PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ६१ ते ७०

ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६१ ( अनेक देवता सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - अनेक देवता : छंद - निचृत्, अनुष्टुभ्, सतोबृहती, गायत्री


के ष्ठा॑ नरः॒ श्रेष्ठ॑तमा॒ य एक॑एक आय॒य ।
प॒र॒मस्याः॑ परा॒वतः॑ ॥ १ ॥

के स्था नरः श्रेष्ठतमाः ये एकःऽएक आऽयय ।
परमस्याः पराऽवतः ॥ १ ॥

हे वीरांनो, तुम्ही अत्यंत थोर; तर तुम्ही कोण आहात. कारण अतिशय दूरच्या ठिकाणाहून तुम्ही एक एक जण ह्या प्रमाणे आला आहात. ॥ १ ॥


क्व॑१वोऽ॑श्वाः॒ क्वा॒३॑भीश॑वः क॒थं शे॑क क॒था य॑य ।
पृ॒ष्ठे सदो॑ न॒सोर्यमः॑ ॥ २ ॥

क्व वः अश्वाः क्व अभीशवः कथं शेक कथा यय ।
पृष्ठे सदः नसोः यमः ॥ २ ॥

तुमचे घोडे कुठे आहेत " त्यांचे लगाम कोठे आहेत ? तुम्ही येथपर्यंत आलात तरी कसे आणि जाणार तरी कोणत्या मार्गाने, कारण तुमच्या घोड्यांच्या पाठीवर खोगीर आणि तोंडात लगाम आहेच. ॥ २ ॥


ज॒घने॒ चोद॑ एषां॒ वि स॒क्थानि॒नरो॑ यमुः ।
पु॒त्र॒कृ॒थे न जन॑यः ॥ ३ ॥

जघने चोदः एषां वि सक्थानि नरः यमुः ।
पुत्रऽकृथे न जनयः ॥ ३ ॥

त्यांच्या कमरेशी चाबूक लटकत असतो त्या चबकाने ते वीर शत्रूंना लांब लांब झांपा टाकीत पळावयास लावतात, आणि पुत्र प्रसवतांना स्त्रियांची जशी दुर्दशा होते तशी त्यांची पळतांना दुर्दशा करतात. ॥ ३ ॥


परा॑ वीरास एतन॒ मर्या॑सो॒ भद्र॑जानयः ।
अ॒ग्नि॒तपो॒ यथास॑थ ॥ ४ ॥

परा वीरासः इतन मर्यास भद्रऽजानयः ।
अग्निऽतपः यथा असथ ॥ ४ ॥

वीरांनो, मरुतांनो, सुंदर नववधूंचे पाणिग्रहण करणार्‍या तरुणांनो, तुम्ही सुखाने दूर जा, आणि हिंवाळ्यात विस्तवापाशी शेकत बसावे त्याप्रमाणे शुखासीन व्हा. ॥ ४ ॥


सन॒त्साश्व्यं॑ प॒शुमु॒तगव्यं॑ श॒ताव॑यम् ।
श्या॒वाश्व॑स्तुताय॒ या दोर्वी॒रायो॑प॒बर्बृ॑हत् ॥ ५ ॥

सनत सा अश्व्यं पशुं उत गव्यं शतऽअवयम् ।
श्यावाश्वऽस्तुताय या दोः वीराय उपऽबर्बृहत् ॥ ५ ॥

मी शावाकाने ज्या शूरवीराची प्रशंसा केली त्या वीराला अलिंगन देण्याकरितां ज्या लावण्यवती तरुणीने आपले बाहू पुढे केले त्याच तरुणीला, पुष्कळ संपत्ति घोडे गायी, शेंकडो अजा इत्यादि प्राप्त होतील. ॥ ५ ॥


उ॒त त्वा॒ स्त्री शशी॑यसी पुं॒सो भ॑वति॒ वस्य॑सी ।
अदे॑वत्रादरा॒धसः॑ ॥ ६ ॥

उत त्वा स्त्री शशीयसी पुंसः भवति वस्यसी ।
अदेवऽत्रात् अराधसः ॥ ६ ॥

देवभक्ति विमुख आणि दानधर्म न करणार्‍या पुरुषापेक्षा स्त्री सुद्धा दृढनिश्चयी व चतुर असते. ॥ ६ ॥


विया जा॒नाति॒ जसु॑रिं॒ वि तृष्य॑न्तं॒ वि का॒मिन॑म् ।
दे॒व॒त्रा कृ॑णु॒ते मनः॑ ॥ ७ ॥

वि या जानाति जसुरिं वि तृष्यंतं वि कामिनम् ।
देवऽत्रा कृणुते मनः ॥ ७ ॥

तिला आपला पति मारकट लसलस करणारा आणि कामातुर आहे असे कळते तरीही ती आपले लक्ष भगवंताकडे लावते. ॥ ७ ॥


उ॒त घा॒ नेमो॒ अस्तु॑तः॒ पुमाँ॒ इति॑ ब्रुवे प॒णिः ।
स वैर॑देय॒ इत्स॒मः ॥ ८ ॥

उत घा नेमः अस्तुतः पुमान् इति ब्रुवे पणिः ।
सः वैरऽदेय इत् समः ॥ ८ ॥

आणि तो तिचा अर्धा भाग म्हणजे पति अगदींच अश्लाघ्य वर्तनाचा आणि कंजुष असे जरी मी म्हणतो तरी आपले वैर उगविण्यास मात्र तो पुरा पैसा खर्च करील. ॥ ८ ॥


उ॒त मे॑ऽरपद्युव॒तिर्म॑म॒न्दुषी॒ प्रति॑ श्या॒वाय॑ वर्त॒निम् ।
वि रोहि॑ता पुरुमी॒ळ्हाय॑ येमतु॒र्विप्रा॑य दी॒र्घय॑शसे ॥ ९ ॥

उत मे अरपत् युवतिः ममंदुषी प्रति श्यावाय वर्तनिम् ।
वि रोहिता पुरुऽमीळ्हाय येमतुः विप्राय दीर्घऽयशसे ॥ ९ ॥

त्या सुंदर तरुणीने मला - श्वावाला - वाट दाखविली; आणि मी दोन प्याजी घोडे रथाला जोडून दिगंतकीर्ति, आणि विद्वान असा जो पुरूमीळ्ह् त्याच्याकडे गेलो. ॥ ९ ॥


यो मे॑ धेनू॒नां श॒तं वैद॑दश्वि॒र्यथा॒दद॑त् ।
त॒र॒न्त इ॑व मं॒हना॑ ॥ १० ॥

यः मे धेनूनां शतं वैदत्ऽअश्विः यथा ददत् ।
तरंतःइव मंहना ॥ १० ॥

तेव्हां तरन्ताप्रमाणेच ’वैददश्वि’ ह्याने शेंकडो धेनूंची मला देणगी दिली. ॥ १० ॥


य ईं॒ वह॑न्त आ॒शुभिः॒ पिब॑न्तो मदि॒रं मधु॑ ।
अत्र॒ श्रवां॑सि दधिरे ॥ ११ ॥

ये ईं वहंते आशुऽभिः पिबंतः मदिरं मधु ।
अत्र श्रवांसि दधिरे ॥ ११ ॥

आनंदमग्न करणारे हे मधुर पेय प्राशन करून आणि वेगवान् घोडे जोडून जे मरुत् आता निघाले आहेत त्यांनीच येथे आपली कीर्ति करून ठेविली आहे. ॥ ११ ॥


येषां॑ श्रि॒याधि॒ रोद॑सी वि॒भ्राज॑न्ते॒ रथे॒ष्वा ।
दि॒वि रु॒क्म इ॑वो॒परि॑ ॥ १२ ॥

येषां श्रिया अधि रोदसीइति विऽभ्राजंते रथेषु आ ।
दिवि रुक्मःऽइव उपरि ॥ १२ ॥

वर आकाशांत सुवर्णाचा गोळा सूर्य तळपत रहावा त्याप्रमाणे त्या मरुतांच्या रथात "रोदसी" ही आपल्या लावण्य कांतीने फारच चमकत असते. ॥ १२ ॥


युवा॒ स मारु॑तः ग॒णस्त्वे॒षर॑थो॒ अने॑द्यः ।
शु॒भं॒यावाप्र॑तिष्कुतः ॥ १३ ॥

युवा सः मारुतः गणः त्वेषऽरथः अनेद्यः ।
शुभंऽयावा अप्रतिऽस्कुतः ॥ १३ ॥

आणि समूहांतील मरुतही तारुण्याढ्य, प्रखर तेजोयुक्त रथांत बसणारे, विजय संपादनार्थ निघालेले निष्पाप अणि दुर्निवार आहेत. ॥ १३ ॥


को वे॑द नू॒नं ए॑षां॒ यत्रा॒ मद॑न्ति॒ धूत॑यः ।
ऋ॒तजा॑ता अरे॒पसः॑ ॥ १४ ॥

कः वेद नूनं एषां यत्र मदंति धूतयः ।
ऋतऽजाताः अरेपसः ॥ १४ ॥

पृथ्वीला हालवून सोडणारे, सत्यापासून जन्मलेले निष्कलंक मरुत् हे सोमप्राशन करून जेथे आनंदांत डुलत दिसतात, ते ठिकाण तरी कोणाला माहीत आहे. ॥ १४ ॥


यू॒यं मर्तं॑ विपन्यवः प्रणे॒तार॑ इ॒त्था धि॒या ।
श्रोता॑रो॒ याम॑हूतिषु ॥ १५ ॥

यूयं मर्तं विपन्यवः प्रऽनेतारः इत्था धिया ।
श्रोतारः यामऽहूतिषु ॥ १५ ॥

ईश्वरगानप्रिय मरुतांनो अशा मनःपूर्वक केलेल्या स्तोत्राने तुम्ही दीन भक्ताचे गाऱ्हाणे ऐकून घेता, आणि संकटकाली धांवा केला असतां त्याचे मार्ग दर्शक होता. ॥ १५ ॥


ते नो॒ वसू॑नि॒ काम्या॑ पुरुश्च॒न्द्रा रि॑शादसः ।
आ य॑ज्ञियासः ववृत्तन ॥ १६ ॥

ते नः वसूनि काम्या पुरुचंद्राः रिशादसः ।
आ यज्ञियासः ववृत्तन ॥ १६ ॥

अत्यंत आल्हादच व्हावा अशी तुमची कांती आहे. हे शत्रुसंहारकारी, परमपूज्य विभूतींनो, आम्हास जी अत्युत्कृष्ट संपत्ति हवी आहे तीच कृपाकरून आमच्याकडे पाठवून द्या. ॥ १६ ॥


ए॒तं मे॒ स्तोम॑मूर्म्ये दा॒र्भ्याय॒ परा॑ वह ।
गिरो॑ देवि र॒थीरि॑व ॥ १७ ॥

एतं मे स्तोमं ऊर्म्ये दार्भ्याय परा वह ।
गिरः देवि रथीःइव ॥ १७ ॥

हे तेजोलहरी ऊर्म्ये, रथांतून बसून गेल्याप्रमाणे तू हे माझे स्तोत्र, हे माझे प्रशंसा-पद्म दूरप्रांति राहाणार्‍या त्या दार्भ्याला नेऊन दे. ॥ १७ ॥


उ॒त मे॑ वोचता॒दिति॑ सु॒तसो॑मे॒ रथ॑वीतौ ।
न कामो॒ अप॑ वेति मे ॥ १८ ॥

उत मे वोचतात् इति सुतऽसोमे रथऽवीतौ ।
न कामः अप वेति मे ॥ १८ ॥

आणि त्याला सांग कीं, "सोम‍अर्पण करणारा ’रथविति’ आपल्या संबंधाने माझा जो एक हेतु. तो नाहीसा होत नाही."" ॥ १८ ॥


ए॒ष क्षे॑ति॒ रथ॑वीतिर्म॒घवा॒ गोम॑ती॒रनु॑ ।
पर्व॑ते॒ष्वप॑श्रितः ॥ १९ ॥

एषः क्षेति रथऽवीतिः मघऽवा गोऽमतीः अनु ।
पर्वतेषु अपऽश्रितः ॥ १९ ॥

हा दानशूर रथविति, गोमती नदीच्या बाजूच्या पर्वतांत बंदोबस्ताने नगर वसवून राहिला आहे. ॥ १९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६२ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - श्रुतविद् आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - जगती


ऋ॒तेन॑ ऋ॒तमपि॑हितं ध्रु॒वं वां॒ सूर्य॑स्य॒ यत्र॑ विमु॒चन्त्यश्वा॑न् ।
दश॑ श॒ता स॒ह त॑स्थु॒स्तदेकं॑ दे॒वानां॒ श्रेष्ठं॒ वपु॑षामपश्यम् ॥ १ ॥

ऋतेन ऋतं अपिहितं ध्रुवं वां सूर्यस्य यत्र विऽमुचंति अश्वान् ।
दश शता सह तस्थुः तत् एकं देवानां श्रेष्ठं वपुषां अपश्यम् ॥ १ ॥

ज्या ठिकाणी सूर्याचे घोडे रथाला जोडण्याकरिता मोकळे करितात, त्या ठिकाणी अचल सनातन जे सत्यस्वरूप आहे, ते तुमच्याच सनातन सृष्टि नियमांच्या योगाने झांकून गेले आहे. त्याच ठिकाणी तेजाचे हजारो किरण एकवटलेले आहेत. हा देवांचा एक अत्युत्कृष्ट अद्‍भुत चमत्कारच मला पहवयास सापडला म्हणावयाचा. ॥ १ ॥


तत्सु वां॑ मित्रावरुणा महि॒त्वमी॒र्मा त॒स्थुषी॒रह॑भिर्दुदुह्रे ।
विश्वाः॑ पिन्वथः॒ स्वस॑रस्य॒ धेना॒ अनु॑ वा॒मेकः॑ प॒विरा व॑वर्त ॥ २ ॥

तत् सु वां मित्रावरुणा महिऽत्वं ईर्मा तस्थुषीः अहऽभिः दुदुह्रे ।
विश्वाः इन्वथः वसरस्य धेना अनु वां एकः अविः आ ववर्त ॥ २ ॥

मित्रावरुणहो, हाही तुमचाच एक महिमा की, पृथ्वीतलावर उदके स्वस्थ पडून राहिलेली असतात, ती चंचलरश्मि सूर्याने आपल्या किरणांनी वर ओढून घेतली आणि तुमचा एक नुसता रथ येऊन पोंहोंचल्याबरोबर स्वर्लोकांतील सर्व धेनू, सर्व स्तुति वाणी, तुम्ही मधुर रसाने ओतप्रोत भरून टाकतां. ॥ २ ॥


अधा॑रयतं पृथि॒वीमु॒त द्यां मित्र॑राजाना वरुणा॒ महो॑भिः ।
व॒र्धय॑त॒मोष॑धीः॒ पिन्व॑तं॒ गा अव॑ वृ॒ष्टिं सृ॑जतं जीरदानू ॥ ३ ॥

