PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ८१ ते ८७

ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८१ ( सवितृ सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - सवितृ : छंद - जगती


यु॒ञ्जते॒ मन॑ उ॒त यु॑ञ्जते॒ धियो॒ विप्रा॒ विप्र॑स्य बृह॒तः वि॑प॒श्चितः॑ ।
वि होत्रा॑ दधे वयुना॒विदेक॒ इन्म॒ही दे॒वस्य॑ सवि॒तुः परि॑ष्टुतिः ॥ १ ॥

युञ्जते मनः उत युञ्जते धियः विप्राः विप्रस्य बृहतः विपःऽचितः ।
वि होत्रा दधे वयुनऽवित् एकः इत् मही देवस्य सवितुः परिऽस्तुतिः ॥ १ ॥

स्फूर्तिदेणारा, श्रेष्ठ, अत्यंत विचक्षण असा जो जगत्प्रेरक सविता त्याचे ज्ञानी उपासक आपले मन आणि ध्यान ही सर्व त्याच्या सेवेंत गुंतवून टाकतात. सदाचाराचे ज्ञान एक त्यालाच असते. होत्र कर्म कसे करावे त्याचें विधान तोच करतो. खरोखर त्या जगत्प्रेरक देवाची स्तुतिच सर्वश्रेष्ठ होय. ॥ १ ॥


विश्वा॑ रू॒पाणि॒ प्रति॑ मुञ्चते क॒विः प्रासा॑वीद्‌भ॒द्रं द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे ।
वि नाक॑मख्यत्सवि॒ता वरे॒ण्योऽ॑नु प्र॒याण॑मु॒षसो॒ वि रा॑जति ॥ २ ॥

विश्वा रूपाणि प्रति मुञ्चते कविः प्र असावीत् भद्रं द्विऽपदे चतुःपदे ।
वि नाकं अख्यत् सविता वरेण्यः अनु प्रऽयानं उषसः वि राजति ॥ २ ॥

जगतात जे निरनिराळे पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांचे आकार तोच ज्ञानी कवि सविता धारण करतो, व पशुपक्षी आणि मनुष्यें ह्यांना कल्याणप्रद ज्या गोष्टी आहेत त्याहि त्यानेंच उत्पन्न केल्या आहेत. सर्वोत्तम सवित्याने गगनमंडळाच्या मध्यस्थावर आपली दृष्टि फेंकली, आणि उषेच्या मागानेच तिच्या मागोमाग सुप्रकाशित झाला. ॥ २ ॥


यस्य॑ प्र॒याण॒मन्व॒न्य इद्य॒युर्दे॒वा दे॒वस्य॑ महि॒मान॒मोज॑सा ।
यः पार्थि॑वानि विम॒मे स एत॑शो॒ रजां॑सि दे॒वः स॑वि॒ता म॑हित्व॒ना ॥ ३ ॥

यस्य प्रऽयानं अनु अन्ये इत् ययुः देवाः देवस्य महिमानं ओजसा ।
यः पार्थिवानि विऽममे सः एतशः रजांसि देवः सविता महिऽत्वना ॥ ३ ॥

ह्या सवित्याच्या मार्गाने दुसरेही गेलेच. ह्या भगवंताच्या श्रेष्टपणाचे अनुकरण आपल्या शक्तिप्रमाणे इतर देवांनीही केलेच. ज्याने सर्व भूप्रदेश आणि अंतरिक्षांतील प्रदेश आपल्या महासामर्थ्याच्या जोरावर मोजून टाकले, तो एतशाचा प्रभु हा जगत्प्रेरक सविता देवच होय. ॥ ३ ॥


उ॒त या॑सि सवित॒स्त्रीणि॑ रोच॒नोत सूर्य॑स्य र॒श्मिभिः॒ समु॑च्यसि ।
उ॒त रात्री॑मुभ॒यतः॒ परी॑यस उ॒त मि॒त्रो भ॑वसि देव॒ धर्म॑भिः ॥ ४ ॥

उत यासि सवितरिति त्रीणि रोचना उत सूर्यस्य रश्मिऽभिः सं उच्यसि ।
उत रात्रीं उभयतः परि ईयसे उत मित्रः भवसि देव धर्मऽभिः ॥ ४ ॥

हे जगत्प्रेरका, तिन्ही प्रकाशमय प्रदेशांत तूच संचार करतोस, आणि सूर्याच्या किरणांशी आपल्या किरणांचा संयोग तूच करतोस. रात्रीच्या दोन्ही बाजूकडे तुझीच गति आहे आणि मनुष्यांना त्यांचे धर्मनियम तू घालून दिलेस त्यामुळे जगताचा मित्र तूच झाला आहेस. ॥ ४ ॥


उ॒तेशि॑षे प्रस॒वस्य॒ त्वमेक॒ इदु॒त पू॒षा भ॑वसि देव॒ याम॑भिः ।
उ॒तेदं विश्वं॒ भुव॑नं॒ वि रा॑जसि श्या॒वाश्व॑स्ते सवितः॒ स्तोम॑मानशे ॥ ५ ॥

उत ईशिषे प्रऽसवस्य त्वं एकऽ इत् उत पूषा भवसि देव यामऽभिः ।
उत इदं विश्वं भुवनं वि राजसि श्यावऽअश्वः ते सवितरिति स्तोमं आनशे ॥ ५ ॥

जो जो पदार्थ उत्पन्न झाला त्याचा मालक तूच आहेस. हे देवा, ह्या जगाकडे वरचेवर येण्याने त्याचा पूषाहि तूच आहेस. शिवाय हे एकंदर विश्व तूच सुप्रकाशित करतोस, व म्हणून श्यावाश्वाला, तुझे स्तवन करता आले. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८२ ( सवितृ सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - सवितृ : छंद - गायत्री


तत्स॑वि॒तुर्वृ॑णीमहे व॒यं दे॒वस्य॒ भोज॑नम् । श्रेष्ठं॑ सर्व॒धात॑मं॒ तुरं॒ भग॑स्य धीमहि ॥ १ ॥

तत् सवितुः वृणीमहे वयं देवस्य भोजनम् । श्रेष्ठं सर्वऽधातमं तुरं भगस्य धीमहि ॥ १ ॥

जगत्प्रेरक देवाचे ते अपूर्व उपभोग्यधन आम्ही हात जोडून मागतो, आणि त्याकरिता त्याच्या त्या श्रेष्ठ, सर्व कामना तात्काळ पुरविणार्‍या, शीघ्रविजयी भाग्याचे चिन्तन आम्ही करावे हेच योग्य. ॥ १ ॥


अस्य॒ हि स्वय॑शस्तरं सवि॒तुः कच्च॒न प्रि॒यम् । नमि॒नन्ति॑ स्व॒राज्य॑म् ॥ २ ॥

अस्य हि स्वयशःऽतरं सवितुः कच् चन प्रियम् । न मिनंति स्वऽराज्यम् ॥ २ ॥

ज्याची सकीर्ति लोकोत्तर झाली आहे, आणि जे सर्वांचा अत्यंत प्रिय अशा त्या जगत्प्रेरक देवाच्या ’स्वराज्या’ला, दैवी सत्तेला कोणीहि इजा करू शकत नाही. ॥ २ ॥


स हि रत्ना॑नि दा॒शुषे॑ सु॒वाति॑ सवि॒ता भगः॑ । तं भा॒गं चि॒त्रमी॑महे ॥ ३ ॥

सः हि रत्नानि दाशुषे सुवाति सविता भगः । तं भागं चित्रं ईमहे ॥ ३ ॥

तोच जगत्प्रेरक भाग्यदाता म्हणून भक्ताला अमोलिक रत्ने अर्पण करतो, तेव्हा असेच अद्‍भुत सद्‍भाग्य आम्ही हात जोडून त्याच्यापाशी मागतो. ॥ ३ ॥


अ॒द्या नो॑ देव सवितः प्र॒जाव॑त्सावीः॒ सौभ॑गम् । परा॑ दु॒ष्वप्न्यं॑ सुव ॥ ४ ॥

अद्य नः देव सवित्रिति प्रजाऽवत् सावीः सौभगम् । परा दुःऽस्वप्न्यं सुव ॥ ४ ॥

जगत्प्रेरक देवा, आज आमच्याकरिता प्रजा-पुत्र-पौत्र युक्त सद्‍भाग्य उत्पन्न करून पाठवून दे, आणि दुःस्वप्नाचे दुष्परिणाम नाहीसे कर. ॥ ४ ॥


विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्‌भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥ ५ ॥

विश्वानि देव सवितः दुःऽइतानि परा सुव । यत् भद्रं तन् नः आ सुव ॥ ५ ॥

हे जगत्प्रेरका, यच्चावत् अरिष्टे दून हांकून देऊन, जे जे शुभप्रद असेल ते ते माझ्याकडे येऊं दे. ॥ ५ ॥


अना॑गसो॒ अदि॑तये दे॒वस्य॑ सवि॒तुः स॒वे । विश्वा॑ वा॒मानि॑ धीमहि ॥ ६ ॥

अनागसः अदितये देवस्य सवितुः सवे । विश्वा वामानि धीमहि ॥ ६ ॥

जगत्प्रेरक देवाच्या प्रेरणेमुळे, आम्ही अनाद्यनंत शक्तिच्या दृष्टिने पूर्ण निर्दोषी राहून सर्व विलोभनीय वस्तु विचारपूर्वक आपल्याशा करू असे घडो ॥ ६ ॥


आ वि॒श्वदे॑वं॒ सत्प॑तिं सू॒क्तैर॒द्या वृ॑णीमहे । स॒त्यस॑वं सवि॒तार॑म् ॥ ७ ॥

आ विश्वऽदेवं सत्ऽपतिं सुऽउक्तैः अद्य वृणीमहे । सत्यऽसवं सवितारम् ॥ ७ ॥

सर्व विश्वाचा देव, सज्जनांचा पालक आणि ज्याची आज्ञा कधी खोटी होत नाही असा जो सविता त्याची सुंदर स्तुतींनी आम्ही विनवणी करीत आहोत. ॥ ७ ॥


य इ॒मे उ॒भे अह॑नी पु॒र एत्यप्र॑युच्छन् । स्वा॒धीर्दे॒वः स॑वि॒ता ॥ ८ ॥

यः इमेइति उभेइति अहनीइति पुरः एति अप्रऽयुच्छन् । सुऽआधीः देवः सविता ॥ ८ ॥

उषा आणि रात्र ह्यांची जी ही जोडी तिच्या अगोदर ह्याचे आगमन होते. जो कधींहि आपल्या कार्यांत चुकत नाही, ज्याचे ध्यान फार चित्तवेधक असा हा जगत्प्रेरक देवच होय. ॥ ८ ॥


य इ॒मा विश्वा॑ जा॒तान्या॑श्रा॒वय॑ति॒ श्लोके॑न । प्र च॑ सु॒वाति॑ सवि॒ता ॥ ९ ॥

यः इमा विश्वा जातानि आऽश्रावयति श्लोकेन । प्र च सुवाति सविता ॥ ९ ॥

जो ह्या यच्चावत् सृष्टिला आपले निर्मल यश ऐकवितो, आणि सर्वांना प्रेरणा करतो, तो हा जगत्प्रेरक देवच होय. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८३ ( पर्जन्य सूक्त )

ऋषी - अत्री भौम : देवता - पर्जन्य : छंद - त्रिष्टुभ्


अच्छा॑ वद त॒वसं॑ गी॒र्भिरा॒भिः स्तु॒हि प॒र्जन्यं॒ नम॒सा वि॑वास ।
कनि॑क्रदद्वृष॒भः जी॒रदा॑नू॒ रेतो॑ दधा॒त्योष॑धीषु॒ गर्भ॑म् ॥ १ ॥

मण्डल ५ - सूक्त ८३

त्या विक्रांत विभूतिचे यश गा, अशाच स्तुतींनी पर्जन्याची प्रशंसा कर आणि प्रणतिपूर्वक त्याची सेवा कर. तो वीरपुंगव गडगडाट करून तात्काळ वर्षाव करतो व औषधी वनस्पतिमध्ये आपले वृष्टिरूप वीर्य बीजरूपाने प्रविष्ट करतो. ॥ १ ॥


वि वृ॒क्षान् ह॑न्त्यु॒त ह॑न्ति र॒क्षसो॒ विश्वं॑ बिभाय॒ भुव॑नं म॒हाव॑धात् ।
उ॒ताना॑गा ईषते॒ वृष्ण्या॑वतो॒ यत्प॒र्जन्यः॑ स्त॒नय॒न् हन्ति॑ दु॒ष्कृतः॑ ॥ २ ॥

अच्छ वद तवसं गीःऽभिः आभिः स्तुहि पर्जन्यं नमसा आ विवास ।
कनिक्रदत् वृषभः जीरऽदानू रेतः दधाति ओषधीषु गर्भम् ॥ १ ॥

तो प्रचंडवृक्ष उलथून पाडतो व तसाच राक्षसांचा सुद्धा सप्पा उडवितो. त्याचे भयंकर शस्त्र पाहिल्याबरोबर सर्व जगाची गाळण उडते, ती इतकी की मोठ्याने गर्जना करून जेव्हा पर्जन्य पातक्यांना ठार करतो, तेव्हा त्या जलवर्षक वीराला पाहूनच निरपराधी मनुष्यही दूर पळून जातो. ॥ २ ॥


र॒थीव॒ कश॒याश्वाँ॑ अभिक्षि॒पन्ना॒विर्दू॒तान्कृ॑णुते व॒र्ष्याँ॒॑३ अह॑ ।
दू॒रात्सिं॒हस्य॑ स्त॒नथा॒ उदी॑रते॒ यत्प॒र्जन्यः॑ कृणु॒ते व॒र्ष्यं॑१ नभः॑ ॥ ३ ॥

वि वृक्षान् हंति उत हंति रक्षसः विश्वं बिभाय भुवनं महाऽवधात् ।
उत अनागाः ईषते वृष्ण्यावतः यत् पर्जन्यः स्तनयन् हंति दुःऽकृतः ॥ २ ॥

सारथी चाबकाचे तडाखे उडवून घोड्यांना दौडत पुढे करतो, तसा प्रजन्यही वृष्टिकरणार्‍या आपल्या मेघरूप नोकरांना गोळा करून लोकांच्या ते दृष्टिस पडतील असे करतो. आणि पर्जन्याने ह्याप्रमाणे गगनमंडल ढगांनी गडद भरून टाकले कीं त्या सिंहाच्या गर्जनेचा गडगडाट तितक्या दूर अंतरवरूनहि सुरू होतो. ॥ ३ ॥


प्र वाता॒ वान्ति॑ प॒तय॑न्ति वि॒द्युत॒ उदोष॑धी॒र्जिह॑ते॒ पिन्व॑ते॒ स्वः ।
इरा॒ विश्व॑स्मै॒ भुव॑नाय जायते॒ यत्प॒र्जन्यः॑ पृथि॒वीं रेत॒साव॑ति ॥ ४ ॥

रथीऽइव कशया अश्वान् अभिऽक्षिपन् आविः दूतान् कृणुते वर्ष्यां अह ।
दूरात् सिंहस्य स्तनथाः उत् ईरते यत् पर्जन्यः कृणुते वर्ष्यं नभः ॥ ३ ॥

वादळी वारे जोराने वाहू लागतात, विजांचे उत्पात चालू होतात, औषधींना अंकुर फुटूं लागतात, नभोमंडल मेघांनी गर्द भरून जाते, आणि सर्व जगाचे पोषण होण्याकरिता पृथ्वीवर धान्यसमृद्धि होते; परंतु हा सर्व चमत्कार पर्जन्य चरणीवर आपल्या वृष्टिरूप वीर्य वर्षावाचा प्रसाद करतो, तेव्हा घडून येतो. ॥ ४ ॥


यस्य॑ व्र॒ते पृ॑थि॒वी नन्न॑मीति॒ यस्य॑ व्र॒ते श॒फव॒ज्जर्भु॑रीति ।
यस्य॑ व्र॒त ओष॑धीर्वि॒श्वरू॑पाः॒ स नः॑ पर्जन्य॒ महि॒ शर्म॑ यच्छ ॥ ५ ॥

प्र वाताः वान्ति पतयंति विऽद्युतः उत् ओषधीः जिहते पिन्वते स्व१रितिस्वः ।
इरा विश्वस्मै भुवनाय जायते यत् पर्जन्यः पृथिवीं रेतसा अवति ॥ ४ ॥

ज्याची आज्ञा झाल्याबरोबर पृथ्वी शिरसा नम्र होते, ज्याच्या इच्छामात्रेंकरून खूर असणारे पशु फुरफुरून बागडूं लागतात, ज्याच्या आज्ञेने औषधी सर्व प्रकारची रूपे धारण करतात, अशा तू हे पर्जन्या आम्हाला तुझे श्रेष्ठप्रतीच्या सुखाचे स्थान दे. ॥ ५ ॥


दि॒वो नो॑ वृ॒ष्टिं म॑रुतो ररीध्वं॒ प्र पि॑न्वत॒ वृष्णो॒ अश्व॑स्य॒ धाराः॑ ।
अ॒र्वाङ्ए॒शतेन॑ स्तनयि॒त्नुनेह्य॒पो नि॑षि॒ञ्चन्नसु॑रः पि॒ता नः॑ ॥ ६ ॥

यस्य व्रते पृथिवी नंनमीति यस्य व्रते शफऽवत् जर्भुरीति ।
यस्य व्रत ओषधीः विश्वऽरूपाः सः नः पर्जन्य महि शर्म यच्छ ॥ ५ ॥

मरुतांनो, द्युलोकापासून आम्हांवर कृपा वृष्टि करा. तुमच्या वीर्यवान् मेघरूप अश्वांच्या जलधारा उदकाचे पूर वाहवितील असे करा. पर्जन्या, ह्या समोरच्या गर्जना करणार्‍या मेघासह उदकवृष्टि करीत ये. तूच परमेश्वर व आमचा पिता आहेस. ॥ ६ ॥


अ॒भि क्र॑न्द स्त॒नय॒ गर्भ॒मा धा॑ उद॒न्वता॒ परि॑ दीया॒ रथे॑न ।
दृतिं॒ सुक॑र्ष॒ विषि॑तं॒ न्यञ्चं स॒मा भ॑वन्तू॒द्वतो॑ निपा॒दाः ॥ ७ ॥

दिवः नः वृष्टिं मरुतः ररीध्वं प्र पिन्वत वृष्णः अश्वस्य धाराः ।
अर्वाङ्‍ एतेन स्तनयित्नुना आ इहि अपः निऽसिञ्चन् असुरः पिता नः ॥ ६ ॥

मोठ्याने गर्जना कर, गडगडाट कर, जमीनीमध्ये आपला उदकरूप गर्भ ठेऊन दे, आपल्या जलमय रथात बसून सर्वत्र संचार कर, आणि आपल्या मेघरूप पखालीचे तोंड खुले करून ती खाली उलटी ओढून घे म्हणजे पृथ्वीवरील सर्व उंचवटे खांचखळगे पाण्याने तुडुंब भरून जाऊन सारखे होतील ॥ ७ ॥


म॒हान्तं॒ कोश॒मुद॑चा॒ नि षि॑ञ्च॒ स्यन्द॑न्तां कु॒ल्या विषि॑ताः पु॒रस्ता॑त् ।
घृ॒तेन॒ द्यावा॑पृथि॒वी व्युन्धि सुप्रपा॒णं भ॑वत्व॒घ्न्याभ्यः॑ ॥ ८ ॥

अभि क्रंद स्तनय गर्भं आ धाः उदन्ऽवता परि दीय रथेन ।
दृतिं सु कर्ष विऽसितं न्यञ्चं समाः भवंतु उत्ऽवतः निऽपादाः ॥ ७ ॥

आपला मोठा जलाशय वर उचलून त्यांतील उदकाने खाली भूमिवर सिंचन कर. मोकळे केलेले कालवे दुथडी भरून पुढे वहात जावोत. अकाश आणि पृथिवी ह्यांना दिव्य घृताने आर्द्र कर आणि अवध्य ज्या धेनू त्यांना पिण्याला मनमुराड पाणी होऊ दे. ॥ ८ ॥


यत्प॑र्जन्य॒ कनि॑क्रदत्स्त॒नय॒न् हंसि॑ दु॒ष्कृतः॑ ।
प्रती॒दं विश्वं॑ मोदते॒ यत् किंच॑ पृथि॒व्यामधि॑ ॥ ९ ॥

महांतं कोशं उत् अच नि सिञ्च स्यंदंतां कुल्याः विऽसिताः पुरस्तात् ।
घृतेन द्यावापृथिवीइति वि उंधि सुऽप्रपानं भवत्व् अघ्न्याभ्यः ॥ ८ ॥

पर्जन्या, तू मोठा निनाद करून मोठी गर्जना करून जेव्हा दुष्ट अवर्षणाचा नाश करतोस, तेव्हा ह्या पृथ्वीवर जे जे काही आहे ते ते सर्व आनंदाने डुलूं लागते. ॥ ९ ॥


अव॑र्षीर्व॒र्षमुदु॒ षू गृ॑भा॒याक॒र्धन्वा॒न्यत्ये॑त॒वा उ॑ ।
अजी॑जन॒ ओष॑धी॒र्भोज॑नाय॒ कमु॒त प्र॒जाभ्यो॑ऽविदः मनी॒षाम् ॥ १० ॥

यत् पर्जन्य कनिक्रदत् स्तनयन् हंसि दुःऽकृतः ।
प्रति इदं विश्वं मोदते यत् किं च पृथिव्यां अधि ॥ ९ ॥

तू धनत्तर वृष्टि केलीस, आता जरा उघाडी कर. निर्जल वालुकामय प्रदेश होते ते सुद्धा तू वृष्टि करून प्रवासाला योग्य केलेस. प्राण्यांच्या उपजीविकेकरिता धान्य ओषधी उत्पन्न केल्यास, आणि येणेंकरून सर्व लोकांकडून तू मनःपूर्वक धन्यवाद घेतलास. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८४ ( पृथ्वी, बळित्था सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - पृथ्वी : छंद - अनुष्टुभ्


बळि॒त्था पर्व॑तानां खि॒द्रं बि॑भर्षि पृथिवि ।
प्र या भूमिं॑ प्रवत्वति म॒ह्ना जि॒नोषि॑ महिनि ॥ १ ॥

बट् इत्था पर्वतानां खिद्रं बिभर्षि पृथिवि ।
प्र या भूमिं प्रवत्वति मह्ना जिनोषि महिनि ॥ १ ॥

हे पृथिवी, खरोखर पाहता पर्वतांना भोक पाडण्याचे हत्यारच तू जवळ बाळगतेस असे वाटते. कारण त्यातून ज्या तुजवर पाण्यचे लोंढे धों धों वहात चालले आहेत अशा हे महा वसुंधरे तू आपल्या सामर्थ्याने जमीनीला स्फुरणच आणतेस. ॥ १ ॥


स्तोमा॑सस्त्वा विचारिणि॒ प्रति॑ ष्टोभन्त्य॒क्तुभिः॑ ।
प्र या वाजं॒ न हेष॑न्तं पे॒रुमस्य॑स्यर्जुनि ॥ २ ॥

स्तोमासः त्वा विऽचारिणि प्रति स्तोभंति अक्तुऽभिः ।
प्र या वाजं न हेषंतं पेरुं अस्यसि अर्जुनि ॥ २ ॥

हे आकाश संचारिणी पृथिवी, कविजनांचे समूह रात्रंदिवस तुझे स्तवन करतात. आणि हे शुभ्र कांतियुक्त पृथ्वी, तू उदकाने फुगलेल्या मेघाला, खिंकाळणार्‍या घोड्याप्रमाणे पुढे फेंकतेस. ॥ २ ॥


दृ॒ळ्हा चि॒द्या वन॒स्पती॑न्क्ष्म॒या दर्ध॒र्ष्योज॑सा ।
यत्ते॑ अ॒भ्रस्य॑ वि॒द्युतो॑ दि॒वः वर्ष॑न्ति वृ॒ष्टयः॑ ॥ ३ ॥

दृळ्हा चित् आ वनस्पतीन् क्ष्मया दर्धर्षि ओजसा ।
यत् ते अभ्रस्य विऽद्युतः दिवः वर्षंति वृष्टयः ॥ ३ ॥

जेव्हा पावसाच्या धारा तुम्हा मेघमंडळांतील विद्युल्लतांना आकाशांतून खाली कोसळून देतात अशा प्रसंगी झाडाझुडपांना जमीनीसुद्धा आपल्य जोमाने तूच घट्ट धरून ठेवतेस. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८५ ( वरुण सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्


प्र स॒म्राजे॑ बृ॒हद॑र्चा गभी॒रं ब्रह्म॑ प्रि॒यं वरु॑णाय श्रु॒ताय॑ ।
वि यो ज॒घान॑ शमि॒तेव॒ चर्मो॑प॒स्तिरे॑ पृथि॒वीं सूर्या॑य ॥ १ ॥

प्र संऽराजे बृहत् अर्च गभीरं ब्रह्म प्रियं वरुणाय श्रुताय ।
वि यः जघान शमिताऽइव चर्म उपऽस्तिरे पृथिवीं सूर्याय ॥ १ ॥

सर्व विश्वाचा अति विख्यात अधिराज जो वरुण त्याच्या प्रित्यर्थ एक मधुर परंतु उदात्त आणि गहनार्थपूर्ण प्रार्थना सूक्त, हे मना, तू मोठ्याने पठण कर. शमित्याप्रमाणे त्याने सूर्यासाठी आंथरण्याकरितां हे आकाशरूप चर्म आणि ही पृथिवी ठोकून ठोकून घडविली. ॥ १ ॥


वने॑षु॒ व्य॑१न्तरि॑क्षं ततान॒ वाज॒मर्व॑त्सु॒ पय॑ उ॒स्रिया॑सु ।
हृ॒त्सु क्रतुं॒ वरु॑णो अ॒प्स्व॑१ग्निं दि॒वि सूर्य॑मदधा॒त् सोम॒मद्रौ॑ ॥ २ ॥

वनेषु वि अन्तरिक्षं ततान वाजं अर्वत्ऽसु पयः उस्रियासु ।
हृत्ऽसु क्रतुं अरुणः अप्ऽसु अग्निं दिवि सूर्यं अदधात् सोमं अद्रौ ॥ २ ॥

वरुणाने मेघस्वरूप अरण्यांच्या वर ’अंतरिक्ष’, घोड्यांच्या व घोडे स्वारांच्या ठिकाणी लढाऊ सामर्थ्य आणि धेनूंच्या ठिकाणी दुग्ध निर्माण केले. तसेच मेघोदकांत अग्नि, आकाशात सूर्य आणि पर्वतावर सोमवल्ली हेही त्या त्या ठिकाणी त्यानेंच ठेविले. ॥ २ ॥


नी॒चीन॑बारं॒ वरु॑णः॒ कव॑न्धं॒ प्र स॑सर्ज॒ रोद॑सी अ॒न्तरि॑क्षम् ।
तेन॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य॒ राजा॒ यवं॒ न वृ॒ष्टिर्व्युनत्ति॒ भूम॑ ॥ ३ ॥

नीचीनऽबारं वरुणः कवंधं प्र ससर्ज रोदसीइति अंतरिक्षम् ।
तेन विश्वस्य भुवनस्य राजा यवं अ वृष्टिः वि उनत्ति भूम ॥ ३ ॥

वरुणाने अंतराळ आणि अंतरिक्ष निर्माण केले आहे. म्हणजे एक अवाढव्य कटाहच त्याने खाली तोंड करून ठेवलेला आहे. आणि त्या पात्रानेच हा सर्व त्रिभुवनाचा राजा पाऊस, शेताला टवटवी आणतो त्याप्रमाणे पृथ्वीवर सिंचन करून तिला प्रफुल्लित करतो. ॥ ३ ॥


उ॒नत्ति॒ भूमिं॑ पृथि॒वीमु॒त द्यां य॒दा दु॒ग्धं वरु॑णो॒ वष्ट्यादित् ।
सम॒भ्रेण॑ वसत॒ पर्व॑तासस्तविषी॒यन्तः॑ श्रथयन्त वी॒राः ॥ ४ ॥

उनत्ति भूमिं पृथिवीं उत द्यां यदा दुग्धं वरुणः वष्टि आत् इत् ।
सं अभ्रेण वसत पर्वतासः तविषीऽयंतः श्रथयंत वीराः ॥ ४ ॥

ह्या प्रमाणे वरुणच भूमिला, पृथिवीला आणि द्युलोकाला आर्द्र करतो, आणि दुग्धाच्या हविर्भागाचा जो प्रेमाने स्वीकार करतो, त्याबरोबरच पर्वत मेघरूप वस्त्रें नेसतात आणि धुमाळी उडवून देणारे वीर मरुत् त्याची ती वस्त्रे सैल करतात. ॥ ४ ॥


इ॒मामू॒ ष्वासु॒रस्य॑ श्रु॒तस्य॑ म॒हीं मा॒यां वरु॑णस्य॒ प्र वो॑चम् ।
माने॑नेव तस्थि॒वाँ अ॒न्तरि॑क्षे॒ वि यो म॒मे पृ॑थि॒वीं सूर्ये॑ण ॥ ५ ॥

इमां ऊंइति सु आसुरस्य श्रुतस्य महीं मायां वरुणस्य प्र वोचम् ।
मानेनऽइव तस्थिऽवान् अंतरिक्षे वि यः ममे पृथिवीं सूर्येण ॥ ५ ॥

या प्रमाणे ह्या जगद्विख्यात वरुणाच्या - ह्या ईश्वराच्या - अद्‍भुत लीलेचे मी यथाशक्ति वर्णन केले आहे. ज्या ह्या वरुणाने अंतरिक्षांत उभे राहून एखाद्या मापाने मोजावे त्याप्रमाणे आकाश आणि पृथिवी ह्याना सूर्याच्या मापाने मोजून टाकले. ॥ ५ ॥


इ॒मामू॒नु क॒वित॑मस्य मा॒यां म॒हीं दे॒वस्य॒ नकि॒रा द॑धर्ष ।
एकं॒ यदु॒द्ना न पृ॒णन्त्येनी॑रासि॒ञ्चन्ती॑र॒वन॑यः समु॒द्रम् ॥ ६ ॥

इमां ऊंइति नु कविऽतमस्य मायां महीं देवस्य नकिः आ दधर्ष ।
एकं यत् उद्ना न पृणंति एनीः आऽसिञ्चंतीः अवनयः समुद्रम् ॥ ६ ॥

ह्या ज्ञानी-कवि-श्रेष्ठ देवाची ही अद्‍भुत करणी अशी आहे कीं तिचा अतिक्रम कोणासहि करतां येत नाही. कारण उघडच आहे कीं शेंकडो नद्या, लोंढे जरी समुद्रांत जाऊन लोटत असतात तरी तो कांही तोंडातोंड भरत नाही. ॥ ६ ॥


अ॒र्य॒म्यं वरुण मि॒त्र्यं वा॒ सखा॑यं वा॒ सद॒मिद्‌भ्रात॑रं वा ।
वे॒शं वा॒ नित्यं॑ वरु॒णार॑णं वा॒ यत्सी॒मा॑श्चकृ॒मा शि॒श्रथ॒स्तत् ॥ ७ ॥

अर्यम्यं वरुण मित्र्यं वा सखायं वा सदं इत् भ्रातरं वा ।
वेशं वा नित्यं वरुण अरणं वा यत् सीं आगः चकृम शिश्रथः तत् ॥ ७ ॥

हे वरुणा, गुरुजन, मित्रत्वेच्छु, नेहमी सहाय करणारा स्नेही, भाऊ, किंवा कायमचा शेजारी, अथवा हे वरुणा, तिऱ्हाईत ह्यांचा जो काही अपराध केला असेल याची कृपा करून निष्कृति कर ॥ ७ ॥


कि॒त॒वासो॒ यद्रि॑रि॒पुर्न दी॒वि यद्वा॑ घा स॒त्यमुत यन्न वि॒द्म ।
सर्वा॒ ता वि ष्य॑ शिथि॒रेव॑ दे॒वाधा॑ ते स्याम वरुण प्रि॒यासः॑ ॥ ८ ॥

कितवासः यत् रिरिपुः न दीवि यत् वा घ सत्यं उत यत् न विद्म ।
सर्वा ता वि स्य शिथिराऽइव देव अधा ते स्याम वरुण प्रियासः ॥ ८ ॥

जुवेबाजांनी सुद्धां जुगारींत फसविले नसेल इतक्या अश्लाघ्य रीतीने आम्ही फसविले असेल किंवा जे काही आम्ही खरोखर जाणून बुजून अथवा न जाणून ही केलेले असेल, हे देवा ते सर्व पातक खिळखिळ्या झालेल्या शृंखलांप्रमाणे आमच्यापासून एकदाचे काढून टाक आणि हे वरुणा आम्ही तुझे आवडते भक्त होऊं असे कर. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८६ ( इंद्राग्नी सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - इंद्राग्नी : छंद - अनुष्टुभ्


इन्द्रा॑ग्नी॒ यमव॑थ उ॒भा वाजे॑षु॒ मर्त्यं॑ ।
दृ॒ळ्हा चि॒त्स प्र भे॑दति द्यु॒म्ना वाणी॑रिव त्रि॒तः ॥ १ ॥

इंद्राग्नीइत् यं अवथः उभा वाजेषु मर्त्यम् ।
दृळ्हा चित् सः प्र भेदति द्युम्ना वाणीः‍इव त्रितः ॥ १ ॥

हे इंद्राग्नीहो, सत्वसामर्थ्याच्या झटापटीत ज्या भाविकावर तुम्ही कृपा कराल, तो आपल्या तीव्र ओजाने, त्रित महात्मा प्रतिपक्षाचे तर्कट खोडून टाकतो, त्याप्रमाणे, कठीण परिस्थितीला पार भेदून टाकील. ॥ १ ॥


या पृत॑नासु दु॒ष्टरा॒ या वाजे॑षु श्र॒वाय्या॑ ।
या पञ्च॑ चर्ष॒णीर॒भीन्द्रा॒ग्नी ता ह॑वामहे ॥ २ ॥

या पृतनासु दुस्तरा या वाजेषु श्रवाय्या ।
या पञ्च चर्षणीः अभि इन्द्राग्नीइति ता हवामहे ॥ २ ॥

जे युद्धांमध्ये दुर्निवार, सात्विक सामर्थ्यांत जें परमविख्यात, जे पांचहि मानव जातींना अंकित करतात, अशा इंद्राग्नींचा आम्ही धांवा कारतो. ॥ २ ॥


तयो॒रिदम॑व॒च्छव॑स्ति॒ग्मा दि॒द्युन्म॒घोनोः॑ ।
प्रति॒ द्रुणा॒ गभ॑स्त्यो॒र्गवां॑ वृत्र॒घ्न एष॑ते ॥ ३ ॥

तयोः इत् अमऽवत् शवः तिग्मा दिद्युत् मघोनोः ।
प्रति द्रुणा गभस्त्योः गवां वृत्रऽघ्न आ ईषते ॥ ३ ॥

त्या उभयतांचीच धडाडी फार भयंकर आहे, त्या भगवंताचीच झळाळी फार प्रखर. आणि ही धडाडी त्यांच्या भुजदंडांपासून निघून प्रकाश धेनूंच्या रथासह एकट्या त्या वृत्रनाशक इंद्राच्या ठिकाणींच येऊन पोहोंचते. ॥ ३ ॥


ता वा॒मेषे॒ रथा॑नामिन्द्रा॒ग्नी ह॑वामहे ।
पती॑ तु॒रस्य॒ राध॑सो वि॒द्वांसा॒ गिर्व॑णस्तमा ॥ ४ ॥

ता वां एषे रथानां इंद्राग्नीइति हवामहे ।
पतीइति तुरस्य राधसः विद्वांसा गिर्वणःऽतमा ॥ ४ ॥

तर त्यांच्या रथांचे आगमन इकडे व्हावे म्हणून इंद्राग्नीचा धांवा आम्ही करीत आहोत. जो त्वरीत प्राप्त होतो अशा कृपाप्रसादाचे मालक तेच आहेत. तेच सर्वज्ञ, आणि अत्यांत स्तुति पात्र असेही तेच होत. ॥ ४ ॥


ता वृ॒धन्ता॒वनु॒ द्यून्मर्ता॑य दे॒वाव॒दभा॑ ।
अर्ह॑न्ता चित्पु॒रो द॒धेऽं॑शेव दे॒वावर्व॑ते ॥ ५ ॥

ता वृधंतौ अनु द्यून् मर्ताय देवौ अदभा ।
अर्हंता चित् पुरः दधे अंशाऽइव देवौ अर्वते ॥ ५ ॥

ते देव मर्त्यमानवाच्या हितार्थ दिवसानुदिवस जास्तीच तत्पर होतात. त्यांना कोणीही फसवूं शकत नाही. ते महानुभव आहेत व हीनस्थितीला तेच भाग्य दाते, म्हणूनच मी त्यांना आपल्यापुढे रात्रंदिवस ठेविले आहे. ॥ ५ ॥


ए॒वेन्द्रा॒ग्निभ्या॒महा॑ वि ह॒व्यं शू॒ष्यं घृ॒तं न पू॒तमद्रि॑भिः ।
ता सू॒रिषु॒ श्रवो॑ बृ॒हद्र॒यिं गृ॒णत्सु॑ दिधृत॒मिषं॑ गृ॒णत्सु॑ दिधृतम् ॥ ६ ॥

एव इन्द्राग्निऽभ्यां अहावि हव्यं शूष्यं घृतं न पूतं अद्रिऽभिः ।
ता सूरिषु श्रवः बृहत् रयिं गृणत्ऽसु दिधृतं इषं गृणत्ऽसु दिधृतम् ॥ ६ ॥

ह्या प्रमाणे इंद्राग्नी प्रित्यर्थ, ग्राव्यांच्यास्पर्शाने पवित्र झालेले घृत जसे अर्पण करतो तसेच बलवर्धक हविही आम्ही अर्पण केले आहे. तर आमच्या लोकधुरीण यजमानांना सद्यशाचा स्तोतृजनाला लाभ करून द्या, स्तोतृजनांना सयुत्साहाचाही लाभ करून द्या. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८७ ( मरुत् सूक्त )

ऋषी - एवयामरुत् : देवता - मरुत् : छंद - जगती


प्र वो॑ म॒हे म॒तयो॑ यन्तु॒ विष्ण॑वे म॒रुत्व॑ ते गिरि॒जा ए॑व॒याम॑रुत् ।
प्र शर्धा॑य॒ प्रय॑ज्यवे सुखा॒दये॑ त॒वसे॑ भ॒न्ददि॑ष्टये॒ धुनि॑व्रताय॒ शव॑से ॥ १ ॥

प्र वः महे मतयः यंतु विष्णवे मरुत्वते गिरिऽजाः एवयामरुत् ।
प्र शर्धाय प्रऽयज्यवे सुऽखादये तवसे भंदत्ऽइष्टये धुनिऽव्रताय शवसे ॥ १ ॥

एवयामरुत् तुमच्या ज्या अंतःकरण प्रवृत्ति पद्यरूपांत प्रकट झाल्या आहेत, त्या वृत्ति, मरुतांचा नायक जो परमश्रेष्ठ विष्णु त्याच्याकडे वळोत. तो सेनानायक, यज्ञार्हविभूतींत अग्रेसर, वीरभूषणांनी अलंकृत, आणि प्रभावशाली आहे. त्याच्या प्रित्यर्थ केलेल्या इष्टिंत एक सारखा जयघोषच चालतो, आणि त्याचे स्फुरण पावणारे सामर्थ्य प्रकट होऊ लागले म्हणजे तो भयंकर शब्द करतो, तर अशा त्या मरुत्‍वेष्टित विष्णूकडे आमच्या वृत्ति वळोत. ॥ १ ॥


प्र ये जा॒ता म॑हि॒ना ये च॒ नु स्व॒यं प्र वि॒द्मना॑ ब्रु॒वत॑ एव॒याम॑रुत् ।
क्रत्वा॒ तद्वो॑ मरुतो॒ नाधृषे॒ शवो॑ दा॒ना म॒ह्ना तदे॑षा॒मधृ॑ष्टासो॒ नाद्र॑यः ॥ २ ॥

प्र ये जाता महिना ये च नु स्वयं प्र विद्मना ब्रुवते एवयामरुत् ।
क्रत्वा तत् वः मरुतः न आऽधृषे शवः दाना मह्ना तत् एषां अधृष्टासः न अद्रयः ॥ २ ॥

एवयामरुत् ! जे आपल्या समर्थ्यानेच उत्पन्न झाले, जे आपण होऊन अवतीर्ण झाले, त्यांनी आपल्या ज्ञानानेंच हे सांगितले आहे. हे मरुतांनो, तुमच्या स्फुरण पावणार्‍या बळाचा प्रतिकार कोणालाही आपल्या कर्तृत्वाने, दानधर्माने, अगर शौर्याने, करता येणार नाही, कारण पर्वताप्रमाणे ते अचलधैर्य आहेत. ॥ २ ॥


प्र ये दि॒वः बृ॑ह॒तः श्रृ॑ण्वि॒रे गि॒रा सु॒शुक्वा॑नः सु॒भ्व एव॒याम॑रुत् ।
न येषा॒म्म्री॑ स॒धस्थ॒ ईष्ट॒ आँ अ॒ग्नयो॒ न स्ववि॑द्युतः॒ प्र स्य॒न्द्रासो॒ धुनी॑नाम् ॥ ३ ॥

प्र ये दिवः बृहतः शृण्विरे गिरा सुऽशुक्वानः सुऽभ्वः एवयामरुत् ।
न येषां इरी सधऽस्थे ईष्टे आ अग्नयः न स्वऽविद्युतः प्र स्यंद्रासः धुनीनाम् ॥ ३ ॥

एवयामरुत् ! गायनाच्या योगाने त्यांचे आगमन महदाकांतूनही दूर माहीत पडते. त्यांची कांति देदीप्यमान आणि शरीर बांधेसूद असते. त्यांच्या स्थानांत कोणीही प्रमुख म्हणून त्यांच्यावर सत्ता गाजवीत नाही. तीन अग्निप्रमाणे ते स्वयंप्रकाश आहेत, आणि धों धों वाहाणार्‍या नद्यांना नेट त्यांचाच असतो. ॥ ३ ॥


स च॑क्रमे मह॒तो निरु॑रुक्र॒मः स॑मा॒नस्मा॒त्सद॑स एव॒याम॑रुत् ।
य॒दायु॑क्त॒ त्मना॒ स्वादधि॒ ष्णुभि॒र्विष्प॑र्धसो॒ विम॑हसो॒ जिगा॑ति॒ शेवृ॑धो॒ नृभिः॑ ॥ ४ ॥

सः चक्रमे महतः निः उरुऽक्रमः समानस्मात् सदसऽ एवयामरुत् ।
यदा अयुक्त त्मना स्वात् अधि स्नुऽभिः विऽस्पर्धसः विऽमहसोअः जिगाति शेऽवृधः नृभिः ॥ ४ ॥

अपार प्रदेश आक्रमण करणारा जो विष्णु त्याने आपल्या सर्वसाधारण महास्थानापासून बाहेर प्रयाण केले. आपल्या निवासस्थानाच्या शिखराच्या बाजूने निघून एकदा त्याने आपण होऊन आपले बिनजोड व महाबलवान् घोडे जोडले की, तो आनंदवर्धन देव आपल्या वीरांसह भूलोकीं तात्काल प्राप्त झालाच म्हणून म्हणा. ॥ ४ ॥


स्व॒नो न वोऽ॑मवान्रेजय॒द्वृषा॑ त्वे॒षो य॒यिस्त॑वि॒ष ए॑व॒याम॑रुत् ।
येना॒ सह॑न्त ऋ॒ञ्जत॒ स्वरो॑चिषः॒ स्थार॑श्मानो हिर॒ण्ययाः॑ स्वायु॒धास॑ इ॒ष्मिणः॑ ॥ ५ ॥

स्वनः न वः अमऽवान् रेजयत् वृषा त्वेषः ययिः तविषः एवयामरुत् ।
येन सहंतः ऋञ्जत स्वऽरोचिषः स्थाऽरश्मानः हिरण्ययाः सुऽआयुधासः इष्मिणः ॥ ५ ॥

एवयामरुत् !! तुमच्या भीषण निनादाप्रमाणेच तो तुमचा वर्षणक्षम, तीव्रवेग, आणि धुमाळी उडवून देणारा रथसुद्धां जगाचा थरकांप करतो. अशाच रथांत बसून त्या स्वयंप्रकाश, स्थिरतेजस्क, सुवर्णवर्ण, आणि आवेशी वीरांनी तीक्ष्ण शस्त्रें घेऊन पुढें चाल केली. ॥ ५ ॥


अ॒पा॒रो वो॑ महि॒मा वृ॑द्धशवसस्त्वे॒षं शवो॑ऽवत्वेव॒याम॑रुत् ।
स्थाता॑रो॒ हि प्रसि॑तौ सं॒दृशि॒ स्थन॒ ते न॑ उरुष्यता नि॒दः शु॑शु॒क्वांसो॒ नाग्नयः॑ ॥ ६ ॥

अपारः वः महिमा वृद्धऽशवसः त्वेषं शवः अवतु एवयामरुत् ।
स्थातारः हि प्रऽसितौ संऽदृशि स्थन ते नः उरुष्यत निदः शुशुक्वांसः अग्नयः ॥ ६ ॥

एवयामरुत् !! महाबलाढ्य मरुतांनो, तुमचे सामर्थ्य अपार आहे. तुमचा जाज्वल्य प्रताप आमचे संरक्षण करो. तुम्ही स्थिर आहांतच, परंतु बिकट प्रसंगी आमच्या दृष्टिच्या आटोक्यांत असा; तुम्ही अग्निसारखे उज्ज्वल कांतिमान् आहांत, तेव्हा निंदकांच्या अपवादांपासून आमची सुटका करा. ॥ ६ ॥


ते रु॒द्रासः॒ सुम॑खा अ॒ग्नयो॑ यथा तुविद्यु॒म्ना अ॑वन्त्वेव॒याम॑रुत् ।
दी॒र्घं पृ॒थु प॑प्रथे॒ सद्म॒ पार्थि॑वं॒ येषा॒मज्मे॒ष्वा म॒हः शर्धां॒स्यद्‌भु॑ तैनसाम् ॥ ७ ॥

ते रुद्रासः सुऽमखा अग्नयः यथा तुविऽद्युम्नाः अवंतु एवयामरुत् ।
दीर्घं पृथु पप्रथे सद्म पार्थिवं येषां अज्मेषु आ महः शर्धांसि अद्‌भुृतऽएनसाम् ॥ ७ ॥

एवयामरुत् !! ते रुद्रस्वरूपच, आणि यज्ञांतील पवित्र अग्निप्रमाणे त्यांचे प्रतापतेज अगाध आहे, तर असे मरुत् आमच्यावर अनुग्रह करोत. त्यांचे पृथ्वी जवळील वसतिस्थान विस्तीर्ण ऐसपैस असे पसरलेले आहे, आणि स्वारींत, त्या अत्यंत निष्पाप अशा मरुतांचे सैन्य आणि त्याची ओजस्विता तर विचारूंच नका ॥ ७ ॥


अ॒द्वे॒षो नो॑ मरुतो गा॒तुमेत॑न॒ श्रोता॒ हवं॑ जरि॒तुरे॑व॒याम॑रुत् ।
विष्णो॑र्म॒हः स॑मन्यवो युयोतन॒ स्मद्र॒थ्यो॒३॑नदं॒सनाप॒ द्वेषां॑सि सनु॒तः ॥ ८ ॥

अद्वेषः नः मरुतः गातुं इतन श्रोत हवं अरितुः एवयामरुत् ।
विष्णोः महः सऽमन्यवः युयोतन स्मत् रथ्यः न दंसना अप द्वेषांसि सनुतरिति ॥ ८ ॥

मरुतांनो, तुमच्या मनांत द्वेषाला वावच नाही, तर तुम्ही आता इकडचा रस्ता चालू लागा ना ? मज स्तोतृजनाची हांक तर ऐका. सर्वश्रेष्ठ विष्णूचे, आणि ज्या तुमचे अंतःकरण समान आहे अशा मरुतांनो, तुम्हीच आमचे सेनानायक आहांत तेव्हा आपल्या अद्‍भुत पराक्रमाने द्वेषबुद्धिची पूरी ताटातूट करून तिला दूर हांकून द्या. ॥ ८ ॥


गन्ता॑ नो य॒ज्ञं य॑ज्ञियाः सु॒शमि॒ श्रोता॒ हव॑मर॒क्ष ए॑व॒याम॑रुत् ।
ज्येष्ठा॑सो॒ न पर्व॑तासो॒ व्योमनि यू॒यं तस्य॑ प्रचेतसः॒ स्यात॑ दु॒र्धर्त॑वो नि॒दः ॥ ९ ॥

गंता नः यज्ञं यज्ञियाः सुऽशमि श्रोत हवं अरक्षः एवयामरुत् ।
ज्येष्ठासः न पर्वतासः विऽओमनि यूयं तस्य प्रचेतसः स्यात दुःऽधर्तवः निदः ॥ ९ ॥

एवयामरुत् !! यज्ञसेव्य मरुतांनो, आमच्या यज्ञसमारंभास अगमन करा, आणि आमचा धांवा कळवळ्याने ऐकून घ्या. हा धांवा राक्षसांचा नाही तुमचा आहे. अत्युच्च आकाशांत मोठमोठे पर्वतप्राय मेघ असतात तसेच तुम्ही दिसत आहांत, तर हे ज्ञानशील विभूतिंनो निंदकाला तुम्ही त्राहि करून सोडणारे आहांत असे जाणवा. ॥ ९ ॥


॥ इति पञ्चमं मण्डलं समाप्तं ॥
ॐ तत् सत्


GO TOP