|
ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त २१ ते ३० ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २१ (इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
वि॒श्व॒जिते॑ धन॒जिते॑ स्व॒र्जिते॑ सत्रा॒जिते॑ नृ॒जित॑ उर्वरा॒जिते॑ ।
विश्वऽजिते धनऽजिते स्वःऽजिते सत्रा७जिते नृऽजिते उर्वराऽजिते ॥
सर्व विश्व जिंकणारा, अर्थात् सर्व वैभवें जिंकणारा, स्वर्गीय प्रकाश जिंकणारा, असंख्य लोकांस एकदम जिंकणारा, वीरांस जिंकणारा, गोधनें जिंकणारा, आणि दिव्योदकें जिंकणारा असा जो परम पूज्य इंद्र त्याला मधुर सोमरस अर्पण करा. ॥ १ ॥
अ॒भि॒भुवे॑ऽभिभ॒ङ्गा्य॑ वन्व॒तेऽ॑षाळ्हाय॒ सह॑मानाय वे॒धसे॑ ।
अभिऽभुवे अभिऽभङ्गातय वन्वते अषाळ्हाय सहमानाय वेधसे ॥
जो प्रतिस्पर्ध्यांस पादाक्रांत करून राक्षससेनेचा चुराडा उडवितो, जो प्रेमानें भक्तांस आपलेसें करतो, जो अजिंक्य आहे व जो सर्वांवर आपली सत्ता चालवून यथान्याय व्यवस्था लावतो, सिंहासारखी ज्याची गर्जना, जो स्तोत्रनायक आहे, ज्याच्या बलाचा थांग कोणासही लागत नाहीं आणि कोणी कितीही मोठा असो त्याच्यावरही जो आपली सत्ता चालवितो त्या इंद्राचे गुणानुवाद गा. ॥ २ ॥
स॒त्रा॒सा॒हो ज॑नभ॒क्षो ज॑नंस॒हश्च्यव॑नो यु॒ध्मो अनु॒ जोष॑मुक्षि॒तः ।
सत्राऽसहः जनऽभक्षः जनंऽसहः च्यवनः युध्मः अनु जोषं उक्षितः ॥
मोठमोठ्यंना धाकांत ठेवून व सर्व जनांवर प्रभुत्व गाजवून पुनः सर्व लोकांच्या प्रेमादरास पात्र होणारा आणि अढळांसही ढळविणारा हा अत्युत्कृष्ट योद्धा आपल्या इच्छेस येईल तितकें विशाल स्वरूप शरणागत आहे, तर अशा इंद्राच्या पराक्रमप्रचुर महत्कृत्यांचे मी यथामति वर्णन करतो. ॥ ३ ॥
अ॒ना॒नु॒दो वृ॑ष॒भो दोध॑तो व॒धो ग॑म्भी॒र ऋ॒ष्वो अस॑मष्टकाव्यः ।
अननुऽदः वृषभः दोधतः वधः गम्भीरः ऋष्वः असमष्टऽकाव्यः ॥
ज्या अतुलशौर्य महावीरानें त्या क्रूर घातक्यांचा संहार केला, जो गंभीर व अत्यंत धीरोदात्त आहे, ज्याच्या चातुर्याचा अंतपार लागत नाहीं, जो धनाढ्यांनाही प्रेरणा करतो व दुष्टांचा धुव्वा उडवितो, जो अतिशय बलाढ्य व व्यापक आहे आणि ज्याचा यज्ञ सुखवर्धकच असतो त्या ह्या इंद्रानें उषःकाल व सूर्य ह्यांना उत्पन्न केलें. ॥ ४ ॥
य॒ज्ञेन॑ गा॒तुम॒प्तुरो॑ विविद्रिरे॒ धियो॑ हिन्वा॒ना उ॒शिजो॑ मनी॒षिणः॑ ।
यज्ञेन गातुं अप्ऽतुरः विविद्रिरे धियः हिन्वाना उशिजः मनीषिणः ॥
भगवत् कृपेकरितां अत्युत्सुक झालेल्या ज्ञानी भक्तजनांनी आपलें चित्त इंद्राच्या ठिकाणी निश्चल ठेवले तेव्हांच यज्ञाच्या योगाने त्या दिव्योदकवर्षी इंद्रापासून त्यांना आनंदाचा मार्ग प्राप्त झाला. इंद्राच्या प्रसादाची इच्छा धरून त्यांनी आपलीं पंचेंद्रिये इंद्राला वाहिली तेव्हांच स्तवन आणि उपासना ह्यांच्यायोगानें त्यांना सामर्थ्यसंपत्तीचा लाभ झाला. ॥ ५ ॥
इन्द्र॒ श्रेष्ठा॑नि॒ द्रवि॑णानि धेहि॒ चित्तिं॒ दक्ष॑स्य सुभग॒त्वम॒स्मे ।
इन्द्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि चित्तिं दक्षस्य सुभगऽत्वं अस्मे इति ॥
हे इंद्रा, अत्यंत श्रेष्ठ अशा ज्याच्या संपत्ति आहेत त्या आमच्या हातीं ठेव. आमच्या ठिकाणीं सुविचार असूं दे व कर्तबगारीनेंच जो भाग्योदय होतो तोच आम्हांस दे. आमच्या ठिकाणीं सर्व ऐश्वर्याचा उत्कर्ष कर, आमच्या शरीरांत आरोग्य, वाचेंत रसवत्ता, आणि हरएक दिवसामध्यें तुझी मंगल कृपा असूं दे. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २२ (इंद्राचे पालुपद सूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-अष्टिः
त्रिक॑द्रुकेषु महि॒षो यवा॑शिरं तुवि॒शुष्म॑स्तृ॒पत्सोम॑मपिब॒द्विष्णु॑ना सु॒तं यथाव॑शत् ।
त्रिकद्रुकेषु महिषः यवऽआशिरं तुविऽशुष्मः ।
इंद्र हा महाप्रबल व ह्याचा दरारा अतिशयच. ह्यानें त्रिकद्रुक उत्सवांत विष्णूच्या रूपानें तृप्ति होईपर्यंत यथेच्छ सोमरस प्राशन केला तेव्हां सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापी इंद्रानें अघटित पराक्रम करावे म्हणूनच कीं काय त्याच्या अंगी त्या रसानें विलक्षण वीरश्री उत्पन्न झाली. ह्या करितां तो दिव्य व सत्यप्रभाव रस ह्या सत्यस्वरूप इंद्राच्या ठिकाणी - ह्या देवाच्या ठिकाणी - पूर्णपणें लीन होवो. ॥ १ ॥
अध॒ त्विषी॑माँ अ॒भ्योज॑सा॒ क्रिविं॑ यु॒धाभ॑वदा रोद॑सी अपृणदस्य म॒ज्मना॒ प्र वा॑वृधे ।
अध त्विषीऽमान् अभि ओजसा क्रिविं युधा अभवत् ।
जाज्वल्य इंद्राने आपल्या पराक्रमाच्या तेजानें क्रिवि राक्षसास युद्धांत पराजित करून आणि आकाश व पृथ्वी ह्यांना व्यापून टाकून तो त्या रसाच्या वीरश्रीनें पुनः ज्यास्तच मोठा झाला. त्याचप्रमाणें इंद्रानें सोमरसाला आपल्या अंगांत जागा दिली असतां तेथें तो त्याच्यापेक्षांही जास्त वृद्धिंगत होऊं लागला. तेव्हां तो दिव्य व सत्यप्रभाव रस ह्या सत्यस्वरूप इंद्राच्या ठिकाणी - ह्या देवाच्या ठिकाणी - पूर्णपणें लीन होवो. ॥ २ ॥
सा॒कं जा॒तः क्रतु॑ना सा॒कमोज॑सा ववक्षिथ सा॒कं वृ॒द्धो वी॑र्याइः सास॒हिर्मृधो॒ विच॑र्षणिः ।
साकं जातः क्रतुना साकं ओजसा ववक्षिथ ।
महत्कृत्यें घडवून आणणारी जी तुझी प्रज्ञा त्या प्रज्ञेनें युक्त होऊनच तूं प्रकट झालास; आपल्या पराक्रमाच्या तेजाबरोबरच तूं विस्तृत झालास आणि तूं सर्वसाक्षी आपल्या शौर्यासह प्रबल होऊन दुष्ट शत्रूंना पादाक्रांत केलेंस; स्तोतृजनाला आपला कृपाप्रसाद आणि अनुपम वैभव अशीं दोन्ही देणारा तूंच आहेस, तर तो दिव्य व सत्यप्रभाव रस ह्या सत्यस्वरूप इंद्राच्या ठिकाणी - ह्या देवाच्या ठिकाणी - पूर्णपणें लीन होवो. ॥ ३ ॥
तव॒ त्यन्नर्यं॑ नृ॒तोऽ॑प इन्द्र प्रथ॒मं पू॒र्व्यं दि॒वि प्र॒वाच्यं॑ कृ॒तम् ।
तव त्यन् नर्यं नृतो इति अपः इन्द्र प्रथमं पूर्व्यं दिवि प्रऽवाच्यं कृतं ।
हे रणभैरव इंद्रा, अगदी प्रथम, पुरातन आणि सर्व जगाला हितकर असा तुझा पराक्रम हा आहे कीं, तूं आपल्या ईश्वरी सामर्थ्यानें दिव्य उदकें मुक्त करून ह्या पृथ्वीवर प्राणज्योति पाठवून दिलीस. इंद्रानें देव पराङ्मुख अशा सर्व दुर्जनांना आपल्या प्रतापतेजानें हतवीर्य करून टाकलें. तेव्हां हा अमितप्रज्ञ देव आमच्या अंगीं शौर्यतेज उत्पन्न करो आणि उत्साहही उत्पन्न करो. ॥ ४ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २३ (बृहस्पतिसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-बृहस्पतिः छन्दः-जगती
ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑तिं हवामहे क॒विं क॑वी॒नामु॑प॒मश्र॑वस्तमम् ॥
गणानां त्वा गणऽपतिं हवामहे कविं कवीनां उपमश्रवःऽतमं ॥
समुदायांचा प्रभु म्हणून तूं गणपति, तूं ज्ञानीजनांत अत्यंत ज्ञानी; ज्यांची कीर्ति अतिशय उत्कृष्ट त्यांच्यामध्येंही तूं श्रेष्ठ. तूं राजाधिराज, तुला आम्ही आदरानें बोलावतो. हे स्तुतींच्या प्रभो ब्रह्मणस्पते, आमची हांक ऐकून आपल्या सर्व शक्तीसह त्वरेनें ये आणि ह्या आसनावर विराजमान हो. ॥ १ ॥
