|
ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त १ ते १० ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्, विराज्
अ॒ग्निं नरो॒ दीधि॑तिभिर॒रण्यो॒र्हस्त॑च्युती जनयन्त प्रश॒स्तम् ।
अग्निं नरः दीधितिऽभिः अरण्योः हस्तऽच्युती जनयंत प्रऽशस्तं ।
अग्रगण्य ऋषिंनी प्रार्थनाद्वारे अरणींचे मंथन करून अतिप्रशस्त, सुदूरदर्शनीय, गृहस्वामी व चंचलदीप्ति अशा अग्निदेवाला प्रकट केले आहे. ॥ १ ॥
तम॒ग्निमस्ते॒ वस॑वो॒ न्यृण्वन्सुप्रति॒ चक्ष॒मव॑से॒ कुत॑श्चित् ।
तं अग्निं अस्ते वसवः नि ऋण्वन् सुऽप्रतिचक्षं अवसे कुतः चित् ।
वसुस्वरूप वसिष्ठऋषींनी आपण सर्वदा अकुतोभय रहावे म्हणून आपल्या गृहामध्ये ह्या परमसुंदर व प्रत्यक्ष दर्शनीय अशा अग्निदेवाला स्थापन केले आहे, आणि म्हणूनच हा अग्निदेव घरोघर व नित्यप्रति पूजनीय होऊन बसला आहे. ॥ २ ॥
प्रेद्धो॑ अग्ने दीदिहि पु॒रो नो॑ऽजस्रया सू॒र्म्या यविष्ठ ।
प्रऽइद्धः अग्ने दीदिहि पुरः नः अजस्रया सूर्म्या यविष्ठ ।
हे अग्निदेवा, तू पुष्कळ समिधांनी आम्ही स्वतः एकत्र केलेल्या उत्तम इंधनांनी पेटविला गेला आहेस. तू आता असा आमच्या सन्मुख येऊन आपल्या नित्य कांतिने देदीप्यमान हो. ही आमची नेहमींची हवि अन्ने तुजसमोर सुसिद्ध तयार आहेत. ॥ ३ ॥
प्र ते॑ अ॒ग्नयो॒॑ऽग्निभ्यो॒ वरं॒ निः सु॒वीरा॑सः शोशुचन्त द्यु॒मन्तः॑ ।
प्र ते अग्नयः अग्निऽभ्यः वरं निः सुऽवीरासः शोशुचंत द्युऽमंतः ।
ह्या गृहपूज्य लौकाग्नी करतांच तर तो स्वर्गस्थ वीरवत् प्रकाशमान अग्नि देव अतिप्रखर तापट आहे. अहो, ह्या अग्नितत्त्वाची सकल अग्रणी व महाकुलीन ब्राह्मणवीर उत्तमप्रकारे आराधना करतात. ॥ ४ ॥
दा नो॑ अग्ने धि॒या र॒यिं सु॒वीरं॑ स्वप॒त्यं स॑हस्य प्रश॒स्तम् ।
दाः नः अग्ने धिया रयिं सुऽवीरं सुऽअपत्यं सहस्य प्रऽशस्तम् ।
हे पराक्रमी अग्निदेवा, भक्तिपरःसर गाइलेल्या ह्या स्तोत्रेकरून प्रसन्न होऊन तू आम्हाला कीर्तियुक्त ऐश्वर्य दे, सुक्षत्रिय वीर दे, सुपुत्र दे. आणि हे देवा, आम्हावर दुरून चाल करून आलेले किंवा आमचा सर्वनाश करण्याकरितां आमच्यावर येण्यास निघणारे आमचे जे शत्रूजन ते आमचे द्वत्-दत्त ऐश्वर्य हिरावून न घेवोत. ॥ ५ ॥
उप॒ यमेति॑ युव॒तिः सु॒दक्षं॑ दो॒षा वस्तो॑र्ह॒विष्म॑ती घृ॒ताची॑ ।
उप यं एति युवतिः सुऽदक्षं दोषा वस्तोः हविष्मती घृताची ।
सदा नवीन, हिमोदकसंपन्न, हविर्भागाधिकारी देवता, रात्रिदेवी ज्या परमदक्ष अग्निदेवाच्या आधारावर जवळ निवासास रात्रभर राहिलेली असते त्याच ह्या अग्निदेवाच्या जवळ आमची आपापली अशांति (मनाची काळजी, किंवा संसारातील पुनर्जन्म-मरणरूप धडपड, अथवा हे स्तुतिस्तोत्रसंपादन) त्याच्या आश्रयास राहो. अग्निदेव आमची चिंता, आमची संकटे निवारण करो, आमची स्तुति अग्निप्रत जाऊन पोहचो किंवा अग्निद्वारे आम्ही मुक्त होवोत. ॥ ६ ॥
विश्वा॑ अ॒ग्ने॑ऽप द॒हारा॑ती॒र्येभि॒स्तपो॑भि॒रद॑हो॒ जरू॑थम् ।
विश्वाः अग्ने अप दह अरातीः येभिः तपऽभिः अदहः जरूथं ।
हे अग्निदेवा, त्यापूर्वी एकदां ज्या तापेंकरून महा उग्रशब्द करणार्या "जरूथ" राक्षसाला जाळून टाकले होते त्याच तुझ्या उष्णतेने आज आमचे सर्व जगभर परसलेले दुष्ट शत्रू भाजून भस्म कर आणि आमच्या महा भयंकर रोगांनाही मुळींच पुढे कधी चीतपट करणार नाहीत असे कायमचे तोंड दाबून चीत करून टाक. ॥ ७ ॥
आ यस्ते॑ अग्न इध॒ते अनी॑कं॒ वसि॑ष्ठ॒ शुक्र॒ दीदि॑वः॒ पाव॑क ।
आ यः ते अग्ने इधते अनीकं वसिष्ठ शुक्र दीदिऽवः पावक ।
हे सकलपूर्णधनसंपन्न, हे शुभ्रतेजस्क अग्निदेवा, जे तुझे परम देदिप्यमान तेज आहे त्या तेजाप्रत आम्ही सन्मुख होऊन, हे बघ तुझी पूजा समिधाद्वारे करीत आहोंत, तू ह्या आमच्या स्तोत्रांनी प्रसन्न होऊन एथेंच आमच्या यज्ञभूमीचे ठायी रहा. ॥ ८ ॥
वि ये ते॑ अग्ने भेजि॒रे अनी॑कं॒ मर्ता॒ नरः॒ पित्र्या॑सः पुरु॒त्रा ।
वि ये ते अग्ने भेजिरे अनीकं मर्ताः नरः पित्र्यासः पुरुऽत्रा ।
हे अग्निदेवा, ज्या ज्या पित्राज्ञानुकारी वीर व भक्त मानवांनी तुझ्या तेजाला पुष्कळ ठिकाणी देशदेशांतरांमध्ये नेऊन विभक्तपणे आपापल्या घरी स्थापित केले आहे, त्या त्या ठिकाणच्या सर्व तेजांसहवर्तमान तू प्रसन्नचित्तें करून आमच्या येथे आता यथार्थ विराजमान हो. ॥ ९ ॥
इ॒मे नरो॑ वृत्र॒हत्ये॑षु॒ शूरा॒ विश्वा॒ अदे॑वीर॒भि स॑न्तु मा॒याः ।
इमे नरः वृत्रऽहत्येषु शूराः विश्वाः अदेवीः अभि संतु मायाः ।
अहो, जे लोक ह्या माझ्या प्रार्थना स्तुतिला आपली असे समजून गात राहतील, ते ह्या मर्त्य भूवरील लोक निज संकट निवारण करण्याच्या कामांत शूर होतील; त्यांच्या पासून सर्व जगतांमधील संकटरूपी राक्षसी बला दूर पळून जाईल व त्यांना शत्रूंच्या चलाखीची बाधा सहसा होणार नाही. ॥ १० ॥
मा शूने॑ अग्ने॒ नि ष॑दाम नृ॒णां माशेष॑सो॒ऽवीर॑ता॒ परि॑ त्वा ।
मा शूने अग्ने नि सदाम नृणां मा अशेषसः अवीरता परि त्वा ।
हे अग्निदेवा, शून्य अशा निर्जन मंदिरात तू राहू नको आणि निःसंतान तथा कुसंतान अशा लोकांच्या घरीही तू पूजिला जात नसतोस. हे अग्नि, तू योग्य अधिकारी सुपुत्रप्रजादि संपन्न कुळांत, ह्या आमच्या देशात खुशाल नांद. ॥ ११ ॥
यम॒श्वी नित्य॑मुप॒याति॑ य॒ज्ञं प्र॒जाव॑न्तं स्वप॒त्यं क्षयं॑ नः ।
यं अश्वी नित्यं उपऽयाति यज्ञं प्रजाऽवंतं सुऽअपत्यं क्षयं नः ।
ज्या यज्ञगृहामध्ये अश्वावर आरूढ होऊन अग्निदेव नित्य हजर होत असतो ते आमचे घर सुपुत्रवंत, सुप्रजावंत होऊन येथे ह्या भूमीवर सर्वच आमचे स्वजातिबांधव गुण्यागोविंदाने नांदोत. ॥ १२ ॥
पा॒हि नो॑ अग्ने र॒क्षसो॒ अजु॑ष्टात्पा॒हि धू॒र्तेरर॑रुषो अघा॒योः ।
पाहि नः अग्ने रक्षसः अजुष्टात् पाहि धूर्तेः अररुषः अघऽयोः ।
हे अग्नि, तू आमचे दुष्ट निंदकांपासून संरक्षण कर. पापांवर ज्यांचे आयुष्य जीवन रचले गेले आहे, अशा दुष्ट प्रकृति राक्षसांपासूनही आमचे संरक्षण कर. तुझ्या उपासनेच्या योगाने आम्ही सर्व दुष्ट सैन्यांना येथून पळवून लावूं, असे तुझ्या आशीर्वादाने घडून येवो. ॥ १३ ॥
सेद् अ॒ग्निर॒ग्नींँरत्य॑स्त्व॒न्यान्यत्र॑ वा॒जी तन॑यो वी॒ळुपा॑णिः ।
