PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ६१ ते ७०

ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६१ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ : छंद - त्रिष्टुभ्


उद्वां॒ चक्षु॑र्वरुण सु॒प्रती॑कं दे॒वयो॑रेति॒ सूर्य॑स्तत॒न्वान् ।
अ॒भि यो विश्वा॒ भुव॑नानि॒ चष्टे॒ स म॒न्युं मर्त्ये॒ष्वा चि॑केत ॥ १ ॥

उत् वां चक्षुः वरुणा सुऽप्रतीकं देवयोः एति सूर्यः ततन्वान्
अभि यः विश्वा भुवनानि चष्टे सः मन्युं मर्त्येषु आ चिकेत ॥ १ ॥

मित्रावरूण देवांनो, तुमचा नेत्र जो हा सूर्य तो आपले रश्मिजाल चोहोंकडे पसरून देत देत उदय पावत आहे. तो हीं सर्व भुवने प्रत्यक्ष अवलोकन करतो, आणि मानवांच्या अंतःकरणांतील गूढ हेतूही तो जाणतो. ॥ १ ॥


प्र वां॒ स मि॑त्रावरुणावृ॒तावा॒ विप्रो॒ मन्मा॑नि दीर्घ॒श्रुदि॑यर्ति ।
यस्य॒ ब्रह्मा॑णि सुक्रतू॒ अवा॑थ॒ आ यत्क्रत्वा॒ न श॒रदः॑ पृ॒णैथे॑ ॥ २ ॥

प्र वां सः मित्रावरुणौ ऋतऽवा विप्रः मन्मानि दीर्घऽश्रुत् इयर्ति
यस्य ब्रह्माणि सुक्रतूइतिसुऽक्रतू अवाथः आ यत् क्रत्वा न शरदः पृणैथे ॥ २ ॥

मित्रावरुणांनो, जो ज्ञानी कवि सद्धर्मनिष्ठ आणि विख्यात आहे, तो आपल्या मननस्फुरीत स्तोत्रांची तुमच्या सेवेकडेच योजना करतो. हे सत्कर्तृत्वशील देवांनो, अशा कवीच्या प्रार्थासूक्तांचे तुम्ही अभिनंदन करतां आणि त्याच्या आयुष्याची वर्षे तुम्ही सत्कृत्यांनी परिपूर्ण करीता. ॥ २ ॥


प्रोरोर्मि॑त्रावरुणा पृथि॒व्याः प्र दि॒व ऋ॒ष्वात् बृ॑ह॒तः सु॑दानू ।
स्पशः॑ दधाथे॒ ओष॑धीषु वि॒क्षु ऋध॑ग् य॒तः अनि॑मिषं॒ रक्ष॑माणा ॥ ३ ॥

प्र उरोः मित्रावरुणा पृथिव्याः प्र दिवः ऋष्वात् बृहतः सुदानूइतिसुऽदानू स्पशः
दधाथेइति ओषधीषु विक्षु ऋधक् यतः अनिऽमिषं रक्षमाणा ॥ ३ ॥

मित्रावरुणांनो, विस्तीर्ण पृथ्वी आणि विशाल उत्तुंग आकाश ह्यांच्यापासून प्रादुर्भूत होणारे आपले दूत, हे अतिउदार देवांनो, तुम्ही औषधि आणि मानवजन ह्यांच्या ठिकाणी पाठवितां, आणि खरोखर त्या योगाने तुम्ही सर्वांचे अगदी डोळ्याचे पातेंही न हलवितां जागरूक राहून रक्षण करता. ॥ ३ ॥


शंसा॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ धाम॒ शुष्मः॒ रोद॑सी बद्बघधे महि॒त्वा ।
अय॒न् मासा॒ अय॑ज्वनां अ॒वीराः॒ प्र य॒ज्ञम॑न्मा वृ॒जनं॑ तिराते ॥ ४ ॥

शंसा मित्रस्य वरुणस्य धाम शुष्मः रोदसी इति बद्बधे महिऽत्वा
अयन् मासाः अयज्वनां अवीराः प्र यज्ञऽमन्मा वृजनं तिराते ॥ ४ ॥

मित्र आणि वरुण यांच्या तेजस्वितेची महती गा; त्यांच्या प्रतापाने त्यांच्या महिम्यानेंच ह्या रोदसी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. देवाचा यज्ञ न करणाराचे आयुष्य शूर पुत्रांवाचून फुकट जाईल; पण यज्ञ करून ईश चिंतन करणारा भक्त शत्रूच्या समूहांतून सुरक्षित पार पडेल. ॥ ४ ॥


अमू॑रा॒ विश्वा॑ वृषणौ इ॒मा वां॒ न यासु॑ चि॒त्रं ददृ॑शे॒ न य॒क्षं ।
द्रुहः॑ सचंते॒ अनृ॑ता॒ जना॑नां॒ न वां॑ नि॒ण्यानि अ॒चिते॑ अभूवन् ॥ ५ ॥

अमूरा विश्वा वृषणौ इमाः वां न यासु चित्रं ददृशे न यक्षं
दुहः सचन्ते अनृता जनानां न वां निण्यानि अचिते अभूवन् ॥ ५ ॥

हे वीरांनो, हे प्रमादरहित कामनावर्षक वीरांनो, हे येथील सर्व लोक तुमचे भक्त नसले पाहिजेत; कारण त्यांच्या ठिकाणी कांहीच वैशिष्ठ्य दिसत नाही, किंवा दुसरा कांही पूजेचा प्रकारही नाही. या लोकांच्या खोडसाळ कृत्यांचा शेवट द्वेषांतच होणार, कारण त्यांची गुप्त दुष्कृत्यें तुम्हांला कदापि अज्ञात राहू शकणारच नाहीत. ॥ ५ ॥


सं ऊं॑इतिवां य॒ज्ञं म॑हयं॒ नमो॑भिर्हु॒वे वां॑ मित्रावरुणा स॒बाधः॑ ।
प्र वां॒ मन्मा॑नि ऋ॒चसे॒ नवा॑नि कृ॒तानि॒ ब्रह्म॑ जुजुषन्न् इ॒मानि॑ ॥ ६ ॥

सं ओं इति वां यज्ञं महयं नमःऽभिः हुवे वां मित्रावरुणा सऽबाधः
प्र वां मन्मानि ऋचसे नवानि कृतानि ब्रह्म जुजुषन् इमानि ॥ ६ ॥

मी संकटांनी त्रस्त झाल्याकारणाने हे मित्रावरुणांनो, तुमच्या यज्ञाचा केवळ नमस्कारांनीच सन्मान करतो. ऋचांनी तुमची काव्यसेवा करण्याच्या हेतूने ही मननीय कवनें मी नवीनच केली आहेत, तर त्या प्रार्थनासूक्तांच्या योगाने तुम्ही संतुष्ट व्हा. ॥ ६ ॥


इ॒यं दे॑व पु॒रोहि॑तिर्यु॒वभ्यां॑ य॒ज्ञेषु॑ मित्रावरुणौ अकारि ।
विश्वा॑नि दु॒र्गा पि॑पृतं ति॒रः नः॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

इयं देव पुरःऽहितिः युवऽभ्यां यज्ञेषु मित्रावरुणौ अकारि
विश्वानि दुःऽगा पिपृतं तिरः नः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

देवांनो, मित्रावरुणांनो, हीच हौत्रसेवा यज्ञांमध्ये आम्ही तुम्हां प्रीत्यर्थ केली आहे. तर यातना देणार्‍या सर्व संकटांतून आम्हाला मुक्त करा; आणि तुमच्या आशीर्वादाने आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६२ (सूर्य, मित्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ, सूर्य : छंद - त्रिष्टुभ्


उत्सूर्यो॑ बृ॒हद॒र्चींष्य॑श्रेत्पु॒रु विश्वा॒ जनि॑म॒ मानु॑षाणाम् ।
स॒मो दि॒वा द॑दृशे॒ रोच॑मानः॒ क्रत्वा॑ कृ॒तः सुकृ॑तः क॒र्तृभि॑र्भूत् ॥ १ ॥

उत् सूर्यः बृहत् अर्चींषि अश्रेत् पुरु विश्वा जनिम मानुषाणां
समः दिवा ददृशे रोचमानः क्रत्वा कृतः सुऽकृतः कर्तृऽभिः भूत् ॥ १ ॥

सूर्य उदय पावून सर्व मानवजातीच्या हितार्थ तो आपले विस्तृत रश्मिजाल विखरून देतो, आणि तो तेजाने तळपू लागला म्हणजे आकाशांत सर्वांना एकसारखाच दिसतो. ईश्वराच्या कर्तृत्त्वानेच तो उत्पन्न झाला आहे, त्यामुळे तो उत्कृष्टही आहे. पण सत्कर्मनिरत भक्तांमुळेच त्याची उत्कृष्टता सार्थ झाली आहे. ॥ १ ॥


स सू॑र्य॒ प्रति॑ पु॒रो न॒ उद्गा॑व ए॒भि स्तोमे॑भिरेत॒शेभि॒रेवैः॑ ।
प्र नो॑ मि॒त्राय॒ वरु॑णाय वो॒चोऽना॑गसो अर्य॒म्णे अ॒ग्नये॑ च ॥ २ ॥

सः सूर्य प्रति पुरः नः उत् गाः एभिः स्तोमेभिः एतशेभिः एवैः
प्र नः मित्राय वरुणाय वोचः अनागसः अर्यम्णे अग्नये च ॥ २ ॥

हा जो सूर्य आमच्या समोर उदित झाला आहे, तो आमच्या स्तवनांमुळे प्रसन्न होऊन, आपल्या त्वरित धावणार्‍या "एतश" अश्वांच्या रथांत बसून उदय पावला आहे.. हे सूर्या आमचे निरपराधित्व तू जगन्मित्राला, वरुणाला, अर्यमाला आणि अग्निला सांगितलेंस ना ? ॥ २ ॥


वि नः॑ स॒हस्रं॑ शु॒रुधो॑ रदन्त्वृ॒तावा॑नो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निः ।
यच्छ॑न्तु च॒न्द्रा उ॑प॒मं नो॑ अ॒र्कमा नः॒ कामं॑ पूपुरन्तु॒ स्तवा॑नाः ॥ ३ ॥

