|
ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त १ ते १० ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
त्वं ह्य॑ग्ने प्रथ॒मो म॒नोता॒स्या धि॒यो अभ॑वो दस्म॒ होता॑ ।
त्वं हि अग्ने प्रथमः मनोता अस्याः धियः अभवः दस्म होता ।
अग्निदेवा, ह्या आमच्या ध्यानयोगाचा आद्य प्रवर्तक तू असून, हे अद्भुत चारित्र्या, आमच्या यज्ञाचा आचार्य झालास, आणि हे वीरेश्रेष्ठ, यच्चावत् विजयोन्मत्त शत्रूंना पादाक्रांत करण्याकरितां तू आपले अजिंक्य सामर्थ्य प्रकट केलेस. ॥ १ ॥
अधा॒ होता॒ न्यसीदो॒ यजी॑यानि॒ळस्प॒द इ॒षय॒न्नीड्यः॒ सन् ।
अध होता नि असीदः यजीयान् इळः पद इषयन् ईड्यः सन् ।
तू परमपूज्य आणि परमस्तुत्य देव भक्तांची अंतःकरणे उत्साहपूर्ण करून व आमचा ’होता’ होऊन ह्या भूलोकी अधिष्ठित झाला आहेस, म्हणून श्रेष्ठतम ऐश्वर्याची मनीषा धारणारे भगवद्भक्त जन सर्वांहून आद्य असा जो तू त्या तुझीच उपासना करीत आले आहेत. ॥ २ ॥
वृ॒तेव॒ यन्तं॑ ब॒हुभि॑र्वसव्यै॒३स्त्वे र॒यिं जा॑गृ॒वांसो॒ अनु॑ग्मन् ।
वृताऽइव यन्तं बहुऽभिः वसव्यैः त्वेइति रयिं जागृऽवांसः अनु ग्मन् ।
सैन्याने परिवेष्ठित अशा वीराप्रमाणे अनेक प्रकारच्या अमोलिक धनांनी युक्त होऊन तू संचार करतोस; तेजःपुंज, दर्शनीय, परमथोर, वपेने आर्ध्र आणि अखंडित प्रकाश असा तू अग्नि त्या तुझ्या ठिकाणी आपले चित्त जागृत ठेऊन भक्तजन दिव्य ऐश्वर्य प्राप्तिच्या पाठिमागे लागतात. ॥ ३ ॥
प॒दं दे॒वस्य॒ नम॑सा॒ व्यन्तः॑ श्रव॒स्यवः॒ श्रव॑ आप॒न्नमृ॑क्तम् ।
पदं देवस्य नमसा व्यन्तः श्रवस्यवः श्रवः आपन् अमृक्तं ।
जे ईश्वराच्या पदी प्रणामपूर्वक अनुसरले त्या सत्कीर्तिलोलुप भक्तांना निष्कलंक सत्कीर्तीचा तर लाभ झालाच; पण शिवाय त्यांची नांवेहि पुण्यप्रद ठरली आणि ते तुझ्या दर्शनसौख्यांत निमग्न झाले. ॥ ४ ॥
त्वां व॑र्धन्ति क्षि॒तयः॑ पृथि॒व्यां त्वां राय॑ उ॒भया॑सो॒ जना॑नाम् ।
त्वां वर्धन्ति क्षितयः पृथिव्यां त्वां राय उभयासः जनानां ।
पृथ्वीवरील सर्व सुखवस्तू लोक तुझा महिमा प्रसृत करितात; त्यांची ऐहिक आणि पारलौकिक अशी दोन्ही प्रकारची ऐश्वर्ये ही सुद्धा तुझाच लौकिक वाढवितात. हे दीनोधारा, आम्हां मानवांचा कैवारी, आणि आईबाप सदैव तूच आहेस ही गोष्ट मात्र सर्वत्रांस माहित असणे अगदी अवश्य होय. ॥ ५ ॥
स॒प॒र्येण्यः॒ स प्रि॒यो वि॒क्ष्व१ग्निर्होता॑ म॒न्द्रो नि ष॑सादा॒ यजी॑यान् ।
सपर्येण्यः सः प्रियः विक्षु अग्निः होता मन्द्रः नि ससाद यजीयान् ।
तो उपासनायोग्य, पूजनीय आणि सर्वप्रिय अग्नि आनंदमग्न होऊन ह्या मानव लोकांत यज्ञाचा आचार्य म्हणून विराजित झाला आहे. तेव्हां हे अग्ने, आपल्या यज्ञमंदिरांत तेजाने झगझगणार्या अशा तुझ्या समोर गुडघे टेकून प्रणिपात करून आम्ही तुज सन्निध येतो ॥ ६ ॥
तं त्वा॑ व॒यं सु॒ध्यो३नव्य॑ मग्ने सुम्ना॒यव॑ ईमहे देव॒यन्तः॑ ।
तं त्वा वयं सुध्यः नव्यं अग्ने सुम्नऽयव ईमहे देवऽयन्तः ।
म्हणूनच हे अग्नि, तुझ्या ध्यानांत गढून गेलेले आणि शाश्वत सुखाभिलाषी असे आम्ही सेवक, तू परमस्तुत्य म्हणून तुझी हात जोडून विनवणी करतो तेव्हां अग्निदेवा, आपल्या दिव्य महातेजाने तळपणारा असा तू देव, आपल्या भक्तांना मार्ग दर्शक झालास. ॥ ७ ॥
वि॒शां क॒विं वि॒श्पतिं॒ शश्व॑तीनां नि॒तोश॑नं वृष॒भं च॑र्षणी॒नाम् ।
विशां कविं विश्पतिं शश्वतीनां निऽतोशनं वृषभं चर्षणीनां ।
कविश्रेष्ठ नरांचा नराधिप, अगणित जनांचा शास्ता, प्राणिमात्रांचा वीर्यशाली नायक, शत्रूंच्या आंगावर तुटून पडणारा, भक्तांना उत्साह प्रद, पतित पावन, परमपूज्य आणि दिव्य ऐश्वर्यांचा देदिप्यमान प्रभु जो अग्नि त्याची उपासना करा. ॥ ८ ॥
सो अ॑ग्न ईजे शश॒मे च॒ मर्तो॒ यस्त॒ आन॑ट्स॒मिधा॑ ह॒व्यदा॑तिम् ।
सः अग्ने ईजे शशमे च मर्तः यः ते आनट् संऽइधा हव्यऽदातिं ।
हे अग्नि, ज्याने तुला समिधा अर्पण करून हविर्दानाची पूर्तता केली त्याच दीन मानवाने तुझ्या प्रित्यर्थ यज्ञ केला व तपश्चर्याहि केली असे मी समजतो, अर्थात् जो तुला नमन करून आहुति समर्पण करतो त्याचे संरक्षण तुझ्याच कडून होऊन, जितकी म्हणून स्पृहणीय संपत्ति असेल तितकी सर्व त्याच्या हस्तगत होते. ॥ ९ ॥
अ॒स्मा उ॑ ते॒ महि॑ म॒हे वि॑धेम॒ नमो॑भिरग्ने स॒मिधो॒त ह॒व्यैः ।
अस्मै ऊंइति ते महि महे विधेम नमऽभिः अग्ने संऽइधा उत हव्यैः ।
ह्या महाथोर देवा प्रित्यर्थ, हे अग्निदेवा, तुझ्या प्रित्यर्थ आम्ही प्रणामपूर्वक समिधा आणि हविर्भाग अर्पण करून अशीच खडतर सेवा करूं. हे सामर्थ्य-प्रभवा, वेदीवर स्तुतींनी आणि मनोहर गायनांनी तुला आळवून तुझ्या मंगलप्रद दयार्द्र अंतःकरणांत प्रवेश करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करूं ॥ १० ॥
आ यस्त॒तन्थ॒ रोद॑सी॒ वि भा॒सा श्रवो॑भिश्च श्रव॒स्य१स्तरु॑त्रः ।
