|
ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ५१ ते ६० ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५१ ( आदित्य सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - आदित्य : छंद - त्रिष्टुभ्
आ॒दि॒त्याना॒मव॑सा॒ नूत॑नेन सक्षी॒महि॒ शर्म॑णा॒ शंत॑मेन ।
आदित्यानां अवसा नूतनेन सक्षीमहि शर्मणा शम्ऽतमेन
आदित्य देवांच्या कृपेने मला नवीन नवीन सुर्वसुखसंपन्न मंदिर व महाल मिळोत. आमचा धांवा ऐकून त्याकरितां सत्वर उडी घालणारे देव ह्या यजमानाला अति तेजःपुंज व सुनीतिसंपन्न ठेवोत. ॥ १ ॥
आ॒दि॒त्यासो॒ अदि॑तिर्मादयन्तां मि॒त्रो अ॑र्य॒मा वरु॑णो॒ रजि॑ष्ठाः ।
आदित्यासः अदितिः मादयन्तां मित्रः अर्यमा वरुणः रजिष्ठाः
द्वादश आदित्य देव, प्रकाशमती अखंडित पृथिवी देवी, दिनाधिपति मित्र देव, अर्यमा व अति सरलस्वभाव वरुण देव आमच्या यज्ञांत आनंद करोत. त्रिभुवनपालक देव आमचे निमंत्रित असोत आणि आज आमच्या रक्षणार्थ आमच्या येथे सोम पिवोत. ॥ २ ॥
आ॒दि॒त्या विश्वे॑ म॒रुत॑श्च॒ विश्वे॑ दे॒वाश्च॒ विश्व॑ ऋ॒भव॑श्च॒ विश्वे॑ ।
आदित्याः विश्वे मरुतः च विश्वे देवाः च विश्वे ऋभवः च विश्वे
सर्व ब्रह्माण्डांतील आदित्य देव, सर्व ब्रह्माण्डावरील मरुत् गण, सकल ऋभु देव, इंद्र, अग्नि व अश्विनीकुमार देव ह्या सर्वांची आम्ही यथासांग स्तुति वर्णन केली. अहो देवांनो, तुम्ही सर्वदा आम्हाला आपल्या आशीर्वचनांनी प्रतिपाळा. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५२ ( आदित्य सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - आदित्य : छंद - त्रिष्टुभ्
आ॒दि॒त्यासो॒ अदि॑तयः स्याम॒ पूर्दे॑व॒त्रा व॑सवो मर्त्य॒त्रा ।
आदित्यासः अदितयः स्याम पूः देवऽत्रा वसवः मर्त्यऽत्रा
अहो आदित्यांनो, आम्ही सदा दिव्य प्रकाशमान व अखंडित असे व्हावे. अहो वसूंनो, तुम्ही देव व मनुष्यें ह्या दोघांनाही तारक. हे मित्रावरुणांनो, तुमच्या दत्त ऐश्वर्याचा उपभोग घेणार्या आम्हाला आपल्या ऐश्वर्याचा वाटा उत्कृष्टपणे लाभावा. अहो द्यावापृथिवींनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही सध्यां उपस्थित असणारे सदोदित कायम (सुरक्षित) असावे. ॥ १ ॥
मि॒त्रस्तन्नो॒ वरु॑णो मामहन्त॒ शर्म॑ तो॒काय॒ तन॑याय गो॒पाः ।
मित्रः तत् नः वरुणः ममहन्त शर्म तोकाय तनयाय गोपाः
मित्र आणि वरुण हे विश्वपालक अहर्निशाधिपति देव आम्हाला, आमच्या पोरांबाळांना सर्व माणसांना अखंड सुख अर्पण करोत. अहो देवांनो, आम्ही तुमचे भक्त असून आम्ही दुसर्यांच्या पापांचे भागीदार होऊं नये. ॥ २ ॥
तु॒र॒ण्यवो॑ऽङ्गिरसो नक्षन्त॒ रत्नं॑ दे॒वस्य॑ सवि॒तुरि॑या॒नाः ।
तुरण्यवः अङ्गिरसः नक्षन्त रत्नं देवस्य सवितुः इयानाः
मागितले असतां सत्वर देणारे भगवान् अंगिरस देवर्षि आम्हाला सर्वोद्भव सूर्य भगवंताचे ते ऐश्वर्यरत्न समर्पण करोत. महाश्रेष्ठ, भक्तपालक, पितास्वरूप वरुण भगवान् आणि ब्रह्मांडांतील सर्व देव आम्हाला एकमतें करून त्या महदैश्वर्याचा आनंदाने उपभोग घेऊं देवोत. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५३ ( द्यावापृथिवी सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - द्यावापृथिवी : छंद - त्रिष्टुभ्
प्र द्यावा॑ य॒ज्ञैः पृ॑थि॒वी नमो॑भिः स॒बाध॑ ईळे बृह॒ती यज॑त्रे ।
प्र द्यावा यज्ञैः पृथिवी इति नमःऽभिः सऽबाधः ईळे बृहती इति यजत्रेइति |
मी मर्त्यमानव यज्ञद्वारांनी सप्रेम हविसमर्पण पूर्वक आता ह्या महाविस्तृत भक्तपाल द्यावापृथिवींची पूजा आरंभितो. कारण प्राचीन स्तोत्रगायकांनी ह्या महान् देवपुत्र देवतांना यज्ञामध्ये आपल्या सन्मुख स्थापित केले असतेंच. ॥ १ ॥
प्र पू॑र्व॒जे पि॒तरा॒ नव्य॑सीभिर्गी॒र्भिः कृ॑णुध्वं॒ सद॑ने ऋ॒तस्य॑ ।
प्र पूर्वजे इतिपूर्वऽजे पितरा नव्यसीभिः गीःऽभिः कृणुध्वं सदने ऋतस्य
अहो विप्रगणांनो, तुम्ही ह्या महा प्राचीन सत्य देवगृह यज्ञाचे ठायी नवीन नवीन स्तुतिस्तोत्रें गाऊन ह्या सर्व जगताच्या मातापिता द्यावापृथिवी देवतांना आपल्या सन्मुख स्थापन करा. हे द्यावापृथिवी देवतांनो, आपल्या सकल दिव्य परिवार जनांसहवर्तमान आपण आमच्या येथे यज्ञार्थ आम्हाला आपला सर्वोत्कृष्ट महाकृपा वरप्रसाद देण्यास सत्वत यावे. ॥ २ ॥
उ॒तो हि वां॑ रत्न॒धेया॑नि॒ सन्ति॑ पु॒रूणि॑ द्यावापृथिवी सु॒दासे॑ ।
उतो इति हि वां रत्नऽधेयानि सन्ति पुरूणि द्यावापृथिवी इति सुऽदासे
