PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त १ ते १०

ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त १ (अग्निसूक्त)

ऋषिः - अङ्‌गिरसः देवता- अग्निः छन्दः- जगती


त्वम् अ॑ग्ने॒ द्युभि॒स्त्वमा॑शुशु॒क्षणि॒स्त्वम॒द्‌भ्यस्त्वमश्म॑न॒स्परि॑ ।
त्वं वने॑भ्य॒स्त्वमोष॑धीभ्य॒स्त्वं नृ॒णां नृ॑पते जायसे॒ शुचिः॑ ॥ १ ॥

त्वं अग्ने द्युऽभिः त्वं आऽशुशुक्षणिः त्वं अद्ऽभ्यः त्वं अश्मनः परि ॥
त्वं वनेभ्यः त्वं ओषधीभ्यः त्वं नृणां नृऽपते जायसे शुचिः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, परम तेजःपुंज असा तूं स्वर्गीय उदकांपासून , किंवा कणखर अशा पाषाणापासून, किंवा निबिड अरण्यापासून अथवा हे सकल लोकपालका, वनस्पतीपासूनही प्रतिदिनीं प्रकट होत असतोस तो पवित्र स्वरुपानेंच दृगोचर होत असतोस. ॥ १ ॥


तवा॑ग्ने हो॒त्रं तव॑ पो॒त्रमृ॒त्वियं॒ तव॑ ने॒ष्ट्रं त्वम॒ग्निदृ॑ताय॒तः ।
तव॑ प्रशा॒स्त्रं त्वम॑ध्वरीयसि ब्र॒ह्मा चासि॑ गृ॒हप॑तिश्च नो॒ दमे॑ ॥ २ ॥

तव अग्ने होत्रं तव पोत्रं ऋत्वियं तव नेष्ट्रं त्वं अग्नित् ऋतऽयतः ॥
तव प्रऽशास्त्रं त्वं अध्वरिऽयसि ब्रह्मा च असि गृहऽपतिः च नः दमे ॥ २ ॥

हे अग्ने, यज्ञामध्ये होत्याचा मान तुझाच, यथाकालीं करावयाच्या अशा पोतृकर्माचा मान तुलाच आणि सत्यधर्माचें आचरण करणार्‍या यजमानाच्या यज्ञांतील नेष्ट्याचाही मान तुझाच असतो. तूं प्रशास्ता आहेस. आणि अध्वर्युचें कामही पण तूंच करतोस. त्याचप्रमाणें ब्रह्मा तूंच आणि आमच्या घरांतील गार्हपत्याग्निही तूंच आहेस. ॥ २ ॥


त्वम॑ग्न॒ इन्द्रो॑ वृष॒भः स॒ताम॑सि॒ त्वं विष्णु॑रुरुगा॒यो न॑म॒स्यः ।
त्वम् ब्र॒ह्मा र॑यि॒विद्ब्र॑ह्मणस्पते॒ त्वं वि॑धर्तः सचसे॒ पुर॑न्ध्या ॥ ३ ॥

त्वं अग्ने इन्द्रः वृषभः सतां असि त्वं विष्णुः उरुऽगायः नमस्यः ॥
त्वं ब्रह्मा रयिऽवित् ब्रह्मणः पते त्वं विऽधर्तः व्सचसे पुरंऽध्या ॥ ३ ॥

हे अग्ने पुण्यपुरुषाचे मनोरथ पूर्ण करणारा इंद्र तो तूंच, व परमपूज्य आणि अमित कीर्ति असा जो विष्णू तोहि तूंच. हे ब्रह्मणस्पतिरूप अग्निदेवा, दिव्य संपत्ति देणारा ब्रह्मा तूंच आहेस. आणि जगत्तारका अलौलिक जी बुद्धिमत्ता तिनें तुझ्याच चरणांचा आश्रय केलेला आहे. ॥ ३ ॥


त्वम॑ग्ने॒ राजा॒ वरु॑णो धृ॒तव्र॑त॒स्त्वं मि॒त्रो भ॑वसि द॒स्म ईड्यः॑ ।
त्वम॑र्य॒मा सत्प॑ति॒र्यस्य॑ स॒म्भुजं॒ त्वमंशो॑ वि॒दथे॑ देव भाज॒युः ॥ ४ ॥

त्वं अग्ने राजा वरुणः धृतऽव्रतः त्वं मित्रः भवसि दस्म ईड्यः ॥
त्वं अर्यमा सत्ऽपतिः यस्य संऽभुजं त्वं अंशः विदथे देव भाजयुः ॥ ४ ॥

ज्याच्या नियमांस कधींही बाध येत नाहीं असा विश्वाचा राजा जो वरुण तो हे अग्नीदेवा तूंच आहेस; महा पराक्रमी आणि स्तुत्य असा मित्रही तूंच. सकळ सज्जनांचा प्रभु असा अर्यमा तूंच आणि हे देवा, उपभोग घेण्यासारखे जें जें सुख अर्यमा देत असतो तें तें सुख यज्ञमंडपांत उदार हस्तानें देणारा जो अंश नामक देव तोही तूंच आहेस ॥ ४ ॥


त्वम॑ग्ने॒ त्वष्टा॑ विध॒ते सु॒वीर्यं॒ तव॒ ग्नावो॑ मित्रमहः सजा॒त्यम् ।
त्वमा॑शु॒हेमा॑ ररिषे॒ स्वश्व्यं॒ त्वं न॒रां शर्धो॑ असि पुरू॒वसुः॑ ॥ ५ ॥

त्वं अग्ने त्वष्टा विधते सुऽवीर्यं तव ग्नावः मित्रऽमहः सऽजात्यं ॥
त्वं आशुऽहेमा ररिषे सुऽअश्व्यं त्वं नरां शर्धः असि पुरुऽवसुः ॥ ५ ॥

हे अग्ने, त्वष्टादेव तूंच असल्यामुळें, भक्तांच्या आंगीं जें अत्युत्कृष्ट वीर्य असतें तेंही तुझेच स्वरूप होय. हे देवा, मित्राप्रमाणें तुझी कांति सुखकर असते, तेव्हां तुझ्या दिव्यशक्तीचें सर्व विश्वाशीं सजातीयत्वच आहे. विद्युलते प्रमाणे अत्यंत त्वरित गतीनें येऊन बुद्धिरूप उत्तम अश्व भक्तांनां तूंच देतोस, आणि तूं अत्यंत ऐश्वर्यसंपन्न आहेस तेव्हां बलशाली पुरुषाचें बलही तूंच ॥ ५ ॥


त्वम॑ग्ने रु॒द्रो असु॑रो म॒हो दि॒वस्त्वं शर्धो॒ मारु॑तं पृ॒क्ष ई॑शिषे ।
त्वं वातै॑ररु॒णैर्या॑सि शंग॒यस्त्वं पू॒षा वि॑ध॒तः पा॑सि॒ नु त्मना॑ ॥ ६ ॥

त्वं अग्ने रुद्रः असुरः महः दिवः त्वं शर्धः मारुतं पृक्ष ईशिषे ॥
त्वं वातैः अरुणैः यासि शंऽगयः त्वं पूषा विधतः पासि नु त्मना ॥ ६ ॥

हे अग्निदेवा, महदाकाशांत राहणारा परमात्मा रुद्र तूं आहेस; मरुतांची सेना तूंच आणि ज्याच्यामुळें प्राणिमात्रांचे पोषण होतें त्या सामर्थ्यावर प्रभुत्वही तुझेंच असतें. मंगलधाम असा तूं प्रभातकालच्या तेजस्वी वायूसह सर्वत्र संचार करतोस आणि सर्वपोषक पुषादेवाच्या रूपानें आपण होऊन भक्तांचें परिपालन करतोस. ॥ ६ ॥


त्वम॑ग्ने द्रविणो॒दा अ॑रङ्॒गकृते॒ त्वं दे॒वः स॑वि॒ता र॑त्न॒धा अ॑सि ।
त्वम् भगो॑ नृपते॒ वस्व॑ ईशिषे॒ त्वम् पा॒युर्दमे॒ यस्तेऽ॑विधत् ॥ ७ ॥

त्वं अग्ने द्रविणःऽदाः अरंऽकृते त्वं देवः सविता रत्नऽधा असि ॥
त्वं भगः नृऽपते वस्वः ईशिषे त्वं पायुः दमे यः ते अविधत् ॥ ७ ॥

अग्ने, सेवारूप अलंकारानें तुला नटविणार्‍या भक्तांनां सामर्थ्यधन देणारा तूं आहेस, सर्वप्रकारच्या अमोलिक रत्नाचा निधी जो सर्वप्रेरक सविता तोही तूंच. हे सकल लोक प्रभो तूं भाग्यदाता म्हणून अत्यंत उत्कृष्ट असें जें दिव्य धन आहे त्या धनावर सत्ता तूंच चालवितोस आणि तुझ्या निवास स्थलीं (वेदीवर) तुझी मनोभावानें सेवा करणार्‍या भक्तांचा रक्षणकर्ता तूंच होतोस. ॥ ७ ॥


त्वाम॑ग्ने॒ दम॒ आ वि॒श्पतिं॒ विश॒स्त्वां राजा॑नं सुवि॒दत्र॑मृञ्जते ।
त्वं विश्वा॑नि स्वनीक पत्यसे॒ त्वं स॒हस्रा॑णि श॒ता दश॒ प्रति॑ ॥ ८ ॥

त्वां अग्ने दमे आ विश्पतिं विशः त्वां राजानं सुऽविदत्रं ऋञ्जते ॥
त्वं विश्वानि सुऽअनीक पत्यसे त्वं सहस्राणि शता दश प्रति ॥ ८ ॥

हे अग्निदेवा, तुझ्या वेदीवर, तूं सकलजन पालक आणि सर्व जगाचा अत्यंत उदार राजा म्हणून तुझें गौरव भक्तजन करीत असतात. हे अतुल रूपा, सर्व वस्तु-जाताचा स्वामी तूं आहेस, आणि दहा पांचच काय पण शेंकडो अथवा असंख्य लोकानांही पण तूं भारी आहेस. ॥ ८ ॥


त्वाम॑ग्ने पि॒तर॑मि॒ष्टिभि॒र्नर॒स्त्वां भ्रा॒त्राय॒ शम्या॑ तनू॒रुच॑म् ।
त्वं पु॒त्रो भ॑वसि॒ यस्तेऽ॑विध॒त्त्वं सखा॑ सु॒शेवः॑ पास्या॒धृषः॑ ॥ ९ ॥

त्वां अग्ने पितरं इष्टिऽभिः नरः त्वां भ्रात्राय शम्या तनूऽरुचं ॥
त्वं पुत्रः भवसि यः ते अविधत् त्वं सखा सुऽशेवः पासि आऽधृषः ॥ ९ ॥

हे अग्ने, सर्व लोक तुज जगपित्याला यज्ञ यागानीं संतुष्ट करितात व तुझें बंधुत्व लाभावें म्हणून तुला- तेजोमय शरीरी देवाला- आपल्या तपःश्चर्येनें प्रसन्न करतात, तेव्हां तूंही सेवा करणार्‍या भक्ताचा पुत्र होतोस, अथवा आनंददायक असा प्राणमित्र होऊन शत्रूच्या हल्यापासून त्यांचें संरक्षण करितोस. ॥ ९ ॥


त्वम॑ग्न ऋ॒भुरा॒के न॑म॒स्यस्त्वं वाज॑स्य क्षु॒मतो॑ रा॒य ई॑शिषे ।
त्वं वि भा॒स्यनु॑ दक्षि दा॒वने॒ त्वं वि॒शिक्षु॑रसि य॒ज्ञमा॒तनिः॑ ॥ १० ॥

त्वं अग्ने ऋभुः आके नमस्यः त्वं वाजस्य क्षुऽमतः रायः ईशिषे ॥
त्वं वि भासि अनु धक्षि दावने त्वं विशिक्षुः असि यज्ञं आऽतनिः ॥ १० ॥

हे अग्ने, पूजनीय ऋभू तो प्रत्यक्ष तूंच आहेस. प्रतापी अशा पुरुषार्थ संपत्तीचा मालक तूंच. तूं प्रज्वलित होतोस, प्रकाशमान होतोस, तो हवि अर्पण करणार्‍या भक्ताच्या कल्याणाकरितांच म्हणून अशा भक्ताचा यज्ञ सिद्धीस नेऊन त्याला तूं सन्मार्गदर्शक होतोस. ॥ १० ॥


त्वम॑ग्ने॒ अदि॑तिर्देव दा॒शुषे॒ त्वं होत्रा॒ भार॑ती वर्धसे गि॒रा ।
त्वमिळा॑ श॒तहि॑मासि॒ दक्ष॑से॒ त्वं वृ॑त्र॒हा व॑सुपते॒ सर॑स्वती ॥ ११ ॥

त्वं अग्ने अदितिः देव दाशुषे त्वं होत्रा भारती वर्धसे गिरा ॥
त्वं इळा शतऽहिमा असि दक्षसे त्वं वृत्रऽहा वसुऽपते सरस्वती ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, हविर्दात्याला अदिति तूंच आहेस. होत्रा आणि भारती ह्या देवतांच्या रूपानें स्तुतींनीं आनंदभरित तूंच होत असतोस. असंख्य वर्षांची पुरातन जी इळा, तिचेंहि रूप भक्तांच्या आंगीं तरतरी आणण्यासाठीं तूंच घेत असतोस. हें अत्युत्कृष्ट निधीच्या प्रभो अग्निदेवा, तूं वृत्राचा नाश करणारा आहेस, आणि सरस्वतीही तूंच आहेस. ॥ ११ ॥


त्वम॑ग्ने॒ सुभृ॑त उत्त॒मं वय॒स्तव॑ स्पा॒र्हे वर्ण॒ आ सं॒दृशि॒ श्रियः॑ ।
त्वं वाजः॑ प्र॒तर॑णो बृ॒हन्न॑सि॒ त्वं र॒यिर्ब॑हु॒लो वि॒श्वत॑स्पृ॒थुः ॥ १२ ॥

त्वं अग्ने सुऽभृतः उत्ऽतमं वयः तव स्पार्हे वर्णे आ संऽदृशि श्रियः ॥
त्वं वाजः प्रऽतरणः बृहन् असि त्वं रयिः बहुलः विश्वतः पृथुः ॥ १२ ॥

अग्नी तूं भव्यशरीरी असून लोकोत्तर तारण्याची मूर्तिच आहेस. सौंदर्य म्हणून म्हणतात तें तर फक्त तुझ्याच स्पृहणीय व मनोहर अंगकांतींत नजरेस पडतें. सर्व संकटातून पार पाडणारा आणि महाथोर असा जो सात्विक प्रताप तो तूंच आहेस, आणि अपार व सर्व विश्वापेक्षांसुद्धां जी मोठी आहे अशी संपत्तिही तूंच. ॥ १२ ॥


त्वाम् अ॑ग्न आदि॒त्यास॑ आ॒स्यं त्वां जि॒ह्वां शुच॑यश्चक्रिरे कवे ।
त्वां रा॑ति॒षाचो॑ अध्व॒रेषु॑ सश्चिरे॒ त्वे दे॒वा ह॒विर॑द॒न्त्याहु॑तम् ॥ १३ ॥

त्वां अग्ने आदित्यासः आस्यं त्वां जिह्वां शुचयः चक्रिरे कवे ॥
त्वां रातिऽसाचः अध्वरेषु सश्चिरे त्वे इति देवाः हविः अदन्ति आऽहुतं ॥ १३ ॥

हे अग्ने, आदित्यांनीं तुला आपले मुख असें म्हटले; हे महाज्ञानी त्या देवा, त्या पवित्र विभृतींनीं आपल्या जिव्हेचें पदही तुलाच दिलें. औदार्यशाली देव तुझ्या मागोमाग येऊन यज्ञामध्यें तुझ्याच ठिकाणीं अर्पण केलेला हविर्भाग भक्षण करीत असतात. ॥ १३ ॥


त्वे अ॑ग्ने॒ विश्वे॑ अ॒मृता॑सो अ॒द्रुह॑ आ॒सा दे॒वा ह॒विर॑द॒न्त्याहु॑तम् ।
त्वया॒ मर्ता॑सः स्वदन्त आसु॒तिं त्वं गर्भो॑ वी॒रुधां॑ जज्ञिषे॒ शुचिः॑ ॥ १४ ॥

त्वे इति अग्ने विश्वे अमृतासः अद्रुहः आसा देवाः हविः अदन्ति आऽहुतं ॥
त्वया मर्तासः स्वदन्ते आऽसुतिं त्वं गर्भः वीरुधां जज्ञिषे शुचिः ॥ १४ ॥

हे अग्ने, स्वतः अमर परंतु कोणाचाही द्वेष न करणारे जे देव आहेत ते सर्व तुझ्याच ठिकाणीं अर्पण केलेला हविर्भाग स्वमुखानें भक्षण करीत असतात. मर्त्य मानवहि तुझ्याच कृपेनें अन्नरसाचा आस्वाद घेतात. आणि वनस्पतींच्या उदरींसुद्धां तूंच परम पवित्र सूक्ष्म रूपानें प्रादुर्भूत होत असतोस. ॥ १४ ॥


त्वं तान्सं च॒ प्रति॑ चासि म॒ज्मनाग्ने॑ सुजात॒ प्र च॑ देव रिच्यसे ।
पृ॒क्षो यदत्र॑ महि॒ना वि ते॒ भुव॒दनु॒ द्यावा॑पृथि॒वी रोद॑सी उ॒भे ॥ १५ ॥

त्वं तान् सं च प्रति च असि मज्मना अग्ने सुऽजात प्र च देव रिच्यसे ॥
पृक्षः यद् अत्र महिना वि ते भुवत् अनु द्यावापृथिवी इति रोदसी इति उभे इति ॥ १५ ॥

पवित्र ठिकाणीं प्रकट होणार्‍या अग्निदेवा जगांतील प्रत्येक वस्तूशीं, व सर्व वस्तु एकत्र केल्या तरी त्या सर्वांशींही तुझी बरोबरी असते. ह्यांत कांहींच आश्चर्य नाहीं. पण हे देवा आपल्या दिव्य प्रतापानें त्या सर्वांपेक्षांही तूं वरचढच आहेस. अशावेळीं तुझें सामर्थ्य आपल्या मोठेपणाच्या भरांत अंतराळ प्रदेशासह सर्व पृथ्वी व आकाश ह्या दोन्हीं ठिकाणीं ओतप्रोत भरून जाऊन मावेनासें होतें ॥ १५ ॥


ये स्तो॒तृभ्यो॒ गोअ॑ग्रा॒मश्व॑पेशस॒मग्ने॑ रा॒तिमु॑पसृ॒जन्ति॑ सू॒रयः॑ ।
अ॒स्माञ्च॒ तांश्च॒ प्र हि नेषि॒ वस्य॒ आ बृ॒हद्व॑देम वि॒दथे॑ सु॒वीराः॑ ॥ १६ ॥

ये स्तोतृऽभ्यः गोऽअग्रां अश्वऽपेशसं अग्ने रातिं उपऽसृजन्ति सूरयः ॥
अस्मान् च तान् च प्र हि नेषि वस्यः आ बृहत् वदेम विदथे सुवीराः ॥ १६ ॥

तुझ्या स्तोतृजनांना (ज्ञान) गोधन प्रमुख आणि सुबुद्धिरूप अश्व संपन्न अशी देणगी जे उदार महात्मे देत असतत, त्यांना आणि त्यांच्या बरोबर आम्हांलाही अत्युत्तम अशा आनंदमय वस्तूंकडे घेऊन जा, आणि आम्हीं आमच्या विजयी वीरांसह यज्ञसभेंत तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त २ (अग्निसूक्त)

ऋषिः - अङ्‌गिरसः देवता-अग्निः छन्दः-जगती


य॒ज्ञेन॑ वर्धत जा॒तवे॑दसम॒ग्निं य॑जध्वं ह॒विषा॒ तना॑ गि॒रा ।
स॒मि॒धा॒नं सु॑प्र॒यसं॒ स्वर्णरं द्यु॒क्षं होता॑रं वृ॒जने॑षु धू॒र्षद॑म् ॥ १ ॥

यज्ञेन वर्धत जातऽवेदसं अग्निं यजध्वं हविषा तना गिरा ॥
संऽइधानं सुऽप्रयसं स्वःऽनरं द्युक्षं होतारं वृजनेषु धूऽसदं ॥ १ ॥

सर्व वस्तूमात्राचें ज्ञान ज्याला आहे त्या ह्या अग्नीला यज्ञानें प्रमुदित करा. अखंड स्तवनवाणीनें आणि हवीनें त्याचें अर्चन करा. हा अग्नी अत्यंत प्रज्वलित व आनंदमय असा दिव्य वीर आहे. स्वर्गलोकांतील होता, आणि आमच्या स्वभूमींतील आमचा धुरीण तोच आहे. ॥ १ ॥


अ॒भि त्वा॒ नक्ती॑रु॒षसो॑ ववाशि॒रेऽ॑ग्ने व॒त्सं न स्वस॑रेषु धे॒नवः॑ ।
दि॒व इ॒वेद॑र॒तिर्मानु॑षा यु॒गा क्षपो॑ भासि पुरुवार सं॒यतः॑ ॥ २ ॥

अभि त्वा नक्तीः उषसः ववाशिरे अग्ने वत्सं न स्वसरेषु धेनवः ॥
दिवःऽइव इत् अरतिः मानुषा युगा आ क्षपः भासि पुरुऽवार संऽयतः ॥ २ ॥

हे अग्निदेवा, धेनु ज्याप्रमाणें गोठ्यांत अपल्या वासरांकडे हंबारत येतात, त्याप्रमाणें हे अग्ने उषा आणि रात्र ह्या तुझ्याकडे औत्सुक्यानें धांव घेत येतात. हे सर्वजनप्रिय अग्ने तूं स्वर्गलोकींचा महाबुद्धिमन् अधिष्ठाता असूनही ह्या मानवी युगांत भूलोकीं रात्रीं नित्य प्रकाशत असतोस. ॥ २ ॥


तं दे॒वा बु॒ध्ने रज॑सः सु॒दंस॑सं दि॒वस्पृ॑थि॒व्योर॑र॒तिं न्येरिरे ।
रथ॑मिव॒ वेद्यं॑ शु॒क्रशो॑चिषम॒ग्निं मि॒त्रं न क्षि॒तिषु॑ प्र॒शंस्य॑म् ॥ ३ ॥

तं देवाः बुध्ने रजसः सुऽदंससं दिवःपृथिव्योः अरतिं नि एरिरे ॥
रथंऽइव वेद्यं शुक्रऽशोचिषं अग्निं मित्रं न क्षितिषु प्रऽशंस्यं ॥ ३ ॥

त्या अद्‍भुत कर्म कुशल अग्नीला, पृथ्वी आणि आकाश ह्या दोहोंच्याही नियामकाला देवानीं रजोलोकाच्या अगदीं तळाशीं (म्हणजेच ह्या भूलोकीं) आणलें. हा अग्नि वेगवान् रथाप्रमाणें विख्यात आहे. ह्याचे तेज पवित्र असून हा मित्राप्रमाणें सर्व ठिकाणी सारखाच स्तवनयोग्य आहे. ॥ ३ ॥


तमु॒क्षमा॑णं॒ रज॑सि॒ स्व आ दमे॑ च॒न्द्रमि॑व सु॒रुचं॑ ह्वा॒र आ द॑धुः ।
पृश्न्याः॑ पत॒रं चि॒तय॑न्तम॒क्षभिः॑ पा॒थो न पा॒युं जन॑सी उ॒भे अनु॑ ॥ ४ ॥

तं उक्षमाणं रजसि स्वे आ दमे चन्द्रं इव सुऽरुचं ह्वारे आ दधुः ॥
पृश्न्याः पतरं चितयन्तं अक्षऽभिः पाथः न पायुं जनसी इति उभे इति अनु ॥ ४ ॥

अंतराळांत दिवसानुदिवस वृद्धिंगत होणार्‍या चंद्राप्रमाणे ज्याची कांति मनोहर आहे त्या ह्या अग्नीची स्थापना, एखाद्या गुप्त ठिकाणीं सुवर्णाचा ठेवा ठेवावा त्याप्रमाणें त्याच्या स्वतःच्या ठिकाणीं ( वेदीवर ) केलेली असते. हा अग्नि चित्रविचित्र अशा मेघमालेचा एक सुंदर पक्षीच आहे आणि नदीच्या पाण्यावरील पुलाप्रमाणें द्यु आणि पृथिवी ह्या दोन्ही लोकांवर तो आपली दृष्टी निश्चल ठेवित असतो. ॥ ४ ॥


स होता॒ विश्वं॒ परि॑ भूत्वध्व॒रं तमु॑ ह॒व्यैर्मनु॑ष ऋञ्जते गि॒रा ।
हि॒रि॒शि॒प्रो वृ॑धसा॒नासु॒ जर्भु॑र॒द्द्यौर्न स्तृभि॑श्चितय॒द्रोद॑सी॒ अनु॑ ॥ ५ ॥

सः होता विश्वं परि भूतु अध्वरं तं ऊं इति हव्यैः मनुषः ऋञ्जते गिरा ॥
हिरिऽशिप्रः वृधसानासु जर्भुरत् द्यौः न स्तृऽभिः चितयत् रोदसी इति अनु ॥ ५ ॥

अग्नी हा होतृरूपानें ह्या सर्वव्यापक यज्ञाचा चोहोंकडून सांभाळ करो. सर्व लोक हवींनीं व स्तुतींनी त्यालाच विभूषित करितात. सुवर्णमुकुट धारण करून हा अग्नि वनौषधींच्या समुदायांत मोठ्या डौलानें विहार करतो व नक्षत्रांच्या योगानें आकाश जसें चमकत असते, त्याप्रमाणें आपल्या ज्वालांनीं अंतराल प्रदेशाला लखलखीत करतो. ॥ ५ ॥


स नो॑ रे॒वत्स॑मिधा॒नः स्व॒स्तये॑ संदद॒स्वान्र॒यिम॒स्मासु॑ दीदिहि ।
आ नः॑ कृणुष्व सुवि॒ताय॒ रोद॑सी॒ अग्ने॑ ह॒व्या मनु॑षो देव वी॒तये॑ ॥ ६ ॥

स नः रेवत् संऽइधानः स्वस्तये संऽददस्वान् रयिं अस्मासु दीदिहि ॥
आ नः कृणुष्व सुविताय रोदसी इति अग्ने हव्या मनुषः देव वीतये ॥ ६ ॥

तूं अत्यंत उदार आहेस तर आमच्या कल्याणासाठीं दिव्य संपत्तिरूप प्रभेनें प्रज्वलित होऊन त्या संपत्तीचा वर्षाव आम्हांवर होईल अशा रीतीनें प्रकाशमान हो आणि आमचें मंगल व्हावें म्हणून मज दीनाच्या हविर्भागाचा स्वीकार करण्याकरितां द्यु आणि पृथिवी ह्या उभयतानां इकडे घेऊन ये. ॥ ६ ॥


दा नो॑ अग्ने बृह॒तो दाः स॑ह॒स्रिणो॑ दु॒रो न वाजं॒ श्रुत्या॒ अपा॑ वृधि ।
प्राची॒ द्यावा॑पृथि॒वी ब्रह्म॑णा कृधि॒ स्वर्ण शु॒क्रमु॒षसो॒ वि दि॑द्युतः ॥ ७ ॥

दाः नः अग्ने बृहतः दाः सहस्रिणः दुरः न वाजं श्रुत्यै अप वृधि ॥
प्राची इति द्यावापृथिवी इति ब्रह्मणा कृधि स्वः न शुक्रं उषसः वि दिद्युतः ॥ ७ ॥

हे अग्ने, ज्या ज्या संपत्ति श्रेष्ठ आहेत त्या त्या त्य्य्ं आम्हांस दे. ज्या सहस्रपट (म्हणजे असंख्यपट) मोठ्या आहेत त्याच दे. तुझी कीर्ति सर्वत्र गाजावी म्हणून असें कर कीं एखादा दरवाजा जसा एकदम उघडावा त्याप्रमाणें सात्त्विक सामर्थ्याची वाट झपाट्यासरशी मोकळी कर. आमच्या प्रार्थेनेनें द्यावापृथिवी आम्हांस अनुकूल होतील असें कर. आणि मग शुभ्रतेजस्क सूर्याप्रमाणें उषाही प्रकशमान होवोत. ॥ ७ ॥


स इ॑धा॒न उ॒षसो॒ राम्या॒ अनु॒ स्वर्ण दी॑देदरु॒षेण॑ भा॒नुना॑ ।
होत्रा॑भिर॒ग्निर्मनु॑षः स्वध्व॒रो राजा॑ वि॒शामति॑थि॒श्चारु॑रा॒यवे॑ ॥ ८ ॥

स इधानः उषसः राम्याः अनु स्वः न दीदेत् अरुषेण भानुना ॥
होत्राभिः अग्निः मनुषः सुऽअध्वरः राजा विशां अतिथिः चारुः आयवे ॥ ८ ॥

रात्र पडतांच आणि उषःकाल होतांच ज्याला प्रज्वलित करतात तो हा अग्नि आपल्या आरक्त प्रभेनें सूर्याप्रमाणेंच प्रकाशमान होवो. अग्नि हा भक्तजनांच्या स्तवनवाणीच्या योगानें यज्ञ उत्तम रीतीनें शेवटास नेतो. सर्व लोकांचा हा राजा खरा, परंतु भक्तजनांना मात्र कधीं नव्हे तो येणारा असा प्रिय पाहुणा होय. ॥ ८ ॥


ए॒वा नो॑ अग्ने अ॒मृते॑षु पूर्व्य॒ धीष्पी॑पाय बृ॒हद्दि॑वेषु॒ मानु॑षा ।
दुहा॑ना धे॒नुर्वृ॒जने॑षु का॒रवे॒ त्मना॑ श॒तिनं॑ पुरु॒रूप॑मि॒षणि॑ ॥ ९ ॥

एव नः अग्ने अमृतेषु पूर्व्य धीः पीपाय बृहत्ऽदिवेषु मानुषा ॥
दुहाना धेनुः वृजनेषु कारवे त्मना शतिनं पुरुऽरूपं इषणि ॥ ९ ॥

हे अमरदेवांमध्यें अत्यंत श्रेष्ठ अग्नीदेवा, आम्हां मनुष्यांची ध्यानबुद्धि, अशा रितीनें, त्या परम दीप्तिमान् देवांच्या ठिकाणीं बळावलेली आहे, म्हणून स्वर्ग लोकांतील धेनु आमच्या स्वभूमींत येऊन इच्छा होतांच शेंकडों प्रकारच्या आणि हव्या त्या स्वरूपाच्या वस्तु आपल्या कांसेतून सोडतात. ॥ ९ ॥


व॒यम॑ग्ने॒ अर्व॑ता वा सु॒वीर्यं॒ ब्रह्म॑णा वा चितयेमा॒ जना॒म् अति॑ ।
अ॒स्माकं॑ द्यु॒म्नमधि॒ पञ्च॑ कृ॒ष्टिषू॒च्चा स्वर्ण शु॑शुचीत दु॒ष्टर॑म् ॥ १० ॥

वयं अग्ने अर्वता वा सुऽवीर्यं ब्रह्मणा वा चितयेम जनान् अति ॥
अस्माकं द्युम्नं अधि पञ्च कृष्टिषु उच्चा स्वः न शुशुचीत दुष्तरं ॥ १० ॥

हे अग्ने, आम्हीं आपला पुरुषार्थ तुझी प्राप्ति करून घेऊन तिच्या द्वारें किंवा निदान तुझ्या प्रार्थनेच्या द्वारें तरी लोकांच्या मनावर विशेष रीतीनें ठसवूं असें कर. आमचें वैभव सूर्याप्रमाणें दुष्प्राप्य होऊन पांचही जातीच्या लोकांत अत्युच्च स्थळीं तळपत राहील असें कर. ॥ १० ॥


स नो॑ बोधि सहस्य प्र॒शंस्यो॒ यस्मि॑न्सुजा॒ता इ॒षय॑न्त सू॒रयः॑ ।
यम॑ग्ने य॒ज्ञमु॑प॒यन्ति॑ वा॒जिनो॒ नित्ये॑ तो॒के दी॑दि॒वांसं॒ स्वे दमे॑ ॥ ११ ॥

स नः बोधि सहस्य प्रऽशंस्यः यस्मिन् सुऽजाताः इषयंत सूरयः ॥
यं अग्ने यज्ञं उपऽयन्ति वाजिनः नित्ये तोके दीदिऽवांसं स्वे दमे ॥ ११ ॥

पराक्रमी देवा, उच्च कुलांत जन्म घेतलेले महात्मे ज्याच्या प्राप्तीची इच्छा करतात, असा तूं अत्यंत प्रशंसनीयच आहेस. हे अग्नी सामर्थ्यवान् लोक परमपूज्य अशा तुझीच सेवा करतात, आणि तूंही तुझीं अत्यंत आवडतीं लेकरें जे आम्हीं त्या आमच्या येथें आपल्या वेदीवर प्रकाशमान होतोस, तर तूं आतां सर्वस्वी आमचा हो. ॥ ११ ॥


उ॒भया॑सो जातवेदः स्याम ते स्तो॒तारो॑ अग्ने सू॒रय॑श्च॒ शर्म॑णि ।
वस्वो॑ रा॒यः पु॑रुश्च॒न्द्रस्य॒ भूय॑सः प्र॒जाव॑तः स्वप॒त्यस्य॑ शग्धि नः ॥ १२ ॥

उभयासः जातऽवेदः स्याम ते स्तोतारः अग्ने सूरयः च शर्मणि ॥
वस्वः रायः पुरुऽचन्द्रस्य भूयसः प्रजाऽवतः सुऽअपत्यस्य शग्धि नः ॥ १२ ॥

हे सर्वज्ञ अग्ने, आम्हीं तुझे स्तोतृजन आणि आमचे यजमान अशा उभयतांनींही आनंदांत रहावें असा आशिर्वाद दे, आणि अत्यंत आल्हाददायक, विपुल प्रजा युक्त आणि पुत्र पौत्र युक्त असें जें उत्कृष्ट ऐश्वर्य आहे, तें आम्हांस प्राप्त करून दे. ॥ १२ ॥


ये स्तो॒तृभ्यो॒ गोअ॑ग्रा॒मश्व॑पेशस॒मग्ने॑ रा॒तिमु॑पसृ॒जन्ति॑ सू॒रयः॑ ।
अ॒स्माञ्च॒ तांश्च॒ प्र हि नेषि॒ वस्य॒ आ बृ॒हद्व॑देम वि॒दथे॑ सु॒वीराः॑ ॥ १३ ॥

ये स्तोतृभ्यः गोऽअग्रां अश्वऽपेशसं अग्ने रातिं उपऽसृजन्ति सूरयः ॥
अस्मान् च तान् च प्र हि नेषि वस्यः आ बृहत् वदेम विदथे सुऽवीराः ॥ १३ ॥

तुझ्या स्तोतृजनांना (ज्ञान) गोधनप्रमुख आणि बुद्धिरूप अश्वसंपन्न अशी देणगी जे उदार महात्मे देत असतात, त्यांना आणि त्यांच्या बरोबरच आम्हांलाही अत्युत्तम अशा आनंदमय वस्तूकडे घेऊन जा, आणि आम्ही आमच्या विजयी वीरांसह यज्ञ सभेंत तुझें महद्यश वर्णन करीत राहूं असें कर ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ३ (आप्रीसूक्त)

