PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त ७१ ते ७५

ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७१ ( सवितृ सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - सवित्रू : छंद - जगती


उदु॒ ष्य दे॒वः स॑वि॒ता हि॑र॒ण्यया॑ बा॒हू अ॑यंस्त॒ सव॑नाय सु॒क्रतुः॑ ।
घृतेन॑ पा॒णी अ॒भि प्रु॑ष्णुते मखो युवा॑ सु॒दक्षो॒ रज॑सो॒ विध॑र्मणि ॥ १ ॥

उत् ऊं इति स्यः देवः सविता हिरण्यया बाहू इति अयंस्त सवनाय सुऽक्रतुः ।
घृतेन पाणी इति अभि प्रुष्णुते मखः युवा सुऽदक्षः रजसः विऽधर्मणि ॥ १ ॥

अहो त्या सत्यकर्मशील, सर्वोत्पादक सूर्य देवाने आमच्या यज्ञकर्माकरितां आपल्या रश्मिरूप सुवर्णमय भुजा बाहेर फैलावल्या ना ? तो महाश्रेष्ठ, नित्यतरुण, परमदक्ष देव भूलोक धारण कर्मांत निमग्न असतांना आपल्या किरणरूप हातांना उदकरूप घृताने भरवीत आहे. ॥ १ ॥


दे॒वस्य॑ व॒यं स॑वि॒तुः सवीमनि॒ श्रेष्ठे॑ स्याम॒ वसु॑नश्च दा॒वने॑ ।
यो विश्व॑स्य द्वि॒पदो॒ यश्चतु॑ष्पदो॒ नि॒वेश॑ने प्रस॒वे चासि॒ भूम॑नः ॥ २ ॥

देवस्य वयं सवितुः सवीमनि श्रेष्ठे स्याम वसुनः च दावने ।
यः विश्वस्य द्विऽपदः यः चतुःऽपदः निऽवेशने प्रऽसवे च असि भूमनः ॥ २ ॥

आतां आपण सर्वप्रसव सूर्य देवाचे ध्यान करूं या, की जेणेंकरून आपण स्वतः मोठे वैभवसंपन्न होऊन दुसर्‍यांना धन देणारे असे दानकर्मशीलही होऊ. अहो, हा सूर्यदेव जगतांच्या पालन कर्मामध्ये आणि सकल द्विपाद् चतुष्पाद् प्राण्यांना उत्पन्न करण्यामध्ये महासमर्थ प्रभु अहे. ॥ २ ॥


अद॑ब्धेभिः सवितः पा॒युभि॒ष्ट्वं शि॒वेभि॑र॒द्य परि॑ पाहि नो॒ गय॑म् ।
हिर॑ण्यजिह्वः सुवि॒ताय॒ नव्य॑से॒ रक्षा॒ माकि॑र्नो अ॒घशं॑स ईशत ॥ ३ ॥

अदब्धेभिः सवितरिति पायुऽभिः त्वं शिवेभिः अद्य परि पाहि नः गयम् ।
हिरण्यऽजिह्वः सुविताय नव्यसे रक्ष माकिः नः अघऽशंस ईशत ॥ ३ ॥

हे सर्वप्रेरक सूर्यदेवा, तुझ्या धारिष्टवंत, जनकल्याणकारक, भक्तसंरक्षक किरणांनी आमच्या घराचे आज सर्वतः परिरक्षण कर. तू हितकर व रमणीय वाणीदायक देव आम्हांकरितां नवीन नवीन सुखे निर्माण कर. आमचे सर्वत्र परिपालन कर. इतकेंच नव्हे, तर आमचे वाईट इच्छून आमची उघड उघड निंदा व अप्रतिष्ठा करणार्‍यांचा आम्हांवर अधिकारच न राहो असे कर. ॥ ३ ॥


उदु॒ ष्य दे॒वः स॑वि॒ता दमू॑ना॒ हिर॑ण्यपाणिः प्रतिदो॒षम॑स्थात् ।
अयो॑हनुर्यज॒तो म॒न्द्रजि॑ह्व॒ आ दा॒शुषे॑ सुवति॒ भूरि॑ वा॒मम् ॥ ४ ॥

उत् ऊं इति स्यः देवः सविता दमूनाः हिरण्यऽपाणिः प्रतिऽदोषं अस्थात् ।
अयःऽहनुः यजतः मन्द्रऽजिह्वः आ दाशुषे सुवति भूरि वामम् ॥ ४ ॥

अहाहा, हा उन्मत्त शत्रूंचे व महा गर्विष्टांचे पूर्ण दमन करणारा, हितकर व रमणीय किरणहस्तधारी, सर्वोदकदायी सूर्य देव प्रति रात्रिनंतर उदय पावो. हा सुवर्ण किरणरूप शस्त्रधारी, प्रमोदकारी वाणीदायक देव आपली उपासना करणार्‍या दानशूर भक्ताला चोहोंकडून पुष्कळ धन देतो. ॥ ४ ॥


उदू अयानुपव॒क्तेव॑ बा॒हू हि॑र॒ण्यया॑ सवि॒ता सु॒प्रतीका ।
दिवो रोहांस्यरुहत्पृथि॒व्या अरी॑रमत्प॒तय॒त्कच्चिदभ्व॑म् ॥ ५ ॥

उत् ऊं इति अयानुपवक्तेव बाहू हिरण्यया सविता सुप्रतीका ।
दिवो रोहांस्यरुहत् पृथिव्या अरीरमत्पतयत्कच्चिदभ्वम् ॥ ५ ॥

