PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त ६१ ते ७०

ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६१ ( सरस्वती सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - सरस्वती : छंद - जगती, गायत्री, त्रिष्टुभ्


इ॒यम॑ददाद्रभ॒समृ॑ण॒च्युतं॒ दिवो॑दासं वध्र्य॒श्वाय॑ दा॒शुषे॑ ॥
या शश्व॑न्तमाच॒खादा॑व॒सं प॒णिं ता ते॑ दा॒त्राणि॑ तवि॒षा स॑रस्वति ॥ १ ॥

इयं अददात् रभसं ऋणऽच्युतं दिवःऽदासं वध्रिऽअश्वाय दाशुषे ।
या शश्वंतं आऽचख अदावसं पणिं ता ते दात्राणि तविषा सरस्वति ॥ १ ॥

बेगुमान आणि पूर्वीचे सर्व उसने फेडून टाकणारा असा ’दिवोदास’ नांवाचा पुत्र वध्रयश्व नामक धर्मपरायण भक्ताला हिनेच दिला, ज्याच्या जोराअर ’अबस’ नामक एकंदर दान पराङ्‍मुख कंजुषाचा सप्पा उडाला, तेव्हां हे सरस्वती, अशा प्रकारच्या तुझ्या देणग्या हिमतीच्या खर्‍याच. ॥ १ ॥


इ॒यं शुष्मे॑भिर्बिस॒खा इ॑वारुज॒त्सानु॑ गिरी॒णां त॑वि॒षेभि॑रू॒र्मिभिः॑ ॥
पा॒रा॒व॒त॒घ्नीमव॑से सुवृ॒क्तिभिः॒ सर॑स्वती॒मा वि॑वासेम धी॒तिभिः॑ ॥ २ ॥

इयं शुष्मेभिः बिसखाःऽइव अरुजत् सानु गिरीणां तविषेभिः ऊर्मिऽभिः ।
पारावतऽघ्नीं अवसे सुवृक्तिऽभिः सरस्वतीं आ विवासेम धीतिऽभिः ॥ २ ॥

कमलाचे कोंब उपटून टाकणार्‍या मनुष्याप्रमाणे ही सहज लीलेने आपल्या त्वेषाने हिमतीने आणि उसळीसरशी पर्वतांची शिखरें ढासळून देते. अशा ह्या "पारावतांचा" नाश करणार्‍या सरस्वतीची सेवा शुद्ध भक्तीने आणि ध्यान निष्ठेने आम्ही तिचा अनुग्रह व्हावा म्हणून करीत आहो. ॥ २ ॥


सर॑स्वति देव॒निदो॒ नि ब॑र्हय प्र॒जां विश्व॑स्य॒ बृस॑यस्य मा॒यिनः॑ ॥
उ॒त क्षि॒तिभ्यो॒ऽवनी॑रविन्दो वि॒षमे॑भ्यो अस्रवो वाजिनीवति ॥ ३ ॥

सरस्वति देवऽनिदः नि बर्हय प्रऽजां विश्वस्य बृसयस्य मायिनः ।
उत क्षितिऽभ्यः अवनीः अविंदः विषं एभ्यः अस्रवः वाजिनीऽवति ॥ ३ ॥

हे सरसवती, ईश्वराची निंदा करणारे दुरात्मे आणि "बृंसया"ची एकंदर कपटी प्रजा ह्याचा तू समूळ उच्छेद कर. आपआपल्या घरी समाधानाने नांदणार्‍या भक्तांकरितां तू उदकाचे प्रवाह शोधून काढलेस, पण सत्व सामर्थ्यशालिनी, त्यांच्या उदकांतील विष पार वाहून जाईल असे कर. ॥ ३ ॥


प्र णो॑ दे॒वी सर॑स्वती॒ वाजे॑भिर्वा॒जिनी॑वती ॥ धी॒नाम॑वि॒त्र्यवतु ॥ ४ ॥

प्र नः देवी सरस्वती वाजेभिः वाजिनीऽवती । धीनां अवित्रि अवतु ॥ ४ ॥

सत्वगुणानेच सत्व सामर्थ्यमंडित अशी सरस्वती आमच्या बुद्धिवर आपली पाखर घालणारी देवी आमच्यावर पूर्ण अनुग्रह करो. ॥ ४ ॥


यस्त्वा॑ देवि सरस्वत्युपब्रू॒ते धने॑ हि॒ते ॥ इन्द्रं॒ न वृ॑त्र॒तूर्ये॑ ॥ ५ ॥

यः त्वा देवि सरस्वति उपऽब्रूते धने हिते । इंद्रं न वृत्रऽतूर्ये ॥ ५ ॥

घोर संग्राम सुरू असता, वृत्र हननार्थ इंद्राला आळवावे त्याप्रमाणे हे देवी सरसवती, तुला जो पाचारण करतो त्याचे तू संरक्षणच करतेस. ॥ ५ ॥


त्वं दे॑वि सरस्व॒त्यवा॒ वाजे॑षु वाजिनि ॥ रदा॑ पू॒षेव॑ नः स॒निम् ॥ ६ ॥

त्वं देवि सरस्वति अवा वाजेषु वाजिनि । रद पूषाऽइव नः सनिं ॥ ६ ॥

हे सत्वाढ्य सरस्वती देवी, सत्व लाभार्थ चाललेल्या झटापटीत तू आमच्यावर अनुग्रह कर आणि ’पूषा’ प्रमाणे आमचा संचित निधान तू खणून बाहेर आण. ॥ ६ ॥


उ॒त स्या नः॒ सर॑स्वती घो॒रा हिर॑ण्यवर्तनिः ॥ वृ॒त्र॒घ्नी व॑ष्टि सुष्टु॒तिम् ॥ ७ ॥

उत स्या नः सरस्वती घोरा हिरण्यऽवर्तनिः । वृत्रऽघ्नी वष्टि सुऽस्तुतिं ॥ ७ ॥

ही उग्रस्वरूप, वृत्रनाशक सरस्वती, जिच्या रथाची चाके सुवर्णाची आहेत अशी ही देवी, आमच्या चित्तवेधक स्तुतिंच्या श्रवणाविषयी फार लालस असते. ॥ ७ ॥


यस्या॑ अन॒न्तो अह्रु॑तस्त्वे॒षश्च॑रि॒ष्णुर॑र्ण॒वः ॥ अम॒श्चर॑ति॒ रोरु॑वत् ॥ ८ ॥

यस्या अनंतः अह्रुतः त्वेषः चरिष्णुः अर्णवः । अमः चरति रोरुवत् ॥ ८ ॥

तिचा सामर्थ्योदधि अमर्याद, अनिर्बंध, खवळून उसळणारा आणि मोठा भयंकर आहे, तो गर्जना करून जोराने चोहोंकडे पसरतो. ॥ ८ ॥


सा नो॒ विश्वा॒ अति॒ द्विषः॒ स्वसॄ॑र॒न्या ऋ॒ताव॑री ॥ अत॒न्नहे॑व॒ सूर्यः॑ ॥ ९ ॥

सा नः विश्वाः अति द्विषः स्वसॄः अन्यः ऋतऽवरी । अतन् अहाऽइव सूर्यः ॥ ९ ॥

त्या सद्धर्म प्रिय सरस्वतीने, सूर्य जसा आपले रश्मिजाल पसरतो, त्याप्रमाणे आम्हांस सर्व द्वेष्ट्यांच्या पार, तिच्या सर्व भगिनींच्या पलिकडे नेऊन पसारा मांडून दिला. ॥ ९ ॥


उ॒त नः॑ प्रि॒या प्रि॒यासु॑ स॒प्तस्व॑सा॒ सुजु॑ष्टा ॥ सर॑स्वती॒ स्तोम्या॑ भूत् ॥ १० ॥

उत नः प्रिया प्रियासु सप्तऽस्वसा सुऽजुष्टा । सरस्वती स्तोम्या भूत् ॥ १० ॥

सर्व प्रिय वस्तूंत प्रिय, सात बहिणींची बहिण अशी ही प्रेमळ सरस्वती, खरोखरच आम्हाला प्रशंसनीय आहे. ॥ १० ॥


आ॒प॒प्रुषी॒ पार्थि॑वान्यु॒रु रजो॑ अ॒न्तरि॑क्षम् ॥ सर॑स्वती नि॒दस्पा॑तु ॥ ११ ॥

आपप्रुषी पार्थिवानि उरु रजः अंतरिक्षं । सरस्वती निदः पातु ॥ ११ ॥

भौतिक रजोलोक आणि अंतराळ आपल्या कांतीने भरून टाकणारी ही सरस्वती लोकापवादापासून आमचे रक्षण करो. ॥ ११ ॥


त्रि॒ष॒धस्था॑ स॒प्तधा॑तुः॒ पञ्च॑ जा॒ता व॒र्धय॑न्ती ॥ वाजे॑वाजे॒ हव्या॑ भूत् ॥ १२ ॥

त्रिसधस्था सप्तऽधातुः पंच जाता वर्धयंती । वाजेऽवाजे हव्या भूत् ॥ १२ ॥

ही तिन्ही लोकांत वास करणारी आहे. हिचे तत्व सात प्रकारचे असून पांचही मानवजातींचा ही उत्कर्षच करते. तेव्हां अशा ह्या सरस्वतीला प्रत्येक सात्विक संग्रामांत पाचारण करणे अगदी अवश्य आहे. ॥ १२ ॥


प्र या म॑हि॒म्ना म॒हिना॑सु॒ चेकि॑ते द्यु॒म्नेभि॑र॒न्या अ॒पसा॑म॒पस्त॑मा ॥
रथ॑ इव बृह॒ती वि॒भ्वने॑ कृ॒तोप॒स्तुत्या॑ चिकि॒तुषा॒ सर॑स्वती ॥ १३ ॥

प्र या महिम्ना महिना आसु चेकिते द्युम्नेभिः अन्याः अपसां अपःऽतमा ।
रथःऽइव बृहती विऽभ्वने कृता उपऽस्तुत्या चिकितुषा सरस्वती ॥ १३ ॥

मोठेपणाने, महिम्याने आणि वैभवाने जी ह्या सर्व नद्यांत श्रेष्ठ अशी स्पष्टपणे दृगोच्चर होते. इतर सर्व प्रवाहांमध्ये जिच्या प्रवाहाचा वेग फारच जलद असतो. परमेश्वरा करितां जिचे पात्र रथाप्रमाणे प्रशस्त झाले, ती ज्ञानशालिनी सरस्वती खरोखरच अत्यंत स्तुत्य आहे. ॥ १३ ॥


सर॑स्वत्य॒भि नो॑ नेषि॒ वस्यो॒ माप॑ स्फरीः॒ पय॑सा॒ मा न॒ आ ध॑क् ॥
जु॒षस्व॑ नः स॒ख्या वे॒श्या च॒ मा त्वत्क्षेत्रा॒ण्यर॑णानि गन्म ॥ १४ ॥

सरस्वति अभि नः नेषि वस्यः मा अप स्फरीः पयसा मा नः आ धक् ।
जुषस्व नः सख्या वेश्या च मा त्वत् क्षेत्राणि अरणानि गन्म ॥ १४ ॥

हे सरस्वती, अमोलिक अभीष्ट संपत्तिकडे तू आम्हास ने. तुझ्या आंगावरील दूध तोडून आम्हांस दुर्बल करूं नको, आम्हांस दूर ढकलूं नको. आमची सलगी आणि सेवा ह्यांचे कौतुक कर. आणि तुला सोडून भलत्याच देशांत आम्हांला जाऊ देऊ नको. ॥ १४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६२ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


स्तु॒षे नरा॑ दि॒वो अ॒स्य प्र॒सन्ता॒श्विना॑ हुवे॒ जर॑माणो अ॒र्कैः ॥
या स॒द्य उ॒स्रा व्युषि॒ ज्मो अन्ता॒न्युयू॑षतः॒ पर्यु॒रू वरां॑सि ॥ १ ॥

स्तुषे नरा दिवः अस्य प्रऽसंता अश्विना हुवे जरमाणः अर्कैः ।
या सद्यः उस्रा विऽउषि ज्मः अंतान् युयूषतः परि उरु वरांसि ॥ १ ॥

ह्या आकाशाचे नियंता अश्विनी कुमार देवांची मी प्रार्थना करतो. "अर्क" ऋक्‍स्तोत्रमय प्रार्थनांनी धांवा करून मी त्यांना यज्ञार्थ बोलवितो. हे अश्वी देव असे आहेत की ह्यांनी स्वेच्छेनेच पृथ्वीच्या व आकाशाच्या महाविस्तीर्ण व प्रज्वलित टोकांना आतांच (म्हणजे उजाडतांच) परस्परांपासून अगदी अलग करून ठेवले. ॥ १ ॥


ता य॒ज्ञमा शुचि॑भिश्चक्रमा॒णा रथ॑स्य भा॒नुं रु॑रुचू॒ रजो॑भिः ॥
पु॒रू वरां॒स्यमि॑ता॒ मिमा॑ना॒पो धन्वा॒न्यति॑ याथो॒ अज्रा॑न् ॥ २ ॥

