|
ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त १०१ ते ११४ ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०१ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - अंधीगु श्यावाश्व आणि इतर : देवता - पवमान सोम : छंद - अनुष्टुभ्, गायत्री
पु॒रोजि॑ती वो॒ अन्ध॑सः सु॒ताय॑ मादयि॒त्नवे॑ ।
पुरः जिती वः अन्धसः सुताय मादयित्नवे
तुमच्या सोमपेयाला प्रथमविजय प्राप्त व्हावा म्हणून, त्या पिळलेल्या उल्लासकारी रसाला विजय प्राप्त व्हावा म्हणून, हे मित्रांनों, लांब जिभेचा जो श्वान असतो त्याला दूर पिटाळून द्या १.
यो धार॑या पाव॒कया॑ परिप्र॒स्यन्द॑ते सु॒तः ।
यः धारया पावकया परि प्रस्यन्दते सुतः
हा जो सोमरस आपल्या पावन धारेनें पात्रांत वाहतो, तो पराक्रमी अश्वाप्रमाणें फारच तेजस्वी दिसत आहे २.
तं दु॒रोषं॑ अ॒भी नरः॒ सोमं॑ वि॒श्वाच्या॑ धि॒या ।
तं दुरोषं अभि नरः सोमं विश्वाच्या धिया
शूर ऋत्विज् त्या दुर्दम्य रसाची योजना, आपल्या सर्वगामी ध्यानबुद्धीनें, ग्राव्यांच्या योगानें यज्ञकर्माकडे करितात ३.
सु॒तासो॒ मधु॑मत्तमाः॒ सोमा॒ इन्द्रा॑य म॒न्दिनः॑ ।
सुतासः मधुमत् तमाः सोमाः इन्द्राय मन्दिनः
अत्यंत मधुर, उल्लासकारी, आणि पवित्र असे सोमरस इंद्राप्रीत्यर्थ पात्रांत वहात रहिले आहेत, ते तुमचे हर्षकारी रस दिव्यविभूतिंकडे गमन करोत ४.
इन्दु॒रिन्द्रा॑य पवत॒ इति॑ दे॒वासो॑ अब्रुवन् ।
इन्दुः इन्द्राय पवते इति देवासः अब्रुवन्
हा सोमरस इंद्राप्रीत्यर्थ पात्रांत वहात आहे, असें दिव्य विबुधांनीं सांगितलें तेव्हां स्तुतिवाणींचा प्रभु आणि आपल्या ओजस्वितेनें विश्वाचा अधिपति जो इंद्र त्यानें यज्ञाची इच्छा प्रकट केली ५.
स॒हस्र॑धारः पवते समु॒द्रो वा॑चमीङ्ख॒यः ।
सहस्र धारः पवते समुद्रः वाचं ईङ्खयः
सहस्त्रावधि धारांचा, कल्लोळयुक्त समुद्रच, वाणीला चालना देणारा, अक्षयधनाचा स्वामी, आणि इंद्राचा आवडता असा सोम पावनप्रवाहानें वहात असतो ६.
अ॒यं पू॒षा र॒यिर्भगः॒ सोमः॑ पुना॒नो अ॑र्षति ।
अयं पूषा रयिः भगः सोमः पुनानः अर्षति
हा धनाधिपति पूषा, हा भक्तांचे भाग्य, हा आपल्या वैभवाने विश्वाचा धनी शोभणारा भक्तपावन सोम पात्रांत वहात आहे. त्याने द्युलोक आणि भूलोक या दोनोंनाही प्रकाशित केले. ७.
सं उ॑ प्रि॒या अ॑नूषत॒ गावो॒ मदा॑य॒ घृष्व॑यः ।
सं ओं इति प्रियाः अनूषत गावः मदाय घृष्वयः
सर्वांना प्रिय ज्या तेजस्वी वाणी त्यांनीं देवाला हर्ष व्हावा म्हणून त्याचे स्तवन केलें तेव्हां भक्तपावन सोमरसबिन्दूनीं यज्ञाला मार्ग करून दिला ८.
य ओजि॑ष्ठ॒स्तं आ भ॑र॒ पव॑मान श्र॒वाय्य॑म् ।
यः ओजिष्ठः तं आ भर पवमान श्रवाय्यं
जें अत्यंत तेजस्वी आहे त्या अतिविख्यात धनालाहे पावना, तूं आमच्याकडे आण. जे पांचहि समाजांना व्यापून राहतें ते अक्षयधन आम्हीं त्या सोमाच्या सहाय्यानें प्राप्त करून घेऊं ९.
सोमाः॑ पवन्त॒ इन्द॑वोऽ॒स्मभ्यं॑ गातु॒वित्त॑माः ।
सोमाः पवन्ते इन्दवः अस्मभ्यं गातुवित् तमाः
आल्हादी सोमरसबिंदु आमच्यासाठीं शुद्धप्रवाहानें वहात आहेत; ते सन्मार्ग उत्तम रीतीनें जाणतात; ते मित्राप्रमाणें हितकर, आणि पिळले गेले तरी निष्कलंक, ध्यानसुलभ, आणि दिव्यप्रकाश प्राप्त करून देणारे आहेत १०.
सु॒ष्वा॒णासो॒ व्य् अद्रि॑भि॒श्चिता॑ना॒ गोरधि॑ त्व॒चि ।
सुस्वाणासः वि अद्रि भिः चितानाः गोः अधि त्वचि
ग्राव्यांच्या योगानें ते अनेक प्रकारचे मधुर नाद उत्पन्न करितात; गव्याच्या चामड्यावर ठेवले म्हणजे आपल्या चकाकीनें ते फारच स्पष्ट दिसतात; अशा त्या दिव्यनिधिप्रापक सोमरसांनीं आमच्या भोंवतीं चोहोंकडे उत्साहपूर्ण असे ध्वनि उत्पन्न केले ११.
ए॒ते पू॒ता वि॑प॒श्चितः॒ सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ।
एते पूताः विपः चितः सोमासः दधि आशिरः
हे पवित्र, महा प्राज्ञ, दधिमिश्रित सोम सूर्याप्रमाणें प्रेक्षणीय आहेत. आणि ते जरी चंचल असले तरी वसतीवरी उदकामध्यें अगदीं स्थिर राहतात १२.
प्र सु॑न्वा॒नस्यान्ध॑सो॒ मर्तो॒ न वृ॑त॒ तद्वचः॑ ।
प्र सुन्वानस्य अन्धसः मर्तः न वृत तत् वचः
पिळून सिद्ध होत असलेल्या सोमपेयाचे ते शब्द मूर्ख मानवाला कळत नाहींत. म्हणून पूर्वी भृगूंनीं जसे "मख" या अधार्मिकला ठार केलें त्याप्रमाणें तुम्हींही दानधर्म न करणार्या कुत्र्याला ठार मारून टाका १३.
आ जा॒मिरत्के॑ अव्यत भु॒जे न पु॒त्र ओ॒ण्योः ।
आ जामिः अत्के अव्यत भुजे न पुत्रः ओण्योः
खांद्यावर किंवा कडेवर पुत्राला घ्यावें त्याप्रमाणें आमचा आप्त हा सोम पवित्ररूप वस्त्रावर पसरला आहे; आणि युवतींच्या प्रियकराप्रमाणें, किंवा त्यांच्या पतिप्रमाणें आपल्या सदनांत जाऊन राहण्यासाठीं पुढें सरसावला आहे १४.
स वी॒रो द॑क्ष॒साध॑नो॒ वि यस्त॒स्तम्भ॒ रोद॑सी ।
सः वीरः दक्ष साधनः वि यः तस्तम्भ रोदसी इति
ज्यानें उभय लोकांना आपआपल्या ठिकाणीं सांवरून धरलें, तो हा वीर सोम चातुर्यबलाचें साधनच आहे; जसा ज्ञानी कवि आपल्या स्थानीं बसण्याकरितां जातो, तसा हा हरिद्वर्ण सोम पवित्रावर सर्वत्र पसरतो १५.
अव्यो॒ वारे॑भिः पवते॒ सोमो॒ गव्ये॒ अधि॑ त्व॒चि ।
अव्यः वारेभिः पवते सोमः गव्ये अधि त्वचि
तो ऊर्णावर्ण लोंकरीप्रमाणें दिसणारा सोम ऊर्णापवित्रांतून गव्याच्या चामड्यावर शुद्धप्रवाहानें वहातो; तो वीर्यशाली हरिद्वर्ण सोम गर्जना करीत इंद्राच्या पवित्र आणि अलंकृत स्थानाकडे गमन करितो १६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०२ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - त्रित आप्त्य : देवता - पवमान सोम : छंद - उष्णिह
क्रा॒णा शिशु॑र्म॒हीनां॑ हि॒न्वन्न् ऋ॒तस्य॒ दीधि॑तिम् ।
क्राणा शिशुः महीनां हिन्वन् ऋतस्य दीधितिं
श्रेष्ठ मातांचा बालक जो सोम तो आपल्या कृतीनें सत्यधर्माची प्रभा चोहोंकडे विखरून सकल प्रिय वस्तूंना व्यापून राहिला, अशी गोष्ट दोन्ही वेळां घडली १.
उप॑ त्रि॒तस्य॑ पा॒ष्यो३रभ॑क्त॒ यद्गुहा॑ प॒दम् ।
उप त्रितस्य पाष्योः अभक्त यत् गुहा पदं
त्रिताच्या ग्राव्यांचे स्थान, अर्थात यज्ञाचें गुप्तस्थान त्यानें आपल्या सात किरणांनीं व्याप्त केलें; हे हवें होतें तेंच झाले २.
त्रीणि॑ त्रि॒तस्य॒ धार॑या पृ॒ष्ठेष्व् एर॑या र॒यिम् ।
त्रीणि त्रितस्य धारया पृष्ठेषु आ ईरय रयिं
आपल्या धारेनें त्रिताच्या पृष्ठभागावर तीन ठिकाणीं अक्षय धन विखरून दे. ही त्याची योजना घडून येते म्हणूनच सोम हा सुकृती होय ३.
ज॒ज्ञा॒नं स॒प्त मा॒तरो॑ वे॒धां अ॑शासत श्रि॒ये ।
जजानं सप्त मातरः वेधां अशासत श्रिये
स्तवननिर्माता सोम उत्पन्न होतांचा सात मातांनीं यज्ञ सुशोभित करण्याची त्याला आज्ञा केली, म्हणूनच हा अक्षयधनांचा अढळ उद्गम स्पष्टपणें दृग्गोचर झाला ४.
अ॒स्य व्र॒ते स॒जोष॑सो॒ विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒द्रुहः॑ ।
अस्य व्रते स जोषसः विश्वे देवासः अद्रुहः
ह्याच्या आज्ञेंत, एकविचारानें राहणारे आणि द्वेषरहित असे यच्चावत्दिव्यविबुध असतात; ते जेव्हां संतुष्ट होतात तेव्हांच ते स्पृहणीयचारित्र्यविबुध आपलें दर्शन देतात ५.
