|
ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ११ ते २० ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ११ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
म॒हाँ अ॑स्यध्व॒रस्य॑ प्रके॒तो न ऋ॒ते त्वद॒मृता॑ मादयन्ते ।
महान् असि अध्वरस्य प्रऽकेतः न ऋते त्वत् अमृताः मादयंते ।
देवा तू यागांचा महान प्रेरक यज्ञध्वज आहेस. देवा, तुझ्यावांचून इतर देवदेवता आनंद मानीत नाहीत. हे अग्निदेवा, तू सकल देवदेवतांसहवर्तमान एकाच रथावर आरूढ होऊन आता इकडे ये. हे भक्तांना उन्नतिगतिप्रद देवा, तू अग्रगण्य पूजेचा पहिला मान घेणारा देव आहेस. देवा, असा इकडे ये, आणि इथें बैस. ॥ १ ॥
त्वामी॑ळते अजि॒रं दू॒त्याय ह॒विष्म॑न्तः॒ सद॒मिन्मानु॑षासः ।
त्वां ईळते अजिरं दूत्याय हविष्मंतः सदं इत् मानुषासः ।
देवा, हविरन्नसहित आमची ही माणसे तुज शीघ्रगति व सदा सत्य देवाला आमच्या येथील यज्ञाचा तू दूत म्हणून सदैव प्रार्थीत असतात. देवा, तू ह्यांच्याच तर कुशासनांवर देवांसहवर्तमान सध्या बसला आहेस. हे अग्रगण्य देवा, ह्या आमच्या यजमानाचे आयुष्यांतील दिवस सर्वच चांगले सुखसंपदादि संयुक्त जावोत. ॥ २ ॥
त्रिश्चि॑द॒क्तोः प्र चि॑कितु॒र्वसू॑नि॒ त्वे अ॒न्तर्दा॒शुषे॒ मर्त्या॑य ।
त्रिः चित् अक्तोः प्र चिकितुः वसूनि त्वेइति अंतः दाशुषे मर्त्याय ।
हे अग्रगण्य देवा, तुज प्रकाशस्वरूप देवाच्या ठायी धन धान्य व बुद्धि आदि तीन्ही राज्यैश्वर्ये संपूर्ण वसत असतात. हे अग्रगण्य देवा, ह्या आमच्या दानशूर यजमानाकरितां पूर्व मनुष्यांप्रमाणे तू आता येथे आम्हांकडून यज्ञ करव. तू आमचा देवांकरिता सकल निंदादि दोषापहारक असा दूत बन. ॥ ३ ॥
अ॒ग्निरी॑शे बृह॒तो अ॑ध्व॒रस्या॒ग्निर्विश्व॑स्य ह॒विषः॑ कृ॒तस्य॑ ।
अग्निः ईशे बृहतः अध्वरस्य अग्निः विश्वस्य हविषः कृतस्य ।
ह्या महान विराट्रूप जगद्यज्ञावर ह्या अग्निदेवाचेच राज्य आहे. सर्व जगाने सद्विधिपूर्वक बनविलेल्या पक्वान्नांचा अधिपतिही अग्निच आहे. सकल ऐश्वर्यसंपन्न देव ह्याच्याच यज्ञांतून पूजेंतून आपापला भाग उचलून ग्रहण करतात. अहो, आता देवांनी अग्निला आपला हविर्वाहक नेमला आहे. ॥ ४ ॥
आग्ने॑ वह हवि॒रद्या॑य दे॒वानिन्द्र॑ज्येष्ठास इ॒ह मा॑दयन्ताम् ।
आ अग्ने वह हविःअद्याय देवान् इन्द्रऽज्येष्ठास इह मादयंतां ।
हे प्रमुख अग्निदेवा, हा हवि नैवेद्य भक्षण करण्याकरितां तू देवांना इकडेस आपल्या शक्तिद्वारे घेऊन ये. कारण, हे देवा, आमची इच्छा अशी आहे कीं, ह्या आमच्या यज्ञांत इंद्रासारखे मोठमोठे पराक्रमी देवही सुप्रसन्न व सुसंतुष्ट व्हावेत. देवा, हा आमचा यज्ञ, हे आमचे अन्नसमर्पण तू आपल्या वतीने स्वर्गांत दिव्य लोकांप्रत पोंचवून सकल देवांमध्ये ह्याची यथायोग्य वांटणी कर. अहो अग्निद्वारे पूजित सकल देवदेवतांनो, तुम्ही आम्हांला खूप आशीर्वचने देऊन आमचा उत्तम प्रकारे सदैव सांभाळ करीत रहा. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १२ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अग॑न्म म॒हा नम॑सा॒ यवि॑ष्ठं॒ यो दी॒दाय॒ समि॑द्धः॒ स्वे दु॑रो॒णे ।
अगन्म महा नमसा यविष्ठं यः दीदाय संइऽद्धः स्वे दुरोणे ।
जो सर्वत्र घृतहिरण्यादि उत्कृष्ट समिधांनी पेटविला गेला आहे व जो आपल्या द्यावापृथिवींमधील अंतरवकाशमय विशाल द्रोणरूप घरामध्ये दीपसमान प्रगट झाला आहे, त्या विचित्र नानावर्ण कांति, सुनिमंत्रित, जगत्प्रतीत जगत्साक्षी व नित्य तरुण बालस्वरूप सूर्याला अग्निदेवाला साष्टांग नमस्कारेंकरून आम्ही सामोरे जात आहोत. ॥ १ ॥
स म॒ह्ना विश्वा॑ दुरि॒तानि॑ सा॒ह्वान॒ग्निः ष्ट॑वे॒ दम॒ आ जा॒तवे॑दाः ।
स मह्ना विश्वा दुःऽइतानि साह्वान् अग्निः स्तवे दमे आ जातऽवेदाः ।
तो सर्वजगाची पापें आपल्या महासामर्थ्याने सहन करणारा सर्वज्ञ अग्रणी देव ह्या आमच्या स्तुतिंमध्ये व यज्ञामध्ये येवो. तो आम्हाला, आमच्या स्तोत्रपाठकाला, तसेच आमच्या ऐश्वर्यवंत क्षत्रिय महाराजांना निंदायुक्त पापांपासून दूर सुरक्षित ठेवो. ॥ २ ॥
त्वं वरु॑ण उ॒त मि॒त्रो अ॑ग्ने॒ त्वां व॑र्धन्ति म॒तिभि॒र्वसि॑ष्ठाः ।
त्वं वरुणः उत मित्रः अग्ने त्वां वर्धंति मतिऽभिः वसिष्ठाः ।
हे अग्निदेवा, तू वरुण देव आहेस. तूच आपत्तिकारक मित्रही आहेस. रे देव, तुला आम्ही वसिष्ठ गोत्रज लोक आपल्या बुद्धिध्यानबळेंकरून समिधाद्वारे वाढवीत आहोंत. तुझा महिमा स्तोत्रद्वारे वर्णन करून हव्यद्रव्यांनी तुला पूजित आहोंत. देवा, तुझ्या ठायींच सुसंभजनीय वसु देवही वर्तमान आहेत. अहो सकल अग्निमध्यविराजित देवदेवतांनो, तुम्ही सर्व आम्हांला सुखाशिर्वाद देऊन आमचा यथायोग्य प्रतिपाळ करा. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १३ ( वैश्वानर अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्राग्नये॑ विश्व॒शुचे॑ धियं॒धेऽसुर॒घ्ने मन्म॑ धी॒तिं भ॑रध्वम् ।
प्र अग्नये विश्वऽशुचे धियंऽधे असुरऽघ्ने मन्म धीतिं भरध्वं ।
जगद्दीप, दोषनाशक अशा अग्निदेवाला आपल्या ध्यानभक्तींनी तुम्ही हव्यन्नांनी जेऊं घाला. त्या बुद्धिमंतांमध्ये पूर्ण निष्कम, जगन्नायक अशा अग्निदेवाची ह्या आजच्या यज्ञामध्ये हविसहित मी देखील भक्तियुक्तांतःकरणे करून स्तोत्रपूजा करतो. ॥ १ ॥
त्वम॑ग्ने शो॒चिषा॒ शोशु॑चान॒ आ रोद॑सी अपृणा॒ जाय॑मानः ।
त्वं अग्ने शोचिषा शोशुचानः आ रोदसीइति अपृणाः जायमानः ।
हे अग्नि देवा, तू प्रगट होतांच आपल्या सुंदर कांतीने प्रफुल्लित होऊन दोन्ही द्यावापृथिवींमध्ये परिपूर्ण व्यापून राहिलास. जगन्नाथा, तू सर्वज्ञ आहेस. हे देवा, तू इतर सकल देवदेवतांना आपल्या महिम्यानेच त्यांच्या त्यांच्या भक्तानुग्रह प्रतिग्रहस्वरूप दोषांपासून व निंदेपासून मुक्त केले आहेस. ॥ २ ॥
जा॒तो यद॑ग्ने॒ भुव॑ना॒ व्यख्यः॑ प॒शून्न गो॒पा इर्यः॒ परि॑ज्मा ।
जातः यत् अग्ने भुवना व्य् अख्यः पशून् न गोपाः इर्यः परिऽज्मा ।
हे अग्निदेवा, जेव्हां तू उत्पन्न झालास (उदय पावलास) तेव्हां तू आपल्या प्रेरकदृष्टीने, गोपाल ज्याप्रमाणे आपल्या गाईंना प्रदक्षिणा (फेर्या) घालून बघतो तद्वत्, तुझ्या भोंवतालच्या सकल भुवनांना न्याहाळून घेतलेस. हे सकल जगदाधिपति भगवन्, तुझ्या कृपेने ब्राह्मणांना स्तोत्र आठवले. भो भो देवगणांनो, तुम्ही सारे आम्हाला आशीर्वचनपूर्वक पाळीत रहा. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १४ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - बृहती, त्रिष्टुभ्
स॒मिधा॑ जा॒तवे॑दसे दे॒वाय॑ दे॒वहू॑तिभिः ।
संऽइधा जातवेदसे देवाय देवहूतिऽभिः ।
हविर्भोगसमर्पण पूर्वक श्रद्धायुक्त नमस्कार करीत होत्साते आम्ही भक्तजन तुज सर्वज्ञ, पराक्रमपूर्ण, दिव्य व प्रमुखाग्रणी अग्निला देवस्तुतिस्तोत्रांनी समिधाद्वारां प्रार्थीत आहोंत. ॥ १ ॥
व॒यं ते॑ अग्ने स॒मिधा॑ विधेम व॒यं दा॑शेम सुष्टु॒ती य॑जत्र ।
वयं ते अग्ने संऽइधा विधेम वयं दाशेम सुऽस्तुती यजत्र ।
हे अग्रणी देवा, आम्ही तुला समिधा अर्पण करतो. हे यजमान तारका देवा, आम्ही तुझी उत्तमोत्तम स्तुति गात आहोंत. हे पूज्य अध्वर्यु, आम्ही तुजला घृत पाजत आहोंत. हे सुंदरकांति देवा, आम्ही तुला ही आमची सुस्वादु पक्वान्नें समर्पण करीत आहोंत. ॥ २ ॥
आ नो॑ दे॒वेभि॒रुप॑ दे॒वहू॑ति॒मग्ने॑ या॒हि वष॑ट्कृतिं जुषा॒णः ।
आ नः देवेभिः उप देवऽहूतिं अग्ने याहि वषट्ऽकृतिं जुषाणः ।
हे उत्कर्षकारी देवा, आमच्या तृप्तिकर भोजनांचा स्वीकार करून व आमच्या अतिथ्य योगें अति हर्षित होऊन आमच्या हांकेसरसा सकल देवांसहवर्तमान आम्हांकडे सत्वर धांवत ये. देवा, आम्ही भक्तजन तुज देवाची अशीच सदैव पूजा करीत राहूं. अहो देवदेवतांनो, तुम्ही आम्हाला आता आशिर्वाद द्या आणि आमचे सर्वदा संरक्षण करा. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १५ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - गायत्री
उ॒प॒सद्या॑य मी॒ळ्हुष॑ आ॒स्ये जुहुता ह॒विः । यो नो॒ नेदि॑ष्ठ॒माप्य॑म् ॥ १ ॥
उपऽसद्याय मीळ्हुषे आस्ये जुहुत हविः । यः नः नेदिष्ठं आप्यं ॥ १ ॥
अहो अध्वर्युंनो, कामवर्षक अग्निदेवाच्या मुखामध्ये देवाला पोंचण्याकरिता उत्कृष्ट घृतमय हवि सोडा. कारण, हा अग्निदेवच आमचा अति समीपस्थ सोयरा व अंतिमप्राप्य (अधिदैवत) आहे. ॥ १ ॥
यः पञ्च॑ चर्ष॒णीर॒भि नि॑ष॒साद॒ दमे॑दमे । क॒विर्गृ॒हप॑ति॒र्युवा॑ ॥ २ ॥
यः पञ्च चर्षणीः अभि निऽससाद दमेऽदमे । कविः गृहपतिः युवा ॥ २ ॥
हा जगच्चक्षु, त्रिकालज्ञ, नवयुवस्क, गृहस्वामी अग्निदेव घरोघर प्रति मनुष्यरूपी यज्ञकुंडांमधून (पंच प्राणाहुति) पांच घासांकरितांच जेवावयास बसत असतो. ॥ २ ॥
स नो॒ वेदो॑ अ॒मात्य॑म॒ग्नी र॑क्षतु वि॒श्वतः॑ । उ॒तास्मान्पा॒त्वंह॑सः ॥ ३ ॥
स नः वेदः अमात्यं अग्निः रक्षतु विश्वतः । उत अस्मान् पातु अंहसः ॥ ३ ॥
तो हा अग्निदेव आमच्या पवित्र वेदाचे, आमच्या अमात्याचे (प्रधानादि सुमंत्र्यांचे) व तसेच आमचेही सकल पापांपासून संरक्षण करो. ॥ ३ ॥
नवं॒ नु स्तोम॑म॒ग्नये॑ दि॒वः श्ये॒नाय॑ जीजनम् । वस्वः॑ कु॒विद्व॒नाति॑ नः ॥ ४ ॥
नवं नु स्तोमं अग्नये दिवः श्येनाय जीजनं । वस्वः कुवित् वनाति नः ॥ ४ ॥
ह्या आकाशचर दैदीप्यमान श्येन (गरुड) पक्षाला (सूर्यरूप अग्निला) मी अगदी नवीन रचलेले पद गातोंच. कारण हा पृथ्वीला जाणणारा असून आम्हांकरितां चोहोंकडची संपत्ति आणून देतो. ॥ ४ ॥
स्पा॒र्हा यस्य॒ श्रियो॑ दृ॒शे र॒यिर्वी॒रव॑तो यथा । अग्रे॑ य॒ज्ञस्य॒ शोच॑तः ॥ ५ ॥
स्पार्हाः यस्य श्रियः दृशे रयिः वीरऽवतः यथा । अग्रे यज्ञस्य शोचतः ॥ ५ ॥
कारण की ह्या यज्ञाग्रभास्कर पराक्रमी देवाच्या किरणरूप लक्ष्मीचे राज्यैश्वर्य डोळ्यांनी वारंवार बघावेसेंच वाटते. ॥ ५ ॥
सेमां वे॑तु॒ वष॑ट्कृतिम॒ग्निर्जु॑षत नो॒ गिरः॑ । यजि॑ष्ठो हव्य॒वाह॑नः ॥ ६ ॥
सः इमां वेतु वषट्ऽकृतिं अग्निः जुषत नः गिरः । यजिष्ठः हव्यऽवाहनः ॥ ६ ॥
तो अग्निदेव ह्या माझ्या तृप्तिकर सुस्वादु हवनीय पक्वान्नांची लालसा धरो. परमपूज्य हव्यवाहक अग्निदेव ह्या आमच्या स्तुतिस्तोत्रांचा स्वीकार करो. ॥ ६ ॥
नि त्वा॑ नक्ष्य विश्पते द्यु॒मन्तं॑ देव धीमहि । सु॒वीर॑मग्न आहुत ॥ ७ ॥
नि त्वा नक्ष्य विश्पते द्युऽमंतं देव धीमहि । सुवीरं अग्ने आऽहुत ॥ ७ ॥
हे सुखप्राष्यलोकनाथा, देवा, पूजनप्रिय अग्रनायका, तुझ्या दिव्य प्रकाशमान व महापराक्रमी विभूतिचेंच आम्ही निदिध्यासन करीत आहोत. तुझ्या ध्यानांत आम्ही पूर्ण लीन आहोत. ॥ ७ ॥
क्षप॑ उ॒स्रश्च॑ दीदिहि स्व॒ग्नय॒स्त्वया॑ व॒यम् । सु॒वीर॒स्त्वम॑स्म॒युः ॥ ८ ॥
क्षपः उस्रः च दीदिहि सुऽअग्नयः त्वया वयं । सुऽवीरः त्वं अस्मऽयुः ॥ ८ ॥
देवा, रात्री आणि दिवसा आम्हांकरिता सुप्रकाशित रहा. देवा तुझ्या योगाने आम्ही सदा सुखमय अग्निसंपन्न असूं. तू शक्तिमंत महासमर्थ देव आमचा पुत्र होऊन रहा. ॥ ८ ॥
उप॑ त्वा सा॒तये॒ नरो॒ विप्रा॑सो यन्ति धी॒तिभिः॑ । उपाक्ष॑रा सह॒स्रिणी॑ ॥ ९ ॥
उप त्वा सातये नरः विप्रासः यंति धीतिऽभिः । उप अक्षरा सहस्रिणी ॥ ९ ॥
ज्ञानी भक्त पुरुषार्थी जन सकल धनप्राप्त्यर्थ आपल्या बुद्धिमत्तेने तुजकडेच येतात. तुझे ध्यान व यज्ञयागद्वारे पूजन करतात. देवा, ही आमची हजारों प्रकारची अखंड स्तुतिवाणी तुझ्याजवळच येण्यास निघाली आहे. ॥ ९ ॥
अ॒ग्नी रक्षां॑सि सेधति शु॒क्रशो॑चि॒रम॑र्त्यः । शुचिः॑ पाव॒क ईड्यः॑ ॥ १० ॥
अग्निः रक्षांसि सेधति शुक्रऽशोचिः अमर्त्यः । शुचिः पावकः ईड्यः ॥ १० ॥
स्वतः शुद्ध, परमपूजनीय, पतितपावन, शुभ्रकांति, अमर व उपासकांना सदा उन्नतिप्रद असा हा अग्नि देव राक्षसांचा, पापांचा, मलांचा, दुष्टांचा संहार करीत असतो. ॥ १० ॥
स नो॒ राधां॒स्या भ॒रेशा॑नः सहसो यहो । भग॑श्च दातु॒ वार्य॑म् ॥ ११ ॥
स नः राधांसि आ भर इशानः सहसः यहोइति । भगः च दातु वार्यं ॥ ११ ॥
हे महासमर्थ पुत्रा, एवंगुणविशिष्ट तू ईश्वर आम्हाला पुष्कळ धन व राज्यादि ऐश्वर्य यांचा भरपूर पुरवठा करून दे. आणि तू स्वतः ऐश्वर्यवंत असल्याकारणाने तू आम्हाला हे आमचे इच्छित उत्कृष्ट वरप्रदान जरूर द्यावेंच. ॥ ११ ॥
त्वम॑ग्ने वी॒रव॒द्यशो॑ दे॒वश्च॑ सवि॒ता भगः॑ । दिति॑श्च दाति॒ वार्य॑म् ॥ १२ ॥
त्वं अग्ने वीरऽवत् यशः देवः च सविता भगः । दितिः च दाति वार्यं ॥ १२ ॥
हे अग्निदेवा, तू दिव्य दानशूर आहेस म्हणून आम्हाला सुक्षत्रियांप्रमाणे महत् यशोधन दे. देवा, तू सर्वोत्पादक आहेस, म्हणून आम्हाला राज्यवैभव दे. आणि भगवंता, तू उदार आहेस, त्याअर्थी तू आता आम्हाला हे आमचे इच्छित उत्कृष्ट वरप्रदान देच. ॥ १२ ॥
अग्ने॒ रक्षा॑ णो॒ अंह॑सः॒ प्रति॑ ष्म देव॒ रीष॑तः । तपि॑ष्ठैर॒जरो॑ दह ॥ १३ ॥
अग्ने रक्ष नः अंहसः प्रति स्म देव रीषतः । तपिष्ठैः अजरः दह ॥ १३ ॥
हे उत्कर्षकारी देवा, आमचा पापांपासून बचाव कर. हे ज्ञानप्रकाशवंता, तू जरारहित असून शत्रूंचा संहार करणारा आहेस, त्याअर्थी तू आता आपल्या दाहकशक्तिने आमच्या शत्रूंना भाजून काढ, आमच्या शत्रूंचे पूर्ण भस्म करून टाक. ॥ १३ ॥
अधा॑ म॒ही न॒ आय॒स्यना॑ धृष्टो॒ नृपी॑तये । पूर्भ॑वा श॒तभु॑जिः ॥ १४ ॥
अध मही नः आयसि अनाधृष्टः नृऽपीतये । पूः भवा शतऽभुजिः ॥ १४ ॥
देवा, आता तू ज्याअर्थी अप्रतिद्वंद्व महाधाडसी आमचा वीर देव आहेस, त्याअर्थी आम्हाला आमच्या लोकांच्या रक्षणार्थ लोखंडाच्या खाणींनी युक्त अति विस्तीर्ण व अति विशाल अशी पवित्र भूमि देणारा हो. ॥ १४ ॥
त्वं नः॑ पा॒ह्यंह॑सो॒ दोषा॑वस्तरघाय॒तः । दिवा॒ नक्त॑मदाभ्य ॥ १५ ॥
त्वं नः पाहि अंहसः दोषौ अस्तः अघायतः । दिवा नक्तं अद अभ्य ॥ १५ ॥
हे कधींही कोणाला न दबणार्या देवा, तू आम्हाला पापमय रात्रींच्या दोषांपासून व अंधकारांतील आणि अज्ञान दशेंतील पापांपासून रात्रंदिवस राख. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १६ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
ए॒ना वो॑ अ॒ग्निं नम॑सो॒र्जो नपा॑त॒मा हु॑वे ।
एना वः अग्निं नमसा उर्जः नपातं आ हुवे ।
ओजःपुत्र, सर्वप्रिय, सर्वोत्कृष्ट उत्तेजक, अखंडित, सुयज्ञकारी, जगद्दूत व अमर अशा अग्निदेवाची मी ह्याप्रमाणे स्तुति-हवि-संयुक्त तुम्हांकरितां आता पूजा करतो. ॥ १ ॥
स यो॑जते अरु॒षा वि॒श्वभो॑जसा॒ स दु॑द्रव॒त्स्वाहुतः ।
सः योजते अरुषा विश्वऽभोजसा सः दुद्रवत् सुऽआहुतः ।
त्याने आपले अरुणवर्णशोभित विश्वान्नसेवी पुष्ट घोडे रथाला जोडले आहेत. तो योग्यस्तुत, सुभोक्ता, सुशांत, यज्ञकर्ता, ऐश्वर्यसंपन्न जनोपसेवित अग्नि अखिल देवांसमवेत इकडे धांवत येत आहे. ॥ २ ॥
उद॑स्य शो॒चिर॑स्थादा॒जुह्वा॑नस्य मी॒ळ्हुषः॑ ।
उत् अस्य शोचिः अस्थात् आऽजुह्वानस्य मीळ्हुषः ।
ह्या मेघवर्षक हवनभोगशाली अग्नीची ज्वाला वर उठली. ह्याचा अरोचक, आकाशस्पर्शी धूरही वर निघून गेला. ऋत्विग्जन आचार्यादि महाजन अग्नीला घृतसमिधाद्वारे प्रदीप्त करीत आहेत. ॥ ३ ॥
तं त्वा॑ दू॒तं कृ॑ण्महे य॒शस्त॑मं दे॒वाँ आ वी॒तये॑ वह ।
तं त्वा दूतं कृण्महे यशःतमं देवान् आ वीतये वह ।
एवंगुणविशिष्ट तुजला आम्ही आमचा यशस्वी दूत नेमतो. ह्या भोजन समारंभाकरिता देवांना घेऊन ये. हे महाबलवंता, आम्हाला तू सर्व जगांतील त्या त्या उपभोग्य वस्तूंचे राजे करून दे की ज्या आम्ही तुला आता मागणार आहोंत. ॥ ४ ॥
त्वम॑ग्ने गृ॒हप॑ति॒स्त्वं होता॑ नो अध्व॒रे ।
त्वं अग्ने गृहपतिः त्वं होता नः अध्वरे ।
हे अग्निदेवा, तू आमच्या घरांचा स्वामी आहेस. तुझी नित्य वैश्वदेवादिकांनी घरांत पूजा केल्याने आमच्या घरांची शोभा आहे. महायागांमध्ये सार्वजनिक हवनकार्यामध्ये तूच आमचा होता होतोस. हे प्रतिदिनपूजित रोज रोज उदय पावणार्या किंवा रोज रोज घरांत वैश्वदेवरूपाने पूजिल्या जाणार्या भगवंता, तू आमचा बुद्धिप्रेरक सूचक होता असून तूच आमच्याकडून यज्ञ यथासांग करून घेतोस व आम्हाला उत्कृष्ट वरप्रसाद देतोस. ॥ ५ ॥
कृ॒धि रत्नं॒ यज॑मानाय सुक्रतो॒ त्वं हि र॑त्न॒धा असि॑ ।
कृधि रत्नं यजमानाय सुक्रतोइतिसुऽक्रतो त्वं हि रत्नधा असि ।
हे यज्ञकर्मकर्त्या देवा, आमच्या क्षत्रिय यजमानांकरितां बहु रत्नखाणी निर्माण कर. कारण तू खरोखर अखिल रत्नभांडार आहेस. आणि देवा, आमच्या यज्ञांतील सकल ऋत्विजांची ते स्वतः चांगले स्तोत्रवेत्ते व परमदक्ष असे असले तरी देखील त्यांची बुद्धि तू तीक्ष्णच ठेव. ॥ ६ ॥
त्वे अ॑ग्ने स्वाहुत प्रि॒यासः॑ सन्तु सू॒रयः॑ ।
त्वेइति अग्ने सुऽआहुत प्रियासः संतु सूरयः ।
हे सुस्वादु घृतान्नपुष्ट अग्निदेवा, सूर्यभगवान् व स्वर्लोकवासी देवगण तुजविषयी अतिप्रीति संयुक्त असोत. कारण की ते ऐश्वर्यवंत भूर्भुवादि लोकांचे नियामक प्रभु असून आमच्या स्तुतिवाग्धेनु समूहांवर त्यांचीच सत्ता चालते. ॥ ७ ॥
येषा॒मिळा॑ घृ॒तह॑स्ता दुरो॒ण आँ अपि॑ प्रा॒ता नि॒षीद॑ति ।
येषां इळा घृतऽहस्ता दुरोणे आ अपि प्राता निऽसीदति ।
ज्यांच्या घरांत थबथबीत तुपाने हात भरून जातील अशी उत्कृष्ट पक्वान्नें सर्वांना भरपूर पुरून उरतील इतकी भरून ठेवलेली असतात. अशा उदारांतःकरण भक्तांचे, हे सर्व सहन करणार्या देवा, तू संरक्षण कर. त्यांच्या, आमच्या व आमच्या यजमानांच्या शत्रूंचे निर्मूलन कर. आम्हाला सर्व जगद्विख्यात असे सुख दे. ॥ ८ ॥
स म॒न्द्रया॑ च जि॒ह्वया॒ वह्नि॑रा॒सा वि॒दुष्ट॑रः ।
सः मन्द्रया च जिह्वया वह्निः आसा विदुःऽतरः ।
हे अग्निदेवा, असा तू विद्वद्वर हविर्वाहक देव आपल्या आनंदकारक जिव्हेने व मुखाने आमच्या यज्ञसिद्ध्यर्थ सामुग्री पुरवणार्या ऐश्वर्यवंत यजमानांकरिता, जेणेंकरून ते हवनीय द्रव्य सदैव आम्हाला देतच राहतील, असे महान राज्यवैभव आणून दे. इतकेंच नव्हे तर त्यांच्याकरिता व आम्हाकरिताही नाना हव्यन्ने परिपक्व करून ठेव. ॥ ९ ॥
ये राधां॑सि॒ दद॒त्यश्व्या॑ म॒घा कामे॑न॒ श्रव॑सो म॒हः ।
ये राधांसि ददति अश्व्या मघा कामेन श्रवसः महः ।
हे नित्य तरूण देवा, महान लौकिकाच्या इच्छेने जे आम्हाला यज्ञार्थ अश्व गो-गजादि वैभव व धनधान्यादि संपत्ति इत्यादि सामुग्री समर्पण करतात त्यांचे तू दुरितक्षयकारक पराक्रम बळांनी व शेंकडो नगरांनी संरक्षण कर. ॥ १० ॥
दे॒वो वो॑ द्रविणो॒दाः पू॒र्णां वि॑वष्ट्या॒सिच॑म् ।
देवः वः द्रविणःऽदाः पूर्णां विवष्टि आऽसिचं ।
हा धनद देव तुम्हांकडून लबालब आकंठ भरलेली घृतपात्रे इच्छितो. अहो विप्रांनो, अग्निमध्ये ह्या घृतधारा सोडा आणि ही पात्रेंही सोमरसाने परिपूर्ण भरून ठेवा. इतके केल्यावर मग देव तुम्हांकडे वळलाच समजा. ॥ ११ ॥
तं होता॑रमध्व॒रस्य॒ प्रचे॑तसं॒ वह्निं॑ दे॒वा अ॑कृण्वत ।
तं होतारं अध्वरस्य प्रऽचेतसं वह्निं देवाः अकृण्वत ।
देवांनी ह्या शीघ्र पेट घेणार्या अस्मद् बुद्धिप्रेरक हविर्वाहकाला महायागांचा होता बनविले. अहो, हा अग्निदेव उदार दानशूर भक्तजनांची सेवाच करतो म्हणा. कारण आपल्या भक्तांना हा महान वीर्य (ओज-पराक्रम) देऊन त्यांना ऐश्वर्याप्रतही हाच चढवतो. ॥ १२ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १७ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - द्विपदा त्रिष्टुभ्
अग्ने॒ भव॑ सुष॒मिधा॒ समि॑द्ध उ॒त ब॒र्हिरु॑र्वि॒या वि स्तृ॑णीताम् ॥ १ ॥
अग्ने भव सुऽसमिधा संऽइऽद्धः उत बर्हिः उर्विया वि स्तृणीतां ॥ १ ॥
हे अग्निदेवा, ह्या उत्तम समिधांनी पेट घे. अहो अध्वर्युंनो, ती विस्तीर्ण चटई कुशासन अग्निप्रित्यर्थ पसरून ठेवा. ॥ १ ॥
उ॒त द्वार॑ उश॒तीर्वि श्र॑यन्तामु॒त दे॒वाँ उ॑श॒त आ व॑हे॒ह ॥ २ ॥
उत द्वारः उशतीः वि श्रयंतां उत देवान् उशतः आ वह इह ॥ २ ॥
अहो दरवाजामध्ये ह्यावेळी अपशब्द बोलूं नका. अहो, स्तुतिकामुक व हविरन्नेच्छु देवांना दरवजांतून अग्नीला इकडे आणूं द्या. ॥ २ ॥
अग्ने॑ वी॒हि ह॒विषा॒ यक्षि॑ दे॒वान्स्व॑ध्व॒रा कृ॑णुहि जातवेदः ॥ ३ ॥
अग्ने वीहि हविषा यक्षि देवान् सुऽअध्वरा कृणुहि जातऽवेदः ॥ ३ ॥
हे सर्वज्ञ अग्निदेवा, ये, लाजूं नको. देवांकरिता हवन कर. आणि हा यज्ञ उत्तम करून घे. ॥ ३ ॥
स्व॒ध्व॒रा क॑रति जा॒तवे॑दा॒ यक्ष॑द्दे॒वाँ अ॒मृता॑न्पि॒प्रय॑च्च ॥ ४ ॥
सुऽअध्वरा करति जातऽवेदाः यक्षत् देवान् अमृतान् पिप्रयत् च ॥ ४ ॥
हा सर्वज्ञ देव यज्ञ यथासांग समाप्त करून व सकल अमर दिव्य विभूतिंना हव्यन्नांनी संतुष्ट करून हा आमचा यज्ञ सर्वोत्कृष्ट महायाग असा आमच्याकडून करवून घेत आहेत. ॥ ४ ॥
वंस्व॒ विश्वा॒ वार्या॑णि प्रचेतः स॒त्या भ॑वन्त्वा॒शिषो॑ नो अ॒द्य ॥ ५ ॥
वंस्व विश्वा वार्याणि प्रचेतइातिप्रऽचेतः सत्याः भवंतु आऽशिषः नः अद्य ॥ ५ ॥
हे अति बुद्धिमान देवा, आम्हाला सर्व जगावरील उत्कृष्टा उत्कृष्ट राज्यधनादि ऐश्वर्य अर्पण कर. आजच तुझे आशीर्वाद सत्य होवोत. ॥ ५ ॥
त्वामु॒ ते द॑धिरे हव्य॒वाहं॑ दे॒वासो॑ अग्न ऊ॒र्ज आ नपा॑तम् ॥ ६ ॥
त्वां ऊंइति ते दधिरे हव्यऽवाहं देवासः अग्ने ऊर्जः आ नपातं ॥ ६ ॥
अहाहा, अग्निदेवा, त्या सकल सूर्यादि देवांनी ओजः पुत्र तुजला आपल्या हविर्भागवाहक नेमले आहे. ॥ ६ ॥
ते ते॑ दे॒वाय॒ दाश॑तः स्याम म॒हो नो॒ रत्ना॒ वि द॑ध इया॒नः ॥ ७ ॥
ते ते देवाय दाशतः स्याम महः नः रत्ना वि दधः इयानः ॥ ७ ॥
हे अग्निदेवा, तुज देवाला समर्पण करण्याकरिता ह्याप्रमाणे यज्ञकर्मकारी आम्ही वसिष्ठगोत्री तुझे जन तुलाच निरंतर हवि देत राहूं. आणि भक्त ज्याच्याकडे मागण्याकरिता जातात असा तू देव आम्हाला महत्त्व व राज्यैश्वर्य यांप्रत चढव. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १८ ( दाशराज्ञ सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र, सुदास पैजवन दानस्तुती (२२-२५) : छंद - त्रिष्टुभ्
त्वे ह॒ यत्पि॒तर॑श्चिन्न इन्द्र॒ विश्वा॑ वा॒मा ज॑रि॒तारो॒ अस॑न्वन् ।
त्वेइति ह यत् पितरः चित् नः इंद्रः विश्वा वामा जरितारः असन्वन् ।
इंद्रा, ज्या ज्या वेळी कधीकाळी आमच्या पूर्वजांना नड पडली त्या त्या वेळी त्यांना तुझ्याकडूनच अखिल जगतातील राज्यधन जेणेंकरून मिळाले, त्या तुझ्या स्तुति ह्याच होत. तुझ्याठायींच प्रकाशस्वरूप कामधेनु आहेत. ते हे बुद्धिरूप अश्वही तुझेच आहेत. देवभक्त पुरुषांना अति धनदाता तूंच आहेस. ॥ १ ॥
राजे॑व॒ हि जनि॑भिः॒ क्षेष्ये॒वाव॒ द्युभि॑र॒भि वि॒दुष्क॒विः सन् ।
राजाऽइव हि जनिऽभिः क्षेषि एव अवः द्युभिः अभि विदुः कविः सन् ।
इंद्रा, तू विद्वान व त्रिकालज्ञ असूनही राजाप्रमाणे आपल्या दिव्य पट्टराणींसह यथेच्छ क्रीडा करतोसच. हे ऐश्वर्यवंत महादेवा, तू आम्हाकरिता सदा त्वल्लीन अशी काव्यलंकार विभूषित स्तुतिस्तोत्रे, प्रकाशधेनु आणि बुद्धिरूप अश्व यांनी संयुक्त असे महदैश्वर्य समर्पण कर. ॥ २ ॥
इ॒मा उ॑ त्वा पस्पृधा॒नासो॒ अत्र॑ म॒न्द्रा गिरो॑ देव॒यन्ती॒रुप॑स्थुः ।
