PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १३१ ते १४०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३१ (इंद्र सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : इंद्रः - छंद - अत्यष्टी


इंद्रा॑य॒ हि द्यौरसु॑रो॒ अन॑म्न॒तेन्द्रा॑य म॒ही पृ॑थि॒वी वरी॑मभिर्द्यु॒म्नसा॑ता॒ वरी॑मभिः ।
इंद्रं॒ विश्वे॑ स॒जोष॑सो दे॒वासो॑ दधिरे पु॒रः ।
इंद्रा॑य॒ विश्वा॒ सव॑नानि॒ मानु॑षा रा॒तानि॑ सन्तु॒ मानु॑षा ॥ १ ॥

इंद्राय हि द्यौः असुरः अनम्नत इंद्राय मही पृथिवी वरीमऽभिः द्युम्नसाता वरीमऽभिः ॥
इंद्रं विश्वे सऽजोषसः देवासः दधिरे पुरः ॥
इंद्राय विश्वा सवनानि मानुषा रातानि संतु मानुषा ॥ १ ॥

प्रकाशयुक्त व अमर्याद असें आकाश फक्त एका इंद्रालाच प्रणिपात करते आणि ही अवाढव्य पृथ्वीसुद्धां सौभाग्यसंपन्न होण्याकरितां आपल्या सर्वोत्कृष्ट संपत्तीसह आपल्या अत्युत्तम फलपुष्पांसह इंद्रापुढेंच लोटांगण घालते. प्रेमामुळें एक झालेल्या सर्व देवांनी, इंद्रालाच अग्रेसरत्व दिले आहे, तेव्हां आम्हां मनुष्यांचे सर्व सोमरस आम्हां भक्तजनांचे हविर्भाग, सर्व इंद्रालाच अर्पण असोत. ॥ १ ॥


विश्वे॑षु॒ हि त्वा॒ सव॑नेषु तु॒ञ्जते॑ समा॒नमेकं॒ वृष॑मण्यवः॒ पृथ॒क् स्वः सनि॒ष्यवः॒ पृथ॑क् ।
तं त्वा॒ नावं॒ न प॒र्षणिं॑ शू॒षस्य॑ धु॒रि धी॑महि ।
इंद्रं॒ न य॒ज्ञैश्चि॒तय॑न्त आ॒यवः॒ स्तोमे॑भि॒रिंद्र॑मा॒यवः॑ ॥ २ ॥

विश्वेषु हि त्वा सवनेषु तुञ्जते समानं एकं वृषऽमन्यवः पृथक् स्वरिति स्वः सनिष्यवः पृथक् ॥
तं त्वा नावं न पर्षणिं शूषस्य धुरि धीमहि ॥
इंद्रं न यज्ञैः चितयंतः आयवः स्तोमेभिः इंद्रं आयवः ॥ २ ॥

सोम अर्पण करण्याच्या प्रत्येक प्रसंगी, तूं सर्वांचा मिळोन एकच देव, म्हणून तुझी विनवणी आपआपल्या परीनें यजमान लोक पराकाष्ठेच्या उत्कंठेने करीत असतात व प्रत्येक जण अक्षय्य आनंद प्राप्त व्हावा म्हणून स्वतः निरनिराळी प्रार्थनाही करीत असतो. तेव्हां एखादा प्राणरक्षक नौकेप्रमाणें सर्व महत्कार्यारंभी, अगोदर तुझी योजना आम्ही प्रथम करावी हेंच योग्य आहे, म्हणून आम्हीं मानवजन, यज्ञांच्या निमित्तानें सूक्त गायनाच्या योगानें इंद्राच्याच ठिकाणीं चित्त एकाग्र करतो. ॥ २ ॥


वि त्वा॑ ततस्रे मिथु॒ना अ॑व॒स्यवो॑ व्र॒जस्य॑ सा॒ता गव्य॑स्य निः॒सृजः॒ सक्ष॑न्त इंद्र निः॒सृजः॑ ।
यद्ग॒॑व्यन्ता॒ द्वा जना॒ स्व१॑र्यन्ता॑ स॒मूह॑सि ।
आ॒विष्करि॑क्र॒द्वृष॑णं सचा॒भुवं॒ वज्र॑मिंद्र सचा॒भुव॑म् ॥ ३ ॥

वि त्वा ततस्रे मिथुना अवस्यवः व्रजस्य साता गव्यस्य निःऽसृजः सक्षंतः इंद्र निःऽसृजः ॥
यत् गव्यंता द्वा जना स्वः यंता संऽऊहसि ॥
आविः करिक्रत् वृषणं सचाऽभुवं वज्रं इंद्र सचाऽभुवम् ॥ ३ ॥

तुझ्या प्रसादाची लालसा धरून यजमान व त्याची पत्नी अशी अनेक जोडपीं स्वर्गीय गोधन प्राप्त होण्यांकरितां, हे इंद्रा, तुला हवि अर्पण करतात, व आहुति देऊन सर्व दुर्वासना बाजूस सारून तुझें यजन तत्परतेनें करीत असतात. दिव्यप्रकाश आणि स्वर्गसुख ह्यांच्यासाठीं उत्सुक झालेल्या जोडप्यांना जेव्हां जेव्हां तूं स्वर्लोकीं नेतोस, तेव्हां तेव्हां, हे इंद्रा, तुझें अमोघ वज्र आमच्या सहज दृष्टीस पडतें, जें तुझा जीव कीं प्राण आहे. त्याचा तुझा कधींही वियोग घडत नाहीं. ॥ ३ ॥


वि॒दुष्टे॑ अ॒स्य वी॒र्यस्य पू॒रवः॒ पुरो॒ यदि॑न्द्र॒ शार॑दीर॒वाति॑रः सासहा॒नो अ॒वाति॑रः ।
शास॒स्तमि॑न्द्र॒ मर्त्य॒मय॑ज्युं शवसस्पते ।
म॒हीम॑मुष्णाः पृथि॒वीमि॒मा अ॒पो म॑न्दसा॒न इ॒मा अ॒पः ॥ ४ ॥

विदुः ते अस्य वीर्यस्य पूरवः पुरः यत् इंद्र शारदीः अवऽआतिरः ससहानः अवऽआतिरः ॥
शासः तं इंद्र मर्त्यं अयज्युं शवसः पते ॥
महीं अमुष्णाः पृथिवीं इमा अपः मंदसानः इमाः अपः ॥ ४ ॥

तुझा एक पराक्रम आतां सर्व जगास माहीत झाला आहे, तो हा कीं, हे इंद्रा, आवर्षणरूप राक्षसाचे शरद ऋतूंत अभेद्य होणारे किल्ले तूं फोडून टाकलेस. अनावर होऊन तूं ते जमीनदोस्त करून टाकलेस. हे सामर्थ्यसागरा, तूं त्या धर्मलंड लोकांना शासन केलेंस व विजयश्रीच्या हर्षभरांत भक्तांकरितां ही पृथ्वी, ह्या नद्या व हे नदीकांठचे प्रदेश तूं हस्तगत करून घेतलेस. ॥ ४ ॥


आदित्ते॑ अ॒स्य वी॒र्यस्य चर्किर॒न्मदे॑षु वृषन्नु॒शिजो॒ यदावि॑थ सखीय॒तो यदावि॑थ ।
च॒कर्थ॑ का॒रमे॑भ्यः॒ पृत॑नासु॒ प्रव॑न्तवे ।
ते अ॒न्याम॑न्यां न॒द्यं सनिष्णत श्रव॒स्यन्तः॑ सनिष्णत ॥ ५ ॥

आत् इत् ते अस्य वीर्यस्य चर्किरन् मदेषु वृषन् उशिजः यत् आविथ सखिऽयतः यत् आविथ ॥
चकर्थ कारं एभ्यः पृतनासु प्रऽवंतवे ॥
ते अन्याऽअन्या नद्यं सनिष्णत श्रवस्यंतः सनिष्णत ॥ ५ ॥

हे औदार्यशीला, सहवासाकरितां अत्युत्सुक झालेल्या भक्तांचे तूं रक्षण केलेस, व तुझ्याशी सख्य जोडण्यास आतुर झालेल्या भक्तांना तूं सहाय्य केलेंस. आणि त्यांच्याकरितां युद्धांत जय मिळविण्याच्या ईर्ष्येनें जेव्हां तूं सिंहनाद केलास, तेव्हां त्यांनी एकीमागून दुसरी याप्रमाणे एकूणएक नद्यांमधील प्रदेश जिंकले. ॥ ५ ॥


उ॒तो नो॑ अ॒स्या उ॒षसो॑ जु॒षेत॒ ह्य१॑र्कस्य॑ बोधि ह॒विषो॒ हवी॑मभिः॒ स्वर्षाता॒ हवी॑मभिः ।
यदि॑न्द्र॒ हन्त॑वे॒ मृधो॒ वृषा॑ वज्रिं॒ चिके॑तसि ।
आ मे॑ अ॒स्य वे॒धसः॒ नवी॑यसो॒ मन्म॑ श्रुधि॒ नवी॑यसः ॥ ६ ॥

उतो इति नः अस्याः उषसः जुषेत हि अर्कस्य बोधि हविषः हवीमऽभिः स्वःऽसाता हवीमऽभिः ॥
यत् इंद्र हंतवे मृधः वृषा वज्रिन् चिकेतसि ॥
आ मे अस्य वेधसः नवीयसः मन्म श्रुधि नवीयसः ॥ ६ ॥

आतां आज तरी ह्या सुप्रभातीं हा इंद्र आम्हांस आपलेसे म्हणेल काय ? हे इंद्रा, आमची साम-गायनें मान्य करून घे. आम्हीं आर्जवानें तुला हवि अर्पण करितों तें हवि व आम्हांस दिव्य प्रकाशाचा लाभ व्हावा म्हणून प्रार्थना करतो त्याही मान्य करून घे. हे वज्रधर इंद्रा, मी केलेलें हे स्तवन तत्कालिक स्फूर्तिनें, अपूर्व प्रतिमेनें सुचलेले हें तुझें स्तोत्र तू कृपा करून ऐकून घेत जा. ॥ ६ ॥


त्वं तमि॑न्द्र वावृधा॒नो अ॑स्म॒युर॑मित्र॒यन्तं॑ तुविजात॒ मर्त्यं॒ वज्रे॑ण शूर॒ मर्त्य॑म् ।
ज॒हि यो नो॑ अघा॒यति॑ श्रृणु॒ष्व सु॒श्रव॑स्तमः ।
रि॒ष्टं न याम॒न्नप॑ भूतु दुर्म॒तिर्विश्वाप॑ भूतु दुर्म॒तिः ॥ ७ ॥

त्वं तं इंद्र वावृधानः अस्मऽयुः अमित्रऽयंतं तुविऽजात मर्त्यं वज्रेण शूर मर्त्यम् ॥
जहि यः नः अघऽयति शृणुष्व सुश्रवःऽतमः ॥
रिष्टं नः यामन् अप भूतु दुःऽमतिः विश्वा अप भूतु दुःऽमतिः ॥ ७ ॥

हे इंद्रा, तूं अत्यंत बलाढ्य असूनही आमच्या विषयीं तुला अतिशय प्रेम वाटतें. तूं स्वाभाविकपणेंच सर्वसमर्थ आहेस, तर हे शूरा, आमचा निष्कारण द्वेष करणार्‍या दुष्टाचा, त्या अधम मानवाचा तूं आपल्या शस्त्रानें निःपात करून टाक, व आमच्या विरुद्ध अत्याचार करतो त्यालाही मारून टाक. एवढें आमचे ऐक. पहा तुझी केवढी लोकोत्तर कीर्ति आहे ती. तर दुष्ट वासना आणि सर्व दुर्जन आमच्याकडे येऊं लागतांच नाहिंसे होवोत. एखाद्या मोडक्या खटार्‍याप्रमाणें वाटेंतच मोडून पडोत. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३२ (इंद्र सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : इंद्रः - छंद - अत्यष्टी


त्वया॑ व॒यं म॑घव॒न्पूर्व्ये॒ धन॒ इंद्र॑त्वोताः सासह्याम पृतन्य॒तो व॑नु॒याम॑ वनुष्य॒तः ।
नेदि॑ष्ठे अ॒स्मिन्नह॒न्यधि॑ वोचा॒ नु सु॑न्व॒ते ।
अ॒स्मिन्य॒ज्ञे वि च॑येमा॒ भरे॑ कृ॒तं वा॑ज॒यन्तो॒ भरे॑ कृ॒तम् ॥ १॥

त्वया वयं मघऽवन् पूर्व्ये धने इंद्रत्वाऽऊताः ससह्याम पृतन्यतः वनुयाम वनुष्यतः ॥
नेदिष्ठे अस्मिन् अहनि अधि वोच नु सुन्वते ॥
अस्मिन् यज्ञे वि चयेम भरे कृतं वाजऽयंतः भरे कृतम् ॥ १ ॥

पूर्वींच्या युद्धांत होत असे त्याप्रमाणे, हे उदार इंद्रा, आतांही आमच्यावर सैन्यानिशी चढाई करून येणार्‍या शत्रूंचा तुझ्याच कृपेनें आणि तुझ्याच संरक्षणामुळें आम्ही प्रतिकार करूं, आणि आमचा सर्वथैव घात करूं पाहणार्‍या दुष्टांची खोड मोडूं, असें कर. हा आणीबाणीचा दिवस तर येऊन ठेपलाच, तर आतां तुला सोमरसानें संतुष्ट करणार्‍या भक्तांस, आशीर्वाद दे. आम्हांला पराक्रम गाजविण्याचीच केवळ इच्छा आहे, तेव्हां युद्धांत आम्हांस जें जें काय मिळेल, आम्ही जें जें कांही जिंकून आणूं, तें तें सर्व ह्या यज्ञांमध्यें तुझ्याच पायी वाहण्याचा आमचा संकल्प झालेला आहे. ॥ १ ॥