सः इत् अग्निः अग्नीन् अति अस्तु अन्यान् यत्र वाजी तनयः वीळुऽपाणिः ।
हा आमचा आहवनीय मंगल प्रसंगोचित भक्तप्रेमी अग्नि कुमार देव इतर कव्यादादि उग्रस्वरूप अग्नींच्या पुढे अतिसत्वर येथे यज्ञभूमीत येऊन विराजमान होवो. अहो, तोच तनयस्वरूप बालरूपधारी, सुदृढहस्त, आहवनीय अग्नि कुमार देव आपल्या सहस्रमार्गांनी आमच्या अखंड स्तुतिस्तोत्र प्रवाहांवर प्रसन्न होऊन हा इकडे येतच आहे. ॥ १४ ॥
सेद॒ग्निर्यो व॑नुष्य॒तो नि॒पाति॑ समे॒द्धार॒मंह॑स उरु॒ष्यात् ।
सः इत् अग्निः यः वनुष्यतः निऽपाति संऽएद्धारं अंहस उरुष्यात् ।
अहो, तोच हा आहवनीय बाल अग्निदेव आमच्या स्तुतिस्तोत्रांच्या इकडे येऊन राहिला आहे. हा भक्तांना त्रास देणार्यांचा पूर्ण निःपात करतो आणि आपल्या भक्तांच्या पापराशींचाही चुराडा करून टाकतो. सुकुलोत्पन्न प्रजा ह्या अग्निदेवाची निरंतर उपासन करीत असतात. ॥ १५ ॥
अ॒यं सो अ॒ग्निराहु॑तः पुरु॒त्रा यमीशा॑नः॒ समिदि॒न्धे ह॒विष्मा॑न् ।
अयं सः अग्निः आऽहुतः पुरुऽत्रा यं ईशानः सं इत् इन्धे हविष्मान् ।
तो हा सुकुमार अग्निदेव मी पाचारिला आहे. हा भक्तांना पुष्कळ प्रकारांनी सांभाळून घेतो. ह्या ईश्वरस्वरूप अग्निदेवाची हविरन्नयुक्त यजमान आता उत्तम षोडशोपचारे पूजा करील. ह्याच अग्निदेवाला सव्य प्रदक्षिणा घालून महायागांमध्ये होतृवर्ग पूर्णाहुति संप्रदान करीत असतात. ॥ १६ ॥
त्वे अ॑ग्न आ॒हव॑नानि॒ भूरी॑शा॒नास॒ आ जु॑हुयाम॒ नित्या॑ ।
त्वेइति अग्ने आऽहवनानि भूरि इशानासः आ जुहुयाम नित्या ।
हे तरुण पण सुकुमार अग्निदेवा, तुझे हवनीय द्रव्य तयार आहे. ये देवा, ये, असाच नित्यप्रतिही येत जा आणि सकल देवांसहवर्तमान आमच्या हविरन्नांचा उपभोग प्रतीदिन घेत जा. तुझ्या यज्ञामध्ये उपस्थित होण्याकरिता स्तोत्र तथा शास्त्र ह्या दोहोंचाही वाहन रूपाने उपयोग केला आहे. ॥ १७ ॥
इ॒मो अ॑ग्ने वी॒तत॑मानि ह॒व्याज॑स्रो वक्षि दे॒वता॑ति॒मच्छ॑ ।
इमोइति अग्ने वीतऽतमानि हव्या अजस्रः वक्षि देवऽतातिं अच्छ ।
हे अग्नि, ही सुनिर्मल द्रव्यें तू प्रथम स्वीकारून नंतर आपल्या प्रिय बालमित्र देवसमूहांमध्ये यथायोग्य वांटून दे. इतकेच नव्हे तर, ते सुंदर देवही तुज समागमे आमच्या इकडे प्रत्यक्ष येवोत. तू त्या देवांना आमच्या यज्ञार्थ घेऊन येत जा. ॥ १८ ॥
मा नो॑ अग्ने॒ऽवीर॑ते॒ परा॑ दा दु॒र्वास॒से॑ऽमतये॒ मा नो॑ अ॒स्यै ।
मा नः अग्ने अवीरते परा दाः दुः वाससे अमतये मा नः अस्यै ।
हे अग्निदेवा, आम्हाला अभक्त, परम भ्याड व दुष्ट पुत्र संपन्नतेप्रत नेऊ नको. आम्हाला तुझा भक्त व शूर बहाद्दर असा पुत्र दे. आमची वस्त्रें कधींही दरिद्री वा मलीन नसावी. आम्हाला कधी विपरीत बुद्धि न होवो, व त्या दुर्बुद्धिंच्या कचाट्यांतही कधी न येऊ असे कर. आम्हाला उपासमार न पडोत. आमच्यावर दुष्ट राक्षसस्वरूप शत्रू हल्ले न करोत. आम्ही सर्व सदा सत्य मार्गावर आरूढ राहू असेंच होऊ दे. आम्हाला घरी दारी अथवा अरण्यांत (स्वदेशी वा परदेशी) सर्वत्र शत्रूंच्या हिंसेपासून मुळींच बाधा न होवो. ॥ १९ ॥
नू मे॒ ब्रह्मा॑ण्यग्न॒ उच्छ॑शाधि॒ त्वं दे॑व म॒घव॑द्भ्यः॑ सुषूदः ।
नू मे ब्रह्माणि अग्ने उत् शशाधि त्वं देव मघवत्ऽभ्यः सुसूदः ।
हे अग्ने, तू आम्हाकरिता उत्तम उत्तम अन्न शोधून ठेव. तुझे यागद्वारा उपार्चन करणार्या आम्हांकरितां तू चांगली पक्वान्ने शिजवून देत जा. हे देवा, तुझ्या पूजनामध्ये यज्ञकार्यामध्ये आम्ही दोघेही (ब्राह्मण-क्षत्रिय यजमान-स्तोता) नित्य सिद्ध असूं. हे देव देवतांनो, तुम्ही सर्व मिळून आता आम्हाकरितां मंगलकारक आशिर्वाद बोलून तुम्हीच सदोदित आमचे परित्राण करीत रहा. ॥ २० ॥
त्वम॑ग्ने सु॒हवो॑ र॒ण्वसं॑दृक्सुदी॒ती सू॑नो सहसो दिदीहि ।
त्वं अग्ने सुऽहवः रण्वऽसंदृक् सुऽदीती सूनोइति सहसः दिदीहि ।
हे सुदीप्तिमंत, हे सहस्रपुत्र अग्नि, तू आनंदाने भक्तांकरिता यज्ञार्थ बोलाविला जाणारा देव आहेस. तू रमणीयमूर्ति व सुंदरकांति आहेस. हे अग्निदेवा, तुजसमान नित्य व सत्यपुत्र सन्निद्ध असतांना मला दुसर्या कोणाही मर्त्यपुत्रांची इच्छाच न राहो. तरी पण, आमचा उत्तम भक्त आर्यपुत्र आमची वृद्धापकाळी उपेक्षा अथवा अवहेलना कधी न करो. ॥ २१ ॥
मा नो॑ अग्ने दुर्भृ॒तये॒ सचै॒षु दे॒वेद्धे॑ष्व॒ग्निषु॒ प्र वो॑चः ।
मा नः अग्ने दुःऽभृतये सचा एषु देवऽइद्धेषु अग्निषु प्र वोचः ।
हे सत्यदेवा अग्ने, आमचे सेवकजन वाईट न निघोत. ते आम्हाला ह्या देवसेवित यज्ञकार्य समयी अग्नि समोर दुरुत्तरे न देवोत. ते दुष्ट मनोविकार आम्हांमध्ये कदापि चुकूनही न शिरोत. हे सर्व सहन करणार्या देवाच्या पुत्रा, ती दुर्बुद्धी आम्हाला कदापि न होवो. ॥ २१ ॥
स मर्तो॑ अग्ने स्वनीक रे॒वानम॑र्त्ये॒ य आ॑जु॒होति॑ ह॒व्यम् ।
स मर्तः अग्ने सुऽअनीक रेवान् अमर्त्ये यः आऽजुहोति हव्यम् ।
हे सुप्रकाशित अग्नि देवा, तोच मनुष्य धनवान होईल की जो तुज अमरमूर्तिमध्ये हव्यद्रव्य समर्पण करील, नित्य वैश्वदेव करील. कारण, अहो, ती ही अग्नि देवताच स्वतः सर्व धनसंपन्नता संपूर्ण आपल्याठायी धारण करते. अहो ह्या अग्नि देवासाठीच तर जिज्ञासु, प्रार्थनाशील व भजनोद्यमी लोक ’कोणता तो अग्निदेव’, ’कोठे आहे तो देव’ म्हणून पुसत पुसत पुनरपि त्या अग्निपाशींच येतात. ॥ २३ ॥
म॒हो नो॑ अग्ने सुवि॒तस्य॑ वि॒द्वान्र॒यिं सू॒रिभ्य॒ आ व॑हा बृ॒हन्त॑म् ।
महः नः अग्ने सुवितस्य विद्वान् रयिं सूरिभ्यः आ वह बृहंतम् ।
हे अग्निदेवा, आम्हाला जाण्यायोग्य कल्याणकारक मार्गांचा तू जाणता आहेस, तेव्हां तू आम्हाला महत्त्वाप्रत पोंचव. आमच्याकरिता देवांपासून महदैश्वर्य घेऊन ये, की जेणें करून आम्हीपूर्ण सहनशील बलवंत होऊन तू दिलेल्या ऐश्वर्यानंदात व त्या योगे वाढलेल्या भक्त्यानंदात निमग्न राहूं व आम्ही सदा अक्षीण संपत्ति, पूर्णायुषी व क्षत्रियपुत्र संपन्न होऊ. ॥ २४ ॥
नू मे॒ ब्रह्मा॑ण्यग्न॒ उच्छ॑शाधि॒ त्वं दे॑व म॒घव॑द्भ्यःभ सुषूदः ।
नु मे ब्रह्माणि अग्ने उत् शशाधि त्वं देव मघवत्ऽभ्यः सुषूदः ।
