PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ५१ ते ६०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - उचथ्य अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


अध्व॑र्यो॒ अद्रि॑भिः सु॒तं सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
पु॒नी॒हीन्द्रा॑य॒ पात॑वे ॥ १ ॥

अध्वर्यो इति अद्रि भिः सुतं सोमं पवित्रे आ सृज पुनीहि इन्द्राय पातवे ॥ १ ॥

हे अध्वर्यू, ग्राव्यांनीं चुरलेल्या सोमाला पवित्रावर ठेव, आणि इंद्रानें प्राशन करावा म्हणून तो गाळून घे १.


दि॒वः पी॒यूषं॑ उत्त॒मं सोमं॒ इन्द्रा॑य व॒ज्रिणे॑ ।
सु॒नोता॒ मधु॑मत्तमम् ॥ २ ॥

दिवः पीयूषं उत् तमं सोमं इन्द्राय वज्रिणे सुनोत मधुमत् तमम् ॥ २ ॥

द्युलोकांतील उत्कृष्ट अमृत जो सोम, अत्यंत मधुर जो सोम, तो वज्रधर इंद्राप्रीत्यर्थ पिळून सिद्ध कर २.


तव॒ त्य इ॑न्दो॒ अन्ध॑सो दे॒वा मधो॒र्व्य् अश्नते ।
पव॑मानस्य म॒रुतः॑ ॥ ३ ॥

तव त्ये इन्दो इति अन्धसः देवाः मधोः वि अश्नते पवमानस्य मरुतः ॥ ३ ॥

आल्हादप्रदा सोमा, तुझें गाळलेलें मधुर पेय, दिव्यविबुध हे मरुत्‌गण ते प्राशन करीत असतात ३.


त्वं हि सो॑म व॒र्धय॑न् सु॒तो मदा॑य॒ भूर्ण॑ये ।
वृष॑न् स्तो॒तारं॑ ऊ॒तये॑ ॥ ४ ॥

त्वं हि सोम वर्धयन् सुतः मदाय भूर्णये वृषन् स्तोतारं ऊतये ॥ ४ ॥

हे सोमा, तूं आपलें महात्म्य वाढविणारा आणि आपलें वीर्य गाजविणारा आहेस म्हणून हर्षोत्कर्षासाठीं, सर्वत्र चळवळ व्हावी यासाठीं, आणि स्तोतृजनांच्या रक्षणासाठीं, तुजला पिळून सिद्ध केला आहे ४.


अ॒भ्यर्ष विचक्षण प॒वित्रं॒ धार॑या सु॒तः ।
अ॒भि वाजं॑ उ॒त श्रवः॑ ॥ ५ ॥

अभि अर्ष वि चक्षण पवित्रं धारया सुतः अभि वाजं उत श्रवः ॥ ५ ॥

सूक्ष्मदृष्टि सोमा, तुला चुरून ठेवला म्हणजे सत्वाढ्यता आणि कीर्ति यांची प्राप्ति व्हावी म्हणून पवित्रांतून तुझा रसप्रवाह वाहूं दे ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - उचथ्य अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


परि॑ द्यु॒क्षः स॒नद्र॑यि॒र्भर॒द्वाजं॑ नो॒ अन्ध॑सा ।
सु॒वा॒नो अ॑र्ष प॒वित्र॒ आ ॥ १ ॥

परि द्युक्षः सनत् रयिः भरत् वाजं नः अन्धसा सुवानः अषर् पवित्रे आ ॥ १ ॥

आकाशनिवासी अक्षय धनदाता जो तूं त्यानें आपल्या पेयानें आम्हांमध्यें सत्वाढ्यता आणली आहे, तर तुला चुरून सिद्ध करतांना तूं पवित्रांतून वहात रहा १.


तव॑ प्र॒त्नेभि॒रध्व॑भि॒रव्यो॒ वारे॒ परि॑ प्रि॒यः ।
स॒हस्र॑धारो या॒त् तना॑ ॥ २ ॥

तव प्रत्नेभिः अध्व भिः अव्यः वारे परि प्रियः सहस्र धारः यात् तना ॥ २ ॥

ओहो, देवप्रिय असा तूं आपल्या पुरातन मार्गांनीं लोंकरीच्या गाळण्यांतून सहस्त्रधारांनीं एकसारखा वाहूं लागलासच २.


