|
ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त २१ ते ३० ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २१ ( अग्नि सूक्त )
ऋषी - सस आत्रेय : देवता - अग्नि : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्
म॒नु॒ष्वत्त्वा॒ नि धी॑महि मनु॒ष्वत्समि॑धीमहि ।
मनुष्वत् त्वा नि धीमहि मनुष्वत् सं इधीमहि ।
मनूप्रमाणे आम्ही तुझी वेदीवर स्थापना करतो. मनूराजाने केल्याप्रमाणे तुला प्रदीप्त करतो. अंगिरा, अग्निदेवा, देवभक्तांकरितां मनूराजाप्रमाणेंच तू दिव्य विभुतींचें यजन कर. ॥ १ ॥
त्वं हि मानु॑षे॒ जनेऽ॑ग्ने॒ सुप्री॑त इ॒ध्यसे॑ ।
त्वं हि मानुषे जने अग्ने सुऽप्रीतः इध्यसे ।
प्रसन्नान्तःकरण अग्निदेव, तूं ह्या मानवलोकांत खरोखरच वेदीवर प्रदीप्त होत असतोस आणि हे नवनीत सेवना, घृतपूर्ण पळ्या तुझ्याकडेच सरसावत आहेत. ॥ २ ॥
त्वां विश्वे॑ स॒जोष॑सो दे॒वासो॑ दू॒तम॑क्रत ।
त्वां विश्वे सऽजोषसः देवासः दूतं अक्रत ।
सर्व दिव्य विभूतींनी एकचित्त होऊन तुला आपला प्रतिनिधि केलें आहे, आणि हे प्रतिभासंपन्न तुझी सेवा करून यज्ञांमध्यें तुज भगवंताचें गौरव ते करीत असतात. ॥ ३ ॥
दे॒वं वो॑ देवय॒ज्यया॒ग्निमी॑ळीत॒ मर्त्यः॑ ।
देवं वः देवऽयज्यया अग्निं ईळीत मर्त्यः ।
देवांचे यजन करण्याच्या हेतूने तुमच्यासाठीं अग्निदेवाचा गौरव हा मनुष्य प्राणी करो. श्वेततेजोमय देवा प्रज्वलित होऊन तूं प्रकाशित हो. सत्यधर्माच्या उद्गमस्थानी विराजमान हो. फलधान्यादिकांचे उद्गम स्थान पृथ्वी, तिच्या ठिकाणी विराजमान हो. ॥ ४ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २२ ( अग्नि सूक्त )
ऋषी - विश्वसामन् आत्रेय : देवता - अग्नि : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्
प्र वि॑श्वसामन्नत्रि॒वदर्चा॑ पाव॒कशो॑चिषे ।
प्र विश्वऽसामन् अत्रिऽवत् अर्च पावकऽशोचिषे ।
हे विश्वसामन्, अत्रिऋषिप्रमाणें पुण्यप्रकाश जो अग्निदेव त्याच्या प्रीत्यर्थ मोठ्याने स्तवन कर. सर्व यज्ञयागांतील परमपूज्य होता आणि सर्व लोकांत अत्यानंदरूप असा तोच आहे. ॥ १ ॥
न्य॑१ग्निं जा॒तवे॑दसं॒ दधा॑ता दे॒वमृ॒त्विज॑म् ।
नि अग्निं जातऽवेदसं दधात देवं ऋत्विजम् ।
सर्वज्ञ आणि मनुष्यांचा खरा ऋत्विज असा अग्निदेव त्याची वेदीवर स्थापना करा, व सर्व दिव्य विभूतींना प्रसन्न करून व्याप्त करणारा यज्ञ आज अविरतपणानें यथासांग तडीस जाऊं द्या. ॥ २ ॥
चि॒कि॒त्विन्म॑नसं त्वा दे॒वं मर्ता॑स ऊ॒तये॑ ।
चिकित्वित्ऽमनसं त्वा देवं मर्तासः ऊतये ।
तुझे मन अत्यंत सूक्ष्मदृष्टि, तेव्हां तुज पुरुषोत्तमाच्या कृपाकटाक्ष प्राप्तीकरितां तुझ्या चरणापाशी येऊन तुझें कृपाछत्र आमच्यावर असावें ह्यासाठी सर्व मानवांनीं तुझें चिंतन केले आहे. ॥ ३ ॥
अग्ने॑ चिकि॒द्ध्य॑१स्य न॑ इ॒दं वचः॑ सहस्य ।
अग्ने चिकिद्धि अस्य न इदं वचः सहस्य ।
सर्वदमना अग्निदेवा, आमच्या भाषणाकडे तूं पूर्ण अवधान दे. उत्कृष्ट मुकुट धारण करणार्या भगवंता, हे गृहस्वामिन् देवा, आम्ही अत्रि स्तोत्रांनी तुला दृष्टचित्त करीत आहोत; स्तुतींनी तुला अलंकृत करीत आहोत. ॥ ४ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २३ ( अग्नि सूक्त )
ऋषी - द्युम्न विश्वचर्षणि आत्रेय : देवता - अग्नि : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्
अग्ने॒ सह॑न्त॒मा भ॑र द्यु॒म्नस्य॑ प्रा॒सहा॑ र॒यिम् ।
अग्ने सह्न्तं आ भर द्युम्नस्य प्रऽसहा रयिम् ।
सत्वप्राप्तीसाठी चाललेल्या युद्धांत जें यच्चावत् जिवांना प्रत्यक्ष पादाक्रांत करूं शकेल असेच विजयी ऐश्वर्य, हे अग्निदेवा, आपल्या अतुल तेजाच्या जोरावर आमच्याकडे घेऊन ये. ॥ १ ॥
तम॑ग्ने पृतना॒षहं॑ र॒यिं स॑हस्व॒ आ भ॑र ।
तं अग्ने पृतनाऽसहं रयिं सहस्वः आ भर ।
हे रिपुदमना अग्ने, शत्रूसेनेचा मोड करणारे हे ऐश्वर्य आम्हांस तू दान कर. तूं खरोखर सत्यस्वरूप आहेस, प्रकाशसंपन्न सत्व-सामर्थ्याचा अलौकिक दाता तूंच आहेस. ॥ २ ॥
विश्वे॒ हि त्वा॑ स॒जोष॑सो॒ जना॑सो वृ॒क्तब॑र्हिषः ।
विश्वे हि त्वा सऽजोषसः जनासः वृक्तऽबर्हिषः ।
सकल जन प्रेमाने एकचित्त होऊन दर्भाग्रें खुडून टाकून, यज्ञ मंदिरांतील सर्वांचा प्रिय होता जो तू, त्या तुजजवळच्या अमोलिक दिव्य संपत्तीची ते याचना करीत आहेत. ॥ ३ ॥
स हि ष्मा॑ वि॒श्वच॑र्षणिर॒भिमा॑ति॒ सहो॑ द॒धे ।
सः हि स्म विश्वऽचर्षणिः अभिऽमाति सहः दधे ।
तो सर्वद्रष्टा भगवंत, सर्वांचा दर्प जिरवून टाकणारें ओज त्याच्याजवळ आहे. हे श्वेततेजोमया अग्नि, ह्य आमच्या निवास स्थानांत तू ऐश्वर्याचा प्रकाश पाड. हे पतित पावना उज्वल असा प्रकाश पाड. ॥ ४ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २४ ( अग्नि सूक्त )
ऋषी - गौपायन आत्रेय : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराज्
अग्ने॒ त्वं नो॒ अन्त॑म उ॒त त्रा॒ता शि॒वो भ॑वा वरू॒थ्यः ॥ १ ॥
अग्ने त्वं नः अन्तमः उत त्राता शिवः भव वरूथ्यः ॥ १ ॥
अग्नि, तूं आमच्या अतिशय निकट राहून चिलखताप्रमाणें तू आमचा कल्याण-प्रद तारक हो. ॥ १ ॥
वसु॑र॒ग्निर्वसु॑श्रवा॒ अच्छा॑ नक्षि द्यु॒मत्त॑मं र॒यिं दाः॑ ॥ २ ॥
वसुः अग्निः वसुऽश्रवाः अच्छा नक्षि द्युमत्ऽतमं रयिं दाः ॥ २ ॥
अग्नि हेच आमचे स्पृहणीय धन, त्याच्या अभिलषणीय धनाची कीर्ति त्रिजगतांत आहे. देवा, तू आमच्याकडे ये, आणि अत्यंत उज्ज्वल असें दिव्य धन आम्हांस प्रदान कर. ॥ २ ॥
स नो॑ बोधि श्रु॒धी हव॑मुरु॒ष्या णो॑ अघाय॒तः स॑मस्मात् ॥ ३ ॥
स नः बोधि श्रुधी हवं उरुष्य णः अघऽयतः समस्मात् ॥ ३ ॥
तू आमचा हो. आमची हांक ऐक. सर्व दुष्ट पातकी लोकांच्या तडाख्यातून आमची मुक्तता कर. ॥ ३ ॥
तं त्वा॑ शोचिष्ठ दीदिवः सु॒म्नाय॑ नू॒नमी॑महे॒ सखि॑भ्यः ॥ ४ ॥
तं त्वा शोचिष्ठ दीदिऽवः सुम्नाय नूनं ईमहे सखिऽभ्यः ॥ ४ ॥
आणि हे प्रकाशमान देवा, हे अत्यंत तेजःपूंज मूर्ते, आमच्या मित्रांकरितां त्यांच्या सुखासाठी आम्ही तुझी विनवणी करीत आहोत. ॥ ४ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २५ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसूयू आत्रेय : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुभ्
अच्छा॑ वो अ॒ग्निमव॑से दे॒वं गा॑सि॒ स नो॒ वसुः॑ ।
अच्छ वः अग्निं अवसे देवं गासि सः नः वसुः ।
तुमच्यावर कृपाप्रसाद व्हावा म्हणून हे उद्गात्या अग्नीचे, त्या देवाचे यशोगायन कर. तोच सद्धर्मप्रतिपालक, ईश्वरी तेजांचा पुत्र अग्नि, आम्हांला उत्कृष्ट अशी दिव्य संपत्ति देवो. आमचा द्वेष करणारे जे दुष्ट आहेत त्यांच्या कपट जालांतून आम्हांस पार नेवो. ॥ १ ॥
स हि स॒त्यो यं पूर्वे॑ चिद्दे॒वास॑श्चि॒द्यमी॑धि॒रे ।
सः हि सत्यः यं पूर्वे चित् देवासः चित् यं ईधिरे ।
पूर्वींच्या ऋषिंनी आणि देवांनीसुद्धा ज्या यज्ञसंपादक, मधुरभाषी, आपल्या अत्युज्वल कांतीने विराजत, अशा अग्निदेवाला वेदीवर प्रज्वलित केलें तो हा अग्नि खरोखर सत्यरूपच आहे. ॥ २ ॥
स नो॑ धी॒ती वरि॑ष्ठया॒ श्रेष्ठ॑या च सुम॒त्या ।
सः नः धीती वरिष्ठया श्रेष्ठया च सुऽमत्या ।
आमच्या ध्यानस्तुतीने, आमच्या पापरहित संकल्पांनी प्रसन्न होऊन तू आपल्या सर्वोत्कृष्ट आणि अनुपम सौजन्याच्या योगानें हे पुरुषोत्तमा अग्ने, आमच्यावर आपल्या कृपा-ऐश्वर्याचा प्रकाश पाड ॥ ३ ॥
अ॒ग्निर्दे॒वेषु॑ राजत्य॒ग्निर्मर्ते॑ष्वावि॒शन् ।
अग्निः देवेषु राजति अग्निः मर्तेषु आऽविशन् ।
आपल्या तेजाने अग्नि देवांमध्ये आपले अधिपत्य मिरवितो, आणि मानवांच्या अंतःकरणांत शिरून तेथेंहि तो आपली सत्ता चालवितो. अग्नि हाच आमचे हविर्भाग देवांकडे पोहोंचवितो. तेव्हां हे ऋत्विजांनो, मनोमय स्तुतींनी अग्नीची परिचर्या करा. ॥ ४ ॥
अ॒ग्निस्तु॒विश्र॑वस्तमं तु॒विब्र॑ह्माणमुत्त॒मम् ।
अग्निः तुविश्रवःऽतमं तुविऽब्रह्माणं उत्ऽतमम् ।
ज्याची कीर्ति पराकाष्टेची पसरते, ज्याचें प्रार्थना-स्तोत्र अमोघ, आणि जो स्वतः सर्वोत्कृष्ट असतो, जो अपरजित असून ज्याच्या बालकाचीहि त्याच्याप्रमाणेंच ख्याति होते अशा प्रकारचा सत्पुत्र अग्नि हविदात्या यजमानाला देतो. ॥ ५ ॥