अहो द्यावापृथिवी देवतांनो, तुम्हांजवळ सद्भक्तास अर्पण करण्याकरितां पुष्कळ ऐश्वर्यरत्नें आहेत. तेव्हां, त्यापैकीं सर्वांत जे मोठे असेल ते आम्हाला द्या. अहो द्यावापृथिव्याश्रित देव देवतांनो, तुम्ही आमचे सदासर्वदां आपल्या मंगल आशीर्वचने करून पतिपालन करा. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५४ ( वास्तोष्पति सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वास्तोष्पति : छंद - त्रिष्टुभ्
वास्तो॑ष्पते॒ प्रति॑ जानीह्य॒स्मान्स्वा॑वे॒शो अ॑नमी॒वो भ॑वा नः ।
वास्तोः पते प्रति जानीहि अस्मान् सुऽआवेशः अनमीवः भव नः
हे वास्तोष्पति (गृहपालक) भगवान,आमच्याकडे लक्ष्य दे. आम्हांस्तव उत्तमोत्तम प्रासाददायक व सदा आरोग्यदायक असा रहा. देवा, जे आम्ही तुझ्याजवळ मागतो ते तू आम्हाला आनंदाने पुरव. आमच्या सकल प्राण्यांना व सेवकांना सुखकर हो. ॥ १ ॥
वास्तो॑ष्पते प्र॒तर॑णो न एधि गय॒स्फानो॒ गोभि॒रश्वे॑भिरिन्दो ।
वास्तोः पते प्रऽतरणः नः एधि गयऽस्फानः गोभिः अश्वेभिः इन्दो इति
हे गृहवास्तुपति, आल्हादकारक भगवान्, तू आमचा सर्वभार निर्वाहक आणि धनधान्य प्रवर्धक असून, आम्हाला गाई व घोड्यांनिशी वाढता हो. तुझ्या भक्तीमध्ये आम्ही जरारहित असावे. देवा, पोर जसा पित्याला प्रिय असतो त्याप्रमाणें तू आम्हावर सदा कृपावत्सल रहा. ॥ २ ॥
वास्तो॑ष्पते श॒ग्मया॑ सं॒सदा॑ ते सक्षी॒महि॑ र॒ण्वया॑ गातु॒मत्या॑ ।
वास्तोः पते शग्मया सम्ऽसदा ते सक्षीमहि रण्वया गातुऽमत्या
हे मंदिराधिपति देवा, तुझ्या सुखकर, रमणीय ऐश्वर्यपरिपूरित वा प्रशंसापूर्ण स्थानांचा आम्हाल लाभ व्हावा. देवा, तुझ्या श्रेष्ठ ऐश्वर्य रत्नाचा योग देऊन त्याचा संरक्षक ही तूंच बनून रहा. अहो गृहवास्तुपत्याश्रित देवतांनो, तुम्ही आपल्या शुभ वाणींनी आमचे सर्वदां परिरक्षण करीत रहा. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५५ ( वास्तोष्पति सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वास्तोष्पति : छंद - गायत्री, उपरिष्टद् बृहती, अनुष्टुभ्
अ॒मी॒व॒हा वा॑स्तोष्पते॒ विश्वा॑ रू॒पाण्या॑वि॒शन् ।
अमीवऽहा वास्तोः पते विश्वा रूपाणि आविशन्
हे वास्तुपति भगवन्, आपल्या रोगविनाशक सर्वगम्य स्वरूपांनी आमच्या इथे स्थित होत्साता, देवा, तू आम्हाला सुखाश्रित व प्रेमास्पद मित्र बनून रहा. ॥ १ ॥
यद॑र्जुन सारमेय द॒तः पि॑शङ्ग॒ यच्छ॑से ।
यत् अर्जुन सारमेय दतः पिशङ्ग यच्चसे
हे पिंगट डोळ्यांच्या आणि पांढर्या वर्णाच्या सारमेया, इंद्राच्या कुत्र्या, तू भक्षण करीत असतांना जेव्हां आपले दांत दाखवितोस व जेव्हां ते तुझ्या ओठांमधून बाहेर निघतात तेव्हां ते भाल्याच्या पात्यांप्रमाणे चकाकित दिसूं लागतात. हे कुत्र्या देवा, तू आतां खुशाल निजून रहा. ॥ २ ॥
स्ते॒नं रा॑य सारमेय॒ तस्क॑रं वा पुनःसर ।
स्तेनं राय सारमेय तस्करं वा पुनःऽसर
हे इंद्रदेवाच्या कुत्रोबा देवा, पुढे जाऊन पुनः त्याच ठिकाणास येणार्या अन्य चोरांवर किंव डाकेखोरांवर धांव. इंद्राच्या स्तोत्रगायक आम्हा विप्रांच्या ऐश्वर्यामध्यें उगीच कां बाधा आणतोस ? आता तू खुशाल पडून रहा. ॥ ३ ॥
त्वं सू॑क॒रस्य॑ दर्दृहि॒ तव॑ दर्दर्तु सूक॒रः ।
त्वं सूकरस्य ददृहि तव दर्दर्तु सूकरः
हे कुत्र्या, तू डुकराला विदारून खा व तें डुक्कर तुला डसो. आम्हां इंद्र स्तोत्रकारांना आमच्या ऐश्वर्यांत वृथा कां बाधा आणतोस ? जा, आता खुशाल झोंप घे. ॥ ४ ॥
सस्तु॑ मा॒ता सस्तु॑ पि॒ता सस्तु॒ श्वा सस्तु॑ वि॒श्पतिः॑ ।
सस्तु माता सस्तु पिता सस्तु श्वा सस्तु विश्पतिः
हा कुत्रा निजो, आमच्या आईला झोंप येवो, पित्याचा डोळा लागो. आमचे जामातादि संबंधीजन चांगले झोंपोत. माझे सर्व जातिबंधु निजतांना खुशाल निद्रासुख अनुभवोत. आणि (रात्रीच्या प्रहरी) हे सारे आमच्या सभोंवरील जन आनंदाने पडोत. ॥ ५ ॥
य आस्ते॒ यश्च॒ चर॑ति॒ यश्च॒ पश्य॑ति नो॒ जनः॑ ।
यः आस्ते यः च चरति यः च पश्यति नः जनः
जो (येथे कांही चोरण्याच्या किंवा नेण्याच्या इच्छेने) येईल, बसेल किंवा इतस्ततः बघेल त्याचे आम्ही सर्व मिळून डोळे फोडूं. आमची सर्व कांही इस्टेट ह्या प्रासाद मंदिराप्रमाणे इथल्या इथे निरंतर सुस्थितीत (पडली) असो. ॥ ६ ॥
स॒हस्र॑शृङ्गो वृष॒भो यः स॑मु॒द्रादु॒दाच॑रत् ।
सहस्रऽशृङ्गः वृषभः यः समुद्रात् उत्ऽआचरत्
ज्याला नक्षत्ररूपी हजार शिंगे आहेत असा (रात्री समयरूपी) बैल आकाशांतून बाहेर येऊं लागला आहे, तेव्हां आतां त्या महावृषभाच्या आज्ञेवरून आम्ही सर्व जनांना निजवितो. ॥ ७ ॥
प्रो॒ष्ठे॒श॒या व॑ह्येश॒या नारी॒र्यास्त॑ल्प॒शीव॑रीः ।
प्रोष्ठेऽऽशयाः वह्येऽऽशयाः नारीः याः तल्पऽशीवरीः
चौकांत (आंगणांत) निजलेल्या, गाड्या वगैरें सारख्या वाहनांवर निजलेल्या आणि पलंगादिकांवर निजलेल्या व ज्यांच्या अंगांचा सुगंध येतो अशा सर्व आर्य स्त्रियांना आम्ही प्रथम निजवितों. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५६ ( मरुत् सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मरुत् : छंद - द्विपदा विराज्, त्रिष्टुभ्
क ईं॒ व्यक्ता॒ नरः॒ सनी॑ळा रु॒द्रस्य॒ मर्या॒ अध॒ स्वश्वाः॑ ॥ १ ॥
के ईं विऽअक्ताः नरः सऽनीळाः रुद्रस्य मर्याः अध सुऽअश्वाः ॥ १ ॥
हे दृग्गोचर झालेले, समानबल, नरहितपर, आणि सदश्ववाहक असे रुद्रमहादेव पुत्र कोण बरें ? ॥ १ ॥
नकि॒र्ह्येषां ज॒नूंषि॒ वेद॒ ते अ॒ङ्ग वि॑द्रे मि॒थो ज॒नित्र॑म् ॥ २ ॥
नकिः हि एषां जनूंषि वेदे ते अङ्ग विद्रे मिथः जनित्रम् ॥ २ ॥
ह्यांच्या जन्माची हकीकत तर कोणालाच ठाऊक नाही. (रुद्र व पृश्नि ह्यांच्यापासून झालेल्या परस्परांच्या जन्माबद्दल त्यांचे तेच जाणे. ॥ २ ॥
अ॒भि स्व॒पूभि॑र्मि॒थो व॑पन्त॒ वात॑स्वनसः श्ये॒ना अ॑स्पृध्रन् ॥ ३ ॥
अभि स्वऽपूभिः मिथः वपन्त वातऽस्वनसः श्येनाः अस्पृध्रन् ॥ ३ ॥
चालतां चालतां पवनरूप पक्षांनी परस्परांचे आलिंगनपूर्वक स्वागत करीत करीत हे वायुवत् शब्दकारी गरुड पक्षीसम मरुत् गण आपापसांतच चढाओढ करीत आहेत बघा. ॥ ३ ॥
ए॒तानि॒ धीरो॑ नि॒ण्या चि॑केत॒ पृश्नि॒र्यदूधो॑ म॒ही ज॒भार॑ ॥ ४ ॥
एतानि धीरः निण्या चिकेत पृश्निः यत् ऊधः मही जभार ॥ ४ ॥
धीर रुद्र महदेव ह्या सर्व श्वेत वर्णात्मक स्वकीय गणांना जाणतात. आणि त्या महती पृश्निमातेनें तर ह्यांना आपल्या अंतरिक्षरूपी उदरांत - गर्भांत - बाळगिलेंच होते. ॥ ४ ॥
सा विट् सु॒वीरा॑ म॒रुद्भि॑तरस्तु स॒नात्सह॑न्ती॒ पुष्य॑न्ती नृ॒म्णम् ॥ ५ ॥
सा विट् सुऽवीरा मरुत्ऽभिः अस्तु सनात् सहन्ती पुष्यन्ती नृम्णम् ॥ ५ ॥
हे मरुतांचे सुभक्तपुत्र प्रजागन चिरकाल शत्रूवर चाल करणारे आणि भक्तांना धनलाभ करून देणारे राहोत. ॥ ५ ॥
यामं॒ येष्ठाः॑ शु॒भा शोभि॑ष्ठाः श्रि॒या सम्मि॑श्ला॒ ओजो॑भिरु॒ग्राः ॥ ६ ॥
यामं येष्ठाः शुभा शोभिष्ठाः श्रिया सम्ऽमिश्लाः ओजःऽभिः उग्राः ॥ ६ ॥
हे मरुत्गण जाण्याच्या ठिकाणी बेधडक जावोत. आपापल्या अलंकारांनी सुशोभित असोत, कांतीरूप स्त्रियांनी ते परिवृत असोत, आणि वीर्यबळाने महा भीमपराक्रमी असोत. ॥ ६ ॥
उ॒ग्रं व॒ ओज॑ स्थि॒रा शवां॒स्यधा॑ म॒रुद्भि॑र्ग॒णस्तुवि॑ष्मान् ॥ ७ ॥
उग्रं वः ओजः स्थिरा शवांसि अध मरुत्ऽभिः गणः तुविष्मान् ॥ ७ ॥
अहो मरुतांनो, तुमचे तेज महा पराक्रमी. आणि तुमचे सामर्थ्य महा खंबीर. मरुतांचा संघ वाढता राहो. ॥ ७ ॥
शु॒भ्रो वः॒ शुष्मः॒ क्रुध्मी॒ मनां॑सि॒ धुनि॒र्मुनि॑रिव॒ शर्ध॑स्य धृ॒ष्णोः ॥ ८ ॥
शुभ्रः वः शुष्मः क्रुध्मी मनांसि धुनिः मुनिःऽइव शर्धस्य धृष्णोः ॥ ८ ॥
अहो मरुत्गणांनो, तुमचे सामर्थ्य सर्व शोभासंयुक्त, पण तुम्ही मनाचे मोठे तापट. महाधाडसी आणि शत्रूवर खुशाल चाल करून जाणार्या तुमची वृक्षादिकांना हालवून सोडण्याची कृति म्हटली म्हणजे मौनव्रतधारी तमस्त्र्याप्रमाणे महाचमत्कारीक आहे. ॥ ८ ॥
सने॑म्य॒स्मद्यु॒योत॑ दि॒द्युं मा वो॑ दुर्म॒तिरि॒ह प्रण॑ङ्नः ॥ ९ ॥
सनेमि अस्मत् युयोत दिद्युं मा वः दुःऽमतिः इह प्रणक् नः ॥ ९ ॥
हे मरुत देवांनो, या, हा मी तुम्हाला भेटतों. पण आमच्यांपासून ते तुमचें चकाकीत अस्त्र दूर ठेवा. आणि देवांनो, तुमचा तो हट्टी स्वभावही आम्हाला ह्या यज्ञभूमीवर दृष्टीस न पडो. ॥ ९ ॥
प्रि॒या वो॒ नाम॑ हुवे तु॒राणा॒म् आ यत्तृ॒पन्म॑रुतो वावशा॒नाः ॥ १० ॥
प्रिया वः नाम हुवे तुराणां आ यत् तृपत् मरुतः वावशानाः ॥ १० ॥
अहो आवडत्या मरुत देवांनो, तुम्हां सत्वरगति देवतांचे नांव घे घेऊन आम्ही निमंत्रण करतो, कीं कोणीकडून तरी आपण देवांनी आम्हां भक्तजनांवर संतुष्ट होऊन यज्ञार्थ यावे. ॥ १० ॥
स्वा॒यु॒धास॑ इ॒ष्मिणः॑ सुनि॒ष्का उ॒त स्व॒यं त॒न्व१ शुम्भ॑मानाः ॥ ११ ॥
सुऽआयुधासः इष्मिणः सुऽनिष्काः उत स्वयं तन्वः शुम्भमानाः ॥ ११ ॥
देवांनो, तुमची आयुधें उत्तम, तुम्ही चालणारे खूप, तुम्हांजवळ अलंकार पुष्कळ, आणि तुम्ही आपल्या शरीरांना आपणच सुशोभित करीत असतां. ॥ ११ ॥
शुची॑ वो ह॒व्या म॑रुतः॒ शुची॑नां॒ शुचिं॑ हिनोम्यध्व॒रं शुचि॑भ्यः ॥
शुची वः हव्या मरुतः शुचीनां शुचिं हिनोमि अध्वरं शुचिऽभ्यः
भो मरुत् देवांनो, तुम्हां पवित्रांचे निमंत्रणही पवित्रच. तुम्हां पवित्रात्म्यांकडे मी ह्या पवित्र यज्ञराजाला पाठवितो. उदकाला अथवा यज्ञाला केवळ स्पर्शमात्रेंकरून पवित्र करणारे, पवित्रजन्मवंत, पवित्रात्म, व शुद्धस्वरूप असे तुम्ही ह्या सत्य यज्ञस्तुतिरूप नि मंत्रणावरून ह्या सत्य यज्ञाप्रत आपण आलांत (हे ठीक झाले). ॥ १२ ॥
