PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त २१ ते ३०

ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २१ (अग्नि सूक्त)

ऋषी - गथी कौशिकः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्, अनुष्टुप्, विराड्‌रूपा, सतो बृहती


इ॒मं नो॑ य॒ज्ञम॒मृते॑षु धेही॒मा ह॒व्या जा॑तवेदो जुषस्व ।
स्तो॒काना॑मग्ने॒ मेद॑सो घृ॒तस्य॒ होतः॒ प्राशा॑न प्रथ॒मो नि॒षद्य॑ ॥ १ ॥

इमं नः यज्ञममृतेषु धेहीमा हव्या जातऽवेदः जुषस्व ।
स्तोकानामग्ने मेदसः घृतस्य होतः प्राशान प्रथमः निषद्य ॥ १ ॥

जे अमर आहेत त्यांच्यापुढें आमच्या ह्या यज्ञाची स्थापना कर. हे हविर्दात्या अग्निदेवा, तूं सर्वांमध्यें श्रेष्ठ असल्याकारणानें येथें विराजित होऊन घृत आणि वपा ह्यांच्या बिंदूचें प्राशन कर. ॥ १ ॥


घृ॒तव॑न्तः पावक ते स्तो॒का श्चो॑तन्ति॒ मेद॑सः ।
स्वध॑र्मन्दे॒ववी॑तये॒ श्रेष्ठं॑ नो धेहि॒ वार्य॑म् ॥ २ ॥

घृतवंतः पावक ते स्तोका श्चोतंति मेदसः ।
स्वधर्मंदेववीतये श्रेष्ठं नः धेहि वार्यम् ॥ २ ॥

जगतास पावन करणार्‍या हे अग्निदेवा, तुझ्यासाठीं घृतमिश्रित असे हे वपेचे बिंदु स्रवत आहेत. स्वतःच्या नियमांचे परिपालन करणार्‍या हे देवा, हा आमचा श्रेष्ठ आणि स्पृहणीय हवि देवांस त्याचें सेवन करतां येईल अशा ठिकाणीं नेऊन ठेव.॥ २ ॥


तुभ्यं॑ स्तो॒का घृ॑त॒श्चुतोऽ॑ग्ने॒ विप्रा॑य सन्त्य ।
ऋषिः॒ श्रेष्ठः॒ समि॑ध्यसे य॒ज्ञस्य॑ प्रावि॒ता भ॑व ॥ ३ ॥

तुभ्यं स्तोका घृतश्चुतोऽग्ने विप्राय संत्य ।
ऋषिः श्रेष्ठः समिध्यसे यज्ञस्य प्राविता भव ॥ ३ ॥

हे उदार अग्निदेवा, तूं जो बुद्धिशाली देव, त्या तुझ्यासाठींच ह्या घृतस्रावी बिंदूंची योजना आहे. तूं तो श्रेष्ठज्ञाता आहेस म्हणून आम्ही तुला प्रदीप्त करीत आहोंत, तर ह्या यज्ञाचा उत्तम संरक्षणकर्ता हो. ॥ ३ ॥


तुभ्यं॑ श्चोतन्त्यध्रिगो शचीव स्तो॒कासो॑ अग्ने॒ मेद॑सो घृ॒तस्य॑ ।
क॒वि॒श॒स्तो बृ॑ह॒ता भा॒नुना आगा॑ ह॒व्या जु॑षस्व मेधिर ॥ ४ ॥

तुभ्यं श्चोतंत्यध्रिगः शचीव स्तोकासः अग्ने मेदसः घृतस्य ।
कविशस्तः बृहता भानुना आगा हव्या जुषस्व मेधिर ॥ ४ ॥

ज्याचें गमनास कोठेंही प्रतिबंध नाही आणि जो सामर्थ्यवान आहे अशा हे अग्निदेवा, तुझ्यासाठी घृताचे आणि वपेचे हे बिंदु स्रवत आहेत. विद्वान पुरुषांनीसुद्धां तुझे स्तवन केलेले असल्यामुळें तूं आपल्या अपरिमीत तेजासहवर्तमान येथें आगमन कर व हे बुद्धिशाली देवा ह्या हविंचा अंगिकार कर. ॥ ४ ॥


ओजि॑ष्ठं ते मध्य॒तो मेद॒ उद्भृ॑पतं॒ प्र ते॑ व॒यं द॑दामहे ।
श्चोत॑न्ति ते वसो स्तो॒का अधि॑ त्व॒चि प्रति॒ तान्दे॑व॒शो वि॑हि ॥ ५ ॥

ओजिष्ठं ते मध्यतः मेद उद्भृातं प्र ते वयं ददामहे ।
श्चोतंति ते वसः स्तोका अधि त्वचि प्रति तांदेवशः विहि ॥ ५ ॥

तुझ्याकरितां पशूच्या शरीराच्या मध्यभागांतून वपा काढून घेतली आहे व ती तुला आम्ही अर्पण करीत आहोंत. हे देदीप्यमान देवा त्याचे थेंब तुझ्या अंगावर ठिपकत आहेत, तर हे सर्व देवांमध्यें ज्याचे त्यास वाटून दे. ॥ ५ ॥


मण्डल ३ सूक्त २२ (पुरीष्य अग्निसूक्त)

ऋषी - गाथी कौशिकः : देवता - पुरीष्याः अग्नयः : छंद - त्रिष्टुप्, अनुष्टुप्


अ॒यं सो अ॒ग्निर्यस्मि॒न्सोम॒मिन्द्रः॑ सु॒तं द॒धे ज॒ठरे॑ वावशा॒नः ।
स॒ह॒स्रिणं॒ वाज॒मत्यं॒ न सप्तिं॑ सस॒वान्त्सन्स्तू॑यसे जातवेदः ॥ १ ॥

अयं सः अग्निर्यस्मिन्सोममिंद्रः सुतं दधे जठरे वावशानः ।
सहस्रिणं वाजमत्यं न सप्तिं ससवांत्सन्स्तूयसे जातऽवेदः ॥ १ ॥

हाच तो अग्नि जो, इंद्रास स्वतःचे उदरांत सोमरस भरावा अशी इच्छा झाली असतां त्याचे ठिकाणी तो सोमरसाची स्थापना करतो. हे सर्वज्ञ अग्निदेवा, एखाद्या वेगवान अश्वाप्रमाणे तूं हजारो प्रकारच्या सामर्थ्याची आम्हांकडे प्रेरणा करीत असल्यामुळें तुझी स्तुति होत आहे. ॥ १ ॥


अग्ने॒ यत्ते॑ दि॒वि वर्चः॑ पृथि॒व्यां यदोष॑धीष्व॒प्स्वा य॑जत्र ।
येना॒न्तरि॑क्षमु॒र्वात॒तन्थ॑ त्वे॒षः स भा॒नुर॑र्ण॒वो नृ॒चक्षाः॑ ॥ २ ॥

अग्ने यत्ते दिवि वर्चः पृथिव्यां यदोषधीष्वप्स्वा यजत्र ।
येनांतरिक्षमुर्वाततंथ त्वेषः स भानुरर्णवः नृचक्षाः ॥ २ ॥

हे यज्ञार्ह अग्निदेवा, ते तुझे स्वर्गात, पृथ्वीवर, ओषधींच्या ठिकाणी, अथवा उदकांत दृष्टीस पडतें आणि ज्याच्यायोगानें तूं हे विशाल अंतरिक्ष निर्माण केलेंस तें तुझे प्रखर तेज समुद्राप्रमाणें सर्वत्र पसरलेलें असून त्याच्या अवलोकनांतून कोणीही मानव सुटत नाहीं. ॥ २ ॥


अग्ने॑ दि॒वो अर्ण॒मच्छा॑ जिगा॒स्यच्छा॑ दे॒वाँ ऊ॑चिषे॒ धिष्ण्या॒ ये ।
या रो॑च॒ने प॒रस्ता॒त्सूर्य॑स्य॒ याश्चा॒वस्ता॑दुप॒तिष्ठ॑न्त॒ आपः॑ ॥ ३ ॥

अग्ने दिवः अर्णमच्छा जिगास्यच्छा देवान् ऊचिषे धिष्ण्या ये ।
या रोचने परस्तात्सूर्यस्य याश्चावस्तादुपतिष्ठंत आपः ॥ ३ ॥

हे अग्निदेवा, द्युलोकांतील उदकांकडे तूं गमन करतोस, स्तवनार्ह असे असणारे जे देव त्यांच्याशी आणि त्याचप्रमाणे सूर्याच्या वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस असणार्‍या देदीप्यमान प्रदेशांत जीं जलें निवास करतात त्यांच्याशीही तुझें संभाषण झालें आहे. ॥ ३ ॥


पु॒री॒ष्यासो अ॒ग्नयः॑ प्राव॒णेभिः॑ स॒जोष॑सः ।
जु॒षन्तां॑ य॒ज्ञम॒द्रुहो॑ऽनमी॒वा इषो॑ म॒हीः ॥ ४ ॥

पुरीष्यासः अग्नयः प्रावणेभिः सजोषसः ।
जुषंतां यज्ञमद्रुहोऽनमीवा इषः महीः ॥ ४ ॥

कोणाचाही द्वेष न करणारे व रोगांचा परिहार करणारे असे हे उदकांत व प्रवाहांत वास करणारे अग्नि ह्या उत्कृष्ट हवींचा सर्व मिळून स्वीकार करोत. ॥ ४ ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ५ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, तुझा धांवा करणार्‍या ह्या भक्तांकरितां त्याने सतत चालविलेली ही स्तुति सफल कर. आणि तिच्यामुळें त्याचे हातून पराक्रमाचीं कृत्यें घडून त्यास गोधनादि संपत्तीचा लाभ होवो. आमच्या पुत्रपौत्रांकडून वंश विस्तार होवो आणि हे अग्निदेवा तुझी ती सर्वप्रसिद्ध कृपादृष्टि आमचेवर वळो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २३ (अग्नि सूक्त)

ऋषी - देवश्रवः देववातः च भारतौ : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


निर्म॑थितः॒ सुधि॑त॒ आ स॒धस्थे॒ युवा॑ क॒विर॑ध्व॒रस्य॑ प्रणे॒ता ।
जूर्य॑त्स्व॒ग्निर॒जरो॒ वने॒ष्वत्रा॑ दधे अ॒मृतं॑ जा॒तवे॑दाः ॥ १ ॥

निर्मथितः सुधित आ सधस्थे युवा कविरध्वरस्य प्रणेता ।
जूर्यत्स्वग्निरजरः वनेष्वत्रा दधे अमृतं जातऽवेदाः ॥ १ ॥

तारुण्ययुक्त प्रज्ञानशील व यज्ञाचा नायक असा हा सर्वज्ञ अग्निदेव येथें अमरत्व घेऊन येत आहे. सर्व देव जेथें एकत्र जमतात अशा ह्या स्थळीं ह्यास मंथनानें प्रकट व्हावयास लावून ह्याची उत्तम प्रकारें स्थापना केली आहे व सर्व काष्ठें जरी दग्ध होऊन कमी कमी होत आहेत तरी ह्याचें तारुण्याचें तेज यत्किंचितही कमी होत नाही. ॥ १ ॥


