![]()  | 
|  
 ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त २१ ते ३० ऋग्वेद - मंडल १० सूक्त २१ (अग्नीचे पालुपदसूक्त) 
ऋषी  -  विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र   
आग्निं न स्ववृ॑क्तिभि॒र्होता॑रं त्वा वृणीमहे  ।  
आ  अग्निं  न  स्ववृक्ति-भिः  होतारं  त्वा  वृणीमहे   
ज्यांमध्ये (दिव्यजनांकरितां) कुशासने पसरून ठेवतात, अशा यज्ञसमारंभासाठीं तुज अग्निला-व्यापक रुपाने राहणार्या पवित्रतेजस्क अशा तुजला, आम्हीं यज्ञपुरोहित म्हणून तुमच्या आनंदाच्या प्रसंगी उत्तम ऋक्स्तुतींनीं नेमस्त करतों, आणि तूंहि त्यामुळे वृद्धिंगत होतोस. १. 
 
त्वां उ॒ ते स्वा॒भुवः॑ शु॒म्भन्त्यश्व॑राधसः  ।  
त्वां  ओं इति  ते  सु-आभुवः  शुम्भन्ति  अश्व-राधसः   
आपली सत्ता ज्यांनी उत्तम रीतीने प्रस्थापित केली असे तुझे अश्वसंपन्न भक्त तुजला सुशोभित करतात. तेव्हां घृत सिंचन करणारी ऋजुगामिनी आहुती त्या तुमच्या हर्षोत्कर्षांच्या प्रसंगी तुजला कडकडून भेटते, आणि तूंहि ज्वालेने वृद्धिंगत होतोस २.
 
त्वे ध॒र्माण॑ आसते जु॒हूभिः॑ सिञ्च॒तीरि॑व  ।  
त्वे इति  धर्माणः  आसते  जुहूभिः  सिचतीः-इव   
यच्चावत धर्म तुझ्या ठिकाणीं राहतात आणि घटकेंत कृष्णवर्ण, घटकेंत श्वेतवर्ण अशीं रूपें भक्ताच्या घृताहुति, स्रुवेच्या योगाने जणों काय तुझ्या ठिकाणी सिंचनच करीत आहेत कीं काय असें वाटतें, आणि तूंहि त्या उल्लासाच्या प्रसंगी सर्व प्रकारच्या शोभा धारण करतोस आणि वृद्धिंगत होतोस. ३. 
 
यं अ॑ग्ने॒ मन्य॑से र॒यिं सह॑सावन्न् अमर्त्य  ।  
यं  अग्ने  मन्यसे  रयिं  सहसावन्  अमर्त्य   
हे शत्रूदमना, अमरा, अग्निदेवा, ज्या प्रकारचें ऐश्वर्य (देण्याचे) तुझ्या मनांत येईल ते अद्भुत ऐश्वर्य, आम्हांला सत्त्वसामर्थ्य प्राप्त झाले आहे म्हणून याच यज्ञांत तूं घेऊन ये. आणि म्हणूनच कीं काय त्या तुमच्या उल्लासाच्या प्रसंगी तूं वृद्धिंगत होत असतोस. ४. 
 
अ॒ग्निर्जा॒तो अथ॑र्वणा वि॒दद्विश्वा॑नि॒ काव्या॑  ।  
अग्निः  जातः  अथर्वणा  विदत्  विश्वानि  काव्या   
अथवर्णामुळे प्रकट झालेल्या अग्नीनें सर्व प्रकारची काव्यस्फूर्ति दिली या तुमच्या उल्हासाच्या प्रसंगी विवस्वानाचा-यमाचा अत्यंत प्रिय असा प्रतिनिधि झालास म्हणूनच तूं (आणखीहि) वद्धिंगत झालास. ५.  
 
त्वां य॒ज्ञेष्व् ई॑ळ॒तेऽ॑ग्ने प्रय॒त्यध्व॒रे  ।  
त्वां  यजेषु  ईळते  अग्ने  प्र-यति  अध्वरे  
यज्ञामध्ये हे अग्निदेवा, तुझे स्तवन करतात; अध्वर याग चालू झाला म्हणजे येथेंहि तुझीच महती गातात, तेव्हां (भक्तांना) पाहिजेत ती सर्व अभिलषणीय वैभवें त्या तुमच्या उल्लासपूर्ण यज्ञांत तूं देतोस, आणि ज्वालेने वृद्धिंगत होतोस ६.  
 
त्वां य॒ज्ञेष्व् ऋ॒त्विजं॒ चारुं॑ अग्ने॒ नि षे॑दिरे  ।  
त्वां  यजेषु  ऋत्विजं  चारुं  अग्ने  नि  सेदिरे   
यज्ञामध्ये दर्शनीय यज्ञपुरोहित, घृताप्रमाणे तकतकीत, शुभ्रकांतिमान् आणि आपल्या किरणरूप नेत्रींनी सर्व कांही बारकाईने पाहणारा अशा तुजला मानवी भक्तांनी उल्लसित होऊन (वेदीवर) स्थापन केलें म्हणून तूंहि ज्वालेने वृद्धिंगत होतोस. ७.  
 
अग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषो॒रु प्र॑थयसे बृ॒हत्  ।  
अग्ने  शुक्रेण  शोचिषा  उरु  प्रथयसे  बृहत्   
तर हे अग्निदेवा, आपल्या शुभ्र तेजाने तूं अतिशय दूरपर्यंत विस्तृत होऊन प्रख्यात झाला आहेत. म्हणून तूं मोठ्याने गर्जना करून आपले वीर्यशालित्व गाजवितोस आणि उल्लासपूर्ण यज्ञप्रसंगी भगिनी ज्या वनलता त्यांच्यामध्ये आपला बीजांकुर ठेवतोस आणि वद्धिंगत होतोस. ८.
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २२ (इंद्रसूक्त) 
ऋषी  -  विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र   
कुह॑ श्रु॒त इन्द्रः॒ कस्मि॑न्न् अ॒द्य जने॑ मि॒त्रो न श्रू॑यते  ।  
कुह  श्रुतः  इन्द्रः  कस्मिन्  अद्य  जने  मित्रः  न  श्रूयते   
तो प्रख्यात इंद्र कोठें आहे, कोणत्या लोकांचा तो मित्र आहे असे आज आपल्या कानीं येते ? तुम्हां ऋषींच्या निवासस्थानीं (जो प्राप्त होतो) किंवा गुहेमध्येंहि जो स्तुतीने आकर्षिला जातो, तो इंद्र कोठें आहे ? १. 
 
इ॒ह श्रु॒त इन्द्रो॑ अ॒स्मे अ॒द्य स्तवे॑ व॒ज्र्यृची॑षमः  ।  
इह  श्रुतः  इन्द्रः  अस्मे इति  अद्य  स्तवे  वज्री  ऋचीषमः  
तो विख्यात इंद्र, तो वज्रधर इंद्र, ऋक् स्तवनांच्या ऐश्वर्याने मंडित असणारा इंद्र हा येथे आमच्या स्तुतींत राहिला आहे. आणि मित्राप्रमाणें त्यानें भक्तजनांमध्ये आपले अप्रतिम यशहि गाजविले आहे. २.  
 
म॒हो यस्पतिः॒ शव॑सो॒ असा॒म्या म॒हो नृ॒म्णस्य॑ तूतु॒जिः  ।  
महः  यः  पतिः  शवसः  असामि  आ  महः  नृम्णस्य  तूतुजिः   
जो अद्वितीय अशा उत्कटबलाचा प्रभु आहे, जो आपल्या अचाट पौरुषाचा तडाका (शत्रूला) दाखवितो, आणि पिता जसा आपल्या प्रिय पुत्राचा प्रतिपालक असतो, तसा (शत्रूवर) धडाक्याने आदळणार्या आपल्या वज्राचा तो धनी म्हणून मिरवतो. ३. 
 
यु॒जा॒नो अश्वा॒ वात॑स्य॒ धुनी॑ दे॒वो दे॒वस्य॑ वज्रिवः  ।  
युजानः  अश्वा  वातस्य  धुनी इति  देवः  देवस्य  वज्रि-वः   
सोसाट्याने धांवणारे वायुदेवाचे अश्व, हे वज्रधरा, देवा, तूं आपल्या रथाला जोडतोस; त्यांना त्या देदीप्यमान मार्गाने दौडत नेतोस, आणि ते धांवू लागले म्हणजे त्या मार्गाचीहि वाखाणणी तूंच करतोस. ४. 
 
त्वं त्या चि॒द्वात॒स्याश्वागा॑ ऋ॒ज्रा त्मना॒ वह॑ध्यै  ।  
त्वं  त्या  चित्  वातस्य  अश्वा  आ  अगाः  ऋज्रा  त्मना  वहध्यै   
वायूच्या त्या धाडधाड धांवणार्या घोड्यांवर बसण्याकरतां खरोखर तूं स्वत: असतोस म्हणून बरें; कारण कोणताहि दिव्यविबुध किंवा मानव त्यांना कह्यात ठेवणारा असा दिसत नाहीच आणि आहे असें ऐकण्यात देखील नाही. ५. 
 
अध॒ ग्मन्तो॒शना॑ पृच्छते वां॒ कद॑र्था न॒ आ गृ॒हम्  ।  
अध  ग्मन्ता  उशना  पृच्चते  वां  कत्-अर्था  नः  आ  गृहं   
ते (अश्व) धांवू लागले तेव्हां उभयतांना उशना भक्त विचारतो कीं कोणत्या हेतूने तुम्हीं आमच्या घरी आलां -मजसारख्या मानवाकडे, -तुमच्या त्या दूरच्या द्युलोकापासून आलां आहां किंवा या भूलोकापासून आलां आहांत ६.  
 
आ न॑ इन्द्र पृक्षसेऽ॒स्माकं॒ ब्रह्मोद्य॑तम्  ।  
आ  नः  इन्द्र  पृक्षसे  अस्माकं  ब्रह्म  उत्-यतं   
इंद्रा, तूं आम्हांला बलाढ्य करतोस. तर आमचे प्रार्थनास्तोत्रहि तुजसाठी सदैव सिद्धच असते. आणि ज्याला यत्किंचित् देखील माणुसकी नाही असा जो शुष्ण (राक्षस) त्याला तूं ठार केलेस म्हणून तुझ्यापाशीच आम्हीं संरक्षणाची याचना करितों. ७. 
 
अ॒क॒र्मा दस्यु॑र॒भि नो॑ अम॒न्तुर॒न्यव्र॑तो॒ अमा॑नुषः  ।  
अकर्मा  दसुः  अभि  नः  अमन्तुः  अन्य-व्रतः  अमानुषः  
आतां आणखी एक दुष्ट आहे तो सत्कर्म न करणारा, इतरांचा अपमान करून आपली शेखी मिरवणारा, भलत्याच धर्माप्रमाणे चालणार, आणखी माणुसकीला पारखा असलेला असा आमच्या पुढे उभा आहे. तर हे शत्रुनाशना, त्या अधार्मिक दुष्टाचा तूं नाश कर आणि त्याचे घातक हत्यारहि तूं मोडून टाक. ८.  
 
त्वं न॑ इन्द्र शूर॒ शूरै॑रु॒त त्वोता॑सो ब॒र्हणा॑  ।  
त्वं  नः  इन्द्र  शूर  शूरैः  उत  त्वाऊतासः  बर्हना   
हे वीरा इंद्रा, तूं आपल्या शूर सैनिकांसह आमचा पाठीराखा हो, तुमुल युद्धांत तुझ्याकडून आमचे रक्षण होतें. भक्तजन जसजशी स्तुति करतात (तसतशी) तुझ्याकडून होणारी त्यांची अभीष्टाची पूर्णताहि अगणित प्रकारांनी होते. ९.  
 
त्वं तान् वृ॑त्र॒हत्ये॑ चोदयो॒ नॄन् का॑र्पा॒णे शू॑र वज्रिवः  ।  
त्वं  तान्  वृत्र-हत्ये  चोदयः  नॄन्  कार्पाणे  शूर  वज्रि-वः   
हे वीरा, हे वज्रधरा इंद्रा, अन्धकार पसरून देणार्या शत्रूंचा नाश तरवारीच्या युद्धांत करण्याला आपल्या शूर भक्तांना तू प्रवृत्त करतोस. मग नक्षत्रांचा प्रभाव जाणणार्या शास्त्रज्ञांच्या अथवा कवींच्या, अथवा सामान्यजनांच्यामध्यें कोठेंहि तो गुप्त राहिला असेना ! १०. 
 
म॒क्षू ता त॑ इन्द्र दा॒नाप्न॑स आक्षा॒णे शू॑र वज्रिवः  ।  
मक्षु  ता  ते  इन्द्र  दान-अप्नसः  आक्षाणे  शूर  वज्रि-वः  
हे इंद्रा, जेव्हां त्या शुष्णाचे सर्व सागेलागे त्यांच्या अनुनयांसह तूं ठार मारलेस, तेव्हां हे वज्रधरा, वीरा, तुझ्या दातृत्वाचीं कृत्यें पटापट सिद्धीस गेली ११. 
 
माकु॒ध्र्यग् इन्द्र शूर॒ वस्वी॑र॒स्मे भू॑वन्न् अ॒भिष्ट॑यः  ।  
मा  अकुध्र्यक्  इन्द्र  शूर  वस्वीः  अस्मे इति  भूवन्  अभिष्टयः   
हे इंद्रा, हे वीरा, धनाप्रमाणें अभिलषणीय अशा ज्या तुझ्या सद्भावना, त्या आमच्याविषयी कधीं निरर्थक न होवोत. हे वज्रधरा, खरोखरच आम्हीं त्या तुझ्या सदिच्छेच्या सुखमय छत्राखाली राहूं असे कर. १२. 
 
अ॒स्मे ता त॑ इन्द्र सन्तु स॒त्याहिं॑सन्तीरुप॒स्पृशः॑  ।  
अस्मे इति  ता  ते  इन्द्र  सन्तु  सत्या  अहिंसन्तीः  उप-स्पृषः   
भक्ताचा कधीं घात न करणारा असा जो तुझा हस्तस्पर्श तो, हे इंद्रा, आमच्या संबंधाने सत्य होवो. हे वज्रधरा, धेनूंच्या दुग्धाप्रमाणें आम्हीं त्या स्पर्शाच्या योगाने सुखी होऊं असे कर १३. 
 
अ॒ह॒स्ता यद॒पदी॒ वर्ध॑त॒ क्षाः शची॑भिर्वे॒द्याना॑म्  ।  
अहस्ता  यत्  अपदी  वर्धत  क्षाः  शचीभिः  वेद्यानां   
जिला हात नाहीत आणि पायहि नाहींत अशी ही पृथिवी ज्ञानी विभूतीच्या शक्तींनी उत्कर्ष पावते हे पाहून त्या पृथ्वीभोंवती वेटोळें घालून बसलेल्या शुष्णाला विश्वाच्या आयुष्यवृद्धीसाठींच तूं ठार कर. १४. 
 
पिबा॑-पि॒बेदि॑न्द्र शूर॒ सोमं॒ मा रि॑षण्यो वसवान॒ वसुः॒ सन्  ।  
पिब-पिब  इत्  इन्द्र  शूर  सोमं  मा  रिषण्यः  वसवान  वसुः  सन्  
हे वीरा, इंद्रा, हा सोमरस तूं प्राशन करच, आम्हांवर रोष धरूं नको. दिव्यनिधिच्या प्रभो, तूं स्वत: निधिरूपच आहेस. तर तुझे स्तवन करणार्या दानशील यजमानाचे रक्षण कर आणि श्रेष्ठ अशा दिव्य संपत्तीने आम्हांला संपन्न कर. १५. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २३ (इंद्रसूक्त) 
ऋषी  -  विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र   
यजा॑मह॒ इन्द्रं॒ वज्र॑दक्षिणं॒ हरी॑णां र॒थ्य१ं विव्र॑तानाम्  ।  
यजामहे  इन्द्रं  वज्र-दक्षिणं  हरीनां  रथ्यं  वि-व्रतानां  
ज्याच्या उजव्या बाजूकडे वज्र आहे, जो आपल्या रथाला हरिद्वर्ण अश्व जोडतो, आणि विविध धर्मी लोकांचेहि धुरीणत्व स्वीकारतो, त्या इंद्राप्रीत्यर्थ आम्ही यजन करीत आहों. तो आपल्या (मरुतांच्या) सेनेसह आपल्या मिशांवर हात फ़िरवीत उभा राहतो आणि आपल्या (भक्तांवर) कृपाप्रसाद केल्याकारणानेंच दातृत्वशाली म्हणून गाजतो. १. 
 
हरी॒ न्व् अस्य॒ या वने॑ वि॒दे वस्व् इन्द्रो॑ म॒घैर्म॒घवा॑ वृत्र॒हा भु॑वत्  ।  
हरी इति  नु  अस्य  या  वने  विदे  वसु  इन्द्रः  मघैः  मघ-वा  वृत्र-हा  भुवत्   
त्याचे जे दोन हरिद्वर्ण अश्व, -ते (अश्वरूप) धन त्याला मेघोदकांत मिळाले, आणि अशा (षट्) ऐश्वर्यांच्या योगानें तो वृत्रनाशक इंद्र भगवान म्हणून प्रसिद्ध झाला. तो ऋभू म्हणजे (दीप्ततेज) आहे. तो वाज म्हणजे सत्वस्वरूप आहे. तो ऋभुक्षा (म्हणजे श्रेष्ठतम) आहे; तो उत्कट बलाचा स्वामी आहे. त्या कारणानें मी अधार्मिक दुष्टांचे नांव सुद्धां येथून पार निपटून टाकीन. २. 
 
य॒दा वज्रं॒ हिर॑ण्यं॒ इदथा॒ रथं॒ हरी॒ यं अ॑स्य॒ वह॑तो॒ वि सू॒रिभिः॑  ।  
यदा  वज्रं  हिरण्यं  इत्  अथ  रथं  हरी इति  यं  अस्य  वहतः  वि  सूरि-भिः  
पहा, जेव्हां तो आपल्या सुवर्णाच्या मुठीचे वज्र घेतो आणि ज्या रथाला त्याचे हरिद्वर्ण अश्व ओढून नेतात त्या रथांत यज्ञकर्त्या यजमानांसह आरोहण करतो, तेव्हां पुरातनकालापासून प्रख्यात असलेला भगवान् इंद्र जगद्विख्यात हा सत्वसामर्थ्याचा प्रभूच ठरला. ३.  
 
सो चि॒न् नु वृ॒ष्टिर्यू॒थ्याख्प्  स्वा सचाँ॒ इन्द्रः॒ श्मश्रू॑णि॒ हरि॑ता॒भि प्रु॑ष्णुते  ।  
सो इति  चित्  नु  वृष्टिः  यूथ्या  स्वा  सचा  इन्द्रः  श्मश्रूणि  हरिता  अभि  प्रुष्णुते   
आपले अनुचर, आपल्या मिशा, आणि आपले हरिद्वर्ण अश्व यांना इंद्र एकदम जलाने आर्द्र करतो, तें जें जल पडतें तीच पर्जन्यवृष्टि होय. कारण मधुर सोमरस जेथें पिळला जातो,  त्या यज्ञगृहीं जेव्हां तो गमन करतो तेव्हां, वायु जसा अरण्यांतील वृक्ष हलवितो त्याप्रमाणें  तोहि मेघोदकांना हलवून सोडतो. ४.  
 
यो वा॒चा विवा॑चो मृ॒ध्रवा॑चः पु॒रू स॒हस्राशि॑वा ज॒घान॑  ।  
यः  वाचा  वि-वाचः  मृध्र-वाचः  पुरु  सहस्रा  असिवा  जघान  
तोंडाने वाटेल तसें भुकत सुटणारे, शिवीगाळ करणारे असे सहस्त्रावधि अमंगल शत्रु ज्याने आपल्या नुसत्या सिंहनादानेंच ठार मारले, तोच तोच हा, त्याचाच पराक्रम आम्हीं वर्णन करतो. तो आम्हांला पित्याप्रमाणें  आहे. त्यानें आमचा जोम, आमचे उत्कट बल वृद्धिंगतच केलें आहे. ५. 
 
स्तोमं॑ त इन्द्र विम॒दा अ॑जीजन॒न्न् अपू॑र्व्यं पुरु॒तमं॑ सु॒दान॑वे  ।  
स्तोमं  ते  इन्द्र  वि-मदाः  अजीजनन्  अपूर्व्यं  पुरु-तमं  सु-दानवे  
हे इंद्रा, या विमदकुलोत्पन्नांनी, दानशूर जो तूं त्या तुजप्रित्यर्थ एक अपूर्व आणि अत्यंत रम्य असे कवन रचलें आहे. तुज जगन्नयकाला प्रिय काय ते आम्हीं जाणतो, आणि म्हणूनच गोपालक जसा धेनूला त्याप्रमानें आम्हीं तुजला हांक मारतों. ६. 
 
माकि॑र्न ए॒ना स॒ख्या वि यौ॑षु॒स्तव॑ चेन्द्र विम॒दस्य॑ च॒ ऋषेः॑  ।  
माकिः  नः  एना  सख्या  वि  यौषुः  तव  च  इन्द्र  वि-मदस्य  च  ऋषेः  
इंद्रा, तुझें आणि विमद ऋषीचें जे हें सख्य जुळलें आहे ते कदापि न तुटो. हे देवा, पाठच्या भावंडावर जशी ममता असते तशी तुझी बुद्धि आमच्याविषयीं प्रेमळ आहे हे आम्हीं ओळखतों; तर आमच्याविषयीं तेंच मंगलपूर्ण प्रेम तुझ्या मनांत सतत राहो. ७. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २४ (इंद्र, अश्विनीकुमारसूक्त) 
ऋषी  -  विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र   
इन्द्र॒ सोमं॑ इ॒मं पि॑ब॒ मधु॑मन्तं च॒मू सु॒तम्  ।  
इन्द्र  सोमं  इमं  पिब  मधु-मन्तं  चमू इति  सुतं   
इंद्रा, हा चमसांत पिळलेला मधुर सोमरस तूं प्राशन कर. आणि तूं उल्लसित वृत्तीमध्यें असतां आमच्या हातामध्यें तू हजारो प्रकारचे वैभव ठेव; कारण हे अपार ऐश्वर्या, तूं आपल्या महिम्याने वृद्धिंगतच होत आहेस. १. 
 
त्वां य॒ज्ञेभि॑रु॒क्थैरुप॑ ह॒व्येभि॑रीमहे  ।  
त्वां  यजेभिः  उक्थैः  उप  हव्येभिः  ईमहे   
यज्ञांनी सामगायनांनी, आणि आहुतींनी, हे सर्व शक्तींच्या शक्तिनाथा, तुझी आम्हीं विनवणी करीत आहोंत, तर आपल्या उल्लसित वृत्तींत तूं असतांना उत्कृष्ट जे अभीष्ट तेंच तूं आम्हाला अर्पण कर. कारण हे अपार ऐश्वर्या तूं स्वमहात्म्यानें वृद्धिंगतच होतोस. २.  
 
यस्पति॒र्वार्या॑णां॒ असि॑ र॒ध्रस्य॑ चोदि॒ता  ।  
यः  पतिं  वार्याणां  असि  रध्रस्य  चोदिता  
हे इंद्रा, तूं जो अभिलषणीय वस्तूंचा प्रभु आहेस, धनाढ्य यजमानांना प्रेरणा करणारा आणि भक्तांचा संरक्षक आहेस, तोच तूं आपल्या उल्लसित वृत्तींत असतां द्वेष्ट्यांपासून आणि पातकांपासून आमचे रक्षण कर. ३.  
 
यु॒वं श॑क्रा माया॒विना॑ समी॒ची निर॑मन्थतम्  ।  
युवं  शक्रा  मायाविना  समीची इतिसम्-ईची  निः  अमन्थतं  
हे समर्थ अश्वीहो, तुम्ही दिव्य मायेने संपन्न आहांत, विमदाच्या स्तवनाने (प्रसन्न होऊन) तुम्हीं एकत्र असणार्या द्यावापृथिवींना गदगदां हलविलेंत. ४.
 
विश्वे॑ दे॒वा अ॑कृपन्त समी॒च्योर्नि॒ष्पत॑न्त्योः  ।  
विश्वे  देवाः  अकृपन्त  सम्-ईच्योः  निः-पतन्त्योः   
हे सत्यस्वरूप देवांनो, जेव्हां तुम्ही त्यांना घुसळून निरनिराळें केलें तेव्हां एकत्र असलेल्या त्या द्यावापृथिवीची सर्व दिव्यविभूतींना दया आली आणि ते तुंम्हाला म्हणाले की आतां त्यांना आपाआपल्या जागीं परत नेऊन ठेवा. ५. 
 
मधु॑मन् मे प॒राय॑णं॒ मधु॑म॒त् पुन॒राय॑नम्  ।  
मधु-मत्  मे  परायणं  मधु-मत्  पुनः  आयनं   
तुमचे गमन जसें मला मधुर वाटतें, तसें आगमनहि मला फार मधुर वाटतें.  तर हे देवांनो, आपल्या दिव्य शक्तीने आम्हांला मधुर रसानें युक्त करा ६. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २५ (सोमाचे पालुपदसूक्त) 
ऋषी  -  विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र   
भ॒द्रं नो॒ अपि॑ वातय॒ मनो॒ दक्षं॑ उ॒त क्रतु॑म्  ।  
भद्रं  नः  अपि  वातय  मनः  दक्षं  उत  क्रतुं  अध  
मंगलकारी असे मन, तसेंच चातुर्यबल आणि कर्तॄत्वशक्ति हे आमच्यामध्यें येतील असें करा. आणि धेनूं जशा तृणांत रमून जातात, त्याप्रमाणे हे सोमा, उल्लसित वृत्तींमध्ये, भक्तजन रममाण होतात; कारण तूंही (आनंदाने) वृद्धिंगत होतोस. १.  
 
हृ॒दि॒स्पृश॑स्त आसते॒ विश्वे॑षु सोम॒ धाम॑सु  ।  
हृदि-स्पृशः  ते  आसते  विश्वेषु  सोम  धाम-सु   
हे सोमा, सर्व यज्ञगृहांत तुझें हृदयस्पर्शी रस आहेत आणि तेथे आमच्या ह्या वासनाहि आहेत. त्या वासना तूं आपल्या उल्लसित वृत्तींत असतां अपूर्व धनाच्या प्राप्तीची इच्छा करतात; कारण तूंहि (आनंदाने) वृद्धिंगत होत असतोस. २.  
 
उ॒त व्र॒तानि॑ सोम ते॒ प्राहं मि॑नामि पा॒क्या  ।  
उत  व्रतानि  सोम  ते  प्र  अहं  मिनामि  पाक्या   
हे सोमा, जरी तुझ्या सेवेचे नियम मीं मनोदौर्बल्यामुळें मोडतो, तरी पिता जसा पुत्रावर मायाच करतो, त्याप्रमाणे आपल्या उल्लासवृत्तींत असतां तूं आम्हांवर दया करून प्राणघातक शस्त्रापासून आमचे सर्वप्रकारें रक्षण कर. कारण तूंहि (आनंदाने) वद्धिंगतच होतोस. ३.  
 
सं उ॒ प्र य॑न्ति धी॒तयः॒ सर्गा॑सोऽव॒ताँ इ॑व  ।  
सं  ओं इति  प्र  यन्ति  धीतयः  सर्गासः  अवतान्-इव  
प्रवाह ज्याप्रमाणें खोल जाग्याकडे वाहतात, त्याप्रमाणे माझ्या सर्व वृत्ति तुझ्याकडे लागल्या आहेत; तर हे सोमा, आम्ही जगावे म्हणून तूं आपल्या तल्लीनतेंत असतांना चमस त्याच्या जाग्यावर ठेवावा त्याप्रमाणे आमच्यामध्ये कर्तॄत्वशक्तीची स्थापना कर ४.  
 
तव॒ त्ये सो॑म॒ शक्ति॑भि॒र्निका॑मासो॒ व्यृण्विरे  ।  
तव  त्ये  सोम  शक्ति-भिः  नि-कामासः  वि  ऋण्विरे  
तुझ्या ज्या शक्तींनी, तुझ्या त्या कल्पकतेच्या, धडाधडीच्या, शक्तींनी प्रज्ञावान् भक्त कृतार्थ झाले; आणि तूं आपल्यां तल्लीन वृत्तींत असतांना त्यांनी धेनू आणि अश्व यांच्या आवाराचीं कपाटे सताड उघडून दिली. ५. 
 
प॒शुं नः॑ सोम रक्षसि पुरु॒त्रा विष्ठि॑तं॒ जग॑त्  ।  
पशुं  नः  सोम  रक्षसि  पुरु-त्रा  वि-स्थितं  जगत्  
गोपालक जसा आपल्या धेनूचे रक्षण करतो, त्याप्रमाने शेंकडों ठिकाणीं नानातर्हेनें पसरलेल्या ह्या जगताचे रक्षण, हे सोमा, तूं करतोस; आणि (प्राण्यांनी) जगावे म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेऊन या अखिल भुवनांना तूं आकर्षण करून उचलून धरतोस, आणि आपल्या उल्लास वृत्तींत राहून वृद्धिंगतच होतोस. ६.  
 
त्वं नः॑ सोम वि॒श्वतो॑ गो॒पा अदा॑भ्यो भव  ।  
त्वं  नः  सोम  विश्वतः  गोपाः  अदाभ्यः  भव   
हे सोमा, अजिंक्य असा तूं आमचा सर्वतोपरी संरक्षक हो. हे राजा, आमचा घात करूं पाहणार्या दुष्टांना दूर हांकून देऊन ठार कर. कोणत्याहि दुर्विचाराचा आमच्यावर पगडा बसूं देऊं नको; कारण आपल्या उल्लास वृत्तींत राहूनच तूंहि वृद्धिंगतच होतोस. ७.  
 
त्वं नः॑ सोम सु॒क्रतु॑र्वयो॒धेया॑य जागृहि  ।  
त्वं  नः  सोम  सु-क्रतुः  वयः-धेयाय  जागृहि  
हे सोमा, तूं सच्चारित्र्य आहेस, तर आम्हांला तारुण्याचा उत्साह प्राप्त व्हावा म्हणून तूं जागृत रहा. आम्हां मानवांना योग्य कार्यक्षेत्र मिळवून देण्यांत तूं फारच चतुर आहेस; तूं द्रोहबुद्धीपासून आमचे रक्षण कर. पाहा, आपल्या उल्लास वृत्तीं तूंहि वृद्धिंगतच होतोस. ८. 
 
त्वं नो॑ वृत्रहन्त॒मेन्द्र॑स्येन्दो शि॒वः सखा॑  ।  
त्वं  नः  वृत्रहन्-तम  इन्द्रस्य  इन्दो इति  शिवः  सखा   
वृत्राचा अगदीं समूळ उच्छेद करणार्या सोमविन्दो, तूं आमच्या मित्राचा परम मंगल मित्र आहेस आणि म्हणून अर्भकांच्या हितसंपादनासाठीं समरांत युद्ध करणारे सैनिक तुजला हांक मारतात. ९.  
 
अ॒यं घ॒ स तु॒रो मद॒ इन्द्र॑स्य वर्धत प्रि॒यः  ।  
अयं  घ  सः  तुरः  मदः  इन्द्रस्य  वर्धत  प्रियः   
हाच तो इंद्राचा प्रिय आणि त्वरित हर्षोत्पादक (सोम) प्रफुल्लित झाला आहे. श्रॆष्ठ अशा कक्षीवान् नांवाच्या स्तोत्रकर्त्याची प्रतिमा हा उल्लसित वत्तींत असतांना यानेंच वृद्धिंगत केली. आणि (हे सोमा) मग तूंहि स्वत: हर्षाने वृद्धिंगत झालास. १०.  
 
अ॒यं विप्रा॑य दा॒शुषे॒ वाजा॑ँ इयर्ति॒ गोम॑तः  ।  
अयं  विप्राय  दाशुषे  वाजान्  इयर्ति  गो--मतः   
दानशाली स्तोत्याला गोधनयुक्त सत्त्वसामर्थ्यें देणारा तो हा सातजणांपेक्षा हा उत्तम आहे, कारण याने आपल्या हर्षोलासांत अंध आणि पंगु अशाहि भक्तांचा उद्धार केला आणि म्हणूनच स्वमहिम्यानें  तो वृद्धिंगत झाला. ११. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २६ (पूषन्सूक्त) 
ऋषी  -  विमल ऐंद्र अथवा प्राजापत्य अथवा वसुकृत् वासुक्र   
प्र ह्यच्छा॑ मनी॒षा स्पा॒र्हा यन्ति॑ नि॒युतः॑  ।  
प्र  हि  अच्च  मनीषाः  स्पार्हाः  यन्ति  नि-युतः   
आमच्या मननीय आणि स्पृहणीय भावना पूषाकडे त्वरित गेल्या. म्हणून तोहि श्रेष्ठ पूषा नियुत् नांवाचे अश्व रथाला जोडून त्या अद्भुत मनोहर स्तुतीमध्ये रममाण होवो १.  
 
यस्य॒ त्यन् म॑हि॒त्वं वा॒ताप्यं॑ अ॒यं जनः॑  ।  
यस्य  त्यत्  महि-त्वं  वाताप्यं  अयं  जनः  
हा स्तोतृजन त्या पूषा देवाचे तें अपूर्व श्रेष्ठत्व आणि नि:सीम सामर्थ्य आपल्या ध्यान भक्तीनें आकलन करो. म्हणजे हा पूषा भक्ताच्या एकाग्रतेने त्याच्या उत्कृष्ट स्तुतींकडे चित्त देईल २.  
 
स वे॑द सुष्टुती॒नां इन्दु॒र्न पू॒षा वृषा॑  ।  
सः  वेद  सु-स्तुतीनां  इन्दुः  न  पूषा  वृषा   
पराक्रमी पूषाहि सोमाप्रमाणेंच उत्कृष्ट स्तवनाकडे लक्ष देतो; तो नयनमनोहर पूषा आमच्या धेनुसमुहावर कृपाजलांचे सिंचन करतो, आणि आम्हांवरहि तसेंच सिंचन करतो ३.  
 
मं॒सी॒महि॑ त्वा व॒यं अ॒स्माकं॑ देव पूषन्  ।  
मंसीमहि  त्वा  वयं  अस्माकं  देव  पूषन्   
हे पूषा देवा, आम्हीं तुजला आमच्या मननीय स्तोत्रांचे साधन म्हणून आणि तूं स्तोतृजनाला हलवून सोडणारा आहेस म्हणून तुझे भक्तिभावाने चिंतन करतो  ४.  
 
प्रत्य॑र्धिर्य॒ज्ञानां॑ अश्वह॒यो रथा॑नाम्  ।  
प्रति-अर्धिः  यजानां  अश्व-हयः  रथानां   
जो यज्ञांच्या अर्ध्या भागाचा स्वामी, जो आपल्या रथाच्या अश्वांना अतिशय त्वरेने दौडत नेतो, तो पूषा मानवहितकारी ऋषि होय. तो स्तोतृजनांचा दुरित विमोचक असा मित्र होय ५. 
 
आ॒धीष॑माणायाः॒ पतिः॑ शु॒चाया॑श्च शु॒चस्य॑ च  ।  
आधीषमाणायाः  पतिः  शुचायाः  च  शुचस्य  च   
आपल्याच नादांत (=ध्यानकार्यांत) मग्न असलेली एक स्वच्छ अजा आणि एक अज अशा दोहोंची जोडी तो बाळगतो. त्याच्या अंगावरील (उर्णारूप) वस्त्र तो विणतो, आणि ती वस्त्रेंहि तो स्वच्छ ठेवतो ६.  
 
इ॒नो वाजा॑नां॒ पति॑रि॒नः पु॑ष्टी॒नां सखा॑  ।  
इनः  वाजानां  पतिः  इनः  पुष्टीनां  सखा   
असा तो जगत्प्रभु सत्वसामर्थ्याचा स्वामी आहे. तो जगत्प्रभु उन्नतिप्रद मित्र आहे. तो अजिंक्य पूषा मनोहर सोमरसाकडे पाहून आपल्या मिशांवर सहज हात फिरवितो ७. 
 
आ ते॒ रथ॑स्य पूषन्न् अ॒जा धुरं॑ ववृत्युः  ।  
आ  ते  रथस्य  पूषन्  अजाः  धुरं  ववृत्युः  
हे पूषा, तुझ्या रथाची धुरा अज ओढतात, तरी तूं यच्चावत् याचकांचा पुरातन कालापासूनचा मित्रच आहेस; हा तुझा अधिकार कधीं नष्ट झालेला नाही ८. 
 
अ॒स्माकं॑ ऊ॒र्जा रथं॑ पू॒षा अ॑विष्टु॒ माहि॑नः  ।  
अस्माकं  ऊर्जा  रथं  पूषा  अविष्टु  माहिनः  
हे पूषा, तूं यच्चावत् याचकांचा पुरातन कालापासूनचा मित्रच आहेस; तुझ्या कृपेने आम्हाला विपुल अन्नाची प्राप्ती होत राहो. ९ . 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २७ (इंद्र-वसुक्र संवाद, इंद्रमाहात्म्यसूक्त) 
ऋषी - वसुक्र ऐंद्र    
अस॒त् सु मे॑ जरितः॒ साभि॑वे॒गो यत् सु॑न्व॒ते यज॑मानाय॒ शिक्ष॑म्  ।  
असत्  सु  मे  जरितरिति  सः  अभि-वेगः  यत्  सुन्वते  यजमानाय  
स्तवनरत भक्ता, माझा असा पक्का निर्धार झाला आहे कीं सोम अर्पण करणार्या भक्ताला कांही तरी द्यावें आणि त्याला मार्गाला लावावे. पण जो आशीर्वादपर प्रार्थना म्हणत नाही, जो सत्याचा घात करतो, जो कुटिल मार्गानेंच जात असतो, आणि पुन: माजलेला असतो त्याला मात्र मी ठार मारणार १.  
 
यदीद॒हं यु॒धये॑ सं॒नया॒न्यदे॑वयून् त॒न्वाख्प्  शूशु॑जानान्  ।  
यदि  इत्  अहं  युधये  सम्-नयानि  अदेव-यून्  तन्वा   
जे देवाला मानीत नाहीत, त्या अधार्मिक परंतु शरीराने धष्टपुष्ट अशा शत्रूंना जेव्हां त्याच्याशी युद्ध करण्याकरितां मी कोठच्या तरी ठिकाणी गाठीन, त्या वेळी अगोदर तुझ्या यज्ञगृही (सोमरूपी) पुष्ट परिपक्व करीन आणि तीव्र सोमरस पंधरावेळा (पात्रांत) ओतीन २.  
 
नाहं तं वे॑द॒ य इति॒ ब्रवी॒त्यदे॑वयून् स॒मर॑णे जघ॒न्वान्  ।  
न  अहं  तं  वेद  यः  इति  ब्रवीति  अदेव-यून्  सम्-अरणे  जघन्वान्   
जो कोणी म्हणतो कीं संग्रामांत देवनिन्दकांचा फडशा उडविला, पण हे अमक्याने केले असे कोणाचेंच नांव सांगितलेले मला केव्हांहि कळलें नाही. कारण कापाकापीचे घनचक्कर युद्ध चाललेले जे पहतात ते ते सर्व लोक माझ्याच वीर्यशालित्वाचे वर्णन करीत आहेत (असें त्याला आढळेल) ३.  
 
यदज्ञा॑तेषु वृ॒जने॒ष्व् आसं॒ विश्वे॑ स॒तो म॒घवा॑नो म आसन्  ।  
यत्  अजातेषु  वृजनेषु  आसं  विश्वे  सतः  मघ-वानः  मे  आसन्   
जी युद्धें आज तुम्हांला ऐकूनहि माहित नाहीत, त्या युद्धांच्या वेळींहि मी तेथे होतों म्हणूनच सर्व (भक्त) आज यजमान म्हणून मिरवीत आहेत. कारण चैनीत राहिलेल्या त्या प्रबल शत्रूला मींच जिंकले आणि त्याला पाय धरून गरगर फिरवून पर्वतावरून खाली भिरकावून दिले ४. 
 
न वा उ॒ मां वृ॒जने॑ वारयन्ते॒ न पर्व॑तासो॒ यद॒हं म॑न॒स्ये  ।  
न  वै  ओं इति  मां  वृजने  वारयन्ते  न  पर्वतासः  यत्  अहं  मनस्ये   
संग्रामांत (मी एकदां शिरलो की) माझें निवारण कोणीहि करूं शकत नाहीत; जेव्हां मी एखादी गोष्ट करण्याचे मनांत आणतो, तेव्हां पर्वतहि मला अडाथळा करूं शकत नाहीत; अगदी बहिरा मनुष्य देखील माझ्या गर्जनेने चलचळां कांपू लागतो, आणि याच कारणानें   रश्मिमाली सूर्य देखील दररोज भीतीने पुढे सरकत असतो ५. 
 
दर्श॒न् न्व् अत्र॑ शृत॒पाँ अ॑नि॒न्द्रान् बा॑हु॒क्षदः॒ शर॑वे॒ पत्य॑मानान्  ।  
दर्शन्  नु  अत्र  शृत-पान्  अनिन्द्रान्  बाहु-क्षदः  शरवे  पत्यमानान्   
शिजवून सिद्ध केलेले रस प्राशन करणारे, (परंतु) मला इंद्राला न मानणारे आणि आपल्या बाहुबलाने (निरपराध्यास) चिरडून टाकणारे दुष्ट येथें माझ्या बाणाला बळी पडलेले मी पाहिले आणि माझ्याकरितां आपले शरीर झिजविणारा जो माझा प्रिय भक्त त्याची ज्यांनी निन्दा केली त्यांच्या अंगावर ह्या माझ्या (रथचकाच्या) धांवा त्यांना चाकाखाली दडपून त्यांच्यावरून फिरल्या ६.  
 
