|
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७१ ते ८० ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७१ ( अग्नि सूक्त ) ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
उप॒ प्र जि॑न्वन्नुश॒तीरु॒शन्तं॒ पतिं॒ न नित्यं॒ जन॑यः॒ सनी॑ळाः ॥
उप प्र जिन्वन् उशतीः उशंतं पतिं न नित्यं जनयः सऽनीळाः ॥
ज्याप्रमाणे प्रेमळ बायका आपल्या प्रेमळ पतीस संतुष्ट करतात त्याचप्रमाणें एकाच ठिकाणीं राहणार्या ह्या स्त्रियांनी त्यास संतुष्ट केलें आहे. ज्याप्रमाणें उषेला पाहून गाईंना आनंद होतो त्याप्रमाणें ह्यांनी आश्चर्यकरक तेजाच्या योगानें प्रकाशमान होणारा शुभ्रवर्ण दिवस व कृष्णवर्ण रात्र ह्यांस पाहून त्यांचे आनंदानें स्वागत केलें आहे. ॥ १ ॥
वी॒ळु चि॑द्दृ॒ळ्हा पि॒तरो॑ न उ॒क्थैरद्रिं॑ रुज॒न्नङ्गि॑रसो॒ रवे॑ण ॥
वीळु चित् दृळ्हा पितरः नः उक्थैः अद्रिं रुजन् अङ्गिरसः रवेण ॥
आमच्या पितरांनी नुसत्या स्तोत्रसामर्थ्यांनी अत्यंत दुर्भेद्य असे दुर्गही फोडून टाकले. त्याचप्रमाणे अंगिरसांनी स्तोत्रघोषानें पर्वतांचा भंग केला. त्यांनी आमचेकरितां विस्तीर्ण द्युलोकाकडे जाण्यास मार्ग तयार केला व दिवस, स्वर्ग, दीप्ति आणि प्रकाश ह्यांचा लाभ करून घेतला. ॥ २ ॥
दध॑न्नृ॒तं ध॒नय॑न्नस्य धी॒तिमादिद॒र्यो दि॑धि॒ष्वो विभृ॑त्राः ॥
दधन् ऋतं धनयन् अस्य धीतिं आत् इत् अर्यः दिधिष्वः विऽभृत्राः ॥
प्रेमाने त्याची उपासना करणारे जे त्याचे किंकर त्यांनी त्याच्या सत्यनियमांचे अवलंबन केले व त्यांच्या प्रार्थना सफल करून घेतल्या. देवसमुदायास संतुष्ट करणार्या कर्मव्यापृत परंतु निर्लोभ अशा त्या अग्नीकडे गमन करीत असतात. ॥ ३ ॥
मथी॒द्यदीं॒ विभृ॑तो मात॒रिश्वा॑ गृ॒हेगृ॑हे श्ये॒तो जेन्यो॒ भूत् ॥
मथीत् यत् ईं विऽभृतः मातरिश्वा गृहेऽगृहे श्येतः जेन्यः भूत् ॥
त्यास सर्वव्यापी मातरिश्वा ह्यानें मन्थन करून उत्पन्न केलें तेव्हांपासून हा देदीप्यमान अग्नि प्रत्येक घरांत प्रादुर्भूत होऊं लागला. एखाद्या बलिष्ठ राजाची कामगिरी अंगावर घेतल्याप्रमाणें त्या भृगुसारखा दिसणार्या अग्निदेवानें प्रत्येक ठिकाणीं हजर राहून सर्वांचे प्रतिनिधित्व पत्करलें आहे. ॥ ४ ॥
म॒हे यत्पि॒त्र ईं॒ रसं॑ दि॒वे करव॑ त्सरत्पृश॒न्यश्चिकि॒त्वान् ॥
महे यत् पित्र ईं रसं दिवे कः अव त्सरत् पृशन्यः चिकित्वान् ॥
अग्निदेव हा चित्रविचित्र कांतीने युक्त व प्रज्ञावान आहे. आपला पिता जो श्रेष्ठ द्युलोक ह्याची हौस त्यानें पुरविली व मग तो खालीं निघून गेला. त्याबरोबर त्याचेवर रागाने अस्त्रवेत्त्या पराक्रमी पुरुषानें प्रज्वलित बाण सोडला, व त्या दिव्य लोकानें आपल्या कन्येचे ठिकाणीं प्रकाश उत्पन्न केला. ॥ ५ ॥
स्व आ यस्तुभ्यं॒ दम॒ आ वि॒भाति॒ नमो॑ वा॒ दाशा॑दुश॒तो अनु॒ द्यून् ॥
स्वे आ यः तुभ्यं दमे आ विऽभाति नमः वा दाशात् उशतः अनु द्यून् ॥
जो आपल्या घरी तुझे प्रित्यर्थ तुझी ज्वाला प्रज्वलित करतो, आणि भक्तांच्या उपासनेचा आवडीनें स्वीकार करणार्या तुला जो प्रत्यहीं नमन करतो त्याचे, हे द्विगुणित कांतीनें विभूषित असणार्या अग्निदेवा, तूं आयुष्य वाढव. ज्याचा तूं कैवार घेतोस त्यास वैभव प्राप्त होऊन तो रथांत बसो. ॥ ६ ॥
अ॒ग्निं विश्वा॑ अ॒भि पृक्षः॑ सचन्ते समु॒द्रं न स्र॒वतः॑ स॒प्त य॒ह्वीः ॥
अग्निं विश्वा अभि पृक्षः सचंते समुद्रं न स्रवतः सप्त यह्वीः ॥
ज्याप्रमाणे सप्त महानद्या समुद्रास जाऊन मिळतात त्याप्रमाणें विश्वांतील सर्व हवि अग्नीकडेच जातात. आमच्या अगदी जवळच्या नातलगांस सुद्धां आमचें आयुष्य किती आहे ह्याचें ज्ञान नाहीं, पण तूं इतका प्रज्ञावान आहेस कीं देवा मनांत काय विचार चालतात ते सुद्धां तुला विदित होतात. ॥ ७ ॥
आ यदि॒षे नृ॒पतिं॒ तेज॒ आन॒ट् शुचि॒ रेतो॒ निषि॑क्तं॒ द्यौर॒भीके॑ ॥
आ यत् इषे नृऽपतिं तेजः आनट् शुचि रेतः निऽसिक्तं द्यौः अभीके ॥
ज्यावेळी सर्व लोकांचा स्वामी जो अग्निदेव त्यास विश्वामध्यें सुखसमृद्धि नांदावी म्हणून त्याच्या तेजानें व्यापून टाकलें त्यावेळी खरोखर उज्ज्वल वीर्यानेंच त्याचे शरीरांत संचार केला. हें सर्व पहाण्यास द्युलोक जवळच साक्षी होता. मग त्या वीर्याचे योगानें अग्नीनें तारुण्ययुक्त, सुविचारसंपन्न व निर्दोष अशी प्रजा निर्माण केली आणि त्यांस आपल्या कर्मास प्रवृत्त केलें. ॥ ८ ॥
मनो॒ न योऽ॑ध्वनः स॒द्य एत्येकः॑ स॒त्रा सूरो॒ वस्व॑ ईशे ॥
मनः न यः अध्वनः सद्यः एति एकः सत्रा सूरः वस्वः ईशे ॥
ज्याचें आपल्या मार्गानें मनाप्रमाणें त्वरेने गमन होत असतें तो सूर्य संपत्तीवर स्वतः एकटा अधिकार गाजवितो. मित्र आणि वरुण हे सुंदर हस्तांनी सुशोभित असलेले सार्वभौम, धेनूंचे ठिकाणीं असलेल्या गोड अमृताचें रक्षण करीत असतात. ॥ ९ ॥
मा नो॑ अग्ने स॒ख्या पित्र्या॑णि॒ प्र म॑र्षिष्ठा अ॒भि वि॒दुष्क॒विः सन् ॥
मा नः अग्ने सख्या पित्र्याणि प्र मर्षिष्ठाः अभि विदुः कविः सन् ॥
हे अग्निदेवा, ज्या अर्थी तूं अतिशय ज्ञाता व प्रज्ञाशाली आहेस, त्या अर्थीं आमच्या वाडवडिलांपासून आमच्याशीं तुझा चालत आलेला स्नेहसंबंध तूं तोडून टाकूं नकोस. वार्धक्य हें काळ्या ढगाप्रमाणें सुंदर रूपाचा बिघाड करणारें आहे, म्हणून त्या दुष्टाच्या येण्याचे अगोदर तुंच आमचेकडे ये. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७२ ( अग्नि सूक्त ) ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
नि काव्या॑ वे॒धसः॒ शश्व॑तस्क॒र्हस्ते॒ दधा॑नो॒ नर्या॑ पु॒रूणि॑ ॥
नि काव्या वेधसः शश्वतः कः हस्ते दधानः नर्या पुरूणि ॥
अनेक हितकारक लाभ आपले हती ठेवणार्या अग्निदेवानें कित्येक कवींचीं काव्यें आपल्याकडे आकर्षून घेतली आहेत. सर्व प्रकारची शाश्वत संपत्ति सदैव निर्माण करून अग्नि वैभवांचा स्वामी झाला आहे. ॥ १ ॥
अ॒स्मे व॒त्सं परि॒ षन्तं॒ न वि॑न्दन्नि॒च्छन्तो॒ विश्वे॑ अ॒मृता॒ अमू॑राः ॥
अस्मे इति वत्सं परि संतं न विंदन् इच्छंतः विश्वे अमृताः अमूराः ॥
ज्यांचे मन गोंधळून जाणें संभवनीय नाहीं अशा सर्व देवांनी आमचेकडे आमचे भोंवती भोंवती बसून राहणार्या ह्या बालकाचा मनःपूर्वक शोध केला तरी त्यांस हे बालक सांपडलें नाही. पण त्याच्या पावलांमागें जातां जातां श्रमानें थकलेल्या देवांनी त्याची स्तुति करतांच अग्नीच्या श्रेष्ठ पदाचे ठिकाणी ते सहज रीतीनें जाऊन उभे राहिले. ॥ २ ॥
ति॒स्रो यद॑ग्ने श॒रद॒स्त्वामिच्छुचिं॑ घृ॒तेन॒ शुच॑यः सप॒र्यान् ॥
तिस्रः यत् अग्ने शरदः त्वां इच् शुचिं घृतेन शुचयः सपर्यान् ॥
हे अग्निदेवा, तूं देदीप्यमान आहेस. ज्यावेळीं त्या तेजस्वी पुरुषांनी तीन वर्षेपर्यंत तुझी घृतानें पूजा केली त्यावेळी यज्ञांत सर्वत्र विदित अशी पदवी त्यांस प्राप्त झाली व त्या सुंदर पुरुषांना महत्कृत्यें करण्याकडे आपल्या स्वतःची प्रेरणा करतां येऊं लागली. ॥ ३ ॥
आ रोद॑सी बृह॒ती वेवि॑दानाः॒ प्र रु॒द्रिया॑ जभ्रिरे य॒ज्ञिया॑सः ॥
आ रोदसी इति बृहती इति वेविदानाः प्र रुद्रिया जभ्रिरे यज्ञियासः ॥
विशाल असे द्युलोक व पृथ्वीलोक ह्यांतून शोध करतां करतां त्या यज्ञार्ह पुरुषांस रुद्राचे सामर्थ्याचा लाभ झाला. जेव्हां मर्त्य माणसांना हें विदित झालें तेव्हां अत्यंत श्रेष्ठ पदावर विराजमान झालेल्या अग्नीस ते उच्च स्थानावर आरोहण करून जाणण्यास समर्थ झाले. ॥ ४ ॥
सं॒जा॒ना॒ना उप॑ सीदन्नभि॒ज्ञु पत्नी॑वन्तो नम॒स्यं नमस्यन् ॥
संऽजानानाः उप सीदन् अभिऽज्ञु पत्नीऽवंतः नमस्यं नमस्यन्निति नमस्यन् ॥
तुझें ज्ञान झाल्यावर ते गुडघे टेंकून तुझे समीप बसले, आणि तूं त्यांस अत्यंत पूज्य असल्यामुळें तुला त्यांनी वंदन केलें. एका मित्राचा डोळा लागला असतां दुसर्या मित्रानें तेथें रक्षण करीत बसावें अशा रीतीने अतिरिक्त प्रयत्न करून त्यांनी आपले स्वतःस अमर करून घेतले. ॥ ५ ॥
त्रिः स॒प्त यद्गुह्या॑नि॒ त्वे इत्प॒दावि॑द॒न्निहि॑ता य॒ज्ञिया॑सः ॥
त्रिः सप्त यत् गुह्यानि त्वे इति इत् पदा अविदन् निऽहिता यज्ञियासः ॥
जी एकवीस गुह्य पदें फक्त तुझ्याच ठिकाणी ठेवलेलीं आहेत त्यांचे त्या यज्ञार्ह पुरुषांस ज्ञान झालें. त्या गुह्य पदांच्याच योगानें ते ऐक्यभावानें राहून स्वतःच्या अमरत्वाचें रक्षण करीत असतात. हे अग्निदेवा, तूं आमच्या गुरावासरांचे व स्थावर जंगम संपत्तीचें परिपालन कर. ॥ ६ ॥
वि॒द्वाँ अ॑ग्ने व॒युना॑नि क्षिती॒नां व्यानु॒षक् छु॒रुधो॑ जी॒वसे॑ धाः ॥
विद्वान् अग्ने वयुनानि क्षितीनां वि आनुषक् शुरुधः जीवसे धाः ॥
हे अग्निदेवा, सर्व मनुष्याचे विचार तूं जाणार असून त्यांच्या जीवनार्थ त्यांच्या पोषणाची तूं चिरकालिक योजना केलेली आहेस, देवांचे गमन करण्याचे अंतर्मार्गही तुला विदित आहेत व त्यामुळें तूं त्यांस हवि पोहोंचविणारा दूत झाला आहेस. तुला आलस्य कसें तें माहीत नाहीं. ॥ ७ ॥
स्वा॒ध्यो दि॒व आ स॒प्त य॒ह्वी रा॒यो दुरो॒ व्यृत॒ज्ञा अ॑जानन् ॥
सुऽआध्यः दिवः आ सप्त यह्वीः रायः दुरः वि ऋतऽज्ञाः अजानन् ॥
तुझे चिंतन करणार्या व तुझे सत्यनियम पाळणार्या त्या पुरुषांस द्युलोकांतील सप्त नद्या व संपत्तीचीं द्वारें ह्यांचे ज्ञान झालें. सरमेसही गाई कोंडून ठेवलेले दुर्भेद्यस्थान सांपडलें. ह्याचे योगानेंच मानवजातीस सुखांत राहतां येत आहे. ॥ ८ ॥
आ ये विश्वा॑ स्वप॒त्यानि॑ त॒स्थुः कृ॑ण्वा॒नासो॑ अमृत॒त्वाय॑ गा॒तुम् ॥
आ ये विश्वा सुअपत्यानि तस्थुः कृण्वानासः अमृतऽत्वाय गातुम् ॥
अमरत्व मिळविण्याकरितां मार्ग तयार करण्याच्या उद्देशानें जे पुरुष आपल्या सर्व अपत्यांजवळ साहाय्य याचनार्थ गेले त्या श्रेष्ठ पुरुषांकरितां पृथ्वी आपल्या सामर्थ्यानें विस्तृत झाली- त्या आपल्या पुत्रांकरितां- आपल्या चिमुकल्या पांखरांस आपली तृषा भागवितां यावी म्हणून- अदिति मातेनें विशाल रूप धारण केलें. ॥ ९ ॥
अधि॒ श्रियं॒ नि द॑धु॒श्चारु॑मस्मिन्दि॒वो यद॒क्षी अ॒मृता॒ अकृ॑ण्वन् ॥
अधि श्रियं नि दधुः चारुं अस्मिन् दिवः यत् अक्षी इति अमृताः अकृण्वन् ॥
मृत्यूपासून मुक्त असलेल्या देवांनी ज्यावेळीं स्वर्गलोकाचे दोन डोळे निर्माण केले त्यावेळीं त्यांनी ह्या अग्नीचे ठिकाणीं अत्यंत सुंदर तेज ठेवलें त्याबरोबर अगदीं मोकळ्या सोडल्याप्रमाणें अग्नीपासून तेजाच्या नद्या वाहूं लागल्या व त्या, खाली पृथ्वीवर आल्याबरोबर, अखिल प्राणिमात्रांस त्यांचे ज्ञान झालें ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७३ ( अग्नि सूक्त ) ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
र॒यिर्न यः पि॑तृवि॒त्तो व॑यो॒धाः सु॒प्रणी॑तिश्चिकि॒तुषो॒ न शासुः॑ ॥
रयिः न यः पितृऽवित्तः वयःऽधाः सुऽप्रनीतिः चिकितुषः न शासुः ॥
जो अग्निदेव बापापासून मिळालेल्या संपत्तीप्रमाणें आयुष्यास वृद्धिकारक होतो, ज्ञानी मनुष्याच्या उपदेशाप्रमाणें जो सन्मार्ग दाखवून देतो, ज्याची बरदास्त उत्तम आहे अशा पाहुण्याप्रमाणें जो संतुष्ट होतो, अशा ह्या अग्निदेवानें भक्ताचे हवि पोंचविण्याचे कार्य करून उपासकाचें घर समृद्धीनें भरून टाकलें आहे. ॥ १ ॥
दे॒वो न यः स॑वि॒ता स॒त्यम॑न्मा॒ क्रत्वा॑ नि॒पाति॑ वृ॒जना॑नि॒ विश्वा॑ ॥
देवः न यः सविता सत्यऽमन्मा क्रत्वा निऽपाति वृजनानि विश्वा ॥
जो सवितादेवाप्रमाणें सत्यबुद्धिशील आहे, जो आपल्या सामर्थ्यानें सर्व दुरितांचा निःपात करतो, ज्याची स्तुति अनेकांकडून झालेली आहे, स्वतःचें रूप जसें बदलतां येत नाहीं त्याप्रमाणें जो कधींही बदलत नाहीं, स्वतःच्या प्राणामुळें जो मनुष्यास सुखदायक वाटतो असा हा अग्निदेव सर्वांस प्रिय झाला आहे. ॥ २ ॥
दे॒वो न यः पृ॑थि॒वीं वि॒श्वधा॑या उप॒क्षेति॑ हि॒तमि॑त्रो॒ न राजा॑ ॥
देवः न यः पृथिवीं विश्वऽधायाः उपऽक्षेति हितऽमित्रः न राजा ॥
एखाद्या देवाप्रमाणें विश्वाचें पोषण करून, हितकारक व मित्रत्व धारण करणार्या नृपतीप्रमाणें, अथवा युद्धांत पुढाकार घेणार्या व सुखांत लोळणार्या वीरांप्रमाणें अथवा एखाद्या पतिप्रिय व निष्कलंक स्त्रीप्रमाणें सर्वांस सन्माननीय होऊन ह्या पृथ्वीवर तो विराजमान होतो. ॥ ३ ॥
तं त्वा॒ नरो॒ दम॒ आ नित्य॑मि॒द्धमग्ने॒ सच॑न्त क्षि॒तिषु॑ ध्रु॒वासु॑ ॥
तं त्वा नरः दमे आ नित्यं इद्धं अग्ने सचंत क्षितिषु ध्रुवासु ॥
हे अग्निदेवा, प्रत्येक गृहीं प्रज्वलित होणार्या तुला ह्या सनातन विश्वांत मनुष्यें भजत आलीं आहेत. ह्या अग्नीचे ठिकाणीं त्यांनी पुष्कळ धन अर्पण केलें आहे, म्हणून हे अग्निदेवा, तूं त्यांचे करितां वैभव घेऊन ये. तूं सर्व विश्वाचा प्राण आहेस. ॥ ४ ॥
वि पृक्षो॑ अग्ने म॒घवा॑नो अश्यु॒र्वि सू॒रयो॒ दद॑तो॒ विश्व॒मायुः॑ ॥
वि पृक्षः अग्ने मघऽवानः अश्युः वि सूरयः ददतः विश्वं आयुः ॥
हे अग्निदेवा, तुझी उपासना करणार्यांना पोटभर अन्न मिळालेंच पाहिजे. तुला हवि अर्पण करणार्या विद्वान् स्तोत्यांस पूर्ण आयुष्य प्राप्त झालेंच पाहिजे. आम्हांस विजय मिळावा म्हणून देवांसाठी त्यांचा हविर्भाग तयार करून ठेवणारे जे आम्ही भक्तिमान लोक त्यांस युद्धांत शौर्याचा लाभ खात्रीनें होईल. ॥ ५ ॥
ऋ॒तस्य॒ हि धे॒नवो॑ वावशा॒नाः स्मदू॑ध्नीः पी॒पय॑न्त॒ द्युभ॑क्ताः ॥
ऋतस्य हि धेनवः वावशानाः स्मत्ऽऊध्नीः पीपयंत द्युऽभक्ताः ॥
तुझ्या सत्य नियमनांचा अभिमान धारण करणार्या व स्वर्गलोकांतील एक हिस्सा प्राप्त करून घेणार्या धेनूंची सर्व जगास, आपल्या सदोदित भरपूर भरलेल्या कांसेंतील दुग्ध उत्सुकतेनें पाजले. तुझ्या कृपेची याचना करणार्या महानद्या फार लांबच्या प्रदेशांतून पर्वताचे संनिध येऊन ठेपल्या. ॥ ६ ॥
त्वे अ॑ग्ने सुम॒तिं भिक्ष॑माणा दि॒वि श्रवो॑ दधिरे य॒ज्ञिया॑सः ॥
त्वे इति अग्ने सुऽमतिं भिक्षमाणाः दिवि श्रवः दधिरे यज्ञियासः ॥
हे अग्निदेवा पवित्र देवांनी तुझेजवळ कृपेची भिक्षा मागून स्वर्गलोकांत कीर्ति मिळविली. त्यांनी रात्र व उषा ह्या दोन भिन्न स्वरूपाच्या देवतांस उत्पन्न केलें आणि ह्याप्रमाणें काळा रंग व तांबडा रंग ह्यांस त्यांनी एका जागीं आणले. ॥ ७ ॥
यान्रा॒ये मर्ता॒न्सुषू॑दो अग्ने॒ ते स्या॑म म॒घवा॑नो व॒यं च॑ ॥
यान् राये मर्तान् सुसूदः अग्ने ते स्याम मघऽवानः वयं च ॥
हे अग्निदेवा, ज्या आम्हां मानवांची तूं वैभवप्राप्त्यर्थ योजना करून ठेविली आहेस त्या अर्थी आम्हींही तुला हवि अर्पण करूं. द्युलोक व पृथ्वीलोक ह्यांची जोडी आणि अंतरिक्ष ह्यांस व्याप्त करून तूं छायेप्रमाणें ह्या सर्व विश्वास चिकटला आहेस. ॥ ८ ॥
अर्व॑द्भिरग्ने॒ अर्व॑तो॒ नृभि॒र्नॄन्वी॒रैर्वी॒रान्व॑नुयामा॒ त्वोताः॑ ॥
अर्वत्ऽभिः अग्ने अर्वतः नृभिः नॄन् वीरैः वीरान् वनुयाम त्वाऽऊताः ॥
हे अग्निदेवा, तूं आमचा संरक्षक झालास तर आम्हीं आपल्या अश्वांनी शत्रूच्या अश्वांस जिंकू. आम्ही आपल्या माणसांकडून शत्रूंची माणसें जेरीस आणूं, व आम्ही आपल्या लढवय्यांकडून शत्रूकडील योध्यांस पराभूत करूं. आमच्या कुलांतील विद्वान् पुरुषांस वाडवडिलांनी मिळविलेल्या संपत्तीचें स्वामित्व मिळून त्यांस शंभर वर्षें आयुष्य प्राप्त होवो. ॥ ९ ॥
ए॒ता ते॑ अग्न उ॒चथा॑नि वेधो॒ जुष्टा॑नि सन्तु॒ मन॑से हृ॒दे च॑ ॥
एता ते अग्न उचथानि वेधः जुष्टानि संतु मनसे हृदे च ॥
हे कर्तृत्ववान् अग्निदेवा, ही तुझी स्तोत्रें तुझ्या चित्तास व अंतःकरणास प्रिय होवोत. देवांच्या कृपेनें प्राप्त झालेली कीर्ति धारण करीत आम्ही सर्व वैभवांवर ताबा चालविणारा जो तूं त्या तुझे नियम पाळण्यास खचित समर्थ होऊं. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७४ ( अग्नि सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्नि : छंद - गायत्री
उ॒प॒प्र॒यन्तो॑ अध्व॒रं मन्त्रं॑ वोचेमा॒ग्नये॑ ॥
उपऽप्रयंतः अध्वरं मंत्रं वोचेम अग्नये ॥
जो आपली हांक लांब असतांनासुद्धां ऐकतो अशा ह्या अग्निप्रित्यर्थ आपण एक स्तोत्र म्हणू या. ॥ १ ॥
यः स्नीहि॑तीषु पू॒र्व्यः सं॑जग्मा॒नासु॑ कृ॒ष्टिषु॑ ॥
यः स्नीहितीषु पूर्व्यः संऽजग्मानासु कृष्टिषु ॥
जेव्हां एकमेकाचा वध करण्याच्या हेतुनें माणसे एकमेकांवर तुटून पडतात तेव्हां ह्या पुरातन अग्निदेवानें भक्ताकरितां त्याच्या घरादाराचा सांभाळ केला आहे. ॥ २ ॥
उ॒त ब्रु॑वन्तु ज॒न्तव॒ उद॒ग्निर्वृ॑त्र॒हाज॑नि ॥
उत ब्रुवंतु जंतवः उत् अग्निः वृत्रऽहा अजनि ॥
आतां लोकांना बिनधोक म्हणू द्या कीं प्रत्येक युद्धांतून धनाची लूट आणणार्या ह्या अग्निदेवानें वृत्राचे वधार्थ जन्म घेतला होता. ॥ ३ ॥
यस्य॑ दू॒तो असि॒ क्षये॒ वेषि॑ ह॒व्यानि॑ वी॒तये॑ ॥
यस्य दूतः असि क्षये वेषि हव्यानि वीतये ॥
ज्याच्या घरी तूं देवाचा प्रतिनिधि ह्या नात्यानें राहतोस, ज्याच्या हवीचा आस्वाद घेण्याकरितां तूं तिकडे गमन करतोस, अथवा ज्याचा यज्ञ सुंदर व्हावा अशी तू तजवीज करतोस, ॥ ४ ॥
तमित्सु॑ह॒व्यम॑ङ्गिरः सुदे॒वं स॑हसो यहो ॥
तं इत् सुऽहव्यं अङ्गिरः सुऽदेवं सहसः यहो इति ॥
हे अंगिरसा, हे सामर्थ्यापासून जन्म पावणार्या अग्निदेवा, त्याच मनुष्याचा हवि उत्तम झाला असे लोक म्हणतात. तोच अतिशय तेजस्वी असे लोक समजतात, त्याचाच यज्ञ उत्तम अशी लोकांत प्रशंसा होते. ॥ ५ ॥
आ च॒ वहा॑सि॒ ताँ इ॒ह दे॒वाँ उप॒ प्रश॑स्तये ॥
आ च वहासि तान् इह देवान् उप प्रऽशस्तये ॥
हे अत्यंत आल्हाद देणार्या अग्निदेवा, हवींचा आस्वाद घेण्याकरितां व स्तवनांचा स्वीकार करण्याकरितां त्या सुप्रसिद्ध देवांस तूं इकडे घेऊन येत असतोस. ॥ ६ ॥
न योरु॑प॒ब्दिरश्व्यः॑ शृ॒ण्वे रथ॑स्य॒ कच्च॒न ॥
न योः उपब्दिः अश्व्यः शृण्वे रथस्य कत् चन ॥
हे अग्निदेवा, जेव्हां तू आपलें प्रतिनिधिपणाचे कार्य बजावण्याकरितां जातोस त्यावेळीं तुझ्या रथाचा अथवा अश्वांच्या चालण्याचा शब्द मुळींच ऐकूं येत नाहीं. ॥ ७ ॥
त्वोतो॑ वा॒ज्यह्र॑योऽ॒भि पूर्व॑स्मा॒दप॑रः ॥
त्वाऽऊतः वाजि अह्रयः अभि पूर्वस्मात् अपरः ॥
अग्निदेवा जेव्हां तुला हवि अर्पण करणार्यास तूं आपले संरक्षणाखाली घेतलेंस तेव्हां त्याचें बल वाढून व हीन स्थिति नाहींशी होऊन तो पूर्वीपेक्षां उच्च स्थितीस चढला व भरभराटीस पोंहोचला. ॥ ८ ॥
उ॒त द्यु॒मत्सु॒वीर्य॑म् बृ॒हद॑ग्ने विवाससि ॥
उत द्युऽमत् सुऽवीर्यं बृहत् अग्ने विवाससि ॥
अग्निदेवा, देवास हवि देणार्यास तूं तेजानें युक्त असे विपुल सामर्थ्य अर्पण करतोस. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७५ ( अग्नि सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्नि : छंद - गायत्री जु॒षस्व॑ स॒प्रथ॑स्तमं॒ वचो॑ दे॒वप्स॑रस्तमम् ॥ ह॒व्या जुह्वा॑न आ॒सनि॑ ॥ १ ॥ जुषस्व सप्रथःतमं वचः देवप्सरःऽतमम् ॥ हव्या जुह्वान आसनि ॥ १ ॥
आपले मुखांत हवि ठेवीत असतां, देवांस प्रिय असें जे माझे एक मोठे स्तोत्र आहे, त्याचा स्वीकार कर. ॥ १ ॥
अथा॑ ते अङ्गिरस्त॒माग्ने॑ वेधस्तम प्रि॒यम् ॥ वो॒चेम॒ ब्रह्म॑ सान॒सि ॥ २ ॥ अथ ते अङ्गिरःऽस्तम अग्ने वेधःऽतम प्रियम् ॥ वोचेम ब्रह्म सानसि ॥ २ ॥
हे अग्ने, हे अंगिरसा, हे अत्यंत कर्तृत्वशील देवा, तुला आवडणारे असें एक सुंदर स्तोत्र आतां आम्ही म्हणणार आहोंत. ॥ २ ॥
कस्ते॑ जा॒मिर्जना॑ना॒मग्ने॒ को दा॒श्वध्वरः ॥ को ह॒ कस्मि॑न्नसि श्रि॒तः ॥ ३ ॥ कः ते जामिः जनानां अग्ने कः दाशुऽअध्वरः ॥ कः ह कस्मिन् असि श्रितः ॥ ३ ॥
हे अग्निदेवा, सर्व मनुष्यांत तुला कोण आप्त वाटतो ? तुला यज्ञ समर्पण करणारा कोण ? खरोखर तू कोण आहेस ? व कोणाचे संनिध तुला रहावेंसे वाटते ? ॥ ३ ॥
त्वं जा॒मिर्जना॑ना॒मग्ने॑ मि॒त्रो अ॑सि प्रि॒यः ॥ सखा॒ सखि॑भ्य॒ ईड्यः॑ ॥ ४ ॥ त्वं जामिः जनानां अग्ने मित्रः असि प्रियः ॥ सखा सखिऽभ्य ईड्यः ॥ ४ ॥
हे अग्निदेवा, तूं सर्वांचा आप्त आहेस, तूं आमचा प्रिय मित्र आहेस, तुझ्यावर प्रेम करणारांचा तूं सन्माननीय स्नेही आहेस. ॥ ४ ॥
यजा॑ नो मि॒त्रावरु॑णा॒ यजा॑ दे॒वाँ ऋ॒तं बृ॒हत् ॥ अग्ने॒ यक्षि॒ स्वं दम॑म् ॥ ५ ॥ यजा नः मित्रावरुणा यज देवान् ऋतं बृहत् ॥ अग्ने यक्षि स्वं दमम् ॥ ५ ॥
मित्र आणि वरुण ह्यांस तूं आमचा यज्ञ पोहोंचीव, देव व तुझी श्रेष्ठ सत्यनियमनें ह्यांना आमची पूजा अर्पण कर. अग्निदेवा, तूं आमचा यज्ञ घरीं घेऊन जात असतोस. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७६ ( अग्नि सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
का त॒ उपे॑ति॒र्मन॑सो॒ वरा॑य॒ भुव॑दग्ने॒ शंत॑मा॒ का म॑नी॒षा ॥
का त उपऽइतिः मनसः वराय भुवत् अग्ने शंऽतमा का मनीषा ॥
कोणते स्तोत्र तुझ्या अगदीं अंतःकरणापर्यंत भिडून तुला आनंद देईल. हे अग्निदेवा, कोणती स्तुति तुला फार संतोषदायक वाटेल. यज्ञ अर्पण करून तुझेपासून कोणी सामर्थ्यप्राप्ति करून घेतली ? कशा अंतःकरणानें आम्ही तुला हवि अर्पण करावे ? ॥ १ ॥
एह्य॑ग्न इ॒ह होता॒ नि षी॒दाद॑ब्धः॒ सु पु॑रए॒ता भ॑वा नः ॥
आ इहि अग्ने इह होता नि सीद अदब्धः सु पुरःऽएता भव नः ॥
अग्निदेवा, इकडे ये. आमचा हविर्दाता होऊन येथें विराजमान हो. तूं आमचा पुढारी हो, कारण तुला कोणीही अपाय करण्यास समर्थ होणार नाही. विश्वांत सर्वत्र पसरलेले द्युलोक व पृथ्वीलोक तुझे रक्षण करोत. देवांचा आमचेवर मोठा अनुग्रह व्हावा म्हणून आमचा यज्ञ त्यांस अर्पण कर. ॥ २ ॥
प्र सु विश्वा॑न्र॒क्षसो॒ धक्ष्य॑ग्ने॒ भवा॑ य॒ज्ञाना॑मभिशस्ति॒पावा॑ ॥
प्र सु विश्वान् रक्षसः धक्षि अग्ने भव यज्ञानां अभिशस्तिऽपावा ॥
हे अग्निदेवा, सर्व राक्षसांचे तूं दहन करतोस, म्हणून ह्या आमच्या यज्ञाचा लौकिक कायम राहील अशी तजवीज कर. शिवाय सोमरसाचा मुख्य भोक्ता जो इंद्र त्याचे घोडे जोडून इकडे आण. त्या उदार देवाच्या आदराप्रित्यर्थ सर्व तयारी आम्ही करून ठेवली आहे. ॥ ३ ॥
प्र॒जाव॑ता॒ वच॑सा॒ वह्नि॑रा॒सा च॑ हु॒वे नि च॑ सत्सी॒ह दे॒वैः ॥
प्रजाऽवता वचसा वह्निः आसा च हुवे नि च सत्सि इह देवैः ॥
आमच्या कुळांतील सर्व माणसे जी तुझी स्तुति गात आहेत तिच्या योगानें व स्वमुखानेंही मी तुझें पूजन करीत आहे म्हणून तूं देवांसह येथे येऊन बस. हे यज्ञार्ह देवा, हवि पोहोंचविणे व यज्ञास पवित्रता आणणें ही दोन्ही कामें तूं सांभाळीत असतोस. संपत्ति उत्पन्न करणार्या व तिचे दान करणार्या हे देवा, लवकर जागृत हो. ॥ ४ ॥
यथा॒ विप्र॑स्य॒ मनु॑षो ह॒विर्भि॑र्दे॒वाँ अय॑जः क॒विभिः॑ क॒विः सन् ॥
यथा विप्रस्य मनुषः हविःऽभिः देवान् अयजः कविऽभिः कविः सन् ॥
ज्याप्रमाणें विद्वान् मनूच्या हवींनी, तू बुद्धिमान उपासकांचेसह, स्वतः प्रज्ञावंत असल्यामुळें, देवांचे यजन केलेंस, त्याचप्रमाणे हे अत्यंत सत्यस्वरूप हविर्दात्या, देवांस आनंद उत्पन्न करणार्या ह्या यज्ञचमसानें तूं त्यांस हवि अर्पण कर. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७७ ( अग्नि सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्नि : छंद - गायत्री
क॒था दा॑शेमा॒ग्नये॒ कास्मै॑ दे॒वजु॑ष्टोच्यते भा॒मिने॒ गीः ॥
कथा दाशेम अग्नये का अस्मै देवऽजुष्टोच्यते भामिने गीः ॥
ह्या अग्निला आम्ही कोणत्या रीतीनें हवि द्यावा बरें ? जो अमर, सत्य धर्माचा प्रणेता, हविर्दाता व यज्ञार्ह असून देवांना मानवांचे समुदायांत आणून बसविण्याचें काम ज्याचे एकट्याचेच हातून होतें अशा त्या देदीप्यमान अग्निकरितां देवांना पसंत पडेल असे आम्ही कोणते स्तोत्र म्हणावें बरें ? ॥ १ ॥
यो अ॑ध्व॒रेषु॒ शंत॑म ऋ॒तावा॒ होता॒ तमू॒ नमो॑भि॒रा कृ॑णुध्वम् ॥
यः अध्वरेषु शंऽतमः ऋतऽवा होता तं ऊं इति नमःऽओभिः आ कृणुध्वम् ॥
ज्याचें दर्शन घडल्याबरोबर मनास अत्यंत संतोष होतो, जो सत्यधर्माचा प्रणेता आहे, व जो देवांना हवि पोहोंचवितो त्या अग्निदेवास अनेकदां वंदन करून तुम्ही येथें घेऊन या. ज्यावेळी मानवांच्या कामासाठी अग्नि देवांकडे जातो त्यावेळी तो त्यांपैकीं प्रत्येकास ओळखतो व त्यांचे मनःपूर्वक पूजन करतो. ॥ २ ॥
स हि क्रतुः॒ स मर्यः॒ स सा॒धुर्मि॒त्रो न भू॒दद्भु॑तस्य र॒थीः ॥
सः हि क्रतुः सः मर्यः सः साधुः मित्रः न भूत् अद्भुतस्य रथीः ॥
जगांत जे कोठे बुद्धिसामर्थ्य आढळतें तें तोच होय. तोच खरा मनुष्य होय. तो फार चांगला आहे. ज्याप्रमाणे मित्र आपल्या आश्चर्यकारक रथावर आरोहण करतो त्याप्रमाणे हाही अद्भुत रथावर विराजमान होतो. देवांचे श्रद्धाळु उपासक ह्याच सौंदयवान देवास यज्ञांत प्रथम बोलावतात. ॥ ३ ॥
स नो॑ नृ॒णां नृत॑मो रि॒शादा॑ अ॒ग्निर्गिरोऽ॑वसा वेतु धी॒तिम् ॥
सः नः नृणां नृऽतमः रिशादा अग्निः गिरः अवसा वेतु धीतिम् ॥
सर्व नरांत अत्यंत श्रेष्ठ आणि शत्रूंचा संहार करणारा तो अग्नि आम्हांस आपल्या संरक्षणाखाली घेऊन आमच्या स्तुतिस्तोत्रांचा अंगिकार करो, आणि त्याचप्रमाणें, तुला हवि अर्पण करणार्या आणि त्यामुळें सामर्थ्यवान व पराक्रमी बनलेल्या अशा ज्या कोणी पुरुषांनी तुझें स्तवन केलें असेल त्याचाही तूं स्वीकार कर. ॥ ४ ॥
ए॒वाग्निर्गोत॑मेभिरृ॒तावा॒ विप्रे॑भिरस्तोष्ट जा॒तवे॑दाः ॥
एव अग्निः गोतमेभिः ऋतऽवा विप्रेभिः अस्तोष्ट जातऽवेदाः ॥
सत्यधर्माचा प्रणेता आणि सर्वज्ञ अशा ह्या अग्नीची विद्वान् गौतमांनी ह्याप्रमाणें स्तुति केली. त्यानेंच त्यांना वैभव, सामर्थ्य व समृद्धि ह्यांचा लाभ करून दिला. तो प्रज्ञाशील अग्नि सर्वांना आवडतो. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७८ ( अग्नि सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्नि : छंद - गायत्री अ॒भि त्वा॒ गोत॑मा गि॒रा जात॑वेदो॒ विच॑र्षणे ॥ द्यु॒म्नैर॒भि प्र णो॑नुमः ॥ १ ॥ अभि त्वा गोतमाः गिरा जातऽवेदः विऽचर्षणे ॥ द्युम्नैः अभि प्र नोनुमः ॥ १ ॥
हे सर्वज्ञ व सर्वसंचारी अग्निदेवा, आम्ही गोतम, तुला प्रार्थना व उत्तम हवि अर्पण करून पुन्हा पुन्हा वंदन करतो. ॥ १ ॥
तमु॑ त्वा॒ गोत॑मो गि॒रा रा॒यस्का॑मो दुवस्यति ॥ द्यु॒म्नैर॒भि प्र णो॑नुमः ॥ २ ॥ तं ऊं इति त्वा गोतमः गिरा रायःऽकामः दुवस्यति ॥ द्युम्नैः अभि प्र नोनुमः ॥ २ ॥
वैभवाची इच्छा धरून हा गोतम तुझी ह्याप्रमाणें सेवा करीत आहे. उत्तम उत्तम हवि अर्पण करून आम्ही तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो. ॥ २ ॥
तमु॑ त्वा वाज॒सात॑ममङ्गिर॒स्वद्ध॑वामहे ॥ द्यु॒म्नैर॒भि प्र णो॑नुमः ॥ ३ ॥ तं ऊं इति त्वा वाजऽसातमं अङ्गिरस्वत् हवामहे ॥ द्युम्नैः अभि प्र नोनुमः ॥ ३ ॥
सामर्थ्याची अतिशय प्राप्ति करून देणार्या त्या तुला आम्ही अंगिरसाप्रमाणे हांक मारतो. आम्ही उत्तम उत्तम हवि अर्पण करून, तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो. ॥ ३ ॥
तमु॑ त्वा वृत्र॒हन्त॑मं॒ यो दस्यूँ॑रवधूनु॒षे ॥ द्यु॒म्नैर॒भि प्र णो॑नुमः ॥ ४ ॥ तं ऊं इति त्वा वृत्रहन्ऽतमं यः दस्यून् अवऽधूनुषे ॥ द्युम्नैः अभि प्र नोनुमः ॥ ४ ॥
वृत्राचा विध्वंस करून दस्यूची दाणादाण उडवून देणार्या ह्या तुला उत्तम हवि अर्पण करून, आम्ही तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो. ॥ ४ ॥
अवो॑चाम॒ रहू॑गणा अ॒ग्नये॒ मधु॑म॒द्वचः॑ ॥ द्यु॒म्नैर॒भि प्र णो॑नुमः ॥ ५ ॥ अवोचाम रहूगणाः अग्नये मधुऽमत् वचः ॥ द्युम्नैः अभि प्र नोनुमः ॥ ५ ॥
अग्निदेवास उद्देशून आम्ही रहूगणांनी हे अत्यंत मधुर स्तोत्र म्हटलें आहे; तुला उत्तम उत्तम हवि अर्पण करून, अग्निदेवा, आम्ही तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७९ ( अग्नि सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्नि : छंद - गायत्री; त्रिष्टुभ्; उष्णिह
हिर॑ण्यकेशो॒ रज॑सो विसा॒रेऽ॑हि॒र्धुनि॒र्वात॑ इव॒ ध्रजी॑मान् ॥
हिरण्यऽकेशः रजसः विऽसारे अहिः धुनिः वातःऽइव ध्रजीमान् ॥
ह्याचे केश सुवर्णाप्रमाणे आहेत. हा जेव्हां रजोलोकाच्या विस्तीर्ण प्रदेशांत असतो तेव्हां भितीनें गडबड उडवून देणारा जणूं कांही सापच, अथवा सोसाट्याने वाहणारा वार्या सारखा आहे असा भास होतो. ह्याची दीप्ति अत्यंत प्रज्वलित आहे. दासीप्रमाणे इमानानें काम करणार्या व सदा यशस्वी अशा ज्या उषा त्यांचे ह्यांस ज्ञान आहे. ॥ १ ॥
आ ते॑ सुप॒र्णा अ॑मिनन्तँ॒ एवैः॑ कृ॒ष्णो नो॑नाव वृष॒भो यदी॒दम् ॥
आ ते सुऽपर्णा अमिनंत एवैः कृष्णः नोनाव वृषभः यदि इदम् ॥
तुझे मोठमोठ्या पंखाचे पक्षी सर्व वस्तूंचा नाश करूं लागले व काळ्या रंगाचा वृषभ मोठमोठ्यानें डुरकण्या फोडूं लागला. इकडे असे होत आहे तोंच हांसल्यासारख्या आवाज करणार्या कोल्ह्यांनाही तो घेऊन आला. मग काय ? पावसाची मुसळ धार लागली व मेघ गर्जना करूं लागले. ॥ २ ॥
यदी॑मृ॒तस्य॒ पय॑सा॒ पिया॑नो॒ नय॑न्नृ॒तस्य॑ प॒थिभी॒ रजि॑ष्ठैः ॥
यत् ईं ऋतस्य पयसा पियानः नयन् ऋतस्य पथिऽभिः रजिष्ठैः ॥
ज्यावेळीं सत्यधर्माच्या सरळ मार्गांनी लोकांना वाट दाखवीत हा सत्याच्या उदकांचे पान करतो त्यवेळी अर्यमा, मित्र आणि वरुण दोहोंकडे हिंडून वर आकाशांत असलेल्या पखालीच्या चामड्यांत तेथल्या तेथेंच पाणी भरून ठेवतात. ॥ ३ ॥
अग्ने॒ वाज॑स्य॒ गोम॑त॒ ईशा॑नः सहसो यहो ॥ अ॒स्मे धे॑हि जातवेदो॒ महि॒ श्रवः॑ ॥ ४ ॥
अग्ने वाजस्य गोऽमतः ईशानः सहसः यहो इति॥
सामर्थ्यापासून जन्म घेणार्या हे अग्ने, ज्यापासून गोधनांचा लाभ होतो अशा सामर्थ्यावर तुझी सत्ता आहे. हे सर्वज्ञ देवा, आमचे करितां अत्यंत मोठ्या कीर्तिचा ठेवा तयार कर. ॥ ४ ॥
स इ॑धा॒नो वसु॑ष्क॒विर॒ग्निरी॒ळेन्यो॑ गि॒रा ॥ रे॒वद॒स्मभ्यं॑ पुर्वणीक दीदिहि ॥ ५ ॥ सः इधानः वसुः कविः अग्निः ईळेन्यः गिरा ॥ रेवत् अस्मभ्यं पुरुऽअनीक दीदिहि ॥ ५
तो तूं सर्वप्रसिद्ध अग्नि, देदीप्यमान, वैभवाचा पुतळा, प्रज्ञावान व स्तुतींनी गुण गाण्यास योग्य असा आहेस. अनेक सेनांवर अधिपत्य गाजविणार्या हे देवा, आम्हांस धन प्राप्त होईल अशा रीतीनें आपली ज्योति प्रज्वलित कर. ॥ ५ ॥
क्ष॒पो रा॑जन्नु॒त त्मनाग्ने॒ वस्तो॑रु॒तोषसः॑ ॥ स ति॑ग्मजम्भ र॒क्षसो॑ दह॒ प्रति॑ ॥ ६ ॥ क्षपः राजन् उत त्मना अग्ने वस्तोः उत उषसः ॥ सः तिग्मऽजंभ रक्षसः दह प्रति ॥ ६
हे तीक्ष्णदंष्ट्र अग्निदेवा, हे राजाधिराजा, प्रत्येक रात्री व उषेचा प्रकाश पडल्याबरोबर आपल्या ज्वालांनी राक्षसांचे दहन कर. ॥ ६ ॥
अवा॑ नो अग्न ऊ॒तिभि॑र्गाय॒त्रस्य॒ प्रभ॑र्मणि ॥ विश्वा॑सु धी॒षु व॑न्द्य ॥ ७ ॥ अवा नः अग्ने ऊतिऽभिः गायत्रस्य प्रऽभर्मणि ॥ विश्वासु धीषु वंद्य ॥ ७ ॥
अखिल स्तोत्रांत ज्याला नमन केलेलें असते अशा, हे अग्निदेवा, आम्ही गायत्री छंदातील स्तवनें तुला अर्पण करीत असल्यामुळें तूं आमच्यावर कृपा करून आमचें रक्षण कर. ॥ ७ ॥
आ नो॑ अग्ने र॒यिं भ॑र सत्रा॒साहं॒ वरे॑ण्यम् ॥ विश्वा॑सु पृ॒त्सु दु॒ष्टर॑म् ॥ ८ ॥ आ नः अग्ने रयिं भर सत्राऽसाहं वरेण्यम् ॥ विश्वासु पृत्ऽसु दुस्तरम् ॥ ८ ॥
हे अग्निदेवा, आम्हांस असें वैभव दे कीं जें नेहमी टिकेल, जे आम्हांस हवें असें वाटेल व जें आमच्यापासून कोणत्याही युद्धांत शत्रूस हिसकावून घेतां येणार नाही. ॥ ८ ॥
आ नो॑ अग्ने सुचे॒तुना॑ र॒यिं वि॒श्वायु॑पोषसम् ॥ मा॒र्डी॒कं धे॑हि जी॒वसे॑ ॥ ९ ॥ आ नः अग्ने सुऽचेतुना रयिं विश्वायुऽपोषसम् ॥ मार्डीकं धेहि जीवसे ॥ ९ ॥
हे अग्निदेवा, आमच्या आपत्तींचा नीट विचार करून आम्हांस सुखावह होणारी व आमच्या पोषणास जन्मभर उपयोगी पडणारी अशी संपत्ति आमचे जीवन चालण्याकरितां आम्हांस अर्पण कर. ॥ ९ ॥
प्र पू॒तास्ति॒ग्मशो॑चिषे॒ वाचो॑ गोतमा॒ग्नये॑ ॥ भर॑स्व सुम्न॒युर्गिरः॑ ॥ १० ॥ प्र पूताः तिग्मऽशोचिषे वाचः गोतम अग्नये ॥ भरस्व सुम्नऽयुः गिरः ॥ १० ॥
हे गोतमा, ह्या प्रखर ज्वालांनी युक्त असलेल्या ह्या अग्नीस संपत्तीची इच्छा धारण करून, पवित्र स्तुतिस्तोत्रें अर्पण कर. ॥ १० ॥
यो नो॑ अग्नेऽभि॒दास॒त्यन्ति॑ दू॒रे प॑दी॒ष्ट सः ॥ अ॒स्माक॒मिद्वृ॒धे भ॑व ॥ ११ ॥ यः नः अग्ने अभिऽदासति अंति दूरे पदीष्ट सः ॥ अस्माकं इत् वृधे भव ॥ ११ ॥
हे अग्निदेवा, जो कोणी समीप अथवा दूर असतांना आम्हांस उपद्रव देतो त्याचा निःपात होवो. तूं केवल आमच्याच अभिवृद्धीस कारणीभूत हो. ॥ ११ ॥
स॒ह॒स्रा॒क्षो विच॑र्षणिर॒ग्नी रक्षां॑सि सेधति ॥ होता॑ गृणीत उ॒क्थ्यः ॥ १२ ॥ सहस्रऽअक्षः विऽचर्षणिः अग्निः रक्षांसि सेधति ॥ होता गृणीते उक्थ्यः ॥ १२ ॥
सहस्र नेत्रांनी युक्त व सर्वसंचारी हा अग्नि राक्षसांस हांकून लावतो. स्तवनांस योग्य असा हा हविर्दाता हा पहा भाषण करीत आहे. ॥ १२ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ८० ( इंद्र सूक्त ) ऋषि - गोतम राहूगण : देवता - इंद्र : छंद - पंक्ति
इ॒त्था हि सोम॒ इन्मदे॑ ब्र॒ह्मा च॒कार॒ वर्ध॑नम् ॥
इत्था हि सोमे इत् मदे ब्रह्मा चकार वर्धनम् ॥
तुला संतोष उत्पन्न होण्याकरितां सोमरसाची सिद्धता होताच ह्या विद्वान् उपासकानें तुझे महत्त्व वर्णन केलें आहे. हे अत्यंत बलशाली व वज्रधारी देवा, स्वतःचें सम्राज्य स्थान करण्याची इच्छा धरून तू अहीस ह्या पृथ्वीवरून हांकून लावलेंस. ॥ १ ॥
स त्वा॑मद॒द्वृषा॒ मदः॒ सोमः॑ श्ये॒नाभृ॑तः सु॒तः ॥
सः त्वा अमदत् वृषा मदः सोमः श्येनऽआभृतः सुतः ॥
त्या श्येन पक्ष्यानें आणलेल्या व पिळून ठेवलेल्या उत्साहवर्धक सोमरसानें तुला स्फुरण उत्पन्न केले व त्याच्यायोगानें हे वज्रधारी देवा, स्वतःचें साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धरून तूं आपल्या सामर्थ्यानें वृत्राचा पाण्यांतून वध केलास. ॥ २ ॥
प्रेह्य॒भीहि॑ धृष्णु॒हि न ते॒ वज्रो॒ नि यं॑सते ॥
प्र इहि अभि इहि धृष्णुहि न ते वज्रः नि यंसते ॥
पुढें चालून जा, हल्ला कर, पराक्रम गाजव. तुझ्या वज्राला कोणी प्रतिबंध करणार नाही. हे इंद्रा, तुझें सामर्थ्य शौर्यगुणानें युक्त आहे. स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धरून तूं वृत्रास मारलेंस व उदकांस जिंकून आणलेस. ॥ ३ ॥
निरि॑न्द्र॒ भूम्या॒ अधि॑ वृ॒त्रं ज॑घन्थ॒ निर्दि॒वः ॥
निः इंद्र भूम्याः अधि वृत्रं जघंथ निः दिवः ॥
हे इंद्रा, तूं भूलोकांतून व द्युलोकांतून वृत्राचा नायनाट करून टाकलास. तर आतां स्वतःचें साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धरून ह्या सर्व प्राणिवर्गाच्या जिवितांचे धारण करणार्या व मरुत् देवांनी प्रेरित केलेल्या उदकांस खाली मोकळें सोडून दे. ॥ ४ ॥
इन्द्रो॑ वृ॒त्रस्य॒ दोध॑तः॒ सानुं॒ वज्रे॑ण हीळि॒तः ॥
इंद्रः वृत्रस्य दोधतः सानुं वज्रेण हीळितः ॥
स्वतःचें साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धरून व उदकांचा प्रवाह सुरळीत सुरू होण्याकरितां त्यांत गति उत्पन्न करावी ह्या हेतूनें इंद्रानें, कोपनिष्ठ होऊन सर्व जगतास हालवून सोडणार्या वृत्रावर हल्ला करून त्याचे शिर पायानें तुडवून टाकलें आहे. ॥ ५ ॥
अधि॒ सानौ॒ नि जि॑घ्नते॒ वज्रे॑ण श॒तप॑र्वणा ॥
अधि सानौ नि जिघ्नते वज्रेण शतऽपर्वणा ॥
ज्याला शंभर सांधे होते असे आपले वज्र घेऊन इंद्र वृत्राच्या मस्तकावर घाव घालीत आहे. स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धरणारा इंद्र भक्तांच्या हवींनी संतुष्ट होऊन आपल्या प्रेमांतील मनुष्यांची चलती व्हावी असा हेतु मनांत बाळगतो. ॥ ६ ॥
इन्द्र॒ तुभ्य॒मिद॑द्रि॒वोऽ॑नुत्तं वज्रिन्वी॒र्यम् ॥
इंद्र तुभ्यं इत् अद्रिऽवः अनुत्तं वज्रिन् वीर्यम् ॥
हे शस्त्रास्त्रमंडित इंद्रा, हे वज्रधारी देवा, ज्याचा कोणास प्रतिकार करतां यावयाचा नाही असे सामर्थ्य केवळ तुझ्याच जवळ आहे कारण स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धारण करून तूं युक्तिप्रयुक्तीनें त्या कपटाचरणी पशूचा वध केलास. ॥ ७ ॥
वि ते॒ वज्रा॑सो अस्थिरन्नव॒तिं ना॒व्या३॑ अनु॑ ॥
वि ते वज्रासः अस्थिरन् नवतिं नाव्या अनु ॥
तूं उगारलेले वज्र नव्वद महानद्यांवर दिसत होते. स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा बाळगणारा जो तूं त्या तुझे सामर्थ्य फार श्रेष्ठ आहे. तुझें बाहुबल जगताचे हितच करणारे आहे. ॥ ८ ॥
स॒हस्रं॑ सा॒कम॑र्चत॒ परि॑ ष्टोभत विंश॒तिः ॥
सहस्रं साकं अर्चत परि स्तोभत विंशतिः ॥
सहस्र माणसें एके ठिकाणी जमून त्याचे पूजन करा. वीस मिळून त्याची स्तुति करा. शेंकडो भक्तांनी त्याची स्तुति केली आहे. ह्या इंद्राकरितां एक स्तोत्र अगदी तयार आहे. ह्यास स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा आहे ॥ ९ ॥
इंद्रो॑ वृ॒त्रस्य॒ तवि॑षीं॒ निर॑ह॒न्सह॑सा॒ सहः॑ ॥
इंद्रः वृत्रस्य तविषीं निः अहन् सहसा सहः ॥
इंद्राने वृत्राच्या सामर्थ्याचा मोड केला, त्याने आपल्या बलानें त्याच्या बलाचा निरोध केला. वृत्राला मारून त्याने जलप्रवाहास मोकळें सोडून दिले हा त्याचा फार मोठा पराक्रम होय. स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची त्याची इच्छा होती. ॥ १० ॥
इ॒मे चि॒त्तव॑ म॒न्यवे॒ वेपे॑ते भि॒यसा॑ म॒ही ॥
इमे इति चित् तव मन्यवे वेपेते इति भियसा मही इति ॥
तुझ्या क्रोधापुढें हे दोन्ही विस्तीर्ण लोक सुद्धां भितीनें कांपू लागतात. कारण स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याचा इच्छा धरून, हे इंद्रा, तूं मरुद्गणांचे साहाय्य घेऊन आपल्या सामर्थ्यानें वृत्राचा वध केलास. ॥ ११ ॥
न वेप॑सा॒ न त॑न्य॒तेन्द्रं॑ वृ॒त्रो वि बी॑भयत् ॥
न वेपसा न तन्यता इंद्रं वृत्रः वि बीभयत् ॥
पृथ्वीस गदगदां हालवून अथवा मोठमोठ्या गर्जना करूनही वृत्रास इंद्राचे मनांत भिती उत्पन्न करतां आली नाहीं पण उलट स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धरणार्या इंद्राचेंच हजार धारांचे लोखंडी वज्र त्याचे अंगावर पडले. ॥ १२ ॥
यद्वृ॒त्रं तव॑ चा॒शनिं॒ वज्रे॑ण स॒मयो॑धयः ॥
यत् वृत्रं तव च अशनिं वज्रेण संऽअयोधयः ॥
ज्यावेळी तूं आपल्या वज्रानें वृत्रांची व तुझ्या शस्त्रांची गांठ घालून दिलीस त्यावेळीं हे इंद्रा, स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धारण करणार्या तुझें सामर्थ्य, तूं वृत्राचा वध करण्याचें मनांत आणल्यामुळें स्वर्गलोकांत सुद्धा अनुभवास आले. ॥ १३ ॥
अ॒भि॒ष्ट॒ने ते॑ अद्रिवो॒ यत्स्था जग॑च्च रेजते ॥
अभिऽस्तने ते अद्रिऽवः यत् स्थाः जगत् च रेजते ॥
हे वज्रधारी देवा, तूं गर्जना केली असतां चल वस्तु व अचल पदार्थ देखील कंपित होऊन जातात. फार तर काय पण स्वतःचें साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धारण करणार्या तुझ्या क्रोधाकडे पाहून प्रत्यक्ष त्वष्टा देखील भितीनें थरथर कापूं लागतो. ॥ १४ ॥
न॒हि नु याद॑धी॒मसीन्द्रं॒ को वी॒र्या प॒रः ॥
नहि नु यात् अधिऽमसि ईंद्रं कः वीर्या परः ॥
सामर्थ्यांत इंद्राच्याही पलीकडे असा कोणी आम्हांस दिसत नाही. त्याच्या पराक्रमापुढें कोणाची गति आहे ? स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धारण करणार्या इंद्राचे अंगी देवांनी शक्ति, सामर्थ्य व तेजस्वीपणा ह्यांची स्थापना केली. ॥ १५ ॥
यामथ॑र्वा॒ मनु॑ष्पि॒ता द॒ध्यङ् धिय॒मत्न॑त ॥
यां अथर्वा मनुः पिता दध्यङ् धियं अत्नत ॥
जी स्तुति अथर्वा, सर्वांचा पिता मनु आणि दध्यङ ह्यांनी केली त्याचप्रमाणे जी स्तोत्रें व स्तवनें त्यांनी गाइली ती सर्व आपले स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा धारण करणार्या त्या इंद्रासच पूर्वीप्रमाणे जाऊन पोहोंचली. ॥ १६ ॥
ॐ तत् सत् |