च॒रुर्न यस्तं ई॑ङ्ख॒येन्दो॒ न दानं॑ ईङ्खय ।
व॒धैर्व॑धस्नव् ईङ्खय ॥ ३ ॥

चरुः न यः तं ईङ्खय इन्दो इति न दानं ईङ्खय वधैः वधस्नो इतिवध स्नो ईङ्खय ॥ ३ ॥

जो भाताच्या गुबगुबीत मुदीप्रमाणें स्वस्थ आहे त्याला गदगदां हलव, पण आपलें वरदान झुगारून देऊं नको. हे शत्रुनाशना, आपल्या मारक शस्त्रानें शत्रूला उलथून टाक ३.


नि शुष्मं॑ इन्दव् एषां॒ पुरु॑हूत॒ जना॑नाम् ।
यो अ॒स्माँ आ॒दिदे॑शति ॥ ४ ॥

नि शुष्मं इन्दो इति एषां पुरु हूत जनानां यः अस्मान् आदिदेशति ॥ ४ ॥

आल्हादप्रदा रसा, हे अखिलजनसेव्या, त्या प्रतिस्पर्ध्यांपैकीं जो धुमाकूळ घालतो, आणि आम्हांला हुकमाची भाषा बोलतो त्याचा निःपात कर ४.


श॒तं न॑ इन्द ऊ॒तिभिः॑ स॒हस्रं॑ वा॒ शुची॑नाम् ।
पव॑स्व मंह॒यद्र॑यिः ॥ ५ ॥

शतं नः इन्दो इति ऊति भिः सहस्रं वा शुचीणां पवस्व मंहयत् रयिः ॥ ५ ॥

हे आल्हादप्रदा रसा, पवित्र अशा शेंकडोंच काय, पण हजारों सहाय्यक शक्तींनीं तुझा रसप्रवाह वाहूं दे. कारण तूं अक्षयधनाचा दाता आहेस ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


उत् ते॒ शुष्मा॑सो अस्थू॒ रक्षो॑ भि॒न्दन्तो॑ अद्रिवः ।
नु॒दस्व॒ याः प॑रि॒स्पृधः॑ ॥ १ ॥

उत् ते शुष्मासः अस्थुः रक्षः भिन्दन्तः अद्रि वः नुदस्व याः परि स्पृधः ॥ १ ॥

तुझे तडाके बसूं लागले आणि राक्षसांचा चुरडा उडूं लागला; तर आतां हे अभिषवप्रिया, आमचा जे मत्सर करतात त्यांना हांकलून दे १.


अ॒या नि॑ज॒घ्निरोज॑सा रथसं॒गे धने॑ हि॒ते ।
स्तवा॒ अबि॑भ्युषा हृ॒दा ॥ २ ॥

अया नि जघ्निः ओजसा रथ सङ्गे धने हिते स्तवै अबिभ्युषा हृदा ॥ २ ॥

अशा रीतीनें तूं आपल्या ओजस्वितेनें शत्रूंचा धुव्वा उडवून देतोस म्हणून रथाशीं रथ थडकले, झुंजाला तोंड लागलें, तरी निर्भय अन्तःकरणानें मी तुझें स्तवन करणार २,


अस्य॑ व्र॒तानि॒ नाधृषे॒ पव॑मानस्य दू॒ढ्या ।
रु॒ज यस्त्वा॑ पृत॒न्यति॑ ॥ ३ ॥

अस्य व्रतानि न आधृषे पवमानस्य दुः ध्या रुज यः त्वा पृतन्यति ॥ ३ ॥

ह्या भक्तपावन सोमाचे अतर्क्य नियम मोडण्याची कोणाचीहि प्राज्ञा नाही. हे सोमा, सैन्यासह जो कोणी तुज्यावर चालून येईल त्याला तूं भोंसकून टाक ३.


तं हि॑न्वन्ति मद॒च्युतं॒ हरिं॑ न॒दीषु॑ वा॒जिन॑म् ।
इन्दुं॒ इन्द्रा॑य मत्स॒रम् ॥ ४ ॥

तं हिन्वन्ति मद च्युतं हरिं नदीषु वाजिनं इन्दुं इन्द्राय मत्सरम् ॥ ४ ॥

हर्षानें ओथंबलेला, हरिद्वर्ण, सत्वाढ्य, आणि हर्षोफुल्ल करणारा जो आल्हादप्रद सोम त्याला भक्तजन नदीप्रवाहांमध्यें धुवून इंद्राला अर्पण करतात ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


अ॒स्य प्र॒त्नां अनु॒ द्युतं॑ शु॒क्रं दु॑दुह्रे॒ अह्र॑यः ।
पयः॑ सहस्र॒सां ऋषि॑म् ॥ १ ॥

अस्य प्रत्नां अनु द्युतं शुक्रं दुदुह्रे अह्रयः पयः सहस्र सां ऋषिम् ॥ १ ॥

ह्याच्या पुरातन दीप्तिला साजेल असें जें त्याचें रसरूप तेजस्वी दुग्ध, सरस्त्रावधि देणग्या देणारा जो त्याचा रस तो ऋग्विज हे पिळून सिद्ध करितात १.


अ॒यं सूर्य॑ इवोप॒दृग् अ॒यं सरां॑सि धावति ।
स॒प्त प्र॒वत॒ आ दिव॑म् ॥ २ ॥

अयं सूर्यः इव उप दृक् अयं सरांसि धावति सप्त प्र वतः आ दिवम् ॥ २ ॥

हा सूर्याप्रमाणें तेजस्वी आहे, हा सरोवराप्रमाणें विस्तीर्ण अशा द्रोणपात्राकडे धांवतो, आणि आकाशाला जाऊन भिडतील असे सात रसप्रवाह सोडतो २.


अ॒यं विश्वा॑नि तिष्ठति पुना॒नो भुव॑नो॒परि॑ ।
सोमो॑ दे॒वो न सूर्यः॑ ॥ ३ ॥

अयं विश्वानि तिष्ठति पुनानः भुवना उपरि सोमः दिवः न सूर्यः ॥ ३ ॥

हा शुद्धप्रवाह सोम देदीप्यमान सूर्याप्रमाणें सकल भुवनाच्यावर उच्च स्थानीं जाऊन राहिला आहे ३.


परि॑ णो दे॒ववी॑तये॒ वाजा॑ँ अर्षसि॒ गोम॑तः ।
पु॒ना॒न इ॑न्दव् इन्द्र॒युः ॥ ४ ॥

परि नः देव वीतये वाजान् अर्षसि गो मतः पुनानः इन्दो इति इन्द्र युः ॥ ४ ॥

देवसेवेसाठीं आमच्याकडे सत्वप्रचुर असा गोधनांचा प्रवाह तूं चोहोंकडून वहावण्यास लावतोस, आणि हे पावनप्रवाहा, हे आल्हादप्रदा, इंद्राच्या भेटीसाठीं तूं उत्सुक असतोस ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


यवं॑-यवं नो॒ अन्ध॑सा पु॒ष्टम्-पु॑ष्टं॒ परि॑ स्रव ।
सोम॒ विश्वा॑ च॒ सौभ॑गा ॥ १ ॥

यवं यवं नः अन्धसा पुष्टं पुष्तं परि स्रव सोम विश्वा च सौभगा ॥ १ ॥

तूं आपल्या पेयाच्या योगानें प्रत्येक धान्य, प्रत्येक प्रकारची पुष्टि, आणि हे सोमा सर्व प्रकारची भाग्यें, यांचा ओघ आमच्याकडे वाहून दे १.


इन्दो॒ यथा॒ तव॒ स्तवो॒ यथा॑ ते जा॒तं अन्ध॑सः ।
नि ब॒र्हिषि॑ प्रि॒ये स॑दः ॥ २ ॥

इन्दो इति यथा तव स्तवः यथा ते जातं अन्धसः नि बर्हिषि प्रिये सदः ॥ २ ॥

आल्हादप्रदा सोमा, जशी तुझी स्तुति उत्कृष्ट, जशा तुझ्या पेयाची उत्पत्ति उत्तम, त्याचप्रमाणें हें तुझें प्रिय आसन आहे, तर त्याच्यावर आरोहण कर २.


उ॒त नो॑ गो॒विद॑श्व॒वित् पव॑स्व सो॒मान्ध॑सा ।
म॒क्षूत॑मेभि॒रह॑भिः ॥ ३ ॥

उत नः गो वित् अश्व वित् पवस्व सोम अन्धसा मक्षु तमेभिः अह भिः ॥ ३ ॥

आणि हे सोमा, गोधनदाता, अश्वधनदाता, असा तूं झरझर निघून जाणार्‍या प्रत्येक दिवसांगणिक आमच्यासाठीं पेयरूपानें तुझ्या रसाचा प्रवाह वहावयास लाव. ३.