हे अग्ने, तू मजकरिता अतिसत्वर व पुष्कळ असे हवियोग्य धान्य शोधून दे. तू देव आम्हा हविर्दानशील भक्तांस्तव उत्तम प्रकरे अन्ने परिपक्व करून ठेव. तुमच्या आराधन समयी दोघेही यजमान व उपाध्याय ब्राह्मण व क्षत्रिय उपस्थित राहोत. आणि तुम्ही सर्व देव ह्या स्वस्तिवाचन पूर्वक यज्ञसमाराधनने करून संतुष्ट होऊन आमचे सर्वत्र परिपालन करा. ॥ २५ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २ ( आप्री सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - आप्रीदेवतासमूह : छंद - त्रिष्टुभ्
जु॒षस्व॑ नः स॒मिध॑अग्ने अ॒द्य शोचा॑ बृ॒हद्य॑ज॒तं धू॒ममृ॒ण्वन् ।
जुषस्व नः संऽइधं अग्ने अद्य शोच बृहत् यजतं धूमं ऋण्वन् ।
हे अग्निदेवा, आज ही आमची समिधा तू आनंदाने ग्रहण कर. देवा, ह्या यज्ञोत्पन्न धुराला गति देऊन तू आता अतिप्रखर देदीप्यमान हो. हे देवा अग्ने, आपल्या धूमराशीरूप हस्तांनी स्वर्गाच्या शिखराला स्पर्श कर आणि सूर्य देवाच्या किरणांमध्ये अगदी एकजीव होऊन पूर्णपणे मिसळून रहा. ॥ १ ॥
नरा॒शंस॑स्य महि॒मान॑मेषा॒मुप॑ स्तोषाम यज॒तस्य॑ य॒ज्ञैः ।
नराशंसस्य महिमानं एषां उप स्तोषाम यजतस्य यज्ञैः ।
अहो विप्रांनो, चला आपण ह्या देवांपैकी, एका हविद्वारा पूजनीय व भक्त स्तवनीय देवाचा महिमा आपापल्या स्तुतिस्तोत्रांनी गाऊ या. अहो हे देव उत्कृष्ट यज्ञकर्मशील, परमशुद्ध, मनुष्यांच्या बुद्धिला धारणा देणारे आणि सोम व घृत इत्यादि दोन्ही प्रकारचे हव्यान्नांचा आस्वाद घेणारे आहेत. ॥ २ ॥
ई॒ळेन्यं॑ वो॒ असु॑रं सु॒दक्ष॑म॒न्तर्दू॒तं रोद॑सी सत्य॒वाच॑म् ।
ईळेन्यं वः असुरं सुऽदक्षं अंतः दूतं रोदसीइति सत्यऽवाचं ।
अहो अध्वर्युंनो, तुम्ही आम्ही मिळून सर्व आपण स्तुतियोग्य, प्रकाशमान, प्रज्ञावान्, द्यावापृथिवींतील सत्य सत्य बातमीदार, आद्य मनुनेंही ज्याची पूजा केली आहे अशा अग्नि तत्वाची प्राचीन मनु प्रजापति समान यज्ञ यागांकरिता समिधाद्वारे उत्तम पूजा सदैवच करीत रहावे. ॥ ३ ॥
स॒प॒र्यवो॒ भर॑माणा अभि॒ज्ञु प्र वृ॑ञ्जते॒ नम॑सा ब॒र्हिर॒ग्नौ ।
सपर्यवः भरमाणा अभिऽज्ञु प्र वृञ्जते नमसा बर्हिः अग्नौ ।
अग्न्युपासक व अग्निला प्रतिदिन हविष्यान्नांनी भरवणारे अध्वर्यु जन अग्निमध्ये नमस्कारपूर्वक व गुडघे टेंकून हवि समर्पण करीत आहेत. अहो नाना प्रकारच्या विचित्रकृति, बहिरंत घृतमय पक्वानांनी अग्निमध्ये आहुति समर्पण करणार्या अध्वर्युंनो, आता तुम्ही अग्नि देवाची पूजा सुरू करा. ॥ ४ ॥
स्वा॒ध्यो३॒वि दुरो॑ देव॒यन्तो॑ऽशिश्रयू रथ॒युर्दे॒वता॑ता ।
सुऽआध्यः वि दुरः देवयंतऽः अशिश्रयूः रथयुः देवऽताता ।
सत्कर्मी, रथकामी व ईश्वरभक्त अध्वर्यूंनी प्रातःकाळच्या व सायंकाळच्या दोन्ही देव सभांकरिता आपल्या मंडपाचे दरवाजे उघडे करून ठेविले आहेत. ह्या यज्ञांत आपल्या वत्साला चाटणार्या गोमातेप्रमाणे किंवा कुमारिकांप्रमाणे परम प्राचीन व शुद्ध अशा उभय - सायंप्रातः - देवसभांना येण्यास निघाल्या आहेत. ॥ ५ ॥
उ॒त योष॑णे दि॒व्ये म॒ही न॑ उ॒षासा॒नक्ता॑ सु॒दुघे॑व धे॒नुः ।
उत योषणेइति दिव्येइति महीइति नः उषसानक्ता सुदुघाऽइव धेनुः ।
सदा तरुण देदीप्यमान, अतिमहान, गाईप्रमाणे यथेच्छ दुग्ध देणार्या, कुशासनांवर आरूढ होणार्या, बहुजनस्तुत, यज्ञप्रिय व ऐश्वर्यसंपन्न अशा त्या दोन्ही अहोरात्रीरूप देवपंक्ती आम्हा भक्तांच्या कल्याणार्थ आता ह्या यज्ञमंडपात आपापल्या स्थानी विराजमान होवोत. ॥ ६ ॥
विप्रा॑ य॒ज्ञेषु॒ मानु॑षेषु का॒रू मन्ये॑ वां जा॒तवे॑दसा॒ यज॑ध्यै ।
विप्रा यज्ञेषु मानुषेषु कारूइति मन्ये वां जातऽवेदसा यजध्यै ।
अहो अध्वर्युंनो, ह्या मनुष्यकृत यज्ञांमध्ये मी तुम्हां ब्राह्मणांना देवांचे कारू (स्तुतिपाठक व कर्मकर्ते) असे समजतो. तुम्ही दोघेही विद्वान आहांत, म्हणून तुम्ही आम्हांकरिता आता यज्ञारंभ करा. ह्या स्तोत्राद्वारे आमच्या यागाला तुम्ही ऊर्ध्वगति द्या; जेणेकरून ते दोन्ही - दिनरात्रिमय - देवलोक तृप्त होऊन आम्हाला अशा देवकार्यांकरितांच उत्कृष्ट ऐश्वर्य समर्पण करतील. ॥ ७ ॥
आ भार॑ती॒ भार॑तीभिः स॒जोषा॒ इळा॑ दे॒वैर्म॑नु॒ष्येभिर॒ग्निः ।
पदच्छेद नाही
आदित्यस्थ देवांसमवेत आदित्य व सूर्यपत्नी भारती लक्ष्मीदेवी इकडे येवो. पृथ्वी देवी आपल्या प्रतिक्षेत्र स्थानाधित देवांसमवेत येथे येवो. परम हर्षोत्फुल्ल अग्निदेव आमच्या सकल पूर्व पितरांसहित विराजमान होवोत. ज्ञानोदकवती विद्यादेवी सरस्वती आपल्या भक्त विद्वद्गणांसह वर्तमान आमच्या सन्मुख यज्ञार्थ येवो. तिन्ही देवता ह्या कुशासनांवर सुखेंकरून आरूढ होवोत. ॥ ८ ॥
तन्न॑स्तु॒रीप॒म् अध॑ पोषयि॒त्नु देव॑ त्वष्ट॒र्वि र॑रा॒णः स्य॑स्व ।
पदच्छेद नाही
हे प्रजापति त्वष्ट्ट देवा, तू तेजस्वी वीर्यवान आहेस, त्याअर्थी तू आम्हांकरिता आता आपले दिव्य, पोषक व भक्तपालनार्थ त्वरित गति असे ते तेजोमय वीर्योदक खाली सोड; म्हणजे त्या योगाने आम्हांला उद्यमी, कर्मशील, व्यवहारकुशल, देवभक्त असा शूर वीर पुत्र उत्पन्न होईल. ॥ ९ ॥
वन॑स्प॒ते॑ऽव सृ॒जोप॑ दे॒वान॒ग्निर्ह॒विः श॑मि॒ता सू॑दयाति ।
पदच्छेद नाही
हे ओषधी व्रीहि यव धान्यादि देवते, तू आपले बीजरूप गांठोडें आता देवांच्या समोरच सोड. सर्वशामक अग्नि ह्या हविर्धान्यांना परिपक्व करीत असतो आणि ओहो, तो वनस्पति अरण्यपालक देव भगवान खरोखरच इतके सत्य सत्य यज्ञ सर्वदाच करीत असतो. कारण त्याला देवांची सारी उत्पत्तिस्थाने ठाऊक झाली आहेत. ॥ १० ॥
आ या॑ह्यग्ने समिधा॒नो अ॒र्वाङ्इःन्द्रे॑ण दे॒वैः स॒रथं॑ तु॒रेभिः॑ ।
पदच्छेद नाही
हे अग्निदेवा, तू समाधियोगे सतेज होऊन इंद्रदेव व अन्य त्वरितगति देवांसह वर्तमान एकाच रथावर बसून, लौकर इकडे ये. सुपुत्रवंत देवी अदितिला व सर्व जन्ममरणरहित अनाद्यंत देवाला मी स्तुतिपूर्वक पाचारीत आहे. अहो देवांनो, तुम्ही या आमच्या आसनांवर बसा आणि आम्हांमध्येंच आनंद माना. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अ॒ग्निं वो॑ दे॒वम॒ग्निभिः॑ स॒जोषा॒ यजि॑ष्ठं दू॒तम॑ध्व॒रे कृ॑णुध्वम् ।
अग्निं वः देवं अग्निऽभिः सऽजोषा यजिष्ठं दूतं अध्वरे कृणुध्वं ।
