PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त ११ ते २०

ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ११ ( अग्नि सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


यज॑स्व होतरिषि॒तो यजी॑या॒नग्ने॒ बाधो॑ म॒रुतां॒ न प्रयु॑क्ति ।
आ नो॑ मि॒त्रावरु॑णा॒ नास॑त्या॒ द्यावा॑ हो॒त्राय॑ पृथि॒वी व॑वृत्याः ॥ १ ॥

यजस्व होतः इषितः यजीयान् अग्ने बाधः मरुतां न प्रऽयुक्ति ।
आ नः मित्रावरुणा नासत्या द्यावा होत्राय पृथिवीइति ववृत्याः ॥ १ ॥

हे अग्नी, तू यज्ञाच्या मानाला अगदी योग्य आहेस. तुझे मन आमच्याकडे वळून मरुताच्या उत्तेजनाने धांवण्याने त्यांचे सैन्य जसे देवा प्रित्यर्थ यज्ञ करते, त्याप्रमाणे आमच्या करता तूंही यजन कर. आणि त्या करतां मित्रावरुण, सत्यस्वरूप अश्वी, द्यावापृथिवी या विभूति, आहुतिचा स्वीकार करण्याकरता येथे आदराने घेऊन ये. ॥ १ ॥


त्वं होता॑ म॒न्द्रत॑मो नो अ॒ध्रुग॒न्तर्दे॒वो वि॒दथा॒ मर्त्ये॑षु ।
पा॒व॒कया॑ जु॒ह्वा३ वह्नि॑रा॒साग्ने॒ यज॑स्व त॒न्व१ं तव॒ स्वाम् ॥ २ ॥

त्वं होता मन्द्रऽतमः नः अध्रुक् अंतः देवः विदथा मर्त्येषु ।
पावकया जुह्वा वह्निः आसा अग्ने यजस्व तन्वं तव स्वां ॥ २ ॥

तू आनंदघन, तू आमचा होता आहेस, तुला कोणीही शत्रू नाही व यज्ञ सभेत काय पण ह्या मृत्युलोकांतही आमचा देव तूच. हे अग्नि आमचे हव्य देवांकडे तूंच नेतोस. तर तुझ्या पवित्र ज्वालेने, तुझ्या मुखाने ते ग्रहण करून तू स्वतः संतुष्ट हो. ॥ २ ॥


धन्या॑ चि॒द्धि त्वे धि॒षणा॒ वष्टि॒ प्र दे॒वाञ्जन्म॑ गृण॒ते यज॑ध्यै ।
वेपि॑ष्ठो॒ अङ्गि॑ेरसां॒ यद्ध॒ विप्रो॒ मधु॑ छ॒न्दो भन॑ति रे॒भ इ॒ष्टौ ॥ ३ ॥

धन्या चित् हि त्वेइति धिषणा वष्टि प्र देवान् जन्म गृणते यजध्यै ।
वेपिष्ठः अङ्‌गिरसां यत् ह विप्रः मधु छन्दः भनति रेभः इष्टौ ॥ ३ ॥

अंगिरसापैकी अत्यंत प्रतिभाशाली कवि रेभ हा जेव्हां अभीष्ट प्राप्तीस्तव यजन करण्याकरता मधुर गायन करतो - ज्या भक्ताने तुझ्या अवताराची महती वर्णन केली त्या भक्ताकरिता गायन करतो; अशा वेळेस तुझ्या अन्तःकरणांतील औत्सुक्यबुद्धि द्विगुणित होऊन देवांवर प्रसन्न होतोस. ॥ ३ ॥


अदि॑द्युत॒त्स्वपा॑को वि॒भावाग्ने॒ यज॑स्व॒ रोद॑सी उरू॒ची ।
आ॒युं न यं नम॑सा रा॒तह॑व्या अ॒ञ्जन्ति॑ सुप्र॒यसं॒ पञ्च॒ जनाः॑ ॥ ४ ॥

अदिद्युतत् सु अपाकः विऽभावा अग्ने यजस्व रोदसीइति उरूचीइति ।
आयुं न यं नमसा रातऽहव्याः अञ्जंति सुऽरयसं पञ्च जनाः ॥ ४ ॥

हा ज्ञानशाली देदीप्यमान अग्नि पहा तेजाने तळपूं लागला. हे अग्नी, तू ह्या विस्तीर्ण रोदसीला माझ्याकरता संतुष्ट कर. हा अग्नि सुखदाता आणि आयुष्यवर्धक म्हणून पांचही जातीचे हवि अर्पण करून व प्रणिपात करून त्याचे अर्चन करीत असतात. ॥ ४ ॥


वृ॒ञ्जे ह॒ यन्नम॑सा ब॒र्हिर॒ग्नावया॑मि॒ स्रुग्घृ॒तव॑ती सुवृ॒क्तिः ।
अम्य॑क्षि॒ सद्म॒ सद॑ने पृथि॒व्या अश्रा॑यि य॒ज्ञः सूर्ये॒ न चक्षुः॑ ॥ ५ ॥

वृञ्जे ह यत् नमसा बर्हिः अग्नौ अयामि स्रुक् घृतऽवती सुऽवृक्तिः ।
अम्यक्षि सद्म सदने पृथिव्याः अश्रायि यज्ञः सूर्ये न चक्षुः ॥ ५ ॥

मी नम्रपणाने प्रणिपात करून दर्भाने साफसूफ करीत आहे, इकडे तुमची घृतपूर्ण आणि सुनिर्मल स्रुक् (पळी) ही आहुति देण्याकरता अग्नीसन्मुख जात आहे तो पृथिवीच्या पाठीवर यज्ञमंदिरांत वेदीची उभारणी होऊन आमचे नेत्र जसे सूर्याकडे लागलेले असतात तसाच आमचा यज्ञ सुद्धा सूर्याच्याच ठिकाणी राहतो. ॥ ५ ॥


द॒श॒स्या नः॑ पुर्वणीक होतर्दे॒वेभि॑रग्ने अ॒ग्निभि॑रिधा॒नः ।
रा॒यः सू॑नो सहसो वावसा॒ना अति॑ स्रसेम वृ॒जनं॒ नांहः॑ ॥ ६ ॥

दशस्य नः पुरुऽअनीक होतः देवेभिः अग्ने अग्निऽभिः इधानः ।
रायः सूनोइति सहसः वावसानाः अति स्रसेम वृजनं न अंहः ॥ ६ ॥

हे अग्नी, हे नानारूपधरा आचार्या, तुझ्या अंगभूत असलेल्या दुसर्‍या अग्नीसह तुला देवांनी प्रज्वलित केले आहे. तर हे विजयीसामर्थ्याच्या दात्या आम्हाला दिव्य संपत्ति अर्पण कर. म्हणजे तिच्या योगाने मंडित होऊन आम्ही दुःखाला व तसेच पातकालाही आमच्या पासून झाडून टांकू. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १२ ( अग्नि सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


मध्ये॒ होता॑ दुरो॒णे ब॒र्हिषो॒ राळ॒ग्निस्तो॒दस्य॒ रोद॑सी॒ यज॑ध्यै ।
अ॒यं स सू॒नुः सह॑स ऋ॒तावा॑ दू॒रात्सूर्यो॒ न शो॒चिषा॑ ततान ॥ १ ॥

मध्ये होता दुरोणे बर्हिषः राट् अग्निः तोदस्य रोदसीइति यजध्यै ।
अयं सः सूनुः सहसः ऋतऽवा दूरात् सूर्यः न शोचिषा ततान ॥ १ ॥

आमचा यज्ञ होता - व जगत्प्रेरक सूर्याचे तेजच अशा अग्नीने आपल्या मंदिरांत परिस्तरणांच्या आंत अधिष्ठित होऊन रोदसीचे यजन करण्यास आरंभ केला. हा पहा विजयी सामर्थ्य देणारा सद्धर्मप्रिय अग्नि, सूर्याप्रमाणेंच आपल्या क्रांतीच्या योगाने दूरवर पसरला आहे. ॥ १ ॥


आ यस्मि॒न्त्वे स्वपा॑के यजत्र॒ यक्ष॑द्राजन्स॒र्वता॑तेव॒ नु द्यौः ।
त्रि॒ष॒धस्थ॑स्तत॒रुषो॒ न जंहो॑ ह॒व्या म॒घानि॒ मानु॑षा॒ यज॑ध्यै ॥ २ ॥

आ यस्मिन् त्वेइति सु अपाके यजत्र यक्षत् राजन् सर्वताताऽइव नु द्यौः ।
त्रिऽसधस्थः ततरुषः न जंहः हव्या मघानि मानुषा यजध्यै ॥ २ ॥

हे यज्ञार्हा, जगाच्या राजा, तू अजड म्हणून तुझ्या ठिकाणी खुद्द द्युने (आकाशाने) सुद्धां सर्व कामना सिद्ध्यर्थ यजन केले, असा तूं घो घो वहाणार्‍या वार्‍याच्या झोता प्रमाणे सर्व त्रैलोक्य व्यापून बसला आहेस. तर आम्हां मानवांचा हविर्भाग आमची होमद्रव्ये ह्यांचे हवन करण्यास आरंभ कर. ॥ २ ॥


तेजि॑ष्ठा॒ यस्या॑र॒तिर्व॑ने॒राट् तो॒दो अध्व॒न्न वृ॑धसा॒नो अ॑द्यौत् ।
अ॒द्रो॒घो न द्र॑वि॒ता चे॑तति॒ त्मन्नम॑र्त्योऽव॒र्त्र ओष॑धीषु ॥ ३ ॥

तेजिष्ठा यस्य अरतिः वनेराट् तोदः अध्वन् न वृधसानः अद्यौत् ।
अद्रोघः न द्रविता चेतति त्मन् अमर्त्यः अवर्त्रः ओषधीषु ॥ ३ ॥

तुझी अत्यन्त तेजःपुंज दीप्ति, अरण्यांची स्वामिनी आहे; जगत्प्रेरक सूर्याची प्रखरता जशी मार्गांत वाढत जाते त्या प्रमाणे हाही वृद्धिंगत होऊन प्रकाशूं लागला, तथापि वायूची झुळूक जशी कोणास उपद्रव देत नाही तसा हा निरुपद्रवी देव, हा अमर विभूति, वनस्पतींच्या पोटांत दबून न राहतां आपण होऊन स्पष्टपणे दृष्टिगोचर होतो. ॥ ३ ॥


सास्माके॑भिरे॒तरी॒ न शू॒षैर॒ग्नि ष्ट॑वे॒ दम॒ आ जा॒तवे॑दाः ।
द्र्वन्नो व॒न्वन् क्रत्वा॒ नार्वो॒स्रः पि॒तेव॑ जार॒यायि॑ य॒ज्ञैः ॥ ४ ॥

सः अस्माकेभिः एतरी न शूषैः अग्नि स्तवे दमे आ जातऽवेदाः ।
द्रुऽअन्नः वन्वन् क्रत्वा न अर्वा उस्रः पिताऽइव जारयायि यज्ञैः ॥ ४ ॥

ह्या सर्वज्ञ अग्नीचे यश यज्ञमंदिरांत आमच्या प्रभावशाली स्तोत्रांनी गायिले आहे. काष्ठें हेच त्याचे अन्न, तथापि आपल्या अगाध कर्तृत्वाने, आमच्या अग्रेसर योद्ध्याप्रमाणे तो आमचे कार्य करीत आहे. व तो उषेच्या पित्याप्रमाणे आहे आणि अशा अर्थानेंही यज्ञद्वारा त्याची उपासना होतच असते. ॥ ४ ॥


अध॑ स्मास्य पनयन्ति॒ भासो॒ वृथा॒ यत्तक्ष॑दनु॒याति॑ पृ॒थ्वीम् ।
स॒द्यो यः स्य॒न्द्रो विषि॑तो॒ धवी॑यानृ॒णो न ता॒युरति॒ धन्वा॑ राट् ॥ ५ ॥

अध स्म अस्य पनयंति भासः वृथा यत् तक्षत् अनुऽयाति पृथ्वीं ।
सद्यः यः स्यन्द्रः विऽसितः धवीयान् ऋणः न तायुः अति धन्व राट् ॥ ५ ॥

तो आपल्या ज्वालारूप जिव्हेने पृथ्वीला चाटीत असतो तेव्हां त्याचे किरणसुद्धां त्याची स्तुति करीत असतात. आणि एकदम मोकळा सुटून धडाक्याने वाहणार्‍या धबधब्या प्रमाणे, किंवा सूड उगविणार्‍या जबरदस्ताप्रमाणे तो मोकळ्या मैदानांतही धुमाकूळ घालतो. ॥ ५ ॥


स त्वं नो॑ अर्व॒न्निदा॑या॒ विश्वे॑भिरग्ने अ॒ग्निभि॑रिधा॒नः ।
वेषि॑ रा॒यो वि या॑सि दु॒च्छुना॒ मदे॑म श॒तहि॑माः सु॒वीराः॑ ॥ ६ ॥

सः त्वं नः अर्वन् निदायाः विश्वेभिः अग्ने अग्निऽभिः इधानः ।
वेषि रायः वि यासि दुच्छुना मदेम शतहिमाः सुवीराः ॥ ६ ॥

हे अग्रेसरा अग्ने, आपल्या अंगभूत अशा सर्व अग्नीसहित तूं प्रदीप्त झाला आहेस तर निंदेपासून आमचे रक्षण कर. आम्हाला दिव्य संपत्ति दे, आणि दुर्वासना नष्ट कर. म्हणजे आम्ही आमच्या सनिनिकांसह वर्तमान शंभर वर्षे आनंदत राहूं. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १३ ( अग्नि सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


त्वद्विश्वा॑ सुभग॒ सौभ॑गा॒न्यग्ने॒ वि य॑न्ति व॒निनो॒ न व॒याः ।
श्रु॒ष्टी र॒यिर्वाजो॑ वृत्र॒तूर्ये॑ दि॒वो वृ॒ष्टिरीड्यो॑ री॒तिर॒पाम् ॥ १ ॥

त्वत् विश्वा सुऽभग सौभगानि अग्ने वि यंति वनिनः न वयाः ।
श्रुष्टी रयिः वाजः वृत्रऽतूर्ये दिवः वृष्टिः ईड्यः रीतिः अपां ॥ १ ॥

हे अग्नी वृक्षाच्या बुंध्यापासून फांद्या निघाव्या त्याप्रमाणे हे मंगलाधीशा, सर्व मंगलकारक वस्तु तुझ्या पासून निघतात. दिव्यधन, शत्रूंशी लढण्यांत दाखवावयाचे सात्विक शौर्य, आकाशांतून होणारी वृष्टी, आणि त्या उदकाचे प्रशस्त प्रवाह हे सर्व तुझेच अंकित आहेत. ॥ १ ॥


त्वं भगो॑ न॒ आ हि रत्न॑मि॒षे परि॑ज्मेव क्षयसि द॒स्मव॑र्चाः ।
अग्ने॑ मि॒त्रो न बृ॑ह॒त ऋ॒तस्यासि॑ क्ष॒त्ता वा॒मस्य॑ देव॒ भूरेः॑ ॥ २ ॥

त्वं भगः नः आ हि रत्नं इषे परिज्माऽइव क्षयसि दस्मऽवर्चाः ।
अग्ने मित्रः न बृहत ऋतस्य असि क्षत्ता वामस्य देव भूरे ॥ २ ॥

तू आमचा भाग्यदाता म्हणून अमोलिक रत्न मी तुझ्याच जवळ मागतो. तुझा पराक्रम अत्युद्‍भुत, पृथ्वीला वेढून टाकणार्‍या वायू प्रमाणे आहे. सर्व ठिकाणी तुझी वस्ती आहे. हे अग्निदेवा जगन्मित्राप्रमाणे श्रेष्ठ अशा ईश्वरी न्यायाचा तू अधिकारी आहेस. हे देवा अत्यंत रमणीय अशा दिव्य संपत्तीचाही तू यथाविभाग दाता आहेस. ॥ २ ॥


स सत्प॑तिः॒ शव॑सा हन्ति वृ॒त्रमग्ने॒ विप्रो॒ वि प॒णेर्भ॑र्ति॒ वाज॑म् ।
यं त्वं प्र॑चेत ऋतजात रा॒या स॒जोषा॒ नप्त्रा॒पां हि॒नोषि॑ ॥ ३ ॥

सः सत्ऽपतिः शवसा हंति वृत्रं अग्ने विप्रः वि पणेः भर्ति वाजं ।
यं त्वं प्रऽचेतः ऋतऽजात राया सऽजोषाः नप्त्रा अपां हिनोषि ॥ ३ ॥

हे ज्ञानरूपा, हे सद्धर्मप्रभवा, दिव्य जलांतून आविर्भूत होऊन वात्सल्याने ज्या भक्ताला दिव्य ऐश्वर्याच्या आशेने तू सन्मार्गास लावतोस, हे अग्नि, तो भक्त सज्जन प्रतिपालक होऊन आपल्या उत्कृष्ट शौर्याने शत्रूचा संहार करतो. तोच प्रभावशाली भक्त कंजुष दुष्टाचे सत्व हरण करतो. ॥ ३ ॥


यस्ते॑ सूनो सहसो गी॒र्भिरु॒क्थैर्य॒ज्ञैर्मर्तो॒ निशि॑तिं वे॒द्यान॑ट् ।
विश्वं॒ स दे॑व॒ प्रति॒ वार॑मग्ने ध॒त्ते धा॒न्य१म् पत्य॑ते वसव्याइः ॥ ४ ॥

