PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ९१ ते १००

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९१ (अग्निसूक्त)

ऋषी - अरुण वैतहव्य : देवता - अग्नि : छंद - १५ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - जगती


सं जा॑गृ॒वद्‌भि॒र्जर॑माण इध्यते॒ दमे॒ दमू॑ना इ॒षय॑न्न् इ॒ळस्प॒दे ।
विश्व॑स्य॒ होता॑ ह॒विषो॒ वरे॑ण्यो वि॒भुर्वि॒भावा॑ सु॒षखा॑ सखीय॒ते ॥ १॥

सं जागृवत्-भिः जरमाणः इद्यते दमे दमूनाः इषयन् इळः पदे
विश्वस्य होता हविषः वरेण्यः वि-भुः विभावा सु-सखा सखि-यते ॥ १ ॥

(प्रभतकाळीं) जागृत होणार्‍या स्तोतृजनांकडून ज्याचे स्तवन चालते असा यज्ञगृहाचा प्रभू अग्नि, हा यज्ञगृही (भक्तांना) प्रोत्साहन देऊन वेदीवर प्रदीप्त होतो. तोच सर्व आहुतींचे हवन करणारा आहे. तो सर्वव्यापक आणि उज्ज्वल प्रभू अग्नि त्याच्याशी जो मित्रत्व जोडतो त्याचा उत्कृष्ट सखा होतो १.


स द॑र्शत॒श्रीरति॑थिर्गृ॒हे-गृ॑हे॒ वने॑-वने शिश्रिये तक्व॒वीरि॑व ।
जनं॑-जनं॒ जन्यो॒ नाति॑ मन्यते॒ विश॒ आ क्षे॑ति वि॒श्योख्प् विशं॑-विशम् ॥ २ ॥

सः दर्शत-श्रीः अतिथिः गृहे--गृहे वने--वने शिश्रिये तक्ववीः-इव
जनम्-जनं जन्यः न अति मन्यते विशः आ क्षेति विश्यः विशम्-विशम् ॥ २ ॥

तो असा आहे की त्याचे ऐश्वर्य पाहातच रहावे. प्रत्येक भक्ताच्या घरी तो अतिथि म्हणून जातो. आणि मृगया करणारा शिकारी जसा रानारानांतून हिण्डतो, तोहि प्रत्येक वनावनामध्ये (दावाग्नि रूपाने) भरून राहातो. तो जनहितकारी (अग्नि) जनांमध्ये कोणाकडेहि दुर्लक्ष करीत नाही आणि लोकहितकारी असा तो प्रत्येक समाजांतील लोकांत वास करून राहातो २.


सु॒दक्षो॒ दक्षैः॒ क्रतु॑नासि सु॒क्रतु॒रग्ने॑ क॒विः काव्ये॑नासि विश्व॒वित् ।
वसु॒र्वसू॑नां क्षयसि॒ त्वं एक॒ इद्द्यावा॑ च॒ यानि॑ पृथि॒वी च॒ पुष्य॑तः ॥ ३ ॥

सु-दक्षः दक्षः क्रतुना असि सु-क्रतुः अग्ने कविः काव्येन असि विश्व-वित्
वसुः वसूनां क्षयसि त्वं एकः इत् द्यावा च यानि पृथिवी इति च पुष्यतः ॥ ३ ॥

तूं आपल्या चातुर्यबलांनी कुशलोत्तम आणि कर्तूत्वशक्तीने उत्कृष्ट कर्तृत्वान ठरला आहेस. हे अग्नि तूं प्रतिभाशालित्वाने कवि आणि ज्ञानाने सर्वज्ञ आहेस. तूं दिव्यनिधि (आहेस); आणि ज्यांचा परिपोष द्यावापृथिवी करितात अशा उत्कृष्ट वस्तूंचा तूंच एकटा निधि आहेस ३.


प्र॒जा॒नन्न् अ॑ग्ने॒ तव॒ योनिं॑ ऋ॒त्वियं॒ इळा॑यास्प॒दे घृ॒तव॑न्तं॒ आस॑दः ।
आ ते॑ चिकित्र उ॒षसां॑ इ॒वेत॑योऽरे॒पसः॒ सूर्य॑स्येव र॒श्मयः॑ ॥ ४ ॥

प्र-जानन् अग्ने तव योनिं ऋत्वियं इळायाः पदे घृत-वन्तं आ असदः
आ ते चिकित्रे उषसाम्-इव एतयः अरेपसः सूर्यस्य-इव रश्मयः ॥ ४ ॥

हे अग्ने, असा ज्ञानीं तूं हें सर्व समजून त्या त्या कालाला योग्य आणि घृताप्रमाणे तुकतुकीत अशा आपल्या आसनावर इळेच्या स्थानी आरूढ झालास; ही तुझी स्वरूपे प्रभात कालच्या कांतीप्रमाणे, किंवा सूर्याच्या किरणांप्रमाणे निष्कलंक अशी स्पष्टपणे दिसतात ४.


तव॒ श्रियो॑ व॒र्ष्यस्येव वि॒द्युत॑श्चि॒त्राश्चि॑कित्र उ॒षसां॒ न के॒तवः॑ ।
यदोष॑धीर॒भिसृ॑ष्टो॒ वना॑नि च॒ परि॑ स्व॒यं चि॑नु॒षे अन्नं॑ आ॒स्ये ॥ ५ ॥

तव श्रियः वर्ष्यस्य-इव वि-द्युतः चित्राः चिकित्रे उषसां न केतवः
यत् ओषधीः अभि-सृष्टः वनानि च परि स्वयं चिनुषे अन्नं आस्ये ॥ ५ ॥

तुझ्या शोभायमान दीप्ति अशा दिसतात कीं पर्जन्याच्या मुसळधारेंत चमकणार्‍या अद्‍भुत विजाच, किंवा उष:कालचे किरणध्वजच. आणि तूं मोकळा सुटतोस, तेव्हां औषधि काय, अरण्ये काय, जें सांपडेल ते काष्ठरूप अन्न तूं आपल्या मुखांत टाकतोस ५.


तं ओष॑धीर्दधिरे॒ गर्भं॑ ऋ॒त्वियं॒ तं आपो॑ अ॒ग्निं ज॑नयन्त मा॒तरः॑ ।
तं इत् स॑मा॒नं व॒निन॑श्च वी॒रुधो॑ऽ॒न्तर्व॑तीश्च॒ सुव॑ते च वि॒श्वहा॑ ॥ ६ ॥

तं ओषधीः दधिरे गर्भं ऋत्वियं तं आपः अग्निं जनयन्त मातरः
तं इत् समानं वनिनः च वीरुधः अन्तः-वतीः च सुवते च विश्वहा ॥ ६ ॥

योग्य काळी प्रकट होणार्‍या अग्नीला औषधीनी बीजरूपाने आपल्या ठिकाणी धारण केले. आपोदेवींनीहि त्याची जननी हो‍ऊन त्याला दृग्गोचर केले. जो सर्व ठिकाणी एकसारखाच राहतो त्या अग्नीला वनांतील लता गर्भरूपाने धारण करितात आणि (घर्षण केले असतां) सर्व काळ त्याला प्रसवतात ६.


वातो॑पधूत इषि॒तो वशा॒ँ अनु॑ तृ॒षु यदन्ना॒ वेवि॑षद्वि॒तिष्ठ॑से ।
आ ते॑ यतन्ते र॒थ्योख्प् यथा॒ पृथ॒क् छर्धां॑स्यग्ने अ॒जरा॑णि॒ धक्ष॑तः ॥ ७ ॥

वात-उपधूतः इषितः वशान् अनु तृषु यत् अन्ना वेविषत् व्-तिष्ठसे
आ ते यतन्ते रथ्याः यथा पृथक् शर्धांसि अग्ने अजराणि धक्षतः ॥ ७ ॥

वायूने हलवून सोडलेला आणि इच्छित वस्तूच्या मागोमाग धांवून चाललेला असा तूं, यच्चयावत्‌ खाद्यपदार्थांना चटकन आपल्यामध्ये समाविष्ट करून पाहिजे तिकडे संचार करतोस. तेव्हां हे अग्निदेवा, धगधगीत आणि क्षीण न होणारे तुझ्या ज्वालेचे लोळ, रथांत आरुढ झालेल्या वीरा प्रमाणे निरनिराळ्या दिशांना धांवत असतात ७.


मे॒धा॒का॒रं वि॒दथ॑स्य प्र॒साध॑नं अ॒ग्निं होता॑रं परि॒भूत॑मं म॒तिम् ।
तं इदर्भे॑ ह॒विष्या स॑मा॒नं इत् तं इन् म॒हे वृ॑णते॒ नान्यं त्वत् ॥ ८ ॥

मेधाकारं विदथस्य प्र-साधनं अग्निं होतारं परि-भूतमं मतिं
तं इत् अर्भे हविषि आ समानं इत् तं इत् महे वृणते न अन्यं त्वत् ॥ ८ ॥

बुद्धीला प्रेरणा करणारा, यज्ञसभेचे भूषण, यज्ञाचा संपादक आणि मन:शक्तीचा नियंता जो अग्नि, त्यालाच भक्तजन (प्रणिपात करितात), आहुति लहान असली तरी सर्वांशी समानत्वाने वागणार्‍या त्या देवाची प्रार्थना करितात आणि आहुति मोठी असली तरीही त्याचीच प्रार्थना करितात. हे अग्नि, आम्ही तुझ्यावांचून दुसर्‍या कोणाचा धांवा करीत नाही ८.


त्वां इदत्र॑ वृणते त्वा॒यवो॒ होता॑रं अग्ने वि॒दथे॑षु वे॒धसः॑ ।
यद्दे॑व॒यन्तो॒ दध॑ति॒ प्रयां॑सि ते ह॒विष्म॑न्तो॒ मन॑वो वृ॒क्तब॑र्हिषः ॥ ९ ॥

त्वां इत् अत्र वृणते त्वायवः होतारं अग्ने विदथेषु वेधसः
यत् देव-यन्तः दधति प्रयांसि ते हविष्मन्तः मनवः वृक्त-बर्ह् इषः ॥ ९ ॥

तुझे भक्तजन तुलाच येथे आर्जव कारून आणतात; हे अग्ने, काव्यरचना करणारे भक्त तुज यज्ञसंपादकाची यज्ञामध्ये विनवणी करितात. जेव्हां देवाकडे लक्ष लागलेले मानव तुझ्या ठिकाणी आपले प्रेम ठेवतात, तेव्हां त्याच्या हातांत आहुति असते आणि त्यांनी तुझ्यासाठी कुशासन सिद्ध केलेले असते ९.


तवा॑ग्ने हो॒त्रं तव॑ पो॒त्रं ऋ॒त्वियं॒ तव॑ ने॒ष्ट्रं त्वं अ॒ग्निदृ॑ताय॒तः ।
तव॑ प्रशा॒स्त्रं त्वं अ॑ध्वरीयसि ब्र॒ह्मा चासि॑ गृ॒हप॑तिश्च नो॒ दमे॑ ॥ १० ॥

तव अग्ने होत्रं तव पोत्रं ऋत्वियं तव नेष्ट्रं त्वं अग्निद् ऋत-यतः
तव प्र-शास्त्रं त्वं अध्वरि-यसि ब्रह्मा च असि गृह-पतिः च नः दमे ॥ १० ॥

हे अग्ने, होत्याचे काम तुझेच आहे. "पोता" ऋत्विजाचे यथाकाल करावयाचे कामहि तुझेच आणि नेष्ट्याचे कामहि तुझ्याचकडे आहे. सद्धर्माने चालणार्‍या भक्ताचा अग्निमिंध्‌ ऋत्विज तूंच. प्रशास्ता तूंच आणि अध्वर्यूचे कृत्यहि तूंच करतोस. तूंच ब्रह्मा आहेस आणि आमच्या यज्ञगृहांत यजमानहि तूंच आहेस १०.


यस्तुभ्यं॑ अग्ने अ॒मृता॑य॒ मर्त्यः॑ स॒मिधा॒ दाश॑दु॒त वा॑ ह॒विष्कृ॑ति ।
तस्य॒ होता॑ भवसि॒ यासि॑ दू॒त्य१ं उप॑ ब्रूषे॒ यज॑स्यध्वरी॒यसि॑ ॥ ११॥

यः तुभ्यं अग्ने अमृताय मर्त्यः सम्-इधा दाशत् उत वा हविः-कृति
तस्य होता भवसि यासि दूत्यं उप ब्रूषे यजसि अध्वरि-यसि ॥ ११ ॥

हे अग्ने तूं जो अजरामर, त्या तुझ्या प्रीत्यर्थ जो मर्त्य मानव समिधांनी आणि आहुतींनी आपला भक्तिभाव समर्पण करतो, त्याचा तूं यज्ञसंपादक होतोस आणि दिव्यविबुधांना आणण्याकरितां त्यांचे दूतत्व पत्करतोस; त्यांना पाचारण करतोस आणि यज्ञसांग संपादन करतोस, पण अध्वर्यूहि तूंच होतोस ११.


इ॒मा अ॑स्मै म॒तयो॒ वाचो॑ अ॒स्मदाँ ऋचो॒ गिरः॑ सुष्टु॒तयः॒ सं अ॑ग्मत ।
व॒सू॒यवो॒ वस॑वे जा॒तवे॑दसे वृ॒द्धासु॑ चि॒द्वर्ध॑नो॒ यासु॑ चा॒कन॑त् ॥ १२ ॥

इमाः अस्मै मतयः वाचः अस्मत् आ ऋचः गिरः सु-स्तुतयः सं अग्मत
वसु-यवः वसवे जात-वेदः वृद्धासु चित् वर्धनः यासु चाकनत् ॥ १२ ॥

ह्या आमच्या मननशक्ति त्याच्या सन्निध गेल्या; आमच्या वाणी, आमच्या ऋचा, प्रशस्ति, उत्कृष्ट स्तुति ह्या सर्व त्याच्याकडे गेल्या; दिव्यनिधि, सर्वज्ञ जो अग्नि त्याच्याकडून आम्ही उत्कृष्ट धनाची इच्छा करितो म्हणून ज्या स्तुति त्याला प्रिय असतात, त्या वृधिंगत झाल्या म्हणजे तोहि हर्षाने प्रफुल्ल होतो १२.


इ॒मां प्र॒त्नाय॑ सुष्टु॒तिं नवी॑यसीं वो॒चेयं॑ अस्मा उश॒ते शृ॒णोतु॑ नः ।
भू॒या अन्त॑रा हृ॒द्यस्य नि॒स्पृशे॑ जा॒येव॒ पत्य॑ उश॒ती सु॒वासाः॑ ॥ १३ ॥

इमां प्रत्नाय सु-स्तुतिं नवीयसीं वोचेयं अस्मै उशते शृणोतु नः
भूयाः अन्तरा हृदि अस्य नि-स्पृशे जायाइव पत्ये उशती सु-वासाः ॥ १३ ॥

ह्या सनातन देवाप्रीत्यर्थ अभिनव अशी एक उत्कृष्ट स्तुति मी म्हणणार आहे; ती आमची विनंति तो ऐकून घेवो. ती त्याच्या अगदी हृदयाच्या आंत बिलगून बसो; जणों काय पतीसाठी उत्कृष्ठित झालेले वस्त्राभरणभूषित भार्याच १३.


यस्मि॒न्न् अश्वा॑स ऋष॒भास॑ उ॒क्षणो॑ व॒शा मे॒षा अ॑वसृ॒ष्टास॒ आहु॑ताः ।
की॒ला॒ल॒पे सोम॑पृष्ठाय वे॒धसे॑ हृ॒दा म॒तिं ज॑नये॒ चारुं॑ अ॒ग्नये॑ ॥ १४ ॥

यस्मिन् अश्वासः ऋषभासः उक्षणः वशाः मेषाः अव-सृष्टासः आहुताः
कीलाल-पे सोम-पृष्ठाय वेधसे हृदा मतिं जनये चारुं अग्नये ॥ १४ ॥

निरनिराळ्या जातींच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या ठिकाणी अश्व, तुंद गवे (वन्य वृषभ), वांझ पशु, मेंढे इत्यादि पशूंना मोकळे सोडतात किंवा त्यांचे बलिदान होते. परंतु आमच्या येथे मधुर रसास्वादी, सोमवाहक जगत्‌स्त्रष्टा जो अग्नि, त्याच्या प्रीत्यर्थ मी मन:पूर्वक माझी प्रतिभा जागृत करितो १४.


अहा॑व्यग्ने ह॒विरा॒स्ये ते स्रु॒चीव घृ॒तं च॒म्वीव॒ सोमः॑ ।
वा॒ज॒सनिं॑ र॒यिं अ॒स्मे सु॒वीरं॑ प्रश॒स्तं धे॑हि य॒शसं॑ बृ॒हन्त॑म् ॥ १५ ॥

अहावि अग्ने हविः आस्ये ते स्रुचि-इव घृतं चम्वि-इव सोमः
वाज-सनिं रयिं अस्मे इति सु-वीरं प्र-शस्तं धेहि यशसं बृहन्तम् ॥ १५ ॥

हे अग्नि, स्रुचेमध्ये घृत आणि चमसामध्ये रस ठेवावा त्याप्रमाणे तुझ्या मुखामध्ये मी आहुति अर्पण केली आहे, तर सत्त्वसामर्थ्याचा लाभ देणारे, श्रेष्ठ, वीरांनी युक्त असे ऐश्वर्य आणि प्रशंसनीय असे महद्यश आम्हांला अर्पण कर १५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९२ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - शार्यांत मानव : देवता - विश्वेदेव : छंद - जगती


य॒ज्ञस्य॑ वो र॒थ्यं वि॒श्पतिं॑ वि॒शां होता॑रं अ॒क्तोरति॑थिं वि॒भाव॑सुम् ।
शोच॒ञ्छुष्का॑सु॒ हरि॑णीषु॒ जर्भु॑र॒द्वृषा॑ के॒तुर्य॑ज॒तो द्यां अ॑शायत ॥ १॥

यजस्य वः रथ्यं विश्पतिं विशां होतारं अक्तोः अतिथिं विभावसुं
शोचन् शुष्कासु हरिणीषु जर्भुरत् वृषा केतुः यजतः द्यां अशायत ॥ १ ॥

तुमच्या यज्ञाचा धुरीण, लोकांचा लोकाध्यक्ष, यज्ञाचा संपादक, रात्रीं येणारा अतिथि, तेजाचा निधि असा जो अग्नि त्याची मी उपासना करीत आहे. असा हा अग्नि प्रदीप्त हो‍ऊन शुष्क आणि हिरव्या अशा प्रकारच्या लतादिकांतून धगधगतच वाटेल तिकडे फिरतो आणि नंतर जो यज्ञाचा ध्वज, वृष्टिवर्षक अग्नि द्युलोकांत जाऊन तेथें स्वस्थ राहतो १.


इ॒मं अ॑ञ्ज॒स्पां उ॒भये॑ अकृण्वत ध॒र्माणं॑ अ॒ग्निं वि॒दथ॑स्य॒ साध॑नम् ।
अ॒क्तुं न य॒ह्वं उ॒षसः॑ पु॒रोहि॑तं॒ तनू॒नपा॑तं अरु॒षस्य॑ निंसते ॥ २ ॥

इमं अजः-पां उभये अकृण्वत धर्माणं अग्निं विदथस्य साधनं
अक्तुं न यह्वं उषसः पुरः-हितं तनू-नपातं अरुषस्य निंसते ॥ २ ॥

भक्तांचे त्वरित रक्षण करणारा, धर्मप्रतिपालक जो हा अग्नि त्याला मानव आणि दिव्यजन अशा उभयतांनीहि यज्ञविधीचे साधनत्वच केले, तारामण्डळाचा प्रबलप्रमुख, उष:कालचा पुरोहित असा जो रक्तवर्ण भक्तपालक अग्नि त्याच्या चरणाचे सर्वजण चुंबन घेतात २.