ता यज्ञं आ शुचिऽभिः चक्रमाणा रथस्य भानुं रुरुचुः रजःऽभिः ।
पुरु वरांसि अमिता मिमाना अपः धन्वानि अति याथः अज्रान् ॥ २ ॥

त्या अश्वी देवांनी आपल्या शुद्ध किरणांनी विराट् जगद्‍यज्ञाला चालविले आणि ह्या जगत् रूप रथाच्या प्रभारूप सूर्याला ह्यांनीच सर्वांग सुंदर बनविले. ह्या स्वतः अगाध महिमावंत अश्वी देवांनी आकाशाच्या तेजस्वी परंतु उजाड मैदानालाही व्यापून टाकले. आणि ते एका क्षणांत सदा तरुण अशा उदक प्रवाहाला ओलांडून पार निघून गेले. ॥ २ ॥


ता ह॒ त्यद्व॒र्तिर्यदर॑ध्रमुग्रे॒त्था धिय॑ ऊहथुः॒ शश्व॒दश्वैः॑ ॥
मनो॑जवेभिरिषि॒रैः श॒यध्यै॒ परि॒ व्यथि॑र्दा॒शुषो॒ मर्त्य॑स्य ॥ ३ ॥

ता ह त्यत् वर्तिः यत् अरध्रं उग्रा इत्था धियः ऊहथुः शश्वत् अश्वैः ।
मनःऽजवेभिः इषिरैः शयध्यै परि व्यथिः दाशुषः मर्त्यस्य ॥ ३ ॥

हे असले उग्र अश्वी देव इतके गमनशील आहेत की ह्यांनी आपल्या मनाच्या भरारीप्रमाणे वेगवान व मजबूत घोड्यांच्या योगाने मनुष्यांच्या बुद्धींना निःशेष व कायमचे धरून ठेवले आहे. अशा करितां की उदार व दानशूर भक्ताच्या संकटांनी व बाधांनी जणों अक्षय निद्राच घ्यावी. ॥ ३ ॥


ता नव्य॑सो॒ जर॑माणस्य॒ मन्मोप॑ भूषतो युयुजा॒नस॑प्ती ॥
शुभं॒ पृक्ष॒मिष॒मूर्जं॒ वह॑न्ता॒ होता॑ यक्षत्प्र॒त्नो अ॒ध्रुग्युवा॑ना ॥ ४ ॥

ता नव्यसः जरमाणस्य मन्म उप भूषतः युयुजानसप्तीइतियुयुजानऽसप्ती ।
शुभं पृक्षं इषं ऊर्जं वहंता होता यक्षत् प्रत्नः अध्रुक् युवाना ॥ ४ ॥

त्या सदा तरुण, स्तोतृजनांच्या ध्यानांना शोभा आणणार्‍या, आपले सातही घोडे ज्यांनी सर्वदा भक्ताकडे जाण्याकरितां जुंपूनच ठेविलेले असतात अशा, अतिप्राचीन परंतु स्थिरवयस्क देवांना आमच्या होत्यांनी शुभ (व्रीहि, यव, गोधूमादि) अन्न व तेजस्वी (घृतादि) हविंच्या द्वारे आपल्या हातांनी पूजिले. ॥ ४ ॥


ता व॒ल्गू द॒स्रा पु॑रु॒शाक॑तमा प्र॒त्ना नव्य॑सा॒ वच॒सा वि॑वासे ॥
या शंस॑ते स्तुव॒ते शम्भ॑विष्ठा बभू॒वतु॑र्गृण॒ते चि॒त्ररा॑ती ॥ ५ ॥

ता वल्गूइति दस्रा पुरुशाकऽतमा प्रत्ना नव्यसा वचसा आ विवासे ।
या शंसते स्तुवते शंऽभविष्ठा बभूवतुः गृणते चित्ररातीइतिचित्रऽराती ॥ ५ ॥

त्या अति सुंदर, महान शककर्ते, पुरातन अश्वीनी कुमार देवांची मी नवीन रचलेल्या ह्या माझ्या स्तुति स्तोत्रांच्या योगे यथेच्छ प्रार्थना करीत आहे. हे देव असे आहेत की आपली प्रशंसापूर्वक स्तुति रचणार्‍या भक्ताला हे महा कल्याणप्रद होतात व ती स्तोत्रे निरंतर म्हणणार्‍याला तर हे नाना प्रकारचे ऐश्वर्यच देतात. ॥ ५ ॥


ता भु॒ज्युं विभि॑र॒द्भ्यः स॑मु॒द्रात्तुग्र॑स्य सू॒नुमू॑हथू॒ रजो॑भिः ॥
अ॒रे॒णुभि॒र्योज॑नेभिर्भु॒जन्ता॑ पत॒त्रिभि॒रर्ण॑सो॒ निरु॒पस्था॑त् ॥ ६ ॥

ता भुज्युं विऽभिः अत्ऽभ्यः समुद्रात् तुग्रस्य सूनुं ऊहथु रजःऽभिः ।
अरेणुऽभिः योजनेभिः भुजंता पतत्रिऽभिः अर्णसः निः उपस्थात् ॥ ६ ॥

आपल्या महापुरांच्या स्थानांतूल स्वतः बाहेर येऊन त्यांनी शुद्ध, निर्मल, अतिदूर शीघ्रगमन करणार्‍या घोड्यांच्या योगाने ’तुग्रा’चा पुत्र ’भुज्यु’ला अगाध जलाशया मधून धरून ठेऊन बुडतां बुडतां वाचविले. ॥ ६ ॥


वि ज॒युषा॑ रथ्या यात॒मद्रिं॑ श्रु॒तं हवं॑ वृषणा वध्रिम॒त्याः ॥
द॒श॒स्यन्ता॑ श॒यवे॑ पिप्यथु॒र्गामिति॑ च्यवाना सुम॒तिं भु॑रण्यू ॥ ७ ॥

वि जयुषा रथ्या यातं अद्रिं श्रुतं हवं वृषणा वध्रिऽमत्याः ।
दशस्यंता शयवे पिप्यथुः गां इति च्यवाना सुऽमतिं भुरण्यूइति ॥ ७ ॥

भक्तांच्या बुद्धिला प्रकाशित करणारे हे अश्वी देव यशस्कर मार्गांनी पर्वतावर चढले आहेत, व तेथून हे महाबलाढ्य देव दुर्बळांची हांक ऐकत आहेत. त्यांनी ’शयु’ राक्षसाला मारणाच्या इच्छेनेंच जणों काय दुग्धप्राशन केले आहे. ॥ ७ ॥


यद्रो॑दसी प्र॒दिवो॒ अस्ति॒ भूमा॒ हेळो॑ दे॒वाना॑मु॒त म॑र्त्य॒त्रा ॥
तदा॑दित्या वसवो रुद्रियासो रक्षो॒युजे॒ तपु॑र॒घं द॑धात ॥ ८ ॥

यत् रोदसीइति प्रऽदिवः अस्ति भूम हेळः देवानां उत मर्त्यऽत्रा ।
तत् आदित्याः वसवः रुद्रियासः रक्षःऽयुजे तपुः अघं दधात ॥ ८ ॥

जो महान् प्रभावशाली देव द्यावा पृथिवींचा प्रकाशक आहे, जो मनुष्यांचा तारक आहे अथवा ज्याने सहज लीलेने द्वादश आदित्य, अष्ट वसु व एकादश रुद्र या दिव्य विभूतिंना स्थिरस्थावर केले त्याच प्रकाशमान देवाने राक्षसगणांचा विध्वंस करणारे अग्नि दैवत पृथ्वीवर स्थापन केले. ॥ ८ ॥


य ईं॒ राजा॑नावृतु॒था वि॒दध॒द्रज॑सो मि॒त्रो वरु॑ण॒श्चिके॑तत् ॥
ग॒म्भी॒राय॒ रक्ष॑से हे॒तिम॑स्य॒ द्रोघा॑य चि॒द्वच॑स॒ आन॑वाय ॥ ९ ॥

यः ईं राजानौ ऋतुऽथा विऽदधत् रजसः मित्रः वरुणः चिकेतत् ।
गंभीराय रक्षसे हेतिं अस्य द्रोघाय चित् वचसे आनवाय ॥ ९ ॥

ज्या देवाने दोन राजकुमार अश्वी देवांना आपापल्या ऋतूंमध्ये स्थापन केले व ज्याने हे रजोलोक (मृत्युलोक), मित्रलोक (स्वर्गलोक) व वरुणलोक (पाताल) बनविले तो देव ह्या प्रदेशांत विदेशीय (अज्ञान) राक्षसाला मारून टाकून, त्याने खोटे बोल बोलून केलेल्या दुखापतीही तो दूर करो. ॥ ९ ॥


अन्त॑रैश्च॒क्रैस्तन॑याय व॒र्तिर्द्यु॒मता या॑तं नृ॒वता॒ रथे॑न ॥
सनु॑त्येन॒ त्यज॑सा॒ मर्त्य॑स्य वनुष्य॒तामपि॑ शी॒र्षा व॑वृक्तम् ॥ १० ॥

अन्तरैः चक्रैः तनयाय वर्तिः द्युऽमता आ यातं नृऽवता रथेन ।
सनुत्येन त्यजसा मर्त्यस्य वनुष्यतां अपि शीर्षा ववृक्तं ॥ १० ॥

तुम्हाला घेऊन येणार्‍या, हृदयस्थ प्रेमरूपी चाकांनी चालणार्‍या, आपल्या उत्कृष्ट दिव्य उंच रथावर आरूढ होऊन, हे अश्विनीकुमार देवांनो, आमच्या पुत्रादि रक्षणाकरितां तुम्ही याच आणि आम्हां मनुष्यांच्या शत्रूंचे शिर आपल्या शस्त्राने उडवाच. ॥ १० ॥


आ प॑र॒माभि॑रु॒त म॑ध्य॒माभि॑र्नि॒युद्भि्॑र्यातमव॒माभि॑र॒र्वाक् ॥
दृ॒ळ्हस्य॑ चि॒द्गोम॑तो॒ वि व्र॒जस्य॒ दुरो॑ वर्तं गृण॒ते चि॑त्रराती ॥ ११ ॥

आ परमाभिः उत मध्यमाभिः नियुत्ऽभिः यातं अवमाभिः अर्वाक् ।
दृळ्हस्य चित् गोऽमतः वि व्रजस्य दुरः वर्तं गृणते चित्ररातीइतिचित्रऽराती ॥ ११ ॥

हे भक्तांना नाना प्रकारचे ऐश्वर्य देणारे अश्विनी कुमार देवांनो, आपल्या शेवटच्या, मधल्या व पहिल्या अशा सर्व अखंड जोडले गेलेल्या अश्वांसमवेत तुम्ही आमच्या यज्ञाकडे जरूर या आणि आमच्याकरितां ज्ञानरूप धेनूंच्या मजबूत गोठ्याचें दार उघडून द्या. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६३ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


क्व१त्या व॒ल्गू पु॑रुहू॒ताद्य दू॒तो न स्तोमो॑ऽविद॒न्नम॑स्वान् ॥
आ यो अ॒र्वाङ्नारस॑त्या व॒वर्त॒ प्रेष्ठा॒ ह्यस॑थो अस्य॒ मन्म॑न् ॥ १ ॥

क्व त्या वल्गूइति पुरुहूऽता अद्य दूतः न स्तोमः अविदन् नमस्वान् ।
आ यः अर्वाक् नासत्या ववर्त प्रेष्ठा हि असथः अस्य मन्मन् ॥ १ ॥

आज ज्यांनी सदा सत्य देवांना इकडे वळवून आणले अशा आमच्या श्रद्धायुक्त प्रार्थनांना जाणणारे ते अति सुस्वरूप व बहुभक्तस्तुत अश्वी देव कोठे आहेत बरे ? कारण, हे देव असे आहेत की, हे आजवर आम्हां भक्त जनांच्या निदिध्यासपूर्वक स्तुतिगायनांमध्ये अतिशय आनंद मानीत आले आहेत. ॥ १ ॥


अरं॑ मे गन्तं॒ हव॑नाया॒स्मै गृ॑णा॒ना यथा॒ पिबा॑थो॒ अन्धः॑ ॥
परि॑ ह॒ त्यद्व॒र्तिर्या॑थो रि॒षो न यत्परो॒ नान्त॑रस्तुतु॒र्यात् ॥ २ ॥

अरं मे गंतं हवनाय अस्मै गृणाना यथा पिबाथः अंधः ।
परि ह त्यत् वर्तिः याथः रिषः न यत् परः न अन्तरः तुतुर्यात् ॥ २ ॥

हे प्रार्थनार्ह देवांनो, माझ्या ह्या यज्ञकार्यार्थ तुम्ही एक क्षणभर तर या, आणि हा सोमरस प्याच. कारण तुमच्या येण्याने ह्या माझ्या घराचे इतके संरक्षण होईल की आंतील अथवा बाहेरील परका कोणीही शत्रु माझ्यावर चालून येऊ शकणार नाही. ॥ २ ॥