अभू॒र्व् औक्षी॒र्व्यु१ आयु॑रान॒ड् दर्ष॒न् नु पूर्वो॒ अप॑रो॒ नु द॑र्षत्  ।  
अभूः  ओं इति  औक्षीः  वि  ओं इति  आयुः  आनट्  दर्षत्  नु  पूर्वः  अपरः  नु  दर्षत्  
इंद्रा तूं पूर्वीहि होतासच. आणि खरोखरच (भक्तावर) कृपाजलांचे सिंचन केलेस; सर्व प्राणिमात्रांचे आयुष्य तूं व्यापून टांकलेंस हे पूर्वीच्या भक्तांनी पाहिले आणि आतांच्या भक्तांनीहि पाहिले, (की) जो इंद्र ह्या रजोलोकाच्याहि पलीकडे असून त्याला व्यापून राहिला त्याला हे दोन द्यावापृथिवी देखील वेष्टून टांकू शकले  नाहीत ७.  
 
गावो॒ यवं॒ प्रयु॑ता अ॒र्यो अ॑क्ष॒न् ता अ॑पश्यं स॒हगो॑पा॒श्चर॑न्तीः  ।  
गाव  यवं  प्र-युताः  अर्यः  अक्षन्  ताः  अपश्यं  सह-गोपाः  चरन्तीः  
आर्य भक्ताच्या धेनू एकत्र मिळून तृण धान्याजवल गेल्या; त्यांना चरतांना आणि तृण भक्षण करतांना त्यांच्या गोपबालकासह मी पाहिले पहा आर्य भक्तांच्या हांकेसरशी येणार्या त्या धेनू येथें भोंवताली जमल्या; आतां  त्यांचा धनी त्यांना वाटेल तितके चुचकारो ८.  
 
सं यद्वयं॑ यव॒सादो॒ जना॑नां अ॒हं य॒वाद॑ उ॒र्वज्रे॑ अ॒न्तः  ।  
सं  यत्  वयं  यवस-अदः  जनानां  अहं  यव-अदः  उरु-अज्रे  अन्तरिति   
जरी लोकांमध्ये मी धान्यभक्षक असलों, तरी या विस्तीर्ण जगत् क्षेत्राच्या आंत आम्ही (सर्वच प्राणे) तृणभक्षकच ठरतों. येथे ज्याला जुंपले असेल त्याने आपल्याला बन्धमुक्त करणारा भेटो अशी इच्छा करावी; परंतु होतें काय की, जो मोकळा आहे त्यालाच कोणी तरी दुसरा जबरदस्त भेटून तोंच जुंपून टाकतो ९.  
 
अत्रेदु॑ मे मंससे स॒त्यं उ॒क्तं द्वि॒पाच् च॒ यच् चतु॑ष्पात् संसृ॒जानि॑  ।  
अत्र  इत्  ओं इति  मे  मंससे  सत्यं  उक्तं  द्वि-पात्  च  यत्  चतुः-पात्  सम्-सृजानि  
अशा ठिकाणी माझे बोलणे सत्य आहे असे तुला तात्काळ पटेल. कारण द्विपद आणि चतुष्पद यांना (त्यांच्या स्त्रियांसह) मी एकत्रच उत्पन्न करतो, आणि जो (मज) बलवानावर चढाई करून येतो त्याच्याशी युद्ध करण्याच्या भरीस अगोदर न पडतांच मी त्याचे ज्ञानधन हरण करून (भक्तांमध्ये) विभागून देतो १०.  
 
यस्या॑न॒क्षा दु॑हि॒ता जात्व् आस॒ कस्तां वि॒द्वाँ अ॒भि म॑न्याते अ॒न्धाम्  ।  
यस्य  अनक्षा  दुहिता  जातु  आस  कः  तां  विद्वान्  अभि  मन्याते  अन्धां   
एखाद्याची कन्या कदाचित् अन्ध असली (म्हणजे कोणाकडेहि ती पाहात सुद्धां नसली) तरी कोणता चतुर पुरुष तिच्याविषयी मनांत अढी ठेवील ? कोणता युवक तिच्याशीं आपले मन उघडे करील ? जो तिच्याशी विवाह करील तो, किंवा जो (नुसतीच) मागणी घालीत असेल तो ? ११.  
 
किय॑ती॒ योषा॑ मर्य॒तो व॑धू॒योः परि॑प्रीता॒ पन्य॑सा॒ वार्ये॑ण  ।  
कियती  योषा  मर्यतः  वधू-योः  परि-प्रीता  पन्यसा  वार्येण   
वधू शोधन करणार्या तरुणावर किती तरी तरुणी त्याच्या केवळ मोहक वाखाणणीनेंच प्रेम करूं लागतात. परंतु जी वधू  खरोखरच भाग्यशालिनी आणि लावण्यवती असते तिला आपोआपच या जगांत (पतिरूप) मित्राचा लाभ होतो १२.  
 
प॒त्तो ज॑गार प्र॒त्यञ्चं॑ अत्ति शी॒र्ष्णा शिरः॒ प्रति॑ दधौ॒ वरू॑थम्  ।  
पत्तः  जगार  प्रत्यचं  अत्ति  शीर्ष्णा  शिरः  प्रति  दधौ  वरूथं   
एक असा आहे कीं तो आपल्या पायांनी पकडतो, आणि त्याच्या समोर येणार्याला खाऊन टाकतो; आणि मस्तकावर दुसर्या मस्तकांचे शिरस्त्राण घालतो. (स्वत:) बसला असतां जवळच उभी असलेली जी (दीप्ति) तिला खाली ढकलून देतो आणि उत्तान भूमीच्या मागून जातो १३. 
 
बृ॒हन्न् अ॑च्छा॒यो अ॑पला॒शो अर्वा॑ त॒स्थौ मा॒ता विषि॑तो अत्ति॒ गर्भः॑  ।  
बृहन्  अच्चायः  अपलाशः  अर्वा  तस्थौ  माता  वि-सितः  अत्ति  गर्भः   
असा तो विशाल आहे, त्याला सावली नाही किंवा पाने नाहीत; तो अश्ववीर (म्हणजे त्वरितगति) आहे; माता मात्र स्वस्थ उभी आहे; आणि तिचे मोकळे सुटलेले वासरूं आपले खाणें खात आहे, परंतु दुसरीच्याच वासराला चाटून ती हंबरते, अशा धेनूनें आपली कास कोणत्या ठिकाणीं ठेवली आहे बरें ? १४.      
 
स॒प्त वी॒रासो॑ अध॒रादुदा॑यन्न् अ॒ष्टोत्त॒रात्ता॒त् सं अ॑जग्मिर॒न् ते  ।  
सप्त  वीरासः  अधरात्  उत्  आयन्  अष्ट  उत्तरात्तात्  सं  अजग्मिरन्  ते   
खालच्या बाजूने सातजण वीर वर आले, वरच्या बाजूकडून आठजण एकदम पुढें झाले, पाठीमागच्या बाजूने नऊजण "स्थिवि" हातांत घेऊन धांवले आणि दहाजण पुढच्या बाजूने "आशन्" पर्वताचे शिखर ओलांडून पलीकडे गेले १५.  
 
द॒शा॒नां एकं॑ कपि॒लं स॑मा॒नं तं हि॑न्वन्ति॒ क्रत॑वे॒ पार्या॑य  ।  
दशानां  एकं  कपिलं  समानं  तं  हिन्वन्ति  क्रतवे  पार्याय  
त्या दहाजणांमध्ये सर्वांशी सारखेपणाने वागणारा कपिल म्हणून एक (मुनि) आहे, त्याला (जगत्) उद्धाराच्या कार्यासाठी ते पाठवून देतात; आणि (प्रकृति रूप) माता नद्योदकांत उत्तम रीतीने जतन करून ठेवलेल्या अल्लड बालकाला मोठ्या संतोषाने धारण करतो १६. 
 
पीवा॑नं मे॒षं अ॑पचन्त वी॒रा न्युप्ता अ॒क्षा अनु॑ दी॒व आ॑सन्  ।  
पीवानं  मेषं  अपचन्त  वीराः  नि-उप्ताः  अक्षाः  अनु  दीवे  आसन्   
इकडे त्या वीरांनी एका पुष्ट एक्याला शिजविले, इकडे द्यूताला अनुलक्षून फांसे टाकले सुद्धा गेले; आणि तिकडे स्वत: पवित्र आणि दुसर्यालाहि पावन करणारे दोघे जण त्या विशाल "धेनू"कडे चालूं लागले १७.  
 
वि क्रो॑श॒नासो॒ विष्व॑ञ्च आय॒न् पचा॑ति॒ नेमो॑ न॒हि पक्ष॑द॒र्धः  ।  
वि  क्रोशनासः  विष्वचः  आयन्  पचाति  नेमः  नहि  पक्षत्  अर्धः   
मोठ्याने आक्रोश करीत करीत ते सैरावैरा धांवत होते; त्यापैकी निम्या लोकांनी "हवि" पक्व केले; पण राहिलेल्या निम्या लोकांनी ते पक्व केले नाही. पण ह्या सवितादेवाने (जगत् श्रष्ट्याने) मला असे सांगितले की काष्ठभक्षक आणि घृतभक्षक अग्निच आपल्या मनासारखे घडवील १८.  
 
अप॑श्यं॒ ग्रामं॒ वह॑मानं आ॒राद॑च॒क्रया॑ स्व॒धया॒ वर्त॑मानम्  ।  
अपश्यं  ग्रामं  वहमानं  आरात्  अचक्रया  स्वधया  वर्तमानं   
चाकावांचून केवळ आपल्या स्वत:च्या स्वाभाविक शक्तिने चालणारा असा कोण एक बलाढ्य (वीर) मोठ्या समूहाला घेऊन येतांना दुरून मला दिसला. त्या (समूहा) चा धनी जगाच्या युगाप्रमाणेंच (म्हणजे युगधर्माप्रमाणें) चालतो, म्हणूनच त्या नव्या दमाच्या प्रभूने "शिश्र" नामक दुष्टांचा फडशा उडवून दिला १९. 
 
ए॒तौ मे॒ गावौ॑ प्रम॒रस्य॑ यु॒क्तौ मो षु प्र से॑धी॒र्मुहु॒रिन् म॑मन्धि  ।  
एतौ  मे  गावौ  प्र-मरस्य  युक्तौ  मो इति  सु  प्र  सेधीः  मुहुः  इत्  ममन्धि   
मज प्रमराचे हे वृषभ जोडून अगदीं तयार आहेत, त्यांना दामटूं नको, सावकाश धीरेच चालूं दे. उदके देखील त्याचा उद्देश सफल करतील, आणि सर्वांना पवित्र करणारा सूर्य देखील मेघरूप धारण करून तो हेतू साध्य करून देईल २०.  
 
अ॒यं यो वज्रः॑ पुरु॒धा विवृ॑त्तोऽ॒वः सूर्य॑स्य बृह॒तः पुरी॑षात्  ।  
अयं  यः  वज्रः  पुरुधा  वि-वृत्तः  अवः  सूर्यस्य  बृहतः  पुरीषात्   
जो अशनि अनेक प्रकारांनी महान् सूर्याच्या उदकमय अभ्रपटलाच्या खाली झरझर फ़िरला तो हा. तेथे सद्यश तर आहेच; पण त्याच्या पलीकडे दुसरे जे एक (तेज) आहे, त्यांतून स्तवनरत (भक्त मात्र) कांही एक इजा न होतां पार जातात २१.  
 
वृ॒क्षे-वृ॑क्षे॒ निय॑ता मीमय॒द्गौस्ततो॒ वयः॒ प्र प॑तान् पूरु॒षादः॑  ।  
वृक्षे--वृक्षे  नि-यता  मीमयत्  गौः  ततः  वयः  प्र  पतान्  पुरुष-अदः   
वृक्षावृक्षाच्या ठिकाणी बांधलेली धेनू हंबरली, तेव्हा तेथून पुरुषभक्षक पक्षी नीट उडून (अंगावर) आले तेव्हां हे सर्व विश्व तरी इंद्राप्रीत्यर्थ सोमरस सिद्ध करीत असतें आणि ऋषिला सहाय देत असतें तरी देखील भयभीत होऊन जाते २२.  
 
दे॒वानां॒ माने॑ प्रथ॒मा अ॑तिष्ठन् कृ॒न्तत्रा॑देषां॒ उप॑रा॒ उदा॑यन्  ।  
देवानां  माने  प्रथमाः  अतिष्ठन्  कृन्तत्रात्  एषां  उपराः  उत्  आयन्   
दिव्य विभूतींच्या निसर्गरचनेंत हे प्रथमच होते आणि मग त्यापासून तुटलेल्या विभागापासून मेघमंडल उद्भवले. तिघेजण आर्द्र (मेघमंडळाच्या निकट) असूनहि पृथिवीला संतप्त करतात; परंतु दोघे जण गडगड वाजणारे उदकपटल वाहून नेतात २३.
 
सा ते॑ जी॒वातु॑रु॒त तस्य॑ विद्धि॒ मा स्मै॑ता॒दृग् अप॑ गूहः सम॒र्ये  ।  
सा  ते  जीवातुः  उत  तस्य  विद्धि  मा  स्म  एतादृक्  अप  गूहः  समर्ये   
ती तुझी जीवनकला आहे याची जाणीव ठेव आणि समरप्रसंगी असा लपून राहूं नको. पहा की, रवि देखील दिव्यप्रकाश प्रकट  करतो आणि (अन्धकाराचा) केरकचरा दडपून टाकतो; ह्या सकलशोधक आदित्याचा हा क्रम केव्हांहि सुटला नाही २४. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २८ (इंद्र-वसुक्र-वसुक्रपत्नी संवाद, इंद्रमाहात्म्यसूक्त) 
ऋषी  -  १ - इंद्रस्नुषा वसुक्रपत्नीस; २, ४, ६, ८, १०, १२ - इंद्र; अवशिष्ट - वसुक्र ऐंद्र   
विश्वो॒ ह्य१न्यो अ॒रिरा॑ज॒गाम॒ ममेदह॒ श्वशु॑रो॒ ना ज॑गाम  ।  
विश्वः  हि  अन्यः  अरिः  आजगाम  मम  इत्  अह  श्वशुरः  न  आ  जगाम   
दुसरे सर्व आर्यजन जमले; पण माझा सासरा काय तो आला नाही. ( तो आला म्हणजे हे) धान्य भक्षण करील, आणि सोमरस प्राशन करील, आणि यथेच्छ भोजन करून नंतर घरी जाईल १.  
 
स रोरु॑वद्वृष॒भस्ति॒ग्मशृ॑ङ्गो॒ वर्ष्म॑न् तस्थौ॒ वरि॑म॒न्न् आ पृ॑थि॒व्याः  ।  
सः  रोरुवत्  वृषभः  तिग्म-शृङ्गः  वर्ष्मन्  तस्थौ  वरिमन्  आ  पृथिव्याः   
तो तीक्ष्ण शिंगाचा झुंझार वीरपुंगव विस्तीर्ण पृथिवीच्या उत्तुंग शिखरावर उभा राहिला आणि त्याने गर्जून सांगितले की माझे जठर जो (भक्त) सोमरसाने पूर्ण करील, त्याचे मी सर्व बिकट प्रसंगांतून रक्षण करीन २.  
 
अद्रि॑णा ते म॒न्दिन॑ इन्द्र॒ तूया॑न् सु॒न्वन्ति॒ सोमा॒न् पिब॑सि॒ त्वं ए॑षाम्  ।  
अद्रिणा  ते  मन्दिनः  इन्द्र  तूयान्  सुन्वन्ति  सोमान्  पिबसि  त्वं  एषां   
हे इंद्रा, सोमहर्षित अशा तुज प्रीत्यर्थ भक्तजन ग्राव्यांनी तीव्र सोमरस पिळीत आहेत; आणि तूंहि तो रस प्राशन करीत आहेस; (तसेंच) ते तुजसाठी (पुष्टिवर्धक हविरूप) वृषभ पक्व करितात आणि हे भगवंता त्या बळावर तुजला त्यांनी पाचारण करतांच तू त्यांचा तो हविर्भाग सेवन करतोस ३.  
 
इ॒दं सु मे॑ जरित॒रा चि॑किद्धि प्रती॒पं शापं॑ न॒द्यो वहन्ति  ।  
इदं  सु  मे  जरितः  आ  चिकिद्धि  प्रति-ईपं  शापं  नद्यः  वहन्ति   
हे स्तोत्या, माझे हे कोडें ओळख. नद्या आपला ओघ उलटा वाहवितात. सिंह पुढे येतो आहे असें पाहूनहि ससा त्याच्याव झांप घालतो, आणि कोल्हा रानडुक्कराला त्याच्या जाळींतून बाहेर हुसकून लावतो ४. 
 
क॒था त॑ ए॒तद॒हं आ चि॑केतं॒ गृत्स॑स्य॒ पाक॑स्त॒वसो॑ मनी॒षाम्  ।  
कथा  ते  एतत्  अहं  आ  चिकेतं  गृत्सस्य  पाकः  तवसः  मनीषां   
मी एक अजाणता दुर्बल मनुष्य आहे. हे तुझें कोडें मी कसें ओळखणार ? तुज महाबुद्धिमान महाबलाढ्याच्या मनातील भाव मला कसा कलणार ? तूंच सर्वज्ञ (देव) आहेस; तर तुझी कल्याणकारिणी रथधुरा ज्या उद्दिष्टाकडे वळली असेल, तो हेतु हे भगवंता, तूंच यथायोग्य काळीं आम्हांला सांगत जा ५.  
 
ए॒वा हि मां त॒वसं॑ व॒र्धय॑न्ति दि॒वश्चि॑न् मे बृह॒त उत्त॑रा॒ धूः  ।  
एव  हि  मां  तवसं  वर्धयन्ति  दिवः  चित्  मे  बृहतः  उत्-तरा  धूः   
ज्याप्रमाणे मज महाबलाढ्याचे (महात्म्य) भक्त वाढवितात. महान् द्युलोकांपेक्षांहि माझी रथधुरा उच्च आहे. (म्हणूनच) सहस्त्रावधि दुष्टांना मी एकदम ठार करतों. जगत्पित्याने शत्रूंना निपटून टाकणारा म्हणूनच मला निर्माण केले ६.  
 
ए॒वा हि मां त॒वसं॑ ज॒ज्ञुरु॒ग्रं कर्म॑न्-कर्म॒न् वृष॑णं इन्द्र दे॒वाः  ।  
एव  हि  मां  तवसं  जजुः  उग्रं  कर्मन्-कर्मन्  वृषणं  इन्द्र  देवाः   
याप्रमाणें प्रत्येक कार्यांत मी बलाढ्य, भीषण, आणि वीर्यशाली म्हणूनच मला-देवेंद्राला दिव्यविबुध ओळखतात. उल्लासाच्या भरांत मी वज्राने वृत्राला मारून टाकतो आणि भक्तासाठी आपल्या सामर्थ्याने प्रकाशधेनूंचा समूह प्रकट करितों ७. 
 
दे॒वास॑ आयन् पर॒शूँर॑बिभ्र॒न् वना॑ वृ॒श्चन्तो॑ अ॒भि वि॒ड्भिरा॑यन्  ।  
देवासः  आयन्  परशून्  अबिभ्रन्  वना  वृश्चन्तः  अभि  विट्-भिः  आयन्   
दिव्यविबुध आले, त्यांनी परशु हातीं घेतले होते, मग त्यांनी जंगल तोडून ते आपल्या परिजनासह (जागा मोकळी करीत) चालले. त्यांनी नद्यांच्या ठिकाणी मिष्ट उदक ठेवलें, आणि शुष्क काष्ठांचे सर्पण पार जाळून टाकले ८. 
 
श॒शः क्षु॒रं प्र॒त्यञ्चं॑ जगा॒राद्रिं॑ लो॒गेन॒ व्यभेदं आ॒रात्  ।  
शशः  क्षुरं  प्रत्यचं  जगार  अद्रिं  लोगेन  वि  अभेदं  आरात्   
(गळा कापण्यासाठी) वस्तरा पुढें केला होता, पण पुढें केलेल्या वस्तर्याला सशाने गिळूनच टाकले. मातीच्या एक ढेकळाने लांबचा पर्वत देखील मी दुभंग केला. तसेंच क्षुल्लक मनुष्याच्या हातून मी मोठमोठ्यांनाहि वठणीस आणीन; जोराने फुगून तुंद झालेल्या बैलावरहि पहा त्या लहान वासराने चाल केली ९. 
 
सु॒प॒र्ण इ॒त्था न॒खं आ सि॑षा॒याव॑रुद्धः परि॒पदं॒ न सिं॒हः  ।  
सु-पर्णः  इत्था  नखं  आ  सिसाय  अव-रुद्धः  परि-पदं  न  सिंहः   
गरुडपक्ष्याने तेथें आपली नखें अशा रीतीने रोंवून दिलीं, की पिंजर्यात कोण्डलेला सिंहच जणों आपले पंजे एकमेकांवर घासतो आहे कीं काय. (हा,जो) रोखून धरलेला तान्हेलेला महिष त्याच्याकरितां चामड्याच्या वादीने हे सहज ताणून पुढें ओढले आहे १०.  -
 
तेभ्यो॑ गो॒धा अ॒यथं॑ कर्षदे॒तद्ये ब्र॒ह्मणः॑ प्रति॒पीय॒न्त्यन्नैः॑  ।  
तेभ्यः  गोधाः  अयथं  कर्षत्  एतत्  ये  ब्रह्मणः  प्रति-पीयन्ति  अन्नैः  सिमः   
जे प्रार्थनारहित भक्ताच्या अन्नांनी (आपला देह) पुष्ट करतात त्याच्यासाठी हे (धनुष्य) चामड्याच्या वादीने असेंच ताणून धरावे लागते. सोडून दिलेल्या वृषभांना जे (दुष्ट) भक्षण करितात, ते आपल्या स्वत:चे बल आणि शरीर क्षीणच करून टाकतात ११.  
 
ए॒ते शमी॑भिः सु॒शमी॑ अभूव॒न् ये हि॑न्वि॒रे त॒न्व१ः सोम॑ उ॒क्थैः  ।  
एते  शमीभिः  सु-शमी  अभूवन्  ये  हिन्विरे  तन्वः  सोमे  उक्थैः   
जे सत्कर्मांनी सत्क्रियावान् झाले, ज्यांनी आपल्या स्वत:ला सोमवनांत प्रार्थनांच्या योगाने व्यापृत केले ते हे (भक्त). म्हणून तूं आम्हां मनुष्यांप्रमाणे आमच्याशीं भाषण करून आम्हांजवळ सत्वसामर्थ्य ठेव. तूं वीराने आपली कीर्ति आणि आपले नांव द्युलोकांत देखील गाजविलें आहेस १२. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त २९ (इंद्रसूक्त) 
ऋषी  -  वसुक्र ऐंद्र   
वने॒ न वा॒ यो न्यधायि चा॒कञ्छुचि॑र्वां॒ स्तोमो॑ भुरणाव् अजीगः  ।  
वने  न  वा  यः  नि  अधायि  चाकन्  शुचिः  वां  स्तोमः  भुरणौ  अजीगरिति   
अरण्यामध्ये जो (आपली पिलें) मोठ्या आनंदाने (सुरक्षित) नेऊन ठेवतो अशा पक्ष्याप्रमाणें आनंदाच्या लगबगीने इकडे तिकडे वावरणार्या पत्नी ;यजमानांनो, तुमची पवित्र स्तुति त्याच्यापर्यंत जाऊन पोहोंचली सुद्धा. आज असंख्य दिवस अशाच भक्तांचा हा इंद्र यज्ञसंपादक झालेला आहे. तो शूरांत शूरांचा हितकारी आहे; इतकेंच काय पण वीरांमध्येंहि अत्युत्कृष्ट वीर आहे. तो या पृथिवीचा पति होय १. 
 
प्र ते॑ अ॒स्या उ॒षसः॒ प्राप॑रस्या नृ॒तौ स्या॑म॒ नृत॑मस्य नृ॒णाम्  ।  
प्र  ते  अस्याः  उषसः  प्र  अपरस्याः  नृतौ  स्याम  नृ-तमस्य  नृणां   
आजच्या उष:कालीं आणि उद्यांच्याहि उष:कालाच्या प्रसंगी आपण सर्व भक्त, तो शूरांत अत्यंत शूर, आणि मानवांना अत्यंत हितकर असा जो देव त्याच्या रणनृत्यांत निमग्न होऊं. (देवा) तीन तेजस्वी शिखरांचा जो तुझा "त्रिशोक" रथ, -तो तुझा दातृत्वशालि रथ कुत्सासह शेंकडों शूर भक्तांना पाठोपाठ घेऊन गेला २. 
 
कस्ते॒ मद॑ इन्द्र॒ रन्त्यो॑ भू॒द्दुरो॒ गिरो॑ अ॒भ्यु१ग्रो वि धा॑व  ।  
कः  ते  मदः  इन्द्र  रन्त्यः  भूत्  दुरः  गिरः  अभि  उग्रः  वि  धाव   
हे इंद्रा (दुसरा) कोणता उल्लासकारी सोमरस तुजला प्रिय झाला ? शत्रु भयंकर असा तूं आमच्या यज्ञद्वारांकडे, आमच्या स्तुतींकडे धांवतच ये. इकडे माझ्याकडे तुजला घेऊन येणारा कोण आहे ? माझ्या अंत:करणाच्या कळकळीने आणि हविरन्नांनी मी तुझी तृप्ति खास करूं शकेन ३. 
 
कदु॑ द्यु॒म्नं इ॑न्द्र॒ त्वाव॑तो॒ नॄन् कया॑ धि॒या क॑रसे॒ कन् न॒ आग॑न्  ।  
कत्  ओं इति  द्युम्नं  इन्द्र  त्वावतः  नॄन्  कया  धिया  करसे  कत्  नः  आ  अगन्   
इंद्रा, तुझें तेजोबल कोणतें ? कोणत्या प्रकारच्या एकाग्रध्यानानें तूं शूर भक्तांना आपले म्हणून म्हणतोस ? अशी स्थिति आम्हांस कशी येईल ? हे सर्वत्रसंचारी इंद्रा, तूं मित्राप्रमाणे आहेस. सत्यस्वरूप आहेस. परंतु सर्व मानवांची तळमळ मात्र (कशासाठीं-तर) उदर पोषणासाठीं आणि अन्नासाठीं चालली असते ४. 
 
प्रेर॑य॒ सूरो॒ अर्थं॒ न पा॒रं ये अ॑स्य॒ कामं॑ जनि॒धा इ॑व॒ ग्मन्  ।  
प्र  ईरय  सूरः  अर्थं  न  पारं  ये  अस्य  कामं  जनिधाः-इव  ग्मन्   
पति जसा (आपल्या पत्नीची) इच्छा पुरवितो, त्याप्रमाणें जे भक्तजन, हे स्वयंसिद्ध बलवान् देवा, तुझ्या अगणित स्तुतीशी संलग्न होतात; हे इंद्रा, जे तुजला हविर्भाग अर्पण करतात, अशा भक्तांचे उद्दिष्ट, सूर्य जसा (आकाशाची सीमा दाखवितो) त्याप्रमाणे तूं दृष्टिपथांमध्ये आण ५.  
 
मात्रे॒ नु ते॒ सुमि॑ते इन्द्र पू॒र्वी द्यौर्म॒ज्मना॑ पृथि॒वी काव्ये॑न  ।  
मात्रेइति  नु  ते  सुमितेइतिसु-मिते  इन्द्र  पूर्वी इति  द्यौः  मज्मना  पृथिवी  काव्येन   
इंद्रा, तुझ्या दीप्तिबलाने द्युलोक, आणि तुझ्या चातुर्याने पृथिवी असे उत्तमरीतीने बनलेले दोन उत्कृष्ट लोक तुझ्या महिम्याचे दर्शक झाले आहेत. तर आतां तूं जो श्रेष्ठ देव त्या तुझ्यासाठी भोजनांत रुचिकर मधुर हवि आणि प्राशनाकरितां घृतयुक्त सोमरस सिद्ध असोत ६.  
 
आ मध्वो॑ अस्मा असिच॒न्न् अम॑त्रं॒ इन्द्रा॑य पू॒र्णं स हि स॒त्यरा॑धाः  ।  
आ  मध्वः  अस्मै  असिचन्  अमत्रं  इन्द्राय  पूर्णं  सः  हि  सत्य-राधाः   
ऋत्विजांनी या इंद्राप्रीत्यर्थ मधुररसाचे पात्र परिपूर्ण भरले आहे; कारण भक्तांना खरी तृप्ति देणारा तोच. आणि त्याच मानवहितकारी शूराचे महात्म्य या भूलोकाच्या विस्तीर्ण प्रदेशावर त्याच्याच कर्तृत्वाने आणि पराक्रमांनी वृद्धिंगत झाले आहे ७.  
 
व्यान॒ळ् इन्द्रः॒ पृत॑नाः॒ स्वोजा॒ आस्मै॑ यतन्ते स॒ख्याय॑ पू॒र्वीः  ।  
वि  आनट्  इन्द्रः  पृतनाः  सु-ओजाः  आ  अस्मै  यतन्ते  सख्याय  पूर्वीः   
महान् ओजस्वी इंद्राने सर्व शत्रुसैन्यांना घेरून टाकले, म्हणून त्याचे प्रेम संपादण्यासाठीं अगणित भक्तजन प्रयत्न करीत असतात; तर हे देवा, आपल्या कल्याणकारी सदिच्छेने ज्या रथाला तूं प्रेरणा करितोस त्या शूर रथावर तूं संग्रामांमध्यें आज आरोहण कर ८. 
 ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३० (आपोनप्त्रीय जलसूक्त) ऋषी - कवष ऐलूष : देवता - अप् अथवा अपानपात् : छं - त्रिष्टुभ् 
प्र दे॑व॒त्रा ब्रह्म॑णे गा॒तुरे॑त्व॒पो अच्छा॒ मन॑सो॒ न प्रयु॑क्ति  ।  
प्र  देव-त्रा  ब्रह्मणे  गातुः  एतु  अपः  अच्च  मनसः  न  प्र-युक्ति   
देवलोकामध्यें, स्तवनाधिपतिच्या प्रीत्यर्थ हा शीघ्रगामी (रस) [त्याच्या स्वत:च्याच] मनाकडून प्रोत्साहन मिळाल्या प्रमाणे उदकांकडे त्वरित जाऊन मिसळो. हे ऋत्विजा, त्या जगत्मित्राचा, त्या सर्वावारक वरुणाचा हा महत्वाचा नैवेद्य आहे; तर त्या व्यापकवेगी देवाप्रीत्यर्थ एक मनोहर कवनाची रचना कर १.  
 
अध्व॑र्यवो ह॒विष्म॑न्तो॒ हि भू॒ताच्छा॒प इ॑तोश॒तीरु॑शन्तः  ।  
अध्वर्यवः  हविष्मन्तः  हि  भूत  अच्च  अपः  इत  उशतीः  उशन्तः   
अध्वर्यूंनो, तुम्ही आपल्या हातीं हविर्भाग घेऊन सज्ज व्हा; आणि देवोत्सुक असे तुम्हीं देवोत्सुक उदकांकडे गमन करा. तो आकाशस्थ आरक्तवर्ण पक्षी ज्यांच्याकडे खाली अवलोकन करीत आहे ते उदककल्लोळ तुम्हीं शुद्ध हस्ताने या सोमरसांत ओतून द्या २.  
 
