PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १५१ ते १६०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५१ (मित्रावरुणौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : मित्रावरुणौ - छंद - जगती


मि॒त्रं न यं शिम्या॒ गोषु॑ ग॒व्यवः॑ स्वा॒ध्यो वि॒दथे॑ अ॒प्सु जीज॑नन् ।
अरे॑जेतां॒ रोद॑सी॒ पाज॑सा गि॒रा प्रति॑ प्रि॒यं य॑ज॒तं ज॒नुषा॒मवः॑ ॥ १ ॥

मित्रं नः यं शिम्या गोषु गव्यवः सुऽआध्यः विदथे अप्ऽसु जीजनन् ॥
अरेजेतां रोदसी इति पाजसा गिरा प्रति प्रियं यजतं जनुषां अवः ॥ १ ॥

ध्यानासक्त पुरुषांनी ज्ञानगोधन लाभाची इच्छा धरून यज्ञप्रसंगी, मित्राप्रमाणें उपकारक अशा प्रिय व पूज्य अग्नीला आपल्या प्रभावानें आकाशोदकापासून प्रकट केलें, तेव्हां त्याच्या द्वेषामुळें आणि गर्जनेमुळें आकाश आणि पृथ्वी हीं चळचळा कापूं लागलीं. कारण, मनुष्यमात्राचें रक्षण आतां कसें होईल ही त्यांना विवंचना पडली. ॥ १ ॥


यद्ध॒ त्यद्वां॑ पुरुमी॒ळ्हस्य॑ सो॒मिनः॒ प्र मि॒त्रासो॒ न द॑धि॒रे स्वा॒भुवः॑ ।
अध॒ क्रतुं॑ विदतं गा॒तुमर्च॑त उ॒त श्रु॑तं वृषणा प॒स्त्यावतः ॥ २ ॥

यत् ह त्यत् वां पुरुऽमीळ्हस्य सोमिनः प्र मित्रासः न दधिरे सुऽआभुवः ॥
अध क्रतुं विदतं गातुं अर्चत उत श्रुतं वृषणा पस्त्यऽवतः ॥ २ ॥

सोमयाग करणार्‍या पुरुमीळ्हाच्या आज्ञेप्रमाणें चालणार्‍या ऋत्विजांनी प्रेमळ अंतःकरणानें तुम्हांस तोच हविर्भाग अर्पण केला आहे, तर भक्तीनें तुमचें स्तवन करणार्‍या भक्तास प्रज्ञा आणि काव्यस्फूर्ति द्या. हे वीरांनो, घरधनी जो यजमान त्याच्या प्रार्थनेकडे लक्ष असूं द्या. ॥ २ ॥


आ वां॑ भूषन्क्षि॒तयः॒ जन्म॒ रोद॑स्योः प्र॒वाच्यं॑ वृषणा॒ दक्ष॑से म॒हे ।
यदी॑मृ॒ताय॒ भर॑थः॒ यदर्व॑ते॒ प्र होत्र॑या॒ शिम्या॑ वीथो अध्व॒रम् ॥ ३ ॥

आ वां भूषन् क्षितयः जन्म रोदस्योः प्रऽवाच्यं वृषणा दक्षसे महे ॥
यत् ईं ऋताय भरथः यत् अर्वते प्र होत्रया शिम्या वीथः अध्वरम् ॥ ३ ॥

हे वीरांनो, तुम्ही अंतराळांतून प्रकट झालांत, तेव्हां उत्कृष्ट कर्तृत्वशक्ति प्राप्त व्हावी म्हणून ह्या तुमच्या अति स्तुत्य अवताराचें रसभरीत वर्णन लोक करीत असतात, आणि भक्तियुक्त यथाविधि केलेल्या यज्ञाचा तुम्ही प्रेमानें स्वीकार केलात म्हणजे ती कर्तृत्वशक्ति धर्मप्रसाराकरितां आणि भक्तांस देण्याकरितांच घेऊनच येतां. ॥ ३ ॥


प्र सा क्षि॒तिर॑सुर॒ या महि॑ प्रि॒य ऋता॑वानावृ॒तमा घो॑षथो बृ॒हत् ।
यु॒वं दि॒वो बृ॑ह॒तो दक्ष॑मा॒भुवं॒ गां न धु॒र्युप॑ युञ्जाथे अ॒पः ॥ ४ ॥

प्र सा क्षितिः असुरा या महि प्रिय ऋतऽवानाउ ऋतं आ घोषथः बृहत् ॥
युवं दिवः बृहतः दक्षं आऽभुवं गां नः धुरि उप युञ्जाथे इति अपः ॥ ४ ॥

ईश्वर स्वरूप मित्रावरुणांनो ज्या लोकांवर तुमची विशेष कृपा असते, तो वैभवास चढतो. धर्मप्रतिपालक देवांनो, आमच्या यज्ञाची अतिशय प्रशंसा करा. महान अशा द्युलोकापासून प्राप्त होणार्‍या सर्वोत्कृष्ट व कार्यक्षम अशा सामर्थ्याची आणि पुण्यकर्माची सांगड, रथाला बैल जोडल्याप्रमाणें तुम्ही पक्की घालून टाकतां. ॥ ४ ॥


म॒ही अत्र॑ महि॒ना वार॑मृण्वथोऽरे॒णव॒स्तुज॒ आ सद्म॑न्धे॒नवः॑ ।
स्वर॑न्ति॒ ता उ॑प॒रता॑ति॒ सूर्य॒मा नि॒म्रुच॑ उ॒षस॑स्तक्व॒वीरि॑व ॥ ५ ॥

मही इति अत्र महिना वारं ऋण्वथः अरेणवः तुजः आ सद्मन् धेनवः ॥
स्वरंति ताः उपरऽताति सूर्यं आ निऽम्रुच उषसः तक्ववीःऽइव ॥ ५ ॥

आपल्या महिम्यानें तुम्ही ह्या पृथ्वीवरील सर्व स्पृहणीय संपत्तीचा सांठा पुढें मांडून ठेवतां ह्यामुळें निष्कलंक आणि कुशाग्र अशा बुद्धिरूप धेनू आपल्या ठिकाणीं सुखरूप राहतात. आणि आकाश मेघाच्छादित होतें अशा दिवशी सकाळ संध्याकाळ सूर्यदर्शनासाठी मंजुळ ओरडणार्‍या तक्कवि पक्ष्याप्रमाणें त्या धेनूही सुस्वर असा काव्य ध्वनी काढीत असतात. ॥ ५ ॥


आ वा॑मृ॒ताय॑ के॒शिनी॑रनूषत॒ मित्र॒ यत्र॒ वरु॑ण गा॒तुमर्च॑थः ।
अव॒ त्मना॑ सृ॒जतं॒ पिन्व॑तं॒ धियो॑ यु॒वं विप्र॑स्य॒ मन्म॑नामिरज्यथः ॥ ६ ॥

आ वा ऋताय केशिनीः अनूषत मित्र यत्र वरुण गातुं अर्चथः ॥
अव त्मना सृजतं पिन्वतं धियः युवं विप्रस्य मन्मनां इरज्यथः ॥ ६ ॥

हे मित्रावरुणांनो, ज्या ज्या यज्ञांत तुम्ही स्वतःच्या उच्च स्वरानें गायन करीत असतां, त्या यज्ञांत मनोहर केशकलापभूषित अशा दिव्यांगना तुमच्या यशाचें वर्णन करीत असतात. तर तुम्ही आपण होऊन आमच्या बुद्धींस प्रेरणा करून त्या विकसित करा, माझ्यासारख्या कवीच्या स्तवनांना स्फूर्ति देणारे तुम्हींच आहांत. ॥ ६ ॥


यो वां॑ य॒ज्ञैः श॑शमा॒नो ह॒ दाश॑ति क॒विर्होता॒ यज॑ति मन्म॒साध॑नः ।
उपाह॒ तं गच्छ॑थो वी॒थो अ॑ध्व॒रमच्छा॒ गिरः॑ सुम॒तिं ग॑न्तमस्म॒यू ॥ ७ ॥

यः वा यज्ञैः शशमानः ह दाशति कविः होता यजति मन्मऽसाधनः ॥
उप अह तं गच्छथः वीथः अध्वरं अच्छ गिरः सुमतिं गंतं अस्मयू इति अस्मऽयू ॥ ७ ॥

