PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ७१ ते ८०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - ऋषभ वैश्वामित्र : देवता - पवमान सोम : छंद - जगती, त्रिष्टुप्


आ दक्षि॑णा सृज्यते शु॒ष्म्या३सदं॒ वेति॑ द्रु॒हो र॒क्षसः॑ पाति॒ जागृ॑विः ।
हरि॑रोप॒शं कृ॑णुते॒ नभ॒स्पय॑ उप॒स्तिरे॑ च॒म्वो३र्ब्रह्म॑ नि॒र्णिजे॑ ॥ १ ॥

आ दक्षिणा सृज्यते शुष्मी आसदं वेति द्रुहः रक्षसः पाति जागृविः
हरिः ओपशं कृणुते नभः पयः उप स्तिरे चम्वोः ब्रह्म निः निजे ॥ १ ॥

दक्षिणा धेनू दिली. दमदार सोमहि आपल्या आसनावर हौसेनें बसला. तो सदैव जागरूक राहणारा सोम, दुष्ट लोक आणि राक्षस यांच्यापासून भक्तांचें रक्षण करतो. तो हरिद्वर्ण सोम मेघमंडळाचा चांदवा बनवितो, आणि द्यावापृथिवीरूप चमूच्या आस्तरणासाठीं वृष्टि, आणि परिधानासाठीं प्रार्थनासूक्त निर्माण करतो १.


प्र कृ॑ष्टि॒हेव॑ शू॒ष ए॑ति॒ रोरु॑वदसु॒र्य१ ं वर्णं॒ नि रि॑णीते अस्य॒ तम् ।
जहा॑ति व॒व्रिं पि॒तुरे॑ति निष्कृ॒तं उ॑प॒प्रुतं॑ कृणुते नि॒र्णिजं॒ तना॑ ॥ २ ॥

प्र कृष्टिहा इव शूषः एति रोरुवत् असुर्यं वर्णं नि रिणीते अस्य तं
जहाति वव्रिं पितुः एति निः कृतं उप प्रुतं कृणुते निः निजं तना ॥ २ ॥

स्तवनीय सोम हा दुष्टांचा नाश करणाऱ्या वीराप्रमाणें गर्जना करीत संचार करतो, आणि आपलें तें अपूर्व दिव्यतेज लोकांच्या दृष्टीस पाडतो. तो आपलें जीर्ण आवरण टाकून देतो, जगत्‍ पित्याच्या गृहाकडे गमन करतो, आणि तेजस्वी जें दशापवित्र तें परिधान करतो २.


अद्रि॑भिः सु॒तः प॑वते॒ गभ॑स्त्योर्वृषा॒यते॒ नभ॑सा॒ वेप॑ते म॒ती ।
स मो॑दते॒ नस॑ते॒ साध॑ते गि॒रा ने॑नि॒क्ते अ॒प्सु यज॑ते॒ परी॑मणि ॥ ३ ॥

अद्रि भिः सुतः पवते गभस्त्योः वृषायते नभसा वेपते मती
सः मोदते नसते साधते गिरा नेनिक्ते अप् सु यजते परीमणि ॥ ३ ॥

ग्राव्यांनीं चुरलेला सोमरस ऋत्विजांच्या दोन्हीं हातांतून पात्रांत वहात आहे. नभोमंडळामुळें तो वीर्यभरानें फोंफावतो आणि मननस्तुतीनें हलून जातो. भक्ताच्या वाणीनें तो आनंदित होतो आणि त्यांचें सहाय करतो; उदकानें तो स्वच्छ होतो आणि देवाचें यजन करतो ३.


परि॑ द्यु॒क्षं सह॑सः पर्वता॒वृधं॒ मध्वः॑ सिञ्चन्ति ह॒र्म्यस्य॑ स॒क्षणि॑म् ।
आ यस्मि॒न् गावः॑ सुहु॒ताद॒ ऊध॑नि मू॒र्धञ् छ्री॒णन्त्य॑ग्रि॒यं वरी॑मभिः ॥ ४ ॥

परि द्युक्षं सहसः पर्वत वृधं मध्वः सिचन्ति हर्म्यस्य सक्षणिं
आ यस्मिन् गावः सुहुत आदः ऊधनि मूर्धन् श्रीणन्ति अग्रियं वरीम भिः ॥ ४ ॥

द्युलोकांत वास करणारा, धाडसाचा पर्वत वृद्धिंगत करणारा, आणि नभोमंडळापर्यंत जाऊन भिडणारा जो सोम, त्याचा मधुररस ऋत्विज्‍ लोक पात्रांत ओतीत आहेत. हुतहव्य भक्षण करणाऱ्या धेनू त्या रसामध्यें आपल्या कांसेंतील उत्कृष्ट दुग्ध मोठ्या सौजन्यानें मिसळून देतात ४.


सं ई॒ रथं॒ न भु॒रिजो॑रहेषत॒ दश॒ स्वसा॑रो॒ अदि॑तेरु॒पस्थ॒ आ ।
जिगा॒दुप॑ ज्रयति॒ गोर॑पी॒च्यं प॒दं यद॑स्य म॒तुथा॒ अजी॑जनन् ॥ ५ ॥

सं ईं इति रथं न भुरिजोः अहेषत दश स्वसारः अदितेः उप स्थे आ
जिगात् उप ज्रयति गोः अपीच्यं पदं यत् अस्य मतुथाः अजीजनन् ॥ ५ ॥

दोन्हीं हातांनीं रथ भरधांव हांकावा त्याप्रमाणें दहा भगिनींनीं त्याला अदितिसमीप भरवेगानें नेलें. तेव्हां प्रकाश धेनूंच्या गूढस्थानीं जाऊन तो थडकला. त्या स्थानाच्या अगदीं निकट गेला; तें स्थान त्याच्याच भावनांनीं उत्पन्न केलें होतें ५.


श्ये॒नो न योनिं॒ सद॑नं धि॒या कृ॒तं हि॑र॒ण्ययं॑ आ॒सदं॑ दे॒व एष॑ति ।
ए रि॑णन्ति ब॒र्हिषि॑ प्रि॒यं गि॒राश्वो॒ न दे॒वाँ अप्य् ए॑ति य॒ज्ञियः॑ ॥ ६ ॥

श्येनः न योनिं सदनं धिया कृतं हिरण्ययं आसदं देवः आ ईषति
आ ईं इति रिणन्ति बर्हिषि प्रियं गिरा अश्वः न देवान् अपि एति यजियः ॥ ६ ॥

ससाणा आपल्या घरट्याकडें जातो त्याप्रमाणें दीप्तिमान्‍ सोम ध्यानभक्तीनें सुवर्णमय झालेल्या स्थानीं आरूढ होण्याकरितां गमन करतो. भक्तजन सर्वप्रिय सोमाला स्तुतिवाणीनें कुशासनावर अधिष्ठित करतात; तेव्हां तो यज्ञार्ह सोमहि अश्वाप्रमाणें त्वरेनें दिव्यविभूतिंकडे जातो ६.


परा॒ व्यक्तो अरु॒षो दि॒वः क॒विर्वृषा॑ त्रिपृ॒ष्ठो अ॑नविष्ट॒ गा अ॒भि ।
स॒हस्र॑णीति॒र्यतिः॑ परा॒यती॑ रे॒भो न पू॒र्वीरु॒षसो॒ वि रा॑जति ॥ ७ ॥

परा वि अक्तः अरुषः दिवः कविः वृषा त्रि पृष्ठः अनविष्ट गाः अभि
सहस्र नीतिः यतिः परायतिः रेभः न पूर्वीः उषसः वि राजति ॥ ७ ॥

स्पष्टपणें दृग्गोच्चर, आरक्तवर्ण, ज्ञानी, आणि तीन स्थलीं वास करणाऱ्या त्या वीर्यशाली सोमानें दूरच्या द्युलोकांतून येऊन भक्तांच्या स्तवनवाणीची प्रशंसा केली. हजारों प्रकारांनीं मार्गदर्शक होणारा, आणि एकदां इकडे, एकदां तिकडे, याप्रमाणें संचार करणारा सोम प्रत्येक उष:कालीं दिव्य बन्दिजनाप्रमाणें आपल्या तेजानें विराजमान होतो ७.


त्वे॒षं रू॒पं कृ॑णुते॒ वर्णो॑ अस्य॒ स यत्राश॑य॒त् समृ॑ता॒ सेध॑ति स्रि॒धः ।
अ॒प्सा या॑ति स्व॒धया॒ दैव्यं॒ जनं॒ सं सु॑ष्टु॒ती नस॑ते॒ सं गोअ॑ग्रया ॥ ८ ॥

त्वेषं रूपं कृणुते वर्णः अस्य सः यत्र अशयत् सं ऋता सेधति स्रिधः
अप्साः याति स्वधया दैव्यं जनं सं सु स्तुती नसते सं गो अग्रया ॥ ८ ॥

त्याचा वर्ण तेजस्वी रूप धारण करतो. आणि तो जेथें स्वस्थ पडून राहतो तेथेंहि तो युद्धांत शत्रूंना ठार करतो. दिव्य उदकें स्वाधीन ठेवणारा सोम हा आपल्या स्वभावानुसार दिव्यविबुधांकडे जातो. आणि भक्तांच्या माधुर्यपूर्ण स्तुतीशीं रममाण होतो ८.