आ यः ततंथ रोदसिइति वि भासा श्रवःऽभिः च श्रवस्यः तरुत्रः ।
ज्याने आपल्या उज्ज्वलतेने, आणि सत्कीर्ति महिम्याने ही अंतराळाची पोकळी दूरवर पसरून भरून टाकली. तोच हा लोकोत्तर तारक देव होय. तर हे अग्नि, श्रेष्ठ, चिरंतन आणि ऐश्वर्यप्रद अशा तुझ्या सत्वमय सामर्थ्यांनी आमच्यावर भरपूर प्रकाश पाड. ॥ ११ ॥
नृ॒वद्व॑सो॒ सद॒मिद्धे॑ह्य॒स्मे भूरि॑ तो॒काय॒ तन॑याय प॒श्वः ।
नूऽवत् वसोइति सदं इत् धेहि अस्मेइति भूरि तोकाय तनयाय पश्वः ।
हे दिव्यनिधे, वीरपुरुषसेवित असे अपार वैभव आमच्या हाती निरंतर ठेव, अर्भकाला, बालकाला (पशु इत्यादिक) जी चंचल संपत्ति, तीहि दे. अलोट, श्रेष्ठ आणि पापनाशक मनोत्साह, आणि कल्याण प्रद सत्कीर्ति ह्याची जोड आम्हांस मिळो. ॥ १२ ॥
पु॒रूण्य॑ग्ने पुरु॒धा त्वा॒या वसू॑नि राजन्व॒सुता॑ ते अश्याम् ।
पुरूणि अग्ने पुरुधा त्वाऽया वसूनि राजन् वसुता ते अश्यां ।
हे जगद्राजा अग्नि, तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या अभिलषणीय धनाढ्यतेमुळे पाहिजे त्या प्रकारच्या असंख्य धनांचा लाभ आम्ही जोडूं. असंख्यजन-मनोहार अग्नि, तुझ्यापाशी धन पाहिले तर अपार आहे; तू जगाचा राजा, तेव्हां तुझ्या हाती भक्तांकरिता जे अपूर्व धन पाहिजे तेंही आहे. ॥ १३ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - शक्वरी, अनुष्टुभ्
त्वं हि क्षैत॑व॒द्यशोऽग्ने मि॒त्रो न पत्य॑से ।
त्वं हि क्षैतऽवत् यशः अग्ने मित्रः न पत्यसे ।
अग्निदेवा, जगन्मित्राप्रमाणे तूंहि राजसत्तेच्या कीर्तिवैभवाचा धनीच आहेस. हे सर्वसाक्षी देवा, हे दिव्यनिधे, आमच्या यशाप्रमाणे आमच्या सुखसमृद्धीची अभिवृद्धी तूच करतोस. ॥ १ ॥
त्वां हि ष्मा॑ चर्ष॒णयो॑ य॒ज्ञेभि॑र्गी॒र्भिरीळ॑ते ।
त्वां हि स्म चर्षणयः यज्ञेभिः गीःऽभिः ईळते ।
सर्व मनुष्यमात्र आपापल्या परीने तुझे यजन करून म्हणा, संकीर्तन करून म्हणा तुझीच महती वाढवीत असतात. आणि विश्वद्रष्टा, महायोद्धा परंतु अगदी अश्राप असा सूर्य तोहि रजोलोक भेदून टाकून तुजकडेच येतो. ॥ २ ॥
स॒जोष॑स्त्वा दि॒वो नरो॑ य॒ज्ञस्य॑ के॒तुमि॑न्धते ।
सऽजोषः त्वा दिवः नरः यज्ञस्य केतुं इंधते ।
प्रेमाने एकत्र झालेले भक्तजन, तू यज्ञाचा, स्वर्ग द्वाराचा ध्वजच अशा भावाने तुला प्रज्वलीत करतात. तेव्हां अर्थातच सुखेच्छु म्हणून जो जो मानव प्राणी आहे तो तो यागामध्ये तुझीच उपासना करील. ॥ ३ ॥
ऋध॒द्यस्ते॑ सु॒दान॑वे धि॒या मर्तः॑ श॒शम॑ते ।
ऋधत् यः ते सुऽदानवे धिया मर्तः शशमते ।
तू महोदर म्हणून तुझ्या प्रित्यर्थ जो कोणी भक्त निदिध्यासरूप तप करतो, तो तुझ्या त्या बलवत्तर आणि दैवी आश्रयाच्या जोरावर पातके आणि शत्रू ह्यांच्या कचाट्यांतून पार तरून जातो. ॥ ४ ॥
स॒मिधा॒ यस्त॒ आहु॑तिं॒ निशि॑तिं॒ मर्त्यो॒ नश॑त् ।
संइधा यः ते आऽहुतिं निऽशितिं मर्त्यः नशत् ।
जो दीन भक्त समिधांच्या योगाने आहुति अर्पण करून तुला उद्दीपित केल्याचे श्रेय जोडतो; हे अग्ने, तो भक्त, ज्याचा शाखाविस्तार मोठा विस्तीर्ण आहे अशा आपल्या कुलाचा आणि शतवर्षात्मक आयुष्याचा एक महावृक्षच वाढीस लावतो असे म्हटले पाहिजे. ॥ ५ ॥
त्वे॒षस्ते॑ धू॒म ऋ॑ण्वति दि॒वि षञ्छु॒क्र आत॑तः ।
त्वेषः ते धूमऽ ऋण्वति दिवि सञ् शुक्रः आऽततः ।
पहा तुझ्या धुराचा लोट आकाशांत नीट चालला आहे. तसेच तुझे शुभ्रवर्ण प्रखर तेजही सर्वत्र पसरले आहे. तर हे पुण्यश्लोका रविप्रमाणे तूही आपल्या कांतीने आपला कृपाप्रसाद आमच्यावर पाडतोस हेंच खरे. ॥ ६ ॥
अधा॒ हि वि॒क्ष्वीड्योऽसि प्रि॒यो नो॒ अति॑थिः ।
अधा हि विक्षु ईड्यः असि प्रियः नः अतिथिः ।
आता तू आमचा प्रिय अतिथी आहेस अशीच तुझी महती सर्वतोमुखी झाली आहे. तू एखाद्या दानशूराप्रमाणे अथवा पुत्रांप्रमाणे आम्हांस सुरम्य दिसतोस, व नगरांतील एखाद्या वृद्ध शिष्टाप्रमाणे आदरणीय वाटतोस. विद्या, तप आणि कर्तृत्व ह्या तिन्ही दुर्लभ गोष्टी तुझ्या अगदी हातच्या आहेत. ॥ ७ ॥
क्रत्वा॒ हि द्रोणे॑ अ॒ज्यसेऽग्ने वा॒जी न कृत्व्यः॑ ।
क्रत्वा हि द्रोणे अज्यसे अग्ने वाजी न कृत्व्यः ।
अग्नि, तू आपल्या दैवी कर्तृत्वशक्तीने, उदकपूर्ण मेघपटलांत विद्युत्-रूपाने अशा रीतीने घुसतोस, की जणो काय एक महापराक्रमी योद्धाच. तूं वायूप्रमाणे सर्व संचारी, आमचे त्राण, आमचा आसरा तूंच, आणि नागाच्या छोट्या पिल्लाप्रमाणे तुझे चापल्यहि अपूर्व. ॥ ८ ॥
त्वं त्या चि॒दच्यु॒ताग्ने॑ प॒शुर्न यव॑से ।
त्वं त्या चित् अच्युता अग्ने पशुः न यवसे ।
हे जरारहित देवा, तुझे ज्वालारूप बलाढ्य वीर अरण्याचाहि सप्पा उडवितात त्या अर्थी, एखाद्या श्वापदाने उभे गवत सहज उपटून टाकावे त्याप्रमाणे, अगदी अढळ, कशानेही न हलणार्या अशा पदार्थाचे सुद्धा तूं सहज उच्चाटन करतोस ह्यांत संशय नाही. ॥ ९ ॥
वेषि॒ ह्यध्वरीय॒तामग्ने॒ होता॒ दमे॑ वि॒शाम् ।