यं ई॒ गर्भं॑ ऋता॒वृधो॑ दृ॒शे चारुं॒ अजी॑जनन् ।
यं ईं इति गर्भं ऋत वृधः दृशे चारुं अजीजनन्
सनातनधर्माची अभिवृद्धि करणार्या दिव्यविभूतिंनीं त्या मनोहर बालकाला, त्या कवील, त्या ज्ञानी, यज्ञामध्यें श्रेष्ठ, आणि सर्वांना स्पृहणीय वाटणार्या सोमाला जगानें अवलोकन करावें म्हणून उत्पन्न केलें ६.
स॒मी॒ची॒ने अ॒भि त्मना॑ य॒ह्वी ऋ॒तस्य॑ मा॒तरा॑ ।
समीचीने इतिसं ईचीने अभि त्मना यह्वी ऋतस्य मातरा
एकत्र वास करणार्या, महानुभाव, आणि सद्धर्माच्या जननीं ज्या द्यावापृथिवी त्या यज्ञकर्माला आरंभ करून देऊन त्याला होऊन वारंवार भेटतात ७.
क्रत्वा॑ शु॒क्रेभि॑र॒क्षभि॑रृ॒णोरप॑ व्र॒जं दि॒वः ।
क्रत्वा शुक्रेभिः अक्ष भिः ऋणोः अप व्रजं दिवः
हे सोमा, तूं आपल्या कर्तृत्वानें, आपल्या देदीप्यमान नेत्रांनीं, अध्वरयागामध्यें सनातन सत्यमार्गाच्या किरणांचा रिघाव करून देऊन द्युलोकाच्या प्रकाशाचा समूह जगतावर लोटला आहेस ८.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०३ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - द्वित आप्त्य : देवता - पवमान सोम : छंद - उष्णिह
प्र पु॑ना॒नाय॑ वे॒धसे॒ सोमा॑य॒ वच॒ उद्य॑तम् ।
प्र पुनानाय वेधसे सोमाय वचः उत् यतं
भक्तपावन, स्तवननिर्माता जो सोम त्याच्याप्रीत्यर्थ औत्सुक्यपूर्ण कवन अर्पण कर. ऋण परत करावें त्याप्रमाणें भक्ति अर्पण कर. तो मननीय स्तवनांनीं प्रसन्न होतो १.
परि॒ वारा॑ण्य् अ॒व्यया॒ गोभि॑रञ्जा॒नो अ॑र्षति ।
परि वाराणि अव्यया गोभिः अजानः अर्षति
गोदुग्धाशीं मिश्र होऊन ऊर्णावस्त्राच्या गाळण्यांतून तो पात्रांत वहातो. तो हरिद्वर्ण सोमरस स्वच्छ होऊन आपलीं तिन्ही आसनें मांडून ठेवतो २.
परि॒ कोशं॑ मधु॒श्चुतं॑ अ॒व्यये॒ वारे॑ अर्षति ।
परि कोशं मधु श्चुतं अव्यये वारे अर्षति
मधुररसानें ओथंबलेला संचयच असा सोमरस लोंकरीच्या गाळण्यांतून एकसारखा पाझरत आहे, आणि इकडे ऋषींच्या सप्त वाणींनीं देवाचें स्तवन चाललें आहे ३.
परि॑ णे॒ता म॑ती॒नां वि॒श्वदे॑वो॒ अदा॑भ्यः ।
परि नेता मतीनां विश्व देवः अदाभ्यः
मननपूर्वक होणार्या स्तुतींचा प्रेरक आणि सर्वांचे आराध्य असा अप्रतिहत हरिद्वर्ण सोमानें स्वच्छ होऊन दोन्ही चमूपात्रांत प्रवेश केला ४.
परि॒ दैवी॒रनु॑ स्व॒धा इन्द्रे॑ण याहि स॒रथ॑म् ।
परि दैवीः अनु स्वधाः इन्द्रेण याहि स रथं
आपल्या दैवी स्वभावानुसार इंद्रासह एकाच रथांत आरूढ होऊन अमरविभूति जो तूं तो देवाचें स्तवन करीत वन्दिजनांसह सर्व ठिकाणीं गमन कर ५.
परि॒ सप्ति॒र्न वा॑ज॒युर्दे॒वो दे॒वेभ्यः॑ सु॒तः ।
परि सप्तिः न वाज युः देवः देवेभ्यः सुतः
सत्वसमरोत्सुक अश्वाप्रमाणें हा दिव्यविभूति सोम, हा दिव्यविभूतिसाठींच पिळलेला आणि पवित्रांतून स्वच्छ गाळलेला सोम, द्रोणपात्रांत तुडुंब भरून जाऊन इकडे तिकडे धांवत आहे ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०४ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - पर्वत आणि नारद काण्व : देवता - पवमान सोम : छंद - उष्णिह
सखा॑य॒ आ नि षी॑दत पुना॒नाय॒ प्र गा॑यत ।
सखायः आ नि सीदत पुनानाय प्र गायत
मित्रांनों आसनावर बसा; पवित्रांतून स्वच्छ होत असलेल्या सोमरसाची महती वर्णन करा; आणि आपल्या उत्कर्षासाठीं त्याला बालकाप्रमाणें यज्ञालंकारांनीं भूषित करा १.
सं ई॑ व॒त्सं न मा॒तृभिः॑ सृ॒जता॑ गय॒साध॑नम् ।
सं ईं इति वत्सं न मातृ भिः सृजत गय साधनं
ऐहिक कल्याणाचें साधन, असा देवसंरक्षित, उल्लासप्रद, आणि दोन्ही प्रकारचें उत्कटबल आंगीं आणणारा जो सोम त्याला, मातेकडे वत्स न्यावें त्याप्रमाणें आपोदेवीशी संयुक्त करा २.
पु॒नाता॑ दक्ष॒साध॑नं॒ यथा॒ शर्धा॑य वी॒तये॑ ।
पुनात दक्ष साधनं यथा शर्धाय वीतये
चातुर्यबलाचें साधन असा सोम गाळून स्वच्छ करा; जेणेंकरून तुमची धडाडी टिकून राहील, तुमची सेवा चालेल, आणि मित्राला, विश्वावरक वरुणाला अत्यंत संतोष होईल ३.
अ॒स्मभ्यं॑ त्वा वसु॒विदं॑ अ॒भि वाणी॑रनूषत ।
अस्मभ्यं त्वा वसु विदं अभि वाणीः अनूषत
आमच्यासाठीं उत्कृष्टसंपत्ति देणारा तूं, त्या तुझी स्तुति आम्हीं आमच्या वाणींनीं केली आहे; आणि आतां गोदुग्धानें तुझा तेजस्वी वर्ण आम्हीं आच्छादित करीत आहोंत ४.
स नो॑ मदानां पत॒ इन्दो॑ दे॒वप्स॑रा असि ।
सः नः मदानां पते इन्दो इति देव प्सराः असि
हे आमच्या आनंदनिधाना, हे आल्हादप्रदा सोमा, तूं देवाचेंच स्वरूप आहेस, तर मित्र जसा मित्राला, त्याप्रमाणें आम्हांला उत्तमरीतीनें सन्मार्गबोधक हो ५.
सने॑मि कृ॒ध्य् अ१ स्मदा र॒क्षसं॒ कं चि॑द॒त्रिण॑म् ।
सनेमि कृधि अस्मत् आ रक्षसं कं चित् अत्रिणं
जो कोणी घातकी राक्षस असेल, जो कोणी गरीब प्राण्यांना खाऊन टाकीत असेल त्याला आम्हांपासून पार निपटून टाक; तसेंच, जो कोणी देवपराङ्मुख आणि कपटी असेल त्याचा आमच्या हातून नि:पात कर आणि आमच्या पातकांशीं युद्ध करून तीं नाहींशी कर ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०५ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - पर्वत आणि नारद काण्व : देवता - पवमान सोम : छंद - उष्णिह
तं वः॑ सखायो॒ मदा॑य पुना॒नं अ॒भि गा॑यत ।
तं वः सखायः मदाय पुनानं अभि गायत
मित्रानों, तुम्हांला आल्हाद व्हावा म्हणून त्या तुमच्या भक्तपावन सोमाचें गुणगायन करा. आणि बालकाला प्रसन्न ठेवावें त्याप्रमाणें यज्ञाच्या योगानें आणि उत्तेजक कवनांनीं त्याला गोडी आणा १.
सं व॒त्स इ॑व मा॒तृभि॒रिन्दु॑र्हिन्वा॒नो अ॑ज्यते ।
सं वत्सः इव मातृ भिः इन्दुः हिन्वानः अज्यते
सोमरस ढवळला जात असतां वत्साप्रमाणें तो उदकरूप मातांशीं संयुक्त होतो; आणि देवप्रिय, हर्षकर, आणि मन:पूर्वक केलेल्या स्तुतींनीं अलंकृत होतो २.
अ॒यं दक्षा॑य॒ साध॑नोऽ॒यं शर्धा॑य वी॒तये॑ ।
अयं दक्षाय साधनः अयं शर्धाय वीतये
हा चातुर्यबलाचें साधन होय; शत्रूवर धौशा उडवून देण्यासाठीं, तसेच देवसेवेसाठीं आणि दिव्यविबुधांसाठीं हा अत्यंत मधुररस पिळला आहे ३.
गोम॑न् न इन्दो॒ अश्व॑वत् सु॒तः सु॑दक्ष धन्व ।
गो मत् नः इन्दो इति अश्व वत् सुतः सु दक्ष धन्व
हे आल्हादप्रद रसा, हे चातुर्याबलाढ्या, तूं पिळून सिद्ध झालेला आहेस तर गोसंपन्न आणि अश्वसंपन्न असें ऐश्वर्य आम्हांकडे धो धो वहात आण. तुझ्या तेजस्वी कान्तिला मीं दुग्धाशीं मिश्र करितों ४.
स नो॑ हरीणां पत॒ इन्दो॑ दे॒वप्स॑रस्तमः ।
सः नः हरीणां पते इन्दो इति देवप्सरः तमः
हे हरिद्वर्णे वनस्पते, हे आल्हादप्रदा सरा, तूं देवाचें अत्यंत मनोहररूप आहेस. तर मित्र जसा मित्राला त्याप्रमाणें मानवहितकारी असा तूं आमच्या वैभवाला कारण हो ५.
सने॑मि॒ त्वं अ॒स्मदाँ अदे॑वं॒ कं चि॑द॒त्रिण॑म् ।
सनेमि त्वं अस्मत् आ अदेवं कं चित् अत्रिणं
जो कोणी घातकी राक्षस असेल, जो कोणी गरीब प्राण्यांना खाऊन टाकीत असेल त्याला आमच्यापासून पार निसटून टाक, तसेंच हे आल्हादरूपा, लोकांना बाधा करणार्या दुष्टांना तूं चिरडून टाक, आणि दुटप्पी लबाडांचा धुव्वा उडवून दे ६.