यः ते सूनोइति सहसः गीःऽभिः उक्थैः यज्ञैः मर्तः निऽशितिं वेद्या आनट् ।
विश्वं सः देव प्रति वा अरं अग्ने धत्ते धान्यं पत्यते वसव्यैः ॥ ४ ॥

विजयी सामर्थ्य देणार्‍या देवा, जो दीन मानव स्तुति स्तोत्रांनी गायनांनी, यज्ञांनी आपल्या अल्प बुद्धिप्रमाणे तुझ्या औत्सुक्याला भरते आणतो. हे देवा तोच भक्त सर्व धनधान्य आपल्या हातांत ठेऊं शकतो. सर्व अमूल्य धनाचा मालक तोच असतो. ॥ ४ ॥


ता नृभ्य॒ आ सौ॑श्रव॒सा सु॒वीराग्ने॑ सूनो सहसः पु॒ष्यसे॑ धाः ।
कृ॒णोषि॒ यच्छव॑सा॒ भूरि॑ प॒श्वो वयो॒ वृका॑या॒रये॒ जसु॑रये ॥ ५ ॥

ता नृभ्यः आ सौश्रवसा सुऽवीरा अग्ने सूनोइति सहसः पुष्यसे धाः ।
कृणोषि यत् छवसा भूरि पश्वः वयः वृकाय अरये जसुरये ॥ ५ ॥

जयिष्णु सामर्थ्यदात्या अग्निदेवा, तू आमच्या लोकांच्या उन्नतीसाठी वीरप्रचुर आणि सत्कीर्तिप्रद अशी जी साधने असतील ती आम्हांस सुलभ कर. तू आपल्या स्फुरत्‍बलाने खादाड लांडग्याला, शत्रूला आणि दुबळ्याला सुद्धां जर पशु, संपत्ति व तकवा देतोस, तर आम्हां तुझ्या भक्तांना त्या गोष्टी तू खात्रीने देशील. ॥ ५ ॥


व॒द्मा सू॑नो सहसो नो॒ विहा॑या॒ अग्ने॑ तो॒कं तन॑यं वा॒जिनो॑ दाः ।
विश्वा॑भिर्गी॒र्भिर॒भि पू॒र्तिम॑श्यां॒ मदे॑म श॒तहि॑माः सु॒वीराः॑ ॥ ६ ॥

वद्मा सूनोइति सहसः नः विऽहायाऽ अग्ने तोकं तनयं वाजि नः दाः ।
विश्वाभिः गीःऽभिः अभि पूर्तिं अश्यां मदेम शतहिमाः सुवीराः ॥ ६ ॥

सामर्थ्य प्रभवा तू आमचा शिक्षक, तू उदारात्मा आहेस. हे अग्नी आम्हाला सात्विक बल आणि पुत्रपौत्र दे. सर्व प्रकारच्या तुझ्या स्तुतींनी माझे मनोरथ सफल होवोत म्हणजे आमच्या शूर सैनिकांसहवर्तमान आम्ही आनंदमग्न राहूं. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १४ ( अग्नि सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - शक्वरी, त्रिष्टुभ्


अ॒ग्ना यो मर्त्यो॒ दुवो॒ धियं॑ जु॒जोष॑ धी॒तिभिः॑ ।
भस॒न् नु ष प्र पू॒र्व्य इषं॑ वुरी॒ताव॑से ॥ १ ॥

अग्ना यः मर्त्यः दुवः धियं जुजोष धीतिऽभिः ।
भसत् नु सः प्र पूर्व्यः इषं वुरीत अवसे ॥ १ ॥

जो दीन मानव आपली उपासना आणि ध्यान आपल्या प्रेमळ स्तोत्रांनी अग्नीला मान्य होईल असे करील, तो सर्वांच्या आधी पापाची राखरांगोळी करील आणि आत्मरक्षणार्थ मनोत्साहाचा लाभ जोडील. ॥ १ ॥


अ॒ग्निरिद्धि प्रचे॑ता अ॒ग्निर्वे॒धस्त॑म॒ ऋषिः॑ ।
अ॒ग्निं होता॑रमीळते य॒ज्ञेषु॒ मनु॑षो॒ विशः॑ ॥ २ ॥

अग्निः इत् धि प्रऽचेताः अग्निः वेधःऽतमः ऋषिः ।
अग्निं होतारं ईळते यज्ञेषु मनुषः विशः ॥ २ ॥

अग्नि हाच ज्ञानघन, अग्नि हाच अत्युर्कृष्ट नियामक होय, म्हणूनच मानवी प्रजा अग्नीरूप होत्याची यज्ञामध्ये महती गात असतात. ॥ २ ॥


नाना॒ ह्य१ग्नेऽवसे॒ स्पर्ध॑न्ते॒ रायो॑ अ॒र्यः ।
तूर्व॑न्तो॒ दस्यु॑मा॒यवो॑ व्र॒तैः सीक्ष॑न्तो अव्र॒तम् ॥ ३ ॥

नाना हि अग्ने अवसे स्पर्धंते रायः अर्यः ।
तूर्वंतः दस्युं आयवः व्रतैः सीक्षंतः अव्रतं ॥ ३ ॥

हे अग्नि, तुझ्या प्रसादासाठी आर्यजन दिव्यसंपत्ति जलदीने आपलीशी करून व भाविक जन आपल्या कडकडीत धर्मशासनांनी, धर्मभ्रष्ट पाखांड्यावर जय मिळवून नाना प्रकाराने तुला विनवीत असतात. ॥ ३ ॥


अ॒ग्निर॒प्सामृ॑ती॒षहं॑ वी॒रं द॑दाति॒ सत्प॑तिम् ।
यस्य॒ त्रस॑न्ति॒ शव॑सः स॒ञ्चक्षि॒ शत्र॑वो भि॒या ॥ ४ ॥

अग्निः अप्सां ऋतीऽसहं वीरं ददाति सत्ऽपतिं ।
यस्य त्रसंति शवसः संऽचक्षि शत्रवः भिया ॥ ४ ॥

दिव्य उदके हस्तगत करून देणारा, केवढाही निकराचा हल्ला आला तरी न डगमगणारा, आणि सज्जनांचा प्रतिपालक असा वीर भक्ताकडे अग्नि पाठवून देतो. तो वीर असा की त्याला पाहिल्याबरोबर शत्रूंची भयाने पांचावर धारण बसते. ॥ ४ ॥


अ॒ग्निर्हि वि॒द्मना॑ नि॒दो दे॒वो मर्त॑मुरु॒ष्यति॑ ।
स॒हावा॒ यस्यावृ॑तो र॒यिर्वाजे॒ष्ववृ॑तः ॥ ५ ॥

अग्निः हि विद्मना निदः देवः मर्तं उरुष्यति ।
सहऽवा यस्य अवृतः रयिः वाजेषु अवृतः ॥ ५ ॥

ज्ञान प्रभावाने अग्निदेव भक्ताला निंदकांच्या तडाख्यांतून बचावून नेतो. तोच झुंझार होतो. त्याची विजयश्री अप्रतिहत असते. धर्मयुद्धांतही अकुंठितच असते. ॥ ५ ॥


अच्छा॑ नो मित्रमहो देव दे॒वानग्ने॒ वोचः॑ सुम॒तिं रोद॑स्योः ।
वी॒हि स्व॒स्तिं सु॑क्षि॒तिं दि॒वो नॄन्द्वि॒षो अंहां॑सि
दुरि॒ता त॑रेम॒ ता त॑रेम॒ तवाव॑सा तरेम ॥ ६ ॥

अच्छा नः मित्रमहः देव देवान् अग्ने वोचः सुमतिं रोदस्योः ।
वीहि स्वस्तिं सुक्षितिं दिवः नॄन् द्विषः अंहांसि दुरिता तरेम ता तरेम तवावसा तरेम ॥ ६ ॥

हे सौम्यदीप्ते अग्निदेवा, अंतरालांतील दिव्य शक्तींना आमच्या भक्तिपूर्ण स्तोत्रांची ओळख करून दे. आणि द्यूलोकांतून कुशल, स्वास्थ्य, आणि शूरसैनिक ह्यांनी परिप्लुत अशी देणगी दे. म्हणजे सज्जन्द्वेष्टे, पातके आणि संकटे ह्यांच्यातून आम्ही पार पडूं, खचित पार पडूं, तुझ्या कृपेनेंच पार पडूं ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १५ ( अग्नि सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ् आणि अनेक


इ॒ममू॒ षुवो॒ अति॑थिमुष॒र्बुधं॒ विश्वा॑सां वि॒शां पति॑मृञ्जसे गि॒रा ।
वेतीद्दि॒वो ज॒नुषा॒ कच्चि॒दा शुचि॒र्ज्योक्चि॑दत्ति॒ गर्भो॒ यदच्यु॑तम् ॥ १ ॥

इमं ऊंइति सु वः अतिथिं उषःऽबुधं विश्वासां विशां पतिं ऋञ्जसे गिरा ।
वेति इत् दिवः जनुषा कत् चित् आ शुचिः ज्योक् चित् अत्ति गर्भः यत् अच्युतं ॥ १ ॥

तुमचा प्रिय पाहुणा उषःकाली जागृत होणारा, व सर्व मानवी प्रजांचा राजा अग्नि त्याची प्रेमळ प्रार्थनेने मी विनवणी करतो. तोच जन्मतः पवित्र आहे. तोच आकाशातून आमच्याकडे येतो. आणि बालरूप असतांही जे कोणास हलणार देकील नाहीत असे महावृक्ष पार खाऊन टकतो. ॥ १ ॥


मि॒त्रं न यं सुधि॑तं॒ भृग॑वो द॒धुर्वन॒स्पता॒वीड्य॑मू॒र्ध्वशो॑चिषम् ।
स त्वं सुप्री॑तो वी॒तह॑व्ये अद्भुbत॒ प्रश॑स्तिभिर्महयसे दि॒वेदि॑वे ॥ २ ॥

मित्रं न यं सुऽधितं भृगवः दधुः वनस्पतौ ईड्यं ऊर्ध्वऽशोचिषं ।
सः त्वं सुऽप्रीतः वीतऽहव्ये अद्भुनत प्रशस्तिऽभिः महयसे दिवेऽदिवे ॥ २ ॥

तो प्रसन्नचित्त, परमस्तुत्य आहे. त्याच्या ज्वाला नीट वर जातात. अशा अग्नीला भृगुंनी समिधांवर स्थापन केले. हे अद्‍भुता, तू संतुष्ट झालास म्हणजे हविचा स्वीकार करावयास म्हणून प्रतिदिवशी उत्कृष्ट स्तोत्रांनी तुझे यशःकीर्तन भक्तांकडून होत असते. ॥ २ ॥


स त्वं दक्ष॑स्यावृ॒को वृ॒धो भू॑र॒र्यः पर॒स्यान्त॑रस्य॒ तरु॑षः ।
रा॒यः सू॑नो सहसो॒ मर्त्ये॒ष्वा छ॒र्दिर्य॑च्छ वी॒तह॑व्याय स॒प्रथो॑ भ॒रद्वा॑जाय स॒प्रथः॑ ॥ ३ ॥

सः त्वं दक्षस्य अवृकः वृधः भूः अर्यः परस्य अंतरस्य तरुषः ।
रायः सूनोइति सहसः मर्त्येषु आ छर्दिः यच्छ वीतऽहव्याय सऽप्रथः भरत्ऽवाजाय सऽप्रथः ॥ ३ ॥

तुला लोभ शिवत नाही असा तू निर्लोभ देव आमच्या चातुर्य बलाचा उत्कर्ष कर. आणि आर्यजन दूर असोत की येथे जवळ असोत, त्यांचा तारक हो. सामर्थ्यप्रभवा, दिव्य संपत्ति अर्पण कर; आणि तुला हविर्भाग देतां यावा म्हणून ह्या मर्त्यलोकांत आम्हांला विस्तीर्ण भूप्रदेश दे. भरद्वाजाला तुझा अफाट प्रदेश दे. ॥ ३ ॥


द्यु॒ता॒नं वो॒ अति॑थिं॒ स्वर्णरम॒ग्निं होता॑रं॒ मनु॑षः स्वध्व॒रम् ।
विप्रं॒ न द्यु॒क्षव॑चसं सुवृ॒क्तिभि॑र्हव्य॒वाह॑मर॒तिं दे॒वमृ॑ञ्जसे ॥ ४ ॥

द्युतानं वः अतिथिं स्वःऽनरं अग्निं होतारं मनुषः सुऽअध्वरं ।
विप्रं न द्युक्षऽवचसं सुवृक्तिऽभिः हव्यऽवाहं अरतिं देवं ऋञ्जसे ॥ ४ ॥

तुमचा देदीप्यमान अतिथी, स्वर्गीय वीर, मनुष्यांचे यज्ञयाग उत्तम रीतीने सिद्धिस नेणारा होता, हा एक दिव्य कवने वदविणारा स्फूर्तिदाताच समजून त्या हव्यवाहनाचे, त्या देवाचे, आम्ही निर्मल अन्तःकरणाने गायिलेल्या स्तुतींनी गौरव करतो. ॥ ४ ॥


पा॒व॒कया॒ यश्चि॒तय॑न्त्या कृ॒पा क्षाम॑न्रुरु॒च उ॒षसो॒ न भा॒नुना॑ ।
तूर्व॒न्न याम॒न्नेत॑शस्य॒ नू रण॒ आ यो घृ॒णे न त॑तृषा॒णो अ॒जरः॑ ॥ ५ ॥

पावकया यः चितयंत्या कृपा क्षामन् रुरुचे उषसः न भानुना ।
तूर्वन् न यामन् एतशस्य नू रणे आ यः घृणे न ततृषाणः अजरः ॥ ५ ॥

तू आपल्या परमपवित्र आणि स्पष्टपणे दिसणार्‍या कांतीने पृथ्वीवर अशा रीतीने प्रकाशतोस कीं जणो उषेचीच प्रभा दाटली आहे. असा तू अजरामर देव युद्धांत जाण्याकरतां वाटेने जणो इतक्या लगबगीने गेलास की उन्हाने तृषार्त झालेला मनुष्य जसा सैरावैरा धांवतो त्याप्रमाणे त्वरेने गेलास. ॥ ५ ॥


अ॒ग्निम॑ग्निं वः स॒मिधा॑ दुवस्यत प्रि॒यम्प्रि॑यं वो॒ अति॑थिं गृणी॒षणि॑ ।
उप॑ वो गी॒र्भिर॒मृतं॑ विवासत ।
दे॒वो दे॒वेषु॒ वन॑ते॒ हि वार्यं॑ दे॒वो दे॒वेषु॒ वन॑ते॒ हि नो॒ दुवः॑ ॥ ६ ॥

अग्निंऽअग्निं वः संऽइधा दुवस्यत प्रियंऽप्रियं वः अतिथिं गृणीषणि ।
उप वः गीःऽभिः अमृतं विवासत ।
देवः देवेषु वनते हि वार्यं देवः देवेषु वनते हि नः दुवः ॥ ६ ॥

मित्रहो एकट्या अग्नीलाच समिधा अर्पण करून त्याची उपासना करा. तुमचा प्राणापलिकडे प्रिय अतिथी अग्नि त्याची स्तोत्र घोषाने महती गा. आपल्या मधुर वाणीने त्या मरणरहित देवाची उपासना करा. सर्व देवतांमध्यें तोच देव ती स्पृहणीय दिव्य संपत्ति देईल. सर्व देवतांमध्ये तोच देव आमच्या उपासनेचे कौतुक करतो. ॥ ६ ॥


समि॑द्धम॒ग्निं स॒मिधा॑ गि॒रा गृ॑णे॒ शुचिं॑ पाव॒कं पु॒रो अ॑ध्व॒रे ध्रु॒वम् ।
विप्रं॒ होता॑रं पुरु॒वार॑म॒द्रुहं॑ क॒विं सु॒म्नैरी॑महे जा॒तवे॑दसम् ॥ ७ ॥

संऽइद्धं अग्निं संऽइधा गिरा गृणे शुचिं पावकं पुरः अध्वरे ध्रुवं ।
विप्रं होतारं पुरुऽवारं अद्रुहं कविं सुम्नैः ईमहे जातऽवेदसं ॥ ७ ॥

प्रज्वलित झालेल्या अग्नीला स्तुतीने आणि समिधार्पणाने प्रसन्न करतो. त्या पवित्र पावन आणि अचल अग्नीला यागामध्ये अग्रभागी वेदीवर संतुष्ट करतो. स्फूर्तिदाता कवि, सर्व प्रिय होता, अजान शत्रु आणि सर्वज्ञ अशा त्या जातवेदाची प्रमोददायक मद्यांनी करुणा भाकतो. ॥ ७ ॥


त्वां दू॒तम् अ॑ग्ने अ॒मृतं॑ यु॒गेयु॑गे हव्य॒वाहं॑ दधिरे पा॒युमीड्य॑म् ।
दे॒वास॑श्च॒ मर्ता॑सश्च॒ जागृ॑विं वि॒भुं वि॒श्पतिं॒ नम॑सा॒ नि षे॑दिरे ॥ ८ ॥

त्वां दूतं अग्ने अमृतं युगेऽयुगे हव्यऽवाहं दधिरे पायुं ईड्यं ।
देवासः च मर्तासः च जागृविं विभुं विश्पतिं नमसा नि सेदिरे ॥ ८ ॥