वि नः सहस्रं शुरुधः रदन्तु ऋतऽवानः वरुणः मित्रः अग्निः
यच्छन्तु चन्द्राः उपऽमं नः अर्कं आ नः कामं पूपुरन्तु स्तवानाः ॥ ३ ॥

सद्धर्मावरच प्रेम करणारे वरुण, मित्र आणि अग्नि हे आमच्यासाठी धर्माचे सहस्रावधि शुद्ध मार्ग आंखून देवोत; ते आल्हादप्रद देव आम्हाला उत्कृष्ट "अर्क" स्तोत्रांची स्फूर्ति देवोत; आणि त्यांचे स्तवन आम्ही केले असतां आमचे मनोरथ पूर्ण करोत. ॥ ३ ॥


द्यावा॑भूमी अदिते॒ त्रासी॑थां नो॒ ये वां॑ ज॒ज्ञुः सु॒जनि॑मान ऋष्वे ।
मा हेळे॑ भूम॒ वरु॑णस्य वा॒योर्मा मि॒त्रस्य॑ प्रि॒यत॑मस्य नृ॒णाम् ॥ ४ ॥

द्यावाभूमी इति अदिते त्रासीथां नः ये वां जज्ञुः सुऽजनिमानः ऋष्वेइति
मा हेळे भूम वरुणस्य वायोः मा मित्रस्य प्रियऽतमस्य नृणाम् ॥ ४ ॥

हे अनिर्बंध द्यावाभूमिहो, आम्ही उत्तम ठिकाणी जन्म घेतला आहे हे लक्षात घेऊन तुम्ही उदात्त विभूति आमचे संरक्षण करा; आणि वरुणाच्या किंवा वायूच्या क्रोधाला अथवा मानवांचा अत्यंत आवडता जो मित्र त्याच्या क्रोधाला आम्ही पात्र होऊं असे करूं नका. ॥ ४ ॥


प्र बा॒हवा॑ सिसृतं जी॒वसे॑ न॒ आ नो॒ गव्यू॑तिमुक्षतं घृ॒तेन॑ ।
आ नो॒ जने॑ श्रवयतं युवाना श्रु॒तं मे॑ मित्रावरुणा॒ हवे॒मा ॥ ५ ॥

प्र बाहवा सिसृतं जीवसे नः आ नः गव्यूतिं उक्षतं घृतेन
आ नः जने श्रवयतं युवाना श्रुतं मे मित्रावरुणा हवा इमा ॥ ५ ॥

मित्रावरुणांनो, आमचा जीवनक्रम उत्तम चालावा म्हणून तुम्ही आपले बाहू आमच्या सहाय्यार्थ पुढे करा; आमच्या धेनूंच्या तृणाच्छादित भूमीवर उदकवर्शाव करा. तारुण्याढ्य देवांनो, आमची कीर्ति जगांत पसरेल असे करा, आणि आम्ही तो तुमचा धांवा करतो, त्याच्याकडे अवश्य लक्ष द्या. ॥ ५ ॥


नू मि॒त्रो वरु॑णो अर्य॒मा न॒स्त्मने॑ तो॒काय॒ वरि॑वो दधन्तु ।
सु॒गा नो॒ विश्वा॑ सु॒पथा॑नि सन्तु यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

नु मित्रः वरुणः अर्यमा नः त्मने तोकाय वरिवः दधन्तु
सुऽगा नः विश्वा सुऽपथानि सन्तु यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ६ ॥

वरुण, मित्र आणि अर्यमा हे आपण होऊन एक प्रशस्त उत्कृष्ट ध्येय आमच्या संततीसाठी आमच्यापुढें ठेवोत. सर्व सन्मार्ग आम्हाला सुगम होवोत, आणि देवांनो, तुम्ही अशाच आशीर्वादांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६३ (सूर्य, मित्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ, सूर्य : छंद - त्रिष्टुभ्


उद्वे॑ति सु॒भगो॑ वि॒श्वच॑क्षाः॒ साधा॑रणः॒ सूर्यो॒ मानु॑षाणाम् ।
चक्षु॑र्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य दे॒वश्चर्मे॑व॒ यः स॒मवि॑व्य॒क्तमां॑सि ॥ १ ॥

उत् ओं इति एति सुऽभगः विश्वऽचक्षाः साधारणः सूर्यः मानुषाणां
चक्षुः मित्रस्य वरुणस्य देवः चर्मऽइव यः सम्ऽअविव्यक् तमांसि ॥ १ ॥

सद्‌भाग्यदाता, सर्वद्रष्टा, असा हा सूर्य पहा उदय पावला आहे. तो सर्व मानवांना सारखाच दर्शनीय आणि हितप्रद आहे. जगन्मित्र वरुणाचा तो नेत्रच आहे आणि एखादा कातड्याचा तुकडा चुरगळून टाकावा त्याप्रमाणे त्यानें अंधकाराला चुरमडून दूर फेकून दिले. ॥ १ ॥


उद्वे॑ति प्रसवी॒ता जना॑नां म॒हान्के॒तुर॑र्ण॒वः सूर्य॑स्य ।
स॒मा॒नं च॒क्रं प॑र्या॒विवृ॑त्स॒न्यदे॑त॒शो वह॑ति धू॒र्षु यु॒क्तः ॥ २ ॥

उत् ओं इति एति प्रऽसवीता जनानां महान् केतुः अर्णवः सूर्यस्य
समानं चक्रं परिऽआविवृत्सन् यत् एतशः वहति धूर्षु युक्तः ॥ २ ॥

जनांना कार्य व्यापृत करणारा हा पहा, सूर्याचा ध्वज असा जो अरुणच, तो प्रकाश दिसूं लागला. समुद्राच्या लाटा जशा हेलकावे खातात, त्या प्रमाणे तो अरुणध्वज हेलावत असतो. कारण सूर्याचा "एतश" अश्व रथाला जोडला म्हणजे त्याच्या रथाचे वाटोळे गरगरीत चक्र तो वेगाने पुढे ढकलतो आणि त्या योगाने अरुण प्रकाशाला हेलकावे बसतात. ॥ २ ॥


वि॒भ्राज॑मान उ॒षसा॑मु॒पस्था॑द्रे॒भैरुदे॑त्यनुम॒द्यमा॑नः ।
ए॒ष मे॑ दे॒वः स॑वि॒ता च॑च्छन्द॒ यः स॑मा॒नं न प्र॑मि॒नाति॒ धाम॑ ॥ ३ ॥

विऽभ्राजमानः उषसां उपऽस्थात् रेभैः उत् एति अनुऽमद्यमानः एषः
मे देवः सविता चच्चन्द यः समानं न प्रऽमिनाति धाम ॥ ३ ॥

उषादेवीच्या सन्निध (तिच्या मागोमाग) जो प्रकाशूं लागतो, आणि कविजन स्तवनद्वारा ज्याची महती गातात असा हा सूर्य उदय पावत आहे. हाच तो माझा सविता; त्याचा तर मला ध्यास लागला आहे. त्याने सर्वांना एकाच प्रकारचे तेजोमय स्थान दाखवून दिले आहे. सर्वांना त्याने सारखाच धर्ममार्ग सांगितला आहे आणि सृष्टि-धर्माचे उल्लंघन तो कोणालाच करूं देत नाही. ॥ ३ ॥


दि॒वो रु॒क्म उ॑रु॒चक्षा॒ उदे॑ति दू॒रेअ॑र्थस्त॒रणि॒र्भ्राज॑मानः ।
नू॒नं जनाः॒ सूर्ये॑ण॒ प्रसू॑ता॒ अय॒न्नर्था॑नि कृ॒णव॒न्नपां॑सि ॥ ४ ॥

दिवः रुक्मः उरुऽचक्षाः उत् एति दूरेऽऽअर्थः तरणिः भ्राजमानः
नूनं जनाः सूर्येण प्रऽसूताः अयन् अर्थानि कृणवन् अपांसि ॥ ४ ॥

द्युलोकांचे भूषणच असा हा अपारदृष्टि सूर्य उदय पावत आहे. तो देदीप्यमान् आहे, त्वरितगति आहे, पण त्याचे निवासस्थान अतिशयच दूर आहे. सर्व मनुष्यमात्र सूर्याच्याच प्रेरणेने उद्योगांत गढून जातात, आणि ते आपआपली कामे करूनच आपला हेतु साधतात. ॥ ४ ॥


यत्रा॑ च॒क्रुर॒मृता॑ गा॒तुम॑स्मै श्ये॒नो न दीय॒न्नन्वे॑ति॒ पाथः॑ ।
प्रति॑ वां॒ सूर॒ उदि॑ते विधेम॒ नमो॑भिर्मित्रावरुणो॒त ह॒व्यैः ॥ ५ ॥

यत्र चक्रुः अमृताः गातुं अस्मै श्येनः न दीयन् अनु एति पाथः
प्रति वां सूरे उत्ऽइते विधेम नमःऽभिः मित्रावरुणा उत हव्यैः ॥ ५ ॥

अमर अशा दिव्य विभूतींनीच ह्या सूर्याचा गमनमार्ग निश्चित केला; म्हणून तो सूर्य सुद्धां एखाच्या ससाण्याप्रमाणेच उड्डाण करून आपल्या मार्गाने नीट जातो. म्हणून हा सूर्य उदित झाल्याबरोबर, मित्रावरुणांनो, आम्ही प्रणाम करून आणि हविर्भाग अर्पण करून तुमची उपावना करूं. ॥ ५ ॥


नू मि॒त्रो वरु॑णो अर्य॒मा न॒स्त्मने॑ तो॒काय॒ वरि॑वो दधन्तु ।
सु॒गा नो॒ विश्वा॑ सु॒पथा॑नि सन्तु यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

नु मित्रः वरुणः अर्यमा नः त्मने तोकाय वरिवः दधन्तु
सुऽगा नः विश्वा सुऽपथानि सन्तु यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ६ ॥

यासाठी वरुण, मित्र, अर्यमा हे आपण होऊन एक प्रशस्त ध्येय आमच्या संततीसाठी आमच्यापुढे ठेवोत. सर्व सन्मार्ग आम्हाला सुगम होवोत, आणि हे विभूतींनो, तुम्ही असेच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६४ ( मित्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ : छंद - त्रिष्टुभ्


दि॒वि क्षय॑न्ता॒ रज॑सः पृथि॒व्यां प्र वां॑ घृ॒तस्य॑ नि॒र्णिजो॑ ददीरन् ।
ह॒व्यं नो॑ मि॒त्रो अ॑र्य॒मा सुजा॑तो॒ राजा॑ सुक्ष॒त्रो वरु॑णो जुषन्त ॥ १ ॥

दिवि क्षयन्ता रजसः पृथिव्यां प्र वां घृतस्य निःऽनिजः ददीरन्
हव्यं नः मित्रः अर्यमा सुऽजातः राजा सुऽक्षत्रः वरुणः जुषन्त ॥ १ ॥

तुम्ही द्युलोकांमध्ये वास्तव्य करता - तसेच रजोलोकात, आणि पृथ्वीवरही तुमचा वास असतो. पृथ्वीवरील अंतरीक्षामध्ये घृताप्रमाणे उज्ज्वल वस्त्रें तुम्हाला मेघांनी नेसविली आहेत; तर जगन्मित्र, अर्यमा आणि वीरोत्तम जगत्‌राजा वरुण आमचे हविर्भाग संतोषाने गृहण करोत. ॥ १ ॥


आ रा॑जाना मह ऋतस्य गोपा॒ सिन्धु॑पती क्षत्रिया यातम॒र्वाक् ।
इळां॑ नो मित्रावरुणो॒त वृ॒ष्टिमव॑ दि॒व इ॑न्वतं जीरदानू ॥ २ ॥

आ राजाना महः ऋतस्य गोपा सिन्धुपती इतिसिन्धुऽपती क्षत्रिया यातं अर्वाक्
इळां नः मित्रावरुणा उत वृष्टिं अव दिवः इन्वतं जीरदानू इति जीरऽदानू ॥ २ ॥

हे जगताच्या अधिपतींनो, श्रेष्ठ सद्धर्माच्या रक्षकांनो, नदीपतींनो, वीरोत्तमांनो इकडे आगमन करा. हे मित्रावरुणांनो, आम्हाला भूमि द्या, येथे सुवृष्टि करा, आणि हे उदार श्रेष्ठांनो, द्युलोकांतून तुम्ही इकडे येऊन आम्हांमध्ये निरंतर उत्साह ठेवा. ॥ २ ॥


मि॒त्रस्तन्नो॒ वरु॑णो दे॒वो अ॒र्यः प्र साधि॑ष्ठेभिः प॒थिभि॑र्नयन्तु ।
ब्रव॒द्यथा॑ न॒ आद॒रिः सु॒दास॑ इ॒षा म॑देम स॒ह दे॒वगो॑पाः ॥ ३ ॥

मित्रः तत् नः वरुणः देवः अर्यः प्र साधिष्ठेभिः पथिऽभिः नयन्तु
ब्रवत् यथा नः आत् अरिः सुऽदासे इषा मदेम सह देवऽगोपाः ॥ ३ ॥

यासाठी मित्र, आणि श्रेष्ठ देव वरुण हे आम्हाला अत्यंत शुद्ध अशाच मार्गांनी घेऊन जावोत. ते अशा पद्धतीने की, अधार्मिक मनुष्य सुद्धां सुदासाजवळ जाऊन म्हणेल की, "आमचे देखील देवांनी असेच रक्षण करावे आणि आम्ही तुम्हां सर्वांबरोबर उत्साहाने आनंदित व्हावे." ॥ ३ ॥


यो वां॒ गर्तं॒ मन॑सा॒ तक्ष॑दे॒तमू॒र्ध्वां धी॒तिं कृ॒णव॑द्धा॒रय॑च्च ।
उ॒क्षेथां॑ मित्रावरुणा घृ॒तेन॒ ता रा॑जाना सुक्षि॒तीस्त॑र्पयेथाम् ॥ ४ ॥

यः वां गर्तं मनसा तक्षत् एतं ऊर्ध्वां धीतिं कृणवत् धारयत् च
उक्षेथां मित्रावरुणा घृतेन ता राजाना सुऽक्षितीः तर्पयेथाम् ॥ ४ ॥

तुमच्या प्रीत्यर्थ ज्याने आपल्या मनानेंच उत्तम आसनाची योजना केली असेल, किंवा तातडीने निदिध्यासाला आरंभ करून तो चालू ठेवला असेल; त्यासाठी हे मेत्रावरुणांनो, तुम्ही घृताप्रमाणे चकचकीत अशा उदकाची वृष्टि करा, आणि सद्‌भक्तांना संतुष्ट करा. ॥ ४ ॥


ए॒ष स्तोमो॑ वरुण मित्र॒ तुभ्यं॒ सोमः॑ शु॒क्रो न वा॒यवे॑ऽयामि ।
अ॒वि॒ष्टं धियो॑ जिगृ॒तं पुरं॑धीर्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

एषः स्तोमः वरुण मित्र तुभ्यं सोमः शुक्रः न वायवे अयामि
अविष्टं धियः जिगृतं पुरम्ऽधीः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥

हे वरुणा, हे मित्रा, हे स्तवन मी तुम्हाला अर्पण करीत आहे. वायूला ज्याप्रमाणे शुभ्र तेजस्वी सोमरस अर्पण करतात, त्याप्रमाणे तुम्हाला हे स्तवन मी अर्पण करीत आहे; तर तुम्ही आमची ध्यानशक्ति सुरक्षित ठेवा, सद्‌बुद्धिला प्रेरणा करा, आणि आपल्या आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६५ ( मित्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ : छंद - त्रिष्टुभ्


प्रति॑ वां॒ सूर॒ उदि॑ते सू॒क्तैर्मि॒त्रं हु॑वे॒ वरु॑णं पू॒तद॑क्षम् । ययो॑रसु॒र्य१मक्षि॑तं॒ ज्येष्ठं॒ विश्व॑स्य॒ याम॑न्ना॒चिता॑ जिग॒त्नु॑ ॥ १ ॥

प्रति वां सूरे उत्ऽइते सुऽउक्तैः मित्रं हुवे वरुणं पूतऽदक्षं ययोः असुर्यं अक्षितं ज्येष्ठं विश्वस्य यामन् आचिता जिगत्नु ॥ १ ॥

सूर्याचा उदय होतांच प्रार्थनासूक्तांनी मी जगन्मित्राला तुमच्या प्रीत्यर्थ पाचारण करतो. आणि जो चातुर्यबलाला पवित्रपण आणतो, त्या वरुणाचीही विज्ञप्ति करतो. त्या उभयतांचे दैवी सामर्थ्य अक्षय्य आहे, श्रेष्ठ आहे, आणि विश्वाच्या धकाधकीच्या मार्गामध्ये तेच विजयी होते. ॥ १ ॥


ता हि दे॒वाना॒मसु॑रा॒ ताव॒र्या ता नः॑ क्षि॒तीः क॑रतमू॒र्जय॑न्तीः । अ॒श्याम॑ मित्रावरुणा व॒यं वां॒ द्यावा॑ च॒ यत्र॑ पी॒पय॒न्नहा॑ च ॥ २ ॥

ता हि देवानां असुरा तौ अर्या ता नः क्षितीः करतं ऊर्जयन्तीः अश्याम मित्रावरुणा वयं वां द्यावा च यत्र पीपयन् अहा च ॥ २ ॥

दिव्यविभूतींमध्ये तुम्ही उभयतां दैवी सामर्थ्याने मण्डित आहां; तुम्ही उभयतां श्रेष्ठ प्रवृत्तीचे आहांत; तर आमच्या समाजाला तेजस्वी करा, आणि जेथे द्युलोक अहोरात्र आम्हाला उन्नतीला नेतील अशा परिस्थितीचा लाभ आम्हांस होईल असे करा. ॥ २ ॥


ता भूरि॑पाशा॒वनृ॑तस्य॒ सेतू॑ दुर॒त्येतू॑ रि॒पवे॒ मर्त्या॑य । ऋ॒तस्य॑ मित्रावरुणा प॒था वा॑म॒पो न ना॒वा दु॑रि॒ता त॑रेम ॥ ३ ॥

ता भूरिऽपाशौ अनृतस्य सेतूइति दुरत्येतूइतिदुःऽअत्येतू रिपवे मर्त्याय ऋतस्य मित्रावरुणा पथा वां अपः न नावा दुःऽइता तरेम ॥ ३ ॥

दुष्टांना पकडण्याचे पाश ह्या मित्रावरुणांजवळ भरपूर आहेत. खोडसाळपणाचा प्रतिबंध करण्याची शक्तिही त्यांच्या ठिकाणी आहे. मानवी शत्रूला त्यांच्या हेतूंचा थांग कधीही लागत नाही. तर मित्रावरुणांनो, नावेच्या योगाने जलाशय तरून जावा त्याप्रमाणे तुमच्या सद्धर्माच्या मार्गाने आम्ही दुःखसागरांतून तरून जाऊं असे घडवा. ॥ ३ ॥


आ नो॑ मित्रावरुणा ह॒व्यजु॑ष्टिं घृ॒तैर्गव्यू॑तिमुक्षत॒मिळा॑भिः । प्रति॑ वा॒मत्र॒ वर॒मा जना॑य पृणी॒तमु॒द्नो दि॒व्यस्य॒ चारोः॑ ॥ ४ ॥

आ नः मित्रावरुणा हव्यऽजुष्टिं घृतैः गव्यूतिं उक्षतं इळाभिः प्रति वां अत्र वरं आ जनाय पृणीतं उद्नः दिव्यस्य चारोः ॥ ४ ॥

मित्रावरुणांनो, आमच्या हविर्भागाचा तुम्ही प्रसन्न अंतःकरणाने स्वीकार करा. पोषक अशा घृताची आणि धान्यसमृद्धीची आमच्या भूमीवर वृष्टि करा; तसेच सर्व लोकांसाठी दिव्य लोकांतील मनोल्हादी उदकाचा वर्षाव करून आपले वरदान पूर्ण करा. ॥ ४ ॥


ए॒ष स्तोमो॑ वरुण मित्र॒ तुभ्यं॒ सोमः॑ शु॒क्रो न वा॒यवे॑ऽयामि । अ॒वि॒ष्टं धियो॑ जिगृ॒तं पुरं॑धीर्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

एषः स्तोमः वरुण मित्र तुभ्यं सोमः शुक्रः न वायवे अयामि अविष्टं धियः जिगृतं पुरम्ऽधीः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥

हे वरुणा, हे मित्रा, ही प्रशस्ति मी तुम्हाला अर्पण करीत आहे. वायूला ज्याप्रमाणे शुभ्र सोमरस, त्याप्रमाणे ही प्रशस्ति तुम्हाला अर्पण करीत आहे. तर तुम्ही आमची ध्यानशक्ति सुरक्षित ठेवा, बुद्धिला प्रेरणा करा, आणि आपल्या आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६६ (मित्रावरुण, आदित्य, सूर्य )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ, आदित्य, सूर्य : छंद - बृहती, सतोबृहती, पुरउभष्णिह, गायत्री


प्र मि॒त्रयो॒र्वरु॑णयो॒ स्तोमो॑ न एतु शू॒ष्यः॑ ।
नम॑स्वान्तुविजा॒तयोः॑ ॥ १ ।

प्र मित्रयोः वरुणयोः स्तोमः नः एतु शूष्यः नमस्वान् तुविऽजातयोः ॥ १ ॥

हा आमचा आवेशपूर्ण स्तोत्रप्रबंध मित्रावरुणांना जाऊन पोहोंचो; हे जे आमचे स्तवन आम्ही प्रमाणपूर्वक केले आहे, ते असंख्य स्थली प्रकट होणार्‍या मित्रावरूण देवांकडे जावो. ॥ १ ॥


या धा॒रय॑न्त दे॒वाः सु॒दक्षा॒ दक्ष॑पितरा ।
अ॒सु॒र्या॑य॒ प्रम॑हसा ॥ २ ॥

या धारयन्त देवाः सुऽदक्षा दक्षऽपितरा असुर्याय प्रऽमहसा ॥ २ ॥

मित्रावरुण अत्यंत चतुर, किंबहुना चातुर्याचे ते जनकच आहेत. म्हणून ज्यांचे तेज अपार - अशा मित्रावरुणांना देवतांनी त्यांच्या दैवी सामर्थ्यासाठी आपल्या अंतःकरणांतच ठेऊन दिले आहे. ॥ २ ॥


ता न॑ स्ति॒पा त॑नू॒पा वरु॑ण जरितॄ॒णाम् ।
मित्र॑ सा॒धय॑तं॒ धियः॑ ॥ ३ ॥

ता नः स्तिऽपा तनूऽपा वरुण जरितॄणां मित्र साधयतं धियः ॥ ३ ॥

हे मित्रा, हे वरुणा, आमच्या मंदिरांचे आणि आमच्या शरीराचेही रक्षण करणारे तुम्ही आहांत. तर आम्हा स्तोतृजनांच्या बुद्धीला प्रगल्भता आणा. ॥ ३ ॥


यद॒द्य सूर॒ उदि॒तेऽना॑गा मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
सु॒वाति॑ सवि॒ता भगः॑ ॥ ४ ॥

यत् अद्य सूरे उत्ऽइते अनागाः मित्रः अर्यमा सुवाति सविता भगः ॥ ४ ॥

आज सूर्याचा उदय होतांच, निष्कलंक असा मित्र, अर्यमा, सविता आणि त्याचप्रमाणे भग हे आम्हांस प्रेरणा करोत. ॥ ४ ॥


सु॒प्रा॒वीर॑स्तु॒ स क्षयः॒ प्र नु याम॑न्सुदानवः ।
ये नो॒ अंहो॑ऽति॒पिप्र॑ति ॥ ५ ॥

सुप्रऽअवीः अस्तु सः क्षयः प्र नु यामन् सुऽदानवः ये नः अंहः अतिऽपिप्रति ॥ ५ ॥

भक्ताच्या त्या वसतिस्थानाचे उत्तम रीतीने रक्षण होवो. हे उदारश्रेष्ठहो, जे तुम्ही आम्हांला पातकापासून मुक्त करता ते तुम्ही आपल्या मार्गाने जात असताना त्याचे सहज रक्षण होईलच. ॥ ५ ॥


उ॒त स्व॒राजो॒ अदि॑ति॒रद॑ब्धस्य व्र॒तस्य॒ ये ।
म॒हो राजा॑न ईशते ॥ ६ ॥

उत स्वऽराजः अदितिः अदब्धस्य व्रतस्य ये महः राजानः ईशते ॥ ६ ॥

आणखी असे की, हे पूर्ण स्वतंत्र देव, श्रेष्ठांचेही राजे मित्रावरुण आणि अनिर्बंध अदिति, असे सर्वजण अनिरुद्ध सत्तेचे प्रभु आहेत. ॥ ६ ॥


प्रति॑ वां॒ सूर॒ उदि॑ते मि॒त्रं गृ॑णीषे॒ वरु॑णम् ।
अ॒र्य॒मणं॑ रि॒शाद॑सम् ॥ ७ ॥

प्रति वां सूरे उत्ऽइते मित्रं गृणीषे वरुणं अर्यमणं रिशादसम् ॥ ७ ॥

आज सूर्य उदय पावला म्हणजे वरुण, मित्र आणि शत्रुनाशक अर्यमा यांचे गुणसंकीर्तन कर. ॥ ७ ॥


रा॒या हि॑रण्य॒या म॒तिरि॒यम॑वृ॒काय॒ शव॑से ।
इ॒यं विप्रा॑ मे॒धसा॑तये ॥ ८ ॥

राया हिरण्यऽया मतिः इयं अवृकाय शवसे इयं विप्रा मेधऽसातये ॥ ८ ॥

आमची बुद्धि सुवर्णादिकांच्या इच्छेमध्ये गुरफटलेली होती, ती आता दयेने, न्यायाने संपन्न असे जे सामर्थ्य त्याच्या प्राप्तीसाठी झटत आहे. हे ज्ञानरूप देवांनो, ती आता ज्ञानप्राप्तीसाठींही झटत आहे. ॥ ८ ॥


ते स्या॑म देव वरुण॒ ते मि॑त्र सू॒रिभिः॑ स॒ह ।
इषं॒ स्व॑श्च धीमहि ॥ ९ ॥

ते स्याम देव वरुण ते मित्र सूरिऽभिः सह इषं स्वर् इति स्वः च धीमहि ॥ ९ ॥

हे देवा वरुणा, हे मित्रा, आम्ही आमच्या धुरीणांसह तुमचे भक्त म्हणून राहूं; आणि उत्साह आणि दिव्यप्रकाश ह्यांचा निदिध्यास धरूं. ॥ ९ ॥


ब॒हवः॒ सूर॑चक्षसोऽग्निजि॒ह्वा ऋ॑ता॒वृधः॑ ।
त्रीणि॒ ये ये॒मुर्वि॒दथा॑नि धी॒तिभि॒र्विश्वा॑नि॒ परि॑भूतिभिः ॥ १० ॥

बहवः सूरऽचक्षसः अग्निऽजिह्वाः ऋतऽवृधः
त्रीणि ये येमुः वि दथानि धीतिऽभिः विश्वानि परिभूतिऽभिः ॥ १० ॥

दिसणाला सूर्याप्रमाणे तेजस्वी, अग्नीच्या जिव्हेने हविर्भाग स्वीकारणारे, आणि सत्य धर्माच्या आचरणाने प्रसन्न होणारे विभूति पुष्कळ आहेत. पण ज्यांनी केवळ आपल्या सर्वप्रभावी संकल्पांनीच तीन्ही यज्ञस्थानांचे (तीन्ही लोकांचे) रक्षण केले आहे असे देव मित्रावरुण हेच होत. ॥ १० ॥


वि ये द॒धुः श॒रदं॒ मास॒मादह॑र्य॒ज्ञम॒क्तुं चादृच॑म् ।
अ॒ना॒प्यं वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा क्ष॒त्रं राजा॑न आशत ॥ ११ ॥

वि ये दधुः शरदं मासं आत् अहः यज्ञं अक्तुं च आत् ऋचं
अनाप्यं वरुणः मित्रः अर्यमा क्षत्रं राजानः आशत ॥ ११ ॥

ह्यांनीच शारदीय वर्ष प्रचारांत आणले. ह्यांनीच महिने आणि दिवस, आणि तसेच यज्ञ, रात्र आणि ऋक्‌सूक्ते ह्यांचे वैशिष्ट्य दाखवून दिले. अशा प्रकारचे कोणालाही अलभ्य असे प्रभुत्व मित्रावरुणांनाच आहे. ॥ ११ ॥


तद्वो॑ अ॒द्य म॑नामहे सू॒क्तैः सूर॒ उदि॑ते ।
यदोह॑ते॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा यू॒यमृ॒तस्य॑ रथ्यः ॥ १२ ॥

तत् वः अद्य मनामहे सुऽउक्तैः सूरे उत्ऽइते
यत् ओहते वरुणः मित्रः अर्यमा यूयं ऋतस्य रथ्यः ॥ १२ ॥

तर आज आतां सूर्यचा उदय होतांच सूक्तांनी तुमच्या सामर्थ्याचे आम्ही चिंतन करतो. सत्यधर्माचा अग्रणी जो वरुण, मित्र अथवा अर्यमा ह्यालाच त्याची जाणीव असते. ॥ १२ ॥


ऋ॒तावा॑न ऋ॒तजा॑ता ऋता॒वृधो॑ घो॒रासो॑ अनृत॒द्विषः॑ ।
तेषां॑ वः सु॒म्ने सु॑च्छ॒र्दिष्ट॑मे नरः॒ स्याम॒ ये च॑ सू॒रयः॑ ॥ १३ ॥

ऋतऽवानः ऋतऽजाताः ऋतऽवृधः घोरासः अनृतऽद्विषः
तेषां वः सुम्ने सुच्चर्दिःऽतमे नरः स्याम ये च सूरयः ॥ १३ ॥

हे सर्व सद्धर्मप्रेमी, सद्धर्मासाठींच प्रकट होणारे आणि सद्धर्माचीच अभिवृद्धि करणारे आहेत. ते उग्रप्रतापी आणि असत्याचा, अन्ययाचा द्वेष करणारे आहेत. तर अशा तुमचे अत्यंत उत्कृष्ट जे पद त्याच्या आनंदाचा लाभ हे शूर देवांनो, आम्हांला आणि आमचे जे धुरीण आहेत त्यांना होईल असे करा. ॥ १३ ॥