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०६ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - अग्नि चाक्षुष, चक्षु मानव, मनु आप्सव : देवता - पवमान सोम : छंद - उष्णिह
इन्द्रं॒ अच्छ॑ सु॒ता इ॒मे वृष॑णं यन्तु॒ हर॑यः ।
इन्द्रं अच्च सुताः इमे वृषणं यन्तु हरयः
हे पिळलेले हरिद्वर्ण सोमबिंदु वीर्यशाली इंद्रापर्यंत जाऊन पोहोंचोत. हे झटपट निघालेले रस दिव्यप्रकाश प्राप्त करून देतात हे सर्वश्रुतच आहे. १
अ॒यं भरा॑य सान॒सिरिन्द्रा॑य पवते सु॒तः ।
अयं भराय सानसिः इन्द्राय पवते सुतः
हा पिळलेला भक्तवरद असा सोमरस इंद्राच्या तृप्तीसाठी गाळलेला, स्वच्छप्रवाहाने वहात आहे. हा रस त्या सर्वविजयी इंद्रालाच प्रोत्साहन देतो हेंही आम्हाला माहीत आहे. २
अ॒स्येदिन्द्रो॒ मदे॒ष्व् आ ग्रा॒भं गृ॑भ्णीत सान॒सिम् ।
अस्य इत् इन्द्रः मदेषु आ ग्राभं गृभ्णीत सानसिं
याच्याच प्राशनाने झालेल्या हर्षभरांत इंद्रानें आपले विजयी अस्त्र हातीं घेतले, आपले वीर्योत्फुल्ल वज्र त्या उदकजेत्या इंद्रानें हातांत घेतले. ३.
प्र ध॑न्वा सोम॒ जागृ॑वि॒रिन्द्रा॑येन्दो॒ परि॑ स्रव ।
प्र धन्व सोम जागृविः इन्द्राय इन्दो इति परि स्रव
सोमा, तूं जागरूक राहून धो धो वाहात रहा. हे आल्हादप्रदा रसा, तूं इंद्राप्रीत्यर्थ पाझरत रहा. आणि देदीप्यमान दिव्यलोकाप्रद असा जोम आम्हांमध्यें उत्पन्न कर. ४
इन्द्रा॑य॒ वृष॑णं॒ मदं॒ पव॑स्व वि॒श्वद॑र्शतः ।
इन्द्राय वृषणं मदं पवस्व विश्व दर्शतः
इंद्राप्रीत्यर्थ तूं आपला वीर्योत्फुल्ल आणि आल्हादप्रद प्रवाह सोड. तूं सर्वांना प्रेक्षणीय आहेस, हजारो मार्गांनी जाणारा सन्मार्गदर्शक आणि अत्यंत चतुर आहेस. ५
अ॒स्मभ्यं॑ गातु॒वित्त॑मो दे॒वेभ्यो॒ मधु॑मत्तमः ।
अस्मभ्यं गातुवित् तमः देवेभ्यः मधुमत् तमः
तूं आम्हाला उत्तम रीतीनें ध्येयदर्शक, आणि दिव्य विभूतींना अत्यंत मधुर आहेस. तर गर्जना करीत तूं आपल्या सहस्रावधि मार्गांनी गमन कर. ६
पव॑स्व दे॒ववी॑तय॒ इन्दो॒ धारा॑भि॒रोज॑सा ।
पवस्व देव वीतये इन्दो इति धाराभिः ओजसा
आल्हाददायक रसा, देवसेवेसाठीं तूं आपल्या धारांनी, आणि ओजस्वितेनें स्वच्छ होऊन वहा. आणि मधुर होऊन हे सोमा, आपल्या कलशामध्ये स्थिर रहा. ७
तव॑ द्र॒प्सा उ॑द॒प्रुत॒ इन्द्रं॒ मदा॑य वावृधुः ।
तव द्रप्साः उद प्रुतः इन्द्रं मदाय ववृधुः
तुझे रसबिंदु उदकांशी मिश्र झालेले, इंद्राच्या हर्षासाठी वृद्धिंगत झाले; अमरत्व लाभावे म्हणून दिव्य विबुधांनी मोठ्या प्रेमानें तुझें प्राशन केले. ८
आ नः॑ सुतास इन्दवः पुना॒ना धा॑वता र॒यिम् ।
आ नः सुतासः इन्दवः पुनानाः धावत रयिं
पिळलेल्या सोमरसांनो, पावन असे जे तुम्ही, त्या अविनाशी ऐश्वर्याला सत्वर चालवीत आमच्याकडे आणा. तुम्ही द्युलोकापासून पर्जन्य पाडणारे, उदकांचा प्रवाह सोडणारे आणि दिव्यप्रकाशाचे दाते आहांत. ९
सोमः॑ पुना॒न ऊ॒र्मिणाव्यो॒ वारं॒ वि धा॑वति ।
सोमः पुनानः ऊर्मिणा अव्यः वारं वि धावति
गाळला जातांना हा सोमरस आपल्या लहरींनी लोकरीच्या पवित्रांतून जिकडे तिकडे धावतो; आणि स्वच्छ होऊन भक्तांनी स्तवन करण्याच्या अगोदरच गर्जना करीत वाहतो. १०
धी॒भिर्हि॑न्वन्ति वा॒जिनं॒ वने॒ क्रीळ॑न्तं॒ अत्य॑विम् ।
धीभिः हिन्वन्ति वाजिनं वने क्रीळ्अन्तं अति अविं
वनांत क्रीडा करणार्या सोमरूपी अश्वाला प्रतिभायुक्त कवनांनी ऋत्विज, हे लोकरीच्या पवित्रांतून हलवून गाळतात. पण त्या पूर्वींच त्यांच्या मनःपूर्वक तीन पृष्ठांचा जो सोमपल्लव त्याचे मोठ्या घोषानें वर्णन केले. ११
अस॑र्जि क॒लशा॑ँ अ॒भि मी॒ळ्हे सप्ति॒र्न वा॑ज॒युः ।
असर्जि कलशान् अभि मीळ्हे सप्तिः न वाज युः
सोमाला द्रोणकलशांकडे मोठ्या वेगानें सोडला, जणों, युद्धाच्या गर्दींत घुसणारा विजयोत्सुक अश्ववीरच. याप्रमाणे तो भक्तपावन सोमरस स्तुतिवाणीला स्फूर्ति देऊन पात्रांत वाहूं लागला. १२
पव॑ते हर्य॒तो हरि॒रति॒ ह्वरां॑सि॒ रंह्या॑ ।
पवते हर्यतः हरिः अति ह्वरांसि रंह्या
भक्तप्रिय हरिद्वर्ण सोम मोठ्या सरोबरीनें दुष्टांच्या कपटजालाचीं पटले फोडून निघाला, आणि वीराला योग्य असें यश भक्तजनांकडे वाहून आणून सर्वत्र पसरला. १३
अ॒या प॑वस्व देव॒युर्मधो॒र्धारा॑ असृक्षत ।
अया पवस्व देव युः मधोः धाराः असृक्षत
देवोत्सुक असा तूं या प्रमाणेंच वहात रहा. ह्या तुझ्या मधुर धारा पात्रांत पाझरल्या आहेत; आणि तूंही मोठ्याने ललकार्या देत पवित्राला चोहोंकडून वेढून टाकीत आहेस. १४
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०७ (सप्तर्षिविरचित पवमान सोमसूक्त)
ऋषी - भरद्वाज, बार्हस्पत्य इ. सप्तर्षि : देवता - पवमान सोम :
परी॒तो षि॑ञ्चता सु॒तं सोमो॒ य उ॑त्त॒मं ह॒विः ।
परि इतः सिचत सुतं सोमः यः उत् तमं हविः
आतांच पिळलेला सोमरस वसतीवरील उदकांत ओतून द्या. हा दिव्यविभुतींचे उत्कृष्ट हवि होय. हा जो मानव-हितकर सोम, त्याला ग्राव्यांनी चुरून उदकांत कोळून मिसळले आहे. १
नू॒नं पु॑ना॒नो॑ऽविभिः॒ परि॑ स्र॒वाद॑ब्धः सुर॒भिन्त॑रः ।
नूनं पुनानः अवि भिः परि स्रव अदब्धः सुरभिं तरः
तर हे सोमा, तूं आता लोंकरीच्या गाळण्यांतून स्वच्छ होऊन पाझरत रहा; अप्रतिहत आणि अत्यंत सुगंधित होऊन तूं झरझर रसप्रवाह सोड. तुजला पिळून उदकांत मिसळल्यावर गोदुग्धाशीं चांगला मिश्र करून आणि उकळून आम्हीं त्या पेयानें उल्लसित होऊं. २
परि॑ सुवा॒नश्चक्ष॑से देव॒माद॑नः॒ क्रतु॒रिन्दु॑र्विचक्ष॒णः ॥ ३ ॥
परि सुवानः चक्षसे देव मादनः क्रतुः इन्दुः वि चक्षणः ॥ ३ ॥
सर्वांनी तुजला पहात रहावें म्हणून तूं उत्तम रीतीनें पिळलेला आहेस. तूं देवाला हृष्टचित्त करणारा, कर्तृत्वशाली आल्हादरूप आणि सर्वांना सूक्ष्मदृष्टीनें पाहणारा आहेस. ३
पु॒ना॒नः सो॑म॒ धार॑या॒पो वसा॑नो अर्षसि ।
पुनानः सोम धारया अपः वसानः अर्षसि
हे सोमा, तूं धाराप्रवाहानें स्वच्छ झालास म्हणजे उदकरूप वस्त्र परिधान करून वाहतोस. तूं रत्ननिधि आहेस, तूं सनातनधर्माच्या आद्यस्थानी वास करतोस. दिव्य सोमा, तूं सुवर्णाप्रमाणें तेजस्वी रसाचा निर्झर आहेस. ४
दु॒हा॒न ऊध॑र्दि॒व्यं मधु॑ प्रि॒यं प्र॒त्नं स॒धस्थं॒ आस॑दत् ।
दुहानः ऊधः दिव्यं मधु प्रियं प्रत्नं सध स्थं आ असदत्
द्युलोकाच्या दिव्यमधुर कासेचें दोहन करून हा रस आपल्या आवडत्या पुरातन लोकांत राहिला. हा सूक्ष्मदृष्टि सोमरस शूर ऋत्विजांनी हलवून स्वच्छ केला म्हणजे सर्वांना हवे हवेसे जे आधारपात्र त्याच्याकडे तो सत्ववीर सोमरस वहात जातो. ५
पु॒ना॒नः सो॑म॒ जागृ॑वि॒रव्यो॒ वारे॒ परि॑ प्रि॒यः ।
पुनानः सोम जागृविः अव्यः वारे परि प्रियः
हे सोमा, जागरूक असा तूं ऊर्णावस्त्रांतून स्वच्छ झालास म्हणजे सर्वांना प्रिय होतोस. ज्ञानी असा तूं अंगिरा ऋषीमध्यें श्रेष्ठ आहेस, तर आमचाही यज्ञ तुझ्या माधुर्यानें पुनीत कर. ६
सोमो॑ मी॒ढ्वान् प॑वते गातु॒वित्त॑म॒ ऋषि॒र्विप्रो॑ विचक्ष॒णः ।
सोमः मीढवान् पवते गातुवित् तमः ऋषिः विप्रः वि चक्षणः
सोम हा कामनावर्षक आणि उत्तम प्रकारे सन्मार्ग जाणणारा आहे. तो ऋषि आहे, तो ज्ञानी आणि अतिशय सूक्ष्मदृष्टी आहे. हे सोमा, काव्यप्रेरक आणि देवसेवेंत अत्यंत तत्पर अशा त्वां सूर्याला वर द्युलोकीं चढवून दिलेंस. ७
सोम॑ उ षुवा॒णः सो॒तृभि॒रधि॒ ष्णुभि॒रवी॑नाम् ।
सोमः ओं इति सुवानः सोतृ भिः अधि स्नु भिः अवीनां
रस पिळणार्या हातांनी सोम हा लोंकरीच्या पवित्रावर उंच स्थानी ठेवून त्याचा रस पिळला जाऊं लागला, म्हणजे वडवेप्रमाणें भरवेगानें वाहणार्या हरिद्वर्ण धारेनें वाहतो, उल्लासकारी धारेनें वाहतो. ८
अ॒नू॒पे गोमा॒न् गोभि॑रक्षाः॒ सोमो॑ दु॒ग्धाभि॑रक्षाः ।
अनूपे गो मान् गोभिः अक्षारिति सोमः दुग्धाभिः अक्षारिति
हा धेनुयुक्त सोम गोदुग्धाशी युक्त होऊन उतरत्या जागेकडे धाराप्रवाहानें वाहूं लागला, दुग्धासह खालीं वाहूं लागला. नंतर समुद्राकडे जावे त्याप्रमाणे ऋत्विज हे रससंचय करण्याच्या पात्राकडे गेले. आणि तो हर्षवर्धन रस, देवाला हर्ष व्हावा म्हणून त्यांनी जोरानें दाबून पिळला. ९
आ सो॑म सुवा॒नो अद्रि॑भिस्ति॒रो वारा॑ण्य् अ॒व्यया॑ ।
आ सोम सुवानः अद्रि भिः तिरः वाराणि अव्यया
सोमा, ग्राव्यांच्या योगानें पिळला जाताना तूं लोकरीच्या पवित्रांतून सारखा वहात राहतोस. लोक जसे ग्रामांत प्रवेश करतात त्याप्रमाणे तूं हरिद्वर्ण रस दोन्ही चमूपात्रांत शिरलास आणि वनांतच आपलें स्थान केलेंस. १०
स मा॑मृजे ति॒रो अण्वा॑नि मे॒ष्यो मी॒ळ्हे सप्ति॒र्न वा॑ज॒युः ।
सः ममृजे तिरः अण्वानि मेष्यः मीळ्हे सप्तिः न वाज युः
झुंजामध्यें युद्धोत्सुक अश्व जसा फळी फोडून जातो, त्याप्रमाणे मेंढ्याच्या लोंकरीच्या पवित्रांतून सोम हा स्वच्छ होऊन पाझरतो. म्हणून हा शुद्ध होणारा आणि शुद्ध करणारा जो सोम त्याचें ज्ञात्यांनी, तसेंच ऋक्प्रवीण कवींनीही गौरवच करावे. ११
प्र सो॑म दे॒ववी॑तये॒ सिन्धु॒र्न पि॑प्ये॒ अर्ण॑सा ।
प्र सोम देव वीतये सिन्धुः न पिप्ये अर्णसा
देवानें स्वीकार करावा म्हणून समुद्र जसा लाटांनी उसळतो, तसा तूं आपल्या कल्लोळांनी फुगून उचंबळतोस. तूं आपल्या पल्लवाच्या दुधासारख्या रसामुळें मादकारक नसतोस, पण मधुररसानें ओथंबलेला सांठा तूं जवळ आणून भक्ताला जागरूक ठेवतोस. १२
आ ह॑र्य॒तो अर्जु॑ने॒ अत्के॑ अव्यत प्रि॒यः सू॒नुर्न मर्ज्यः॑ ।
आ हर्यतः अर्जुने अत्के अव्यत प्रियः सूनुः न मर्ज्यः
देवप्रिय सोमरस, ज्याप्रमाणे प्रिय पुत्र भूषित करावा त्याप्रमाणें शुभ्र वस्त्रांत आवृत्त असतो, आणि रथाला गति द्यावी त्याप्रमाणें कार्यकुशल ऋत्विज त्याला आपल्या हातांतून नदीच्या उदकांत लोटतात. १३
अ॒भि सोमा॑स आ॒यवः॒ पव॑न्ते॒ मद्यं॒ मद॑म् ।
अभि सोमासः आयवः पवन्ते मद्यं मदं
सोमरस हा तल्लिनता उत्पन्न करून हर्षोत्सुकता आणणारा आहे. त्याला भक्तगण स्वच्छ करतात, म्हणूनच समुद्राच्या स्थानांत ज्ञानी जन हृष्ट होऊन त्यांना दिव्यलोकाचा लाभ होतो. १४
तर॑त् समु॒द्रं पव॑मान ऊ॒र्मिणा॒ राजा॑ दे॒व ऋ॒तं बृ॒हत् ।
तरत् समुद्रं पवमानः ऊर्मिणा राजा देवः ऋतं बृहत्
शुद्ध होत चाललेल्या सोमरसानें आपल्या लहरींनी समुद्रावरही ताण केली. त्या राजानें - त्या दिव्य सोमानें - श्रेष्ठ अशा सद्धर्माचा प्रवाह सोडला. त्याला हलवून दिला तेव्हां त्यानें मित्राच्या, वरुणाच्या धर्मनियमानुसार श्रेष्ठ सद्धर्माचा प्रवाह सोडला. १५
नृभि॑र्येमा॒नो ह॑र्य॒तो वि॑चक्ष॒णो राजा॑ दे॒वः स॑मु॒द्रियः॑ ॥ १६ ॥
नृ भिः येमानः हर्यतः वि चक्षणः राजा देवः समुद्रियः ॥ १६ ॥
सर्वप्रिय, सूक्ष्मदृष्टि आणि समुद्रांतून गमन करणारा राजा - सोमदेव हा सत्कार्यनिरत भक्तांनी आकळिला आहे. १६
इन्द्रा॑य पवते॒ मदः॒ सोमो॑ म॒रुत्व॑ते सु॒तः ।
इन्द्राय पवते मदः सोमः मरुत्वते सुतः
हर्षवर्धक सोमरस पिळला जातांना मरुत्प्रभु जो इंद्र त्याच्या प्रीत्यर्थ स्वच्छ प्रवाहानें वाहतो. तो सहस्रावधि धारांनी पवित्रांतून वाहतो. भक्तजन त्यालाच उदकानें स्वच्छ करतात. १७
पु॒ना॒नश्च॒मू ज॒नय॑न् म॒तिं क॒विः सोमो॑ दे॒वेषु॑ रण्यति ।
पुनानः चमू इति जनयन् मतिं कविः सोमः देवेषु रण्यति
चमूपात्रांत स्वच्छ होणारा, मननीय कवनांची स्फूर्ती देणारा, असा कवि सोम तो दिव्यविभूतिमध्यें रममाण होतो आणि गोदुग्धाचें वस्त्र परिधान करून उत्कृष्ट दिसूं लागतो; पण वनांत असतांना मात्र आच्छादित असतो. १८
तवा॒हं सो॑म रारण स॒ख्य इ॑न्दो दि॒वे-दि॑वे ।
तव अहं सोम ररण सख्ये इन्दो इति दिवे दिवे
आल्हादप्रदा सोमा, तुझ्या मैत्रींत प्रत्यही मी आनंद मानतो, हरिद्वर्ण सोमा, सहस्रावधि अडचणी माझ्या भोवतीं घिरट्या घालीत आहेत, तर माझें रक्षण कर आणि त्या अडचणींचा कोट फोडून पार जा. १९
उ॒ताहं नक्तं॑ उ॒त सो॑म ते॒ दिवा॑ स॒ख्याय॑ बभ्र॒ ऊध॑नि ।
उत अहं नक्तं उत सोम ते दिवा सख्याय बभ्रो इति ऊधनि
आणखी असं की, रात्री काय आणि दिवसा काय, हे हरिद्वर्ण सोमा, मी मित्रत्वासाठी नेहमीच तुझ्या वक्षःस्थलाजवळच बसलो आहे. सूर्य हा उष्णतेने तळपणारा आहे, दूर आहे. तरीही पक्षी उडतातच. तसे आम्हीही उद्योग करीत राहूं असें कर. २०
मृ॒ज्यमा॑नः सुहस्त्य समु॒द्रे वाचं॑ इन्वसि ।
मृज्यमानः सु हस्त्य समुद्रे वाचं इन्वसि
हे सुपल्लवा सोमा, समुद्रांत धुतला जात असतां तूं काव्यमय वाणीला प्रेरणा करतोस. आणि हे पावना, सुवर्णालंकार युक्त आणि सर्वांना स्पृहणीय अशा विपुल ऐश्वर्याकडे तूं सर्व दिशांनी वहात जातोस. २१
मृ॒जा॒नो वारे॒ पव॑मानो अ॒व्यये॒ वृषाव॑ चक्रदो॒ वने॑ ।
मृजानः वारे पवमानः अव्यये वृषा अव चक्रदः वने
धुतला जात असतां, लोकरीच्या पवित्रांतून स्वच्छ होत असतां, वीर्योत्कृष्ट असा तूं वनामध्यें वारंवार मोठ्यानें गर्जना करतोस. आणि हे पावना सोमा, गोदुग्धाशीं युक्त होऊन दिव्यविभूतिंच्या पवित्र स्थानाकडे वहात जातोस. २२
पव॑स्व॒ वाज॑सातयेऽ॒भि विश्वा॑नि॒ काव्या॑ ।
पवस्व वाज सातये अभि विश्वानि काव्या
आम्हांला सत्वप्राप्ति व्हावी म्हणून आणि सर्व प्रकारची कवनें स्फुरावीं म्हणून शुद्ध प्रवाहानें वहा. सोमा, दिव्यविभूतिंना प्रथम हर्षनिर्भर करणारा तूं समुद्राचें नाना प्रकारानें धारण केलेंस. २३
स तू प॑वस्व॒ परि॒ पार्थि॑वं॒ रजो॑ दि॒व्या च॑ सोम॒ धर्म॑भिः ।
सः तु पवस्व परि पार्थिवं रजः दिव्या च सोम धर्म भिः
तो तूं, पृथ्वीजवळच्या रजोलोकाला पवित्र कर. हे सोमा, आपल्या विविध धर्मांनी दिव्यलोक पवित्र कर. सूक्षदृष्टीचे ज्ञानी भक्त आपल्या मननीय स्तोत्रांनी आणि एकाग्र ध्यानांनी तुज शुभ्र सोमरसाला हलवून सोडतात. २४
पव॑माना असृक्षत प॒वित्रं॒ अति॒ धार॑या ।
पवमानाः असृक्षत पवित्रं अति धारया
पवित्र सोमरस आपल्या धारेनें पवित्रांतून पार वहात चालले. ते मरुत्गणांनी वेष्टित आहेत. ते हर्षकर इंद्रप्रिय आणि अश्वाप्रमाणें तरतरीत असे सोमरस भक्तांची प्रतिभा आणि प्रेमळपणा यांना अनुलक्षून वाहूं लागले. २५
अ॒पो वसा॑नः॒ परि॒ कोशं॑ अर्ष॒तीन्दु॑र्हिया॒नः सो॒तृभिः॑ ।
अपः वसानः परि कोशं अर्षति इन्दुः हियानः सोतृ भिः
उदकाचें परिधान करणारा आल्हादप्रद रस, पिळणार्या ऋत्विजांनी उंचावरून खालीं ओतला असतां रससंचयामध्यें तुडुंब भरून वाहतो; आणि प्रकाश उत्पन्न करून आणि दुग्धरूप वस्त्र परिधान करून हर्षनिर्भर झालेल्या स्तुति धेनूंना हंबारावयास लावतो. २६
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०८ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - गौरविति शाक्त्य, शक्ति वसिष्ठ आणि इतर : देवता - पवमान सोम :
पव॑स्व॒ मधु॑मत्तम॒ इन्द्रा॑य सोम क्रतु॒वित्त॑मो॒ मदः॑ ।
पवस्व मधुमत् तमः इन्द्राय सोम क्रतुवित् तमः मदः
हे सोमा, अत्यंत मधुर असा तूं इंद्राप्रीत्यर्थ पावनप्रवाहानें वहा. तूं अत्यंत कर्तृत्वशाली आहेस. तूं आनंदरूप आणि दिव्य लोकांतच निरंतर वास करणारा हर्ष आहेस. तर इंद्राप्रीत्यर्थ तुझा पवित्रप्रवाह वाहूं दे. १
यस्य॑ ते पी॒त्वा वृ॑ष॒भो वृ॑षा॒यते॑ऽ॒स्य पी॒ता स्व॒र्विदः॑ ।
यस्य ते पीत्वा वृषभः वृष यते अस्य पीता स्वः विदः
तुझा रस प्राशन करून वीर्यशाली इंद्र आपले वीर्य गाजवतो. दिव्यप्रकाश देणारा जो तूं त्या तुझ्या प्राशनाच्या योगानें महाप्राज्ञा इंद्रानें उत्साहभराला चोहोंकडून आक्रमण केलें, अश्व ज्या प्रमाणे झुंजाकडे धावतो त्याप्रमाणे आक्रमण केले. २
त्वं ह्य् अ१ ङ्ग दैव्या॒ पव॑मान॒ जनि॑मानि द्यु॒मत्त॑मः ।
त्वं हि अङ्ग दैव्या पवमान जनिमानि द्युमत् तमः
हे पावन सोमा, खरोखर अत्यंत दिप्तीमान अशा दिव्यविभूतिंचा समूह अमरत्वाला पावला असा घोष तूंच केलास. ३
येना॒ नव॑ग्वो द॒ध्यङ्ङ् अ॑पोर्णु॒ते येन॒ विप्रा॑स आपि॒रे ।
येन नव ग्वः दध्यङ् अप ऊर्णुते येन विप्रासः आपिरे
ज्याच्या योगाने "नवग्व" वंशांतील दध्यङ् ऋषीनें ज्ञानभाण्डार उघडून दिले; ज्याच्या योगानें ज्ञानी कवींना दिव्य विबुधांच्या सुखमय आश्रयाखालीं सुरुचिर अमृताचा लाभ झाला; आणि ज्याच्या योगानें त्यांना सत्कीर्तिही लाभली असा तूंच आहेस. ४
ए॒ष स्य धार॑या सु॒तो॑ऽव्यो॒ वारे॑भिः पवते म॒दिन्त॑मः ।
एषः स्यः धारया सुतः अव्यः वारेभिः पवते मदिन् तमः
हाच तो सोम कीं जो पिळला असतां लोकरीच्या पवित्रांतून धाराप्रवाहानें वहातो, आणि अत्यंत हर्षकर आणि उदक कल्लोलाप्रमाणें क्रीडाशील असतो. ५
य उ॒स्रिया॒ अप्या॑ अ॒न्तरश्म॑नो॒ निर्गा अकृ॑न्त॒दोज॑सा ।
यः उस्रियाः अप्याः अन्तः अश्मनः निः गाः अकृण्तत् ओजसा
ज्यानें उदकांतून उद्भवलेल्या प्रकाश-धेनूंना मेघोदर फोडून त्यांतून बाहेस काढले, असा तूं त्या धेनूंचा आणि अश्वांचा समूह विपुल करतोस. तर हे शत्रुधर्षका, तूं चिलखत घातलेल्या वीराप्रमाणे शत्रूंची खांडोळी कर. ६
आ सो॑ता॒ परि॑ षिञ्च॒ताश्वं॒ न स्तोमं॑ अ॒प्तुरं॑ रज॒स्तुर॑म् ।
आ सोत परि सिचत अश्वं न स्तोमं अप् तुरं
मित्रांनो रस पिळा; आणि मग उदकांतून आणि रजोलोकांतून अश्वाप्रमाणें वेगाने धावणार्या, अरण्यांत गर्जना करणार्या, आणि उदकाने परिपूर्ण झालेल्या त्या स्तुत्य सोमाला पात्रांत ओतून द्या. ७
स॒हस्र॑धारं वृष॒भं प॑यो॒वृधं॑ प्रि॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने ।
सहस्र धारं वृषभं पयः वृधं प्रियं देवाय जन्मने
जो हजारो धारांचा आहे, वीर्यशाली आहे, उदकाची आणि दुग्धाची वृद्धी करणारा आहे, दिव्यविभूतिंना प्रिय आहे, सद्धर्मानेंच जो सद्धर्मापासून उत्पन्न झाला, जो नाना प्रकारानें भक्तांचा उत्कर्षच करतो, जो जगाचा राजा आहे, जो दिव्य आहे आणि श्रेष्ठ असा सद्धर्मही आहे. ८
अ॒भि द्यु॒म्नं बृ॒हद्यश॒ इष॑स्पते दिदी॒हि दे॑व देव॒युः ।
अभि द्युम्नं बृहत् यशः इषः पते दिदीहि देव देव युः
हे उत्साहाच्या प्रभू, दिव्यवैभव आणि श्रेष्ठ यश यांचा प्रकाश सर्वत्र पसर. हे दिव्या, तूं देवोत्सुक आहेस, तर आमच्या या मध्यलोकांतील उदकभाण्डार फोडून मोकळें कर. ९
आ व॑च्यस्व सुदक्ष च॒म्वोः सु॒तो वि॒शां वह्नि॒र्न वि॒श्पतिः॑ ।
आ वच्यस्व सु दक्ष चम्वोः सुतः विशां वह्निः न विश्पतिः
हे चातुर्यबलाढ्या, तुजला पिळून दोन चमूपात्रांत ठेवले आहे. तर लोकधुरीण राजाप्रमाणें आमच्याकडे वळ. द्युलोकांतून वृष्टि कर, उदकांच्या ओघाला पुढें लोट आणि आम्हाला प्रकाशधेनूचा लाभ व्हावा म्हणून आमच्या बुद्धींना चालना दे. १०
ए॒तं उ॒ त्यं म॑द॒च्युतं॑ स॒हस्र॑धारं वृष॒भं दिवो॑ दुहुः ।
एतं ओं इति त्यं मद च्युतं सहस्र धारं वृषभं दिवः दुहुः
ह्याच त्या हर्षानें ओथंबलेल्या सोमापासून हजारों धाराप्रवाह सोडून द्युलोकीं वास करणार्या आणि यच्चावत् उत्कृष्ट वस्तु धारण करणार्या ह्याच सोमापासून सकल वस्तूंचे दोहन केले. ११
वृषा॒ वि ज॑ज्ञे ज॒नय॒न्न् अम॑र्त्यः प्र॒तप॒ञ् ज्योति॑षा॒ तमः॑ ।
वृषा वि जजे जनयन् अमर्त्यः प्र तपन् ज्योतिषा तमः
तो वीर्यशाली आणि अमर असा उत्पन्न झाला, आणि त्यानें प्रकाश उत्पन्न करून त्या प्रकाशाच्या योगानें अंधकाराला भाजून काढून नाहीसें केले. कवींनी त्याची मनःपूर्वक स्तुति केली, तेव्हां त्यानें आपल्या अद्भुत सामर्थ्यानें तीन प्रकारचें प्रावरण धारण केले. १२
स सु॑न्वे॒ यो वसू॑नां॒ यो रा॒यां आ॑ने॒ता य इळा॑नाम् ।
सः सुन्वे यः वसूनां यः रायां आनेता यः इळानां
हा जो उत्कृष्ट वस्तूंची, धनांची, अन्नांची, आणि उत्तम निवासस्थलांची प्राप्ति करून देणारा आहे, त्या सोमाचा रस पिळून सिद्ध केला आहे. १३
यस्य॑ न॒ इन्द्रः॒ पिबा॒द्यस्य॑ म॒रुतो॒ यस्य॑ वार्य॒मणा॒ भगः॑ ।
यस्य नः इन्द्रः पिबात् यस्य मरुतः यस्य वा अर्यमणा भगः
ज्या आमच्या रसाचें प्राशन इंद्र करीत असतो, ज्याचे प्राशन मरुत्, अर्यमा, आणि भाग्याधिपति देव करीत असतात; ज्याच्या योगाने उत्कृष्ट कृपाप्रसाद प्राप्त व्हावा म्हणून आम्ही मित्र, वरुण, इंद्र यांना आपल्याकडे आणतो तोच हा सोम होय. १४
इन्द्रा॑य सोम॒ पात॑वे॒ नृभि॑र्य॒तः स्वा॑यु॒धो म॒दिन्त॑मः ।
इन्द्राय सोम पातवे नृ भिः यतः सु आयुधः मदिन् तमः
सोमा, जरी तूं शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेस तरी तुजला इंद्राने प्राशन करावें म्हणून शूर भक्तांनी तुझें नियमन केले. तो तूं, अत्यंत हर्षप्रद आणि मधुर असा प्रवाह वहात ठेव. १५
इन्द्र॑स्य॒ हार्दि॑ सोम॒धानं॒ आ वि॑श समु॒द्रं इ॑व॒ सिन्ध॑वः ।
इन्द्रस्य हार्दि सोम धानं आ विश समुद्रं इव सिन्धवः
हे रसा, इंद्रच्या हृदयांत जें सोमाचें स्थान आहे त्यामध्यें समुद्रांत नद्यांनी प्रवेश करावा त्याप्रमाणें तूं प्रवेश कर. तें स्थान मित्राला, वरुणाला, वायूला प्रिय असेंच आहे. तें स्थान द्युलोकाचा उत्कृष्ट आधारच होय. १६
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०९ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - अग्नि धिष्ण्य ऐश्वर : देवता - पवमान सोम : छंद - द्विपदा विराज्
परि॒ प्र ध॒न्वेन्द्रा॑य सोम स्वा॒दुर्मि॒त्राय॑ पू॒ष्णे भगा॑य ॥ १ ॥
परि प्र धन्व इन्द्राय सोम स्वादुः मित्राय पूष्णे भगाय ॥ १ ॥
हे सोमा, तूं इंद्राकरितां, मित्राकरितां, पूषाकरितां, आणि भाग्याधिपाकरितां आपला मधुर प्रवाह धों धों वहात ठेव. १
इन्द्र॑स्ते सोम सु॒तस्य॑ पेयाः॒ क्रत्वे॒ दक्षा॑य॒ विश्वे॑ च दे॒वाः ॥ २ ॥
इन्द्रः ते सोम सुतस्य पेयाः क्रत्वे दक्षाय विश्वे च देवाः ॥ २ ॥
हे सोमा, तो तुझा रस इंद्र प्राशन करो, आणि आमच्या कर्तृत्वासाठी आणि चातुर्यबलासाठी सकल दिव्य विबुधहि प्राशन करोत. २
ए॒वामृता॑य म॒हे क्षया॑य॒ स शु॒क्रो अ॑र्ष दि॒व्यः पी॒यूषः॑ ॥ ३ ॥
एव अमृताय महे क्षयाय सः शुक्रः अर्ष दिव्यः पीयूषः ॥ ३ ॥
असा तू देदीप्यमान, दिव्य, आणि अमृतमय आहेस, तर आमच्या अमरत्वासाठी, आम्हांस उत्तमलोकाची प्राप्ति व्हावी यासाठीं तूं वहात रहा. ३
पव॑स्व सोम म॒हान् स॑मु॒द्रः पि॒ता दे॒वानां॒ विश्वा॒भि धाम॑ ॥ ४ ॥
पवस्व सोम महान् समुद्रः पिता देवानां विश्वा अभि धाम ॥ ४ ॥
सोमा तूं थोर आहेस. तूं समुद्राप्रमाणे विस्तीर्ण आणि देवांचा पिता आहेस. तूं सर्व तेजोमय स्थानांना अनुलक्षून पावनप्रवाहानें वहात रहा. ४
शु॒क्रः प॑वस्व दे॒वेभ्यः॑ सोम दि॒वे पृ॑थि॒व्यै शं च॑ प्र॒जायै॑ ॥ ५ ॥
शुक्रः पवस्व देवेभ्यः सोम दिवे पृथिव्यै शं च प्र जायै ॥ ५ ॥
सोमा, देदीप्यमान असा तूं दिव्यविबुधांसाठी, द्युलोकासाठी, पृथिवीसाठी, आणि लोकांच्या कल्याणासाठी पावनप्रवाहानें वहात रहा. ५
दि॒वो ध॒र्तासि॑ शु॒क्रः पी॒यूषः॑ स॒त्ये विध॑र्मन् वा॒जी प॑वस्व ॥ ६ ॥
दिवः धर्ता असि शुक्रः पीयूषः सत्ये वि धर्मन् वाजी पवस्व ॥ ६ ॥
तूं देदीप्यमान, अमर, द्युलोकाचा धारक आहेस. तर सत्ववीर असा तूं सत्य आणि विविध धर्मांच्या प्रसंगी पावनप्रवाहानें वहात रहा. ६
पव॑स्व सोम द्यु॒म्नी सु॑धा॒रो म॒हां अवी॑नां॒ अनु॑ पू॒र्व्यः ॥ ७ ॥
पवस्व सोम द्युम्नी सु धारः महां अवीनां अनु पूर्व्यः ॥ ७ ॥
सोमा, तूं तेजःपुंज, उत्कृष्ट धाराप्रवाहानें वहाणारा आहेस. तर त्या उत्तम ऊर्णावस्त्राच्या पवित्रांतून पूर्वीप्रमाणेंच वहात रहा. ७
नृभि॑र्येमा॒नो ज॑ज्ञा॒नः पू॒तः क्षर॒द्विश्वा॑नि म॒न्द्रः स्व॒र्वित् ॥ ८ ॥
नृ भिः येमानः जजानः पूतः क्षरत् विश्वानि मन्द्रः स्वः वित् ॥ ८ ॥
उत्पन्न होतांच ऋत्विजांनीं नियमन केलेला, पवित्र, हर्षप्रद आणि दिव्य लोकप्रापक असा तूं, सर्व प्रकारच्या उत्तम वस्तूंचा प्रवाह वहात ठेव. ८
इन्दुः॑ पुना॒नः प्र॒जां उ॑रा॒णः कर॒द्विश्वा॑नि॒ द्रवि॑णानि नः ॥ ९ ॥
इन्दुः पुनानः प्र जां उराणः करत् विश्वानि द्रविणानि नः ॥ ९ ॥
सोमरस स्वच्छ होताना त्याने लोकांचे रक्षण करून सर्व प्रकारची शाश्वत धनें आम्हांस अर्पण केली. ९
पव॑स्व सोम॒ क्रत्वे॒ दक्षा॒याश्वो॒ न नि॒क्तो वा॒जी धना॑य ॥ १० ॥
पवस्व सोम क्रत्वे दक्षाय अश्वः न निक्तः वाजी धनाय ॥ १० ॥
हे सोमा, युद्धाकरितां लढाऊ अश्व सज्ज करतात त्याप्रमाणें स्वच्छ झालेला तूं सत्ववीर आमच्या कर्तृत्वासाठी आणि चातुर्यबलासाठी आपल्या पावनप्रवाहानें वहात रहा. १०
तं ते॑ सो॒तारो॒ रसं॒ मदा॑य पु॒नन्ति॒ सोमं॑ म॒हे द्यु॒म्नाय॑ ॥ ११ ॥
तं ते सोतारः रसं मदाय पुनन्ति सोमं महे द्युम्नाय ॥ ११ ॥
रस पिळणारे ऋत्विज् देवाला हर्ष व्हावा यासाठी, आणि श्रेष्ठ अशा तेजोवैभवासाठी तुझा रस गाळून तो स्वच्छ करीत असतात. ११
शिशुं॑ जज्ञा॒नं हरिं॑ मृजन्ति प॒वित्रे॒ सोमं॑ दे॒वेभ्य॒ इन्दु॑म् ॥ १२ ॥
शिशुं जजानं हरिं मृजन्ति पवित्रे सोमं देवेभ्यः इन्दुम् ॥ १२ ॥
प्रकट होणार्या त्या हरिद्वर्ण बालकाला - त्या आल्हादप्रद सोमाला - दिव्यविबुधांना अर्पण करावे म्हणून पवित्रांतून गाळून स्वच्छ करतात. १२
इन्दुः॑ पविष्ट॒ चारु॒र्मदा॑या॒पां उ॒पस्थे॑ क॒विर्भगा॑य ॥ १३ ॥
इन्दुः पविष्ट चारुः मदाय अपां उप स्थे कविः भगाय ॥ १३ ॥
रुचिर, आल्हादप्रद, आणि काव्यस्फूर्ति देणारा जो सोम त्यानें भक्तांना हर्ष व्हावा, भाग्य प्राप्त व्हावें म्हणून उदकाच्या स्थानाजवळ आपला पावनप्रवाह वहात ठेवला. १३
बिभ॑र्ति॒ चार्व् इन्द्र॑स्य॒ नाम॒ येन॒ विश्वा॑नि वृ॒त्रा ज॒घान॑ ॥ १४ ॥
बिभर्ति चारु इन्द्रस्य नाम येन विश्वानि वृत्रा जघान ॥ १४ ॥
इंद्राचे जे मनोहर नामाभिधान तें तो धारण करतो; त्याच्या जोरावर त्याने सर्व शत्रूंचा निःपात केला आहे. १४
पिब॑न्त्यस्य॒ विश्वे॑ दे॒वासो॒ गोभिः॑ श्री॒तस्य॒ नृभिः॑ सु॒तस्य॑ ॥ १५ ॥
पिबन्ति अस्य विश्वे देवासः गोभिः श्रीतस्य नृ भिः सुतस्य ॥ १५ ॥
शूर ऋत्विजांनी पिळलेला, आणि गोदुग्ध मिसळलेला, असा सोमाचा रस सकल दिव्यविबुध प्राशन करतात. १५
प्र सु॑वा॒नो अ॑क्षाः स॒हस्र॑धारस्ति॒रः प॒वित्रं॒ वि वारं॒ अव्य॑म् ॥ १६ ॥
प्र सुवानः अक्षारिति सहस्र धारः तिरः पवित्रं वि वारं अव्यम् ॥ १६ ॥
पिळला जात असतां लोकरीच्या पवित्रांतून सहस्रावधि धारांनी तो वहात आहे. १६
स वा॒ज्य् अक्षाः स॒हस्र॑रेता अ॒द्भिर्मृ॑जा॒नो गोभिः॑ श्रीणा॒नः ॥ १७ ॥
सः वाजी अक्षारिति सहस्र रेताः अत् भिः मृजानः गोभिः श्रीणानः ॥ १७ ॥
तो अमितवीर्य सत्ववीर स्वच्छ होऊन उदकांनी आणि गोदुग्धाने युक्त असा वहात आहे. १७
प्र सो॑म या॒हीन्द्र॑स्य कु॒क्षा नृभि॑र्येमा॒नो अद्रि॑भिः सु॒तः ॥ १८ ॥
प्र सोम याहि इन्द्रस्य कुक्षा नृ भिः येमानः अद्रि भिः सुतः ॥ १८ ॥
सोमरसा, तूं इंद्राच्या जठरांत प्रवेश कर, शूर ऋत्विजांनी तुझे नियमन केले आहे आणि ग्राव्यांच्या योगाने तुजला पिळले आहे. १८
अस॑र्जि वा॒जी ति॒रः प॒वित्रं॒ इन्द्रा॑य॒ सोमः॑ स॒हस्र॑धारः ॥ १९ ॥
असर्जि वाजी तिरः पवित्रं इन्द्राय सोमः सहस्र धारः ॥ १९ ॥
हा सहस्रप्रवाही, सत्वाढ्य, वीर, आम्ही इंद्राप्रीत्यर्थ पवित्रांतून पात्रांत गाळला आहे. १९
अ॒ञ्जन्त्य् ए॑नं॒ मध्वो॒ रसे॒नेन्द्रा॑य॒ वृष्ण॒ इन्दुं॒ मदा॑य ॥ २० ॥
अजन्ति एनं मध्वः रसेन इन्द्राय वृष्णे इन्दुं मदाय ॥ २० ॥
ह्या आल्हादप्रद सोमरसाला, वीर्यशाली इंद्राला हर्ष व्हावा म्हणून भक्तजन मधुररसाशीं संयुक्त करतात. २०
दे॒वेभ्य॑स्त्वा॒ वृथा॒ पाज॑सेऽ॒पो वसा॑नं॒ हरिं॑ मृजन्ति ॥ २१ ॥
देवेभ्यः त्वा वृथा पाजसे अपः वसानं हरिं मृजन्ति ॥ २१ ॥
दिव्यविबुधांसाठी, उदकांचे आवरण धारण करणार्या तुज हरिद्वर्ण सोमाला तेजोबलासाठीं ऋत्विज स्वच्छ करतात. २१
इन्दु॒रिन्द्रा॑य तोशते॒ नि तो॑शते श्री॒णन्न् उ॒ग्रो रि॒णन्न् अ॒पः ॥ २२ ॥
इन्दुः इन्द्राय तोशते नि तोशते श्रीणन् उग्रः रिणन् अपः ॥ २२ ॥
आल्हादरूप सोमरस इंद्राप्रीत्यर्थच चुरला जात असतो. दुग्धमिश्रित होऊन तो शत्रुभयंकर आणि उदकांना मुक्त करणारा सोम अगदी जोरानें चुरला जात असतो. २२
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ११० (पवमान सोमसूक्त)
ऋषी - त्र्यरुण त्रैवृष्ण आणि त्रसदस्यु पौरुकुत्स्य :
पर्य् ऊ॒ षु प्र ध॑न्व॒ वाज॑सातये॒ परि॑ वृ॒त्राणि॑ स॒क्षणिः॑ ।
परि ओं इति सु प्र धन्व वाज सातये परि वृत्राणि सक्षणिः
आम्हाला सत्वसामर्थ्याची प्राप्ती व्हावी म्हणून सर्व दिशांनी धों धों वहात रहा. अंधकाररूपी वृत्रांना तूं रगडून टाकणारा आहेस. द्वेष्ट्यांचा निःपात व्हावा म्हणून ऋणाची फेड करणार्या मित्राप्रमाणे तूं भक्तांकडे येतोस. १
अनु॒ हि त्वा॑ सु॒तं सो॑म॒ मदा॑मसि म॒हे स॑मर्य॒राज्ये॑ ।
अनु हि त्वा सुतं सोम मदामसि महे समर्य राज्ये
तुझा रस पिळून सिद्ध झाला म्हणजे, हे सोमा, आम्हीं आनंदमग्न होतो. कारण हे पावना, ज्यामध्ये विजय मिळाल्यानें राज्यलाभ होतो, अशा संग्रामांत सत्वसामर्थ्याला अनुलक्षून तूं उडी घेतोस. २
अजी॑जनो॒ हि प॑वमान॒ सूर्यं॑ वि॒धारे॒ शक्म॑ना॒ पयः॑ ।
अजीजनः हि पवमान सूर्यं वि धारे शक्मना पयः
हे पावना, निराधार अशा आकाशांत तूं आपल्या शक्तिमत्वानें सूर्य उत्पन्न केलास, आणि प्रकाश विस्तारून देणार्या आपल्या बुद्धिसामर्थ्यानें तेथें उदकही उत्पन्न केलेंस. ३
अजी॑जनो अमृत॒ मर्त्ये॒ष्व् आँ ऋ॒तस्य॒ धर्म॑न्न् अ॒मृत॑स्य॒ चारु॑णः ।
अजीजनः अमृत मर्त्येषु आ ऋतस्य धर्मन् अमृतस्य चारुणः
हे अमर सोमा, सनातन सत्याच्या स्वभावधर्मानुसार, सुरुचिर अमृताच्या धर्मानुसार तूं मर्त्यमानवांमध्ये उत्पन्न झालास, आणि सत्वसामर्थ्याचा ओघ आमच्याकडे लोटून देऊन निरंतर वहात राहिलास. ४
अ॒भ्य्-अभि॒ हि श्रव॑सा त॒तर्दि॒थोत्सं॒ न कं चि॑ज् जन॒पानं॒ अक्षि॑तम् ।
अभि अभि हि श्रवसा ततर्दिथ उत्सं न कं चित् जन पानं अक्षितं
तूं आपल्या यशस्वितेनें, सर्व जनांनी जेथें सोमरस प्राशन करावा असा अक्षय निर्झर तूं खोदून ठेवलास, दोन्ही खांद्यांवर उदक वाहून नेणारा मनुष्य पहारीनें विहीर खोदतो, त्याप्रमाणे खोदून ठेवलास. ५.
आदीं॒ के चि॒त् पश्य॑मानास॒ आप्यं॑ वसु॒रुचो॑ दि॒व्या अ॒भ्यनूषत ।
आत् ईं के चित् पश्यमानासः आप्यं वसु रुचः दिव्याः अभि अनूषत
तुज आप्ताला अवलोकन करून उत्कृष्ट दिव्यसंपत्ति उपभोगणार्या भक्तांनी तुझें संकीर्तन केले, म्हणून, झांकण काढावे त्याप्रमाणे त्या दिव्यसंपत्तिवरचें आवरण जगत्स्रष्टा सविता दूर करीत आहे. ६
त्वे सो॑म प्रथ॒मा वृ॒क्तब॑र्हिषो म॒हे वाजा॑य॒ श्रव॑से॒ धियं॑ दधुः ।
त्वे इति सोम प्रथमाः वृक्त बर्हिषः महे वाजाय श्रवसे धियं दधुः
हे सोमा, प्रथम ज्यांनी यज्ञ केला त्या यजमानांनी उच्च सत्वसामर्थ्यासाठी आणि यशोलाभासाठी तुझ्या ठिकाणी आपली निष्ठा ठेवली, तर हे वीरा तूं आपलें वीर्य गाजविण्याची त्यांना प्रेरणा कर. ७
दि॒वः पी॒यूषं॑ पू॒र्व्यं यदु॒क्थ्यं म॒हो गा॒हाद्दि॒व आ निर॑धुक्षत ।
दिवः पीयूषं पूर्व्यं यत् उक्थ्यं महः गाहात् दिवः आ निः अधुक्षत
दिव्यलोकांतील पुरातन आणि प्रशंसनीय असे जे अमृत ते द्युलोकाच्या विस्तीर्ण खोल गुहेंतून त्यांनी हलवून बाहेर काढले, आणि इंद्र प्रकट होतांच त्याची उच्च स्वरानें स्तुति केली. ८
अध॒ यदि॒मे प॑वमान॒ रोद॑सी इ॒मा च॒ विश्वा॒ भुव॑ना॒भि म॒ज्मना॑ ।
अध यत् इमे इति पवमान रोदसी इति इमा च विश्वा भुवना अभि मज्मना
नंतर हे भक्तपावना, वृषभ जसा गोसमूहांत, त्याप्रमाणे द्यावापृथिवी आणि त्याचप्रमाणे सर्व भुवनें ह्या सर्वांमध्ये तूं ठाम उभा राहतोस. ९
सोमः॑ पुना॒नो अ॒व्यये॒ वारे॒ शिशु॒र्न क्रीळ॒न् पव॑मानो अक्षाः ।
सोमः पुनानः अव्यये वारे शिशुः न क्रीळ्अन् पवमानः अक्षारिति
सोमरस स्वच्छ होत असतांना लोकरीच्या पवित्रांतून बालकाप्रमाणे क्रीडा करीत शुद्ध होऊन पाझरतो तो आल्हादप्रद रस, हजारो धारांचा आणि असंख्य सत्व सामर्थ्याचा आहे. १०
ए॒ष पु॑ना॒नो मधु॑माँ ऋ॒तावेन्द्रा॒येन्दुः॑ पवते स्वा॒दुरू॒र्मिः ।
एषः पुनानः मधु मान् ऋत वा इन्द्राय इन्दुः पवते स्वादुः ऊर्मिः
हा भक्तपावन आल्हादप्रद रस, हा मधुर आणि सनातन धर्मप्रिय रस, इंद्रासाठी पावनप्रवाहानें वहात आहे. तो मधुर आहे, तो तरंगप्रचुर, सत्वसामर्थ्यप्रद, सौख्यप्रद आणि यौवनाचा जोम आणणारा आहे. ११
स प॑वस्व॒ सह॑मानः पृत॒न्यून् सेध॒न् रक्षां॒स्य् अप॑ दु॒र्गहा॑णि ।
सः पवस्व सहमानः पृतन्यून् सेधन् रक्षांसि अप दुः गहाणि
हे सोमा, भक्तांवर सैन्यानिशीं धांवून येणार्या शत्रूंना दडपून टाकणारा, राक्षसांचा फडशा उडविणारा, संकटांचा निरास करणारा, शस्त्रधारी आणि शत्रूंना पादाक्रांत करणारा आहेस. तर तूं आपल्या पावनप्रवाहानें वहात रहा. १२
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १११ (पवमान सोमसूक्त)
ऋषी - अनानत पारुच्छेपि : देवता - पवमान सोम : छंद - अत्यष्टि
अ॒या रु॒चा हरि॑ण्या पुना॒नो विश्वा॒ द्वेषां॑सि तरति स्व॒युग्व॑भिः॒ सूरो॒ न स्व॒युग्व॑भिः ।
अया रुचा हरिण्या पुनानः विश्वा द्वेषांसि तरति स्वयुग्व भिः
हा आपल्या हरिद्वर्ण कांतीने सकल वस्तू पवित्र करणारा सोमरस सर्व द्वेष्ट्यांच्या तडाक्यांतून भक्तांना पार नेतो. आपोआप जोडल्या जाणार्या आपल्या अश्वाच्या योगाने जसा सूर्य अंधकाराच्या पार नेतो त्याप्रमाणे नेतो. पवित्रांतून स्वच्छ होतांना तो हरिद्वर्ण तेजस्वी रस ऋक्स्तवनांच्या योगानें, सात मुखांतून निघणार्या ऋक्स्तवनाच्या योगाने सर्व प्रकारचीं रूपें धारण करतो, तेव्हां पिळलेल्या रसाची धार पहा कशी चमकते ती ! १
त्वं त्यत् प॑णी॒नां वि॑दो॒ वसु॒ सं मा॒तृभि॑र्मर्जयसि॒ स्व आ दम॑ ऋ॒तस्य॑ धी॒तिभि॒र्दमे॑ ।
त्वं त्यत् पणीनां विदः वसु सं मातृ भिः मर्जयसि स्वे आ दमे ऋतस्य धीति भिः दमे
तूं कंजुष मनुष्याचें तें अलोट द्रव्य आपल्या हाती परत घेतलेस, आणि उदकरूप मातांसह सत्यधर्माच्या ध्यान तत्परतेने स्वतःच्या गृहांत अलंकृत झालास. दूर अंतरावरून कानावर येणार्या सामगायनाप्रमाणें तुझ्या ध्यानस्तुति जेथे रममाण होतात तेथे तीन प्रकारच्या दीप्तींनी प्रकाशमान होऊन भक्तांमध्ये तारुण्याचा जोम ठेवलाच म्हणून समजा. २
पूर्वां॒ अनु॑ प्र॒दिशं॑ याति॒ चेकि॑त॒त् सं र॒श्मिभि॑र्यतते दर्श॒तो रथो॑ ।
पूर्वां अनु प्र दिशं याति चेकितत् सं रश्मि भिः यतते दर्शतः रथः
सर्वांना स्पष्टपणे ज्ञानचैतन्य देणारा सोम थेट पूर्वेकडे जातो तेंव्हा त्याचा तो दर्शनीय रथ, तो प्रेक्षणीय दिव्यरथही तिकडेच धावतो. त्याचवेळी त्याचे प्रशंसनीय पराक्रम विजय संपादनासाठी इंद्राकडे गेले आणि त्यांनी त्याला आनंदित केले. याप्रमाणे त्या इंद्राचे वज्र आणि तूं असे उभयतां अजिंक्य ठरलां, अपराजित ठरला. ३
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ११२ (आसन्नमरण जपमंत्र तथा पवमान सोमाचे पालुपदसूक्त)
ऋषी - शिशु आंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - पंक्ति
ना॒ना॒नं वा उ॑ नो॒ धियो॒ वि व्र॒तानि॒ जना॑नाम् ।
नानानं वै ओं इति नः धियः वि व्रतानि जनानां
आमच्या बुद्धि नानाप्रकारच्या; तसेच लोकांच्या वागणुकीचे नियमही नानातर्हेचे आहेत. पहा कीं, सुतार तासलेले लाकूडच शोधतो, वैद्य रोगी हुडकतो, आणि ब्रह्मा (ऋत्विज्) सोम अर्पण करणारा भक्त भेटावा अशी इच्छा करतो. परंतु हे सोमरसा, तूं मात्र इंद्राप्रीत्यर्थच आपला पावनप्रवाह वहात ठेव. १
जर॑तीभि॒रोष॑धीभिः प॒र्णेभिः॑ शकु॒नाना॑म् ।
जरतीभिः ओषधीभिः पर्णेभिः शकुनानां
जुन्या औषधींनी, पक्ष्यांच्या पिसार्यांनी, किंवा चमकणार्या पाषाणांनी, खटपटी मनुष्य सुवर्णाचा सांठा शोधतो, तसेच आम्हीही हिरण्यवर्णाचा जो सोम त्याचा शोध करतो. तर हे सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपला पावनप्रवाह वहात ठेव. २
का॒रुर॒हं त॒तो भि॒षग् उ॑पलप्र॒क्षिणी॑ न॒ना ।
कारुः अहं ततः भिषक् उपल प्रक्षिणी नना
मी स्वतः कवि आहे, माझा बाळ्या वैद्य आहे, आणि माझी ’नना’ धान्य निवडून त्यांतले खडे वेंचून टाकते. याप्रमाणे द्रव्याची इच्छा धरणारे आम्ही नाना प्रकारच्या बुद्धि चालवून, गाई तृणाकडे धांवतात त्याप्रमाणे, द्रव्याच्या पाठीमागे धांवत आहों; परंतु हे सोमा, तूं मात्र इंद्राप्रीत्यर्थ आपला पावनप्रवाह वहात ठेव. ३
अश्वो॒ वोळ्हा॑ सु॒खं रथं॑ हस॒नां उ॑पम॒न्त्रिणः॑ ।
अश्वः वोळ्हा सुखं रथं हसनां उप मन्त्रिणः
दणकट घोड्याला हलका मजेदार रथ ओढणे बरे वाटते. चैनी लोकांना थट्टा मस्करी आवडते. धाधावलेला पुरुष स्त्रीच्या समागमाला हपापलेला असतो, बेडकाला पाणीच आवडते. परंतु हे सोमा, तूं मात्र इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहाने वहात रहा. ४
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ११३ (आसन्नमरणाचे पालुपदसूक्त)
ऋषी - कश्यप मारीच : देवता - पवमान सोम : छंद - पंक्ति
श॒र्य॒णाव॑ति॒ सोमं॒ इन्द्रः॑ पिबतु वृत्र॒हा ।
शर्यणावति सोमं इन्द्रः पिबतु वृत्र हा
शर्यणावतांत वृत्रनाशन इंद्र सोमरस प्राशन करो. तो आपल्या स्वतःच्या ठिकाणी सर्व बल एकवटणारा आहे, उत्कृष्ट पराक्रम गाजविणारा आहे. म्हणून हे आल्हादप्रद रसा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहाने वहात रहा. १.
आ प॑वस्व दिशां पत आर्जी॒कात् सो॑म मीढ्वः ।
आ पवस्व दिशां पते आर्जीकात् सोम मीढवः
हे सकल दिशांच्या प्रभू, हे दिक्पाला सोमा, कामनावर्षक असा तूं, ऋजीक प्रदेशांतून इकडे वहात रहा. सनातन धर्माच्य वाणीने, सत्याने, भक्तीने आणि तपश्चर्येने तूं पिळलेला आहेस, तर हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहानें वहात रहा. २
प॒र्जन्य॑वृद्धं महि॒षं तं सूर्य॑स्य दुहि॒ताभ॑रत् ।
पर्जन्य वृद्धं महिषं तं सूर्यस्य दुहिता आ अभरत्
पर्जन्याने वाढविलेला जो श्रेष्ठ सोम त्याला सूर्याची कन्या वनांतून घेऊन आली, त्याला गंधर्वांनीही हाती धरले, आणि त्याच्या वल्लीमध्ये तो अपूर्व रस त्यांनी साठविला. तर हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ३
ऋ॒तं वद॑न्न् ऋतद्युम्न स॒त्यं वद॑न् सत्यकर्मन् ।
ऋतं वदन् ऋत द्युम्न सत्यं वदन् सत्य कर्मन्
सनातन धर्माचे तेज अंगी बाणलेल्या हे सोमा, तूं सद्धर्म वदणारा आहेस. हे सत्चारित्र्या, तूं सत्यच भाषण करणारा आहेस. हे राजा सोमा, तूं निष्ठेनें पूर्ण असे भाषण करणारा आहेस. हे सोमा, सृष्टिकर्त्याने तुजला अलंकृत केले आहे. तर हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ४
स॒त्यमु॑ग्रस्य बृह॒तः सं स्र॑वन्ति संस्र॒वाः ।
सत्यं उग्रस्य बृहतः सं स्रवन्ति सं स्रवाः
जो सत्याच्या प्रभावाने शत्रूंना भयंकर वाटतो अशा श्रेष्ठ सोमाचे पाझर एकत्र वाहतात, त्या रसपूर्ण सोमाचे रसप्रवाह एकत्रच होतात. हे हरिद्वर्णा, प्रार्थनासूक्तानें तूं भक्तपावन ठरला आहेस; तर हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ५
यत्र॑ ब्र॒ह्मा प॑वमान छन्द॒स्या३ं वाचं॒ वद॑न् ।
यत्र ब्रह्मा पवमान चन्दस्यां वाचं वदन्
हे पावनप्रवाहा, जेथे ब्रह्मसूक्त म्हणणारा ऋत्विज् छन्दोबद्ध वाणी मुखावाटे काढतो, ग्राव्यांच्या योगाने सोमयागप्रसंगी आदरणीय होतो, आणि सोमाच्या योगानेंच हर्षनिर्भर होतो तेथे हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ६
यत्र॒ ज्योति॒रज॑स्रं॒ यस्मि॑ँ लो॒के स्वर्हि॒तम् ।
यत्र ज्योतिः अजस्रं यस्मिन् लोके स्वः हितं
ज्या ठिकाणी प्रकाश अखंड आहे, ज्या ठिकाणी दिव्यतेज सांठविलेले आहे, त्या ठिकाणी, हे पावनप्रवाहा, त्या अक्षय अमरलोकीं, मला स्थापन कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ७
यत्र॒ राजा॑ वैवस्व॒तो यत्रा॑व॒रोध॑नं दि॒वः ।
यत्र राजा वैवस्वतः यत्र अव रोधनं दिवः
ज्या ठिकाणी विवस्वानाचा पुत्र यमराज वास्तव्य करतो, ज्या ठिकाणी द्युलोकाचें - दृष्टीच्या टप्प्यांत नसलेले - गुप्तस्थान आहे, ज्या ठिकाणी भर वेगानें धांवणार्या आपोदेवी राहतात, त्या ठिकाणी मला ठेवून अमर कर, आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ८
यत्रा॑नुका॒मं चर॑णं त्रिना॒के त्रि॑दि॒वे दि॒वः ।
यत्र अनु कामं चरणं त्रि नाके त्रि दिवे दिवः
द्युलोकाच्या ज्या तिसर्या उच्चलोकांत, ज्या तिसर्या दिव्यलोकांत, वाटेल तिकडे संचार करता येतो; ज्या ठिकाणी सर्व स्थळे तेजोमय आहेत, तेथे मला ठेऊन अमर कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ९
यत्र॒ कामा॑ निका॒माश्च॒ यत्र॑ ब्र॒ध्नस्य॑ वि॒ष्टप॑म् ।
यत्र कामाः नि कामाः च यत्र ब्रध्नस्य विष्टपं
ज्या ठिकाणी काम्यकर्म करणारे, आणि तसेच निष्कामकर्म आचरणारे लोक राहतात, जे सृष्टीच्या मूलस्तंभाचे स्थान आहे, ज्या ठिकाणी स्वधा (म्हणजे स्वयंसिद्ध अमृत) आहे, ज्या ठिकाणी तृप्ति आहे, अशा ठिकाणी मला ठेऊन अमर कर, आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. १०
यत्रा॑न॒न्दाश्च॒ मोदा॑श्च॒ मुदः॑ प्र॒मुद॒ आस॑ते ।
यत्र आनन्दाः च मोदाः च मुदः प्र मुदः आसते
ज्या ठिकाणी आनंद आहेत, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वासनेच्याही वासना सफल होतात त्या ठिकाणी मला ठेऊन अमर कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ११
ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ११४ (आसन्नमरणाचे पालुपदसूक्त)
ऋषी - कश्यप मारीच : देवता - पवमान सोम : छंद - पंक्ति
य इन्दोः॒ पव॑मान॒स्यानु॒ धामा॒न्य् अक्र॑मीत् ।
यः इन्दोः पवमानस्य अनु धामानि अक्रमीत्
जो भक्त आल्हालप्रद आणि पावनप्रवाह सोमाच्या तेजोमय स्थानांचे व्यवस्थित रीतीनें आक्रमण करतो, हे सोमा, जो आपले अंतःकरण तुक्ज्या ठिकाणीं लावतो तोच उत्कृष्ट संततीने युक्त झाला असे म्हणतात. तर हे आल्हादप्रदा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहानें वाहात रहा. १.
ऋषे॑ मन्त्र॒कृतां॒ स्तोमैः॒ कश्य॑पोद्व॒र्धय॒न् गिरः॑ ।
ऋषे मन्त्र कृतां स्तोमैः कश्यप उत् वर्धयन् गिरः
हे ऋषे, कश्यपा, मंत्ररचना करणार्या भक्तांच्या स्तवनांनी आपली वाणी उन्नत करून, सोमराजाला प्रणिपात कर; जो सर्व लतावल्लींचा प्रभू म्हणून उत्पन्न झाला आहे त्याच्यापुढे नम्र हो. आणि हे आल्हादप्रदा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहानें वाहात रहा. २.
स॒प्त दिशो॒ नाना॑सूर्याः स॒प्त होता॑र ऋ॒त्विजः॑ ।
सप्त दिशः नानासूर्याः सप्त होतारः ऋत्विजः
सातही दिशा, अनेक सूर्य मण्डलें, सात होते (ऋत्विज्) अदितीचे सात दिव्यपुत्र अशा सर्वांसह येऊन हे सोमा, आमचे सर्व प्रकारे रक्षण कर, आणि हे आल्हादप्रदा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहानें वाहात रहा. ३.
यत् ते॑ राजञ् छृ॒तं ह॒विस्तेन॑ सोमा॒भि र॑क्ष नः ।
यत् ते राजन् शृतं हविः तेन सोम अभि रक्ष नः
हे सोमराजा, हे जे तुझ्यापुढें पक्व हविरन्न ठेवले आहे त्याच्या योगानें हे सोमा, तूं आमचे सर्व दिशांनी रक्षण कर. कोणताही अधार्मिक शत्रू, आमचा कधींही मोड करूं शकणार नाही असे कर, आणि हे आल्हादप्रदा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या पावनप्रवाहानें वाहात रहा. ४.
॥ नववे मण्डल समाप्त ॥ |