|
ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ११ ते २० ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ११ ( अग्नि सूक्त )
ऋषी - सुतंभर आत्रेय : देवता - अग्नि : छंद - जगती
जन॑स्य गो॒पा अ॑जनिष्ट॒ जागृ॑विर॒ग्निः सु॒दक्षः॑ सुवि॒ताय॒ नव्य॑से ।
जनस्य गोपाः अजनिष्ट जागृविः अग्निः सुऽदक्षः सुविताय नव्यसे ।
पहा हा जगाचा सांभाळ करणारा, जागरूक आणि परमचतुर अग्नि मनुष्यांना अपूर्व सुख द्यावें म्हणून ह्या लोकीं अवतीर्ण झाला आहे. तो घृतप्रभव, आणि पवित्रतेजस्क देव आम्हां भारतीयांकरितां आपल्या गगनचुंबी व विशाल ज्वालांनीं सुप्रकाशित झाला आहे. ॥ १ ॥
य॒ज्ञस्य॑ के॒तुं प्र॑थ॒मं पु॒रोहि॑तम॒ग्निं नर॑स्त्रिषध॒स्थे समी॑धिरे ।
यज्ञस्य केतुं प्रथमं पुरःऽहितं अग्निं नरः त्रिऽसधस्थे सं ईधिरे ।
यज्ञाचा मार्ग दर्शक ध्वज, सर्वांचा आद्य धर्माचार्य अशा अग्नीला पुण्य पुरुषांनीं निरनिराळ्या तीन वेदींवर प्रज्वलित केलें आहे, तर इंद्रासह आणि इतर सर्व दिव्य विभूतिंसह जो एकाच रथावर आरूढ होत असतो तो हा यज्ञ होता अघटीत कर्तृत्वशाली अग्नि आतां कुशासनावर अधिष्ठित होवो. ॥ २ ॥
अस॑म्मृष्टो जायसे मा॒त्रोः शुचि॑र्म॒न्द्रः क॒विरुद॑तिष्ठः वि॒वस्व॑तः ।
असंऽमृष्टः जायसे मात्रोः शुचिः मन्द्रः कविः उत् अतिष्ठः विवस्वतः ।
अरणिरूप दोन जननींच्या पोटीं तूं उत्पन्न होतोस तो भूषणविरहित पण पवित्र तेजस्क असाच होतोस; आनंदमग्न व ज्ञानी कवि अशा रूपानें तूं विवस्वानापासून प्रकट झालास. हे देवा भक्तजनांनी घृताहुतींनी तुला हर्षोल्लसित केले. त्यामुळें आकाशापर्यंत जाऊन भिडलेला धुराचा लोट हाच बाहुटाप्रमाणें दिसूं लागला. ॥ ३ ॥
अ॒ग्निर्नो॑ य॒ज्ञमुप॑ वेतु साधु॒याग्निं नरो॒ वि भ॑रन्ते गृ॒हेगृ॑हे ।
अग्निः नः यज्ञं उप वेतु साधुऽया अग्निं नरः वि भरन्ते गृहेऽगृहे ।
सौजन्य प्रेरित होऊन अग्नि आमच्या यज्ञसमारंभास आगमन करो; कारण लोकहि परोपरीनें घरोघर अग्नीचाच सत्कार करीत असतात. देवांकडे हविर्भाग घेऊन जाणारा अग्नि हाच आमचा प्रतिनिधि झाला आहे आणि अग्नीला निवडून आपलासा करणारे लोक कवि-प्रतिभेलाहि त्याच्या बरोबरच हस्तगर करून घेतात. ॥ ४ ॥
तुभ्ये॒दम॑ग्ने॒ मधु॑मत्तमं॒ वच॒स्तुभ्यं॑ मनी॒षा इ॒यं अ॑स्तु॒ शं हृ॒दे ।
तुभ्य इदं अग्ने मधुमत्ऽतमं वचःऽतुभ्यं मनीषा इयं अस्तु शं हृदे ।
हे अग्नी, माधुर्यानें ओथंबलेले हे स्तोत्र तुझ्या प्रीत्यर्थ म्हटले आहे. माझी आकांक्षा, माझें ध्यानस्तवन तुझ्याच प्राप्तीसाठीं; ते तुझ्या अंतःकरणाला प्रसन्न करो; मोठमोठे प्रचंड उदक प्रवाह महानदाला तुडुंब भरून टाकतात त्याप्रमाणें भक्तांचे स्तुति प्रवाह तुला ओतप्रोत भरून टाकून तुझ्याच उत्कटबलानें तुला वृद्धिंगत करतात. ॥ ५ ॥
त्वां अ॑ग्ने॒ अङ्गि॒॑रसो॒ गुहा॑ हि॒तमन्व॑विन्दञ्छिश्रिया॒णं वने॑वने ।
त्वां अग्ने अङ्गिजरसः गुहा हितं अनु अविन्दन् शिश्रियाणं वनेऽवने ।
हे अग्नी, प्रत्येक अरण्यांत वास्तव्य करून सुप्त राहणार्या अशा तुला अंगिरा ऋषिंनी लोकांच्या निदर्शनास आणलें. तूं आतां अरणि घर्षणानेंच प्रकट होतोस म्हणून हे अंगिरसप्रिय, हे प्रताप पुत्रा अग्ने, तुला "सर्वकष" असे म्हणतात. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १२ ( अग्नि सूक्त )
ऋषी - सुतंभर आत्रेय : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्राग्नये॑ बृह॒ते य॒ज्ञिया॑य ऋ॒तस्य॒ वृष्णे॒ असु॑राय॒ मन्म॑ ।
प्र अग्नये बृहते यज्ञियाय ऋतस्य वृष्णे असुराय मन्म ।
परम पूज्य, सत्य धर्मावर कृपामृताचें सिंचन करणारा, परमेश्वर अग्नि त्यालाच हे अंतःस्फुरित स्तोत्र मी अर्पण करतो. यज्ञांत ह्या अग्नीच्या मुखामध्यें पवित्र घृतधारा सोडावीं त्या प्रमाणें मी आपली रसाळ स्तुतीहि ह्या वीर पुंगवाला समर्पण करीत आहे. ॥ १ ॥
ऋ॒तं चि॑कित्व ऋ॒तमिच्चि॑किद्ध्यृ॒तस्य॒ धारा॒ अनु॑ तृन्धि पू॒र्वीः ।
ऋतं चिकित्व ऋतं इत् चिकिद्धि ऋतस्य धाराः अनु तृन्धि पूर्वीः ।
सनातनधर्माचें सूक्ष्मज्ञान असणार्या देव, सत्य धर्माचें ज्ञान तूं आम्हांस करून दे, आणि खर्या धर्म ज्ञानाचें प्रचंड लोट तूं ह्या लोकीं सोडून दे. मुद्दाम जबरीनें किंवा लबाडीनें मी कांही जादुटोणा चालवितो असे नाही. तर हा आरक्ततेजस्क वीर जो अग्नि त्यानेंच लावून दिलेला सनातन धर्म मीं आचरीत असतों. ॥ २ ॥
कया॑ नः अग्न ऋ॒तय॑न्नृ॒तेन॒ भुवो॒ नवे॑दा उ॒चथ॑स्य॒ नव्यः॑ ।
कया नः अग्न ऋतयन् ऋतेन भुवः नवेदाः उचथस्य नव्यः ।
सत्यमार्गानेंच सद्धर्माचें प्रतिपालन करणार्या अग्निदेवा आमच्या अपूर्व सामगायनाचें ज्ञान तुला कशा रीतीनें झालें असेल बरें ? तिन्ही कालांचा शास्ता परमेश्वर मला ओळखतो अण मी मात्र त्या दिव्यैश्वर्य प्रभूला ओळखूं शकत नाहीं. ॥ ३ ॥
के ते॑ अग्ने रि॒पवे॒ बन्ध॑नासः॒ के पा॒यवः॑ सनिषन्त द्यु॒मन्तः॑ ।
के ते अग्ने रिपवे बन्धनासः के पायवः सनिषन्त द्युऽमन्तः ।
अग्निदेवा, शत्रूंना बांधून टाकणार्या तुझ्या त्या शृंखळा कोणत्या ? आणि ज्या तेजस्वी सेवकांनीं त्या आपल्या स्वाधीन ठेविल्या आहेत म्हणतात ते सेवक कोण ? हे अग्नि अधर्माचा सांठा कोण जपून ठेवतात, आणि असत्य भाषणाचे चहाते असे हरीचे लाल तरी कोण आहेत ? ॥ ४ ॥
सखा॑यस्ते॒ विषु॑णा अग्न ए॒ते शि॒वासः॒ सन्तो॒ अशि॑वा अभूवन् ।
सखायः ते विषुणाः अग्ने एते शिवासः सन्तः अशिवाः अभूवन् ।
हे अग्नि, असे हरीचे लाल तेच काय कीं जे सर्वांशींच मित्र म्हणून सारखेपणानें वागत होते व प्रथम सोज्ज्वळ असून मागाहून पातकी ठरले. तेव्हां सरळ धर्मानें वागणार्या महात्म्याला नाहीं नाहीं तीं नांवे ठेऊन त्यांनी आपल्या दुर्भाषणांनी आपल्या स्वतःलाच फसविलें नाही का ? ॥ ५ ॥
यस्ते॑ अग्ने॒ नम॑सा य॒ज्ञमीट्ट॑ ऽऋ॒तं स पा॑त्यरु॒षस्य॒ वृष्णः॑ ।
यः ते अग्ने नमसा यज्ञं ईट्टे ऋतं सः पाति अरुषस्य वृष्णः ।