उदु॒ त्यद्द॑र्श॒तं वपु॑र्दि॒व ए॑ति प्रतिह्व॒रे ।
यदी॑मा॒शुर्वह॑ति दे॒व एत॑शो॒ विश्व॑स्मै॒ चक्ष॑से॒ अर॑म् ॥ १४ ॥

उत् ओं इति त्यत् दर्शतं वपुः दिवः एति प्रतिऽह्वरे
यत् ईं आशुः वहति देवः एतशः विश्वस्मै चक्षसे अरम् ॥ १४ ॥

पहा, हे दर्शनीय असे देवाचे प्रत्यक्ष स्वरूप (सूर्यरूपानें) आकाशाच्या पूर्व दिग् भागी उदय पावत आहे. आणि त्याला सर्वांनी डोळे भरून पहावे म्हणून तेजस्वी "एतश" त्याला शीघ्रगतीने पुढे आणीत आहे. ॥ १४ ॥


शी॒र्ष्णःशी॑र्ष्णो॒ जग॑तस्त॒स्थुष॒स्पतिं॑ स॒मया॒ विश्व॒मा रजः॑ ।
स॒प्त स्वसा॑रः सुवि॒ताय॒ सूर्यं॒ वह॑न्ति ह॒रितो॒ रथे॑ ॥ १५ ॥

शीर्ष्णःऽशीर्ष्णः जगतः तस्थुषः पतिं समया विश्वं आ रजः
सप्त स्वसारः सुविताय सूर्यं वहन्ति हरितः रथे ॥ १५ ॥

प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक स्थावराचा, आणि तसाच प्रत्येक जंगमाचा अधिपति जो सूर्य त्याला परस्परांच्या भगिनी अशा ज्या सात हरित्‌वर्ण घोड्या, त्या रथांत अधिष्ठित करून जगाच्या कल्याणासाठी अंतरिक्षांतून इकडे सर्वांच्या पुढे घेऊन येत असतात. ॥ १५ ॥


तच्चक्षु॑र्दे॒वहि॑तं शु॒क्रमु॒च्चर॑त् ।
पश्ये॑म श॒रदः॑ श॒तं जीवे॑म श॒रदः॑ श॒तम् ॥ १६ ॥

तत् चक्षुः देवऽहितं शुक्रं उत्ऽचरत्
पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतम् ॥ १६ ॥

देवतांना हितकर असा ईश्वराचा सूर्यरूपी शुभ्रतेजस्क जो हा नेत्र, तो आकाशांतून वर आला आहे. तर अशा मंगलप्रद नेत्राचे दर्शन आम्हाला शंभर वर्षेपर्यंत व्हावे आणि त्यासाठी आम्ही जगावे असे घडो. ॥ १६ ॥


काव्ये॑भिरदा॒भ्या या॑तं वरुण द्यु॒मत् ।
मि॒त्रश्च॒ सोम॑पीतये ॥ १७ ॥

काव्येभिः अदाभ्या आ यातं वरुण द्युऽमत्
मित्रः च सोमऽपीतये ॥ १७ ॥

कोणाकडूनही जे कधी दबले जात नाहीत अशा मित्रावरुणांनो, तुम्ही देदीप्यमान् देव, आमच्या कविजनांच्या प्रार्थनेने सोमप्राशनार्थ आमचेकडे आगमन करा. ॥ १७ ॥


दि॒वो धाम॑भिर्वरुण मि॒त्रश्चा या॑तम॒द्रुहा॑ ।
पिब॑तं॒ सोम॑मातु॒जी ॥ १८ ॥

दिवः धामऽभिः वरुण मित्रः च आ यातं अद्रुहा
पिबतं सोमं आतुजी इत्य् आतुजी ॥ १८ ॥

द्रोहबुद्धिरहित मित्रावरुणांनो, तुम्ही आपल्या तेजस्वीपणास अनुसरून द्युलोकांतून आमचेकडे आगमन करा, आणि हे शत्रूला जर्जर करणार्‍या देवांनो, आमचा सोमरस प्राशन करा. ॥ १८ ॥


आ या॑तं मित्रावरुणा जुषा॒णावाहु॑तिं नरा ।
पा॒तं सोम॑मृतावृधा ॥ १९ ॥

आ यातं मित्रावरुणा जुषाणौ आहुतिं नरा
पातं सोमं ऋतऽवृधा ॥ १९ ॥

सद्धर्माची अभिवृद्धि करणार्‍या मित्रावरुणांनो, आमची आहुति प्रसन्न अंतःकरणाने स्वीकारून हे देवांनो, आमचा सोमरसही प्राशन करा. ॥ १९ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६७ ( अश्विनीकुमारसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


प्रति॑ वां॒ रथं॑ नृपती ज॒रध्यै॑ ह॒विष्म॑ता॒ मन॑सा य॒ज्ञिये॑न ।
यो वां॑ दू॒तो न धि॑ष्ण्या॒वजी॑ग॒रच्छा॑ सू॒नुर्न पि॒तरा॑ विवक्मि ॥ १ ॥

प्रति वां रथं नृपतीऽ इतिनृऽपती जरध्यै हविष्मता मनसा यज्ञियेन
यः वां दूतः न धिष्ण्यौ अजीगः अच्च सूनुः न पितरा विवक्मि ॥ १ ॥

हे शूर श्रेष्ठांनो, आम्ही हविर्भागयुक्त हस्ताने आणि पवित्र मनानें तुमच्या रथाची देखील प्रशंसा करण्यास उद्युक्त झालो आहोत. बुद्धिप्रेरक अश्वीहो, तुमचा तो रथ हा दूताप्रमाणे लोकांना जागृत करतो. म्हणूनच पुत्र जसा मातापित्यांचे स्वागत करतो, त्याप्रमाणे मीही तुमचे स्वागत करीत आहे. ॥ १ ॥


अशो॑च्य॒ग्निः स॑मिधा॒नो अ॒स्मे उपो॑ अदृश्र॒न्तम॑सश्चि॒दन्ताः॑ ।
अचे॑ति के॒तुरु॒षसः॑ पु॒रस्ता॑च्छ्रि॒ये दि॒वो दु॑हि॒तुर्जाय॑मानः ॥ २ ॥

अशोचि अग्निः सम्ऽइधानः अस्मे इति उपो इति अदृश्रन् तमसः चित् अन्ताः
अचेति केतुः उषसः पुरस्तात् श्रिये द् इवः दुहितुः जायमानः ॥ २ ॥

अग्नि प्रज्वलित होऊन आमचे सन्मुख सुप्रकाशित झाला, त्यायोगे अंधकाराची दुर्दशा उडालेली प्रत्यक्ष दिसू लागली; तोंच आकाशकन्या उषादेवी हिचा ध्वज देखील ती शोभा वाढविण्यासाठी पुढे सरसावून फडकूं लागला. ॥ २ ॥


अ॒भि वां॑ नू॒नम॑श्विना॒ सुहो॑ता॒ स्तोमैः॑ सिषक्ति नासत्या विव॒क्वान् ।
पू॒र्वीभि॑र्यातं प॒थ्या॑भिर॒र्वाक्स्व॒र्विदा॒ वसु॑मता॒ रथे॑न ॥ ३ ॥

अभि वां नूनं अश्विना सुऽहोता स्तोमैः सिसक्ति नासत्या विवक्वान्
पूर्वीभिः यातं पथ्याभिः अर्वाक् स्वःऽविदा वसुऽमता रथेन ॥ ३ ॥

आमचा निष्णात् यज्ञसंपादक परोपरीने देवाला आळविणारा आहे. तो, हे अश्वीहो, स्तुतीस्तोत्रांनी तुमच्या सेवेस हा पहा उद्युक्त आहे. तर तुम्ही स्वर्ग-व्यापक आणि उत्कृष्ट धनदायक अशा आपल्या रथांत आरोहण करून परिचित आणि सुव्यवस्थित अशा मार्गांनी इकडे आगमन करा. ॥ ३ ॥


अ॒वोर्वां॑ नू॒नम॑श्विना यु॒वाकु॑र्हु॒वे यद्वां॑ सु॒ते मा॑ध्वी वसू॒युः ।
आ वां॑ वहन्तु॒ स्थवि॑रासो॒ अश्वाः॒ पिबा॑थो अ॒स्मे सुषु॑ता॒ मधू॑नि ॥ ४ ॥

अवोः वां नूनं अश्विना युवाकुः हुवे यत् वां सुते माध्वी इति वसुऽयुः
आ वां वहन्तु स्थविरासः अश्वाः पिबाथः अस्मे इति सुऽसुता मधूनि ॥ ४ ॥

खरोखर हे अश्वींनो, हे मधुर रसप्रिय देवांनो, तुम्ही जे भक्तरक्षक - त्या तुमचा मी उपासक, उच्चतम अशा धनाची इच्छा धरून सोमरस पिळून सिद्ध होतांच तुम्हाला पाचारण करीत आहे. तर तुमचे पुष्ट अश्व तुम्हाला इकडे घेऊन येवोत, आणि येथे आल्यावर आम्ही उत्तम रीतीने पिळून सिद्ध केलेला हा मधुररस तुम्ही प्राशन करा. ॥ ४ ॥


प्राची॑मु देवाश्विना॒ धियं॒ मेऽमृ॑ध्रां सा॒तये॑ कृतं वसू॒युम् ।
विश्वा॑ अविष्टं॒ वाज॒ आ पुरं॑धी॒स्ता नः॑ शक्तं शचीपती॒ शची॑भिः ॥ ५ ॥

प्राचीं ओं इति देवा अश्विना धियं मे अमृध्रां सातये कृतं वसुऽयुं
विश्वाः अविष्टं वाजे आ पुरम्ऽधीः ता नः शक्तं शचीपती इतिशचीऽपती शचीभिः ॥ ५ ॥