बळ् अ॑स्य नी॒था वि प॒णेश्च॑ मन्महे व॒या अ॑स्य॒ प्रहु॑ता आसु॒रत्त॑वे ।
य॒दा घो॒रासो॑ अमृत॒त्वं आश॒तादिज् जन॑स्य॒ दैव्य॑स्य चर्किरन् ॥ ३ ॥

बट् अस्य नीथा वि पणेः च मन्महे वयाः अस्य प्र-हुताः आसुः अत्तवे
यदा घोरासः अमृत-त्वं आशत आत् इत् जनस्य दैव्यस्य चर्किरन् ॥ ३ ॥

खरोखरच त्याचे नीतिमार्ग आणि दुष्ट कंजूषाचे मार्ग ह्यांची भिन्नता आमच्या सतत डोळ्यापुढे असते आणि त्या दुष्टांना भक्षण करण्यासाठी त्याच्या ज्वालारूप शाखा सर्वत्र पसरलेल्याच असतात आणि जेव्हां त्याच्या भयानक ज्वाला अमृतत्त्वाची मर्यादाच गांठतात, तेव्हांहि दिव्यविबुधाचे स्तवन भक्तजन करीतच असतात ३.


ऋ॒तस्य॒ हि प्रसि॑ति॒र्द्यौरु॒रु व्यचो॒ नमो॑ म॒ह्य१रम॑तिः॒ पनी॑यसी ।
इन्द्रो॑ मि॒त्रो वरु॑णः॒ सं चि॑कित्रि॒रेऽ॑थो॒ भगः॑ सवि॒ता पू॒तद॑क्षसः ॥ ४ ॥

ऋतस्य हि प्र-सितिः द्यौः उरु व्यचः नमः मही अरमतिः पनायसी
इन्द्रः मित्रः वरुणः सं चिकित्रिरे अथो इति भगः सविता पूत-दक्षसः ॥ ४ ॥

सत्यधर्माचे बंधन आहे म्हणूनच द्युलोक, विस्तीर्ण नभोमण्डळ, नमनभक्ति-श्रेष्ठ, प्रशंसनीय अशी अरमति (=विरक्तता) ह्यांनी, आणि तसेंच, इंद्र, मित्र, वरुण, भाग्याधिपति भग आणि सविता ह्यांनी, हे भक्तीचे सत्कृत्य अवलोकन केले आणि म्हणूनच ते भक्त पवित्र अशा चातुर्यबलाने भूषित होतात ४.


प्र रु॒द्रेण॑ य॒यिना॑ यन्ति॒ सिन्ध॑वस्ति॒रो म॒हीं अ॒रम॑तिं दधन्विरे ।
येभिः॒ परि॑ज्मा परि॒यन्न् उ॒रु ज्रयो॒ वि रोरु॑वज् ज॒ठरे॒ विश्वं॑ उ॒क्षते॑ ॥ ५ ॥

प्र रुद्रेण ययिना यन्ति सिन्धवः तिरः महीं अरमतिं दधन्विरे
येभिः परि-ज्मा परि-यन् उरु ज्रयः वि रोरुवत् जठरे विश्वं उक्षते ॥ ५ ॥

शीघ्र संचारी रुद्राच्या सामर्थ्याने महानद्या वाहात असतात, त्यांनी श्रेष्ठ अरमतीला झांकून टाकले. त्याच्य योगानेच पारिज्मा (=सर्वगामी वायु) हा विस्तृत भूप्रदेशाला जोराने वेढून टाकून मोठ्याने गर्जना करतो. आणि पोटांत प्रवेश करून तेथे असेल नसेल ते सर्व रसाने भिजवून टाकतो ५.


क्रा॒णा रु॒द्रा म॒रुतो॑ वि॒श्वकृ॑ष्टयो दि॒वः श्ये॒नासो॒ असु॑रस्य नी॒ळयः॑ ।
तेभि॑श्चष्टे॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मेन्द्रो॑ दे॒वेभि॑रर्व॒शेभि॒रर्व॑शः ॥ ६ ॥

क्राणाः रुद्राः मरुतः विश्व-कृष्टयः दिवः श्येनासः असुरस्य नीळयः
तेभिः चष्टे वरुणः मित्रः अर्यमा इन्द्रः देवेभिः अर्वशेभिः अर्वशः ॥ ६ ॥

रुद्रपुत्र कर्तव्यतत्पर जे मरुत्‌ ते अखिल समजाचे मित्रच आहेत; ते द्युलोकांतील जणों श्येन पक्षीच होत. किंवा ईश्वराच्या घरट्यांतील जणों पिल्लेच होत. त्याच्या योगाने वरुण, मित्र, अर्यमा किंवा इंद्र हा विश्वाचे निरीक्षण करतो; त्या अश्ववीर मरुतांमुळे तो अश्ववीरांचा नायक म्हणून प्रसिद्ध आहे ६.


इन्द्रे॒ भुजं॑ शशमा॒नास॑ आशत॒ सूरो॒ दृशी॑के॒ वृष॑णश्च॒ पौंस्ये॑ ।
प्र ये न्वस्या॒र्हणा॑ ततक्षि॒रे युजं॒ वज्रं॑ नृ॒षद॑नेषु का॒रवः॑ ॥ ७ ॥

इन्द्रे भुजं शशमानासः आशत सूरः दृशीके वृषणः च पैंस्ये
प्र ये नु अस्य अर्हणा ततक्षिरे युजं वज्रं नृ-सदनेषु कारवः ॥ ७ ॥

जे भक्त उपासना करणारे असतात, त्यांना सूर्य दृग्गोचर झाला म्हणजे इंद्राच्या ठिकाणी - त्या अभीष्टवर्षक वीराच्या पराक्रमांच्या ठिकाणी आनंदाचा ठेवा प्राप्त होतो; असे भक्त कोणते तर ज्यांनी त्यांच्या सन्मानासाठी त्याचे प्रिय वज्र घांसून स्वच्छ केले असते, तेच यजमानाच्या गृहांतील स्तोतृजन म्हणून कार्य करितात ७.


सूर॑श्चि॒दा ह॒रितो॑ अस्य रीरम॒दिन्द्रा॒दा कश्चि॑द्‌भयते॒ तवी॑यसः ।
भी॒मस्य॒ वृष्णो॑ ज॒ठरा॑दभि॒श्वसो॑ दि॒वे-दि॑वे॒ सहु॑रि स्त॒न्न् अबा॑धितः ॥ ८ ॥

सूरः चित् आ हरितः अस्य रीरमत् इन्द्रात् आ कः चित् भयते तवीयसः
भीमस्य वृष्णः जठरात् अभि-श्वसः दिवे--दिवे सहुरिः स्तन् अबाधितः ॥ ८ ॥

परंतु सूर्यसुद्धां आपण नाना वर्ण किरणांचे अश्व आवरून धरतो, मला वाटतें कीं तो बलाढ्य इंद्रापुढे भयभीतच होतो की काय ? त्या भीषण वीराच्या जठरांतून प्रतिदिनी निघणार्‍या श्वासोच्छ्‌वासापुढे कोणीच तग धरूं शकत नाही आणि म्हणूनच तो अजिंक्य वीर श्वासानेच अप्रतिहत रीतीने गर्जत असतो ८.


स्तोमं॑ वो अ॒द्य रु॒द्राय॒ शिक्व॑से क्ष॒यद्वी॑राय॒ नम॑सा दिदिष्टन ।
येभिः॑ शि॒वः स्ववा॑ँ एव॒याव॑भिर्दि॒वः सिष॑क्ति॒ स्वय॑शा॒ निका॑मभिः ॥ ९ ॥

स्तोमं वः अद्य रुद्राय शिक्वसे क्षयत्-वीराय नमसा दिदिष्टन
येभिः शिवः स्व-वान् एवयाव-भिः दिवः सिसक्ति स्व-यशाः निकाम-भिः ॥ ९ ॥

तुमची जी स्तोत्रावलि, ती भक्तांचे रक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आणि वीरांचा आश्रय जो रुद्र त्याला आज प्रणिपातपूर्वक अर्पण करा. तो शिव म्हणजे मंगलरूप आहे, तो आत्मवान्‌ आणि आपल्याच यशाने मण्डित आहे. तो आपल्या निश्चित मार्गांनी जाणार्‍या आणि मनोवृत्तींचे नियंत्रण करणार्‍या मरुतांसह द्युलोकांत वास करितो ९.


ते हि प्र॒जाया॒ अभ॑रन्त॒ वि श्रवो॒ बृह॒स्पति॑र्वृष॒भः सोम॑जामयः ।
य॒ज्ञैरथ॑र्वा प्रथ॒मो वि धा॑रयद्दे॒वा दक्षै॒र्भृग॑वः॒ सं चि॑कित्रिरे ॥ १० ॥

ते हि प्र-जायाः अभरन्त वि श्रवः बृहस्पतिः वृषभः सोम-जामयः
यजैः अथर्वा प्रथमः वि धारयत् देवाः दक्षैः भृगवः सं चिकित्रिरे ॥ १० ॥

वीरधुरीण बृहस्पति आणि सोमाच्या ठिकाणी आसक्त असे दिव्य विबुध ह्यांनी प्रजेच्या ख्यातीची अभिवृद्धीच केली. अथर्व्याने यज्ञांच्या योगाने प्रथम त्या कीर्तीला आधार दिला आणि दिव्यविभूति आणि भृगु ह्यांनी आपल्या चातुर्याने तीच गोष्ट स्पष्टपणे दाखविली १०.


ते हि द्यावा॑पृथि॒वी भूरि॑रेतसा॒ नरा॒शंस॒श्चतु॑रङ्गो य॒मोऽ॑दितिः ।
दे॒वस्त्वष्टा॑ द्रविणो॒दा ऋ॑भु॒क्षणः॒ प्र रो॑द॒सी म॒रुतो॒ विष्णु॑रर्हिरे ॥ ११॥

ते हि द्यावापृथिवी इति भूरि-रेतसा नराशंसः चतुः-अङ्गः यमः अदितिः
देवः त्वष्टा द्रविणः-दाः ऋभुक्षणः प्र रोदसी इति मरुतः विष्णुः अर्हिरे ॥ ११ ॥

तुम्ही द्यावापृथिवी असे आहांत की तुमचा उदकवर्षाव विपुल असतो. म्हणून भक्तप्रख्यापक, चतुर्बल संपन्न असे यम, अदिति, त्वष्टादेव, अचल धनदाता अग्नि, ऋभू, रोदसी, मरुत्‌ आणि विष्णु ह्या सर्व विभूतींची भक्तजनांनी सेवाच केली आहे ११.


उ॒त स्य न॑ उ॒शिजां॑ उर्वि॒या क॒विरहिः॑ शृणोतु बु॒ध्न्योख्प् हवी॑मनि ।
सूर्या॒मासा॑ वि॒चर॑न्ता दिवि॒क्षिता॑ धि॒या श॑मीनहुषी अ॒स्य बो॑धतम् ॥ १२ ॥

उत स्यः नः उशिजां उर्विया कविः अहिः शृणोतु बुध्न्यः हवीमनि
सूर्यामासा वि-चरन्ता दिवि-क्षिता धिया शमीनहुषी इति अस्य बोधतम् ॥ १२ ॥

तसेंच जो, आम्हां भाविकांचा श्रेष्ठ कवि अहिर्बुध्न्य, तो आम्ही धांवा केला असतां आमच्याकडे लक्ष देवो. तसेंच सूर्य चंद्र हे निरनिराळ्या गतीने संचार करणारे पण एकाच आकाशांत वास करितात, म्हणून ते आणि शमी नहुषींनो तुम्ही आमच्या स्तवनाकडे एकाग्रतेने लक्ष द्या १२.


प्र नः॑ पू॒षा च॒रथं॑ वि॒श्वदे॑व्योऽ॒पां नपा॑दवतु वा॒युरि॒ष्टये॑ ।
आ॒त्मानं॒ वस्यो॑ अ॒भि वातं॑ अर्चत॒ तद॑श्विना सुहवा॒ याम॑नि श्रुतम् ॥ १३ ॥

प्र नः पूषा चरथं विश्व-देव्यः अपां नपात् अवतु वायुः इष्टये
आत्मानं वस्यः अभि वातं अर्चत तत् अश्विना सु-हवा यामनि श्रुतम् ॥ १३ ॥

तसेंच आमचे जे मार्गक्रमण त्याला पूषा आशीर्वाद देवो. विश्वेदेवांपैकीच जो एक तो अपांनपात आणि वायु हाहि आम्हांला इच्छित प्राप्ति व्हावी म्हणून आपला अनुग्रह करो. उत्कृष्ट वस्तूंचा आत्मा जो वात (=प्रेरक) त्याच्या प्रीत्यर्थ "अर्क" स्तोत्र म्हणा आणि पाचारण करतांच येणारे हे अश्वीहो, तुम्हींहि ह्या यज्ञ मार्गांत आमचा धांवा ऐका १३.


वि॒शां आ॒सां अभ॑यानां अधि॒क्षितं॑ गी॒र्भिरु॒ स्वय॑शसं गृणीमसि ।
ग्नाभि॒र्विश्वा॑भि॒रदि॑तिं अन॒र्वणं॑ अ॒क्तोर्युवा॑नं नृ॒मणा॒ अधा॒ पति॑म् ॥ १४ ॥

विशां आसां अभयानां अधि-क्षितं गीः-भिः ओं इति स्व-यशसं गृणीमसि
ग्नाभिः विश्वाभिः अदितिं अनर्वणं अक्तोः युवानं नृ-मनाः / अध पतिम् ॥ १४ ॥

निर्भय अशा ह्या सर्व दिव्य संघाचा जो अध्यक्ष आपल्याच यशाने विभूषित आहे, त्या भगवंताचे संकीर्तन आम्ही स्तुतींनी करितो. जी अनंतस्वरूप आहे, जी दिव्यांगना परिवेष्टित आहे अशी अदिति-तिला कोणी कांही इजा करूं शकत नाही. जो रात्रीच्या तारकासमूहाचा प्रतिपालक आहे, जो वीरवृत्ति आहे त्याचीहि आम्ही स्तुति करितो १४.


रेभ॒दत्र॑ ज॒नुषा॒ पूर्वो॒ अङ्गि॑रा॒ ग्रावा॑ण ऊ॒र्ध्वा अ॒भि च॑क्षुरध्व॒रम् ।
येभि॒र्विहा॑या॒ अभ॑वद्विचक्ष॒णः पाथः॑ सु॒मेकं॒ स्वधि॑ति॒र्वन॑न्वति ॥ १५ ॥

रेभत् अत्र जनुषा पूर्वः अङ्गिराः ग्रावाणः ऊर्ध्वाः अभि चक्षुः अध्वरं
येभिः वि-हायाः अभवत् वि-चक्षणः पाथः सु-मेकं स्व-धितिः वनन्-वति ॥ १५ ॥

जन्मापासून अंगिराने येथेच पूर्वी स्तवन केले. ग्रावे येथेंच उद्युक्त हो‍ऊन त्यांनी अध्वरयागाकडे दृष्टि ठेविली. ह्या पद्धतीने भक्त चतुर झाला आणि उच्च पदवीला चढला. उदक रमणीय झाले आणि उदकपूर्ण मेघांमध्ये "विद्युत‌" तळपत राहिली १५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९३ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - तान्व पार्थ्य : देवता - विश्वेदेव
छंद - २, ३, १३ - अनुष्टुभ्; ९ - अक्षरपंक्ती;
११ - न्यंकुसारिणी; १५ - पुरस्ताद्‌बृहती; अवशिष्ट - प्रस्तारपंक्ति


महि॑ द्यावापृथिवी भूतं उ॒र्वी नारी॑ य॒ह्वी न रोद॑सी॒ सदं॑ नः ।
तेभि॑र्नः पातं॒ सह्य॑स ए॒भिर्नः॑ पातं शू॒षणि॑ ॥ १ ॥

महि द्यावापृथिवी इति भूतं उर्वी इति नारी इति यह्वी इति न रोदसी इति सदं नः
तेभिः नः पातं सह्यसः एभिः नः पातं शूषणि ॥ १ ॥

श्रेष्ठ द्यावापृथिवी हो, तुम्ही आमच्यासाठी विस्तृत व्हा. तुम्ही उभयतां आणि रोदसी ह्या नारी असूनहि महाप्रबल आहां; तर आमच्यावर चाल करून येणार्‍यापासून आपल्या शक्तींनी आमचा बचाव करा आणि आमचा स्तोत्रघोष चालू असेल अशा वेळी आपल्या वीरवृत्तीनी आमचे रक्षण करा १.


य॒ज्ञे-य॑ज्ञे॒ स मर्त्यो॑ दे॒वान् स॑पर्यति ।
यः सु॒म्नैर्दी॑र्घ॒श्रुत्त॑म आ॒विवा॑सत्येनान् ॥ २ ॥

यजे--यजे सः मर्त्यः देवान् सपर्यति
यः सुम्नैः दीर्घश्रुत्-तमः आविवासाति एनान् ॥ २ ॥

तो मर्त्य मानव प्रत्येक यज्ञांत दिव्य विभूतीची सेवा करतोच. जो त्यांच्या सुखप्रद आशीर्वादांनी अतिशय विख्यात होतो, तोहि त्यांची उपासना करतो २.


विश्वे॑षां इरज्यवो दे॒वानां॒ वार्म॒हः ।
विश्वे॒ हि वि॒श्वम॑हसो॒ विश्वे॑ य॒ज्ञेषु॑ य॒ज्ञियाः॑ ॥ ३ ॥

विश्वेषां इरज्यवः देवानां वाः महः
विश्वे हि विश्व-महसः विश्वे यजेषु यजियाः ॥ ३ ॥

तुम्ही सर्वांचे अधिपति आहांत; तुम्हां दिव्यविभूतींचे वरदान श्रेष्ठ आहे. तुम्ही सर्व सकल तेजांचे अधिष्ठान आहांत; सर्व यज्ञांमध्ये तुम्ही यजनीयच आहांत ३.


ते घा॒ राजा॑नो अ॒मृत॑स्य म॒न्द्रा अ॑र्य॒मा मि॒त्रो वरु॑णः॒ परि॑ज्मा ।
कद्रु॒द्रो नृ॒णां स्तु॒तो म॒रुतः॑ पू॒षणो॒ भगः॑ ॥ ४ ॥

ते घ राजानः अमृतस्य मन्द्राः अर्यमा मित्रः वरुणः परि-ज्मा
कत् रुद्रः नृणां स्तुतः मरुतः पूषणः भगः ॥ ४ ॥

विश्वेदेवहो तुम्ही खरोखरच अमरत्वाचे राजे आहांत. तुम्ही अर्यमा, मित्र, वरुण, परिज्मा(=वायु) हे आनंदवृत्ति आहांत. शूरांना स्तुत्य असा रुद्र तसेंच मरुत्‌, पूषा, भाग्याधिप हेहि तसेच आहेत ४.


उ॒त नो॒ नक्तं॑ अ॒पां वृ॑षण्वसू॒ सूर्या॒मासा॒ सद॑नाय सध॒न्या ।
सचा॒ यत् साद्ये॑षां॒ अहि॑र्बु॒ध्नेषु॑ बु॒ध्न्यः ॥ ५ ॥

उत नः नक्तं अपां वृषण्वसूइतिवृषण्-वसू सूर्यामासा सदनाय स-धन्या
सचा यत् सादि एषां अहिः बुध्नेषु बुध्न्यः ॥ ५ ॥

तसेंच उदकांची वृष्टि हेच ज्यांचे धन अशा चंद्रसूर्यांनो, समानवैभव असे तुम्ही आमच्या गृही दिवसा आणि रात्रींहि आगमन करा आणि जो अहिबुध्न्य त्यांच्या मूलस्थानांत ह्याच्यासह राहतो तोहि येवो ५.


उ॒त नो॑ दे॒वाव् अ॒श्विना॑ शु॒भस्पती॒ धाम॑भिर्मि॒त्रावरु॑णा उरुष्यताम् ।
म॒हः स रा॒य एष॒तेऽ॑ति॒ धन्वे॑व दुरि॒ता ॥ ६ ॥

उत नः देवौ अश्विना शुभः पती इति धाम-भिः मित्रावरुणौ उरुष्यतां
महः सः रायः आ ईषते अति धन्वाइव दुः-इता ॥ ६ ॥

तसेंच ते मंगलाधीश उभयतां अश्वीदेव आणि मित्रावरुण हे आपल्या तेजोबलांनी आम्हांला मुक्त करोत. अफाट दुर्गम प्रदेशांतून जावे त्याप्रमाणे त्याचा भक्त श्रेष्ठ धनाकडे मोठ्या इर्षेने जातो ६.


