PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - मेध्यातिथि काण्व : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र ये गावो॒ न भूर्ण॑यस्त्वे॒षा अ॒यासो॒ अक्र॑मुः ।
घ्नन्तः॑ कृ॒ष्णां अप॒ त्वच॑म् ॥ १ ॥

प्र ये गावः न भूर्णयः त्वेषाः अयासः अक्रमुः घ्नन्तः कृष्णां अप त्वचम् ॥ १ ॥

धेनूप्रमाणें जे चपल असतात त्या सोमांच्या शीघ्रगति दीप्तिनें सर्व कांहीं आक्रमण करून टाकलें. परंतु असें करतांना त्यांनीं कृष्णवर्ण दुष्टांना (= तमोमयपटलांना ) दूर घालवून देऊन त्यांचा विध्वंस केला १.


सु॒वि॒तस्य॑ मनाम॒हे॑ऽति॒ सेतुं॑ दुरा॒व्यम् ।
सा॒ह्वांसो॒ दस्युं॑ अव्र॒तम् ॥ २ ॥

सुवितस्य मनामहे अति सेतुं दुः आव्यं साह्वांसः दस्युं अव्रतम् ॥ २ ॥

मंगलाचा जणों सेतूच अशा सोमाचें आम्हीं चिन्तन करतों त्यामुळें धर्महीन आणि दुष्टबुद्धि पाखांडी लोकांना आम्हीं रगडून टाकतों २.


शृ॒ण्वे वृ॒ष्टेरि॑व स्व॒नः पव॑मानस्य शु॒ष्मिणः॑ ।
चर॑न्ति वि॒द्युतो॑ दि॒वि ॥ ३ ॥

शृण्वे वृष्टेः इव स्वनः पवमानस्य शुष्मिणः चरन्ति वि द्युतः दिवि ॥ ३ ॥

मेघवृष्टिप्रमाणें पावनप्रवाह सोमाच्या वृष्टीचा ध्वनि ऐकूं येत आहे आणि आकाशांत विद्युल्लताहि चमकत आहेत. ३.


आ प॑वस्व म॒हीं इषं॒ गोम॑दिन्दो॒ हिर॑ण्यवत् ।
अश्वा॑व॒द्वाज॑वत् सु॒तः ॥ ४ ॥

आ पवस्व महीं इषं गो मत् इन्दो इति हिरण्य वत् अश्व वत् वाज वत् सुतः ॥ ४ ॥

आतां तूं पिळला गेला आहेस, तर उच्च मनोत्साहाचा प्रवाह, आणि हे आल्हादप्रदा सोमा, गोधनयुक्त, सुवर्णयुक्त, अश्वयुक्त आणि सत्वसामर्थ्ययुक्त प्रवाह तूं आम्हांवर लोट ४.


स प॑वस्व विचर्षण॒ आ म॒ही रोद॑सी पृण ।
उ॒षाः सूर्यो॒ न र॒श्मिभिः॑ ॥ ५ ॥

सः पवस्व वि चर्षणे आ माही इति रोदसी इति पृण उषाः सूर्यः न रश्मि भिः ॥ ५ ॥

हे सर्वत्रसंचारी सोमा, तूं ह्या विस्तीर्ण द्यावापृथिवींना उषा किंवा सूर्य जसें आपल्या किरणांनीं भरून टाकतात तसा वृष्टिरसानें भरून टाक ५.


परि॑ णः शर्म॒यन्त्या॒ धार॑या सोम वि॒श्वतः॑ ।
सरा॑ र॒सेव॑ वि॒ष्टप॑म् ॥ ६ ॥

परि नः शर्म यन्त्या धारया सोम विश्वतः सर रसा इव विष्टपम् ॥ ६ ॥

आणि कल्याणकर आश्रय देणारी जी तुझी धारा तिनें हे सोमा, जगत्‌रूप रसानदी स्वस्थानाला वेढते त्याप्रमाणें आम्हांस वेढून टाक ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - मेध्यातिथि काण्व : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ज॒नय॑न् रोच॒ना दि॒वो ज॒नय॑न्न् अ॒प्सु सूर्य॑म् ।
वसा॑नो॒ गा अ॒पो हरिः॑ ॥ १ ॥

जनयन् रोचना दिवः जनयन् अप् सु सूर्यं वसानः गाः अपः हरिः ॥ १ ॥

द्युलोकांतील तेज:पुंज नक्षत्रें प्रकट करून, आकाशांतील उदकांत सूर्य उत्पन्न करून हरिद्वर्ण सोमानें प्रकाश धेनू आणि उदकें ह्यांना आच्छादन करून टाकलें १.