अका॑रि वा॒मन्ध॑सो॒ वरी॑म॒न्नस्ता॑रि ब॒र्हिः सु॑प्राय॒णत॑मम् ॥
उ॒त्ता॒नह॑स्तो युव॒युर्व॑व॒न्दा वां॒ नक्ष॑न्तो॒ अद्र॑य आञ्जन् ॥ ३ ॥

अकारि वां अंधसः वरीमन् अस्तारि बर्हिः सुप्रऽअयनतमं ।
उत्तानऽहस्तः युवयुः ववन्द आ वां नक्षन्तः अद्रयः आंजन् ॥ ३ ॥

हा बघा उत्कृष्ट सोमरस तुम्हाकरितां तयार केला आहे. कोमल कोमल दर्भांकुरांचा बिछोना पसरविला आहे. उंच हात जोडून तुमचा हा ’होता’ तुम्हाला नमस्कार करून तुमची यथेच्छ स्तुति गात आहे, व तुमच्या येणाची वाट बघत आहे. हे अचल पर्वतप्राय सोमपाषाण तुमच्याकरितां सोमरसाने जणो माखून निघाले आहेत, सुंदर दिसत आहेत व मोठे उत्सुक झाले आहेत. ॥ ३ ॥


ऊ॒र्ध्वो वा॑म॒ग्निर॑ध्व॒रेष्व॑स्था॒त्प्र रा॒तिरे॑ति जू॒र्णिनी॑ घृ॒ताची॑ ॥
प्र होता॑ गू॒र्तम॑ना उरा॒णोऽयुक्त॒ यो नास॑त्या॒ हवी॑मन् ॥ ४ ॥

ऊर्ध्वः वां अग्निः अध्वरेषु अस्थात् प्र रातिः एति जूर्णिनी घृताची ।
प्र होता गूर्तमनाः उराणः अयुक्त यः नासत्या हवीमन् ॥ ४ ॥

यज्ञांमध्ये तुमच्या करितां, हे अश्विनी कुमार देवांनो, हा अग्निदेव उठून उभा राहिला आहे. घृताने थबथबलेल्या व स्तुतिंनी गाइलेला हा हविर्भाग तुमच्याकडे येण्यास निघाला आहे; आणि श्रेष्ठ कर्मशाली व कृतज्ञबुद्धियुक्त असा जो हा आमचा होता आहे तो तुम्हां सत्य देवांकरितां हे हविष्यान्न हातांत घेऊन तुम्हाला समर्पण करीत आहे. ॥ ४ ॥


अधि॑ श्रि॒ये दु॑हि॒ता सूर्य॑स्य॒ रथं॑ तस्थौ पुरुभुजा श॒तोति॑म् ॥
प्र मा॒याभि॑र्मायिना भूत॒मत्र॒ नरा॑नृतू॒ जनि॑मन्य॒ज्ञिया॑नाम् ॥ ५ ॥

अधि श्रिये दुहिता सूर्यस्य रथं तस्थौ पुरुऽभुजा शतऽऊतिं ।
प्र मायाभिः मायिना भूतं अत्र नरा नृऽतूइति जनिमन् यज्ञियानां ॥ ५ ॥

हे सुदीर्घ उदारहस्त अश्वी देवांनो, सूर्याची मुलगी सावित्री देवी आपल्या शेंकडो प्रकारांनी सुरक्षित अशा रथावर आरूढ होऊन तुमच्या आश्रयार्थ - तुम्हाला वरण्याकरितां - तुम्हाकडे येण्याला निघाली आहे. हे कुशल, नृत्यशील पुरुषांनो, देवांच्या ह्या जन्मसमयी (यज्ञामध्ये) शक्तिस्वरूप शची देवीही अवश्यमेव आल्याच समजा. ॥ ५ ॥


यु॒वं श्री॒भिर्द॑र्श॒ताभि॑रा॒भिः शु॒भे पु॒ष्टिमू॑हथुः सू॒र्यायाः॑ ॥
प्र वां॒ वयो॒ वपु॒षेऽनु पप्त॒न्नक्ष॒द्वाणी॒ सुष्टु॑ता धिष्ण्या वाम् ॥ ६ ॥

युवं श्रीभिः दर्शताभिः आभिः शुभे पुष्टिं ऊहथुः सूर्यायाः ।
प्र वां वयः वपुषे अनु पप्तन् नक्षत् वाणी सुऽस्तुता धिष्ण्या वां ॥ ६ ॥

देवांनो, तुमच्या ह्या सुंदर व तरुण कांतीच्या योगाने त्या सूर्या देवीचे कल्याणकारक असे उत्तमप्रकारे पोषणच झाले. तुमच्या शोभिवंत घोड्यांनी इकडे येण्याला उडी मारली आहे, आणि स्तवनार्ह देवांनो, ऋषींच्या ह्या उत्तम करुणापूर्ण स्तुतिनेंही तुमचाच धांवा मांडला आहे. ॥ ६ ॥


आ वां॒ वयोऽश्वासो॒ वहि॑ष्ठा अ॒भि प्रयो॑ नासत्या वहन्तु ॥
प्र वां॒ रथो॒ मनो॑जवा असर्जी॒षः पृ॒क्ष इ॒षिधो॒ अनु॑ पू॒र्वीः ॥ ७ ॥

आ वां वयः अश्वासः वहिष्ठाः अभि प्रयः नासत्या वहंतु ।
प्र वां रथः मनःऽजवा असर्जि इषः पृक्षः इषिधः अनु पूर्वीः ॥ ७ ॥

हे सत्य देवांनो, तुमचे ते उत्तम वाहक सपक्ष घोडे तुम्हांला आमच्या यज्ञाकडे लवकर घेऊन येवोत. तुमचा तो मनोवेगगामी, प्राचीन अथवा पूर्व दिशेकडून उदय पावणारा यज्ञाकडे धांव घेणारा व भक्तांकरितां दानशील रथ ह्या यज्ञाकडे येण्याकरितां निघाला ना ? ॥ ७ ॥


पु॒रु हि वा॑म् पुरुभुजा दे॒ष्णं धे॒नुं न॒ इषं॑ पिन्वत॒मस॑क्राम् ॥
स्तुत॑श्च वाम् माध्वी सुष्टु॒तिश्च॒ रसा॑श्च॒ ये वा॒मनु॑ रा॒तिमग्म॑न् ॥ ८ ॥

पुरु हि वां पुरुऽभुजा देष्णं धेनुं न इषं पिन्वतं असक्रां ।
स्तुतः च वां माध्वीइति सुस्तुतिः च रसाः च ये वां अनु रातिं अग्मन् ॥ ८ ॥

हे दीर्घहस्त तथा उदारहस्त देवांनो, तुम्ही मनांत घेतल्यास तुमच्या जवळ भक्तांना देण्यायोग्य धन कितीतरी आहे. ह्याकरितां आता आमच्या ह्या अनन्यगतिक ज्ञानधेनूंना तुम्ही बळ द्या. हे भगवंतांनो, तुमची स्तुति गाइल्यानंतर तुमची ती मधुर प्रसन्न हास्ययुक्त मुद्रा, ते उत्कृष्ट सोमरस व तो तुमचा अहेर - ऐश्वर्यदान - हे सर्व आम्हांकडे तुमच्या अगोदरच येऊन दाखल होवोत. ॥ ८ ॥


उ॒त म॑ ऋ॒ज्रे पुर॑यस्य र॒घ्वी सु॑मी॒ळ्हे श॒तं पे॑रु॒के च॑ प॒क्वा ॥
शा॒ण्डो दा॑द्धिर॒णिनः॒ स्मद्दि॑ष्टी॒न्दश॑ व॒शासो॑ अभि॒षाच॑ ऋ॒ष्वान् ॥ ९ ॥

उत म ऋज्रेइति पुरयस्य रघ्वीइति सुऽमीळ्हे शतं पेरुके च पक्वा ।
शाण्डः दात् हिरणिनः स्मत्ऽदिष्टीन् दश वशासः अभिऽसाचः ऋष्वान् ॥ ९ ॥

आणि ’पुरया’च्या सरळ व जलदी चालणार्‍या, राजांनाच शोभण्यासारख्या दोन्ही घोड्या, शंभर प्रकारची पक्वान्ने, दर्शनीय दहा सोनेरी रंगाचे रथ आणि सुंदर, शत्रूंवर धांवून जाणारे व सदानुकूल असे नरवीर सैनिक तुम्ही मजला द्यावेत. ॥ ९ ॥


सं वां॑ श॒ता ना॑सत्या स॒हस्राश्वा॑नां पुरु॒पन्था॑ गि॒रे दा॑त् ॥
भ॒रद्वा॑जाय वीर॒ नू गि॒रे दा॑द्ध॒ता रक्षां॑सि पुरुदंससा स्युः ॥ १० ॥

सं वां शता नासत्या सहस्रा अश्वानां पुरुऽपंथाः गिरे दात् ।
भरत्ऽवाजाय वीर नु गिरे दात् हता रक्षांसि पुरुऽदंससा स्युरितिस्युः ॥ १० ॥

हे सत्यसत्य देवतांनो, तुम्ही ह्या स्तुतिप्रित्यर्थ मज भरद्वाज वंशीयाला शेकडो काय पण हजारो शीघ्रगामी घोडे द्यावेत. हे बहुकर्मकुशल देवांनो, ह्या स्तुतिकरितां तुम्ही माझे उपद्रवी राक्षस, दुष्ट शत्रू सत्वर नष्ट करा. ॥ १० ॥


आ वां॑ सु॒म्ने वरि॑मन्सू॒रिभिः॑ ष्याम् ॥ ११ ॥

आ वां सुम्ने वरिमन् सूरिऽभिः स्यां ॥ ११ ॥

की जेणेंकरून तुमच्या श्रेष्ठ स्तुतिस्तोत्रांच्या श्रवण मनन निदिध्यासामध्यें तुमच्या प्रेमळ भक्तांसह वर्तमान मी सदा सर्वदा निमग्न रहावे. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६४ ( उषा सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्


उदु॑ श्रि॒य उ॒षसो॒ रोच॑माना॒ अस्थु॑र॒पां नोर्मयो॒ रुश॑न्तः ॥
कृ॒णोति॒ विश्वा॑ सु॒पथा॑ सु॒गान्यभू॑दु॒ वस्वी॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ॥ १ ॥

उत् ऊंइति श्रिये उषसः रोचमानाः अस्थुः अपां न ऊर्मयः रुशंतः ।
कृणोति विश्वा सुऽपथा सुऽगानि अभूत् ऊंइति वस्वी दक्षिणा मघोनी ॥ १ ॥

अहाहा, देदीप्यमान उषा समुद्राच्या शुभ्र लाटींप्रमाणे भक्तांच्या वैभव प्राप्त्यर्थ वर येऊ लागली आहे. अहो, ह्या उषेच्या उजेडाने सर्व जगावरील सन्मार्ग सुगम झाले. ही ऐश्वर्यवती उषा धनधान्य संपन्न तथा चतुर दानशील देवी होय. ॥ १ ॥


भ॒द्रा द॑दृक्ष उर्वि॒या वि भा॒स्युत्ते॑ शो॒चिर्भा॒नवो॒ द्याम् अ॑पप्तन् ॥
आ॒विर्वक्षः॑ कृणुषे शु॒म्भमा॒नोषो॑ देवि॒ रोच॑माना॒ महो॑भिः ॥ २ ॥

भद्रा ददृक्षे उर्विया वि भासि उत् ते शोचिः भानवः द्यां अपप्तन् ।
आविः वक्षः कृणुषे शुंभमाना उषः देवि रोचमाना महोऽभिः ॥ २ ॥

हे देवी उषा माता, तू फार उत्तम आमचे मंगल करणारी दिसतेस, तू विस्तीर्ण ब्रह्मांडाला शोभा आणतेस. तुझे दीप्तिमंत किरण आकाशावर आरूढ झाले आहेत. स्वतेजाने लखलखणार्‍या प्रकाशमान उषा देवीने आपले दिव्य स्वरूप प्रकट केले आहे. ॥ २ ॥


वह॑न्ति सीमरु॒णासो॒ रुश॑न्तो॒ गावः॑ सु॒भगा॑मुर्वि॒या प्र॑था॒नाम् ॥
अपे॑जते॒ शूरो॒ अस्ते॑व॒ शत्रू॒न्बाध॑ते॒ तमो॑ अजि॒रो न वोळ्हा॑ ॥ ३ ॥

वहंति सीं अरुणासः रुशंतः गावः सुऽभगां उर्विया प्रथानां ।
अप ईजते शूरः अस्ताऽइव शत्रून् बाधते तमः अजिरः न वोळ्हा ॥ ३ ॥

आरक्तवर्ण, देदीप्यमान, विश्वव्यापी किरणरूप गाई, कीर्तिच्या ऐश्वर्याची जणों पराकाष्ठाच अशा धेनू उषा देवीला वाहून आणत आहेत. ही उषा देवी शूर तिरंदाजा प्रमाणे अंधकार शत्रूंना पळवीत आहे, आणि शीघ्रगामी घोडेस्वाराप्रमाणे अज्ञान शत्रूंचा संहार करीत आहे. ॥ ३ ॥


सु॒गोत ते॑ सु॒पथा॒ पर्व॑तेष्ववा॒ते अ॒पस्त॑रसि स्वभानो ॥
सा न॒ आ व॑ह पृथुयामन्नृष्वे र॒यिं दि॑वो दुहितरिष॒यध्यै॑ ॥ ४ ॥

सुऽगा उत ते सुऽपथा पर्वतेषु अवाते अपः तरसि स्वभानोइतिस्वभानो ।
सा नः आ वह पृथुऽयामन् ऋष्वे रयिं दिवः दुहितः इषयध्यै ॥ ४ ॥

पर्वतांवरील अथवा निर्वात अरण्यांतील सर्व मार्ग तुझ्या कृपेने आतां सुगम झाले. हे स्वप्रकाश उषा देवी, तू जणो ह्या आकाश समुद्रावर तरतेसच. हे सुदीर्घ गति, परमसुंदर आकाशकन्यके, एवंगुण विशिष्ट तू आमच्याकरितां ऐश्वर्य घेऊन ये. ॥ ४ ॥


सा व॑ह॒ योक्षभि॒रवा॒तोषो॒ वरं॒ वह॑सि॒ जोष॒मनु॑ ॥
त्वं दि॑वो दुहित॒र्या ह॑ दे॒वी पू॒र्वहू॑तौ मं॒हना॑ दर्श॒ता भूः॑ ॥ ५ ॥

सा आ वह या उक्षऽभिः अवाता उषः वरं वहसि जोषं अनु ।
त्वं दिवः दुहितः या ह देवी पूर्वऽहूतौ मंहना दर्शता भूः ॥ ५ ॥

हे उषा देवी, तू अप्रतिरुद्धगति अशी आकाश कन्यका आहेस, तुजला मोठमोठे किरणरूप बैल अति उल्हासाने ओढत आहेत. हे देवी, तू प्रातःकाळी प्रथम पूजनीय आहेस. हे माते देवी, तू आतां आम्हांकरितां धनादि ऐश्वर्यरत्न घेऊन येऊन आम्हाला आपले मंगलकारक दर्शन दे कशी ॥ ५ ॥


उत्ते॒ वय॑श्चिद्वस॒तेर॑पप्त॒न्नर॑श्च॒ये पि॑तु॒भाजो॒ व्युष्टौ ॥
अ॒मा स॒ते व॑हसि॒ भूरि॑ वा॒ममुषो॑ देवि दा॒शुषे॒ मर्त्या॑य ॥ ६ ॥

उत् ते वयः चित् वसतेः अपप्तन् नरः च ये पितुभाजः व्युष्टौ ।
अमा सते वहसि भूरि वामं उषः देवि दाशुषे मर्त्याय ॥ ६ ॥

आणि हे उषे देवी, तुझ्या दर्शनाबरोबर पक्षीगण आपापल्या वसती स्थानांपासून उडायला लागतात, तसेच, हे देवी उषे, पित्राज्ञाकारी नर उठून स्वकार्य तत्पर होतात. हे माते उषे, अमावस्येच्या सान्निध्यांत तुला भजणार्‍या दानशूर नरांना तू पुष्कळ धनदौलत आणून देतेस. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६५ ( उषा सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्


ए॒षा स्या नो॑ दुहि॒ता दि॑वो॒जाः क्षि॒तीरु॒च्छन्ती॒ मानु॑षीरजीगः ॥
या भा॒नुना॒ रुश॑ता रा॒म्यास्वज्ञा॑यि ति॒रस्तम॑सश्चिद॒क्तून् ॥ १ ॥

एषा स्या नः दुहिता दिवःऽजाः क्षितीः उच्छंती मानुषीः अजीगरिति ।
या भानुना रुशता राम्यासु अज्ञायि तिरः तमसः चित् अक्तून् ॥ १ ॥

ह्या उषा देवीने प्रकाशमान भानूच्या योगेंकरून रमणीय रात्रींतील अंधकाराला व नक्षत्रांना दूर सारिले, त्या ह्या आकाशपुत्री उषा देवीने आपल्या मानवी प्रजेच्या उत्कर्षाच्या इच्छेने आम्हाला आता जागृत केले आहे. ॥ १ ॥


वि तद्य॑युररुण॒युग्भि॒रश्वै॑श्चि॒त्रं भा॑न्त्यु॒षस॑श्च॒न्द्रर॑थाः ॥
अग्रं॑ य॒ज्ञस्य॑ बृह॒तो नय॑न्ती॒र्वि ता बा॑धन्ते॒ तम॒ ऊर्म्या॑याः ॥ २ ॥

वि तत् ययुः अरुणयुक्ऽभिः अश्वैः चित्रं भान्ति उषसः चन्द्रऽरथाः ।
अग्रं यज्ञस्य बृहतः नयन्तीः वि ताः बाधंते तमः ऊर्म्यायाः ॥ २ ॥

परम आल्हादकारी, कांतिरूप रथसंयुक्त उषादेवी फारच रमणीय दिसते. विराट् कर्मरूप यज्ञाला आरंभ करवणारी उषा आपल्या अरुणवर्णयुक्त अश्वांसह वर्तमान आकाशाबाहेर निघाली आहे. हिच्या योगाने रात्रीच्या अंधकारालाच काय ती बाधा झाली. ॥ २ ॥


श्रवो॒ वाज॒मिष॒मूर्जं॒ वह॑न्ती॒र्नि दा॒शुष॑ उषसो॒ मर्त्या॑य ॥
म॒घोनी॑र्वी॒रव॒त्पत्य॑माना॒ अवो॑ धात विध॒ते रत्न॑म॒द्य ॥ ३ ॥

श्रवः वाजं इषं ऊर्जं वहंतीः नि दाशुषे उषसः मर्त्याय ।
मघोनीः वीरऽवत् पत्यमानाः अवः धातः विधते रत्नं अद्य ॥ ३ ॥

दानशूर उदार भक्ताला कीर्ति, धन, बळ, शक्ति, अन्न व तेज आदि देणारी व वीराप्रमाणे गमन करणारी महदैश्वर्यवती उषा देवी आपल्या भक्तांचे प्रतिपालन करते. ही अशी उषा देवी आज आम्हाला ऐश्वर्यरत्न देवो. ॥ ३ ॥


इ॒दा हि वो॑ विध॒ते रत्न॒मस्ती॒दा वी॒राय॑ दा॒शुष॑ उषासः ॥
इ॒दा विप्रा॑य॒ जर॑ते॒ यदु॒क्था नि ष्म॒ माव॑ते वहथा पु॒राचि॑त् ॥ ४ ॥

इदा हि वः विधते रत्नं अस्ति इदा वीराय दाशुषे उषासः ।
इदा विप्राय जरते यत् उक्था नि स्म माऽवते वहथ पुरा चित् ॥ ४ ॥

उषा माता तुमचा आतांही प्रतिपाल करते. दानशूर भक्ताला ऐश्वर्यरत्न आतांही ठेविले आहेच. जे पूर्वीं निज वाणींनी उच्चारलेल्या "उक्थ" प्रार्थनांनी माझ्या सारख्याला लाभवून दिले, ते वैभव आज देखील स्तवन करणार्‍या ज्ञानी भक्ताकरिता तयारच आहे. ॥ ४ ॥


इ॒दा हि त॑ उषो अद्रिसानो गो॒त्रा गवा॒मङ्गि॒॑रसो गृ॒णन्ति॑ ॥
व्य१र्केण॑ बिभिदु॒र्ब्रह्म॑णा च स॒त्या नृ॒णाम॑भवद्दे॒वहू॑तिः ॥ ५ ॥

इदा हि ते उषः अद्रिसानोइतिअद्रिऽसानो गोत्रा गवां अङ्‌गिरसः गृणंति ।
वि अर्केण बिभिदुः ब्रह्मणा च सत्या नृणां अभवत् देवऽहूतिः ॥ ५ ॥

हे उषे देवी, महापर्वताच्या शिखरावरती उभे राहून हे अंगिरस कुलोत्पन्न अथवा अग्नि उपासक द्विजगण तुझ्या ज्ञानप्रकाश धेनूंच्या गोठ्याची महती गात आहेत. ऋचामय "अर्क" स्तोत्रांनी व विराटरूप "ब्रह्म" सूक्तांनी भक्तांनी अज्ञानांधकाराचा समूळ नाश केला आणि मनुष्यांकडून प्रेमाने झालेले देवांचे बोलावणे यथार्थ झाले. ॥ ५ ॥


उ॒च्छा दि॑वो दुहितः प्रत्न॒वन्नो॑ भरद्वाज॒वद्वि॑ध॒ते म॑घोनि ॥
सु॒वीरं॑ र॒यिं गृ॑ण॒ते रि॑रीह्युरुगा॒यमधि॑ धेहि॒ श्रवो॑ नः ॥ ६ ॥

उच्छ दिवः दुहितरिति प्रत्नऽवत् नः भरत्ऽवाजऽवत् विधते मघोनि ।
सुऽवीरं रयिं गृणते रिरीहि उरुऽगायं अधि धेहि श्रवः नः ॥ ६ ॥

हे देवकन्ये, पहिल्या प्रमाणेच आतां देखील आम्हाला उचलून धर, आमचा उत्कर्ष कर, आम्हाला आमचे पूर्व वैभव दाखव. हे ऐश्वर्यवंत कुमारिके, आम्हाला भरद्वाजांप्रमाणेंच समज. आम्ही ज्या अर्थी तुझी एवढी स्तुति करीत आहोंत त्या अर्थी तूं आम्हांला आतां ऐश्वर्यरत्न दे आणि आमची सर्व जगद् विस्तृत अशी कीर्ति पुनरपि फैलूं दे. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६६ ( मरुत् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - मरुत् : छंद - त्रिष्टुभ्


वपु॒र्नु तच्चि॑कि॒तुषे॑ चिदस्तु समा॒नं नाम॑ धे॒नु पत्य॑मानम् ॥
मर्ते॑ष्व॒न्यद्दो॒हसे॑ पी॒पाय॑ स॒कृच्छु॒क्रं दु॑दुहे॒ पृश्नि॒रूधः॑ ॥ १ ॥

वपुः नु तत् चिकितुषे चित् अस्तु समानं नाम धेनु पत्यमानं ।
मर्तेषु अन्यत् दोहसे पीपाय सकृत् शुक्रं दुदुहे पृश्निः ऊधः ॥ १ ॥

त्या एकसारख्या समान पोशाखवाल्या व बराबर कवाइतीप्रमाणे कूच करणार्‍या मरुद्‍गणांच्या शरीरांविषयी व तसेच "धेनु" नांवाविषयी (म्हणजे धेनू नांव कोणाचे अशा विषयी) मोठमोठ्या शहाण्यांनाही आश्चर्य वाटते. एखाद्याच मानवाने त्या गाईला दोहून तिचे दुग्ध प्राशन केले असते. हा विचित्रवर्ण अंतरिक्ष लोक एकदांच त्या गाईच्या कांसेला लागून बलकारी शुक्लवर्ण दुग्धामृत प्याला आहे. ॥ १ ॥


ये अ॒ग्नयो॒ न शोशु॑चन्निधा॒ना द्विर्यत्त्रिर्म॒रुतो॑ वावृ॒धन्त॑ ॥
अ॒रे॒णवो॑ हिर॒ण्यया॑स एषां सा॒कं नृ॒म्णैः पौंस्ये॑भिश्च भूवन् ॥ २ ॥

ये अग्नयः न शोशुचन् इधानाः द्विः यत् त्रिः मरुतः वावृधंत ।
अरेणवः हिरण्ययासः एषां साकं नृम्णैः पौंस्येभिः च भूवन् ॥ २ ॥

ह्या मरुद्‍गणांचे अग्निप्रमाणे दीप्तिमंत, अति तेजस्वी, निर्धूल व सुवर्णमय असे दोन अथवा तीनच रथ जेव्हां का एके ठिकाणी जमतात तेव्हां ते धारिष्ट व पौरुष यांसहित दृगोचर होतात. ॥ २ ॥


रु॒द्रस्य॒ ये मी॒ळ्हुषः॒ सन्ति॑ पु॒त्रा यांश्चो॒ नु दाधृ॑वि॒र्भर॑ध्यै ॥
वि॒दे हि मा॒ता म॒हो म॒ही षा सेत्पृश्निः॑ सु॒भ्वे३गर्भ॒माधा॑त् ॥ ३ ॥

रुद्रस्य ये मीळ्हुषः संति पुत्रा यान् चोइति नु दाधृविः भरध्यै ।
विदे हि माता महः मही सा सा इत् पृश्निः सुऽभ्वे गर्भं आ अधात् ॥ ३ ॥

जे मरुत् मेघ रुद्रांचे पुत्र आहेत आणि सर्वाधार अंतरिक्ष ज्यांचे पोषण करते, त्या मेघपुत्र मरुतांनाही श्रेष्ठ भू माता ही जाणतेच. त्या परमथोर व विचित्रवर्ण खगोल मातेने लोकांच्या कल्याणार्थ आपल्या पोटांत उदकरूप गर्भ धारण केला आहे. ॥ ३ ॥