उ॒त नो॑ रु॒द्रा चि॑न् मृळतां अ॒श्विना॒ विश्वे॑ दे॒वासो॒ रथ॒स्पति॒र्भगः॑ ।
ऋ॒भुर्वाज॑ ऋभुक्षणः॒ परि॑ज्मा विश्ववेदसः ॥ ७ ॥

उत नः रुद्रा चित् मृळतां अश्विना विश्वे देवासः रथःपतिः भगः
ऋभुः वाजः ऋभुक्षणः परि-ज्मा विश्व-वेदसः ॥ ७ ॥

आणि तसेंच ते रुद्ररूप अश्वीदेव आम्हांवर दया करोत; त्याचप्रमाणे रथपति, भाग्याधिपति, ऋभु, वाज, परिज्मा (वायु) आणि ऋभूसंरक्षक, सकलज्ञानसंपन्न दिव्यविबुधांनो आम्हांवर दया करा ७.


ऋ॒भुरृ॑भु॒क्षा ऋ॒भुर्वि॑ध॒तो मद॒ आ ते॒ हरी॑ जूजुवा॒नस्य॑ वा॒जिना॑ ।
दु॒ष्टरं॒ यस्य॒ साम॑ चि॒दृध॑ग् य॒ज्ञो न मानु॑षः ॥ ८ ॥

ऋभुः ऋभुक्षाः ऋभुः विधतः मदः आ ते हरी इति जूजुवानस्य वाजिना
दुस्तरं यस्य साम चित् ऋधक् यजः न मानुषः ॥ ८ ॥

इंद्रा तूं ऋभुसंरक्षक आणि खरोखर ’ऋभू’ म्हणजे शीघ्र प्रसादकारी आहेस. तुझ्या सेवकाचा हर्ष देखील ऋभूच होय. तुज शीघ्रेवेगी भगवंताचे हरिद्वर्ण अश्वसुद्धां सत्वबलाढ्य आहेत, तुझे सामस्तोत्र तर अपूर्वच आणि यज्ञ हा सुद्धा मानवी नव्हे ८.


कृ॒धी नो॒ अह्र॑यो देव सवितः॒ स च॑ स्तुषे म॒घोना॑म् ।
स॒हो न॒ इन्द्रो॒ वह्नि॑भि॒र्न्येषां चर्षणी॒नां च॒क्रं र॒श्मिं न यो॑युवे ॥ ९ ॥

कृधि नः अह्रयः देव सवितरिति सः च स्तुषे मघोनां
सहः नः इन्द्रः वह्नि-भिः नि एषां चर्षणीनां चक्रं रश्मिं न योयुवे ॥ ९ ॥

हे सवितृदेवा, आम्हांला नि:स्पृह कर. त्या सवितादेवाचे स्तवन होत असतेंच. तोच भाग्यवान यजमानाचे बल होय. आणि तो इंद्रच आपल्या अश्वांच्या योगाने रथ चक्रांना आणि लगामाच्या योगाने अश्वांना आवरून धरावे त्याप्रमाणे यच्चयावत्‌ प्राणिमात्रांचे नियमन करितो ९.


ऐषु॑ द्यावापृथिवी धातं म॒हद॒स्मे वी॒रेषु॑ वि॒श्वच॑र्षणि॒ श्रवः॑ ।
पृ॒क्षं वाज॑स्य सा॒तये॑ पृ॒क्षं रा॒योत तु॒र्वणे॑ ॥ १० ॥

आ एषु द्यावापृथिवी इति धातं महत् अस्मे इति वीरेषु विश्व-चर्षणि श्रवः
पृक्षं वाजस्य सातये पृक्षं राया उत तुर्वणे ॥ १० ॥

द्यावापृथिवीहो, सर्वाला व्यापून टाकील असे महत्‌ यश ह्या आमच्या वीरांमध्ये ठेवा. सत्वबलाच्या लाभासाठी तरतरी (उत्साह) आणि शत्रूला तुडविण्यासाठी धन आणि शारीरिक जोम आम्हांमध्ये असूं द्या १०.


ए॒तं शंसं॑ इन्द्रास्म॒युष् ट्वं कूचि॒त् सन्तं॑ सहसावन्न् अ॒भिष्ट॑ये ।
सदा॑ पाह्य॒भिष्ट॑ये मे॒दतां॑ वे॒दता॑ वसो ॥ ११॥

एतं शंसं इन्द्र अस्म-युः त्वं कू-चित् सन्तं सहसावन् अभि ष्टये
सदा पाहि अभिष्टये मेदतां वेदता वसो इति ॥ ११ ॥

हे इंद्रा, तूं आमचा पक्षपाती आहेस, तर ह्या स्तोत्राला आणि स्तोत्याला तो कोठेंहि असला तरी, हे धाडसी वीरा, तूं आमच्या उद्दिष्टासाठी रक्षण कर. आमच्या प्राप्तव्यासाठी सदैव रक्षण कर. हे दिव्यनिधे, तुझ्या ज्ञानाने त्याचा परिपोष होवो ११.


ए॒तं मे॒ स्तोमं॑ त॒ना न सूर्ये॑ द्यु॒तद्या॑मानं वावृधन्त नृ॒णाम् ।
सं॒वन॑नं॒ नाश्व्यं॒ तष्टे॒वान॑पच्युतम् ॥ १२ ॥

एतं मे स्तोमं तना न सूर्ये द्युतत्-यामानं ववृधन्त नृणां
सम्-वननं न अस्व्यं तष्टाइव अनप-च्युतम् ॥ १२ ॥

तेजोमार्गातील किरणाला जसें सूर्यामध्ये नेऊन भिडवावे, त्याप्रमाणे माझ्या सूक्तावलीला मित्रांच्या मालिकेने सतत संवर्धित केले आहे. माझा तो सूक्तसमूह एक प्रकारचा संघच आहे. सुतार रथाच्या अश्वांसाठी जशी अगदी न तुटणारी दणकट जुपी तयार करतो, तशीच ही सूक्तमालिका आहे १२.


वा॒वर्त॒ येषां॑ रा॒या यु॒क्तैषां॑ हिर॒ण्ययी॑ ।
ने॒मधि॑ता॒ न पौंस्या॒ वृथे॑व वि॒ष्टान्ता॑ ॥ १३ ॥

ववर्त येषां राया युक्ता एषां हिरण्ययी
नेम-धिता न पैंस्या वृथाइव विष्ट-अन्ता ॥ १३ ॥

अशा भक्तांची देवसेवा त्यांच्या पदरात पडते, ती वैभवाने युक्त आणि सुवर्णमय अशी असते; आणि जी जणों काय हातांत हात घालून संग्रामाला सज्ज झालेल्या पौरुषशाली योध्याची मालिकाच बनते १३.


प्र तद्दुः॒शीमे॒ पृथ॑वाने वे॒ने प्र रा॒मे वो॑चं॒ असु॑रे म॒घव॑त्सु ।
ये यु॒क्त्वाय॒ पञ्च॑ श॒तास्म॒यु प॒था वि॒श्राव्ये॑षाम् ॥ १४ ॥

प्र तत् दुः-शीमे पृथवाने वेने प्र रामे वोचं असुरे मघवत्-सु
ये युक्त्वाय पच शता अस्म-यु पथा वि-श्रावि एषाम् ॥ १४ ॥

अशी अनेक स्तवने - दु:शीम, पृथवान, वेन, आणि बलाढ्य राम हे आमचे दानशूर धुरीण विद्यमान असतांना मी केली, तेव्हां त्यांनी पांचशे घोडे एकजात तयार असे दिले. यप्रमाणे आम्हांविषयीचे त्यांचे प्रेम ह्या मार्गाने सर्वतोमुखी झाले १४.


अधीन् न्व् अत्र॑ सप्त॒तिं च॑ स॒प्त च॑ ।
स॒द्यो दि॑दिष्ट॒ तान्वः॑ स॒द्यो दि॑दिष्ट पा॒र्थ्यः स॒द्यो दि॑दिष्ट माय॒वः ॥ १५ ॥

अधिइत् नु अत्र सप्ततिं च सप्त च सद्यः दिदिष्ट तान्वः
सद्यः दिदिष्ट पार्थ्यः सद्यः दिदिष्ट मायवः ॥ १५ ॥

त्याशिवाय सात अधिक सत्तर इतके अश्व घेऊन जा, म्हणून तान्वाने ताबडतोब आम्हांला सांगितले, पार्थ्यानेंहि तसेंच तात्काळ सांगितले. त्याचप्रमाने मायवाने सुद्धां सांगितले १५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९४ (सोमाभिषव ग्रावन्‌सूक्त)

ऋषी - अर्बुद काद्रवेय सर्प : देवता - ग्रावन् : छंद - ५, ७, १४ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


प्रैते व॑दन्तु॒ प्र व॒यं व॑दाम॒ ग्राव॑भ्यो॒ वाचं॑ वदता॒ वद॑द्‌भ्यः ।
यद॑द्रयः पर्वताः सा॒कं आ॒शवः॒ श्लोकं॒ घोषं॒ भर॒थेन्द्रा॑य सो॒मिनः॑ ॥ १॥

प्र एते वदन्तु प्र वयं वदाम ग्राव-भ्यः वाचं वदत वदत्-भ्यः
यत् अद्रयः पर्वताः साकं आशवः श्लोकं घोषं भरथ इन्द्राय सोमिनः ॥ १ ॥

हे ग्रावे शब्द करोत आणि आम्हींहि पण स्तुतिस्तवने उच्चारूं आणि ऋत्विजांनो ध्वनिरूपाने संवाद करणार्‍या ग्राव्यांना उद्देशून कवने म्हणा. हे पर्वतावरील ग्राव्यांनो, तुम्ही अधिषवण फलकांवर झटपट फिरणारे आहां; तुम्हींहि सोमाचा आस्वाद घेतां. तुम्हींहि सोमप्रिय आहांत तर इंद्राप्रीत्यर्थ तुमचा स्तुतिघोष चालू ठेवा १.


ए॒ते व॑दन्ति श॒तव॑त् स॒हस्र॑वद॒भि क्र॑न्दन्ति॒ हरि॑तेभिरा॒सभिः॑ ।
वि॒ष्ट्वी ग्रावा॑णः सु॒कृतः॑ सुकृ॒त्यया॒ होतु॑श्चि॒त् पूर्वे॑ हवि॒रद्यं॑ आशत ॥ २ ॥

एते वदन्ति शत-वत् सहस्र-वत् अभि क्रन्दन्ति हरितेभिः आस-भिः
विष्टवी ग्रावाणः सु-कृतः सु-कृत्यया होतुः चित् पूर्वे हविः-अद्यं आशत ॥ २ ॥

हे ग्रावे एवढ्या मोठ्याने निनाद उत्पन्न करतात की ते शंभर आहेत की हजार आहेत ते कळतच नाही. सोमरसाने हरिद्वर्ण झालेल्या आपल्या मुखांनी ते एकसारखा घोष करीत असतात. हे सुकृतशाली पाषाणांनो, तुम्ही धर्मरते हो‍ऊन आपल्या सत्कर्माने होत्याच्या अगोदर तुम्हीच ते मिष्ट प्राशन करा २.


ए॒ते व॑द॒न्त्यवि॑दन्न् अ॒ना मधु॒ न्यूङ्खयन्ते॒ अधि॑ प॒क्व आमि॑षि ।
वृ॒क्षस्य॒ शाखां॑ अरु॒णस्य॒ बप्स॑त॒स्ते सूभ॑र्वा वृष॒भाः प्रें अ॑राविषुः ॥ ३ ॥

एते वदन्ति अविदन् अना मधु नि ऊङ्खयन्ते अधि पक्वे आमिषि
वृक्षस्य शाखां अरुणस्य बप्सतः ते सूभर्वाः वृषभाः प्र ईं अराविषुः ॥ ३ ॥

एकीकडे हे ग्रावे शब्द करीत आहे आणि एकीकडे मुखाने मधुर पेयाचा आस्वाद घेत आहेत आणि पक्व केलेल्या पुरोडाशाकडे पाहून जणों मिटक्याच मारीत आहेत. वृक्षाच्या कोंवळ्या लाल डहाळीचा पाला खाऊन पुष्ट झालेले जणो वृषभच की काय, अशा ग्रांव्यांनी पहा कसा कल्होळ केला आहे ३.


बृ॒हद्व॑दन्ति मदि॒रेण॑ म॒न्दिनेन्द्रं॒ क्रोश॑न्तोऽविदन्न् अ॒ना मधु॑ ।
सं॒रभ्या॒ धीराः॒ स्वसृ॑भिरनर्तिषुराघो॒षय॑न्तः पृथि॒वीं उ॑प॒ब्दिभिः॑ ॥ ४ ॥

बृहत् वदन्ति मदिरेण मन्दिना इन्द्रं क्रोशन्तः अविदन् अना मधु
सम्-रभ्य धीराः स्वसृ-भिः अनर्तिषुः आघोषयन्तः पृथिवीं उपब्दि-भिः ॥ ४ ॥

हर्षोल्लास उत्पन्न करणार्‍या पेयाने ते मोठ्याने शब्द करीत आहेत. त्यांनी इंद्राला ओरडून हांका मारल्या, पण आपल्या मुखाने अगोदर मधुररस प्राशन केला, नंतर त्या धीट ग्राव्यांनी आपल्या भगिनी ज्या अंगुली त्यांच्या सह नृत्य आरंभिले आणि आपल्या निनादाने पृथिवीवर आपला आवाज घुमवून सोडला ४.


सु॒प॒र्णा वाचं॑ अक्र॒तोप॒ द्यव्या॑ख॒रे कृष्णा॑ इषि॒रा अ॑नर्तिषुः ।
न्य१ङ् नि य॒न्त्युप॑रस्य निष्कृ॒तं पु॒रू रेतो॑ दधिरे सूर्य॒श्वितः॑ ॥ ५ ॥

सु-पर्णाः वाचं अक्रत उप द्यवि आखरे कृष्णाः इषिराः अनर्तिषुः
न्यक् नि यन्ति उपरस्य निः-कृतं पुरु रेतः दधिरे सूर्य-श्वितः ॥ ५ ॥

तेव्हां उत्तम पिसार्‍याचे गरुडपक्षी उंच आकाशांत किलकिलाट करूं लागले, आकाशरूप आवारांत कृष्णमेघ नाचू लागले आणि त्यांतीलच कांही मेघ जवळच्या पर्वतावर ठरलेल्या स्थानाकडे ते खाली उतरले, तेव्हां सूर्याच्या तेजाने चकाकणार्‍या जलबिंदूंनी भूमीवर पाणीच पाणी करून सोडले ५.


उ॒ग्रा इ॑व प्र॒वह॑न्तः स॒माय॑मुः सा॒कं यु॒क्ता वृष॑णो॒ बिभ्र॑तो॒ धुरः॑ ।
यच्छ्व॒सन्तो॑ जग्रसा॒ना अरा॑विषुः शृ॒ण्व ए॑षां प्रो॒थथो॒ अर्व॑तां इव ॥ ६ ॥

उग्राः-इव प्र-वहन्तः सम्-आयमुः साकं युक्ताः वृषणः बिभ्रतः धुरः
यद् श्वसन्तः जग्रसानाः अराविषुः शृण्वे एषां प्रोथथः अर्वताम्-इव ॥ ६ ॥

उग्र दिसणार्‍या पुरुषाप्रमाणे ते आपले काम सहज उरकून टाकतात आणि आतां तर जूं मानेवर घेणार्‍या वृषभाप्रमाणे ते यांनी आपले सर्व बळ एकवटलेले आहे; कारण पहा ते मोठमोठ्याने श्वास टाकीत आणि तोंडांत पाल्याचा घास धरून जोराने ओरडूं लागले आहेत. घोड्याच्या खिंकाळण्याप्रमाणे मला त्यांचा आवाजसुद्धां ऐकूं येत आहे ६.


दशा॑वनिभ्यो॒ दश॑कक्ष्येभ्यो॒ दश॑योक्त्रेभ्यो॒ दश॑योजनेभ्यः ।
दशा॑भीशुभ्यो अर्चता॒जरे॑भ्यो॒ दश॒ धुरो॒ दश॑ यु॒क्ता वह॑द्‌भ्यः ॥ ७ ॥

दशावनि-भ्यः दशकक्ष्येभ्यः दश-योक्त्रेभ्यः दश-योजनेभ्यः
दशाभीशु-भ्यः अर्चत अजरेभ्यः दश धुरः दश युक्ताः वहत्-भ्यः ॥ ७ ॥

त्यांना अधिषवण फलकावर इकडून तिकडे फिरविण्याला दहाजणी असतात, दहा कमरबन्द, तसेंच दहा तणावे किंवा तना, दहा जुंपण्याच्या वाद्या आणि दहा नाडे लागतात, शिवाय दहा जोडण्या किंवा दहा लगाम असा त्यांचा संच असतो. तर न झिजणार्‍या ह्या ग्राव्यांना, दहा धुरांना जोडलेल्या आणि जणींना घेऊन हिण्डणार्‍या ग्राव्यांना उद्देशून एक "अर्क" स्तोत्र म्हणा ७.


ते अद्र॑यो॒ दश॑यन्त्रास आ॒शव॒स्तेषां॑ आ॒धानं॒ पर्ये॑ति हर्य॒तम् ।
त ऊ॑ सु॒तस्य॑ सो॒म्यस्यान्ध॑सोऽं॒शोः पी॒यूषं॑ प्रथ॒मस्य॑ भेजिरे ॥ ८ ॥

ते अद्रयः दश-यन्त्रासः आशवः तेषां आधानं परि एति हर्यतं
ते ओं इति सुतस्य सोम्यस्य अन्धसः अंशोः पीयूषं प्रथमस्य भेजिरे ॥ ८ ॥

हे ग्रावे असे आहेत की त्यांची सामग्री दहा प्रकारची आहे. ते स्वत: शीघ्रसंचारी आहेत म्हणून रस पिळण्याचे त्यांचे जे अतिशय आवडते कार्य ते पाळीपाळीने चालू असते. आणि पिळलेल्या सोमरसाचा, त्या पेयाचा, त्या अमृताचा पहिला घुटका तेच घेतात ८.


ते सो॒मादो॒ हरी॒ इन्द्र॑स्य निंसतेऽं॒शुं दु॒हन्तो॒ अध्या॑सते॒ गवि॑ ।
तेभि॑र्दु॒ग्धं प॑पि॒वान् सो॒म्यं मध्व् इन्द्रो॑ वर्धते॒ प्रथ॑ते वृषा॒यते॑ ॥ ९ ॥

ते सोम-अदः हरी इति इन्द्रस्य निंसते अंशुं दुहन्तः अधि आसते गवि
तेभिः दुग्धं पपि-वान् सोम्यं मधु इन्द्रः वर्धते प्रथते वृष-यते ॥ ९ ॥

ते सोम प्राशन करणारे ग्रावे इंद्राच्या हरिद्वर्ण अश्वाचेहि चुंबन घेतात; आणि पल्लवांचा रस पिळतांना गव्याच्या चर्मावर अधिष्ठित होतात, पण त्यांनी दोहून पिळून काढलेले मधुर सोमपेय वारंवार प्राशन करून इंद्र हा आनंदाने रुष्ट होतो, हर्षाने वृधिंगत होतो आणि वीराला शोभतील अशीच कृत्यें करतो ९.


वृषा॑ वो अं॒शुर्न किला॑ रिषाथ॒नेळा॑वन्तः॒ सदं॒ इत् स्थ॒नाशि॑ताः ।
रै॒व॒त्येव॒ मह॑सा॒ चार॑व स्थन॒ यस्य॑ ग्रावाणो॒ अजु॑षध्वं अध्व॒रम् ॥ १० ॥

वृषा वः अंशुः न किल रिषाथन इळावन्तः सदं इत् स्थन आशि ताः
रैवत्याइव महसा चारवः स्थन यस्य ग्रावाणः अजुषध्वं अध्वरम् ॥ १० ॥

ग्राव्यांनो तुम्हीं चुरतां आहां तो सोमपल्लव वीर्यशाली आहे आणि त्या चुरण्यामुळे तुम्हांला कधींहि अपाय होत नाही. तुम्हांजवळ सदासर्वदा हे हविरन्न आहे म्हणून तुम्हीं नेहमी तृप्तच आहांत आणि संपत्तीच्या तेजाने मण्डित असल्याप्रमाणे ज्या यजमानाच्या अध्वरयागाचा तुम्हीं स्वीकार करितां, त्या यजमानालाहि तुम्ही रमणीयच दिसतां १०.


