PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३१ (विश्वेदेवसूक्त)

ऋषी - कवष ऐलूष : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


आ नो॑ दे॒वानां॒ उप॑ वेतु॒ शंसो॒ विश्वे॑भिस्तु॒रैरव॑से॒ यज॑त्रः ।
तेभि॑र्व॒यं सु॑ष॒खायो॑ भवेम॒ तर॑न्तो॒ विश्वा॑ दुरि॒ता स्या॑म ॥ १ ॥

आ नः देवानां उप वेतु शंसः विश्वेभिः तुरैः अवसे यजत्रः
तेभ् इः वयं सु-सखायः भवेम तरन्तः विश्वा दुः-इता स्याम ॥ १ ॥

त्वरित प्राप्त होणार्‍या सकल अभीष्टांसह दिव्य विभूतींचा पुण्य आशीर्वाद आमच्या रक्षणासाठी आम्हांवर राहो. म्हणजे त्यांच्या योगाने हा एक उत्तम मित्र आम्ही जोडला असें होईल आणि आम्हीं सर्व प्रकारची संकटें तरून पार जाऊं १.


परि॑ चि॒न् मर्तो॒ द्रवि॑णं ममन्यादृ॒तस्य॑ प॒था नम॒सा वि॑वासेत् ।
उ॒त स्वेन॒ क्रतु॑ना॒ सं व॑देत॒ श्रेयां॑सं॒ दक्षं॒ मन॑सा जगृभ्यात् ॥ २ ॥

परि चित् मर्तः द्रविणं ममन्यात् ऋतस्य पथा नमसा विवासेत्
उत स्वेन क्रतुना सं वदेत श्रेयांसं दक्षं मनसा जगृभ्यात् ॥ २ ॥

मर्त्यमानवाने सर्व प्रकारें द्रव्यप्राप्तीची चिंता वहावी; पण सनातन सद्धर्माच्या मार्गाने (वागून) नम्रभावाने (देवाची) सेवा मात्र करीत रहावे. आपल्या कर्तृत्वाच्या धोरणाने प्रयत्‍न करावा, विचारणा करावी, आणि चातुर्य आणि उन्नति ही ध्येयें मनांत घट्ट धरून ठेवावी २.


अधा॑यि धी॒तिरस॑सृग्रं॒ अंशा॑स्ती॒र्थे न द॒स्मं उप॑ य॒न्त्यूमाः॑ ।
अ॒भ्यानश्म सुवि॒तस्य॑ शू॒षं नवे॑दसो अ॒मृता॑नां अभूम ॥ ३ ॥

अधायि धीतिः अससृग्रं अंशाः तीर्थे न दस्मं उप यन्ति ऊमाः
अभि आनश्म सुवितस्य शूषं नवेदसः अमृतानां अभूम ॥ ३ ॥

आमचे एकाग्र ध्यान आतां पूर्ण झाले, (सोमाचे) पल्लवहि आणले; एखाद्या तीर्था (कडे जावे) ज्याप्रमाणे अद्‍भूत करामतीचा मनुष्याकडेच सहायेच्छु जन धांवतात; तसे आम्हीहि त्या सुमंगल (देवा) च्या सामर्थ्याकडे गेलो; आणि त्यामुळे अमर जे विबुध त्यांना ओळखूं लागलों ३.


नित्य॑श्चाकन्या॒त् स्वप॑ति॒र्दमू॑ना॒ यस्मा॑ उ दे॒वः स॑वि॒ता ज॒जान॑ ।
भगो॑ वा॒ गोभि॑रर्य॒में अ॑नज्या॒त् सो अ॑स्मै॒ चारु॑श् छदयदु॒त स्या॑त् ॥ ४ ॥

नित्यः चाकन्यात् स्व-पतिः दमूनाः यस्मै ओं इति देवः सविता जजान
भगः वा गोभिः अर्यमा ईं अनज्यात् सः अस्मै चारुः चदयत् उत स्यात् ॥ ४ ॥

तो अनाद्यनंत देव प्रसन्न होवो. तोच स्वायत्त आहे, तोच उदार आहे. या (भक्ता) साठींच सॄष्टिकर्त्याने (हें सर्व) उत्पन्न केले. भाग्याचा प्रभु (भग) तसार्च ’अर्यमा’ हा या (भक्ता) ला सकल सुंदर वस्तु प्राप्त करून देवो, आणि त्या वस्तू त्याच्या (उपभोगा) साठीं त्याच्याजवळ असोत ४.


इ॒यं सा भू॑या उ॒षसां॑ इव॒ क्षा यद्ध॑ क्षु॒मन्तः॒ शव॑सा स॒माय॑न् ।
अ॒स्य स्तु॒तिं ज॑रि॒तुर्भिक्ष॑माणा॒ आ नः॑ श॒ग्मास॒ उप॑ यन्तु॒ वाजाः॑ ॥ ५ ॥

इयं सा भूयाः उषसाम्-इव क्षाः यत् ह क्षु-मन्तः शवसा सम्-आयन्
अस्य स्तुतिं जरितुः भिक्षमाणाः आ नः शग्मासः उप यन्तु वाजाः ॥ ५ ॥

अरुणप्रभेला जशी पृथ्वी प्रिय, त्याप्रमाणेंही आमची भूमि देखील अशी असो, कीं येथे बलाढ्य योद्धे भर धौशाने एकत्र जमावे, आणि स्तोत्रकर्त्याच्या स्तुतींची याचना करीत ते कल्याणकारी सत्त्ववीर आमच्याकडे यावेत ५.


अ॒स्येदे॒षा सु॑म॒तिः प॑प्रथा॒नाभ॑वत् पू॒र्व्या भूम॑ना॒ गौः ।
अ॒स्य सनी॑ळा॒ असु॑रस्य॒ योनौ॑ समा॒न आ भर॑णे॒ बिभ्र॑माणाः ॥ ६ ॥

अस्य इत् एषा सु-मतिः पप्रथाना अभवत् पूर्व्या भूमना गौः
अस्य स-नीळाः असुरस्य योनौ समाने आ भरणे बिभ्रमाणाः ॥ ६ ॥

ह्याचीच ही प्रतिभा, याचीच पुरातन स्तवनवाणी आपल्या उत्कर्षाने सर्वविश्रुत झाली; आणि म्हणून ईश्वराच्या लोकीं एकाच ठिकाणी राहणारे जे (विबुध गण) त्यांचा सारख्याच व्यवस्थेने परिपोष होतो ६.


किं स्वि॒द्वनं॒ क उ॒ स वृ॒क्ष आ॑स॒ यतो॒ द्यावा॑पृथि॒वी नि॑ष्टत॒क्षुः ।
सं॒त॒स्था॒ने अ॒जरे॑ इ॒तऊ॑ती॒ अहा॑नि पू॒र्वीरु॒षसो॑ जरन्त ॥ ७ ॥

किं स्वित् वनं कः ओं इति सः वृक्षः आस यतः द्यावापृथिवी इति निः-ततक्षुः
सन्तस्थाने इतिसम्-तस्थाने अजरेइति इतऊती इतीतः-ऊती अहानि पूर्वीः उषसः जरन्त ॥ ७ ॥

ते अरण्य कोणते, आणि त्यांतला तो वृक्ष तरी कोणता होता की ज्याच्यापासून दिव्य विबुधांनी द्युलोक आणो भूलोक हे तासून तयार केले ? हे दोन्ही लोक स्वसंरक्षित आणि व्यवस्थित राहिले असून कधी जीर्ण होत नाहीत. आणि म्हणूनच जे असंख्य दिवस आणि असंख्य प्रभात समय (हो‍ऊन गेले) त्यांनी (ईश्वराची)स्तवने केलीं ७.


नैताव॑दे॒ना प॒रो अ॒न्यद॑स्त्यु॒क्षा स द्यावा॑पृथि॒वी बि॑भर्ति ।
त्वचं॑ प॒वित्रं॑ कृणुत स्व॒धावा॒न् यदीं॒ सूर्यं॒ न ह॒रितो॒ वह॑न्ति ॥ ८ ॥

न एतावत् एना परः अन्यत् अस्ति उक्षा सः द्यावापृथिवी इति बिभर्ति
त्वचं पवित्रं कृणुत स्वधावान् यत् ईं सूर्यं न हरितः वहन्ति ॥ ८ ॥

इतकेंच नव्हे, तर याच्याहिपेक्षां वरची एक गोष्ट आहे ती ही की महेष्वास जो (ईश्वर) तो या द्युलोक-भूलोकांना धारण करतो. त्याच स्वतंत्र देवाने भक्ताच्या त्वचेला पवित्र बनविलें आणि म्हणूनच हरिद्वर्ण अश्व सूर्याप्रमाणे त्यालाहि (तथांतून) घेऊन जातात ८.


स्ते॒गो न क्षां अत्ये॑ति पृ॒थ्वीं मिहं॒ न वातो॒ वि ह॑ वाति॒ भूम॑ ।
मि॒त्रो यत्र॒ वरु॑णो अ॒ज्यमा॑नोऽ॒ग्निर्वने॒ न व्यसृ॑ष्ट॒ शोक॑म् ॥ ९ ॥

स्तेगः न क्षं अति एति पृथ्वीं मिहं न वातः वि ह वाति भूम
मित्रः यत्र वरुणः अज्यमानः अग्निः वने न वि असृष्ट शोकम् ॥ ९ ॥

(स्तेग म्हणजे) रश्मिसमूह; त्या रश्मिप्रमाणे, पृथिवीला व्यापून टाकतो; आणि वायुहि त्याच्या विपुल समूहाला धुक्याप्रमाणे हलवून सोडतो, तेव्हां जगत्‌ मित्र वरुण त्या ठिकाणीं दृग्गोचर हो‍ऊन अरण्यांतील अग्नीप्रमाणे त्याचे तेज झळाळत राहते ९.


स्त॒रीर्यत् सूत॑ स॒द्यो अ॒ज्यमा॑ना॒ व्यथि॑रव्य॒थीः कृ॑णुत॒ स्वगो॑पा ।
पु॒त्रो यत् पूर्वः॑ पि॒त्रोर्जनि॑ष्ट श॒म्यां गौर्ज॑गार॒ यद्ध॑ पृ॒च्छान् ॥ १० ॥

स्तरीः यत् सूत सद्यः अज्यमाना व्यथिः अव्यथीः कृणुत स्व-गोपा
पुत्रः यत् पूर्वः पित्रोः जनिष्ट शम्यां गौः जगार यत् ह पृच्चान् ॥ १० ॥

ती धेनू जी प्रथम वांझ होती तिला प्रसूतिवेदना हो‍ऊं लागून ती व्याली; तेव्हां तिला जरी व्यथा झाली होती तरी ती स्वसंरक्षित असल्याने इतरांना व्यथारहित केले; आईबापांचा प्रथम पुत्र जेव्हां जन्मास आला; तेव्हां त्या धेनूनें शमीला गिळून टाकले; म्हणून तिच्याचविषयीं आम्हीं विचारपूस करीत होतो १०.


उ॒त कण्वं॑ नृ॒षदः॑ पु॒त्रं आ॑हुरु॒त श्या॒वो धनं॒ आद॑त्त वा॒जी ।
प्र कृ॒ष्णाय॒ रुश॑दपिन्व॒तोध॑रृ॒तं अत्र॒ नकि॑रस्मा अपीपेत् ॥ ११ ॥

उत कण्वं नृ-सदः पुत्रं आहुः उत श्यावः धनं आ अदत्त वाजी
प्र कृष्णाय रुशत् अपिन्वत ऊधः ऋतं अत्र नकिः अस्मै अपीपेत् ॥ ११ ॥

नृषदाच्या पुत्राला ’कण्व’ असें म्हणूं लागले; सत्वाढ्य श्यावाने यशोधन मिळविलें; आणि तेजस्वी आकाश मंडळाने आपली कांस कृष्णाकरितां (उदकाने) तुडुंब भरली. पण हे सर्व सनातन धर्माच्या आचरणानें झाले, दुसर्‍या कशानेहि कोणाची भरभराट झाली नाही ११.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३२ (इंद्रसूक्त)

ऋषी - कवष ऐलूष : देवता - इंद्र
छं - ६-९ त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


प्र सु ग्मन्ता॑ धियसा॒नस्य॑ स॒क्षणि॑ व॒रेभि॑र्व॒राँ अ॒भि षु प्र॒सीद॑तः ।
अ॒स्माकं॒ इन्द्र॑ उ॒भयं॑ जुजोषति॒ यत् सो॒म्यस्यान्ध॑सो॒ बुबो॑धति ॥ १॥

प्र सु ग्मन्ता धियसानस्य सक्षणि वरेभिः वरान् अभि सु प्र-सीदतः
अस्माकं इन्द्रः उभयं जुजोषति यत् सोम्यस्य अन्धसः बुबोधति ॥ १ ॥

ध्यानमार्गाला अनुसरणार्‍या आणि सतत विज्ञप्ति करणार्‍या भक्ताच्या उत्कृष्ट प्रार्थनांकडे लक्ष देऊन येथे यज्ञसेवेमध्ये ते उभयतां (अश्व) (ईश्वराच्या) उत्तमोत्तम वरदानांसह आगमन करोत; जेव्हां सोम पेयाचा आस्वाद इंद्र घेतो, त्यी वेळेस तो आमच्या स्तुति आणि सेवा ह्या दोन्ही मान्य करून घेतो १.


वीन्द्र यासि दि॒व्यानि॑ रोच॒ना वि पार्थि॑वानि॒ रज॑सा पुरुष्टुत ।
ये त्वा॒ वह॑न्ति॒ मुहु॑रध्व॒राँ उप॒ ते सु व॑न्वन्तु वग्व॒नाँ अ॑रा॒धसः॑ ॥ २ ॥

वि इन्द्र यासि दिव्यानि रोचना वि पार्थिवानि रजसा पुरु-स्तुत
ये त्वा वहन्ति मुहुः अध्वरान् उप ते सु वन्वन्तु वग्वनान् अराधसः ॥ २ ॥

तूं प्रकाशपूर्ण जे दिव्य लोक ते व्यापून टाकले आहेस. हे असंख्य-जन-स्तुता देवा, पृथ्वीजवळचे रजोलोकहि तूं व्याप्त केले आहेस. जे तुला अध्वर यागाकडे वारंवार घेऊन येतात, ते तुझे अश्व आम्हीं जरी उगीच कांहीं तरी स्तुति करून बडबड करीत असलों आणि (देवाचे) आराधन जरी बरोबर करीत नाही तरी आमच्यावर प्रेम करोत २.


तदिन् मे॑ छन्त्स॒द्वपु॑षो॒ वपु॑ष्टरं पु॒त्रो यज् जानं॑ पि॒त्रोर॒धीय॑ति ।
जा॒या पतिं॑ वहति व॒ग्नुना॑ सु॒मत् पुं॒स इद्‌भ॒द्रो व॑ह॒तुः परि॑ष्कृतः ॥ ३ ॥

तत् इत् मे चन्त्सत् वपुषः वपुः-तरं पुत्रः यत् जानं पित्रोः अधि-इयति
जाया पतिं वहति वनुना सु-मत् पुंसः इत् भद्रः वहतुः परि-कृतः ॥ ३ ॥

सर्व रमणीय वस्तूंमध्ये मी केलेले स्तवनच त्याला रमणीय वाटो. कारण पुत्र हाच आईबापांचा सर्व जीव आपल्याकडे खेंचतो. प्रेमळ पत्‍नी आपल्या मनोहर बोलांनी पतीचे चित्त आपल्याकडे ओढून घेते, किंवा विवाहासाठीं (निघालेल्या) पुरुषाच्या मिरवणुकीचा थाट फारच आकर्षक असतो ३.


तदित् स॒धस्थं॑ अ॒भि चारु॑ दीधय॒ गावो॒ यच् छास॑न् वह॒तुं न धे॒नवः॑ ।
मा॒ता यन् मन्तु॑र्यू॒थस्य॑ पू॒र्व्याभि वा॒णस्य॑ स॒प्तधा॑तु॒रिज् जनः॑ ॥ ४ ॥

तत् इत् सध-स्थं अभि चारु दीधय गावः यत् शासन् वहतुं न धेनवः
माता यत् मन्तुः यूथस्य पूर्व्या अभि वाणस्य सप्त-धातुः इत् जनः ॥ ४ ॥

तेंच मन्दिर तूं उत्तम रीतीने सुप्रकाशित कर. मिरवणुकीमध्यें जशा धेनू, तशा तेथें किरणावलिच आपला रिघाव करतात. मननशील भक्ताची माता सर्व समजामध्येंहि अग्रेसर असते; तिच्या स्तुतिघोषाच्या भोंवतीच आलाप घेणारे जन गोळा होतात ४.


प्र वोऽ॑च्छा रिरिचे देव॒युष् प॒दं एको॑ रु॒द्रेभि॑र्याति तु॒र्वणिः॑ ।
ज॒रा वा॒ येष्व् अ॒मृते॑षु दा॒वने॒ परि॑ व॒ ऊमे॑भ्यः सिञ्चता॒ मधु॑ ॥ ५ ॥

प्र वः अच्च रिरिचे देव-युः पदं एकः रुद्रेभिः याति तुर्वणिः
जरा वा येषु अमृतेषु दावने परि वः ऊमेभ्यः सिचत मधु ॥ ५ ॥

तुमचा तो देवोत्सुक भक्त परमपदाला जाऊन पोहोंचला, तोच एक त्वरित यशोवान्‌ भक्त रुद्रांसह संचार करतो. (भक्ताने केलेली) स्तुति ज्या अमर विभूतींच्या (मनांत) वरदान देण्याकडे प्रवृत्ति उत्पन्न करते, त्या तुमच्या सहायकांसाठी तुम्हीं मधुर सोमरस पात्रांत भरपूर ओता ५.


नि॒धी॒यमा॑नं॒ अप॑गूळ्हं अ॒प्सु प्र मे॑ दे॒वानां॑ व्रत॒पा उ॑वाच ।
इन्द्रो॑ वि॒द्वाँ अनु॒ हि त्वा॑ च॒चक्ष॒ तेना॒हं अ॑ग्ने॒ अनु॑शिष्ट॒ आगा॑म् ॥ ६ ॥

नि-धीयमानं अप-गूळ्हं अप्-सु प्र मे देवानां व्रत-पाः उवाच
इन्द्रः विद्वान् अनु हि त्वा चचक्ष तेन अहं अग्ने अनु-शिष्टः आ अगाम् ॥ ६ ॥

देवांच्या धर्मनियमांचे पालन करणार्‍या एका भक्ताने मला असे सांगितले कीं उदकाच्या अंतर्भागीं तूं अदृश्यरूपानें राहिला आहेस आणि सर्वज्ञ इंद्राने तुजला अनुलक्षून मजकडे अवलोकन केलें, तेव्हां -त्याच्याच आज्ञेनुरूप हे अग्निदेवा, मी येथें प्राप्त झालों ६. -


अक्षे॑त्रवित् क्षेत्र॒विदं॒ ह्यप्रा॒ट् स प्रैति॑ क्षेत्र॒विदानु॑शिष्टः ।
ए॒तद्वै भ॒द्रं अ॑नु॒शास॑नस्यो॒त स्रु॒तिं वि॑न्दत्यञ्ज॒सीना॑म् ॥ ७ ॥

अक्षेत्र-वित् क्षेत्र-विदं हि अप्राट् सः प्र एति क्षेत्र-विदा अनु-शिष्टः
एतत् वै भद्रं अनु-शासनस्य उत स्रुतिं विन्दति अजसीनाम् ॥ ७ ॥

जाण्याचे ठिकाण माहित नसणारानें ज्ञानी पुरुषास विचारले म्हणजे त्या ज्ञानी पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे तो अज्ञानी मनुष्य इच्छित स्थळीं जाऊन पोहोंचतो. धर्माज्ञा पालनानें होणारें कल्याण हें असें असतें. त्याचप्रमाणें न्याय्य मार्गाची जी सरळवृत्ति तीहि तशीच त्याच्या ठिकाणी बाणते ७.


अ॒द्येदु॒ प्राणी॒दम॑मन्न् इ॒माहापी॑वृतो अधयन् मा॒तुरूधः॑ ।
एं ए॑नं आप जरि॒मा युवा॑नं॒ अहे॑ळ॒न् वसुः॑ सु॒मना॑ बभूव ॥ ८ ॥

अद्य इत् ओं इति प्र आणीत् अममन् इमा अहा अपि-वृतः अधयत् मातुः ऊधः
आ ईं एनं आप जरिमा युवानं अहेळन् वसुः सु-मनाः बभूव ॥ ८ ॥

आजच त्यानें श्वासोच्छवास घेतला आजच्या दिवशीच त्याला स्मृति उत्पन्न झाली, आणि (पदराखाली) झांकून राहून त्याने मातेचें स्तनपान केलें; पुढें तो तरुण झाला आणि नंतर त्या तरुणाला जरेनें गांठलें, पण त्या वेळीं जेव्हां तो क्रोधरहित दिव्यसंपत्तिमान्‌, आणि पुण्यात्मा असाच बनला होता ८.


ए॒तानि॑ भ॒द्रा क॑लश क्रियाम॒ कुरु॑श्रवण॒ दद॑तो म॒घानि॑ ।
दा॒न इद्वो॑ मघवानः॒ सो अ॑स्त्व॒यं च॒ सोमो॑ हृ॒दि यं बिभ॑र्मि ॥ ९ ॥

एतानि भद्रा कलश क्रियाम कुरु-श्रवण ददतः मघानि
दानः इत् वः मघ-वानः सः अस्तु अयं च सोमः हृदि यं बिभर्मि ॥ ९ ॥

हे कलशा, कुरुश्रवणा, याप्रमाणें देणग्या देणार्‍या यजमानाचें आम्हीं असेच कल्याण केलें आहे; तर हे दानशूर यजमानांनो, तो तुम्हांला कल्याणदायक होवो; आणि हा जो सोम मी आपल्या हृदयांत बाणवितो, तोहि पण तुम्हांला सुखदाता होवो ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३३ (विश्वेदेव, इंद्रसूक्त, कुरुश्रवण दानस्तुती)

ऋषी - कवष ऐलूष
देवता - १ - विश्वेदेव्; २-३ - इंद्र; ४-५ कुरुश्रवण त्रासदस्यव दानस्तुती; अवशिष्ट - उपमस्र्हवस् शोकनिवृत्ती
छं - १ - त्रिष्टुभ्; २ - बृहती; ३ - सतोबृहती; अवशिष्ट - गायत्री


प्र मा॑ युयुज्रे प्र॒युजो॒ जना॑नां॒ वहा॑मि स्म पू॒षणं॒ अन्त॑रेण ।
विश्वे॑ दे॒वासो॒ अध॒ मां अ॑रक्षन् दुः॒शासु॒रागा॒दिति॒ घोष॑ आसीत् ॥ १॥

प्र मा युयुज्रे प्र-युजः जनानां वहामि स्म पूषणं अन्तरेण
वि श्वे देवासः अध मां अरक्षन् दुः-शासुः आ अगात् इति घोषः आसीत् ॥ १ ॥

लोकांच्या युक्त्याप्रयुक्त्यांना मला इकडे गुंतवून टाकले; परंतु मी आपल्या अंत:करणाने विश्वपोषक (ईश्वरा) ला मनांत धारण केलें आहे; म्हणूनच दिव्यविभूतींनी माझें रक्षण केले; तथापि कोणी तरी कुवार्ता सांगणारा मनुष्य इकडे आला अशी आरोळी आलीच १.


सं मा॑ तपन्त्य॒भितः॑ स॒पत्नी॑रिव॒ पर्श॑वः ।
नि बा॑धते॒ अम॑तिर्न॒ग्नता॒ जसु॒र्वेर्न वे॑वीयते म॒तिः ॥ २ ॥

सं मा तपन्ति अभितः सपत्नीः-इव पर्शवः
नि बाधते अमतिः नग्नता जसुः वेः न वेवीयते मतिः ॥ २ ॥

माझ्या ह्या बरगड्यांनी हाडें सवतीप्रमाणे चोहोकडून मला संताप देत आहेत. मूर्खपणा, दारिद्र्य, आणि वखवख ह्या आपत्ति मला छळीत आहेत. आणि त्रासलेल्या पक्ष्याप्रमाणें माझी मति अगदी गुंग झालेली आहे. २.


मूषो॒ न शि॒श्ना व्यदन्ति मा॒ध्य स्तो॒तारं॑ ते शतक्रतो ।
स॒कृत् सु नो॑ मघवन्न् इन्द्र मृळ॒याधा॑ पि॒तेव॑ नो भव ॥ ३ ॥

मूषः न शिश्ना वि अदन्ति मा आध्यः स्तोतारं ते शतक्रतो इतिशत-क्रतो
सकृत् सु नः मघ-वन् इन्द्र मृळय अध पिताइव नः भव ॥ ३ ॥

हे अनंतप्रज्ञा देवा, उंदरांनी (कापडाचे) धागेदोरे कुरतडावे, त्याप्रमाणें मानसिक दु:खें मला खाऊन टाकीत आहेत; तर हे भगवंता इंद्रा, आतां वेळ न लावतां मजवर कृपा कर आणि पित्याप्रमाणें आमचा (प्रतिपालक) हो ३.


कु॒रु॒श्रव॑णं आवृणि॒ राजा॑नं॒ त्रास॑दस्यवम् । मंहि॑ष्ठं वा॒घतां॒ ऋषिः॑ ॥ ४ ॥

कुरु-श्रवणं अवृणि राजानं त्रासदस्यवं मंहिष्ठं वाघतां ऋषिः ॥ ४ ॥

त्रृसदस्यूचा पुत्र अत्यंत उदार जो कुरुश्रवण, त्याला कवींच्या त्या धुरीणाला मी ऋषीने (यज्ञाकरितां) विनंती केली ४.


यस्य॑ मा ह॒रितो॒ रथे॑ ति॒स्रो वह॑न्ति साधु॒या । स्तवै॑ स॒हस्र॑दक्षिणे ॥ ५ ॥

यस्य मा हरितः रथे तिस्रः वहन्ति साधु-या स्तवै सहस्र-दक्षिणे ॥ ५ ॥

तेव्हां त्याचे तीन हरिद्वर्ण घोडे मला रथांतून ऐटीने घेऊन चालले म्हणून, सहस्त्रावधि दक्षिणा ज्या यज्ञांत देतात, अशा यज्ञांत (त्याच्याकरितां) मीहि ईश्वराचे स्तवन करीन ५.


यस्य॒ प्रस्वा॑दसो॒ गिर॑ उप॒मश्र॑वसः पि॒तुः । क्षेत्रं॒ न र॒ण्वं ऊ॒चुषे॑ ॥ ६ ॥

यस्य प्र-स्वादसः गिरः उपम-श्रवसः पितुः क्षेत्रं न रण्वं ऊचुषे ॥ ६ ॥

उपमा देण्यासारखी ज्याची कीर्ति असा जो राजपुत्र "उपमश्रव" त्याच्या पित्याचें भाषण किति मधुर, जणो काय भुकेलेल्यापुढें मधुरफलांनी भरलेला बागच ६.


अधि॑ पुत्रोपमश्रवो॒ नपा॑न् मित्रातिथेरिहि । पि॒तुष् टे॑ अस्मि वन्दि॒ता ॥ ७ ॥

अधि पुत्र उपम-श्रवः नपात् मित्र-अतिथेः इहि पितुः ते अस्मि वन्द् इता ॥ ७ ॥

हे राजपुत्रा उपमश्रवा, हे मित्रातिथीच्या बालका, ये इकडे; मी तुझ्या पित्यालाला पूज्य मानणारा आणि त्याचा आश्रित आहे ७.


यदीशी॑या॒मृता॑नां उ॒त वा॒ मर्त्या॑नाम् । जीवे॒दिन् म॒घवा॒ मम॑ ॥ ८ ॥

यत् ईशीय अमृतानां उत वा मर्त्यानां जीवेत् इत् मघ-वा मम ॥ ८ ॥

जर अमर विबुधांवर माझी सत्ता चालली असती, जर मर्त्य मानवांवरहि तसाच अधिकार चालता; तर हा माझा दानशूर यजमान खासच जगला असता ८.


न दे॒वानां॒ अति॑ व्र॒तं श॒तात्मा॑ च॒न जी॑वति । तथा॑ यु॒जा वि वा॑वृते ॥ ९ ॥

न देवानां अति व्रतं शत-आत्मा चन जीवति तथा युजा वि ववृते ॥ ९ ॥

(पण उपाय काय ?) शंभर वर्षे ज्याला आयुष्य असेल तो सुद्धां देवांचा नियम मोडून जगत नाही, आप्तेष्टापासून त्याची ताटातूट होतेच (म्हणून आतां शोक करूं नको) ९.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३४ (अक्षसूक्त)

ऋषी - कवष ऐलूष अथवा अक्ष मौजवत्
देवता - १, ७, ९, १२ - अक्ष; १३ - कृषि; अवशिष्ट अक्ष-कितव निंदा
छं - ७ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्


प्रा॒वे॒पा मा॑ बृह॒तो मा॑दयन्ति प्रवाते॒जा इरि॑णे॒ वर्वृ॑तानाः ।
सोम॑स्येव मौजव॒तस्य॑ भ॒क्षो वि॒भीद॑को॒ जागृ॑वि॒र्मह्यं॑ अच्छान् ॥ १ ॥

प्रावेपाः मा बृहतः मादयन्ति प्रवाते--जाः इरिणे वर्वृतानाः
सोमस्य-इव मौज-वतस्य भक्षः वि-भीदकः जागृविः मह्यं अच्चान् ॥ १ ॥

वार्‍याच्या सोसाट्यांत पोसलेल्या (झाडाच्या) लाकडांपासून बनलेले हे (फांसे)- हे पटलांवर गरंगळत थैथै नाचणारे फांसे-मला बेभान करीत आहेत-हा स्वत: जागरूक राहणारा फांसा मला मात्र मौज पर्वतावरील सोमवल्लीच्या मधुरपेयाने गुंग झाल्याप्रमाणे गुंग करून सोडीत आहे १.


