PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ११ ते २०

ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ११ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्राग्नौ : छंद - गायत्री


अ॒ग्निर्होता॑ पु॒रोहि॑तोऽध्व॒रस्य॒ विच॑र्षणिः । स वे॑द य॒ज्ञमा॑नु॒षक् ॥ १ ॥

अग्निर्होता पुरोहितोऽध्वरस्य विचर्षणिः । स वेद यज्ञमानुषक् ॥ १ ॥

ऋत्विजासम्मुख स्थापिलेला, आणि यज्ञावलोकन करणारा अग्नि यज्ञीय प्रार्थना लक्षपूर्वक श्रवण करतो. ॥ १ ॥


स ह॑व्य॒वाळम॑र्त्य उ॒शिग्दू॒तश्चनो॑हितः । अ॒ग्निर्धि॒या समृ॑ण्वति ॥ २ ॥

स हव्यवाळमर्त्य उशिग्दूतश्चनोहितः । अग्निर्धिया समृण्वति ॥ २ ॥

आहुतींनी वृद्धिंगत होणारा, हव्यवाहक, अमर, आणि तत्पर दूत अग्नि स्तुतिस्तोत्रांनी प्रसन्न होतो. ॥ २ ॥


अ॒ग्निर्धि॒या स चे॑तति के॒तुर्य॒ज्ञस्य॑ पू॒र्व्यः । अर्थं॒ ह्यस्य त॒रणि॑ ॥ ३ ॥

अग्निर्धिया स चेतति केतुर्यज्ञस्य पूर्व्यः । अर्थं ह्यस्य तरणि ॥ ३ ॥

अंधःकारापासून रक्षण करणारा, यज्ञध्वज, आणि पुरातन अग्नि भक्तांच्या प्रार्थना बुद्धिपूर्वक श्रवण करतो. ॥ ३ ॥


अ॒ग्निं सू॒नुं सन॑श्रुतं॒ सह॑सो जा॒तवे॑दसम् । वह्निं॑ दे॒वा अ॑कृण्वत ॥ ४ ॥

अग्निं सूनुं सनश्रुतं सहसः जातऽवेदसम् । वह्निं देवा अकृण्वत ॥ ४ ॥

पुरातन कालापासून विख्यात, सर्वज्ञ, आणि बलपुत्र अग्नीला देवांनी आपला हव्यवाहक बनविला आहे. ॥ ४ ॥


अदा॑भ्यः पुरए॒ता वि॒शाम॒ग्निर्मानु॑षीणाम् । तूर्णी॒ रथः॒ सदा॒ नवः॑ ॥ ५ ॥

अदाभ्यः पुरएता विशामग्निर्मानुषीणाम् । तूर्णी रथः सदा नवः ॥ ५ ॥

अविनाशी, लोकाग्रणी आणि द्रुतगामी अग्नि रथाप्रमाणे चिरनूतन आहे. ॥ ५ ॥


सा॒ह्वान्विश्वा॑ अभि॒युजः॒ क्रतु॑र्दे॒वाना॒ममृ॑क्तः । अ॒ग्निस्तु॒विश्र॑वस्तमः ॥ ६ ॥

साह्वान्विश्वा अभियुजः क्रतुर्देवानाममृक्तः । अग्निस्तुविश्रवस्तमः ॥ ६ ॥

देवांचा पुष्टिकर्ता, अविनाशी आणि कीर्तिमान अग्नि युद्धामध्ये शत्रूंचा पराजय करतो. ॥ ६ ॥


अ॒भि प्रयां॑सि॒ वाह॑सा दा॒श्वाँ अ॑श्नोति॒ मर्त्यः॑ । क्षयं॑ पाव॒कशो॑चिषः ॥ ७ ॥

अभि प्रयांसि वाहसा दाश्वान् अश्नोति मर्त्यः । क्षयं पावकशोचिषः ॥ ७ ॥

पवित्रकांती अग्नीच्या कृपाप्रसादाने हविर्युक्त भक्ताला अन्न आणि निवासस्थान प्राप्त होते. ॥ ७ ॥


परि॒ विश्वा॑नि॒ सुधि॑ता॒ग्नेः अ॑श्याम॒ मन्म॑भिः । विप्रा॑सो जा॒तवे॑दसः ॥ ८ ॥

परि विश्वानि सुधिताग्नेर् अश्याम मन्मभिः । विप्रासः जातऽवेदसः ॥ ८ ॥

हे अग्ने, तू आम्हाला कांतीयुक्त, शोभायुक्त आणि ऐश्वर्ययुक्त असे धन प्रदान कर. आम्हा स्तोतृजनांच्या कल्याणासाठी आमच्याकडे आगमन कर. ॥ ८ ॥


अग्ने॒ विश्वा॑नि॒ वार्या॒ वाजे॑षु सनिषामहे । त्वे दे॒वास॒ एरि॑रे ॥ ९ ॥

अग्ने विश्वानि वार्या वाजेषु सनिषामहे । त्वे देवास एरिरे ॥ ९ ॥

हे देवसमावेशक अग्ने, युद्धामध्ये विजयी करून तू आम्हास उत्कृष्ट संपत्ती प्रदान कर. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १२ (इंद्राग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्राग्नौ : छंद - गायत्री


इन्द्रा॑ग्नी॒ आ ग॑तं सु॒तं गी॒र्भिर्नभो॒ वरे॑ण्यम् । अ॒स्य पा॑तं धि॒येषि॒ता ॥ १ ॥

इंद्रग्नी आ गतं सुतं गीर्भिर्नभः वरेण्यम् । अस्य पातं धियेषिता ॥ १ ॥

हे इंद्र आणि अग्नि देवहो, ह्या तयार केलेल्या सोमरसाकडे, ह्या उत्कृष्ट पेयाकडे आमच्या स्तुतींनी संतुष्ट होऊन आगमन करा आणि स्वतःच्याच प्रेरणेनें त्याचें प्राशन करा. ॥ १ ॥


इन्द्रा॑ग्नी जरि॒तुः सचा॑ य॒ज्ञो जि॑गाति॒ चेत॑नः । अ॒या पा॑तमि॒मं सु॒तम् ॥ २ ॥

इंद्रग्नी जरितुः सचा यज्ञः जिगाति चेतनः । अया पातमिमं सुतम् ॥ २ ॥

हे इंद्र आणि अग्नि देवतांनो, तुमच्या स्तुतिकर्त्याचा हा चित्तास हुशारी आणणारा यज्ञ तुम्हां दोघांकडे मिळून येत आहे. ह्यानें संतुष्ट होऊन तुम्ही ह्या सिद्ध केलेल्या सोमाचें प्राशन करा. ॥ २ ॥


इन्द्र॑म॒ग्निं क॑वि॒च्छदा॑ य॒ज्ञस्य॑ जू॒त्या वृ॑णे । ता सोम॑स्ये॒ह तृ॑म्पताम् ॥ ३ ॥

इंद्रमग्निं कविच्छदा यज्ञस्य जूत्या वृणे । ता सोमस्येह तृम्पताम् ॥ ३ ॥

यज्ञापासून प्राप्त झालेल्या स्फूर्तीच्या योगानें इंद्राग्नींना संतुष्ट करण्याची माझी इच्छा आहे. कवींना त्यांचा मोठा आधार आहे. हे इंद्राग्नी आमच्या सोमरसानें येथें तृप्त होवोत. ॥ ३ ॥


तो॒शा वृ॑त्र॒हणा॑ हुवे स॒जित्वा॒नाप॑राजिता । इ॒न्द्रा॒ग्नी वा॑ज॒सात॑मा ॥ ४ ॥

तोशा वृत्रहणा हुवे सजित्वानापराजिता । इंद्रग्नी वाजसातमा ॥ ४ ॥

शत्रूंचा नाश करणार्‍या, वृत्राचा वध करणार्‍या, कधींही पराभूत न होणार्‍या व सामर्थ्याचा अत्यंत लाभ करून देणार्‍या ह्या इंद्र आणि अग्नि देवांस मी यज्ञ अर्पण करतो. ॥ ४ ॥


प्र वा॑मर्चन्त्यु॒क्थिनो॑ नीथा॒विदो॑ जरि॒तारः॑ । इन्द्रा॑ग्नी॒ इष॒ आ वृ॑णे ॥ ५ ॥

प्र वामर्चंत्युक्थिनः नीथाविदः जरितारः । इंद्रग्नी इष आ वृणे ॥ ५ ॥

स्तुतिस्तोत्रांमध्यें निपुण असणारे उपासक तुमचें अर्चन करीत आहेत. हे इंद्र आणि अग्नि देवांनो, तुमच्यापासून आम्ही धान्यसमृद्धीची इच्छा करतो. ॥ ५ ॥


इन्द्रा॑ग्नी नव॒तिं पुरो॑ दा॒सप॑त्नीरधूनुतम् । सा॒कमेके॑न॒ कर्म॑णा ॥ ६ ॥

इंद्रग्नी नवतिं पुरः दासपत्नीरधूनुतम् । साकमेकेन कर्मणा ॥ ६ ॥

हे इंद्र आणि अग्नि देवतांनो, दुष्ट शत्रूंनी बळकावलेली नव्वद नगरें तुम्हीं दोघांनी एकाच हल्ल्यांत उध्वस्त करून टाकली. ॥ ६ ॥


इन्द्रा॑ग्नी॒ अप॑स॒स्पर्युप॒ प्र य॑न्ति धी॒तयः॑ । ऋ॒तस्य॑ प॒थ्या३अनु॑ ॥ ७ ॥

इंद्रग्नी अपसस्पर्युप प्र यंति धीतयः । ऋतस्य पथ्या३अनु ॥ ७ ॥

हे इंद्र आणि अग्नि देवतांनो, सत्य मार्गानुरोधानें परीक्रमण करीत असतां आमचे विचार आपल्या पराक्रमांच्या भोंवती वेगाने धांव घेऊं लागले. ॥ ७ ॥


इन्द्रा॑ग्नी तवि॒षाणि॑ वां स॒धस्था॑नि॒ प्रयां॑सि च । यु॒वोर॒प्तूर्यं॑ हि॒तम् ॥ ८ ॥

इंद्रग्नी तविषाणि वां सधस्थानि प्रयांसि च । युवोरप्तूर्यं हितम् ॥ ८ ॥

हे इंद्र आणि अग्नि देवतांनो, तुमचा आनंद आणि पराक्रम ह्यांचे साहचर्य आहे. तुमचें सहाय्य कल्याणप्रद असतें. ॥ ८ ॥


इन्द्रा॑ग्नी रोच॒ना दि॒वः परि॒ वाजे॑षु भूषथः । तद्वां॑ चेति॒ प्र वी॒र्यम् ॥ ९ ॥

इंद्रग्नी रोचना दिवः परि वाजेषु भूषथः । तद्वां चेति प्र वीर्यम् ॥ ९ ॥

हे इंद्र आणि अग्नि देवतांनो, पराक्रमी कृत्यें करीत असतां तुम्ही द्युलोकाच्या देदीप्यमान प्रदेशास शोभा आणतां. तुमचें बल त्या वेळी उत्कृष्ट रीतीनें प्रकट होतें. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १३ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुप्


प्र वो॑ दे॒वाया॒ग्नये॒ बर्हि॑ष्ठमर्चास्मै ।
गम॑द्दे॒वेभि॒रा स नो॒ यजि॑ष्ठो ब॒र्हिरा स॑दत् ॥ १ ॥

प्र वः देवायाग्नये बर्हिष्ठमर्चास्मै ।
गमद्देवेभिरा स नः यजिष्ठः बर्हिरा सदत् ॥ १ ॥

तुमच्या प्रिय अग्नि देवास एक अत्यंत दीर्घ स्तोत्र अर्पण करा. तो अत्यंत पूजनीय देव, सकल देवांसहवर्तमान आमचे समीप येवो आणि ह्या कुशासनावर अधिष्ठित होवो. ॥ १ ॥


ऋ॒तावा॒ यस्य॒ रोद॑सी॒ दक्षं॒ सच॑न्त ऊ॒तयः॑ ।
ह॒विष्म॑न्त॒स्तमी॑ळते॒ तं स॑नि॒ष्यन्तोऽ॑वसे ॥ २ ॥

ऋतावा यस्य रोदसी दक्षं सचंत ऊतयः ।
हविष्मंतस्तमीळते तं सनिष्यंतोऽवसे ॥ २ ॥

जो सत्यकर्मा आहे, द्युलोक आणि भूलोक हे ज्याचे आहेत आणि ज्याची कृपा ह्याच्या सामर्थ्याशीं संलग्न आहे अशा त्या अग्निदेवास, त्याचे भक्त हवि अर्पण करून आळवितात, ज्यास लाभाची इच्छा आहे ते आपल्या कल्याणाकरितां त्याचेंच स्तवन करतात. ॥ २ ॥


स य॒न्ता विप्र॑ एषां॒ स य॒ज्ञाना॒मथा॒ हि षः ।
अ॒ग्निं तं वो॑ दुवस्यत॒ दाता॒ यो वनि॑ता म॒घम् ॥ ३ ॥

स यंता विप्र एषां स यज्ञानामथा हि षः ।
अग्निं तं वः दुवस्यत दाता यः वनिता मघम् ॥ ३ ॥

हाच अग्नि या सर्व मानवांचा नियंता आहे. हाच यज्ञांचा नेता आहे. जो संपत्तीचें अर्जन करणारा असून उदार दाता आहे, अशा त्या तुमच्या प्रिय अग्नीची सेवा करा. ॥ ३ ॥


स नः॒ शर्मा॑णि वी॒तये॑ऽ॒ग्निर्य॑च्छतु॒ शंत॑मा ।
यतो॑ नः प्रु॒ष्णव॒द्वसु॑ दि॒वि क्षि॒तिभ्यो॑ अ॒प्स्वा ॥ ४ ॥

स नः शर्माणि वीतयेऽग्निर्यच्छतु शंतमा ।
यतः नः प्रुष्णवद्वसु दिवि क्षितिभ्यः अप्स्वा ॥ ४ ॥

आमच्या उत्कर्षाकरितां तो अग्नि आम्हांस अत्यंत कल्याणप्रद अशीं सौख्यें अर्पण करो, द्युलोकांत व उदकांत असलेलीं व पृथ्वीपासून प्राप्त होणारी वैभवें आमच्या हिताकरितां तोच वर्धन करणारा आहे. ॥ ४ ॥


दी॒दि॒वांस॒मपू॑र्व्यं॒ वस्वी॑भिरस्य धी॒तिभिः॑ ।
ऋक्वा॑णो अ॒ग्निमि॑न्धते॒ होता॑रं वि॒श्पतिं॑ वि॒शाम् ॥ ५ ॥

दीदिवांसमपूर्व्यं वस्वीभिरस्य धीतिभिः ।
ऋक्वाणः अग्निमिंधते होतारं विश्पतिं विशाम् ॥ ५ ॥

जो हविर्दाता आहे, जो सर्व मानवांचा अधिपति आहे व आपल्या तेजःपुंज प्रभेमुळें जो अपूर्व तेजस्वी दिसतो त्या ह्या अग्नीस स्तोत्रगायक उपासक उद्दिप्त करीत आहेत. ॥ ५ ॥


उ॒त नो॒ ब्रह्म॑न्नविष उ॒क्थेषु॑ देव॒हूत॑मः ।
शं नः॑ शोचा म॒रुद्वृ॒िधोऽ॑ग्ने सहस्र॒सात॑मः ॥ ६ ॥

उत नः ब्रह्मन्नविष उक्थेषु देवहूतमः ।
शं नः शोचा मरुद्वृ्धोऽग्ने सहस्रसातमः ॥ ६ ॥

शिवाय हे प्रज्ञावान देवा, स्तोत्रें अर्पण केली असतां देवांस आमचा यज्ञ पोंचविण्यास सदैव उद्युक्त असलेला तूं आमचें संरक्षण कर. भक्तांना हजारों प्रकारचे लाभ घडविणारा आणि वायूच्या योगानें वृद्धी पावणारा जो तूं तो, हे अग्निदेवा प्रदीप्त होऊन आमचें कल्याण कर. ॥ ६ ॥


नू नो॑ रास्व स॒हस्र॑वत्तो॒कव॑त्पुष्टि॒मद्वसु॑ ।
द्यु॒मद॑ग्ने सु॒वीर्यं॒ वर्षि॑ष्ठ॒मनु॑पक्षितम् ॥ ७ ॥

नू नः रास्व सहस्रवत्तोकवत्पुष्टिमद्वसु ।
द्युमदग्ने सुवीर्यं वर्षिष्ठमनुपक्षितम् ॥ ७ ॥

हे अग्निदेव, ज्यांत संततीचा लाभ आहे, ज्याची वृद्धी होणारी आहे, ज्याचे योगानें उत्तम वीर्याची प्राप्ति होते, जें सर्वोत्कृष्ट आहे, ज्याची प्रभा अतिशय दूरपर्यंत आहे, व ज्याचा कधीं ऱ्हास होत नाही असें वैभव सहस्रपटीनें आम्हांस त्वरीत अर्पण कर. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १४ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


आ होता॑ म॒न्द्रो वि॒दथा॑न्यस्थात्स॒त्यो यज्वा॑ क॒वित॑मः॒ स वे॒धाः ।
वि॒द्युद्र॑तथः॒ सह॑सस्पु॒त्रो अ॒ग्निः शो॒चिष्के॑शः पृथि॒व्यां पाजो॑ अश्रेत् ॥ १ ॥

आ होता मंद्रः विदथान्यस्थात्सत्यः यज्वा कवितमः स वेधाः ।
विद्युद्र्थः सहसस्पुत्रः अग्निः शोचिष्केशः पृथिव्यां पाजः अश्रेत् ॥ १ ॥

आनंदोत्पादक, सत्यस्वरूप, आमचे हवि आणि यज्ञ देवतांप्रत पोंचविणारा असा हा अत्यंत प्रज्ञावान सृष्टिकर्ता यज्ञमंडपांत विराजित झाला आहे. विद्युत हाच ज्याचा रथ आहे व ज्याचे केश ज्वालारूप आहेत असा सामर्थ्याचा पुत्र हा अग्नि ह्या पृथ्वीवर आपल्या शक्तीचा आश्रय करून बसला आहे. ॥ १ ॥


अया॑मि ते॒ नम॑उक्तिं जुषस्व॒ ऋता॑व॒स्तुभ्यं॒ चेत॑ते सहस्वः ।
वि॒द्वाँ आ व॑क्षि वि॒दुषो॒ नि ष॑त्सि॒ मध्य॒ आ ब॒र्हिरू॒तये॑ यजत्र ॥ २ ॥

अयामि ते नमौक्तिं जुषस्व ऋतावस्तुभ्यं चेतते सहस्वः ।
विद्वान् आ वक्षि विदुषः नि षत्सि मध्य आ बर्हिरूतये यजत्र ॥ २ ॥

मी तुझ्याकडे गमन करीत आहे, माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. हे सत्यशील आणि सामर्थ्यवान देवा, ज्यास सर्व कांही विदित आहे अशा तुलाच हा नमस्कार केलेला आहे. तूं स्वतः प्रज्ञावान असून सर्व प्रज्ञावान देवांस तूं घेऊन येतोस आणि हे यज्ञार्ह अग्ने, आमच्या संरक्षणासाठीं तूं सर्वांच्यामध्यें कुशासनावर बसतोस. ॥ २ ॥


द्रव॑तां त उ॒षसा॑ वा॒जय॑न्ती॒ अग्ने॒ वात॑स्य प॒थ्याभि॒रच्छ॑ ।
यत्सी॑म॒ञ्जन्ति॑ पू॒र्व्यं ह॒विर्भि॒रा व॒न्धुरे॑व तस्थतुर्दुरो॒णे ॥ ३ ॥

द्रवतां त उषसा वाजयंती अग्ने वातस्य पथ्याभिरच्छ ।
यत्सीमञ्जंति पूर्व्यं हविर्भिरा वंधुरेव तस्थतुर्दुरोणे ॥ ३ ॥

हे अग्निदेवा, उत्साह उत्पन्न करणार्‍या दोन उषा वायूच्या मार्गांनी तुझ्याकडे धांवत येवोत. तूं जो पुरातन देव त्यास ऋत्विज लोक हवींनी अभिसिंचन करीत आहेत तोंच गाडीच्या दांडीप्रमाणे त्या दोघी यज्ञमंडपांत येऊन स्थिर झाल्या. ॥ ३ ॥


मि॒त्रश् च॒ तुभ्यं॒ वरु॑णः सह॒स्वोऽ॑ग्ने॒ विश्वे॑ म॒रुतः॑ सु॒म्नम॑र्चन् ।
यच्छो॒चिषा॑ सहसस्पुत्र॒ तिष्ठा॑ अ॒भि क्षि॒तीः प्र॒थय॒न्सूर्यो॒ नॄन् ॥ ४ ॥

मित्रश् च तुभ्यं वरुणः सहस्वोऽग्ने विश्वे मरुतः सुम्नमर्चन् ।
यच्छोचिषा सहसस्पुत्र तिष्ठा अभि क्षितीः प्रथयन्सूर्यः नॄन् ॥ ४ ॥

हे सामर्थ्याच्या पुत्रा, हे बलवान अग्निदेवा, ज्यावेळीं सूर्याच्या रूपानें सर्व मानवांना उजेडांत आणीत तूं आपल्या तेजानें सर्व प्रदेश व्याप्त करून टाकलेस, त्यावेळी मित्र, वरुण आणि अखिल मरुत्‌देव ह्यांनी तुला अत्यंत सुंदर असे हवि अर्पण केले. ॥ ४ ॥


व॒यं ते॑ अ॒द्य र॑रि॒मा हि काम॑मुत्ता॒नह॑स्ता॒ नम॑सोप॒सद्य॑ ।
यजि॑ष्ठेन॒ मन॑सा यक्षि दे॒वानस्रे॑धता॒ मन्म॑ना॒ विप्रो॑ अग्ने ॥ ५ ॥

वयं ते अद्य ररिमा हि काममुत्तानहस्ता नमसोपसद्य ।
यजिष्ठेन मनसा यक्षि देवानस्रेधता मन्मना विप्रः अग्ने ॥ ५ ॥

तुझ्याकडे हात पसरून व तुला वंदन करीत करीत तुझ्याकडे येऊन आम्ही आज खरोखर तुला जें हवें ते अर्पण केले आहे. तर हे अग्ने अत्यंत भक्तिशील अंतःकरणानें व सर्व अपायांचे निराकरण करणार्‍या स्तुतीनें तूं आमचे यज्ञ देवांकडे पोहोंचव. तूं प्रज्ञाशीलच आहेस. ॥ ५ ॥


त्वद्धि पु॑त्र सहसो॒ वि पू॒र्वीर्दे॒वस्य॒ यन्त्यू॒तयो॒ वि वाजाः॑ ।
त्वं दे॑हि सह॒स्रिणं॑ र॒यिं नो॑ऽद्रो॒घेण॒ वच॑सा स॒त्यम॑ग्ने ॥ ६ ॥

त्वद्धि पुत्र सहसः वि पूर्वीर्देवस्य यंत्यूतयः वि वाजाः ।
त्वं देहि सहस्रिणं रयिं नोऽद्रोघेण वचसा सत्यमग्ने ॥ ६ ॥

हे सामर्थ्याच्या पुत्रा, कोणत्याही देवाची विपुल कृपा अथवा सामर्थ्य तुझ्यामुळेंच प्राप्त होतें. अग्निदेवा, ज्यांत द्रोहाचा लवलेश नाहीं असे शब्द उच्चारून आम्हांस तूं सहस्रपटीनें वाढणारी अशी खरी संपत्ती दे. ॥ ६ ॥


तुभ्यं॑ दक्ष कविक्रतो॒ यानी॒मा देव॒ मर्ता॑सो अध्व॒रे अक॑र्म ।
त्वं विश्व॑स्य सु॒रथ॑स्य बोधि॒ सर्वं॒ तद॑ग्ने अमृत स्वदे॒ह ॥ ७ ॥

तुभ्यं दक्ष कविक्रतः यानीमा देव मर्तासः अध्वरे अकर्म ।
त्वं विश्वस्य सुरथस्य बोधि सर्वं तदग्ने अमृत स्वदेह ॥ ७ ॥

ज्याच्यापासून बुद्धिशाली पंडितांस ज्ञानसंपन्नता प्राप्त होते अशा हे सामर्थ्यवान अग्निदेवा, आम्ही मर्त्यलोकांनी ह्या यज्ञामध्ये तुझ्याप्रित्यर्थ जे कांही केले असेल तें तूं सुंदर रथांमध्यें आरूढ होणार्‍या देववृंदांस विदित कर आणि हे अमर अग्ने येथें त्याचा आस्वाद घे. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १५ (अग्नि सूक्त)

ऋषी - उत्लोलः कात्यः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


वि पाज॑सा पृ॒थुना॒ शोशु॑चानो॒ बाध॑स्व द्वि॒षो र॒क्षसो॒ अमी॑वाः ।
सु॒शर्म॑णो बृह॒तः शर्म॑णि स्याम॒ग्नेर॒हं सु॒हव॑स्य॒ प्रणी॑तौ ॥ १ ॥

वि पाजसा पृथुना शोशुचानः बाधस्व द्विषः रक्षसः अमीवाः ।
सुशर्मणः बृहतः शर्मणि स्यामग्नेरहं सुहवस्य प्रणीतौ ॥ १ ॥

आपल्या विपुल सामर्थ्यानें प्रदीप्त होऊन द्वेष्ट्यांचा, राक्षसांचा आणि रोगांचा परिहार कर. ज्याची कृपा सहज प्राप्त होण्याजोगी आहे, आणि ज्यास सहज रीतीनें हाक मारतां येते अशा त्या श्रेष्ठ अग्निदेवाच्या कृपा छत्राखालीं व नेतृत्वाखालीं माझीं राहण्याची इच्छा आहे. ॥ १ ॥


त्वं नो॑ अ॒स्या उ॒षसो॒ व्युष्टौ॒ त्वं सूर॒ उदि॑ते बोधि गो॒पाः ।
जन्मे॑व॒ नित्यं॒ तन॑यं जुषस्व॒ स्तोमं॑ मे अग्ने त॒न्वा सुजात ॥ २ ॥

त्वं नः अस्या उषसः व्युष्टौ त्वं सूर उदिते बोधि गोपाः ।
जन्मेव नित्यं तनयं जुषस्व स्तोमं मे अग्ने तन्वा सुजात ॥ २ ॥

ह्या उषेनें आपले तेज प्रकट केल्यानंतर आणि सूर्य उदय पावल्यानंतर तूं जागृत हो; कारण तूं आमचा संरक्षणकर्ता आहेस. हे जन्मश्रेष्ठ अग्निदेवा, ज्या प्रमाणे मातापितर आपल्या पोटच्या मुलास जवळ घेतात त्याप्रमाणें माझ्या स्तोत्राचा विचार कर. ॥ २ ॥


त्वं नृ॒चक्षा॑ वृष॒भानु॑ पू॒र्वीः कृ॒ष्णास्व॑ग्ने अरु॒षो वि भा॑हि ।
वसो॒ नेषि॑ च॒ पर्षि॒ चात्यंहः॑ कृ॒धी नो॑ रा॒य उ॒शिजो॑ यविष्ठ ॥ ३ ॥

त्वं नृचक्षा वृषभानु पूर्वीः कृष्णास्वग्ने अरुषः वि भाहि ।
वसः नेषि च पर्षि चात्यंहः कृधी नः राय उशिजः यविष्ठ ॥ ३ ॥

हे सामर्थ्यवान अग्निदेवा, सर्व मानवांचे अवलोकन करणारा असा जो तूं तो ह्या अंधकारमय रात्रींत आपल्या पूर्वींच्या तेजस्वीपणास अनुसरून प्रकाश पाड. हे वैभवस्वरूप देवा, तूं आमचा मार्गदर्शक होतोस व आम्हांस अडचणींतून बाहेर नेतोस. हे अत्यंत तरुण अग्ने तुझ्या दर्शनाची वांछा धरणार्‍या आम्हांस संपत्ति प्राप्त होईल असें कर. ॥ ३ ॥


अषा॑ळ्हो अग्ने वृष॒भो दि॑दीहि॒ पुरो॒ विश्वाः॒ सौभ॑गा संजिगी॒वान् ।
य॒ज्ञस्य॑ ने॒ता प्र॑थ॒मस्य॑ पा॒योर्जात॑वेदो बृह॒तः सु॑प्रणीते ॥ ४ ॥

अषाळ्हः अग्ने वृषभः दिदीहि पुरः विश्वाः सौभगा संजिगीवान् ।
यज्ञस्य नेता प्रथमस्य पायोर्जातऽवेदः बृहतः सुप्रणीते ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, शत्रूंची सर्व नगरें आणि उत्कृष्ट वैभवें जिंकीत तूं आपलें तेज प्रकट कर; कारण तूं अजिंक्य व सामर्थ्यवान आहेस. सर्वभूतमात्राचें ज्ञान असणार्‍या हे सन्मार्गदर्शक अग्निदेवा, तुझ्या सहाय्याची इच्छा करणार्‍या त्या पहिल्या महायज्ञांचे नेतृत्व तूंच केलेंस. ॥ ४ ॥


अच्छि॑द्रा॒ शर्म॑ जरितः पु॒रूणि॑ दे॒वाँ अच्छा॒ दीद्या॑नः सुमे॒धाः ।
रथो॒ न सस्नि॑र॒भि व॑क्षि॒ वाज॒मग्ने॒ त्वं रोद॑सी नः सु॒मेके॑ ॥ ५ ॥

अच्छिद्रा शर्म जरितः पुरूणि देवान् अच्छा दीद्यानः सुमेधाः ।
रथः न सस्निरभि वक्षि वाजमग्ने त्वं रोदसी नः सुमेके ॥ ५ ॥

हे देवांना स्तुति पोंचविणार्‍या अग्निदेवा, देवांस उद्देशून आपली उज्वल प्रभा प्रकट करणारा व अत्यंत बुद्धिमान असा जो तूं तो आमची सौख्यें विपुल राहून त्यांत कोणतेंही न्यून उत्पन्न होणार नाहीं असें कर. हे अग्ने, ज्याप्रमाणे एखादा रथ भरपूर संपत्ति घेऊन येतो, त्याप्रमाणें आम्हांस समर्थ्य घेऊन ये, व भूलोक आणि द्युलोक हे आम्हांस सुखावह होतील असे कर. ॥ ५ ॥


प्र पी॑पय वृषभ॒ जिन्व॒ वाजा॒नग्ने॒ त्वं रोद॑सी नः सु॒दोघे॑ ।
दे॒वेभि॑र्देव सु॒रुचा॑ रुचा॒नो मा नो॒ मर्त॑स्य दुर्म॒तिः परि॑ ष्ठात् ॥ ६ ॥

प्र पीपय वृषभ जिन्व वाजानग्ने त्वं रोदसी नः सुदोघे ।
देवेभिर्देव सुरुचा रुचानः मा नः मर्तस्य दुर्मतिः परि ष्ठात् ॥ ६ ॥

हे प्रतापी अग्निदेवा, आमच्याकरितां सत्ता-सामर्थ्य जिंकून आण, आणि त्याची वृद्धि कर. आमच्याकरितां द्युलोक आणि भूलोक फलप्रद होऊं दे. देवांसहवर्तमान सुंदर कांतीनें प्रकाशणारा जो तूं तो हे देवा, कोणाही मानवाची दुष्ट हिकमत आम्हांस बाधक होणार नाहीं असें कर. ॥ ६ ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ७ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ७ ॥

हे अग्निदेवा, तुझा धांवा करणार्‍या ह्या भक्ताकरितां त्यानें सतत चालविलेली ही स्तुती सफल कर आणि तिच्यामुळें त्याचे हातून पराक्रमाची कृत्यें घडून त्यास गोधनादि संपत्तीचा लाभ होवो. आमच्या पुत्रपौत्रांकडून वंशविस्तार चालो, आणि हे अग्निदेवा, तुझी ती सर्व प्रसिद्ध कृपादृष्टी आमचेवर वळो. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १६ (अग्नि सूक्त)

ऋषी - उत्किलः कात्यः : देवता - अग्नि : छंद - बृहती, सतो बृहती


अ॒यम॒ग्निः सु॒वीर्य॒स्येशे॑ म॒हः सौभ॑गस्य ।
रा॒य ई॑शे स्वप॒त्यस्य॒ गोम॑त॒ ईशे॑ वृत्र॒हथा॑नाम् ॥ १ ॥

अयमग्निः सुवीर्यस्येशे महः सौभगस्य ।
राय ईशे स्वपत्यस्य गोमत ईशे वृत्रहथानाम् ॥ १ ॥

उत्तम शौर्य आणि उत्कृष्ट भाग्य ह्यांचेवर ह्या अग्निची सत्ता आहे. उत्तम संतति आणि गोधन ह्यांनी युक्त असलेल्या वैभवावरही हाच सत्ता चालवितो. ज्या युद्धांमध्ये दुष्टांचा संहार होतो त्यांचेवरही त्याची सत्ता असते. ॥ १ ॥


इ॒मं न॑रो मरुतः सश्चता॒ वृधं॒ यस्मि॒न्रायः॒ शेवृ॑धासः ।
अ॒भि ये सन्ति॒ पृत॑नासु दू॒ढ्यो वि॒श्वाहा॒ शत्रु॑माद॒भुः ॥ २ ॥

इमं नरः मरुतः सश्चता वृधं यस्मिन्रायः शेवृधासः ।
अभि ये संति पृतनासु दूढ्यः विश्वाहा शत्रुमादभुः ॥ २ ॥

जे युद्धांमध्ये अजिंक्य आहेत आणि ज्यांनी शत्रूस नेहमींच जेरीस आणले आहे अशा हे पराक्रमी मरुत् देवांनो सर्वांस अभिवृद्धिकारक असून ज्याचे ठिकाणी सौख्यदायक वैभव वास करते अशा ह्या अग्नीस भजा. ॥ २ ॥


स त्वं नो॑ रा॒यः शि॑शीहि॒ मीढ्वो॑ अग्ने सु॒वीर्य॑स्य ।
तुवि॑द्युम्न॒ वर्षि॑ष्ठस्य प्र॒जाव॑तोऽनमी॒वस्य॑ शु॒ष्मिणः॑ ॥ ३ ॥

स त्वं नः रायः शिशीहि मीढ्वः अग्ने सुवीर्यस्य ।
तुविद्युम्न वर्षिष्ठस्य प्रजावतोऽनमीवस्य शुष्मिणः ॥ ३ ॥

अतीशय कांतीमान अशा हे उदार अग्ने, आमचेवर कृपा करून ती अतीशय वृद्धिंगत व्हावी व तिच्या योगानें आम्हांस उत्तम शौर्य, संतती, निरोगीपणा व बल ह्यांचा लाभ व्हावा. ॥ ३ ॥


चक्रि॒र्यो विश्वा॒ भुव॑ना॒भि सा॑स॒हिश्चक्रि॑र्दे॒वेष्वा दुवः॑ ।
आ दे॒वेषु॒ यत॑त॒ आ सु॒वीर्य॒ आ शंस॑ उ॒त नृ॒णाम् ॥ ४ ॥

चक्रिर्यः विश्वा भुवनाभि सासहिश्चक्रिर्देवेष्वा दुवः ।
आ देवेषु यतत आ सुवीर्य आ शंस उत नृणाम् ॥ ४ ॥

ज्यानें सर्व विश्वें उत्पन्न केलीं, जो कधींही हार न जाणारा आहे, आणि जो देवांस आमचे हवि पोंचवीत असतो तो हा अग्निदेव मनुष्यांस उत्तम शौर्य प्राप्त होऊन त्यांची प्रशंसा व्हावी ह्यासाठी देवसमूहांत प्रयत्न करीत आहे. ॥ ४ ॥


मा नो॑ अ॒ग्नेऽ॑मतये॒ मावीर॑तायै रीरधः ।
मागोता॑यै सहसस्पुत्र॒ मा नि॒देऽ॑प॒ द्वेषां॒स्या कृ॑धि ॥ ५ ॥

मा नः अग्नेऽमतये मावीरतायै रीरधः ।
मागोतायै सहसस्पुत्र मा निदेऽप द्वेषांस्या कृधि ॥ ५ ॥

सामर्थ्यापासून जन्म पावणार्‍या हे अग्निदेवा, आम्हांस अविचारीपणा, भ्याडपणा, गोधनाची कमतरता व निंदा ह्यांचे स्वाधीन करूं नकोस, आमच्या द्वेष्ट्यांचा निःपात कर. ॥ ५ ॥


श॒ग्धि वाज॑स्य सुभग प्र॒जाव॒तोऽ॑ग्ने बृह॒तो अ॑ध्व॒रे ।
सं रा॒या भूय॑सा सृज मयो॒भुना॒ तुवि॑द्युम्न॒ यश॑स्वता ॥ ६ ॥

शग्धि वाजस्य सुभग प्रजावतोऽग्ने बृहतः अध्वरे ।
सं राया भूयसा सृज मयोभुना तुविद्युम्न यशस्वता ॥ ६ ॥

हे भाग्यसंपन्न अग्निदेवा, ह्या यज्ञांत आम्हांस संततीनें युक्त असें विपुल सामर्थ्य प्राप्त होईल असा प्रयत्न कर. हे अत्यंत कांतीमान अग्निदेवा, यश आणि सौख्य ह्यांनी परिपूर्ण अशा वैभवाशीं आम्हांस संलग्न कर. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १७ (अग्नि सूक्त)

ऋषी - कतः वैश्वामित्रः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


स॒मि॒ध्यमा॑नः प्रथ॒मानु॒ धर्मा॒ सम॒क्तुभि॑रज्यते वि॒श्ववा॑रः ।
शो॒चिष्के॑शो घृ॒तनि॑र्णिक्पाव॒कः सु॑य॒ज्ञो अ॒ग्निर्य॒जथा॑य दे॒वान् ॥ १ ॥

समिध्यमानः प्रथमानु धर्मा समक्तुभिरज्यते विश्ववारः ।
शोचिष्केशः घृतनिर्णिक्पावकः सुयज्ञः अग्निर्यजथाय देवान् ॥ १ ॥

जो प्रदीप्त होत चाललेला आहे, सर्वांस ज्याच्या दर्शनाची इच्छा आहे, ज्याचे केश तेजोमय आहेत, घृतरूपी वस्त्राचें ज्यास प्रावरण आहे व ज्याचें पूजन उत्तम तऱ्हेने होत आहे अशा ह्या अग्नीचें, देवांस यज्ञ प्राप्त व्हावा म्हणून प्राचीन विधीस अनुसरून अनेक प्रकारच्या स्निग्ध द्रव्यांनी सिंचन होत आहे. ॥ १ ॥


यथाय॑जो हो॒त्रम॑ग्ने पृथि॒व्या यथा॑ दि॒वो जा॑तवेदश्चिकि॒त्वान् ।
ए॒वानेन॑ ह॒विषा॑ यक्षि दे॒वान्म॑नु॒ष्वद्य॒ज्ञं प्र ति॑रे॒मम् अ॒द्य ॥ २ ॥

यथायजः होत्रमग्ने पृथिव्या यथा दिवः जातऽवेदश्चिकित्वान् ।
एवानेन हविषा यक्षि देवान्मनुष्वद्यज्ञं प्र तिरेमम् अद्य ॥ २ ॥

हे अग्निदेवा, पृथ्वीचें यजनकर्म ज्याप्रमाणें तूं सफल केलेंस, हे सर्वज्ञ देवा, तूं प्रज्ञावान असल्यामुळें ज्याप्रमाणें द्यूलोकाचेंही यजनकर्म सार्थ केलेंस त्याप्रमाणें ह्या हवींच्या योगानें देवांचे पूजन कर, व मनूच्या यज्ञाप्रमाणें हा यज्ञ आज देवांप्रत नेऊन पोंचव. ॥ २ ॥


त्रीण्यायूं॑षि॒ तव॑ जातवेदस्ति॒स्र आ॒जानी॑रु॒षस॑स्ते अग्ने ।
ताभि॑र्दे॒वाना॒मवो॑ यक्षि वि॒द्वानथा॑ भव॒ यज॑मानाय॒ शं योः ॥ ३ ॥

त्रीण्यायूंषि तव जातऽवेदस्तिस्र आजानीरुषसस्ते अग्ने ।
ताभिर्देवानामवः यक्षि विद्वानथा भव यजमानाय शं योः ॥ ३ ॥

हे सर्वज्ञ अग्निदेवा, तुझीं आयुष्यें तीन आहेत, आणि तीन उषा ह्या तुझ्या तीन माता आहेत. त्यांच्या साहाय्यानें तूं आमचा कल्याणप्रद हवि, तूं प्रजावान असल्यामुळें देवांस नेऊन पोंचव; आणि तुझा आश्रय इच्छिणार्‍या भक्तास जें सौख्य प्राप्त होतें तेंच मूर्तिमंत सौख्य तूं ह्या उपासकासाठीं प्राप्त होवो. ॥ ३ ॥


अ॒ग्निं सु॑दी॒तिं सु॒दृशं॑ गृ॒णन्तो॑ नम॒स्याम॒स्त्वेड्यं॑ जातवेदः ।
त्वां दू॒तम॑र॒तिं ह॑व्य॒वाहं॑ दे॒वा अ॑कृण्वन्न॒मृत॑स्य॒ नाभि॑म् ॥ ४ ॥

अग्निं सुदीतिं सुदृशं गृणंतः नमस्यामस्त्वेड्यं जातऽवेदः ।
त्वां दूतमरतिं हव्यवाहं देवा अकृण्वन्नमृतस्य नाभिम् ॥ ४ ॥

ज्याची प्रभा सुंदर आहे, व ज्याचें दर्शन मनोहर आहे, जो सर्वज्ञ व स्तवनार्ह आहे, असा जो तूं अग्निदेव त्या तुझें स्तवन करीत आम्हीं वंदन करतों. हवि पोंचविणारा आणि कधींही विश्रांति न घेणारा असा जो तूं देवांचा प्रतिनिधी, त्या तुला देवांनी अमर पदाचें केंद्रस्थान केलें. ॥ ४ ॥


यस्त्वद्धोता॒ पूर्वो॑ अग्ने॒ यजी॑यान्द्वि॒ता च॒ सत्ता॑ स्व॒धया॑ च श॒म्भुः ।
तस्यानु॒ धर्म॒ प्र य॑जा चिकि॒त्वोऽ॑थ नो धा अध्व॒रं दे॒ववी॑तौ ॥ ५ ॥

यस्त्वद्धोता पूर्वः अग्ने यजीयांद्विता च सत्ता स्वधया च शम्भुः ।
तस्यानु धर्म प्र यजा चिकित्वोऽथ नः धा अध्वरं देववीतौ ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, हा हविर्दाता तुझ्यापेक्षांही प्राचीन असून यजनकर्मांत फार प्रवीण होता, ज्याचा दोन्ही लोकांत निवास असे, व हवि अर्पण केले असतां जो कल्याणप्रद होत होता त्यानें दाखविलेल्या विधीस अनुसरून हे प्रजावान देवा, तूं यजन कर व आमचा यज्ञ देव अंगिकार करतील अशा ठिकाणीं नेऊन पोंचव. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १८ (अग्नि सूक्त)

ऋषी - कतः वैश्वामित्रः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


भवा॑ नो अग्ने सु॒मना॒ उपे॑तौ॒ सखे॑व॒ सख्ये॑ पि॒तरे॑व सा॒धुः ।
पु॒रु॒द्रुहो॒ हि क्षि॒तयो॒ जना॑नां॒ प्रति॑ प्रती॒चीर्द॑हता॒दरा॑तीः ॥ १ ॥

भवा नः अग्ने सुमना उपेतौ सखेव सख्ये पितरेव साधुः ।
पुरुद्रुहः हि क्षितयः जनानां प्रति प्रतीचीर्दहतादरातीः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, मातापितरांप्रमाणे तूं दयाळु असल्यामुळें आम्हीं तुझ्या सन्निध आल्यावर ज्याप्रमाणें मित्र मित्रावर संतुष्ट असतो त्याप्रमाणें तूं आम्हांवर संतुष्ट हो. खरोखर लोकांस अशीं पुष्कळ माणसें भेटतात कीं, जीं त्यांचा मनापासून द्वेष करतात, ह्याकरतां जे उलट्या काळजाचे शत्रु असतील त्यांना तूं दहन करून टांक. ॥ १ ॥


तपो॒ ष्वग्ने॒ अन्त॑राँ अ॒मित्राँ॒ तपा॒ शंस॒मर॑रुषः॒ पर॑स्य ।
तपो॑ वसो चिकिता॒नो अ॒चित्ता॒न्वि ते॑ तिष्ठन्ताम॒जरा॑ अ॒यासः॑ ॥ २ ॥

तपः ष्वग्ने अंतरान् अमित्रान् तपा शंसमररुषः परस्य ।
तपः वसः चिकितानः अचित्तान्वि ते तिष्ठंतामजरा अयासः ॥ २ ॥

हे अग्निदेवा, जे गुप्त रिपु असतील त्यांना जाळून टाक. अभक्तिमान शत्रूंच्या शिव्याशापांपासून रक्षण कर. हे वैभवस्वरूप देवा, तूं सूज्ञ असल्यामुळें ज्यांची मनें दुष्ट असतील त्यांचेंही दहन कर. सर्वसंचारक असे तुझे कधींही ऱ्हास न पावणारे रश्मि तुला सर्वत्र वेष्टून टाकोत. ॥ २ ॥


इ॒ध्मेना॑ग्न इ॒च्छमा॑नो घृ॒तेन॑ जु॒होमि॑ ह॒व्यं तर॑से॒ बला॑य ।
याव॒दीशे॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान इ॒मां धियं॑ शत॒सेया॑य दे॒वीम् ॥ ३ ॥

इध्मेनाग्न इच्छमानः घृतेन जुहोमि हव्यं तरसे बलाय ।
यावदीशे ब्रह्मणा वंदमान इमां धियं शतसेयाय देवीम् ॥ ३ ॥

हे अग्निदेवा, स्तोत्रें गाऊन तुला वंदन करीत असतां, शतगुणी लाभाच्या इच्छेनें म्हटलेल्या ह्या दिव्य स्तोत्रावर मल जितका अधिकार चालवितां येईल तितका चालवून, सामर्थ्य आणि बल प्राप्त होण्याकरितां तुझ्या दर्शनाची लालसा धरीत इंधन व घृत ह्यांसहवर्तमान हा हवि मी तुला अर्पण करणार आहे. ॥ ३ ॥


उच्छो॒चिषा॑ सहसस्पुत्र स्तु॒तो बृ॒हद्वयः॑ शशमा॒नेषु॑ धेहि ।
रे॒वद॑ग्ने वि॒श्वामि॑त्रेषु॒ शं योर्म॑र्मृ॒ज्मा ते॑ त॒न्वं१भूरि॒ कृत्वः॑ ॥ ४ ॥

उच्छोचिषा सहसस्पुत्र स्तुतः बृहद्वयः शशमानेषु धेहि ।
रेवदग्ने विश्वामित्रेषु शं योर्मर्मृज्मा ते तन्वं१भूरि कृत्वः ॥ ४ ॥

हे सामर्थ्यापासून जन्म पावणार्‍या अग्निदेवा, तुझें स्तवन केलें असतां आपल्या दीप्तीच्या योगानें आपल्या स्तवनकर्त्यास तूं दीर्घ आयुष्य अर्पण कर. हे अग्निदेवा, जे तुझे शरीर तुझ्या भक्तास स्वतःचें मूर्तीमंत कल्याणच असे वाटतें त्यांस, विश्वामित्रांना संपत्ती प्राप्त व्हावी ह्या इच्छेनें आम्हीं पुनः पुनः सिंचन करीत आहोंत. ॥ ४ ॥


कृ॒धि रत्नं॑े सुसनित॒र्धना॑नां॒ स घेद॑ग्ने भवसि॒ यत्समि॑द्धः ।
स्तो॒तुर्दु॑रो॒णे सु॒भग॑स्य रे॒वत्सृ॒प्रा क॒रस्ना॑ दधिषे॒ वपूं॑षि ॥ ५ ॥

कृधि रत्नंह सुसनितर्धनानां स घेदग्ने भवसि यत्समिद्धः ।
स्तोतुर्दुरोणे सुभगस्य रेवत्सृप्रा करस्ना दधिषे वपूंषि ॥ ५ ॥

धनाचें उदारपणानें दान करणार्‍या हे अग्निदेवा, ज्या अर्थीं सर्वप्रसिद्ध असा जो तूं तो खरोखर प्रदीप्त होत आहेस, त्या अर्थीं उत्कृष्टांतील उत्कृष्ट असे लाभ घेऊन ये. तुझ्या भाग्यवान स्तोतृकर्त्यांच्या घरीं वैभव अर्पण करण्याकरितां बाहू उभारलेले आहेत असें रूप तूं धारण करीत असतोस. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १९ (अग्नि सूक्त)

ऋषी - गाथी कौशिकः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


अ॒ग्निं होता॑रं॒ प्र वृ॑णे मि॒येधे॒ गृत्सं॑ क॒विं वि॑श्व॒विद॒ममू॑रम् ।
स नो॑ यक्षद्दे॒वता॑ता॒ यजी॑यान्‌रा॒ये वाजा॑य वनते म॒घानि॑ ॥ १ ॥

अग्निं होतारं प्र वृणे मियेधे गृत्सं कविं विश्वविदममूरम् ।
स नः यक्षद्देवताता यजीयान्‌राये वाजाय वनते मघानि ॥ १ ॥

ह्या पवित्र यज्ञांत मी अग्नीची येण्याच्या इच्छा करीत आहें कारण तो आमचा हवि पोंचविणारा आहे. त्याची गति तीव्र आहे, तो प्रज्ञाशाली आहे, त्यास सर्व विधींचे ज्ञान आहे व तो प्रमादांपासून अलिप्त आहे. ह्या यज्ञांत तो यजनीय देव आमची सेवा देवांस पोहोंचवो. आम्हांस मिळून आम्ही सामर्थ्यवान व्हावें म्हणून तो विपुल संपत्ति घेऊन येत असतो. ॥ १ ॥


प्र ते॑ अग्ने ह॒विष्म॑तीमिय॒र्म्यच्छा॑ सुद्यु॒म्नां रा॒तिनीं॑ घृ॒ताची॑म् ।
प्र॒द॒क्षि॒णिद्दे॒वता॑तिमुरा॒णः सं रा॒तिभि॒र्वसु॑भिर्य॒ज्ञम॑श्रेत् ॥ २ ॥

प्र ते अग्ने हविष्मतीमियर्म्यच्छा सुद्युम्नां रातिनीं घृताचीम् ।
प्रदक्षिणिद्देवतातिमुराणः सं रातिभिर्वसुभिर्यज्ञमश्रेत् ॥ २ ॥

हे अग्निदेवा, ज्याच्यामध्यें हवि ठेवलेला आहे असा घृत परिपूर्ण, कांतिमान व हविर्दायक यज्ञचमस मी तुझ्यापुढें करीत आहे. यज्ञास प्रदक्षिणा घालून त्यास सन्मान देणारा अग्निदेव संपत्ति व श्रेष्ठ लाभ ह्यांचेसह ह्या यागाचा आश्रय करो. ॥ २ ॥


स तेजी॑यसा॒ मन॑सा॒ त्वोत॑ उ॒त शि॑क्ष स्वप॒त्यस्य॑ शि॒क्षोः ।
अग्ने॑ रा॒यो नृत॑मस्य॒ प्रभू॑तौ भू॒याम॑ ते सुष्टु॒तय॑श्च॒ वस्वः॑ ॥ ३ ॥

स तेजीयसा मनसा त्वोत उत शिक्ष स्वपत्यस्य शिक्षोः ।
अग्ने रायः नृतमस्य प्रभूतौ भूयाम ते सुष्टुतयश्च वस्वः ॥ ३ ॥

तूं ज्यांचे संरक्षण करतोस त्यांची मति अत्यंत तीव्र होते. ह्याकरितां तुझ्या बोधामृताची इच्छा करणार्‍या ह्या तुझ्या गरीब बालकास शिक्षण दे. हे अग्निदेवा, उत्तम उत्तम स्तुति गात असतां, अत्यंत शूर असा जो तूं त्या तुझ्यासासून प्राप्त झालेल्या वैभवाच्या व संपत्तीच्या विपुल भांडारांत आम्हीं वास करूं . ॥ ३ ॥


भूरी॑णि॒ हि त्वे द॑धि॒रे अनी॒काग्ने॑ दे॒वस्य॒ यज्य॑वो॒ जना॑सः ।
स आ व॑ह दे॒वता॑तिं यविष्ठ॒ शर्धो॒ यद॒द्य दि॒व्यं यजा॑सि ॥ ४ ॥

भूरीणि हि त्वे दधिरे अनीकाग्ने देवस्य यज्यवः जनासः ।
स आ वह देवतातिं यविष्ठ शर्धः यदद्य दिव्यं यजासि ॥ ४ ॥

हे अग्ने, तूं जो श्रेष्ठ देव, त्याचे यजन करणार्‍या मानवांनी तुझ्या ठिकाणी अनेक देवतांचा वास आहे असें कल्पिले आहे. त्या अर्थीं आज तुला सर्व देवसमुदायाचें यजन करतां येईल अशा रीतीनें, हे अत्यंत तरुण अग्निदेवा, तूं आमचा यज्ञ देवांकडे घेऊन जा. ॥ ४ ॥


यत्त्वा॒ होता॑रम॒नज॑न्मि॒येधे॑ निषा॒दय॑न्तो य॒जथा॑य दे॒वाः ।
स त्वं नो॑ अग्नेऽवि॒तेह बो॒ध्यधि॒ श्रवां॑सि धेहि नस्त॒नूषु॑ ॥ ५ ॥

यत्त्वा होतारमनजन्मियेधे निषादयंतः यजथाय देवाः ।
स त्वं नः अग्नेऽवितेह बोध्यधि श्रवांसि धेहि नस्तनूषु ॥ ५ ॥

ज्याअर्थीं तुझें यजन करण्याकरितां, आमचा हविर्दाता जो तूं त्या त्याला येथें बसवून देवांनी अभिषिक्त केलें आहे, त्या अर्थी हे अग्निदेवा, आमचें संरक्षण करण्याकरितां तूं जागृत हो आणि खुद्द आम्हांस उत्तम कीर्ति अर्पण कर. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २० (अग्नि विश्वेदेवसूक्त)

ऋषी - गाथी कौशिकः : देवता - विश्वेदेवाः, अग्नि : छंद - त्रिष्टुप्


अ॒ग्निमु॒षस॑म॒श्विना॑ दधि॒क्रां व्युष्टिषु हवते॒ वह्नि॑रु॒क्थैः ।
सु॒ज्योति॑षो नः शृण्वन्तु दे॒वाः स॒जोष॑सो अध्व॒रं वा॑वशा॒नाः ॥ १ ॥

अग्निमुषसमश्विना दधिक्रां व्युष्टिषु हवते वह्निरुक्थैः ।
सुज्योतिषः नः शृण्वंतु देवाः सजोषसः अध्वरं वावशानाः ॥ १ ॥

अग्नि, उषा, अश्विनद्वय आणि दधिका ह्यांना हा उपासक प्रभातकाळीं अनेक स्तोत्रें गात हवि अर्पण करीत आहे. ज्याचे तेज सुंदर आहे व ज्याचा निवास एकत्र आहे, असे देव त्या यज्ञाची आवड धरून आमची प्रार्थना श्रवण करोत. ॥ १ ॥


अग्ने॒ त्री ते॒ वाजि॑ना॒ त्री ष॒धस्था॑ ति॒स्रस्ते॑ जि॒ह्वा ऋ॑तजात पू॒र्वीः ।
ति॒स्र उ॑ ते त॒न्वो दे॒ववा॑ता॒स्ताभि॑र्नः पाहि॒ गिरो॒ अप्र॑युच्छन् ॥ २ ॥

अग्ने त्री ते वाजिना त्री षधस्था तिस्रस्ते जिह्वा ऋतजात पूर्वीः ।
तिस्र ऊं इति ते तन्वः देववातास्ताभिर्नः पाहि गिरः अप्रयुच्छन् ॥ २ ॥

हे अग्ने ! तुझ्यांत सामर्थ्य उत्पन्न करणार्‍या तीन वस्तू आहेत, तुझी इतर देवांसह निवास करण्याची स्थानेंही तीन आहेत. सत्यापासून जन्म पावणार्‍या हे देवा, तुला तीन दीर्घ जिव्हा आहेत. देवांस प्रियकर अशी तुझी खरोखर तीं शरीरेंही आहेत. त्यांच्यायोगानें आमच्या स्तुतीचा अनादर न करतां आमचें संरक्षण कर. ॥ २ ॥


अग्ने॒ भूरी॑णि॒ तव॑ जातवेदो॒ देव॑ स्वधावोऽ॒मृत॑स्य॒ नाम॑ ।
याश्च॑ मा॒या मा॒यिनां॑ विश्वमिन्व॒ त्वे पू॒र्वीः सं॑द॒धुः पृ॑ष्टबन्धो ॥ ३ ॥

अग्ने भूरीणि तव जातऽवेदः देव स्वधावोऽमृतस्य नाम ।
याश्च माया मायिनां विश्वमिन्व त्वे पूर्वीः संदधुः पृष्टबंधः ॥ ३ ॥

हे अग्ने, हे बलवान व सर्वज्ञ देवा, तूं अमर असून तुझीं नामें अनेक आहेत. हे विश्वप्रेरका, सकल याचना पुरविणार्‍या हे देवा, कपटी लोकांना ज्या कांही युक्त्या माहीत असतील त्या सर्वांचा तुझें ठायीं शेवट झालेला आहे. ॥ ३ ॥


अ॒ग्निर्ने॒ता भग॑ इव क्षिती॒नां दैवी॑नां दे॒व ऋ॑तु॒पा ऋ॒तावा॑ ।
स वृ॑त्र॒हा स॒नयो॑ वि॒श्ववे॑दाः॒ पर्ष॒द्विश्वाति॑ दुरि॒ता गृ॒णन्त॑म् ॥ ४ ॥

अग्निर्नेता भग इव क्षितीनां दैवीनां देव ऋतुपा ऋतावा ।
स वृत्रहा सनयः विश्ववेदाः पर्षद्विश्वाति दुरिता गृणंतम् ॥ ४ ॥

सत्याचा संरक्षण कर्ता व सत्य स्वभावशाली असा हा अग्निदेव, भगाप्रमाणे सर्व मानवी सृष्टीचा व देवसमुदायांचा नायक आहे. सर्वज्ञ सनातन व दुष्टांचे हनन करणारा हा अग्निदेव आपल्या स्तुतिकर्त्यास सर्व संकटांतून पलीकडे नेतो. ॥ ४ ॥


द॒धि॒क्राम॒ग्निमु॒षसं॑ च दे॒वीं बृह॒स्पतिं॑ सवि॒तारं॑ च दे॒वम् ।
अ॒श्विना॑ मि॒त्रावरु॑णा॒ भगं॑ च॒ वसू॑न् रु॒द्राँ आ॑दि॒त्याँ इ॒ह हु॑वे ॥ ५ ॥

दधिक्रामग्निमुषसं च देवीं बृहस्पतिं सवितारं च देवम् ।
अश्विना मित्रावरुणा भगं च वसून् रुद्रान् आदित्यान् इह हुवे ॥ ५ ॥

दधिका, अग्नि, उषादेवी, बृहस्पति, सविता देव व अश्विन, मित्रावरूण, भग, वसु, रुद्र व आदित्य ह्यांनाही मी पाचारण करतो. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP