|
ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ७१ ते ८० ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७१ ( अश्विनीकुमारसूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्
अप॒ स्वसु॑रु॒षसो॒ नग्जि॑हीते रि॒णक्ति॑ कृ॒ष्णीर॑रु॒षाय॒ पन्था॑म् ।
अप स्वसुः उषसः नक् जिहीते रिणक्ति कृष्णीः अरुषाय पन्थां
आपली भगिनी जी उषा, तिच्यापासून रात्र दूर सरते. तमोममय रात्र उषेच्या अरुणवर्ण प्रभेसाठी मार्ग मोकळा करते. उषा ही अश्ववीर देणारी, गोधन (प्रकाशधन) देणारी आहे. तुमच्याकरितां आम्ही तिला पाचारण करतो. तर अश्वीहो, अंधकार आणि त्यांतील घातपात हे आम्हांपासून दूर करा. ॥ १ ॥
उ॒पाया॑तं दा॒शुषे॒ मर्त्या॑य॒ रथे॑न वा॒मम॑श्विना॒ वह॑न्ता ।
उपऽआयातं दाशुषे मर्त्याय रथेन वामं अश्विना वहन्ता
हा जो तुमचा मानवी भक्तजन त्याच्याकडे अत्यंत अभिलषणीय असे जें धन ते घेऊन या. दारिद्र्य आणि रोग ह्यांना आमच्यांतून हांकलून लावा, आणि हे मधुररसप्रिय देवांनो, रात्रंदिवस आमचे रक्षण करा. ॥ २ ॥
आ वां॒ रथ॑मव॒मस्यां॒ व्यु॑ष्टौ सुम्ना॒यवो॒ वृष॑णो वर्तयन्तु ।
आ वां रथं अवमस्यां विऽउष्टौ सुम्नऽयवः वृषणः वर्तयन्तु
आता जो प्रभातकाळ उजाडेल त्यावेळी तुमचे कल्याणकारी आणि वीर्यशाली अश्व, तुमचा रथ आमच्याकडे वळवून आणोत; तुमच्या रथाची झळाळीसुद्धा सुखकारक असते; आणि त्याचे अश्व तुमच्या न्यायप्रेमामुळेच जोडले जातात. तर असा तो तुमचा ऐश्वर्यांडित रथ तुम्ही इकडे घेऊन या. ॥ ३ ॥
यो वां॒ रथो॑ नृपती॒ अस्ति॑ वो॒ळ्हा त्रि॑वन्धु॒रो वसु॑मा.ण् उ॒स्रया॑मा ।
यः वां रथः नृपती इतिनृऽपती अस्ति वोळ्हा त्रिऽवन्धुरः वसुऽमान् उस्रऽयामा
हे वीर प्रतिपालकांनो, तुमचा रथ तुम्हाला आरोहण करण्याला अगदी योग्य आहे; त्यात बैठकी तीन आहेत. भक्तांना देण्यासाठी उत्कृष्ट वस्तूहि त्यांत भरल्या आहेत. तो प्रभातकालींच गमन करतो. तर अशा योग्य रथांत बसून हे सत्यस्वरूप अश्वीहो, तुम्ही आगमन करा. तुमचा रथ पाहिजे ते कार्य करण्याला समर्थ आहे. आणि तो पाहिजे तिकडे परिभ्रमण करूं शकतो. ॥ ४ ॥
यु॒वं च्यवा॑नं ज॒रसो॑ऽमुमुक्तं॒ नि पे॒दव॑ ऊहथुरा॒शुमश्व॑म् ।
युवं च्यवानं जरसः अमुमुक्तं नि पेदवे ऊहथुः आशुं अश्वं
तुम्ही च्यवनाला वार्धक्यापासून सोडविलेत. यदूला एक भरधांव दौडणारा सर्वगामी अश्व अर्पण केलात. अत्रीऋषीला अंधकाराच्या अधोगतीपासून मुक्त केलेंत, आणि जहुषाला (जेथे जखडून टाकले होते, त्या) प्रतिबंधनांतून त्याला मोकळे केलेत. ॥ ५ ॥
इ॒यं म॑नी॒षा इ॒यम॑श्विना॒ गीरि॒मां सु॑वृ॒क्तिं वृ॑षणा जुषेथाम् ।
इयं मनीषा इयं अश्विना गीः इमां सुऽवृक्तिं वृषणा जुषेथां
ही तुमची मननसेवा, हे अश्वीदेवांनो, ही तदनुरूप स्तुति, आणि ही उत्कृष्ट काव्यरचना, तर हे अश्वीदेवांनो, तिचा प्रसन्नतेने स्वीकार करा. ही प्रार्थनासूक्ते तुमच्याच सेवेसाठी तुमच्याकडे गेली आहेत. तर हे देवांनो, तुम्ही आपल्या आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७२ ( अश्विनीकुमारसूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्
आ गोम॑ता नासत्या॒ रथे॒नाश्वा॑वता पुरुश्च॒न्द्रेण॑ यातम् ।
आ गोऽऽमता नासत्या रथेन अश्वऽवता पुरुऽचन्द्रेण यातं
गोधनयुक्त (=प्रकाश धनयुक्त), अश्वधनयुक्त आणि अत्यंत महोल्हादी अशा रथांतून, हे सत्यस्वरूप अश्वीहो, इकडे या. सर्वत्रांच्या उद्दिष्ट स्तुति तुमच्याच सेवेस सादर असतात. आणि स्पृहणीय अशा ऐश्वर्याने तुम्ही मण्डित असतां. ॥ १ ॥