ए॒ष प्र॒त्नेन॒ मन्म॑ना दे॒वो दे॒वेभ्य॒स्परि॑ ।
धार॑या पवते सु॒तः ॥ २ ॥

एषः प्रत्नेन मन्मना देवः देवेभ्यः परि धारया पवते सुतः ॥ २ ॥

हा दिव्यरस पुरातन आणि मननीय स्तवनानें दिव्यविभूतिंसाठीं पिळला जाऊन आपल्या धारेनें पवित्र प्रवाह सोडतो २.


वा॒वृ॒धा॒नाय॒ तूर्व॑ये॒ पव॑न्ते॒ वाज॑सातये ।
सोमाः॑ स॒हस्र॑पाजसः ॥ ३ ॥

ववृधानाय तूर्वये पवन्ते वाज सातये सोमाः सहस्र पाजसः ॥ ३ ॥

कीर्तीनें वृद्धिंगत होणारा आणि दुष्टांना झपाट्यासरशीं ठार करून टाकणारा जो इंद्र त्याच्यासाठीं, आणि भक्तांना सत्वसामर्थ्याचा लाभ देण्यासाठीं, हे सहस्त्रतेजोबलाचे सोमरस वहात आहेत ३.


दु॒हा॒नः प्र॒त्नं इत् पयः॑ प॒वित्रे॒ परि॑ षिच्यते ।
क्रन्द॑न् दे॒वाँ अ॑जीजनत् ॥ ४ ॥

दुहानः प्रत्नं इत् पयः पवित्रे परि सिच्यते क्रन्दन् देवान् अजीजनत् ॥ ४ ॥

पूर्वींच्याच पेयाचें दोहन करणारा सोमरस पवित्रावर ओतला गेला, तेव्हां त्याने गर्जना करून दिव्यविबुधांना प्रकट केलें ४.


अ॒भि विश्वा॑नि॒ वार्या॒भि दे॒वाँ ऋ॑ता॒वृधः॑ ।
सोमः॑ पुना॒नो अ॑र्षति ॥ ५ ॥

अभि विश्वानि वार्या अभि देवान् ऋत वृधः सोमः पुनानः अर्षति ॥ ५ ॥

यच्चावत् अभिलक्षणीय वस्तु आणि सत्यधर्माचा उत्कर्ष करणार्‍या दिव्यविभूति ह्यांच्याकडेच हा पावन सोमरस वहात जातो ५.


गोम॑न् नः सोम वी॒रव॒दश्वा॑व॒द्वाज॑वत् सु॒तः ।
पव॑स्व बृह॒तीरिषः॑ ॥ ६ ॥

गो मत् नः सोम वीर वत् अश्व वत् वाज वत् सुतः पवस्व बृहतीः इषः ॥ ६ ॥

तर हे सोमा, तुझा रस पिळला म्हणजे तूं, गोधनयुक्त, वीरपुरुषयुक्त, अश्वयुक्त आणि सत्वसामर्थ्ययुक्त अशा उच्च मनोत्साहाचा प्रवाह आमच्यावर लोट ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - मेध्यातिथि काण्व : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


यो अत्य॑ इव मृ॒ज्यते॒ गोभि॒र्मदा॑य हर्य॒तः ।
तं गी॒र्भिर्वा॑सयामसि ॥ १ ॥

यः अत्यः इव मृज्यते गोभिः मदाय हर्यतः तं गीः भिः वासयामसि ॥ १ ॥

तीव्रवेगी वीराप्रमाणें आवेश उत्पन्न व्हावा म्हणून जो गोदुग्धानें माखला जातो, त्या सर्वप्रिय सोमाला आम्हीं स्तुतिरूप वस्त्रांनीं आच्छादित करतों १.


तं नो॒ विश्वा॑ अव॒स्युवो॒ गिरः॑ शुम्भन्ति पू॒र्वथा॑ ।
इन्दुं॒ इन्द्रा॑य पी॒तये॑ ॥ २ ॥

तं नः विश्वाः अवस्युवः गिरः शुम्भन्ति पूर्व था इन्दुं इन्द्राय पीतये ॥ २ ॥

कृपाप्रसादाची वाञ्छा धरणार्‍या आमच्या सकल स्तुति, त्या आल्हादप्रद रसाला इंद्रानें प्राशन करावें म्हणून पूर्वपद्धतीस अनुसरून अलंकृत करीत आहेत २.