अ॒ग्निर्द॑दाति॒ सत्प॑तिं सा॒साह॒ यो यु॒धा नृभिः॑ ।
अग्निः ददाति सत्ऽपतिं सासाह यः युधा नृऽभिः ।
अग्नि भक्तांना असा उत्तम अधिपति देतो, कीं तो आपल्या शूर सैनिकांसह शत्रूशीं युद्ध करून त्यांत त्यांचा पराजय करतो. घोड्यावर बसून अतिशय जलद धांवणारा अप्रतिहत आणि सर्वविजयी असा योद्धा अग्नि भक्तांच्या साह्याकरितां देतो. ॥ ६ ॥
यद्वाहि॑ष्ठं॒ तद॒ग्नये॑ बृ॒हद॑र्च विभावसो ।
यत् वाहिष्ठं तत् अग्नये बृहत् अर्च विभावसोइतिविभाऽवसो ।
जे जे कांही अत्यंत त्वरेने अर्पण करतां येईल, ते ते अग्नीप्रत अर्पण होऊं द्या. हे तेजोविराजित देवा, आनंदित होऊन मोठ्याने घोष कर. राजाच्या पट्टराणीप्रमाणें दिव्य संपत्ति, ही तुझीच आणि सत्वाढयशक्ति हीहि तुझीच. ॥ ७ ॥
तव॑ द्यु॒मन्तो॑ अ॒र्चयो॒ ग्रावे॑वोच्यते बृ॒हत् ।
तव द्युमन्तः अर्चयः ग्रावाऽइव उच्यते बृहत् ।
तुझ्या ज्वाला देदीप्यमान, आणि ग्राव्यांच्या गंभीर ध्वनि प्रमाणे ’बृहत्’ सामगायनहि तुजप्रीत्यर्थ उच्चस्वरांत होते. आणि आकाशापासून आपोआप मेघगर्जना होते, त्याप्रमाणें तुझा भीषण नाद कर्णपथावर आदळतो. ॥ ८ ॥
ए॒वाँ अ॒ग्निं व॑सू॒यवः॑ सहसा॒नं व॑वन्दिम ।
एव अग्निं वसूऽयवः सहसानं ववंदिम ।
अत्युत्कृष्ट दिव्य संपत्तीची मनीषा धरून आम्ही जगज्जेत्या अग्नीला वारंवार प्रणिपात केलेला आहे, तर तो अगाध कर्तृत्वशाली भगवंत नावेंत बसवून सुखरूप पार नेल्याप्रमाणे यच्चावत् धर्महीन द्वेष्ट्यांच्या सेनेंतून आम्हांस विजयी करून पार नेवो. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २६ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वसूयू आत्रेय : देवता - अग्नि, विश्वेदेव : छंद - गायत्री
अग्ने॑ पावक रो॒चिषा॑ म॒न्द्रया॑ देव जि॒ह्वया॑ । आ दे॒वान्व॑क्षि॒ यक्षि॑ च ॥ १ ॥
अग्ने पावक रोचिषा मन्द्रया देव जिह्वया । आ देवान् वक्षि यक्षि च ॥ १ ॥
पावना अग्निदेवा, आपल्या सुंदर दीप्तीनें आणि मधुर शब्दांनी देवांचे मन वळवून त्यांना इकडे घेऊन ये, आणि त्यांच्या प्रीत्यर्थ यजन कर. ॥ १ ॥
तं त्वा॑ घृतस्नवीमहे॒ चित्र॑भानो स्व॒र्दृश॑म् । दे॒वाँ आ वी॒तये॑ वह ॥ २ ॥
तं त्वा घृतस्नोइतिघृतःस्नो ईमहे चित्रभानोइतिचित्रऽभानो स्वःदृशम् । देवाँ आ वीतये वह ॥ २ ॥
दिव्य घृताची वृष्टी करणार्या, हे अद्भुत कांतीमान देवा, सूर्याप्रमाणें तेजस्वी अशा तुजपुढें मी पदर पसरून प्रार्थना करीत आहे, तर हविरन्न ग्रहण करण्याकरितां दिव्यविभूतींना इकडे घेऊन ये. ॥ २ ॥
वी॒तिहो॑त्रं त्वा कवे द्यु॒मन्तं॒ समि॑धीमहि । अग्ने॑ बृ॒हन्त॑मध्व॒रे ॥ ३ ॥
वीतिऽहोत्रं त्वा कवे द्युऊमन्तं सं इधीमहि । अग्ने बृहन्तं अध्वरे ॥ ३ ॥
हे कविश्रेष्ठ अग्ने, देवांना यज्ञ हवींचा उपभोग करविणारा तूं तेजोमूर्ति श्रेष्ठ देव म्हणून यज्ञयागांत आम्ही तुलाच प्रदीप्त करतो. ॥ ३ ॥
अग्ने॒ विश्वे॑भि॒रा ग॑हि दे॒वेभि॑र्ह॒व्यदा॑तये । होता॑रं त्वा वृणीमहे ॥ ४ ॥
अग्ने विश्वेभिः आ गहि देवेभिः हव्यऽदातये । होतारं त्वा वृणीमहे ॥ ४ ॥
हे अग्ने, आपल्या सर्व दिव्य विभूंतीसह तू येथे आगमन कर. तुज यज्ञ संपादकाची आम्ही प्रार्थना करीत आहोत. ॥ ४ ॥
यज॑मानाय सुन्व॒त आग्ने॑ सु॒वीर्यं॑ वह । दे॒वैरा स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ५ ॥
यजमानाय सुन्वते आ अग्ने सुऽवीर्यं वह । देवैः आ सत्सि बर्हिषि ॥ ५ ॥
तुला सोमरस अर्पण करणार्या यजमानास तू उत्कृष्ट शौर्याची देणगी दे. आणि देवांसह कुशासनावर आरोहण कर. ॥ ५ ॥
स॒मि॒धा॒नः स॑हस्रजि॒दग्ने॒ धर्मा॑णि पुष्यसि । दे॒वानां॑ दू॒त उ॒क्थ्यः ॥ ६ ॥
संऽइधानः सहस्रऽजित् अग्ने धर्माणि पुष्यसि । देवानां दूतः उक्थ्यः ॥ ६ ॥
सहस्रावधि प्रतिपक्ष्यांस जिंकणर्या अग्निदेवा, तूं वेदीवर प्रज्वलित होऊन लोकांत सद्धर्माचा प्रसार करतोस, आणि देवतांचा प्रशंसनीय प्रतिनिधि तूंच आहेस. ॥ ६ ॥
न्य॑१ग्निं जा॒तव॑दसं होत्र॒वाहं॒ यवि॑ष्ठ्यम् । दधा॑ता दे॒वमृ॒त्विज॑म् ॥ ७ ॥