आ नो॑ दे॒वेभि॒रुप॑ यातम॒र्वाक्स॒जोष॑सा नासत्या॒ रथे॑न ।
आ नः देवेभिः उप यातं अर्वाक् सऽजोषसा नासत्या रथेन
सत्यस्वरूप अश्वीहो, तुम्ही दिव्य विबुधांसह तुमच्या प्रेमपूर्ण रथांत बसून इकडे भूलोकी आगमन करा. तुमचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आमच्या वाडवडिलांपासूनच आहे. तसेच तुमचा बंधुभावहि सर्व भक्तांशी आहे, ही गोष्ट अवश्य लक्षात घ्या. ॥ २ ॥
उदु॒ स्तोमा॑सो अ॒श्विनो॑रबुध्रञ्जा॒मि ब्रह्मा॑ण्यु॒षस॑श्च दे॒वीः ।
उत् ओं इति स्तोमासः अश्विनोः अबुध्रन् जामि ब्रह्माणि उषसः च देवीः
अश्वीदेवांच्या स्तुतिस्तोत्रांनी ह्यावेळी जिकडे तिकडे सर्वांना जागृत केले तेव्हां, प्रार्थनासूक्ते आणि उषादेवी ह्यांचाहि निकट आप्तसंबंध जडला; आणि सर्वांचा आधा ज्या रोदसी त्यांची सेवा करून काव्यप्रेमी भक्तजन सत्यस्वरूप अश्विदेवांचे गुणवर्णन करू लागले. ॥ ३ ॥
वि चेदु॒च्छन्त्य॑श्विना उ॒षासः॒ प्र वां॒ ब्रह्मा॑णि का॒रवो॑ भरन्ते ।
वि च इत् उच्चन्ति अश्विनौ उषसः प्र वां ब्रह्माणि कारवः भरन्ते
हे अश्वीहो, उषादेवी सुप्रकाशित होऊ लागल्या; आणि स्तोत्र-कुशल भक्तजन प्रार्थनासूक्ते अर्पण करू लागले. जगत्प्रसव सविता देवहि आपला रश्मिसमूह प्रसृत करीत चालला, आणि वेदीवरील अग्निप्रित्यर्थ समिधा अर्पण होऊन त्याचे गुणसंकीर्तन होऊं लागले. ॥ ४ ॥
आ प॒श्चाता॑न्नास॒त्या पु॒रस्ता॒दाश्वि॑ना यातमध॒रादुद॑क्तात् ।
आ पश्चातात् नासत्या आ पुरस्तात् आ अश्विना यातं अधरात् उदक्तात्
म्हणून हे सत्यस्वरूप देवहो, तुम्ही आमच्या पाठीमागील प्रदेशांत असला, तरी आमचेकडे या. हे अश्विदेवहो, समोरच्या प्रदेशांत, किंवा खालच्या लोकीं अथवा वर आकाशांत असलां तरी तेथूनहि या. इतकेच काय, पण सर्व बाजूंनी आगमन करा; आणि तेही पांच समाजांना हितकर अशा संपत्तीसह आगमन करा; आणि अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७३ ( अश्विनीकुमारसूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्
अता॑रिष्म॒ तम॑सस्पा॒रम॒स्य प्रति॒ स्तोमं॑ देव॒यन्तो॒ दधा॑नाः ।
अतारिष्म तमसः पारं अस्य प्रति स्तोमं देवऽयन्तः दधानाः
ह्या पापरूपी आणि क्लेशरूपी अंधकाराच्या आम्ही पार पडलो. देवाकडे लक्ष ठेवून त्यांचे स्तवन करीत राहिलो म्हणून अंधकारांतून पलिकडे गेलो. आणि आता हे अश्वीहो, तुम्ही अद्भुत कार्य करणारे, सर्वांना पुरून उरणारे, अतिशय पुरातन आणि अमर आहांत, म्हणूनच तुम्हाला आमची स्तुतिवाणी नम्रपणे पाचारण करीत आहे. ॥ १ ॥
न्यु॑ प्रि॒यो मनु॑षः सादि॒ होता॒ नास॑त्या॒ यो यज॑ते॒ वन्द॑ते च ।
नि ओं इति प्रियः मनुषः सादि होता नासत्या यः यजते वन्दते च
ऋत्विजांचा आवडता यज्ञसंपादक आसनस्थ होऊन, हे सत्यस्वरूप देवांनो, तुमचे यजन करून तुम्हाला प्रणाम करीत आहे. तर हे अश्वीहो, तुम्ही येथे आमच्या सन्निध येऊन ह्या मधुररसाचे सेवन करा. ह्या यज्ञसभेमध्ये तुमच्या प्रसन्नतेची इच्छा धरणारा मी तुमचे यशस्तवन करीत आहे. ॥ २ ॥
अहे॑म य॒ज्ञं प॒थामु॑रा॒णा इ॒मां सु॑वृ॒क्तिं वृ॑षणा जुषेथाम् ।
अहेम यज्ञं पथां उराणाः इमां सुऽवृक्तिं वृषणा जुषेथां
तुमचा धर्ममार्ग अनुसरणारे आम्ही भक्तजन हा यज्ञ तुमच्या प्रीत्यर्थ संपादन करीत आहोत. तर हे वीरांनो, ह्या उत्तम कवनांच्या योगाने संतुष्ट व्हा. पहा, आज्ञाधारक दूत पुढे पाठवावा त्याप्रमाणे मी वसिष्ठाने तुमची महती वर्णन करून तुमचे लक्ष वेधून घेतले आहे. ॥ ३ ॥