वेषि हि अध्वरीयतां अग्ने होता दमे विशां ।
हे अग्निदेवा, यज्ञकर्मनिरत भक्तांच्या यज्ञमंदिरांत तूच होता होऊन स्थानापन्न होतोस. तर हे भक्तजन प्रभो, तू आमचा उत्कर्ष घडवून आण, आणि हे अंगिरा, आमच्या हविर्भागाचा स्वीकार कर. ॥ १० ॥
अच्छा॑ नो मित्रमहो देव दे॒वानग्ने॒ वोचः॑ सुम॒तिं रोद॑स्योः ।
अच्छ नः मित्रऽमहः देव देवान् अग्ने वोचः सुऽमतिं रोदस्योः ।
प्रशांत तेजस्क अग्निदेवा, ह्या अंतराळांत ज्या ज्या दिव्य शक्ति आहेत त्यांना त्यांना आमच्या प्रेमळ बुद्धीची साक्ष पटीव, व कल्याण स्थिर आश्रय आणि वीरसैनिक अशी देणगी आम्हास देवलोकांतून पाठवून दे. म्हणजे सकल रिपु, पातके आणि संकटे ह्यांच्यातून आम्ही तरून जाऊं, खात्रीने त्यांच्यातून मुक्त होऊं, तुझ्या कृपाप्रसादानेच त्यातून मुक्त होऊं. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अग्ने॒ स क्षे॑षदृत॒पा ऋ॑ते॒जा उ॒रु ज्योति॑र्नशते देव॒युष्टे॑ ।
अग्ने सः क्षेषत् ऋतऽपाः ऋतेऽजाः उरु ज्योतिः नशते देवऽयुः ते ।
अग्निदेवा, तू वरुण आहेस, मित्रांशीही तू एकरूपच आहेस. तू आपला कृपाकटाक्ष फेकून ज्या दीन भक्तांचा सांभाळ करतोस, तो भगवद्भक्त ( कसा असतो हे पाहिले तर असे दिसते की तो ) सनातन धर्माचेच पालन करतो. तो सनातन सत्यधर्मावर निष्ठा ठेवून आनंदाने राहतो, व शेवटी त्याला अमर्याद दिव्य प्रकाशाची प्राप्ति होते. ॥ १ ॥
ई॒जे य॒ज्ञेभिः॑ शश॒मे शमी॑भिरृ॒धद्वा॑राया॒ग्नये॑ ददाश ।
ईजे यज्ञेभिः शशमे शमीभिः ऋधत्ऽवाराय अग्नये ददाश ।
सर्व विलोभनीय वस्तूंची भक्तांकरिता जो समृद्धि करतो अशा अग्निरूप देवाची जो उपासना करतो, यज्ञद्वारा अर्चन करतो, अथवा आपल्या कुशाग्र बुद्धिसामर्थ्याने तपाचरण करतो, त्याला मोठमोठ्या वैभवशाली पुरुषांची इतराजी होते, तसेच उद्दाम वृत्ति अथवा पातके किंवा क्लेश ह्यापैकी कशाचीही बाधा होत नाही. ॥ २ ॥
सूरो॒ न यस्य॑ दृश॒तिर॑रे॒पा भी॒मा यदेति॑ शुच॒तस्त॒ आ धीः ।
सूरः न यस्य दृशतिः अरेपाः भीमा यत् एति शुचतः ते आ धीः ।
तुज देदिप्यमान विभूतीकडे जेव्हां आमचे चित्त लागते तेव्हां सूर्याप्रमाणे उग्र असे जरी तुझे स्वरूप असले तरी त्याची निष्कलंकता आमच्या अनुभवास येते; असा तू रमणीय देव सर्वांचे आश्रयस्थान आहेस. तू वनांत प्रकट होतोस तेव्हां हंबरणार्या गाईंप्रमाणे तुझ्या ज्वालाहि रात्रीच्या वेळी मोठ्याने शब्द करीत असतात. ॥ ३ ॥
ति॒ग्मं चि॒देम॒ महि॒ वर्पो॑ अस्य॒ भस॒दश्वो॒ न य॑मसा॒न आ॒सा ।
तिग्मं चित् एम महि वर्पः अस्य भसत् अश्वः न यमसानः आसा ।
त्याची एकंदर चलणूक तीव्र, आणि आकार तर अवाढव्यच. लगामाने तंग झालेला घोडा जसा चेकाळून जातो त्याप्रमाणे अग्निही आपल्या मुखाने जे सांपडेल ते भस्म करून टाकतो. एखाद्या जलाल फरशुप्रमाणे आपली जीभ तो लकलकावून आणि अरण्ये दग्ध करून धातु आटणीस घालणार्या कारागिराप्रमाणे सर्वांचे पार पाणी करून टाकतो. ॥ ४ ॥
स इदस्ते॑व॒ प्रति॑ धादसि॒ष्यञ्छिशी॑त॒ तेजोऽयसो॒ न धारा॑म् ।
सः इत् अस्ताऽइव प्रति धात् असिष्यन् शिशीत तेजः अयसः न धारां ।
तिरंदाजाप्रमाणे प्रहार करणाच्या उद्देशाने तोच एक आपले शरसंधान अचूक जुळवून देतो आणि तरवारीच्या धारेप्रमाणे आपले ज्वालारूप शस्त्र पाजळून ठेवतो. असा हा अग्नि निशानाथ आहे. त्याची चालच विलक्षण, ऊंच वृक्षावर घरटे बांधणार्या पक्ष्याप्रमाणे त्यांच्या पंखांचा वेग फारच जलद आहे. ॥ ५ ॥
स ईं॑ रे॒भो न प्रति॑ वस्त उ॒स्राः शो॒चिषा॑ रारपीति मि॒त्रम॑हाः ।
सः ईं रेभः न प्रति वस्ते उस्राः शोचिषा रारपीति मित्रऽमहाः ।
पहाटे गायन करणार्या भक्ताप्रमाणे अग्नि हाही उषेला आपले तेजोवस्त्र नेसवीत असतो. मित्रासारख सुखप्रद प्रकाश देणारा असूनही आपल्या ज्वालेने मोठ्याने फडाडत जातो, असा हा अग्निदेव, वीरांना रात्रंदिवस भक्तप्रेमाने आरक्त दिसतो. असा हा अमर देव वीरांना दिवसाही आरक्त असतो. ॥ ६ ॥
दि॒वो न यस्य॑ विध॒तो नवी॑नो॒द्वृषा॑ रु॒क्ष ओष॑धीषु नूनोत् ।
दिवः न यस्य विधतः नवीनोत् वृषा रुक्षः ओषधीषु नूनोत् ।
आपला प्रकाश दिगंत पसरविणार्या ज्या ह्या अग्नीचा शब्द मेघगर्जनेप्रमाणे गंभीर होतो; जो हा तेजःपुंज वीर वनसपतींत संचार करीत असतांना विक्राळ निनाद करतो, तो हा अग्नि आपल्या तीव्र तेजाने आणि गतीने जात असतां, नववधू जी रोदसी (पृथ्वी आणि अंतराल) हिला अमोल संपत्तीने आणि आपल्या प्रखर कांतीने भरून टाकतो. ॥ ७ ॥
धायो॑भिर्वा॒ यो युज्ये॑भिर॒र्कैर्वि॒द्युन्न द॑विद्यो॒त्स्वेभिः॒ शुष्मैः॑ ।
धायःऽभिः वा यः युज्येभिः अर्कैः विऽद्युन् न दविद्योत् स्वेभिः शुष्मैः ।
अंतःकरण तृप्त करणार्या निवडक ’अर्क’ पद्यांनी प्रसन्न होऊन विद्युल्लते प्रमाणे आपल्या तीव्र प्रतापाने जो एकदम दिपवून सोडतो, त्या ह्या अग्नीनेच मरुतांचे सैन्य तयार केले आहे. ऋभुप्रमाणे पहा त्याची ती झपाट्याने चमक मारणारी झळाळी दृगोच्चर होऊं लागली. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
यथा॑ होत॒र्मनु॑षो दे॒वता॑ता य॒ज्ञेभिः॑ सूनो सहसो॒ यजा॑सि ।
यथा होतः मनुषः देवऽताता यज्ञेभिः सूनोइति सहसः यजासि ।
हे महाचार्या, अटोकाट सामर्थ्य देणार्या देवा, मानवांनी भगवत्सेवा आरंभिली म्हणजे तींत यज्ञद्वारा दिव्य विभूति प्रित्यर्थ यजन करावे हा तुझा बाणा त्यास अनुसरून हे अग्नि - तू मोठ्या हौसेने व प्रसन्न मनाने तुझ्या त्या प्रसन्नचित्त व उत्सुक विभूती प्रित्यर्थ यजन करा. ॥ १ ॥
स नो॑ वि॒भावा॑ च॒क्षणि॒र्न वस्तो॑र॒ग्निर्व॒न्दारु॒ वेद्य॒श्चनो॑ धात् ।
सः नः विभाऽवा चक्षणिः न वस्तोः अग्निः वन्दारु वेद्यः चनः धात् ।
देदीप्यमान व प्रभात कालाचा जणो मार्गदर्शक असा हा सर्व विख्यात अग्नि मनोहर स्तवन गोड मानून घेवो. तोच सर्व विश्वाचा आत्मा आहे. तोच मरणरहित आहे. तोच सर्वज्ञ अग्नि उषेला जागृत करून मर्त्य मानवांचा अतिथी होतो. ॥ २ ॥
द्यावो॒ न यस्य॑ प॒नय॒न्त्यभ्वं॒ भासां॑सि वस्ते॒ सूर्यो॒ न शु॒क्रः ।
द्यावः न यस्य पनयन्ति अभ्वं भासांसि वस्ते सूर्यः न शुक्रः ।
सकल तारका पुंज तसेच सकल उपासक गण त्याच्या विशाल सामर्थ्याचे गुणानुवाद गात असतात. तो सूर्याप्रमाणे उज्ज्वल कांतीमान् अग्नीहि तेजोमयच वस्त्रें ल्याला आहे . जो भक्तांना काव्य प्रेरणा करतो तोच हा जरारहित जगत्पावन देव ह्यानेच "दुर्भिक्ष" रूप राक्षसाचे तटबंदी किल्ले विच्छिन्न करून टाकले. ॥ ३ ॥
व॒द्मा हि सू॑नो॒ अस्य॑द्म॒सद्वा॑ च॒क्रे अ॒ग्निर्ज॒नुषाज्मान्न॑म् ।
वद्मा हि सूनोइति असि अद्मऽसद्वा चक्रे अग्निः जनुषा अज्म अन्नं ।
हे दानशूरा, तू प्रख्यात देव आमच्या भोजन समारंभातही अग्रस्थानी अधिष्ठित होतोस. कारण आम्हांला घरदार आणि अन्नाच्छादन तूच दिलेस. हे विक्रमप्रदा, आमच्या ठिकाणी ओजस्विता असू दे. राजाप्रमाणे सर्वांना जिंकून टाक आणि आपल्या रिपुरहित लोकांत वास कर. ॥ ४ ॥
निति॑क्ति॒ यो वा॑र॒णमन्न॒मत्ति॑ वा॒युर्न राष्ट्र्यत्ये॑त्य॒क्तून् ।
निऽतिक्ति यः वारणं अन्नं अत्ति वायुः न राष्ट्री अति एति अक्तून् ।
जो आपले चिलखत चकचकीत ठेवतो, जो भक्तांनी अर्पण केलेले हवि ग्रहण करतो, व वायू प्रमाणे सर्व राष्ट्रभर पसरून रात्रीच्या अंधकाराचा नाश करतो अशा तुझे अंकित जे आम्ही, त्या आमच्या अधार्मिक शत्रूंचा आम्ही धुव्वा उडवून देऊं. तू आमचा आवेशी वीर, जे तुझा पाडाव करण्याकरिता तुझ्यावर तुटून पडतात त्यांनाच उलट लोळवितोस. ॥ ५ ॥
आ सूर्यो॒ न भा॑नु॒मद्भि॑ र॒र्कैरग्ने॑ त॒तन्थ॒ रोद॑सी॒ वि भा॒सा ।
आ सूर्यः न भानुमत्ऽभिः अर्कैः अग्ने ततंथ रोदसीइति वि भासा ।
हे अग्नि, सूर्याप्रमाणे तू आपल्या रश्मिपूर्ण तेजांनी आणि कांतीने सर्व अंतराल कोंदाटून टाकले आहेस. तू अद्भुतस्वरूप देव आपल्या विमल दीप्तीने लपेटून गेलेला आहे म्हणून औशिजाप्रमाणे आमच्याही मार्गांत आपला प्रकाश पसरून त्याने अज्ञान अंधकाराचा उच्छेद करून टाकला. ॥ ६ ॥
त्वां हि म॒न्द्रत॑ममर्कशो॒कैर्व॑वृ॒महे॒ महि॑ नः॒ श्रोष्य॑ग्ने ।
त्वां हि मन्द्रऽतमं अर्कऽशोकैः ववृमहे महि नः श्रोषि अग्ने ।
तू अत्यानंद मग्न आहेसच. तुला चटकदार अशा ’अर्क’ स्तवनांनी आम्ही आपलासा करतो. हे अग्नि, मोठी म्हणून जी कांही सद्वस्तु आहे ती आमच्या ठिकाणी ठेव. बलाढ्यपणा आणि दयालुत्व ह्या गुणांमुळे तुलाच इंद्र आणि वायु समजून तुझी देव आराधना करतात. ॥ ७ ॥
नू नो॑ अग्नेऽवृ॒केभिः॑ स्व॒स्ति वेषि॑ रा॒यः प॒थिभिः॒ पर्ष्यंहः॑ ।
नु नः अग्ने अवृकेभिः स्वस्ति वेषि रायः पथिऽभिः पर्षि अंहः ।
हे अग्नि, निष्कंटक अशा मार्गांनी दिव्य संपत्ति व्यवस्थितपणे आम्हांकडे आणून पोहोंचीव. पातकांतून पार ने. आणि आमच्या धुरीणांना आणि स्तोतृजनाला सुखशांति दे. आम्ही आपल्या वीर पुरुषांसह शेंकडों वर्षें आनंदाचा उपघोग घेऊं असे कर. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
हु॒वे वः॑ सू॒नुं सह॑सो॒ युवा॑न॒मद्रो॑घवाचं म॒तिभि॒र्यवि॑ष्ठम् ।
हुवे वः सूनुं सहसः युवानं अद्रोघऽवाचं मतिऽभिः यविष्ठं ।
विजयी सामर्थ्याचा पुत्र म्हटला तरी शोभेल असा अग्नि, की ज्याच्या मुखांतून मर्मभेदक भाषण कधी निघावयाचेंच नाही. जो तरुणच काय पण तारुण्याची मूर्तीच कां म्हणाना, अशा अग्नीचा मी आपल्या मनःपूर्वक स्तुतींनी धांवा करतो. तो सर्वज्ञ आहे. जगांतील अपूर्व वस्तू आणि सामर्थ्यसंपत्ति ह्यांची देणगी आमच्याकडे तोच पाठवून देतो. स्वतः असंख्य लोकांना हवा हवासा वाटतो, कारण कोणाचाही द्वेष करीत नाही. ॥ १ ॥
त्वे वसू॑नि पुर्वणीक होतर्दो॒षा वस्तो॒रेरि॑रे य॒ज्ञिया॑सः ।
त्वेइति वसूनि पुरुऽअनीक होतः दोष वस्तोः ईरिर यज्ञियासः ।