दे॒वाश्चि॑त् ते असुर्य॒ प्रचे॑तसो॒ बृह॑स्पते य॒ज्ञियं॑ भा॒गमा॑नशुः ॥
देवाः चित् ते असुर्य प्रऽचेतसः बृहस्पते यज्ञियं भागं आनशुः ॥
हे बृहस्पते, हे परमात्मन्, देवांनाही तुझ्या ज्ञानशालित्वामुळेंच यज्ञामध्यें हविर्भाग प्राप्त आहे. आणि देदीप्यमान सूर्य जसा आपल्या तेजानें उषेची प्रभा उत्पन्न करतो, तसा तूंच एक आमच्या सर्व प्रार्थनास्तोत्रांचा उत्पन्न कर्ता आणि पिता आहेस. ॥ २ ॥
आ वि॒बाध्या॑ परि॒राप॒स्तमां॑सि च॒ ज्योति॑ष्मन्तं॒ रथ॑मृ॒तस्य॑ तिष्ठसि ॥
आ विबाध्या परिरापः तमांसि च ज्योतिष्मंतं रथं ऋतस्य तिष्ठसि ॥
निंदक आणि अंधकार ह्या दोहोंनाही आपल्या तेजानें नाहींसे करून टाकून, सत्यधर्माचा जो तेजोमय रथ त्याच्याचमध्यें बसून तूं जात असतोस. हे बृहस्पते, तो सत्याचा रथ उग्र असून दुष्टांचा नाश करणारा, राक्षसांचा उच्छेद करणारा, ज्ञानरूप धेनूंना कोंडून धरणार्या दुर्गांचा विध्वंस करणारा आणि स्वर्ग मिळवून देणारा असा आहे. ॥ ३ ॥
सु॒नी॒तिभि॑र्नयसि॒ त्राय॑से॒ जनं॒ यस्तुभ्यं॒ दाशा॒न्न तमंहो॑ अश्नवत् ॥
सुनीतिऽभिः नयसि त्रायसे जनं यः तुभ्यं दाशात् न तं अंहः अश्नवत् ॥
तूं लोकांना सदाचरणाच्याच मार्गांनी नेऊन त्यांचे रक्षण करतोस. जो तुझी अनन्य भावानें भक्ति करतो त्याला पातक किंवा क्लेश हे स्पर्शही करूं शकत नाहींत. तूं ब्रह्मद्वेष्ट्याला त्राहि त्राहि करून सोडून, त्याचा क्रोध निरर्थक करतोस. तेव्हां हे बृहस्पते, हा तुझा मोठाच महिमा होय. ॥ ४ ॥
न तमंहो॒ न दु॑रि॒तं कुत॑श्च॒न नारा॑तयस्तितिरु॒र्न द्व॑या॒विनः॑ ॥
न तं अंहः न दुःऽइतं कुतः चन न अरातयः तितिरुः न द्वयाविनः ॥
हे ब्रह्मणस्पते, भक्तरक्षणाविषयीं अत्यंत तत्पर असा तूं ज्या भक्ताचें संरक्षण करतोस त्याला पातकाची बाधा होत नाही, त्याच्यावर कोठून कसलेंही संकट येत नाहीं, आणि दुष्ट शत्रु काय किंवा कपटी नीच काय, कोणीही त्याच्यावर आपला पगडा बसविला असें कधींही होत नाही. कारण सन्मार्गापासून भ्रष्ट करणार्या सर्वच दुरात्म्यांना तूं आपल्या भक्तांपासून दूर हांकून लावतोस. ॥ ५ ॥
त्वं नो॑ गो॒पाः प॑थि॒कृद्वि॑चक्ष॒णस्तव॑ व्र॒ताय॑ म॒तिभि॑र्जरामहे ॥
त्वं नः गोपाः पथिःकृत् विऽचक्षणः तव व्रताय मतिऽभिः जरामहे ॥
सर्वद्रष्टा असा तूं आमचा त्राता आणि सन्मार्गदर्शक आहेस. तुझ्या आज्ञेवरूनच आम्ही माननीय अशा स्तोत्रांनी भजन करीत असतों, म्हणून हे बृहस्पते, आमचा घात करण्याकरितां जो कोणी आमच्याशी कौटिल्य लढवील, त्याची ती दुष्ट क्रिया खाडकन् त्याचाच नाश करो. ॥ ६ ॥
उ॒त वा॒ यो नो॑ म॒र्चया॒दना॑गसोऽराती॒वा मर्तः॑ सानु॒को वृकः॑ ॥
उत वा यः नः मर्चयात् अनागसः अरातीऽवा मर्तः सानुकः वृकः ॥
अथवा आमच्याशी वैर धरणारा व गर्वानें ताठून जाऊन परवित्ताचा अपहार करणारा जो जो मनुष्य आम्हांला, तुझ्या निरपराधी भक्तांना पेंचात आणूं पाहील त्याला, हे बृहस्पती, तूं आमच्या वाटेंतून कायमचा काढून टाक आणि देवसेवा आमच्या हातून व्हावी म्हणून आमचा मार्ग सुगम कर. ॥ ७ ॥
त्रा॒तारं॑ त्वा त॒नूनां॑ हवाम॒हेऽ॑वस्पर्तरधिव॒क्तार॑मस्म॒युम् ॥
त्रातारं त्वा तनूनां हवामहे अवऽस्पर्तः अधिऽवक्तारं अस्मऽयुं ॥
जगत्तारका, आमचा पाठिराखा आणि आम्हांवर प्रेम करून आमचें सांत्वन करणारा असा तूं त्या तुझा आम्हीं धांवा करीत आहों. तर हे बृहस्पते, देवनिंदकांचा तूं निःपात कर आणि उत्कृष्ट सुखाचें जें निधान आहे तें पापबुद्धि दुष्टांस मिळालें असें होऊं देऊं नको. ॥ ८ ॥
त्वया॑ व॒यं सु॒वृधा॑ ब्रह्मणस्पते स्पा॒र्हा वसु॑ मनु॒ष्या द॑दीमहि ॥
त्वया वयं सुऽवृधा ब्रह्मणः पते स्पार्हा वसु मनुष्या आ ददीमहि ॥
आमची उन्नति तुझ्या हातीं, म्हणून हे ब्रह्मणस्पति, तुझ्या कृपेनें स्पृहणीय आणि लोकहितकर अशा वैभवाचा लाभ आम्हांस होवो; व आमच्याशीं वैर करणारे जे जे दुष्ट बाजूस उभे राहून किंवा प्रत्यक्ष आमच्यावर घाला घालतील, त्या कर्मनष्टांचा तूं चुराडा करून टाक. ॥ ९ ॥
त्वया॑ व॒यमु॑त्त॒मं धी॑महे॒ वयो॒ बृह॑स्पते॒ पप्रि॑णा॒ सस्नि॑ना यु॒जा ॥
त्वया वयं उत्तमं धीमहे वयः बृहस्पते पप्रिणा सस्निना युजा ॥
हे बृहस्पती, तूं आमचे मनोरथ पूर्ण करणारा उदार सहकारी आहेस. म्हणून तुझ्या दयेनें आम्हीं तारुण्याचा अस्सल जोम कायम राखूं शकतो. तेव्हां अभद्र भाषण करणारे आणि घातपात करणारे दुष्ट ह्यांचा अधिकार आमच्यावर चालूं देऊं नको, आणि सत् भाषण करणारे जे आम्ही त्या आमचा शुद्ध अंतःकरणाच्या योगानें उत्कर्ष होईल असें कर. ॥ १० ॥
अ॒ना॒नु॒दो वृ॑ष॒भो जग्मि॑राह॒वं निष्ट॑प्ता॒ शत्रुं॒ पृत॑नासु सास॒हिः ॥
अननुऽदः वृषभः जग्मिः आऽहवं निःतप्ता शत्रुं पृतनासु ससहिः ॥
तूं अतुल शौर्यवान वीरश्रेष्ठ व युद्धांकरितां धांवून जाणारा आहेस. तूं शत्रूला होरपळून टाकून संग्रामांत सदैव विजय संपादन करणारा आहेस. तूं सत्य आहेस आणि म्हणूनच हे ब्रह्मणस्पती, तूं भक्तांचे ऋण फेडल्याशिवाय कधीही रहात नाहींस; व कसाही घोर विषयांध मनुष्य असो त्याची धुंदी तूं पार उतरून टाकतोस. ॥ ११ ॥
अदे॑वेन॒ मन॑सा॒ यो रि॑ष॒ण्यति॑ शा॒सामु॒ग्रो मन्य॑मानो॒ जिघां॑सति ॥
अदेवेन मनसा यः रिषण्यति शासां उग्रः मन्यमानः जिघांसति ॥
हे बृहस्पती, पूर्णपणें नास्तिक बनलेल्या आपल्या अंतःकरणानें जो तुझ्या भक्तांचा नाश करणयाची बुद्धि धरतो आणि आपण मोठे भयंकर आहों अशा घमेंडीने आम्हांस ठार मारूं पहातो, त्याच्या त्या मारक शस्त्राचा वार आम्हांस लागूं नये, इतकेच नव्हे तर साधूंचा उपमर्द करणार्या त्या घातकी दुष्टाच्या क्रोधाची रग आम्हींच जिरवूं असें कर. ॥ १२ ॥
भरे॑षु॒ हव्यो॒ नम॑सोप॒सद्यो॒ गन्ता॒ वाजे॑षु॒ सनि॑ता॒ धनं॑धनम् ॥
भरेषु हव्यः नमसा उपऽसद्यः गन्ता वाजेषु सनिता धनंऽधनं ॥
आनंदाच्या भरांतही तुझे स्मरण केले पाहिजे, आणि सेवा लीन होऊनच केली पाहिजे. तूं युद्धाच्या गर्दींत सहज घुसतोस व हरएक प्रकारची संपत्ति भक्तांना देतोस. तर हे बृहस्पति देवा, संग्रामामध्यें शत्रूंच्या रथाचे तुकडे तुकडे करावे त्याप्रमाणें देव भक्तिहीन व घातपात करणार्या अधमांचे तूं निर्दाळण कर. ॥ १३ ॥
तेजि॑ष्ठया तप॒नी र॒क्षस॑स्तप॒ ये त्वा॑ नि॒दे द॑धि॒रे दृ॒ष्टवी॑र्यम् ॥
तेजिष्ठया तपनी रक्षसः तप ये त्वा निदे दधिरे दृष्टऽवीर्यं ॥
तुझा पराक्रम स्पष्ट दिसत असून सुद्धां पुनः ज्यांनी ज्यांनी तुझी निंदा केली असेल त्या दुष्ट राक्षसांना तूं आपल्या अत्यंत प्रखर तेजाच्या ज्वालेनें जाळून भस्म कर. हे बृहस्पति अत्यंत प्रशंसनीय असें तुझें शौर्य आहे तें प्रकट कर आणि निंदकांचा धुव्वा उडवून दे. ॥ १४ ॥
बृह॑स्पते॒ अति॒ यद॒र्यो अर्हा॑द्द्यु॒मद्वि॒भाति॒ क्रतु॑म॒ज्जने॑षु ॥
बृहस्पते अति यत् अर्यः अर्हात् द्युऽमत् विऽभाति क्रतुऽमत् जनेषु ॥
हे बृहस्पति, ज्या ऐश्वर्याला भक्तीहीन मनुष्य कधींच पात्र होत नाहीं, जें देदीप्यमान व प्रज्ञाबलशाली असल्यामुळेंच लोकांत अतिशय सुशोभित दिसतें आणि जें आपल्या अंगच्या प्रभावनें प्रकाशित होतें हे सत्यधर्म रक्षणार्थ प्रकट होणार्या देवा, तें अद्भुत ऐश्वर्य आम्हांस देण्याची कृपा कर. ॥ १५ ॥
मा नः॑ स्ते॒नेभ्यो॒ ये अ॒भि द्रु॒हस्प॒दे नि॑रा॒मिणो॑ रि॒पवोऽ॑न्नेषु जागृ॒धुः ॥
मा नः स्तेनेभ्यः ये अभि द्रुहः पदे निरामिणः रिपवः अन्नेषु जगृधुः ॥
आहे त्यांत संतोष मानून राहणार्या सज्जनाविषयीं जे दुष्ट शत्रू मनामध्यें डाव धरून त्याच्या धनाचा अपहार करतात अशा दुष्ट चोरांच्या हातीं आम्हांस देऊं नको. देवांची हेळसांड करावी अशी कुबुद्धि ते वागवीत असतात, आणि हे बृहस्पति भक्तजन मात्र तुझें स्तवन करणें ह्याच्या पलिकडे कांहींच जाणत नाहींत. ॥ १६ ॥
विश्वे॑भ्यो॒ हि त्वा॒ भुव॑नेभ्य॒स्परि॒ त्वष्टाज॑न॒त्साम्नः॑साम्नः क॒विः ॥
विश्वेभ्यः हि त्वा भुवनेभ्यः परि त्वष्टा अजनत् साम्नःऽसाम्नः कविः ॥
त्रैलोक्यापेक्षां वरचढ अशा तुला स्वष्ट्यानें प्रकट केलें. प्रत्येक सामगायनाची रचना करणारा जो कवि तोच हा ब्रह्मणस्पति भक्तांचे भक्तिरूप ऋण घेऊन त्याचें पापरूप ऋण फेडीत असतो, आणि श्रेष्ठ अशा सत्यधर्माचें परिपालन करीत असतां संव्हार करून टाकतो. ॥ १७ ॥
तव॑ श्रि॒ये व्यजिहीत॒ पर्व॑तो॒ गवां॑ गो॒त्रमु॒दसृ॑जो॒ यद॑ङ्गि॑रः ॥
तव श्रिये वि अजिहीत पर्वतः गवां गोत्रं उत्ऽअसृजः यत् अङ्गििरः ॥
हे अंगिरसांचा अभिमान बाळगणार्या देवा, ज्ञानरूप धेनूंचा समूह जेव्हां तूं मोकळा करून खाली पाठवून दिलास त्यावेळीं येवढा पर्वत पण तो दुभंग होऊन गेला ही गोष्ट तुझ्याच गौरवाला कारणीभूत झाली. हे बृहस्पते, तूं इंद्राशी एकरूप होऊन, लाटांनी उचंबळून गेलेल्या दिव्य जलांचा संचय अंधकारानें गडप करून टाकला होता तो एकदम खाली कोसळून दिलास. ॥ १८ ॥
ब्रह्म॑णस्पते॒ त्वम॒स्य य॒न्ता सू॒क्तस्य॑ बोधि॒ तन॑यं च जिन्व ॥
ब्रह्मणः पते त्वं अस्य यन्ता सुऽउक्तस्य बोधि तनयं च जिन्व ॥
हे ब्रह्मणसपति, तूंच ह्या आमच्या स्तवनांचा प्रेरक हो. आमच्या पुत्रपौत्रांची उन्नति कर. तुम्ही देव ज्याच्याकडे कृपा दृष्टीनें पहाल तें सर्व मंगलरूपच होते. तर आम्ही आपल्या शौर्यसंपन्न वीरांसह यज्ञ सभेंत तुझे महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १९ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २४ (बृहस्पतिसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-बृहस्पतिः छन्दः-जगती
सेमाम॑विड्ढि॒ प्रभृ॑तिं॒ य ईशि॑षेऽ॒या वि॑धेम॒ नव॑या म॒हा गि॒रा ॥
सः इमा अविड्ढि् प्रभृतिं यः ईशिषे स्या विधेम नवया महा गिरा ॥
आम्हीं अर्पण करण्याकरितां आणलेल्या ह्या उपायनाचा तूं प्रेमाने स्वीकार कर. तूं सर्व समर्थ आहेस, तेव्हां ह्या अपूर्व व उत्कृष्ट स्तोत्रानें तुझी सेवा आम्हांस करूं दे. हे बृहास्पती तुझा दुसरा आत्माच कीं काय असा इंद्र जो भक्तांवर इच्छित लाभांचा पाऊस पाडतो तो प्रशंसाच करील अशी उत्कृष्ट स्तोत्रें करण्यास आमच्या बुद्धिला तूं प्रेरणा कर. ॥ १ ॥
यो नन्त्वा॒न्यन॑म॒न्न्योज॑सो॒ताद॑र्दर्म॒न्युना॒ शम्ब॑राणि॒ वि ॥
यः नन्त्वानि अनमन् नि ओजसा उत अदर्दः मन्युना शम्बराणि वि ॥
देवापुढें नम्र होणें उचित असूनही जे नम्र झाले नाहींत त्यांनासुद्धां ज्यानें आपल्या तेजस्वितेनें आपली मस्तके खाली वांकवावयांस लाविलीं व आपल्या क्रोधाने शंबरांच्या अनेक टोळ्यांची वाताहात करून टाकली तोच हा ब्रह्मणस्पती; त्यानें अचलांनाही उलथूल पाडलें आणि अखिल संपत्ति आपल्याच हतांत अटकावून धरणार्या पर्वताच्या उदरांत प्रवेश केला. ॥ २ ॥
तद्दे॒वानां॑ दे॒वत॑माय॒ कर्त्व॒मश्र॑थ्नन्दृ॒ळ्हाव्र॑दन्त वीळि॒ता ॥
तत् देवानां देवऽतमाय कर्त्वं अश्रथ्नन् दृळ्हा अव्रदन्त वीळिता ॥
देवांमध्यें अत्यंत श्रेष्ठ जो देव त्यालाच साजेल असा ह्याचा पराक्रम आहे. तो हाच कीं अगदी अढळ अशी जी जी म्हणून प्रस्थे होती तींही त्याच्यापुढें डळमळूं लागलीं, आणि अगदीं कठिण होतीं तीं तर लोण्याप्रमाणें अगदीं मऊ झाली. त्यानें भक्ताच्या प्रार्थनेवरून ज्ञान धेनूंना मुक्त केले आणि बलराक्षसाच्या चिंधड्या उडवून व खुद्द अंधकारालाच कोंडून टाकून दिव्यप्रकाशाचें दर्शन सर्वांनाच करविलें. ॥ ३ ॥
अश्मा॑स्यमव॒तम् ब्रह्म॑ण॒स्पति॒र्मधु॑धारम॒भि यमोज॒सातृ॑णत् ॥
अश्मऽआस्यं अवतं ब्रह्मणः पतिः मधुऽधारं अभि यं ओजसा अतृणत् ॥
समुद्ररूप पुष्करणीचें तोंड पाषाणाचें चिणून टाकलें होते, परंतु ब्रह्मणस्पतीनें आपल्या तेजोबलाने तो पाषाण फोडून टाकून मधुर रसाच्या धारा वर्षविणार्या त्या झर्याचें तोंड मोकळे केले. सकल सूर्यकिरण तेथूनच अमृत प्राशन करून भूलोकांतील निर्झरांना उदकानें एकदम भरून तुडुंब करून सोडतात. ॥ ४ ॥
सना॒ ता का चि॒द्भुव॑ना॒ भवी॑त्वा मा॒द्भिः श॒रद्भि॒ र्दुरो॑ वरन्त वः ॥
सना ता का चित् भुवना भवीत्वा मात्ऽभिः शरत्ऽभिः दुरः वरन्त वः ॥
सर्व अद्भुत भुवने मग ती पुरातन असोत कीं पुढे होणारी असोत, तुमच्याकरितां आपली द्वारें कांही महिन्यांनी म्हणा किंवा कांही वर्षांनी म्हणा खास उघडणारच. कारण चातुर्याच्या ज्या व्यवस्था ब्रह्मणस्पतीने करून ठेविल्या आहेत त्या धोरणानें भूलोक व स्वर्गलोक हे दोघेही आपली कामे एकामागून दुसरे ह्याप्रमाणे सहज लीलेने करीतच असतात. ॥ ५ ॥
अ॒भि॒नक्ष॑न्तो अ॒भि ये तमा॑न॒शुर्नि॒धिं प॑णी॒नाम् प॑र॒मं गुहा॑ हि॒तम् ॥
अभिऽनक्षन्तः अभि ये तं आनशुः निऽधिं पणीनां परमं गुहा हितं ॥
दिव्यप्रकाशाचा जो अत्युत्कृष्ट ठेवा पणि राक्षसांनी अगदी गुप्त जागीं दडवून ठेवलेला होता तो हस्तगत करून घेण्याच्या उद्देशाने जे जे सत्पुरुष तेथे आले, ते ते त्या राक्षसांचे मायाजाळ पाहून, त्या कपट जालाचा उपसर्ग पुनः पुनः जिकडून होत असे तिकडेच जाण्याकरितां निघून गेले. ॥ ६ ॥
ऋ॒तावा॑नः प्रति॒चक्ष्यानृ॑ता॒ पुन॒रात॒ आ त॑स्थुः क॒वयो॑ म॒हस्प॒थः ॥
ऋतऽवानः प्रतिऽचक्ष्य अनृता पुनः आ अतः आ तस्थुः कवयः महः पथः ॥
सत्य धर्माचेंच आचरण करणार्या त्या महाज्ञानी ऋषिंनी त्या राक्षसाचे कपट ओळखून पुनः तो निधि हस्तगत करून घेण्याकरितां मोठ्या विलक्षण मार्गाचा अवलंब केला. "हा कोणी भलता सलता नव्हे बरें" असे म्हणून त्यांनी प्रज्वलित अग्नि घेऊन तो आपल्या बाहुबळानें पणि लपून बसले होते त्या पर्वतावर फेंकला. ॥ ७ ॥
ऋ॒तज्ये॑न क्षि॒प्रेण॒ ब्रह्म॑ण॒स्पति॒र्यत्र॒ वष्टि॒ प्र तद॑श्नोति॒ धन्व॑ना ॥
ऋतऽज्येन क्षिप्रेण ब्रह्मणः पतिः यत्र वष्टि प्र तत् अश्नोति धन्वना ॥
सत्य हीच ज्यांची दोरी असे आपले अतिशय जलद बाण सोडणारे धनुष्य हातीं घेऊन त्याच्या योगाने ब्रह्मणस्पति वाटेल त्या ठिकाणीं जाऊन शत्रूंशी गांठ घालतो. तो ज्या बाणांनी प्रहार करतो तेही इतके उत्कृष्ट असतात कीं ते कानापासून सुटतात खरे परंतु त्यांना पाहतां यावे म्हणून मनुष्याप्रमाणेंच डोळे असतात कीं काय असे वाटतें. ॥ ८ ॥
स सं॑न॒यः स वि॑न॒यः पु॒रोहि॑तः॒ स सुष्टु॑तः॒ स यु॒धि ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ ॥
स संऽनयः स विऽनयः पुरःऽहितः स सुऽस्तुतः सः युधि ब्रह्मणः पतिः ॥
ज्यांच्यामध्यें वियोग झाला असतो त्यांना एकत्र करणारा आणि जे एकमेकांवर तुटून पडत असतात त्यांना एकमेकांपासून दूर करणारा हाच. हाच सर्वांचा प्रतिनिधि, आणि युद्ध प्रसंगी मनोभावानें स्तवन करतात तेंही ह्याच ब्रह्मणस्पतीचें. हा खरोखरच दयाशील आहे; पहा कीं एक फक्त मनःपूर्वक स्तोत्र केल्यानेंच हा भक्तांचा सत्वसामर्थ्य व अभीष्ट धन देतो, आणि जो उगवावा म्हणून आतां कांहीच खटपट पडत नाहीं, तो जाज्वल्य सूर्य सुद्धां भक्तांकरितांच तळपत असतो. ॥ ९ ॥
वि॒भु प्र॒भु प्र॑थ॒मं मे॒हना॑वतो॒ बृह॒स्पतेः॑ सुवि॒दत्रा॑णि॒ राध्या॑ ॥
विऽभु प्रऽभु प्रथमं मेहनाऽवतः बृहस्पतेः सुऽविदत्राणि राध्या ॥
औदार्यशील बृहस्पतीचे प्रसाद असे कांही आहेत कीं, मोठे व्यापक, प्रभावसंपन्न, सर्वोत्तम आणि अत्यंत प्रेमपूर्ण असतात. हे जे आपणास अनेक लाभ झालेले आहेत ते सुद्धां ह्या ब्रह्मणस्पतीच्याच कृपेचें फळ. हा भक्ति-प्रेमास सर्वथैव योग्य व अत्यंत सत्वधीर आहे, आणि ह्याच्याच दयेनें देवता व भक्तजन हे दोन्ही वर्ग आणि तशीच सर्व मनुष्यें हीं खुशाल सुखाचा उपभोग घेत असतात. ॥ १० ॥
योऽ॑वरे वृ॒जने॑ वि॒श्वथा॑ वि॒भुर्म॒हामु॑ र॒ण्वः शव॑सा व॒वक्षि॑थ ॥
यः अवरे वृजने विश्वऽथा विऽभुः महां ऊं इति रण्वः शवसा ववक्षिथ ॥
खाली ह्या भूतलावर तूं सर्वतोपरी अत्यंत समर्थ व शूर असून आपल्या पराक्रमानें प्रबल झालेला आहेस इतकेंच नव्हे तर, तूं देवाधिदेव इतर देवतांच्या तुलनेनें पाहिलें तरीही तूं ब्रह्मणस्पती अतिशय व्यापकच आहेस. ह्या यच्चावत् वस्तुजातास वेष्टून राहणारा असाही तूंच एक आहेस. ॥ ११ ॥
विश्वं॑ स॒त्यं म॑घवाना यु॒वोरिदाप॑श्च॒न प्र मि॑नन्ति व्र॒तं वा॑म् ॥
विश्वं सत्यं मघऽवाना युवोः इत् आपः चन प्र मिनन्ति व्रतं वां ॥
हे औदार्यसागर हो, सत्य म्हणून जे जे कांही आहे ते तुमच्याच मुळें आहे; व हे सर्व विश्वही तुमचेंच आहे. प्रत्यक्ष मेघोदकें सुद्धां तुमचा आज्ञाभंग करीत नाहींत; तर हे इंद्रा, हे ब्रह्मणस्पति, रथाला घोडे जोडून त्वरेनें यावे त्याप्रमाणें आमच्या हविरन्नाचा स्वीकार करण्याकरितां त्वरेनें या. ॥ १२ ॥
उ॒ताशि॑ष्ठा॒ अनु॑ शृण्वन्ति॒ वह्न॑यः स॒भेयो॒ विप्रो॑ भरते म॒ती धना॑ ॥
उत अशिष्ठाः अनु शृण्वन्ति वह्नयः सभेयः विप्रः भरते मती धना ॥
ह्या पहा अग्नीच्या अत्यंत चंचल ज्वाला त्यांच्याच शब्दाकडे लक्ष देत आहेत, आणि यज्ञ सभेंतील विद्वान स्तोता अंतःकरणपूर्वक स्तवन करून अभीष्ट संपत्ति प्राप्त करून घेत आहे. जो दौर्जन्याचा पूर्ण तिटकारा व भक्ताच्या भक्ति ऋणाचा यथेच्छ स्वीकार करतो तोच हा युद्धामध्यें पराक्रम गाजविणारा वीर ब्रह्मणस्पति होय. ॥ १३ ॥
ब्रह्म॑ण॒स्पते॑रभवद्यथाव॒शं स॒त्यो म॒न्युर्महि॒ कर्मा॑ करिष्य॒तः ॥
ब्रह्मणः पतेः अभवत् यथाऽवशं सत्यः मन्युः महि कर्म करिष्यतः ॥
एखादा मोठा पराक्रम करावयाचा असला म्हणजे ब्रह्मणस्पतीच्या आवेशाचा परिणाम त्याच्या इच्छेप्रमाणें खरोखरच घडून येतो. पहा कीं त्यानें प्रकाशधेनूंना मुक्त करून आकाशामध्यें त्या निरनिराळ्या वांटून दिल्या त्याबरोबर महानदीचा ओघ जोरानें दोहोंकडे पांगला जावा त्याप्रमाणें त्यांचा समूह चोहोंकडेच फांकला. ॥ १४ ॥
ब्रह्म॑णस्पते सु॒यम॑स्य वि॒श्वहा॑ रा॒यः स्या॑म र॒थ्यो॑३वय॑स्वतः ॥
ब्रह्मणः पते सुऽयमस्य विश्वहा रायः स्याम रथ्यः वयस्वतः ॥
हे ब्रह्मणस्पते, जे निरंतर सुयंत्र चालतें व ज्यांत तारुण्याच्या जोमाची उणीव कधींही भासत नाही, अशा ऐश्वर्याचे मालक आम्हीं होऊं असे कर. आम्हीं वीर आहोंत; तेव्हां आमच्या मंडळींत वीरांनाच जन्म दे. तूं जगन्नायक असूनही स्तोत्ररूपानें तुझा धांवा करावा अशीच तुझी मनीषा असते. ॥ १५ ॥
ब्रह्म॑णस् पते॒ त्वम॒स्य य॒न्ता सू॒क्तस्य॑ बोधि॒ तन॑यं च जिन्व ॥
ब्रह्मणः पते त्वं अस्य यन्ता सुऽउक्तस्य बोधि तनयं च जिन्व ॥
हे ब्रह्मणस्पती तूंच ह्या आमच्या स्तवनाचा प्रेरक हो, आमच्या पुत्रपौत्रांची उन्नति कर. तुम्ही देव ज्याच्याकडे कृपादृष्टीनें पहाल ते सर्व मंगलरूपच होतें तर आम्हीं आपल्या शौर्यसंपन्न मंडळासह यज्ञ सभेंत तुझें वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १६ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २५ (ब्रह्मणस्पति पालुपदसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-बृहस्पतिः छन्दः-जगती
इन्धा॑नो अ॒ग्निं व॑नवद्वनुष्य॒तः कृ॒तब्र॑ह्मा शूशुवद्रा॒तह॑व्य॒ इत् ।
इंधानः अग्निं वनवत् वनुष्यतः कृतऽब्रह्मा शूशुवत् रातऽहव्य इत् ॥
ज्याला ज्याला म्हणून ब्रह्मणस्पती आपलासा म्हणेल, त्या त्या भक्तानें अग्नीला प्रज्वलित करून त्याच्याद्वारें उपासना केली म्हणजे तो भक्त आपल्या घातकी शत्रूंचा खचितच नाश करूं शकेल आणि अशा प्रकारचा जो कोणी भक्त प्रेमपूर्वक प्रार्थना-स्तोत्रें करून हविर्भाग अर्पण करतो, त्याचा निःसंशय उत्तरोत्तर उत्कर्षच होत जाऊन तो आपल्या पुत्रपौत्रांच्या योगाने आपल्या आयुर्मर्यादेपेक्षांही जास्तच जगला असें होईल. ॥ १ ॥
वी॒रेभि॑र्वी॒रान्व॑नवद्वनुष्य॒तो गोभी॑ र॒यिं प॑प्रथ॒द्बोध॑ति॒ त्मना॑ ।
वीरेभिः वीरान् वनवत् वनुष्यतः गोभिः रयिं पप्रथत् बोधति त्मना ॥
ज्या ज्या भक्ताला ब्रह्मणस्पति आपलासा म्हणेल, तो तो भक्त आपल्या शौर्यसंपन्न सैनिकांसह आपल्या शूर परंतु घातकी प्रतिस्पर्ध्यांचा फडशाच उडवील आणि ज्ञान धेनूंच्या द्वाराने आपल्या ऐश्वर्याची मर्यादा सर्व बाजूंनी अधिक अधिकच विस्तृत करून त्या ऐश्वर्याचा स्वतः अनुभवही घेईल आणि त्याच्या पुत्रपौत्रांचाही ब्रह्मणस्पति उत्कर्षच करील. ॥ २ ॥
सिन्धु॒र्न क्षोदः॒ शिमी॑वाँ ऋघाय॒तो वृषे॑व॒ वध्रीँ॑र॒भि व॒ष्ट्योज॑सा ।
सिन्धुः न क्षोदः शिमीऽवान् ऋघायतः वृषाऽइव वध्रीन् अभि वष्टि ओजसा ॥
ज्या ज्या भक्ताला ब्रह्मणस्पति आपलासा म्हणतो तो तो भक्त विद्याकला ह्याच्या सामर्थ्यानें युक्त होतो व खवळलेल्या समुद्राप्रमाणें जोरावत असतो. शत्रु कितीही चिडलेले असोत, एखाद्या दांडग्या रगेल वृषभाला दुबळ्या बैलांची कांहीच क्षिती वाटत नाहीं, त्याप्रमाणें आंगच्या तेजस्वितेमुळे त्याला त्यांची मौजच वाटते. अग्नीच्या प्रखर ज्वालेप्रमाणे त्या भक्ताला कोणीही आवरून धरूं शकत नाहीं. ॥ ३ ॥
तस्मा॑ अर्षन्ति दि॒व्या अ॑स॒श्चतः॒ स सत्व॑भिः प्रथ॒मो गोषु॑ गच्छति ।
तस्मै अर्षन्ति दिव्याः असश्चतः सः सत्वऽभिः प्रथमः गोषु गच्छति ॥
ज्या ज्या भक्ताला ब्रह्मणस्पति आपलासा म्हणतो त्याच्या करितांच दिव्य जलाचे अक्षय ओघ भरून जात असतात. आपल्या सात्विक गुणांनी प्रथम तोच ज्ञान रश्मिच्या समूहांत अवगाहन करतो. आणि त्याच्या सामर्थ्यांत अणुमात्रही कधीं कमीपणा येत नाही, आणि त्याच्या मार्गांत कांहि अडथळा आल्यास आपल्या तेजस्वितेच्या जोरावर त्या विघ्नांना तो रगडून टाकतो. ॥ ४ ॥
तस्मा॒ इद्विश्वे॑ धुनयन्त॒ सिन्ध॒वोऽ॑च्छिद्रा॒ शर्म॑ दधिरे पु॒रूणि॑ ।
तस्मै इत् विश्वे धुनयंत सिन्धवः अच्छिद्रा शर्म दधिरे पुरूणि ॥
ज्या ज्या भक्ताला ब्रह्मणस्पति आपलासा म्हणतो त्याच्याच करितां यच्चावत् महानद्या मोठ्या धडाक्याने वहात जात असतात. अगदीं निर्दोष अशी शेंकडो सुखें ह्या जगांत आहेत तीं त्याच्या करितां राखून ठेविली असतात आणि ज्या आनंदाचा उपभोग खुद्द देव घेतात त्याच आनंदांत राहून तो भाग्यशाली पुरुष उत्कर्ष पावतो. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २६ (बृहस्पतिसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-बृहस्पतिः छन्दः-जगती
ऋ॒जुरिच्छंसो॑ वनवद्वनुष्य॒तो दे॑व॒यन्निददे॑वयन्तम॒भ्यसत् ।
ऋजुः इच् शंसः वनवत् वनुष्यतः देवऽयन् इत् अदेवऽयन्तं अभि असत् ॥
एक खर्या सद्भावनेने देवाची स्तुति करणारा भक्तच घातकी शत्रूंचा निःपात करू शकतो. देवावर निष्ठा ठेवणार्या पुरुषासच देवपराङ्मुख दुर्जनांचा सामाचार घेता येतो. देवाचें कृपाछत्र ज्याच्यावर आहे तोच एक भयंकर युद्ध प्रसंगांत विजयी होतो आणि धर्मविहीन मनुष्याच्याही संपत्तिचा उपभोग देवोपासकच भक्त घेतो. ॥ १ ॥
यज॑स्व वीर॒ प्र वि॑हि मनाय॒तो भ॒द्रं मनः॑ कृणुष्व वृत्र॒तूर्ये॑ ।
यजस्व वीर प्र विहि मनायतः भद्रं मनः कृणुष्व वृत्रऽतूर्ये ॥
हे धर्मनिष्ठ शूर ब्रह्मणस्पतीचे यजन कर. उद्दाम मनुष्याची पर्वा करूं नको. शत्रूंशी युद्ध करण्याच्या वेळीं मन उदार ठेव. ब्रह्मणस्पतीस अर्पण करण्याकरितां हविर्भाग सिद्ध कर. कारण त्याच्यामुळें तूं भाग्यशाली झाला आहेस व आम्हीं सुद्धां ह्या ब्रह्मणस्पतीचीच करुणा भाकीत आहों. ॥ २ ॥
स इज्जने॑न॒ स वि॒शा स जन्म॑ना॒ स पु॒त्रैर्वाजं॑ भरते॒ धना॒ नृभिः॑ ।
सः इइ जनेन सः विशा सः जन्मना सः पुत्रैः वाजं भरते धना नृऽभिः ॥
अंतःकरणांत पूर्णपणे विश्वास धरून सर्व देवांचा पिता जो हा ब्रह्मणस्पती त्याला हवि अर्पण करून त्याची उपासना जो करील तोच आपल्या सर्व प्रजाननांसह, आपल्या आप्तमंडळीसह, आपल्या पुत्रपौत्रांसह आणि आपल्या सैनिकांसह सत्वसामर्थ्य व सर्व संपत्ति ह्यांचा उपभोग घेईल. ॥ ३ ॥
यो अ॑स्मै ह॒व्यैर्घृ॒तव॑द्भि॒वरवि॑ध॒त्प्र तं प्रा॒चा न॑यति॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ ।
यः अस्मै हव्यैः घृतवत्ऽभिः अविधत् प्र तं प्राचा नयति ब्रह्मणः पतिः ॥
जो भक्त घृतयुक्त हविंनी ह्याची आराधना करतो त्याला हा ब्रह्मणस्पती सन्मार्गाने घेऊन जातो. त्याला तो सर्व पातकांपासून मुक्त करतो, त्याचे हानीपासून व दारिद्र्यापासून संरक्षण करतो आणि त्याच्याकरितां वाटतील तितके मोठमोठे व अद्भुत पराक्रम करतो. ॥ ४ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २७ (आदित्यसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-आदित्यः छन्दः-त्रिष्टुप्
इ॒मा गिर॑ आदि॒त्येभ्यो॑ घृ॒तस्नूः॑ स॒नाद्राज॑भ्यो जु॒ह्वा जुहोमि ।
इमाः गिरः आदित्येभ्यः घृतऽस्नूः सनात् राजऽभ्यः जुह्वा जुहोमि ॥
जी स्तोत्रें म्हणत असतांनाच इकडे घृतधाराही अग्निमध्यें पडत असतात अशा सुंदर स्तुति मी नित्य आपल्या मुखाने ह्या आदित्यांना - ह्या राजांना - अर्पण करीत असतो. तर ही आमची प्रार्थना मित्र, अर्यमा व भग हे ऐकोत. आणि स्वतःच्याच अपार सामर्थ्यानिशीं प्रकट होणारा महा चतुर वरुण, आणि अंश हेही ती प्रार्थना ऐकून घेवोत. ॥ १ ॥
इ॒मं स्तोमं॒ सक्र॑तवो मे अ॒द्य मि॒त्रो अ॑र्य॒मा वरु॑णो जुषन्त ।
इमं स्तोमं सऽक्रतवः मे अद्य मित्रः अर्यमा वरुणः जुषन्त ॥
जें एकाचें पराक्रम चातुर्य तेंच सर्वांचे अशा प्रकारच्या एकच स्वरूपाचे मित्र, अर्यमा आणि वरुण माझ्या ह्या स्तोत्राचा स्वीकार करोत. ते सर्वच आदित्य तेजःपुंज, पर्जन्य धारेप्रमाणे निर्मल, निष्पाप, निष्कलंक आहेत. त्यांना कसल्याही संकटापासून धोका पोहोंचत नाही. ॥ २ ॥
त आ॑दि॒त्यास॑ उ॒रवो॑ गभी॒रा अद॑ब्धासो॒ दिप्स॑न्तो भूर्य॒क्षाः ।
त आदित्यासः उरवः गभीराः अदब्धासः दिप्सन्तः भूरिऽअक्षाः ॥
आदित्य हे सर्वव्यापक आणि गंभीर आहेत. त्यांना लबाडी कधींही खपत नाही. ते पातक्यांस शिक्षा करतात. त्यांना असंख्य डोळे आहेत. वाईट कोणते चांगले कोणते तें जीवांच्या अंतःकरणांत असलेलेंही त्यांना लख्ख समजतें. आणि पदार्थ कितीही दूर असोत, ह्या आदित्य राजांना तो अगदी जवळच असतो. ॥ ३ ॥
धा॒रय॑न्त आदि॒त्यासो॒ जग॒त्स्था दे॒वा विश्व॑स्य॒ भुव॑नस्य गो॒पाः ।
धारयन्तः आदित्यासः जगत् स्थाः देवाः विश्वस्य भुवनस्य गोपाः ॥
हे अत्यंत दीप्तिमान आदित्य सर्व स्थावर जंगमांना धारण करून यच्चावत् भुवनांचे परिपालन करीत असतात. ह्यांची बुद्धि अत्यंत विशाल आहे. दैवी सामर्थ्याचे सुद्धां संरक्षण करणारे हे सत्यस्वरूप आदित्य भक्तांचे एकंदर ऋण फेडून टाकतात. ॥ ४ ॥
वि॒द्यामा॑दित्या॒ अव॑सो वो अ॒स्य यद॑र्यमन्भ॒य आ चि॑न्मयो॒भु ।
विद्यां आदित्याः अवसः वः अस्य यत् अर्यमन् भये आ चिन् मयःऽभु ॥
हे आदित्यहो, हे अर्यमन्, संकटांतही जो कल्याणप्रद होतो तो तुमचा कृपेचा आसरा मला मिळो. डोळस मनुष्य खांच खळगे टाळून जपून चालतो, त्याप्रमाणे, हे मित्रावरुण हो, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी वागत असतां संकटांची व पातकांची प्रचंड गर्ता मला चुकवितां येईल असें करा. ॥ ५ ॥
सु॒गो हि वो॑ अर्यमन्मित्र॒ पन्था॑ अनृक्ष॒रो व॑रुण सा॒धुरस्ति॑ ।
सुऽगः हि वः अर्यमन् मित्र पन्थाः अनृक्षरः वरुण साधुः अस्ति ॥
हे अर्यमन्, हे मित्र, हे वरुणा खरोखरच तुमचा मार्ग सुलभ, सर्वोत्कृष्ट आणि निष्कंटक आहे. तर हे आदित्यहो त्यामार्गाने आम्हीं जात असतां आम्हांस आशीर्वाद देऊन ज्या सुखाचा कधींही नाश होणार नाहीं असें सुख आम्हांस द्या. ॥ ६ ॥
पिप॑र्तु नो॒ अदि॑ती॒ राज॑पु॒त्राति॒ द्वेषां॑स्यर्य॒मा सु॒गेभिः॑ ।
पिपर्तु नः अदितिः राजऽपुत्रा अति द्वेषांसि अर्यमा सुऽगेभिः ॥
हे भुवनांचे राजे आदित्य जिच्या पासून प्रकट झाले ती शक्ति अदिति, आणि अर्यमा हे चांगल्या मार्गांनी आम्हांस दुष्टांच्या द्वेष बुद्धिच्या पार घेऊन जावोत. मित्राचा व वरुणाचा आनंदमय आश्रय अतिशय मोठा आहे तर आमची हानि न होतां आमच्या वीर पुरुषांसह तो उत्कृष्ट आश्रय आम्हांस गांठतां येईल असें करा. ॥ ७ ॥