उ॒क्षेव॑ यू॒था प॑रि॒यन्न् अ॑रावी॒दधि॒ त्विषी॑रधित॒ सूर्य॑स्य ।
दि॒व्यः सु॑प॒र्णो॑ऽव चक्षत॒ क्षां सोमः॒ परि॒ क्रतु॑ना पश्यते॒ जाः ॥ ९ ॥

उक्षा इव यूथा परि यन् अरावीत् अधि त्विषीः अधित सूर्यस्य
दिव्यः सु पर्णः अव चक्षत क्षां सोमः परि क्रतुना पश्यते जाः ॥ ९ ॥

भक्तसमूहाभोंवतीं हिंडून पाहून त्यानें वृषभाप्रमाणें डुरकणी फोडली, आणि सूर्याची झळाळी आंगी धारण केली. दिव्य गरुडानें खालीं पृथिवीकडे अवलोकन केलें, त्याप्रमाणें सोमानेंहि आपल्या कर्तृत्वानें सकलजनांचें निरीक्षण केलें ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - हरिमन्त आंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


हरिं॑ मृजन्त्यरु॒षो न यु॑ज्यते॒ सं धे॒नुभिः॑ क॒लशे॒ सोमो॑ अज्यते ।
उद्वाचं॑ ई॒रय॑ति हि॒न्वते॑ म॒ती पु॑रुष्टु॒तस्य॒ कति॑ चित् परि॒प्रियः॑ ॥ १ ॥

हरिं मृजन्ति अरुषः न युज्यते सं धेनु भिः कलशे सोमः अज्यते
उत् वाचं ईरयति हिन्वते मती पुरु स्तुतस्य कति चित् परि प्रियः ॥ १ ॥

हरिद्वर्ण सोमाला ऋत्विज्‍ आलंकृत करितात. आरक्तवर्ण अश्वाप्रमाणें त्याला यज्ञाशीं जोडतात. म्हणून कलशामध्यें सोमरस दुग्धाशीं मिसळून ठेवला जातो. तो स्तुतीला स्फूर्ति देतो, मननाला प्रोत्साहन देतो. उघडच आहे कीं, परोपरीनें ज्याची स्तुति होते अशा सोमाला कोणता भक्त अत्यंत प्रिय नसेल ? १.


सा॒कं व॑दन्ति ब॒हवो॑ मनी॒षिण॒ इन्द्र॑स्य॒ सोमं॑ ज॒ठरे॒ यदा॑दु॒हुः ।
यदी॑ मृ॒जन्ति॒ सुग॑भस्तयो॒ नरः॒ सनी॑ळाभिर्द॒शभिः॒ काम्यं॒ मधु॑ ॥ २ ॥

साकं वदन्ति बहवः मनीषिणः इन्द्रस्य सोमं जठरे यत् आदुहुः
यदि मृजन्ति सु गभस्तयः नरः स नीळाभिः दश भिः काम्यं मधु ॥ २ ॥

जेव्हां इंद्राच्या हृत्कलशांत सोमरस ओततात तेव्हां असंख्य ज्ञानीभक्त एकदम नाना प्रकारांनीं देवाचे स्तवन करतात. आपले भुजदण्ड उत्तम ठेवणारे भक्त एकत्र झालेल्या आपल्या दहा अंगुलींनीं कमनीय आणि मधुर असें सोमपेय जेव्हां अलंकृत करतात, तेव्हांहि ते अशीच स्तुति करतात २.


अर॑ममाणो॒ अत्य् ए॑ति॒ गा अ॒भि सूर्य॑स्य प्रि॒यं दु॑हि॒तुस्ति॒रो रव॑म् ।
अन्व् अ॑स्मै॒ जोषं॑ अभरद्विनंगृ॒सः सं द्व॒यीभिः॒ स्वसृ॑भिः क्षेति जा॒मिभिः॑ ॥ ३ ॥

अरममाणः अति एति गाः अभि सूर्यस्य प्रियं दुहितुः तिरः रवं
अनु अस्मै जोषं अभरत् विनं गृसः सं द्वयीभिः स्वसृ भिः क्षेति जामि भिः ॥ ३ ॥

कधींहि विश्रांति न घेणारा सोम हा सूर्याच्या प्रभातरूप कन्येला प्रिय जो गीतध्वनि, त्याच्या आटोक्यापलीकडील ज्या उषा धेनू, त्यांच्या सन्मुख जातो; आणि ’विनंगृसा’ने त्याचा पूर्ण संतोष केला म्हणूनच दोन्ही नात्यानें ज्या सख्या बहिणी आहेत त्यांच्यासह तो वास करतो ३.


नृधू॑तो॒ अद्रि॑षुतो ब॒र्हिषि॑ प्रि॒यः पति॒र्गवां॑ प्र॒दिव॒ इन्दु॑ऋत्वियः॑ ।
पुरं॑धिवा॒न् मनु॑षो यज्ञ॒साध॑नः॒ शुचि॑र्धि॒या प॑वते॒ सोम॑ इन्द्र ते ॥ ४ ॥

नृ धूतः अद्रि सुतः बर्हिषि प्रियः पतिः गवां प्र दिवः इन्दुः ऋत्वियः
पुरन्धि वान् मनुषः यज साधनः शुचिः धिया पवते सोमः इन्द्र ते ॥ ४ ॥

शूरांनीं स्वच्छ धुतेलेला, ग्राव्यांनीं चुरलेला, यज्ञामध्यें सर्वप्रिय झालेला, प्रकाशधेनूंचा नाथ, पुरातन कालापासून आल्हादप्रद, योग्य ऋतूंत पालवणारा, सद्‍बुद्धींनीं मण्डित, मानवांचा हितकारी, यज्ञाचें साधन, आणि शुद्ध असा जो सोम, तो हे इंद्रा, तुझ्याप्रीत्यर्थ ध्यानभक्तीच्या योगानें वहात आहे ४.


नृबा॒हुभ्यां॑ चोदि॒तो धार॑या सु॒तोऽनुष्व॒धं प॑वते॒ सोम॑ इन्द्र ते ।
आप्राः॒ क्रतू॒न् सं अ॑जैरध्व॒रे म॒तीर्वेर्न द्रु॒षच् च॒म्वो३रास॑द॒द्धरिः॑ ॥ ५ ॥

नृबाहु भ्यां चोदितः धारया सुतः अनु स्वधं पवते सोमः इन्द्र ते
आ अप्राः क्रतून् सं अजैः अध्वरे मतीः वेः न द्रुषत् चम्वोः आ असदत् हरिः ॥ ५ ॥

शूर भक्तांच्या बाहूंनीं ढवळून हलविलेला, आणि प्रवाह वाहील अशा रीतीनें पिळलेला सोमरस, हे इंद्रा, तुझ्याप्रीत्यर्थ आपल्या स्वभावानुरूप स्वच्छ प्रवाहानें वहात आहे. त्यानें सर्व पुण्यकर्में व्यापून टाकलीं, अध्वरयागांत ध्यानप्रवृत्तींना प्रेरणा केली आणि वृक्षावर बसणाऱ्या पक्ष्याप्रमाणें तो हरित्पल्लव सोम द्युलोक आणि भूलोक ह्यांमध्यें दोन्हीं चमूपात्रांत अधिष्ठित झाला ५.


अं॒शुं दु॑हन्ति स्त॒नय॑न्तं॒ अक्षि॑तं क॒विं क॒वयो॑ऽ॒पसो॑ मनी॒षिणः॑ ।
सं ई॒ गावो॑ म॒तयो॑ यन्ति सं॒यत॑ ऋ॒तस्य॒ योना॒ सद॑ने पुन॒र्भुवः॑ ॥ ६ ॥

अंशुं दुहन्ति स्तनयन्तं अक्षितं कविं कवयः अपसः मनीषिणः
सं ईं इति गावः मतयः यन्ति सं यतः ऋतस्य योना सदने पुनः भुवः ॥ ६ ॥

ध्वनीनें नादित, नष्ट न होणारा, प्रतिभाशाली, अशा सोमल्लवाला पिळून, ज्ञानी, सत्कर्मशील, आणि आत्मवान्‍ भक्तजन त्याचें दुग्ध काढतात; अशा त्या सोमाशीं स्तुतिरूप धेनू, आणि भक्तांच्या मन:प्रवृत्ति परस्पर संलग्न होतात. सनातन सद्धर्माचें उत्पत्तिस्थान जें यज्ञमंदिर तेथेंच अशा स्तुतिधेनूंचा आणि मन:प्रवृत्तींचा पुन:पुन: संगम होतो ६.


नाभा॑ पृथि॒व्या ध॒रुणो॑ म॒हो दि॒वो३ऽ॒पां ऊ॒र्मौ सिन्धु॑ष्व् अ॒न्तरु॑क्षि॒तः ।
इन्द्र॑स्य॒ वज्रो॑ वृष॒भो वि॒भूव॑सुः॒ सोमो॑ हृ॒दे प॑वते॒ चारु॑ मत्स॒रः ॥ ७ ॥

नाभा पृथिव्याः धरुणः महः दिवः अपां ऊर्मौ सिन्धुषु अन्तः उक्षितः
इन्द्रस्य वज्रः वृषभः विभु वसुः सोमः हृदे पवते चारु मत्सरः ॥ ७ ॥

पृथ्वीच्या नाभिस्थानीं वेदीवर, जगदाधार अशा उच्च द्युलोकीं, उदकांच्या लहरींवर, नद्यांच्या अन्तर्भागीं सोमरसाचें सिंचन होतें. तोच सोम इंद्राचें वज्र होतो; तोच वृष्टिवर्षकवीर सर्वव्यापक धनाचा स्वामी होय. हर्षोत्फुल्ल करणारा सोमच देवाच्या हृदयांकडे सुंदर रीतीनें वाहतो ७.