अहो अध्वर्युंनो, तुम्ही आपल्या महायागांमध्ये अग्निमय देवांसहित महद्उल्लसी, ऊर्ध्वगति, व पूजांमध्ये सर्व श्रेष्ठ अश अग्नि देवाला, परमेश्वरास आपले पापपुण्य सांगणारा अथवा हविर्भाग पोंहोचविणारा दूत करा. ॥ १ ॥
प्रोथ॒दश्वो॒ न यव॑सेऽवि॒ष्यन्य॒दा म॒हः सं॒वर॑णा॒द्व्यस्था॑त् ।
प्रोथत् अश्वः न यवसे अविष्यन् यदा महः संऽवरणात् वि अस्थात् ।
जंगलातील हिरवागार चारा खाऊन पुष्ट होऊन शब्द करणार्या घोड्याप्रमाणे हा अग्नि जेव्हां अरण्यांतील आपल्या महान दावरूप पाशांतून निघावयास लागतो, तेव्हां हा दावाग्नि पेट घेऊन त्याच्या ज्वाळांच्या पाठीमागून वाराही निघावयास लागतोच. हे अगिदेवा, अशा वेळी तुझा मार्ग काळा झालेला असतो. ॥ २ ॥
उद्यस्य॑ ते॒ नव॑जातस्य॒ वृष्णो॑ऽग्ने॒ चर॑न्त्य॒जरा॑ इधा॒नाः ।
उत् यस्य ते नवऽजातस्य वृष्णः अग्ने चरंन्ति अजराः इधानाः ।
हे अग्निदेवा, नवीन प्रादुर्भूत झालेल्या आणि वर्षाकामेच्छु अशा त्या तुझ्या तरुण व इंधनमय ज्वाला जेव्हां का वर जातात तेव्हां डोळ्याला सहन न होणारा, अतितिक्त असा तुझा धूमही थेट स्वच्छ आकाशाप्रत चालता होतो. हे अग्निदेवा, तू देवांचा संदेशहारी दूत असून देवांना तू आपल्याबरोबर आमच्या यज्ञकार्यार्थ आणतोसच. ॥ ३ ॥
वि यस्य॑ ते पृथि॒व्यां पाजो॒ अश्रे॑त्तृ॒षु यदन्ना॑ स॒मवृ॑क्त॒ जम्भैः॑ ।
वि यस्य ते पृथिव्यां पाजः अश्रेत् तृषु यत् अन्ना संऽअवृक्तः जम्भैः ।
हे अग्निदेवा, जेव्हा का तुझे तेज पृथ्वीवरील सकल वस्तूंचा आश्रय घ्यावयास पाहते, अथवा जेव्हा तुझे तेज पृथ्वीवरील सकल अन्नांना आपल्या ज्वालारूपी जाभाड्यांना पसरून खावयास लावते, त्यावेळी तुझी तू ज्वालारूप फौज विसर्जन पावलेल्या काष्ठादिकांना यवांच्या लाह्यांप्रमाणे भक्षण करतोस. ॥ ४ ॥
तमिद्दो॒षा तमु॒षसि॒ यवि॑ष्ठम॒ग्निमत्यं॒ न म॑र्जयन्त॒ नरः॑ ।
तं इत् दोषा तं उषसि यविष्ठं अग्निं अत्यं न मर्जयंत नरः ।
अग्निला प्रदीप्त करणारे भक्तजन त्या अति चपल, सहजगत्या आलेल्या, अति गमनशील घोड्याप्रमाणे अग्नीची रात्रंदिन सायंकाल व प्रातःकाल त्याच्या स्थानावर यज्ञकुंडामध्ये पूजा करीत असतात. भोजन केलेल्या व वर्षाकामेच्छु अशा ह्या अग्नीची ज्वाळाही बघा कशी चमकूं लागली आहे. ॥ ५ ॥
सु॒सं॒दृक्ते॑ स्वनीक॒ प्रती॑कं॒ वि यद्रु॒क्मो न रोच॑स उपा॒के ।
सुऽसंदृक् ते सुऽअनीक प्रतीकं वि यत् रुक्मः न रोचसे उपाके ।
हे सुंदर तेजोमंडित अग्नि, तुझे सुकुमार दर्शनीय स्वरूप आम्हाला प्रत्यक्ष झाले; कारण सुवर्णाप्रमाणे तू आमच्या अगदी जवळच चमकू लागला आहेस. विजेप्रमाणे तुझे आश्चर्यकारक तेजोबल आकाशांतून वाहेर निघत असते. हे अग्नि, तू आपल्या सूर्यरूप प्रभेला रोजच्या रोज जगाला दाखवीत असतोस. ॥ ६ ॥
यथा॑ वः॒ स्वाहा॒ग्नये॒ दाशे॑म॒ परीळा॑भिर्घृ॒तव॑द्भि श्च ह॒व्यैः ।
यथा वः स्वाहा अग्नये दाशेम परी इळाभिः घृतवत्ऽभिः च हव्यैः ।
एवंगुणविशिष्ट अग्निदेवा, तुम्ही ह्या मद्दत्त आहुतींनी आता तृप्त व्हा. आणि हे अग्निदेवा, आम्ही ज्या अर्थी तुझ्या ऊर्ध्वगतिदायक स्वरूपाची घृतसंयुक्त व प्रार्थना पुरःसर हवनीय द्रव्येंकरून सदा पूजा करीत असतो, त्या अर्थी तूही आपल्याकडून आम्हाला नाना प्रकारची मोठमोठी सुवर्णमय दिव्य नगरे शेकडों वेळां देऊन आमचे निरंतर संरक्षणच करीत रहा. ॥ ७ ॥
या वा॑ ते॒ सन्ति॑ दा॒शुषे॒ अधृ॑ष्टा॒ गिरो॑ वा॒ याभि॑र्नृ॒वती॑रुरु॒ष्याः ।
याः वा ते संति दाशुषे अधृष्टाः गिरः वा याभिः नृऽवतीः उरुष्याः ।
हे महाबली भगवंताच्या पोरा, सर्वज्ञा अग्निदेवा, तुज दानशूर देवाच्या ज्या धारिष्टवत अथवा बोलक्या शब्द करणार्या ज्वाळा आहेत, अथवा ज्या तुझ्या त्वद् दत्त वाणींनी तू आपल्या प्रजेचे संरक्षण करतोस, त्या तुझ्या स्तोत्ररूप वाणींनी तू आमच्या उपाध्यायांचे व स्तोत्र प्रकाशकांचेही यथायोग्य संरक्षण कर. ॥ ८ ॥
निर्यत्पू॒तेव॒ स्वधि॑तिः॒ शुचि॒र्गात्स्वया॑ कृ॒पा त॒न्वा३॒रोच॑मानः ।
निः यत् पूताऽइव स्वऽधितिः शुचिः गात् स्वया कृपा तन्वा रोचमानः ।
हे अग्ने, जेव्हां तू आपल्या कोमल पण तेजस्वी दीप्तिने, पाजळलेल्या तरवारीच्या धारेप्रमाणे बाहेर निघतोस, तेव्हां तू कमनीयमूर्ति, सत्कर्मकारी व पतितपावन असा आहेस. तो तू पहांटे व द्यावापृथिवीरूप मातांमधून देवयज्ञार्थ अग्रणीच आमच्या जवळ अरणींतूनही प्रकट होतोस. ॥ ९ ॥
ए॒ता नो॑ अग्ने॒ सौभ॑गा दिदी॒ह्यपि॒ क्रतुं॑ सु॒चेत॑सं वतेम ।
एता नः अग्ने सौभगा दिदीहि अपि क्रतुं सुऽचेतसं वतेम ।
हे अग्निदेवा, एवढें महत् सौभग्य ऐश्वर्य आम्हाला दे. आणखी आम्हाला पुष्कळ कामे आणि त्या कामांना चालवण्यास लगणारी हजारो प्रकारची तीक्ष्ण सुबुद्धिही तुझ्या कृपेने लाभो. तुझ्या स्तुति स्तोत्रपाठक व संपादक भक्तांनाही अखिल जगभर संपत्तिचा लाभ होवो. हे अग्नि व अग्न्यनुगामी देवांनो, तुम्ही सर्व आम्हाला आता आशिर्वचने देऊन आमचे सदैव संरक्षण करीत रहा. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्र वः॑ शु॒क्राय॑ भा॒नवे॑ भरध्वं ह॒व्यं म॒तिं चा॒ग्नये॒ सुपू॑तम् ।
प्र वः शुक्राय भानवे भरध्वं हव्यं मतिं च अग्नये सुऽपूतं ।
अहो, अध्वर्युंनो, तुम्ही शुभ्र, देववीर्यरूप, प्रभावंत व भक्ताला अधिकाधिक उन्नतिप्रत पोंचविणार्या अग्निदेवाला आपालले भक्त पुत्र, नाना हवि अन्ने व आपापल्या ध्यानबुद्धि समर्पण करा. आपल्या पुत्रांनाही देवकार्ये करण्यास शिकवा. कारण हा अग्नि दिव्य लोकांतील व भूलोकांतील अखिल सृष्टीच्या अंतःकरणामध्ये ज्ञानमार्गाने घुसलेला असतो. ॥ १ ॥
स गृत्सो॑ अ॒ग्निस्तरु॑णश्चिदस्तु॒ यतो॒ यवि॑ष्ठो॒ अज॑निष्ट मा॒तुः ।
स गृत्सः अग्निः तरुणः चित् अस्तु यतः यविष्ठः अजनिष्ट मातुः ।
तो अग्नि बुद्धीमान असून आणखी तरुणही आहेच. अहो हा अति तरुण देव आपल्या दिव्य मातेपासून द्युलोकांतून प्रकट झाला. हा ज्वालामय दांतवाला अग्नि अरण्यांना आत्मसात् भस्म करून टाकतो आणि हा एका क्षणार्धांत पुष्कळ अन्नांचा फडशा उडवून देतो. ॥ २ ॥
अ॒स्य दे॒वस्य॑ सं॒सद्यनी॑के॒ यं मर्ता॑सः श्ये॒तं ज॑गृ॒भ्रे ।
अस्य देवस्य संऽसदि अनीके यं मर्तासः श्येतं जगृभ्रे ।