उप॒ त्या वह्नी॑ गमतो॒ विशं॑ नो रक्षो॒हणा॒ सम्भृ॑ता वी॒ळुपा॑णी ।
उप त्या वह्नी इति गमतः विशं नः रक्षःऽहना सम्ऽभृता वीळुपाणी इतिवीळुऽपाणी
भक्तास देण्याकरितां वरप्रसाद घेऊन येणारे पहा ते अश्वीदेव आमच्या निवासाकडेच येत आहेत. ते राक्षसांचा नाश करणारे, आयुधांनी सुसज्ज, आणि भुजदंडांनी सुदृढ आहेत. तर हे अश्वीहो, आम्हांला झिडकारू नका, ह्या हर्षवर्धक मधुर पेयांकडे आगमन करा, तुमच्या मंगल वरदानांसह इकडे या. ॥ ४ ॥
आ प॒श्चाता॑न्नास॒त्या पु॒रस्ता॒दाश्वि॑ना यातमध॒रादुद॑क्तात् ।
आ पश्चातात् नासत्या आ पुरस्तात् आ अश्विना यातं अधरात् उदक्तात्
सत्यस्वरूपांनो, तुम्ही आमच्या पाठीमागील प्रदेशांत असला, तरी आमचेकडे या. हे अश्विदेवहो, समोरच्या प्रदेशांत, किंवा खालच्या लोकीं अथवा वर आकाशांत असलां तरी तेथूनहि या. इतकेच काय, पण सर्व बाजूंनी आगमन करा; आणि तेही पांच समाजांना हितकर अशा संपत्तीसह आगमन करा; आणि अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७४ ( अश्विनीकुमारसूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - विषम-सतोबृहती, सम-सतोबृहती
इ॒मा उ॑ वां॒ दिवि॑ष्टय उ॒स्रा ह॑वन्ते अश्विना ।
इमाः ओं इति वां दिविष्टयः उस्रा हवन्ते अश्विना
हे अश्वीहो, ह्या प्रातःकालच्या इष्टि तुम्हां प्रकाशरूप देवांना पाचारण करीत आहेत. म्हणून मीही तुमच्या कृपाप्रसादासाठी हे दिव्य शक्तिसंपन्नांनो, तुमची करुणा भाकतो, कारण तुम्ही तर प्रत्येक भक्ताकडे जात असता आणि संपादन कराण्याला योग्य अशी अद्भुत वस्तु, हे वीरांनो, तुम्ही देत असतां. ॥ १ ॥
यु॒वं चि॒त्रं द॑दथु॒र्भोज॑नं नरा॒ चोदे॑थां सू॒नृता॑वते ।
युवं चित्रं ददथुः भोजनं नरा चोदेथां सूनृतावते
नव्हे अशी वस्तू सत्य, मधुरभाषी भक्ताकडे तुम्ही आपण होऊन पाठवून देतां, तर प्रसन्नचित्ताने तुम्ही आपला रथ आमच्याकडे वळवा, आणि आमच्या सोमरसाच्या माधुर्याचा आस्वाद घ्या. ॥ २ ॥
आ या॑त॒मुप॑ भूषतं॒ मध्वः॑ पिबतमश्विना ।
आ यातं उप भूषतं मध्वः पिबतं अश्विना
तर या, अश्वीहो, इकडे असे सन्निध या, आणि या मधुररसाचे प्राशन करा. हे वीरांनो, हे विजयश्री संपन्नांनो, आम्हाला धुडकावून देऊ नका, आमच्याकडे याच. ॥ ३ ॥
अश्वा॑सो॒ ये वा॒मुप॑ दा॒शुषो॑ गृ॒हं यु॒वां दीय॑न्ति॒ बिभ्र॑तः ।
अश्वासः ये वां उप दाशुषः गृहं युवां दीयन्ति बिभ्रतः
हे तुमचे अश्व तुम्हाला रथांतून भक्ताच्या गृहाकडे घेऊन जातात, त्याच शीघ्रगति अश्वांसह, हे शूर अश्विदेवांनो, तुम्ही आमचा कळवळा बाळगून आमच्याकडे या. ॥ ४ ॥
अधा॑ ह॒ यन्तो॑ अ॒श्विना॒ पृक्षः॑ सचन्त सू॒रयः॑ ।
अध ह यन्तः अश्विना पृक्षः सचन्त सूरयः
हे पहा अश्विदेव येण्यास निघाले असतील तोंच आमच्या धुरीणांना सामर्थ्याचा लाभ झाला. दानशाली यजमानांना ते सत्यस्वरूप अश्विदेव अक्षय्य यश देतात; आणि आम्हालाही त्या यशाचा अढळ आधार प्राप्त करून देतात. ॥ ५ ॥
प्र ये ययुः अवृकासः रथाःऽइव नृऽपातारः जनानां
कोणाचाही घातपात न करता, युद्धांतील रथाप्रमाणे जे लोकनायक जनतेचे संरक्षण करून देवाला शरण गेले, ते शूर पुरुष आमच्याच उत्कट सामर्थ्याने वृद्धिंगत होऊन उत्कर्ष पावले, आणि तेच आता उत्कृष्ट प्रदेशांत उत्तम लोकांत निश्चिंतपणे राहत आहेत. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७५ ( उषासूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्