अम॑न्थिष्टां॒ भार॑ता रे॒वद॒ग्निं दे॒वश्र॑वा दे॒ववा॑तः सु॒दक्ष॑म् ।
अग्ने॒ वि प॑श्य बृह॒ताभि रा॒येषां नो॑ ने॒ता भ॑वता॒दनु॒ द्यून् ॥ २ ॥

अमंथिष्टां भारता रेवदग्निं देवश्रवा देववातः सुदक्षम् ।
अग्ने वि पश्य बृहताभि रायेषां नः नेता भवतादनु द्यून् ॥ २ ॥

देवश्रवा व देववात अशा भरताच्या दोन वंशजांनी आपणास संपत्ति मिळावी म्हणून ह्या अत्यंत पराक्रमी अग्नीस मंथन क्रियेच्यायोगानें उत्पन्न केलें. हे अग्निदेवा, विपुल संपत्ति बरोबर घेऊन तूं आपली दृष्टि आम्हांवर फेंक, आणि प्रत्येक दिवशीं आमच्याकरितां समृद्धीचा प्रेरक हो. ॥ २ ॥


दश॒ क्षिपः॑ पू॒र्व्यं सी॑मजीजन॒न्सुजा॑तं मा॒तृषु॑ प्रि॒यम् ।
अ॒ग्निं स्तु॑हि दैववा॒तं दे॑वश्रवो॒ यो जना॑ना॒मस॑द्व॒शी ॥ ३ ॥

दश क्षिपः पूर्व्यं सीमजीजनन्सुजातं मातृषु प्रियम् ।
अग्निं स्तुहि दैववातं देवश्रवः यः जनानामसद्वशी ॥ ३ ॥

ह्या श्रेष्ठ वंशोत्पन्न व सर्वप्रिय सनातन अग्नीस त्याच्या मातृसमुदायांत हाताच्या दहा अंगुलांना निर्माण केलें. हे देवश्रवा जो (अग्निदेव) अखिल लोकांचा अधिपति होणार आहे व ज्यास देववातानें प्रकट केलें आहे अशा ह्या अग्नीची स्तुति कर. ॥ ३ ॥


नि त्वा॑ दधे॒ वर॒ आ पृ॑थि॒व्या इळा॑यास्प॒दे सु॑दिन॒त्वे अह्ना॑म् ।
दृ॒षद्व॑त्यां॒ मानु॑ष आप॒यायां॒ सर॑स्वत्यां रे॒वद॑ग्ने दिदीहि ॥ ४ ॥

नि त्वा दधे वर आ पृथिव्या इळायास्पदे सुदिनत्वे अह्नाम् ।
दृषद्वत्यां मानुष आपयायां सरस्वत्यां रेवदग्ने दिदीहि ॥ ४ ॥

पृथ्वीपासून अतिशय वर अशा इळेच्या निवासस्थानामध्यें दिवसाच्या शुभमुहुर्तावर मी तुझी स्थापना करतो. हे अग्निदेवा, आम्हांस संपत्ति प्राप्त व्हावी म्हणून सरस्वतीच्या, आपयेच्या अथवा दृशटूतीच्या काठीं मनुष्य वस्तीची जितकीं घरें असतील तितक्या (सर्व) गृहांतून तूं प्रज्वलित हो. ॥ ४ ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ५ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, तुझा धांवा करणार्‍या ह्या भक्ताकरितां त्यानें सतत चालविलेली ही स्तुति सफल कर आणि तिच्यामुळें त्याचे हातून पराक्रमाचीं कृत्यें घडून त्या गोधनादि संपत्तीचा लाभ होवो. आमच्या पुत्रपौत्रांकडून वंश विस्तार होवो, आणि हे अग्निदेवा, तुझी ती सर्वप्रसिद्ध कृपादृष्टि आमचेवर वळो. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २४ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुप्, गायत्री


अग्ने॒ सह॑स्व॒ पृत॑ना अ॒भिमा॑ती॒रपा॑स्य । दु॒ष्टर॒स्तर॒न्नरा॑ती॒र्वर्चो॑ धा य॒ज्ञवा॑हसे ॥ १ ॥

अग्ने सहस्व पृतना अभिमातीरपास्य । दुष्टरस्तरन्नरातीर्वर्चः धा यज्ञवाहसे ॥ १ ॥

हे अग्निदेवा, वैर्‍यांच्या टोळ्यांना दमवून टाक आणि आमच्यावर हल्ला करणार्‍यांची दाणादाण उडव. आमच्या शत्रूंवर विजय मिळवून अजिंक्य असा जो तूं तो ह्या यज्ञकर्त्याकरितां अनुपम सामर्थ्य घेऊन ये. ॥ १ ॥


अग्न॑ इ॒ळा समि॑ध्यसे वी॒तिहो॑त्रो॒ अम॑र्त्यः । जु॒षस्व॒ सू नो॑ अध्व॒रम् ॥ २ ॥

अग्न इळा समिध्यसे वीतिहोत्रः अमर्त्यः । जुषस्व सू नः अध्वरम् ॥ २ ॥

हे अग्निदेवा, हवींचा उपभोग घेणारा आणि अमर्त्य असा जो तूं तो हवींनी प्रदीप्त होत असतोस ह्यासाठीं आमच्या ह्या यज्ञाचा प्रसन्न चित्तानें स्वीकार कर. ॥ २ ॥


अग्ने॑ द्यु॒म्नेन॑ जागृवे॒ सह॑सः सूनवाहुत । एदं ब॒र्हिः स॑दो॒ मम॑ ॥ ३ ॥

अग्ने द्युम्नेन जागृवे सहसः सूनवाहुत । एदं बर्हिः सदः मम ॥ ३ ॥

ज्या तुझ्या आहुतींनी सन्मान करण्यांत येतो व जो तूं हवीच्या योगानें जागृत होतोस अशा हे सामर्थ्यवान पुत्रा अग्निदेवा, ह्या मी मांडलेल्या कुशासनावर विराजित हो. ॥ ३ ॥


अग्ने॒ विश्वे॑भिर॒ग्निभि॑र्दे॒वेभि॑र्महया॒ गिरः॑ । य॒ज्ञेषु॒ ये उ॑ चा॒यवः॑ ॥ ४ ॥

अग्ने विश्वेभिरग्निभिर्देवेभिर्महया गिरः । यज्ञेषु ये ऊं इति चायवः ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, यज्ञामध्यें जे हवींच्या करितां खरोखर लोलुप होत असतात, त्यांचेसह आणि त्याचप्रमाणें इतर सर्व अग्निदेवांसहवर्तमान स्तोत्रांची प्रशंसा कर. ॥ ४ ॥


अग्ने॒ दा दा॒शुषे॑ र॒यिं वी॒रव॑न्तं॒ परी॑णसम् । शि॒शी॒हि नः॑ सूनु॒मतः॑ ॥ ५ ॥

अग्ने दा दाशुषे रयिं वीरवंतं परीणसम् । शिशीहि नः सूनुमतः ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, शूरपुरुषांचा ज्यांत संग्रह होईल असें विपुल वैभव ह्या तुझ्या सेवकास दे. आम्हांस संतति अर्पण करून आमचीं मुखें उज्वल कर. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २५ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्राग्नौ : छंद - विराट्


अग्ने॑ दि॒वः सू॒नुर॑सि॒ प्रचे॑ता॒स्तना॑ पृथि॒व्या उ॒त वि॒श्ववे॑दाः ।
ऋध॑ग्दे॒वाँ इ॒ह य॑जा चिकित्वः ॥ १ ॥

अग्ने दिवः सूनुरसि प्रचेतास्तना पृथिव्या उत विश्ववेदाः ।
ऋधग्देवान् इह यजा चिकित्वः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, अत्यंत प्रज्ञाशील व सर्वज्ञ असा जो तूं तो द्युलोकाचा व तसाच भूलोकाचाही पुत्र आहेस. हे प्रज्ञावान देवा येथें अखिल देवांचे पृथक पृथक पूजन कर. ॥ १ ॥


अ॒ग्निः स॑नोति वी॒र्याणि वि॒द्वान्स॒नोति॒ वाज॑म॒मृता॑य॒ भूष॑न् ।
स नो॑ दे॒वाँ एह व॑हा पुरुक्षो ॥ २ ॥

अग्निः सनोति वीर्याणि विद्वान्सनोति वाजममृताय भूषन् ।
स नः देवान् एह वहा पुरुक्षः ॥ २ ॥

हा प्रज्ञावान अग्निदेव आमच्या यज्ञास अलंकृत करीत आम्हांस अमरत्व प्राप्त व्हावें म्हणून अनेक प्रकारचें बल व सामर्थ्य ह्यांचा लाभ आम्हांस करून देतो. ज्याचे जवळ विपुल समृद्धि भरलेली आहे अशा हे अग्निदेवा, अखिल देवांस आम्हांकरितां तूं येथें घेऊन ये. ॥ २ ॥


अ॒ग्निर्द्यावा॑पृथि॒वी वि॒श्वज॑न्ये॒ आ भा॑ति दे॒वी अ॒मृते॒ अमू॑रः ।
क्षय॒न्वाजैः॑ पुरुश्च॒न्द्रो नमो॑भिः ॥ ३ ॥

अग्निर्द्यावापृथिवी विश्वजन्ये आ भाति देवी अमृते अमूरः ।
क्षयन्वाजैः पुरुश्चंद्रः नमोभिः ॥ ३ ॥

सर्व भक्तसमुदाय वंदन करीत असतां येथें आपल्या अखिल सामर्थ्यासह निवास करणारा, आल्हाददायक, विपुल कांतीनें युक्त व प्रमाद विवर्जित असा हा अग्निदेव सर्व विश्वाच्या जननीच अशा ज्या दोन अमर देवता - द्युलोक व पृथिवी - ह्यांस सुप्रकाशित करीत आहे. ॥ ३ ॥


अग्न॒ इन्द्र॑श्च दा॒शुषो॑ दुरो॒णे सु॒ताव॑तो य॒ज्ञमि॒होप॑ यातम् ।
अम॑र्धन्ता सोम॒पेया॑य देवा ॥ ४ ॥

अग्न इंद्रश्च दाशुषः दुरोणे सुतावतः यज्ञमिहोप यातम् ।
अमर्धंता सोमपेयाय देवा ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, सोमपानाची आवड धरून तूं आणि इंद्र असे दोघे देव सोम अर्पण करणार्‍या ह्या याजकाचे घरीं त्याच्या यज्ञाचा कंटाळा न करतां त्यास अलंकृत करण्याकरितां इकडे या. ॥ ४ ॥


अग्ने॑ अ॒पां समि॑ध्यसे दुरो॒णे नित्यः॑ सूनो सहसो जातवेदः ।
स॒धस्था॑नि म॒हय॑मान ऊ॒ती ॥ ५ ॥