हे अग्नि, तुला प्रणिपात करून तुझ्या प्रीत्यर्थ जो यज्ञ करतो, तो आरक्ततेजस्क वीर जो तूं त्या तुझ्या सनातन धर्माचेंच आचरण करतो, विशाल अशा स्वर्ग लोक त्याचाच. तर आतां आशारूप अरण्यांत भटकणार्या मनुष्याचा आशातंतु जो हा पुण्यत्म अग्नि, तो आतां प्राप्त होवो. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १३ ( अग्नि सूक्त )
ऋषी - सुतंभर आत्रेय : देवता - अग्नि : छंद - गायत्री
अर्च॑न्तस्त्वा हवाम॒हेऽर्चन्तः॒ समि॑धीमहि । अग्ने॒ अर्च॑न्त ऊ॒तये॑ ॥ १ ॥
अर्चन्तः त्वा हवामहे अर्चन्तः सं इधीमहि । अग्ने अर्चन्तआ ऊतये ॥ १ ॥
मोठ्यानें भजन करून आम्हीं तुझा धांवा करीत असतो, आणि मोठ्यानें स्तोत्रघोष करून तुला प्रज्वलित करतो. हे अग्ने तुझ्या कृपा-रक्षणा करतां आम्हीं तुझें स्तवन उच्चस्वरानें करीत असतो. ॥ १ ॥
अ॒ग्ने स्तोमं॑ मनामहे सि॒ध्रम॒द्य दि॑वि॒स्पृशः॑ । दे॒वस्य॑ द्रविण॒स्यवः॑ ॥ २ ॥
अग्नेआ स्तोमं मनामहे सिध्रं अद्य दिविऽस्पृशः । देवस्य द्रविणस्यवः ॥ २ ॥
हे अग्नि, आकाशापर्यंत जाऊन भिडणारा जो तूं देव त्या तुझ्या सद्यःफलदायी स्तोत्राचें आम्हीं देवप्रीत्यर्थ झटणारे भक्तजन मनन करीत असतो. ॥ २ ॥
अ॒ग्निर्जु॑षत नो॒ गिरो॒ होता॒ यः मानु॑षे॒ष्वा । स य॑क्ष॒द्दैव्यं॒ जन॑म् ॥ ३ ॥
अग्निः जुषत नः गिरः होता यः मानुषेषु आ । सः यक्षत् दैव्यं जनम् ॥ ३ ॥
सर्व मनुष्यांमध्यें जो एकच यज्ञ संपादक आहे त्या अग्नीनें आमच्या स्तुतीचा स्वीकार केला आहे, तर तोच आतां आपल्या दिव्य विभूतींना संतुष्ट करो. ॥ ३ ॥
त्वं अ॑ग्ने स॒प्रथा॑ असि॒ जुष्टो॒ होता॒ वरे॑ण्यः । त्वया॑ य॒ज्ञं वि त॑न्वते ॥ ४ ॥
त्वं अग्ने सऽप्रथा असि जुष्टः होता वरेण्यः । त्वया यज्ञं वि तन्वते ॥ ४ ॥
अग्ने, तूं अपार आहेस, सर्वोत्कृष्ट प्रसन्नचित्त होता तूंच आहेस आणि यज्ञ कर्म तुझ्या मुळेंच करतां येतें ॥ ४ ॥
त्वाम॑ग्ने वाज॒सात॑मं॒ विप्रा॑ वर्धन्ति॒ सुष्टु॑तम् । स नो॑ रास्व सु॒वीर्य॑म् ॥ ५ ॥
त्वां अग्ने वाजऽसातमं विप्राः वर्धन्ति सुऽस्तुतम् । सः नः रास्व सुऽवीर्यम् ॥ ५ ॥
सत्वसामर्थ्य आलोट मिळवून देणारा तूं, आणि उत्कृष्ट स्तुति सेविताही तूंच, तेव्हां अशा तुला आमचे ज्ञानी विप्र हवनानें हर्षित करीत असतात तर तूं आम्हांस उत्तम प्रतीचें शौर्य दे. ॥ ५ ॥
अग्ने॑ ने॒मिर॒राँऽइ॑व दे॒वांस्त्वं प॑रि॒भूर॑सि । आ राध॑श्चि॒त्रमृ॑ञ्जसे ॥ ६ ॥
अग्ने नेमिः अरान्ऽइव देवान् त्वं परिऽभूः असि । आ राधः चित्रं ऋञ्जसे ॥ ६ ॥
चाकाचा पावटा त्याचे आरे एकत्र संभाळून धरतो त्याचप्रमाणें सर्व दिव्य विभुतींना तूं एकटाच व्यापून टाकून वेढून बसला आहेस व म्हणूनच अद्भुत कृपाप्रसाद मिळविण्याचा माझा एकसारखा प्रयत्न चालु आहे. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १४ ( अग्नि सूक्त )
ऋषी - सुतंभर आत्रेय : देवता - अग्नि : छंद - गायत्री
अ॒ग्निं स्तोमे॑न बोधय समिधा॒नः अम॑र्त्यम् । ह॒व्या दे॒वेषु॑ नो दधत् ॥ १ ॥
अग्निं स्तोमेन बोधय संऽइधानः अमर्त्यम् । हव्या देवेषु नः दधत् ॥ १ ॥
त्या मरणरहित विभूतिला अर्थात् अग्नीला प्रज्वलित् करून तूं त्याला स्तोत्रानेंउद्बोधन कर. दिव्य विभूतिंकडे आपले हविर्भाग त्यानेंच पोहोंचविले आहेत. ॥ १ ॥
तं अ॑ध्व॒रेष्वी॑ळते दे॒वं मर्ता॒ अम॑र्त्यम् । यजि॑ष्ठं॒ मानु॑षे॒ जने॑ ॥ २ ॥
तं अध्वरेषु ईळते देवं मर्ताः अमर्त्यम् । यजिष्ठं मानुषे जने ॥ २ ॥
मृत्युच्या आधीन असलेले आपण सर्व मानव त्या मृत्युरहित ईश्वराचें यागांमध्यें भजन करीत असतों; आपण मानवांना अत्यंत पूजनीय अशा त्या भगवंताचें स्तवन करीत असतो. ॥ २ ॥
तं हि शश्व॑न्त॒ ईळ॑ते स्रु॒चा दे॒वं घृ॑त॒श्चुता॑ । अ॒ग्निं ह॒व्याय॒ वोळ्ह॑वे ॥ ३ ॥
तं हि शश्वन्त ईळते स्रुचा देवं घृतऽश्चुता । अग्निं हव्याय वोळ्हवे ॥ ३ ॥
हविर्भाग देवतांस पोहोंचावा म्हणून यच्चावत् यज्ञनिरत भक्तजन घृतानें थबथबलेल्या पळीनें आहुति देऊन त्या भगवंताचेंच स्तवन करीत असतात. ॥ ३ ॥
अ॒ग्निर्जा॒तः अ॑रोचत॒ घ्नन्दस्यू॒ञ्ज्योति॑षा॒ तमः॑ । अवि॑न्द॒द्गा अ॒पः स्वः ॥ ४ ॥
अग्निः जातः अरोचत घ्नन् दस्यून् ज्योतिषा तमः । अविन्दत् गा अपः स्व१रितिस्वः ॥ ४ ॥
अग्नि आविर्भूत होतांच अंधकार आणि धर्महीन दुष्टलोक ह्यांचे आपल्या ज्योतीनें एकदमच निर्मूलन करून टाकून सुप्रकाशित झाला, आणि त्यानें दिव्य प्रकाश, दिव्य उदकें व दिव्यलोक ह्यांची लोकांस ओळख करून दिली. ॥ ४ ॥
अ॒ग्निमी॒ळेन्यं॑ क॒विं घृ॒तपृ॑ष्ठं सपर्यत । वेतु॑ मे शृ॒णव॒द्धव॑म् ॥ ५ ॥
अग्निं ईळेन्य कविं घृतऽपृष्ठं सपर्यत । वेतु मे श्रृणवत् हवम् ॥ ५ ॥
स्तवनार्ह, आणि कवित्वस्फूर्ति देणारा जो अग्नि त्याचें अर्चन करा. त्याचा दृश्य भाग घृतानें उद्वर्तन केलेला आहे. तर तो येथें येऊन माझा धांवा प्रेमानें ऐकून घेवो. ॥ ५ ॥
अ॒ग्निंघृ॒तेन॑ वावृधुः॒ स्तोमे॑भिर्वि॒श्वच॑र्षणिम् । स्वा॒धीभि॑र्वच॒स्युभिः॑ ॥ ६ ॥
अग्निं घृतेन ववृधुः स्तोमेभिः विश्वचर्षणिम् । सुऽआधीभिः वचस्युऽभिः ॥ ६ ॥
ह्याप्रमाणें, सर्व-गतिक आणि सर्व-द्रष्ट्या अग्नीला घृताहुतींनी, स्तोत्रांनी, वारंवार मनन केलेल्या स्तोत्रांच्या योगानें भक्तजनांनी हर्ष प्रवृद्ध केले. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १५ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वरुण आत्रेय : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
प्र वे॒धसे॑ क॒वये॒ वेद्या॑य॒ गिरं॑ भरे य॒शसे॑ पू॒र्व्याय॑ ।
प्र वेधसे कवये वेद्याय गिरं भरे यशसे पूर्व्याय ।
जगच्चालक, प्रतिभासंपन्न, आणि महाज्ञानी यशोमंडीत पुराणपुरुष जो अग्नि त्याच्या प्रीत्यर्थ मी सुमधुर स्तुति अर्पण केली आहे. अग्नि हाच ईश्वरविभूति आनंदमय आहे. दिव्य ऐश्वर्याचा आधर आणि सर्वोत्कृष्ट संपत्तीचा निधिहि तोच आहे. ॥ १ ॥
