|
ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त १ ते १० ऋग्वेद - मंडल १० सूक्त १ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अग्रे॑ बृ॒हन्नुषसा॑मू॒र्ध्वो अ॑स्थान्निर्जग॒न्वान् तम॑सो॒ ज्योति॒षागा॑त् ।
अग्ने बृहन् उषसां ऊर्ध्वः अस्थात् निः-जगन्वान् तमसः ज्योतिषा आ अगात्
हा श्रेष्ठ अग्नि उषादेवीच्या पूर्वीच आपल्या ज्वाला उभारून सज्ज झाला आहे. तो आपल्या दीप्तिच्या योगाने अन्धकारांतून बाहेर निघाला; तेव्हां त्या शोभनांग देवाने प्रकट होतां क्षणींच आपल्या उज्ज्वल किरणांनी सर्व यज्ञमंदिरे व्याप्त करून टाकली. १.
स जा॒तो गर्भो॑ असि॒ रोद॑स्यो॒रग्ने॒ चारु॒र्विभृ॑त॒ ओष॑धीषु ।
सः जातः गर्भः असि रोदस्योः अग्ने चारुः वि-भृतः ओषधीषु
हे अग्नि, तूं जो प्रकट झालास, तो द्यावापृथिवींचा जणों गाभाच असा प्रकट झालास. हे अग्ने, सुरुचिर असा तूं वनस्पतींच्या पोटीं ओतप्रोत भरून राहिलास आणि चित्र-विचित्र वर्णाचा, पण बालरूप होऊन रात्रीच्या अन्धकाराच्या पटलांना घेरून गर्जना केलीस आणि ओषधीरूप मातांच्या अंकावर आरूढ होण्यासाठी निघून गेलास. २.
विष्णु॑रि॒त्था प॑र॒मं अ॑स्य वि॒द्वाञ्जा॒तो बृ॒हन्न् अ॒भि पा॑ति तृ॒तीय॑म् ।
विष्णुः इत्था परमं अस्य विद्वान् जातः बृहन् अभि पाति तृतीयं
श्रेष्ठ आणि परम ज्ञानी विष्णु देखील असाच प्रकट होऊन ह्या अग्नी च्या तिसर्या अत्युच्च पदाचे रक्षण करितो. ऋत्विज ह्या ठिकाणी त्याचे अर्चन करितात. ३.
अत॑ उ त्वा पितु॒भृतो॒ जनि॑त्रीरन्ना॒वृधं॒ प्रति॑ चर॒न्त्यन्नैः॑ ।
अतः ओं इति त्वा पितु-भृतः जनित्रीः अन्न-वृधं प्रति चरन्ति अन्नैः
म्हणूनच धान्यादिकांनी समृद्ध अशा (ओषधी रूप) जननी तूं अन्नवर्धक म्हणून तुझ्याकडे हविरन्ने घेऊन येतात, आणि तूंहि त्या रूप बदलणार्या ऒषधींना पुन: जाऊन भेटतोस, कारण मानवांमध्यें (देवांच्या) यज्ञाचा संपादक तूंच आहेस. ४.
होता॑रं चि॒त्रर॑थं अध्व॒रस्य॑ य॒ज्ञस्य॑-यज्ञस्य के॒तुं रुश॑न्तम् ।
होतारं चित्र-रथं अध्वरस्य यजस्य-यजस्य केतुं रुशन्तं
तूं कसा आहेस, तर यज्ञसंपादक, अद्भूत अशा रथांतून गमन करणारा, अध्वर यागाचा आणि तसेंच प्रत्येक यज्ञाचा उज्ज्वल ध्वजच; दिव्य विबुधांच्या हविर्भागाचा वांटेकरी, आपल्या महिम्यानें, आपल्या शोभेने सकल जनांचा सन्माननीय पाहुणा (आहेस तर असा) जो अग्नि तो हा. (त्याचे मी स्तवन करितों). ५.
स तु वस्त्रा॒ण्यध॒ पेश॑नानि॒ वसा॑नो अ॒ग्निर्नाभा॑ पृथि॒व्याः ।
सः तु वस्त्राणि अध पेशनानि वसानः अग्निः नाभा पृथिव्याः
पहा, तो नाना प्रकारचीं उज्ज्वल वस्त्रें परिधान करणारा अग्नि आरक्त दीप्तीनें पृथिवीच्या अगदीं मध्यभागी (वेदीवर) प्रकट झाला आहे. आहवनीय स्थानीं त्याची स्थापना झालीं सुद्धां; तर आतां हे प्रभो अग्ने, तूं येथेंच दिव्य विबुधांचे यजन कर. ६.
आ हि द्यावा॑पृथि॒वी अ॑ग्न उ॒भे सदा॑ पु॒त्रो न मा॒तरा॑ त॒तन्थ॑ ।
आ हि द्यावापृथिवी इति अग्ने उभे इति सदा पुत्रः न मातरा ततन्थ
हे अग्ने, द्यावापृथिवींचा जणों पुत्रच अशा तूं, उभयतां आईबापांवर आपल्या तेजाचा चांदवा निरंतर पसरून दिला आहेस; तर हे तारुण्यमूर्ते अग्निदेवा, आम्हां उत्सुक भक्तांकडे ये. हे दर्पदमना दिव्य विबुधांनाही येथपर्यंत आण. ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त २ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
पि॒प्री॒हि दे॒वाँ उ॑श॒तो य॑विष्ठ वि॒द्वाँ ऋ॒तूँ ऋ॑तुपते यजे॒ह ।
पिप्रीहि देवान् उशतः यविष्ठ विद्वान् ऋतून् ऋतु-पते यज इह
हे यौवनाढ्या, यज्ञोत्सुक दिव्य विभूतींना संतुष्ट कर. यज्ञकाल-प्रतिपालका, यज्ञकाल जाणणारा तूं (आहेस, तर) दिव्य विबुधांप्रीत्यर्थ ह्या ठिकाणी यजन कर. तुज जवळ असणार्या दिव्य ऋत्विजांच्या योगाने आम्हा (मानवी) होत्यांना तूं अत्यंत पूज्य झाला आहेस. १.
वेषि॑ हो॒त्रं उ॒त पो॒त्रं जना॑नां मन्धा॒तासि॑ द्रविणो॒दा ऋ॒तावा॑ ।
वेषि होत्रं उत पोत्रं जनानां मन्धाता असि द्रविणः-दाः ऋत-वा
भक्तांच्या होतृकर्माची तुजला आवड आहे; तसेंच पोतृकर्माचीहि आहे. तूं ध्यानप्रेरक, (अविनाशी) संपत्ति देणारा, आणि सनातन सद्धर्माचा अभिलाषी आहेस. म्हणूनच "स्वाहा" शब्दपूर्वक आम्हीं त्याला जी आहुति अर्पण करितों (तिच्या योगाने) तो पूज्य अग्नि दिव्य विबुधांचे यजन करो. २.
आ दे॒वानां॒ अपि॒ पन्थां॑ अगन्म॒ यच् छ॒क्नवा॑म॒ तदनु॒ प्रवो॑ळ्हुम् ।
आ देवानां अपि पन्थां अगन्म यत् शक्नवाम तत् अनु प्र-वोळ्हुं
दिव्य विभूतींनी आंखून दिलेल्या मार्गांनीच आम्ही गेलों आहों. आमच्या हातून जें जें होऊं शकेल, तें तें आम्ही पार पाडावें या हेतूनें तो मार्ग आम्ही अनुसरला. सर्वज्ञ अग्नि हें जाणतच आहे; तर तो दिव्य विबुधांना संतुष्ट करो. तोच खरा यज्ञसंपादक आहे; आणि अध्वरयाग तसाच यज्ञकाल हे त्यानेंच निश्चित केलेले आहेत. ३.
