|  | 
| ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त १ ते १० ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - बुध व गविष्ठिर आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - त्रिष्टुभ्  
अबो॑ध्य॒ग्निः स॒मिधा॒ जना॑नां॒ प्रति॑ धे॒नुमि॑वाय॒तीमु॒षास॑म्  । 
अबोधि अग्निः संऽइधा जनानां प्रति धेनुंऽइव आऽयतीं उषसं  ।  
धेनुप्रमाणे मनोरथ दुग्ध देणारी उषा उदयोन्मुख होतांच, ऋत्विजांच्या समिधांनी अग्नि जागृत झाला आहे. आपल्या शाखा दूरवर फैलावून देणार्या एखाद्या प्रचंड वृक्षाप्रमाणें त्याच्या किरणांचा झोत आकाश भेदून जात आहे. ॥ १ ॥ 
 
अबो॑धि॒ होता॑ य॒जथा॑य दे॒वानू॒र्ध्वः अ॒ग्निः सु॒मनाः॑ प्रा॒तर॑स्थात्  । 
अबोधि होता यजथाय देवान् ऊर्ध्वः अग्निः सुऽमनाः प्रातः अस्थात्  । 
दिव्य विभूतींचे यजन करण्यासाठीं हा दिव्य होता जागृत झाला आहे. हा प्रसन्नांतःकरणाचा अग्नि ह्या प्रभातसमयीं यज्ञाकरितां सिद्ध झाला आहे. पहा ह्या प्रज्वलित अग्निचें उज्ज्वल तेज दृग्गोचर होत आहे, आणि हा परम श्रेष्ठ देव अंधकार पटलापासून अगदीं वेगळा झाला आहे. ॥ २ ॥ 
 
यदीं॑ ग॒णस्य॑ रश॒नामजी॑गः॒ शुचिर॑ङ्क्ते॒  शुचि॑भि॒र्गोभि॑र॒ग्निः  । 
यत् ईं गणस्य रशनां अजीगरिति शुचिः अङ्क्तेन शुचिऽभिः गोभिः अग्निः  । 
तो जनसमूहाच्या मनोवृत्तिरूप मालिकेला जागृत करतो, त्यावेळेस तो परमपावन अग्नि पवित्र प्रकाशकिरणांनी लोपटलेलाच असतो. त्याच वेळेस आपले पवित्र सामर्थ्य प्रकट करणार्या आहुतीचा अग्नीशी योग घडतो. कारण ती (आहुति-सामुग्री) नीट पुढें होऊन आली असतां त्यानेंही उठून जुहू(पळी)च्या योगानें तिचें प्राशन केलें. ॥ ३ ॥ 
 
अ॒ग्निमच्छा॑ देवय॒तां मनां॑सि॒ चक्षूं॑षीव॒ सूर्ये॒ सं च॑रन्ति  । 
अग्निं अच्छ देवऽयतां मनांसि चक्षूंषिऽइव सूर्ये सं चरन्ति  । 
जगाचे डोळे सूर्याकडे लागावे त्याप्रमाणें देवभक्तांचीं अंतःकरणें अग्नीकडे प्रसवतात, तेव्हां तोही शुभ्र वस्त्रमंडित वीराप्रमाणें दिवस उगवतांच एकदम अवतीर्ण होतो. ॥ ४ ॥ 
 
जनि॑ष्ट॒ हि जेन्यो॒ अग्रे॒ अह्नां॑ हि॒तो हि॒तेष्व॑रु॒षो वने॑षु  । 
जनिष्ट हि जेन्यः अग्रे अह्नां हितः हितेषु अरुषः वनेषु  । 
हा पहा अभिजात अग्नि, पसरून ठेविलेल्या समिधांवर आरूढ होणारा हा आरक्त तेजस्क अग्नि प्रकट झाला आहे. भक्तांना सात प्रकरचीं रत्नें देणारा हा परमपूज्य दिव्य होता अग्नि घरोघर यज्ञमंडपांत विराजमान झाला आहे. ॥ ५ ॥ 
 
अ॒ग्निर्होता॒ न्यसीद॒द्यजी॑यानु॒पस्थे॑ मा॒तुः सु॑र॒भा उ॑ लो॒के  । 
अग्निः होता नि असीदत् यजीयान् उपऽस्थे मातुः सुरभौ ऊं लोके  । 
परमपूज्य होता अग्नि भू-मातेच्या अंकावर सुवासित स्थळीं आरूढ झाला आहे. तो तारुण्ययुक्त प्रतिभाशाली सर्व स्थल निवासी, सद्धर्मप्रिय, चराचरांचा आधार, आणि चराचर जिवांच्या मध्येंच प्रज्वलित होणारा असा आहे. ॥ ६ ॥ 
 
प्र णु त्यं विप्र॑मध्व॒रेषु॑ सा॒धुम॒ग्निं होता॑रमीळते॒ नमो॑भिः  । 
प्र णु त्यं विप्रं अध्वरेषु साधुं अग्निं होतारं ईळते नमःऽभिः  । 
प्रज्ञावान् आणि यागांमध्यें उत्कृष्टप्रतीचा यज्ञ संपादक अशा अग्नीला अनेक प्रणिपातकरून आम्हीं त्याचें स्तवन करीत असतों. सनातन सत्य नियमांच्या योगानेंच त्यानें आकाश आणि पृथिवी ह्यांचा विस्तार केला. ह्यामुळें त्या अविनाशी योद्ध्याला उत्तम घृतानें भक्तजन अभ्यंग करतात. ॥ ७ ॥ 
 
मा॒र्जा॒ल्यो मृज्यते॒ स्वे दमू॑नाः कविप्रश॒स्तो अति॑थिः शि॒वो नः॑  । 
मार्जाल्यः मृज्यते स्वे दमूनाः कविऽप्रशस्तः अतिथिः शिवः नः  । 
सकलांना आदरणीय, संयमी, आणि कविजनांनीं ज्याचें यश गावें असा आमचा कल्याणप्रद अतिथि हो अग्नि त्याची परिचर्या त्याच्या वेदीवरच होत असते. हे अग्ने, ज्वालारूप हजारों शिंगें असलेला आणि अवर्णनीय बलशाली असा तूं वीर पुंगव आपल्या प्रतापानें पाहिजे त्या शत्रूचा निःपात करून टाकतोस. ॥ ८ ॥ 
 
प्र स॒द्यो अ॑ग्ने॒ अत्ये॑ष्य॒न्याना॒विर्यस्मै॒ चारु॑तमो ब॒भूथ॑  । 
प्र सद्यः अग्ने अति एषि अन्यान् आविः यस्मै चारुऽतमः बभूथ  । 
ज्या भक्ताला तूं अत्यंत उदात्त वाटतोस त्याच्यासाठीं हे अग्निदेवा, तूं झपाट्यासरशीं शौर्यांत इतरांना मागें टाकतोस (कारण तूं तसाच आहेस). तूं स्तवनार्ह, दर्शनीय, तेजोमय आहेस. तूं मनुष्य जातीचा प्रिय हितकारी अतिथि आहेस. ॥ ९ ॥ 
 
तुभ्यं॑ भरन्ति क्षि॒तयो॑ यविष्ठ ब॒लिम॑ग्ने॒ अन्ति॑त॒ ओत दू॒रात्  । 
तुभ्यं भरन्ति क्षितयः यविष्ठ बलिं अग्ने अन्तितः आ उत दूरात्  । 
हे तारुण्य मूर्ते, गृहस्थाश्रमी जन तुझ्या सन्निध असोत कीं दूर देशीं असोत, ते नाना तऱ्हेचीं उपायनें, हे अग्निदेव, तुज समर्थाला सादर समर्पण करितातच. तर तुजपुढें अत्यंत लीन झालेल्या उपासकानें केलेली मनोहर स्तुति तूं मानून घे. हे अग्नी, तुझें आनंदधाम मोठें, श्रेष्ठ आणि कल्याणप्रद आहे. ॥ १० ॥ 
 
आद्य रथं॑ भानुमो भानु॒मन्त॒मग्ने॒ तिष्ठ॑ यज॒तेभिः॒ सम॑न्तम्  । 
आ अद्य रथं भानुऽमः भानुऽमन्तं अग्ने तिष्ठ यजतेभिः संऽअन्तम्  । 
हे प्रकाशमय देवा, आपल्या प्रकाशपूर्ण आणि रुचिर रथावर दिव्यविभूतिंसह तूं आज आरोहण कर. भक्तीचे सर्व प्रकार तूं जाणतोस, तर आमचा हविर्भाग ग्रहण करण्याकरितां देवांना या विस्तीर्ण अंतरिक्षांतून इकडे घेऊन ये. ॥ ११ ॥ 
 