जो तुमचे स्तवन करून यज्ञद्वारा तुम्हांस हवि अर्पण करतो, व जो कोणी कवि किंवा आचार्य प्रतिभायुक्त स्तवनांनी तुमची उपासना करतो, त्याच्या सन्निध जाऊन तुम्ही त्याच्या यज्ञाचा प्रेमानें स्वीकार करता, तर हे आम्हांवर लोभ करणार्‍या नित्रवरुणांनो, प्रार्थना आणि खरी भक्ति याच्या योगानें आमच्याकडे या. ॥ ७ ॥


यु॒वां य॒ज्ञैः प्र॑थ॒मा गोभि॑रञ्जत॒ ऋता॑वाना॒ मन॑सो॒ न प्रयु॑क्तिषु ।
भर॑न्ति वां॒ मन्म॑ना सं॒यता॒ गिरोऽ॑दृप्यता॒ मन॑सा रे॒वदा॑शाथे ॥ ८ ॥

युवां यज्ञैः प्रथमा गोभिः अंजत ऋतऽवाना मनसः नः प्रऽयुक्तिषु ॥
भरंति वां मन्मना संऽयता गिरः अदृप्यता मनसा रेवत् आशाथे इति ॥ ८ ॥

न्यायप्रवर्तक मित्रावरुणांनो, यज्ञार्थ आणलेल्या गोरसानें मानसिक ध्यानविधीप्रमाणें प्रथम तुमचेंच अर्चन होत असते. भक्तजन आपली अनन्य भक्ति व प्रार्थना ही दोन्ही तुम्हांस एकदमच अर्पण करतात आणि तुम्हींही प्रेमळ अंतःकरणानें दिव्य वैभव घेऊन त्यांच्याजवळ प्राप्त होत असता. ॥ ८ ॥


रे॒वद्वयो॑ दधाथे रे॒वदा॑शाथे॒ नरा॑ मा॒याभि॑रि॒तऊ॑ति॒ माहि॑नम् ।
न वां॒ द्यावोऽ॑हभि॒र्नोत सिन्ध॑वो॒ न दे॑व॒त्वं प॒णयो॒ नान॑शुर्म॒घम् ॥ ९ ॥

रेवत् वयः दधाथे इति रेवत् आशाथे इति नरा मायाभिः इतऽऊति माहिनम् ॥
न वां द्यावः अहऽभिः न उत सिंधवः न देवत्वं पणयः न आनशुः मघम् ॥ ९ ॥

हे वीरांनो, अप्रतिम तारुण्य ते तुमच्या अंगी असते. अत्युच्च आणि सर्वरक्षक असे जे मोठे ऐश्वर्य तेंही तुम्हींच आपल्या दैवी सामर्थ्यानें आपलेंसे केलेले आहे. म्हणून आकाश, समुद्र किंवा पाणी ह्यांपैकी कोणासही तुमच्या देवत्वाची अगर ऐश्वर्याची बरोबरी केव्हांही करतां आली नाहीं. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५२ (मित्रावरुणौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : मित्रावरुणौ - छंद - त्रिष्टुप्


यु॒वं वस्त्रा॑णि पीव॒सा व॑साथे यु॒वोरच्छि॑द्रा॒ मन्त॑वो ह॒ सर्गाः॑ ।
अवा॑तिरत॒मनृ॑तानि॒ विश्व॑ ऋ॒तेन॑ मित्रावरुणा सचेथे ॥ १ ॥

युवं वस्त्राणि पीवसा वसाथे इति युवोः अच्छिद्रा मंतवः ह सर्गाः ॥
अव अतिरतं अनृतानि विश्वा ऋतेन मित्रावरुणा सचेथे इति ॥ १ ॥

तुम्ही असें आहांत की, तुमची वस्त्रें म्हणजे भरगच्च प्रकाश, तुमचे नेमानेम व तुमची करणी ही कधीच चुकायची नाहींत, कसलीही लबाडी त्मच्यापुढें टिकत नाहीं, कारण हे मित्रावरुणांनो, सत्यधर्मापासून तुम्ही कधी रेंसभरही ढळत नाही. ॥ १ ॥


ए॒तच्च॒न त्वो॒ वि चि॑केतदेषां स॒त्यो मन्त्रः॑ कविश॒स्त ऋघा॑वान् ।
त्रि॒रश्रिं॑ हन्ति॒ चतु॑रश्रिरु॒ग्रो दे॑व॒निदो॒ ह प्र॑थ॒मा अ॑जूर्यन् ॥ २ ॥

एतच् चन त्वः वि चिकेतत् एषां सत्यः मंत्रः कविऽशस्त ऋघावान् ॥
त्रिःऽअश्रिं हंति चतुःऽअश्रिः उग्रः देवऽनिदः ह प्रथमा अजूर्यन् ॥ २ ॥

ही गोष्ट कोणासही सहज समजेल कीं, मोठमोठे ज्ञानी ऋषि त्याच्या ज्या नेमानेमाची अतिशय स्तुति करीत असतात तें तंतोतंत खरे आणि अगदीं अपरिहार्य असते. शत्रूंचे हत्यार जर त्रिधारी तर ह्यांचे भयंकर चारधारी होऊन त्याचा नायनाट करते व त्याच सपाट्यांत देवनिंदक दुष्टांचा सप्पा पहिल्या प्रथम उडतो. ॥ २ ॥


अ॒पादे॑ति प्रथ॒मा प॒द्वती॑नां॒ कस्तद्वां॑ मित्रावरु॒णा चि॑केत ।
गर्भो॑ भा॒रं भ॑र॒त्या चि॑दस्य ऋ॒तं पिप॒र्त्यनृ॑तं॒ नि ता॑रीत् ॥ ३॥

अपात् एति प्रथमा पत्ऽवतीनां कः तत् वा मित्रावरुणा चिकेत ॥
गर्भः भारं भरति आ चित् अस्य ऋतं पिपर्ति अनृतं नि तारीत् ॥ ३ ॥

हा काय चमत्कार पहा कीं जिला पाय नाहींत तीच तर सर्वांच्यापुढें येते. हे मित्रावरुणांनो, ह्या तुमच्या महिम्याचा पार कोण जाणील ? तुमचा बालरूप अवतार ह्या जगाचा भार वाहतो आणि सत्यधर्माची अभिवृद्धि करून असत्याचा नाश करतो. ॥ ३ ॥


प्र॒यन्त॒मित्परि॑ जा॒रं क॒नीनां॒ पश्या॑मसि॒ नोप॑नि॒पद्य॑मानम् ।
अन॑वपृग्णा॒ वित॑ता॒ वसा॑नं प्रि॒यं मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ धाम॑ ॥ ४॥

प्रयंतं इत् परि जारं कनीनां पश्यामसि न उपऽनिपद्यमानम् ॥
अनवऽपृग्णा विऽतता वसानं प्रियं मित्रस्य वरुणस्य धाम ॥ ४ ॥

दिव्यांगनांच्या प्रीतीस पात्र झालेला नेहमीं चालत असलेलाच आमच्या दृष्टीस पडतो. त्याला विश्रांती घेतांना आम्ही कधींच पहात नाहीं. त्याची वस्त्रें तेजोरूप असून त्यांचा झोळ एकसारखा दूरवर पसरलेला असतो. मित्राचें व वरुणाचेंही प्रियस्थान तोच. ॥ ४ ॥


अ॒न॒श्वः जा॒तो अ॑नभी॒शुरर्वा॒ कनि॑क्रदत्पतयतू॒र्ध्वसा॑नुः ।
अ॒चित्तं॒ ब्रह्म॑ जुजुषु॒र्युवा॑नः॒ प्र मि॒त्रे धाम॒ वरु॑णे गृ॒णन्तः॑ ॥ ५॥

अनश्वः जातः अनभीशुः अर्वा कनिक्रदत् पतयत् ऊर्ध्वऽसानुः ॥
अचित्तं ब्रह्म जुजुषुः युवानः प्र मित्रे धाम वरुणे गृणंतः ॥ ५ ॥

अश्वाप्रमाणे परंतु अश्वाच्या जातीचा मात्र नव्हे व त्याला लगामही नाही असा हा सूर्य उदय पावतांच गर्जना करीत व ऐटीने छाती उंच करीत करीत एकदम आकाशांत उड्डाण करतो. ह्या चमत्कारामुळे तारुण्याचा निरंतर उपभोग घेणारे देव, मित्रावरुणांच्या ठिकाणी दिसणार्‍या वैभवाचें आश्चर्य करीत ईश्वराच्या अतर्क्य गुणवर्णनांत गर्क होऊन जातात. ॥ ५ ॥


आ धे॒नवो॑ मामते॒यमव॑न्तीर्ब्रह्म॒प्रियं॑ पीपय॒न्त्सस्मि॒न्नूध॑न् ।
पि॒त्वो भि॑क्षेत व॒युना॑नि वि॒द्वाना॒साविवा॑स॒न्नदि॑तिमुरुष्येत् ॥ ६॥

आ धेनवः मामतेयं अवंतीः ब्रह्मऽप्रियं पीपयन् सस्मिन् ऊधन् ॥
पित्वः भिक्षेत वयुनानि विद्वान् आसा आऽविवासन्न् अदितिं उरुष्येत् ॥ ६ ॥

ज्या धेनूंनी माझे म्हणजे ममतापुत्राचें संरक्षण केले त्यांनींच मला उपासनानिष्ठ भक्ताला आपल्या कासेंतील दुग्धरसानें पुष्ट केले आहे. सर्व विद्यापारंगत झाल्यावर मग दिव्यज्ञान भोजन मिळण्याविषयीं त्यांना प्रार्थना करावी. आणि अनादि अनंतावर समक्ष सर्व भार टाकून दुःख मुक्त होण्याची आकांक्षा धरावी. ॥ ६ ॥


आ वां॑ मित्रावरुणा ह॒व्यजु॑ष्टिं॒ नम॑सा देवा॒वव॑सा ववृत्याम् ।
अ॒स्माकं॒ ब्रह्म॒ पृत॑नासु सह्या अ॒स्माकं॑ वृ॒ष्टिर्दि॒व्या सु॑पा॒रा ॥ ७॥

आ वां मित्रावरुणा हव्यऽजुष्टिं नमसा देवौ अवसा ववृत्याम् ॥
अस्माकं ब्रह्म पृतनासु सह्याः अस्माकं वृष्टिः दिव्या सुऽपारा ॥ ७ ॥

हे देवांनो, मित्रावरुणांनो, सेवा आणि भक्ति ह्याच्या आधारावर मी अर्पण केलेल्या हवींचा स्वीकार करण्याकडे तुमचें लक्ष मला वेधतां येऊं द्या. आमची प्रार्थना युद्धांत यशस्वी होवो, आणि दिव्य अशी ज्ञान वृष्टि आम्हांस कल्याणकारक होवो. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५३ (मित्रावरुणौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : मित्रावरुणौ - छंद - त्रिष्टुप्


यजा॑महे वां म॒हः स॒जोषा॑ ह॒व्येभि॑र्मित्रावरुणा॒ नमो॑भिः ।
घृ॒तैर्घृ॑तस्नू॒ अध॒ यद्वा॑म॒स्मे अ॑ध्व॒र्यवो॒ न धी॒तिभि॒र्भर॑न्ति ॥ १ ॥

यजामहे वा महः सऽजोषा हव्येभिः मित्रावरुणा नमःऽभिः ॥
घृतैः घृतस्नू इति घृतऽस्नू अध यत् वां अस्मे इति अध्वर्यवः न धीतिऽभिः भरंति ॥ १ ॥

मित्रावरुणांनो, तुम्ही समर्थ आहांत, आम्ही सारख्याच प्रेमानें हव्य अर्पण करून आणि नम्रपणानें प्रार्थना करून तुमची सेवा करीत आहोंत. स्वर्गीय घृताचा वर्षाव करणार्‍या देवांनो, हे आमचे अध्वर्यु तुम्हाला घृताहुतीप्रमाणेंच माननीय स्तोत्रांनी संतुष्ट करीत आहेत. ॥ १ ॥


प्रस्तु॑तिर्वां॒ धाम॒ न प्रयु॑क्ति॒रया॑मि मित्रावरुणा सुवृ॒क्तिः ।
अ॒नक्ति॒ यद्वां॑ वि॒दथे॑षु॒ होता॑ सु॒म्नं वां॑ सू॒रिर्वृ॑षणा॒विय॑क्षन् ॥ २ ॥

प्रऽस्तुतिः वां धाम न प्रऽयुक्तिः अयामि मित्रावरुणा सुऽवृक्तिः ॥
अनक्ति यत् वा विदथेषु होता सुम्नं वां सूरिः वृषणौ इयक्षन् ॥ २ ॥

तुमची उत्कृष्ट स्तुती ही सुद्धां तुमचें ध्यान करण्याप्रमाणेंच एक सामर्थ्य आहे; म्हणून हे मित्रावरुणांनो, मी आपलें हें सुंदर स्तोत्र तुम्हांस अर्पण केले आहे. आचार्य जेव्हां धर्ममंदिरांत नेमका तुमचें भजन करूं लागतो, तेव्हां हे वीरांनो, तुमच्यापासून खर्‍या आनंदाचा लाभ व्हावा अशीच त्या महात्म्याची अपेक्षा असते. ॥ २ ॥


पी॒पाय॑ धे॒नुरदि॑तिर्‌ऋ॒ताय॒ जना॑य मित्रावरुणा हवि॒र्दे ।
हि॒नोति॒ यद्वां॑ वि॒दथे॑ सप॒र्यन्त्स रा॒तह॑व्यो॒ मानु॑षो॒ न होता॑ ॥ ३ ॥

पीपाय धेनुः अदितिः ऋताय जनाय मित्रावरुणा हविःऽदे ॥
हिनोति यत् वां विदथे सपर्यन् सः रातऽहव्यः मानुषः नः होता ॥ ३ ॥

मित्रावरुणांनो, यज्ञसभामंदिरांत आचार्यसुद्धां इतर सामान्य मनुष्याप्रमाणेंच हवि देऊन तुमचें अर्चन करून आपल्या अंतःकरणास तुमच्या सेवेला पाठवून देतो, त्या वेळेस चिच्छक्तिरूप धेनू सत्यधर्माच्या वृद्धिसाठी व हविर्दात्या भक्तासाठी दिव्य दुग्धानें भरून तुस्त होऊन जाते. ॥ ३ ॥


उ॒त वां॑ वि॒क्षु मद्या॒स्वन्धो॒ गाव॒ आप॑श्च पीपयन्त दे॒वीः ।
उ॒तो नो॑ अ॒स्य पू॒र्व्यः पति॒र्दन्वी॒तं पा॒तं पय॑स उ॒स्रिया॑याः ॥ ४ ॥

उत वां विक्षु मद्यासु अंधः गावः आपः च पीपयंत देवीः ॥
उतो इति नः अस्य पूर्व्यः पतिः दन् वीतं पातं पयसः उस्रियायाः ॥ ४ ॥

आणखी शिवाय तुमच्या आनंदमग्न भक्तमंडळांत सोमरस, दिव्य धेनू आणि स्वर्गीय उदक ह्यांची रेलचेल असते. तो सनातन भगवंत आम्हांसही असाच आनंद देईल, तर या, आणि प्रकाशरूप धेनूच्या मधूर दुग्धाचा आस्वाद घ्या. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५४ (विष्णु सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : विष्णुः - छंद - त्रिष्टुप्


विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्याणि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि ।
यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः ॥ १ ॥

विष्णोः नु कं वीर्याणि प्र वोचं यः पार्थिवानि विऽममे रजांसि ॥
यः अस्कभायत् उत्ऽतरं सधऽस्थं विऽचक्रमाणः त्रेधा उरुऽगायः ॥ १ ॥

आतां मी विष्णूचे पराक्रम कितीतरी वर्णन केले तरी ते थोडेच. सर्व भुवने त्यानें व्यापून टाकिली इतकेंच नाही, तर अत्युच्च देवलोक आहे तो सुद्धां त्यानेंच सांवरून धरला आहे. निरनिराळी तीनच पावलें टाकून त्यानें सर्व व्यापून टाकले आहे. ॥ १ ॥


प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्येण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः ।
यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यन्ति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ २ ॥

प्र तत् विष्णुः स्तवते वीर्येण मृगः न भीमः कुचरः गिरिऽस्थाः ॥
यस्य उरुषु त्रिषु विऽक्रमणेषु अधिऽक्षियंति भुवनानि विश्वा ॥ २ ॥

विष्णूची त्याच्या पराक्रमामुळेंच फार स्तुति होत असते. गिरिकंदरांत राहून घोर प्रदेशांत संचार करणार्‍या, भयंकर सिंहाप्रमाणें हा दिव्य विभूतींमध्यें महा पराक्रमी आहे. पहा सर्वव्यापक अशा निरनिराळ्या तीन पावलांतच विश्वांतील यच्चावत् भुवनें सहज मावली आहेत. ॥ २ ॥


प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑ ।
य इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑ ॥ ३ ॥

प्र विष्णवे शूषं एतु मन्म गिरिऽक्षित उरुऽगायाय वृष्णे ॥
यः इदं दीर्घं प्रऽयतं सधऽस्थं एकः विऽममे त्रिऽभिः इत् पदेभिः ॥ ३ ॥

हे कार्यक्षम व मनोहर कवन विष्णूच्या कानांवर जावो. प्रेमळ स्तुतींचा भोक्ता आणि ज्याचें यश सर्वव्यापक असा वीर तो आहे. हे एवढें अवाढव्य जगड्व्याळ विश्व परंतु तें फक्त ह्याच्या एकट्याच्या तीनच पावलांत खलास होऊन गेले. ॥ ३ ॥


यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मद॑न्ति ।
य उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥ ४ ॥

यस्य त्री पूर्णा मधुना पदानि अक्षीयमाणा स्वधया मदंति ॥
य ऊं इति त्रिऽधातु पृथिवीं उत द्यां एकः दाधार भुवनानि विश्वा ॥ ४ ॥

ह्याची निवासस्थानेंही तीन व तींही मधुर रसानें पूर्ण ओथंबलेली, अक्षय्य व आपल्याच स्वाभाविक सहजानंदांत निमग्न अशी आहेत. आणि तो स्वतः असा आहे कीं हे त्रिगुणात्मक विश्व म्हणजे पृथ्वी, आकाश आणि इतर भुवनें हे सर्व एकट्यानें सांवरून धरलें आहे. ॥ ४ ॥


तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मद॑न्ति ।
उ॒रु॒क्र॒मस्य॒ स हि बन्धु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑ ॥ ५ ॥

तत् अस्य प्रियं अभि पाथः अश्यां नः रः यत्र देवऽयवः मदंति ॥
उरुऽक्रमस्य सः हि बंधुः इत्था विष्णोः पदे परमे मध्वः उत्सः ॥ ५ ॥

देवतांची आराधना करणारे उत्तम पुरुष ज्या प्रिय मार्गाचा अवलंब करून ज्ञानी झाले, ते स्थान मलाही प्राप्त व्हावे. त्या पराक्रमी विष्णुच्या परमपदी अमृतादि मधुर साठा आहे. वस्तुतः विष्णु सर्वांचा बंधुच आहे. ॥ ५ ॥


ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावः॒ भूरि॑शृङ्गान अ॒यासः॑ ।
अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑ ॥ ६ ॥

ता वां वास्तूनि उश्मसि गमध्यै यत्र गावः भूरिऽशृङ्गाः अयासः ॥
अत्र अह तत् उरुऽगायस्य वृष्णः परमं पदं अव भाति भूरि ॥ ६ ॥

जेथे जेथे उत्तम श्रृंगे असलेली व शीघ्रगामी गाईंची स्थाने आहेत त्या सर्व स्थानी तुम्हां दोघांना (यजमान व यजमान पत्‍नी) कसल्याही आडकाठीविना विचरण करता यावे अशी मी विष्णुकडे प्रार्थना करीत आहे. कारण ती सर्व स्थाने स्तवनीय, अभीष्टवर्धक व परमपद अशा विष्णुची आहेत. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५५ (विष्णु सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : विष्णुः - छंद - जगती


प्र वः॒ पान्त॒मन्ध॑सो धियाय॒ते म॒हे शूरा॑य॒ विष्ण॑वे चार्चत ।
या सानु॑नि॒ पर्व॑ताना॒मदा॑भ्या म॒हस्त॒स्थतु॒रर्व॑तेव सा॒धुना॑ ॥ १ ॥

प्र वः पांतं अंधसः धियाऽयते महे शूराय विष्णवे च अर्चत ॥
या सानुनि पर्वतानां अदाभ्या महः तस्थतुः अर्वताऽइव साधुना ॥ १ ॥

तुम्ही आपल्या सोमरसाच्या माधुर्याचे वर्णन परम श्रेष्ठ आणि शूर विष्णूपुढे करीत जा. खर्‍या भक्तीनें केलेल्या प्रार्थना तो खचित ऐकतो. ते पहा त्या पर्वताच्या शिरावर ते दोघेही अजिंक्य योद्धे एखाद्या घोड्यावर आरूढ झाल्याप्रमाणे उंच उभे राहिले आहेत. ॥ १ ॥


त्वे॒षमि॒त्था स॒मर॑णं॒ शिमी॑वतो॒रिंद्रा॑विष्णू सुत॒पा वा॑मुरुष्यति ।
या मर्त्या॑य प्रतिधी॒यमा॑न॒मित्कृ॒शानो॒रस्तु॑रस॒नामु॑रु॒ष्यथः॑ ॥ २ ॥

त्वेषं इत्था संऽअरणं शिमीऽवतोः इंद्राविष्णू इति सुतऽपाः वां उरुष्यति ॥
या मर्त्याय प्रतिऽधीयमानं इत् कृशानोः अस्तुः असनां उरुष्यथः ॥ २ ॥

हे इंद्रविष्णूहो, तुम्ही प्रबल आहात, म्हणून सोमरसाचा प्रसाद जो ग्रहण करतो तो त्वेषानें चाललेल्या घोर संग्रामांतून सुद्धां न हटतां पार पडतो. धनुष्यावर बाण चढवून तो निरपराधी मनुष्यावर सोडण्याच्या बेतांत कृशानु धनुर्धर असला तरीही त्याच्या बाणाची दिशा फिरवून त्या भक्ताचें तुम्ही रक्षण करतां ॥ २ ॥


ता ईं॑ वर्धन्ति॒ मह्य॑स्य॒ पौंस्यं॒ नि मा॒तरा॑ नयति॒ रेत॑से भु॒जे ।
दधा॑ति पु॒त्रोऽ॑वरं॒ परं॑ पि॒तुर्नाम॑ तृ॒तीय॒मधि॑ रोच॒ने दि॒वः ॥ ३ ॥

ता ईं वर्धंति महि अस्य पौंस्यं नि मातरा नयति रेतसे भुजे ॥
दधाति पुत्रः अवरं परं पितुः नाम तृतीयं अधि रोचने दिवः ॥ ३ ॥

त्या हवि अर्पणामुळे ह्याचा अगोदरच मोठा पराक्रम इतका वाढतो की, लोकांस पौरुषाचा उपभोग दीर्घकाल घडावा म्हणून आईबाप (म्हणजे आकाश व पृथ्वी) ह्यांच्या पर्यंत येऊन पोहोंचतो. म्हणजे अर्थातच पुत्र, हा आपल्या पित्याचें सामान्यप्रतीचें, मध्यमप्रतीचें, आणि तिसते उत्तम प्रतीचे स्थित्यंतर अशी तिन्ही स्थित्यंतरे त्या दैदिप्यमान स्वर्गलोकांत राहतील असे करतो. ॥ ३ ॥


तत्त॒दिद॑स्य॒ पौंस्यं॑ गृणीमसी॒नस्य॑ त्रा॒तुर॑वृ॒कस्य॑ मी॒ळ्हुषः॑ ।
यः पार्थि॑वानि त्रि॒भिरिद्विगा॑मभिरु॒रु क्रमि॑ष्टोरुगा॒याय॑ जी॒वसे॑ ॥ ४ ॥

तत्ऽतत् इत् अस्य पौंस्यं गृणीमसि इनस्य त्रातुः अवृकस्य मीळ्हुषः ॥
यः पार्थिवानि त्रिऽभिः इत् विगामऽभिः उरु क्रमिष्ट उरुऽगायाय जीवसे ॥ ४ ॥

हा विश्वाधिपती, भक्तरक्षक, कृपाळू आणि उदार आहे तरी, त्यानें तीनच पावलांनी भूलोकाचें आक्रमण केले व तेंही मनुष्याने उन्नति आणि दीर्घायुष्य ही दोन्ही साधावी म्हणून केलें, ह्या पराक्रमाचीच आम्ही विशेष वाखाणणी करतो. ॥ ४ ॥


द्वे इद॑स्य॒ क्रम॑णे स्व॒र्दृशो॑ऽभि॒ख्याय॒ मर्त्यो॑ भुरण्यति ।
तृ॒तीय॑मस्य॒ नकि॒रा द॑धर्षति॒ वय॑श्च॒न प॒तय॑न्तः पत॒त्रिणः॑ ॥ ५ ॥

द्वे इति इत् अस्य क्रमणे इति स्वःदृशः अभिऽख्याय मर्त्यः भुरण्यति ॥
तृतीयं अस्य नकिः आ दधर्षति वयः चन पतयंतः पतत्रिणः ॥ ५ ॥

हा आकाशस्थ सर्व द्रष्टा विष्णू, त्याची दोनच पावले पाहून मनुष्य आश्चर्यानें थक्क होऊन जातो. त्याच्या तिसर्‍या पावलाकडे पाहण्याची सुद्धां कोणाची प्राज्ञा नाही. सामर्थ्याची तरतरी किंवा कल्पना शक्तिरूपी पक्ष्याच्या भरार्‍या ह्यापैकी कशाचीही तेथे मात्रा चालत नाही. ॥ ५ ॥


च॒तुर्भिः॑ सा॒कं न॑व॒तिं च॒ नाम॑भिश्च॒क्रं न वृ॒त्तं व्यतीँ॑रवीविपत् ।
बृ॒हच्छ॑रीरो वि॒मिमा॑न॒ ऋक्व॑भि॒र्युवाकु॑मारः॒ प्रत्ये॑त्याह॒वम् ॥ ६ ॥

चतुर्भिः साकं नवतिं च नामऽभिः चक्रं नः वृत्तं व्यतीन् अवीविपत् ॥
बृहत्ऽशरीरः विऽमिमान ऋक्वऽभिः युवा अकुमारः प्रति एति आऽहवम् ॥ ६ ॥

चार प्रकारच्या नांवांनी प्राण्याच्या जन्माची नव्वद विलक्षन स्थित्यंतरे तो एखाद्या वाटोळ्या चाकाप्रमाणे गरगर फिरवीत आहे. हा शरीरानें इतका अवाढव्य परंतु भक्तिनें सहज मोजला जातो. तरुण परंतु बालरूप नव्हे, असा हा विष्णू भक्तांनी हाक मारल्याबरोबर येऊन उभा राहतो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५६ (विष्णु सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : विष्णुः - छंद - जगती


भवा॑ मि॒त्रो न शेव्यो॑ घृ॒तासु॑ति॒र्विभू॑तद्युम्न एव॒या उ॑ स॒प्रथाः॑ ।
अधा॑ ते विष्णो वि॒दुषा॑ चि॒दर्ध्यः॒ स्तोमो॑ य॒ज्ञश्च॒ राध्यो॑ ह॒विष्म॑ता ॥ १ ॥

भव मित्रः न शेव्यः घृतऽआसुतिः विभूतऽद्युम्नः एवऽया ऊं इति सऽप्रथाः ॥
अधा ते विष्णो इति विदुषा चित् अर्ध्यः स्तोमः यज्ञः च राध्यः हविष्मता ॥ १ ॥

तुझे यजन घृताहुतींनी होत असतें. तुझे ऐश्वर्य अप्रतीम, तूं सर्वव्यापी, व भक्तांकरितां त्वरेने येतोस तर तूं जिवलग मित्राप्रमाणे आम्हांस आनंदप्रद हो. हे विष्णू, ज्ञानी जनांनी तुझें यश वृद्धिंगत करावे, आणि भक्तांनी हवि देऊन यज्ञद्वारा तुला प्रसन्न करावे हे योग्यच आहे. ॥ १ ॥


यः पू॒र्व्याय॑ वे॒धसे॒ नवी॑यसे सु॒मज्जा॑नये॒ विष्ण॑वे॒ ददा॑शति ।
यो जा॒तम॑स्य मह॒तो महि॒ ब्रव॒त्सेदु॒ श्रवो॑भि॒र्युज्यं॑ चिद॒भ्यसत् ॥ २ ॥

यः पूर्व्याय वेधसे नवीयसे सुमत्ऽजानये विष्णवे ददाशति ॥
यः जातं अस्य महतः महि ब्रवत् सः इत् ऊं इति श्रवःऽभिः युज्यं चित् अभि असत् ॥ २ ॥

तो पुराण पुरुष खरा, परंतु नवीन म्हटला तर नवीनही आहे, व सृष्टी नियामक व स्वयंभू आहे, म्हणून ह्या विष्णूची जो भक्ति करतो, जो ह्या परमश्रेष्ठ विष्णूच्या अवताराचें स्तवन करतो, त्याचा दैवी ऐश्वर्याशी योग खचित घडून येईल. ॥ २ ॥


तमु॑ स्तोतारः पू॒र्व्यं यथा॑ वि॒द ऋ॒तस्य॒ गर्भं॑ ज॒नुषा॑ पिपर्तन ।
आस्य॑ जा॒नन्तो॒ नाम॑ चिद्विवक्तन म॒हस्ते॑ विष्णो सुम॒तिं भ॑जामहे ॥ ३ ॥

तं ऊं इति स्तोतारः पूर्व्यं यथा विद ऋतस्य गर्भं जनुषा पिपर्तन ॥
आ अस्य जानंतः नाम चित् विवक्तन महः ते विष्णो इति सुऽमतिं भजामहे ॥ ३ ॥

हे स्तोतृजनहो, सकल धर्मव्यवस्थेचे आदिकरण स्वभावतः हाच विष्णू होय, तेव्हां तुम्ही आपल्या अल्पज्ञानाप्रमाणे त्याच्या अवताराचे स्तवन करून त्याला आनंदाने परिपूर्ण करा. त्याची जी जी चरित्रें तुम्हांस माहीत आहेत ती ती वर्णन करा. हे विष्णू, तुज परमश्रेष्ठाच्या कृपेचा अनुभव आम्हीं घेतच आहों. ॥ ३ ॥


तम॑स्य॒ राजा॒ वरु॑ण॒स्तम॒श्विना॒ क्रतुं॑ सचन्त॒ मारु॑तस्य वे॒धसः॑ ।
दा॒धार॒ दक्ष॑मुत्त॒मम॑ह॒र्विदं॑ व्र॒जं च॒ विष्णुः॒ सखि॑वाँ अपोर्णु॒ते ॥ ४ ॥

तं अस्य राजा वरुणः तं अश्विना क्रतुं सचंत मारुतस्य वेधसः ॥
दाधार दक्षं उत्ऽतमं अहःऽविदं व्रजं च विष्णुः सखिऽवान् अपऽउर्णुते ॥ ४ ॥

मरुतांचे नियमन करणार्‍या ह्या विष्णूच्या त्या पराक्रमाचा विभागी राजा वरुण आहे, तसेंच अश्वी देवही आहेत. सर्वोत्कृष्ट, आणि दिवस उत्पन्न करून विश्वाला प्रकाशित करणारे असे सामर्थ्य विष्णूच्या अंगी आहे. तो आपल्या अनुचरांसह जाऊन स्वर्गीय धेनूंचा समूह मोकळा सोडून देतो. ॥ ४ ॥


आ यो वि॒वाय॑ स॒चथा॑य॒ दैव्य॒ इंद्रा॑य॒ विष्णुः॑ सु॒कृते॑ सु॒कृत्त॑रः ।
वे॒धा अ॑जिन्वत्त्रिषध॒स्थ आर्य॑मृ॒तस्य॑ भा॒गे यज॑मान॒माभ॑जत् ॥ ५ ॥

आ यः विवाय सचथाय दैव्यः इंद्राय विष्णुः सुऽकृते सुकृत्ऽतरः ॥
वेधा अजिन्वत् त्रिऽसधस्थः आर्यं ऋतस्य भागे यजमानं आ अभजत् ॥ ५ ॥

अगोदर इंद्र हा सत्कृत्य तत्पर, आणि त्यात शक्तियुक्त आणि सत्कृत्यांविषयीं विशेष उत्सुक असा विष्णू त्या इंद्राकडे त्याचकरितां गेला. त्रिभुवनांचा अधिपति आणि शास्ता जो विष्णु त्यानें आर्ययजमानास सुखी केले आणि श्रेष्ट धर्माचा वांटेकरी करून त्याची उन्नति केली. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५७ (अश्विनौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : अश्वोनौ - छंद - त्रिष्टुप्


अबो॑ध्य॒ग्निर्ज्म उदे॑ति॒ सूर्यो॒ व्यु३॒॑षाश्च॒न्द्रा म॒ह्यावो अ॒र्चिषा॑ ।
आयु॑क्षाताम॒श्विना॒ यात॑वे॒ रथं॒ प्रासा॑वीद्दे॒वः स॑वि॒ता जग॒त्पृथ॑क् ॥ १ ॥

अबोधि अग्निः ज्मः उत् एति सूर्यः वि उषाः चंद्रा मही आवः अर्चिषा ॥
आयुक्षातां अश्विना यातवे रथं प्र असावीत् देवः सविता जगत् पृथक् ॥ १ ॥

अग्नि जागृत आहे, सूर्य क्षितिजावर उदय पावण्याच्या बेतात आहे, श्रेष्ठ आणि सुखकर उषा आपल्या तेजाने सुप्रकाशित झाली आहे. आणि अश्वीदेवही रथ जोडून निघण्याच्या तयारींतच आहे, अशावेळी जगत्‌प्रेरक परमात्म्याने प्राणिमात्रांनाही आपआपल्या उद्योगास लावण्याकरितां जागृत केले आहे. ॥ १ ॥


यद्यु॒ञ्जाथे॒ वृष॑णमश्विना॒ रथं॑ घृ॒तेन॑ नो॒ मधु॑ना क्ष॒त्रमु॑क्षतम् ।
अ॒स्माकं॒ ब्रह्म॒ पृत॑नासु जिन्वतं व॒यं धना॒ शूर॑साता भजेमहि ॥ २ ॥

यत् युञ्जाथे इति वृषणं अश्विना रथं घृतेन नः ः मधुना क्षत्रं उक्षतम् ॥
अस्माकं ब्रह्म पृतनासु जिन्वतं वयं धना शूरऽसाता भजेमहि ॥ २ ॥

हे अश्विदेवहो, तुम्ही आपला विजयशाली रथ जोडून तयार व्हाल तेव्हां आमच्या शूर सैनिकांवर घृत आणि मध यांची जयसूचक अशी वृष्टी करून आशिर्वाद द्या. आम्ही केलेले स्तवन आम्हांस रणांगणांत यशस्वी करील असे करा. आणि ज्या अतुल संपत्तिकरितां वीर एकमेकांशी झगडत असतात, त्या अप्रतीम ऐश्वर्याचा लाभ आम्हांस घडेल असे करा. ॥ २ ॥


अ॒र्वाङ्‍ त्रि॑च॒क्रो म॑धु॒वाह॑नो॒ रथो॑ जी॒राश्वो॑ अ॒श्विनो॑र्यातु॒ सुष्टु॑तः ।
त्रि॒व॒न्धु॒रो म॒घवा॑ वि॒श्वसौ॑भगः॒ शं न॒ आ व॑क्षद्‌द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे ॥ ३ ॥

अर्वाङ्‍ त्रिऽचक्रः मधुऽवाहनः रथः जीरऽअश्वः अश्विनोः यातु सुऽसुतः ॥
त्रिऽवंधुरः मघऽवा विश्वऽसौभगः शं नः आ वक्षत् द्विऽपदे चतुःऽपदे ॥ ३ ॥

अश्विदेवहो, तुमचा प्रेमरूप मधाने भरून गेलेला अत्यंत नामांकित असा तीनचाकी रथ आमच्या बाजूस येवो, ह्या तुमच्या रथाचे घोडे अतिशय तल्लख असतात व रथाला तीन बैठकी असून त्याच्या येण्याने भक्तांना इच्छित लाभ होतात. त्यामुळे सहजच तो सर्व जगाला भाग्यसंपन्न करणारा असा झाला आहे. तर असा हा तुमचा रथ आमच्या मनुष्यांना व चतुष्पदांनाही सुख घेऊन येवो. ॥ ३ ॥


आ न॒ ऊर्जं॑ वहतमश्विना यु॒वं मधु॑मत्या नः॒ कश॑या मिमिक्षतम् ।
प्रायु॒स्तारि॑ष्टं॒ नी रपां॑सि मृक्षतं॒ सेध॑तं॒ द्वेषः॒ भव॑तं सचा॒भुवा॑ ॥ ४ ॥

आ नः ऊर्जं वहतं अश्विना युवं मधुऽमत्या नः ः कशया मिमिक्षतम् ॥
प्र आयुः तारिष्टं नीः रपांसि मृक्षतं सेधतं द्वेषः भवतं सचाऽभुवा ॥ ४ ॥

अश्विदेवहो, आम्हांस देण्याकरितां आणाल तर ओजस्वीपणा घेऊन या. मधाने ओथंबलेल्या तुमच्या चाबकाने आशिर्वादाचें पवित्र सिंचन आम्हांवर करा. आमचे आयुष्य वाढवा. क्लेशाचा नायनाट करा. द्वेषबुद्धि विलयास न्या आणि सदैव आमचे पाठिराखे व्हा. ॥ ४ ॥


यु॒वं ह॒ गर्भं॒ जग॑तीषु धत्थो यु॒वं विश्वे॑षु॒ भुव॑नेष्व॒न्तः ।
यु॒वम॒ग्निं च॑ वृषणाव॒पश्च॒ वन॒स्पतीँ॑रश्विना॒वैर॑येथाम् ॥ ५ ॥

युवं ह गर्भं जगतीषु धत्थः युवं विश्वेषु भुवनेषु अंतरिति ॥
युवं अग्निं च वृषणौ अपः च वनस्पतीन् अश्विनौ ऐरयेथाम् ॥ ५ ॥

स्त्रीजातीमध्यें गर्भाची योजना तुम्हींच करता, तुम्हीच सर्व भुवनांत चैतन्याची ज्योत पाजळतां, आणि हे अश्विदेवहो, हे वीरांनो, ऊष्णतेचे प्रवर्तन तुम्हीच करतां, जलवृष्टि तुम्हींच करतां, व वनस्पनींना जीवनकला तुम्हींच देतां. ॥ ५ ॥


यु॒वं ह॑ स्थो भि॒षजा॑ भेष॒जेभि॒रथो॑ ह स्थो र॒थ्या३॑राथ्ये॑भिः ।
अथो॑ ह क्ष॒त्रमधि॑ धत्थ उग्रा॒ यो वां॑ ह॒विष्मा॒न्मन॑सा द॒दाश॑ ॥ ६ ॥

युवं ह स्थः भिषजा भेषजेभिः अथो इति ह स्थः रथ्या राथ्येभिरितिरथेभिः ॥
अथो इति ह क्षत्रं अधि धत्थः उग्रा यः वां हविष्मान् मनसा ददाश ॥ ६ ॥

तुम्ही औषधीसंपन्न असे भिषग्वर्य आहांत. तुम्ही महारथी वीर आहांत. तेव्हां रथास जोडण्यायोग्य उत्कृष्ट घोडे तुमच्या पदरीं असावयाचेच. आणि हे उग्ररूप अश्विदेवहो, तुम्हाला भक्तिनें ज्यानें हवि अर्पण केलें आहे, त्याला तुम्ही लोकांचे अधिपत्य देत असतां. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५८ (अश्विनौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : अश्वोनौ - छंद - त्रिष्टुप्


वसू॑ रु॒द्रा पु॑रु॒मन्तू॑ वृ॒धन्ता॑ दश॒स्यतं॑ नो वृषणाव॒भिष्टौ॑ ।
दस्रा॑ ह॒ यत्रेक्ण॑ औच॒थ्यो वां॒ प्र यत्स॒स्राथे॒ अक॑वाभिरू॒ती ॥ १ ॥

वसू इति रुद्रा पुरुमंतू इति वृधंता दशस्यतं नः ः वृषणौ अभिष्टौ ॥
दस्रा ह यत् रेक्णः औचथ्यः वां प्र यत् सस्राथे इति अकवाभिः ऊती ॥ १ ॥

हे अश्विदेवांनो, तुम्ही दैवी संपत्तीचे निधि आहांत. रुद्र स्वरूप, बलाढ्य व अत्यंत प्रज्ञावानही तुम्हींच आहांत. आम्ही तुमची विनवणी करीत आहोंत. तर हे वीरांनो, हे अद्भुत कर्मकारी अश्वीहो, उचथ्याचा पुत्र जो अमोल ठेवा हात जोडून तुम्हांपाशी मागत आहे तो कृपा करून द्या. तुम्ही आपला कृपाप्रसाद सढळ हाताने देत असता. ॥ १ ॥


को वां॑ दाशत्सुम॒तये॑ चिद॒स्यै वसू॒ यद्धेथे॒ नम॑सा प॒दे गोः ।
जि॒गृ॒तम॒स्मे रे॒वतीः॒ पुरं॑धीः काम॒प्रेणे॑व॒ मन॑सा॒ चर॑न्ता ॥ २ ॥

कः वां दाशत् सुऽमतये चित् अस्यै वसू इति यत् धेथे इति नमसा पदे गोः ॥
जिगृतं अस्मे इति रेवतीः पुरंऽधीः कामप्रेणऽइव मनसा चरंता ॥ २ ॥

हे दिव्य निधि अश्वीदेवहो, यज्ञवेदीच्या पुढे तुम्हांस अंतःपूर्वक प्रणिपात केला असतां जो अनुग्रह तुम्ही भक्तांवर करता, तशा अनुग्रहास योग्य अशी तुमची सेवा कोणाच्या तरी हातून होईल काय ? आमची उज्ज्वल प्रतिभा जागृत करा, कारण भक्तांच्या कामना पूर्ण करण्याच्या हेतूनेंच तुम्ही सर्वत्र संचार करीत असतां. ॥ २ ॥


यु॒क्तो ह॒ यद्वां॑ तौ॒ग्र्याय॑ पे॒रुर्वि मध्ये॒ अर्ण॑सो॒ धायि॑ प॒ज्रः ।
उप॑ वा॒मवः॑ शर॒णं ग॑मेयं॒ शूरो॒ नाज्म॑ प॒तय॑द्‌भि॒रेवैः॑ ॥ ३ ॥

युक्तः ह यत् वां तौग्र्याय पेरुः वि मध्ये अर्णसः धायि पज्रः ॥
उप वां अवः शरणं गमेयं शूरः न अज्म पतयत्ऽभिः एवैः ॥ ३ ॥

हा तुमचा रथ संकट निवारणार्थ नेहमी तयारच आहे. हा प्रबल रथ पूर्वी तुग्र पुत्राच्या साहाय्यासाठी तुम्ही भर समुद्रांत लोटला होता. एखादा शुर सैनिक आश्रयाकरितां इकडे तिकडे न जाता आपल्या चलाख घोड्यानिशी आपल्या सैन्याकडे जातो, त्याप्रमाणे मीही तुम्हांलाच शरण यावे, हेंच माझे कर्तव्य आहे. ॥ ३ ॥


उप॑स्तुतिरौच॒थ्यमु॑रुष्ये॒न्मा मामि॒मे प॑त॒त्रिणी॒ वि दु॑ग्धाम् ।
मा मामेधो॒ दश॑तयश्चि॒तो धा॒क् प्र यद्वां॑ ब॒द्धस्त्मनि॒ खाद॑ति॒ क्षाम् ॥ ४ ॥

उपऽस्तुतिः औचथ्यं उरुष्येत् मा मां इमे इति पतत्रिणी इति वि दुग्धाम् ॥
मा मां एधः दशऽतयः चितः धाक् प्र यत् वां बद्धः त्मनि खादति क्षाम् ॥ ४ ॥

हे स्तवन मला उचस्थ पुत्राला मुक्त करो, पंख असलेल्या ह्या दोघीजणी मला पिळून टाकून शुष्क न करोत. ही लाकडांच्या ओंडक्यांची दसपट मोठी होळी मला जाळून भस्म न करो. पहा ज्याने ह्या तुमच्या भक्ताला बांधून टाकले होते, तोच आतां स्वतः धूळ खात पडला आहे. ॥ ४ ॥


न मा॑ गरन्न॒द्यो मा॒तृत॑मा दा॒सा यदीं॒ सुस॑मुब्धम॒वाधुः॑ ।
शिरो॒ यद॑स्य त्रैत॒नो वि॒तक्ष॑त्स्व॒यं दा॒स उरो॒ अंसा॒वपि॑ ग्ध ॥ ५ ॥

न मा गरन् नद्यः मातृऽतमा दासाः यत् ईं सुऽसमुब्धं अवऽअधुः ॥
शिरः यत् अस्य त्रैतनः विऽतक्षत् स्वयं दासः उरः अंसौ अपि ग्धेति ग्ध ॥ ५ ॥

त्या गुलामांनी मला बांधून नदींत टाकले तरी आई प्रमाणे प्रेम करणार्‍या नद्यांनी मला बुडविले नाही; व जरी त्रैतनानें आतां माझ्या डोक्यावर वार केलेला आहे, तरी थोडक्यांच वेळानें त्याचे स्वतःचे उर व खांदे ह्यांचा चुराडा उडून जाणार आहे. ॥ ५ ॥


दी॒र्घत॑मा मामते॒यो जु॑जु॒र्वान्द॑श॒मे यु॒गे ।
अ॒पामर्थं॑ य॒तीनां॑ ब्र॒ह्मा भ॑वति॒ सार॑थिः ॥ ६ ॥

दीर्घऽतमा मामतेयः जुजुर्वान् दशमे युगे ॥
अपां अर्थं यतीनां ब्रह्मा भवति सारथिः ॥ ६ ॥

ममतेचा पुत्र दीर्घतमा ह्याला दहाव्या युगांत वार्धक्य प्राप्त होऊन ब्रह्मपद मिळाले. अर्थात् ज्या ज्या कर्मांनी मनुष्यास कृतार्थत्व येते, अशा कर्म परंपरेचा तो आतां प्रवर्तक झाला आहे. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५९ (द्यावापृथिव्यौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : द्यावापृथिव्यौ - छंद - जगती


प्र द्यावा॑ य॒ज्ञैः पृ॑थि॒वी ऋ॑ता॒वृधा॑ म॒ही स्तु॑षे वि॒दथे॑षु॒ प्रचे॑तसा ।
दे॒वेभि॒र्ये दे॒वपु॑त्रे सु॒दंस॑से॒त्था धि॒या वार्या॑णि प्र॒भूष॑तः ॥ १॥

प्र द्यावा यज्ञैः पृथिवी इति ऋतऽवृधा मही इति स्तुषे विदथेषु प्रऽचेतसा ॥
देवेभिः ये इति देवपुत्रे इति देवऽपुत्रे सुऽदंससा एत्था धिया वार्याणि प्रऽभूषतः ॥ १ ॥

विद्वत्सभेमध्ये यज्ञ प्रसंगी द्यावापृथिवीचेही मी स्तवन करतो; ह्या परम थोर, सद्धर्माचा उत्कर्ष करणार्‍या व महा ज्ञानवान् अशा आहेत. ही दिव्य जनांची माता पितरे देवांच्या सहाय्याने अद्भुत कर्मे करून आपल्या खर्‍या प्रेमळपणाने देवांच्या स्पृहणीय कृपाप्रसादांना जास्तच शोभा आणतात. ॥ १ ॥


उ॒त म॑न्ये पि॒तुर॒द्‌रुहः॒ मनो॑ मा॒तुर्महि॒ स्वत॑व॒स्तद्धवी॑मभिः ।
सु॒रेत॑सा पि॒तरा॒ भूम॑ चक्रतुरु॒रु प्र॒जाया॑ अ॒मृतं॒ वरी॑मभिः ॥ २॥

उत मन्ये पितुः अद्रुहः मनः मातुः महि स्वऽतवः तत् हवीमऽभिः ॥
सुऽरेतसा पितरा भूम चक्रतुः उरु प्रऽजाया अमृतं वरीमऽभिः ॥ २ ॥

ईश्वराचा धांवा करीत असतांनाच त्या जगत् पित्याचें प्रेमळ अंतःकरण आणि जगत् मातेचे स्वतः सिद्ध सामर्थ्य ह्यांचे मी अखंड चिंतन करीत असतो. खरोखर जगद्‌उत्पत्तिकुशल अशा आईबापांनी ही विस्तीर्ण भूमि आपल्या बालकांकरितां आपल्या बहुमोल समृद्धींनी अमृतमय करून टाकली आहे. ॥ २ ॥


ते सू॒नवः॒ स्वप॑सः सु॒दंस॑सो म॒ही ज॑ज्ञुर्मा॒तरा॑ पू॒र्वचि॑त्तये ।
स्था॒तुश्च॑ स॒त्यं जग॑तश्च॒ धर्म॑णि पु॒त्रस्य॑ पाथः प॒दमद्व॑याविनः ॥ ३॥

ते सूनवः सुऽअपसः सुऽदंससः मही इति जज्ञुः मातरा पूर्वऽचित्तये ॥
स्थातुः च सत्यं जगतः च धर्मणि पुत्रस्य पाथः पदं अद्वयाविनः ॥ ३ ॥

महोदर, सत्कर्मरत, चमत्कारकुशल अशा त्या देवांनी ह्या परम थोर आईबापांना त्यांचे स्मरण प्रातःकाळी आम्ही प्रथम करावे म्हणून प्रकट केले आहे. हे माता पितरांनो, ह्या जगांतील स्थावर जंगमाचा व्यापार ज्या नियमांनी चालतो, त्या नियमांचे अस्तित्व तुम्हांमुळेच आहे आंत एक बाहेर एक हा प्रकार ज्याच्या स्वप्नीही नाही असा जो तुमचा पुत्र त्याच्या स्थानाचें रक्षणही तुम्हींच करीत असतां. ॥ ३ ॥


ते मा॒यिनो॑ ममिरे सु॒प्रचे॑तसो जा॒मी सयो॑नी मिथु॒ना समो॑कसा ।
नव्यं॑नव्यं॒ तन्तु॒मा त॑न्वते दि॒वि स॑मु॒द्रे अ॒न्तः क॒वयः॑ सुदी॒तयः॑ ॥ ४॥

ते मायिनः ममिरे सुऽप्रचेतसः जामी इति सयोनी इति सऽयोनी मिथुना संऽओकसा ॥
नव्यंऽनव्यं तंतुं आ तन्वते दिवि समुद्रे अंतरिति कवयः सुऽदीतयः ॥ ४ ॥

त्यांची (देवांची) शक्ति अलौकिक व शहाणपणाही अपूर्व आहे. त्यांनी ही जोडी अशी निर्माण केली आहे कीं, त्या परस्पर जणुं नातलगच, कारण त्यांचा जन्म एका ठिकाणापासून आणि राहणें ही एकत्रच. ह्या प्रमाणे वर आकाशांत आणि खाली समुद्राच्या पोटांत, ज्ञानी आणि परम् दीप्तिमान अशा देवांनी आपल्या कृतींची अद्भुत परंपराच लावून दिलेली आहे. ॥ ४ ॥


तद्राघधो॑ अ॒द्य स॑वि॒तुर्वरे॑ण्यं व॒यं दे॒वस्य॑ प्रस॒वे म॑नामहे ।
अ॒स्मभ्यं॑ द्यावापृथिवी सुचे॒तुना॑ र॒यिं ध॑त्तं॒ वसु॑मन्तं शत॒ग्विन॑म् ॥ ५॥

तत् राधः अद्य सवितुःन् वरेण्यं वयं देवस्य प्रऽसवे मनामहे ॥
अस्मभ्यं द्यावापृथिवी इति सुऽचेतुना रयिं धत्तं वसुऽमंतं शतऽग्विनम् ॥ ५ ॥

सर्व प्रेरक देवांची जी अत्यंत स्पृहणीय आणि अपूर्व देणगी तिचें चिंतन आम्ही सूर्योदयीं करीत असतों, तर ह्या द्यावापृथिवी उदार अंतःकरणानें, ज्याचा सांठा शतपट होऊं शकतो असे ऐश्वर्य आमच्या करितां आणोत. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १६० (द्यावापृथिव्यौ सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : द्यावापृथिव्यौ - छंद - जगती


ते हि द्यावा॑पृथि॒वी वि॒श्वश॑म्भुव ऋ॒ताव॑री॒ रज॑सो धार॒यत्क॑वी ।
सु॒जन्म॑नी धि॒षणे॑ अ॒न्तरी॑यते दे॒वो दे॒वी धर्म॑णा॒ सूर्यः॒ शुचिः॑ ॥ १ ॥

ते इति हि द्यावापृथिवी इति विश्वऽशंभुव ऋतवरी इत्यृतवरी रजसः धारयत्कवी इति धारयत्ऽकवी ॥
सुजन्मनी इति सुऽजन्मनी धिषणे इति अंतः ईयते देवः देवी इति धर्मणा सूर्यः शुचिः ॥ १ ॥

ह्या पहा द्यावापृथिवी; ह्या धर्मप्रिय व विश्वाला सुखकारक असून अंतरिक्षांतील ज्ञानप्रवर्तक शक्तींना धारण करीत असतात ; आणि ह्यांच्या पोटीं अनेक महात्मे जन्म घेतात. ईश्वराचे चातुर्य ह्यांचे ठिकाणी प्रकट होत असते व ह्याच दिव्य शक्तीच्या अंतर्भागीं सूर्य आपल्या नियमानुसार फिरत असतो. ॥ १ ॥


उ॒रु॒व्यच॑सा म॒हिनी॑ अस॒श्चता॑ पि॒ता मा॒ता च॒ भुव॑नानि रक्षतः ।
सु॒धृष्ट॑मे वपु॒ष्ये३॑न रोद॑सी पि॒ता यत्सी॑म॒भि रू॒पैरवा॑सयत् ॥ २ ॥

उरुऽव्यचसा महिनी इति असश्चता पिता माता च भुवनानि रक्षतः ॥
सुधृष्टमे इति सुधृष्टमे वपुष्ये इति न रोदसी इति पिता यत् सीं अभि रूपैः अवासयत् ॥ २ ॥

अति विस्तीर्ण, थोर आणि पवित्र अशी ही मातापितरें सर्व भुवनांचे रक्षण करीत असतात. ह्यांच्या अंतराळ प्रदेशांतील नक्षत्रेंही अत्यंत रमणीय रत्नाप्रमाणे असून चांगली स्थिर आहेत, कारण जगत्पित्यानें सर्वांसच मनोहर रूपाने मंडित केलें आहे. ॥ २ ॥


सः वह्निः॑ पु॒त्रः पि॒त्रोः प॒वित्र॑वान्पु॒नाति॒ धीरो॒ भुव॑नानि मा॒यया॑ ।
धे॒नुं च॒ पृश्निं॑ वृष॒भं सु॒रेत॑सं वि॒श्वाहा॑ शु॒क्रं पयः॑ अस्य दुक्षत ॥ ३ ॥

सः वह्निः पुत्रः पित्रोः पवित्रऽवान् पुनाति धीरः भुवनानि मायया ॥
धेनुं च पृश्निं वृषभं सुऽरेतसं विश्वाहा शुक्रं पयः अस्य धुक्षत ॥ ३ ॥

अत्यंत पवित्र, अत्यंत ज्ञानवान, व उपासना प्रवर्तक असा ईश्वर ह्या आईबापांचा पुत्र होऊन आपल्या अलौकिक सामर्थ्याने सर्व भुवनांना पवित्र करतो. आणि चित्रविचित्र धेनू आणि वीर्यसंपन्न वृषभ ह्यांचे नित्य दोहन करून शुद्ध सत्वरूप दुग्ध भक्तांकरितां काढून देतो. ॥ ३ ॥


अ॒यं दे॒वाना॑म॒पसा॑म॒पस्त॑मो॒ यो ज॒जान॒ रोद॑सी वि॒श्वश॑म्भुवा ।
वि यो म॒मे रज॑सी सुक्रतू॒यया॒जरे॑भिः॒ स्कम्भ॑नेभिः॒ समा॑नृचे ॥ ४ ॥

अयं देवानां अपसां अपःऽतमः यः जजान रोदसी इति विश्वऽशंभुवा ॥
वि यः ममे रजसी इति सुक्रतूऽयया अजरेभिः स्कंभनेभिः सं आनृचे ॥ ४ ॥

सर्व कुशल देवांमध्ये हा ईश्वरच एक अत्यंत कर्तृत्ववान व म्हणूनच त्याला सर्व लोकांना सुखप्रद अशी आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न करतां आली. ह्यानें आपल्या अपूर्व कर्तबगारीनें अंतराळांतील सर्व गोल निर्माण करून अशा आधारावर ते सांवरून धरिले आहेत कीं ते आधार कधींही जीर्ण होणार नाहींत. ॥ ४ ॥


ते नो॑ गृणा॒ने म॑हिनी॒ महि॒ श्रवः॑ क्ष॒त्रं द्या॑वापृथिवी धासथो बृ॒हत् ।
येना॒भि कृ॒ष्टीस्त॒तना॑म वि॒श्वहा॑ प॒नाय्य॒मोजो॑ अ॒स्मे समि॑न्वतम् ॥ ५ ॥

ते इति नः गृणाने इति महिनी इति महि श्रवः क्षत्रं द्यावापृथिवी इति धासथः बृहत् ॥
येन अभि कृष्टीः ततनाम विश्वहा पनाय्यं ओजः अस्मे इति सं इन्वतम् ॥ ५ ॥

थोर द्यावापृथीवींनो, तुमचें आम्ही यथामति स्तवन करीत असतों. म्हणून तुम्ही आम्हाला श्रेष्ठ सुकीर्ति आणि थोर अधिकाराचें पद अर्पण करीतच आहां ; पण आतां जेणेंकरून आम्हां देवभक्त जनांचा चोहोंकडे निरंतर प्रसार होईल, व ज्याची चोहोंकडे वाखाणणीच होईल असा जोम आमच्या अंगी नेहमीं वसेल असें करा. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP