PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३१ ( इंद्र सूक्त )

ऋषी - अवस्यु आत्रेय : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


इन्द्रो॒ रथा॑य प्र॒वतं॑ कृणोति॒ यं अ॒ध्यस्था॑न्म॒घवा॑ वाज॒यन्त॑म् ।
यू॒थेव॑ प॒श्वो व्युनोति गो॒पा अरि॑ष्टो याति प्रथ॒मः सिषा॑सन् ॥ १ ॥

इन्द्रः रथाय प्रऽवत कृणोति यं अधिऽअस्थान् मघऽवा वाजयन्तम् ।
यूथाऽइव पश्वः वि उनोति गोपा अरिष्टः याति प्रथमः सिसासन् ॥ १ ॥

पहा इंद्राने आपला रथ - ज्या युद्धोत्सुक रथावर तो ऐश्वर्यसंपन्न भगवान् आरूढ होतो तो रथ - त्याने खाली भूलोकांकडे होराने हांकला आहे, आणि एखादा पशुपाल जसा आपल्या खिल्लाराच्या पुढे होऊन त्याला उत्तेजन देऊन पुढे हांकून नेतो, त्याप्राणे इंद्र, ज्याला शस्त्रांचा घांव लागणेच अशक्य असा इंद्र, विजयश्री साधण्याकरिता सर्वांच्या आघाडीस झाला आहे. ॥ १ ॥


आ प्र द्र॑व हरिवो॒ मा वि वे॑नः॒ पिश॑ङ्‌ग्राते अ॒भि नः॑ सचस्व ।
न॒हि त्वदि॑न्द्र॒ वस्यो॑ अ॒न्यदस्त्य॑मे॒नांश्चि॒ज्जनि॑वतश्चकर्थ ॥ २ ॥

आ प्र द्रव हरिऽवः मा वि वेनः पिशङ्‌गषऽराते अभि नः सचस्व ।
नहि त्वत् इन्द्र वस्यः अन्यत् अस्ति अमेनान् चित् जनिऽवतः चकर्थ ॥ २ ॥

इंद्रा, तू त्वरेने धांव घे, हरिदश्वनायका, रुष्ट होऊं नको, भक्तांना सहस्रावधि देणग्या देणार्‍या हे भगवंता आमच्या अगदी जवळ ऐस. इंद्रा, तुझ्यावांचून अथवा तुझ्यापेक्षा उत्कृष्ट असा दुसरा पदार्थच नाही. आणि जे जे भक्त स्त्रिसुखरहित होते, त्यांची लग्ने लावून त्या सर्वांना तू सुंदर वनिता प्राप्त करून दिल्यास. ॥ २ ॥


उद्यत्सहः॒ सह॑स॒ आज॑निष्ट॒ देदि॑ष्ट॒ इन्द्र॑ इन्द्रि॒याणि॒ विश्वा॑ ।
प्राचो॑दयत्सु॒दुघा॑ व॒व्रे अ॒न्तर्वि ज्योति॑षा संववृ॒त्वत्तमो॑ऽवः ॥ ३ ॥

उत् यत् सहः सहसः आ अजनिष्ट देदिष्टे इन्द्रः इन्द्रियाणि विश्वा ।
प्र अचोदयत् सुऽदुघाः वव्रे अन्तः वि ज्योतिषा संऽववृत्वत् तमः अवरित्यवः ॥ ३ ॥

एका झुंझारबलापासून दुसरे तसेच झुंझारबल निर्माण झाले अशा हातघाईच्या वेळेस इंद्रानेही आपले अलोट ईश्वरी सामर्थ्य प्रकट केलेले आहे. अथांग खोल गुहेंतून त्याने अमृतस्रविणी धेनू बाहेर आणली, आणि जगाला झांकून टाकणार्‍या तिमिराचा आपल्या उज्वल दीप्तीनें विध्वंस केला. ॥ ३ ॥


अन॑वस्ते॒ रथ॒मश्वा॑य तक्ष॒न्त्वष्टा॒ वज्रं॑ पुरुहूत द्यु॒मन्त॑म् ।
ब्र॒ह्माण॒ इन्द्रं॑ म॒हय॑न्तो अ॒र्कैरव॑र्धय॒न्नह॑ये॒ हन्त॒वा उ॑ ॥ ४ ॥

अनवः ते रथं अश्वाय तक्षन् त्वष्टा वज्रं पुरुऽहूत द्युऽमंतम् ।
ब्रह्माणः इंद्रं महयंतः अर्कैः अवर्धयन् अहये हन्तवै ऊंइति ॥ ४ ॥

तुझ्या रथाकरितां "अनु" कुलोत्पन्न शूरांनी रथ सिद्ध केला. हे सर्वजन संसेव्या देवा, त्वष्ट्याने तुझ्याकरता झगझगीत वज्र तयार केले. हे इंद्रा, ब्रह्मज्ञ कविंनी "अर्क" स्तोत्रांनी तुझे यशोवर्णन करून "अहि" भुजंगाला ठार मारण्याकरितां तुला आनंदाने वृद्धिंगत केले. ॥ ४ ॥


वृष्णे॒ यत्ते॒ वृष॑णो अ॒र्कमर्चा॒निन्द्र॒ ग्रावा॑णो॒ अदि॑तिः स॒जोषाः॑ ।
अ॒न॒श्वासो॒ ये प॒वयो॑ऽर॒था इन्द्रे॑षिता अ॒भ्यव॑र्तन्त॒ दस्यू॑न् ॥ ५ ॥

वृष्णे यत् ते वृषणः अर्कं अर्चान् इंद्र ग्रावाणः अदितिः सऽजोषाः ।
अनश्वासः ये पवयः अरथा इन्द्रऽइषिताः अभि अवर्तन्त दस्यून् ॥ ५ ॥

वीरांनी, सोमपाषाणांनी आणि प्रेमळ आदितीने, हे इंद्रा तुज वीराला उत्साह येण्याकरिता "अर्क" स्तोत्र गंभीर सुरांत म्हटले, त्या वेळेस, आमच्या कांही सैनिकांजवळ घोडे नव्हते, कांहींच्या रथाला धांवा होत्या पण कांहींना तर रथसुद्धा नव्हते, तथापि हे सर्व इंद्राच्या प्रेरणेने मोठ्या आवेशाने त्या धर्महीन पाखांड्यांवर तुटून पडले. ॥ ५ ॥


प्र ते॒ पूर्वा॑णि॒ कर॑णानि वोचं॒ प्र नूत॑ना मघव॒न्या च॒कर्थ॑ ।
शक्ती॑वो॒ यद्वि॒भरा॒ रोद॑सी उ॒भे जय॑न्न॒पो मन॑वे॒ दानु॑चित्राः ॥ ६ ॥

प्र ते पूर्वाणि करणानि वोचं प्र नूतना मघऽवन् या चकर्थ ।
शक्तिऽवः यत् विऽभराः रोदसीइति उभेइति जयन् अपः मनवे दानुऽचित्राः ॥ ६ ॥

तू पुरातन काळी केलेली लोकोत्तर कृत्ये आणि हे ऐश्वर्यवंता देवा तू अगदी अलीकडे जी पराक्रमाची कृत्ये केलीस ती, ह्या सर्वांचे वर्णन मी यथाशक्ति करीनच. कारण हे अमानुषशक्तीच्या प्रभो देवा, आकाश आणि पृथिवी ह्या उभयतांना एकमेकांपासून अलग अशा रीतीने आकाशंतील उदकें मनुष्याच्या कल्याणाकरितां जिंकून आपल्या कह्यांत आणली आहेस. ॥ ६ ॥


तदिन्नु ते॒ कर॑णं दस्म वि॒प्राहिं॒ यद्घ्नन्नोजो॒ अत्रामि॑मीथाः ।
शुष्ण॑स्य चि॒त्परि॑ मा॒या अ॑गृभ्णाः प्रपि॒त्वं यन्नप॒ दस्यूँ॑रसेधः ॥ ७ ॥

तत् इत् नु ते करणं दस्म विप्र अहिं यत् घ्नन् ओजः अत्र अमिमीथाः ।
शुष्णस्य चित् परि मायाः अगृभ्णाः प्रऽपित्वं यन् अप दस्यून् असेधः ॥ ७ ॥

हे अद्‍भुतचारित्र्या, हे ज्ञानशीला, तू अहिचा वध करून आपल्या आंगची तेजस्विता येथे निदर्शनास आणलीस हे सुद्धा तुझे एक महत्कृत्य होय. शुष्णाच्या सर्व कपटजालांना तू पुरून उरलास, आणि एकदम हल्ला करून धर्महीन दस्यूंचा फडशा उडवून दिलास. ॥ ७ ॥


त्वम॒पो यद॑वे तु॒र्वशा॒यार॑मयः सु॒दुघाः॑ पा॒र इ॑न्द्र ।
उ॒ग्रम॑यात॒मव॑हो ह॒ कुत्सं॒ सं ह॒ यद्वा॑मु॒शनार॑न्त दे॒वाः ॥ ८ ॥

त्वं अपः यदवे तुर्वशाय अरमयः सुऽदुघाः पार इन्द्र ।
उग्रं अयातं अवहः ह कुत्सं सं ह यत् वां उशना अरत देवाः ॥ ८ ॥

पैल तीरावर असलेले यदु आणि तुर्वश ह्यांच्याकरिता तू "सुदुधा"नांवाच्या नदीचे खळाळणारे पाणी स्तब्ध केलेस, नंतर घोर राक्षसावर तुम्ही दोघे धांवून गेलां, आणि देव व उशना असे मिळून तुमच्याकडे निघून आले त्यावेळेस तू कुत्साला नीट जपून आणले होतेसच. ॥ ८ ॥


इन्द्रो॑कुत्सा॒ वह॑माना॒ रथे॒ना वा॒मत्या॒ अपि॒ कर्णे॑ वहन्तु ।
निः षी॑म॒द्‌भ्योो धम॑थो॒ निः ष॒धस्था॑न्म॒घोनो॑ हृ॒दो व॑रथ॒स्तमां॑सि ॥ ९ ॥

इन्द्राकुत्सा वहमाना रथेन वां अत्याः अपि कर्णे वहन्तु ।
निः सीं अत्भ्यःः धमथः निः सधऽस्थान् मघोनः हृदः वरथः तमांसि ॥ ९ ॥

हे इंद्रा, हे कुत्सा तुम्ही उभयतां रथांत वसून निघाला आहांत तर तुमचे चलाख घोडे तुम्हांला हांकेच्या अंतरावर घेऊन येवोत. तुम्ही अंधकाराला दिव्य उदकांपासून फुंकरासरशी दूर उडवून दिलेंत, देवांचे निवासस्थान आकाश त्या आकाशांतूनहि फुंकून दिलेंत, आणि दानशूर सज्जनांच्या हृदयांतील चिंतारूप तमोपटलाचा संहार केलात. ॥ ९ ॥


वात॑स्य यु॒क्तान्सु॒युज॑श्चि॒दश्वा॑न्क॒विश्चि॑दे॒षो अ॑जगन्नव॒स्युः ।
विश्वे॑ ते॒ अत्र॑ म॒रुतः॒ सखा॑य॒ इन्द्र॒ ब्रह्मा॑णि॒ तवि॑षीमवर्धन् ॥ १० ॥