स तू प॑वस्व॒ परि॒ पार्थि॑वं॒ रज॑ स्तो॒त्रे शिक्ष॑न्न् आधून्व॒ते च॑ सुक्रतो ।
मा नो॒ निर्भा॒ग् वसु॑नः सादन॒स्पृशो॑ र॒यिं पि॒शङ्गं॑ बहु॒लं व॑सीमहि ॥ ८ ॥

सः तु पवस्व परि पार्थिवं रजः स्तोत्रे शिक्षन् आधून्वते च सुक्रतो इतिसु क्रतो
मा नः निः भाक् वसुनः सादन स्पृशः रयिं पिशङ्गं बहुलं वसीमहि ॥ ८ ॥

अशा प्रकारें तूं पृथ्वीवरील रजोलोकांकडे सर्व बाजूंनीं वहात ये. तुजला धुवून स्वच्छ करणाऱ्या भक्ताला आणि स्तोतृजनाला वरदान देऊन, हे सत्कर्मप्रेरका सोमा, तूं वहात रहा. आमच्या मंदिराला जपून ठेवणाऱ्या वैभवापासून आमची ताटातूट करूं नको आणि सुवर्णमण्डित अशा महत्‍ वैभवाचें वस्त्र आम्हीं परिधान करूं असें कर ८.


आ तू न॑ इन्दो श॒तदा॒त्वश्व्यं॑ स॒हस्र॑दातु पशु॒मद्धिर॑ण्यवत् ।
उप॑ मास्व बृह॒ती रे॒वती॒रिषो॑ऽधि स्तो॒त्रस्य॑ पवमान नो गहि ॥ ९ ॥

आ तु नः इन्दो इति शत दातु अश्व्यं सहस्र दातु पशु मत् हिरण्य वत्
उप मास्व बृहतीः रेवतीः इषः अधि स्तोत्रस्य पवमान नः गहि ॥ ९ ॥

आल्हादप्रद सोमा, जें शेंकडों प्रकारांनीं दिलें जातें, किंबहुना हजारों प्रकारांनीं जें दिलें जाईल असें अश्वसंपन्न, गोसंपन्न, आणि सुवर्णसंपन्न वैभव आम्हांस अर्पण कर. श्रेष्ठ आणि दिव्यधनयुक्त मनोत्साह अर्पण कर, आणि हे पावनप्रवाहा ह्या आमच्या स्तवनाकडे अदत्य ये ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - पवित्र आंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - जगती


स्रक्वे॑ द्र॒प्सस्य॒ धम॑तः॒ सं अ॑स्वरन्न् ऋ॒तस्य॒ योना॒ सं अ॑रन्त॒ नाभ॑यः ।
त्रीन् स मू॒र्ध्नो असु॑रश्चक्र आ॒रभे॑ स॒त्यस्य॒ नावः॑ सु॒कृतं॑ अपीपरन् ॥ १ ॥

स्रक्वे द्रप्सस्य धमतः सं अस्वरन् ऋतस्य योना सं अरन्त नाभयः
त्रीन् सः मूर्ध्नः असुरः चक्रे आरभे सत्यस्य नावः सु कृतं अपीपरन् ॥ १ ॥

सोमबिन्दूच्या धों धों आवाज करणाऱ्या परंतु मिटलेल्या ओष्ठप्रान्तांनीं म्हणजे अभिषणफलकांनीं एकच कल्होळ उडवून दिला. रथचक्राचे तुंबे सद्धर्माच्या उद्‌गमस्थानीं धांवून गेले. त्रिभुवनाचीं तीन उच्चस्थानें भक्तांनीं आक्रमण करावीं म्हणून परमात्म्यानें उत्पन्न केलीं, आणि सत्याच्या नौका सत्कर्मरत भक्ताला दु:खाच्या पार नेत्या झाल्या १.


स॒म्यक् स॒म्यञ्चो॑ महि॒षा अ॑हेषत॒ सिन्धो॑रू॒र्माव् अधि॑ वे॒ना अ॑वीविपन् ।
मधो॒र्धारा॑भिर्ज॒नय॑न्तो अ॒र्कं इत् प्रि॒यां इन्द्र॑स्य त॒न्वं अवीवृधन् ॥ २ ॥

सम्यक् सम्यचः महिषाः अहेषत सिन्धोः ऊर्मौ अधि वेनाः अवीविपन्
मधोः धाराभिः जनयन्तः अर्कं इत् प्रियां इन्द्रस्य तन्वं अवीवृधन् ॥ २ ॥

उत्तम रीतीनें एकत्र वास करणाऱ्या महाजनांनीं नदीच्या कल्लोलांत सोमाला सरसावून दिलें तेव्हां भक्तीच्या मनोहर वाणी स्तुति गुणगुणू लागल्या आणि मधुर रसाच्या धारांनीं “अर्क” स्तोत्र म्हणून इंद्राला प्रिय जी भक्तिरूप तनू तिला वृद्धिंगत केलें २.


प॒वित्र॑वन्तः॒ परि॒ वाचं॑ आसते पि॒तैषां॑ प्र॒त्नो अ॒भि र॑क्षति व्र॒तम् ।
म॒हः स॑मु॒द्रं वरु॑णस्ति॒रो द॑धे॒ धीरा॒ इच् छे॑कुर्ध॒रुणे॑ष्व् आ॒रभ॑म् ॥ ३ ॥

पवित्र वन्तः परि वाचं आसते पितआ एषां प्रत्नः अभि रक्षति व्रतं
महः समुद्रं वरुणः तिरः दधे धीराः इत् शेकुः धरुणेषु आरभम् ॥ ३ ॥

पवित्र हातीं घेतलेले भक्त देवाची स्तुति चालली असतांना भोवतीं जमतात. कारण पुराणपुरुष जो जगत्‍ पिता तो ह्या सत्याच्या धर्माचें सर्वस्वी रक्षण करतो. श्रेष्ठ वरुणानें अन्तरिक्ष समुद्राला जेव्हां झांकून टाकलें, तेव्हां केवळ ध्याननिरत भक्तच नित्य व्यवसायांमध्यें त्याला चिकटून राहूं शकले ३.


स॒हस्र॑धा॒रे॑ऽव॒ ते सं अ॑स्वरन् दि॒वो नाके॒ मधु॑जिह्वा अस॒श्चतः॑ ।
अस्य॒ स्पशो॒ न नि मि॑षन्ति॒ भूर्ण॑यः प॒दे-प॑दे पा॒शिनः॑ सन्ति॒ सेत॑वः ॥ ४ ॥

सहस्र धारे अव ते सं असरन् दिवः नाके मधु जिह्वाः असश्चतः
अस्य स्पशः न नि मिषन्ति भूर्णयः पदे पदे पाशिनः सन्ति सेतवः ॥ ४ ॥

अत्युच्च द्युलोकाच्या प्रदेशांत निरंतर वाहणाऱ्या त्या मधुरभाषी सोमानीं सहस्रावधि छिद्राच्या पवित्रांत एकच निनाद उठवून दिला. ह्याचे भिरिभिरी धांवणारे सेवक कधींहि डोळे मिटून स्वस्थ बसत नाहींत, तर हातांत प्रतिबंधक पाश घेऊन ते ठिकठिकाणीं असतातच ४.


पि॒तुर्मा॒तुरध्य् आ ये स॒मस्व॑रन्न् ऋ॒चा शोच॑न्तः सं॒दह॑न्तो अव्र॒तान् ।
इन्द्र॑द्विष्टां॒ अप॑ धमन्ति मा॒यया॒ त्वचं॒ असि॑क्नीं॒ भूम॑नो दि॒वस्परि॑ ॥ ५ ॥

पितुः मातुः अधि आ ये सं अस्वरन् ऋचा शोचन्तः सं दहन्तः अव्रतान्
इन्द्र द्विष्टां अप धमन्ति मायया त्वचं असिक्नीं भूमनः दिवः परि ॥ ५ ॥

जगत्‍ पित्याच्या आणि मातेच्या सन्निध, ऋचेनें उज्ज्वल झालेल्या आणि धर्मभ्रष्टांस जाळून टाकणाऱ्या परिचारकांनीं एकच घोष केला. इंद्राचा द्वेष करणारे जे कृष्णवर्ण पाखांडी दुष्ट त्यांना ते आपल्या अतर्क्य गूढ शक्तीनें भूमीवरून जोरानें उडवून आकाशांत भोवंडून ठार करतात ५.


प्र॒त्नान् माना॒दध्य् आ ये स॒मस्व॑र॒ञ् छ्लोक॑यन्त्रासो रभ॒सस्य॒ मन्त॑वः ।
अपा॑न॒क्षासो॑ बधि॒रा अ॑हासत ऋ॒तस्य॒ पन्थां॒ न त॑रन्ति दु॒ष्कृतः॑ ॥ ६ ॥

प्रत्नात् मानात् अधि आ ये सं अस्वरन् श्लोक यन्त्रासः रभसस्य मन्तवः
अप अनक्षासः बधिराः अहासत ऋतस्य पन्थां न तरन्ति दुः कृतः ॥ ६ ॥

जे पुरातन प्रमाणापासून च्युत होऊन भलताच घोष करूं लागले, जे स्तुतिस्तोत्रांवर नियंत्रण घालूं लागले; जे सर्वत्र धुमाकूळ घालण्याच्या विचारांत निमग्न झाले, ते खरोखरच आंधळे आहेत, ते बहिरेहि आहेत. त्यांनीं सनातन धर्ममार्गाचा त्याग केला. त्या दुराचरणी दुष्टांचा कधींही उद्धार होणार नाहीं ६.


