|
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८१ - ९० ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८१ ( इंद्र सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - इंद्र : छंद - पंक्ति
इंद्रो॒ मदा॑य वावृधे॒ शव॑से वृत्र॒हा नृभिः॑ ॥
इंद्रः मदाय ववृधे शवसे वृत्रऽहा नृभिः ॥
वृत्राचा वध करणार्या इंद्रास आनंद व्हावा व त्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून मनुष्याकडून त्याचे स्तवन होत आहे. ज्यावेळी मोठे युद्ध उपस्थित होते त्यावेळीं आम्ही त्यास हांक मारतो व लहानशा युद्धांतही आम्ही त्यास बोलावतो. पराक्रमाच्या कृत्यांत त्याने आमचें नेहमी रक्षण केले आहे. ॥ १ ॥
असि॒ हि वी॑र॒ सेन्योऽ॑सि॒ भूरि॑ पराद॒दिः ॥
असि हि वीर सेन्यः असि भूरि पराऽददिः ॥
हे वीरा, खरोखर तूंच सेनानायक शोभतोस. अनेक तर्हेने भक्तांस वैभव अर्पण करणारा तूंच आहेस. जगाच्या दृष्टीने जी माणसें लहान त्यांना सुद्धा तूं उत्कर्षाप्रत पोहोंचवितोस व सोमरस अर्पण करणार्या आपल्या भक्तांस, तुझ्याजवळ असलेली विपुल संपत्ति प्राप्त करून घेण्याचें ज्ञान तूं देत असतोस. ॥ २ ॥
यदु॒दीर॑त आ॒जयो॑ धृ॒ष्णवे॑ धीयते॒ धना॑ ॥
यत् उत्ऽईरते आजयः धृष्णवे धीयते धना ॥
ज्यावेळी युद्धांना प्रारंभ होतो त्यावेळी धारिष्टवान पुरुषावर तुझ्याकडून संपत्तीचा वर्षाव होतो. शत्रूंचा गर्व हरण करणारे आपले अश्व तूं रथास जोड. तूं कोणाचा वध केलास बरें ! तूं वैभवावर कोणाची स्थापना केलीस. खरोखर, हे इंद्रा, तूं आमची वैभवावर स्थापना केली आहेस. ॥ ३ ॥
क्रत्वा॑ म॒हाँ अ॑नुष्व॒धं भी॒म आ वा॑वृधे॒ शवः॑ ॥
क्रत्वा महान् अनुऽस्वधं भीमः आ ववृधे शवः ॥
आपल्या सामर्थ्याच्या योगानें श्रेष्ठत्व पावलेल्या व आपल्या स्वतःच्या युद्धपद्धतीमुळें शत्रूंस भयंकर वाटणार्या ह्या देवानें आपले सामर्थ्य पुष्कळ वृद्धिंगत केले आहे. सुंदर मुकुटानें विभूषित व पीतवर्ण अश्वांनी संपन्न अशा ह्या श्रेष्ठ देवानें एकमेकांशी भिडलेल्या आपल्या दोन्ही बाहूंवर शोभेकरितां लोखंडी वज्र धारण केले आहे. ॥ ४ ॥
आ प॑प्रौ॒ पार्थि॑वं॒ रजो॑ बद्ब॒धे रो॑च॒ना दि॒वि ॥
आ पप्रौ पार्थिवं रजः बद्बधे रोचना दिवि ॥
ह्याने भूलोकासह रजोलोकाला व्याप्त करून टाकले आहे. द्युलोकांतील सर्व देदीप्यमान प्रदेशांत हा भरून राहिला आहे. हे इंद्रा, तुझ्या सारखा ह्या जगांत अन्य कोणीही नाही. एवढेंच काय परंतु असा पूर्वींही कोणी झाला नाही, व पुढेंही कोणी होणार नाही. तूं सर्वांपेक्षा सुद्धा जास्त मोठा झाला आहेस. ॥ ५ ॥
यो अ॒र्यो म॑र्त॒भोज॑नं परा॒ददा॑ति दा॒शुषे॑ ॥
यः अर्यः मर्तऽभोजनं पराऽददाति दाशुषे ॥
जो भक्तांवर प्रेम करीत असून आपल्या उपासकांकरितां मानवांना योग्य अशी पोषणाची तजवीज करतो, तो इंद्र आम्हांस वैभव प्राप्त करून घेण्याचें शिक्षण देवो. तुझ्याजवळ संपत्ति पुष्कळ आहे. ती तूं आम्हांस वाटून दे. तुझ्या कृपेचा मला उपभोग घेवूं दे. ॥ ६ ॥
मदे॑मदे॒ हि नो॑ द॒दिर्यू॒था गवा॑मृजु॒क्रतुः॑ ॥
मदेऽमदे हि नः ददिः यूथा गवां ऋजुऽक्रतुः ॥
आपल्या सामर्थ्याचा सरळ मनानें उपभोग करणारा हा इंद्र जेव्हां जेव्हां आपल्या हर्षाच्या भरांत येतो तेव्हां तेव्हां खरोखर धेनूंचे कळपच्या कळप आम्हांस अर्पण करतो. हे इंद्र देवा, शेंकडो प्रकारची वैभवें आपल्या दोन्ही हातांत घेऊन ठेव. आमचे तेज वाढव आणि आम्हांस संपत्ति अर्पण कर. ॥ ७ ॥
मा॒दय॑स्व सु॒ते सचा॒ शव॑से शूर॒ राध॑से ॥
मादयस्व सुते सचा शवसे शूर राधसे ॥
हे शूरा, सोमरस सिद्ध केल्यानंतर तूं आम्हांस सामर्थ्य देण्याकरितां, आणि आमच्यावर कृपा करण्याकरितां आमच्या सोमरसांनी संतुष्ट हो. तुझ्याजवळ अनेक प्रकारची संपत्ति आहे हे आम्हांस खचित माहीत आहे. आम्ही आपले सर्व मनोरथ तुझ्यापुढें ठेवतो, म्हणून तूं आमचा संरक्षणकर्ता हो. ॥ ८ ॥
ए॒ते त॑ इंद्र ज॒न्तवो॒ विश्वं॑ पुष्यन्ति॒ वार्य॑म् ॥
एते ते इंद्र जंतवः विश्वं पुष्यंति वार्यम् ॥
हे इंद्रा, ही तुझ्या आश्रयाखाली राहणारी माणसें, दिवसानुदिवस सर्व प्रकारची स्पृहणीय संपत्ति वृद्धिंगत करून घेत आहेत. भक्तिहीन पातकी लोकांनी आपल्याजवळ किती संपत्ति सांठवून ठेवलेली आहे हे तूं भक्तवत्सल असल्यामुळें तुला विदित आहे; तेव्हां त्यांची संपत्ति हरण करून आम्हांस आणून दे. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८२ ( इंद्र सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - इंद्र : छंद - पंक्ति; जगती
उपो॒ षु शृ॑णु॒ही गिरो॒ मघ॑व॒न्मात॑था इव ॥
उपो इति सु शृणुही गिरः मघऽवन् मा अतथाऽइव ॥
हे उदार इंद्र देवा, इकडे ये व आमच्या प्रार्थना ऐक. आमच्याविषयी पूर्वीपेक्षा भिन्न भावना धारण करूं नकोस. ज्या अर्थी गोड गोड वाणीने तुझ्याजवळ याचना कशा करावी हें तूं आम्हांस शिकविलेले आहेस, त्या अर्थी आम्ही तुझ्याजवळ आळ घेणारच घेणार. यास्तव हे इंद्रा, खरोखर आपले अश्व तू सिद्ध कर. ॥ १ ॥
अक्ष॒न्नमी॑मदन्त॒ ह्यव॑ प्रि॒या अ॑धूषत ॥
अक्षन् अमीमदंत हि अव प्रियाः अधूषत ॥
ते सुखांत राहिले, त्यांनी आनंद केला. त्यांच्यावर तुझी प्रीति असल्यामुळें त्यांनी हर्षाने आपली मस्तकें डोलविली. स्वतःच्याच तेजानें युक्त असलेल्या त्या विद्वान् लोकांनी अभिनव स्तोत्रें रचून तुझे स्तवनही केले. यास्तव, हे इंद्रा तूं खरोखर आपले अश्व आतां सिद्ध कर. ॥ २ ॥