तृ॒दि॒ला अतृ॑दिलासो॒ अद्र॑योऽश्रम॒णा अशृ॑थिता॒ अमृ॑त्यवः ।
अ॒ना॒तु॒रा अ॒जरा॒ स्थाम॑विष्णवः सुपी॒वसो॒ अतृ॑षिता॒ अतृ॑ष्णजः ॥ ११॥

तृदिलाः अतृदिलासः अद्रयः अश्रमणाः अशृथिताः अमृत्यवः
अनातुराः अजराः स्थ अमविष्णवः सु-पीवसः अतृषिताः अतृष्ण-जः ॥ ११ ॥

ग्राव्यांनो, तुम्हीं दुसर्‍याला छिद्रें पाडतां; पण स्वत: अगदी छिद्ररहित गुळगुळीत आहांत; तुम्हीं कधी थकत नाही, कधी विशविशीत होत नाही; तुम्हांला मृत्यु नाही, कोणतीहि व्याधि नाही, झीज नाही; तुम्हींच जिकडे तिकडे धुमश्चक्री उडवून देतां. तुम्ही चांगले धडधाकट असतां, तुम्हांला तहान नाही आणि कशाचा हव्यास नाही ११.


ध्रु॒वा ए॒व वः॑ पि॒तरो॑ यु॒गे-यु॑गे॒ क्षेम॑कामासः॒ सद॑सो॒ न यु॑ञ्जते ।
अ॒जु॒र्यासो॑ हरि॒षाचो॑ ह॒रिद्र॑व॒ आ द्यां रवे॑ण पृथि॒वीं अ॑शुश्रवुः ॥ १२ ॥

ध्रुवाः एव वः पितरः युगे--युगे क्षेम-कामासः सदसः न युजते
अजुर्यासः हरि-साचः हरिद्रवः आ द्यां रवेण पृथिवीं अशुश्रवुः ॥ १२ ॥

तुमचे वाडवडील जे पर्वत ते युगान युगें अगदी अचल राहिले आहेत. त्यांनाहि त्यांचा योगक्षेम चालवावयाचा असतो; पण ते घरांतून बाहेर येऊन किंवा आपण हो‍ऊन कसलाच खटाटोप करीत नाहीत, तेहि कधी झिजत नाहीत, तेहि सोमपल्लव धारण करण्याने नेहमी हरिद्वर्णच दिसतात आणि आपल्या कंदरांतील श्वापदांच्या गर्जनेने पृथिवीचे प्रदेश दुमदुमून टाकतात १२.


तदिद्व॑द॒न्त्यद्र॑यो वि॒मोच॑ने॒ याम॑न्न् अञ्ज॒स्पा इ॑व॒ घेदु॑प॒ब्दिभिः॑ ।
वप॑न्तो॒ बीजं॑ इव धान्या॒कृतः॑ पृ॒ञ्चन्ति॒ सोमं॒ न मि॑नन्ति॒ बप्स॑तः ॥ १३ ॥

तत् इत् वदन्ति अद्रयः वि-मोचने यामन् अजःपाः-इव घ इत् उपब्दि--भिः
वपन्तः बीजम्-इव धान्य-कृतः पृचन्ति सोमं न मिनन्ति बप्सतः ॥ १३ ॥

सोमरस पाझरूं लागला असतां ग्रावे हेच भाषण करितात, कार्यव्यापृत असतां हुषारी येण्यासाठी पाणी पिणार्‍याप्रमाने मध्येच "हुश्‌" असाहि शब्द काढतात. धान्य पेरणारे कॄषिवल बीं पेरतात त्याप्रमाणे ते सोमाचा रस विखुरतात आणि सोमपल्लव खाऊन टाकीत असतांहि त्याचा रस मात्र कमी हो‍ऊं देत नाहीत १३.


सु॒ते अ॑ध्व॒रे अधि॒ वाचं॑ अक्र॒ता क्री॒ळयो॒ न मा॒तरं॑ तु॒दन्तः॑ ।
वि षू मु॑ञ्चा सुषु॒वुषो॑ मनी॒षां वि व॑र्तन्तां॒ अद्र॑य॒श्चाय॑मानाः ॥ १४ ॥

सुते अध्वरे अधि वाचं अक्रत / आ क्रीळयः न मातरं तुदन्तः
वि सु मुच सुसु-वुषः मनीषां व् इ वर्तन्तां अद्रयः चायमानाः ॥ १४ ॥

अध्वरयागामध्यें सोम पिळल्यावर ते मोठ्याने भाषण करितात आणि खेळकर मुलें आईला देखील बुक्क्या मारतात, त्याप्रमाने ते सोमपल्लवाला चुरतात. (असो) उत्तम रीतीने सोम पिळणार्‍या ग्राव्यांची प्रशंसा आतां पुरे. ग्राव्यांचा सन्मान करावयाचा तो केला आहे; तर त्यांना आतां आपल्या जाग्यावर परत जाऊं दे १४.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९५ (पुरूरवस्-उर्वशी संवादसूक्त)

ऋषी - पुरूरवस् ऐल; उर्वशी : देवता - उर्वशी, पुरूरवस् : छंद - त्रिष्टुभ्


ह॒ये जाये॒ मन॑सा॒ तिष्ठ॑ घोरे॒ वचां॑सि मि॒श्रा कृ॑णवावहै॒ नु ।
न नौ॒ मन्त्रा॒ अनु॑दितास ए॒ते मय॑स्कर॒न् पर॑तरे च॒नाह॑न् ॥ १॥

हये जाये मनसा तिष्ठ घोरे वचांसि मिश्रा कृणवावहै नु
न नौ मन्त्राः अनुदितासः एते मयः करन् पर-तरे चन अहन् ॥ १ ॥

हे पहा, ए प्रिय भार्ये, खरोखर मनापासून जरा थांब ना ! मला घोरांत पाडणार्‍या निष्ठुर स्त्रिये, मला तुझ्याशी थोड्या तरी सुखदु:खाच्या गोष्टी करूं दे. आपल्या दोघांच्याहि मनांतील संकल्प तसेंच मनांतल्या मनांतच राहून गेले नाहीत काय ? त्यांच्यापासून आतांपर्यंत किती तरी सुख झाले, पण आतां पुढे उद्यां कसे होणार ? १.


किं ए॒ता वा॒चा कृ॑णवा॒ तवा॒हं प्राक्र॑मिषं उ॒षसां॑ अग्रि॒येव॑ ।
पुरू॑रवः॒ पुन॒रस्तं॒ परे॑हि दुराप॒ना वात॑ इवा॒हं अ॑स्मि ॥ २ ॥

किं एता वाचा कृणव तव अहं प्र अक्रमिषं उषसां अग्रिया इव
पुरूरवः पुनः अस्तं परा इहि दुः-आपना वातः-इव अहं अस्मि ॥ २ ॥

महाराज ! पण आतां बोलून काय करणार ? त्याचा काय उपयोग ? अगदी पहिल्याने दिसणारी उष:कालची प्रभा जशी जाणारच, तसे मलाहि पण तुम्हांला सोडून गेलेच पाहिजे म्हणून समजा. तर राजा पुरूरवा, आतां परत आपल्या मंदिरात जा; कारण वारा जसा कोंडून धरतां येत नाही, तसे मलाहि कोणी धरून ठेऊं शकणार नाही २.


इषु॒र्न श्रि॒य इ॑षु॒धेर॑स॒ना गो॒षाः श॑त॒सा न रंहिः॑ ।
अ॒वीरे॒ क्रतौ॒ वि द॑विद्युत॒न् नोरा॒ न मा॒युं चि॑तयन्त॒ धुन॑यः ॥ ३ ॥

इषुः न शृइये इषु-धेः असना गो--साः शतसा न रंहिः
अवीरे क्रतौ वि दविद्युतत् न उरा न मायुं चितयन्त धुनयः ॥ ३ ॥

प्रिये ! आतां भात्यातून बाण काढून ते शत्रूवर सोडून मला विजयश्री जिंकतां येणार नाही; तर धेनूंसाठी प्रदेश मिळवावा, शेकडो युद्धांत यश मिळवावें हाहि जोम मजमध्ये कसा राहणार ? याप्रमाणे मीच हतवीर्य झालो म्हणजे माझी कसलीच सत्ता उज्ज्वल तेजाने चमकणार नाही. इतकेंच नाही तर सिंहनाद करणारे माझे वीर देखील नरम पडून मेंढराप्रमाने ओरडूं लागतील ३.


सा वसु॒ दध॑ती॒ श्वशु॑राय॒ वय॒ उषो॒ यदि॒ वष्ट्यन्ति॑गृहात् ।
अस्तं॑ ननक्षे॒ यस्मि॑ञ् चा॒कन् दिवा॒ नक्तं॑ श्नथि॒ता वै॑त॒सेन॑ ॥ ४ ॥

सा वसु दधती श्वशुराय वयः उषः यदि वष्टि अन्ति-गृहात्
अस्तं ननक्षे यस्मिं चाकन् दिवा नक्तं श्नथिता वैतसेन ॥ ४ ॥

हे उषे, मजवर जर हिचे खरोखर प्रेम होते, तर आपल्या अन्तर्गृहांत राहूनहि आपल्या श्वशुराला त्याच्या आशेचे एक तरी निधान (एक तरी नातू) हिने खास द्यावयाचा होता. ज्या ज्या ठिकाणी जाण्याची हिची लहर लागली, त्या त्या वेळी एका मंदिरातून ही दुसर्‍या मंदिरात जात असे आणि मीहि रात्रंदिवस तिच्याबरोबर राहून विलास करून तिला श्रान्त करीत असे ४.


त्रिः स्म॒ माह्नः॑ श्नथयो वैत॒सेनो॒त स्म॒ मेऽ॑व्यत्यै पृणासि ।
पुरू॑र॒वोऽ॑नु ते॒ केतं॑ आयं॒ राजा॑ मे वीर त॒न्व१स्तदा॑सीः ॥ ५ ॥

त्रिः स्म माह्नः श्नथयः वैतसेन उत स्म मे अव्यत्यै पृणासि
पुरूरवः अनु ते केतं आयं राजा मे वीर तन्वः तत् आसीः ॥ ५ ॥

हे खरेंच ! तूं दिवसांतून तीन तीन वेळां मला भेटून विलास करीत होतास आणि मला दुसरी कोणीही सवत न करितां मलाच प्रसन्न ठेवीत होतास - पण हेंहि खरें की तू असा वागलास म्हणूनच तुझ्या मर्जीप्रमाणे मी राहिले, आणि म्हणूनच हे वीरा, तू माझ्या जिवाचा त्या वेळी मालक होतास ५.


या सु॑जू॒र्णिः श्रेणिः॑ सु॒म्नाअ॑पिर्ह्र॒देच॑क्षु॒र्न ग्र॒न्थिनी॑ चर॒ण्युः ।
ता अ॒ञ्जयो॑ऽरु॒णयो॒ न स॑स्रुः श्रि॒ये गावो॒ न धे॒नवो॑ऽनवन्त ॥ ६ ॥

या सु-जूर्णिः श्रेणिः सुम्ने--आपिः ह्रदे--चक्षुः न ग्रन्थिनाई चरण्युः
ताः अजयः अरुणयः न सस्रुः श्रिये गावः न धेनवः अनवन्त ॥ ६ ॥

पण आतां काय ? त्या वेळच्या माझ्या बरोबरच्या अप्सरा सख्या तरी कोठे आहेत ? ती सुजूर्णि, ती श्रेणी, ती सुम्न‍आपी, ती हृदेचक्षु तशीच ती चंचल ग्रन्थिनी ह्या कोठेच दिसत नाहीत. त्या अरुणकान्ति अलंकारभूषित सख्या आतां इकडे तिकडे वावरतांना दिसल्या नाहीत आणि माझे वैभवच अशा ज्या धेनू आहेत त्याहि दु:खामुळे हंबारत नाहीत ! ६.


सं अ॑स्मि॒ञ् जाय॑मान आसत॒ ग्ना उ॒तें अ॑वर्धन् न॒द्य१ः स्वगू॑र्ताः ।
म॒हे यत् त्वा॑ पुरूरवो॒ रणा॒याव॑र्धयन् दस्यु॒हत्या॑य दे॒वाः ॥ ७ ॥

सं अस्मिन् जायमाने आसत ग्नाः उत ईं अवर्धन् नद्यः स्व-गूर्ताः
महे यत् त्वा पुरूरवः रणाय अवर्धयन् दस्यु-हत्याय देवाः ॥ ७ ॥

अहाहा ! हा पुरूरवा जन्माला आला तेव्हांचा थाट काय वर्णावा त्या वेळी येथे अप्सरा जमल्या; आपल्याच तोर्‍यात वाहणार्‍या नद्यांनी देखील ह्या पुरूरव्याचे कोडकौतुक केले. सर्व हेच म्हणत कीं राजा पुरूरवा, धर्मभ्रष्ट दुष्टांना तूं ठार मारावेस आणि त्याकरितां त्यांच्याशी भयंकर युद्धहि करावेस म्हणूनच देवांनी तुला लहानाचा मोठा केला ७.


सचा॒ यदा॑सु॒ जह॑ती॒ष्व् अत्कं॒ अमा॑नुषीषु॒ मानु॑षो नि॒षेवे॑ ।
अप॑ स्म॒ मत् त॒रस॑न्ती॒ न भु॒ज्युस्ता अ॑त्रसन् रथ॒स्पृशो॒ नाश्वाः॑ ॥ ८ ॥

सचा यत् आसु जहतीषु अत्कं अमानुषीषु मानुषः नि-सेवे
अप स्म मत् तरसन्ती न भुज्युः ताः अत्रसन् रथ-स्पृशः न अश्वाः ॥ ८ ॥

आणि म्हणूनच मला वाटते की दिव्य अशा ह्या ज्या अप्सरा त्यांनी आपले दिव्य रूप टाकले, आणि म्हणूनच मजसारख्या मानवी राजाला त्यांचा उपभोग घेतां आला; पण त्याच आतां भ्यालेल्या हरिणीप्रमाने मला पाहून दूर पळूं लागल्या आणि रथाचा स्पर्श होतांच नवखा अश्व जसा चौखूर उडतो, त्याप्रमाणे सैरावैरां धांवूं लागल्या ८.


यदा॑सु॒ मर्तो॑ अ॒मृता॑सु नि॒स्पृक् सं क्षो॒णीभिः॒ क्रतु॑भि॒र्न पृ॒ङ्क्ते ।
ता आ॒तयो॒ न त॒न्वः शुम्भत॒ स्वा अश्वा॑सो॒ न क्री॒ळयो॒ दन्द॑शानाः ॥ ९ ॥

यत् आसु मर्तः अमृतासु नि-स्पृक् सं क्षोणीभिः क्रतु-भिः न पृङ्क्ते
ताः आतयः न तन्वः शुम्भत स्वाः अश्वासः न क्रीळयः दन्दशानाः ॥ ९ ॥

जेव्हां मर्त्य मानव ह्या स्वर्गीय अप्सरांच्या ठिकाणी आपल्या प्रेमवासना निगडित करतो, पण पृथ्वीवरील सत्तेच्या जोरावर किंवा पराक्रमाच्या जोरावर त्यांना वश करूं शकत नाहे, अशा परिस्थितीमध्ये हंसीप्रमाणे त्या आपली शरीरें नटवून, अश्व जसा ऐटीने आपलाच लगाम चावतो, त्याप्रमाने आपलेच ओष्ट आंवळून इकडून तिकडे उगाच ठुमकत मुरडत मात्र जात असतात ९.


वि॒द्युन् न या पत॑न्ती॒ दवि॑द्यो॒द्‌भर॑न्ती मे॒ अप्या॒ काम्या॑नि ।
जनि॑ष्टो अ॒पो नर्यः॒ सुजा॑तः॒ प्रोर्वशी॑ तिरत दी॒र्घं आयुः॑ ॥ १० ॥

वि-द्युत् न या पतन्ती दविद्योत् भरन्ती मे अप्या काम्यानि
जनिष्टो इति अपः नर्यः सु-जातः प्र उर्वशी तिरत दीर्घं आयुः ॥ १० ॥

वीज पडतांना जशी एकदम झक्क चमकते तशीच तूंहि चमकलीस. माझ्या वासना तृप्त करतांना क्षणभरच, फक्त क्षणभरच चमकलीस; पण आपले ध्येय कोणते, आपल्याला एक शूर, देखणा असा उत्तम पुत्र व्हावा हे ध्येय होते ना ? याप्रमाणे घडले तरच मला उर्वशीने दीर्घायुष्य दिले असे होईल १०.


ज॒ज्ञि॒ष इ॒त्था गो॒पीथ्या॑य॒ हि द॒धाथ॒ तत् पु॑रूरवो म॒ ओजः॑ ।
अशा॑सं त्वा वि॒दुषी॒ सस्मि॒न्न् अह॒न् न म॒ आशृ॑णोः॒ किं अ॒भुग् व॑दासि ॥ ११॥

जजिषे इत्था गो--पीथ्याय हि दधाथ तत् पुरूरवः मे ओजः
अशासं त्वा विदुषी सस्मिन् अहन् न मे आ अशृणोः किं अभुक् वदासि ॥ ११ ॥

ठीक ! सोमयाग करण्यासाठी आणि पृथ्वीचे पालन करण्यासाठी तूंच पुत्ररूपाने उत्पन्न झाला आहेस; राजा पुरूरवा, ते तुझे तेज तू मजजवळ ठेविले होतेंसच. मला ही गोष्ट माहीत झाली त्याच दिवशी हे राजा, मी तुजजवळ ती सांगितली देखील; पण ते तुम्ही ऐकले नसावें; असें आहे तर आतां तळमळून कां बोलतां ११.


क॒दा सू॒नुः पि॒तरं॑ जा॒त इ॑च्छाच् च॒क्रन् नाश्रु॑ वर्तयद्विजा॒नन् ।
को दम्प॑ती॒ सम॑नसा॒ वि यू॑यो॒दध॒ यद॒ग्निः श्वशु॑रेषु॒ दीद॑यत् ॥ १२ ॥

कदा सूनुः पितरं जातः इच्चात् चक्रन् न अश्रु वर्तयत् वि-जानन्
कः दम्पती इतिदम्-पती स-मनसा वि यूयोत् अध यत् अग्निः श्वशुरेषु दीदयत् ॥ १२ ॥

काय पुत्र झाला ? पण तो बापाला ओळखूं लागण्याइतका मोठा केव्हां होणार ? तो रडतांना पाहून बाप त्याचे अश्रु केव्हां पुसणार ? एकमेकांवर अकृत्रिम प्रेम करणार्‍या जोडप्याची ताटातूट-जोपर्यंत श्वशुरगृही त्यांचा गृह्याग्नी प्रज्वलित राहिला असेल तोपर्यंत तरी कोण करील ? १२.


प्रति॑ ब्रवाणि व॒र्तय॑ते॒ अश्रु॑ च॒क्रन् न क्र॑न्ददा॒ध्ये शि॒वायै॑ ।
प्र तत् ते॑ हिनवा॒ यत् ते॑ अ॒स्मे परे॒ह्यस्तं॑ न॒हि मू॑र॒ मापः॑ ॥ १३ ॥

प्रति ब्रवाणि वर्तयते अश्रु चक्रन् न क्रन्दत् आध्ये शिवायै
प्र तत् ते हिनव यत् ते अस्मे इति परा इहि अस्तं नहि मूर मा आपः ॥ १३ ॥

इतकेंच आहे तर मी तुला असे वचन देते की तो रडला तर त्याचे अश्रु मी पुशीन. तो रडूं लागला तर त्याची समजून करून त्याला रडूं देणार नाही. त्याच्या कल्याणाची चिंता मी स्वत: वाहीन; एवढे मला करतां ये‍ईल आणि तसे वचन मी देते; तर आता घरी परत जा; विरहशोकाने मूढ झालेल्या राजा, कांही झाले तरी मी तुला परत मिळणे शक्य नाही १३.