वातस्य युक्तान् सुऽयुजः चित् अश्वान् कविः चित् एषः अजगन् अवस्युः ।
विश्वे ते अत्र मरुतः सखायः इन्द्र ब्रह्माणि तविषीं अवर्धन् ॥ १० ॥

हा कविजन प्रसाद प्राप्तीच्य इच्छेने वायूच्या, तुझ्या वायुरूप रथाला जोडल्या व सुयंत्र चालणार्‍या अश्वांच्या जवळ प्राप्त झाला आहे, ह्या ठिकाणी इंद्रा, तुझे प्राणमित्र जे मरुत् गण त्या सर्वांच्या "ब्रह्म" स्तोत्रांनी तुझा धाडसी स्वभाव वृद्धिंगत झाला आहे. ॥ १० ॥


सूर॑श्चि॒द्रथं॒ परि॑तक्म्यायां॒ पूर्वं॑ कर॒दुप॑रं जूजु॒वांस॑म् ।
भर॑च्च॒क्रमेत॑शः॒ सं रि॑णाति पु॒रः दध॑त्सनिष्यति॒ क्रतुं॑ नः ॥ ११ ॥

सूरः चित् रथं परिऽतक्म्यायां पूर्वं करत् उपरं जूजुऽवांसम् ।
भरत् चक्रं एतशः सं रिणाति पुरः दधत् सनिष्यति क्रतुं नः ॥ ११ ॥

जगास चिंतातूर करणारी रात्र पडली आतां, सूर्य मागे रेंगाळत पडलेला आपला रथ मोठ्या त्वरेने चालवून पुढें काढील. एतश त्याच्य चाकाला नेट देऊन फिरवून देईल; आणि त्या रथाला आमच्या समोर आणून आम्हाला बुद्धि-सामर्थ्य देईल. ॥ ११ ॥


आयं ज॑ना अभि॒चक्षे॑ जगा॒मेन्द्रः॒ सखा॑यं सु॒तसो॑ममि॒च्छन् ।
वद॒न्ग्रावाव॒ वेदिं॑ भ्रियाते॒ यस्य॑ जी॒रम॑ध्व॒र्यव॒श्चर॑न्ति ॥ १२ ॥

आयं जनाः अभिऽचक्षे जगाम इन्द्रः सखायं सुतऽसोमं इच्छन् ।
वदन् ग्रावा अव वेदिं भ्रियाते यस्य जीरं अध्वर्यवः चरन्ति ॥ १२ ॥

जनहो, हा पहा इंद्र तुम्हाला दर्शन देण्याकरता आला. आपणाकरितां कोणत्या भक्ताने सोमरस तयार केला आहे त्या भक्तास पहाण्याला तो फार उत्सुक झाला आहे. मधुर निनाद करणारा ग्रावा वेदीवर नेऊन ठेवला असून आतां अध्वर्यु त्या ग्राव्याचा फिरण्याचा वेग जास्तच करूं लागले आहेत. ॥ १२ ॥


ये चा॒कन॑न्त चा॒कन॑न्त॒ नू ते मर्ता॑ अमृत॒ मो ते अंह॒ आर॑न् ।
वा॒व॒न्धि यज्यूँ॑रु॒त तेषु॑ धे॒ह्योजो॒ जने॑षु॒ येषु॑ ते॒ स्याम॑ ॥ १३ ॥

ये चाकनन्त चाकनन्त नु ते मर्ताः अमृत मोइति ते अंहः आ अरन् ।
वावन्धि यज्यून् उत तेषु धेहि ओजः जनेषु येषु ते स्याम ॥ १३ ॥

जे बिचारे आनंदांत आहेत, ते तसेच आनंदात राहोत. हे अमर भगवंता, त्या मर्त्य जनांना पातकाचा, दुःखाचा स्पर्शहि होऊ नये. यज्ञद्वारा तुझी सेवा करणार्‍या भक्तांवर प्रेम कर. अशा भक्तमंडळात तू तेजस्विता ठेव आणि आमचीहि गणना होईल असे कर. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३२ ( इंद्र सूक्त )

ऋषी - गातु आत्रेय : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अद॑र्द॒रुत्स॒मसृ॑जो॒ वि खानि॒ त्वम॑र्ण॒वान्ब॑द्ब्धा॒नाँ अ॑रम्णाः ।
म॒हान्त॑मिन्द्र॒ पर्व॑तं॒ वि यद्वः सृजः वि धारा॒ अव॑ दान॒वं ह॑न् ॥ १ ॥

अदर्दः उत्सं असृजः वि खानि त्वं अर्णवान् बद्‍बधानान् अरम्णाः ।
महान्तं इन्द्र पर्वतं वि यत् वरितिवः सृजः वि धारा अव दानवं हन्नितिहन् ॥ १ ॥

तू ज्ञानमृताचा बुजलेला झरा, त्याचे झांकण फोडून खुला केलस, मोकळे सोडलेस, कोंडल्यामुळे प्रक्षुब्ध झालेला समुद्र शांत केलास; प्रचंड पर्वत अथवा मेघ तूं उघडलास आणि त्यातून पर्जन्याची मुसळधार पृथीवर सोडलीस, त्या दुष्ट दानवाचा निःपात केलास त्या वेळेसच हे सर्व चमत्कार तू केलेस. ॥ १ ॥


त्वमुत्साँ॑ ऋ॒तुभि॑र्बद्बतधा॒नाँ अरं॑ह॒ ऊधः॒ पर्व॑तस्य वज्रिन् ।
अहिं॑ चिदुग्र॒ प्रयु॑तं॒ शया॑नं जघ॒न्वाँ इ॑न्द्र॒ तवि॑षीमधत्थाः ॥ २ ॥

त्वं उत्सान् ऋतुऽभिः बद्‍बधानान् अरंहः ऊधः पर्वतस्य वज्रिन् ।
अहिं चित् उग्र प्रऽयुतं शयानं जघन्वान् इन्द्र तविषीं अधत्थाः ॥ २ ॥

वसंत इत्यादि ऋतुंसहित अमृताचे निर्झर डांबून बंद करून टाकले होते त्यांना तू बंधमुक्त केलेस आणि हे वज्रधरा मेघरूप धेनूची कांस वाहती केलीस. राधेरूप इंद्रा, ऐसपैस पसरलेल्या अहि भुजंगाला निर्दळून टाकून आपले अलौलिक धाडस तू व्यक्त केलेस. ॥ २ ॥


त्यस्य॑ चिन्मह॒तो निर्मृ॒गस्य॒ वध॑र्जघान॒ तवि॑षीभि॒रिन्द्रः॑ ।
य एक॒ इद॑प्र॒तिर्मन्य॑मान॒ आद॑स्माद॒न्यो अ॑जनिष्ट॒ तव्या॑न् ॥ ३ ॥

त्यस्य चिन् महतः निः मृगस्य वधः जघान तविषीभिः इन्द्रःः ।
यः एकः इत् अप्रतिः मन्यमानः आत् अस्मात् अन्यः अजनिष्ट तव्यान् ॥ ३ ॥

त्या पशुतुल्य प्रचंड दानवाचे हत्यार इंद्राने रट्ट्यासरशी मोडून खाली पाडले. ह्या प्रमाणे जो राक्षस आपण स्वतः बिनजोड आहोत अशा घमेंडीत होता, त्याला शेवटी इंद्र हा शेरास सव्वाशेर भेटलाच. ॥ ३ ॥


त्यं चि॑देषां स्व॒धया॒ मद॑न्तं मि॒हो नपा॑तं सु॒वृधं॑ तमो॒गाम् ।
वृष॑प्रभर्मा दान॒वस्य॒ भामं॒ वज्रे॑ण व॒ज्री नि ज॑घान॒ शुष्ण॑म् ॥ ४ ॥

त्यं चित् एषां स्वधया मदन्तं मिहः नपातं सुऽवृधं तमःऽगाम् ।
वृषऽप्रभर्मा दानवस्य भामं वज्रेण वज्री नि जघान शुष्णम् ॥ ४ ॥

जो ह्या देवांच्या पद्धतीप्रमाणे हविरन्न खाऊन तुंद झाला होता, ज्याने जिकडे तिकडे इतके धुके पसरून दिले होते कीं त्याचा तो जणुं पोशिंदाच ठरला. तो अहि राक्षस प्रशस्त माजलेला असून गडद अंधकारांत दबा धरून बसला होता, तर अशा बलाढ्य राक्षसाचा क्रोध आणि शुष्ण दानव अशा सर्वांना वज्रधर इंद्राने, त्या मेघ प्रेरक देवानें, आपल्या वज्राने निपटून टाकले. ॥ ४ ॥


त्यं चि॑दस्य॒ क्रतु॑भि॒र्निष॑त्तमम॒र्मणो॑ वि॒ददिद॑स्य॒ मर्म॑ ।
यदीं॑ सुक्षत्र॒ प्रभृ॑ता॒ मद॑स्य॒ युयु॑त्सन्तं॒ तम॑सि ह॒र्म्ये धाः ॥ ५ ॥

त्यं चित् अस्य क्रतुऽभिः निऽसत्तं अमर्मणः विदत् इत् अस्य मर्म ।
यत् ईंसुऽक्षत्र प्रऽभृता मदस्य युयुत्सन्तं तमसि हर्म्ये धाः ॥ ५ ॥

त्या राक्षसाला मर्मस्थान नव्हतेच, किंवा असल्यास ते अगदी खोल होते; तेव्हां अशा दुरात्म्याचे मर्म तू आपल्या चतुराईने अचुक हुडकून काढलेस म्हणावयाचे कारण असे कीं, हे वीरोत्तमा इंद्रा तुझ्यापाशी लढणार्‍या त्या दैत्यास तू युद्धोत्साहाच्या भर रंगात येऊन अंधार नगरीत कायमचेच नेऊन टाकलेस. ॥ ५ ॥


त्यं चि॑दि॒त्था क॑त्प॒यं शया॑नमसू॒र्ये तम॑सि वावृधा॒नम् ।
तं चि॑न्मन्दा॒नो वृ॑ष॒भः सु॒तस्यो॒च्चैरिन्द्रो॑ अप॒गूर्या॑ जघान ॥ ६ ॥

त्यं चित् इत्था कत्पयं शयानं असूर्ये तमसि ववृधानम् ।
तं चिन् मन्दानः वृषभः सुतस्य उच्चैः इन्द्रः अपऽगूर्या जघान ॥ ६ ॥

सूर्याचे किरण जेथे येऊच शकत नव्हते अशा निबिड काळोखात तो दुष्ट मस्त होऊन खुशाल मजेने पसरलेला होता. अशावेळेस सोमरसाने हर्षभरीत होऊन जो वीर पुंगव इंद्र, मोठ्याने गर्जना करून त्याला टाकून बोलला आणि शेवटी त्याने त्या राक्षसाला ठार केले. ॥ ६ ॥


उद्यदिन्द्रो॑ मह॒ते दा॑न॒वाय॒ वध॒र्यमि॑ष्ट॒ सहो॒ अप्र॑तीतम् ।
यदीं॒ वज्र॑स्य॒ प्रभृ॑तौ द॒दाभ॒ विश्व॑स्य ज॒न्तोर॑ध॒मं च॑कार ॥ ७ ॥

उत् यत् इन्द्रः महते दानवाय वधः यमिष्ट सहः अप्रतिऽइतम् ।
यत् ईं वज्रस्य प्रऽभृतौ ददाभ विश्वस्य जन्तोः अधमं चकार ॥ ७ ॥

इंद्राने त्या अधम दानवाचा वध करण्याकरितां आपले हत्यार उगारले. आपले अप्रतिम युद्ध सामर्थ्य खर्च केले, आणि वज्राची फेक मारून शत्रूला तडाखा दिला त्याचवेळेस यच्चावत् जीवजंतुपेक्षाहि तो दुष्ट राक्षस नीच ठरला होता. ॥ ७ ॥


त्यं चि॒दर्णं॑ मधु॒पं शया॑नमसि॒न्वं व॒व्रं मह्याद॑दु॒ग्रः ।
अ॒पाद॑म॒त्रं म॑ह॒ता व॒धेन॒ नि दु॑र्यो॒ण आ॑वृणङ्मृ॒यध्रवा॑चम् ॥ ८ ॥

त्यं चित् अर्णं मधुऽपं शयानं असिन्वं वव्रं महि आदत् उग्रः ।
अपादं अत्रं महता वधेन नि दुर्योणे आवृणक्‍ मृध्रऽवाचम् ॥ ८ ॥

त्या खवळलेल्या परंतु मधुररस पिऊन पसरलेल्या त्या जबरदस्त भुजंगाचे नरडे त्या रौद्रस्वरूप इंद्राने धरले. आणि प्राण्यांना गट्ट करून टाकणार्‍या त्या भुजंग देह राक्षसाला, सज्जनांना शिवीगाळ करणार्‍या त्या दुष्टाचा, त्याच्याच घरात शिरून आपल्या प्रचंड वज्राने चुराडा करून टाकला. ॥ ८ ॥


को अ॑स्य॒ शुष्मं॒ तवि॑षीं वरात॒ एको॒ धना॑ भरते॒ अप्र॑तीतः ।
इ॒मे चि॑दस्य॒ ज्रय॑सो॒ नु दे॒वी इन्द्र॒स्यौज॑सः भि॒यसा॑ जिहाते ॥ ९ ॥

कः अस्य शुष्मं तविषीं वराते एकः धना भरते अप्रतीऽइतः ।
इमेइति चित् अस्य ज्रयसः नु देवीइति इन्द्रस्य ओजसः भियसा जिहातेइति ॥ ९ ॥

ह्या इंद्राच्या प्रखरप्रतापाला आणि धाडसाला कोणीतरी प्रतिबंध करूं शकेल काय ? अनिवार्य प्रभु एकटाच सर्व धनसंपत्ति हस्तगत करून घेतो. ह्या द्यावापृथिवीरूप देवीसुद्धा त्याच्या धौशापुढे, ह्या इंद्राच्या तेजापुढे, भितीने अगदी नम्र होतात. ॥ ९ ॥


न्यस्मै दे॒वी स्वधि॑तिर्जिहीत॒ इन्द्रा॑य गा॒तुरु॑श॒तीव॑ येमे ।
सं यदोजो॑ यु॒वते॒ विश्व॑माभि॒रनु॑ स्व॒धाव्ने॑ क्षि॒तयो॑ नमन्त ॥ १० ॥

नि अस्मै देवी स्वऽधितिः जिही ते इन्द्राय गातुः उशतीऽइव येमे ।
सं यत् ओजः युवते विश्वं आभिः अनु स्वधाऽव्ने क्षितयः नमन्त ॥ १० ॥

ही आकाशाची कुऱ्हाड पहा ना ? ती विद्युल्लता देवीहि इंद्रापुढे लवते, ही भ्रमण करणारी पृथिवीसुद्धां काम विव्हल सुंदरीप्रमाणे त्याच्यापुढे दीन होते. जीवांत जेवढी म्हणून तेजस्विता आढळते तेवढी सर्व हा इंद्रच देतो. त्य स्वतंत्रशक्ति ईश्वरापुढे सर्व लोक साष्टांग प्रणिपात करतात. ॥ १० ॥


एकं॒ नु त्वा॒ सत्प॑तिं॒ पाञ्च॑जन्यं जा॒तं शृ॑णोमि य॒शसं॒ जने॑षु ।
तं मे॑ जगृभ्र आ॒शसो॒ नवि॑ष्ठं दो॒षावस्तो॒र्हव॑मानास॒ इन्द्र॑म् ॥ ११ ॥

एकं नु त्वा सत्ऽपतिं पाञ्चऽजन्यं जातं शृणोमि यशसं जनेषु ।
तं मे जगृभ्रे आऽशसः नविष्ठं दोषा वस्तोः हवमानासः इन्द्रम् ॥ ११ ॥

पांचहि मानवीवंशाचा तूच एकटा जगद्विख्यात, सर्वोत्कृष्ट प्रभु अवतीर्ण झाला आहेस असे मी सुद्धा ऐकतो. आणि सकाळ संध्याकाळ इंद्राचा धांवा करतांना माझ्या मनोवृत्तिंनी ही गोष्ट अपूर्वाने आपल्या स्वतःशी अगदी घट्ट धरून ठेवली आहे. ॥ ११ ॥


ए॒वा हि त्वामु॑तु॒था या॒तय॑न्तं म॒घा विप्रे॑भ्यो॒ दद॑तं शृ॒णोमि॑ ।
किं ते॑ ब्र॒ह्माणो॑ गृहते॒ सखा॑यो॒ ये त्वा॒या नि॑द॒धुः काम॑मिन्द्र ॥ १२ ॥

एव हि त्वां ऋतुऽथा यातयन्तं मघा विप्रेभ्यः ददतं शृणोमि ।
किं ते ब्रह्माणः गृहते सखायः ये त्वाऽया निऽदधुः कामं इन्द्र ॥ १२ ॥

शिवाय तू वेळच्यावेळी भक्तांना उद्योगात व्यापृत करतोस, आणि तुझे स्तवन करणार्‍या विप्रांना नानाप्रकारच्या देणग्या देतोस असेहि मी ऐकतो. तर मग, तुला शरण येऊन व तुझ्या ठिकाणीच ज्यांनी आपली सर्व आकांक्षा ठेविली, त्या प्रार्थनासूक्ते म्हणणार्‍या स्नेहाळू भक्तांना तुझ्याकडून काय काय मिळाले, ते सांगशील काय ? ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३३ ( इंद्र सूक्त )

ऋषी - संवरण प्राजापत्य आत्रेय : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


महि॑ म॒हे त॒वसे॑ दीध्ये॒ नॄनिन्द्रा॑ये॒त्था त॒वसे॒ अत॑व्यान् ।
यो अ॑स्मै सुम॒तिं वाज॑सातौ स्तु॒तो जने॑ सम॒र्यश्चि॒केत॑ ॥ १ ॥

महि महे तवसे दीध्ये नॄन् इंद्राय इत्थ तवसे अतव्यान् ।
यः अस्मै सुऽमतिं वाजऽसातौ स्तुतः जने समऽर्यः चिकेत ॥ १ ॥

खरोखरच मी दुर्बल पडलो, तेव्हा अंगात धमक यावी म्हणून पहा प्रबल अशा इंद्रदेवाप्रीत्यर्थ मी उत्कृष्ट स्तोत्राच्या अनुरोधाने एकाग्र मनाने ध्यान करतो, व माझ्या शूर सैनिकांचा माथा उजळ करतो. जनसमाजात त्याचे स्तवन केले असतां तो रणशूर देव, सत्वसामर्थ्य प्राप्तीच्या खटपटीत मजसारख्या पामराकरिता सद्‍बुद्धिचा मार्ग स्पष्टपणें प्रकाशित करो. ॥ १ ॥


स त्वं न॑ इन्द्र धियसा॒नो अ॒र्कैर्हरी॑णां वृष॒न्योक्त्र॑मश्रेः ।
या इ॒त्था म॑घव॒न्ननु॒ जोषं॒ वक्षो॑ अ॒भि प्रार्यः स॑क्षि॒ जना॑न् ॥ २ ॥

सः त्वं नः इंद्र धियसानः अर्कैः हरीणां वृषन् योक्त्रं अश्रेः ।
याः इत्था मघऽवन् अनु जोषं वक्षः अभि प्र अर्यः सक्षि जनान् ॥ २ ॥

हे इंद्रा, आमच्या ’अर्क’ स्तोत्रांच्या योगाने तुझे चित्त तन्मय झाले म्हणजे हे वीरपुंगवा, आपल्या हरिद्वर्ण अश्वांचा लगाम तू हाती घेतोस, आणि हे भगवंता तू आपल्या खुषीने त्या अश्वांना आमच्याकडे घेऊन ये व आमचा नायक म्हणून सैनिकांच्या पाठीवर रहा. ॥ २ ॥


न ते त॑ इन्द्रा॒भ्य॑१स्मदृ॒ष्वायु॑क्तासो अब्र॒ह्मता॒ यदस॑न् ।
तिष्ठा॒ रथ॒मधि॒ तं व॑ज्रह॒स्ता र॒श्मिं दे॑व यमसे॒ स्वश्वः॑ ॥ ३ ॥

न ते ते इंद्र अभि अस्मत् ऋष्व अयुक्तासः अब्रह्मता यत् असन् ।
तिष्ठ रथं अधि तं वज्रऽहस्त रश्मिं देव यमसे सुऽअश्वःः ॥ ३ ॥

इंद्रा, तुझे ते घोडे आमच्याकडे वळलेले दिसत नाहीत. हे परमश्रेष्ठा, मग काय आमच्या स्तोत्र विमुखतेमुळे त्यांना तू जोडलेसच नाहीस ? देवा असे करू नको, हे वज्रधरा आपल्या त्या रथावर आरोहण कर आणि आपल्या खंद्या घोड्यांची अनीन हाती घे. ॥ ३ ॥


पु॒रू यत्त॑ इन्द्र॒ सन्त्यु॒क्था गवे॑ च॒कर्थो॒र्वरा॑सु॒ युध्य॑न् ।
त॒त॒क्षे सूर्या॑य चि॒दोक॑सि॒ स्वे वृषा॑ स॒मत्सु॑ दा॒सस्य॒ नाम॑ चित् ॥ ४ ॥

पुरू यत् ते इंद्र संति उक्था गवे चकर्थ उर्वरासु युध्यन् ।
ततक्षे सूर्याय चित् ओकसि स्वे वृषा समत्ऽसु दासस्य नाम चित् ॥ ४ ॥

भक्तांना प्रकाश धेनू प्राप्त व्हावी म्हणून त्या सुपीक समृद्ध प्रदेशात शत्रूंशी युद्ध करून तूं आपली शर्थ केलीस तेव्हां इंद्रा तुझे पोवाडे अगणित झाले. ह्यात काय नवल ? पहा ह्या कामवर्षक वीराने सूर्याकरिता त्याच्या आकाशरूप गृहात जो एक रानटी मनुष्यासारखा काळाकुट्ट आकार बनविला आहे तो काय युद्धामध्ये बनविला की काय कोण जाणे. ॥ ४ ॥


व॒यं ते त॑ इन्द्र॒ ये च॒ नरः॒ शर्धो॑ जज्ञा॒ना या॒ताश्च॒ रथाः॑ ।
आस्माञ्ज॑गम्या दहिशुष्म॒ सत्वा॒ भगो॒ न हव्यः॑ प्रभृ॒थेषु॒ चारुः॑ ॥ ५ ॥

वयं ते ते इंद्र ये च नरः शर्धः जज्ञाना याताः च रथाः ।
आस्मान् जगम्यात् अहिऽशुष्म सत्वा भगः न हव्यः प्रऽभृथेषु चारुः ॥ ५ ॥

इंद्रा आम्ही आहोत ते तुझे म्हणून आहोत. तुझा दळभार अपरिमित हेही आम्हांस माहीत आहे. आमचे रथ सज्ज होऊन निघाले आहेत. तर अशा वेळेस हे दानवांतका, कोणी तरी सत्वशील शूरवीर, जो सुदैवाप्रमाणे आम्हास हवासा वाटेल, आणि संग्रामांतहि जो अगदी उमदा दिसेल - असा शूरवीर आमच्या सहाय्यार्थ येवो. ॥ ५ ॥


प॒पृ॒क्षेण्य॑मिन्द्र॒ त्वे ह्योजो॑ नृ॒म्णानि॑ च नृ॒तमा॑नो॒ अम॑र्तः ।
स न॒ एनीं॑ वसवानो र॒यिंदाः॒ प्रार्य स्तु॑षे तुविम॒घस्य॒ दान॑म् ॥ ६ ॥

पपृक्षेण्यं इंद्र त्वेइति हि ओजः नृम्णानि च नृतमानः अमर्तः ।
सः नः एनीं वसवानः रयिं दाः प्र अर्य स्तुषे तुविऽमघस्य दानम् ॥ ६ ॥

इंद्रा, स्पृहणीय तेजस्विता आणि वीर्य ही खरोखर तुझ्याच ठिकाणी वास करतात. तू रणांगणावर धुमाकूळ उडवून देतोस, तू अमर आहेस, तेव्हां, हे दिव्यनिधि-धारका देवा, तू आम्हाला निष्कलंक संपत्ति दे. आमचा धनी आणि भक्तास असंख्य देणग्या देणारा तू म्हणूनच तुझ्या दातृत्वाची मी प्रशंसा करीत आहे. ॥ ६ ॥


ए॒वा न॑ इन्द्रो॒तिभि॑रव पा॒हि गृ॑ण॒तः शू॑र का॒रून् ।
उ॒त त्वचं॒ दद॑तो॒ वाज॑सातौ पिप्री॒हि मध्वः॒ सुषु॑तस्य॒ चारोः॑ ॥ ७ ॥

एव नः इन्द्र ऊतिऽभिः अव पाहि गृणतः शूर कारून् ।
उत त्वचं ददतः वाजऽसातौ पिप्रीहि मध्वः सुऽसुतस्य चारौः ॥ ७ ॥

ह्याप्रमाणे इंद्रा आपल्या कृपाप्रसादाने आमचे रक्षण कर. हे शूरा, तुझी स्तुति करणार्‍या कविजनांचाहि तू प्रतिपाल कर. सत्वसामर्थ्य हस्तगत करून घेतांना जे आपल्या आंगची कातडीसुद्धां पर्वा न करता खुशाल सोडून देतात अशा सत्पुरुषांवर निःसीम प्रेम ठेव, आणि त्यांनी उत्तम रीतीने पिळून तयार केलेला रुचिर मधुर रसहि तू प्रेमपूर्वक होऊन प्राशन कर. ॥ ७ ॥


उ॒त त्ये मा॑ पौरुकु॒त्स्यस्य॑ सू॒रेस्त्र॒सद॑स्योर्हिर॒णिनो॒ ररा॑णाः ।
वह॑न्तु मा॒ दश॒ श्येता॑सो अस्य गैरिक्षि॒तस्य॒ क्रतु॑भि॒र्नु स॑श्चे ॥ ८ ॥

उत त्ये मा पौरुऽकुत्स्यस्य सूरेः त्रसदस्योः हिरणिनः रराणाः ।
वहंतु मा दश श्येतासः अस्य गैरिऽक्षितस्य क्रतुऽभिः नु सश्चे ॥ ८ ॥

ज्याच्या खजिन्यात भरपूर सोने आहे असा पुरुकुत्साचा मुलगा, लोकनायक जो त्रसदस्यु राजा, त्याने दिलेले ते आपल्या शुभ्र वर्णाने झळकणारे व मोठ्या ऐटीने चालणारे दहा घोडे मला रथातून मिरवत निवोत. ह्या गिरिक्षिताच्याच कर्तबगारीमुळे मी स्वस्थपणे चाललो आहे. ॥ ८ ॥


उ॒त त्ये मा॑ मारु॒ताश्व॑स्य॒ शोणाः॒ क्रत्वा॑मघासो वि॒दथ॑स्य रा॒तौ ।
स॒हस्रा॑ मे॒ च्यव॑तानो॒ ददा॑न आनू॒कम॒र्यः वपु॑षे॒ नार्च॑त् ॥ ९ ॥

उत त्ये मा मारुतऽअश्वस्य शोणाः क्रत्वाऽमघासः विदथस्य रातौ ।
सहस्रा मे च्यवतानः ददानः आनूकं अर्यः वपुषे न अर्चत् ॥ ९ ॥

धर्मसभेमध्ये पारितोषिक म्हणून मरुताश्वाच्या मुलाने मला दिलेले घोडे लालबुंद अणि ताकदीने वरिष्ठ आहेत. ह्याशिवाय आर्यच्यवतान ह्यानेहि मला हजार घोडे व कांही भूषणे, ती मी आपल्या आंगावर वागवावीत म्हणूनच की काय, मोठ्या आदराने अर्पण केली आहेत. ॥ ९ ॥


उ॒त त्ये मा॑ ध्व॒न्यस्य॒ जुष्टा॑ लक्ष्म॒ण्यस्य सु॒रुचो॒ यता॑नाः ।
म॒ह्ना रा॒यः सं॒वर॑णस्य॒ ऋषे॑र्व्र॒जं न गावः॒ प्रय॑ता॒ अपि॑ ग्मन् ॥ १० ॥

उत त्ये मा ध्वन्यस्य जुष्टाः लक्ष्मण्यस्य सुऽरुचः यतानाः ।
मह्ना रायः संऽवरणस्य ऋषेः व्रजं न गावः प्रऽयता अपि ग्मन् ॥ १० ॥

आणखी पुनः लक्ष्मणाचा मुलगा ध्वन्य त्याने मला नजर केलेले मोठे तेजदार चलाख घोडे, संवरण ऋषीच्य गोठ्याकडे प्रकाश धेनूचा समूह वळावा त्याप्रमाणे मजकडे मोठ्या वैभवानिशी आणून पोंहोचविले आहेत. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३४ ( इंद्र सूक्त )

ऋषी - संवरण प्राजापत्य आत्रेय : देवता - इंद्र : छंद - जगती, त्रिष्टुभ्


अजा॑तशत्रुम॒जरा॒ स्वर्व॒त्यनु॑ स्व॒धामि॑ता द॒स्ममी॑यते ।
सु॒नोत॑न॒ पच॑त॒ ब्रह्म॑वाहसे पुरुष्टु॒ताय॑ प्रत॒रं द॑धातन ॥ १ ॥

अजातऽशत्रुं अजरा स्वःऽवति अनु स्वधा अमिता दस्मं ईयते ।
सुनोतन पचत ब्रह्मऽवाहसे पुरुऽस्तुताय प्रऽतरं दधातन ॥ १ ॥

जिचे तारुण्य कधीहि नष्ट होत नाही अशी ती स्वर्गीय व अपरिमित दिव्य शक्ति अजात शत्रु आणि अद्‍भुत पराक्रमी इंद्रालाच माळ घालते. तर ऋत्विजांनो प्रार्थनासूक्ते ज्याला अर्पण करतात, व असंख्य जीव ज्याचे भजन करतात त्या इंद्राप्रीत्यर्थ सोमरस सिद्ध करा, आणि हविरन्ने पक्व करून ती त्याला यथेच्छ समर्पण करा. ॥ १ ॥


आयः सोमे॑न ज॒ठर॒मपि॑प्र॒ताम॑न्दत म॒घवा॒ मध्वो॒ अन्ध॑सः ।
यदीं॑ मृ॒गाय॒ हन्त॑वे म॒हाव॑धः स॒हस्र॑भृष्टिमु॒शना॑ व॒धं यम॑त् ॥ २ ॥

आ यः सोमेन जठरं अपिप्रत अमंदत मघऽवा मध्वः अंधसः ।
यत् ईं मृगाय हंतवे महाऽवधः सहस्रऽभृष्टिं उशना वधं यमत् ॥ २ ॥

भीषण आयुध हातात घेऊन त्या दुष्ट "मृग" नामक राक्षसाचा नाश करण्याकरता जेव्हां इंद्र उद्युक्त झाला, आणि ’उशना’ ह्याने हजारो तीक्ष्ण अणकुच्या असलेले ते घोर वज्र इंद्राच्य हाती दिले, त्या वेळेस इंद्राने अपले जठर सोमरसाने परिपूर्ण भरले, आणि त्या मधुर पेयाच्या आस्वादाने भगवान् इंद्र हृष्टचित्त झाला. ॥ २ ॥


यो अ॑स्मै घ्रं॒स उ॒त वा॒ य ऊध॑नि॒ सोमं॑ सु॒नोति॒ भव॑ति द्यु॒माँ अह॑ ।
अपा॑प श॒क्रस्त॑त॒नुष्टि॑मूहति त॒नूशु॑भ्रं म॒घवा॒ यः क॑वास॒खः ॥ ३ ॥

यः अस्मै घ्रंसे उत वा यः ऊधनि सोमं सुनोति भवति द्युऽमान् अह ।
अपऽअप शक्रः ततनुष्टिं ऊहति तनूऽशुभ्रं मघऽवा यः कवऽसखः ॥ ३ ॥

उन्हांतान्हांत, पावसांत किंवा काळोखांतसुद्धा मेहनत करून जो भक्त देवा प्रीत्यर्थ सोमरस पिळून सिद्ध करतो, तो तेजोवैभवाने मंडित होतो. परंतु जो आपल्या मुलाबाळांच्या डौलात राहतो, आपल्याच शरीराला नटविण्यांत चूर असतो आणि नीच अधम लोकांची संगति धरतो अशा मूर्खाला तो सर्व सत्ताधीश भगवान मुळीच विचारीत नाही. ॥ ३ ॥


यस्याव॑धीत्पि॒तरं॒ यस्य॑ मा॒तरं॒ यस्य॑ श॒क्रो भ्रात॑रं॒ नात॑ ईषते ।
वेतीद्व॑स्य॒ प्रय॑ता यतंक॒रो न किल्बि॑षादीषते॒ वस्व॑ आक॒रः ॥ ४ ॥

यस्य अवधीत् पितरं यस्य मातरं यस्य शक्रः भ्रातरं न अतः ईषते ।
वेति इत् ऊंइति अस्य प्रऽयता यतंऽकरः न किल्बिषात् ईषते वस्व आऽकरः ॥ ४ ॥

पातक्यांना दंड करीत असतंना त्य सर्व सत्ताधीश देवाने एखाद्याच्या बापाला आईला अगर बंधूला जरी देहांत शासन केले असले तरी अशा दुर्दैवी मनुष्याला सोडून तो निघून जात नाही. तर त्याच्यावर लोभ करतो आणि त्याने अर्पण केलेल्या हवींचा स्वीकार करतो. तो सर्वांचा शास्ता आहे. दुष्टांनी केलेल्या पातकांमुळे तो पळून जात नाही, व अपूर्व दिव्य संपत्तीचा तो निधीच होय. ॥ ४ ॥


न प॒ञ्चभि॑र्द॒शभि॑र्वष्ट्या॒रभं॒ नासु॑न्वता सचते॒ पुष्य॑ता च॒न ।
जि॒नाति॒ वेद॑मु॒या हन्ति॑ वा॒ धुनि॒रा दे॑व॒युं भ॑जति॒ गोम॑ति व्र॒जे ॥ ५ ॥

न पंचऽभिः दशभिः वष्टि आऽरभं न असुन्वता सचते पुष्यता चन ।
जिनाति वा इत् अमुया हंति वा धुनिः आ देवऽयुं भजति गोऽमति व्रजे ॥ ५ ॥

दहापांच लोकांकडून तरी बोलबाला व्हावा अशी अपेक्षा देव यत्किंचिथी करीत नाही आणि मनुष्य कीतीही मातबर असला तथापि तो भक्तिरूप सोमरस अर्पण न करील तर त्याच्याशी तो काही एक संबंध ठेवणार नाही. इतकेच नव्हे तर त्याचा पाडाव करून ह्या नाही त्या मर्गाने त्याचा नाश करील. सर्व विश्व हालवून सोडील अशा तो जबरदस्त आहे. परंतु ज्ञान धेनूंचा समूह आपलासा करून घेण्याच्या उद्योगात भक्तजन असले तर त्यांना तो सर्वथैव सहाय्यच करतो. ॥ ५ ॥


वि॒त्वक्ष॑णः॒ समृ॑तौ चक्रमास॒जोऽ॑सुन्वतो॒ विषु॑णः सुन्व॒तो वृ॒धः ।
इन्द्रो॒ विश्व॑स्य दमि॒ता वि॒भीष॑णो यथाव॒शं न॑यति॒ दास॒मार्यः॑ ॥ ६ ॥

विऽत्वक्षणः संऽऋतौ चक्रंऽआसजः असुन्वतः विषुणः सुन्वतः वृधः ।
इंद्रः विश्वस्य दमिता विऽभीषणः यथाऽवशं नयति दासं आर्यः ॥ ६ ॥

इंद्रदेव युद्धामध्ये मोठा जाज्वल्य आणि शत्रूंचे एकंदर कडेंच्या कडें एकदम गारद करणारा असा आहे. भक्तिरूप सोमरसाला विन्मुख अशा जनाकडे तोही पाठ फिरवितो आणि सोमरस अर्पण करणार्‍या भक्ताची भरभराट करितो. इंद्र हा सर्व विश्वाचा दर्प हरण करील असा पराक्रमी व मोठा उग्ररूप आहे. तो आर्यजनाचा प्रभू, अधार्मिकांना त्याच्या इच्छेप्रमाणें पादाक्रांत करतोच. ॥ ६ ॥


समीं॑ प॒णेर॑जति॒ भोज॑नं मु॒षे वि दा॒शुषे॑ भजति सू॒नरं॒ वसु॑ ।
दु॒र्गे च॒न ध्रि॑यते॒ विश्व॒ आ पु॒रु जनो॒ यो अ॑स्य॒ तवि॑षी॒मचु॑क्रुधत् ॥ ७ ॥

सं ईं पणेः अजति भोजनं मुषे वि दाशुषे भजति सूनरं वसु ।
दुःऽगे चन ध्रियते विश्वः आ पुरु जनः यः अस्य तविषीं अचुक्रुधत् ॥ ७ ॥

दानधर्म न करणारे जे कवडीचुंबक आहेत त्यांची धनदौलत हरण करण्यास तो त्वरेने जातो, आणि हवि अर्पण करण्यासाठी तत्पर असलेल्या भक्ताला सत्संगतिचे अमोल धन देतो. पातके करून ह्या इंद्रदेवाचा प्रचंडकोप एकदा का खवळविला, तर मग ते कडेकोट बंदोवस्ताच्या किल्ल्यांत जरी राहिले तरी तेथेसुद्धा त्यांचा निभाव लागणार नाही. ॥ ७ ॥


सं यज्जनौ॑ सु॒धनौ॑ वि॒श्वश॑र्धसा॒ववे॒दिन्द्रो॑ म॒घवा॒ गोषु॑ शु॒भ्रिषु॑ ।
युजं॒ ह्य॑१न्यमकृ॑त प्रवेप॒न्युदीं॒ गव्यं॑ सृजते॒ सत्व॑भि॒र्धुनिः॑ ॥ ८ ॥

सं यत् जनौ सुऽधनौ विश्वऽशर्धसाउ अवेत् इंद्रः मघऽवा गोषु शुभ्रिषु ।
युजं हि अन्यं अकृत प्रऽवेपनी उत् ईं गव्यं सृजते सत्वऽभिः धुनिः ॥ ८ ॥

दोघेजण सारख्या धनाचे सारख्या प्रचंड शक्तीचे असलेले त्याच्या नजरेत आले तरी, जो निष्कलंक ज्ञान धेनूंच्या समूहांत असेल त्यालाच भगवान आपला म्हणेल. पातक्यांचा थरकाप करणारा आणि शत्रूसैन्य हालवून देणारा असा तो भगवान् त्याच सत्पुरुषाला ज्ञान धेनूंचे दुग्धामृत देईल. ॥ ८ ॥


स॒ह॒स्र॒सामाग्नि॑वेशिं गृणीषे॒ शत्रि॑मग्न उप॒मां के॒तुम॒र्यः ।
तस्मा॒ आपः॑ सं॒यतः॑ पीपयन्त॒ तस्मि॑न्क्ष॒त्रमम॑वत्त्वे॒षम॑स्तु ॥ ९ ॥

सहस्रऽसां आग्निऽवेशिं गृणीषे शत्रिं अग्न उपऽमां केतुं अर्यः ।
तस्मा आपः संयतः पीपयंत तस्मिन् क्षत्रं अमऽवत् त्वेषं अस्तु ॥ ९ ॥

हे अग्निरूप इंद्रा, हजारो देणग्या देणारा व सत्कीर्तीचा अत्युत्कृष्ट धवजच असा अग्निवेशचा पुत्र आर्य शत्रि, त्याची प्रशंसा मला केली पाहिजे. दिव्योदकेंसुद्धां त्याच्यकरितां तुडुंब भरून वाहतात, तेव्हां अशा पुण्यश्लोक राजाची सत्ता आणि त्याचा दरारा ही दृढमूल आणि प्रखर असोत. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३५ ( इंद्र सूक्त )

ऋषी - प्रभूवसु आंगिरस आत्रेय : देवता - इंद्र : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्


यस्ते॒ साधि॒ष्ठोऽ॑वस॒ इन्द्र॒ क्रतु॒ष्टमा भ॑र ।
अ॒स्मभ्यं॑ चर्षणी॒सहं॒ सस्निं॒ वाजे॑षु दु॒ष्टर॑म् ॥ १ ॥

यः ते साधिष्ठः अवसे इंद्र क्रतुः टं आ भर ।
अस्मभ्यं चर्षणिऽसहं सस्निं वाजेषु दुस्तरम् ॥ १ ॥

हे इंद्रा तुझी कर्तृत्वशक्ति अत्यंत अमोघ, सर्व जीवांना भारी. झुंझामध्ये अनावर परंतु उदार आहे, अशी ती तुझी कर्तृत्वशक्ति आमच्यावर अनुग्रह करण्याकरता तू आम्हास अर्पण कर. ॥ १ ॥


यदि॑न्द्र ते॒ चत॑स्रो॒ यच् छू॑र॒सन्ति॑ ति॒स्रः ।
यद्वा॒ पञ्च॑ क्षिती॒नामव॒स्तत्सु न॒ आ भ॑र ॥ २ ॥

यत् इंद्र ते चतस्रः यत् शूर सन्ति तिस्रः ।
यत् वा पंच क्षितीनां अवः तत् सु नः आ भर ॥ २ ॥

शूर इंद्रा, तुझ्या देणग्या, मग त्या तीन प्रकारच्या असोत, चार प्रकारच्या असोत, किंवा शांतताप्रिय मानवांना योग्य अशा पाच प्रकारच्या असोत. त्या देणग्या म्हणजे तो तुझा कृपाप्रसाद तू आज दयाळू होऊन आम्हास दे. ॥ २ ॥


आ तेऽ॑वो॒ वरे॑ण्यं॒ वृष॑न्तमस्य हूमहे ।
वृष॑जूति॒र्हि ज॑ज्ञि॒ष आ॒भूभि॑रिन्द्र तु॒र्वणिः॑ ॥ ३ ॥

आ ते अवः वरेण्यं वृषन्ऽतमस्य हूमहे ।
वृषऽजूतिः हि जज्ञिष आऽभूभिः इंद्र तुर्वणिः ॥ ३ ॥

तू वीर शिरोमणि, म्हणून संरक्षक अनुग्रहासाठी आम्ही तुझ्यापुढे पदर पसरतो. वीरांना योग्य अशीच तडफ दाखवून तू प्रकट होतोस. आणि हे इंद्रा, शत्रूमर्दन अशा मरुतांसह चाल करून तू सर्वांचा हां हां म्हणता पराभव करतोस. ॥ ३ ॥


वृषा॒ ह्यसि॒ राध॑से जज्ञि॒षे वृष्णि॑ ते॒ शवः॑ ।
स्वक्ष॑त्रं ते धृ॒षन्मनः॑ सत्रा॒हमि॑न्द्र॒ पौंस्य॑म् ॥ ४ ॥

वृषा हि असि राधसे जज्ञिषे वृष्णि ते शवः ।
स्वऽक्षत्रं ते धृषन् मनः सत्राऽहं इंद्र पौंस्यम् ॥ ४ ॥

तू सकलकामनावर्षक महावीर आहेस. तू भक्तांवर कृपा करण्यासाठीच अवतीर्ण होतोस. तुझे उत्कट सामर्थ्यहि वीरोचित असेच आहे. तुझ्या धाडसी मनावर तुझी स्वतःचीच सत्ता, आणि तुझे पौरुषबळ असे आहे की ते असंख्य शत्रूंनाही भारीच असते. ॥ ४ ॥


त्वं तमि॑न्द्र॒ मर्त्य॑ममित्र॒यन्त॑मद्रिवः ।
स॒र्व॒र॒था श॑तक्रतो॒ नि या॑हि शवसस्पते ॥ ५ ॥

त्वं तं इंद्र मर्त्यं अमित्रऽयंतं अद्रिऽवः ।
सर्वऽरथा शतक्रतोइतिशतक्रतो नि याहि शवसः पते ॥ ५ ॥

हे अशनिधरा इंद्रा, हे अपार कर्तृत्वशालिन्, जो कोणी आमच्याशी वैर साधत असेल, त्याचा हे अतुलबला देवा, अशा दुष्टाचा निःपात कर. ॥ ५ ॥


त्वामिद्वृ॑त्रहन्तम॒ जना॑सः वृ॒क्तब॑र्हिषः ।
उ॒ग्रं पू॒र्वीषु॑ पू॒र्व्यं हव॑न्ते॒ वाज॑सातये ॥ ६ ॥

त्वां इत् वृत्रहन्ऽतम जनासः वृक्तऽबर्हिषः ।
उग्रं पूर्वीषु पूर्व्यं हवंते वाजऽसातये ॥ ६ ॥

वृत्राचा अगदी नायनाट करणार्‍या ईश्वरा, सत्वसामर्थ्याची प्राप्ती व्हावी म्हणून भक्तजन दर्भाग्रे साफसूफ करून तुजला - असंख्य विभूतीत अग्रेसर अशा तुज रौद्र स्वरूप देवाला - हांक मारीत असतात. ॥ ६ ॥


अ॒स्माक॑मिन्द्र दु॒ष्टरं॑ पुरो॒यावा॑नमा॒जिषु॑ ।
स॒यावा॑नं॒ धने॑धने वाज॒यन्त॑मवा॒ रथ॑म् ॥ ७ ॥

अस्माकं इंद्र दुस्तरं पुरःऽयावानं आजिषु ।
सऽयावानं धनेऽधने वाजऽयंतं अव रथम् ॥ ७ ॥

दुर्निवार, संग्रामामध्ये नेहमी सर्वांच्या आघाडीस राहणारा, शत्रूंच्या गर्दीत मिसळणारा, आणि हरएक प्रकारच्या संपत्तीकरितां सामर्थ्यसंग्रह करण्याकरितां झटणारा असा जो आमचा मनोरथ, त्याला हे इंद्रा, जतन कर. ॥ ७ ॥


अ॒स्माक॑मि॒न्द्रेहि॑ नो॒ रथ॑मवा॒ पुरं॑ध्या ।
व॒यं श॑विष्ठ॒ वार्यं॑ दि॒वि श्रवो॑ दधीमहि दि॒वि स्तोमं॑ मनामहे ॥ ८ ॥

अस्माकं इन्द्र आ इहि नः रथं अव पुरंऽध्या ।
वयं शविष्ठ वार्यं दिवि श्रवः दधीमहि दिवि स्तोमं मनामहे ॥ ८ ॥

इंद्रा कृपा करून आमच्याकडे आगमन कर, आणि आपल्या अपूर्व बुद्धिमत्तेने आमच्या मनोरथावर तू आपल्या कृपेची पारख ठेव. हे सामर्थ्यसागरा, आम्ही आपले यश स्वर्गातसुद्धा स्थिर केले असे कर, आणि स्वर्गातहि तुझ्याच गुणानुवादाचे चिंतन करावे असे कर. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३६ ( इंद्र सूक्त )

ऋषी - प्रभूवसु आंगिरस आत्रेय : देवता - इंद्र : छंद - जगती, त्रिष्टुभ्


स आ ग॑म॒दिन्द्रो॒ यो वसू॑नां॒ चिके॑त॒द्दातुं॒ दाम॑नो रयी॒णाम् ।
ध॒न्व॒च॒रो न वंस॑गस्तृषा॒णश्च॑कमा॒नः पि॑बतु दु॒ग्धमं॒शुम् ॥ १ ॥

सः आ गमत् इंद्रः यः वसूनां चिकेतत् दातुं दामनः रयीणाम् ।
धन्वऽचरः न वंसगः तृषाणः चकमानः पिबतु दुग्धं अंशुम् ॥ १ ॥

अत्युत्कृष्ट वस्तु आणि दिव्य ऐश्वर्य ह्यांच्या अपरिमित खजिन्यांतून भक्तांना वैभव कसे द्यावे हे जो उत्तमरीतीने जाणतो असा इंद्र आमच्या सन्निध आगमन करो. निर्जल प्रदेशात भटकणारा व ताहानेने व्याकुळ झालेला वृषभ किंवा जलशोषणाकरिता आतुर झालेला सूर्य आसोशीने उदक प्राशन करील तितक्या उत्कट प्रेमाने हा सोमवल्लीचा दुग्धमिश्रित रस, तो प्राशन करो. ॥ १ ॥


आ ते॒ हनू॑ हरिवः शूर॒ शिप्रे॒ रुह॒त् सोमो॒ न पर्व॑तस्य पृ॒ष्ठे ।
अनु॑ त्वा राज॒न्नर्व॑तो॒ न हि॒न्वन् गी॒र्भिर्म॑देम पुरुहूत॒ विश्वे॑ ॥ २ ॥

आ ते हनूइति हरिऽवः शूर शिप्रेइति रुहत् सोमः न पर्वतस्य पृष्ठे ।
अनु त्वा राजन् अर्वतः न हिन्वन् गीःऽभिः मदेम पुरुहूत विश्वे ॥ २ ॥

हरिदश्वनायका शूरा, पर्वताच्या उन्नत शिखरावर ठेविल्या प्रमाणे ह्या सोमवल्लीचा तुरा तुझ्या कपोलावर आणि मुकुटावर विलसत राहो. हे असंख्यभक्त पूजिता, जगन्नायका, आमच्या घोडेस्वारांना तूच उत्तेजन देतोस म्हणून सर्व प्रकारच्या स्तुतींनी आम्ही तुला हृष्टचित्त करतो. ॥ २ ॥


च॒क्रं न वृ॒त्तं पु॑रुहूत वेपते॒ मनो॑ भि॒या मे॒ अम॑ते॒रिद॑द्रिवः ।
रथा॒दधि॑ त्वा जरि॒ता स॑दावृध कु॒विन्नु स्तो॑षन्मघवन्पुरू॒वसुः॑ ॥ ३ ॥

चक्रं न वृत्तं पुरुऽहूत वेपते मनः भिया मे अमतेः इत् अद्रिऽवः ।
रथात् अधि त्वा जरिता सदाऽवृध कुवित् नु स्तोषत् मघऽवन् पुरुऽवसुः ॥ ३ ॥

असंख्य लोक ज्या तुला आळवितात अशा हे अशनिधस, इंद्रा, वाटोळ्या चाकाप्रमाणे माझे मन बुद्धिमांद्याच्या व दारिद्र्याच्या भितीने हेलकावे खात आहे. भगवंता, हे अखंडोत्कर्ष भूषिता, तू रथावर अधिष्ठित झालेला असतांनाहि म्या पुरुवसु कवीने तुझे स्तवन करू नये काय ? ॥ ३ ॥


ए॒ष ग्रावे॑व जरि॒ता त॑ इ॒न्द्रेय॑र्ति॒ वाचं॑ बृ॒हदा॑शुषा॒णः ।
प्र स॒व्येन॑ मघव॒न्यंसि॑ रा॒यः प्र द॑क्षि॒णिद्ध॑रिवो॒ मा वि वे॑नः ॥ ४ ॥

एष ग्रावाऽइव जरिता त इन्द्र इयर्ति वाचं बृहत् आशुषाणः ।
प्र सव्येन मघऽवन् यंसि रायः प्र दक्षिणित् धरिऽवः मा वि वेनः ॥ ४ ॥

इंद्रा, तुझी सेवा अविरत करणारा हा कविजन सोमपाषाणांच्या गंभीर निनादाप्रमाणे, तुझ्या प्रीत्यर्थ बृहत् साम आणि स्तोत्र ह्यांचे आलाप खड्या आवाजांत काढीत आहे, तर हे भगवंता तू आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी आम्हांस ऐश्वर्य दे. हे हरिदश्ववाहना, अनमान करून नको. ॥ ४ ॥


वृषा॑ त्वा॒ वृष॑णं वर्धतु॒ द्यौर्वृषा॒ वृष॑भ्यां वहसे॒ हरि॑भ्याम् ।
स नो॒ वृषा॒ वृष॑रथः सुशिप्र॒ वृष॑क्रतो॒ वृषा॑ वज्रि॒न्भरे॑ धाः ॥ ५ ॥

वृषा त्वा वृषणं वर्धतु द्यौः वृषा वृषऽभ्यां वहसे हरिऽभ्याम् ।
सः नः वृषा वृषऽरथः सुऽशिप्र वृषक्रतोइतिवृषऽक्रतो वृषा वज्रिन् भरे धाः ॥ ५ ॥

तुज सकलकामनावर्षक वीराचे यश जलवर्षक आकाश वृद्धिंगत करो. तू वीर्यशाली देव आपल्या रगेल अशाच अश्वांवर आरूढ होऊन जात असतोस. हे उज्वल मुकुटधरा, हे वीरपराक्रमा, तू वीर्यशाली, तसाच तुझा रथहि वीरोचितच आहे. हे वज्रधरा, तू पौरुषवान् आहेस तेव्हां युद्धांमध्ये आमची बाजू सांवरून धर. ॥ ५ ॥


यः रोहि॑तौ वा॒जिनौ॑ वा॒जिनी॑वान्त्रि॒भिः श॒तैः सच॑माना॒वदि॑ष्ट ।
यूने॒ सम॑स्मै क्षि॒तयो॑ नमन्तां श्रु॒तर॑थाय मरुतः दुवो॒या ॥ ६ ॥

यः रोहितौ वाजिनौ वाजिनीऽवान् त्रिऽभिः शतैः सचमानौ अदिष्ट ।
यूने सं अस्मै क्षितयः नमंतां श्रुतऽरथाय मरुतः दुवःऽया ॥ ६ ॥

पवित्रशक्तींचा चाहाता श्रुतरथ राजा, त्याने दोन अबलक घोडे, त्यांच्यावर स्वार झालेले योद्धे व त्यांच्याबरोबर जाणारे तीनशे पायदळ असा सरंजाम मला बहाल केला. हे देवा, त्या श्रुतरथ राजापुढे सर्व लोक नम्र भावाने आपले मस्तक लवोत. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३७ ( इंद्र सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


सं भा॒नुना॑ यतते॒ सूर्य॑स्या॒जुह्वा॑नो घृ॒तपृ॑ष्ठः॒ स्वञ्चाः॑ ।
तस्मा॒ अमृ॑ध्रा उ॒षसो॒ व्युच्छा॒न्य इन्द्रा॑य सु॒नवा॒मेत्याह॑ ॥ १ ॥

सं भानुना यतते सूर्यस्य आऽजुह्वानः घृतऽपृष्ठः सुऽअंचाः ।
तस्मा अमृध्राः उषसः वि उच्छान् यः इंद्राय सुनवाम इति आह ॥ १ ॥

भक्तांनी तुला पाचारण करून व तुला नवनीताचे उद्वर्तन करून उत्तम प्रकाराने तुझे अर्चन केले आहे. तुझा रश्मि समूह सूर्याच्या किरणाशी स्पर्धेत सरसच ठरतो. तर हे ईश्वरा, "आम्ही इंद्राप्रीत्यर्थ सोमरस पिळून सिद्ध करू" अशी जो भाक देईल त्याच्याकरिता उमा देवी, अखंड कांतीने अव्याहत प्रकाशोत. ॥ १ ॥


समि॑द्धाग्निर्वनवत्स्ती॒र्णब॑र्हिर्यु॒क्तग्रा॑वा सु॒तसो॑मो जराते ।
ग्रावा॑णो॒ यस्ये॑षि॒रं वद॒न्त्यय॑दध्व॒र्युर्ह॒विषाव॒ सिन्धु॑म् ॥ २ ॥

समिद्धऽअग्निः वनवत् स्तीर्णऽबर्हिः युक्तऽग्रावा सुतऽसोमः जराते ।
ग्रावाणः यस्य इषिरं वदन्ति अयत् अध्वर्युः हविषा अव सिन्धुम् ॥ २ ॥

अग्नि प्रदीप्त करून कुशासन पसरून भक्तजन तुझे अर्चन करोत, सोमपाषाण रस पिळण्याकरिता एकत्र जोडून व सोमरस गाळून ते तुझे यशोगायन करोत, आणि ज्याचे सोमपाषाण मोठ्या आवेशाने घोष करतात असा आमचा अध्वर्युहि हविर्भाग हाती घेऊन तुज कृपा सिंधुकडे सत्वर गमन करो. ॥ २ ॥


व॒धूरि॒यं पति॑मि॒च्छन्त्ये॑ति॒ य ईं॒ वहा॑ते॒ महि॑षीमिषि॒राम् ।
आस्य॑ श्रवस्या॒द्रथ॒ आ च॑ घोषात्पु॒रू स॒हस्रा॒ परि॑ वर्तयाते ॥ ३ ॥

वधूः इयं पतिं इच्छंति एति यः ईं वहाते महिषीं इषिराम् ।
आ अस्य श्रवस्यात् रथः आ च घोषात् पुरू सहस्रा परि वर्तयाते ॥ ३ ॥

ही पहा यजमानाची भार्या आपल्या पतीला भेटण्याच्या इच्छेने इकडेच येत आहे. आणि ज्याने अशा आपल्या अनुरागवती प्रियेचे प्राणिग्रहण केले तोहि पण इकडेच येत आहे. ह्या आमच्या यजमानाच्या रथाची कीर्ति जिकडे तिकडे पसरो. त्याचे नांव जगांत दुमदुमून राहो, आणि त्याच्या रथाची चाके हजारो वेळा इतस्ततः पर्यटन करोत. ॥ ३ ॥


न स राजा॑ व्यथते॒ यस्मि॒न्निन्द्र॑स्ती॒व्रं सोमं॒ पिब॑ति॒ गोस॑खायम् ।
आ स॑त्व॒नैरज॑ति॒ हन्ति॑ वृ॒त्रं क्षेति॑ क्षि॒तीः सु॒भगो॒ नाम॒ पुष्य॑न् ॥ ४ ॥

न सः राजा व्यथते यस्मिन्न् इंद्रः तीव्रं सोमं पिबति गोऽसखायम् ।
आ सत्वनैः अजति हंति वृत्रं क्षेति क्षितीः सुऽभगः नाम पुष्यन् ॥ ४ ॥

ज्याच्या यज्ञसमारंभात इंद्र हा दुग्धमिश्रित परंतु तीक्ष्ण असा सोमरस प्राशन करतो, त्या राजाला कधीहि क्लेश होत नाहीत. तो आपल्या सत्वशील अनुचरांसह चाल करून जाऊन कृष्णवर्ण शत्रूचा नायनाट करतो. आणि अशा रीतीने तो भाग्यशाली राजा आपले नांव गाजवून प्रजेचे परिपालन करतो. ॥ ४ ॥


पुष्या॒त्क्षेमे॑ अ॒भि योगे॑ भवात्यु॒भे वृतौ॑ संय॒ती सं ज॑याति ।
प्रि॒यः सूर्ये॑ प्रि॒यः अ॒ग्ना भ॑वाति॒ य इन्द्रा॑य सु॒तसो॑मो॒ ददा॑शत् ॥ ५ ॥

पुष्यात् क्षेमे अभि योगे भवाति उभेइति वृतौ संयतीइतिसंऽयती सं जयाति ।
प्रियः सूर्ये प्रियः अग्ना भवाति य इंद्राय सुतऽसोमः ददाशत् ॥ ५ ॥

जो भक्त सोमरस सिद्ध करून मोठ्या भक्तिभावाने इंद्राला अर्पण करतो. त्याचा स्वस्थतेच्या काळी उत्कर्ष होतो, आणि उपार्जनकाली किंवा युद्धकाळी विजय होतो. दोन्ही दळभार एकमेकाशी भिडले असता अखेत त्यचीच सरशी होते, व तो सूर्याला आणि अग्निलाहि प्रियच असतो. ॥ ५ ॥


मण्डल ५ सूक्त ३८ ( इंद्र सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - इंद्र : छंद - अनुष्टुभ्


उ॒रोष्ट॑ इन्द्र॒ राध॑सो वि॒भ्वी रा॒तिः श॑तक्रतः ।
अधा॑ नः विश्वचर्षणे द्यु॒म्ना सु॑क्षत्र मंहय ॥ १ ॥

उरोः ते इंद्र राधसः विऽभ्वी रातिः शतक्रतोइतिशतऽक्रतो ।
अध नः विश्वऽचर्षणे द्युम्ना सुऽक्षत्र मंहय ॥ १ ॥

हे अतुलप्रज्ञा इंद्रा, तुझ्या कृपाप्रसादाचा अलोट दातृत्वौघ दोहोंकडे अबाधित प्रसरो. हे सर्वसाक्षी, सर्वसत्ताधीशा, आता तुझ्या अपरिमित तेजाची देणगी आम्हांस दे. ॥ १ ॥


यदी॑मिन्द्र श्र॒वाय्य॒मिषं॑ शविष्ठ दधि॒षे ।
प॒प्र॒थे दी॑र्घ॒श्रुत्त॑मं॒ हिर॑ण्यवर्ण दु॒ष्टर॑म् ॥ २ ॥

यत् ईं इंद्र श्रवाय्यं इषं शविष्ठ दधिषे ।
पप्रथे दीर्घश्रुत्ऽतमं हिरण्यऽवर्ण दुस्तरम् ॥ २ ॥

बलसागरा इंद्रा, जो जो आवेश तुझ्या आंगी आहे, सुवर्णाप्रमाणे तेजःपुंज अंगकांतीच्या ईश्वरा, त्या त्या आवेशबलाची प्रसिद्धि, त्याची ख्याति पृथ्वीच्या कोना कोपर्‍यापर्यंत होते. ते अप्रतिहत आहे असाच त्याचा लौकिक होतो. ॥ २ ॥


शुष्मा॑सो॒ ये ते॑ अद्रिवो मे॒हना॑ केत॒सापः॑ ।
उ॒भा दे॒वाव॒भिष्ट॑ये दि॒वश्च॒ ग्मश्च॑ राजथः ॥ ३ ॥

शुष्मासः ये ते अद्रिऽवः मेहना केतऽसापः ।
उभा देवौ अभिष्टये दिवः च ग्मः च राजथः ॥ ३ ॥

हे अशनिधरा, तुज्या औदर्यामुळे ज्या विभूतींचा दरारा जिकडे तिकडे बसला आहे. आणि ज्यांची कामगिरी तुझ्या हेतूंप्रमाणे बरोबर वठते अशा विभूति आणि तूं असे उभयतां आमच्या अभीष्ट पूर्ततेकरिता पृथ्वी आणि स्वर्ग ह्या दोहोंवरहि अधिपत्य चालवितो. ॥ ३ ॥


उ॒तः नो॑ अ॒स्य कस्य॑ चि॒द्दक्ष॑स्य॒ तव॑ वृत्रहन् ।
अ॒स्मभ्यं॑ नृ॒म्णमा भ॑रा॒स्मभ्यं॑ नृमणस्यसे ॥ ४ ॥

उतोइति नः अस्य कस्य चित् दक्षस्य तव वृत्रऽहन् ।
अस्मभ्यं नृम्णं आ भर अस्मभ्यं नृऽमणस्यसे ॥ ४ ॥

हे वृत्रनाशना, ह्या नाही त्या, तुझ्या कोणत्याही चातुर्याच्या योगाने का होईना पण आम्हांला पौरुषाची जोड करून दे. तुजसारख्या वीराचे अंतःकरण आमच्यासठी तिळतिळ तुटणे हे अगदी योग्यच आहे. ॥ ४ ॥


नू त॑ आ॒भिर॒भिष्टि॑भि॒स्तव॒ शर्म॑ञ्छतक्रतः ।
इन्द्र॒ स्याम॑ सुगो॒पाः शूर॒ स्याम॑ सुगो॒पाः ॥ ५ ॥

नू ते आभिः अभिष्टिऽभिः तव शर्मन् शतक्रतोइतिशतऽक्रतो ।
इंद्र स्याम सुऽगोपाः शूर स्याम सुऽगोपाः ॥ ५ ॥

अतुल पराक्रमी देवा, ह्या आमच्या अभीष्टसिद्धिंनी युक्त होऊन हे इंद्रा, तुझ्या सुखमय आश्रयाखाली आम्ही सुरक्षित राहूं. हे वीरा, अगदी सुरक्षित राहूं असे घडो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३९ ( इंद्र सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - इंद्र : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्


यदि॑न्द्र चित्र मे॒हनास्ति॒ त्वादा॑तमद्रिवः ।
राध॒स्तन्नो॑ विदद्वस उभयाह॒स्त्या भ॑र ॥ १ ॥

यत् इंद्र चित्र मेहना अस्ति त्वाऽदातं अद्रिऽवः ।
राधः तत् नः विदद्वसोइतिविदत्ऽवसो उभयाहस्ति आ भर ॥ १ ॥

हे अशनिमंडिता इंद्रा, हे अद्‍भुतरूपा, तुझ्या औदार्यामुळेंच जो कृपाप्रसाद भक्तास लाभतो, तोच प्रसाद, हे अभीश्ट निधि-दायका, आपल्या दोन्ही दोन्ही हातांनी आम्हां वाचकांच्या पदरांत टाक. ॥ १ ॥


यन्मन्य॑से॒ वरे॑ण्य॒मिन्द्र॑ द्यु॒क्षं तदा भ॑र ।
वि॒द्याम॒ तस्य॑ ते व॒यमकू॑पारस्य दा॒वने॑ ॥ २ ॥

यत् मन्यसे वरेण्यं इंद्र द्युक्षं तत् आ भर ।
विद्याम तस्य ते वयं अकूपारस्य दावने ॥ २ ॥

इंद्रा, तुझ्या मतानेच जे अत्युत्कृष्ट, स्वर्गीय ऐश्वर्य असेल तेच आम्हांस दे. ह्याप्रमाणे तुझ्या अमर्याद दातृत्वशीलाच्या औदार्याचा अनुभव येवो. ॥ २ ॥


यत्ते॑ दि॒त्सु प्र॒राध्यं॒ मनो॒ अस्ति॑ श्रु॒तं बृ॒हत् ।
तेन॑ दृ॒ळ्हा चि॑दद्रिव॒ आ वाजं॑ दर्षि सा॒तये॑ ॥ ३ ॥

यत् ते दित्सु प्रऽराध्यं मनः अस्ति श्रुतं बृहत् ।
तेन दृळ्हा चित् अद्रिऽवः आ वाजं दर्षि सातये ॥ ३ ॥

दातृत्व-प्रवण, आणि तत्काळ कार्यक्षम अशी जी तुझी अंतःकरणप्रवृत्ति आहे, तिच्याच योगाने हे अशनिधरा, सत्वसामर्थ्य प्राप्तकरून देण्याकरिता अत्यंत कठीण अंशांचेहि तू विदारण केलेस. ॥ ३ ॥


मंहि॑ष्ठं वो म॒घोनां॒ राजा॑नं चर्षणी॒नाम् ।
इन्द्र॒मुप॒ प्रश॑स्तये पू॒र्वीभि॑र्जुजुषे॒ गिरः॑ ॥ ४ ॥

मंहिष्ठं वः मघोनां राजानं चर्षणीनाम् ।
इंद्रं उप प्रऽशस्तये पूर्वीभिः जुजुषे गिरः ॥ ४ ॥

दानशूरांतहि अत्यंत उदार, सकल प्रणिमात्रांचा राजा भगवान् इंद्र, त्याची महती अनुभयास यावी म्हणून कविजनांनी ननाविध स्तुतीच्या योगाने त्याचे चित्त वेधून टाकले आहे. ॥ ४ ॥


अस्मा॒ इत्काव्यं॒ वच॑ उ॒क्थमिन्द्रा॑य॒ शंस्य॑म् ।
तस्मा॑ उ॒ ब्रह्म॑वाहसे॒ गिरो॑ वर्ध॒न्त्यत्र॑यो॒ गिरः॑ शुम्भ॒न्त्यत्र॑यः ॥ ५ ॥

अस्मै इत् काव्यं वच उक्थं इंद्राय शंस्यम् ।
तस्मै ऊंइति ब्रह्मऽवाहसे गिरः वर्धंति अत्रयः गिरः शुभंति अत्रयः ॥ ५ ॥

आमचे कवन, आमची स्तुति आणि आमचे साससूक्त ही सर्व इंद्राप्रीत्यर्थच गायिली पाहिजेत. प्रार्थनास्तुतिंच्या त्या कामुकाप्रीत्यर्थ अत्रि ऋषि स्तोत्रांची पराकाष्ठा करीत आहेत. अत्रि ऋषि आपल्या स्तवनवाणी अलंकृत करीत आहेत. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४० ( इंद्र सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - इंद्र, सूर्य : छंद - उष्णिक्, अनुष्टुभ्


आ या॒ह्यद्रि॑भिः सु॒तं सोमं॑ सोमपते पिब ।
वृष॑न्निन्द्र॒ वृष॑भिर्वृत्रहन्तम ॥ १ ॥

आ याहि अद्रिऽभिः सुतं सोमं सोमऽपते पिब ।
वृषन् इंद्र वृषऽभिः वृत्रहन्ऽतम ॥ १ ॥

देवा इकडे आगमन कर. पाषाणांनी पिळून सिद्ध केलेला सोमरस, हे सोमप्रिया वीरा, आपल्या वीर्यवान् सेवकांसह वृत्राचा नायनाट करणार्‍या इंद्रा, तू प्राशन कर. ॥ १ ॥


वृषा॒ ग्रावा॒ वृषा॒ मदो॒ वृषा॒ सोमो॑ अ॒यं सु॒तः ।
वृष॑न्निन्द्र॒ वृष॑भिर्वृत्रहन्तम ॥ २ ॥

वृषा ग्रावा वृषा मदः वृषा सोमः अयं सुतः ।
वृषन् इंद्र वृषऽभिः वृत्रहन्ऽतम ॥ २ ॥

कमनावर्षका, आपल्या वीर्यवान् सेवकांसह वृत्राचा समूळ उच्छेद करणार्‍या हे इंद्रा, हा सोमपाषाण वृष्टि कुशल आहे. त्यापासून उत्पन्न होणारा आनंद वीर्यप्रद असतो, आणि हा गाळून तयार केलेला रससुद्धां वीर्यशालीच असतो. ॥ २ ॥


वृषा॑ त्वा॒ वृष॑णं हुवे॒ वज्रि॑ञ्चि॒त्राभि॑रू॒तिभिः॑ ।
वृष॑न्निन्द्र॒ वृष॑भिर्वृत्रहन्तम ॥ ३ ॥

वृषा त्वा वृषणं हुवे वज्रिन् चित्राभिः ऊतिभिः ।
वृषन् इंद्र वृषऽभिः वृत्रहन्ऽतम ॥ ३ ॥

हे वज्रधरा, वृष्टिकुशला, आपल्या वीर्यवान् सेवकांसह वृत्राचा पार धुव्वा उडवून देणार्‍या हे इंद्रा, तुझ्या आश्चर्यकारक संरक्षणाच्या आशेनें आम्हीं तुज वीर्यधनाला पाचारण करीत आहोत. ॥ ३ ॥


ऋ॒जी॒षी व॒ज्री वृ॑ष॒भस्तु॑रा॒षाट्छु॒ष्मी राजा॑ वृत्र॒हा सो॑म॒पावा॑ ।
यु॒क्त्वा हरि॑भ्या॒मुप॑ यासद॒र्वाङ्मााध्यं॑दिने॒ सव॑ने मत्स॒दिन्द्रः॑ ॥ ४ ॥

ऋजीषी वज्री वृषभः तुराषाट् शुष्मी राजा वृत्रहा सोमऽपावा ।
युक्त्वा हरिऽभ्यां उप यासत् अर्वाङ्‍ माध्यंदिने सवने मत्सत् इंद्रः ॥ ४ ॥

हा विश्वाचा राजा इंद्र महान् आवेशी आहे. त्याने वज्र हाती घेतले असून तो वीरपुंगव देव बलाढ्य रिपूंनाहि नामशेष करतो. त्याचा दरारा अतिशय. तो वृत्रनाशन आणि सोमप्रिय आहे. असा तो इंद्र आपले हरिद्वर्ण अश्व जोडून या भूलोकी येवो. आणि मध्यम सवनाच्या वेळी सोमप्राशनाने हृष्टचित्त होवो. ॥ ४ ॥


यत्त्वा॑ सूर्य॒ स्वर्भानु॒स्तम॒सावि॑ध्यदासु॒रः ।
अक्षे॑त्रवि॒द्यथा॑ मु॒ग्धो भुव॑नान्यदीधयुः ॥ ५ ॥

यत् त्वा सूर्य स्वःऽर्भानुः तमसा अविध्यत् आसुरः ।
अक्षेत्रऽवित् यथा मुग्धः भुवनानि अदीधयुः ॥ ५ ॥

सूर्या, ’असुरा’ने उत्पन्न केलेल्या स्वर्भानूने जेव्हां अंधकाररूप शस्त्राने तुला विद्ध करून ग्रासून टाकले, तेव्हां सर्व प्राणिमात्र वेड्यासारखे होऊन त्यांना आपण कोणत्या जागी आहोत हे सुद्धा कळेना, व त्यांची अगदी तिरपिट उडून गेली. ॥ ५ ॥


स्वर्भानो॒रध॒ यदि॑न्द्र मा॒या अ॒वो दि॒वो वर्त॑माना अ॒वाह॑न् ।
गू॒ळ्हं सूर्यं॒ तम॒साप॑व्रतेन तु॒रीये॑ण॒ ब्रह्म॑णाविन्द॒दत्रिः॑ ॥ ६ ॥

स्वःऽभानोः अध यत् इंद्र माया अवः दिवः वर्तमानाः अवऽअहन् ।
गूळ्हं सूर्यं तमसा अपऽव्रतेन तुरीयेण ब्रह्मणा अविन्दत् अत्रिः ॥ ६ ॥

इंद्रा, आकाशाच्या अंतर्भागी स्वर्भानूने चालविलेल्या कपटप्रयोगांचे जेव्हां तू धुडके उडवून दिलेस तेव्हां त्या व्रतभ्रष्ट स्वर्भानूने माजविलेल्या अंधकारात बुडालेल्या सूर्याचा शोध अत्रि ऋषींनि चवथ्या स्तोत्राच्या योगाने लाविला. ॥ ६ ॥


मा मामि॒मं तव॒ सन्त॑मत्र इर॒स्या द्रु॒ग्धो भि॒यसा॒ नि गा॑रीत् ।
त्वं मि॒त्रः अ॑सि स॒त्यरा॑धा॒स्तौ मे॒हाव॑तं॒ वरु॑णश्च॒ राजा॑ ॥ ७ ॥

मा मां इमं तव संतं अत्रे इरस्या द्रुग्धः भियसा नि गारीत् ।
त्वं मित्रः असि सत्यऽराधाः तौ मा इह अवतं वरुणः च राजा ॥ ७ ॥

हे अत्रि मी तुझा आहे, तेव्हां त्या सज्जनद्वेष्ट्या दुष्टाने तुझ्या भितीमुळे किंवा आपल्या खुनशी स्वभावामुळे मला गिळून टाकले असे होऊं नये. तुझा आशिर्वाद विफल होणार नाहीच. तू लोकमित्र आहेस, तर तू आणि तुझा देव राजा वरुण असे दोघे माझा बचाव करा. ॥ ७ ॥


ग्राव्णो॑ ब्र॒ह्मा यु॑युजा॒नः स॑प॒र्यन् की॒रिणा॑ दे॒वान्नम॑सोप॒शिक्ष॑न् ।
अत्रिः॒ सूर्य॑स्य दि॒वि चक्षु॒राधा॒त्स्वर्भानो॒रप॑ मा॒या अ॑घुक्षत् ॥ ८ ॥

ग्राव्णः ब्रह्मा युयुजानः सपर्यन् कीरिणा देवान् नमसा उपऽशिक्षन् ।
अत्रिः सूर्यस्य दिवि चक्षुः आ अधात् स्वःऽभानोः अप माया अघुक्षत् ॥ ८ ॥

ब्रह्म स्तोत्र वेत्त्या अत्रीने ग्रावे एकत्र जुळवून आपल्या चमत्कृतिजनक स्तुतीने व पादवंदनांनी दिव्य विभूतींची सेवा करून देवाच्या सूर्यरूप नेत्राची आकाशात पुनः स्थापना केली आणि स्वर्भानूचे कपटजाल होते कि नव्हते असे करून टाकले. ॥ ८ ॥


यं वै सूर्यं॒ स्वर्भानु॒स्तम॒सावि॑ध्यदासु॒रः ।
अत्र॑य॒स्तमन्व॑विन्दन्न॒ह्य॑१न्ये अश॑क्नुवन् ॥ ९ ॥

यं वै सूर्यं स्वःऽभानुः तमसा अविध्यत् आसुरः ।
अत्रयः तं अनु अविन्दन् नहि अन्ये अशक्नुवन् ॥ ९ ॥

’असुरा’ पासून झालेल्या स्वर्भानूने सूर्याला अंधकाराने पीडीत केले होते, त्या सूर्याला अत्रि ऋषिंनीच शोधून काढले. इतर कोणासहि तसे करता आले नाही. ॥ ९ ॥


ॐ तत् सत्


GO TOP