|
ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ३१ ते ४३ ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३१ (विश्वेदेवसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-विश्वेदेवा छन्दः-जगती
अ॒स्माकं॑ मित्रावरुणावतं॒ रथं॑ आदि॒त्यै रु॒द्रैर्वसु॑भिः सचा॒भुवा॑ ॥
अस्माकं मित्रावरुणा अवतं रथं आदित्यैः रुद्रैः वसुऽभिः सचाऽभुवा ॥
मित्रावरुणांनो, आदित्य, रुद्र, आणि वसु हे सदैव तुमच्या बरोबर असतात. इकडे क्षुधित परंतु मोठ्या मजेनें अरण्यांत राहणारे पक्षी जसे आपल्या घरट्यांतून बाहेर पडून जोरानें उडत जातात त्याप्रमाणे आमच्या रथाचे घोडे विजयकीर्ति मिळविण्यांकरितां आनंदाने फुरफुरत उडत जात आहेत. आणि तुम्हीही सद्यशाचे भुकेले, आनंदभरित आणि तेजो लोकनिवासी आहांत, तर तुम्ही आमच्या रथाचें संरक्षण करा. ॥ १ ॥
अध॑ स्मा न॒ उद॑वता सजोषसो॒ रथं॑ देवासो अ॒भि वि॒क्षु वा॑ज॒युम् ॥
अध स्म नः उत् अवत सऽजोषसः रथं देवासः अभि विक्षु वाजऽयुं ॥
प्रेमामुळें एकरूप झालेल्या देवांनो, जेव्हां आमचे चलाख घोडे आपल्या जोरदार चालीने धूलिमय प्रदेशांतून दौडत जात असतां, पृथ्वीवरील उंच खडकांवर आपल्या टापांचा दणदणाट करून सोडतात - अशावेळी वीरश्रीचा आवेश आणणार्या आमच्या रथाला लोकांच्या समोर संभाळून घेऊन चला. ॥ २ ॥
उ॒त स्य न॒ इन्द्रो॑ वि॒श्वच॑र्षणिर्दि॒वः शर्धे॑न॒ मारु॑तेन सु॒क्रतुः॑ ॥
उत स्यः नः इन्द्रः विश्वऽचर्षणिः दिवः शर्धेन मारुतेन सुऽक्रतुः ॥
तो सर्वसाक्षी महाप्रज्ञावान् इंद्र, मरुतांच्या सेनेसह स्वर्गांतून येऊन आम्हांला श्रेष्ठ संपत्तीच्या आणि सत्वसामर्थ्याचा लाभ करून देण्याकरितां, शत्रूंना अजिंक्य अशा आपल्या सहाय्यांनी आमच्या रथाच्या पाठिमागें उभा आहेच. ॥ ३ ॥
उ॒त स्य दे॒वो भुव॑नस्य स॒क्षणि॒स्त्वष्टा॒ ग्नाभिः॑ स॒जोषा॑ जूजुव॒द्रथ॑म् ॥
उत स्यः देवः भुवनस्य सक्षणिः त्वष्टा ग्नाभिः सःजोषा जूजुवत् रथं ॥
परंतु सर्व लोकांना वंद्य असा तो त्वष्टा देवसुद्धां आपल्या दिव्य स्त्रियांसहित आमच्या रथांत बसून त्या रथाला प्रेरणा करो. आणि तसेच इळा, भग, महदाकाश, अंतराल, पूषा, पुरंधि आणि प्रभु अश्वीदेव हेही ह्या रथाला प्रेरणा करोत. ॥ ४ ॥
उ॒त त्ये दे॒वी सु॒भगे॑ मिथू॒दृशो॒षासा॒नक्ता॒ जग॑तामपी॒जुवा॑ ॥
उत त्ये इति देवी इति सुभगे इति सुऽभगे मिथुऽदृश् उषसानक्ता जगतां अपिऽजुवा ॥
ज्या दिव्य आणि महद्भाग्यशाली आहेत, ज्या एकीमागून दुसरी ह्याप्रमाणे जगाच्या नजरेस पडतात व प्राणिमात्रांना हुषारी आणतात, त्या उषा आणि रात्र ह्या दोघीही रथाला अशीच प्रेरणा करोत. तुम्हां दोघींचे, आणि हे पृथ्वी तुझेंही, मी उत्कृष्ट स्तोत्रानें स्तवन करूं लागलो म्हणजे तुमचे तीन प्रकारचें सत्वतेज - आणि सनातन अशा ईश्वराचे सामर्थ्यही - दृष्टोत्पत्तिस येते. ॥ ५ ॥
उ॒त वः॒ शंस॑मु॒शिजा॑मिव श्म॒स्यहि॑र्बु॒ध्न्योऽ॒ज एक॑पादु॒त ॥
उत वः शंसं उशिजांऽइव श्मसि अहिः बुध्न्यः अजः एकऽपात् उत ॥
इतर स्तवनरत भक्तांच्या प्रमाणे आम्हीहीं तुमचे स्तवन करण्यास उत्सुकच आहोंत. अशी प्रार्थना ऐकून अहि, बुध्न्य, अज-एकपाद, त्रित, ऋभुक्षाः, सविता, आणि भक्तांसाठी अत्यंत त्वरेनें धावून येणारा आपानपात् ह्या सर्वांनी आमच्या मननीय स्तोत्रानें प्रसन्न होऊन आमच्या यज्ञकर्माच्या ठिकाणी आवड ठेवली. ॥ ६ ॥
ए॒ता वो॑ व॒श्म्युद्य॑ता यजत्रा॒ अत॑क्षन्ना॒यवो॒ नव्य॑से॒ सम् ॥
एता वः वश्मि उत्ऽयता यजत्राः अतक्षन् आयवः नव्यसे सं ॥
हे परमपूज्य देवांनो, ही तुमची स्तवने औत्सुक्यानें म्हणण्यांत मला प्रेम वाटतें, आणि भक्तजनही तुमचे गुणानुवाद गातेवेळेस ती ठाकठिकीनें म्हणत असतात. आम्हां सर्वांनाच सत्कीर्तीची व सत्व समर्थ्याची आवड आहे, तेव्हां रथास जोडलेला अश्व जसा आपल्या इष्ट स्थळी सत्वर पोहोंचतो, त्याप्रमाणे आमच्यासह सर्वांनाच तुमच्या ध्यानसुखाचा लाभ घडेल असें होवो. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३२ (अनेक देवतासूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-द्यावापृथिव्यौ छन्दः-जगती
अ॒स्य मे॑ द्यावापृथिवी ऋताय॒तो भू॒तम॑वि॒त्री वच॑सः॒ सिषा॑सतः ॥
अस्य मे द्यावापृथिवी ऋतऽयतः भूतं अवित्री इति वचसः सिसासतः ॥
खर्या धर्माप्रमाणे मी उपासना करून अभीष्ट प्राप्तीच्या प्रयत्नांत आहें तर हे द्यावापृथिवीहो, ह्या माझ्या स्तवनांत तुम्ही प्रसन्न व्हा. तुमचे आयुष्य अमर्याद आहे, तेव्हां दिव्यधनाच्या इच्छेने तुमचें स्तवन करून तुमचीही थोरवी येथें सर्वांपुढे मी वर्णन करतो. ॥ १ ॥
मा नो॒ गुह्या॒ रिप॑ आ॒योरह॑न्दभ॒न्मा न॑ आ॒भ्यो री॑रधो दु॒च्छुना॑भ्यः ॥
मा नः गुह्या रिपः आयोः अहन् दभन् मा नः आभ्यः रीरधः दुच्छुनाभ्यः ॥
कोणाही मनुष्याच्या गुप्त कपटजालापासून आम्हांस केव्हांही उपद्रव होऊं देऊं नको. किंवा दुसर्या असल्याच संकटांच्या तडाख्यांत आम्हांस सापडूं देऊं नको. आमच्या मित्राशी असलेल्या आमच्या स्नेहभावांत व्यत्यय येऊं देऊं नको श्रेष्ठ सुखाच्या प्राप्तीची इच्छा धरून अंतकरणपूर्वक ही विनवणी आम्ही करीत आहों, तर ती मनास आण. ॥ २ ॥
अहे॑ळता॒ मन॑सा श्रु॒ष्टिमा व॑ह॒ दुहा॑नां धे॒नुं पि॒प्युषी॑मस॒श्चत॑म् ॥
अहेळता मनसा श्रुष्टिं आ वह दुहानां धेनुं पिप्युषीं असश्चतं ॥
आमच्याविषयीं मनांत राग न धरतां असे कर कीं, आमच्या इच्छेप्रमाणे ऐकणारी, व मनोरथरूप दुग्ध देऊन समृद्ध करणारी अशी धेनू, तूं आम्हांस दे. हे सर्वजनस्तुत इंद्रा, सर्व ठिकाणी तात्काळ जाणारा, सत्वधीर आणि शूर अशा, तुझी विनवणी स्तवनानें आणि पद्यांनी आम्ही करीतच आहों. ॥ ३ ॥
रा॒काम॒हं सु॒हवां॑ सुष्टु॒ती हु॑वे शृ॒णोतु॑ नः सु॒भगा॒ बोध॑तु॒ त्मना॑ ॥
राकां अहं सुऽहवां सुऽस्तुती हुवे शृणोतु नः सुऽभगा बोधतु त्मना ॥
जिला बोलविण्यास आयास पडत नाहीत, अशी जी राकादेवी तिचें यथायोग्य स्तवन करून तिला आम्ही बोलावित आहों तर ती सौभाग्यशालीनी आमची स्तुति ऐकून घेऊन ती मनास आणो. न मोडणार्या सुईनें ती आमचें यज्ञकर्म पक्कें शिवून टाकून एकत्र करो. आणि शेंकडो प्रकारें दानधर्म करणारा आणि सर्वांनी वाहवा करावी असा वीरपुत्र आम्हांस देवो. ॥ ४ ॥
यास्ते॑ राके सुम॒तयः॑ सु॒पेश॑सो॒ याभि॒र्ददा॑सि दा॒शुषे॒ वसू॑नि ॥
याः ते राके सुऽमतयः सुऽपेशसः याभिः ददासि दाशुषे वसूनि ॥
हे राकादेवी, ज्याच्या योगाने तूं भक्तांस नानाप्रकारची धनें देत असतेस, तशाच प्रकारची प्रेमळ बुद्धि आमच्याविषयींही धरून प्रसन्न अंतःकरणानें आमच्याकडे ये. हे सौभाग्यशालिनी देवभक्तांस हजारों प्रकारची समृद्धि तूं देतच असतेस. ॥ ५ ॥
सिनी॑वालि॒ पृथु॑ष्टुके॒ या दे॒वाना॒मसि॒ स्वसा॑ ॥
सिनीवालि पृथुऽष्टुके या देवानां असि स्वसा ॥
हे विपुलकुंतले, सिनीवाली, तूं देवांची बहिणच आहेस, तर हे देवी, तुला अर्पण केलेला हविर्भाग तूं ग्रहण करून आम्हांस संततीचा लाभ दे. ॥ ६ ॥
या सु॑बा॒हुः स्व॑ङ्गु॒ुरिः सु॒षूमा॑ बहु॒सूव॑री ॥
या सुबाहुः सुऽअङ्गुयरिः सुऽसूमा बहुऽसूवरी ॥
जिचे बाहु मनोहर आणि करांगुलीही कोमल आहेत, जिच्या कुसवा चांगल्या व जिला संतति विपुल असून जी सर्व जनांची स्वामिनीच होय त्या सिनीवालीला हवि अर्पण करा. ॥ ७ ॥
या गु॒ङ्गूर्या सि॑नीवा॒ली या रा॒का या सर॑स्वती ॥
या गुङ्गूः या सिनीवाली या राका या सरस्वती ॥
गुंगू, सिनीवाली, राका, सरस्वती ह्या सर्व देवता, ज्या इंद्राणीच होत, त्या इंद्रपत्नीला आणि वरुणपत्नीला मी संरक्षण व्हावें म्हणून बोलावित आहे. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३३ (रुद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-रुद्रः छन्दः-त्रिष्टुप्
आ ते॑ पितर्मरुतां सु॒म्नमे॑तु॒ मा नः॒ सूर्य॑स्य सं॒दृशो॑ युयोथाः ॥
आ ते पितः मरुतां सुम्नं एतु मा नः सूर्यस्य संऽदृशः युयोथाः ॥
हे रुद्रा, हे मरुतांच्या पित्या, तुझा आनंदमय प्रसाद आमच्याकडे येऊं दे. ज्ञान सूर्याच्या दर्शनाचा आणि आमचा वियोग तूं करूं नको. जे अत्यंत नीच आहेत त्यांच्याशी वागतांना आमचा शूर पुत्र धिमेपणानें वागो आणि हे रुद्रा, पुत्रपौत्र आणि सेवक ह्यांच्यासहवर्तमान आमची अभिवृद्धि होवो. ॥ १ ॥
त्वाद॑त्तेभी रुद्र॒ शंत॑मेभिः श॒तं हिमा॑ अशीय भेष॒जेभिः॑ ॥
त्वाऽदत्तेभिः रुद्र शंऽतमेभिः शतं हिमाः अशीय भेषजेभिः ॥
हे रुद्रा, तूं कृपाळू होऊन आम्हांस जी अत्यंत सुखकारक औषधें दिलेली आहेस त्याच्या योगाने आम्ही आयुष्याचा शंभर वर्षें उपभोग घेऊं असें कर. तूं आमच्यांतून द्वेषबुद्धि अगदी नाहींशी कर, पातकें विलयास ने आणि सर्वसंचारी रोगांचे उच्चाटन कर. ॥ २ ॥
श्रेष्ठो॑ जा॒तस्य॑ रुद्र श्रि॒यासि॑ त॒वस्त॑मस्त॒वसां॑ वज्रबाहो ॥
श्रेष्ठः जातस्य रुद्र श्रिया असि तवःऽतमः तवसां वज्रबाहो इति वज्रऽबाहो ॥
ह्या जगांत जे जे म्हणून उत्पन्न झालेले आहे त्या सर्वांमध्यें, हे रुद्रा, तूंच आपल्या अंगच्या प्रतापश्रीने अत्यंत श्रेष्ठ आहेस. तुझे भुजदंड वज्राप्रमाणें बळकट आहेत तेव्हां हे वज्रबाहू रुद्रा, बलवान पुरुषांतही तूं अत्यंत बलिष्ठच आहेस. आम्हांस सर्व संकटांतून सुखरूप पार पाड आणि पातकी दुष्टांकडून जे जे हल्ले आमच्यावर होतील त्या सर्वांशी झगडून त्यांची दाणादाण करून टाक. ॥ ३ ॥
मा त्वा॑ रुद्र चुक्रुधामा॒ नमो॑भि॒र्मा दुष्टु॑ती वृषभ॒ मा सहू॑ती ॥
मा त्वा रुद्र चुक्रुधामा नमःऽभिः मा दुःऽस्तुती वृषभ मा सऽहूती ॥
हे मनोरथपूरका वीरश्रेष्ठा, आम्ही तुला कसातरी प्रणिपात केला अशामुळें तूं क्रुद्ध होऊं नको, अथवा योग्य रीतीनें तुझें स्तवन केलें नाही, किंवा भलत्याच बरोबर तुलाही हांक मारली म्हणूनही क्रोध येऊं देऊं नको. औषधींच्या योगाने तूं आमच्या सैनिकांना खडखडीत बरें कर. वैद्यांचाही तूं अपूर्व वैद्य आहेस अशी तुझी कीर्ति मी सर्वतोमुखीं ऐकत आहे. ॥ ४ ॥
हवी॑मभि॒र्हव॑ते॒ यो ह॒विर्भि॒रव॒ स्तोमे॑भी रु॒द्रं दि॑षीय ॥
हवीमऽभिः हवते यः हविःऽभिः अव स्तोमेभिः रुद्रं दिषीय ॥
धांवा करून आणि हवि अर्पण करून भक्तजन ज्याची करुणा भाकित असतात, तो रुद्र ह्या स्तवनांनी मला प्रसन्न करून घेतां येवो. त्याचे अंतःकरण अतिशय कोमल, भक्तांच्या हाकेकडे त्याचे लक्ष त्वरित वेधतें, तर तो गौरवर्ण व प्रकाशमय किरीट धारण करणारा रुद्र मला ह्या दुर्वासनेच्या आधीन खचित होऊं देणार नाही. ॥ ५ ॥
उन्मा॑ ममन्द वृष॒भो म॒रुत्वा॒न्त्वक्षी॑यसा॒ वय॑सा॒ नाध॑मानम् ॥
उत् मा ममन्द वृषभः मरुत्वान् त्वक्षीयसा वयसा नाधमानं ॥
मी पदर पसरून त्याची प्रार्थना केली तेव्हां मनोरथपूरक आणि मरुतांचा पिता रुद्र, त्यानें ज्यामध्यें जोम भरून राहिला आहे असे ऐन उमेदीचें वय दीर्घकाल पर्यंत देऊन त्याच्या योगानें मला पराकाष्ठेचा आनंद दिलाच आहे. परंतु रखरखीत उन्ह पडले असतां त्या ठिकाणी वृक्षाच्या शीतल छायेंत सुख मिळावें त्याप्रमाणें मी पापमुक्त होऊन, हे रुद्रा, तुझें आनंदपद मिळवीन व त्याचा उपभोग घेईन असें कर. ॥ ६ ॥
क्व॑१स्य ते॑ रुद्र मृळ॒याकु॒र्हस्तो॒ यो अस्ति॑ भेष॒जो जला॑षः ॥
क्व स्यः ते रुद्र मृळयाकुः हस्तः यः अस्ति भेषजः जलाषः ॥
हे रुद्रा, तुझा तो मंगलकारक हस्त कोठें आहे ? पीडितांस व्याधिनिर्मुक्त करणारा तो तुझा औषधियुक्त हस्त कोठें आहे ? कांही अदृष्ट कारणांनी जे जे दोष आमच्या ठिकाणी जडलेले आहेत त्य दोषांचे परिमर्जन तो तुझा हातच करील. तर हे वीरश्रेष्ठा, आम्हाला क्षमा करून आमच्यावर कृपा कर. ॥ ७ ॥
प्र ब॒भ्रवे॑ वृष॒भाय॑ श्विती॒चे म॒हो म॒हीं सु॑ष्टु॒तिमी॑रयामि ॥
प्र बभ्रवे वृषभाय श्वितीचे महः महीं सुऽस्तुतिं ईरयामि ॥
वीरश्रेष्ठ आणि गौरवर्ण अशा रुद्राला उत्तमांतही उत्तम अशी गणली जाणारी सर्वोत्कृष्ट स्तुति मी अर्पण करीत आहे; उज्वल कांतिमान रुद्राचें नमस्कारपूर्वक स्तवन करून त्याच्या जाज्वल्य प्रतपाची महतीही आतां आम्ही गात आहों ॥ ८ ॥
स्थि॒रेभि॒रङ्गैः॑ पुरु॒रूप॑ उ॒ग्रो ब॒भ्रुः शु॒क्रेभिः॑ पिपिशे॒ हिर॑ण्यैः ॥
स्थिरेभिः अङ्गैःद पुरुऽरूपः उग्रः बभ्रुः शुक्रेभिः पिपिशे हिरण्यैः ॥
नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस्क व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं. ॥ ९ ॥
अर्ह॑न्बिभर्षि॒ साय॑कानि॒ धन्वार्ह॑न्नि॒ष्कं य॑ज॒तं वि॒श्वरू॑पम् ॥
अर्हन् बिभर्षि सायकानि धन्व अर्हन् निष्कं यजतं विश्वऽरूपं ॥
हे भगवंता, तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तऱ्हेतऱ्हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तूं घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे भगवंता रुद्रा, तेजस्वीपणांत तुज्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही. ॥ १० ॥
स्तु॒हि श्रु॒तं ग॑र्त॒सदं॒ युवा॑नं मृ॒गं न भी॒ममु॑पह॒त्नुमु॒ग्रम् ॥
स्तुहि श्रुतं गर्तऽसदं युवानं मृगं न भीमं उपऽहत्नुं उग्रं ॥
विख्यात, सिंहासनाधिष्ठित, अक्षय्य तारुण्ययुक्त, सिंहाप्रमाणें उग्र व भयंकर आणि दुष्टांचा निःपात करणारा रुद्र त्याचें स्तवन कर. हे रुद्रा, भक्तजन तुझी स्तुति करीत आहेत, तर त्या स्तोतृजनांवर तूं कृपा कर आणि आमच्याहून अगदीं निराळे म्हणजे अर्थात् जे दुष्ट आहेत त्यांच्यावरच तुझे बाण जाऊन त्यांचा निःपात करोत. ॥ ११ ॥
कु॒मा॒रश्चि॑त्पि॒तरं॒ वन्द॑मानं॒ प्रति॑ नानाम रुद्रोप॒यन्त॑म् ॥
कुमारः चित् पितरं वन्दमानं प्रति नानाम रुद्र उपऽयन्तं ॥
पुत्र जसा आपल्या वंद्य पित्याला प्रणाम करतो त्याप्रमाणें हे रुद्रा, तूं जवळ येत आहेस असे पाहिल्याबरोबर तुला मी प्रणिपात केला. सर्व समृद्धिचा दाता आणि सर्व सज्जनांचा प्रभु अशा ह्या रुद्राचें स्तवन करणें माझें कर्तव्य आहे तर हे देवा आमच्या स्तवनांचा स्वीकार करून आपली दिव्यौषधें आम्हांस दे. ॥ १२ ॥
या वो॑ भेष॒जा म॑रुतः॒ शुची॑नि॒ या शंत॑मा वृषणो॒ या म॑यो॒भु ॥
या वः भेषजा मरुतः शुचीनि या शंऽतमा वृषणः या मयःऽभु ॥
हे मरुतांनो, तुमचीं जीं औषधें पवित्र, जी अत्यंत मंगलकारक व अत्यंत कल्याणप्रद आहेत जी औषधें आम्हां मानवांचा पिता मनुराजा त्यानें तुम्हांपासून संपादन केली त्याच दिव्यौषधींची याचना आम्ही सर्वांच्या सुखासाठीं आणि कल्याणसाठी भगवान् रुद्रापाशी करीत आहों. ॥ १३ ॥
परि॑ णो हे॒ती रु॒द्रस्य॑ वृज्याः॒ परि॑ त्वे॒षस्य॑ दुर्म॒तिर्म॒ही गा॑त् ॥
परि नः हेतिः रुद्रस्य वृज्याः परि त्वेषस्य दुःऽमतिः मही गात् ॥
भगवान् रुद्राचीं अस्त्रें आम्हांला वगळून दुसरीकडे जावोत, त्याच्या जाज्वल्य क्रोधाचा अत्यंत भयंकर आवेश सुद्धां इतरत्र म्हणजे अर्थात् दुष्टांकडेच वळो. दानशूर यजमानांच्या हितार्थ तूं आपल्या अढळ धनुष्याची दोरी अंमळ सैल कर आणि हे भक्तांवर अभीष्ट सिद्धींचा वर्षाव करणार्या देवा, आमच्या पुत्रपौत्रांवर दया कर. ॥ १४ ॥
ए॒वा ब॑भ्रो वृषभ चेकितान॒ यथा॑ देव॒ न हृ॑णी॒षे न हंसि॑ ॥
एव बभ्रो इति वृषभ चेकितान यथा देव न हृणीषे न हंसि ॥
हे जगद्धारक, वीरश्रेष्ठ सर्वज्ञ देवा, तूं आमच्यावर रागावणर नाहींस, आम्हांस मारणार नाहींस असे आश्वासन दे. आमचा धांवा तुझ्या कानी ताबडतोब पडावा अशासाठीं हे रुद्रा, तूं आमचा हो आणि आम्हीं आमच्या वीर पुरुषांसहवर्तमान यज्ञसभेंत तुझें महद्यश वर्ण करीत राहूं असें कर. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३४ (मरुत्सूक्त) ऋषिः -गृत्समदः देवता-मरुतः छन्दः-जगती या सूक्ताचा पदच्छेद उपलब्ध नाही
धा॒रा॒व॒रा म॒रुतो॑ धृ॒ष्ण्वोजसो मृ॒गा न भी॒मास्तवि॑षीभिर॒र्चिनः॑ ॥
जलधारांनी सर्व आकाश अगदी गर्द करून सोडणारा ज्यांचा पराक्रम, शत्रूच्या अंगावर बेधडक तुटून त्यांचा फडशा उडविणारें ज्यांचे अनिवार्य तेजोबल, जे सिंहाप्रमाणे भयंकर, धैर्यभराच्या तेजानें जे उज्ज्वल, अग्नीप्रमाणे देदीप्यमान, आणि नेहमी सोमपानोत्सुक असतात अशा मरुतांनी मेघपटलाची वाताहत करून टाकून, पहा स्वर्धेनूंना बंधमुक्त केलें. ॥ १ ॥
द्यावो॒ न स्तृभि॑श्चितयन्त खा॒दिनो॒ व्य॑१भ्रिया॒ न द्यु॑तयन्त वृ॒ष्टयः॑ ॥
वक्षस्थलावर तेजःपुंज अलंकार धारण करणार्या मरुतांनो, तुमच्या रूपाने प्रत्यक्ष रुद्रच पृश्निच्या शुभ्र कांतिमान् उदरांत जेव्हां प्रकट झाला, तेव्हां नक्षत्रांच्या योगाने आकाश लकलकीत दिसते त्याप्रमाणें तुमच्या जलधारांचा झोत झगझगीत दिसला. ॥ २ ॥
उ॒क्षन्ते॒ अश्वाँ॒ अत्याँ॑ इवा॒जिषु॑ न॒दस्य॒ कर्णै॑स्तुरयन्त आ॒शुभिः॑ ॥
द्वंद्वयुद्धांत किंवा शर्यतींत चलाख वीरांना बेगुमान सोडून द्यावे त्याप्रमाणे मरुत् देव हे आपल्या अश्वांना भरधांव सोडतात आणि गर्जना करणार्या सिंहाच्या कानांप्रमाणे तीक्ष्ण अशा आपल्या कर्णांनी भक्तांची प्रार्थना ऐकून मोठ्या त्वरेनें भूलोकीं येतात. सुवर्ण मुकुट धारण करणारे आणि अगदी एक विचारानें वागणारे मरुत्हो, तुम्ही आपल्या रथास चित्रविचित्र हरिणी जोडून निघतां तेव्हां प्रत्यक्ष सामर्थ्याला सुद्धां चळचळां कांपावयास लावतां. ॥ ३ ॥
पृ॒क्षे ता विश्वा॒ भुव॑ना ववक्षिरे मि॒त्राय॑ वा॒ सद॒मा जी॒रदा॑नवः ॥
लोकांना सामर्थ्याची प्राप्ति व्हावी म्हणून म्हणा, किंवा भक्तहितार्थ म्हणा, वृष्टिरूपाने तत्काल फलद्रुप होणार्या मरुतांनी हीं यच्चावत् भुवनें जलधारांनी पहा कशी चिंब भिजवून टाकलीं. चित्रविचित्र रंगाच्या मेघरूप हरिणी हेच त्यांच्या रथाचे घोडे, पण ह्या मरुतांच्या प्रसादानें लाभलेली संपत्ति मात्र अक्षय्य राहते व एखाद्या ऋजुमार्गी शूर योद्धा रणामध्यें सर्वांच्याही पुढेंच असतो त्याप्रमाणे धर्मविषयक ज्ञानांत तुम्हीं अग्रेसरच आहां. ॥ ४ ॥
इन्ध॑न्वभिर्धे॒नुभी॑ र॒प्शदू॑धभिरध्व॒स्मभिः॑ प॒थिभि॑र्भ्राजदृष्टयः ॥
डोळे दिपवून टाकणारे विद्युल्लतारूप भाले हातांत वागविणार्या मरुतांनो, ज्या प्रदीप्त अग्नीप्रमाणे तेजःपुंज आहेत आणि ज्यांच्या कांसा दुधानें अगदीं तुडुंब भरून गेलेल्या आहेत अशा धेनू बरोबर घेऊन तुमच्या नेहमींच्याच अप्रतिहत मार्गांनी आमच्याकडे या. हंसांचा समुदाय आपल्या निवासस्थळीं जातो त्याप्रमाणे, हे एकचित्त मरुतांनो, सोमपानाने हर्षनिर्भर होण्यासाठीं ह्या आमच्या मधुर रसाकडे या. ॥ ५ ॥
आ नो॒ ब्रह्मा॑णि मरुतः समन्यवो न॒रां न शंसः॒ सव॑नानि गन्तन ॥
अगदी एकाच विचारानें चालणार्या मरुतांनो आमच्या प्रार्थनास्तोत्रांनी प्रमुदित होऊन इकडे या. शूरांमध्यें जो अत्यंत प्रशंसनीय इंद्र त्याच्याप्रमाणे तुम्हीही आमच्या सोमसेवनांकरितां या. प्रकाशाने आकाश व्यापणार्या उषेच्या पीन कुचमंडलाप्रमाणें तुम्ही आपल्या मेघ धेनूंची कांसही परिपुष्ट करा आणि स्तोतृजनांच्या ध्यानोपासनेस सत्वसामर्थ्यानें अलंकृत करा. ॥ ६ ॥
तं नो॑ दात मरुतो वा॒जिनं॒ रथ॑ आपा॒नं ब्रह्म॑ चि॒तय॑द्दि॒वेदि॑वे ॥
तर हे मरुतांनो, आघाडीच्या रथामध्यें एका वीर पुरुषाची योजना करा, आणि जे स्तोत्र थेट देवांपर्यंत जाऊन पोहोंचेल आणि प्रतिदिनीं आमचा आत्मभाव अधिकाधिक जागृत करील अशा प्रकारच्या स्तोत्राची प्रेरणा करा. स्तोतृजनांना उत्साह द्या, व आर्य भूमींतील भक्तकवींना यश, श्रेष्ठ बुद्धि आणि अनिवार्य व अजिंक्य असें सामर्थ्य द्या. ॥ ७ ॥
यद्यु॒ञ्जते॑ म॒रुतो॑ रु॒क्मव॑क्ष॒सोऽ॑श्वा॒न्रथे॑षु॒ भग॒ आ सु॒दान॑वः ॥
वक्षस्थली देदीप्यमान अलंकार धारण करणारे व अत्यंत औदार्यशाली असे मरुत् जेव्हां भक्तांचा भाग्योदय करण्याकरितां आपल्या रथांना अश्व जोडून निघतात त्या वेळेस गाय जशी आपल्या निवासस्थानी वासरा करितां प्रेमानें पान्हा सोडते त्याप्रमाणे हवि अर्पण करणार्या भक्ताकरितां ते अपूर्व सुखोत्साहाचा भरपूर पान्हा सोडतात. ॥ ८ ॥
यो नो॑ मरुतो वृ॒कता॑ति॒ मर्त्यो॑ रि॒पुर्द॒धे व॑सवो॒ रक्ष॑ता रि॒षः ॥
हे मरुतांनो, जो कोणी घातकी शत्रु लांडग्याप्रमाणें आमच्या सर्वस्वाचा अपहार करण्याची बुद्धि ठेवीत असेल त्याच्या तडाख्यांतून हे दिव्य निधींनो, आमचे संरक्षण करा. आपल्या चक्राकार हत्यारांच्या ज्वालांनी त्याला चोहोंकडून वेढून त्याचा नायनाट करा, आणि देवनिंदकांचे मारक शस्त्र खाली आपटून त्याचे तुकडे तुकडे करा. ॥ ९ ॥
चि॒त्रं तद्वो॑ मरुतो॒ याम॑ चेकिते॒ पृश्न्या॒ यदूध॒रप्य् आ॒पयो॑ दु॒हुः ॥
हे मरुतांनो, तुम्ही सर्व बंधूनी मिळून जेव्हां पृश्नीच्या कांसेचें दोहन केलेंत, आणि हे रुद्रपुत्रांनो, स्तोतृजनाच्या निंदकांस शासन करण्याकरितां, अथवा त्रित ऋषीला सतावून सोडणार्या दुष्टांची हाडें नरम करण्यांकरितां जेव्हां तुम्ही बाहेर निघाला, त्यावेळचा तुमच्या स्वारीचा देखावा खरोखरच अद्भुत दिसत होता. ॥ १० ॥
तान् वो॑ म॒हो म॒रुत॑ एव॒याव्नो॒ विष्णो॑रे॒षस्य॑ प्रभृ॒थे ह॑वामहे ॥
तुम्ही महाथोर व तात्काळ मनोरथ पुरविणारे आहांत, तेव्हां व्यापक आणि शीघ्रगामी अशा विष्णु प्रित्यर्थ केलेल्या ह्या यागांत आम्ही तुम्हाला बोलावीत आहोंत. प्रार्थना स्तोत्रांत निमग्न होऊन स्रवेनें तुम्हांला आहुति देऊन सुवर्णाप्रमाणे तेजःपुंज अंगकांतीचे, व अत्यंत श्रेष्ठ अशा तुम्हांपाशी तुमच्या अवर्णनीय कृपाधनाची याचना आम्ही करीत आहोंत. ॥ ११ ॥
ते दश॑ग्वाः प्रथ॒मा य॒ज्ञमू॑हिरे॒ ते नो॑ हिन्वन्तू॒षसो॒ व्युष्टिषु ॥
ज्या मरुतांनी पुरातन काळी होऊन गेलेल्या ’दशग्व’ ऋषींच्या रूपानें प्रथम यज्ञ केला, ते हे मरुत् उषेनें आपली प्रभा दृगोच्चर करतांच आमच्या हृदयांत स्तोत्र प्रेरणा करोत. ती उषा जशी आपल्या आरक्त किरणांनी रात्रीच्या अंधकाराचें आवरण दूर करते त्याप्रमाणे हे श्रेष्ठ मरुत् सुद्धां आपल्या शुभ्र पवित्र व दुग्ध समुद्राप्रमाणे अलोट अशा तेजानें अज्ञान अंधःकार पार नाहिंसा करून टाकतात. ॥ १२ ॥
ते क्षो॒णीभि॑ररु॒णेभि॒र्नाञ्जिभी॑ रु॒द्रा ऋ॒तस्य॒ सद॑नेषु वावृधुः ॥
आपल्या आरक्त तेजोमय अंकाराप्रमाणेंच आपल्या रोदसी प्रमुख स्त्रियांनाही बरोबर घेऊन येऊन, ह्या रुद्ररूप मरुतांनी सत्यधर्माच्या मंदिरांत म्हणजे यज्ञ मंडपांत आपला महिमा उत्कृष्ट रीतीनें वाढविला. आणि पावसाची मुसळधार त्यांनी सुरू केली त्यावेळी मोठ्या एकदम लख्ख चमकणार्या विद्युल्लतेच्या जोरावर त्यांनी अतिशय आल्हादकारक आणि नयनमनोहर अंगकांति धारण केली आहे असे दृष्टीस पडले. ॥ १३ ॥
ताँ इ॑या॒नो महि॒ वरू॑थमू॒तय॒ उप॒ घेदे॒ना नम॑सा गृणीमसि ॥
आम्हां भक्तांना स्वसंरक्षणाकरितां ह्यांचे चिलखत मिळावे म्हणून ह्या मरुतांची अत्यंत नम्रपणाने प्रार्थना करून व त्याच्या समीप जाऊन ह्या स्तोत्रानें त्यांची स्तुति आम्हीं आरंभिली आहे; कारण पांच यज्ञहोत्यांना यज्ञास आमंत्रण करावें त्याप्रमाणे, त्रित ऋषीनें आपले मनोरथ सिद्ध व्हावे व आपले रक्षण व्हावे म्हणून ह्याच मरुतांना त्यांच्या चक्राकार आयुधांसहित आपल्याकडे वळवून आणले होते. ॥ १४ ॥
यया॑ र॒ध्रं पा॒रय॒थात्यंहो॒ यया॑ नि॒दो मु॒ञ्चथ॑ वन्दि॒तार॑म् ॥
हे मरुतांनो, ज्या भक्तप्रेमामुळें तुम्ही खर्या भक्ताला संकटांतून पार पाडतां, ज्या कळवळ्यामुळें तुम्ही स्तोतृजनाला निंदकांच्या कचाटीतून सोडवितां, तीच तुमची भक्तरक्षण बुद्धि आमच्याकडे वळो; आणि गाय आपल्या वांसराकडे हंबरतच धांवून जातें त्याप्रमाणें तीच तुमची दयार्द्र बुद्धि धांवतच आमच्याकडे येवो. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३५ (अपानपात् अग्निसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-अपाम्नपात् छन्दः-त्रिष्टुप्
उपे॑मसृक्षि वाज॒युर्व॑च॒स्यां चनो॑ दधीत ना॒द्यो गिरो॑ मे ॥
उप ईं असृक्षि वाजऽयुः वचस्यां चनः दधीत नाद्यः गिरः मे ॥
सत्वशौर्याची मनीषा धरून ह्या स्तवन वाणीचा उच्चार मी देव सन्निध करीत आहे, तर हा दिव्य नद्यांचा पति माझ्या स्तुतींच्या ठिकाणी प्रेम ठेवो. हा अपानपात् भक्तसाहाय्यार्थ त्वरेनें धांवून येतो तर ह्या आमच्या वेड्या वांकड्या स्तुतीला तो श्रुतिमनोहर करील काय ? व त्याला ती अत्यंत प्रिय होईल काय ? ॥ १ ॥
इ॒मं स्वस्मै हृ॒द आ सुत॑ष्टं॒ मन्त्रं॑ वोचेम कु॒विद॑स्य॒ वेद॑त् ॥
इमं सु अस्मै हृदः आ सुऽतष्टं मन्त्रं वोचेम कुवित् अस्य वेदत् ॥
चला, ज्यामध्यें पदांची रचना सुव्यवस्थित आहे असा हा मंत्र आपण अगदी अंतःकरणापासून त्याच्या प्रित्यर्थ म्हणूं पण आपला मंत्र तो ऐकून घेईल काय ? ईश्वरी सामर्थ्याच्या बळावर पहा, ह्या अपानपात् प्रभूनें यच्चावत् भुवनें उत्पन्न केलीं. ॥ २ ॥
सम॒न्या यन्त्युप॑ यन्त्य् अ॒न्याः स॑मा॒नमू॒र्वं न॒द्यः पृणन्ति ॥
सं अन्याः यन्ति उप यन्ति अन्याः समानं ऊर्वं नद्यः पृणन्ति ॥
कांही एकत्र मिळून व कांही निरनिराळ्या परंतु सर्वच नद्या जशा एका सागरालाच जाऊन मिळतात, त्याप्रमणें आकाशांतील तेजोरूप नद्यांनी, पवित्र आणि अतिशय देदीप्यमान जो अपानपात्, त्यालाच चोहोंकडून वेढून टाकलें आहे. ॥ ३ ॥
तमस्मे॑रा युव॒तयो॒ युवा॑नम् मर्मृ॒ज्यमा॑नाः॒ परि॑ य॒न्त्यापः॑ ॥
तं अस्मेराः युवतयः युवानं मर्मृज्यमानाः परि यन्ति आपः ॥
दिव्य नद्यारूप सुंदर तरुणी अलंकारांनी नटून सजून निःशंकपणें ज्या तरुणाकडे चोहोंकडून धांवतच जातात, ज्याला प्रदीप्त होण्यास कोणत्याही दाह्य पदार्थाची आवश्यकता लागत नाही व उदकामध्यें सुद्धां जो प्रदीप्त राहतो तो हा स्निग्धकांति अपानपात्, आपल्या शुभ्रवर्ण आणि झगझगीत तेजाच्या सामर्थ्यानें, आम्हीं ऐश्वर्यसंपन्न होऊं अशा रीतीनें प्रकाशो. ॥ ४ ॥
अ॒स्मै ति॒स्रो अ॑व्य॒थ्याय॒ नारी॑र्दे॒वाय॑ दे॒वीर्दि॑धिष॒न्त्यन्न॑म् ॥
अस्मै तिस्रः अव्यथ्याय नारीः देवाय देवीः दिधिषन्ति अन्नं ॥
ज्याला दुःख किंवा क्लेश स्पर्शही करूं शकत नाहींत अशा ह्या दिव्य बालकाला स्तनपान करविण्यास तीन दिव्य स्त्रिया उत्सुक असतात. तेव्हां एखाद्या कट्यारीप्रमाणें तो आकाशोदकामध्यें एकदम पुढें घुसतो आणि सर्वांच्या आदिमाता ज्या तीन देवी त्यांचे अमृतरूप दुग्ध प्राशन करतो. ॥ ५ ॥
अश्व॒स्यात्र॒ जनि॑मा॒स्य च॒ स्वर्द्रु॒हो रि॒षः स॒म्पृचः॑ पाहि सू॒रीन् ॥
अश्वस्य अत्र जनिम अस्य च स्वः द्रुहः रिषः सम्पृचः पाहि सूरीन् ॥
आकाशांत ह्या विद्युत् अग्निरूप अश्वाचा जन्म झाला. सूर्य हा सुद्धां ह्याचेंच स्वरूप होय. तर हे अपानपात् देवा, नीच आणि घातकी ह्यांच्या संपर्कापासून आमच्या यजमानांचे रक्षण कर. मेघरूपी विशविशीत तटबंदीच्या आंत दूर जरी तो असला तरीही तो अजिंक्यच आहे. त्याच्यापुढें धर्महीन शत्रु किंवा त्यांचे कपटजाल ह्यांची बिलकूल मात्रा चालत नाही. ॥ ६ ॥
स्व आ दमे॑ सु॒दुघा॒ यस्य॑ धे॒नुः स्व॒धां पी॑पाय सु॒भ्वन्न॑मत्ति ॥
स्व आ दमे सुऽदुघा यस्य धेनुः स्वधां पीपाय सुऽभु अन्नं अत्ति ॥
अभीष्ट दुग्ध आयासावांचून देणारी कामधेनु सुद्धां त्याच्या निवासस्थळी राहून व अमृताचा भरपूर पुरवठा करून आपण उत्कृष्ट अन्नाचा आस्वाद घेते. तो हा ओजस्वी अपानपात् देव, भक्तांना स्पृहणीय संपत्तीचा लाभ करून देण्याकरितां आकाशोदकांत प्रकाशमान होत आहे. ॥ ७ ॥
यो अ॒प्स्वा शुचि॑ना॒ दैव्ये॑न ऋ॒तावाज॑स्र उर्वि॒या वि॒भाति॑ ॥
यः अप्ऽसु आ शुचिना दैव्येन ऋतऽवा अजस्रः उर्विया विऽभाति ॥
हा सत्यधर्मप्रिय आणि चिरंतन देव आपल्या निर्मल दैवी सामर्थ्याच्या योगानें आकाशांत दूरवर एकदम प्रकाश पाडतो. वृक्षाच्या फांद्याप्रमाणें हीं सर्व भुवनें त्याच्या दैवी सामर्थ्याच्या शाखाच आहेत आणि प्राणिमात्रासुद्धां एकंदर वनस्पतीही ह्याच्याचपासून उत्पन्न झाल्या आहेत. ॥ ८ ॥
अ॒पां नपा॒दा ह्यस्था॑दु॒पस्थं॑ जि॒ह्माना॑मू॒र्ध्वो वि॒द्युतं॒ वसा॑नः ॥
अपां नपात् आ हि अस्थात् उपऽस्थं जिह्मानां ऊर्ध्वः विऽद्युतं वसानः ॥
हा अपानपात् विद्युत्रूप वस्त्र करून कुटिलकेश अशा मेघांच्या सन्निध उभा राहिला आहे आणि कनकाप्रमाणें सुंदर कांतीच्या महानद्याही उदक रूपानें त्याच्या अत्यंत श्रेष्ठ यशाचा प्रसार करीत सर्वत्र वहात आहेत. ॥ ९ ॥
हिर॑ण्यरूपः॒ स हिर॑ण्यसंदृग॒पां नपा॒त्सेदु॒ हिर॑ण्यवर्णः ॥
हिरण्यऽरूपः स हिरण्यऽसंदृक् अपां नपात् सः इत् ऊं इति हिरण्यऽवर्णः ॥
ह्यांचे स्वरूप सुवर्णाप्रमाणेंच अविनाशी व दर्शनीय आहे. अपानपाताची अंगकांति सुद्धां सुवर्णाप्रमाणेंच लकलकीत असते. तो आपल्या सुवर्णमय म्हणजे अविनाशी अशा स्वस्थानी बसून भक्तांना नाशरहित सुवर्णरूप संपत्ति देतो. आणि भक्तजन हेही त्यास भक्तीनें हविर्भाग अर्पण करतात. ॥ १० ॥
तद् अ॒स्यानी॑कमु॒त चारु॒ नामा॑पी॒च्यं वर्धते॒ नप्तु॑र॒पाम् ॥
तत् अस्य अनीकं उत चारु नाम अपीच्यं वर्धते नप्तुः अपां ॥
अपानपाताचें तें मनोहर स्वरूप आणि गोड नांव हें सर्वांच्या नकळत गुप्तपणें वृद्धिंगत होत असतें. दिव्य लोकांतील युवती त्याला प्रज्वलित करतात. आणि कांचनाप्रमाणें अविनाशी असें दिव्य घृत हेंच खरोखर त्याचें अन्न असतें. ॥ ११ ॥
अ॒स्मै ब॑हू॒नाम॑व॒माय॒ सख्ये॑ य॒ज्ञैर्वि॑धेम॒ नम॑सा ह॒विर्भिः॑ ॥
अस्मै बहूनां अवमाय सख्ये यज्ञैः विधेम नमसा हविःऽभिः ॥
असंख्य भक्तांचा हा जिवलग सखा, तेव्हां त्याच्या प्रित्यर्थ यज्ञ करून, त्याला प्रणिपात आणि हवि अर्पण करून आम्हीं त्याची सेवा करूं. त्याचा शिरोभाग मी अलंकारांनी विभूषित करतो आमची शिरस्त्राणें त्याच्या पुढें ठेऊन त्याला प्रसन्न करतो. हविर्भागांनी त्याला तृप्त करतो आणि ऋक् स्तोत्रांनी त्याचें स्तवन करतो. ॥ १२ ॥
स ईं॒ वृषा॑जनय॒त्तासु॒ गर्भं॒ स ईं॒ शिशु॑र्धयति॒ तं रि॑हन्ति ॥
सः ईं वृषा अजनयत् तासु गर्भं स ईं शिशुः धयति तं रिहन्ति ॥
त्या सुरयुवतींच्या उदरी ह्या वीर श्रेष्ठानें गर्भ उत्पन्न केला परंतु आपणच बालक होऊन त्यांचें स्तनपान करूं लागला व त्याही त्याला कुरवाळूं लागल्या. तोच हा अपानपात्, त्याची अंगकांति कधींही म्लान होत नाहीं व तो अग्निरूपानें पृथ्वीवर दिसतो तेव्हां तो दुसर्याच्याच कोणाच्यातरी शरीराशीं मिळून गेला कीं काय असे वाटतें. ॥ १३ ॥
अ॒स्मिन्प॒दे प॑र॒मे त॑स्थि॒वांस॑मध्व॒स्मभि॑र्वि॒श्वहा॑ दीदि॒वांस॑म् ॥
अस्मिन् पदे परमे तस्थिऽवांसं अध्वस्मऽभिः विश्वहा दीदिऽवांसं ॥
हा अत्यंत श्रेष्ठ पदावर - ह्या वेदीवर - विराजमान होऊन अविनाशी तेजानें जो हा एकसारखा प्रकाशत असतो, त्या ह्या अपानपाताला हविरन्नें अर्पण करून दिव्य युवती आपण स्वतः त्याला विद्युत् वस्त्रांनीं मंडित करीत असतात. ॥ १४ ॥
अयां॑समग्ने सुक्षि॒तिं जना॒यायां॑समु म॒घव॑द्भ्यःध सुवृ॒क्तिम् ॥
अयांसं अग्ने सुऽक्षितिं जनाय अयांसं ऊं इति मघवत्ऽभ्यः सुऽवृक्तिं ॥
हे अग्निदेवा, मी दीन जनांना आश्रय दिला आहे व दानशूर यजमानांकरितां शुद्धांतःकरणानें तुझे स्तवनही केलें आहे. तुम्ही देव ज्याच्याकडे कृपाकटाक्षानें पहाल तें सर्व मंगलमयच होतें. तर आम्ही आपल्या वीरपुरुषसहवर्तमान यज्ञसभेंत तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३६ (ऋतुसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-विश्वेदेवा छन्दः-जगती
तुभ्यं॑ हिन्वा॒नो व॑सिष्ट॒ गा अ॒पोऽ॑धुक्षन्सी॒मवि॑भि॒रद्रि॑भि॒र्नरः॑ ॥
तुभ्यं हिन्वानः वसिष्ट गा अपः अधुक्षन् सीं अविऽभिः अद्रिऽभिः नरः ॥
तुझ्याकडे आणलेल्या सोमरसांत दूध आणि कुशोदक घातलेले आहे व ऋत्विजांनी तो रस पाषाणाच्या योगानें पिळून काढून लोकरीच्या वस्त्रांतून गाळून स्वच्छ करून घेतला आहे. तर हे इंद्रा, वषट्कार प्रयुक्त आणि स्वाहा असें म्हणून आहुति दिलेला हा रस तूं होत्याच्या पात्रांतून प्राशन कर, कारण विश्वाचा नियंता तूंच आहेस. ॥ १ ॥
य॒ज्ञैः सम्मि॑श्लाः॒ पृष॑तीभिर्ऋ॒गष्टिभि॒र्याम॑ञ् छु॒भ्रासो॑ अ॒ञ्जिषु॑ प्रि॒या उ॒त ॥
यज्ञैः संऽमिश्लाः पृषतीऽभिः ऋष्टिभिः यामन् सुभ्रासः अञ्जिसु प्रियाः उत ॥
यज्ञ होत असतात तेथेच तुम्ही नेहमी वावरता. तुम्ही मार्ग आक्रमण करूं लागला म्हणजे तुमच्या रथास जोडलेल्या चित्र विचित्र रंगाच्या हरिणीच्या योगानें व तुमच्या हातांतील लकलकीत भाल्यांच्या योगानें तुम्ही फारच शोभिवंत व शुभ्रतेजस्क दिसतां आणि अंगाला प्रकाशरूप उटणें लावण्यांत तर तुम्हाला मौज वाटत असते. तेव्हां हे भरतपुत्रांनो, हे आकाशपुत्र मरुतांनो, कुशासनावर आरोहण करून पोता नामक ऋत्विजाच्या पात्रांतून सोमरस प्राशन करा. ॥ २ ॥
अ॒मेव॑ नः सुहवा॒ आ हि गन्त॑न॒ नि ब॒र्हिषि॑ सदतना॒ रणि॑ष्टन ॥
अमाऽइव नः सुऽहवा आ हि गन्तन नि बर्हिषि सदतन रणिऽष्टन ॥
भक्तांची हांक तुम्ही लवकर मनावर घेतां तेव्हां हे देवांनो, आपल्या घरींच आल्याप्रमाणें आमच्याकडे या आणि ह्या कुशासनावर बसून येथेंच आराम करा. हे त्वष्ट्र देवा, तूंही देव व देवपत्न्या ह्या आपल्या समुदायासह ह्या सोमपेयानें तृप्त होऊन हर्षभरित हो. ॥ ३ ॥
आ व॑क्षि दे॒वाँ इ॒ह वि॑प्र॒ यक्षि॑ चो॒शन्हो॑त॒र्नि ष॑दा॒ योनि॑षु त्रि॒षु ॥
आ वक्षि देवान् इह विप्र यक्षि च उशन् होतः नि सद योनिषु त्रिषु ॥
हे महाज्ञानी अग्निदेवा, तूं देवांना येथें घेऊन ये. त्यांचा संतोष कर आणि मोठ्या उत्सुकतेनें तिन्ही वेदींवर आरोहण कर. तुझ्या पुढें ठेवलेला मधुर सोमरस गोड करून घे आणि आग्नीध्र नांवाच्या ऋत्विजाच्या पात्रानें सोमरस प्राशन करून तृप्त हो. ॥ ४ ॥
ए॒ष स्य ते॑ त॒न्वो नृम्ण॒वर्ध॑नः॒ सह॒ ओजः॑ प्र॒दिवि॑ बा॒ह्वोर्हि॒तः ॥
एषः स्यः ते तन्वः नृम्णऽवर्धनः सहः ओजः प्रऽदिवि बाह्वोः हितः ॥
हे इंद्रा, हा प्रसिद्ध सोमरस, हा शरीरांतील पौरुष बलाचा उत्कर्ष करणारा सोमरस तुला अर्पण केला आहे. शत्रूंचा पराभव करण्याचें सामर्थ्य आणि तेजस्विता ह्यांचे तुझ्या भुजदंडांत आजकालचें नाहीं, अनादिकालापासून आहेच. तथापि हे दिव्यैश्वर्यसंपन्न इंद्रा, हा रस तुझ्याकरतांच गाळून तुझ्या पुढें आणला आहे. तर ह्या ब्रह्मपात्रांतून तूं तो यथेच्छ प्राशन कर. ॥ ५ ॥
जु॒षेथां॑ य॒ज्ञं बोध॑तं॒ हव॑स्य मे स॒त्तो होता॑ नि॒विदः॑ पू॒र्व्या अनु॑ ॥
जुषेथां यज्ञं बोधतं हवस्य मे सत्तः होता निऽविदः पूर्व्याः अनु ॥
आमचा यज्ञ तुम्ही मान्य करून घ्या. आम्ही अर्पण केलेल्या हविर्भागाकडे तुमचें लक्ष असूं द्या. यज्ञहोता आसनावर बसून पुरातन कालापासून प्रसिद्ध असलेली "निविद्" नांवाची स्तोत्रें तुमच्या प्रित्यर्थ म्हणत आहे. तर हे मित्रावरुणांनो, हा आम्हीं केलेला प्रणिपात तुम्हां देवराजांना आमच्याकडे वळविण्याकरितां तुमच्याकडेच गेला. तर ’प्रशास्ता’ ह्या ऋत्विजाच्या पात्रांतून हा मधुर रस प्राशन करा. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३७ (ऋतुसूक्त, द्रविणोदस् अग्निचे पालुपदसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-द्रविणोदः छन्दः-जगती
मन्द॑स्व हो॒त्रादनु॒ जोष॒मन्ध॒सोऽ॑ध्वर्यवः॒ स पू॒र्णां व॑ष्ट्या॒सिच॑म् ॥
मन्दस्व होत्रात् अनु जोषं अन्धसः अध्वर्यवः स पूर्णां वष्टि आऽसिचं ॥
हे द्रविणोद अग्निदेवा, होत्याच्या पात्रांतून तूं तृप्ति होईपर्यंत सोमरस प्राशन करून हर्षभरित हो. अध्वर्यूहो, भरपूर अर्पण केलेल्या रसाची मात्र त्याला अत्यंत आवड आहे, तेव्हां ह्या अग्नीला अर्पण करण्याकरितां सोमरस घेऊन या. ह्या मधुर रसाच्या ठिकाणी तुझी फार आसक्ति असून तूं अत्यंत उदार आहेस. तेव्हां भक्तांना सामर्थ्यरूप संपत्ति अर्पण करणार्या हे अग्निदेवा तूं सर्व प्रसंगी येऊन होत्याच्या पात्रांतून सोमरस प्राशन कर. ॥ १ ॥
यमु॒ पूर्व॒महु॑वे॒ तमि॒दं हु॑वे॒ सेदु॒ हव्यो॑ द॒दिर्यो नाम॒ पत्य॑ते ॥
यं ऊं इति पूर्वं अहुवे तं इदं हुवे सः इत् ऊं इति हव्यः ददिः यः नाम पत्यते ॥
ज्याला मी पूर्वी बोलावित होतो त्यालाच आतांही मी हांक मारीत आहे. ज्याचा धांवा करावा असा कोणीं असेल तर तो हाच अत्युदार प्रभु होय. तोच सर्वांचा मालक, तर भक्तांना सामर्थ्यरूप संपत्ति अर्पण करणार्या हे अग्निदेवा तूं सर्व प्रसंगी येऊन अध्वर्यूंनी तुला अर्पण केलेला हा मधुर सोमरस होत्याच्या पात्रांतून प्राशन कर. ॥ २ ॥
मेद्य॑न्तु ते॒ वह्न॑यो॒ येभि॒रीय॒सेऽ॑रिषण्यन्वीळयस्वा वनस्पते ॥
मेद्यन्तु ते वह्नयः येभिः ईयसे अरिषण्यन् वीळयस्व वनस्पते ॥
ज्याच्या योगानें तूं सर्व ठिकाणीं गमन करतोस ते तुझे ज्वालारूप अश्व रस प्राशन करून पुष्ट होवोत. सर्व वृक्ष, वनस्पति इत्यादिकांचा सुद्धां तूं प्रभु आहेस. तर हे भगवंता, भक्तांची कोणत्याही प्रकारें हानि न होऊं देतां त्याचें सामर्थ्य तूं दृढ कर. हे धैर्यसागरा, हे सामर्थ्यसंपत्तिदात्या, अग्निदेवा, तूं येथें येऊन आम्हांला प्रोत्साहन दे; आणि सर्व यज्ञप्रसंगी, नेष्टा नामक ऋत्विजांच्या पात्रांतून तूं सोमरस प्राशन कर. ॥ ३ ॥
अपा॑द्धो॒त्रादु॒त पो॒त्राद॑मत्तो॒त ने॒ष्ट्राद॑जुषत॒ प्रयो॑ हि॒तम् ॥
अपात् होत्रात् उत पोत्रात् अमत्त उत नेष्ट्रात् अजुषत प्रयः हितं ॥
अग्निनें होत्याच्या पात्रांतून सोमरस प्राशन केला. ’पोता’ ह्या ऋत्विजाच्या पात्रांतूनही रस सेवन करून तो हर्षनिर्भर झाला. आणि त्याचप्रमाणे नेष्ट्याच्या पात्रांतून अर्पण केलेला रुचिर भक्ति रसही प्राशन करून तो तृप्त झाला आहे. आतां चवथें जे यज्ञ पात्र आहे तें निष्कलंक आणि अमर आहे. दानशूर यजमान रस अर्पण करतात तो त्यांतूनच. तर हा सामर्थ्यसंपत्तिदाता अग्निदेव ह्या चवथ्या पात्रानें रस प्राशन करो. ॥ ४ ॥
अ॒र्वाञ्च॑म॒द्य य॒य्यं नृ॒वाह॑णं॒ रथं॑ युञ्जाथामि॒ह वां॑ वि॒मोच॑नम् ॥
अर्वाञ्चं अद्य यय्यं नृऽवाहनं रथं युञ्जाथां इह वां विऽमोचनं ॥
तुमचा रथ तुम्हां सारख्या शूरांनाच बसण्यास योग्य आहे तर तो तुमचा अत्यंत वेगानें जाणारा रथ आज आमच्याइकडे येण्यांकरितां जोडून त्वरेनें निघा. तो येथें येऊन पोहोंचल्यावर घोडे सोडा. तुमच्या मधुर रसानें आमचे हविर्भाग आर्द्र करा, आनंदानें इकडे या आणि हे सात्विक धनांच्या निधींनो, हा सोमरस ग्रहण करा. ॥ ५ ॥
जोष्य॑ग्ने स॒मिधं॒ जोष्याहु॑तिं॒ जोषि॒ ब्रह्म॒ जन्यं॒ जोषि॑ सुष्टु॒तिम् ॥
जोषि अग्ने संऽइधं जोषि आऽहुतिं जोषि ब्रह्म जन्यं जोषि सुऽस्तुतिं ॥
हे अग्ने, ह्या समिधेचा स्वीकार करून संतुष्ट हो, आमच्या आहुतिनें प्रसन्न हो. ह्या लोकहितकारक व उदात्त प्रार्थनास्तोत्रानें प्रमुदित हो आणि ह्या स्तवनानेंही हृष्टचित्त हो. हे दिव्य संपत्तीच्या निधे अग्निदेवा तूं प्रेमळ अंतःकरणानें आपल्या अखिल शक्तीनिशी येऊन सर्व मोठमोठ्या व प्रेमळ अशा दिव्य विभूतींना यथाकाली सोमरसाच्या हविर्भागाचा आस्वाद घेऊं दे. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३८ (सवितृसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-सविता छन्दः-त्रिश्टुप्
उदु॒ ष्य दे॒वः स॑वि॒ता स॒वाय॑ शश्वत्त॒मं तद॑पा॒ वह्नि॑रस्थात् ॥
उत् ऊं इति स्यः देवः सविता सवाय शश्वत्ऽतमं तत्ऽअपाः वह्निः अस्थात् ॥
हा पहा देदीप्यमान सविता जगाचे प्रवर्तन नियमन करणारा हा पवित्र देव प्राणिमात्राला प्रेरणा करण्याकरितां उदय पावला आहे. हा त्याचा व्यवसाय अव्याहत चाललेला आहे. दिव्य विभूतींजवळ जो अलौकिक रत्नांचा ठेवा आहे तो ह्याच देवानें तेथें ठेविला असून यज्ञकर्मप्रिय यजमानाला निरुपम सुखाचा वांटेकरी त्यानेंच केलें आहे. ॥ १ ॥
विश्व॑स्य॒ हि श्रु॒ष्टये॑ दे॒व ऊ॒र्ध्वः प्र बा॒हवा॑ पृ॒थुपा॑णिः॒ सिस॑र्ति ॥
विश्वस्य हि श्रुष्टये देवः ऊर्ध्वः प्र बाहवा पृथुऽपाणिः सिसर्ति ॥
जगाचें कल्याण करण्याकरितां हा देव सदैव उभाच आहे. सर्वत्र पसरणारा रश्मिसमूह हेच त्याचे हात. ते आपले बाहू सर्व विश्वाच्या सहाय्यार्थ तो वारंवार पुढें करीत असतो. त्याच्या आज्ञेनेंच उदकांच्या आंगी सर्व किल्मिष नाहीसे करण्याचें सामर्थ्य आलेले आहे, आणि त्याच्या आज्ञेनेंच वायु हा अंतरिक्षांत संचार करून विहार करीत असतो. ॥ २ ॥
आ॒शुभि॑श्चि॒द्यान्वि मु॑चाति नू॒नमरी॑रम॒दत॑मानं चि॒देतोः॑ ॥
आशुऽभिः चित् यान् वि मुचाति नूनं अरीरमत् अतमानं चित् एतोः ॥
आपल्या अत्यंत वेगवान अश्वांना रथास जोडून जात असतां त्यांना तो एकदम मोकळे करतो, परंतु तसें करतांच, झपाट्यानें मार्ग चालणार्या प्रवाशास आपला प्रवास थांबवून तो विश्रांती घेण्यास लावतो. रात्र सुद्धां सविता देवाच्या आज्ञेनेंच पुढें सरसावत असते. ॥ ३ ॥
पुनः॒ सम॑व्य॒द्वित॑तं॒ वय॑न्ती म॒ध्या कर्तो॒र्न्यधा॒च्छक्म॒ धीरः॑ ॥
पुनरिति सं अव्यत् विऽततं वयन्ती मध्या कर्तोः नि अधात् शक्म धीरः ॥
अंधःकाररूपी अति विस्तीर्ण आवरण विणून तें तयार करणार्या रात्रीनें पहा आपला पडदा उलगडून तो ह्या विश्वावर पुनः पसरून दिला. त्याबरोबर ज्ञानी भक्तानेंही आपलें उपासनाकर्म मध्येंच बंद ठेवलें, परंतु थोड्याच वेळानें आपली निद्रा सोडून देऊन तो उपासनातत्पर झाला, तोंच, ज्याला विश्रांतीचा कधीं लवलेशही माहीत नाही व ज्याने निरनिराळ्या ऋतूंचे काल एकदांच ठरवून टाकले आहेत असा तो परम देदीप्यमान सविता पुनः उदय पावला. ॥ ४ ॥
नानौकां॑सि॒ दुर्यो॒ विश्व॒मायु॒र्वि ति॑ष्ठते प्रभ॒वः शोको॑ अ॒ग्नेः ॥
नान ओकांसि दुर्यः विश्वं आयुः वि तिष्ठते प्रऽभवः शोकः अग्नेः ॥
सायंकाळी ह्या गृह्याग्नीचा ओजस्वी प्रकाश यजमानांच्या एकट्या घरांमध्येंच केवळ पसरतो असें नव्हे, तर यच्चावत् सचेतन प्राण्यांच्या अंतरंगीसुद्धां जाऊन पसरतो. त्यामुळें, अग्नीच्या इच्छेनुरूप सर्वप्रेरक देवानें दिलेला सर्वांत मोठा असा जो सुखाचा वांटा आहे तो उषा माता आपल्या भक्तरूप पुत्रासाठी जतन करून ठेवते. ॥ ५ ॥
स॒माव॑वर्ति॒ विष्ठि॑तो जिगी॒षुर्विश्वे॑षां॒ काम॒श्चर॑ताम॒माभू॑त् ॥
संऽआववर्ति विऽस्थितः जिगीषुः विश्वेषां कामः चरतां अमा अभूत् ॥
विजयश्रीकरितां आतुर झालेला वीर दूर रणांत असला तरीही छावणीकडे परत फिरतो, एवढेंच काय पण दिवसभर इकडे तिकडे फिरणार्या प्राणिमात्राचें सारें लक्ष्य घराकडे वेधून जाते. एकंदर लोक अपुरीं राहिलेलीं कामें अर्धवटच टाकून विश्रांती घेतात. परंतु हें सर्व, त्या जगत्प्रेरक ईश्वराच्या आज्ञेप्रमाणेंच होत असतें. ॥ ६ ॥
त्वया॑ हि॒तमप्य॑म॒प्सु भा॒गं धन्वान्वा मृ॑ग॒यसो॒ वि त॑स्थुः ॥
त्वया हितं अप्यं अप्ऽसु भागं धन्व अनु आ मृगयसः वि तस्थुः ॥
अंतरिक्षांत उदकांचा जो सांठा तूं ठेवून दिलेला आहेस तो सांठा, निर्जल व वालुकामय प्रदेशांतून इकडे तिकडे धांवणार्या पशूंना पर्जन्यकाळीं प्राप्त होतो. अरण्यांतील वृक्षांचा समुदायही तूं पक्ष्यांनाच राहण्याकरितां दिलेला आहेस. एवंच, सर्वप्रेरक व देदीप्यमान सवित्याची आज्ञा कोणीही मोडीत नाहीं हेंच खरें. ॥ ७ ॥
या॒द्रा॒ध्यं॑१वरु॑णो॒ योनि॒मप्य॒मनि॑शितं नि॒मिषि॒ जर्भु॑राणः ॥
यात्ऽद्राध्यं वरुणः योनिं अप्यं अनिऽशितं निऽमिषि जर्भुराणः ॥
सर्व ठिकाणीं प्रवास करण्यास सोइस्कर असे ठिकाण म्हणजे समुद्र, त्या समुद्राला अंतरिक्ष प्रदेशाला सूर्यास्त होतांच वरुण रूपानें हा मोठ्या झपाट्यासरशीं अव्याहत व्यापून टाकतो. अशावेळीं एकंदर पक्षी आपआपल्या घरट्यांत शिरतात व पक्षी आपआपल्या निवार्याच्या जागीं जाऊन स्वस्थ पडतात. एवंच जगत्प्रेरक सवित्यानें प्रत्येक जीवमात्राला विश्रांतीला निरनिराळें स्थळ नेमून दिलेलें आहे. ॥ ८ ॥
न यस्येन्द्रो॒ वरु॑णो॒ न मि॒त्रो व्र॒तम॑र्य॒मा न मि॒नन्ति॑ रु॒द्रः ॥
न यस्य इंद्रः वरुणः न मित्रः व्रतं अर्यमा न मिनन्ति रुद्रः ॥
ज्याच्या कार्याला इंद्र अथवा वरुण, मित्र, अर्यमा किंवा रुद्र हीं त्याची रूपें सुद्धां विघात करीत नाहींत, मग दुरात्मे व धर्महीन लोक कोठून करणार ? म्हणून मी ह्या जगत्प्रेरक व देदीप्यमान अशा सविता देवाचें नमस्कारपूर्वक गौरव करून सर्वांच्या कल्याणाकरितां त्याचा धांवा करतो. ॥ ९ ॥
भगं॒ धियं॑ वा॒जय॑न्तः॒ पुरं॑धिं॒ नरा॒शंसो॒ ग्नास्पति॑र्नो अव्याः ॥
भगं धियं वाजयन्तः पुरंऽधिं नराशंसः ग्नाः पतिः नः अव्याः ॥
महद्भाग्य, एकाग्रबुद्धि आणि प्रतिभा ही स्वपराक्रमानें मिळविण्याकरितां आम्ही उत्सुक झालों आहोंत. तर सर्वजनस्तुत्य व दिव्य शक्तीचा प्रभु सविता आमच्यावर कृपादृष्टी ठेवो. आम्हाला अत्युत्कृष्ट धनाचा लाभ झाला अथवा आम्हांस ऐश्वर्याचा उपभोग मिळाला तथापि आम्ही ह्या जगत्प्रेरक देवाचे प्रिय भक्त व्हावें म्हणजे झालें. ॥ १० ॥
अ॒स्मभ्यं॒ तद्दि॒वो अ॒द्भ्यः पृ॑थि॒व्यास्त्वया॑ द॒त्तं काम्यं॒ राध॒ आ गा॑त् ॥
अस्मभ्यं तत् दिवः अत्ऽभ्यः पृथिव्याः त्वया दत्तं काम्यं राधः आ गात् ॥
हे देवा तूं आम्हांवर केलेला स्पृहणीय प्रसाद आम्हाला सर्व ठिकाणांहून म्हणजे आकाशपासून, उदकापासून व पृथ्वीपासून सुद्धां प्राप्त होवो. हे जगत्प्रेरका देवा, स्तोतृजनाचें त्यामुळें कल्याणच होतें, आणि तुझें अखंड स्तवन करणार्या कवीलाही एका जिवलग बंधूचा लाभ झाल्यासारखा होतो. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३९ (अश्विनीकुमारसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-अश्विनौ छन्दः-त्रिष्टुप्
ग्रावा॑णेव॒ तद् इदर्थं॑ जरेथे॒ गृध्रे॑व वृ॒क्षं नि॑धि॒मन्त॒मच्छ॑ ॥
ग्रावाणाऽइव तत् इत् अर्थं जरेथे इति गृध्राऽइव वृक्षं निधिऽमन्तं अच्छ ॥
सोमवल्लीच रस काढणे ह्या एकाच कार्याकरितां ज्याप्रमाणें सोमपाषाणांचा निनाद होत असतो त्याप्रमाणें तुम्हीही उभयतां एकदम भक्तांची प्रशंसा करीत असतां. गृध्राप्रमाणें भुकेनें वखवखलेले पक्षी जसे फलांनी लादलेल्या वृक्षाकडे धांव घेतात तसे प्रेमसमुद्राला भरती आलेल्या भक्ताकडे तुम्हींही कितीतरी त्वरेनें धांवत जातां. यज्ञमंडपांत देवस्तवन करणारे ब्रह्मा नांवाचे ऋत्विज दोन असावे त्याप्रमाणें तुम्हीं शोभतां, किंवा लोकहिततत्पर असे दोघे मध्यस्त असावे त्याप्रमाणें तुम्हीं भक्तांचे मध्यस्थ आहांत, आणि सर्व जनांनीं तुमचा धांवा करण्यास तुम्ही अगदी योग्य आहांत. ॥ १ ॥
प्रा॒त॒र्यावा॑णा र॒थ्येव वी॒राजेव॑ य॒मा वर॒मा स॑चेथे ॥
प्रातःऽयवाना रथ्याऽइव वीरा अजाऽइव यमा वरं आ सचेथे इति ॥
तुम्ही दोघेही युद्धकुशल वीराप्रमाणे रणशूर असून भक्ताकडे प्रातःकाळींच जात असतां आणि तुम्हां दोघांची जोडी जन्मरहित म्हणून तुम्हीं तुमच्या स्वतःच्याच इच्छेप्रमाणें वागतां. लावण्यवती स्त्रिया स्वतः दागदागिन्यांनी नटलेल्या रमणीय दिसतात त्याप्रमाणें तुमची रसाळ वाणीही अलंकृतच असते आणि एखादें दंपत्य उपासना कर्मांत प्रवीण असतें त्याप्रमाणें तुम्हा दोघांनाही ईश्वरी कर्तृत्वाविषयीं अंतर्ज्ञान आहे ही गोष्ट तर जगत्प्रसिद्धच आहे. ॥ २ ॥
शृङ्गे॑रव नः प्रथ॒मा ग॑न्तम॒र्वाक् श॒फावि॑व॒ जर्भु॑राणा॒ तरो॑भिः ॥
शृङ्गाऽऽइव नः प्रथमा गन्तं अर्वाक् शफौऽइव इव जर्भुराणा तरःऽभिः ॥
द्वितीयेच्या चंद्राची शृंगे जशी आमच्याकडे वळतात त्याप्रमाणे तुम्ही प्रथम आमच्याकडे या. भरवेगानें धांवणारे खूर असावे अशाप्रमाणें त्वरेनें आमच्याकडे या. तेजोमय विभूतींनो, पराक्रमी देवांनो, तुम्ही दोघेही चक्रवाक पक्ष्याप्रमाणें किंवा प्रबल योध्याप्रमाणें दररोज प्रातःकाळी आमच्याकडे आगमन करा. ॥ ३ ॥
ना॒वेव॑ नः पारयतं यु॒गेव॒ नभ्ये॑व न उप॒धीव॑ प्र॒धीव॑ ॥
नावाऽइव नः पारयतं युगाऽइव नभ्याऽइव नः उपधी इवेत्युपधीऽइव प्रधी इवेति प्रधीऽइव ॥
नौका जशी पैलतीरास पोंचविते त्याप्रमाणें आम्हांस दुःखाच्या पार न्या. दोन्ही बाजूंचे जूं, दोन्ही चाकांचे तुंबे, अरे, धांवा ही सर्व शाबूत असलेल्या रथाप्रमाणें आम्हांस संकटांच्या पार घेऊन जा. तुमची कोणत्याही प्रकारें कधी हानि होण्याचा संभवच नाहीं तेव्हां विश्वासू कुत्र्याप्रमाणे जागरूक राहून आमचा बचाव करा; आणि दौर्बल्यापासून चिलखताप्रमाणें आमचें संरक्षण करा. ॥ ४ ॥
वाते॑वाजु॒र्या न॒द्येव री॒तिर॒क्षी इ॑व॒ चक्षु॒षा या॑तम॒र्वाक् ॥
वाताऽइव अजुर्या नद्याऽइव रीतिः अक्षी इवेत्यक्षीऽइव चक्षुषा आ यातं अर्वाक् ॥
तुम्ही वायुप्रमाणें कधींही क्षीण न होणारे आहांत. नद्यांप्रमाणें तुमचीही गति अति शीघ्र असून पहाण्याची शक्ति असलेल्या तेत्राप्रमाणे तुमची जोडी अखंडित आहे. तर तुम्ही कृपाकरून आमच्याकडे या. शरीरास जसे हातपाय त्याप्रमाणें तुम्ही आम्हांस पराकाष्ठेचे सुखकारक तर अत्यंत अभिलाषणीय अशी जी संपत्ति आहे तिकडेच आम्हांस घेऊन जा. ॥ ५ ॥
ओष्ठा॑विव॒ मध्व् आ॒स्ने वद॑न्ता॒ स्तना॑विव पिप्यतं जी॒वसे॑ नः ॥
ओष्ठौऽइव मधु आस्ने वदन्ता स्तनौऽइव पिप्यतं जीवसे नः ॥
आमच्याच मुखाचे ओठ जसे आमच्याकरितां मधुर बोलतात त्याप्रमाणें आमच्याशी गोड शब्द बोला, व आम्ही आनंदानें आयुष्य घालवावे म्हणून मातेच्या दोन स्तनांप्रमाणे आम्हांस आनंदरूप दुग्ध पाजा. शरीरास जसे नाक त्याप्रमाणे आमचे रक्षण करण्यांत तुम्ही अग्रेसर आहांत तर आमचेच कान जसे आमचा शब्द ऐकतील त्याप्रमाणे आमचा धांवा तुम्ही उत्तम रीतीनें ऐकून घ्या. ॥ ६ ॥
हस्ते॑व श॒क्तिम॒भि सं॑द॒दी नः॒ क्षामे॑व नः॒ सम॑जतं॒ रजां॑सि ॥
हस्ताऽइव शक्तिं अभि संददी इति सऽददी नः क्षामऽइव नः सं अजतं रजांसि ॥
तुम्हींच आमचे हात असल्याप्रमाणें आम्हांस उत्कृष्ट प्रतीचें सामर्थ्य द्या. वाळलेल्या पाचोळ्याप्रमाणें आमची पातकें पार उडवून द्या. हे अश्वीदेवहो, आमच्या स्तवनवाणी तुमच्या ठिकाणी जडलेल्या आहेत. तर निसण्यावर सुरा पाजळावा त्याप्रमाणें त्या स्तवनवाणींना तीक्ष्णता आणून त्यांना कार्यक्षम करा. ॥ ७ ॥
ए॒तानि॑ वामश्विना॒ वर्ध॑नानि॒ ब्रह्म॒ स्तोमं॑ गृत्सम॒दासो॑ अक्रन् ॥
एतानि वां अश्विना वर्धनानि ब्रह्म स्तोमं गृत्सऽमदासः अक्रन् ॥
हे अश्वीदेवहो, तुमचा महिमा वाढविणारी, तुम्हाला अत्यानंद उत्पन्न करणारी प्रार्थनास्तोत्रें आणि गुणसंकीर्तन हें आम्ही गृत्समदांनीं केलें आहे. तर हे वीरांनो, त्या स्तोत्रांनी प्रसन्न होऊन इकडे या, व आम्हांस आमच्या शूर मित्रांसहवर्तमान यज्ञसभेंत महद्यश वर्णन करूं द्या. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ४० (सोमापूषन्सूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-सोमापूषणौ छन्दः-जगती
सोमा॑पूषणा॒ जन॑ना रयी॒णां जन॑ना दि॒वो जन॑ना पृथि॒व्याः ॥
सोमापूषणा जनना रयीणां जनना दिवः जनना पृथिव्याः ॥
हे सोमा, हे सृष्टिपोषका देवा, दिव्य ऐश्वर्याचे जनक तुम्ही, आकाशाचे जनक तुम्ही आणि ह्या पृथ्वीचेही पण जनक तुम्हीच आहांत. सर्व भुवनांचे प्रतिपालक असेच तुम्ही एकदम प्रकट झालां आणि अमरत्वाचें सर्वस्व तुम्ही आहांत अशी खुद्द देवतांनीच ग्वाही दिलेली आहे. ॥ १ ॥
इ॒मौ दे॒वौ जाय॑मानौ जुषन्ते॒मौ तमां॑सि गूहता॒मजु॑ष्टा ॥
इमौ देवौ जायमानौ जुषन्त इमौ तमांसि गूहतां अजुष्टा ॥
हे दोघेही देव प्रकट होतांक्षणी सर्व देवतांस समाधानच वाटलें. कारण कोणालाही न आवडणारा असा जो दुःख व अज्ञान ह्यांचा अंधकार त्याचा त्यांनी अगदीं नायनाट करून टाकला. सोम आणि पूषारूप धेनूंची वाढ जरी पूर्ण झाली नव्हती तरी त्यांच्या ठिकाणी, सोम आणि पूषा ह्यांच्या कार्यासाठी इंद्रानें शुभ्र प्रकाशरूप पक्व दुग्ध उत्पन्न केलें. ॥ २ ॥
सोमा॑पूषणा॒ रज॑सो वि॒मानं॑ स॒प्तच॑क्रं॒ रथ॒मवि॑श्वमिन्वम् ॥
सोमापूषणा रजसः विमानं सप्तऽचक्रं रथं अविश्वऽमिन्वं ॥
हे सोमा, हे पोषक देवा, येवढा रजोलोक पण त्याचें मोजमाप सहज घेईल अशा प्रकारचा तुमचा रथ असून त्याला सात चाकें आहेत. संपूर्ण विश्वसुद्धां त्याचें आकलन करूं शकत नाहीं. पाहिजे त्या ठिकाणी त्याला संचार करतां येतो, आणि संकल्प केल्याबरोबर तो जोडला जातो. तर हे वीरश्रेष्ठ देवांनो, किरणरूप पांच लगामांचा तुमचा तो रथ तुम्ही आतां भरधांव सोडा ॥ ३ ॥
दि॒व्य॑१न्यः सद॑नं च॒क्र उ॒च्चा पृ॑थि॒व्याम॒न्यो अध्य॒न्तरि॑क्षे ॥
दिवि अन्यः सदनं चक्र उच्चा पृथिव्यां अन्यः अधि अन्तरिक्षे ॥
तुम्हां दोघांपैकी एकाचें निवासस्थान उच्च अशा आकाशलोकीं असून दुसर्याचे वास्तव्य पृथ्वी आणि अंतराळ ह्या दोहोंमध्यें आहे. तर सर्वांनाच जो प्रिय वाटतो व सर्व सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी एकवटते असा जो ऐश्वर्याचा उत्कर्ष तो हे उभयतां देव आम्हांस प्राप्त करून देऊन आमच्या वंशांत कुलदीपक पुरुष उत्पन्न करोत. ॥ ४ ॥
विश्वा॑न्य॒न्यो भुव॑ना ज॒जान॒ विश्व॑म॒न्यो अ॑भि॒चक्षा॑ण एति ॥
विश्वानि अन्यः भुवना जजान विश्वं अन्यः अभिऽचक्षाणः एति ॥
तुम्हांपैकी एकाने सर्व भुवनें प्रकट केली आणि दुसरा सर्व विश्वांचे निरीक्षण करीत करीत संचार करीत असतो. तर हे सोमा, हे पूषा, माझ्या ध्यानोपासनेकडे कृपादृष्टीनें पहा म्हणजे तुम्हां दोघांच्या कृपेनें आम्ही दुर्जनांच्या एकंदर सैन्याचा अगदीं मोड करून टाकूं. ॥ ५ ॥
धियं॑ पू॒षा जि॑न्वतु विश्वमि॒न्वो र॒यिं सोमो॑ रयि॒पति॑र्दधातु ॥
धियं पूषा जिन्वतु विश्वंऽइन्वः रयिं सोमः रयिपतिः दधातु ॥
यच्चावत् विश्वाचें आक्रमण करणारा हा सर्वपोषक पूषा देव आमच्या एकाग्र ध्यानाला प्रेरणा करो; व दिव्य ऐश्वर्याचा प्रभु सोम हा आम्हांस तें श्रेष्ठ ऐश्वर्य प्राप्त करून देवो. सर्वांगपरिपूर्ण अशी दिव्य चिच्छक्ति आमचें रक्षण करो आणि आमच्या शूर मित्रांसहवर्तमान यज्ञसभेमध्यें देवाचें महद्यश वर्ण करीत राहूं असें घडो. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ४१ (आनेक देवतासूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-विश्वेदेवा छन्दः-जगती
वायो॒ ये ते॑ सह॒स्रिणो॒ रथा॑स॒स्तेभि॒रा ग॑हि ॥ नि॒युत्वा॒न्सोम॑पीतये ॥ १ ॥
वायो इति ये ते सहस्रिणः रथासः तेभिः आ गहि ॥
वायुदेवा, तुझे जे हजारों अत्यंत वेगवान रथ आहेत त्यांना नियुत् नांवाचे घोडे जोडून सोमरसाचा आस्वाद घेण्यांकरितां आमच्याकडे ये. ॥ १ ॥
नि॒युत्वा॑न्वाय॒वा ग॑ह्य॒यं शु॒क्रो अ॑यामि ते ॥ गन्ता॑सि सुन्व॒तो गृ॒हम् ॥ २ ॥
नियुत्वान् वायो इति आ गहि अयं शुक्रः अयामि ते ॥
वायुदेवा, लक्षावधी कोस धांवणारे तुझे नियुत् नांवाचे घोडे जोडून तूं येच; पहा हा रस तुला अर्पण केला आहे. आणि सोमरस अर्पण करणार्या भक्ताच्या घरीं तूं जातोसच. ॥ २ ॥
शु॒क्रस्या॒द्य गवा॑शिर॒ इन्द्र॑वायू नि॒युत्व॑तः ॥ आ या॑तं॒ पिब॑तं नरा ॥ ३ ॥
शुक्रस्य अद्य गोऽआशिरः इन्द्रवायू इति नियुत्वतः ॥
ह्या शुभ्र तेजस्वी रसांत आज दहिदूध मिश्रित केलें आहे. तर हे इंद्रा, हे वायू, हे वीर नायकहो, तुम्ही नियुत् घोडे जोडून यज्ञमंडपी या व सोमरसाचा आस्वाद घ्या. ॥ ३ ॥
अ॒यं वां॑ मित्रावरुणा सु॒तः सोम॑ ऋतावृधा ॥ ममेदि॒ह श्रु॑तं॒ हव॑म् ॥ ४ ॥
अयं वां मित्रावरुणा सुतः सोमः ऋताऽवृधा ॥
हे मित्रावरुणांनो, हे सनातन धर्माचा उत्कर्ष करणार्या देवांनो, तुमच्याकरितां हा सोमरस गाळून तयार केला आहे. तर आतां तरी तुम्ही माझी हांक ऐका. ॥ ४ ॥
राजा॑ना॒वन॑भिद्रुहा ध्रु॒वे सद॑स्युत्त॒मे ॥ स॒हस्र॑स्थूण आसाते ॥ ५ ॥
राजानौ अनभिऽद्रुहा ध्रुवे सदसि उत्ऽतमे ॥
इंद्र, वायू हे देवतांचे राजे खरे परंतु द्वेष, मत्सर इत्यादि विकारांचा स्पर्शही त्यांच्या चित्ताला कधीं होत नाहीं. आणि अढळ, अत्युच्च व असंख्य स्तंभांनी जे सुशोभित आहे अशा आपल्या राजमंदिरांत ते वास करतात. ॥ ५ ॥
ता स॒म्राजा॑ घृ॒तासु॑ती आदि॒त्या दानु॑न॒स्पती॑ ॥ सचे॑ते॒ अन॑वह्वरम् ॥ ६ ॥
ता संऽराजां घृतासुती इति घ्तऽआसुती आदित्याः दानुनः पती इति ॥
हे विश्वाचे सम्राट असतांही भक्ताच्या घृताहुतीचें प्रेमानें सेवन करतात. जे जे उदार आहेत त्यांच्यामध्यें सुद्धां हे आदित्य अत्यंत श्रेष्ठ असून जो भक्त मनाचा अगदीं निर्मल असेल त्याच्याच जवळ ते निरंतर राहतात. ॥ ६ ॥
गोम॑द् ऊ॒ षु ना॑स॒त्याश्वा॑वद्यातमश्विना ॥ व॒र्ती रु॑द्रा नृ॒पाय्य॑म् ॥ ७ ॥
गोऽमत् ऊं इति सु नासत्या अश्वऽवत् यातं अश्विना ॥
हे सत्यस्वरूप अश्विदेवांनो, तुम्ही आपल्या प्रकाशयुक्त व व्यापल सामर्थ्यांसह त्वरेनें इकडे या. रुद्ररूप देवांनो, हे आमचे यज्ञगृह तुमच्यासारख्या वीरांनी रक्षण करण्यास अगदीं योग्य असेंच आहे. ॥ ७ ॥
न यत्परो॒ नान्त॑र आद॒धर्ष॑द्वृषण्वसू ॥ दुः॒शंसो॒ मर्त्यो॑ रि॒पुः ॥ ८ ॥
न यत् परः न अन्तरः आऽदधर्षत् वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ॥
पराक्रमधनसंपन्न अश्वी देवांनो, बाहेरून उघडपणें अगर आंतून गुप्तपणें शत्रुत्व करणार्या कोणीही देव निंदक मानवास जें ऐश्वर्य हिरावून घेतां येणार नाही, ॥ ८ ॥
ता न॒ आ वो॑ळ्हमश्विना र॒यिं पि॒शङ्ग॑ संदृशम् ॥ धिष्ण्या॑ वरिवो॒विद॑म् ॥ ९ ॥
ता न आ वोळ्हं अश्विना रयिं पिशङ्गसऽसंदृशं ॥
आणि ध्यानगम्य अश्वि देवांनो, जें अत्यंत स्पृहणीय असें सुख देतें व अनुपम सौंदर्याची कांति ज्याच्या ठिकाणीं स्पष्ट दिसते, अशा प्रकारचें ऐश्वर्य आमच्या करितां घेऊन या. ॥ ९ ॥
इन्द्रो॑ अ॒ङ्गम म॒हद्भ॒यम॒भी षदप॑ चुच्यवत् ॥ स हि स्थि॒रो विच॑र्षणिः ॥ १० ॥
इन्द्रः अङ्गआ महत् भयं अभी सत् अप चुच्यवत् ॥
कितीही भयंकर व कंबर खचविणारें संकट येवो, इंद्रानें तें उलथून पाडलेच म्हणून समजावें. कारण तोच सर्वद्रष्टा सर्वव्यापक आणि अढळ आहे. ॥ १० ॥
इन्द्र॑श्च मृ॒ळया॑ति नो॒ न नः॑ प॒श्चाद॒घं न॑शत् ॥ भ॒द्रं भ॑वाति नः पु॒रः ॥ ११ ॥
इन्द्रः च मृळयाति नः न नः पश्चात् अघं नशत् ॥
असा हा इंद्र आमच्यावर कृपा करो, म्हणजे मग पातक कितीही आमच्या पाठीमागे लागले तरी आम्हांस स्पर्श करण्याची त्याची छाती होणार नाही आणि पुढेंही आमचे सर्वतोपरी कल्याणच होईल. ॥ ११ ॥
इन्द्र॒ आशा॑भ्य॒स्परि॒ सर्वा॑भ्यो॒ अभ॑यं करत् ॥ जेता॒ शत्रू॒न्विच॑र्षणिः ॥ १२ ॥
इन्द्र आशाभ्यः परि सर्वाभ्यः अभयं करत् ॥
इंद्र हा सर्व बाजूंनी अगदी निर्भय करो सज्जनांच्या शत्रूंना पादाक्रांत करणारा सर्वसाक्षी देव तोच आहे. ॥ १२ ॥
विश्वे॑ देवास॒ आ ग॑त शृणु॒ता म॑ इ॒मं हव॑म् ॥ एदं ब॒र्हिर्नि षी॑दत ॥ १३ ॥
विश्वे देवास आ गत शृणुत मे इमं हवं ॥
सकल देवांनो, येथें या, आमचा धांवा ऐकून घ्या आणि येथें ह्या कुशासनावर आरोहण करा ॥ १३ ॥
ती॒व्रो वो॒ मधु॑माँ अ॒यं शु॒नहो॑त्रेषु मत्स॒रः ॥ ए॒तं पि॑बत॒ काम्य॑म् ॥ १४ ॥
तीव्रः वः मधुऽमान् अयं शुनऽहोत्रेषु मत्सरः ॥
सकल देवांनो, हा कडक परंन्तु फारच मधुर आनंदवर्धक व सर्वांना अत्यंत प्रिय असा सोमरस शुन नोत्रांच्या यज्ञगृही तुमच्या करितां सिद्ध केला आहे तो हा सोमरस तुम्ही ग्रहण करा. ॥ १४ ॥
इन्द्र॑ज्येष्ठा॒ मरु॑द्ग॑णा॒ देवा॑सः॒ पूष॑रातयः ॥ विश्वे॒ मम॑ श्रुता॒ हव॑म् ॥ १५ ॥
इन्द्रऽज्येष्ठाः मरुत्ऽगणा देवासः पूषऽरातयः ॥
सकल देवांनो, तुम्हां सर्वांत वरिष्ठ इंद्र आहे, तोच सर्वपोषक आणि अत्यंत उदार असा पूषा तुमच्यामध्यें आहे. तुमच्यामध्यें मरुत् ही आहेतच तर तुम्ही सर्व देव माझी हांक मनास आणा. ॥ १५ ॥
अम्बि॑तमे॒ नदी॑तमे॒ देवि॑तमे॒ सर॑स्वति ॥
अम्बिऽतमे नदीऽतमे देविऽतमे सरस्वति ॥
हे श्रेष्ठ माते, हे श्रेष्ठ नदी, हे श्रेष्ठ सरस्वतीदेवी, आम्ही जवळ जवळ सांदींतच पडल्यासारखें झालों आहोंत, तर हे माते तूं आमची प्रख्याति कर. ॥ १६ ॥
त्वे विश्वा॑ सरस्वति श्रि॒तायूं॑षि दे॒व्याम् ॥
त्वे इति विश्वा सरस्वति श्रिता आयूंषि देव्यां ॥
हे सरस्वती, तुज श्रेष्ठ देवतेच्या इच्छेवर सर्वांचीच आयुष्यें अवलंबून आहेत, तर आम्हां शुनहोत्रांच्या घरी येऊन तूं संतुष्ट हो आणि आम्हांस पुत्रपौत्र आणि आश्रितजन देण्याची कृपा कर. ॥ १७ ॥
इ॒मा ब्रह्म॑ सरस्वति जु॒षस्व॑ वाजिनीवति ॥
इमा ब्रह्म सरस्वति जुषस्व वाजिनीऽवति ॥
हे सत्यसामर्थ्यसंपन्ने, हे सत्यधर्मस्वरूपे सरस्वती, देवांना आवडणारी व मनःपूर्वक म्हटलेली अशी जी ही स्तोत्रें आम्ही गृत्समदांनी तुला अर्पण केलीं आहेत, तीं स्तोत्रें ती प्रार्थना तूं मनांस आणून प्रसन्न हो. ॥ १८ ॥
प्रेतां॑ य॒ज्ञस्य॑ श॒म्भुवा॑ यु॒वामिदा वृ॑णीमहे ॥ अ॒ग्निं च॑ हव्य॒वाह॑नम् ॥ १९ ॥
प्र इतां यज्ञस्य शंऽभुवा युवां इत् आ वृणीमहे ॥
यज्ञाची उन्नति करणार्या तुम्ही उभयतांनी इकडे अवश्य यावें अशी, देवांस हवि पोहोंचविणार जो अग्निदेव त्याला प्रार्थना आम्हीं करीत असतो. ॥ १९ ॥
द्यावा॑ नः पृथि॒वी इ॒मं सि॒ध्रम॒द्य दि॑वि॒स्पृश॑म् ॥ य॒ज्ञं दे॒वेषु॑ यच्छताम् ॥ २० ॥
द्यावा नः पृथिवी इति इमं सिध्रं अद्य दिविऽस्पृशं ॥
आमचे हेतु साध्य करून देणारा व स्वर्गापर्यंत जाऊन भिडणारा असा हा आमचा यज्ञ द्यावापृथिवी ह्या देवांना समर्पण करोत. ॥ २० ॥
आ वा॑मु॒पस्थ॑मद्रुहा दे॒वाः सी॑दन्तु य॒ज्ञियाः॑ ॥ इ॒हाद्य सोम॑पीतये ॥ २१ ॥
आ वां उपऽस्थं अद्रुहा देवाः सीदन्तु यज्ञियाः ॥
ज्यांच्या मनांत द्वेष इत्यादि विकार कधींही वसत नाहींत असे हे सर्व यज्ञार्हदेव आज येथें सोमरस प्राशन करण्याकरितां तुमच्या अगदीं सन्निध येऊन बसोत. ॥ २१ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ४२ (शकुन् इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्रः छन्दः-त्रिष्टुप्
कनि॑क्रदज्ज॒नुषं॑ प्रब्रुवा॒ण इय॑र्ति॒ वाच॑मरि॒तेव॒ नाव॑म् ॥
कनिक्रदत् जनुषं प्रऽब्रुवाण इयर्ति वाचं अरिताऽइव नावं ॥
वारंवार सुस्वर आवाज काढून आपण केवढ्या उत्तम जातीचे पक्षी आहों हें वरचेवर सांग्ण्याकरितांच की काय हा कपिंजल पक्षी, कर्णधाराने नौका बेधडक हांकावी त्याप्रमाणे आपला मधुर आवाज अगदीं खुला सोडून देत आहे. तर हे पक्षीश्रेष्ठा, तूं आम्हांस मंगल शकुन कर. गुप्त किंवा उघड असा कोणताही घाला तुझावर कधींही येणार नाही. ॥ १ ॥
मा त्वा॑ श्ये॒न उद्व॑धी॒न्मा सु॑प॒र्णो मा त्वा॑ विद॒दिषु॑मान्वी॒रो अस्ता॑ ॥
मा त्वा श्येनः उत् वधीत् मा सुऽपर्णः मा त्वा विदत् इषुऽमान् वीरः अस्ता ॥
ससाणा किंवा गरुड हे तुझा घात न करोत. धनुष्यबाण हातांत घेतलेल्या तिरंदाज पारध्याकडून सुद्धां तुला यत्किंचित् धक्का न लागो. तूं पितृदिशेच्या बाजूला पुनः पुनः शब्द करून आम्हांला मंगल व कल्याणप्रद अशी सुवार्ता कथन कर. ॥ २ ॥
अव॑ क्रन्द दक्षिण॒तो गृ॒हाणां॑ सुम॒ङ्ग॒लो॑ भद्रवा॒दी श॑कुन्ते ॥
अव क्रन्द दक्षिणतः गृहाणां सुऽमङ्गंलः भद्रऽवादी शकुन्ते ॥
हे कपिंजल पक्षा, तूं मंगल व कल्याणप्रद सुवार्ता आणतोस तर भक्तजनांच्या घरांच्या उजव्या बाजूस आपला शब्द कर. चोर किंवा पातकी ह्यांचे वर्चस्व आमच्यावर कधींही न होवो. आणि आमच्या शूर वीरांसहवर्तमान यज्ञसभेमध्यें देवांचे महद्यश वर्णन करीत राहूं असें घडो. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ४३ (शकुन् इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्रः छन्दः-जगती
प्र॒द॒क्षि॒णिद॒भि गृ॑णन्ति का॒रवो॒ वयो॒ वद॑न्त ऋतु॒था श॒कुन्त॑यः ॥
प्रऽदक्षिणित् अभि गृणन्ति कारवः वयः वदन्तः ऋतुऽथा शकुन्तयः ॥
कपिंजल पक्षी हेच कोणी कवि, तारुण्याचे आलाप काढून योग्य काळीं दक्षिण दिशेकडे सुस्वर गायन करीत असतात. सामगायनांत प्रवीण अशा गायकाप्रमाणें ते दोन्ही प्रकारचे ध्वनि काढीत असतात. गायत्र आणि त्रिष्टुभ ह्या दोन्ही प्रकारच्या बहारीच्या लकेर्या ते मारीत असतात. ॥ १ ॥
उ॒द्गा्॒तेव॑ शकुने॒ साम॑ गायसि ब्रह्मपु॒त्र इ॑व॒ सव॑नेषु शंससि ॥
उद्गाकताऽइव शकुने साम गायसि ब्रह्मऽपुत्रःऽइव सवनेषु शंससि ॥
हे कपिंजला, सामगायनांत प्रवीण अशा उद्गात्याप्रमाणें तूं सामगायन करतोस. ब्रह्मपुत्र नांवाच्या ऋत्विजांप्रमाणे सवनांचे प्रसंगी तूं देवाचें गुण संकीर्तन करतोस. तुझी बाल्यावस्था असूनही एखादा वीर्यशाली योद्धा ज्याप्रमाणे पराक्रम करतो त्याप्रमाणें हे पक्ष्या सर्व बाजूंनी आमच्यासाठीं मंगल शब्द कर. हे पक्ष्या तूं सर्व बाजूंनी शुभप्रद आणि मधुर असे आलाप काढ. ॥ २ ॥
आ॒वदं॒स्त्वं श॑कुने भ॒द्रमा व॑द तू॒ष्णीमासी॑नः सुम॒तिं चि॑किद्धि नः ॥
आऽवदन् त्वं शकुने भद्रं आ वद तूष्णीं आसीनः सुऽमतिं चिकिद्धि नः ॥
हे पक्ष्या तूं बोलशील तेव्हां कल्याणसूचक अशीच साद घाल. स्तब्ध बसलेला असशील तेव्हां आमचें शुभ चिंतन करीत जा आणि उडत असशील तेव्हां कर्करी ह्या वाद्याप्रमाणें मंजूळ ध्वनि कर आणि आमच्या शूर मित्रांसहवर्तमान यज्ञ सभेंत देवाचें महद्यश वर्णन करीत रहावें अशी प्रार्थना कर. ॥ ३ ॥
॥ द्वितीय मण्डलं समाप्तं ॥ |