अवो॑चाम क॒वये॒ मेध्या॑य॒ वचो॑ व॒न्दारु॑ वृष॒भाय॒ वृष्णे॑  । 
अवोचाम कवये मेध्याय वचः वन्दारु वृषभाय वृष्णे  । 
प्रतिभाशाली पूजनीय, कामनावर्षक वीर जो अग्नि, त्याच्या प्रीत्यर्थ हें नम्रभाव स्फुरित असें सूक्त आम्हीं गाईलें आहे. देवाला प्रणिपात करून हें स्तोत्र गविष्ठिरानें म्हटलें आहे; तेव्हां सर्व अंतराळ व्यापणारें व जगताला ललामभूत असें महातेज ज्याप्रमाणें आकाशांत वसत आहे, हें गविष्ठिराचें स्तोत्र अग्नीच्या ठिकाणीं वसो. ॥ १२ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त २ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - वृश जान आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - त्रिष्टुभ् 
कु॒मा॒रं मा॒ता यु॑व॒तिः समु॑ब्धं॒ गुहा॑ बिभर्ति॒ न द॑दाति पि॒त्रे  । 
कुमारं माता युवतिः संऽउब्धं गुहा बिभर्ति न ददाति पित्रे  ।  
तारुण्यशोभिनी माता जोरानें कवटाळून धरलेल्या कुमाराला गुप्तपणें आपल्या वरोबर वागवीत असते, पित्याच्या हवालीं करीत नाहीं. अशा वेळेस त्याचें कधींही तेजोहीन न होणारें मुख जनाच्या दृष्टीस पडत नाही, परंतु जेव्हां त्याची वेदीवर स्थापना होते तेव्हां तो दृष्टीगोचर होतो. ॥ १ ॥ 
 
कमे॒तं त्वं यु॑वते कुमा॒रं पेषी॑ बिभर्षि॒ महि॑षी जजान  । 
कं एतं त्वं युवते कुमारं पेषी बिभर्षि महिषी जजान  । 
हे तरुणी, तूं परिचारिका होऊन ज्याचें संगोपन करीत असतेस तो हा कुमार कोण ? ह्याला तर पट्टराणीनें जन्म दिला. तो तान्हा बालक पुष्कळ वर्षेपर्यंत वाढतच होता. त्याची माता प्रसूत झाली त्याच वेळेस तो झालेला मी पाहिला. ॥ २ ॥ 
 
हिर॑ण्यदन्तं॒ शुचि॑वर्णमा॒रात्क्षेत्रा॑दपश्य॒मायु॑धा॒ मिमा॑नम्  । 
हिरण्यऽदन्तं शुचिऽवर्णं आरात् क्षेत्रात् अपश्यं आयुधा मिमानम्  । 
त्या सुवर्णदंत आणि दीप्ततेजस्क कुमाराला आपल्या ठिकाणावर आयुधें परजीत असतांना मी दूर अंतरावरून पाहिलें. निर्भेळ असें हविरूप अमृत त्याला मी अर्पण करीत असतों, तेव्हां इंद्र भक्ति-विमुख आणि स्तोत्रविहीन दुर्जन माझें काय वांकडें करणार ? ॥ ३ ॥ 
 
क्षेत्रा॑दपश्यं सनु॒तश् चर॑न्तं सु॒मद्यू॒थं न पु॒रु शोभ॑मानम्  । 
क्षेत्रात् अपश्यं सनुतरिति चरन्तं सुऽमत् यूथं न पुरु शोभमानम्  । 
खिल्लारास बरोबर घेऊन फिरणार्या वृषभाप्रमाणें त्या अत्यंत शोभायमान दिसणार्या कुमारास आपल्या जागेपासून दुसरीकडे हिंडत असतांना मी पाहिलें; त्याच्यानें त्याला अटकाव करवला नाहीं. तो तर प्रकट झालाच, परंतु त्याक्षणीं वृद्ध होत्या त्या सुद्धां तरुण दिसूं लागल्या. ॥ ४ ॥  [ह्या अर्थांत कांहीतरी विसंगत आहे असें वाटते] 
के मे॑ मर्य॒कं वि य॑वन्त॒ गोभि॒र्न येषां॑ गो॒पा अर॑णश्चि॒दास॑  । 
के मे मर्यकं वि यवन्त गोभिः न येषां गोपाः अरणः चित् आस  । 
गोधनादि संपत्तीपासून माझ्या लोकांस दूर केलें आहे; त्यांच्याकरितां अजिंक्य असा संरक्षण नव्हता काय ? ज्यांनी त्या माझ्या लोकांवर अत्याचार केला ते नष्ट होवोत. कारण ज्याला आमच्या मनांतील इच्छा विदित आहेत, तो आमच्या पशु आदिकरून संपत्तीचें संरक्षण करण्याकरितां येत आहे. ॥ ५ ॥ 
 
व॒सां राजा॑नं वस॒तिं जना॑ना॒मरा॑तयो॒ नि द॑धु॒र्मर्त्ये॑षु  । 
वसां राजानं वसतिं जनानां अरातयः नि दधुः मर्त्येषु  । 
लोकांचें आश्रयस्थान व वस्तुमात्रांचा राजा अशा त्या देवाला शत्रुंनी मनुष्यांच्या गर्दींत लपवून ठेवलें आहे. अत्रि ऋषीच्या प्रार्थना त्यास मुक्त करोत. जे निन्दा करीत असतील त्यांचीच निन्दा होवो. ॥ ६ ॥ 
 
शुन॑श्चि॒च्छेपं॒ निदि॑तं स॒हस्रा॒द्यूपा॑दमुञ्चो॒ अश॑मिष्ट॒ हि षः  । 
शुनःशेपं चित् निऽदितं सहस्रात् यूपात् अमुञ्चः अशमिष्ट हि सः  । 
बद्ध केलेल्या शुनःशेपास तूं हजार खांबापासून सोडविलेंस. खरोखर त्यानें फार दुःख सहन केलें, तर हे प्राज्ञहोत्या अग्निदेवा, येथें विराजमान होऊन आम्हांसही आमच्या बंधांपासून मुक्त कर. ॥ ७ ॥ 
 
हृ॒णी॒यमा॑नो॒ अप॒ हि मदैयेः॒ प्र मे॑ दे॒वानां॑ व्रत॒पा उ॑वाच  । 
हृणीयमानः अप हि मत् ऐयेः प्र मे देवानां व्रतऽपा उवाच  । 
हे अग्निदेवा, जेव्हां तुला क्रोध येईल, त्या वेळेस माझेपासून जरा दूर हो. देवांच्या व्रतांचें संरक्षण करणारा इंद्र माझ्याशी बोलला. त्या सुज्ञ इंद्रानें तुला पाहिलें आणि त्यानें सांगितल्यावरून, हे इंद्रा, मी तुझ्याकडे आलों. ॥ ८ ॥ 
 
वि ज्योति॑षा बृह॒ता भा॑त्य॒ग्निरा॒विर्विश्वा॑नि कृणुते महि॒त्वा  । 
वि ज्योतिषा बृहता भाति अग्निः आविः विश्वानि कृणुते महिऽत्वा  । 
अग्नि अतिशय तेजानें प्रकाशत असतो. आपल्या प्रभावानेंतो सर्व वस्तूंना प्रकट करतो. दुष्टपणाच्या व देवत्वहीन अशा कपटी बेतांचा तो नाश करतो. राक्षसांच्या नाशाकरितां तो आपली शृंगें तीक्ष्ण करतो. ॥ ९ ॥ 
 
उ॒त स्वा॒नासो॑ दि॒वि ष॑न्त्व॒ग्नेस्ति॒ग्मायु॑धा॒ रक्ष॑से॒ हन्त॒वा उ॑  । 
उत स्वानासः दिवि सन्तु अग्नेः तिग्मऽआयुधाः रक्षसे हन्तवै ऊंइति  । 
राक्षसांचा नाश करण्याकरितां अग्निदेवाच्या आवाज करणार्या व तीक्ष्ण आयुधांप्रमाणें तळपणार्या ज्वाला द्युलोकामध्येंही दिसूं लागोत. त्याच्या ज्वाला आनंद देण्याकरितांच शत्रूंचा नाश करीत असतात. देवत्वहीन असे त्याचे शत्रु त्यास प्रतिबंध करूं शकत नाहींत. ॥ १० ॥ 
 
ए॒तं ते॒ स्तोमं॑ तुविजात॒ विप्रो॒ रथं॒ न धीरः॒ स्वपा॑ अतक्षम्  । 
एतं ते स्तोमं तुविजात विप्रः रथं न धीरः सुऽअपाः अतक्षम्  । 
अनेक भक्तांकरितां प्रकट होणार्या हे अग्निदेवा, ज्याप्रमाणें एखादा कुशल कारागीर रथ तयार करतो, त्याप्रमाणें मी तुझ्या प्रज्ञाशाली भक्तांने हें स्तोत्र तयार केलें आहे. हे अग्निदेवा, जर तें तुला आवडलें असेल तर आम्हांस प्रकाशमय उदकांची प्राप्ती करून घेतां येवो. ॥ ११ ॥ 
 