स॒हस्र॑धारे॒ वित॑ते प॒वित्र॒ आ वाचं॑ पुनन्ति क॒वयो॑ मनी॒षिणः॑ ।
रु॒द्रास॑ एषां इषि॒रासो॑ अ॒द्रुह॒ स्पशः॒ स्वञ्चः॑ सु॒दृशो॑ नृ॒चक्ष॑सः ॥ ७ ॥

सहस्र धारे वि तते पवित्रे आ वाचं पुनन्ति कवयः मनीषिणः
रुद्रासः एषां इषिरासः अद्रुहः स्पशः सु अचः सु दृशः नृ चक्षसः ॥ ७ ॥

परंतु मनाला कह्यांत ठेवणारे जे ज्ञानी ते हजारों धारांचें पवित्र पसरून त्यावर सोमरस गाळतांना आपली स्तुतिवाणी पवित्र करतात. अशा पुण्यशीलांचे सहयकर्ते कोण म्हणाल, तर तीव्रवेगी, द्वेषरहित, अत्युत्कृष्ट, प्रियदर्शन आणि सर्वदर्शी मरुत्‍ हेच. ७.


ऋ॒तस्य॑ गो॒पा न दभा॑य सु॒क्रतु॒स्त्री ष प॒वित्रा॑ हृ॒द्य् अ१न्तरा द॑धे ।
वि॒द्वान् स विश्वा॒ भुव॑ना॒भि प॑श्य॒त्यवाजु॑ष्टान् विध्यति क॒र्ते अ॑व्र॒तान् ॥ ८ ॥

ऋतस्य गोपाः न दभाय सु क्रतुः त्री सः पवित्रा हृदि अन्तः आ दधे
विद्वान् सः विश्वा भुवना अभि पश्यति अव अजुष्टान् विध्यति कर्ते अव्रतान् ॥ ८ ॥

सद्धर्माचा पालक आणि सत्कर्मकारी जो प्रभू त्याला कोणीहि ठकवूं शकत नाहीं; त्यानें मानवी हृदयांत तीन पवित्र वस्तु ठेवल्या आहेत. तो सर्वज्ञ देव सर्व भुवनें निरीक्षण करतो. आणि तिरस्करणीय असे जे अधार्मिक दुष्ट त्यांना त्यांचें दुष्कर्म चालू असतांनाच भोंसकून ठार करतो. ८.


ऋ॒तस्य॒ तन्तु॒र्वित॑तः प॒वित्र॒ आ जि॒ह्वाया॒ अग्रे॒ वरु॑णस्य मा॒यया॑ ।
धीरा॑श्चि॒त् तत् स॒मिन॑क्षन्त आश॒तात्रा॑ क॒र्तं अव॑ पदा॒त्यप्र॑भुः ॥ ९ ॥

ऋतस्य तन्तुः वि ततः पवित्रे आ जिह्वायाः अग्रे वरुणस्य मायया
धीराः चित् तत् सं इनक्षन्तः आशत अत्र कर्तं अव पदाति अप्र भुः ॥ ९ ॥

सद्धर्माचा तंतु सोमपवित्रावर उलगडून ठेवला आहे. आणि वरुणाच्या अतर्क्य शक्तीनें तो भक्ताच्या जिव्हेच्या अग्रावरहि आहे. प्रज्ञावान्‍ जे भक्त असतात ते समजूनच सद्धर्माचा तंतु स्वाधीन करून घेतात. परंतु हें काम करण्याला जो असमर्थ असेल तो मात्र धडपडत खालीं पडतो ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कक्षीवत् दैर्घतमस : देवता - पवमान सोम : छंद - जगती, त्रिष्टुप्


शिशु॒र्न जा॒तो॑ऽव चक्रद॒द्वने॒ स्व१ र्यद्वा॒ज्य् अरु॒षः सिषा॑सति ।
दि॒वो रेत॑सा सचते पयो॒वृधा॒ तं ई॑महे सुम॒ती शर्म॑ स॒प्रथः॑ ॥ १ ॥

शिशुः न जातः अव चक्रदत् वने स्वः यत् वाजी अरुषः सिसासति
दिवः रेतसा सचते पयः वृधा तं ईमहे सु मती शर्म स प्रथः ॥ १ ॥

नुकत्याच उपजलेल्या बालकाप्रमाणें तो वनामध्यें खालीं वांकून मोठ्यानें गर्जना करितो; कारण, अरुणवर्ण सत्वाढ्य वीर स्वर्लोक जिंकण्याला उद्युक्त होत आहे. उदकाची भरपूर वृद्धि करणारें जें द्युलोकांतील बीज त्याच्याबरोबर जो नेहमीं असतो त्या सोमाजवळ आम्हीं सद्‍बुद्धीनें त्याचा उदार आश्रय मागत आहों १.


दि॒वो य स्क॒म्भो ध॒रुणः॒ स्वातत॒ आपू॑र्णो अं॒शुः प॒र्येति॑ वि॒श्वतः॑ ।
सेमे म॒ही रोद॑सी यक्षदा॒वृता॑ समीची॒ने दा॑धार॒ सं इषः॑ क॒विः ॥ २ ॥

दिवः यः स्कम्भः धरुणः सु आततः आपूर्णः अंशुः परि एति विश्वतः
सः इमे इति मही इति रोदसी इति यक्षत् आवृता समीचीने इतिसं ईचीने दाहार सं इषः कविः ॥ २ ॥

जो हा द्युलोकाचा अतिविस्तीर्ण आधारस्तंभ, जो हा परिपूर्ण भरलेला किरणपल्लव, तो सर्व बाजूंनीं सर्वत्र संचार करतो; तोच ह्या आच्छादित आणि उत्तम रीतीनें एकत्र वास करणाऱ्या थोर द्यावापृथिवींना संतुष्ट करो. त्याच काव्यप्रेरक देवानें मनोत्साहाचें धारण केलें आहे २.


महि॒ प्सरः॒ सुकृ॑तं सो॒म्यं मधू॒र्वी गव्यू॑ति॒रदि॑तेऋतं य॒ते ।
ईशे॒ यो वृ॒ष्टेरि॒त उ॒स्रियो॒ वृषा॒पां ने॒ता य इ॒तऊ॑तिरृ॒ग्मियः॑ ॥ ३ ॥

महि प्सरः सु कृतं सोम्यं मधु उर्वी गव्यूतिः अदितेः ऋतं यते
ईशे यः वृष्टेः इतः उस्रियः वृषा अपां नेता यः इतः ऊतिः ऋग्मियः ॥ ३ ॥

उत्तम रीतीनें बनविलेले नामांकित पक्वान्न म्हणजे मधुर सोमपेय, आणि धेनूसाठीं अदितीचा विस्तृत प्रदेश अशी देणगी सद्धर्मानें वागणाऱ्या भक्तांकरितांच आहे. प्रकाशशाली वृषभ जो सोम तो येथूनच पर्जन्यवृष्टीवर अधिकार चालवितो; जो येथें येऊन भक्तांचें रक्षण करतो तोच सोम दिव्य उदकांचा धुरीण आहे. ऋक्स्तोत्रांनीं प्रशंसा करण्यास तोच योग्य होय ३.


आ॒त्म॒न्वन् नभो॑ दुह्यते घृ॒तं पय॑ ऋ॒तस्य॒ नाभि॑र॒मृतं॒ वि जा॑यते ।
स॒मी॒ची॒नाः सु॒दान॑वः प्रीणन्ति॒ तं नरो॑ हि॒तं अव॑ मेहन्ति॒ पेर॑वः ॥ ४ ॥

आत्मन् वत् नभः दुह्यते घृतं पयः ऋतस्य नाभिः अमृतं वि जायते
समीचीनाः सु दानवः प्रीणन्ति तं नरः हितं अव मेहन्ति पेरवः ॥ ४ ॥

आत्म्यानें व्याप्त असें जें आकाश त्याच्यापासून उदकरूप घृताचें दोहन होतें. सद्धर्माचा गाभा म्हणजे अमृत, तेंहि तेथूनच उत्पन्न होतें. म्हणून उत्तम रीतीनें एकत्र राहणारे दानशूर भक्त त्याच्यावरच प्रेम करतात, सर्वांना पार पाडणारे शूर भक्त त्या हितकर सोमाकडूनच उदकाचा वर्षाव करवितात ४.


अरा॑वीदं॒शुः सच॑मान ऊ॒र्मिणा॑ देवा॒व्य१ ं मनु॑षे पिन्वति॒ त्वच॑म् ।
दधा॑ति॒ गर्भं॒ अदि॑तेरु॒पस्थ॒ आ येन॑ तो॒कं च॒ तन॑यं च॒ धाम॑हे ॥ ५ ॥

अरावीत् अंशुः सचमानः ऊर्मिणा देव अव्यं मनुषे पिन्वति त्वचं
दधाति गर्भं अदितेः उप स्थे आ येन तोकं च तनयं च धामहे ॥ ५ ॥

उदककल्लोळांनीं चिंब झालेल्या सोमरसानें मोठ्यानें गर्जना केली, मानवांच्या हिताकरितां आपला देवसेवेला योग्य असा पल्लव तो टवटवीत करितो. आणि अदितीच्या सन्निध तो आपला अंकुर असा ठेवतो कीं, त्या योगानें आम्हांला पुत्रपौत्राचा लाभ घडतो ५.