हे अश्वीदेवांनो, उच्चतम धनाची इच्छा करणारी माझी बुद्धि सरळ करा, तिला निराबाध करून परमध्येयाच्या प्राप्तीसाठी कार्यक्षम करा; संग्रामामध्ये आणि सत्त्वप्राप्तीच्या प्रयत्‍नांमध्ये आमच्या सर्व प्रकारच्या कल्पना कार्यप्रवण करा. आणि हे महाशक्तिसंपन्नांनो,, तुम्ही आपल्या महत् शक्तीच्या योगाने आम्हाला समर्थ करा. ॥ ५ ॥


अ॒वि॒ष्टं धी॒ष्व॑श्विना न आ॒सु प्र॒जाव॒द्रेतो॒ अह्र॑यं नो अस्तु ।
आ वां॑ तो॒के तन॑ये॒ तूतु॑जानाः सु॒रत्ना॑कसो दे॒ववी॑तिं गमेम ॥ ६ ॥

अविष्टं धीषु अश्विना नः आसु प्रजावत् रेतः अह्रयं नः अस्तु
आ वां तोके तनये तूतुजानाः सुऽरत्नासः देवऽवीतिं गमेम ॥ ६ ॥

अश्वीहो, पुन्हा विनंती करतो की, आमच्या अशा बुद्धीमध्ये तुम्ही प्रविष्ट व्हा. संततिविषयक जी आमची धमक ती तशीच अबाधित ठेवा; आणि पुत्रपौत्रादिकांची आणि उत्तमोत्तम अभीष्टरूप रत्‍नांची प्राप्ति होऊन आम्ही देवसेवेचा मार्ग अनुसरावा असे करा. ॥ ६ ॥


ए॒ष स्य वां॑ पूर्व॒गत्वे॑व॒ सख्ये॑ नि॒धिर्हि॒तो मा॑ध्वी रा॒तो अ॒स्मे ।
अहे॑ळता॒ मन॒सा या॑तम॒र्वाग॒श्नन्ता॑ ह॒व्यं मानु॑षीषु वि॒क्षु ॥ ७ ॥

एषः स्यः वां पूर्वगत्वाइव सख्ये निऽधिः हितः माध्वी इति रातः अस्मे इति
अहेळता मनसा यातं अर्वाक् अश्नन्ता हव्यं मानुषीषु विक्षु ॥ ७ ॥

हा पहा, तुमचे सख्यत्व जोडावे म्हणून अगोदर पुढे दूत पाठवावा त्याप्रमाणे हे मधुररसप्रिय देवांनो, आम्ही अर्पण केलेला आमचा भावभक्तीचा निधिच असा हा सोमरस तुम्हांपुढे ठेवला आहे. तर मनामध्ये कांही एक रोष न धरता इकडे भूलोकी या, आणि आम्हां भक्तजनांमध्ये मिळून मिसळून हा हविर्भाग सेवन करा. ॥ ७ ॥


एक॑स्मि॒न्योगे॑ भुरणा समा॒ने परि॑ वां स॒प्त स्र॒वतो॒ रथो॑ गात् ।
न वा॑यन्ति सु॒भ्वो॑ दे॒वयु॑क्ता॒ ये वां॑ धू॒र्षु त॒रण॑यो॒ वह॑न्ति ॥ ८ ॥

एकस्मिन् योगे भुरणा समाने परि वां सप्त स्रवतः रथः गात्
न वायन्ति सुऽभ्वः देवऽयुक्ताः ये वां धूःऽसु तरणयः वहन्ति ॥ ८ ॥

भक्तांचे संभरण करणारे हे अश्वीहो, एकाच उद्देशाने, एकाच हेतूने तुम्हांस नेण्यासाठी तुमचा रथ सात नद्यांभोवती घेरा घेऊन चालू लागला देखील. तुमचे अश्व दिव्यजनांनीच रथाला जोडले आहेत. ते चांगले धडधाकट असून कधी थकत नाहीत आणि असे ते त्वरितगति तुम्हाला इच्छेला येईल तिकडे घेऊन जातात. ॥ ८ ॥


अ॒स॒श्चता॑ म॒घव॑द्भ्यो॒ हि भू॒तं ये रा॒या म॑घ॒देयं॑ जु॒नन्ति॑ ।
प्र ये बन्धुं॑ सू॒नृता॑भिस्ति॒रन्ते॒ गव्या॑ पृ॒ञ्चन्तो॒ अश्व्या॑ म॒घानि॑ ॥ ९ ॥

असश्चता मघवत्ऽभ्यः हि भूतं ये राया मघऽदेयं जुनन्ति
प्र ये बन्धुं सूनृताभिः तिरन्ते गव्या पृञ्चन्तः अश्व्या मघानि ॥ ९ ॥

आमच्या दानशूर यजमानांबरोबर तुम्ही एकसारखे, सतत रहा. ते आपल्या संपत्तीच्या साधनाने सत्पात्री देणग्या देण्यास प्रवृत्त असतात. ते आपल्या मधुर भाषणांनी सर्वांचे बंधुत्व जोडतात; आणि गोधनाबरोबरच अश्वांचेही देणगी ते देवभक्तांना देतात. ॥ ९ ॥


नू मे॒ हव॒मा शृ॑णुतं युवाना यासि॒ष्टं व॒र्तिर॑श्विना॒विरा॑वत् ।
ध॒त्तं रत्ना॑नि॒ जर॑तं च सू॒रीन्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ १० ॥

नु मे हवं आ शृणुतं युवाना यासिष्टं वर्तिः अश्विनौ इरावत्
धत्तं रत्नानि जरतं च सूरीन् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ १० ॥

तारुण्याढ्य अश्वीदेवांनो, अगदी विलंब न लावता तुम्ही माझा धांवा ऐका; आणि तुमच्या आगमनामुळे समृद्ध अशा आमच्या गृहांकडे आगमन करा; भक्ताला आणि लोकधुरीणांना इष्ट ती रत्‍नसंपत्ती द्या, आणि अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६८ ( अश्विनीकुमारसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - विराज्, त्रिष्टुभ्


आ शु॑भ्रा यातमश्विना॒ स्वश्वा॒ गिरो॑ दस्रा जुजुषा॒णा यु॒वाकोः॑ ।
ह॒व्यानि॑ च॒ प्रति॑भृता वी॒तं नः॑ ॥ १ ॥

आ शुभ्रा यातं अश्विना सुऽअश्वा गिरः दस्रा जुजुषाणा युवाकोः
हव्यानि च प्रतिऽभृता वीतं नाः ॥ १ ॥

हे शुभ्रतेजस्क अश्वींनो, हे उत्कृष्ट अश्वसंपन्नांनो, हे अद्‌भुत कर्मकारी विभूतींनो, भक्तांच्या स्तुतिस्तोत्रांनी संतुष्ट होऊन इकडे आगमन करा, आणि आम्ही अर्पण केलेला हविर्भाग ग्रहण करा. ॥ १ ॥


प्र वा॒मन्धां॑सि॒ मद्या॑न्यस्थु॒ररं॑ गन्तं ह॒विषो॑ वी॒तये॑ मे ।
ति॒रो अ॒र्यो हव॑नानि श्रु॒तं नः॑ ॥ २ ॥

प्र वां अन्धांसि मद्यानि अस्थुः अरं गन्तं हविषः वीतये मे
त इरः अर्यः हवनानि श्रुतं नः ॥ २ ॥

ही मधुररसयुक्त पेयें तुम्हांपुढे ठेवली आहेत, तर माझ्या हविर्भागाचा यथेच्छ स्वीकार करण्यासाठी आगमन करा; आणि दूर असलात तरी देखील आम्हां आर्य भक्तांची नम्र विज्ञप्ति ऐका. ॥ २ ॥


प्र वां॒ रथो॒ मनो॑जवा इयर्ति ति॒रो रजां॑स्यश्विना श॒तोतिः॑ ।
अ॒स्मभ्यं॑ सूर्यावसू इया॒नः ॥ ३ ॥

प्र वां रथः मनःऽजवा इयर्ति तिरः रजांसि अश्विना शतऽऊतिः
अस्मभ्यं सूर्यावसूइति इयानः ॥ ३ ॥

तुमचा मनोवेगाने धांवणारा रथ - अंतःकरणाच्या प्रदेशातून दौडत जातो. कारण, हे सूर्यकन्येला प्रिय असलेल्या देवांनो, आम्ही तुमच्या रथाची प्रार्थनाच तशी केली होती. ॥ ३ ॥


अ॒यं ह॒ यद्वां॑ देव॒या उ॒ अद्रि॑रू॒र्ध्वो विव॑क्ति सोम॒सुद्यु॒वभ्या॑म् ।
आ व॒ल्गू विप्रो॑ ववृतीत ह॒व्यैः ॥ ४ ॥

अयं ह यत् वां देवऽयाः ओं इति अद्रिः ऊर्ध्वः विवक्ति सोमऽसुत् युवभ्यां
आ वल्गू इति विप्रः ववृतीत हव्यैः ॥ ४ ॥

हा पहा तुम्हा देवांचा सेवक सोमपाषाण - हा सोमरस पिळणारा सोमपाषाण - तुमच्यासाठी सज्ज होऊन रस पिळतांना मधुर शब्द करीत आहे. अशा वेळी, तुमचा काव्यप्रेमी भक्त आपल्या विज्ञप्ति स्तोत्रांनी, हे रुचिर मूर्तींनो, तुम्हाला वळवून इकडे आणील असेच घडो. ॥ ४ ॥


चि॒त्रं ह॒ यद्वां॒ भोज॑नं॒ न्वस्ति॒ न्यत्र॑ये॒ महि॑ष्वन्तं युयोतम् ।
यो वा॑मो॒मानं॒ दध॑ते प्रि॒यः सन् ॥ ५ ॥

चित्रं ह यत् वां भोजनं नु अस्ति नि अत्रये महिष्वन्तं युयोतं
यः वां ओमानं दधते प्र्यः सन् ॥ ५ ॥

तुमची जी सर्वपोषक देणगी खरोखरच अद्‌भुत आहे, तीच अपूर्व देणगी तुम्ही अत्रीसाठी निराळी ठेवा, कारण तो तुमचाच आवडता भक्त आहे आणि तो तुमच्याच संरक्षणाचे छत्र धारण करीत असतो. ॥ ५ ॥


उ॒त त्यद्वां॑ जुर॒ते अ॑श्विना भू॒च्च्यवा॑नाय प्र॒तीत्यं॑ हवि॒र्दे ।
अधि॒ यद्वर्प॑ इ॒तऊ॑ति ध॒त्थः ॥ ६ ॥

उत त्यत् वां जुरते आश्विना भूत् च्यवानाय प्रतीत्यं हविःऽदे
अधि यत् वर्पः इतःऽऊति धत्थः ॥ ६ ॥

हे अश्वीहो, वार्धक्याने ग्रासलेल्या परंतु तुम्हाला हवि अर्पण करण्यार्‍या च्यवनाला तुमचे आगमन लाभदायकच झाले. त्याला तुम्ही इतके सणसणीत तारुण्यपूर्ण रूप अर्पण केले की काही विचारायची सोय नाही. ॥ ६ ॥


उ॒त त्यं भु॒ज्युम॑श्विना॒ सखा॑यो॒ मध्ये॑ जहुर्दु॒रेवा॑सः समु॒द्रे ।
निरीं॑ पर्ष॒दरा॑वा॒ यो यु॒वाकुः॑ ॥ ७ ॥

उत त्यं भुज्युं अश्विना सखायः मध्ये जुहुः दुःऽएवासः समुद्रे
निः ईं पर्षत् अरावा यः युवाकुः ॥ ७ ॥

हे अश्वीहो, दुसरा चमत्कार असा की, भुज्यूला त्याच्या दुष्ट अधम मित्रांनी भर समुद्रांत ढकलून दिले होते त्याला तुमचा जो प्रिय अश्व त्याने सुखरूप पैलतीरास पोहोंचविले. ॥ ७ ॥


वृका॑य चि॒ज्जस॑मानाय शक्तमु॒त श्रु॑तं श॒यवे॑ हू॒यमा॑ना ।
याव॒घ्न्यामपि॑न्वतम॒पो न स्त॒र्यं॑ चिच्छ॒क्त्य॑श्विना॒ शची॑भिः ॥ ८ ॥

वृकाय चित् जसमानाय शक्तं उत श्रुतं शयवे हूयमाना
यौ अघ्न्यां अपिन्वतं अपः न स्तर्यं चित् शक्ती अश्विना शचीभिः ॥ ८ ॥

वृक म्हणून कोणी भक्त तपश्चर्येने क्षीण झाला त्यालाही तुम्ही सर्व प्रकारें शक्तिमान केलेत. शयूसाठी तुमचा धांवा केला तो तुम्ही ऐकला. आणि हे अश्वीहो, आपल्या दैवी शक्तीने त्या भक्ताच्या म्हातार्‍या वांझ गाईला टुमटुमीत बनवून, भांडे पाण्याने कांठोकाठ भरावे, त्याप्रमाणे तिची कास तुम्ही दुधाने टचटचीत भरून टाकलीत. ॥ ८ ॥


ए॒ष स्य का॒रुर्ज॑रते सू॒क्तैरग्रे॑ बुधा॒न उ॒षसां॑ सु॒मन्मा॑ ।
इ॒षा तं व॑र्धद॒घ्न्या पयो॑भिर्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ९ ॥

एषः स्यः कारुः जरते सुऽउक्तैः अग्रे बुधानः उषसां सुऽमन्मा
इषा तं वर्धत् अघ्न्या पयःऽभिः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ९ ॥

म्हणूनच हा मी तुमचा सेवक- एकनिष्ठेने तुमचे ध्यान करणारा स्तोता - उषःकालपूर्वी उठून स्तुति-स्तोत्रांनी तुमचे यश गात आहे. तर तुमची कृपारूप धेनू त्याचे मन उत्साहभराने विकसित करो, आणि विभूतींनो, तुम्हीही असाच आशिर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६९ ( अश्विनीकुमारसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


आ वां॒ रथो॒ रोद॑सी बद्ब धा॒नो हि॑र॒ण्ययो॒ वृष॑भिर्या॒त्वश्वैः॑ ।
घृ॒तव॑र्तनिः प॒विभी॑ रुचा॒न इ॒षां वो॒ळ्हा नृ॒पति॑र्वा॒जिनी॑वान् ॥ १ ॥

आ वां रथः रोदसी इति बद्बधानः हिरण्ययः वृषऽभिः यातु अश्वैः
घृतऽवर्तनिः पविऽभिः रुचानः इषां वोळ्हा नृऽपतिः वाजिनीऽवान् ॥ १ ॥

रोदसींना देखील प्रतिबंध करणारा तुमचा रथ, ज्याचे तेज कधी कमी होत नाही असा तो तुमचा रथ त्याला जोडलेल्या जलवृष्टिकर वीर्यसंपन्न अश्वांसह इकडे येवो; त्याची चाके घृताप्रमाणे चकचकीत आहेत आणि घृताचा जणों वर्षावच करतात. त्या चाकांची धांवही अगदी लकलकीत असते. असा तो सत्त्वाढ्यतेने व्याप्त असणारा रथ शूरांचा अधिपति आणि शूरांना उत्साह आणणारा आहे. ॥ १ ॥


स प॑प्रथा॒नो अ॒भि पञ्च॒ भूमा॑ त्रिवन्धु॒रो मन॒सा या॑तु यु॒क्तः ।
विशो॒ येन॒ गच्छ॑थो देव॒यन्तीः॒ कुत्रा॑ चि॒द्याम॑मश्विना॒ दधा॑ना ॥ २ ॥

सः पप्रथानः अभि पञ्च भूम त्रिऽवन्धुरः मनसा यातु युक्तः
विशः येन गच्चथः देवऽयन्तीः कुत्र चित् यामं अश्विना दधाना ॥ २ ॥

ज्यामध्ये तीन बैठकी आहेत असा तुमचा सर्वविख्यात रथ तुमच्या संकल्पानेंच जोडला जाऊन पांचही मानव समाजांमध्ये (पांचही) प्रदेशामध्ये आक्रमण करूं द्या. हे अश्वीहो, तुम्हाला कोठेंही जावयाचे असले, तरी देवाची उपासना करणार्‍या जनतेकडे तुम्ही त्याच रथांत बसून प्रथम गमन करता. ॥ २ ॥


स्वश्वा॑ य॒शसा या॑तम॒र्वाग्दस्रा॑ नि॒धिं मधु॑मन्तं पिबाथः ।
वि वां॒ रथो॑ व॒ध्वा॒३ याद॑मा॒नोऽन्ता॑न्दि॒वो बा॑धते वर्त॒निभ्या॑म् ॥ ३ ॥

सुऽअश्वा यशसा आ यातं अर्वाक् दस्रा निऽधिं मधुऽमन्तं पिबाथः
वि वां रथः वध्वा यादमानः अन्तान् दिवः बाधते वर्तनिऽभ्याम् ॥ ३ ॥

तुम्ही यशोमंडीत देव, तुमच्या उत्कृष्ट अश्वांसह, खाली भूलोकीं आगमन करा. हे अ‌द्भुतरूप अश्वीहो, तुम्ही जेव्हां मधुररसाचा चषक घेऊन मधुररस प्राशन करता, आणि जेव्हां तुमचा रथ "सूर्या" नांवाच्या नववधूला त्यांत आरोहण करवून दौडत जातो, तेव्हां त्याच्या चाकाच्या रगाड्याने दिग्भाग देखील चुरडून जातात. ॥ ३ ॥


यु॒वोः श्रियं॒ परि॒ योषा॑वृणीत॒ सूरो॑ दुहि॒ता परि॑तक्म्यायाम् ।
यद्दे॑व॒यन्त॒मव॑थः॒ शची॑भिः॒ परि॑ घ्रं॒समो॒मना॑ वां॒ वयो॑ गात् ॥ ४ ॥

युवोः श्रियं परि योषा अवृणीत सूरः दुहिता परिऽतक्म्यायां
यत् देवऽयन्तं अवथः शचीभिः परि घ्रंसं ओमना वां वयः गात् ॥ ४ ॥

रात्रीचा गडद अंधार पडला, आणि मनाला हुरहुर लागली तेव्हां त्या तरुणीने, सूर्यकन्येने तुमच्याच पासून सौभाग्याच्या ऐश्वर्याचा वर मागितला. कारण देवाच्या प्रत्येक उपासकाचे तुम्ही आपल्या दिव्य शक्तींनी रक्षणच करता, आणि प्रत्येक भक्ताला तुमच्या रक्षणामुळे प्रखर दीप्ति आणि तारुण्य ह्यांची प्राप्ती होते. ॥ ४ ॥


यो ह॒ स्य वां॑ रथिरा॒ वस्त॑ उ॒स्रा रथो॑ युजा॒नः प॑रि॒याति॑ व॒र्तिः ।
तेन॑ नः॒ शं योरु॒षसो॒ व्यु॑ष्टौ॒ न्य॑श्विना वहतं य॒ज्ञे अ॒स्मिन् ॥ ५ ॥

यः ह स्यः वां रथिरा वस्ते उस्राः रथः युजानः परिऽयाति वर्तिः
तेन नः शं योः उषसः विऽउष्टौ नि अश्विना वहतं यज्ञे अस्मिन् ॥ ५ ॥

महारथीहो, जो तुमचा रथ आपोआप जोडला जाऊन उषःकालाची प्रभा धारण करतो, आणि मार्गक्रमण करू लागतो, त्याच रथांतून हे अश्वीदेवांनो, तुम्ही सुप्रभातींच आमच्या ह्या यज्ञामध्ये आनंद आणि मांगल्य यांची देणगी घेऊन या. ॥ ५ ॥


नरा॑ गौ॒रेव॑ वि॒द्युतं॑ तृषा॒णास्माक॑म॒द्य सव॒नोप॑ यातम् ।
पु॒रु॒त्रा हि वां॑ म॒तिभि॒र्हव॑न्ते॒ मा वा॑म॒न्ये नि य॑मन्देव॒यन्तः॑ ॥ ६ ॥

नरा गौराइव विऽद्युतं तृषाणा अस्माकं अद्य सवना उप यातं
पुरुऽत्रा हि वां मतिऽभिः हवन्ते मा वां अन्ये नि यमन् देवऽयन्तः ॥ ६ ॥

हे वीरांनो, शुभ्र मेघ जसे विद्युल्लतेसाठी आतुर असतात, त्याप्रमाणे तृषित असे तुम्ही आज आतुरतेने आमच्या सोमसवनांकडे या; तुमची विनवणी पुष्कळ भक्तांकडून मनःपूर्वक होतच असते, पण दुसरे कोणी भक्त बुम्हाला अडवून धरतील, तर तसे मात्र होऊं देऊं नका. ॥ ६ ॥


यु॒वं भु॒ज्युमव॑विद्धं समु॒द्र उदू॑हथु॒रर्ण॑सो॒ अस्रि॑धानैः ।
प॒त॒त्रिभि॑रश्र॒मैर॑व्य॒थिभि॑र्दं॒सना॑भिरश्विना पा॒रय॑न्ता ॥ ७ ॥

युवं भुज्युं अवऽविद्धं समुद्रे उत् ऊहथुः अर्णसः अस्रिधानैः
पतत्रिऽभिः अश्रमैः अव्यथिऽभिः दंसनाभिः अश्विना पारयन्ता ॥ ७ ॥

भुज्यूला समुद्रामध्ये फेकून दिले असता तुम्हीच आपल्या अक्षय साधनांनी त्या खळबळून गेलेल्या समुद्रांतून त्याला बाहेर काढलेत. आणि हे अश्वीदेवहो, पंख लावलेल्या, न दमणार्‍या, आणि अपघात न होऊं देणार्‍या वाहनांनींच जणों काय घेऊन गेल्यासारखे त्याला आपल्या अद्‌भुत चमत्कृतींनी पार पाडलेत. ॥ ७ ॥


नू मे॒ हव॒मा शृ॑णुतं युवाना यासि॒ष्टं व॒र्तिर॑श्विना॒विरा॑वत् ।
ध॒त्तं रत्ना्॑नि॒ जर॑तं च सू॒रीन्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ८ ॥

नु मे हवं आ शृणुतं युवाना यासिष्टं वर्तिः अश्विनौ इरावत्
धत्तं रत्नानि जरतं च सूरीन् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ८ ॥

तर आतां तरी, हे तारुणमंडितांनो, माझा धांवा ऐका. हे अश्वीहो, तुमच्या येण्याने ससंमृद्ध होणार्‍या ह्या यज्ञगृहामध्ये आगमन करा. स्तोतृजनाला आणि आमच्या धुरीणांना अभीष्ट रत्‍नें अर्पण करा, आणि अशाच आशीर्वादांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७० ( अश्विनीकुमारसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


आ वि॑श्ववाराश्विना गतं नः॒ प्र तत्स्थान॑मवाचि वां पृथि॒व्याम् ।
अश्वो॒ न वा॒जी शु॒नपृ॑ष्ठो अस्था॒दा यत्से॒दथु॑र्ध्रु॒वसे॒ न योनि॑म् ॥ १ ॥

आ विश्वऽवारा अश्विना गतं नः प्र तत् स्थानं अवाचि वां पृथिव्यां
अश्वः न वाजी शुनऽपृष्ठः अस्थात् आ यत् सेदथुः ध्रुवसे न योनिम् ॥ १ ॥

सकलजनप्रिय अश्वीहो, आमचेकडे या. यज्ञमंदिर हेच तुमचे पृथ्वीवरील स्थान आहे असे सांगतात. आणि तुमचा भरदार पुठ्ठ्याचा रणधुंधर अश्व देखील, तुम्ही आसनावर बसल्याप्रमाणे त्याच्या पाठीवर स्थिर बसतांच ताबडतोब निघाला. ॥ १ ॥


सिष॑क्ति॒ सा वां॑ सुम॒तिश्चनि॒ष्ठाता॑पि घ॒र्मो मनु॑षो दुरो॒णे ।
यो वां॑ समु॒द्रान्स॒रितः॒ पिप॒र्त्येत॑ग्वा चि॒न्न सु॒युजा॑ युजा॒नः ॥ २ ॥

सिसक्ति सा वां सुऽमतिः चनिष्ठा अतापि घर्मः मनुषः दुरोणे
यः वां समुद्रान् सरितः पिपर्ति एतऽग्वा चित् न सुऽयुजा युजानः ॥ २ ॥

तुम्हाला अतिशय आवडणारी अशी मनःपूर्वक केलेली स्तुति तुम्हाला सोडून जातच नाही (नेहमी तुम्हाला धरूनच राहते). आणि इकडे भक्ताच्या गृहीं दुग्धाचे पात्र तापून राहिले असते, अशा वेळी तुमचा एतग्वा नावाचा अश्व दुसर्‍या अश्वाबरोबर जोडीने जोडला जाऊन अनेक समुद्र आणि नद्या ओलांडून तुम्हाला घेऊन इकडे येतो. ॥ २ ॥


यानि॒ स्थाना॑न्यश्विना द॒धाथे॑ दि॒वो य॒ह्वीष्वोष॑धीषु वि॒क्षु ।
नि पर्व॑तस्य मू॒र्धनि॒ सद॒न्तेषं॒ जना॑य दा॒शुषे॒ वह॑न्ता ॥ ३ ॥

यानि स्थानानि अश्विना दधाथेइति दिवः यह्वीषु ओषधीषु विक्षु
नि पर्वतस्य मूर्धनि सदन्ता इषं जनाय दाशुषे वहन्ता ॥ ३ ॥

हे अश्वीहो, तुम्ही स्वतःसाठी जी स्थाने निश्चित केली आहेत, मग ती द्युलोकाच्या उच्चभागी असोत, महानद्यांमध्ये असोत, किंवा वनस्पतीमध्ये अथवा मानवी समाजांमध्ये, किंवा पर्वताच्या शिखरावर असोत; तुम्ही तेथे अधिष्ठित होऊन भक्तजनांकरिता उत्साहरूप देणगी घेऊन येता. ॥ ३ ॥


च॒नि॒ष्टं दे॑वा॒ ओष॑धीष्व॒प्सु यद्यो॒ग्या अ॒श्नवै॑थे॒ ऋषी॑णाम् ।
पु॒रूणि॒ रत्‍नां॒ दध॑तौ॒ न्य१स्मे अनु॒ पूर्वा॑णि चख्यथुर्यु॒गानि॑ ॥ ४ ॥

चनिष्टं देवौ ओषधीषु अप्ऽसु यत् योग्याः अश्नवैथेइति ऋषीणां
पुरूणि रत्नांू दधतौ नि अस्मे इति अनु पूर्वाणि चख्यथुः युगानि ॥ ४ ॥

हे देवांनो, ऋषिजनांकडून अर्पण झालेल्या ज्या ज्या योग्य वस्तूंचा तुम्ही स्वीकार करता, त्या वस्तू-औषधि किंवा उदक-ह्यांच्याविषयी तुम्ही अतिशय आवड ठेवता, आणि भक्तांना भरपूर रत्‍नसंपत्ति देता, तर पूर्वींच्या ऋषिकालांतील युगें जशी तुम्ही कृपादृष्टीने अवलोकन प्रसिद्धीस आणलीत, त्याचप्रमाणे आमच्याकडेहि कृपादृष्टीने अवलोकन करा. ॥ ४ ॥


शु॒श्रु॒वांसा॑ चिदश्विना पु॒रूण्य॒भि ब्रह्मा॑णि चक्षाथे॒ ऋषी॑णाम् ।
प्रति॒ प्र या॑तं॒ वर॒मा जना॑या॒स्मे वा॑मस्तु सुम॒तिश्चनि॑ष्ठा ॥ ५ ॥

शुश्रुवांसा चित् अश्विना पुरूणि अभि ब्रह्माणि चक्षाथेइति ऋषीणां
प्रति प्र यातं वरं आ जनाय अस्मे इति वां अस्तु सुऽमतिः चनिष्ठा ॥ ५ ॥

हे अश्वीदेवांनो, तुम्ही अतिविख्यात आहांत, तुम्ही पुष्कळच स्तुति स्तवने ऐकली आहेत. तसेच ऋषींच्या प्रार्थना सूक्तांकडेहि लक्ष पुरविले आहे, तर आम्हा भक्तजनांसाठी उत्तम देणगी घेऊन या; आणि आम्ही चित्त लावून केलेल्या स्तुतीवर अत्यंत प्रेम करा. ॥ ५ ॥


यो वां॑ य॒ज्ञो ना॑सत्या ह॒विष्मा॑न्कृ॒तब्र॑ह्मा सम॒र्यो॒३ भवा॑ति ।
उप॒ प्र या॑तं॒ वर॒मा वसि॑ष्ठमि॒मा ब्रह्मा॑ण्यृच्यन्ते यु॒वभ्या॑म् ॥ ६ ॥

यः वां यज्ञः नासत्या हविष्मान् कृतऽब्रह्मा सऽमर्यः
भवाति उप प्र यातं वरं आ वसिष्ठं इमा ब्रह्माणि ऋच्यन्ते युवऽभ्याम् ॥ ६ ॥

हे सत्यस्वरूप अश्वीहो, ज्या तुमच्या यज्ञात उत्तम हविर्भाग अर्पण होतात, ज्यामध्ये "ब्रह्मा" ऋत्विज् हा प्रार्थनासूक्ते संपूर्ण म्हणतो, तोच यज्ञ युद्धकालीं कार्यक्षम ठरतो; तर आतांहि वसिष्ठाला वरप्रदान देण्यासाठी या. ही आमची प्रार्थनासूक्तें तुम्हां उभयतां प्रीत्यर्थच म्हटली जात आहेत. ॥ ६ ॥


इ॒यं म॑नी॒षा इ॒यम॑श्विना॒ गीरि॒मां सु॑वृ॒क्तिं वृ॑षणा जुषेथाम् ।
इ॒मा ब्रह्मा॑णि युव॒यून्य॑ग्मन्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

इयं मनीषा इयं अश्विना गीः इमां सुऽवृक्तिं वृषणा
जुषेथां इमा ब्रह्माणि युवऽयूनि अग्मन् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

पहा, ही तुमची ध्यान सेवा. अश्वीहो, तिचा प्रसन्नतेने स्वीकार करा. ही प्रार्थना सूक्ते तुमच्याच सेवेसाठी तुम्हांकडे गेली आहेत. तर हे देवांनो, तुम्ही आपल्या आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ॐ तत् सत्


GO TOP