PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३१ ( इंद्र सूक्त )

ऋषी - सुहोत्र भरद्वाज : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अभू॒रेको॑ रयिपते रयी॒णामा हस्त॑योरधिथा इन्द्र कृ॒ष्टीः ।
वि तो॒के अ॒प्सु तन॑ये च॒ सूरेऽवोचन्त चर्ष॒णयो॒ विवा॑चः ॥ १ ॥

अभूः एकः रयिऽपते रयीणां आ हस्तयोः अधिथाः इंद्र कृष्टीः ।
वि तोके अप्ऽसु तनये च सूरे अवोचंत चर्षणयः विऽवाचः ॥ १ ॥

दिव्य ऐश्वर्याच्या प्रभो, तुझ्यासारखा तू एकच झालास. इंद्रा सर्व लोकांना तू आपल्या हातांत ठेविले आहेस, तेव्हां पुत्रपौत्रांकरितां, दिव्योदकांकरितां चाललेल्या युद्धांत, हे धुरंधरा, परोपरीने गुणवर्णन करणारे लोक तुझेच यशोगायन करीत असतात. ॥ १ ॥


त्वद्भि॒येन्द्र॒ पार्थि॑वानि॒ विश्वाच्यु॑ता चिच्च्यावयन्ते॒ रजां॑सि ।
द्यावा॒क्षामा॒ पर्व॑तासो॒ वना॑नि॒ विश्वं॑ दृ॒ळ्हं भ॑यते॒ अज्म॒न्ना ते॑ ॥ २ ॥

त्वत् भिया इंद्र पार्थिवानि विश्वा अच्युता चित् च्यवयंते रजांसि ।
द्यावाक्षामा पर्वतासः वनानि विश्वं दृळ्हं भयते अज्मन् आ ते ॥ २ ॥

इंद्रा तुझ्या भितीने, अढळ असे भौतिक पदार्थ व रजोलोकही कांपू लागतात आणि तू भरधोशाने जाऊं लागलास म्हणजे पृथिवी, आकाश, मेघमंडल, पर्वत, अरण्ये, एवंच, याच्चावत् अचल पदार्थ भयभीत होतात. ॥ २ ॥


त्वं कुत्से॑ना॒भि शुष्ण॑मिन्द्रा॒शुषं॑ युध्य॒ कुय॑वं॒ गवि॑ष्टौ ।
दश॑ प्रपि॒त्वे अध॒ सूर्य॑स्य मुषा॒यश्च॒क्रमवि॑वे॒ रपां॑सि ॥ ३ ॥

त्वं कुत्सेन अभि शुष्णं इंद्र अशुषं युध्य कुयवं गोऽइष्टौ ।
दश प्रऽपित्वे अध सूर्यस्य मुषायः चक्रं अविवेः रपांसि ॥ ३ ॥

इंद्रा, कुत्साला सहाय करून अवर्षण पाडणार्‍या शुष्ण राक्षसाशी युद्ध कर आणि प्रकाशार्थ चाललेल्या संग्रामांत कुयवाचे नरडें फोडून टाक. म्हणूनच की काय प्रातःकाळी सूर्याच्या रथाचे एक चाक तू काढून घेतलेस आणि त्याच्या सर्व आपत्तिंचा परिहार केलास. ॥ ३ ॥


त्वं श॒तान्यव॒ शम्ब॑रस्य॒ पुरो॑ जघन्थाप्र॒तीनि॒ दस्योः॑ ।
अशि॑क्षो॒ यत्र॒ शच्या॑ शचीवो॒ दिवो॑दासाय सुन्व॒ते सु॑तक्रे भ॒रद्वा॑जाय गृण॒ते वसू॑नि ॥ ।

त्वं शतानि अव शंबरस्य पुरः जघंथ अप्रतीनि दस्योः ।
अशिक्षः यत्र शच्या शचीऽवः दिवऽदासाय सुन्वते
सुतऽक्रे भरत्ऽवाजाय गृणते वसूनि ॥ ४ ॥

तू त्या धर्महीन शंबर राक्षसाच्या शेंकडो दुर्भेद्य किल्ल्यांचा व नगरांचा विध्वंस करून टाकलास. हे अद्‍भुत शक्तिमंता, भक्तांना अभीष्ट देऊन त्यांच्या कडून सोमरस जणों विकत घेणार्‍या हे देवा, तू आपल्या दैवी शक्तीने सोमार्पण करणारा दिवोदास आणि तुझे स्तोत्र करणारा भारद्वाज ह्यांना तु अमोल अभीष्ट संपत्ति दिलीस. ॥ ४ ॥


स स॑त्यसत्वन्मह॒ते रणा॑य॒ रथ॒माति॑ष्ठ तुविनृम्ण भी॒मम् ।
या॒हि प्र॑पथि॒न्नव॒सोप॑ म॒द्रिक्प्र च॑ श्रुत श्रावय चर्ष॒णिभ्यः॑ ॥ ५ ॥

सः सत्यऽसत्वन् महते रणाय रथं आ तिष्ठ तुविऽनृम्ण भीमं ।
याहि प्रऽपथिन् अवसा उप मद्रिक् प्र च श्रुत श्रवय चर्षणिऽभ्यः ॥ ५ ॥

हे सत्यस्वरूपा, हे सत्वशीला आतां तुंबळ युद्ध होणार तर त्याकरितां आपल्या भयंकर रथावर आरूढ हो. हे अगाधवीर्या, हे अखिलमार्गगामी देवा, आपला प्रसाद घेऊन तू मजकडे आगमन कर. जगत्‍विश्रुता, लोकहितार्थ आपले यश आम्हांस ऐकीव. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३२ ( इंद्र सूक्त )

ऋषी - सुहोत्र भरद्वाज : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अपू॑र्व्या पुरु॒तमा॑न्यस्मै म॒हे वी॒राय॑ त॒वसे॑ तु॒राय॑ ।
वि॒र॒प्शिने॑ व॒ज्रिणे॒ शंत॑मानि॒ वचां॑स्या॒सा स्थवि॑राय तक्षम् ॥ १ ॥

अपूर्व्या पुरुऽतमानि अस्मै महे वीराय तवसे तुराय ।
विऽरप्शिने वज्रिणे शंऽतमानि वचांसि आसा स्थविराय तक्षं ॥ १ ॥

ह्या महा विक्रमी वीराप्रित्यर्थ, ह्या साहसी विशालरूप सनातन वज्रधारीप्रित्यर्थ, अप्रतिम आणि अत्यंत मनोहर अशी अगणित स्तोत्रे मी स्वतः रचून स्वमुखाने गायिली आहेत. ॥ १ ॥


स मा॒तरा॒ सूर्ये॑णा कवी॒नामवा॑सय द्रु॒जदद्रिं॑ गृणा॒नः ।
स्वा॒धीभि॒रृक्व॑भिर्वावशा॒न उदु॒स्रिया॑णामसृजन्नि॒दान॑म् ॥ २ ॥