हे अग्नी तू मनुष्यांचा मरणरहित असा कार्य साधक आहेस. तू त्यांचे हवि पोंहोचविणारा आणि परम स्तुत्य रक्षणकर्ता आहेस. अशा तुझी स्थापन भक्तजन युगानुयुगे वेदीवर करीत आले आहेत. तू जागरूक, विश्वाव्यापक आणि मनुष्यांचा अधिपति म्हणून देव आणि मर्त्यमानव तुला प्रणिपात करून स्वस्थ झाले. ॥ ८ ॥


वि॒भूष॑न्नग्न उ॒भयाँ॒ अनु॑ व्र॒ता दू॒तो दे॒वानां॒ रज॑सी॒ समी॑यसे ।
यत्ते॑ धी॒तिं सु॑म॒तिमा॑वृणी॒महेऽध स्मा नस्त्रि॒वरू॑थः शि॒वो भ॑व ॥ ९ ॥

विऽभूषन् अग्ने उभयान् अनु व्रता दूतः देवानां रजसीइति सं ईयसे ।
यत् ते धीतिं सुऽमतिं आऽवृणीमहे अध स्म नः त्रिऽवरूथः शिवः भव ॥ ९ ॥

अग्निदेवा, तू उभय लोकांना आपल्या महात्म्याने अलंकृत करून आणि आपल्याच नियमानुसार पेवांचा प्रतिनिधि होऊन अंतरिक्षांत वावरत असतोस. तुझे चित्त आणि लोभ आम्हांवर जडावा म्हणून आम्ही प्रार्थना करीत आहों, अम्हांला तिप्पट मजबूत चिलखत घालून तू मगलदायक हो. ॥ ९ ॥


तं सु॒प्रती॑कं सु॒दृशं॒ स्वञ्च॒मवि॑द्वांसो वि॒दुष्ट॑रं सपेम ।
स य॑क्ष॒द्विश्वा॑ व॒युना॑नि वि॒द्वान्प्र ह॒व्यम॒ग्निर॒मृते॑षु वोचत् ॥ १० ॥

तं सुऽप्रतीकं सुऽदृशं सुऽअञ्चं अविद्वांसः विदुःऽतरं सपेम ।
सः यक्षत् विश्वा वयुनानि विद्वान् प्र हव्यं अग्निः अमृतेषु वोचत् ॥ १० ॥

मनोहराकृति, दर्शनीय, शीघ्रगतिमान् आणि महाज्ञानी अशा अग्नीची आपण अज्ञानी जन आतां उपासना करूं. तो आमच्याबद्दल यजन करील, सर्व विद्या आणि आचार तो अग्नीच जाणतो तर तो आम्ही अर्पण केलेल्या कवींची प्रशंसा अमर विभूति पुढे खास करील. ॥ १० ॥


तम॑ग्ने पास्यु॒त तम् पि॑पर्षि॒ यस्त॒ आन॑ट्क॒वये॑ शूर धी॒तिम् ।
य॒ज्ञस्य॑ वा॒ निशि॑तिं॒ वोदि॑तिंवा॒ तमित्पृ॑णक्षि॒ शव॑सो॒तरा॒या ॥ ११ ॥

तं अग्ने पासि उत तं पिपर्षि यः ते आनट् कवये शूर धीतिं ।
यज्ञस्य वा निऽशितिं वा उत्ऽइतिं वा तं इत् पृणक्षि शवसा उत राया ॥ ११ ॥

हे शूरा, तुज कविश्रेष्ठा प्रित्यर्थ जो आपले प्रतिभास्फुरित काव्य सादर अर्पण करील, हे अग्नी, तू त्याचे रक्षण तू करतोस, त्याचा उद्धार करतोस. यज्ञाविषयी कळकळ ज्याच्या मनांत बाणते, किंवा जो यज्ञाचा आरंभ यथासांग करतो त्याला अग्नि उत्कट बलाने आणि दिव्य वैभवाने भरून सोडतो. ॥ ११ ॥


त्वम॑ग्ने वनुष्य॒तोनि पा॑हि॒ त्वमु॑ नः सहसावन्नव॒द्यात् ।
सं त्वा॑ ध्वस्म॒न्वद॒भ्येतु॒ पाथः॒ सं र॒यिः स्पृ॑ह॒याय्यः॑ सह॒स्री ॥ १२ ॥

त्वं अग्ने वनुष्यतः नि पाहि त्वं ऊंइति नः सहसाऽवन् अवद्यात् ।
सं त्वा ध्वस्मन्ऽवत् अभि एतु पाथः सं रयिः स्पृहयाय्यः सहस्री ॥ १२ ॥

अग्नी, आमच्यावर अपघाती शस्त्र उपसणार्‍या पासून आमचा बचाव कर. हे दर्पदलना अपकीर्तीपासूनही आमचे रक्षण कर. अगदी निर्दोष असा मार्ग आणि अत्यंत मोहक असे दिव्य धन हीं आम्हांस तुझ्यापासून लाभोत. ॥ १२ ॥


अ॒ग्निर्होता॑ गृ॒हप॑तिः॒ स राजा॒ विश्वा॑वेद॒ जनि॑मा जा॒तवे॑दाः ।
दे॒वाना॑मु॒त यो मर्त्या॑नां॒ यजि॑ष्ठः॒ स प्र य॑जतामृ॒तावा॑ ॥ १३ ॥

अग्निः होता गृहऽपतिः सः राजा विश्वा वेद जनिमा जातऽवेदाः ।
देवानां उत यः मर्त्यानां यजिष्ठः सः प्र यजतां ऋतऽवा ॥ १३ ॥

अग्नी, हा होता, गृहस्वामी, जगाचा राजा आणि सर्वसृष्टीचा ज्ञाता होय. देवांचे आणि मर्त्य प्राण्यांचे सर्व जन्म त्याला माहीत आहेत. आतां तो अत्यंत पूज्य असा सद्धर्म प्रचारक अग्नि आमच्या करतां यजन करो. ॥ १३ ॥


अग्ने॒ यद॒द्य वि॒शो अ॑ध्वरस्य होतः॒ पाव॑कशोचे॒ वेष्ट्वं हि यज्वा॑ ।
ऋ॒ता य॑जासि महि॒ना वि यद्भूर्ह॒व्या व॑ह यविष्ठ॒ या ते॑ अ॒द्य ॥ १४ ॥

अग्ने यत् अद्य विशः अध्वरस्य होतरिति पावकऽशोचे वेः ट्वं हि यज्वा ।
ऋता यजासि महिना वि यत् भूः हव्या वह यविष्ठ या ते अद्य ॥ १४ ॥

अग्निदेवा, यागांतील आचार्या, हे पुण्यतेजस्का, आम्हां प्रजाजनांपासून जे कांही तुला आज हवेंसे वाटेल, त्याचे सनातन सत्यांत हवन कर. आमचा याजक तूंच. तू आपल्या मोठेपणाने सर्व व्यापून बसलाच आहेस, तर हे तारुण्यमूर्ते, जे हविर्भाग तुजकडे अर्पण झाले आहेत ते तुझ्या विभूतींना नेऊन दे. ॥ १४ ॥


अ॒भि प्रयां॑सि॒ सुधि॑तानि॒ हि ख्यो नि त्वा॑ दधीत॒ रोद॑सी॒ यज॑ध्यै ।
अवा॑ नो मघव॒न्वाज॑साता॒वग्ने॒ विश्वा॑नि दुरि॒ता त॑रेम॒ ता त॑रेम॒ तवाव॑सा तरेम ॥ १५ ॥

अभि प्रयांसि सुऽधितानि हि ख्यः नि त्वा दधीत रोदसीइति यजध्यै ।
अव नः मघऽवन् वाजऽसातौ अग्ने विश्वानि दुरिता तरेम
ता तरेम तवावसा तरेम ॥ १५ ॥

ही आल्हाददायक हव्ये तुजपुढे व्यवस्थीत ठेविली आहेत, त्यांच्याकडे अवलोकन कर. देवांप्रित्यर्थ तू यज्ञ सिद्धिस न्यावास म्हणून वेदीरूप रोदसीच्या ठिकाणी तुला ऋत्विजांनी अधिष्ठित करावे हेंच उचित. हे भगवंता अग्नि, धार्मिक सामर्थ्य मिळविण्याच्या उद्योगांत आमचे सहाय्य कर, म्हणजे यच्चावत् संकटांतून आम्ही पार पडूं, त्यांच्यातून खात्रीने पार पडूं आणि तेंही तुझ्या कृपेने पडूं. ॥ १५ ॥


अग्ने॒ विश्वे॑भिः स्वनीक दे॒वैरूर्णा॑वन्तं प्रथ॒मः सी॑द॒ योनि॑म् ।
कु॒ला॒यिनं॑ घृ॒तव॑न्तं सवि॒त्रे य॒ज्ञं न॑य॒ यज॑मानाय सा॒धु ॥ १६ ॥

अग्ने विश्वेभिः सुऽअनीक देवैः ऊर्णाऽवंतं प्रथमः सीद योनिं ।
कुलायिनं घृतऽवंतं सवित्रे यज्ञं नय यजमानाय साधु ॥ १६ ॥

रुचिररूपा अग्निदेवा, तू आद्य विभूति आहेस. तू आपल्या दिव्यगणांसह ह्या आसनावर आरोहण कर. ते आसन पक्ष्याच्या घरट्याप्रमाणे केले असून त्याच्यावर शालजोडी अंथरली आहे त्याच्यावर विराजमान हो आणि यजमानाच्या हितार्थ त्याचा घृतयुक्त यज्ञ तू जगत्प्रेरक ईश्वरास उत्तम रीतीने अर्पण कर. ॥ १६ ॥


इ॒ममु॒ त्यम॑थर्व॒वद॒ग्निं म॑न्थन्ति वे॒धसः॑ ।
यम॑ङ्कू॒ यन्त॒मान॑य॒न्नमू॑रं श्या॒व्याभ्यः ॥ १७ ॥

इमं ऊंइति त्यं अथर्वऽवत् अग्निं मंथन्ति वेधसः ।
यं अङ्कूीयंतं आ अनयन् अमूरं श्याव्याभ्यः ॥ १७ ॥

सदाचारप्रवर्तक ऋषि ह्या अग्नीला अथर्वण ऋषीप्रमाणे अरणींतून मंथन करून प्रकट करीत आहेत. नागमोडी गतीने धांवणार्‍या ह्या अग्नीला, ह्या प्रमादरहित देवाला रात्रीच्या अंधकाराचे निवारण करण्याकरतां ते ऋषि घेऊन आले. ॥ १७ ॥


जनि॑ष्वा दे॒ववी॑तये स॒र्वता॑ता स्व॒स्तये॑ ।
आ दे॒वान् व॑क्ष्य॒मृताँ॑ ऋता॒वृधो॑ य॒ज्ञं दे॒वेषु॑ पिस्पृशः ॥ १८ ॥

जनिष्व देवऽवीतये सर्वऽताता स्वस्तये ।
आ देवान् वक्षि अमृतान् ऋतऽवृधः यज्ञं देवेषु पिस्पृशः ॥ १८ ॥

देव यज्ञार्थ, आमच्या कल्याणार्थ, सर्वाभीष्ट प्राप्तिस्तव तू प्रादुर्भूत हो. सद्धर्माचा पुरस्कार करणार्‍या अमर विभूतींना येथे घेऊन ये, आणि त्या देवांच्या ठिकाणी आमचा यज्ञ समर्पण कर. ॥ १८ ॥


व॒यमु॑ त्वा गृहपते जनाना॒मग्ने॒ अक॑र्म स॒मिधा॑ बृ॒हन्त॑म् ।
अ॒स्थू॒रि नो॒ गार्ह॑पत्यानि सन्तु ति॒ग्मेन॑ न॒स्तेज॑सा॒ सं शि॑शाधि ॥ १९ ॥

वयं ऊंइति त्वा गृहऽपते जनानां अग्ने अकर्म संइधा बृहन्तं ।
अस्थूरि नः गार्हऽपत्यानि सन्तु तिग्मेन नः तेजसा सं शिशाधि ॥ १९ ॥

लोकांच्या गृह सौख्याच्या प्रभो, समिध अर्पण करून श्रेष्ठ विभूतीला आम्ही उल्लसित केले आहे. तर आमची सर्व गृहकार्यें व्यवस्थित होवो. तुझ्या प्रखर ज्वालेने आमचीही भक्ति तीव्र कर. ॥ १९ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १६ ( अग्नि सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - अनेक


त्वम॑ग्ने य॒ज्ञानां॒ होता॒ विश्वे॑षां हि॒तः ॥ दे॒वेभि॒र्मानु॑षे॒ जने॑ ॥ १ ॥

त्वं अग्ने यज्ञानां होता विश्वेषां हितः । देवेभिः मानुषे जने ॥ १ ॥

अग्नि, तू अखील यज्ञांचा आचार्य म्हणूनच तुला देवांनी ह्या मानवलोकांत स्थापन केले आहे. ॥ १ ॥


स नो॑ म॒न्द्राभि॑रध्व॒रे जि॒ह्वाभि॑र्यजा म॒हः ॥ आ दे॒वान्व॑क्षि॒ यक्षि॑ च ॥ २ ॥

सः नः मन्द्राभिः अध्वरे जिह्वाभिः यज महः । आ देवान् वक्षि यक्षि च ॥ २ ॥

ह्याप्रमाणे तू थोर विभूति, आपल्या आनंदमग्न जिव्यांनी आमच्या यागकर्मांत यजन कर आणि दिव्य विबुध गणांस घेऊन येऊन त्यांना संतुष्ट कर. ॥ २ ॥


वेत्था॒ हि वे॑धो॒ अध्व॑नः प॒थश्च॑ दे॒वाञ्ज॑सा ॥ अग्ने॑ य॒ज्ञेषु॑ सुक्रतो ॥ ३ ॥

वेत्थ हि वेधः अध्वनः पथः च देव अञ्जसा । अग्ने यज्ञेषु सुक्रतोइतिसुऽक्रतो ॥ ३ ॥

हे नियामका, हे अगाधचरिता अग्निदेवा, यज्ञामध्ये आपल्या सरळ स्वभावानुरूप सन्मार्ग कोणते, सदाचार कोणते हे खरोखर तूंच जाणतोस. ॥ ३ ॥


त्वामी॑ळे॒ अध॑ द्वि॒ता भ॑र॒तो वा॒जिभिः॑ शु॒नम् ॥ ई॒जे य॒ज्ञेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ४ ॥

त्वां ईळे अध द्विता भरतः वाजिऽभिः शुनं । ईजे यज्ञेषु यज्ञियं ॥ ४ ॥

म्हणूनच भरताने आपल्या सात्विक पराक्रमांनी आत्महितार्थ तुझे दोन प्रकारांनी गौरव केले आणि तुज यज्ञार्ह पूज्य विभूती प्रित्यर्थ यजन केले. ॥ ४ ॥


त्वमि॒मा वार्या॑ पु॒रु दिवो॑दासाय सुन्व॒ते ॥ भ॒रद्वा॑जाय दा॒शुषे॑ ॥ ५ ॥

त्वं इमा वार्या पुरु दिव्ःऽदासाय सुन्वते । भरत्ऽवाजाय दाशुषे ॥ ५ ॥

ही अमोल स्पृहणीय धनें सोम अर्पण करणारा दिवोदास आणि हवि अर्पण करणारा मी भरद्वाज अशांना अर्पण कर. ॥ ५ ॥


त्वं दू॒तो अम॑र्त्य॒ आ व॑हा॒ दैव्यं॒ जन॑म् ॥ शृ॒ण्वन्विप्र॑स्य सुष्टु॒तिम् ॥ ६ ॥

त्वं दूतः अमर्त्यः आ वह दैव्यं जनं । शृण्वन् विप्रस्य सुऽस्तुतिं ॥ ६ ॥

तू अजरामरदेव आमचा कार्यसाधक आहेस तर मज दीन कवीची विनवणी ऐकून विबुध गणांना येथे घेऊन ये. ॥ ६ ॥


त्वाम॑ग्ने स्वा॒ध्यो॒३मर्ता॑सो दे॒ववी॑तये ॥ य॒ज्ञेषु॑ दे॒वमी॑ळते ॥ ७ ॥

त्वां अग्ने सुऽआध्यः मर्तासः देवऽवीतये । यज्ञेषु देवं ईळते ॥ ७ ॥

अग्निदेवा, उत्तम ध्यानशील भक्त देवांप्रित्यर्थ यज्ञ सांग व्हावा म्हणून तुज भगवंताचे यज्ञामध्यें गौरव करतात. ॥ ७ ॥


तव॒ प्र य॑क्षि सं॒दृश॑मु॒त क्रतुं॑ सु॒दान॑वः ॥ विश्वे॑ जुषन्त का॒मिनः॑ ॥ ८ ॥

तव प्र यक्षि संऽदृशं उत क्रतुं सुऽदानवः । विश्वे जुषन्त कामिनः ॥ ८ ॥

तुझे दिव्य स्वरूप आणि अगाध चरित ह्यांची मी महती गात आहे. तसेंच सर्व उदारात्मे आणि त्याच प्रमाणे कामार्थी लोकही तुझ्या दर्शनानेच तृप्त झाले आहेत. ॥ ८ ॥


त्वं होता॒ मनु॑र्हितो॒ वह्नि॑रा॒सा वि॒दुष्ट॑रः ॥ अग्ने॒ यक्षि॑ दि॒वो विशः॑ ॥ ९ ॥

त्वं होता मनुःऽहितः वह्निः आसा विदुःऽतरः । अग्ने यक्षि दिवः विशः ॥ ९ ॥

मनु राजाने ह्या लोकी स्थापन केलेला मानवांचा यज्ञाचार्य तू आहेस. आपल्या मुखाने तू हव्य पोहोंचवितोस. तू अगाध ज्ञानी आहेस, तर दिव्य जनांना यज्ञाने संतुष्ट कर. ॥ ९ ॥