अहो जगताला निजनिजव्यापार प्रेरक देव, निजलेल्यांस उठवून हांक मारून जागें करणार्‍या घरांतल्या आजोबा प्रमाणें, आपले पथ्यकर सुंदर व प्रत्यक्ष धडधडीत दिसणार्‍या किरणरूप हातांना आतां दूरवर फैलावीत आहेत. अहो, हा सूर्य देव आकाशाच्या आणि पृथ्वीच्या शिखरांवर बघा कसा चढत आहे. अहो, हा देव, जे जे कोणी ऐश्वर्याने उन्मत्त झालेले असतात अशांना रसातळास घालविणारा हा आनंदाने आकाशमार्गावरून फिरत चालला आहे. ॥ ५ ॥


वामम॒द्य स॑वितर्वा॒ममु श्वो दि॒वेदि॑वे वा॒मम॒स्मभ्यं सावीः ।
वा॒मस्य॒ हि क्षय॑स्य देव॒ भूरे॑र॒या धि॒या वा॑म॒भाजः॑ स्याम ॥ ६ ॥

वाममद्य सवितर्वाममु श्वो दिवेदिवे वाममस्मभ्यं सावीः ।
वामस्य हि क्षयस्य देव भूरेरया धिया वामभाजः स्याम ॥ ६ ॥

हे स्फूर्तिदायक सूर्यदेवा, आम्हांला आज धन दे, उद्यांही संपत्ति दे आणि इतकेंच नव्हे तर रोजच्या रोज आम्हांला अधिकाधिक ऐश्वर्य संपादनार्थ उत्तरोत्तर स्फूर्ति देत जा. हे महदैश्वर्यप्रदायक आणि भक्तांना देशचे देश, प्रांतचे प्रांत कबजा करून देणार्‍या देवा, ह्या तुम्हा स्तुतिंच्या मननांनी आम्ही ऐश्वर्याप्रत चढूं, असे कर. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७२ ( इंद्रासोम सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्रासोम : छंद - त्रिष्टुभ्


इन्द्रा॑सोमा॒ महि॒ तद्वां॑ महि॒त्वं यु॒वं म॒हानि॑ प्रथ॒मानि॑ चक्रथुः ।
यु॒वं सूर्यं॑ विवि॒दथु॑र्युवं स्व१र्विश्वा॒ तमांस्यहतं नि॒दश्च॑ ॥ १ ॥

इन्द्रासोमा महि तत् वां महिऽत्वं युवं महानि प्रथमानि चक्रथुः ।
युवं सूर्यं विविदथुः युवं स्वः विश्वा तमांसि अहतं निदः च ॥ १ ॥

हे इंद्र व सोम देवांनो, तुमचा तो महिमा केवढा मोठा आहे ? तुम्ही पूर्वी मोठमोठे स्थिर व विस्तृत परिणामकारक असे पराक्रम करून ठेविले आहेत. अहो, तुम्ही सूर्याला मिळविले, आणि तुम्ही आकाशांतील व ह्या जगतातील सकल अज्ञानमय अंधकार तसेच निंदारूप पाप नाहिंसे करून टाकले. ॥ १ ॥


इन्द्रा॑सोमा वासय॑थ उ॒षास॒मुत्सूर्यं॑ नयथो॒ ज्योति॑षा स॒ह ।
उप॒ द्यां स्क॒म्भथुः स्क॒म्भ॑ने॒नाप्र॑थतं पृथि॒वीं मा॒तरं॒ वि ॥ २ ॥

इन्द्रासोमा वासयथः उषासं उत् सूर्यं नयथः ज्योतिषा सह ।
उप द्यां स्कंभथुः स्कंभनेन अप्रथतं पृथिवीं मातरं वि ॥ २ ॥

हे इंद्रा व हे सोमा, तुम्ही दोघांनी मिळून सहपरक्रमाने उषेवरती प्रकाशवस्त्राचे पांघरूण घातले. तुम्ही सूर्याला प्रभेसह पुढें पुढें ओढीत नेतां, तुम्ही मातृदेवी पृथ्वीला दृढ व विस्तृत करून ठेविले. ॥ २ ॥


इन्द्रा॑सोमा॒वहि॑म॒पः प॑रि॒ष्ठां हथो वृत्रमनु॑ वां॒ द्यौर॑मन्यत ।
प्रार्णां॑स्यैरयतं न॒दीना॒मा स॑मु॒द्राणि॑ पप्रथुः पु॒रूणि॑ ॥ ३ ॥

इन्द्रासोमौ अहिं अपः परिऽस्थां हथः वृत्रं अनु वां द्यौः अमन्यत ।
प्र अर्णांसि ऐरयतं नदीनां आ समुद्राणि पप्रथुः पुरूणि ॥ ३ ॥

हे इंद्रसोमदेवांनो, तुम्ही पाण्याची मर्यादा ठरवून टाकतां. ’वृत्रा’ला व वृत्रमागून ’अहि’ला तुम्हींच तर मारले. हे इंद्रसोमदेवता, आकाशाला तुमची ती गोष्ट फारच आवडली. अहो, तुम्ही देवांनी महानद्यांच्या पाण्यांत स्वैर वहावयास लावलेत, आणि तुम्हीच समुद्राला सर्वत्र पसरविले. ॥ ३ ॥


इन्द्रा॑सोमा प॒क्वमा॑मास्व॑न्तर्नि गवा॑मिद्द॑धथुर्व॒क्षणासु॑ ।
ज॒गृभथु॒रन॑पिनद्धमासु॒ रुश॑च्चि॒त्रासु जग॑तीष्वन्तः॒ ॥ ४ ॥

इन्द्रासोमा पक्वं आमासु अन्तः नि गवां इत् दधथुः वक्षणासु ।
जगृभथुः अनपिऽनद्धं आसु रुशत् चित्रासु जगतीषु अन्तरिति ॥ ४ ॥

हे इंद्रासोमदेवांनो, तुम्ही प्रकाश किरणरूप धेनूंच्या कच्च्या (कोंवळ्या) कांसेमध्ये परिपक्व अशा ज्ञानौदकरूप दुग्धान्नाचा साठा भरून ठेवला आहे. अहो, ह्या नाना वर्णाकृति गति ज्ञान-गाईंच्या स्तनांमध्ये कधी कोणास सहसा न मिळणारे व प्रकाशमान ज्ञानामृत सार गर्भित करून ठेवून दिले आहे. ॥ ४ ॥


इन्द्रा॑सोमा यु॒वम॒ङ्ग तरु॑त्रमपत्य॒साचं॒ श्रुत्यं॑ रराथे ।
यु॒वं शुष्मं॒ नर्यं चर्ष॒णिभ्यः॒ सं वि॑व्यथुः पृतना॒षाह॑मुग्रा ॥ ५ ॥

इन्द्रासोमा युवं अङ्ग तरुत्रं अपत्यऽसाचं श्रुत्यं रराथे इति ।
युवं शुष्मं नर्यं चर्षणिऽभ्यः सं विव्यथुः पृतनाऽसहं उग्रा ॥ ५ ॥

हे इंद्र व सोमदेवांनो, तुम्ही कुल (गोत्र, देश, जगत्) तारक, सत्कीर्तिमंत, असे सुपुत्रासारखे प्रजाधन आम्हाला - तुमच्या भक्ताला - दिले आहे. हे देवांनो, तुम्ही आपल्या विचारवान भक्तांना शत्रूंच्या वाटेल तेवढ्या सैन्याशी सामना करून लढण्यासारखे आर्य श्रेष्ठ कुलीन पुरुषांना शोभण्यासारखे उचित बळ भक्तांच्या संघशक्तींत मिसळून ठेवले आहे. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७३ ( बृहस्पती सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - बृहस्पती : छंद - त्रिष्टुभ्


यो अ॑द्रि॒भित्प्र॑थम॒जा ऋ॒तावा॒ बृह॒स्पति॑राङ्गिर॒सो हवि॒ष्मा॑न् ।
द्वि॒बर्हज्मा प्राघर्म॒सत्पि॒ता न॒ आ रोद॑सी॒ वृष॒भो रो॑रवीति ॥ १ ॥

यः अद्रिऽभित् प्रथमऽजा ऋतऽवा बृहस्पतिः आङ्गिरसः हविष्मान् ।
द्विबर्हऽज्मा प्राघर्मऽसत् पिता नः आ रोदसी इति वृषभः रोरवीति ॥ १ ॥

जो मेघरूप, अथवा भक्त-संकटरूप पर्वतांचे विदारण करणारा, प्रजापति देवाचे प्रथम संतान, सत्यप्रतिज्ञ, अंगिरसपुत्र, यज्ञभागाधिकारी, दोन्ही लोकांमधून गमन करणारा, अत्यंत देदीप्यमान, कामवर्षक, महान् लोकाधिपती, आमच्या सर्वांचा पिता बृहस्पती देव आहे, तो रोदसी देवीला मोठ्याने गर्जना करून ओरडत परमेश्वराविषयी सांगत आहे. ॥ १ ॥


जना॑य चि॒द्य ईव॑त उ लो॒कं बृह॒स्पति॑र्दे॒वहू॑तौ च॒कार॑ ।
घ्नन्वृ॒त्राणि॒ वि पुरो॑ दर्दरीति॒ जय॒ञ्च्छत्रूँ॑र॒मित्रा॑न्पृ॒त्सु साह॑न् ॥ २ ॥

जनाय चित् यः ईवत ऊं इति लोकं बृहस्पतिः देवऽहूतौ चकार ।
घ्नन् वृत्राणि वि पुरः दर्दरीति जयन् शत्रून् अमित्रान् पृत्ऽसु सहन् ॥ २ ॥

आणि हा जो महान् लोकाधिपति बृहस्पती देव आहे हा देवांच्या यज्ञार्थ निमंत्रणामध्ये पाचारिला जातो. ह्याने आपल्या भजकांकरितां लोकोपलोक निर्माण केले आहेत. ह्याने वृत्रासुराला मारून, लढाईंत शत्रूंला जिंकून आणि वैर्‍यांच्या मार्‍याला सहन करून अज्ञानांधकारमय शत्रूंच्या नगरांचा कामक्रोधदूषित बुद्धिरूप गुफेचा विध्वंस केला. ॥ २ ॥


बृह॒स्पतिः॒ सम॑जय॒द्वसू॑नि म॒हो व्र॒जान् गोम॑तो दे॒व ए॒षः ।
अ॒पः सिषा॒सन्त्स्व१॒प्रतीतो॒ बृह॒स्पति॒र्हन्त्य॒मित्र॑म॒र्कैः ॥ ३ ॥