यद्वो॑ व॒यं प्र॑मि॒नाम॑ व्र॒तानि॑ वि॒दुषां॑ देवा॒ अवि॑दुष्टरासः ।
तत् वः वयं प्र-मिनाम व्रतानि विदुषां देवाः अविदुः-तरासः
हे दिव्य विबुधांनो, ज्ञानशील जे तुम्हीं त्या तुमच्या आज्ञा आम्हीं अत्यंत अज्ञानी असल्यानें नित्य मोडतो हें खरें. तरी पण, देवांना त्यांच्या त्यांच्या योग्य काली सर्वज्ञ अग्नि हा जसा आहुति पोहोंचवितो, तसाच तो आमच्या हातून चुकलेले जें जें कर्म असेल तें तें सर्व परिपूर्ण करील. ४.
यत् पा॑क॒त्रा मन॑सा दी॒नद॑क्षा॒ न य॒ज्ञस्य॑ मन्व॒ते मर्त्या॑सः ।
यत् पाक-त्रा मनसा दीन-दक्षाः न यजस्य मन्वते मर्त्यासः
आम्हीं मानव अपरिपक्व बुद्धीमुळें आणि दौर्बल्यामुळें जेव्हां यज्ञाची गोष्ट सुद्धां मनांत आणीत नाही, तेव्हां देखील यज्ञकर्म जाणणारा, यज्ञसंपादक, आणि परम पूज्य अग्नि हे सर्व ध्यानांत आणून दिव्य विबुधांचे यजन (आमच्याकरितां) यथाकालीं करीतच असतो. ५.
विश्वे॑षां॒ ह्यध्व॒राणां॒ अनी॑कं चि॒त्रं के॒तुं जनि॑ता त्वा ज॒जान॑ ।
विश्वेषां हि अध्वराणां अनीकं चित्रं केतुं जनिता त्वा जजान
यच्चयावत् यागांचा प्रमुख आणि त्यांचा अद्भूत ध्वजच म्हणून जगत्पित्यानें तुजला निर्माण केले, तर तूं आपल्या स्वभावाला अनुसरून-शूरपुरुषांनी संपन्न, स्पृहणीय, पोषणसमर्थ, आणि सर्वजनप्रिय अशी उत्साहशक्ति भक्तांना प्राप्त व्हावी यासाठीं यजन कर. ६.
यं त्वा॒ द्यावा॑पृथि॒वी यं त्वाप॒स्त्वष्टा॒ यं त्वा॑ सु॒जनि॑मा ज॒जान॑ ।
यं त्वा द्यावापृथिवी इति यं त्वा आपः त्वष्टा यं त्वा सु-जमिमा जजान
ज्या तुला द्यावापृथिवींनीं प्रकट केलें, ज्या तुला जलांनी प्रकट केलें, किंवा सुंदर वस्तु निर्माण करणार्या जगताच्या शिल्पकारानें प्रकट केलें, तो तूं पितरांचा मार्ग उत्तम तर्हेनें जाणतोस; तर हे अग्नि, तूं प्रदीप्त होऊन आपल्या अत्युज्ज्वल कांतीने प्रकाशित हो. ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ३ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
इ॒नो रा॑जन्न् अर॒तिः समि॑द्धो॒ रौद्रो॒ दक्षा॑य सुषु॒माँ अ॑दर्शि ।
इनः राजन् अरतिः सम्-इद्धः रौद्रः दक्षाय सुसु-मान् अदर्शि
हे जगत् राजा, तूं सकलांचा प्रभु आहेस, जगन्नायक आहेस; असा अग्नि प्रज्वलित झाला म्हणजे जरी भयंकर वाटतो तरी भक्तांच्या चातुर्यकलासाठींच तो सुप्रकाशित होतो; या प्रमाणे सर्वांकडे दृष्टि फेकित आपल्या महत्तेजाने तो प्रकाशित झाला म्हणजे कृष्णवर्ण रात्रीला मागे लोटून शुभ्रकांति उषेसह यज्ञासाठी पुढे सरसावतो. १.
कृ॒ष्णां यदेनीं॑ अ॒भि वर्प॑सा॒ भूज् ज॒नय॒न् योषां॑ बृह॒तः पि॒तुर्जाम् ।
कृष्णां यत् एनीं अभि वर्पसा भूत् जनयन् योषां बृहतः पितुः जां
पहा की, श्रेष्ठ जो जगत्पिता त्याच्या उषारूप कन्येला प्रगट करून आपल्या उज्ज्वलतेनें तमोमय रात्रीचा निरास करितो आणि सूर्याचे किरण जरी प्रकाशोन्मुख झाले, तरी त्यांनाहि थोंपवून धरून हा देवनायक आपल्या दिव्य वैभवासह तळपत राहतो. २.
भ॒द्रो भ॒द्रया॒ सच॑मान॒ आगा॒त् स्वसा॑रं जा॒रो अ॒भ्येति प॒श्चात् ।
भद्रः भद्रया सचमानः आ अगात् स्वसारं जारः अभि एति पश्चात्
कल्याणकर अग्नि हा कल्याणरूप उषेसहित प्राप्त झाला तेव्हां भक्ताची भगिनी जी उषा तिचा प्रियकर तिच्या पाठोपाठच आला आणि सर्व वस्तू आमच्या दृष्टीस पाडणार्या दीप्तीने सर्वत्र भरून आपल्या तेजस्वी किरणांनी प्रत्येक मनोरम वस्तूला व्यापून राहिला. ३.
अ॒स्य यामा॑सो बृह॒तो न व॒ग्नून् इन्धा॑ना अ॒ग्नेः सख्युः॑ शि॒वस्य॑ ।
अस्य यामासः बृहतः न वग्नून् इन्धानाः अग्नेः सख्युः
त्यांचे संचारी किरण उत्कृष्ट अशी काव्येंच जणों उद्दीपित करितात. भक्तांचा सखा, कल्याणरूप, स्तवनयोग्य, वीर्यशाली, श्रेष्ठ आणि दर्शनीय अशा अग्नीच्या तीव्र ज्वाला अंधकारांच्या पटलांना भेदून जातांना स्पष्ट दिसतात. ४.
स्व॒ना न यस्य॒ भामा॑सः॒ पव॑न्ते॒ रोच॑मानस्य बृह॒तः सु॒दिवः॑ ।
स्वनाः न यस्य भामासः पवन्ते रोचमानस्य बृहतः सु-दिवः
ज्यी देदीप्यमान, श्रेष्ठ, आणि मनोहरकांति अग्नीच्या ज्वाला वायूच्या निनादाप्रमाणे शब्द करीत डुलत असतात; जो आपल्या उच्च, तेजस्वी, सर्वोत्कृष्ट आणि हलणार्या ज्वालाकल्लोळांनी सहजलीलेने आकाशाला जाऊन भिडतो तो हा होय. ५.
अ॒स्य शुष्मा॑सो ददृशा॒नप॑वे॒र्जेह॑मानस्य स्वनयन् नि॒युद्भिः॑ ।
अस्य शुष्मासः ददृशान-पवेः जेहमानस्य स्वनयन् नियुत्-भिः
ज्याच्या रथचक्राच्या धांवा धांवतांना स्पष्ट दिसतात, त्या ह्या अग्नीच्या रखरखीत ज्वालांनी गर्जना केली; तेव्हां आपल्या पुरातन तेज:पुंज आणि किंकाळणार्या अश्वांनी तो जगन्नायक सर्वव्यापक आणि दृग्गोचर झाला. ६.
स आ व॑क्षि॒ महि॑ न॒ आ च॑ सत्सि दि॒वस्पृ॑थि॒व्योर॑र॒तिर्यु॑व॒त्योः ।
सः आ वक्षि महि नः आ च सत्सि दिवःपृथिव्योः अरतिः युवत्योः
हे अग्ने, तूं हा असा आहेस; तर आम्हांला महत्वाला चढव; तरुण द्यावापृथिवीचा तूं नायक म्हणून येथे वास्तव्य कर. हे अग्ने, तूं शीघ्रगति आहेस; तर आपल्या शीघ्रगति अश्वांसह आगमन कर. तूं धौशानें धांवणारा आहेस; तर धौशाने धांवणार्या आपल्या अश्वांसह इकडेच आगमन कर. ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ४ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्र ते॑ यक्षि॒ प्र त॑ इयर्मि॒ मन्म॒ भुवो॒ यथा॒ वन्द्यो॑ नो॒ हवे॑षु ।
प्र ते यक्षि प्र ते इयर्मि मन्म भुवः यथा वन्द्यः नः हवेषु
मी तुझ्याप्रीत्यर्थ यजन करतों, मननीय स्तोत्र तुजला अर्पण करितों. आम्हीं जो धांवा करतों, त्यांत तूंच आम्हाला वन्दनीय झाला आहेस. निर्जल प्रदेशांत जसा पाण्याचा झरा, तसा हे पुराणपुरुषा, जगत् राजा, तुझी सेवा करणार्या भक्ताला तू आहेस. १.
यं त्वा॒ जना॑सो अ॒भि सं॒चर॑न्ति॒ गाव॑ उ॒ष्णं इ॑व व्र॒जं य॑विष्ठ ।
यं त्वा जनासः अभि सम्-चरन्ति गावः उष्णम्-इव व्रजं
धेनू जशा निवार्याच्या उबदार जागेकडे धांवतात, तसे हे तारुण्यमूर्ते, सकल भक्तजन धांवत धांवत तुझ्याभोवती जमतात. तूं जसा दिव्यजनांचा प्रतिनिधि, तसा मानवांचाहि आहेस; म्हणूनच श्रेष्ठ असा तूं त्या उभयतांच्या मधून प्रकाशमय अशा अंतरीक्ष मार्गानें संचार करतोस. २.
शिशुं॒ न त्वा॒ जेन्यं॑ व॒र्धय॑न्ती मा॒ता बि॑भर्ति सचन॒स्यमा॑ना ।
शिशुं न त्वा जेन्यं वर्धयन्ती माता बिभर्ति सचनस्यमाना
बालकाला जशी माता त्याप्रमाणे प्रेमळ जननी जी पृथिवी ती तुज धीरोदात्त देवाच्या महिम्याचे संवर्धन करते. आणि एखादा वृषभ जसा मोकाट धांवत सुटावा, त्याप्रमाणे तूंही आकाश मार्गाने विजयश्रीच्या सरोबरीने धांवत जातोस. ३.
मू॒रा अ॑मूर॒ न व॒यं चि॑कित्वो महि॒त्वं अ॑ग्ने॒ त्वं अ॒ङ्ग वि॑त्से ।
मूराः अमूर न वयं चिकित्वः महि-त्वं अग्ने त्वं अङ्ग वित्से
हे मोहरहिता, आम्हीं मूढाप्रमाणेंच आहोंत. हे ज्ञानमय देवा, खरे मोठेपण कोणतें तें बापा, तूंच जाणतोस. त्याची प्रत्यक्ष मूर्त्तिमान् तुझी ही आकृति अशीच (भूमीवरहि पहुडते;) आणि जिव्हेने आहुति ग्रहण करतांना तो असा दिसतो की जणों एखादा भूपाल आपल्या लाडक्या तरुण प्रियेचे चुंबनच घेत आहे. ४.
कूचि॑ज् जायते॒ सन॑यासु॒ नव्यो॒ वने॑ तस्थौ पलि॒तो धू॒मके॑तुः ।
कू-चित् जायते सनयासु नव्यः वने तस्थौ पलितः धूम-केतुः
काष्ठे जीर्ण असली तरी नित्यनूतन असा अग्नि त्यांच्यातहि प्रकट होतो. आणि धूमाचा ध्वज फडकावीत आपल्या पिंगटवर्ण तेजाने वनांत वास करितो; पाण्यांत बुडी न मारतांच वृषभाप्रमाणे उदकें तरून जातो; पण अशा अग्निलाच स्थिरचित्त जे मानवी भक्त ते वेदीवर नेऊन ठेवितात. ५.
त॒नू॒त्यजे॑व॒ तस्क॑रा वन॒र्गू र॑श॒नाभि॑र्द॒शभि॑र॒भ्यधीताम् ।
तनूत्यजाइव तस्करा वनर्गू इति रशनाभिः दश-भिः अभि अधीतां
जिवावर उदार झालेल्या आणि जंगलात वाट मारणार्या दोन चोरांना बांधावे त्याप्रमाणे दहा दोरखंडांनी मन आणि अहंकार हे दोघे चोर जखडले गेले आहेत; तर आतां, हे अग्निदेवा, ही जी आम्ही तुझी अपूर्व आणि मननीय स्तुति केली आहे, तिचा आपल्या प्रकाशपूर्ण ज्वालांनी रथा प्रमाणें तू यज्ञाशी संयोग करून दे. ६.
ब्रह्म॑ च ते जातवेदो॒ नम॑श्चे॒यं च॒ गीः सदं॒ इद्वर्ध॑नी भूत् ।
ब्रह्म च ते जात-वेदः नमः च इयं च गीः सदं इत् वर्धनी भूत्
यथातथ्यवेत्त्या अग्निदेवा आम्ही केलेले हे तुझें प्रार्थनासूक्त तुजला अर्पण असो. हा प्रणिपात तुलाच, आणि ही स्तुतिहि तुलाच अर्पण असो. ती तुझे माहात्म्य वृद्धिंगत करणारी होवो. हे अग्निदेवा, आमच्या मुलांलेकरांचे रक्षण तूं न विसंबतां करून आमच्याहि स्वत:च्या हिताची जपणूक कर. ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ५ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
एकः॑ समु॒द्रो ध॒रुणो॑ रयी॒णां अ॒स्मद्धृ॒दो भूरि॑जन्मा॒ वि च॑ष्टे ।
एकः समुद्रः धरुणः रयीणां अस्मत् हृदः भूरि-जन्मा वि चष्टे
शाश्वत संपत्तीचा तो समुद्रच आहे. तो वारंवार प्रगट होऊन आमच्या अंत:करणाचें निरीक्षण करतो आणि गुप्तरूपानें समीप राहणार्या त्या उभयतांच्या हृदयाच्या जवळ वास करतो. अशा अग्निरूप पक्ष्यांचे स्थान अमृत निर्झरामध्यें आहे. १.
स॒मा॒नं नी॒ळं वृष॑णो॒ वसा॑नाः॒ सं ज॑ग्मिरे महि॒षा अर्व॑तीभिः ।
समानं नीळं वृषणः वसानाः सं जग्मिरे महिषाः अर्वतीभिः
एकाच स्थळीं वास करून राहणारे वीर्यशाली आणि विशाल असे शूर वीर चपळ अशा योषितांशी प्रेमानें जरी निगडित झाले आहेत; तरी इकडे सद्धर्माच्या स्थानाचे रक्षण ज्ञानी असतात तेच करितात; आणि त्यांतील रहस्य तत्त्वेंहि तेच जतन करितात. २.
ऋ॒ता॒यिनी॑ मा॒यिनी॒ सं द॑धाते मि॒त्वा शिशुं॑ जज्ञतुर्व॒र्धय॑न्ती ।
ऋतयिनी इत्य् ऋऋत-यिनी मायिनी इति सं दधातेइति मित्वा शिशुं जजतुः वर्धयन्ती इति
सद्धर्माचरणी, नियमानें वागणार्या अद्भुत्कृत्यकुशल अशा ज्या द्यावापृथिवी त्या एकत्र झाल्या, तेव्हां त्यांनी त्या बालकाला प्रकट निर्माण केलें आणि नंतर सर्व चराचर विश्वाचा जो मध्य आणि कविप्रतिभेचा जो तंतूच अशा देवाची उपासना मनांत नाना प्रकारच्या आकांक्षा धरून त्या करूं लागल्या. ३.
ऋ॒तस्य॒ हि व॑र्त॒नयः॒ सुजा॑तं॒ इषो॒ वाजा॑य प्र॒दिवः॒ सच॑न्ते ।
ऋतस्य हि वर्तनयः सु-जातं इषः वाजाय प्र-दिवः सचन्ते
सद्धर्माचे मार्ग आणि भक्ताचा उत्साह हे सत्त्वसामर्थ्य-प्राप्तीसाठी पहिल्यापासूनच त्या सुप्रभव अग्नीच्या आज्ञेनुसार वागत आहेत; आणि म्हणूनच त्याच्या आच्छादक छत्राखाली राहून द्यावापृथिवी मधुर घृताने आणि अन्नाने प्राणिमात्राला पुष्ट करितात. ४.
स॒प्त स्वसॄ॒ररु॑षीर्वावशा॒नो वि॒द्वान् मध्व॒ उज् ज॑भारा दृ॒शे कम् ।
सप्त स्वसॄः अरुषीः वावशानः विद्वान् मध्वः उत् जभार दृशे कं
सातहि अरुणवर्ण भगिनींना प्रेमाने हांक मारून मधुररसज्ञ अग्नीने लोकांनी त्यांना पहावे म्हणून बाहेर आणले. पुराणपुरुषानें अंतरिक्षांतच त्यांचे नियमन केले, आणि आपण पूषांचे रूप धारण करण्याची इच्छा दर्शवून त्याप्रमाणें रूप घेतलें. ५.
स॒प्त म॒र्यादाः॑ क॒वय॑स्ततक्षु॒स्तासां॒ एकां॒ इद॒भ्यंहु॒रो गा॑त् ।
सप्त मर्यादाः कवयः ततक्षुः तासां एकां इत् अभि अंहुरः गात्
ज्ञात्या पुरुषांनी धर्माच्या सात मर्यादा आंखून दिल्या आहेत. जो पातकी असेल तो त्यांतील एका मर्यादेचे तरी उल्लंघन करील. पण मानवी आयुष्याचा जो खरा आधारस्तंभ आहे, तो सर्व नीति मार्ग जेथून निघतात त्या उच्च निवासांत, आणि धैर्यवृत्तिमध्यें आढळतो. ६.
अस॑च् च॒ सच् च॑ पर॒मे व्योम॒न् दक्ष॑स्य॒ जन्म॒न्न् अदि॑तेरु॒पस्थे॑ ।
असत् च सत् च परमे वि-ओमन् दक्षस्य जन्मन् अदितेः उप-स्थे
अशाश्वत आणि शाश्वत असे जें जें आहे तें सर्व अत्युच्च आकाशांत, विवेकाच्या उगमस्थानीं आणि अनाद्यनंत अदितीच्या ठिकाणी असतें. सद्धर्माच्या अगदी प्रारंभी प्राचीन कालीं, सर्वांच्या आधीं प्रकट झालेला जो हा अग्नि, तोच आमचा वीर-पुंगव आणि तोच आमची धेनु होय. ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ६ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अ॒यं स यस्य॒ शर्म॒न्न् अवो॑भिर॒ग्नेरेध॑ते जरि॒ताभिष्टौ॑ ।
अयं सः यस्य शर्मन् अवः-भिः अग्नेः एधते जरिता अभिष्टौ
हाच तो अग्नि कीं ज्याच्या कल्याणमय आश्रयाखाली आणि संरक्षणाखालीं, त्याच्या कृपाप्रसादांनी स्तोतृजन उन्नतिला पावतो. हाच तो दीप्तिमान् की ज्याच्या समिधांच्या प्रखर किरणांनी वेष्टित असलेला तो प्रकाशवान् देव सर्वत्र संचार करितो. १.
यो भा॒नुभि॑र्वि॒भावा॑ वि॒भात्य॒ग्निर्दे॒वेभि॑रृ॒तावाज॑स्रः ।
यः भानु-भिः विभावा वि-भाति अग्निः देवेभिः ऋत-वा अजस्रः
जो प्रकाशवान् अग्नि, जो सद्धर्मप्रिय, अविनाशी देव, आपल्या दिव्य किरणांनी प्रकाशित होतो; तोच (हा देव) आपल्या प्रिय भक्तांना आपले प्रेम अर्पण करितो. एकाद्या सत्त्वधीर अश्ववीराप्राणे तो अचूक कार्यकर्ता आहे. २.
ईशे॒ यो विश्व॑स्या दे॒ववी॑ते॒रीशे॑ वि॒श्वायु॑रु॒षसो॒ व्युष्टौ ।
ईशे यः विश्वस्याः देव-वीतेः ईशे विश्व-आयुः उषसः वि-उष्टौ
जो सर्व प्रकारच्या देवसेवेचा अधिपति आहे, जो विश्वात्मा प्रभातकाली प्रकाशणार्या उषांचाहि प्रभु आहे, ज्या अग्नीच्या ठिकाणी अप्रतिहत रथगामी असा यजमान आपल्या मननांनी, आणि आपल्या प्रभावी स्तवनांनी आपले हविर्भाग पक्के स्थिर राहतील असे करितो. ३.
शू॒षेभि॑र्वृ॒धो जु॑षा॒णो अ॒र्कैर्दे॒वाँ अच्छा॑ रघु॒पत्वा॑ जिगाति ।
शूषेभिः वृधः जुषाणः अर्कैः देवान् अच्च रघु-पत्वा जगाति
प्रभावशाली स्तवनांनी ज्याचे महात्म्य वाढतें, अर्कस्तोत्रांनी ज्याला हर्ष होतो असा शीघ्रवेगी अग्नि दिव्यविबुधांकडे गमन करितो. तो आनंदपूर्ण असा यज्ञसंपादक आहे, तो अत्यंत पूज्य आणि स्तुत्य अग्नि दिव्यविभूतींना "जुव्हेने" आहुति पोहोचवितो. ४.