सः मातरा सूर्येण कवीनां अवासयत् रुजत् अद्रिं गृणानः ।
सुऽआधीभिः ऋक्वऽभिः वावशानः उत् उस्रियाणां असृजत् निऽदानं ॥ २ ॥

त्या इंद्राचे स्तवन होत असते म्हणून कवींची कवित्व जननी जी उषा तिला इंद्राने सूर्यप्रकाशाच्या योगाने वस्त्राच्छादित केली व पर्वताचा भेद केला. आणि ध्यानैकनिष्ठ ऋषींबरोबर आपणही गायनांत निमग्न होऊन त्याने प्रकाश धेनूंचे पाश तोडून टाकले. ॥ २ ॥


स वह्नि॑भि॒र्ऋ क्व॑भि॒र्गोषु॒ शश्व॑न्मि॒तज्ञु॑भिः पुरु॒कृत्वा॑ जिगाय ।
पुरः॑ पुरो॒हा सखि॑भिः सखी॒यन्दृ॒ळ्हा रु॑रोज क॒विभिः॑ क॒विः सन् ॥ ३ ॥

सः वह्निऽभिः ऋक्वऽभिः गोषु शश्वत् मितज्ञुऽभिः पुरुऽकृत्वा जिगाय ।
पुरः पुरःऽहा सखिऽभिः सखीऽयन् दृळ्हा रुरोज कविऽभिः कविः सन् ॥ ३ ॥

असंख्य सत्कृत्ये करणार्‍या त्या इंद्राने उपासना करतांना गुडघे टेकून तल्लीन होणार्‍या पवित्र ऋषिगणांना सहवर्तमान प्रकाशधेनूंसाठी चाललेल्या युधांत वारंवार जय मिळविले. त्या ह्या शत्रुदुर्ग विध्वंसक व भक्त-प्रेमोत्सुक प्रतिभाशाली देवाने आपल्या काव्यनिपुण मित्रांसह दुष्टांच्या दुर्भेद्य नगरांचा उच्छेद केला. ॥ ३ ॥


स नी॒व्याभिर्जरि॒तार॒मच्छा॑ म॒हो वाजे॑भिर्म॒हद्भि॑िश्च॒ शुष्मैः॑ ।
पु॒रु॒वीरा॑भिर्वृषभ क्षिती॒नां आ गि॑र्वणः सुवि॒ताय॒ प्र या॑हि ॥ ४ ॥

सः नीव्याभिः जरितारं अच्छ महः वाजेभिः महत्ऽभिः च शुष्मैः ।
पुरुऽवीराभिः वृषभ क्षितीनां आ गिर्वणः सुविताय प्र याहि ॥ ४ ॥

हे मानवजाति-धुरीणा, तंग बांधलेल्या घोड्या रथास जोडून उच्चप्रतीची सत्वसामर्थ्यें आणि श्रेष्ठ दर्जाची प्रखरवृत्ति ह्यांसह आगमन कर. हे स्तुतिकामुका, वीरप्रचुर सेनेनिशीं उपासकाकडे त्याचे मंगल करण्याकरितां ये. ॥ ४ ॥


स सर्गे॑ण॒ शव॑सा त॒क्तो अत्यै॑र॒प इन्द्रो॑ दक्षिण॒तस्तु॑रा॒षाट् ।
इ॒त्था सृ॑जा॒ना अन॑पावृ॒दर्थं॑ दि॒वेदि॑वे विविषुरप्रमृ॒ष्यम् ॥ ५ ॥

सः सर्गेण शवसा तक्तः अत्यैः अपः इंद्रः दक्षिणतः तुराषाट् ।
इत्था सृजानाः अनपाऽवृत् अर्थं दिवेऽदिवे विविषुः अप्रऽमृष्यं ॥ ५ ॥

झटपट कार्यभाग उरकण्याची प्रवृत्ति आणि बलोद्रेक ह्या गुणांनी मडित हा इंद्रा आहे. आपल्या आवेशी अश्वांनिशी दक्षिण दिशेच्या बाजूने दिव्योदकें त्याने हां हां म्हणतां हस्तगत करून घेतली. ह्या प्रमाणे खरोखरच ते उदकप्रवाह मोकळे होऊन त्याचे प्राप्तव्य जो समुद्र, तिकडे ते निरंकुश आणि अक्षय्य वाहूं लागले. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३३ ( इंद्र सूक्त )

ऋषी - शुनहोत्र भरद्वाज : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


य ओजि॑ष्ठ इन्द्र॒ तं सु नो॑ दा॒ मदो॑ वृषन्स्वभि॒ष्टिर्दास्वा॑न् ।
सौव॑श्व्यं॒ यो व॒नव॒त्स्वश्वो॑ वृ॒त्रा स॒मत्सु॑ सा॒सह॑द॒मित्रा॑न् ॥ १ ॥

यः ओजिष्ठः इंद्र तं सु नः दाः मदः वृषन् सुऽअभिष्टिः दास्वान् ।
सौवश्व्यं यः वनवत् सुऽअश्वः वृत्रा समत्ऽसु ससहत् अमित्रान् ॥ १ ॥

इंद्रा, ज्यामध्ये तेजस्विता पराकाष्ठेची असून हे वीरपुंगवा, जो आपल्या सत्प्रतिपालक्षम शक्तीच्या जोरावर पाहिजे ते देऊं शकतो तो तुझा उल्लास तू आम्हांकडे आण. बुद्धिरूप उत्कृष्ठ अश्वसहाय्यानें नामांकित अशी अश्वसंपत्ति तो आपलीशी करतो, आणि रणांगणांत, कपटी, दुष्ट आणि शत्रु ह्यांना पादाक्रांत करतो. ॥ १ ॥


त्वां ही॒१न्द्राव॑से॒ विवा॑चो॒ हव॑न्ते चर्ष॒णयः॒ शूर॑सातौ ।
त्वं विप्रे॑भि॒र्वि प॒णीँर॑शाय॒स्त्वोत॒ इत्सनि॑ता॒वाज॒मर्वा॑ ॥ २ ॥

त्वां हि इंद्र अवसे विऽवाचः हवंते चर्षणयः शूरऽसातौ ।
त्वं विप्रेभिः वि पणीन् अशायः त्वाऽऊतः इत् सनिता वाजं अर्वा ॥ २ ॥

निरनिराळ्या प्रकारांनी धांवा करणारे जन, शूरसैनिकांच्या झटापटीत संरक्षणासाठी हे इंद्रा तुझांच धांवा करतात. ज्ञानी कवि जे अंगिरस त्यांना बरोबर घेऊन तू "पणि"चा उच्छेद केलास, आणि अजिंक्य योद्धा तुझ्या रक्षणामुळेच सत्वसामर्थ्य प्राप्त करून घेऊं शकतो. ॥ २ ॥


त्वं ताँ इ॑न्द्रो॒भयाँ॑ अ॒मित्रा॒न्दासा॑ वृ॒त्राण्यार्या॑ च शूर ।
वधी॒र्वने॑व॒ सुधि॑तेभि॒रत्कै॒रा पृ॒त्सु द॑र्षि नृ॒णां नृ॑तम ॥ ३ ॥

त्वं तान् इन्द्र उभयान् अमित्रान् दासा वृत्राणि आर्या च शूर ।
वधीः वनाऽइव सुऽधितेभिः अत्कैः आ पृत्ऽसु दर्षि नृणां नृऽतम ॥ ३ ॥

शूर इंद्रा, आर्यभूमींत आमचे शत्रु धर्मविहीन कपटी दुष्ट अशा उभयतांचा तू बीमोड केलास. वीरावंतसा, बरोबर नेमक्या विद्युत्पाताने अरण्ये पार फडशा व्हावी त्या प्रमाणे समरंगणांत तू त्यांच्या चिंधड्या उडवून दिल्यास. ॥ ३ ॥


स त्वं न॑ इ॒न्द्राक॑वाभिरू॒ती सखा॑ वि॒श्वायु॑रवि॒ता वृ॒धे भूः॑ ।
स्वर्षाता॒ यद्ध्वया॑मसि त्वा॒ युध्य॑न्तो ने॒मधि॑ता पृ॒त्सु शू॑र ॥ ४ ॥

सः त्वं नः इन्द्र अकवाभिः ऊती सखा विश्वऽआयुः अविता वृधे भूः ।
स्वःऽसाता यत् ह्वयामसि त्वा युध्यंतः नेमऽधिता पृत्ऽसु शूर ॥ ४ ॥

इंद्रा तू ह्या विश्वाचा प्राण, आणि आमचा प्रतिपालक मित्र आहेस. तर आपल्या अमोघ संरक्षणाने आमची उन्नति कर. आणि म्हणूनच हे शूरा, दिव्यप्रकाशाचा लाभ होण्यासाठी, ह्या संग्रामांत ह्या तुमुल युद्धांत आम्ही तुलाच पाचारण करीत आहों. ॥ ४ ॥


नू॒नं न॑ इन्द्राप॒राय॑ च स्या॒ भवा॑ मृळी॒क उ॒त नो॑ अ॒भिष्टौ॑ ।
इ॒त्था गृ॒णन्तो॑ म॒हिन॑स्य॒ शर्म॑न्दि॒वि ष्या॑म॒ पार्ये॑ गो॒षत॑माः ॥ ५ ॥

नूनं नः इंद्र अपराय च स्याः भवा मृळीकः उत नः अभिष्टौ ।
इत्था गृणंतः महिनस्य शर्मन् दिवि स्याम पार्ये गोसऽतमाः ॥ ५ ॥

इंद्रा, आतां आणि तसाच पुढेंही तू आमचाच हो. आणि आमचा इष्ट हेतू साध्य करून देण्याकरितां आमच्यावर दया कर. ह्या प्रमाणे तुझे गुणसंकीर्तन करून आम्ही तुज सर्व श्रेष्ठाच्या कृपाछत्राखाली ऐन बाणीच्या दिवशी प्रकाश धेनूंचे मालक होऊं असे घडो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३४ ( इंद्र सूक्त )

ऋषी - शुनहोत्र भरद्वाज : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


सं च॒ त्वे ज॒ग्मुर्गिर॑ इन्द्र पू॒र्वीर्वि च॒ त्वद्य॑न्ति वि॒भ्वो मनी॒षाः ।
पु॒रा नू॒नं च॑ स्तु॒तय॒ ऋषी॑णां पस्पृ॒ध्र इन्द्रे॒ अध्यु॑क्था॒र्का ॥ १ ॥

सं च त्वेइति जग्मुः गिरः इंद्र पूर्वीः वि च त्वत् यंति विऽभ्वः मनीषाः ।
पुरा नूनं च स्तुतयः ऋषीणां पस्पृध्रे इंद्रे अधि उक्थऽअर्का ॥ १ ॥

इंद्रा, तुझ्याकडे भक्तांच्या अगणित स्तुति गेल्या आहेत. कवींची सर्वव्यापी कल्पनाशक्ति ही तुझ्याच ठिकाणी लीन झाली आहे. पूर्वी काय आणि आतां काय, ऋषींची स्तोत्रें व सामसूक्तें ह्यांची तुझ्याकडे पोहोंचण्याची चढाऒढ चाललेली आहे. ॥ १ ॥


पु॒रु॒हू॒तो यः पु॑रुगू॒र्त ऋभ्वाँ॒ एकः॑ पुरुप्रश॒स्तो अस्ति॑ य॒ज्ञैः ।
रथो॒ न म॒हे शव॑से युजा॒नो३ऽस्माभि॒रिन्द्रो॑ अनु॒माद्यो॑ भूत् ॥ २ ॥

पुरुहूतः यः पुरुऽगूर्त ऋभ्वा एकः पुरुऽप्रशस्तः अस्ति यज्ञैः ।
रथः न महे शवसे युजानः अस्माभिः इंद्रः अनुमाद्यः भूत् ॥ २ ॥

असंख्य लोक ज्याचा धांवा करतात, असंख्य लोक ज्याचे यश गातात, असा जो महानुभाव इंद्र त्याचेच गौरव यज्ञाने होत असते. त्याने रथ जोडलाच आहे अशा भावनेने, अत्युच्च प्रभावशालित्व प्राप्त होण्याच्या इच्छेने ह्या इंद्राच्या उपासनेने आम्हांस तसाच उल्लास होवो. ॥ २ ॥


न यं हिंस॑न्ति धी॒तयो॒ न वाणी॒रिन्द्रं॒ नक्ष॒न्तीद॒भि व॒र्धय॑न्तीः ।
यदि॑ स्तो॒तारः॑ श॒तं यत्स॒हस्रं॑ गृ॒णन्ति॒ गिर्व॑णसं॒ शं तद॑स्मै ॥ ३ ॥

न यं हिंसंति धीतयः न वाणीः इंद्रं नक्षंति इत् अभि वर्धयंतीः ।
यदि स्तोतारः शतं यत् सहस्रं गृणंति गिर्वणसं शं तत् अस्मै ॥ ३ ॥

ध्यान किंवा स्तुति ह्या पैकी कोणीच त्या इंद्राला उपसर्ग देत नाहींत, इतकेंच नव्हे तर त्याच्या सन्निध जाऊन त्याच्या आनंदाची वृद्धि करतात. आणि स्तोत्रकर्ते कवि जे त्या स्तुतिलालस इंद्राची शेंकडो नव्हे हजारों तऱ्हेने प्रशंसा करतात त्याच्यामुळे त्याला समाधानच वाटते. ॥ ३ ॥


अस्मा॑ ए॒तद्दि॒व्य१र्चेव॑ मा॒सा मि॑मि॒क्ष इन्द्रे॒ न्ययामि॒ सोमः॑ ।
जनं॒ न धन्व॑न्न॒भि सं यदापः॑ स॒त्रा वा॑वृधु॒र्हव॑नानि य॒ज्ञैः ॥ ४ ॥

अस्मै एतत् दिवि अर्चाऽइव मासा मिमिक्षः इंद्रे नि अयामि सोमः ।
जनं न धन्वन् अभि सं यत् आपः सत्रा ववृधुः हवनानि यज्ञैः ॥ ४ ॥