बृहस्पतिः सं अजयत् वसूनि महः व्रजान् गोऽमतः देवः एषः ।
अपः सिसासन् स्वः अप्रतिऽइतः बृहस्पतिः हन्ति अमित्रं अर्कैः ॥ ३ ॥

ह्या महान् लोकाधिपति बृहस्पती देवाने संग्रामामध्ये पुष्कळ धनदौलत आणि किरण धेनुसंयुक्त नाना मंदिरे जिंकून घेतली आहेत. अहो, हा देव मोठ्या महत्वाचा आहे. आकाशोदकाचीही लूट ह्याने मिळविली. हा अप्रतिद्वंद्व वीर आहे. अहो हा बृहस्पती देव ऋङ्‍मय स्तोत्रांच्या योगेंकरून भक्तांच्या शत्रूंचे निवारण करतो. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७४ ( सोमारुद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - सोमारुद्र : छंद - त्रिष्टुभ्


सोमा॑रुद्रा॒ धा॒रयेथामसु॒र्यं१॒ प्र वा॑मि॒ष्टयोऽर॑मश्नुवन्तु ।
दमे॑दमे स॒प्त रत्ना॒ दधा॑ना॒ शं नो॑ भूतं द्वि॒पदे॒ शं चतु॑ष्पदे ॥ १ ॥

सोमारुद्रा धारयेथां असुर्यं प्र वां इष्टयः अरं अश्नुवन्तु ।
दमेऽदमे सप्त रत्ना दधाना शं नः भूतं द्विऽपदे शं चतुःऽपदे ॥ १ ॥

हे सोम व रुद्र देवतांनो, तुम्ही आम्हांमध्ये तुमचे असुर संहारकारी बल मोठ्या प्रमाणावर धारण करा. हे देवांनो, आमचे यज्ञयाग निर्विघ्न चालवून त्यांचा आपण यथेच्छ भोग घ्या. अहो, ज्याअर्थी तुम्ही घरोघर, देशोदेशी किंवा प्रत्येक लोकांत सदैश्वर्यरत्न धारण करणारे देव आहांत त्याअर्थी तुम्ही आपल्या द्विपाद् चतुष्पाद प्राण्यांना कल्याणप्रद व्हा. ॥ १ ॥


सोमा॑रुद्रा॒ वि वृ॑हतं॒ विषू॑ची॒ममीवा॒ या नो॒ गय॑मावि॒वेश॑ ।
आरे बा॑धेथां॒ निर्‌ऋतिं परा॒चैर॒स्मे भ॒द्रा सौ॑श्रव॒सानि॑ सन्तु ॥ २ ॥

सोमारुद्रा वि वृहतं विषूचीं अमीवा या नः गयं आऽविवेश ।
आरे बाधेथां निर्‌ऋतिं पराचैः अस्मे इति भद्रा सौश्रवसानि सन्तु ॥ २ ॥

हे सोमरुद्र देवांनो, जो आमच्या घरांत, देशांत महामारी सारखा घुसला आहे, तो दुष्ट संसर्गजन्य महारोग आमच्या घरांतून बाहेर घालवा. अलक्ष्मी किंवा यमराजाची अकाल भावना आम्हांपासून दूरच्या दूरच तुमच्या कृपेने निवारण होवो; आणि आमची जेणेंकरून सर्वत्र कीर्ति गाइली जाईल अशी आमच्या हातून जगद् उपकरक सत्कार्य घडून येवोत. ॥ २ ॥


सोमा॑रुद्रा यु॒वमे॒तान्य॒स्मे विश्वा॑ त॒नूषु॑ भेष॒जानि॑ धत्तम् ।
अव॑ स्यतं मु॒ञ्चतं॒ यन्नो॒ अस्ति त॒नूषु॑ ब॒द्धं कृतमेनो॑ अ॒स्मत् ॥ ३ ॥

सोमारुद्रा युवं एतानि अस्मे इति विश्वा तनूषु भेषजानि धत्तम् ।
अव स्यतं मुञ्चतं यत् नः अस्ति तनूषु बद्धं कृतं एनः अस्मत् ॥ ३ ॥

हे सोमदेवसहित रुद्रदेवतांनो, तुम्ही आमच्या शरीरांमध्येही क्षयातिसारादि महारोगांवरील सकल औषधे धारण करा. जो कोणता रोग आमच्या शरीरांत बद्धमूल दृढ झाला असेल, अथवा जे जे म्हणून कांही पाप आम्ही केले असेल, ते झाडून सारे आमचे रोग तुम्ही आम्हांपासून दूर घालवून द्या आणि त्या पापांपासून आम्हांला मुक्त करा. ॥ ३ ॥


ति॒ग्मायु॑धौ ति॒ग्महे॑ती सु॒शेवौ॒ सोमा॑रुद्रावि॒ह सु मृ॑ळतं नः ।
प्र नो॑ मुञ्चतं॒ वरु॑णस्य॒ पाशा॑द् गोपा॒यतं॑ नः सुमन॒स्यमा॑ना ॥ ४ ॥

तिग्मऽआयुधौ तिग्महेती इति तिग्मऽहेती सुऽशेवौ सोमारुद्रौ इह सु मृळतं नः ।
प्र नः मुञ्चतं वरुणस्य पाशात् गोपायतं नः सुऽमनस्यमाना ॥ ४ ॥

हे तीक्ष्णायुधधारी, हे तीव्रशस्त्रसंयुक्त, हे भक्तसुखप्रद सोम व रुद्र देवांनो, तुम्ही ह्या आमच्या यज्ञकार्यामध्ये सुसंतुष्ट व सुप्रसन्न व्हा. आम्हाला निद्रा, आलस व यमराज ह्यांच्या पाशांपासून आतां सोडवा. हे सर्व लोकांमध्ये सौमनस्य परस्पर प्रेम व आदरबुद्धि उत्पन्न करून देणार्‍या देवांनो, तुम्ही आतां आमचे संरक्षण करा. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७५ ( भरद्वाज ऋषिसमुदाय सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - युद्धशस्त्रे : छंद - अनुष्टुभ्, पंक्ति, त्रिष्टुभ्


जी॒मूत॑स्येव भवति॒ प्रतीकं॒ यद्व॒र्मी याति॑ स॒मदा॑मु॒पस्थे॑ ।
अनाविद्धया त॒न्वा॑ जय॑ त्वं स त्वा॒ वर्मणो महिमा॒ पि॑पर्तु ॥ १ ॥

जीमूतस्य इव भवति प्रतीकं यत् वर्मी याति सऽमदां उपस्थे ।
अनाविद्धया तन्वा जय त्वं सः त्वा वर्मणः महिमा पिपर्तु ॥ १ ॥

रणदेवतेच्या अंकावर आरूढ होण्यास - लढाईमध्ये शत्रूंच्या समोर जाण्यास जेव्हां एखादा क्षत्रिय वीर राजा चिलखत धारण करून निघतो, तेव्हां तो जलरूप उत्साहबलाने भरलेल्या मेघासारखा असतो. हे क्षत्रिय वीरा, शत्रूचे बाण शरीराला न लागू देतां तू शत्रूला जिंकून ये. हे गोब्राह्मण प्रतिपालक राजा, हे उत्कृष्ट कवच चिलखत तुझे शत्रूंच्या आयुधांपासून संग्रामांत संरक्षण करो. ॥ १ ॥


धन्व॑ना॒ गा धन्व॑ना॒जिं ज॑येम॒ धन्व॑ना ती॒व्राः स॒मदो जयेम ।
धनुः॒ शत्रो॑रपका॒मं कृ॑णोति॒ धन्व॑ना॒ सर्वाः प्र॒दिशो॑ जयेम ॥ २ ॥

धन्वना गाः धन्वना आजिं जयेम धन्वना तीव्राः सऽमदः जयेम ।
धनुः शत्रोः अपऽकामं कृणोति धन्वना सर्वाः प्रऽदिशः जयेम ॥ २ ॥

धनुष्याच्या योगेकरून आपण पृथ्वी कमावूं या. ह्या धनुष्यबाणांनी आपण ह्या संग्रामांत जय पावूं. धनुष्याच्या योगेकरून आपण महाभयंकर, अतिबलसंपन्न अशा शत्रूंनाही जिंकून घेऊ. आपल्या धनुष्य शत्रूंच्या इच्छांना अपायकारी होवो. अहो ह्या धनुष्याने आपण चारही दिशांमध्ये सर्व जगभर आपला विजय संपादन करूं चला. ॥ २ ॥


व॑क्ष्यन्ती॒वेदा ग॑नीगन्ति॒ कर्णं॑ प्रि॒यं सखा॑यं परिषस्वजा॒ना ।
योषे॑व शिङ्क्ते॒ वितताधि॒ धन्व॒न् ज्या इ॒यं सम॑ने पा॒रय॑न्ती ॥ ३ ॥

वक्ष्यन्तीऽइव इत् आ गनीगन्ति कर्णं प्रियं सखायं परिऽसस्वजाना ।
योषाऽइव शिङ्क्ते विऽतता अधि धन्वन् ज्या इयं समने पारयन्ती ॥ ३ ॥

कानांत हळूच सांगण्याकरितांच जणों काय इकडे येण्यास निघालेल्या, आपल्या प्रिय पतीला दृढालिंगन देणार्‍या, विस्तृत झालेल्या आणि संग्रामामध्ये विजय मिळण्याला कारणीभूत होणार्‍या कुलस्त्रियेप्रमाणे ही धनुष्यास लिपटलेली दोरी बघा कशी कर्ण मधुर ध्वनि करीत आहे. ॥ ३ ॥


ते आ॒चर॑न्ती॒ सम॑नेव॒ योषा॑ मा॒तेव॑ पु॒त्रं बि॑भृतामु॒पस्थे॑ ।
अप॒ शत्रू॑न् विध्यतां संविदा॒ने आर्त्नी॑ इ॒मे वि॑ष्फुरन्ती अ॒मित्रा॑न् ॥ ४ ॥

ते इति आचरन्ती इत्याऽचरन्ती समनाऽइव योषा माताऽइव पुत्रं बिभृतां उपऽस्थे ।
अप शत्रून् विध्यतां संविदाने इति संऽविदाने आर्त्नी इति इमे इति विष्फुरन्ती इति विऽस्फुरन्ती अमित्रान् ॥ ४ ॥

धनुष्याची ही दोन टोंके पतिगतानुकुल साध्वी स्त्रीप्रमाणे किंवा पुत्रवत्सल मातेप्रमाणे सदा परस्परांजवळ येत राहून आमच्याद्वारे तुम्हां विप्रांचे रक्षण करोत. लढाईमध्ये वीरांच्या निंदकांना आपल्या आवाजांनी झिडकारणारी ही धनुष्याच्या दोरीची दोन्ही टोकें आम्हांकडून शत्रूंवर अचूक नेम मारवोत. ॥ ४ ॥


बह्वी॒नां पि॒ता ब॒हुर॑स्य पु॒त्रश्चि॒श्चा कृ॑णोति॒ सम॑नाव॒गत्य॑ ।
इ॒षुधिः सङ्काः॒ पृत॑नाश्च॒ सर्वाः पृष्ठे निन॑द्धो जयति॒ प्रसू॑तः ॥ ५ ॥

बह्वीनां पिता बहुः अस्य पुत्रः चिश्चा कृणोति समना अवऽगत्य ।
इषुऽधिः सङ्काः पृतनाः च सर्वाः पृष्ठे निऽनद्धः जयति प्रऽसूतः ॥ ५ ॥

हा भाता पुष्कळ बाणांचा पालनकर्ता पिता आहे. अहो, ह्याला पुष्कळ बाणरूप पोरे आहेत. हा बाणांचा निधि लढाईचे शास्त्र जाणत असून ह्यांतून बाण उपसतांना शत्रूंना खिसगणतींत मानण्यासारखा व वीरांना उत्साहकारी असा ’चिश्चा’ असा शब्द निघतो. हा बाणांचा साठा वीरांच्या पाठीशी दृढ राहून त्यांना प्रोत्साहन देतो व त्यांना आपल्या शरीरापासून तीरही पुरवितो. अहो, भाता निश्चयेंकरून शत्रूच्या एकत्र झालेल्या सैनिकांचा पाडाव करील. ॥ ५ ॥


रथे॒ तिष्ठ॑न् नयति वा॒जिनः॑ पु॒रो यत्र॑यत्र का॒मय॑ते सुषार॒थिः ।
अ॒भीशूनां महि॒मानं॑ पनायत॒ मनः॑ प॒श्चादनु य॒च्छन्ति र॒श्मयः॑ ॥ ६ ॥

रथे तिष्ठन् नयति वाजिनः पुरः यत्रऽयत्र कामयते सुऽसारथिः ।
अभीशूनां महिमानं पनायत मनः पश्चात् अनु यच्छन्ति रश्मयः ॥ ६ ॥

हा उत्तम सारथी रथावर बसून आपल्या इच्छेप्रमाणे घोड्यांना पुढें पुढें पळवीत आहे; आणि आपल्या झटक्यांचा इशारा जाणवीत घोड्यांचे दोर त्यांच्या पाठीमागून पळत सुटले आहेत. ॥ ६ ॥


ती॒व्रान् घोषा॑न् कृण्वते॒ वृष॑पाण॒योऽश्वा॒ रथे॑भिः स॒ह वा॒जय॑न्तः ।
अ॒व॒क्राम॑न्तः॒ प्रपदैर॒मित्रा॑न् क्षि॒णन्ति॒ शत्रून् रन॑पव्ययन्तः ॥ ७ ॥

तीव्रान् घोषान् कृण्वते वृषऽपाणयः अश्वाः रथेभिः सह वाजयन्तः ।
अवऽक्रामन्तः प्रऽपदैः अमित्रान् क्षिणन्ति शत्रून् अनपऽव्ययन्तः ॥ ७ ॥

रथाला घेऊन मोठ्या उत्साहाने दौड मारणारे, मोठमोठ्या ख्रुरांचे व लांब लांब पायांचे असे हे घोडे जोराचा शब्द करीत खिंकाळत आहेत. लांब उड्या घेऊन शत्रू सैन्यावर आक्रमण करणारे व लढाईत कधींही मागे पाय न घेणारे असे हे घोडे शत्रूंना पायांखाली तुडवीत चालले आहेत. ॥ ७ ॥


र॒थ॒वाहनं ह॒विरस्य॒ नाम॒ यत्रायु॑धं॒ निहि॑तमस्य॒ वर्म॑ ।
तत्रा॒ रथ॒मुप॑ श॒ग्मं स॑देम वि॒श्वाहा॑ व॒यं सु॑मन॒स्यमा॑नाः ॥ ८ ॥

रथऽवाहनं हविः अस्य नाम यत्र आयुधं निऽहितं अस्य वर्म ।
तत्रा रथं उप शग्मं सेदेम विश्वाहा वयं सुऽमनस्यमानाः ॥ ८ ॥

ह्या राजाच्या ज्या रथामध्ये शत्रूकडून लुटीने मिळविलेले नाना प्रकारचे घृत पक्वान्नादि उपभोग्य पदार्थ, तसेच नाना प्रकारची शस्त्रास्त्रें, व कवचे ठेविली असतील त्या रथामध्ये आपण बसू या. कारण आम्ही ब्राह्मणलोक सदा सर्वदा सुखशांति व मनाची सहजस्थिति अनुभवणारे आहोंत. ॥ ८ ॥


स्वा॒दु॒षं॒सदः॑ पि॒तरो॑ वयो॒धाः कृ॑च्छ्रेश्रितः॒ शक्ती॑वन्तो गभी॒राः ।
चि॒त्रसे॑ना॒ इषु॑बला॒ अमृ॑ध्राः स॒तोवी॑रा उ॒रवो व्रातसा॒हाः ॥ ९ ॥

स्वादुऽसंसदः पितरः वयःऽधाः कृच्छ्रेऽश्रितः शक्तीऽवन्तः गभीराः ।
चित्रऽसेना इष्ऽउबला अमृध्राः सतःऽवीरा उरवः व्रातऽसाहाः ॥ ९ ॥

हे रथपाल गोप लोक शत्रूंचे गोड गोड पदार्थ लुटून आणणारे, दानकार्यांत उदार, संकटकाळी मित्रांना आश्रय देणारे, सशक्त, गंभीरवृत्तीचे, स्वतःसिद्ध बहाद्दर, मोठे धिप्पाड आणि शत्रूंवर चाल करून जाण्यास तयार असे आहेत. ॥ ९ ॥


ब्राह्म॑णासः॒ पित॑रः॒ सोम्या॑सः शि॒वे नो॒ द्यावा॑पृथि॒वी अ॑ने॒हसा॑ ।
पू॒षा नः॑ पातु दुरि॒तादृतावृ॑धो रक्षा॒ माकि॑र्नो अ॒घशंस ईशत ॥ १० ॥

ब्राह्मणासः पितरः सोम्यासः शिवे इति नः द्यावापृथिवी इति अनेहसा ।
पूषा नः पातु दुःऽइतात् ऋतऽवृधः रक्ष माकिः नः अघऽशंसः ईशत ॥ १० ॥

हे ब्राह्मणांनो, तुम्ही सोमरसाचे संपादक किंवा शांतिसुखाचे उपभोक्ते आहांत, हे आम्ही जाणून आहोंत. हे निष्पाप द्यावापृथिवींनो, आम्ही आरंभिलेल्या या संग्रामांत तुम्ही आम्हांला कल्याणकारी व्हा. भो भो सत्यपथवर्धक ब्राह्मणांनो, आपल्या आशीर्वादाने चराचरपोषक पुषा देव आमचे ह्या लढाईत सर्वतः संरक्षण करो. अहो अध्वर्युंनो, ही जी लढाई आम्ही आरंभिली आहे, ह्याचे कारण तुम्ही जाणतांच, की आपला निंदकांचे राज्य आपल्यावर न राहो. ॥ १० ॥


सु॒प॒र्णं व॑स्ते मृ॒गो अ॑स्या॒ दन्तो॒ गोभिः॒ सन्न॑द्धा पतति॒ प्रसू॑ता ।
यत्रा॒ नरः॒ सं च॒ वि च॒ द्रव॑न्ति॒ तत्रा॒स्मभ्य॒मिष॑वः॒ शर्म यंसन् ॥ ११ ॥

सुऽपर्णं वस्ते मृगः अस्याः दन्तः गोभिः संऽनद्धा पतति प्रऽसूता ।
यत्र नरः सं च वि च द्रवन्ति तत्र अस्मभ्यं इषवः शर्म यंसन् ॥ ११ ॥

ह्या तीराच्या सदा सरळमार्गानें जाणार्‍या अग्रभागाला सुतीक्ष्ण पान बसविले आहे. हा बाण भात्यांतून निघून धनुष्यदोरीवर चढून मग शत्रूंच्या मर्म स्थळावर जाऊन आदळतो. ज्या ज्या ठिकाणी घोळका होतो किंवा पळापळ सुरू होते, अशा ठिकाणी ह्या बाणरूपी देवता आम्हांला कल्याणप्रद होवोत. ॥ ११ ॥


ऋजी॑ते॒ परि वृङ्‌धि॒ नोऽश्मा॑ भवतु नस्त॒नूः ।
सोमो॒ अधि॑ ब्रवीतु॒ नोऽदि॑तिः॒ शर्म यच्छतु ॥ १२ ॥

ऋजीते परि वृंग्धि नः अश्मा भवतु नः तनूः ।
सोमः अधि ब्रवीतु नः अदितिः शर्म यच्छतु ॥ १२ ॥

हे सरळ जाणार्‍या तीरा, तू आम्हांला वाढव, आम्हांला स्फुरण दे. आमची शरीरे दगडाप्रमाणे मजबूत होवोत. सोमदेव आमच्याच बाजूने बोलो. अदिति देवता आमचे कल्याण करो. ॥ १२ ॥


आ ज॑ङ्घन्ति॒ सान्वे॑षां ज॒घनाँ॒ उप॑ जिघ्नते ।
अश्वा॑जनि॒ प्रचे॑त॒सोऽश्वान् स॒मत्सु॑ चोदय ॥ १३ ॥

आ जङ्घन्ति सानु एषां जघनान् उप जिघ्नते ।
अश्वऽअजनि प्रऽचेतसः अश्वान् समत्ऽसु चोदय ॥ १३ ॥

ह्या चाबकांचे अग्रभाग बघा किती तीव्र मारा करतात. अहो पण चाबूक पळणार्‍या घोड्यांना हळूच मारतात. हे घोड्याला अधिकाधिक पळविण्यास लावणार्‍या चाबका, ह्या महाबुद्धिमान घोड्यांना घनघोर लढाईमध्ये शिरण्याची प्रेरणा कर. ॥ १३ ॥


अहि॑रिव भो॒गैः पर्ये॑ति बा॒हुं ज्याया॑ हे॒तिं प॑रि॒बाध॑मानः ।
ह॒स्त॒घ्नो विश्वा॑ व॒युना॑नि वि॒द्वान् पुमा॒न् पुमांसं॒ परि॑ पातु वि॒श्वतः॑ ॥ १४ ॥

अहिःऽइव भोगैः परि एति बाहुं ज्यायाः हेतिं परिऽबाधमानः ।
हस्तऽघ्नः विश्वा वयुनानि विद्वान् पुमान् पुमांसं परि पातु विश्वतः ॥ १४ ॥

हे हस्तघ्न, (एक प्रकारचे चामड्याचे सशस्त्र कंकण), सर्पावर जशी कात त्याप्रमाणे तुम्ही आमच्या दंडाला घेरा दिला आहे. धनुष्याच्या दोरीला कापण्याचे तुला महत् कष्ट पडतात. अखिल जगांतील ज्ञान तुला आहे, उत्तम वैज्ञानिक पद्धतीने तू बनविला गेला आहेस. तू पुरुष आहेस. एतदर्थ ह्या आमच्या वीर राजा यजमानाचा व माझा तू सर्वप्रकारे सांभाळ कर. ॥ १४ ॥


आला॑क्ता॒ या रुरु॑शी॒र्ष्ण्यथो॒ यस्या॒ अयो॒ मुख॑म् ।
इदं प॒र्जन्य॑रेतस॒ इष्वै॑ दे॒व्यै बृहन्नमः॑ ॥ १५ ॥

आलऽअक्ता या रुरुऽशीर्ष्णी अथो इति यस्या अयः मुखम् ।
इदं पर्जन्यऽरेतस इष्वै देव्यै बृहत् नमः ॥ १५ ॥

जी विषाने माखलेली, हरिणशृंगाप्रमाणे अणिदार व लखलखित, जिच्या अग्रभागी पोलाद बसविले आहे, व पर्जन्य बीजभूत अशा ’इषु’ (बाणरूप) महादेवीला हा माझा साष्टांग नमस्कार असो. ॥ १५ ॥


अव॑सृष्टा॒ परा॑ प॒त शर॑व्ये॒ ब्रह्म॑संशिते ।
गच्छा॒मित्रा॒न्प्र प॑द्यस्व॒ मामीषां॒ कं च॒नोच्छि॑षः ॥ १६ ॥

अवऽसृष्टा परा पत शरव्ये ब्रह्मऽसंशिते ।
गच अमित्रान् प्र पद्यस्व मा अमीषां कं चन उत् शिषः ॥ १६ ॥

हे ब्रह्म (मोठ्या) स्तोत्रांनी प्रार्थित शरदेवते, तुला जेव्हां आम्ही फेंकू, तेव्हां तू नेमकी आमच्या शत्रूंवर जाऊन पड. जा देवी जा. आमच्या शत्रूंनाच नेमकें गाठ. हे तीर देवते, तू त्या आमच्या शत्रूंमधून एकाला देखील शिल्लक ठेवू नको. सर्व शत्रूंचा पूर्ण संहार कर. ॥ १६ ॥


यत्र॑ बा॒णाः स॒म्पत॑न्ति कुमा॒रा वि॑शि॒खा इ॑व ।
तत्रा॑ नो॒ ब्रह्म॑ण॒स्पति॒रदि॑तिः शर्म॑ यचतु वि॒श्वाहा॒ शर्म॑ यच्छतु ॥ १७ ॥

यत्र बाणाः संऽपतन्ति कुमाराः विशिखाःऽइव ।
तत्र नः ब्रह्मणः पतिः अदितिः शर्म यच्छतु विश्वाहा शर्म यच्छतु ॥ १७ ॥

शेंडी ठेविलेल्या पोरांप्रमाणे हे बाण जेथे पडतील त्या त्या ठिकाणांहून ब्रह्मपति भगवान् आम्हाला सुख संप्रदान करो, आणि भगवती देवी अदितिही आम्हांकरितां सदा सर्वदा कल्याणप्रदच राहो. ॥ १७ ॥


मर्माणि ते॒ वर्म॑णा चादयामि॒ सोम॑स्त्वा॒ राजा॒मृते॒नानु॑ वस्ताम् ।
उ॒रोर्वरीयो॒ वरु॑णस्ते कृणोतु॒ जय॑न्तं॒ त्वानु॑ दे॒वाम॑दन्तु ॥ १८ ॥

मर्माणि ते वर्मणा छादयामि सोमः त्वा राजा अमृतेन अनु वस्ताम् ।
उरोः वरीयः वरुणः ते कृणोतु जयन्तं त्वा अनु देवाः मदन्तु ॥ १८ ॥

हे राजा, तुझ्या मर्मस्थानांवर मी कवच चढवितो. हे राजा, श्रीसोमदेव राजा तुला आपल्या अमृतरसाने परिधान करो. श्रीमान् वरुण देव तुला दीर्घछातीचा (महान् ऐश्वर्याचा) करो. हे राजा, तुझा जय झाल्यावर देव तुझ्याद्वारे यज्ञकर्मांमध्ये संतुष्ट होवोत. ॥ १८ ॥


यो॒ नः स्वो अर॑णो॒ यश्च॒ निष्ट्यो॒ जिघांसति ।
दे॒वास्तंसर्वे धूर्वन्तु ब्रह्म॒ वर्म॒ ममान्त॑रम् ॥ १९ ॥

यः नः स्वः अरणः यः च निष्ट्यः जिघांसति ।
देवाः तं सर्वे धूर्वन्तु ब्रह्म वर्म मम अन्तरम् ॥ १९ ॥

जो स्वकीय, अथवा परकीय, अथवा अति दूर देशस्थ शत्रु आम्हाला मारू पहात असेल, त्या दुष्टाला सकल देव एथून धुडकावून लावोत. देव आमच्या शत्रूंचा धुव्वा उडवून देवोत. हे विराट स्तोत्र माझे अभ्यंतरीय कवच आहे. ॥ १९ ॥


॥ इति षष्ठं मण्डलं समाप्तं ॥
ॐ तत् सत्


GO TOP