सु॒दे॒वो अ॒द्य प्र॒पते॒दना॑वृत् परा॒वतं॑ पर॒मां गन्त॒वा उ॑ ।
अधा॒ शयी॑त॒ निरृ॑तेरु॒पस्थेऽ॑धैनं॒ वृका॑ रभ॒सासो॑ अ॒द्युः ॥ १४ ॥

सु-देवः अद्य प्र-पतेत् अनावृत् परावतं परमां गन्तवै ओं इति
अध शयीत निः-ऋतेः उप-स्थे अध एनं वृकाः रभसासः अद्युः ॥ १४ ॥

काय ? मग तुझा जो मी पतिरूप उत्कृष्ट देव तो एकूणच आजच उघडा पडावा ना ? ह्या पृथ्वीच्या अगदी शेवटच्या सीमेवर जाऊन तेथे आपटावा ना ? काय ! मी दुर्गतीच्या अगदी तळाशी जाऊन आदळावे त्यापेक्षां अशा स्थितीमध्ये ह्या प्राण्याला लांडग्यांनी ताबडतोब फाडून खाल्लेले काय वाईट ? १४.


पुरू॑रवो॒ मा मृ॑था॒ मा प्र प॑प्तो॒ मा त्वा॒ वृका॑सो॒ अशि॑वास उ क्षन् ।
न वै स्त्रैणा॑नि स॒ख्यानि॑ सन्ति सालावृ॒काणां॒ हृद॑यान्ये॒ता ॥ १५ ॥

पुरूरवः मा मृथाः मा प्र पप्तः मा त्वा वृकासः अशिवासः ओं इति क्षन्
न वै स्त्रैणानि सख्यानि सन्ति सालावृकाणां हृदयानि एता ॥ १५ ॥

राजा पुरूरवा, काय हे ? अशा रीतीने तूं कां मरावेस ? तर असा व्यर्थ मरूं नकोस; निराश होऊनसुद्धां कोठें तरी निघून जाऊं नकोस; दुष्ट अमंगळ लांडग्यांच्या भक्ष्यस्थानी देखील पडूं नकोस ! विचार कर स्त्रियांचे प्रेमसंपादन केवळ विषयसुखासाठी नसतें. अशी विलासी जनांची जी हृदये ती माणसांची नव्हेत, कुत्र्यालांडग्यांचीच ती हृदये होत १५.


यद्विरू॒पाच॑रं॒ मर्त्ये॒ष्व् अव॑सं॒ रात्रीः॑ श॒रद॒श्चत॑स्रः ।
घृ॒तस्य॑ स्तो॒कं स॒कृदह्न॑ आश्नां॒ तादे॒वेदं ता॑तृपा॒णा च॑रामि ॥ १६ ॥

यत् वि-रूपा अचरं मर्त्येषु अवसं रात्रीः शरदः चतस्रः
घृतस्य स्तोकं सकृत् अह्नः आश्नां तात् एव इदं ततृपाणा चरामि ॥ १६ ॥

तर मजकडे पहा, मी अनेक प्रकारची रुपे घेऊन ह्या मृत्युलोकांत संचार करीत होते, त्यांतच चार वर्षेपर्यंत रात्रंदिवस मी तुझ्या संगतीमध्ये राहिले, पण विषयरूप घृताचा घुटका मी फक्त एकच दिवस एकदा घेतला, तरी तेवढ्याने मी तृप्त झाले आणि आतां चालले १६.


अ॒न्त॒रि॒क्ष॒प्रां रज॑सो वि॒मानीं॒ उप॑ शिक्षाम्यु॒र्वशीं॒ वसि॑ष्ठः ।
उप॑ त्वा रा॒तिः सु॑कृ॒तस्य॒ तिष्ठा॒न् नि व॑र्तस्व॒ हृद॑यं तप्यते मे ॥ १७ ॥

अन्तरिक्ष-प्रां रजसः वि-मानीं उप शिक्षामि उर्वशीं वसिष्ठः
उप त्वा रातिः सु-कृतस्य तिष्ठात् नि वर्तस्व हृदयं तप्यते मे ॥ १७ ॥

ठीक आहे अन्तरिक्षव्यापिनी आणि रजोलोक निवासिनी जी तूं उर्वशी, त्या तुला मी उदात्त प्रेमी हो‍ऊन वश करून घे‍ईनच घे‍ईन. माझ्या सत्क्रियेचे कांही फळ असेल तर तेंच तुझ्याजवळ उभे राहो. आतां जास्त बोलत नाही. माझें हृदय तापून गेले आहे हे जाणून तरी परत ये १७.


इति॑ त्वा दे॒वा इ॒म आ॑हुरैळ॒ यथें॑ ए॒तद्‌भव॑सि मृ॒त्युब॑न्धुः ।
प्र॒जा ते॑ दे॒वान् ह॒विषा॑ यजाति स्व॒र्ग उ॒ त्वं अपि॑ मादयासे ॥ १८ ॥

इति त्वा देवाः इमे आहुः ऐळ यथा ईं एतत् भवसि मृत्यु-बन्धुः
प्र-जा ते देवान् हविषा यजाति स्वः-गे ओं इति त्वं अपि मादयासे ॥ १८ ॥

बरें तर, आता सर्व देवच तुला हे सांगत आहेत की, याप्रमाणे तुझी स्थिति झाली आणि मृत्यूशी तुझे सख्य जुळले अर्थात्‌ तूं इहलोक सोडलास म्हणजे तुझे पुत्र देवाचे यजन करतील आणि तूंहि स्वर्गलोकी जाऊन सुखानंद भोगशील १८.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९६ (इंद्राश्वसूक्त)

ऋषी - वरु आंगिरस अथवा सर्वहरि ऐंद्र : देवता - हरि : छंद - १२-१३ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - जगती


प्र ते॑ म॒हे वि॒दथे॑ शंसिषं॒ हरी॒ प्र ते॑ वन्वे व॒नुषो॑ हर्य॒तं मद॑म् ।
घृ॒तं न यो हरि॑भि॒श्चारु॒ सेच॑त॒ आ त्वा॑ विशन्तु॒ हरि॑वर्पसं॒ गिरः॑ ॥ १॥

प्र ते महे विदथेशम्सिषं हरी इति प्र ते वन्वे वनुषः हर्यतं मदं
घृतं न यः हरि-भि ः चारु सेचत आ त्वा विशन्तु हरि-वर्पसं गिरः ॥ १ ॥

ह्या थोर यज्ञसभेमध्ये मी तुझ्या दोन्ही हरिद्वर्ण अश्वांची प्रशंसा करितो; आणि तुला प्रिय जो हर्षकारी सोमरस तो मी प्रतिस्पर्ध्यांपासून जिंकून आणतो; तुझ्या हरित्‌ किरण अश्वांच्या योगाने तुझा हर्ष घृताप्रमाणे पुष्टिकारक वृष्टि करतो; तर हरित्‌ किरणांनी व्याप्त अशी जी तुझी मूर्ति (शरीर) तिच्या ठिकाणी माझी कवने प्रविष्ट होवोत १.


हरिं॒ हि योनिं॑ अ॒भि ये स॒मस्व॑रन् हि॒न्वन्तो॒ हरी॑ दि॒व्यं यथा॒ सदः॑ ।
आ यं पृ॒णन्ति॒ हरि॑भि॒र्न धे॒नव॒ इन्द्रा॑य शू॒षं हरि॑वन्तं अर्चत ॥ २ ॥

हरिं हि योनिं अभि ये सम्-अस्वरन् हिन्वन्तः हरी इति दिव्यं यथा सदः
आ यं पृणन्ति हरि-भिः न धेनवः इन्द्राय शूषं हरि-वन्तं अर्चत ॥ २ ॥

हरित्‌ तेजोमय स्थानाची महती ज्यांनी वर्णन केली, ज्यांनी दिव्य लोकांचे वर्नन केले तसेंच त्यांनी हरित्‌ अश्वांनाहि प्रोत्साहन देऊन स्तुतिघोष केला. हरित्‌वर्ण सोमवल्लीचा रस ज्याप्रमाणे तृप्त करतो, त्याप्रमाणे ज्या इंद्राला यज्ञधेनू आपल्या दुग्धाने तृप्त करितात, त्या हरित्‌ कान्तियुक्त इंद्राप्रीत्यर्थ आवेशपूर्ण स्तोत्र म्हणा २.


सो अ॑स्य॒ वज्रो॒ हरि॑तो॒ य आ॑य॒सो हरि॒र्निका॑मो॒ हरि॒रा गभ॑स्त्योः ।
द्यु॒म्नी सु॑शि॒प्रो हरि॑मन्युसायक॒ इन्द्रे॒ नि रू॒पा हरि॑ता मिमिक्षिरे ॥ ३ ॥

सः अस्य वज्रः हरितः यः आयसः हरिः नि-कामः हरिः आ गभस्त्योः
द्युम्नी सु-शिप्रः हरिमन्यु-सायकः इन्द्रे नि रूपा हर् इता मिमिक्षिरे ॥ ३ ॥

ते त्याचे वज्र पोलादाचे खरे, पण ते हरित्‌ तेजानेच चकाकत असते. असे ते हरित्‌ वर्णाचे अत्यंत मनोहर वज्र हरित्‌ दीप्तियुक्त इंद्र हा आपल्या भुजदण्डावर वागवितो. शिवाय उत्कृष्ट शिरस्त्राण चढविलेल्या ज्वलत्‌ तेजस्क इंद्राचा प्राणघातक भयंकर जो आवेश तोच बाण आहे; एवंच सर्व हरित्‌ वर्ण शक्ति इंद्राच्या स्वरूपांतच मिसळून गेल्या आहेत ३.


दि॒वि न के॒तुरधि॑ धायि हर्य॒तो वि॒व्यच॒द्वज्रो॒ हरि॑तो॒ न रंह्या॑ ।
तु॒ददहिं॒ हरि॑शिप्रो॒ य आ॑य॒सः स॒हस्र॑शोका अभवद्धरिम्भ॒रः ॥ ४ ॥

दिवि न केतुः अधि धायि हर्यतः विव्यचत् वज्रः हरितः न रंह्या
तुदत् अहिं हरि-शिप्रः यः आयसः सहस्र-शोकाः अभवत् हरिम्-भरः ॥ ४ ॥

हरित्‌‍ वर्णाचा मनोहर ध्वज आकाशांत फडकावा त्याप्रमाने इंद्राचे वज्र आकाशांत चोहोंकडे तळपत आहे. जणों काय वेगाने गरगर फिरणार्‍या पाण्याच्या हरित्‌ वर्ण लाटाच; आणि हरित्‌ वर्ण शिरस्त्राण चढविलेल्या इंद्राने जेव्हां अहीला वज्राने भोंसकले, तेव्हां तो इंद्र सहस्त्रावधि तेजोवलयांनी शोभू लागला ४.


त्वं-त्वं॑ अहर्यथा॒ उप॑स्तुतः॒ पूर्वे॑भिरिन्द्र हरिकेश॒ यज्व॑भिः ।
त्वं ह॑र्यसि॒ तव॒ विश्वं॑ उ॒क्थ्य१ं असा॑मि॒ राधो॑ हरिजात हर्य॒तम् ॥ ५ ॥

त्वम्-त्वं अहर्यथाः उप-स्तुतः पूर्वेभिः इन्द्र हरि-केश यज्व-भिः
त्वं हर्यसि तव विश्वं उक्थ्यं असामि राधः हरि-जात हर्यतम् ॥ ५ ॥

हरित्‌ तेजस्क इंद्रा ! पूर्वींच्या यज्ञकर्त्यांनी तुझा गौरव केला; तुझीच स्तुति केली; कारण ज्या विश्वावर तूं प्रेम करतोस, ते हे प्रशंसनीय असे सर्व विश्व तुझेंच आहे. सर्व उक्थ स्तवनहि तुझेंच आहे. हे हरित्‌स्वरूपा देवा, भक्ताला प्रिय असा जो तुझा कृपाप्रसाद तो कधीं अर्धवट नसायचाच ५.


ता व॒ज्रिणं॑ म॒न्दिनं॒ स्तोम्यं॒ मद॒ इन्द्रं॒ रथे॑ वहतो हर्य॒ता हरी॑ ।
पु॒रूण्य॑स्मै॒ सव॑नानि॒ हर्य॑त॒ इन्द्रा॑य॒ सोमा॒ हर॑यो दधन्विरे ॥ ६ ॥

ता वज्रिणं मन्दिनं स्तोम्यं मदे इन्द्रं रथे वहतः हर्यता हरी इति
पुरूणि अस्मै सवनानि हर्यते इन्द्राय सोमाः हरयः दधन्विरे ॥ ६ ॥

वज्रधर, आनंदमग्न आणि स्तवनयोग्य अशा इंद्राला, - तो हर्षाने उत्फुल्ल झाला म्हणजे त्याचे हरित्‌वर्ण अश्व रथांतून (यज्ञाकडे) घेऊन जातात, आणि म्हणूनच हा हरित्‌वर्ण सोमाचा रस इंद्रापुढे आणून ठेविला आहे ६.


अरं॒ कामा॑य॒ हर॑यो दधन्विरे स्थि॒राय॑ हिन्व॒न् हर॑यो॒ हरी॑ तु॒रा ।
अर्व॑द्‌भि॒र्यो हरि॑भि॒र्जोषं॒ ईय॑ते॒ सो अ॑स्य॒ कामं॒ हरि॑वन्तं आनशे ॥ ७ ॥

अरं कामाय हरयः दधन्विरे स्थिराय हिन्वन् हरयः हरी इति तुरा
अर्वत्-भिः यः हरि-भिः जोषं ईयते सः अस्य कामं हर् इ-वन्तं आनशे ॥ ७ ॥

भक्तांचा मनोरथ सिद्ध व्हावा म्हणून हरिद्वर्ण सोमाचे रस येथे इंद्रापुढे ठेविले आहेत. तेच रस, जो इंद्र युद्धांत स्थिरच राहतो त्याच्या इच्छेनुरूप त्याच्या हरित्‌ वर्ण अश्वांना यज्ञमंदिराकडे वळवितात आणि इंद्रसुद्धां त्या हरित्‌तेजस्क अश्वांच्या योगाने आवेशाने तन्मय होतो आणि ह्या त्याच्या भक्ताची रसार्पणाची कामना तो पूर्ण करतो ७.


हरि॑श्मशारु॒र्हरि॑केश आय॒सस्तु॑र॒स्पेये॒ यो ह॑रि॒पा अव॑र्धत ।
अर्व॑द्‌भि॒र्यो हरि॑भिर्वा॒जिनी॑वसु॒रति॒ विश्वा॑ दुरि॒ता पारि॑ष॒द्धरी॑ ॥ ८ ॥

हरि-श्मशारुः हरि-केशः आयसः तुरः-पेये यः हरि-पाः अवधर्त
अर्वत्-भिः यः हरि-भिः वाजिनी-वसुः अति विश्वा दुः-इता पारिषत् हरी इति ॥ ८ ॥

हरित्‌ तेजाने श्मश्रू प्रकाशित झालेला आणि हरित्‌ तेजोमय केशयुक्त जो वज्रधर, हरिदश्व-इंद्र तो तत्काळ अर्पण केलेल्या सोमरसाने जेव्हां हृष्ट झाला, तेव्हां त्या सत्वैश्वर्यविभूषित इंद्राने आपल्या हरिद्वर्ण अश्वांच्या योगाने सर्व संकटांतून भक्तांना पार नेले ८.


स्रुवे॑व॒ यस्य॒ हरि॑णी विपे॒ततुः॒ शिप्रे॒ वाजा॑य॒ हरि॑णी॒ दवि॑ध्वतः ।
प्र यत् कृ॒ते च॑म॒से मर्मृ॑ज॒द्धरी॑ पी॒त्वा मद॑स्य हर्य॒तस्यान्ध॑सः ॥ ९ ॥

स्रुवाइव यस्य हरिणी इति वि-पेततुः शिप्रेइति वाजाय हरिणी इति दविध्वतः
प्र यत् कृते चमसे मर्मृजत् हरी इति पीत्वा मदस्य हर्यतस्य अन्धसः ॥ ९ ॥

(अग्नीकडे) स्रुवा जातात, त्याप्रमाणे इंद्राच्या हरिद्वर्ण हरिणी परोपरीने उड्या मारीत दौडत जात असतात; आणि त्याच्या शिरस्त्राणावर लावलेले हरिद्वर्ण तुरे एकसारखे फडफडत असतात; ते तुरे झाडून तो सत्वसंगरासाठी सज्ज होतो; तेव्हां हर्षकारी आणि प्रिय असा सोमरस चषकांतून प्राशन करून इंद्र हा आपल्या हरित्‌ अश्वांच्या पाठीवर थाप मारून हात फिरवितो ९.


उ॒त स्म॒ सद्म॑ हर्य॒तस्य॑ प॒स्त्योख्प् रत्यो॒ न वाजं॒ हरि॑वाँ अचिक्रदत् ।
म॒ही चि॒द्धि धि॒षणाह॑र्य॒दोज॑सा बृ॒हद्वयो॑ दधिषे हर्य॒तश्चि॒दा ॥ १० ॥

उत स्म सद्म हर्यतस्य पस्त्योः अत्यः न वाजं हरि-वान् अच् इक्रदत्
मही चित् हि धिषणा अहर्यत् ओजसा बृहत् वयः दधिषे हयर्तः चित् आ ॥ १० ॥

हे त्या प्रेमळ इंद्राचे आसन; आणि तडफदार अश्ववीर संग्रामप्रसंगी गर्जना करतो त्याप्रमाने इंद्राने ह्या द्यावापृथिवीच्या पोकळीत आपला सिंहनाद दुमदुमून सोडला, तेव्हां त्याची उदात्त दृढ इच्छा त्याच्या तेजस्वितेमुळे श्रेष्ठ ठरली; तर हे स्तोत्रकर्त्या आतां भक्तप्रेमी इंद्रापासून उत्कृष्ट आवेशाचा लाभ तुला होणारे हे खचित १०.


आ रोद॑सी॒ हर्य॑माणो महि॒त्वा नव्यं॑-नव्यं हर्यसि॒ मन्म॒ नु प्रि॒यम् ।
प्र प॒स्त्यं असुर हर्य॒तं गोरा॒विष् कृ॑धि॒ हर॑ये॒ सूर्या॑य ॥ ११॥

आ रोदसी इति हर्यमाणः महि-त्वा नव्यम्-नव्यं हर्यसि मन्म नु प्रियं
प्र पस्त्यं असुर हर्यतं गोः आविः कृधि हरये सूर्याय ॥ ११ ॥

आपल्या प्रभावाने रोदसींना मनोहर स्वरूप देऊन, प्रत्यही प्रिय, अपूर्व आणि मननीय स्तोत्राची अपेक्षा भक्तापासून करतोस; पण हे परात्परा, हरित्‌ किरण सूर्य आम्हांला दृग्गोचर व्हावा म्हणून त्याच्या प्रकाशधेनूचे निवासस्थान तूं प्रथम प्रकट कर ११.


आ त्वा॑ ह॒र्यन्तं॑ प्र॒युजो॒ जना॑नां॒ रथे॑ वहन्तु॒ हरि॑शिप्रं इन्द्र ।
पिबा॒ यथा॒ प्रति॑भृतस्य॒ मध्वो॒ हर्य॑न् य॒ज्ञं स॑ध॒मादे॒ दशो॑णिम् ॥ १२ ॥

आ त्वा हर्यन्तं प्र-युजः जनानां रथे वहन्तु हरि-शिप्रं इन्द्र
पिब यथा प्रति-भृतस्य मध्वः हर्यन् यजं सध-मादे दश-ओणिम् ॥ १२ ॥

हे हरित्‌ मुकुटधरा इंद्रा, सर्व जनतेच्या आकांक्षा तुज भक्तप्रेमी देवाला रथांतून इकडेच घेऊन येवोत; आणि नंतर तूं हर्षकर सोमाच्या सवनप्रसंगी हाताच्या ह्या दहा अंगुलींनी धरलेली आहुति देऊन संपादिलेला यज्ञ मान्य करून घे; आणि अर्पण केलेला मधुर रस प्राशन कर १२.


अपाः॒ पूर्वे॑षां हरिवः सु॒तानां॒ अथो॑ इ॒दं सव॑नं॒ केव॑लं ते ।
म॒म॒द्धि सोमं॒ मधु॑मन्तं इन्द्र स॒त्रा वृ॑षञ् ज॒ठर॒ आ वृ॑षस्व ॥ १३ ॥

अपाः पूर्वेषां हरि-वः सुतानां अथो इति इदं सवनं केवलं ते
ममद्धि सोमं मधु-मन्तं इन्द्र सत्रा वृषन् जठरे आ वृषस्व ॥ १३ ॥

हे हरिदश्वा, अशाच रीतीने पूर्वी तूं सोमरस प्राशन केला आहेस म्हणून हेंहि सवन केवळ तुझ्याच प्रीत्यर्थ केले आहे; तर हे मनोरथवर्षका, ह्या मधुर सोमरसाने हृष्ट हो आणि आपल्या जठरामध्ये त्याला स्थान दे १३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९७ (ओषधिसूक्त)

ऋषी - भिषग् आथर्वण - देवता - ओषधि : छंद - अनुष्टुभ्


या ओष॑धीः॒ पूर्वा॑ जा॒ता दे॒वेभ्य॑स्त्रियु॒गं पु॒रा ।
मनै॒ नु ब॒भ्रूणां॑ अ॒हं श॒तं धामा॑नि स॒प्त च॑ ॥ १॥

याः ओषधीः पूर्वा जाता देवेभ्यः त्रि-युगं पुरा
मनै नु बभ्रूणां अहं शतं धामानि सप्त च ॥ १ ॥

ज्या औषधि दिव्य जनांच्या देखील अगोदर तीन युगे उत्पन्न झाल्या त्या ह्या चित्रविचित्र औषधींच्या सात आणि शंभर जातींचा अभ्यास मी विचारपूर्वक करीन १.


श॒तं वो॑ अम्ब॒ धामा॑नि स॒हस्रं॑ उ॒त वो॒ रुहः॑ ।
अधा॑ शतक्रत्वो यू॒यं इ॒मं मे॑ अग॒दं कृ॑त ॥ २ ॥

शतं वः अम्ब धामानि सहस्रं उत वः रुहः
अध शत-क्रत्वः यूयं इमं मे अगदं कृत ॥ २ ॥

बाई औषधींनो, तुमचे निरनिराळे गुणधर्म शेंकडो (=असंख्य) आहेत, तुमच्या अंकुराचे भेद हजार आहेत, अहो, शेंकडो प्रकारच्या सामर्थ्यांनी युक्त वनस्पतींनो, हे माझे रोगनाशक औषध सिद्ध होईल असे करा २.


ओष॑धीः॒ प्रति॑ मोदध्वं॒ पुष्प॑वतीः प्र॒सूव॑रीः ।
अश्वा॑ इव स॒जित्व॑रीर्वी॒रुधः॑ पारयि॒ष्ण्वः ॥ ३ ॥

ओषधीः प्रति मोदध्वं पुष्प-वतीः प्र-सूवरीः
अश्वाः-इव स-जित्वरीः वीरुधः पारयिष्ण्वः ॥ ३ ॥

तुम्ही ह्याचा आनंदच माना की कांही औषधींना जरी नुसती फुलेंच येतात तर काहींना फळेंहि येतात; तथापि सर्व प्रकारच्या औषधि अश्ववीराप्रमाणे रोगांना जिंकून चिरडून टाकतात आणि कांही वेलीलता रोग्यांना घोर रुग्णावस्थेंतून बचावून नेतात ३.


ओष॑धी॒रिति॑ मातर॒स्तद्वो॑ देवी॒रुप॑ ब्रुवे ।
स॒नेयं॒ अश्वं॒ गां वास॑ आ॒त्मानं॒ तव॑ पूरुष ॥ ४ ॥

ओषधीः इति मातरः तत् वः देवीः उप ब्रुवे
सनेयं अश्वं गां वासः आत्मानं तव पुरुष ॥ ४ ॥

औषधींनो, देवींनो, मातु:श्रींनो, तुमच्यासमक्ष मी हेंहि सांगतो की, हे रोगार्त मानवा, तुझा जीव मी वांचवीन, मग अश्व, धेनू, वस्त्रें तर मिळवीनच ४.


अ॒श्व॒त्थे वो॑ नि॒षद॑नं प॒र्णे वो॑ वस॒तिष् कृ॒ता ।
गो॒भाज॒ इत् किला॑सथ॒ यत् स॒नव॑थ॒ पूरु॑षम् ॥ ५ ॥

अश्वत्थे वः नि-सदनं पर्णे वः वसतिः कृता
गो--भाजः इत् किल असथ यत् सनवथ पुरुषम् ॥ ५ ॥

औषधींनो, तुमचा वास अश्वत्थ वृक्षावर असतो. तुमचा प्रभाव अश्वत्थवृक्षामध्येंहि आढळतो. त्याचप्रमाणे तुमची वस्ती पळसांच्या वनांमध्येंहि असते. पण जेव्हां तुम्ही रोग्याला वांचवाल, तेव्हांच तुम्ही गो-प्रद (=प्रभावशालिनी आणि धेनू देणार्‍या) ठराल ५.


यत्रौष॑धीः स॒मग्म॑त॒ राजा॑नः॒ समि॑ताव् इव ।
विप्रः॒ स उ॑च्यते भि॒षग् र॑क्षो॒हामी॑व॒चात॑नः ॥ ६ ॥

यत्र ओषधीः सम्-अग्मत राजानः समितौ-इव
विप्रः सः उच्यते भिषक् रक्षः-हा अमीव-चातनः ॥ ६ ॥

लोकसभेमध्ये जसे राजे अधिष्ठित होतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी औषधि (आपले ज्ञान ठेवून) एकत्रित होतात त्याच ज्ञानी पुरुषाला वैद्य असे नांव आहे. पिशाच, राक्षस यांचा नाश तोच करतो आणि व्याधींचाहि नि:पात करतो ६.


अ॒श्वा॒व॒तीं सो॑माव॒तीं ऊ॒र्जय॑न्तीं॒ उदो॑जसम् ।
आवि॑त्सि॒ सर्वा॒ ओष॑धीर॒स्मा अ॑रि॒ष्टता॑तये ॥ ७ ॥

अश्व-वतीं सम-वतीं ऊर्जयन्तीं उत्-ओजसं आ
अवित्सि सर्वाः ओषधीः अस्मै अरिष्ट-तातये ॥ ७ ॥

कांही औषधि अश्वाप्रमाणे झटपट गुणकारी असतात, कांही सोम गुणयुक्त (=वीरत्वोपादक), कांही उत्साहवर्धक तर कांही ओज उत्पन्न करणार्‍या असतात; त्या सर्वांचा आरोग्यवृद्धीसाठी मी उपयोग करतो ७.


उच् छुष्मा॒ ओष॑धीनां॒ गावो॑ गो॒ष्ठादि॑वेरते ।
धनं॑ सनि॒ष्यन्ती॑नां आ॒त्मानं॒ तव॑ पूरुष ॥ ८ ॥

उत् शुष्माः ओषधीनां गावः गोष्ठात्-इव ईरते
धनं सनिष्यन्तीनां आत्मानं तव पुरुष ॥ ८ ॥

गोठ्यांतून जशा धेनू एकदम बाहेर पडतात, त्याप्रमाणे औषधींतून त्यांचा प्रभाव बाहेर पडतो आणि आरोग्य धन देणार्‍या औषधींच्या योगाने, हे व्याधिग्रस्त मनुष्या, तुझ्या जिवाकडे तो प्रभाव पोहोंचेल ८.


इष्कृ॑ति॒र्नाम॑ वो मा॒ताथो॑ यू॒यं स्थ॒ निष्कृ॑तीः ।
सी॒राः प॑त॒त्रिणी॑ स्थन॒ यदा॒मय॑ति॒ निष् कृ॑थ ॥ ९ ॥

इष्कृतिः नाम वः माता अथो इति यूयं स्थ निः-कृतीः
सीराः पतत्रिणीः स्थन यत् आमयति निः कृथ ॥ ९ ॥

औषधींनो, रोगनाशक शक्ति ही तुमची माता आणि म्हणूनच निष्कृति म्हणजे व्याधिनाशनी हे नांव तुम्हांला प्राप्त झाले आहे. तुमच्या अन्त:करणांत द्रव आहे, तुम्ही पर्णाच्छादित बाणहि जवळ बाळगतां, तर रोग्याला ज्याच्यापासून त्रास होत आहे तो रोग तुम्ही पार निपटून टाका ९.


अति॒ विश्वाः॑ परि॒ष्ठा स्ते॒न इ॑व व्र॒जं अ॑क्रमुः ।
ओष॑धीः॒ प्राचु॑च्यवु॒र्यत् किं च॑ त॒न्वोख्प् रपः॑ ॥ १० ॥

अति विश्वाः परि-स्थाः स्तेनः-इव व्रजं अक्रमुः
ओषधीः प्र अचुच्यवुः यत् किं च तन्वः रपः ॥ १० ॥

चोरांनी गांवांत घुसावे त्याप्रमाणे जेव्हां चोहोंकडून वेढणार्‍या रोगांनी मनुष्याचे शरीर व्याप्त होतें, तेव्हां तेथे शरीरांत जो कांही व्याधि असेल, त्याचे उच्चाटन औषधि करतात १०.


यदि॒मा वा॒जय॑न्न् अ॒हं ओष॑धी॒र्हस्त॑ आद॒धे ।
आ॒त्मा यक्ष्म॑स्य नश्यति पु॒रा जी॑व॒गृभो॑ यथा ॥ ११॥

यत् इमाः वाजयन् अहं ओषधीः हस्ते आदधे
आत्मा यक्ष्मस्य नश्यति पुरा जीव-गृभः यथा ॥ ११ ॥

जेव्हां आरोग्याकरितां निकराचा प्रयत्‍न करण्याच्या ह्या औषधींना मी हातीं धरले, तेव्हां लागलीच पारध्याच्या पुढे सावजें मान टाकतात त्याप्रमाने रोगाचे मूळच त्या औषधि पुढे नाश पावते ११.


यस्यौ॑षधीः प्र॒सर्प॒थाङ्ग॑म्-अङ्गं॒ परु॑ष्-परुः ।
ततो॒ यक्ष्मं॒ वि बा॑धध्व उ॒ग्रो म॑ध्यम॒शीरि॑व ॥ १२ ॥

यस्य ओषधीः प्र-सर्पथ अङ्गम्-अङ्गं परुः-परुः
ततः यक्ष्मं वि बाधध्वे उग्रः मध्यमशीः-इव ॥ १२ ॥

ज्याच्या रोमरोमांतून सांध्यासांध्यातून हे औषधींनो, तुम्ही आपला जोर चालवितां, त्याच्या अंगांत भिनलेल्या रोगांचा-न्यायी राजा अपराध्याला शिक्षा करतो त्याप्रमाणे तुम्ही समूळ नाश करितां १२.


सा॒कं य॑क्ष्म॒ प्र प॑त॒ चाषे॑ण किकिदी॒विना॑ ।
सा॒कं वात॑स्य॒ ध्राज्या॑ सा॒कं न॑श्य नि॒हाक॑या ॥ १३ ॥

साकं यक्ष्म प्र पत चाषेण किकिदीविना
साकं वातस्य ध्राज्या साकं नश्य नि-हाकया ॥ १३ ॥

हे क्षयरोगा, तूं ह्या रोग्याच्या अंगांतून निघून जा; हे जे तास पक्षी, किंवा किकिदिवा उडत आहेत त्यांच्याबरोबर उडून जा; अथवा वार्‍याचा झोत चालू आहे त्याच्यामध्ये मिसळून जा. नाही तर निहाकेप्रमाणे ठार मारून जा १३.


अ॒न्या वो॑ अ॒न्यां अ॑वत्व॒न्यान्यस्या॒ उपा॑वत ।
ताः सर्वाः॑ संविदा॒ना इ॒दं मे॒ प्राव॑ता॒ वचः॑ ॥ १४ ॥

अन्या वः अन्यां अवतु अन्या अन्यस्याः उप अवत
ताः सर्वाः सम्-विदानाः इदं मे प्र अवत वचः ॥ १४ ॥

औषधींनो, तुमच्यापैकी प्रत्येक दुसरीचे रक्षण करो; प्रत्येक दुसरीचे सहाय्य करो आणि सर्च एकत्र मिळून हे जे माझे औषधिविषयक बोलणे आहे त्याचे समर्थन करून ते खरे करा १४.


याः फ॒लिनी॒र्या अ॑फ॒ला अ॑पु॒ष्पा याश्च॑ पु॒ष्पिणीः॑ ।
बृह॒स्पति॑प्रसूता॒स्ता नो॑ मुञ्च॒न्त्वंह॑सः ॥ १५ ॥

याः फलिनीः याः अफलाः अपुष्पाः याः च पुष्पिणीः
बृहस्पति-प्रसूताः ताः नः मुचन्तु अंहसः ॥ १५ ॥

औषधि फळे धरणार्‍या असोत किंवा फळे धरणार्‍या नसोत; त्या फुलणार्‍या असोत किं न फुलणार्‍या असोत; पण त्या सर्वच बृहस्पतीपासून उत्पन्न झाल्या आहेत. म्हणूनच त्या आम्हांला रोगरूप पापापासून मुक्त करोत १५.


मु॒ञ्चन्तु॑ मा शप॒थ्याख्प् दथो॑ वरु॒ण्यादु॒त ।
अथो॑ य॒मस्य॒ पड्बी॑शा॒त् सर्व॑स्माद्देवकिल्बि॒षात् ॥ १६ ॥

मुचन्तु मा शपथ्यात् अथो इति वरुण्यात् उत
अथो इति यमस्य पडबढबदबद्रह्णीशात् सर्वस्मात् देव-किल्बिषात् ॥ १६ ॥

त्या मला खोट्या शपथेच्या पापापासून (शिव्याशापांपासून), वरुणाच्या कोपापासून सोडवोत; त्याचप्रमाने त्या यमाच्या पाशापासून मुक्त करोत, इतकेंच काय, पण देवांविरुद्ध आम्ही जे कांही पातक केले असेल त्या सर्व पातकांपासूनहि आम्हांला सोडवोत १५.


अ॒व॒पत॑न्तीरवदन् दि॒व ओष॑धय॒स्परि॑ ।
यं जी॒वं अ॒श्नवा॑महै॒ न स रि॑ष्याति॒ पूरु॑षः ॥ १७ ॥

अव-पतन्तीः अवदन् दिवः ओषधयः परि
यं जीवं अश्नवामहै न सः रिष्याति पुरुषः ॥ १७ ॥

द्युलोकापासून खाली येणार्‍या औषधि बोलल्या की आम्ही ज्या पुरुषाच्या अंगामध्ये पूर्णपणे भिनून जाऊं तो रोगामुळे मरणारच नाही १७.


या ओष॑धीः॒ सोम॑राज्ञीर्ब॒ह्वीः श॒तवि॑चक्षणाः ।
तासां॒ त्वं अ॑स्युत्त॒मारं॒ कामा॑य॒ शं हृ॒दे ॥ १८ ॥

याः ओषधीः सोम-राजीः बह्वीः शत-विचक्षणाः
तासां त्वं असि उत्-तमा अरं कामाय शं हृदे ॥ १८ ॥

ज्या औषधीचा राजा सोम आहे, ज्या अनेक औषधि शेकडो प्रकारांनी गुणावह होतात त्या सर्वांमध्ये तूं उत्कृष्ट आहेस; तर आमच्या आरोग्यविषयक इच्छा पूर्ण कर आणि आमच्या चित्ताला सुख लाभू दे १८.


या ओष॑धीः॒ सोम॑राज्ञी॒र्विष्ठि॑ताः पृथि॒वीं अनु॑ ।
बृह॒स्पति॑प्रसूता अ॒स्यै सं द॑त्त वी॒र्यम् ॥ १९ ॥

याः ओषधीः सोम-राजीः वि-स्थिताः पृथिवीं अनु
बृहस्पति-प्रसूताः अस्यै सं दत्त वीर्यम् ॥ १९ ॥

सोम हाच ज्यांचा राजा अशा ज्या औषधि पृध्वीवर निरनिराळ्या ठिकाणी विखुरल्या आहेत, त्या सर्व बृहस्पतीपासून उत्पन्न झाल्या आहेत म्हणून त्या औषधि रोग्याच्या ह्या शरीरांमध्ये वीर्य उत्पन्न करोत १९.


मा वो॑ रिषत् खनि॒ता यस्मै॑ चा॒हं खना॑मि वः ।
द्वि॒पच् चतु॑ष्पद॒स्माकं॒ सर्वं॑ अस्त्वनातु॒रम् ॥ २० ॥

मा वः रिषत् खनिता यस्मै च अहं खनामि वः
द्वि-पत् चतुः-पत् अस्माकं सर्वं अस्तु अनातुरम् ॥ २० ॥

जो मनुष्य तुम्हांला भूमींतून खणून काढील त्याचा नाश हो‍ऊं देऊं नका, तसेंच ज्या रोग्यासाठी मी तुम्हांस खणून बाहेर काढीत आहें त्याचाहि नाश हो‍ऊ नये असें करा. त्याचप्रमाणे आमची माणसे आणि पशु हे सर्व निरोगी राहोत २०.


याश्चे॒दं उ॑पशृ॒ण्वन्ति॒ याश्च॑ दू॒रं परा॑गताः ।
सर्वाः॑ सं॒गत्य॑ वीरुधोऽ॒स्यै सं द॑त्त वी॒र्यम् ॥ २१॥

याः च इदं उप-शृण्वन्ति याः च दूरं परागताः
सर्वाः सम्-गत्य वीरुधः अस्यै सं दत्त वीर्यम् ॥ २१ ॥

माझे बोलणे ज्या औषधि येथे ऐकत आहेत किंवा ज्या दूरदेशी आहेत त्यांनी, हे वनस्पतींनो, त्या सर्वांनी एकत्र हो‍ऊन ह्या रोग्याला आरोग्य आणि वीर्य अर्पण करावे २१.


ओष॑धयः॒ सं व॑दन्ते॒ सोमे॑न स॒ह राज्ञा॑ ।
यस्मै॑ कृ॒णोति॑ ब्राह्म॒णस्तं रा॑जन् पारयामसि ॥ २२ ॥

ओषधयः सं वदन्ते सोमेन सह राजा
यस्मै कृणोति ब्राह्मणः तं राजन् पारयामसि ॥ २२ ॥

माझी प्रार्थना ऐकून औषधींनी सोमराजापाशी असे सांगितले कीं ज्या रोग्यासाठी हा ब्राह्मण औषध बनवीत आहे, त्याला आम्ही रोगमुक्त करूं २२.


त्वं उ॑त्त॒मास्यो॑षधे॒ तव॑ वृ॒क्षा उप॑स्तयः ।
उप॑स्तिरस्तु॒ सोऽ॒स्माकं॒ यो अ॒स्माँ अ॑भि॒दास॑ति ॥ २३ ॥

त्वं उत्-तमा असि ओषधे तव वृक्षाः
उपस्तयः उपस्तिः अस्तु सः अस्माकं यः अस्मान् अभि-दासति ॥ २३ ॥

म्हणूनच हे औषधें तूं सर्वोत्कृष्ट आहेस; वृक्ष जरी मोठे दिसतात, तरी तुझ्या मानाने ते झुडपांप्रमाणे तुझ्या खालीच; म्हणून आम्हांला उपद्रव देणारा हा जो दुष्ट रोग त्याचा नि:पात होवो २३.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९८ (देवापि-आख्यान, पर्जन्यसूक्त)

ऋषी - देवापि आर्ष्टिषेण : देवता - देव : छंद - त्रिष्टुभ्


बृह॑स्पते॒ प्रति॑ मे दे॒वतां॑ इहि मि॒त्रो वा॒ यद्वरु॑णो॒ वासि॑ पू॒षा ।
आ॒दि॒त्यैर्वा॒ यद्वसु॑भिर्म॒रुत्वा॒न् स प॒र्जन्यं॒ शंत॑नवे वृषाय ॥ १॥

बृहस्पते प्रति मे देवतां इहि मित्रः वा यत् वरुणः वा असि पूषा
आदित्यैः वा यत् वसु-भिः मरुत्वान् सः पर्जन्यं शम्-तनवे वृषय ॥ १ ॥

हे प्रार्थनेच्या प्रभो बृहस्पते, मी देवाचे ध्यान करतो; पण माझ्या देवविषयक ध्येयांशी तूं एकरूप हो; जगन्मित्र "मित्र" म्हणून, अथवा "आवरक" वरुण म्हणून, किंवा पोषक पूषा म्हणून (वाटेल त्या नांवाने) तूं प्रसिद्ध आहेस; तर असा तूं मरुत्‌ परिष्टित देव आदित्यांसह अथवा दिव्य निधींसह प्रसन्न हो‍ऊन आमच्या शंतनू राजासाठी पर्जन्यवृष्टि कर १.


