PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४१ ( मित्र, वरुण, आदित्य, अर्यमन् सूक्त )

ऋषि - काण्व घौर : देवता - आदित्य, मित्र, वरुण अर्यमन् : छंद - गायत्री


यं रक्ष॑न्ति॒ प्रचे॑तसो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ॥
नू चि॒त्स द॑भ्यते॒ जनः॑ ॥ १ ॥

यं रक्षंति प्रचेतसः वरुणः मित्रः अर्यमा ॥
नु चित् सः दभ्यते जनः ॥ १ ॥

अत्यंत प्रज्ञावान असे मित्र, वरुण आणि अर्यमा हे देव ज्याचे रक्षण करतात अशा मनुष्यास कोणाकडून तरी अपाय होणें शक्य आहे काय ? ॥ १ ॥


यं बा॒हुते॑व॒ पिप्र॑ति॒ पान्ति॒ मर्त्यं॑ रि॒षः ॥
अरि॑ष्टः॒ सर्व॑ एधते ॥ २ ॥

यं बाहुताऽइव पिप्रति पांति मर्त्यं रिषः ॥
अरिष्टः सर्वः एधते ॥ २ ॥

जणूं कांही आपल्या बाहूवर झेलल्याप्रमाणे ज्या मनुष्यांचे ते पोषण व शत्रूपासून रक्षण करतात तीं मनुष्यें सर्व भितीपासून मुक्त होऊन भरभराटीस चढतात. ॥ २ ॥


वि दु॒र्गा वि द्विषः॑ पु॒रो घ्नन्ति॒ राजा॑न
एषाम् ॥ नय॑न्ति दुरि॒ता ति॒रः ॥ ३ ॥

वि दुःऽगा वि द्विषः पुरः घ्नंति राजानः एषाम् ॥
नयंति दुःऽइता तिरः ॥ ३ ॥

हे सर्व विश्वाचे राजे आपल्या समोर भक्तांच्या संकटांचा व शत्रूंचा नाश करतात आणि त्यांची अरिष्टें पार नाहीशी करतात. ॥ ३ ॥


सु॒गः पन्था॑ अनृक्ष॒र आदि॑त्यास ऋ॒तं य॒ते ॥
नात्रा॑वखा॒दो अ॑स्ति वः ॥ ४ ॥

सुऽगः पंथाः अनृक्षरः आदित्यासः ऋतं यते ॥
न अत्र अवऽखादः अस्ति वः ॥ ४ ॥

हे आदित्यहो, जो नीतिपथाकडे जातो त्याचा मार्ग सुगम आणि कंटकरहित असतो. येणेंकरून आपणांसही कधींही वाईट मनुष्याचे हवि मिळण्याचा संभव नाही. ॥ ४ ॥


यं य॒ज्ञं नय॑था नर॒ आदि॑त्या ऋ॒जुना॑ प॒था ॥
प्र वः॒ स धी॒तये॑ नशत् ॥ ५ ॥

यं यज्ञं नयथ नरः आदित्याः ऋजुना पथा ॥
प्र वः सः धीतये नशत् ॥ ५ ॥

हे शूर आदित्य हो, ज्या यज्ञास तुम्ही सरळ वाट दाखवून मार्गोपदेशक होतां तो तुमचें स्तवन करण्यास कधींतरी चुकेल काय ? ॥ ५ ॥


स रत्नं॒ मर्त्यो॒ वसु॒ विश्वं॑ तो॒कमु॒त त्मना॑ ॥
अच्छा॑ गच्छ॒त्यस्तृ॑तः ॥ ६ ॥

सः रत्नं मर्त्यः वसु विश्वं तोकं उत त्मना ॥
अच्छा गच्छति अस्तृतः ॥ ६ ॥

तो मनुष्य कोठें पराभव न पावतां उत्तम संपत्ति, सर्व प्रकारचें वैभव आणि संतति ह्यांकडे आपोआप जाऊन पोंचतो. ॥ ६ ॥


क॒था रा॑धाम सखाय॒ स्तोमं॑ मि॒त्रस्या॑र्य॒म्णः ॥
महि॒ प्सरो॒ वरु॑णस्य ॥ ७ ॥

कथा राधाम सखाय स्तोमं मित्रस्य अर्यम्णः ॥
महि प्सरः वरुणस्य ॥ ७ ॥

जिवलग स्नेह्यांनो, मित्र आणि अर्यमा ह्यांचे स्तोत्र व वरुणाचा उत्कृष्ट हवि आपण कसा सजवावा बरें ? ॥ ७ ॥


मा वो॒ घ्नन्तं॒ मा शप॑न्तं॒ प्रति॑ वोचे देव॒यन्त॑म् ॥
सु॒म्नैरिद्व॒ आ वि॑वासे ॥ ८ ॥

मा वः घ्नंतं मा शपंतं प्रति वोचे देवऽयंतम् ॥
सुम्नैः इत् वः आ विवासे ॥ ८ ॥

एखादा मनुष्य आपणांस शिव्याशाप देईल किंवा आपणांवर बोटें मोडील तर जरी तो भाविक असला तरी त्याचे बरोबर माझें संभाषण न घडो. तुम्ही दिलेल्याच संपत्तीवर मी संतोष मानून राहतो. ॥ ८ ॥


च॒तुर॑श्चि॒द्दद॑मानाद्बिभी॒यादा निधा॑तोः ॥
न दु॑रु॒क्ताय॑ स्पृहयेत् ॥ ९ ॥

चतुरः चित् ददमानात् बिभीयात् आ निऽधातोः ॥
न दुःऽउक्ताय स्पृहयेत् ॥ ९ ॥

जो चारही संपत्ति देणारा आहे व ज्याचे जवळ संपत्तीचा ठेवा आहे, त्याची नेहमी भिती बाळगावी. त्याचे विषयी दुरुक्ति बोलण्याची आवड बाळगूं नये. ॥ ९ ॥


मण्डल १ सूक्त ४२ ( पुषन् सूक्त )

ऋषि - काण्व घौर : देवता - पूषन् : छंद - गायत्री


सम् पू॑ष॒न्नध्व॑नस्तिर॒ व्यंहो॑ विमुचो नपात् ॥ सक्ष्वा॑ देव॒ प्र ण॑स्पु॒रः ॥ १ ॥

सं पूषन्न् अध्वनः तिर वि अंहः विऽमुचः नपात् ॥ सक्ष्व देव प्र नः पुरः ॥ १ ॥

हे पूषा , वाटेने आम्हांस घेऊन जा. हे विमोचनपुत्रा, आमच्या संकटांतून आम्हांस मुक्त कर. हे देवा, आमचे जवळच चाल. ॥ १ ॥


यो नः॑ पूषन्न॒घो वृको॑ दुः॒शेव॑ आ॒दिदे॑शति ॥ अप॑ स्म॒ तं प॒थो ज॑हि ॥ २ ॥

यः नः पूषन् अघः वृकः दुःऽशेव आऽदिदेशति ॥ अप स्म तं पथः जहि ॥ २ ॥

हे पूषा, जो हिडीसवाणा व दुष्ट लांडगा आम्हांस मार्गोपदेशक होऊं पाहतो त्यास मार्गातून काढून टाक. ॥ २ ॥


अप॒ त्यं प॑रिप॒न्थिनं॑ मुषी॒वाणं॑ हुर॒श्चित॑म् ॥ दू॒रमधि॑ स्रु॒तेर॑ज ॥ ३ ॥

अप त्यं परिऽपंथिनं मुषीवाणं हुरःऽचितम् ॥ दूरं अधि स्रुतेः अज ॥ ३ ॥

जो कपटी चोर आमच्या मार्गांत विघ्न करतो त्यास वाटेंतून दूर हांकून लाव. ॥ ३ ॥


त्वं तस्य॑ द्वया॒विनो॑ऽ॒घशं॑सस्य॒ कस्य॑ चित् ॥ प॒दाभि ति॑ष्ठ॒ तपु॑षिम् ॥ ४ ॥

त्वं तस्य द्वयाविनः अघऽशंसस्य कस्य चित् ॥ पदा अभि तिष्ठ तपुषिम् ॥ ४ ॥

दुर्भाषणी, दुटप्पी माणसाच्या, तापदायक शरीरावर, मग तो कोणीही असो, पाय देऊन उभा रहा. ॥ ४ ॥


आ तत्ते॑ दस्र मन्तुमः॒ पूष॒न्नवो॑ वृणीमहे ॥ येन॑ पि॒तॄनचो॑दयः ॥ ५ ॥

आ तत् ते दस्र मंतुऽमः पूषन् अवः वृणीमहे ॥ येन पितॄन् अचोदयः ॥ ५ ॥

हे सुंदर प्रज्ञावान पूषा, ज्याचे योगाने तूं आमच्या पितरांस भरभराटीस पोंचविलेस त्या तुझ्या कृपा प्रसादाची आम्ही इच्छा करतो. ॥ ५ ॥


अधा॑ नो विश्वसौभग॒ हिर॑ण्यवाशीमत्तम ॥ धना॑नि सु॒षणा॑ कृधि ॥ ६ ॥

अध नः विश्व*सौभग हिरण्यवाशीमत्ऽतम ॥ धनानि सुऽसना कृधि ॥ ६ ॥

हे सकलसौभाग्यवंता, हे सुवर्णशस्त्रांनी विभूषित देवा, आम्हांस सकल संपत्ति सुलभ कर. ॥ ६ ॥


अति॑ नः स॒श्चतो॑ नय सु॒गा नः॑ सु॒पथा॑ कृणु ॥ पूष॑न्नि॒ह क्रतुं॑ विदः ॥ ७ ॥

अति नः सश्चतः नय सुऽगा नः सुऽपथा कृणु ॥ पूषन् इह क्रतुं विदः ॥ ७ ॥

आमचा पाठलाग करणारे असतील त्यांचेमधून आम्हांस बचावून घेऊन जा आणि आमचे मार्ग जाण्यास सुलभ कर. हे पूषा, येथें काय करणें उचित आहे, हें तुला विदितच आहे. ॥ ७ ॥


अ॒भि सू॒यव॑सं नय॒ न न॑वज्वा॒रो अध्व॑ने ॥ पूष॑न्नि॒ह क्रतुं॑ विदः ॥ ८ ॥

अभि सुऽयवसं नय न नवऽज्वारः अध्वने ॥ पूषन् इह क्रतुं विदः ॥ ८ ॥

जेथें तृणाची समृद्धि असेल अशा प्रदेशांत आम्हांस घेऊन जा आणि मार्गांत कोणताही नविन ताप उत्पन्न न होवो. येथें काय करणें उचित आहे तें हे पूषा, तुला विदितच आहे. ॥ ८ ॥


श॒ग्धि पू॒र्धि प्र यं॑सि च शिशी॒हि प्रास्यु॒दर॑म् ॥ पूष॑न्नि॒ह क्रतुं॑ विदः ॥ ९ ॥

शग्धि पूर्धि प्र यंसि च शिशीहि प्रासि उदरम् ॥ पूषन् इह क्रतुं विदः ॥ ९ ॥

हे पूषा, तूं सामर्थ्यवान् आहेस म्हणून आमच्या इच्छा परिपूर्ण कर. आम्हांस संपत्ति दे. आम्हांस तृप्त कर. येथें काय करणें उचित आहे हें तुला विदितच आहे. ॥ ९ ॥


न पू॒षणं॑ मेथामसि सू॒क्तैर॒भि गृ॑णीमसि ॥ वसू॑नि द॒स्ममी॑महे ॥ १० ॥

न पूषणं मेथामसि सुऽक्तैः अभि गृणीमसि ॥ वसूनि दस्मं ईमहे ॥ १० ॥

आम्ही पूषाची निंदा कधींही करणार नाहीं, उलट उत्तम स्तोत्रांनी त्याचें स्तवन करूं. त्या सुंदर देवाजवळ आम्ही वैभवाची याचना करतो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४३ ( रुद्र, मित्रावरुण, सोम सूक्त )

ऋषि - काण्व घौर : देवता - रुद्र, मित्रावरुण, सोम : छंद - गायत्री, अनुष्टुभ्


कद्रु॒द्राय॒ प्रचे॑तसे मी॒ळ्हुष्ट॑माय॒ तव्य॑से ॥ वो॒चेम॒ शंत॑मं हृ॒दे ॥ १ ॥

कत् रुद्राय प्रचेतसे मीळ्हुःऽतमाय तव्यसे ॥ वोचेम शंऽतमं हृदे ॥ १ ॥

अत्यन्त प्रज्ञाशील, अतिशय उदार, अतिशय बलवान व हृदयास अत्यंत प्रमोददायक अशा रुद्राप्रित्यर्थ आम्ही केव्हां स्तोत्र म्हणावे बरें ? ॥ १ ॥


यथा॑ नो॒ अदि॑तिः॒ कर॒त्पश्वे॒ नृभ्यो॒ यथा॒ गवे॑ ॥ यथा॑ तो॒काय॑ रु॒द्रिय॑म् ॥ २ ॥

यथा नः अदितिः करत् पश्वे नृऽभ्यः यथा गवे ॥ यथा तोकाय रुद्रियम् ॥ २ ॥

ह्या योगाने आमच्या मुलाबाळांवर, गाईवर, नोकरमाणसांवर व जनावरांवर अदितिदेवी रुद्राचे उत्तम आशिर्वाद आणील, ॥ २ ॥


यथा॑ नो मि॒त्रो वरु॑णो॒ यथा॑ रु॒द्रश्चिके॑तति ॥ यथा॒ विश्वे॑ स॒जोष॑सः ॥ ३ ॥

यथा नः मित्रः वरुणः यथा रुद्रः चिकेतति ॥ यथा विश्वे सऽजोषसः ॥ ३ ॥

व ह्या योगाने मित्र, वरुण, रुद्र, व त्यांचे सहवर्तमान असलेले सर्व देव ह्यांना आमची ओळख राहील. ॥ ३ ॥


गा॒थप॑तिं मे॒धप॑तिं रु॒द्रं जला॑षभेषजम् ॥ तच्छं॒योः सु॒म्नमी॑महे ॥ ४ ॥

गाथऽपतिं मेधऽपतिं रुद्रं जलाषऽभेषजम् ॥ तत् शंऽयोः सुम्नं ईमहे ॥ ४ ॥

सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो. ॥ ४ ॥


यः शु॒क्र इ॑व॒ सूर्यो॒ हिर॑ण्यमिव॒ रोच॑ते ॥ श्रेष्ठो॑ दे॒वानां॒ वसुः॑ ॥ ५ ॥

यः शुक्रःऽइव सूर्यः हिरण्यंऽइव रोचते ॥ श्रेष्ठः देवानां वसुः ॥ ५ ॥

हा रुद्र देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे. ॥ ५ ॥


शं नः॑ कर॒त्यर्व॑ते सु॒गं मे॒षाय॑ मे॒ष्ये ॥ नृभ्यो॒ नारि॑भ्यो॒ गवे॑ ॥ ६ ॥

शं नः करति अर्वते सुऽगं मेषाय मेष्ये ॥ नृऽभ्यः नारिऽभ्यः गवे ॥ ६ ॥

हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो. ॥ ६ ॥


अ॒स्मे सो॑म॒ श्रिय॒मधि॒ नि धे॑हि श॒तस्य॑ नृ॒णाम् ॥ महि॒ श्रव॑स्तुविनृ॒म्णम् ॥ ७ ॥

अस्मे सोम श्रियं अधि नि धेहि शतस्य नृणाम् ॥ महि श्रवः तुविऽनृम्णम् ॥ ७ ॥

हे सोमा, आमचेसाठीं शेंकडो मनुष्यांचे धन व अनेक शूरांचे यश सिद्ध करून ठेव. ॥ ७ ॥


मा नः॑ सोमपरि॒बाधो॒ मारा॑तयो जुहुरन्त ॥ आ न॑ इन्दो॒ वाजे॑ भज ॥ ८ ॥

मा नः सोमऽपरिबाधः मा अरातयः जुहुरंत ॥ आ नः इन्दो इति वाजे भज ॥ ८ ॥

सोमास त्रास देणारे अथवा आमच्याशीं शत्रुत्व करणरे लोक आम्हांस उपद्रव न करोत. हे इंद्रा, सामर्थ्याचें कृत्य चाललें असतांना तूं आमचे सन्निध रहा. ॥ ८ ॥


यास्ते॑ प्र॒जा अ॒मृत॑स्य॒ पर॑स्मि॒न्धाम॑न्नृ॒तस्य॑ ॥
मू॒र्धा नाभा॑ सोम वेन आ॒भूष॑न्तीः सोम वेदः ॥ ९ ॥

याः ते प्रऽजा अमृतस्य परस्मिन् धामन् ऋतस्य ॥
मूर्धा नाभा सोम वेनः आऽभूषंतीः सोम वेदः ॥ ९ ॥

तूं अमर आहेस. जो तुझा प्रजानन नीतिमत्तेच्या अत्युच्च स्थलावर अधिष्ठित होतो, त्यास हे सोमा, तूं आपल्या पोटाशीं धरलें आहेस - त्यास तूं आपल्य मस्तकावर धारण केलें आहेस. ते दिव्यतेजानें विभूषित झाले हें तुला माहित आहे. ॥ ९ ॥


मण्डल १ सूक्त ४४ ( अग्नि सूक्त )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - १-२ अश्विनीकुमार, उषा;
१४ अनेकदेवता; सेष अग्नि : छंद - सम-सतोबृहती; विषम बृहती


अग्ने॒ विव॑स्वदु॒षस॑श्चि॒त्रं राधो॑ अमर्त्य ॥
आ दा॒शुषे॑ जातवेदो वहा॒ त्वम॒द्या दे॒वाँ उ॑ष॒र्बुधः॑ ॥ १ ॥

अग्ने विवस्वत् उषसः चित्रं राधः अमर्त्य ॥
आ दाशुषे जातऽवेदः वह त्वं अद्य देवान् उषःऽबुधः ॥ १ ॥

हे अमर अग्निदेवा, तू उषादेवीची आश्चर्यकारक व उज्ज्वल अशी देणगी आहेस. हे अखिलज्ञानवंता, प्रातःकाली प्रबुद्ध होणार्‍या देवांस, तूं आज हवि अर्पण करणार्‍या भक्ताकडे घेऊन ये. ॥ १ ॥


जुष्टो॒ हि दू॒तो असि॑ हव्य॒वाह॒नोऽ॑ग्ने र॒थीर॑ध्व॒राणा॑म् ॥
स॒जूर॒श्विभ्या॑मु॒षसा॑ सु॒वीर्य॑म॒स्मे धे॑हि॒ श्रवो॑ बृ॒हत् ॥ २ ॥

जुष्टः हि दूतः असि हव्यऽवाहनः अग्ने रथीः अध्वराणाम् ॥
सऽजूः अश्विऽभ्यां उषसा सुऽवीर्यं अस्मे इति धेहि श्रवः बृहत् ॥ २ ॥

हे अग्निदेवा, यज्ञांस सत्वर सांगतेस नेणारा व देवांस त्यांचे हवि पोंचविणारा असा तूं खरोखर आमचा प्रिय प्रतिनिधि आहेस. अश्विन व उषा ह्यांसह येऊन उत्तम पराक्रमानें युक्त अशी विपुल कीर्ति आमचे वांट्यास आण. ॥ २ ॥


अ॒द्या दू॒तं वृ॑णीमहे॒ वसु॑म॒ग्निं पु॑रुप्रि॒यम् ॥
धू॒मके॑तुं॒ भाऋ॑जीकं॒ व्युष्टिषु य॒ज्ञाना॑मध्वर॒श्रिय॑म् ॥ ३ ॥

अद्य दूतं वृणीमहे वसुं अग्निं पुरुऽप्रियम् ॥
धूमऽकेतुं भाऽऋजीकं विऽउष्टिषु यज्ञानां अध्वरऽश्रियम् ॥ ३ ॥

यज्ञांचे जणूं वैभवच, तेजःस्वरूप, धूमाच्या निशाणानें युक्त, अनेकांस प्रिय व मूर्तिमान संपत्तिच असा जो अग्नि त्यास आम्ही उषःकालचा स्वच्छ प्रकाश पडल्याबरोबर आमचा प्रतिनिधि नेमीत आहोंत. ॥ ३ ॥


श्रेष्ठं॒ यवि॑ष्ठ॒मति॑थिं॒ स्वाहुतं॒ जुष्टं॒ जना॑य दा॒शुषे॑ ॥
दे॒वाँ अच्छा॒ यात॑वे जा॒तवे॑दसम॒ग्निमी॑ळे॒ व्युष्टिषु ॥ ४ ॥

श्रेष्ठं यविष्ठं अतिथिं सुऽआहुतं जुष्टं जनाय दाशुषे ॥
देवान् अच्छ यातवे जातऽवेदसं अग्निं इळे विऽउष्टिषु ॥ ४ ॥

श्रेष्ठ, अत्यंत तरुण, उत्तम हवींचा सन्मान ज्यास मिळतो असा अतिथि, हवि अर्पण करणार्‍या भक्तजनांस प्रिय अशा सर्वज्ञ अग्नीची, त्यानें देवांचेकडे गमन करावें म्हणून, उषःकालचा स्वच्छ प्रकाश पडल्याबरोबर मी स्तुति करतो. ॥ ४ ॥


स्त॒वि॒ष्यामि॒ त्वाम॒हं विश्व॑स्यामृत भोजन ॥
अग्ने॑ त्रा॒तार॑म॒मृतं॑ मियेध्य॒ यजि॑ष्ठं हव्यवाहन ॥ ५ ॥

स्तविष्यामि त्वां अहं विश्वस्य अमृत भोजन ॥
अग्ने त्रातारं अमृतं मियेध्य यजिष्ठं हव्यऽवाहन ॥ ५ ॥

विश्वाला पोसणार्‍या हे अमर अग्ने, हवि पोंचविणार्‍या यज्ञार्ह देवा, तूं आमचा अत्यंत पूज्य संरक्षणकर्ता असल्यामुळें मी तुझें स्तवन करीन. ॥ ५ ॥


सु॒शंसो॑ बोधि गृण॒ते य॑विष्ठ्य॒ मधु॑जिह्वः॒ स्वाहुतः ॥
प्रस्क॑ण्वस्य प्रति॒रन्नायु॑र्जी॒वसे॑ नम॒स्या दैव्यं॒ जन॑म् ॥ ६ ॥

सुऽशंसः बोधि गृणते यविष्ठ्य मधुजिह्वः सुऽआहुतः ॥
प्रस्कण्वस्य प्रतिरन् आयुः जीवसे नमस्य दैव्यं जनम् ॥ ६ ॥

तूं मधुरभाषी व सुंदर हवींचा सन्मान पावणारा आहेस. अत्यंत तरुण देवा, तुझी स्तवनेंही उत्तमोत्तम झालेलीं आहेत. यास्तव स्तुति करणार्‍या भक्तांकरितां तूं जागरूक रहा. प्रस्कण्वानें दीर्घकालपर्यंत जगांत रहावें म्हणून तूं त्याचे आयुष्य वाढवून देवसमुदायांस आमची प्रणति अर्पण कर. ॥ ६ ॥


होता॑रं वि॒श्ववे॑दसं॒ सं हि त्वा॒ विश॑ इ॒न्धते॑ ॥
स आ व॑ह पुरुहूत॒ प्रचे॑त॒सोऽ॑ग्ने दे॒वाँ इ॒ह द्र॒वत् ॥ ७ ॥

होतारं विश्वऽवेदसं सं हि त्वा विशः इंधते ॥
सः आ वह पुरुऽहूत प्रऽचेतसः अग्ने देवान् इह द्रवत् ॥ ७ ॥

देवांस हवि पोंचविणारा व सर्वज्ञ असा जो तूं त्या तुला खरोखर सर्व लोक प्रदीप्त करतात. ह्याकरिता, सर्वांकडून निमंत्रित होणार्‍या हे अग्निदेवा, तूं अत्यंत प्रज्ञाशील अशा देवांस त्वरेनें येथें घेऊन ये. ॥ ७ ॥


स॒वि॒तार॑मु॒षस॑म॒श्विना॒ भग॑म॒ग्निं व्युष्टिषु॒ क्षपः॑ ॥
कण्वा॑सस्त्वा सु॒तसो॑मास इन्धते हव्य॒वाहं॑ स्वध्वर ॥ ८ ॥

सवितारं उषसं अश्विना भगं अग्निं विऽउष्टिषु क्षपः ॥
कण्वासः त्वा सुतऽसोमासः इंधते हव्यवाहं सुऽअध्वर ॥ ८ ॥

रात्र संपून स्वच्छ पहांट झाल्याबरोबर सविता, उषा, अश्वि, भग व अग्नि, ह्यांस येथें घेऊन ये. हे यज्ञसिद्धिदात्या अग्निदेवा, तूं देवांस हवि पोंचविणारा असल्यामुळें, हे कण्व, सोमरस सिद्ध करून, तुला प्रज्वलित करीत आहेत. ॥ ८ ॥


पति॒र्ह्यध्व॒राणा॒मग्ने॑ दू॒तो वि॒शामसि॑ ॥
उ॒ष॒र्बुध॒ आ व॑ह॒ सोम॑पीतये दे॒वाँ अ॒द्य स्व॒र्दृशः॑ ॥ ९ ॥

पतिः हि अध्वराणां अग्ने दूतः विशां असि ॥
उषःऽबुधः आ वह सोमऽपीतये देवान् अद्य स्वःऽदृशः ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, खरोखर तूं यज्ञांचा स्वामी आणि मनुष्यांचा प्रतिनिधि आहेस. प्र्भातकाळींच जागृत होणार्‍या व स्वर्ग लोकास आपल्या नजरेंत ठेवणार्‍या देवांस आज सोमपानार्थ घेऊन ये. ॥ ९ ॥


अग्ने॒ पूर्वा॒ अनू॒षसो॑ विभावसो दी॒देथ॑ वि॒श्वद॑र्शतः ॥
असि॒ ग्रामे॑ष्ववि॒ता पु॒रोहि॒तोऽ॑सि य॒ज्ञेषु॒ मानु॑षः ॥ १० ॥

अग्ने पूर्वाः अनु उषसः विभाऽवसो दीदेथ विश्वऽदर्शतः ॥
असि ग्रामेषु अविता पुरःऽहितः असि यज्ञेषु मानुषः ॥ १० ॥

दीप्तिवैभवांने युक्त असणार्‍या हे अग्निदेवा, तूं सर्व विश्वांत अत्यंत सुंदर आहेस. तूं पूर्वकालीन ज्या उषा त्यांच्या मागोमाग प्रकाशित होत होतास. ग्रामांमध्यें तूंच सर्वांचा संरक्षण करणारा आहेस व यज्ञांत मनुष्यांस प्रिय अशा यज्ञाचा अग्रणीही तूंच आहेस. ॥ १० ॥


नि त्वा॑ य॒ज्ञस्य॒ साध॑न॒मग्ने॒ होता॑रमृ॒त्विज॑म् ॥
म॒नु॒ष्वद्दे॑व धीमहि॒ प्रचे॑तसं जी॒रं दू॒तमम॑र्त्यम् ॥ ११ ॥

नि त्वा यज्ञस्य साधनं अग्ने होतारं ऋत्विजम् ॥
मनुष्वत् देव धीमहि प्रऽचेतसं जीरं दूतं अमर्त्यम् ॥ ११ ॥

यज्ञांस साधनीभूत, देवांस हवि पोंचविणारा आचार्य, अत्यंत प्रज्ञाशील, सत्वर गमन करणारा प्रतिनिधि, व मृत्युरहित असा जो तूं त्या तुला हे देवा, आम्ही जनसमुदायांत नेऊन प्रस्थापित करतो. ॥ ११ ॥


यद्दे॒वानां॑ मित्रमहः पु॒रोहि॒तोऽ॑न्तरो॒ यासि॑ दू॒त्यम् ॥
सिन्धो॑रिव॒ प्रस्व॑नितास ऊ॒र्मयो॑ऽ॒ग्नेर्भ्रा॑जन्ते अ॒र्चयः॑ ॥ १२ ॥

यत् देवानां मित्रऽमहः पुरःऽहितः अन्तरः यासि दूत्यम् ॥
सिंधोःऽइव प्रऽस्वनितासः ऊर्मयः अग्नेः भ्राजंते अर्चयः ॥ १२ ॥

स्वमित्रांस आनंददायक, यज्ञाचा आचार्य, व आमचा अंतरंग हितकर्ता असा जो तूं जेव्हां देवांच्या दूतकर्माकरितां गमन करतोस त्यावेळीं तुझ्या ज्वाळा मोठमोठ्या गर्जना करणार्‍या सिंधूच्या लाटांप्रमाणे शोभतात. ॥ १२ ॥


श्रु॒धि श्रु॑त्कर्ण॒ वह्नि॑भिर्दे॒वैर॑ग्ने स॒याव॑भिः ॥
आ सी॑दन्तु ब॒र्हिषि॑ मि॒त्रो अ॑र्य॒मा प्रा॑त॒र्यावा॑णो अध्व॒रम् ॥ १३ ॥

श्रुधि श्रुत्ऽकर्ण वह्निऽभिः देवैः अग्ने सयावऽभिः ॥
आ सीदंतु बर्हिषि मित्रः अर्यमा प्रातःऽयावानः अध्वरम् ॥ १३ ॥

हे अग्निदेवा, तुझा कान प्रार्थना ऐकण्यास आगदीं तत्पर असतो. तुझेसह संचार करणार्‍या व भक्तांची चिंता वाहणार्‍या देवांसहवर्तमान तूं आमची स्तुति ऐक, प्रातःकालींच आमच्या यज्ञाकडे गमन करणारे मित्र आणि अर्यमा हे दर्भासनावर विराजमान होवोत. ॥ १३ ॥


शृ॒ण्वन्तु॒ स्तोम॑म्म॒रुतः॑ सु॒दान॑वोऽग्निजि॒ह्वा ऋ॑ता॒वृधः॑ ॥
पिब॑तु॒ सोमं॒ वरु॑णो धृ॒तव्र॑तोऽ॒श्विभ्या॑मु॒षसा॑ स॒जूः ॥ १४ ॥

शृण्वंतु स्तोमं मरुतः सुऽदानवः अग्निऽजिह्वाः ऋतऽवृधः ॥
पिबतु सोमं वरुणः धृतऽव्रतः अश्विभ्यां उषसा सऽजूः ॥ १४ ॥

अतिशय उदार असे जे मरुद्देव - कीं जे नीतिनियमांस उत्तेजन देतात व अग्नीच्या द्वारें ज्यांची जिव्हा तृप्त होते - ते आमची स्तुति श्रवण करोत. आपले अनुशासन अंमलांत आणणारा वरुण, अश्विन, आणि उषा ह्यांसहवर्तमान, सोमाचे प्राशन करो. ॥ १४ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४५ ( अग्नि सूक्त )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - अग्नि : छंद - अनेक


त्वम॑ग्ने॒ वसूँ॑रि॒ह रु॒द्राँ आ॑दि॒त्याँ उ॒त ॥
यजा॑ स्वध्व॒रं जनं॒ मनु॑जातं घृत॒प्रुष॑म् ॥ १ ॥

त्वं अग्ने वसून् इह रुद्रान् आदित्यान् उत ॥
यज सुऽअध्वरं जनं मनुऽजातं घृतऽप्रुषम् ॥ १ ॥

हे अमर अग्निदेवा, वसु, रुद्र व आदित्य यांचा सन्मान कर. घृताचा हवि देणारे, उत्तम यज्ञ करणारे व मनूपासून जन्म पावलेले जे पुरुष असतील त्यांचाही ह्या यज्ञांत सन्मान कर. ॥ १ ॥


श्रु॒ष्टी॒वानो॒ हि दा॒शुषे॑ दे॒वा अ॑ग्ने॒ विचे॑तसः ॥
तान्‌रो॑हिदश्व गिर्वण॒स्त्रय॑स्त्रिंशत॒मा व॑ह ॥ २ ॥

श्रुष्टीऽवानः हि दाशुषे देवाः अग्ने विऽचेतसः ॥
तान् रोहित्ऽअश्व गिर्वणः त्रयःऽत्रिंशतं आ वह ॥ २ ॥

रक्तवर्ण अश्वांनी युक्त असलेल्या हे स्तुतिप्रिय अग्निदेवा, सर्व देव अत्यंत प्रज्ञावान असून हवि अर्पण करणार्‍या भक्ताची प्रार्थना श्रवण करण्यास ते खरोखर अतिशय तत्पर असतात. ह्यासाठीं त्यांस इकडे घेऊन ये. त्यांची एकंदर संख्या तेहतीस आहे. ॥ २ ॥


प्रि॒य॒मे॒ध॒वद॑त्रि॒वज्जात॑वेदो विरूप॒वत् ॥
अ॒ङ्‍गि॒र॒स्वन्म॑हिव्रत॒ प्रस्क॑ण्वस्य श्रुधी॒ हव॑म् ॥ ३ ॥

प्रियमेधऽवत् अत्रिऽवत् जातऽवेदः विरूपऽवत् ॥
अङ्‍गिरस्वत् महिऽव्रत प्रस्कण्वस्य श्रुधि हवम् ॥ ३ ॥

हे जातवेद अग्निदेवा, तुझ्या आज्ञा फार श्रेष्ठ आहेत. तूं प्रियमेधाप्रमाणे, अत्रीप्रमाणे, विरूपाप्रमाणें व अंगिराप्रमाणें प्रस्कण्वाचीही हांक ऐक. ॥ ३ ॥


महि॑केरव ऊ॒तये॑ प्रि॒यमे॑धा अहूषत ॥
राज॑न्तमध्व॒राणा॑म॒ग्निं शु॒क्रेण॑ शो॒चिषा॑ ॥ ४ ॥

महिऽकेरवः ऊतये प्रियऽमेधाः अहूषत ॥
राजंतं अध्वराणां अग्निं शुक्रेण शोचिषा ॥ ४ ॥

मोठमोठी स्तोत्रें गाणार्‍या प्रियमेधांनी आपल्या रक्षणाकरिता, स्वतेजानें यज्ञांत प्रकाशमान होणार्‍या देदीप्यमान अग्नीसच आमंत्रण केलें होतें. ॥ ४ ॥


घृता॑हवन सन्त्ये॒मा उ॒ षु श्रु॑धी॒ गिरः॑ ॥
याभिः॒ कण्व॑स्य सू॒नवो॒ हव॒न्ते॑ऽवसे त्वा ॥ ५ ॥

घृतऽआहवन संत्य इमाः ऊं इति सु श्रुधि गिरः ॥
याभिः कण्वस्य सूनवः हवंते अवसे त्वा ॥ ५ ॥

घृतांच्या हवींचा स्वीकार करणार्‍या हे उदार देवा, ज्या स्तुतींच्या योगानें कण्वाचे पुत्र तुला हवन करीत आहेत त्या तू श्रवण कर. ॥ ५ ॥


त्वां चि॑त्रश्रवस्तम॒ हव॑न्ते वि॒क्षु ज॒न्तवः॑ ॥
शो॒चिष्के॑शं पुरुप्रि॒याग्ने॑ ह॒व्याय॒ वोळ्ह॑वे ॥ ६ ॥

त्वां चित्रश्रवःऽतम हवंते विक्षु जंतवः ॥
शोचिःऽकेशं पुरुऽप्रिय अग्ने हव्याय वोळ्हवे ॥ ६ ॥

प्रार्थना श्रवण करण्यांत तुझी शक्ति आश्चर्यकारक आहे, तूं अनेक जनांना प्रिय आहेस. तुझे केश ज्वालारूप आहेत. देवांकडे हवि घेऊन जाण्याकरितां हे अग्निदेवा, ह्या जगांतील लोक तुझें पूजन करीत असतात. ॥ ६ ॥


नि त्वा॒ होता॑रमृ॒त्विजं॑ दधि॒रे व॑सु॒वित्त॑मम् ॥
श्रुत्क॑र्णं स॒प्रथ॑स्तमं॒ विप्रा॑ अग्ने॒ दिवि॑ष्टिषु ॥ ७ ॥

नि त्वा होतारं ऋत्विजं दधिरे वसुवित्ऽतमम् ॥
श्रुत्ऽकर्णं सप्रथःऽतमं विप्रा अग्ने दिविष्टिषु ॥ ७ ॥

हवि अर्पण करणारा, यज्ञांतील आचार्य, अतिशय संपत्तिमान, भक्तांच्या हांकेस कान देणारा व अत्यंत कीर्तिमान असा जो तूं त्या तुझी विद्वान लोक यज्ञांत संस्थापना करतात. ॥ ७ ॥


आ त्वा॒ विप्रा॑ अचुच्यवुः सु॒तसो॑मा अ॒भि प्रयः॑ ॥
बृ॒हद्‌भा बिभ्र॑तो ह॒विरग्ने॒ मर्ता॑य दा॒शुषे॑ ॥ ८ ॥

आ त्वा विप्रा अचुच्यवुः सुतऽसोमाः अभि प्रयः ॥
बृहत् भाः बिभ्रतः हविः अग्ने मर्ताय दाशुषे ॥ ८ ॥

हे अग्निदेवा, ज्यांनी सोमरस तयार करून ठेविला आहे, जे अतिशय कांतीने युक्त आहेत, व ज्यांनी हवि हातांत घेतलेलें आहेत अशा विद्वान लोकांनी, भक्तिशील मनुष्यांकरितां, तुझें मन हवींच्या अन्नाकडे वळविलेले आहे. ॥ ८ ॥


प्रा॒त॒र्याव्णः॑ सहस्कृत सोम॒पेया॑य सन्त्य ॥
इ॒हाद्य दैव्यं॒ जनं॑ ब॒र्हिरा सा॑दया वसो ॥ ९ ॥

प्रातःऽर्याव्नः सहःऽकृत सोमऽपेयाय संत्य ॥
इह अद्य दैव्यं जनं बर्हिः आ सादय वसो इति ॥ ९ ॥

सामर्थ्यापासून जन्म पावणार्‍या हे उदार अग्निदेवा, हे मूर्तिमंत वैभवा, प्रातःकालींच बाहेर गमन करणार्‍या देवसमुदायांस आज ह्या यज्ञांत सोमपानार्थ दर्भासनांवर आणून बसव. ॥ ९ ॥


अ॒र्वाञ्चं॒ दैव्यं॒ जन॒मग्ने॒ यक्ष्व॒ सहू॑तिभिः ॥
अ॒यं सोमः॑ सुदानव॒स्तं पा॑त ति॒रोअ॑ह्न्यम् ॥ १० ॥

अर्वाञ्चं दैव्यं जनं अग्ने यक्ष्व सहूतिऽभिः ॥
अयं सोमः सुऽदानवः तं पात तिरःऽअह्न्यम् ॥ १० ॥

हे अग्निदेवा, देवसमुदायांस इकडे आणून त्या सर्वांस एकाच वेळीं आहुति देऊन तृप्त कर. हे अत्यंत उदार देवांनो, हा येथें सोम ठेवलेला आहे. तो आपण प्राशन करा. तो काल तयार केलेला आहे. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४६ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - अश्विनीकुमार : छंद - गायत्री


ए॒षो उ॒षा अपू॑र्व्या॒ व्युच्छति प्रि॒या दि॒वः ॥ स्तु॒षे वा॑मश्विना बृ॒हत् ॥ १ ॥

एषो इति उषाः अपूर्व्या वि उच्छति प्रिया दिवः ॥ स्तुषे वां अश्विना बृहत् ॥ १ ॥

द्युलोकांस प्रिय असलेली अशी जी अपूर्व तेजोयुक्त उषा देवी ती आपला प्रकाश पाडीत आहे. हे अश्विनहो ! मी तुमची मनःपूर्वक स्तुति करतो. ॥ १ ॥


या द॒स्रा सिन्धु॑मातरा मनो॒तरा॑ रयी॒णाम् ॥ धि॒या दे॒वा व॑सु॒विदा॑ ॥ २ ॥

या दस्रा सिन्धुऽमातरा मनोतरा रयीणाम् ॥ धिया देवा वसुऽविदा ॥ २ ॥

हे अश्विनीदेव सुंदर आहेत. सिंधु ही त्यांची जननी होय. वेगवान पुरुषांशी तुलना केली असतां हे आपल्या वेगानें मनाससुद्धां मागें टाकतात. हे अंतःकरणपूर्वक भक्तांना धन अर्पण करतात. ॥ २ ॥


व॒च्यन्ते॑ वां ककु॒हासो॑ जू॒र्णाया॒मधि॑ वि॒ष्टपि॑ ॥ यद्वां॒ रथो॒ विभि॒ष्पता॑त् ॥ ३ ॥

वच्यंते वां ककुहासः जूर्णायां अधि विष्टपि ॥ यत् वां रथः विऽभिः पतात् ॥ ३ ॥

वेगाने धांवण्यांत जणूं पक्षीच अशा तुमच्या अश्वांच्या योगानें जेव्हां तुमचा रथ ताडताड उडत जातो त्यावेळी अति पुरातन अशा स्वर्गलोकांत सुद्धां तुमची स्तोत्रें म्हणण्यांत येतात. ॥ ३ ॥


ह॒विषा॑ जा॒रो अ॒पां पिप॑र्ति॒ पपु॑रिर्नरा ॥ पि॒ता कुट॑स्य चर्ष॒णिः ॥ ४ ॥

हविषा जारः अपां पिपर्ति पपुरिः नरा ॥ पिता कुटस्य चर्षणिः ॥ ४ ॥

हा सर्वसंचारी व सर्वतृप्तिकारक सूर्यदेव कीं - ज्याच्यावर उदकांचा लोभ आहे व ज्याच्यापासून पाण्याचे रांजण ( मेघ ) जन्म पावतात - तो तुम्हांस हवींनी संतुष्ट करतो. ॥ ४ ॥


आ॒दा॒रो वां॑ मती॒नां नास॑त्या मतवचसा ॥ पा॒तं सोम॑स्य धृष्णु॒या ॥ ५ ॥

आऽदारः वां मतीनां नासत्या मतऽवचसा ॥ पातं सोमस्य धृष्णुऽया ॥ ५ ॥

हे स्तुतिप्रिय व सत्यस्वरूप अश्विनीदेवहो ! सोमरस हा तुमच्या मनाची कपाटे उघडतो. म्हणून सोमरसाचे मनसोक्त प्राशन करा. ॥ ५ ॥


या नः॒ पीप॑रदश्विना॒ ज्योति॑ष्मती॒ तम॑स्ति॒रः ॥ ताम॒स्मे रा॑साथा॒मिष॑म् ॥ ६ ॥

या नः पीपरत् अश्विना ज्योतिष्मती तमः तिरः ॥ तां अस्मे रासाथां इषम् ॥ ६ ॥

अहो अश्विनहो, जी उज्वल प्रकाश पाडून आम्हांस अंधकाराच्या पार घेऊन जाईल त्या तुमच्या कृपेचा लाभ आम्हांस करून द्या. ॥ ६ ॥


आ नो॑ ना॒वा म॑ती॒नां या॒तं पा॒राय॒ गन्त॑वे ॥ यु॒ञ्जाथा॑मश्विना॒ रथ॑म् ॥ ७ ॥

आ नः नावा मतीनां यातं पाराय गंतवे ॥ युञ्जाथां अश्विना रथम् ॥ ७ ॥

तुमच्या कृपारूपी नौकेंत बसून आम्हांस दुःखसमुद्राच्या पार जातां यावे म्हणून इकडे आगमन करा. हे अश्विनहो, तुम्ही आपला रथ जोडा. ॥ ७ ॥


अ॒रित्रं॑ वां दि॒वस्पृ॒थु ती॒र्थे सिन्धू॑नां॒ रथः॑ ॥ धि॒या यु॑युज्र॒ इन्द॑वः ॥ ८ ॥

अरित्रं वां दिवः पृथु तीर्थे सिंधूनां रथः ॥ धिया युयुज्रे इंदवः ॥ ८ ॥

नदीच्या तीरावरून तुमचे गमन होत असतां तुमचा रथ हीच स्वर्गलोकाहूनही विस्तीर्ण अशी तुमची नौका होते. तुमच्याकरितां आम्हीं येथें भक्तीने सोमरस तयार करून ठेवले आहेत. ॥ ८ ॥


दि॒वस्क॑ण्वास॒ इन्द॑वो॒ वसु॒ सिन्धू॑नां प॒दे ॥ स्वं व॒व्रिं कुह॑ धित्सथः ॥ ९ ॥

दिवः कण्वासः इंदवः वसु सिंधूनां पदे ॥ स्वं वव्रिं कुह धित्सथः ॥ ९ ॥

हे कण्वहो, स्वर्गाच्या प्रदेशांत आल्हाददायक तेज भरून राहिलें आहे आणि नद्यांच्या निवासस्थानी तेजःपुंज असे वैभव दृगोचर होत आहे. तर हे अश्विनहो, आपण आपले दिव्य देह कोणते ठिकाणी घेऊन जाल बरें ? ॥ ९ ॥


अभू॑दु॒ भा उ॑ अं॒शवे॒ हिर॑ण्यं॒ प्रति॒ सूर्यः॑ ॥ व्यख्यज्जि॒ह्वयासि॑तः ॥ १० ॥

अभूत् ऊं इति भाः ऊं इति अंशवे हिरण्यं प्रति सूर्यः ॥ वि अख्यत् जिह्वया असितः ॥ १० ॥

चोहोंकडे आपले रश्मि फेंकण्याकरितां ही पहा प्रभा सज्ज झाली आहे. आणि हे पहा इकडे सूर्य उगवला. हा कांचनाचीच प्रतिमा होय. अग्नीनेही आपली जिव्हा बाहेर काढून स्वतःची दीप्ति प्रकट केली आहे. ॥ १० ॥


अभू॑दु पा॒रमेत॑वे॒ पन्था॑ ऋ॒तस्य॑ साधु॒या ॥ अद॑र्शि॒ वि स्रु॒तिर्दि॒वः ॥ ११ ॥

अभूत् ऊं इति पारं एतवे पंथाः ऋतस्य साधुऽया ॥ अदर्शि वि स्रुतिः दिवः ॥ ११ ॥

धर्मनीतीचा मार्ग आपणांस दुःखाच्या पलीकडे नेण्यासाठी स्पष्ट दिसूं लागला आहे आणि स्वर्गाची वाटही दृष्टी पडूं लागली आहे. ॥ ११ ॥


तत्त॒दिद॒श्विनो॒रवो॑ जरि॒ता प्रति॑ भूषति ॥ मदे॒ सोम॑स्य॒ पिप्र॑तोः ॥ १२ ॥

तत्ऽतत् इत् अश्विनोः अवः जरिता प्रति भूषति ॥ मदे सोमस्य पिप्रतोः ॥ १२ ॥

सोमप्राशनाने आनंद झाल्याबरोबर जे अश्विनदेव भक्तांस भरपूर वैभव देतात त्यांच्या या कृपाप्रसादाची स्तोतृजन नेहमी वाखाणणी करीत असतो. ॥ १२ ॥


वा॒व॒सा॒ना वि॒वस्व॑ति॒ सोम॑स्य पी॒त्या गि॒रा ॥ म॒नु॒ष्वच्छ॑म्भू॒ आ ग॑तम् ॥ १३ ॥

ववसाना विवस्वति सोमस्य पीत्या गिरा ॥ मनुष्वत् शंभू इति शं‍भू आ गतम् ॥ १३ ॥

ज्याप्रमाणें पूर्वी तुम्ही मनूचे भेटीस गेलां होतां त्याप्रमाणे आमच्या प्रार्थनांनी व सोमरसाचे प्राशनानें प्रेरीत होऊन विवस्वताकरितां आपले तेज प्रकट करीत आमचे कल्याणकर्ते आपण इकडे या. ॥ १३ ॥


यु॒वोरु॒षा अनु॒ श्रियं॒ परि॑ज्मनोरु॒पाच॑रत् ॥ ऋ॒ता व॑नथो अ॒क्तुभिः॑ ॥ १४ ॥

युवोः उषाः अनु श्रियं परिऽज्मनोः उपऽआचरत् ॥ ऋता वनथः अक्तुऽभिः ॥ १४ ॥

आपण परिभ्रमण करीत असतां आपल्या मार्गाच्या अनुरोधानें उषेनेंही आपलें मार्गक्रमण चालविलें. आपणांस रात्री केलेली यागकर्मे फार आवडतात. ॥ १४ ॥


उ॒भा पि॑बतमश्विनो॒भा नः॒ शर्म॑ यच्छतम् ॥ अ॒वि॒द्रि॒याभि॑रू॒तिभिः॑ ॥ १५ ॥

उभा पिबतं अश्विना उभा नः शर्म यच्छतम् ॥ अविद्रियाभिः ऊतिऽभिः ॥ १५ ॥

हे अश्विनहो, आपल्या कृपेस खंड पडूं न देतां आपण उभयतांही आम्हांस सौख्य अर्पण करा व उभयतां सोमरसाचें प्राशन करा. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४७ ( अश्विनीकुमार )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - अश्विनीकुमार
छंद - सम-सतोबृहती; विषम बृहती


अ॒यं वां॒ मधु॑मत्तमः सु॒तः सोम॑ ऋतावृधा ॥
तम॑श्विना पिबतं ति॒रोअ॑ह्न्यं ध॒त्तं रत्ना॑नि दा॒शुषे॑ ॥ १ ॥

अयं वां मधुमत्ऽतमः सुतः सोमः ऋतऽवृधा ॥
तं अश्विना पिबतं तिरःऽअह्न्यं धत्तं रत्नानि दाशुषे ॥ १ ॥

नीतिधर्मपरिपालनांत आनंद मानणार्‍या हे अश्विनीदेवांनो, हा अतिशय माधुर्ययुक्त असा सोमरस तुमच्याकरितां काढून ठेवलेला आहे. तो कालच तयार केलेला आहे. त्याचें प्राशन करा आणि आपल्या भक्ताकरितां उत्तम संपत्तिचें भांडार भरून ठेवा. ॥ १ ॥


त्रि॒व॒न्धु॒रेण॑ त्रि॒वृता॑ सु॒पेश॑सा॒ रथे॒ना या॑तमश्विना ॥
कण्वा॑सो वा॒म् ब्रह्म॑ कृण्वन्त्यध्व॒रे तेषां॒ सु शृ॑णुतं॒ हव॑म् ॥ २ ॥

त्रिऽवंधुरेण त्रिऽवृता सुऽपेशसा रथेन यातं अश्विना ॥
कण्वासः वां ब्रह्म कृण्वंति अध्वरे तेषां सु शृणुतं हवम् ॥ २ ॥

हे अश्विनहो, ज्या आपल्या रथास तीन बंधुरा आहेत, ज्याचा आकार त्रिकोणावृत्त आहे व जो दिसण्यांत सुंदर आहे अशा रथांत बसून इकडे या. ह्या यज्ञांत कण्व तुमची स्तुति करीत आहेत त्यांची हांक आपण श्रवण करा. ॥ २ ॥


अश्वि॑ना॒ मधु॑मत्तमं पा॒तं सोमं॑ ऋतावृधा ॥
अथा॒द्य द॑स्रा॒ वसु॒ बिभ्र॑ता॒ रथे॑ दा॒श्वांस॒मुप॑ गच्छतम् ॥ ३ ॥

अश्विना मधुमत्ऽतमं पातं सोमं ऋतऽवृधा ॥
अथ अद्य दस्रा वसु बिभ्रता रथे दाश्वांसं उप गच्छतम् ॥ ३ ॥

हे अश्विनीदेवांनो, ह्या अत्यंत मधुर सोमरसाचें प्राशन करा आणि हे सुरूपवान देवांनो आपल्या रथांतून पुष्कळ संपत्ति घेऊन येऊन भक्त जनांकडे आगमन करा. ॥ ३ ॥


त्रि॒ष॒ध॒स्थे ब॒र्हिषि॑ विश्ववेदसा॒ मध्वा॑ य॒ज्ञं मि॑मिक्षतम् ॥
कण्वा॑सो वां सु॒तसो॑मा अ॒भिद्य॑वो यु॒वां ह॑वन्ते अश्विना ॥ ४ ॥

त्रिऽसधस्थे बर्हिषि विश्वऽवेदसा मध्वा यज्ञं मिमिक्षतम् ॥
कण्वासः वां सुतऽसोमाः अभिऽद्यवः युवां हवंते अश्विना ॥ ४ ॥

तिघांस एकदम बसतां येईल अशा रीतीने मांडलेल्या दर्भासनावर आरूढ होऊन हे सर्वज्ञ देवहो, आमचा यज्ञ माधुर्याने परिप्लुत करा. हे अश्विनहो, हे तेजस्वीपणाने शोभणारे कण्व सोमरस तयार करून आपणांस आमंत्रण करीत आहेत. ॥ ४ ॥


याभिः॒ कण्व॑म॒भिष्टि॑भिः॒ प्राव॑तं यु॒वम॑श्विना ॥
ताभिः॒ ष्व१स्माँ अ॑वतं शुभस्पती पा॒तं सोम॑मृतावृधा ॥ ५ ॥

याभिः कण्वं अभिष्टिऽभिः प्र आवतं युवं अश्विना ॥
ताभिः सु अस्मान् अवतं शुभः पती इति पातं सोमं ऋतऽवृधा ॥ ५ ॥

ज्या आपल्या कृपासामर्थ्याच्या योगाने हे अश्विनहो, आपण कण्वाचें संरक्षण केलेंत त्याच सामर्थ्यानें युक्त होऊन आमचेंही रक्षण करा. कारण आपण सर्व मंगलतेचे स्वामी व न्यायनीतीस उत्तेजन देणारे आहां. ॥ ५ ॥


सु॒दासे॑ दस्रा॒ वसु॒ बिभ्र॑ता॒ रथे॒ पृक्षो॑ वहतमश्विना ॥
र॒यिं स॑मु॒द्रादु॒त वा॑ दि॒वस्पर्य॒स्मे ध॑त्तं पुरु॒स्पृह॑म् ॥ ६ ॥

सुऽदासे दस्रा वसु बिभ्रता रथे पृक्षः वहतं अश्विना ॥
रयिं समुद्रात् उत वा दिवः परि अस्मे धत्तं पुरुऽस्पृहम् ॥ ६ ॥

अहो सुंदर अश्विदेवहो, ज्या अर्थी आपण सुदासाकरितां संपत्ति घेऊन आला त्याअर्थी आपल्या रथांतून आमच्याकरितांही जीवनसामग्री घेऊन या. ज्यावर पुष्कळ लोकांचा डोळा असतो असे वैभव आम्हांस अर्पण करा. मग ते आपण महासागरांमधून आणलेले असो अथवा स्वर्गाच्या भोंवतालील प्रदेशांतून आणलेलें असो. ॥ ६ ॥


यन्ना॑सत्या परा॒वति॒ यद्वा॒ स्थो अधि॑ तु॒र्वशे॑ ॥
अतो॒ रथे॑न सु॒वृता॑ न॒ आ ग॑तं सा॒कं सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑ ॥ ७ ॥

यन् नासत्या पराऽवति यत् वा स्थः अधि तुर्वशे ॥
अतः रथेन सुऽवृता नः आ गतं साकं सूर्यस्य रश्मिऽभिः ॥ ७ ॥

हे सत्यस्वरूप अश्विनदेवतांनो ! आपण तुर्वशापासून जवळ असा अथवा फार लांब असा; तेथून आपल्या सुंदर रथांत बसून इकडे या आणि येतांना सूर्याच्या किरणांसही बरोबर घेऊन या. ॥ ७ ॥


अ॒र्वाञ्चा॑ वां॒ सप्त॑योऽध्वर॒श्रियो॒ वह॑न्तु॒ सव॒नेदुप॑ ॥
इषं॑ पृ॒ञ्चन्ता॑ सु॒कृते॑ सु॒दान॑व॒ आ ब॒र्हिः सी॑दतं नरा ॥ ८ ॥

अर्वाञ्चा वां सप्तयः अध्वरऽश्रियः वहंतु सवना इत् उप ॥
इषं पृञ्चंता सुऽकृते सुऽदानवे आ बर्हिः सीदतं नरा ॥ ८ ॥

यज्ञास ललामभूत असे आपले अश्व आपणांस आमच्या हवींकडे घेऊन येवोत. अहो शूरांनो ! आपणांस प्रेमाने हवि अर्पण करणार्‍या सदाचारी भक्तासाठी समृद्धीची भरती करून ह्या कुशासनावर विराजमान व्हा ॥ ८ ॥


तेन॑ नास॒त्या ग॑तं॒ रथे॑न॒ सूर्य॑त्वचा ॥
येन॒ शश्व॑दू॒हथु॑र्दा॒शुषे॒ वसु॒ मध्वः॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ९ ॥

तेन नासत्या आ गतं रथेन सूर्यऽत्वचा ॥
येन शश्वत् ऊहथुः दाशुषे वसु मध्वः सोमस्य पीतये ॥ ९ ॥

हे सत्यस्वरूप अश्विनीदेवतांनो ! सूर्यासही आच्छादून टाकणार्‍या आपल्या रथांत बसून इकडे या. जेव्हां जेव्हां आपणांस मधुर सोमरसाच्या पानाची इच्छा होते, त्या त्या वेळी आपण नेहमी ह्याच रथांतून आपल्या भक्तांकरितां सोमरस आणीत असतां. ॥ ९ ॥


उ॒क्थेभि॑र॒र्वागव॑से पुरू॒वसू॑ अ॒र्कैश्च॒ नि ह्व॑यामहे ॥
शश्व॒त्कण्वा॑नां॒ सद॑सि प्रि॒ये हि कं॒ सोमं॑ प॒पथु॑रश्विना ॥ १० ॥

उक्थेभिः अर्वाक् अवसे पुरूवसू इति पुरुऽवसू अर्कैः च नि ह्वयामहे ॥
शश्वत् कण्वानां सदसि प्रिये हि कं सोमं पपथुः अश्विना ॥ १० ॥

अनेक वैभवांनी संपन्न अशा अश्विनीदेवांस आम्ही स्तुति स्तोत्रें गाऊन आम्हांकडे पाचारण करीत आहों. हे अश्विनहो ! आपणांस प्रिय असलेल्या कण्वांच्या सदनांत जाऊन आपण खरोखर नेहमी सोमप्राशन केलेलें आहे. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४८ ( उषा सूक्त )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - उषा : छंद - सम-सतोबृहती; विषम बृहती


स॒ह वा॒मेन॑ न उषो॒ व्युच्छा दुहितर्दिवः ॥
स॒ह द्यु॒म्नेन॑ बृह॒ता वि॑भावरि रा॒या दे॑वि॒ दास्व॑ती ॥ १ ॥

सह वामेन नः उषः वि उच्छ दुहितः दिवः ॥
सह द्युम्नेन बृहता विभाऽवरि राया देवि दास्वती ॥ १ ॥

द्युलोकदुहिते हे उषादेवी, अत्यंत सुंदर अशा तुझ्या कांतीने येथे आमचेसाठी सुप्रकाशित हो. हे देदीप्यमान देवते, तूं दानशूर असल्यामुळें विपुल संपत्ति व वैभव हे बरोबर घेऊन येऊन येथें प्रकाश पाड. ॥ १ ॥


अश्वा॑वती॒र्गोम॑तीर्विश्वसु॒विदो॒ भूरि॑ च्यवन्त॒ वस्त॑वे ॥
उदी॑रय॒ प्रति॑ मा सू॒नृता॑ उष॒श्चोद॒ राधो॑ म॒घोना॑म् ॥ २ ॥

अश्वऽवतीः गोऽमतीः विश्वऽसुविदः भूरि च्यवंत वस्तवे ॥
उत् ईरय प्रति मा सूनृताः उषः चोद राधः मघोनाम् ॥ २ ॥

ह्या उषा, अश्व, धेनु, व ह्या विश्वांतील उत्तम उत्तम सौख्यें हीं आपल्या बरोबर घेऊन जगतीतलावर प्रकाश पाडण्याकरितां आकाशांतून उतरून आल्या आहेत. हे उषे, माझेबरोबर मधुर संभाषण कर व श्रीमंत पुरुषांजवळ जितकें धन असतें तितकें धन आम्हांस अर्पण कर. ॥ २ ॥


उ॒वासो॒षा उ॒च्छाच्च॒ नु दे॒वी जी॒रा रथा॑नाम् ॥
ये अ॑स्या आ॒चर॑णेषु दध्रि॒रे स॑मु॒द्रे न श्र॑व॒स्यवः॑ ॥ ३ ॥

उवास उषाः उच्छात् च नु देवी जीरा रथानाम् ॥
ये अस्याः आऽचरणेषु दध्रिरे समुद्रे न श्रवस्यवः ॥ ३ ॥

उषेनें आपला प्रकाश पाडला आहे व ती असाच आपला प्रकाश पाडणार. (सायंकाळी मुक्कामास राहिलेल्या गाड्यांना) हीच पुढें जाण्याविषयीं प्रेरणा करते. कारण, ज्याप्रमाणें समुद्रपर्यटनास निघणारे साहसी लोक समुद्राकडे दृष्टि लावून बसतात त्याप्रमाणें सर्व रथ उषेच्या आगमनाची प्रतीक्षा करीत बसलेले असतात. ॥ ३ ॥


उषो॒ ये ते॒ प्र यामे॑षु यु॒ञ्जते॒ मनो॑ दा॒नाय॑ सू॒रयः॑ ॥
अत्राह॒ तत्कण्व॑ एषां॒ कण्व॑तमो॒ नाम॑ गृणाति नृ॒णाम् ॥ ४ ॥

उषः ये ते प्र यामेषु युञ्जते मनः दानाय सूरयः ॥
अत्र अह तत् कण्वः एषां कण्वऽतमः नाम गृणाति नृणाम् ॥ ४ ॥

जे विद्वान लोक तुझें आगमन झाले असतां दानकर्म करण्याकडे स्वतःच्या मनाची प्रवृत्ति करतात त्यांचे नाम हा कण्व कुलांतील श्रेष्ठ ह्या यज्ञांत मोठ्या सन्मानानें गात असतो. ॥ ४ ॥


आ घा॒ योषे॑व सू॒नर्यु॒षा या॑ति प्रभुञ्ज॒ती ॥
ज॒रय॑न्ती॒ वृज॑नं प॒द्वदी॑यत॒ उत्पा॑तयति प॒क्षिणः॑ ॥ ५ ॥

आ घ योषाऽइव सूनरी उषाः याति प्रऽभुंजती ॥
जरयंती वृजनं पत्ऽवत् ईयते उत् पातयति पक्षिणः ॥ ५ ॥

एखाद्या सुंदर स्त्रीप्रमाणें ही उषा विलास करीत करीत व सर्व दुरितांस नाशाप्रत पोंचवीत येत आहे. ज्यांस पाय आहेत अशा प्राण्यांस ती चालावयास लावते व ज्यांस पंख आहेत अशा जीवांस ती अंतरिक्षांत उडण्यास प्रवृत्त करते. ॥ ५ ॥


वि या सृ॒जति॒ सम॑नं॒ व्य३र्थिनः॑ प॒दं न वे॒त्योद॑ती ॥
वयो॒ नकि॑ष्टे पप्ति॒वांस॑ आसते॒ व्युष्टौ वाजिनीवति ॥ ६ ॥

वि या सृजति समनं वि अर्थिनः पदं न वेति ओदती ॥
वयः नकिः टे पप्तिऽवांसः आसते विऽउष्टौ वाजिनीऽवति ॥ ६ ॥

जे उद्योगशील आहेत व ज्यांस धन मिळविण्याची इच्छा आहे त्यांना ती आपापल्या कामास प्रवृत्त करते. ह्या उदार देवतेस विश्रांतीची मुळींच गरज वाटत नाही. उत्साहवर्धन करणारी ही उषादेवी प्रकाशमान झाली कीं ज्यास् उडण्याचें सामर्थ्य आहे असा एकही पक्षी घरट्यांत बसून रहात नाहीं. ॥ ६ ॥


ए॒षायु॑क्त परा॒वतः॒ सूर्य॑स्यो॒दय॑ना॒दधि॑ ॥
श॒तं रथे॑भिः सु॒भगो॒षा इ॒यं वि या॑त्य॒भि मानु॑षान् ॥ ७ ॥

एषा अयुक्त पराऽवतः सूर्यस्य उत्‌अयनात् अधि ॥
शतं रथेभिः सुऽभगा उषाः इयं वि याति अभि मानुषान् ॥ ७ ॥

सूर्याच्या उदयस्थानाच्याही पलीकडे असलेल्या लांबच्या प्रदेशापासून हिनें आपले अश्व जोडून आणलेले आहेत. ही परोपकारी उषा मनुष्यांच्याकडे शंभर रथांत बसून येते. ॥ ७ ॥


विश्व॑मस्या नानाम॒ चक्ष॑से॒ जग॒ज्ज्योति॑ष्कृणोति सू॒नरी॑ ॥
अप॒ द्वेषो॑ म॒घोनी॑ दुहि॒ता दि॒व उ॒षा उ॑च्छ॒दप॒ स्रिधः॑ ॥ ८ ॥

विश्वं अस्याः ननाम चक्षसे जगत् ज्योतिः कृणोति सूनरी ॥
अप द्वेषः मघोनी दुहिता दिवः उषाः उच्छत् अप स्रिधः ॥ ८ ॥

हिचें दर्शन झाल्याबरोबर सर्व जगानें हिला प्रणाम केला आहे. ही उपकारी उषा सर्वांस प्रकाश देते. ह्या द्युलोकाच्या उदार कन्येनें सर्व द्वेषकारक व बाधक जीवांचे उन्मूलन करून टाकलें आहे. ॥ ८ ॥


उष॒ आ भा॑हि भा॒नुना॑ च॒न्द्रेण॑ दुहितर्दिवः ॥
आ॒वह॑न्ती॒ भूर्य॒स्मभ्यं॒ सौभ॑गं व्यु॒च्छन्ती॒ दिवि॑ष्टिषु ॥ ९ ॥

उषः आ भाहि भानुना चंद्रेण दुहितः दिवः ॥
आऽवहंती भूरि अस्मभ्यं सौभगं विऽउच्छंती दिविष्टिषु ॥ ९ ॥

द्युलोककन्ये हे उषादेवी, आमची यज्ञकर्में सुरू होण्याकरितां येथें आपला प्रकाश पाडून व आम्हांस अतिशय सौख्याचा लाभ करून देऊन आपल्या आल्हाददायक किरणांनी येथे प्रकट हो. ॥ ९ ॥


विश्व॑स्य॒ हि प्राण॑नं॒ जीव॑नं॒ त्वे वि यदु॒च्छसि॑ सूनरि ॥
सा नो॒ रथे॑न बृह॒ता वि॑भावरि श्रु॒धि चि॑त्रामघे॒ हव॑म् ॥ १० ॥

विश्वस्य हि प्राणनं जीवनं त्वे वि यत् उच्छसि सूनरि ॥
सा नः रथेन बृहता विभाऽवरि श्रुधि चित्रऽमघे हवम् ॥ १० ॥

जेव्हां हे सुखदायिनी देवी, तूं आपला प्रकाश पाडतेस तेव्हां तुझेपासून विश्वाला, आपला प्राण आपलें चैतन्य मिळालें असे वाटते. हे उज्ज्वल व अलौकिक औदार्य प्रकट करणारे देवते, तूं आपल्या मोठ्या रथांत बसून येऊन आमची हांक ऐक. ॥ १० ॥


उषो॒ वाजं॒ हि वंस्व॒ यश्चि॒त्रो मानु॑षे॒ जने॑ ॥
तेना व॑ह सु॒कृतो॑ अध्व॒राँ उप॒ ये त्वा॑ गृ॒णन्ति॒ वह्न॑यः ॥ ११ ॥

उषः वाजं हि वंस्व यः चित्रः मानुषे जने ॥
तेन वह सुऽकृतः अध्वरान् उप ये त्वा गृणंति वह्नयः ॥ ११ ॥

हे उषादेवते, आपले अंगी असें सामर्थ्य आण कीं ज्याबद्दल सर्व मनुष्यांस आचंबा वाटेल. त्या सामर्थ्याचे योगानें आमचे कल्याण करणार्‍या देवांना, जे उपास्क तुझें स्तवन करतात त्यांच्या यज्ञांसमीप, घेऊन ये. ॥ ११ ॥


विश्वा॑न्दे॒वाँ आ व॑ह॒ सोम॑पीतये॒ऽन्तरि॑क्षादुष॒स्त्वम् ॥
सास्मासु॑ धा॒ गोम॒दश्वा॑वदु॒क्थ्य१॑मुषो॒ वाजं॑ सु॒वीर्य॑म् ॥ १२ ॥

विश्वान् देवान् आ वह सोमऽपीतये अन्तरिक्षात् उषः त्वम् ॥
सा अस्मासु धाः गोऽमत् अश्वऽवत् उक्थ्यं उषः वाजं सुऽवीर्यम् ॥ १२ ॥

हे उषादेवी, सर्व देवांना अंतरिक्षांतून येथें सोमपानार्थ घेऊन ये, आणि, हे उषे, आमच्या अंगी असे सामर्थ्य आण की ज्याचें योगानें आम्हांस आपलें वीर्य गाजवितां येईल, ज्याची फार प्रशंसा होईल व ज्याचेमुळें आम्हांस धेनूंचा व अश्वांचा लाभ करून घेतां येईल. ॥ १२ ॥


यस्या॒ रुश॑न्तो अ॒र्चयः॒ प्रति॑ भ॒द्रा अदृ॑क्षत ॥
सा नो॑ र॒यिं वि॒श्ववा॑रं सु॒पेश॑समु॒षा द॑दातु॒ सुग्म्य॑म् ॥ १३ ॥

यस्याः रुशंतः अर्चयः प्रति भद्राः अदृक्षत ॥
सा नः रयिं विश्वऽवारं सुऽपेशसं उषाः ददातु सुग्म्यम् ॥ १३ ॥

जिची उज्ज्वल व कल्याणकारक किरणें दिसूं लागली आहेत ती ही उषा आम्हांस, सर्व लोकांस हवीशी वाटणारी अशी उत्तम प्रकारची संपत्ति, आम्हांस प्रयास न पडतां अर्पण करो. ॥ १३ ॥


ये चि॒द्धि त्वामृष॑यः॒ पूर्व॑ ऊ॒तये॑ जुहू॒रे॑ऽवसे महि ॥
सा नः॒ स्तोमा॑ँ अ॒भि गृ॑णीहि॒ राध॒सोषः॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॑ ॥ १४ ॥

ये चित् हि त्वां ऋषयः पूर्वे ऊतये जुहूरे अवसे महि ॥
सा नः स्तोमान् अभि गृणीहि राधसा उषः शुक्रेण शोचिषा ॥ १४ ॥

ज्या प्रचीन ऋषींनी, हे श्रेष्ठ उषादेवी, स्वसंरक्षणार्थ तुला पाचारण केलें त्यांच्या पूजनास पात्र झालेल्या व उज्ज्वल कांतीने युक्त असलेल्या हे उषे, तूं आपली कृपा आम्हांवर करून आमच्या स्तोत्रांबद्दल आपली प्रशंसाबुद्धि व्यक्त कर. ॥ १४ ॥


उषो॒ यद॒द्य भा॒नुना॒ वि द्वारा॑वृ॒णवो॑ दि॒वः ॥
प्र नो॑ यच्छतादवृ॒कं पृ॒थु छ॒र्दिः प्र दे॑वि॒ गोम॑ती॒रिषः॑ ॥ १५ ॥

उषः यत् अद्य भानुना वि द्वारौ ऋणवः दिवः ॥
प्र नः यच्छतात् अवृकं पृथु छर्दिः प्र देवि गोऽमती इषः ॥ १५ ॥

हे उषादेवी, ज्या अर्थी आज तूं आपल्या तेजानें स्वर्गाची द्वारें खुली केली आहेस, त्याअर्थी हे देवी आम्हांस जेथें शत्रूंचा त्रास होणार नाही असें विशाल मंदिर लाभेल असें कर व आम्हांला धेनु प्राप्त होतील अशी आम्हांविषयी कृपा धारण कर. ॥ १५ ॥


सं नो॑ रा॒या बृ॑ह॒ता वि॒श्वपे॑शसा मिमि॒क्ष्वा समिळा॑भि॒रा ॥
सं द्यु॒म्नेन॑ विश्व॒तुरो॑षो महि॒ सं वाजै॑र्वाजिनीवति ॥ १६ ॥

सं नः राया बृहता विश्वऽपेशसा मिमिक्ष्व सं इळाभिः आ ॥
सं द्युम्नेन विश्वऽतुरा उषः महि सं वाजैः वाजिनीऽवति ॥ १६ ॥

हे सामर्थ्यवान् श्रेष्ठ उषादेवी, आम्हांस अखिल प्रकारच्या संपत्तींनी, समृद्धींनी, सर्वत्र प्रसार पावणार्‍या कीर्तिवैभवानें व बलानें परिपूर्ण करून टाक. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४९ ( उषा सूक्त )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - उषा : छंद - अनुष्टुभ्


उषो॑ भ॒द्रेभि॒रा ग॑हि दि॒वश्चि॑द्रोच॒नादधि॑ ॥
वह॑न्त्वरु॒णप्स॑व॒ उप॑ त्वा सो॒मिनो॑ गृ॒हम् ॥ १ ॥

उषः भद्रेभिः आ गहि दिवः चित् रोचनात् अधि ॥
वहंतु अरुणऽप्सवः उप त्वा सोमिनः गृहम् ॥ १ ॥

हे उषादेवी, देदीप्यमान द्युलोकाच्या वरील भागकडून येथे आपल्या कल्याणप्रद कांतीने विभूषित होऊन आगमन कर. तुझे रक्तवर्ण अश्व सोमरस अर्पण करणार्‍या भक्ताच्या घराकडे तुला घेऊन येवोत. ॥ १ ॥


सु॒पेश॑सं सु॒खं रथं॒ यम॒ध्यस्था॑ उष॒स्त्वम् ॥
तेना॑ सु॒श्रव॑सं॒ जनं॒ प्रावा॒द्य दु॑हितर्दिवः ॥ २ ॥

सुऽपेशसं सुऽखं रथं यं अध्ऽअस्थाः उषः त्वम् ॥
तेन सुऽश्रवसं जनं प्र अव अद्य दुहितः दिवः ॥ २ ॥

हे उषादेवी, ज्या सुखावह व सुंदर रथांत तूं विराजमान झाली आहेस त्यांत बसून येऊन, हे द्युलोककन्ये, उत्तम कीर्तीची इच्छा करणार्‍या ह्या मनुष्यांचे संरक्षण कर. ॥ २ ॥


वय॑श्चित्ते पत॒त्रिणो॑ द्वि॒पच्चतु॑ष्पदर्जुनि ॥
उषः॒ प्रार॑न्नृ॒तूँरनु॑ दि॒वो अन्ते॑भ्य॒स्परि॑ ॥ ३ ॥

वयः चित् ते पतत्रिणः द्विऽपत् चतुःऽपत् अर्जुनि ॥
उषः प्र आरन् ऋतून् अनु दिवः अंतेभ्यः परि ॥ ३ ॥

हे देदीप्यमान देवी, द्युलोकाच्या आसमंतातील भागांतून तुझें आगमन झाल्याबरोबर, उडणारे पक्षी व द्विपाद आणि चतुष्पाद प्राणी बाहेर निघण्यास सिद्ध झाले. ॥ ३ ॥


व्यु॒च्छन्ती॒ हि र॒श्मिभि॒र्विश्व॑मा॒भासि॑ रोच॒नम् ॥
तां त्वामु॑षर्वसू॒यवो॑ गी॒र्भिः कण्वा॑ अहूषत ॥ ४ ॥

विऽउच्छंती हि रश्मिऽभिः विश्वं आऽभासि रोचनम् ॥
तां त्वां उषः वसूऽयवः गीःऽभिः कण्वा अहूषत ॥ ४ ॥

आपल्या किरणांनी जगावर प्रकाश पाडीत जी तूं सर्व जगास प्रकाशमय करून टाकतेस त्या तुझ्या, हे उषे, कण्वांनी संपत्तीची इच्छा धरून, स्तोत्रांचे योगानें धांवा केला आहे. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५० ( सूर्य सूक्त )

ऋषि - प्रस्कण्व काण्व : देवता - सूर्य : छंद - गायत्री, अनुष्टुभ्


उदु॒त्यं जा॒तवे॑दसं दे॒वं व॑हन्ति के॒तवः॑ ॥ दृ॒शे विश्वा॑य॒ सूर्य॑म् ॥ १ ॥

उत् ऊं इति त्यं जातऽवेदसं देवं वहंति केतवः ॥ दृशे विश्वाय सूर्यम् ॥ १ ॥

या सूर्याचें सर्वांस दर्शन घडावे म्हणून त्या सर्वज्ञ सूर्यदेवास त्याचे रश्मि इकडे घेऊन येत आहेत. ॥ १ ॥


अप॒ त्ये ता॒यवो॑ यथा॒ नक्ष॑त्रा यन्त्य॒क्तुभिः॑ ॥ सूरा॑य वि॒श्वच॑क्षसे ॥ २ ॥

अप त्ये तायवः यथा नक्षत्रा यंति अक्तुऽभिः ॥ सूराय विश्वऽचक्षसे ॥ २ ॥

ह्या सर्वदर्शी सूर्यास पाहून नक्षत्रे, रात्रीसहवर्तमान चोरांप्रमाणे पळ काढतात. ॥ २ ॥


अदृ॑श्रमस्य के॒तवो॒ वि र॒श्मयो॒ जनाँ॒ अनु॑ ॥ भ्राज॑न्तो अ॒ग्नयो॑ यथा ॥ ३ ॥

अदृश्रं अस्य केतवः वि रश्मयः जनान् अनु ॥ भ्राजंतः अग्नयः यथा ॥ ३ ॥

सर्व लोकांवर प्रकाश पाडण्याकरितां येत असतां अग्निप्रमाणे तेजस्वी असे ह्याचे उज्ज्वल रश्मि दिसत आहेत. ॥ ३ ॥


त॒रणि॑र्वि॒श्वद॑र्शतो ज्योति॒ष्कृद॑सि सूर्य ॥ विश्व॒मा भा॑सि रोच॒नम् ॥ ४ ॥

तरणिः विश्वऽदर्शतः ज्योतिःऽकृत् असि सूर्य ॥ विश्वं आ भासि रोचनम् ॥ ४ ॥

हे सूर्या ! तूं प्रकाश देणारा, सर्वांत अत्यंत सुंदर व सर्वसंचारी आहेस. ह्या अखिल जगावर तूं प्रकाश पाडून त्यास उज्ज्वलता आणतोस. ॥ ४ ॥


प्र॒त्यङ्‍ दे॒वानां॒ विशः॑ प्र॒त्यङ्‍ङ्‍उदे॑षि॒ मानु॑षान् ॥ प्र॒त्यङ्‍विश्वं॒ स्वर्दृ॒शे ॥ ५ ॥

प्रत्यङ्‍ देवानां विशः प्रत्यङ् उत् एषि मानुषान् ॥ प्रत्यङ् विश्वं स्वः दृशे ॥ ५ ॥

तुझा प्रकाश सर्वांच्या नजरेस पडावा म्हणून देवसमुदाय, मनुष्यें, किंबहुना विश्व ह्यांच्या समोर, तू ढळढळीत प्रकाशमान होतोस. ॥ ५ ॥


येना॑ पावक॒ चक्ष॑सा भुर॒ण्यन्तं॒ जनाँ॒ अनु॑ ॥ त्वं व॑रुण॒ पश्य॑सि ॥ ६ ॥

येन पावक चक्षसा भुरण्यंतं जनान् अनु ॥ त्वं वरुण पश्यसि ॥ ६ ॥

ह्या योगाने हे वरुणा, हे जगतास पावन करणार्‍या देवा, तुला सर्व लोकांचा भार सहन करणार्‍या ह्या जगताकडे स्वनेत्राने पाहतां येते. ॥ ६ ॥


वि द्यामे॑षि॒ रज॑स्पृ॒थ्वहा॒ मिमा॑नो अ॒क्तुभिः॑ ॥ पश्य॒ञ्जन्मा॑नि सूर्य ॥ ७ ॥

वि द्यां एषि रजः पृथु अहा मिमानः अक्तुऽभिः ॥ पश्यन् जन्मानि सूर्य ॥ ७ ॥

हे सूर्या, सर्व प्राणिमात्रांचे निरीक्षण करीत व रात्रीच्या योगाने दिवसाचें मापन करीत तूं द्युलोकावर व विस्तीर्ण रजोलोकावर आगमन करतोस. ॥ ७ ॥


स॒प्त त्वा॑ ह॒रितो॒ रथे॒ वह॑न्ति देव सूर्य ॥ शो॒चिष्के॑शं विचक्षण ॥ ८ ॥

सप्त त्वा हरितः रथे वहंति देव सूर्य ॥ शोचिःऽकेशं विऽचक्षण ॥ ८ ॥

हे सर्वनिरीक्षक सूर्यदेवा ! ज्याचे केश दीप्तिमय आहेत अशा तुला सात रक्तवर्ण अश्व रथांतून आणीत असतात. ॥ ८ ॥


अयु॑क्त स॒प्त शु॒न्ध्युवः॒ सूरो॒ रथ॑स्य न॒प्त्यः ॥ ताभि॑र्याति॒ स्वयु॑क्तिभिः ॥ ९ ॥

अयुक्त सप्त शुंध्युवः सूरः रथस्य नप्त्यः ॥ ताभिः याति स्वयुक्तिऽभिः ॥ ९ ॥

रथाच्या पुढील भागास जोडल्यामुळें ज्या जणुं कांही त्या रथापासून उत्पन्न झाल्या असल्याचाच भास होतो अशा सात घोड्या ह्या सूर्यानें स्वरथास जोडल्या आहेत. त्या रथाचें जूं आपले आपणच मानेवर घेणार्‍या असल्यामुळें, त्यांस सज्ज करून तो बाहेर प्रयाण करतो. ॥ ९ ॥


उद्व॒यं तम॑स॒स्परि॒ ज्योति॒ष्पश्य॑न्त॒ उत्त॑रम् ॥
दे॒वं दे॑व॒त्रा सूर्य॒मग॑न्म॒ ज्योति॑रुत्त॒मम् ॥ १० ॥

उत् वयं तमसः परि ज्योतिः पश्यंत उत्ऽतरम् ॥
देवं देवऽत्रा सूर्यं अगन्म ज्योतिः उत्ऽतमम् ॥ १० ॥

जें सर्व अंधकारावर आपलें प्राबल्य प्रकट करील असें उत्तम तेज शोधीत असतां आम्ही ह्या उत्कृष्ट ज्योतीकडे-सूर्याकडे आलो. हा देव अखिल देवांत श्रेष्ठ आहे. ॥ १० ॥


उ॒द्यन्न॒द्य मि॑त्रमह आ॒रोह॒न्नुत्त॑रां॒ दिव॑म् ॥
हृ॒द्रो॒गं मम॑ सूर्य हरि॒माणं॑ च नाशय ॥ ११ ॥

उत्ऽयन् अद्य मित्रऽमह आऽरोहन् उत्ऽतरां दिवम् ॥
हृऽरोगं मम सूर्य हरिमाणं च नाशय ॥ ११ ॥

स्वमित्रांस आनंद देणार्‍या हे सूर्या ! आज येथें उदय पावून व ह्या वर दिसणार्‍या आकाशावर आरोहण करून माझा हृद्रोग व कावीळ नाहींशी कर. ॥ ११ ॥


शुके॑षु मे हरि॒माणं॑ रोप॒णाका॑सु दध्मसि ॥
अथो॑ हारिद्र॒वेषु॑ मे हरि॒माणं॒ नि द॑ध्मसि ॥ १२ ॥

शुकेषु मे हरिमाणं रोपणाकासु दध्मसि ॥
अथो इति हारिद्रवेषु मे हरिमाणं नि दध्मसि ॥ १२ ॥

माझी कावीळ आम्ही पोपटांवर आणि रोपणाका ह्या नांवाच्या पक्ष्यांवर घालतों. अथवा हारिद्रव पक्ष्यांवर माझी कावीळ जाऊन बसेल असें आम्ही करतो. ॥ १२ ॥


उद॑गाद॒यमा॑दि॒त्यो विश्वे॑न॒ सह॑सा स॒ह ॥
द्वि॒षन्तं॒ मह्यं॑ र॒न्धय॒न्मो अ॒हं द्वि॑ष॒ते र॑धम् ॥ १३ ॥

उत् अगात् अयं आदित्यः विश्वेन सहसा सह ॥
द्विषंतं मह्यं रंधयन् मो इति अहं द्विषते रधम् ॥ १३ ॥

आपल्या सर्व सामर्थ्यानें सज्ज होऊन, माझे शत्रूंस मजपुढें शरण येण्यास भाग पाडीत, हा आदित्य येथें उगवला आहे. मी शत्रूच्या मुठींत कधींही न जावो. ॥ १३ ॥


ॐ तत् सत्


GO TOP