पु॒ना॒नो या॑ति हर्य॒तः सोमो॑ गी॒र्भिः परि॑ष्कृतः ।
विप्र॑स्य॒ मेध्या॑तिथेः ॥ ३ ॥

पुनानः याति हर्यतः सोमः गीः भिः परि कृतः विप्रस्य मेध्य अतिथेः ॥ ३ ॥

सर्वप्रिय, भक्तपावन सोम हा स्तुतींनीं अलंकृत होऊन भक्तिज्ञानशील उपासक जो मेध्यातिथि त्याच्या यज्ञाकडे जात आहे ३.


पव॑मान वि॒दा र॒यिं अ॒स्मभ्यं॑ सोम सु॒श्रिय॑म् ।
इन्दो॑ स॒हस्र॑वर्चसम् ॥ ४ ॥

पवमान विदाः रयिं अस्मभ्यं सोम सु श्रियं इन्दो इति सहस्र वर्चसम् ॥ ४ ॥

पावनप्रवाहा सोमा, जें अत्यंत भूषणास्पद, जें हजारों प्रकारच्या ऊर्जस्वितेनें युक्त, तें वैभव हे आल्हादप्रदा सोमा, तूं आम्हांला प्राप्त करून दे ४.


इन्दु॒रत्यो॒ न वा॑ज॒सृत् कनि॑क्रन्ति प॒वित्र॒ आ ।
यदक्षा॒रति॑ देव॒युः ॥ ५ ॥

इन्दुः अत्यः न वाज सृत् कनिक्रन्ति पवित्रे आ यत् अक्षाः अति देव युः ॥ ५ ॥

संग्रामाकडे तडक निघालेला तीव्रवेगी सैनिक गर्जना करतो त्याप्रमाणें आल्हादप्रद सोमरस जेव्हां पवित्रांतून पाझरतो तेव्हां अशीच गर्जना करतो ५.


पव॑स्व॒ वाज॑सातये॒ विप्र॑स्य गृण॒तो वृ॒धे ।
सोम॒ रास्व॑ सु॒वीर्य॑म् ॥ ६ ॥

पवस्व वाज सातये विप्रस्य गृणतः वृधे सोम रास्व सु वीर्यम् ॥ ६ ॥

तर स्तुतिमर्मज्ञ अशा स्तवनकर्त्याच्या सत्वविजयासाठीं आणि त्याच्या उत्कर्षासाठीं तूं वहात रहा. हे सोमा, त्याला उच्चप्रतीचें शौर्य अर्पण कर ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अयास्य अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र ण॑ इन्दो म॒हे तन॑ ऊ॒र्मिं न बिभ्र॑दर्षसि ।
अ॒भि दे॒वाँ अ॒यास्यः॑ ॥ १ ॥

प्र नः इन्दो इति महे तने ऊर्मिं न बिभ्रत् अर्षसि अभि देवान् अयास्यः ॥ १ ॥

आल्हादप्रदा सोमा, आमच्या महासत्रासाठीं अविश्रान्त जो तूं, तो दिव्यविभूतिंकडे तरंगाकुल जलौघाप्रमाणेंच कीं काय वहात जातोस १.


म॒ती जु॒ष्टो धि॒या हि॒तः सोमो॑ हिन्वे परा॒वति॑ ।
विप्र॑स्य॒ धार॑या क॒विः ॥ २ ॥

मती जुष्टः धिया हितः सोमः हिन्वे परावति विप्रस्य धारया कविः ॥ २ ॥

भक्तांनीं मननपूर्वक ज्याची सेवा केली, ज्यांनीं एकाग्रबुद्धीनें त्याला हृदयांत ठेवला असा तो स्फूर्तिदायक सोम ज्ञानी भक्तांनीं ओतलेल्या नुसत्या धारेनेंच दूरच्या दिव्यलोकाकडे गेला २.


अ॒यं दे॒वेषु॒ जागृ॑विः सु॒त ए॑ति प॒वित्र॒ आ ।
सोमो॑ याति॒ विच॑र्षणिः ॥ ३ ॥

अयं देवेषु जागृविः सुतः एति पवित्रे आ सोमः याति वि चर्षणिः ॥ ३ ॥

हा जागरूक सोम पिळल्यावर दिव्यविबुधांकडे गमन करतो. तो विज्ञानशाली रस पवित्रांतून वाहत तिकडे जातो ३.