अग्ने अपां समिध्यसे दुरोणे नित्यः सूनः सहसः जातऽवेदः ।
सधस्थानि महयमान ऊती ॥ ५ ॥

हे सर्वज्ञ अग्निदेवा, हे सामर्थ्याच्या पुत्रा, आपल्या कृपेच्या योगानें यज्ञस्थलांना शोभा आणणारा जो तूं सनातन देव त्या तुला उदकांच्या निवासस्थानांत तुझे उपासक प्रज्वलित करीत आहेत. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २६ (वैश्वानर अग्नि, आत्मगीता सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - वैश्वानर अग्नि, मरुत् : छंद - जगती


वै॒श्वा॒न॒रं मन॑सा॒ग्निं नि॒चाय्या॑ ह॒विष्म॑न्तो अनुष॒त्यं स्व॒र्विद॑म् ।
सु॒दानुं॑ दे॒वं र॑थि॒रं व॑सू॒यवो॑ गी॒र्भी र॒ण्वं कु॑शि॒कासो॑ हवामहे ॥ १ ॥

वैश्वानरं मनसाग्निं निचाय्या हविष्मंतः अनुषत्यं स्वर्विदम् ।
सुदानुं देवं रथिरं वसूयवः गीर्भी रण्वं कुशिकासः हवामहे ॥ १ ॥

आम्हांस संपत्तीची इच्छा असल्यामुळे मानवांचा मित्र असा जो अग्नि त्याचे प्रथम ध्यान करून व त्याच्या प्रित्यर्थ आहुती सिद्ध करून आम्ही कुशिक त्यास स्तोत्रासह हवि अर्पण करतो. तो सत्यानुसारी, स्वर्गाची प्राप्ति करून देणारा, अत्यंत उदार, शीघ्रगामी व रमणीय आहे. ॥ १ ॥


तं शु॒भ्रम॒ग्निमव॑से हवामहे वैश्वान॒रं मा॑त॒रिश्वा॑नमु॒क्थ्यम् ।
बृह॒स्पतिं॒ मनु॑षो दे॒वता॑तये॒ विप्रं॒ श्रोता॑र॒मति॑थिं रघु॒ष्यद॑म् ॥ २ ॥

तं शुभ्रमग्निमवसे हवामहे वैश्वानरं मातरिश्वानमुक्थ्यम् ।
बृहस्पतिं मनुषः देवतातये विप्रं श्रोतारमतिथिं रघुष्यदम् ॥ २ ॥

तेजःपुंज, अखिल मानवांचा हितकर्ता, प्रत्यक्ष मातरिश्वा, मूर्तिमंत बृहस्पति, स्तवनीय बुद्धिशाली, भक्तांची हांक ऐकण्यास तत्पर, शीघ्रगामी व आमचा अतिथि अशा त्या अग्नीस मनुष्यांचा यज्ञ सिद्धीस जावा म्हणून आम्ही संरक्षणार्थ पाचारण करतो. ॥ २ ॥


अश्वो॒ न क्रन्द॒ञ्जनि॑भिः॒ समि॑ध्यते वैश्वान॒रः कु॑शि॒केभि॑र्यु॒गेयु॑गे ।
स नो॑ अ॒ग्निः सु॒वीर्यं॒ स्वश्व्यं॒ दधा॑तु॒ रत्न॑ म॒मृते॑षु॒ जागृ॑विः ॥ ३ ॥

अश्वः न क्रंदञ्जनिभिः समिध्यते वैश्वानरः कुशिकेभिर्युगेयुगे ।
स नः अग्निः सुवीर्यं स्वश्व्यं दधातु रत्न्ममृतेषु जागृविः ॥ ३ ॥

आनंदाने खिंकाळणार्‍या अश्वाप्रमाणें आवाज उत्पन्न करणारा व अखिल मानवांच्या हिताविषयी तत्पर असा हा अग्नि यज्ञप्रसंगी कुशिकांकडून स्व-करांगुलींनी प्रदीप्त केला जातो. अमर असणार्‍या सर्व देवांत अधिक जागृत असा जो हा अग्नि तो आम्हांस वीर्यसंपन्न व उत्तम अश्वांनी युक्त असें वैभव अर्पण करो. ॥ ३ ॥


प्र य॑न्तु॒ वाजा॒स्तवि॑षीभिर॒ग्नयः॑ शु॒भे सम्मि॑श्लाः॒ पृष॑तीरयुक्षत ।
बृ॒ह॒दुक्षो॑ म॒रुतो॑ वि॒श्ववे॑दसः॒ प्र वे॑पयन्ति॒ पर्व॑ताँ॒ अदा॑भ्याः ॥ ४ ॥

प्र यंतु वाजास्तविषीभिरग्नयः शुभे सम्मिश्लाः पृषतीरयुक्षत ।
बृहदुक्षः मरुतः विश्ववेदसः प्र वेपयंति पर्वतान् अदाभ्याः ॥ ४ ॥

सामर्थ्याचे पुतळेच असे हे अग्नि आपल्या पूर्ण आवेशानें पुढें सरसावोत. आपलें सौंदर्य प्रकट करण्याकरितां मरुतांनीही एकत्र जमून, आपल्या ठिपकेदार रंगाच्या हरिणी रथास जोडल्या आहेत. अत्यंत सामर्थ्यवान, सर्वज्ञ व अजिंक्य असे हे मरुत पर्वतांना सुद्धां कंप उत्पन्न करीत आहेत. ॥ ४ ॥


अ॒ग्नि॒श्रियो॑ म॒रुतो॑ वि॒श्वकृ॑ष्टय॒ आ त्वे॒षमु॒ग्रमव॑ ईमहे व॒यम् ।
ते स्वा॒निनो॑ रु॒द्रिया॑ व॒र्षनि॑र्णिजः सिं॒हा न हे॒षक्र॑तवः सु॒दान॑वः ॥ ५ ॥

अग्निश्रियः मरुतः विश्वकृष्टय आ त्वेषमुग्रमव ईमहे वयम् ।
ते स्वानिनः रुद्रिया वर्षनिर्णिजः सिंहा न हेषक्रतवः सुदानवः ॥ ५ ॥

सर्व मानवांचे अधिपति असे हे मरुतदेव अग्नीचाच आश्रय शोधतात. त्यांच्या उग्र व त्वेषयुक्त अशा सामर्थ्याची आम्ही याचना करतो. हे रुद्रपुत्र गर्जना करणारे, पर्जन्यरूपी वस्त्र पांघरणारे, अत्यंत उदार व सिंहाप्रमाणे मेघनाद उत्पन्न करणारे आहेत. ॥ ५ ॥


व्रातं॑व्रातं ग॒णंग॑णं सुश॒स्तिभि॑र॒ग्नेर्भामं॑ म॒रुता॒मोज॑ ईमहे ।
पृष॑दश्वासो अनव॒भ्ररा॑धसो॒ गन्ता॑रो य॒ज्ञं वि॒दथे॑षु॒ धीराः॑ ॥ ६ ॥

व्रातंव्रातं गणंगणं सुशस्तिभिरग्नेर्भामं मरुतामोज ईमहे ।
पृषदश्वासः अनवभ्रराधसः गंतारः यज्ञं विदथेषु धीराः ॥ ६ ॥

मरुतांच्या प्रत्येक समुदायाची आणि त्यांच्या प्रत्येक समूहाची स्तुति करीत आम्ही त्यांच्या सामर्थ्याची व अग्नीच्या प्रखर तेजाची याचना करतो. यागकर्मे चालली असतां, ज्यांच्या कृपेस कधींही ओहोटी नाही असे ते प्रज्ञावान मरुत आपल्या ठिपकेदार हरिणीवर आरूढ होऊन यज्ञाप्रत गमन करीत असतात. ॥ ६ ॥


अ॒ग्निर॑स्मि॒ जन्म॑ना जा॒तवे॑दा घृ॒तं मे॒ चक्षु॑र॒मृतं॑ म आ॒सन् ।
अ॒र्कस्त्रि॒धातू॒ रज॑सो वि॒मानोऽ॑जस्रो घ॒र्मो ह॒विर॑स्मि॒ नाम॑ ॥ ७ ॥

अग्निरस्मि जन्मना जातऽवेदा घृतं मे चक्षुरमृतं म आसन् ।
अर्कस्त्रिधातू रजसः विमानोऽजस्रः घर्मः हविरस्मि नाम ॥ ७ ॥

मी अग्नि आहे, मी जन्मतःच सर्वज्ञ झालो. घृत हा माझा नेत्र होय. माझ्या मुखांत अमृत आहे. तीन तत्त्वांचे बनलेले तेज तें मी; मीच रजोलोकाचें मापन करणारा; मी अविनाशी तपनशक्ति; ज्याला हवि म्हणतात तोही मीच. ॥ ७ ॥


त्रि॒भिः प॒वित्रै॒रपु॑पो॒द्ध्य१र्कं हृ॒दा म॒तिं ज्योति॒रनु॑ प्रजा॒नन् ।
वर्षि॑ष्ठं॒ रत्न॑नम् अकृत स्व॒धाभि॒रादिद्द्यावा॑पृथि॒वी पर्य॑पश्यत् ॥ ८ ॥

त्रिभिः पवित्रैरपुपोद्ध्य१र्कं हृदा मतिं ज्योतिरनु प्रजानन् ।
वर्षिष्ठं रत्नतम् अकृत स्वधाभिरादिद्द्यावापृथिवी पर्यपश्यत् ॥ ८ ॥

एक उत्कृष्ट ज्ञाति उत्पन्न करावी असा विचार मनांत आणून त्याने तीन प्रकारच्या साधनांनी ज्योतिष्मान सूर्याचें शोधन केले. अशा प्रकारे त्यानें आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानें अत्यंत श्रेष्ठ प्रकारचें एक रत्‍न निर्माण करून त्याच्या साधनानें द्युलोक आणि पृथ्वीलोक ह्यांचे अवलोकन केलें. ॥ ८ ॥


श॒तधा॑र॒मुत्स॒मक्षी॑यमाणं विप॒श्चितं॑ पि॒तरं॒ वक्त्वा॑नाम् ।
मे॒ळिं मद॑न्तं पि॒त्रोरु॒पस्थे॒ तं रो॑दसी पिपृतं सत्य॒वाच॑म् ॥ ९ ॥

शतधारमुत्समक्षीयमाणं विपश्चितं पितरं वक्त्वानाम् ।
मेळिं मदंतं पित्रोरुपस्थे तं रोदसी पिपृतं सत्यवाचम् ॥ ९ ॥

हे द्युलोक आणि पृथ्वीलोकहो, जो कधीही क्षीण न होणारा व शेंकडो प्रवाहांनी वाहणारा असा मधुर झरा आहे, गाण्यास अगदीं योग्य अशा स्तोत्रांचा जो प्रज्ञावान जनक आहे, जो उदार आहे व मातापितरांच्या अंकावर जो मोठ्या आनंदानें बागडत असतो अशा ह्या सत्यवादी अग्नीस संतुष्ट करा. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २७ (ऋतु सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - गायत्री


प्र वो॒ वाजा॑ अ॒भिद्य॑वो ह॒विष्म॑न्तो घृ॒ताच्या॑ । दे॒वाञ्जि॑गाति सुम्न॒युः ॥ १ ॥

प्र वः वाजा अभिद्यवः हविष्मंतः घृताच्या । देवाञ्जिगाति सुम्नयुः ॥ १ ॥

नवीन हुशारी आणणार्‍या तुमच्या हवींच्या आहुति घृतयुक्त पात्रांतून स्वर्गाकडे चालल्या आहेत. ज्यास कल्याणाची इच्छा आहे असा भावीक पूजकच देवांप्रत जाऊन पोहोंचतो. ॥ १ ॥


ईळे॑ अ॒ग्निं वि॑प॒श्चितं॑ गि॒रा य॒ज्ञस्य॒ साध॑नम् । श्रु॒ष्टी॒वानं॑ धि॒तावा॑नम् ॥ २ ॥

ईळे अग्निं विपश्चितं गिरा यज्ञस्य साधनम् । श्रुष्टीवानं धितावानम् ॥ २ ॥

जो प्रज्ञाशील आहे, जो यज्ञांचा साधनीभूत आहे, ज्याची कीर्ति मोठी आहे आणि जो वैभवाचे निधि अर्पण करतो अशा अग्नीचा मी स्तोत्रांनी गौरव करतो. ॥ २ ॥


अग्ने॑ श॒केम॑ ते व॒यं यमं॑ दे॒वस्य॑ वा॒जिनः॑ । अति॒ द्वेषां॑सि तरेम ॥ ३ ॥

अग्ने शकेम ते वयं यमं देवस्य वाजिनः । अति द्वेषांसि तरेम ॥ ३ ॥

हे दीप्तिमान अग्ने, तुझी प्रतिष्ठापना करून संकटमुक्त होण्याचे सामर्थ्य आम्हा हविर्युक्त भक्तांना प्रदान कर. ॥ ३ ॥


स॒मि॒ध्यमा॑नो अध्व॒रे॒३ऽग्निः पा॑व॒क ईड्यः॑ । शो॒चिष्के॑श॒स्तमी॑महे ॥ ४ ॥

समिध्यमानः अध्वरे३ऽग्निः पावक ईड्यः । शोचिष्केशस्तमीमहे ॥ ४ ॥

जो सर्वांस पावन करणारा आहे, जो स्तवन करण्यास योग्य आहे, आणि ज्याचे केश ज्वालांरूप आहेत अशा त्या अग्नीस या यज्ञांत प्रज्वलित करीत आहेत. ॥ ४ ॥


पृ॒थु॒पाजा॒ अम॑र्त्यो घृ॒तनि॑र्णि॒क्स्वाहुतः । अ॒ग्निर्य॒ज्ञस्य॑ हव्य॒वाट् ॥ ५ ॥

पृथुपाजा अमर्त्यः घृतनिर्णिक्स्वाहुतः । अग्निर्यज्ञस्य हव्यवाट् ॥ ५ ॥

ज्याचें सामर्थ्य मोठें आहे, जो अमर आहे, घृत हेंच ज्याचे वस्त्र आहे, व उत्तम उत्तम आहुति ज्यास अर्पण केलेल्या आहेत असा हा अग्नीच यज्ञांतील आमचे हवि देवांस पोंचवित असतो. ॥ ५ ॥


तं स॒बाधो॑ य॒तस्रु॑च इ॒त्था धि॒या य॒ज्ञव॑न्तः । आ च॑क्रुर॒ग्निमू॒तये॑ ॥ ६ ॥

तं सबाधः यतस्रुच इत्था धिया यज्ञवंतः । आ चक्रुरग्निमूतये ॥ ६ ॥

यज्ञपात्रें ह्याप्रमाणें सिद्ध करून मोठ्या भक्तीनें यज्ञ अर्पण करणार्‍या उपासकांनी ह्या अग्नीस स्वसंरक्षणार्थ बोलावून आणले. ॥ ६ ॥


होता॑ दे॒वो अम॑र्त्यः पु॒रस्ता॑देति मा॒यया॑ । वि॒दथा॑नि प्रचो॒दय॑न् ॥ ७ ॥

होता देवः अमर्त्यः पुरस्तादेति मायया । विदथानि प्रचोदयन् ॥ ७ ॥

आमचे हवि पोंचविणारा हा अमर्त्य देव यज्ञकर्मास उत्तेजन देत आपल्या अतर्क्य शक्तीनें येथे येत आहे. ॥ ७ ॥


वा॒जी वाजे॑षु धीयतेऽध्व॒रेषु॒ प्र णी॑यते । विप्रो॑ य॒ज्ञस्य॒ साध॑नः ॥ ८ ॥

वाजी वाजेषु धीयतेऽध्वरेषु प्र णीयते । विप्रः यज्ञस्य साधनः ॥ ८ ॥

प्रज्ञाशील यज्ञास साधनीभूत व सामर्थ्यवान अशा त्या अग्निदेवाचें पराक्रमाच्या कृत्यांत भक्तजन स्मरण करतात व यागकर्मांत त्यास अग्रस्थान देतात. ॥ ८ ॥


धि॒या च॑क्रे॒ वरे॑ण्यो भू॒तानां॒ गर्भ॒मा द॑धे । दक्ष॑स्य पि॒तरं॒ तना॑ ॥ ९ ॥

धिया चक्रे वरेण्यः भूतानां गर्भमा दधे । दक्षस्य पितरं तना ॥ ९ ॥

त्या श्रेष्ठ देवानें हे सर्व आपल्या बुद्धीच्या योगानें निर्माण केलें. सामर्थ्यास सदोदित जन्म देणार्‍या अशा सर्व भूतांच्या आदिकरणास त्यानेंच अस्तित्वांत आणले. ॥ ९ ॥


नि त्वा॑ दधे॒ वरे॑ण्यं॒ दक्ष॑स्ये॒ळा स॑हस्कृत । अग्ने॑ सुदी॒तिमु॒शिज॑म् ॥ १० ॥

नि त्वा दधे वरेण्यं दक्षस्येळा सहस्कृत । अग्ने सुदीतिमुशिजम् ॥ १० ॥

सामर्थ्यापासून उत्पन्न झालेल्या हे अग्निदेवा, सर्वांत श्रेष्ठ, अत्यंत दीप्तिमान व यज्ञावर प्रेम करणार्‍या अशा तुला तुझ्या बलाची स्तोत्रें गाऊन मी येथें प्रस्थापित करतो. ॥ १० ॥


अ॒ग्निं य॒न्तुर॑म॒प्तुर॑मृ॒तस्य॒ योगे॑ व॒नुषः॑ । विप्रा॒ वाजैः॒ समि॑न्धते ॥ ११ ॥

अग्निं यंतुरमप्तुरमृतस्य योगे वनुषः । विप्रा वाजैः समिंधते ॥ ११ ॥

बुद्धिमान भक्त यज्ञकालीं आपलें सर्व बल खर्च करून सर्व जगताचा नियंता व संरक्षणकर्ता जो अग्निदेव त्यास प्रदीप्त करतात. ॥ ११ ॥


ऊ॒र्जो नपा॑तमध्व॒रे दी॑दि॒वांस॒मुप॒ द्यवि॑ । अ॒ग्निमी॑ळे क॒विक्र॑तुम् ॥ १२ ॥

ऊर्जः नपातमध्वरे दीदिवांसमुप द्यवि । अग्निमीळे कविक्रतुम् ॥ १२ ॥

जो सामर्थ्याचा पुत्र आहे, ज्याची दीप्ति स्वर्गलोकापर्यंत तळपत आहे व बुद्धिशाली पंडितांना ज्याचेपासून ज्ञान सामर्थ्य प्राप्त होतें अशा त्या अग्निदेवाचें मी ह्या यज्ञांत स्तवन करतो. ॥ १२ ॥


ई॒ळेन्यो॑ नम॒स्यस्ति॒रस्तमां॑सि दर्श॒तः । सम॒ग्निरि॑ध्यते॒ वृषा॑ ॥ १३ ॥

ईळेन्यः नमस्यस्तिरस्तमांसि दर्शतः । समग्निरिध्यते वृषा ॥ १३ ॥

सामर्थ्यवान, स्तवनीय, वंदन करण्यास योग्य, अंधःकाराचा परिहार व सुंदर अशा ह्या अग्निदेवास त्याचे भक्तजन प्रदीप्त करीत आहेत. ॥ १३ ॥


वृषो॑ अ॒ग्निः समि॑ध्य॒तेऽ॑श्वो॒ न दे॑व॒वाह॑नः । तं ह॒विष्म॑न्त ईळते ॥ १४ ॥

वृषः अग्निः समिध्यतेऽश्वः न देववाहनः । तं हविष्मंत ईळते ॥ १४ ॥

अश्वांप्रमाणें देवांना इकडे घेऊन येणार्‍या ह्या सामर्थ्यवान अग्निदेवांस त्याचे भक्त प्रदीप्त करीत आहेत. हवि अर्पण करणारे उपासक त्याचीं स्तोत्रें गात आहेत. ॥ १४ ॥


वृष॑णं त्वा व॒यं वृ॑ष॒न्वृष॑णः॒ समि॑धीमहि । अग्ने॒ दीद्य॑तं बृ॒हत् ॥ १५ ॥

वृषणं त्वा वयं वृषन्वृषणः समिधीमहि । अग्ने दीद्यतं बृहत् ॥ १५ ॥

हे सामर्थ्यवान अग्निदेवा, तुझ्या कृपेने सामर्थ्याचा उपयोग घेणारे आम्ही अतिशय सामर्थ्यानें प्रज्वलित झालेला असा जो तूं सामर्थ्यवान देव त्या तुला प्रदीप्त करीत आहोंत. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २८ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - गायत्री, उष्णिक्, त्रिष्टुप्, जगती


अग्ने॑ जु॒षस्व॑ नो ह॒विः पु॑रो॒ळाशं॑ जातवेदः । प्रा॒तः॒सा॒वे धि॑यावसो ॥ १ ॥

अग्ने जुषस्व नः हविः पुरोळाशं जातऽवेदः । प्रातःसावे धियावसः ॥ १ ॥

स्तुतिस्तोत्रें हीच ज्याची संपत्ति आहे अशा हे सर्वज्ञ अग्निदेवा, प्रातःकालच्या यज्ञसमयीं आमचे हवि व आहुति ह्यांचा स्वीकार कर. ॥ १ ॥


पु॒रो॒ळा अ॑ग्ने पच॒तस्तुभ्यं॑ वा घा॒ परि॑ष्कृतः । तं जु॑षस्व यविष्ठ्य ॥ २ ॥

पुरोळा अग्ने पचतस्तुभ्यं वा घा परिष्कृतः । तं जुषस्व यविष्ठ्य ॥ २ ॥

हे अग्निदेवा, ही आहुति तुझेकरितां शिजविली आहे आणि तुझ्याचकरितां ती जास्त स्वादिष्ट केली आहे. हे अत्यंत तरुण अग्निदेवा तिचा स्वीकार कर. ॥ २ ॥


अग्ने॑ वी॒हि पु॑रो॒ळाश॒माहु॑तं ति॒रोअ॑ह्न्यम् । सह॑सः सू॒नुर॑स्यध्व॒रे हि॒तः ॥ ३ ॥

अग्ने वीहि पुरोळाशमाहुतं तिरोअह्न्यम् । सहसः सूनुरस्यध्वरे हितः ॥ ३ ॥

हे अग्निदेवा, काल तयार केलेली जी आहुति आम्ही तुला अर्पण करीत आहोंत तिचा आस्वाद घे. सामर्थ्यापासून जन्म घेणारा जो तूं त्याची यज्ञावर अनुकूल दृष्टि असते. ॥ ३ ॥


माध्यं॑दिने॒ सव॑ने जातवेदः पुरो॒ळाश॑मि॒ह क॑वे जुषस्व ।
अग्ने॑ य॒ह्वस्य॒ तव॑ भाग॒धेयं॒ न प्र मि॑नन्ति वि॒दथे॑षु॒ धीराः॑ ॥ ४ ॥

माध्यंदिने सवने जातऽवेदः पुरोळाशमिह कवे जुषस्व ।
अग्ने यह्वस्य तव भागधेयं न प्र मिनंति विदथेषु धीराः ॥ ४ ॥

हे सर्वज्ञ आणि बुद्धिमान अग्निदेवा, माध्यान्ह कालच्या यज्ञप्रसंगी ह्या आमच्या आहुतीचा येथे स्वीकार कर. हे अग्निदेवा, तूं श्रेष्ठ असल्यामुळें यज्ञांतील तुझ्या हविर्भागास ज्ञातेलोक कधींही हरकत करीत नाहींत. ॥ ४ ॥


अग्ने॑ तृ॒तीये॒ सव॑ने॒ हि कानि॑षः पुरो॒ळाशं॑ सहसः सून॒वाहु॑तम् ।
अथा॑ दे॒वेष्व॑ध्व॒रं वि॑प॒न्यया॒ धा रत्न॑वन्तम् अ॒मृते॑षु॒ जागृ॑विम् ॥ ५ ॥

अग्ने तृतीये सवने हि कानिषः पुरोळाशं सहसः सूनवाहुतम् ।
अथा देवेष्वध्वरं विपन्यया धा रत्नवंतम् अमृतेषु जागृविम् ॥ ५ ॥

हे सामर्थ्यपुत्रा अग्निदेवा, तृतीय यज्ञप्रसंगी सुद्धां आम्ही अर्पण केलेल्या व उत्कृष्ट द्रव्यांनी परिपूर्ण अशा ह्या यज्ञास त्या अमर समुदायाप्रत नेऊन पोंचव. ॥ ५ ॥


अग्ने॑ वृधा॒न आहु॑तिं पुरो॒ळाशं॑ जातवेदः । जु॒षस्व॑ ति॒रोअ॑ह्न्यम् ॥ ६ ॥

अग्ने वृधान आहुतिं पुरोळाशं जातऽवेदः । जुषस्व तिरोअह्न्यम् ॥ ६ ॥

हे सर्वज्ञ अग्निदेवा, तुला अर्पण केलेली ही आहुति सफल कर आणि तिचा स्वीकार कर. ती कालच तयार केलेली आहे. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २९ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुप्, त्रिष्टुप्, जगती


अस्ती॒दम॑धि॒मन्थ॑न॒मस्ति॑ प्र॒जन॑नं कृ॒तम् ।
ए॒तां वि॒श्पत्नी॒मा भ॑रा॒ग्निं म॑न्थाम पू॒र्वथा॑ ॥ १ ॥

अस्तीदमधिमंथनमस्ति प्रजननं कृतम् ।
एतां विश्पत्नीमा भराग्निं मंथाम पूर्वथा ॥ १ ॥

येथे मंथनाची सर्व तयारी आहे, येथें अग्नीस उत्पन्न करण्याची सर्व सामग्री सिद्ध करून ठेवली आहे. आतां त्या श्रेष्ठ योषितेला घेऊन ये म्हणजे आपल्या नेहमीच्या घर्षण पद्धतीनें अग्नीस उत्पन्न करूं. ॥ १ ॥


अ॒रण्यो॒र्निहि॑तो जा॒तवे॑दा॒ गर्भ॑ इव॒ सुधि॑तो ग॒र्भिणी॑षु ।
दि॒वेदि॑व॒ ईड्यो॑ जागृ॒वद्‌भि॑र्ह॒विष्म॑द्भिार्मनु॒ष्येभिर॒ग्निः ॥ २ ॥

अरण्योर्निहितः जातऽवेदा गर्भ इव सुधितः गर्भिणीषु ।
दिवेदिव ईड्यः जागृवद्‌भिर्हविष्मद्भियर्मनुष्येभिरग्निः ॥ २ ॥

ज्याप्रमाणें गर्भवती स्त्रीच्या उदरांत गर्भ ठेविला जावा त्याप्रमाणें हा सर्वज्ञ (अग्निदेव) ह्या दोन मंथनयष्टींच्या ठिकाणीं स्थापित झालेला आहे. मनुष्यांनी जागृत राहून व हवि अर्पण करून रोज त्याचा गौरव करावा अशी ह्या अग्नीदेवाची थोरवी आहे. ॥ २ ॥


उ॒त्ता॒नाया॒मव॑ भरा चिकि॒त्वान्स॒द्यः प्रवी॑ता॒ वृष॑णं जजान ।
अ॒रु॒षस्तू॑पो॒ रुश॑दस्य॒ पाज॒ इळा॑यास्पु॒त्रो व॒युने॑ऽजनिष्ट ॥ ३ ॥

उत्तानायामव भरा चिकित्वान्सद्यः प्रवीता वृषणं जजान ।
अरुषस्तूपः रुशदस्य पाज इळायास्पुत्रः वयुनेऽजनिष्ट ॥ ३ ॥

ही जी मंथनयष्टी उताणी ठेवली आहे तिच्यावर दुसरी यष्टी मोठ्या काळजीनें ठेव. पहा ती लागलीच गर्भवती होऊन हिने ह्या सामर्थ्यवान देवास जन्म दिला. हा तेजाचा जणूं स्तंभच आहे आणि ह्याची दीप्ति अतिशय तळपणारी आहे. इळेच्या ह्या पुत्राचा जन्म मोठ्या परामर्षात झाला आहे. ॥ ३ ॥


इळा॑यास्त्वा प॒दे व॒यं नाभा॑ पृथि॒व्या अधि॑ ।
जात॑वेदो॒ नि धी॑म॒ह्यग्ने॑ ह॒व्याय॒ वोळ्ह॑वे ॥ ४ ॥

इळायास्त्वा पदे वयं नाभा पृथिव्या अधि ।
जातऽवेदः नि धीमह्यग्ने हव्याय वोळ्हवे ॥ ४ ॥

हे सर्वज्ञ अग्निदेवा, आमचे हवी तूं पोंचवावे ह्या हेनूने आम्ही तुला पृथ्वीच्या नाभीवर इळेच्या श्रेष्ठपणाचे ठिकाणी प्रस्थापित करीत आहोंत. ॥ ४ ॥


मन्थ॑ता नरः क॒विमद्व॑यन्तं॒ प्रचे॑तसम॒मृतं॑ सु॒प्रती॑कम् ।
य॒ज्ञस्य॑ के॒तुम् प्र॑थ॒मं पु॒रस्ता॑द् अ॒ग्निं न॑रो जनयता सु॒शेव॑म् ॥ ५ ॥

मंथता नरः कविमद्वयंतं प्रचेतसममृतं सुप्रतीकम् ।
यज्ञस्य केतुम् प्रथमं पुरस्ताद् अग्निं नरः जनयता सुशेवम् ॥ ५ ॥

अहो नरांनो, जो प्रज्ञाशील आहे, ज्यास आंत एक बाहेर एक असें माहीत नाही, ज्याचें ज्ञान विशाल आहे, ज्यास मृत्युची बाधा नाही व ज्याची आकृती मनोहर आहे अशा अग्निदेवास घर्षणानें उत्पन्न करा. हे मनुष्यांनो, जो यज्ञाचा विजयध्वज आहे, जो सर्वांत वरिष्ठ आहे आणि ज्याच्यापासून उत्कृष्ट सुखें प्राप्त होतात अशा अग्निदेवास मंथन काष्ठातून बाहेर आणा. ॥ ५ ॥


यदी॒ मन्थ॑न्ति बा॒हुभि॒र्वि रो॑च॒तेऽ॑श्वो॒ न वा॒ज्यरु॒षो वने॒ष्वा ।
चि॒त्रो न याम॑न्न॒श्विनो॒रनि॑वृतः॒ परि॑ वृण॒क्त्यश्म॑न॒स्तृणा॒ दह॑न् ॥ ६ ॥

यदी मंथंति बाहुभिर्वि रोचतेऽश्वः न वाज्यरुषः वनेष्वा ।
चित्रः न यामन्नश्विनोरनिवृतः परि वृणक्त्यश्मनस्तृणा दहन् ॥ ६ ॥

जर ह्याला आपल्या बाहूंनी घर्षणाच्या योगें उत्पन्न केलें आहे तर हा काष्ठांमध्ये एखाद्या सामर्थ्यवान अश्वाप्रमाणे देदीप्यमान भासतो. ज्यावेळीं अश्विनी देवांच्या मार्गांत हा प्रकट होतो त्यावेळीं ह्याची कांति जणूं कांही अतिशयच आश्चर्यकारक दिसावयास लागून तृणांना भस्म करून हा सर्व पाषाण उघडे पाडतो. ॥ ६ ॥


जा॒तो अ॒ग्नी रो॑चते॒ चेकि॑तानो वा॒जी विप्रः॑ कविश॒स्तः सु॒दानुः॑ ।
यं दे॒वास॒ ईड्यं॑ विश्व॒विदं॑ हव्य॒वाह॒मद॑धुरध्व॒रेषु॑ ॥ ७ ॥

जातः अग्नी रोचते चेकितानः वाजी विप्रः कविशस्तः सुदानुः ।
यं देवास ईड्यं विश्वविदं हव्यवाहमदधुरध्वरेषु ॥ ७ ॥

जो हवि पोंचविणारा, सर्वज्ञ आणि स्तवनीय असल्यामुळे त्याची देवांनी यज्ञाचे ठिकाणीं स्थापना केली तो हा प्रज्ञावान, सामर्थ्ययुक्त, मेधावी, अत्यंत उदार व बुद्धिमान पुरुषांनीही स्तवन केलेला अग्निदेव प्रकट झाल्याबरोबर आपला प्रकाश सर्वत्र पाडतो. ॥ ७ ॥


सीद॑ होतः॒ स्व उ॑ लो॒के चि॑कि॒त्वान्सा॒दया॑ य॒ज्ञं सु॑कृ॒तस्य॒ योनौ॑ ।
दे॒वा॒वीर्दे॒वान्ह॒विषा॑ यजा॒स्यग्ने॑ बृ॒हद्यज॑माने॒ वयो॑ धाः ॥ ८ ॥

सीद होतः स्व ऊं इति लोके चिकित्वान्सादया यज्ञं सुऽकृतस्य योनौ ।
देवावीर्देवान्हविषा यजास्यग्ने बृहद्यजमाने वयः धाः ॥ ८ ॥

हे हविर्दात्या अग्निदेवा, प्रज्ञावान असा जो तूं तो स्व-स्थानापन्न हो आणि ह्या सत्कृत्यांच्या मंदिरांत सर्व यज्ञार्ह देवांस आपआपल्या स्थानी विराजित कर. तूं देवांची इच्छा तृप्त करणारा आहेस व हवींच्यायोगानें तूं त्यांचे पूजन करतोस. तर हे अग्निदेवा, तुझ्या ह्या उपासकास दीर्घ आयुष्य अर्पण कर. ॥ ८ ॥


कृ॒णोत॑ धू॒मं वृष॑णं सखा॒योऽ॑स्रेधन्त इतन॒ वाज॒मच्छ॑ ।
अ॒यम॒ग्निः पृ॑तना॒षाट् सु॒वीरो॒ येन॑ दे॒वासो॒ अस॑हन्त॒ दस्यू॑न् ॥ ९ ॥

कृणोत धूमं वृषणं सखायोऽस्रेधंत इतन वाजमच्छ ।
अयमग्निः पृतनाषाट् सुवीरः येन देवासः असहंत दस्यून् ॥ ९ ॥

मित्रांनो, ह्या धूम्रयुक्त सामर्थ्यवान अग्नीची स्थापना करा. आणि सर्व विघ्नांपासून मुक्त होऊन त्याच्या सामर्थ्याच्या शोधार्थ चला. हा वीर्यशाली अग्निदेव कीं ह्याच्या सहाय्याने देवांनी दुष्ट लोकांना जेरीस आणले. तो प्रचंड सैन्याचा पराभव करण्यास समर्थ आहे. ॥ ९ ॥


अ॒यं ते॒ योनि॑र्‌ऋ॒त्वियो॒ यतो॑ जा॒तो अरो॑चथाः ।
तं जा॒नन्न॑ग्न॒ आ सी॒दाथा॑ नो वर्धया॒ गिरः॑ ॥ १० ॥

अयं ते योनिर्‌ऋत्वियः यतः जातः अरोचथाः ।
तं जानन्नग्न आ सीदाथा नः वर्धया गिरः ॥ १० ॥

ज्या स्थळीं तूं मागें जन्म घेऊन प्रकाशित होतास तें तुझ्याकरितां प्रत्येक यागकालीं राखून ठेवलेले हे स्थान होय. अग्निदेवा, तूं तें नीट ओळखून तेथें विराजमान हो, आमची स्तोत्रें सफल होतील असें कर. ॥ १० ॥


तनू॒नपा॑दुच्यते॒ गर्भ॑ आसु॒रो नरा॒शंसो॑ भवति॒ यद्वि॒जाय॑ते ।
मा॒त॒रिश्वा॒ यदमि॑मीत मा॒तरि॒ वात॑स्य॒ सर्गो॑ अभव॒त्सरी॑मणि ॥ ११ ॥

तनूनपादुच्यते गर्भ आसुरः नराशंसः भवति यद्विजायते ।
मातरिश्वा यदमिमीत मातरि वातस्य सर्गः अभवत्सरीमणि ॥ ११ ॥

ज्यावेळीं हा चैतन्यानें भरलेला पण गर्भरूपांतच असतो त्यावेळीं ह्यास तनूनपात असे म्हणतात, आणि ज्यावेळीं हा जन्मास येतो त्यावेळीं ह्यास नराशंस हे नांव मिळते. ज्यावेळीं हा मातेच्या उदरांत प्रकट होतो त्यावेळीं ह्यास मातरिश्वा म्हणून ओळखतात. हा जेव्हां आपला मार्ग आक्रमण करूं लागला त्यावेळीं वायूचा जन्म झाला. ॥ ११ ॥


सु॒नि॒र्मथा॒ निर्म॑थितः सुनि॒धा निहि॑तः क॒विः ।
अग्ने॑ स्वध्व॒रा कृ॑णु दे॒वान्दे॑वय॒ते य॑ज ॥ १२ ॥

सुनिर्मथा निर्मथितः सुनिधा निहितः कविः ।
अग्ने स्वध्वरा कृणु देवांदेवयते यज ॥ १२ ॥

ह्या प्रज्ञाशील देवास उत्तम मंथनाच्या योगानें उत्पन्न केलें आहे व त्याची उत्तम रीतीनें संस्थापना झाली आहे. हे अग्निदेवा, आमचे यज्ञ चांगल्या रीतीनें सिद्धीस ने आणि तुझ्या उपासकासाठी त्याचीं यज्ञकर्में देवांस अर्पण कर. ॥ १२ ॥


अजी॑जनन्न॒मृतं॒ मर्त्या॑सोऽस्रे॒माणं॑ त॒रणिं॑ वी॒ळुज॑म्भम् ।
दश॒ स्वसा॑रो अ॒ग्रुवः॑ समी॒चीः पुमां॑सं जा॒तम॒भि सं र॑भन्ते ॥ १३ ॥

अजीजनन्नमृतं मर्त्यासोऽस्रेमाणं तरणिं वीळुजम्भम् ।
दश स्वसारः अग्रुवः समीचीः पुमांसं जातमभि सं रभंते ॥ १३ ॥

नाशरहित, शत्रूंचा पराभव करणारा आणि कठीण दंष्ट्रांनी युक्त अशा ह्या अमर देवास मानवांनी निर्माण केलें. ह्या वीरानें जन्म घेतल्याबरोबर बहिणी बहिणींप्रमाणे एक मताने वागणार्‍या दहा अंगुली त्याचें समारंभानें स्वागत करतात. ॥ १३ ॥


प्र स॒प्तहो॑ता सन॒काद॑रोचत मा॒तुरु॒पस्थे॒ यदशो॑च॒दूध॑नि ।
न नि मि॑षति सु॒रणो॑ दि॒वेदि॑वे॒ यदसु॑रस्य ज॒ठरा॒दजा॑यत ॥ १४ ॥

प्र सप्तहोता सनकादरोचत मातुरुपस्थे यदशोचदूधनि ।
न नि मिषति सुरणः दिवेदिवे यदसुरस्य जठरादजायत ॥ १४ ॥

सात प्रकारानें हविर्दातृत्त्व करणारा हा अग्निदेव जेव्हां आपल्या मातेच्या स्तनापाशीं प्रकट होऊं लागला त्यावेळेपासून हा सदैव तिच्याच अंकावर विराजमान झालेला आहे. ह्या रमणीय देवानें जेव्हां त्या चैतन्यदायक पुरुषापासून जन्म घेतला तेव्हां पासून एक दिवसही विश्रांति घेत असलेला तो दिसत नाही. ॥ १४ ॥


अ॒मि॒त्रा॒युधो॑ म॒रुता॑मिव प्र॒याः प्र॑थम॒जा ब्रह्म॑णो॒ विश्व॒मिद्वि॑दुः ।
द्यु॒म्नव॒द्‌ब्रह्म॑ कुशि॒कास॒ एरि॑र॒ एक॑एको॒ दमे॑ अ॒ग्निं समी॑धिरे ॥ १५ ॥

अमित्रायुधः मरुतामिव प्रयाः प्रथमजा ब्रह्मणः विश्वमिद्विदुः ।
द्युम्नवद्‌ब्रह्म कुशिकास एरिर एकएकः दमे अग्निं समीधिरे ॥ १५ ॥

हा शत्रूंशी युद्ध करणारा, मरुतांशी जणूं कांही सख्य जोडणारा आणि सर्व विश्वाचे अगोदर प्रकट झाला आहे. त्याच्या स्तोतृकर्त्यास हें सर्व माहित आहे म्हणून कुशिकांनीं त्याचें एक प्रतिभासंपन्न स्तोत्र गाऊन त्यास आपआपल्या घरीं प्रज्वलित केलें आहे. ॥ १५ ॥


यद॒द्य त्वा॑ प्रय॒ति य॒ज्ञे अ॒स्मिन्होत॑श्चिकि॒त्वोऽ॑वृणीमही॒ह ।
ध्रु॒वम॑या ध्रु॒वमु॒ताश॑मिष्ठाः प्रजा॒नन्वि॒द्वाँ उप॑ याहि॒ सोम॑म् ॥ १६ ॥

यदद्य त्वा प्रयति यज्ञे अस्मिन्होतश्चिकित्वोऽवृणीमहीह ।
ध्रुवमया ध्रुवमुताशमिष्ठाः प्रजानन्विद्वान् उप याहि सोमम् ॥ १६ ॥

हे ज्ञानवान हविर्दायका, ज्याअर्थीं आम्हीं येथे ह्या पवित्र यज्ञामध्यें आज तुझी याचना केली आहे त्याअर्थीं तूं आलास हें खासच व तूं आपलें सामर्थ्य प्रकट केलेंस हेंही खासच. तूं प्रज्ञावान आहेस. तूं सर्व कांही जाणतोस ह्यासाठीं आमच्या सोमाकडे ये. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३० (संपात सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


इ॒च्छन्ति॑ त्वा सो॒म्यासः॒ सखा॑यः सु॒न्वन्ति॒ सोमं॒ दध॑ति॒ प्रयां॑सि ।
तिति॑क्षन्ते अ॒भिश॑स्तिं॒ जना॑ना॒मिन्द्र॒ त्वदा कश्च॒न हि प्र॑के॒तः ॥ १ ॥

इच्छंति त्वा सोम्यासः सखायः सुन्वंति सोमं दधति प्रयांसि ।
तितिक्षंते अभिशस्तिं जनानामिंद्र त्वदा कश्चन हि प्रकेतः ॥ १ ॥

सोम अर्पण करणारे तुझे मित्र तुझ्या आगमनाची इच्छा करीत आहेत. ते सोमरस काढूं लागले आहेत व हवि तयार करून आणीत आहेत. लोकांनी कितीही निंदा केली तथापि ती सहन करण्याची त्यांची तयारी आहे; कारण हे इंद्रा, खरोखर तुझ्यापेक्षां ज्ञानी असा ह्या जगांत कोण आहे ? ॥ १ ॥


न ते॑ दू॒रे प॑र॒मा चि॒द्रजां॒स्या तु प्र या॑हि हरिवो॒ हरि॑भ्याम् ।
स्थि॒राय॒ वृष्णे॒ सव॑ना कृ॒तेमा यु॒क्ता ग्रावा॑णः समिधा॒ने अ॒ग्नौ ॥ २ ॥

न ते दूरे परमा चिद्रजांस्या तु प्र याहि हरिवः हरिभ्याम् ।
स्थिराय वृष्णे सवना कृतेमा युक्ता ग्रावाणः समिधाने अग्नौ ॥ २ ॥

तुला तो अतिशय विस्तृत असा रजोलोक सुद्धां लांब नाहीं, म्हणून हे पीतवर्ण अश्वांवर आरूढ होणार्‍या देवा, आपले घोडे जोडून तूं येथें सत्वर ये. अग्नी प्रदीप्त करून हे जे सोमपाषाण चालू केले आहेत आणि जे हवि अर्पण करण्यांत येत आहेत ते सर्व तुझ्या प्रित्यर्थ आहेत, कारण तूं स्थैर्ययुक्त आणि शौर्यवान आहेस. ॥ २ ॥


इन्द्रः॑ सु॒शिप्रो॑ म॒घवा॒ तरु॑त्रो म॒हाव्रा॑तस्तुविकू॒र्मिरृघा॑वान् ।
यदु॒ग्रो धा बा॑धि॒तो मर्त्ये॑षु॒ क्व१त्या ते॑ वृषभ वी॒र्याणि ॥ ३ ॥

इंद्रः सुशिप्रः मघऽवा तरुत्रः महाव्रातस्तुविकूर्मिरृघावान् ।
यदुग्रः धा बाधितः मर्त्येषु क्व१त्या ते वृषभ वीर्याणि ॥ ३ ॥

इंद्राचा मुकुट फार शोभिवंत आहे. इंद्र हा फार उदार आहे. त्यास सर्वत्र विजय प्राप्त होतो. सैन्य समुदायांवर त्याचेच अधिपत्य असतें. त्याची महत्कृत्यें विपुल आहेत व तो शत्रूंचा संहार करणारा आहे. हे सामर्थ्यवान देवा शत्रूंनी तुला पीडा केली असतां तूं उग्रपणा धारण करून जे पूर्वीं पराक्रम केलेंस ते आतां काय झालें ? ॥ ३ ॥


त्वं हि ष्मा॑ च्या॒वय॒न्नच्यु॑ता॒न्येको॑ वृ॒त्रा चर॑सि॒ जिघ्न॑मानः ।
तव॒ द्यावा॑पृथि॒वी पर्व॑ता॒सोऽ॑नु व्र॒ताय॒ निमि॑तेव तस्थुः ॥ ४ ॥

त्वं हि ष्मा च्यावयन्नच्युतान्येकः वृत्रा चरसि जिघ्नमानः ।
तव द्यावापृथिवी पर्वतासोऽनु व्रताय निमितेव तस्थुः ॥ ४ ॥

खरोखर स्थिर पदार्थाची दाणादाण उडवून दुष्टाचे शासन करीत व ह्या जगांमध्ये एकटाच प्रभुत्व गाजवीत तूं संचार करतोस. द्युलोक व भूलोक व त्याच प्रमाणे हे पर्वत सुद्धां तुझ्या आज्ञेनुसार आपआपल्या स्थानीं जखडून टाकल्या प्रमाणे स्थिर झालेले आहेत. ॥ ४ ॥


उ॒ताभ॑ये पुरुहूत॒ श्रवो॑भि॒रेको॑ दृ॒ळ्हम॑वदो वृत्र॒हा सन् ।
इ॒मे चि॑दिन्द्र॒ रोद॑सी अपा॒रे यत्सं॑गृ॒भ्णा म॑घवन्का॒शिरित्ते॑ ॥ ५ ॥

उताभये पुरुहूत श्रवोभिरेकः दृळ्हमवदः वृत्रहा सन् ।
इमे चिदिंद्र रोदसी अपारे यत्संगृभ्णा मघऽवन्काशिरित्ते ॥ ५ ॥

शिवाय अनेक भक्तांकडून ज्यास पाचारण केले जाते अशा हे इंद्रा, तूं दुष्टांचा संहारक आणि जगताचा एकटाच प्रभु असल्यामुळे जेव्हां जेव्हां तुझ्या मनुष्यांनी धांवा केला तेव्हां तेव्हां त्यांना अभय देण्याकरितां तूं त्यांना धैर्य उत्पन्न होईल अशा रीतीनें आश्वासन दिलेंस. हे उदार इंद्रा ज्यांचा अंत लावणें कठीण आहे अशा ह्या द्यावापृथिवीस जेव्यां तूं केवळ हातानें धरून ठेवलेंस त्या वेळीं तुझी नुसती एक मूठच झाली. ॥ ५ ॥


प्र सू त॑ इन्द्र प्र॒वता॒ हरि॑भ्या॒म् प्र ते॒ वज्रः॑ प्रमृ॒णन्ने॑तु॒ शत्रू॑न् ।
ज॒हि प्र॑ती॒चो अ॑नू॒चः परा॑चो॒ विश्वं॑ स॒त्यं कृ॑णुहि वि॒ष्टम॑स्तु ॥ ६ ॥

प्र सू त इंद्र प्रवता हरिभ्याम् प्र ते वज्रः प्रमृणन्नेतु शत्रून् ।
जहि प्रतीचः अनूचः पराचः विश्वं सत्यं कृणुहि विष्टमस्तु ॥ ६ ॥

हे इंद्रा, तुझा रथ अश्वांसहित खालीं उतरत येथें येवो. शत्रूंचा संहार करीत तुझें वज्रही येथें प्राप्त होवो. जे तुला प्रतिरोध करीत असतील, जे पाठीमागून येऊन तुझ्यावर हल्ला करतील अथवा जे दुष्ट तुझ्या पासून फार दूर असतील त्या सर्वांना मारून टाक. हे सर्व जग सत्यमय कर आणि त्यांत तुझा प्रवेश होऊं दे. ॥ ६ ॥


यस्मै॒ धायु॒रद॑धा॒ मर्त्या॒याभ॑क्तं चिद्‌भजते गे॒ह्यं१सः ।
भ॒द्रा त॑ इन्द्र सुम॒तिर्घृ॒ताची॑ स॒हस्र॑दाना पुरुहूत रा॒तिः ॥ ७ ॥

यस्मै धायुरदधा मर्त्यायाभक्तं चिद्‌भजते गेह्यं१सः ।
भद्रा त इंद्र सुमतिर्घृताची सहस्रदाना पुरुहूत रातिः ॥ ७ ॥

ज्या मानवासाठी तूं द्रव्याचे निधी उदारपणानें सांठवून ठेवलेले असतात त्यास पूर्वी कधींही प्राप्त न झालेल्या गृह सौख्यांचा उपभोग करावयास सांपडतो. हे इंद्रा विपुल घृत प्राप्त करून देणारी तुझी कृपा खरोखर कल्याणप्रद आहे. अनेक भक्तांकडून पाचारण होत असलेल्या हे देवा तुझें औदार्य हजारों प्रकारचीं सुखें प्राप्त करून देणारें आहे. ॥ ७ ॥


स॒हदा॑नुं पुरुहूत क्षि॒यन्त॑मह॒स्तमि॑न्द्र॒ सं पि॑ण॒क्कुणा॑रुम् ।
अ॒भि वृ॒त्रं वर्ध॑मानं॒ पिया॑रुम॒पाद॑मिन्द्र त॒वसा॑ जघन्थ ॥ ८ ॥

सहदानुं पुरुहूत क्षियंतमहस्तं इंद्र सं पिणक्कुणारुम् ।
अभि वृत्रं वर्धमानं पियारुमपादमिंद्र तवसा जघंथ ॥ ८ ॥

ज्याचा अनेक भक्त धांवा करीत असतात अशा हे इंद्रा, दानूसहवर्तमान वास्तव्य करणार्‍या कुणारूचे हात तोडून तूं त्यांचे चूर्ण करून टाकलेंस. वृद्धि पावत असलेल्या वृत्र आणि पिआरू ह्यांचे पाय तोडून टाकून तूं आपल्या सामर्थ्यानें त्यांचा वध केलास. ॥ ८ ॥


नि सा॑म॒नामि॑षि॒रामि॑न्द्र॒ भूमिं॑ म॒हीम॑पा॒रां सद॑ने ससत्थ ।
अस्त॑भ्ना॒द्द्यां वृ॑ष॒भो अ॒न्तरि॑क्ष॒मर्ष॒न्त्वाप॒स्त्वये॒ह प्रसू॑ताः ॥ ९ ॥

नि सामनामिषिरामिंद्र भूमिं महीमपारां सदने ससत्थ ।
अस्तभ्नाद्द्यां वृषभः अंतरिक्षमर्षंत्वापस्त्वयेह प्रसूताः ॥ ९ ॥

हे इंद्रा, समतोल परंतु सर्वप्रेरक अशी जी ही अपार आणि विस्तीर्ण पृथिवी तिला तूं आपल्या जागेवर स्थिर केलेंस. ह्या पराक्रमी देवानें आकाश आणि अंतिरिक्ष ह्यांना स्थिरता आणली. तूं ज्यांच्यामध्यें वेग उत्पन्न केलास तीं जलें येथें वाहत येवोत. ॥ ९ ॥


अ॒ला॒तृ॒णो व॒ल इ॑न्द्र व्र॒जो गोः पु॒रा हन्तो॒र्भय॑मानो॒ व्यार ।
सु॒गान्प॒थो अ॑कृणोन्नि॒रजे॒ गाः प्राव॒न्वाणीः॑ पुरुहू॒तं धम॑न्तीः ॥ १० ॥

अलातृणः वल इंद्र व्रजः गोः पुरा हंतोर्भयमानः व्यार ।
सुगान्पथः अकृणोन्निरजे गाः प्रावन्वाणीः पुरुहूतं धमंतीः ॥ १० ॥

हे इंद्रा, ज्यानें गाईंना प्रतिबंधांत टाकले होतें असा तो क्षुद्र वल तूं प्रहार करण्यापूर्वीच भयानें चूर होऊन गेला. ह्या इंद्रानें गाईंना जाण्याकरितां मार्ग सुगम केले आणि त्यावेळीं उच्च घोषांत चाललेल्या प्रार्थनांनी अनेक भक्तां कडून धांवा होत असलेल्या त्या इंद्रास अधिक उत्तेजन आणले. ॥ १० ॥


एको॒ द्वे वसु॑मती समी॒ची इन्द्र॒ आ प॑प्रौ पृथि॒वीमु॒त द्याम् ।
उ॒तान्तरि॑क्षाद॒भि नः॑ समी॒क इ॒षो र॒थीः स॒युजः॑ शूर॒ वाजा॑न् ॥ ११ ॥

एकः द्वे वसुमती समीची इंद्र आ पप्रौ पृथिवीमुत द्याम् ।
उतांतरिक्षादभि नः समीक इषः रथीः सयुजः शूर वाजान् ॥ ११ ॥

एकमेकांशी संलग्न झालेले व धनपरिपूर्ण असे द्युलोक आणि भूलोक हे जे दोन प्रदेश त्यांना इंद्रानें एकट्यानें व्यापून टाकलें आहे. म्हणून हे शूरा, आपल्या रथांत आरूढ होऊन त्यास जोडलेले आपले अश्व अंतरिक्षांतून आमचे समीप घेऊन ये. ॥ ११ ॥


दिशः॒ सूर्यो॒ न मि॑नाति॒ प्रदि॑ष्टा दि॒वेदि॑वे॒ हर्य॑श्वप्रसूताः ।
सं यदान॒ळध्व॑न॒ आदिदश्वै॑र्वि॒मोच॑नं कृणुते॒ तत्त्वस्य ॥ १२ ॥

दिशः सूर्यः न मिनाति प्रदिष्टा दिवेदिवे हर्यश्वप्रसूताः ।
सं यदानळध्वन आदिदश्वैर्विमोचनं कृणुते तत्त्वस्य ॥ १२ ॥

ज्याचे अश्व पीतवर्ण आहेत अशा इंद्राने नेमून आणि दाखवून ठेवलेल्या दिशांकडे जाण्यास सूर्य कधींही चुकत नाहीं जेव्हां सर्व मार्गांचे तो आपल्या अश्वांच्या योगानें आक्रमण करतो तेव्हां तो आपला रथ सोडून देतो. ॥ १२ ॥


दिदृ॑क्षन्त उ॒षसो॒ याम॑न्न॒क्तोर्वि॒वस्व॑त्या॒ महि॑ चि॒त्रमनी॑कम् ।
विश्वे॑ जानन्ति महि॒ना यदागा॒दिन्द्र॑स्य॒ कर्म॒ सुकृ॑ता पु॒रूणि॑ ॥ १३ ॥

दिदृक्षंत उषसः यामन्नक्तोर्विवस्वत्या महि चित्रमनीकम् ।
विश्वे जानंति महिना यदागादिंद्रस्य कर्म सुऽकृता पुरूणि ॥ १३ ॥

रात्र आपला मार्ग क्रमीत असतां देदीप्यमान उषेचें आश्चर्यकारक व सर्वप्रसृत तेज अवलोकन करण्याकरितां सर्व लोक उत्सुक होतात. आणि ज्यावेळीं ॥ १३ ॥


महि॒ ज्योति॒र्निहि॑तं व॒क्षणा॑स्वा॒मा प॒क्वं च॑रति॒ बिभ्र॑ती॒ गौः ।
विश्वं॒ स्वाद्म॒ सम्भृ॑तमु॒स्रिया॑यां॒ यत्सी॒मिन्द्रो॒ अद॑धा॒द्भोज॑नाय ॥ १४ ॥

महि ज्योतिर्निहितं वक्षणास्वामा पक्वं चरति बिभ्रती गौः ।
विश्वं स्वाद्म सम्भृतमुस्रियायां यत्सीमिंद्रः अदधाद्भोजनाय ॥ १४ ॥

स्तनांमध्यें धरून ठेवलेल्या धवलपणाचा पुंज कीं काय असें जें पक्व झालेलें रुचकर दूध तें धारण करून नवीन वेताची कालवड इतस्ततः हिंडत असते. ज्या वेळीं लोकांच्या पोषणाकरितां इंद्रानें गाईचे अंगी दूध ठेवलें त्या वेळी तिच्यात सर्व माधुर्य जणुं काय ओतप्रोत भरून राहिलें. ॥ १४ ॥


इन्द्र॒ दृह्य॑ यामको॒शा अ॑भूवन्य॒ज्ञाय॑ शिक्ष गृण॒ते सखि॑भ्यः ।
दु॒र्मा॒यवो॑ दु॒रेवा॒ मर्त्या॑सो निष॒ङ्गिणो॑ रि॒पवो॒ हन्त्वा॑सः ॥ १५ ॥

इंद्र दृह्य यामकोशा अभूवन्यज्ञाय शिक्ष गृणते सखिभ्यः ।
दुर्मायवः दुरेवा मर्त्यासः निषङ्गिणः रिपवः हंत्वासः ॥ १५ ॥

हे इंद्रा, आपलें सर्व सामर्थ्य अंगी आण. शत्रूंनी सर्व वाटा बंद केल्या आहेत. तुझे मित्र आणि तुझा भक्त ह्यांना तुझें गायन करण्यास शिकव. जे मानव नाना प्रकारच्या अवघड युक्त्या व अभेद्य मार्ग काढीत आहेत, त्यांचा तूं वधच केला पाहिजेस. कारण ते शत्रुत्व आचरत असून त्यांनी आपल्याजवळ धनुष्यें घेतलीं आहेत. ॥ १५ ॥


सं घोषः॑ शृण्वेऽव॒मैर॒मित्रै॑र्ज॒ही न्येष्व॒शनिं॒ तपि॑ष्ठाम् ।
वृ॒श्चेम॒धस्ता॒द्वि रु॑जा॒ सह॑स्व ज॒हि रक्षो॑ मघवन्र॒न्धय॑स्व ॥ १६ ॥

सं घोषः शृण्वेऽवमैरमित्रैर्जही न्येष्वशनिं तपिष्ठाम् ।
वृश्चेमधस्ताद्वि रुजा सहस्व जहि रक्षः मघऽवन्रंधयस्व ॥ १६ ॥

अगदीं जवळ येऊन ठेपलेल्या शत्रूंनी केलेली गर्जना ऐकूं येऊं लागली आहे. आपलें अत्यंत तप्त असें वज्र त्यांच्या अंगांवर फेंक. त्यांची पाळें मुळें तोडून टाक, त्यांना यातना दे, ते रंजीस येतील असें कर आणि हे उदार देवा राक्षसाला शरणा आणवून मारून टाक. ॥ १६ ॥


उद्वृ॑ह॒ रक्षः॑ स॒हमू॑लमिन्द्र वृ॒श्चा मध्यं॒ प्रत्यग्रं॑ शृणीहि ।
आ कीव॑तः सल॒लूकं॑ चकर्थ ब्रह्म॒द्विषे॒ तपु॑षिं हे॒तिम॑स्य ॥ १७ ॥

उद्वृह रक्षः सहमूलमिंद्र वृश्चा मध्यं प्रत्यग्रं शृणीहि ।
आ कीवतः सललूकं चकर्थ ब्रह्मद्विषे तपुषिं हेतिमस्य ॥ १७ ॥

इंद्रा, राक्षसास मुळासकट उपटून टाक, त्याच्या मध्य भागावर हत्यार चालव, त्याचे शीर छेदून टाक. खरोखर किती तरी वेळ तूं संदिग्धपणांत घालविलास. तुझ्या भक्तांचा द्वेष करणार्‍या दुष्टांच्या अंगावर जळजळीत शस्त्र फेंक. ॥ १७ ॥


स्व॒स्तये॑ वा॒जिभि॑श्च प्रणेतः॒ सं यन्म॒हीरिष॑ आ॒सत्सि॑ पू॒र्वीः ।
रा॒यो व॒न्तारो॑ बृह॒तः स्या॑मा॒स्मे अ॑स्तु॒ भग॑ इन्द्र प्र॒जावा॑न् ॥ १८ ॥

स्वस्तये वाजिभिश्च प्रणेतः सं यन्महीरिष आसत्सि पूर्वीः ।
रायः वंतारः बृहतः स्यामास्मे अस्तु भग इंद्र प्रजावान् ॥ १८ ॥

हे उत्तम मार्गदर्शक इंद्रा, ज्याअर्थीं अनेक तऱ्हेच्या विपुल संपत्तीवर तुझी सत्ता आहे त्याअर्थीं आमच्या कल्याणार्थ अश्वांवर आरूढ होऊन ये. आम्हीं तुझ्या जवळ पुष्कळ धनाची याचना करणारे होऊं. हे इंद्रा, संततीसह उत्तम दैव आमच्याकरितां नेमलेलें असो. ॥ १८ ॥


आ नो॑ भर॒ भग॑मिन्द्र द्यु॒मन्तं॒ नि ते॑ दे॒ष्णस्य॑ धीमहि प्ररे॒के ।
ऊ॒र्व इ॑व पप्रथे॒ कामो॑ अ॒स्मे तमा पृ॑ण वसुपते॒ वसू॑नाम् ॥ १९ ॥

आ नः भर भगमिंद्र द्युमंतं नि ते देष्णस्य धीमहि प्ररेके ।
ऊर्व इव पप्रथे कामः अस्मे तमा पृण वसुपते वसूनाम् ॥ १९ ॥

हे इंद्रा, उत्कृष्ट दैव आम्हास प्राप्त करून दे. तूं उदार असल्यामुळें तुझ्या अतिरिक्त कृपा प्रसादाखालीं आम्हीं राहात आहोंत. आमच्या कामना वडवानलाप्रमाणें वृद्धींगत होत आहेत, त्यांचे हे संपत्तीच्या अधिष्ठात्या इंद्रा, तूं शमन कर. ॥ १९ ॥


इ॒मं कामं॑ मन्दया॒ गोभि॒रश्वै॑श्च॒न्द्रव॑ता॒ राध॑सा प॒प्रथ॑श्च ।
स्व॒र्यवो॑ म॒तिभि॒स्तुभ्यं॒ विप्रा॒ इन्द्रा॑य॒ वाहः॑ कुशि॒कासो॑ अक्रन् ॥ २० ॥

इमं कामं मंदया गोभिरश्वैश्चंद्रवता राधसा पप्रथश्च ।
स्वर्यवः मतिभिस्तुभ्यं विप्रा इंद्रय वाहः कुशिकासः अक्रन् ॥ २० ॥

आम्हास धेनू आणि अश्व अर्पण करून आमची ही कामना तृप्त कर आणि आपल्या आनंदप्रद अशा कृपा प्रसादानें आम्हास योग्यतेस चढव. हे स्तोत्र अलौकिक तेजाची इच्छा करणार्‍या विद्वान कुशिकांनी आपल्या उत्तम स्फूर्तीच्या सहाय्यानें, हे इंद्रा, तुझ्या प्रित्यर्थ रचलें आहे. ॥ २० ॥


आ नो॑ गो॒त्रा द॑र्दृहि गोपते॒ गाः सम॒स्मभ्यं॑ स॒नयो॑ यन्तु॒ वाजाः॑ ।
दि॒वक्षा॑ असि वृषभ स॒त्यशु॑ष्मोऽ॒स्मभ्यं॒ सु म॑घवन्बोधि गो॒दाः ॥ २१ ॥

आ नः गोत्रा दर्दृहि गोपते गाः समस्मभ्यं सनयः यंतु वाजाः ।
दिवक्षा असि वृषभ सत्यशुष्मोऽस्मभ्यं सु मघऽवन्बोधि गोदाः ॥ २१ ॥

आम्हास गाई देण्याकरितां गाईचे गोठे उघड. आम्हांस विपुल संपत्ति व सामर्थ्य प्राप्त होऊं दे. हे सामर्थ्यवान देवा, तूं स्वर्गासही व्याप्त करणारा असून सत्य बलशाली आहेस. हे उदार इंद्रा, तूं गाईंचे दान करणारा असल्यामुळें आमच्या हांकेसरशी जागृत हो. ॥ २१ ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ २२ ॥

शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजसातौ ।
शृण्वंतमुग्रमूतये समत्सु घ्नंतं वृत्राणि संजितं धनानाम् ॥ २२ ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतिम आहे, उग्र असतांही युधांत संरक्षणासाठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण आमंत्रण करूं. ॥ २२ ॥


ॐ तत् सत्


GO TOP