स॒हस्र॑धा॒रे॑ऽव॒ ता अ॑स॒श्चत॑स्तृ॒तीये॑ सन्तु॒ रज॑सि प्र॒जाव॑तीः ।
चत॑स्रो॒ नाभो॒ निहि॑ता अ॒वो दि॒वो ह॒विर्भ॑रन्त्य॒मृतं॑ घृत॒श्चुतः॑ ॥ ६ ॥

सहस्र धारे अव ताः असश्चतः तृतीये सन्तु रजसि प्रजावतीः
चतस्रः नाभः नि हिताः अवः दिवः हविः भरन्ति अमृतं घृत श्चुतः ॥ ६ ॥

हजारों छिद्रांच्या पवित्रांतून, त्याच्या तिसऱ्या रजपटलांतून, प्रजेला हितकर अशा अविरतप्रवाही धारा वहात राहोत. त्या सोमाचे चार मुख्य भाग द्युलोकाच्या खालींच ठेवलेले आहेत, ते घृतानें थबथबले म्हणजे अमृतमय हविर्भाग देवाकडे नेतात ६.


श्वे॒तं रू॒पं कृ॑णुते॒ यत् सिषा॑सति॒ सोमो॑ मी॒ढ्वाँ असु॑रो वेद॒ भूम॑नः ।
धि॒या शमी॑ सचते॒ सें अ॒भि प्र॒वद्दि॒वस्कव॑न्धं॒ अव॑ दर्षदु॒द्रिण॑म् ॥ ७ ॥

श्वेतं रूपं कृणुते यत् सिसासति सोमः मीढवान् असुरः वेद भूमनः
धिया शमी सचते सः ईं अभि प्र वत् दिवः कवन्धं अव दर्षत् उद्रिणम् ॥ ७ ॥

शुभ्र आणि तेजस्वी असें रूप सोम स्वत: धारण करतो; आणि तसेंच रूप तो भक्तांना मिळवून देतो. सोम हा कामनावर्षक ईश्वरांश आहे. तो विपुल वरदान देतो. उतरत्या जागेकडे उदक धांवते त्याप्रमाणें यज्ञकर्माकडे ध्यानानें आणि सत्कर्मानें सहज येतो; आणि उदकानें तुडुंब भरलेल्या द्युलोकाच्या पटलाला बुडाशीं छेद पाडतो ७.


अध॑ श्वे॒तं क॒लशं॒ गोभि॑र॒क्तं कार्ष्म॒न्न् आ वा॒ज्य् अक्रमीत् सस॒वान् ।
आ हि॑न्विरे॒ मन॑सा देव॒यन्तः॑ क॒क्षीव॑ते श॒तहि॑माय॒ गोना॑म् ॥ ८ ॥

अध श्वेतं कलशं गोभिः अक्तं कार्ष्मन् आ वाजी अक्रमीत् सस वान्
आ हिन्विरे मनसा देव यन्तः कक्षीवते शत हिमाय गोनाम् ॥ ८ ॥

शुभ्रवर्ण आणि दुग्धपूर्ण कलशाकडे सत्वाढ्य सोम, जयेच्छु योद्धा रणाकडे धांवतो त्याप्रमाणें, धांवत गेला, तेव्हां मन:पूर्वक देवोत्सुक झालेल्या भक्तांनीं शंभर वर्षे जगलेल्या वृद्ध कक्षीवानाकडे धेनूंची देणगी पाठविली ८.


अ॒द्भिः सो॑म पपृचा॒नस्य॑ ते॒ रसो॑ऽव्यो॒ वारं॒ वि प॑वमान धावति ।
स मृ॒ज्यमा॑नः क॒विभि॑र्मदिन्तम॒ स्वद॒स्वेन्द्रा॑य पवमान पी॒तये॑ ॥ ९ ॥

अत् भिः सोम पपृचानस्य ते रसः अव्यः वारं वि पवमान धावति
सः मृज्यमानः कवि भिः मदिन् तम स्वदस्व इन्द्राय पवमान पीतये ॥ ९ ॥

सोमा, उदकांशीं मिश्र झालेला जो तूं, त्या तुझा रस, हे पावना, लोंकरीच्या पवित्रांतून पहा कसा झरझर वहात आहे. प्रतिभावान्‍ भक्तांनीं तुजला अलंकृत केलें आहे, तर हे अत्यंत हर्षकरा, हे पावना, इंद्रानें प्राशन करावें म्हणून तूं मधुररुचिप्रद हो ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - जगती


अ॒भि प्रि॒याणि॑ पवते॒ चनो॑हितो॒ नामा॑नि य॒ह्वो अधि॒ येषु॒ वर्ध॑ते ।
आ सूर्य॑स्य बृह॒तो बृ॒हन्न् अधि॒ रथं॒ विष्व॑ञ्चं अरुहद्विचक्ष॒णः ॥ १ ॥

अभि प्रियाणि पवते चनः हितः नामानि यह्वः अधि येषु वर्धते
आ सूर्यस्य बृहतः बृहन् अधि रथं विष्वचं अरुहत् वि चक्षणः ॥ १ ॥

सर्वप्रिय आणि प्रभावशाली सोम हा देवाच्या ज्या नांवामध्यें तल्लीन होतो, त्या नांवाकरितां वहात राहतो. थोर आणि सूक्ष्मज्ञानी सोमानें थोर सूर्याच्या सर्वगामी रथावर आरोहण केलें १.


ऋ॒तस्य॑ जि॒ह्वा प॑वते॒ मधु॑ प्रि॒यं व॒क्ता पति॑र्धि॒यो अ॒स्या अदा॑भ्यः ।
दधा॑ति पु॒त्रः पि॒त्रोर॑पी॒च्य१ ं नाम॑ तृ॒तीयं॒ अधि॑ रोच॒ने दि॒वः ॥ २ ॥

ऋतस्य जिह्वा पवते मधु प्रियं वक्ता पतिः धियः अस्याः अदाभ्यः
दधाति पुत्रः पित्रोः अपीच्यं नाम तृतीयं अधि रोचने दिवः ॥ २ ॥

सद्धर्माची वाणी प्रिय आणि मधुर असा रसप्रवाह सोडते. त्या वाणीचा जो वक्ता तो ह्या ध्यानबुद्धीचा पति होय. तो अजिंक्य आहे. म्हणून तो पुत्र आपल्या मातापितरांचें तिसरें जें गूढ नामाभिधान तें तेज:पुंज द्युलोकाच्या प्रदेशीं गुप्त ठेवतो. २.


अव॑ द्युता॒नः क॒लशा॑ँ अचिक्रद॒न् नृभि॑र्येमा॒नः कोश॒ आ हि॑र॒ण्यये॑ ।
अ॒भीं ऋ॒तस्य॑ दो॒हना॑ अनूष॒ताधि॑ त्रिपृ॒ष्ठ उ॒षसो॒ वि रा॑जति ॥ ३ ॥

अव द्युतानः कलशान् अचिक्रदन् नृ भिः वेमानः कोशे आ हिरण्यये
अभि ईं ऋतस्य दोहनाः अनूषत अधि त्रि पृष्ठः उषसः वि राजति ॥ ३ ॥

दीप्तीमान्‍ सोम शूर ऋत्विजांनीं सुवर्णाच्या सांठवणींत ठेऊन पिळला म्हणजे खालीं ठेवलेल्या कलशांत वहातांना गर्जना करितो. सत्यधर्माचें दोहन करणाऱ्या ऋत्विजांनीं सोमाचें स्तवन केलें तेव्हां तीन पृष्ठभागीं अधिष्ठित झालेला सोम उष:कालीं आपल्या तेजानें शोभूं लागला ३.


अद्रि॑भिः सु॒तो म॒तिभि॒श्चनो॑हितः प्ररो॒चय॒न् रोद॑सी मा॒तरा॒ शुचिः॑ ।
रोमा॒ण्य् अव्या॑ स॒मया॒ वि धा॑वति॒ मधो॒र्धारा॒ पिन्व॑माना दि॒वे-दि॑वे ॥ ४ ॥

अद्रि भिः सुतः मति भिः चनः हितः प्र रोचयन् रोदसी इति मातरा शुचिः
रोमाणि अव्या समया वि धावति मधोः धारा पिन्वमाना दिवे दिवे ॥ ४ ॥

ग्राव्यांनीं पिळलेला आणि मन:पूर्वक केलेल्या स्तुतींनीं देवाला प्रिय झालेला शुद्ध सोमरस जगताचीं मातापितरें ज्या द्यावापृथिवी त्यांना उज्ज्वल करून ऊर्णावस्त्राच्या पवित्रावर त्याच्या भोंवतीं अनेक प्रकारानें वहात आहे; त्या मधुर सोमाची धार भरगच्च फुगलेली असते ४.


परि॑ सोम॒ प्र ध॑न्वा स्व॒स्तये॒ नृभिः॑ पुना॒नो अ॒भि वा॑सया॒शिर॑म् ।
ये ते॒ मदा॑ आह॒नसो॒ विहा॑यस॒स्तेभि॒रिन्द्रं॑ चोदय॒ दात॑वे म॒घम् ॥ ५ ॥

परि सोम प्र धन्व स्वस्तये नृ भिः पुनानः अभि वासय आशिरं
ये ते मदाः आहनसः वि हायसः तेभिः इन्द्रं चोदय दातवे मघम् ॥ ५ ॥

हे सोमा, जगाच्या कल्याणासाठीं, शूर ऋत्विजांनीं तुजला गाळून स्वच्छ केलें आहे, तर तूं सर्व बाजूंनीं वहात रहा. आणि तुझे जे हर्षोत्फुल्ल करणारे आणि खळखळाट उडविणारे उत्तुंग रसप्रवाह त्यांच्या योगानें, आम्हांला वरप्रसाद देण्याची इच्छा तूं इंद्रामध्यें उत्पन्न कर ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - जगती


ध॒र्ता दि॒वः प॑वते॒ कृत्व्यो॒ रसो॒ दक्षो॑ दे॒वानां॑ अनु॒माद्यो॒ नृभिः॑ ।
हरिः॑ सृजा॒नो अत्यो॒ न सत्व॑भि॒र्वृथा॒ पाजां॑सि कृणुते न॒दीष्व् आ ॥ १ ॥

धर्ता दिवः पवते कृत्व्यः रसः दक्षः देवानां अनु माद्यः नृ भिः
हरिः सृजानः अत्यः न सत्व भिः वृथा पाजांसि कृणुते नदीषु आ ॥ १ ॥

द्युलोकाचा धारक, कर्तृत्ववान्‍ आणि दिव्यविभूतिंमध्यें चतुर असा सोमरस वहात आहे, त्याची प्रशंसा भक्तांनीं करावी हें अगदीं योग्य. सत्वाढ्यवीरांनीं भरधांव फेंकलेल्या अश्वांप्रमाणें हरिद्वर्ण सोम हा नदीच्या उदकांत आपलें तेजोबल सहजगत्या प्रकट करतो. १.


शूरो॒ न ध॑त्त॒ आयु॑धा॒ गभ॑स्त्योः॒ स्व१ ः सिषा॑सन् रथि॒रो गवि॑ष्टिषु ।
इन्द्र॑स्य॒ शुष्मं॑ ई॒रय॑न्न् अप॒स्युभि॒रिन्दु॑र्हिन्वा॒नो अ॑ज्यते मनी॒षिभिः॑ ॥ २ ॥

शूरः न धत्ते आयुधा गभस्त्योः स्वर् इति स्वः सिसासन् रथिरः गो इष्टिषु
इन्द्रस्य शुष्मं ईरयन् अपस्यु भिः इन्दुः हिन्वानः अज्यते मनीषि भिः ॥ २ ॥

शूराप्रमाणें, प्रकाशधेनू जिंकण्याच्या झुंजांत स्वर्गीय प्रकाश स्वाधीन करून घेणारा हा योद्धा आपल्या दोन्हीं हातांत आयुधें बाळगितो. इंद्राच्या प्रतापाला प्रोत्साहन देणारा हा आल्हादप्रद सोमरस कर्मनिष्ठ भक्तांनीं ढवळला आहे. आणि मनोजय करणाऱ्या भक्तांनीं दुग्धाशीं मिश्रित केला आहे. २.


इन्द्र॑स्य सोम॒ पव॑मान ऊ॒र्मिणा॑ तवि॒ष्यमा॑णो ज॒ठरे॒ष्व् आ वि॑श ।
प्र णः॑ पिन्व वि॒द्युद॒भ्रेव॒ रोद॑सी धि॒या न वाजा॒ँ उप॑ मासि॒ शश्व॑तः ॥ ३ ॥

इन्द्रस्य सोम पवमानः ऊर्मिणा तविष्यमाणः जठरेषु आ विश
प्र नः पिन्व वि द्युत् अभ्रा इव रोदसी इति धिया न वाजान् उप मासि शश्वतः ॥ ३ ॥

सोमा, तूं कल्लोळानें आपला जोम प्रत्ययास आणतोस; तर तूं स्वच्छ प्रवाहानें वहात राहून इंद्राच्या द्रोण कलशरूप उदरांत प्रवेश कर. मेघाला ज्याप्रमाणें विद्युत्‍ त्याप्रमाणें द्यावापृथिवींना तूं आमच्यासाठीं समृद्ध कर. ध्यानयुक्तीनें तूं भक्तांना सत्वसामर्थ्याच्या जवळ नेतोस ३.


विश्व॑स्य॒ राजा॑ पवते स्व॒र्दृश॑ ऋ॒तस्य॑ धी॒तिं ऋ॑षि॒षाळ॑वीवशत् ।
यः सूर्य॒स्यासि॑रेण मृ॒ज्यते॑ पि॒ता म॑ती॒नां अस॑मष्टकाव्यः ॥ ४ ॥

विश्वस्य राजा पवते स्वः दृशः ऋतस्य धीतिं ऋषिषाट् अवीवशत्
यः सूर्यस्य असिरेण मृज्यते पिता मतीनां असमष्ट काव्यः ॥ ४ ॥

विश्वाचा राजा, दिव्य प्रकाशदर्शक असा सोम स्वच्छ प्रवाहाने वहात आहे. ऋषींच्या अशा या धुरीणानें सनातन सत्याचें मनन चालविलें. जो सूर्याच्या तीव्र किरणांनीं घांसला जातो, तो हा सोम सन्मतींचा पिता होय. कवनांनीं याचें आकलन होतच नाहीं ४.


वृषे॑व यू॒था परि॒ कोशं॑ अर्षस्य् अ॒पां उ॒पस्थे॑ वृष॒भः कनि॑क्रदत् ।
स इन्द्रा॑य पवसे मत्स॒रिन्त॑मो॒ यथा॒ जेषा॑म समि॒थे त्वोत॑यः ॥ ५ ॥

वृषा इव यूथा परि कोशं अर्षसि अपां उप स्थे वृषभः कनिक्रदत्
सः इन्द्राय पवसे मत्सरिन् तमः यथा जेषाम सं इथे त्वा ऊतयः ॥ ५ ॥

वृषभ जसा गोसमूहाकडे, त्याप्रमाणें तूं चोहोंकडून द्रोण कलशांकडे धांवतोस. नदी प्रवाहाजवळ त्या वृषभानें डुरकणी फोडलीच. हे अत्यंत हर्षप्रदा सोमा, तूं इंद्रासाठीं स्वच्छ प्रवाहानें वहातोस, तर तूं संरक्षण केलेले आम्हीं भक्त संग्रामामध्यें विजयी होऊं असें कर ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७७ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - जगती


ए॒ष प्र कोशे॒ मधु॑माँ अचिक्रद॒दिन्द्र॑स्य॒ वज्रो॒ वपु॑षो॒ वपु॑ष्टरः ।
अ॒भीं ऋ॒तस्य॑ सु॒दुघा॑ घृत॒श्चुतो॑ वा॒श्रा अ॑र्षन्ति॒ पय॑सेव धे॒नवः॑ ॥ १ ॥

एषः प्र कोशे मधु मान् अचिक्रदत् इन्द्रस्य वज्रः वपुषः वपुः तरः
अभि ईं ऋतस्य सु दुघाः घृत श्चुतः वाश्राः अर्षन्ति पयसा इव धेनवः ॥ १ ॥

हा मधुर रस कलशांत खळखळत वहात गेला. मनोहर वस्तूपेक्षां मनोहर असा हा सोमरस इंद्राचें वज्रच होय. म्हणून विपुल दुग्ध देणाऱ्या, घृतानें ओथंबणाऱ्या धेनू हंबारत प्रवाहाप्रमाणें त्याच्याकडे धांवतात १.


स पू॒र्व्यः प॑वते॒ यं दि॒वस्परि॑ श्ये॒नो म॑था॒यदि॑षि॒तस्ति॒रो रजः॑ ।
स मध्व॒ आ यु॑वते॒ वेवि॑जान॒ इत् कृ॒शानो॒रस्तु॒र्मन॒साह॑ बि॒भ्युषा॑ ॥ २ ॥

सः पूर्व्यः पवते यं दिवः परि श्येनः मथायत् इषितः तिरः रजः
सः मध्वः आ युवते वेविजानः इत् कृशानोः अस्तुः मनसा अह बिभ्युषा ॥ २ ॥

तो हा पुरातन सोम, की ज्याला श्येनानें द्युलोकांतून एकदम उचलून आणलें, आणि जो रजोलोकांतूंन नीट खालीं सोडला गेला, तो स्वच्छ प्रवाहानें वहात आहे. धनुर्धर कृशानूच्या पुढें कांपत कांपत येणारा पल्लव भ्यालेल्या मनानेंच जणों मधुर रस निराळा करतो २.


ते नः॒ पूर्वा॑स॒ उप॑रास॒ इन्द॑वो म॒हे वाजा॑य धन्वन्तु॒ गोम॑ते ।
ई॒क्षे॒ण्यासो अ॒ह्यो३ न चार॑वो॒ ब्रह्म॑-ब्रह्म॒ ये जु॑जु॒षुर्ह॒विर्-ह॑विः ॥ ३ ॥

ते नः पूर्वासः उपरासः इन्दवः महे वाजाय धन्वन्तु गो मते
ईक्षेण्यासः अह्यः न चारवः ब्रह्म ब्रह्म ये जुजुषुः हविः हविः ॥ ३ ॥

तुझे पहिले आणि आतांचे आल्हादप्रद बिंदु आम्हांला गोसंपन्न असें विपुल सत्वसामर्थ्य प्राप्त करून घेण्याची प्रेरणा करतात. ते सोमबिंदु खरोखरच प्रेक्षणीय असतात. ’अह्यां’प्रमाणें सुंदर असतात. त्यांनीं प्रत्येक प्रार्थनास्तोत्र, प्रत्येक हवि गोड करून घेतलें असतें ३.


अ॒यं नो॑ वि॒द्वान् व॑नवद्वनुष्य॒त इन्दुः॑ स॒त्राचा॒ मन॑सा पुरुष्टु॒तः ।
इ॒नस्य॒ यः सद॑ने॒ गर्भं॑ आद॒धे गवां॑ उरु॒ब्जं अ॒भ्यर्ष॑ति व्र॒जम् ॥ ४ ॥

अयं नः विद्वान् वनवत् वनुष्यतः इन्दुः सत्राचा मनसा पुरु स्तुतः
इनस्य यः सदने गर्भं आदधे गवां उरुब्जं अभि अषर्ति व्रजम् ॥ ४ ॥

हा आमचा सर्वज्ञ, इकडे मानवांकडे येणारा, आणि ज्याची स्तुति सर्वांनीं अगदी मन:पूर्वक केली आहे असा सोमरस प्रतिस्पर्ध्यांना पादाक्रांत करतो. ज्या सोमानें ईश्वराच्या निवासस्थानीं आपला पल्लव ठेवला, तो हा सोम, प्रकाशधेनूंच्या विस्तीर्ण द्वाराकडे वहात जातो ४.


चक्रि॑र्दि॒वः प॑वते॒ कृत्व्यो॒ रसो॑ म॒हाँ अद॑ब्धो॒ वरु॑णो हु॒रुग् य॒ते ।
असा॑वि मि॒त्रो वृ॒जने॑षु य॒ज्ञियो॑ऽत्यो॒ न यू॒थे वृ॑ष॒युः कनि॑क्रदत् ॥ ५ ॥

चक्रिः दिवः पवते कृत्व्यः रसः महान् अदब्धः वरुणः हुरुक् यते
असावि मित्रः वृजनेषु यजियः अत्यः न यूथे वृष युः कनिक्रदत् ॥ ५ ॥

कर्तृत्ववान्‍, कर्मकुशल सोम, द्युलोकांतून स्वच्छ प्रवाहानें वहातो. तो श्रेष्ठ आणि अजिंक्य वरुणच होय. तो भक्ताकडे वळसे घेत घेत वहात जातो. ज्याचा पिळलेला रस आम्हांला संकटांमध्यें मननीय असा मित्रच होतो, तो हा सोम, चलाख अश्व आपल्या समूहांत खिंकाळतो त्याप्रमाणें, वीर्य गाजविण्यास उत्सुक होऊन गर्जना करतो ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - जगती


प्र राजा॒ वाचं॑ ज॒नय॑न्न् असिष्यदद॒पो वसा॑नो अ॒भि गा इ॑यक्षति ।
गृ॒भ्णाति॑ रि॒प्रं अवि॑रस्य॒ तान्वा॑ शु॒द्धो दे॒वानां॒ उप॑ याति निष्कृ॒तम् ॥ १ ॥

प्र राजा वाचं जनयन् असिस्यदत् अपः वसानः अभि गाः इयक्षति
गृभ्णाति रिप्रं अविः अस्य तान्वा शुद्धः देवानां उप याति निः कृतम् ॥ १ ॥

सोमराजा वाणीला प्रेरणा करून आणि उदकाशीं मिश्र होऊन वाहून राहिला आहे. प्रकाशधेनूंना उद्देशून तो देवाचें यजन भक्ताकडून करवितो. त्याचें लोंकराचें जें गाळणें आहे तें आपल्या तंतूंनीं त्यांतील चोथा एका बाजूस सारून देतें. त्यामुळें तो स्वच्छ होऊन दिव्यविभूतिंच्या गृहांकडे गमन करतो १.


इन्द्रा॑य सोम॒ परि॑ षिच्यसे॒ नृभि॑र्नृ॒चक्षा॑ ऊ॒र्मिः क॒विर॑ज्यसे॒ वने॑ ।
पू॒र्वीर्हि ते॑ स्रु॒तयः॒ सन्ति॒ यात॑वे स॒हस्रं॒ अश्वा॒ हर॑यश्चमू॒षदः॑ ॥ २ ॥

इन्द्राय सोम परि सिच्यसे नृ भिः नृ चक्षाः ऊर्मिः कविः अज्यसे वने
पूर्वीः हि ते स्रुतयः सन्ति यातवे सहस्रं अश्वाः हरयः चमू सदः ॥ २ ॥

सोमा, शूर ऋत्विजांकडून तूं इंद्राप्रीत्यर्थ पात्रांत ओतला जातोस. तूं सर्व मनुष्यांना अवलोकन करणारा आहेस; आनंदाचा कल्लोल आणि प्रतिभावान्‍ असा तूं वनांतून देवाकडे गमन करतोस. तुझे अनेक प्रवाह तिकडे जाण्यास सिद्धच असतात, आणि तुझे रसरूप अश्व चमूपात्रांत ओतलेले हजारों दिसतात २.


स॒मु॒द्रिया॑ अप्स॒रसो॑ मनी॒षिणं॒ आसी॑ना अ॒न्तर॒भि सोमं॑ अक्षरन् ।
ता ईं॑ हिन्वन्ति ह॒र्म्यस्य॑ स॒क्षणिं॒ याच॑न्ते सु॒म्नं पव॑मानं॒ अक्षि॑तम् ॥ ३ ॥

समुद्रियाः अप्सरसः मनीषिणं आसीनाः अन्तः अभि सोमं अक्षरन्
ताः ईं हिन्वन्ति हर्म्यस्य सक्षणिं याचन्ते सुम्नं पवमानं अक्षितम् ॥ ३ ॥

समुद्राच्या आंत वास करणाऱ्या अप्सरा मनोजयी सोमाकडे धांवत गेल्या. त्याच अप्सरा, यज्ञमंदिरांत सतत वास्तव्य करणाऱ्या यजमानाला उल्लसित करतात, आणि पावनप्रवाही सोमाजवळ अक्षय सुख मागतात ३.


गो॒जिन् नः॒ सोमो॑ रथ॒जिद्धि॑रण्य॒जित् स्व॒र्जिद॒ब्जित् प॑वते सहस्र॒जित् ।
यं दे॒वास॑श्चक्रि॒रे पी॒तये॒ मदं॒ स्वादि॑ष्ठं द्र॒प्सं अ॑रु॒णं म॑यो॒भुव॑म् ॥ ४ ॥

गो जित् नः सोमः रथ जित् हिरण्य जित् स्वः जित् अप् जित् पवते सहस्र जित्
यं देवासः चक्रिरे पीतये मदं स्वादिष्ठं द्रप्सं अरुणं मयः भुवम् ॥ ४ ॥

आम्हांसाठीं प्रकाशधेनू जिंकणारा, रथ जिंकणारा, सुवर्ण जिंकणारा, दिव्यप्रकाश जिंकणारा, दिव्य उदकें जिंकणारा, इतकेंच नव्हे तर अगणित वस्तु जिंकणारा असा सोम स्वच्छ प्रवाहानें वहात आहे. ज्या सोमाला, ज्या हर्षकर, अत्यंत रुचिर, अरुणवर्ण आणि जनहितकर सोमबिन्दूला दिव्यविभूतिंनीं आपलें पेय केलें तो वहात आहे ४.


ए॒तानि॑ सोम॒ पव॑मानो अस्म॒युः स॒त्यानि॑ कृ॒ण्वन् द्रवि॑णान्य् अर्षसि ।
ज॒हि शत्रुं॑ अन्ति॒के दू॑र॒के च॒ य उ॒र्वीं गव्यू॑तिं॒ अभ॑यं च नस्कृधि ॥ ५ ॥

एतानि सोम पवमानः अस्म युः सत्यानि कृण्वन् द्रविणानि अर्षसि
जहि शत्रुं अन्तिके दूरके च यः उर्वीं गव्यूतिं अभयं च नः कृधि ॥ ५ ॥

हे सोमा, तूं पावनप्रवाह आमचा कनवाळू आहेस, जीं जीं वैभवें आहेत तीं तीं आमच्यासाठीं तूं सत्यतेस आणून वहातोस. तर आमचा शत्रु, मग तो जवळ असो किंवा दूर असो, त्याला ठार कर, आणि आमच्या गोधनासाठीं विस्तीर्ण प्रदेश देऊन आम्हांला निर्भय कर ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - जगती


अ॒चो॒दसो॑ नो धन्व॒न्त्व् इन्द॑वः॒ प्र सु॑वा॒नासो॑ बृ॒हद्दि॑वेषु॒ हर॑यः ।
वि च॒ नश॑न् न इ॒षो अरा॑तयोऽ॒र्यो न॑शन्त॒ सनि॑षन्त नो॒ धियः॑ ॥ १ ॥

अचोदसः नः धन्वन्तु इन्दवः प्र सुवानासः बृहत् दिवेषु हरयः
वि च नशन् नः इषः अरातयः अर्यः नशन्त सनिषन्त नः धियः ॥ १ ॥

ज्यांना कोणाकडूनहि प्रेरणा होण्याची आवश्यकता नाहीं असे आल्हादप्रद हरिद्वर्ण सोमरस पिळले असतां श्रेष्ठ आणि परमोच्च स्वर्लोकाकडे आपला ओघ लोटोत. आमचा उत्साह रूप हविर्भाग देवाला अर्पण करूं न देणारे जे शत्रु ते नष्ट होवोत. पहा, शत्रु नाश पावले आणि आमच्या आकांक्षा यशस्वी झाल्या १.


प्र णो॑ धन्व॒न्त्व् इन्द॑वो मद॒च्युतो॒ धना॑ वा॒ येभि॒रर्व॑तो जुनी॒मसि॑ ।
ति॒रो मर्त॑स्य॒ कस्य॑ चि॒त् परि॑ह्वृतिं व॒यं धना॑नि वि॒श्वधा॑ भरेमहि ॥ २ ॥

प्र नः धन्वन्तु इन्दवः मद च्युतः धना वा येभिः अर्वतः जुनीमसि
तिरः मर्तस्य कस्य चित् परि ह्वृतिं वयं धनानि विश्व धा भरेमहि ॥ २ ॥

हर्षभरानें ओथंबलेले सोमबिंदु आमच्याकडे धनाचा ओघ लोटून देवोत. त्या धनांच्या योगानें आम्हीं अश्वारूढ होऊन शत्रूंवर तुटून पडूं. कोणताहि मानव असो त्याच्या कपटजालाचा विध्वंस करून आम्हीं यशोधन चोहोंकडून जिंकून आणूं २.


उ॒त स्वस्या॒ अरा॑त्या अ॒रिर्हि ष उ॒तान्यस्या॒ अरा॑त्या॒ वृको॒ हि षः ।
धन्व॒न् न तृष्णा॒ सं अ॑रीत॒ ताँ अ॒भि सोम॑ ज॒हि प॑वमान दुरा॒ध्यः ॥ ३ ॥

उत स्वस्याः अरात्याः अरिः हि सः उत अन्यस्याः अरात्याः वृकः हि सः
धन्वन् न तृष्णा सं अरीत तान् अभि सोम जहि पवमान दुः आध्यः ॥ ३ ॥

सोम हा आपल्या स्वत:च्या शत्रूचा शत्रू आहे तसाच आमच्यासारख्या इतर भक्तांच्याहि शत्रूंचा वृकच आहे. रेताड मैदानांत तहानेनें मारावें त्याप्रमाणें हे सोमा, त्या दुराराध्य हट्टी शत्रूंना अगदीं निपटून टाक ३.


दि॒वि ते॒ नाभा॑ पर॒मो य आ॑द॒दे पृ॑थि॒व्यास्ते॑ रुरुहुः॒ सान॑वि॒ क्षिपः॑ ।
अद्र॑यस्त्वा बप्सति॒ गोरधि॑ त्व॒च्य् अ१ प्सु त्वा॒ हस्तै॑र्दुदुहुर्मनी॒षिणः॑ ॥ ४ ॥

दिवि ते नाभा परमः यः आददे पृथिव्याः ते रुरुहुः सानवि क्षिपः
अद्रयः त्वा बप्सति गोः अधि त्वचि अप् सु त्वा हस्तैः दुदुहुः मनीषिणः ॥ ४ ॥

तुझा जो उत्कृष्ट पल्लव द्युलोकांत मुख्य जागीं आहे तोच पृथिवीच्या शिखरावर ऋत्विजांनीं रोवून दिला आहे. म्हणूनच गव्याच्या चर्मावर ठेऊन ग्रावे तुजला चुरून टाकतात आणि मनोनिग्रही ऋत्विज्‍ तुजला उदकांत कालवून तुझें दोहन करतात ४.


ए॒वा त॑ इन्दो सु॒भ्वं सु॒पेश॑सं॒ रसं॑ तुञ्जन्ति प्रथ॒मा अ॑भि॒श्रियः॑ ।
निदं॑-निदं पवमान॒ नि ता॑रिष आ॒विस्ते॒ शुष्मो॑ भवतु प्रि॒यो मदः॑ ॥ ५ ॥

एव ते इन्दो इति सु भ्वं सु पेशसं रसं तुजन्ति प्रथमाः अभि श्रियः
निदं निदं पवमान नि तारिषः आविः ते शुष्मः भवतु प्रियः मदः ॥ ५ ॥

याप्रमाणें हे आल्हादरूपा सोमा, तुझा व्यापक, सामर्थ्यशाली आणि मनोहर रस, तुझ्या आश्रयाला प्रथम येणारे ऋत्विज्‍ जोरानें चुरून सिद्ध करीत आहेत. तर हे पावनप्रवाहा, प्रत्येक निन्दकाच्या तडाक्यांतून आम्हांला पार ने आणि तुझा प्रिय हर्षकारी रस प्रतापी आहे असें निदर्शनास आण ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - वसु भारद्वाज : देवता - पवमान सोम : छंद - जगती


सोम॑स्य॒ धारा॑ पवते नृ॒चक्ष॑स ऋ॒तेन॑ दे॒वान् ह॑वते दि॒वस्परि॑ ।
बृह॒स्पते॑ र॒वथे॑ना॒ वि दि॑द्युते समु॒द्रासो॒ न सव॑नानि विव्यचुः ॥ १ ॥

सोमस्य धारा पवते नृ चक्षसः ऋतेन देवान् हवते दिवः परि
बृहस्पतेः रवथेन वि दिद्युते समुद्रासः न सवनानि विव्यचुः ॥ १ ॥

मानवांचें निरीक्षण करणाऱ्या सोमाचा प्रवाह स्वच्छ वहात आहे. तो सनातन सद्धर्माच्या योगानें दिव्यविभूतिंना द्युलोकाच्या उच्च भागांतून पाचारण करतो आणि बृहस्पतीच्या सिंहनादाबरोबरच प्रकाशित होतो. त्याच्या सवनांनीं समुद्राप्रमाणें यज्ञमंदिरें व्यापून टाकलीं १.


यं त्वा॑ वाजिन्न् अ॒घ्न्या अ॒भ्यनू॑ष॒तायो॑हतं॒ योनिं॒ आ रो॑हसि द्यु॒मान् ।
म॒घोनां॒ आयुः॑ प्रति॒रन् महि॒ श्रव॒ इन्द्रा॑य सोम पवसे॒ वृषा॒ मदः॑ ॥ २ ॥

यं त्वा वाजिन् अघ्न्याः अभि अनूषता अयः हतं योनिं आ रोहसि द्यु मान्
मघोनां आयुः प्र तिरत् महि श्रव इन्द्राय सोम पवसे वृषा मदः ॥ २ ॥

हे सत्वाढ्या, ज्या तुजसाठीं अश्राप धेनू हंबारून राहिल्या, तो तूं तेज:पुंज सोम आपल्या लोहमय स्थानांत आरूढ होतोस, आणि आमच्या यजमानांचें आयुष्य आणि थोर कीर्ति यांना वृद्धिंगत करून, हे सोमा, तूं वीर्यशाली हर्षप्रकर्षानें इंद्राप्रीत्यर्थ स्वच्छ प्रवाहानें वहातोस २.


एन्द्र॑स्य कु॒क्षा प॑वते म॒दिन्त॑म॒ ऊर्जं॒ वसा॑नः॒ श्रव॑से सुम॒ङ्गलः॑ ।
प्र॒त्यङ् स विश्वा॒ भुव॑ना॒भि प॑प्रथे॒ क्रीळ॒न् हरि॒रत्यः॑ स्यन्दते॒ वृषा॑ ॥ ३ ॥

आ इन्द्रस्य कुक्षा पवते मदिन् तमः ऊर्जं वसानः श्रवसे सु मङ्गलः
प्रत्यङ् सः विश्वा भुवना अभि पप्रथे क्रीळन् हरिः अत्यः स्यन्दते वृषा ॥ ३ ॥

इंद्राच्या कलशरूप जठरांत अत्यंत हर्षकर आणि मंगलरूप सोमरस ओजस्वितेचें वस्त्र परिधान करून धर्माची प्रख्याति व्हावी म्हणून स्वच्छ प्रवाहानें वहातो. त्यानें स्वत: अखिल भूप्रदेशावर आपल्या यशाचा विस्तार केला, आणि तो हरिद्वर्ण अश्वारूढ वीर क्रीडा करीत रसरूपानें वाहूं लागला ३.


तं त्वा॑ दे॒वेभ्यो॒ मधु॑मत्तमं॒ नरः॑ स॒हस्र॑धारं दुहते॒ दश॒ क्षिपः॑ ।
नृभिः॑ सोम॒ प्रच्यु॑तो॒ ग्राव॑भिः सु॒तो विश्वा॑न् दे॒वाँ आ प॑वस्वा सहस्रजित् ॥ ४ ॥

तं त्वा देवेभ्यः मधुमत् तमं नरः सहस्र धारं दुहते दश क्षिपः
नृ भिः सोम प्र च्युतः ग्राव भिः सुतः विश्वान् देवान् आ पवस्व सहस्र जित् ॥ ४ ॥

दिव्यविबुधासाठीं, तुझ्या त्या अत्यंत मधुर आणि हजारों धारा सोडणाऱ्या रसाचें, शूर ऋत्विज्‍ आणि त्यांच्या दहा अंगुलि मिळून दोहन करितात; त्याच शूर ऋत्विजांनीं हे सोमा, तुला ग्राव्यांनीं चुरून पिळला आहे, तर सहस्रावधि धनें जिंकणारा असा तूं अखिल दिव्यजनांसाठीं स्वच्छ प्रवाहानें वहा ४.


तं त्वा॑ ह॒स्तिनो॒ मधु॑मन्तं॒ अद्रि॑भिर्दु॒हन्त्य॒प्सु वृ॑ष॒भं दश॒ क्षिपः॑ ।
इन्द्रं॑ सोम मा॒दय॒न् दैव्यं॒ जनं॒ सिन्धो॑रिवो॒र्मिः पव॑मानो अर्षसि ॥ ५ ॥

तं त्वा हस्तिनः मधु मन्तं अद्रि भिः दुहन्ति अप् सु वृषभं दश क्षिपः
इन्द्रं सोम मादयन् दैव्यं जनं सिन्धोः इव ऊर्मिः पवमानः अर्षसि ॥ ५ ॥

उत्तम भुजदण्डांचे ऋत्विज्‍ आणि त्यांच्या दहा अंगुलि एकत्र मिळून ग्राव्यांच्या योगानें तुझ्या मधुरस्रावी वीर्यशाली रसाचें उदकांमध्यें दोहन करतात; आणि हे सोमा तूंहि इंद्राला आणि दिव्यविबुधांना हर्ष उत्पन्न करून समुद्राच्या लाटेप्रमाणें उचंबळून स्वच्छ प्रवाहानें वहातोस ५.


ॐ तत् सत्


GO TOP