यो जि॒नाति॒ न जीय॑ते॒ हन्ति॒ शत्रुं॑ अ॒भीत्य॑ ।
स प॑वस्व सहस्रजित् ॥ ४ ॥

यः जिनाति न जीयते हन्ति शत्रुं अभि इत्य सः पवस्व सहस्र जित् ॥ ४ ॥

जो शत्रूंना जिंकतो, पण स्वतः कधींहि जिंकला जात नाहीं, जो शत्रूवर तुटून पडून त्याला ठार करतो, आणि हजारों शत्रूंना पादाक्रांत करतो, तो तूं सोम आपल्या रसाचा प्रवाह वहावयास लाव ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


परि॒ सोम॑ ऋ॒तं बृ॒हदा॒शुः प॒वित्रे॑ अर्षति ।
वि॒घ्नन् रक्षां॑सि देव॒युः ॥ १ ॥

परि सोमः ऋतं बृहत् आशुः पवित्रे अर्षति वि घ्नन् रक्षांसि देव युः ॥ १ ॥

अंगात त्वरित भिनणारा सोम, पवित्रांतून श्रेष्ठ अशा सनातन सद्धर्माचा प्रवाह सोडतो, तो राक्षसांचा निःपात करून देवासाठीं उत्सुक झालेला असतो १.


यत् सोमो॒ वाजं॒ अर्ष॑ति श॒तं धारा॑ अप॒स्युवः॑ ।
इन्द्र॑स्य स॒ख्यं आ॑वि॒शन् ॥ २ ॥

यत् सोमः वाजं अर्षति शतं धाराः अपस्युवः इन्द्रस्य सख्यं आ विशन् ॥ २ ॥

ज्या वेळीं सोम हा सत्वाढ्यतेचा प्रवाह सोडतो, त्या वेळेस त्याच्या कर्मोत्सुक अशा शेंकडों धारांनीं इंद्राचें मित्रत्व जोडलेलें असतें २.


अ॒भि त्वा॒ योष॑णो॒ दश॑ जा॒रं न क॒न्यानूषत ।
मृ॒ज्यसे॑ सोम सा॒तये॑ ॥ ३ ॥

अभि त्वा योषणः दश जारं न कन्या अनूषत मृज्यसे सोम सातये ॥ ३ ॥

कुमारी ज्याप्रमाणें आपल्या प्रियकराचेंच गुणवर्णन करीत सुटते, त्याप्रमाणें अंगुलीरूप दहा स्त्रिया तुझीच प्रशंसा करतात; पण हे सोमा, देवाची प्राप्ति व्हावी म्हणून तुलाहि गाळून स्वच्छ करावा लागतो ३.


त्वं इन्द्रा॑य॒ विष्ण॑वे स्वा॒दुरि॑न्दो॒ परि॑ स्रव ।
नॄन् स्तो॒तॄन् पा॒ह्यंह॑सः ॥ ४ ॥

त्वं इन्द्राय विष्णवे स्वादुः इन्दो इति परि स्रव नॄन् स्तोतॄन् पाहि अंहसः ॥ ४ ॥

इंद्रासाठीं आणि विष्णूसाठीं, हे आल्हादप्रदा रसा, तूं वहात रहा, आणि शूर ऋत्विजांचें आणि स्तोतृजनांचें पातकांपासून रक्षण कर ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५७ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र ते॒ धारा॑ अस॒श्चतो॑ दि॒वो न य॑न्ति वृ॒ष्टयः॑ ।
अच्छा॒ वाजं॑ सह॒स्रिण॑म् ॥ १ ॥

प्र ते धाराः असश्चतः दिवः न यन्ति वृष्टयः अच्च वाजं सहस्रिणम् ॥ १ ॥

सतत वहात राहणाच्या तुझ्या धारा आकाशांतून पडणार्‍या पर्जन्यवृष्टीप्रमाणें हजारों प्रकारचें सत्वसामर्थ्य अर्पण करतात १.


अ॒भि प्रि॒याणि॒ काव्या॒ विश्वा॒ चक्षा॑णो अर्षति ।
हरि॑स्तुञ्जा॒न आयु॑धा ॥ २ ॥

अभि प्रियाणि काव्या विश्वा चक्षाणः अर्षति हरिः तुजानः आयुधा ॥ २ ॥

तो हरिद्वर्ण सोम नानाप्रकारच्या चित्तवेधक कवनांचा परामर्श घेत घेत आणि आपलीं शस्त्रास्त्रें पाजळीत यज्ञाकडे येतो २.


स म॑र्मृजा॒न आ॒युभि॒रिभो॒ राजे॑व सुव्र॒तः ।
श्ये॒नो न वंसु॑ षीदति ॥ ३ ॥

सः मर्मृजानः आयु भिः इभः राजा इव सु व्रतः श्येनः न वंसु सीदति ॥ ३ ॥

भक्ताकडून तो अलंकृत होतो त्या वेळीं तो सत्क्रियाप्रेरक सोम एखाद्या गजराजाप्रमाणें आणि एखाद्या पुण्यशील राजाप्रमाणें शोभतो, आणि श्येनपक्ष्याप्रमाणें उच्चस्थानीं अधिष्ठित होतो ३.


स नो॒ विश्वा॑ दि॒वो वसू॒तो पृ॑थि॒व्या अधि॑ ।
पु॒ना॒न इ॑न्द॒व् आ भ॑र ॥ ४ ॥

सः नः विश्वा दिवः वसु उतो इति पृथिव्याः अधि पुनानः इन्दो इति आ भर ॥ ४ ॥

हे आल्हादप्रदा रसा, तूं गाळून स्वच्छ झालास म्हणजे दिव्यलोकांतील आणि पृथ्वीवरील यच्चावत् उत्कृष्ट वस्तु आमच्यासाठीं घेऊन ये ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


तर॒त् स म॒न्दी धा॑वति॒ धारा॑ सु॒तस्यान्ध॑सः ।
तर॒त् स म॒न्दी धा॑वति ॥ १ ॥

तरत् सः मन्दी धावति धारा सुतस्य अन्धसः तरत् सः मन्दी धावति ॥ १ ॥

तो तीक्ष्ण आणि हर्षोत्फ़ुल्ल करणारा सोमरस धांव घेत आहे; त्याच्या रसाच्या पेयाची धाराहि धांवत आहे. पहा, तो तीव्र आणि हर्षोत्फ़ुल्ल होणारा रस कसा त्वरेनें धांवत आहे १.


उ॒स्रा वे॑द॒ वसू॑नां॒ मर्त॑स्य दे॒व्य् अव॑सः ।
तर॒त् स म॒न्दी धा॑वति ॥ २ ॥

उस्रा वेद वसूनां मर्तस्य देवी अवसः तरत् सः मन्दी धावति ॥ २ ॥

उषारूप धेनू ही सर्व उत्कृष्ट वस्तूंना जाणते; त्या देवीला मर्त्यमानवांच्या रक्षणाची काळजी असते; म्हणूनच तो तीव्र आणि हर्षोत्फ़ुल्ल होणारा इंद्र त्वरेनें धांवत येतो २.


ध्व॒स्रयोः॑ पुरु॒षन्त्यो॒रा स॒हस्रा॑णि दद्महे ।
तर॒त् स म॒न्दी धा॑वति ॥ ३ ॥

ध्वस्रयोः पुरु सन्त्योः आ सहस्राणि दद्महे तरत् सः मन्दी धावति ॥ ३ ॥

ध्वस्त्रांपासून आणि पुरुषन्तीपासून हजारों वस्तूंचा आम्हीं स्वीकार करीत असतों, तोंच तो तीव्र आणि देवाला हर्षोत्फ़ुल्ल करणारा सोमरसहि धांव घेतो ३.


आ ययो॑स्त्रिं॒शतं॒ तना॑ स॒हस्रा॑णि च॒ दद्म॑हे ।
तर॒त् स म॒न्दी धा॑वति ॥ ४ ॥

आ ययोः त्रिंशतं तना सहस्राणि च दद्महे तरत् सः मन्दी धावति ॥ ४ ॥

आम्हीं त्या दोघांपासून तीनशेंच काय, पण हजारों प्रकारची धनें सतत घेतों म्हणून तो तीव्र आणि देवाला हर्षोत्फ़ुल्ल करणारा सोमरस धांव घेत वहातो ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


पव॑स्व गो॒जिद॑श्व॒जिद्वि॑श्व॒जित् सो॑म रण्य॒जित् ।
प्र॒जाव॒द्रत्नं॒ आ भ॑र ॥ १ ॥

पवस्व गो जित् अश्व जित् विश्व जित् सोम रण्य जित् प्रजावत् रत्नं आ भर ॥ १ ॥

सोमरसा तुझा पुण्यप्रवाह वाहूं दे; तूं प्रकाश धेनू जिंकणारा, मनोरूप अश्व जिंकणारा आहेस, इतकेंच काय, पण विश्वहि जिंकणारा आहेस. अर्थात् सर्व रमणीय वस्तंचाहि जेता आहेस. तर संततियुक्त असें उत्कृष्ट ऐश्वर्य आमच्याकडे आण १.


पव॑स्वा॒द्भ्यो अदा॑भ्यः॒ पव॒स्वौष॑धीभ्यः ।
पव॑स्व धि॒षणा॑भ्यः ॥ २ ॥

पवस्व अत् भ्यः अदाभ्यः पवस्व ओषधीभ्यः पवस्व धिषणाभ्यः ॥ २ ॥

तूं आपला प्रवाह उदकांतून वहात ठेव; तूं अप्रतिहत-सामर्थ्य आहेस; तुझा पुण्यप्रवाह वाहूं दे. तूं औषधिपासून पाझरत रहा; अधिषवण फलकांपासूनहि पाझरत रहा २.


त्वं सो॑म॒ पव॑मानो॒ विश्वा॑नि दुरि॒ता त॑र ।
क॒विः सी॑द॒ नि ब॒र्हिषि॑ ॥ ३ ॥

त्वं सोम पवमानः विश्वानि दुः इता तर कविः सीद नि बर्हिषि ॥ ३ ॥

सोमा, तूं प्रवाह वाहवितांना सर्व प्रकारचीं संकटें दूर कर. तूं काव्यस्फूर्ति देणारा आहेस. तूं ह्या कुशासनावर आरोहण कर ३.


पव॑मान॒ स्वर्विदो॒ जाय॑मानोऽभवो म॒हान् ।
इन्दो॒ विश्वा॑ँ अ॒भीद॑सि ॥ ४ ॥

पवमान स्वः विदः जायमानः अभवः महान् इन्दो इति विश्वान् अभि इत् असि ॥ ४ ॥

हे पावना, स्वर्गीय प्रकाशाचा दाता असा तूं उत्पन्न होतांच श्रेष्ठ झालास. हे आल्हादप्रदा, तूं सकल विश्वाला पुरून उरलास ४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र गा॑य॒त्रेण॑ गायत॒ पव॑मानं॒ विच॑र्षणिम् ।
इन्दुं॑ स॒हस्र॑चक्षसम् ॥ १ ॥

प्र गायत्रेण गायत पवमानं वि चर्षणिं इन्दुं सहस्र चक्षसम् ॥ १ ॥

पावन आणि सूक्ष्मदृष्टि सोमाप्रीत्यर्थ, आल्हादप्रद आणि सहस्त्रनेत्र सोमाप्रीत्यर्थ गायत्राचें गायन करा १.


तं त्वा॑ स॒हस्र॑चक्षसं॒ अथो॑ स॒हस्र॑भर्णसम् ।
अति॒ वारं॑ अपाविषुः ॥ २ ॥

त्वं त्वा सहस्र चक्षसं अथो इति सहस्र भर्णसं अति वारं अपाविषुः ॥ २ ॥

तुज सहस्त्रनेत्राला, सहस्त्रावधि लोकांचा भार वाहणार्‍याला, ऋत्विजांनीं ऊर्णावस्त्रांतून गाळून स्वच्छ केलें आहे २.


अति॒ वारा॒न् पव॑मानो असिष्यदत् क॒लशा॑ँ अ॒भि धा॑वति ।
इन्द्र॑स्य॒ हार्द्य् आ॑वि॒शन् ॥ ३ ॥

अति वारान् पवमानः असिस्यदत् कलशान् अभि धावति इन्द्रस्य हार्दि आ विशन् ॥ ३ ॥

तुझा रस स्वच्छ होतांना लोंकरीच्या वस्त्रांतून कलशांत पाझरला, आणि आतां इंद्राच्या हृदयांत शिरण्याच्या इच्छेनें तो द्रोणपात्राकडे धांवत आहे ३.


इन्द्र॑स्य सोम॒ राध॑से॒ शं प॑वस्व विचर्षणे ।
प्र॒जाव॒द्रेत॒ आ भ॑र ॥ ४ ॥

इन्द्रस्य सोम राधसे शं पवस्व वि चर्षणे प्रजावत् रेतः आ भर ॥ ४ ॥

आमच्यावर इंद्राची कृपा व्हावी म्हणून, हे विश्वदर्शी सोमा, तूं सुखरूप वहात रहा; आणि संततिप्रद वीर्यशालित्व भक्तांमध्यें भरपूर असूं दे ४.


ॐ तत् सत्


GO TOP