स नः॑ पवस्व वाज॒युश्च॑क्रा॒णश्चारुं॑ अध्व॒रम् ।
ब॒र्हिष्मा॒ँ आ वि॑वासति ॥ ४ ॥

सः नः पवस्व वाज युः चक्राणः चारुं अध्वरं बर्हिष्मान् आ विवासति ॥ ४ ॥

सात्विकतेचा भुकेला आणि आमचा मनोरम अध्वरयाग सिद्धीस नेणारा असा तूं आमच्यासाठीं वहात रहा. पहा हा यज्ञोत्सुक ऋत्विज् तुझी सेवा करीत आहे ४.


स नो॒ भगा॑य वा॒यवे॒ विप्र॑वीरः स॒दावृ॑धः ।
सोमो॑ दे॒वेष्व् आ य॑मत् ॥ ५ ॥

सः नः भगाय वायवे विप्र वीरः सदावृधः सोमः देवेषु आ यमत् ॥ ५ ॥

तो हा ज्ञानवीर आणि सदासमृद्ध सोम आमच्या भाग्योदयासाठीं आणि दिव्यविभूतिंमध्यें वायुदेवासाठीं हवीचें नियमन करो ५.


स नो॑ अ॒द्य वसु॑त्तये क्रतु॒विद्गा॑तु॒वित्त॑मः ।
वाजं॑ जेषि॒ श्रवो॑ बृ॒हत् ॥ ६ ॥

सः नः अद्य वसुत्तये क्रतु वित् गातुवित् तमः वाजं जेषि श्रवः बृहत् ॥ ६ ॥

सत्कृत्यप्रेरक आणि सन्मार्गावरील अत्युत्तम नेता असा तूं आम्हांला अक्षय्य धन मिळावें म्हणून सत्वाढ्यता आणि सत्कीर्ति हीं प्रथम जिंकून दे ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अयास्य अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


स प॑वस्व॒ मदा॑य॒ कं नृ॒चक्षा॑ दे॒ववी॑तये ।
इन्द॒व् इन्द्रा॑य पी॒तये॑ ॥ १ ॥

सः पवस्व मदाय कं नृ चक्षा देव वीतये इन्दो इति इन्द्राय पीतये ॥ १ ॥

मानवांचे निरीक्षण करणारा असा तूं दिव्यजनांनीं उल्लसित व्हावें, त्यांची सेवा आम्हांला घडावी आणि इंद्रानें तुजला प्राशन करावें, म्हणून सुखरूपपणें वहात रहा १.


स नो॑ अर्षा॒भि दू॒त्य१ ं त्वं इन्द्रा॑य तोशसे ।
दे॒वान् सखि॑भ्य॒ आ वर॑म् ॥ २ ॥

सः नः अर्ष अभि दूत्यं त्वं इन्द्राय तोशसे देवान् सखि भ्यः आ वरम् ॥ २ ॥

तुझ्याकडे जे दूतकार्य आहे त्याच्या सिद्धिसाठीं तूं वहात रहा. इंद्राप्रीत्यर्थ तुजला चुरून पिळलेला आहे तर मित्रांपेक्षांहि अधिक प्रेमानें तूं दिव्यविबुधांकडे वहात जा. २.


उ॒त त्वां अ॑रु॒णं व॒यं गोभि॑रञ्ज्मो॒ मदा॑य॒ कम् ।
वि नो॑ रा॒ये दुरो॑ वृधि ॥ ३ ॥

उत त्वां अरुणं वयं गोभिः अज्मः मदाय कं वि नः राये दुरः वृधि ॥ ३ ॥

आरक्तवर्ण अशा तुला आम्हीं हर्षनिर्भर होण्यासाठीं गोदुग्धाशीं मिश्रित करतों. आम्हांला अढळ धन मिळावें म्हणून त्याचीं द्वारें तूं लीलेनें उघडून दे ३.


अत्य् ऊ॑ प॒वित्रं॑ अक्रमीद्वा॒जी धुरं॒ न याम॑नि ।
इन्दु॑र्दे॒वेषु॑ पत्यते ॥ ४ ॥

अति ओं इति पवित्रं अक्रमीत् वाजी धुरं न यामनि इन्दुः देवेषु पत्यते ॥ ४ ॥

युद्धोत्सुक अश्व धुरेशी जोडला जाऊन मार्गावर धांवतो, त्याप्रमाणें सत्वाढ्य सोमरस पवित्रांतून झरझर वहातो; तो आल्हादकर रस दिव्यविबुधांमध्यें जाऊन पडतो ४.


सं ई॒ सखा॑यो अस्वर॒न् वने॒ क्रीळ॑न्तं॒ अत्य॑विम् ।
इन्दुं॑ ना॒वा अ॑नूषत ॥ ५ ॥

सं ईं इति सखायः अस्वरन् वने क्रीळन्तं अति अविं इन्दुं नावाः आनूषत ॥ ५ ॥

वनांमध्यें डुलत राहणार्‍या सोमाप्रीत्यर्थ आमच्या ऋत्विज मित्रांनीं मोठ्यानें गुणसंकीर्तन केलें आहे. ऊर्णावस्त्रांतून पाझरणार्‍या त्या इंदूचे स्वतः स्तुतींनींच स्तवन केलें आहे ५.


तया॑ पवस्व॒ धार॑या॒ यया॑ पी॒तो वि॒चक्ष॑से ।
इन्दो॑ स्तो॒त्रे सु॒वीर्य॑म् ॥ ६ ॥

तया पवस्व धारया यया पीतः वि चक्षसे इन्दो इति स्तोत्रे सु वीर्यम् ॥ ६ ॥

तुजला प्राशन केलें असतां ज्या धारेनें, हे आल्हादप्रदा, सूक्ष्मबुद्धि अशा भक्ताच्या ठिकाणीं तूं उत्तम शौर्य उत्पन्न करतोस, त्या धारेनें तूं वहात रहा ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अयास्य अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


असृ॑ग्रन् दे॒ववी॑त॒ये॑ऽत्यासः॒ कृत्व्या॑ इव ।
क्षर॑न्तः पर्वता॒वृधः॑ ॥ १ ॥

असृग्रन् देव वीतये अत्यासः कृत्व्याः इव क्षरन्तः पर्वत वृधः ॥ १ ॥

देवाच्या यज्ञासाठीं, पर्वतावर वाढणारे तीक्ष्ण सोमपल्लव, कर्तृत्वशाली तीव्र वीराप्रमाणें झराझर वहात आहेत १.


परि॑ष्कृतास॒ इन्द॑वो॒ योषे॑व॒ पित्र्या॑वती ।
वा॒युं सोमा॑ असृक्षत ॥ २ ॥

परि कृतासः इन्दवः योषा इव पित्र्य वती वायुं सोमाः असृक्षत ॥ २ ॥

पित्यानें दिलेल्या भूषणांनीं अलंकृत झालेल्या तरुणीप्रमाणें वसतीवरीला सुशोभित करून सोमरसांनीं वायुदेवाकडे गमन केलें २.


ए॒ते सोमा॑स॒ इन्द॑वः॒ प्रय॑स्वन्तः च॒मू सु॒ताः ।
इन्द्रं॑ वर्धन्ति॒ कर्म॑भिः ॥ ३ ॥

एते सोमासः इन्दवः प्रयस्वन्तः चमू इति सुताः इन्द्रं वर्धन्ति कर्म भिः ॥ ३ ॥

आल्हादप्रद आणि चमूपात्रांत पिळलेले भक्तप्रेमी सोमरसबिंदु भक्ताच्या यज्ञकर्मांनींच इंद्राचा महिमा वृद्धिंगत करितात ३.


आ धा॑वता सुहस्त्यः शु॒क्रा गृ॑भ्णीत म॒न्थिना॑ ।
गोभिः॑ श्रीणीत मत्स॒रम् ॥ ४ ॥

आ धावत सु हस्त्यः शुक्रा गृभ्णीत मन्थिना गोभिः श्रीणीत मत्सरम् ॥ ४ ॥

पिळदार भुजदंडाच्या ऋत्विजांनों, या आणि ह्या तेजस्वी रसाला मन्थिपात्रांत ओतून ठेवा. ह्या उल्लासप्रद सोमरसाला गोदुग्धाशीं मिश्र करा. ४.


स प॑वस्व धनंजय प्रय॒न्ता राध॑सो म॒हः ।
अ॒स्मभ्यं॑ सोम गातु॒वित् ॥ ५ ॥

सः पवस्व धनं जय प्र यन्ता राधसः महः अस्मभ्यं सोम गातु वित् ॥ ५ ॥

यशोधन जिंकणार्‍या सोमा, तूं उत्तमोत्तम वरदानांचा नियन्ता आहेस. तुझा रसप्रवाह यथेच्छ वाहूं दे. हे सोमा, तूं आम्हांला सन्मार्गाचा मार्गदर्शक झाला आहेस ५.