आ दे॒वो दू॒तो अ॑जि॒रश्चि॑कि॒त्वान् त्वद्दे॑वापे अ॒भि मां अ॑गच्छत् ।
प्र॒ती॒ची॒नः प्रति॒ मां आ व॑वृत्स्व॒ दधा॑मि ते द्यु॒मतीं॒ वाचं॑ आ॒सन् ॥ २ ॥

आ देवः दूतः अजिरः चिकित्वान् त्वत् देव-आपे अभि मां अगच्चत्
प्रतीचीनः प्रति मां आ ववृत्स्व दधामि ते द्यु-मतीं वाचं आसन् ॥ २ ॥

तो प्रज्ञाशाली देव पर्जन्यवृष्टीचा वेगवान्‌ दूत हो‍ऊनच की काय, हे देवापि, तुझाकडून माझ्या सन्मुख आला आहे; तर हे देवा तूं प्रसन्न हो‍ऊन भरपूर पर्जन्यवृष्टि कर. तुझी सोज्वळ वाणी तुझे नांव मी माझ्या मुखांत निरंतर राहील असे करीन २.


अ॒स्मे धे॑हि द्यु॒मतीं॒ वाचं॑ आ॒सन् बृह॑स्पते अनमी॒वां इ॑षि॒राम् ।
यया॑ वृ॒ष्टिं शंत॑नवे॒ वना॑व दि॒वो द्र॒प्सो मधु॑मा॒ँ आ वि॑वेश ॥ ३ ॥

अस्मे इति धेहि द्यु-मतीं वाचं आसन् बृहस्पते अनमीवां इषिरां
यया वृष्टिं शम्-तनवे वनाव दिवः द्रप्सः मधु-मान् आ विवेश ॥ ३ ॥

तुझी उज्ज्वल पवित्र वाणी (पवित्र नांव) आमच्या मुखामध्ये निरंतर असूं दे. हे बृहस्पते, ती वाणी भवरोग नाशकच नव्हे, तर अतिशय उत्साहवर्धक आहे. तिच्या प्रभावाने शन्तनू राजासाठी आम्ही उभयतांनी पर्जन्यवृष्टि घडवून आणण्याची आकांक्षा धरली आहे. त्या इच्छेला अनुसरून पावसाचे माधुर्ययुक्त टप्पोरे थेंब आकाशांतून सुटून भूमीमध्यें घुसले देखील. ३.


आ नो॑ द्र॒प्सा मधु॑मन्तो विश॒न्त्व् इन्द्र॑ दे॒ह्यधि॑रथं स॒हस्र॑म् ।
नि षी॑द हो॒त्रं ऋ॑तु॒था य॑जस्व दे॒वान् दे॑वापे ह॒विषा॑ सपर्य ॥ ४ ॥

आ नः द्रप्साः मधु-मन्तः विशन्तु इन्द्र देहि अधि-रथं सहस्रं
नि सीद होत्रं ऋतु-था यजस्व देवान् देव-आपे हविषा सपयर् ॥ ४ ॥

तेच मधुर्ययुक्त भक्तिरसाचे बिंदु आमच्या अन्त:करणांतहि शिरोत; त्यासाठीच हे इंद्रा, आम्हांला सहस्त्रावधि महारथ्यांइतके सामर्थ्य दे. हे देवापि पुरोहिता, तूं होत्याच्या आसनावर अधिष्ठित हो, योग्य वेळी देवांचे यजन कर आणि त्यांना हविर्भाग अर्पण करून त्यांची सेवा कर ४.


आ॒र्ष्टि॒षे॒णो हो॒त्रं ऋषि॑र्नि॒षीद॑न् दे॒वापि॑र्देवसुम॒तिं चि॑कि॒त्वान् ।
स उत्त॑रस्मा॒दध॑रं समु॒द्रं अ॒पो दि॒व्या अ॑सृजद्व॒र्ष्या अ॒भि ॥ ५ ॥

आर्ष्टिषेणः होत्रं ऋषिः नि-सीदन् देव-आपिः देव-सुमतिं चिकित्वान्
सः उत्-तरस्मात् अधरं समुद्रं अपः दिव्याः असृजत् वर्ष्याः अभि ॥ ५ ॥

ऋष्टिषेणाचा पुत्र देवापि ऋषि ह्याने होतृकर्माचा कार्यभार उचलला; कारण देवाला प्रसन्न कसे करावे हे तो उत्तम रीतीने जाणत होता. त्याने वरच्या लोकांपासून वृष्टि करणार्‍या मेघांतून दिव्य जलाचा इतका वर्षाव केला की त्यांचे उदक खालच्या भूमीवरील समुद्राला भरगच्च जाऊन मिळाले ५.


अ॒स्मिन् स॑मु॒द्रे अध्युत्त॑रस्मि॒न्न् आपो॑ दे॒वेभि॒र्निवृ॑ता अतिष्ठन् ।
ता अ॑द्रवन्न् आर्ष्टिषे॒णेन॑ सृ॒ष्टा दे॒वापि॑ना॒ प्रेषि॑ता मृ॒क्षिणी॑षु ॥ ६ ॥

अस्मिन् समुद्रे अधि उत्-तरस्मिन् आपः देवेभिः नि-वृताः अतिष्ठन्
ताः अद्रवन् आऋष्टिषेणेन सृष्टाः देव-आपिना प्र-इषिताः मृक्षिणीषु ॥ ६ ॥

ह्या आकाशांतील उच्च प्रदेशांत आणि खाली समुद्रामध्ये देवांनीच सांठवून ठेवलेली उदकें पूर्ण भरलेली होतीच. तीच उदके आर्ष्टिषेण जो देवापि त्याने आपल्या प्रार्थनेच्या योगाने मोकळी केली; त्याबरोबर ती जोराने खाली कोसळून भूमीच्या कोनाकोपर्‍यांत देखील अगदी रेलचेल भरून गेली ६.


यद्दे॒वापिः॒ शंत॑नवे पु॒रोहि॑तो हो॒त्राय॑ वृ॒तः कृ॒पय॒न्न् अदी॑धेत् ।
दे॒व॒श्रुतं॑ वृष्टि॒वनिं॒ ररा॑णो॒ बृह॒स्पति॒र्वाचं॑ अस्मा अयच्छत् ॥ ७ ॥

यत् देव-आपिः शम्-तनवे पुरः-हितः होत्राय वृतः कृपयन् अदीधेत्
देव-श्रुतं वृष्टि-वनिं रराणः बृहस्पतिः वाचं अस्मै अयच्चत् ॥ ७ ॥

देवापि हा शंतनू राजाच्या यज्ञांत हौत्राचा "पुरोहित" म्हणून नेमस्त केला होता. तो दयाळू असल्याने त्याने सर्व देवांमध्ये प्रख्यात आणि जलवृष्टि करण्याला पूर्णपणे समर्थ अशा बृहस्पतीचे ध्यान केले, त्या योगाने प्रार्थनेचा प्रभु बहस्पति संतुष्ट हो‍ऊन त्याने देवापिला वेदवाणीची स्फूर्ति दिली ७.


यं त्वा॑ दे॒वापिः॑ शुशुचा॒नो अ॑ग्न आर्ष्टिषे॒णो म॑नु॒ष्यः समी॒धे ।
विश्वे॑भिर्दे॒वैर॑नुम॒द्यमा॑नः॒ प्र प॒र्जन्यं॑ ईरया वृष्टि॒मन्त॑म् ॥ ८ ॥

यं त्वा देव-आपिः शुशुचानः अग्ने आर्ष्टिषेणः मनुष्यः सम्-ईधे
वि श्वेभिः देवैः अनु-मद्यमानः प्र पर्जन्यं ईरय वृष्टि-मन्तम् ॥ ८ ॥

हे अग्निदेवा, आर्ष्टिषेणाच्या देवापि नांवाच्या पुत्राने अर्थात्‌ एका मानवानेच तपाने प्रकाशित हो‍ऊन तुला प्रज्ज्वलित केले आणि तूंहि तेजोभराने प्रकाशून आपल्या सर्व दिव्य विबुधांसह यज्ञामध्ये हृष्टचित्त हो‍ऊन भरपूर जलवृष्टि करणार्‍या मेघाला वृष्टि करण्याची आज्ञा दे ८.


त्वां पूर्व॒ ऋष॑यो गी॒र्भिरा॑य॒न् त्वां अ॑ध्व॒रेषु॑ पुरुहूत॒ विश्वे॑ ।
स॒हस्रा॒ण्यधि॑रथान्य॒स्मे आ नो॑ य॒ज्ञं रो॑हिद॒श्वोप॑ याहि ॥ ९ ॥

त्वां पूर्वे ऋषयः गीः-भिः आयन् त्वां अध्वरेषु पुरु-हूत विश्वे
सहस्राणि अधि-रथानि अस्मे इति आ नः यजं रिहित्-अश्वा उप याहि ॥ ९ ॥

प्राचीन काळचे ऋषि स्तुतींच्या योगाने तुझ्याचकडे पोहोंचले. आणि हे सकलजन-शरण्यदेवा, अध्वर यागांमध्ये सर्व भक्तजनहि तुलाच शरण गेले; हजारो रथांत भरलेल्या उपायनापेक्षांहि मूल्यवान्‌ असे हे आमचे हविर्भाग आहेत. तर हे आरक्ताश्वा देवा, आमच्या यज्ञाकडे आगमन करच ९.


ए॒तान्य॑ग्ने नव॒तिर्नव॒ त्वे आहु॑ता॒न्यधि॑रथा स॒हस्रा॑ ।
तेभि॑र्वर्धस्व त॒न्वः शूर पू॒र्वीर्दि॒वो नो॑ वृ॒ष्टिं इ॑षि॒तो रि॑रीहि ॥ १० ॥

एतानि अग्ने नवतिः नव त्वे इति आहुतानि अधि-रथा सहस्रा
तेभिः वर्धस्व तन्वः शूर पूर्वीः दिवः नः वृष्टिं इषितः रिरीहि ॥ १० ॥

हे अग्निदेवा, हजारो रथांत भरलेल्या उपायनांच्या तोडीची ही नव्याण्णवच उपायने तुजला समर्पण केली आहेत; तरी हे वीरश्रेष्ठा, त्यांच्या योगाने तूं आपल्या असंख्य ज्वालांना आनंदाने वृद्धिंगत कर, आणि आमच्या प्रार्थनेने प्रोत्साहन पावून तूं आकाशातून भरपूर जलवृष्टि कर १०.


ए॒तान्य॑ग्ने नव॒तिं स॒हस्रा॒ सं प्र य॑च्छ॒ वृष्ण॒ इन्द्रा॑य भा॒गम् ।
वि॒द्वान् प॒थ ऋ॑तु॒शो दे॑व॒याना॒न् अप्यौ॑ला॒नं दि॒वि दे॒वेषु॑ धेहि ॥ ११॥

एतानि अग्ने नवतिं सहस्रा सं प्र यच्च वृष्णे इन्द्राय भागं
वि द्वान् पथः ऋतु-शः देव-यानान् अपि औलानं दिवि देवेषु धेहि ॥ ११ ॥

याचप्रमाणे हे अग्निदेवा, ही आमची नऊ हाजार नऊ अवदाने आहेत, ती तूं वीर्यशाली इंद्राला त्याचा भाग म्हणून अर्पण कर. दिव्य विबुधांनी गमन करण्यास योग्य असे जे प्रत्येक ऋतूंतील मार्ग आहेत ते तूं जाणतोसच; तर उलानाचा पुत्र जो शन्तनू त्यालाहि दिव्यजनामध्ये स्थान दे ११.


अग्ने॒ बाध॑स्व॒ वि मृधो॒ वि दु॒र्गहापामी॑वां॒ अप॒ रक्षां॑सि सेध ।
अ॒स्मात् स॑मु॒द्राद्बृ॑ह॒तो दि॒वो नो॑ऽ॒पां भू॒मानं॒ उप॑ नः सृजे॒ह ॥ १२ ॥

अग्ने बाधस्व वि मृधः वि दुः-गहा अप अमीवां अप रक्षांसि सेध
अस्मात् समुद्रात् बृहतः दिवः नः अपां भूमानं उप नः सृज इह ॥ १२ ॥

हे अग्निदेवा, विघ्न करणार्‍या दुष्टांचा नाश कर, दुर्गम ठिकाणे सुगम कर, व्याधि आणि राक्षस ह्यांचा अगदी नायनाट कर, आणि विशाल अशा समुद्रांतून आणि द्युलोकांतून आमच्या भूप्रदेशावर आमच्यासाठी ओतप्रोत जलवर्षाव कर १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९९ (इंद्रसूक्त)

ऋषी - वम्र वैखानस : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


कं न॑श्चि॒त्रं इ॑षण्यसि चिकि॒त्वान् पृ॑थु॒ग्मानं॑ वा॒श्रं वा॑वृ॒धध्यै॑ ।
कत् तस्य॒ दातु॒ शव॑सो॒ व्युष्टौ॒ तक्ष॒द्वज्रं॑ वृत्र॒तुरं॒ अपि॑न्वत् ॥ १॥

कं नः चित्रं इषण्यसि चिकित्वान् पृथु-ग्मानं वाश्रं ववृधध्यै
कत् तस्य दातु शवसः वि-उष्टौ तक्षत् वज्रं वृत्र-तुरं अपिन्वत् ॥ १ ॥

तूं महाप्रज्ञच आहेस; पण आमचा उत्कर्ष व्हावा म्हणून तूं आम्हांस आमचे कोणते इच्छित देण्याची आकांक्षा धरली आहेस ते सांग; तथापि ते इच्छित असे असावे की त्याचा मार्ग प्रशंसनीय असावा आणि त्याचा चोहोंकडे बोलबाला व्हावा. त्या भगवंताच्या उत्कट बलाचा प्रकाश आतां उजळला आहे; पण तो कोणती देणगी (काय वरदान) देणार आहे ? त्याने आपले वृत्रनाशक वज्र तर घांसून ठेवलेलेच आहे आणि मेघांनाहि जलाने तुडुंब भरून टाकले आहे १.


स हि द्यु॒ता वि॒द्युता॒ वेति॒ साम॑ पृ॒थुं योनिं॑ असुर॒त्वा स॑साद ।
स सनी॑ळेभिः प्रसहा॒नो अ॑स्य॒ भ्रातु॒र्न ऋ॒ते स॒प्तथ॑स्य मा॒याः ॥ २ ॥

सः हि द्युता वि-द्युता वेति साम पृथुं योनिं असुर-त्वा ससाद
सः स-नीळेभिः प्र-सहानः अस्य भ्रातुः न ऋते सप्तथस्य मायाः ॥ २ ॥

आपल्या उज्ज्वल विद्युल्लतेच्या योगाने आणि आपल्या ईश्वरी सामर्थ्याच्या प्रभावाने तो प्रशस्त आसनावर अधिष्ठित झाला आणि आपल्या सहचरी शूर भक्तांसह रणांगणावर चढाई करूर सद्धर्म रक्षणाच्या कार्यात सप्तथाचा आणि त्याच्या सर्व कपटी युक्त्यांचा पार धुव्वा उडवून दिला; पण त्याच्या भ्रात्याचा मात्र नाश केला नाही २.


स वाजं॒ याताप॑दुष्पदा॒ यन् स्वर्षाता॒ परि॑ षदत् सनि॒ष्यन् ।
अ॒न॒र्वा यच् छ॒तदु॑रस्य॒ वेदो॒ घ्नञ् छि॒श्नदे॑वाँ अ॒भि वर्प॑सा॒ भूत् ॥ ३ ॥

सः वाजं याता अपदुः-पदा यन् स्वः-साता परि सदत् सनिष्यन्
अनर्वा यत् शत-दुरस्य वेदः घ्नन् शिश्न-देवान् अभि वर्पसा भूत् ॥ ३ ॥

तो सत्त्वप्राप्तीच्या संग्रामांत जातो; पण अन्यायाचा मार्ग न स्वीकारतां योग्य मार्गाने गमन करून दिव्य प्रकाश प्राप्तीच्या कार्यांत भक्ताला यश ये‍ईपर्यंत जवळच ठाण मांडून बसतो; तो अप्रतिहत आहे, म्हणूनच शतदुराच्या खोट्या प्रचाराचा विध्वंस करून त्याने लिंगपूजक दुष्टांचा आपल्या वर्धिष्णु बलाने नाश केला ३.


स य॒ह्व्योऽ॒वनी॒र्गोष्व् अर्वा जु॑होति प्रध॒न्यासु॒ सस्रिः॑ ।
अ॒पादो॒ यत्र॒ युज्या॑सोऽर॒था द्रो॒ण्यश्वास॒ ईर॑ते घृ॒तं वाः ॥ ४ ॥

सः यह्व्यः अवनीः गोषु अर्वा आ जुहोति प्र-धन्यासु सस्रिः
अपादः यत्र युज्यासः अरथाः द्रोणि-अश्वासः ईरते घृतं वाः ॥ ४ ॥

तो महाप्रबल असे जलप्रवाह खाली सोडून देतो, प्रकाश गोधनप्राप्तिच्या मार्गात तर तो अश्ववीरच आहे. अनेक महायुद्धांत तो एकदम पुढे सरसावतो; तेव्हां चपल परंतु चरणरहित-आणि रथाला जोडले न जाणारे पण अश्वाप्रमाणे दिसणारे जे द्रोणाकार मेघ आकाशव्यापक आहेत-ते घृताप्रमाणे पुष्टिकारक अशा जलाचा वर्षाव करितात ४.


स रु॒द्रेभि॒रश॑स्तवार॒ ऋभ्वा॑ हि॒त्वी गयं॑ आ॒रेअ॑वद्य॒ आगा॑त् ।
व॒म्रस्य॑ मन्ये मिथु॒ना विव॑व्री॒ अन्नं॑ अ॒भीत्या॑रोदयन् मुषा॒यन् ॥ ५ ॥

सः रुद्रेभिः अशस्त-वारः ऋभ्वा हित्वी गयं आरे--अवद्यः आ अगात्
वम्रस्य मन्ये मिथुना विवव्री इतिवि-वव्री अन्नं अभि-इत्य अरोदयत् मुषायन् ॥ ५ ॥

भक्तांनी जरी वरदान मागितले नव्हते, तरी ऋभूरक्षक जो इंद्र तो आपले अत्यंत निष्कलंक असे स्थान सोडून देऊन रुद्रांसह भक्त सहायार्थ आला आणि मला वाटते, की त्याने वम्राच्या (वम्राने पाठविलेल्या) जोडीदारापासून सर्व वित्त हिसकावून घेऊन त्यांना कफल्लक केले. त्यांच्या अन्नाचा सांठाच हरण करून त्यांना रडकुण्डीस आणले ५.


स इद्दासं॑ तुवी॒रवं॒ पति॒र्दन् ष॑ळ॒क्षं त्रि॑शी॒र्षाणं॑ दमन्यत् ।
अ॒स्य त्रि॒तो न्व् ओज॑सा वृधा॒नो वि॒पा व॑रा॒हं अयो॑अग्रया हन् ॥ ६ ॥

सः इत् दासं तुवि-रवं पतिः दन् षट्--अक्षं त्रि-शीर्षाणं दमन्यत्
अस्य त्रितः नु ओजसा वृधानः विपा वराहं अयः-अग्रया हन्नितिहन् ॥ ६ ॥

सर्वांचा अधिपति इंद्र त्याने प्रचंड गर्जना करणारा, सहा डोळ्यांचा आणि तीन डोक्यांचा असा जो सद्धर्माचा एक शत्रु होता त्याला खाली दडपून टाकले आणि ह्या इंद्राच्याच ओजस्वितेमुळे बलवान्‌ बनलेला तो त्रित त्यांने पोलादि फाळ बसविलेल्या बरचीने "वराह" राक्षसाचा नाश केला ६.