न्य१ग्निं जातवेदसं होत्रऽवाहं यविष्ठ्यम् । दधाता देवं ऋत्विजम् ॥ ७ ॥
सर्वज्ञ, हविर्भाग पोहोंचविणारा, तारुण्यमूर्ति यज्ञाचा ऋत्विज आणि देव अग्नि त्याला वेदीवर अधिष्टित करा. ॥ ७ ॥
प्र य॒ज्ञ ए॑त्वानु॒षग॒द्या दे॒वव्य॑चस्तमः । स्तृ॒णी॒त ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ८ ॥
प्र यज्ञ एतु आनुषक् अद्या देवव्यचस्तमः । स्तृणीत बर्हिः आऽसदे ॥ ८ ॥
हविर्द्वारा देवतांना अत्यानंदानें व्याप्त करणारा यज्ञसमारंभ अव्याहत तडीस जाऊं द्या आणि देवतांस आरोहण करण्यास कुशासन पसरा. ॥ ८ ॥
एदं म॒रुतो॑ अ॒श्विना॑ मि॒त्रः सी॑दन्तु॒ वरु॑णः । दे॒वासः॒ सर्व॑या वि॒शा ॥ ९ ॥
आ इदं मरुतः अश्विना मित्रः सीदन्तु वरुणः । देवासः सर्वया विशा ॥ ९ ॥
ह्या कुशासनावर, मरुत् अश्विदेव, व जगन्मित्र वरुण आपल्या सर्व दिव्यगणांसहवर्तमान विराजमान होवोत. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २७ ( अत्रि भौम सूक्त )
ऋषी - अत्रि भौम : देवता - दानस्तुति : छंद - त्रिष्टुभ्, अनुष्टुभ्
अन॑स्वन्ता॒ सत्प॑तिर्मामहे मे॒ गावा॒ चेति॑ष्ठो॒ असु॑रः म॒घोनः॑ ।
अनस्वंता सत्ऽपतिः ममहे मे गावा चेतिष्ठः असुरः मघोनः ।
सज्जनांचा प्रतिपालक, दानशूरांचा अत्यन्त ज्ञानवान् प्रभुश्रेष्ठ त्यानें मला उत्तम जातिवंत बैल नजर केले. हे जगन्मित्रा अग्निदेवा त्रिवृष्णाचा पुत्र त्र्यरुण त्या दहा हजारांच्या देणगीनें पसिद्धीस आला. ॥ १ ॥
यो मे॑ श॒ता च॑ विंश॒तिं च॒ गोनां॒ हरी॑ च यु॒क्ता सु॒धुरा॒ ददा॑ति ।
यः मे शता च विंशतिं च गोनां हरीइति च युक्ता सुऽधुरा ददाति ।
त्र्यरुणानें तुला एकशेंवीस बैल आणि उंची सामानासकट रथाला जोडलेली अबलक घोड्यांची एकजोडी नजर केली आहे; आणि हे जगन्मित्रा अग्ने, तुझे उत्कृष्ट स्तवन होऊन तूं हर्ष वृद्धिंगत झाला आहेस तर त्या त्र्यरुणाला हे देवा तूं सुखाचे धाम अर्पण कर. ॥ २ ॥
ए॒वा ते॑ अग्ने सुम॒तिं च॑का॒नः नवि॑ष्ठाय नव॒मं त्र॒सद॑स्युः ।
एवा ते अग्ने सुऽमतिं चकानः नविष्ठाय नवमं त्रसदस्युः ।
अग्नि, तुला केव्हांही पहावा तर तूं अत्यंत नूतनच दिसतोस, तर ह्याप्रमाणें तुझ्या कृपा प्रेमाची आस धरणार्या त्रसुदस्यूनें, हे जगन्मित्रा, नऊ वेळां तुझे यशोगान केलें आहे. म्हणून ह्या त्र्यरुणहि एकाग्र मनाने सतःसिद्ध महाबलाढ्य जो अग्नि, त्याची मी केलेली प्रार्थना स्तुति गाऊन म्हणत असतो. ॥ ३ ॥
यो म॒ इति॑ प्र॒वोच॒त्यश्व॑मेधाय सू॒रये॑ ।
यः मे इति प्रवोचति अश्वऽमेधाय सूरये ।
जो कोणी माझा म्हणून त्या ’अश्वमेध’ राज्यापाशीं शब्द टाकील, त्याला ऋक्सूक्तानें स्तवन करून अभीष्ट प्राप्तीस्तव प्रयत्न करणार्या त्या पुरुषाला ईश्वर इच्छित लाभ देईल, त्या सद्धर्मशील पुरुषाला तो विशाल बुद्धि देईल. ॥ ४ ॥
यस्य॑ मा परु॒षाः श॒तमु॑द्ध॒र्षय॑न्त्यु॒क्षणः॑ ।
यस्य मा परुषाः शतं उत्ऽहर्षयन्ति उक्षणः ।
चित्रविचित्र रंगाच्या शेंकडो वृषभांनी मला अत्यानंदीत केले. ही देणगी ज्या "अश्वमेध" राजाची, त्यानें दिलेलें दान तीन तऱ्हेने बनवलेल्या सोमरसाच्या पेयाप्रमाणें हर्षप्रद होय. ॥ ५ ॥
इन्द्रा॑ग्नी शत॒दाव्न्यश्व॑मेधे सु॒वीर्य॑म् ।
इन्द्राग्नीइति शतदाव्नि अश्वऽमेधे सुऽवीर्यम् ।
शेंकडो देणग्या देणार्या त्या अश्वमेध राज्याच्या आंगी उत्कृष्ट शौर्य ठेवा. त्याची राजसत्ता रक्षण करा. अफाट आकाशांतील कधी क्षीण न होणार्या सूर्याप्रमाणें त्याची सत्ता अक्षय्य करा. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २८ ( अग्नि सूक्त )
ऋषी - विश्ववारा आत्रेयी : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्, जगती, अनुष्टुभ्, गायत्री
समि॑द्धो अ॒ग्निर्दि॒वि शो॒चिर॑श्रेत्प्र॒त्यङ्उ॒अग्नषस॑मुर्वि॒या वि भा॑ति ।
समिद्धः अग्निः दिवि शोचिः अश्रेत् प्रत्यङ् उषसं उर्विया वि भाति ।
अग्नि प्रज्वलित झाला असतां त्याची प्रभा आकाशांत पसरावी आणि उषःकालीन प्रकाशाच्या सन्मुख दूरवर त्याची कांति उज्वल दिसावी म्हणून ही पहा सर्व जनप्रिय प्रेमळ उषा, घृत धारेनें आणि हवीनें देवांना हर्षोत्फुल्ल करणारी उषा, आमच्या नमनांनी प्रसन्न होऊन उदय पावत आहे. ॥ १ ॥
स॒मि॒ध्यमा॑नो अ॒मृत॑स्य राजसि ह॒विष्कृ॒ण्वन्तं॑ सचसे स्व॒स्तये॑ ।
संऽइध्यमानः अमृतस्य राजसि हविः कृण्वंतं सचसे स्वस्तये ।
तूं प्रज्वलित होऊन अमरत्वावर राजसत्ता चालवितोस, आणि हवि अर्पण करणार्या भक्ताच्या महत्कल्याणासाठीं त्याच्या अगदी पाठीशी असतोस. हे अग्ने, ज्याचा तूं कैवार घेतोस, जो तुला आपल्या पुढें वेदीवर अधिष्ठित करून तुझें आदरातिथ्य करतो, तो सर्व प्रकारची सामर्थ्य संपत्ति आपल्या अगदी मुठीत ठेवतो. ॥ २ ॥
अग्ने॒ शर्ध॑ मह॒ते सौभ॑गाय॒ तव॑द्यु॒म्नान्यु॑त्त॒मानि॑ सन्तु ।
अग्ने शर्ध महते सौभगाय तव द्युम्नानि उत्ऽतमानि संतु ।
आम्हाला महत्भाग्य प्राप्त होण्याकरितां, हे अग्नि, तूं आपले संहत-सामर्थ्य प्रकट कर. तुझ्या किरणांची तेजस्विता उत्तमोत्तम असो. आमचा गृहस्थधर्म व्यवस्थित कसा चालावा तें आम्हांस सुचव, आणि आमच्याशी वैर करणार्या दुष्टांचे प्राबल्य हाणुन पाड. ॥ ३ ॥
समि॑द्धस्य॒ प्रम॑ह॒सोऽ॑ग्ने॒ वन्दे॒ तव॒ श्रिय॑म् ।
संऽइद्धस्य प्रःमहसः अग्ने वन्दे तव श्रियम् ।
अग्नि, तूं महाप्रतापि. तूं प्रज्वलित झाला असतां तुझ्या तेजो वैभवापुढें मी प्रणत होतो. तूं तेजस्वितेने आढ्य सकल कामवर्षक पुंगव आहेस आणि यज्ञयागांत तूंच प्रदीप्त होत असतोस. ॥ ४ ॥
समि॑द्धो अग्न आहुत दे॒वान्य॑क्षि स्वध्वर ।
संऽइद्धः अग्ने आऽहुत देवान् यक्षि सुऽअध्वर ।
अग्निदेवा, तुला पाचारण करून तूं प्रदीप्त झालास म्हणजे, यज्ञयाग यथासांग संपादन करणार्या हे भगवंता, देवतांना संतुष्ट कर, आमचे हविर्भाग पोंचविणारा तूंच आहेस. ॥ ५ ॥
आ जु॑होता दुव॒स्यता॒ग्निं प्र॑य॒त्यध्व॒रे ।
आ जुहोत दुवस्यत अग्निं प्रऽयति अध्वरे ।
यागास आरंभ झाला असतां, ऋत्विजांनो, अग्नीला पाचारण करून आहुति द्या; त्याची मनोभावनें सेवा करा; त्या हविर्वाहक भगवंताला तुम्हीं आपल्याकडे घ्या. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २९ ( इंद्र सूक्त )
ऋषी - गौरवीति शाक्त्य आत्रेय : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
त्र्यर्य॒मा मनु॑षो दे॒वता॑ता॒ त्री रो॑च॒ना दि॒व्या धा॑रयन्त ।
त्रि अर्यमा मनुषः देवऽताता त्री रोचना दिव्या धारयंत ।
मनुष्यें जी ईश्वरसेवा करतात, त्या सेवेत देवांनी तीन प्रकारचे प्रेसंबंध आणि तीन प्रकारची दिव्य तेजें ठेविली आहेत. ज्यांचे चातुर्यबल फार पवित्र, असे मरुत् तुझ्या भजनांत मोठ्यानें गर्जना करीत आहेत. अणि हे इन्द्र, तूंच महाप्राज्ञ देव, तू मरुतांचा ऋषि आहेस. ॥ १ ॥
अनु॒ यदीं॑ म॒रुतो॑ मन्दसा॒नमार्च॒न्निन्द्रं॑ पपि॒वांसं॑ सु॒तस्य॑ ।
अनु यत् ईं मरुतः मन्दसानं आर्चन् इन्द्रं पपिवांसं सुतस्य ।
आनंदमग्न आणि सोमरसाचें पुनः पुनः प्राशन करणार्या इन्द्राचें मरुतांनी अर्चन केलें, तेव्हां त्याने वज्र हातीं घेऊन त्या महाभुजंगाला ठार केले. आणि अविरतप्रवाह जीं दिव्य उदकें, त्यांनी यथेच्छ संचार करावा म्हणून त्यांना मुक्त केलें. ॥ २ ॥
उ॒त ब्र॑ह्माणो मरुतो मे अ॒स्येन्द्रः॒ सोम॑स्य॒ सुषु॑तस्य पेयाः ।
उत ब्रह्माणः मरुतः मे अस्य इन्द्रः सोमस्य सुऽसुतस्य पेयाः ।
प्रार्थना-सूक्तप्रिय मरुतांनों, उत्तम रितीने बनविलेल्या ह्या माझ्या सोमरसाचे इंद्र प्राशन करो. हाच जो सोमरसमय हविर्भाग त्याच्यायोगाने प्रकाशधेनूंची प्राप्ति झाली आणि ह्याचेंच प्राशन करून इंद्रानें त्या अहि भुजंगाचें निर्दलन केलें. ॥ ३ ॥
आद्रोद॑सी वित॒रं वि ष्क॑भायत्संविव्या॒नश्चि॑द्भि॒यसे॑ मृ॒गं कः॑ ।
आत् रोदसीइति विऽतरं वि स्कभायत् संऽविव्यानः चित् भियसे मृगं करितिकः ।
नंतर त्यानें आकाश व पृथ्वी ही दोन्ही तुटक करून त्यांची आपआपल्या जागीं स्थापना केली, अणि त्या दोहोंना व्यापून टाकून "मृगा"ला भयविव्हल करून टाकलें. सर्व जगत् गिळंकृत करून टाकणार्या त्या राक्षसाला सर्व ओकून टाकावयास लावून इंद्रानें फुसफुसत आंगावर चाल करून आलेल्या त्या अधम दानवास आपटून मारले. ॥ ४ ॥