अग्न॒ आ या॑हि वी॒तये॑ गृणा॒नो ह॒व्यदा॑तये ॥ नि होता॑ सत्सि ब॒र्हिषि॑ ॥ १० ॥

अग्ने आ याहि वीतये गृणानः हव्यऽदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥ १० ॥

हे देवहव्यवाहक, हविर्भक्षक आणि सुस्तुत अग्ने, होतृ होऊन आमच्या यज्ञीय दर्भासनी तूं स्थानापन्न हो. ॥ १० ॥


तं त्वा॑ स॒मिद्भि॑ीरङ्गिगरो घृ॒तेन॑ वर्धयामसि ॥ बृ॒हच्छो॑चा यविष्ठ्य ॥ ११ ॥

तं त्वा समित्ऽभिः अङ्‌गिरः घृतेन वर्धयामसि । बृहत् शोच यविष्ठ्य ॥ ११ ॥

अग्निदेवा, तुझे संकीर्तन आणि घृताहुतींनी तुजला आम्ही हर्षाने वृद्धिंगत करतो, तर हे अत्यंत तरुणा देवा अगदी लकलकीत असा प्रकाश पाड. ॥ ११ ॥


स नः॑ पृ॒थु श्र॒वाय्य॒मच्छा॑ देव विवाससि ॥ बृ॒हद॑ग्ने सु॒वीर्य॑म् ॥ १२ ॥

सः नः पृथु श्रवाय्यं अच्छ देव विवाससि । बृहत् अग्ने सुऽवीर्यं ॥ १२ ॥

देवा, तू आम्हांस विशाल कीर्तने अलंकृत कर. हे अग्ने, उच्च प्रतीचे उत्कृष्ट शौर्य आमच्यात वसेल असे कर. ॥ १२ ॥


त्वाम॑ग्ने॒ पुष्क॑रा॒दध्यथ॑र्वा॒ निर॑मन्थत ॥ मू॒र्ध्नो विश्व॑स्य वा॒घतः॑ ॥ १३ ॥

त्वां अग्ने पुष्करात् अधि अथर्वा निः अमंथत । मूर्ध्नः विश्वस्य वाघतः ॥ १३ ॥

अग्नि, अथर्वणाने तुला पुष्करा पासून मंथन करून प्रकट केले. भगवत् स्तवन करणारे जे हे विश्व त्याच्या मस्तकापासून (आकाशांतून) मंथन करून तुला आणले. ॥ १३ ॥


तमु॑ त्वा द॒ध्यङ्ऋयषिः॑ पु॒त्र ई॑धे॒ अथ॑र्वणः ॥ वृ॒त्र॒हणं॑ पुरंद॒रम् ॥ १४ ॥

तं ऊंइति त्वा दध्यङ् ऋषिः पुत्रः ईधे अथर्वणः । वृत्रऽहनं पुरंऽदरं ॥ १४ ॥

नंतर अथर्वणाचा पुत्र दध्यङ्‍ ऋषि याने, वृत्राच्या तटबंदी नगरांचा नाश करणारा जो तू, त्या तुला प्रदीप्त केले. ॥ १४ ॥


तमु॑ त्वा पा॒थ्यो वृषा॒ समी॑धे दस्यु॒हन्त॑मम् ॥ ध॒नं॒ज॒यं रणे॑रणे ॥ १५ ॥

तं ऊंइति त्वा पाथ्यः वृषा सं ईधे दस्युहंऽतमं । धनंऽजयं रणेऽरणे ॥ १५ ॥

पथ्याचा रणशूर पुत्र प्रत्येक संग्रामामध्ये तुज शत्रुविनाशक आणि यशोधनदायक देवाला आहुतींनी प्रज्वलित करतो. ॥ १५ ॥


एह्यू॒ षु ब्रवा॑णि॒ तेऽग्न इ॒त्थेत॑रा॒ गिरः॑ ॥ ए॒भिर्व॑र्धास॒ इन्दु॑भिः ॥ १६ ॥

आ इहि ऊंइति सु ब्रवाणि ते अग्ने इत्था इतराः गिरः । एभिः वर्धासे इन्दुऽभिः ॥ १६ ॥

इकडे आगमन कर, खरोखरच तुजप्रित्यर्थ मी दुसरीही स्तोत्रे म्हणेन. हे अग्नी ह्या सोमबिंदुंनी तुझा हर्ष वृद्धिंगर होईल. ॥ १६ ॥


यत्र॒ क्व च ते॒ मनो॒ दक्षं॑ दधस॒ उत्त॑रम् ॥ तत्रा॒ सदः॑ कृणवसे ॥ १७ ॥

यत्र क्व च ते मनः दक्षं दधसे उत्ऽतरं । तत्र सदः कृणवसे ॥ १७ ॥

जेथे कोठे तुझे मन जडेल तेथे तू आपले चातुर्यहि प्रकट करतोस, तेथेंच उत्कृष्ट असे स्थानहि तू संपादन करतोस. ॥ १७ ॥


न॒हि ते॑ पू॒र्तम॑क्षि॒पद्भुव॑न्नेमानां वसो ॥ अथा॒ दुवो॑ वनवसे ॥ १८ ॥

नहि ते पूर्तं अक्षिऽपत् भुवत् नेमानां वसोइति । अथ दुवः वनवसे ॥ १८ ॥

तुझ्या कडून प्राप्त होणारी समृद्धि कधींही क्षणिक नसते. हे असंख्य भक्तकामप्रदा, तर आतां आमची सेवा तू स्वीकारच. ॥ १८ ॥


आग्निर॑गामि॒ भार॑तो वृत्र॒हा पु॑रु॒चेत॑नः ॥ दिवो॑दासस्य॒ सत्प॑तिः ॥ १९ ॥

आ अग्निः अगामि भारतः वृत्रऽहा पुरुऽचेतनः । दिवःऽदासस्य सत्ऽपतिः ॥ १९ ॥

भारतीयांचा प्रभु अग्नि, हा तमोनाशन चैतन्यप्रद अग्नि, पहा प्रकट झाला आहे. दिवोदासाचा खरा मालक तोच. ॥ १९ ॥


स हि विश्वाति॒ पार्थि॑वा र॒यिं दाश॑न्महित्व॒ना ॥ व॒न्वन्नवा॑तो॒ अस्तृ॑तः ॥ २० ॥

सः हि विश्वा अति पार्थिवा रयिं दाशत् महिऽत्वना । वन्वन् अवातः अस्तृतः ॥ २० ॥

त्या भूलोकींची जी यच्चावत् नाशवंत संपत्ति आहे तिच्या पलीकडची संपत्ति तो देईल. आपल्या थोरपणानेच तो विजयी झाला आहे. तो दुर्निवार आणि अजिंक्य आहे. ॥ २० ॥


स प्र॑त्न॒वन्नवी॑य॒साग्ने॑ द्यु॒म्नेन॑ सं॒यता॑ ॥ बृ॒हत्त॑तन्थ भा॒नुना॑ ॥ २१ ॥

सः प्रत्नऽवत् नवीयसा अग्ने द्युम्नेन संऽयता । बृहत् ततंथ भानुना ॥ २१ ॥

हे देवा अग्ने, तू पूर्वीप्रमाणे आपल्या अपूर्व, घनदाट, उज्ज्वलतेच्या प्रकाशाने फार दूरवर विस्तार पावला आहेस. ॥ २१ ॥


प्र वः॑ सखायो अ॒ग्नये॒ स्तोमं॑ य॒ज्ञं च॑ धृष्णु॒या ॥ अर्च॒ गाय॑ च वे॒धसे॑ ॥ २२ ॥

प्र वः सखायः अग्नये स्तोमं यज्ञं च धृष्णुऽया । अर्च गाय च वेधसे ॥ २२ ॥

मित्रांनो, अग्नी प्रित्यर्थ यजन करा; मग त्या जगन्नियामकापुढे तुम्ही प्रार्थनापूर्वक न घाबरतां मोठ्याने म्हणा, त्याच्या प्रित्यर्थ गायन करा. ॥ २२ ॥


स हि यो मानु॑षा यु॒गा सीद॒द्धोता॑ क॒विक्र॑तुः ॥ दू॒तश्च॑ हव्य॒वाह॑नः ॥ २३ ॥

सः हि यः मानुषा युगा सीदत् होता कविऽक्रतुः । दूतऽ च हव्यऽवाहनः ॥ २३ ॥

तोच हा अग्नि त्या मानवी काळांत होता, काव्यप्रज्ञ देवांचा प्रतिनिधि आणि हविर्भाग पोहोंचविणारा होऊन हेथे विराजमान झाला आहे. ॥ २३ ॥


ता राजा॑ना॒ शुचि॑व्रतादि॒त्यान्मारु॑तं ग॒णम् ॥ वसो॒ यक्षी॒ह रोद॑सी ॥ २४ ॥

ता राजाना शुचिऽव्रता आदित्यान् मारुतं गणं । वसोइति यक्षि इह रोदसीइति ॥ २४ ॥

ज्यांची आज्ञा, ज्यांचे मार्ग पुण्यप्रद असतात असे ते राजे मित्रावरुण, आदित्य, मरुतगण आणि द्यावापृथिवी अशा सर्वांना हे दिव्य निधे येथे आणून त्यांचा संतोष कर. ॥ २४ ॥


वस्वी॑ ते अग्ने॒ संदृ॑ष्टिरिषय॒ते मर्त्या॑य ॥ ऊर्जो॑ नपाद॒मृत॑स्य ॥ २५ ॥

वस्वी ते अग्ने संऽदृष्टिः इषऽयते मर्त्याय । ऊर्जः नपात् अमृतस्य ॥ २५ ॥

अग्नि तुझी कृपादृष्टी, हे ओजःप्रभवा तुझा मरणरहित देवच कृपाकटाक्ष, भक्त्युत्साहाची आकांक्षा बाळगणार्‍या भक्ताला इच्छित धनलाभ देणारा होतो. ॥ २५ ॥


क्रत्वा॒ दा अ॑स्तु॒ श्रेष्ठो॑ऽ॒द्य त्वा॑ व॒न्वन्सु॒रेक्णाः॑ ॥ मर्त॑ आनाश सुवृ॒क्तिम् ॥ २६ ॥

क्रत्वा दाः अस्तु श्रेष्ठः अद्य त्वा वन्वन् सुऽरेक्णाः । मर्तः आनाश सुऽवृक्तिं ॥ २६ ॥

आज तुझी उपासना केल्याने तुझा भक्त तुझ्या सत्तेने दाता, थोर सद्वैभवसंपन्न होवो. म्हणजे त्या मर्त्य मानवाचा तुझ्या निर्मल अंतःकरणाशी योग झालाच. ॥ २६ ॥


ते ते॑ अग्ने॒ त्वोता॑ इ॒षय॑न्तो॒ विश्व॒मायुः॑ ॥ तर॑न्तो अ॒र्यो अरा॑तीर्व॒न्वन्तो॑ अ॒र्यो अरा॑तीः ॥ २७ ॥

ते ते अग्ने त्वाऽऊताः इषयंतः विश्वं आयुः । तरंतः अर्यः अरातीः वन्वंतः अर्यः अरातीः ॥ २७ ॥

अग्नि, तू ज्याचे रक्षण केलेस ते भक्तीचा आवेश बाणण्याची इच्छा धरतात. ते आपले एकंदर आयुष्य उपभोगतात. सुष्ट आणि दुष्ट, आर्य आणि अनार्य अशा सर्वांवरच ते छाप बसवितात. ॥ २७ ॥


अ॒ग्निस्ति॒ग्मेन॑ शो॒चिषा॒ यास॒द्विश्वं॒ न्य१त्रिण॑म् ॥ अ॒ग्निर्नो॑ वनते र॒यिम् ॥ २८ ॥

अग्निः तिग्मेन शोचिषा यासत् विश्वं न् अत्रिणं । अग्निः नः वनते रयिं ॥ २८ ॥

अग्नि आपल्या रखरखीत तेजाने एकंदर राक्षसांना उलथून टाकतो, आणि आम्हां भक्तांना आपली दिव्य संपत्ति देतो. ॥ २८ ॥


सु॒वीरं॑ र॒यिमा भ॑र॒ जात॑वेदो॒ विच॑र्षणे ॥ ज॒हि रक्षां॑सि सुक्रतो ॥ २९ ॥

सुऽवीरं रयिं आ भर जातऽवेदः विऽचर्षणे । जहि रक्षांसि सुक्रतोइतिसुऽक्रतो ॥ २९ ॥

वीरपुरुषप्रचुर असे दिव्य धन घेऊन ये. सर्व संचारी सर्वज्ञ जातवेदा, अगाध चरिता, दानवांचा संहार कर. ॥ २९ ॥


त्वं नः॑ पा॒ह्यंह॑सो॒ जात॑वेदो अघाय॒तः ॥ रक्षा॑ णो ब्रह्मणस्कवे ॥ ३० ॥

त्वं नः पाहि अंहसः जातऽवेदः अघऽयतः । रक्षा नः ब्रह्मणः कवे ॥ ३० ॥

हे सर्वज्ञा, दुराचारी दुष्टापासून, मानवापासून आमचा बचाव कर, हे ब्रह्मज्ञा आमचे रक्षण कर. ॥ ३० ॥


यो नो॑ अग्ने दु॒रेव॒ आ मर्तो॑ व॒धाय॒ दाश॑ति ॥ तस्मा॑न्नः पा॒ह्यंह॑सः ॥ ३१ ॥

यः नः अग्ने दुःऽएव आ मर्तः वधाय दाशति । तस्मात् नः पाहि अंहसः ॥ ३१ ॥

अग्नि, जो अत्याचारी नीच मनुष्य आम्हांला मृत्युच्या दाढेंत ढकलूं पाहत असेल त्याच्या त्या थोर कर्मापासून आमचा सांभाळ कर. ॥ ३१ ॥


त्वं तं दे॑व जि॒ह्वया॒ परि॑ बाधस्व दु॒ष्कृत॑म् ॥ मर्तो॒ यो नो॒ जिघां॑सति ॥ ३२ ॥

त्वं तं देव जिह्वया परि बाधस्व दुःऽकृतं । मर्तः यः नः जिघांसति ॥ ३२ ॥

जो दुष्ट आम्हांला ठार करण्यास टपला असेल, त्या अधमालाच हे भगवंता, तू आपल्या ज्वालेने चोहोंकडून घेऊन दडपून टाक. ॥ ३२ ॥


भ॒रद्वा॑जाय स॒प्रथः॒ शर्म॑ यच्छ सहन्त्य ॥ अग्ने॒ वरे॑ण्यं॒ वसु॑ ॥ ३३ ॥

भरत्ऽद्वाजाय सऽप्रथः शर्म यच्छ सहन्त्य । अग्ने वरेण्यं वसु ॥ ३३ ॥

हे रणधुरंधरा, भरद्वाजाला विस्तीर्ण सुखाश्रय दे. हे अग्नि, त्याला सर्वोत्कृष्ट असे अभीप्सित धन दे. ॥ ३३ ॥


अ॒ग्निर्वृ॒त्राणि॑ जङ्घ नद्द्रविण॒स्युर्वि॑प॒न्यया॑ ॥ समि॑द्धः शु॒क्र आहु॑तः ॥ ३४ ॥

अग्निः वृत्राणि जङ्घनत् द्रविणस्युः विपन्यया । संऽइद्धः शुक्र आऽहुतः ॥ ३४ ॥

भक्तांना सामर्थ्यसंपत्ति देऊं इच्छिणारा अग्नि एकदा स्फूर्तिरचित कवनांनी कळला म्हणजे तो तमोरूप शत्रूची तात्काळ धूळधाण करून टाकतो. ॥ ३४ ॥


गर्भे॑ मा॒तुः पि॒तुष्पि॒ता वि॑दिद्युता॒नो अ॒क्षरे॑ ॥ सीद॑न्नृ॒तस्य॒ योनि॒मा ॥ ३५ ॥

गर्भे मातुः पितुः पिता विऽदिद्युतानः अक्षरे । सीदन् ऋतस्य योनिं आ ॥ ३५ ॥

आकाशरूप पित्याचाही तो पिता होय. परंतु रोदसी मातेच्या निर्विकार उदरांत तो देदीप्यमान होऊन सत्यधर्माचे स्थान (वेदि) तेथे आरोहण करतो. ॥ ३५ ॥


ब्रह्म॑ प्र॒जाव॒दा भ॑र॒जात॑वेदो॒ विच॑र्षणे ॥ अग्ने॒ यद्दी॒दय॑द्दि॒वि ॥ ३६ ॥

ब्रह्म प्रजाऽवत् आ भर जातऽवेदः विऽचर्षणे । अग्ने यत् दीदयत् दिवि ॥ ३६ ॥

हे अग्नि, आकाशांतही ज्याच्या वैभवाचे तेज चमकते असे जे सत्पुत्रदायी भक्तिसुख-प्रार्थनासुख, ते आम्हांस मिळवून दे. ॥ ३६ ॥


उप॑ त्वा र॒ण्वसं॑दृशं॒ प्रय॑स्वन्तः सहस्कृत ॥ अग्ने॑ ससृ॒ज्महे॒ गिरः॑ ॥ ३७ ॥

उप त्वा रण्वऽसंदृशं प्रयस्वन्तः सहःऽकृत । अग्ने ससृज्महे गिरः ॥ ३७ ॥

सामर्थ्योद्‍भूत, भक्तिसुख अनुभविणारे आम्ही भक्त, हे अग्नि, मनोहर स्वरूप जो तू त्या तुझ्या आनंदधामाला आम्ही जाऊं असे कर. ॥ ३७ ॥


उप॑ छा॒यामि॑व॒ घृणे॒रग॑न्म॒ शर्म॑ ते व॒यम् ॥ अग्ने॒ हिर॑ण्यसंदृशः ॥ ३८ ॥

उप छायांऽइव घृणेः अगन्म शर्म ते वयं । अग्ने हिरण्यऽसंदृशः ॥ ३८ ॥

हे सुवर्णकांती प्रज्वलित अग्ने, वृक्षाचा आश्रय केलेल्या पक्ष्यांप्रमाणे आम्ही तुझ्या आश्रयाची याचना करतो ॥ ३८ ॥


य उ॒ग्र इ॑व शर्य॒हा ति॒ग्मशृ॑ङ्गो॒ष न वंस॑गः ॥ अग्ने॒ पुरो॑ रु॒रोजि॑थ ॥ ३९ ॥

य उग्रःऽइव शर्यऽहा तिग्मऽशृङ्गः न वंसगः । अग्ने पुरः रुरोजिथ ॥ ३९ ॥

तू दिसण्यांत धनुर्धराप्रमाणे भयंकर अथवा तीक्ष्ण शिंगाच्या वृषभाप्रमाणे क्रूर दिसतोस. अशा भयानक रूपानेच शत्रूंचा तूं विध्वंस केलास. ॥ ३९ ॥


आ यं हस्ते॒ न खा॒दिनं॒ शिशुं॑ जा॒तं न बिभ्र॑ति ॥ वि॒शाम॒ग्निं स्व॑ध्व॒रम् ॥ ४० ॥

आ यं हस्ते न खादिनं शिशुं जातं न बिभ्रति । विशां अग्निं सुऽअध्वरं ॥ ४० ॥

परंतु सुवर्णवलयांनी विभूषित अशा तान्ह्या बालकाला उचलून घ्यावे त्याप्रमाणे ऋत्विज् यज्ञयाग सिद्धीस नेणार्‍या त्या अग्नीलाच हाती घेऊन मिरवितात. ॥ ४० ॥


प्र दे॒वं दे॒ववी॑तये॒ भर॑ता वसु॒वित्त॑मम् ॥ आ स्वे योनौ॒ नि षी॑दतु ॥ ४१ ॥

प्र देवं देवऽवीतये भरत वसुवित्ऽतमं । आ स्वे योनौ नि सीदतु ॥ ४१ ॥

अत्युत्कृष्ट संपत्ति अलोट देणारा देव, त्याला ह्या देव यजन समारंभाकरितां घेऊन या. तो आपल्या जागी अधिष्टित होवो. ॥ ४१ ॥


आ जा॒तं जा॒तवे॑दसि प्रि॒यं शि॑शी॒ताति॑थिम् ॥ स्यो॒न आ गृ॒हप॑तिम् ॥ ४२ ॥

आ जातं जातऽवेदसि प्रियं शिशीत अतिथिं । स्योने आ गृहऽपतिं ॥ ४२ ॥

प्रिय अतिथी अग्नि प्रकट झाला म्हणजे त्याला मुख्य अग्नीनेच उद्दीपित करा. त्या कुलस्वामीला आरामशीर जागेमध्ये झगझगीत करा. ॥ ४२ ॥


अग्ने॑ यु॒क्ष्वा हि ये तवाश्वा॑सो देव सा॒धवः॑ ॥ अरं॒ वह॑न्ति म॒न्यवे॑ ॥ ४३ ॥

अग्ने युक्ष्व हि ये तव अश्वासः देव साधवः । अरं वहन्ति मन्यवे ॥ ४३ ॥

अग्निदेवा, हे तुझे सुविनीत अश्व आहेत त्यांना जोडून चल. ते तुझे मन मानेल तेथे तुला खचित घेऊन जातील. ॥ ४३ ॥


अच्छा॑ नो या॒ह्या व॑हा॒भि प्रयां॑सि वी॒तये॑ ॥ आ दे॒वान्सोम॑पीतये ॥ ४४ ॥

अच्छ नः याहि आ वह अभि प्रयांसि वीतये । आ देवान् सोमपीतये ॥ ४४ ॥

आमच्याकडे ये. ही स्वादिष्ट हविरन्ने ग्रहण करण्याकरता देवांना घेऊन ये. सोम प्राशनार्थही त्यांना घेऊन ये. ॥ ४४ ॥


उद॑ग्ने भारत द्यु॒मदज॑स्रेण॒ दवि॑द्युतत् ॥ शोचा॒ वि भा॑ह्यजर ॥ ४५ ॥

उत् अग्ने भारत द्युऽमत् अजस्रेण दविद्युतत् । शोच वि भाहि अजर ॥ ४५ ॥

भारतप्रिया अग्नि, तू देदीप्यमान होऊन झगझगीत होऊन एकसारखा प्रदीप्त रहा. जरा रहिता तू सुखप्रकाशित रहा. ॥ ४५ ॥


वी॒ती यो दे॒वं मर्तो॑ दुव॒स्येद॒ग्निमी॑ळीताध्व॒रे ह॒विष्मा॑न् ॥
होता॑रं सत्य॒यजं॒ रोद॑स्योरुत्ता॒नह॑स्तो॒ नम॒सा वि॑वासेत् ॥ ४६ ॥

वीती यः देवं मर्तः दुवस्येत् अग्निं ईळीत अध्वरे हविष्मान् ।
होतारं सत्यऽयजं रोदस्योः उत्तानऽहस्तः नमसा आ विवासेत् ॥ ४६ ॥

जो मानव हविरन्न अर्पण करून भगवंताची उपासना करील, जो यज्ञयागांत अग्नीचा गौरव करील, त्यानेंच हविर्भुक्त होऊन सत्याप्रित्यर्थ यज्ञ करणार्‍या त्या देवापुढे त्या अंतवालस्थ यज्ञसंपादकापुढे हात जोडून आणि प्रणिपात करून सेवा केली असे होईल. ॥ ४६ ॥


आ ते॑ अग्न ऋ॒चा ह॒विर्हृ॒दा त॒ष्टं भ॑रामसि ॥ ते ते॑ भवन्तू॒क्षण॑ ऋष॒भासो॑ व॒शा उ॒त ॥ ४७ ॥

आ ते अग्न ऋचा हविः हृदा तष्टं भरामसि । ते ते भवन्तु उक्षणः ऋषभासः वशाः उत ॥ ४७ ॥

अग्नि, अगदी मनापासून अर्पण केलेला हा हविर्भाग ऋक् पद्याने तुला सादर करतो. ह्या ऋचाच तुझे वाहन म्हणा वृषभ म्हणा किंवा धेनू म्हणा, सर्व काही होवोत. ॥ ४७ ॥


अ॒ग्निं दे॒वासो॑ अग्नि॒यमि॒न्धते॑ वृत्र॒हन्त॑मम् ॥
येना॒ वसू॒न्याभृ॑ता तृ॒ळ्हा रक्षां॑सि वा॒जिना॑ ॥ ४८ ॥

अग्निं देवासः अग्नियं इंधते वृत्रऽहंतमं ।
येन वसूनि आऽभृता तृळ्हा रक्षांसि वाजिना ॥ ४८ ॥

सर्वांमध्ये अग्रेसर व अंधकाराचा पार नायनाट करणार्‍या अग्नीला देवच उद्दीपित करतात. त्यानेच उत्कृष्ट आणि वेंचक संपत्ति आम्हांस दिली. आणि त्याच सत्वाढ्य वीराने राक्षसांचा संहार केला. ॥ ४८ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १७ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - द्विपदा विराज, त्रिष्टुभ्


पिबा॒ सोम॑म॒भि यमु॑ग्र॒ तर्द॑ ऊ॒र्वं गव्यं॒ महि॑ गृणा॒न इ॑न्द्र ।
वि यो धृ॑ष्णो॒ वधि॑षो वज्रहस्त॒ विश्वा॑ वृ॒त्रम॑मि॒त्रिया॒ शवो॑भिः ॥ १ ॥

पिब सोमं अभि यं उग्र तर्दः ऊर्वं गव्यं महि गृणानः इन्द्र ।
वि यः धृष्णोइति वधिषः वज्रऽहस्त विश्वा वृत्रं अमित्रिया शवःऽभिः ॥ १ ॥

सोमरसाचे प्राशन कर. हे उग्रमूर्ति इंद्रा, ज्या कार्यासाठी भक्त तुझी अतिशय महती गातात, ते कार्य तू कर. प्रकाश धेनूंना कोंडणारे आवार तू छिन्न भिन्न करून टाक. धैर्यसागरा, वज्रधरा, अज्ञान अंधकार आणि एकंदर शत्रुसैन्य ह्यांचा आपल्या उत्कट पराक्रमाने तू संहार करून टाकला आहेसच. ॥ १ ॥


स ईं॑ पाहि॒ य ऋ॑जी॒षी तरु॑त्रो॒ यः शिप्र॑वान्वृष॒भो यो म॑ती॒नाम् ।
यो गो॑त्र॒भिद्व॑ज्र॒भृद्यो ह॑रि॒ष्ठाः स इ॑न्द्र चि॒त्राँ अ॒भि तृ॑न्धि॒ वाजा॑न् ॥ २ ॥

सः ईं पाहि यः ऋजीषी तरुत्रः यः शिप्रऽवान् वृषभः यः मतीनां ।
यः गोत्रऽभित् वज्रऽभृत् यः हरिस्थाः सः इन्द्र चित्रान् अभि तृंधि वाजान् ॥ २ ॥

मोठ्या आसोशीने सोमरसाचे प्राशन करणारा, जगत्तारक, मुकुटमंडित, उपासकांच्या सद्‍वासना सफल करणारा वीरपुंगव असा जो तू, तो प्रकाशाच्या अवरोधाचा नाश करणारा आहेस. हे इंद्रा ह्या दीनाचे रक्षण कर, आणि अद्‍भुत अशा सत्वसामर्थ्याचा मार्ग मोकळा कर. ॥ २ ॥


ए॒वा पा॑हि प्र॒त्नथा॒ मन्द॑तु त्वा श्रु॒धि ब्रह्म॑ वावृ॒धस्वो॒त गी॒र्भिः ।
आ॒विः सूर्यं॑ कृणु॒हि पी॑पि॒हीषो॑ ज॒हि शत्रूँ॑र॒भि गाइ॑न्द्र तृन्धि ॥ ३ ॥

एव पाहि प्रत्नऽथा मंदतु त्वा श्रुधि ब्रह्म ववृधस्व उत गीःऽभिः ।
आविः सूर्यं कृणुहि पीपिही इषः जहि शत्रून् अभि गाः इन्द्र तृंधि ॥ ३ ॥

पूर्वीप्रमाणे आतांही हा रस पी, तो तुला हृष्टचित्त करो. आमची कळकळीची प्रार्थना ऐकून घे, आणि आम्ही केलेल्या गुणानुवादाने तू आनंदाने डोलूं लाग. सूर्यावरचे आवरण दूर कर. आमच्या आवेशाला दृढता आण, शत्रूंचा संहार कर, आणि ज्ञानाचे किरण मोकळे कर. ॥ ३ ॥


ते त्वा॒ मदा॑ बृ॒हदि॑न्द्र स्वधाव इ॒मे पी॒ता उ॑क्षयन्त द्यु॒मन्त॑म् ।
म॒हामनू॑नं त॒वसं॒ विभू॑तिं मत्स॒रासो॑ जर्हृषन्त प्र॒साह॑म् ॥ ४ ॥

ते त्वा मदाः बृहत् इन्द्र स्वधाऽवः इमे पीताः उक्षयंत द्युमंतं ।
महां अनूनं तवसं विऽभूतिं मत्सरासः जर्हृषंत प्रऽसहं ॥ ४ ॥

स्वाधीनशक्ते इंद्रा, हा जो उल्लासप्रद सोमरस तू प्राशन केलास त्याने तुझ्या वीरश्रीला तर खूपच भरते आणले. हर्षोद्रेक करणार्‍या त्या रसाने, श्रेष्ठ, परिपूर्णतम, विक्रमशाली महानुभाव, व शत्रूंचे दमन करणारा असा जो तू, त्या तुला हर्षनिर्भर केले. ॥ ४ ॥


येभिः॒ सूर्य॑मु॒षसं॑ मन्दसा॒नोऽवास॒योऽपदृ॒ळ्हानि॒ दर्द्र॑त् ।
म॒हामद्रिं॒ परि॒ गा इ॑न्द्र॒ सन्तं॑ नु॒त्था अच्यु॑तं॒ सद॑सः॒ परि॒ स्वात् ॥ ५ ॥

येभिः सूर्यं उषसं मन्दसानः अवासयः अप दृळ्हानि दर्द्रत् ।
महां अद्रिं परि गाः इंद्र संतं नुत्थाः अच्युतं सदसः परि स्वात् ॥ ५ ॥

ह्या सोमरसाने उल्लसित होऊनच तू उषा आणि सूर्य ह्यांच्यावर प्रकाशाचे पांघरूण घातलेस. दुर्भेद्य गिरि दुर्गांचा चुराडा करून टाकलास. प्रकाश धेनूंस चोहोंकडून अडवून धरणार्‍या व कशानेही न ढळणार्‍या अशा पर्वतासही हे इंद्रा तू त्याच्या ठिकाणापासून उलथून पाडलेस. ॥ ५ ॥


तव॒ क्रत्वा॒ तव॒ तद्दं॒सना॑भिरा॒मासु॑ प॒क्वं शच्या॒ नि दी॑धः ।
और्णो॒र्दुर॑ उ॒स्रिया॑भ्यो॒ वि दृ॒ळ्होदू॒र्वाद्गा अ॑सृजो॒ अङ्गि॑ररस्वान् ॥ ६ ॥

तव क्रत्वा तव तत् दंसनाभिः आमासु पक्वं शच्या नि दीधरितिदीधः ।
और्णोः दुरः उस्रियाभ्यः वि दृळ्हा उत् ऊर्वात् गाः असृजः अङ्गिनरस्वान् ॥ ६ ॥

आपल्या कर्तृत्वशक्तीने, अद्‍भुत चमत्काराने, आणि ईश्वरी सामर्थ्याने कोंवळ्या ज्ञान धेनूंच्या कांसेंतही मिष्ट दुग्ध उत्पन्न केलेंस. प्रकाश धेनूंच्या गोठ्याची दारे घट्ट लागलेली होती ती त्यांच्या करतां तू खुली केलीस. आणि अंगिराऋषींसह चालून जाऊन धेनूंना बंदीवासांतून मुक्त केलेंस. ॥ ६ ॥


प॒प्राथ॒ क्षां महि॒ दंसो॒ व्यु१र्वीमुप॒ द्यामृ॒ष्वो बृ॒हदि॑न्द्र स्तभायः ।
अधा॑रयो॒ रोद॑सी दे॒वपु॑त्रे प्र॒त्ने मा॒तरा॑ य॒ह्वी ऋ॒तस्य॑ ॥ ७ ॥

पप्राथ क्षां महि दंसः वि उर्वीं उप द्यां ऋष्वः बृहद् इन्द्र स्तभायः ।
अधारयः रोदसीइति देवपुत्रेइतिदेवऽपुत्रे प्रत्नेइति मातरा यह्वीइति ऋतस्य ॥ ७ ॥

ही विस्तीर्ण भूमि तू पसरून दिलीस हेंचे तुझे केवढे अद्‍भुत कृत्य. थोर परमश्रेष्ठ अशा हे इंद्रा, तू नक्षत्र मंडलाला आधार दिलास. आणि देवांच्या जननी आणि सृष्टिनियमांच्या पुरातन व प्रबल माता ज्या रोदसी (अंतराल) त्यांनाही तूच सावरून धरलेस. ॥ ७ ॥


अध॑ त्वा॒ विश्वे॑ पु॒र इ॑न्द्र दे॒वा एकं॑ त॒वसं॑ दधिरे॒ भरा॑य ।
अदे॑वो॒ यद॒भ्यौहि॑ष्ट दे॒वान्स्वर्षाता वृणत॒ इन्द्र॒मत्र॑ ॥ ८ ॥

अध त्वा विश्वे पुर इन्द्र देवाः एकं तवसं दधिरे भराय ।
अदेवः यत् अभि औहिष्ट देवान् स्वःऽसाता वृणते इन्द्रं अत्र ॥ ८ ॥

आता हे इंद्रा, तूच एक बलाढ्य हे जाणून सर्व विबुधगणांनी युद्धप्रसंगी तुलाच अग्रेसर केले, आणि धर्मभ्रष्ट दुष्ट जेव्हां देवांवरच हत्यर उपसतात अशा वेळेस दैवी प्रकाश प्राप्त करून घेण्याकरितां चालविलेल्या संग्रामांत इंद्रच विजयी होतो. ॥ ८ ॥


अध॒ द्यौश्चि॑त्ते॒ अप॒ सा नु वज्रा॑द्द्वि॒तान॑मद्भि॒यसा॒ स्वस्य॑ म॒न्योः ।
अहिं॒ यदिन्द्रो॑ अ॒भ्योह॑सानं॒ नि चि॑द्वि॒श्वायुः॑ श॒यथे॑ ज॒घान॑ ॥ ९ ॥