स द्रुह्व॑णे॒ मनु॑ष ऊर्ध्वसा॒न आ सा॑विषदर्शसा॒नाय॒ शरु॑म् ।
स नृत॑मो॒ नहु॑षोऽ॒स्मत् सुजा॑तः॒ पुरो॑ऽभिन॒दर्ह॑न् दस्यु॒हत्ये॑ ॥ ७ ॥

सः द्रुह्वणे मनुषे ऊर्ध्वसानः आ साविषत् अर्शसानाय शरुं
सः नृ-तमः नहुषः अस्मत् सु-जातः पुरः अभिनत् अर्हन् दस्यु-हत्ये ॥ ७ ॥

मानव हितकारी देव इंद्र वीरश्रेष्ठ आहे, तोच अत्यंत लोकहितकारी आणि नहुषांचा सहाकारी आहे, उत्तम अभिजात असा तोच आहे; त्या परम पूज्य देवाने अधार्मिकांचा नाश करण्यासाठी प्रथम त्यांच्या तटबन्दी नगरांचा विध्वंस केला ७.


सो अ॒भ्रियो॒ न यव॑स उद॒न्यन् क्षया॑य गा॒तुं वि॒दन् नो॑ अ॒स्मे ।
उप॒ यत् सीद॒दिन्दुं॒ शरी॑रैः श्ये॒नोऽ॑योपाष्टिर्हन्ति॒ दस्यू॑न् ॥ ८ ॥

सः अभ्रियः न यवसे उदन्यन् क्षयाय गातुं विदत् नः अस्मे इति
उप यत् सीदत् इन्दुं शरीरैः श्येनः अयः-अपाष्टिः हन्ति दस्यून् ॥ ८ ॥

तो जणो काय मेघांच्या अंतर्भागी राहतो आणि तृणधान्यावर भरपूर वृष्टि करून आम्हांला उत्तम निवासस्थान मिळावे म्हणून आम्हांला मार्ग दाखवितो. जेव्हां तो श्येन पक्ष्याच्या रूपाने किंवा आपल्या अनेक प्रकारच्या शरीरांनी सोमवल्लीच्या सन्निध जातो, तेव्हांहि पोलादाप्रमाणे कणखर टाचेने अधार्मिकांना चिरडून टाकतो ८.


स व्राध॑तः शवसा॒नेभि॑रस्य॒ कुत्सा॑य॒ शुष्णं॑ कृ॒पणे॒ परा॑दात् ।
अ॒यं क॒विं अ॑नयच् छ॒स्यमा॑नं॒ अत्कं॒ यो अ॑स्य॒ सनि॑तो॒त नृ॒णाम् ॥ ९ ॥

सः व्राधतः शवसानेभिः अस्य कुत्साय शुष्णं कृपणे परा अदात्
अयं कविं अनयत् शस्यमानं अत्कं यः अस्य सनिता उत नृणाम् ॥ ९ ॥

आपला बलोद्रेक प्रकट करणार्‍या शूर सैनिकांसह त्याने शुष्ण आणि त्याचे बलाढ्य अनुचर ह्या सर्वांनाच कुत्स (नामक) भक्ताच्या स्वाधीन केले. त्या (कुत्साने) (असें केले की) ज्याच्या काव्यरूप प्रावरणाची सर्वत्र प्रशंसा झाली होती अशा एका कवीला आपल्या राज्यांत नेले. ह्याप्रमाणे कुत्स हा त्या कवीचा आणि त्या शूर सैनिकांच्या कीर्तीचा आधारस्तंभ झाला ९.


अ॒यं द॑श॒स्यन् नर्ये॑भिरस्य द॒स्मो दे॒वेभि॒र्वरु॑णो॒ न मा॒यी ।
अ॒यं क॒नीन॑ ऋतु॒पा अ॑वे॒द्यमि॑मीता॒ररुं॒ यश्चतु॑ष्पात् ॥ १० ॥

अयं दशस्यन् नर्येभिः अस्य दस्मः देवेभिः वरुणः न मायी
अयं कनीनः ऋतु-पाः अवेदि अमिमीत अररुं यः चतुः-पात् ॥ १० ॥

मायाचक्रचालक जो वरुण त्याच्याप्रमाणेच अद्‍भुत कर्मकारी इंद्राने देखील आपल्या शूर दिव्यगणांसह कुत्सालाच सहाय्य केले; वरुण हाहि अत्यंत मनोहर स्वरूप असून ऋतूंचे चक्र सुयंत्रपणे चालविणारा म्हणून सर्वविख्यात आहे. त्यामुळेच चतुष्पाद जो अररू दैत्य त्याला त्याने अगदी चीत करून टाकले १०.


अ॒स्य स्तोमे॑भिरौशि॒ज ऋ॒जिश्वा॑ व्र॒जं द॑रयद्वृष॒भेण॒ पिप्रोः॑ ।
सुत्वा॒ यद्य॑ज॒तो दी॒दय॒द्गीः पुर॑ इया॒नो अ॒भि वर्प॑सा॒ भूत् ॥ ११॥

अस्य स्तोमेभिः औशिजः ऋजिश्वा व्रजं दरयत् वृषभेण पिप्रोः
सुत्वा यत् यजतः दीदयत् गीः पुरः इयानः अभि वर्पसा भूत् ॥ ११ ॥

उशिजेचा पुत्र ऋजिश्वा ह्याने म्हटलेल्या प्रार्थनासूक्तांच्या प्रभावाने आणि वीरोचित शौर्याने प्रिप्रूच्या संपत्तीचा खजिना फोडून टाकला, इंद्राला सोमरस अर्पण करून त्या पूज्य देवाची स्तुति उज्ज्वल केली आणि शत्रूंच्या नगरांवर हल्ल चढवून आपल्या पराक्रमाने ते हस्तगत केले ११.


ए॒वा म॒हो अ॑सुर व॒क्षथा॑य वम्र॒कः प॒ड्भिरुप॑ सर्प॒दिन्द्र॑म् ।
स इ॑या॒नः क॑रति स्व॒स्तिं अ॑स्मा॒ इषं॒ ऊर्जं॑ सुक्षि॒तिं विश्वं॒ आभाः॑ ॥ १२ ॥

एव महः असुर वक्षथाय वम्रकः पट्-भिः उप सर्पत् इन्द्रं
सः इयानः करति स्वस्तिं अस्मै इषं ऊर्जं सु-क्षितिं विश्वं आ अभार् इत्य् अभाः ॥ १२ ॥

याप्रमाणे हे सत्ताधीशा, आपला उत्कर्ष महनीय व्हावा म्हणून वम्रक अखेरीस साष्टांग प्रणिपात करीत करीतच इंद्रासमोर गेला आणि त्याच्यापुढे नम्र हो‍ऊन याचना केली. तेव्हां इंद्राने त्याला क्षेम, उत्साह ओजस्विता, अचलस्थान, इतकेंच काय पण त्याले हवे होते ते सर्व अर्पण केले १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त १०० (विश्वेदेवांचे पालुपदसूक्त)

ऋषी - दुवस्यु वान्दन : देवता - विश्वेदेव : छंद - १२ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - जगती


इन्द्र॒ दृह्य॑ मघव॒न् त्वाव॒दिद्‌भु॒ज इ॒ह स्तु॒तः सु॑त॒पा बो॑धि नो वृ॒धे ।
दे॒वेभि॑र्नः सवि॒ता प्राव॑तु श्रु॒तं आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ १॥

इन्द्र दृह्य मघ-वन् त्वावत् इत् भुजे इह स्तुतः सुत-पाः बोधि नः वृधे
देवेभिः नः सविता प्र अवतु श्रुतं आ सर्व-तातिं अदि तिं वृणीमहे ॥ १ ॥

इंद्रा भगवंता, तुझ्याप्रमाणेच ह्या आमच्या भुजदण्डांतहि तू सणसणीत बल ठेव. येथे यज्ञमंदिरात आम्ही तुझे स्तवन केले आहे; तर तूं सोमप्राशन करून आमच्या उत्कर्षाचा प्रवर्तक हो. जगत्प्रेरक सविता दिव्यविबुधांसह आमच्या सर्वविश्रुत स्तवनावर प्रेम ठेवो; आणि शेवटी आम्ही हेच वरदान मागतो की आमचे सर्वतोपरि मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्रच असावे १.


भरा॑य॒ सु भ॑रत भा॒गं ऋ॒त्वियं॒ प्र वा॒यवे॑ शुचि॒पे क्र॒न्ददि॑ष्टये ।
गौ॒रस्य॒ यः पय॑सः पी॒तिं आ॑न॒श आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ २ ॥

भराय सु भरत भागं ऋत्वियं प्र वायवे शुचि-पे क्रन्दत्-इष्टये
गौरस्य यः पयसः पीतिं आनशे आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ २ ॥

योग्यकाळी अर्पण करावयाचा हविर्भाग विश्व पोषक आणि युद्धकुशल इंद्राला उत्तम रीतीने अर्पण कर; त्याचप्रमाने पवित्र सोमरस प्राशन करणारा आणि ज्याच्या यज्ञाच्या वेळी मारे मोठ्याने स्तोत्रघोष चालतो त्या वायूप्रीत्यर्थहि हविर्भाग अर्पण कर. हा वायु शुभ्रवर्ण दुग्धाच्या प्राशनाचीच जणो इच्छा दर्शवित आहे; तर आम्ही हेच वरदान मागणार की आमचे सर्वतोपरि मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्रच रहावे २.


आ नो॑ दे॒वः स॑वि॒ता सा॑विष॒द्वय॑ ऋजूय॒ते यज॑मानाय सुन्व॒ते ।
यथा॑ दे॒वान् प्र॑ति॒भूषे॑म पाक॒वदा स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ३ ॥

आ नः देवः सविता साविषत् वयः ऋजु-यते यजमानाय सुन्वते
यथा देवान् प्रति-भूषेम पाक-वत् आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ३ ॥

जगत्‌ प्रसूति जो सविता, तो आमच्या नीतिमान्‌ आणि सोमयाजी यजमानाला नेहमी भर उमेदीचे वय देवो. म्हणजे त्या योगाने शुद्धान्त:करण साधूप्रमाणे आम्ही देखील दिव्यजनाची सेवा करूं. परंतु वरदान हेच मागूं की आमचे सर्वतोपरी कल्याण हो‍ऊन आम्ही स्वतंत्र असावे ३.


इन्द्रो॑ अ॒स्मे सु॒मना॑ अस्तु वि॒श्वहा॒ राजा॒ सोमः॑ सुवि॒तस्याध्ये॑तु नः ।
यथा॑-यथा मि॒त्रधि॑तानि संद॒धुरा स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ४ ॥

इन्द्रः अस्मे इति सु-मनाः अस्तु विश्वहा राजा सोमः सुवितस्य अधि एतु नः
यथायथा मित्र-धितानि सम्-दधुः आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ४ ॥

इंद्र हा आमच्याविषयी निरंतर वात्सल्यबुद्धि बाळगो. सोम राजा हा देखील आमच्या कल्याणाचीच चिन्ता वाहो; ज्याप्रमाने लोक मित्रकार्ये घडवून आणतात, त्याप्रमाणे आम्ही हेच वरदान मागणार की आमचे सर्वतोपरी मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्र रहावे ४.


इन्द्र॑ उ॒क्थेन॒ शव॑सा॒ परु॑र्दधे॒ बृह॑स्पते प्रतरी॒तास्यायु॑षः ।
य॒ज्ञो मनुः॒ प्रम॑तिर्नः पि॒ता हि कं॒ आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ५ ॥

इन्द्रः उक्थेन शवसा परुः दधे बृहस्पते प्र-तरीता असि आयुषः
यजः मनुः प्र-मतिः नः पिता हि कं आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ५ ॥

उक्थ स्तोत्रांनी प्रसन्न हो‍ऊन इंद्र हा आपल्या उत्कट बलाने समुद्र आणि आकाश ह्यांना धारण करतो. तोच प्रार्थानाधिपति देव दीर्घ आयुष्य अर्पण करणारा आहे. यज्ञार्ह मनु हाच आमचा मार्गदर्शक आणि हितकारक पिता होय; तर आम्ही हेच वरदान मागूं की आमचे सर्वतोपरी कल्याण हो‍ऊन आम्ही बन्धमुक्त आणि स्वतंत्र असावे ५.


इन्द्र॑स्य॒ नु सुकृ॑तं॒ दैव्यं॒ सहो॑ऽ॒ग्निर्गृ॒हे ज॑रि॒ता मेधि॑रः क॒विः ।
य॒ज्ञश्च॑ भूद्वि॒दथे॒ चारु॒रन्त॑म॒ आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ६ ॥

इन्द्रस्य नु सु-कृतं दैव्यं सहः अग्निः गृहे जरिता मेधिरः कविः
यजः च भूत् विदथे चारुः अन्तमः आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ६ ॥

पुण्यशीलत्व, महत्कार्य आणि दैवी सामर्थ्य हे इंद्राचेच ऐश्वर्य होय. अग्नि हा सद्‍बुद्धीचा दाता आणि प्रतिभासंपन्न कवि होय. तो यज्ञमंदिरामध्ये भक्तांना स्तवनांची स्फूर्ति देतो. म्हणूनच ह्या धर्मपरिषदेंतील आमचा यज्ञ उत्कृष्ट आणि अद्वितीय असाच झाला. तर आतां हेच वरदान मागूं की आमचे सर्व प्रकारे मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्र असावे ६.


न वो॒ गुहा॑ चकृम॒ भूरि॑ दुष्कृ॒तं नाविष्ट्यं॑ वसवो देव॒हेळ॑नम् ।
माकि॑र्नो देवा॒ अनृ॑तस्य॒ वर्प॑स॒ आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ७ ॥

न वः गुहा चकृम भूरि दुः-कृतं न आविः-त्यं वसवः देव-हेळनं
माकिः नः देवाः अनृतस्य वर्पसः आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ७ ॥

हे पुण्यनिधि देवांनो ! तुमच्याविषयी पाहिले तर आम्ही कांही तरी मोठे भयंकर पातक गुप्तपणे केले आहे असे नाही आणि उघडपणे तर नाहीच नाही. आम्ही देवाची निंदाहि केली नाही. तर देवांनो, आम्हांला अधर्माची, अन्यायाची प्रवृत्ति हो‍ऊं देऊं नका; कारण आम्ही हेच वरदान मागतो की आमचे सर्व प्रकारे मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्र असावे ७.


अपामी॑वां सवि॒ता सा॑विष॒न् न्य१ग् वरी॑य॒ इदप॑ सेध॒न्त्वद्र॑यः ।
ग्रावा॒ यत्र॑ मधु॒षुदु॒च्यते॑ बृ॒हदा स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ८ ॥

अप अमीवां सविता साविषत् न्यक् वरीयः इत् अप सेधन्तु अद्रयः
ग्रावा यत्रमधु-सुत् उच्यते बृहत् आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ८ ॥

जगत्प्रेरक सविता सर्व आधिव्याधि आमच्यापासून दूर करून नष्ट करो. आणि धर्मदृष्टीने जे कांही उणे असेल, तेंहि सोमरस पिळण्याचे अद्रि नाहींसे करोत; सोमसवनसंगी मधुर रस पिळण्याचा ग्रावा मोठ्याने घोष करतो आणि त्या वेळी आम्ही हेच वरदान मागतो की आमचे सर्व प्रकारे मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्र रहावे ८.


ऊ॒र्ध्वो ग्रावा॑ वसवोऽस्तु सो॒तरि॒ विश्वा॒ द्वेषां॑सि सनु॒तर्यु॑योत ।
स नो॑ दे॒वः स॑वि॒ता पा॒युरीड्य॒ आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ९ ॥

ऊर्ध्वः ग्रावा वसवः अस्तु सोतरि विश्वा द्वेषांसि सनुतः युयोत
सः नः देवः सविता पायुः ईड्यः आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ९ ॥

हे पुण्यनिधींनो, सोमरस पिळण्याचा ग्रावा रस पिळण्याच्या कार्यात अगदी गढून जावो, आणि तुम्ही असे करा की आमच्याविषयी ज्यांच्या ज्यांच्या मनांत द्वेषबुद्धि राहिली असेल तो सर्व द्वेष पार नाहीसा करा. जगत्‌-प्रेरक सविता देवा आम्हां सर्वांचा संरक्षक आहे. आणि आम्हांला तो सर्वथैव स्तुत्यच आहे; कारण आम्ही हेच वरदान मागतो की आमचे सर्व प्रकारे मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्र असावे ९.


ऊर्जं॑ गावो॒ यव॑से॒ पीवो॑ अत्तन ऋ॒तस्य॒ याः सद॑ने॒ कोशे॑ अ॒ङ्ग्ध्वे ।
त॒नूरे॒व त॒न्वो अस्तु भेष॒जं आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ १० ॥

ऊर्जं गावः यवसे पीवः अत्तन ऋतस्य याः सदने कोशे अङ्ध्वे
तनूः एव तन्वः अस्तु भेषजं आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ १० ॥

धेनूंनो, तृण धान्याने परिपूर्ण अशा ह्या भूमीमध्ये तुम्ही चरतां तेव्हां जणो काय ओज आणि पुष्टता ह्यांचेच सेवन करतां आणि सद्धर्माच्या गृहांत सद्धर्माच्या भाण्डारात ते ओज दुग्धरूपाने निदर्शनास आणतां; तर तुमचे शरीरजन्य (दुग्ध) आमच्या शरीरासाठी औषध होवो; कारण आम्ही हेच वरदान मागतो की आमचे सर्वतोपरी मंगल हो‍ऊन आम्ही स्वतंत्र असावे १०.


क्र॒तु॒प्रावा॑ जरि॒ता शश्व॑तां॒ अव॒ इन्द्र॒ इद्‌भ॒द्रा प्रम॑तिः सु॒ताव॑ताम् ।
पू॒र्णं ऊध॑र्दि॒व्यं यस्य॑ सि॒क्तय॒ आ स॒र्वता॑तिं॒ अदि॑तिं वृणीमहे ॥ ११॥

क्रतु-प्रावा जरिता शश्वतां अवः इन्द्रः इत् भद्रा प्र-मतिः सुत-वतां
पूर्णं ऊधः दिव्यं यस्य सिक्तये आ सर्व-तातिं अदितिं वृणीमहे ॥ ११ ॥

सोमरस पिळणार्‍या सर्व भक्तजनांच्या कर्तृत्वशक्तीचा प्रेरक इंद्र हाच आहे; स्तवनांची स्फूर्ति तोच देतो, तोच भक्तांचा संरक्षक होतो, आणि त्याचीच आज्ञा सोमरस पिळणार्‍या भक्तांना कल्याणकर असते; आकाशधेनूची दिव्य कास ज्याच्या आज्ञेने जलवर्षाव करण्यासाठी भरपूर भरलेली आहे, त्याच्यापाशी आम्ही हे वरदान मागतो की आमचे सर्व प्रकारे मंगल असून आम्ही स्वतंत्र असावे ११.


चि॒त्रस्ते॑ भा॒नुः क्र॑तु॒प्रा अ॑भि॒ष्टिः सन्ति॒ स्पृधो॑ जरणि॒प्रा अधृ॑ष्टाः ।
रजि॑ष्ठया॒ रज्या॑ प॒श्व आ गोस्तूतू॑र्ष॒त्य्पर्यग्रं॑ दुव॒स्युः ॥ १२ ॥

चित्रः ते भानुः क्रतु-प्राः अभिष्टिः सन्ति स्पृधः जरणि-प्राः अधृष्टाः
रजिष्टया रज्या पश्वः आ गोः तूतूर्षति परि अग्रं दुवस्युः ॥ १२ ॥

देवा, तुझा अद्‍भुत तेज:समूह हा आमच्या सत्कार्यशीलतेचे जीवन आणि आमचा सर्व प्रकारे संरक्षक आहे. आम्हांला प्रतिस्पर्थी आहेत ते आरडाओरड करण्यात कुशल आणि धाडसी आहेत; पण आम्हींच त्यांना वांगवू. बैल किंवा इतर पशु ह्यांना दाव्याचे टोंक धरून नीट मार्गाने नेणेच योग्य, त्याप्रमाणे उपासक आपल्या वृत्तींना सरळ मार्गाने नेण्याची त्वरा करतो तेच योग्य आहे १२.


ॐ तत् सत्


GO TOP