देवांच्या मुख्य सभेमध्ये मर्त्यजन ज्या श्वेतवर्ण अग्निकुमाराची उपासना करतात, जो पुरुषार्थगर्भित स्तुति वाणीला उचारवितो असा तो अग्नि आम्हां मानवांकरिता आमच्या शत्रूंना असह्य अशा प्रचंड तेजाने प्रदीप्त होत असतो. ॥ ३ ॥
अ॒यं क॒विरक॑विषु॒ प्रचे॑ता॒ मर्ते॑ष्व॒ग्निर॒मृतो॒ नि धा॑यि ।
अयं कविः अकविषु प्रऽचेताः मर्तेषु अग्निः अमृतः नि धायि ।
हा निर्बुद्धांना बुद्धिप्रेरक त्रिकालदर्शी अग्नि भूलोकामध्ये आधारास्तव अमृतरूपाने स्थापिला गेला आहे. तो जगदाधार अग्नि मजला ह्या मानवलोकांत सोडून अधोगतिमध्ये टाकून न जावो. हे बलशाली अग्नि देवा आता एवढे कर की आम्ही निरंतर तुम्हा ध्यानामध्ये व सख्यप्रेमामध्येंच दत्तचित्त असूं. ॥ ४ ॥
आ यो योनिं॑ दे॒वकृ॑तं स॒साद॒ क्रत्वा॒ ह्य१॒ग्निर॒मृताँ॒ अता॑रीत् ।
आ यः योनिं देवऽकृतं ससाद क्रत्वा हि अग्निः अमृतान् अतारीत् ।
जो हा अग्नि देवकल्पित स्वस्थानी जाऊन राहिला, त्याने खरोखरच आपल्या बुद्धिने यज्ञाद्वारे देवांना उचलून धरिले. नाना वनस्पति, वृक्षलता व पृथ्वी ह्यांनी ह्या जगन्निधान अग्निला अंतःसाररूपाने आपापल्यामध्ये धारण करून ठेवले आहे. ॥ ५ ॥
ईशे॒ह्य१॒ग्निर॒मृत॑स्य॒ भूरे॒रीशे॑ रा॒यः सु॒वीर्य॑स्य॒ दातोः॑ ।
ईशे हि अग्निः अमृतस्य भूरेः ईशे रायः सुऽवीर्यस्य दातोः ।
अग्नि हा पुष्कळ अमृताचा प्रभु आहे आणि महापराक्रमी व उदार ऐश्वर्याचा हा राजा आहे. हे सर्व करणार्या शक्तिमंता देवा, आता असे होऊ दे, कीं आम्ही (वसिष्ठ गोत्री जन) तुझ्याजवळ सुपुत्रविरहित असे न राहू. आम्ही तुझ्या लोकी अशा रूपरहित खिन्न मुद्रेने न बसू व आम्ही त्वद्-भक्तिविरहित असे कधी न असू. आम्ही तुझ्या कृपाप्रसादाने, पुत्रवान्, रूपवान, तेजस्वी व भक्तिमान होऊ असे कर. ॥ ६ ॥
प॒रि॒षद्यं॒ ह्यर॑णस्य॒ रेक्णो॒ नित्य॑स्य रा॒यः पत॑यः स्याम ।
परिऽसद्यं हि अरणस्य रेक्णः नित्यस्य रायः पतयः स्याम ।
हे अग्निदेवा, तुझ्या कृपेने आणखी असेही होवो, की कंजूष परकीयाचे धन आम्हाजवळ आमचे म्हणून येऊन राहो व आमच्या नित्य वंशपरंपरागत द्रव्याचे आम्हीच सदा स्वामी बनून असू. देवा, आमचे हक्कदार आमच्या इस्टेटीचे भोक्ते दुसर्यांच्या (परकीयांच्या) पोरांना नको होऊ देऊ; आणि आम्हा अप्रबुद्ध जनांचा उन्नति मार्ग तू आता फार लांबवू नको. ॥ ७ ॥
न॒हि ग्रभा॒यार॑णः सु॒शेवो॑ऽन्योद॑र्यो॒ मन॑सा॒ मन्त॒वा उ॑ ।
नहि ग्रभाय अरणः सुऽशेवः अऽन्यऽउदर्यः मनसा मंतवै उंइति ।
अहो विद्वज्जनहो, परकीय जरी सुखसेवी झाला तरी देखील तो आपणांला पुत्रवत् पालनीय वा प्रहणीय कधींच होऊ नये. अहो दुसर्यांच्या पोटचा गोळा त्याचे आपण आपल्या मनाने देखील चिंतन करणे म्हणजे धिक्कारच नाही का ? आणि हे अग्निदेवा, जर तो परकीय पोर आमच्याकडे आपलेंच हे घर असे समजून वारंवार येतच राहिला, तर तो आमचा नवीन बलवान पराक्रमी घोडा त्या परकीयांवर बेलाशक चाल करून जावो व त्यांना मारून विजयी होऊन परत येवो. ॥ ८ ॥
त्वम॑ग्ने वनुष्य॒तो नि पा॑हि॒ त्वमु॑ नः सहसावन्नव॒द्यात् ।
या ऋचेचा पदच्छेद दिलेला नाही
हे अग्निदेवा, तू आमच्या संहारकारी शत्रूंपासून आमचे सर्वदा संरक्षण कर. हे बलवान अग्ने, तू काय आमच्या भ्रष्ट निंदकांपासून अमचे परित्राण करणार नाहीस ? देवा, तुला आम्हांकडे येण्याकरिता रस्त्यावर लागणारे अन्न म्हणून हा आमचा हवि निर्दोष समर्पित असो व हा ठीक तुलाच पोहोंचो. आणि आम्हाकडे तुझ्या कृपेने हजारों प्रकारची आमची मनोवांच्छित धनसंपत्ति लक्ष्मी रूपाने येवो. ॥ ९ ॥
ए॒ता नो॑ अग्ने॒ सौभ॑गा दिदी॒ह्यपि॒ क्रतुं॑ सु॒चेत॑सं वतेम ।
या ऋचेचा पदच्छेद दिलेला नाही
हे अग्निदेवा, ही सारी सौभाग्यवर्धक ऐश्वर्ये तू आम्हाला देच. आणि आम्ही स्वकर्तव्य यज्ञ कर्मकारी व अति कुशाग्रबुद्धि संपन्न होवोत. देवा तुझ्या स्तोत्र संपादक व स्तुतिगायक भक्तांना आमच्या ह्या ब्राह्मण उपाध्यायांनाही सर्व जगभरच्या संपत्तिचा लाभ होवो. भो भो अखिल देवदेवतांनो, तुम्ही सदा सर्वदा आम्हाला आपल्या आशिर्वचनें करून असेच रक्षित जा बरे. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५ ( वैश्वानर अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्राग्नये॑ त॒वसे॑ भरध्वं॒ गिरं॑ दि॒वो अ॑र॒तये॑ पृथि॒व्याः ।
प्र अग्नये तवसे भरध्वं गिरं दिवः अरतये पृथिव्याः ।
अहो विप्रांनो, आकाश व पृथ्वीमध्ये गमन करणार्या महान् अग्निकरितां तुम्ही स्तुतिगोत्र गा. कारण हा जगन्मनोहर अग्नि सकल देवांच्या सांनिध्यांतील असून हा सदा जागृत अशा देवांसमवेत हव्य-अन्नादिकांनी भक्तांकडून प्रार्थिला जात असतो. ॥ १ ॥
पृ॒ष्टो दि॒वि धाय्य॒ग्निः पृ॑थि॒व्यां ने॒ता सिन्धू॑नां वृष॒भ स्तिया॑नाम् ।
पृष्टः दिवि धायि अग्निः पृथिव्यां नेता सिंधूनां वृषभः स्तियानां ।
नद्यांचा मार्गदर्शक, उदकांचा वर्षक व भक्त प्रार्थित अग्नि पृथ्वी व आकाशांत स्थापिला गेला आहे. सकलजन कल्याणकारी अग्नि भक्तांच्या हविंनी परिपुष्ट होऊन तोच मानवी प्रजेला तेजस्वी करतो. ॥ २ ॥
त्वद्भि॒या विश॑ आय॒न्नसि॑क्नीरसम॒ना जह॑ती॒र्भोज॑नानि ।
त्वत् भिया विशः आयन् असिक्नीः असमनाः जहतीः भोजनानि ।
हे जनहितकारी देवा, हे भिन्न आचारमत व कृष्णवर्ण जन तुझ्या भितीने आपापले उपभोग पदार्थ सोडून येथे तुझ्या यज्ञार्थ आले आहेत. कारण, हे अग्रणी देवा, तु ’पुरू’करिता प्रकाशित होऊन त्याच्या शत्रूची नगरे उध्वस्त केली आणि जगाला प्रकाश दिला. ॥ ३ ॥
तव॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वी उ॒त द्यौर्वैश्वा॑नर व्र॒तम॑ग्ने सचन्त ।
तव त्रिऽधातु पृथिवी उत द्यौः वैश्वानर व्रतं अग्ने सचंत ।
हे विश्वोपकरी अग्निदेवा, पृथिवीवर तसेच स्वर्गलोकांमध्येंही तत्तत् प्रांतस्थजन तुझ्या (पृथ्वी, आप, तेज अथवा स्वर्ग, मृत्यु, पातालव्यापी) तीन तत्त्वमय स्वरूपाची नित्य नैत्तिकोपासना सदैव करीत असतात. अखंड ज्वालेने व प्रभेने सदा देदीप्यमान राहून द्यावापृथिवींना तूच विस्तारवितोस, फैलाविलेले दाखवितोस. ॥ ४ ॥
त्वाम॑ग्ने ह॒रितो॑ वावशा॒ना गिरः॑ सचन्ते॒ धुन॑यो घृ॒ताचीः॑ ।
त्वां अग्ने हरितः वावशानाः गिरः सचंते धुनयः घृताचीः ।
हे उर्ध्वोर्ध्वनेत्या अग्निदेवा, तुज क्षेत्रपति व धनपतिला आणि उषःकाळच्या तसेच दिनकाळाच्या जगन्नेत्या ध्वजाला कामेच्छु घोड्यांप्रमाणे पवित्र व घृतमय अन्नसंयुक्त स्तुतिवाणी आता प्रार्थीत आहेत. ॥ ५ ॥
त्वे अ॑सु॒र्य१ं॒वस॑वो॒ न्यृण्व॒न्क्रतुं॒ हि ते॑ मित्रमहो जु॒षन्त॑ ।
त्वेइति असुर्यं वसवः नि ऋण्वन् क्रतुं हि ते मित्रऽमहः जुषंत ।
अग्निदेवा, तुझ्या ठायी सकल धनसंपन्न वसु देवांनी आपले वैभव ठेविले आहे. हे भक्ताला परमप्रिय देवा, धनदायी वसुदेवांनी तुजकरितां आपल्या व्रतालाही आजवर चालविलेंच आहे. हे उन्नतिप्रद देवा, भक्तजनांस्तव आपली श्रेष्ठ ज्योति प्रकट करीत तू पाताल लोकांतून आला आहेस. ॥ ६ ॥
स जाय॑मानः पर॒मे व्योमन्वा॒युर्न पाथः॒ परि॑ पासि स॒द्यः ।
सः जायमानः परमे विऽओमन् वायुः न पाथः परि पासि सद्यः ।
महदाकाशामध्ये सूर्यरूपाने प्रकट होणारा तू वायुप्रमाणे भक्तदत्त अर्घ्यादि व हविष्यान्नादि अन्न जल एकदम खातोस पितोस. सर्व वस्तुमात्रांना जाणून घेणार्या देवा, तू नाना भुवनांना, देशांना पृथ्वीवर प्रकट करीत करीत व आपल्या भक्तरूप तनयांना त्यांच्या त्यांच्या कर्मांमध्ये (सदुद्योगांमध्ये, यज्ञकर्मामध्ये) लावीत लावीत उगवितोस तेव्हां महान् शब्द करतोस. ॥ ७ ॥
ताम॑ग्ने अ॒स्मे इष॒मेर॑यस्व॒ वैश्वा॑नर द्यु॒मतीं॑ जातवेदः ।
तां अग्ने अस्मेइति इषं आ ईरयस्व वैश्वानर द्युऽमतीं जातऽवेदः ।
हे बुद्धिप्रेरक, जगन्नायक, ऊर्ध्वगतिप्रद देवा, तू आम्हाकरिता ती सकल इच्छित दिव्यान्ने सर्वत्र उत्पन्न कर, जेणेकरून हे जगदाधार देवा, तू दानशूर भक्तांना महद्यश व इच्छित धनधान्यैश्वर्य विपुल देतोस. ॥ ८ ॥
तं नो॑ अग्ने म॒घव॑द्भ्यःु पुरु॒क्षुं र॒यिं नि वाजं॒ श्रुत्यं॑ युवस्व ।
तं नः अग्ने मघवत्ऽभ्यः पुरुऽक्षुं रयिं नि वाजं श्रुत्यं युवस्व ।
हे दिव्य पुढारी अग्निदेवा, आम्हा हविष्मंत जनांना तू ते प्रचुर धनधान्यसंयुक्त राज्यैश्वर्यरत्न, सकल जगत्प्रसिद्ध महद्यश व हयगजादि लक्ष्मी अथवा ते यज्ञयागादि वैभव उत्तम प्रकारे मिळवून दे. हे जगत्पुरुष, अग्रणीदेवा, सकल रुद्रदेव व वसुदेव यांसहवर्तमान आमच्या यज्ञांनी परम आनंदित होत्साता तू आम्हाला महान् सुखसंपदा दे. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ६ ( वैश्वानर अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्र स॒म्राजो॒ असु॑रस्य॒ प्रश॑स्तिं पुं॒सः कृ॑ष्टी॒नाम॑नु॒माद्य॑स्य ।
प्र संऽराजः असुरस्य प्रऽशस्तिं पुंसः कृष्टीनां अनुमाद्यस्य ।
राजाधिराज ऐश्वर्यदात्या भगवंता, मी तुला वंदन करतो. आणि ह्या प्रमाणे भगवंताला नमस्कार केल्यावर आता बलवान् व विद्वान भक्तांनी एकापाठीमागून एकाने मनोहर्षाने ज्याची इंद्राप्रमाणे स्तुति केली असते अशा त्या शीघ्रगति नरवीराची पूर्वभक्तांनी केलेल्या स्तुतिंच्या प्रमाणे मीही स्तुति करतो. ॥ १ ॥
क॒विं के॒तुं धा॒सिं भा॒नुमद्रे॑र्हि॒न्वन्ति॒ शं रा॒ज्यं रोद॑स्योः ।
कविं केतुं धासिं भानुं अद्रेः हिन्वंति शं राज्यं रोदस्योः ।
त्रिकालदर्शी, पर्वतांचा आधार, द्यावापृथिवीचा शांतिकारक राजाच अशा भगवान् सूर्यदेवालाच सर्व देव स्तवितात, त्याअर्थी मीही अंधकाररूपी नगरीचे विदारण करणार्या अग्निदेवाच्या प्राचीन महान यज्ञयागादि व्रतनियमांना स्तुति स्तोत्राद्वारे यथासांग चालवितो. ॥ २ ॥
न्यक्र॒तून्ग्र॒थिनो॑ मृ॒ध्रवा॑चः प॒णीँर॑श्र॒द्धाँ अ॑वृ॒धाँ अ॑य॒ज्ञान् ।
नि अक्रतून् ग्रथिनः मृध्रवाचः पणीन् अश्रद्धान् अवृधान् अयज्ञान् ।
ह्या अति प्रचीन ऊर्धगतिदायक अग्निदेवाने त्या अधर्मी, वृथा वाद घालणार्या, कर्कशवाणी, अश्रद्धावान, अति कंजुष, पूजनद्वारे देवांचे पूजन न करणारा, यज्ञानुष्ठान न करणारा, अति दुष्ट व वृथा कालक्षेप करणार्या राक्षसांचा अत्यंत धुव्वा उडवून त्यांना फार दूर अज्ञानांधकारांत टाकून दिले आहे. ॥ ३ ॥
यो अ॑पा॒चीने॒ तम॑सि॒ मद॑न्तीः॒ प्राची॑श्च॒कार॒ नृत॑मः॒ शची॑भिः ।
यः अपाचीने तमसि मदंतीः प्राचीः चकार नृऽतमः शचीभिः ।
ज्या अग्रणी देवाने अंधकारामधून आपल्या शक्तिंच्या द्वारे प्रफुल्ल शोभायमान अशा प्राचीला उत्पन्न केले, त्या धनेश, धीट व शत्रुसेनेला दमन करणार्या अग्रणीची मी स्तुति गातो. ॥ ४ ॥
यो दे॒ह्यो३॒अन॑मयद्वध॒स्नैर्यो अ॒र्यप॑त्नीरु॒षस॑श्च॒कार॑ ।
यः देह्यः अनमयत् वधऽस्नैः यः अर्यऽपत्नीः उषसः चकार ।
ज्याने आपल्या मारक आयुधांनी अंधकाराच्या भिंतींना अगदी जमीनदोस्त केले, ज्याने उषादेवीला सूर्यासारख्या उत्कृष्ट भर्त्याची पत्नी बनवून दिले त्या अतिचपल अग्निदेवाने आपल्या धारिष्टबलानेच पृथ्वीवरील नाना प्रजांना सांवरून धरून राजा ’नहुषा’पासूनही यज्ञामध्ये हविद्वारे आपली खंडणी घेतली. ॥ ५ ॥
यस्य॒ शर्म॒न्नुप॒ विश्वे॒ जना॑स॒ एवै॑स्त॒स्थुः सु॑म॒तिं भिक्ष॑माणाः ।
यस्य शर्मन् उप विश्वे जनासः एवैः तस्थुः सुऽमतिं भिक्षमाणाः ।
सकल जन यज्ञांतील ज्याच्या येण्याजाण्याने ज्या देवाला सहजसुख व सुबुद्धि यांची याचना करून ज्याची नित्य पूजा करतात तो सकल जगन्नायक देवताग्रणी अग्निदेव आता आपल्या मातापितास्वरूप द्यावापृथिवींच्या उत्कृष्ट अंकावर येऊन बसला आहे. ॥ ६ ॥
आ दे॒वो द॑दे बु॒ध्न्या३॒वसू॑नि वैश्वान॒र उदि॑ता॒ सूर्य॑स्य ।
आ देवः ददे बुध्न्या वसूनि वैश्वानरः उत्ऽइता सूर्यस्य ।
सूर्य उदय पावल्याबरोबर जगदुपकारक अग्निने स्वर्गीय दिव्य धन आम्हाला समुद्रांतून आणून दिले, पाताल लोकांतून आणून दिले, शत्रूंच्या प्रदेशांतून आणले, आकाशांतून आणले व सार्या पृथ्वीवरून आणून दिले. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ७ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्र वो॑ दे॒वं चि॑त्सहसा॒नम॒ग्निमश्वं॒ न वा॒जिनं॑ हिषे॒ नमो॑भिः ।
प्र वः देवं चित् सहसानं अग्निं अश्वं न वाजिनं हिषे नमःऽभिः ।
अहो अग्निमहाराज, तुम्ही घोड्याप्रमाणे धिरोदात्त, सहनशील व बलसंपन्न आहांत म्हणून मी देवांकरिता नमस्कार व हव्यन्ने देऊन पाठवीत आहे. देवा, आमच्या यज्ञाचा तू आतां दूत हो. कारण, तू सर्व देवांमध्ये बुद्धिमान असून तू आपण होऊन जगांतील एकूण एक काष्ठवल्लींचा बरोबर जाणता आहेस. ॥ १ ॥
आ या॑ह्यग्ने प॒थ्या३॒अनु॒ स्वा म॒न्द्रो दे॒वानां॑ स॒ख्यं जु॑षा॒णः ।
आ याहि अग्ने पथ्याः अनु स्वाः मन्द्रः देवानां सख्यं जुषाणः ।
हे अग्निदेवा, तू सकल देवदेवतांशी सख्य करून महा हर्षित होत्साता ह्या आपल्या राजमार्गांवरून असा चालत चालत इकडे ये. देवा, पृथ्वीच्या उंच शिखरांवरून आपल्या दाहक शक्तिनिशी आरडून ओरडून व ज्वालारूप जिव्हांनी जाभाड्यांनी यच्च यावत् अरण्यांना अधाशाप्रमाणे भस्म करून टाकून असा इकडे ये. ॥ २ ॥
प्रा॒चीनो॑ य॒ज्ञः सुधि॑तं॒ हि ब॒र्हिः प्री॑णी॒ते अ॒ग्निरी॑ळि॒तो न होता॑ ।
प्राचीनः यज्ञः सुऽधितं हि बर्हिः प्रीणीते अग्निः ईळितः न होता ।
देवा, हा यज्ञमार्ग अति प्राचीन सनातन आहे ना ? देवा, हे कुशासन तुम्हांकरिता अंथरून ठेविले आहे बघा. सुस्तुतिप्रार्थित अग्निदेव होत्याप्रमाणे यजमानावर - भक्तांवर - प्रेमच करतो. कारण, हे सदा तरुण देवा, यज्ञामध्यें तू बोलाविला जातोस, तेथे तू आनंदात मांडी मारून बसतोस, इतकेंच नव्हे तर तू जगत्पूज्य द्यावापृथिवी मातांना पूर्णपणे ओळखतोस. ॥ ३ ॥
स॒द्यो अ॑ध्व॒रे र॑थि॒रं ज॑नन्त॒ मानु॑षासो॒ विचे॑तसो॒ य ए॑षाम् ।
सद्यः अध्वरे रथिरं जनंत मानुषासः विऽचेतसः यः एषां ।
यागांमध्ये उत्तम बुद्धिमान माणसे ह्य रथसंयुक्त अग्निला तेथल्या तेथेंच प्रगट करतात. अहो हा जगन्नाथ अग्निदेव मोठा सुखी, मिष्टभाषणी, पण सत्यवक्ता असा आपला उन्नतीचा मार्गदर्शक असून ह्याने ह्या दृश्य जगताला घरांत बसवूनच ठेविले आहे. ॥ ४ ॥
असा॑दि वृ॒तो वह्नि॑राजग॒न्वान॒ग्निर्ब्र॒ह्मा नृ॒षद॑ने विध॒र्ता ।
असादि वृतः वह्निः आऽजगन्वान् अग्निः ब्रह्मा नृऽसदने विऽधर्ता ।
हविर्वाहक अग्निदेव आला आहे. हा उद्धर्ता, व उन्नतिमार्गद्रष्टा देव यागांमध्ये श्रेष्ठ आचार्य म्हणून मानला गेला असून अहो हा राजसभेमध्ये येऊन बसला. द्यावापृथिवी ह्याची बढाई गातात आणि आमचा होता ह्याच जगत्पूज्य देवाची पूजा करीत आहे. ॥ ५ ॥
ए॒ते द्यु॒म्नेभि॒र्विश्व॒माति॑रन्त॒ मन्त्रं॒ ये वारं॒ नर्या॒ अत॑क्षन् ।
एते द्युम्नेभिः विश्वं आ अतिरंत मंत्रं ये वारं नर्याः अतक्षन् ।
अहो, हे इतके लोक ह्या अग्निच्या स्तुतिस्तोत्रेंकरून जगावरून तरून गेले समजा. कोणते म्हणाल, तर जे लोक मंत्राला बरोबर व परिपूर्ण सुसंकृत सुसंपादित करतात, अथवा जे लोक विद्वानांच्या मुखाने श्रवण करून स्वतःच्या बुद्धिमध्ये त्याच्या मनन-निदिध्यासाने विस्तार करतात किंवा जे माझे शिष्य वा भक्त वा अनुयायी वा उपदेशकारी होऊन ह्या सत्य अग्निदेवाला आपापल्या घरी वैश्वदेव करून व महायागांमध्ये नित्य प्रदीप्त करतात. ॥ ६ ॥
नू त्वाम॑ग्न ईमहे॒ वसि॑ष्ठा ईशा॒नं सू॑नो सहसो॒ वसू॑नाम् ।
नु त्वां अग्ने ईमहे वसिष्ठाः ईशानं सूनोइतिअः सहसः वसूनां ।
हे महाबली भगवंताच्या पोरा, समर्थाच्या पुत्रा, अग्निदेवा, सकल ऐश्वर्येश तुज आम्ही वासिष्ठ संप्रदायी लोक आता असे मागतो की तू आमच्या ऐश्वर्यवंत यज्ञकर्मकर्त्या राजांना व मंत्रपठक ब्राह्मणांना अतीशीघ्र फट्दिशी ऐश्वर्यरत्न देऊन टाक. अहो देवदेवतांनो, तुम्ही सारे आम्हाला आशीर्वाद देऊन आमचा पूर्ण सांभाळ करा बरे. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
इ॒न्धे राजा॒ सम॒र्यो नमो॑भि॒र्यस्य॒ प्रती॑क॒माहु॑तं घृ॒तेन॑ ।
इंधे राजा सं अर्यः नमःऽभिः यस्य प्रतीकं आऽहुतं घृतेन ।
ज्याचे मुख घृतलिप्त आहे अश श्रेष्ठ अग्निराजाची स्तुतिस्तोत्रांसहित पूजा करतात. अग्रणी देव अग्नि उषामातांच्या प्रथमच जागृत होऊन हा इथे चमकू लागला आहे. ॥ १ ॥
अ॒यमु॒ ष्य सुम॑हाँ अवेदि॒ होता॑ म॒न्द्रो मनु॑षो य॒ह्वो अ॒ग्निः ।
अयं उंइति स्यः सुऽमहान् अवेदि होता मन्द्रः मनुषः यह्वः अग्निः ।
अहो, हा तो चपल व पूज्य अग्नि मनुष्यांचा महान उत्कृष्ट आचार्य गणला गेला आहे. ह्यानेंच पृथ्वीमध्ये उत्पादक शक्ति भरपूर सांठवून ठेविली असून हा कृष्णमार्गी अग्नि स्वनिर्मित ओषधींनी वाढतोही. ॥ २ ॥
कया॑ नो अग्ने॒ वि व॑सः सुवृ॒क्तिं कामु॑ स्व॒धामृ॑णवः श॒स्यमा॑नः ।
कया नः अग्ने वि वसः सुऽवृक्तिं कां ऊंइति स्वधां ऋणवः शस्यमानः ।
हे अग्निदेवा, कोणत्या स्वधास्वाहादि हवींनी आम्हाला आमचे स्तुतिरूप वरप्रसाद मिळावयाचे आहेत. तुझे स्तुतिस्तोत्र गाऊन तू आम्हाला कोणते तृप्तिकर वरप्रसाद देशील बरें ? हे उदरांच्या तारण करणार्या देवा, आम्ही आमच्या अजिंक्य अशा व सत्य सत्य राज्यैश्वर्याचे सहकारी मालक कधी होऊ सांग बरे ? ॥ ३ ॥
प्रप्रा॒यम॒ग्निर्भ॑र॒तस्य॑ शृण्वे॒ वि यत्सूर्यो॒ न रोच॑ते बृ॒हद्भाःb ।
प्रऽप्र अयं अग्निः भरतस्य शृण्वे वि यत् सूर्यः न रोचते बृहत् भाः ।
हा भरतांचा अग्नि महान् प्रख्यात आहे, कारण हा सूर्याप्रमाणे अतिप्रखर तापतो. अंधकारमय ’पूरु’ राक्षसाच्या समोर त्याच्या सैन्यामध्ये लढण्यास हाच तयार झाला. तो हा प्रकाशमान दिव्य अतिथि देवच बघा एथे सुप्रकाशित झाला आहे. ॥ ४ ॥
अस॒न्नित्त्वे आ॒हव॑नानि॒ भूरि॒ भुवो॒ विश्वे॑भिः सु॒मना॒ अनी॑कैः ।
असन् इत् त्वेइति आऽहवनानि भूरि भुवः विश्वेभिः सुऽमनाः अनीकैः ।
देवा, तुझी हवनीय चंदनकर्पूर घृतसमिधादि द्रव्ये येथे ह्या देशांत यज्ञभूमींत भरपूर आहेत. इथे आमच्या यज्ञामध्ये तू आता सर्व ब्रह्मांडभर देवसेनेसहित सप्रेम व सानंद रहा. तुझी स्तुति आमच्याकडून यथासांग झाली ना ? हे मोठ्या कुळांत पृथ्वीरूप भरतखंडांत जन्म घेतलेल्या अग्निदेवा, तूच आम्हांकडून आपली स्तुति वदवून आपला मोठेपणा वाढवून घेतोस. ॥ ५ ॥
इ॒दं वचः॑ शत॒साः संस॑हस्र॒मुद॒ग्नये॑ जनिषीष्ट द्वि॒बर्हाः॑ ।
इदं वचः शतऽसाः संऽसहस्रं उत् अग्नये जनिषीष्ट द्विऽबर्हाः ।
शेंकडो नव्हे हजारो प्रकारांनी व विद्याकर्मरूप सकाम व निष्काम अश द्व्यर्थगामी ह्या माझ्या स्तुतिस्तोत्रांनी अग्नीला जागृत व सुप्रसन्न केलेंच आहे. आता हा आपल्या भक्ताला यजमानाला व स्तोत्रकर्त्या आम्हा विप्रांला दिव्यगतिप्रद, रोगनाशक, शत्रुसंहारक व शांति समाधान सुखप्रद होवो. ॥ ६ ॥
नू त्वाम॑ग्न ईमहे॒ वसि॑ष्ठा ईशा॒नं सू॑नो सहसो॒ वसू॑नाम् ।
नू त्वां अग्ने ईमहे वसिष्ठाः ईशानं सूनोइति सहसः वसूनां ।
हे धारिष्टवंताच्या पुत्रा, अग्रणी अग्निदेवा, आम्ही वसिष्ठानुगामी जन तुज धनपतीला आमच्या यज्ञकर्मरत राजाकरिता व स्तोत्रज्ञ विप्रांकरिता अतित्वरित पराक्रमबल खरोखरच मागत आहोंत. अहो सकल देवदेवतांनो, तुम्ही आमचा आपल्या सुखमय व प्रसन्नचित्त आशीर्वादें करून सदैव सांभळच करीत रहा. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अबो॑धि जा॒र उ॒षसा॑मु॒पस्था॒द्धोता॑ म॒न्द्रः क॒वित॑मः पाव॒कः ।
अबोधि जारः उषसां उपऽस्थात् धोता मंद्रः कविऽतमः पावकः ।
सदानंदी, त्रिकालद्रष्टा, यज्ञामध्ये देवांना बोलावणारा, पवित्र व सर्वप्रिय उषावल्लभ अग्निदेव उषांमधून- उषादेवीपासून उठून जागृत झाला आहे. हा उभय (ब्राह्मण व क्षत्रिय) जनांचा प्रज्ञावर्धक आहे. देवांना हा हविद्रव्य यथाविभाग पोचवितो, आणि पुण्यवंतांना देण्याकरिता ह्याच्याजवळ धनदौलतही पुष्कळ आहे. ॥ १ ॥
स सु॒क्रतु॒र्यो वि दुरः॑ पणी॒नां पु॑ना॒नो अ॒र्कं पु॑रु॒भोज॑सं नः ।
स सुक्रतुः यः वि दुरः पणीनां पुनानः अर्कं पुरुऽभोजसं नः ।
अहो हाच देव सुयज्ञ सत्कर्मकारी आहे. कारण ह्याने ’पणी’ राक्षसाच्या दुर्गांचा भेद करून, आमच्या पुष्कळ प्रकारच्या पक्वान्नांना व ऋङ्मय-सारगर्भित स्तुतिंना पावन करून घेऊन आणि आमचा होता यज्ञकर्माचा अध्वर्यु बनून, सकल प्रजांना रात्रंदिन आपल्या दाबांत धाकांत ठेवून, व रात्रीच्या रमणीय अंधकाराला दूर सारून मोठ्या आनंदाने आता आपल्या भक्ताला आपले दर्शन दिले आहे. ॥ २ ॥
अमू॑रः क॒विरदि॑तिर्वि॒वस्वा॑न्सुसं॒सन्मि॒त्रो अति॑थिः शि॒वो नः॑ ।
अमूरः कविः अदितिर्विवस्वान् सुऽसंसत् मित्रः अतिथिः शिवः नः ।
जो निश्चितबुद्धि, त्रिकालदृष्टा, अखंडित देदीप्यमान, सभाभूषण आपत्तारक, आमचा कल्याणकारी अतिथि, अतिधनसंपन्न असा हा देव उषेच्या पुढे सुप्रकाशित दिसत आहे, तो हा अग्निदेव पाण्याच्या अंतर्यामीही शिरला आहे. ॥ ३ ॥
ई॒ळेन्यो॑ वो॒ मनु॑षो यु॒गेषु॑ समन॒गा अ॑शुचज्जा॒तवे॑दाः ।
ईळेन्यः वः मनुषः युगेषु समनऽगाः अशुचत् जातऽवेदाः ।
आपणां मनुष्यांच्या यज्ञकालरूप युगायुगांच्या ठायी हा परमपूज्य व सर्वज्ञ अग्नि संग्रामामध्ये उपस्थित होऊन सुप्रकाशित होत आला आहे. जो परमसुंदर अग्नि सूर्यामध्येंही प्रकाशतो त्या हवनयोग्य अग्निला आपल्या वाक्स्तुतिरूप धेनू आता जागृत करोत. ॥ ४ ॥
अग्ने॑ या॒हि दू॒त्यं१॒मा रि॑षण्यो दे॒वाँ अच्छा॑ ब्रह्म॒कृता॑ ग॒णेन॑ ।
अग्ने याहि दूत्यं मा रिषण्यः देवान् अच्छ ब्रह्मऽकृता गणेन ।
हे अग्निदेवा, देवांना घेऊन येण्याकरिता तू आमचा दूत म्हणून जा, आणि बरोबर देवांजवळ जाऊन पोहोंच. आम्ही सर्व मिळून तुझे मोठे विराटरूप वर्णनात्मक स्तोत्र संपादन करीत आहोंत यास्तव तू कधीही आमचे अहित करू नको. देवी सरस्वती, मरुद्गण, अश्विनीकुमार देव, आपोदेवता, व सकल विश्वव्यापी देवगण ह्या सर्वांना तू ह्या आमच्या यज्ञांतील यथायोग्य विभाग आम्हांमध्ये ऐश्वर्य धारण करावे म्हणून वाटून दे. ॥ ५ ॥
त्वाम॑ग्ने समिधा॒नो वसि॑ष्ठो॒ जरू॑थं ह॒न्यक्षि॑ रा॒ये पुरं॑धिम् ।
त्वां अग्ने संऽइधानः वसिष्ठः जरूथं हन् यक्षि राये पुरंऽधिं ।
हे नायक देवा, मी वसिष्ठाने तुला समिधाद्वारे पूजिले आहे. त्या कठोरभाषी ’जरूथा’ला तू आता मारून टाक. आमच्या अत्रिय राजा यजमानाला बहु बुद्धि दे. हे सर्वज्ञा, तू आम्हांकडून पुष्कळ ईशस्तुति वदवून घे. अहो, अग्न्याश्रित देवगणांनो, तुम्ही आम्हाला चांगले आशिर्वाद देऊन सदोदित आमचे संरक्षण करीत जा बरे. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १० ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
उ॒षो न जा॒रः पृ॒थु पाजो॑ अश्रे॒द्दवि॑द्युत॒द्दीद्य॒च्छोशु॑चानः ।
उषः न जारः पृथु पाजः अश्रेत् दविद्युतत् दीद्यत् शोशुचानः ।
सर्व प्रकाशक, स्वयंप्रकाशमान, व अति तेजःपुंज अग्नि प्रिय वल्लभाप्रमाणे उषादेवीजवळ सदा निवास करतो. कामनावर्षक, जनमनोहर, अग्नि आपल्या प्रभेने सर्वत्र फांकला आहे. ह्या बुद्धिप्रेरक अग्निदेवाने प्रभातकाळी सर्व कामनावंत प्रजेला जागृत केले आहे. ॥ १ ॥
स्व१॒र्ण वस्तो॑रु॒षसा॑मरोचि य॒ज्ञं त॑न्वा॒ना उ॒शिजो॒ न मन्म॑ ।
स्वः न वस्तोः उषसां अरोचि यज्ञं तन्वानाः उशिजः न मन्म ।
उषादेवीच्या दिवसरूप सुंदर वस्त्राप्रमाणे किंवा ज्याच्या आश्रयास उषेचे वास्तव्य आहे असा सूर्यदेव प्रकाशमान झाला आहे. अहो, ऋत्विजांनो, तुम्ही आता आपली यज्ञकर्मे करीत राहून आपापल्या इच्छेप्रमाणे त्या भगवंताची ध्यानपूर्वक स्तुति गा. अहो, हा दिव्य अग्रणी सकल वस्तुजातांच्या उत्पत्तीला जाणत असून हा देवांना यज्ञार्थ खास घेऊन आणणारा असा योग्य दूत आहे. हा भक्तांना अति धनदायक आहे. बघा हा कसा देवांना आमच्या इकडे धांवत घेऊनच आला. ॥ २ ॥
अच्छा॒ गिरो॑ म॒तयो॑ देव॒यन्ती॑र॒ग्निं य॑न्ति॒ द्रवि॑णं॒ भिक्ष॑माणाः ।
अच्छ गिरः मतयः देवऽयन्तीः अग्निं यंति द्रविणं भिक्षमाणाः ।
देवैककामेच्छु अशा आमच्या बुद्धिध्यानसहित स्तुतिवाणी अग्नीलाच धन मागून घेऊन त्या सर्वांगसुंदर, प्रत्यक्ष दर्शन, सुगम, मानवांच्या अखंड हविंचा वाहक, अशा अग्रणी देवाप्रतच सरळ जावोत. ॥ ३ ॥
इन्द्रं॑ नो अग्ने॒ वसु॑भिः स॒जोषा॑ रु॒द्रं रु॒द्रेभि॒रा व॑हा बृ॒हन्त॑म् ।
इंद्रं नः अग्ने वसुऽभिः सऽजोषा रुद्रं रुद्रेभिः आ वह बृहंतं ।
हे उत्तरोत्तर ऊर्ध्वगति देणार्या अग्निदेवा, अष्ट वसु, एकादश रुद्र, व द्वादश आदित्य यांसहवर्तमान आमच्या स्तुतिस्तोत्रांनी प्रसन्नचित्त होत्साता तू आमच्याकडे त्या महान् रुद्रदेवाला, सर्वोत्पत्ति अदितिला, व बृहस्पतिलाही असाच रोजरोज यज्ञार्थ घेऊन येत जा बरे. ॥ ४ ॥
म॒न्द्रं होता॑रमु॒शिजो॒ यवि॑ष्ठम॒ग्निं विश॑ ईळते अध्व॒रेषु॑ ।
मंद्रं होतारं उशिजः यविष्ठं अग्निं विशः ईळते अध्वरेषु ।
सकाम भक्तगणांच्या यागांद्वारा सदानंदी, नित्यतरुण, ऊर्ध्वोर्ध्वगतिप्रद अग्निदेवाचीच उपासना करतात. हाच देव रात्रिमध्येहि जागृत-रात्रिसंयुक्त असतो. अहो, हा दिवसास देवांना आमच्या यज्ञानिमित्त घेऊन येण्यांकरिता अविश्रांत परिश्रमी असा दूत बनतो. ॥ ५ ॥
ॐ तत् सत् |