अधारयतं पृथिवीं उत द्यां मित्र राजाना वरुणा महःऽभिः ।
वर्धयतं ओषधीः पिन्वतं गाः अव वृष्टिं सृजतं जीरदानूइतिजीरऽदानू ॥ ३ ॥

हे विश्वाधीश मित्रावरुणांनो, आपल्या महिम्याने पृथ्वी आणि नक्षत्रे तुम्ही सांवरून धरली. तुम्ही औषधी-वनस्पतींना वाढीस लावले आणि मेघ धेनूंना पुष्ट केल्या तर हे शीघ्र वृष्टी-पद विभूतींनो, तुम्ही आता कृपामृताची वृष्टि करा. ॥ ३ ॥


आ वा॒मश्वा॑सः सु॒युजो॑ वहन्तु य॒तर॑श्मय॒ उप॑ यन्त्व॒र्वाक् ।
घृ॒तस्य॑ नि॒र्णिगनु॑ वर्तते वां॒ उप॒ सिन्ध॑वः प्र॒दिवि॑ क्षरन्ति ॥ ४ ॥

आ वां अश्वासः सुऽयुजः वहंतु यतऽरश्मय उप यंतु अर्वाक् ।
घृतस्य निःऽनिक् अनु वर्तते वां उप सिन्धवः प्रऽदिवि क्षरंति ॥ ४ ॥

तुमचे सुव्यवस्थित आणि रश्मिरूप लगाम आंखडून धरलेले अश्व तुम्हांला घेऊन येवोत - इकडे घेऊन येवोत. स्निग्ध दिव्योदकाचे आवरण तुम्ही आंगावर घेतल्यामुळे महानद्या प्राचीन काळापासून आजपर्यंत एकसारख्या उचंबळून वहात आहेत. ॥ ४ ॥


अनु॑ श्रु॒ताम॒मतिं॒ वर्ध॑दु॒र्वीं ब॒र्हिरि॑व॒ यजु॑षा॒ रक्ष॑माणा ।
नम॑स्वन्ता धृतद॒क्षाधि॒ गर्ते॒ मित्रासा॑थे वरु॒णेळा॑स्व॒न्तः ॥ ५ ॥

अनु श्रुतां अमतिं वर्धत् उर्वीं बर्हिःऽइव यजुषा रक्षमाणा ।
नमस्वंता धृतऽदक्षा अधि गर्ते मित्र आसाथे वरुण ईळासु अंतरिति ॥ ५ ॥

यजुर्मंत्रांनी अभिमंत्रण केलेल्या दर्भांप्रमाने तुम्ही आपल्या जगद्विध्यात अफाट बलाचें व्यवस्थित रीतीने संवर्धन केले आहे. स्थितप्रज्ञ मित्रावरुणांनो तुमच्यापुढे भक्तजन पूज्यभावाने नम्र होतात, असे तुम्ही सर्वत्रसमृद्धि असतांना आपल्या दिव्ये रथावर आरूढ होत असतां. ॥ ५ ॥


अक्र॑विहस्ता सु॒कृते॑ पर॒स्पा यं त्रासा॑थे वरु॒णेळा॑स्व॒न्तः ।
राजा॑ना क्ष॒त्रमहृ॑णीयमाना स॒हस्र॑स्थूणं बिभृथः स॒ह द्वौ ॥ ६ ॥

अक्रऽविहस्ता सुऽकृते परःपा यं त्रासाथेइति वरुणा इळासु अंतरिति ।
राजाना क्षत्रं अहृणीयमाना सहस्रस्थूणं बिभृथः सह द्वौ ॥ ६ ॥

सर्वत्र समृद्धि असतां, पुण्यशील सत्पुरुषाचे तुम्ही रक्षण करतां, त्या अर्थी तुम्ही अशा तऱ्हेने सत्प्रतिपालक आहांत कीं, त्याच्याकरितां तुमच्या हातांना रक्ताचा एकही डाग लागण्याचे कारण पडत नाही. हे विश्वाधीशांनो, तुम्ही उभयतां आपली राजसत्ता अशा प्रकाराने राखीत आहात कीं तिला सांवरून धरण्यास जणों हजारों खांबच आहेत. ॥ ६ ॥


हिर॑ण्यनिर्णि॒गयो॑ अस्य॒ स्थूणा॒ वि भ्रा॑जते दि॒व्य॑१ श्वाज॑नीव ।
भ॒द्रे क्षेत्रे॒ निमि॑ता॒ तिल्वि॑ले वा स॒नेम॒ मध्वो॒ अधि॑गर्त्यस्य ॥ ७ ॥

हिरण्यऽनिर्निक् अयः अस्य स्थूणा वि भ्राजते दिवि अश्वाजनीऽव ।
भद्रे क्षेत्रे निऽमिता तिल्विले वा सनेम मध्वः अधिऽगर्त्यस्य ॥ ७ ॥

त्यांचा रथ सुवर्णाचा असून त्याचे खांब मात्र पोलादि आहेत; आकाशंत तो विद्युल्लतेप्रमाणे चमकतो. असेच खांब आमच्या सुपीक आणि सकस शेत जमीनीतही रोवलेले आहेत तेव्हा त्या खांबावर उभारलेल्या मंडपांत त्याच्या रथांतील मधुर अमृत रसाचा आम्हांस लाभ होवो. ॥ ७ ॥


हिर॑ण्यरूपमु॒षसो॒ व्युष्टा॒वयः॑ स्थूण॒मुदि॑ता॒ सूर्य॑स्य ।
आ रो॑हथो वरुण मित्र॒ गर्त॒मत॑श्चक्षाथे॒ अदि॑तिं॒ दितिं॑ च ॥ ८ ॥

हिरण्यऽरूपं उषसः विउष्टौ अयःस्थूणं उट्ऽइता सूर्यस्य ।
आ रोहथः वरुण मित्र गर्तं अतः चक्षाथेइति अदितिं दितिं च ॥ ८ ॥

प्रभातकाल झाला, सूर्याचा उदय झाला म्हणजे हे मित्रावरुणहो तुम्ही आपल्या पोलादी खांबाच्या सुवर्णमय अविनाशी रथात विराजमान होता. आणि तेथून ह्या सर्व अनंत आणि सांत ( अनश्वर आणि नश्वर, अदृश्य आणि दृश्य) पदार्थांचे अवलिकन करीत असतां. ॥ ८ ॥


यद् बंहि॑ष्ठं॒ नाति॒विधे॑ सुदानू॒ अच्छि॑द्रं॒ शर्म॑ भुवनस्य गोपा ।
तेन॑ नो मित्रावरुणावविष्टं॒ सिषा॑सन्तो जिगी॒वांसः॑ स्याम ॥ ९ ॥

यत् बंहिष्ठं न आतिऽविधे सुदानूइतिसुऽदानू अच्छिद्रं शर्म भुवनस्य गोपा ।
तेन नः मित्रावरुणौ अविष्टं सिसासंतः जिगीवांसः स्याम ॥ ९ ॥

हे उदार श्रेष्ठहो, अत्यंत दृढ, अभेद्य, आणि निर्दोष असे जे सुखाचे स्थान आहे ते आम्हास अर्पण करून आम्हावर अनुग्रह करा आनि विजयोत्सुक झालेले आम्ही विजय संपादन करूं असे घडवा ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६३ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - अर्चनानस् आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - जगती


ऋत॑स्य गोपा॒वधि॑ तिष्ठथो॒ रथं॒ सत्य॑धर्माणा पर॒मे व्योमनि ।
यमत्र॑ मित्रावरु॒णाव॑थो यु॒वं तस्मै॑ वृ॒ष्टिर्मधु॑मत्पिन्वते दि॒वः ॥ १ ॥

ऋतस्य गोपौ अधि तिष्ठथः रथं सत्यऽधर्माणा परमे विऽओमनि ।
यं अत्र मित्रावरुणा अवथः युवं तस्मै वृष्टिः मधुऽमत् पिन्वते दिवः ॥ १ ॥

तुम्ही सनातन नियमांचे प्रतिपालक आणि सत्य हाच तुमचा स्वभाव आहे. तुमचा रथ अत्युच्च गगनांत आहे, त्यावर तुम्ही आरूढ होतां. हे मित्रावरुणांनो, ज्याच्यावर तुम्ही येथे अनुग्रह करता त्याच्याकरितां आकाशांत वृष्टि मधुररसाने ओतप्रोत भरून जाते. ॥ १ ॥


स॒म्राजा॑व॒स्य भुव॑नस्य राजथो॒ मित्रा॑वरुणा वि॒दथे॑ स्व॒र्दृशा॑ ।
वृ॒ष्टिं वां॒ राधो॑ अमृत॒त्वमी॑महे॒ द्यावा॑पृथि॒वी वि च॑रन्ति त॒न्यवः॑ ॥ २ ॥

संऽराजौ अस्य भुवनस्य राजथः मित्रावरुणा विदथे स्वःऽदृशा ।
वृष्टिं वां राधः अमृतऽत्वं ईमहे द्यावापृथिवीइति वि चरंति तन्यवः ॥ २ ॥

तुम्ही विश्वाचे चक्रवर्ति ह्या सर्व जगतावर आपला अधिकार चालविता. हे मित्रावरुणांनो, धर्मसभेमध्ये तुम्ही सूर्याप्रमाणे तेजःपुंज दिसतां. तुमच्यापाशी इच्छित वृष्टि, कृपाप्रसाद आणि अमरत्व ही आम्ही जोडून मागतो. कारण मेघगर्जने प्रमाणे तुमचा अभय शब्द आकाश आणि पृथिवी ह्यांत दुमदुमून राहिला आहे. ॥ २ ॥


स॒म्राजा॑ उ॒ग्रा वृ॑ष॒भा दि॒वस्पती॑ पृथि॒व्या मि॒त्रावरु॑णा॒ विच॑र्षणी ।
चि॒त्रेभि॑र॒भ्रैरुप॑ तिष्ठथो॒ रवं॒ द्यां व॑र्षयथो॒ असु॑रस्य मा॒यया॑ ॥ ३ ॥

संऽराजौ उग्रा वृषभा दिवः पतीइति पृथिव्याः मित्रावरुणा विचर्षणीइतिविऽचर्षणी ।
चित्रेभिः अभ्रैः उप तिष्ठथः रवं द्यां वर्षयथः असुरस्य मायया ॥ ३ ॥

तुम्ही विश्वाचे अधिराजे, घोर पराक्रमी आणि आकाश व पृथिवी ह्यांचे मालक आहांत. हे मित्रावरुणांनो, तुम्ही सर्वदर्शी आहात. नानावर्ण मेघांच्या ज्या मालिका त्यांच्या गर्जनेला तुम्ही आपल्या शब्दाने पुष्टि देतां तर तुम्ही आपल्या अलौकिक ईश्वरी शक्तिने आज आकाशांतून वृष्टि करा. ॥ ३ ॥


मा॒या वां॑ मित्रावरुणा दि॒वि श्रि॒ता सूर्यो॒ ज्योति॑श्चरति चि॒त्रमायु॑धम् ।
तम॒भ्रेण॑ वृ॒ष्ट्या गू॑हथो दि॒वि पर्ज॑न्य द्र॒प्सा मधु॑मन्त ईरते ॥ ४ ॥

माया वां मित्रावरुणा दिवि श्रिता सूर्यः ज्योतिः चरति चित्रं आयुधम् ।
तं अभ्रेण वृष्ट्या गूहथः दिवि पर्जन्य द्रप्साः मधुऽमंतः ईरते ॥ ४ ॥

मित्रावरुणांनो, तुमची अद्‍भुत करणी आकाशांत विलसत आहे. सूर्यासारखे दिव्य तेज हेंच तुमचे एक विलक्षण हत्यार म्हणून आज चालले आहे. त्यालाहि मेघपटल आणि जलवृष्टि ह्यांच्या योगाने जेव्हा झांकून टाकतां तेव्हांच हे पर्जन्या, तुझ्या माधुर्यपूर्ण जलबिंदूना अवसान सांपडते. ॥ ४ ॥


रथं॑ युञ्जते म॒रुतः॑ शु॒भे सु॒खं शूरो॒ न मि॑त्रावरुणा॒ गवि॑ष्टिषु ।
रजां॑सि चि॒त्रा विच॑रन्ति त॒न्यवो॑ दि॒वः स॑म्राजा॒ पय॑सा न उक्षतम् ॥ ५ ॥

रथं युञ्जते मरुतः शुभे सुऽखं शूरः न मित्रावरुणा गोऽइष्टिषु ।
रजांसि चित्रा वि चरंति तन्यवः दिवः संऽराजा पयसा नः उक्षतम् ॥ ५ ॥

मित्रावरुणांनो, वीरपुरुष संग्रामांमध्ये जसा सदैव सिद्ध असतो त्याप्रमाणे मरुत् हेहि जयश्रीप्रित्यर्थ आपला आरामशीर रथ सज्ज करीत आहेत. मेघगर्जना चित्रविचित्र अंतराळांत घुमत आहेत तर हे विश्वाधिपहो, आमच्यावर दिव्य दुग्धाने सिंचन करा. ॥ ५ ॥


वाचं॒ सु मि॑त्रावरुणा॒विरा॑वतीं प॒र्जन्य॑श्चि॒त्रां व॑दति॒ त्विषी॑मतीम् ।
अ॒भ्रा व॑सत म॒रुतः॒ सु मा॒यया॒ द्यां व॑र्षयतमरु॒णाम॑रे॒पस॑म् ॥ ६ ॥

वाचं सु मित्रावरुणौ इरावतीं पर्जन्यः चित्रां वदति त्विषीऽमतीम् ।
अभ्रा वसत मरुतः सु मायया द्यां वर्षयतं अरुणां अरेपसम् ॥ ६ ॥

मित्रावरुणांनो, हा पहा पर्जन्य फलधान्यपूर्ण, अद्‍भुत आणि विद्युत्तेजसंपन्न अशी भाषा बोलूं लागला. मरुतांनीही मेघरूप वस्त्रें परिधान केली तर आतां तुम्ही आपल्या अलौकिक चमत्काराने आरक्त परंतु निष्कलंक अशा आकाशाकडून जलवृष्टि करवा. ॥ ६ ॥


धर्म॑णा मित्रावरुणा विपश्चिता व्र॒ता र॑क्षेथे॒ असु॑रस्य मा॒यया॑ ।
ऋ॒तेन॒ विश्वं॒ भुव॑नं॒ वि रा॑जथः॒ सूर्य॒मा ध॑त्थः दि॒वि चित्र्यं॒ रथ॑म् ॥ ७ ॥

धर्मणा मित्रावरुणा विपःऽचिता व्रता रक्षेथेइति असुरस्य मायया ।
ऋतेन विश्वं भुवनं वि राजथः सूर्यं आ धत्थः दिवि चित्र्यं रथम् ॥ ७ ॥

ज्ञानमय मित्रावरुणांनो, सद्धर्माने आणि आपल्या ईश्वरी शक्तिने तुम्ही जगाचे नियम अबाधित ठेवित आहांत. सनातन न्यायानेच तुम्ही ह्या सर्व विश्वावर आपली तेजस्वी सत्ता चालविता, आपला दिव्य रथ म्हणून सूर्याला आकाशांत स्थापन करतां. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६४ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - अर्चनानस् आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्