न य ईष॑न्ते ज॒नुषोऽया॒ न्व१न्तः सन्तो॑ऽव॒द्यानि॑ पुना॒नाः ॥
निर्यद्दु॒ह्रे शुच॒योऽनु॒ जोष॒मनु॑ श्रि॒या त॒न्वमु॒क्षमा॑णाः ॥ ४ ॥

न य ईषंते जनुषः अया न् अंतरिति संतः अवद्यानि पुनानाः ।
निः यद् दुह्रे शुचयः अनु जोषं अनु श्रिया तन्वं उक्षमाणाः ॥ ४ ॥

जे जन्म घेण्याची इच्छाच ठेवीत नाहीत, इतकेच नव्हे तर जी आभ्यंतरी पापे असतात त्यांना देखील जे सपाट्यासरसे बाहेर वृष्टिरूपाने झुगारून देऊन स्वतः निष्कलंक होऊन जातात तेच पवित्र मरुद्‍गण आपल्या दानशूर लक्ष्मीच्या शोभेने संयुक्त होऊन ह्या विस्तीर्ण भूगोलावर वृष्टिद्वारा जलसिंचन करीत असतात. ॥ ४ ॥


म॒क्षू न येषु॑ दो॒हसे॑ चिद॒या आ नाम॑ धृ॒ष्णु मारु॑तं॒ दधा॑नाः ॥
न ये स्तौ॒ना अ॒यासो॑ म॒ह्ना नू चि॑त्सु॒दानु॒रव॑ यासदु॒ग्रान् ॥ ५ ॥

मक्षु न येषु दोहसे चित् अयाः आः आ नाम धृष्णु मारुतं दधानाः ।
न ये स्तौनाः अयासः मह्ना नु चित् सुऽदानुः अव यासत् उग्रान् ॥ ५ ॥

ह्या मरुद्‍गणांमधील "धृष्णु" सारखे धारिष्टवंत नांव धारण करणारे व पुण्यकार्यार्थ गमन करणारे कांही मरुत् सैनिक असे बहाद्दर असतात कीं ते भक्तांच्या कामना सिद्ध्यर्थ अति शीघ्र गमन करतात. कांही असे असतात की अति स्तुति केल्यावर, कांही सैनिक तर भयंकर क्रोधी स्वभावाचे असतात, अशांना मग दानशूर भक्त दानांच्या योगाने संतुष्ट करून आपल्या संरक्षणार्थ खाली उतरवितोच. ॥ ५ ॥


त इदु॒ग्राः शव॑सा धृ॒ष्णुषे॑णा उ॒भे यु॑जन्त॒ रोद॑सी सु॒मेके॑ ॥
अध॑स्मैषु रोद॒सी स्वशो॑चि॒राम॑वत्सु तस्थौ॒ न रोकः॑ ॥ ६ ॥

ते इत् उग्राः शवसा धृष्णुऽसेनाः उभेइति युजंत रोदसीइति सुमेकेइतिसुऽमेके ।
अध स्म एषु रोदसी स्वऽशोचिः आ अमवत्ऽसु तस्थौ न रोकः ॥ ६ ॥

ह्या अशा क्रोधिष्ट परंतु धारिष्टवंत मरुद्‍गणांनी ह्या पृथ्वीरूप सुंदर मूर्तिंना एकदम आपणांत मिसळून घेतले. त्या स्वयं प्रकाशमान रुद्रकन्या द्यावा पृथिवी देखील ह्यांच्यात पूर्ण मिसळून गेल्या; ह्या महाबली मरुद्‍गणांना ह्या रोदसींचीच काय ती एक आडकाठी होती (ती दूर झाली) ॥ ६ ॥


अ॒ने॒नो वो॑ मरुतो॒ यामो॑ अस्त्वन॒श्वश्चि॒द्यमज॒त्यर॑थीः ॥
अ॒न॒व॒सो अ॑नभी॒शू र॑ज॒स्तूर्वि रोद॑सी प॒थ्या याति॒ साध॑न् ॥ ७ ॥

अनेनः वः मरुतः यामः अस्तु अनश्वः चित् यं अजति अरथीः ।
अनवसः अनभीशुः रजःऽतूः वि रोदसीइति पथ्याः याति साधन् ॥ ७ ॥

मरुतांनो, तुमचा रथ पवित्र निष्पाप आहे, कारण तो घोड्यावांचून व सारथ्यावांचूनही चालतो. कोठेंच न थांबणारा, पाशबंधनांनी रहित, अति सवेग चालण्याने धूळ उडविणारा व भक्तांना कल्याणकारक असा तुमचा रथ रोदसींसह वर्तमान इकडे येण्यास निघालाच आहे. ॥ ७ ॥


नास्य॑ व॒र्ता न त॑रु॒ता न्वस्ति॒ मरु॑तो॒ यमव॑थ॒ वाज॑सातौ ॥
तो॒के वा॒ गोषु॒ तन॑ये॒ यम॒प्सु स व्र॒जं दर्ता॒ पार्ये॒ अध॒ द्योः ॥ ८ ॥

न अस्य वर्ता न तरुता नु अस्ति मरुतः यं अवथ वाजऽसातौ ।
तोके वा गोषु तनये यं अप्ऽसु सः व्रजं दर्ता पार्ये अध द्योः ॥ ८ ॥

अहो, ह्या यज्ञार्थ संग्रामांत मरुतांनी ज्यांचे रक्षण केले त्याला न कोणी दाबणारा, न कोणी त्यांना मारणारा. मरुत् हे आपल्या भक्तरूप मुलांना अर्भकांप्रमाणे लेखून पृथ्वीबर आणि समुद्रावर त्यांचा बचाव करीत असतात. हे मरुद्‍गण ह्या संसार संग्रामामध्ये दिव्य प्रकाश धेनूंच्या कळपावर देखील आपली सत्ता गाजविणारे आहेत. ॥ ८ ॥


प्र चि॒त्रम॒र्कं गृ॑ण॒ते तु॒राय॒ मारु॑ताय॒ स्वत॑वसे भरध्वम् ॥
ये सहां॑सि॒ सह॑सा॒ सह॑न्ते॒ रेज॑ते अग्ने पृथि॒वी म॒खेभ्यः॑ ॥ ९ ॥

प्र चित्रं अर्कं गृणते तुराय मारुताय स्वऽतवसे भरध्वं ।
ये सहांसि सहसा सहंते रेजते अग्ने पृथिवी मखेभ्यः ॥ ९ ॥

अहो ऋत्विजांनो, मोठ्याने गर्जणार्‍या, स्वतःसिद्ध बलवान् अशा मरुद्‍गणांची तुम्ही नाना प्रकारें छन्दोबद्ध स्तुति गा. हे लढाईला पाठ न दाखविणारे देव परम सहिष्णुतापूर्वक शत्रूंचा मारा सहन करतात. हे अग्नि देवा, ह्या मरुत् गणांच्या संग्रामाचे समयी पृथ्वी देखील भयकंपित होते. ॥ ९ ॥


त्विषी॑मन्तो अध्व॒रस्ये॑व दि॒द्युत्तृ॑षु॒च्यव॑सो जु॒ह्वो३नाग्नेः ॥
अ॒र्चत्र॑यो॒ धुन॑यो॒ न वी॒रा भ्राज॑ज्जन्मानो म॒रुतो॒ अधृ॑ष्टाः ॥ १० ॥

त्विषीऽमंतः अध्वरस्यऽइव दिद्युत् तृषुऽच्यवसः जुह्वः न अग्नेः ।
अर्चत्रयः धुनयः न वीराः भ्राजत्ऽजन्मानः मरुतः अधृष्टाः ॥ १० ॥

जणों काय महायुद्ध सुरू आहे, त्या यज्ञांतील अग्निच्या जिव्हारूप ज्वालांप्रमाणे प्रकाशमान, अति शीघ्र गति, व परम आवेशयुक्त असे हे मरुत् गण आहेत. आणि हे मरुत् वीरांप्रमाणे प्रार्थना करणारांचे रक्षण करणारे, भक्तांच्या शत्रूंना हालवून सोडणारे , महाकुलीन विराटरूप घराण्यांत जन्म पावलेले व अजिंक्य असे महापराक्रमी आहेत. ॥ १० ॥


तं वृ॒धन्तं॒ मारु॑तं॒ भ्राज॑दृष्टिं रु॒द्रस्य॑ सू॒नुं ह॒वसा वि॑वासे ॥
दि॒वः शर्धा॑य॒ शुच॑यो मनी॒षा गि॒रयो॒ नाप॑ उ॒ग्रा अ॑स्पृध्रन् ॥ ११ ॥

तं वृधंतं मारुतं भ्राजत्ऽऋष्टिं रुद्रस्य सूनुं हवसा आ विवासे ।
दिवः शर्धाय शुचयः मनीषाः गिरयः न आपः उग्राः अस्पृध्रन् ॥ ११ ॥

संघशक्तीने वाढणार्‍या, चमकणारे भाले हातांत परजणार्‍या रुद्राच्या पुत्राला - मारुताला - आम्ही प्रार्थनापूर्वक हवि समर्पण द्वारा भजत आहोत. हे दिव्य, परमपवित्र, स्वतंत्र बुद्धिवंत जलरूप मारुत पर्वतांप्रमाणे उग्र असूनही भक्तांच्या कल्याणार्थ अहमहमिकापूर्वक एकसारखे झटत असतात. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६७ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - मित्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्


विश्वे॑षां वः स॒तां ज्येष्ठ॑तमा गी॒र्भिर्मि॒त्रावरु॑णा वावृ॒धध्यै॑ ॥
सं या र॒श्मेव॑ य॒मतु॒र्यमि॑ष्ठा॒ द्वा जनाँ॒ अस॑मा बा॒हुभिः॒ स्वैः ॥ १ ॥

विश्वेषां वः सतां ज्येष्ठऽतमा गीःऽभिः मित्रावरुणा वावृधध्यै ।
सं या रश्माऽइव यमतुः यमिष्ठा द्वा जनान् असमा बाहुऽभिः स्वैः ॥ १ ॥

भो भो ऋत्विजांनो, सकल चराचर जगतामध्ये परम श्रेष्ठ अशा महाविभूति मित्र व वरुण देवांची तुम्ही आतां आपल्या वाणींनी प्रशंसा करा, या दोन्ही अनुपम सत्ताधीश देवांनी लगामाप्रमाणे आपल्या हातांनी सकल जगाला सर्व लोकांना आवरून धरिले आहे. ॥ १ ॥


इ॒यं मद्वां॒ प्र स्तृ॑णीते मनी॒षोप॑ प्रि॒या नम॑सा ब॒र्हिरच्छ॑ ॥
य॒न्तं नो॑ मित्रावरुणा॒वधृ॑ष्टं छ॒र्दिर्यद्वां॑ वरू॒थ्यं सुदानू ॥ २ ॥

इयं मत् वां प्र स्तृणीते मनीषा उप प्रिया नमसा बर्हिः अच्छ ।
यंतं नः मित्रावरुणौ अधृष्टं छर्दिः यत् वां वरूथ्यं सुदानूइतिसुऽदानू ॥ २ ॥

हे मित्रावरुण देवांनो, सप्रेम नमस्कार व उत्कृष्ट घृतपक्व नैवेद्य पूर्वक पूजाकरून तुमची स्तुति वर्णावी अशी आमची मनिषा आहे. देवांनो, आम्हांला असे अजिंक्य घर द्या, की जेणेंकरून हे दानशूर देवांनो, तुमचा वरदहस्त आम्हांवर सदैव कायमच राहील. ॥ २ ॥


आ या॑तं मित्रावरुणा सुश॒स्त्युप॑ प्रि॒या नम॑सा हू॒यमा॑ना ॥
सं याव॑प्न॒स्थो अ॒पसे॑व॒ जना॑ञ्छ्रुधीय॒तश्चि॑द्यतथो महि॒त्वा ॥ ३ ॥

आ यातं मित्रावरुणा सुऽशस्ति उप प्रिया नमसा हूयमाना ।
सं यौ अप्नःऽस्थः अपसाऽइव जनान् श्रुधीऽयतः चित् यतथः महिऽत्वा ॥ ३ ॥

हे मित्रवरुणांनो, आपण आलांत, फार चांगले केले. आतां असे इकडे मजजवळ येऊन आमच्या सप्रेम नमस्कारांचा आणि आहुतींचा स्वीकार करा. आपण दोघेही महा वैभवसंपन्न देव यशेच्छु पुरुषांच्या कर्मरूप उदकांना ताळ्यावर आणणारे आहांत. ॥ ३ ॥


अश्वा॒ न या वा॒जिना॑ पू॒तब॑न्धू ऋ॒ता यद्गर्भ॒मदि॑ति॒र्भर॑ध्यै ॥
प्र या महि॑ म॒हान्ता॒ जाय॑माना घो॒रा मर्ता॑य रि॒पवे॒ नि दी॑धः ॥ ४ ॥

अश्वा न या वाजिना पूतबन्धूइतिपूतऽबंधू ऋता यत् गर्भं अदितिः भरध्यै ।
प्र या महि महांता जायमाना घोरा मर्ताय रिपवे नि दीधरितिदीधः ॥ ४ ॥

या उभय, बांधव, जातिवंत घोड्याप्रमाणे कुलीन व सत्य देवांना अदिति देवीने गर्भांत आपल्या पोटांत धारण केले होते. ह्या महाविराट् घोर युद्धकारी, व नूतन जन्मलेल्या पोरांना त्या विराट् अदिति देवीने प्रजेच्या रिपूंच्या संहारार्थ जगांत प्रगट केले. ॥ ४ ॥


विश्वे॒ यद्वां॑ मं॒हना॒ मन्द॑मानाः क्ष॒त्रं दे॒वासो॒ अद॑धुः स॒जोषाः॑ ॥
परि॒ यद्भू॒थो रोद॑सी चिदु॒र्वी सन्ति॒ स्पशो॒ अद॑ब्धासो॒ अमू॑राः ॥ ५ ॥

विश्वे यत् वां मंहना मंदमानाः क्षत्रं देवासः अदधुः सऽजोषाः ।
परि यत् भूथः रोदसीइति चित् उर्वीइति संति स्पशः अदब्धासः अमूराः ॥ ५ ॥

सकल देवांनी मिळून महोत्साहपूर्वक जेव्हां तुमची मोठी तारीफ केली, तेव्हां कोठे त्यांना क्षत्रिय बळ चढले, रणवेश भरून आला. अहो देवांनो, तुम्ही विस्तीर्ण द्यावा-पृथिवींना व्यापून टाकिले आहे. आणि मित्रा वरुणांनो, तुमचे दूत कोणालाही न दबणारे व महाचतुर असे आहेत. ॥ ५ ॥


ता हि क्ष॒त्रं धा॒रये॑थे॒ अनु॒ द्यून्दृं॒हेथे॒ सानु॑मुप॒मादि॑व॒ द्योः ॥
दृ॒ळ्हो नक्ष॑त्र उ॒त वि॒श्वदे॑वो॒ भूमि॒माता॒न्द्यां धा॒सिना॒योः ॥ ६ ॥

ता हि क्षत्रं धारयेथेइति अनु द्यून् दृंहेथेइति सानुं उपमात्ऽइव द्योः ।
दृळ्हः नक्षत्रः उत विश्वऽदेवः भूमिं आ अतान् द्यां धासिना आयोः ॥ ६ ॥

हे मित्रावरुण देव दिवसानुदिवस ऐश्वर्याने व बळाने वाढतच गेले. जणों काय ह्यांनी आकाशरूप मंदिराच्या शिखराला टेंकू दिला आहे. आकाशस्थ स्थिर नक्षत्रे, तसेच सर्व लोकांचा देव सूर्य, पृथ्वी, व अंतरिक्ष लोक यांना ह्या देवांनी आयुष्मंत मनुष्यांनी अर्पण केलेल्या हविरन्नाच्या उपभोगें करून स्वाधिकार संपन्न केले आहे. ॥ ६ ॥


ता वि॒ग्रं धै॑थे ज॒ठरं॑ पृ॒णध्या॒ आ यत्सद्म॒ सभृ॑तयः पृ॒णन्ति॑ ॥
न मृ॑ष्यन्ते युव॒तयोऽवाता॒ वि यत्पयो॑ विश्वजिन्वा॒ भर॑न्ते ॥ ७ ॥

ता विग्रं धैथेइति जठरं पृणध्यै आ यत् सद्म सऽभृतयः पृणंति ।
न मृष्यंते युवतयः अवाताः वि यत् पयः विश्वऽजिन्वा भरंते ॥ ७ ॥

हे मित्रा वरुण देव एकाग्रचित्त स्तुति करणार्‍या भक्ताला आपल्या कृपेचा आधार देतात. हे देव भक्तांच्या घरी पहिल्या प्रथम हविष्यान्नांनी आपले पोट भरून घेतात आणि मग त्यांची पाहुणे मंडळी त्यांचे घरी जेवण्याकरितां पोंचते. हे मित्रावरुणांनो, तुमच्या पोषणाने नदीरूप तरुणींना पाण्याचे उपासमार सहन करावे लागत नाहीत; कारण तुम्ही सर्वांना जीवन देणारे देव त्यांनाही जलरूप जीवन देता. ॥ ७ ॥


ता जि॒ह्वया॒ सद॒मेदं सु॑मे॒धा आ यद्वां॑ स॒त्यो अ॑र॒तिर्ऋ॒वतेभूत् ॥
तद्वां॑ महि॒त्वं घृ॑तान्नावस्तु यु॒वं दा॒शुषे॒ वि च॑यिष्ट॒मंहः॑ ॥ ८ ॥

ता जिह्वया सदं इदं सुऽमेधा आ यत् वां सत्यः अरतिः ऋते भूत् ।
तत् वां महिऽत्वं घृतऽअन्नौ अस्तु युवं दाशुषे वि चयिष्टं अंहः ॥ ८ ॥

अहो मित्रावरुण, आमच्या यज्ञसदनाला या. हे बुद्धिमंतांनो, हा हविष्यान्न रस आपल्या जिव्हेने चाखा. तुमचा हा निष्कपटी अनन्य भक्त परिचारक यज्ञांत तत्पर झाला आहे. हे घृतयुक्त अन्न खाणार्‍यांनो, तुमचा तो महिमा आतां प्रगट होवो, की जेणेंकरून तुम्ही सोदारहस्त हविष्यान्न नैवेद्य समर्पण करणार्‍या यजमानाला पापांपासून सोडवितां. ॥ ८ ॥


प्र यद्वां॑ मित्रावरुणा स्पू॒र्धन्प्रि॒या धाम॑ यु॒वधि॑ता मि॒नन्ति॑ ॥
न ये दे॒वास॒ ओह॑सा॒ न मर्ता॒ अय॑ज्ञसाचो॒ अप्यो॒ न पु॒त्राः ॥ ९ ॥

प्र यत् वां मित्रावरुणा स्पूर्धन् प्रिया धाम युवऽधिता मिनंति ।
न ये देवासः ओहसा न मर्ताः अयज्ञऽसाचः अप्यः न पुत्राः ॥ ९ ॥

हे मित्रावरुणांनो, जे तुमचे प्रिय निजधाम आहे त्यांमध्ये त्यांचाच प्रवेश होतो, कीं जे उत्कट इच्छेने तुमचे ठायींच आपल्या बुद्धीचा पूर्ण लय करतात. ते तुमचे आनंद धाम देवांप्रमाणे, किंवा स्तुतिध्यान करणार्‍या भक्त मनुष्यांप्रमाणे त्यांना प्राप्त होते परंतु यज्ञकर्म सोडल्याने ’अपीं’च्या पोरांना जसे मिळाले नाही तसे मात्र नव्हे. ॥ ९ ॥


वि यद्वाचं॑ की॒स्तासो॒ भर॑न्ते॒ शंस॑न्ति॒ के चि॑न्नि॒विदो॑ मना॒नाः ॥
आद्वां॑ ब्रवाम स॒त्यान्यु॒क्था नकि॑र्दे॒वेभि॑र्यतथो महि॒त्वा ॥ १० ॥

वि यत् वाचं कीस्तासः भरंते शंसंति के चित् निऽविदः मनानाः ।
आत् वां ब्रवाम सत्यानि उक्था नकिः देवेभिः यतथः महिऽत्वा ॥ १० ॥

जेव्हां का भजनानंदी लोक दम भरभरून तुमचे स्तुतिस्तोत्र वेदमंत्र गातात आणि कोणीकोणी हविष्यान्न समर्पणाच्या वेळी म्हटले जाणार्‍या मंत्रांनी मनन निदिध्यासपूर्वक तुमची स्तुति गाण्याला सुरुवात करतात तेव्हां तेव्हां आम्ही देखील तुमची निजवाणींच्या द्वारे उक्थ मंत्रांनी सत्य सत्य अनन्यभावाने स्तुति गाऊन म्हणत असतो की "तुम्ही देव मोठेपणांत इतर देवांच्या बरोबरीचे नाही का ? " ॥ १० ॥


अ॒वोरि॒त्था वां॑ छ॒र्दिषो॑ अ॒भिष्टौ॑ यु॒वोर्मि॑त्रावरुणा॒वस्कृ॑धोयु ॥
अनु॒ यद्गावः॑ स्फु॒रानृ॑जि॒प्यं धृ॒ष्णुं यद्रणे॒ वृष॑णं यु॒नज॑न् ॥ ११ ॥

अवोः इत्था वां छर्दिषः अभिष्टौ युवोः मित्रावरुणौआ अस्कृधोयु ।
अनु यत् गावः स्फुरान् ऋजिप्यं धृष्णुं यत् रणे वृषणं युनजन् ॥ ११ ॥

मित्रावरुणांनो, तुम्हां दोघांही देवांचे यज्ञार्थ अभ्यागमन तुम्हा भक्त रक्षणकर्त्याच्या सुखार्थ इकडेस अविच्छिन्न होवो. आपण दोघेही ह्या भक्ताच्या यज्ञामध्यें सदैव येत जा. आणि आम्हांस असा वर द्या कीं जेणेंकरून आमच्या वाणींना स्फुरण चढेल आणि आम्ही रण संग्रामांमध्ये निष्कपट प्रेमाने परस्पर मिळून जाऊन धैर्यवंत होत्साते आपली मनोकामना पूर्ण करून घेऊं ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६८ ( इंद्रावरुण सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्


श्रु॒ष्टी वां॑ य॒ज्ञ उद्य॑तः स॒जोषा॑ मनु॒ष्वद्वृ॒क्तब॑र्हिषो॒ यज॑ध्यै ॥
आ य इन्द्रा॒वरु॑णावि॒षे अ॒द्य म॒हे सु॒म्नाय॑ म॒ह आ॑व॒वर्त॑त् ॥ १ ॥

श्रुष्टी वां यज्ञः उत्ऽयतः सऽजोषा मनुष्वत् वृक्तऽबर्हिषः यजध्यै ।
आ यः इंद्रावरुणौ इषे अद्य महे सुम्नाय मह आऽववर्तत् ॥ १ ॥

अहो हे इंद्रावरुण देवांनो, तुम्हांप्रित्यर्थ ही स्तुति असो. तुम्हाकरितां मोठ्या उत्सुक्तेने आम्ही हा यज्ञ आरंभिला आहे. मर्त्य मानवाप्रमाणे तुम्हाकरितां कुशासन पसरून आम्ही यज्ञ करीत आहोंत. हा यज्ञसोहळा तुम्ही - इंद्र व वरुण देवता - आम्हाला परम कल्याणकारक असा करून द्यालच. ॥ १ ॥


ता हि श्रेष्ठा॑ दे॒वता॑ता तु॒जा शूरा॑णां॒ शवि॑ष्ठा॒ ता हि भू॒तम् ॥
म॒घोनां॒ मंहि॑ष्ठा तुवि॒शुष्म॑ ऋ॒तेन॑ वृत्र॒तुरा॒ सर्व॑सेना ॥ २ ॥

ता हि श्रेष्ठा देवऽताता तुजा शूराणां शविष्ठा ता हि भूतं ।
मघोनां मंहिष्ठा तुविऽशुष्म ऋतेन वृत्रऽतुरा सर्वऽसेना ॥ २ ॥

त्या तुम्हा दोघांही देवांच्या पूजा भक्तांना शत्रु विध्वंसनफलप्रद होतात. शूर भक्तांना अतिशय बलप्रद होतात. तुमच्या दोन्ही यज्ञपूजा खरोखरच बलप्रद, शत्रू विध्वंसक आणि संघशक्ति प्रदायक होतात. ॥ २ ॥


ता गृ॑णीहि नम॒स्येभिः शू॒षैः सु॒म्नेभि॒रिन्द्रा॒वरु॑णा चका॒ना ॥
वज्रे॑णा॒न्यः शव॑सा॒ हन्ति॑ वृ॒त्रं सिष॑क्त्य॒न्यो वृ॒जने॑षु॒ विप्रः॑ ॥ ३ ॥

ता गृणीहि नमस्येभिः शूषैः सुम्नेभिः इंद्रावरुणा चकाना ।
वज्रेणआ अन्यः शवसा हंति वृत्रं सिसक्ति अन्यः वृजनेषु विप्रः ॥ ३ ॥

हे ज्ञानी भक्तांनो, त्या स्तुतिकामुक इंद्रावरुण देवांचे उत्साहबलपूर्वक आनंदांत निमग्न होऊन व नमस्कार करून मनःपूर्वक स्तुतिस्तोत्र गा. कारण ह्यांपैकी इंद्र देव आपल्या क्षत्रियोचित पराक्रमाने आपल्या शस्त्रांनी वृत्रासुराचा वध करणारा आहे, आणि दुसरा विद्वान व भक्त असा साधु वरुण देव आपत्काळामध्ये भक्तांच्या समागमे राहणारा आहे. ॥ ३ ॥


ग्नाश्च॒ यन् नर॑श्च वावृ॒धन्त॒ विश्वे॑ दे॒वासो॑ न॒रां स्वगू॑र्ताः ॥
प्रैभ्य॑ इन्द्रावरुणा महि॒त्वा द्यौश्च॑ पृथिवि भूतमु॒र्वी ॥ ४ ॥

ग्नाः च यत् नरः च वावृधंत विश्वे देवासः नरां स्वऽगूर्ताः ।
प्र एभ्यः इंद्रावरुणा महित्वा द्यौः च पृथिवि भूतं उर्वीइति ॥ ४ ॥

वीर मनुष्य व त्या मनुष्यांच्या साध्वी स्त्रिया यांनी आपल्या आपण स्तुति उच्चारवून घेणार्‍या विश्वव्यापक देवांचा महिमा वाढविला आहे. हे महान् विराट् द्यौ व हे विस्तीर्ण पृथिवी देवी, ह्या इंद्र व वरुण देवांनी तुम्हांवरही आपला प्रभाव टाकला आहे. ॥ ४ ॥


स इत्सु॒दानुः॒ स्ववाँ॑ ऋ॒तावेन्द्रा॒ यो वां॑ वरुण॒ दाश॑ति॒त्मन् ॥
इ॒षा स द्वि॒षस्त॑रे॒द्दास्वा॒न्वंस॑द्र॒यिं र॑यि॒वत॑श्च॒ जना॑न् ॥ ५ ॥

सः इत् सुऽदानुः स्वऽवान् ऋतऽव् अ इंद्रा यः वां वरुण दाशति त्मन् ।
इषा सः द्विषः तरेत् दास्वान् वंसत् रयिं रयिऽवतः च जनान् ॥ ५ ॥

अहो इंद्र महाराज, अहो वरुणमहाराज, तो एकटाच खरा दानी होय की जो सत्यमार्गांनी मिळविलेल्या स्वकीय धनाचीच तुम्हां देवांकरितां हविर्दानांकडे उपयोग करतो. तोच महादानशील भक्त यज्ञांच्या योगाने शत्रूंवर स्वसत्ता गजवील. आणि राज्यैश्वर्याने धनसंपन्न होऊन तोच पुत्र, सेवकजन व प्रजादि सुख प्राप्त करून घेईल. ॥ ५ ॥


यं यु॒वं दा॒श्वध्वराय देवा र॒यिं ध॒त्थो वसु॑मन्तं पुरु॒क्षुम् ॥
अ॒स्मे स इ॑न्द्रावरुणा॒वपि॑ ष्या॒त्प्र यो भ॒नक्ति॑ व॒नुषा॒मश॑स्तीः ॥ ६ ॥

यं युवं दाशुऽअध्वराय देवा रयिं धत्थः वसुऽमन्तं पुरुऽक्षुं ।
अस्मेइति सः इन्द्रावरुणौ अपि सात् प्र यः भनक्ति वनुषां अशस्तीः ॥ ६ ॥

अहो, तुम्ही देव महादान प्रसंगास यागामध्ये ऐश्वर्यवंत व पुष्कळ धन धान्य संपन्न धनिकाला जे धन देता, ते धन, किंवा, हे इंद्रावरुणांनो, जेणेकरून शत्रूंच्या शापादि दुर्वचनांचा तुमचा भक्त भंग करून टाकतो, ते ऐश्वर्य, ती सत्ता देखील तुम्ही आम्हाला द्या. ॥ ६ ॥


उ॒त नः॑ सुत्रा॒त्रो दे॒वगो॑पाः सू॒रिभ्य॑ इन्द्रावरुणा र॒यिः ष्या॑त् ॥
येषां॒ शुष्मः॒ पृत॑नासु सा॒ह्वान्प्र स॒द्यो द्यु॒म्ना ति॒रते॒ ततु॑रिः ॥ ७ ॥

उत नः सुऽत्रात्रः देवगोपाः सूरिऽभ्य इंद्रावरुणा रयिः स्यात् ।
येषां शुष्मः पृतनासु सह्वान् प्र सद्यः द्युम्ना तिरते ततुरिः ॥ ७ ॥

आणखी, इंद्रावरुणांनो, आम्हा स्तोतृजनांना सुरक्षित व देवांच्या पाहार्‍यांतले असे सन्मार्गप्राप्य उत्कृष्ट ऐश्वर्यधन व्हावे. ते ऐश्वर्य असे असावे की जेणेकरून शत्रुसैन्यासमोर धिटाईने उभे राहण्याचे व शत्रूंवर तरवार गाजविण्याचे यशस्वी सामर्थ्य आजच प्राप्त होईल. ॥ ७ ॥


नू न॑ इन्द्रावरुणा गृणा॒ना पृ॒ङ्क्तं र॒यिं सौ॑श्रव॒साय॑ देवा ॥
इ॒त्था गृ॒णन्तो॑ म॒हिन॑स्य॒ शर्धो॑ऽ॒पो न ना॒वा दु॑रि॒ता त॑रेम ॥ ८ ॥

नु नः इंद्रावरुणा गृणाना पृंक्तं रयिं सौश्रवसाय देवा ।
इत्था गृणन्तः महिनस्य शर्धः अपः न नावा दुःऽइता तरेम ॥ ८ ॥

अहो आपली सुकीर्ति भक्तांकडून वदवून घेणार्‍या इंद्र व वरुण देवतांनो, आम्हाला आतां पूर्ण धनैश्वर्यरत्न समर्पण कराच. तुम्हां महात्म्यांचे सामर्थ्य एवंप्रकारे गात असतां, नाव ज्याप्रमाणे समुद्राला पार करते तद्वत्, आम्ही सकल पापांपासून ह्या भवसागरांतून तरून जावे. ॥ ८ ॥


प्र स॒म्राजे॑ बृह॒ते मन्म॒ नु प्रि॒यमर्च॑ दे॒वाय॒ वरु॑णाय स॒प्रथः॑ ॥
अ॒यं य उ॒र्वी म॑हि॒ना महि॑व्रतः॒ क्रत्वा॑ वि॒भात्य॒जरो॒ न शो॒चिषा॑ ॥ ९ ॥

प्र संराजे बृहते मन्म नु प्रियं अर्च देवाय वरुणाय सऽप्रथः ।
अयं यः उर्वीइति महिना महिऽव्रतः क्रत्वा विऽभाति अजरः न शोचिषा ॥ ९ ॥

अहो स्तोत्रवक्ते ब्राम्हणांनो, राजाधिराज विराट्स्वरूप देवालाच प्रिय समजा (देवावर प्रेम करा), आणि आपापल्या प्रथानुसार योग्य पूर्वरीत्यनुसार देवाची यज्ञयागादि द्वारे पूजा अर्चा कराच. अहो विप्र भक्तांनो, हा देव एवढा मोठा आहे की ह्याने आपल्या महिम्याने मोठेपणाचे व्रत चालवून, आपल्या प्रभेने जरारहिताप्रमाणे राहून, संसार कर्मरूप यज्ञद्वारा पृथ्वी व आकाश ह्यांना सुप्रकाशित केले आहे. ॥ ९ ॥


इन्द्रा॑वरुणा सुतपावि॒मं सु॒तं सोमं॑ पिबतं॒ मद्यं॑ धृतव्रता ॥
यु॒वो रथो॑ अध्व॒रं दे॒ववी॑तये॒ प्रति॒ स्वस॑र॒मुप॑ याति पी॒तये॑ ॥ १० ॥

इंद्रावरुणा सुतपौ इमं सुतं सोमं पिबतं मद्यं धृतऽव्रता ।
युवोः रथः अध्वरं देवऽवीतये प्रति स्वसरं उप याति पीतये ॥ १० ॥

हे सुशोभायमान, दृढ नियमप्रतिपालक, इंद्रावरुण देवांनो, ह्या मी काढलेल्या महदानंददायक सोमरसाचे प्राशन करा. देवांना आणणारा तो तुमचा रथ ह्या आपल्याच गृहरूप यागाप्रत सोमपानार्थ पहा कसा येत आहे. ॥ १० ॥


इन्द्रा॑वरुणा॒ मधु॑मत्तमस्य॒ वृष्णः॒ सोम॑स्य वृष॒णा वृ॑षेथाम् ॥
इ॒दं वा॒मन्धः॒ परि॑षिक्तम॒स्मे आ॒सद्या॒स्मिन्ब॒र्हिषि॑ मादयेथाम् ॥ ११ ॥

इंद्रावरुणा मधुमत्ऽतमस्य वृष्णः सोमस्य वृषणा आ वृषेथां ।
इदं वां अन्धः परिऽशिक्तं अस्मेइति आऽसद्य अस्मिन् बर्हिषि मादयेथां ॥ ११ ॥

अहो परमश्रेष्ठ इंद्रवरुणांनो, अतिसुरस व अतिश्रेष्ठ अशा ह्या सोमरसाच्या आपल्या भागांचा स्वीकार करा. हे तुमचे उत्कृष्ट हविरूप नैवेद्यान्न तुम्हाकरितां आम्ही पात्र मांडून वाढून ठेविले आहे. अहो, ह्या यज्ञकर्मामध्यें आपली स्वारी येऊन व ह्या आसनावर विराजमान होऊन ह्या भोजनाने आनंदित होवो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६९ ( इंद्राविष्णु सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्राविष्णु : छंद - त्रिष्टुभ्


सं वां॒ कर्म॑णा॒ समि॒षा हि॑नो॒मीन्द्रा॑विष्णू॒ अप॑सस्पा॒रे अ॒स्य ॥
जु॒षेथां॑ य॒ज्ञं द्रवि॑णं च धत्त॒मरि॑ष्टैर्नः प॒थिभिः॑ पा॒रय॑न्ता ॥ १ ॥

सं वां कर्मणा सं इषा हिनोमि इंद्राविष्णूइति अपसः पारे अस्य ।
जुषेथां यज्ञं द्रविणं च धत्तं अरिष्टैः नः पथिऽभिः पारयंता ॥ १ ॥

हे इंद्र, हे विष्णु, ह्या भवाब्धींतून तरून जाण्याकरितां सत्कर्म अथवा सत्स्तोत्रे व समाजासहित हवन द्वारांनी आम्ही तुमच्या सामोरे आलो आहोंत. ह्या आमच्या यज्ञाचा आनंदाने स्वीकार करा आणि आम्हाला नाना प्रकारचे ऐश्वर्य द्या. आमच्या सत्यमार्गावरून निर्विघ्नपणे आम्हाला पार नेणारे आपणच समर्थ आहांत. ॥ १ ॥


या विश्वा॑सां जनि॒तारा॑ मती॒नामिन्द्रा॒विष्णू॑ क॒लशा॑ सोम॒धाना॑ ॥
प्र वां॒ गिरः॑ श॒स्यमा॑ना अवन्तु॒ प्र स्तोमा॑सो गी॒यमा॑नासो अ॒र्कैः ॥ २ ॥

या विश्वासां जनितारा मतीनां इंद्राविष्णूइति कलशा सोमऽधाना ।
प्र वां गिरः शस्यमानाः अवंतु प्र स्तोमासः गीयमानासः अर्कैः ॥ २ ॥

जे यच्च यावत् जीवजन्त्वादि प्राण्यांच्या बुद्धिंचे प्रेरक इंद्राविष्णू देव आहेत, ते जणो काय सोमरस खाणीरूप कलशच होत. अहो ह्याप्रमाणे तुम्ही इंद्राविष्णू देवांनो, तुमची मोठ्या जोराने प्रशंसा करणार्‍या ह्या आमच्या स्तुतिरूप वाणींचे तुम्ही रक्षण करा. ऋङ्‍मय सूक्तांनी गाइल्या जाणार्‍या ह्या सामस्तोत्रांवर तुम्ही सुप्रसन्न रहा. ॥ २ ॥


इन्द्रा॑विष्णू मदपती मदाना॒मा सोमं॑ यातं॒ द्रवि॑णो॒ दधा॑ना ॥
सं वा॑मञ्जन्त्व॒क्तुभि॑र्मती॒नां सं स्तोमा॑सः श॒स्यमा॑नास उ॒क्थैः ॥ ३ ॥

इंद्राविष्णूइति मदपतीइतिमदऽअपती मदानां आ सोमं यातं द्रविणोइति दधाना ।
सं वां अंजंतु अक्तुऽभिः मतीनां सं स्तोमासः शस्यमानासः उक्थैः ॥ ३ ॥

भो आनंददायक सोमरसाधिपती इंद्राविष्णू देवांनो, हे अति हर्षप्रद सोमाकरितां धन देणार्‍या देवांनो, ह्या सोमरस पानाकरितां तुम्ही येथे या. तुम्ही आपल्या सर्वव्यापी तेजाने एथे प्रकट व्हा, आणि आमच्या बुद्धिमंत आचार्यांनी निजवाणींनी केलेल्या तुमच्या स्तुतिस्तोत्रांना शोभा आणा. ॥ ३ ॥


आ वा॒मश्वा॑सो अभिमाति॒षाह॒ इन्द्रा॑विष्णू सध॒मादो॑ वहन्तु ॥
जु॒षेथां॒ विश्वा॒ हव॑ना मती॒नामुप॒ ब्रह्मा॑णि शृणुतं॒ गिरो॑ मे ॥ ४ ॥

आ वां अश्वासः अभिमातिऽसहः इंद्राविष्णूइति सधऽमादः वहंतु ।
जुषेथां विश्वा हवना मतीनां उप ब्रह्माणि शृणुतं गिरः मे ॥ ४ ॥