अध॒ क्रत्वा॑ मघव॒न्तुभ्यं॑ दे॒वा अनु॒ विश्वे॑ अददुः सोम॒पेय॑म् ।
अध क्रत्वा मघऽवन् तुभ्यं देवा अनु विश्वे अददुः सोमऽपेयम् ।
सूर्याच्या आपीततेजोयुक्त घोड्या भरधांव दौडत जात असतांना ’एतशा’करितां तूं त्यांना स्तब्ध केलेंस. ह्या तुझ्या अतुल कर्तृत्वामुळें हे ऐश्वर्यसंपन्ना, सर्व देवगणांनी तुजला सोमरस समर्पण केला. ॥ ५ ॥
नव॒ यद॑स्य नव॒तिं च॑ भो॒गान्सा॒कं वज्रे॑ण म॒घवा॑ विवृ॒श्चत् ।
नव यत् अस्य नवतिं च भोगान् साकं वज्रेण मघऽवा विऽवृश्चत् ।
जेव्हां दातृश्रेष्ठ इंद्रानें त्या राक्षसाच्या, चैनीच्या पदार्थांनी रेचून भरलेल्या नव्याण्णव नगरांचा आपल्या वज्रानें विध्वंस करून टाकला, त्या वेळेस देवांच्या निवासस्थानी आकाशांत मरुतांनी उच्चस्वरांत गायन केलें अणि आपल्या त्रिष्टुभ् वृत्तांतील आलापांनी आकाश दणाणून सोडलें. ॥ ६ ॥
सखा॒ सख्ये॑ अपच॒त्तूय॑म॒ग्निर॒स्य क्रत्वा॑ महि॒षा त्री श॒तानि॑ ।
सखा सख्ये अपचत् तूयं अग्निः अस्य क्रत्वा महिषा त्री शतानि ।
प्रेमळ मित्र अग्नीनें आपला प्रेमळ सखा इंद्र त्याच्याकरितां त्याच्याच कर्तृत्वशक्तीनें, तीनशे "महिष" नांवाच्या वनस्पति परिपक्व केल्या; तेव्हां आम्हां मानवांची तीन सरोवरें भरतील इतका सोमरस तयार झाला होता तो रस वृत्रास ठार मारण्याकरितां इन्द्रानें एकदम प्राशन केला. ॥ ७ ॥
त्री यच्छ॒ता म॑हि॒षाणा॒मघो॒ मास्त्री सरां॑सि म॒घवा॑ सो॒म्यापाः॑ ।
त्री यत् छता महिषाणां अघः माः त्री सरांसि मघऽवा सोम्या अपाः ।
तीनशे "महिष" गृहण करून जेव्हां इंद्राने सोमरसाची तीन सरोवरें प्राशन केली आणि अहि भुजंगास ठार मारले तेव्हां जयघोष करावा त्याप्रमाणे सर्व देवांनी एकदम सिंहनाद केला. ॥ ८ ॥
उ॒शना॒ यत्स॑हस्याइ॒रया॑तं गृ॒हमि॑न्द्र जूजुवा॒नेभि॒रश्वैः॑ ।
उशना यत् सहस्यैः अयातं गृहं इंद्र जूजुवानेभिः अश्वैः ।
मोठे तीव्र वेगाचे मजबूत अश्व जोडलेल्या रथांत बसून हे इंद्रा, हे उशना, तुम्हीं आपल्या सदनांत परत आला, त्यापूर्वी हे इंद्रा कुत्स आणि इतर देव ह्यांच्या बरोबर रथांत जाऊन तूं शत्रूशी युद्ध करून शुष्ण राक्षसाचा वध केलास. ॥ ९ ॥
प्रान्यच्च॒क्रम॑वृहः॒ सूर्य॑स्य॒ कुत्सा॑या॒न्यद्वरि॑वो॒ यात॑वेऽकः ।
प्र अन्यत् चक्रं अवृहः सूर्यस्य कुत्साय अन्यत् वरिवः यातवे अकरित्यकः ।
सूर्याचे एक चाक तू चालू करून दिलेस आणि युद्धास निघालेल्या कुत्साकरितां दुसरे चाक तूं प्रशस्त व सुखप्रद केलेस. धर्मविहीन व नकट्या नाकाच्या दस्यूस तू ठार मारून, त्यांच्याच घरांत, सज्जनांना शिव्याशाप देणार्या त्या दुष्टांचा तूं धुव्वा उडवून दिलास. ॥ १० ॥
स्तोमा॑सस्त्वा॒ गौरि॑वीतेरवर्ध॒न्नर॑न्धयो वैदथि॒नाय॒ पिप्रु॑म् ।
स्तोमासः त्वा गौरिऽवीतेः अवर्धन् अरंधयः वैदथिनाय पिप्रुम् ।
गौरीवीतिच्या स्तोत्रांनी तू हर्षाने वृद्धिंगत झालास आणि पिप्रुस वैदथिनाच्या सर्वस्वी स्वाधीन केलेस; ऋजिश्व्याने तुजकरितां पक्वान्नें सिद्ध करून तुझा कृपालोभ संपादन केला; तेव्हां त्याने अर्पण केलेला सोमरस तू प्राशन केलास. ॥ ११ ॥
नव॑ग्वासः सु॒तसो॑मास॒ इन्द्रं॒ दश॑ग्वासो अ॒भ्यर्चन्त्य॒र्कैः ।
नवऽग्वासः सुतऽसोमासः इंद्रं दशऽग्वासः अभि अर्चन्ति अर्कैः ।
नवग्व आणि दशग्व ह्यांनी सोमरस सिद्ध करून "ऋक्" स्तोत्रांनी इंद्राची स्तुति केली व प्रकाशधेनूच्या बंदिखान्याची जागा चिणून बंद करून टाकली होती ती प्रयासाने फोडून त्या शूरपुरुषांनी ते बंधनगृह खुले केले. ॥ १२ ॥
क॒थो नु ते॒ परि॑ चराणि वि॒द्वान्वी॒र्या मघव॒न्या च॒कर्थ॑ ।
कथोइति नु ते परि चराणि विद्वान् वीर्या मघऽवन् या चकर्थ ।
सर्वज्ञा, ऐश्वर्यसंपन्न भगवंता, तुझी सेवा माझ्या हातून कशी बरें होईल ? तू जी जी पराक्रमाची कृत्ये पूर्वी केलीस आणि जी तू अगदी अलीकडे नवीनच करशील त्यांचे वर्णन, हे उत्कटबलाढ्य देवा, आम्ही यज्ञसभांतून करू म्हणजे झाले. ॥ १३ ॥
ए॒ता विश्वा॑ चकृ॒वाँ इ॑न्द्र॒ भूर्यप॑रीतो ज॒नुषा॑ वी॒र्येण ।
एता विश्वा चकृऽवान् इन्द्र भूरि अपरिऽइतः जनुषा वीर्येण ।
प्रकट झाल्यापासून जो आपल्या वीर्यभराने कधीही कोणास हार गेला नाही, त्या भगवान् इंद्रानेच ही सर्व महत्कृत्ये केली आहेत. हे वज्रधरा आपल्या अतुल धैर्यबलाने जी कृत्ये तू केली आहेस त्या तुझ्या ह्या विलक्षण हिमतीला प्रतिबंध करील असा कोणीहि असू शकणार नाही. ॥ १४ ॥
इन्द्र॒ ब्रह्म॑ क्रि॒यमा॑णा जुषस्व॒ या ते॑ शविष्ठ॒ नव्या॒ अक॑र्म ।
इन्द्र ब्रह्म क्रियमाणा जुषस्व या ते शविष्ठ नव्याः अकर्म ।
हे इंद्रा, ह्या तुझ्या आम्ही करीत असलेल्या प्रार्थना-सूक्तांचा तू स्वीकार कर. ही अपूर्व सूक्तें, हे महाबलिष्ठा, सुंदर तलम विणलेल्या सुखकर वस्त्राप्रमाणे आम्ही तुझ्या प्रीत्यर्थच केली आहेत. एखादा बुद्धिमान् कुशल शिल्पि रथ सजवून तयार करतो त्याप्रमाणे व्यवस्थित वसविली आहेत. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३० ( इंद्रसूक्त, ऋणंचय दानस्तुति )
ऋषी - बभ्रु आत्रेय : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
क्व॑१स्य वी॒रः को अ॑पश्य॒दिन्द्रं॑ सु॒खर॑थ॒मीय॑मानं॒ हरि॑भ्याम् ।
क्व१स्य वीरः को अपश्यत् इन्द्रं सुखऽरथं ईयमानं हरिऽभ्याम् ।
कोठे आहे तो शूरश्रेष्ठ ? आरक्ततेजोयुक्त घोडे जोडलेल्या आपल्या आरामशीर रथात विराजमान होऊन जात असता इंद्राला कोणी बरे पाहिले असेल ? दिव्य ऐश्वर्याने मंडित होऊन सोमरस प्राशन करण्याची इच्छा धरणारा तो वज्रधर, तो सोमप्रिय सर्वजनसंसेव्य देव, भक्तरक्षणार्थ त्यांच्याकडेच जात असतो. ॥ १ ॥
अवा॑चचक्षं प॒दम॑स्य स॒स्वरु॒ग्रं नि॑धा॒तुरन्वा॑यमि॒च्छन् ।
अव अचचक्षं पदं अस्य सस्वः उग्रं निऽधातुः अनु आयं इच्छन् ।
मी ह्या जगदाधार देवाचे, गूढ परंतु घोर असे स्थान पाहिले, आणि इच्छा धरून तेथे पोहोंचलो. मी दुसर्या लोकांनाहि विचारिले तेव्हां ते म्हणाले कीं आम्हीही शूर पुरुष आहोत, व आम्हांला ज्ञान जागृति आली आहे, पण आम्ही इंद्राच्या स्थानी जाऊन पोहोंचू काय ? ॥ २ ॥
प्र नु व॒यं सु॒ते या ते॑ कृ॒तानीन्द्र॒ ब्रवा॑म॒ यानि॑ नो॒ जुजो॑षः ।
प्र नु वयं सुते या ते कृतानि इन्द्र ब्रवाम यानि नः जुजोषः ।
सोमरस पिळून सिद्ध झाला असतां, हे इंद्राच्या महत्कृत्यांनी तू आम्हाला सुखी केलेस त्या सर्व पराक्रमांचे वर्णन आम्ही करू. ते परक्रम ज्याला अजून विदीत नसतील त्याने ते जरूर माहित करून घ्यावे, आणि ज्याला ते विदीत असतील त्याने ते पुनः पुनः श्रवण करावे. हा पहा दिव्यैश्वर्यसंपन्न इंद्र आपल्या सर्व सैन्यासह इकडेच येत आहे. ॥ ३ ॥
स्थि॒रं मन॑श्चकृषे जा॒त इ॑न्द्र॒ वेषीदेको॑ यु॒धये॒ भूय॑सश्चित् ।
स्थिरं मनाः चकृषे जातः इन्द्र वेषि इत् एकः युधये भूयसः चित् ।
इंद्रा तू प्रकट होताच आपले मन दृढ केलेस. आणि असंख्य शत्रूंशी लढण्यास एकट्याने कंबर बांधलीस. आपल्या अचाट बलाने प्रचंड खडक फोडून प्रकाशरूप धेनूंच्या बंदिवासाचे ठिकाण शोधून काढलेस. ॥ ४ ॥
प॒रो यत्त्वं प॑र॒म आ॒जनि॑ष्ठाः परा॒वति॒ श्रुत्यं॒ नाम॒ बिभ्र॑त् ।
परः यत् त्वं परमः आऽजनिष्ठाः पराऽवति श्रुत्यं नाम बिभ्रत् ।
तूं जे नांव धारण केलेस ते ताबडतोब प्रख्यात झाले अणि असे विख्यात नांव धारण करून, तू श्रेष्ठ परात्पर भगवान् अत्यंत दूरच्या लोकीं अवतीर्ण झालास, व तेव्हां पासून देवांनासुद्धा तुझा दरारा वाटत आहे. दुष्ट अधार्मिक लोकांच्या ताबेदारीत जी दिव्य उदकें सापडली होती ती झाडून सर्व त्या इंद्राने मुक्त केली. ॥ ५ ॥
तुभ्येदे॒ते म॒रुतः॑ सु॒शेवा॒ अर्च॑न्त्य॒र्कं सु॒न्वन्त्यन्धः॑ ।
तुभ्य इत् एते मरुतः सुऽशेवाः अर्चन्ति अर्कं सुन्वंति अन्धः ।
हे मंगलकारक मरुत् तुझ्याकरितां "अर्क" स्तवन मोठ्याने गर्जना करून म्हणत आहेत. ऋत्विज सोमरसाचे पेय तयार करीत आहेत. कारण इंद्राने आपल्या लोकोत्तर युक्त्यांनी त्या कपटपटु अहिला, पाण्यामध्यें बुडी मारून छपून बसणार्या भुजंगाला, शोधून ठार केले. ॥ ६ ॥
वि षू मृधो॑ ज॒नुषा॒ दान॒मिन्व॒न्नह॒न्गवा॑ मघवन्संचका॒नः ।
वि सु मृधः जनुषा दानं इन्वन् अहन् गवा मघऽवन् संऽचकानः ।
भक्तांना द्यावयाची देणगी पुढें करून, आणि हे ऐश्वर्यवंत, प्रकाशधेनूचा शोध लागला त्यामुळे आनंदभरीत होऊन, तू प्रथमच शत्रूंचा पार धुव्वा उडवून दिलास, आणि मनुष्यमात्राच्या सुखाचा मार्ग खुला व्हावा म्हणून तेथे रणांगणांवर त्या अधार्मिक ’नमुचि’चे शिर तू धडापासून वेगळे केलेस. ॥ ७ ॥
युजं॒ हि मामकृ॑था॒ आदिदि॑न्द्र॒ शिरो॑ दा॒सस्य॒ नमु॑चेर्मथा॒यन् ।
युजं हि मां अकृथाः आत् इत् इन्द्र शिरः दासस्य नमुचेः मथायन् ।
इंद्रा, नमुचि राक्षसाचे मस्तक ठेंचून टाकताना तू मला आपल्या जोडीला घेतलेस. तेव्हां मरुतांकरिता, रथचक्राप्रमाणे परिभ्रमण करणार्या द्यावापृथिवींनीही गरगर फिरणार्या त्या दिव्य अशनीचे सहाय्य घेतले. ॥ ८ ॥
स्त्रियो॒ हि दा॒स आयु॑धानि च॒क्रे किं मा॑ करन्नब॒ला अ॑स्य॒ सेनाः॑ ।
स्त्रियः हि दासः आयुधानि चक्रे किं मा करन् अबलाः अस्य सेनाः ।
त्या धर्मविमुख राक्षसाने आपले जबरदस्त हत्यार बाहेर काढले, आणि ते कोणते म्हणाल तर स्त्रिया. आता स्त्रियांचा विचार बाजूला ठेवला तरी त्या राक्षसाचे सैन्यसुद्धा दुर्बल, ते माझे काय करणार ? शत्रुसैन्याच्या आत कोंडल्या गेलेल्या "वाक्"रूपी दोन्ही धेनू इंद्राच्या दृष्टीस पडल्या; आणि त्याबरोबर तो दस्यूचा समाचर घेण्यास तात्कळ धावून गेला. ॥ ९ ॥
समत्र॒ गावो॑ऽ॒भितो॑ऽनवन्ते॒हेह॑ व॒त्सैर्वियु॑ता॒ यदास॑न् ।
सं अत्र गावः अभितः अनवन्त इहऽइह वत्सैः विऽयुताः यत् आसन् ।
त्या राक्षसाने कोंडून टाकलेल्या धेनूंची त्यांच्या वांसरापासून ताटातूट झाली, म्हणून त्याही इकडेतिकडे चोहोंकडे पाहून हंबरडा फोडीत होत्याच. आणि पिळून तयार केलेल्या सोमरसानें इंद्राला उल्लसित करतांच त्याने एकदम आपल्या सामर्थ्याने त्या धेनूंना बंधमुक्त केले. ॥ १० ॥
यदीं॒ सोमा॑ ब॒भ्रुधू॑ता॒ अम॑न्द॒न्नरो॑रवीद्वृष॒भः साद॑नेषु ।
यत् ईं सोमाः बभ्रुऽधूता अमंदन् अरोरवीत् वृषभः सदनेषु ।
मी बभ्रु ऋषीने घुसळून तयार केलेला सोमरस अवलोकन करून इंद्र हर्षमग्न झाला; व तो वीरपुंगव इंद्र आपल्या छावणीतच गर्जना करू लागला. आणि नंतर त्या शत्रुनगदांचा विध्वंस करणार्या इंद्राने त्या सोमरसाचा पुनः पुनः आस्वाद घेतल्यावर लागलीच त्या प्रकाशधेनू त्याने भक्तांस देऊन टाकल्या. ॥ ११ ॥
भ॒द्रमि॒दं रु॒शमा॑ अग्ने अक्र॒न्गवां॑ च॒त्वारि॒ दद॑तः स॒हस्रा॑ ।
भद्रं इदं रुशमाः अग्ने अक्रन् गवां चत्वारि ददतः सहस्रा ।
अग्नि, ’रुशम’ लोकांनी आम्हांस चार हजार गाई दिल्या ही गोष्ट त्यांनी उत्तमच केली. आणि त्यांचा राजा ऋणंचय त्याने सढळ हाताने ज्या देणग्या दिल्या, त्यांचा, त्या वीरवीरोत्तमाच्या देणग्यांचा आम्ही स्वीकार केला. ॥ १२ ॥
सु॒पेश॑सं॒ माव॑ सृज॒न्त्यस्तं॒ गवां॑ स॒हस्रै॑रु॒शमा॑सो अग्ने ।
सुऽपेशसं मा अव सृजन्ति अस्तं गवां सहस्रैः रुशमासः अग्ने ।
अग्नि, वस्त्रभूषणांनी माझा गौरव करून व हजारो धेनू देऊन ’रुशम’ लोकांनि माझी पाठवण केली. त्यावेळेस ती संकटाची रात्र उजाडतांच, सोमरसाचे कडक पेय अर्पण करून इंद्राला हर्षभरीत केले. ॥ १३ ॥
औच्छ॒त्सा रात्री॒ परि॑तक्म्या॒ याँ ऋ॑णञ्च॒ये राज॑नि रु॒शमा॑नाम् ।
औच्छत् सा रात्री परिऽतक्म्या या ऋणंऽचये राजनि रुशमानाम् ।
’रुशम’ लोकांचा राजा ऋणंचय आला असता त्यावेळेची ती संकटाची रात्र संपून उजाडले, व घोड्यावर स्वार होऊन वेगाने चाल करणार्या योद्ध्याप्रमाणें मी बभ्रु होतो म्हणून त्याने मला चार हजार द्रव्य दिले. ॥ १४ ॥
चतुः॑सहस्रं॒ गव्य॑स्य प॒श्वः प्रत्य॑ग्रभीष्म रु॒शमे॑ष्वग्ने ।
चतुःऽसहस्रं गव्यस्य पश्वः प्रति अग्रभीष्म रुशमेषु अग्ने ।
अग्नि, रुशमापासून आम्ही चार हजार द्रव्य आणि पुष्कळ गाईगुरे घेतली. आणि शिवाय आम्ही विद्वान् विप्र म्हणून यज्ञांती "प्रवर्ग्य" ह्या समारंभाकरितां तापवून घडवून तयार केलेले एक मोठे पोलादी "घर्म" पात्र आम्हांस मिळाले. ॥ १५ ॥
ॐ तत् सत् |