स्व॒र्जे॒षे भर॑ आ॒प्रस्य॒ वक्म॑न्युष॒र्बुधः॒ स्वस्मि॒न्नञ्ज॑सि क्रा॒णस्य॒ स्वस्मि॒न्नञ्ज॑सि ।
अह॒न्निंद्रो॒ यथा॑ वि॒दे शी॒र्ष्णाशी॑र्ष्णोप॒वाच्यः॑ ।
अ॒स्म॒त्रा ते॑ स॒ध्र्यक् सन्तु रा॒तयो॑ भ॒द्रा भ॒द्रस्य॑ रा॒तयः॑ ॥ २॥

स्वःऽजेषे भरे आप्रस्य वक्मनि उषःऽबुधः स्वस्मिन् अंजसि क्राणस्य स्वस्मिन् अंजसि ॥
अहन् इंद्रः यथा विदे शीर्ष्णाऽशीर्ष्णा उपवाच्यः ॥
अस्मत्रा ते सध्र्यक् संतु रातयः भद्रा भद्रस्य रातयः ॥ २ ॥

जो स्वर्गलोक मिळवून देतो, जो खर्‍या वीराचें वैभवच आहे अशा त्या युद्धप्रसंगी भक्तानें प्रातःकाळीं उठून स्वतः केलेल्या कळवळ्याच्या प्रार्थनेनें आणि निरंतर सेवारत जनाच्या कळवळीनें संतुष्ट होऊन इंद्रानें शत्रूंचा संहार केला, हें सर्व विश्रुत आहेच. तो हा इंद्र असा आहे कीं त्याच्या चरणांवर लोळण घेऊन त्याचा गौरव करावा. हे इंद्रा, तूं मूर्तिमंत सद्‍भाग्यच आहेस, तर तुझे कृपाप्रसाद, तुझीं मंगलप्रद वरदानें आमच्याकडे वळोत. ॥ २ ॥


तत्तु प्रयः॑ प्र॒त्नथा॑ ते शुशुक्व॒नं यस्मि॑न्य॒ज्ञे वार॒मकृ॑ण्वत॒ क्षय॑मृ॒तस्य॒ वार॑सि॒ क्षय॑म् ।
वि तत्वो॑चे॒रध॑ द्वि॒तान्तः प॑श्यन्ति र॒श्मिभिः॑ ।
स घा॑ विदे॒ अन्विंद्रः॑ ग॒वेष॑णो बन्धु॒क्षिद्भ्यो॑ ग॒वेष॑णः ॥ ३॥

तत् तु प्रयः प्रत्नरथा ते शुशुक्वनं यस्मिन् यज्ञे वारं अकृण्वत क्षयं ऋतस्य वाः असि क्षयम् ॥
वि तत् वोचेः अध द्विता अंतरिति पश्यंति रश्मिऽभिः ॥
सः घ विदे अनु इंद्रः गोऽएषणः बंधुक्षिद्भ्यः् गोऽएषणः ॥ ३ ॥

ज्या यज्ञांत तुझ्यासाठीं सुंदर वेदि म्हणजे रमणीय निवासस्थान भक्तांनी तयार केलेलें आहे त्या ह्या यज्ञांतील हा अत्यंत उज्ज्वल हविर्भाग पूर्वींप्रमाणेंच आतांही तुलाच अर्पण होत असतो, व भक्तांना सनातन सत्यलोकीं घेऊन जाणाराही तूंच आहेस. तर अशा भक्तांना, सूर्यप्रकाशाच्या योगानें दोहोंच्यामध्यें अर्थात् अंतराळी काय काय दिसत असतें तें सांग बरे. हें तर प्रसिद्धच आहे कीं दिव्य धेनूंचा समूह हुडकून काढणारा असा एक इंद्रच आणि एकदां आपलें म्हटलें की त्याच्याकरितां त्या प्रकाशधेनूंना सोडवून आणणाराही एक इंद्रच. ॥ ३ ॥


नू इ॒त्था ते॑ पू॒र्वथा॑ च प्र॒वाच्यं॒ यदङ्गि्॑रो॒भ्योऽ॑वृणो॒रप॑ व्र॒जमिंद्र॒ शिक्ष॒न्नप॑ व्र॒जम् ।
ऐभ्यः॑ समा॒न्या दि॒शास्मभ्यं॑ जेषि॒ योत्सि॑ च ।
सु॒न्वद्भ्यो॑ रन्धया॒ कं चि॑दव्र॒तं हृ॑णा॒यन्तं॑ चिदव्र॒तम् ॥ ४॥

नू इत्था ते पूर्वऽथा च प्रऽवाच्यं यत् अंगिरःऽभ्यः अवृणोः अप व्रजं इंद्र शिक्षन् अप व्रजम् ॥
आ एभ्यः समान्या दिशा अस्मभ्यं जेषि योत्सि च ॥
सुन्वत्ऽभ्यः रंधय कं चित् अव्रतं हृणायंतं चित् अव्रतम् ॥ ४ ॥

हे इंद्रा, खरोखर तुझी चरित्रें पूर्वीप्रमाणे पुनः पुनः वर्णन करावी असे वाटण्यासारखीच आहेत. पहा कीं अंगिरसांकरितां, प्रकाशरूपी धेनूंना कोंडून धरणारा कोट तूं फोडून टाकलास आणि त्या ज्ञानधेनू हस्तगत करून अंगिरसांचे स्वाधीन केल्यास, तर तुझे भक्त जे आम्हीं त्या आमच्याकरितां सुद्धां अशाच रीतीनें, युद्ध करून आम्हांस जय मिळवून देशीलच परंतु जे तुला सोम अर्पण करून तुझी सेवा करतात त्यांच्या सत्तेखाली सर्व अधार्मिक लोकांना, सज्जनांवर संतापणार्‍या सर्व दुराचारी मानवांना, पूर्णपणें आण. ॥ ४ ॥


सं यज् जना॒न् क्रतु॑भिः॒ शूर॑ ई॒क्षय॒द्धने॑ हि॒ते त॑रुषन्त श्रव॒स्यवः॒ प्र य॑क्षन्त श्रव॒स्यवः॑ ।
तस्मा॒ आयुः॑ प्र॒जाव॒दित्बाधे॑ अर्च॒न्त्योज॑सा ।
इंद्र॑ ओ॒क्यं दिधिषन्त धी॒तयो॑ दे॒वाँ अच्छा॒ न धी॒तयः॑ ॥ ५॥

सं यत् जनान् क्रतुऽभिः शूरः ईक्षयत् धने हिते तरुषंत श्रवस्यवः प्र यक्षंत श्रवस्यवः ॥
तस्मै आयुः प्रजाऽवत् इत् बाधे अर्चंति ओजसा ॥
इंद्र ओक्यं दिधिषंत धीतयः देवान् अच्छ न धीतयः ॥ ५ ॥

हे शूरा, पुढें काय होणार हें उत्तम रीतीनें पाहण्याची शक्ति आपल्या ईश्वरी सामर्थ्यानें तूं भक्तांना दिली आहेस त्या योगानें, युद्धप्रसंग येतो त्या त्या वेळी सत्कीर्ति संपादनोत्सुक वीर शत्रूंवर तुटून पडून सहजच विजय संपादन करतात, व पुण्य जोडण्याकरितां तुझ्याप्रित्यर्थ यज्ञादिक करीत असतात. जोमदार व पुत्रपौत्रयुक्त असेंच दीर्घायुष प्राप्त व्हावें म्हणून संकटकाळीं गायन करून कंठरवानें इंद्राचीच करुणा भाकीत असतात आणि तें इतर देवतांचे स्तवन करतात त्या वेळींही त्यांचे चित्त इंद्राच्याच ठिकाणीं जडलेले असतें. ॥ ५ ॥


यु॒वं तमि॑न्द्रापर्वता पुरो॒युधा॒ यः नः॑ पृत॒न्यादप॒ तंत॒मिद्ध॑तं॒ वज्रे॑ण॒ तंत॒मिद्ध॑तम् ।
दू॒रे च॒त्ताय॑ छन्त्स॒द्गह॑नं॒ यदिन॑क्षत् ।
अ॒स्माकं॒ शत्रू॒न्परि॑ शूर वि॒श्वतो॑ द॒र्मा द॑र्षीष्ट वि॒श्वतः॑ ॥ ६॥

युवं तं इंद्रापर्वता पुरःऽयुधा यः नः पृतन्यात् अप तंऽतं इत् हतं वज्रेण तंऽतं इत् हतम् ॥
दूरे चत्ताय छंत्सत् गहनं यत् इनक्षत् ॥
अस्माकं शत्रून् परि शूर विश्वतः दर्मा दर्षीष्ट विश्वतः ॥ ६ ॥

हे इंद्र आणि पर्वतहो, तुम्हीच आमचे धुरीण आहांत, तेव्हां सैन्यानिशीं आमच्यावर कोणीही चाल करून येवो, त्याचा व त्याच्या सर्व सागालाग्यांचा आपल्या वज्रप्रहारानें नाश करून टाका. तुमचें शस्त्र पाहिजे त्या शत्रूस मारून टाकील असे आहे, मग तो कितीही दूर गेलेला असो किंवा कितीही बिकट ठिकाणी छपून बसलेला असो. हे शूर इंद्रा, प्रतिस्पर्ध्याच्या चिंधड्या करणारे अस्त्र आमच्या ठिकाणच्या शत्रूंचा सर्व बाजूंनी पार फडशाच उडवील. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३३ ( राक्षोघ्न सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : इंद्रः - छंद - त्रिष्टुप्


उ॒भे पु॑नामि॒ रोद॑सी ऋ॒तेन॒ द्रुहो॑ दहामि॒ सं म॒हीर॑नि॒न्द्राः ।
अ॒भि॒व्लग्य॒ यत्र॑ ह॒ता अ॒मित्रा॑ वैलस्था॒नं परि॑ तृ॒ळ्हा अशे॑रन् ॥ १ ॥

उभे इति पुनामि रोदसी इति ऋतेन द्रुहः दहामि सं महीः अनिंद्राः ।
अभिव्लग्य यत्र हताः अमित्राः वैलऽस्थानं परि तृळ्हाः अशेरन् ॥ १ ॥

सनातन खरा धर्म म्हणजे यज्ञ, त्याच्या योगानें आकाश व पृथ्वी ह्या दोहोंनाही मी शुद्ध करतो. इंद्रास न मानणार्‍या अशा कांही बलाढ्य आणि पुष्ट चेटक्या असतील त्यांनानी यज्ञाच्या योगानेंच जाळून भस्म करतो. पहा येथें हे आमचे शत्रु हल्ल्याच्या सपाट्यांत मारले जाऊन त्यांचे तुकडे तुकडे होऊन ते मसणांत पडलेले आहेत. ॥ १ ॥


अ॒भि॒व्लग्या॑ चिदद्रिवः शी॒र्षा या॑तु॒मती॑नाम् ।
छि॒न्धि व॑टू॒रिणा॑ प॒दा म॒हाव॑टूरिणा प॒दा ॥ २ ॥

अभिव्लग्या चित् अद्रिऽवः शीर्षा यातुऽमतीनाम् ।
छिंधि वटूरिणा पदा महाऽवटूरिणा पदा ॥ २ ॥

हे वज्रधरा, एकदम हल्ला चढवून ह्या जादूटोणा करणार्‍या अधमांची डोचकीं चेंचून टाक; आपल्या प्रचंड जगड्व्याळ पायाखाली चिरडून टाक. ॥ २ ॥


अवा॑सां मघवन् जहि॒ शर्धो॑ यातु॒मती॑नाम् ।
वै॒ल॒स्था॒न॒के अ॑र्म॒के म॒हावै॑लस्थे अर्म॒के ॥ ३ ॥

अवासां मघऽवन् जहि शर्धः यातुऽमतीनाम् ।
वैलऽस्थानके अर्मके महाऽवैलस्थे अर्मके ॥ ३ ॥

हे अत्युदा इंद्रदेवा, ह्या जादूगारांची बलाढ्य टोळी मसणवटींत घाणेरड्या जागी - घोर स्मशानांत अतिशय गलिच्छ जागी दडून रहात असते तेथें - गांठून तिचा फडशा पाडून टाक. ॥ ३ ॥


यासां॑ ति॒स्रः प॑ञ्चा॒शतो॑ऽभिव्ल॒ङ्गै॑र॒पाव॑पः ।
तत्सु ते॑ मनायति त॒कत्सु ते॑ मनायति ॥ ४ ॥

यासां तिस्रः पंचाशतः अभिव्लङ्गैःः अपाऽवपः ।
तत् सु ते मनायति तकत् सु ते मनायति ॥ ४ ॥

ह्या पूर्वींच त्या टोळीपैकी पन्नास पन्नासाची एकेक अशा तीन तुकड्यांचा तूं आपल्या सपाट्यानें चक्काचूर करून टाकला आहेस व हें कृत्य जरी तुला कांहींच वाटलें नाहीं तरी आम्हां खर्‍या भक्तांना त्याचे फारच महत्व वाटत असतें. ॥ ४ ॥


पि॒शङ्ग॑गभृष्टिमम्भृ॒णं पि॒शाचिं॑ इंद्र॒ सं मृ॑ण ।
सर्वं॒ रक्षः॒ नि ब॑र्हय ॥ ५ ॥

पिशंगभृष्टिं अंभृणं पिशाचिं इंद्र सं मृण ।
सर्वं रक्षः नि बर्हय ॥ ५ ॥

हे इंद्रा, पिंगट रंगाचा आणि विक्राळ भेसूर ओरडणारा जो पिशाच्च आहे त्याला ठार करून टाक, आणि त्याच्या बरोबरच इतर सर्व राक्षसांचाही संहार कर. ॥ ५ ॥


अ॒वर्म॒ह इ॑न्द्र दादृ॒हि श्रु॒धी नः॑ शु॒शोच॒ हि द्यौः क्षा न भी॒षाँ अ॑द्रिवो घृ॒णान् न भी॒षाँ अ॑द्रिवः ।
शु॒ष्मिन्त॑मो॒ हि शु॒ष्मिभि॑र्व॒धैरु॒ग्रेभि॒रीय॑से ।
अपू॑रुषघ्नो अप्रतीत शूर॒ सत्व॑भिस्त्रिस॒प्तैः शू॑र॒ सत्व॑भिः ॥ ६ ॥

अवः महः इंद्र ददृहि श्रुधी नः शुशोच हि द्यौः क्षाः न भीषा अद्रिवः घृणान् न भीषा अद्रिवः ।
शुष्मिम्ऽतमः हि शुष्मिऽभिः वधैः उग्रेभिः ईयसे ।
अपूरुषऽघ्नः अप्रतिऽइत शूर सत्वऽभिः त्रिसप्तैः शूर सत्वऽभिः ॥ ६ ॥

हे इंद्रा, ह्या घोर अंधकाराच्या ठिकर्‍या उडवून दे. आमच्या प्रार्थनेकडे तुझें लक्ष आहे ना ? आकाशांतून अशनींची वृष्टी करणार्‍या वज्रधर इंद्रा ! तुझ्या ह्या अतिशय प्रखर आहाळाच्या भितीमुळेंच कीं काय पृथ्वीप्रमाणें आकाशसुद्धां भयानें अगदी खिन्न झाल्यासारखें दिसत आहे. तूं अत्यंत सामर्थ्यवान तूं, आपलीं घातक शस्त्रास्त्रें पाजळून सर्व ठिकाणी संचार करीत असतोस, परंतु हे वीरा सात्विकांनाही अचिंतनीय असा, तूं सज्जनांना यत्किंचितही धक्का न लावतां एकवीस सेवकानिशीं सर्वत्र जात असतोस. ॥ ६ ॥


व॒नोति॒ हि सु॒न्वन्क्षयं॒ परी॑णसः सुन्वा॒नः हि ष्मा॒ यज॒त्यव॒ द्विषो॑ दे॒वाना॒मव॒ द्विषः॑ ।
सु॒न्वा॒न इत्सि॑षासति स॒हस्रा॑ वा॒ज्यवृ॑तः ।
सु॒न्वा॒नायेन्द्रो॑ ददात्या॒भुवं॑ र॒यिं द॑दात्या॒भुव॑म् ॥ ७ ॥

वनोति हि सुन्वन् क्षयं परीणसः सुन्वानः हि स्म यजति अव द्विषः देवानां अव द्विषः ।
सुन्वानः इत् सिसासति सहस्रा वाजि अवृतः ।
सुन्वानाय इंद्रः ददाति आऽभुवं रयिं ददाति आऽभुवम् ॥ ७ ॥

खरोखर सर्व संपत्तीचें जें आगर तें, सोमरस अर्पण करणार्‍या यजमानास प्राप्त होते. सोम अर्पण करणारा भक्तच शत्रूंना आपल्या कह्यांत ठेऊं शकतो व देवद्वेष्ट्यांचा पराभव करूं शकतो. सोम अर्पण करणारा भक्त वीर कोणासही हार न जातां हजारों जय मिळवतो. इंद्र हा अशा भक्तालाच मनमुराद सुख संपत्ति देतो आणि दिव्यैश्वर्यही पण तो त्यालाच यथेच्छ देत असतो. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३४ (वायुः सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : वायुः - छंद - अत्यष्टी


आ त्वा॒ जुवो॑ रारहा॒णा अ॒भि प्रयो॒ वायो॒ वह॑न्त्वि॒ह पू॒र्वपी॑तये॒ सोम॑स्य पू॒र्वपी॑तये ।
ऊ॒र्ध्वा ते॒ अनु॑ सू॒नृता॒ मन॑स्तिष्ठतु जान॒ती ।
नि॒युत्व॑ता॒ रथे॒ना या॑हि दा॒वने॒ वायः॑ म॒खस्य॑ दा॒वने॑ ॥ १ ॥

आ त्वा जुवः रारहाणाः अभि प्रयः वायो इति वहंतु इह पूर्वऽपीतये सोमस्य पूर्वऽपीतये ।
ऊर्ध्वा ते अनु सूनृता मनः तिष्ठतु जानती ।
नियुत्वता रथेन आ याहि दावने वायो इति मखस्य दावने ॥ १ ॥

हे वायो, तुझे वार्‍यासारखे वेगवान घोडे ह्या रुचिर हविकडे, ह्या सोमरसाचा पहिल्यानें आणि उत्तम रीतीनें आस्वाद घेण्याकरितां तुला इकडे घेऊन येवोत. हे सत्य मधुर स्तोत्र, हे ज्ञानमय आणि उदात्त स्तोत्र तुझ्या चित्ताचे रंजन करो. नियुत् नांवाचे वायुरूप घोडे रथास जोडून आम्ही अर्पण केलेल्या हवीचा, ह्या आमच्या अध्वर्यूनें अर्पण केलेल्या हवीचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये. ॥ १ ॥


मन्द॑न्तु त्वा म॒न्दिनो॑ वाय॒विन्द॑वोऽ॒स्मत्क्रा॒णासः॒ सुकृ॑ता अ॒भिद्य॑वो॒ गोभिः॑ क्रा॒णा अ॒भिद्य॑वः ।
यद्ध॑ क्रा॒णा इ॒रध्यै॒ दक्षं॒ सच॑न्त ऊ॒तयः॑ ।
स॒ध्री॒ची॒ना नि॒युतः॑ दा॒वने॒ धिय॒ उप॑ ब्रुवत ईं॒ धियः॑ ॥ २ ॥

मंदंतु त्वा मंदिनः वायो इति इंदवः अस्मत् क्राणासः सुऽकृताः अभिऽद्यवः गोभिः क्राणाः अभिऽद्यवः ।
यत् ह क्राणाः इरध्यै दक्षं सचंते ऊतयः ।
सध्रीचीनाः निऽयुतः दावने धियः उप ब्रुवते ईं धियः ॥ २ ॥

हे वायुदेवा, आमचे हे सोमरस हर्षकर आहेत, उत्साहप्रद आहेत; ते मोठ्या खुबीनें तयार केले असून त्यांचे तेज तर असें आहे कीं ते जणूं काय स्वर्गलोकींचेच, शिवाय त्यांत दूध घालून त्यांस फारच रुचि आणलेली आहे. तर ह्या सोमरसांनी तूं हर्षभरीत हो. तुझे साहाय्यकारी घोडे महासमर्थ अशा तुजबरोबरच सेवेकरितां सदैव तत्पर असे असतात. नेहमीं रथास जोडलेले असे ते अश्व जेव्हां भक्तांच्या हृदयांत पवित्र विचार जागृत करण्यास उद्युक्त होतात, तेव्हां आमचे बुद्धिमान ऋत्विज ह्या वायु प्रित्यर्थ स्तोत्रगायन करीतच असतात. ॥ २ ॥


वा॒युर्यु॑ङ्क्ते॒ रोहि॑ता वा॒युर॑रु॒णा वा॒यू रथे॑ अजि॒रा धु॒रि वोळ्ह॑वे॒ वहि॑ष्ठा धु॒रि वोळ्ह॑वे ।
प्र बो॑धया॒ पुरं॑धिं जा॒र आ स॑स॒तीमि॑व ।
प्र च॑क्षय॒ रोद॑सी वासयो॒षसः॒ श्रव॑से वासयो॒षसः॑ ॥ ३ ॥

वायुः युंक्ते रोहिता वायुः अरुणा वायुः रथे अजिरा धुरि वोळ्हवे वहिष्ठा धुरि वोळ्हवे ।
प्र बोधय पुरंऽधिं जारः आ ससतींऽइव ।
प्र चक्षय रोदसी इति वासय उषसः श्रवसे वासय उषसः ॥ ३ ॥

वायुदेव हा आपल्या रथास कधीं कधीं दोन अबलख आणि कधीं कधीं दोन लाल घोडेही जोडतो. हा वायुदेव, आपल्या स्वतःस पाहिजे तिकडे घेऊन जाण्याकरितां, सर्वत्र संचार करण्याकरितां, अतिशय वेगवान व अतिशय बळकट घोडे रथेच्या धुरेला जोडीत असतो. हे वायुदेवा, प्रियतमा निद्रावश असतां तिचा प्रियकर ज्याप्रमाणें तिला हळूच जागी करतो त्याप्रमाणें आमच्या अंतःकरणांतील उच्च कल्पना जागृत कर, आणि पृथ्वी व आकाश ह्यांच्यावरील आवरण दूर करून तीं आम्हांस दिसतील असें कर. उषेला सुप्रकाशित कर, आमच्या हातून सत्कर्में व्हावी म्हणून तिला सुप्रकाशित कर. ॥ ३ ॥


तुभ्य॑मु॒षासः॒ शुच॑यः परा॒वति॑ भ॒द्रा वस्त्रा॑ तन्वते॒ दंसु॑ र॒श्मिषु॑ चि॒त्रा नव्ये॑षु र॒श्मिषु॑ ।
तुभ्यं॑ धे॒नुः स॑ब॒र्दुघा॒ विश्वा॒ वसू॑नि दोहते ।
अज॑नयो म॒रुतो॑ व॒क्षणा॑भ्यो दि॒व आ व॒क्षणा॑भ्यः ॥ ४ ॥

तुभ्यं उषसः शुचयः पराऽवति भद्रा वस्त्रा तन्वते दंऽसु रश्मिषु चित्रा नव्येषु रश्मिषु ।
तुभ्यं धेनुः सबःऽदुघा विश्वा वसूनि दोहते ।
अजनयः मरुतः वक्षणाभ्यः दिवः आ वक्षणाभ्यः ॥ ४ ॥

हे वायुदेवा, तुझ्यासाठीं ही देदीप्यमान उषादेवी आपल्या अद्‍भुत प्रमेमध्यें आपल्या अपूर्व किरणामध्यें सुंदर व तलम अशीं मंगल वस्त्रें आकाशांत दूरवर उलगडून तयार ठेवते. अमृतस्राविणी दिव्य धेनूही तुझ्यासाठींच यच्चावत् रमणीय पदार्थांचा पान्हा सोडतात. आकाशाच्या उदरांत तूं वादळें उत्पन्न करतोस, ती नद्यांच्या पोषणासाठीं उत्पन्न करतोस. ॥ ४ ॥


तुभ्यं॑ शु॒क्रासः॒ शुच॑यस्तुर॒ण्यवो॒ मदे॑षू॒ग्रा इ॑षणन्त भु॒र्वण्य॒पामि॑षन्त भु॒र्वणि॑ ।
त्वां त्सा॒री दस॑मानो॒ भग॑मीट्टे तक्व॒वीये॑ ।
त्वं विश्व॑स्मा॒द्‌भुव॑नात्पासि॒ धर्म॑णासु॒र्यात्पासि॒ धर्म॑णा ॥ ५ ॥

तुभ्यं शुक्रासः शुचयः तुरण्यवः मदेषु उग्राः इषणंत भुर्वणि अपां इषंत भुर्वणि ।
त्वां त्सारी दसमानः भगं ईट्टे तक्वऽवीये ।
त्वं विश्वस्मात् भुवनात् पासि धर्मणा असुर्यात् पासि धर्मणा ॥ ५ ॥

हे स्वच्छ शुभ्र सोमरस तरतरी आणणारे आहेत, परंतु अंगांत उत्साह उत्पन्न करण्याच्या कामीं जरा कडकच आहेत. ते तुला स्वस्थ बसूं देत नाहींत. मेघमंडळांत सोसाट्यानें भ्रमण करावयास व जलवृष्टि करावयास लावतात. प्रवासानें बावरलेला व थकलेला भक्त, चोरांनी अंगावर चाल केली असतां तुझें मंगल नाम घेऊन स्तवन करतो, तेव्हां त्या भक्ताचें रक्षण, सर्व जग त्याच्या विरुद्ध असलें तरीही तूं त्याच्या केवळ भक्तीमुळें प्रसन्न होऊन करतोस, निबिड अंधःकारामध्येंही आपल्या दिव्य शक्तीनें रक्षण करतोस. ॥ ५ ॥


त्वं नो॑ वायवेषा॒मपू॑र्व्यः॒ सोमा॑नां प्रथ॒मः पी॒तिम॑र्हसि सु॒तानां॑ पी॒तिम॑र्हसि ।
उ॒तो वि॒हुत्म॑तीनां वि॒शां व॑व॒र्जुषी॑णाम् ।
विश्वा॒ इत्ते॑ धे॒नवः॑ दुह्र आ॒शिरं॑ घृ॒तं दु॑ह्रत आ॒शिर॑म् ॥ ६ ॥

त्वं नः वायो इति एषां अपूर्व्यः सोमानां प्रथमः पीतिं अर्हसि सुतानां पीतिं अर्हसि ।
उतो इति विहुत्मतीनां विशां ववर्जुषीणाम् ।
विश्वाः इत् ते धेनवः दुह्रे आऽशिरं घृतं दुह्रते आऽशिरम् ॥ ६ ॥

हे वायो, यज्ञामध्यें तूं पहिला, सर्वांच्या अगोदर येणारा आहेस, तर आमच्या ह्या सोमरसाचें पान प्रथम तूंच करावेंस हें योग्य आहे. शिवाय हा सोमरस नाना प्रकारचें हवि अर्पण करून पातकापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणार्‍या भक्तजनांनीच तुला अर्पण केलेला आहे. तुझ्याचसाठीं धेनू अतिशय कसदार अशा उत्कृष्ट घट्ट दुधाचा पान्हा सोडतात. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३५ (वायुः सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : वायुः - छंद - अत्यष्टी


स्ती॒र्णं ब॒र्हिरुप॑ नो याहि वी॒तये॑ स॒हस्रे॑ण नि॒युता॑ नियुत्वते श॒तिनी॑भिर्नियुत्वते ।
तुभ्यं॒ हि पू॒र्वपी॑तये दे॒वा दे॒वाय॑ येमि॒रे ।
प्र ते॑ सु॒तासो॒ मधु॑मन्तो अस्थिर॒न्मदा॑य॒ क्रत्वे॑ अस्थिरन् ॥ १ ॥

स्तीर्णं बर्हिः उप नः याहि वीतये सहस्रेण निऽयुता नियुत्वते शतिनीभिः नियुत्वते ।
तुभ्यं हि पूर्वऽपीतये देवाः देवाय येमिरे ।
प्र ते सुतासः मधुऽमंतः अस्थिरन् मदाय क्रत्वे अस्थिरन् ॥ १ ॥

हे दर्भासन आंथरले आहे, तर हे वायू आमचेकडे हविचा स्वीकार करण्याकरितां ये; आपले हजारो घोडे रथास जोडून, हा जो आम्ही सिद्ध केलेला सोमरस शेंकडो प्रशंसापर सूक्तांनी अधिकच तीव्र बनला आहे त्याची रुची घेण्याकरितां ये. भगवंता वायुदेवा, इतर दैवतें प्रथम सोमपान करण्याविषयी तुला आग्रह करीत आहेत, यास्तव हे मधुर सोमबिंदु तुला आल्हाद व्हावा म्हणून सादर केले आहेत - तूं आपल्या सत्कार्यक्षमत्वाचा उपयोग करावास म्हणून अर्पण केले आहेत. ॥ १ ॥


तुभ्या॒यं सोमः॒ परि॑पूतो॒ अद्रि॑भि स्पा॒र्हा वसा॑नः॒ परि॒ कोश॑मर्षति शु॒क्रा वसा॑नो अर्षति ।
तवा॒यं भा॒ग आ॒युषु॒ सोमः॑ दे॒वेषु॑ हूयते ।
वह॑ वायो नि॒युतो॑ याह्यस्म॒युर्जु॑षा॒णो या॑ह्यस्म॒युः ॥ २ ॥

तुभ्य अयं सोमः परिऽपूतः अद्रिऽभि स्पार्हा वसानः परि कोशं अर्षति शुक्रा वसानः अर्षति ।
तव अयं भागः आयुषु सोमः देवेषु हूयते ।
वह वायो इति निऽयुतः याहि अस्मऽयुः जुषाणः याहि अस्मऽयुः ॥ २ ॥

पाषाणांनी पिळून काढलेला हा स्वच्छ सोमरस तुझ्यासाठी तयार केला आहे. हा शुभ्र कांतियुक्त सोमरस पात्रांत ओतून ठेवला आहे. मोत्यासारखा चमकणारा हा सोमरस गाळून ठेवला आहे. हा भाग तुझ्याकरितां ठेवून हा बाकीचा इतर देवतांना व दिव्य जनांना अर्पण केला आहे, तर हे वायू, आपले घोडे तूं इकडे वळव. आमच्याशी वात्सल्याने, प्रेमाने वागणारा असा तूं इकडे येऊन संतुष्ट हो. ॥ २ ॥


आ नो॑ नि॒युद्‌भिः॑ श॒तिनी॑भिरध्व॒रं स॑ह॒स्रिणी॑भि॒रुप॑ याहि वी॒तये॒ वायो॑ ह॒व्यानि॑ वी॒तये॑ ।
तवा॒यं भा॒ग ऋ॒त्वियः॒ सर॑श्मिः॒ सूर्ये॒ सचा॑ ।
अ॒ध्व॒र्युभि॒र्भर॑माणा अयंसत॒ वायः॑ शु॒क्रा अ॑यंसत ॥ ३ ॥

आ नः नियुत्ऽभिः शतिनीभिः अध्वरं सहस्रिणीभिः उप याहि वीतये वायो इति हव्यानि वीतये ।
तव अयं भागः ऋत्वियः सऽरश्मिः सूर्ये सचा ।
अध्वर्युऽभिः भरमाणाः अयंसत वायो इति शुक्राः अयंसत ॥ ३ ॥

आपले शेकडोंच काय पण हजारो घोडे जोडून हे वायू, आमच्या यज्ञयागप्रसंगी हविर्भागाचा स्वीकार करण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी ये. हा तुझा भाग तुझ्याकरितां योग्य रीतीनें वेगळा काढून ठेवला आहे व आतां तो रविकिरणांच्या सान्निध्यामुळें फारच तेजःपुंज दिसत आहे. हे वायुदेवा, असा हा सोमरस अध्वर्यूंनी पात्रांत ओतून, भरून त्तुझ्यापुढे ठेवला आहे. हा शुभ्र रस तुला सादर अर्पण केला आहे. ॥ ३ ॥


आ वां॒ रथो॑ नि॒युत्वा॑न्वक्ष॒दव॑सेऽ॒भि प्रयां॑सि॒ सुधि॑तानि वी॒तये॒ वायो॑ ह॒व्यानि॑ वी॒तये॑ ।
पिब॑तं॒ मध्वो॒ अन्ध॑सः पूर्व॒पेयं॒ हि वां॑ हि॒तम् ।
वाय॒वा च॒न्द्रेण॒ राध॒सा ग॑त॒मिंद्र॑श्च॒ राध॒सा ग॑तम् ॥ ४ ॥

आ वां रथः नियुत्वान् वक्षत् अवसे अभि प्रयांसि सुऽधितानि वीतये वायो इति हव्यानि वीतये ।
पिबतं मध्वः अंधसः पूर्वऽपेयं हि वां हितम् ।
वायो इति आ चंद्रेण राधसा आ गतं इंद्रः च राधसा गतम् ॥ ४ ॥

नियुत् नावाचे घोडे जोडलेला हा तुमचा रथ तुम्हां दोघांनाही येथे आमच्या रक्षणाकरिता, आमच्या पक्वानाचा नैवेद्य वाढूने ठेवला आहे त्याचा आस्वाद घेण्याकरितां, आणि हे वायू, आमच्या हवींचा स्वीकार करण्याकरितां, घेऊन आलेला आहे. हा मधुर रस तुम्ही प्राशन करा. खरोखर प्रथम पिण्याकरितां रस काढून ठेवला आहे तो तुमच्यासाठींच. तर हे वायू, तूं आणि इंद्र असे दोघे आपला प्रसाद घेऊन या, आपला आल्हाददायक असा कृपा प्रसाद घेऊन या. ॥ ४ ॥


आ वां॒ धियो॑ ववृत्युरध्व॒राँ उपे॒ममिन्दुं॑ मर्मृजन्त वा॒जिन॑मा॒शुमत्यं॒ न वा॒जिन॑म् ।
तेषां॑ पिबतमस्म॒यू आ नो॑ गन्तं इ॒होत्या ।
इंद्र॑वायू सु॒ताना॒मद्रि॑भिर्यु॒वं मदा॑य वाजदा यु॒वम् ॥ ५ ॥

आ वां धियः ववृत्युः अध्वरान् उप इमं इंदुं मर्मृजंत वाजिनं आशुं अत्यं न वाजिनम् ।
तेषां पिबतं अस्मयू इत्यस्मऽयू आ नः गंतं इह ऊत्या ।
इंद्रवायू इति सुतानां अद्रिऽभिः युवं मदाय वाजऽदा युवम् ॥ ५ ॥

आमच्या ध्यानयुक्त प्रार्थना तुम्हां दोघांनाही आमच्या सध्यां चालू असलेल्या यज्ञयागाकडे वळवितीलच. कारण हा उत्साहवर्धक रस, जसे एखाद्या तेजस्वी आणि तल्लख वारूला स्वच्छ करावें त्याप्रमाणे आमच्या ऋत्विजांनी फार काळजीपूर्वक स्वच्छ केला आहे. तुम्ही आमच्यावर प्रेम करतां तर हे रस प्राशन करा आणि आमच्या साहाय्याकरितां या. हे इंद्रा, हे वायु, सोमग्राव्यांनी स्वच्छ केलेले हे रस तुम्ही दोघेही ग्रहण करा, म्हणजे हे दिव्य सामर्थ्य देणार्‍या देवांनो तुम्ही प्रसन्न चित्त व्हाल. ॥ ५ ॥


इ॒मे वां॒ सोमा॑ अ॒प्स्वा सु॒ता इ॒हाध्व॒र्युभि॒र्भर॑माणा अयंसत॒ वायो॑ शु॒क्रा अ॑यंसत ।
ए॒ते वा॑म॒भ्यसृक्षत ति॒रः प॒वित्र॑मा॒शवः॑ ।
यु॒वा॒यवोऽ॑ति॒ रोमा॑ण्य॒व्यया॒ सोमा॑सो॒ अत्य॒व्यया॑ ॥ ६ ॥

इमे वां सोमाः अप्ऽसु आ सुताः इह अध्वर्युऽभिः भरमाणाः अयंसत वायो इति शुक्राः अयंसत ।
एते वां अभि असृक्षत तिरः पवित्रं आशवः ।
युवाऽयवः अति रोमाणि अव्यया सोमासः अति अव्यया ॥ ६ ॥

हे पाणी घालून पिळलेले सोमरस, ऋत्विजांनी ह्या यज्ञ पात्रात गाळून तुला अर्पण केले आहेत. हे शुभ्र रस, हे वायुदेवा, तुला समर्पण केलेले आहेत. तुम्हा दोघांकरितां हे रस दर्भाच्या चाळणीतून छानले आहेत, हे आल्हाददायक व तुमच्याकरितां उत्सुका झालेले रस कधींही खराब न होणार्‍या लोकरीच्या वस्त्रातून गाळलेले आहेत. ॥ ६ ॥


अति॑ वायो सस॒तो या॑हि॒ शश्व॑तो॒ यत्र॒ ग्रावा॒ वद॑ति॒ तत्र॑ गच्छतं गृ॒हमिंद्र॑श्च गच्छतम् ।
वि सू॒नृता॒ ददृ॑शे॒ रीय॑ते घृ॒तमा पू॒र्णया॑ नि॒युता॑ याथो अध्व॒रम् ।
इंद्र॑श्च याथो अध्व॒रम् ॥ ७ ॥

अति वायो इति ससतः याहि शश्वतः यत्र ग्रावा वदति तत्र गच्छतं गृहं इंद्रः च गच्छतम् ।
वि सूनृता ददृशे रीयते घृतं आ पूर्णया निऽयुता याथः अध्वरं ।
इंद्रः च याथः अध्वरम् ॥ ७ ॥

हे वायुदेवा, ह्या पहांटेच्या वेळेस पुष्कळ लोक निजून राहिले असतील तर त्यांना वगळून जेथे सोमरस पिळणार्‍या पाषाणांचा मधुर आवाज होत असेल तर तेथें जा. हे वायू तूं आणि इंद्र दोघेही त्या घरी जा. मधुर व प्रेमळ असे स्तोत्र गायन जेथें चाललें असेल आणि घृताच्या धारा यज्ञाग्नीमध्यें जेथें एकसारख्या चालल्या असतील अशा पवित्र यागालाच आपले पवित्र घोडे जोडून तूं आणि इंद्र मिळून जा. ॥ ७ ॥


अत्राह॒ तत्व॑हेथे॒ मध्व॒ आहु॑तिं॒ यम॑श्व॒त्थमु॑प॒तिष्ठ॑न्त जा॒यवो॑ऽ॒स्मे ते स॑न्तु जा॒यवः॑ ।
सा॒कं गावः॒ सुव॑ते॒ पच्य॑ते॒ यवो॒ न ते॑ वाय॒ उप॑ दस्यन्ति धे॒नवो॑ ।
नाप॑ दस्यन्ति धे॒नवः॑ ॥ ८ ॥

अत्र अह तत् वहेथे इति मध्व आऽहुतिं यं अश्वत्थं उपऽतिष्ठंत जायवः अस्मे ते संतु जायवः ।
साकं गावः सुवते पच्यते यवः न ते वायो इति उप दस्यंति धेनवः ।
न अप दस्यंति धेनवः ॥ ८ ॥

सोमरसाचा मधुर हविर्भाग इकडे घेऊन ये. ह्याच गोड सोमवल्लीला अश्वत्थाप्रमाणें पवित्र मानून वीर पुरुष त्याची अतिशय वाखाणणी करीत असतात - असे विजयी वीर नेहमी आमच्या बाजूला असोत. आमच्या धेनू एकदम प्रसवतात व शेतांत धान्य चांगले लागास होते. हे वायू, तुझा ह्या दुभत्या गाईंना कधीं रोग होत नाही व त्या कधींही क्षीण होत नाहींत. ॥ ८ ॥


इ॒मे ये ते॒ सु वा॑यो बा॒ह्वोजसोऽ॒न्तर्न॒दी ते॑ प॒तय॑न्त्यु॒क्षणो॒ महि॒ व्राध॑न्त उ॒क्षणः॑ ।
धन्व॑न् चि॒द्ये अ॑ना॒शवो॑ जी॒राश्चि॒दगि॑रौकसः ।
सूर्य॑स्येव र॒श्मयो॑ दुर्नि॒यन्त॑वो॒ हस्त॑योर्दुर्नि॒यन्त॑वः ॥ ९ ॥

इमे ये ते सु वायो इति बाह्वुऽओजसः अंतः नदी इति ते पतयंति उक्षणः महि व्राधंतः उक्षणः ।
धन्वन् चित् ये अनाशवः जीराः चित् अगिरऽओकसः ।
सूर्यस्यऽइव रश्मयः दुःऽनियंतवः हस्तयोः दुःऽनियंतवः ॥ ९ ॥

वायुदेवा, हे पहा तुम्हे मजवूत बांध्याचे तेजस्वी घोडे आकाशाच्या नादयुक्त पोकळींतून भरधाव चालले आहेत, व पळत असतांही धिप्पाड आणि फुगलेले दिसत आहेत. पाणी नाही अशा प्रदेशांत देखील ते थकत नाहींत. भरवेगात चालले असतांना केवढाही आवाज झाला तरी ते बिचकत नाहींत, आणि सूर्याच्या किरणांना ज्याप्रमाणें दाबून ठेवणें अशक्य त्याप्रमाणें त्या घोड्यांनाही कोणी खेंचून धरूं शकत नाही. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३६ (मित्रावरुणौ सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : मित्रावरुणौ - छंद - अत्यष्टी


प्र सु ज्येष्ठं॑ निचि॒राभ्यां॑ बृ॒हन्नमो॑ ह॒व्यं म॒तिं भ॑रता मृळ॒यद्भ्यां॒ स्वादि॑ष्ठं मृळ॒यद्भ्या॑ म् ।
ता स॒म्राजा॑ घृ॒तासु॑ती य॒ज्ञेय॑ज्ञ॒ उप॑स्तुता ।
अथै॑नोः क्ष॒त्रं न कुत॑श्च॒नाधृषे॑ देव॒त्वं नू चि॑दा॒धृषे॑ ॥ १ ॥

प्र सु ज्येष्ठं निऽचिराभ्यां बृहन् नमः हव्यं मतिं भरत मृळयत्ऽभ्यां स्वादिष्ठं मृळयत्ऽभ्याम् ।
ता संऽराजा घृतासुती इति घृतऽआसुती यज्ञेऽयज्ञ उपऽस्तुता ।
अथ एनोः क्षत्रं न कुतः चन आऽधृषे देवऽत्वं नु चित् आऽधृषे ॥ १ ॥

सनातन, आनंदरूप आणि आनंददायक अशा मित्रावरुणांना अत्यंत नम्रपणानें प्रणिपात करा, अति एकाग्र चित्तानें त्यांचे ध्यान करा आणि अत्यंत मधुर हवि त्यांना अर्पण करा. ते विश्वाचे अधिराजे आहेत, घृताप्रमाणे तेजस्वी असा पर्जन्य तेच पाडतात आणि त्यांचे यजन प्रत्येक यज्ञामध्यें होत असतें. त्यांच्या विश्वावरील सार्वभौम सत्तेविरुद्ध कोणी बोटही उचलू शकत नाही, अगर त्यांच्या ईश्वरत्वाबद्दल ब्र सुद्धा काढूं शकत नाहीं ॥ १ ॥


अद॑र्शि गा॒तुरु॒रवे॒ वरी॑यसी॒ पन्था॑ ऋ॒तस्य॒ सम॑यंस्त र॒श्मिभि॒श्चक्षु॒र्भग॑स्य र॒श्मिभिः॑ ।
द्यु॒क्षं मि॒त्रस्य॒ साद॑नमर्य॒म्णो वरु॑णस्य च ।
हा॑ दधाते बृ॒हदु॒क्थ्यं१॑वय॑ उप॒स्तुत्यं॑ बृ॒हद्वयः॑ ॥ २ ॥

अदर्शि गातुः उरवे वरीयसी पंथाः ऋतस्य सं अयंस्त रश्मिऽभिः चक्षुः भगस्य रश्मिऽभिः ।
द्युक्षं मित्रस्य सदनं अर्यम्णः वरुणस्य च ।
अथ दधते बृहत् उक्थ्यं वयः उपऽस्तुत्यं बृहत् वयः ॥ २ ॥

पहा ही लावण्यवती उषा आमच्या महा यज्ञाकरितां उदय पावली आहे. त्रिकाल सत्य अशा आकाशांतील तिचा मार्ग किरणांनी प्रकाशित झाला आहे, आणि दयाळु भगवंताचा नेत्रसुद्धां आपल्या नेहमींच्या उज्ज्वल किरणांच्या वेषानें दिसूं लागला आहे. अशाच रीतीनें मित्र, अर्यमा आणि वरुण ह्यांचे स्थानही सुप्रकाशित झाले असून तेथूनच उत्कट व प्रशंसनीय उत्साह आणि अत्यंत नामांकित असें तारुण्य, ते प्रसन्न होऊन देत असतात. ॥ २ ॥


ज्योति॑ष्मती॒मदि॑तिं धार॒यत्क्षि॑तिं॒ स्वर्वती॒मा स॑चेते दि॒वेदि॑वे जागृ॒वांसा॑ दि॒वेदि॑वे ।
ज्योति॑ष्मत्क्ष॒त्रमा॑शाते आदि॒त्या दानु॑न॒स्पती॑ ।
मि॒त्रस्तयो॒र्वरु॑णो यात॒यज्ज॑नोऽर्य॒मा या॑त॒यज्ज॑नः ॥ ३ ॥

ज्योतिष्मतीं अदितिं धारयत्ऽक्षितिं स्वःऽवतीं आ सचेते दिवेऽदिवे जागृऽवांसा दिवेऽदिवे ।
ज्योतिष्मत् क्षत्रं आशाते इति आदित्या दानुनः पती इति ।
मित्रः तयोः वरुणः यातयत्ऽजनः अर्यमा यातयत्ऽजनः ॥ ३ ॥

जी ही अपरंपार तेजोमय पोकळी आदिति रूपानें पृथ्वीला आणि नक्षत्रांना सांवरून धरीत आहे त्या ह्या आदितीच्या बरोबरच मित्रावरुण ह्या निद्रारहित विभूति, निरंतर असतात व विश्वाच्या वैभवयुक्त साम्राज्याचा हेच दानशूर आदित्य उपभोग घेत असतात. त्यांच्यामध्ये मित्र व वरुण हे लोकांना आपापल्या कर्त्यव्याची प्रेरणा करतात, व अर्यमाही अशी प्रेरणा करतो. ॥ ३ ॥


अ॒यं मि॒त्राय॒ वरु॑णाय॒ शंत॑मः॒ सोमो॑ भूत्वव॒पाने॒ष्वाभ॑गो दे॒वो दे॒वेष्वाभ॑गः ।
तं दे॒वासो॑ जुषेरत॒ विश्वे॑ अ॒द्य स॒जोष॑सः ।
तथा॑ राजाना करथो॒ यदीम॑ह॒ ऋता॑वाना॒ यदीम॑हे ॥ ४ ॥

अयं मित्राय वरुणाय शंऽतमः सोमः भूतु अवऽपानेषु आऽभगः देवः देवेषु आऽभगः ।
तं देवासः जुषेरत विश्वे अद्य सऽजोषसः ।
तथा राजाना करथः यत् ईमहे ऋतऽवाना यत् ईमहे ॥ ४ ॥

हा सोमरस मित्रावरुणांना अत्यंत सुखदायक होवो. हा दिव्य कांतियुक्त मधुर सोमरस, देवास अत्यंत प्रिय असा हा रस, यज्ञपात्रांतून प्राशन करतांना त्यांना फारच रचकर लागो. प्रेमानें एकत्र झालेले सर्व देव ह्या रसाचा यथेच्छ उपभोग घेवोत. हे विश्वाधिपति मित्रावरुणहो, आम्ही तुम्हांपाशी याचना करीत आहों ती पूर्ण करा. हे सत्यधर्मप्रवर्तकहो, आम्ही दान मागतो तें कृपा करून द्या. ॥ ४ ॥


यो मि॒त्राय॒ वरु॑णा॒यावि॑ध॒ज्जनो॑ऽन॒र्वाणं॒ तं परि॑ पातो॒ अंह॑सो दा॒श्वांसं॒ मर्त॒मंह॑सः ।
तम॑र्य॒माभि र॑क्षत्यृजू॒यन्त॒मनु॑ व्र॒तम् ।
उ॒क्थैर्य ए॑नोः परि॒भूष॑ति व्र॒तं स्तोमै॑रा॒भूष॑ति व्र॒तम् ॥ ५ ॥

यः मित्राय वरुणाय अविधत् जनः अनर्वाणं तं परि पातः अंहसः दाश्वांसं मर्तं अंहसः ।
तं अर्यमा अभि रक्षति ऋजुऽयंतं अनु व्रतम् ।
उक्थैः यः एनोः परिऽभूषति व्रतं स्तोमैः आऽभूषति व्रतम् ॥ ५ ॥

जो भक्त मित्रावरुणांची सेवा करतो त्या अजातशत्रु आणि उदार भक्तांचे पातकांपासून आणि क्लेशांपासून सर्व प्रकारें रक्षण करा. जो प्रामाणिकपणें सद्धर्मानें चालतो, जो यज्ञांना स्तोत्रगायनानें अलंकृत करतो आणि उपासनेला स्तवनांनी विभूषित करतो त्या भक्ताचें अर्यमा सर्व प्रकारें संरक्षण करतो. ॥ ५ ॥


नमो॑ दि॒वे बृ॑ह॒ते रोद॑सीभ्यां मि॒त्राय॑ वोचं॒ वरु॑णाय मी॒ळ्हुषे॑ सुमृळी॒काय॑ मी॒ळ्हुषे॑ ।
इंद्र॑म॒ग्निमुप॑ स्तुहि द्यु॒क्षम॑र्य॒मणं॒ भग॑म् ।
ज्योग्जीव॑न्तः प्र॒जया॑ सचेमहि॒ सोम॑स्यो॒ती स॑चेमहि ॥ ६ ॥

नमः दिवे बृहते रोदसीभ्यां मित्राय वोचं वरुणाय मीळ्हुषे सुऽमृळीकाय मीळ्हुषे ।
इंद्रं अग्निं उप स्तुहि द्युक्षं अर्यमणं भगम् ।
ज्योक् जीवंतः प्रऽजया सचेमहि सोमस्य ऊती सचेमहि ॥ ६ ॥

पृथ्वी आणि आकाश ह्यांच्या मध्यभागीं प्रकाशणार्‍या मित्राचें मी स्तवन करतो. दानशूर, दयाळू आणि औदार्यशील वरुणाचेही मी गुणानुवाद गातो. हे ऋत्विजांनो, इंद्र, अग्नि, भग आणि स्वर्गलोकवासी अर्यमा ह्यांचे यश गा. आम्हांस सत्पुत्रयुक्त दीर्घायुष्य प्राप्त होवो व ते सोमरस अर्पण केल्याच्या योगानें प्राप्त होवो. ॥ ६ ॥


ऊ॒ती दे॒वानां॑ व॒यमिंद्र॑वन्तो मंसी॒महि॒ स्वय॑शसो म॒रुद्‌भिः॑ ।
अ॒ग्निर्मि॒त्रो वरु॑णः॒ शर्म॑ यंस॒न् तद॑श्याम म॒घवा॑नो व॒यं च॑ ॥ ७ ॥

ऊती देवानां वयं इंद्रऽवंतः मंसीमहि स्वऽयशसः मरुत्ऽ‍भिः ।
अग्निः मित्रः वरुणः शर्म यंसन् तत् अश्याम मघऽवानः वयं च ॥ ७ ॥

मरुतांच्या व देवांच्या दयेनें आम्हांवर त्या इंद्राची कृपा होवो. आणि आम्ही स्वकष्टानें सत्कीर्ति संपादन केली अशा दृष्टीनें आम्हांस लोक ओळखोत. अग्नि, मित्र आणि वरुण हे आम्हां सर्वांस सुख शांती देवोत, व तिचा उपभोग आमचे यजमान आणि आम्ही अशा सर्वांस चिरकाल घडो. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३७ (मित्रावरुणौ सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : मित्रावरुणौ - छंद - निचृच्छकरी


सु॒षु॒मा या॑त॒मद्रि॑भि॒र्गोश्री॑ता मत्स॒रा इ॒मे सोमा॑सो मत्स॒रा इ॒मे ।
आ रा॑जाना दिविस्पृशास्म॒त्रा ग॑न्त॒मुप॑ नः ।
इ॒मे वां॑ मित्रावरुणा॒ गवा॑शिरः॒ सोमाः॑ शु॒क्रा गवा॑शिरः ॥ १ ॥

सुसुम आ यातं अद्रिऽभिः गोऽश्रीताः मत्सराः इमे सोमासः मत्सराः इमे ।
आ राजाना दिविऽस्पृशा अस्मऽत्रा गंतं उप नः ।
इमे वां मित्रावरुणा गोऽआशिरः सोमाः शुक्रा गोऽआशिरः ॥ १ ॥

मित्रावरुणांनो या, आम्हीं हे सोमरस ग्राव्यांच्या योगानें पिळून काढलेले आहेत. त्यांच्यामध्यें दूध घातलें असून ते उत्साहकर व हर्षप्रद आहेत. हे जगन्नायकहो तुम्ही आकाश सुद्धां व्यापून टाकणारे आहां, तुम्हींच आमचे रक्षणकर्ते आहा, तर आम्हांकडे या. मित्रावरुणहो हे शुभ्र सोमरस तुमच्याच करितां केले असून त्यांत मिष्ट, दाट असें दूध आणि थोडेसें पाणी घातलेले आहे. ॥ १ ॥


इ॒म आ या॑त॒मिन्द॑वः॒ सोमा॑सो॒ दध्या॑शिरः सु॒तासो॒ दध्या॑शिरः ।
उ॒त वा॑मु॒षसः॑ बु॒धि सा॒कं सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑ ।
सु॒तो मि॒त्राय॒ वरु॑णाय पी॒तये॒ चारु॑र्‌ऋ॒ताय॑ पी॒तये॑ ॥ २ ॥

इम आ यातं इंदवः सोमासः दधिऽआशिरः सुतासः दधिऽआशिरः ।
उत वां उषसः बुधि साकं सूर्यस्य रश्मिऽभिः ।
सुतः मित्राय वरुणाय पीतये चारुः ऋताय पीतये ॥ २ ॥

इकडे या, आमच्या येथें ह्या सोमरसांत दह्यासारखें घट्ट दूध घातलें आहे. हा रस पिळून त्यांत मिष्ट दहींही घातले आहे. प्रभात होऊन सूर्याचे कोमल किरण दिसूं लागतांच तुम्हा दोघांकरितां म्हणजे मित्र व वरुण यांच्याकरितां हा रस पिळून तयार केला आहे, त्यांनी हा सुंदर रस प्राशन करावा म्हणून - त्या सत्य स्वरूप मित्रावरुणांनी ग्रहण करावा म्हणून सिद्ध केला आहे. ॥ २ ॥


तां वां॑ धे॒नुं न वा॑स॒रीमं॒शुं दु॑ह॒न्त्यद्रि॑भिः॒ सोमं॑ दुह॒न्त्यद्रि॑भिः ।
अ॒स्म॒त्रा ग॑न्त॒मुप॑ नोऽ॒र्वाञ्चा॒ सोम॑पीतये ।
अ॒यं वां॑ मित्रावरुणा॒ नृभिः॑ सु॒तः सोम॒ आ पी॒तये॑ सु॒तः ॥ ३ ॥

तां वां धेनुं न वासरीं अंशुं दुहंति अद्रिऽभिः सोमं दुहंति अद्रिऽभिः ।
अस्मऽत्रा गंतं उप नः अर्वांचा सोमऽपीतये ।
अयं वां मित्रावरुणा नृभिः सुतः सोमः आ पीतये सुतः ॥ ३ ॥

हे देवांनो, दुधाचे प्रवाहाचे प्रवाह सोडणार्‍या त्या तुमच्या प्रकाशरूपी धेनूंचे दूध काढावें त्याप्रमाणे आमचे ऋत्विज ह्या सोमवल्लीचे जणों दूधच काढीत आहेत. ग्राव्याच्या योगानें त्या पाषाणाच्या योगाने, जणुं त्या वनस्पतीचें जणों दोहनच करीत आहेत; तर हे भक्तरक्षकांनो आमच्या इकडे सोमपानार्थ या. हे मित्रावरुणांनो, ऋत्विजांनी हा येथें तुमच्याकरितां सोमरस सिद्ध करून ठेवला आहे, तो तुम्ही ग्रहण करावा म्हणून येथें त्यांनी पात्रांत ओतून तुम्हांपुढें ठेविला आहे. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३८ (पूषन् सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : पूषा - छंद - अत्यष्टिः


प्रप्र॑ पू॒ष्णस्तु॑विजा॒तस्य॑ शस्यते महि॒त्वम॑स्य त॒वसो॒ न त॑न्दते स्तो॒त्रम॑स्य॒ न त॑न्दते ।
अर्चा॑मि सुम्न॒यन्न॒हमन्त्यू॑तिं मयो॒भुव॑म् ।
विश्व॑स्य॒ यो मन॑ आयुयु॒वे म॒खो दे॒व आ॑युयु॒वे म॒खः ॥ १ ॥

प्रऽप्र पूष्णः तुविऽजातस्य शस्यते महिऽत्वं
अस्य तवसः न तंदते स्तोत्रं अस्य न तंदते ।
अर्चामि सुम्नऽयन् अहं अंतिऽऊतिं मयःऽभुवम् ।
विश्वस्य यः मनः आऽयुयुवे मखः देवः आऽयुयुवे मखः ॥ १ ॥

समर्थ अशा पूषाचा महिमा मी आता यथामति वर्णन करीत आहे. हा जातीचाच प्रतापी ! ह्याच्या पराक्रमाची कीर्ति कधींही कमी होत नाही, किंवा ह्याची स्तुति आता संपली असेंही होत नाही. शांतिसुखाची मनीषा धरून मी ज्या ह्या पूषाची उपासना करीत आहे, तो भक्तांचे रक्षण करण्यास एका पायावर तयार, व सर्वोत्कृष्ट आनंदाचा लाभ करून देणारा असा आहे. हा परम प्रभु सर्व विश्वाचें चित्त आपल्याकडे आकर्षण करून घेतो, आणि ह्याच्या प्रित्यर्थ केलेला यज्ञही सर्वांची मनें वेधून टाकतो. ॥ १ ॥


प्र हि त्वा॑ पूषन्नजि॒रं न याम॑नि॒ स्तोमे॑भिः कृ॒ण्व ऋ॒णवो॒ यथा॒ मृध॒ उष्ट्रो॒ न पी॑परो॒ मृधः॑ ।
हु॒वे यत्त्वा॑ मयो॒भुवं॑ दे॒वं स॒ख्याय॒ मर्त्यः॑ ।
अ॒स्माक॑माङ्गू॒वषां द्यु॒म्निन॑स्कृधि॒ वाजे॑षु द्यु॒म्निन॑स्कृधि ॥ २ ॥

प्र हि त्वा पूषन् अजिरं न यामनि स्तोमेभिः
कृण्वे ऋणवः यथा मृधः उष्ट्रः न पीपरः मृधः ।
हुवे यत् त्वा मयःऽभुवं देवं सख्याय मर्त्यः ।
अस्माकं आंगूषान् द्युम्निनः कृधि वाजेषु द्युम्निनः कृधि ॥ २ ॥

हे पूषा, चापल्यांत वायुप्रमाणें अत्यंत चंचल अशा तुझे भजन आम्ही स्तोत्रांनी करीत असतो. तर युद्धप्रसंगी आमचे रक्षण करतोस त्याप्रमाणे शत्रूच्या ह्या बेचिराख प्रदेशांतूनही आम्हास उंटाच्या पाठीवर बसवून नेल्याप्रमाणें पार पाड. तूं परमानंददायक परमेश्वर व मी गरीब मर्त्य तुझा सहवास घडावा म्हणून तुला विनवीत आहे. भजनांत आमच्या स्तुतींना सफल कर, आणि समरांगणात आमचे बाण यशस्वी कर. ॥ २ ॥


यस्य॑ ते पूषन्त्स॒ख्ये वि॑प॒न्यवः॒ क्रत्वा॑ चि॒त्सन्तोऽ॑वसा बुभुज्रि॒र इति॒ क्रत्वा॑ बुभुज्रि॒रे ।
तामनु॑ त्वा॒ नवी॑यसीं नि॒युतं॑ रा॒य ई॑महे ।
अहे॑ळमान उरुशंस॒ सरी॑ भव॒ वाजे॑वाजे॒ सरी॑ भव ॥ ३ ॥

यस्य ते पूषन् सख्ये विपन्यवः क्रत्वा चित्
संतः अवसा बुभुज्रिरे इति क्रत्वा बुभुज्रिरे ।
तां अनु त्वा नवीयसीं निऽयुतं रायः ईमहे ।
अहेळमानः उरुऽशंस सरी भव वाजेऽवाजे सरी भव ॥ ३ ॥

हे पूषा, तुझ्या सहवासानें विद्वान साधुजन आपल्या सत्कृत्यामुळे आणि तुझ्या कृपेमुळें जगाच्या उपयोगी पडले, आणि खरोखर ह्या सत्कर्मामुळेंच ते आनंदपदाचा उपभोग घेत आहेत. तर तुझ्या पूज्य नांवाला साजतील असे कोट्यावधि दिव्यप्रसाद आम्ही तुजपशी पदर पसरून मागतो, तर आम्हांस न झिडकारतां, हे जनस्तुत पूषा, तूंच आमचा पाठिराखा हो, प्रत्येक युद्धांत तूंच आमचा धुरीण हो. ॥ ३ ॥


अ॒स्या ऊ॒ षु ण॒ उप॑ सा॒तये॑ भु॒वोऽ॑हेळमानो ररि॒वाँ अ॑जाश्व श्रवस्य॒ताम॑जाश्व ।
ओ षु त्वा॑ ववृतीमहि॒ स्तोमे॑भिर्दस्म सा॒धुभिः॑ ।
न॒हि त्वा॑ पूषन्नति॒मन्य॑ आघृणे॒ न ते॑ स॒ख्यम॑पह्नु॒वे ॥ ४ ॥

अस्या ऊं इति सु णः उप सातये भुवः
अहेळमानः ररिऽवान् अजऽअश्व श्रवस्यतां अजऽअश्व ।
ओ इति सु त्वा ववृतीमहि स्तोमेभिः दस्म साधुऽभिः ।
नहि त्वा पूषन् अतिऽमन्य आघृणे न ते सख्यं अपऽह्नुवे ॥ ४ ॥

हे पूषा तुझे अश्वसुद्धां जन्मरहित आहेत, तर अशी दिव्य संपत्ति मिळवून देण्याकरितां सदा सर्वदा आमच्या अगदी जवळ रहा. हे अद्‍भुत पराक्रम करणार्‍या पूषा, आमच्या मनोहर स्तोत्राच्या योगानें आम्हांस तुझें अंतःकरण आमच्याकडे वळविता येवो. हे प्रखर दीप्तिमान पूषा, तुझा विसर मला क्षणभरही न पडो, आणि तुझा सहवासाची उपेक्षा मजकडून यत्किंचितही कधींही न होवो. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३९ (विश्वेदेव सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : विश्वेदेवः - छंद - अत्यष्टिः


अस्तु॒ श्रौष॑ट् पु॒रो अ॒ग्नीं धि॒या द॑ध॒ आ नु तच्छर्धो॑ दि॒व्यं वृ॑णीमह इंद्रवा॒यू वृ॑णीमहे ।
यद्ध॑ क्रा॒णा वि॒वस्व॑ति॒ नाभा॑ सं॒दायि॒ नव्य॑सी ।
अध॒ प्र सू न॒ उप॑ यन्तु धी॒तयो॑ दे॒वाँ अच्छा॒ न धी॒तयः॑ ॥ १ ॥

अस्तु श्रौषट् पुरः अग्निं धिया दधे आ नु तत् शर्धः दिव्यं वृणीमहे इंद्रवायू इति वृणीमहे ।
यत् ह क्राणा विवस्वति नाभा संऽदायि नव्यसी ।
अध प्र सु नः उप यंतु धीतयः देवान् अच्छ न धीतयः ॥ १ ॥

ऐका ऐका, मी आपल्यासमोर अग्नीची स्थापना भक्तिपुरःसर करून त्याच्याजवळ आम्हांस ते दिव्य सामर्थ्य प्राप्त व्हावें म्हणून प्रार्थना करतो. हे इंद्रवायूहो, त्या सामर्थ्याकरितां आम्हीं पदर पसरतो. अपूर्व आणि हटकून कार्यभाग साधून देणारी जी जी प्रार्थना असते ती ती ह्या प्रकाशाच्या निधीच्या ठिकाणी संलग्न होऊन जाते म्हणून आमचेही लक्ष पूर्णपणे त्याच्याचकडे लागो आणि देवाच्या दृष्टीखाली असल्याप्रमाणें आमच्या काव्य प्रतिभेचा भर निषेध पसरो. ॥ १ ॥


यद्ध॒ त्यन्मि॑त्रावरुणावृ॒तादध्या॑द॒दाथे॒ अनृ॑तं॒ स्वेन॑ म॒न्युना॒ दक्ष॑स्य॒ स्वेन॑ म॒न्युना॑ ।
यु॒वोरि॒त्थाधि॒ सद्म॒स्वप॑श्याम हिर॒ण्यय॑म् |
धी॒भिश्च॒न मन॑सा॒ स्वेभि॑र॒क्षभिः॒ सोम॑स्य॒ स्वेभि॑र॒क्षभिः॑ ॥ २ ॥

यत् ध त्यत् मित्रावरुणौ ऋतात् अधि आददाथे इत्याऽददाथे अनृतं स्वेन मन्युना दक्षस्य स्वेन मन्युना ।
युवोः इत्था अधि सद्मऽसु अपश्याम हिरण्ययम् |
धीभिः चन मनसा स्वेभिः अक्षऽभिः सोमस्य स्वेभिः अक्षऽभिः ॥ २ ॥

हे मित्रावरुणांनो, जेव्हां तुम्ही आपल्या स्वेच्छेनें व आपल्या चातुर्याच्या धोरणास अनुसरून सत्यस्वरूप आत्म्यापासून हे असत्य शरीर वेगळे करून ठेवलेंत, तेव्हांच तुमचे हिरण्यमय स्वरूप तुमच्या निवासस्थानांत आमच्या दृष्टीस आले. ते प्रथम आमच्या सूक्ष्म बुद्धींस मात्र गोचर झाले, नंतर मनाला, नंतर इंद्रियांना आणि शेवटी सोमाकडे लागलेल्या आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनाही गोचर झाले. ॥ २ ॥


यु॒वां स्तोमे॑भिर्देव॒यन्तो॑ अश्विनाश्र॒वय॑न्त इव॒ श्लोक॑मा॒यवो॑ यु॒वां ह॒व्याभ्या३॑यवः॑ ।
यु॒वोर्विश्वा॒ अधि॒ श्रियः॒ पृक्ष॑श्च विश्ववेदसा ।
प्रु॒षा॒यन्ते॑ वां प॒वयो॑ हिर॒ण्यये॒ रथे॑ दस्रा हिर॒ण्यये॑ ॥ ३ ॥

युवां स्तोमेभिः देवऽयंतः अश्विना आश्रावयंतःऽइव श्लोकं आयवः युवां हव्या अभि आयवः ।
युवोः विश्वाः अधि श्रियः पृक्षः च विश्वऽवेदसा ।
प्रुषायंते वां पवयः हिरण्यये रथे दस्रा हिरण्यये ॥ ३ ॥

हे अश्वी देवांनो, इकडे बंदिजनाप्रमाणें तुमची कीर्ति पसरविणारे कित्येक ऋत्विज तुमचे स्तवन करून तुम्हांस आळवीत असतात, तर इकडे दुसरे काही ऋत्विज तुम्हांस हविर्भाग देऊन भजत असतात. हे ज्ञानसागरांनो, सर्व प्रकारची संपत्ति, सर्व प्रकारचें सामर्थ्य ही तुमच्याकडे वसत आहेत. हे अद्‍भुत पराक्रमी अश्विंनो, तुमच्या अविनाशी सुवर्ण रथाच्या धावा इच्छित मनोरथांचा जणों पाऊसच पाडीत असतात. ॥ ३ ॥


अचे॑ति दस्रा॒ व्यु१॒॑नाक॑मृण्वथो यु॒ञ्जते॑ वां रथ॒युजो॒ दिवि॑ष्टिष्वध्व॒स्मानो॒ दिवि॑ष्टिषु ।
अधि॑ वां॒ स्थाम॑ व॒न्धुरे॒ रथे॑ दस्रा हिर॒ण्यये॑ ।
प॒थेव॒ यन्ता॑वनु॒शास॑ता॒ रजोऽ॑ञ्जसा॒ शास॑ता॒ रजः॑ ॥ ४ ॥

अचेति दस्रा वि ऊं इति नाकं ऋण्वथः युंजते वां रथऽयुजः दिविष्टिषु अध्वस्मानः दिविष्टिषु ।
अधि वां स्थाम वंधुरे रथे दस्रा हिरण्यये ।
पथाऽइव यंतौ अनुऽशासता रजः अंजसा शासता रजः ॥ ४ ॥

हे पराक्रमी अश्विंनो, आकाशाची कवाडें तुम्ही उघडितां हे सर्वांसच माहीत आहे. आपल्या रथाचे घोडे भक्तजनांच्या सकाळच्या इष्टीकडे जाण्याकरितां तुम्ही जोडीत असतां, ते तुमचे कधींही नाश न पावणारे घोडे देवलोकीं राहण्याची इच्छा करणार्‍या भक्तांकडे जाण्याकरितां तुम्ही जोडीत असता. हे अश्वीदेवांनो, तुमची कर्में अद्‍भुत आहेत. तुमच्या अविनाशी रथांत सारथ्याच्या शेजारी आम्हास बसूं द्या; कारण पृथ्वीवरील एखाद्या पक्क्या सडकेवरून चालल्याप्रमाणें तुम्ही नीट अंतराळीं घोडे दौडत असतां, व दिव्य लोकांच्या मार्गानें रथ भरधांव सोडीत असता. ॥ ४ ॥


शची॑भिर्नः शचीवसू॒ दिवा॒ नक्तं॑ दशस्यतम् ।
मा वां॑ रा॒तिरुप॑ दस॒त्कदा॑ च॒नास्मद्रा॒तिः कदा॑ च॒न ॥ ५ ॥

शचीभिः नः शचीवसू इति दिवा नक्तं दशस्यतम् ।
मा वां रातिः उप दसत् कदा चन अस्मत् रातिः कदा चन ॥ ५ ॥

हे अश्वीदेवहो, विलक्षण सामर्थ्यें ही तुमची संपत्ति, तर अशा त्या सामर्थ्यांच्या योगानें रात्रंदिवस तुम्ही आम्हांस सहाय्य करा. तुमच्या औदार्याला कधींही खळ न पडो. आम्हावरील तुमची कृपाही कधीं न संपो. ॥ ५ ॥


वृष॑न्निंद्र वृष॒पाणा॑स॒ इन्द॑व इ॒मे सु॒ता अद्रि॑षुतासः उ॒द्‌भिद॒स्तुभ्यं॑ सु॒तास॑ उ॒द्‌भिदः॑ ।
ते त्वा॑ मन्दन्तु दा॒वने॑ म॒हे चि॒त्राय॒ राध॑से ।
गी॒र्भिर्गि॑र्वाह॒ स्तव॑मान॒ आ ग॑हि सुमृळी॒कः न॒ आ ग॑हि ॥ ६ ॥

वृषन् इंद्र वृषऽपानासः इंदवः इमे सुताः अद्रिऽसुतासः उत्ऽभिदः तुभ्यं सुतासः उत्ऽभिदः ।
ते त्वा मंदंतु दावने महे चित्राय राधसे ।
गीःऽभिः गिर्वाहः स्तवमानः आ गहि सुऽमृळीकः नः आ गहि ॥ ६ ॥

हे औदार्यसागरा इंद्रा, हे सोमरस तुझ्यासारख्या शूरालाच पिण्यायोग्य आहेत. हे ग्राव्यांनी पिळून गाळलेले तीव्र सोमरस, हे शरीरांत भिनणारे रस तुझ्याकरितां तयार केले आहेत. तूं प्रसन्न होऊन आम्हांस फार मोठी व अद्‍भुत अशी देणगी द्यावीस म्हणून हे रस तुला हर्ष उत्पन्न करोत. हे स्तुतीनें प्रसन्न होणार्‍या इंद्रा सुंदर स्तोत्रांनी तुझे गुणानुवाद आम्हीं गात आहोंत, आमच्याकडे ये. तूं आम्हांस अति सुखकर आहेस, तर आम्हांकडे ये. ॥ ६ ॥


ओ षू णो॑ अग्ने शृणुहि॒ त्वमी॑ळि॒तो दे॒वेभ्यो॑ ब्रवसि य॒ज्ञिये॑भ्यो॒ राज॑भ्यो य॒ज्ञिये॑भ्यः ।
यद्ध॒ त्यामङ्गि्॑रोभ्यो धे॒नुं दे॑वा॒ अद॑त्तन ।
वि तां दु॑ह्रे अर्य॒मा क॒र्तरी॒ सचाँ॑ ए॒ष तां वे॑द मे॒ सचा॑ ॥ ७ ॥

ओ इति सु नः अग्ने श्रृणुहि त्वं ईळितः देवेभ्यः ब्रवसि यज्ञियेभ्यः राजऽभ्यः यज्ञियेभ्यः ।
यत् ह त्यां अंगिरोभ्यः धेनुं देवाः अदत्तन ।
वि तां दुह्रे अर्यमा कर्तरी सचान् एषः तां वेद मे सचा ॥ ७ ॥

हे अग्निदेवा, आमचे ऐक. तुझे गुणसंकीर्तन आम्ही करीत असतों, ती ही गोष्ट त्या माननीय देवांपाशी - त्या यज्ञार्ह आणि देदीप्यमान देवांपाशी तूं सांगशीलच. देवांनो, जेव्हां तुम्ही अंगिरसांना काम धेनू दिलीत, तेव्हां यज्ञ करणार्‍या यजमानाकरितां अर्यमानें तिचे दोहन केले आणि ती गाय कोणती हें एक त्याला किंवा मलाच माहीत आहे. ॥ ७ ॥


मो षु वो॑ अ॒स्मद॒भि तानि॒ पौंस्या॒ सना॑ भूवन्द्यु॒म्नानि॒ मोत जा॑रिषुर॒स्मत् पु॒रोत जा॑रिषुः ।
यद्व्॑श्चि॒त्रं यु॒गेयु॑गे॒ नव्यं॒ घोषा॒दम॑र्त्यम् ।
अ॒स्मासु॒ तन्म॑रुतो॒ यच्च॑ दु॒ष्टरं॑ दिधृ॒ता यच्च॑ दु॒ष्टर॑म् ॥ ८ ॥

मो इति सु वः अस्मत् अभि तानि पौंस्या सना भूवन् द्युम्नानि मा उत जारिषुः अस्मत् पुरा उत जारिषुः ।
यत् वः चित्रं युगेऽयुगे नव्यं घोषात् अमर्त्यम् ।
अस्मासु तत् मरुतः यत् च दुस्तरं दिधृत यच् च दुस्तरम् ॥ ८ ॥

हे मरुतांनो, आम्हांकरितां तुम्ही जे पराक्रम केलेत, त्या आतां जुन्या पुराण्या गोष्टी झाल्या असे कधींही न घडो. आमचे उज्ज्वल यश कधीं मलीन न होवो, अर्थात् आमच्या डोळ्यांदेखत तर कधींही न होवो. अद्‍भुत व पिढ्यान पिढ्या लोटल्या तरी नवीनच आणि लोकोत्तर अशी जी तुमची देणगी सर्वप्रसिद्ध असेल ती, हे मरुतांनो, आम्हांस द्या. जे जे दुःसाध्य असेल, जे जे दुर्लभ असेल, तें सुद्धां दिल्यावांचून राहूं नका. ॥ ८ ॥


द॒ध्यङ्‍ ह॑ मे ज॒नुषं॒ पूर्वो॒ अङ्गि॑ाराः प्रि॒यमे॑धः॒ कण्वो॒ अत्रि॒र्मनु॑र्विदु॒स्ते मे॒ पूर्वे॒ मनु॑र्विदुः ।
तेषां॑ दे॒वेष्वाय॑तिर॒स्माकं॒ तेषु॒ नाभ॑यः ।
तेषां॑ प॒देन॒ मह्या न॑मे गि॒रेन्द्रा॒ग्नी आ न॑मे गि॒रा ॥ ९ ॥

दध्यङ्‍ ह मे जनुषं पूर्वः अं‍गिराः प्रियऽमेधः कण्वः अत्रिः मनुः विदुः ते मे पूर्वे मनुः विदुः ।
तेषां देवेषु आऽयतिः अस्माकं तेषु नाभयः ।
तेषां पदेन महि आ नमे गिरा इंद्राग्नी इति आ नमे गिरा ॥ ९ ॥

पुरातन ऋषि दध्यङ्‍, तसेंच अंगिरा, प्रियमेध, कण्व, अत्रि आणि मनु ह्यांस माझे कुल माहीत आहे. जे जे माझ्यापूर्वीं होऊन गेले ते ते ऋषि आणि मनु राजा ह्या सर्वांस माझी माहिती आहे; कारण त्यांचा संबंध देवांपर्यंत पोहोंचतो, आणि आमचे मुख्य पूर्वजही त्यांच्यापैकींच होते. तेव्हां त्यांच्याच पद्धतीस अनुसरून मी इंद्राग्नीचे स्तवन करून त्यांच्या पुढें नम्र होतों, त्यांचे यशोवर्णन करून त्यांसच प्रणिपात करतो. ॥ ९ ॥


होता॑ यक्षद्व॒निनो॑ वन्त॒ वार्यं॒ बृह॒स्पति॑र्यजति वे॒न उ॒क्षभिः॑ पुरु॒वारे॑भिरु॒क्षभिः॑ ।
ज॒गृ॒भ्मा दू॒रआ॑दिशं॒ श्लोक॒मद्रे॒रध॒ त्मना॑ ।
अधा॑रयतर॒रिन्दा॑नि सु॒क्रतुः॑ पु॒रू सद्मा॑नि सु॒क्रतुः॑ ॥ १० ॥

होता यक्षत् वनिनः वंत वार्यं बृहस्पतिः यजति वेनः उक्षऽभिः पुरुऽवारेभिः उक्षऽभिः ।
जगृभ्म दूरेऽआदिशं श्लोकं अद्रेः अध त्मना ।
अधारयत् अररिंदानि सुऽक्रतुः पुरू सद्मानि सुऽक्रतुः ॥ १० ॥

आचार्याला देवाचे यजन करूं द्या, व प्रेमळ देवही उत्कृष्ट हविरन्नाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त होवोत. कारण आतां ज्ञानवान बृहस्पति हा बलवर्धक सोमरस अर्पण करून देवयजन करण्यास उद्युक्त झाला आहे, व सर्व गुणसंपन्न आणि तीव्र अशा सोमरसानें यजन करीत आहे. तेव्हां सोमवल्ली पिळण्याच्या पाषाणांचा दूरवर ऐकूं येणासा असा ध्वनि आमच्या सहजीच कानी पडला. महत्कार्य करणार्‍या ह्या सोमाच्या हातीं पाऊस पाडण्याचे आहे म्हणूनच पुण्यकर्म आचरणाराला राहण्यास विस्तृत आणि उत्कृष्ट स्थलें मिळाली आहेत. ॥ १० ॥


ये दे॑वासो दि॒व्येका॑दश॒ स्थ पृ॑थि॒व्यामध्येका॑दश॒ स्थ ।
अ॒प्सु॒क्षितो॑ महि॒नैका॑दश॒ स्थ ते दे॑वासो य॒ज्ञमि॒मं जु॑षध्वम् ॥ ११ ॥

ये देवासः दिवि एकादश स्थ पृथिव्यां अधि एकादश स्थ ।
अप्सुऽक्षितः महिना एकादश स्थ ते देवासः यज्ञं इमं जुषध्वम् ॥ ११ ॥

हे दिव्य विभूतींनो, तुम्ही आकाशामध्यें अकराजण रहात आहां, पृथ्वीवर अकराच जण आणि उदकांमध्येन्ही अकराच जण मोठ्या वैभवानें रहात आहां. तेव्हां तुम्ही हा आमचा यज्ञ मान्य करून घ्या. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १४० (अग्नि सूक्त )

ऋषि : दीर्घतमाः - देवता : अग्निः - छंद - जगती


वे॒दि॒षदे॑ प्रि॒यधा॑माय सु॒द्युते॑ धा॒सिमि॑व॒ प्र भ॑रा॒ योनि॑म॒ग्नये॑ ।
वस्त्रे॑णेव वासया॒ मन्म॑ना॒ शुचिं॑ ज्यो॒तीर॑थं शु॒क्रव॑र्णं तमो॒हन॑म् ॥ १ ॥

वेदिऽसदे प्रियऽधामाय सुऽद्युते धासिंऽइव प्र भर योनिं अग्नये ।
वस्त्रेणऽइव वासय मन्मना शुचिं ज्योतिःऽरथं शुक्रऽवर्णं तमःऽहनम् ॥ १ ॥

जो हा अग्नि वेदीवर आरूढ होत असतो, व ज्यास त्याचें स्वतःचे तेजोमय स्थान फार प्रिय असते अशा परम देदीप्यमान अग्निकरितां घृतपात्र घेऊन या. घृत हेंच त्याला हविरन्नाप्रमाणे आहे, आणि वस्त्रानें मंडित केल्याप्रमाणें अग्नीस मननीय स्तोत्रानें आच्छादित करा. हा परम पवित्र, शुभ्र तेजोमय असून प्रकाश हाच जो त्याचा रथ, त्याच्या योगानें तो अंधःकाराचा नाश करीत असतो. ॥ १ ॥


अ॒भि द्वि॒जन्मा॑ त्रि॒वृदन्न॑मृज्यते संवत्स॒रे वा॑वृधे ज॒ग्धमी॒ पुनः॑ ।
अ॒न्यस्या॒सा जि॒ह्वया॒ जेन्यो॒ वृषा॒ न्य१॒॑न्येन॑ व॒निनो॑ मृष्ट वार॒णः ॥ २ ॥

अभि द्विऽजन्मा त्रिऽवृत् अन्नं ऋज्यते संवत्सरे ववृधे जग्धं ईमिति पुनरिति ।
अन्यस्य आसा जिह्वया जेन्यः वृषा नि अन्येन वनिनः मृष्ट वारणः ॥ २ ॥

दोघांपासून म्हणजे पृथ्वी आणि आकाश ह्यांच्यापासून हा प्रकट होतो, आणि तीन प्रकारचें अन्न ग्रहण करून एक वर्षानें पुन्हां त्याच भक्षण केलेल्या अन्नाची धान्यरूपानें अनेक पटीनें वृद्धि करतो. बलशाली अग्नि अत्यंत उदारचरित दिसतो, तेव्हांचे त्याचे मुख आणि जिव्हा हीं वेगळीं, आणि अनिवार होऊन अरण्याचीं अरण्यें फस्त करून टाकतो, तेव्हांचे वेगळे. ॥ २ ॥


कृ॒ष्ण॒प्रुतौ॑ वेवि॒जे अ॑स्य स॒क्षिता॑ उ॒भा त॑रेते अ॒भि मा॒तरा॒ शिशु॑म् ।
प्रा॒चाजि॑ह्वं ध्व॒सय॑न्तं तृषु॒च्युत॒मा साच्यं॒ कुप॑यं॒ वर्ध॑नं पि॒तुः ॥ ३ ॥

कृष्णऽप्रुतौ वेविजे इति अस्य सऽक्षितौ उभा तरेते इति अभि मातरा शिशुम् ।
प्राचाऽजिह्वं ध्वसयंतं तृषुऽच्युतं आ साच्यं कुपयं वर्धनं पितुः ॥ ३ ॥

प्रथम दोघी अंधःकारांत गडप असतात व एकमेकींस चिकटून राहून जोरानें हालूं लागतात व नंतर प्रकट झालेल्या अग्निरूप बालकाजवळ दोघीही धांवत येतात. हा बालक सामान्य नव्हे. ह्याची जिव्हा लांब बाहेर येऊन पूर्वाभिमुख होते. हा एकदम प्रकट होऊन चमकतो व सर्व अनिष्टांचा नाश करतो. याची सेवा सर्वांनी केली पाहिजे. हा भक्तांच्या अंतःकरण वृत्तींना उचंबळून टाकून जगताच्या पित्याला हर्षभरीत करतो. ॥ ३ ॥


मु॒मु॒क्ष्वो३॒॑मन॑वे मानवस्य॒ते र॑घु॒द्रुवः॑ कृ॒ष्णसी॑तास ऊ॒ जुवः॑ ।
अ॒स॒म॒ना अ॑जि॒रासो॑ रघु॒ष्यदो॒ वात॑जूता॒ उप॑ युज्यन्त आ॒शवः॑ ॥ ४ ॥

मुमुक्ष्वः मनवे मानवस्यते रघुऽद्रुवः कृष्णऽसीतासः ऊं इति जुवः ।
असमनाः अजिरासः रघुऽस्यदः वातऽजूताः उप युज्यंते आशवः ॥ ४ ॥

अग्निदेवा, हे तुझे मोकळे सुटण्याविषयी आतुर झालेले, सर्वव्यापक, भरधांव जाणारे अश्व वेगानें उडत जात असतां त्यांचा मार्ग काळा होत जातो. ह्या अश्वांची तोंडे निरनिराळ्या दिशांकडे वळलेली असून हे वायुरूप शीघ्रगति आणि वायुप्रेरित अश्व, त्या मनुराजाकरितां जोडलेले असतात. ॥ ४ ॥


आद॑स्य॒ ते ध्व॒सय॑न्तो॒ वृथे॑रते कृ॒ष्णमभ्वं॒ महि॒ वर्पः॒ करि॑क्रतः ।
यत्सीं॑ म॒हीम॒वनिं॒ प्राभि मर्मृ॑शदभिश्व॒सन्स्त॒नय॒न्नेति॒ नान॑दत् ॥ ५ ॥

आत् अस्य ते ध्वसयंतः वृथा ईरते कृष्णं अभ्वं महि वर्पः करिक्रतः ।
यत् सीं महीं अवनिं प्र अभि मर्मृशत् अभिऽश्वसन् स्तनयन् एति नानदत् ॥ ५ ॥

जाता जाता मार्गांतील अंधकाराचा समूळ उच्छेदकरून आपले अवाढव्य रूप प्रकट करणारे ते अग्नीचे अश्व सहज परंतु मोठ्या धडाक्यानें उडत जात असतात, कारण त्या वेळी हा अग्निही पृथ्वीच्या विस्तीर्ण भाल प्रदेशाचे चुंबन घेऊन मेघ गर्जनारूप प्रचंड घोष करीत सोसाट्यानें जात असतो. ॥ ५ ॥


भूष॒न्न योऽ॑धि ब॒भ्रूषु॒ नम्न॑ते॒ वृषे॑व॒ पत्नी॑र॒भ्येति॒ रोरु॑वत् ।
ओ॒जा॒यमा॑नस्त॒न्वश्च शुम्भते भी॒मो न शृङ्गा्॑ दविधाव दु॒र्गृभिः॑ ॥ ६ ॥

भूषन् न यः अधि बभ्रूषु नम्नते वृषाऽइव पत्नीःन अभि एति रोरुवत् ।
ओजायमानः तन्वः च शुंभते भीमः न शृं‍गा दविधाव दुःऽगृभिः ॥ ६ ॥

चित्रविचित्र औषधींना आपल्या प्रभेने अलंकृत करण्याकरितांच कीं काय हा अग्नि त्यांच्याकडे वांकून पाहून एखादा शूर योद्धा आपल्या प्रिय पत्नींना भेटावयास जातो, त्याप्रमाणें गर्जना करीत करीत त्या औषधींकडे जातो. त्याचा दिव्य प्रताप प्रकट झाल्यानेंच त्याच्या शरीरास विशेष शोभा येते. परंतु त्यावेळेस एखाद्या भयंकर श्वापदाप्रमाणे तो दुर्निवार होऊन आपली ज्वालारूप आयाळ एकदम हालवितो. ॥ ६ ॥


स सं॒स्तिरो॑ वि॒ष्टिरः॒ सं गृ॑भायति जा॒नन्ने॒व जा॑न॒तीर्नित्य॒ आ श॑ये ।
पुन॑र्वर्धन्ते॒ अपि॑ यन्ति दे॒व्यम॒न्यद्वर्पः॑ पि॒त्रोः कृ॑ण्वते॒ सचा॑ ॥ ७ ॥

स संऽस्तिरः विऽस्तिरः सं गृभायति जानन् एव जानतीः नित्यः आ शये ।
पुनः वर्धंते अपि यंति देव्यं अन्यत् वर्पः पित्रोः कृण्वते सचा ॥ ७ ॥

त्या ज्वाला संकलित असोत किंवा निरनिराळ्या दृष्टीस पडण्यासारख्या असोत, त्या सर्वांस जाणणारा हा सनातन अग्नि त्या सर्वांसच कवटाळतो, व त्याही अग्नीला आपला म्हणून ओळखतात व म्हणून त्यांच्या समूहामध्यें जाऊन तो शयन करतो तेव्हां पुन्हा त्या ज्वाला वृद्धिंगत होतात, व दिव्यरूप पावून आईबापांसह एक निराळेंच रूप धारण करतात. ॥ ७ ॥


तम॒ग्रुवः॑ के॒शिनीः॒ सं हि रे॑भि॒र ऊ॒र्ध्वास्त॑स्थुर्म॒म्रुषीः॒ प्रायवे॒ पुनः॑ ।
तासां॑ ज॒रां प्र॑मु॒ञ्चन्ने॑ति॒ नान॑द॒दसुं॒ परं॑ ज॒नय॑ञ्जी॒वमस्तृ॑तम् ॥ ८ ॥

तं अग्रुवः केशिनीः सं हि रेभिरे ऊर्ध्वाः तस्थुः मम्रुषीः प्र आयवे पुनरिति ।
तासां जरां प्रऽमुंचन् एति नानदत् असुं परं जनयन् जीवं अस्तृतम् ॥ ८ ॥

सुंदर केश कलाप धारण करणार्‍या, परंतु ह्या लावण्यवतींनी अग्नीला आलिंगन दिले त्याच्या अगोदर त्या मृतप्रायच होत्या, परंतु ह्या विश्वजीवनाकरितांच त्या उठून उभ्या राहिल्या, तेव्हां त्यांचे वार्धक्य घालवून त्यांच्यामध्यें उत्साहपूर्ण, व नष्ट किंवा क्षीण न होणारी अशी अपूर्व जीवशक्ति उत्पन्न करून तो जयघोष करीत करीत त्यांच्याकडे आला. ॥ ८ ॥


अ॒धी॒वा॒सं परि॑ मा॒तू रि॒हन्नह॑ तुवि॒ग्रेभिः॒ सत्व॑भिर्याति॒ वि ज्रयः॑ ।
वयो॒ दध॑त्प॒द्वते॒ रेरि॑ह॒त्सदानु॒ श्येनी॑ सचते वर्त॒नीरह॑ ॥ ९ ॥

अधीवासं परि मातू रिहन् अह तुविऽग्रेभिः सत्वऽभिः याति वि ज्रयः ।
वयः दधत् पत्ऽवते रेरिहत् सदानु श्येनी सचते वर्तनिः अह ॥ ९ ॥

पृथ्वीमातेच्या वस्त्राच्या पदराचें चुंबन घेत घेत हा तीव्र अग्नि वणव्याच्या रूपानें धडाक्यानें पुढे जात असतो, व तो जवळ येतांच घोर वन्य श्वापदेंसुद्धां ओरडत सैरावैरा धांवू लागतात. पृथ्वीचा पृष्ठभाग चाटीत चाटीत जात असतां हा अग्नि पादचारी प्राण्यांच्याअंगांत त्यांस अन्न देऊन नेहमी नवा जोम उत्पन्न करतो. परंतु हा पुढें गेल्यावर पाठीमागे त्याचा मार्ग मात्र काळा होत जातो. ॥ ९ ॥


अ॒स्माक॑मग्ने म॒घव॑त्सु दीदि॒ह्यध॒ श्वसी॑वान्वृष॒भो दमू॑नाः ।
अ॒वास्या॒ शिशु॑मतीरदीदे॒र्वर्मे॑व यु॒त्सु प॑रि॒जर्भु॑राणः ॥ १० ॥

अस्माकं अग्ने मघवत्ऽसु दीदिहि अध श्वसीवान् वृषभः दमूनाः ।
अवऽअस्य शिशुऽमतीः अदीदेः वर्मऽइव युत्ऽसु परिऽजर्भुराणः ॥ १० ॥

हे अगिदेवा, आमच्या औदार्यशील यजमानांवर आपल्या दयेचा प्रकाश पाड. तूं वीर्यवान व आत्मसंयमी असून तुझा श्वासोश्वास सुद्धां ओजस्वी असतो. तूं आपले बालरूप टाकून समरांगणांत तेजस्वी चिलखत घालून वावरल्याप्रमाणें आपल्या प्रकाशानें सर्वांस दिपवून टाकलें आहेस. ॥ १० ॥


इ॒दम॑ग्ने॒ सुधि॑तं॒ दुर्धि॑ता॒दधि॑ प्रि॒यादुं॑ चि॒न्मन्म॑नः॒ प्रेयः॑ अस्तु ते ।
यत्ते॑ शु॒क्रं त॒न्वो३॒॑रोच॑ते॒ शुचि॒ तेना॒स्मभ्यं॑ वनसे॒ रत्न॒िमा त्वम् ॥ ११ ॥

इदं अग्ने सुऽधितं दुःऽधितात् अधि प्रियात् ऊं इति चिन् मन्मनः प्रेयः अस्तु ते ।
यत् ते शुक्रं तन्वः रोचते शुचि तेन अस्मभ्यं वनसे रत्नं आ त्वम् ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, कशाबशा रचलेल्या एखाद्या कवनापेक्षां, किंवा तुला आवडणार्‍या एखाद्या सुरस पद्यापेक्षांही हे माझें सुव्यवस्थित स्तोत्र तुला विशेष आवडो. तुख्या शरीराचा जो शुभ्र आणि पवित्र प्रकाश पडत असतो त्याच्या योगानें तूं आम्हांस तुझी कृपा हें रत्नच देत आहेस, असे होवो. ॥ ११ ॥


रथा॑य॒ नाव॑मु॒त नो॑ गृ॒हाय॒ नित्या॑रित्रां प॒द्वतीं॑ रास्यग्ने ।
अ॒स्माकं॑ वी॒राँ उ॒त नो॑ म॒घोनो॒ जनां॑श्च॒ या पा॒रया॒च्छर्म॒ या च॑ ॥ १२ ॥

रथाय नावं उत नः गृहाय नित्यऽअरित्रां पत्ऽवतीं रासि अग्ने ।
अस्माकं वीरान् उत नः मघोनः जनान् च या पारयात् शर्म या च ॥ १२ ॥

हे अग्ने, आम्हांस राहण्यासाठीं व जलद चालण्यासाठीं, अभंग असे सुकाणूं आणि वल्ही असलेली अशी एक नौका तूं देणार आहेसच, परंतु ती अशी पाहिजे कीं, जिच्यामध्यें आमचे सर्व योद्धे यजमान आणि मुलें माणसें ही सर्व बसून पार जातील व जी आम्हांस सुखाचा आसरा होईल. ॥ १२ ॥


अ॒भी नो॑ अग्न उ॒क्थमिज्जु॑गुर्या॒ द्यावा॒क्षामा॒ सिन्ध॑वश्च॒ स्वगू॑र्ताः ।
गव्यं॒ यव्यं॒ यन्तो॑ दी॒र्घाहेषं॒ वरं॑ अरु॒ण्यो वरन्त ॥ १३ ॥

अभि नः अग्ने उक्थं इत् जुगुर्याः द्यावाक्षामा सिंधवः च स्वऽगूर्ताः ।
गव्यं यव्यं यंतः दीर्घा अहा इषं वरं अरुण्यः वरंत ॥ १३ ॥

हे अग्ने, हे आमचे प्रशंसास्तोत्र उत्तम मानून घे, म्हणजे, पृथ्वी आकाश आणि स्वयशोमंडित अशा महानद्या ह्या आम्हांस दिव्य गोधनें, धान्यसमृद्धि व दीर्घायुष्य ही प्राप्त करून देतील, व अरुणवर्ण अशा उषादेवी आम्हांसाठीं मनःसामर्थ्य हेंच वरदान मागून घेतील. ॥ १३ ॥


ॐ तत् सत्


GO TOP