तु॒वि॒ग्रीवो॑ वृष॒भः वा॑वृधा॒नोऽश॒त्र्व॑१र्यः सम॑जाति॒ वेदः॑  । 
तुविऽग्रीवः वृषभः वावृधानः अशत्रु अर्यः सं अजाति वेदः  । 
अनेक ग्रीवांनी युक्त, सामर्थ्यवान् व वृद्धिंगत होणारा हा अग्निदेव शत्रूंचें धन निष्प्रतिबंध रीतीनें हरण करतो. त्या अमर देवांनीं अग्नीकरितां दर्भ पसरणार्या मनुष्यास सौख्य अर्पण करण्याकरितां व हवि देणार्या मनुष्यास कल्याणप्रद संपत्ति देण्याविषयीं अग्नीस सांगितलें आहे. ॥ १२ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ३ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - वसुश्रुत आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - त्रिष्टुभ् 
त्वम॑ग्ने॒ वरु॑णो॒ जाय॑से॒ यत्त्वं मि॒त्रो भ॑वसि॒ यत्समि॑द्धः  । 
त्वं अग्ने वरुणः जायसे यत् त्वं मित्रः भवसि यत् संऽइद्धः  । 
हे अग्नी, तूं प्रकट होतोस तेव्हां वरुण, आणि प्रज्वलित होतोस तेव्हां तूं जगाचा मित्र असतोस. हे भगवत् प्रताप-पुत्रा, सकल देवांचा वास तुझ्या ठिकाणीं आहे. आणि हवि अर्पण करणार्या यजमानाला साक्षात इंद्र तूंच. ॥ १ ॥ 
 
त्वम॑र्य॒मा भ॑वसि॒ यत्क॒नीनां॒ नाम॑ स्वधाव॒न्गुह्यं॑ बिभर्षि  । 
त्वं अर्यमा भवसि यत् कनीनां नाम स्वधाऽवन् गुह्यं बिभर्षि  । 
देवा, नववधूंना उत्तम पति देणारा अर्यमा तूं, तुझें एक नामाभिधान आहे तें फार गूढ. पति आणि पत्नि अशा उभयतांना तूं अंतःकरणानें एक करतोस त्यावेळीं ते हितकारी मित्राप्रमाणे तुला तेजोरूप गोरसानें उद्वर्तन करतात. ॥ २ ॥ 
 
तव॑ श्रि॒ये म॒रुतो॑ मर्जयन्त॒ रुद्र॒ यत्ते॒ जनि॑म॒ चारु॑ चि॒त्रम्  । 
तव श्रिये मरुतः मर्जयन्त रुद्र यत् ते जनिम चारु चित्रम्  । 
तुझ्या ऐश्वर्याच्या उत्कर्षाकरितां मरुतांनीं पर्जन्य वृष्टि करून जिकडे तिकडे स्वच्छ केलें. हे रुद्र स्वरूपा तुझा जन्म म्हणजे एक मनोवेधक परंतु अद्भुत प्रसंग होय. आणि विष्णुरूप ईश्वराचें सर्वोत्कृष्ट पद म्हणजे जे स्थान आकाशांत सन्निविष्ट झालें आहे, तेथे राहून प्रकाश धेनूंच्या गूढ शक्तींची जोपासना तूंच करतोस. ॥ ३ ॥ 
 
तव॑ श्रि॒या सु॒दृशो॑ देव दे॒वाः पु॒रू दधा॑ना अ॒मृतं॑ सपन्त  । 
तव श्रिया सुदृशः देव देवाः पुरू दधाना अमृतं सपंत  । 
भगवंता ! तुझ्या ऐश्वर्यामुळेंच तुझ्या दिव्य विभूतिंना  अलोट समृद्धि प्राप्त होऊन अमरत्वचाहि लाभ झाला आहे. ह्या विश्वजीवनाचें स्तोत्र मानवी उत्सुक भाविकांनीं मनःपूर्वक त्याला समर्पण करून त्या दिव्य होत्याची स्थापना त्यां भक्तांनी वेदीवर केली. ॥ ४ ॥ 
 
न त्वद्धोता॒ पूर्वो॑ अग्ने॒ यजी॑या॒न्न काव्यैः॑ प॒रो अ॑स्ति स्वधावः  । 
न त्वत् होता पूर्वः अग्ने यजीयान् न काव्यैः परः अस्ति स्वधाऽवः  । 
तुझ्यापेक्षां पुरातन होता दुसरा नाहीं. आणि हे स्वतंत्रा, कवींच्या काव्य शक्तींनाही अगोचर अशा तुझ्यावांचून अन्य कोणीच नाहीं. ज्या भक्तलोकांचा तूं अतिथि होशील त्यांनीं, हे देवा, यज्ञद्वारा दुसर्या मानवांना जिंकलेच म्हणून समजावें. ॥ ५ ॥ 
 
व॒यम॑ग्ने वनुयाम॒ त्वोता॑ वसू॒यवो॑ ह॒विषा॒ बुध्य॑मानाः  । 
वयं अग्ने वनुयाम त्वाऽऊताः वसुऽयवः हविषा बुध्यमानाः  । 
हे अग्नि, अत्युत्कृष्ट दिव्य संपत्तिची इच्छा धरणारे आम्हां भक्तजनांना तुझ्या कृपाछत्राचा लाभ झाला असतांना, कर्तव्याविषयीं जागृत होऊन व तुजला हवि अर्पण करून सर्व प्रतिपक्षीयांवर आम्हीं आपलें वर्चस्व स्थापन करावें असें कर. समरामध्यें काय किंवा विशेष दिवशीं भरणार्या धर्मपरिषदेमध्यें काय, हे भगवत प्रताप पुत्रा अग्नी, आम्ही आपल्या ऐश्वर्यानें इतर लोकांस आपलेसे करूं असें कर. ॥ ६ ॥ 
 
यः न॒ आगो॑ अ॒भ्येनो॒ भरा॒त्यधीद॒घम॒घशं॑से दधात  । 
यः न आगः अभि एनः भराति अधि इत् अघं अघऽशंसे दधात  । 
जो कोणी विनाकारण एखादा अपराध किंवा पातक आमच्या माथीं मारूं पाहील त्याचा तो गुन्हा उलट त्याच्याच पदरांत बांधला जाईल असें कर. हे ज्ञानरूपा देवा, जो आपल्या दुटप्पी वर्तनानें आमच्यावर कांहीं कड्याळ आणूं पहात असेल, तर अशा दुष्टानें केलेली आमची नालस्ती तूं पार नाहींशीं करून टाक. ॥ ७ ॥ 
 
त्वाम॒स्या व्युषि॑ देव॒ पूर्वे॑ दू॒तं कृ॑ण्वा॒ना अ॑यजन्त ह॒व्यैः  । 
त्वां अस्या विऽउषि देव पूर्वे दूतं कृण्वानाः अयजन्त हव्यैः  । 
मर्त्य जनांनी आपल्या अत्यंत प्रिय अशा वस्तु अर्पण करून तुला प्रज्वलित केलें असतां हे अग्निदेवा, दिव्य संपत्तीचें जें आगर आहे त्याठिकाणीं तूं गमन करतोस म्हणून आपल्या पूर्वजांनीं उषःकालची रम्य प्रभा फांकली अशावेळीं तुला आपला मध्यस्थ समजून तुझें यजन केलें. ॥ ८ ॥ 
 
अव॑ स्पृधि पि॒तरं॒ योधि॑ वि॒द्वान्पु॒त्रो यस्ते॑ सहसः सून ऊ॒हे  । 
अव स्पृधि पितरं योधि विद्वान् पुत्रः यः ते सहसः सूनो इति  ऊहे  । 
तूं सर्व कांही जाणतोसच, तर हे ईश्वरीप्रतापाच्या दात्या, तूं माझ्या पित्याचा उद्धार कर. पातकाचा नाश कर. आपणांस तुझा पुत्रच समज. हे सर्वसाक्षीन् - आमच्याकडे कृपादृष्टीनें केव्हां पाहशील ? हे अग्नि, आमचा मार्गदर्शक तूं केव्हां होशील ? ॥ ९ ॥ 
 
भूरि॒ नाम॒ वन्द॑मानो दधाति पि॒ता व॑सो॒ यदि॒ तज्जो॒षया॑से  । 
भूरि नाम वन्दमानः दधाति पिता वसो इति यदि तत् जोषयासे  । 
तुला वंदन करून, हे दिव्यनिधे तुला आवडत असेल तर आमचे पिता नानाप्रकरच्या नांवांनी तुला आळवतील. पण आपल्या ईश्वरी प्रतापाच्या प्रतीचीनें तल्लीन झालेला अग्नि वृद्धिंगत होऊन शांति सुखाचें धाम आम्हांस देईल ना ? ॥ १० ॥ 
 
त्वम॒ङ्ग  ज॑रि॒तारं॑ यविष्ठ॒ विश्वा॑न्यग्ने दुरि॒ताति॑ पर्षि  । 
त्वं अङ्गध जरितारं यविष्ठ विश्वानि अग्ने दुःऽइता अति पर्षि  । 
हे बापा अग्नि, हे तारुण्यमूर्ते, स्तोतृजनांना यच्चावत् पातकौघाच्या पैलतीरास तूंच नेतोस. कारण ह्या जगांत चोर दृष्टोत्पत्तिस आलेले आहेत. दुसर्याचें शत्रुत्व करणारे लोकही वावरत आहेत. आणि ज्याच्या मनांतील दुष्ट हेतु केव्हांही बाहेर दिसत नाहीं असे कपटी दुष्टही येथें होऊन गेले आहेत. ॥ ११ ॥ 
 
इ॒मे यामा॑सस्त्व॒द्रिग॑भूव॒न्वस॑वे वा॒ तदिदागो॑ अवाचि  । 
इमे यामासः त्वद्रिक् अभूवन् वसवे वा तत् इत् आगः अवाचि  । 
हीं आमची आगमनें तुझ्याचकडे झालीं आहेत. तुज दिव्यनिधि पाशींच आम्ही आमचा जो जो अपराध होता तो कबूल केला आहे. अग्नि वेदीवर वृद्धिंगत झाला आहे, तेव्हां तो निंदकांच्या किंवा घातकी दुष्टांच्या स्वाधीन आम्हांस खचित करणार नाहीं. ॥ १२ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - वसुश्रुत आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - त्रिष्टुभ् 
त्वाम॑ग्ने॒ वसु॑पतिं॒ वसू॑नाम॒भि प्र म॑न्दे अध्व॒रेषु॑ राजन्  । 
त्वां अग्ने वसुऽपतिं वसूनां अभि प्र मन्दे अध्वरेषु राजन्  ।  
हे अग्नि, तूं दिव्य निधींचा भांडारी आहेस; हे जगताच्या अधिराजा तुझ्या यागप्रसंगी आम्हांला निरतिशय आनंद होत असतो; सत्व सामर्थ्याचे आम्हीं भुकेले आहोंत तर तें सामर्थ्य आम्हीं तुझ्याच कृपेनें हस्तगत करून घेऊं आणि कोणत्याही मानवी शत्रुसेनेचा आम्ही अगदीं मोड करून टाकूं असा आमचा विश्वास आहे. ॥ १ ॥ 
 
ह॒व्य॒वाळ॒ग्निर॒जरः॑ पि॒ता नो॑ वि॒भुर्वि॒भावा॑ सु॒दृशी॑को अ॒स्मे  । 
हव्यऽवाट् अग्निः अजरः पिता नः विऽभुः विभाऽवा सुऽदृशीकः अस्मे इति । 
अग्निरूप ईश्वर हा भक्तांचे हविर्भाग दिव्य विभूतिंकडे पोहोंचवितो. तो कधीही जराग्रस्त होत नाही, तो आमचा पिता आहे, तो सर्वव्यापक तेजोमय आणि आम्हांला अत्यंत दर्शनीय आहे. ज्यांच्या योगानें तूं जो गृहपति, त्या तुझी सेवा उत्तम रीतीनें आमच्या हातून होईल अशा मनोत्साहाचा प्रकाश आमच्या अंतःकरणांत पाड. सत्कीर्तीचें भरपूर माप आमच्या पदरांत टाक. ॥ २ ॥ 
 
वि॒शां क॒विं वि॒श्पतिं॒ मानु॑षीणां॒ शुचिं॑ पाव॒कं घृ॒तपृ॑ष्ठम॒ग्निम्  । 
विशां कविं विश्पतिं मानुषीणां शुचिं पावकं घृतपृष्ठं अग्निम्  । 
मनव जातींना काव्यस्फुर्ति देणारा कवि हाच. आणि मानवजातीचा प्रभुहि हाच. पवित्र परमपावन घृताप्रमाणें तेजःपुंज अंगकांतीनें युक्त आणि विश्वांतील सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती असणारा हा अग्नि, त्याला तुम्हीं आपला यज्ञ-होता म्हणून वेदीवर प्रतिष्ठित करा. सर्व दिव्यशक्तींमध्यें अत्यंत स्पृहणीय अशा वस्तु कोणी आपल्याशा केल्या असतील तर ह्यानेंच. ॥ ३ ॥ 
 
जु॒षस्वा॑ग्न॒ इळ॑या स॒जोषा॒यत॑मानो र॒श्मिभिः॒ सूर्य॑स्य  । 
जुषस्व अग्ने इळ्या सऽजोषाः यतमानः रश्मिऽभिः सूर्यस्य  । 
हे अग्नि, आमच्या उत्साहस्फुर्तीनें प्रेमार्द्र होऊन तूं आमची ही सेवा ग्रहण कर. सूर्याचे किरण वर येत आहेत तसतसे तुझे रश्मिही जास्तच दीप्तिमान् होत आहेत व ह्याप्रमाणें तुझी त्यांच्याशीं जणों चढाओढच चालली आहे कीं काय असें वाटते. हें विश्वज्ञा, ह्या आमच्या समिधेचा तूं स्वीकार कर आणि हविर्भाग भोजनाकरितां तुझ्या विभूतीला येथें घेऊन ये. ॥ ४ ॥ 
 
जुष्टो॒ दमू॑ना॒ अति॑थिर्दुरो॒ण इ॒मं नो॑ य॒ज्ञमुप॑ याहि वि॒द्वान्  । 
जुष्टः दमूना अतिथिः दुरोणे इमं नः यज्ञं उप याहि विद्वान्  । 
तूं आत्मसंयमी, भक्तांचा प्रिय अतिथि आहेस, तूं सर्व जाणतोसच तर प्रसन्न होऊन ह्या मंदिरांत आमच्या यज्ञसमारंभास आगमन कर. हे अग्नि, आमच्यावर चोहोंकडून बेलाशक हल्ला करणार्या सर्व अधार्मिकांचा सप्प उडवून आमच्याशीं निष्कारण वैर करणार्या दुष्टाच्या संपतीरूप नाड्या तूं आंखडून धर. ॥ ५ ॥ 
 
व॒धेन॒ दस्युं॒ प्र हि चा॒तय॑स्व॒ वयः॑ कृण्वा॒नस्त॒न्वे॑३स्वायै॑  । 
वधेन दस्युं प्र हि चातयस्व वयः कृण्वानः तन्वे स्वायै  । 
आपल्या भीषण आयुधानें धर्महीन अनार्याचें तूं उच्चाटन कर. भक्तांच्या आंगी तारुण्याची रग त्यांच्या स्वतःच्या हितासाठीं तूंच ठेवतोस. हे दिव्यप्रतापपुत्रा, स्वर्गीय शक्तीचें तूं पोषण करतोस, हे वीरोत्तमा अग्ने, सत्वसामर्थ्य प्राप्तीसाठीं चाललेल्या झगड्यांत आमचें रक्षण कर. ॥ ६ ॥ 
 
व॒यं ते॑ अग्न उ॒क्थैर्वि॑धेम व॒यं ह॒व्यैः पा॑वक भद्रशोचे  । 
वयं ते अग्न उक्थैः विधेम वयं हव्यैः पावक भद्रऽशोचे  । 
आम्ही सामगायनांनी तुझी विनवणी करतों आणि हे जगत्पावना, मंगलधामा, हवि अर्पण करूनही आम्ही तुझी सेवा करतो. तर सर्व जगताला हवें हवेंसें वाटतें, अशा दिव्य ऐश्वर्याची आमच्याकडे पाठवणी कर. सर्वप्रकारच्या सामर्थ्यसंपत्तीही आमच्या ठिकाणीं ठेव. ॥ ७ ॥ 
 
अ॒स्माक॑मग्ने अध्व॒रं जु॑षस्व॒ सह॑सः सूनः त्रिषधस्थ ह॒व्यम्  । 
अस्माकं अग्ने अध्वरं जुषस्व सहसः सूनो इति त्रिऽसधस्थ हव्यम्  । 
आमच्या यागाचा तूं अंगीकार कर; हे प्रतापबलदा अग्नी, तीन ठिकाणी ठेवलेल्या ह्या हविरन्नाचाही तूं स्वीकार कर. आम्हीं देवांच्या दृष्टीनें पुण्यशील व्हावें असें कर आणि तुझ्या तीन पदरी सुखमय चिलखतानें आमचें रक्षण कर. ॥ ८ ॥ 
 
विश्वा॑नि नः दु॒र्गहा॑ जातवेदः॒ सिन्धुं॒ न ना॒वा दु॑रि॒ताति॑ पर्षि  । 
विश्वानि नः दुःगहा जातऽवेदः सिन्धुं न नावा दुःइता अति पर्षि  । 
अत्यंत असह्य अशीं जीं जीं दुःखें आहेत त्या सर्व दुःखांतून , त्या सर्व संकटांतून, जहाजांत बसून समुद्र तरून जावें त्याप्रमाणें, आम्हांस पार पाड. हे अग्नी, अत्रि ऋषींनी ज्याप्रमाणें प्रणतिपूर्वक तुझें स्तवन केलें त्याप्रमाणें आम्हीही करीत आहों, तर आमच्या शरीरांचाही संरक्षक तूंच हो. ॥ ९ ॥ 
 
यस्त्वा॑ हृ॒दा की॒रिणा॒ मन्य॑मा॒नोऽ॑मर्त्यं॒ मर्त्यो॒ जोह॑वीमि  । 
यः त्वा हृदा कीरिणा मन्यमानः अमर्त्यं मर्त्यः जोहवीमि  । 
जें तुझ्या स्तुतींमध्यें अगदी गढून जातें अशा ह्या मनानें मी तुझें चिंतन करून, तुला मरणरहित भगवंताला वारंवार हांक मारीत आहे तर हे सर्वज्ञा जातवेद, आम्हांला आमच्या कार्यांत यश दे. आणि हे अग्नि, माझ्या अनुयायांसहित मी अमरत्वचा उपभोग घेईन असें कर. ॥ १० ॥ 
 
यस्मै॒ त्वं सु॒कृते॑ जातवेद उ लो॒कम॑ग्ने कृ॒णवः॑स्यो॒नम्  । 
यस्मै त्वं सुऽकृते जातऽवेदः ऊं इति लोकं अग्ने कृणवः स्योनम्  । 
हे सर्वज्ञा, ज्या पुण्यशील महात्म्याला तूं दुःखमुक्त आणि आनंदमग्न करतोस, तो बुद्धिरूप अश्व, पुत्रपौत्र, वीरसैनिक, ज्ञान-धेनू इत्यादि संपत्ति ज्यामध्यें भरपूर आहेत, अशा ऐश्वर्याचा उपभोग आपल्या कल्याणाकरितां घेतो. ॥ ११ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - वसुश्रुत आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - गायत्री 
सुस॑मिद्धाय शो॒चिषे॑ घृ॒तं ती॒व्रं जु॑होतन  ।  अ॒ग्नये॑ जा॒तवे॑दसे  ॥ १ ॥ 
सुऽसमिद्धाय शोचिषे घृतं तीव्रं जुहोतन  । अग्नये जातऽवेदसे  ॥ १ ॥ 
हा तेजस्वी अग्नि प्रदीप्त झाला आहे तर त्या जातवेदाला साजुक घृताची आहुति अर्पण करा. ॥ १ ॥ 
 
नरा॒शंसः॑ सुषूदती॒मं य॒ज्ञमदा॑भ्यः  ।  क॒विर्हि मधु॑हस्त्यः  ॥ २ ॥ 
नराशंसः सुसूदति इमं यज्ञं अदाभ्यः  । कविः हि मधुऽहस्त्यः  ॥ २ ॥ 
हा सकल स्तुत्य अजिंक्य नराशंस आमच्या यज्ञाला ओजस्वी करील; तो कवि आहे, त्याचे हस्त मधुररस वर्षणानें आर्द्र झाले आहेत. ॥ २ ॥ 
 
ई॒ळि॒तो अ॑ग्न॒ आव॒हेन्द्रं॑ चि॒त्रमि॒ह प्रि॒यम्  ।  सु॒खै रथे॑भिरू॒तये॑  ॥ ३ ॥ 
ईळितः अग्ने आ वह इन्द्रं चित्रं इह प्रियम्  । सुऽखैः रथेभिः ऊतये  ॥ ३ ॥ 
अग्ने, तुझें स्तवन झालें असल्यामुळें त्या अद्भुत कांति आणि भक्तप्रिय इंद्राला आरामशील रथांत बसून आमच्या संरक्षणार्थ येथें घेऊन ये. ॥ ३ ॥ 
 
ऊर्ण॑म्रदा॒ वि प्र॑थस्वा॒भ्य॑१र्का अ॑नूषत  ।  भवा॑ नः शुभ्र सा॒तये॑  ॥ ४ ॥ 
ऊर्णऽम्रदाः वि प्रथस्व अभि अर्काः अनूषत  । भव नः शुभ्र सातये  ॥ ४ ॥ 
मित्रा, लोंकरीच्या वस्त्राप्रमाणें मऊ असें कुशासन आतां पसरून ठेव. देवा, तुझ्या प्रीत्यर्थ अर्क गायनें गाइलींच आहेत, तर हे शुभ्र तेजस्क देवा, आम्हांला आनंद प्राप्ति व्हावी म्हणून तूं आमचा सहकारी हो. ॥ ४ ॥ 
 
देवी॑र्द्वारो॒ वि श्र॑यध्वं सुप्राय॒णा न॑ ऊ॒तये॑  ।  प्रप्र॑ य॒ज्ञं पृ॑णीतन  ॥ ५ ॥ 
देवीः द्वारः वि श्रयध्वं सुप्रऽअयनाः न ऊतये  । प्रऽप्र यज्ञं पृणीतन  ॥ ५ ॥ 
यज्ञमंडपाच्या दिव्य द्वारांनो, तुम्हीं आतां आपोआप उघडा. गर्दी असली तरी आंत सहज जातां येईल इतका तुमचा मार्ग प्रशस्त आहे. तर आमच्यावर कृपा व्हावी म्हणून आमचा हा यज्ञ सर्वतऱ्हेनें परिपूर्ण करा. ॥ ५ ॥ 
 
सु॒प्रती॑के वयो॒वृधा॑ य॒ह्वी ऋ॒तस्य॑ मा॒तरा॑  ।  दो॒षामु॒षास॑मीमहे  ॥ ६ ॥ 
सुप्रतीके वयोवृधा यह्वी ऋतस्य मातरा  । दोषां उषासं ईमहे  ॥ ६ ॥ 
आमच्या धर्मप्रवृत्तींना प्रसवणार्या जननी, त्या सुरमणीय, यौवन पोषिका, तारुण्य तरला, ज्या उषा आणि रात्र, त्यांची नम्रभावानें आम्हीं प्रार्थना करतों. ॥ ६ ॥ 
 
वात॑स्य॒ पत्म॑न्नीळि॒ता दैव्या॒ होता॑रा॒ मनु॑षः  ।  इ॒मं नो॑ य॒ज्ञमा ग॑तम्  ॥ ७ ॥ 
वातस्य पत्मन्न् ईळिता दैव्या होतारा मनुषः  । इमं नः यज्ञं आ गतम्  ॥ ७ ॥ 
दिव्य यज्ञसंपदकहो, तुमचें स्तवन आम्हीं केलें आहे, तर आम्हां मानवांच्या यज्ञसमरंभास वायु वेगानें आगमन करा. ॥ ७ ॥ 
 
इळा॒ सर॑स्वती म॒ही ति॒स्रो दे॒वीर्म॑यो॒भुवः॑  ।  ब॒र्हिः सी॑दन्त्व॒स्रिधः॑  ॥ ८ ॥ 
इळा सरस्वती मही तिस्रः देवीः मयोभुवः  । बर्हिः सीदन्त्व् अस्रिधः  ॥ ८ ॥ 
इळा, सरस्वती आणि मही ह्या तिन्ही मंगलप्रद आणि अश्राप दिव्य शक्ति ह्या कुशासनांवर विराजमान होवोत. ॥ ८ ॥ 
 
शि॒वस्त्व॑ष्टरि॒हा ग॑हि वि॒भुः पोष॑ उ॒त त्मना॑  ।  य॒ज्ञेय॑ज्ञे न॒ उद॑व  ॥ ९ ॥ 
शिवस्त्वष्टः इहा गहि विभुः पोष उत त्मना  । यज्ञे।-यज्ञे न उद् अव  ॥ ९ ॥ 
हे त्वष्टृदेवा, तूं कल्याणकारक आणि सर्वस्थलवर्ती आहेस, तर आपण होऊन आमच्या उत्कर्षप्रसंगी, आमच्याकडे आगमन कर आणि प्रत्येक यज्ञांत कृपाकटाक्षानें आमचे संरक्षण कर. ॥ ९ ॥ 
 
यत्र॒ वेत्थ॑ वनस्पते दे॒वानां॒ गुह्या॒ नामा॑नि  ।  तत्र॑ ह॒व्यानि॑ गामय  ॥ १० ॥ 
यत्र वेत्थ वनस्पते देवानां गुह्या नामानि  । तत्र हव्यानि गामय  ॥ १० ॥ 
हे वृक्षराजा यूषा, ज्या ज्या ठिकाणीं देवांचीं गूढ नांवें आणि सत्कृत्यें हीं माहीत आहेत त्या ठिकाणीं स्वर्लोकीं हे आमचे हविर्भाग तूं पोहोंचते कर. ॥ १० ॥ 
 
स्वाहा॒ग्नये॒ वरु॑णाय॒ स्वाहेन्द्रा॑य म॒रुद्भ्यः॒॒ ।  स्वाहा॑ दे॒वेभ्यो॑ ह॒विः  ॥ ११ ॥ 
स्वाहाग्नये वरुणाय स्वाहेन्द्राय मरुद्भ्यः  स्वाहा देवेभ्यः हविः  ॥ ११ ॥ 
अग्नि प्रीत्यर्थ, करुणाप्रीत्यर्थ, इंद्राप्रीत्यर्थ, मरुतांप्रीत्यर्थ आणि इतर देवतां प्रीत्यर्थ हा हविर्भाग "स्वाहा" ह्या शब्दाबरोबर दिला जावो. ॥ ११ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - वसुश्रुत आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - पंक्ति 
अ॒ग्निं तं म॑न्ये॒ यो वसु॒रस्तं॒ यं यन्ति॑ धे॒नवः॑  । 
अग्निं तं मन्ये यः वसुः अस्तं यं यन्ति धेनवः  ।  
जो दिव्य संपत्तिचा निधि, आपलें घर समजून ज्याच्या आश्रयाला प्रकाशरूप धेनू, ज्याच्या आश्रयाला तडफदार घोडेस्वार, आणि ज्याच्या आश्रयाला कधीं न बदलणारे विश्वासू वीर येतात, त्या अग्नीचें मी चिन्तन करीत आहे. तर हे भगवंता, स्तोतृजनांना तूं आवेश बल दे. ॥ १ ॥ 
 
सो अ॒ग्निर्यो वसु॑र्गृ॒णे सं यमा॒यन्ति॑ धे॒नवः॑  । 
सः अग्निः यः वसुः गृणे सं यं आऽयन्ति धेनवः  । 
ज्याला दिव्य निधि म्हणतात तो अग्निच. ज्याच्याकडे प्रकाशधेनू, भरधांव जाणारे अश्व आणि उत्तम कुलीन नृपनायकही येतात त्याचेंच मीं यशोवर्णन करतों. हे देवा तूं आम्हां स्तोतृजनांना उत्साहबल दे. ॥ २ ॥ 
 
अ॒ग्निर्हि वा॒जिनं॑ वि॒शे ददा॑ति वि॒श्वच॑र्षणिः  । 
अग्निः हि वाजिनं विशे ददाति विश्वऽचर्षणिः  । 
अग्नि यजमानाला शूर योद्धा मिळवून देतो, कारण अग्नि सर्वद्रष्टा आहे. ओतप्रोत ऐश्वर्य अग्निच देतो, आणि प्रसन्न होतांच अभिलषणीय वस्तु भक्ताला प्राप्त करून देतो. तर हे देवा, आम्हां स्तोतृजनांना उत्साहबल दे. ॥ ३ ॥ 
 
आ ते॑ अग्न इधीमहि द्यु॒मन्तं॑ देवा॒जर॑म्  । 
आ ते अग्ने इधीमहि द्युऽमन्तं देव अजरम्  । 
देवा अग्ने, तुज प्रभासंपन्न जरारजित भगवंताला आम्ही आतां प्रदीप करतों, म्हणजे ही भाग्यशालिनी समिध नभोमंडलांत तुझा प्रकाश पसरून देईल. तर आम्हां तुझ्या  स्तोतृजनांना उत्साहबल दे. ॥ ४ ॥ 
 
आ ते॑ अग्न ऋ॒चा ह॒विः शुक्र॑स्य शोचिषस्पते  । 
आ ते अग्ने ऋचा हविः शुक्रस्य शोचिषः पते  । 
उज्ज्वल कांतीच्या प्रभो अग्ने, हे आल्हादप्रद स्वरूपा, हे अद्भुत चारित्र्य जगत्पते, हे हविर्वाहका देवा, शुभ्र तेजोमंडित अशा तुझ्या प्रीत्यर्थ हा हविर्भाग ऋग्मंत्रानें अर्पण होत आहे, तर तुझ्या स्तोतृजनांना आवेशबल दे. ॥ ५ ॥ 
 
प्रो त्ये अ॒ग्नयो॑ऽ॒ग्निषु॒ विश्वं॑ पुष्यन्ति॒ वार्य्य॑म्  । 
प्रो इति त्ये अग्नयः अग्निषु विश्वं पुष्यन्ति वार्यम्  । 
निरनिराळ्या अग्निस्वरूपांत आविर्भूत होणारे हे तीन अग्नि यच्चावत् अभिलषणीय धनांचा उत्कर्षच घडवून आणतात. आनंदाचा उमाळा ते आणतात, आणि आनंदाची स्फुर्तीही तेच देतात. भक्ताला ते एकसारखी प्रेरणा करीत असतात, तर देवा, तूं ही आम्हां स्तोतृजनांना उत्साहबल दे. ॥ ६ ॥ 
 
तव॒ त्ये अ॑ग्ने अ॒र्चयो॒ महि॑ व्राधन्त वा॒जिनः॑  । 
तव त्ये अग्ने अर्चयः महि व्राधन्त वाजिनः  । 
अग्नि त्या तुझ्या ज्वाला सत्यवीर्याढ्य होऊन अतिशय वृद्धिंगत होतात, त्या तुझ्या ज्वालांनीं प्रकाशरूप धेनूच्या खिल्लारांना चौखूर उड्या मारीत स्वच्छंद बागडण्यास लावले, तर हे देवा आम्हां स्तोतृजनांनाही तुझें आवेशबल अर्पण कर. ॥ ७ ॥ 
 
नवा॑ नो अग्न॒ आ भ॑र स्तो॒तृभ्यः॑ सुक्षि॒तीरिषः॑  । 
नवा नः अग्ने आ भर स्तोतृऽभ्यः सुऽक्षितीः इषः  । 
हे अग्ने, आम्हां स्तोतृजनांना नवीं नवीं सुस्थळें आणि मनौत्सुक्य हीं अर्पण कर. उच्च स्वरानें तुझें स्तोत्रगायन केलेले व तुला आपला प्रतिनिधि समजणारे आम्हीं दीन जन तुझें होऊं असें कर आणि घरोघर तुझ्या स्तोतृवर्गाला आवेशबल दे. ॥ ८ ॥ 
 
उ॒भे सु॑श्चन्द्र स॒र्पिषो॒ दर्वी॑ श्रीणीष आ॒सनि॑  । 
उभे इति सुऽश्चन्द्र सर्पिषः दर्वी इति श्रीणीषे आ सनि  । 
हे आल्हादप्रद स्वरूपा, घृतपूर्ण अशा दोन्ही दर्वींना (चोंच असलेल्या पळ्या) तूं आपल्या मुखांत जागा देतोस. तर हे प्रतापप्रभो, सामगायनांत आम्ही रंगलो असतां आम्हांस पूर्णपणें कृतार्थ कर आणि आपल्या स्तोतृजनांना उत्साहबल दे. ॥ ९ ॥ 
 
ए॒वाँ अ॒ग्निम॑जुर्यमुर्गी॒र्भिर्य॒ज्ञेभि॑रानु॒षक्  । 
एव अग्निं अजुर्यमुः गीःऽभिः यज्ञेभिः आनुषक्  । 
ह्याप्रमाणें भगवान् अग्नीला स्तुतींनी आणि यज्ञांनी एकसारखे आळवून भक्तांनी आपलासा केला आहे. आमच्या मध्यें तो उत्कृष्ट शौर्याची समृद्धि करो. हे देवा तुझ्या  स्तोतृजनांना तूं औत्सुक्यबल प्राप्त करून दे. ॥ १० ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - इष आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - अनुष्टुभ्, पंक्ति 
सखा॑यः॒ सं वः॑ स॒म्यञ्च॒मिषं॒ स्तोमं॑ चा॒ग्नये॑  । 
सखायः सं वः सम्यञ्चं इषं स्तोमं च अग्नये  ।  
मित्रहो, तुम्ही आपले समुचित असें मनोत्साह आणि स्तोत्र त्या अग्नीला सादर करा. सर्व जनांत तो अत्युत्कृष्ट, ओजस्वितेची जोपासना करणारा प्रतापी वीर आहे, त्याला अर्पण करा. ॥ १ ॥ 
 
कुत्रा॑ चि॒द्यस्य॒ समृ॑तौ र॒ण्वा नरो॑ नृ॒षद॑ने  । 
कुत्रा चित् यस्य संऽऋतौ रण्वाः नरः नृऽसदने  । 
तो भगवंत कोठेंहीं कां असेना, परंतु त्याचें आगमन झाले असतां शूर पुरुष आपल्या घरोघर दृष्टचित्त होतात. माननीय सज्जन त्याला प्रज्वलित करतात आणि कितीही क्षुद्र मनुष्य असोत, ते त्याला प्रकट करतातच. ॥ २ ॥ 
 
सं यदि॒षो वना॑महे॒ सं ह॒व्या मानु॑षाणाम्  । 
सं यत् इषः वनामहे सं हव्या मानुषाणाम्  । 
जेव्हां आम्हीं त्याच्यापाशीं सात्विक उत्साह प्राप्त व्हावा म्हणून विनवणी करतों, जेव्हां भक्तजनांचे हविर्भाग आम्हीं त्याला अर्पण करतों, तेव्हां आपल्या ऐश्वर्याच्या उत्कट आवेशाने सनातन धर्माचें नियंतृत्व तो आपल्याकडे घेतो. ॥ ३ ॥ 
 
सः स्मा॑ कृणोति के॒तुमा नक्तं॑ चिद्दू॒र आ स॒ते  । 
सः स्म कृणोति केतुं आ नक्तं चित् दूरे आ सते  । 
भक्तजन पावन जरारहित अग्नि अरण्यांची अरण्यें जाळून उध्वस्त करतो, अशा वेळींही दूर अंतरावर असणार्या मनुष्याला रात्रीच्या वेळी आपल्या प्रकाशाच्या ध्वजानें मार्गदर्शकच होतो. ॥ ४ ॥ 
 
अव॑ स्म॒ यस्य॒ वेष॑णे॒ स्वेदं॑ प॒थिषु॒ जुह्व॑ति  । 
अव स्म यस्य वेषणे स्वेदं पथिषु जुह्वति  । 
ज्याची सेवा करतां करतां, ज्याच्या प्राप्तीच्या मार्गांत असतांना भक्तजन घामानें डबडबून जाऊन ज्याला आहुति देतात, असे भक्त त्या अग्नीला आपल्या अपत्याप्रमाणेंच होत. भूमीवर ज्या प्रमाणें पर्वत त्या प्रमाणें ते भक्त अग्नीच्या पाठीवर खुशाल चढून बसतात. ॥ ५ ॥ 
 
यं मर्त्यः॑ पुरु॒स्पृहं॑ वि॒दद्विश्व॑स्य॒ धाय॑से  । 
यं मर्त्यः पुरुऽस्पृहं विदत् विश्वस्य धायसे  । 
सर्वांनाच प्रिय वाटतो अशा ज्या अग्नीला मर्त्यमानव अखिल जगाच्या तृप्ती करितां प्रकट करतो. तो अग्निच आमच्य अन्नरसाला रुचि आणतो आणि सचेतन प्राणिमात्राला आश्रय भूतही तोच होतो. ॥ ६ ॥ 
 
स हि ष्मा॒ धन्वाक्षि॑तं॒ दाता॒ न दात्या प॒शुः  । 
सः हि स्म धन्व आऽक्षितं दाता न दाति आ पशुः  । 
हा दानशूर आहे. तेव्हां पशूप्रमाणें खा खा न करतां उलट तो निर्जल प्रदेशांतील शेतेंसुद्धां शस्यधान्यांनी समृद्ध करतो. त्याची श्मश्रु सुवर्णाप्रमाणें तेजस्वी, त्याचे दांत पवित्र लकलकीत असून तो महाचतूर, व त्याचें सामर्थ्य अप्रतिहत आहे. ॥ ७ ॥ 
 
शुचिः॑ ष्मा॒ यस्मा॑ अत्रि॒वत्प्र स्वधि॑तीव॒ रीय॑ते  । 
शुचिः स्म यस्मे अत्रिऽवत् प्र स्वधितीःऽइव रीयते  । 
तो पवित्र तेजस्क आहे; ज्या भक्ताकरितां अत्रि ऋषिशीं वागल्याप्रमाणें तो वागतो त्या भक्ताकरितां पाजळलेल्या फरशुप्रमाणें तो धगधगीत आतो. जिच्या कुसवा फार चांगल्या आहेत आणि जिच्यापासून हटकून फलप्राप्ति होते अशी अरणि माता त्याला प्रसवली, व म्हणूनच भक्ताला भाग्य प्राप्त झालें. ॥ ८ ॥ 
 
आ यस्ते॑ सर्पिरासु॒तेऽ॑ग्ने॒ शमस्ति॒ धाय॑से  । 
आ यः ते सर्पिःऽआसुते अग्ने शं अस्ति धायसे  । 
हे अग्ने, जो भक्त तुझा आहे; परमसुख हें त्याच्या तृप्तीकरितां असते. तर आपलें तेजोवैभव, आणि कीर्ति आणि आपलें चित्त अशाच भक्तांच्या ठिकाणीं ठेव. ॥ ९ ॥ 
 
इति॑ चिन् म॒न्युम॒ध्रिज॒स्त्वादा॑त॒मा प॒शुं द॑दे  । 
इति चित् मन्युं अध्रिजः त्वाऽदातं आ पशुं ददे  । 
अशी उत्कृष्ट मनोवृत्ति त्या भक्ताची असते. तो अनिवार्य होतो, पण तूं कृपा करून दिलेल्या पशु इत्यादि संपत्तिचा स्वीकार करतो. तरी हे अग्नि, जे तुज भगवंताला भजत नाहीत, त्यंचा पराभव अत्रि ऋषि करोत, आणि अनार्य लोक व त्यांचा आवेश ह्यांनाहि तो पादाक्रांत करो. ॥ १० ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - इष आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - जगती 
त्वाम॑ग्न ऋता॒यवः॒ समी॑धिरे प्र॒त्नं प्र॒त्नास॑ ऊ॒तये॑ सहस्कृत  । 
त्वां अग्न ऋतऽयवः सं ईधिरे प्रत्नं प्रत्नासः ऊतये सहःऽकृत  ।  
हे अग्ने, सद्धर्माचरणोत्सुक पुरातन ऋषींनीसुद्धां प्रसादप्रीत्यर्थ तुला पुराणपुरुषाला प्रज्वलित करून तुझी सेवा केली. हे प्रताप-प्रदा देवा, तूं आल्हाददायक, पूजनीय, विश्वंभर, आत्मसंयमी, गृहस्वामी, आणि सर्वोत्तम आहेस. ॥ १ ॥ 
 
त्वाम॑ग्ने॒ अति॑थिं पू॒र्व्यं विशः॑ शो॒चिष्के॑शं गृ॒हप॑तिं॒ नि षे॑दिरे  । 
त्वां अग्ने अतिथिं पूर्व्यं विशः शोचिःऽकेशं गृहऽपतिं नि सेदिरे  । 
हे अग्नि, तूं भक्तांचा पुरातन अतिथि आहेस, त्या तुला तेजोमय केशमंडित गृहस्वामीला भक्तजनांनीं वेदीवर अधिष्ठित केलें. तुझा ज्वाला-ध्वज विशाल आणि रूपें असंख्य; तूं भाग्यधन यथाविभाग देणारा, तुझा सुखाश्रय सर्वोत्कृष्ट, तुझें संरक्षण नामांकित आणि तूं सर्व जीर्णपदार्थांना व्यापून आत्मसात् करणारा असा आहेस. ॥ २ ॥ 
 
त्वाम॑ग्ने॒ मानु॑षीरीळ्ते॒ विशो॑ होत्रा॒विदं॒ विवि॑चिं रत्न॒धात॑मम्  । 
त्वां अग्ने मानुषीः ईळते विशः होत्राऽविदं विविचिं रत्नधातमम्  । 
हे अग्ने, तूं सकल हौत्र जाणणारा, सदसद्विवेचक आणि भक्तांना अपरंपार रत्नसंपत्ति देणारा आहेस; तूं केव्हां केव्हां गुप्त असतोस. हे भगवंता, तूं सर्वसाक्षी आहेस, तुझा घोष दारुण परंतु तूं अत्यंत सेव्य आणि घृताहुति हेंच तूं वैभव मानतोस, तर अशा तुझें यशोवर्णन ही मानवी प्रजा करीत असते. ॥ ३ ॥ 
 
त्वाम॑ग्ने धर्ण॒सिं वि॒श्वधा॑ व॒यं गी॒र्भिर्गृ॒णन्तो॒ नम॒सोप॑ सेदिम  । 
त्वां अग्ने धर्णसिं विश्वधा वयं गीःऽभिः गृणन्तः नमसा उप सेदिम  । 
हे अग्ने, तूं जो विश्वाचा आधार, त्या तुझें गुणगायन करून आम्ही निरंतर प्रणिपात करून तुला भजत असतों. तर हे अंगिरा, तूं मज मर्त्यभक्ताचा देव, आपल्या यशानें आणि देदीप्यमान रश्मिंनी उद्दीपित होऊन आम्हांवर प्रसन्न हो. ॥ ४ ॥ 
 
त्वम॑ग्ने पुरु॒रूपो॑ वि॒शेवि॑शे॒ वयो॑ दधासि प्र॒त्नथा॑ पुरुष्टुत  । 
त्वं अग्ने पुरुऽरूपः विशेऽविशे वयः दधासि प्रत्नऽथा पुरुऽस्तुत  । 
हे अग्नि, तूं नानारूपधर देव पुरातन कालपासून प्रत्येक भक्ताला तारुण्यतेज देत आला आहेस. हे सर्वजनस्तुत देवा, अन्ने नानाविध आहेत, परंतु आपल्या प्रतापानें तूं त्यांचा मालक झाला आहेस. आणि तूं जाज्ज्वल्य तेव्हां तुझ्या त्या अवर्णनीय ज्योतीला प्रतिरोध करण्याची कोणाचीहि छाती नाहीं. ॥ ५ ॥ 
 
त्वाम॑ग्ने समिधा॒नं य॑विष्ठ्य दे॒वा दू॒तं च॑क्रिरे हव्य॒वाह॑नम्  । 
त्वां अग्ने सऽइधानं यविष्ठ्य देवाः दूतं चक्रिरे हव्यऽवाहनम्  । 
हे अत्यंत तारुण्याढ्य देवा, तूं नेहमीं प्रज्वलित म्हणून तुला त्यांचाही प्रतिनिधि केले. कारण तूं हविर्वाहक, व तुझा प्रबलवेग सर्वसंचारी असून तुला निमन्त्रण झालें म्हणजे तूं घृतांतूनच अविर्भूत होतोस. आणि बुद्धिला प्रखरता आणणारा जो त्यांचा तीव्र नेत्र तो नेत्रच ते तुला समजतात. ॥ ६ ॥ 
 
त्वाम॑ग्ने प्र॒दिव॒ आहु॑तं घृ॒तैः सु॑म्ना॒यवः॑ सुष॒मिधा॒ समी॑धिरे  । 
त्वां अग्ने प्रऽदिवः आऽहुतं घृतैः सुम्नऽयवः सुऽसमिधा सं ईधिरे  । 
हे अग्नि, तुझ्या सुखाश्रयाची मनीषा धरणारे भक्तजन प्राचीनकाळापासून तुला घृताहुतींनी पाचारण करून उत्तम समिधांनी प्रज्वलित करीत आलेले आहेत. आणि तूं असा आहेस कीं तूं वनस्पतिकाष्ठांनी वृद्धिंगत आणि हर्षोत्फुल्ल होऊन पृथ्वीवरील सर्व शक्तींच्या मुळाशीं असतोस. ॥ ७ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ९ ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - गय आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - अनुष्टुभ्, पंक्ति 
त्वां अ॑ग्ने ह॒विष्म॑न्तो दे॒वं मर्ता॑स ईळते  । 
त्वाम् अग्ने हविष्मन्तः देवम् मर्तासः ईळते  ।  
हे अग्नी, सकल मर्त्यजन हवि हातांत घेऊन तुज भगवंताचे स्तवन करीत असतात; हे सर्वज्ञा मीही तुझेच चिंतन करीत असतो, तर आमचे हविर्भाग देवांकडे तूं निरंतर नेऊन पोहोंचीव. ॥ १ ॥ 
 
अ॒ग्निर्होता॒ दास्व॑तः॒ क्षय॑स्य वृ॒क्तब॑र्हिषः  । 
अग्निः होता दास्वतः क्षयस्य वृक्तऽबर्हिषः  । 
जो दर्भाग्रें नीटनेटकीं कापून टाकून त्याचे आसन बनवून ते देवाकरितां पसरून ठेवतो, आणि जो दानधर्म व हविर्भाग अर्पण करतो अशा पुरुषाच्या घरांतील मुख्य यज्ञसंपादक म्हटला तर हा अग्निच होय; सर्व यज्ञसमारंभ त्यालाच पावतात आणि सत्कीर्तिप्रेरित सत्वसामर्थ्येहीं सुद्धां त्याच्याच पाठिमागें धांव घेतात. ॥ २ ॥ 
 
उ॒त स्म॒ यं शिशुं॑ यथा॒ नवं॒ जनि॑ष्टा॒रणी॑  । 
उत स्म यम् शिशुम् यथा नवम् जनिष्ट अरणी इति । 
बालकाला मातेनें जन्म द्यावा त्याप्रमाणें अभिनवरूप अग्नीला "अरणि"नें प्रकट केलें. तो हा अग्नि अखिल मानवजातीचा सांभाळ करणारा आहे; उत्कृष्ट याग ज्याच्या प्रीत्यर्थ होतात असाही तो अग्निच आहे. ॥ ३ ॥ 
 
उ॒त स्म॑ दुर्गृभीयसे पु॒त्रो न ह्वा॒र्याणा॑म्  । 
उत स्म दुःऽगृभीयसे पुत्रः न ह्वार्याणाम्  । 
सर्पाचें पिल्लूसुद्धां अचपळ असतें त्याप्रमाणें तूंही दुर्निवार आहेस; आणि एखादा बैल तृण धान्याचा पार फडशा उडवून देतो, त्याप्रमाणें हे अग्नि, तूंही असंख्य अरण्यें जाळून फस्त करतोस. ॥ ४ ॥ 
 
अध॑ स्म॒ यस्या॒र्चयः॑ स॒म्यक्सं॒यन्ति॑ धू॒मिनः॑  । 
अध स्म यस्य अर्चयः सम्यक् सम्ऽयन्ति धूमिनः  । 
पहा ह्या धूम्रपरिवेष्टित अग्नीच्या ज्वाळांचा झोत आकाशाकडे एकसारखा लागून राहतो कारण अशावेळीं, त्रित हा एखाद्या लोहाराप्रमाणें त्या अग्निला जोरानें फुंकून प्रज्वलित करीत असतो अथवा एखाद्या शिकलगाराप्रमाणें त्याला तीव्रपणा आणीत असतो. ॥ ५ ॥ 
 
तवा॒हम॑ग्न ऊ॒तिभि॑र्मि॒त्रस्य॑ च॒ प्रश॑स्तिभिः  । 
तव अहम् अग्ने ऊतिऽभिः मित्रस्य च प्रशस्तिऽभिः  । 
हे अग्नि, तुज मित्राच्या साहाय्यानें, तुझी स्तुति केल्यानें मी आणि माझे आप्तजन असे आम्ही सर्वजण द्वेषबुद्धि विलयाला नेऊन मर्त्यमानवांच्या हात धुवून पाठीमागें लागणार्या सर्व संकटांतून सुखरूप पार पडूं असें कर. ॥ ६ ॥ 
 
तं नो॑ अग्ने अ॒भी नरो॑ र॒यिं स॑हस्व॒ आ भ॑र  । 
तम् नः अग्ने अभी नरः रयिम् सहस्वः आ भर  । 
तर हे दर्पदलना अग्ने, आम्हां शूर पुरुषांना तें अप्रतिम वैभव तूं प्राप्त करून दे. आम्हांस भरंवसा आहे कीं देव आम्हांकडे असें वैभव खचित पाठवील. तो आमचा उत्कर्ष करील आणि आम्हीं सत्वसामर्थ्य मिळवावें म्हणून आम्हांला प्रोत्साहन देईल. तर हे देवा आम्हांस विजयश्री प्राप्त व्हावी ह्या करितां तूं युद्धांत आमच्या बरोबर रहा. ॥ ७ ॥ 
 ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त १० ( अग्नि सूक्त ) 
ऋषी - गय आत्रेय  :   देवता  -  अग्नि   :  छंद - अनुष्टुभ्, पंक्ति 
अग्न॒ ओजि॑ष्ठ॒माभ॑र द्यु॒म्नम॒स्मभ्य॑मध्रिगो  । 
अग्ने ओजिष्ठम् आ भर द्युम्नम् अस्मभ्यम् अध्रिगोइत्याध्रिऽगो  । 
अप्रतिहत गमना अग्ने, अत्यंत उज्ज्वल असें जें महत्तेह आहे तें आमच्यासाठीं तूं घेऊन ये. आणि अपार ऐश्वर्यानें आम्हांला युक्त करून आम्हीं सत्वसामर्थ्य स्वाधीन करून घ्यावें म्हणून आमचा मार्ग तूं आम्हांस आंखून दे. ॥ १ ॥ 
 
त्वं नो॑ अग्ने अद्भु॒त॒ क्रत्वा॒ दक्ष॑स्य मं॒हना॑  । 
त्वम् नः अग्ने अद्भु०त क्रत्वा दक्षस्य मंहना  । 
हे अद्भुत स्वरूपा अग्ने, आपल्या दैवी सामर्थ्यानें आणि चातुर्याच्या महिमानें प्रकट होऊन आमचा झाला आहेस, आणि आदरणीय मित्राप्रमाणें ईश्वरीसत्ता ही तुझ्याच कर्तबगारीवर अवलंबून राहिली आहे. ॥ २ ॥ 
 
त्वं नो॑ अग्न एषां॒ गयं॑ पु॒ष्टिं च॑ वर्धय  । 
त्वम् नः अग्न एषाम् गयम् पुष्टिम् च वर्धय  । 
हे अग्नी ज्या ज्या लोकधुरीण पुरुषांना तुझ्या स्तवनांच्या योगानें समृद्धि प्राप्त झालेली असते, अशा सत्पुरुषांच्या आणि आमच्या गृहसौख्याची आणि उत्कर्षाची अभिवृद्धीच कर. ॥ ३ ॥ 
 
ये अ॑ग्ने चन्द्र ते॒ गिरः॑ शु॒म्भन्त्यश्व॑राधसः  । 
ये अग्ने चन्द्र ते गिरः शुम्भन्ति अश्वऽराधसः  । 
हे अग्नी, कुशाग्र बुद्धिरूप देणगी ज्यांना मिळालेली आहे असे जे जे सत्पुरुष आपल्या वाणींना तुझ्या स्तवनानें मोहकता आणतात व त्यांना अलङ्कृत करतात, ते महाप्रतापि पुरुष आपल्या उत्कृष्ट शौर्यानें लोकोत्तर होतात; त्यांची अखंड सत्कीर्ति आकाशांतून सुद्धां आपण होऊन सर्वांना जागृत करीत असते. ॥ ४ ॥ 
 
तव॒ त्ये अ॑ग्ने अ॒र्चयो॒ भ्राज॑न्तो यन्ति धृष्णु॒या  । 
तव त्ये अग्ने अर्चयः भ्राजन्तः यन्ति धृष्णुऽया  । 
अग्नी तुझ्या ज्वाळांचे ते रखरखील लोळ एकसारखे जोरानें पुढें लोटत आहेत. आकाशाला वेढा देणार्या विद्युल्लतेप्रमाणें किंवा धाड धाड दौडत चाललेल्या विजयाकांक्षी रथाप्रमाणें ते लोळ वेगानें पुढें वाढून जात आहेत. ॥ ५ ॥ 
 
नू नो॑ अग्न ऊ॒तये॑ स॒बाध॑सश्च रा॒तये॑  । 
नू नः अग्ने ऊतये सऽबाधसः च रातये  । 
अग्निदेवा, आमच्या संरक्षणा करितां आणि आमच्या उत्कंठापीडित मित्रमंडळाला आपल्या कृपेची देणगी देण्याकरितां इकडे ये. आमचे धुरीण त्यांचे सर्व आशापाश तोडून त्यांतून निघून जाण्यास समर्थ होवोत. ॥ ६ ॥ 
 
त्वं नो॑ अग्ने अङ्गि॑रः स्तु॒त स्तवा॑न॒ आ भ॑र  । 
त्वम् नः अग्ने अङ्गिःरः स्तुतः स्तवानः आ भर  । 
हे अंगिरा, हे अग्ने, तुझी स्तुति आजपर्यंत होत आली आणि अजूनही ती होत असतेच, तर हे यज्ञसंपादका आम्हां तुझ्या स्तोतृ-जनांना तूं असें दिव्य ऐश्वर्य प्राप्त करून दे कीं आपल्या विभुत्वामुळें तें सर्वांना भारी होईल. तुझें गुणगायन चालूच आहे, तेव्हां आम्हांला विजय प्राप्त व्हावा म्हणून न्याय्य युद्धांत तूं आमचा सहकारी हो. ॥ ७ ॥ 
 ॐ तत् सत्  |