ए॒तं मृ॑जन्ति॒ मर्ज्यं॒ पव॑मानं॒ दश॒ क्षिपः॑ ।
इन्द्रा॑य मत्स॒रं मद॑म् ॥ ६ ॥

एतं मृजन्ति मर्ज्यं पवमानं दश क्षिपः इन्द्राय मत्सरं मदम् ॥ ६ ॥

दुग्धानें अलंकृत करण्यास योग्य अशा ह्या पावन रसाला दहा भगिनी अलंकृत करीत आहेत; ह्या हर्षकर आनंदरूप पेयाला इंद्राप्रीत्यर्थ सुरुचिर करीत आहेत ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४७ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


अ॒या सोमः॑ सुकृ॒त्यया॑ म॒हश्चि॑द॒भ्यवर्धत ।
म॒न्दा॒न उद्वृ॑षायते ॥ १ ॥

अया सोमः सु कृत्यया महः चित् अभि अवर्धत मन्दानः उत् वृष यते ॥ १ ॥

अशा सत्कृत्याच्या योगानें सोमानें मोठ्यांनाहि महत्त्वास चढविलें; असा हा हर्षोत्फ़ुल्ल रस आपलें वीर्य प्रकट करीत आहे. १.


कृ॒तानीद॑स्य॒ कर्त्वा॒ चेत॑न्ते दस्यु॒तर्ह॑णा ।
ऋ॒णा च॑ धृ॒ष्णुश्च॑यते ॥ २ ॥

कृतानि इत् अस्य कर्त्वा चेतन्ते दस्यु तर्हणा ऋणा च धृष्णुः चयते ॥ २ ॥

जे जे पराक्रम गाजवावयाचे होते, ते ते यानें गाजविले. ह्यानें केलेला पाखांडी लोकांचा नायनाट तर ढळढळीत दिसत आहे. हा धडाडीचा वीर भक्तांचे ऋण फेडतोच २.


आत् सोम॑ इन्द्रि॒यो रसो॒ वज्रः॑ सहस्र॒सा भु॑वत् ।
उ॒क्थं यद॑स्य॒ जाय॑ते ॥ ३ ॥

आत् सोमः इन्द्रियः रसः वज्रः सहस्र साः भुवत् उक्थं यत् अस्य जायते ॥ ३ ॥

इंद्राला प्रिय असा हा रस सहस्त्रावधि वेळां विजयी झालेलें जणों वज्रच बनून गेला आहे, आणि म्हणूनच याचें स्तवन भक्तजन करतात ३.


स्व॒यं क॒विर्वि॑ध॒र्तरि॒ विप्रा॑य॒ रत्नं॑ इच्छति ।
यदी॑ मर्मृ॒ज्यते॒ धियः॑ ॥ ४ ॥

स्वयं कविः वि धर्तरि विप्राय रत्नं इच्चति यदि मर्मृज्यते धियः ॥ ४ ॥

जर भक्त आपल्या ध्यानबुद्धि वारंवार स्वच्छ ठेवील तर स्फूर्तिदायक सोमरस विश्वाधार इंद्राच्या अधिष्ठानांत त्या ज्ञानप्रेमी भक्तासाठीं अमोल रत्‍नाची देणगी मागून घेईल ४.


सि॒षा॒सतू॑ रयी॒णां वाजे॒ष्व् अर्व॑तां इव ।
भरे॑षु जि॒ग्युषां॑ असि ॥ ५ ॥

सिसासतुः रयीणां वाजेषु अर्वतां इव भरेषु जिग्युषां असि ॥ ५ ॥

अचल धनाच्या लाभासाठीं प्रयत्‍न करणार्‍याचा, आणि सात्विक युद्धांत अश्वारूढ वीराचा जसा तूं सहाकारी असतोस, तसाच संग्रामांमध्यें विजयेच्छु वीराचाहि असतोस ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


तं त्वा॑ नृ॒म्णानि॒ बिभ्र॑तं स॒धस्थे॑षु म॒हो दि॒वः ।
चारुं॑ सुकृ॒त्यये॑महे ॥ १ ॥

तं त्वा नृम्णानि विभ्रतं सध स्थेषु महः दिवः चारुं सु कृत्यया ईमहे ॥ १ ॥

वीरोचित असे अनेक पराक्रम प्रकट करणारा जो तूं मनोरम विभूति, त्याला, अत्युच्च आकाशाच्या मन्दिरांत वास करणार्‍या सोमाला, आह्मीं सत्कर्मानींच आळवीत आहों १.