अंसे॒ष्वा म॑रुतः खा॒दयो॑ वो॒ वक्ष॑स्सु रु॒क्मा उ॑पशिश्रिया॒णाः |
अंसेषु आ मरुतः खादयः वः वक्षःऽसु रुक्माः उपऽशिश्रियाणाः
हे मरुतांनो, तुमच्या खांद्यावर तुम्ही चक्राकार वीरभूषणें लाविली असतात; तुमच्या छातीवर पदकें लटकत असतात; आणि तुमच्या स्वभावानुसार तुम्हीं जी जलवृष्टी करतां, तिच्या योगाने जशी विद्युल्लता शोभते, त्याप्रमाणे तुम्ही आयुधें घेऊन जाताना ती आयुधें फारच चमकून शोभिवंत दिसतात. ॥ १३ ॥
प्र बु॒ध्न्या व ईरते॒ महां॑सि॒ प्र नामा॑नि प्रयज्यवस्तिरध्वम् ॥।
प्र बुध्न्या वः ईरते महांसि प्र नामानि प्रऽयज्यवः तिरध्वं
हे अत्यवश्य यष्टव्य देवगणांनो, तुमचे जन्म अंतरिक्षांतर्गत तेजःस्वरूप म्हणून गाईले जातात. तर आता तुम्ही उदकांना खाली सोडून द्या, व ह्या पृथ्वीवर पाणीच पाणी करून द्या. मरुतांनो, हा सहस्रगुणित, घरी तयार केलेला, व गृहस्थीजनांनी देण्यास योग्य असा आपला यज्ञभाग आनंदाने ग्रहण करा. ॥ १४ ॥
यदि॑ स्तु॒तस्य॑ मरुतो अधी॒थेत्था विप्र॑स्य वा॒जिनो॒ हवी॑मन् ॥
यदि स्तुतस्य मरुतः अधिथ इत्था विप्रस्य वाजिनः हवीमन्
अहो मरुत देवांनो, तुम्हांप्रत हविरन्न समर्पण करणार्या ज्ञानी भक्त जनाच्या यज्ञांतील ह्या स्तुतिस्तोत्रांच्या अभिप्रायाला जर तुम्ही जाणाल, तर तुम्ही ह्या सद्भक्ताला ऐश्वर्य तत्काळ द्यालच. आणखी ते ऐश्वर्य असे असावे की ज्या ऐश्वर्याला दुसरा शत्रु कधींही दाबून न बसो. ॥ १५ ॥
अत्या॑सो॒ न ये म॒रुतः॒ स्वञ्चो॑ यक्ष॒दृशो॒ न शु॒भय॑न्त॒ मर्याः॑ ॥
अत्यासः न ये मरुतः सुऽअञ्चः यक्षऽदृशः न शुभयन्त मर्याः
हे मरुत् गण उत्कृष्ट चालणार्या व सतत दौड मारणार्या घोड्यांप्रमाणे, अंतरिक्षांतून बघणार्या जनहितपर यक्षांप्रमाणे सुशोभित दिसतात. ते माडीवर उभे राहिलेल्या पोरांप्रमाणे, स्वच्छंद खेळत असणार्या व इतस्ततः धांवणार्या मुलांप्रमाणे, उत्तम व पयोरूपी अन्न हातांत धारण करीत असलेले असे आहेत. ॥ १६ ॥
द॒श॒स्यन्तो॑ नो म॒रुतो॑ मृळन्तु वरिव॒स्यन्तो॒ रोद॑सी सु॒मेके॑ ॥
दशस्यन्तः नः मरुतः मृळन्तु वरिवस्यन्तः रोदसी इति सुमेके इतिसुऽमेके
सुरूपधारी द्यावापृथिवीमध्ये व्यापणारे आणि भक्तांना धन देणारे मरुत् गण आम्हाला सुखसंपन्न करोत. हे वसुमय मरुत् गणांनो, तुमचे मेघजलाला फोडणारे व शत्रूजनांना मारणारे असे तें शस्त्र आम्हांपासून दूरच ठेवा. आणि मग शांतचित्त होत्साते आमच्या यज्ञाकडे येण्यास वळा. ॥ १७ ॥
आ वो॒ होता॑ जोहवीति स॒त्तः स॒त्राचीं॑ रा॒तिं म॑रुतो गृणा॒नः ॥
आ वः होता जोहवीति सत्तः सत्राची रातिं मरुतः गृणानः
अहो मरुतांनो, सर्वत्र व महाप्राचीन काळापासून तुम्ही भक्तांना देऊन ठेविलेल्या ऐश्वर्यधनांची प्रशंसा करणारा हा येथें असलेला तुमचा यज्ञहोता तुम्हाला यज्ञार्थ हांक मारीत आहे. अहो इंद्रिय किंवा पालक देवांनो, जो याचकांमध्ये श्रेष्ठ कामयाचक आणि जो अनन्य - एकीकडेसच ज्याच्या चित्ताची लय लागलेली असा अकपटी आहे, तो तुमच्याकरितां "उक्थ" स्तुति म्हणत आहे. ॥ १८ ॥
इ॒मे तु॒रं म॒रुतो॑ रामयन्ती॒मे सहः॒ सह॑स॒ आ न॑मन्ति ॥
इमे तुरं मरुतः रमयन्ति इमे सहः सहसः आ नमन्ति
हे बघा मरुत देव सत्वर इकडेसच येत आहेत. हे आम्हांपैकीं बळवंतांच्या बलाकडे झुकले. हे दुष्टांमधून सुष्टुजनांचे संरक्षण करतात. हवि न देणार्याचा हे महाद्वेष करतात. ॥ १९ ॥
इ॒मे र॒ध्रं चि॑न्म॒रुतो॑ जुनन्ति॒ भृमिं॑ चि॒द्यथा॒ वस॑वो जु॒षन्त॑ ॥
इमे रध्रं चित् मरुतः जुनन्ति भृमिं चित् यथा वसवः जुषन्त
हे मरुत देव ऐश्वर्यवंताला आणि सदा भ्रमणशील दरिद्री जनालाही प्रेरणा करतात. अहो देवांनो, तुम्ही वसुदेवगणांप्रमाणे ह्या यज्ञांत आनंद माना. अहो भक्तकामवर्षक देवांनो, आमची भितीरूप पापें नाहींशीं करा. आम्हांमध्ये पुष्कळ प्रजापुत्र सेवकादि धारण करून ठेवा. ॥ २० ॥
मा वो॑ दा॒त्रान्म॑रुतो॒ निर॑राम॒ मा प॒श्चाद्द॑घ्म रथ्यो विभा॒गे ॥
मा वः दात्रात् मरुतः निः अराम मा पश्चात् दध्म रथ्यः विऽभागे
अहो मरुतांनो, तुमच्या देणग्यापासून आम्हाला लोटून लावूं नका. अहो रथवंतांनो, तुमच्या ह्या वैभवांटणीच्या प्रसंगी आम्हाला मागें ठेवूं नका. अहो भक्तकामवर्षक देवांनो, जें जें तुम्ही उत्तम उत्पन्न केले आहे तें तें स्पृहणीय ऐश्वर्यधन आम्हाला द्याच द्या. ॥ २१ ॥
सं यद्धन॑न्त म॒न्युभि॒र्जना॑सः॒ शूरा॑ य॒ह्वीष्वोष॑धीषु वि॒क्षु ॥
सं यत् हनन्त मन्युऽभिः जनासः शूराः यह्वीषु ओषधीषु विक्षु