इमाः ऊंइति त्वा पस्पृधानासः अत्र मन्द्राः गिरः देवऽयंतीः उप स्थुः ।
अहो, हा प्रमोदकारक, अतिस्पृहणीय, देवैक लालसी अशा माझ्या स्तुतिरूप वाणी आज ह्या यज्ञाद्वारे तुझ्याकडे धांव घेत आहेत. तर हे देवा, तुझे कल्याणप्रद ऐश्वर्यही आता आम्हाकडे येऊ दे. हे ऐश्वर्याच्या राजा इंद्रा, तुझ्यामध्ये बुद्धि लावून तुझी ध्यानपूर्वक स्तुतिस्तोत्रे गाण्यांत आम्ही सुख मानूं असे होऊ दे. ॥ ३ ॥
धे॒नुं न त्वा॑ सू॒यव॑से॒ दुदु॑क्ष॒न्नुप॒ ब्रह्मा॑णि ससृजे॒ वसि॑ष्ठः ।
धेनुं न त्वा सूऽयवसे दुदुक्षन् उप ब्रह्माणि ससृजे वसिष्ठः ।
हे इंद्रा, तुला गाईप्रमाणे व्रीहियवादि धान्यरूप चार्यासहित जेव्हां का आम्ही दोहूं लागलो, तेव्हा मज वसिष्ठ ब्राह्मणाकडून तुझ्या विराट रूपाची स्तुतिस्तोत्रेंच घडली, आणि म्हणूनच सकल जग तुला माझ्या बुद्धिरूप गाईंचा नाथ म्हणू लागले. हे ऐश्वर्य प्रभु इंद्र देवा, आता तर तू नीट सरळ आमच्या ध्यानबुद्धिकडेच यावे. ॥ ४ ॥
अर्णां॑सि चित्पप्रथा॒ना सु॒दास॒ इन्द्रो॑ गा॒धान्य॑कृणोत्सुपा॒रा ।
अर्णांसि चित् पप्रथाना सुऽदास इंद्रः गाधानि अकृणोत् सुऽपारा ।
इंद्राने एकेकाळी आपल्या ’सुदास’ भक्ताला (राजाला) ह्या विस्तीर्ण अगाध ब्रह्मांडरूप भवसागरांतून सहजासहजी उत्तीर्ण केले. पण ह्या ’उक्थ’ स्तुतींनी सदास्तुत्य देवाने मोठ्या उत्साहाने चालून आलेल्या "शिम्यु"ला ह्या सिन्धूनदीचे दुःशापच बाधतील असे केले (पाण्यांत बुडवून मारले). ॥ ५ ॥
पु॒रो॒ळा इत्तु॒र्वशो॒ यक्षु॑रासीद्रा॒ये मत्स्या॑सो॒ निशि॑ता॒ अपी॑व ।
पुरोळाः इत् तुर्वशः यक्षुः आसीत् राये मत्स्यासः निशिताः अपिऽइव ।
ह्या भारत भूमीवर यज्ञकामुक ’तुर्वश’ भक्त राजा हातांत पुरोडाश घेऊन तुज समर्पण करीत होता त्या राजावर देखील त्या पुरोडाशाला बघून जणों काय खाण्यास धांवणारे सिंधू नदीतील मत्स्य चवताळून आलेच. परंतु त्याकाळी तेथे योद्धाजन "भृगु" पुत्रांनी त्या राजाला मदत केली व मत्स्यांना पुरोडाश समर्पण करवून व तेथेच यज्ञ करवून शांत केले. आणि अशा संकट समयांतून इंद्र देवाने तो पुरोडाश स्वीकारून भक्त सखा इंद्राने आपल्या मित्र "तुर्वश" राजाला सिन्धूनदी पार केले ॥ ६ ॥
आ प॒क्थासो॑ भला॒नसो॑ भन॒न्तालि॑नासो विषा॒णिनः॑ शि॒वासः॑ ।
आ पक्थासः भलानसः भनंत आ अलिनासः विषाणिनः शिवासः ।
हविपाचक, भद्रमुख, तपोवृद्ध (कंडूकशमनार्थ) मृगशृंगधारी, व सर्वजन कल्याणेच्छु यज्ञाने आनंदित झालेल्या देवाने भक्तांस्तव "तृत्सु"च्या सहायार्थ चाल करून जाऊन आपल्या उत्कर्षप्रिय उपासक जनांच्या गाईंचे कळपचे कळप परत घेतले आणि लढून भक्तांच्या शत्रूंना युद्धामध्ये मारून टाकले. ॥ ७ ॥
दु॒रा॒ध्यो३॒अदि॑तिं स्रे॒वय॑न्तोऽचे॒तसो॒ वि ज॑गृभ्रे॒ परु॑ष्णीम् ।
दुःऽआध्यः अदितिं स्रेवयंतः अचेतसः वि जगृभ्रे परुष्णीं ।
महाकष्टाने जिंकला जाणारा, महानिर्बुद्ध हट्टी व दुराग्रही अशा दुष्ट शत्रूने सूर्यसंभूत परुष्णी नदीला कोरडे करण्याचा प्रयत्न करून तिचा पाट फोडला. पृथ्वीचा मालक काय तो मीच असे समजणारा महामूर्ख खादाड ’चयमाना’चा पुत्र ’यवि’ नामे राक्षस आपल्या बळाच्या जोरावर सार्या पृथ्वीला कापट्याने एका व्यक्तीच्या ताब्यांत आणत गेला परंतु अखेरीस जनावरासारखा समरभूमीत देवभक्ताकडून मारला जाऊन स्मशानांत लोळत पडला. ॥ ८ ॥
ई॒युरर्थं॒ न न्य॒र्थं परु॑ष्णीमा॒शुश्च॒नेद॑भिपि॒त्वं ज॑गाम ।
ईयुः अर्थं न निऽअर्थं परुष्णीं आशुः चन इत् अभिऽपित्वं जगाम ।
भक्तांकरिता कोठूनही संकट समयी शीघ्र साहाय्यार्थ उडी घालणारा तो देव येऊन त्याने जिचे जल सांचले आहे अशा परुष्णीला स्वमार्गगामी केले. तो इंद्र येथून जल पिऊन गेला आणि त्याने आपल्या मानभक्त "सुदासा"स्तव त्याच्या महाजल्पक वितंडवादी बडबड्या शत्रूंना - "सुतुकां"ना मार देऊन चांगलेच मऊ केले. ॥ ९ ॥
ई॒युर्गावो॒ न यव॑सा॒दगो॑पा यथाकृ॒तम॒भि मि॒त्रं चि॒तासः॑ ।
ईयुः गावः न यवसात् अगोपाः यथाऽकृतं अभि मित्रं चितासः ।
तदनंतर गोपालविरहित त्या गाईंचे कळप दुष्टांपासून सोडवण्याच्या सत्कृत्यामुळे झालेल्या आपत्तारक मित्र इंद्र देवाकडे, चार्याप्रमाणे - व्रीहियवादि दाण्याकडे जावे त्याप्रमाणे - धांवतच गेले. त्यावेळी ’पृश्नि’ देवी माता रोदसींनी साहाय्यार्थ पाठविलेल्या चित्रविचित्रवर्ण संयुक्त, अतिरम्यकांति, मरुद्गणांचा, ज्याचा सदा अखंड खोगीर कसलेलाच असतो, अशा घोड्याही भक्तांकडे अतिशीघ्र आगमन करत्या झाल्या. ॥ १० ॥
एकं॑ च॒ यो विं॑श॒तिं च॑ श्रव॒स्या वै॑क॒र्णयो॒र्जना॒न्राजा॒ न्यस्तः॑ ।
एकं च यः विंशतिं च श्रवस्या वैकर्णयोः जनान् राजा नि अस्तरित्यस्तः ।
सुदास राजा सत्कीर्तिकरितां त्या परुष्णी नदीच्या दोन्ही तीरावरच्या शत्रूंच्या नगरांतील लोकांना - एकएकट्याला व कधी कधी एकदम वीस वीस जणांनाही जेव्हां का मारत सुटला व विजयी होऊन प्रसन्न चित्तेंकरून यज्ञमंडपात शिरला त्यावेळी त्या लढाईचे वेळी युद्धप्रिय पराक्रमी इंद्र देवाने भक्ताच्या साहाय्यार्थ ह्या मरुद्गणांना उत्पन्न केले होते. ॥ ११ ॥
अध॑ श्रु॒तं क॒वषं॑ वृ॒द्धम॒प्स्वनु॑ द्रु॒ह्युं नि वृ॑ण॒ग्वज्र॑बाहुः ।
अध श्रुतं कवषं वृद्धं अप्ऽसु अनु द्रुह्युं नि वृणक् वज्रबाहुः ।
आता, हातात तरवार धारण करणार्या इंद्रदेवाने पूर्वश्रुत, अतिजरठ "कवषा"ला "द्रुह्यु"च्या पाठोपाठच पाण्यांत बुडवून मारले. आणि तेव्हांच भक्तसखा तुज देवाचे प्रेम इच्छिणार्या त्या त्वद् दत्तचित्त भक्तांनी प्रथम तुला यज्ञद्वारे हर्षित करून तदनंतर आपणही यज्ञशेषान्न व सोमरस खाऊन पिऊन परमानंदित झाले. ॥ १२ ॥
वि स॒द्यो विश्वा॑ दृंहि॒तान्ये॑षा॒मिन्द्रः॒ पुरः॒ सह॑सा स॒प्त द॑र्दः ।
वि सद्यः विश्वा दृंहितानि एषां इंद्रः पुरः सहसा सप्त दर्दरितिदर्दः ।
इंद्राने ह्या शत्रूंच्या चोंहीकडच्या महा दुर्गम अशा सातही किल्ल्यांचा एका सपाट्याने विध्वंस करून टाकला. ह्याने "आनवा"च्या गोधनाचे हरण केले आणि "तृत्सु"च्या सैन्यामध्ये उत्साहाचा प्रवेश केला. ह्या इंद्राच्या कृपेने आम्ही आपल्या कपटभाषणी व पुष्कळ अशा मनुष्य शत्रूंना लढाईंत सहज जिंकून घेऊं. ॥ १३ ॥
नि ग॒व्यवो॑ऽनवो द्रु॒ह्यव॑श्च ष॒ष्टिः श॒ता सु॑षुपुः॒ षट् स॒हस्रा॑ ।
नि गव्यवः अनवः द्रुह्यवः च षष्टिः शता सुसुपुः षट् सहस्रा ।
दुसर्यांची गोधने बळजबरीने चोरून नेणारे असे साठ "गव्यु" राक्षस, सहाशे "अनु" राक्षस व एक हजार सहासष्ट "द्रुह्यु" राक्षस हे सगळे रणांगणावर लोळले. आणि हा सर्व प्रताप कोणी केला म्हणाल, तर केवळ एकट्या परिचर्या कामेच्छु इंद्र महाराजांच्या विश्वव्यापक पराक्रमी फौजेने केला. ॥ १४ ॥
इन्द्रे॑णै॒ते तृत्स॑वो॒ वेवि॑षाणा॒ आपो॒ न सृ॒ष्टा अ॑धवन्त॒ नीचीः॑ ।
इंद्रेण एते तृत्सवः वेविषाणाः आपः न सृष्टाः अधवंत नीचीः ।
ती लढाईकरिता एकत्र झालेली, परंतु आपसांत वैमनस्ये येऊन त्यामुळे बिथरलेली, मोजण्याइतकी घोडी, लपण्याच्या किंवा पळण्याच्या जागा ज्यांना मुळींच माहीत नाहीत अशी असल्यामुळे "तृत्सू"ची सेना पाण्याप्रमाणे फांकली आणि गिरिदुर्गांचा आश्रय सोडून खाली खाली येऊं लागली. इंद्राने राजा "सुदास" भक्ताच्या यज्ञांत नाना प्रकारची हव्यपक्वान्ने खाल्ली. ॥ १५ ॥
अ॒र्धं वी॒रस्य॑ शृत॒पाम॑नि॒न्द्रं परा॒ शर्ध॑न्तं नुनुदे अ॒भि क्षाम् ।
अर्धं वीरस्य शृतऽपां अनिंद्रं परा शर्धंतं नुनुदे अभि क्षां ।
इंद्राने आपल्या भक्तपुत्रांच्या अपराक्रमी, अपमानास्पद व हिंसक क्रोधरूपी "मन्यु" शत्रूला ह्या क्षीरादि हविरन्नादि रसपरिपोषक पृथ्वीवरून पार दूर पळवून लावले, तेव्हा मग क्रोधरूप "मन्यु" शत्रूंचे पूर्ण दमन झाल्यावर "सुदास" राजाला वाट मोकळी झाली आणि मग तो जेथून पळून गेला होता त्या आपल्या दुर्गांच्या रस्त्यावर सरळ आला. ॥ १६ ॥
आ॒ध्रेण॑ चि॒त्तद्वेकं॑ चकार सिं॒ह्यं चि॒त्पेत्वे॑ना जघान ।
आध्रेण चित् तत् ंंइतिउ एकं चकार सिंह्यं चित् पेत्वेन जघान ।
अहो अतिदरीद्री जनाकडूनही ह्याने एक मुख्य यज्ञदान कर्म करून घेतलेच. ह्या देवाने बकर्यांकडून सिंहाला मारविले. ह्या पराक्रमी देवाने सुईकडून यज्ञयूपाचे सजविण्याचे कार्य करून घेतले. ह्याप्रमाणे ह्या देवाने "सुदासा"ला सकल उपभोग्य अन्ने समर्पण केली. ॥ १७ ॥
शश्व॑न्तो॒ हि शत्र॑वो रार॒धुष्टे॑ भे॒दस्य॑ चि॒च्छर्ध॑तो विन्द॒ रन्धि॑म् ।
शश्वंतः हि शत्रवः ररधुः ते भेदस्य चित् शर्धतः विंद रंधिं ।
तुज देवाचा उपहास करणारे पुष्कळ शत्रु असेच खरोखर भेदाच्या वशीकरणाला पोंचले, नष्ट झाले. तुझे स्तुतिस्तोत्र गाणार्या भक्तावर जो तीक्ष्ण शस्त्र उचलून त्याला ठार मारण्याचे पाप करतो अशा अभक्तांवर हे इंद्र देवा, तुझें वज्र जाऊन पडो, त्यांचा संहार होवो. ॥ १८ ॥
आव॒दिन्द्रं॑ य॒मुना॒ तृत्स॑वश्च॒ प्रात्र॑ भे॒दं स॒र्वता॑ता मुषायत् ।
आवत् इंद्रं यमुना तृत्सवः च प्र अत्र भेदं सर्वऽताता मुषायत् ।
ह्या भरतखंडाचे ठिकाणी यमुनातीरवासी महाजनांनी यज्ञद्वारे इंद्राची स्तुति केली. आणि तृत्सु लढाईंतील भेदाचाच विचार करीत राहिला. अहो, ’अज’, ’शिग्रु’ व ’यक्षु’ यमुना पुरींतील ह्या जनांनी या संग्राम यज्ञात शत्रूंच्या सैन्यांतील घोड्यांच्या शिरांचे बलि अर्पण केले. ॥ १९ ॥
न त॑ इन्द्र सुम॒तयो॒ न रायः॑ सञ्च॒क्षे॒ पूर्वा॑ उ॒षसो॒ न नूत्नाः॑ ।
न त इंद्र सुऽमतयः न रायः संऽचक्षे पूर्वाः उषसः न नूत्नाः ।
हे इंद्रा, तुझ्या सुंदर ध्यानबुद्धि प्राचीन जनांच्या ऐश्वर्याप्रमाणे किंवा आतांच्या ह्या उषःप्रभेप्रमाणे अगणित आहेत. त्वां ’मन्यगान’ पुत्र ’देवक’ राक्षसालाही मारून टाकले होते. महान गिरि शिखरावरून त्वां ’शंबरा’सुराला खाली ढकलून त्याचे टाळके फोडले. ॥ २० ॥
प्र ये गृ॒हादम॑मदुस्त्वा॒या प॑राश॒रः श॒तया॑तु॒र्वसि॑ष्ठः ।
प्र ये गृहात् अममदुः त्वाऽया पराऽशरः शतऽयातुः वसिष्ठः ।
जे आम्ही वसिष्ठ, पराशर व शतयातु आदि ब्राह्मण तुझ्या वरदानाने अतिहर्षित झालो आहोत तेच आम्ही तुझे भक्तजन यज्ञार्थ घरांतील भोजनांचे सुख कधी भुलणार नाही. देवा, आता असे कर की ह्या स्तोत्रपाठकांचे दिवस उत्तम कार्यात जावोत. ॥ २१ ॥
द्वे नप्तु॑र्दे॒वव॑तः श॒ते गोर्द्वा रथा॑ व॒धूम॑न्ता सु॒दासः॑ ।
द्वेइति नप्तुः देवऽवतः शतेइति गोः द्वा रथा वधूऽमंता सुऽदासः ।
अग्निदेवा, ह्या देवभक्त सुदास राजापासून दोनशे गाई, आणि स्त्रीसहित एक मला व एक माझ्या पत्नीला बसण्याकरिता असे दोन रथ, इतक्या दानाचा अधिकारी मी वसिष्ठऋषि, ह्याचा होता म्हणून, ह्याला स्तुतियुक्त मागत आहे. एवढे ह्याने मला दिले, की मग मी आपल्या यज्ञमंडपी (घरी) चालता होतो. ॥ २२ ॥
च॒त्वारो॑ मा पैजव॒नस्य॒ दानाः॒ स्मद्दि॑ष्टयः कृश॒निनो॑ निरे॒के ।
चत्वारः मा पैजऽवनस्य दानाः स्मत्ऽदिष्टयः कृशनिनः निऽरेके ।
ह्या पिजवन पौत्र सुदास राजापासून श्रद्धा भक्तिपुरःसर दानांत मिळालेले हे पृथ्वीवरून सपाट भरधांव चालणारे, अति शीघ्रगति, सुवर्णलंकारांनी सजविलेले असे चारही घोडे पुत्रवत् पालनीय मजला, माझ्या स्त्रीसह पुत्राला आणि ह्या यज्ञशेषान्नाला एकाद्या संकटप्रसंगांत घेऊन न जावोत. ॥ २३ ॥
यस्य॒ श्रवो॒ रोद॑सी अ॒न्तरु॒र्वी शी॒र्ष्णे शी॑र्ष्णे विब॒भाजा॑ विभ॒क्ता ।
यस्य श्रवः रोदसीइति अंतः उर्वीइति शीर्ष्णेऽशीर्ष्णे विऽबभाज विऽभक्ता ।
ज्याचे महद्यश विस्तीर्ण पृथ्वी व दिव्य आकाश ह्याच्यामध्ये प्रतिमनुष्याचे ठायी वाटले गेले, त्या राजाची हे सातही लोक किंवा ह्या सातही नद्या इंद्राप्रमाणेंच स्तुति गात आहेत. ह्या नद्यांनी लढाईंत "युधामधि" असुरालाही आपल्या अथांग पाण्यांत बुडविले. ॥ २४ ॥
इ॒मं न॑रो मरुतः सश्च॒तानु॒ दिवो॑दासं॒ न पि॒तरं॑ सु॒दासः॑ ।
इमं नरः मरुतः सश्चत अनु दिवःऽदासं न पितरं सुऽदासः ।
अहो मरुद्गणांनो, ह्या सुदासाला आमच्या पितृतुल्य दिवोदासाप्रमाणेच लेखा. अहो, विप्रगणांनो, पैजवानाच्या ह्या अविनाशी, अजरामर क्षत्रियवंशध्वजाची यज्ञांत स्तुति करा. ॥ २५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १९ ( संपात सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
यस्ति॒ग्मशृ॑ङ्गो वृष॒भो न भी॒म एकः॑ कृ॒ष्टीश्च्या॒वय॑ति॒ प्र विश्वाः॑ ।
यः तिग्मऽशृंगः वृषभः न भीमः एकः कृष्टीः च्यवयति प्र विश्वाः ।
जो तीक्ष्णश्रृंग सांडाप्रमाणे एकच महा बलवान् सकल ब्रह्मांडांतील भुवनांची उलथापालथ करतो, दानाविषयी कंजूष असणार्या अशांची जो गोधने नष्ट करून टाकतो, असा तू इंद्रदेव आमच निरंतर ज्ञानधनाधिकारीच होऊन रहा. ॥ १ ॥
त्वं ह॒ त्यदि॑न्द्र॒ कुत्स॑मावः॒ शुश्रू॑षमाणस्त॒न्वा सम॒र्ये ।
त्वं ह त्यत् इंद्र कुत्सं आव शुश्रूषमाणः तन्वा सऽमर्ये ।
इंद्रा, तू त्यावेळी "कुत्सा"चे रक्षण केलेस; कारण तेव्हां तो लढाईमध्ये स्वयंसेवक होता. आणखी तू ह्या "आर्जुनेया"लाही शिकविलेस आणि "कुयवा"चा व "शुष्णा"चा पूर्ण निःपात केलास. ॥ २ ॥
त्वं धृ॑ष्णो धृष॒ता वी॒तह॑व्यं॒ प्रावो॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ सु॒दास॑म् ।
त्वं धृष्णोइति धृषता वीतऽहव्यं प्र आवः विश्वाभिः ऊतिऽभिः सुऽदासं ।
हे शत्रूमर्दना, तू "सुदासा"ला आपल्या धारिष्टवंत शक्तींनी रक्षिलेस. पृथ्वी जिंकण्याच्यावेळी तू त्या अरिकंदन "पौरुकुत्सि"ला सांभाळिलेस आणि वृत्रासुरहनन समयी "पुरू"ला राखलेस. ॥ ३ ॥
त्वं नृभि॑र्नृमणो दे॒ववी॑तौ॒ भूरी॑णि वृ॒त्रा ह॑र्यश्व हंसि ।
त्वं नृभिः नृऽमनः देवऽवीतौ भूरीणि वृत्रा हरिऽअश्व हंसि ।
हे हरिदश्वनायक, देवांनिमित्त यज्ञकार्यांचे समयी श्रेष्ठ महाजन तुझ्या ध्यानांतच निमग्न होऊन राहतात, अथवा ज्याचे मन मनुष्यांमध्ये आहे असा तू देव आहेस. ॥ ४ ॥
तव॑ च्यौ॒त्नानि॑ वज्रहस्त॒ तानि॒ नव॒ यत्पुरो॑ नव॒तिं च॑ स॒द्यः ।
तव च्यौत्नानि वज्रऽहस्त तानि नव यत् पुरः नवतिं च सद्यः ।
हे शस्त्रधारी इंद्रदेवा, तुझे अखंडित चैतन्यबळ एवढे कीं तू शत्रूचे नव्याण्णव दुर्ग एकदम पाडलेस. जेव्हा तू आपल्या घरांत प्रवेश करतोस, तेव्हा तर तू शेकडों मंदिरांनाही पुरून उरतोस. देवा, तू "वृत्रा"ला मारलेस, आणखी "नमुचि"लाही ठार केलेस. ॥ ५ ॥
सना॒ ता त॑ इन्द्र॒ भोज॑नानि रा॒तह॑व्याय दा॒शुषे॑ सु॒दासे॑ ।
सना ता ते इंद्र भोजनानि रातऽहव्याय दाशुषे सुऽदासे ।
इंद्रा, तुझी ती सनातन भोग्य अन्ने यज्ञद्वारे देवाराधन करणार्या दानशूर "सुदास" राजाला प्राप्त होवोत. हे बहुशक्तिधारी देवा, तुझ्या भक्तकामवर्षक रथाला तुझे कामवर्षक मनोहर पीतवर्ण असे दोन्ही अश्व मी जुंपून देतो. ही माझी युष्मद् विराट्रूप वर्णनात्मक महास्तोत्रे तुज शक्तिमंताजवळ तुला यज्ञांत आणण्याकरिता जाऊन पोंहचोत. ॥ ६ ॥
मा ते॑ अ॒स्यां स॑हसाव॒न्परि॑ष्टाव॒घाय॑ भूम हरिवः परा॒दै ।
मा ते अस्यां सहसाऽवन् परिष्टौ अघाय भूम हरिऽवः पराऽदै ।
हे महासमर्था, जनमनोहर पिंगटवर्णाच्या अश्वसंयुक्ता, तुझी आमच्या सभोंवार सर्वत्र व्याप्ति असतांना तुझ्या ह्या जगरूप सभेमध्ये आम्हांला परकीय शत्रूंच्या ताब्यांत देण्यासारखे पाप तुझ्या हातून होऊ देऊ नको. तुझ्या धाडसी रक्षण सामर्थ्याद्वारे आमचे सर्वत्र परित्राण कर. तुझ्या स्तोत्र पाठकांचे ठायी आम्ही सदा प्रेमभक्तिसंपन्नच राहूं असे कर. ॥ ७ ॥
प्रि॒यास॒ इत्ते॑ मघवन्न॒भिष्टौ॒ नरो॑ मदेम शर॒णे सखा॑यः ।
प्रियासः इत् ते मघऽवन् अभिष्टौ नरः मदेम शरणे सखायः ।
हे ऐश्वर्यवंता, आम्ही त्वत्प्रेमबद्ध भक्तजन सदा तुझ्या कृपाछत्राखाली आनंदाने नांदू असे कर. अतिथि सत्कारार्थ सत्वर सामोरे जाणार्या "अतिथिग्वा"ला माननीय बनविणारा तू देव "तुर्वशा"ला वश कर; "याद्वा"ला शांत कर. ॥ ८ ॥
स॒द्यश्चि॒न्नु ते म॑घवन्न॒भिष्टौ॒ नरः॑ शंसन्त्युक्थ॒शास॑ उ॒क्था ।
सद्यः चित् नु ते मघऽवन् अभिष्टौ नरः शंसंति उक्थऽशास उक्था ।
आणि, हे षड्गुणैश्वर्य सुसंपन्न भगवन्, यज्ञामध्ये खरोखरच भक्त व वीर जन निजवाणींच्या सद्यःस्फूर्तीने स्तोत्रद्वारा व हव्यद्वारा तुझी प्रशंसा गातात. ज्या योगे तुझ्या यज्ञयागांनी अति कंजुष व्यापारी वैश्य जनांकडून यज्ञकार्यार्थ हवे तितके धन आम्हाला समर्पण करविले ते तुझी भक्ति ध्यान-यज्ञकर्म आम्हालाही वरप्रसाद म्हणून दे. ॥ ९ ॥
ए॒ते स्तोमा॑ न॒रां नृ॑तम॒ तुभ्य॑मस्म॒द्र्यञ्चो॒ दद॑तो म॒घानि॑ ।
एते स्तोमाः नरां नृऽतम तुभ्यं अस्मद्र्यंचः ददतः मघानि ।
अग्रण्यांच्या अग्रणी देवा, तुला यज्ञाद्वारे समर्पण करण्याकरिता आम्हाला धनधान्यादि संपत्तिमंत करणार्या ह्या दानशूर वैश्यजनांचे संघ खरोखरच स्तुतिस पात्र आहेत. हे महापराक्रमी इंद्रदेवा, ह्या वैश्यादि व्यापारोद्यमी जनांच्या शत्रूजनांना मारून टाकून ह्यांचा तू शूर संरक्षक आणि कल्याणकारी मित्र बन. ॥ १० ॥
नू इ॑न्द्र शूर॒ स्तव॑मान ऊ॒ती ब्रह्म॑जूतस्त॒न्वा वावृधस्व ।
नु इंद्र शूर स्तवमानः ऊती ब्रह्मऽजूतः तन्वा ववृधस्व ।
हे शूर इंद्रदेवा, तू विराट्रूप स्तवनार्ह आहेस. त्याअर्थी तू आता आमच्या येथे आपल्या शांतिपुष्टिरूप दोन्ही वरप्रसादपूर्ण शरीरांनी वर्धमान होत रहा. आम्हाला घरेदारे व यज्ञयागादि दे. अहो इंद्राश्रित देवविभूतिंनो, तुम्ही सर्वजण आम्हाला आशिर्वाद देऊन त्यायोगे आमचे सदा सर्वदा संरक्षण करीत रहा. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २० ( इंद्र सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
उ॒ग्रो ज॑ज्ञे वी॒र्याय स्व॒धावा॒ञ्चक्रि॒रपो॒ नर्यो॒ यत्क॑रि॒ष्यन् ।
उग्रः जज्ञे वीर्याय स्वधाऽवान् चक्रिः अपः नर्यः यत् करिष्यन् ।
यज्ञाहुतिद्वारे तृप्त होणारा व शत्रूंना महाभयंकर असा हा देव आपला पराक्रम दाखविण्याकरितां यज्ञांत प्रगट झाला. हा मनुष्यहितपर देव जे करू म्हणेल ते काम फत्ते करणारा आहे. हा सदा तरुण देव मनुष्यांच्या घरोघर वैश्वदेव यज्ञकर्म समयी आपल्या रक्षक सामर्थ्यानिशी जात असतो. केवढेंही महान पातक असले तरी त्या पापांपासून इंद्र आमचा संरक्षणकर्ता आहे. ॥ १ ॥
हन्ता॑ वृ॒त्रमिन्द्रः॒ शूशु॑वानः॒ प्रावी॒न्नु वी॒रो ज॑रि॒तार॑मू॒ती ।
हंता वृत्रं इंद्रः शूशुवानः प्र आवीत् नु वीरः जरितारं ऊती ।
इंद्राने यज्ञद्वारे हर्षित होऊन वृत्राला मारले. त्या वीराने खरोखरच आपल्या संरक्षण सामर्थ्यांनी स्तोत्रकर्त्यांचे संरक्षण केले. आणि सुदासाकरितां ह्याने एक निराळा लोक निर्माण केला, इतकेच नव्हे तर त्याला खरोखरच सकल धनधान्यादिही दिले. हो ! असा हा इंद्र देव आमच्या दानशूर यजमानास्तव पुनरपि प्रगट होवो. ॥ २ ॥
यु॒ध्मो अ॑न॒र्वा ख॑ज॒कृत्स॒मद्वा॒ शूरः॑ सत्रा॒षाड् ज॒नुषे॒मषा॑ळ्हः ।
युध्मः अनर्वा खजऽकृत् समत्ऽवा शूरः सत्राषाट् जनुषा ईं अषाळ्हः ।
युद्धप्रिय, अप्रतिद्वंद्व, कलहोत्पादक, संग्रामगमय, महापराक्रमी, अति प्राचीन काळापासूनही ज्याचा कोणी कधी पराभवच केला नाही असा, जन्मापासूनच शत्रूंना असह्य व स्वतंत्रबल असा हा इंद्र देव शत्रूंच्या फौजांना पळवून लावीत आहे. अहो ह्याने, जे शत्रूमय जग झाले होते ते सारे मारून टाकले. ॥ ३ ॥
उ॒भे चि॑दिन्द्र॒ रोद॑सी महि॒त्वा प॑प्राथ॒ तवि॑षीभिस्तुविष्मः ।
उभेइति चित् इंद्र रोदसीइति महिऽत्वा आ पप्राथ तविषीभिः तुविष्मः ।
इंद्रा, त्वां अतिबलवंताने आपल्या बळानेच दोन्ही द्यावापृथिवींना विस्तृत करून व्यापून टाकलेस. ह्या अश्वयुक्त इंद्राने शत्रूंवर आपले हत्यार सोडून शत्रूला मारून टाकून मग हा आनंदाने सोमरसाशी तन्मय झाला. ॥ ४ ॥
वृषा॑ जजान॒ वृष॑णं॒ रणा॑य॒ तमु॑ चि॒न्नारी॒ नर्यं॑ ससूव ।
वृषा जजान वृषणं रणाय तं ऊंइति चित् नारी नर्यं ससूव ।
वीर्यसेचक (पितास्वरूप कश्यपांनी) ह्या वर्षणकारी देवाला स्ववीर्यापासून उत्पन्न केले. अहो हा मनुष्यांचा देव एका (अदिति) देवीच्या - स्त्रीरत्नाच्या - पोटी जन्मास आला. आता जो हा मनुष्यांचा सेनापति देव आहे तो महासत्वधीर, ज्ञान गवान्वेषी व परमधारिष्ट संपन्न असा महाप्रभु व अग्रणी आहे. ॥ ५ ॥
नू चि॒त्स भ्रे॑षते॒ जनो॒ न रे॑ष॒न्मनो॒ यो अ॑स्य घो॒रमा॒विवा॑सात् ।
नु चित् सः भ्रेषते जनः न रेषत् मनः यः अस्य घोरं आऽविवासात् ।
जो मनुष्य खरोखरच ह्या प्रचंड गर्जना करणार्या महान् उग्र देवाच्या पर्यर्चेला लागला त्याचे मन मग स्वस्थानापासून - स्वध्येयापासून - एक क्षणभरही हालत नाही. जो इंद्रा प्रित्यर्थ परिचरणोपकरणांमध्ये निशीदिन लागलेला असतो तो आपल्या स्वराज्यामध्ये सत्यधर्म पालक आणि यज्ञकर्मकारी असा प्रभु बनतो. ॥ ६ ॥
यदि॑न्द्र॒ पूर्वो॒ अप॑राय॒ शिक्ष॒न्नय॒ज्ज्याया॒न्कनी॑यसो दे॒ष्णम् ।
यत् इंद्र पूर्वः अपराय शिक्षन् अयत् ज्यायान् कनीयसः देष्णं ।
इंद्रा, जे वडिलाने धाकट्यास (पित्याने पुत्रास - ज्येष्ठ भ्रात्याने कनिष्ठ भ्रात्यास - उपदेशकाने अनुयायास ) समर्पण करावे, अथवा जे श्रेष्ठ वाडवडिलोपार्जित स्वधन तद्वंशज पुत्रादिकांपाशीच रहावे, ते सारे धन दूर असले तरी देखील तेथूनही अमृताप्रमाणे आमच्या चाऱ्ही बाजूंनी येऊन आमच्या आश्रयास राहो. हे विचित्रगति देवा, आम्हाला नाना प्रकारची धनसंपत्ति व राज्यैश्वर्य आणून दे. ॥ ७ ॥
यस्त॑ इन्द्र प्रि॒यो जनो॒ ददा॑श॒दस॑न्निरे॒के अ॑द्रिवः॒ सखा॑ ते ।
यः ते इंद्र प्रियः जनः ददाशत् असन् निरेके अद्रिऽवः सखा ते ।
इंद्रा, जे भक्तिमंत सुजन तुला यज्ञद्वारे धन समर्पण करतात ते आपत्काळी इंद्रा सारख्याचे मित्रत्व पावतात. इंद्रा, असे आम्ही वसिष्ठादि जन, ह्या क्षत्रियराज परिपालित परमश्रेष्ठ भगवंताचा वरप्रसाद म्हणून मिळालेल्या अशा ह्या भारत भूमीमध्ये मारले न जाऊ व पूर्ण धनधान्यादि राज्यैश्वर्य सुसंपन्न राहूं असे कर. ॥ ८ ॥
ए॒ष स्तोमो॑ अचिक्रद॒द्वृषा॑ त उ॒त स्ता॒मुर्म॑घवन्नक्रपिष्ट ।
एषः स्तोमः अचिक्रदत् वृषा ते उत स्तामुः मघऽवन् अक्रपिष्ट ।
हे धनसंपन्न देवा, हा वर्षाकारी मेघकलाप गर्जना करीत आहे - नव्हे हा स्तोत्र वक्ता तुझी स्तुति जोराजोराने गात आहे. तुझ्या स्तुतिकर्त्या मेघाला - भक्ताला - तुझी मदत येऊन पोंचली. हे दुष्काळरूप शत्रूला परास्त करणार्या देवा, मेघधन संपन्न इंद्रा, तू आमच्याकरितां चोहोंकडून ऐश्वर्यधन अतिशीघ्र आणून दे. ॥ ९ ॥
स न॑ इन्द्र॒ त्वय॑ताया इ॒षे धा॒स्त्मना॑ च॒ ये म॒घवा॑नो जु॒नन्ति॑ ।
सः नः इंद्र त्वऽयतायै इषे धाः त्मना च ये मघऽवानः जुनंति ।
मेघराजा इंद्रा, एवंगुणविशिष्ट तू, आम्हा भक्तांना तुझ्या यज्ञशेषान्नाचा उपभोग मिळावा म्हणून, आमच्यापाशी धन ठेव. कारण जे ऐश्वर्य संपन्न असतात ते आपल्या आपण यज्ञयागादि द्वारे तुझी पूजा करतातच. तुझ्या ह्या मज समान स्तोत्रगायकाला चोहोंकडून भरपूर शक्ति, बळ प्राप्त होवो. अहो सकल देव देवतांनो, तुम्ही आपल्या आशिर्वादांनी आमचा सदासर्वदा प्रतिपाळ करा. ॥ १० ॥
ॐ तत् सत् |