हे नानारूपधर यज्ञनायका, धार्मिक लोक अभीष्ट धनाची प्राप्ति रात्रंदिवस तुझ्याच पासून करून घेतात. तू जगत्पावन म्हणून सर्व विश्वाने आपल्या सुखाचे निधान जमीनींत ठेवा ठेवावा त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी ठेवून दिले आहे. ॥ २ ॥
त्वं वि॒क्षु प्र॒दिवः॑ सीद आ॒सु क्रत्वा॑ र॒थीर॑भवो॒ वार्या॑णाम् ।
त्वं विक्षु प्रऽदिवः सीद आसु क्रत्वा रथीः अभवः वार्याणां ।
तू ह्या कर्तृत्वशक्तीमुळे अभिलषणीय धनांचा महारथी असा मालक झालेला आहेस, तर हे ज्ञानशीला जातवेदा ती अपूर्व धने तू आपल्या सेवकांना वारंवार मिळतील अशी प्रेरणा कर. ॥ ३ ॥
यो नः॒ सनु॑त्यो अभि॒दास॑दग्ने॒ यो अन्त॑रो मित्रमहो वनु॒ष्यात् ।
यः नः सनुत्यः अभिऽदासत् अग्ने यः अन्तरः मित्रऽमहः वनुष्यात् ।
हे अग्नि, जो गुप्तपणाने आम्हांवर घाला घालील, अथवा हे सौम्यप्रकाश देवा, आमचा शेजारी म्हणवून जो आम्हांवर हत्यार उपसील, तर हे अत्युग्रप्रतापा, तूं रखरखीतपणामुळे मुळचाच तप्त आहेस तेव्हां कधींही विगलित न होणार्या अशा आपल्या वीर्यशाली तेजाने दुष्टांची होळी कर. ॥ ४ ॥
यस्ते॑ य॒ज्ञेन॑ स॒मिधा॒य उ॒क्थैर॒र्केभिः॑ सूनो सहसो॒ ददा॑शत् ।
यः ते यज्ञेन संइधा यः उक्थैः अर्केभिः सूनोइति सहसः ददाशत् ।
सामर्थ्यदात्या ! जो मानव यज्ञाने, समिधांनी, सामसूक्तांनी किंवा प्रार्थनास्तोत्रांनी तुझी भक्ति करतो, हे मृत्युरहिता, तोच भक्त मर्त्यमानवांचा ज्ञान संपन्न होऊन दिव्य संपत्ति, वैभव आणि कीर्ति ह्यांच्या योगाने आपले तेज चोंहोकडे पाडतो. ॥ ५ ॥
स तत् कृ॑धीषि॒तस्तूय॑मग्ने॒ स्पृधो॑ बाधस्व॒ सह॑सा॒ सह॑स्वान् ।
सः तत् कृधि इषितः तूयं अग्ने स्पृधः बाधस्व सहसा सहस्वान् ।
अग्निदेवा, आमच्या सेवेने तुझे मन ओढून घेतले आहे तर असे कर की, आपल्या सर्वंकषबलाने आमच्या रिपूंचा मोड कर. तू दिव्य तेजाने लपेटून गेला आहेस. काव्यांत तुझीच स्तुति असते तर मी जो तुझा स्तोतृजन त्या मी केलेले भजन तू मान्य करून घे. ॥ ६ ॥
अ॒श्याम॒ तं काम॑मग्ने॒ तवो॒ती अ॒श्याम॑ र॒यिं र॑यिवः सु॒वीर॑म् ।
अश्याम तं कामं अग्ने तव ऊती अश्याम रयिं रयिऽवः सुऽवीरं ।
हे अग्नि, तुझ्या कृपासंरक्षणामुळे आमचा तो इच्छित मनोरथ पूर्ण होवो. हे दिव्य धनसंपन्ना, हे दिव्यधन आम्हांस प्राप्त होवो. सर्व सामर्थ्य मिळविण्यासाठीं आमचा प्रयत्न आहे तर त्या सत्व सामर्थ्याचाही आम्हांस लाभ होवो. हे जरारहिता, तुझ्या महत् ओजाची जोड आम्हांस मिळो. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्र नव्य॑सा॒ सह॑सः सू॒नुमच्छा॑ य॒ज्ञेन॑ गा॒तुमव॑ इ॒च्छमा॑नः ।
प्र नव्यसा सहसः सूनुं अच्छा यज्ञेन गातुं अव इच्छमानः ।
सुखपूर्ण मार्गाला लागण्याची, देवाच्या कृपाछात्राची इच्छा असणारा प्रत्येक भक्त अपूर्व यज्ञकर्माने अग्नीची सेवा करतो. विजयदाता, अरण्ये उध्वस्त करणारा - कृष्णमार्ग असूनही स्वतः उज्वल व भक्तांचे हविर्भाग ग्रहण करणारा असा जो दिव्य अग्नि त्याच्या सान्निध उपासक नम्रपणाने जातो. ॥ १ ॥
स श्वि॑ता॒नस्त॑न्य॒तू रो॑चन॒स्था अ॒जरे॑भि॒र्नान॑दद्भि॒ र्यवि॑ष्ठः ।
सः श्वितानः तन्यतुः रोचनऽस्था अजरेभिः नानदत्ऽभिः यविष्ठः ।
तो वातावरणांत वास करून सिंहनाद करतो. प्रकाशपूर्ण अशा द्यूलोकांतहि त्याचे वास्तव्य आहे. ज्यांना कधींही वार्धक्य येत नाही व जे मेघगर्जना करतात अशा विभूतींनी तो परिवेष्टीत आहे. हा जगत्पावन, अत्यंत श्रेष्ठ, अग्नि पातके, दुःखे कितीही असोत, त्यांचा बींमोड करून भक्तांच्या पाठोपाठ राहतो. ॥ २ ॥
वि ते॒ विष्व॒ग्वात॑जूतासो अग्ने॒ भामा॑सः शुचे॒ शुच॑यश्चरन्ति ।
वि ते विष्वक् वातऽजूतासः अग्ने भामासः शुचे शुचयः चरन्ति ।
परमपवित्र अग्नी, तुझ्या निष्कलंक ज्वालांना झंझावाताने वेग मिळाल्या बरोबर त्या चोंहोकडे पसरतात. मग मोठ्या जबरदस्तांचीसुद्धां दाणादाण उडवून देणारे तुझे जे दिव्य नवग्व ते मोठ्या आवेशाने सपाट्यांत येईल ते मोडून टाकून अरण्यांची धूळधाण करून टाकतात. ॥ ३ ॥
ये ते॑ शु॒क्रासः॒ शुच॑यः शुचिष्मः॒ क्षां वप॑न्ति॒ विषि॑तासो॒ अश्वाः॑ ।
ये ते शुक्रासः शुचयः शुचिष्मः क्षा वपन्ति विऽसितासः अश्वाः ।
हे विमल दीप्ते ! श्वेततेजस्क आणि पवित्र असे तुझे अश्व आहेत ते मोकळे सुटून आपल्या पायाखालील जमीन निर्मल करून टाकतात; आणि तुझ्यापासून वर उधळणारे जळजळीत निझारे मेघ मण्डळापर्यंत भिडून दूरवर प्रकाशतात. ॥ ४ ॥
अध॑ जि॒ह्वा पा॑पतीति॒ प्र वृष्णो॑ गोषु॒युधो॒ नाशनिः॑ सृजा॒ना ।
अध जिह्वा पापतीति प्र वृष्णः गोषुऽयुधः न अशनिः सृजाना ।
प्रकाशधेनूंकरिता संग्राम करणार्या इंद्राचे जसे वज्र तशीच ह्या वीर्यशाली अग्नीची जिव्हा आहे. ती आकाशांतून सुटून एकदम खाली येऊन थडकते. होरपळून टाकणारी त्याची ती ज्वाला म्हणजे शूरवीर सैनिकाचे हल्ला करण्याचे अस्त्रच होय. तिच्याच योगाने तो उग्र दिसतो व अनावर होऊन काननांचा नाश करतो. ॥ ५ ॥
आभा॒नुना॒ पार्थि॑वानि॒ ज्रयां॑सि म॒हस्तो॒दस्य॑ धृष॒ता त॑तन्थ ।
आ भानुना पार्थिवानि ज्रयांसि महः तोदस्य धृषता ततंथ ।
जगाला प्रेरणा करणारा सूर्य त्याच्या सारखा आवेश दाखवून तू आपल्या प्रकाशाने पृथ्वीचे विस्तीर्ण प्रदेश आमच्या दृष्टिसमोर उलगडून ठेवतोस. असा तू देव आपल्या विजयशाली सामर्थ्याने आमचे भय आणि शत्रू ह्यांचा संहार कर. आम्हांवर शस्त्र उपसणार्यांवरही तू चाल करून जातोस तर त्यांचा तू पार उच्छेद करून टाक. ॥ ६ ॥
स चि॑त्र चि॒त्रं चि॒तय॑न्तम॒स्मे चित्र॑क्षत्र चि॒त्रत॑मं वयो॒धाम् ।
सः चित्र चित्रं चितयंतं अस्मेइति चित्रऽक्षत्र चित्रऽतमं वयःऽधां ।
हे अद्भुता, हे अद्भुत सत्तामंडिता, जे आश्चर्यकारक आहे, जे पाहून लोक अगदी थक्क होतील असे ढळढळीत दिसणारे ज्ञान, जागृति उत्पन्न करून अंगात नवा दम उत्पन्न करणारे दिव्यधन, हे आल्हाददायका, आल्हादप्रद वीरांनी परिप्लुत, श्रेष्ठ असे दिव्यधन तू आपल्या आल्हादप्रद ज्वालांनी आमच्याकडे पोहोंचवून दे. ॥ ७ ॥
ऋग्वेद - ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ७ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - जगती, त्रिष्टुभ्
मू॒र्धानं॑ दि॒वो अ॑र॒तिं पृ॑थि॒व्या वै॑श्वान॒रमृ॒त आ जा॒तम॒ग्निम् ।
मूर्धानं दिवः अरतिं पृथिव्याः वैश्वानरं ऋते आ जातं अग्निं ।
जो द्युलोकाला मस्तकाप्रमाणे व पृथ्वीचा अधिष्ठाता आहे, जो सनातन सत्यापासून प्रादुर्भूत होतो, जो सर्वजन प्रिय, काव्यस्फूर्तिप्रद, सर्व मानवांचा चक्रवर्ती राजा परंतु भक्तांचा पाहुणा आहे, अशा अग्नीला देवांनी सोमरस प्राशनयोग्य असे पात्र जणो बनविले आहे. ॥ १ ॥
नाभिं॑ य॒ज्ञानां॒ सद॑नं रयी॒णां म॒हामा॑हा॒वम॒भि सं न॑वन्त ।
नाभिं यज्ञानां सदनं रयीणां महां आऽहावं अभि सं नवण्त ।
यज्ञाचा आधारस्तंभ, दिव्यधनाचे आगार, मोठमोठेही ज्याचा धांवा करतात अशा ह्या अग्नीचे संकीर्तन खुद्द देवच करीत असतात. सर्वाप्रेमस्थान, यागाचा धुरीण आणि यज्ञाचा उज्ज्वल ध्वज अशा अग्नीला देवांनीच प्रकट केले. ॥ २ ॥
त्वद्विप्रो॑ जायते वा॒ज्यग्ने॒ त्वद्वी॒रासो॑ अभिमाति॒षाहः॑ ।
त्वत् विप्रः जायते वाजी अग्ने त्वत् वीरासः अभिमातिऽसहः ।
हे अग्नी, धर्मप्रसारार्थ झगडणारा असा ज्ञानी कवि तुझ्यामुळेच निर्माण होतो. शत्रूला पादाक्रांत करणारे पराक्रमी पुरुषही तुझ्यापासूनच मिळतात. हे जनमनोहरा राजा, सर्वांना चटका लावून सोडील अशी जी आमची इच्छित संपत्ति ती आम्हांस दे. ॥ ३ ॥
त्वां विश्वे॑ अमृत॒ जाय॑मानं॒ शिशुं॒ न दे॒वा अ॒भि सं न॑वन्ते ।
त्वां विश्वे अमृत जायमानं शिशुं न देवाः अभि सं नवंते ।
हे अमरा, नूतन अर्भकाला कांही गाणे गावे त्याप्रमाणे तूं प्रकट होत असतां सर्व देव सुद्धां तुझे यशोगायन करतात. हे विश्वचित्तहरा देवा, जगाचे आईबाप द्यावा-पृथिवी ह्यांचा जवळ राहून तू प्रकाशित झालास ह्या तुझ्या कर्तृत्वशक्तीने ते द्यावा-पृथिवी सुद्धां अमर झाले. ॥ ४ ॥
वैश्वा॑नर॒ तव॒ तानि॑ व्र॒तानि॑ म॒हान्य॑ग्ने॒ नकि॒रा द॑धर्ष ।
वैश्वानर तव तानि व्रतानि महानि अग्ने नकिः आ दधर्ष ।
जनमनोभिरामा अग्नि, तुझे जे सुप्रसिद्ध नियम आहेत ते फिरविण्याची कोणाचीही ताकद नाही. म्हणूनच मातापितरे द्यावा-पृथिवी ह्यांच्या उदरांत प्रकट होऊन विद्या आणि सदाचार ह्यांच्यातच ज्ञानरवीच्या प्रकाशाचा छडा तू लावून दिलास. ॥ ५ ॥
वै॒श्वा॒न॒रस्य॒ विमि॑तानि॒ चक्ष॑सा॒ सानू॑नि दि॒वो अ॒मृत॑स्य के॒तुना॑ ।
वैश्वानरस्य विऽमितानि चक्षसा सानूनि दिवः अमृतस्य केतुना ।
ह्या अमर वैश्वनराच्या सकलजन हृद्य अशा ह्या अग्नीच्या दृष्टीने आणि प्रकाशाने घुमटाची उंचीही मापून टाकिली आहे. वास्तविक पाहतां ह्या अग्नीच्याच शिरोभागी सर्व भुवने अधिष्ठित झाली आहेत. वृक्षाला अनेक फांद्या फुटाव्या त्याप्रमाणे सात प्रसिद्ध नद्यांचा उगमही तेथूनच झाला आहे. ॥ ६ ॥
वि यो रजां॒स्यमि॑मीत सु॒क्रतु॑र्वैश्वान॒रो वि दि॒वो रो॑च॒ना क॒विः ।
वि यः रजांसि अमिमीत सुऽक्रतुः वैश्वानरः वि दिवः रोचना कविः ।
अलौकिक कर्तृत्वशाली अग्नीने रजोलोक सुद्धां मोजून सोडला. द्युलोकांतील प्रकाशपूर्ण प्रदेशही त्या कविश्रेष्ठ वैश्वानरानेच आंखून दिले. आकाशस्थ गोल त्यानेच पसरून दिले आहेत. तो अपराजित, सज्जन प्रतिपालक आणि अमरपदाचा संरक्षण कर्ता आहे. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ८ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - जगती, त्रिष्टुभ्
पृ॒क्षस्य॒ वृष्णो॑ अरु॒षस्य॒ नू सहः॒ प्र नु वो॑चं वि॒दथा॑ जा॒तवे॑दसः ।
पृक्षस्य वृष्णः अरुषस्य नु सहः प्र नु वोचं विदथा जातऽवेदसः ।
वीर्य संपन्न व आरक्तवर्ण असे जे सर्वव्यापक बल, असा जो सकलसृष्टि ज्ञाता अग्नि त्याच्या विजयी सामर्थ्याचे यशोगायन यज्ञसभेमध्ये आम्ही केले आहे. हा पहा, आमच्या अपूर सुंदर आणि पवित्र स्तुतीचा ओघ सोमरसाप्रमाणेच त्या वैश्वानर अग्नीकडे कसा वहात आहे. ॥ १ ॥
स जाय॑मानः पर॒मे व्योमनि व्र॒तान्य॒ग्निर्व्र॑त॒पा अ॑रक्षत ।
सः जायमानः परमे व्योमनि व्रतानि अग्निः व्रतऽपाः अरक्षत ।
आकाशाच्या अत्युच्च प्रदेशांत प्रादुर्भूत होऊन नियमप्रतिपालक अग्नि हा ईश्वरी नियमांचे संरक्षण करीत आहे. त्या अगाध लीलाविग्रही अग्नीनेच हे अंतरिक्ष मोजून मर्यादित केले. अशा ह्या वैश्वानर अग्नीचा महिमा अगदी शेवटच्या आकाशमंडलापर्यंत जाऊन भिडला. ॥ २ ॥
व्यस्तभ्ना॒द्रोद॑सी मि॒त्रो अद्भु॒॑तोऽन्त॒र्वाव॑दकृणो॒ज्ज्योति॑षा॒ तमः॑ ।
वि अस्तभ्नात् रोदसीइति मित्रः अद्भुितः अंतःऽवावत् अकृणोत् ज्योतिषा तमः ।
ह्या जगन्मित्राने अंतराळाला आधार दिला. ह्या अद्भुतस्वरूप देवाने आपल्या तेजाने अंधकार कोणीकडच्या कोणीकडे दडवून टाकला. दोन ढाली फिरवाव्या त्याप्रमाणे आकाशाचे खालचे आणि वरचे अशी दोन्ही शकले जो व्यवस्थेने फिरवितो त्या वैश्वानरानेंच सर्व पराक्रम आपल्याच ठिकाणी एकत्र सांठविले आहेत. ॥ ३ ॥
अ॒पामु॒पस्थे॑ महि॒षा अ॑गृभ्णत॒ विशो॒ राजा॑न॒मुप॑ तस्थुर्ऋ॒॑ग्मिय॑म् ।
अपां उपऽस्थे महिषा अगृभ्णत विशः राजानं उप तस्थुः ऋग्मियं ।
थोर थोर ऋषींनी त्याला दिव्य उदकांच्या अंतरंगात हस्तगत करून घेतले व नंतर सर्व प्रजाजनांनी त्या ऋक् सूक्तप्रिय राजाला स्तुतींनी आळविले. ह्या प्रमाणे विवस्वानाचा कार्यसाधक मातरिश्वा ह्याने अग्नीला दूरच्या लोकांतून पृथ्वीवर आणले. ॥ ४ ॥
यु॒गेयु॑गे विद॒थ्यं गृ॒णद्भ्यो्ऽग्ने र॒यिं य॒शसं॑ धेहि॒ नव्य॑सीम् ।
युगेऽयुगे विदथ्यं गृणत्ऽभ्यः अग्ने रयिं यशसं धेहि नव्यसीं ।
हे अग्नी, स्तोतृजनाला तू युगायुगांत पिढ्यानपिढी, यज्ञसभेमध्ये ज्याची प्रशंसा होते असे यशस्वी दिव्यधन आणि अपूर्व शक्ति ह्याची जोड करून दे. हे अजरामर राजा, उल्कापाताने मारल्या प्रमाणे अवाच्य भाषण करणार्या पातक्यांना आपल्या तेजोभराने खाली पाडून जमीनदोस्त कर. ॥ ५ ॥
अ॒स्माक॑म् अग्ने म॒घव॑त्सु धार॒याना॑मि क्ष॒त्रम॒जरं॑ सु॒वीर्य॑म् ।
अस्माकं अग्ने मघवत्सु धारय अनामि क्षत्रं अजरं सुऽवीर्यं ।
अग्नी, आमच्या दानशूर यजमानाच्या ठिकाणी अशा प्रकारचे क्षात्रतेज आणि शौर्य ठेव कीं त्याला कोणीही वांकवूं शकणार नाही. जनचित्तहरा अग्नी, आम्ही तुझ्या कृपा छत्राच्या आश्रयाने शेकडो किंबहुना हजारोंनाही भारी असे सत्वसामर्थ्य जिंकून आपलेसें करूं. ॥ ६ ॥
अद॑ब्धेभि॒स्तव॑ गो॒पाभि॑रिष्टेऽ॒स्माक॑म् पाहि त्रिषधस्थ सू॒रीन् ।
अदब्धेभिः तव गोपाभिः इष्टे अस्माकं पाहि त्रिऽसधस्थ सूरीन् ।
अभीष्टपूरका, हे त्रैलोक्य व्यापका देवा, आपल्या अजिंक्य शक्तींनी आमच्या धुरीणांचे रक्षण कर. हे अग्नी, तुला हविर्भाग अर्पण करणार्या आम्हा भक्तांच्या सैन्याचा तूंच सांभाळ कर. हे वैश्वानर तुझे स्तवन जिकडे तिकडे होत असते. तूच आमचे तारण कर. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ९ ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
अह॑श्च कृ॒ष्णमह॒रर्जु॑नं च॒ वि व॑र्तेते॒ रज॑सी वे॒द्याभिः॑ ।
अहरिति च कृष्णं अहः अर्जुनं च वि वर्तेतेइति रजसीइति वेद्याभिः ।
दिवस अर्धा कृष्णवर्ण आणि अर्धा श्वेतवर्ण आहे. असे हे दोन्ही रजोलोक ईश्वराच्या कौशल्याने एका मागून एक चक्राकार फिरत असतात. आणि जनमनोभिराम अग्नि राजाप्रमाणे प्रकट होऊन आपल्या प्रभेने अंधकार नाहीसा करतो. ॥ १ ॥
नाहं तन्तुं॒ न वि जा॑ना॒म्योतुं॒ न यं वय॑न्ति सम॒रेऽतमानाः ।
न अहं तंतुं न वि जानामि ओतुं न यं वयन्ति संऽअरे अतमानाः ।
यज्ञरूप वस्त्राचे आडवे धागे कोणते ते मला माहीत नाहीत आणि उभे कोणते तेही माहीत नाही. समरांगणांत पराक्रम गाजविणारे योद्धे कोणता यज्ञ करतात तोहि मी जाणत नाही. असा मी अज्ञानी आहे, तर आतां कोणाचा बरे पुत्र - आपल्या भूलोकींच्या पित्यापेक्षा विद्वान असा पुत्र - आपल्या वक्तृत्वाने येथें ही गोष्ट मला समजावून देईल ॥ २ ॥
स इत्तन्तुं॒ स वि जा॑ना॒त्योतुं॒ स वक्त्वा॑ न्यृतु॒था व॑दाति ।
सः इत् तंतुं सः वि जानाति ओतुं सः वक्त्वानि ऋतुऽथा वदाति ।
यज्ञरूप वस्त्राचे आडवे आणि उभे असे दोन्ही प्रकारचे धागे एक अग्नीच जाणतो. तोच आपल्या वक्तृत्वाने योग्यकाळी (ते धागे कोणते ते) आम्हां समजावून देईल. हा अविनाशी पदाचे रक्षण करणारा देव, दुसर्या कोण्यापेक्षांही श्रेष्ठ विचक्षण व खाली भूलोकीं संचार करणारा देवच हा यज्ञमार्ग पूर्णपणे जाणतो. ॥ ३ ॥
अ॒यं होता॑ प्रथ॒मः पश्य॑ते॒ममि॒दं ज्योति॑र॒मृतं॒ मर्त्ये॑षु ।
अयं होता प्रथमः पश्यत इमं इदं ज्योतिः अमृतं मर्त्येषु ।
हा अगदी आद्य होता होय. ह्याच्याकडे अवलोकन करा. हे पहा मृत्युलोकांत अमर तेज प्रकट झाले आहे. आणि प्रकट होऊन अढळ राहिले आहे. ह्याला मृत्यु नाही व आकारानेंही हा एकसारखा वृद्धिंगत होत असतो. ॥ ४ ॥
ध्रु॒वं ज्योति॒र्निहि॑तं दृ॒शये॒ कं मनो॒ जवि॑ष्ठं प॒तय॑त्स्व॒न्तः ।
ध्रुवं ज्योतिः निऽहितं दृशये कं मनः जविष्ठं पतयत्ऽसु अन्तरिति ।
जलद उडणार्या ज्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यात मन हेंच पराकाष्ठेचे चपळ आहे. त्या मनापेक्षांही हा चंचल, परंतु स्थिर म्हटला तर अगदी अचल आहे. अशा प्रकारच्या ह्या तेजाची, आम्हांस त्याचे दर्शन व्हावे म्हणून वेदीवर स्थापना झाली आहे. ह्याप्रमाणे एकाच मनाचे आणि एकाच उद्देशाने प्रेरीत झालेले सर्व देव एकच सत्कर्मरूप वस्त्र विणीत असतात. ॥ ५ ॥
वि मे॒ कर्णा॑ पतयतो॒ वि चक्षु॒र्वी३दं ज्योति॒र्हृद॑य॒ आहि॑तं॒ यत् ।
वि मे कर्णा पतयतः वि चक्षुः वि इदं ज्योतिः हृदये आऽहितं यत् ।
माझे कान तिकडे लागले आहेत आणि नेत्रही तिकडेच जडले आहेत. हे तेज मी आपल्या हृदयांत साठविले. माझे मन दूरच्या एका वस्तूच्या निदिध्यासांत गर्क होऊन इकडे तिकडे फिरत आहे. तर आता मी बोलूं काय आणि विचार तरी करूं कसला ? ॥ ६ ॥
विश्वे॑ दे॒वा अ॑नमस्यन्भिया॒नास्त्वाम॑ग्ने॒ तम॑सि तस्थि॒वांस॑म् ।
विश्वे देवा अनमस्यन् भियानाः त्वां अग्ने तमसि तस्थिऽवांसं ।
अंधकार पडल्यामुळे घाबरलेल्या देवांनी, तू जो स्थैर्यवान देव, त्या तुलाच प्रणिपात केला. तर हा वैश्वानर आमच्या संरक्षणाचे कार्य आपल्या आंगावर घेवो. हा अमर देव, आमचे रक्षण व्हावे म्हणून आमच्यावर दया करो. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त १० ( अग्नि सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - अग्नि : छंद - विराज, त्रिष्टुभ्
पु॒रो वो॑ म॒न्द्रं दि॒व्यं सु॑वृ॒क्तिं प्र॑य॒ति य॒ज्ञे अ॒ग्निम॑ध्व॒रे द॑धिध्वम् ।
प्रः वः मंद्रं दिव्यं सुऽवृक्तिं प्रऽयति यज्ञे अग्निं अध्वरे दधिध्वम् ।
आनंदरूप, दिव्य, निष्पाप अशा अग्नीची, यज्ञयाग आरंभ होतांच आपल्या पुढें स्थापना करा. प्रार्थना सूक्तांनी आपल्या पुढें स्थापना करा. खरोखर तो दिव्य कांतिमान् देव, तो सकृत सृष्टिवेत्ता देव आमचे याग उत्कृष्ट रीतीने तडीस नेतो. ॥ १ ॥
तम् उ॑ द्युमः पुर्वणीक होत॒रग्ने॑ अ॒ग्निभि॒र्मनु॑ष इधा॒नः ।
तं ऊंइति द्युऽमः पुरुऽअनीक होतः अग्ने अग्निऽभिः मनुषः इधानः ।
हे दीप्तीमन्ता, नानारूपधारा, हे यज्ञसंपादका अग्ने, मानवांच्या घरांतील अग्नीनीच तू प्रदीप्त होऊन सोमरसाचा स्वीकार कर. आमचा स्तुत्यौघ आणि आमच्या मनोवृत्ति ममतेच्या जोराप्रमाणे - पवित्र घृतधारेप्रमाणे ह्या अग्नीकडे वहात आहेत. ॥ २ ॥
पी॒पाय॒ स श्रव॑सा॒ मर्त्ये॑षु॒ यो अ॒ग्नये॑ द॒दाश॒ विप्र॑ उ॒क्थैः ।
पीपाय सः श्रवसा मर्त्येषु यः अग्नये ददाश विप्रः उक्थैः ।
जो ज्ञानी विप्र प्रार्थनासूक्ते म्हणून अग्नीला हविर्भाग देतो, तो ह्या मृत्युलोकांतल्या आश्चर्यकारक रक्षण साधनांनी त्या भक्ताला ज्ञान धेनूंचा समूह प्राप्त करून घेण्याच्या उद्योगाला प्रवृत्त करतो. ॥ ३ ॥
आ यः प॒प्रौ जाय॑मान उ॒र्वी दू॑रे॒दृशा॑ भा॒सा कृ॒ष्णाध्वा॑ ।
आ यः पप्रौ जायमान उर्वीइति दूरेऽदृशा भासा कृष्णऽध्वा ।
अग्नि ज्या मार्गाने जातो तो मार्ग काळा दिसतो तरी अग्नि प्रकट होतांच आपल्या दूर अंतरावरून स्पष्ट दिसणार्या कांतीने तो सर्व जागा भरून टाकतो व म्हणूनच हा पतित पावन अग्नी, रात्रीच्या गडद अंधारांतूनही आपल्या स्वच्छ तेजाने स्पष्ट दिसतो. ॥ ४ ॥
नू न॑श्चि॒त्रं पु॑रु॒वाजा॑भिरू॒ती अग्ने॑ र॒यिं म॒घव॑द्भ्य्श्च धेहि ।
नू नः चित्रं पुरुऽवाजाभिः ऊती अग्ने रयिं मघवत्ऽभ्यः च धेहि ।
हे अग्नी, तूं आपल्या कृपेच्या संरक्षणाने आमच्या दानशूर यजमानांना आणि आम्हांलाही दिव्य धन दे, परंतु ते असे कीं जे अनेक सात्विक सामर्थ्यांनी परिप्लुत असल्यामुळे अद्भुत वाटेल. म्हणजे ते भक्त तुझ्या कृपाप्रसादाने व आपल्या दातृत्वाने सद्यशाने आणि शौर्याने दुसर्यापेक्षां वरचढ राहतील. ॥ ५ ॥
इ॒मं य॒ज्ञं चनो॑ धा अग्न उ॒शन्यं त॑ आसा॒नो जु॑हु॒ते ह॒विष्मा॑न् ।
इमं यज्ञं चनः धा अग्ने उशन् यं ते आसानः जुहुते हविष्मान् ।
तुझ्या सन्निध हवि हातांत घेऊन मी आहुति देत आहे. असा हा यज्ञ हे अग्नी तू गोड उत्सुक्तेने करून घे. आम्हा भरद्वाजांत निर्मल प्रवृत्ति ठेव. आणि जे सत्वसामर्थ्य अगदी लभ्य झालेंच पाहिजे अशा प्रयत्नांत आमचे साहाय्य कर. ॥ ६ ॥
वि द्वेषां॑सीनु॒हि व॒र्धयेळां॒ मदे॑म श॒तहि॑माः सु॒वीराः॑ ॥ ७ ॥
वि द्वेषांसि इनुहि वर्धय इळां मदेम शतहिमाः सुवीराः ॥ ७ ॥
आमची द्वेषबुद्धि दिगंतरास ने. धनधान्याची समृद्धि कर आणि वीरपुरुषांसहवर्तमान शत वर्षेपर्यंत आम्ही तुझ्या आनंदात तल्लीन राहू असे कर. ॥ ७ ॥
ॐ तत् सत् |