तं उ॒स्रां इन्द्रं॒ न रेज॑मानं अ॒ग्निं गी॒र्भिर्नमो॑भि॒रा कृ॑णुध्वम् ।
तं उस्रां इन्द्रं न रेजमानं अग्निं गीः-भिः नमः-भिः आ कृणुध्वं
इंद्राप्रमाणेंच जो उष:प्रकाशाला हलवून सोडतो, त्या अग्नीला स्तुतींनी आणि प्रणिपाताने आपलासा करा. सकल वस्तुजात जाणणारा आणि शत्रूचा दर्प मोडून टाकणार्या वीरांमध्ये जो हांक मारण्याला योग्य आहे, अशा अग्नीचे कीर्तन ज्ञानी स्तोते मननीय स्तुतींनी करितात. ५.
सं यस्मि॒न् विश्वा॒ वसू॑नि ज॒ग्मुर्वाजे॒ नाश्वाः॒ सप्ती॑वन्त॒ एवैः॑ ।
सं यस्मिन् विश्वा वसूनि जग्मुः वाजे न अश्वाः सप्ति-वन्तः एवैः
तीव्रवेगी जोरदार अश्व ज्याप्रमाणे आरूढ झालेल्या सैनिकांसह संग्रामांत घुसतात, त्याप्रमाणें तुजमध्ये सकल उत्कृष्ट संपत्तींनी घुसून तेथें वास केला आहे. म्हणून हे अग्ने, इंद्राकडूनहि मिळण्यास अत्यंत योग्य अशा तुझ्या सहायशक्ति आमच्याकडे येतील असे कर. ६.
अधा॒ ह्यग्ने म॒ह्ना नि॒षद्या॑ स॒द्यो ज॑ज्ञा॒नो हव्यो॑ ब॒भूथ॑ ।
अध हि अग्ने मह्ना नि-सद्य सद्यः जजानः हव्यः बभूथ
हे अग्नि आपल्या महिम्याच्या योगाने तात्काळ प्रगट होऊन आणि येथे आसनस्थ होऊन तूं आहुतींचा स्वीकार करण्यास सज्ज झाला आहेस, म्हणूनच दिव्यजन तुझ्या इच्छेनुरूप तेथे प्राप्त झाले आणि तुझ्या उत्कृष्ट संरक्षणाने युक्त होऊन उन्नतिला पावले ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ७ (अग्निसूक्त) ऋषी - त्रित आप्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
स्व॒स्ति नो॑ दि॒वो अ॑ग्ने पृथि॒व्या वि॒श्वायु॑र्धेहि य॒जथा॑य देव ।
स्वस्ति नः दिवः अग्ने पृथिव्याः विश्व-आयुः धेहि यजथाय देव
तुझी उपासना करतां यावी म्हणून हे अग्निदेवा, विश्वात्मा असा तूं आकाश आणि पृथ्वी यांच्यांतील मंगलवृत्ति आंम्हांमध्ये ठेव. हे अद्भूतचारित्र्या, आम्हीं तुझ्या इच्छेनुरूप चालणार; तर हे देवा, प्रशस्त अशा तुझ्या प्रशंसांनी तूं आम्हांस पाप मुक्त कर. १.
इ॒मा अ॑ग्ने म॒तय॒स्तुभ्यं॑ जा॒ता गोभि॒रश्वै॑र॒भि गृ॑णन्ति॒ राधः॑ ।
इमाः अग्ने मतयः तुभ्यं जाताः गोभिः अश्वैः अभि गृणन्ति राधः
अग्निदेवा, ह्या पहा आंम्हाला स्फुरलेल्या मननीय स्तुति. भक्ताला गोधन आणि अश्वधन यांनी युक्त करून तुझ्याच कृपाप्रसादाची महती गात आहेत. ज्या वेळेस हे आनंदनिधाना, मर्त्य भक्त स्तवनांच्या योगाने प्राप्त झालेला तुझा प्रसाद गहण करून त्याचा उपभोग घेतो तेव्हांहि, हे सुप्रभवा देवा, तो तुझीच महती गातो. २.
अ॒ग्निं म॑न्ये पि॒तरं॑ अ॒ग्निं आ॒पिं अ॒ग्निं भ्रात॑रं॒ सदं॒ इत् सखा॑यम् ।
अग्निं मन्ये पितरं अग्निं आपिं अग्निं भ्रातरं सदं इत् सखायं
अग्नीलाच मी पिता समजतो, अग्नीलाच आप्त. अग्नीलाच भ्राता आणि अग्नीलाच जिवलग मित्र समजतो. श्रेष्ठ अग्निच्या तेजस्वी स्वरूपाची, म्हणजे आकाशांतील सूर्याच्या पूज्य अशा शुभ्र तेजाची उपासना करीत असतां मी अग्नीचीच सेवा करीत आहे असेंच वाटतें. ३.
सि॒ध्रा अ॑ग्ने॒ धियो॑ अ॒स्मे सनु॑त्री॒र्यं त्राय॑से॒ दम॒ आ नित्य॑होता ।
सिध्राः अग्ने धियः अस्मे इति सनुत्रीः यं त्रायसे दमे आ नित्य-होता
हे अग्ने, सर्व कांही प्राप्त करून देणार्या तुझ्या स्तुति आम्हांला फलप्रद होवोत. शाश्वत असा यज्ञ संपादक तूं आहेस. आपल्या गृहांत तूं ज्यांचे रक्षण करतोस, तोच धर्मशील होतो, तोच आरक्तवर्ण अश्वांनी संपन्न आणि तोच महाबलाढ्य होतो. अशाच भक्ताला प्रतिदिनीं अभिलषणीय वैभव प्राप्त होवो. ४.
द्युभि॑र्हि॒तं मि॒त्रं इ॑व प्र॒योगं॑ प्र॒त्नं ऋ॒त्विजं॑ अध्व॒रस्य॑ जा॒रम् ।
द्यु-भिः हितं मित्रम्-इव प्र-योगं प्रत्नं ऋत्विजं अध्वरस्य जारं
प्रत्येक दिवशी हितकारी मित्राप्रमाणे प्रेरणा करणारा, पुरातन ऋत्विज, आणि अध्वर यागाचा अत्यंत प्रेमी असा अग्नि त्याला आयुष्मान् भक्तांनी आपल्या बाहूंनी अरणींतून घर्षण करून प्रकट केले, आणि त्या दिव्य होत्याला निरनिराळ्या स्थानी अधिष्ठित केले. ५.
स्व॒यं य॑जस्व दि॒वि दे॑व दे॒वान् किं ते॒ पाकः॑ कृणव॒दप्र॑चेताः ।
स्वयं यजस्व दिवि देव देवान् किं ते पाकः कृणवत् अप्र-चेताः
हे देवा, तूंच स्वत: दिव्यविबुधांचे आकाशांत यजन कर. त्यांना संतुष्ट कर. मी दुर्बल आणि अज्ञान भक्त काय करणार ? तर ज्याप्रमाणे तूं यथाकाली दिव्यजनांचे यजन करतोस, त्याप्रमाणे हे सुप्रभवा, आपल्या स्वत:चेहि यजन कर ६.
भवा॑ नो अग्नेऽवि॒तोत गो॒पा भवा॑ वय॒स्कृदु॒त नो॑ वयो॒धाः ।
भव नः अग्ने अविता उत गोपाः भव वयः-कृत् उत नः वयः-धाः
अग्निदेवा, तूं आमचा सहकारी हो, आमचा संरक्षक हो. तूं आमचा तरुण्याचा जोम राखणारा, आम्हांला तारुण्य अर्पण करणारा हो. हे महातेजा, आम्हांला हवि अर्पण करण्याचे सामर्थ्य दे; आणि यत्किंचित्हि न विसंबतां आमचेहि रक्षण कर ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८ (अग्निसूक्त) ऋषी - त्रिशिरस् त्वाष्ट्र : देवता - १-६ - अग्नि; ७-९ - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
प्र के॒तुना॑ बृह॒ता या॑त्य॒ग्निरा रोद॑सी वृष॒भो रो॑रवीति ।
प्र केतुना बृहता याति अग्निः आ रोदसी इति वृषभः रोरवीति
आपल्या विशाल धूम्र ध्वजासह अग्नि हा सर्वत्र संचार करतो. द्युलोक आणि भूलोक यांच्यामध्ये तो कामनावर्षक अग्नि वृषभाप्रमाणे मोठ्याने डुरकणी फोडतो. पहा, द्युलोकाचे उत्कृष्ट प्रांतभाग ज्याने व्यापून टाकले आहेत, असा हा महाभाग देव उदकांच्या मूलस्थानांत वृधिंगत झाला आहे. १.
मु॒मोद॒ गर्भो॑ वृष॒भः क॒कुद्मा॑न् अस्रे॒मा व॒त्सः शिमी॑वाँ अरावीत् ।
मुमोद गर्भः वृषभः ककुत्-मान् अस्रेमा वत्सः शिमी-वान् अरावीत्
ज्वालारूप उंच वशिंग असलेला अग्निरूप बालवृषभ हर्षभरित झाला, तेव्हां त्या अश्रांत आणि सत्कर्मप्रेरक वत्सानेंच मोठ्याने हम्माऽऽ असा शब्द केला. याप्रमाणें तो श्रेष्ठ देव भक्ताची उपासनाकर्मे उत्साहाने युक्त करून स्वस्थानी गमन करतो २.
आ यो मू॒र्धानं॑ पि॒त्रोरर॑ब्ध॒ न्यध्व॒रे द॑धिरे॒ सूरो॒ अर्णः॑ ।
आ यः मूर्धानं पित्रोः अरब्ध नि अध्वरे दधिरे सूरः अर्णः
जो द्यावा पृथिवीरूप मातापितरांच्या मस्तकापर्यंत जाऊन भिडलेला असतो म्हणून त्याला तेजोर्मि-माली सूर्यच समजून ऋत्विजांनी अध्वरांत त्याची स्थापना केली. ह्याच्याच उड्डानामध्ये उषा देवी आरक्तवर्ण आणि प्रकाशरूप अश्वावर आरूढ होऊन सद्धर्माच्या आद्यस्थानी स्वत: भक्तांवर प्रसन्न होतात. ३.
उ॒ष-उ॑षो॒ हि व॑सो॒ अग्रं॒ एषि॒ त्वं य॒मयो॑रभवो वि॒भावा॑ ।
उषः-उषः हि वसो इति अग्रं एषि त्वं यमयोः अभवः विभावा
हे दिव्यनिधे, तूं प्रत्येक उष:कालाच्या पूर्वी यज्ञमंदिरांत प्राप्त होतोस. तूं त्या उभयतां द्यावापथिवीना प्रकाशदायक झाला आहेस आणि सनातन धर्मासाठी, अर्थात् आपल्या स्वत:साठी मित्राला सूर्याला प्रकट करून तूं यज्ञमंडपांतील सातहि स्थाने आक्रमण करीत असतोस. ४.
भुव॒श्चक्षु॑र्म॒ह ऋ॒तस्य॑ गो॒पा भुवो॒ वरु॑णो॒ यदृ॒ताय॒ वेषि॑ ।
भुवः चक्षुः महः ऋतस्य गोपाः भुवः वरुणः यत् ऋताय वेषि
महनीय अशा सनातन सत्याचा तूं नेत्र आहेस, तूं त्याचा रक्षकहि आहेस, सनातन धर्माविषयी तूं लालस आहेस, म्हणून तूं वरुणहि झाला आहेस. हे वस्तुजात जाणणार्या देवा, तूंच उदकाचा उद्गम आहेस; आणि ज्याच्या हविर्भागाचा तूं स्वीकार करतोस, त्याचा हविर्भाग देवांना पोहोंचविणारा दूतहि तूंच होतोस. ५.
भुवो॑ य॒ज्ञस्य॒ रज॑सश्च ने॒ता यत्रा॑ नि॒युद्भिः॒ सच॑से शि॒वाभिः॑ ।
भुवः यजस्य रजसः च नेता यत्र नियुत्-भिः सचसे शिवाभिः
यज्ञाचा आणि रजोलोकाचा नायक तूं आहेस. त्या ठिकाणी आपल्या "नियुत्" घोड्यांसह तूं संचार करतोस. दिव्य प्रकाशाचा लाभ करून देणारे आपले सूर्यरूप मस्तक तूं द्युलोकांत ठेवतोस, पण हे असे, आपल्या जिव्हेला तूं भक्तांसाठी आहुतिवाहक बनवितोस. ६.
अ॒स्य त्रि॒तः क्रतु॑ना व॒व्रे अ॒न्तरि॒च्छन् धी॒तिं पि॒तुरेवैः॒ पर॑स्य ।
अस्य त्रितः क्रतुना वव्रे अन्तः इच्चन् धीतिं पितुः एवैः परस्य
ध्यानसिद्धीची इच्छा आपल्या अंत:करणांत धरणारा जो "त्रित" त्याला त्याच्या कर्तृत्वानें आणि परात्पर पित्याच्या कृपेनें वर प्राप्त झाला. मातापितरांच्या निवासस्थानीं भक्तांकडून ज्याची सेवा निरंतर होते त्या अग्निशी आपले नाते काय आहे ते सांगूनच त्या त्रिताने आपली शस्त्रास्त्रे हाती घेतली. ७.
स पित्र्या॒ण्यायु॑धानि वि॒द्वान् इन्द्रे॑षित आ॒प्त्यो अ॒भ्ययुध्यत् ।
सः पित्र्याणि आयुधानि विद्वान् इन्द्र-इषितः आप्त्यः अभि अयुध्यत्
नंतर पित्याकडून मिळालेली सर्व शस्त्रास्त्रे पाहून घेऊन त्या "आप्स्या"ने इंद्राच्या प्रोत्साहनाने युद्ध आरंभिले, आणि तीन मस्तकांचा आणि तीन रंगाचा जो त्रिशिरा त्याला ठार करून त्वष्ट्याच्या प्रकाशरूप धेनूंना त्रिताने बन्धमुक्त केलें. ८.
भूरीदिन्द्र॑ उ॒दिन॑क्षन्तं॒ ओजोऽ॑वाभिन॒त् सत्प॑ति॒र्मन्य॑मानम् ।
भूरि इत् इन्द्रः उत्-इनक्षन्तं ओजः अव अभिनत् सत्-पतिः मन्यमानं
आपल्या पराक्रमाची अतिशय शेखी मिरविणार्या उन्मत्त दुष्टाला सज्जनांचा प्रतिपालक जो इंद्र त्यानेंच खरोखर ठार केलें; आणि त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूप त्याच्या धेनू हस्तगत करून घेऊन शत्रूची तीन्ही मस्तकें त्याने उडवून दिली. ९.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९ (अप्सूक्त)
ऋषी - त्रिशिरस् त्वाष्ट्र अथवा सिंधुद्वीप आंबरीष : देवता - अप्
आपो॒ हि ष्ठा म॑यो॒भुव॒स्ता न॑ ऊ॒र्जे द॑धातन ।
आपः हि स्थ मयः-भुवः ताः नः ऊर्जे दधातन महे रणाय चक्षसे ॥ १ ॥
हे आपोदेवींनो, तुम्ही कल्याणमय आहांत, तर आम्हीं परम रमणीय अशी वस्तू पहावी म्हणून आम्हांला ओजस्वितेच्या ठिकाणी घेऊन चला. १.
यो वः॑ शि॒वत॑मो॒ रस॒स्तस्य॑ भाजयते॒ह नः॑ ।
यः वः शिव-तमः रसः तस्य भाजयत इह नः उशतीः-इव मातरः ॥ २ ॥
तुमचा जो अत्यंत मंगलकारक रस आहे त्याचा, प्रेमळ माता आपल्या बालकाला दुग्धाचा आस्वाद करविते त्याप्रमाणे आम्हांला उपभोग करवा. २.
तस्मा॒ अरं॑ गमाम वो॒ यस्य॒ क्षया॑य॒ जिन्व॑थ ।
तस्मै अरं गमाम वः यस्य क्षयाय जिन्वथ आपः जनयथ च नः ॥ ३ ॥
तुमच्या निवासस्थानावर तुमचे प्रेम आहे, त्याच्या जवळ आम्हीं त्वरित पोहोंचावें म्हणून हे आपोदेवी हो, आम्हांला तेथेंच उत्पन्न करा. ३.
शं नो॑ दे॒वीर॒भिष्ट॑य॒ आपो॑ भवन्तु पी॒तये॑ ।
शं नः देवीः अभिष्टये आपः भवन्तु पीतये शं योः अभि स्रवन्तु नः ॥ ४ ॥
आपोदेवी आमच्या कल्याणाला, आमच्या मनोरथसिद्धीला कारण होवोत; आमच्या सोमपानालाहि सोमयागालाहि आपोदेवी कारण होवोत; कल्याण आणि अभीष्टवस्तू यांचा ओघ त्या आमच्यावर लोटोत. ४
ईशा॑ना॒ वार्या॑णां॒ क्षय॑न्तीश्चर्षणी॒नाम् ।
ईशानाः वार्याणां क्षयन्तीः चर्षणीनां अपः याचामि भेषजम् ॥ ५ ॥
अभिलषणीय वस्तूंच्या त्या स्वामिनी होत. जनतेच्या त्या आश्रयस्थान होत. म्हणून आपोदेवींपाशीं मी औषधांची याचना करितों. ५.
अ॒प्सु मे॒ सोमो॑ अब्रवीद॒न्तर्विश्वा॑नि भेष॒जा ।
अप्-सु मे सोमः अब्रवीत् अन्तः विश्वानि भेषजा अग्निं च विश्व-शम्भुवम् ॥ ६ ॥
कारण सोमाने मला असें सांगितले कीं यच्चयावत् औषधें उदकांत असतात. सर्वमंगल जो अग्नि, तोहि त्यांत आहे ६.
आपः॑ पृणी॒त भे॑ष॒जं वरू॑थं त॒न्वेख्प् मम॑ ।
आपः पृणीत भेषजं वरूथं तन्वे मम ज्योक् च सूर्यं दृशे ॥ ७ ॥
तर माझ्या शरीराचे रक्षण होईल असे औषधरूप कवच हे आपोदेवीहो, मला अर्पण करा; आणि मी निरंतर सूर्याला पाहूं शकेन असे करा. ७.
इ॒दं आ॑पः॒ प्र व॑हत॒ यत् किं च॑ दुरि॒तं मयि॑ ।
इदं आपः प्र वहत यत् किं च दुः-इतं मयि यत् वा अहं अभि--दुद्रोह यत् वा शेपे उत अनृतम् ॥ ८ ॥
हे आपोदेवींनो, माझ्यामध्ये जें जें पातक असेल, तें सर्व धुवून टाका. मी कोणाचा द्रोह केला असेल, कोणाला शाप दिला असेल, किंवा कांही खोटें बोललो असेन तर तेंहि सर्व धुवून टाका. ८.
आपो॑ अ॒द्यान्व् अ॑चारिषं॒ रसे॑न॒ सं अ॑गस्महि ।
आपः अद्य अनु अचारिषं रसेन सं अगस्महि पयस्वान् अग्ने आ गहि तं मा सं सृज वर्चसा ॥ ९ ॥
हे आपोदेवींनो, हे पहा, तुम्हांसन्निध मी प्राप्त झालों आहें. तर तुमच्या रसाशी आमचा योग घडेल असें करा. तर उदकांतर्गत अग्निदेवा, तूं ये आणि मला आपल्या ओजस्वीतेने युक्त कर ९.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १० (यम-यमी संवादसूक्त)
ऋषी - यम वैवस्वत आणि यमी वैवस्वती : देवता - यम, यमी
ओ चि॒त् सखा॑यं स॒ख्या व॑वृत्यां ति॒रः पु॒रू चि॑दर्ण॒वं ज॑ग॒न्वान् ।
ओ इति चित् सखायं सख्या ववृत्यां तिरः पुरु चित् अर्णवं जगन्वान्
मी माझ्या प्रियसख्याला प्रेमाने खेंचून आणीनच; तो ह्या अफाट प्रेम समुद्राच्या पार निघून जाण्याच्या जरी बेतांत असला, तरी जगाच्या रहाटीकडे बारीक लक्ष देणारा ईश्वर ह्याला पुत्र देऊन पित्याचे नातें उत्पन्न करो. १.
न ते॒ सखा॑ स॒ख्यं व॑ष्ट्ये॒तत् सल॑क्ष्मा॒ यद्विषु॑रूपा॒ भवा॑ति ।
न ते सखा सख्यं वष्ति एतत् स-लक्ष्मा यत् विषु-रूपा भवाति
तुझा मी प्रियमित्र आहे -पण अशा तर्हेच्या मैत्रीची मी इच्छा करीत नाही की जिच्या योगाने मी मूळचा बन्धुत्वाच्या नात्याचा असतांना नंतर निराळ्याच नात्याचा म्हणजे पति व्हावा. आतां पुत्राविषयी म्हणशील तर परमात्मा जो ईश्वर त्याचे वीर्यशाली पुत्र दिव्यविबुध जे या द्युलोकाला धारण करीत आहेत ते तर जिकडे तिकडे दृष्टीला पडतच आहेत. २.
उ॒शन्ति॑ घा॒ ते अ॒मृता॑स ए॒तदेक॑स्य चित् त्य॒जसं॒ मर्त्य॑स्य ।
उशन्ति घ ते अमृतासः एतत् एकस्य चित् त्यजसं मर्त्यस्य
ते अमर विबुध दिव्यविबुध, त्यांची हीच इच्छा असते, की मानव हा एकटा असतो त्याला (कोणी तरी) वांटेकरीण असावी; आणि तुझे मनहि मजवर आहेच; तर तूं पुत्रोत्पादक पति होऊन माझ्यामध्ये प्रवेश कर. ३.
न यत् पु॒रा च॑कृ॒मा कद्ध॑ नू॒नं ऋ॒ता वद॑न्तो॒ अनृ॑तं रपेम ।
न यत् पुरा चकृम कत् ह नूनं ऋता वदन्तः अनृतं रपेम
हें पहा की, जें आपण पूर्वी कधींहि केलेलें नाही ते आतां तरी कां म्हणून करावें ? आजपर्यंत सत्यधर्माच्या लांब लांब गोष्टी सांगून आतां अनीतीची बडबड आपण कां करावी ? आकाशोदकांत राहणारा गंधर्व हा (पिता) आणि दिव्य उदकरूप जी स्त्री ती आपली जननी असे आपले उच्च प्रतीचे नातें आहे हे ध्यानांत धर. ४.
गर्भे॒ नु नौ॑ जनि॒ता दम्प॑ती कर्दे॒वस्त्वष्टा॑ सवि॒ता वि॒श्वरू॑पः ।
गर्भे नु नौ जनिता दम्पती इतिदम्-पती कः देवः त्वष्टा सविता विश्व-रूपः
खरोखर आपण उभयतां गर्भांत असतांनाच जगत्पित्याने, त्वष्टा देवाने, सर्वरूपधर सृष्टिकर्त्या सवित्याने आपणास पतिपत्नी करून टाकले आहे. तर त्या देवाच्या आज्ञा कोणी मोडतात काय ? आपण (पतिपत्नी) आहोत हे आकाशाला आणि पृथिवीला देखील माहीत आहे. ५.
को अ॒स्य वे॑द प्रथ॒मस्याह्नः॒ क ईं॑ ददर्श॒ क इ॒ह प्र वो॑चत् ।
कः अस्य वेद प्रथमस्य अह्नः कः ईं दृर्श कः इह प्र वोचत्
त्या अगदी पहिल्या दिवसाचे ज्ञान आज कोणाला आहे ? ही गोष्ट कोणी पाहिली आहे ? आणि आपण पाहिली असे येथे येऊन कोण सांगतो आहे ? मित्राचे, वरुणाचे तेजोभुवन किती महनीय आहे ? तर तरुण पुरुषांना मोहजाळाने हैराण करणार्या स्त्रिये, ही तूं काय बडबड चालविली आहेस ? ६.
य॒मस्य॑ मा य॒म्य१ं काम॒ आग॑न् समा॒ने योनौ॑ सह॒शेय्या॑य ।
यमस्य मा यम्यं कामः आ अगन् समाने योनौ सह-शेय्याय
यमाजवळ एकाच जागी, आणि एकाच शय्येवर शयन करावें अशी मला यमीला प्रबळ वासना झाली आहे; आणि पतीपुढे जशी पत्नी त्याप्रमाणे मी आपली काया तुजपुढे उघडी करते, तर रथाच्या चक्राप्रमाणे आपण एकमेकांकडे धांव घेऊ चला. ७.
न ति॑ष्ठन्ति॒ न नि मि॑षन्त्ये॒ते दे॒वानां॒ स्पश॑ इ॒ह ये चर॑न्ति ।
न तिष्ठन्ति न नि मिषन्ति एते देवानां स्पशः इह ये चरन्ति
छी छी, हे पहा, येथे जे देवाचे दूत वावरत आहेत ते एकाच जागी उभे राहत नाहीत किंवा झोपहि घेत नाहीत. समजलीस! हे कामुक स्त्रिये, तूं आतां झटदिशी मला सोडून दुसर्या कोणाकडे तरी जा. आणि रथाच्या चक्राप्रमाणे धांवत जाऊन त्याला कडकडून भेट. ८.
रात्री॑भिरस्मा॒ अह॑भिर्दशस्ये॒त् सूर्य॑स्य॒ चक्षु॒र्मुहु॒रुन् मि॑मीयात् ।
रात्रीभिः अस्मै अह-भिः दशस्येत् सूर्यस्य चक्षुः मुहुः उत् मिमीयात्
रात्रीच्या रात्री आणि दिवसाचे दिवस एकत्र राहतां येईल अशा रीतीने याला कोणी तरी माझ्या स्वाधीन करील काय ? सूर्याचा नेत्र वारंवार इकडे उघडून पाहील काय ? पहा, आकाश आणि पृथ्वि ही भावंडे असूनहि पतिपत्नी झाली आहेत, तशीच ही यमी देखील यमाचे पत्नीत्व धारण करील असें घडो ९.
आ घा॒ ता ग॑च्छा॒न् उत्त॑रा यु॒गानि॒ यत्र॑ जा॒मयः॑ कृ॒णव॒न्न् अजा॑मि ।
आ घ ता गच्चान् उत्-तरा युगानि यत्र जामयः कृणवन् अजामि
भावंडेंहि पतिपत्नी होतील असा काल पुढे येणारच आहे. पण ह्या वेळी तरी तूं आपल्या बाहूची उशी दुसर्या कोणा वीर्यशाली प्रियकराला अर्पण कर. हे भाग्यशालिनी, माझ्याशिवाय दुसरा कोणी तरी पति असावा अशी इच्छा धर. १०.
किं भ्राता॑स॒द्यद॑ना॒थं भवा॑ति॒ किं उ॒ स्वसा॒ यन् निरृ॑तिर्नि॒गच्छा॑त् ।
किं भ्राता असत् यत् अनाथं भवाति किं ओं इति स्वसा यत् निः-ऋतिः नि-गच्चात्
ज्याच्यामुळें बहिण अनाथ होते तो भाऊ कसचा ? आणि अशा रीतीनें जी अधोगतीला जाऊन पोंहोचते ती तरी बहीण कसली ? मी कामविव्हल झाल्याने हे असें पुष्कळच बहकू लागले आहे; तर आता आपल्या शरीराने माझ्या शरीराला आलिंगन देच. ११.
न वा उ॑ ते त॒न्वा त॒न्व१ं सं प॑पृच्यां पा॒पं आ॑हु॒र्यः स्वसा॑रं नि॒गच्छा॑त् ।
न वै ओं इति ते तन्वा तन्वं सं पपृच्यां पापं आहुः यः स्वसारं नि-गच्चात्
चल जा. तुझ्या शरीराशी मी आपले शरीर कदापि भिडवणार नाही. आपल्या भगिनीकडे जो जातो त्याला अधम म्हणतात बरे! तर हे भाग्यशालिनी, माझ्याशिवाय दुसर्या पुरुषापासून आनंद प्राप्त करून घे. मी तुझा भाऊ ह्या गोष्टीची मुळीच इच्छा करीत नाही १२.
ब॒तो ब॑तासि यम॒ नैव ते॒ मनो॒ हृद॑यं चाविदाम ।
बतः बत असि यम न एव ते मनः हृदयं च अविदाम
हाय, हाय, तूं खरोखरच यम-कृतांत आहेस; तुझे मन, तुझें हृदय इतके कठोर असेल हे मला माहित नव्हते; पण आता काय ? गळ्याभोंवती जसी माला किंवा वृक्षाभोंवती जसी लता, तसी दुसरी तरी कोणी स्त्री तुला आलिंगन देवो. १३.
अ॒न्यं ऊ॒ षु त्वं य॑म्य॒न्य उ॒ त्वां परि॑ ष्वजाते॒ लिबु॑जेव वृ॒क्षम् ।
अन्यं ओं इति सु त्वं यमि अन्यः ओं इति त्वां परि स्वजाते लिबुजाइव वृक्षं
हे यमी, तूं देखील आतां दुसर्या कोणाला तरी मनापासून वर, म्हणजे तोहि तुला असा कडकडून भेटेल. जणो काय वृक्ष आणि वेलच. त्याचे मन तूं ओढून घे; आणि तोहि तुझे घेईल. याप्रमाणे त्या पतिबरोबरच तूं सुखानंदपूर्ण विलास कर (म्हणजे तुझे कल्याण होईल). १४.
ॐ तत् सत् |