ऋषिः - गृत्समदः देवता-अग्निः छन्दः-त्रिश्टुप्


समि॑द्धो अ॒ग्निर्निहि॑तः पृथि॒व्यां प्र॒त्यङ्‍ विश्वा॑नि॒ भुव॑नान्यस्थात् ।
होता॑ पाव॒कः प्र॒दिवः॑ सुमे॒धा दे॒वो दे॒वान्य॑जत्व॒ग्निरर्ह॑न् ॥ १ ॥

संऽइद्धः अग्निः निऽहितः पृथिव्यां प्रत्यङ्‍ विश्वानि भुवनानि अस्थात् ॥
होता पावकः प्रऽदिवः सुऽमेधा देवः देवान् यजतु अग्निः अर्हन् ॥ १ ॥

पृथीवर (म्हणजे वेदीवर) स्थापन केलेला हा अग्नि पहा कसा प्रज्वलित होऊन यच्चावत् भुवनांच्या सन्मुख उभा राहिला आहे. सनातन, परमपावन, महाप्रज्ञ, दैदिप्यमान आणि परम वंद्य असा हा यज्ञ होता अग्नि आज देवांना हविर्भावानें संतुष्ट करो. ॥ १ ॥


नरा॒शंसः॒ प्रति॒ धामा॑न्य॒ञ्जन् ति॒स्रो दिवः॒ प्रति॑ म॒ह्ना स्व॒र्चिः ।
घृ॒त॒प्रुषा॒ मन॑सा ह॒व्यमु॒न्दन्मू॒र्धन्य॒ज्ञस्य॒ सम॑नक्तु दे॒वान् ॥ २ ॥

नराशंसः प्रति धामानि अञ्जन् तिस्रः दिवः प्रति मह्ना सुऽअर्चिः ॥
घृतऽप्रुषा मनसा हव्यं उंदन् मूर्धन् यज्ञस्य सं अनक्तु देवान् ॥ २ ॥

हा सुन्दर ज्वालांचा नराशंस (लोकसंस्तुत्य) अग्नि आपल्या दीप्तीनें आपल्या स्वतःच्या तीन स्थानांना आणि त्यांच्या बरोबरच तिन्ही द्युलोकांना प्रकाशानें जगाच्या स्पष्ट नजरेस आणतो; तर जें स्तवन चालूं होतांच घृत धारा यज्ञकुंडांत वाहूं लागतात, अशा मनःपूर्वक चाललेल्या आमचा हविर्भाग आर्द्र करून यज्ञाच्या आरंभीच तो देवांना अलंकृत करो. ॥ २ ॥


ई॒ळि॒तो अ॑ग्ने॒ मन॑सा नो॒ अर्ह॑न्दे॒वान्य॑क्षि॒ मानु॑षा॒त्पूर्वो॑ अ॒द्य ।
स आ व॑ह म॒रुतां॒ शर्धो॒ अच्यु॑त॒मिन्द्रं॑ नरो बर्हि॒षदं॑ यजध्वम् ॥ ३ ॥

ईळितः अग्ने मनसा नः अर्हन् देवान् यक्षि मानुषात् पूर्वः अद्य ॥
सः आ वह मरुतां शर्धः अच्युतं इन्द्रं नरः बर्हिऽसदं यजध्वं ॥ ३ ॥

हे अग्ने, तूं परमपूज्य, आणि सर्वांपेक्षां पुरातन आहेस. तुझें स्तवन आमच्याकडून अंतःकरण पूर्वक झालें आहे, तर आज तूं देवांना हविर्दानानें संतुष्ट कर. आणि युद्धांत जो कधींही माघार घेत नाहीं असा मरुतांचा प्रचंड समूह येथें घेऊन ये. आणि ऋत्विजांनो तुम्हींही येथें कुशासनावर आरूढ झालेल्या इंद्राचें अर्चन करा. ॥ ३ ॥


देव॑ बर्हि॒र्वर्ध॑मानं सु॒वीरं॑ स्ती॒र्णं रा॒ये सु॒भरं॒ वेद्य॒स्याम् ।
घृ॒तेना॒क्तं व॑सवः सीदते॒दं विश्वे॑ देवा आदित्या य॒ज्ञिया॑सः ॥ ४ ॥

देव बर्हिः वर्धमानं सुऽवीरं स्तीर्णं राये सुऽभरं वेदि इति अस्यां ॥
घृतेन अक्तं वसवः सीदत इदं विश्वे देवाः आदित्याः यज्ञियासः ॥ ४ ॥

देदिप्यमान कुशासना, दिव्य ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठीं ह्या वेदीवर तुला आम्ही आंथरलेलें आहे. तूं उत्कर्षकारक, वीर्यप्रद, समृद्धिकर, आणि नवनीता प्रमाणें मृदु आहेस तर हे वसूंनो, हे सर्व देवांनों, हे यज्ञार्ह आदित्यांनो, ह्या आसनावर विराजमान व्हा. ॥ ४ ॥


वि श्र॑यन्तामुर्वि॒या हू॒यमा॑ना॒ द्वारो॑ दे॒वीः सु॑प्राय॒णा नमो॑भिः ।
व्यच॑स्वती॒र्वि प्र॑थन्तामजु॒र्या वर्ण॑म् पुना॒ना य॒शसं॑ सु॒वीर॑म् ॥ ५ ॥

वि श्रयन्ता उर्विया हूयमानाः द्वारः देवीः सुप्रऽअयनाः नमःऽभिः ॥
व्यचस्वतीः वि प्रथन्तां अजुर्याः वर्णं पुनानाः यशसं सुऽवीरं ॥ ५ ॥

जाण्याला ऐस पैस अशीं यज्ञ शालेची दिव्यद्वारें आम्हीं नमस्कार करून विनंती केल्याबरोबर पार खुलासा उडोत. हीं यज्ञमंडपाची विशाल अव अभंग द्वारें आतां उघडोत. शेंकडों शूर पुरुष ज्याच्या पदरीं आहेत अशी ज्याची ख्याती आहे अशा भक्तवर्गालाही तीं पुनीत करतात. ॥ ५ ॥


सा॒ध्वपां॑सि स॒नता॑ न उक्षि॒ते उ॒षासा॒नक्ता॑ व॒य्येव रण्वि॒ते ।
तन्तुं॑ त॒तं सं॒वय॑न्ती समी॒ची य॒ज्ञस्य॒ पेशः॑ सु॒दुघे॒ पय॑स्वती ॥ ६ ॥

साधु अपांसि सनता नः उक्षिते इति उषसानक्ता वय्याऽइव रण्विते इति॥
तन्तुं ततं संऽवयन्ती समीची (इति संऽईची) यज्ञस्य पेशः सुऽदुघे पयस्वती इति॥ ६ ॥

ह्या पहा रात्र आणि उषा, ह्या यौवनाढ्य व सुंदर पक्षाप्रमाणें रमणीय असून एकमेकींशीं संलग्न मनोरथरूप दुग्ध प्रेमानें देणार्‍या आणि प्रेमरसानें पूर्ण भरलेल्या आहेत. कालरूप धागा जो एकदां पसरून दिलेला आहे त्याचेंच वस्त्र त्या एकसारख्या विणीत असतात आणि आमच्या यज्ञाचें स्वरूप व आमचे सत्कर्म हीं सदैव वृद्धिंगत करतात. ॥ ६ ॥


दैव्या॒ होता॑रा प्रथ॒मा वि॒दुष्ट॑र ऋ॒जु य॑क्षतः॒ समृ॒चा व॒पुष्ट॑रा ।
दे॒वान्यज॑न्तावृतु॒था सम॑ञ्जतो॒ नाभा॑ पृथि॒व्या अधि॒ सानु॑षु त्रि॒षु ॥ ७ ॥

दैव्या होतारा प्रथमा विदुःऽतरा ऋजु यक्षतः सं ऋचा वपुःऽतरा ॥
देवान् यजन्तौ ऋतुऽथा सं अञ्जतः नाभा पृथिव्याः अधि सानुषु त्रिषु ॥ ७ ॥

सर्वांत पहिले, अत्यंत ज्ञानवान् अवर्णनीय कांतियुक्त असे जे दोन दिव्य यज्ञ होते आहेत ते आमचा यज्ञ ऋक्स्तोमानें यथायोग्य संपादन करोत. ते योग्यकाळीं देवांचें यजन करून व पृथ्वीच्या मध्यभागीं वेदीवरील तीन उच्चासनांवर त्यांस बसवून अलंकृत करतात. ॥ ७ ॥


सर॑स्वती सा॒धय॑न्ती॒ धियं॑ न॒ इळा॑ दे॒वी भार॑ती वि॒श्वतू॑र्तिः ।
ति॒स्रो दे॒वीः स्व॒धया॑ ब॒र्हिरेदमच्छि॑द्रं पान्तु शर॒णं नि॒षद्य॑ ॥ ८ ॥

सरस्वती साधयन्ती धियं नः इळा देवी भारती विश्वऽतूर्तिः ॥
तिस्रः देवीः स्वधया बर्हिः आ इदं अच्छिद्रं पान्तु शरणं निऽसद्य ॥ ८ ॥

आमचे ध्यान सफल करणारी सरस्वती, दैदिप्यमान इळा व सर्व जगताला हातांत ठेवणारी भारती ह्या तिन्ही देवी आपल्या परिपाठाप्रमाणें ह्या कुशासनावर आरोहण करून हा आमचा आसरा पूर्णपणें निर्दोष राहील अशा तऱ्हेनें त्याचें रक्षण करोत. ॥ ८ ॥


पि॒शङ्ग॑ंरूपः सु॒भरो॑ वयो॒धाः श्रु॒ष्टी वी॒रो जा॑यते दे॒वका॑मः ।
प्र॒जां त्वष्टा॒ वि ष्य॑तु॒ नाभि॑म॒स्मे अथा॑ दे॒वाना॒मप्ये॑तु॒ पाथः॑ ॥ ९ ॥

पिशङ्गीऽरूपः सुऽभरः वयःऽधाः श्रुष्टी वीरः जायते देवकामः ॥
प्रऽजां त्वष्टा वि स्यतु नाभिं अस्मे इति अथ देवानां अपि एतु पाथः ॥ ९ ॥

हा पहा सुवर्णाप्रमाणें कांतिमान् व पुष्टशरीराचा वीर प्रकट होत आहे. तो तारुण्याचा केवळ निधिच, सर्वांची विनंती ऐकून घेणारा आणि देवांचा आवडता आहे असा हा त्वष्टा आमच्या वंशांत असा कुलदीपक निर्माण करो कीं तो शेवटीं देवलोकींच जाईल. ॥ ९ ॥


वन॒स्पति॑रवसृ॒जन्नुप॑ स्थाद॒ग्निर्ह॒विः सू॑दयाति॒ प्र धी॒भिः ।
त्रिधा॒ सम॑क्तं नयतु प्रजा॒नन्दे॒वेभ्यो॒ दैव्यः॑ शमि॒तोप॑ ह॒व्यम् ॥ १० ॥

वनस्पतिः अवसृजन् उप स्थात् अग्निः हविः सूदयाति प्र धीभिः ॥
त्रिधा संऽअक्तं नयतु प्रऽजानन् देवेभ्यः दैव्यः शमिता उप हव्यं ॥ १० ॥

हा वनस्पतियूप जवळ उभा राहून मेध्य हवि मोकळा सोडून देवो. मग ध्यान स्तोत्रें चालू असतांना अग्नि त्याला परिपक्व करील. आणि मग देवलोकांत राहणारा व तेथील रीति जाणणारा, शमिता म्हणजे यज्ञीय पशूचें हनन करणारा तें तीनदां सिंचन केलेलें हवि देवंकडे घेऊन जाईल. ॥ १० ॥


घृ॒तं मि॑मिक्षे घृ॒तम॑स्य॒ योनि॑र्घृ॒ते श्रि॒तो घृ॒तम्व॑स्य॒ धाम॑ ।
अ॒नु॒ष्व॒धमा व॑ह मा॒दय॑स्व॒ स्वाहा॑कृतं वृषभ वक्षि ह॒व्यम् ॥ ११ ॥

घृतं मिमिक्षे घृतं अस्य योनिः घृते श्रितः घृतं ऊं इति अस्य धाम ॥
अनुऽस्वधं आ वह मादयस्व स्वाहाऽकृतं वृषभ वक्षि हव्यं ॥ ११ ॥

ह्या अग्नीमध्यें घृत सिंचन केलेलें आहे. कारण घृत हें त्याचें उद्‍गमस्थान आहे. घृतामध्यें तो वास करतो आणि घृत हें त्याचें तेजच आहे, तर हे मनोरथपूरक अग्ने, तूं आपल्या आनंदी स्वभावानुरूप उल्लसित हो आणि स्वाहा असा उच्चार करून अर्पण केलेला हविर्भाग देवंकडे पोहोंचवून दे ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ४ (अग्निसूक्त)

ऋषिः -सोमाहुति भार्गवः देवता-अग्निः छन्दः-त्रिष्टुप्


हु॒वे वः॑ सु॒द्योत्मा॑नं सुवृ॒क्तिं वि॒शाम॒ग्निमति॑थिं सुप्र॒यस॑म् ।
मि॒त्र इ॑व॒ यो दि॑धि॒षाय्यो॒ भूद्दे॒व आदे॑वे॒ जने॑ जा॒तवे॑दाः ॥ १ ॥

हु॒वे व॒ः सु॒ऽद्योत्मा॑नं सु॒ऽवृक्तिं विशां अग्निं अतिथिं सुऽप्रयसं ॥
मित्रऽइव यः दिधिषाय्यः भूत् देवः आऽदेवे जने जातऽवेदाः ॥ १ ॥

ज्याचा प्रकाश अतिशय उज्ज्वल आहे, जो अत्यंत पवित्र आहे, जो आनंदस्वरूप आणि सर्वजनांचा अतिथी आहे, त्या अग्नीला मी तुमच्या हितार्थ आहुति अर्पण करतो. कारण हा सर्वज्ञ भगवान् भाविक जनांना मित्राप्रमाणें खरोखरच हवाहवासा वाटतो. ॥ १ ॥


इ॒मं वि॒धन्तो॑ अ॒पां स॒धस्थे॑ द्वि॒ताद॑धु॒र्भृग॑वो वि॒क्ष्वा॑३योः ।
ए॒ष विश्वा॑न्य॒भ्यस्तु॒ भूमा॑ दे॒वाना॑म॒ग्निर॑र॒तिर्जी॒राश्वः॑ ॥ २ ॥

इमं विधन्तः अपां सधऽस्थे द्विता अदधुः भृगवः विक्षु आयोः ॥
एषः विश्वानि अभि अस्तु भूम देवानां अग्निः अरतिः जीरऽअश्वः ॥ २ ॥

दिव्य उदकांच्या निवासस्थानांत प्रथम ह्याची सेवा करून भृगुऋषींनी ह्याला मनुष्यलोकी आणून दोन दिव्य ठिकाणी त्याची स्थापना केली. ह्याचा बुद्धिरूप अश्व अत्यंत त्वरित गति आहे, तेव्हां, देवांचा नियंता अशा ह्या अग्नीचा यच्चयावत् भुवनांमध्यें विजय होवो. ॥ २ ॥


अ॒ग्निं दे॒वासो॒ मानु॑षीषु वि॒क्षु प्रि॒यं धुः॑ क्षे॒ष्यन्तो॒ न मि॒त्रम् ।
स दी॑दयदुश॒तीरूर्म्या॒ आ द॒क्षाय्यो॒ यो दास्व॑ते॒ दम॒ आ ॥ ३ ॥

अग्निं देवासः मानुषीषु विक्षु प्रियं धुः क्षेष्यन्तः न मित्रं ॥
स दीदयत् उशतीः ऊर्म्या आ दक्षाय्यः यः दास्वते दमे आ ॥ ३ ॥

मनुष्य लोकांत वास करण्याची इच्छा झल्यामुळें देवांनीं मित्राप्रमणें प्रिय अशा ह्या अग्नीची येथें स्थापना केली, म्हणून दानशूर भक्तांनीं ह्याचा नम्रपणानें सन्मान करावा असा हा अग्नि, त्याच्या प्राप्तीसाठीं उत्कंठित झालेल्या रात्रींना सुप्रकाशित करतो. ॥ ३ ॥


अ॒स्य र॒ण्वा स्वस्ये॑व पु॒ष्टिः संदृ॑ष्टिरस्य हिया॒नस्य॒ दक्षोः॑ ।
वि यो भरि॑भ्र॒दोष॑धीषु जि॒ह्वामत्यो॒ न रथ्यो॑ दोधवीति॒ वारा॑न् ॥ ४ ॥

अस्य रण्वा स्वस्यऽइव पुष्टिः संऽदृष्टिः अस्य हियानस्य धक्षोः ॥
वि यः भरिभ्रत् ओषधीषु जिह्वां अत्यः न रथ्यः दोधवीति वारान् ॥ ४ ॥

ह्याचा विस्तार वाढला असतां तो आपल्या स्वतःचाच उत्कर्ष झाल्याप्रमाणें आनंदप्रद होतो आणि क्षुब्ध होऊन जाळूं लागला तरी सुद्धां ह्याचें दर्शन मनोहर असतें. भरधांव धांवणारा घोडा ज्याप्रमाणें आपली जीभ वरचेवर बाहेर काढून जोरानें हालवितो व पुच्छहि वेगानें झाडतो, त्याप्रमाणें अग्नि हा वनस्पतींत शिरला असतां आपल्या ज्वालांचे फटकारे मारीत जातो. ॥ ४ ॥


आ यन्मे॒ अभ्वं॑ व॒नदः॒ पन॑न्तो॒शिग्भ्यो॒ नामि॑मीत॒ वर्ण॑म् ।
स चि॒त्रेण॑ चिकिते॒ रंसु॑ भा॒सा जु॑जु॒र्वाँ यो मुहु॒रा युवा॒ भूत् ॥ ५ ॥

आ यत् मे अभ्वं वनदः पनन्त उशिक्ऽभ्यः न अमिमीत वर्णं ॥
स चित्रेण चिकिते रंसु भासा जुजुर्वान् यः मुहुः आ युवा भूत् ॥ ५ ॥

विस्तीर्ण पापरूप जंगलाचा नाश करणार्‍या अग्नीच्या भयंकर सामर्थ्याचें वर्णन कवींनी मजजवळ केल्याबरोबर पूर्वी जसा तो भक्तजनांपुढें प्रकट झाला, त्याप्रमाणेंच त्यानें आपला आविर्भाव मजपुढें प्रकट केला. त्यावेळेस आपल्या अद्‍भुत कांतीनें तो इतक्या मजेदार रीतीनें प्रकाशमान होऊं लागला कीं, आतां मंद होत चालला असें वाटावें तर तो आपला पुन्हा ताजातवाना. ॥ ५ ॥


आ यो वना॑ तातृषा॒णो न भाति॒ वार्ण प॒था रथ्ये॑व स्वानीत् ।
कृ॒ष्णाध्वा॒ तपू॑ र॒ण्वश्चि॑केत॒ द्यौरि॑व॒ स्मय॑मानो॒ नभो॑भिः ॥ ६ ॥

आ यः वना ततृषाणः न भाति वाः ण पथा रथ्याऽइव स्वानीत् ॥
कृष्णऽध्वा तपुः रण्वः चिकेत द्यौःऽइव स्मयमानः नभःऽभिः ॥ ६ ॥

हा अरण्याकरितांच जणों अत्यंत ताहानलेला आहे किं काय असें वाटतें. पाण्याचा लोंढा जसा वाटेनें जातां जातां धों धों शब्द करीत वाहत जातो, किंवा जसा रथचक्रांचा घडघड आवाज होतो, त्याचप्रमाणें हा अग्नीही शब्द करतो. ह्याचा मार्ग कृष्ण वर्णाचा आहे, तरी सुद्धां पहा हा जाज्वल्य व आल्हाददयक अग्नि, मेघांच्या योगानें जसें आकाश हंसत आहे असें वाटतें तसा हाही हास्यमुख दिसतो. ॥ ६ ॥


स यो व्यस्था॑द॒भि दक्ष॑दु॒र्वीं प॒शुर्नैति॑ स्व॒युरगो॑पाः ।
अ॒ग्निः शो॒चिष्माँ॑ अत॒सान्यु॒ष्णन्कृ॒ष्णव्य॑थिरस्वदय॒न्न भूम॑ ॥ ७ ॥

स यः वि अस्थात् अभि धक्षत् उर्वीं पशुः न एति स्वऽयुः अगोपाः ॥
अग्निः शोचिष्मान् अतसानि उष्णन कृष्णऽव्यथिः अस्वदयत् न भूम ॥ ७ ॥

तो ठिकठिकाणीं पसरत जाऊन ह्या विशाल पृथ्वीला जाळून टाकतो आणि कोणाच्याही कह्यांत न राहणार्‍या वन्य श्वापदाप्रमाणें स्वैरगति होऊन फिरत असतो; तरी ही ह्या परम दैदिप्यमान व कृष्णध्वज अग्नीनें झाडेंझुडपें जाळून टाकण्याच्या मिषानें ह्या भूमीची चवच पाहिली असावी कीं काय असे वाटतें. ॥ ७ ॥


नू ते॒ पूर्व॒स्याव॑सो॒ अधी॑तौ तृ॒तीये॑ वि॒दथे॒ मन्म॑ शंसि ।
अ॒स्मे अ॑ग्ने सं॒यद्वी॑रं बृ॒हन्तं॑ क्षु॒मन्तं॒ वाजं॑ स्वप॒त्यं र॒यिं दाः॑ ॥ ८ ॥

नु ते पूर्वस्य अवसः अधिऽइतौ तृतीये विदथे मन्म शंसि ॥
अस्मे इति अग्ने संयत्ऽवीर बृहन्तं क्षुऽमन्तं वाजं क्षुऽअपत्यं रयिं दाः ॥ ८ ॥

तूं पूर्वीं आम्हांवर जे जे अनुग्रह केलेस त्याचें कृतज्ञेनें स्मरण करून ह्या तिसर्‍या यज्ञ समारंभांत तुझें मनःपूर्वक स्तवन केलें आहे. तर हे अग्ने, वीरांच्या संततमालिकेनें सुशोभित, श्रेष्ठ, प्रतपशाली, सत्वप्रधान व सुपुत्रयुक्त असें ऐश्वर्य आम्हांस कृपा करून दे. ॥ ८ ॥


त्वया॒ यथा॑ गृत्सम॒दासो॑ अग्ने॒ गुहा॑ व॒न्वन्त॒ उप॑राँ अ॒भि ष्युः ।
सु॒वीरा॑सो अभिमाति॒षाहः॒ स्मत्सू॒रिभ्यो॑ गृण॒ते तद् वयो॑ धाः ॥ ९ ॥

त्वया यथा गृत्सऽमदासः अग्ने गुहा वन्वन्तः उपरान् अभि स्युरिति स्युः ॥
सुऽवीरासः अभिमातिऽसहः स्मत् सूरिऽभ्यः गृणते तत् वयः धाः ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, तुझी भक्ति एकांतीं स्वस्थचित्तानें करणार्‍या आम्हां गृत्समदांनी आमच्या अगदी जवळ येऊन भिडलेल्या दुष्टांना तुझ्या कृपेनें शूरवीर संपन्न व शत्रुनाशक होऊन पादाक्रांत करावें हेंच जर योग्य आहे, तर हा तुझा भक्त आणि त्याचा यजमान अशा दोघांमध्येंही तारुण्याचा अपूर्व जोम नेहमीं असूं दे. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ५ (अग्निसूक्त)

ऋषिः -सोमाहुति भार्गवः देवता-अग्निः छन्दः-त्रिष्टुप्


होता॑जनिष्ट॒ चेत॑नः पि॒ता पि॒तृभ्य॑ ऊ॒तये॑ ।
प्र॒यक्ष॒ञ्जेन्यं॒ वसु॑ श॒केम॑ वा॒जिनो॒ यम॑म् ॥ १ ॥

होता अजनिष्ट चेतनः पिता पितृऽभ्यः ऊतये ॥
प्रऽयक्षन् जेन्यं वसु शकेम वाजिनः यमं ॥ १ ॥

हा यज्ञ-होता, चैतन्य घन आणि जगत्पिता अग्नि, आमच्या पितरांवर कृपा करण्याकरितां प्रकट झाला आहे व विजयप्रद आणि सर्वोत्कृष्ट असा लाभ आम्हांस व्हावा म्हणून जर आमचा यज्ञ तो संपादन करतो, तर त्या सत्वशाली वीराला ह्या यज्ञासाठीं ठेऊन घेण्यास आम्हीं समर्थ होऊं असे घडो. ॥ १ ॥


आ यस्मि॑न्स॒प्त र॒श्मय॑स्त॒ता य॒ज्ञस्य॑ ने॒तरि॑ ।
म॒नु॒ष्वद्दैव्य॑मष्ट॒मं पोता॒ विश्वं॒ तदि॑न्वति ॥ २ ॥

आ यस्मिन् सप्त रश्मयः तताः यज्ञस्य नेतरि ॥
मनुष्वत् दैव्यं अष्टमं पोता विश्वं तत् इन्वति ॥ २ ॥

यज्ञाचा अग्रणी जो हा अग्नि, त्याच्या सातही कर्मांचीं सूत्रें आहेतच; तेव्हां हा पोता होऊन देवांसंबंधीं आठवें कर्मसुद्धां, मनुराजाच्या घराप्रमाणें येथेंही संपादन करीत आहे. ॥ २ ॥


द॒ध॒न्वे वा॒ यदी॒मनु॒ वोच॒द्ब्रह्मा॑णि॒ वेरु॒ तत् ।
परि॒ विश्वा॑नि॒ काव्या॑ ने॒मिश्च॒क्रमि॑वाभवत् ॥ ३ ॥

दधन्वे वा यत् ईं अनु वोचत् ब्रह्माणि वेः ऊं इति तत् ॥
परि विश्वानि काव्या नेमिः चक्रंऽइव अभवत् ॥ ३ ॥

जे जे हविर्भाग ऋत्विज अर्पण करतो, जीं जीं प्रशंसापर स्तोत्रें ऋत्विज् प्रेमळपणानें म्हणतो तें तें सर्व कर्म ह्याला अवगतच आहे. चाकाच्या भोंवतीं जसें त्याचें कडें असतें त्याप्रमाणें सर्व ऋत्विक-कर्माचें ज्ञान ह्याच्यामध्यें सांठविलेलें आहे. ॥ ३ ॥


सा॒कं हि शुचि॑ना॒ शुचिः॑ प्रशा॒स्ता क्रतु॒नाज॑नि ।
वि॒द्वाँ अ॑स्य व्र॒ता ध्रु॒वा व॒या इ॒वानु॑ रोहते ॥ ४ ॥

साकं हि शुचिना शुचिः प्रऽशास्ता क्रतुना अजनि ॥
विद्वान् अस्य व्रता ध्रुवा वयाऽइव अनु रोहते ॥ ४ ॥

पवित्र अशा यज्ञकर्माबरोबरच हा अत्यंत पवित्र अग्नि प्रशास्ता (सर्व यज्ञ कर्मांचा मार्गदर्शक) म्हणून प्रादुर्भूत झाला आहे. ह्याच्या कर्मपद्धतींत यत्किंचित्‍ही बदल कधीं होत नाहीं. म्हणून अशा कर्माचें ज्ञान ज्याला आहे तो विद्वान् ऋत्विज् ह्या अग्निच्या ज्ञानाच्या एका लहानशा फांदीप्रमाणेंच होय. ॥ ४ ॥


ता अ॑स्य॒ वर्ण॑मा॒युवो॒ नेष्टुः॑ सचन्त धे॒नवः॑ ।
कु॒वित्ति॒सृभ्य॒ आ वरं॒ स्वसा॑रो॒ या इ॒दं य॒युः ॥ ५ ॥

ताः अस्य वर्णं आयुवः नेष्टुः सचन्त धेनवः ॥
कुवित् तिसृऽभ्यः आ वरं स्वसारः याः इदं ययुः ॥ ५ ॥

ज्या इतर तिघी बहिणी ह्या यज्ञकर्मांस आल्या होत्या, त्या तिघीपेक्षांही कितीतरी पट ज्या अधिक मनोहर आहेत अशा त्या विद्युल्लतारूपी चपल धेनु ह्या अग्निरूप नेष्ट्याच्या तेजःपुंज कांतीला भुलून गेल्या. ॥ ५ ॥


यदी॑ मा॒तुरुप॒ स्वसा॑ घृ॒तम्भर॒न्त्यस्थि॑त ।
तासा॑मध्व॒र्युराग॑तौ॒ यवो॑ वृ॒ष्टीव॑ मोदते ॥ ६ ॥

यदि मातुः उप स्वसा घृतं भरन्ती अस्थित ॥
तासां अध्वर्युः आऽगतौ यवः वृष्टीऽइव मोदते ॥ ६ ॥

जेव्हां आईच्या जवळ बहिण घृत घेऊन उभी राहिलेली असते, तेव्हां पाऊस पडल्यामुळें पेरलेल्या धान्याला जसा आनंद होतो तसा आनंद त्या दोघींच्या येण्यानें अध्वर्युला होतो ॥ ६ ॥


स्वः स्वाय॒ धाय॑से कृणु॒तामृ॒त्विगृ॒त्विज॑म् ।
स्तोमं॑ य॒ज्ञं चादरं॑ व॒नेमा॑ ररि॒मा व॒यम् ॥ ७ ॥

स्वः स्वाय धायसे कृणुतां ऋत्विक् ऋत्विजं ॥
स्तोमं यज्ञं च आत् अरं वनेम ररिम वयं ॥ ७ ॥

तर ह्या अग्नीस आपल्या स्वतःच्याच संतोषासाठीं स्वतःचा पुरोहित बनून, ऋत्विजाचें कार्य संपादन करूं द्या म्हणजे त्यांची महती वर्णन करण्यांत आम्हांस अतिशय प्रेम वाटेल आणि मग त्यालाच हा यज्ञ आम्हीं समर्पण करूं. ॥ ७ ॥


यथा॑ वि॒द्वाँ अरं॒ कर॒द्विश्वे॑भ्यो यज॒तेभ्यः॑ ।
अ॒यम॑ग्ने॒ त्वे अपि॒ यं य॒ज्ञं च॑कृ॒मा व॒यम् ॥ ८ ॥

यथा विद्वान् अरं करत् विश्वेभ्यः यजतेभ्यः ॥
अयं अग्ने त्वे इति अपि यं यज्ञं चकृम वयं ॥ ८ ॥

ज्ञानशाली अग्नीनें सर्व माननीय देवांनां संतुष्ट करावें म्हणून हा जो यज्ञ आम्हीं केला आहे तो हा यज्ञ हे अग्निदेवा तुलाच अर्पण असो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ६ (अग्निसूक्त)

ऋषिः -सोमाहुति भार्गवः देवता-अग्निः छन्दः-गायत्री


इ॒माम् मे॑ अग्ने स॒मिध॑मि॒मामु॑प॒सदं॑ वनेः । इ॒मा ऊ॒ षु श्रु॑धी॒ गिरः॑ ॥ १ ॥

इमां मे अग्ने संऽमिधं इमा उपऽसदं वनेरिति वनेः॥
इमा ऊं इति सु श्रुधि गिरः ॥ १ ॥

हे अग्ने, ही मी अर्पण केलेली समिध आणि ही माझी उपासना तुला प्रिय होऊं दे. तसेंच, मी करतों तें तुझें गुण संकीर्तनही तूं स्वस्थ चित्तानें ऐकून घे. ॥ १ ॥


अ॒या ते॑ अग्ने विधे॒मोर्जो॑ नपा॒दश्व॑मिष्टे । ए॒ना सू॒क्तेन॑ सुजात ॥ २ ॥

अया ते अग्ने विधेम उर्जः नपात् अश्वंऽइष्टे ॥
एना सुऽउक्तेन सुऽजात ॥ २ ॥

हे तपस्तेजामुळें प्रकट होणार्‍या अग्निदेवा, बुद्धिरूप अश्व तुला फार प्रिय आहे; तर अशा सन्मान्य रीतीनेंच तुझी सेवा मला घडूं दे. हे अभिजात देवा, ह्या स्तवनाच्या योगानेंही माझ्या हातून तुझी सेवा झाली असें होऊं दे. ॥ २ ॥


तं त्वा॑ गी॒र्भिर्गिर्व॑णसं द्रविण॒स्युं द्र॑विणोदः । स॒प॒र्येम॑ सप॒र्यवः॑ ॥ ३ ॥

तं त्वा गीःऽभिः गिर्वणसं द्रविणस्युं द्रविणःऽदः ॥
सपर्येम सपर्यवः ॥ ३ ॥

हे देवा, तूं स्तुति-प्रिय आहेस, तर आमच्याकडून तुझी स्तुतीरूप सेवा घडो. हे सामर्थ्य-संपत्तिदात्या, तू भक्तिरूप संपदेची इच्छा करणारा आहेस, म्हणून आम्हां सेवकांच्या हातून भक्तीनेंही तुझी सेवा होऊं दे. ॥ ३ ॥


स बो॑धि सू॒रिर्म॒घवा॒ वसु॑पते॒ वसु॑दावन् । यु॒यो॒ध्यस्मद्द्वेषां॑सि ॥ ४ ॥

सः बोधि सूरिः मघऽवा वसुऽपते वसुऽदावन् ॥
युयोधि अस्मत् द्वेषांसि ॥ ४ ॥

हे निधिपते, हे दिव्य निधि प्राप्त करून देणार्‍या देवा, तूं आम्हांस आपल्या कृपेचें दान करणारा असा यजमान हो आणि आमच्या द्वेष्ट्यांचें आणि द्वेषबुद्धिचें उच्चाटन कर. ॥ ४ ॥


स नो॑ वृ॒ष्टिं दि॒वस्परि॒ स नो॒ वाज॑मन॒र्वाण॑म् । स नः॑ सह॒स्रिणी॒रिषः॑ ॥ ५ ॥

सः नः वृष्टिं दिवः परि सः नः वाजं अनर्वाणं ॥
सः नः सहस्रिणीः इषः ॥ ५ ॥

आम्हांकरतां आकाशातून पर्जन्यवृष्टि कर, अविनाशी सत्व सामर्थ्य दे आणि हजारों प्रकारचा जोम आमच्या आंगीं राहील असें कर. ॥ ५ ॥


ईळा॑नायाव॒स्यवे॒ यवि॑ष्ठ दूत नो गि॒रा । यजि॑ष्ठ होत॒रा ग॑हि ॥ ६ ॥

ईळानाय अवस्यवे यविष्ठ दूत नः गिरा ॥
यजिष्ठ होतः आ गहि ॥ ६ ॥

हे तारुण्यमूर्ते, देव प्रतिनिधे, हे परमपूज्य पुरोहिता, आमच्या स्तवनांनी संतुष्ट होऊन तुझें गुण संकिर्तन करणार्‍याकडे तुझ्या कृपेची आकांक्षा बाळगणार्‍या ह्या भक्ताकडे तुझें आगमन होऊं दे. ॥ ६ ॥


अ॒न्तर्ह्यग्न॒ ईय॑से वि॒द्वाञ्जन्मो॒भया॑ कवे । दू॒तो जन्ये॑व॒ मित्र्यः॑ ॥ ७ ॥

अन्तः हि अग्ने ईयसे विद्वान् जन्म उभया कवे ॥
दूतः जन्याऽइव मित्र्यः ॥ ७ ॥

हे प्रज्ञावान् अग्ने, हे सर्वज्ञा, स्वकीयांना आणि परकीयांनाही हितकर अशा मध्यस्था प्रमाणें देव आणि मानव ह्या दोन्हीं प्रकारच्या वर्गांमधें तूं सारखाच वागत असतोस. ॥ ७ ॥


स वि॒द्वाँ आ च॑ पिप्रयो॒ यक्षि॑ चिकित्व आनु॒षक् । आ चा॒स्मिन्स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ८ ॥

सः विद्वान् आ च पिप्रयः यक्षि चिकित्व आनुषक् ॥
आ च अस्मिन् सत्सि बर्हिषि ॥ ८ ॥

तूं सर्व जाणतोसच, तरी देवांना प्रिय वटतें तेंच कर. हे ज्ञानवंता, त्यांना यथायोग्य रीतीनें यज्ञानें संतोषित कर आणि ह्या कुशासनावर विराजमान् हो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ७ (अग्निसूक्त)

ऋषिः -सोमाहुति भार्गवः देवता-अग्निः छन्दः-गायत्री


श्रेष्ठं॑ यविष्ठ भार॒ताग्ने॑ द्यु॒मन्त॒मा भ॑र । वसो॑ पुरु॒स्पृहं॑ र॒यिम् ॥ १ ॥

श्रेष्ठं यविष्ठ भारत अग्ने द्युऽमन्तं आ भर ।
वसो इति पुरुऽस्पृहं रयिं ॥ १ ॥

हे अत्यंत तरुण अग्निदेवा, हे भारता, श्रेष्ठ, दिव्य तेजस्वी, आणि सर्वांनीं जिच्या विषयीं लालसा धरावी अशी संपत्ति घेऊन ये. ॥ १ ॥


मा नो॒ अरा॑तिरीशत दे॒वस्य॒ मर्त्य॑स्य च । पर्षि॒ तस्या॑ उ॒त द्वि॒षः ॥ २ ॥

मा नः अरातिः ईशत देवस्य मर्त्यस्य च ।
पर्षि तस्याः उत द्विषः ॥ २ ॥

देवांचा किंवा योग्य मनुष्याचा मान न ठेवण्याची जी दुर्बुद्धि असते तिचा पगडा आमच्यावर चालूं नये असें कर, आणि अशा दुष्ट बुद्धिच्या आणि सज्जनद्वेष्ट्याच्या तडाख्यांतून आम्हांस पार पाड. ॥ २ ॥


विश्वा॑ उ॒त त्वया॑ व॒यं धारा॑ उद॒न्या इव । अति॑ गाहेमहि॒ द्विषः॑ ॥ ३ ॥

विश्वाः उत त्वया वयं धाराः उदन्याःऽइव ।
अति गाहेमहि द्विषः ॥ ३ ॥

पाण्याच्या एखाद्या क्षुल्लक ओहोळांतून सहज पार जावें त्या प्रमाणें तुझ्या कृपेनें आम्हीं, शत्रूंच्या मध्यें घुसून सहजगत्या पार निघून जाऊं असें कर. ॥ ३ ॥


शुचिः॑ पावक॒ वन्द्योऽ॑ग्ने बृ॒हद्वि रो॑चसे । त्वं घृ॒तेभि॒राहु॑तः ॥ ४ ॥

शुचिः पावक वन्द्यः अग्ने बृहत् वि रोचसे ।
त्वं घृतेभिः आऽहुतः ॥ ४ ॥

हे परम पवित्र अग्ने, तूं परम पावन आणि पूज्य आहेस, आणि घृताहुती अर्पण करून तुझी आराधना केली असतां तूं अतिशयच प्रदीप्त होत असतोस. ॥ ४ ॥


त्वं नो॑ असि भार॒ताग्ने॑ व॒शाभि॑रु॒क्षभिः॑ । अ॒ष्टाप॑दीभि॒राहु॑तः ॥ ५ ॥

त्वं नः असि भारत अग्ने वशाभिः उक्षऽभिः ।
अष्टाऽपदीभिः आऽहुतः ॥ ५ ॥

भारतीयांवर प्रेम करणार्‍या अग्निदेवा, आमच्या कळवळाच्या प्रार्थनांनी, उत्साह वर्धक सामगायनांनीं आणि छन्दोबद्ध ऋचांनीं तुझी आराधना केली असतां तूं आमचासा होतोस. ॥ ५ ॥


द्र्वन्नः स॒र्पिरा॑सुतिः प्र॒त्नो होता॒ वरे॑ण्यः । सह॑सस्पु॒त्रो अद्भु॑हतः ॥ ६ ॥

द्रुऽअन्नः सर्पिःऽआसुतिः प्रत्नः होता वरेण्यः ।
सहसः पुत्रः अद्भुःतः ॥ ६ ॥

वनस्पती हें ज्याचें अन्न, घृत हें ज्याचें पेय, असा अग्नि, हा सर्वोत्कृष्ट व पुरातन यज्ञ_होता आणि तपः सामर्थ्यानें प्रकट होणारा एक अद्‍भुत विभूति होय. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ८ (अग्निसूक्त)

ऋषिः -गृत्समदः देवता-अग्निः छन्दः-गायत्री


वा॒ज॒यन्नि॑व॒ नू रथा॒न्योगा॑ँ अ॒ग्नेरुप॑ स्तुहि । य॒शस्त॑मस्य मी॒ळ्हुषः॑ ॥ १ ॥

वाजयन्ऽइव नु रथान् योगान् अग्नेः उप स्तुहि ।
यशःऽतमस्य मीळ्हुषः ॥ १ ॥

युद्धोत्सुक योद्धा ज्याप्रमाणें रथाचें व त्याच्या जातिवंत घोड्यांचे वर्णन हौसेनें करतो, त्याप्रमाणें तूंही ह्या अग्नीच्या अद्‍भुद देणगीचें वर्णन कर. ह्या अग्नीची पुण्यकीर्ति अत्यंत श्रेष्ठ, आणि हा स्वतः सर्व कामनापूरक असा आहे. ॥ १ ॥


यः सु॑नी॒थो द॑दा॒शुषे॑ऽजु॒र्यो ज॒रय॑न्न॒रिं । चारु॑प्रतीक॒ आहु॑तः ॥ २ ॥

यः सुऽनीथः ददाशुषे अजुर्यः जरयन् अरिं ।
चारुऽप्रतीक आऽहुतः ॥ २ ॥

दाननिरत भक्ताचा जो उत्कृष्ट मार्गदर्शक आहे, जो अधार्मिकांस जर्जर करतो पण स्वतः कधींही जर्जर होत नाहीं, ज्याचें स्वरूप अत्यंत रमणीय असतें अशा अग्नीप्रीत्यर्थ आम्हीं हवन केलें आहे. ॥ २ ॥


य उ॑ श्रि॒या दमे॒ष्वा दो॒षोषसि॑ प्रश॒स्यते॑ । यस्य॑ व्र॒तं न मीय॑ते ॥ ३ ॥

य ऊं इति श्रिया दमेषु आ दोषा उषसि प्रऽशस्यते ।
यस्य व्रतं न मीयते ॥ ३ ॥

त्याच्याबरोबरच त्याच्या ईश्वरी वैभवाचेंही स्तवन सकाळ संध्याकाळ घरोघर होत असतें आणि त्याच्या नियमाचें उल्लंघन कोणासही करता येणें शक्य नाहीं. ॥ ३ ॥


आ यः स्वर्ण भा॒नुना॑ चि॒त्रो वि॒भात्य॒र्चिषा॑ । अ॒ञ्जा॒नो अ॒जरै॑र॒भि ॥ ४ ॥

आ यः स्वः न भानुना चित्रः विऽभाति अर्चिषा ।
अञ्जानः अजरैः अभि ॥ ४ ॥

सूर्य आपल्या रश्मींनी जसा दैदीप्यमान, तसा हाही आपल्या प्रभेनें अद्‍भुत तेजःपुंज होऊन आपल्या अविनाशी ज्वालांनीं सर्व वस्तुजात स्पष्टपणें दृगोचर करतो. ॥ ४ ॥


अत्रि॒मनु॑ स्व॒राज्य॑म॒ग्निमु॒क्थानि॑ वावृधुः । विश्वा॒ अधि॒ श्रियो॑ दधे ॥ ५ ॥

अत्रिं अनु स्वऽराज्यं अग्निं उक्थानि ववृधुः ।
विश्वा अधि श्रियः दधे ॥ ५ ॥

ह्या सर्वभक्षक अग्नीचें ब्रह्मांडावर जें साम्राज्य आहे, त्याच्याच अनुरोधानें वर्णन करून सामगयनांनीं त्यांचे यश वृद्धिंगत केले आहे. कारण सर्व प्रकारचें ऐश्वर्य ह्याच्याच ठिकाणीं वास करतें. ॥ ५ ॥


अ॒ग्नेरिन्द्र॑स्य॒ सोम॑स्य दे॒वाना॑मू॒तिभि॑र्व॒यम् ।
अरि॑ष्यन्तः सचेमह्य॒भि ष्या॑म पृतन्य॒तः ॥ ६ ॥

अग्नेः इन्द्रस्य सोमस्य देवानां ऊतिऽभिः वयं ।
अरिष्यन्तः सचेमहि अभि स्याम पृतन्यतः ॥ ६ ॥

अग्नीच्या, इंद्राच्या, आणि सोमाच्याच नव्हे तर इतर सामान्य देवतांच्याही कृपेनें आम्हीं उपद्रव रहित राहून सज्जनांच्या ससैन्य शत्रूंस पादाक्रांत करूं असें घडो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त ९ (अग्निसूक्त)

ऋषिः -गृत्समदः देवता-अग्निः छन्दः-त्रिष्टुप्


नि होता॑ होतृ॒षद॑ने॒ विदा॑नस्त्वे॒षो दी॑दि॒वाँ अ॑सदत्सु॒दक्षः॑ ।
अद॑ब्धव्रतप्रमति॒र्वसि॑ष्ठः सहस्रम्भ॒रः शुचि॑जिह्वो अ॒ग्निः ॥ १ ॥

नि होता होतृऽसदने विदानः त्वेषः दीदिऽवान् असदत् सुऽदक्षः ।
अदब्धव्रतऽप्रमतिः वसिष्ठः सहस्रंऽभरः शुचिऽजिह्वः अग्निः ॥ १ ॥

ज्ञानवान, अत्यंत उग्र, महादीप्तिमान् व अत्यंत निष्णात असा हा यज्ञहोता अग्नि होत्याच्या ठिकाणीं अधिष्ठित झाला आहे. भक्त रक्षणाचा ह्याचा व्यापार अखंड चालला असून हा अत्यंत स्पृहणीय आहे. हजारों प्रकारचे लाभ आपल्या भक्तास तो करून देत असतो. आणि त्याची वाणी अत्यंत पवित्र आहे. ॥ १ ॥


त्वं दू॒तस्त्वमु॑ नः पर॒स्पास्त्वं वस्य॒ आ वृ॑षभ प्रणे॒ता ।
अग्ने॑ तो॒कस्य॑ न॒स्तने॑ त॒नूना॒मप्र॑युच्छ॒न्दीद्य॑द्बोधि गो॒पाः ॥ २ ॥

त्वं दूतः त्वं ऊं इति नः परःऽपाः त्वं वस्य आ वृषभ प्रऽनेता ।
अग्ने तोकस्य नः तने तनूनां अप्रऽयुच्छन् दीद्यत् बोधि गोपाः ॥ २ ॥

तूं आमचा मध्यस्थ आहेस. तूं परलोकींचा संरक्षक आहेस. हे अभीष्ट पूरका, इष्टवस्तूच्या प्राप्तीकडे नेणारा तूंच आहेस. हे अग्ने, आम्ही स्वतः आणि आमचे पुत्रपौत्र, ह्यांच्या शाश्वतीसाठीं तूं सुप्रकाशित होऊन आम्हांस एक क्षणभरही न विसंबणारा असा आमचा पाठिराखा हो. ॥ २ ॥


वि॒धेम॑ ते पर॒मे जन्म॑न्नग्ने वि॒धेम॒ स्तोमै॒रव॑रे स॒धस्थे॑ ।
यस्मा॒द्योने॑रु॒दारि॑था॒ यजे॒ तं प्र त्वे ह॒वींषि॑ जुहुरे॒ समि॑द्धे ॥ ३ ॥

विधेम ते परमे जन्मन् अग्ने विधेम स्तोमैः अवरे सधऽस्थे ।
यस्मात् योनेः उत्ऽआरिथ यजे तं प्र त्वे इति हवींषि जुहुरे संऽइद्धे ॥ ३ ॥

हे अग्ने, ज्या अत्यंत उच्चलोकीं तूं प्रकट होतोस तेथें सुद्धा तुझी सेवा आमच्या हातून घडूं दे. आणि खालीं ह्या भूलोकींही स्तवनांनीं तुझें भजन आमच्याकडून होऊं दे. कारण ज्या ज्या जन्मस्थानीं तूं प्रकट झालास तेथें तेथें मी तुझें अर्चन करतोच आहे. आणि म्हणूनच तूं प्रज्वलित झालास तेव्हां तुझ्या ठिकाणीं ऋत्विजांनीं हविर्भाग अर्पण केले. ॥ ३ ॥


अग्ने॒ यज॑स्व ह॒विषा॒ यजी॑याञ्छ्रु॒ष्टी दे॒ष्णम॒भि गृ॑णीहि॒ राधः॑ ।
त्वं ह्यसि॑ रयि॒पती॑ रयी॒णां त्वं शु॒क्रस्य॒ वच॑सो म॒नोता॑ ॥ ४ ॥

अग्ने यजस्व हविषा यजीयान् श्रुष्टी देष्णं अभि गृणीहि राधः ।
त्वं हि असि रयिऽपती रयीणां त्वं शुक्रस्य वचसः मनोता ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, तूं भक्तांची प्रार्थना ऐकून घेणारा व यज्ञकुशल असा आहेस तेव्हां हविर्द्रव्यांनीं देवांप्रित्यर्थ यजन कर. आमच्या जवळ तुला देण्यायोग्य जी काय संपत्ति आहे ती हीच, तर तीच तूं गोड मानून तिची प्रशंसा कर; कारण तुला काय कमी ? सर्व ऐहिक व पारलौकिक वैभवांचा तूं मालक आहेस, आणि अत्यंत ओजस्वी अशा कवित्वाची अंतःकरणांत स्फुर्तीहि तूंच उत्पन्न करतोस. ॥ ४ ॥


उ॒भयं॑ ते॒ न क्षी॑यते वस॒व्यं दि॒वेदि॑वे॒ जाय॑मानस्य दस्म ।
कृ॒धि क्षु॒मन्तं॑ जरि॒तार॑मग्ने कृ॒धि पतिं॑ स्वप॒त्यस्य॑ रा॒यः ॥ ५ ॥

उभयं ते न क्षीयते वसव्यं दिवेऽदिवे जायमानस्य दस्म ।
कृधि क्षुऽमन्तं जरितारं अग्ने कृधि पतिं सुऽअपत्यस्य रायः ॥ ५ ॥

हे अद्‍भुत पराक्रमी देवा, भक्तांना वरदान देण्याकरतां तूं दररोज प्रकट होत असतोस, तरीही ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही संपत्तींचा जो सांठा तुजजवळ आहे तो अधींही कमी म्हणून होतच नाहीं. हे अग्ने, तुझ्या ह्या सेवकाला तूं प्रतापशाली कर आणि ज्याच्यावर कोणीही सत्ता चालवूं शकत नाहीं अशा वैभवाची मालकी त्याच्याकडे दे. ॥ ५ ॥


सैनानी॑केन सुवि॒दत्रो॑ अ॒स्मे यष्टा॑ दे॒वाँ आय॑जिष्ठः स्व॒स्ति ।
अद॑ब्धो गो॒पा उ॒त नः॑ पर॒स्पा अग्ने॑ द्यु॒मदु॒त रे॒वद्दि॑दीहि ॥ ६ ॥

सः एना अनीकेन सुऽविदत्रः अस्मे यष्टा देवान् आयजिष्ठः स्वस्ति ।
अदब्धः गोपाः उत नः परःऽपा अग्ने द्युमत् उत रेवत् दिदीहि ॥ ६ ॥

तूं अतिशय कनवाळू व यज्ञकर्मामध्यें अत्यंत कुशल आहेस. आणि म्हणूनच आमचें कल्याण होईल अशा रीतीनें आपल्या तेजोमय मुखानें तूं देवांना संतुष्ट करतोस. ज्याच्यापुढें कोणतेही लपंडाव चालत नाहींत, अशा प्रकारचा तूं आमचा ह्या पृथ्वीवरील प्रतिपालक आहेस, इतकेंच नाहीं तर आमचें पारलौकिक हित पहाणाराही तूंच आहेस. तर हे अग्निदेवा, तुझा प्रकाश आम्हांस स्वयंस्फूर्तिदायक होईल अशा रीतीनें प्रकाशीत हो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल २ - सूक्त १० (अग्निसूक्त)

ऋषिः -गृत्समदः देवता-अग्निः छन्दः-त्रिष्टुप्


जो॒हूत्रो॑ अ॒ग्निः प्र॑थ॒मः पि॒तेवे॒ळस्प॒दे मनु॑षा॒ यत्समि॑द्धः ।
श्रियं॒ वसा॑नो अ॒मृतो॒ विचे॑ता मर्मृ॒जेन्यः॑ श्रव॒स्यः स वा॒जी ॥ १ ॥

जोहूत्रः अग्निः प्रथमः पिताऽइव इळः पदे मनुषा यत् संऽमिद्धः ।
श्रियं वसानः अमृतः विऽचेताः मर्मृजेन्यः श्रवस्यः सः वाजी ॥ १ ॥

सर्व विश्वाचा आद्य जनक म्हणून ज्याचा जयघोष करणें अगदी योग्य अशा अग्नीला जेव्हां आमचा ऋत्विज उत्तर वेदीवर प्रज्वलित करतो, तेव्हां तो अमर महाज्ञानी अग्नि आपल्या तेजोरूप वैभवानें मंडित होतो. भक्तांनीं सेवा करण्यास सर्वथैव पात्र असा कोणी असेल तर तोच पुण्यकीर्ति आणि सर्ववीर अग्नि आहे. ॥ १ ॥


श्रू॒या अ॒ग्निश्चि॒त्रभा॑नु॒र्हव॑ं मे॒ विश्वा॑भिर्गी॒र्भिर॒मृतो॒ विचे॑ताः ।
श्या॒वा रथं॑ वहतो॒ रोहि॑ता वो॒तारु॒षाह॑ चक्रे॒ विभृ॑त्रः ॥ २ ॥

श्रूया अग्निः चित्रऽभानुः हवं मे विश्वाभिः गीःऽभिः अमृतः विऽचेताः ।
श्यावा रथं वहतः रोहिता वा उत अरुषा अह चक्रे विऽभृत्रः ॥ २ ॥

हा अद्‍भुत कंतिमान अग्नि सर्व प्रकारच्या स्तोत्रांच्या द्वारें माझा धांवा ऐको. तो अमर आहे आणि सर्वज्ञही तोच आहे. त्याच्या रथाला कधीं कधीं श्यामवर्णाचे, कधीं कधीं लाल रंगाचे आणि कधीं आरक्त वर्णाचे तेजोमय अश्व जोडलेले असतात. आणि त्यांत बसून तो नाना प्रकारच्या यज्ञयागांना जात असतो. ॥ २ ॥


उ॒त्ता॒नाया॑मजनय॒न्सुषू॑त॒ं भुव॑द॒ग्निः पु॑रु॒पेशा॑सु॒ गर्भः॑ ।
शिरि॑णायां चिद॒क्तुना॒ महो॑भि॒रप॑रीवृतो वसति॒ प्रचे॑ताः ॥ ३ ॥

उत्तानायां अजनयन् सुऽसूतं भुवत् अग्निः पुरुऽपेशासु गर्भः ।
शिरिणायां चित् अक्तुना महःऽभिः अपरिऽवृतः वसति प्रऽचेताः ॥ ३ ॥

पवित्र ठिकाणींच प्रकट होणार्‍या अग्नीला उत्तान अरणींतूनच उत्पन्न केलें. कारण नाना प्रकारच्या वनस्पतींच्या पोटीं तो सूक्ष्मरूपानें राहिलेलाच आहे; व म्हणून कडक हिवाळ्यांतील धुकट रात्रीं देखील तो महाप्रज्ञ अग्नि आपल्या तेजामुळें अंधःकारानें झांकला न जातां सर्व ठिकाणीं वास करतो. ॥ ३ ॥


जिघ॑र्म्य॒ग्निं ह॒विषा॑ घृ॒तेन॑ प्रतिक्षि॒यन्त॒ं भुव॑नानि॒ विश्वा॑ ।
पृ॒थुं ति॑र॒श्चा वय॑सा बृ॒हन्तं॒ व्यचि॑ष्ठ॒मन्नै॑ रभ॒सं दृशा॑नम् ॥ ४ ॥

जिघर्मि अग्निं हविषा घृतेन प्रतिक्षियन्तं भुवनानि विश्वा ।
पृथुं तिरश्चा वयसा बृहन्तं व्यचिष्ठं अन्नैः रभसं दृशानं ॥ ४ ॥

अशा ह्या अग्नीवर आतां मी हविर्द्रव्यानें आणि घृतानें सिंचन करतो. सर्व भुवनांमध्यें प्रत्येक ठिकाणीं ह्याचा वास आहे. हा सर्वतोपरी विशाल आणि आपल्या अंगच्या जोमामुळें अत्यंत थोर, अत्यंत व्यापक, सर्व प्रकारच्या अन्नसंपत्तीने संपन्न व दर्शनीय आहे. ॥ ४ ॥


आ वि॒श्वतः॑ प्र॒त्यञ्चं॑ जिघर्म्यर॒क्षसा॒ मन॑सा॒ तज्जु॑षेत ।
मर्य॑श्रीः स्पृह॒यद्व॑र्णो अ॒ग्निर्नाभि॒मृशे॑ त॒न्वा३ जर्भु॑राणः ॥ ५ ॥

आ विश्वतः प्रत्यञ्चं जिघर्मि अरक्षसा मनसा तत् जुषेत ।
मर्यऽश्रीः स्पृहयत्ऽवर्णः अग्निः न अभिऽमृशे तन्वा जर्भुराणः ॥ ५ ॥

ह्या सर्वतोमुख प्रभूला मी घृतानें अभिषिंचन करतो. ह्या माझ्या सेवेचा तो आपल्या वात्सल्यपूर्ण अंतःकरणानें स्वीकार करो. एखाद्या नववधूच्या वीर्यशाली व तरुण प्रियपति प्रमाणें ह्या अग्नीचा झोंक व त्याची अंगकांतीहि तशीच अत्यंत स्पृहणीय असते. तथापि तों आपल्या प्रखर तेजाच्या ऐन भरांत आला म्हणजे त्याला स्पर्श करण्याचीही कोणाची प्राज्ञा नसते. ॥ ५ ॥


ज्ञे॒या भा॒गं स॑हसा॒नो वरे॑ण॒ त्वादू॑तासो मनु॒वद्व॑देम ।
अनू॑नम॒ग्निं जु॒ह्वा वच॒स्या म॑धु॒पृचं॑ धन॒सा जो॑हवीमि ॥ ६ ॥

ज्ञेया भागं सहसानः वरेण त्वाऽदूतासः मनुवत् वदेम ।
अनूनं अग्निं जुह्वा वचस्या मधुऽपृचं धनऽसा जोहवीमि ॥ ६ ॥

आपल्या अंगच्या उत्कृष्ट गुणानें तूं सर्वांवर सत्ता चालवितोस, तरी तूं आपल्या हविर्भागाचा स्वीकार कर. तूं आमचा मध्यस्थ म्हणून मनूराजानें केल्याप्रमाणें आम्हींही तुझें यश वर्णन करूं. जो सर्वथैव अव्यंग आहे, जो भक्तावर आपल्या कृपेच्या मधुर रसाची वृष्टि करतो, अशा ह्या अग्नीचें स्वागत सर्व प्रकारच्या संपत्तीची वाञ्च्छा धरून मी वक्तृत्वपूर्ण स्तुतींनी, आणि पळीनें घृताहुती अर्पण करीत आहे. ॥ ६ ॥


ॐ तत् सत्


GO TOP