|
ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ११ ते २० ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ११ (इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
श्रु॒धी हव॑म् इन्द्र॒ मा रि॑षण्यः॒ स्याम॑ ते दा॒वने॒ वसू॑नाम् ।
श्रुधि हवं इन्द्र मा रिषण्यः स्याम ते दावने वसूनां ।
हे इंद्रा आमचा धांवा ऐक. आमचा अव्हेर करूं नको. तुझ्या दैवी संपत्तीच्या अनुपम निधींचा लाभ आम्हांस होईल असें कर. आमच्या ओजस्वी स्तुति धनाच्या प्राप्तीसाठीं अगदी उत्कंठीत झाल्या असून नद्यांच्या ओघाप्रमाणें जोरानें त्या तुजकडे वहात येऊन तुला आनंदभरीत करीत आहेत. ॥ १ ॥
सृ॒जो म॒हीरि॑न्द्र॒ या अपि॑न्वः॒ परि॑ष्ठिता॒ अहि॑ना शूर पू॒र्वीः ।
सृजः महीः इन्द्र या अपिन्वः परिऽस्थिताः अहिना शूर पूर्वीः ।
हे शूर इंद्रा, जे विशाल आणि अपार असे स्वर्गीय जलसंचय त्या दुष्ट भुजंगानें वेढून टाकिले होते त्या उचंबळून जाणार्या जलकल्लोळांना तूं मोकळे करून भूमीवर सोडून दिलेस, तेव्हां भक्तीच्या सामगायनांनी तुला विलक्षण वीरश्री चढली आणि आपण अमर आहों अशा घमेंडितच असणार्या राक्षसाला आपटून त्याचा तूं चेंदामेंदा करून टाकलास. ॥ २ ॥
उ॒क्थेष्विन्नु शू॑र॒ येषु॑ चा॒कन्स्तोमे॑ष्विन्द्र रु॒द्रिये॑षु च ।
उक्थेषु इन् नु शूर येषु चाकन् स्तोमेषु इन्द्र रुद्रियेषु च ।
हे शूर इंद्रा, ज्या सामगायनांची, स्तोत्रांची अथवा रुद्रपुत्र मरुतांनीं गायिलेल्या ज्या स्तवनांची तुला आवड आहे, ज्या स्तुतींनीं तूं हर्षभरीत होतोस, त्याच आमच्या निष्कलंक, निर्दोष स्तुति वायुवेगानें धांवल्याप्रमाणें फक्त तुझ्याच कडे मोठ्या त्वरेनें धांवतात. ॥ ३ ॥
शु॒भ्रं नु ते॒ शुष्मं॑ व॒र्धय॑न्तः शु॒भ्रं वज्रं॑ बा॒ह्वोर्दधा॑नाः ।
शुभ्रं नु ते शुष्मं वर्धयन्तः शुभ्रं वज्रं बाह्वोः दधानाः ।
तुझ्या लोकोत्तर, निष्कलंक प्रतापाची कीर्ति तर आम्हीं जिकडे तिकडे वाढवीत आहोंच, परंतु तुझें तें स्वच्छ झगझगीत वज्र देखील तुझ्या खांद्यावर ठेऊन देत आहोंत. तर हे इंद्रा, परम निष्कलंक असा तूं आपल्या वीर्यभराच्या आनंदानें स्फुरण पावून आमच्या हिताकरितां, सूर्याप्रमाणें प्रखर अशा आपल्या वज्रानें धर्महीन अनार्य शत्रूंचा संहार करून टाक. ॥ ४ ॥
गुहा॑ हि॒तं गुह्यं॑ गू॒ळ्हम॒प्स्वपी॑वृतं मा॒यिनं॑ क्षि॒यन्त॑म् ।
गुहा हितं गुह्यं गूळ्हं अप्ऽसु अपिऽवृतं मायिनं क्षियन्तं ।
आकाश कुहरांत वस्ती करून तेथल्याच उदकांत बुडी मारून त्यांतच छपून राहणारा आणि पुनः स्वतः अदृश्य व मायावी, अशा ज्या अहि राक्षसानें स्वर्लोकाला आच्छादून टाकून मेघोदकें रोखून धरलीं होतीं त्या राक्षसाला हे शूर इंद्रा, तूं आपल्या पराक्रमानें ठार मारून टाकलेस. ॥ ५ ॥
स्तवा॒ नु त॑ इन्द्र पू॒र्व्या म॒हान्यु॒त स्त॑वाम॒ नूत॑ना कृ॒तानि॑ ।
स्तव नु त इन्द्र पूर्व्या महानि उत स्तवाम नूतना कृतानि ।
हे इंद्रा, तूं पुरातन काळीं केलेल्या मोठमोठ्या विक्रमशाली कृत्यांची जशी आम्ही महती वर्णन करूं, तशीच ती तुझ्या अगदी अलीकडे केलेल्या पराक्रमांचीही करूं आणि रणकंदनाकरितां आतुर झालेल्या तुझ्या खांद्यावरील त्या वज्राचा प्रभाव जसा आम्ही वर्णन करूं तसाच सूर्याचे जणों देदिप्यमान ध्वजच असे ते तुझे दोन पीतवर्ण तेजोमय अश्व ह्यांचाही प्रताप वर्णन करूं. ॥ ६ ॥
हरी॒ नु त॑ इन्द्र वा॒जय॑न्ता घृत॒श्चुतं॑ स्वा॒रम॑स्वार्ष्टाम् ।
हरी इति नु ते इन्द्र वाजयन्ता घृतऽश्चुतं स्वारं अस्वार्ष्टां ।
हे इंद्रा, जो गंभीर ध्वनि ऐकल्याबरोबर अग्नीमध्यें घृताहुती पडते व पृथ्वीवर दिव्य जलाची वृष्टि होते अशा प्रकारचा सिंहनाद आपलें सामर्थ्य प्रकट करणार्या त्या तुझ्या तेजोरूप अश्वांनी केला, त्या बरोबर पृथ्वी एकदम सपाट होऊन गेली आणि मेघरूप पर्वत हालत होता तोही एकदम स्तब्ध झाला. ॥ ७ ॥
नि पर्व॑तः सा॒द्यप्र॑युच्छ॒न्त्सं मा॒तृभि॑र्वावशा॒नो अ॑क्रान् ।
नि पर्वतः सादि अप्रऊयुच्छन् सं मातृऽभिः वावशानः अक्रान् ।
पर्वत तर अगदी बिनचूक खालींच कोसळला पण त्या पूर्वीं तो उदकरूपी मातांबरोबर गर्जना करीत करीत फिरत होता. भक्त जनांनी त्याच दिव्य वाणीची महती पृथ्वीवरील दूर दूरच्या प्रदेशीं प्रसिद्ध केली, अर्थात् इंद्राच्या प्रेरणेनें झालेला तो गंभीर शब्दच त्यांनीं प्रसृत केला. ॥ ८ ॥
इन्द्रो॑ म॒हां सिन्धु॑मा॒शया॑नं माया॒विनं॑ वृ॒त्रम॑स्फुर॒न्निः ।
इन्द्रः महां सिन्धुं आऽशयानं मायाऽविनं वृत्रं अस्फुरत् निः ।
महासागरांत स्वस्थ पडून राहून त्याला अवरोधून धरणार्या व नानाप्रकारचीं कौटाळें रचणार्या त्या वृत्राला इंद्रानें जेव्हां खालीं झुगारून देऊन मारून टाकलें त्यावेळीं त्या महावीराच्या भयंकर कडकडाट करणार्या वज्रालाच भिऊन आकाश आणि पृथ्वी ही थरथर कापूं लागूं लागलीं. ॥ ९ ॥
अरो॑रवी॒द्वृष्णो॑ अस्य॒ वज्रोऽ॑मानुषं॒ यन्मानु॑षो नि॒जूर्वी॑त् ।
अरोरवीत् वृष्णः अस्य वज्रः अमानुषं यन् मानुषः निऽजूर्वीत् ।
मानवजातीचें कल्याण करणार्या त्या महावीर्यशाली इंद्राच्या वज्रानें जेव्हां मानवद्वेष्ट्या वृत्राला भाजून ठार मारून टाकलें तेव्हां त्या वज्राचाही भयंकर कडकडाट होत होताच. भक्तांनी अर्पण केलेला सोमरस प्राशन करून अशा रीतीनें इंद्रानें त्या मायावी दानवाच्या कपट जालाचा विध्वंस करून टाकला. ॥ १० ॥
पिबा॑पि॒बेदि॑न्द्र शूर॒ सोमं॒ मन्द॑न्तु त्वा म॒न्दिनः॑ सु॒तासः॑ ।
पिबऽपिब इत् इन्द्र शूर सोमं मन्दन्तु त्वा मन्दिनः सुतासः ।
हे वीरा इंद्रा, कर, हा सोमरस कृपा करून प्राशन कर, हा स्वच्छ केलेला आल्हाददायक रस तुला अत्यंत हर्षनिर्भर करो. तुला आकंठ तृप्त करून तुझा शौर्यमहिमा तो वृद्धिंगत करो आणि आमच्या प्रार्थनेप्रमाणें खरोखरच त्या तृप्तिकारक सोमरसानें इंद्राला प्रसन्न चित्त केलें. ॥ ११ ॥
त्वे इ॒न्द्राप्य॑भूम॒ विप्रा॒ धियं॑ वनेम ऋत॒या सप॑न्तः ।
त्वे इति इन्द्र अपि अभूम विप्राः धियं वनेम ऋतया सपन्तः ।
इंद्रा, तुझे गुणानुवाद गाणारे आम्हीं भक्तजन आतां तुझ्या आश्रयाला आलों आहोंत. तुझी उपासना आम्ही सत्य धर्मानें करीत असतों तर तुझ्या ठिकाणीं आमचें चित्त जडावें येवढें दान आम्हांस तुझ्याकडून मिळो. तुझ्या कृपेची आशा धरून तुझ्या लोकोत्तर यशाचें चिंतन आम्ही करीत असतों, तर तुझ्या दिव्य संपत्तिच्या दानास आम्हीं पात्र व्हावें असें कर. ॥ १२ ॥
स्याम॒ ते त॑ इन्द्र॒ ये त॑ ऊ॒ती अ॑व॒स्यव॒ ऊर्जं॑ व॒र्धय॑न्तः ।
स्याम ते ते इन्द्र ये ते ऊती अवस्यवः ऊर्जं वर्धयन्तः ।
तुझ्या कृपाप्रसादाची मनीषा आम्हीं धरलेली आहे आणि तुझ्या कृपाछत्रामुळेंच आम्ही तुझ्या ओजस्वी प्रतापाची कीर्ति उत्तरोत्तर वृद्धिंगत करीत असतों तेव्हां आतां तरी आम्हांस तूं आपलेसे म्हण. हे भगवंता, आणखी असें कर कीं, ज्याच्यामुळें आम्हांस शौर्याची पराकाष्ठा करतां येईल, जें आम्हांस अत्यंत प्रियच वाटेल व ज्यामध्यें आम्हांस वीरपुरुषाच्या संगतीचा लाभ होईल असें वैभव आम्हांस कृपा करून दे. ॥ १३ ॥
रासि॒ क्षयं॒ रासि॑ मि॒त्रम॒स्मे रासि॒ शर्ध॑ इन्द्र॒ मारु॑तं नः ।
रासि क्षयं रासि मित्रं अस्मे इति रासि शर्धः इन्द्र मारुतं नः ।
इंद्रा आम्हांस शांतीचें सदन दे, सन्मित्र दे, आम्हांस मरुतांच्या सेनेचें पाठबळ दे, आणि जे प्रेमळ, हृष्टचित्त व सोमरसाचा प्रथम आस्वाद घेतात त्या बायूंचेंहि आनुकूल्य दे. ॥ १४ ॥
व्यन्त्विन्नु येषु॑ मन्दसा॒नस्तृ॒पत्सोमं॑ पाहि द्र॒ह्यदि॑न्द्र ।
व्यन्तु इत् नु येषु मन्दसानः तृपत् सोमं पाहि द्रह्यत् इन्द्र ।
ज्यांना पाहून तूं उल्लासित होतोस त्या मरुतांचा तर सोमरस प्राशन करूं द्याच. पण तूं नित्य तृप्त आणि दृढ-सामर्थ्य-शाली आहेस. तरीसुद्धां हा सोमरस कृपा करून तूं ग्रहण कर. हे लोकतारका, युद्धामध्यें आमची कीर्ति तूं वाढविलीसच पण उच्च स्वरांत म्हटलेल्या व ज्यामध्यें तुझ्या पराक्रमाचें वर्णन आहे अशा अर्क गायनांनींही आकाश दुमदुमून सोडून तूं त्यांचेहि गौरव वाढविलेंस. ॥ १५ ॥
बृ॒हन्त॒ इन्नु ये ते॑ तरुत्रो॒क्थेभि॑र्वा सु॒म्नमा॒विवा॑सान् ।
बृहन्तः इत् नु ये ते तरुत्र उक्थेभिः वा सुम्नं आविवासान् ।
अथवा हे जगत्तरका, शांतिसुखाचें पद ज्यांनी प्रमळ स्तवनांच्या योगानें तुझी सेवा करून संपादन केलें तेच खरोखर धन्य होत. आणि यज्ञामध्यें जे तुझ्यासाठीं प्रशस्त कुशासन अंथरतात तेच फक्त तुझ्या प्रसादाला पात्र होतात व त्यांनाच सात्विक सामर्थ्याचा लाभ होतो. ॥ १६ ॥
उ॒ग्रेष्विन्नु शू॑र मन्दसा॒नस्त्रिक॑द्रुकेषु पाहि॒ सोम॑मिन्द्र ।
उग्रेषु इत् नु शूर मन्दसानः त्रिऽकद्रुकेषु पाहि सोमं इन्द्र ।
हे वीरा, उग्र कृत्यांमध्यें सुद्धां तुला आनंद होतो, तर हे इंद्रा, ह्या आमच्या ’त्रिकद्रुक’ नामक उत्सवांत तूं सोमरस प्राशन कर. पीतवर्ण तेजाचे अश्व जोडलेल्या आपल्या रथांत बसून मिशांवर हात फिरवीत फिरवीत प्रसनांतःकरणानें सोमरसप्राशनार्थ इकडे ये. ॥ १७ ॥
धि॒ष्वा शवः॑ शूर॒ येन॑ वृ॒त्रम॒वाभि॑न॒द्दानु॑मौर्णवा॒भम् ।
धिष्व शवः शूर येन वृत्रं अवऽअभिनत् दानुं और्णऽवाभं ।
ज्या सामर्थ्यानें तूं वृत्राला आणि और्णवाभ राक्षसाला चेंचून मारून टाकलेंस तेंच सामर्थ्य तूं आज प्रकट कर. हे देवा, आम्हां आर्य लोकांकरितां तूं दिव्य प्रकाशावरील आच्छादन दूर केलेंस त्याच वेळेस तो दिव्य प्रकाश अडवून धरणारा तो अधार्मिक दुष्ट तुझ्या डाव्या बाजूकडेच खचून जाऊन मरून पडला ॥ १८ ॥
सने॑म॒ ये त॑ ऊ॒तिभि॒स्तर॑न्तो॒ विश्वाः॒ स्पृध॒ आर्ये॑ण॒ दस्यू॑न् ।
सनेम ये त ऊतिऽभिः तरन्तः विश्वाः स्पृधः आर्येण दस्यून् ।
आमच्याशीं शत्रुत्व करणार्या यच्चावत् अधर्मिक दुष्टांस, तुझ्या कृपेच्या जोरावरच, परंतु आपल्या अंगांतील आर्य पराक्रमानें पादाक्रांत करणारे जे जे म्हणून असतील त्यांच्याच सहाय्याचा लाभ आम्हांस होवो. अर्थात्, आमच्याशीं मित्रत्वानें वागणार्या लोकांचा धुरीण जो त्रित त्याच्या स्वधीन त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूप ह्याला केलेंस तें तरी आमच्याचसाठीं केलेंस. ॥ १९ ॥
अ॒स्य सु॑वा॒नस्य॑ म॒न्दिन॑स्त्रि॒तस्य॒ न्यर्बु॑दं वावृधा॒नो अ॑स्तः ।
अस्य सुवानस्य मन्दिनः त्रितस्य नि अर्बुदं ववृधानः अस्तरित्यस्तः ।
अनंदकारक सोमरस स्वच्छ गाळून ते इंद्राला अर्पण करणारा त्रित नामक भक्त त्याच्यसाठीं इंद्रानें वीरश्रीच्या भरांत अवाढव्य रूप धारण करून अर्बुद राक्षसाला पार धुळीला मिळवून दिलें. इंद्र हा अङ्गिरा ऋषींचा कैवारी. तेव्हां सूर्य आपलें तेजस्वी चक्र फिरवितो त्या प्रमाणें आपलें वज्र त्यानें गरगर फिरवून बल राक्षसाच्याही चिंधड्या उडवून दिल्या. ॥ २० ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची दयार्द्र बुद्धि तीच धेनु ह्या तुझ्या भक्ताला मनोरथ दुग्ध देऊन तृप्त करो. तुझ्या सर्व भक्त जनांनाहि असें दुग्ध दे. तूं आमचें भाग्य आहेस. आम्हांस वगळूं नको आणि आम्ही आमच्या शूरवीरांसह यज्ञ सभेंत तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ २१ ॥
ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त १२ (इंद्राचे पालुपद सूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
यो जा॒त ए॒व प्र॑थ॒मो मन॑स्वान्दे॒वो दे॒वान्क्रतु॑ना प॒र्यभू॑षत् ।
यः जातः एव प्रथमः मनस्वान् देवः देवान् क्रतुना परिऽअभूषत् ।
हे जनहो, जो प्रकट होतांच सर्व विश्वाच्या आधींचा आणि विशुद्धात्मा असा देवाधिदेव होऊन आपल्या कर्तुत्वतेनें देवांना ललामभूतच झाला, ज्याच्या प्रखर प्रतापामुळें व वीर्याच्या तेजामुळें आकाश आणि पृथिवी ही अगदी भिऊन गेली, तोच इंद्र होय. ॥ १ ॥
यः पृ॑थि॒वीं व्यथ॑माना॒मदृं॑ह॒द्यः पर्व॑ता॒न्प्रकु॑पिताँ॒ अर॑म्णात् ।
यः पृथिवीं व्यथमानां अदृंहत् यः पर्वतान् प्रऽकुपितान् अरम्णात् ।
हे जनहो, ज्याने डळमळणार्या पृथ्वीला घट्ट आणि दृढ केलें व क्षुब्ध झाल्यामुळें जोरानें हलणार्या पर्वतांस ज्यानें स्थिर केलें, ज्याने हा अमर्याद अंतरिक्ष प्रदेश सुद्धां आक्रमण केला, आणि ज्यानें आकाशांतील नक्षत्रें अचल केलीं, तोच इंद्र होय. ॥ २ ॥
यो ह॒त्वाहि॒मरि॑णात्स॒प्त सिन्धू॒न्यो गा उ॒दाज॑दप॒धा व॒लस्य॑ ।
यः हत्वा अहिं अरिणात् सप्त सिन्धून् यः गाः उत्ऽआजत् अपऽधा वलस्य ।
हे जनहो, ज्यानें अहि नामक महाभुजंगाला ठार मारून सातही नद्यांना मुक्त केलें, ज्यानें प्रकाशरूप गाईंना बल राक्षसाच्या बंदिवासांतून सोडविलें, ज्यानें कठिण पाषाणाच्या पोटीं सुद्धां अग्नीची उत्पत्ति केली आणि संग्रामामध्यें जो सज्जनांच्या शत्रूंची सपशेल वाताहात करून टाकतो, तोच इंद्र होय. ॥ ३ ॥
येने॒मा विश्वा॒ च्यव॑ना कृ॒तानि॒ यो दासं॒ वर्ण॒मध॑रं॒ गुहाकः॑ ।
येन इमा विश्वा च्यवना कृतानि यः दासं वर्णं अधरं गुहा अकरित्यकः ।
हे जनहो, हीं सर्व अस्थिर भुवनें ज्यानें निर्माण केलीं, आर्यजनांचें शत्रुत्व करणार्या अधार्मिक दुष्ट जातीचा ज्यानें निःपात करून तिला गिरिकंदरांत छपून रहावयास लाविलें, पारध्यानें सावज पाडाव करावें त्याप्रमाणें ज्या विशालशाली वीरानें सज्जनांच्या शत्रूंचे वैभव आणि नक्षा दोन्हीहि पार हरण करून घेतलीं, तोच इंद्र होय. ॥ ४ ॥
यं स्मा॑ पृ॒च्छन्ति॒ कुह॒ सेति॑ घो॒रमु॒तेमा॑हु॒र्नैषो अ॒स्तीत्ये॑नम् ।
यं स्म पृच्छन्ति कुह सः इति घोरं उत् ईं आहुः न एषः अस्ति इति एनं ।
हे जनहो, असा तो इंद्र आहे तरी कोठें असा प्रश्न ह्या इंद्राविषयीं कोणी करतात, आणी नाहींच असें सुद्धा ह्याच्या संबंधानें कोणी विक्षिप्त म्हणत असतत, परंतु पक्ष्यांचा थवा सहज उडवून द्यावा त्याप्रमाणें, सज्जनांच्या शत्रूंचें प्राबल्य जो सहज मोडून टाकतो, त्याच्या ठिकाणीं तुम्ही खचित दृढ भाव ठेवा. कारण, तोच इंद्र होय. ॥ ५ ॥
यो र॒ध्रस्य॑ चोदि॒ता यः कृ॒शस्य॒ यो ब्र॒ह्मणो॒ नाध॑मानस्य की॒रेः ।
यः रध्रस्य चोदिता यः कृशस्य यः ब्रह्मणः नाधमानस्य कीरेः ।
हे जनहो, श्रीमान् असो, दीन दुर्बल असो, ज्ञानी विप्र असो किंवा नम्रभावानें प्रार्थना करणारा कवि असो, सर्वांसच जो प्रेरणा करतो, सोमवल्लि पिळण्याकरतां ग्रावे (पाषाण) जोडून ठेवणारा आणि सोमरस स्वच्छ पिळून तयार करणारा अशा दोघांचेंहि जो हा प्रियदर्शन प्रभु रक्षण करतो, तोच इंद्र होय. ॥ ६ ॥
यस्याश्वा॑सः प्र॒दिशि॒ यस्य॒ गावो॒ यस्य॒ ग्रामा॒ यस्य॒ विश्वे॒ रथा॑सः ।
यस्य अश्वासः प्रऽदिशि यस्य गावः यस्य ग्रामाः यस्य विश्वे रथासः ।
हे जनहो, ज्याच्या आज्ञेंत सर्व बुद्धिरूप अश्व, ज्याच्या आज्ञेंत सर्व प्रकाशक धेनू, ज्याच्या आज्ञेंत सर्व इंद्रिय ग्राम, आणि ज्याच्या आज्ञेंत सर्व मनोरूप रथ वागत असतात, ज्यानें सूर्याला आणि उषेला उत्पन्न केलें, व दिव्य उदकहि ज्याच्या तंत्रानेंच वृष्टि करतात, तोच इंद्र होय. ॥ ७ ॥
यं क्रन्द॑सी संय॒ती वि॒ह्वये॑ते॒ परेऽ॑वर उ॒भया॑ अ॒मित्राः॑ ।
यं क्रन्दसी संयती इति सऽजंती विह्वयेते इति विऽहवयेते परे अवरे उभयाः अमित्राः ।
भयन्कर आरोळी मारून परस्परांवर चाल करणारीं सैन्यें, एकमेकांचें शत्रुत्व करणारीं ह्या आणि त्या अशा दोन्ही पक्षाचीं सैन्येंही ज्याचा मोठ्यानें धांवा करतात, एकच मनोरथ मनांत धरून दोन्ही बाजूचे लोक ज्याला आपल्याकडे आदरानें बोलावित असतात, तोच इंद्र होय. ॥ ८ ॥
यस्मा॒न्न ऋ॒ते वि॒जय॑न्ते॒ जना॑सो॒ यं युध्य॑माना॒ अव॑से॒ हव॑न्ते ।
यस्मात् न ऋते विऽजयन्ते जनासः यं युध्यमानाः अवसे हवन्ते ।
हे जनहो, ज्याच्या कृपेवाचून कोणाला जय मिळत नाहीं, युद्धांत झगडत असतां स्वसंरक्षणासाठीं, ज्याचा धांवा लोक करतात, ज्याच्यावरून ह्या अमर्याद विश्वाची प्रतिमा घडली गेली आणि पूर्णपणें अढळ असलेल्यांनाही जो उलथून टाकूं शकतो, तोच इंद्र होय. ॥ ९ ॥
यः शश्व॑तो॒ मह्येनो॒ दधा॑ना॒नम॑न्यमाना॒ञ्छर्वा॑ ज॒घान॑ ।
यः शश्वतः महि एनः दधानान् अमन्यमानान् शर्वा जघान ।
हे जनहो, निरंतर घोर पातकें करून बेगुमानपणानें वागणार्या दुष्टांचा ज्यानें आपल्या वज्रानें संव्हार केला. सज्जनांचा उन्मत्तपणानें उपमर्द करणाराची त्यानें केलेल्या अपमानाबद्दल जो कधीं गय करीत नाहीं व जो अधार्मिक दुष्टांचा नाशच करतो, तोच इंद्र होय. ॥ १० ॥
यः शम्ब॑रं॒ पर्व॑तेषु क्षि॒यन्तं॑ चत्वारिं॒श्यां श॒रद्य॒न्ववि॑न्दत् ।
यः शम्बरं पर्वतेषु क्षियन्तं चत्वारिंश्यां शरदि अनुऽआविन्दत् ।
हे जनहो, शंबरासुर पर्वतांच्या दरी खोर्यांत अगदीं बेमालूमपणें छपून राहिला असतांही ज्यानें त्यास हुडकून काढून शरद ऋतुच्या चाळिसाव्या दिवशीं ठार मारलें, व खाली आपटला तरीही पडल्या पडल्याच पराक्रम गाजविण्याचा आव घालणार्या अहि राक्षसाचा ज्यानें फडशा उडवून टाकला, तोच इंद्र होय ॥ ११ ॥
यः स॒प्तर॑श्मिर्वृष॒भस्तुवि॑ष्मान॒वासृ॑ज॒त् सर्त॑वे स॒प्त सिन्धू॑न् ।
यः सप्तरश्मिः वृषभः तुविष्मान् अवऽअसृजत् सर्तवे सप्त सिन्धून् ।
निरनिराळ्या सात प्रकारच्या रश्मिंनी जो विभूषित आहे, ज्या अतुल प्रतापी आणि सर्व श्रेष्ठ वीरानें सातही महा नद्यांचे प्रवाह पृथ्वीवर यथेच्छ वहावे म्हणून मोकळे करून दिले, ज्यानें स्वर्ग लोकावर चढाई करून जाणार्या रौहिणेयाला वज्राप्रमाणें कणखर अशा हातांनी भिरकावून दिलें, तोच इंद्र होय. ॥ १२ ॥
द्यावा॑ चिदस्मै पृथि॒वी न॑मेते॒ शुष्मा॑च्चिदस्य॒ पर्व॑ता भयन्ते ।
द्यावा चित् अस्मै पृथिवी इति नमेते इति शुष्मात् चित् अस्य पर्वताः भयन्ते ।
हे जनहो,आकाश आणि पृथ्वी हेही ज्याला प्रणिपात करतात, ज्याच्या दरार्यामुळें पर्वत सुद्धां चळ चळ कांपतात, जो भक्तीनें अर्पण केलेल्या सोमरसाचें प्राशन करतो, जो अत्यंत सुदृढ व ज्याचे भुजदंड वज्राप्रमाणेंच कठिण असून शिवाय ज्याच्य हातांत वज्रही असतेंच, तोच इंद्र होय. ॥ १३ ॥
यः सु॒न्वन्त॒मव॑ति॒ यः पच॑न्तं॒ यः शंस॑न्तं॒ यः श॑शमा॒नमू॒ती ।
यः सुन्वन्तं अवति यः पचन्तं यः शंसन्तं यः शसमानं ऊती ।
सोमरस पिळून गाळणार्या ऋत्विजाचें जो रक्षण करतो, जो हविरन्न तयार करणार्याचें, स्तोत्र पठण करणाराचें, व गुणानुवाद गाणाराचेंहि आपल्या कृपादृष्टीनें रक्षण करतो, ज्याला भक्तीनें स्तोत्र प्रार्थना केली असतां, सोम अर्पण केला असतां आणि असा हविर्भाग अर्पण केला असतां आनंदाचें भरतें येतें, तोच इंद्र होय. ॥ १४ ॥
यः सु॑न्व॒ते पच॑ते दु॒ध्र आ चि॒द्वाजं॒ दर्द॑र्षि॒ स किला॑सि स॒त्यः ।
यः सुन्वते पचते दुध्रः आ चित् वाजं दर्दर्षि सः किल असि सत्यः ।
अंतःकरणालाही तुझें आकलन होत नाहीं, परंतु सोमरस आणि हविरन्न पक्व करून तें तुला अर्पण करणार्या भक्ताला तूं सत्वसामर्थ्य देतोस, तेव्हां म्हणतात त्याचपमाणें तूं सत्य रूप आहेस ह्यांत संशय नाहीं. तेव्हां हे इंद्रा, आम्ही तुला निरंतर प्रिय होऊन आपल्या शूरविरांसहवर्तमान तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १३ (इंद्राचे पालुपद सूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
ऋ॒तुर्जनि॑त्री॒ तस्या॑ अ॒पस्परि॑ म॒क्षू जा॒त आवि॑श॒द्यासु॒ वर्ध॑ते ।
ऋतुः जनित्री तस्या अपः परि मक्षु जातः आविशत् यासु वर्धते ।
वर्षाऋतु हि ह्या सोमाची जननी. तिच्या उदकांतून ह्याची उत्पत्ति झाली; व ज्या आकाशोदकामुळें ह्याची वृद्धि होते त्यांतच ह्यानें तात्काळ प्रवेश केला, म्हणून ही सोमवल्ली सतेज आणि तुस्त होऊन दुधासारख्या रसानें उचंबळून गेलेली असते. सोमवल्लिंतील अमृत म्हणतात ते हेंच. तेव्हां ह्या तुझ्या महा कृत्याची प्रशंसा प्रथम केली पाहिजे. ॥ १ ॥
स॒ध्रीमा य॑न्ति॒ परि॒ बिभ्र॑तीः॒ पयो॑ वि॒श्वप्स्न्या॑य॒ प्र भ॑रन्त॒ भोज॑नम् ।
सध्री ईं आ यन्ति परि बिभ्रतीः पयः विश्वऽप्स्न्याय प्र भरन्त भोजनं ।
चोहोंकडून पूर्ण भरलेल्या नद्या सर्वजणी मिळून त्याच्याकडे येतात, अखिल जगताचें पोषण करण्याकरितां त्यांनीं जलरूप अन्न आणलेलेंच असतें. आकाशांतून खाली येणार्या प्रवाहांना वाहाण्याचा मार्ग एकच आहे. हे सर्व प्रकार तूंच निर्माण केलेस तर तुझेंच स्तवन प्रथम केलें पाहिजे. ॥ २ ॥
अन्वेको॑ वदति॒ यद्ददा॑ति॒ तद्रू॒पा मि॒नन्तद॑पा॒ एक॑ ईयते ।
अनु एकः वदति यत् ददाति तत् रूपा मिनन् तत्ऽअपाः एकः ईयते ।
एक ईश्वर जें देतो तेंच दिले म्हणून जीव सांगतो. आकार नष्ट करणें हें ज्याचें काम आहे असा मृत्यु हा वस्तुमात्रांची रूपें नाहींशीं करीत सर्वत्र संचार करीत असतो. प्रत्येक प्राण्याच्या बर्या वाईट सर्व चेष्टा सहन करते अशी एक पृथ्वीच. आणि हे सव प्रकार तूंच निर्माण केलेस म्हणून तुझेंच स्तवन प्रथम केलें पाहिजे. ॥ ३ ॥
प्र॒जाभ्यः॑ पु॒ष्टिं वि॒भज॑न्त आसते र॒यिमि॑व पृ॒ष्ठं प्र॒भव॑न्तमाय॒ते ।
प्रऽजाभ्यः पुष्टिं विऽभजन्त आसते रयिंऽइव पृष्ठं प्रऽभवन्तं आऽयते ।
पाठीवरही वाहून नेतां येणार नाहीं इतकें धन वाचकांस दान करावें, त्या प्रमाणें प्राणीमात्रांना विपुल अन्नाच्छादन यथान्याय देण्यास मेघ बसले आहेत, व म्हणूनच जगत् पित्यानें दिलेले दुग्धरूप अन्न दातांनीं चावण्याचें कारण न पडतां तान्हें मूल खाऊं शकतें , आणि हे सर्व प्रकार तूं केलेस म्हणून तुझेंच स्तवन प्रथम केलें पाहिजे. ॥ ४ ॥
अधा॑कृणोः पृथि॒वीं सं॒दृशे॑ दि॒वे यो धौ॑ती॒नाम॑हिह॒न्नारि॑णक्प॒थः ।
अध अकृणोः पृथिवीं संऽदृशे दिवे यः धौतीनां अहिऽहन् अरिणक् पथः ।
नक्षत्रमंडित आकाशालाही पृथिवी उत्तम शोभेल अशीच तूं निर्माण केली आहेस. हे वृत्तांतका, पवित्र जलांचे मार्गही तूं खुले करून दिले आहेस तेव्हां एखाद्या तृषार्त वीराला त्याचा श्रमपरिहार करावा त्याप्रमाणें देवांनी स्तोत्रांच्या योगानें तुझ्या पराक्रमांचें वर्णन करून, हे ईश्वरा तुला नवी वीरश्री उत्पन्न केली, तथापि हें सर्व तूंच घडविलेस म्हणून तुझेंच स्तवन प्रथम केलें पाहिजे. ॥ ५ ॥
यो भोज॑नं च॒ दय॑से च॒ वर्ध॑नमा॒र्द्रादा शुष्कं॒ मधु॑मद्दु॒दोहि॑थ ।
यः भोजनं च दयसे च वर्धनं आर्द्रात् आ शुष्कं मधुमत् दुदोहिथ ।
जो तूं आम्हाला अन्न आणि समृद्धि देऊन आमचा उत्कर्ष करतोस व ओल्या जमीनींतून सुकें परंतु मधुर धान्य उत्पन्न करण्याची करामत करून दाखवितोस, आणि आपल्या ईश्वरी संपत्तिंचा ठेवा सूर्य मंडळांत ठेऊन दिला आहेस, असा तूं फक्त तूंच ह्या सर्व विश्वाचा एकटा मालक आहेस. तेव्हां तुझेंच स्तवन प्रथम केलें पाहिजे. ॥ ६ ॥
यः पु॒ष्पिणी॑श्च प्र॒स्वश्च॒ धर्म॒णाधि॒ दाने॒ व्यवनी॒रधा॑रयः ।
यः पुष्पिणीः च प्रऽस्वः च धर्मणा अधि दाने वि अवनीः अधारयः ।
ज्यानें फुलांनीं व फळांनी उबरलेले वृक्ष व जोरानें वाहणारे प्रवाह जमीनींत निरनिराळ्या ठिकाणीं आपल्या सृष्टि नियमाच्या योगानें निर्माण केले. ज्यांच्या तेजाला उपमाच नाहीं अशा विद्युल्लता ज्यानें आकाशांत उत्पन्न केल्या, जो स्वतः इतका विस्तीर्ण कीं विस्तीर्ण अशा सागरांनाही ज्याचा वेढा आहे, असा तूंच एक स्तवन करण्यास योग्य आहेस. ॥ ७ ॥
यो ना॑र्म॒रं स॒हव॑सुं॒ निह॑न्तवे पृ॒क्षाय॑ च दा॒सवे॑शाय॒ चाव॑हः ।
यः नार्मरं सहऽवसुं निऽहन्तवे पृक्षाय च दासऽवेशाय च अवहः ।
भक्तांना सामर्थ्य यावें आणि अधार्मिक दुष्टांचा नाश व्हावा म्हणून नार्भर राक्षसाला त्याच्या वैभवासह तूं मृत्युकडे पठवून दिलेस; आणि आपल्या जाज्वल्य तरवारीस तोंड लपविण्याची पाळी येऊं दिली नाहीस. देवा, हींच काय पण आणखी अशी तुझीं चरित्रे कितीतरी आहेत. आणि म्हणूनच पूर्वींप्रमाणें आजही तूं आम्हांस अत्यंत स्तुत्यच आहेस. ॥ ८ ॥
श॒तं वा॒ यस्य॒ दश॑ सा॒कमाद्य॒ एक॑स्य श्रु॒ष्टौ यद्ध॑ चो॒दमावि॑थ ।
शतं वा यस्य दश साकं आ अद्यः एकस्य श्रुष्टौ यत् ह चोदं आविथ ।
एका भक्ताची हांक ऐकल्याबरोबर तूं आपल्या रथाला हजार घोडे एकदम जोडून त्या सद्भक्ताचें रक्षण केलेंस. आणि दभीति ह्या भक्तसाठीं त्याच्या अधार्मिक शत्रूंस अशा ठिकाणीं कायमचें प्रतिबंधांत ठेविलेंस, कीं तेथें त्यांस बांधून ठेवण्याचें कामच पडूं नये. इतक्या उत्कृष्ट प्रतीचा तूं भक्ताचा सहाय्य-कर्ता झालास तो तूं, खरोखरच स्तुत्य आहेस. ॥ ९ ॥
विश्वेदनु॑ रोध॒ना अ॑स्य॒ पौंस्यं॑ द॒दुर॑स्मै दधि॒रे कृ॒त्नवे॒ धन॑म् ।
विश्वा इत् अनु रोधनाः अस्य पौंस्यं ददुः अस्मै दधिरे कृत्नवे धनं ।
उदक-प्रवाहाला प्रतिबंध करणार्या सर्व प्रकारच्या शक्तींनी ज्याच्या सामर्थ्यापुढें हातच टेंकले आणि जो महत्कृत्य कुशल म्हणून ज्याच्यापुढें त्यांचे वैभव अगदी फिकें पडलें असा तूं, सहा ऋतु आणि पांच महाभूतें व पांच कर्मेद्रिये ह्यांना आपापल्या ठिकाणीं स्थापून, आणि पुनः स्वतः त्या सर्वांना व्यापून उरलासच, तो तूं अत्यंत स्तुत्य आहेस ह्यातं संशय नाहीं. ॥ १० ॥
सु॒प्र॒वा॒च॒नं तव॑ वीर वी॒र्यंयद् एके॑न॒ क्रतु॑ना वि॒न्दसे॒ वसु॑ ।
सुऽप्रवाचनं तव वीर वीर्यं यत् एकेन क्रतुना विन्दसे वसु ।
हे वीरा, एकाच महत्कृत्यानें सर्व स्पृहणीय संपत्ति तूं आपलीशी करतोस, व जातुष्ठिरा सारख्या बलाढ्य पुरुषाचा तारुण्यमद तूं हरण करून टाकतोस अशा तुझ्या परक्रमाचें गौरव करावें तितकें थोडेंच. आणि हे इंद्रा हीं सर्व कृत्यें तूंच केलींस, तेव्हां खरोखरच तूं अत्यंत स्तुत्य आहेस. ॥ ११ ॥
अर॑मयः॒ सर॑पस॒स्तरा॑य॒ कं तु॒र्वीत॑ये च व॒य्याय च स्रु॒तिम् ।
अरमयः सरऽअपसः तराय कं तुर्वीतये च वय्याय च स्रुतिं ।
तुर्वीति आणि वय्य ह्यांना तरून जातां यावें म्हणून त्याच्याकरितां तूं जोरानें वाहणार्या नदीचा प्रवाह थांबवून धरलास, आणि अंध व पंगु असून पतित झालेल्या परावृजाची तूं उन्नति करून त्याची चोंहोकडून प्रख्याति केलीस तेव्हां तूं अतिशयच स्तुत्य आहेस. ॥ १२ ॥
अ॒स्मभ्यं॒ तद्व॑सो दा॒नाय॒ राधः॒ सम॑र्थयस्व ब॒हु ते॑ वस॒व्यम् ।
अस्मभ्यं तत् वसो दानाय राधः सं अर्थयस्व बहु ते वसव्यं ।
हे दिव्यनिधे इंद्रा, तूं आपलें कृपाधन आम्हांस देण्याकरितां असें योजून ठेव कीं तें अत्यंत नामांकित अशी त्याची प्रख्याति उत्तरोत्तर तूंच करशील. तुझ्यापाशीं शेलकी शेलकी अशी संपत्ति कितीतरी पडली आहें तेव्हां तिच्या प्रित्यर्थ आम्हीं आपल्या शौर्यसंपन्न वीरांसह यज्ञ सभेंत तुझें महद्यश निरंतर वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १३ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १४ (इंद्राचे पालुपद सूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
अध्व॑र्यवो॒ भर॒तेन्द्रा॑य॒ सोम॒माम॑त्रेभिः सिञ्चता॒ मद्य॒मन्धः॑ ।
अध्वर्यवः भरत इंद्राय सोमं अमत्रेभिः सिञ्चत मद्यं अन्धः ।
अध्वर्यूहो ! इंद्राला अर्पण करण्याकरितां सोमरस घेऊन या. तें प्रमोददायक पेय पेल्यांनी ह्याच्या पात्रां ओता. शूर इंद्राला नित्य तेंच प्रशा करण्याची लालसा अहे म्हणून त्या प्रतापी वीराला तें अर्पण करा. ह्याला तेंच पाहिजे आहे. ॥ १ ॥
अध्व॑र्यवो॒ यो अ॒पो व॑व्रि॒वांसं॑ वृ॒त्रं ज॒घाना॒शन्ये॑व वृ॒क्षम् ।
अध्वर्यवः यः अपः वव्रिऽवांसं वृत्रं जघान अशन्याऽइव वृक्षं ।
अध्वर्यूहो ! दिव्योदकांना पर झांकून टाकणार्या वृत्राला, एखादा वृक्ष विद्युत्पाताने छाटला जावा त्याप्रमाणे, ज्यानें आपल्या वज्रानें तोडून टाकलें, त्या सोमप्रिय देवाला हा रस अर्पण कर. सोमरस प्राशन करण्यास हा इंद्रच अत्यंत योग्य आहे. ॥ २ ॥
अध्व॑र्यवो॒ यो दृभी॑कं ज॒घान॒ यो गा उ॒दाज॒दप॒ हि व॒लं वः ।
अध्वर्यवः यः दृभीकं जघान यः गाऽ उत्ऽआजत् अप हि वलं वरिति वः ।
अध्वर्यूहो ! ज्यनें दृभीकाचा वध केला, पकाशरूपी धेनूंना मुक्त केलें आणि वल राक्षसाचें खरें स्वरूप उघड करून त्यास थार मारले, त्या, अंतराळांत वायु प्रमाणे ह्या विश्वामध्यें भरून रहिला आहे अशा इंद्राला, तीक्ष्ण बाण वस्त्रांनीं झांकावा त्याप्रमाणें सोमवल्लींनी आच्छादून टाका. ॥ ३ ॥
अध्व॑र्यवो॒ य उर॑णं ज॒घान॒ नव॑ च॒ख्वांसं॑ नव॒तिं च॑ बा॒हून् ।
अध्वर्यवः यः उरणं जघान नव चख्वांसं नवतिं च बाहून् ।
अध्वर्यूहो ! उरण आपले नव्व्याण्णव भुजदंड उगारून चाल करून आला असतां त्या राक्षसाचें ज्यानें दिर्दालन करून टाकलें, ज्यानें अर्बुद राक्षसालाही खालीं आपटून ठार मारून टाकिलें, तुआ इंद्राला आमच्या सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां आग्रहाची प्रार्थना करा. ॥ ४ ॥
अध्व॑र्यवो॒ यः स्वश्नं॑ ज॒घान॒ यः शुष्ण॑म॒शुषं॒ यो व्यंसम् ।
अध्वर्यवः यः सु अश्नं जघान यः शुष्णं अशुषं यः विऽअंसं ।
अध्वर्यूहो ! ज्यानें अश्नाचा निःपात केला, ज्यानें अतिशय खादाड असा शुष्ण, तसेंच व्यस, विप्रु नमुची आणि रुधिका इत्यादि दानवन्चाहि नाश करून टाकला, त्या इंद्राला सोमरसचें पेय अर्पण करा. ॥ ५ ॥
अध्व॑र्यवो॒ यः श॒तं शम्ब॑रस्य॒ पुरो॑ बि॒भेदाश्म॑नेव पू॒र्वीः ।
अध्वर्यवः यः शतं शम्बरस्य पुरः बिभेद अश्मनाऽइव पूर्वीः ।
अध्वर्यूहो ! ज्यानें शंबरचें शंभर विशाल किल्ले, विद्युत्पातनें भन्ग करून टकावे, त्याप्रमाणें फोडून त्यांचा विध्वंस केला, आणि ज्यानें वर्चीच्या एक लाख सैनिकांना जमीनदोस्त करून टाकलें, त्या इंद्राकरितां सोमरस घेऊन या. ॥ ६ ॥
अध्व॑र्यवो॒ यः श॒तमा स॒हस्रं॒ भूम्या॑ उ॒पस्थेऽ॑वपज्जघ॒न्वान् ।
अध्वर्यवः यः शतं आ सहस्रं भूम्याः उपऽस्थे अवपज् जघन्वान् ।
अध्वर्यूहो ! ज्यानें लाखों शत्रूंचा वध करून पृथ्वीच्या पाठीवर त्यांना अस्ताव्यस्तपणें विखरून टाकिलें, ज्याने आपले भक्त जे कुत्स, वायु, आणि अतिथिग्र यांच्या लढवया शत्रूंचा रणांत मोड केला त्या इंद्राकरितां सोमरस घेऊन या. ॥ ७ ॥
अध्व॑र्यवो॒ यन्न॑रः का॒मया॑ध्वे श्रु॒ष्टी वह॑न्तो नशथा॒ तदिन्द्रे॑ ।
अध्वर्यवः यत् नरः कामयाध्वे श्रुष्टी वहन्तः नशथ तद् इन्द्रे ।
शूर अध्वर्यूहो ! त्याची आज्ञा तुम्हांला शिरसामान्यच आहे, तर तुमची जी जी मनीषा असेल ती ती तुम्हांल इंद्रापसूनच प्राप्त करून घेतां येईल तर आपल्या बाहुबळानें स्वच्छ पिळून कढलेला पवित्र सोमरस, उए यज्ञनिष्ठ भक्तांनों, त्या पुण्यलोक इंद्राला अर्पण करा. ॥ ८ ॥
अध्व॑र्यवः॒ कर्त॑ना श्रु॒ष्टिम॑स्मै॒ वने॒ निपू॑तं॒ वन॒ उन्न॑यध्वम् ।
अध्वर्यवः कर्तन श्रुष्टिं अस्मै वने निऽपूतं वन उत् नयध्वं ।
अध्वर्यूहो ! त्याच्या आज्ञेप्रमां करा. वनांत म्हणजे अरण्यांत सुद्धां हो अत्यंत पवित्र मानला जातो असा सोमरस पाण्यांत मिसळून इंद्राला अर्पण करण्यकरितां घेऊन ज. तो ब्>इंद्र नित्य तृप्तच आहे परंतु तुम्ही स्वहस्तनें कढलेल्या रसाची त्याला लालसा आहे, तर त्या ब्>इंद्राला हा हर्षकर सोमरस अर्पण करा. ॥ ९ ॥
अध्व॑र्यवः॒ पय॒सोध॒र्यथा॒ गोः सोमे॑भिरीं पृणता भो॒जमिन्द्र॑म् ।
अध्वर्यवः पयसा उधः यथा गोः सोमेभिः ईं पृणता भोजं इन्द्रं ।
अध्वर्यूहो ! गाईची कांस दुधानें भरून जावी त्याप्रमाणें भरून त्या औदार्यशाली ला त्रुप्त करा. मल येवढें माहित आहे, नव्हे माझी अशी पक्कि खात्री आहे कीं, पूजनीय सोम अर्पण करणार्या भक्ताची पक्कि ओळख ठेवतो. ॥ १० ॥
अध्व॑र्यवो॒ यो दि॒व्यस्य॒ वस्वो॒ यः पार्थि॑वस्य॒ क्षम्य॑स्य॒ राजा॑ ।
अध्वर्यवः यः दिव्यस्य वस्वः यः पार्थिवस्य क्षम्यस्य राजा ।
अध्वर्यूहो ! जो दिव्य ऐश्वर्याचा आणि ह्या भूलोकांतील भौतिक संपत्तिचाही राजा आहे तुआ ला, एखाद्या विजयी विजयी वीरावर धान्य वृष्टि करून त्यांस संतुष्ट करावें त्याप्रमाणें सोमरसाच्या धारांनी पूर्णपणें संतुष्ट करा; आणि हेंच तुमचें कर्तव्य आहे असें समजा. ॥ ११ ॥
अ॒स्मभ्यं॒ तद्व॑सो दा॒नाय॒ राधः॒ सम॑र्थयस्व ब॒हु ते॑ वस॒व्यम् ।
अस्मभ्यं तत् वसो इति दानाय राधः सं अर्थयस्व बहु ते वसव्यं ।
हे दिव्यनिधे , तूं आपलें कृपाधन आम्हांस द्यावयाचें तें असें योजून ठेव कीं, तें अत्यंत नामांकित अशी त्याची प्रख्याति तूंच करशील. तुझ्यापाशीं शेलकी शेलकी अशी संपत्ति कितीतरी भरली आहे, तेव्हां तिच्या प्रित्यर्थ आम्हीं आपल्या शौर्यसंपन्न वीरांसह यज्ञसभेंत तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १२ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १५ (इंद्राचे पालुपद सूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
प्र घा॒ न्वस्य मह॒तो म॒हानि॑ स॒त्या स॒त्यस्य॒ कर॑णानि वोचम् ।
प्र घा नु अस्य महतः महानि सत्या सत्यस्य करणानि वोचं ।
आतां ह्या श्रेष्ठतम इंद्राची श्रेष्ठ अशींच चरित्रें, ह्या सत्यस्वरूप इंद्राचीं सत्यमयच चरित्रें मी वर्णन करतो. "चिकद्रुक" उत्सवांत इंद्राने सोम प्राशन केला आणि त्या हर्षवेगांत त्याने अहि राक्षसाचा शिरच्छेद करून टाकला. ॥ १ ॥
अ॒वं॒शे द्याम॑स्तभायद्बृ॒हन्त॒मा रोद॑सी अपृणद॒न्तरि॑क्षम् ।
अवंशे द्यां अस्तभायत् बृहन्तं आ रोदसी इति अपृणत् अन्तरिक्षं ।
ज्यामध्यें कोठें कसलाही आधार सांपडत नाही अशा आकाशांत त्याने मोठमोठीं नक्षत्रें अढळ ठेऊन दिली. अंतराळ व वातावरणप्रदेश हे वायूनें भरून टाकले आणि त्यांत पृथ्वीला सांवरून धरून तिची मर्यादा विस्तीर्ण केली. ह्या सर्व गोष्टी इंद्राने सोमरसाच्या हर्षभरांत केल्या. ॥ २ ॥
सद्मे॑व॒ प्राचो॒ वि मि॑माय॒ मानै॒र्वज्रे॑ण॒ खान्य॑तृणन्न॒दीना॑म् ।
सद्मऽइव प्राचः वि मिमाय मानैः वज्रेण खानि अतृणत् नदीनां ।
घराची जागा आंखून द्यावी त्याप्रमाणें पूर्व पश्चिम इत्यादि दिशांची सीमा त्यानेंच ठरविली. स्वर्गीय नद्यांच्या उगमींची द्वारें आपल्या वज्रानें खोडून मोकळीं केली आणि लांबच लांब मार्गांनी त्यांनी वहात जावे अशाकरितां सहज लीलेने त्यांस बंधमुक्त केलें. हे सर्व पराक्रम इंद्राने सोमरसाच्या हर्षभरांत केले. ॥ ३ ॥
स प्र॑वो॒ळ्हॄन्प॑रि॒गत्या॑ द॒भीते॒र्विश्व॑मधा॒गायु॑धमि॒द्धे अ॒ग्नौ ।
स प्रऽवोळ्हॄन् परिऽगत्या दभीतेः विश्वं अधाक् आयुधं इद्धे अग्नौ ।
दभीति ह्या भक्ताला पकडून घेऊन जाणार्या दुष्टांना त्यानें वेढा घातला. त्यांची हत्यारे हिसकाऊन घेऊन एका पेटलेल्या आहळांत तीं सर्व जाळून टाकली आणि त्या दभीला धेनू, अश्व, आणि रथ ह्यांनी परिपूर्ण अशी संपत्ति दिली. ह्या सर्व गोष्टी इंद्रानें सोमाच्या हर्षभरांत केल्या. ॥ ४ ॥
स ईं॑ म॒हीं धुनि॒मेतो॑ररम्णा॒त्सो अ॑स्ना॒तॄन॑पारयत्स्व॒स्ति ।
स ईं महीं धुनिं एतोः अरम्णात् सः अस्नातॄन् अपारयत् स्वस्ति ।
धों धों करीत वाहणार्या संसाररूप प्रचंड लोंढ्याचा वेग त्याने अगदीं थांबवून धरून, ज्यांना त्यांत पोंहून जातां येत नव्हते त्यांना सुखरूप पैलतीरास नेऊन सोडले. आणि नदी तरून गेल्यावर त्यांना उत्कृष्ट धनाचा लाभ झाला. असे हे चमत्कार इंद्राने सोमरसाच्या भरांत केलें. ॥ ५ ॥
सोद॑ञ्चं॒ सिन्धु॑मरिणान्महि॒त्वा वज्रे॒णान॑ उ॒षसः॒ सम् पि॑पेष ।
सः उदञ्चं सिन्धुं अरिणात् महिऽत्वा वज्रेणा अनः उषसः सं पिपेष ।
आपल्या प्रभावाने त्याने समुद्राच्या उदकाचा प्रवाह वर वहात जाईल असें केले. आपल्या वज्रानें उषेच्या रथाचा चुराडा करून टाकला. आणि मोठ्या झपाट्यानें चाल करण्याचा आपल्या सेनेकडून प्रतिपक्ष्याच्या सुस्त सैन्याचा अगदीं फन्ना उडवून टाकला. हीं कृत्यें इंद्राने सोमरसाच्या हर्षभरांत केलीं. ॥ ६ ॥
स वि॒द्वाँ अ॑पगो॒हं क॒नीना॑मा॒विर्भव॒न्नुद॑तिष्ठत्परा॒वृक् ।
स विद्वान् अपऽगोहं कनीनां आविः भवन् उत् अतिष्ठत् पराऽवृक् ।
त्या तरुण कुमारिका लपून बसल्या होत्या तें ठिकाण परावृज ऋषीला (इंद्राच्या कृपेनें) उमगले, त्याबरोबर तो तेथें प्रकट होऊन त्यांच्या समोर उभा राहिला. तेव्हां तो पंगू असूनही इंद्रकृपेनें उत्तम चालूं लागला आणि अंध होता तरी त्याला उत्तम दृष्टी आली. असे हे सर्व चमत्कार इंद्राने सोमरसाच्या हर्षभरांत केले. ॥ ७ ॥
भि॒नद्व॒लमङ्गि॑ँरोभिर्गृणा॒नो वि पर्व॑तस्य दृंहि॒तान्यै॑रत् ।
भिनत् वलं अङ्गिहरःऽभिः गृणानः वि पर्वतस्य दृंहितानि ऐरत् ।
अंगिरसांच्या स्तुतीनें प्रसन्न होऊन त्याने बल राक्षसाला विदारण करून मारून टाकले आणि पर्वताचे मोठमोठे दुर्ग हलवून सोडून त्यांनी मोठ्या चतुराईनें उभारलेली तटबंदीही पार उध्वस्त करून टाकली. ही सर्व महत्कृत्यें इंद्राने सोमाच्या हर्षभरांत केलीं. ॥ ८ ॥
स्वप्ने॑ना॒भ्युप्या॒ चुमु॑रिं॒ धुनिं॑ च ज॒घन्थ॒ दस्युं॒ प्र द॒भीति॑मावः ।
स्वप्नेन अभिऽउप्य चुमुरिं धुनिं च जघंथ दस्युं प्र दभीतिं आवः ।
तूं चुमुरी आणि धुनि ह्या राक्षसांना निद्रेनें ग्रासून टाकून खाली लोळवून मारलेंस आणि अधार्मिक दुष्टांचा वध करून दभीतिचें रक्षण केलेंस. तुझ्या कृपेचा आधार मिळाला म्हणून त्याला त्या प्रसंगी अक्षय्य वस्तूचा लाभ झाला. परंतु ही सर्व सकृत्यें इंद्रानें सोमाच्या हर्षभरांत केलीं. ॥ ९ ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची दयार्द्र बुद्धि हीच प्रेमळ धेनू तुझ्या भक्ताला मनोरथ-दुग्ध देऊन तृप्त करो. त्याप्रमाणें आम्हां सर्व भक्त जनांनाही असेंच दुग्ध दे. तूं आमचे भाग्य आहेस, आम्हांस वगळूं नकोस आणि आम्ही आमच्या शौर्यसंपन्न वीरांसह यज्ञ सभेंत तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असे कर. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १६ (इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
प्र वः॑ स॒तां ज्येष्ठ॑तमाय सुष्टु॒तिम॒ग्नावि॑व समिधा॒ने ह॒विर्भ॑रे ।
प्र वः सतां ज्येष्ठऽतमाय सुऽष्टुतिं अग्नौऽइव संऽइधाने हविः भरे ।
हे जनहो, प्रज्वलित अग्निमध्यें इंद्राप्रित्यर्थ हवि अर्पण करावे त्याप्रमाणे तुमच्यासाठीं मी हे अपूर्व स्तवन, सज्जनामध्यें अत्यंत श्रेष्ठ अशा त्या इंद्राच्या चरणीं अर्पण करीत आहे. सर्व जगताला क्षीणता आणणारा परंतु स्वतः जो कधीही क्षीण होत नाही, व ज्याचे वृद्धिंगत झालेले सामर्थ्य अनादि कालापासून जसेंच्या तसेंच असून जो सर्वदा तारुण्य दशेंतच असतो त्या इंद्राची आम्हांवर कृपा व्हावी म्हणून त्याचा धांवा आम्ही करीत असतों. ॥ १ ॥
यस्मा॒दिन्द्रा॑द्बृह॒तः किं च॒नेमृ॒ते विश्वा॑न्यस्मि॒न्सम्भृ॒ताधि॑ वी॒र्या ।
यस्मात् इन्द्रात् बृहतः किं चन ईं ऋते विश्वानि अस्मिन् संऽभृता अधि वीर्या ।
ज्या परम थोर इंद्राशिवाय कांहीच असूं शकत नाहीं त्याच्याच ठिकाणीं यच्चावत् पराक्रम एकवट झालेले आहेत, तो भगवान् आपल्या उदरांत सोमरस, शरीरांत अपार सामर्थ्यतेज, हातांत वज्र आणि मस्तकांत दिव्य विज्ञान वागवीत असतो. ॥ २ ॥
न क्षो॒णीभ्यां॑ परि॒भ्वे त इन्द्रि॒यं न स॑मु॒द्रैः पर्व॑तैरिन्द्र ते॒ रथः॑ ।
न क्षोणीभ्यां परिऽभ्वे ते इन्द्रियं न समुद्रैः पर्वतैः इन्द्र ते रथः ।
इंद्रा, तुझ्या ईश्वरी महिम्याचा अंत भूमी व स्वर्ग ह्या दोन्ही लोकांना सुद्धां लागला नाही. समुद्र किंवा पर्वत ह्यांनाही तुझ्या रथाला अडथळा करवत नाही आणि तुझ्या या सामर्थ्याची बरोबरी तर कोणालाच करतां येणार नाही. ही गोष्ट तूं अति वेगवान घोडे जोडलेल्या आपल्या रथांत बसून एकदम असंख्य योजनें दौडत जातोस त्यावेळीं सहज अनुभवास हेते. ॥ ३ ॥
विश्वे॒ ह्यस्मै यज॒ताय॑ धृ॒ष्णवे॒ क्रतुं॒ भर॑न्ति वृष॒भाय॒ सश्च॑ते ।
विश्वे हि अस्मै यजताय धृष्णवे क्रतुं भरन्ति वृषभाय सश्चते ।
परमपूज्य धैर्याची केवळ मूर्ति आणि भक्तसाहाय्यार्थ सदैव सज्ज अशा ह्या वीरनायकाच्या चरणींच सर्व लोक आपली भक्तियुक्त उपासना अर्पण करीत असतात. तर मित्रा, त्याला हवि अर्पण करून त्याचें यजन कर. हे इंद्रा, तूं वीर्यशाली व अत्यंत ज्ञानी आहेस तेव्हां ज्याच्या रश्मिसमूहांत विलक्षण वीर्य आहे अशा आपल्या तेजोमय मुखानें तूं आमचा सोमरस प्राशन कर. ॥ ४ ॥
वृष्णः॒ कोशः॑ पवते॒ मध्व॑ ऊ॒र्मिर्वृ॑ष॒भान्ना॑य वृष॒भाय॒ पात॑वे ।
वृष्णः कोशः पवते मध्व ऊर्मिः वृषभऽअन्नाय वृषभाय पातवे ।
वीरश्री उत्पन्न करणारा आणि मधुर अशा ह्या सोमरसाचें पात्र भरून जाऊन आंतील रस उचंबळून वाहूं लागला. वीरांनी अर्पण केलेल्याच हविर्भागाचा जो स्वीकार करतो त्या वीरश्रेष्ठ इंद्रानें हा रस प्राशन करावा म्हणूनच ऋत्विज पात्रांत ओतून ठेवीत आहेत. अध्वर्यु, चांगले जोरदार सोमवल्ली ठेंचण्याचे पाषाणही चांगले भक्कम, आणि खुद्द सोरसच शौर्यप्रद, मग तो ह्या वीरश्रेष्ठ इंद्राकरितां ऋत्विजांनी गाळून तयार करावा ह्यांत नवल कोणतें ? ॥ ५ ॥
वृषा॑ ते॒ वज्र॑ उ॒त ते॒ वृषा॒ रथो॒ वृष॑णा॒ हरी॑ वृष॒भाण्यायु॑धा ।
वृषा ते वज्रः उत ते वृषा रथः वृषणा हरी वृषभाइ आयुधा ।
तुझें वज्र वीर्यशाली, तुझा रथही वीर्यशाली, तुझे घोडे वीर्यशाली आणि तुझी आयुधेंही वीर्यशालीच आहेत. हे वीरश्रेष्ठा, वीरांनाच जी वीरश्री उत्पन्न होते तिचा सुद्धां स्वामी तूंच आहेस. तर हे इंद्रा, वीर्य गुणाचें सर्वस्व जो हा सोमरस तो प्राशन करून संतुष्ट हो. ॥ ६ ॥
प्र ते॒ नावं॒ न सम॑ने वच॒स्युवं॒ ब्रह्म॑णा यामि॒ सव॑नेषु॒ दाधृ॑षिः ।
प्र ते नावं न समने वचस्युवं ब्रह्मणा यामि सवनेषु दधृषिः ।
तूं स्तवनप्रिय आणि जणों युद्धरूप समुद्र तरून जाण्याची नौका; तेव्हां धैर्य धरून सोम अर्पण करण्याच्या वेळीं प्रार्थनास्तोत्राच्या सहाय्यानें मी तुझ्याकडे येत आहे. तर इंद्रा आमची प्रार्थना ऐकेल काय ? हा इंद्र अनुपम संपत्तिचा जणों काय अक्षय्य झराच आहे. परंतु तोही सोमरसानें अगदी भिजून जाईल असें आम्ही करतो. ॥ ७ ॥
पु॒रा स॑म्बा॒धाद॒भ्या व॑वृत्स्व नो धे॒नुर्न व॒त्सं यव॑सस्य पि॒प्युषी॑ ।
पुरा संऽबाधात् अभि आ ववृत्स्व नः धेनुः न वत्सं यवसस्य पिप्युषी ।
कुरणांत चरून तुंद झालेली धेनू आपल्या वासराचें रक्षण करते त्याप्रमाणें हे जे संकट आतां आमच्या पुढेंच वाढून टेवलेले आहे तें आमच्यावर कोसळण्यापूर्वींच तूं आमच्याकडे वळ आणि हे अमितप्रज्ञ इंद्रा, वीर पुरुषाची आपल्या प्रिय पत्नीशी भेंट व्हावी, त्याप्रमाणे तुझ्या दयार्द्र बुद्धिशीं आमचा लवकर समागम होऊं दे. ॥ ८ ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची अनुग्रहबुद्धि हीच प्रेमळ धेनू, तुझ्या भक्ताला मनोरथ-दुग्ध देऊन तृप्त करो. आम्हां सर्व भक्तजनांनाही असेंच दुग्ध दे. तूं आमचें भाग्य आहेस; तर आम्हांस वगळूं नको. आणि आम्ही आपल्या शूर वीरांसहवर्तमान यज्ञ सभेंत तुझे यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १७ (इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
तद॑स्मै॒ नव्य॑मङ्गिर॒स्वद॑र्चत॒ शुष्मा॒ यद॑स्य प्र॒त्नथो॒दीर॑ते ।
तत् अस्मै नव्यं अङ्गि७रस्वत् अर्चत शुष्मा यद् अस्य प्रत्नऽथा उत्ऽईरते ।
अंगीरसांप्रमाणे तुम्हीही इंद्रा प्रित्यर्थ एक नामांकित नवें स्तोत्र खड्या सुरांत म्हणा. पुरातन काळाप्रमाणें आतां सुद्धां इंद्राचा दरारा सारखा गाजत आहे. कारण प्रकाशरूप धेनूंचे एकंदर समूह भोंवताली तटबंदी बांधून पक्के चिणून टाकले होते ते त्यानें सोमरसाच्या हर्षभरांत ती तटबंदी ढांसळून टाकून मोकळे केले. ॥ १ ॥
स भू॑तु॒ यो ह॑ प्रथ॒माय॒ धाय॑स॒ ओजो॒ मिमा॑नो महि॒मान॒माति॑रत् ।
स भूतु यः ह प्रथमाय धायसे ओजः मिमानः महिमानं आ अतिरत् ।
सोमरस प्रथम प्राशन करण्याचा ज्या इंद्राचाच अधिकार, व आपल्या बळाचा अजमास दाखवितां दाखवितां ज्याने खुद्द मोठेपणालाच व्यापून टाकले, युद्धांमध्यें व आपल्या स्वतःला तेजाच्या कवचानेंच जो आच्छादित करतो त्यानेंच हे सर्व नक्षत्रगोल आपल्या मस्तकावर धारण केले आहेत, तेव्हां अशा त्या इंद्राचा जयजयकार असो. ॥ २ ॥
अधा॑कृणोः प्रथ॒मं वी॒र्यं म॒हद्यद॒स्याग्रे॒ ब्रह्म॑णा॒ शुष्म॒मैर॑यः ।
अध अकृणोः प्रथमं वीर्यं महत् यत् अस्य अग्रे ब्रह्मणा शुष्मं ऐरयः ।
इंद्रा, तुझा अगदीं प्राचीन आणि मोठा असा पराक्रम हा की, अगोदर शब्दानेंच तूं आपला दरारा चालवून दाखविलास. पीत तेजोरूप अश्व जोडलेल्या आपल्या रथांत तूं आरूढ होऊन शत्रूच्या वीरांची दाणादाण करून टाकलीस तेव्हां ते कांही मिळून व कांही एकएकटे असे जिकडे तिकडे पळून गेले. ॥ ३ ॥
अधा॒ यो विश्वा॒ भुव॑ना॒भि म॒ज्मने॑शान॒कृत्प्रव॑या अ॒भ्यव॑र्धत ।
अध यः विश्वा भुवन अभि मज्मना ईशानऽकृत् प्रऽवया अभि अवर्धत ।
आणि आपल्या अतुल प्रतापानें तो यच्चावत भुवनांचा पुरातन परंतु तारुण्यशाली असा प्रभू असून तो त्या सर्वांनाही व्यापून पुनः जास्त वाढलेलाच आहे. त्या जगन्नायकानें हे स्वप्रकाश गोल निर्माण करून त्यांच्या योगाने अंतराल भरून सोडलें आणि प्रकाशाने पांगलेल्या अंधःकाराला एकत्र शिवून टाकून गोळा करून ठेऊन दिले. ॥ ४ ॥
स प्रा॒चीना॒न्पर्व॑ताँ दृंह॒दोज॑साधरा॒चीन॑मकृणोद॒पामपः॑ ।
सः प्राचीनान् पर्वतान् दृंहत् ओजसा अधराचीनं अकृणोत् अपां अपः ।
पुढें झुकून पडण्याच्या बेतांत आलेल्या पर्वतांना त्याने आपल्या प्रतापानें पक्के अढळ केले, आणि खाली भूमीवर वर्षाव करावा हें कार्य जलांचे असें त्याने ठरवून टाकले. सर्व प्राणिमात्राचें पोषण करणार्या ह्या पृथ्वीला त्याचाच आधार आहे व त्याने आपल्या ईश्वरी करणीनें नक्षत्रें खाली पडूं न देतां सांवरून धरली आहेत. ॥ ५ ॥
सास्मा॒ अरं॑ बा॒हुभ्यां॒ यं पि॒ताकृ॑णो॒द्विश्व॑स्मा॒दा ज॒नुषो॒ वेद॑स॒स्परि॑ ।
सः अस्मै अरं बाहुऽभ्यां यं पिता अकृणोत् विश्वस्मात् आ जनुषः वेदसः परि ।
जगत्पित्या इंद्राने ज्या वज्राला, सर्व प्राण्यांना ज्ञान सामर्थ्यापेक्षांही वरचढ असेंच निर्माण केलेले आहे, व ह्याच्या योगाने ह्या इंद्राने भयंकर सिंहनाद करून क्रिवि राक्षसाला ठार मारून जमिनीवर निजवून दिले तें वज्रच मात्र ह्या इंद्राच्या भुजदंडाला पूर्णपणें शोभतें. ॥ ६ ॥
अ॒मा॒जूरि॑व पि॒त्रोः सचा॑ स॒ती स॑मा॒नादा सद॑स॒स्त्वामि॑ये॒ भग॑म् ।
अमाजूःऽइव पित्रोः सचा सती समानात् आ सदसः त्वां इये भगं ।
पितृगृही उपवर होणारी कन्या ज्याप्रमाणे तुजपाशी सौभाग्य मागते, त्याप्रमाणे मीही सर्व जीवांचा जो एकच समाईक आश्रय त्या ठिकाणीं तुजपाशी पदर पसरून सद्भाग्य मागत आहे. आम्हामध्यें बुद्धिप्रकाश उत्पन्न कर. तूं द्यावयाचें तें देतोसच पण, ज्याच्या योगानें तूं स्वतः आनंदमग्न असतोस तेंच भाग्य आमच्याकरितां घेऊन येऊन आम्हांस देऊन टाक. ॥ ७ ॥
भो॒जं त्वामि॑न्द्र व॒यं हु॑वेम द॒दिष्ट्वमि॒न्द्रापां॑सि॒ वाजा॑न् ।
भोजं त्वां इन्द्र वयं हुवेम ददिः त्वं इन्द्र अपांसि वाजान् ।
इंद्रा तूं उदारात्मा, आम्ही तुझाच धांवा करूं. तूंच कर्तव्यबुद्धि व सात्विक सामर्थ्य देत असतोस. आपल्या अद्भुत लीलेनें आम्हांस साहाय्य कर, आणि हे वीरश्रेष्ठ इंद्रा, आम्हांस अत्यंत उच्च अशा आनंदांत ठेव. ॥ ८ ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची अनुग्रहबुद्धि हीच प्रेमळ धेनू, तुझ्या भक्ताला मनोरथ-दुग्ध देऊन तृप्त करो. आम्हां सर्व भक्तजनांनाही असेंच दुग्ध दे. तूं आमचें भाग्य आहेस; तर आम्हांस वगळूं नको. आणि आम्ही आपल्या शूर वीरांसहवर्तमान यज्ञ सभेंत तुझे यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १८ (प्रातःस्मरणसीक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
प्रा॒ता रथो॒ नवो॑ योजि॒ सस्नि॒श्चतु॑र्युगस्त्रिक॒शः स॒प्तर॑श्मिः ।
प्रातरिति रथः नवः योजि सस्निः चतुःऽयुगः त्रिऽकशः सप्तऽरश्मिः ।
हा पहा यज्ञरूपी रथ प्रातःकाळी जोडून अगदी तयार आहे. हा रथ अभीष्टदाता असून, त्याला चार घोडे, तीन चाबूक आणि सात लगाम आहेत. रथाला दहा दारें असून तो मनुष्यांचे कल्याणच करीत असतो व स्वर्गीय प्रकाशाचाही लाभ करून देतो. अशा ह्या रथाला अग्नीमध्ये उत्कंठा-पूर्वक अर्पण केलेल्या आहुती व अंतःकरणपूर्वक केलेलीं स्तवनें ह्यांच्या द्वारेंच वेग मिळत असतो. ॥ १ ॥
सास्मा॒ अरं॑ प्रथ॒मं स द्वि॒तीय॑मु॒तो तृ॒तीयं॒ मनु॑षः॒ स होता॑ ।
सः अस्मै अरं प्रथमं सः द्वितीयं उतो इति तृतीयं मनुषः सः होता ।
ह्या इंद्रा प्रित्यर्थ करावयाच्या यज्ञाकरितां सकृद्दर्शनी पाहिलें तरी हा अग्निच योग्य दिसतो. दुसर्या खेपेस विचार केला तरीही त्या कार्याला तोच इष्ट वाटतो, पुनः तिसर्यानें विचार केला तरी तेंच. कारण मनुष्यमात्राचा यज्ञसंपादक हा अग्निच आहे. पण ह्याची तऱ्हाच वेगळी. सूक्ष्मरूपानें एकीच्या उदरांत असतो आणि प्रकट करतात ते दुसरेच, व हा अभिजात वीर ज्यांच्याबरोबर नेहमीं असतो तेही असे दुसरेच असतात. ॥ २ ॥
हरी॒ नु कं॒ रथ॒ इन्द्र॑स्य योजमा॒यै सू॒क्तेन॒ वच॑सा॒ नवे॑न ।
हरी इति नु कं रथे इन्द्रस्य योजं आऽयै सुऽक्तेन वचसा नवेन ।
आतां इंद्राने इकडे यावे म्हणून उत्कृष्ट सुरांत गायिलेल्या अपूर्व स्तोत्राने त्याच्या रथाला ती पीतवर्ण घोड्यांची जोडी मी ही जोडलीच पहा. हे इंद्रा, आमच्या येथें पुष्कळ कवि तुझ्या सेवेंत तत्पर आहेत. तेव्हां आता दुसरे कोणी भक्तजन तुला अडवून न ठेवोत म्हणजे झालें. ॥ ३ ॥
आ द्वाभ्यां॒ हरि॑भ्यामिन्द्र या॒ह्या च॒तुर्भि॒रा ष॒ड्भिर्हू॒यमा॑नः ।
आ द्वाभ्यां हरिऽभ्यां इन्द्र याहि आ चतुःऽभिः आ षट्ऽभिः हूयमानः ।
इंद्रा तुला आम्ही बोलवीत आहोत तर तूं रथाला दोन घोडे जोडून ये, चार जोडून ये अगर सहा जोडून ये; अथवा वाटल्यास आठ किंवा दहा सुद्धां जोडून हा सोमरस प्राशन करण्यास ये. हे परमपवित्र देवा, हा रस तुझ्याचकरितां गाळला आहे त्याचा तूं अव्हेर करूं नको. ॥ ४ ॥
आ विं॑श॒त्या त्रिं॒शता॑ याह्य॒र्वाङ्आम च॑त्वारिं॒शता॒ हरि॑भिर्युजा॒नः ।
आ विंशत्या त्रिंशता याहि अर्वाङ् आ चत्वारिंशता हरिऽभिः युजानः ।
तूं वीस, तीस किंवा चाळीस अश्व जोडूनही आमच्याकडे (भूलोकी) ये. हे इंद्रा, तूं आपल्या उत्कृष्ट रथाला पाहिजे तर पन्नास किंवा साठ वा सत्तर सुद्धां घोडे जोड परंतु सोमपान करण्यास येच. ॥ ५ ॥
आशी॒त्या न॑व॒त्या या॑ह्य॒र्वाङ्आर श॒तेन॒ हरि॑भिरु॒ह्यमा॑नः ।
आ अशीत्या नवत्या याहि अर्वाङ् आ शतेन हरिऽभिः उह्यमानः ।
अथवा आवश्यक असेल तर ऐंशी, नव्वद किंवा शंभर घोडे जोडलेल्याही रथांत बसून आमच्याकडे ये. आमच्या भक्तीने तूं हर्षनिर्भर व्हावेंस म्हणून हा पहा सोमरस आम्ही अगदी भक्तिपुरःसर ’शुनहोत्र’ नामक पात्रांत ओतून ठेवला आहे. ॥ ६ ॥
मम॒ ब्रह्मे॑न्द्र या॒ह्यच्छा॒ विश्वा॒ हरी॑ धु॒रि धि॑ष्वा॒ रथ॑स्य ।
मम ब्रह्म इन्द्र याहि अच्छ विश्वा हरी इति धुरि धिष्व रथस्य ।
इंद्रा माझ्याच प्रार्थनेकडे ये. कृपा कर आणि आपले सर्व घोडे रथाच्या धुरेला जोड. जरी भक्तांनी तुला इतर पुष्कळ ठिकाणी बोलाविलें असेल, तरी हे शूरा प्रथम ह्या आमच्या सोम-सवनांतच तूं रसप्राशनानें हृष्टचित्त हो. ॥ ७ ॥
न म॒ इन्द्रे॑ण स॒ख्यं वि यो॑षद॒स्मभ्य॑मस्य॒ दक्षि॑णा दुहीत ।
न म इन्द्रेण सख्यं वि योषत् अस्मभ्यं अस्य दक्षिणा दुहीत ।
माझें इंद्राशी जें आत्यंतिक प्रेम आहे त्यांत कधी व्यत्यय न येवो. त्याची दयार्द्रबुद्धि हीच धेनू माझे मनोरथ पूर्ण करो. त्याचा भुजदंड हाच आमचे उत्कृष्ट चिलखत; तेव्हां त्याच्या जोरावर प्रत्येक युद्धांत आम्हींच विजयी होऊं असे घडो. ॥ ८ ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची अनुग्रहबुद्धि हीच प्रेमळ धेनू, तुझ्या भक्ताला मनोरथ-दुग्ध देऊन तृप्त करो. आम्हां सर्व भक्तजनांनाही असेंच दुग्ध दे. तूं आमचें भाग्य आहेस; तर आम्हांस वगळूं नको. आणि आम्ही आपल्या शूर वीरांसहवर्तमान यज्ञ सभेंत तुझे यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त १९ (इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
अपा॑य्य॒स्यान्ध॑सो॒ मदा॑य॒ मनी॑षिणः सुवा॒नस्य॒ प्रय॑सः ।
अपायि अस्य अन्धसः मदाय मनीषिणः सुवानस्य प्रयसः ।
बुद्धिमान् भक्ताचें अत्युत्तम सुखच अशा ह्या सोमवल्लीच्या मधुर पेयाचा स्वीकार अंतकरणाला विशेष आनंद व्हावा म्हणूनच होत असतो. कारण ज्याचा महिमा पुरातन काळापासून अतिशय वाढलेलाच आहे अशा इंद्राला, आणि त्याच्या प्रार्थनेंत सदैव निमग्न राहणार्या भक्तजनांना सुद्धां त्या रसस्वादांत गोडीच वाटते. ॥ १ ॥
अ॒स्य म॑न्दा॒नो मध्वो॒ वज्र॑ह॒स्तोऽ॑हि॒मिन्द्रो॑ अर्णो॒वृतं॒ वि वृ॑श्चत् ।
अस्य मन्दानः मध्वः वज्रऽहस्तः अहिं इन्द्रः अर्णःऽवृतं वि वृश्चत् ।
हा मधुर रस पिऊन अत्यंत आनंदनिर्भर झालेल्या इंद्रानें, वज्र हातीं घेऊन अहि राक्षसाच्या ठिकर्या उडऊन दिल्या. कारण उचंबळून जाणार्या दिव्योदकाच्या प्रवाहाचा त्यानेंच चोहोंकडून कोंडमारा चालविला होता. दिव्य नद्यांचे ते सुखमय प्रवाह मोकळे सुटल्यावर पक्षी आपल्या घरट्यांकडे धांवतात त्याप्रमाणें ह्या पृथ्वीकडे धांवतच आले. ॥ २ ॥
स माहि॑न॒ इन्द्रो॒ अर्णो॑ अ॒पां प्रैर॑यदहि॒हाच्छा॑ समु॒द्रम् ।
स माहिनः इन्द्रः अर्णः अपां प्र ऐरयत् अहिऽहा अच्छ समुद्रं ।
अहीचा नाश करणारा आणि सर्व श्रेष्ठ अशा इंद्राने ते दिव्य जलाचे कल्लोळ समुद्राला जाऊन मिळावे म्हणून तिकडेच पाठवून दिले. सूर्याला उत्पन्न करून प्रकाशरूप धेनू हस्तगत करून घेतल्या आणि रात्र निर्माण करून प्राणिमात्रांनी दिवसा करावयाचे सर्व व्यापार ठरवून टाकले. ॥ ३ ॥
सो अ॑प्र॒तीनि॒ मन॑वे पु॒रूणीन्द्रो॑ दाशद्दा॒शुषे॒ हन्ति॑ वृ॒त्रम् ।
सः अप्रतीनि मनवे पुरूणि इन्द्रः दाशत् दाशुषे हन्ति वृत्रं ।
ह्या इंद्राने, हवि अर्पण करणार्या भक्तजनांना अपार आणि अप्रतिम लाभ करून दिले आहेत, व वृत्राचा वध त्यानेंच केला. तेव्हां सूर्याचा प्रकाश मी मिळवणार अशी ज्यांना ज्यांना ईर्ष्या आहे त्या त्या लोकांनी सहाय्यासाठी ताबडतोब अगदी लीनपणानें ज्याचा आश्रय करावा असा कोणी असेल तर तो इंद्रच होय. ॥ ४ ॥
स सु॑न्व॒त इन्द्रः॒ सूर्य॒मा दे॒वो रि॑ण॒ङ्मशर्त्या॑य स्त॒वान् ।
सः सुन्वत इन्द्रः सूर्यं आ देवः रिणक् मर्त्याय स्तवान् ।
स्तवन केले असतां प्रसन्न होऊन ह्या इंद्रानें सोम अर्पण करणार्या परंतु यःकश्चित् अशा भक्ताच्या स्वाधीन सूर्याला करून दिले. आणि एतशाने केलेल्या सेवेचा स्वीकार करून इंद्राने त्या एतशाला अनुपम संपत्ति, जणों काय त्याच्या मालकीचा भागच असें समजून दिली; व ती संपत्ति अशी कीं, तिच्या योगानें कसलाही अश्लाघ्य दुर्गुण असला तरी तो नाहींसाच व्हावा. ॥ ५ ॥
स र॑न्धयत्स॒दिवः॒ सार॑थये॒ शुष्ण॑म॒शुषं॒ कुय॑वं॒ कुत्सा॑य ।
स रन्धयत् सऽदिवः सारथये शुष्णं अशुषं कुयवं कुत्साय ।
परम तेजःपुंज इंद्राने आपला सारथी कुत्स याच्या हातीं सर्वभक्षक शुष्ण व कुयव (धान्याचा नाश करणारा) राक्षस ह्यांना दिले आणि दिवोदासाकरितां शंबराच्या नव्याण्णव दुर्गांचा विध्वंस केला. ॥ ६ ॥
ए॒वा त॑ इन्द्रो॒चथ॑महेम श्रव॒स्या न त्मना॑ वा॒जय॑न्तः ।
एव ते इन्द्र उचथं अहेम श्रवस्या न त्मना वाजयन्तः ।
इंद्रा, सात्विक सामर्थ्य मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेव्हां सत्कीर्तिच्या लालसेनें व उत्कट उत्कंठेनें आम्हीं हे तुझे स्तवन अशा रीतीनें करावे हे साहजिकच आहे. तर आज सात पिढ्या जें तुझें प्रेम ह्या तुझ्या सेवकांवर आहे त्याचा आम्हा तुझ्या सेवकांना पूर्ण लाभ मिळो. भगवंता, देवपरांमुख दुर्जनांच्या घातक शस्त्रांचे तूं तुकडे करून टाक. ॥ ७ ॥
ए॒वा ते॑ गृत्सम॒दाः शू॑र॒ मन्मा॑व॒स्यवो॒ न व॒युना॑नि तक्षुः ।
एवा ते गृत्सऽमदाः शूर मन्म अवस्यवः न वयुनानि तक्षुः ।
हे आम्ही गृत्समद तुझ्या प्रसादाची इच्छा धरून बसलो आहोंत आणि म्हणूनच, हे शूरा, तुझें मननीय स्तोत्र आणि तुझी उपासनापद्धति हीं दोन्हीही आम्ही कृतींत उतरली आहेत. इंद्रा, प्रार्थनानिमग्न अशा तुझ्या नवीन भक्तजनांना सुद्धां उत्साह, ओज, आराम आणि अत्यंत श्रेष्ठ सुख ह्यांचा लाभ होवो. ॥ ८ ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची अनुग्रहबुद्धि हीच प्रेमळ धेनू, तुझ्या भक्ताला मनोरथ-दुग्ध देऊन तृप्त करो. आम्हां सर्व भक्तजनांनाही असेंच दुग्ध दे. तूं आमचें भाग्य आहेस; तर आम्हांस वगळूं नको. आणि आम्ही आपल्या शूर वीरांसहवर्तमान यज्ञ सभेंत तुझे यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल २ सूक्त २० (इंद्रसूक्त)
ऋषिः -गृत्समदः देवता-इन्द्र छन्दः-त्रिष्टुप्
व॒यं ते॒ वय॑ इन्द्र वि॒द्धि षु णः॒ प्र भ॑रामहे वाज॒युर्न रथ॑म् ।
वयं ते वय इन्द्र विद्धि सु नः प्र भरामहे वाजऽयुः न रथं ।
एखादा झुंजार वीर आपला रथ अतिशय जोराने चालवितो, त्याप्रमाणे हे इंद्रा आम्ही आपल्या ऐन उमेदीचें वय तुझ्या कार्याकडेच अर्पण करीत आहों. तर आमच्याकडे आपल्या कृपाकटाक्षानें एकवार पहा. आम्ही तुझेच गुणानुवाद तत्परनेतें गातो, मनःपूर्वक तुझेंच ध्यान करतो व तुझ्या कृपेंतील शूर पुरुषांच्या निरुपम सुखाकरितांच यज्ञ करीत असतो. ॥ १ ॥
त्वं न॑ इन्द्र॒ त्वाभि॑रू॒ती त्वा॑य॒तो अ॑भिष्टि॒पासि॒ जना॑न् ।
त्वं नः इन्द्र त्वाभिः ऊती त्वाऽयतः अभिष्टिऽपा असि जनान् ।
इंद्रा, तूं आमचा आहेस व तुझ्यावर आपला सर्व भार ठेवणार्या भक्तजनांच्या मनोरथांचे तूं आपल्य कृपाकवचानें रक्षण करतोस. आणि जो जो भक्त खर्या अंतःकरणानें तुला शरण जातो त्या त्या दानशूर भक्ताचा तूं प्रभु आणि संरक्षकही तूंच होतोस. ॥ २ ॥
स नो॒ युवेन्द्रो॑ जो॒हूत्रः॒ सखा॑ शि॒वो न॒राम॑स्तु पा॒ता ।
सः नः युवा इंद्रः जोहूत्रः सखा शिवः नरा अस्तु पाता ।
ज्याचा सर्व लोक जयघोष करतात तोच हा तारुण्याचा पुतळा आणि वीरांचा हितकर सखा इंद्र आमचा संरक्षक होवो; आणि तोच आपल्या कृपेनें, प्रशस्ति म्हणणारे ऋत्विज, अर्चन करणारे भक्त, हविरन्न तयार करणारे सेवक आणि स्तवन करणारे उपासक जन ह्या सर्वांना दुःखसमुद्राच्या पार घेऊन जावो. ॥ ३ ॥
तमु॑ स्तुष॒ इन्द्रं॒ तं गृ॑णीषे॒ यस्मि॑न्पु॒रा वा॑वृ॒धुः शा॑श॒दुश्च॑ ।
तं ऊं इति स्तुषे इन्द्रं तं गृणीषे यस्मिन् पुरा ववृधुः शाशदुः च ।
ज्याच्या कृपेने प्राचीन काळच्या भक्तजनांचा उत्कर्ष होऊन ते सत्ताधीश झाले त्या इंद्राचेंच मी स्तवन करतो व त्याचेंच गुणसंकीर्तन करतो. तो एकदां वळला, कीं प्रार्थना निमग्न भक्त नवीन कां असेना, स्पृहणीय संपत्तीविषयींचा त्याचा मनोरथ तो परिपूर्ण करून सोडतो. ॥ ४ ॥
सो अङ्गि॑तरसामु॒चथा॑ जुजु॒ष्वान्ब्रह्मा॑ तूतो॒दिन्द्रो॑ गा॒तुमि॒ष्णन् ।
सः अङ्गितरसां उचथा जुजुष्वान् ब्रह्मा तूतोत् इन्द्रः गातुं इष्णन् ।
अंगिरसांच्या प्रेमळ स्तवनांनी अतिशय संतुष्ट होऊन व त्यांचा मार्ग निष्कंटक करून त्यांच्या प्रार्थनास्तोत्रांमध्यें त्यानें सामर्थ्य उत्पन्न केलें; आणि भक्ताच्या स्तवनाने दयार्द्र होऊन त्याने सूर्याला वर आणून उषःकालाला बाजूस ओढून घेतलें आणि वखवखलेल्या व अधार्मिक दुष्टांची असंख्य ठिकाणें उध्वस्त करून टाकलीं. ॥ ५ ॥
स ह॑ श्रु॒त इन्द्रो॒ नाम॑ दे॒व ऊ॒र्ध्वो भु॑व॒न्मनु॑षे द॒स्मत॑मः ।
सः ह श्रुतः इन्द्रः नाम देव ऊर्ध्वः भुवत् मनुषे दस्मऽतमः ।
त्या ह्या प्रख्यात देवानें सृष्टीमध्यें अनेक चमत्कार केलेले आहेत. तो हा इंद्र भक्तांच्या साहाय्याकरितां सदैव उभाच आहे. त्यांकरितांच त्या सर्वसत्ताधीश व स्वतंत्र प्रभूनें महाघातकी आणि अधार्मिक दुष्टांचे प्रिय मस्तक तोडून जमिनीवर पाडले. ॥ ६ ॥
स वृ॑त्र॒हेन्द्रः॑ कृ॒ष्णयो॑नीः पुरंद॒रो दासी॑रैरय॒द्वि ।
स वृत्रऽहा इंद्रः कृष्णऽयोनीः पुरंऽदरः दासीः ऐरयत् वि ।
ह्याच वृत्रघ्न इंद्राने - वृत्राच्या प्रचंड दुर्गांचा विध्वंस करणार्या ह्या पुरंदरानें - कृष्णवर्ण व धर्मविहीन अनार्यांची अगदीं दाणादाण करून टाकली व पृथ्वी आणि दिव्योदकें ही आर्य लोकांकरितां निर्माण करून भक्तांच्या प्रशंसास्तोत्रांत त्याने कायमचे सामर्थ्य आणलें. ॥ ७ ॥
तस्मै॑ तव॒स्य॑१मनु॑ दायि स॒त्रेन्द्रा॑य दे॒वेभि॒रर्ण॑सातौ ।
तस्मै तवस्यं अनु दायि सत्रा इंद्राय देवेभिः अर्णऽसातौ ।
लाटांनी उचंबळणारे दिव्य जलप्रवाह इंद्राने हस्तगत केले त्या वेळेपासूनच सर्व देवतांनी ह्या इंद्राच्या अपार बलशालित्वाचें श्रेष्ठत्व मान्य केले आहे. त्यांनी ह्या इंद्राच्या खांद्यावर वज्र ठेऊन दिले त्याबरोबर त्यानें धर्मविहीन दुष्टांचा संहार करूण लोखंडाची तटबंदी असलेलीं त्यांची नगरें पार पाडून टाकली. ॥ ८ ॥
नू॒नं सा ते॒ प्रति॒ वरं॑ जरि॒त्रे दु॑ही॒यदि॑न्द्र॒ दक्षि॑णा म॒घोनी॑ ।
नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयत् इन्द्र दक्षिणा मघोनी ।
आतां हे इंद्रा, तुझी ती प्रख्यात व औदार्यशील अशी भक्तांविषयींची अनुग्रहबुद्धि हीच प्रेमळ धेनू, तुझ्या भक्ताला मनोरथ-दुग्ध देऊन तृप्त करो. आम्हां सर्व भक्तजनांनाही असेंच दुग्ध दे. तूं आमचें भाग्य आहेस; तर आम्हांस वगळूं नको. आणि आम्ही आपल्या शूर वीरांसहवर्तमान यज्ञ सभेंत तुझे यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ ९ ॥
ॐ तत् सत् |