न मा॑ मिमेथ॒ न जि॑हीळ ए॒षा शि॒वा सखि॑भ्य उ॒त मह्यं॑ आसीत् ।
अ॒क्षस्या॒हं ए॑कप॒रस्य॑ हे॒तोरनु॑व्रतां॒ अप॑ जा॒यां अ॑रोधम् ॥ २ ॥

न मा मिमेथ न जिहीळे एषा शिवा सखि-भ्यः उत मह्यं आसीत्
अक्षस्य अहं एक-परस्य हेतोः अनु-व्रतां अप जायां अरोधम् ॥ २ ॥

ही माझी भार्या मला कधीं टाकून बोलली नाही किंवा माझ्यावर संतापली नाही, माझ्या मित्रांशी आणि माझ्याशी सुखासमाधानाने वागली, असें असून केवळ ह्या एकच एक जुगारीच्या (व्यसनाच्या) नादी भरून मी आपल्या आज्ञाधारक स्त्रीला दरडावून दूर लोटून दिले २.


द्वेष्टि॑ श्व॒श्रूरप॑ जा॒या रु॑णद्धि॒ न ना॑थि॒तो वि॑न्दते मर्डि॒तार॑म् ।
अश्व॑स्येव॒ जर॑तो॒ वस्न्य॑स्य॒ नाहं वि॑न्दामि कित॒वस्य॒ भोग॑म् ॥ ३ ॥

द्वेष्टि श्वश्रूः अप जाया रुणद्धि न नाथितः विन्दते मर्डितारं
अश्वस्य-इव जरतः वस्न्यस्य न अहं विन्दामि कितवस्य भोगम् ॥ ३ ॥

(जुगार्‍याची) सासू त्याचा तिटकारा करते. शेवटीं बायकोहि त्याचा निषेध करते. त्याने पुष्कळ विनवण्या केल्या, तरी त्याची कोणाला दया येत नाही.(अशी माझी स्थिति आहे). मोठ्या किंमतवान्‌ परंतु म्हातार्‍या घोड्याप्रमाणे (माझी दशा झाली आहे.) मला जुगारींत (पैसा न मिळाल्यानें) चैनसुद्धां भोगावयास मिळाली नाही ३.


अ॒न्ये जा॒यां परि॑ मृशन्त्यस्य॒ यस्यागृ॑ध॒द्वेद॑ने वा॒ज्य१क्षः ।
पि॒ता मा॒ता भ्रात॑र एनं आहु॒र्न जा॑नीमो॒ नय॑ता ब॒द्धं ए॒तम् ॥ ४ ॥

अन्ये जायां परि मृशन्ति अस्य यस्य अगृधत् वेदने वाजी अक्षः
पिता माता भ्रातरः एनं आहुः न जानीमः नयत बद्धं एतम् ॥ ४ ॥

तो बलाढ्य फांसा ज्याचें धन जुगारींत पार लुबाडून घेतो त्याच्या बायकोवरसुद्धा भलतेच लोक हात टाकण्यासहि चुकत नाहींत. त्याचा बाप, आई, भाऊ, हे म्हणतात कीं हा कोण आहे तो आम्हीं मुळींच ओळखीत नाहीं. खुशाल त्याच्या मुसक्या बांधून त्याला घेऊन जा ४.


यदा॒दीध्ये॒ न द॑विषाण्येभिः परा॒यद्‌भ्योऽ॑व हीये॒ सखि॑भ्यः ।
न्युप्ताश्च ब॒भ्रवो॒ वाचं॒ अक्र॑त॒ँ एमीदे॑षां निष्कृ॒तं जा॒रिणी॑व ॥ ५ ॥

यत् आदीध्ये न दविषाणि एभिः परायत्-भ्यः अव हीये सखि-भ्यः
नि-उप्ताः च बभ्रवः वाचं अक्रत एमि इत् एषां निः-कृतं जारिणी-इव ॥ ५ ॥

जेव्हां मी असा निर्धार करतों की इत:पर ह्या फाशांनी खेळणार नाही, तेव्हा संगत सुटलेले माझे सोबती-आणि फांसे माझा धि:कार तर करतातच; परंतु एकदा का ते पिंगट रंगाचे फांसे पटावर फेंकले जाऊन त्यांचा खुळखुळाट सुरू झाला, म्हणजे एखादी बदकर्मी स्त्री संकेतस्थळीं जाते त्याप्रमाणें मीहि त्या जुगाराच्या अड्ड्याकडे धांवतो ५.


स॒भां ए॑ति कित॒वः पृ॒च्छमा॑नो जे॒ष्यामीति॑ त॒न्वाख्प् शूशु॑जानः ।
अ॒क्षासो॑ अस्य॒ वि ति॑रन्ति॒ कामं॑ प्रति॒दीव्ने॒ दध॑त॒ आ कृ॒तानि॑ ॥ ६ ॥

सभां एति कितवः पृच्चमानः जेष्यामि इति तन्वा शूशुजानः
अक्षासः अस्य वि तिरन्ति कामं प्रति-दीव्ने दधतः आ कृतानि ॥ ६ ॥

(जुगार्‍याला येतोस का म्हणून) विचारलें की त्याच्या अंगात सुरसुरी चढून "हा आतां मी जिंकणार" असें म्हणून तो अड्ड्यांत जातो, आणि प्रतिस्पर्ध्याशी त्याने पैज बांधली की फांसे त्याची हांव वाढवूं लागतात ६.


अ॒क्षास॒ इद॑ङ्कु॒शिनो॑ नितो॒दिनो॑ नि॒कृत्वा॑न॒स्तप॑नास्तापयि॒ष्णवः॑ ।
कु॒मा॒रदे॑ष्णा॒ जय॑तः पुन॒र्हणो॒ मध्वा॒ सम्पृ॑क्ताः कित॒वस्य॑ ब॒र्हणा॑ ॥ ७ ॥

अक्षासः इत् अङ्कुशिनः नि-तोदिनः नि-कृत्वानः तपनाः तापयिष्णवः
कुमार-देष्णाः जयतः पुनः-हनः मध्वा सम्-पृक्ताः कितवस्य बर्हणा ॥ ७ ॥

हे फांसे अंकुशधारी आहेत; परांण्या टोचणारे आहेत, चामडी (सोलून ती) कातरणारे आहेत, आपण तापून दुसर्‍यालाहि भाजून काढणारे आहेत. (इतकेंहि करून) जुगारींत एखादे वेळीं जय झाला म्हणजे जे बक्षिस मिळतें ते मुलांच्या खेळण्याइतक्याहि किंमतीचे नसते; याप्रमाणें ते उन्मादाने जणों थबथबणारे फांसे जुगार्‍याला प्रथम फुगवून शेवटीं त्याचा नि:पातच करतात ७.


त्रि॒प॒ञ्चा॒शः क्री॑ळति॒ व्रात॑ एषां दे॒व इ॑व सवि॒ता स॒त्यध॑र्मा ।
उ॒ग्रस्य॑ चिन् म॒न्यवे॒ ना न॑मन्ते॒ राजा॑ चिदेभ्यो॒ नम॒ इत् कृ॑णोति ॥ ८ ॥

त्रि-पचाशः क्रीळति व्रातः एषां देवः-इव सविता सत्य-धर्मा
उग्रस्य चित् मन्यवे न नमन्ते राजा चित् एभ्यः नमः इत् कृणोमि ॥ ८ ॥

तीन तीन, पन्नास पन्नास, अशा संचाने फांशांचा खेळ चालतो. (तो खरेपणाच्या इतक्या ऐटीने कीं) जणों काय सत्यस्वरूप सविताच अवतरला आहे. कोणत्याहि भयंकर मनुष्यापुढें ते नम्र होत नाहीत, पण उलट राजा असला तरी तो यांच्या पुढें नमतो ८.


नी॒चा व॑र्तन्त उ॒परि॑ स्फुरन्त्यह॒स्तासो॒ हस्त॑वन्तं सहन्ते ।
दि॒व्या अङ्गा॑रा॒ इरि॑णे॒ न्युप्ताः शी॒ताः सन्तो॒ हृद॑यं॒ निर्द॑हन्ति ॥ ९ ॥

नीचाः वर्तन्ते उपरि स्फुरन्ति अहस्तासः हस्त-वन्तं सहन्ते
दिव्याः अङ्गाराः इरिणे नि-उप्ताः शीताः सन्तः हृदयं निः दहन्ति ॥ ९ ॥

हे फांसे पडतात खाली, पण फुरफुरतात सर्वांच्या वर; यांना हात नाहीत, तरी हात असणार्‍या पुरुषांना हे दीन करतात. हे पटावर टाकले कीं जणों दिव्यलोकचे निखारेच. कारण ते हाताला जरी थंड लागतात, तरी काळीजच करपवून टाकीत असतात ९.


जा॒या त॑प्यते कित॒वस्य॑ ही॒ना मा॒ता पु॒त्रस्य॒ चर॑तः॒ क्व स्वित् ।
ऋ॒णा॒वा बिभ्य॒द्धनं॑ इ॒च्छमा॑नोऽ॒न्येषां॒ अस्तं॒ उप॒ नक्तं॑ एति ॥ १० ॥

जाया तप्यते कितवस्य हीना माता पुत्रस्य चरतः क्व स्वित्
ऋण-वा बिभ्यत् धनं इच्चमानः अन्येषां अस्तं उप नक्तं एति ॥ १० ॥

जुगार्‍याची बायको दीनवाणी हो‍ऊन चरफडत बसते. त्याची आई आपल्या पुत्राला इकडे तिकडे भटकतांना पाहून कळवळते. तो स्वत: कर्जबाजारी हो‍ऊन भेदरून जातो आणि पैशाकरितां दुसर्‍याच्या दारीं दिवस रात्र खेपा घालतो १०.


स्त्रियं॑ दृ॒ष्ट्वाय॑ कित॒वं त॑तापा॒न्येषां॑ जा॒यां सुकृ॑तं च॒ योनि॑म् ।
पू॒र्वा॒ह्णे अश्वा॑न् युयु॒जे हि ब॒भ्रून् सो अ॒ग्नेरन्ते॑ वृष॒लः प॑पाद ॥ ११॥

स्त्रियं दृष्टवाय कितवं तताप अन्येषां जायां सु-कृतं च योनिं
पूर्वाह्णे अश्वान् युयुजे हि बभ्रून् सः अग्नेः अन्ते वृषलः पपाद ॥ ११ ॥

स्वत:च्या स्त्रीला पाहिले तर त्याला संताप येतोच; पण दुसर्‍याच्या स्त्रियेला पाहिले, किंवा इतरांचे घर शृंगारलेले दृष्टीस पडलें तरी जुगार्‍याच्या अंगाची लाही होते; पण करतो काय ? सकाळीं धुरकटलेले घोडे जुंपून (भाड्याकरितां) गाडी हाकावी आणि (रात्री) शेकोटी पेटवून तिच्याजवळ त्या गुलामाने पडून राहावें ११.


यो वः॑ सेना॒नीर्म॑ह॒तो ग॒णस्य॒ राजा॒ व्रात॑स्य प्रथ॒मो ब॒भूव॑ ।
तस्मै॑ कृणोमि॒ न धना॑ रुणध्मि॒ दशा॒हं प्राची॒स्तदृ॒तं व॑दामि ॥ १२ ॥

यः वः सेनानीः महतः गणस्य राजा व्रातस्य प्रथमः बभूव
तस्मै कृणोमि न धना रुणध्मि दश अहं प्राचीः तत् ऋतं वदामि ॥ १२ ॥

जो तुमच्या बलाढ्य संघाचा सेनापति असेल, तुमच्या पथकाचा अगदीं मुख्य असेल किंवा राजा असेल, त्याच्या पुढें मी आपल्या (हाताच्या) दहाहि बोटांच्या ओंजळीने हात जोडतो आणि सांगतों कीं जुगारीनें मला लुबाडतां आले नाही. हे मी खरें अगदी खरें बोलत आहें १२.


अ॒क्षैर्मा दी॑व्यः कृ॒षिं इत् कृ॑षस्व वि॒त्ते र॑मस्व ब॒हु मन्य॑मानः ।
तत्र॒ गावः॑ कितव॒ तत्र॑ जा॒या तन् मे॒ वि च॑ष्टे सवि॒तायं अ॒र्यः ॥ १३ ॥

अक्षैः मा दीव्यह् कृषिं इत् कृषस्व वित्ते रमस्व बहु मन्यमानः
तत्र गावः कितव तत्र जाया तत् मे वि चष्टे सविता अयं अर्यः ॥ १३ ॥

फांशांनी (जुगार) खेळूं नको; तर शेती कर; आणि मग संपत्तीमध्ये रममाण हो, म्हणजे तूं फार मानमान्यतेला चढशील. तेथें (शेतींत) गाई मिळतील आणि बायकोहि मिळून तेथें तुझा संसार होईल. मला ही गोष्ट ह्या भगवान्‌ सूर्यनारायणानें अनुभवास आणून दिली १३.


मि॒त्रं कृ॑णुध्वं॒ खलु॑ मृ॒ळता॑ नो॒ मा नो॑ घो॒रेण॑ चरता॒भि धृ॒ष्णु ।
नि वो॒ नु म॒न्युर्वि॑शतां॒ अरा॑तिर॒न्यो ब॑भ्रू॒णां प्रसि॑तौ॒ न्व् अस्तु ॥ १४ ॥

मित्रं कृणुध्वं खलु मृळत नः मा नः घोरेण चरत अभि धृष्णु
नि वः नु मन्युः विशतां अरातिः अन्यः बभ्रूणां प्र-सितौ नु अस्तु ॥ १४ ॥

मला आपला मित्र समज. (हे फाशा) खरोखर आमच्यावर दया कर. तुझ्या भयंकर धकाधकीनें मजवर हल्ला चढवूं नको. (फाशांनो,) तुमचा क्रोध शांत होवो, आणि दुसरा कोणी तरी म्हणजे अधार्मिक दुष्ट तुम्हां पिंगट फांशांच्या जाळ्यांत अडकून पडो १४.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३५ (विश्वेदेवांचे पालुपदसूक्त)

ऋषी - लुश धानाक
देवता - विश्वेदेव
छं - १-१२ - जगती; १३-१४ त्रिष्टुभ्


अबु॑ध्रं उ॒ त्य इन्द्र॑वन्तो अ॒ग्नयो॒ ज्योति॒र्भर॑न्त उ॒षसो॒ व्युष्टिषु ।
म॒ही द्यावा॑पृथि॒वी चे॑ततां॒ अपो॑ऽ॒द्या दे॒वानां॒ अव॒ आ वृ॑णीमहे ॥ १॥

अबुध्रं ओं इति त्ये इन्द्र-वन्तः अग्नयः ज्योतिः भरन्तः उषसः वि-उष्टिषु
मही इति द्यावापृथिवी इति चेततां अपः अद्य देवानां अवः आ वृणीमहे ॥ १ ॥

इंद्रासह येणारे ते तेज:पूर्ण अग्नि ह्या प्रभात कालच्या प्रकाशांत जागृत झाले आहेत. तेव्हां, ह्या श्रेष्ठ द्यावापृथिवीहि आमच्या सत्कर्मवृत्ति जागृत करोत, अशी दिव्यविबुधांच्या कृपेची याचना आज आम्ही करीत आहोंत १.


दि॒वस्पृ॑थि॒व्योरव॒ आ वृ॑णीमहे मा॒तॄन् सिन्धू॒न् पर्व॑ताञ् छर्य॒णाव॑तः ।
अ॒ना॒गा॒स्त्वं सूर्यं॑ उ॒षासं॑ ईमहे भ॒द्रं सोमः॑ सुवा॒नो अ॒द्या कृ॑णोतु नः ॥ २ ॥

दिवःपृथिव्योः अवः आ वृणीमहे मातॄन् सिन्धून् पर्वतान् शर्यणावतः
अनागाः-त्वं सूर्यं उषसं ईमहे भद्रं सोमः सुवानः अद्य कृणोतु नः ॥ २ ॥

तसेंच ह्या द्यावापृथिवी, मातेप्रमाणें प्रेमळ नद्या, शर्यणावतांतील पर्वतराजी, यांच्याकडून संरक्षण मिळावें अशी आम्हीं (तुजपाशी) याचना करतो. आम्हांला निष्पाप करावें अशी सूर्य आणि उषा यांची प्रार्थना आम्हीं करीतच आहोत; तर हा पिळला जाणारा सोम आज आमचे कल्याण करो २.


द्यावा॑ नो अ॒द्य पृ॑थि॒वी अना॑गसो म॒ही त्रा॑येतां सुवि॒ताय॑ मा॒तरा॑ ।
उ॒षा उ॒च्छन्त्यप॑ बाधतां अ॒घं स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ३ ॥

द्यावा नः अद्य पृथिवी इति अनागसः मही इति त्रायेतां सुविताय मातरा
उषाः उच्चन्ती अप बाधतां अघं स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ३ ॥

आम्ही निरपराध आहोंत; म्हणून आमच्या सुमंगलासाठीं, श्रेष्ठ आणि मातेप्रमाणें प्रेमळ द्यावापृथिवी त्या आज आमचें रक्षण करोत. उजळणारी उषा आमचें पातक पार नाहींसें करो. कारण प्रदीप्त झालेल्या अग्नीला आम्ही कल्याणार्थ विनवीत आहोंत ३.


इ॒यं न॑ उ॒स्रा प्र॑थ॒मा सु॑दे॒व्यं रे॒वत् स॒निभ्यो॑ रे॒वती॒ व्युच्छतु ।
आ॒रे म॒न्युं दु॑र्वि॒दत्र॑स्य धीमहि स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ४ ॥

इयं नः उस्रा प्रथमा सु-देव्यं रेवत् सनि-भ्यः रेवती वि उच्चतु
आरे मन्युं दुः-विदत्रस्य धीमहि स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ४ ॥

ही पहिली ऐश्वर्यसंपन्न उषा दानशील भक्तासाठीं उत्तम दिव्य आणि धनसंपन्न कांतीने सुप्रकाशित होवो. दुर्विचारी मनुष्याच्या क्रोधाला आम्हीं मूळींच जुमानीत नाही. कारण प्रदीप्त झालेल्या अग्नीला आम्हीं कल्याणार्थ (सदैव) विनवीत असतों ४.


प्र याः सिस्र॑ते॒ सूर्य॑स्य र॒श्मिभि॒र्ज्योति॒र्भर॑न्तीरु॒षसो॒ व्युष्टिषु ।
भ॒द्रा नो॑ अ॒द्य श्रव॑से॒ व्युच्छत स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ५ ॥

प्र याः सिस्रते सूर्यस्य रश्मि-भिः ज्योतिः भरन्तीः उषसः वि-उष्टिषु
भद्राः नः अद्य श्रवसे वि उच्चत स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ५ ॥

सूर्याच्या किरणावलीशी ज्या मिसळून जातात, परंतु उदयकालीं ज्या स्वत: प्रकाशमण्डित असतात त्या उषा आमच्या हितासाठी आज प्रकाशोत; कारण प्रदीप्त झालेल्या अग्नीला आम्हीं कल्याणार्थ विनवीत असतो ५.


अ॒न॒मी॒वा उ॒षस॒ आ च॑रन्तु न॒ उद॒ग्नयो॑ जिहतां॒ ज्योति॑षा बृ॒हत् ।
आयु॑क्षातां अ॒श्विना॒ तूतु॑जिं॒ रथं॑ स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ६ ॥

अनमीवाः उषसः आ चरन्तु नः उत् अग्नयः जिहतां ज्योतिषा बृहत्
अयुक्षातां अश्विना तूतुजिं रथं स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ६ ॥

आरोग्यप्रद उषादेवी आमच्याकडे आगमन करोत. वेदीवरील त्रेताग्निहि आपल्या उज्ज्वलतेनें उद्दीपित होवोत; आणि अश्वीदेव आपला शीघ्रगामी रथ जोडून सज्ज ठेवोत; कारण प्रदीप्त झालेल्या अग्नीची आम्ही आमच्या कल्याणार्थ विनवणी करीत असतों ६.


श्रेष्ठं॑ नो अ॒द्य स॑वित॒र्वरे॑ण्यं भा॒गं आ सु॑व॒ स हि र॑त्न॒धा असि॑ ।
रा॒यो जनि॑त्रीं धि॒षणां॒ उप॑ ब्रुवे स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ७ ॥

श्रेष्ठं नः अद्य सवितः वरेण्यं भागं आ सुव सः हि रत्न-धाः असि
रायः जनित्रीन् धिषणां उप ब्रुवे स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ७ ॥

हे सृष्टिकर्त्या, सवितृदेवा, तूं आम्हांला अत्यंत प्रशस्त आणि श्रेष्ठ असे भाग्य दे. अत्युत्कृष्ट संपत्तीचा दाता तूंच आहेत. (अचल) संपत्तीची जननी जी सद्‌बुद्धि तिचीहि आम्ही विनंति करतो. तशीच प्रदीप्त झालेल्या आग्निचीहि आमच्या कल्याणार्थ विनवणी करीत असतों ७.


पिप॑र्तु मा॒ तदृ॒तस्य॑ प्र॒वाच॑नं दे॒वानां॒ यन् म॑नु॒ष्याख्प् अम॑न्महि ।
विश्वा॒ इदु॒स्रा स्पळ् उदे॑ति॒ सूर्यः॑ स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ८ ॥

पिपर्तु मा तत् ऋतस्य प्र-वाचनं देवानां यत् मनुष्याः अमन्महि
विश्वाः इत् उस्राः स्पट् उत् एति सूर्यः स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ८ ॥

सनातन धर्माचे विवेचन आणि देवाच संकीर्तन आम्ही करीतच असतो, ते (आमचें) अभीष्ट परिपूर्ण करो. सर्व उषांचा परामर्ष घेणारा हा सूर्य उदय पावत आहे, आणि आम्हींहि प्रदीप्त झालेल्या अग्निला आमच्या कल्याणार्थ विनवीत आहोंत ८.


अ॒द्वे॒षो अ॒द्य ब॒र्हिष॒ स्तरी॑मणि॒ ग्राव्णां॒ योगे॒ मन्म॑नः॒ साध॑ ईमहे ।
आ॒दि॒त्यानां॒ शर्म॑णि॒ स्था भु॑रण्यसि स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ९ ॥

अद्वेषः अद्य बर्हिषः स्तरीमणि ग्राव्णां योगे मन्मनः साधे ईमहे
आदित्यानां शर्मणि स्थाः भुरण्यसि स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ९ ॥

आम्हीं आज कुशासन पसरतांना, ग्रावे जुळतांना मननीय स्तोत्रांची योजना करतांना, मनांत यत्किंचितहि द्वेषबुद्धि न ठेवतां प्रार्थना करीत आहों, की (हे मना) आदित्याच्या कल्याणमय छत्राखाली तूं रहा. परंतु सतत प्रयत्‍न कर म्हणजे प्रदीप्त झालेल्या अग्नीची विनवणी आम्ही कल्याणार्थ करूं ९.


आ नो॑ ब॒र्हिः स॑ध॒मादे॑ बृ॒हद्दि॒वि दे॒वाँ ई॑ळे सा॒दया॑ स॒प्त होतॄ॑न् ।
इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णं सा॒तये॒ भगं॑ स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ १० ॥

आ नः बर्हिः सध-मादे बृहत् दिवि देवान् ईळे सादय सप्त होतॄन्
इन्द्रं मित्रं वरुणं सातये भगं स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ १० ॥

अत्युच्च आकाशांत राहणार्‍या दिव्यविभूतींचे मी सार्वत्रिक सोमयागाच्या प्रसंगी स्तवन करतो. ऋत्विजा, तूं सप्तहोत्यांना त्यांच्या कुशासनावर अधिष्ठित कर, म्हणजे आम्हींहि इंद्र, मित्र, वरुण, भग आणि प्रदीप्त झालेला अग्नि यांची विनवणी कल्याणार्थ करीत राहूं १०.


त आ॑दित्या॒ आ ग॑ता स॒र्वता॑तये वृ॒धे नो॑ य॒ज्ञं अ॑वता सजोषसः ।
बृह॒स्पतिं॑ पू॒षणं॑ अ॒श्विना॒ भगं॑ स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ ११॥

ते आदित्याः आ गत सर्वतातये वृधे नः यजं अवत स-जोषसः
बृहस्पतिं पूषणं अश्विना भगं स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ ११ ॥

आदित्यांनो, आमच्या सर्वाभीष्टपूरक यज्ञाला तुम्हीं आगमन करा. प्रेमळ मनाचे तुम्हीं आमच्या अभिवृद्धीसाठीं आमचा यज्ञ यथासांग तडीस न्या. कारण आम्हीं बृहस्पति, पूषा अश्वीदेव, भाग्यदाता भग, आणि प्रदीप्त अग्नि यांची विनवणी कल्याणार्थ करीत असतो ११.


तन् नो॑ देवा यच्छत सुप्रवाच॒नं छ॒र्दिरा॑दित्याः सु॒भरं॑ नृ॒पाय्य॑म् ।
पश्वे॑ तो॒काय॒ तन॑याय जी॒वसे॑ स्व॒स्त्य१ग्निं स॑मिधा॒नं ई॑महे ॥ १२ ॥

तत् नः देवाः यच्चत सु-प्रवाचनं चर्दिः आदित्याः सु-भरं नृ-पाय्यं
पश्वे तोकाय तनयाय जीवसे स्वस्ति अग्निं सम्-इधानं ईमहे ॥ १२ ॥

हे देवांनो, हे आदित्यांनो, ज्याची सर्वत्र वाखाणणी होते, जें समृद्ध आहे, जें शूर पुरुषांनी सुरक्षित आहे, असे गृह आम्हांला अर्पण करा. कारण पशु, (लोकांची) लहान मुलेंबाळें यांची जीवनयात्रा सुखाने व्हावी म्हणून आम्हीं प्रदीप्त झालेल्या अग्नीची विनवणी कल्याणार्थ करीत असतों १२.


विश्वे॑ अ॒द्य म॒रुतो॒ विश्व॑ ऊ॒ती विश्वे॑ भवन्त्व॒ग्नयः॒ समि॑द्धाः ।
विश्वे॑ नो दे॒वा अव॒सा ग॑मन्तु॒ विश्वं॑ अस्तु॒ द्रवि॑णं॒ वाजो॑ अ॒स्मे ॥ १३ ॥

विश्वे अद्य मरुतः विश्वे ऊती विश्वे भवन्तु अग्नयः सम्-इद्धाः
वि श्वे नः देवाः अवसा आ गमन्तु विश्वं अस्तु द्रविणं वाजः अस्मे इति ॥ १३ ॥

आज अखिल मरुत्‌गण, सर्व स्वरूपाचे प्रज्वलित अग्नि आमच्या सर्व प्रकारच्या सहायार्थ येवोत. आणि सर्व प्रकारचें (अचल) धन आणि सत्त्वसामर्थ्य आमचें होवो १३.


यं दे॑वा॒सोऽ॑वथ॒ वाज॑सातौ॒ यं त्राय॑ध्वे॒ यं पि॑पृ॒थात्यंहः॑ ।
यो वो॑ गोपी॒थे न भ॒यस्य॒ वेद॒ ते स्या॑म दे॒ववी॑तये तुरासः ॥ १४ ॥

यं देवासः अवथ वाज-सातौ यं त्रायध्वे यं पिपृथ अति अंहः
यः वः गो--पीथे न भयस्य वेद ते स्याम देव-वीतये तुरासः ॥ १४ ॥

दिव्यविबुधांनो, सत्त्वसामर्थ्य प्राप्तीच्या प्रयत्‍नांत ज्याच्यावर तुम्हीं कृपा करितां, ज्याचे परित्राण करितां, ज्याला पातकापासून सोडवितां, तो भक्त तुमच्या सोमयागांत भयाला जुमानीत नाही; त्याप्रमाणें देवसेवेसाठीं आम्हींहि तसेच (निर्भय) हो‍ऊं असे हे त्वरितप्रसाद देवांनो तुम्ही घडवा १४.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३६ (विश्वेदेवांचे पालुपदसूक्त)

ऋषी - लुश धानाक
देवता - विश्वेदेव
छं - १-१२ - जगती; १३-१४ त्रिष्टुभ्


उ॒षासा॒नक्ता॑ बृह॒ती सु॒पेश॑सा॒ द्यावा॒क्षामा॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
इन्द्रं॑ हुवे म॒रुतः॒ पर्व॑ताँ अ॒प आ॑दि॒त्यान् द्यावा॑पृथि॒वी अ॒पः स्वः ॥ १॥

उषसानक्ता बृहती इति सु-पेशसा द्यावाक्षामा वरुणः मित्रः अर्यमा
इन्द्रं हुवे मरुतः पर्वतान् अपः आदित्यान् द्यावापृथिवी इति अपः स्वर् इति स्वः ॥ १ ॥

श्रेष्ठ उषा आणि रात्र, आणि ज्यांची रचना उत्कृष्ट आहे अशा द्यावापृथिवी, तसेंच (आवरक) वरुण, मित्र, अर्यमा आणि इंद्र यांना नम्रपणानें पाचारण करीत आहेत; तसेंच मरुत्‌गण, पर्वत, आपोदेवी आणि आदित्य, आकाशलोक आणि भूलोक, उदकें आणि स्वर्लोक, यांनाहि मी पाचारण करीत आहे १.


द्यौश्च॑ नः पृथि॒वी च॒ प्रचे॑तस ऋ॒ताव॑री रक्षतां॒ अंह॑सो रि॒षः ।
मा दु॑र्वि॒दत्रा॒ निरृ॑तिर्न ईशत॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ २ ॥

द्यौः च नः पृथिवी च प्र-चेतसा ऋतवरी इत्य् ऋत-वरी रक्षतां अंहसः रिषः
मा दुः-विदत्रा न्र्-ऋतिः नः ईशत तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ २ ॥

अत्यंतज्ञानी, सत्यधर्मप्रिय असे आकाश आणि भूलोक हे पातकापासून आणि अपघातापासून आमचे संरक्षण करोत. कुविचार आणि दुर्दशा यांचा पगडा आम्हांवर कधीहि न चालो, आणि हा प्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागत आहों २.


विश्व॑स्मान् नो॒ अदि॑तिः पा॒त्वंह॑सो मा॒ता मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य रे॒वतः॑ ।
स्वर्व॒ज्ज्योति॑रवृ॒कं न॑शीमहि॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ३ ॥

विश्वस्मात् नः अदितिः पातु अंहसः माता मित्रस्य वरुणस्य रेवतः
स्वः-वत् ज्योतिः अवृकं नशीमहि तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ३ ॥

मित्राची तसेंच (दिव्य) ऐश्वर्यसंपन्न वरुणाची माता जी अदिति ती आमचें सर्व प्रकारच्या पातकापासून रक्षण करो; जेथें कपट, घातकीपणा यांचा लेशहि नसतो अशी दिव्य लोकांतील उज्ज्वलता आम्हांस लाभो; हाच प्रसाद आम्हीं दिव्य विबुधांजवळ आज हात जोडून मागत आहों ३. -


ग्रावा॒ वद॒न्न् अप॒ रक्षां॑सि सेधतु दु॒ष्वप्न्यं॒ निरृ॑तिं॒ विश्वं॑ अ॒त्रिण॑म् ।
आ॒दि॒त्यं शर्म॑ म॒रुतां॑ अशीमहि॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ४ ॥

ग्रावा वदन् अप रक्षांसि सेधतु दुः-स्वप्न्यं निः-ऋतिं विश्वं अत्रिणं
आदित्यं शर्म मरुतां अशीमहि तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ४ ॥

ग्राव्यांचा निनादच राक्षसांना दूर पळवून ठार करो. त्याचप्रमाणें दु:स्वप्नें दुर्दशा आणि सर्व प्रकारचे खादाड शत्रु यांचाहि तो नाश करो. आदित्य आणि मरुत्‌ यांचे कल्याणकारी छत्र आम्हांवर असो; हाच कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागत आहोंत ४.


एन्द्रो॑ ब॒र्हिः सीद॑तु॒ पिन्व॑तां॒ इळा॒ बृह॒स्पतिः॒ साम॑भिरृ॒क्वो अ॑र्चतु ।
सु॒प्र॒के॒तं जी॒वसे॒ मन्म॑ धीमहि॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ५ ॥

आ इन्द्रः बर्हिः सीदतु पिन्वतां इळा बृहस्पतिः साम-भिः ऋक्वः अर्चतु
सु-प्रकेतं जीवसे मन्म धीमहि तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ५ ॥

इंद्र आपल्या कुशासनावर आरुढ होवो, देवस्तुतीला भरतें येवो, ऋक्‌स्तोत्रप्रविण [ऋत्विज] बहस्पतीचे सामगायनानें अर्चन करो. उत्कृष्ट जाणीव उत्पन्न करणारे आणि मननीय असें जें स्तोत्र त्याचें मनन (सर्वांच्या) जीवनासाठीं आम्ही करीत राहूं; हाच कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागें आहो ५.


दि॒वि॒स्पृशं॑ य॒ज्ञं अ॒स्माकं॑ अश्विना जी॒राध्व॑रं कृणुतं सु॒म्नं इ॒ष्टये॑ ।
प्रा॒चीन॑रश्मिं॒ आहु॑तं घृ॒तेन॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ६ ॥

दिवि-स्पृशं यजं अस्माकं अश्विना जीर-अध्वरं कृणुतं सुम्नं इष्टये
प्राचीन-रश्मिं आहुतं घृतेन तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ६ ॥

आमचा यज्ञ हे अश्वीहो, शीघ्रफलद आणि निर्विघ्न हो‌ऊन तो दिव्यलोकीं पोहोंचेल असें करा. आमच्या इच्छित प्राप्तीसाठी तो सुखमय, घृताहुतियुक्त करून त्याचा प्रकाश अनुकूल करा, हाच कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागतों आहो ६.


उप॑ ह्वये सु॒हवं॒ मारु॑तं ग॒णं पा॑व॒कं ऋ॒ष्वं स॒ख्याय॑ श॒म्भुव॑म् ।
रा॒यस्पोषं॑ सौश्रव॒साय॑ धीमहि॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ७ ॥

उप ह्वये सु-हवं मारुतं गणं पावकं ऋष्वं सख्याय शम्-भुवं
रायः पोषं सौश्रवसाय धीमहि तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ७ ॥

तात्काळ हांक ऐकून येणारे, पवित्र, भव्य आणि कल्याणप्रद मरुत्‌गणांना मी पाचारण करितों. त्यांचे नांव (स्तवनामध्यें) सर्वत्र ऐकूं यावे म्हणून आम्ही त्या (अक्षय-) धनवर्धक मरुतांचे चिंतन करतों आणि हाच कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागतों आहो ७.


अ॒पां पेरुं॑ जी॒वध॑न्यं भरामहे देवा॒व्यं सु॒हवं॑ अध्वर॒श्रिय॑म् ।
सु॒र॒श्मिं सोमं॑ इन्द्रि॒यं य॑मीमहि॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ८ ॥

अपां पेरुं जीव-धन्यं भरामहे देव-अव्यं सु-हवं अध्वर-श्रियं
सु-रश्मिं सोमं इन्द्रियं यमीमहि तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ८ ॥

उदकांना उचंबळून देऊन भरती आणणारा, मानवी जीवनाला धन्य करणारा, देवाच्या कृपेंत राहणारा, भक्ताच्या हाकेसरशीं येणारा असा जो सोम तो आम्हीं पात्रांत ओतीत आहों; त्या कांतिमान सोमाजवळ आम्हीं इंद्राच्या कृपेची याचना करावी हाच कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागतों आहो ८.


स॒नेम॒ तत् सु॑स॒निता॑ स॒नित्व॑भिर्व॒यं जी॒वा जी॒वपु॑त्रा॒ अना॑गसः ।
ब्र॒ह्म॒द्विषो॒ विष्व॒ग् एनो॑ भरेरत॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ९ ॥

सनेम तत् सु-सनिता सनित्व-भिः वयं जीवाः जीव-पुत्राः अनागसः
ब्रह्म-द्विषः विष्वक् एनः भरेरत तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ९ ॥

दानशाली आणि धार्मिक मित्रांसह दानशालित्वानेंच ते महत्‌ भाग्य लाभतें तें भाग्य आम्हीं निरपराध जीव, आमचे पुत्रादिक जीवंत राहून प्राप्त करून घेऊं असे घडो, आणि सर्व पातकें वेदधर्मद्वेषी दुष्टाच्या माथीं बसोत असा कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागतों आहो ९.


ये स्था मनो॑र्य॒ज्ञिया॒स्ते शृ॑णोतन॒ यद्वो॑ देवा॒ ईम॑हे॒ तद्द॑दातन ।
जैत्रं॒ क्रतुं॑ रयि॒मद्वी॒रव॒द्यश॒स्तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ १० ॥

ये स्थाः मनोः यजियाः ते शृणोतन यत् वः देवाः ईमहे तत् ददातन
जैत्रं क्रतुं रयिमत् वीर-वत् यशः तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ १० ॥

मनूला पूज्य असे जे तुम्हीं आमचा धांवा ऐका. हे दिव्यजनांनो, विजयप्रद पराक्रम, आणि (अक्षय) धनयुक्त आणि वीरयुक्त यश, ही देणगी आम्ही तुमच्यापाशी मागत आहों, ती तुम्ही आम्हाला प्राप्त होईल असें करा -हाच कृपाप्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागतों आहो १०.


म॒हद॒द्य म॑ह॒तां आ वृ॑णीम॒हेऽ॑वो दे॒वानां॑ बृह॒तां अ॑न॒र्वणा॑म् ।
यथा॒ वसु॑ वी॒रजा॑तं॒ नशा॑महै॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ ११॥

महत् अद्य महतां आ वृणीमहे अवः देवानां बृहतां अनर्वणां
यथा वसु वीर-जातं नशामहै तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ ११ ॥

श्रेष्ठ आणि अपराजित अशा दिव्य विभूतीचें जें मोठ्यांत मोठे वरदान तेंच आज आम्हीं नम्रपणें मागत आहो, म्हणजे त्याच्या योगाने वीर्यशालि पुत्रांनी युक्त असें ऐश्वर्य आम्हांला लाभेल ११.


म॒हो अ॒ग्नेः स॑मिधा॒नस्य॒ शर्म॒ण्यना॑गा मि॒त्रे वरु॑णे स्व॒स्तये॑ ।
श्रेष्ठे॑ स्याम सवि॒तुः सवी॑मनि॒ तद्दे॒वानां॒ अवो॑ अ॒द्या वृ॑णीमहे ॥ १२ ॥

महः अग्नेः सम्-इधानस्य शर्मणि अनागाः मित्रे वरुणे स्वस्तये
श्रेष्ठे स्याम सवितुः सवीमनि तत् देवानां अवः अद्य वृणीमहे ॥ १२ ॥

समिधांनी प्रदीप्त झालेल्या श्रेष्ठ अग्नीच्या कल्याणकारी छत्राखाली, मित्र देवाच्या कृपेंत, वरुणाच्या सन्निध, अथवा श्रेष्ठ सवित्याच्या उत्साहपूर्ण सृष्टीच्या ठिकाणीं आम्ही निरपराधी भक्तांनी मंगलप्राप्तीसाठीं रहावें हा प्रसाद आम्हीं दिव्यविबुधांजवळ आज हात जोडून मागत आहो १२.


ये स॑वि॒तुः स॒त्यस॑वस्य॒ विश्वे॑ मि॒त्रस्य॑ व्र॒ते वरु॑णस्य दे॒वाः ।
ते सौभ॑गं वी॒रव॒द्गोम॒दप्नो॒ दधा॑तन॒ द्रवि॑णं चि॒त्रं अ॒स्मे ॥ १३ ॥

ये सवितुः सत्य-सवस्य विश्वे मित्रस्य व्रते वरुणस्य देवाः
ते सौभगं वीर-वत् गो--मत् अप्नः दधातन द्रविणं चित्रं अस्मे इति ॥ १३ ॥

सत्याचा जनक जो सृष्टिकर्ता सविता त्याच्या, तसेंच मित्राच्या, किंवा (जगदावरक) वरुणाच्या नियमानुसार जे अखिल दिव्यगण वागत असतात, ते आम्हांला वीरयुक्त गोधनयुक्त सत्कर्माचे भाग्य आणि अद्‍भूत (अचल) धन अर्पण करोत १३.


स॒वि॒ता प॒श्चाता॑त् सवि॒ता पु॒रस्ता॑त् सवि॒तोत्त॒रात्ता॑त् सवि॒ताध॒रात्ता॑त् ।
स॒वि॒ता नः॑ सुवतु स॒र्वता॑तिं सवि॒ता नो॑ रासतां दी॒र्घं आयुः॑ ॥ १४ ॥

सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सविता उत्तरात्तात्
सविता अधरात्तात् सव् इता नः सुवतु सर्व-तातिं सविता नः रासतां दीर्घं आयुः ॥ १४ ॥

सविता आमच्या पाठीकडे राहो, सविता आमच्या समोर राहो, सविता उत्तरेकडे, सविता दक्षिणेकडेहि राहो; (सारांश) सविता (सृष्टिकर्ता) सर्व इच्छित वस्तु सर्वबाजूंनी आम्हांकारितां उत्पन्न करो, आणि तोच सविता आम्हांला दीर्घायुष्य देवो. १४


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३७ (सूर्यसूक्त)

ऋषी - अभितपस् सौर्य
देवता - सूर्य
छं - १० - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तं स॑पर्यत ।
दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शंसत ॥ १॥

नमः मित्रस्य वरुणस्य चक्षसे महः देवाय तत् ऋतं सपर्यत
दूरे--दृशे देव-जाताय केतवे दिवः पुत्राय सूर्याय शंसत ॥ १ ॥

जगन्मित्र जगदावरक अशा वरुणाचा जो नेत्र त्या सविता देवाला तें श्रेष्ठ सत्कर्म समर्पण करा. सर्वदर्शी, दिव्यप्रभव, प्रकाश हाच ज्याचा ध्वज, द्युलोकाचा पुत्र, असा जो सूर्य त्याचे स्तवन करा १.


सा मा॑ स॒त्योक्तिः॒ परि॑ पातु वि॒श्वतो॒ द्यावा॑ च॒ यत्र॑ त॒तन॒न्न् अहा॑नि च ।
विश्वं॑ अ॒न्यन् नि वि॑शते॒ यदेज॑ति वि॒श्वाहापो॑ वि॒श्वाहोदे॑ति॒ सूर्यः॑ ॥ २ ॥

सा मा सत्य-उक्तिः परि पातु विश्वतः द्यावा च यत्र ततनन् अहान् इ च
विश्वं अन्यत् नि विशते यत् एजति विश्वहा अपः विश्वाहा उत् एत् इ सूर्यः ॥ २ ॥

ज्याच्या सत्यमय वाणीमुळें द्युलोक आणि अहोरात्र हे विस्तारले गेले आहेत, ती सत्यवाणी माझे सर्व बाजूंनी रक्षण करो. ज्या ज्या इतर वस्तू हालचाल करतात, त्या केव्हां तरी विराम पावतात; परंतु उदकें मात्र अखंड वहात असतात आणि सूर्य देखील सतत चालत असतो २.


न ते॒ अदे॑वः प्र॒दिवो॒ नि वा॑सते॒ यदे॑त॒शेभिः॑ पत॒रै र॑थ॒र्यसि॑ ।
प्रा॒चीनं॑ अ॒न्यदनु॑ वर्तते॒ रज॒ उद॒न्येन॒ ज्योति॑षा यासि सूर्य ॥ ३ ॥

न ते अदेवः प्र-दिवः नि वासते यत् एतशेभिः पतरैः रथर्यसि
प्राचीनं अन्यत् अनु वर्तते रजः उत् अन्येन ज्योतिषा यासि सूर्य ॥ ३ ॥

तूं आपल्या पक्षयुक्त "एतश’ अश्वांसह जेव्हां रथांतून धांवतोस, तेव्हां कोणी कसाहि देवनिन्दक तुजला आकाशांत थांबवूं शकत नाहीं. पूर्वेकडे उदय पावण्यापूर्वी कांही निराळाच रज:समूह समोर क्षितिजावर दिसतो; परंतु हे सूर्या, तूं उदय पावतोस तेव्हां कांही निराळ्याच प्रकाशाने युक्त हो‍ऊन उदय पावतोस ३.


येन॑ सूर्य॒ ज्योति॑षा॒ बाध॑से॒ तमो॒ जग॑च् च॒ विश्वं॑ उदि॒यर्षि॑ भा॒नुना॑ ।
तेना॒स्मद्विश्वां॒ अनि॑रां॒ अना॑हुतिं॒ अपामी॑वां॒ अप॑ दु॒ष्वप्न्यं॑ सुव ॥ ४ ॥

येन सूर्य ज्योतिषा बाधसे तमः जगत् च विश्वं उत्-इयर्षि भानुना
तेन अस्मत् विश्वां अनिरां अनाहुतिं अप अमीवां अप दुः-स्वप्न्यं सुव ॥ ४ ॥

हे सूर्या, तूं ज्या प्रकाशाने अन्धकाराचा निरास करतोस, ज्या आपल्या किरणाने हे सर्व जगत्‌ तूं कर्मव्यापृत करतोस, त्या तुझ्या उज्ज्वलतेनें सर्व उपासमार, कर्मलोप, आधिव्याधि, आणि दु:स्वप्ने यांना आमच्यापासून दूर हांकून दे ४.