संवृ॑क्तधृष्णुं उ॒क्थ्यं म॒हाम॑हिव्रतं॒ मद॑म् ।
श॒तं पुरो॑ रुरु॒क्षणि॑म् ॥ २ ॥

संवृक्त धृष्णुं उक्थ्यं महामहिव्रतं मदं शतं पुरः रुरुक्षणिम् ॥ २ ॥

धाडसानें अंगावर चालून येणार्‍या शत्रूंना छाटून टाकणारा, प्रशंसनीय, मोठ्यांत मोठी सत्ता चालविणारा आणि शत्रूंच्या शेंकडों नगरांचा विध्वंस करणारा असा जो हर्षकर सोम त्याची आम्ही विनवणी करतों २.


अत॑स्त्वा र॒यिं अ॒भि राजा॑नं सुक्रतो दि॒वः ।
सु॒प॒र्णो अ॑व्य॒थिर्भ॑रत् ॥ ३ ॥

अतः त्वा रयिं अभि राजानं सुक्रतो इतिसु क्रतो दिवः सु पर्णः अव्यथिः भरत् ॥ ३ ॥

म्हणूनच तुज दिव्यधनाच्या राजाला, हे सत्कार्यशीला, ज्याला केव्हांहि व्यथा होत नाहीं अशा तुला सुपर्णानें द्युलोकांतून भूलोकीं आणलें ३.


विश्व॑स्मा॒ इत् स्वर्दृ॒शे साधा॑रणं रज॒स्तुर॑म् ।
गो॒पां ऋ॒तस्य॒ विर्भ॑रत् ॥ ४ ॥

विश्वस्मै इत् स्वः दृशे साधारणं रजः तुरं गोपां ऋतस्य विः भरत् ॥ ४ ॥

तुजला विश्वानें पहावे म्हणूनच, समतेनें वागविणारा, रजोलोकांतून त्वरेनें धांवणारा आणि सनातन सद्धर्माचा संरक्षक जो तूं, त्या तुज सोमाला, सुपर्णानें स्वर्गांतून खालीं आणलें ४.


अधा॑ हिन्वा॒न इ॑न्द्रि॒यं ज्यायो॑ महि॒त्वं आ॑नशे ।
अ॒भि॒ष्टि॒कृद्विच॑र्षणिः ॥ ५ ॥

अध हिन्वानः इन्द्रियं ज्यायः महि त्वं आनशे अभिष्टि कृत् वि चर्षणिः ॥ ५ ॥

इकडे पात्रांत एकसारखा हलविला गेल्यानें त्या सोमाला इंद्राजवळ अतिशय महत्त्व प्राप्त झालें आणि त्यायोगानेंच तो भक्तसहाय्यक आणि सर्वसंचारी झाला ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कवि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


पव॑स्व वृ॒ष्टिं आ सु नो॑ऽ॒पां ऊ॒र्मिं दि॒वस्परि॑ ।
अ॒य॒क्ष्मा बृ॑ह॒तीरिषः॑ ॥ १ ॥

पवस्व वृष्टिं आ सु नः अपां ऊर्मिं दिवः परि अयक्ष्माः बृहतीः इषः ॥ १ ॥

तूं रसाची वृष्टि कर; द्युलोकांतील उदकांच्या तरंगाप्रमाणें तुझा प्रवाह वाहूं दे. क्षयरोगाचा नाश करणारा जो तुझा श्रेष्ठ उत्साह त्याचाहि प्रवाह वाहूं दे १.


तया॑ पवस्व॒ धार॑या॒ यया॒ गाव॑ इ॒हागम॑न् ।
जन्या॑स॒ उप॑ नो गृ॒हम् ॥ २ ॥

तया पवस्व धारया यया गावः इह आगमन् जन्यासः उप नः गृहम् ॥ २ ॥

ज्या तुझ्या धाराप्रवाहानें धेनूं इकडे आल्या; जिच्या योगानें जनहितकारी धेनू आमच्या गृहांकडे आल्या अशा धारेनें वहात रहा २.


घृ॒तं प॑वस्व॒ धार॑या य॒ज्ञेषु॑ देव॒वीत॑मः ।
अ॒स्मभ्यं॑ वृ॒ष्टिं आ प॑व ॥ ३ ॥

घृतं पवस्व धारया यजेषु देव वीतमः अस्मभ्यं वृष्टिं आ पव ॥ ३ ॥

यज्ञांत आपल्या धारेनें घृताचा प्रवाह वाहूं दे. आणि देवाला अत्यंत प्रिय असा तूं आमच्यासाठीं पर्जन्यवृष्टि कर ३.


स न॑ ऊ॒र्जे व्य् अ१ व्ययं॑ प॒वित्रं॑ धाव॒ धार॑या ।
दे॒वासः॑ शृ॒णव॒न् हि क॑म् ॥ ४ ॥

सः नः ऊर्जे वि अव्ययं पवित्रं धाव धारया देवासः शृणवन् हि कम् ॥ ४ ॥

आमच्या ओजस्वितेसाठीं ह्या ऊर्णावस्त्राच्या गाळणींतून तूं धाराप्रवाहानें धांवत वहा. तुझ्या प्रवाहाचा निनाद दिव्यविबुध मजेनें ऐकत आहेत ४.


पव॑मानो असिष्यद॒द्रक्षां॑स्य् अप॒जङ्घ॑नत् ।
प्र॒त्न॒वद्रो॒चय॒न् रुचः॑ ॥ ५ ॥

पवमानः असिस्यदत् रक्षांसि अप जङ्घनत् प्रत्न वत् रोचयन् रुचः ॥ ५ ॥

यज्ञपावन सोमरस, राक्षसांची धुळधाण करून प्राचीन पद्धतीप्रमाणें आपल्या कान्ति उजळून वहात राहिला आहे ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - उचथ्य अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


उत् ते॒ शुष्मा॑स ईरते॒ सिन्धो॑रू॒र्मेरि॑व स्व॒नः ।
वा॒णस्य॑ चोदया प॒विम् ॥ १ ॥

उत् ते शुष्मासः ईरते सिन्धोः ऊर्मेः इव स्वनः वाणस्य चोदय पविम् ॥ १ ॥

पहा तुझा दणदणाट समुद्राच्या लाटेच्या निर्घोषाप्रमाणें कानावर पडत आहे, आतां आपल्या बाणाचें वज्रास्त्र तूं शत्रूंवर फेंक १.


प्र॒स॒वे त॒ उदी॑रते ति॒स्रो वाचो॑ मख॒स्युवः॑ ।
यदव्य॒ एषि॒ सान॑वि ॥ २ ॥

प्र सवे ते उत् ईरते तिस्रः वाचः मखस्युवः यत् अव्ये एषि सानवि ॥ २ ॥

ज्या वेळीं तूं लोंकरीच्या पवित्राच्या शिखरावर आरोहण करतोस आणि तुझ रस पिळला जातो, त्या वेळीं तीन प्रकारच्या यज्ञोचित स्तुति ऋत्विजांच्या मुखावाटे निघतात २.


अव्यो॒ वारे॒ परि॑ प्रि॒यं हरिं॑ हिन्व॒न्त्यद्रि॑भिः ।
पव॑मानं मधु॒श्चुत॑म् ॥ ३ ॥

अव्यः वारे परि प्रियं हरिं हिन्वन्ति अद्रि भिः पवमानं मधु श्चुतम् ॥ ३ ॥

देवप्रिय, हरिद्वर्ण, पावन आणि मधुररसस्त्रावी सोमाला ग्राव्यांनीं चुरून लोंकरीच्या गाळण्यावर ठेऊन हालवितात ३.


आ प॑वस्व मदिन्तम प॒वित्रं॒ धार॑या कवे ।
अ॒र्कस्य॒ योनिं॑ आ॒सद॑म् ॥ ४ ॥

आ पवस्व मदिन् तम पवित्रं धारया कवे अर्कस्य योनिं आसदम् ॥ ४ ॥

अत्यंत आवेश उत्पन्न करणार्‍या सोमा, हे स्फूर्तिप्रदा, अर्कस्तोत्राच्या मूलस्थानीं आरोहण करण्यासाठीं तूं धाराप्रवाहानें पवित्रांतून वहात रहा ४.


स प॑वस्व मदिन्तम॒ गोभि॑रञ्जा॒नो अ॒क्तुभिः॑ ।
इन्द॒व् इन्द्रा॑य पी॒तये॑ ॥ ५ ॥

सः पवस्व मदिन् तम गोभिः अजानः अक्तु भिः इन्दो इति इन्द्राय पीतये ॥ ५ ॥

पूर्ण तल्लीनता आणणार्‍या रसा, तुझ्याशीं अगदीं सहज मिसळून जाणार्‍या गोदुग्धानें तूं संपृक्त झाला आहेस, तर हे आल्हादप्रदा, इंद्रानें प्राशन करावें म्हणून तुझा रसप्रवाह वाहूं दे ५.


ॐ तत् सत्


GO TOP