ऋ॒तेन॑ ऋ॒तं ध॒रुणं॑ धारयन्त य॒ज्ञस्य॑ शा॒के प॑र॒मे व्योमन् ।
ऋतेन ऋतं धरुणं धारयन्त यज्ञस्य शाके परमे विऽओमन् ।
यज्ञकर्माच्या जोरावर ऋषिवर्यांनी सत्यधर्माच्या आचरणानें जगाला आधारभूत जे सनातन सत्याचे नियम, त्याचें अत्युच्च अशा स्वर्लोकांत सुद्धां रक्षण केले. ते ऋषि असे होते कीं, आकाशाला सावरून धरणारा जो धर्मरूप स्वर्ग लोक, त्या ठिकाणीं विराजमान होणार्या जन्मरहित शूरविभूतींच्या सन्निध, ते ऋषिवर्य, जन्म मृत्युच्या तडाक्यांत सांपडलेल्या मानवी भक्तांसहित जाऊं शकले. ॥ २ ॥
अं॒हो॒युव॑स्त॒न्वस्तन्वते॒ वि वयो॑ म॒हद्दु॒ष्टरं॑ पू॒र्व्याय॑ ।
अंहःऽयुवः तन्वः तन्वते वि वयः महत् दुष्टरं पूर्व्याय ।
सनातन ईश्वराच्या भक्तीसाथी, त्यांनी निष्पाप शरीरें धारण करून कशाला हि न जुमानणारा असा तरुण्याचा जोम आंगांत आणला. तर हा नुकताच आविर्भूत झालेला अग्नि सर्व प्रदेश त्वरित व्याप्त करो. सिंहाप्रमाणें क्रुद्ध झालेल्या ह्या अग्नीच्या भोंवती भक्तजन अजून उभेंच आहेत. ॥ ३ ॥
मा॒तेव॒ यद्भर॑से पप्रथा॒नो जन॑ञ्जनं॒ धाय॑से॒ चक्ष॑से च ।
माताऽइव यत् भरसे पप्रथानः जनंऽजनं धायसे चक्षसे च ।
प्रत्येक मनुष्याने तृप्त व्हावे, त्याला बरे वाईट दिसूं लगावें म्हणून सर्वत्र प्रसार पावून तूं मनुष्यमात्राचे मतेप्रमाणे लालन करतोस. परंतु त्यांचा आंगात वास्तव्य करून तूं प्रत्येक यौवनाला वार्धक्य आणतोस तेव्हां तूंच स्वतः नानप्रकारचीं रूपें घेऊन संचार करतोस हेंच खरे. ॥ ४ ॥
वाजो॒ नु ते॒ शव॑सस्पा॒त्वन्त॑मु॒रुं दोघं॑ ध॒रुणं॑ देव रा॒यः ।
वाजः नु ते शवसः पातु अन्तं उरुं दोघं धरुणं देव रायः ।
उत्कट सामर्थ्याच्या प्रभो देवा तुझ्या उत्कटबलाचा सात्विक जोम त्या विस्तीर्ण सीमेचें - त्या दुग्धप्रहाचे - संरक्षण करो. हे देवा तोच दुग्ध प्रवाह दिव्य संपत्तीचा आधार आहे, आणि एखाद्या हेराप्रमाणें गुप्त ठिकाणीं राहून दिव्य धनाच्या प्राप्तिसाठीं मला अत्रील प्रकाश चैतय देऊन मुक्त केलेस. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १६ ( अग्नि सूक्त )
ऋषी - पूरु आत्रेय : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुभ्, पंक्ति
बृ॒हद्वयो॒ हि भा॒नवेऽ॑र्चा दे॒वाया॒ग्नये॑ ।
बृहत् वयः हि भानवे अर्च देवाय अग्नये ।
तुझे वय पुष्कळ झाले खरें पण अग्निदेवा प्रीत्यर्थ, त्याच्या ऊज्वल रश्मिसमूहाप्रीत्यर्थ भजनाचा घोष कर. ह्या अग्नीला मर्त्यजनांनी मनोहर स्तवनांनी आपल्या पुढें वेदीवर मित्राप्रमाणें अधिष्ठित केले आहे. ॥ १ ॥
स हि द्युभि॒र्जना॑नां॒ होता॒ दक्ष॑स्य बा॒ह्वोः ।
सः हि द्युऽभिः जनानां होता दक्षस्य बाह्वोः ।
आपल्या उज्वल प्रभेनें तो सर्व लोकांचा यज्ञ संपादक झाला आहे. त्या परम चतुर देवाच्या बाहूंच्या ठिकाणी हविर्भाग समर्पण झाले आहेत. असा हा अग्नि भाग्यदाता देव म्हणून अभिलषणीय धन भक्तांच्या पुढें आणून ठेवित अस्तो. ॥ २ ॥
अ॒स्य स्तोमे॑ म॒घोनः॑ स॒ख्ये वृ॒द्धशो॑चिषः ।
अस्य स्तोमे मघोनः सख्ये वृद्धऽशोचिषः ।
ह्या ऐश्वर्यदाताच्या स्तोत्रांत, ह्या परमदेदीप्यमान देवाच्या मित्र प्रेमांत सर्व कांही भरलेले आहे. ह्याचा भयंकर निनाद होत असतांना शूरांनी समरांत आपला उग्र प्रताप गाजविला. ॥ ३ ॥
अधा॒ह्यग्न एषां सु॒वीर्य॑स्य मं॒हना॑ ।
अध हि अग्ने एषां सुऽवीर्यस्य मंहना ।
आतां तुझ्या प्रबल शौर्याच्या देणगीमुळें जय ह्यांचाच. आणि तूं जरी चिमुकला असलास तरी तुला किंवा तुझ्या यशाला आकाश व पृथ्वी हे दोन्हीं लोक सुद्धा पुरे पडले नाहींत. ॥ ४ ॥
नू न॒ एहि॒ वार्य॒मग्ने॑ गृणा॒न आ भ॑र ।
नू नः आ इहि वार्यं अग्ने गृणानः आ भर ।
अग्निदेवा, आमच्याकडे लवकर धांव घे. तुझें स्तवन चालूच आहे तेव्हां तुझें स्पृहणीय धन आम्हांकरितां घेऊन ये. आम्ही आणि आमचे जे धुरीण आहेत ते असे एकदमच क्षेम सुखाचा उपभोग घेऊं म्हणून आमच्या उत्कर्षाकरितां ह्या झटापटींत तूं आमचा सहाय्यकर्ता हो. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १७ ( अग्नि सूक्त )
ऋषी - पूरु आत्रेय : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुभ्, पंक्ति
आ य॒ज्ञैर्दे॑व॒ मर्त्य॑ इ॒त्था तव्यां॑समू॒तये॑ ।
आ यज्ञैः देव मर्त्यः इत्था तव्यांसं ऊतये ।
हे देवा, मी गरीब मर्त्यमानवानें आत्मरक्षणार्थ तुज विभूतीची प्रार्थना करावी ना? यज्ञयाग उत्तमरीतीनें सांग झाल्यावर आतां मी "पुरू" तुझा प्रसाद व्हावा म्हणून तुज अग्नीची स्तुति करूं ना ? ॥ १ ॥
अस्य॒ हि स्वय॑शस्तरः आ॒सा वि॑धर्म॒न्मन्य॑से ।
अस्य हि स्वयशःऽतर आसा विऽधर्मन् मन्यसे ।
हे सद्भक्ता, त्याच्या सन्निध तुझ्या जवळ कांही गुण नसतांही तू स्वयशोमंडितच वाटतोस आणि म्हणूनच तू त्या दुःखरहित अद्भुत कांति आणि आनंदमग्न देवाचें ध्यान करीत असतोस. तो खरोखरच विचाराच्या आटोक्याबाहेर आहे. ॥ २ ॥
अ॒स्य वासा उ॑ अ॒र्चिषा॒ य आयु॑क्त तु॒जा गि॒रा ।
अस्य वै असौ ऊं इति अर्चिषा यः अयुक्त तुजा गिरा ।
त्याच्यामुळेंच, त्याच्या कांतीनेंच, आणि भक्तांच्या ओजस्वी प्रार्थनेनेंच हा अग्नि कार्य व्यापृत आहे. आणि त्याच्या तेजोरूप बीजाच्या प्रभावाने आकाशाप्रमाणेच ह्या अग्निच्या ज्वालाहि अतीशय देदीप्यमान दिसत असतात. ॥ ३ ॥
अ॒स्य क्रत्वा॒ विचे॑तसो द॒स्मस्य॒ वसु॒ रथ॒ आ ।
अस्य क्रत्वा विऽचेतसः दस्मस्य वसु रथे आ ।
त्याच्याच ईश्वरी सामर्थ्या मुळें ह्या महाज्ञानी अणि अद्भुत रूप अग्निच्या रथांत सर्वोत्कृष्ट जी संपत्ति ती भरलेली आहे, आणि म्हणूनच भक्तजन ज्याचा धांवा करतात असा हा अग्नि पृथ्वीच्या सर्व प्रांतात विख्यात झाला आहे. ॥ ४ ॥
नू न॒ इद्धि वार्य॑मा॒सा स॑चन्त सू॒रयः॑ ।
नू नः इत् धि वार्यं आसा सचन्त सूरयः ।
खरोखरच तुझ्यामुळें आमच्या धुरीणांना अभिलषणीय धन प्राप्त झालें आहे. हे ओजःप्रभवा देवा, अभीष्ट प्राप्ती व्हावी एतदर्थ आमचे रक्षण कर. क्षेमसुख व्हावे म्हणून आम्हांस सबल कर आणि आमच्या उत्कर्षाकरितां युद्ध्यांत आमच्या सन्निद्ध रहा ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १८ ( अग्नि सूक्त )
ऋषी - मुक्तवाहस् द्वित आत्रेय : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुभ्, पंक्ति
प्रा॒तर॒ग्निः पु॑रुप्रि॒यो वि॒शः स्त॑वे॒ताति॑थिः ।
प्रातः अग्निः पुरुऽप्रियः विशः स्तवेत अतिथिः ।
सर्वजनप्रिय आणि भक्तांच्या घरी पाहुणा म्हणून जाणार्या अग्नीचे स्तवन प्रातःकाळीं सर्व लोक करोत. तो मर्त्य मानवांत असतांना सर्व प्रकारच्या हविरन्नांनी प्रसन्न चित्त होतो. ॥ १ ॥
द्वि॒ताय॑ मृ॒क्तवा॑हसे॒ स्वस्य॒ दक्ष॑स्य मं॒हना॑ ।
द्विताय मृक्तऽवाहसे स्वस्य दक्षस्य मंहना ।
सर्व शारीरिक व्यंगें ज्यानें धुवून टाकली असा जो मी द्वित त्या माझ्या करितां, हे अमर भगवंता तुझ्या चातुर्बलाच्या देणगीमुळें स्तोतृजनानें तुझ्या प्रीत्यर्थ सोमरस सिद्ध करून ठेवला आहे. ॥ २ ॥
तं वो॑ दी॒र्घायु॑शोचिषं गि॒रा हु॑वे म॒घोना॑म् ।
तं वः दीर्घायुऽशोचिषं गिरा हुवे मघोनाम् ।
सत्पुरुषांचे दीर्घायुष्य सुप्रकाशित करणारा अग्नि त्याचा धांवा, दानशूर भक्तांनी केलेल्या स्तुतींच्या योगानें मी तुमच्यासाठीं करीत आहे, हे बुद्धिरूप अश्वदात्या अशा भक्तांचा रथ बिनधोक दौडत जातो. ॥ ३ ॥
चि॒त्रा वा॒ येषु॒ दीधि॑तिरा॒सन्नु॒क्था पान्ति॒ ये ।
चित्रा वा येषु दीधितिः आसन् उक्था पान्ति ये ।
ज्यांची ध्यानशक्ति विलक्षण आहे, जे आपल्या मुखांत साम सूक्तें वागवितात अशा भक्तांनीं ह्या प्रकाशाधिपा प्रीत्यर्थ कुशासन पसरलें असतें. आणि म्हणूनच ते सुकीर्तीनें अलंकृत झाले आहेत. ॥ ४ ॥
ये मे॑ पञ्च॒शतं॑ द॒दुरश्वा॑नां स॒धस्तु॑ति ।
ये मे पञ्चाशतं ददुः अश्वानां सधऽस्तुति ।
आम्हीं सर्वांनी मिळून ईशस्तुति गयल्यामुळें ज्या थोर पुरुषांनी मला पन्नास अश्व नजर केले, हे अमर भगवंता अग्नि, अशा दातृत्वशाली वीरपुरुषांना तूं वीरांचे ओजस्वी, विशाल आणि श्रेष्ठ असें सुयश दे. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १९ ( अग्नि सूक्त )
ऋषी - वत्रि आत्रेय : देवता - अग्नि : छंद - गायत्री, अनुष्टुभ्, विराज्
अ॒भ्यव॒स्थाः प्र जा॑यन्ते॒ प्र व॒व्रेर्व॒व्रिश्चि॑केत ।
अभि अवऽस्थाः प्र जायन्त प्र वव्रेः वव्रिः चिकेत ।
स्थित्यंतरें होतात; एका आच्छादनाच्या आंत दुसरें दृष्टीस पडते आणि अशा प्रकारे प्राणी मातेच्या उदरांत असलेला नजरेस येतो. ॥ १ ॥
जु॒हु॒रे वि चि॒तय॒न्तोऽनिमिषं नृ॒म्णं पा॑न्ति ।
जुहुरे वि चितयन्तः अनिऽमिषं नृम्णं पान्ति ।
सूक्ष्म विचार करून ज्यांनी यज्ञ केला, त्यांचा पराक्रम अखंड टिकतो. आणि शेवटी ते अक्षय्य लोकीं वास करतात. ॥ २ ॥
आ श्वै॑त्रे॒यस्य॑ ज॒न्तवो॑ द्यु॒मद्व॑र्धन्त कृ॒ष्टयः॑ ।
आ श्वैत्रेयस्य जन्तवः द्युऽमत् वर्धन्त कृष्टयः ।
आमच्या श्वैत्रेयाच्या क्षुद्र लोकांनीसुद्धां उज्ज्वल कीर्ति मिळविली आणि ह्या भक्तिरूप मधुर रस सेवनाच्या योगानेच कीं काय सत्वलाभाची इच्छा धरणार्या बृहदुक्थाच्या गळ्यांत आज कंठी लटकत आहे. ॥ ३ ॥
प्रि॒यं दु॒ग्धं न काम्य॒मजा॑मि जा॒म्योः सचा॑ ।
प्रियं दुग्धं न काम्यं अजामि जाम्योः सचा ।
द्यावापृथिवींची जी जिवश्चकंठश्च जोडी तिच्यापासून पहा मधुर दुग्धाप्रमाणें वाटेल तो मनोरथ पूर्ण करून घेतो. माझी स्थिती अशी आहे कीं अंतर्भागीं सत्व सामर्थ्याने रसरसणार्या कढत कटाहाप्रमाणें स्वतः अपराजित राहून बाकी सर्वांचा पराजय करूं शकतो. ॥ ४ ॥
क्रीळ॑न्नो रश्म॒ आ भु॑वः॒ सं भस्म॑ना वा॒युना॒ वेवि॑दानः ।
क्रीळन् नः रश्मे आ भुवः सं भस्मना वायुना वेविदानः ।
हे दिव्य किरणसमूहा, तूं क्रीडा करीत मौजेनें आमच्यकडे ये. सर्व शुष्क करून टाकणार्या वायूशी तुझा परिचय आहेच. ह्याप्रमाणें ह्या अग्नीचे किरण हल्ला चढविणार्या योद्ध्याप्रमाणें जलाल असून त्याच्या वक्षस्थलापासून निघणारी ज्वालाहि तशीच प्रखर असते. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २० ( अग्नि सूक्त )
ऋषी - प्रयस्वन्त आत्रेय : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुभ्
यम॑ग्ने वाजसातम॒ त्वं चि॒न्मन्य॑से र॒यिम् ।
यं अग्ने वाजऽसातम त्वं चित् मन्यसे रयिम् ।
भक्तांना अतिशय सत्वसामर्थ्य प्राप्त करून देणार्या हे अग्निदेवा, जे जे ऐश्वर्य देवामध्यें अत्यंत विख्यात आणि आम्हांला योग्य असें तुला वाटत असेल त्या ऐश्वर्याचें वर्णन आमच्या स्तुतींच्या द्वारे आम्हांकडून करवून घे ॥ १ ॥
ये अ॑ग्ने॒ नेरय॑न्ति ते वृ॒द्धा उ॒ग्रस्य॒ शव॑सः ।
ये अग्ने न ईरयन्ति ते वृद्धाः उग्रस्य शवसः ।
हे अग्नि, तू उग्र आणि उत्कट बलाढ्य देव असतांना जे लोक मोठ्या पदास चढलेले अथवा वयस्क असून तुझें अन्तःकरण भक्तीनें हालवून सोडीत नाहींत त्यांनी आपणास अन्यधर्मी किंवा दुसर्या देवांची सेवा करणार्या पुरुषांच्या द्वेषाला व तिरस्काराला पात्र करून घेतलेच असे समजावे. ॥ २ ॥
होता॑रं त्वा वृणीम॒हेऽ॑ग्ने॒ दक्ष॑स्य॒ साध॑नम् ।
होतारं त्वा वृणीमहे अग्ने दक्षस्य साधनम् ।
अग्नि, चातुर्य-बल साध्य करून देणार्या तुज यज्ञ-संपादकाची विनवणी आम्ही करीत आहोत. तूं यज्ञांमध्ये अग्रेसर, तेव्हां प्रार्थना स्तुतीनें तुला आनंदित करून आम्हीं पाचारण करीत आहोंत. ॥ ३ ॥
इ॒त्था यथा॑ त ऊ॒तये॒ सह॑सावन्दि॒वेदि॑वे ।
इत्था यथा त ऊतये सहसाऽवन् दिवेऽदिवे ।
खरोखर अनुग्रह-संरक्षणाला आम्हीं पात्र झालों त्याप्रमाणेच हे सर्वंकषा देवा, दिवसानुदिवस दिव्यैश्वर्य प्राप्तीला आणि सनातन धर्म कार्याला आम्हीं प्राप्त होऊं असें कर. हे महत्कार्य कुशला, प्रकाश धेनूंच्या लाभानें आम्हीं सर्वजण एकदम प्रमुदित होऊं, आम्ही आमच्या शूर सैनिकांसह एकदम हर्षभरित होऊं असें कर. ॥ ४ ॥
ॐ तत् सत् |