अध्व॑र्यवोऽ॒प इ॑ता समु॒द्रं अ॒पां नपा॑तं ह॒विषा॑ यजध्वम्  ।  
अध्वर्यवः  अपः  इत  समुद्रं  अपां  नपातं  हविषा  यजध्वं   
अध्वर्यूंनो, तुम्ही उदकांकडे, समुद्राकडे गमन करा; आणि उदकांचा तो प्रभव (जो पर्जन्य) त्याला हवि अर्पण करून त्याचे यजन करा. तो अतिशय पवित्र असा उदक कल्लोळ तुम्हांला आज प्राप्त करून देवो; आणि त्याच्याप्रीत्यर्थ तुम्ही माधुर्यपूर्ण सोमरस पिळून सिद्ध करा ३.  
 
यो अ॑नि॒ध्मो दीद॑यद॒प्स्व् अ१न्तर्यं विप्रा॑स॒ ईळ॑ते अध्व॒रेषु॑  ।  
यः  अनिध्मः  दीदयत्  अप्-सु  अन्तः  यं  विप्रासः  ईळते  अध्वरेषु   
जो इन्धनावांचून उदकांच्या पोटांत प्रज्वलित होतो, ज्याचे स्तवन ज्ञानी स्तोते अध्वरयागांत करितात तो उदकांचा प्रभव (पर्जन्य) आम्हांला मधुररसप्रचुर असें उदक देवो, की ज्या उदकाच्या योगाने इंद्र हा आपला पराक्रम गाजविण्यासाठी प्रबल झाला ४.  
 
याभिः॒ सोमो॒ मोद॑ते॒ हर्ष॑ते च कल्या॒णीभि॑र्युव॒तिभि॒र्न मर्यः॑  ।  
याभिः  सोमः  मोदते  हर्षते  च  कल्याणीभिः  युवति-भिः  न  मर्यः   
सुंदर सुलक्षणी तरुणीच्या लावण्याने शूर पुरुष मोहित व्हावा त्याप्रमाने ज्याच्या योगाने सोम प्रमुदित होतो, उल्लसित होतो, अशा उदकांकडे हे अध्वर्यो तूं गमन कर; आणि तीं उदके तू पात्रांत ओतून देशील तेव्हां ती सुगंधित औषधींनी स्वच्छ कर ५.  
 
ए॒वेद्यूने॑ युव॒तयो॑ नमन्त॒ यदीं॑ उ॒शन्न् उ॑श॒तीरेत्यच्छ॑  ।  
एव  इत्  यूने  युवतयः  नमन्त  यत्  ईं  उशन्  उषतीः  एति  अच्च   
लावण्यवती युवति तरुणापुढे लाजून खाली मान घालतात, तथापि तोहि त्या उत्सुक युवतींकडे उत्सुकतेने धांवतो. त्याप्रमाने हे अध्वर्यु, कवींची प्रातिभा आणि आपोदेवी हे मनानें, एकमेकांना जाणतात, अंत:करणाने परस्परांना ओळखतात ६.  
 
यो वो॑ वृ॒ताभ्यो॒ अकृ॑णोदुलो॒कं यो वो॑ म॒ह्या अ॒भिश॑स्ते॒रमु॑ञ्चत्  ।  
यः  वः  वृताभ्यः  अकृणोत्  ओं इति  लोकं  यः  वः  मह्याः  अभि-शस्तेः  अमुचत्   
तुम्हांला प्रतिबन्ध झाला तेव्हां ज्याने हा भूलोक मोकळा केला; ज्याने भयंकर आपत्तितून तुम्हांला सडविले, त्या इंद्राप्रीत्यर्थ, हे आपोदेवींनी, तुम्ही आपला माधुर्यपूर्ण आणि त्या देवाला हृष्ट करणारा (उदक) कल्लोल उचंबळू द्या ७.  
 
प्रास्मै॑ हिनोत॒ मधु॑मन्तं ऊ॒र्मिं गर्भो॒ यो वः॑ सिन्धवो॒ मध्व॒ उत्सः॑  ।  
प्र  अस्मै  हिनोत  मधु-मन्तं  ऊर्मिं  गर्भः  यः  वः  सिन्धवः  मध्वः  उत्सः   
जो तुमच्या उदकांचा गाभाच आहे, जो मधुर रसचा निर्झरच आहे, हे महानद्यांनो, तो तुम्ही आपला माधुर्यपूर्ण कल्लोल देवाप्रीत्यर्थ, उचंबळून द्या. तो घृताप्रमाणे तकतकीत आणि अध्वरांमध्ये प्रशंसनीय आहे, तर हे धनसंपन्न आपोदेवींने, आमची हांक ऐका ८. 
 
तं सि॑न्धवो मत्स॒रं इ॑न्द्र॒पानं॑ ऊ॒र्मिं प्र हे॑त॒ य उ॒भे इय॑र्ति  ।  
तं  सिन्धवः  मत्सरं  इन्द्र-पानं  ऊर्मिं  प्र  हेत  यः  उभे इति  इयर्ति   
हे नद्यांनो, तुमचा जो उल्लासकारी आणि इंद्राला प्राशन करण्याला योग्य असा उदकप्रवाह (आहे, जो) प्रमोदाने ओथंबलेला, आसोशी उत्पन्न करणारा, मेघांत उत्पन्न होणारा तीन धाग्यांचा, सर्वगामी, अखंड निर्झर आहे, तो तुम्ही त्याच्याकडे वहात न्या. तो उदकतरंग उभय (लोकांतील) फल प्राप्त करून देतो ९.  
 
आ॒वर्वृ॑तती॒रध॒ नु द्वि॒धारा॑ गोषु॒युधो॒ न नि॑य॒वं चर॑न्तीः  ।  
आवर्वृततीः  अध  नु  द्वि-धाराः  गोषु-युधः  न  नि-यवं  चरन्तीः   
ह्या पहा उभय प्रवाही आपोदेवी; धेनूकरितां युद्ध करणार्या झुंझाराप्रमाणे परत फिरून खोल दरींत उडी टाकून वहात जात आहेत. ह्या आपोदेवी जगत्जननी आहेत, जगताच्या स्वामिनी आहेत. सोमरसाबरोबरच त्या वृद्धिंगत होतात आणि त्याच रसामध्यें वास करतात; तर हे ऋषे, अशा त्या आपोदेवींना तू वन्दन कर १०.  
 
हि॒नोता॑ नो अध्व॒रं दे॑वय॒ज्या हि॒नोत॒ ब्रह्म॑ स॒नये॒ धना॑नाम्  ।  
हिनोत  नः  अध्वरं  देव-यज्या  हिनोत  ब्रह्म  सनये  धनानां   
आपोदेवीनों, तुम्हीं आमचा अध्वरयाग देवाच्या सेवेकडे पोहोंचवून द्या. (नानाप्रकारच्या) धनांचा लाभ व्हावा म्हणून हें ब्रह्मसूक्तहि तिकडे पाठवून द्या. आमच्या सद्धर्माचरणाच्या प्रसंगी आपली कांस मोकळी करा. आणि हे आपोदेवींनो आमची विज्ञप्ति उदार अंत:करणानें ऐकून घ्या ११.  
 
आपो॑ रेवतीः॒ क्षय॑था॒ हि वस्वः॒ क्रतुं॑ च भ॒द्रं बि॑भृ॒थामृतं॑ च  ।  
आपः  रेवतीः  क्षयथ  हि  वस्वः  क्रतुं  च  भद्रं  बिभृथां  ऋतं  च   
आपोदेवीहो, सर्वधनसंपन्न अशा तुम्हीं दिव्य संपत्तीचेंहि निवासस्थान आहां; सत्कर्म, कल्याण आणि अमरत्व ही तुम्हीं (हातांत) धारण करितां; (अक्षय) संपत्ति आणि सुंदर अपत्यें यांच्या तुम्हीं स्वामिनी आहांत; तर (तुम्हांपैकी जी) सरस्वती नदी, ती भर तारुण्याचा जोम स्तोत्याला अर्पण करो १२.  
 
प्रति॒ यदापो॒ अदृ॑श्रं आय॒तीर्घृ॒तं पयां॑सि॒ बिभ्र॑ती॒र्मधू॑नि  ।  
प्रति  यत्  आपः  अदृश्रं  आयतीः  घृतं  पयांसि  बिभ्रतीः  मधूनि   
जेव्हां मधुर घृत आणि मधुर उदके घेऊन इकडे येणार्या आपोदेवींना मी अवलोकन केलें, तेव्हां अध्वर्यूंनी मनाने एकचित्त होऊन उत्तम रीतीने पिळलेला सोमरस इंद्राप्रीत्यर्थ आणलाच होता १३. 
 
एमा अ॑ग्मन् रे॒वती॑र्जी॒वध॑न्या॒ अध्व॑र्यवः सा॒दय॑ता सखायः  ।  
आ  इमाः  अग्मन्  रेवतीः  जीव-धन्याः  अध्वर्यवः  सादयत  सखायः   
ह्या पहा प्राणिमात्राला प्रसन्नता देणार्या सर्वधनसंपन्न आपोदेवी प्राप्त झाल्या. हे अध्वर्यूंनो, हे मित्रांनो, त्यांना आसन द्या. सोमार्पणोत्सुक ऋत्विजांनो, त्यांना कुशासनावर अधिष्ठित करा; कारण उदकांचा प्रभव जो (अग्नि) त्याच्याशी त्या एकचित्त झाल्या आहेत १४.  
 
आग्म॒न्न् आप॑ उश॒तीर्ब॒र्हिरेदं न्यध्व॒रे अ॑सदन् देव॒यन्तीः॑  ।  
आ  अग्मन्  आपः  उशतीः  बर्हिः  आ  इदं  नि  अध्वरे  असदन्  देव-यन्तीः   
भक्तोत्सुक आपोदेवी येथे प्राप्त झाल्या; देवाकडे सर्वांचे लक्ष्य लावणार्या आपोदेवी अध्वर यागांत कुशासनावर अधिष्ठित झाल्या. तर आतां अध्वर्यूंनो तुम्हीं इंद्राप्रीत्यर्थ सोमरस पिळून तो सिद्ध करा, म्हणजे देवाची सेवा तुम्हांला उत्तम रीतीनें साध्य झालीच असे समजा १५. 
 ॐ तत् सत्  |