वरु॑णं वो रि॒शाद॑समृ॒चा मि॒त्रं ह॑वामहे ।
परि॑ व्र॒जेव॑ बा॒ह्वोर्ज॑ग॒न्वांसा॒ स्वर्णरम् ॥ १ ॥

वरुणं वः रिशादसं ऋचा मित्रं हवामहे ।
परि व्रजाऽइव बाह्वोः जगन्वांसा स्वःऽनरम् ॥ १ ॥

शत्रुनाशक वरुण आणि मित्र ह्यांना तुमच्या प्रित्यर्थ आम्ही ऋक्सूक्तांनी पाचारण करीत आहोत. दिव्य तेजो राशि सूर्याला आपल्या भुजदंडांच्या वेष्टनानेच जणों काय त्यांनी कवटाळून धरले आहे. ॥ १ ॥


ता बा॒हवा॑ सुचे॒तुना॒ प्र य॑न्तं अस्मा॒ अर्च॑ते ।
शेवं॒ हि जा॒र्यं वां॒ विश्वा॑सु॒ क्षासु॒ जोगु॑वे ॥ २ ॥

ता बाहवा सुऽचेतुना प्र यंतं अस्मै अर्चते ।
शेवं हि जार्यं वां विश्वासु क्षासु जोगुवे ॥ २ ॥

वात्सल्यपूर्ण मनाने मला हृदयाशी धरण्याकरिता तुम्ही आपले बाहू, ऋक्सूक्ताने तुमचा धांवा करणार्‍या मज दीनाकडे सरसांवा. तुमच्या पासून प्राप्त होणार्‍या परमस्तुत्य आनंदाचे पोंवाडे मी सर्व देशभर सांगत फिरत आहे. ॥ २ ॥


यन्नू॒नम॒श्यां गतिं॑ मि॒त्रस्य॑ यायां प॒था ।
अस्य॑ प्रि॒यस्य॒ शर्म॒ण्यहिं॑सानस्य सश्चिरे ॥ ३ ॥

यन् नूनं अश्यां गतिं मित्रस्य यायां पथा ।
अस्य प्रियस्य शर्मणि अहिंसानस्य सश्चिरे ॥ ३ ॥

मला उत्तम स्थिति प्राप्त व्हावी आणि मी त्या जगन्मित्राच्या सेवेच्या मार्गास लागावे हेच योग्य आहे. पहा सर्व जग सुद्धां कोणाचाही घात न करणार्‍या अशा त्या प्रिय ईश्वराच्याच सुखमय आश्रयाला गेले. ॥ ३ ॥


यु॒वाभ्यां॑ मित्रावरुणोप॒मं धे॑यामृ॒चा ।
यद् ध॒ क्षये॑ म॒घोनां॑ स्तोतॄ॒णां च॑ स्पू॒र्धसे॑ ॥ ४ ॥

युवाभ्यां मित्रावरुणा उपऽमं धेयां ऋचा ।
यत् ह क्षये मघोनां स्तोतॄणां च स्पूर्धसे ॥ ४ ॥

मित्रावरुणांनो, ऋक्सूक्ताने मी तुमच्यापासून असा उत्कृष्ठ प्रसाद प्राप्त करून घेईन, की मोठमोठे दानशूर धनाढ्य आणि भक्तजन ह्यांच्या घरांत त्याच्यामुळे ईर्ष्याच उत्पन्न होईल. ॥ ४ ॥


आ नो॑ मित्र सुदी॒तिभि॒र्वरु॑णश्च स॒धस्थ॒ आ ।
स्वे क्षये॑ म॒घोनां॒ सखी॑नां च वृ॒धसे॑ ॥ ५ ॥

आ नः मित्र सुदीतिऽभिः वरुणः च सधऽस्थे आ ।
स्वे क्षये मघोनां सखीनां च वृधसे ॥ ५ ॥

हे जगन्मित्रा, तू आणि वरुण असे उभयतां देदीप्यमान कांतिने विभूषित होऊन आपल्या निवासस्थानांतून आमच्या दानशूर धनाढ्य स्नेह्यांच्या गृहीं, त्यांचा सत्कार व्हावा म्हणून आगमन करा. ॥ ५ ॥


यु॒वं नो॒ येषु॑ वरुण क्ष॒त्रं बृ॒हच्च॑ बिभृ॒थः ।
उ॒रु णो॒ वाज॑सातये कृ॒तं रा॒ये स्व॒स्तये॑ ॥ ६ ॥

युवं नः येषु वरुणा क्षत्रं बृहच् च बिभृथः ।
उरु नः वाजऽसातये कृतं राये स्वस्तये ॥ ६ ॥

देवांनो, ज्या दिव्यविभूतिं मध्ये तुम्ही आपली प्रतापि राजसत्ता गाजवितां त्यांच्यासह तुम्ही अशी कृति करा कीं आम्हाला त्यामुळे पवित्र सामर्थ्याची प्राप्ति होऊन, दिव्य संपत्ति आणि समाधान ह्यांचा लाभ होईल. ॥ ६ ॥


उ॒च्छन्त्यां॑ मे यज॒ता दे॒वक्ष॑त्रे॒ रुश॑द्ग॑वि ।
सु॒तं सोमं॒ न ह॒स्तिभि॒रा प॒ड्भिर्धा॑वतं नरा॒ बिभ्र॑तावर्च॒नान॑सम् ॥ ७ ॥

उच्छंत्यां मे यजता देवऽक्षत्रे रुशत्ऽगवि ।
सुतं सोमं अ हस्तिऽभिः आ पट्ऽभिः धावतं नरा बिभ्रतौ अर्चनानसम् ॥ ७ ॥

परमपूज्य देवांनो, प्रभातकाळ होतांच भगवंताचे अधिकार क्षेत्र जे आकाश तेथे आरक्त किरण दृग्गोचर होतांच तुम्ही सोमरसाचे प्राशन करण्याकरितां पायींच धांवत या. हे वीरांनो, तुम्हीच मला लेकराप्रमाणे हातांनी वर उचलून धरीत असतां. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६५ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - रातहव्य आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्


यश्चि॒केत॒ स सु॒क्रतु॑र्देव॒त्रा स ब्र॑वीतु नः ।
वरु॑णो॒ यस्य॑ दर्श॒तः मि॒त्रो वा॒ वन॑ते॒ गिरः॑ ॥ १ ॥

यः चिकेत सः सुऽक्रतुः देवऽत्रा सः ब्रवीतु नः ।
वरुणः यस्य दर्शतः मित्रः वा वनते गिरः ॥ १ ॥

जो विचारी असेल तोच पुरुष कर्तबगारीचा. दर्शनीय वरुणाला अथवा जगन्मित्र देवाला ज्याची सुस्वर स्तोत्रे आवडतात त्यानेच येऊन देवा संबंधाने आमच्याशी बोलावे. ॥ १ ॥


ता हि श्रेष्ठ॑वर्चसा॒ राजा॑ना दीर्घ॒श्रुत्त॑मा ।
ता सत्प॑ती ऋता॒वृध॑ ऋ॒तावा॑ना॒ जने॑जने ॥ २ ॥

ता हि श्रेष्ठऽवर्चसा राजाना दीर्घश्रुत्ऽतमा ।
ता सत्पतीइतिसत्ऽपति ऋतऽवुधा ऋतऽवाना जनेऽजने ॥ २ ॥

तेच अत्यंत पराक्रमी उभयतां देव जगाचे राजे होत; तेच सज्जन प्रतिपालक अशी त्यांची फार दूरवर कीर्ति पसरलेली आहे. सर्वलोकांत सनातन सत्यधर्माचा उत्कर्ष करणारे सनातन धर्म पाळणारे खरोखर काय ते तेच आहेत. ॥ २ ॥


ता वा॑मिया॒नोऽ॑वसे॒ पूर्वा॒ उप॑ ब्रुवे॒ सचा॑ ।
स्वश्वा॑सः॒ सुचे॒तुना॒ वाजाँ॑ अ॒भि प्र दा॒वने॑ ॥ ३ ॥

ता वां इयानः ऽवसे पूर्वौ उप ब्रुवे सचा ।
सुऽअश्वासः सु चेतुना वाजान् अभि प्र दावने ॥ ३ ॥

तुमच्या कृपानुग्रहांसाठी तुमच्यापुढे हात जोडून येऊन, सर्व जगताच्या आधीचे जे तुम्ही त्या तुम्हां उभयतांची मी एकदमच प्रार्थना करतो. सुबुद्धिरूप अश्वसंपन्न असे भक्तजनसुद्धां तुम्ही त्यांस सत्वसामर्थ्यांची देणगी द्यावी म्हणून भक्तिभावाने तुमची विनवणी करीत आहेत. ॥ ३ ॥


मि॒त्रो अं॒होश्चि॒दादु॒रुक्षया॑य गा॒तुं व॑नते ।
मि॒त्रस्य॒ हि प्र॒तूर्व॑तः सुम॒तिरस्ति॑ विध॒तः ॥ ४ ॥

मित्रः अंहो चित् आत् उरु क्षयाय गातुं वनते ।
मित्रस्य हि प्रऽतूर्वतः सुऽमतिः अस्ति विधतः ॥ ४ ॥

हा जगताचा मित्र असा आहे की दुःख व पातक ह्यांच्या राशिंतून सुद्धां अत्युत्तम लोकाच्या मार्गावर तो भाविकांस आणून सोडतो. दुर्जनांचा नायनाट करण्याकरितां पुढें सरसावणार्‍या मित्राची भक्तविषयींची प्रेमबुद्धि ही ह्या प्रमाणे लोकोत्तर आहे. ॥ ४ ॥


व॒यं मि॒त्रस्याव॑सि॒ स्याम॑ स॒प्रथ॑स्तमे ।
अ॒ने॒हस॒स्त्वोत॑यः स॒त्रा वरु॑णशेषसः ॥ ५ ॥

वयं मित्रस्य अवसि स्याम सप्रथःऽतमे ।
अनेहसः त्वाऽऊतयः सत्रा वरुणऽशेषसः ॥ ५ ॥

हे जगत् मित्र, तुझ्या अपार कृपाछत्राखालीच आमचा वास घडो. आम्ही तुम्ह्या रक्षणाखाली म्हणून निर्भय आणि निरंतर तुज वरुणाची लेकरेंच अशा रीतीने राहूं असे घडो. ॥ ५ ॥


यु॒वं मि॑त्रे॒मं जनं॒ यत॑थः॒ सं च॑ नयथः ।
मा म॒घोनः॒ परि॑ख्यतं॒ मो अ॒स्माक॒मृषी॑णां गोपी॒थे न॑ उरुष्यतम् ॥ ६ ॥

युवं मित्रा इमं जनं यतथः सं च नयथः ।
मा मघोनः अरि ख्यतं मोइति अस्माकं ऋषीणां गोऽपीथे नः उरुष्यतम् ॥ ६ ॥

मित्र देवहो, ह्याप्रमाणे तुम्ही मज भक्ताकडून प्रयत्न करवितां आणि तो तडीसही नेतां, तर हे दातृश्रेष्ठहो, आमचा अव्हेर करूं नका, आमच्या ऋषिंचीहि हेळसांड करूं नका, आणि सोमदुग्ध प्राशन प्रसंगी आम्हांला पाप-विमुक्त करा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६६ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - रातहव्य आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - अनुष्टुभ्


आ चि॑कितान सु॒क्रतू॑ दे॒वौ म॑र्त रि॒शाद॑सा ।
वरु॑णाय ऋ॒तपे॑शसे दधी॒त प्रय॑से म॒हे ॥ १ ॥

आ चिकितान सुक्रतूइतिसुऽक्रतू देवौ मर्त रिशादसा ।
वरुणाय ऋतऽपेशसे दधीत प्रयसे महे ॥ १ ॥

बुद्धिमान भाविका, अगाध कर्तृत्वशाली, आणि दुष्टविनाशक जे देव त्यांचा धांवा त्यांना - त्या वरुणाला - त्या सद्धर्मस्वरूप देवाला उत्कृष्ट सुखप्राप्त्यर्थ भक्तिने हव्य अर्पण करा. ॥ १ ॥


ता हि क्ष॒त्रं अवि॑ह्रुतं स॒म्यग॑सु॒र्य॑१माशा॑ते ।
अध॑ व्र॒तेव॒ मानु॑षं॒ स्व॑१र्ण धा॑यि दर्श॒तम् ॥ २ ॥

ता हि क्षत्रं अविऽह्रुतं सम्यक् असुर्यं आशातेइति ।
अध व्रताऽइव मानुषं स्वः ण धायि दर्शतम् ॥ २ ॥

ह्या जगावरचे अविच्छिन्न ईश्वरीप्रभुत्व ते उभयतांहि उत्कृष्ट तऱ्हेने आपल्या ठिकाणी वागवीत आहेत. आणि त्यायोगाने त्यांनी आपल्या विधिनियमाप्रमाणेच हा मानवी लोकही सूर्या सारखा प्रेक्षणीय व आदरणीय बनविला आहे. ॥ २ ॥


ता वा॒मेषे॒ रथा॑नामु॒र्वीं गव्यू॑तिमेषाम् ।
रा॒तह॑व्यस्य सुष्टु॒तिं द॒धृक्स्तोमै॑र्मनामहे ॥ ३ ॥

ता वां एषे रथानां उर्वीं गव्यूतिं एषाम् ।
रातऽहव्यस्य सुऽस्तुतिं दधृक् स्तोमैः मनामहे ॥ ३ ॥

ह्या आमच्या मनोरथांच्या विशाल उद्दिष्टाकडे जातां यावे म्हणून ’रातहव्या’च्या मनोहर स्तुतिंचा स्वीकार करणारे जे तुम्ही त्या तुमचे चिन्तन आम्ही करीत आहो. ॥ ३ ॥


अधा॒ हि काव्या॑ यु॒वं दक्ष॑स्य पू॒र्भिर॑द्‌भु ता ।
नि के॒तुना॒ जना॑नां चि॒केथे॑ पूतदक्षसा ॥ ४ ॥

अध हि काव्या युवं दक्षस्य पूःऽभिः अद्‌भुःता ।
नि केतुना जनानां चिकेथेइति पूतऽदक्षसा ॥ ४ ॥

हे चातुर्यबलाच्या भराने आश्चर्यकारक लीला दाखविणार्‍या देवांनो, तुम्ही खरोखर काव्यरूपच आहांत. पवित्रकार्यांत ज्या तुमचे चातुर्य व्यक्त होते अशा देवांनो, ज्ञानबलानेच तुमचे स्वरूप लक्षांत येते. ॥ ४ ॥


तदृ॒तं पृ॑थिवि बृ॒हच्छ्र॑वए॒ष ऋषी॑णाम् ।
ज्र॒य॒सा॒नावरं॑ पृ॒थ्वति॑ क्षरन्ति॒ याम॑भिः ॥ ५ ॥

तत् ऋतं पृथिवि बृहच् श्रवःऽएषे ऋषीणाम् ।
ज्रयसानौ अरं पृथु अति क्षरंति यामऽभिः ॥ ५ ॥

हे पृथिवी, ऋषींची प्रख्याति होण्यास कारण ते श्रेष्ठ सनातन सत्यच होय. त्यांचे तेज सर्वगामी असून ते महासमर्थ आहेत. आणि म्हणूनच दिव्यविभूति यज्ञार्थ येऊन जलाची वृष्टि करतात. ॥ ५ ॥


आ यद्वा॑मीयचक्षसा॒ मित्र॑ व॒यं च॑ सू॒रयः॑ ।
व्यचि॑ष्ठे बहु॒पाय्ये॒ यते॑महि स्व॒राज्ये॑ ॥ ६ ॥

आ यत् वां ईयऽचक्षसा मित्र वयं च सूरयः ।
व्यचिष्ठे बहुऽपाय्ये यतेमहि स्वऽराज्ये ॥ ६ ॥

हे व्यापकदृष्टि मित्रावरुणांनो, आम्ही आणि आमचे धुरीण यजमान असे सर्व मिळून तुमच्या अमर्याद आणि असंख्यजन सेवित अशा दैवी स्वराज्यांत राहून सत्कार्यरत होऊं असे करा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६७ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - यजत आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - अनुष्टुभ्


बळि॒त्था दे॑वा निष्कृ॒तमादि॑त्या यज॒तं बृ॒हत् ।
वरु॑ण॒ मित्रार्य॑म॒न्वर्षि॑ष्ठं क्ष॒त्रमा॑शाथे ॥ १ ॥

बट् इत्था देवा निःऽकृतं आदित्या यजतं बृहत् ।
वरुण मित्र अर्यमन् वर्षिष्ठं क्षत्रं आशाथेइति ॥ १ ॥

खरोखरच हे आदित्य देवांनो, हे सन्नियामका मित्रा, हे वरुणा, श्रेष्ठ विशुद्ध आणि अत्युत्कृष्ट अशी जी सत्ता तुम्ही स्वतःकरितां राखून ठेविली आहे ती तुम्हांलाच प्राप्त झाली आहे. ॥ १ ॥


आ यद्योनिं॑ हिर॒ण्ययं॒ वरु॑ण॒ मित्र॒ सद॑थः ।
ध॒र्तारा॑ चर्षणी॒नां य॒न्तं सु॒म्नं रि॑शादसा ॥ २ ॥

आ यत् योनिं हिरण्ययं अरुण मित्र सदथः ।
धर्तारा चर्षणीनां यंतं सुम्नं रिशादसा ॥ २ ॥

हे मित्रावरुणहो, जर तुम्ही आज ह्या सुवर्णमय अविनाशी वेदीवर अधिष्ठित झाला आहांत, तर हे लोकप्रतिपालक आणि दुष्टनाशक देवांनो, तुम्ही आम्हांला आनंदपद अर्पण करा. ॥ २ ॥


विश्वे॒ हि वि॒श्ववे॑दसो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।
व्र॒ता प॒देव॑ सश्चिरे॒ पान्ति॒ मर्त्यं॑ रि॒षः ॥ ३ ॥

विश्वे हि विश्ववेदसः वरुणः मित्र अर्यमन् ।
व्रता पदाऽइव सश्चिरे पान्ति मर्त्यं रिषः ॥ ३ ॥

वरुण काय, मित्र काय आणि अर्यमा काय, हे सर्वच पूर्ण सर्वज्ञ आहेत. त्यांचे जे विधिनियम आहेत ते ते स्वतःच अक्षरशः पाळतात आणि भाविकजनांचे हानिपासून संरक्षण करतात. ॥ ३ ॥


ते हि स॒त्या ऋ॑त॒स्पृश॑ ऋ॒तावा॑नो॒ जने॑जने ।
सु॒नी॒थासः॑ सु॒दान॑वोऽहोश्चि॑दुरु॒चक्र॑यः ॥ ४ ॥

ते हि सत्याः ऋतऽस्पृशः ऋतऽवानः जनेऽजने ।
सुऽनीथासः सुऽदानवः अंहोः चित् उरुऽचक्रयः ॥ ४ ॥

ते सत्यस्वरूप आणि सनातन न्यायाला पूर्णपणे अनुसरणारे आहेत. जगांत सद्धर्मप्रिय तेच आहेत. ते सन्मार्गप्रवर्तक, महोदार आणि कोणत्याहि पातकापासून भक्तांस मुक्त करणारे असे आहेत. ॥ ४ ॥


को नु वां॑ मि॒त्रास्तु॑तो॒ वरु॑णः वा त॒नूना॑म् ।
तत् सु वा॒मेष॑ते म॒तिरत्रि॑भ्य॒ एष॑ते म॒तिः ॥ ५ ॥

कः नु वां मित्र अस्तुतः वरुणः वा तनूनाम् ।
तत् सु वां ईषते मतिः अत्रिऽभ्यः ईषते मतिः ॥ ५ ॥

हे मित्रा, हे वरुणा, भक्तांनी स्तवन केले नाही असा तुम्हां उभयतांमध्ये कोणी तरी असेल काय ? कारण तुमच्याकडे आमचे मन वेधून जातेंच, तुम्हांकडे आम्हां अत्रिगोत्रीयांचे मन हटकून वेधतेंच. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६८ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - उरुचक्रि आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्


प्र वो॑ मि॒त्राय॑ गायत॒ वरु॑णाय वि॒पा गि॒रा ।
महि॑क्षत्रबृ॒तं बृ॒हत् ॥ १ ॥

प्र वः मित्राय गायत वरुणाय विपा गिरा ।
महिऽक्षत्रौ ऋतं बृहत् ॥ १ ॥

जगन्मित्राची, वरुणाची, स्वयंस्फूर्तीच्या वाणीने स्तुति करा, त्यांची सत्ता थोर आणि त्यांचे सनातन सत्यहि तसेच थोर आहे. ॥ १ ॥


स॒म्राजा॒ या घृ॒तयो॑नी मि॒त्रश्चो॒भा वरु॑णश्च ।
दे॒वा दे॒वेषु॑ प्रश॒स्ता ॥ २ ॥

संऽराजा या घृतयोनीइतिघृतऽयोनी मित्रः च उभा वरुणः च ।
देवा देवेषु प्रऽशस्ता ॥ २ ॥

ते उभयतां मित्रावरुण विश्वाधिराज आणि दिव्य घृताचे आदिस्थान होत. दिव्य विभूतींत श्रेष्ठ देव तेच. ॥ २ ॥


ता नः॑ शक्तं॒ पार्थि॑वस्य म॒हो रा॒यो दि॒व्यस्य॑ ।
महि॑ वां क्ष॒त्रं दे॒वेषु॑ ॥ ३ ॥

ता नः शक्तं पार्थिवस्य महः रायः दिव्यस्य ।
महि वां क्षत्रं देवेषु ॥ ३ ॥

ते तुम्ही आम्हाला ऐहिक आणि दिव्य असे दोन्ही प्रकारचे ऐश्वर्य अर्पण करा. कारण देवांमध्ये तुमचीच सत्ता मोठी आहे. ॥ ३ ॥


ऋ॒तमृ॒तेन॒ सपं॑तेषि॒रं दक्ष॑माशाते ।
अद्रुहा दे॒वौ व॑र्धेते ॥ ४ ॥

ऋतं ऋतेन सपंता इषिरं दक्षं आशातेइति ।
अद्रुहा देवौ वर्धेतेइति ॥ ४ ॥

सनातन नियमाच्या योगानेंच सनातन धर्माची व्यवस्था लावून तुम्ही आपल्या स्वतःच्या ठिकाणी आवेशयुक्त चरुतस्रपणाचे बळ सांठविले आहे. तेव्हा हे देव, द्वेषरहित बुद्धीनेंच तुम्ही सर्वांचा प्रतिपाळ करीत असतां. ॥ ४ ॥


वृ॒ष्टिद्या॑वा री॒त्यापे॒षस्पती॒ दानु॑मत्याः ।
बृ॒हंतं॒ अर्त॑माशाते ॥ ५ ॥

वृष्टिऽद्यावा रीतिऽआपा इषः पतीइति दानुऽमत्याः ।
बृहंतं अर्तं आशातेइति ॥ ५ ॥

आकाश जलवृष्टिने हे व्याप्त करतात आणि नद्यांना जोराने फोंफावत वहावयास लावतात. ज्याच्या योगाने दातृत्वाची स्फूर्ति होते अशा मनोत्साहाचे प्रभू असे हे उभयतां देव आपल्या भव्य सिंहासनावर विराजमान झाले आहेत. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६९ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - उरुचक्रि आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्


त्री रो॑च॒ना व॑रुण॒ त्रीँरु॒त द्यून्त्रीणि॑ मित्र धारयथो॒ रजां॑सि ।
वा॒वृ॒धा॒नाव॒मतिं॑ क्ष॒त्रिय॒स्यानु॑ व्र॒तं रक्ष॑माणावजु॒र्यम् ॥ १ ॥

त्री रोचना वरुण त्रीन् उत द्यून् त्रीणि मित्र धारयथः रजांसि ।
वावृधानौ अमतिं क्षत्रियस्य अनु व्रतं रक्षमाणौ अजुर्यम् ॥ १ ॥

हे वरुणा, हे जगन्मित्रा, तीन तेजोलोक, तीन प्रकारचे स्वर्गलोक आणि तीन प्रकारचे रजोलोक, तुम्ही धारण केले आहेत. उग्र अशा क्षात्रबलाचा उत्कर्ष तुम्हींच करतां आणि चिरंतन अशा सृष्टि क्रमाचीहि जोपासना तुम्हीच ठेवतां. ॥ १ ॥


इरा॑वतीर्वरुण धे॒नवो॑ वां॒ मधु॑मद्वां॒ सिन्ध॑वो मित्र दुह्रे ।
त्रय॑स्तस्थुर्वृष॒भास॑स्तिसृ॒णां धि॒षणा॑नां रेतो॒धा वि द्यु॒मन्तः॑ ॥ २ ॥

इरावतीः वरुण धेनवः वां मधुऽमत् वां सिन्धवः मित्र दुह्रे ।
त्रयः तस्थुः वृषभासः तिसॄणां धिषणानां रेतःऽधा वि द्युऽमंतः ॥ २ ॥

हे मित्रावरुणहो, तुमच्या धेनू धान्य समृद्धिला आणि तुमच्या आकाशांतील महानद्या मधुररसाला प्रसवतात. तसेच तुमचे हे तेजोमय तीन वृषभ आहेत, ते तिन्ही भुवनांत आपले वीर्य भरून ठेवीत आहेत. ॥ २ ॥


प्रा॒तर्दे॒वीमदि॑तिं जोहवीमि म॒ध्यंदि॑न॒ उदि॑ता॒ सूर्य॑स्य ।
रा॒ये मि॑त्रावरुणा स॒र्वता॒तेळे॑ तो॒काय॒ तन॑याय॒ शं योः ॥ ३ ॥

प्रातः देवीं अदितिं जोहवीमि मध्यंदिने उत्ऽइता सूर्यस्य ।
राये मित्रावरुणा सर्वताता ईळे तोकाय तनयाय शं योः ॥ ३ ॥

मी प्रातःकाळीं, सूर्योदय समयी व माध्यान्हकाळीहि अदिति देवीला आदराने बोलावितो. आणि दिव्यैश्वर्य, पुत्रपौत्र आणि सुखशांति ही प्राप्त होण्याकरितां मित्रावरुणाचे स्तवन तर सर्वकाळ करीत असतो. ॥ ३ ॥


या ध॒र्तारा॒ रज॑सो रोच॒नस्यो॒तादि॒त्या दि॒व्या पार्थि॑वस्य ।
न वां॑ दे॒वा अ॒मृता॒ आ मि॑नन्ति व्र॒तानि॑ मित्रावरुणा ध्रु॒वाणि॑ ॥ ४ ॥

या धर्तारा रजसः रोचनस्य उत आदित्या दिव्या पार्थिवस्य ।
न वां देवाः अमृताः आ मिनंति व्रतानि मित्रावरुणा ध्रुवाणि ॥ ४ ॥

रजोलोक, प्रकाशपूर्ण असा स्वर्गलोक व भूलोक ह्यांना जे धारण करतात ते आदित्य तुम्हीं आहात. तेव्हां हे मित्रावरुणांनो, तुमचे अढळ नियम कोणीहि अमर विभूति कधींहि मोडीत नाहींत. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७० ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - उरुचक्रि आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - गायत्री


पु॒रू॒रुणा॑ चि॒द्ध्यस्त्यवो॑ नू॒नं वां॑ वरुण । मित्र॒ वंसि॑ वां सुम॒तिम् ॥ १ ॥

पुरुऽउरुणा चित् हि अस्ति अवः नूनं वां वरुण । मित्र वंसि वां सुऽमतिम् ॥ १ ॥

तुमच्या कृपेचा ओघ अमर्याद आहे. म्हणून हे मित्रावरुणहो, ती तुमची दयार्द्रबुद्धि आज मजकडे वळो. ॥ १ ॥


ता वां॑ स॒म्यग॑द्रुह्वा॒णेषं॑ अश्याम॒ धाय॑से । व॒यं ते रु॑द्रा स्याम ॥ २ ॥

ता वां सम्यक् अद्रुह्वाणा इषं अश्याम धायसे । वयं ते रुद्रा स्याम ॥ २ ॥

द्वेषबुद्धिरहित देवांनो, आम्हीं तृप्त व्हावे म्हणून तुमच्या दैवी आवेशाचा लाभ आम्हांस उत्तम रीतीने घडेल असे करा. हे रुद्र स्वरूप देवांनो, आम्हांस आपले म्हणा. ॥ २ ॥


पा॒तं नो॑ रुद्रा पा॒युभि॑रु॒त त्रा॑येथां सुत्रा॒त्रा । तु॒र्याम॒ दस्यू॑न्त॒नूभिः॑ ॥ ३ ॥

पातं नः रुद्रा पायुऽभिः उत त्रायेथां सुऽत्रात्रा । तुर्याम दस्यून् तनूभिः ॥ ३ ॥

रुद्रस्वरूप देवांनो, आपल्या सेवकाकरवी आमचे रक्षण करा. हे सुसंरक्षक देवांनो, आमचा सांभाळ करा. आणि आम्ही स्वतः अधार्मिक दुष्टावर मात करावी असे करा. ॥ ३ ॥


मा कस्या॑द्‌भु॒तक्रतू य॒क्षं भु॑जेमा त॒नूभिः॑ । मा शेष॑सा॒ मा तन॑सा ॥ ४ ॥

मा कस्य अद्‌भुातक्रतूइतिअद्‌भु त्ऽक्रतू यक्षं भुजेमा तनूभिः । मा शेषसा मा तनसा ॥ ४ ॥

ज्या तुमची कर्तृत्वशक्ति अलौकिक आहे अशा देवांनो, आम्ही स्वतः किंवा आमचे आप्त किंवा आमचे वंशज असे दुसर्‍याच्या धर्मकृत्यावर आपला चरितार्थ चालवूं असे होऊं देऊं नका. ॥ ४ ॥


ॐ तत् सत्


GO TOP