आकाशांत शुभ्रकांति जशी चंद्राशी संलग्न होते, तसे हे स्तवन त्याच्याकडे जाते, आणि हा सोमरस सुद्धा इंद्राच्याच ठिकाणी लीन होतो. निर्जल प्रदेशात उदक जसे तृषाकांत लोकांना गार् करून सोडते त्या प्रमाणे यज्ञद्वारा अर्पण केलेल्या हवनांच्या योगाने भक्तजनांच्या मनाला अत्यंत आनंद प्राप्त होतो. ॥ ४ ॥


अस्मा॑ ए॒तन्मह्या॑ङ्गू॒ षम॑स्मा॒ इन्द्रा॑य स्तो॒त्रं म॒तिभि॑रवाचि ।
अस॒द्यथा॑ मह॒ति वृ॑त्र॒तूर्य॒ इन्द्रो॑ वि॒श्वायु॑रवि॒ता वृ॒धश्च॑ ॥ ५ ॥

अस्मै एतत् महि आङ्गूषं अस्मै इंद्राय स्तोत्रं मतिऽभिः अवाचि ।
असत् यथा महति वृत्रऽतूर्ये इंद्रः विश्वऽआयुः अविता वृधः च ॥ ५ ॥

हे उत्तमप्रतीचे भजन, हे स्तोत्र आम्ही ह्या इंद्राप्रित्यर्थच अगदी अंतःपूर्वक म्हटले आहे. आणि तेणे करून प्रसन्न होऊन हा विश्वात्मा इंद्र ह्या घोरांधकार नाशनाच्या प्रसंगी आमचा प्रतिपाल आणि उत्कर्ष करो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३५ ( इंद्र सूक्त )

ऋषी - नर भरद्वाज : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


क॒दा भु॑व॒न्रथ॑क्षयाणि॒ ब्रह्म॑ क॒दा स्तो॒त्रे स॑हस्रपो॒ष्यन्दाः ।
क॒दा स्तोमं॑ वासयोऽस्य रा॒या क॒दा धियः॑ करसि॒ वाज॑रत्नाः ॥ १ ॥

कदा भुवन् रथऽक्षयाणि ब्रह्म कदा स्तोत्रे सहस्रऽपोष्यं दाः ।
कदा स्तोमं वासयः अस्य राया कदा धियः करसि वाजरत्नाः ॥ १ ॥

आमची प्रार्थनास्तोत्रें तुझ्या रथांत तुझ्याकडे येऊन केव्हां बसतील ? हजारो तर्‍हेने अभिवृद्धि करणारे वैभव तू भक्ताला केव्हां देशील ? ह्या तुझ्या भक्ताचे स्तोत्र तुझ्या दिव्य ऐश्वर्याने विभूषित कर. हे देवा आमच्या वृत्तींना सामर्थ्यरत्नांनी केव्हां अलंकृत करशील ? ॥ १ ॥


कर्हि॑ स्वि॒त्तदि॑न्द्र॒ यन्नृभि॒र्नॄन्वी॒रैर्वी॒रान्नी॒ळया॑से॒ जया॒जीन् ।
त्रि॒धातु॒ गा अधि॑ जयासि॒ गोष्विन्द्र॑ द्यु॒म्नं स्वर्वद्धेह्य॒स्मे ॥ २ ॥

कर्हि स्वित् तत् इंद्र यत् नृऽभिः नॄन् वीरैः वीरान् नीळयासे जय् आजीन् ।
त्रिऽधातु गाः अधि जयासि गोषु इंद्र द्युम्नं स्वःवत् धेहि अस्मेइति ॥ २ ॥

हे केव्हांतरी होणारच. हे इंद्रा आमच्या सैनिकांना तुझ्या सैनिकांशी आणि आमच्या वीरांना तुझ्या वीरांशी तू एकत्र करणारच. तर आतां ह्या युद्धांत विजय संपादन कर. आणि प्रकाशधेनूंप्राप्त्यर्थ चाललेल्या तीन प्रकारच्या प्रयत्नांत तू त्या धेनू जिंकून घे. इंद्रा, दिव्य औज्ज्वल्य आमच्या ठिकाणी ठेव. ॥ २ ॥


कर्हि॑ स्वि॒त्तदि॑न्द्र॒ यज्ज॑रि॒त्रे वि॒श्वप्सु॒ ब्रह्म॑ कृ॒णवः॑ शविष्ठ ।
क॒दा धियो॒ न नि॒युतो॑ युवासे क॒दा गोम॑घा॒ हव॑नानि गच्छाः ॥ ३ ॥

कर्हि स्वित् तत् इंद्र यत् जरित्रे विश्वऽप्सु ब्रह्म कृणवः शविष्ठ ।
कदा धियः न निऽयुतः युवासे कदा गोऽमघा हवनानि गच्छाः ॥ ३ ॥

अमृतप्रभाव इंद्रा, भक्ताकरितां त्याचे प्रार्थनासूक्त सर्वफलप्रद करणार ते केव्हां होणार ? कल्पना-कल्पनांची सांगड जुळावी त्याप्रमाणे तू रथाला ’नियुत्’ घोड्या केव्हां जोडणार ? गोधने प्राप्त करून देणार्‍या ह्या हवींकडे तू केव्हां येणार ? ॥ ३ ॥


स गोम॑घा जरि॒त्रे अश्व॑श्चन्द्रा॒ वाज॑श्रवसो॒ अधि॑ धेहि॒ पृक्षः॑ ।
पी॒पि॒हीषः॑ सु॒दुघा॑मिन्द्र धे॒नुं भ॒रद्वा॑जेषु सु॒रुचो॑ रुरुच्याः ॥ ४ ॥

सः गोऽमघा जरित्रे अश्वऽचन्द्राऽ वाजऽश्रवसः अधि धेहि पृक्षः ।
पीपिहि इषः सुऽदुघां इंद्र धेनुं भरत्ऽवाजेषु सुऽरुचः रुरुच्याः ॥ ४ ॥

गोधनयुक्त ज्ञान, बुद्धिरूप अश्वांनी सुशोभित आणि सात्विक सामर्थ्यामुळे विख्यात अशा प्रकारची सत्ता तू भक्तांच्या ठिकाणी ठेव. हे इंद्रा, आमचा उत्साह, आणि ही दुग्धवती धेनू ह्या दोहोंचाही परितोष कर, आणि त्यांच्या रुचिर दीप्तिने भरद्वाजांचे कुल प्रकाशित होवो. ॥ ४ ॥


तमा नू॒नं वृ॒जन॑म॒न्यथा॑ चि॒च्छूरो॒ यच्छ॑क्र॒ वि दुरो॑ गृणी॒षे ।
मा निर॑रं शुक्र॒दुघ॑स्य धे॒नोरा॑ङ्गि र॒सान्ब्रह्म॑णा विप्र जिन्व ॥ ५ ॥

तं आ नूनं वृजनं अन्यथा चित् शूरः यत् शक्र वि दुरः गृणीषे ।
मा निः अरं शुक्रऽदुघस्य धेनोः आङ्‌गिरसान् ब्रह्मणा विप्र जिन्व ॥ ५ ॥

हे समर्था, तू शूर आहेस. तेव्हां हा भूप्रदेश आम्हांस अन्य प्रकारानेंही खुला कर. तुझेच यश मी गात आहे. प्रकाश प्रसवणारा जो तू त्या तुझ्या धेनूंपासून मी दूर राहूं नये असे कर. आणि हे कविश्रेष्ठा, प्रार्थनासूक्तांच्या योगाने अंगिरसांना उत्तेजन आण. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३६ ( इंद्र सूक्त )

ऋषी - नर भरद्वाज : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


स॒त्रा मदा॑स॒स्तव॑ वि॒श्वज॑न्याः स॒त्रा रायोऽध॒ ये पार्थि॑वासः ।
स॒त्रा वाजा॑नामभवो विभ॒क्ता यद्दे॒वेषु॑ धा॒रय॑था असु॒र्यम् ॥ १ ॥

सत्रा मदासः तव विश्वऽजन्याः सत्रा रायः अध ये पार्थिवासः ।
सत्रा वाजानां अभवः विऽभक्ता यत् देवेषु धारयथाः असुर्यं ॥ १ ॥

तुझा उल्लास म्हणजे सर्व विश्वाचे हित; ऐहिक ऐश्वर्य तेंही तुझेच. तू सत्वसामर्थ्य यथान्याय देणारा, म्हणून निरंतर गाजत अहेस, कारण देवांमध्ये जे दैवी चैतन्य आहे त्यालाही आधार तुझाच अहे. ॥ १ ॥


अनु॒ प्र ये॑जे॒ जन॒ ओजो॑ अस्य स॒त्रा द॑धिरे॒ अनु॑ वी॒र्याय ।
स्यू॒म॒गृभे॒ दुध॒येऽर्वते च॒ क्रतुं॑ वृञ्ज॒न्त्यपि॑ वृत्र॒हत्ये॑ ॥ २ ॥

अनु प्र येजे जनः ओजः अस्य सत्रा दधिरे अनु वीर्याय ।
स्यूमऽगृभे दुधये अर्वते च क्रतुं वृञ्जंति अपि वृत्रऽहत्ये ॥ २ ॥

ह्याची दिव्य तेजस्विता प्राप्त होण्याकरितांच मनुष्ये यज्ञ करीत आली, आणि त्याने आपले वीर्य प्रकट करावे म्हणून त्याला अनुसरली. असे तुझे उपासक घोड्याचा लगाम खेचून धरणारा जो धुधाट अश्वारूढवीर, त्याला सुद्धां तामसी शत्रूंचा नाश करण्याच्या कार्यांत स्फुरण आणतात. ॥ २ ॥


तं स॒ध्रीची॑रू॒तयो॒ वृष्ण्या॑नि॒ पौंस्या॑नि नि॒युतः॑ सश्चु॒रिन्द्र॑म् ।
स॒मु॒द्रं न सिन्ध॑व उ॒क्थशु॑ष्मा उरु॒व्यच॑सं॒ गिर॒ आ वि॑शन्ति ॥ ३ ॥

तं सध्रीचीः ऊतयः वृष्ण्यानि पौंस्यानि नियुतः सश्चुः इंद्रं ।
समुद्रं न सिंधव उक्थऽशुष्मा उरुऽव्यचसं गिरः आ विशंति ॥ ३ ॥

सर्व आयुधे, वीरशालित्व, पुरुषार्थ, नियुत् अश्व हे सर्व त्या इंद्रापुढे कसे अगदी हात जोडून उभे असतात. नद्यांनी समुद्रास मिळावे तशा स्तुतिही गायन कौशल्याने प्रखर होऊन त्या सर्वव्यापी इंद्राच्या ठिकाणीच लीन होतात. ॥ ३ ॥


स रा॒यस्खामुप॑ सृजा गृणा॒नः पु॑रुश्च॒न्द्रस्य॒ त्वमि॑न्द्र॒ वस्वः॑ ।
पति॑र्बभू॒थास॑मो॒ जना॑ना॒मेको॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य॒ राजा॑ ॥ ४ ॥

सः रायः खां उप सृज गृणानः पुरुऽश्चंद्रस्य त्वं इंद्र वस्वः ।
पतिः बभूथ असमः जनानां एकः विश्वस्य भुवनस्य राजा ॥ ४ ॥

इंद्रा, भक्तमंडळात तुझे गुणगायन चाललेलेंच असते, तर दिव्यसंपत्ति, आणि अत्यंत प्रमोददायक असे अमूल्य धन ह्यांचे ओघ तू आम्हांकडे मोकळे सोड. तू जगाचा प्रतिपालक असा आहेस की तुला जोडच नाही, तूच एकटा ह्या सर्व त्रिभुवनांचा राजा आहेस. ॥ ४ ॥


स तु श्रु॑धि॒ श्रुत्या॒ यो दु॑वो॒युर्द्यौर्न भूमा॒भि रायो॑ अ॒र्यः ।
असो॒ यथा॑ नः॒ शव॑सा चका॒नो यु॒गेयु॑गे॒ वय॑सा॒ चेकि॑तानः ॥ ५ ॥

सः तु श्रुधि श्रुत्या यः दुवःऽयुः द्यौः न भूम अभि रायः अर्यः ।
असः यथा नः शवसा चकानः युगेऽयुगे वयसा चेकितानः ॥ ५ ॥

तू भक्तीचा भुकेला आहेस, तेव्हां ह्या ’श्रुति’च्या द्वारे आमची प्रार्थना ऐक. आकाश जसे पृथ्वीचे छत्र तसा आम्हां आर्य जनांच्या ऐश्वर्याचा आधार हो. तेणे करून आम्हांविषयीं तुझ्या मनांत आवड उत्पन्न व्हावी. प्रत्येक पिढीत (वा युगात) तू आपल्या प्रभावाने आणि ऐन उमेदाच्या जोमाने लोकोत्तर होतोसच. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३७ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अ॒र्वाग्रथं॑ वि॒श्ववा॑रं त उ॒ग्रेन्द्र॑ यु॒क्तासो॒ हर॑यो वहन्तु ।
की॒रिश्चि॒द्धि त्वा॒ हव॑ते॒ स्वर्वानृधी॒महि॑ सध॒माद॑स्ते अ॒द्य ॥ १ ॥

अर्वाक् रथं विश्वऽवारं ते उग्र इंद्र युक्तासः हरयः वहंतु ।
कीरिः चित् हि त्वा हवते स्वःऽवान् ऋधीमहि सधमादः ते अद्य ॥ १ ॥

घोरदर्शन इंद्रा, सर्वांना हवा हवासा वाटणारा तुझा रथ त्याला जोडलेले ते तुझे घोडे येथेपर्यंत घेऊन येवोत. दिव्यस्फूर्तिने युक्त असा हा तुझा दीन भक्त-कवि तुला आळवीत आहे. तर तुझ्या बरोबरच सोमरसाने उल्लसित होऊं असे कर. ॥ १ ॥


प्रो द्रोणे॒ हर॑यः॒ कर्मा॑ग्मन्पुना॒नास॒ ऋज्य॑न्तो अभूवन् ।
इन्द्रो॑ नो अ॒स्य पू॒र्व्यः प॑पीयाद्द्यु॒क्षो मद॑स्य सो॒म्यस्य॒ राजा॑ ॥ २ ॥

प्रोइति द्रोणे हरयः कर्म अग्मन् पुनानासः ऋज्यंतः अभूवन् ।
इंद्रः नः अस्य पूर्व्यः पपीयात् द्युक्षः मदस्य सोम्यस्य राजा ॥ २ ॥

तुझ्या हरित्तेजोमय अश्वांनी सोमरसाने भरलेल्या पात्रांत पानकर्म उरकले आणि ते पुनीत होऊन तडक निघून गेले. तर हा विश्वाच्या आधीचा इंद्र तो रस प्राशन करो. आकाशलोकांत त्याचे वास्तव्य आहे, आणि सोमरसापासून जो उल्लास उत्पन्न होतो त्याचा सत्ताधारी प्रभु इंद्रच आहे. ॥ २ ॥


आ॒स॒स्रा॒णासः॑ शवसा॒नमच्छेन्द्रं॑ सुच॒क्रे र॒थ्यासो॒ अश्वाः॑ ।
अ॒भि श्रव॒ ऋज्य॑न्तो वहेयु॒र्नू चि॒न्नु वा॒योर॒मृतं॒ वि द॑स्येत् ॥ ३ ॥

आऽसस्राणासः शवसानं अच्छ इंद्रं सुऽचक्रे रथ्यासः अश्वाः ।
अभि श्रव ऋज्यंतः वहेयुः नू चित् नु वायोः अमृतं वि दस्येत् ॥ ३ ॥

सरसर धांवणारे रथाचे घोडे, आपले नांव राखण्याकरितां तडफ दौडत उत्कट प्रभावशाली इंद्राला त्याच्या सुंदर रथांतून येथे घेऊन येवोत. कारण वायूपासून प्राप्त झालेल्या ह्या अमृत धारेला खळ पडणार नाही. ॥ ३ ॥


वरि॑ष्ठो अस्य॒ दक्षि॑णामिय॒र्तीन्द्रो॑ म॒घोनां॑ तुविकू॒र्मित॑मः ।
यया॑ वज्रिवः परि॒यास्यंहो॑ म॒घा च॑ धृष्णो॒ दय॑से॒ वि सू॒रीन् ॥ ४ ॥

वरिष्ठः अस्य दक्षिणां इयर्ति इंद्रः मघोनां तुविकूर्मिऽतमः ।
यया वज्रिऽवः परिऽयासि अंहः मघा च धृष्णोइति दयसे वि सूरीन् ॥ ४ ॥

इंद्र हा सर्व श्रेष्ठ आहे. दानशूर श्रीमंतामध्ये सुद्धा ह्याचे दातृकर्म अत्यंत उत्कृष्ट ठरते. तोच ह्या भक्तजनाला असे वरदान देतो की त्याच्या योगाने हे वज्रधरा, तू पातकांचा नाश करतोस आणि हे धैर्यसागरा, आम्हांला वैभवाची देणगी आणि लोकधुरीण ह्यांची जोड मिळवून देतोस. ॥ ४ ॥


इन्द्रो॒ वाज॑स्य॒ स्थवि॑रस्य दा॒तेन्द्रो॑ गी॒र्भिर्व॑र्धतां वृ॒द्धम॑हाः ।
इन्द्रो॑ वृ॒त्रं हनि॑ष्ठो अस्तु॒ सत्वा ता सू॒रिः पृ॑णति॒ तूतु॑जानः ॥ ५ ॥

इंद्रः वाजस्य स्थविरस्य दाता इंन्द्रः गीःऽभिः वर्धतां वृद्धऽमहाः ।
इंद्रः वृत्रं हनिष्ठः अस्तु सत्वा आ ता सूरिः पृणति तूतुजानः ॥ ५ ॥

अढळ अशा सत्वसामर्थ्याचा दाता इंद्र, ज्याचे तेज वृद्धिंगत झाले आहे असा हा इंद्र आमच्या स्तुतींनी आनंदित होवो. सत्वसंपन्न इंद्र वृत्राचे पार निर्दलन करो. निकराने भक्तकार्य तडीस नेणारा जगन्नायक देवही आमच्या इच्छा परिपूर्णच करील ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३८ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अपा॑दि॒त उदु॑ नश्चि॒त्रत॑मो म॒हीं भ॑र्षद्द्यु॒मती॒मिन्द्र॑हूतिम् ।
पन्य॑सीं धी॒तिं दैव्य॑स्य॒ याम॒ञ्जन॑स्य रा॒तिं व॑नते सु॒दानुः॑ ॥ १ ॥

अपात् इतः उत् ऊंइति नः चित्रऽतमः महीं भर्षत् द्युऽमतीं इंद्रऽहूतिं ।
पन्यसीं धीतिं दैव्यस्य यामन् जनस्य रातिं वनते सुऽदानुः ॥ १ ॥

येथेच त्याने सोम प्राशन केला आणि त्या अद्‍भुत तेजस्क देवाने आमची उत्कृष्ट, उज्ज्वल व इंद्राचे नांव घेऊन कळकळीने फोडलेली हांक ऐकून तिचा स्वीकार केला. दिव्यलोक प्राप्तीच्या मार्गांत तो महोदार देव, भक्तांची प्रशंसनीय ध्याननिष्ठा आणि हविर्दान ह्यांचा प्रेमाने आदर करतो. ॥ १ ॥


दू॒राच्चि॒दा व॑सतो अस्य॒ कर्णा॒ घोषा॒दिन्द्र॑स्य तन्यति ब्रुवा॒णः ।
एयमे॑नं दे॒वहू॑तिर्ववृत्यान्म॒द्र्य१गिन्द्र॑मि॒यमृ॒च्यमा॑ना ॥ २ ॥

दूरात् चित् आ वसतः अस्य कर्णा घोषात् इंद्रस्य तन्यति ब्रुवाणः ।
आ इयं एनं देवऽहूतिः ववृत्यात् मद्र्यक् इंद्रं इयं ऋच्यमाना ॥ २ ॥

भजन करणारा भक्त, ऐकणाराचे कान तो दूरवर आहे तोच इंद्राच्या नामघोषाने दुमदुमून टाकतो. तर देवाचा हा नामघोष, ही ऋक् स्तुतिमय प्रार्थना ह्या इंद्राला मजकडे वळवून आणो. ॥ २ ॥


तं वो॑ धि॒या प॑र॒मया॑ पुरा॒जाम॒जर॒मिन्द्र॑म॒भ्यनूष्य॒र्कैः ।
ब्रह्मा॑ च॒ गिरो॑ दधि॒रे सम॑स्मिन्म॒हांश्च॒ स्तोमो॒ अधि॑ वर्ध॒दिन्द्रे॑ ॥ ३ ॥

तं वः धिया परमया पुराऽजां अजरं इंद्रं अभि अनूषि अर्कैः ।
ब्रह्म च गिरः दधिरे सं अस्मिन् महान् च स्तोमः अधि वर्धत् इंद्रे ॥ ३ ॥

अत्युच्च ध्यानपद्धतीने, आणि "अर्क" स्तोत्रांनी त्या पुराणपुरुष अजरामर इंद्राच्या महती वर्णन केली. ह्या इंद्रामध्येंच प्रार्थनासूक्तें आणि सर्वस्तुति एकवटल्या आहेत, व ह्या प्रगल्भ सूक्तकलापाची इंद्राच्याच ठिकाणी खरी किंमत वाढली. ॥ ३ ॥


वर्धा॒द्यं य॒ज्ञ उ॒त सोम॒ इन्द्रं॒ वर्धा॒द्ब्रह्म॒ गिर॑ उ॒क्था च॒ मन्म॑ ।
वर्धाहै॑नमु॒षसो॒ याम॑न्न॒क्तोर्वर्धा॒न्मासाः॑ श॒रदो॒ द्याव॒ इन्द्र॑म् ॥ ४ ॥

वर्धात् यं यज्ञः उत सोमः इंद्रं वर्धात् ब्रह्म गिरः उक्था च मन्म ।
वर्ध अह एनं उषसः यामन् अक्तोः वर्धान् मासाः शरदः द्याव इंद्रं ॥ ४ ॥

ह्या इंद्राचा महिमा यज्ञाच्या योगाने वृद्धिंगत होणार. सोमप्राशन, प्रार्थनासूक्तें, व सामसूक्तें, आणि ध्यान ह्यांच्या मुळेंही वृद्धिंगत होणार. रात्राच्या निबिड अंधकारांतून मार्ग काढणारी उषा ह्याचा महिमा वाढविते इतकेंच नव्हे तर महिने शरद इत्यादि ऋतु आणि तारका हे सुद्धां त्याची कीर्ति वृद्धिंगत करतील. ॥ ४ ॥


ए॒वा ज॑ज्ञा॒नं सह॑से॒ असा॑मि वावृधा॒नं राध॑से च श्रु॒ताय॑ ।
म॒हामु॒ग्रमव॑से विप्र नू॒नमा वि॑वासेम वृत्र॒तूर्ये॑षु ॥ ५ ॥

एव जज्ञानं सहसे असामि ववृधानं राधसे च श्रुताय ।
महां उग्रं अवसे विप्र नूनं आ विवासेम वृत्रऽतूर्येषु ॥ ५ ॥

ह्या प्रमाणे दुष्टांचे दमन आणि सज्जनांवर कृपा करण्याकरितां प्रकट होऊन आपला महिमा पूर्णपणे वाढविणारा परमथोर आणि घोररूप असा जो, हे पूर्णप्रज्ञा, तू आहेस त्या तुज जगविख्यात देवाची उपासना ह्या तमःशत्रनाशन प्रसंगी आम्ही भक्तिपूर्वक करूं. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३९ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


म॒न्द्रस्य॑ क॒वेर्दि॒व्यस्य॒ वह्ने॒र्विप्र॑मन्मनो वच॒नस्य॒ मध्वः॑ ।
अपा॑ न॒स्तस्य॑ सच॒नस्य॑ दे॒वेषो॑ युवस्व गृण॒ते गोअ॑ग्राः ॥ १ ॥

मन्द्रस्य कवेः दिव्यस्य वह्नेः विप्रऽमन्मनः वचनस्य मध्वः ।
अपाः नः तस्य सचनस्य देव इषः युवस्व गृणते गोऽअग्राः ॥ १ ॥

उल्लसित झालेला तुझ्या सेवेत तत्पर व ज्ञानीजन चिंतनीय असा जो दिव्यलोकांतील पूज्यकवि त्याच्या वचनमाधुर्याचा आस्वाद तू घेतला आहेस, तर हे देवा, ज्ञान दुग्धप्रमुख असे उत्साहवर्धक अन्न तू आम्हाकडे पाठवून दे. ॥ १ ॥


अ॒यमु॑शा॒नः पर्यद्रि॑मु॒स्रा ऋ॒तधी॑तिभिरृत॒युग्यु॑जा॒नः ।
रु॒जदरु॑ग्णं॒ वि व॒लस्य॒ सानुं॑ प॒णीँर्वचो॑भिर॒भि यो॑ध॒दिन्द्रः॑ ॥ २ ॥

अयं उशानः परि अद्रिं उस्राः ऋतधीतिऽभिः ऋतऽयुक् युजानः ।
रुजत् अरुग्णं वि वलस्य सानुं पणीन् वचःभिः अभि योधत् इंद्रः ॥ २ ॥

हा शुभ्र प्रभारूप धेनूकरिता उत्सुक झाला आहे. सनातन धर्माशी संलग्न आणि यथार्थ निष्ठेने आकळलेल्या अशा ह्या इंद्राने पर्वताचे विदारण केले. बल राक्षसाच्या अभंग गिरिदुर्गाचा विध्वंस केला, आणि नुसत्या शब्दांनीच पणिला दांती तृण धरावयाल लावले. ॥ २ ॥


अ॒यं द्यो॑तयद॒द्युतो॒ व्य१क्तून्दो॒षा वस्तोः॑ श॒रद॒ इन्दु॑रिन्द्र ।
इ॒मं के॒तुम॑दधु॒र्नू चि॒दह्नां॒ शुचि॑जन्मन उ॒षस॑श्चकार ॥ ३ ॥

अयं द्योतयत् अद्युतः वि अक्तून् दोषा वस्तोः शरदः इन्दुः इंद्र ।
इमं केतुं अदधुः नू चित् अह्नां शुचिऽजन्मनः उषसः चकार ॥ ३ ॥

इंद्रा, ह्या तुझ्या तेजस्वी सोमबिंदुंनी शरद ऋतुतील काळोख्या रात्रींना सकाळ सायंकाळच्या संधिप्रकाशाची उज्ज्वलता आणली. तेव्हां भक्तांनी हा रविप्रभेचा ध्वजच म्हणून त्याची स्थापना केली. त्याने उषःकालालाही पवित्र उज्ज्वलतेने उदय पावल्याची संधि दिली. ॥ ३ ॥


अ॒यं रो॑चयद॒रुचो॑ रुचा॒नो३ऽयं वा॑सय॒द्व्यृ१तेन॑ पू॒र्वीः ।
अ॒यम् ई॑यत ऋत॒युग्भि॒रश्वैः॑ स्व॒र्विदा॒ नाभि॑ना चर्षणि॒प्राः ॥ ४ ॥

अयं रोचयत् अरुचः रुचानः अयं वासयत् वि ऋतेन पूर्वीः ।
अयं ईयते ऋतयुक्ऽभिः अश्वैः स्वःऽविदा नाभिना चर्षणिऽप्राः ॥ ४ ॥

त्याने देदीप्यमान होऊन ह्या अप्रकाशित भुवनांना सुप्रकाशित केले. आणि अगणित जनांना सनातन धर्माने तेजस्विता आणली. हा सर्व प्राण्यांच्या हृदयांत वास करतो. आणि ज्याचे घोडे सत्याच्याच प्रभावाने जोडले जातात व ज्याच्या चाकांचा तुंबा स्वर्गीय प्रकाश देतो अशा रथांत बसून संचार करतो. ॥ ४ ॥


नू गृ॑णा॒नो गृ॑ण॒ते प्र॑त्न राज॒न्निषः॑ पिन्व वसु॒देया॑य पू॒र्वीः ।
अ॒प ओष॑धीरवि॒षा वना॑नि॒ गा अर्व॑तो॒ नॄनृ॒चसे॑ रिरीहि ॥ ५ ॥

नु गृणानः गृणते प्रत्न राजन्न् इषः पिन्व वसुऽदेयाय पूर्वीः ।
अपः ओषधीः अविषा वनानि गाः अर्वतः नॄन् ऋचसे रिरीहि ॥ ५ ॥

हे सनातन राजा, तुझे यशोवर्णन आम्ही करीतच आहो, तर स्तोत्रकर्त्याला अमोल संपत्तिची देणगी मिळावी म्हणून त्याच्या अंगी असलेल्या अनेक उत्साहशक्तींचा विकास कर, आणि ऋक्सूक्ताने स्तवन करणार्‍या भक्ताला मेघोदक, औषधी, निर्विष वनस्पति, गोधन आणि अश्वारूढवीर हे अर्पण कर. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४० ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


इन्द्र॒ पिब॒ तुभ्यं॑ सु॒तो मदा॒याव॑ स्य॒ हरी॒ वि मु॑चा॒ सखा॑या ।
उ॒त प्र गा॑य ग॒ण आ नि॒षद्याथा॑ य॒ज्ञाय॑ गृण॒ते वयो॑ धाः ॥ १ ॥

इंद्र पिब तुभ्यं सुतः मदाय अव स्य हरीइति वि मुच सखाया ।
उत प्र गाय गणे आ निसद्य अथ यज्ञाय गृणते वयः धाः ॥ १ ॥

इंद्रा, उल्लसित होण्यासाठी हा रस प्राशन कर. हा तुझा करतांच तयार केला आहे. तर आपले घोडे सोड, त्या आमच्या दोघां मित्रांना मोकळे करून दे. भक्तमंडळात अधिष्ठित होऊन साम गायनाला आरंभ कर, आणि यज्ञसिद्ध्यर्थ स्तोत्रकर्त्याच्या आंगी धमक राहील असे कर. ॥ १ ॥


अस्य॑ पिब॒ यस्य॑ जज्ञा॒न इ॑न्द्र॒ मदा॑य॒ क्रत्वे॒ अपि॑बो विरप्शिन् ।
तमु॑ ते॒ गावो॒ नर॒ आपो॒ अद्रि॒रिन्दुं॒ सम॑ह्यन्पी॒तये॒ सम॑स्मै ॥ २ ॥

अस्य पिब यस्य जज्ञानः इंद्र मदाय क्रत्वे अपिबः विरप्शिन् ।
तं ऊंइति ते गावः नरः आपः अद्रिः इंदुं सं अह्यन् पीतये सं अस्मैऽ ॥ २ ॥

आविर्भूत होताच उल्लास वाटावा आणि अलौकिक कर्तृत्व गाजवावे म्हणून जो रस तू प्राशन केलास, तसाच हा सोमरस, हे विकसितरूपा, तू आतांही ग्रहण कर. तुझ्या प्रकाश धेनू, तुझे सैनिक, त्या दिव्य नद्या, ते वज्र ह्या सर्वांनीच हा सोमरस तू प्राशन करावास म्हणून सिद्ध केला आहे. ॥ २ ॥


समि॑द्धे अ॒ग्नौ सु॒त इ॑न्द्र॒ सोम॒ आ त्वा॑ वहन्तु॒ हर॑यो॒ वहि॑ष्ठाः ।
त्वा॒य॒ता मन॑सा जोहवी॒मीन्द्रा या॑हि सुवि॒ताय॑ म॒हे नः॑ ॥ ३ ॥

संऽइद्धे अग्नौ सुते इंद्र सोमे आ त्वा वहंतु हरयः वहिष्ठाः ।
त्वाऽयता मनसा जोहवीमि इंद्र आ याहि सुविताय महे नः ॥ ३ ॥

तुझे ते बळकट घोडे, अग्नि प्रदीप्त होतांच व सोमरस मिळून तयार होतांच तुला येथे आणोत. तुझ्या ठिकाणीच चित्त लावून मी तुला येण्याविषयी विनवीत आहे. तर हे इंद्रा आमचे सर्वोत्कृष्ट कल्याण व्हावे म्हणून इकडे आगमन कर. ॥ ३ ॥


आ या॑हि॒ शश्व॑दुश॒ता य॑या॒थेन्द्र॑ म॒हा मन॑सा सोम॒पेय॑म् ।
उप॒ ब्रह्मा॑णि शृणव इ॒मा नोऽथा ते य॒ज्ञस्त॒न्वे३वयो॑ धात् ॥ ४ ॥

आ याहि शश्वत् उशता ययाथ इंद्र महा मनसा सोमऽपेयं ।
उप ब्रह्माणि शृणवः इमा नः अथा ते यज्ञः तन्वे वयः धात् ॥ ४ ॥

तू इकडे वारंवार ये. भक्तोत्सुक परंतु उदार अशा तुझ्या मनाने हे इंद्रा, तू सोमरस प्राशनार्थ आगमन कर. आमची ही प्रार्थनासूक्ते ऐकून घे, म्हणजे आमचा हा तुझा यज्ञ पहा आमच्या अंतःकरणाला केवढी उमेद देईल. ॥ ४ ॥


यद् इ॑न्द्र दि॒वि पार्ये॒ यद् ऋध॒ग् यद् वा॒ स्वे सद॑ने॒ यत्र॒ वासि॑ ।
अतो॑ नो य॒ज्ञमव॑से नि॒युत्वा॑न्स॒जोषाः॑ पाहि गिर्वणो म॒रुद्भिः॑ ॥ ५ ॥

यत् इंद्र दिवि पार्ये यत् ऋधक् यत् वा स्वे सदने यत्र वा असि ।
अतः नः यज्ञं अवसे नियुत्वान् सऽजोषाः पाहि गिर्वणः मरुत्ऽभिः ॥ ५ ॥

इंद्रा, ह्या आजच्या जिवावरच्या प्रसंगी तू समक्ष, एकीकडे किंवा आपल्या स्वस्थानांत कोठेंही अस, परंतु तेथूनच हे स्तुतिप्रिया देवा, प्रेमळ मनाने मरुतांसह येऊन ह्या आमच्या यज्ञाचे रक्षण कर. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP