा सोमरस मी प्राशन केला नाही काय ? १२.


गृ॒हो या॒म्यरं॑कृतो दे॒वेभ्यो॑ हव्य॒वाह॑नः ।
कु॒वित् सोम॒स्यापां॒ इति॑ ॥ १३ ॥

गृहः यामि अरम्-कृतः देवेभ्यः हव्य-वाहनः
कुवित् सोमस्य अपां इति ॥ १३ ॥

हवीचा स्वीकार करणारा आणि हविर्भाग देवांकडे पोहोंचविणारा जो अग्नि तोच मी संतोषभूषित हो‍ऊन भक्तांकडेच निघालो आहे; कारण त्यांचा सोमरस मी प्राशन केला नाही काय ? १३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२० (इंद्रसूक्त)

ऋषी - बृहद्दिव आथर्वण : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


तदिदा॑स॒ भुव॑नेषु॒ ज्येष्ठं॒ यतो॑ ज॒ज्ञ उ॒ग्रस्त्वे॒षनृ॑म्णः ।
स॒द्यो ज॑ज्ञा॒नो नि रि॑णाति॒ शत्रू॒न् अनु॒ यं विश्वे॒ मद॒न्त्यूमाः॑ ॥ १॥

तत् इत् आस भुवनेषु ज्येष्ठं यतः जजे उग्रः त्वेष-नृम्णः
सद्यः जजानः नि रिणाति शत्रून् अनु यं विश्वे मदन्ति ऊमाः ॥ १ ॥

सर्व विश्वामध्ये तीच वस्तु वरिष्ठ ठरली की जिच्यापासून (शत्रु-) भयंकर आणि प्रखर पराक्रमी असा देव जो इंद्र तो प्रकट झाला. प्रकट होतांच त्याने शत्रूंचे निर्दालन केले. तेव्हां त्याच्यापासून सहाय मिळविणारे त्याचे सर्व भक्तजन त्या आनंदांत अंशभागी झाले १.


वा॒वृ॒धा॒नः शव॑सा॒ भूर्यो॑जाः॒ शत्रु॑र्दा॒साय॑ भि॒यसं॑ दधाति ।
अव्य॑नच् च व्य॒नच् च॒ सस्नि॒ सं ते॑ नवन्त॒ प्रभृ॑ता॒ मदे॑षु ॥ २ ॥

ववृधानः शवसा भूरि-ओजाः शत्रुः दासाय भियसं दधाति
अवि-अनत् च वि-अनत् च सस्नि सं ते नवन्त प्र-भृता मदेषु ॥ २ ॥

तो अतुलतेजस्क देव आपल्या उत्कट बलाने वृद्धिंगत होतांच ज्यांना ठार मारणार होता, (ज्यांचा तो शत्रु होता) त्या अधार्मिक "दासांच्या" अंत:करणात भीति उत्पन्न झाली. पण श्वासोच्छवास न करणारे, श्वासोच्छवास करणारे आणि मधल्या स्थितीतले अर्धवट असे सर्व स्थावर जंगम पदार्थ जे तुझ्या स्वाधीन आहेत, ते हे देवा, आनंदाने तल्लीन हो‍ऊन तुझे पोवाडे गात असतात २.


त्वे क्रतुं॒ अपि॑ वृञ्जन्ति॒ विश्वे॒ द्विर्यदे॒ते त्रिर्भव॒न्त्यूमाः॑ ।
स्वा॒दोः स्वादी॑यः स्वा॒दुना॑ सृजा॒ सं अ॒दः सु मधु॒ मधु॑ना॒भि यो॑धीः ॥ ३ ॥

त्वे इति क्रतुं अपि वृजन्ति विश्वे द्विः यत् एते त्रिः भवन्ति ऊमाः
स्वादोः स्वादीयः स्वादुना सृज सं अदः सु मधु मधुना अभि योधीः ॥ ३ ॥

तुझे जे भक्त आहेत, ते जोडीजोडीने तुझी उपासना करोत, किंवा तिघे मिळून करोत; सर्वच सहाकांक्षी भक्तजन असतात ते आपले कर्म तुलाच अर्पण करितात; तर त्यांच्या कर्माचे जे गोड फल-त्यांच्यांतहि जे अधिक गोड असेल त्याला जास्त माधुर्य आण, आणि आपल्या (कृपेच्या) मधुरतेने (युद्धांतील) विजयाची जी खरी गोडी तीहि जिंकून आण ३.


इति॑ चि॒द्धि त्वा॒ धना॒ जय॑न्तं॒ मदे॑-मदे अनु॒मद॑न्ति॒ विप्राः॑ ।
ओजी॑यो धृष्णो स्थि॒रं आ त॑नुष्व॒ मा त्वा॑ दभन् यातु॒धाना॑ दु॒रेवाः॑ ॥ ४ ॥

इति चित् हि त्वा धना जयन्तं मदे--मदे अनु-मदन्ति विप्राः
ओजीयः धृष्णो इति स्थिरं आ तनुष्व मा त्वा दभन् यातु-धानाः दुः-एवाः ॥ ४ ॥

ह्याप्रमाणे भक्तांनी अनेक यशोधने तुझ्या कृपेनेच जिंकली; आणि त्या प्रत्येक हर्षप्रसंगी तुझे स्तोत्रकर्ते आनंदांत मग्न झाले. हे शत्रुधर्षका, तुझा ओजस्वी पराक्रम पक्का स्थिर कर; अशाकरतां की अट्टल कपटी आणि दुष्टबुद्धीचे जे अधार्मिक जादूगार ते तुला केव्हांहि फसवूं शकणार नाहीत ४.


त्वया॑ व॒यं शा॑शद्महे॒ रणे॑षु प्र॒पश्य॑न्तो यु॒धेन्या॑नि॒ भूरि॑ ।
चो॒दया॑मि त॒ आयु॑धा॒ वचो॑भिः॒ सं ते॑ शिशामि॒ ब्रह्म॑णा॒ वयां॑सि ॥ ५ ॥

त्वया वयं शाशद्महे रणेषु प्र-पश्यन्तः युधेन्यानि भूरि
चोदयामि ते आयुधा वचः-भिः सं ते शिशामि ब्रह्मणा वयांसि ॥ ५ ॥

आमच्यासमोर फार मोठे शत्रुसैन्य उभे आहे असे उघड दिसत असले तरीहि रणांगणामध्ये आम्ही तुझ्या कृपेने त्या शत्रुसैन्याचा पार धुव्वा उडवून देऊ. तुझी स्तुति केल्याने प्राप्त झालेली तुझी आयुधे मी शत्रूवर चालवीन, आणि तुझ्या प्रार्थनेच्या योगाने आमच्या जोमदार सैन्याला उत्तेजन दे‍ईन ५.


स्तु॒षेय्यं॑ पुरु॒वर्प॑सं॒ ऋभ्वं॑ इ॒नत॑मं आ॒प्त्यं आ॒प्त्याना॑म् ।
आ द॑र्षते॒ शव॑सा स॒प्त दानू॒न् प्र सा॑क्षते प्रति॒माना॑नि॒ भूरि॑ ॥ ६ ॥

स्तुषेय्यं पुरु-वर्पसं ऋभ्वं इन-तमं आप्त्यं आप्त्यानां
आ दर्षते शवसा सप्त दानून् प्र साक्षते प्रति-मानानि भूरि ॥ ६ ॥

तूं स्तुत्यच आहेस; कारण असे पहा, की तूं अनेक रूपे धारण करतोस; तूं अतिशय उदात्त, अधिपतींचा अधिपति (देवांचाहि देव) आणि आप्तांचाहि आप्त आहेस. तूं आपल्या उत्कट बलाने सातहि दानवांचा नाश करतोस; आणि त्यांच्याच तोडीचे दुसरे शत्रु जरी असंख्य असले तरी त्यांचाहि तूं उच्छेद करतोस ६.


नि तद्द॑धि॒षेऽ॑वरं॒ परं॑ च॒ यस्मि॒न्न् आवि॒थाव॑सा दुरो॒णे ।
आ मा॒तरा॑ स्थापयसे जिग॒त्नू अत॑ इनोषि॒ कर्व॑रा पु॒रूणि॑ ॥ ७ ॥

नि तत् दधिषे अवरं परं च यस्मिन् आविथ अवसा दुरोणे
आ मातरा स्थापयसे जिगत्नू इति अतः इनोषि कर्वरा पुरूणि ॥ ७ ॥

ज्याच्यावर तूं प्रसन्न होतोस त्याच्या गृहामध्ये तूं खालचे (ऐहिक) आणि वरचे (स्वर्गीय) असे ऐश्वर्य (वरदान म्हणून) ठेवतोस; आणि संचार करणारी जी धरित्री माता आणि आकाशांतील गोल ह्यांचे नियमन तूंच करतोस, आणि लौकिक किंवा धार्मिक अशा सर्व प्रकारच्या कर्मांची परिपूर्तताहि करतोस ७.


इ॒मा ब्रह्म॑ बृ॒हद्दि॑वो विव॒क्तीन्द्रा॑य शू॒षं अ॑ग्रि॒यः स्व॒र्षाः ।
म॒हो गो॒त्रस्य॑ क्षयति स्व॒राजो॒ दुर॑श्च॒ विश्वा॑ अवृणो॒दप॒ स्वाः ॥ ८ ॥

इमा ब्रह्म बृहत्-दिवः विवक्ति इन्द्राय शूषं अग्रियः स्वः-साः
महः गोत्रस्य क्षयति स्व-राजः दुरः च विश्वाः अवृणोत् अप स्वाः ॥ ८ ॥

अशा पद्धतीची आवेश उत्पन्न करणारा स्तोत्रे "बृहत्‌दिवा" - हा दिव्य प्रकाशप्राप्तीसाठी झटणारा भक्त इंद्राप्रीत्यर्थ सर्वांच्या अगोदर वारंवार म्हणत असतो. स्वर्गीय प्रकाशाने देदीप्यमान अशा धेनूंच्या समूहाचा इंद्र हाच राजा आहे; आणि त्यानेच त्या समूहाची बंद केलेली सर्व द्वारे मोकळे केली ८.


ए॒वा म॒हान् बृ॒हद्दि॑वो॒ अथ॒र्वावो॑च॒त् स्वां त॒न्व१ं इन्द्रं॑ ए॒व ।
स्वसा॑रो मात॒रिभ्व॑रीररि॒प्रा हि॒न्वन्ति॑ च॒ शव॑सा व॒र्धय॑न्ति च ॥ ९ ॥

एव महान् बृहत्-दिवः अथर्वा अवोचत् स्वां तन्वं इन्द्रं एव
स्वसारः मातरिभ्वरीः अरिप्राः हिन्वन्ति च शवसा वर्धयन्ति च ॥ ९ ॥

याप्रमाणे अथर्वकुलांतील थोर जो "बृहद्दिवा" तो इंद्राला उद्देशून पण आपल्या स्वत:च्या मनाशीच जे कांही बोलला तीच ही कवने. कारण मातेप्रमाणे श्रेष्ठ आणि बहिणीप्रमाणे निर्मळ अशा ज्या मनोवृत्ति त्याच त्याला स्फूर्ति देतात, आणि उत्कट आवेशाने वृद्धिंगत करितात ९.


ॐ तत् सत्


GO TOP