विश्व॑स्य॒ हि प्रेषि॑तो॒ रक्ष॑सि व्र॒तं अहे॑ळयन्न् उ॒च्चर॑सि स्व॒धा अनु॑ ।
यद॒द्य त्वा॑ सूर्योप॒ब्रवा॑महै॒ तं नो॑ दे॒वा अनु॑ मंसीरत॒ क्रतु॑म् ॥ ५ ॥

विश्वस्य हि प्र-इषितः रक्षसि व्रतं अहेळायन् उत्-चरसि स्वधाः अनु
यत् अद्य त्वा सूर्य उप-ब्रवामहै तत् नः देवाः अनु मंसीरत क्रतुम् ॥ ५ ॥

तुजला तशी प्रेरणा झाल्याने तूं विश्वाच्या नियमांचे रक्षण करतोस, आणि कोणावरहि रोष न करितां सृष्टीच्या नियमानुसार आकाशांत भ्रमण करतोस, म्हणून हे सूर्या, आज तुझी आम्ही प्रार्थना करीत आहोत; तर ह्या आमच्या उपासनेला दिव्यविबुध अनुमोदन देवोत ५.


तं नो॒ द्यावा॑पृथि॒वी तन् न॒ आप॒ इन्द्रः॑ शृण्वन्तु म॒रुतो॒ हवं॒ वचः॑ ।
मा शूने॑ भूम॒ सूर्य॑स्य सं॒दृशि॑ भ॒द्रं जीव॑न्तो जर॒णां अ॑शीमहि ॥ ६ ॥

तं नः द्यावापृथिवी इति तत् नः आपः इन्द्रः शृण्वन्तु मरुतः हवं वचः
मा शूने भूम सूर्यस्य सम्-दृशि भद्रं जीवन्तः जरणां अशीमहि ॥ ६ ॥

द्यावापृथिवी, आपोदेवी, तसेंच इंद्र आणि मरुत्‌ हे आमची ती प्रेमळ हांक, आमची ती प्रार्थना ऐकून घेवोत. धडधडीत सूर्य समक्ष असतांना आम्हां आपत्तीमध्यें बुडून जाऊं देऊं नका, आणि कल्याणप्रद आचरण करीत राहून वार्धक्य पावूं असें करा ६.


वि॒श्वाहा॑ त्वा सु॒मन॑सः सु॒चक्ष॑सः प्र॒जाव॑न्तो अनमी॒वा अना॑गसः ।
उ॒द्यन्तं॑ त्वा मित्रमहो दि॒वे-दि॑वे॒ ज्योग् जी॒वाः प्रति॑ पश्येम सूर्य ॥ ७ ॥

विश्वाहा त्वा सु-मनसः सु-चक्षसः प्रजावन्तः अनमीवाः अनागसः
उत्-यन्तं त्वा मित्र-महः दिवे--दिवे ज्योक् जीवाः प्रति पश्येम सूर्य ॥ ७ ॥

आम्हीं दीनदुबळे जीव शुद्धांत:करणी, सूक्ष्मदर्शी, पुत्रपौत्रयुक्त, व्याधिरहित आणि निष्पाप व्हावे आणि हे अनुकूल दीप्तिमान सूर्या, तुझें प्रतिदिवशींच काय, पण सदासर्वदा दर्शन घेत राहावें असें कर ७.


महि॒ ज्योति॒र्बिभ्र॑तं त्वा विचक्षण॒ भास्व॑न्तं॒ चक्षु॑षे-चक्षुषे॒ मयः॑ ।
आ॒रोह॑न्तं बृह॒तः पाज॑स॒स्परि॑ व॒यं जी॒वाः प्रति॑ पश्येम सूर्य ॥ ८ ॥

महि / ज्योतिः बिभ्रतं त्वा वि-चक्षण भास्वन्तं चक्षुषे--चक्षुषे मयः
आरोहन्तं बृहतः पाजसः परि वयं जीवाः प्रति पश्येम सूर्य ॥ ८ ॥

विश्वदर्शी देवा, उत्कृष्ट तेज धारण करणारा, उज्ज्वल आणि प्रत्येक (प्राण्या) च्या नेत्राला कल्याणमय दिसणारा असा तूं, या तेजोबलसंपन्न महदाकाशाच्या भोंवती परिभ्रमण करीत असतांना आम्हीं तुझे दर्शन घेत राहूं असे कर ८.


यस्य॑ ते॒ विश्वा॒ भुव॑नानि के॒तुना॒ प्र चेर॑ते॒ नि च॑ वि॒शन्ते॑ अ॒क्तुभिः॑ ।
अ॒ना॒गा॒स्त्वेन॑ हरिकेश सू॒र्याह्ना॑ह्ना नो॒ वस्य॑सा-वस्य॒सोदि॑हि ॥ ९ ॥

यस्य ते विश्वा भुवनानि केतुना प्र च ईरते नि च विशन्ते अक्तु-भिः
अनागाः-त्वेन हरि-केश सूर्य अह्ना अह्ना नः वस्यसावस्यसा उत् इहि ॥ ९ ॥

तुझ्या प्रकाशरूप ध्वजाने जीं सकल भुवने हालचाल करीत असतात, ती सर्व रात्रीच्या निबिड अन्धकारांत स्वस्थ विराम पावतात. परंतु हे सुवर्णकेशा सूर्या, तूं मात्र आम्हांला प्रतिदिवशी अधिकाधिक निष्पाप करून आणि तारुण्याच्या वाढत्या वाढत्या जोमाने राखून उदय पावत रहा ९.


शं नो॑ भव॒ चक्ष॑सा॒ शं नो॒ अह्ना॒ शं भा॒नुना॒ शं हि॒मा शं घृ॒णेन॑ ।
यथा॒ शं अध्व॒ञ् छं अस॑द्दुरो॒णे तत् सू॑र्य॒ द्रवि॑णं धेहि चि॒त्रम् ॥ १० ॥

शं नः भव चक्षसा सं नः अह्ना शं भानुना शं हिमाः शं घृणेन
यथा शं अध्वन् शं असत् दुरोणे तत् सूर्य द्रविणं धेहि चित्रम् ॥ १० ॥

तूं आपल्या नेत्राने आम्हांला कल्याणप्रद हो; प्रत्येक दिवशी तुझ्या तेजाने, हिमकालामध्ये, तसेंच उष्णकालामध्येंहि आमचे कल्याण होईल असें कर. ज्या योगाने मार्गांत आणि गृहांतहि आमचे ज्याने हित होईल असे ते अद्‍भूत धन आम्हांपाशी ठेव १०.


अ॒स्माकं॑ देवा उ॒भया॑य॒ जन्म॑ने॒ शर्म॑ यच्छत द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे ।
अ॒दत् पिब॑दू॒र्जय॑मानं॒ आशि॑तं॒ तद॒स्मे शं योर॑र॒पो द॑धातन ॥ ११॥

अस्माकं देवाः उभयाय जन्मने शर्म यच्चत द्वि-पदे चतुः-पदे
अदत् पिबत् ऊर्जयमानं आशितं तत् अस्मे इति शं योः अरपः दधातन ॥ ११ ॥

हे दिव्यविबुधांनो आमच्या दोन्ही प्रकारच्या आप्तेष्टांना आणि पशूंनाहि तुम्ही आपला सुखप्रद आश्रय द्या. या जन्मामध्ये, आम्हीं खाऊं पिऊं ( हें खरे) परंतु जे खाल्लेले असेल त्याचा परिणाम ओजस्वीतेंत व्हावा अशा प्रकारचे निष्कलंक भाग्य आम्हांस लाभेल असें करा ११.


यद्वो॑ देवाश्चकृ॒म जि॒ह्वया॑ गु॒रु मन॑सो वा॒ प्रयु॑ती देव॒हेळ॑नम् ।
अरा॑वा॒ यो नो॑ अ॒भि दु॑च्छुना॒यते॒ तस्मि॒न् तदेनो॑ वसवो॒ नि धे॑तन ॥ १२ ॥

यत् वः देवाः चकृम जिह्वया गुरु मनसः वा प्र-युती देव-हेळनं
अरावा यः नः अभि दुच्चुन-यते तस्मिन् तत् एनः वसवः नि धेतन ॥ १२ ॥

दिव्यविबुधांनो, जर कांहीं आम्हीं जिव्हेने किंवा मनाच्या वाह्यातपणानें देवाचा भयंकर अपराध केला असेल, तर, जो कोणी कांहीं दानधर्म अथवा सेवा करीत नसेल, आणि जो आम्हांला विपत्तींत लोटूं पाहत असेल अशा दुष्टाच्याच माथीं ते आमचें सर्व पातक बसेल असे हे दिव्यनिधींनो तुम्ही करा १२.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३८ (इंद्रसूक्त)

ऋषी - लुश धानाक
देवता - ५ - मुष्कवत् इंद्र; अवशिष्ट - इंद्र
छं - जगती


अ॒स्मिन् न॑ इन्द्र पृत्सु॒तौ यश॑स्वति॒ शिमी॑वति॒ क्रन्द॑सि॒ प्राव॑ सा॒तये॑ ।
यत्र॒ गोषा॑ता धृषि॒तेषु॑ खा॒दिषु॒ विष्व॒क् पत॑न्ति दि॒द्यवो॑ नृ॒षाह्ये॑ ॥ १॥

अस्मिन् नः इन्द्र पृत्सुतौ यशस्वति शिमी-वति क्रन्दसि प्र अव सातये
यत्र गो--साता धृषितेषु खादिषु विष्वक् पतन्ति दिद्यवः नृ-सह्ये ॥ १ ॥

इंद्रा ह्या आमच्या यशस्वी आणि (वीरांच्या) पराक्रमांनी विख्यात अशा संग्रामांत तूं गर्जना करतोस, तर आमच्या विजयासाठीं आमचे रक्षण कर. हा संग्राम असा आहे कीं येथें गोधनाच्या प्राप्तीसाठीं वीरांची झटापट चालते, आणि पुढें चढाई करून जाणार्‍या चक्रयुध-धारी सैनिकांवर झगझगीत बाण चोहोंकडून आदळतात १.


स नः॑ क्षु॒मन्तं॒ सद॑ने॒ व्यूर्णुहि॒ गोअ॑र्णसं र॒यिं इ॑न्द्र श्र॒वाय्य॑म् ।
स्याम॑ ते॒ जय॑तः शक्र मे॒दिनो॒ यथा॑ व॒यं उ॒श्मसि॒ तद्व॑सो कृधि ॥ २ ॥

सः नः क्षु-मन्तं सदने वि ऊर्णुहि गो--अर्णसं रयिं इन्द्र श्रवाय्यं
स्याम ते जयतः शक्र मेदिनः यथा वयं उश्मसि तत् वसो इति कृधि ॥ २ ॥

प्रबल प्रकाशाच्या समुद्राप्रमाणें आणि प्रख्यात असें जें (अक्षय) धन ते आमच्या घरांतच तूं आम्हांला उघड करून दाखीव. हे सर्वशक्तिमंता देवा, विजयशाली जो तूं त्या तुझें आम्हीं सेवक-पण धष्ट-पुष्ट सेवक व्हावें. दिव्यनिधे इंद्रा, जें जें व्हावे अशी आम्ही इच्छा करतों तें तें तूं करच २.


यो नो॒ दास॒ आर्यो॑ वा पुरुष्टु॒तादे॑व इन्द्र यु॒धये॒ चिके॑तति ।
अ॒स्माभि॑ष् टे सु॒षहाः॑ सन्तु॒ शत्र॑व॒स्त्वया॑ व॒यं तान् व॑नुयाम संग॒मे ॥ ३ ॥

यः नः दासः आर्यः वा पुरु-स्तुत अदेवः इन्द्र युधये चिकेतति
अस्माभिः ते सु-सहाः सन्तु शत्रवः त्वया वयं तान् वनुयाम सम्-गमे ॥ ३ ॥

सकलजनस्तुता इंद्रा, अनार्य असो, वा आर्य असो जो कोणी देव न मानणारा आमच्याशीं लढण्याच्या विचारांत असेल, (तो आणि) ते तुझे सर्व शत्रु आमच्या हातून सहज जिंकले जातील आणि संग्रामामध्यें तुझ्या सहाय्यानें त्यांना आम्हीं ठार करूं असे कर ३.


यो द॒भ्रेभि॒र्हव्यो॒ यश्च॒ भूरि॑भि॒र्यो अ॒भीके॑ वरिवो॒विन् नृ॒षाह्ये॑ ।
तं वि॑खा॒दे सस्निं॑ अ॒द्य श्रु॒तं नरं॑ अ॒र्वाञ्चं॒ इन्द्रं॒ अव॑से करामहे ॥ ४ ॥

यः दभ्रेभिः हव्यः यः च भूरि-भिः यः अभीके वरिवः-वित् नृ-सह्ये
तं वि-खादे सस्निं अद्य श्रुतं नरं अर्वाचं इन्द्रं अवसे करामहे ॥ ४ ॥

लहानांनी तसाच थोरांनीहि ज्याचा धांवा करावा, वीरांची झटापट चालणार्‍या संग्रामांत जो यशोधनाची प्राप्ति करून देणारा, आणि तुमुल हातघाईच्या युद्धांत जो घुसणारा आहे, त्या सर्व विख्यात, त्या भक्तानुकूल, त्या वीरनायक इंद्राला, आम्हांवर कृपा करण्यासाठीं आम्हीं हांक मारतो ४.


स्व॒वृजं॒ हि त्वां अ॒हं इ॑न्द्र शु॒श्रवा॑नानु॒दं वृ॑षभ रध्र॒चोद॑नम् ।
प्र मु॑ञ्चस्व॒ परि॒ कुत्सा॑दि॒हा ग॑हि॒ किं उ॒ त्वावा॑न् मु॒ष्कयो॑र्ब॒द्ध आ॑सते ॥ ५ ॥

स्व-वृजं हि त्वां अहं इन्द्र शुश्रव अननु-दं वृषभ रध्र-चोदनं
प्र मुचस्व परि कुत्सात् इह आ गहि किं ओं इति त्वावान् मुष्कयोः बद्धः आसते ॥ ५ ॥

तूं स्वत:च शत्रूंना छाटून टाकणारा, दुष्टांना दाद न देणारा आणि प्रबलांना प्रोत्साहन देणारा आहेस. असें हे वीरश्रेष्ठा इंद्रा, मी ऐकले आहे. तर आतां कुत्सभक्तापासून तूं आपली सुटका करून घे आणि आमच्याकडे ये. तुझ्यासारखा वीर मर्माच्या ठिकाणीं जखडल्याप्रमाणें एके ठिकाणीच (एका भक्ताजवळ) कां बसून राहावा ? हें आहे तरी काय ? ५.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३९ (अश्विनीकुमारसूक्त)

ऋषी - घोषा कक्षीवती
देवता - अश्विनीकुमार
छं - १४ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती


यो वां॒ परि॑ज्मा सु॒वृद॑श्विना॒ रथो॑ दो॒षां उ॒षासो॒ हव्यो॑ ह॒विष्म॑ता ।
श॒श्व॒त्त॒मास॒स्तं उ॑ वां इ॒दं व॒यं पि॒तुर्न नाम॑ सु॒हवं॑ हवामहे ॥ १॥

यः वां परि-ज्मा सु-वृत् अश्विना रथः दोषां उषसः हव्यः हव् इष्मता
शश्वत्-तमासः तं ओं इति वां इदं वयं पितुः न नाम सु-हवं हवामहे ॥ १ ॥

अश्विदेवहो, तुमचा रथ झराझर फिरत राहून आकाशाला फेरा घालतो त्या रथाला प्रत्येक भक्ताने सायंकाळी आणि प्रात:काळी पाचारण करावें हेच उचित. म्हणून पित्याचे नांव जसे गोड त्याप्रमाणें तुम्हां उभयतांचे गोड नांव घेऊन आम्हीं तुमचे नेहमीचे भक्त तुम्हांला विनयाने पाचारण करीत आहोंत १.


चो॒दय॑तं सू॒नृताः॒ पिन्व॑तं॒ धिय॒ उत् पुरं॑धीरीरयतं॒ तदु॑श्मसि ।
य॒शसं॑ भा॒गं कृ॑णुतं नो अश्विना॒ सोमं॒ न चारुं॑ म॒घव॑त्सु नस्कृतम् ॥ २ ॥

चोदयतं सूनृताः पिन्वतं धियः उत् पुरम्-धीः ईरयतं तत् उश्मसि
यशसं भागं कृणुतं नः अश्विना सोमं न चारुं मघवत्-सु नः कृतम् ॥ २ ॥

तर सत्यमधुर गीतांची स्फूर्ति द्या; काव्यप्रतिभा उसळतील असें करा, ध्यानबुद्धिला प्रेरणा करा, आमची हीच इच्छा आहे कीं यशच आमच्या वांट्यास असूं द्या. आणि हे अश्वीहो, आमच्या दानशाली यजमानांमध्यें सोमाप्रमाणें सुंदर अंत:करण ठेवा २.


अ॒मा॒जुर॑श्चिद्‌भवथो यु॒वं भगो॑ऽना॒शोश्चि॑दवि॒तारा॑प॒मस्य॑ चित् ।
अ॒न्धस्य॑ चिन् नासत्या कृ॒शस्य॑ चिद्यु॒वां इदा॑हुर्भि॒षजा॑ रु॒तस्य॑ चित् ॥ ३ ॥

अमाजुरः चित् भवथः युवं भगः अनाशोः चित् अवितारा अपमस्य चि त्
अन्धस्य चित् नासत्या कृशस्य चित् युवां इत् आहुः भिषजा रुतस्य चि त् ॥ ३ ॥

आपल्याच घरामध्यें राहून वार्धक्य पावलेल्या भक्तांचे भाग्य तुम्हींच आहांत, अगदीं निकृष्ट दशेस पोहोंचलेल्या दरिद्र्यांवरहि कृपा करणारे तुम्हींच आहांत, तसेंच हे सत्यस्वरूप देवानों, आंधळ्यांचे, थकलेल्यांचे आणि व्याधींनी जर्जर झालेल्यांचेहि वैद्य तुम्हींच आहांत ३.


यु॒वं च्यवा॑नं स॒नयं॒ यथा॒ रथं॒ पुन॒र्युवा॑नं च॒रथा॑य तक्षथुः ।
निष्टौ॒ग्र्यं ऊ॑हथुर॒द्‌भ्यस्परि॒ विश्वेत् ता वां॒ सव॑नेषु प्र॒वाच्या॑ ॥ ४ ॥

युवं च्यवानं सनयं यथा रथं पुनः युवानं चरथाय तक्षथुः
निः तौग्र्यं ऊहथुः अत्-भ्यः परि विश्वा इत् ता वां सवनेषु प्र-वाच्या ॥ ४ ॥

हिंडण्या-फिरण्याला नवीन रथ करावा त्याप्रमाणें तुम्ही वृद्ध झालेल्या च्यवनाला पुन: तरुण बनविलेंत, तुग्राच्या पुत्राला उदकप्रवाहावरून सुखरूप पार नेलेंत; हे तुमचे सर्व पराक्रम सोमार्पण प्रसंगी कीर्तन करण्याला अगदीं योग्य आहेत ४.


पु॒रा॒णा वां॑ वी॒र्याख्प् प्र ब्र॑वा॒ जनेऽ॑थो हासथुर्भि॒षजा॑ मयो॒भुवा॑ ।
ता वां॒ नु नव्या॒व् अव॑से करामहेऽ॒यं ना॑सत्या॒ श्रद॒रिर्यथा॒ दध॑त् ॥ ५ ॥

पुराणा वां वीर्या प्र ब्रव जने अथो इति ह आसथुः भिषजा मयः-भुवा
ता वां नु नव्यौ / अवसे करामहे अयं नासत्या श्रत् अरिः यथा दधत् ॥ ५ ॥

तुमचीं तीं पौरुषाची पुरातनकृत्यें मी लोकांमध्यें सांगतच असतों; कारण तुम्हीं कल्याणकारी वैद्य आहांत; तर स्तवनयोग्य जे तुम्हीं, त्या तुमचा धांवा, संरक्षणाची कृपा व्हावी म्हणून आम्हीं अशा तर्‍हेने करूं की हे सत्यस्वरूप देवांनो, शत्रुसुद्धां तुमच्यावर विश्वास ठेवील ५.


इ॒यं वां॑ अह्वे शृणु॒तं मे॑ अश्विना पु॒त्राये॑व पि॒तरा॒ मह्यं॑ शिक्षतम् ।
अना॑पि॒रज्ञा॑ असजा॒त्याम॑तिः पु॒रा तस्या॑ अ॒भिश॑स्ते॒रव॑ स्पृतम् ॥ ६ ॥

इयं वां अह्वे शृणुतं मे अश्विना पुत्राय-इव पितरा मह्यं शिक्षतं
अनापिः अजाः असजात्या अमतिः पुरा तस्याः अभि-शस्तेः अव स्पृतम् ॥ ६ ॥

ही माझी जिव्हा तुमचा धांवा करीत आहे. हे अश्वीहो, आईबाप जसे पुत्राला, त्याप्रमाणें तुम्ही मला योग्य वळण लावा. मला कोणी आप्त नाही, मी अज्ञ आहे, आणि उत्कृष्ट बुद्धिमानहि नाही; तरी माझा सर्वस्वी नाश झाला नाही तोंच तुम्ही माझे रक्षण करा ६.


यु॒वं रथे॑न विम॒दाय॑ शु॒न्ध्युवं॒ न्यूहथुः पुरुमि॒त्रस्य॒ योष॑णाम् ।
यु॒वं हवं॑ वध्रिम॒त्या अ॑गच्छतं यु॒वं सुषु॑तिं चक्रथुः॒ पुरं॑धये ॥ ७ ॥

युवं रथेन वि-मदाय शुन्ध्युवं नि ऊहथुः पुरु-मित्रस्य योषणं
युवं हवं वध्रि-मत्याः अगच्चतं युवं सु-सुतिं चक्रथुः पुरम्-धये ॥ ७ ॥

विमदाकरितां तुम्हीं आपल्या रथांतून पुरिमित्राच्या पवित्र आणि तरुण कन्येला घेऊन गेलांत. वध्रिमतीचा धांवा ऐकून तुम्ही आलांत आणि त्या बुद्धिमती स्त्रीला उत्कृष्ट संतति दिलीत ७.


यु॒वं विप्र॑स्य जर॒णां उ॑पे॒युषः॒ पुनः॑ क॒लेर॑कृणुतं॒ युव॒द्वयः॑ ।
यु॒वं वन्द॑नं ऋश्य॒दादुदू॑पथुर्यु॒वं स॒द्यो वि॒श्पलां॒ एत॑वे कृथः ॥ ८ ॥

युवं विप्रस्य जरणां उप-ईयुषः पुनरिति कलेः अकृणुतं युवत् वयः
युवं वन्दनं ऋश्य-दात् उत् ऊपथुः युवं सद्यः विश्पलां एतवे कृथः ॥ ८ ॥

वृद्धत्व पावलेला तुमचा भक्त जो कालि त्याला तुम्हीं ऐन तारुण्याचे वय प्राप्त करून दिलेंत. तुम्हीं वन्दनाला विहिरींतून बाहेर काढलेंत, आणि विश्पलेला तत्काळ चालतां ये‍ईल असें केलेत ८.


यु॒वं ह॑ रे॒भं वृ॑षणा॒ गुहा॑ हि॒तं उदै॑रयतं ममृ॒वांसं॑ अश्विना ।
यु॒वं ऋ॒बीसं॑ उ॒त त॒प्तं अत्र॑य॒ ओम॑न्वन्तं चक्रथुः स॒प्तव॑ध्रये ॥ ९ ॥

युवं ह रेभं वृषणा गुहा हितं उत् ऐरयतं ममृ-वांसं अश्विना
युवं ऋबीसं उत तप्तं अत्रये ओमन्-वन्तं चक्रथुः सप्त-वध्रये ॥ ९ ॥

वीर्यशाली देवांनो गुहेमध्ये कोण्डला गेल्याने मरणोन्मुख झालेल्या रेभाला तुम्हीं बाहेर काढलेंत; हे अश्वीहो, जळजळीत लाल झालेल्या निखार्‍यांचा खड्डा तुम्हीं अत्रिसाठी, अगदी स्वस्थ पडून राहण्यासारखा थण्डगार केलात आणि सप्तवध्रिसाठींहि असाच चमत्कार केलात ९.


यु॒वं श्वे॒तं पे॒दवे॑ऽश्वि॒नाश्वं॑ न॒वभि॒र्वाजै॑र्नव॒ती च॑ वा॒जिन॑म् ।
च॒र्कृत्यं॑ ददथुर्द्राव॒यत्स॑खं॒ भगं॒ न नृभ्यो॒ हव्यं॑ मयो॒भुव॑म् ॥ १० ॥

युवं श्वेतं पेदवे अश्विना अश्वं नव-भिः वाजैः नवती च वाजि नं
चर्कृत्यं ददथुः द्रवयत्-सखं भगं न नृ-भ्यः हव्यं मयः-भुवम् ॥ १० ॥

अश्वीहो, तुम्हीं पेदूला नव्याण्णव युद्धांत विजयी झालेला वीर आणि एक पांढरा लढाऊ घोडा दिलात; तो घोडा अतिशय तडफदार, आपल्यावर आरूढ झालेल्या वीराला घेऊन वेगाने धांवणारा, आणि दैवाचा ठेवाच असें म्हणण्या इतका मोठ्या पायगुणाचा होता १०.


न तं रा॑जानाव् अदिते॒ कुत॑श्च॒न नांहो॑ अश्नोति दुरि॒तं नकि॑र्भ॒यम् ।
यं अ॑श्विना सुहवा रुद्रवर्तनी पुरोर॒थं कृ॑णु॒थः पत्न्या॑ स॒ह ॥ ११ ॥

न तं राजानौ अदिते कुतः चन न अंहः अश्नोति दुः-इतं नकिः भयं
यं अश्विना सु-हवा रुद्रवर्तनी इतिरुद्र-वर्तनी पुरः-रथं कृणुथः पत्न्या सह ॥ ११ ॥

हे अनंतांनो, हे (जगत्‌) राजांनो, हांकेसरशी धाऊन येणार्‍या, हे रुद्रमार्गानुसारी अश्वीनो, तुम्हीं ज्या भक्ताला त्याच्या पत्‍नीसह रथांतून सर्वांच्या आघाडीला न्याल, त्याला पातक कोठूनहि स्पर्श करणार नाही, आणि कोणतीहि आपत्ति त्याच्यावर कोसळणार नाही ११.


आ तेन॑ यातं॒ मन॑सो॒ जवी॑यसा॒ रथं॒ यं वां॑ ऋ॒भव॑श्च॒क्रुर॑श्विना ।
यस्य॒ योगे॑ दुहि॒ता जाय॑ते दि॒व उ॒भे अह॑नी सु॒दिने॑ वि॒वस्व॑तः ॥ १२ ॥

आ तेन यातं मनसः जवीयसा रथं यं वां ऋभवः चक्रुः अश्वि ना
यस्य योगे दुहिता जायते दिवः उभे इति अहनी इति सुदिनेइतिसु-दिने विवस्वतः ॥ १२ ॥

मनापेक्षांहि जो वेगवान्‌ आहे असा रथ तुमच्याकरितां ऋभूंनी तयार केला, त्या रथांतून हे अश्वीहो, तुम्हीं आगमन करा. तो रथ जोडला जातांच आकाश कन्यका उषा प्रकट होते, आणि विवस्वान जो सूर्य त्याचा दिवस आणि रात्र ह्या दोन्ही वेळा मंगलकारक होतात १२.


ता व॒र्तिर्या॑तं ज॒युषा॒ वि पर्व॑तं॒ अपि॑न्वतं श॒यवे॑ धे॒नुं अ॑श्विना ।
वृक॑स्य चि॒द्वर्ति॑कां अ॒न्तरा॒स्याद्यु॒वं शची॑भिर्ग्रसि॒तां अ॑मुञ्चतम् ॥ १३ ॥

ता वर्तिः यातं जयुषा वि पर्वतं अपिन्वतं शयवे धेनुं अश्विना
वृकस्य चित् वरिकां अन्तः आस्यात् युवं शचीभिः ग्रसितां अमुचतम् ॥ १३ ॥

तर असे तुम्हीं आपल्या विजयी रथांतून पर्वताकडे - त्याच्या मार्गाकडे गमन करा. शयुसाठीं हे अश्वीहो, तुम्हीं त्याची धेनु दुग्धाने तुडुम्ब भरून टाकिली आणि लाण्डग्याने आपल्या जबड्यांत पकडलेल्या हरिणीची त्याच्या दाढेतून सुखरूप सुटका केलीत १३.


ए॒तं वां॒ स्तोमं॑ अश्विनाव् अक॒र्मात॑क्षाम॒ भृग॑वो॒ न रथ॑म् ।
न्यमृक्षाम॒ योष॑णां॒ न मर्ये॒ नित्यं॒ न सू॒नुं तन॑यं॒ दधा॑नाः ॥ १४ ॥

एतं वां स्तोमं अश्विनौ अकर्म आतक्षाम भृगवः न रथं
नि अमृक्षाम योषणां न मर्ये नित्यं न सूनुं तनयं दधानाः ॥ १४ ॥

आम्हीं हे तुमचे स्तवन, हे अश्वीहो, (आम्हांला जसें सुचलें तसे) केलेले आहे. ज्याप्रमाणे भृगूंनी रथ केला त्याप्रमाणे केले आहे. तरुण वधूला तिच्या पतिकरितां अलंकारांनी नटवावी, त्याप्रमाणें नटविले आहे. किंवा वंश चालविणारा औरसपुत्र लोकांच्या पुढें करावा त्याप्रमाणें पुढे केले आहे १४.


ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४० (अश्विनीकुमारसूक्त)

ऋषी - घोषा कक्षीवती
देवता - अश्विनीकुमार
छं - जगती


रथं॒ यान्तं॒ कुह॒ को ह॑ वां नरा॒ प्रति॑ द्यु॒मन्तं॑ सुवि॒ताय॑ भूषति ।
प्रा॒त॒र्यावा॑णं वि॒भ्वं वि॒शे-वि॑शे॒ वस्तो॑र्वस्तो॒र्वह॑मानं धि॒या शमि॑ ॥ १ ॥

रथं यान्तं कुह कः ह वां नरा प्रति द्यु-मन्तं सु-विताय भूषति
प्रातः-यावाणं वि-भ्वं विशे--विशे वस्तोः-वस्तोः वहमानं धिया शमि ॥ १ ॥

हा तुमचा धांवणारा रथ, हे वीरनायकानो, हा प्रात:कालींच निघणारा तेज:पुंज सर्वगामी आणि (भक्ताच्या) ध्यानबलानें प्रत्येक सुप्रभातीं, प्रत्येक गृहाकडे सत्कर्माचरण प्रसंगी तुम्हांला घेऊन जाणारा रथ कोण सजवीत आहे, कोणता भक्त कोणत्या ठिकाणी आज जगत्कल्याणासाठीं सजवीत आहे १.


कुह॑ स्विद्दो॒षा कुह॒ वस्तो॑र॒श्विना॒ कुहा॑भिपि॒त्वं क॑रतः॒ कुहो॑षतुः ।
को वां॑ शयु॒त्रा वि॒धवे॑व दे॒वरं॒ मर्यं॒ न योषा॑ कृणुते स॒धस्थ॒ आ ॥ २ ॥

कुह स्वित् दोषा कुह वस्तोः अश्विना कुह अभि-पित्वं करतः कुह ऊषतुः
कः वां शयु-त्रा विधवाइव देवरं मर्यं न योषा कृणुते सध-स्थे आ ॥ २ ॥

तुम्हीं रात्री कोठें असतां ? प्रभातकालीं कोठे फिरतां ? हे अश्वीहो, तुम्हीं सन्ध्याकाळची वेळ कोठें घालवितां ? तुम्हीं वस्ती कोठें करतां ?शयुचे रक्षण करणार्‍या हे अश्वीहो, विधवा स्त्री ज्याप्रमाणें आपल्या दिराला कुटुम्बीयांमध्यें सन्मान देते; किंवा तरुण युवती शूर योद्ध्‍याचे सभेमध्ये अभिनन्दन करते, त्याप्रमाणें कोणता (अध्वर याग) आज यज्ञमन्दिरांत तुमचा सन्मान करीत आहे २.


प्रा॒तर्ज॑रेथे जर॒णेव॒ काप॑या॒ वस्तो॑र्वस्तोर्यज॒ता ग॑च्छथो गृ॒हम् ।
कस्य॑ ध्व॒स्रा भ॑वथः॒ कस्य॑ वा नरा राजपु॒त्रेव॒ सव॒नाव॑ गच्छथः ॥ ३ ॥

प्रातः जरेथेइति जरणाइव कापया वस्तोः-वस्तोः यजता गच्चथः गृहं
कस्य ध्वस्रा भवथः कस्य वा नरा राज-पुत्राइव सवना अव गच्चथः ॥ ३ ॥

प्रात:काळीं बन्दिजनांच्या ललकारीनें तुमचे स्तवन होत असते: आणि हे पूज्य देवांनो, तुम्हींहि प्रत्येक प्रभातकाली भक्त गृहीं जातां. हे शूरानो, तुम्हीं कोणाचा नायनाट करतां आणि राजपुत्राप्रमाणें कोणाच्या सोमस्वनाला थाटानें जातां ते सांगा ३.


यु॒वां मृ॒गेव॑ वार॒णा मृ॑ग॒ण्यवो॑ दो॒षा वस्तो॑र्ह॒विषा॒ नि ह्व॑यामहे ।
यु॒वं होत्रां॑ ऋतु॒था जुह्व॑ते न॒रेषं॒ जना॑य वहथः शुभस्पती ॥ ४ ॥

युवां मृगाइव वारणा मृगण्यवः दोषा वस्तोः हविषा नि ह्वयामहे
युवं होत्रां ऋतु-था जुह्वते नरा इषं जनाय वहथः शुभः पती इति ॥ ४ ॥

तुम्हीं उभयतां हत्तीप्रमाणे भव्य आहांत, आणि त्यांना शोधून काढणारे आम्ही भक्त, हवि हातांत घेऊन तुम्हांला नानाप्रकाराने आळवीत आहोंत. हे शूरांनो, (भक्ताकडून) योग्य कालीं तुमच्या प्रित्यर्थ हविर्भाग अर्पण होतो, आणि हे मङ्‌गलधीश देवांनो, तुम्हीहि भक्तजनांसाठीं उत्साहसमृद्धि घेऊन येता ४.


यु॒वां ह॒ घोषा॒ पर्य॑श्विना य॒ती राज्ञ॑ ऊचे दुहि॒ता पृ॒च्छे वां॑ नरा ।
भू॒तं मे॒ अह्न॑ उ॒त भू॑तं अ॒क्तवेऽ॑श्वावते र॒थिने॑ शक्तं॒ अर्व॑ते ॥ ५ ॥

युवा ह घोषा परि अश्विना यती राजः ऊचे दुहिता पृच्चे वां नरा
भूतं मे अह्ने उत भूतं अक्तवे अश्व-वते रथिने शक्तं अर्वते ॥ ५ ॥

हे अश्वीहो, राजकन्या घोषा तुम्हांला प्रदक्षिणा करून असें म्हणाली; -तिने तुम्हांला असे विचारलें, की हे शूरांनो, तुम्ही दिवसभर मजजवळच रहा, त्याचप्रमाणेम रात्रीहि रहा; आणि अश्वसंपन्न आणि तडफदार असा जो योद्धा असेल त्याला (मजसाठी) शक्तिमान्‌ करा ५.


यु॒वं क॒वी ष्ठः॒ पर्य॑श्विना॒ रथं॒ विशो॒ न कुत्सो॑ जरि॒तुर्न॑शायथः ।
यु॒वोर्ह॒ मक्षा॒ पर्य॑श्विना॒ मध्व् आ॒सा भ॑रत निष्कृ॒तं न योष॑णा ॥ ६ ॥

युवं कवी इति स्थः परि अश्विना रथं विशः न कुत्सः जरितुः नशायथः
युवोः ह मक्षा परि अश्विना मधु आसा भरत निः कृतं न योषणा ॥ ६ ॥

प्रतिभासंपन्न असे तुम्हीं आपल्या स्वत:च्या रथावर अधिष्ठित होता, कुत्साने जसा रथ केला, त्याप्रमाणें तुम्हीहि स्तोतृजनांचा संघ वश केलात; आणि स्त्री जशी स्वच्छ पक्वान्ने (पतीला अर्पण करते) त्याप्रमाणें हे अश्वीहो, तुमची मधुमक्षिका आपल्या मुखानें तुमच्यासाठी मध सांचवीत असते ६.


यु॒वं ह॑ भु॒ज्युं यु॒वं अ॑श्विना॒ वशं॑ यु॒वं शि॒ञ्जारं॑ उ॒शनां॒ उपा॑रथुः ।
यु॒वो ररा॑वा॒ परि॑ स॒ख्यं आ॑सते यु॒वोर॒हं अव॑सा सु॒म्नं आ च॑के ॥ ७ ॥

युवं ह भुज्युं युवं अश्विना वशं युवं शिजारं उशनां उप आरथुः
युवः ररावा परि सख्यं आसते युवोः अहं अवसा सुम्नं आ चके ॥ ७ ॥

तुम्हीं भुज्यूकडे धांवलांत, हे अश्वीहो, तुम्हीं वशाकडे गेलांत; शिंजाराकडे आणि उशनाकडे सहायार्थ धांवून गेलांत; तुमचा दानशाली भक्त तुमच्या मित्रप्रेमाच्या आश्रयाने राहतो. म्हणून मीहि पण तुमच्याच कृपेच्या सुखाची आवड धरली आहे ७.


यु॒वं ह॑ कृ॒शं यु॒वं अ॑श्विना श॒युं यु॒वं वि॒धन्तं॑ वि॒धवां॑ उरुष्यथः ।
यु॒वं स॒निभ्य॑ स्त॒नय॑न्तं अश्वि॒नाप॑ व्र॒जं ऊ॑र्णुथः स॒प्तास्य॑म् ॥ ८ ॥

युवं ह कृशं युवं अश्विना शयुं युवं विधन्तं विधवां उरुष्यथः
युवं सनि-भ्यः स्तनयन्तं अश्विना अप व्रजं ऊर्णुथः सप्त-आस्यम् ॥ ८ ॥

दुर्बल झालेल्या भक्ताला तुम्हीं (संकटांतून) मुक्त करतां; हे अश्वीहो, अंथरुणाला खिळलेल्यालाहि तुम्हींच (वांचवितां), अनाथ विधवेलाहि तुम्हीं संकटांतून सोडवितां, तर सात दरवाजे असलेलें आणि उघडतांना मोठ्याने आवाज करणारें धेनूंचे जे आवार तें हे अश्वीहो, तुम्हीं दानशाली भक्तांकरितां धडाक्या सरशी उघडून टाकतां ८.


जनि॑ष्ट॒ योषा॑ प॒तय॑त् कनीन॒को वि चारु॑हन् वी॒रुधो॑ दं॒सना॒ अनु॑ ।
आस्मै॑ रीयन्ते निव॒नेव॒ सिन्ध॑वोऽ॒स्मा अह्ने॑ भवति॒ तत् प॑तित्व॒नम् ॥ ९ ॥

जनिष्ठ योषा पतयत् कनीनकः वि च अरुहं वीरुधः दंसनाः अनु
आ अस्मै रीयन्ते निवनाइव सिन्धवः अस्मै अह्ने भवति तत् पति-त्वनम् ॥ ९ ॥

ती स्त्री तारुण्यदशेला पावली आणि तिने दृष्टिक्षेप टाकला; त्याचबरोबर लतावेलींना अंकुर फुटले आणि त्यांनी आश्चर्यकारक रुपें धारण केली. उंचावरून खालीं कोसळणार्‍या लोंढ्याप्रमाणें नद्यांचे प्रवाह त्याच्याकडे धांवले; म्हणून या दिनमणीला जें अधिपतित्व प्राप्त झालें, ते यामुळेंच ९.


जी॒वं रु॑दन्ति॒ वि म॑यन्ते अध्व॒रे दी॒र्घां अनु॒ प्रसि॑तिं दीधियु॒र्नरः॑ ।
वा॒मं पि॒तृभ्यो॒ य इ॒दं स॑मेरि॒रे मयः॒ पति॑भ्यो॒ जन॑यः परि॒ष्वजे॑ ॥ १० ॥

जीवं रुदन्ति वि मयन्ते अध्वरे दीर्घां अनु प्र-सितिं दीधियुः नरः
वामं पितृ-भ्यः ये इदं सम्-एरिरे मयः पति-भ्यः जनयः परि-स्वजे ॥ १० ॥

(एखाद्या संकटग्रस्त) जीवासाठीं ते रुदन करतात, परंतु अध्वरयागामध्ये समाधानवृत्तीनें वागतात असे भक्त दूर परंपरेच्या बन्धनावर लक्ष ठेवून राहतात. याप्रमाणें जे आपल्या वाडवडिलांना हे अभिलषणीय सुख अर्पण करितात, अशाच पतींना त्यांच्या स्त्रिया आलिंगन देण्यासाठीं पुढे सरसावतात १०.


न तस्य॑ विद्म॒ तदु॒ षु प्र वो॑चत॒ युवा॑ ह॒ यद्यु॑व॒त्याः क्षेति॒ योनि॑षु ।
प्रि॒योस्रि॑यस्य वृष॒भस्य॑ रे॒तिनो॑ गृ॒हं ग॑मेमाश्विना॒ तदु॑श्मसि ॥ ११॥

न तस्य विद्म तत् ओं इति सु प्र वोचत युवा ह यत् युवत्याः क्षेति योनिषु
प्रिय-उस्रियस्य वृषभस्य रेतिनः गृहं गमेम अश्विना तत् उश्मसि ॥ ११ ॥

हें असें कां तें आम्हांला समजत नाही. तें तुम्हींच येथे येऊन चांगले उलगडून सांगा, कीं तरुण हा तरुणींच्या विलासांत कसा गर्क होतो ? तेज:पुंज धेनूंवर प्रेम करणार्‍या वीर्यशाली नरपुंगवाच्या घरांकडे आम्हीं कसे जाऊं ? हे अश्वीहो, आम्हांला इच्छा आहे ती हीच ११.


आ वां॑ अगन् सुम॒तिर्वा॑जिनीवसू॒ न्यश्विना हृ॒त्सु कामा॑ अयंसत ।
अभू॑तं गो॒पा मि॑थु॒ना शु॑भस्पती प्रि॒या अ॑र्य॒म्णो दुर्या॑ँ अशीमहि ॥ १२ ॥

आ वां अगन् सु-मतिः वाजिनीवसूइतिवाजिनी-वसू नि अश्विना हृत्-सु कामाः अयंसत
अभूतं गोपा मिथुना शुभः पती इति प्रियाः अर्यम्णः दुर्यान् अशीमहि ॥ १२ ॥

हे सत्त्वसंपत्तिमान्‌ वीरांनो, माझी मननीय स्तुति तुमच्याकडे गेली. हे अश्वीहो, तुमच्या हृदयांतच आमच्या कामना एकत्र झाल्या आहेत. तर तुम्हीं उभयतां आमचे संरक्षक व्हा. म्हणजे हे मंगलाधीश हो, तुम्हांला प्रिय असे आम्हीं भक्त अर्यमाच्या म्हणजे जेथें मित्रांचा सन्मान होतो अशाच्या गृहीं वास करूं असें घडो १२.


ता म॑न्दसा॒ना मनु॑षो दुरो॒ण आ ध॒त्तं र॒यिं स॒हवी॑रं वच॒स्यवे॑ ।
कृ॒तं ती॒र्थं सु॑प्रपा॒णं शु॑भस्पती स्था॒णुं प॑थे॒ष्ठां अप॑ दुर्म॒तिं ह॑तम् ॥ १३ ॥

ता मन्दसाना मनुषः दुरोणे आ धत्तं रयिं सह-वीरं वचस्यवे
कृतं तीर्थं सु-प्रपानं शुभः पती इति स्थाणुं पथे--स्थां अप दुः-मतिं हतम् ॥ १३ ॥

सोमपेयानें हृष्टचित्त झालेले तुम्हीं विभूति, भक्ताच्या गृहामध्यें स्तोतृजनांसाठी वीरप्रचुर असें ऐश्वर्य ठेवा. तसेंच तीर्थाच्या ठिकाणी पिण्याजोगें स्वच्छ उदक विपुल ठेवा आणि हे मंगलाधीशहो, आमच्या अंत:करणांतील दुष्टबुद्धि, वाटेंत पडलेल्या ओण्डक्याप्रमाणें दूर फेंकून तिचा नायनाट करा १३.


क्व स्विद॒द्य क॑त॒मास्व् अ॒श्विना॑ वि॒क्षु द॒स्रा मा॑दयेते शु॒भस्पती॑ ।
क ईं॒ नि ये॑मे कत॒मस्य॑ जग्मतु॒र्विप्र॑स्य वा॒ यज॑मानस्य वा गृ॒हम् ॥ १४ ॥

क्व स्वित् अद्य कतमासु अश्विना विक्षु दस्रा मादयेतेइति शुभः पती इति
कः ईं नि येमे कतमस्य जग्मतुः विप्रस्य वा यजमानस्य वा गृहम् ॥ १४ ॥

आज तुम्हीं कोठें आहांत ? हे अश्वीहो, हे अद्‍भुत पराक्रमी देवांनो, हे मंगलधीशांनो, कोणत्या दिग्भागीं तुम्हीं हृष्टचित्त हो‍ऊन राहिलां आहांत ? तुम्हांला अडवून धरलें आहे काय ? कोणत्या ज्ञानी भक्ताच्या अथवा कोणत्या यज्ञकर्त्या भक्ताच्या गृहीं तुम्हीं गेलां आहांत ? १४.


ॐ तत् सत्


GO TOP