PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १२१ ते १३०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२१ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : विश्वेदेव - छंद - त्रिष्टुभ्


कदि॒त्था नॄँ पात्रं॑ देवय॒तां श्रव॒द्‌गिरो॒ अङ्गि॑शरसां तुर॒ण्यन् ॥
प्र यदान॒ड्विश॒ आ ह॒र्म्यस्यो॒रु क्रं॑सते अध्व॒रे यज॑त्रः ॥ १ ॥

कत् इत्था नॄन् पात्रं देवऽयता श्रवत् गिरः अंगिरसां तुरण्यन् ॥
प्र यत् आनट् विशः आ हर्म्यस्य उरु क्रंसते अध्वरे यजत्रः ॥ १ ॥

मानवांचे पालन करणारा तो इंद्र ह्याप्रमाणें सत्वर इकडे येऊन भक्तिशील अंगिरसांची स्तुति केव्हां ऐकेल बरें ? जेव्हां सदनांत राहणार्‍या मानवांकडे येतो तेव्हां तो यज्ञार्ह देव यज्ञाकडे मोठ्या प्रौढतेनें पावलें टाकीत जातो. ॥ १ ॥


स्तम्भी॑द्ध॒ द्यां स ध॒रुणं॑ प्रुषायदृ॒भुर्वाजा॑य॒ द्रवि॑णं॒ नरो॒ गोः ॥
अनु॑ स्व॒जां म॑हि॒षश्च॑क्षत॒ व्रां मेना॒मश्व॑स्य॒ परि॑ मा॒तरं॒ गोः ॥ २ ॥

स्तंभीत् ह द्या सः धरुणं प्रुषायत् ऋभुः वाजाय द्रविणं नरः गोः ॥
अनु स्वऽजा महिषः चक्षत व्रां मेनां अश्वस्य परि मातरं गोः ॥ २ ॥

त्यानें द्युलोकाची स्थापना केली. त्या कुशल वीरानें मानवांना सामर्थ्याची प्राप्ति व्हावी म्हणून धेनूंच्या कांसेंतील सर्वांस पुष्टिकारक अशा उत्कृष्ट द्रव्याची वृष्टि केली. त्या महान इंद्रानें आपण निर्माण केलेल्या प्राणि समुदायाचे - अश्वाच्या मादीचें व वासराच्या आईचें - अवलोकन केले. ॥ २ ॥


नक्ष॒द्धव॑मरु॒णीः पू॒र्व्यं राट् तु॒रो वि॒शामङ्गि॑यरसा॒मनु॒ द्यून् ॥
तक्ष॒द्वज्रं॒ नियु॑तं त॒स्तम्भ॒द्द्यां चतु॑ष्पदे॒ नर्या॑य द्वि॒पादे॑ ॥ ३ ॥

नक्षत् हवं अरुणीः पूर्व्यं राट् तुरः विशां अङ्‌गिरसां अनु द्यून् ॥
तक्षत् वज्रं निऽयुतं तस्तंभत् द्यां चतुःऽपदे नर्याय द्विऽपादे ॥ ३ ॥

ताम्रवर्ण उषाचे अगोदर सत्वर प्रकाशून त्यानें प्रतिदिवशी अंगिरस कुलांतील मनुष्यांच्या पूजेचा स्वीकार केला आहे. जें व्रत तो स्वहस्तांत वागवितो तें त्यानेंच तयार केले व मानवास उपयुक्त असे जे चतुष्पाद व द्विपाद प्राणीही त्यांचेसाठी. त्यानेंच द्युलोकाची स्थापना केली. ॥ ३ ॥


अ॒स्य मदे॑ स्व॒र्यं दा ऋ॒तायापी॑वृतमु॒स्रिया॑णा॒मनी॑कम् ॥
यद्ध॑ प्र॒सर्गे॑ त्रिक॒कुम्नि॒वर्त॒दप॒ द्रुहो॒ मानु॑षस्य॒ दुरो॑ वः ॥ ४ ॥

अस्य मदे स्वर्यं दाः ऋताय अपीऽवृतं उस्रियाणां अनीकम् ॥
यत् ह प्रऽसर्गे त्रिऽककुप् निऽवर्तत् अप द्रुहः मानुषस्य दुरः वरिति वः ॥ ४ ॥

सोमरसाच्या आनंदांत असतांना तूं प्रतिबंधात पडलेल्या गाईंचा देदीप्यमान समूह सत्कृत्यें नीट चालण्याकरितां पुन्हां आणून दिलास. ज्या वेळीं तिप्पट विशाल रूप धारण करणार्‍या ह्या इंद्रानें पुन्हां युद्धाकडे मोर्चा फिरविला त्या वेळी मानवजातीच्या शत्रूंच्या गृहांचे दरवाजे त्यानें फोडून टाकले. ॥ ४ ॥


तुभ्यं॒ पयो॒ यत्पि॒तरा॒वनी॑तां॒ राधः॑ सु॒रेत॑स्तु॒रणे॑ भुर॒ण्यू ॥
शुचि॒ यत्ते॒ रेक्ण॒ आय॑जन्त सब॒र्दुघा॑याः॒ पय॑ उ॒स्रिया॑याः ॥ ५ ॥

तुभ्यं पयः यत् पितरौ अनीता राधः सुऽरेतः तुरणे भुरण्यू इति ॥
शुचि यत् ते रेक्णः आ अयजंत सबःऽदुघायाः पय उस्रियायाः ॥ ५ ॥

ज्या वेळी अमृताचा पान्हा देणार्‍या गाईंचे दूध अर्पण करून तुझ्या मातापितरांनी तुला तेजस्वी पेय दिलें त्या वेळी, तुझ्या पोषणाची सत्वर तजवीज करणार्‍या त्या तुझ्या आईबापाकडून तुला जें सामर्थ्यवर्धक व आल्हाद देणारे दुग्ध मिळालें तें केवळ तुझेच साठी होते. ॥ ५ ॥


अध॒ प्र ज॑ज्ञे त॒रणि॑र्ममत्तु॒ प्र रो॑च्य॒स्या उ॒षसो॒ न सूरः॑ ॥
इंदु॒र्येभि॒राष्ट॒ स्वेदु॑हव्यैः स्रु॒वेण॑ सि॒ञ्चञ्ज॒रणा॒भि धाम॑ ॥ ६ ॥

अध प्र जज्ञे तरणिः ममत्तु प्र रोचि अस्याः उषसः न सूरः ॥
इंदुः येभिः आष्ट स्वऽइदुहव्यैः स्रुवेण सिंचन् जरणा अभि धाम ॥ ६ ॥

हा पहा प्रादुर्भूत झाला. तो वेगवान देव प्रमुदित होवो. उषेनंतर हा सूर्याप्रमाणें प्रकाशित झाला आहे. ह्या तिघांनी मिळून स्तोत्रें व ऊनऊन हवि ह्याचेसह यज्ञगृहांत यज्ञचमसातून खाली सांडतील इतके सोमरसाचे बिंदु स्वतःस अर्पण करावयास लावले आहेत. ॥ ६ ॥


स्वि॒ध्मा यद्व॒नधि॑तिरप॒स्यात्सूरो॑ अध्व॒रे परि॒ रोध॑ना॒ गोः ॥
यद्ध॑ प्र॒भासि॒ कृत्व्याँ॒ अनु॒ द्यूनन॑र्विशे प॒श्विषे॑ तु॒राय॑ ॥ ७ ॥

सुऽइध्मा यत् वनऽधितिः अपस्यात् सूरः अध्वरे परि रोधना गोः ॥
यत् ह प्रऽभासि कृत्व्यान् अनु द्यून् अनर्विशे पशुऽइषे तुराय ॥ ७ ॥

सूर्याच्या यज्ञात वृषभास बद्ध करून ठेवणारी व सुंदर इंधन घातलेली काष्ठांची रास जेव्हां प्रदीप्त होण्यास सिद्ध होते व जेव्हां सर्व दिवसांची कामें सुरळीत चालावीं म्हणून तूं आपला प्रकाश पाडतोस, त्या वेळीं रथांत आरूढ होणार्‍या, पशूंस शोधणार्‍या व आपल्या कामाकडे त्वरेनें निघणार्‍या प्रत्येक मनुष्याचें काम होतें. ॥ ७ ॥


अ॒ष्टा म॒हो दि॒व आदो॒ हरी॑ इ॒ह द्यु॑म्ना॒साह॑म॒भि यो॑धा॒न उत्स॑म् ॥
हरिं॒ यत्ते॑ म॒न्दिनं॑ दु॒क्षन्वृ॒धे गोर॑भस॒मद्रि॑भिर्वा॒ताप्य॑म् ॥ ८ ॥

अष्टा महः दिवः आदः हरी इति इह द्युम्नऽसहं अभि योधानः उत्सम् ॥
हरिं यत् ते मंदिनं धुक्षन् वृधे गोऽरभसं अद्रिऽभिः वाताप्यम् ॥ ८ ॥

देदीप्यमान असा जो झरा त्याचे प्राप्त्यर्थ युद्ध करीत असतां तूं विशाल द्युलोकांतून आठ घोडे घेऊन आलास, आणि त्या वेळीं तुला आनंद होण्याकरिता, कढविलेला, दुग्धामुळें जास्ती तीव्र बनलेला, व तुला हर्ष उत्पन्न करणारा असा पिंवळा धमक सोमरस तुझ्या भक्तांसी हातांत यज्ञपाषाण घेऊन तयार केला. ॥ ८ ॥


त्वमा॑य॒सं प्रति॑ वर्तयो॒ गोर्दि॒वो अश्मा॑न॒मुप॑नीत॒मृभ्वा॑ ॥
कुत्सा॑य॒ यत्र॑ पुरुहूत व॒न्वञ्छुष्ण॑मन॒न्तैः प॑रि॒यासि॑ व॒धैः ॥ ९ ॥

त्वं आयसं प्रति वर्तयः गोः दिवः अश्मानं उपऽनीतं ऋभ्वा ॥
कुत्साय यत्र पुरुऽहूत वन्वन् शुष्णं अनंतैः परिऽयासि वधैः ॥ ९ ॥

अनेक भक्तांनी पाचारण केलेल्या हे इंद्रा, ज्या वेळीं कुत्सावर प्रसन्न होऊन तूं अगणित शस्त्रांनी शुष्णास वेढून टाकलेंस त्या वेळीं द्युलोकांतून आणलेला लोखंडाचा गोटा तूं आपल्या कुशलतेनें गोफणीनें शुष्णावर फेंकलास. ॥ ९ ॥


पु॒रा यत्सूर॒स्तम॑सो॒ अपी॑ते॒स्तम॑द्रिवः फलि॒गं हे॒तिम॑स्य ॥
शुष्ण॑स्य चि॒त्परि॑हितं॒ यदोजो॑ दि॒वस्परि॒ सुग्र॑थितं॒ तदादः॑ ॥ १० ॥

पुरा यत् सूरः तमसः अपिऽइतेः तं अद्रिऽवः फलिऽगं हेतिं अस्य ॥
शुष्णस्य चित् परिऽहितं यत् ओजः दिवः परि सुऽग्रथितं तत् आ अदरित्यदः ॥ १० ॥

हे वज्रधारी इंद्रा, तमानें सूर्यास ग्रासण्याचे पूर्वींच तूं आपलें शस्त्र मेघावर फेंकलेस. शुष्णाचे जे बल सर्व द्युलोकास व्यापुन अनिर्बाधपणें राहिलें होतें त्याचाही तूं नाश करून टाकलास. ॥ १० ॥


अनु॑ त्वा म॒ही पाज॑सी अच॒क्रे द्यावा॒क्षामा॑ मदतामिंद्र॒ कर्म॑न् ॥
त्वं वृ॒त्रमा॒शया॑नं सि॒रासु॑ म॒हो वज्रे॑ण सिष्वपो व॒राहु॑म् ॥ ११ ॥

अनु त्वा मही इति पाजसी इति अचक्रेऽइति द्यावाक्षामा मदतां इंद्र कर्मन् ॥
त्वं वृत्रं आऽशयानं सिरासु महः वज्रेण सिस्वपः वराहुम् ॥ ११ ॥

हे इंद्रा, चाकांवाचून फिरणारे ते श्रेष्ठ व सामर्थ्यवान द्युलोक व भूलोक ह्यांना तुझा पराक्रम पाहून आनंद होतो. तूं सर्वांहून वरिष्ठ असल्यामुळें, उदकांत दबा धरून बसलेल्या त्या वराहास - वृत्रास - तूं आपल्या वज्रानें चीत केलेंस. ॥ ११ ॥


त्वमिं॑द्र॒ नर्यो॒ याँ अवो॒ नॄन्तिष्ठा॒ वात॑स्य सु॒युजो॒ वहि॑ष्ठान् ॥
यं ते॑ का॒व्य उ॒शना॑ म॒न्दिनं॒ दाद्वृ॑त्र॒हणं॒ पार्यं॑ ततक्ष॒ वज्र॑म् ॥ १२ ॥

त्वं इंद्र नर्यः यान् अवः नॄन् तिष्ठ वातस्य सुऽयुजः वहिष्ठान् ॥
यं ते काव्यः उशना मंदिनं दात् वृत्रऽहनं पार्यं ततक्ष वज्रम् ॥ १२ ॥

इंद्रा, ज्या मानवाचें तूं रक्षण करतोस त्याचा तूं हितकर्ता असल्यामुळें तूं वायूच्या बलवान व सुलभ रीतीनें जोडले जाणार्‍या अश्वावर आरूढ हो. उशना काव्यानें जें आनंददायक वज्र तुला दिलें तें त्यानें तुला उपयोगी पडावें व तूं वृत्रास मारावें म्हणून केलें होतें. ॥ १२ ॥


त्वं सूरो॑ ह॒रितो॑ रामयो॒ नॄन्भर॑च्च॒क्रमेत॑शो॒ नायमिं॑द्र ॥
प्रास्य॑ पा॒रं न॑व॒तिं ना॒व्याना॒मपि॑ क॒र्तम॑वर्त॒योऽ॑यज्यून् ॥ १३ ॥

त्वं सूरः हरितः रमयः नॄन् भरत् चक्रं एतशः न अयं इंद्र ॥
प्रऽअस्य पारं नवतिं नाव्यानां अपि कर्तं अवर्तयः अयज्यून् ॥ १३ ॥

हे इंद्रा, तूं सूर्याचे पीतवर्ण अश्व थांबविलेस आणि ह्या एतशानेंही चाक ओढले नाहीं. तुझें पूजन न करणार्‍या लोकास तूं नव्वद नद्यांचे पलीकडे फेंकून त्यांना एका मोठ्या खळग्यांत टाकून दिलेस. ॥ १३ ॥


त्वं नो॑ अ॒स्या इं॑द्र दु॒र्हणा॑याः पा॒हि व॑ज्रिवो दुरि॒ताद॒भीके॑ ॥
प्र नो॒ वाजा॑न्र॒॑थ्यो अश्व॑बुध्यानि॒षे य॑न्धि॒ श्रव॑से सू॒नृता॑यै ॥ १४ ॥

त्वं नः अस्याः इंद्र दुःऽहणायाः पाहि वज्रिऽवः दुःऽइतात् अभीके ॥
प्र नः वाजान् रथ्यः अश्वऽबुध्यान् इषे यंधि श्रवसे सूनृतायै ॥ १४ ॥

हे वज्रधारी इंद्रा, आम्हांवर येऊन ठेपलेल्या दुरितापासून व ह्या क्लेशदायक आपत्तीपासून आमचें रक्षण कर. आम्हांस पोटास भरपूर मिळावें, आमची कीर्ति वाढावी, व आम्हांस मधुर सत्याचा लाभ व्हावा म्हणून ज्या सामर्थ्याच्या योगानें आम्हांस पुष्कळ रथ मिळतील, व अनेक अश्व पदरीं असल्यामुळें ज्याची लोकांस खूण पटेल, असें सामर्थ्य आम्हांस अर्पण कर. ॥ १४ ॥


मा सा ते॑ अ॒स्मत्सु॑म॒तिर्वि द॑स॒द्वाज॑प्रमहः॒ समिषो॑ वरन्त ॥
आ नो॑ भज मघव॒न्गोष्व॒र्यो मंहि॑ष्ठास्ते सध॒मादः॑ स्याम ॥ १५ ॥

मा सा ते अस्मत् सुऽमतिः वि दसत् वाजऽप्रमहः सं इषः वरंत ॥
आ नः भज मघऽवन् गोषु अर्यः मंहिष्ठाः ते सधऽमादः स्याम ॥ १५ ॥

तुझी ती कृपाबुद्धि आम्हांवरून उडून न जावो व हे सामर्थ्यवान देवा, आम्हांस पुष्कळ धनधान्य प्राप्त होवो. हे उदार इंद्रा, तूं श्रेष्ठ असल्यामुळें आम्हांस धेनूंचा लाभ होत असतां तूं तेथें अस. आम्ही तुला हवि अर्पण करून सर्वजण आनंदांत राहूं. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२२ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : विश्वेदेव - छंद - त्रिष्टुभ्


प्र वः॒ पान्तं॑ रघुमन्य॒वोऽ॑न्धो य॒ज्ञं रु॒द्राय॑ मी॒ळ्हुषे॑ भरध्वम् ॥
दि॒वो अ॑स्तो॒ष्यसु॑रस्य वी॒रैरि॑षु॒ध्येव॑ म॒रुतो॒ रोद॑स्योः ॥ १ ॥

प्र वः पांतं रघुऽमन्यवः अंधः यज्ञं रुद्राय मीळ्हुषे भरध्वम् ॥
दिवः अस्तोषि असुरस्य वीरैः इषुध्याऽइव मरुतः रोदस्योः ॥ १ ॥

हे ऋत्विजांनो, तुमचे अंगी औत्सुख्यचापल्य आहे. तेव्हां आपले पेय, हवि व आपला यज्ञ तुम्ही रुद्राला अर्पण करा; तो सर्व सिद्धिंचा जणो वर्षावच करीत आतो. इकडे मीही मरुतांचे स्तवन केलेले आहे. हे मरुत् महदाकाशस्थ परमेश्वराच्या वीरांसहवतमान अंतिरिक्षांत जणों काय ईर्ष्येनेंच रहात असतात. ॥ १ ॥


पत्नी॑व पू॒र्वहू॑तिं वावृ॒धध्या॑ उ॒षासा॒नक्ता॑ पुरु॒धा विदा॑ने ॥
स्त॒रीर्नात्कं॒ व्युतं॒ वसा॑ना॒ सूर्य॑स्य श्रि॒या सु॒दृशी॒ हिर॑ण्यैः ॥ २ ॥

पत्नि्ऽइव पूर्वऽहूतिं ववृधध्यैआ उषसानक्ता पुरुधा विदाने इति ॥
स्तरीः न अत्कं विऽउतं वसाना सूर्यस्य श्रिया सुऽदृशी हिरण्यैः ॥ २ ॥

प्रथमाहुतीस ऐन रंग यावा म्हणुन उषा व रात्र यांस अनुकूल करून घेतलें पाहिजे. ह्या, नव वधूंप्रमाणे नाना प्रकारांनी नटत असतात. पैकीं एक विद्युल्लतारूप वस्त्र अघळपघळ नेसून झळकत असते व दुसरी रविकिरणाच्या प्रभारूप सुवर्णलंकारांनी फार खुलून दिसते. ॥ २ ॥


म॒मत्तु॑ नः॒ परि॑ज्मा वस॒र्हा म॒मत्तु॒ वातो॑ अ॒पां वृष॑ण्वान् ॥
शि॒शी॒तमिं॑द्रापर्वता यु॒वं न॒स्तन्नो॒ विश्वे॑ वरिवस्यन्तु दे॒वाः ॥ ३ ॥

ममत्तु नः परिऽज्मा वसर्हा ममत्तु वातः अपां वृषण्ऽवान् ॥
शिशीतं इंद्रापर्वता युवं नः तत् नः विश्वे वरिवस्यंतु देवाः ॥ ३ ॥

सर्व आकाशभर प्रदक्षिणा करतां करतां अंधःकाराचा नायनाट करून टाकणारा असा हा दिनमणि आम्हांस आनंदी आनंद करो. पर्जन्यवृष्टि करणारा वायुदेवही आनंदमय करो. हे पर्वतयुक्त इंद्रा, आमची बुद्धि अतिशय कुशाग्र कर आणि सकल देव ह्या सर्व गोष्टींचा आम्हांस लाभ करुन देवोत. ॥ ३ ॥


उ॒त त्या मे॑ य॒शसा॑ श्वेत॒नायै॒ व्यन्ता॒ पान्तौ॑शि॒जो हु॒वध्यै॑ ॥
प्र वो॒ नपा॑तम॒पां कृ॑णुध्वं॒ प्र मा॒तरा॑ रास्पि॒नस्या॒योः ॥ ४ ॥

उत त्या मे यशसा श्वेतनायै व्यंता पांता औशिजः हुवध्यै ॥
प्र वः नपातं अपां कृणुध्वं प्र मातरा रास्पिनस्य आयोः ॥ ४ ॥

हा मी उशिजेचा पुत्र सुप्रभाती त्या दोघां यशस्कर आणि नाशरहित जगत्पालकांस मजकडे बोलावीत आहे. तेव्हां तुम्हींही आपल्या अग्नीचे परोपरीने स्तवन करा, आणि ह्या चित् शक्तिस प्रकट करणार्‍या ज्या दोन अरणी त्या आपल्यापुढें ठेवा. हा अग्नि आकाशांतील उदकामध्येंही प्रकट होतो व आपल्या प्रचंड घोषाने भक्तांस आशीर्वाद देतो. ॥ ४ ॥


आ वो॑ रुव॒ण्युमौ॑शि॒जो हु॒वध्यै॒ घोषे॑व॒ शंस॒मर्जु॑नस्य॒ नंशे॑ ॥
प्र वः॑ पू॒ष्णे दा॒वन॒ आँ अच्छा॑ वोचेय व॒सुता॑तिम॒ग्नेः ॥ ५ ॥

आ वः रुवण्युं औशिजः हुवध्यै घोषाऽइव शंसं अर्जुनस्य नंशे ॥
प्र वः पूष्णे दावने आन् अच्छ वोचेय वसुऽतातिं अग्नेः ॥ ५ ॥

हा मी उशिजेचा पुत्र तुमच्याकरितां, प्रचंड गर्जना करणार्‍या अग्नीनें येथें यावे म्हणून स्तवन करीत आहे. अशीच स्तुती पूर्वीं घोषा हिने आपला श्वेतरोग नाहींसा व्हावा म्हणून केली होती. तुमच्यासाठी त्या दानशूर पूषाची मी करुणा भाकतो आणि अभीष्ट संपत्तीचा ओघ अग्नीपासून वाहतो, म्हणून त्या प्रित्यर्थ अग्नीची प्रार्थना करतो. ॥ ५ ॥


श्रु॒तं मे॑ मित्रावरुणा॒ हवे॒मोत श्रु॑तं॒ सद॑ने वि॒श्वतः॑ सीम् ॥
श्रोतु॑ नः॒ श्रोतु॑रातिः सु॒श्रोतुः॑ सु॒क्षेत्रा॒ सिंधु॑र॒द्भिःन ॥ ६ ॥

श्रुतं मे मित्रावरुणा हवा इमा उत श्रुतं सदने विश्वतः सीम् ॥
श्रोतु नः श्रोतुऽरातिः सुऽश्रोतुः सुऽक्षेत्रा सिंधुः अत्ऽभिः ॥ ६ ॥

मित्रावरुणहो, माझ्या ह्य हाकांकडे लक्ष द्या. तुम्ही आपल्या घरी असतां तरीही चोहोंकडे चाललेल्या प्रार्थनांकडे लक्ष द्या. ताबडतोव हांक ऐकणारा असा हा सिंधुही आम्ही स्तवन करीत आहों ते ऐको. ह्या सिंधूच्या देणग्या तर सर्व प्रसिद्धच आहेत. हा सुपीक प्रदेशांना आपल्या पाण्यानें अगदी तर्र करून टाकतो. ॥ ६ ॥


स्तु॒षे सा वां॑ वरुण मित्र रा॒तिर्गवां॑ श॒ता पृ॒क्षया॑मेषु प॒ज्रे ॥
श्रु॒तर॑थे प्रि॒यर॑थे॒ दधा॑नाः स॒द्यः पु॒ष्टिं नि॑रुन्धा॒नासो॑ अग्मन् ॥ ७ ॥

स्तुषे सा वां वरुण मित्र रातिः गवां शता पृक्षऽयामेषु पज्रे ॥
श्रुतऽरथे प्रियऽरथे दधानाः सद्यः पुष्टिं निऽरुंधानासः अग्मन् ॥ ७ ॥

हे मित्रावरुणहो, तुम्ही अनेक यज्ञप्रसंगी मला पज्र कुलोत्पन्नाला गोधनाच्या शेंकडो देणग्या दिल्या आहेत. त्या आठवून ह्या तुमच्या दातृत्वाची अतिशय स्तुति होत असते. आहा ! ज्याच्या रथाच्या दर्शनाविषयींही प्रेम वाटावे, त्या श्रुतरथास ऐश्वर्य देऊन ते कायम करणारे असे हे मित्रावरुण आलेच पहा. ॥ ७ ॥


अ॒स्य स्तु॑षे॒ महि॑मघस्य॒ राधः॒ सचा॑ सनेम॒ नहु॑षः सु॒वीराः॑ ॥
जनो॒ यः प॒ज्रेभ्यो॑ वा॒जिनी॑वा॒नश्वा॑वतो र॒थिनो॒ मह्यं॑ सू॒रिः ॥ ८ ॥

अस्य स्तुषे महिऽमघस्य राधः सचा सनेम नहुषः सुऽवीराः ॥
जनः यः पज्रेभ्यः वाजिनीऽवान् अश्वऽवतः रथिनः मह्यं सूरिः ॥ ८ ॥

ज्याचें ऐश्वर्य अपार आहे अशा ह्या भगवंताच्या दातृत्व गुणांची प्रशंसा मी करीत आहे. आपण सर्व शौर्यसंपन्न आहोंत, तर आपण सर्वांनी मिळून त्याचे गुणानुवाद गाइले पाहिजेत. ह्यानेंच पज्र कुलोत्पन्नांना पवित्र सामर्थ्य दिलें आहे, आणि वीरांना घोड्यावर स्वार होऊन माझ्या साहाय्याकरितां येण्यास हाच परम बुद्धिमान प्रेरणा करीत असतो. ॥ ८ ॥


जनो॒ यो मि॑त्रावरुणावभि॒ध्रुग॒पो न वां॑ सु॒नोत्य॑क्ष्णया॒ध्रुक् ॥
स्व॒यं स यक्ष्मं॒ हृद॑ये॒ नि ध॑त्त॒ आप॒ यदीं॒ होत्रा॑भिरृ॒तावा॑ ॥ ९ ॥

जनः यः मित्रावरुणौ अभिऽध्रुग् अपः न वां सुनोति अक्ष्णयाऽध्रुक् ॥
स्वयं सः यक्ष्मं हृदये नि धत्ते आप यत् ईं होत्राभिः ऋतावा ॥ ९ ॥

हे मित्रावरुणहो, सर्वांचा जो उघडपेणे द्वेष करतो, जो सोमरस अर्पण करून सेवा करीत नाही, आणि पोटांत डाव धरून जो दुसर्‍याचा घात करूं पाहतो अशा दुष्ट मनुष्याच्या दृष्टीस जेव्हां असें येतें की सदाचारसंपन्न भक्तांस त्याच्या सद्‍भक्तीचें उत्कृष्ट फळ मिळाले, तेव्हां तो आपण होऊनच आपल्या अंतःकरणास हृद्‍रोग उत्पन्न करून घेतो. ॥ ९ ॥


स व्राध॑तो॒ नहु॑षो॒ दंसु॑जूतः॒ शर्ध॑स्तरो न॒रां गू॒र्तश्र॑वाः ॥
विसृ॑ष्टरातिर्याति बाळ्ह॒सृत्वा॒ विश्वा॑सु पृ॒त्सु सद॒मिच्छूरः॑ ॥ १० ॥

सः व्राधतः नहुषः दंऽसुजूतः शर्धऽतरः नरां गूर्तऽश्रवाः ॥
विसृष्टऽरातिः याति बाळ्हऽसृत्वा विश्वासु पृत्ऽसु सदं इच् शूरः ॥ १० ॥

आणि इकडे तो भक्तजन अशा वेगानें पुढें सरसावतो कीं, त्याचे आश्चर्यच करीत रहावे. बलशाली पुरुषांतही तो उत्तरोत्तर बलाढ्य होत जातो व सर्व लोकांत त्याची कीर्ति अधिकाधिकच पसरत जाते. वाटेल तितका बिकट प्रसंग असो, दानतत्पर शूर भक्त, अशा प्रसंगातून केव्हांही बेधडक पार पडून जातो. ॥ १० ॥


अध॒ ग्मन्ता॒ नहु॑षो॒ हवं॑ सू॒रेः श्रोता॑ राजानो अ॒मृत॑स्य मन्द्राः ॥
न॒भो॒जुवो॒ यन्नि॑र॒वस्य॒ राधः॒ प्रश॑स्तये महि॒ना रथ॑वते ॥ ११ ॥

अध ग्मंत नहुषः हवं सूरेः श्रोत राजानः अमृतस्य मंद्राः ॥
नभःऽजुवः यत् निरवस्य राधः प्रऽशस्तये महिना रथऽवते ॥ ११ ॥

तर ह्या ऋषीच्या - ह्या भक्तजनाच्या हांकेसरशी येथें या. हे देवहो अमरत्वाचे पद भक्तांस देणें, हे अतिशय स्तुत्य कृत्य म्हणजे तुमचा हातचा मळ आहे. आकाशासही तुम्ही भेदून टाकलें आहे, तर या असहाय वीराची विनवणी ऐका व असें करा कीं याची सर्वत्र वाखाणणी होऊन ह्याचे आंगी मोठेंपणा येईल. ॥ ११ ॥


ए॒तं शर्धं॑ धाम॒ यस्य॑ सू॒रेरित्य॑वोच॒न्दश॑तयस्य॒ नंशे॑ ॥
द्यु॒म्नानि॒ येषु॑ व॒सुता॑ती रा॒रन्विश्वे॑ सन्वन्तु प्रभृ॒थेषु॒ वाज॑म् ॥ १२ ॥

एतं शर्धं धाम यस्य सूरेः इति अवोचन् दशऽतयस्य नंशे ॥
द्युम्नानि येषु वसुऽतातिः ररन् विश्वे सन्वंतु प्रऽभृथेषु वाजम् ॥ १२ ॥

ज्या भक्ताच्या यज्ञांत दहा प्रकारच्या हवीचा स्वीकार करण्यास आम्हीं येतो, त्याचें सामर्थ्य अशा तऱ्हेने अतिशय प्रबल असतें अशी भाक प्रत्यक्ष देवांनी दिलेली आहे; तर सर्व प्रकारची ओजस्विता आणि सर्व स्पृहणीय वस्तु ज्याच्या ठिकाणी प्रेमानें एकवट होतात, असे सकल देव आम्हांस यज्ञामध्यें पवित्र सामर्थ्य प्राप्त करून देवोत. ॥ १२ ॥


मन्दा॑महे॒ दश॑तयस्य धा॒सेर्द्विर्यत्पञ्च॒ बिभ्र॑तो॒ यन्त्यन्ना॑ ॥
किमि॒ष्टाश्व॑ इ॒ष्टर॑श्मिरे॒त ई॑शा॒नास॒स्तरु॑ष ऋञ्जते॒ नॄन् ॥ १३ ॥

मंदामहे दशऽतयस्य धासेः द्विः यत् पंच बिभ्रतः यंति अन्ना ॥
किं इष्टऽअश्व इष्टऽरश्मिः एते ईशानासः तरुषः ऋंजते नॄन् ॥ १३ ॥

देव एखादे वेळेस असेंही उद्‍गार काढतात कीं, " चला, हे ऋत्विज दहा प्रकारचें हविरन्न घेऊन आपल्यापुढें आले आहेत, तर त्या दशविध हवीचा आपण स्वीकार करूं या. इष्टाश्व म्हणा किंवा इष्टरश्मि म्हणा हे आमच्या भक्तांपेक्षां आणखी अधिक तें काय करतात ? लोकांवर अधिकार चालविणारे आणि यशस्वी असे हे भक्त खरोखर सर्व लोकांस भूषणप्रद आहेत ". ॥ १३ ॥


हिर॑ण्यकर्णं मणिग्रीव॒मर्ण॒स्तन्नो॒ विश्वे॑ वरिवस्यन्तु दे॒वाः ॥
अ॒र्यो गिरः॑ स॒द्य आ ज॒ग्मुषी॒रोस्राश्चा॑कन्तू॒भये॑ष्व॒स्मे ॥ १४ ॥

हिरण्यऽकर्णं मणिऽग्रीवं अर्णः तत् नः विश्वे वरिवस्यंतु देवाः ॥
अर्यः गिरः सद्य आ जग्मुषीः आ उस्राः चाकंतु उभयेषु अस्मे इति ॥ १४ ॥

कानांत सुवर्णकुंडले व गळ्यांत रत्नजडीत हार असे हे दिव्य स्वरूप आहे, त्याचा लाभ देव आम्हांस करून देवोत. आम्हां दोघांच्याही मुखांतून स्वयंस्फूर्तीनें बाहेत पडणारी स्तुतिस्तोत्रें ऐकण्यास त्या देदीपमान विभूतींस प्रेम वाटो. ॥ १४ ॥


च॒त्वारो॑ मा मश॒र्शार॑स्य॒ शिश्व॒स्त्रयो॒ राज्ञ॒ आय॑वसस्य जि॒ष्णोः ॥
रथो॑ वां मित्रावरुणा दी॒र्घाप्साः॒ स्यूम॑गभस्तिः॒ सूरो॒ नाद्यौ॑त् ॥ १५ ॥

चत्वारः मा मशर्शारस्य शिश्वः त्रयः राज्ञः आयवसस्य जिष्णोः ॥
रथः वां मित्रावरुणा दीर्घऽअप्साः स्यूमऽगभस्तिः सूरः न अद्यौत् ॥ १५ ॥

ते मशर्शाराचे चार पोरगे आणि आयवस राजा मोठा बलाढ्य, त्यांची मला त्रास देण्याची आतां काय प्राज्ञा आहे ? कारण हे मित्रावरुण हो, हा पहा, तुमचा विशाल रथ आतां दिसूं लागला आहे. त्याचे किरण सुद्धां सुखमय असून तो सूर्याप्रमाणें तेजःपुंज आहे. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२३ ( उषा सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : उषा - छंद - त्रिष्टुभ्


पृ॒थू रथो॒ दक्षि॑णाया अयो॒ज्यैनं॑ दे॒वासो॑ अ॒मृता॑सो अस्थुः ॥
कृ॒ष्णादुद् अ॑स्थाद॒र्या विहा॑या॒श्चिकि॑त्सन्ती॒ मानु॑षाय॒ क्षया॑य ॥ १ ॥

पृथुः रथः दक्षिणायाः अयोजि ऐनं देवासः अमृतासः अस्थुः ॥
कृष्णात् उत् अस्थात् अर्या विऽहायाः चिकित्संती मानुषाय क्षयाय ॥ १ ॥

ही उषा फार प्रेमळ आहे. हा पहा तिचा भव्य रथ जोडून तयार झाला आहे, व त्याच्या भोंवती हा नाशरहित तेजःपुंज तारांगण कसा चमकत आहे. ह्या काळ्याभोर काळोखांतून ही परम थोर स्वामिनी जी प्रकट झाली, त्यांत तिचा हेतू ह्या मनुष्यलोकावर प्रकाश पाडून अनुग्रह करावा इतकाच आहे. ॥ १ ॥


पूर्वा॒ विश्व॑स्मा॒द्भुव॑नादबोधि॒ जय॑न्ती॒ वाजं॑ बृह॒ती सनु॑त्री ॥
उ॒च्चा व्यख्यद्युव॒तिः पु॑न॒र्भूरोषा अ॑गन्प्रथ॒मा पू॒र्वहू॑तौ ॥ २ ॥

पूर्वा विश्वस्मात् भुवनात् अबोधि जयंती वाजं बृहती सनुत्री ॥
उच्चा वि अख्यत् युवतिः पुनःऽभूः आ उषाः अगन् प्रथमा पूर्वऽहूतौ ॥ २ ॥

सर्व जग निद्रावश असतां सर्वांच्या आधीं हीच जागी होत असते. मनच्या पवित्रपणाचे जे सामर्थ्य असतें, त्यांत हिच्यापेक्षां कोणीही वरचढ नाही. ही थोर आणि अतिशय उदार आहे. सर्वदा तरुणच असणारी ही सुंदरी पुनः पुनः जन्म घेऊन अति उंच अशा आकाशांतून जगाचें निरीक्षण करीत असते. ती ही उषा, पहा प्रथमाहुतीच्या वेळी सर्वांचे अगोदर येऊन पोहोंचली आहे. ॥ २ ॥


यद॒द्य भा॒गं वि॒भजा॑सि॒ नृभ्य॒ उषो॑ देवि मर्त्य॒त्रा सु॑जाते ॥
दे॒वो नो॒ अत्र॑ सवि॒ता दमू॑ना॒ अना॑गसो वोचति॒ सूर्या॑य ॥ ३ ॥

यत् अद्य भागं विऽभजासि नृऽभ्यः उषः देवि मर्त्यऽत्रा सुऽजाते ॥
देवः नः अत्र सविता दमूनाः अनागसः वोचति सूर्याय ॥ ३ ॥

हे देवी उषे, तूं अत्युच्च ठिकाणी जन्म घेऊन मनुष्यमात्राचें रक्षण करीत असतेस. तूं आजच्या दिवसाचा सुखदुःखाचा वांटा ज्याचा त्यास देण्याचे विचारांत आहेस, तर आमचे साठीं असा प्रयत्न कर की जो ईश्वर स्वतः आत्मसंयमी असून सर्वांस प्रेरणा करतो, त्यानें आम्हीं निष्पाप आहों, असे आज उगवत्या सूर्याला बजावून सांगावे. ॥ ३ ॥


गृ॒हंगृ॑हमह॒ना या॒त्यच्छा॑ दि॒वेदि॑वे॒ अधि॒ नामा॒ दधा॑ना ॥
सिषा॑सन्ती द्योत॒ना शश्व॒दागा॒दग्र॑मग्र॒मिद्भ॑जते॒ वसू॑नाम् ॥ ४ ॥

गृहंऽगृहं अहना याति अच्छ दिवेऽदिवे अधि नामा दधाना ॥
सिसासंती द्योतना शश्वत् आ अगात् अग्रऽमग्रं इत् भजते वसूनाम् ॥ ४ ॥

दररोज निरनिराळाच थाट करून ही प्रकाशवती उषा घरोघर भेट देण्यास जात असते. सज्जनांवर अनुग्रह करण्याविषयी फारच उत्सुक आणि सदैव तेजःपुंह अशी ही उषा पहा ! येऊन पोहोंचली आहे. जगांत यच्चावत् ज्या सुंदर वस्तु आहेत त्यांचा वरवरचा म्हणजे उत्तम उत्तम जो भोग असतो, त्यांचा आस्वाद (प्रकाशाच्या योगानें) हीच घेते. ॥ ४ ॥


भग॑स्य॒ स्वसा॒ वरु॑णस्य जा॒मिरुषः॑ सूनृते प्रथ॒मा ज॑रस्व ॥
प॒श्चा स द॑घ्या॒ यो अ॒घस्य॑ धा॒ता जये॑म॒ तं दक्षि॑णया॒ रथे॑न ॥ ५ ॥

भगस्य स्वसा वरुणस्य जामिः उषः सूनृते प्रथमा जरस्व ॥
पश्चा सः दघ्याः यः अघस्य धाता जयेम तं दक्षिणया रथेन ॥ ५ ॥

भाग्यदात्या देवाची तूं बहीण आणि वरुणाचीही पण आप्तच शोभतेस. हे उषे, सत्य आणि मनोहर स्तोत्रें म्हणण्याची स्फूर्तीही देणारी तूंच आहेस. तुझेंच वर्णन प्रथम होऊं दे. पापकर्म करणारा जो मनुष्य असेल त्यास चांगलीच ठोकर लागून तो मागच्या मागें धडपडून पडो. तूं सदाचार प्रवर्तक आहेस, म्हणून तुझ्याच सहाय्यानें आम्हीं त्यास हा हा म्हणतां पादाक्रांत करून टाकूं. ॥ ५ ॥


उदी॑रतां सू॒नृता॒ उत्पुरं॑धी॒रुद॒ग्नयः॑ शुशुचा॒नासो॑ अस्थुः ॥
स्पा॒र्हा वसू॑नि॒ तम॒साप॑गूळ्हा॒विष्कृ॑ण्वन्त्यु॒षसो॑ विभा॒तीः ॥ ६ ॥

उत् ईरतां सूनृताः उत् पुरंऽधीः उत् अग्नयः शुशुचानासः अस्थुः ॥
स्पार्हा वसूनि तमसा अपऽगूळ्हा आविः कृण्वंति उषसः विऽभातीः ॥ ६ ॥

आतां सत्यार्थपूर्ण आणि हृदयंगम स्तोत्रें गाण्यास सुरवात होऊं द्या, कारण ह्या उषःकाली वेदीवरील अग्नी प्रदीप्त झाले आहेत, आणि जगांतील आल्हादकारक संपत्ति जी अंधःकारांत आतांपर्यंत गडप होऊन पडली होती, तिला ह्या देदीप्यमान उषेनें आपल्या नजरेस पुन्हां पाडले आहे. ॥ ६ ॥


अपा॒न्यदेत्य॒भ्य१॑न्यदे॑ति॒ विषु॑रूपे॒ अह॑नी॒ सं च॑रेते ॥
प॒रि॒क्षितो॒स्तमो॑ अ॒न्या गुहा॑क॒रद्यौ॑दु॒षाः शोशु॑चता॒ रथे॑न ॥ ७ ॥

अप अन्यत् एति अभि अन्यत् एति विषुरूपे इति विषुऽरूपे अहनी इति सं चरेते इति ॥
परिऽक्षितोः तमः अन्या गुहा अकः अद्यौत् उषाः शोशुचता रथेन ॥ ७ ॥

एक दिसूं लागतांच दुसरें दृष्टिआड होते, ह्याप्रमाने ह्या वर्षरूप पुरुषाची उषा आणि रात्र हीं दोन अंगे लहान मोठी होतात, व एकामागून एक अशीं लागोपाठ फिरत असतात. हे जे वर्षाचे दोन प्रकार पृथ्वीवर अनुक्रमानें होत असतात, त्यापैकीं एक, म्हणजे रात्र, अंधःकारास कोनाकोपर्‍यांत दडवून ठेवते न ठेवते तोंच दुसरी, म्हणजे उषा, ही उज्ज्वल अशा रथांत बसून उदय पावते. ॥ ७ ॥


स॒दृशी॑र॒द्य स॒दृशी॒रिदु॒ श्वो दी॒र्घं स॑चन्ते॒ वरु॑णस्य॒ धाम॑ ॥
अ॒न॒व॒द्यास्त्रिं॒शतं॒ योज॑ना॒न्येकै॑का॒ क्रतुं॒ परि॑ यन्ति स॒द्यः ॥ ८ ॥

सऽदृशीः अद्य सऽ दृशीः इत् ऊं इति श्वः दीर्घं सचंते वरुणस्य धाम ॥
अनवद्याः त्रिंशतं योजनानि एकाऽएका क्रतुं परि यंति सद्यः ॥ ८ ॥

ह्या उषा जशा आज दिसतात तशाच त्या उद्याही दिसतील. आणि अशाच रीतीनें वरुणाच्या आकाशरूपी अवाढव्य राज्यांतून ह्या प्रवास करीत असतात. ह्यांच्यामध्यें कोणी कांही दोष काढूं म्हणेल तर अशक्य अशा त्या निष्कलंक आहेत. ह्यांच्यापैकीं, प्रत्येक उषा आकाशास तीस तीस प्रदक्षिणा करते, व अशा रीतीनें सर्वजणी आपआपलें नेमून दिलेले काम पार पाडीत असतात. ॥ ८ ॥


जा॒न॒त्यह्नः॑ प्रथ॒मस्य॒ नाम॑ शु॒क्रा कृ॒ष्णाद॑जनिष्ट श्विती॒ची ॥
ऋ॒तस्य॒ योषा॒ न मि॑नाति॒ धामाह॑रहर्निष्कृ॒तमा॒ चर॑न्ती ॥ ९ ॥

जानति अह्नः प्रथमस्य नाम शुक्रा कृष्णात् अजनिष्ट श्वितीची ॥
ऋतस्य योषा न मिनाति धाम अहःऽअहः निःऽकृतं आऽचरंती ॥ ९ ॥

नूतन वर्षारंभाचा प्रथमच दिवस आतां खास उगवणार, असें जिच्या येण्यानें समजते ती ही उषा पहा काळ्याकुट्ट अंधःकारातून शुभ्र तेजानें मंडित होऊन वर निघत आहे आणि यद्यपि आपला नेमलेला कार्यभाग संपविण्यांत रात्रंदिवस ती गर्क होऊन गेलेली असते; तरीही ती सुंदरी सूर्याचा जो पुरातन सत्यमार्ग आहे, त्याला सोडून केंसाइतकीसुद्धां बाजूस जात नाहीं. ॥ ९ ॥


क॒न्येव त॒न्वा३॑शाश॑दानाँ॒ एषि॑ देवि दे॒वमिय॑क्षमाणम् ॥
सं॒स्मय॑माना युव॒तिः पु॒रस्ता॑दा॒विर्वक्षां॑सि कृणुषे विभा॒ती ॥ १० ॥

कन्याऽइव तन्वा शाशदाना एषि देवि देवं इयक्षमाणम् ॥
संऽस्मयमाना युवतिः पुरस्तात् आविः वक्षांसि कृणुषे विऽभाती ॥ १० ॥

जिचे सर्व अवयव अगदी कसे रेखल्यासारखे भरदार आहेत, अशा एखाद्या नववधूप्रमाणें हे तेजःपुंज उषे, तू आपल्या देदीप्यमान प्रियकराकडे जात असतेस, कारण तोही तुजप्रमाणेंच उत्सुक झालेला असतो, तेव्हां गालांतल्या गालांत हसत हसत व चमकत आपल्या तारुण्याच्या भरांत तूं आपले कुचमंडल त्याच्या देखत किंचित उघडे करावेंस हे साहजिकच आहे. ॥ १० ॥


सु॒सं॒का॒शा मा॒तृमृ॑ष्टेव॒ योषा॒विस्त॒न्वं कृणुषे दृ॒शे कम् ॥
भ॒द्रा त्वमु॑षो वित॒रं व्युच्छ॒ न तत्ते॑ अ॒न्या उ॒षसो॑ नशन्त ॥ ११ ॥

सुऽसंकाशा मातृमृष्टाऽइव योषा आविः तन्वं कृणुषे दृशे कम् ॥
भद्रा त्वं उषः विऽतरं वि उच्छ न तत् ते अन्याः उषसः नशंत ॥ ११ ॥

एखाद्या तरुण सुंदरीला तिच्या आईनें न्हाऊं घालून दागदागिन्यांनी सजवावी, त्याप्रमाणे नटून आमच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठीच तूं आपलें रूप आम्हांपुढें प्रकट करीत असतेस; तर हे उषे तूं आज प्रकाशून सर्वांचे कल्याण कर, आणि आजपर्यंत पुष्कळ प्रभातसमय झाले, परंतु त्यांच्यापैकीं एकाला तरी तुझी सर आली असें कधींही होऊं देऊं नको. ॥ ११ ॥


अश्वा॑वती॒र्गोम॑तीर्वि॒श्ववा॑रा॒ यत॑माना र॒श्मिभिः॒ सूर्य॑स्य ॥
परा॑ च॒ यन्ति॒ पुन॒रा च॑ यन्ति भ॒द्रा नाम॒ वह॑माना उ॒षासः॑ ॥ १२ ॥

अश्वऽवतीः गोऽमतीः विश्वऽवाराः यतमानाः रश्मिभिः सूर्यस्य ॥
परा च यंति पुनः आ च यंति भद्रा नाम वहमानाः उषासः ॥ १२ ॥

ह्या उषांच्या अंगी चापल्य कसें अगदी ओतप्रत भरलें आहे. ह्या आपल्या प्रभेनें सूर्यकिरणांशी स्पर्धा करतां करतां गुप्त होतात व पुन्हां प्रगटही होतात. ह्याप्रमाणें अनेक मंगल स्वरूपें धारण करण्याचा यांचा क्रम चालत आतो. ॥ १२ ॥


ऋ॒तस्य॑ र॒श्मिम॑नु॒यच्छ॑माना भ॒द्रम्भ॑द्रं॒ क्रतु॑म॒स्मासु॑ धेहि ॥
उषो॑ नो अ॒द्य सु॒हवा॒ व्युच्छा॒स्मासु॒ रायो॑ म॒घव॑त्सु च स्युः ॥ १३ ॥

ऋतस्य रश्मिं अनुऽयच्छमाना भद्रंऽभद्रं क्रतुं अस्मासु धेहि ॥
उषः नः अद्य सुऽहवा वि उच्छ अस्मासु रायः मघवत्ऽसु च स्युरिति स्युः ॥ १३ ॥

सत्यस्वरूप जो सूर्य त्याच्या किरणांशी तूं एकरूप होऊन जातेस, त्याप्रमाणें आमच्या मध्येंही तुझ्या कृपेनें उत्तरोत्तर कल्याणप्रद अशी कर्तृत्वशक्ति येऊं दे. हे उषे तुझी आज आम्ही मनःपूर्वक प्रार्थना केली आहे, तर आमच्याकरितां उत्तम रीतीनें प्रकाशित हो आणि उत्कृष्ट अशी जी संपत्ति आहे तिचा लाभ, आम्ही आणि आमचे औदार्यशील यजमान, अशा दोघांसही होऊं दे. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२४ ( उषा सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : उषा - छंद - त्रिष्टुभ्


उ॒षा उ॒च्छन्ती॑ समिधा॒ने अ॒ग्ना उ॒द्यन्सूर्य॑ उर्वि॒या ज्योति॑रश्रेत् ॥
दे॒वो नो॒ अत्र॑ सवि॒ता न्वर्थं॒ प्रासा॑वीद्द्वि॒पत्प्र चतु॑ष्पदि॒त्यै ॥ १ ॥

उषाः उच्छंती संऽइधाने अग्ना उत्ऽयन् सूर्यः उर्विया ज्योतिः अश्रेत् ॥
देवः नः अत्र सविता नु अर्थं प्र असावीत् द्विऽपत् प्र चतुःऽपत् इत्यै ॥ १ ॥

आतां अग्नि प्रज्वलित झाला आहे, उषादेवी अंधःकार नाहींसा करीत असून सूर्यही उदयोन्मुख होत आहे, आणि दोघांच्याही प्रकाशानें दिशा दूरवर कोंदाटून गेल्या आहेत, अशा वेळीं सर्वत्र चैतन्य उत्पन्न करणारा जो प्रकाशमय भगवान त्यानें येथें आमच्याकरिता - मनुष्यें काय आणि पशू काय - प्रत्येकानें काम करावें म्हणून सर्वांसच झोपेंतून पुन्हां पूर्व स्थितीवर आणले आहे. ॥ १ ॥


अमि॑नती॒ दैव्या॑नि व्र॒तानि॑ प्रमिन॒ती म॑नु॒ष्या यु॒गानि॑ ॥
ई॒युषी॑णामुप॒मा शश्व॑तीनामायती॒नां प्र॑थ॒मोषा व्य् अद्यौत् ॥ २ ॥

अमिनती दैव्यानि व्रतानि प्रऽमिनती मनुष्या युगानि ॥
ईयुषीणां उपमा शश्वतीनां आऽयतीनां प्रथमा उषाः वि अद्यौत् ॥ २ ॥

ईश्वरी नियमास बाध न आणतां मनुष्यमात्राच्या आयुष्याची मर्यादा मात्र ही उषा कमी कमी करीत असते. आजपर्यंत ज्या असंख्य उषा येऊन गेल्या, त्यांच्यामध्ये नामांकित, व अजून ही ज्या पुढें येणार आहेत, त्यांच्यामध्येंही उत्कृष्ट अशी ही पहा आजची उषा उदय पावली आहे. ॥ २ ॥


ए॒षा दि॒वो दु॑हि॒ता प्रत्य॑दर्शि॒ ज्योति॒र्वसा॑ना सम॒ना पु॒रस्ता॑त् ॥
ऋ॒तस्य॒ पन्था॒मन्वे॑ति सा॒धु प्र॑जान॒तीव॒ न दिशो॑ मिनाति ॥ ३ ॥

एषा दिवः दुहिता प्रति अदर्शि ज्योतिः वसाना समना पुरऽस्तात् ॥
ऋतस्य पंथां अनु एति साधु प्रजानतीऽइव न दिशः मिनाति ॥ ३ ॥

आहा ! ही पहा आकाशकन्या उषा पूर्व दिग्भागीं पुन्हां दिसूं लागली. ही वीर स्त्री प्रकाशाचींच वस्त्रें ल्यायली असून सत्यस्वरूप सूर्यानें जो मार्ग आंखून दिला त्याच मार्गानें एखाद्या अत्यंत चतुर स्त्रीप्रमाणें जात असते, आपली दिशा कधींसुद्धां चुकत नाहीं. ॥ ३ ॥


उपो॑ अदर्शि शु॒न्ध्युवो॒ न वक्षो॑ नो॒धा इ॑वा॒विर॑कृत प्रि॒याणि॑ ॥
अ॒द्म॒सन्न स॑स॒तो बो॒धय॑न्ती शश्वत्त॒मागा॒त्पुन॑रे॒युषी॑णाम् ॥ ४ ॥

उपो इति अदर्शि शुन्ध्युवः न वक्षः नोधाःऽइव आविः अकृत प्रियाणि ॥
अद्मऽसत् न ससतः बोधयंती शश्वत्ऽतमा आ अगात् पुनः आऽईयुषीणाम् ॥ ४ ॥

हे पहा येथे तिचे जणों शुभ्र आणि उज्ज्वल वक्षस्थलच कीं काय दिसत आहे. एखादा कवी ज्याप्रमाणें कोमल अंतःकरण वृत्तींची आपणांस ओळख करून देतो त्याप्रमाणें जगांतील सौंदर्याची ओळख हिनेंच आपणांस करून दिली आहे. घरची मालकीण मुलाबाळांस उठविते, त्याप्रमाणें झोपेंत घोरत पडलेल्या सर्व विश्वाला ही जागें करीत आहे आणि आपल्यास सोडून न जातां, गेलेल्या उषांमधून पुन्हां आपणाकडे परत आली आहे. ॥ ४ ॥


पूर्वे॒ अर्धे॒ रज॑सो अ॒प्त्यस्य॒ गवां॒ जनि॑त्र्यकृत॒ प्र के॒तुम् ॥
व्यु प्रथते वित॒रं वरी॑य॒ ओभा पृ॒णन्ती॑ पि॒त्रोरु॒पस्था॑ ॥ ५ ॥

पूर्वे अर्धे रजसः अप्त्यस्य गवां जनित्रि अकृत प्र केतुम् ॥
वि ऊं इति प्रथते विऽतरं वरीयः आ उभा पृणंती पित्रोः उपऽस्था ॥ ५ ॥

बाष्प आणि धुकें ह्यांनी भरून गेलेल्या पूर्वेकडील अर्ध्या आकाशांत, प्रकाशाला प्रसविणार्‍या ह्या उषादेवीनें पहा कसा आपला ध्वज रोवून दिला आहे. त्याची प्रभा इतकी दूरवर फांकलेली आहे, कीं आईबापांच्या ज्या क्षितिजरूपी मांडीवर ही उषा बसत असते, ते सर्व क्षितीजच दोन्ही बाजूस प्रकाशानें कसे तिने घनदाट भरून टाकलें आहे. ॥ ५ ॥


ए॒वेदे॒षा पु॑रु॒तमा॑ दृ॒शे कं नाजा॑मिं॒ न परि॑ वृणक्ति जा॒मिम् ॥
अ॒रे॒पसा॑ त॒न्वा शाश॑दाना॒ नार्भा॒दीष॑ते॒ न म॒हो वि॑भा॒ती ॥ ६ ॥

एव इत् एषा पुरुऽतमा दृशे कं न अजामिं न परि वृणक्ति जामिम् ॥
अरेपसा तन्वा शाशदाना न अर्भात् ईषते न महः विभाती ॥ ६ ॥

सर्वांनी दर्शनसुख अनुभवावें अशी तर ह्या अति उदार उषेची इच्छा म्हणून ही स्वकीय असो परकीय असो कोणासही वगळित नाही. ही तेजस्वी उषा आपल्या निष्कलंक लावण्यामुळें सर्वांस स्पष्ट दिसणारी अशी आहे. ही लहानापासून थोरांपर्यंत कोणाचाही अव्हेर करीत नाही. ॥ ६ ॥


अ॒भ्रा॒तेव॑ पुं॒स ए॑ति प्रती॒ची ग॑र्ता॒रुगि॑व स॒नये॒ धना॑नाम् ॥
जा॒येव॒ पत्य॑ उश॒ती सु॒वासा॑ उ॒षा ह॒स्रेव॒ नि रि॑णीते॒ अप्सः॑ ॥ ७ ॥

अभ्राताऽइव पुंसः एति प्रतीची गर्तऽआरुगिव सनये धनानाम् ॥
जायाऽइव पत्ये उशती सुऽवासा उषाः हस्राऽइव नि रिणीते अप्सः ॥ ७ ॥

ही उषा आम्हां वीर पुरुषांसन्मुख येते तेव्हां ती राजाच्या एकुलत्या एक कन्येप्रमाणे मोठ्या थाटानें न्यायासनावर जणों काय बसून निर्णय केल्याप्रमाणे लोकांस यथान्याय भाग्यसंपत्ति वाटून देण्याकरितां येते, परंतु कधीं कधीं पतीकरितां उत्सुक होऊन वस्त्रालंकारांनी नटून सजून त्याच्याकडे निघालेल्या युवतीप्रमाणें, हिचा डौल असतो व तेव्हां ही उषा स्मित हास्य करणार्‍या बालिकेप्रमाणें आपलें सौंदर्य खुबीनें प्रकट करतें. ॥ ७ ॥


स्वसा॒ स्वस्रे॒ ज्याय॑स्यै॒ योनि॑मारै॒गपै॑त्यस्याः प्रति॒चक्ष्ये॑व ॥
व्यु॒च्छन्ती॑ र॒श्मिभिः॒ सूर्य॑स्या॒ञ्ज्यङ्क्तेष समन॒गा इ॑व॒ व्राः ॥ ८ ॥

स्वसा स्वस्रे ज्यायस्यै योनिं अरैक् अप एति अस्याः प्रतिचक्ष्यऽइव ॥
विऽउच्छंती रश्मिऽभिः सूर्यस्य अंजि अं‍क्ते समनगाःऽइव व्राः ॥ ८ ॥

धाकट्या बहिणीनें वडील बहिण दृष्टीस पडतांच तिच्याकरितां जागा मोकळी करून दिली आणि तिच्याकडे जणों काय पहात पहातच तिचा निरोप घेतला. अशा वेळेस वडील बहिण उषा हिचा, बालरवीच्या किरणांच्या बरोबरीनें असा उज्ज्वल प्रकाश पडतो कीं, जणों काय, विद्युल्लतांचा लोळच चमकून राहिला आहे. ॥ ८ ॥


आ॒साम् पूर्वा॑सा॒मह॑सु॒ स्वसॄ॑णा॒मप॑रा॒ पूर्वा॑म॒भ्येति प॒श्चात् ॥
ताः प्र॑त्न॒वन्नव्य॑सीर्नू॒नम॒स्मे रे॒वदु॑च्छन्तु सु॒दिना॑ उ॒षासः॑ ॥ ९ ॥

आसां पूर्वासां अहऽसु स्वसॄणां अपरा पूर्वां अभि एति पश्चात् ॥
ताः प्रत्नतवत् नव्यसीः नूनं अस्मे इति रेवत् उच्छंतु सुऽदिना उषसः ॥ ९ ॥

परस्परांच्या बहिणी अशा ज्या ह्या उषा आजपर्यंत येऊन गेल्या त्यामध्यें ही तऱ्हा दिसतें कीं दररोज एक येऊन जाते न जाते तोंच पुढची लागलीच ठेवलेली तर आतांही पुढील आनंदाचे दिवस दाखविणार्‍या ज्या नूतन उषा अजून यावयाच्या आहेत; त्या पूर्वींच्या उषां प्रमाणेंच आम्हांवर सद्‍भाग्याचा प्रकाश पाडोत. ॥ ९ ॥


प्र बो॑धयोषः पृण॒तो म॑घो॒न्यबु॑ध्यमानाः प॒णयः॑ ससन्तु ॥
रे॒वदु॑च्छ म॒घव॑द्भ्यो् मघोनि रे॒वत्स्तो॒त्रे सू॑नृते जा॒रय॑न्ती ॥ १० ॥

प्र बोधय उषः पृणतः मघोनि अबुध्यमानाः पणयः ससंतु ॥
रेवत् उच्छ मघवत्ऽभ्यः मघोनि रेवत् स्तोत्रे सूनृते जारयंती ॥ १० ॥

हे औदार्यशालिनी उषे, दानशूर भक्त जनांना जागृत कर, परंतु कवडीचुंबक दुष्ट मात्र जागे न होतां निरंतर घोरत पडोत. हे उदारचरिते, तूं दानशील भक्त जनांना ऐश्वर्याने प्रकाशित कर. हे उषे, सत्य व सुरस असें भाषण करण्याला स्फूर्ति तूंच देतेस. कवींना प्रेरणा करणारीही तूंच; तर आतां भगवत् स्तवन करणार्‍या भक्तांस ऐश्वर्यानें प्रकाशित कर. ॥ १० ॥


अवे॒यम॑श्वैद्युव॒तिः पु॒रस्ता॑द्यु॒ङ्क्ते गवा॑मरु॒णाना॒मनी॑कम् ॥
वि नू॒नमु॑च्छा॒दस॑ति॒ प्र के॒तुर्गृ॒हंगृ॑ह॒मुप॑ तिष्ठाते अ॒ग्निः ॥ ११ ॥

अव इयं अश्वैत् युवतिः पुरस्तात् युङ्क्ते गवां अरुणानां अनीकम् ॥
वि नूनं उच्छात् असति प्र केतुः गृहंऽगृहं उप तिष्ठाते अग्निः ॥ ११ ॥

पहा समोर ही लावण्यवती उषा आपल्या वैभवाच्या भरांत दिसूं लागली आहे. हिनें आपल्या रथास जे घोडे जोडले आहेत, तेही आरक्त किरणांचेच असतात. तिच्या तेजःपुंज पताकेचा प्रकाश ह्या आकाशाच्या तमोमय पोकळींत आतां खात्रीनें दूरवर झळकेल, आणि तत्क्षणी घरोघर अग्नीची स्तवनें सुरू होतील. ॥ ११ ॥


उत्ते॒ वय॑श्चिद्वस॒तेर॑पप्त॒न्नर॑श्च॒ ये पि॑तु॒भाजो॒ व्युष्टौ ॥
अ॒मा स॒ते व॑हसि॒ भूरि॑ वा॒ममुषो॑ देवि दा॒शुषे॒ मर्त्या॑य ॥ १२ ॥

उत् ते वयः चित् वसतेः अपप्तन् नरः च ये पितुऽभाजः विऽउष्टौ ॥
अमा सते वहसि भूरि वामं उषः देवि दाशुषे मर्त्याय ॥ १२ ॥

तुझा प्रकाश दिसूं लागतांच हे पहा पक्षिगण आपापल्या घरट्यांतून बाहेर उडून गेले, आणि पोटाच्या व्यवसायांत मग्न असणारे लोक आपापल्या उद्योगास लागले. परंतु एक दानकर्मरत सद्‍भक्त मात्र व्यर्थ यातायात न करतां आपल्या ठिकाणीं स्वस्थ असतो, तथापि त्याच्यासाठी अत्युत्कृष्ट संपत्ति तूं स्वतः विपुल घेऊन येतेस. ॥ १२ ॥


अस्तो॑ढ्वं स्तोम्या॒ ब्रह्म॑णा॒ मेऽ॑वीवृधध्वमुश॒तीरु॑षासः ॥
यु॒ष्माकं॑ देवी॒रव॑सा सनेम सह॒स्रिणं॑ च श॒तिनं॑ च॒ वाज॑म् ॥ १३ ॥

अस्तोढ्वं स्तोम्याः ब्रह्मणा मे अवीवृधध्वं उशतीः उषसः ॥
युष्माकं देवीः अवसा सनेम सहस्रिणं च शतिनं च वाजम् ॥ १३ ॥

महनीय उषांनो, ह्या माझ्या स्तोत्रानें तुमचे स्तवन यथामति झाले आहे व त्यामुळें हे प्रेमळ देवींनो, तुम्ही अतिशय संतुष्टही झाल्या आहांत. तर आतां तुमच्या प्रसादानें अशा सामर्थ्याचा लाभ होवो कीं जें शेंकडो किंवा हजारोंनाही भारी होईल. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२५ ( दान सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : स्वनय दानस्तुति - छंद - जगती, त्रिष्टुभ्


प्रा॒ता रत्न॑म् प्रात॒रित्वा॑ दधाति॒ तं चि॑कि॒त्वान्प्र॑ति॒गृह्या॒ नि ध॑त्ते ॥
तेन॑ प्र॒जां व॒र्धय॑मान॒ आयू॑ रा॒यस्पोषे॑ण सचते सु॒वीरः॑ ॥ १ ॥

प्रातरिति रत्नं प्रातःऽइत्वा दधाति तं चिकित्वान् प्रतिऽगृह्य नि धत्ते ॥
तेन प्रऽजां वर्धयमानः आयूः रायः पोषेण सचते सुऽवीरः ॥ १ ॥

पाहुण्याने अगदी पहांटेस येऊन आपल्या जवळची रत्नें सकाळी आपल्या पित्यापुढें ठेविलीं व त्यानेंही तीं निरखून पाहून त्यांचा स्वीकार केला. तेव्हां ह्या सत्पात्री केलेल्या औदार्यामुळें त्या पराक्रमी राजास भरपूर संपत्ति व दीर्घायुष्य ह्यांचा लाभ होऊन उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी समृद्धिही त्यास प्राप्त झाली. ॥ १ ॥


सु॒गुर॑सत्सुहिर॒ण्यः स्वश्वो॑ बृ॒हद॑स्मै॒ वय॒ इंद्रो॑ दधाति ॥
यस्त्वा॒यन्तं॒ वसु॑ना प्रातरित्वो मु॒क्षीज॑येव॒ पदि॑मुत्सि॒नाति॑ ॥ २ ॥

सुऽगुः असत् सुऽहिरण्यः सुऽअश्वः बृहत् अस्मै वयः इंद्रः दधाति ॥
यः त्वा आऽयंतं वसुना प्रातःऽइत्वः मुक्षीजयाऽइव पदिं उत्ऽसिनाति ॥ २ ॥

त्या राजाला ज्ञानगोधन, अक्षव्य संपत्ति आणि जातिवंत घोडेही प्राप्त होवोत. इंद्र त्याला ऐन उमेदीच्या वयांत ठेवील, कारण पाहुण्या असें पहा, कीं पारधी जसा जाळ्यात शिकार पकडतो, त्याप्रमाणें तूं आलेला पाहून त्यानें आपल्या जवळची अमोलिक संपत्ति देऊन तुला बांधून टाकले आहे. ॥ २ ॥


आय॑म॒द्य सु॒कृतं॑ प्रा॒तरि॒च्छन्नि॒ष्टेः पु॒त्रं वसु॑मता॒ रथे॑न ॥
अं॒शोः सु॒तं पा॑यय मत्स॒रस्य॑ क्ष॒यद्वी॑रं वर्धय सू॒नृता॑भिः ॥ ३ ॥

आयं अद्य सुऽकृतं प्रातःऽ इच्छन् इष्टेः पुत्रं वसुऽमता रथेन ॥
अंशोः सुतं पायय मत्सरस्य क्षयत्ऽवीरं वर्धय सूनृताभिः ॥ ३ ॥

यज्ञकर्मनिष्ठ पुरुषाच्या सच्छील पुत्राला भेटण्याकरितां आज सकाळी मी आपल्या रथांत भरपूर धन भरून घेऊन येथें आलो आहे. तर परमपुरुष ईश्वरास सोमवल्ली पिळून काढलेला आल्हाददायक रस अर्पण कर आणि शूर पुरुषांनाही ज्याचा आसरा असतो, त्या रुद्राचें सत्य आणि रसभरित स्तोत्रांनी स्तवन कर. ॥ ३ ॥


उप॑ क्षरन्ति॒ सिंध॑वो मयो॒भुव॑ ईजा॒नं च॑ य॒क्ष्यमा॑णं च धे॒नवः॑ ॥
पृ॒णन्तं॑ च॒ पपु॑रिं च श्रव॒स्यवो॑ घृ॒तस्य॒ धारा॒ उप॑ यन्ति वि॒श्वतः॑ ॥ ४ ॥

उप क्षरंति सिंधवः मयःऽभुव ईजानं च यक्ष्यमाणं च धेनवः ॥
पृणंतं च पपुरिं च श्रवस्यवः घृतस्य धाराः उप यंति विश्वतः ॥ ४ ॥

जो पुण्य पुरुष प्रत्यक्ष यज्ञ करतो, त्याच्याच केवळ नव्हे, तर यज्ञ करण्याचा नुसता हेतुही जो मनांत बाळगतो, त्यांच्याकडे सुद्धां धेनू आणि आनंदाचे पूर लोटणार्‍या महानद्या धांव घेत असतात. त्याचप्रमाणें ईश्वराला संतुष्ट करणार्‍या सत्पुरुषाकडे सुकीर्तिरूप घृताचे प्रवाहचे प्रवाह चोहोंकडून वहात येतात. ॥ ४ ॥


नाक॑स्य पृ॒ष्ठे अधि॑ तिष्ठति श्रि॒तो यः पृ॒णाति॒ स ह॑ दे॒वेषु॑ गच्छति ॥
तस्मा॒ आपो॑ घृ॒तम॑र्षन्ति॒ सिंध॑व॒स्तस्मा॑ इ॒यं दक्षि॑णा पिन्वते॒ सदा॑ ॥ ५ ॥

नाकस्य पृष्ठे अधि तिष्ठति श्रितः यः पृणाति सः ह देवेषु गच्छति ॥
तस्मै आपः घृतं अर्षंति सिंधवः तस्मै इयं दक्षिणा पिन्वते सदा ॥ ५ ॥

जो कोणी दान धर्मानें ईश्वरास संतुष्ट करतो तो स्वर्गाच्या शिखरावर चढून जाऊन तेथेंच राहतो. त्याचा देवांच्या मंडळात प्रवेश होतो. त्याच्याचकडे स्वर्गांतील व पृथ्वीवरील नद्या घृताचे लोट वाहून नेतात. आणि त्याच्याकरितां ही सुपीक धरित्री समृद्धीनें ओतप्रोत भरून जाते. ॥ ५ ॥


दक्षि॑णावता॒मिदि॒मानि॑ चि॒त्रा दक्षि॑णावतां दि॒वि सूर्या॑सः ॥
दक्षि॑णावन्तो अ॒मृतं॑ भजन्ते॒ दक्षि॑णावन्तः॒ प्र ति॑रन्त॒ आयुः॑ ॥ ६ ॥

दक्षिणाऽवतां इत् इमानि चित्रा दक्षिणाऽवतां दिवि सूर्यासः ॥
दक्षिणाऽवंतः अमृतं भजंते दक्षिणाऽवंतः प्र तिरंते आयुः ॥ ६ ॥

जे दानशाली आहेत, त्यांच्याच करितां ही जगांतील अमोलिक संपत्ति असते. दानशाली लोकंकरितांच आकाशांत सूर्य व तारे प्रकाशतात. दानशाली लोकांनाच अविनाशी पद मिळते आणि दानशाली लोकच आपले व दुसर्‍यांचे आयुष्य वाढवूं शकतात. ॥ ६ ॥


मा पृ॒णन्तो॒ दुरि॑त॒मेन॒ आर॒न्मा जा॑रिषुः सू॒रयः॑ सुव्र॒तासः॑ ॥
अ॒न्यस्तेषां॑ परि॒धिर॑स्तु॒ कश्चि॒दपृ॑णन्तम॒भि सं य॑न्तु॒ शोकाः॑ ॥ ७ ॥

मा पृणंतः दुःऽइतं एन आ अरन् मा जारिषुः सूरयः सुऽव्रतासः ॥
अन्यः तेषां परिऽधिः अस्तु कः चित् अपृणंतं अभि सं यंतु शोकाः ॥ ७ ॥

दानधर्मानें ईश्वरास संतुष्ट करणारे लोक कधींही दुःखांत आणि पातकांत न पडोत. सदाचाररत ज्ञानी कधींही वार्धक्यानें दुर्बल न होवोत. वाटेल तो मनुष्य त्यांचा साहाय्यकर्ता होईल आणि सर्व दुःखदायक प्रसंग कंजुष माणसांवर कोसळतील. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२६ (स्वनय दानस्तुति सूक्त )

ऋषि : कक्षीवत् औशिज - देवता : स्वनय दानस्तुति - छंद - जगती, त्रिष्टुभ्


अम॑न्दा॒न् स्तोमा॒न्प्रभ॑रे मनी॒षा सिन्धा॒वधि॑ क्षिय॒तः भा॒व्यस्य॑ ।
यः मे॑ स॒हस्रं॒ अमि॑मीत स॒वान॒तूर्तः॒ राजा॒ श्रव॑ इ॒च्छमा॑नः ॥ १ ॥

अमंदान् स्तोमान् प्र भरे मनीषा सिंधौ अधि क्षियतः भाव्यस्य ॥
यः मे सहस्रं अमिमीत सवान् अतूर्तः राजा श्रवः इच्छमानः ॥ १ ॥

मी भाव्य राजाची जी मनःपूर्वक प्रशंसा करीत आहे, ती सामान्य नव्हे. हा भाव्य, सिंधु देशाचा राजा ह्यानेंच मजकरितां हजारों यज्ञ केले. हा राजा अजिंक्य असून सत्कर्मोत्सुकही आहे. ॥ १ ॥


श॒तं राज्ञो नाध॑मानस्य नि॒ष्कान् श॒तमश्वा॒न्प्रय॑तान्स॒द्य आद॑म् ।
श॒तं क॒क्षीवाँ॒ असु॑रस्य॒ गोनां॑ दि॒वि श्रवोऽ॒जर॒मा त॑तान ॥ २ ॥

शतं राज्ञः नाधमानस्य निष्कान् शतं अश्वान् प्रऽयतान् सद्यः आदम् ॥
शतं कक्षीवान् असुरस्य गोनां दिवि श्रवः अजरं आ ततान ॥ २ ॥

त्याने आग्रह केल्यामुळे शेंकडों सुवर्ण निष्क, शेंकडों कुमाईत घोडे ह्यांचा मी ताबडतोब स्वीकार केला. मज कक्षिवानाला त्या पराक्रमी राजापासून शेंकडों गाई मिळाल्या. आणि मी त्याची अखंड कीर्ति स्वर्गापर्यंत पसरविली. ॥ २ ॥


उप॑ मा श्या॒वाः स्व॒नये॑न द॒त्ता व॒धूम॑न्तो॒ दश॒ रथा॑सो अस्थुः ।
ष॒ष्टिः स॒हस्र॒मनु॒ गव्य॒मागा॒त्सन॑त्क॒क्षीवाँ॑ अभिपि॒त्वे अह्ना॑म् ॥ ३ ॥

उप मा श्यावाः स्वनयेन दत्ता वधूमंतः दश रथासः अस्थुः ॥
षष्टिः सहस्रं अनु गव्यं आ अगात् सनत् कक्षीवान् अभिऽपित्वे अह्नाम् ॥ ३ ॥

ह्या वेळेस स्वनय राजाने दिलेले दहा रथ मजजवळ होते, त्यांस काळेभोर घोडे जोडले असून रथांत माझ्या नूतन विवाहित पत्नी बसल्या होत्या, व त्यांच्यामागें साठ हजार गाईंचे खिल्लार चाललें होतें. ही सर्व देणगी मला कक्षिवानाला आदल्या दिवशी संध्याकाळीं मिळाली. ॥ ३ ॥


च॒त्वा॒रिं॒शद्दश॑रथस्य॒ शोणाः॑ स॒हस्र॒स्याग्रे॒ श्रेणिं॑ नयन्ति ।
म॒द॒च्युतः॑ कृश॒नाव॑तो॒ अत्या॑न्क॒क्षीव॑न्त॒ उद॑मृक्षन्त प॒ज्राः ॥ ४ ॥

चत्वारिंशत् दशऽरथस्य शोणाः सहस्रस्य अग्रे श्रेणिं नयंति ॥
मदऽच्युतः कृशनऽवतः अत्यान् कक्षीवंतः उत् अमृक्षंत पज्राः ॥ ४ ॥

ह्या दहा रथांच्या बरोबर एक हजार शिपाई चालले होते. आणि त्यांच्यापुढें चाळीस अबलख घोड्यांची विनी होती. हे घोडे अगदी मस्त असल्यामुळें झुलत चाललें होते व त्यांच्या आंगावर सोन्यामोत्यांचे साज असून कक्षिवानाच्या व त्याच्या भाऊबंदांच्या नोकरांनींच ह्या घोड्यास मालीश करून तयार केलें होतें. ॥ ४ ॥


पूर्वा॒मनु॒ प्रय॑ति॒माद॑दे व॒स्त्रीन्यु॒क्ताँ अ॒ष्टाव॒रिधा॑यसो॒ गाः ।
सु॒बन्ध॑वः॒ ये वि॒श्या इव॒ व्रा अन॑स्वन्तः॒ श्रव॒ ऐष॑न्त प॒ज्राः ॥ ५ ॥

पूर्वां अनु प्रऽयतिं आ ददे वऽ त्रीन् युक्तान् अष्टौ अरिऽधायसः गाः ॥
सुऽबंधवः ये विश्याःऽइव व्राः अनस्वंतः श्रवः ऐषंत पज्राः ॥ ५ ॥

पहिलीचा स्वीकार केल्यानंतर लागलीच तुमचेकडून मला तीन आणि आठ मिळून गाड्यांस जोडलेल्या अकरा बैलांची दुसरी देणगी मिळाली. हे बैल असे तयार होते कीं, ते राजाच्याच वाड्यांत असणें योग्य. बाबानों, एकाच कुटुंबांतील माणसांप्रमाणे तुमचा एकमेकांशी सलोखा आहे, परंतु आम्ही पज्राचे वंशजही अस्सलच आहोंत व आम्ही सत्कार्याचीच आस धरलेली आहे. ॥ ५ ॥


आग॑धिता॒ परि॑गधिता॒ या क॑शी॒केव॒ जङ्ग्॑हे ।
ददा॑ति॒ मह्यं॒ यादु॑री॒ याशू॑नां भो॒ज्या श॒ता ॥ ६ ॥

आऽगधिता परिऽगधिता या कशीकाऽइव जंगहे ॥
ददाति मह्यं यादुरी याशूनां भोज्या शता ॥ ६ ॥

सर्वांगित आलिंगनानें जी एखाद्या लतेप्रमाणे माझे शरीरास वेष्टून राहते ती ही तरुणी प्रेमरसानें पूर्ण आणि सर्व सौख्यदायिनी असल्यामुळे मला शेंकडों प्रकारांनी आनंदवीत आहे. ॥ ६ ॥


उपो॑प मे॒ परा॑ मृश॒ मा मे॑ द॒भ्राणि॑ मन्यथाः ।
सर्वा॒हं अ॑स्मि रोम॒शा ग॒न्धारी॑णामिवावि॒का ॥ ७ ॥

उपऽउप मे परा मृश मा मे दभ्राणि मन्यथाः ॥
सर्वा अहं अस्मि रोमशा गंधारीणांऽइव अविका ॥ ७ ॥

ये, अगदी जवळ ये. मला स्पर्श कर. असें समजूं नकोस कीं मी अजून लहानच आहे. पहा, गंधार देशांतील मेंढी जशी ताजीतवानी व तुंद दिसते तशी सर्वतोपरी मीही पण दिसत आहे. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२७ (अग्नि सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : अग्नि - छंद - अत्यष्टी


अ॒ग्निं होता॑रं मन्ये॒ दास्व॑न्तं॒ वसुं॑ सू॒नुं सह॑सः जा॒तवे॑दसं॒ विप्रं॒ न जा॒तवे॑दसम् ।
य ऊ॒र्ध्वया॑ स्वध्व॒रो दे॒वो दे॒वाच्या॑ कृ॒पा ।
घृ॒तस्य॒ विभ्रा॑ष्टि॒मनु॑ वष्टि शो॒चिषा॒जुह्वा॑नस्य स॒र्पिषः॑ ॥ १ ॥

अग्निं होतारं मन्ये दास्वन्तं वसुं सूनुं सहसः जातऽवेदसं विप्रं न जातवेदसम् ॥
य ऊर्ध्वया सुऽअध्वरः देवः देवाच्या कृपा ॥
घृतस्य विऽभ्राष्टिं अनुं वष्टि शोचिषा आऽजुह्वानस्य सर्पिषः ॥ १ ॥

माझे चित्त अग्नीच्या ठिकाणी आहे. हाच यज्ञांतील होता होय. हा अतिशय उदार. हा संपत्तीचा निधि आणि दुर्बलांस धैर्य देणारा आहे. जसा विद्वान ब्राह्मण आपल्या शास्त्रांत पारंगत असतो, तशी ह्याला या सृष्टीची खडान्‍खडा माहिती आहे. हाच भगवंत आमचा यज्ञ उत्तम रीतीनें तडीस नेतो. ह्याची कृपा उदात्त आणि त्याच्या देवपणास साजेशी आहे. आहुती देण्याकरितां तयार केलेल्या घृताची आणि नवनीताची स्वच्छता व लकाकी आपल्यास फार आवडते असें हा आपल्या ज्वालांनी दर्शवितो. ॥ १ ॥


यजि॑ष्ठं त्वा॒ यज॑माना हुवेम॒ ज्येष्ठ॒मङ्गि॑ रसां विप्र॒ मन्म॑भि॒र्विप्रे॑भिः शुक्र॒ मन्म॑भिः ।
परि॑ज्मानमिव॒ द्यां होता॑रं चर्षणी॒नाम् ।
शो॒चिष्के॑शं॒ वृष॑णं॒ यमि॒मा विशः॒ प्राव॑न्तु जू॒तये॒ विशः॑ ॥ २ ॥

यजिष्ठं त्वा यजमानाः हुवेम ज्येष्ठं अङ्‌गिरसां विप्र मन्मभिः विप्रेभिः शुक्र मन्मऽभिः ॥
परिज्मानंऽइव द्यां होतारं चर्षणीनाम् ॥
शोचिःऽकेशं वृषणं यं इमा विशः प्र अवंतु जूतये विशः ॥ २ ॥

तूं अत्यंत पूज्य व अंगिरसांमध्यें अत्यंत श्रेष्ठ आहेस. तुझ्या प्रित्यर्थ हे सर्वज्ञ अग्निदेवा आम्हीं तुझे सेवक एकाग्र मनानें हवन करीत आहों. हे तेजोनिधे, विद्वान ब्राह्मणांसहित सुंदर स्तोत्रांनी तुला आळवीत आहोंत. तूं आकाशाला विद्युत्‍रूपाने जणूं काय वेढाच देत असतोस. सर्व मानवांचा तूं आचार्य असून वीर्यशाली आहेस. प्रदीप्त ज्वाळा हेच तुझे केश; अशा तुजला सर्व जग, सर्व लोक उच्च मनोवृत्ति प्राप्त व्हावी म्हणून शरणांगत असोत. ॥ २ ॥


सः हि पु॒रू चि॒दोज॑सा वि॒रुक्म॑ता॒ दीद्या॑नो॒ भव॑ति द्रुहंत॒रः प॑र॒शुर्न द्रु॑हंत॒रः ।
वी॒ळु चि॒द्यस्य॒ समृ॑तौ॒ श्रुव॒द्वेने॑व॒ यत्‌स्थि॒रम् ।
निः॒षह॑माणो यमते॒ नाय॑ते धन्वा॒सहा॒ नाय॑ते ॥ ३ ॥

सः हि पुरु चित् ओजसा विरुक्मता दीद्यानः भवति द्रुहंऽतरः परशुः न द्रुहंऽतरः ॥
वीळु चित् यस्य संऽऋतौ श्रुवत् वनाऽइव यत् स्थिरम् ॥
निःसहमानः यमते न अयते धन्वऽसहा न अयते ॥ ३ ॥

खरोखर आपल्या झगझगीत शस्त्राच्या योगनें हा अग्नि अतिशय उज्वल दिसतो, आणि आपल्या दिव्य प्रभावानें दुर्जनांचा असा नायनाट करतो कीं, जणों काय शत्रूचें निर्दालन करणारा फरशूच. त्याचा स्पर्श होण्याबरोबर कसाही कठीण पदार्थ असो पार वितळून जातो, किंवा कसाही कडक पदार्थ असो, जंगलांप्रमाणे होरपळून जातो. ह्याला कोणीही विरोध करूं शकत नाही. एकदां ठाकून उभा राहिला कीं मागें फिरण्याची गोष्टच नको. मोठमोठ्या धनुर्धरांपुढें सुद्धा तो हार खात नाहीं ॥ ३ ॥


दृ॒ळ्हा चि॑दस्मा॒ अनु॑ दु॒र्यथा॑ वि॒दे तेजि॑ष्ठाभिर॒रणि॑भिर्दा॒ष्ट्यव॑सेऽ॒ग्नये॑ दा॒ष्ट्यव॑से ।
प्र यः पु॒रूणि॒ गाह॑ते॒ तक्ष॒द्वशने॑व शो॒चिषा॑ ।
स्थि॒रा चि॒दन्ना॒ नि रि॑णा॒त्योज॑सा॒ नि स्थि॒राणि॑ चि॒दोज॑सा ॥ ४ ॥

दृळ्हा चित् अस्मै अनु दुः यथा विदे तेजिष्ठाभिः अरणिऽभिः दाष्टि अवसे अग्नये दाष्टि अवसे ॥
प्र यः पुरूणि गाहते तक्षत् वनाऽइव शोचिषा ॥
स्थिरा चित् अन्ना नि रिणाति ओजसा नि स्थिराणि चित् ओजसा ॥ ४ ॥

ह्याला कडक पदार्थांची आहुति देत असतात हें सर्वांस माहीत आहेच व म्हणून प्रज्वलित झालेल्या अरणींच्या योगानें यजमान त्याचा प्रसाद प्राप्त करून घेण्यांकरितां हवन करतो, त्याचें साहाय्य मिळावें म्हणूनही हवन करतो. आपल्या ज्वाळांच्या सपाट्यानें तो अरण्यांची अरण्यें फस्त करतो त्याचप्रमाणेंच पदार्थ कितीही पुष्कळ असोत त्यांच्या आंत तो शिरतो, आणि आपल्या अद्‍भुत सामर्थ्यानें कठीण कठीण धान्यें पक्व दशेस आणतो व उष्णतेनें अतिशय घट्ट पदार्थांचेही पाणी करून टाकतो. ॥ ४ ॥


तम॑स्य पृ॒क्षमुप॑रासु धीमहि॒ नक्तं॒ यः सु॒दर्श॑तरो॒ दिवा॑तरा॒दप्रा॑युषे॒ दिवा॑तरात् ।
आद॒स्यायु॒र्ग्रभ॑णवद्वी॒ळु शर्म॒ न सू॒नवे॑ ।
भ॒क्तमभ॑क्त॒मवो॒ व्यन्तो॑ अ॒जरा॑ अ॒ग्नयो॒ व्यन्तो॑ अ॒जराः॑ ॥ ५ ॥

तं अस्य पृक्षं उपरासु धीमहि नक्तं यः सुदर्शऽतरो दिवाऽतरात् अप्रऽआयुषे दिवाऽतरात् ॥
आत् अस्य आयुः ग्रभणऽवत् वीळु शर्म न सूनवे ॥
भक्तं अभक्तं अवो व्यंतः अजराः अग्नयः व्यंतः अजराः ॥ ५ ॥

हा दिवसापेक्षां रात्री विशेषच मनोहर दिसतो. दिवसगतीनें आंगांतील जोम कधींही नाहींसा होणार नाही असें आयुष्य आपल्यास असावें म्हणून आपण वेदीजवळ त्याच्या त्या सामर्थ्याचें चिंतन करूं या. बापाची कीर्ति जशी मुलाला, तसेंच ह्या अग्नीचें चित् सामर्थ्य, हाच यजमानाचा सर्वस्वी आधार. वेदीजवळ अग्नीची रूपें - जीं केव्हांही नष्ट होत नाहींत किंवा हीन होत नाहींत -नेहमी जशींच्या तशींच सतेज असतात तींच आमचे आतांचे व पुढें मिळणारे असें सर्व प्रकारचें सहाय्य होय. ॥ ५ ॥


सः हि शर्धो॒ न मारु॑तं तुवि॒ष्वणि॒रप्न॑स्वतीषू॒र्वरा॑स्वि॒ष्टनि॒रार्त॑नास्वि॒ष्टनिः॑ ।
आद॑द्ध॒व्यान्या॑द॒दिर्य॒ज्ञस्य॑ के॒तुर॒र्हणा॑ ।
अध॑ स्मास्य॒ हर्ष॑तो॒ हृषी॑वतो॒ विश्वे॑ जुषन्त॒ पन्थां॑ नरः॑ शु॒भे न पन्था॑म् ॥ ६ ॥

सः हि शर्धः न मारुतं तुविऽस्वनिः अप्नस्वतीषु उर्वरासु इष्टनिः आर्तनासु इष्टनिः ॥
आदत् हव्यानि आऽददिः यज्ञस्य केतुः अर्हणा ॥
अध स्म अस्य हर्षतः हृषीवतः विश्वे जुषण्त पंथां । नरः शुभे न पंथाम् ॥ ६ ॥

उत्तम सुपीक जमीनीवरून सपाट्यानें जातांना अगर शत्रु सैन्यांत आवेशानें घुसतांना तो वार्‍याच्या सोसाट्याप्रमाणें भयंकर शब्द करतो. हा हविर्भोक्ता अग्नि यज्ञाचा उज्वल ध्वज आहे, व ह्यानें आमच्या हवींचा यथासांग स्वीकार केल आहे. हा स्वतः आनंदरूप असून दुसर्‍यांनाही आनंद देतो, तर हाच मार्ग खर्‍या कल्याणाचा, अशा श्रद्धेनें ह्याच्या सेवेचा मार्ग सर्व लोकांनी पत्करला आहे. ॥ ६ ॥


द्वि॒ता यतीं॑ की॒स्तासो॑ अ॒भिद्य॑वो नम॒स्यन्त॑ उप॒वोच॑न्त॒ भृग॑वो म॒थ्नन्तः॑ दा॒शा भृग॑वः ।
अ॒ग्निरी॑शे॒ वसू॑नां॒ शुचि॒र्यो ध॒र्णिरे॑षाम् ।
प्रि॒याँ अ॑पि॒धीँर्व॑निषीष्ट॒ मेधि॑र॒ आ व॑निषीष्ट॒ मेधि॑रः ॥ ७ ॥

द्विता यत् ईं कीस्तासः अभिद्यवः नमस्यंतः उपऽवोचंत भृगवः मथ्नंतः दाशा भृगवः ॥
अग्निः ईशे वसूनां शुचिः यः धर्णिः एषाम् ॥
प्रियाँ अपिऽधीन् वनिषीष्ट मेधिरः आ वनिषीष्ट मेधिरः ॥ ७ ॥

महाकवि जो भृगू त्यांनी आकाशामध्यें दृष्टि स्थिर करून नमस्कारपूर्वक ज्या अग्नीचें दोन प्रकारांनी स्तवन केलें - ह्या भृगूंनी अत्यंत लीन होऊन ज्याचें अरणींतून मंथन केलें असा हा अग्नि सर्व स्पृहणीय संपत्तीचा प्रभु होय. हा अत्य्ंत पवित्र म्हणूनच त्य संपत्तींना हा आपल्या स्वाधीन ठेवूं शकतो. आमचे हविर्भाग याला प्रिय आहेत, म्हणून हा प्रज्ञावान अग्नि त्या हवींचा प्रेमानें स्वीकार करतो. हा अग्नि, हा परमात्मा आमच्या हविर्दानानें प्रसन्न होवो. ॥ ७ ॥


विश्वा॑सां त्वा वि॒शां पतिं॑ हवामहे॒ सर्वा॑सां समा॒नं दम्प॑तिं भु॒जे स॒त्यगि॑र्वाहसं भु॒जे ।
अति॑थिं॒ मानु॑षाणां पि॒तुर्न यस्या॑स॒या ।
अ॒मी च॒ विश्वे॑ अ॒मृता॑स॒ आ वयो॑ ह॒व्या दे॒वेष्वा वयः॑ ॥ ८ ॥

विश्वासां त्वा विशां पतिं हवामहे सर्वासां समानं दऽंपतिं भुजे सत्यऽगिर्वाहसं भुजे ॥
अतिथिं मानुषाणां पितुः न यस्य आसया ॥
अमी इति च विश्वे अमृतासः आ वयः हव्या देवेषु आ वयः ॥ ८ ॥

तूं सकल जनांचा प्रभु आहेस. सर्वांचे मिळून एकच कुलदैवत आहे तें तूंच. आम्हीं आपल्या कल्याणार्थ, आम्हीं आपल्या हितार्थ तुला हाक मारीत आहों. आम्हीं मनःपूर्वक केलेल्या प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोंचविणाराही तूंच. तूं सर्व मनुष्यमात्राचा महनीय अतिथीच आहेस. बापाच्या नजरेखाली असल्यामुळें तुझ्या छायेखाली असल्यामुळें, हे सर्व अमर देव नेहमी ऐन तारुण्यात राहतात. आणि तुझ्याच द्वारें ऋत्विज हे देवांच्या ठिकाणी हविर्भाग पोहोंचता करीत असतात. ॥ ८ ॥


त्वम॑ग्ने॒ सह॑सा॒ सह॑न्तमः शु॒ष्मिन्त॑मो जायसे दे॒वता॑तये र॒यिर्न दे॒वता॑तये ।
शु॒ष्मिन्त॑मो॒ हि ते॒ मदो॑ द्यु॒म्निन्त॑म उ॒त क्रतुः॑ ।
अध॑ स्मा ते॒ परि॑ चरन्त्यजर श्रुष्टी॒वानो॒ नाज॑र ॥ ९ ॥

त्वं अग्ने सहसा सहन्ऽतमः शुष्मिन्ऽतमः जायसे देवऽतातये रयिः न देवऽतातये ॥
शुष्मिन्ऽतमः हि ते मदः द्युम्निन्ऽतम उत क्रतुः ॥
अध स्म ते परि चरंति अजर श्रुष्टीऽवानः न अजर ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, तूं अत्यंत प्रतापी असून तुझ्या दैवी प्रभावामुळें तुझे सामर्थ्य पूर्णपणें अप्रतिहत आहे. देवाची प्रार्थना आम्हास करता यावी म्हणूनच तूं प्रकट होत असतोस. संसारांत जशी संपत्ति तशी देवाच्या सेवेकरितां तुझीच आवश्यकता आहे. तुझा आनंद निरतिशय आणि तुझा पराक्रम अत्यंत प्रखर असतो. हे अग्निदेवा, तुला कधींच वार्धक्य येत नाहीं, आणि म्हणूनच सर्व वस्तु तुझ्याच सेवेस तत्पर असतात व, हे अक्षय्य अग्ने, एखाद्या नोकराप्रमाणें तुझ्याच आज्ञेंत वागतात. ॥ ९ ॥


प्र वो॑ म॒हे सह॑सा॒ सह॑स्वत उष॒र्बुधे॑ पशु॒षे नाग्नये॒ स्तोमो॑ बभूत्व॒ग्नये॑ ।
प्रति॒ यतीं॑ ह॒विष्मा॒न्विश्वा॑सु॒ क्षासु॒ जोगु॑वे ।
अग्रे॑ रे॒भो न ज॑रत ऋषू॒णां जूर्णि॒र्होत॑ ऋषू॒णाम् ॥ १० ॥

प्र वः महे सहसा सहस्वते उषःऽबुधे पशुऽसे न अग्नये स्तोमः बभूतु अग्नये ॥
प्रति यत् ईं हविष्मान् विश्वासु क्षासु जोगुवे ॥
अग्रे रेभः न जरते ऋषूणां जूर्णिः होत ऋषूणाम् ॥ १० ॥

हा महा थोर, आणि स्वसामर्थ्यामुळें तेजस्वी आहे. एखाद्या गोपालकाप्रमाणें हा अरुणोदयापूर्वींच जागृत होत असतो. तर अशा अग्नीचें, अशा ह्या अग्निदेवाचें चित्त ह्या तुमच्या स्तवनानें वेधून जावो. हातात हवि घेऊन यजमान ह्या अग्नीचे गुणानुवाद गात असतांना सर्व पृथ्वीवर दृष्टीस पडतात. राजे लोकांपुढे बंदिजन जसा पोवाडे गात असतो त्याप्रमाणें बुद्धिमान ऋत्विज सर्व देवतांपुढें ह्या अग्नीचें यशोवर्णन करीत असतो. ॥ १० ॥


स नो॒ नेदि॑ष्ठं॒ ददृ॑शान॒ आ भ॒राग्ने॑ दे॒वेभिः॒ सच॑नाः सुचे॒तुना॑ म॒हो रा॒यः सु॑चे॒तुना॑ ।
महि॑ शविष्ठ नस्कृधि सं॒चक्षे॑ भु॒जे अ॒स्यै ।
महि॑ स्तो॒तृभ्यो॑ मघवन्सु॒वीर्यं॒ मथी॑रु॒ग्रो न शव॑सा ॥ ११ ॥

सः नः नेदिष्ठं ददृशानः आ भर अग्ने देवेभिः सऽचनाः सुऽचेतुना महः रायः सुऽचेतुना ॥
महि शविष्ठ नः कृधि संऽचक्षे भुजे अस्यै ॥
महि स्तोतृऽभ्यः मघऽवन् सुऽवीर्यं मथीः उग्रः न शवसा ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, तूं आमच्या अगदीं जवळ प्रकट होतोस तेव्हां कृपाळूपणानें इतर देवांप्रमाणें प्रसन्न होऊन, अत्यंत विशुद्ध संपत्ति दयार्द्र अंतःकरणानें आम्हांस दे. हे सर्वसमर्थ अग्ने असें कर कीं, उदात्त तत्व कोणतें तें आम्हांस कळेल, आणि ह्या पृथ्वीचा उपभोग आम्हांस मिळेल. सर्वांचा नाश करशील कीं काय अशा तऱ्हेचा भयंकर तूं आपल्या प्रतापामुळें दिसतोस, परंतु हे उदारचरिता, तुझें स्तवन करणारांस तूं उत्कृष्ट प्रतीचें शौर्य देतोस. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२८ (अग्नि सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : अग्नि - छंद - अत्यष्टी


अ॒यं जा॑यत॒ मनु॑षो॒ धरी॑मणि॒ होता॒ यजि॑ष्ठ उ॒शिजा॒मनु॑ व्र॒तम॒ग्निः स्वमनु॑ व्र॒तम् ।
वि॒श्वश्रु॑ष्टिः सखीय॒ते र॒यिरि॑व श्रवस्य॒ते ।
अद॑ब्धो॒ होता॒ नि ष॑ददि॒ळस्प॒दे परि॑वीत इ॒ळस्प॒दे ॥ १ ॥

अयं जायत मनुषः धरीमणि होता यजिष्ठः उशिजां अनु व्रतं अग्निः स्वं अनु व्रतम् ॥
विश्वऽश्रुष्टिः सखीऽयते रयिःऽइव श्रवस्यते ॥
अदब्धः होता नि सदत् इळः पदे परिऽवीतः इळः पदे ॥ १ ॥

उशिजेच्या पुत्रांनी केलेल्या तपामुळें मनूच्या पुरातन वेदीवर, हा अत्यंत माननीय अग्नि, हा आचार्य, आपल्या स्वतःच्या प्रतिज्ञेस अनुसरून प्रकट झाला आहे. ह्याचा सहवास निरंतर असावा अशी इच्छा करणार्‍या भक्तजनांस हा सर्व प्रकारचें साहाय्य करतो. पुण्यकर्मे करण्याची लालसा बाळगणारांस तर हा जणूं काय अमुल्य ठेवा आहे. ज्याला पराजय कसा तो माहीत सुद्धां नाही, असा हा आचार्य ह्या वेदीवर अधिष्ठित झाला आहे - आपल्या परिवारासह या पृथीवर अवतीर्ण झाला आहे. ॥ १ ॥


तं य॑ज्ञ॒साध॒मपि॑ वातयामस्यृ॒तस्य॑ प॒था नम॑सा ह॒विष्म॑ता दे॒वता॑ता ह॒विष्म॑ता ।
स न॑ ऊ॒र्जामु॒पाभृ॑त्य॒या कृ॒पा न जू॑र्यति ।
यं मा॑त॒रिश्वा॒ मन॑वे परा॒वतो॑ दे॒वं भाः प॑रा॒वतः॑ ॥ २ ॥

तं यज्ञऽसाधं अपि वातयामसि ऋतस्य पथा नमसा हविष्मता देवऽताता हविष्मता ॥
सः नः ऊर्जां उपऽआभृति अया कृपा न जूर्यति ॥
यं मातरिश्वा मनवे पराऽवतः देवं भारिति भाः पराऽवतः ॥ २ ॥

यज्ञ यथासांग तडीस नेणारा तोच, म्हणून त्या अग्नीची आम्हीं भक्तिभावानें आराधना करतो, व ती आराधना सत्य धर्माच्या मार्गाप्रमाणें नमस्कार करून आणि देवाचें ध्यान करीत असतांना प्रथम आहुति देऊन करीत असतो. हा एवढा कनवाळू, म्हणूनच दैवी तेजाची प्राप्ति आम्हांस सुलभ करण्याच्या कामीं कधींही कंटाळा करीत नाहीं. अशा या देदीप्यमान अग्नीला, मातरिश्वा नांवाचा एक ऋषि होऊन गेला त्यानें पुरातन काळीं मनूकरितां म्हणून देवलोकांतून पृथ्वीवर आणले. ॥ २ ॥


एवे॑न स॒द्यः पर्ये॑ति॒ पार्थि॑वं मुहु॒र्गी रेतो॑ वृष॒भः कनि॑क्रद॒द्दध॒द्रेतः॒ कनि॑क्रदत् ।
श॒तं चक्षा॑णो अ॒क्षभि॑र्दे॒वो वने॑षु तु॒र्वणिः॑ ।
सदो॒ दधा॑न॒ उप॑रेषु॒ सानु॑ष्व॒ग्निः परे॑षु॒ सानु॑षु ॥ ३ ॥

एवेन सद्यः परि एति पार्थिवं मुहुःऽगी रेतः वृषभः कनिक्रदत् दधत् रेतः कनिक्रदत् ॥
शतं चक्षाणः अक्षऽभिः देवः वनेषु तुर्वणिः ॥
सदः दधानः उपरेषु सानुषु अग्निः परेषु सानुषु ॥ ३ ॥

ज्याचें स्तवन वारंवार होत असतें व जो प्रचंडघोष करून इच्छित वस्तूची वृष्टि करतो, असा हा अग्नि पृथ्विला सफल करणार्‍या मेघजलास एकाच फेर्‍यानें एकदम वळसा घालतो, आणि पुनः गर्जना करून जलवृष्टि करतो. आपल्या शेंकडो डोळ्यांनी सर्व जगत् न्याहाळून पहात पहात व मेघरूप अरण्यांत धुमाकूळ घालीत हा अग्नि जवळच्या गिरिशिखरावर व तसेंच दूरच्याही पर्वतांच्या शिखरांवर उतरून विश्रांती घेतो. ॥ ३ ॥


सः सु॒क्रतुः॑ पु॒रोहि॑तो॒ दमे॑दमेऽ॒ग्निर्य॒ज्ञस्या॑ध्व॒रस्य॑ चेतति॒ क्रत्वा॑ य॒ज्ञस्य॑ चेतति ।
क्रत्वा॑ वे॒धा इ॑षूय॒ते विश्वा॑ जा॒तानि॑ पस्पशे ।
यतो॑ घृत॒श्रीरति॑थि॒रजा॑यत॒ वह्नि॑र्वे॒धा अजा॑यत ॥ ४ ॥

सः सुऽक्रतुः पुरःऽहितः दमेऽदमे अग्निः यज्ञस्य अध्वरस्य चेतति क्रत्वा यज्ञस्य चेतति ॥
क्रत्वा वेधाः इषूऽयते विश्वा जातानि पस्पशे ॥
यतः घृतऽश्रीः अतिथिः अजायत वह्निः वेधा अजायत ॥ ४ ॥

हा अग्नि महत्कृत्यकुशल आणि यज्ञांतील मुख्य आचार्य आहे. घरोघर जें जें हविर्दान होतें त्या प्रत्येक ठिकाणीं हा सिद्ध असतो; कारण प्रत्येक यज्ञ चालूं होतांच दैवी सामर्थ्याच्या योगानें त्याला कळत असतें. आपल्या प्राप्तीची उत्कट इच्छा करणार्‍या भक्तांस त्याच सामर्थ्याच्या योगानें हा अनुकूल परिस्थिती उत्पन्न करतो. यच्चावत् सृष्टीवर सारखी नजर ठेवतो म्हणूनच हा पहा घृताहुतींनी देदीप्यमान होणारा अग्नि आज अतिथि झाला आहे, हा हव्यवाचन आणि जगन्नियंता अग्नि प्रकट झाला आहे. ॥ ४ ॥


क्रत्वा॒ यद॑स्य॒ तवि॑षीषु पृ॒ञ्चते॑ऽ॒ग्नेरवे॑ण म॒रुतां॒ न भो॒ज्येऽशि॒राय॒ न भो॒ज्या ।
स हि ष्मा॒ दान॒मिन्व॑ति॒ वसू॑नां च म॒ज्मना॑ ।
स न॑स्त्रासते दुरि॒ताद॑भि॒ह्रुतः॒ शंसा॑द॒घाद॑भि॒ह्रुतः॑ ॥ ५ ॥

क्रत्वा यत् अस्य तविषीषु पृंचते अग्नेः अवेन मरुतां न भोज्या इशिराय न भोज्या ॥
सः हि स्म दानं इन्वति वसूनां च मज्मना ॥
सः नः त्रासते दुःऽइतात् अभिऽह्रुतः शंसात् अघात् अभिऽह्रुतः ॥ ५ ॥

ज्या वेळेस मारुताच्याप्रमाणें विहित विधीस अनुसरून ह्या अग्नीच्या ज्वालांमध्यें अत्यादरानें आपण एखाद्या पाहुण्यास मिष्टान्न भोजन दिल्याप्रमाणें हविर्भाग अर्पण करतो, तेव्हां हा अग्नि आपणास कमनीय संपत्तीचें दान आपल्या प्रभावानें करण्यास उत्सुक होतो. आणि आम्हांस दडपून टाकणार्‍या संकटांपासून तसेंच दुसर्‍याच्या शापापासून किंवा ज्याच्यायोगानें आपण पतित होऊं अशा पातकांपासून आमच बचाव करतो. ॥ ५ ॥


विश्वो॒ विहा॑या अर॒तिर्वसु॑र्दधे॒ हस्ते॒ दक्षि॑णे त॒रणि॒र्न शि॑श्रथच्छ्रव॒स्यया॒ न शि॑श्रथत् ।
विश्व॑स्मा॒ इति॑षुध्य॒ते दे॑व॒त्रा ह॒व्यमोहि॑षे ।
विश्व॑स्मा॒ इत्सु॒कृते॒ वार॑मृण्वत्य॒ग्निर्द्वारा॒ वृण्वति ॥ ६ ॥

विश्वः विहाया अरतिः वसुः दधे हस्ते दक्षिणे तरणिः न शिश्रथत् श्रवस्यया न शिश्रथत् ॥
विश्वस्मै इत् इषुध्यते देवऽत्रा हव्यं आ ऊहिषे ॥
विश्वस्मै इत् सुऽकृते वारं ऋण्वति अग्निः द्वारा वि ऋण्वति ॥ ६ ॥

स्पृहणीय संपत्ति ह्याच विश्वव्यापक समर्थ प्रभूच्या उजव्या हातीं आहे. सूर्य जसा प्रकाश देतो, त्या प्रमाणें तिला तो भक्तांस देऊन टाकतो खरा, परंतु कीर्तीच्या लोभानें देतो असें मात्र नव्हे. अनन्य भावानें भगवत् प्राप्तीची इच्छा करण्यासाठींच, हे सुरश्रेष्ठा आग्नि देवा, तूं हविर्भाग देवांस पोहोंचवितोस. सर्व साधुपुरुषांना हा अग्निदेव सर्वोत्कृष्ट अशी संपत्ति देण्याकरितां घेऊन येतो. आणि आपल्या कृपेचें द्वार भक्तांकरतां उघडून ठेवतो. ॥ ६ ॥


सः मानु॑षे वृ॒जने॒ शंत॑मो हि॒तो३ऽ॒ग्निर्य॒ज्ञेषु॒ जेन्यो॒ न वि॒श्पतिः॑ प्रि॒यो य॒ज्ञेषु॑ वि॒श्पतिः॑ ।
स ह॒व्या मानु॑षाणामि॒ळा कृ॒तानि॑ पत्यते ।
स न॑स्त्रासते॒ वरु॑णस्य धू॒र्तेर्म॒हो दे॒वस्य॑ धू॒र्तेः ॥ ७ ॥

सः मानुषे वृजने शंऽतमः हितः अग्निः यज्ञेषु जेन्यः न विश्पतिः प्रियः यज्ञेषु विश्पतिः ॥
सः हव्या मानुषाणां इळा कृतानि पत्यते ॥
सः नः त्रासते वरुणस्य धूर्तेः महः देवस्य धूर्तेः ॥ ७ ॥

मनुष्यप्राणी पापमग्न झाल्याकारणानें एखादा विजयी राजा अथवा सर्व लोकांस प्रिय असणारा एखादा अध्यक्ष हा ज्याप्रमाणें धर्मसभेमध्यें येऊन बसतो, त्याप्रमाणें हा अग्नि यज्ञामध्यें स्थानापन्न झाला आहे, कारण पवित्र असें सुख हाच देऊं शकतो. वेदीवर जें हवि अर्पण होतें त्याचा स्वामी हाच आणि पातकाबद्दल जो दंड होतो- जी शिक्षा होते तिची, वरुणापासून, त्या परम थोर देवापासून आम्हांस हाच माफी मिळवून देतो. ॥ ७ ॥


अ॒ग्निं होता॑रमीळते॒ वसु॑धितिं प्रि॒यं चेति॑ष्ठमर॒तिं न्येरिरे हव्य॒वाहं॒ न्येरिरे ।
वि॒श्वायुं॑ वि॒श्ववे॑दसं॒ होता॑रं यज॒तं क॒विम् ।
दे॒वासो॑ र॒ण्वमव॑से वसू॒यवो॑ गी॒र्भी र॒ण्वं व॑सू॒यवः॑ ॥ ८ ॥

अग्निं होतारं ईळते वसुऽधितिं प्रियं चेतिष्ठं अरतिं नि एरिरे हव्यऽवाहं नि एरिरे ॥
विश्वऽआयुं विश्वऽवेदसं होतारं यजतं कविम् ॥
देवासः रण्वं अवसे वसुऽयवः गीःऽभी रण्वं वसुऽयवः ॥ ८ ॥

यज्ञाचा आचार्य जो अग्नि, त्यांचे स्तवन ऋत्विजांनी केले आहे. हाच भक्तिप्रिय अग्नि स्पृहणीय संपत्तींचा निधि आहे. अत्यंत ज्ञानवान असा जो ईश्वर तो हाच. ह्या अग्नीपुढें लीन होऊन ऋत्विजांनी देवांस हविर्भाग पोहोंचविण्याकरिता ह्याची योजना केली. जो सर्व विश्वाचा प्राण, एकंदर विश्वाचें ज्याला यथातथ्य ज्ञान, आणि जो यज्ञाचा आचार्य म्हणून सर्व देवता अभीष्ट प्राप्तिकरितां उत्सुक होऊन करीत असतात. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १२९ (इंद्र सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : इंद्रः - छंद - अत्यष्टी


यं त्वं रथ॑मिंद्र मे॒धसा॑तयेऽपा॒का सन्त॑मिषिर प्र॒णय॑सि॒ प्रान॑वद्य॒ नय॑सि ।
स॒द्यश्चि॒त्तम॒भिष्ट॑ये॒ करो॒ वश॑श्च वा॒जिन॑म् ।
सास्माक॑मनवद्य तूतुजान वे॒धसा॑मि॒मां वाचं॒ न वे॒धसा॑म् ॥ १ ॥

यं त्वं रथं इंद्र मेधऽसातये अपाका संतं इषिर प्रऽनयसि प्रऽनवद्य नयसि ॥
सद्यः चित् तं अभिष्टये करः वशः च वाजिनम् ॥
सः अस्माकं अनवद्य तूतुजान वेधसां इमां वाचं नः वेधसाम् ॥ १ ॥

सर्वांस प्रेरणा करणार्‍या हे इंद्रा, यज्ञ यथासांग व्हावा म्हणून ज्या महात्म्याजवळ - मग तो कितीही दूर रहात असो - तूं आपला रथ घेऊन जातोस. हे निष्कलंक इंद्रा, तूं ज्याच्याजवळ आपला रथ घेऊन जातोस, त्याचे हेतू पुरविण्याकरितां तूं तात्काळ त्याच्यावर लोभ करतोस व त्यास बलाढ्य करून सोडतोस. हे दोषरहित इंद्रा, साधु जनांच्या साहाय्यार्थ तूं धांव घेतोस तर आमच्याकडेही लक्ष दे, आणि प्रेमळांमध्येंही जे प्रेमळ कवि आहेत त्यांची हांक ऐकतोस, त्याप्रमाणें आमचीही हांक ऐक. ॥ १ ॥


स श्रु॑धि॒ यः स्मा॒ पृत॑नासु॒ कासु॑ चिद्द॒क्षाय्य॑ इंद्र॒ भर॑हूतये॒ नृभि॒रसि॒ प्रतू॑र्तये॒ नृभिः॑ ।
यः शूरैः॒ स्वः१॒॑ सनि॑ता॒ यो विप्रै॒र्वाजं॒ तरु॑ता ।
तमी॑शा॒नास॑ इरधन्त वा॒जिनं॑ पृ॒क्षमत्यं॒ न वा॒जिन॑म् ॥ २ ॥

सः श्रुधि यः स्म पृतनासु कासु चित् दक्षाय्य इंद्र भरऽहूतये नृऽभिः असि प्रऽतूर्तये नृऽभिः ॥
यः शूरैः स्व१॑रिति स्वः सनिता यः विप्रैः वाजं तरुता ॥
तं ईशानासः इरधंत वाजिनं पृक्षं अत्यं न वाजिनम् ॥ २ ॥

हे इंद्रा, सर्व युद्धांच्या प्रसंगी लढाईची नौबत झडूं लागली असतां वीरांना तुझें स्तवन भक्तीनें करावें लागतें आणि पाप क्षालनाकरितां सुद्धां लोकांना तुझेंच स्तवन करावे लागतें, तर असा जो तूं तो आमची प्रार्थना ऐक. आपण शूरांच्या बरोबर राहिलों तर हा इंद्र स्वर्ग मिळवून देईल आणि सत्पुरुषाच्या संगतीनें दिव्य सामर्थ्य देईल. बलाढ्य राजेसुद्धां हा अत्यंत शूर म्हणून ह्याचेच पाय धरतात. हा मूर्तिमान तीव्र सामर्थ्य म्हणून ह्याच वीराला शरण जातात. ॥ २ ॥


द॒स्मो हि ष्मा॒ वृष॑णं॒ पिन्व॑सि॒ त्वचं॒ कं चि॑द्यावीर॒ररुं॑ शूर॒ मर्त्यं॑ परिवृ॒णक्षि॒ मर्त्य॑म् ।
इंद्रो॒त तुभ्यं॒ तद्दि॒वे तद्रु॒॒द्राय॒ स्वय॑शसे ।
मि॒त्राय॑ वोचं॒ वरु॑णाय स॒प्रथः॑ सुमृळी॒काय॑ स॒प्रथः॑ ॥ ३ ॥

दस्मः हि स्म वृषणं पिन्वसि त्वचं कं चित् यावीः अररुं शूर मर्त्यं परिऽवृणक्षि मर्त्यम् ॥
इंद्र उत तुभ्यं तत् दिवे तत् रुद्राय स्वऽयशसे ॥
मित्राय वोचं वरुणाय सऽप्रथः सुऽमृळीकाय सऽप्रथः ॥ ३ ॥

खरोखरच तूं अद्‍भुत चमत्कार करणारा आहेस. कारण वृष्टियोग्य अशा मेघपटलास तूं छिद्र पाडतोस व हरएक दुर्जन मनुष्यास पिटाळून लावतोस. आणि हे वीरा, अमर आत्म्यापासून हें नाशवंत शरीर भिन्न ठेवतोस. हे इंद्रा, ह्या तुझ्या अद्‍भुत पराक्रमाचें वर्णन मी तुझ्यापुढें, तसेंच आकाशस्थ रुद्रापुढें, म्हणजे जो आपल्याच पराक्रमामुळेंच प्रख्यात आहे अशा रुद्रापुढें व मित्रापुढें केलेलें आहे. आणि त्याचप्रमाणें वरुणापुढें, त्या परम सुखप्रद वरुणापुढेंही तुमच्या त्या जगद्‍विख्यात यशाचें वर्णन सविस्तर केलेलें आहे. ॥ ३ ॥


अ॒स्माकं॑ व॒ इंद्र॑म् उश्मसी॒ष्टये॒ सखा॑यं वि॒श्वायुं॑ प्रा॒सहं॒ युजं॒ वाजे॑षु प्रा॒सहं॒ युज॑म् ।
अ॒स्माकं॒ ब्रह्मो॒तयेऽ॑वा पृ॒त्सुषु॒ कासु॑ चित् ।
न॒हि त्वा॒ शत्रु॒ स्तर॑ते स्तृ॒णोषि॒ यं विश्वं॒ शत्रुं॑ स्तृ॒णोषि॒ यम् ॥ ४ ॥

अस्माकं वः इंद्रं उश्मसि इष्टये सखायं विश्वऽआयुं प्रऽसहं युजं वाजेषु प्रऽसहं युजम् ॥
अस्माकं ब्रह्म ऊतये अवा पृत्सुषु कासु चित् ॥
नहि त्वा शत्रु स्तरते स्तृणोषि यं विश्वं शत्रुं स्तृणोषि यम् ॥ ४ ॥

तुमचे व आमचे अशा दोघांचेही मनोरथ पूर्ण करण्याकरितां इंद्रानें येथें यावें अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा इंद्र आम्हांस अत्यंत प्रिय आहे. हा विश्वात्मा, ह्याच्यापुढें कोणींही युद्धास उभा राहूं शकत नाहीं हा नेहमीं आम्हाबरोबर असून संग्रामात सर्वांस पादाक्रांत करणारा असा आमचा विश्वासू साहाय्यकर्ता आहे. प्रत्येक युद्धप्रसंगी आमच्या स्तोत्रांनी तुला हर्ष होवो, कारण त्यानेंच आमचें रक्षण होत असतें. तुझ्यापुढें कोणत्याही शत्रूचा क्षणभरही निभाव लागत नाही. कोणीही शत्रू तुजपुढें येवो; त्यास तूं पिटाळून लावतोस आणि मनुष्यमात्राचा शत्रू मग तो कोणीही असो त्यास तूं ठार करतोस. ॥ ४ ॥


नि षू न॒माति॑मतिं॒ कय॑स्य चि॒त्तेजि॑ष्ठाभिर॒रणि॑भि॒र्नोतिभि॑रु॒ग्राभि॑रुग्रो॒तिभिः॑ ।
नेषि॑ णो॒ यथा॑ पु॒राने॒नाः शू॑र॒ मन्य॑से ।
विश्वा॑नि पू॒रोरप॑ पर्षि॒ वह्नि॑रा॒सा वह्नि॑र्नः॒ अच्छ॑ ॥ ५ ॥

नि सु नम अतिमऽतिं कयस्य चित् तेजिष्ठाभिः अरणिऽभिः न उतिऽभिः उग्राभिः उग्र ऊतिऽभिः ॥
नेषि नः यथा पुरा अनेनाः शूर मन्यसे ॥
विश्वानि पूरोः अप पर्षि वह्निः आसा वह्निः र्नः अच्छ ॥ ५ ॥

तूं आम्हास सहाय्य करून उन्मत्त लोकांचे नाक खालीं करून टाक, हे इंद्रा, भयंकर पेटलेल्या हिलालाप्रमाणें जाज्वल्य अशा शस्त्रास्त्रांनी त्याची रग जिरवून टाक. पूर्वींप्रमाणे आतांही तूंच आमचा धुरीण आहेस. कारण हे वीरा, निष्कलंक म्हणूनच तूं सर्वांस माहित आहेस. तूं अभीष्ट दाता आहेस तर सद्‍गुरुप्रमाणें आम्हांकडे येऊन आमच्या कायिक व मानसिक अशा सर्व पापाचें क्षालन कर. ॥ ५ ॥


प्र तद्वो॑चेयं॒ भव्या॒येन्द॑वे॒ हव्यो॒ न य इ॒षवा॒न्मन्म॒ रेज॑ति रक्षो॒हा मन्म॒ रेज॑ति ।
स्व॒यं सो अ॒स्मदा नि॒दः व॒धैर॑जेत दुर्म॒तिम् ।
अव॑ स्रवेद॒घशं॑सो ऽवत॒रमव॑ क्षु॒द्रमि॑व स्रवेत् ॥ ६ ॥

प्र तत् वोचेयं भव्याय इंदवे हव्यः नः य इषऽवान् मन्म रेजति रक्षःऽहा मन्म रेजति ॥
स्वयं सः अस्मत् आ निदः वधैः अजेत दुःऽमतिम् ॥
अव स्रवेत् अघऽशंसः अवऽतरं अव क्षुद्रंऽइव स्रवेत् ॥ ६ ॥

तो तुझा पराक्रम भव्य अशा सोमापुढेंसुद्धां वर्णन करणें मला उचित आहे. चित्तास हुषारी आणण्याची शक्ति त्याच्यामध्यें आहे म्हणून तोही पूज्य असल्याप्रमाणेंच आहे. हा राक्षस नाशक असूनही, पवित्र विचाराची लाट ह्याच्यामुळें अंतःकरणांत उत्पन्न होते. स्तवनाची स्फूर्तिही हाच देतो. हा आपण स्वतः आपल्या मारक शस्त्रांनी निंदकांना आणि दुर्जनांना आमच्यापासून हांकून देऊन त्यांचा उच्छेद करो - ह्याच्यापुढें येणारे पातकी पार वितळून जावोत - धुक्याप्रमाणें विरून जावोत. ॥ ६ ॥


व॒नेम॒ तद्धोत्र॑या चि॒तन्त्या॑ व॒नेम॑ र॒यिं र॑यिवः सु॒वीर्यं॑ र॒ण्वं सन्तं॑ सु॒वीर्य॑म् ।
दु॒र्मन्मा॑नं सु॒मन्तु॑भि॒रेमि॒षा पृ॑चीमहि ।
आ स॒त्याभि॒रिंद्रं॑ द्यु॒म्नहू॑तिभि॒र्यज॑त्रं द्यु॒म्नहू॑तिभिः ॥ ७ ॥

वनेम तत् होत्रया चितंत्या वनेम रयिं रयिऽवः सुऽवीर्यं रण्वं संतं सुऽवीर्यम् ॥
दुःऽमन्मानं सुमंतुऽभिः आ ईं इषा पृचीमहि ॥
आ सत्याभिः इंद्रं द्युम्नहूतिऽभिः यजत्रं द्युम्नहूतिऽभिः ॥ ७ ॥

हे भगवन् इंद्रा, जें पुरुषार्थानेंच प्राप्त होतें, जें अत्यंत रमणीय, अत्यंत उदात्त आहे व ज्याच्या योगानें पुरुषार्थाचीच सत्कृत्यें हातून होतात असें जें दिव्यैश्वर्य आहे, त्याचा लाभ तुझी प्रार्थना व एकाग्र ध्यान केल्यामुळेंच आम्हांस होणार. तर सुविचारपूर्वक केलेल्या प्रार्थना आणि तुला प्रसन्न करणारा हविर्भाग अशा दोहोंच्या योगानें अचिंत्य जो तूं त्या तुझी पूर्ण तृप्ति आम्हांकडून होवो. आणि प्रेरणेनें सुचलेली सत्यार्थबोधक सूक्तें आणि आमचें अत्यंत उत्कृष्ट प्रेम ह्यांचाही योग त्या अत्यंत पूज्य इंद्राशी होवो. ॥ ७ ॥


प्रप्रा॑ वो अ॒स्मे स्वय॑शोभिरू॒ती प॑रिव॒र्ग इंद्रो॑ दुर्मती॒नां दरी॑मन्दुर्मती॒नाम् ।
स्व॒यं सा रि॑ष॒यध्यै॒ या न॑ उपे॒षे अ॒त्रैः ।
ह॒तेम॑स॒न्न व॑क्षति क्षि॒प्ता जू॒र्णिर्न व॑क्षति ॥ ८ ॥

प्रऽप्र वः अस्मे इति स्वयशःऽभिः ऊती परिऽवर्ग इंद्रः दुःऽमतीनां दरीमन् दुःऽमतीनाम् ॥
स्वयं सा रिषयध्यै या नः उपऽईषे अत्रैः ॥
हता ईं असत् न वक्षति क्षिप्ता जूर्णिः न वक्षति ॥ ८ ॥

पहा तुम्हा आम्हां सारख्यांच्यासाठी सुद्धां आपल्या पवित्र नावाच्या दरार्‍यानें दुष्टवासनाचें निर्मूलन व दुर्जनांचा धुव्वा उडविणार्‍या कामी सहाय्य करण्यास इंद्र सदैव तत्पर आहे. तेव्हां आमच्यावर चढाई करून आमचा घात करण्यास पाठविलेल्या राक्षस सेनेचाच खुद्द फडशा होऊन जावो, ती आम्हांपर्यंत येऊनही न पोहोंचो. त्यांनी आम्हांवर सोडलेले आगीचे बाण आम्हांपर्यंत येऊं शकत नाहींत हा केवढा चमत्कार. ॥ ८ ॥


त्वं न॑ इंद्र रा॒या परी॑णसा या॒हि प॒थाँ अ॑ने॒हसा॑ पु॒रो या॑ह्यर॒क्षसा॑ ।
सच॑स्व नः परा॒क आ सच॑स्वास्तमी॒क आ ।
पा॒हि नो॑ दू॒रादा॒राद॒भिष्टि॑भिः॒ सदा॑ पाह्य॒भिष्टि॑भिः ॥ ९ ॥

त्वं नः इंद्र राया परीणसा याहि पथान् अनेहसा पुरः याहि अरक्षसा ॥
सचस्व नः ः पराके आ सचस्व अस्तऽईके आ ॥
पाहि नः दूरात् आरात् अभिष्टिऽभिः सदा पाहि अभिष्टिऽभिः ॥ ९ ॥

हे इंद्रा, जो मार्ग विपुल ऐश्वर्याचा आणि निर्दोष असेल त्याच मार्गानें आम्हांस घेऊन चल, ज्या मार्गांत दुर्वासनारूप राक्षस नसतील त्याच मार्गानें आम्हांस घेऊन चल. आम्हीं परदेशी असलो तरी आमच्याबरोबर रहा, व घरीं असलों तरी रहा. आम्ही जवळ किंवा दूर असलो तरी आपल्या सहाय्यानें आपल्या कृपाछत्रानें आमचें सदैव रक्षण कर. ॥ ९ ॥


त्वं न॑ इंद्र रा॒या तरू॑षसो॒ग्रं चि॑त्त्वा महि॒मा स॑क्ष॒दव॑से म॒हे मि॒त्रं नाव॑से ।
ओजि॑ष्ठ॒ त्रात॒रवि॑ता॒ रथं॒ कं चि॑दमर्त्य ।
अ॒न्यम॒स्मद्रि॑रिषेः॒ कं चि॑दद्रिवो॒ रिरि॑क्षन्तं चिदद्रिवः ॥ १० ॥

त्वं नः इंद्र राया तरूषसा उग्रं चित् त्वा महिमा सक्षत् अवसे महे मित्रं न अवसे ॥
ओजिष्ठ त्रातः अवितरिति रथं कं चित् अमर्त्य ॥
अन्यं अस्मत् रिरिषेः कं चित् अद्रिऽवः रिरिक्षंतं चित् अद्रिऽवः ॥ १० ॥

हे इंद्रा, तूं आणि तुझी विजयसंपत्ति हे सर्व आमचेच आहांत. तुम्हाकडे वर डोळा करून कोणाच्यानेंही पहावत नाहीं, म्हणूनच महद्यश जणों काय स्वतःच्याच परम सुखाकरितां व रक्षणाकरितां, जिवलग मित्राजवळ राहिल्याप्रमाणें तुलाच चिकटून राहिलें आहे. हे इंद्रा, तुझें तेज अत्यंत प्रखर होय. हे लोकतारका, हे नाशरहिता, तूंच रथस्थित भक्तांचे परिपालन करतोस तर हे वज्रहस्ता, आमच्याशिवाय दुसरे म्हणजे जे जे दुष्ट आहेत त्यांचा वज्रप्रहारानें चुराडाकरून टाक. हे वज्रधरा आमचा घात करूं पाहाणार्‍या दुष्टांचा विध्वंस करून टाक. ॥ १० ॥


पा॒हि न॑ इंद्र सुष्टुत स्रि॒धोऽवया॒ता सद॒मित्दु॑र्मती॒नां दे॒वः सन्दु॑र्मती॒नाम् ।
ह॒न्ता पा॒पस्य॑ र॒क्षस॑स्त्रा॒ता विप्र॑स्य॒ माव॑तः ।
अधा॒ हि त्वा॑ जनि॒ता जीज॑नद्वसो रक्षो॒हणं॑ त्वा॒ जीज॑नद्वसो ॥ ११ ॥

पाहि नः इंद्र सुऽष्टुत स्रिधः अवऽयाता सदं इत् दुःऽमतीनां देवः सन् दुःऽमतीनाम् ॥
हंता पापस्य रक्षसः त्राता विप्रस्य माऽवतः ॥
अध हि त्वा जनिता जीजनत् वसो इति रक्षःऽहनं त्वा जीजनत् वसो इति ॥ ११ ॥

हे इंद्रा, तुझी स्तुती होत असते, ती भक्तिपूर्वक होत असते. पातकांपासून आम्हांस दूर ठेव. दुर्जनांचा निरंतर उच्छेद करणारा एक तूंच आहेस. आणि ईश्वरस्वरूप असल्यामुळें सर्व दुर्जनांचा समूळ नाश करणाराही तूंच. घोर पातकें करणार्‍या राक्षसांचा विध्वंस तूं करतोस व मजसारख्या दीन ब्राह्मणाचा कैवारही तूंच घेतोस. आणि म्हणूनच हे आनंदनिधाना, जगत्पिता जो परमेश्वर त्यानें तुला प्रकट केलें. हे सुखनिधाना राक्षसांचा विध्वंस करणारा म्हणून तुला प्रकट केलें. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १३० (इंद्र सूक्त )

ऋषि : परुच्छेपः - देवता : इंद्रः - छंद - अत्यष्टी


एन्द्र॑ या॒ह्युप॑ नः परा॒वतः॒ नायमच्छा॑ वि॒दथा॑नीव॒ सत्प॑ति॒रस्तं॒ राजे॑व॒ सत्प॑तिः ।
हवा॑महे त्वा व॒यं प्रय॑स्वन्तः सु॒ते सचा॑ ।
पु॒त्रासो॒ न पि॒तरं॒ वाज॑सातये॒ मंहि॑ष्ठं॒ वाज॑सातये ॥ १ ॥

आ इंद्र याहि उप नः पराऽवतः न अयं अच्छ विदथानिऽइव सत्ऽपतिः अस्तं राजाऽइव सत्ऽपतिः ॥
हवामहे त्वा वयं प्रयस्वंतः सुते सचा ॥
पुत्रासः नः पितरं वाजऽसातये मंहिष्ठं वाजऽसातये ॥ १ ॥

जसा एखादा सत्वशील महात्मा सभेमध्ये येऊन बसतो, अथवा सज्जन प्रतिपालक राजा आपल्या स्वतःच्या घरी परत येतो, त्याप्रमाणें हे इंद्रा तूं आपल्या अत्युच्च लोकाहून आमच्याकडे ये. आम्ही परम सुखाची इच्छा करीत आहोंत, तर सोमरस तयार होतांच तुझी प्रार्थना करून, पुत्र जसे बापाला हांक मारतात तसे तुला हांक मारतो. आम्हांस दिव्य सामर्थ्य प्राप्त व्हावें म्हणून, विजय प्राप्त व्हावा म्हणून, तुज दातृश्रेष्ठाची प्रार्थना करीत आहोत. ॥ १ ॥


पिबा॒ सोम॑मिंद्र सुवा॒नमद्रि॑भिः॒ कोशे॑न सि॒क्तम॑व॒तं न वंस॑गस्तातृषा॒णो न वंस॑गः ।
मदा॑य हर्य॒ताय॑ ते तु॒विष्ट॑माय॒ धाय॑से ।
आ त्वा॑ यच्छन्तु ह॒रितो॒ न सूर्य॒महा॒ विश्वे॑व॒ सूर्य॑म् ॥ २ ॥

पिबा सोमं इंद्र सुवानं अद्रिऽभिः कोशेन सिक्तं अवतं नः वंसगः ततृषाणः न वंसगः ॥
मदाय हर्यताय ते तुविःऽतमाय धायसे ॥
आ त्वा यच्छंतु हरितः न सूर्यं अहा विश्वाऽइव सूर्यम् ॥ २ ॥

जसा एखादा तान्हेलेला वृषभ पंचपात्रानें भरलेल्या हौदांतून मोठ्या आसोशीनें पाणी पितो, अथवा मेघोदकानें तुडुंब भरलेला एखादा तलाव, प्रखर झालेला चंडभानू, पार शोशून टाकतो, त्याप्रमाणे पाषाणांनी वांटून पिळून वाढलेला हा सोमरस, हे इंद्रा, तूं ग्रहण कर. तुला मनोरम आल्हाद व्हावा, तुझी आकंठ तृप्ती व्हावी म्हणून तुझे दिव्य वारू, सूर्याप्रमाणे जाज्वल्य अशा तुला येथें घेऊन येवोत. ज्याप्रमाणें सर्वांस उत्साहप्रद अशा सूर्यास ते दररोज घेऊन येतात त्याप्रमाणे आणोत. ॥ २ ॥


अवि॑न्दद्दि॒वो निहि॑तं॒ गुहा॑ नि॒धिं वेर्न गर्भं॒ परि॑वीत॒मश्म॑न्यन॒न्ते अ॒न्तरश्म॑नि ।
व्र॒जं व॒ज्री गवां॑ इव॒ सिषा॑स॒न्नङ्‌गि॑रस्तमः ।
अपा॑वृणो॒दिष॒ इंद्रः॒ परी॑वृता॒ द्वार॒ इषः॒ परी॑वृताः ॥ ३ ॥

अविंदत् दिवः निऽहितं गुहा निऽधिं वेः न गर्भं परिऽवीतं अश्मनि अनंते अंतः अश्मनि ॥
व्रजं वज्री गवां इव सिसासन् अंगिरःऽतमः ॥
अप अवृणोत् इषः इंद्रः परिऽवृता द्वारः इषः परिऽवृताः ॥ ३ ॥

अत्यंत विशाल अशा पर्वताच्या कड्यांप्रमाणे पडलेल्या शिळेच्या पोटांत दडलेला पक्षिगर्भ ज्याप्रमाणें बाहेर आणावा, त्याप्रमाणें आकाशाच्या उदरांत ठेवलेला प्रकाशांचा निधि त्या इन्द्रानें शोधून काढून जगासमोर आणला. हा अंगिरसांचा प्रभू जो इंद्र, त्यानें प्रकाशरूपी धेनूंचा समूह अजून हस्तगत करून घ्यावयाचा आहे कीं काय अशा डौलानें वज्र हातीं घेऊन आनंदगृहाचे (गुप्त असलेले) दरवाजे बंद होते, ते भक्तजनांसाठी खुले करून ठेवले. ॥ ३ ॥


दा॒दृ॒हा॒णो वज्र॒मिंद्रो॒ गभ॑स्त्योः॒ क्षद्मे॑व ति॒ग्ममस॑नाय॒ सं श्य॑दहि॒हत्या॑य॒ सं श्य॑त् ।
सं॒वि॒व्या॒न ओज॑सा॒ शवो॑भिरिंद्र म॒ज्मना॑ ।
तष्टे॑व वृ॒क्षं व॒निनो॒ नि वृ॑श्चसि पर॒श्वेव॒ नि वृ॑श्चसि ॥ ४ ॥

दादृहाणः वज्रं इंद्रः गभस्त्योः क्षद्मऽइव तिग्मं असनाय सं श्यत् अहिऽहत्याय सं श्यत् ॥
संऽविव्यान ओजसा शवःऽभिः इंद्र मज्मना ॥
तष्टाऽइव वृक्षं वनिनः नि वृश्चसि परश्वाऽइव नि वृश्चसि ॥ ४ ॥

आपले वज्र आपल्या दोन्ही हातांनी बळकट धरून, तें फेंकून मारण्यासाठी एखाद्या अतिशय तीक्ष्ण तरवारीप्रमाणे इंद्रानें त्यस पाजळले; वृत्रास ठार मारण्यासाठी त्यास धार लावली. हे इंद्रा, तूं दिव्य तेजानें तळपत आहेस, आपल्या दिव्य शक्तीनें आणि प्रभावानें अगदी तुंद आहेस; तेव्हां झाडें तोडणार्‍यानें कुऱ्हाड घेऊन जसा एखादा वृक्ष सरोबरीनें पार तोडून टाकावा, त्याप्रमाणें तूं घातक शत्रूंचा शिरच्छेद करून टाकतोस. ॥ ४ ॥


त्वं वृथा॑ न॒द्य इंद्र॒ सर्त॒वेऽ॑च्छा समु॒द्रम॑सृजो॒ रथाँ॑ इव वाजय॒तः रथाँ॑ इव ।
इ॒त ऊ॒तीर॑युञ्जत समा॒नमर्थ॒मक्षि॑तम् ।
धे॒नूरि॑व॒ मन॑वे वि॒श्वदो॑हसो॒ जना॑य वि॒श्वदो॑हसः ॥ ५ ॥

त्वं वृथा नद्यः इंद्र सर्तवे अच्छ समुद्रं असृजः रथान्ऽइव वाजऽयतः रथान्ऽइव ॥
इतः ऊतीः अयुंजत समानं अर्थं अक्षितम् ॥
धेनूःऽइव मनवे विश्वऽदोहसः जनाय विश्वऽदोहसः ॥ ५ ॥

हे इंद्रा, तूं ह्या भरधांव धांवणार्‍या नद्यांना वहात समुद्रास जाऊन मिळावे म्हणून सहज लीलेनें उत्पन्न केलेंस. आमच्यावर प्रसन्न होऊन ह्या नद्यांनी सर्वांनाच एकसारखी हितकर व चिरकाल टिकणारी अशी एक मोठी गोष्ट साधली आहे, ती ही कीं, मनु राजास ज्याप्रमाणें कामधेनु इच्छित पदार्थ देत असतात, त्याप्रमाणें ह्या नद्यांपासून सर्व जगास वाटेल तो पदार्थ आज मिळत आहे. ॥ ५ ॥


इ॒मां ते॒ वाचं॑ वसू॒यन्त॑ आ॒यवो॒ रथं॒ न धीरः॒ स्वपा॑ अतक्षिषुः सु॒म्नाय॒ त्वाम् अ॑तक्षिषुः ।
शु॒म्भन्तो॒ जेन्यं॑ यथा॒ वाजे॑षु विप्र वा॒जिन॑म् ।
अत्य॑मिव॒ शव॑से सा॒तये॒ धना॒ विश्वा॒ धना॑नि सा॒तये॑ ॥ ६ ॥

इमां ते वाचं वसुऽयंतः आयवः रथं न धीरः सुऽअपाः अतक्षिषुः सुम्नाय त्वां अतक्षिषुः ॥
शुंभंतः जेन्यं यथा वाजेषु विप्र वाजिनम् ॥
अत्यंऽइव शवसे सातये धना विश्वा धनानि सातये ॥ ६ ॥

इच्छित धनाच्या प्राप्तीकरितां आम्ही दीनजन हें तुम्हें प्रार्थनासूक्त ठाकठिकीनें बसविलें आहे. जसा चतुर आणि कुशल कारागीर एखादा रथ व्यवस्थित सजवून देतो, त्याप्रमाणें आमच्या कल्याणाकरितां तुझें स्वरून आम्ही ध्यानानें अंतःकरणांत घडविलें आहे. तूं निरंतर विजयशाली म्हणून, हे परमबुद्धिमंता, तुझा आम्हीं नेहमी गौरव करतो, युद्धांत पराक्रमी आणि धाडशी अशा वीराला वस्त्रें भूषणें अर्पण करतात, त्याप्रमाणें आम्हीं प्रबल व्हावें, वैभव मिळवावें आणि सर्व प्रकारचें यशोधन जिंकून आणावें म्हणून तुझा गौरव करीत असतो. ॥ ६ ॥


भि॒नत्पुरो॑ नव॒तिमि॑न्द्र पू॒रवे॒ दिवो॑दासाय॒ महि॑ दा॒शुषे॑ नृतो॒ वज्रे॑ण दा॒शुषे॑ नृतो ।
अ॒ति॒थि॒ग्वाय॒ शम्ब॑रं गि॒रेरु॒ग्रो अवा॑भरत् ।
म॒हो धना॑नि॒ दय॑मान॒ ओज॑सा॒ विश्वा॒ धना॒न्योज॑सा ॥ ७ ॥

भिनत् पुरः नवतिं इंद्र पूरवे दिवःऽदासाय महि दाशुषे नृतो इति वज्रेण दाशुषे नृतो इति ॥
अतिथिऽग्वाय शंबरं गिरेः उग्रः अव अभरत् ॥
महः धनानि दयमानः ओजसा विश्वा धनानि ओजसा ॥ ७ ॥

आपला भक्त महा दानशूर जो दिवोदास त्याच्याकरितां हे रणभैरवा, हे रणशूर इंद्रा, तूं आपल्या वज्रानें शत्रूच्या नव्वद दुर्गांचा चक्काचूर करून टाकलास. महा भयंकर इंद्रानें अतिथिग्वाकरितां, शंबरासुराला पर्वतावरून खाली ओढून मारलें. इंद्र हा असा आहे कीं, श्रेष्ठ संपत्ति तो भक्तांस आपल्या दिव्य बलानें, आपल्या ईश्वरी सामर्थ्यानें देत असतो. ॥ ७ ॥


इंद्रः॑ स॒मत्सु॒ यज॑मान॒मार्यं॒ प्राव॒द्विश्वे॑षु श॒तमू॑तिरा॒जिषु॒ स्वर्मीळ्हेष्वा॒जिषु॑ ।
मन॑वे॒ शास॑दव्र॒तान्त्वचं॑ कृ॒ष्णाम॑रन्धयत् ।
दक्ष॒न्न विश्वं॑ ततृषा॒णमो॑षति॒ न्यर्शसा॒नं ओ॑षति ॥ ८ ॥

इंद्रः समत्ऽसु यजमानं आर्यं प्र आवत् विश्वेषु शतंऽऊतिः आजिषु स्वःऽमीळ्हेषु आजिषु ॥
मनवे शासत् अव्रतान् त्वचं कृष्णां अरंधयत् ॥
दक्षन् नः विश्वं ततृषाणं ओषति नि अर्शसानं ओषति ॥ ८ ॥

इंद्रानें आपल्या अनंत शक्तींनी, संग्रामामध्यें - ज्यांच्या योगानें स्वर्गसुखाचा लाभ होतो अशा संग्रामामध्यें - आपल्या भक्तजनांचे रक्षण केलेलें आहे. मनुराजाकरितां अधार्मिक लोकांना त्यानें शिक्षा करून योग्य मार्गास लावले, आणि कृष्णवर्ण राक्षसांना जिंकून त्यांना त्याच्या कबजांत आणून दिले. आपल्या प्रखर तेजानें सर्व जग जणों जाळणारा असा हा इंद्र, अत्यंत लोभाविष्ट अशा दुर्जनांचे भस्म करून टाकतो. तसेंच साधूंना गांजणार्‍या दुष्टांसही पार होरपळून टाकतो. ॥ ८ ॥


सूर॑श्च॒क्रं प्र वृ॑हज्जा॒त ओज॑सा प्रपि॒त्वे वाच॑मरु॒णो मु॑षायतीशा॒न आ मु॑षायति ।
उ॒शना॒ यत्प॑रा॒वतोऽ॑जगन्नू॒तये॑ कवे ।
सु॒म्नानि॒ विश्वा॒ मनु॑षेव तु॒र्वणि॒रहा॒ विश्वे॑व तु॒र्वणिः॑ ॥ ९ ॥

सूरः चक्रं प्र वृहत् जातः ओजसा प्रऽपित्वे वाचं अरुणः मुषायति ईशानः आ मुषायति ॥
उशना यत् पराऽवतः अजगन् ऊतये कवे ॥
सुम्नानि विश्वा मनुषाऽइव तुर्वणिः अहा विश्वाऽइव तुर्वणिः ॥ ९ ॥

आपण प्रकट होऊन आपल्या प्रभावानें, त्याने सूर्याचें एक चाक राक्षसांस फेंकून मारण्याकरितां उगारले आणि क्रोधानें लाल होऊन प्रातःकाळीं दुसर्‍या चाकांची घरघर सुद्धां बंद करून टाकली. हे प्राज्ञ इंद्रा, पुरातन काळी जेव्हां उशना स्वतःच्या रक्षणार्थ तुझ्याकडे आला त्यावेळी त्यानें तुझ्याकडे येऊन मनुष्यास जीं जीं सुखें मिळणें शक्य तीं तीं जणों काय सर्व जिंकून आपलीशी करून घेतली. ॥ ९ ॥


स नो॒ नव्ये॑भिर्वृषकर्मन्नु॒क्थैः पुरां॑ दर्तः पा॒युभिः॑ पाहि श॒ग्मैः ।
दि॑वोदा॒सेभि॑रिंद्र॒ स्तवा॑नो वावृधी॒था अहो॑भिरिव॒ द्यौः ॥ १० ॥

सः नः नव्येभिः वृषऽकर्मन्न् उक्थैः पुरां दर्तरिति दर्तः पायुऽभिः पाहि शग्मैः ॥
दिवःऽदासेभः इंद्र स्तवानः वावृधीथाः अहोभिःऽइव द्यौः ॥ १० ॥

हे इंद्रा, वृत्राचे किल्ले फोडून टाकणारा आणि सर्व मनोरथांची वृष्टीच भक्तांवर करणारा असा तूं, आमच्या अपूर्व स्तोत्रांनी प्रसन्न होऊन आपल्या संरक्षक कृपाछत्रानें आमचें रक्षण कर. हे इंद्रा, दिवोदासानें तुझें स्तवन केलेलें आहे, तर दिवसांच्या प्रकाशामुळें आकाश जसें अवर्णनीय शोभा पावतें, त्याप्रमाणें तूं आपला गौरव प्रकट कर. ॥ १० ॥


ॐ तत् सत्


GO TOP