व्यु१षा आ॑वो दिवि॒जा ऋ॒तेना॑विष्कृण्वा॒ना म॑हि॒मान॒मागा॑त् ।
वि उषाः आवः दिविऽजाः ऋतेन आविःऽकृण्वाना महिमानं आ अगात्
ही द्युलोकामध्ये प्रकट होणारी उषा पहा प्रकाशित होऊं लागली. आपला थोरपणा सद्धर्मानेंच व्यक्त करणारी ही उषा दृग्गोचर झाली; सुप्रकाशित होऊन तिने दुष्ट, अधम, आणि तिरस्करणीय अंधकार ह्यांचा प्रथम बीमोड केला; आणि अंगिरसाना अत्यंत आदरणीय अशा ह्या उषेने सन्मार्गवर्ती लोकांना जागृत केले. ॥ १ ॥
म॒हे नो॑ अ॒द्य सु॑वि॒ताय॑ बो॒ध्युषो॑ म॒हे सौभ॑गाय॒ प्र य॑न्धि ।
महे नः अद्य सुविताय बोधि उषः महे सौभगाय प्र यन्धि
आमचे श्रेष्ठ जे कल्याण, ते प्राप्त करून घेण्यासाठी आम्हांस जागृत कर; हे उषे, आम्हाला महद्भाग्य लाभावे म्हणून प्रेरणा कर. अद्भुत धन आणि यश आम्हाला अर्पण कर; आणि मानवहितकारिके देवि, ते असे असावे कीं, जे लोकामध्ये अपूर्व ठरावे. ॥ २ ॥
ए॒ते त्ये भा॒नवो॑ दर्श॒ताया॑श्चि॒त्रा उ॒षसो॑ अ॒मृता॑स॒ आगुः॑ ।
एते त्ये भानवः दर्शतायाः चित्राः उषसः अमृतासः आ अगुः
दर्शनीय रूपवती जी उषा, तिचे अद्भुत आणि अविनाशी किरण पहा दिसूं लागले आहेत. देवांनी घालून दिलेले नियम आचरण्याचा पहिला धडा तेच देतात, आणि सर्व अंतरिक्ष प्रदेश व्यापून टाकून जिकडे तिकडे पसरतात. ॥ ३ ॥
ए॒षा स्या यु॑जा॒ना प॑रा॒कात्पञ्च॑ क्षि॒तीः परि॑ स॒द्यो जि॑गाति ।
एषा स्या युजाना पराकात् पञ्च क्षितीः परि सद्यः जिगाति
ही उषा दूर असतानाच आपापल्या कामांत ज्याची त्याची योजना करून पांचहि जनसमूहांच्या प्रदेशाभोंवती झटपट प्रदक्षिणा करते; आणि असे करताना लोकांची सर्व बरीवाईट राहाटी आणि पद्धति ह्यांचे निरीक्षण - ही आकाशकन्या आणि जगाची मालकीण जी उषा - ती करीत असते. ॥ ४ ॥
वा॒जिनी॑वती॒ सूर्य॑स्य॒ योषा॑ चि॒त्राम॑घा रा॒य ई॑शे॒ वसू॑नाम् ।
वाजिनीऽवती सूर्यस्य योषा चित्रऽमघा रायः ईशे वसूनां
सत्त्वाढ्य वृत्तीची प्रवर्तक आणि सूर्याची प्रियपत्नी अशी जी ही उषा तिची देणगी तर अद्भुत असतेच, पण सर्व अभिलषणीय वस्तूंची आणि धनांची ती स्वामिनी आहे; म्हणून ऋषि तिचे स्तवन करतात, आणि तीहि औदर्यशालिनी उषा, त्यांना काव्यगायनाची स्फूर्ति देते. याप्रमाणे हविर्भाग अर्पण करणार्या भक्तांनी जिचे गुणगायन केलेले असते अशी उषा आपला उज्ज्वल प्रकाश प्रसृत करीत असते. ॥ ५ ॥
प्रति॑ द्युता॒नाम॑रु॒षासो॒ अश्वा॑श्चि॒त्रा अ॑दृश्रन्नु॒षसं॒ वह॑न्तः ।
प्रति द्युतानां अरुषासः अश्वाः चित्राः अदृश्रन् उषसं वहन्तः
ज्यांच्या अंगावर चित्रविचित्र रंगांची लकेर मारते, असे आरक्त अश्व प्रभावशालिनी उषेला रथांतून वर घेऊन येतांना दिसूं लागले. पहा, शुभ्र तेजोमय उषा आपल्या सर्वांगसुंदर रथांतून येत आहे, आणि येतांना देवोपासक भक्ताला त्याचे इच्छित रत्न अर्पण करीत आहे. ॥ ६ ॥
स॒त्या स॒त्येभि॑र्मह॒ती म॒हद्भि॑ र्दे॒वी दे॒वेभि॑र्यज॒ता यज॑त्रैः ।
सत्या सत्येभिः महती महत्ऽभिः देवी देवेभिः यजता यजत्रैः
उषा ही सत्यमार्गानुसारी लोकांना सत्यस्वरूप, श्रेष्ठ विभूतींना श्रेष्ठ, पूज्यांना पूज्य, दिव्य जनांमध्ये देवि, आणि यज्ञार्ह देवांमध्ये यजनीय अशी आहे. दुर्जनांच्या कणखरपणाचा भंग करून प्रकाशरूप धेनूंना तिने मुक्त केले, म्हणून च प्रातःकाली उषेकडे तोंड करून धेनु आनंदाने हंबरतात. ॥ ७ ॥
नू नो॒ गोम॑द्वी॒रव॑द्धेहि॒ रत्न॒दमुषो॒ अश्वा॑वत्पुरु॒भोजो॑ अ॒स्मे ।
नु नः गोऽऽमत् वीरऽवत् धेहि रत्नं उषः अश्वऽवत् पुरुऽभोजः अस्मे इति
हे उषे, तू गोधन, शूर सैनिक आणि अश्ववीर ह्यांनी परिपूर्ण असे उच्च वैभव आम्हांला अर्पण कर. दुर्बल मानवी स्वभावाला सहज अशी जी निंदा त्या निंदेला आमचा यज्ञ पात्र होऊं देऊं नको, आणि नेहमी असाच आशीर्वाद देऊन तूं आमचे रक्षण कर. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७६ ( उषासूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्
उदु॒ ज्योति॑र॒मृतं॑ वि॒श्वज॑न्यं वि॒श्वान॑रः सवि॒ता दे॒वो अ॑श्रेत् ।
उत् ओं इति ज्योतिः अमृतं विश्वऽजन्यं विश्वानरः सविता देवः अश्रेत्
जगत्प्रसव जो सविता देव, त्याने आम्हाला अविनाशी, लोकहितकारी, आणि सकल लोकप्रिय प्रकाश जिकडे तिकडे फांकून दिला आहे; तो दिव्य विबुधांचा नेत्र, आणि त्यांच्याच पुण्यकृतीने तो प्रकट झाला. पण त्यापूर्वीच उषेने हे सर्व भुवन लोकांना दृग्गोचर केले. ॥ १ ॥
प्र मे॒ पन्था॑ देव॒याना॑ अदृश्र॒न्नम॑र्धन्तो॒ वसु॑भि॒रिष्कृ॑तासः ।
प्र मे पन्था देवऽयानाः अदृश्रन् अमर्धन्तः वसुऽभिः इष्कृतासः
देवयानाचा (म्हणजेच रविच्या उद्गयनाचा) मार्गसुद्धां पुढें दिसूं लागला. त्या मार्गाने जाणार्याचा कधींहि घात होत नाही. इतकेच नव्हे, तर तो उत्तमोत्तम वस्तूंनी परिपूर्ण आहे. हा पहा उषेचा ध्वज देखील पुढे फडफडूं लागला, आणि मागून तीही उत्तुंग प्रासादांच्या शिखरांपेक्षांही वर चढून पुढे आली. ॥ २ ॥
तानीदहा॑नि बहु॒लान्या॑स॒न्या प्रा॒चीन॒मुदि॑ता॒ सूर्य॑स्य ।
तानि इत् अहानि बहुलानि आसन् या प्राचीनं उत्ऽइता सूर्यस्य
खरोखर, प्रयेक दिवशी पूर्व दिग्भागी सूर्य उदय पावलेला आहे, आणि असे दिवस किती तरी लोटून गेले असतील. पण ह्या प्रत्येक वेळी, नवयुवतीचा जसा प्रियवल्लभ, त्याप्रमाणे तूं त्याच्याशी वागलीस. हे उषे ! विरक्त स्त्रीप्रमाणे तू त्याला सोडून दुसरीकडे कोठेंही हिंडत राहिली नाहीस. ॥ ३ ॥
त इद्दे॒वानां॑ सध॒माद॑ आसन्नृ॒तावा॑नः क॒वयः॑ पू॒र्व्यासः॑ ।
ते इत् देवानां सधऽमादः आसन् ऋतऽवानः कवयः पूर्व्यासः
सद्धर्माने, सत्य-न्याय मार्गाने वागणारे जे प्राचीन ज्ञानी कवि तेच देवांबरोबर स्वर्लोकी राहून त्यांच्यासह आनंदमग्न झाले. अशा त्या आमच्या वाडवडिलांना अत्यंत गूढ असा प्रकाश दृग्गोचर झाला. ते सत्यमंत्र होते. ते जे जे मंत्र म्हणत त्याप्रमाणे घडून येत असे, आणि त्यांनीच उषेला उत्पन्न केले. ॥ ४ ॥
स॒मा॒न ऊ॒र्वे अधि॒ संग॑तासः॒ सं जा॑नते॒ न य॑तन्ते मि॒थस्ते ।
समाने ऊर्वे अधि सम्ऽगतासः सं जानते न यतन्ते मिथः ते
सर्व पुण्यपुरुषांना जेथे जातां येते तेथे त्या विस्तीर्ण स्वर्गलोकी ते एकत्र राहतात. त्यांचा विचार एकच आहे, त्यांचे ज्ञानही एकसारखे आहे. ते परस्परांशी कधी कलह करीत नाहीत. देवांच्या अनुशासनांचाहि कधी भंग करीत नाहींत आणि कोणालाही उपद्रव न देतां सर्व अभीलषणीय वस्तू त्यांनी आपल्या हातांत ठेवल्या आहेत. ॥ ५ ॥
प्रति॑ त्वा॒ स्तोमै॑रीळते॒ वसि॑ष्ठा उष॒र्बुधः॑ सुभगे तुष्टु॒वांसः॑ ।
प्रति त्वा स्तोमैः ईळते वसिष्ठाः उषःऽबुधः सुऽभगे तुस्तुऽवांसः
प्रातःकाली जागृत होऊन वसिष्ठकुलोत्पन्न भक्त कवि तुझे स्तवन काव्यकलापांनी करीत आहेत. हे सद्भाग्यवति उषे, ते तुझे स्तवन करीत असतात. तूं प्रकाशधेनूंची मार्गदर्शक आणि सत्त्वसामर्थ्याची स्वामिनी आहेस. तर तू सुप्रकाशित हो. हे पवित्र प्रभवे उषे, तुझेंच स्तवन प्रथम होऊं दे. ॥ ६ ॥
ए॒षा ने॒त्री राध॑सः सू॒नृता॑नामु॒षा उ॒च्छन्ती॑ रिभ्यते॒ वसि॑ष्ठैः ।
एषा नेत्री राधसः सूनृतानां उषाः उच्चन्ती रिभ्यते वसिष्ठैः
देवांचा कृपाप्रसाद भक्ताकडे आणणारी आणि त्याच्या मधुर काव्यांना स्फूर्ति देणारी उषा पहा प्रकाशूं लागली, आणि तिचे स्तवनही वसिष्ठांनी केले. तर हे उषे, ज्याची कीर्ति दूरवर ऐकण्यात येईल असे ऐश्वर्य तूं आम्हाला अर्पण करून अशाच आशीर्वचनांनी आमचे निरंतर रक्षण कर. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७७ ( उषासूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्
उपो॑ रुरुचे युव॒तिर्न योषा॒ विश्वं॑ जी॒वं प्र॑सु॒वन्ती॑ च॒रायै॑ ।
उपो इति रुरुचे युवतिः न योषा विश्वं जीवं प्रऽसुवन्ती चरायै
ही पहा उषा एकाद्या नवयौवन संपन्न स्त्रीप्रमाणे नुसती चमकून राहिली आहे. प्रत्येक प्राणीमात्राने उद्योग करावा म्हणून ती त्याला तिकडे प्रवृत्त करीत असते. तोंच भक्तजनांच्या समिधांनी अग्नि प्रदीप्त झाला आणि त्याने प्रकाशित होऊम अंधकाराचा नायनाट करून टाकला. ॥ १ ॥
विश्वं॑ प्रती॒ची स॒प्रथा॒ उद॑स्था॒द्रुश॒द्वासो॒ बिभ्र॑ती शु॒क्रम॑श्वैत् ।
विश्वं प्रतीची सऽप्रथाः उत् अस्थात् रुशत् वासः बिभ्रती शुक्रं अश्वैत्
तेव्हां उषादेखील आपल्या विस्तृत कांतिने उदित होऊन सज्ज झाली, आणि शुभ्र प्रकाशाचे वस्त्र परिधान करून मुसमुसत चालूं लागली. तिचा वर्ण तर बोलावयासच नको. सुवर्णाप्रमाणे तेजस्वी, आणि अंगकांति तर काय ! तिकडे पहातच रहावे. अशी ती प्रकाशरूप धेनूंची माता आणि दिनमणीची वल्लभा प्रकाशूं लागली. ॥ २ ॥
दे॒वानां॒ चक्षुः॑ सु॒भगा॒ वह॑न्ती श्वे॒तं नय॑न्ती सु॒दृशी॑क॒मश्व॑म् ।
देवानां चक्षुः सुऽभगा वहन्ती श्वेतं नयन्ती सुऽदृशीकं अश्वं
देवांचा नेत्र जो सूर्य, त्यालाच ती सौभाग्यसंपन्न उषा आपल्याबरोबर वागविते. एक पहाण्यालायक असा पांढर्या रंगाचा अश्व (चंद्र ?) देखील केव्हां केव्हां तिच्याबरोबर असतो. अशी ती उषा आपल्या देदीप्यमान् किरणांनी स्पष्ट दिसूं लागली. तिची देणगी अद्भुतरम्य, आणि सर्वांच्या इच्छेच्या अनुरोधाने भरपूर अशी असते. ॥ ३ ॥
अन्ति॑वामा दू॒रे अ॒मित्र॑मुच्छो॒र्वीं गव्यू॑ति॒मभ॑यं कृधी नः ।
अन्तिऽवामा दूरे अमित्रं उच्च उर्वीं गव्यूतिं अभयं कृधि नः
हे उषे ! तू अशा रीतीने प्रकाश की, त्याच्या योगाने आमची अभिलषित वस्तू आमच्याजवळ येईल आणि शत्रु दूर जातील. आमचा जो भूप्रदेश आहे त्याला निर्भर कर. द्वेष्ट्यांचे आणि द्वेष बुद्धीचे निर्मूलन कर; उत्कृष्ट संपत्ति इकडे आण, आणि हे दातृत्वशीले देवि, देवांचा कृपाप्रसाद स्तोतृजनांकडे पाठवून दे. ॥ ४ ॥
अ॒स्मे श्रेष्ठे॑भिर्भा॒नुभि॒र्वि भा॒ह्युषो॑ देवि प्रति॒रन्ती॑ न॒ आयुः॑ ।
अस्मे इति श्रेष्ठेभिः भानुऽभिः वि भाहि उषः देवि प्रऽतिरन्ती नः आयुः
तुझ्या उत्तमोत्तम किरणांचा प्रकाश आम्हांवर पडूं दे. हे उषे, तूं आमची आयुर्मर्यादा वृद्धिंगत करतेसच, पण हे सर्वजन-रमणीये उषे, तूं आम्हांमध्ये उत्साह ठेऊन गोधन, अश्वधन आणि रथसंपत्ति ह्यांनी परिपूर्ण असे वैभव अर्पण कर. ॥ ५ ॥
यां त्वा॑ दिवो दुहितर्व॒र्धय॒न्त्युषः॑ सुजाते म॒तिभि॒र्वसि॑ष्ठाः ।
यान् त्वा दिवः दुहितः वर्धयन्ति उषः सुऽजाते मतिऽभिः वसिष्ठाः
अशी जी तूं, त्या तुला - हे आकाशकन्ये, हे अभिजात उषे, वसिष्ठकुलोत्पन्न भक्त अंतःकरणपूर्वक म्हटलेल्या स्तोत्रांनी प्रमुदित करीत आहेत, आणि उच्च असे जे ऐश्वर्य तें तूं आम्हाला दान कर, आणि अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण कर. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७८ ( उषासूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्
प्रति॑ के॒तवः॑ प्रथ॒मा अ॑दृश्रन्नू॒र्ध्वा अ॑स्या अ॒ञ्जयो॒ वि श्र॑यन्ते ।
प्रति केतवः प्रथमाः अदृश्रन् ऊर्ध्वाः अस्याः अञ्जयः वि श्रयन्ते
आकाशांत वर फांकणारे उषेचे पहिलेच किरणध्वज पहा दिसूं लागले; तिची भूषणे निरनिराळीं अलग अशी दृष्टोत्पत्तीस येऊं लागली. हे उषे, भूलोकाकडे येणारा जो तुझा तेजोमय विशाल रथ, त्यांतून आमची इष्ट उत्कृष्ट वस्तु तू घेऊन ये. ॥ १ ॥
प्रति॑ षीम॒ग्निर्ज॑रते॒ समि॑द्धः॒ प्रति॒ विप्रा॑सो म॒तिभि॑र्गृ॒णन्तः॑ ।
प्रति सीं अग्निः जरते सम्ऽइद्धः प्रति विप्रासः मतिऽभिः गृणन्तः
प्रथमतः अग्नि समिधांनी प्रज्वलित होऊन त्याचे स्तवन चालू होते. आणि ते स्तवन काव्यप्रेमी भक्त मनःपूर्वक करतात; तोंच उषादेवी आपल्या दीप्तीने भक्तांचे यच्चयावत् नष्टचर्य आणि त्याबरोबरच अंधकार यांचा पार उच्छेद करून इकडे येते. ॥ २ ॥
ए॒ता उ॒ त्याः प्रत्य॑दृश्रन्पु॒रस्ता॒ज्ज्योति॒र्यच्छ॑न्तीरु॒षसो॑ विभा॒तीः ।
एताः ओं इति त्याः प्रति अदृश्रन् पुरस्तात् ज्योतिः यच्चन्तीः उषसः विऽभातीः
ह्या पहा उषादेवी आपले तेज प्रकट करून कशा चमकतच समोर आकाशांत दिसत आहेत. त्यांनीच एका दृष्टीने सूर्य, यज्ञ आणि अग्नि यांना प्रकट केले. तेव्हां सूर्य आणि अग्नि प्रकट होतांच अमंगल अंधकार कुठच्या कुठे पार नष्ट होऊन गेला. ॥ ३ ॥
अचे॑ति दि॒वो दु॑हि॒ता म॒घोनी॒ विश्वे॑ पश्यन्त्यु॒षसं॑ विभा॒तीम् ।
अचेति दिवः दुहिता मघोनी विश्वे पश्यन्ति उषसं विऽभातीं
आकाशाची कन्या जी औदार्यशालिनी उषा, ती स्पष्ट दिसते म्हणून सकल विश्व त्या उज्ज्वलकांति उषेला डोळे भरून पाहते. तिच्याच स्वेच्छेने जोडला जाणारा तो तिचा रथ पहा निघालाच. परस्परांना अनुरूप असे त्याचे अश्व त्याला इकडेच आणीत आहेत. ॥ ४ ॥
प्रति॑ त्वा॒द्य सु॒मन॑सो बुधन्ता॒स्माका॑सो म॒घवा॑नो व॒यं च॑ ।
प्रति त्वा अद्य सुऽमनसः बुधन्त अस्माकासः मघऽवानः वयं च
निर्मळ मनाचे भक्तगण तुझी येण्याची वेळ होतांच जागृत होतात. त्याचप्रमाणे आमचे यजमान आणि आम्हींहि जागृत होतो. तर हे उषादेवींनो, तुम्ही सुप्रकाशित होऊन आमचा प्रदेश धनधान्यांनी समृद्ध करा; आणि सदैव असाच आशीर्वाद देऊन आमचे रक्षण करा. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७९ ( उषासूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्
व्यु१षा आ॑वः प॒थ्या॒३ जना॑नां॒ पञ्च॑ क्षि॒तीर्मानु॑षीर्बो॒धय॑न्ती ।
वि उषाः आवः पथ्या जनानां पञ्च क्षितीः मानुषीः बोधयन्ती
हिताचा मार्ग दाखविणारी, आणि मनुष्यांच्या पांचहि समाजांना (प्रबोधाने) जागृत करणारी कनवाळु उषा पहा दृग्गोचर झाली आहे. नयनमनोहर वृषभांसह ती आपले रश्मिजाल पृथ्वीवर पसरून देते, तेव्हां सूर्यहि आपल्या नेत्रानें रोदसींना दृष्टोत्पत्तीस आणतो. ॥ १ ॥
व्य॑ञ्जते दि॒वो अन्ते॑ष्व॒क्तून्विशो॒ न यु॒क्ता उ॒षसो॑ यतन्ते ।
वि अञ्जते दिवः अन्तेषु अक्तून् विशः न युक्ताः उषसः यतन्ते
अशा वेळी अंधकार हा आकाशाच्या अगदी शेवटच्या कडेला चिकटून राहिलेला दिसतो; पण सज्ज झालेल्या लोक-सेनेप्रमाणे उषा त्याला तेथूनहि हाकलून देणाचा उद्योग करतेच. हे उषे, तुझ्या प्रभारूपी धेनूंनी त्या अंधकाराला अगदीं कोंडून धरला, आणि सूर्य जसा आपले बाहु पसरतो त्याप्रमाणे त्या अंधकारांमध्ये त्यांनी आपले किरण घुसविले. ॥ २ ॥
अभू॑दु॒षा इन्द्र॑तमा म॒घोन्यजी॑जनत्सुवि॒ताय॒ श्रवां॑सि ।
अभूत् उषाः इन्द्रऽतमा मघोनी अजीजनत् सुविताय श्रवांसि
दानशालिनी उषा इंद्राच्या अत्युच्च पदाला पोहोंचली तरीही आज उदय पावली आहे. परोपकारी लोकांसाठींच तिने अनेक प्रकारचे सत्कीर्तिप्रद ध्येय उत्पन्न केले आहे. आणि ही आकाशकन्यका उषादेवी - ही अंगिरसांना अत्यंत आदरणीय अशी उषादेवी - पुण्यमार्गानुसारी भक्तांकरितां त्या उत्तम अभीष्ट वस्तु त्याला अर्पण करते. ॥ ३ ॥
ताव॑दुषो॒ राधो॑ अ॒स्मभ्यं॑ रास्व॒ याव॑त्स्तो॒तृभ्यो॒ अर॑दो गृणा॒ना ।
तावत् उषः राधः अस्मभ्यं रास्व यावत् स्तोतृऽभ्यः अरदः गृणाना
हे उषे, ज्यांनी पूर्वी तुझे स्तवन केले त्यांच्यावर तूं जशी कृपादृष्टि ठेवलीस, तसाच कृपाप्रसाद आम्हांलाही अर्पण कर. वीरपुंगवाचा सिंहनाद किंवा वृषभाची दुरकणी ह्याच्यामुळे तुझें आगमन लोकांना कळते; कारण तेथील अत्यंत कठीण कुहर तूं विदीर्ण केले आहेस. ॥ ४ ॥
दे॒वंदे॑वं॒ राध॑से चो॒दय॑न्त्यस्म॒द्र्य॑क्सू॒नृता॑ ई॒रय॑न्ती ।
देवम्ऽदेवं राधसे चोदयन्ती अस्मद्र्यक् सूनृताः ईरयन्ती
जी जी देवता यज्ञाला येईल, त्या त्या देवतेला तूं आम्हांला वरदान देण्याची प्रेरणा करतेस; आणि मधुर कवने म्हणण्याची स्फूर्ति तूं आम्हांला देतेस, तर तूं सुप्रकाशित होऊन आम्हांला अभीष्टाचा लाभ व्हावा म्हणून योग्य ती बुद्धि आम्हांस दे, आणि अशाच आशीर्वादांनी आमचे निरंतर रक्षण कर. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८० ( उषासूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्
प्रति॒ स्तोमे॑भिरु॒षसं॒ वसि॑ष्ठा गी॒र्भिर्विप्रा॑सः प्रथ॒मा अ॑बुध्रन् ।
प्रति स्तोमेभिः उषसं वसिष्ठाः गीःऽभिः विप्रासः प्रथमाः अबुध्रन्
कवन विशारद वसिष्ठ प्रथम जागृत झाले आणि त्यांनी आपल्या कवनांनी - आपल्या स्तोत्रकलापांनी - उषेचे स्वागत केले. अंतरीक्षांतील प्रदेश एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे होते, ते प्रदेश उषेने आपल्या प्रशानें विभक्त करून पृथ्वी आणि सर्व भुवने स्पष्टपणे जगताच्या दृष्टिपथांमध्ये आणली. ॥ १ ॥
ए॒षा स्या नव्य॒मायु॒र्दधा॑ना गू॒ढ्वी तमो॒ ज्योति॑षो॒षा अ॑बोधि ।
एषा स्या नव्यं आयुः दधाना गूध्वी तमः ज्योतिषा उषाः अबोधि
ती ही उषा भक्तांना प्रतिदिनीं नव्या दमाचे आयुष्य देते; आणि आपल्या दीप्तीने अंधकाराला दडपून टाकून प्राणीमात्राला प्रबुद्ध करते. अशी ती यौवनाढ्या उषा निःसंकोच वृत्तीने पुढे होऊन सूर्य, यज्ञ आणि अग्नि यांच्याकडे निश्चल दृष्टीने पहात राहते. ॥ २ ॥
अश्वा॑वती॒र्गोम॑तीर्न उ॒षासो॑ वी॒रव॑तीः॒ सद॑मुच्छन्तु भ॒द्राः ।
अश्वऽवतीः गोऽऽमतीः नः उषसः वीरऽवतीः सदं उच्चन्तु भद्राः
रीव बुद्धिरूप अश्व, सर्व प्रकारचे गोधन, आणि वीरप्रचुर प्रजा अशी देणगी भक्तांना देणारी मंगलरूप उषा निरंतर प्रकाशित राहो, आणि घृताचा आणि मेघोदकाचा भरपूर वर्षाव करणारी, तसेच सर्व प्रकारच्या समृद्धीने विलसणारी ती उषा असाच आशीर्वाद देऊन आमचे निरंतर कल्याण करो. ॥ ३ ॥
ॐ तत् सत् |