अहो रुद्रपुत्र मरुत् देवांनो, जेव्हां शूर पुरुष पुष्कळ रणमैदानांतून, शेतांमधून व निरनिराळ्या पथकांमधून विभक्त होऊन परस्पर क्रोधानें शत्रूंना मारीत सुटतात अशा वेळी पलटणींमध्यें तुम्ही आमचे जनहितकर तारक कितिकदां तरी बनलां आहांत. ॥ २२ ॥
भूरि॑ चक्र मरुतः॒ पित्र्या॑ण्यु॒क्थानि॒ या वः॑ श॒स्यन्ते॑ पु॒रा चि॑त् ॥
भूरि चक्र मरुतः पित्र्याणि उक्थानि या वः शस्यन्ते पुरा चित्
अहो मरुत देवांनो, जी पूर्वींही कितीकदां गाईली गेली आहेत, ती तुमची पुष्कळ प्रकारे केलेली आमची पितृसंबंधी कर्में व उक्तस्तोत्रें आतां आम्हांकडून पूर्ण करून घ्या. पराक्रमी धीट पुरुष सैन्यामध्यें मरुतांच्याच बळावर धीर धरून उभा असतो, आणि हा घोडाही मरुतांच्याच जोरावर बळ धारण करीत असतो. ॥ २३ ॥
अ॒स्मे वी॒रो म॑रुतः शु॒ष्म्यस्तु॒ जना॑नां॒ यो असु॑रो विध॒र्ता ॥
अस्मे इति वीरः मरुतः शुष्मी अस्तु जनानां यः असुरः विऽधर्ता
अहो मरुतांनो, जो शत्रू जगांना पूर्ण दाबून टाकणारा, महाबलवान व महासमर्थ असा, आम्हाला पाहिजे तो क्षत्रिय द्या; कीं ज्याच्यायोगाने हे पृथ्वीपालन चांगले न्यायशील होईल, आणि आम्ही ह्या भवसागरांतून उद्धरून जाऊं. आता देवा, आम्ही आपापल्या स्थानाप्रत चालते होऊं. ॥ २४ ॥
तन्न॒ इन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निराप॒ ओष॑धीर्व॒निनो॑ जुषन्त ॥
तत् नः इन्द्रः वरुणः मित्रः अग्निः आपः ओषधीः वनिनः जुषन्त
भगवान् इंद्र, मित्र, अग्नि, आपोदेवी, औषधी देवता व वनस्पति देव आमच्या ह्या स्तोत्राचा आनंदाने स्वीकार करोत. मरुतांच्या सन्निधानी आम्हाला सुखमयस्थान लाभो. अहो देवांनो, तुम्ही सदा आपल्या आशीर्वचनांनी आमचा सांभाळ करीत रहा. ॥ २५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५७ ( मरुत् सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मरुत् : छंद - त्रिष्टुभ्
मध्वो॑ वो॒ नाम॒ मारु॑तं यजत्राः॒ प्र य॒ज्ञेषु॒ शव॑सा मदन्ति ।
मध्वः वः नाम मारुतं यजत्राः प्र यज्ञेषु शवसा मदन्ति
हे पूज्य देवांनो, तुमच्या मधुर कार्यपद्धती मुळेच तुमचे "मरुत्" हे नांव सार्थ झाले आहे; मरुत् हे यज्ञामध्ये आपल्या उत्कटतेने हृष्ट होतात; एवढ्या विस्तीर्ण द्यावा पृथिवींनाही ते हालवून सोडतात, आणि कठोर मुद्रेनें जेव्हां ते संचार करतात, तेव्हां सर्व प्रवाहांचे उगम उदकानें भरगच्च भरून टाकतात. ॥ १ ॥
नि॒चे॒तारो॒ हि म॒रुतो॑ गृ॒णन्तं॑ प्रणे॒तारो॒ यज॑मानस्य॒ मन्म॑ ।
निचेतारः हि मरुतः गृणन्तं प्रऽनेतारः यजमानस्य मन्म
गुणसंकीर्तन करणार्या भक्ताकडे मरुत् हे कृपाकटाक्षानेंच पाहतात. यज्ञकर्त्याच्या मननाला ते योग्य वळण लावता. तर हे मरुतांनो, आमच्याही जञसमारंभामध्ये हविर्भागाचा स्वीकार करण्यासाठी आजच ह्या कुशासनावर संतोषाने अधिष्टित व्हा. ॥ २ ॥
नैताव॑द॒न्ये म॒रुतो॒ यथे॒मे भ्राज॑न्ते रु॒क्मैरायु॑धैस्त॒नूभिः॑ ।
न एतावत् अन्ये मरुतः यथा इमे भ्राजन्ते रुक्मैः आयुधैः तनूभिः
मरुत् हे आपल्या वीरभूषणांनी, आयुधांनी, आणि स्वतःच्या तेजाने जसे उज्ज्वल दिसतात, त्याप्रमाणें दुसरा कोणीच दिसत नाही; सर्व भूषणयुक्त मरुत् हे रोदसींनाही अलंकृत करतात, आणि शोभायमान दिसावें म्हणून आपल्या सर्वांच्या अंगावर ते एकसारखींच वीर-भूषणें चढवितात. ॥ ३ ॥
ऋध॒क्सा वो॑ मरुतो दि॒द्युद॑स्तु॒ यद्व॒ आगः॑ पुरु॒षता॒ करा॑म ।
ऋधक् सा वः मरुतः दिद्युत् अस्तु यत् वः आगः पुरुषता कराम
जरी आम्हीं स्वभावानुसार तुमचा अपराध केला असेल,, तरी ते तुमचे झगझगीत आयुध (विद्युत्) आमच्यापासून तुम्हीं दूर ठेवा. परमपूज्य देवांनो, आम्हाला त्याच्या तडाक्यांत सांपडूं देऊं नका. इतकेच नव्हे, तर तुमच्या अत्यंत प्रेमळपणाचा जो कळवळा तो आमच्या विषयीं उत्पन्न होईल असे करा. ॥ ४ ॥
कृ॒ते चि॒दत्र॑ म॒रुतो॑ रणन्तानव॒द्यासः॒ शुच॑यः पाव॒काः ।
कृते चित् अत्र मरुतः रणन्त अनवद्यासः शुचयः पावकाः
निष्कलंक, पवित्र आणि पावन मरुतांनो, आम्हीं जे कांही करतो त्यांतच तुम्ही आनंद माना. परमपूज्य देवांनो, त्य्मच्या स्वाभाविक सौजन्यानें आम्हांवर कृपा करा, आणि आमचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपल्या सत्त्वसामर्थ्यांच्या प्रभावानें आम्हांस (संकटातून) पार न्या. ॥ ५ ॥
उ॒त स्तु॒तासो॑ म॒रुतो॑ व्यन्तु॒ विश्वे॑भि॒र्नाम॑भि॒र्नरो॑ ह॒वींषि॑ ।
उत स्तुतासः मरुतः व्यन्तु विश्वेभिः नामऽभिः नरः हवींषि
ह्याप्रमाणे नाना प्रकारच्या नांवांनी आळवून आम्हीं तुमची स्तुति केली आहे. आतां तरी शूर मरुत् आमचा हविर्भाग ग्रहण करोत. हे मरुतांनो, आमच्या पुत्र-पौत्रांना-प्रजेलाही तुमच्या अमृताचा विभाग अर्पण करा; आणि तुमचे वैभव, त्य्मची मधुरवाणी, आणि तुमचे औदार्य हीं सर्व प्रकट करा. ॥ ६ ॥
आ स्तु॒तासो॑ मरुतो॒ विश्व॑ ऊ॒ती अच्छा॑ सू॒रीन्स॒र्वता॑ता जिगात ।
आ स्तुतासः मरुतः विश्वे ऊती अच्च सूरीन् सर्वऽताता जिगात
हे मरुतांनो, ह्याप्रमाणें तुमचे स्तवन आम्हीं कसेंही जरी केले, तरी आपल्या यच्चयावत् संरक्षण साधनांसह, आपल्या एकंदर ऐश्वर्यासह, आमच्या धुरीणांच्या सहाय्यार्थ आगमन करा. तुम्ही असे आहांत, कीं तुम्हीं आपण होऊन भक्ताची शतपट समृद्धि करितां, तर तसा आशीर्वाद देऊन आमचेंही सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५८ ( मरुत् सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मरुत् : छंद - त्रिष्टुभ्
प्र सा॑क॒मुक्षे॑ अर्चता ग॒णाय॒ यो दैव्य॑स्य॒ धाम्न॒स्तुवि॑ष्मान् ।
प्र साकम्ऽउक्षे अर्चत गणाय यः दैव्यस्य धाम्नः तुविष्मान्
सतत भक्तिकामवर्षक मरुत् गणंची पूजा करा. कारण ते देवांच्या निजधामाचा महिमा वाढविणारे आहेत. अहो मोठ्या रोदसी - द्यावीपृथिवी - देवीही त्यांची सेवा करतात आणि पृथ्वीवरील दर्याखोर्यांतून तो अंतरिक्षापर्यंत ह्यांची मजल पोंचते. ॥ १ ॥
ज॒नूश्चि॑द्वो मरुतस्त्वे॒ष्येण॒ भीमा॑स॒स्तुवि॑मन्य॒वो॑ऽयासः ।
जनूः चित् वः मरुतः त्वेष्येण भीमासः तुविऽमन्यवः अयासः
अहो महाबलभीम, शीघ्रकोपी, सदा गमनशील मरुत देवांनो, तुमचा जन्मच मुळी महा प्रदीप्त रुद्रदेवाच्या द्वारें. अहो तुम्ही महा तेजाने सदा पूरित असतां. तुम्ही जेव्हां निघावयास लागतां तेव्हां चक्षु ज्यांचा सूर्य आहे अशा सार्या जगताची भयाने त्रेधा उडून जाते. ॥ २ ॥
बृ॒हद्वयो॑ म॒घव॑द्भ्योष दधात॒ जुजो॑ष॒न्निन्म॒रुतः॑ सुष्टु॒तिं नः॑ ।
बृहत् वयः मघवत्ऽभ्यः दधात जुजोषन् इत् मरुतः सुऽस्तुतिं नः
ऐश्वर्यवंत मरुतांकरितां पुष्कळ अन्न करून ठेवा. मरुतदेव आमच्या प्रार्थनांचा आनंदाने स्वीकार करतीलच. चाललेल्या रस्त्याप्रमाणे ते मनुष्यांचा फायदाच वाढवितात. मरुतदेव आपल्या स्पृहणीय संरक्षक सामर्थ्याने आमच्या ऐश्वर्याला वृद्धि आणोत. ॥ ३ ॥
यु॒ष्मोतो॒ विप्रो॑ मरुतः शत॒स्वी यु॒ष्मोतो॒ अर्वा॒ सहु॑रिः सह॒स्री ।
युष्माऊतः विप्रः मरुतः शतस्वी युष्माऊतः अर्वा सहुरिः सहस्री
मरुतांनो, तुम्ही ज्यांचे रक्षण करता ते ज्ञानी कवि शेंकडों जामदारखान्यांचे मालक बनतात. युष्मद् रक्षितजन बली, शूर व सहस्र नगरांचे अधिपति राजे बनतात. देवांनो, तुम्ही परिपालन केलेले भक्तजन सम्राट , राजाधिराज बनून ते निजबळांनी सकल संकटांचा नाश करणारे होतात. अहो सर्वांस कांपवून सोडणार्या देवांनो, जर द्यावयाचे असेल तर, तुमचे हे असे धन आम्हांस संप्रदान करा. ॥ ४ ॥
ताँ आ रु॒द्रस्य॑ मी॒ळ्हुषो॑ विवासे कु॒विन्नंस॑न्ते म॒रुतः॒ पुन॑र्नः ।
तान् आ रुद्रस्य मीळ्हुषः विवासे कुवित् नंसन्ते मरुतः पुनः नः
भक्तकामवर्षक ह्या रुद्रपुत्र मरुतदेवांची मी पूजनार्थ वाट बघत आहे. मरुतदेव पुनरपि आम्हांकडे वारंवार येवोत. ज्या गुप्त कारणांनी ते अभ्यंतरी कृद्ध असतील किंवा प्रगटपणे क्रोध दाखवितील, देवांच्या त्या आमच्या क्रोधरूप पापांना आम्ही प्रार्थनाद्वारां घालवून देऊं. ॥ ५ ॥
प्र सा वा॑चि सुष्टु॒तिर्म॒घोना॑मि॒दं सू॒क्तं म॒रुतो॑ जुषन्त ।
प्र सा वाचि सुऽस्तुतिः मघोनां इदं सुऽउक्तं मरुतः जुषन्त
ऐश्वर्यवंतांची ही सुप्रार्थना म्हटली गेली. मरुतदेव ह्या सुभजनांचे आनंदाने सेवन करोत. अहो भक्तकामवर्षक देवतांनो, तुम्ही आम्हांपासून द्वेष अगदीं दूर ठेवा बरे. अहो देवदेवतांनो, तुम्ही सर्वदा आम्हांला आपल्या शुभवाचनांनी सांभाळा. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५९ ( मरुत् सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मरुत्, रुद्र : छंद - अनेक
यं त्राय॑ध्व इ॒दंइ॑दं॒ देवा॑सो॒ यं च॒ नय॑थ ।
यं त्रायध्वे इदम्ऽइदं देवासः यं च नयथ
अहो देवतांनो, तुम्ही ह्याप्रमाणे ज्यांचे संरक्षण केले, ज्यांना तुम्ही उन्नतीस चढविले, त्यांना अहो अग्ने, मित्रवरुण, मित्र, अर्यमन् व मरुतदेवांनो, तुम्ही सुखही दिलेच. ॥ १ ॥
यु॒ष्माकं॑ देवा॒ अव॒साह॑नि प्रि॒य ई॑जा॒नस्त॑रति॒ द्विषः॑ ।
युष्माकं देवाः अवसा अहनि प्रिये ईजानः तरति द्विषः
अहो देवांनो, तुमच्या कृपेने हर्षप्रद दिवसां जो यज्ञ करतो तो शत्रूंवर ताण करतो. जो उत्कृष्ट वर प्राप्त होण्याच्या लालसेने यज्ञामध्ये पुष्कळ अन्न खाऊं घालतो त्याची घरेंदारें अतोनात वाढतात. ॥ २ ॥
न॒हि व॑श्चर॒मं च॒न वसि॑ष्ठः परि॒मंस॑ते ।
नहि वः चरमं चन वसिष्ठः परिऽमंसते
वसिष्ठ ऋषिंनी तुम्हांपैकी शेवटल्यालाही यज्ञार्थ निमंत्रित केल्यावांचून सोडले नाही. अहो सोमेच्छु मरुतदेवांनो, आज आमच्या सोमाभिषवण प्रसंगास सर्व मिळून या व सोमरस प्या. ॥ ३ ॥
न॒हि व॑ ऊ॒तिः पृत॑नासु॒ मर्ध॑ति॒ यस्मा॒ अरा॑ध्वं नरः ।
नहि वः ऊतिः पृतनासु मर्धति यस्मै अराध्वं नरः
अहो जननेतृगणों, ज्याला तुम्ही ऐश्वर्य देतां, त्याला लढाईमध्ये तुम्ही आपल्या संरक्षक सामर्थ्याद्वारे मारीत नाही. तुमची नवीन कृपानुग्रह बुद्धि आमच्याकडे पुनः वळो. अहो सोमपानेच्छूंनो, सोमपानार्थ लवकर या. ॥ ४ ॥
ओ षु घृ॑ष्विराधसो या॒तनान्धां॑सि पी॒तये॑ ।
ओ इति सु घृष्विऽराधसः यातन अन्धांसि पीतये
अहो ज्यांची ऐश्वर्यें एकमेकांत गुंतलेली आहेत अशा मरुत्गणांनो, आमच्या सोमपानार्थ अत्यवश्य या. हे द्रव्य तुम्हांस यथाविधि समर्पण आहे. अहो दुसरे कोठेंच जाऊं नका बरे. ? ॥ ५ ॥
आ च॑ नो ब॒र्हिः सद॑तावि॒ता च॑ न स्पा॒र्हाणि॒ दात॑वे॒ वसु॑ ।
आ चः नः बर्हिः सदत अवित च नः स्पार्हाणि दातवे वसु
मरुतांनो, आमच्या कुशासनावर विराजमान व्हा. आमचे अभिलाषित धन आम्हाला देण्याकरितां आमचे रक्षक बना. अहो अहिंसक मरुतदेवांनो, ह्या यज्ञाचे ठायी आमच्या मधुर सोमाने आपण आपली स्वाहाकारद्वारें आनंदाने तृप्ति करून घ्या. ॥ ६ ॥
स॒स्वश्चि॒द्धि त॒न्व१ः॒ शुम्भ॑माना॒ आ हं॒सासो॒ नील॑पृष्ठा अपप्तन् ।
सस्वरिति चित् हि तन्वः शुम्भमानाः आ हंसासः नीलऽपृष्ठाः अपप्तन्
आणि ते धनवंत मरुत्गण आपल्या शरीरांना अलंकारांनी सुशोभित करून नील वस्त्र आपल्या पाठीवर धारण करीत होत्साते हंसाप्रमाणें येथें झडप घालोत. ते उत्साहवंत देव मजसभोंवार सर्वतः येऊन असोत. ते महा रमणीय नेतृगण आमच्या हवनप्रसंगांत आनंद मानोत. ॥ ७ ॥
यो नो॑ मरुतो अ॒भि दु॑र्हृणा॒युस्ति॒रश्चि॒त्तानि॑ वसवो॒ जिघां॑सति ।
यः नः मरुतः अभि दुःऽहृणायुः तिरः चित्तानि वसवः जिघांसति
हे धनवंत मरुत्गणांनो, जो आम्हाला राग क्रोध चढवील, अथवा आमच्या मनांवर अप्रत्यक्ष (द्वेषाने खोंचून बोलून) प्रहार करील त्याजवर तुम्ही त्याच्या शत्रूचे पाश सोडा. त्याला जखडून बांधून टाका आणि त्याला तुमच्या तपीळ हननशील स्वभावरूप शस्त्राने मारून टाका. ॥ ८ ॥
सांत॑पना इ॒दं ह॒विर्मरु॑त॒स्तज्जु॑जुष्टन ।
सान्ऽतपनाः इदं हविः मरुतः तत् जुजुष्टन
अहो शत्रु संतापकारी, रिपुसंहारक मरुत्गणांनो, हा तुमचा हव्यभाग आपल्या भक्तरक्षक सामर्थ्याने आनंदाने ग्रहण करा. ॥ ९ ॥
गृह॑मेधास॒ आ ग॑त॒ मरु॑तो॒ माप॑ भूतन ।
गृहऽमेधासः आ गत मरुतः मा अप भूतन
अहो गृहयज्ञाधिपति, दानशूर मरुतांनो, या. आपल्या भक्त संरक्षक सामर्थ्यानिशी या. परतून जाऊं नका. ॥ १० ॥
इ॒हेह॑ वः स्वतवसः॒ कव॑यः॒ सूर्य॑त्वचः ।
इहऽइह वः स्वऽतवसः कवयः सूर्यऽत्वचः
अहो स्वयंसिद्ध सामर्थ्यवंत, त्रिकालदर्शी, सूर्यवर्ण मरुतांनो, तुम्हांकरितां इथे आम्ही यज्ञ आरंभिला आहे. ॥ ११ ॥
त्र्यम्बकं यजामहे सु॒गन्धि॑म् पुष्टि॒वर्ध॑नम् ।
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिऽवर्धनं
सर्वप्रसृतपुण्यकीर्ति, कर्मरूप जगद्बीजवर्धक, त्रिलोकसाक्षीनेत्रभूत अशा महाबली रुद्रदेवा प्रित्यर्थ आम्ही यज्ञ करतो. मृत्युपासून आणि गर्भस्थ बंधनापासून तों सायुज्यतादि मुक्तिपर्यंत काकडीच्या फळाप्रमाणे ( म्हणजे ब्रह्मरंध्रद्वारे फुटून चैतन्यलीन होऊन) आम्ही मुक्त व्हावे, पूर्ण निर्वासनारूप (स्वर्गद्वारे पुनर्जन्ममरणादि रहित) मोक्षकैवल्य पावावे. ॥ १२ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६० ( सूर्य, मित्रावरुण सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ : छंद - निच्छृत् त्रिष्टुभ्
यद॒द्य सू॑र्य॒ ब्रवो॑ऽनागा उ॒द्यन्मि॒त्राय॒ वरु॑णाय स॒त्यं ।
यत् अद्य सूर्य ब्रवः अनागाः उत्ऽयन् मित्राय वरुणाय सत्यं
हे सूर्या, तू आज उदय पावून त्या जगन्मित्राला वरुणाला "आम्ही भक्त निरपराध आहोंत" असे जे सांगितलेस, तेच सत्य होवो; हे बंधनातीता देवा, आम्ही देवलोकांत राहूं असे कर; हे अर्यमा, आम्ही देवाचे स्तवन करणारे भक्त, देवांना प्रिय होऊं असे कर. ॥ १ ॥
ए॒ष स्य मि॑त्रावरुणा नृ॒चक्षा॑ उ॒भे उदे॑ति॒ सूर्यो॑ अ॒भि ज्मन् ।
एषः स्यः मित्रावरुणा नृऽचक्षाः उभे इति उत् एति सूर्यः अभि ज्मन्
मित्रावरुणांनो, हाच तो मानवांना अवलोकन करणारा सूर्य मार्गाने जात असतां द्यू आणि पृथिवी अशा उभय लोकांसन्मुख उदय पावतो; यच्चयावत् वस्तुजात - मग ते स्थावर असो किंवा जंगम असो - सर्वांचाच तो पालक आहे; आणि मानवांमध्ये सरळपणा कोठें आहे, कपट कोठें आहे, हेही तो पहात असतो. ॥ २ ॥
अयु॑क्त स॒प्त ह॒रितः॑ स॒धस्था॒द्या ईं॒ वहं॑ति॒ सूर्यं॑ घृ॒ताचीः॑ ।
अयुक्त सप्त हरितः सधऽस्थात् याः ईं वहन्ति सूर्यं घृताचीः
जेथून उदय होतो, त्या स्थानापासूनच त्याने आपल्या रथाला सात हरित्वर्ण आणि घृताने माखल्याप्रमाणे तुकतुकीत घोड्या जोडलेल्या असतात. त्या सूर्याला रथांत बसवून आकाशांतून नेतात. मित्रावरुणांनो, तो सूर्य तुमचाच आहे (तुमचेंच स्वरूप आहे.) जसा गोपालक पशुसमूहाकडे लक्ष ठेवतो, त्याप्रमाणेच सूर्य हा सर्व भुवनें आणि सर्व प्राणी यांचे निरीक्षण करीत असतो. ॥ ३ ॥
उद्वां॑ पृ॒क्षासो॒ मधु॑मंतो अस्थु॒रा सूर्यो॑ अरुहच्छु॒क्रमर्णः॑ ।
उत् वां पृक्षासः मधुऽमन्तः अस्थुः आ सूर्यः अरुहत् शुक्रं अर्णः
तुमचे मधुर रसस्रावी किरणरूपी हस्त पहा वर दिसूं लागले; तसाच सूर्यही शुभ्रतेजस्क समुद्रांतून वर आला. त्याच्यासाठी जे मार्ग आदित्य आंखून ठेवतात, तेच प्रेमळ आदित्य मित्र, वरुण आणि अर्यमा होते. ॥ ४ ॥
इ॒मे चे॒तारः॒ अनृ॑तस्य॒ भूरे॑र्मि॒त्रो अ॑र्य॒मा वरु॑णो॒ हि संति॑ ।
इमे चेतारः अनृतस्य भूरेः मित्रः अर्यमा वरुणः हि सन्ति
जगांतील सर्व खोडसाळपणा ज्यांना अचूक कळतो असे कोण - तर मित्र, अर्यमा आणि वरुण हे होत; ते न्यायधर्माच्या सदनांतच आनंदाने उत्फुल्ल होतात; ते ईश्वराच्या अनाद्यनंत शक्तीचे पुत्र असून कल्याणरूप आहेत. त्यांना कोणी कांही उपद्रव देऊं शकत नाही. ॥ ५ ॥
इ॒मे मि॒त्रो वरु॑णो दू॒ळभा॑सोऽचे॒तसं॑ चिच्चितयंति॒ दक्षैः॑ ।
इमे मित्रः वरुणः दुःऽदभासः अचेतसं चित् चितयन्ति दक्षैः
असे हे मित्र आपल्या चातुर्य बलाने मूढाला देखील कार्यक्षम करतात; ते त्याच्या अंगांत बुद्धियुक्त कर्तृत्व बाणेल असे करतातच, पण त्याला संकटांतून आणि पापमार्गांतून सन्मार्गानेच पलिकडे नेतात. ॥ ६ ॥
इ॒मे दि॒वः अनि॑मिषा पृथि॒व्याश्चि॑कि॒त्वांसो॑ अचे॒तसं॑ नयंति ।
इमे दिवः अनिऽमिषा पृथिव्याः चिकित्वांसः अचेतसं नयन्ति
मित्र आणि वरुण हे क्षणभर देखील डोळे न मिटतां भूलोक आणि द्युलोक ह्यांच्याकडे एकसारखे पहात राहून अज्ञ जनांना वाट दाखवीत असतात. नदीमध्ये खोल डोह असला तरी कोठेंतरी उतार करून त्यांनीच आम्हाला ह्या विस्तीर्ण दुःखरूप जलाशयाच्या पलीकडे नेले आहे. ॥ ७ ॥
यद् गो॒पाव॒ददि॑तिः॒ शर्म॑ भ॒द्रं मि॒त्रः यच्छं॑ति॒ वरु॑णः सु॒दासे॑ ।
यत् गोपावत् अदितिः शर्म भद्रं मित्रः यच्चन्ति वरुणः सुऽदासे
रक्षणक्षम आणि मंगलमय असा आपला आसरा - अदिति, मित्र आणि वरुण -ह्यांनी सुदासास दिला. त्याच आश्रयस्थानामध्यें आम्ही आणि आमच्या वंशजांनी रहावे. हे शीघ्रविजयी देवांनो, तुमचा क्रोध होईल असे कोणतेही दुष्कृत्य आमच्याकदून होऊ नये. ॥ ८ ॥
अव॒ वेदिं॒ होत्रा॑भिर्यजेत॒ रिपः॒ काश्चि॑द्वरुण॒ध्रुतः॒ सः ।
अव वेदिं होत्राभिः यजेत रिपः काः चित् वरुणऽध्रितः सः
होत्रस्तोत्रांनी जो कोणी अयोग्य देवतेला किंवा अयोग्य प्रकारे आहुति देऊन किंवा कांहीतरी पापकर्माने यज्ञवेदी भ्रष्ट करील, तो वरुणाचा घोर अपराधी होईल. अशा प्रकारच्या धर्मद्वेष्ट्यांशी अर्यमा युद्ध करून त्यांचा नाश करीलच. म्हणून हे मनोरथवर्षक, वीरांनो, तुम्ही सुदासासाठी सर्व प्रदेश निष्कंटक मोकळा केलात. ॥ ९ ॥
स॒स्वश्चि॒द्धि समृ॑तिस्त्वे॒ष्येषामपी॒च्येन॒ सह॑सा॒ सह॑न्ते ।
सस्वरिति चित् हि सम्ऽऋतिः त्वेषी एषां अपीच्येन सहसा सहन्ते
ह्यांचा जळजळीत हल्ला शत्रूवर अचानक, एकाएकी होतो. आपल्या गूढ शक्तीने ते दुष्टांना चिरडून टाकतात. हे मनोरथवर्षक वीरांनो, तुमच्या चातुर्यबलाच्या भितीने सर्व दुष्ट चळचळां कांपतात, म्हणून तुम्ही आपल्या मोठेपणाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवा. ॥ १० ॥
यो ब्रह्म॑णे सुम॒तिमा॒यजा॑ते॒ वाज॑स्य सा॒तौ प॑र॒मस्य॑ रा॒यः ।
यः ब्रह्मणे सुऽमतिं आयजाते वाजस्य सातौ परमस्य रायः
जो प्रार्थासूक्तें म्हणणार्यासाठी, किंवा सत्त्वसामर्थ्यासाठी, अथवा जे अत्युच्च ऐश्वर्य, त्याच्या प्राप्तीसाठी, आणि देवाचा अनुग्रह व्हावा म्हणून यज्ञ करतो, त्याचा उच्च हेतु ते औदार्यशाली प्रभु जाणतात, आणि त्याच्या निवासासाठी एक उत्कृष्ट स्थिर असें स्थान निर्माण करतात. ॥ ११ ॥
इ॒यं दे॑व पु॒रोहि॑तिर्यु॒वभ्यां॑ य॒ज्ञेषु॑ मित्रावरुणावकारि ।
इयं देव पुरःऽहितिः युवऽभ्यां यज्ञेषु मित्रावरुणौ अकारि
देवांनो, मित्रावरुणांनो, हीच तुमची सेवा आम्ही यज्ञामध्ये तुमच्या प्रीत्यर्थ केली आहे. तर आम्हाला सर्व संकटांतून पार न्या, आणि अशाच आशीर्वादांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ १२ ॥
ॐ तत् सत् |