ति॒स्रो भूमी॑र्धारय॒न् त्रीँरु॒त द्यून्त्रीणि॑ व्र॒ता वि॒दथे॑ अ॒न्तरे॑षाम् ।
तिस्रः भूमीः धारयन् त्रीन् उत द्यून् त्रीणि व्रता विदथे अन्तः एषां ॥
आदित्यांनी तिन्ही भूलोक आणि तिन्ही स्वर्लोक धारण केलेले आहेत. व यज्ञांत त्यांच्या संबंधाने करावयाची कर्में तींही तीनच आहेत. आदित्यहो, सत्यधर्माचे प्रतिपालक अशा दृष्टीनें तुमचा महिमा मोठा आहे इतकेंच नव्हे तर हे अर्यमन्, हे मित्रा, हे वरुणा, तो अत्यंत श्रेष्ठही आहे. ॥ ८ ॥
त्री रो॑च॒ना दि॒व्या धा॑रयन्त हिर॒ण्ययाः॒ शुच॑यो॒ धार॑पूताः ।
त्री रोचना दिव्या धारयन्त हिरण्ययाः शुचयः धारऽपूताः ॥
सुवर्णमय म्हणजे अविनाशी, देदीप्यमान व पर्जन्य धारेप्रमाणे अत्यंत पवित्र असे हे आदित्य कधीं झोंप घेत नाहीत किंवा डोळ्यांचे पातें लवेल इतकीसुद्धां विश्रांति घेत नाहींत. ते अव्यंग व त्यांची स्तुति सर्वतोमुखी आहे. हे आदित्य तिन्ही तेजोमय दिव्य लोक धारण करतात ते पुण्यवान् भक्तजनांसाठींच होय. ॥ ९ ॥
त्वं विश्वे॑षां वरुणासि॒ राजा॒ ये च॑ दे॒वा अ॑सुर॒ ये च॒ मर्ताः॑ ।
त्वं विश्वेषां वरुण असि राजा ये च देवाः असुर ये च मर्ताः ॥
हे वरुणा, हे ईश्वरा, देव असोत किंवा मानव असोत सर्वांचाच तूं अधिपति आहेस. जे जे पहावयाचे तें आम्ही उत्तम तऱ्हेने विवेक दृष्टीने पहावे म्हणून आम्हांला पुरी शंभर वर्षें आयुष्य दे. तुझ्या पुरातन व्यवस्थेप्रमाणे ठरून गेलेले जे आमचे आयुष्य आहे ते आम्हांस पूर्णपणे भोगावयास सांपडेल असें कर. ॥ १० ॥
न द॑क्षि॒णा वि चि॑किते॒ न स॒व्या न प्रा॒चीन॑मादित्या॒ नोत प॒श्चा ।
न दक्षिणा वि चिकिते न सव्या न प्राचीनं आदित्याः न उत पश्चा ॥
मला उजवीकडे दिसत नाही आणि डावीकडेही दिसत नाही. हे आदित्यहो पुढें दिसत नाहीं मागेंही दिसत नाही. हे दैवी संपत्तिच्या निधिंनो, प्रामाणिकपणा आणि धैर्य ह्यांनी जरी तुम्ही मला युक्त केले आहे तरी, तुम्ही मार्ग दाखवाल तरच ज्या ठिकाणीं भयाचें नांव सुद्धां नाही अशा ज्ञानमय प्रकाशाचा लाभ मला होईल. ॥ ११ ॥
यो राज॑भ्य ऋत॒निभ्यो॑ द॒दाश॒ यं व॒र्धय॑न्ति पु॒ष्टय॑श्च॒ नित्याः॑ ।
यः राजऽभ्यः ऋतनिऽभ्यः ददाश यं वर्धयन्ति पुष्टयः च नित्याः ॥
सत्यधर्माचा प्रतिपाल करणारे आदित्य राजे ह्यांची जो भक्तिपूर्वक उपासना करतो, व समृद्ध आणि सनातन असे आदित्य ज्या भक्ताचा उत्कर्ष करतात, तो भक्त ऐश्वर्यवान, उदार व धर्म सभेंत नामांकित ठरून सर्वांच्या पुढें रथांत बसून जातो. ॥ १२ ॥
शुचि॑र॒पः सू॒यव॑सा॒ अद॑ब्ध॒ उप॑ क्षेति वृ॒द्धव॑याः सु॒वीरः॑ ।
शुचिः अपः सुऽयवसा अदब्ध उप क्षेति वृद्धऽवयाः सुऽवीरः ॥
जो आदित्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो, तो तेजस्वी आणि अन्याय सहिष्णु होऊन जेथें मृदु हरित तृणाच्छादित भूमींतून दिव्य जलांचे प्रवाह वाहतात अशा स्थळीं तो वास करतो. तारण्याचा जोम त्याच्या ठिकाणी वृद्धिंगत होऊन तो वीरश्रेष्ठ होतो; आणि जवळ जाऊन किंवा लांब राहुन सुद्धां त्याचा घात कोणीही शत्रू करूं शकत नाही. ॥ १३ ॥
अदि॑ते॒ मित्र॒ वरु॑णो॒त मृ॑ळ॒ यद्वो॑ व॒यं च॑कृ॒मा कच्चि॒दागः॑ ।
अदिते मित्र वरुण उत मृळ यत् वः वयं चकृम कत् चित् आगः ॥
हे चिच्छक्ते अदिति, हे मित्रा, हे वरुणा, आम्ही तुमचा जो कांही अपराध केला असेल त्याची आम्हांस क्षमा करा. हे इंद्रा भयरहित आणि अनंत असा जो प्रकाश आहे तेथें मी जाऊन पोहोंचेन असें कर, आणि लांबच लांब व अगदी गडद काळोखाच्या दुर्गरहित रात्री आमच्या पर्यंत येऊं सुद्धां देऊं नको. ॥ १४ ॥
उ॒भे अ॑स्मै पीपयतः समी॒ची दि॒वो वृ॒ष्टिं सु॒भगो॒ नाम॒ पुष्य॑न् ।
उभे इति अस्मै पीपयतः समीची इति संऽईची दिवः वृष्टिं सुऽभगः नाम पुष्यन् ॥
देवकृपेने पुनीत झालेल्या त्या सत्पुरुषाकरितां, एकत्र राहणार्या दोघी द्यावा पृथिवी आकाशांतून आपल्या प्रसाद वृष्टिची रेलचेल करतात. तोच भाग्यशाली पुरुष उत्कर्षाला पावून संग्रामांत जातो आणि इहलोक व परलोक असे दोन्ही लोक जिंकून आपलेसे करतो. त्याला दोन्ही बाजूंची अनुकूलताच असते. ॥ १५ ॥
या वो॑ मा॒या अ॑भि॒द्रुहे॑ यजत्राः॒ पाशा॑ आदित्या रि॒पवे॒ विचृ॑त्ताः ।
याः वः मायाः अभिऽद्रुहे यजत्राः पाशाः आदित्याः रिपवे विऽचृत्ताः ॥
परमपूज्य आदित्यांनो, साधुजनांचा द्वेष करणार्या दुष्ट शत्रूला शिक्षा करण्यासाठी जे जे मोहपाश तुम्हीं जगांत पसरून दिलेले आहेत त्यांना मी, घोड्यावर स्वार होऊन दौडत गेल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने ओलांडून जाईन असें करा आणि आम्हांस कसलाही उपद्रव न होता अमर्याद व आनंदरूप असा जो तुमचा आश्रय तेथें आम्ही राहूं असें करा. ॥ १६ ॥
माहं म॒घोनो॑ वरुण प्रि॒यस्य॑ भूरि॒दाव्न॒ आ वि॑दं॒ शून॑मा॒पेः ।
मा अहं मघोनः वरुण प्रियस्य भूरिऽदाव्नः आ विदं शूनं आपेः ॥
हे भगवंता वरुणा, धनाढ्य, प्रेमळ आणि अतिशय उदार असा मनुष्य जरी माझा आप्त असला तरीही त्याच्यापाशी आपलें दैन्य सांगून याचना करण्याचा प्रसंग माझ्यावर कधींही येऊं देऊं नको. आणि ह्याकरितां हे विश्वाधीशा अगदी माझीच सत्ता ज्याच्यावर उत्तम रीतीनें चालेल अशा खर्या ऐश्वर्यापासून मला दूर न ठेवतां आमच्या वीर पुरुषांसहवर्तमान यज्ञ सभेमध्यें आम्ही तुझें महद्यश वर्ण करीत राहूं असें कर. ॥ १७ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २८ (वरुणसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-वरुण छन्दः-त्रिष्टुप्
इ॒दं क॒वेरा॑दि॒त्यस्य॑ स्व॒राजो॒ विश्वा॑नि॒ सान्त्य॒भ्यस्तु म॒ह्ना ।
इदं कवेः आदित्यस्य स्वऽराजः विश्वानि सन्ति अभि अस्तु मह्ना ॥
परम प्रज्ञावान्, पूर्ण स्वतंत्र जो आदित्य (ईश्वर) त्याचे हे स्तोत्र आहे, तेव्हां जे जे म्हणून ह्या विश्वांत नांदत आहे त्य सर्वांहून हें स्तोत्र आपल्या महत्वानें श्रेष्ठ होवो. हा देव सद्भक्ताला अतिशय आनंदच देत असतो म्हणून ह्या सर्व समर्थ वरुणापाशी सत्कीर्तिची याचना मी करीत आहे. ॥ १ ॥
तव॑ व्र॒ते सु॒भगा॑सः स्याम स्वा॒ध्यो वरुण तुष्टु॒वांसः॑ ।
तव व्रते सुऽभगासः स्याम सुऽआध्यः वरुण तुस्तुऽवांसः ॥
आम्ही मनःपूर्वक तुझें ध्यान करून स्तवन करीत असतों तर हे वरुणा, आम्ही अत्यंत भाग्यशाली होऊन तुझ्या आज्ञेंतच राहूं असें कर. आपल्या उज्ज्वल प्रकाशासहित उदय पावणारी जी उषा तिचें आगमन होतांच वेदीवर अग्नि प्रज्वलित होतात त्याप्रमाणे तुझें स्तवनही आम्ही न चुकतां प्रत्यही करीत असतो. ॥ २ ॥
तव॑ स्याम पुरु॒वीर॑स्य॒ शर्म॑न्नुरु॒शंस॑स्य वरुण प्रणेतः ।
तव स्याम पुरुऽवीरस्य शर्मन् उरुऽशंसस्य वरुण प्रऽनेतः ॥
तुझ्या आज्ञेत असंख्य वीर वागत आहेत, तुझी स्तुति सर्वतोमुखी होत असते, तर हे वरुणा, हे वीरनायका, तुझ्याच कृपाछत्राखाली आम्हीं राहूं असे कर. देवांनो, त्या चिच्छक्ति अदितिचे तुम्ही पुत्र आहांत, तुम्हांला खोटेपणाचा कधी गंध सुद्धां नाहीं. तर आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा करून आपलेसे म्हणा. ॥ ३ ॥
प्र सी॑मादि॒त्यो अ॑सृजद्विध॒र्ताँ ऋ॒तं सिन्ध॑वो॒ वरु॑णस्य यन्ति ।
प्र सीं आदित्यः असृजत् विऽधर्ता ऋतं सिन्धवः वरुणस्य यन्ति ॥
विश्वप्रतिपालक आदित्य अशा ह्या वरुणानेंच सृष्टीचे आणि धर्माचे अबाधित नियम अस्तित्वांत आणले. महानद्या सुद्धां ह्या वरुणाच्याच सत्य-नियमास अनुसरून वहात असतात. त्या कधी थकत नाहींत व कधीं थांबतही नाहींत, आणि पक्षी आकाशगोलांत झपाट्यानें उडत जातात त्याप्रमाणें ह्या भूगोलावर त्या नद्या वेगानें धांव घेत असतात. ॥ ४ ॥
वि मच्छ्र॑थाय रश॒नामि॒वाग॑ ऋ॒ध्याम॑ ते वरुण॒ खामृ॒तस्य॑ ।
वि मत् श्रथय रशनांऽइव आग ऋध्याम ते वरुण खां ऋतस्य ॥
आम्ही पातकाने जखडलेले आहोत. एखाद्याच्या मुसक्या सोडाव्या त्याप्रमाणे त्या पातकाचा पाश आमच्या पासून दूर कर. हे वरुणा, तुझ्या सत्यरूप धर्मनदीचा ओघ आमच्या उपासनेनें अधिक अधिक फोंफावत जाईल असें होवो. तुझे जे ध्यानरूप वस्त्र मी विणीत असतो तें पुरें होण्यापूर्वीच त्याचे माप तूं कमी होऊं देऊं नको. ॥ ५ ॥
अपो॒ सु म्य॑क्ष वरुण भि॒यसं॒ मत्सम्रा॒ळृता॒वोऽ॑नु मा गृभाय ।
अपो इति सु म्यक्ष वरुण भियसं मत् संऽम्राट् ऋतऽवः अनु मा गृभाय ॥
हे वरुणा, भय कसें ते माझ्या मनांतून काढून टाक. हे विश्वाधिराजा, हे सत्यधर्म प्रतिपालका, मज दीनावर अनुग्रह कर. दाव्याने बांधलेल्या वासराचें दावें तोडून टाकावें त्याप्रमाणें पातकापासून मला मुक्त कर. डोळ्याचे पातें तरी आपण होऊन लववील इतक्या पुरता सुद्धां स्वतःचा मालक तुझ्या सहाय्याशिवाय कोणी नाही. ॥ ६ ॥
मा नो॑ व॒धैर्व॑रुण॒ ये त॑ इ॒ष्टावेनः॑ कृ॒ण्वन्त॑मसुर भ्री॒णन्ति॑ ।
मा नः वधैः वरुण ये ते इष्टौ एनः कृण्वन्तं असुर भ्रीणन्ति ॥
हे ईश्वरा वरुणा, पापाचरण करणार्या अधमाला जीं मारक शस्त्रें तुझ्या आज्ञेनें ठार करतात त्या शस्त्रांनी आमचा नाश होऊं देऊं नको. तुझ्या प्रकाशापासून आम्हांला दूर जाऊं देऊं नको, आणि आम्ही सुखाने जगावें म्हणून दुर्जनांचा संव्हार कर. ॥ ७ ॥
नमः॑ पु॒रा ते॑ वरुणो॒त नू॒नमु॒ताप॒रं तु॑विजात ब्रवाम ।
नमः पुरा ते वरुण उत नूनं उत अपरं तुविऽजात ब्रवाम ॥
हे वरुणा, तूं स्वतः समर्थ आहेस तेव्हां तुला प्रणिपात करून तुझा जयजयकार आम्ही पूर्वी केला आहे, तसाच तो आतांही करीत आहों आणि पुढेंही करूं. कारण कपटजालनाशका देवा, तुझ्या ठिकाणी जी जी कर्में अर्पण करावीं तीं पर्वताच्या ठिकाणी ठेवल्याशिवाय अगदीं अढळ होत ह्यांत संशय नाही. ॥ ८ ॥
पर॑ ऋ॒णा सा॑वी॒रध॒ मत्कृ॑तानि॒ माहं रा॑जन्न॒न्यकृ॑तेन भोजम् ।
परा ऋणा सावीः अध मत्ऽकृतानि मा अहं राजन् अन्यऽकृतेन भोजं ॥
मी केलेली एकंदर ऋणें आणि पातकें तूं नाहीशी कर. हे जगत्प्रभो, दुसर्याने मिळविलेल्या धनावर मी पोट भरावे असा प्रसंग आणूं नको. आणि अद्यापि पुष्कळ प्रभातसमय यावयाचे आहेत, तेव्हां आम्ही तेथपर्यंत आनंदानें जगून वांचून कुशल राहूं अशी तूं आज्ञा कर. ॥ ९ ॥
यो मे॑ राज॒न्युज्यो॑ वा॒ सखा॑ वा॒ स्वप्ने॑ भ॒यं भी॒रवे॒ मह्य॒माह॑ ।
यः मे राजन् युज्यः वा सखा वा स्वप्ने भयं भीरवे मह्यं आह ॥
हे जगत्प्रभो, मला आपलासा म्हणणारा माझा कोणी आप्त किंवा मित्र स्वप्नांत मी भ्यालों असतांना मला त्या दुःस्वप्नाचें जास्त भय दाखवील, अथवा कोणी चोर किंवा क्रूर दुष्ट आमचा घात करूं पहात असेल, तर ह्या सर्वांपासून हे वरुणा, तूं आमचे संरक्षण कर. ॥ १० ॥
माहं म॒घोनो॑ वरुण प्रि॒यस्य॑ भूरि॒दाव्न॒ आ वि॑दं॒ शून॑मा॒पेः ।
माहं मघोनः वरुण प्रियस्य भूरिदाव्न आ विदं शूनं आपेः ॥
हे भगवंता वरुणा, कोणी धनाढ्य प्रेमळ आणि अतिशय उदार असा माझा आप्त असला तरी त्याच्यापाशी सुद्धां आपले दैन्य सांगून याचना करण्याचा प्रसंग माझ्यावर कधींही येऊं देऊं नको. आणि ह्याकरितां हे विश्वाधिपा माझीच सत्ता ज्याच्यावर उत्तम रीतीने चालेल अशा खर्या ऐश्वर्यापासून मला दूर न ठेवतां आमच्या वीर पुरुषांसहवर्तमान यज्ञसभेंत आम्हीं तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २९ (विश्वेदेवसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-विश्वेदेवा छन्दः-त्रिष्टुप्
धृत॑व्रता॒ आदि॑त्या॒ इषि॑रा आ॒रे मत्क॑र्त रह॒सूरि॒वागः॑ ।
धृतऽव्रताः आदित्याः इषिराः आरे मत् कर्त रहसूःऽइव आगः ॥
विधिनियम प्रतिपालक आदित्यहो, तुम्ही अंतःकरणांत उत्साह उत्पन्न करणारे आहांत. तर गुप्तपणें प्रसूत होणार्या व्यभिचारिणी स्त्रियांना लोकांतून काढून लावतात त्याप्रमाणें पातकाचें माझ्यांतून उच्चाटन करा. हे वरुणा, मित्रा, हे देवांनो, तुम्ही भक्तांचे कल्याणच करतां हे मला माहीत आहे; तुम्ही आमच्या विनवणीकडे लक्ष देतां तेव्हां तुमचा प्रसाद व्हावा म्हणून मी तुमची प्रार्थना करीत आहे. ॥ १ ॥
यू॒यं दे॑वाः॒ प्रम॑तिर्यू॒यमोजो॑ यू॒यं द्वेषां॑सि सनु॒तर्यु॑योत ।
यूयं देवाः प्रऽमतिः यूयं ओजः यूयं द्वेषांसि सनुतः युयोत ॥
हे देवांनो, आमच्या बर्यावाइटाची काळजी तुम्हांला, आणि तुम्हीच आमचे सत्वबल, तेव्हां आंतून गुप्तपणाने सज्जनांचा द्वेष करणार्या अपराधांची क्षमा करा; पातकांचा समूळ नाश करणारे तुम्हीं आहांत, तर आम्हांस अपराधांची क्षमा करा. आणि सध्यांच्या प्रमाणें पुढेंही आम्हांवर तुमची अशीच कृपा असूं द्या. ॥ २ ॥
किमू॒ नु वः॑ कृणवा॒माप॑रेण॒ किं सने॑न वसव॒ आप्ये॑न ।
किं ऊं इति नु वः कृणवाम अपरेण किं सनेन वसवः आप्येन ॥
हे दिव्यधनाच्या निधीनो, आतांही ते तसेंच आहे परंतु त्याबद्दल आम्हीं तुमचे उतराई कसे होणार ? तरी हे मित्रावरुणांनो, हे अदिति, हे इंद्र आणि मरुत्हो तुम्हीं आमचे कल्याणच करा म्हणजे झाले. ॥ ३ ॥
ह॒ये दे॑वा यू॒यमिदा॒पयः॑ स्थ॒ ते मृ॑ळत॒ नाध॑मानाय॒ मह्य॑म् ।
हये देवाः यूयं इत् आपयः स्थ ते मृळत नाधमानाय मह्यं ॥
देवांनो, आमचे आईबाप आप्तबंधु सर्व तुम्हींच. मी तुमच्यापुढें पदर पसरीत आहे तर मजवर कृपा करा. आमच्या ह्या यज्ञाकडे येतांना तुम्ही आपल्या रथाचा वेग मंद करूं नका. आणि तुमच्या सारखे खरे आप्त बांधव असतांनाही आमचे हाल झाले असे होऊं देऊं नका. ॥ ४ ॥
प्र व॒ एको॑ मिमय॒ भूर्यागो॒ यन्मा॑ पि॒तेव॑ कित॒वं श॑शा॒स ।
प्र वः एकः मिमय भूरि आगः यत् मा पिताऽइव कितवं शशास ॥
मी एकट्यानेच तुमचे कितीतरी अपराध केलेले असतील आणि म्हणूनच बापानें आपल्या दुर्वर्तनी मुलास शासन करावें त्याप्रमाणें तुम्हींही मला शिक्षा केलीत, तर देवांनो आतांतरी आपले पाश काढून घ्या आणि पातकांस माझ्यापासून अगदी दूर न्या आणि पिल्लाच्या देखत ताटातूट करून त्याच्या आईस पकडून न्यावे त्याप्रमाणे माझी दुर्दशा करूं नका. ॥ ५ ॥
अ॒र्वाञ्चो॑ अ॒द्या भ॑वता यजत्रा॒ आ वो॒ हार्दि॒ भय॑मानो व्ययेयम् ।
अर्वाञ्चः अद्या भवत यजत्राः आ वः हार्दि भयमानः व्ययेयं ॥
परमपूज्य देवांनो, आज आमच्याकडे आपलें मुख फिरवा. मी गांगरून गेलो आहे, व तुमच्या अगदी हृदयाच्या आंत मी कसातरी येऊन निवार्याला पडेन म्हणतो तर तेथें मला कृपा करून थारा द्या. हे परम पवित्र देवांनो, कोणी क्रूर अधम आमचा घात करूं पाहील तर त्याच्यापासून आमचे रक्षण करा आणि पातकांच्या खळग्यांत आम्हांस पडूं देऊं नका. ॥ ६ ॥
माहं म॒घोनो॑ वरुण प्रि॒यस्य॑ भूरि॒दाव्न॒ आ वि॑दं॒ शून॑मा॒पेः ।
मा अहं मघोनः वरुण प्रियस्य भूरिऽदाव्नः आ विदं श्रूनं आपेः ॥
हे भगवंता वरुणा, एखाद्या धनाढ्य प्रेमळ व अतिशय उदार मनुष्य जरी माझा आप्त असला तरी त्याच्याजवळ सुद्धां आपलें दैन्य सांगून याचना करण्याचा प्रसंग माझ्यावर कधीही येऊं देऊं नको; आणि ह्यासाठी हे विश्वाधिशा अगदीं माझीच सत्ता ज्याच्यावर उत्तम रीतीनें चालेल अशा खर्या ऐश्वर्यापासून मला दूर न ठेवतां आमच्या वीर पुरुषांसहवर्तमान यज्ञसभेंत आम्हीं तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त ३० (अनेक देवतासूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्रः छन्दः-त्रिष्टुप्
ऋ॒तं दे॒वाय॑ कृण्व॒ते स॑वि॒त्र इन्द्रा॑याहि॒घ्ने न र॑मन्त॒ आपः॑ ।
ऋतं देवाय कृण्वते सवित्रे इन्द्राय अहिऽघ्ने न रमन्ते आपः ॥
सत्यधर्म प्रकट करणारा, सृष्टीचा नियामक आणि अहि राक्षसास मारणारा इंद्र, त्यांच्या आज्ञेनेंच उदके वहात असतात, तीं कधी थांबत नाहींत, रात्रंदिवस चाललींच आहेत. तर ती प्रथम उत्पन्न होऊन किती काळ लोटला असावा बरें ? ॥ १ ॥
यो वृ॒त्राय॒ सिन॒मत्राभ॑रिष्य॒त्प्र तं जनि॑त्री वि॒दुष॑ उवाच ।
यः वृत्राय सिनं अत्र अभरिष्यत् प्र तं जनित्री विदुषे उवाच ॥
तो इंद्र आपले शुभ्रतेजस्क वज्र वृत्राकडे आतां फेंकणार इतक्यांतच जगन्माता अदिति हिने त्याचा महिमा ज्ञानीजनांना विदित केला, म्हणूनच त्याच्याच इच्छेस अनुसरून आपल्या प्रवाहाचा मार्ग भूमींतून खोदून काढून धो धो वहात जाणार्या नद्या निरंतर त्याच्याच आज्ञेनें इष्टस्थळी समुद्राकडे जात असतात. ॥ २ ॥
ऊ॒र्ध्वो ह्यस्था॒द् अध्य॒न्तरि॒क्षेऽ॑धा वृ॒त्राय॒ प्र व॒धं ज॑भार ।
ऊर्ध्वः हि अस्थात् अधि अन्तरिक्षे अध वृत्राय प्र वधं जभार ॥
इंद्र हा अंतराळाच्या अगदीं वर उंच उभा राहिला व तेथून त्यानें आपले घातक वज्र वृत्रावर फेंकले. जलवृष्टि करणारा मेघ हेंच वस्त्र परिधान करून तो वृत्रावर धांवून गेला आणि आपल्या लखलखीत तीव्र अस्त्रानें इंद्राने त्या शत्रूस पादाक्रांत केले. ॥ ३ ॥
बृह॑स्पते॒ तपु॒षाश्ने॑व विध्य॒ वृक॑द्वरसो॒ असु॑रस्य वी॒रान् ।
बृहस्पते तपुषा अश्नाऽइव विध्य वृकऽद्वरसः असुरस्य वीरान् ॥
हे सकलस्तुतींच्या नाथा, वृकद्वर नामक लोकांचा जो आपणांस मोठा प्रबल देव म्हणवितो त्याच्या सर्व सैनिकांस तूं विद्युत् प्रहारानें मारल्याप्रमाणें आपल्या जाज्वल्य शस्त्रानें मारून टाक. हे इंद्रा तूं पूर्वीं जसा आपल्या पराक्रमानें दुष्टांचा वध केलास, तसा आतांही आमच्या धर्महीन दुष्ट शत्रूंचा वध कर. ॥ ४ ॥
अव॑ क्षिप दि॒वो अश्मा॑नमु॒च्चा येन॒ शत्रुं॑ मन्दसा॒नो नि॒जूर्वाः॑ ।
अव क्षिप दिवः अश्मानं उच्चा य शत्रुं मन्दसानः निऽजूर्वाः ॥
जो अशनि हातीं घेऊन वीरश्रीच्या हर्षभरानें तू पूर्वीं शत्रूचा निःपात केलास तोच अशनि तूं आज आकाशांतून खालीं फेंक. आम्हांस पुत्रपौत्रांची प्राप्ति करून घ्यावयाची आहे. दैवी समृद्धि आणि ज्ञान धेनूंचाही लाभ करून घ्यावयाचा आहे, तर हे इंद्रा, त्या आनंदाचे आम्हांस वांटेकरी कर. ॥। ५ ॥
प्र हि क्रतुं॑ वृ॒हथो॒ यं व॑नु॒थो र॒ध्रस्य॑ स्थो॒ यज॑मानस्य चो॒दौ ।
प्र हि क्रतुं वृहथः यं वनुथः रध्रस्य स्थः यजमानस्य चोदौ ॥
जो भक्त तुम्हांला प्रिय होतो त्याचे बुद्धिसामर्थ्य तुम्हीं वृद्धिंगत करतां, भक्तिसंपन्न यजमानाला प्रेरणा करणारेही तुम्हींच आहांत, तर इंद्र आणि सोमहो आमच्यावर दया करा आणि ह्या आणिबाणीच्या प्रसंगांतून आमची मुक्तता करा. ॥ ६ ॥
न मा॑ तम॒न्न श्र॑म॒न्नोत त॑न्द्र॒न्न वो॑चाम॒ मा सु॑नो॒तेति॒ सोम॑म् ।
न मा तमत् न श्रमत् न उत तन्द्रत् न वोचाम मा सुनोत् इति सोमं ॥
ईश्वरभक्तीचा मला कधीं त्रास वाटूं नये, त्यामुळें मी थकून गेलो असेंही कधीं होऊं नये. सेवेच्या कामी मला कधीं आळस येऊं नये, किंवा तुम्ही सोमरस अर्पण करून सेवा करूं नका असें अवाक्षरही माझ्या तोंडातून निघूं नये, तोच इंद्र माझे मनोरथ पूर्ण करतो, मला ऐश्वर्य देतो, मला सदुपदेश करतो आणि मी सोमरस अर्पण करूं लागलो असतांना बुद्धिप्रकाश रूप घेऊन मजकडे येतो. ॥ ७ ॥
सर॑स्वति॒ त्वम॒स्माँ अ॑विड्ढि म॒रुत्व॑ती धृष॒ती जे॑षि॒ शत्रू॑न् ।
सरस्वति त्वं अस्मान् अविड्ढि मरुत्वती धृषती जेषि शत्रून् ॥
हे सरस्वती, आमच्याकडे कृपा कटाक्षानें पहा. तूं सुद्धां मरुतांसह शौर्यानें चढाई करून जाऊन शत्रूंना जिंकतेस, आणि इकडेही उन्मत्तपणाने दुसर्याचा अपमान करणारा व अत्याचारी असा जो शंडिकांचा राजा त्याचा वध तर इंद्र करतोच आहे. ॥ ८ ॥
यो नः॒ सनु॑त्य उ॒त वा॑ जिघ॒त्नुर॑भि॒ख्याय॒ तं ति॑गि॒तेन॑ विध्य ।
यः नः सनुत्यः उत वा जिघत्नुः अभिऽख्याय तं तिगितेन विध्य ॥
जो आमच्यावर एकदम छापा घालण्याच्या बेतांत असेल, किंवा आमचा घात करण्याचा ज्याचा डाव असेल त्यांना बिनचूक हुडकून काढून त्यांचा तूं तीव्र शस्त्रानें संहार कर. हे बृहस्पति, तूं आपल्या आयुधांनी शत्रूंना पादाक्रांत करतोसच, तर हे जगत्प्रभो, तूं आपले घातक अस्त्र धर्म द्वेष्ट्यांच्या अंगावर फेंक. ॥ ९ ॥
अ॒स्माके॑भिः॒ सत्व॑भिः शूर॒ शूरै॑र्वी॒र्या कृधि॒ यानि॑ ते॒ कर्त्वा॑नि ।
अस्माकेभिः सत्वऽभिः शूर शूरैः वीर्या कृधि यानि ते कर्त्वानि ॥
हे वीरा, तुला जे जे पराक्रम गाजवावयाचे असतील ते ह्या आमच्या निधड्या शूर सैनिकांना बरोबर घेऊन गाजव; आणि सत्यधर्माचे जे शत्रु आज पुष्कळ दिवस अगदी शेंफारून गेलेले आहेत त्यांचा समूळ धुव्वा उडवून त्यांनी लुबाडलेली संपत्ति आमच्या हाती दे. ॥ १० ॥
तं वः॒ शर्धं॒ मारु॑तं सुम्न॒युर्गि॒रोप॑ ब्रुवे॒ नम॑सा॒ दैव्यं॒ जन॑म् ।
तं वः शर्धं मारुतं सुम्नऽयुः गिरा उप ब्रुवे नमसा दैव्यं जनं ॥
हे मरुतांनो, तुम्ही दिव्यलोकनिवासी देव, तेव्हां सुखप्राप्तीच्या इच्छेने त्या तुमच्या महापराक्रमी सेनेला मी प्रणाम करून उत्तम कवनांनी तिचें यश गात आहे. तर असंख्य शूर सैनिक, स्वाधीनता आणि प्रत्यही वृद्धिंगत होणारी सत्कीर्ति ह्यांनी युक्त अशा ऐश्वर्याचा लाभ आम्हांस होईल असे करा. ॥ ११ ॥
ॐ तत् सत् |