सु॒सं॒दृशं॑ त्वा व॒यं मघ॑वन्वन्दिषी॒महि॑ ॥
सुऽसंदृशं त्वा वयं मघऽवन् वंदिषीमहि ॥
ज्याचें दर्शन फार रमणीय आहे अशा तुला, हे उदार इंद्रदेवा, आम्ही वंदन करूं. आम्ही तुझी स्तुति केली असल्यामुळें, आपल्या रथामध्यें सर्व प्रकारची वैभवें भरून घेऊन, तुझ्या सेवकांसमीप तूं आगमन कर. खरोखर, हे इंद्रा, तूं आपले अश्व आतां जोड. ॥ ३ ॥
स घा॒ तं वृष॑णं॒ रथ॒मधि॑ तिष्ठाति गो॒विद॑म् ॥
सः घ तं वृषणं रथं अधि तिष्ठाति गोऽविदम् ॥
हे इंद्रदेवा, सोमरसाने भरलेले जें यज्ञपात्र, तुला आपले अश्व जोडण्यास प्रवृत्त करतें. त्यांची रुची काय आहे हे कोणी जाणत असेल तो धेनूंची प्राप्ति करून घेण्यास समर्थ असलेल्या अशा आपल्या रथावर आरूढ होवो. इंद्र देवा, खरोखर आपले अश्व तूं सिद्ध कर. ॥ ४ ॥
यु॒क्तस्ते॑ अस्तु॒ दक्षि॑ण उ॒त स॒व्यः श॑तक्रतो ॥
युक्तः ते अस्तु दक्षिणः उत सव्यः शतक्रतो इति शतऽक्रतो ॥
तुझा उजवे बाजूचा घोडा रथास जोडलेला असो, व अत्यंत प्रबल इंद्रा, तुझे डावे बाजूकडील घोडाही रथास जोडला जावो. त्या रथांत बसून आम्ही अर्पण केलेल्या हवींत संतोष मानीत तूं आपल्या प्रियपत्नीकडे गमन कर. खरोखर, हे इंद्रा, तूं आपले अश्व जोड. ॥ ५ ॥
यु॒नज्मि॑ ते॒ ब्रह्म॑णा के॒शिना॒ हरी॒ उप॒ प्र या॑हि दधि॒षे गभ॑स्त्योः ॥
युनज्मि ते ब्रह्मणा केशिना हरी इति उप प्र याहि दधिषे गभस्त्योः ॥
तुझी स्तोत्रें गाऊन आम्ही तुझ्या अश्वांना तुझे रथास नियुक्त होण्याची प्रेरणा करीत आहोंत. याची आयाळ किती दीर्घ आहे पहा. तूं इकडे ये; कारण तू आपल्या हातांत सर्व संपत्ति धारण करतोस. चित्तास हुषारी आणणार्या ह्या सोमरसांनी तुला आनंद दिला आहे. आणि पूषादेव आपली पत्नी यांचे सहवर्तमान, हे वज्रधारी देवा, तूं त्यांत रममाण होऊन गेला आहेस. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८३ ( इंद्र सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - इंद्र : छंद - जगती
अश्वा॑वति प्रथ॒मो गोषु॑ गच्छति सुप्रा॒वीरि॑न्द्र॒ मर्त्य॒स्तवो॒तिभिः॑ ॥
अश्वऽवति प्रथमः गोषु गच्छति सुप्रऽअवीः इंद्र मर्त्यः तव उतिभिः ॥
हे इंद्रदेवा, आपल्या कृपासामर्थ्याने तूं ज्या मानवाचें संरक्षण करतोस तो सर्वांचे अगोदर धेनू व अश्वयुक्त संपत्ति यांप्रत प्राप्त होतो. ज्याप्रमाणें त्वरेनें धांवणारे पाणी चोहोंकडून येऊन समुद्रास भरून टाकते, त्याप्रमाणें खरोखर तूं त्या मानवास विपुल धनानें भरून टाकतोस. ॥ १ ॥
आपो॒ न दे॒वीरुप॑ यन्ति हो॒त्रिय॑म॒वः प॑श्यन्ति॒ वित॑तं॒ यथा॒ रजः॑ ॥
आपः न देवीः उप यंति होत्रियं अवः पश्यंति विऽततं यथा रजः ॥
पुण्यकारक नद्यांप्रमाणे ते त्या यज्ञार्ह इंद्र देवासभोंवती जमतात व जगताचें संरक्षण करण्याचे त्याचे रजोलोकाप्रमाणे सर्वत्र पसरलेले सामर्थ्य ते अवलोकन करतात. भक्तिमान पुरुषास सर्व देव प्रमुख स्थानाकडे घेऊन जातात, व ज्याप्रमाणे विवाहोत्सुक पुरुष वधूंचा शोध करतात त्याप्रमाणे स्वस्तुति गाणार्या भक्तास ते देव शोधीत जातात. ॥ २ ॥
अधि॒ द्वयो॑रदधा उ॒क्थ्यं१॑ वचो॑ य॒तस्रु॑चा मिथु॒ना या स॑प॒र्यतः॑ ॥
अधि द्वयोः अदधा उक्थ्यं वचः यतऽस्रुचा मिथुना या सपर्यतः ॥
यज्ञचमस सिद्ध करून जे प्रधूवर तुझे पूजन करतात त्या उभयतांवर तूं प्रशंसायुक्त वचनांचा वर्षाव करतोस. जो कोणी तुझ्या आज्ञेंत राहतो तो कोणाकडूनही उपद्रव न पावतां भरभराटीस पोहोंचतो. जो भक्त तुला सोमरस अर्पण करतो त्यास कल्याणप्रद असे सामर्थ्य प्राप्त होते. ॥ ३ ॥
आदङ्गि॑राः प्रथ॒मं द॑धिरे॒ वय॑ इ॒द्धाग्न॑यः॒ शम्या॒ ये सु॑कृ॒त्यया॑ ॥
आत् अङ्गिराः प्रथमं दधिरे वयः इद्धऽअग्नयः शम्या ये सुऽकृत्यया ॥
सत्कृत्यें व भक्ति यांच्या योगानें ज्या अंगिरसांनी अग्नीस प्रदिप्त केलें होते त्या सर्वांचे अगोदर ज्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ति झाली, त्या पुरुषांस पणीची सर्व अन्नसामग्री तसेच त्यानें बाळगलेले अश्वधेनू इत्यादि सर्व पशु हेही मिळाले. ॥ ४ ॥
य॒ज्ञैरथ॑र्वा प्रथ॒मः प॒थस्त॑ते॒ ततः॒ सूर्यो॑ व्रत॒पा वे॒न आज॑नि ॥
यज्ञैः अथर्वा प्रथमः पथः तते ततः सूर्यः व्रतऽपा वेनः आ अजनि ॥
प्रथम अथर्वणाने यज्ञाच्या योगाने मार्ग तयार केला नंतर नीतिनियमनांचे परिपालन करणार्या सुंदर सूर्यदेवानें जन्म घेतला. उशना काव्यानें नंतर लगेच धेनू हांकून आणल्या. आम्ही आतां यमानें जन्म घेतल्याबद्दल त्याचें पूजन करीत आहों. ह्यास मृत्युची बाधा नाही. ॥ ५ ॥
ब॒र्हिर्वा॒ यत्स्व॑प॒त्याय॑ वृ॒ज्यते॑ऽ॒र्को वा॒ श्लोक॑मा॒घोष॑ते दि॒वि ॥
बर्हिः वा यत् सुऽअपत्याय वृज्यते अर्कः वा श्लोकं आऽघोषते दिवि ॥
ज्यावेळी चांगल्या अपत्याची प्राप्ति व्हावी म्हणून भक्तिमान लोक दर्भ कापून आणतात अथवा ज्यावेळीं स्तोत्रें अथवा गायनें ह्यांचा घोष द्युलोकापर्यंत जाऊन पोहोंचतो, अथवा जेथें सोमवल्लींतून तिचा रस बाहेर काढण्यास समर्थ अशा एखाद्या शोभिवंत यज्ञ पाषाणाचा ध्वनि चाललेला असतो त्यावेळी असा यज्ञ आपल्या समीप चाललेला पाहून इंद्रास फार हर्ष होतो. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८४ ( इंद्र सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - इंद्र : छंद - अनेक
असा॑वि॒ सोम॑ इंद्र ते॒ शवि॑ष्ठ धृष्ण॒वा ग॑हि ॥
असावि सोमः इंद्र ते शविष्ठ धृष्णो इति आ गहि ॥
हे इंद्रा, तुझ्याकरितां येथे सोमरस तयार करून ठेवला आहे, म्हणून हे अत्यंत बलाढ्य व धारिष्टवान देवा, तूं इकडे ये. ज्याप्रमाणे आपल्या किरणांनी सूर्य रजोलोकास व्याप्त करून टाकतो त्याप्रमाणे तुझ्या शरीरांत सर्वत्र उत्साह प्रवेश करो. ॥ १ ॥
इंद्र॒मिद्धरी॑ वह॒तोऽ॑प्रतिधृष्टशवसम् ॥
इंद्रं इत् हरी इति वहतः अप्रतिधृष्टऽशवसम् ॥
ज्याच्या बलाचा प्रतिरोध कोणास करतां यावयाचा नाही असा जो केवळ इंद्रच त्याचे अश्व, ऋषीजनांच्या स्तुति ऐकण्याकरितां व इतर मनुष्याच्या यज्ञांचा स्वीकार करण्याकरितां घेऊन येत असतात. ॥ २ ॥
आ ति॑ष्ठ वृत्रह॒न्रथं॑ यु॒क्ता ते॒ ब्रह्म॑णा॒ हरी॑ ॥
आ तिष्ठ वृत्रऽहन् रथं युक्ता ते ब्रह्मणा हरी इति ॥
हे वृत्राचा वध करणार्या देवा, तूं रथावर आरूढ हो. आम्ही स्तोत्रे गाऊन तुला आपले अश्व रथास जोडण्यास प्रवृत्त केले आहे. हा सोमफलक आपल्या मधुर ध्वनीनें तुझे मन आमचेकडे वळवो. ॥ ३ ॥
इ॒ममिं॑द्र सु॒तं पि॑ब॒ ज्येष्ठ॒मम॑र्त्यं॒ मद॑म् ॥
इमं इंद्र सुतं पिब ज्येष्ठं अमर्त्यं मदम् ॥
हे इंद्र देवा, जणूं प्रत्यक्ष आनंदच अशा ह्या अत्युत्तम व अमरत्व प्राप्त करून देणार्या सोमरसाचें प्राशन कर. ह्या उज्ज्वल सोमाच्या धारा तुला उद्देशून यज्ञगृहामध्यें वाहूं लागल्या आहेत. ॥ ४ ॥
इंद्रा॑य नू॒नम॑र्चतो॒क्थानि॑ च ब्रवीतन ॥
इंद्राय नूनं अर्चत उक्थानि च ब्रवीतन ॥
खरोखर ह्या इंद्रास उद्देशून पूजा अर्पण करा. त्याचे सन्मानार्थ स्तोत्रें म्हणा. ह्या सोमवल्लींतून काढलेल्या रसबिंदूनीं त्यास आनंद उत्पन्न केला आहे. म्हणून ह्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्यापुढें विनयानें प्रणाम करा. ॥ ५ ॥
नकि॒ष्ट्वद्र॒थीत॑रो॒ हरी॒ यदिं॑द्र॒ यच्छ॑से ॥
नकिःष् त्वत् रथीऽतरः हरी इति यत् इंद्र यच्छसे ॥
ज्यावेळी हे इंद्रा, तूं आपले अश्व रथास जोडतोस त्यावेळीं रथ चालविण्यांत तुझ्यापेक्षां जास्त निपुण खरोखर दुसरा कोणीही नसेल. सामर्थ्यांत तुझी बरोबरी करणारा खरोखर कोणीही नाही, व तुझ्यासारखें अश्वनैपुण्य संपादन करून आजपर्यंत कोणीही तुझ्यावर वरचढ केली नाही हे खचित आहे. ॥ ६ ॥
य एक॒ इद्वि॒दय॑ते॒ वसु॒ मर्ता॑य दा॒शुषे॑ ॥
यः एकः इत् विऽदयते वसु मर्ताय दाशुषे ॥
भक्तीनें हवि अर्पण करणार्या मानवास जो धन अर्पण करतो असा हा अप्रतिहत सामर्थ्यवान इंद्र प्रभूच एकटा होय. ॥ ७ ॥
क॒दा मर्त॑मरा॒धसं॑ प॒दा क्षुम्प॑मिव स्फुरत् ॥
कदा मर्तं अराधसं पदा क्षुंपंऽइव स्फुरत् ॥
इंद्राचे पूजन न करणार्या मानवास तो तृणाप्रमाणे पायाखाली केव्हां तुडवून टाकील बरें ? खरोखर तो आमच्या प्रार्थना केव्हां ऐकेल ? ॥ ८ ॥
यश्चि॒द्धि त्वा॑ ब॒हुभ्य॒ आ सु॒तावाँ॑ आ॒विवा॑सति ॥
यः चित् हि त्वा बहुऽभ्य आ सुतऽवान् आऽविवासति ॥
खरोखर दुसर्या अनेक देवता सोडून मनुष्य सोमरसानें तुझी उपासना करतो असेंच उग्र सामर्थ्य ह्या इंद्राजवळ आहे. ॥ ९ ॥
स्वा॒दोरि॒त्था वि॑षू॒वतो॒ मध्वः॑ पिबन्ति गौ॒र्यः ॥
स्वादोः इत्था विषूऽवतः मध्वः पिबंति गौर्यः ॥
ज्या उज्ज्वल धेनू इंद्राबरोबर असतात, ज्या त्या पराक्रमी देवाच्या सहवासांत शोभा पावून आनंदाचा उपभोग घेतात, व ज्यांना त्याच्या अप्रतिहत जगत्प्रभुत्वामुळें तेज आलेले आहे, त्या धेनूही ह्याप्रमाणे सर्व शरीरांत एकदम प्रवेश करणार्या मधुर व उत्तम सोमरसाचें प्राशन करीत असतात. ॥ १० ॥
ता अ॑स्य पृशना॒युवः॒ सोमं॑ श्रीणन्ति॒ पृश्न॑यः ॥
ताः अस्य पृशनऽयुवः सोमं श्रीणंति पृश्नयः ॥
चित्रविचित्र वर्णांच्या ह्या धेनूंना इंद्राच्या सान्निध्याची फार आवड असते. व त्या सोमरसास परिपक्वत्व आणतात. ह्या धेनू इंद्रास प्रिय आहेत. सर्व विश्वांवर जे इंद्राचें अधिपत्य आहे त्यामुळें ह्यांनाही तेज चढून त्या ह्याचे आयुध जे वज्र त्यास स्फुरण चढवितात. ॥ ११ ॥
ता अ॑स्य॒ नम॑सा॒ सहः॑ सप॒र्यन्ति॒ प्रचे॑तसः ॥
ताः अस्य नमसा सहः सपर्यंति प्रऽचेतसः ॥
त्या ज्ञानवान धेनू त्याचे सामर्थ्यास वंदन करून त्याचें पूजन करतात. सर्वांचे अगोदर आपणांस ज्ञान प्राप्त व्हावे ह्या इच्छेनें, इंद्राच्या अधिपत्यामुळें तेज पावलेल्या त्या धेनूंनी त्याच्या अनेक नियमनांचे योग्य परिपालन केले. ॥ १२ ॥
इंद्रो॑ दधी॒चो अ॒स्थभि॑र्वृ॒त्राण्यप्र॑तिष्कुतः ॥ ज॒घान॑ नव॒तीर्नव॑ ॥ १३ ॥ इंद्रः दधीचः अस्थऽभिः वृत्राणि अप्रतिऽष्कुतः ॥ जघान नवतीः नव ॥ १३ ॥
ज्याच्या सामर्थ्यापुढें शत्रूंचा निभाव लागत नाही अशा त्या इंद्रानें, दधिचाच्या अस्थि घेऊन त्यांच्यायोगानें नव्याण्णव वृत्राचा वध केला. ॥ १३ ॥
इ॒च्छन्नश्व॑स्य॒ यच्छिरः॒ पर्व॑ते॒ष्वप॑श्रितम् ॥ तद्वि॑दच्छर्य॒णाव॑ति ॥ १४ ॥ इच्छन् अश्वस्य यच् शिरः पर्वतेषु अपऽश्रितम् ॥ तत् विदत् शर्यणाऽवति ॥ १४ ॥
पर्वतांत गुप्त होऊन राहिलेलें जे अश्वाचे शिर इंद्र शोधीत होता तें त्याला शरणावृतामध्यें सांपडलें. ॥ १४ ॥
अत्राह॒ गोर॑मन्वत॒ नाम॒ त्वष्टु॑रपी॒च्यम् ॥ इ॒त्था च॒न्द्रम॑सो गृ॒हे ॥ १५ ॥ अत्र अह गोः अमन्वत नाम त्वष्टुः अपीच्यम् ॥ इत्था चंद्रमसः गृहे ॥ १५ ॥
त्वष्टा देवाच्या वृषभाचें नांव सुद्धां लुप्त झाले असतां यांस त्याच ठिकाणीं त्याचा शोध लागला व चंद्राच्या सदनांत सुद्धां तें ह्याच प्रमाणे उपलब्ध झाले. ॥ १५ ॥
को अ॒द्य यु॑ङ्क्ते धु॒रि गा ऋ॒तस्य॒ शिमी॑वतो भा॒मिनो॑ दुर्हृणा॒यून् ॥
कः अद्य युङ्क्ते धुरि गाः ऋतस्य शिमीऽवतः भामिनः दुःहृणायून् ॥
सामर्थ्यवान, तेजस्वी, ताब्यांत ठेवण्यास कठीण असलेलें, मुख व वक्षस्थलें बाणाप्रमाणें घातक असतांही जे सौख्य अर्पण करणारे आहेत अशा वृषभांस सत्यनियमनांच्या धुरेस आज कोण जोडील बरें ? खरोखर जो कोणी ह्यांच्या सेनेस उत्तेजन देईल त्यास दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. ॥ १६ ॥
क ई॑षते तु॒ज्यते॒ को बि॑भाय॒ को मं॑सते॒ सन्त॒मिंद्रं॒ को अन्ति॑ ॥
कः ईषते तुज्यते कः बिभय कः मंसते संतं इंद्रं कः अंति ॥
इंद्रास पाहून कोण पळ काढील ? कोणास धडकी भरेल ? कोण भिईल ? इंद्र आमचे जवळच आहे असें कोणास वाटावयास लागेल ? त्यास आपल्या बलाच्या विषयी कोण प्रार्थना करील ? आपल्या नोकरचाकरांविषयी, व आपली चीजवस्त व शरीरस्वास्थ्य ह्यांविषयीं त्यास कोण विनवील ? आपल्या पदरच्या माणसाविषयीं त्याचेजवळ कोण विनंती करील ? ॥ १७ ॥
को अ॒ग्निमी॑ट्टे ह॒विषा॑ घृ॒तेन॑ स्रु॒चा य॑जाता ऋ॒तुभि॑र्ध्रु॒वेभिः॑ ॥
कः अग्निं ईट्टे हविषा घृतेन स्रुचा यजातै ऋतुऽभिः ध्रुवेभिः ॥
हवीनें घृतानें त्याचें कोण पूजन करतो ? ठराविक योग्य वेळीं त्यास यज्ञचमसानें कोण हवि देतो ? देव यज्ञद्रव्यें त्वरेनें कोणाकरितां घेऊन येतात ? कल्याणकर्त्या अशा देवांचा कोणता उपासक त्यास यज्ञ अर्पण करून त्यांचे चिंतन करतो ? ॥ १८ ॥
त्वम॒ङ्ग प्र शं॑सिषो दे॒वः श॑विष्ठ॒ मर्त्य॑म् ॥
त्वं अङ्ग प्र शंसिषः देवः शविष्ठ मर्त्यम् ॥
हे अत्यंत पराक्रमी देवा, खरोखर तूं श्रेष्ठ देव असूनही मानवांची महती वाढविली आहेस. हे उदार इंद्रा तुझेवाचून सौख्याची प्राप्ति करून देणारा कोणी नाहीं हें मी तुला खचित सांगतो. ॥ १९ ॥
मा ते॒ राधां॑सि॒ मा त॑ ऊ॒तयो॑ वसोऽ॒स्मान्कदा॑ च॒ना द॑भन् ॥
मा ते राधांसि मा ते ऊतयः वसो इति अस्मान् कदा चन दभन् ॥
हे वैभवस्वरूपदेवा, तुझी कृपा व आमचें संरक्षण करणारें तुझें सामर्थ्य ह्याचा आमच्यांत कधींही भंग न पावो. मानवांचे हित करणार्या हे देवा, आमच्या व आमच्या जवळच्या माणसांच्या पदरात सर्व संपत्ति मोजून टाक. ॥ २० ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८५ ( मरुत् सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - मरुत् : छंद - त्रिष्टुभ्; जगती
प्र ये शुम्भ॑न्ते॒ जन॑यो॒ न सप्त॑यो॒ याम॑न्रु॒द्रस्य॑ सू॒नवः॑ सु॒दंस॑सः ॥
प्र ये शुम्भंते जनयः न सप्तयः यामन् रुद्रस्य सूनवः सुऽदंससः ॥
अद्भुत पराक्रम करणारे व शीघ्रसंचारी असे जे रुद्राचे पुत्र स्वमार्गानें गमन करीत असतां, युवतीप्रमाणें आपली शरीरें नटवीत असतात त्यांनीच - खरोखर त्या मरुतांनीच - द्यावा पृथिवींना उत्कर्षाप्रत पोहोंचविलें. ते शूर व युद्ध संघर्षणांत चतुर आहेत. यज्ञ चालला असतां त्यांना फार आनंद होतो. ॥ १ ॥
त उ॑क्षि॒तासो॑ महि॒मान॑माशत दि॒वि रु॒द्रासो॒ अधि॑ चक्रिरे॒ सदः॑ ॥
ते उक्षितासः महिमानं आशत दिवि रुद्रासः अधि चक्रिरे सदः ॥
वृद्धिंगत होत होत, ते महत्वास पोहोंचले. त्या रुद्रानी द्युलोकांत आपलें निवासस्थान केलें. अर्काची उपासना करीत व शरीरबलास प्रगल्भता आणीत त्या पृश्निच्या पुत्रांनी पुष्कळ तेज संपादन केलें. ॥ २ ॥
गोमा॑तरो॒ यच्छु॒भय॑न्ते अ॒ञ्जिभि॑स्त॒नूषु॑ शु॒भ्रा द॑धिरे वि॒रुक्म॑तः ॥
गोऽमातरः यत् शुभयंते अञ्जिऽभिः तनूषु शुभ्राः दधिरे विरुक्मतः ॥
हे धेनूचे देदीप्यमान पुत्र ज्यावेळी भूषणांनी स्वतःस सजवितात त्यावेळी ते उज्ज्वल अलंकार आपल्या अंगावर घालतात. ते सर्व दुष्टांचा नाश करतात व त्यांचे मार्गावरून घृताचा प्रवाह चाललेला असतो. ॥ ३ ॥
वि ये भ्राज॑न्ते॒ सुम॑खास ऋ॒ष्टिभिः॑ प्रच्या॒वय॑न्तो॒ अच्यु॑ता चि॒दोज॑सा ॥
वि ये भ्राजंते सुऽमखासः ऋष्टिऽभिः प्रऽच्यवयंतः अच्युता चित् ओजसा ॥
स्वसामर्थ्यानें अचल वस्तूंना सुद्धां चळावयास लावणारे जे परमपूज्य देव आपल्या आयुधांमुळे शोभिवंत असतात अशा हे मरुतांनो, जेव्हां तुम्ही सर्व बलिष्ठ देव एकत्र जमतां व आपल्या रथांस ठिपकेदार रंगाच्या हरिणी जोडतां त्यावेळी तुमच्या गतींत मनाइतका वेग येतो. ॥ ४ ॥
प्र यद्रथे॑षु॒ पृष॑ती॒रयु॑ग्ध्वं॒ वाजे॒ अद्रि॑म्मरुतो रं॒हय॑न्तः ॥
प्र यत् रथेषु पृषतीः अयुग्ध्वं वाजे अद्रिं मरुतः रंहयंतः ॥
हे मरुत् हो, ज्यावेळी मोठ्या आवेशाने आपलें शस्त्र फेंकीत तुम्ही ठिपकेदार रंगाच्या हरिणी स्वरथास जोडतां त्या तेजाच्याच धारा चोहोंकडे पसरतात व ज्याप्रमाणे पाण्याच्या योगानें एखादी पखाल चिंब भिजावी त्याप्रमाणें पृथ्वीस त्या स्वतःच्या प्रवाहांत बुडवितात. ॥ ५ ॥
आ वो॑ वहन्तु॒ सप्त॑यो रघु॒ष्यदो॑ रघु॒पत्वा॑नः॒ प्र जि॑गात बा॒हुभिः॑ ॥
आ वः वहंतु सप्तयः रघुऽस्यदः रघुऽपत्वानः प्र जिगात बाहुऽभिः ॥
हे मरुत्हो, शीघ्रगामी, चपल व उड्डाण करणारे असे तुमचे अश्व तुम्हांस घेऊन येवोत. तुम्ही याल तेव्हां तुमचे बाहू सरसावून या व ह्या आसनावर बसा. तुमच्याकरितां प्रशस्त जागा तयार केली आहे. आमचे मधुर हवि गोड करून घ्या. ॥ ६ ॥
तेऽवर्धन्त॒ स्वत॑वसो महित्व॒ना नाकं॑ त॒स्थुरु॒रु च॑क्रिरे॒ सदः॑ ॥
ते अवर्धंत स्वऽतवसः महिऽत्वना नाकं तस्थुः उरु चक्रिरे सदः ॥
स्वसामर्थ्यानें युक्त असलेले ते मरुत् आपल्या सामर्थ्यानें वृद्धि पावले. स्वर्गापर्यंत ते आरूढ झाले. त्यांनी स्वतःकरितां विस्तीर्ण सदन निर्माण केलें. शत्रूंच्या गर्वाचें हरण करणार्या त्या पराक्रमी देवांस ज्यावेळी विष्णुनें साहाय्य केलें त्यावेळीं मरुत् देव पक्ष्यांप्रमाणें आपल्या आवडीच्या कुशासनावर जाऊन बसले. ॥ ७ ॥
शूरा॑ इ॒वेद्युयु॑धयो॒ न जग्म॑यः श्रव॒स्यवो॒ न पृत॑नासु येतिरे ॥
शूराःऽइव इत् युयुधयः न जग्मयः श्रवस्यवः न पृतनासु येतिरे ॥
शूरांप्रमाणें शत्रूंवर त्वरेनें चाल करून जाणार्या, योद्ध्यांप्रमाणें अथवा लढाईंत नांव कमवावयाची हांव असणार्या लढवय्यांप्रमाणें ते युद्धांत आपली पराकाष्ठा करतात. ह्या मरुतांची सर्व जगास भिती वाटते. राजाप्रमाणें ह्याचें अंगांत त्वेष दिसतो. ॥ ८ ॥
त्वष्टा॒ यद्वज्रं॒ सुकृ॑तं हिर॒ण्ययं॑ स॒हस्र॑भृष्टिं॒ स्वपा॒ अव॑र्तयत् ॥
त्वष्टा यत् वज्रं सुऽकृतं हिरण्ययं सहस्रऽभृष्टिं सुऽअपाः अवर्तयत् ॥
ज्यावेळीं कुशल त्वष्टा देवानें हजार धारांनी युक्त असें एक सोन्याचें सुंदर वज्र घडवून तयार केलें त्यावेळीं शौर्याची कृत्यें करण्याकरितां इंद्रानें त्याचा स्वीकार करून वृत्राचा वध केला व उदकांच्या प्रवाहांस मार्ग मोकळा करून दिला. ॥ ९ ॥
ऊ॒र्ध्वं नु॑नुद्रेऽव॒तं त ओज॑सा दादृहा॒णं चि॑द्बिभिदु॒र्वि पर्व॑तम् ॥
ऊर्ध्वं नुनुद्रे अवतं ते ओजसा ददृहाणं चित् बिभिदुः वि पर्वतम् ॥
त्यांनी स्वसामर्थ्यांनी विहीर खालून वरती आणली व दृढ पर्वताचा सुद्धां भेद केला. त्य उदार मरुतांनी सोमरसाच्या आनंददायक स्फूर्तीचे भरांत, मधुर वेणूध्वनि करीत, अनेक आश्चर्यकारक कृत्यें केलीं. ॥ १० ॥
जि॒ह्मं नु॑नुद्रेऽव॒तं तया॑ दि॒शासि॑ञ्च॒न्नुत्सं॒ गोत॑माय तृ॒ष्णजे॑ ॥
जिह्मं नुनुद्रे अवतं तया दिशा असिञ्चन् उत्सं गोतमाय तृष्णऽजे ॥
त्या वक्रकूपास त्यांनी त्या दिशेनें वर नेलें, आणि तृषार्त गौतमासाठी त्यांनी उदकाचा झरा वहावयास लावला. चित्रविचित्र क्रांतीनें युक्त असलेले हे मरुत् भक्तांचे संरक्षण करणार्या आपल्या सामर्थ्यासह त्याचेकडे गेले व आपल्या तेजानें त्यांनी त्या विद्वान ऋषीची इच्छा परिपूर्ण केली. ॥ ११ ॥
या वः॒ शर्म॑ शशमा॒नाय॒ सन्ति॑ त्रि॒धातू॑नि दा॒शुषे॑ यच्छ॒ताधि॑ ॥
या वः शर्म शशमानाय संति त्रिऽधातूनि दाशुषे यच्छत अधि ॥
जी सौख्यें तुमचें स्तवन करणार्या करितांच राखलेलीं आहेत त्यांस त्रिगुणित करून ती हवि अर्पण करणार्या भक्तांस द्या व हे मरुत् देवांनो, आम्हांसही त्यांचा लाभ घडूं द्या. हे शूर मरुतांनो, वीर्यशाली संततीनें युक्त असें वैभव आम्हांस अर्पण करा. ॥ १२ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८६ ( मरुत् सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - मरुत् : छंद - गायत्री मरु॑तो॒ यस्य॒ हि क्षये॑ पा॒था दि॒वो वि॑महसः ॥ स सु॑गो॒पात॑मो॒ जनः॑ ॥ १ ॥ मरुतः यस्य हि क्षये पाथ दिवः विऽमहस ॥ सः सुऽगोपातमः जनः ॥ १ ॥
हे अत्यंत तेजःपुंज मरुत् हो, द्युलोकांतून येऊन खरोखर ज्याचे सदनांत तुम्ही सोमरसाचे पान करतां त्यास त्याचे रक्षण करण्यास उत्तमच संरक्षणकर्ता भेटला असे म्हटले पाहिजे. ॥ १ ॥
य॒ज्ञैर्वा॑ यज्ञवाहसो॒ विप्र॑स्य वा मती॒नाम् ॥ मरु॑तः शृणु॒ता हव॑म् ॥ २ ॥ यज्ञैः वा यज्ञऽवाहसः विप्रस्य वा मतीनाम् ॥ मरुतः शृणुत हवम् ॥ २ ॥
यज्ञ करणार्या भक्ताच्या यज्ञांकडे पाहून अथवा विद्वान उपासकाच्या स्तुतींचा आदर करून, हे मरुत् हो, आपण आमची हांक श्रवण करा. ॥ २ ॥
उ॒त वा॒ यस्य॑ वा॒जिनोऽ॑नु॒ विप्र॒मत॑क्षत ॥ स गन्ता॒ गोम॑ति व्र॒जे ॥ ३ ॥ उत वा यस्य वाजिनः अनु विप्रं अतक्षत ॥ सः गंता गोऽमति व्रजे ॥ ३ ॥
शिवाय ज्या सामर्थ्यवान पुरुषाविषयी तुमचा इतका आदर आहे की आपल्या विद्वान भक्तास तुम्ही त्याचेप्रमाणे व्हावयास सांगता त्यासच जेथें धेनू विपुल आहेत अशा वैभवाचे स्थान प्राप्त होते. ॥। ३ ॥
अ॒स्य वी॒रस्य॑ ब॒र्हिषि॑ सु॒तः सोमो॒ दिवि॑ष्टिषु ॥ उ॒क्थम् मद॑श्च शस्यते ॥ ४ ॥ अस्य वीरस्य बर्हिषि सुतः सोमः दिविष्टिषु ॥ उक्थं मदः च शस्यते ॥ ४ ॥
यज्ञामध्यें ह्याच वीराच्या पवित्र दर्भांवर सोमरस काढून ठेवतात व स्तुति व संतोषप्रद गायन करतात. ॥ ४ ॥
अ॒स्य श्रो॑ष॒न्त्वा भुवो॒ विश्वा॒ यश्च॑र्ष॒णीर॒भि ॥ सूरं॑ चित्स॒स्रुषी॒रिषः॑ ॥ ५ ॥ अस्य श्रोषंतु आ भुवः विश्वाः यः चर्षणीः अभि ॥ सूरं चित् सस्रुषीः इषः ॥ ५ ॥
जो सर्व मानवांपेक्षा वरिष्ठ आहे अशा ह्या भक्ताची हांक मरुत् देव श्रवण करोत. ह्याचे वैभव सूर्यापर्यंत जाऊन पोंचेल इतके विपुल आहे. ॥ ५ ॥
पू॒र्वीभि॒र्हि द॑दाशि॒म श॒रद्भि॑र्मरुतो व॒यम् ॥ अवो॑भिश्चर्षणी॒नाम् ॥ ६ ॥ पूर्वीभिः हि ददाशिम शरत्ऽभिः मरुतः वयम् ॥ अवःऽभिः चर्षणीनाम् ॥ ६ ॥
हे मरुत् हो, तुम्ही मानवांचे किती दक्षतेने रक्षण करतां हे पाहून आम्ही अनेक वर्षांपासून आपणांस हवि अर्पण करीत आहोंत. ॥ ६ ॥
सु॒भगः॒ स प्र॑यज्यवो॒ मरु॑तो अस्तु॒ मर्त्यः॑ ॥ यस्य॒ प्रयां॑सि॒ पर्ष॑थ ॥ ७ ॥ सुऽभगः सः प्रऽयज्यवः मरुतः अस्तु मर्त्यः ॥ यस्य प्रयांसि पर्षथ ॥ ७ ॥
हे अत्यंत पूज्य मरुत् देवहो, ज्याचे हवि तुम्ही स्वीकारतां तो मनुष्य खचित परम भाग्यवान होय. ॥ ७ ॥
श॒श॒मा॒नस्य॑ वा नरः॒ स्वेद॑स्य सत्यशवसः ॥ वि॒दा काम॑स्य॒ वेन॑तः ॥ ८ ॥ शशमानस्य वा नरः स्वेदस्य सत्यऽशवसः ॥ विद कामस्य वेनतः ॥ ८ ॥
सत्यबलसमृद्ध हे मरुत् देवांनो, तुमची स्तुति भक्तजन किती परिश्रमपूर्वक करतात व तुमचे संबंधी प्रेम बाळगणर्या भाविकाचे मनांत काय इच्छा असतात हें तुम्हास विदितच आहे. ॥ ८ ॥
यू॒यं तत्स॑त्यशवस आ॒विष्क॑र्त महित्व॒ना ॥ विध्य॑ता वि॒द्युता॒ रक्षः॑ ॥ ९ ॥ यूयं तत् सत्यऽशवसः आविः कर्त महिऽत्वना ॥ विध्यता विऽद्युता रक्षः ॥ ९ ॥
सत्यबलपरिपूर्ण हे मरुत् देवहो, तुम्ही आपल्या सामर्थाचे योगाने त्याची प्रतीति दाखवा, व विद्युतप्रहार करून राक्षसांचे विदारण करा. ॥ ९ ॥
गूह॑ता॒ गुह्यं॒ तमो॒ वि या॑त॒ विश्व॑म॒त्रिण॑म् ॥ ज्योति॑ष्कर्ता॒ यदु॒श्मसि॑ ॥ १० ॥ गूहत गुह्यं तमः वि यात विश्वं अत्रिणम् ॥ ज्योतिः कर्त यत् उश्मसि ॥ १० ॥
हा निबिड अंधकार नाहींसा करा व सर्व दुष्टांना पार घालवून द्या. ज्या प्रकाशाची आम्हांस आवड आहे तो प्रकाशही आम्हांस अर्पण करा. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८७ ( मरुत् सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - मरुत् : छंद - जगती
प्रत्व॑क्षसः॒ प्रत॑वसो विर॒प्शिनोऽ॑नानता॒ अवि॑थुरा ऋजी॒षिणः॑ ॥
प्रऽत्वक्षसः प्रऽतवसः विऽरप्शिनः अनानताः अविथुराः ऋजीषिणः ॥
ज्याप्रमाणें प्रकाश किरण नजरेस पडले की त्यांचेबरोबर आकाशस्थ ज्योति दृष्टीस पडावयाच्याच त्याप्रमाणे हें पहा कित्येक मरुद्देव आपली सुंदर भूषणें धारण करून प्रकट झाले आहेत. ह्यांचे सामर्थ्य विशाल, बल अगाध, महत्त्व मोठे व पराक्रम अतिशय असून हे कोणापुढेंही नम्र होणार नाहींत. हे कोणाकडूनही स्थानभ्रष्ट होणार नाहींत. ह्यांचा स्वभाव सरळ आहे आणि त्यामुळें सर्वांस अत्यंत आवडते झाले आहेत. ॥ १ ॥
उ॒प॒ह्व॒रेषु॒ यदचि॑ध्वं य॒यिं वय॑ इव मरुतः॒ केन॑ चित्प॒था ॥
उपऽह्वरेषु यत् अचिध्वं ययिं वयःऽइव मरुतः केन चित् पथा ॥
हे मरुत् हो, जेव्हां कोणत्यातरी अद्भुत मार्गांनी पक्ष्यांप्रमाणे येऊन तुम्ही पृथ्वीचे समीप धांवत्या मेघांस थंबवून धरतां, त्यावेळी तुमचे रथावर ते उदकांचे संचय कोसळूं लागतात. म्हणून आपल्या भक्ताच्या विनंतीस मान देऊन तुम्ही मधुसदृश अशा उदकाची वृष्टि करा. ॥ २ ॥
प्रैषा॒मज्मे॑षु विथु॒रेव॑ रेजते॒ भूमि॒र्यामे॑षु॒ यद्ध॑ यु॒ञ्जते॑ शु॒भे ॥
प्र एषां अज्मेषु विथुराऽइव रेजते भूमिः यामेषु यत् ह युञ्जते शुभे ॥
ज्यावेळी ते बाहेर जातांना आपण सुंदर दिसावे म्हणून आपली भूषणें चढवूं लागतात त्यावेळी ह्याच्या प्रत्येक चलनवलनाबरोबर एखाद्या अस्थिर वस्तूप्रमाणें पृथिवी हालूं लागते. क्रिडा करणारे, जग हालवून सोडणारे, लकलकणारी शस्त्रास्त्रें धारण करणारे, व सर्वांची दाणादाण उडविणारे मरुत्देव आपला महिमा आपणच गावयास लागतात. ॥ ३ ॥
स हि स्व॒सृत्पृष॑दश्वो॒ युवा॑ ग॒णोऽ॒या ई॑शा॒नस्तवि॑षीभि॒रावृ॑तः ॥
सः हि स्वऽसृत् पृषत्ऽअश्वः युवा गणः अया ईशानः तविषीभिः आऽवृतः ॥
स्वतःसंचारी, ठिपकेदार रंगाच्या अश्वांवर आरूढ होणारा, तारुण्ययुक्त आणि अशा प्रकारे सर्वांवर आपली सत्ता चालविणारा, हा मरुतांचा समुदाय, खरोखर अनेक प्रकारच्या सामर्थ्यांनी परिवेष्टित झालेला आहे. ॥ ४ ॥
पि॒तुः प्र॒त्नस्य॒ जन्म॑ना वदामसि॒ सोम॑स्य जि॒ह्वा प्र जि॑गाति॒ चक्ष॑सा ॥
पितुः प्रत्नस्य जन्मना वदामसि सोमस्य जिह्वा प्र जिगाति चक्षसा ॥
आमच्या पुरातनकाली जन्म पावलेल्या पितरांचे नांव घेऊन आम्ही सांगतो कीं सोमाचे दर्शन घडल्याबरोबर ह्या मरुतांची जिव्हा लालसेनें पुढे येते. ज्यावेळी उत्तेजनकारक शब्द करीत हे युद्धकालीं इंद्रास जाऊन मिळाले तेव्हांच त्यांस यज्ञयागांत विख्यात असलेले पवित्र नांव प्राप्त झालें. ॥ ५ ॥
श्रि॒यसे॒ कं भा॒नुभिः॒ सं मि॑मिक्षिरे॒ ते र॒श्मिभि॒स्त ऋक्व॑भिः सुखा॒दयः॑ ॥
श्रियसे कं भानुऽभिः सं मिमिक्षिरे ते रश्मिऽभिः ते ऋक्वऽभिः सुऽखादयः ॥
उत्तम हवि ज्यांस सदोदित प्राप्त होतात अशा त्या मरुतांनी सौंदर्याच्या वृद्धीसाठी कोणास तेजस्विता अर्पण केली ? ह्यांनी प्रकाशाचा लाभ कोणास करून दिला ? व कोणाची प्रशंसा व्हावयास लावली ? चपल, निर्भय, व शस्त्रास्त्रें धारण करणार्या त्या मरुत् देवांनी आपल्या प्रिय निवासस्थानाकडे संचार केला ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८८ ( मरुत् सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - मरुत् : छंद - प्रसारपंक्ति; विराट्रूपा; त्रिष्टुभ्
आ वि॒द्युन्म॑द्भिर्मरुतः स्व॒र्कै रथे॑भिर्यात ऋष्टि॒मद्भि॒रश्व॑पर्णैः ॥
आ विद्युन्मत्ऽभिः मरुतः सुऽअर्कैः रथेभिः यात ऋष्टिमत्ऽभिः अश्वऽपर्णैः ॥
अश्व हेच ज्यांचे पक्ष आहेत, ज्यांत आयुधांचा भरपूर पुरवठा आहे, ज्यांची फार स्तुति झालेली आहे, व ज्यांत विजा लखलखत आहेत अशा आपल्या रथांत बसून, हे मरुत्हो, इकडे या. युक्तिप्रयुक्तींत अत्यंत चतुर असणार्या हे देवांनो, सर्व लोकात अत्यंत विपुल समजली जाईल अशी पोषणसामग्री बरोबर घेऊन येथें पक्ष्याप्रमाणें उड्डाण करा. ॥ १ ॥
तेऽरु॒णेभि॒र्वर॒मा पि॒शङ्गैः॑ शु॒भे कं या॑न्ति रथ॒तूर्भि॒रश्वैः॑ ॥
ते अरुणेभिः वरं आ पिशङ्गैः शुभे कं यान्ति रथतूःऽभिः अश्वैः ॥
कोणा श्रेष्ठ पुरुषाचे गृह सुशोभित करण्याकरितां ते रथास वेगानें वाहून नेणार्या आपल्या ताम्रवर्ण आणि पीतवर्ण अश्वांवर आरूढ होऊन चालले आहेत ? स्वहस्तांत आयुधें धारण करणारा हा मरुत् देवांचा समुदाय सुवर्णाप्रमाणे आश्चर्यकारक कांतीनें युक्त दिसत आहे. ह्या मरुतांनी आपल्या रथचक्राच्या धांवेने जमीन विदारण करून टाकली आहे. ॥ २ ॥
श्रि॒ये कं वो॒ अधि॑ त॒नूषु॒ वाशी॑र्मे॒धा वना॒ न कृ॑णवन्त ऊ॒र्ध्वा ॥
श्रिये कं वः अधि तनूषु वाशीः मेधा वना न कृणवंते ऊर्ध्वा ॥
जयश्रीनें कोणास विभूषित करण्याकरितां तुमच्या देहावर शस्त्रास्त्रें चमकत आहेत ? ज्याप्रमाणें लतादिक आकाशांत डोकें उंच वर काढतात त्याप्रमाणें तुझे भक्त वर तुझ्याकडे स्तोत्रें पाठवून देत आहेत. मोठ्या वैभवांत जन्म पावलेल्या व अत्यंत तेजानें युक्त असलेल्या हे मरुत् देवांनो, तुमच्यासाठींच हे भक्तजन यज्ञपाषाणाचे (सोमरस काढण्याचे) काम चालू करीत आहेत. ॥ ३ ॥
अहा॑नि॒ गृध्राः॒ पर्या व॒ आगु॑रि॒मां धियं॑ वार्का॒र्यां च॑ दे॒वीम् ॥
अहानि गृध्राः परि आ वः आ अगुः इमां धियं वार्कार्यां च देवीम् ॥
जिच्यामध्यें उदकवृष्टि घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे अशा ह्या दिव्य स्तुतीभोंवती व तुमच्या सभोंवार, हे गृध्रहो, उज्ज्वल प्रकाश देणारे दिवस आकर्षित झाले. स्तुति करणार्या गोतमांनीही आपल्या स्तवनांच्या योगानें आपणांस उदकपान करावयास सांपडावें म्हणून पाण्याच्या झर्यास वर पाठविलें. ॥ ४ ॥
ए॒तत्त्यन्न योज॑नमचेति स॒स्वर्ह॒ यन्म॑रुतो॒ गोत॑मो वः ॥
एतत् त्यत् न योजनं अचेति सस्वः ह यन् मरुतः गोतमः वः ॥
ज्यांनी सुवर्णचक्र हातांत धारण केलें आहे व ज्याच्या दंष्ट्रा लोखंडाप्रमाणे बळकट आहेत असे जे आपण सर्वत्र संचार करणारे वराह त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होत असतांना, हे मरुत् देवांनो, गोतमानें जे स्तोत्र गाइलें तें इतके यशस्वी होतें की कोणत्याही दुसर्या स्तोत्रास त्याची सर आली नाही. ॥ ५ ॥
ए॒षा स्या वो॑ मरुतोऽनुभ॒र्त्री प्रति॑ ष्टोभति वा॒घतो॒ न वाणी॑ ॥
एषा स्या वः मरुतः अनुऽभर्त्री प्रति स्तोभति वाघतः न वाणी ॥
हे मरुत् हो, तुमच्या मनास संतोष अर्पण करणारी ही स्तुति, तुमच्या इतर भक्तांच्या वाणीप्रमाणेंच तुमचें स्तवन करण्यांत निमग्न झाली आहे. ज्या अर्थी तुमच्या हातीं वैभवाचा ठेवा आहे त्या अर्थीं उपासकांनी तुमचें स्तवन केलें हें साहजिकच होय. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८९ ( शंतिपाठ सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - विश्वेदेव : छंद - जगती; त्रिष्टुभ्
आ नो॑ भ॒द्राः क्रत॑वो यन्तु वि॒श्वतोऽ॑दब्धासो॒ अप॑रीतास उ॒द्भिदः॑ ॥
आ नः भद्राः क्रतवः यंतु विश्वतः अदब्धासः अपरिऽइतासः उत्ऽभिदः ॥
ज्यांस प्रतिरोध करता येणे शक्य आहे, ज्यांस कधींही पराभव माहीत नाहीं व जी सर्वदा विजयशाली होतात अशी कल्याणप्रद सामर्थ्यें दोहोंकडून आम्हांस प्राप्त होवोत. ह्यामुळेंच देव आम्हांस सदोदित उत्कर्षप्रद व आमचे रोजचेरोज अविश्रांत संरक्षणकर्ते होतील. ॥ १ ॥
दे॒वानां॑ भ॒द्रा सु॑म॒तिरृ॑जूय॒तां दे॒वानां॑ रा॒तिर॒भि नो॒ नि व॑र्तताम् ॥
देवानां भद्रा सुऽमतिः ऋजुऽयतां देवानां रातिः अभि नः नि वर्तताम् ॥
सरलत्व गुणानें युक्त अशा देवांची कल्याणकारक कृपा व त्यांची उदारता आम्हांस अनुलक्षून प्रवृत्त होतो. देवांच्या मित्रत्वाचा आम्हांस उपयोग घडो. आमचें जीवन दीर्घकाल पर्यंत कायम रहावें म्हणून देव आमचें आयुष्य वर्धन करोत. ॥ २ ॥
तान्पूर्व॑या नि॒विदा॑ हूमहे व॒यं भगं॑ मि॒त्रमदि॑तिं॒ दक्ष॑म॒स्रिध॑म् ॥
तान् पूर्वया निऽविदा हूमहे वयं भगं मित्रं अदितिं दक्षं अस्रिधम् ॥
त्या देवांस म्हणजे भग, मित्र, अदिति ज्यास कोणाकडूनही अपाय होणें शक्य नाही असा दक्ष ह्यांना, व त्याचप्रमाणें अर्यमा, वरुण, सोम व अश्विनद्वय ह्यांनाही मी एक प्राचीन स्तोत्र गाऊन निमंत्रण करतो. दयाळू सरस्वती आम्हांस सौख्य अर्पण करो. ॥ ३ ॥
तन्नो॒ वातो॑ मयो॒भु वा॑तु भेष॒जं तन्मा॒ता पृ॑थि॒वी तत्पि॒ता द्यौः ॥
तत् नः वातः मयःऽभु वातु भेषजं तन् माता पृथिवी तत् पिता द्यौः ॥
ते हितकारक औषध आमचेकडे वायु वाहून आणो. त्याचप्रमाणे माता पृथिवी व पिता द्युलोक हेही तें औषध घेऊन येवोत. सोमनिष्पादन करणारे असे सुखदायक यज्ञपाषाण व अश्विनीदेवहो तें आम्हास आणून देवोत. हे स्तवनार्ह अश्विनी देवहो, तुम्ही आमची प्रार्थना ऐका. ॥ ४ ॥
तमीशा॑नं॒ जग॑तस्त॒स्थुष॒स्पतिं॑ धियंजि॒न्वमव॑से हूमहे व॒यम् ॥
तं ईशानं जगतः तस्थुषः पतिं धियंऽजिन्वं अवसे हूमहे वयम् ॥
बुद्धिस प्रेरणा करणार्या व स्थावर जंगम वस्तुमात्रावर अंमल गाजविणार्या त्या सात्ताधीश देवास आम्ही स्वसंरक्षणार्थ आमंत्रण करतो. ह्या योगानें पूषा आमच्या वैभवाची वृद्धि करणारा व आम्हांस सुखशांतता अर्पण करणारा होईल. कारण तो अजिंक्य असून आमचें संरक्षण व परिपालन करणारा आहे. ॥ ५ ॥
स्व॒स्ति न॒ इन्द्रो॑ वृ॒द्धश्र॑वाः स्व॒स्ति नः॑ पू॒षा वि॒श्ववे॑दाः ॥
स्वस्ति न इंद्रः वृद्धऽश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्वऽवेदाः ॥
ज्याची कीर्ति अतिशय विस्तार पावेलेली आहे असा इंद्र आम्हांस क्षेम अर्पण करो, सर्वज्ञ पूषा देव आम्हांस क्षेम अर्पण करो, ज्याच्या रथाच्या धांवेस कोठेंही प्रतिबंध नाही असा तार्क्ष्य आम्हांस क्षेम अर्पण करो, व बृहस्पतीही आम्हांस क्षेम अर्पण करोत. ॥ ६ ॥
पृष॑दश्वा म॒रुतः॒ पृश्नि॑मातरः शुभं॒यावा॑नो वि॒दथे॑षु॒ जग्म॑यः ॥
पृषत्ऽअश्वा मरुतः पृश्निऽमातरः शुभंऽयावानः विदथेषु जग्मयः ॥
ज्यांच्या अश्वांचा वर्ण ठिपकेदार आहे, ज्यांची माता पृश्नि ही होय, सर्वांचे शुभ करण्याकडे ज्यांची प्रवृत्ति आहे व जे यज्ञांमध्यें नेहमी गमन करतात असे मरुत् देव व त्याचप्रमाणे अग्नि हीच ज्यांची जिव्हा आहे व जे सूर्याचें निरीक्षण करणारे आहेत असे मनु, असे हे सर्व देव, सर्वांचे संरक्षण करणारें असें आपलें सामर्थ्य बरोबर घेऊन, येथें गमन करोत. ॥ ७ ॥
भ॒द्रं कर्णे॑भिः शृणुयाम देवा भ॒द्रम् प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः ॥
भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षऽभिः यजत्राः ॥
हे देवहो, तुमच्या कृपेनें आम्हांस कानांनी चांगले ऐकूं येईल, व हे यज्ञार्ह पुरुषहो, तुमच्या कृपेने आमच्या नेत्रांनी आम्हांस चांगले दिसेल. खरोखर जें आयुष्य देवांनी आम्हांस दिलें असेल त्याचा, आमची गात्रें शाबूत राहून व शरीरस्थैर्य चांगले टिकून, त्यांचे स्तवन करीत करीत आम्ही उपभोग घेऊं. ॥ ८ ॥
श॒तमिन्नु श॒रदो॒ अन्ति॑ देवा॒ यत्रा॑ नश्च॒क्रा ज॒रसं॑ त॒नूना॑म् ॥
शतं इत् नु शरदः अंति देवाः यत्र नः चक्रा जरसं तनूनाम् ॥
हे देवहो, आमचे आयुष्याची काय ती शंभरच वर्षें असतात व त्यांत तुम्ही आमच्या शरीरास वार्धक्य आणतां व त्यांतच आज जे पुत्र म्हणून आहेत ते उद्यां बाप व्हावयाचे असतात. ह्यासाठीं आमच्या आयुष्यक्रमणाच्या मध्यंतरीच त्याची सांखळी तोडूं नकोस. ॥ ९ ॥
अदि॑ति॒र्द्यौरदि॑तिर॒न्तरि॑क्ष॒मदि॑तिर्मा॒ता स पि॒ता स पु॒त्रः ॥
अदितिः द्यौः अदितिः अंतरिक्षं अदितिः माता सः पिता सः पुत्रः ॥
अदिति हीच द्युलोक होय. अदिति हीच अंतरिक्ष होय. अदिति हीच माता, तीच पिता व तीच पुत्रही होय. अदिति हीच सर्व देव व पांचही प्रकारचे मानव होय. जें सर्व कांही उत्पन्न झालें आहे ती अदितिच होय व जें कांही अजून उत्पन्न व्हावयाचें आहे तेंही अदितिच होय. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ९० ( मधुपर्क सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - विश्वेदेव : छंद - गायत्री; अनुष्टुभ् ऋ॒जु॒नी॒ती नो॒ वरु॑णो मि॒त्रो न॑यतु वि॒द्वान् ॥ अ॒र्य॒मा दे॒वैः स॒जोषाः॑ ॥ १ ॥ ऋजुऽनीती नः वरुणः मित्रः नयतु विद्वान् ॥ अर्यमा देवैः सऽजोषाः ॥ १ ॥
वरुण, प्रज्ञावान मित्र आणि सर्व देवांसहवर्तमान अर्यमा, आम्हांस सरळ मार्गानें घेऊन जावोत. ॥ १ ॥
ते हि वस्वो॒ वस॑वाना॒स्ते अप्र॑मूरा॒ महो॑भिः ॥ व्र॒ता र॑क्षन्ते वि॒श्वाहा॑ ॥ २ ॥ ते हि वस्वः वसवानाः ते अप्रऽमूराः महःऽभिः ॥ व्रता रक्षंते विश्वाहा ॥ २ ॥
वैभवाचा संग्रह करणारे हे देव, आपल्या सामर्थ्यामुळें आपल्या दक्षतेंत कधींही अंतर न पडूं देता सदैव आपल्या अनुशासनांचे संरक्षण करीत असतात. ॥ २ ॥
ते अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ यंसन्न॒मृता॒ मर्त्ये॑भ्यः ॥ बाध॑माना॒ अप॒ द्विषः॑ ॥ ३ ॥ ते अस्मभ्यं शर्म यंसन् अमृताः मर्त्येभ्यः ॥ बाधमानाः अप द्विषः ॥ ३ ॥
दुष्ट लोकांचे निर्मूलन करून त्या मृत्युबाधेपासून निर्मुक्त अशा देवांनी आम्हां मानवांस सौख्य अर्पण केले आहे. ॥ ३ ॥
वि नः॑ प॒थः सु॑वि॒ताय॑ चि॒यन्त्विंद्रो॑ म॒रुतः॑ ॥ पू॒षा भगो॒ वन्द्या॑सः ॥ ४ ॥ वि नः पथः सुविताय चियंतु इंद्रः मरुतः ॥ पूषा भगः वंद्यासः ॥ ४ ॥
ते वंद्य असे इंद्र, मरुत्, पूषा, व भग हे देव आमच्या कल्याणासाठीं मार्ग हुडकून काढोत. ॥ ४ ॥
उ॒त नो॒ धियो॒ गोअ॑ग्राः॒ पूष॒न् विष्ण॒वेव॑यावः ॥ कर्ता॑ नः स्वस्ति॒मतः॑ ॥ ५ ॥ उत नः धियः गोऽअग्राः पूषन् विष्णो इति एवऽयावः ॥ कर्त नः स्वस्तिऽमतः ॥ ५ ॥
आपापल्या मार्गांनी गमन करणार्या हे पूषा व विष्णु देवांनो, आमच्या प्रार्थना आम्हांस मुख्यत्वेंकरून धेनूंचा लाभ घडवितील असे करा व आम्हांस सुखी ठेवा. ॥ ५ ॥
मधु॒ वाता॑ ऋताय॒ते मधु॑ क्षरन्ति॒ सिन्ध॑वः ॥ माध्वी॑र्नः स॒न्त्वोष॑धीः ॥ ६ ॥ मधु वाता ऋतऽयते मधु क्षरंति सिंधवः ॥ माध्वीः नः संतु ओषधीः ॥ ६ ॥
जो नीतिनियमनंचे योग्य पालन करतो त्याचेकरितां वारे संतोषदायक रीतीनें वाहूं लागतात व त्याचेकरितां नद्याही मधुर रीतीनें वाहतात. आमच्या ओषधी आमच्याकरितां माधुर्ययुक्त होवोत. ॥ ६ ॥
मधु॒ नक्त॑मु॒तोषसो॒ मधु॑म॒त्पार्थि॑वं॒ रजः॑ ॥ मधु॒ द्यौर॑स्तु नः पि॒ता ॥ ७ ॥ मधु नक्तं उत उषसः मधुऽमत् पार्थिवं रजः ॥ मधु द्यौः अस्तु नः पिता ॥ ७ ॥
रात्र व प्रभातकाल हे गोड असोत, व भूलोक व रजोलोक हेही माधुर्यानें भरलेले असोत. आमचा प्रिय पिता द्युलोक हाही आमचेसाठी सुखावह होवो. ॥ ७ ॥
मधु॑मान्नो॒ वन॒स्पति॒र्मधु॑माँ अस्तु॒ सूर्यः॑ ॥ माध्वी॒र्गावो॑ भवन्तु नः ॥ ८ ॥ मधुऽमान् नः वनस्पतिः मधुऽमान् अस्तु सूर्यः ॥ माध्वीः गावः भवंतु नः ॥ ८ ॥
आमचेसाठी वनस्पति माधुर्ययुक्त असोत व आमचेसाठी सूर्यही सुंदर होवो. धेनु आम्हांस गोड दूध देणार्या होवोत. ॥ ८ ॥
शं नो॑ मि॒त्रः शं वरु॑णः॒ शं नो॑ भवत्वर्य॒मा ॥
शं नः मित्रः शं वरुणः शं नः भवतु अर्यमा ॥
मित्र आम्हांस सुखावह होवो, वरुण आम्हांस सुखावह होवो, अर्यमाही आम्हांस सुखावह होवो, इंद्र व बृहस्पति आम्हांस सुखावह होवोत व अनेक प्रदेशावर गमन करणारा विष्णुही आम्हांस सुखावह होवो. ॥ ९ ॥
ॐ तत् सत् |