अध द्यौः चित् ते अप सा नु वज्रात् द्विता अनमत् भियसा स्वस्य मन्योः ।
अहिं यत् इन्द्रः अभि ओहसानं नि चित् विश्वऽआयुः शयथे जघान ॥ ९ ॥

सर्व विश्वाचे जीवनच असा जो इंद्र त्याने त्या खवळलेल्या महा भुजंगाचे धूड जागच्याजागी ठार केले त्यावेळेस हे इंद्रा तुझे वज्र आणि तुझा क्रोध अशा दोहोंनाही भिऊन जाऊन तारामंडळ सुद्धा चळचळां कापू लागले. ॥ ९ ॥


अध॒ त्वष्टा॑ ते म॒ह उ॑ग्र॒ वज्रं॑ स॒हस्र॑भृष्टिं ववृतच्छ॒ताश्रि॑म् ।
निका॑मम॒रम॑णसं॒ येन॒ नव॑न्त॒महिं॒ सं पि॑णगृजीषिन् ॥ १० ॥

अध त्वष्टा ते महः उग्र वज्रं सहस्रऽभृष्टिं ववृतत् छतऽअश्रिं ।
निऽकामं अरऽमणसं येन नवंतं अहिं सं पिणक् ऋजीषिन् ॥ १० ॥

भीषणरूप देवा, हजारो अणकुच्या व शेंकडो धारा असलेले, मोठे जलाल, व इच्छेप्रमाणे तत्काळ कार्य उरकणारे असे वज्र थोर अशा त्वष्ट्र्देवाने तुझ्या करता तयार केले, आणि त्यायोगाने, हे चंडवेगा देवा, उन्मत्तपणाने गर्जना करणार्‍या ’अहि’च्या चिंधड्या उडवून दिल्यास. ॥ १० ॥


वर्धा॒न्यं विश्वे॑ म॒रुतः॑ स॒जोषाः॒ पच॑च्छ॒तं म॑हि॒षाँ इ॑न्द्र॒ तुभ्य॑म् ।
पू॒षा विष्णु॒स्त्रीणि॒ सरां॑सि धावन्वृत्र॒हणं॑ मदि॒रमं॒शुम॑स्मै ॥ ११ ॥

वर्धान् यं विश्वे मरुतः सऽजोषाः पचत् छतं महिषान् इन्द्र तुभ्यं ।
पूषा विष्णुः त्रीणि सरांसि धावन् वृत्रऽहनं मदिरं अंशुं अस्मै ॥ ११ ॥

यच्चावत् मरुतांनी एकसहा प्रेमाने ज्या तुझा उल्लास दुणावला, हे इंद्रा, ज्या तुजसाठी एका विलक्षण भक्ताने शंभर सहिष शिवून तयार केले, अशा तुज प्रित्यर्थ, वृत्रनाशक जी सोमवल्ली तिचा रस पिळून पूषा, विष्णू ह्यांनी त्या रसाने तीन तलाव भरून ठेवले. ॥ ११ ॥


आ क्षोदो॒ महि॑ वृ॒तं न॒दीनां॒ परि॑ष्ठितमसृज ऊ॒र्मिम॒पाम् ।
तासा॒मनु॑ प्र॒वत॑ इन्द्र॒ पन्थां॒ प्रार्द॑यो॒ नीची॑र॒पसः॑ समु॒द्रम् ॥ १२ ॥

आ क्षोदः महि वृतं नदीनां परिऽस्थितं असृजः ऊर्मिं अपां ।
तासां अनु प्रऽवतः इन्द्र पन्थां प्र आर्दयः नीचीः अपसः समुद्रं ॥ १२ ॥

नद्यांचे धोधो वाहणारे ओघ, जलाशयांचे कल्लोळ सर्व बाजूंनी वेढून टाकून अडवून धरले होते त्यांना तू मोकळे सोडून दिलेस. आणि कड्यावरून खाली कोसळणार्‍या त्यांच्या प्रवाहाच्या अनुरोधानेच त्यांच्या करितां तूं मार्ग करून त्या उदकसंचयास तू खाली समुद्रापर्यंत नेऊन सोडलेस. ॥ १२ ॥


ए॒वा ता विश्वा॑ चकृ॒वांस॒मिन्द्रं॑ म॒हामु॒ग्रम॑जु॒र्यं स॑हो॒दाम् ।
सु॒वीरं॑ त्वा स्वायु॒धं सु॒वज्र॒मा ब्रह्म॒ नव्य॒मव॑से ववृत्यात् ॥ १३ ॥

एव ता विश्वा चकृऽवांसं इन्द्रं महां उग्रं अजुर्यं सहःऽदां ।
सुऽवीरं त्वा सुऽआयुधं सुऽवज्रं आ ब्रह्म नव्यं अवसे ववृत्यात् ॥ १३ ॥

हे सर्व चमत्कार करणारा तू आहेस. तू थोर, घोरस्वरूप, अजरामर, प्रतिस्पर्ध्याला जर्जर करून टाकणारे सामर्थ्य देणारा आहेस. तू वीरश्रेष्ठ तीव्रायुध, तीक्ष्ण वज्रधर आहेस. तर हे इंद्रा अशा तुला आमचे हे अपूर्व नवीन प्रार्थना स्तोत्र आमच्यावर तुझा प्रसाद व्हावा म्हणून तुला वळवून आणो. ॥ १३ ॥


स नो॒ वाजा॑य॒ श्रव॑स इ॒षे च॑ रा॒ये धे॑हि द्यु॒मत॑ इन्द्र॒ विप्रा॑न् ।
भ॒रद्वा॑जे नृ॒वत॑ इन्द्र सू॒रीन्दि॒वि च॑ स्मैधि॒ पार्ये॑ न इन्द्र ॥ १४ ॥

सः नः वाजाय श्रवसे इषे च राये धेहि द्युऽमतः इन्द्र विप्रान् ।
भरत्ऽद्वाजे नृऽवतः इन्द्र सूरीन् दिवि च स्म एधि पार्ये न इन्द्र ॥ १४ ॥

तू असा आहेस, तर सत्वसामर्थ्या, सत्कीर्ति, सादुत्साह आणि दिव्यैश्वर्य ही प्राप्त व्हावी म्हणून हे इंद्रा आम्हास तेजस्वी आणि प्रतिभासंपन्न कर. इंद्रा आम्हां भरद्वाज कुलांत शौर्यमंडित लोकधुरीण उत्पन्न कर, आणि आणीबाणीच्या प्रसंगी आमचा हो. ॥ १४ ॥


अ॒या वाजं॑ दे॒वहि॑तं सनेम॒ मदे॑म श॒तहि॑माः सु॒वीराः॑ ॥ १५ ॥

अया वाजं देवऽहितं सनेम मदेम शतहिमाः सुवीराः ॥ १५ ॥

म्हणजे ह्या स्तुतीच्या प्रभावाने आम्ही दिव्यैश्वर्य पावून आणि शूरवीरांनिशी शंभर वर्षेपर्यंत उल्हासनिमग्नच राहूं. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १८ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


तमु॑ ष्टुहि॒ यो अ॒भिभू॑त्योजा व॒न्वन्नवा॑तः पुरुहू॒त इन्द्रः॑ ।
अषा॑ळ्हमु॒ग्रं सह॑मानमा॒भिर्गी॒र्भिर्व॑र्ध वृष॒भं च॑र्षणी॒नाम् ॥ १ ॥

तं ऊंइति स्तुहि यः अभिभूतिऽयोजाः वन्वन्न् अवातः पुरुहूत इन्द्रः ।
अषाल्हं उग्रं सहमानं आभिः गीःऽभिः वर्ध वृषभं चर्षणीनां ॥ १ ॥

शत्रूंना असह्य अशी ज्याची तेजस्विता, युद्धांत विजय संपादन करणारा परंतु शांतचित्त, आणि असंख्य लोक ज्याचा धांवा करतात अशा ह्या इंद्राचे गुणानुवाद गा. अपराजित, घोररूपधरा, शत्रूंना जर्जर करणारा आणि संपूर्ण प्राणिमात्रांचा नायक असा जो देव त्याचा महिमा ह्या स्तुतींनी वृद्धिंगत कर. ॥ १ ॥


स यु॒ध्मः सत्वा॑ खज॒कृत्स॒मद्वा॑ तुविमृ॒क्षो न॑दनु॒माँ ऋ॑जी॒षी ।
बृ॒हद्रे॑णु॒श्च्यव॑नो॒ मानु॑षीणा॒मेकः॑ कृष्टी॒नाम॑भवत्स॒हावा॑ ॥ २ ॥

सः युध्मः सत्वा खजऽकृत् समत्ऽवा तुविऽम्रक्षः नदनुऽमान् ऋजीषी ।
बृहत्ऽरेणुः च्यवनः मानुषीणां एकः कृष्टीनां अभवत् सहऽवा ॥ २ ॥

तो योद्धा, सत्वाढ्य आणि झुंजाची एकच गर्दी उडवून देणारा आहे. तो युद्धप्रिय दुष्टांना पार धुळीस मिळवून देणारा आणि सिंहनाद करून प्रचंडवेगाने चाल करून जाणार आहे. तो युद्ध करूं लागला म्हणजे धुळीने सर्वदिशा धुंद होतात व सर्वजग कांपावयास लागते. असा हा इंद्र एकटाच एकंदर मनुष्यजातीचे नियंत्रण करणारा प्रभु होय. ॥ २ ॥


त्वं ह॒ नु त्यद॑दमायो॒ दस्यूँ॒रेकः॑ कृ॒ष्टीर॑वनो॒रार्या॑य ।
अस्ति॑ स्वि॒न्नु वी॒र्य१ं तत्त॑ इन्द्र॒ न स्वि॑दस्ति॒ तदृ॑तु॒था वि वो॑चः ॥ ३ ॥

त्वं ह नु त्यत् अदमयः दस्यून् एकः कृष्टीः अवनोः आर्याय ।
अस्ति स्वित् नु वीर्यं तत् ते इन्द्र न स्वित् अस्ति तत् ऋतुऽथा वि वोचः ॥ ३ ॥

खरोखरच अधार्मिक दुष्टांना पादाक्रांत केलेंस ते तूच. आणि एकटा असूनही आम्हां आर्यांच्या सत्तेखाली इतर मनुष्यांना जिंकून आणलेस; तर इंद्रा हा पराक्रम तुझाच अहे ना ? नसलास तर नाही असे तरी ह्या वेळेस स्पष्ट सांगून टाक. ॥ ३ ॥


सदिद्धि ते॑ तुविजा॒तस्य॒ मन्ये॒ सहः॑ सहिष्ठ तुर॒तस्तु॒रस्य॑ ।
उ॒ग्रमु॒ग्रस्य॑ त॒वस॒स्तवी॒योऽरध्रस्य रध्र॒तुरो॑ बभूव ॥ ४ ॥

सत् इत् हि ते तुविऽजातस्य मन्ये सहः सहिष्ठ तुरतः तुरस्य ।
उग्रं उग्रस्य तवसः तवीयः अरध्रस्य रध्रऽतुरः बभूव ॥ ४ ॥

महा बलिष्ठा, स्वतःसिद्ध, बलशाली, भक्तसहायार्थ त्वरीत धांवून येणारा आणि दुष्टांना क्षणार्धांत निपटून टाकणारा असा तू त्या तुझा पराक्रम, तुज भीषण रूपधरी देवाचे भयंकर शौर्य, तू जो प्रतापी त्या तुझी विलक्षण धमक, कधींही हार न जाणार्‍या तू तात्काळ उत्कर्ष करतोस अशा तुझे सर्वंकष सामर्थ्य - हे खरोखरच अनुभवास आले असेंच मी समजतो. ॥ ४ ॥


तन्नः॑ प्र॒त्नं स॒ख्यम॑स्तु यु॒ष्मे इ॒त्था वद॑द्भिरर्व॒लमङ्गि॑ रोभिः ।
हन्न॑च्युतच्युद्दस्मे॒षय॑न्तमृ॒णोः पुरो॒ वि दुरो॑ अस्य॒ विश्वाः॑ ॥ ५ ॥

तत् नः प्रत्नं सख्यं अस्तु युष्मेइति इत्था वदत्ऽभिः वलं अङ्गिरःऽभिः ।
हन् अच्युतऽच्युत् दस्म इषयंतं ऋणोः पुरः वि दुरः अस्य विश्वाः ॥ ५ ॥

दिव्य विभूतींनो, तुमचा आमचा पुरातन कृपालोभ तसाच राहो, असे वारंवार म्हणणार्‍या अंगिरा ऋषींना बरोबर घेऊन हे अद्‍भुत कर्मकारी आणि अढळ पदार्थांनाही उलथून पाडणार्‍या देवा, सर्व उत्साहशक्ति आपल्याच आंगी असावी अशी हांव बाळगणार्‍या बलाचा तू नाश केलास, आणि त्याच्या राजधानीचे यच्चावत् दरवाजे तू भक्तांना उघडून दिलेस. ॥ ५ ॥


स हि धी॒भिर्हव्यो॒ अस्त्यु॒ग्र ई॑शान॒कृन्म॑ह॒ति वृ॑त्र॒तूर्ये॑ ।
स तो॒कसा॑ता॒ तन॑ये॒ स व॒ज्री वि॑तन्त॒साय्यो॑ अभवत्स॒मत्सु॑ ॥ ६ ॥

सः हि धीभिः हव्यः अस्ति उग्रः ईशानऽकृत् महति वृत्रऽतूर्ये ।
सः तोकऽसाता तनये सः वज्री वितन्तसाय्यः अभवत् समत्ऽसु ॥ ६ ॥

तो उग्र आहे, ईश्वरीकरणी ही त्याचीच. अंधकार नाशनार्थ चाललेल्या महायुद्धांत भक्तीने ज्याचा धांवा करावा असा तोच. लहान अर्भकांच्या रक्षणार्थ मांडलेल्या संग्रामांत सुद्धां त्याच वज्रधर देवाला आळवून त्याला शत्रूंच्या छातीवर चालून जाण्याविषयीं प्रार्थना करावी लागली. ॥ ६ ॥


स म॒ज्मना॒ जनि॑म॒ मानु॑षाणा॒मम॑र्त्येन॒ नाम्नाति॒ प्र स॑र्स्रे ।
स द्यु॒म्नेन॒ स शव॑सो॒त रा॒या स वी॒र्येण॒ नृत॑मः॒ समो॑काः ॥ ७ ॥

सः मज्मना जनिम मानुषाणां अमर्त्येन नाम्ना अति प्र सर्स्रे ।
सः द्युम्नेन सः शवसा उत राया सः वीर्येण नृऽतमः संऽओकाः ॥ ७ ॥

आपल्या संहत ओजाने, आपल्या अविनाशी कीर्तीने सर्व मोठमोठ्या पुरुषांच्या जीवित चरित्रांवर त्याने मात करून सोडली. तो वीरोत्तम, तेजस्विता, जोम, दिव्यवैभव आणि शौर्य हे वास करतात त्याच ठिकाणी निरंतर असतो. ॥ ७ ॥


स यो न मु॒हे न मिथू॒ जनो॒ भूत्सु॒मन्तु॑नामा॒ चुमु॑रिं॒ धुनिं॑ च ।
वृ॒णक्पिप्रुं॒ शम्ब॑रं॒ शुष्ण॒मिन्द्रः॑ पु॒रां च्यौ॒त्नाय॑ श॒यथा॑य॒ नू चि॑त् ॥ ८ ॥

सः यः न मुहे न मिथु जनः भूत् सुमन्तुऽनामा चुमुरिं धुनिं च ।
वृणक् पिप्रुं शम्बरं शुष्णं इन्द्रः पुरां च्यौत्नाय शयथाय नु चित् ॥ ८ ॥

जो कधी कोणाला भ्रांतीत ठेवीत नाही, कधींही फसवीत नाही, ज्याच्या नांवाची आठवण चिरकाल राहते असा कोणी असेल तर तो इंद्रच होय. त्यानेंच चुमुरी, धुनि पिप्रु, शंबर आणि शुष्ण यांचा फडशा उडविला. त्यांचे किल्ले ढांसळून देऊन जमीनदोस्त करावे म्हणूनच त्यांचा संहार केला. ॥ ८ ॥


उ॒दाव॑ता॒ त्वक्ष॑सा॒ पन्य॑सा च वृत्र॒हत्या॑य॒ रथ॑मिन्द्र तिष्ठ ।
धि॒ष्व वज्रं॒ हस्त॒ आ द॑क्षिण॒त्राभि प्र म॑न्द पुरुदत्र मा॒याः ॥ ९ ॥

उत्ऽअवता त्वक्षसा पन्यसा च वृत्रऽहत्याय रथं इन्द्र तिष्ठ ।
धिष्व वज्रं हस्ते आ दक्षिणऽत्रा अभि प्र मंद पुरुऽदत्र मायाः ॥ ९ ॥

परित्रणशील, कार्यक्षम, व प्रशंसनीय सद्‍गुणांनी मंडित होऊन हे इंद्रा, वृत्राचा नाश करण्याकरितां, तूं रथावर आरोहण कर. आपल्या उजव्या हातांत वज्र घे आणि औदार्यसागरा आपली माया जरा आंवरून धर. ॥ ९ ॥


अ॒ग्निर्न शुष्कं॒ वन॑मिन्द्र हे॒ती रक्षो॒ नि ध॑क्ष्य॒शनि॒र्न भी॒मा ।
ग॒म्भी॒रय॑ ऋ॒ष्वया॒ यो रु॒रोजाध्वा॑नयद्दुरि॒ता द॒म्भय॑च्च ॥ १० ॥

अग्निः न शुष्कं वनं इन्द्र हेती रक्षः नि धक्षि अशनिः न भीमा ।
गंभीरया ऋष्वया यः रुरोज अध्वनयत् दुःऽइता दम्भयत् च ॥ १० ॥

अग्नीने वठलेले जंगल खाक करावे त्याप्रमाणे, तुझ्या हत्याराच्या जणोकाय घावाने, तुझ्या जणो विद्युत्पाताने हे इंद्रा तू राक्षसांची राखरांगोळी कर. आपल्या गंभीर आणि अत्युदात्त शब्दानेंच तू संकटांचा उच्छेद केलास. आवाजाच्या दणक्यानेंच त्यांना उडवून देऊन दाबून टाकलेस. ॥ १० ॥


आ स॒हस्रं॑ प॒थिभि॑रिन्द्र रा॒या तुवि॑द्युम्न तुवि॒वाजे॑भिर॒र्वाक् ।
या॒हि सू॑नो सहसो॒ यस्य॒ नू चि॒ददे॑व॒ ईशे॑ पुरुहूत॒ योतोः॑ ॥ ११ ॥

आ सहस्र पथिऽभिः इन्द्र राया तुविऽद्युम्न तुविऽवाजेभिः अर्वाक् ।
याहि सुनोइति सहसः यस्य नु चित् अदेवः ईशे पुरुऽहूत योतोः ॥ ११ ॥

प्रखरदीप्ते इंद्रा, अपार सत्वधन आणि दिव्य ऐश्वर्य ही घेऊन हजारो वाटांनी आमच्याकडे भूलोकी ये. सामर्थ्य प्रभवा, सर्वजनस्तुत इंद्रा, देवभक्तिहीन कोणीही लोक तुझे आकलन करू शकत नाहींत. ॥ ११ ॥


प्र तु॑विद्यु॒म्नस्य॒ स्थवि॑रस्य॒ घृष्वे॑र्दि॒वो र॑रप्शे महि॒मा पृ॑थि॒व्याः ।
नास्य॒ शत्रु॒र्न प्र॑ति॒मान॑मस्ति॒ न प्र॑ति॒ष्ठिः पु॑रुमा॒यस्य॒ सह्योः॑ ॥ १२ ॥

प्र तुविऽद्युम्नस्य स्थविरस्य घृष्वेः दिवः ररप्शे महिमा पृथिव्याः ।
न अस्य शत्रुः न प्रतिऽमानं अस्ति न प्रतिऽस्थिः पुरुऽमायस्य सह्योः ॥ १२ ॥

ज्याचे तेज अपार व ज्याचा प्रकाश तीव्र असा पुराणपुरुष इंद्र त्याचा महिमा पृथ्वी आणि गगन ह्यांनाही भेदून गेला. त्याच्या मायेचा तर अंत नाही. ह्या प्रतापशाली देवाला कोणीच शत्रू नाही. त्याच्या तोडीची एकही वस्तु नाही किंवा त्याच्या जागी शोभेल असाही कोणता पदार्थ नाही. ॥ १२ ॥


प्र तत्ते॑ अ॒द्या कर॑णं कृ॒तं भू॒त्कुत्सं॒ यदा॒युम॑तिथि॒ग्वम॑स्मै ।
पु॒रू स॒हस्रा॒ नि शि॑शा अ॒भि क्षामुत्तूर्व॑याणं धृष॒ता नि॑नेथ ॥ १३ ॥

प्र तत् ते अद्य करणं कृतं भूत् कुत्सं यत् आयुं अतिथिऽग्वं अस्मै ।
पुरू सहस्रा नि शिशाः अभि क्षां उत् तूर्वयाणं धृषता निनेथ ॥ १३ ॥

कुत्स, आयु अतिथिग्व - ज्याच्यासाठीं तू शेकडो दुर्जन मारून टाकलेस तो कुत्स पृथ्वीवर वेगने आदळणार इतक्यांत त्याला तू वर उचलून घेतलेस ही तुझी करणी आजच्या घटकेस जगद्‍विख्यात झाली आहे. ॥ १३ ॥


अनु॒ त्वाहि॑घ्ने॒ अध॑ देव दे॒वा मद॒न्विश्वे॑ क॒वित॑मं कवी॒नाम् ।
करो॒ यत्र॒ वरि॑वो बाधि॒ताय॑ दि॒वे जना॑य त॒न्वे गृणा॒नः ॥ १४ ॥

अनु त्वा अहिऽघ्ने अध देव देवाः मदन् विश्वे कविऽतमं कवीनां ।
करः यत्र वरिवः बाधिताय दिवे जनाय तन्वे गृणानः ॥ १४ ॥

देवा, अहिचा वध व्हावा म्हणून सर्व दिव्यविभूतींनी, कविंनाही स्फुर्ति देणारा कविश्रेष्ठ तू, त्या तुझ्या पाठोपाठ उत्साहवर्धक सोमरस प्राशन केला. मग तुझे स्तवन केले तेव्हा द्युलोकाला आणि मनुष्यांना फार पीडा झाली होती म्हणून त्यांना बंदमुक्तीच्या सुखाची जोड करून दिलीस. ॥ १४ ॥


अनु॒ द्यावा॑पृथि॒वी तत्त॒ ओजोऽमर्त्या जिहत इन्द्र दे॒वाः ।
कृ॒ष्वा कृ॑त्नो॒ अकृ॑तं॒ यत्ते॒ अस्त्यु॒क्थं नवी॑यो जनयस्व य॒ज्ञैः ॥ १५ ॥

अनु द्यावापृथिवीइति तत् ते ओजः अमर्त्याः जिहते इन्द्र देवाः ।
कृष्व कृत्नैति अकृतं यत् ते अस्ति उक्थं नवीयः जनयस्व यज्ञैः ॥ १५ ॥

इंद्रा तुझे अपूर्व दिव्य तेज असे आहे की त्याची आकाश पृथिवी, आणि अमरविभूति हे सर्व वाहवाच करतात. हे कर्तृत्वकुशला अजूनही जे चमत्कार तू केले नसशील ते करून टाक. आणि यज्ञांच्या निमित्ताने नवीन सामगायनांची प्रसिद्धि कर. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १९ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


म॒हाँ इन्द्रो॑ नृ॒वदा च॑र्षणि॒प्रा उ॒त द्वि॒बर्हा॑ अमि॒नः सहो॑भिः ।
अ॒स्म॒द्र्यग्वावृधे वी॒र्यायो॒रुः पृ॒थुः सुकृ॑तः क॒र्तृभि॑र्भूत् ॥ १ ॥

महान् इन्द्रः नृऽवत् आ चर्षणिऽप्राः उत द्विऽबर्हाः अमिनः सहःऽभिः ।
अस्मद्र्यक्ग् ववृधे वीर्याय उरुः पृथुः सुऽकृतः कर्तृऽभिः भूत् ॥ १ ॥

परमथोर इंद्र वीरपरिवेष्ठित आहे. वर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी त्याचा वास आहे. उभयलोकांचा प्रभु अप्रहित असा तो देव आमच्याकडे वळो. आपले शौर्य गाजवावे म्हणून वृद्धिंगत झाला, आणि तो विशाल व अतिविस्तृत असा इंद्र आपल्या कर्तृत्वानेंच सुशोभित झाला. ॥ १ ॥


इन्द्र॑मे॒व धि॒षणा॑ सा॒तये॑ धाद्बृ॒हन्त॑मृ॒ष्वम॒जरं॒ युवा॑नम् ।
अषा॑ळ्हेन॒ शव॑सा शूशु॒वांसं॑ स॒द्यश्चि॒द्यो वा॑वृ॒धे असा॑मि ॥ २ ॥

इन्द्रं एव धिषणा सातये धात् बृहंतं ऋष्वं अजरं युवानं ।
अषाळ्हेन शवसा शूशुऽवांसं सद्यः चित् यः ववृधे असामि ॥ २ ॥

अत्यंत उदात्तवृत्तिचा, कधींही क्षीण न होणारा, सदैव तरुण अशा त्या इंद्राला भक्तांच्या ध्याननिष्ठेने यशप्राप्ति करिता हृदयांत ठेवून दिले. ज्याला पराजय कसा तो माहीतच नाही अशा बलोद्रेकाने उत्फुल्ल झालेल्या इंद्राला अंतःकरणांत साठविले. त्याबरोबर तो तात्काळ अर्धामुर्धा नव्हे तर यथेच्छ वृद्धिंगत झाला. ॥ २ ॥


पृ॒थू क॒रस्ना॑ बहु॒ला गभ॑स्ती अस्म॒द्र्य१क्सं मि॑मीहि॒ श्रवां॑सि ।
यू॒थेव॑प॒श्वः प॑शु॒पा दमू॑ना अ॒स्माँ इ॑न्द्रा॒भ्या व॑वृत्स्वा॒जौ ॥ ३ ॥

पृथूइति करस्ना बहुला गभस्तीइति अस्मद्र्यक् सं मिमीहि श्रवांसि ।
यूथाऽइव पश्वः पशुऽपा दमूना अस्मान् इन्द्र अभि आ ववृत्स्व आजौ ॥ ३ ॥

तुझे ते विशाल हात, विस्तीर्ण बाहु, आणि तुझे कान हे आमच्याकडे कर. पशूच्या कळपाला जसा गोपाल त्याचप्रमाणे तू स्वाधीनचित्त देव, आमच्या हालचाली युद्धामध्यें व्यवस्थित घडवून आण. ॥ ३ ॥


तं व॒ इन्द्रं॑ च॒तिन॑मस्य शा॒कैरि॒ह नू॒नं वा॑ज॒यन्तो॑ हुवेम ।
यथा॑ चि॒त्पूर्वे॑ जरि॒तार॑ आ॒सुरने॑द्या अनव॒द्या अरि॑ष्टाः ॥ ४ ॥

तं वः इन्द्रं चतिनं अस्य शाकैः इह नूनं वाजऽयंतः हुवेम ।
यथा चित् पूर्वे जरितारः आसुः अनेद्याः अनवद्याः अरिष्टाः ॥ ४ ॥

तुमच्यासाठी, संकटांचे उच्चाटन करणार्‍या इंद्राला त्याच्या सर्व प्रबल सैनिकांसह आम्ही सत्वसामर्थ्योत्सुक भक्तजन प्रार्थनेने आळवून येथे घेऊन येऊं, म्हणजे पूर्वींचे उपासक होते त्याप्रमाणे आम्हींही अनिंद्य, निष्कलंक आणि हानिरहित होऊं. ॥ ४ ॥


धृ॒तव्र॑तो धन॒दाः सोम॑वृद्धः॒ स हि वा॒मस्य॒ वसु॑नः पुरु॒क्षुः ।
सं ज॑ग्मिरे प॒थ्या३रायो॑ अस्मिन्समु॒द्रे न सिन्ध॑वो॒ याद॑मानाः ॥ ५ ॥

धृतऽव्रतः धनऽदाः सोमऽवृद्धः सः हि वामस्य वसुनः पुरुऽक्षुः ।
सं जग्मिरे पथ्याः रायः अस्मिन् समुद्रे न सिंधवः यादमानाः ॥ ५ ॥

तो आपले न्यायनियम बिनचूक अमलांत आणतो. तो धनदाता आहे. सोमरसाने अत्यंत उल्लसित तोच होतो. आणि अभिलषणीय असे जे उत्कृष्ट धन आहे, त्याचा निधि हा इंद्रच होय. नद्या समुद्राकडे लोटत जातात त्याप्रमाणे, सन्मार्ग आणि सदैश्वर्य हे सर्व ह्या इंद्राकडेच जाऊन पोहोंचतात. ॥ ५ ॥


शवि॑ष्ठं न॒ आ भ॑र शूर॒ शव॒ ओजि॑ष्ठ॒मोजो॑ अभिभूत उ॒ग्रम् ।
विश्वा॑ द्यु॒म्ना वृष्ण्या॒ मानु॑षाणाम॒स्मभ्यं॑ दा हरिवो माद॒यध्यै॑ ॥ ६ ॥

शविष्ठं नः आ भर शूर शवः ओजिष्ठं ओजः अभिऽभूते उग्रं ।
विश्वा द्युम्ना वृष्ण्या मानुषाणां अस्मभ्यं दाः हरिऽवः मादयध्यै ॥ ६ ॥

दुष्टदमना शूरा, ज्याची धडाडी लोकोत्तर असा पराक्रम, व ज्याचे तेज अनिवार्य असे तीव्र ओज आम्हांमध्ये आण. य्च्चावत् प्रताप मनुष्यमात्राचे पौरुष आम्ही आवेशोल्लसित म्हणून आम्हांस अर्पण कर. ॥ ६ ॥


यस्ते॒ मदः॑ पृतना॒षाळमृ॑ध्र॒ इन्द्र॒ तं न॒ आ भ॑र शूशु॒वांस॑म् ।
येन॑ तो॒कस्य॒ तन॑यस्य सा॒तौ मं॑सी॒महि॑ जिगी॒वांस॒स्त्वोताः॑ ॥ ७ ॥

यः ते मदः पृतनाषाट् अमृध्र इन्द्र तं नः आ भर शूशुऽवांसं ।
येन तोकस्य तनयस्य सातौ मंसीमहि जिगीवांसः त्वाऽऊताः ॥ ७ ॥

तुझा वीरोचित उल्लास स्वतःला यत्किंचितही उणेपणा येऊं न देतां रिपुसैन्याची धूळधाण उडवून देतो तो तुझा उत्कंट हर्ष तू आम्हांमध्ये आण. लहान अर्भकांकरिता चालविलेल्या समरांत तुझ्या संरक्षणाखाली आम्ही जय पावून तुझे चिंतन करूं. ॥ ७ ॥


आ नो॑ भर॒ वृष॑णं॒ शुष्म॑मिन्द्र धन॒स्पृतं॑ शूशु॒वांसं॑ सु॒दक्ष॑म् ।
येन॒ वंसा॑म॒ पृत॑नासु॒ शत्रू॒न्तवो॒तिभि॑रु॒त जा॒मीँरजा॑मीन् ॥ ८ ॥

आ नः भर वृषणं शुष्मं इन्द्र धनऽस्पृतं शूशुऽवांसं सुऽदक्षं ।
येन वंसाम पृतनासु शत्रून् तव ऊतिभिः उत जामी।न् अजामीन् ॥ ८ ॥

इंद्रा कामनावर्षक, धनदायक, उत्कट चातुर्यबल युक्त असा जो तुझा दरारा तो आम्हांमध्ये उत्पन्न होईल असे कर. तुझ्या साहाय्यानेंच आम्ही शत्रूंचा युद्धांत मोड करूं मग ते शत्रू त्यांचे नातेवाईक असोत की नसोत. ॥ ८ ॥


आ ते॒ शुष्मो॑ वृष॒भ ए॑तु प॒श्चादोत्त॒राद॑ध॒रादा पु॒रस्ता॑त् ।
आ वि॒श्वतो॑ अ॒भि समे॑त्व॒र्वाङ्इुन्द्र॑ द्यु॒म्नं स्वर्वद्धेह्य॒स्मे ॥ ९ ॥

आ ते शुष्मः वृषभः एतु पश्चात् उत्तरात् अधरात् आ पुरस्तात् ।
आ विश्वतः अभि सं एतु अर्वाङ् इन्द्र द्युम्नं स्वःऽवत् धेहि अस्मेइति ॥ ९ ॥

तुझा वीर्यप्रताप पाठीमागून, वरच्या बाजूने, खालच्या बाजूने, समोरून, चोहोंकडून आम्हांमध्ये येवो, आमच्याकडे येवो. इंद्रा तुझी दिव्य लोकोत्तर दीप्ति आम्हांमध्ये आण. ॥ ९ ॥


नृ॒वत्त॑ इन्द्र॒ नृत॑माभिरू॒ती वं॑सी॒महि॑ वा॒मं श्रोम॑तेभिः ।
ईक्षे॒ हि वस्व॑ उ॒भय॑स्य राज॒न्धा रत्नं॒ महि॑ स्थू॒रं बृ॒हन्त॑म् ॥ १० ॥

नृऽवत् त इन्द्र नृऽतमाभिः ऊती वंसीमहि वामं श्रोमतेभिः ।
ईक्षे हि वस्वः उभयस्य राजन् धाः रत्नं महि स्थूरं बृहंतं ॥ १० ॥

इंद्रा, वीरश्रेष्ठाला उचित अशी जी तुझी जगद्‍विख्यात संरक्षकसामर्थ्यें आहेत, त्यांच्याच योगाने वीरमंडित अभिलषणीय धन आम्ही हस्तगत करू असे घडो. ऐहिक आणि पार लौकिन असे दोन्ही प्रकारचे जे उत्कृष्ट धन आहे त्याचा स्वामी हे जगन्नायका, तूंच आहेस. मोठें अचल आणि श्रेष्ठ असे जे रत्न आहे ते आम्हांस अर्पण कर. ॥ १० ॥


म॒रुत्व॑न्तं वृष॒भं वा॑वृधा॒नमक॑वारिं दि॒व्यं शा॒समिन्द्र॑म् ।
वि॒श्वा॒साह॒मव॑से॒ नूत॑नायो॒ग्रं स॑हो॒दामि॒ह तं हु॑वेम ॥ ११ ॥

मरुत्वन्तं वृषभं वावृधानं अकवारिं दिव्यं शासं इन्द्रं ।
विश्वासाहं अवसे नूतनायोग्रं सहोदां इह तं हुवेम ॥ ११ ॥

इंद्र हा मरुत्‍गणवेष्टित, वीरपुंगव, हर्षोत्फुल्ल होणारा आहे, त्याचे शत्रु कांही सामान्य कोटींतील नव्हते तरी त्याने त्यांचा नाश केला. तो दिव्य रूपप्रशंसनीय, सर्व विश्वाला आपल्या सत्तेखाली आणणारा उग्र आणि विजयदाता आहे तर अशा इंद्राला, त्याचा अगदी नवीन प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून पार्थनेने प्राचारण करीत आहोंत. ॥ ११ ॥


जनं॑ वज्रि॒न्महि॑ चि॒न्मन्य॑मानमे॒भ्यो नृभ्यो॑ रन्धया॒ येष्वस्मि॑ ।
अधा॒ हि त्वा॑ पृथि॒व्यां शूर॑सातौ॒ हवा॑महे॒ तन॑ये॒ गोष्व॒प्सु ॥ १२ ॥

जनं वज्रिन् महि चिन् मन्यमानं एभ्यः नृऽभ्यः रन्धय येषु अस्मि ।
अध हि त्वा पृथिव्यां शूरऽसातौ हवामहे तनये गोषु अप्ऽसु ॥ १२ ॥

वज्रधरा, ज्या ह्या वीरमंडळांत आमचाही समावेश होतो, अशा वीरांच्या स्वाधीन, गर्वाने फुगून जाऊन आपल्यालाच मोठे समजणार्‍या लोकांना कर. शूरपुरुषांमध्ये चाललेल्या झुंझ्यात पुत्रपौत्रांकरिता, ज्ञान धेनूं करिता, दिव्योदकांकरिता सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांत आम्ही तुला भूलोकी निमंत्रण करीत आहोत. ॥ १२ ॥


व॒यं त॑ ए॒भिः पु॑रुहूत स॒ख्यैः शत्रोः॑ शत्रो॒रुत्त॑र॒ इत्स्या॑म ।
घ्नन्तो॑ वृ॒त्राण्यु॒भया॑नि शूर रा॒या म॑देम बृह॒ता त्वोताः॑ ॥ १३ ॥

वयं त एभिः पुरुऽहूत सख्यैः शत्रोःऽशत्रोः उत्ऽतरे इत् स्याम ।
घ्नंतः वृत्राणि उभयानि शूर राया मदेम बृहता त्वाऽऊताः ॥ १३ ॥

ह्या तुझ्या आम्हांवरील लोभामुळे आम्ही प्रत्येक शत्रूपेक्षां सरसच ठरूं असे घडो. हे वीरा, तुझ्या रक्षणामुळे आम्ही दोन्ही प्रकारच्या अंधकाररूपी शत्रूंचा नायनाट करून परमश्रेष्ठ अशा वैभवाच्या योगाने हर्षभरित होऊं असे कर. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २० ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


द्यौर्न य इ॑न्द्रा॒भि भूमा॒र्यस्त॒स्थौ र॒यिः शव॑सा पृ॒त्सु जना॑न् ।
तं नः॑ स॒हस्र॑भरमुर्वरा॒सां द॒द्धि सू॑नो सहसो वृत्र॒तुर॑म् ॥ १ ॥

द्यौः न यः इन्द्र अभि भूम अर्यः तस्थौ रयिः शवसा पृत्ऽसु जनान् ।
तं नः सहस्रऽभरं उर्वराऽसां दद्धि सुनोइति सहसः वृत्रऽतुरं ॥ १ ॥

इंद्रा, आकाश जसे पृथ्वीला सर्व बाजूंनी वेढून तिचे रक्षण करते, त्याप्रमाणे तुझ्या दिव्य वैभवाने सज्जनांना युद्धांमध्ये आपल्या प्रभावाने परित्राण केले आहे. हे हजारो प्रकारचे सुख देणारे, सुपीक देश मिळवून देणारे आणि अंधकाराला पळवून लावणारे दिव्यैश्वर्य, हे सामर्थ्य प्रभवा, आम्हांस अर्पण कर. ॥ १ ॥


दि॒वो न तुभ्य॒मन्वि॑न्द्र स॒त्रासु॒र्यं दे॒वेभि॑र्धायि॒ विश्व॑म् ।
अहिं॒ यद्वृ॒त्रम॒पो व॑व्रि॒वांसं॒ हन्नृ॑जीषि॒न्विष्णु॑ना सचा॒नः ॥ २ ॥

दिवः न तुभ्यं अनु इन्द्र सत्रा असुर्यं देवेभिः धायि विश्वं ।
अहिं यत् वृत्रं अपः वव्रिऽवांसं हन् ऋजीषिन् विष्णुना सचानः ॥ २ ॥

इंद्रा, आकाश तुझ्या आधीन, त्याप्रमाणे अखिल परमेश्वरी सत्ता सर्वकाल तुझ्या आधीन ही गोष्ट देवतांनी सुद्धां मान्य केली आहे. कारण हे सोमप्रिय देवा, विष्णुला बरोबर घेऊन तू वृत्राला - सर्व जगाला घेऊन टाकणार्‍या अहि भुजंगाला तू ठार मारून टाकलेस. ॥ २ ॥


तूर्व॒न्नोजी॑यान्त॒वस॒स्तवी॑यान्कृ॒तब्र॒ह्मेन्द्रो॑ वृ॒द्धम॑हाः ।
राजा॑भव॒न्मधु॑नः सो॒म्यस्य॒ विश्वा॑सां॒ यत्पु॒रां द॒र्त्नुमाव॑त् ॥ ३ ॥

तूर्वन् ओजीयान् तवसः तवीयान् कृतऽब्रह्मा इन्द्रः वृद्धऽमहाः ।
राजा अभवत् मधुनः सोम्यस्य विश्वासां यत् पुरां दर्त्नुं आवत् ॥ ३ ॥

त्वरित विजय मिळविणारा, आपले तेज प्रकट करणारा, प्रतापी वीरांत महाप्रतापी आणि अपार तेजस्क इंद्र, त्याच्या प्रित्यर्थ भक्तांनी प्रार्थना स्तोत्रें म्हटली आहेत. सोमवल्लीचा मधुर रसाचा राजा झाला आहे. कारण शत्रूंच्या सर्व तटबंदी नगरांचा विध्वंस करणारे वज्र आपल्या हातांत तोच वागवितो. ॥ ३ ॥


श॒तैर॑पद्रन्प॒णय॑ इ॒न्द्रात्र॒ दशो॑णये क॒वये॑ऽ॒र्कसा॑तौ ।
व॒धैः शुष्ण॑स्या॒शुष॑स्य मा॒याः पि॒त्वो नारि॑रेची॒त्किं च॒न प्र ॥ ४ ॥

शतैः अपद्रन् पणयः इन्द्र अत्र दशऽओणये कवये अर्कऽसातौ ।
वधैः शुष्णस्य अशुषस्य मायाः पित्वः न अरिरेचीत् किं चन प्र ॥ ४ ॥

इंद्रा, दशोणि नांवाच्या कवीला काव्यस्फुर्तिचा लाभ झाला त्या बरोबरच शेंकडो अरसिक कंजूषलोक दशदिशा पळून गेले तसाच प्रकार, अत्यंत लोभी जो शुष्ण राक्षर त्याचे कपट प्रयोग व त्याचे पोटिस्थ हे सर्व तू आपल्या आयुधांनी पार नाहींसे केलेस, त्यातले कांहीएक शिल्लक राहूं दिले नाहींस, त्यावेळेस झाला. ॥ ४ ॥


म॒हो द्रु॒हो अप॑ वि॒श्वायु॑ धायि॒ वज्र॑स्य॒ यत्पत॑ने॒ पादि॒ शुष्णः॑ ।
उ॒रु ष स॒रथं॒ सार॑थये क॒रिन्द्रः॒ कुत्सा॑य॒ सूर्य॑स्य सा॒तौ ॥ ५ ॥

महः द्रुहः अप विश्वऽआयु धायि वज्रस्य यत् पतने पादि शुष्णः ।
उरु सः सऽरथं सारथये कः इन्द्रः कुत्साय सूर्यस्य सातौ ॥ ५ ॥

आंगावर वज्र येऊन आदळतांच शुष्ण राक्षस ठार झाला आणि त्या सज्जन द्रोही महादुष्टाच्या कचाट्यांतून सर्व विश्वाच्या आयुष्याची दोरी तू बचावलीस त्याच वेळेस इंद्राचा सारथी झालेला जो कुत्स, त्याच्याकरितां सूर्यासाठी चाललेल्या झटापटींत इंद्राने आपल्या शेजारी जागा देऊन त्याला सारथी केले. ॥ ५ ॥


प्र श्ये॒नो न म॑दि॒रमं॒शुम॑स्मै॒ शिरो॑ दा॒सस्य॒ नमु॑चेर्मथा॒यन् ।
प्राव॒न्नमीं॑ सा॒प्यं स॒सन्तं॑ पृ॒णग्रा॒या समि॒षा सं स्व॒स्ति ॥ ६ ॥

प्र श्येनः न मदिरं अंशुं अस्मै शिरः दासस्य नमुचेः मथायन् ।
प्र आवत् नमीं साप्यं ससंतं पृणक् राया सं इषा सं स्वस्ति ॥ ६ ॥

श्येनाने हर्षकारक सोमवल्ली त्याच्याकरिता आपली, त्याचप्रमाणे इंद्राने नमुचि राक्षसाचे मस्तक त्याच्याकरितांच तोडून टाकले. आणि सपिचा पुत्र नभी हा निजला असतां त्याचे रक्षण केले. आणि त्या दिव्यैश्वर्य आणि मनोत्साह ही उत्तम रीतीने व भरपूर दिली. ॥ ६ ॥


वि पिप्रो॒रहि॑मायस्य दृ॒ळ्हाः पुरो॑ वज्रि॒ञ्छव॑सा॒ न द॑र्दः ।
सुदा॑म॒न्तद्रेक्णो॑ अप्रमृ॒ष्यमृ॒जिश्व॑ने दा॒त्रं दा॒शुषे॑ दाः ॥ ७ ॥

वि पिप्रोः अहिऽमायस्य दृल्हाः पुरः वज्रिन् शवसा न दर्दरितिदर्दः ।
सुऽदामन् तत् रेक्णः अप्रऽमृष्यं ऋजिश्वने दात्रं दाशुषे दाः ॥ ७ ॥

सर्पाप्रमाणे कपटी जो पिप्रु, त्यचे दुर्भेद्य किल्ले होते ते, हे इंद्रा, तू आपल्या प्रतापाने उध्वस्त करून टाकलेस. हे दानशूरा, तुला उत्तम हवि अर्पण करणारा भक्त ऋजश्वि ह्याला रू अविनाशी संपत्ति दिलीस. ॥ ७ ॥


स वे॑त॒सुं दश॑मायं॒ दशो॑णिं॒ तूतु॑जि॒मिन्द्रः॑ स्वभि॒ष्टिसु॑म्नः ।
आ तुग्रं॒ शश्व॒दिभं॒ द्योत॑नाय मा॒तुर्न सी॒मुप॑ सृजा इ॒यध्यै॑ ॥ ८ ॥

सः वेतसुं दशऽमायं दशऽओणिं तूतुजिं इन्द्रः स्वभिष्टिऽसुम्नः ।
आ तुग्रं शश्वत् इभं द्योतनाय मातुः न सीं उप सृजा इयध्यै ॥ ८ ॥

इंद्र आपल्या उत्कृष्ट आयुधांनी विभूषित आहे. त्याने अनेक हिकमती माहित असलेला चतुर वेतसु, उपासनेत त्वरित प्रवृत्त होणारा दशोणि, तुग्र ह्यांना, हत्तीचे पिलु त्याच्या आईकडे न्यावे त्याप्रमाणे, त्यांची कीर्ति व्हावी म्हणून ह्या पृथिवीवर उत्पन्न केले. ॥ ८ ॥


स ईं॒ स्पृधो॑ वनते॒ अप्र॑तीतो॒ बिभ्र॒द्वज्रं॑ वृत्र॒हणं॒ गभ॑स्तौ ।
तिष्ठ॒द्धरी॒ अध्यस्ते॑व॒ गर्ते॑ वचो॒युजा॑ वहत॒ इन्द्र॑मृ॒ष्वम् ॥ ९ ॥

सः ईं स्पृधः वनते अप्रतीऽइत बिभ्रत् वज्रं वृत्रऽहनं गभस्तौ ।
तिष्ठत् हरीइति अधि अस्ताऽइव गर्ते वचःऽयुजा वहतः इन्द्रं ऋष्वं ॥ ९ ॥

इंद्र हा कोणालाही आवरला जाणारा नव्हे. ज्या व ज्याच्या योगाने त्याने वृत्रास ठार मारले तेंच वज्र खांद्यावर ठेऊन तो समरांगणांत जाऊन सज्जनाच्या शत्रूंस जिंकतो. एखादा धनुर्धर रथावर आरूढ होता त्याप्रमाणे इंद्रही हरित्तेजोमय अश्वांच्या रथावर आरोहण करतो. आणि आज्ञा केल्याबरोबर आपल्या आपण रथास ते जोडले जाऊन इंद्राला घेऊन जातात. ॥ ९ ॥


स॒नेम॒ तेऽवसा॒ नव्य॑ इन्द्र॒ प्र पू॒रवः॑ स्तवन्त ए॒ना य॒ज्ञैः ।
स॒प्त यत्पुरः॒ शर्म॒ शार॑दी॒र्दर्द्धन्दासीः॑ पुरु॒कुत्सा॑य॒ शिक्ष॑न् ॥ १० ॥

सनेम ते अवसा नव्यः इन्द्रप्र पूरवः स्तवंते एना यज्ञैः ।
सप्त यत् पुरः शर्म शारदीः दर्त् हन् दासीः पुरुऽकुत्साय शिक्षन् ॥ १० ॥

इंद्रा तुझ्या कृपेने आम्ही अपूर्व भाग्याची जोड मिळवूं लोकही अशा स्तुतीने आणि यज्ञांनीच तुझे गौरव करतात, कीं पुरुकुत्साला इच्छित लाभ मिळवून देण्याकरितां शरत्कालांतील अंधकार पटलरूप सात नगरे - म्हणजे राक्षसांची आश्रयस्थाने ह्यांचा तू नाश करून टाकलास आणि अधार्मिक दस्यूंचा संहार केलास. ॥ १० ॥


त्वं वृ॒ध इ॑न्द्र पू॒र्व्यो भू॑र्वरिव॒स्यन्नु॒शने॑ का॒व्याय॑ ।
परा॒ नव॑वास्त्वमनु॒देयं॑ म॒हे पि॒त्रे द॑दाथ॒ स्वं नपा॑तम् ॥ ११ ॥

त्वं वृधः इन्द्र पूर्व्यः भूः वरिवस्यन् उशने काव्याय ।
परा नवऽवास्त्वं अनुऽदेयं महे पित्रे ददाथ स्वं नपातं ॥ ११ ॥

इंद्रा तू पुरातन आहेस, उशना कवीला आराम लाभावा म्हणून तू त्याचा उत्कर्षच केलास. नवावास्त्व नांवाच्या राक्षसास मारून थोरला पिता (द्यू) त्याला भेट म्हणून तू त्याचा नपात् (अग्नि) त्याला दिलास. ॥ ११ ॥


त्वं धुनि॑रिन्द्र॒ धुनि॑मतीर्ऋ्॒णोर॒पः सी॒रा न स्रव॑न्तीः ।
प्र यत् स॑मु॒द्रमति॑ शूर॒ पर्षि॑ पा॒रया॑ तु॒र्वशं॒ यदुं॑ स्व॒स्ति ॥ १२ ॥

त्वं धुनिः इन्द्र धुनिमतीः ऋणोः अपः सीरा न स्रवन्तीः ।
प्र यत् समुद्रं अति शूर पर्षि पारया तुर्वशं यदुं स्वस्ति ॥ १२ ॥

जगही हालवून सोडशील असा तू बलिष्ठ आहेस, तेव्हां आकाशांतून नद्यांप्रमाणे धों धों आवाजाने वृष्टि करणार्‍या दिव्य उदकांचे प्रवाह तूच वहावयास लाविलेस. हे वीरा, तू समुद्राच्या पार निघून जातोस तर तुर्वश व यदु ह्यांनाही सुखरूप पार ने. ॥ १२ ॥


तव॑ ह॒ त्यदि॑न्द्र॒ विश्व॑मा॒जौ स॒स्तो धुनी॒चुमु॑री॒ या ह॒ सिष्व॑प् ।
दी॒दय॒दित्तुभ्यं॒ सोमे॑भिः सु॒न्वन्द॒भीति॑रि॒ध्मभृ॑तिः प॒क्थ्य१र्कैः ॥ १३ ॥

तव ह त्यत् इन्द्र विश्वं आजौ सस्तः धुनीचुमुरीइति या ह सिस्वप् ।
दीदयत् इत् तुभ्यं सोमेभिः सुन्वन् दभीतिः इध्मऽभृतिः पक्थी अर्कैः ॥ १३ ॥

इंद्रा, युद्धामध्ये धुनि, चुमुरी, ह्या दैत्यांना तू कायमचे निजविलेस आणि त्यांनाही मृत्युची गाढ निद्रा लागली. हे सर्व महत्कृत्य तुझेच होय. समिधा आणि पक्व हवि अर्पण करणारा दभीति ह्याने सोमरस काढून "अर्क" स्तोत्रांनी तुझेच अर्चन केले. ॥ १३ ॥


ॐ तत् सत्


GO TOP