|
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १४१ ते १५० ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४१ (अग्नि सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - जगती
बळि॒त्था तद्वपु॑षे धायि दर्श॒तं दे॒वस्य॒ भर्गः॒ सह॑सो॒ यतो॒ जनि॑ ।
बट् इत्था तत् वपुषे धायि दर्शतं देवस्य भर्गः सहसः यतः जनि ।
खरोखरच देवाचें अवर्णनीय असें तेज सामर्थ्याच्या प्रभावामुळें झालें म्हणूनच ते हे अग्निरूप तेज एक दर्शनीय वस्तु होऊन बसले आहे आणि म्हणून माझी चित्तवृत्ति त्याच्याकडे लागते व ती तत्काळ फलद्रुपही होते, व त्यामुळे सत्यधर्मप्रवर्तक अशा आमच्या स्तुतींचा ओघही तिकडेच वळलेला असतो. ॥ १ ॥
पृ॒क्षो वपुः॑ पितु॒मान्नित्य॒ आ श॑ये द्वि॒तीय॒मा स॒प्तशि॑वासु मा॒तृषु॑ ।
पृक्षः वपुः पितुऽमान् नित्य आ शये द्वितीयं आ सप्तऽशिवासु मातृषु ।
सामर्थ्यवान, नाशरहित आणि सर्वांगसंपन्न असा हा अग्नि प्राण्यांच्या शरीरांत वास करीत असतो. त्याचें दुसरे स्वरूप, सातांही भुवनांस जी मातेप्रनाणें कल्याणप्रद होतात अशा उदकांत असतें. ह्या वीर्यवान अग्नीच्या तिसर्या स्वरूपाची योजना त्याच्यापासून मनोरथरूप दुग्ध काढण्याकरितां केलेली आहे आणि येवढ्या करितांच लोकत्रयांत पूज्य अशा अग्नीला सुंदर युवतींनी प्रकट केलें आहे. ॥ २ ॥
निर्यदीं॑ बु॒ध्नान्म॑हि॒षस्य॒ वर्प॑स ईशा॒नासः॒ शव॑सा॒ क्रन्त॑ सू॒रयः॑ ।
निः यत् ईं बुध्नात् महिषस्य वर्पसः ईशानासः शवसा क्रंत सूरयः ।
जेव्हां अति विशाळ अशा ह्या आकाशरूप शरीराच्या मूळ प्रदेशापासून महात्म्यांनी अथवा ज्ञानसंपन्न ऋषींनी आपल्या सामर्थ्यानें ह्याला बाहेर प्रकट केलें, आणि मधुर रसाची आहुति देण्याकरितां पुरातन काळीं तो गुप्त रूपानें राहिला असतांही मातरिश्वानें मंथन करून जेव्हां त्यास बाहेर आणले, ॥ ३ ॥
प्र यत्पि॒तुः प॑र॒मान्नी॒यते॒ पर्या पृ॒क्षुधो॑ वी॒रुधो॒ दंसु॑ रोहति ।
प्र यत् पितुः परमात् नीयते परि आ पृक्षुधः वीरुधः दंऽसु रोहति ।
जेव्हां त्याला परात्पर पित्याजवळून खाली आणून भोंवताली फिरवितात, तेव्हां सामर्थ्यवर्धक आहुतीमधून आणि समिधांच्या लतांमधून तो विलक्षण तेजानें एकदम प्रज्वलित होतो. त्याला प्रकट करण्याचा योग दोघेजण जुळवून आणतात, तेव्हां तो अति पवित्र अग्नि आपल्या प्रखर तेजानें अत्यंत तरुण असाच प्रादुर्भूत होतो. ॥ ४ ॥
आदिन्मा॒तॄरावि॑श॒द्यास्वा शुचि॒रहिं॑स्यमान उर्वि॒या वि वा॑वृधे ।
आत् इत् मातॄः आ अविशत् यासु आ शुचिः अहिंस्यमानः उर्विया वि ववृधे ।
नंतर तो पवित्र अग्नि मातृसमूहांत ताबडतोब प्रवेश करून निष्प्रतिबंधपणें अतिशय वृद्धिंगत होतो, आणि त्यांच्यापैकी ज्या त्याच्या विस्तारवृद्धीस प्रथा कारणीभूत झाल्या असतात त्यांच्या मधून अगोदर प्रज्वलित होऊन नंतर मग नवीन आणि कनिष्ठ समूहांत वेगानें संचार करतो. ॥ ५ ॥
आदिद्धोता॑रं वृणते॒ दिवि॑ष्टिषु॒ भग॑मिव पपृचा॒नास॑ ऋञ्जते ।
आत् इत् होतारं वृणते दिविष्टिषु भगंऽइव पपृचानासः ऋंजते ।
अर्थात् प्रातर्यज्ञाच्या वेळेस ऋत्विज त्यालाच आपला आचार्य करतात, पूर्णपणे हवन करून त्याला प्रसन्न करून घेतात. मग आपल्या प्रज्ञाप्रभावानें आणि अद्भुत सामर्थ्यानें सर्वांच्या स्तुतीस पात्र झालेला, व सर्व विश्वाला ज्याचा आधार आहे असा अग्नि सुप्रसन्न होऊन, भक्तजनांची स्तवनें ऐकण्याकरितां, आणि त्यांच्या सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां देवतांस घेऊन येतो. ॥ ६ ॥
वि यदस्था॑द्यज॒तो वात॑चोदितः ह्वा॒रो न वक्वा॑ ज॒रणा॒ अना॑कृतः ।
वि यत् अस्थात् यजतः वातऽचोदितः ह्वारः न वक्वा जरणाः अनाकृतः ।
हा अत्यंत पूज्य अग्नि वार्यामुळें क्षुब्ध झाला असतां स्तुतीस न जुमानणार्या एखाद्या चतुर वस्ताद पंडिताप्रमाणेंआपल्या मार्गानें जेव्हां अनिवार होऊन नीट जातो, व सर्व पातकाचें भस्म करून टाकतो, ज्याचे दोन्ही पंख कृष्णवर्णच असतात, तरीही जो शुद्ध स्थानीच प्रकट होतो व ज्याच्या कृपेचे मार्ग नाना प्रकारचे आहेत असा हा अग्नि जात असतां वाटेंत अंतरिक्षांतून वर चढत जातो. ॥ ७ ॥
रथो॒ न या॒तः शिक्व॑भिः कृ॒तो द्यामङ्गे॑ुभिररु॒षेभि॑रीयते ।
रथः न यातः शिक्वऽभिः कृतः द्यां अंगेभिः अरुषेभिः ईयते ।
यंत्र सामर्थ्यानें चालविलेल्या व सजवून तयार केलेल्या एखाद्या वाहनांत बसल्याप्रमाणें, तो आपल्या आरक्त परिवारासह सिद्ध होऊन आकाशलोकीं संचार करतो. हे अग्ने तुझे दहन कर्म जेव्हां झपाट्यानें चालू असतें, तेव्हां कृष्णवर्ण धूराचे लोटच्या लोट वर चाललेले असतात व प्रतापी शूरास भ्यावे त्याप्रमाणे पक्षिगण तुझ्या प्रखर कोपाला भिऊन दशदिशा पळून जातात. ॥ ८ ॥
त्वया॒ ह्यग्ने॒ वरु॑णो धृ॒तव्र॑तो मि॒त्रः शा॑श॒द्रे अ॑र्य॒मा सु॒दान॑वः ।
त्वया हि अग्ने वरुणः धृतव्रतः मित्रः शाशद्रे अर्यमा सुऽदानवः ।
हे अग्निदेवा, तुझ्याच द्वारानें वरुण आपल्या धर्म नीति नियमाचे पालन करवितो व मित्र, अर्यमा हे उदारधी देव पातक्यांना शासन करतात. तूं आतां सर्व व्यापक अशा रूपानें प्रकट झाला आहेस, व चाकांची धांव अरांना आपापल्या ठिकाणी दाबून ठेवते त्याप्रमाणें आपल्या प्रज्ञाबलानें सर्वांना सर्व प्रकारें संभाळित आहेस. ॥ ९ ॥
त्वम॑ग्ने शशमा॒नाय॑ सुन्व॒ते रत्नं॑र यविष्ठ दे॒वता॑तिमिन्वसि ।
त्वं अग्ने शशमानाय सुन्वते रत्नं यविष्ठ देवऽतातिं इन्वसि ।
हे अग्निदेवा, तूं सर्वकाल ऐन तारुण्याच्या भरांत असतोस व स्तवनपूर्वक सोमरस अर्पण करणार्या भक्तांना इच्छित रत्न संपत्ति व देवभजनबुद्धि अशा दोहोंचीही जोड करून देतोस. तूं प्रत्यक्ष सामर्थ्याच्याच तारुण्यदशेची मूर्ति आहेस, तर हे महा वैभव संपन्न अग्निदेवा स्तुतिस पात्र अशा तुला आमचा भाग्य दाता म्हणून आमच्या सर्व उद्योगांत आम्ही आरंभी तुझीच आठवण करीत असतो. ॥ १० ॥
अ॒स्मे र॒यिं न स्वर्थं॒ दमू॑नसं॒ भगं॒ दक्षं॒ न प॑पृचासि धर्ण॒सिम् ।
अस्मे इति रयिं न सुऽअर्थं दमूनसं भगं दक्षं न पपृचासि धर्णसिम् ।
हे अग्निदेवा, स्वतः पूर्ण व सत्कार्यीं व्यय करतां येण्याइतके ऐश्वर्य आणि बलवत्तर दैव ह्या गोष्टी ज्याप्रमाणें तूं आम्हांस दिल्यास त्याप्रमाणें सर्व सहन करण्याचें सामर्थ्यही आम्हांस भरपूर दे. घोड्याचा लगाम धरून त्यास कह्यांत ठेवतात त्याप्रमाणें हा अग्नि सहज लीलेने दैवी आणि मानवी जन्मांवर आपलें प्रभुत्व चालवीत असतो आणि सद्धर्म विहित जो यज्ञ त्या यज्ञप्रसंगी देवांप्रित्यर्थ स्तवन करण्याची स्फूर्तिही तोच सत्कृत्यशील देव देत असतो. ॥ ११ ॥
उ॒त नः॑ सु॒द्योत्मा॑ जी॒राश्वो॒ होता॑ म॒न्द्रः शृ॑णवच्च॒न्द्रर॑थः ।
उत नः सुऽद्योत्मा जीरऽश्वः होता मंद्रः शृणवत् चंद्रऽरथः ।
अत्यंत दैदीप्यमान, सर्व वस्तु तात्काळ व्यापून टाकणारा आणि आनंदरूप असा हा यज्ञसंपादक अग्नि तेजोमय रथातून जात असतो, तो आमचा धांवा ऐको. अविद्यारहित अग्नि अचूक प्रेरणांनी आम्हांस अभीष्ट सुखाकडे, स्पृहणीय आनंदाकडे घेऊन जावो. ॥ १२ ॥
अस्ता॑व्य॒ग्निः शिमी॑वद्भिर॒र्कैः साम्रा॑ज्याय प्रत॒रं दधा॑नः ।
अस्तावि अग्निः शिमीवत्ऽभिः अर्कैः सांऽराज्याय प्रऽतरं दधानः ।
ज्यांचा प्रभाव विलक्षण आहे, अशा स्तोत्रगायनांनी अग्नीचें स्तवन केलेले आहे. विश्वाचे साम्राज्य भोगण्याला हा अगदी योग्य आहे, म्हणूनच हा सर्वांत अग्रेसर ठरला आहे. तर आमचे दातृत्वशाली यजमान आणि आम्हीं अशा सर्वांनी, सूर्य ज्याप्रमाणे हिमजलाचा उच्छेद करतो त्याप्रमाणें अधर्माचें उन्मूलन करून अत्यंत वृद्धिंगत व्हावें. ॥ १३ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४२ (अप्री सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - अनुष्टुप्
समि॑द्धो अग्न॒ आ व॑ह दे॒वाँ अ॒द्य य॒तस्रु॑चे ।
संऽइद्धः अग्ने आ वह देवान् अद्य यतऽस्रुचे ।
हे अग्ने तू प्रदीप्त झाला आहेस, तर आहुती देण्यास उद्युक्त झालेल्या यजमानांकडे आज आपल्या देवतांना घेऊन ये. आणि पुरातन यज्ञ धर्माची ही आमची परंपरा सोमरस काढून अर्पण करणार्या भक्तजनांकरितां यथासांग कर. ॥ १ ॥
घृ॒तव॑न्तम् उप॑ मासि॒ मधु॑मन्तं तनूनपात् ।
घृतऽवंतं उप मासि मधुऽमंतं तनूऽनपात् ।
हे स्वयंभू अग्निदेवा, तुझें स्तवन करून हवि अर्पण करणार्या मजसारख्या भक्तजनाच्या जो यज्ञ तू सन्निध राहून यथासांग तडीस नेतोस, त्यांत अर्थातच घृताची आणि मधुर मधाची कधींही उणीव नसते. ॥ २ ॥
शुचिः॑ पाव॒को अद्भु॑हतो॒ मध्वा॑ य॒ज्ञं मि॑मिक्षति ।
शुचिः पावकः अद्भुातः मध्वा यज्ञं मिमिक्षति ।
हा नराशंस म्हणजे सर्व जनस्तुतियोग्य असा अग्नि, स्वतः पवित्र, इतरांस पावन करणारा आणि आश्चर्यचकित करणारा आहे. तो द्युलोकांतून येऊन तीन वेळां आमचा यज्ञ मधुररसाने पूर्ण करतो. तो सर्व देवतांमध्यें अत्यंत पूज्य आहे. ॥ ३ ॥
ई॒ळि॒तो अ॑ग्न॒ आ व॒हेन्द्रं॑ चि॒त्रमि॒ह प्रि॒यम् ।
ईळितः अग्ने आ वह इंद्रं चित्रं इह प्रियम् ।
हे अग्निदेव, आमच्या स्तवनांनी तूं प्रसन्न झाला आहेस, तर ज्याचे यश अत्यंत उज्ज्वल आहे, अशा इंद्राला येथें घेऊन ये. तूं मधुरभाषणी आहेस व हे माझें स्तोत्र तुझ्या प्रित्यर्थच मी गात आहे. ॥ ४ ॥
स्तृ॒णा॒नासो॑ य॒तस्रु॑चो ब॒र्हिर्य॒ज्ञे स्व॑ध्व॒रे ।
स्तृणानासः यतऽस्रुचः बर्हिः यज्ञे सुऽअध्वरे ।
ह्या अध्वर यज्ञांमध्यें ऋत्विज कुशासन आंथरून हातांत ऋचा घेऊन आहुति देण्यास तयार आहेत, व मीही इंद्राकरितां त्या विश्वव्यापक देवाला साजेल असेंच विस्तृत आसन सुशोभित करीत आहे. ॥ ५ ॥
वि श्र॑यन्तामृता॒वृधः॑ प्र॒यै दे॒वेभ्यो॑ म॒हीः ।
वि श्रयंतां ऋतऽवृधः प्रऽयै देवेभ्यः महीः ।
देवतांनी आंत प्रवेश करावा म्हणून यज्ञशालेची पवित्र महाद्वारें उघडोत, ही दुष्टाच्या स्पर्शानें कलंकित झालेलीं नसून सनातनधर्म वृद्धिंगत करणारी, पवित्र करणारी आणि सर्वांस अत्यंत प्रिय अशीं आहेत. ॥ ६ ॥
आ भन्द॑माने॒ उपा॑के॒ नक्तो॒षासा॑ सु॒पेश॑सा ।
आ भंदमाने इति उपाके इति नक्तोषसा सुऽपेशसा ।
सर्वांनी आनंदानें ज्यांचा सत्कार करावा, ज्या परस्पराशी अगदी संलग्न झालेल्या असून, आपल्या सौंदर्यामुळें फार मोहक दिसत असतात अशा रात्र आणि उषारूप देवता म्हणजे सत्यधर्माच्या जणोंकाय श्रेष्ठ माताच, त्या प्रसन्नांतःकरणानें कुशासनांवर येऊन बसोत. ॥ ७ ॥
म॒न्द्रजि॑ह्वा जुगु॒र्वणी॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी ।
मंद्रऽजिह्वा जुगुर्वणी इति होतारा दैव्या कवी इति ।
मधुरभाषी, भगवंताचें अत्यंत प्रेमानें स्तवन करणारे कवि असे दोघेही दिव्य ऋत्विज हा आमचा यज्ञ सर्वार्थप्रद व स्वर्गातील देवतां पर्यंत पोहोंचणारा यज्ञ यथासांग शेवटास नेवोत. ॥ ८ ॥
शुचि॑र्दे॒वेष्वर्पि॑ता॒ होत्रा॑ म॒रुत्सु॒ भार॑ती ।
शुचिः देवेषु अर्पिता होत्रा मरुत्ऽसु भारती ।
शुद्ध चारित्र्य आणि देवतांमध्यें व मरुद्गणांमध्येंही पूज्य असलेली होत्रा, भारती, इळा आणि परम श्रेष्ठ सरस्वती अशा सर्व वंद्य देवता आसनावर आपण होऊन येऊन बसोत. ॥ ९ ॥
तन्न॑स्तु॒रीय॒मद्भु॑ तं पु॒रु वारं॑ पु॒रु त्मना॑ ।
तत् नः तुरीयं अद्भुोतं पुरु वा अरं पुरु त्मना ।
आमच्यावर कृपा करणारा त्वष्ट्रदेव यज्ञमंडपांत नाभीवर म्हणजे उत्तर वेदीवर आरूढ होऊन आमचे ठिकाणी अतिशय ओजस्वी आणि साहजिकपणें अतिशय विपुल असें जे आश्चर्यकारक वीर्य आहे, त्याची अशी योजना करो कीं तेणें करून आम्ही समर्थ होऊन आमचा उत्कर्ष होईल. ॥ १० ॥
अ॒व॒सृ॒जन्नुप॒ त्मना॑ दे॒वान्य॑क्षि वनस्पते ।
अवऽसृजन् उप त्मना देवान् यक्षि वनस्पते ।
हे वृक्षराजा येथे ये आणि स्वतः हवि अर्पण करून देवांचे यजन कर. परम बुद्धिमान अग्निसुद्धां देवतांमध्यें ज्यांचा हविर्भाग त्यांस देत असतो. ॥ ११ ॥
पू॒ष॒ण्वते॑ म॒रुत्व॑ते वि॒श्वदे॑वाय वा॒यवे॑ ।
पूषण्ऽवते मरुत्वते विश्वऽदेवाय वायवे ।
पूषा व तसेच मरुत्ही ज्याचे अंकित आहेत, जो विश्वाधीश व सर्वगति अशा वायुचाही जो आत्मा आहे; जो गायत्रीगायनाविषयी स्फूर्ति देतो; त्या इंद्राला, हे ऋत्विजानों, स्वाहा उच्चार करून हवि अर्पण करा. ॥ १२ ॥
स्वाहा॑कृता॒न्या ग॒ह्युप॑ ह॒व्यानि॑ वी॒तये॑ ।
स्वाहाऽकृतानि आ गहि उप हव्यानि वीतये ।
स्वाहा शब्द उच्चारून हीं हव्यें अर्पण केलीं आहेत. तर हे इंद्रा, त्यांचा स्वीकार करण्यास येच. ह्या अध्वर यज्ञाकरितांच हे ऋत्विज तुला हांक मारीत आहेत. ॥ १३ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४३ (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - अनुष्टुप्
प्र तव्य॑सीं॒ नव्य॑सीं धी॒तिम॒ग्नये॑ वा॒चो म॒तिं सह॑सः सू॒नवे॑ भरे ।
प्र तव्यसीं नव्यसीं धीतिं अग्नये वाचः मतिं सहसः सूनवे भरे ।
जे नेहमी फलद्रूप होते असे माझे ध्यान मी आतां अग्नीच्या ठिकाणीं लावतो, आणि माझे मनोहर व शब्दांनी व्यक्त केलेले विचारही आम्हांस धैर्यबळ देणार्या त्या अग्नीच्याच सेवेला अर्पण करतो. स्वर्लोकीच्या उदकांतून जो प्रादुर्भूत झाला आहे, तो लोकप्रिय अग्नि यज्ञाचा होता होऊन आपल्या दिव्य निधींसह यज्ञसमयीं येऊन पृथ्वीवरील ह्या वेदीवर अधिष्ठित झाला आहे. ॥ १ ॥
सः जाय॑मानः पर॒मे व्योमन्या॒विर॒ग्निर॑भवन्मात॒रिश्व॑ने ।
सः जायमानः परमे विऽओमनि आविः अग्निः अभवत् मातरिश्वने ।
अत्युच्च आकाशांत हा अग्नि प्रकट होतांक्षणींच मातरिश्वाच्या प्रथम दृष्टीस पडला आणि तो आपल्याच प्रज्ञाबलानें आणि पराक्रमानें प्रज्वलित झाला असतां त्याच्या दीप्तीनें पृथ्वी आणि आकाश ही दोन्हीही ओतप्रोत भरून गेली. ॥ २ ॥
अ॒स्य त्वे॒षा अ॒जरा॑ अ॒स्य भा॒नवः॑ सुसं॒दृशः॑ सु॒प्रती॑कस्य सु॒द्युतः॑ ।
अस्य त्वेषाः अजराः अस्य भानवः सुऽसंदृशः सुऽप्रतीकस्य सुऽद्युतः ।
ह्याच्या ज्वाला कधीही खंगत नसून नेहमी घवघवीत असतात, आणि ह्या भव्य अग्नीचे किरणही मोठे प्रेक्षणीय आणि देदीप्यमान असतात. चंडकिरणाप्रमाणें ह्याच्याही तेजाच्या लहरी न थकता किंवा निद्रावश न होतां, रात्रीच्या निबिड अंधःकारास भेदून टाकून चोहोंकडे पसरतात. ॥ ३ ॥
यमे॑रि॒रे भृग॑वो वि॒श्ववे॑दसं॒ नाभा॑ पृथि॒व्या भुव॑नस्य म॒ज्मना॑ ।
यं आऽईरिरे भृगवः विश्वऽवेदसं नाभा पृथिव्या भुवनस्य मज्मना ।
सकल ऐश्वर्याचा स्वामी अशा ज्या अग्नीला भृगुऋषींनी त्रिभुवनांचे बळ खर्च करून स्वर्गांतून आणून पृथ्वीच्या मध्यभागीं वेदीवर प्रस्थापीत केले. तो स्वस्थानी विराजमान झाला असतां त्यास आपल्या स्तुतींनी आपलासा कर. कारण, वरुणाप्रमाणें भगवद्रूप असणारा हा सुद्धां दैवी संपत्तीचा एकटाच प्रभू होय. ॥ ४ ॥
न यो वरा॑य म॒रुता॑मिव स्व॒नः सेने॑व सृ॒ष्टा दि॒व्या यथा॒शनिः॑ ।
न यः वराय मरुतांऽइव स्वनः सेनाऽइव सृष्टा दिव्या यथा अशनिः ।
मेघांची गर्जना, अथवा धनुष्यापासून सुटलेला बाण किंवा आकाशांतील उल्कापात जसे कोणासही थांबवून धरतां येणार नाहींत, त्याप्रमाणे ह्या अग्नीला कोणी आवरून धरूं म्हणेल तर तें शक्य नाहीं. आपल्या तीक्ष्ण दंष्ट्रांनी सपाट्यांत येईल ते सर्व हा खाऊन भस्म करून टाकतो व एखाद्या लढवय्या शत्रूवर तुटून पडावा, त्याप्रमाणे अरण्याचीं अरण्यें घेरून गडप करतो. ॥ ५ ॥
कु॒विन्नो॑ अ॒ग्निरु॒चथ॑स्य॒ वीरस॒द्वसु॑ष्कु॒वित्वसु॑भिः॒ काम॑मा॒वर॑त् ।
कुविन् नः अग्निः उचथस्य वीः असत् वसुः कुवित् वसुऽभिः कामं आऽवरत् ।
अमचे स्तोत्रगायन अग्नि मोठ्या कौतुकानें वारंवार गोड करून घेवो. हा दैवीसंपत्तीचा भांडारी, आम्हांस ती संपत्ति वारंवार देऊन आमचा मनोरथ पूर्ण करो. हा प्रेरक आमचे सुविचार अंगिकृत कार्यांत उत्तम तऱ्हेने चालतील असे करो. पवित्रपणाची मूर्तिच अशा त्या अग्नीचे स्तवन मी करतो. ते अशा स्फूर्तिजन्य स्तोत्राच्या द्वारानेंच करतो. ॥ ६ ॥
घृ॒तप्र॑तीकं व ऋ॒तस्य॑ धू॒र्षद॑म॒ग्निं मि॒त्रं न स॑मिधा॒न ऋ॑ञ्जते ।
घृतऽप्रतीकं वः ऋतस्य धुःऽसदं अग्निं मित्रं न संऽइधान ऋंजते ।
अग्नीची उज्ज्वल कांति घृताने सुशोभितच दिसते. हा सत्यधर्माचा मार्गदर्शक म्हणून तुमच्यासाठी प्रेमळ मित्राप्रमाणें उद्बोधन करून जेव्हां ह्याला भक्तजन सुप्रसन्न करतात तेव्हां आपल्या नेहमींच्या भरधोशानें प्रदीप्त होऊन, सर्व यज्ञमंडपांत दिव्य कांतीनें चमकणारा असा हा अग्नि आमच्या निष्कलंक प्रेमाचें अतिशय कौतुक करतो. ॥ ७ ॥
अप्र॑युच्छ॒न्नप्र॑युच्छद्भिुरग्ने शि॒वेभि॑र्नः पा॒युभिः॑ पाहि श॒ग्मैः ।
अप्रऽयुच्छन्न् अप्रऽयुच्छत्ऽभिः अग्ने शिवेभिः नः पायुऽभिः पाहि शग्मैः ।
हे अग्निदेवा, तूं भक्तांची कधींही उपेक्षा न करतां आपल्या अमोघ मंगलदायक आणि सुखकर अशा उपायांनी आमचें संरक्षण कर. तुझ्या योजना अशा आहेत कीं त्यांच्यात कोठेंही न्यून म्हणून सांपडणार नाही, त्या कोणासही हाणून पाडता येणार नाहींत, व शिवाय त्यांत कधींही खंड पडत नाही. तर हे परमपूज्य देवा, अशा योजनांनी आमच्या स्वकीयांचे संरक्षण कर. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४४ (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - जगती
एति॒ प्र होता॑ व्र॒तम॑स्य मा॒ययो॒र्ध्वां दधा॑नः॒ शुचि॑पेशसं॒ धिय॑म् ।
एति प्र होता व्रतं अस्य मायया उर्ध्वां दधानः शुचिऽपेशसं धियम् ।
आपल्या उपासना प्रावीण्याच्या भरांत जेव्हां ऋत्विज ह्या अग्नीची सेवा करण्यास प्रवृत्त होतो, तेव्हां तो आपल्या सर्वांगसुंदर गायनाचे आलाप खड्या सुरांत काढीत असतो. त्याबरोबर अग्नीही प्रेमभराने आहुति देण्यासाठी पुढे केलेल्या पळीकडे उजव्या बाजूस वळतो. कारण सर्वांच्या पूर्वी तीच त्याच्या आसनास भिडून त्याचें चुंबन घेत असते. ॥ १ ॥
अ॒भीमृ॒तस्य॑ दो॒हना॑ अनूषत॒ योनौ॑ दे॒वस्य॒ सद॑ने॒ परी॑वृताः ।
अभि ईं ऋतस्य दोहनाः अनूषत योनौ देवस्य सदने परिऽवृताः ।
सत्यधर्माचे प्रवाह आपल्या उद्गमस्थानांत म्हणजे देवाच्या निवासस्थानांत दृगोचर झाले. त्यांनीही अग्नीचा गौरव केला. स्वर्गंगेच्या अंकावर लीलेने क्रीडा करीत असतां ह्या अग्नीरूप बालकानें ईश्वरी तेजाचें पान केले, त्यामुळेंच त्याची आतां सर्वत्र प्रार्थना होत असते. ॥ २ ॥
युयू॑षतः॒ सव॑यसा॒ तदिद्वपुः॑ समा॒नमर्थं॑ वि॒तरि॑त्रता मि॒थः ।
युयूषतः सऽवयसा तत् इत् वपुः समानं अर्थं विऽतरित्रता मिथः ।
एकच उद्देश साधण्यासाठी दोघेही परस्पर आतुर झालेले असून दोघांचाही उत्साह सारखाच. तेव्हां अग्नीचें तें अपूर्व रूप प्रकट व्हावें म्हणून दोघेही प्रयत्न करतात. अर्थात् अमच्या भाग्याचे निधान हेंच अशा भावनेनें आम्हींही ह्या अग्नीचा धांवा करावा हें अगदीं योग्य, कारण घोड्याचा लगाम हाती असावा त्याप्रमाणें आमच्या नशीबाचीं सूत्रें ह्याच सूत्रधाराच्या हातीं असतात. ॥ ३ ॥
यमीं॒ द्वा सव॑यसा सप॒र्यतः॑ समा॒ने योना॑ मिथु॒ना समो॑कसा ।
यं ईं द्वा सऽवयसा सपर्यतः समाने योना मिथुना संऽओकसा ।
ज्या अग्नीची उपासना दोघेही ऋत्विज एकाच घरांत राहणारे एकाच वेदीवर जोडीने सारख्याच उत्साहानें करतात; तो हा अग्नि दिवसा काय किंवा रात्री काय, नेहमींच तरुण असणारा हा शुभ्र तेजस्वी अग्नि पहा अवतीर्ण झाला आहे. आणि मनुष्य जातीची कित्येक युगें होऊन जातील, परंतु हा कधीही जराग्रस्त होणार नाहीं. ॥ ४ ॥
तमीं॑ हिन्वन्ति धी॒तयो॒ दश॒ व्रिशो॑ दे॒वं मर्ता॑स ऊ॒तये॑ हवामहे ।
तं ईं हिन्वंति धीतयः दश व्रिशः देवं मर्तासः ऊतये हवामहे ।
ध्यानयुक्त स्तोत्रांनी दहा वेळां प्रार्थना करतों, ती याचीच. आणि आम्ही मर्त्य मानव संरक्षणार्थ हांक मारतों, त्याही ह्या भगवंतालाच. हा कमानदार अशा आकाशांतून सोसाट्यानें खाली येतो, आणि आपलें स्वागत करणार्या भक्तांस बरोबर घेऊन जगांत अपूर्व ज्ञानाचा प्रसार करतो. ॥ ५ ॥
त्वं ह्यग्ने दि॒व्यस्य॒ राज॑सि॒ त्वं पार्थि॑वस्य पशु॒पा इ॑व॒ त्मना॑ ।
त्वं हि अग्ने दिव्यस्य राजसि त्वं पार्थिवस्य पशुपाःऽइव त्मना ।
हे अग्निदेवा, ह्या आकाशांतील भुवनांचा राजा एक तूंच आहेस व ह्या भूगोलाचाही राजा तूंच. एखादा गोपाल जसा गाईंस वळवितो त्याप्रमाणें तूं स्वतः ह्या दोन्ही लोकांवर सत्ता चालवितोस. हे पृथ्वी वगैरे गोल येवढे प्रचंड, शुभ्रवर्ण, तेजःपुंज, नाशरहित आणि भ्रमणशील असे जरी आहेत; तरी ह्या अग्नीच्या कुशासनाला सुद्धां जेमतेमच पुरतात. ॥ ६ ॥
अग्ने॑ जु॒षस्व॒ प्रति॑ हर्य॒ तद्वचो॒ मन्द्र॒ स्वधा॑व॒ ऋत॑जात॒ सुक्र॑तः ।
अग्ने जुषस्व प्रति हर्य तत् वचः मंद्र स्वधाऽव ऋतऽजात सुक्रतो इति सुऽक्रतो ।
हे अग्निदेवा, तूं प्रसन्न होऊन ह्या आमच्या स्तवनानें आनंदभरीत हो. हे अग्ने, तूं आनंदमय, स्वतंत्र, सद्धर्मप्रभव आणि परमप्रज्ञ आहेस. तुझे दर्शन होतांच सर्व दिशांनी तूं भक्तसन्मुखच होतोस, आणि सर्व समृद्धींनी युक्त अशा राजवाड्याप्रमाणें सर्व दिशांनी तूं भक्ताच्या सन्मुख होत असतोस. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४५ (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - जगती
तं पृ॑च्छता॒ सः ज॑गामा॒ सः वे॑द॒ स चि॑कि॒त्वाँ ई॑यते॒ सा न्वीयते ।
तं पृच्छत सः जगाम सः वेद सः चिकित्वान् ईयते सः नु ईयते ।
हा पहा अग्नि इकडेच येत आहे. त्यालाच विचारा. त्याला सर्व गोष्टींची माहिती असते, तो सर्वज्ञ आहे. सगळे त्याचींच आर्जवे करतात व प्रार्थना करतात. सर्व शास्त्र नियम ह्याच्या ठिकाणी, सर्व यज्ञयागही त्याच्याचमध्यें, पवित्र सामर्थ्याचा, सर्व प्रतापांचा आणि प्रतापी पुरुषांचाही अधिपति तोच आहे. ॥ १ ॥
तमित् पृ॑च्छन्ति॒ न सि॒मो वि पृ॑च्छति॒ स्वेने॑व॒ धीरो॒ मन॑सा॒ यदग्र॑भीत् ।
तं इत् पृच्छंति न सिमः वि पृच्छति स्वेनऽइव धीरः मनसा यत् अग्रभीत् ।
कांहि विचारणें असेल तर ह्यालाच विचारतात. परंतु वाटेल तो मनुष्य त्याला प्रश्न करूं शकेल असें मात्र नाहीं. फक्त साधु पुरुष मात्र त्याच्या स्वतःच्या मनांत जो विचार येईल, त्याप्रमाणें आपलें हृद्गत त्याला विचारूं शकतो. तो महात्मा अग्नीनें सांगितलेला पुढचा व मागचा असे एकूण एक शब्द न विसरतां ध्यानांत धरून अग्नीच्याच सद्बुद्धिस अनुसरून चालत असतो. ॥ २ ॥
तमिद्ग॑ःच्छन्ति जु॒ह्व१॒॑स्तमर्व॑ती॒र्विश्वा॒न्येकः॑ शृणव॒द्वचां॑सि मे ।
तं इत् गच्छंति जुह्वः तं अर्वतीः विश्वानि एकः शृणवत् वचांसि मे ।
घृताहुतींनी भरलेल्या पळ्या त्याच्याचकडे जातात. स्फूर्तिजन्य स्तुतिस्तोत्रांचे स्थानही तोच. आम्ही केलेल्या सर्व विनवण्याही त्याच्याच कानीं पडोत. हा नाना प्रकारांच्या प्रार्थनांचा स्वीकार करणारा, जयशाली, यज्ञ यथासांग पूर्ण करणारा, आणि हा बालरूप अग्नि आपल्या जोराची चुणुक प्रकट करूं लागला आहे. ह्यांचे कृपाछत्र असें पूर्ण आहे कीं, त्यांत दोष काढणें अगदी अशक्य आहे. ॥ ३ ॥
उ॒प॒स्थायं॑ चरति॒ यत्स॒मार॑त स॒द्यो जा॒तस्त॑त्सार॒ युज्ये॑भिः ।
उपऽस्थायं चरति यत् संऽआरत सद्यः जातः तत्सार युज्येभिः ।
अग्नि आपले सर्व अंग आवरून घेतो, तेव्हां मात्र तो आजुबाजूस हलके हलके संचार करतो. परंतु नवीन प्रकट होतो, तेव्हां आपल्या परिवारासहवर्तमान एकदम झपाट्यानें निघून जातो. पण अग्नि प्रकट झाल्याबरोबर प्रेमभरानें जेव्हां त्याची स्तुति करावी तेव्हां मात्र जवळ येऊन, शिणलेल्या भक्तजनांस आनंदाचे व प्रेमाचे भरतें यावे म्हणून, तो त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. ॥ ४ ॥
स ईं॑ मृ॒गो अप्यो॑ वन॒र्गुरुप॑ त्व॒च्युप॒मस्यां॒ नि धा॑यि ।
स ईं मृगः अप्यः वनर्गुः उप त्वचि उपऽमस्यां नि धायि ।
हाए मेघोदकांत किंवा अरण्यांत असतो, तेव्हां एखाद्या वन्य श्वापदाप्रमाणेंउग्र दिसतो खरा परंतु आता आकाश आणि पृथ्वीवरील वेदीच्या उत्कृष्ट पृष्ठभागावर त्याची स्थापना केलेली आहे. मनुष्यास सद्धर्माचें ज्ञान त्यानेंच प्रथम शिकविले. कारण, तो सर्वज्ञ असून परम धर्माचा शास्ता आणि सत्याची केवळ मूर्तिच होय. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४६ (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - त्रिष्टुप्
त्रि॒मू॒र्धानं॑ स॒प्तर॑श्मिं गृणी॒षेऽ॑नूनम॒ग्निं पि॒त्रोरु॒पस्थे॑ ।
त्रिऽमूर्धानं सप्तऽरश्मिं गृणीषे अनूनं अग्निं पित्रोः उपऽस्थे ।
अग्नीची मस्तकें तीन प्रकारची आणि किरण सात प्रकारचे असून त्याच्या स्वरूपांत न्यून म्हणून सांपडावयाचेंच नाही. तो जगाच्या आईबापाच्या सन्निध बसलेला आहे, अशा अग्नीचें मी गुणसंकीर्तन करतो पहा. त्याने दिसण्यांत चल परंतु स्वतः अचल अशा आकाशाचा तेजोरूप आणि विस्तीर्ण प्रदेश कसा ओतप्रोत भरून टाकला आहे. ॥ १ ॥
उ॒क्षा म॒हाँ अ॒भि व॑वक्ष एने अ॒जर॑स्तस्थावि॒तऊ॑तिर्ऋ॒ष्वः ।
उक्षा महान् अभि ववक्षे एने इति अजरः तस्थौ इतःऽऊतिः ऋष्वः ।
वीर्यभराने स्फुरण पावणार्या ह्या महान अग्नीनें आकाश आणि पृथ्वी ह्या दोहोंनाही केव्हांच घेरून टाकले. जरारहित आणि उदारचरित अग्नि येथपासून पसरत पसरत आकाशापर्यंत जाऊन भिडला, तोंच त्याच्या आरक्त शिखा मेघरूप गाईच्या कासेस जाऊन चाटूं लागल्या. ॥ २ ॥
स॒मा॒नं व॒त्सम॒भि स॒ञ्चर॑न्ती॒ विष्व॑ग्धे॒नू वि च॑रतः सु॒मेके॑ ।
समानं वत्सं अभि संचरंती विष्वक् धेनु इति वि चरतः सुऽमेके ।
त्या दोन्ही मनोहर धेनू आपल्या वासराभोंवती चक्कर मारीत मारीत एकामागून एक अशा निघून जातात व जातांच त्याचे मार्ग निष्कलंक करून ठेवतात; कारण त्यांचे एकंदर लक्ष (त्यांच्या वासराकडे) त्या सर्वश्रेष्ठ अग्निकडे लागलेले असते. ॥ ३ ॥
धीरा॑सः प॒दं क॒वयो॑ नयन्ति॒ नाना॑ हृ॒दा रक्ष॑माणा अजु॒र्यम् ।
धीरासः पदं कवयः नयंति नाना हृदा रक्षमाणा अजुर्यम् ।
ज्ञाते ऋषि अग्नीला त्याच्या स्वस्थानाकडे नेतात व तेथें खर्या कळवळ्यानें योजलेल्या नाना प्रकारच्या युक्तिप्रयुकींनी त्या जरारहित अग्नीला तेथेंच ठेऊन घेतात. त्यायोगानें उत्कंठेने सेवा करणार्या त्या ऋषिवर्यांनी आकाशरूप सागराकडे दृष्टि फेंकतांच ह्या ऋषींच्यामुळें मर्त्यजनांकरितां सूर्य प्रकट झाला. ॥ ४ ॥
दि॒दृ॒क्षेण्यः॒ परि॒ काष्ठा॑सु॒ जेन्य॑ ई॒ळेन्यो॑ म॒हो अर्भा॑य जी॒वसे॑ ।
दिदृक्षेण्यः परि काष्ठासु जेन्यः ईळेन्यः महः अर्भाय जीवसे ।
कोणत्याही स्थळी दर्शन घेण्यास योग्य असा कोणी असेल तर हीच विभूति होय. सर्व लहान थोरांनी दीर्घायुष्य प्राप्त्यर्थ स्तवन करून ह्यालाच प्रसन्न केले पाहिजे; कारण हा सर्वरक्षक, महोदार, सर्वांना दर्शन देणारा असा अग्नि ह्या सर्व जीवांचा पिता होय. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४७ (दीर्घतमस् जन्मकथा सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - त्रिष्टुप्
क॒था ते॑ अग्ने शु॒चय॑न्त आ॒योर्द॑दा॒शुर्वाजे॑भिराशुषा॒णाः ।
कथा ते अग्ने शुचयंत आयोः ददाशुः वाजेभिः आशुषाणाः ।
हे अग्निदेवा, पुण्यप्रभावानें तेजःपुंज आणि तूं परमात्मा म्हणून, तुला अंतःकरणपूर्वक भजणारे असे भक्तजन तुझी सेवा यज्ञांनी कशी करतात तें कृपा करून आम्हांस सांग. म्हणजे त्यायोगानें पुत्रपौत्र असे दोन्हीही आम्हांस देणारे देव आमच्या धर्माचरणानें संतुष्ट होतील. ॥ १ ॥
बोधा॑ मे अ॒स्य वच॑सो यविष्ठ॒ मंहि॑ष्ठस्य॒ प्रभृ॑तस्य स्वधावः ।
बोधा मे अस्य वचसः यविष्ठ मंहिष्ठस्य प्रऽभृतस्य स्वधाऽवः ।
हवींनी संतुष्ट होणार्या हे अत्यंत तरुण अग्निदेवा, हे माझे स्तोत्र कृपा करून ऐक. त्यांत औदार्य वर्णन केलें असून पद्यरचनाही मनोरम आहे. कोणी निंदोत वा वंदोत, पण हे अग्ने, मी मात्र तुझा सेवक तूं जो सर्ववंद्य देव त्या तुज्यापुढें नम्र होणारच. ॥ २ ॥
ये पा॒यवो॑ मामते॒यं ते॑ अग्ने॒ पश्य॑न्तो अ॒न्धं दु॑रि॒तादर॑क्षन् ।
ये पायवः मामतेयं ते अग्ने पश्यंतः अंधं दुःऽइतात् अरक्षन् ।
तुझ्या आज्ञांकित सेवकांनी त्या ममतेच्या अंध असलेल्या पुत्राला पहातांच त्याचें त्या दुःखापासून रक्षण केले. हे परम बुद्धिमान भगवंता, त्या भक्ताचे तूं अशा रीतीनें रक्षण केलेंस म्हणून, मनांत नुकसान करावयाचें असतांही शत्रु त्या भक्तजनाचें कांहीएक वांकडे करूं शकले नाहींत. ॥ ३ ॥
यो नो॑ अग्ने॒ अर॑रिवाँ अघा॒युर॑राती॒वा म॒र्चय॑ति द्व॒येन॑ ।
यः नः अग्ने अररिऽवान् अघऽयुः अरातिऽवा मर्चयति द्वयेन ।
हे अग्ने, जो कोणी नीच मनुष्य आपण स्वतः भक्ति करीत नाही तो नाहींच, पण सज्जनांना मात्र पाण्यांत पाहतो, आणि कपट लढवून आम्हांस फसविण्याचा घाट घालतो. अशा दुरात्म्याचा दुष्ट बेत उलट त्याच्याच गळ्यांत येतो आणि त्याच्या शिव्याशापांनी त्याचा स्वतःचाच निःपात होतो. ॥ ४ ॥
उ॒त वा॒ यः स॑हस्य प्रवि॒द्वान्मर्तो॒ मर्तं॑ म॒र्चय॑ति द्व॒येन॑ ।
उत वा यः सहस्य प्रऽविद्वान् मर्तः मर्तं मर्चयति द्वयेन ।
तसेंच हे परमप्रतापी अग्निदेवा, तुझें स्तवन सर्वत्र होत असतें. जर तो मनुष्य जाणूनबुजून दुसर्याचा कपटानें घात करूं पाहील, अशा मनुष्याच्या तावडींतून तूं आपल्या गुणसंकीर्तन करणार्या भक्ताचा बचाव कर, आणि आम्हांवर अनर्थ ओढवेल असें होऊं देऊं नको. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४८ (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - त्रिष्टुप्
मथी॒द्यदीं॑ वि॒ष्टो मा॑त॒रिश्वा॒ होता॑रं वि॒श्वाप्सुं॑ वि॒श्वदे॑व्यम् ।
मथीत् यत् ईं विष्टः मातरिश्वा होतारं विश्वऽअप्सुं विश्वऽदेव्यम् ।
जो यज्ञाचा आचार्य, सर्व प्रकारची स्वरूपें धारण करणारा, सर्व देवांचे मूर्त स्वरूप आहे, अशा अग्नीला जेव्हां स्वाधीनचित्त अशा मातरिश्वानें मंथन करून प्रकट केलें तेव्हांपासून देदीप्यमान सूर्याप्रमाणेंच ही एक अद्वितीय व तेजस्वी विभूति म्हणून मनुष्य लोकांत त्याची स्थापना झाली. ॥ १ ॥
द॒दा॒नमिन्न द॑दभन्त॒ मन्मा॒ग्निर्वरू॑थं॒ मम॒ तस्य॑ चाकन् ।
ददानं इत् न ददभंत मन्म अग्निः वरूथं मम तस्य चाकन् ।
जो खरोखर भक्तिभावानें देवाची प्रार्थना करतो, त्याची हानि कोणीही करूं शकत नाही. अग्नीला अशा प्रकारची प्रार्थना मनापासून आवडते. त्यामुळेंच माझें चिलखत बनून तो रक्षण करीत आहे. लोकांस धर्मरत भक्तांचे सत्कर्म, सेवा इत्यादि सर्व कांही मिळतच असते. ॥ २ ॥
नित्ये॑ चि॒न्नु यं सद॑ने जगृ॒भ्रे प्रश॑स्तिभिर्दधि॒रे य॒ज्ञिया॑सः ।
नित्ये चित् नु यं सदने जगृभ्रे प्रशस्तिऽभिः दधिरे यज्ञियासः ।
पूज्य ऋषिजनांना, अग्नि त्यांच्या शाश्वत स्थानींच सांपडला मग मोठ्या गौरवानें त्यांनी त्याची वेदीवर स्थापना केली. नंतर त्याला आदरानें ते यज्ञामध्यें घेऊन गेले. परंतु रथास जोडलेल्या अश्वाप्रमाणें ते मोठ्या झपाट्यानें गेले. ॥ ३ ॥
पु॒रूणि॑ द॒स्मो नि रि॑णाति॒ जम्भै॒राद्रो॑चते॒ वन॒ आ वि॒भावा॑ ।
पुरूणि दस्मः नि रिणाति जंभैः आत् रोचते वने आ विभाऽवा ।
अग्नि हा अघटित चमत्कार घडवून आणतो, परंतु त्याचप्रमाणें शेंकडो पदार्थ आपल्या दाढेखालीं घालून रगडूनही टाकतो. आणि लोकांचे डोळे दिपवून सोडून सर्व अरण्य प्रज्वलित करतो. अशा स्थितींत वारासुद्धां एखाद्या धनुर्धरानें वेगानें सोडलेल्या बाणाला जसा साहाय्यभूत होतो; त्याप्रमाणें दररोज अग्नीच्या ज्वालांनी अनुकूल असाच वहात असतो. ॥ ४ ॥
न यं रि॒पवो॒ न रि॑ष॒ण्यवो॒ गर्भे॒ सन्तं॑ रेष॒णा रे॒षय॑न्ति ।
न यं रिपवः न रिषण्यवः गर्भे संतं रेषणाः रेषयंति ।
अग्नि गर्भावस्थेंत जरी असला तरी त्याला कोणीही शत्रु, कोणीही घातकी किंवा कोणीही अत्याचारी पातकी उपसर्ग देऊं शकत नाही. तो प्रकट झाल्यावर त्याच्या जाज्वल्य तेजानें ते आंधळे होऊन त्यांना दिसेनासे होतें, मग अर्थात् ते उपद्रव देऊं शकतच नाहींत. पण निरंतर उपासनानिष्ठ भक्तजन मात्र त्याला अंतःकरणांत सांठवून ठेवीत असतात. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४९ (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - विराट्
म॒हः स रा॒य एष॑ते॒ पति॒र्दन्नि॒न इ॒नस्य॒ वसु॑नः प॒द आ ।
महः सः राय एषते पतिः दन् इनः इनस्य वसुनः पदे आ ।
हा पहा दिव्य संपत्तीचा उदार अधिपति, राजांचाही राजा, ह्या पवित्र निधीच्या स्थानाकडेस, इकडेच येत आहे. तेव्हां आतां त्याचें आगमन होत आहे, इतक्यांत हे सोमप्रस्तर त्याच्याअ सेवेस तयार असोत. ॥ १ ॥
स यो वृषा॑ न॒रां न रोद॑स्योः॒ श्रवो॑भि॒रस्ति॑ जी॒वपी॑तसर्गः ।
सः यः वृषा नरां न रोदस्योः श्रवःऽभिः अस्ति जीवपीतऽसर्गः ।
हा अग्नि ह्या भूतलावरील लोकांचा आणि तसाच अंतराळांतील भुवनांचा आपल्या कीर्तिनें धुरीण म्हणून गाजत आहे. ज्याच्या किरणरूप सृष्टिचें पान यच्चावत् जीव निरंतर करीत असतात असा हा अग्नि पुढे होऊन आपल्या आसनावर आरोहण करीत आहे. ॥ २ ॥
आ यः पुरं॒ नार्मि॑णी॒मदी॑दे॒दत्यः॑ क॒विर्न॑भ॒न्यो३॒॑नार्वा॑ ।
आ यः पुरं नार्मिणीं अदीदेत् अत्यः कविः नभन्यः न अर्वा ।
ज्याने नार्णिमीच्या तटबंदी शहरावर उज्वल प्रकश पाडला तो हा महाज्ञानी अग्नि, आकाश दुमदुमून सोडणारा जणो चपल अश्वच आणि सूर्याप्रमाणें तेजःपुंज असा अग्नि, आत्मशक्तीनें शतपट भरून राहिला आहे. ॥ ३ ॥
अ॒भि द्वि॒जन्मा॒ त्री रो॑च॒नानि॒ विश्वा॒ रजां॑सि शुशुचा॒नो अ॑स्थात् ।
अभि द्विऽजन्मा त्री रोचनानि विश्वा रजांसि शुशुचानः अस्थात् ।
दोन ठिकाणी प्रकट होणारा व तिन्ही दिव्य लोक आणि सर्व अंतराळ प्रकाशानें ओतप्रत भरून सोडणारा असा जो हा अत्यंत पूज्य आचार्य तो स्वर्गंगेच्या वसतिस्थानांत वास करीत असतो. ॥ ४ ॥
अ॒यं स होता॒ यो द्वि॒जन्मा॒ विश्वा॑ द॒धे वार्या॑णि श्रव॒स्या ।
अयं सः होता यः द्विऽजन्मा विश्वा दधे वार्याणि श्रवस्या ।
तो हा अग्नि दोन्ही ठिकाणी प्रकट होणारा असा यज्ञाचा आचार्य होय. खर्या भक्तानें प्रेरित होऊन, जो जो भक्त ह्याला हविर्भाग अर्पण करतो त्याला हा अग्नि अत्युत्कृष्ट संपत्ति आणि जगद्विख्यात सत्कीर्ति ह्यांचा लाभ करून देतो. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १५० (अग्निः सूक्त ) ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - उष्णिक्
पु॒रु त्वा॑ दा॒श्वान्वो॑चे ऽ॒रिर॑ग्ने॒ तव॑ स्वि॒दा । तो॒दस्ये॑व शर॒ण आ म॒हस्य॑ ॥ १ ॥
पुरु त्वा दाश्वान् वोचे अरिः अग्ने तव स्वित् आ । तोदस्यइाव शरणे आ महस्य ॥ १ ॥
अग्निदेवा, मी तुजपाशी पुष्कळ मागणारच, कारण मी तुझा थोर आणि अनन्य भक्त म्हणून तुझ्या कृपाछत्राखाली असलो म्हणजे अत्यंत थोर अशा सतकर्मप्रवर्तकाच्या छत्राखाली असल्याप्रमाणेंच आहे. ॥ १ ॥
व्यनि॒नस्य॑ ध॒निनः॑ प्रहो॒षे चि॒दर॑रुषः । क॒दा च॒न प्र॒जिग॑तो॒ अदे॑वयोः ॥ २ ॥
वि अनिनस्य धनिनः प्रऽहोषे चित् अररुषः । कदा चन प्रऽजिगतः अदेवऽयोः ॥ २ ॥
तर कृपा कर आणि जो नास्तिक, धनाढ्य असूनही यज्ञ न करणारा आणि देव पराङ्मुख आहे अशा मनुष्याने केवढाही आक्रोश केला तरी तिकडे ढुंकून सुद्धां पाहूं नको. ॥ २ ॥
स च॒न्द्रो वि॑प्र॒ मर्त्यो॑ म॒हः व्राध॑न्तमो दि॒वि । प्रप्रेत्ते॑ अग्ने व॒नुषः॑ स्याम ॥ ३ ॥
सः चंद्रः विप्र मर्त्यः महः व्राधन्ऽतमः दिवि । प्रऽप्र इत् ते अग्ने वनुषः स्याम ॥ ३ ॥
हे ज्ञानरूपा, तुझा भक्त चंद्राप्रमाणें आल्हाददायक आणि स्वर्गलोकींच्या श्रेष्ठ पुरुषामध्येंही, त्याचा उत्कर्ष असतो, तर हे अग्ने आम्ही तुझे भक्त सुद्धां असेच सर्वांमध्यें वरिष्ठ व्हावें असें कर. ॥ ३ ॥
ॐ तत् सत् |