हे इंद्र व विष्णु देवांनो, तुमचे शूर बहाद्दर आणि एकजुटीने उत्साहवंत होणारे असे ते परक्रमी घोडे तुम्हाला एथे घेऊन येवोत. ज्ञानी भक्तांनी केलेल्या ह्या महायज्ञाचा आनंदाने स्वीकार करा. ह्या माझ्या महान् ब्रह्म स्तोत्रांना ऐकून घ्या. ॥ ४ ॥


इन्द्रा॑विष्णू॒ तत्प॑न॒याय्यं॑ वां॒ सोम॑स्य॒ मद॑ उ॒रु च॑क्रमाथे ॥
अकृ॑णुतम॒न्तरि॑क्षं॒ वरी॒योऽप्रथतं जी॒वसे॑ नो॒ रजां॑सि ॥ ५ ॥

इंद्राविष्णूइति तत् पनयाय्यं वां सोमस्य मदे उरु चक्रमाथे ।
अकृणुतं अंतरिक्षं वरीयः अप्रथतं जीवसे नः रजांसि ॥ ५ ॥

हे इंद्राविष्णु देवांनो, हे तुमचे काम केवढे स्तुत्य म्हणावे की तुम्ही आमच्या सोमरस पानाने अति हर्षित होऊन आपला महान पराक्रम आम्हांला प्रत्यक्ष केला. तुम्ही आम्हां वरती कृपाछत्ररूप अंतरिक्ष लोक स्वर्ग निर्माण केले आणि आमच्या उपजीविकेकरितां व वसतिस्थानाकरितां ही पृथिवी विस्तृत करून ठेविली. ॥ ५ ॥


इन्द्रा॑विष्णू ह॒विषा॑ वावृधा॒नाग्रा॑द्वाना॒ नम॑सा रातहव्या ॥
घृता॑सुती॒ द्रवि॑णं धत्तम॒स्मे स॑मु॒द्र स्थः॑ क॒लशः॑ सोम॒धानः॑ ॥ ६ ॥

इंद्राविष्णूइति हविषा ववृधाना अग्रऽअद्वाना नमसा रातऽहव्या ।
घृतासुतीइतिघृतऽआसुती द्रविणं धत्तं अस्मेइति समुद्र स्थः कलशः सोमधानः ॥ ६ ॥

हे यज्ञांतील हविष्यान्नांनी हर्षित व परिपुष्ट होणार्‍यांनो, सर्वांच्या आधी आपला हविर्भाग घेणार्‍यांनो, यज्ञ यागांमध्ये नमस्कारांनी आराधित मूर्तिंनो, घृतमय अन्नप्रिय इंद्रविष्णु देवांनो, आम्हाला तुम्ही नाना प्रकारचे धन द्या; कारण तुम्ही सोमरसाने भरलेल्या पात्राप्रमाणे समुद्ररूप आहांत. ॥ ६ ॥


इन्द्रा॑विष्णू॒ पिब॑तं॒ मध्वो॑ अ॒स्य सोम॑स्य दस्रा ज॒ठरं॑ पृणेथाम् ॥
आ वा॒मन्धां॑सि मदि॒राण्य॑ग्म॒न्नुप॒ ब्रह्मा॑णि शृणुतं॒ हवं॑ मे ॥ ७ ॥

इंद्राविष्णूइति पिबतं मध्वः अस्य सोमस्य दस्रा जठरं पृणेथां ।
आ वां अन्ंहांसि मदिराणि यग्मन् उप ब्रह्माणि शृणुतं हवं मे ॥ ७ ॥

अहो दर्शनीय इंद्रवरुणांनो, ह्या मधुर सोमरसाचे तुम्ही पान करा. अहो ह्या सोमरसाने तुम्ही आपले पोट भरून घ्या. अति प्रमोदकारी ह्या हविष्यान्नाकडे तुम्ही या. माझे हे ’ब्रह्म’ स्तोत्र मजजवळ बसून ऐकून घ्या. ॥ ७ ॥


उ॒भा जि॑ग्यथु॒र्न परा॑ जयेथे॒ न परा॑ जिग्ये कत॒रश्च॒नैनोः॑ ॥
इन्द्र॑श्च विष्णो॒ यदप॑स्पृधेथां त्रे॒धा स॒हस्रं॒ वि तदैरयेथाम् ॥ ८॥

उभा जिग्यथुः न परा जयेथेइति न परा जिग्ये कतरः चन एनोः ।
इंद्रः च विष्णोइति यत् अपस्पृधेथां त्रेधा सहस्रं वि तत् ऐरयेथां ॥ ८ ॥

देवांनो, त्यावेळी तुम्ही दोघेही जिंकला. तुमचा पराभव झाला नाही. अहो, ह्या इंद्र व विष्णु उभय देवांपैकी कोणा एकाचाही पराभव झाला नाही. हे विष्णु देवा, तू आणि इंद्र मिळून तुम्ही दोघांनी ज्या ज्या म्हणून असुरांविरुद्ध लढाया जिंकल्या त्या हजारों प्रकारच्या लढाया आज मितीलाही ऋक्, यजुः, साम ह्या तीन वेदांनी तीन प्रकारे किंवा स्वर्ग, मृत्यु, पाताळ आदि तीन ठिकाणी गाइल्या जातात. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७० ( द्यावापृथ्वी सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - द्यावापृथ्वी : छंद - जगती


घृतव॑ती॒ भुव॑नानामभि॒श्रियो॒र्वी पृथ्वी म॑धुदुघे सु॒पेश॑सा ।
द्यावा॑पृथि॒वी वरु॒ण॒स्य धर्मणा॒ विष्क॑भिते अ॒जरे॒ भूरि॑रेतसा ॥ १ ॥

घृतवती इति घृतऽवती भुवनानां अभिऽश्रिया उर्वी इति पृथ्वी इति मधुदुघे इति मधुऽदुघे सुऽपेशसा ।
द्यावापृथिवी इति वरुणस्य धर्मणा विष्कभिते इति विस्कऽभिते अजरे इति भूरिऽरेतसा ॥ १ ॥

हे उदकधारिणी द्यावापृथिवी देवतांनो, तुम्ही ह्या भुवनांना आधारभूत आहांत. हे पृथ्वीदेवी, हे मधुर उदकरूप दुग्ध देणार्‍या आकाशदेवते, हे सुंदराकृति द्यावापृथिवी देवतांनो, श्रेष्ठ बीजधारी व अजरामर देवतांनो, तुम्ही वरुण देवाच्या धरणाशक्तिच्या आधारावर परस्पर विभिन्न राहतां. ॥ १ ॥


अस॑श्चन्ती॒ भूरि॑धारे॒ पय॑स्वती घृतं दु॑हाते॒ सु॒कृते॒ शुचि॑व्रते ।
राज॑न्ती अ॒स्य भुव॑नस्य रोदसी अ॒स्मे रेतः॑ सिञ्चतं॒ यन्मनु॑र्हितम् ॥ २ ॥

असश्चन्ती इति भूरिधारे इति भूरिऽधारे पयस्वती इति घृतं दुहाते इति सुऽकृते शुचिव्रते इति ।
राजन्ती इति अस्य भुवनस्य रोदसी इति अस्मे इति रेतः सिञ्चतं यत् मनुःऽहितम् ॥ २ ॥

हे अक्षय, बहुजलामृतधारावर्षक, सुनियमपालक, सत्कर्मकारी, उदकदुग्धदायी, हे भुवन प्रकाशक रुद्रपुत्री द्यावापृथिवी देवींनो, आम्हामध्ये सुपुत्रोत्पादकशक्ति द्या की जेणेंकरून आम्हां मानवांचे कल्याण होईल. ॥ २ ॥


यो वा॑मृजवे॒ क्रम॑णाय रोदसी॒ मर्तो॑ द॒दाश॑ धिष॒णे स साधति ।
प्र प्र॒जाभि॑र्जायते॒ धर्मण॒स्परि॑ यु॒वोः सि॒क्ता विषु॑रूपाणि॒ सव्र॑ता ॥ ३ ॥

यः वाम् ऋजवे क्रमणाय रोदसी इति मर्तः ददाश धिषणे इति सः साधति ।
प्र प्रऽजाभिः जायते धर्मणः परि युवोः सिक्ता विषुऽरूपाणि सऽव्रता ॥ ३ ॥

हे धैर्यवंत द्यावापृथिवी देवींनो, जो वीर आपला जीवनक्रम (चरितार्थ) सुखकर चालण्याकरितां तुम्हाला हविरन्नभोग समर्पण करील, त्याचे काम बनून गेले म्हणून समजावे. कारण, तुम्ही देव निजधर्मानुसार ह्या आपल्या भक्तावर अनुग्रहपूर्वक उदकद्वारा प्रजोत्पादनसामर्थ्य देऊन त्याच्याकरितां तुम्ही दृढविश्वासपूर्वक नियम प्रतिपालनशील तथा नाना वर्णाकृतिसंयुक्त प्रजारूप ऐश्वर्य निर्माण करतां. ॥ ३ ॥


घृते॒न द्यावा॑पृथि॒वी अ॒भीवृ॑ते घृत॒श्रिया॑ घृत॒पृचा॑ घृता॒वृधा॑ ।
उ॒र्वी पृथ्वी हो॑तृवूर्ये पु॒रोहि॑ते॒ ते इद्विप्रा॑ ईळ॑ते सु॒म्नमि॒ष्टये॑ ॥ ४ ॥

घृतेन द्यावापृथिवी इति अभीवृते इत्यभिऽवृते घृतऽश्रिया घृतऽपृचा घृतऽवृधा ।
उर्वी इति पृथ्वी इति होतृऽवूर्ये पुरोहिते इति पुरःऽहिते ते इति इत् विप्राः ईळते सुम्नं इष्टये ॥ ४ ॥

हे आकाश आणि पृथिवी देवतांनो, तुम्ही उदकरूप वस्त्र जणों पांघरल्या आहांत. तुम्ही उदकाधार, उदकरूप घृताने माखून न्हाऊन निघालेल्या, आणि जलवर्धनशील अशा देवी आहांत. हे विस्तृत आकाशपृथिवींनो, हे स्तोत्रकर्त्या याज्ञिकांकडून प्रथम निमंत्रित झालेल्या देवतांनो, श्रेष्ठ ज्ञानी भक्तवर्ग ह्याप्रमाणे यज्ञानिमित्त सप्रेम स्तुति गात आहे. ॥ ४ ॥


मधु॑ नो॒ द्यावा॑पृथि॒वी मि॑मिक्षतां मधु॒श्चुता॑ मधु॒दुघे॒ मधु॑व्रते ।
दधा॑ने य॒ज्ञं द्रवि॑णं च दे॒वता॒ महि॒ श्रवो॒ वाज॑म॒स्मे सु॑वीर्यम् ॥ ५ ॥

मधु नः द्यावापृथिवी इति मिमिक्षतां मधुऽश्चुता मधुदुघे इति मधुऽदुघे मधुव्रते इति मधुऽब्रते ।
दधाने इति यज्ञं द्रविणं च देवता महि श्रवः वाजं अस्मे इति सुऽवीर्यम् ॥ ५ ॥

हे खगोल भूगोल देवतांनो, आम्हांकरितां तुम्ही मधुर उदक रस समर्पण करा. हे मधुरोदकदायिनी, हे दृढप्रतिज्ञावंत देवींनो, तुम्ही गोड रस प्रसवणार्‍या आहांत. भो देवींनो, तुम्ही आम्हांमध्ये यज्ञ, धन, महान् ऐश्वर्य, सत्कीर्ति, बळ आणि उत्तम पौरुष (पराक्रम) धारण करणार्‍या अशा देवता आहांत. ॥ ५ ॥


ऊर्जं॑ नो॒ द्यौश्च॑ पृथि॒वी च॑ पिन्वतां पि॒ता मा॒ता वि॑श्व॒विदा॑ सुदंस॑सा ।
सं॒र॒रा॒णे रोद॑सी वि॒श्वशं॑भुवा स॒निं वाजं॑ र॒यिम॒स्मे समि॑न्वताम् ॥ ६ ॥

ऊर्जं नः द्यौः च पृथिवी च पिन्वतां पिता माता विश्वऽविदा सुऽदंससा ।
संरराणे इति संऽरराणे रोदसी इति विश्वऽशंभुवा सनिं वाजं रयिं अस्मे इति सं इन्वताम् ॥ ६ ॥

हे सर्वज्ञ खगोल पिता देव आणि ही सत्कर्मकारीणी भू माता देवी आम्हांला ओज देवोत. ह्या अखिलजन कल्याणकारी आकाशपृथ्वी देवता जगांत पतिपत्न्यनुरूप सहधर्मानुचरण करीत असतांना वीर्यवंत, यज्ञकर्म कुशल तथा महान् राजैश्वर्य संपन्न आज्ञाधारक अशा सुपुत्रोत्पादनाचे सामर्थ्य आम्हांमध्ये ठेवोत. ॥ ६ ॥


ॐ तत् सत्


GO TOP