PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३१ (अग्निसूक्त )

ऋषी - हिरण्यस्तूप अङ्गिरस : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्, जगती


त्वम॑ग्ने प्रथ॒मो अङ्‍गि॑रा॒ ऋषि॑र्दे॒वो दे॒वाना॑मभवः शि॒वः सखा॑ ।
तव॑ व्र॒ते क॒वयो॑ विद्म॒नाप॒सोऽ॑जायन्त म॒रुतः॒ भ्राज॑दृष्टयः ॥ १ ॥

त्वं अग्ने प्रथमः अङ्‍गिराः ऋषिः देवः देवानां अभवः शिवः सखा ॥
तव व्रते कवयः विद्मनाऽअपसः अजायंत मरुतः भ्राजत्ऽऋष्टयः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, पहिला अंगिरा ऋषि व देव तूंच आहेस. देवांचा कल्याणकारक मित्र तूंच होतास. तुझ्या आज्ञानुसार देदीप्यमान शस्त्रें धारण करणारे व ज्ञानसामर्थ्यानें युक्त असलेले बुद्धिमान् मरुद्‍गण अवतीर्ण झाले. ॥ १ ॥


त्वम॑ग्ने प्रथ॒मो अङ्‍गि॑रस्तमः क॒विर्दे॒वानां॒ परि॑ भूषसि व्र॒तम् ।
वि॒भुर्विश्व॑स्मै॒ भुव॑नाय॒ मेधि॑रो द्विमा॒ता श॒युः क॑ति॒धा चि॑दा॒यवे॑ ॥ २ ॥

त्वं अग्ने प्रथमः अङ्‍गिरःऽतमः कविः देवानां परि भूषसि व्रतम् ॥
विऽभुः विश्वस्मै भुवनाय मेधिरः द्विऽमाता शयुः कतिधा चित् आयवे ॥ २ ॥

हे अग्निदेवा, अगदी पहिला आणि प्रमुख अंगिरा तूंच आहेस. तुझें ज्ञान अतिशय आहे. देवांच्या ज्या पवित्र आज्ञा आहेत त्यांना तूंच शोभा आणतोस. तूं सर्वव्यापी आहेस, तुझ्या अंगी विलक्षण बुद्धिमत्ता आहे. तुला दोन मातांनी जन्म दिला होता. खरोखर प्राणिमात्राच्या व मनुष्याच्या हिताकरितां तूं कितीतरी ठिकाणी वास करतोस. ॥ २ ॥


त्वम॑ग्ने प्रथ॒मो मा॑त॒रिश्व॑न आ॒विर्भ॑व सुक्रतू॒या वि॒वस्व॑ते ।
अरे॑जेतां॒ रोद॑सी होतृ॒वूर्येऽ॑सघ्नोर्भा॒रमय॑जो म॒हो व॑सो ॥ ३ ॥

त्वं अग्ने प्रथमः मातरिश्वने आविः भव सुक्रतुऽया विवस्वते ॥
अरेजेतां रोदसी इति होतृऽवूर्ये असघ्नोः भारं अयजः महः वसो इति ॥ ३ ॥

हे अग्निदेवा, तूंच सर्वांचे अगोदर होतास. आपल्या सामर्थ्यासह विवस्वान् आणि मातरिश्वा ह्यांचेकरितां तूं प्रकट हो. तूं मूर्तिमान वैभवच आहेस. जेव्हां होतृस्थानी सर्वांनी तुझी निवडणूक केली त्यावेळी तो कार्यभार तूं सहन केलास आणि सर्व श्रेष्ठ देवांस यज्ञ पोंचविलास. आकाश आणि पृथ्वीमात्र तें पाहून आश्चर्याने कंपित होऊन गेलीं. ॥ ३ ॥


त्वम॑ग्ने॒ मन॑वे॒ द्याम॑वाशयः पुरू॒रव॑से सु॒कृते॑ सु॒कृत्त॑रः ।
श्वा॒त्रेण॒ यत्पि॒त्रोर्मुच्य॑से॒ पर्या त्वा॒ पूर्व॑मनय॒न्नाप॑रं॒ पुनः॑ ॥ ४ ॥

त्वं अग्ने मनवे द्यां अवाशयः पुरूरवसे सुकृते सुऽकृत्ऽतरः ॥
श्वात्रेण यत् पित्रोः मुच्यसे परि आ त्वा पूर्वं अनयन् आ अपरं पुनरिति ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, मनूचेकरितां तूं द्युलोकांत प्रवेश केलास आणि सत्कृत्यांनी विख्यात झालेल्या पुरूरव्याकरितां तूं अतिशय प्रशंसनीय कृति केलीस. ज्यावेळीं घर्षणक्रियेने तुझ्या माता पितरांकडून तुझी प्रेरणा होते, त्यावेळी ऋत्विजलोक तुला प्रथम पूर्वबाजूस अणि नंतर पुन्हां पश्चिमबाजूस घेऊन फिरतात. ॥ ४ ॥


त्वम॑ग्ने वृष॒भः पु॑ष्टि॒वर्ध॑न॒ उद्य॑तस्रुचे भवसि श्र॒वाय्यः॑ ।
य आहु॑तिं॒ परि॒ वेदा॒ वष॑ट्कृति॒मेका॑यु॒रग्रे॒ विश॑ आ॒विवा॑ससि ॥ ५ ॥

त्वं अग्ने वृषभः पुष्टिऽवर्धन उद्यतऽस्रुचे भवसि श्रवाय्यः ॥
यः आऽहुतिं परि वेद वषट्ऽकृतिं एकऽआयुः अग्रे विशः आऽविवाससि ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, तुला हवि अर्पण करण्याकरितां जो मनुष्य यज्ञचमस वर उचलतो त्याच्या संपत्तीची तूं वृद्धि करण्यास अत्यंत बलिष्ठ व कीर्तिमान् आहेस. वषट् या शब्दांनी जी आहुति दिली जाते तिचे ज्ञान असणऱ्या ऋत्विजास तूं सर्वांचे अगोदर अखंड आयुष्य अर्पण करीत या जगतावर वास करतोस. ॥ ५ ॥


त्वम॑ग्ने वृजि॒नव॑र्तनिं॒ नरं॒ सक्म॑न्पिपर्षि वि॒दथे॑ विचर्षणे ।
यः शूर॑साता॒ परि॑तक्म्ये॒ धने॑ द॒भ्रेभि॑श्चि॒त्समृ॑ता॒ हंसि॒ भूय॑सः ॥ ६ ॥

त्वं अग्ने वृजिनऽवर्तनिं नरं सक्मन् पिपर्षि विदथे विऽचर्षणे ॥
यः शूरऽसाता परिऽतक्म्ये धने दभ्रेभिः चित् संऽऋता हंसि भूयसः ॥ ६ ॥

हे सर्वव्यापी अग्निदेवा, जो मनुष्य पापमार्गाचे अवलंबन करतो, त्यास तूं योग्य कर्मास प्रवृत्त करतोस. शूरांनीच मिळविण्यास योग्य अशा संपत्तिविषयीं युद्ध चालले असतां तूं अनेक शत्रूंना थोड्याच लोकांचे हांतून मारवितोस. ॥ ६ ॥


त्वं तम॑ग्ने अमृत॒त्व उ॑त्त॒मे मर्तं॑ दधासि॒ श्रव॑से दि॒वेदि॑वे ।
यस्ता॑तृषा॒ण उ॒भया॑य॒ जन्म॑ने॒ मयः॑ कृ॒णोषि॒ प्रय॒ आ च॑ सू॒रये॑ ॥ ७ ॥

त्वं तं अग्ने अमृतऽत्व उत्ऽतमे मर्तं दधासि श्रवसे दिवेऽदिवे ॥
यः ततृषाणः उभयाय जन्मने मयः कृणोषि प्रयः आ च सूरये ॥ ७ ॥

हे अग्निदेवा, या मनुष्याची रोजचे रोज कीर्ति वाढवीत तूं त्यास उत्तम अविनाशी पदावर चढवितोस. विद्वान् भक्तांकरितां तुझे अंतःकरण अतिशय उत्कंठित होऊन तूं त्यास दोन्ही जन्मास पुरेल इतकी समृद्धि व सौख्यें अर्पण करतोस. ॥ ७ ॥


त्वं नो॑ अग्ने स॒नये॒ धना॑नां य॒शसं॑ का॒रुं कृ॑णुहि॒ स्तवा॑नः ।
ऋ॒ध्याम॒ कर्मा॒पसा॒ नवे॑न दे॒वैर्द्या॑वापृथिवी॒ प्राव॑तं नः ॥ ८ ॥

त्वं नः अग्ने सनये धनानां यशसं कारुं कृणुहि स्तवानः ॥
ऋध्याम कर्मा अपसा नवेन देवैः द्यावापृथिवी इति प्र अवतं नः ॥ ८ ॥

हे अग्निदेवा, आम्ही धनप्राप्तीकरितां तुझें स्तवन करीत असल्यामुळें आम्हांस श्रेयस्कर अशी कीर्ति अर्पण कर. नवीन कृति आचरून आम्ही तुझे यजनकर्म सांग करू. हे द्यावा-पृथिवींनो सर्व देवांसह आमचे संरक्षण करा. ॥ ८ ॥


त्वं नो॑ अग्ने पि॒त्रोरु॒पस्थ॒ आ दे॒वः दे॒वेष्व॑नवद्य॒ जागृ॑विः ।
त॒नू॒कृद्बो॑धि॒ प्रम॑तिश्च का॒रवे॒ त्वं क॑ल्याण॒ वसु॒ विश्व॒मोपि॑षे ॥ ९ ॥

त्वं नः अग्ने पित्रोः उपस्थे आ देवः देवेषु अनवद्य जागृविः ॥
तनूऽकृत् बोधि प्रऽमतिः च कारवे त्वं कल्याण वसु विश्वं आ उपिषे ॥ ९ ॥

हे निष्कलंक अग्निदेवा, सर्व देवांत तूं श्रेष्ठ देव आहेस. तुझा निवास अगदी मातापितरांच्या सन्निध असतो. तूं आमचेकरितां जागृत रहा. सर्वांची शरीरें निर्माण करणार जो तूं तो आपली भक्ति करणाऱ्या संबंधाने अतिशय प्रेम बाळग व जागरूक रहा. तूं प्रत्यक्ष कल्याणच आहेस; तूं सर्व प्रकारचें द्रव्य सर्वत्र पेरून ठेवीत असतोस. ॥ ९ ॥


त्वम॑ग्ने॒ प्रम॑ति॒स्त्वं पि॒तासि॑ न॒स्त्वं व॑य॒स्कृत्तव॑ जा॒मयो॑ व॒यम् ।
सं त्वा॒ रायः॑ श॒तिनः॒ सं स॑ह॒स्रिणः॑ सु॒वीरं॑ यन्ति व्रत॒पाम॑दाभ्य ॥ १० ॥

त्वं अग्ने प्रऽमतिः त्वं पिता असि नः त्वं वयःऽकृत् तव जामयः वयम् ॥
सं त्वा रायः शतिनः सं सहस्रिणः सुऽवीरं यंति व्रतऽपां अदाभ्य ॥ १० ॥

हे अग्निदेवा, तुझे अंतःकरण अत्यंत दयाशील आहे. तूं आमचा पिता आहेस. आम्ही तुझे आप्त आहोंत. हे अजिंक्य देवा, शेंकडो किंबहुना हजारो सुखांनी परिपूर्ण अशी संपत्ति तुझ्याकडे आपोआप चालून येते. तूं अतिशय शूर व आपल्या आज्ञांचे परिपालन करविणारा आहेस. ॥ १० ॥


त्वाम॑ग्ने प्रथ॒ममा॒युमा॒यवे॑ दे॒वा अ॑कृण्व॒न्नहु॑षस्य वि॒श्पति॑म् ।
इळा॑मकृण्व॒न्मनु॑षस्य॒ शास॑नीं पि॒तुर्यत्पु॒त्रो मम॑कस्य॒ जाय॑ते ॥ ११ ॥

त्वां अग्ने प्रथमं आयुं आयवे देवा अकृण्वन् नहुषस्य विश्पतिम् ॥
इळां अकृण्वन् मनुषस्य शासनीं पितुः यत् पुत्रः ममकस्य जायते ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, सर्व जगताचे आयुष्य तुजवर अवलंबून आहे. सर्वांचे आयुष्यवर्धन होण्याकरितांच देवांनी तुला प्रथम उत्पन्न करून नहुषाचा सेनापति केले. त्याचप्रमाणे ज्या वेळीं माझ्या पित्यास पुत्रप्राप्ति झाली, त्यावेळीं मनुष्यमात्रास सज्ञान करणारी इळाही तूं उत्पन्न केलीस. ॥ ११ ॥


त्वं नो॑ अग्ने॒ तव॑ देव पा॒युभि॑र्म॒घोनो॑ रक्ष त॒न्वश्च वन्द्य ।
त्रा॒ता तो॒कस्य॒ तन॑ये॒ गवा॑म॒स्यनि॑मेषं॒ रक्ष॑माण॒स्तव॑ व्र॒ते ॥ १२ ॥

त्वं नः अग्ने तव देव पायुऽभिः मघोनः रक्ष तन्वः च वन्द्य ॥
त्राता तोकस्य तनये गवां असि अनिऽमेषं रक्षमाणः तव व्रते ॥ १२ ॥

हे वंदनीय अग्निदेवा, तूं आपल्या सर्वसंरक्षक अशा शक्तींच्या योगाने आमचे व आमच्यावर उपकार करणारांचे प्रतिपालन कर. आपल्या नियमास अनुसरून एक निमिषही न विसंबतां तूं जगाचे रक्षण करतोस. आमचे हे कौटुंबिक वैभव परंपरेने असेंच स्थिर राहण्याकरितां तूं आमच्या मुलाबाळांचा व गाईवासरांचाही सांभाळ करीत असतोस. ॥ १२ ॥


त्वम॑ग्ने॒ यज्य॑वे पा॒युरन्त॑रोऽनिष॒ङ्‍गाय॑ चतुर॒क्ष इ॑ध्यसे ।
यो रा॒तह॑व्योऽवृ॒काय॒ धाय॑से की॒रेश्चि॒न्मंत्रं॒ मन॑सा व॒नोषि॒ तम् ॥ १३ ॥

त्वं अग्ने यज्यवे पायुः अन्तरः ऽनिषङ्‍गाय चतुःऽअक्ष इध्यसे ॥
यः रातऽहव्यः अवृकाय धायसे कीरेः चित् मंत्रं मनसा वनोषि तम् ॥ १३ ॥

हे अग्निदेवा, याग करणाऱ्या भक्ताचा तूं अगदी अंतरंगांतील साहाय्यकर्ता आहेस. आणि, हे चार नेत्रांनी विभूषित असलेल्या देवा, जो कोणी कधींही दुसऱ्यावर शस्त्र उचलीत नाही त्यचेकरितां तूं प्रेमाने उद्दीपित होतोस. तूं सर्वांचे पोषण करतोस, तुझ्या हातून कोणाचाही नाश होत नाही. जो स्तुतिकर्ता तुला हवि अर्पण करतो तो कितीही गरीब असो त्याने केलेल्या स्तुतीचा तूं मनःपूर्वक स्वीकार करतोस. ॥ १३ ॥


त्वम॑ग्न उरु॒शंसा॑य वा॒घते॑ स्पा॒र्हं यत्रेक्णः॑ पर॒मं व॒नोषि॒ तत् ।
आ॒ध्रस्य॑ चि॒त्प्रम॑तिरुच्यसे पि॒ता प्र पाकं॒ शास्सि॒ प्र दिशो॑ वि॒दुष्ट॑रः ॥ १४ ॥

त्वं अग्ने उरुऽशंसाय वाघते स्पार्हं यत् रेक्णः परमं वनोषि तत् ॥
आध्रस्य चित् प्रऽमतिः उच्यसे पिता प्र पाकं शास्सि प्र दिशः विदुःऽतरः ॥ १४ ॥

हे अग्निदेवा, जो उपासक तुझे अतिशय स्तवन करतो त्याचेकरितां तूं सर्व वैभवांत जे अत्यंत स्पृहणीय वैभव असेल तें सिद्ध करून ठेवतोस. तुझा भक्त स्वतःचे पोषण करण्यासही जरी सर्व तऱ्हेने असमर्थ असला तरी तूं अतिशय प्रेमाने त्याचा सांभाळ करणारा पिताच होतोस असें सर्व लोक बोलतात. तुझें ज्ञान तर अलौलिकच आहे तथापि तूं इतका लडिवाळ आहेस कीं लहान अर्भकास तूं दिशा आणि उपदिशा ह्या शिकवीत बसतोस. ॥ १४ ॥


त्वम॑ग्ने॒ प्रय॑तदक्षिणं॒ नरं॒ वर्मे॑व स्यू॒तं परि॑ पासि वि॒श्वतः॑ ।
स्वा॒दु॒क्षद्मा॒ यो व॑स॒तौ स्यो॑न॒कृज्जी॑वया॒जं यज॑ते॒ सोप॒मा दि॒वः ॥ १५ ॥

त्वं अग्ने प्रयतऽदक्षिणं नरं वर्मऽइव स्यूतं परि पासि विश्वतः ॥
स्वादुऽक्षद्मा यः वसतौ स्योनऽकृत् जीवऽयाजं यजते सः उपऽमा दिवः ॥ १५ ॥

ज्याप्रमाणे उत्तम तऱ्हेने सांधलेले चिलखत शूरांचे रक्षण करते त्याप्रमाणे पवित्र आणि सदाचारी पुरुषाचे तूं सर्व तऱ्हेने परिपालन करतोस. स्वादिष्ट अन्न तयार करून जो आपल्या घरी अतिथीस संतुष्ट करतो व अशा रीतीने प्राणिमात्रांच्याकरितां जणूं कांही जो अनुष्ठानच करतो, त्यास श्रेष्ठपणांत स्वर्गाचीही उपमा दिली तरी ती शोभते. ॥ १५ ॥


इ॒माम॑ग्ने श॒रणिं॑ मीमृषो न इ॒ममध्वा॑नं॒ यमगा॑म दू॒रात् ।
आ॒पिः पि॒ता प्रम॑तिः सो॒म्यानां॒ भृमि॑रस्यृषि॒कृन्मर्त्या॑नाम् ॥ १६ ॥

इमां अग्ने शरणिं मीमृषः नः इमं अध्वानं यं अगाम दूरात् ॥
आपिः पिता प्रऽमतिः सोम्यानां भृमिः असि ऋषिऽकृत् मर्त्यानाम् ॥ १६ ॥

हे अग्निदेवा, ज्या कुमार्गाने आम्ही दूरपर्यंत गेलो होतो, त्याबद्दल - त्या पातकाबद्दल - तूं क्षमा कर. तूं आमचा आप्त, आमचा पिता, सोमरस अर्पण करणाऱ्या भक्तांचा हितकर्ता, सर्वांचे पोषण करणारा, व अज्ञ मानवास श्रेष्ठ अशा ऋषीचे पदवीस चढविणारा आहेस. ॥ १६ ॥


म॒नु॒ष्वद॑ग्ने अङ्‍गिर॒स्वद॑ङ्‍गिरो ययाति॒वत्सद॑ने पूर्व॒वच्छु॑चे ।
अच्छ॑ या॒ह्या व॑हा॒ दैव्यं॒ जन॒मा सा॑दय ब॒र्हिषि॒ यक्षि॑ च प्रि॒यम् ॥ १७ ॥

मनुष्वत् अग्ने अङ्‍गिरस्वत् अङ्‍गिरः ययातिऽवत् सदने पूर्वऽवत् शुचे ॥
अच्छ याहि आ वहा दैव्यं जनं आ सादय बर्हिषि यक्षि च प्रियम् ॥ १७ ॥

मनूकडे, अंगिरसाकडे, व ययातीकडे ज्याप्रमाणे तूं पूर्वी जात होतास त्याप्रमाणे, हे पवित्र अग्निदेवा, हे अंगिरसा, तूं आमच्या सदनाकडे ये, आणि दिव्य लोकांतील सर्व मंडळीस बरोबर आण. त्यांस आसनांवर बसव व त्यांच्या आवडीचा हवि त्यांस अर्पण कर. ॥ १७ ॥


ए॒तेना॑ग्ने॒ ब्रह्म॑णा वावृधस्व॒ शक्ती॑ वा॒ यत्ते॑ चकृ॒मा वि॒दा वा॑ ।
उ॒त प्रणे॑ष्य॒भि वस्यो॑ अ॒स्मान्सं नः॑ सृज सुम॒त्या वाज॑वत्या ॥ १८ ॥

एतेन अग्ने ब्रह्मणा ववृधस्व शक्ती वा यत् ते चकृम विदा वा ॥
उत प्र नेषि अभि वस्यः अस्मान् सं नः सृज सुऽमत्या वाजऽवत्या ॥ १८ ॥

हे अग्निदेवा, जे हे स्तोत्र आम्ही आपले सामर्थ्य व बुद्धि उपयोगांत आणून केलेले आहे त्याच्या योगानें तूं आनंदित हो, व आम्हांस शक्ति व उत्तम बुद्धिमत्ता यांची जोड करून दे. आम्हांस अत्यंत स्पृहणीय अशा वैभवाकडे नेणारा तूंच आहेस. ॥ १८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३२ (इंद्रसूक्त)

ऋषी - हिरण्यस्तूप अङ्गिरस : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


इंद्र॑स्य॒ नु वी॒र्याणि॒ प्र वो॑चं॒ यानि॑ च॒कार॑ प्रथ॒मानि॑ व॒ज्री ।
अह॒न्नहि॒मन्व॒पस्त॑तर्द॒ प्र व॒क्षणा॑ अभिन॒त्पर्व॑तानाम् ॥ १ ॥

इंद्रस्य नु वीर्याणि प्र वोचं यानि चकार प्रथमानि वज्री ॥
अहन् अहिं अनु अपः ततर्द प्र वक्षणाः अभिनत् पर्वतानाम् ॥ १ ॥

वज्रधारी इंद्राचे पराक्रम मी येथें आवडीने गाइलेले आहेत. अखिल पराक्रमाच्या कृत्यांत ह्यांनाच प्रथम स्थान द्यावे लागेल. ह्या इंद्रदेवानें अहिचा वध केला, उदकांस वाट फोडून दिली व पर्वतांची हृदये विदारण केली. ॥ १ ॥


अह॒न्नहिं॒ पर्व॑ते शिश्रिया॒णं त्वष्टा॑स्मै॒ वज्रं॑ स्व॒र्यं ततक्ष ।
वा॒श्रा इ॑व धे॒नवः॒ स्यन्द॑माना॒ अञ्जः॑ समु॒द्रं अव॑ जग्मु॒रापः॑ ॥ २ ॥

अहन् अहिं पर्वते शिश्रियाणं त्वष्टा अस्मै वज्रं स्वर्यं ततक्ष ।
वाश्राःऽइव धेनवः स्यन्दमानाः अञ्जः समुद्रं अव जग्मुः आपः ॥ २ ॥

त्व्ष्टा देवाने त्यास वज्र तयार करून दिले होतें. ते घेऊन त्याने पर्वतांत दबा धरून बसलेल्या अहीचा वध केला. त्याबरोबर वत्सासाठी धेनु हंबरतात त्याप्रमाणे मोठा आवाज करीत पाण्याचे लोट वाहूं लागले व मोठ्या वेगानें समुद्रास जाऊन मिळाले. ॥ २ ॥


वृ॒षा॒यमा॑णोऽवृणीत॒ सोमं॒ त्रिक॑द्रुकेष्वपिबत्सु॒तस्य॑ ।
आ साय॑कं म॒घवा॑दत्त॒ वज्र॒मह॑न्नेनं प्रथम॒जामही॑नाम् ॥ ३ ॥

वृषऽयमाणः अवृणीत सोमं त्रिऽकद्रुकेषु अपिबत् सुतस्य ॥
आ सायकं मघऽवा अदत्त वज्रं अहन् एनं प्रथमऽजां अहीनाम् ॥ ३ ॥

शौर्याच्या भरांत आल्यावर इंद्रास सोमाची इच्छा झाली व त्याचे त्याने तीन यज्ञांत प्राशन केले. त्या उदार इंद्रदेवाने वज्र हें आपले आयुध केले व सर्व अहींतील ज्येष्ठ अहि जो वृत्र त्याचा वध केला. ॥ ३ ॥


यदि॒न्द्राह॑न्प्रथम॒जामही॑ना॒मान्मा॒यिना॒ममि॑नाः॒ प्रोत मा॒याः ।
आत्सूर्यं॑ ज॒नय॒न्द्यामु॒षासं॑ ता॒दीत्ना॒ शत्रुं॒ न किला॑ विवित्से ॥ ४ ॥

यत् इन्द्र अहन् प्रथमःजां अहीनां आत् मायिनां अमिनाः प्र उत मायाः ॥
आत् सूर्यं जनयन् द्यां उषसं तादीत्ना शत्रुं न किला विवित्से ॥ ४ ॥

ज्यावेळी हे इंद्रा सर्व अहींतील ज्येष्ठ अहीचा तूं वध केलास व कपटकर्मांत प्रवीण असलेल्या रिपूंच्या कपटव्यूहांचा विध्वंस केलास त्यावेळी सूर्य, उषा व द्युलोक ह्यांना जन्म प्राप्त झाला व तुझा हात धरील असा कोणीही शत्रू तुला उरला नाही. ॥ ४ ॥


अह॑न्वृ॒त्रं वृ॑त्र॒तरं॒ व्यंस॒मिंद्रो॒ वज्रे॑ण मह॒ता व॒धेन॑ ।
स्कन्धां॑सीव॒ कुलि॑शेना॒ विवृ॒क्णाहिः॑ शयत उप॒पृक्पृ॑थि॒व्याः ॥ ५ ॥

अहन् वृत्रं वृत्रऽतरं विऽअंसं इंद्रः वज्रेण महता वधेन ॥
स्कन्धांसिऽइव कुलिशेन विऽवृक्णा अहिः शयते उपऽपृक् पृथिव्याः ॥ ५ ॥

अहि ह्या नांवाचा वृत्र म्ह्रणजे क्रूर खरा, परंतु वास्तविक पहातां त्याचा क्रूरपणा नांवापेक्षांही जास्त होता. पण इंद्राने आपल्या अत्यंत उग्र वज्राने त्याचे बाहु छेदून त्यास मारून टाकले. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीने एखाद्या वृक्षाच्या फांद्या छेदून टाकाव्या त्याप्रमाणे छीन्नविछिन्न होऊन अहि पृथ्वीवर मृत होऊन पडला. ॥ ५ ॥


अ॒यो॒द्धेव॑ दु॒र्मद॒ आ हि जु॒ह्वे म॑हावी॒रं तु॑विबा॒धमृ॑जी॒षम् ।
नाता॑रीदस्य॒ समृ॑तिं व॒धानां॒ सं रु॒जानाः॑ पिपिष॒ इंद्र॑शत्रुः ॥ ६ ॥

अयोद्धाऽइव दुःमदः आ हि जुह्वे महाऽवीरं तुविऽबाधं ऋजीषम् ॥
न अतारीत् अस्य संऽऋतिं वधानां सं रुजानाः पिपिषे इंद्रऽशत्रुः ॥ ६ ॥

आपल्यास कोणीच प्रतिस्पर्धी नाशी अशा भलत्या अभिमानास पेटून अहिनें महापराक्रमी, अजिंक्य व अनेक शत्रूंनाही भारी, अशा इंद्रास आह्वान केले. परंतु त्याच्या अत्यंत उग्रशस्त्रांच्या पुढें त्यास टिकाव धरतां आला नाही. पण इंद्राचें शत्रुत्व त्याचे अंगी इतके बाणले होतें कीं त्याने मोठमोठ्या दुर्गांचाही अगदी चुराडा करून टाकला. ॥ ६ ॥


अ॒पाद॑ह॒स्तो अ॑पृतन्य॒दिंद्र॒मास्य॒ वज्र॒मधि॒ सानौ॑ जघान ।
वृष्णो॒ वध्रिः॑ प्रति॒मानं॒ बुभू॑षन्पुरु॒त्रा वृ॒त्रो अ॑शय॒द्व्यस्तः ॥ ७ ॥

अपात् अहस्तः अपृतन्यत् इंद्रं आ अस्य वज्रं अधि सानौ जघान ॥
वृष्णः वध्रिः प्रतिऽमानं बुभूषन् पुरुऽत्रा वृत्रः अशयत् विऽअस्तः ॥ ७ ॥

हात पाया तुटून गेले तरी अहिने इंद्राशी युद्ध चालविलेंच. इंद्राने आपलें वज्र त्याच्या पर्वतप्राय बाहूंवर मारले. निःसत्व झाल्यावरही पराक्रमी पुरुषाची ऐट मिरविणारा अहि अस्ताव्यस्त होऊन त्याचे धूडच्या धूड जमीनीवर पडले. ॥ ७ ॥


न॒दं न भि॒न्नम॑मु॒या शया॑नं॒ मनो॒ रुहा॑णा॒ अति॑ य॒न्त्यापः॑ ।
याश्चि॑द्वृ॒त्रो म॑हि॒ना प॒र्यति॑ष्ठ॒त्तासा॒महिः॑ पत्सुतः॒शीर्ब॑भूव ॥ ८ ॥

नदं न भिन्नं अमुया शयानं मनः रुहाणाः अति यन्ति आपः ॥
याः चित् वृत्रः महिना परिऽअतिष्ठत् तासां अहिः पत्सुतःऽशीः बभूव ॥ ८ ॥

जमीनीवर पसरलेल्या एखाद्या महानदाप्रमाणे वृत्र ह्या पृथ्वीवर पडला असतां जलांचे प्रवाहांस धैर्य चढून ते त्याचे अंगावरून वाहूं लागले. आपल्या सामर्थ्याने ज्या उदकांस वृत्राने कोंडून ठेविले होते त्यांच्याच पायांशी तो गतप्राण होऊन पडला. ॥ ८ ॥


नी॒चाव॑या अभवद्वृ॒त्रपु॒त्रेन्द्रो॑ अस्या॒ अव॒ वध॑र्जभार ।
उत्त॑रा॒ सूरध॑रः पु॒त्र आ॑सी॒द्दानुः॑ शये स॒हव॑त्सा॒ न धे॒नुः ॥ ९ ॥

नीचाऽवयाः अभवत् वृत्रऽपुत्रा इन्द्रः अस्याः अव वधः जभार ॥
उत्ऽतरा सूः अधरः पुत्रः आसीत् दानुः शये सहऽवत्सा न धेनुः ॥ ९ ॥

वृत्राची माता त्याचे देहावर आडवी झाली. इंद्राने आपले उग्र वज्र तिचे पोटाराखालून फेंकले. ह्याप्रमाणे माता वर पडलेली व तिचा पुत्र वृत्र खाली पडलेला अशा स्थितीत धेनु जशी आपल्या वासरास पोटाखाली घेते तशीच ती दानु दिसूं लागली. ॥ ९ ॥


अति॑ष्ठन्तीनामनिवेश॒नानां॒ काष्ठा॑नां॒ मध्ये॒ निहि॑तं॒ शरी॑रम् ।
वृ॒त्रस्य॑ नि॒ण्यं वि च॑र॒न्त्यापो॑ दी॒र्घं तम॒ आश॑य॒दिंद्र॑शत्रुः ॥ १० ॥

अतिष्ठंतीनां अनिऽवेशनानां काष्ठानां मध्ये निहितं शरीरम् ॥
वृत्रस्य निण्यं वि चरंति आपः दीर्घं तमः आ अशयत् इंद्रऽशत्रुः ॥ १० ॥

ज्यास कधी खळ नाही व ज्यांस कधीं विश्रांति नाही अशा जलप्रवाहांत वृत्राचे शरीर निमग्न होऊन गेले होते. वृत्राच्या शरीरावर जलाचे प्रवाह खुशाल वहात होते व इंद्रशत्रु वृत्र दीर्घ अंधकारांत जाऊन पडला होता. ॥ १० ॥


दा॒सप॑त्नी॒रहि॑गोपा अतिष्ठ॒न्निरु॑द्धा॒ आपः॑ प॒णिने॑व॒ गावः॑ ।
अ॒पां बिल॒मपि॑हितं॒ यदासी॑द्वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अप॒ तद्व॑वार ॥ ११ ॥

दासऽपत्नीः अहिऽगोपाः अतिष्ठन् निऽरुद्धाः आपः पणिनाऽइव गावः ॥
अपां बिलं अपिऽहितं यत् आसीत् वृत्रं जघन्वान् अप तत् ववार ॥ ११ ॥

अहिनें प्रतिबंधांत ठेवलेली व म्हणून त्या दुष्टाची दास बनलेली जी जलें ती पणीनें प्रतिबंधांत टाकलेल्या धेनुंप्रमाणे बंदिवान् होऊन गेली होती. उदकांचे निवासस्थान जें पूर्वीं बंद झालें होते तें वृत्रास मरून इंद्राने उघडे केले. ॥ ११ ॥


अश्व्यो॒ वारो॑ अभव॒स्तदि॑न्द्र सृ॒के यत्त्वा॑ प्र॒त्यह॑न्दे॒व एकः॑ ।
अज॑यो॒ गा अज॑यः शूर॒ सोम॒मवा॑सृजः॒ सर्त॑वे स॒प्त सिन्धू॑न् ॥ १२ ॥

अश्व्यः वारः अभवः तत् इंद्र सृके यत् त्वा प्रतिऽअहन् देवः एकः ॥
अजयः गाः अजयः शूर सोमं अव असृजः सर्तवे सप्त सिन्धून् ॥ १२ ॥

हे इंद्रा, तूं एकटा श्रेष्ठ देव आहेस. ज्यावेळी तुझ्या आयुधावर त्या अहीनें प्रहार केला त्यावेळी अश्वाकरितां तयार केलेल्या चिलखताप्रमाणें तूं त्यास दाद दिली नाहींस. तूं धेनूंची प्राप्ति करून घेतलीस. हे शूरा, तूं सोमरसाचाही लाभ करून घेतलास व सप्त नद्यांचा प्रवाह चालू करण्याकरितां त्यांस तूं बंधमुक्त केलेंस. ॥ १२ ॥


नास्मै॑ वि॒द्युन्न त॑न्य॒तुः सि॑षेध॒ न यां मिह॒मकि॑रद्ध्रा॒दुनिं॑ च ।
इंद्र॑श्च॒ यद्यु॑यु॒धाते॒ अहि॑श्चो॒ताप॒रीभ्यो॑ म॒घवा॒ वि जि॑ग्ये ॥ १३ ॥

न अस्मै विऽद्युत् न तन्यतुः सिसेध न यां मिहं अकिरत् ह्रादुनिं च ॥
इंद्रः च यत् युयुधाते अहिः च उत अपरीभ्यः मघऽवा वि जिग्ये ॥ १३ ॥

विद्युत्प्रयोग अथवा गर्जना ही दोन्ही वृत्रास कांहींच उपयोगी पडली नाहीत. त्याचप्रमाणे त्याने जी पर्जन्यवृष्टि केली व ज्या अशनि फेंकल्या त्यांचाही त्यास उपयोग झाला नाही. ज्यावेळी इंद्र व अहि ह्यांचे युद्ध झाले त्यावेळीं त्या दानशूर इंद्राने चिरकालिक विजय संपादन केला. ॥ १३ ॥


अहे॑र्या॒तारं॒ कम॑पश्य इंद्र हृ॒दि यत्ते॑ ज॒घ्नुषो॒ भीरग॑च्छत् ।
नव॑ च॒ यन्न॑व॒तिं च॒ स्रव॑न्तीः श्ये॒नो न भी॒तो अत॑रो॒ रजां॑सि ॥ १४ ॥

अहेः यातारं कं अपश्यः इंद्र हृदि यत् ते जघ्नुषः भीः अगच्छत् ॥
नव च यत् नवतिं च स्रवंतीः श्येनः न भीतः अतरः रजांसि ॥ १४ ॥

हे इंद्रा, ज्याअर्थी वृत्रास मारल्यानंतर तुझ्या हृदयांत भितीनें प्रवेश केला त्याअर्थी वृत्राबद्दल सूड उगवणारा असा कोण तुझ्या दृष्टीस पडला ? कारण भयचकित झालेला एखादा श्येनपक्षी ज्याप्रमाणें भराभर अंतरिक्षाचे पार उडून जातो त्याप्रमाणे तूं त्वरेनें नव्याण्णव नद्या ओलांडित पलीकडे गेलास. ॥ १४ ॥


इंद्रो॑ या॒तोऽ॑वसितस्य॒ राजा॒ शम॑स्य च शृ॒ङ्‍गिणो॒ वज्र॑बाहुः ।
सेदु॒ राजा॑ क्षयति चर्षणी॒नाम॒रान्न ने॒मिः परि॒ ता ब॑भूव ॥ १५ ॥

इंद्रः यातः अवऽसितस्य राजा शमस्य च शृङ्‍गिणः वज्रबाहुः ॥
सः इत् ऊं इति राजा क्षयति चर्षणीनां अरान् न नेमिः परि ता बभूव ॥ १५ ॥

सर्व चर व अचर सृष्टीचा इंद्र मालक आहे. जे प्राणी शृंगयुक्त आहेत व जे निरुपद्रवी आहेत त्या दोहोंवरही त्याची सत्ता आहे. त्याचे बाहु वज्राप्रमाणे आहेत; सर्व मानवांचा तो राजा आहे. ज्याप्रमाणें रथचक्राची धांव चाकाच्या आर्‍यांनी वेढून टाकते त्याप्रमाणे इंद्राने हें सर्व वेष्टून टाकले आहे. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३३ (इंद्रसूक्त )

ऋषी - हिरण्यस्तूप अङ्‌गिरस : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


एताया॒मोप॑ ग॒व्यन्त॒ इंद्र॑म॒स्माकं॒ सु प्रम॑तिं वावृधाति ।
अ॒ना॒मृ॒णः कु॒विदाद॒स्य रा॒यो गवां॒ केतं॒ पर॑मा॒वर्ज॑ते नः ॥ १ ॥

आ इत अयाम उप गव्यंत इंद्रं अस्माकं सु प्रऽमतिं ववृधाति ।
अनामृणः कुवित् आत् अस्य रायः गवां केतं परं आऽवर्जते नः ॥ १॥

या, गोधनाची इच्छा धरून आपण इंद्राकडे जाऊं या. आपल्या बुद्दिमत्तेचे तोच अतिशय वर्धन करीत असतो. तो अमर आहे. वैभव-गोधन प्राप्त करून घेण्याचें मुख्य साधन तो आम्हांस दाखवून देईल काय ? ॥ १ ॥


उपेद॒हं ध॑न॒दामप्र॑तीतं॒ जुष्टां॒ न श्ये॒नो व॑स॒तिं प॑तामि ।
इंद्रं॑ नम॒स्यन्नु॑प॒मेभि॑र॒र्कैर्यः स्तो॒तृभ्यो॒ हव्यो॒ अस्ति॒ याम॑न् ॥ २ ॥

उप इत् अहं धनऽदां अप्रतिऽइतं जुष्टां न श्येनः वसतिं पतामि ।
इंद्रं नमस्यन् उपऽमेभिः अर्कैः यः स्तोतृभ्यः हव्यः अस्ति यामन् ॥ २॥

ज्याप्रेमाणे श्येनपक्षी आपल्या नेहमींच्या राहण्याच्या ठिकाणाकडे उडून जातो त्याप्रमाणे मी इंद्राकडे त्यास उत्तमोत्तम स्तोत्रांनी वंदन करीत मार्गाने गमन केले. हा इंद्र संपत्ति देणारा, शत्रूंस अजिंक्य व भक्तांनी अर्चन करण्यास योग्य असा आहे. ॥ २ ॥


नि सर्व॑सेन इषु॒धीँर॑सक्त॒ सम॒र्यो गा अ॑जति॒ यस्य॒ वष्टि॑ ।
चो॒ष्कू॒यमा॑ण इंद्र॒ भूरि॑ वा॒मं मा प॒णिर्भू॑र॒स्मदधि॑ प्रवृद्ध ॥ ३ ॥

नि सर्वऽसेन इषुऽधीन् असक्त सं अर्यः गाः अजति यस्य वष्टि ।
चोष्कूयमाणः इंद्र भूरि वामं मा पणिः भूः अस्मत् अधि प्रऽवृद्ध ॥ ३॥

आपले सर्व सैन्य बरोबर घेऊन ह्याने बाणाचे भाते पठीशी बांधले आहेत. हा फार श्रेष्ठ आहे. त्याची इच्छा असेल त्याचेकडे तो त्यास देण्याकरितां गाई घेऊन जातो. हे अत्यंत थोर इंद्रा, अनेक प्रकारची उत्कृष्ट संपत्ति घेऊन ये व आमचेविषयी कृपणता धारण करूं नको. ॥ ३ ॥


वधी॒र्हि दस्युं॑ ध॒निनं॑ घ॒नेनँ॒ एक॒श्चर॑न्नुपशा॒केभि॑रिंद्र ।
धनो॒रधि॑ विषु॒णक्ते व्याय॒न्नय॑ज्वानो सन॒काः प्रेति॑मीयुः ॥ ४ ॥

वधीः हि दस्युं धनिनं घनेन एकः श्चरन् उपऽशाकेभिः इंद्र ।
धनोः अधि विषुणक् ते वि आयन् अयज्वानः सनकाः प्रऽइतिं ईयुः ॥ ४॥

हे इंद्रा, जरी तूं आपल्या अनुचरांसह निघाला होतास तथापि आपल्या घणासारख्या शस्त्रानें तूं संपत्तिमान् अशा दस्यूचा एकट्यानेंच वध केलास. ते सर्व बाजूंनी तुझ्या धनुष्यावर एकदम तुटून पडले, परंतु त्या सनकांचा मात्र नाश झाला. तुझे यजन करणें त्यांस कधीं माहितच नव्हते. ॥ ४ ॥


परा॑ चिच्छी॒र्षा व॑वृजु॒स्त इ॒न्द्राय॑ज्वानो॒ यज्व॑भिः॒ स्पर्ध॑मानाः ।
प्र यद्दि॒वो ह॑रिव स्थातरुग्र॒ निर॑व्र॒ताँ अ॑धमो॒ रोद॑स्योः ॥ ५ ॥

परा चित् शीर्षा ववृजुः ते इन्द्र अयज्वानः यज्वऽभिः स्पर्धमानाः ।
प्र यत् दिवः हरिऽव स्थातः उग्र निः अव्रतान् अधमः रोदस्योः ॥ ५॥

हे उग्र इंद्रा, तुझे स्थैर्य वाखाणण्या जोगे आहे. तुझे अश्व पीतवर्णाचे आहेत. ज्यावेळी तुझ्या आज्ञा न जुमानणाऱ्या दुष्टांस तूं अंतरिक्षांतून, पृथिवीतून व स्वर्गांतून हांकून लावलेस, त्यावेळी त्यांनी आपली मस्तके लज्जेने पाठीमागे फिरविली. स्वतः तुझे यजन कधींही करीत नसून यजन करणाऱ्या लोकांबरोबर त्यांनी स्पर्धा चालविली होती. ॥ ५ ॥


अयु॑युत्सन्ननव॒द्यस्य॒ सेना॒मया॑तयन्त क्षि॒तयो॒ नव॑ग्वाः ।
वृ॒षा॒युधो॒ न वध्र॑यो॒ निर॑ष्टाः प्र॒वद्‍भि॒रिंद्रा॑च्चि॒तय॑न्त आयन् ॥ ६ ॥

अयुयुत्सन् अनवद्यस्य सेनां अयातयंत क्षितयः नवऽग्वाः ।
वृषऽयुधः न वध्रयः निःऽअष्टाः प्रवत्ऽभिः इंद्रात् चितयंतः आयन् ॥ ६॥

सर्वतोपरी दोषरहित असा जो इंद्र त्याच्या सेनेबरोबर त्यांनी युद्ध मांडले. नवग्वांनी उभे राहून इंद्रास उत्तेजन दिलें. सामर्थ्यवान पुरुषांशी झगडणाऱ्या निर्बल लोकांची जशी दाणादाण होते त्य्प्रमाणे त्यांची स्थिति होतांच इंद्राच्या शक्तीची चांगली ओळख पडून ते सांपडेल त्या मार्गांनी पळत सुटले. ॥ ६ ॥


त्वमे॒तान्रु॑द॒तो जक्ष॑त॒श्चायो॑धयो॒ रज॑सः इंद्र पा॒रे ।
अवा॑दहो दि॒व आ दस्यु॑मु॒च्चा प्र सु॑न्व॒तः स्तु॑व॒तः शंस॑मावः ॥ ७ ॥

त्वं एतान् रुदतः जक्षतः च अयोधयः रजसः इंद्र पारे ।
अव अदहः दिवः आ दस्युं उच्चा प्र सुन्वत स्तुवतः शंसं आवः ॥ ७॥

ते हंसले किंवा रडले तरी त्याची बिलकूल पर्वा न करतां, हे इंद्रा, तूं त्यांच्याशी युद्ध करून त्यांस रजोलोकाच्या पार घालवून दिलेंस. दस्यु उच्च द्युलोकांत असतां तूं त्यास दग्ध केलेस व ज्याने तुझ्याकरितां सोमरस तयार करून तुझें स्तवन केले त्याच्या स्तोत्राचा तूं स्वीकार केलास. ॥ ७ ॥


च॒क्रा॒णासः॑ परी॒णहं॑ पृथि॒व्या हिर॑ण्येन म॒णिना॒ शुम्भ॑मानाः ।
न हि॑न्वा॒नास॑स्तितिरु॒स्त इंद्रं॒ परि॒ स्पशो॑ अदधा॒त्सूर्ये॑ण ॥ ८ ॥

चक्राणासः परिऽनहं पृथिव्या हिरण्येन मणिना शुंभमानाः ।
न हिन्वानासः तितिरुः ते इंद्रं परि स्पशः अदधात् सूर्येण ॥ ८॥

सुवर्णालंकारांनी नटून त्यांनी सर्व पृथ्वीचें परिवेष्टन केलें. त्यांनी आपले सामर्थ्य कितीही प्रकट केले तरी इंद्राचा पराभव त्यांना करतां आला नाहीं. त्यांच्या दूतांस इंद्राने सूर्याकडून हतवीर्य केलें. ॥ ८ ॥


परि॒ यदि॑न्द्र॒ रोद॑सी उ॒भे अबु॑भोजीर्महि॒ना वि॒श्वतः॑ सीम् ।
अम॑न्यमानाँ अ॒भि मन्य॑मानै॒र्निर्ब्र॒ह्मभि॑रधमो॒ दस्यु॑मिंद्र ॥ ९ ॥

परि यत् इंद्र रोदसी इति उभे अबुभोजीः महिना विश्वतः सीम् ।
अमन्यमानान् अभि मन्यमानैः निः ब्रह्मऽभिः अधमः दस्युं इंद्र ॥ ९॥

हे इंद्रा, ज्यावेळीं आपल्या सामर्थ्यानें तूं पृथिवी व स्वर्ग ह्यांवर सर्व प्रकारें स्वसत्ता प्रस्थापित केलीस त्यावेळी आपल्या भक्तांचे हातून तुझा उपमर्द करणाऱ्यांचा तूं पराभव करविलास व आपल्या तीव्र शस्त्रांनी दस्यूस पराजित केलेंस. ॥ ९ ॥


न ये दि॒वः पृ॑थि॒व्या अन्त॑मा॒पुर्न मा॒याभि॑र्धन॒दां प॒र्यभू॑वन् ।
युजं॒ वज्रं॑ वृष॒भश्च॑क्र॒ इंद्रो॒ निर्ज्योति॑षा॒ तम॑सो॒ गा अ॑दुक्षत् ॥ १० ॥

न ये दिवः पृथिव्या अंतं आपुः न मायाभिः धनऽदां परिऽअभूवन् ।
युजं वज्रं वृषभः चक्र इंद्रः निः ज्योतिषा तमसः गाः अदुक्षत् ॥ १०॥

स्वर्ग आणि पृथिवी ह्यांचा अंत लावणाऱ्यांससुद्धां धनदात्या इंद्राला आपल्या कपटजालांनी वेढा देता आला नाहीं सामर्थ्यवान् इंद्रानें आपल्या वज्रासच आपले मदतगार बनविले व आपल्या तेजाच्या योगाने धेनूंस अंधकारांतून बाहेत काढले. ॥ १० ॥


अनु॑ स्व॒धाम॑क्षर॒न्नापो॑ अ॒स्याव॑र्धत॒ मध्य॒ आ ना॒व्यानाम् ।
स॒ध्री॒चीने॑न॒ मन॑सा॒ तमिंद्र॒ ओजि॑ष्ठेन॒ हन्म॑नाहन्न॒भि द्यून् ॥ ११ ॥

अनु स्वधां अक्षरन् आपः अस्य अवर्धत मध्ये आ नाव्यानाम् ।
सध्रीचीनेन मनसा तं इंद्रः ओजिष्ठेन हन्मना अहन् अभि द्यून् ॥ ११॥

इंद्राने जी वाट फोडून दिली त्या वाटेनें जलाचे प्रवाह वाहूं लागले परंतु जेथें नौका सुद्धां चालूं शकतात अशा महनद्यांत शिरून वृत्राने विशाल रूप धारण केलें. मग इंद्राने आपले सर्व लक्ष्य वृत्राच्या वधाकडेच देऊन आपल्या प्रबल शस्त्राने त्यास कायमचे जमीनदोस्त केले. ॥ ११ ॥


न्याविध्यदिली॒बिश॑स्य दृ॒ळ्हा वि शृ॒ङ्‍गिण॑मभिन॒च्छुष्ण॒मिंद्रः॑ ।
याव॒त्तरो॑ मघव॒न्याव॒ ओजो॒ वज्रे॑ण॒ शत्रु॑मवधीः पृत॒न्युम् ॥ १२ ॥

नि अविध्यत् इलीबिशस्य दृळ्हा वि शृङ्‍गिणं अभिनत् शुष्णं इंद्रः ।
यावत् तरः मघऽवन् यावत् ओजः वज्रेण शत्रुं अवधीः पृतन्युम् ॥ १२॥

इलीबिशाचे दुर्गम किल्ले तूं फोडून टाकलेस व शृंगयुक्त अशा शुष्णाचे तूं विदारण केलेस. जितका वेग व जितके सामर्थ्य तुझे अंगी होतें त्या सर्वांचा उपयोग करून तुझ्यांशी युद्ध करणाऱ्या शत्रूचा तूं आपल्या वज्राने वध केलास. ॥ १२ ॥


अ॒भि सि॒ध्मो अ॑जिगादस्य॒ शत्रू॒न्वि ति॒ग्मेन॑ वृष॒भेणा॒ पुरो॑ऽभेत् ।
सं वज्रे॑णासृजद्वृ॒त्रमिंद्रः॒ प्र स्वां म॒तिं अ॑तिर॒च्छाश॑दानः ॥ १३ ॥

अभि सिध्मः अजिगात् अस्य शत्रून् वि तिग्मेन वृषभेणा पुरः अभेत् ।
सं वज्रेण असृजत् वृत्रं इंद्रः प्र स्वां मतिं अतिरत् शाशदानः ॥ १३॥

त्याचे साहाय्यकरी वज्र त्याच्या शत्रूंवर नेम धरून निघालें. आपल्या तीव्र शस्त्राने त्याने शत्रूंची पुरें फोडून टाकली. इंद्राने वज्राशी वृत्राची गांठ घालून दिली व त्याचा संहार करून आपल्या मनाची हौस फेडून घेतली. ॥ १३ ॥


आवः॒ कुत्स॑मिंद्र॒ यस्मि॑ञ्चा॒कन्प्रावः॒ युध्य॑न्तं वृष॒भं दश॑द्युम् ।
श॒फच्यु॑तो रे॒णुर्न॑क्षत॒ द्यामुच्छ्वै॑त्रे॒यो नृ॒षाह्या॑य तस्थौ ॥ १४ ॥

आवः कुत्सं इंद्र यस्मिन् चाकन् प्र आवः युध्यन्तं वृषभं दशऽद्युम् ।
शफऽच्युतः रेणुः नक्षत द्यां उत् श्वैत्रेयः नृऽषह्याय तस्थौ ॥ १४॥

ज्या कुत्सावर हे इंद्रा, तुझे अत्यंत प्रेम होते त्याचे तूं संरक्षण केलेंस व वीर्यशाली दशद्यु युद्धांत गुंतलेला असतांना तूं त्याच्या साहाय्यार्थ धांवलास. घोड्यांच्या खुरांनी उडालेली धूळ आकाशापर्यंत वर गेली, श्वैत्रेयही पुन्हां लोकांनी त्याची सत्ता सहन करावी अशा योग्यतेस चढला. ॥ १४ ॥


आवः॒ शमं॑ वृष॒भं तुग्र्या॑सु क्षेत्रजे॒षे म॑घव॒ञ्छ्वित्र्यं॒ गाम् ।
ज्योक् चि॒दत्र॑ तस्थि॒वांसो॑ अक्रञ्छत्रूय॒तामध॑रा॒ वेद॑नाकः ॥ १५ ॥

आवः शमं वृषभं तुग्र्यासु क्षेत्रऽजेषे मघवन् श्वित्र्यं गाम् ।
ज्योक् चित् अत्र तस्थिऽवांसः अक्रन् शत्रुऽयतां अधरा वेदना अकरित्यकः ॥ १५॥

हे इंद्रा, तुग्रांनी इर्ष्येने भूमि संपादनासाठी आरंभिलेल्या युद्धांत तू श्वित्राच्या धेनूंचे रक्षण करून त्याचा सांभाळ केलास आणि शत्रूंची संपत्ति जिंकून घेतलीस. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३४ ( अश्विनीकुमार सूक्त)

ऋषी - हिरण्यस्तूप अङ्गिरस : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्, जगती


त्रिश्चि॑न्नो अ॒द्या भ॑वतं नवेदसा वि॒भुर्वां॒ याम॑ उ॒त रा॒तिर॑श्विना ।
यु॒वोर्हि य॒न्त्रं हि॒म्येव॒ वास॑सोऽभ्यायं॒सेन्या॑ भवतं मनी॒षिभिः॑ ॥ १ ॥

त्रिः चित् नः अद्य भवतं नवेदसा विऽभुः वां यामः उत रातिः अश्विना ।
युवोः हि यंत्रं हिम्याऽइव वाससः ऽभिऽ आयंसेन्या भवतं मनीषिऽभिः ॥ १॥

हे सर्वज्ञ अश्विनहो, तुम्ही आज तीन्ही वेळा आमचेच व्हा. आपली गति सर्वत्र आहे व आपली दानशूरताही चोहोंकडे अनुभवास येणारी आहे. ज्याप्रमाणे वस्त्राचा व हिंवाळ्या रात्रीचा अत्यंत निकट संबंध असतो त्याप्रमाणे आपण दोघेंही एकमेकांशी असेच संलग्न आहोत. सुज्ञ भक्तास आपण वश व्हा. ॥ १ ॥


त्रयः॑ प॒वयो॑ मधु॒वाह॑ने॒ रथे॒ सोम॑स्य वे॒नामनु॒ विश्व॒ इद्वि॑दुः ।
त्रय॑ स्क॒म्भासः॑ स्कभि॒तास॑ आ॒रभे॒ त्रिर्नक्तं॑ या॒थस्त्रिर्व॑श्विना॒ दिवा॑ ॥ २ ॥

त्रयः पवयः मधुऽवाहने रथे सोमस्य वेनां अनु विश्वे इत् विदुः ।
त्रय स्कम्भासः स्कभितासः आऽरभे त्रिः नक्तं याथः त्रिः व् अश्विना दिवा ॥ २॥

मधुर रसांची प्राप्ति करून देणाऱ्या आपल्या रथास तीन धांवा आहेत. व तो सोमाच्या मार्गाने गमन करतो हे सर्वांस विदितच आहे. त्या रथाचा तोल बिघडूं नये म्हणून तीन स्तंभ उभे केलेले आहेत. हे अश्विनहो, आपण रात्रौ त्रिवार व दिवसां त्रिवार परिभ्रमण करतां. ॥ २ ॥


स॒मा॒ने अह॒न्त्रिर॑वद्यगोहना॒ त्रिर॒द्य य॒ज्ञं मधु॑ना मिमिक्षतम् ।
त्रिर्वाज॑वती॒रिषो॑ अश्विना यु॒वं दो॒षा अ॒स्मभ्य॑मु॒षस॑श्च पिन्वतम् ॥ ३ ॥

समाने अहन् त्रिः अवद्यऽगोहना त्रिः अद्य यज्ञं मधुना मिमिक्षतम् ।
त्रिः वाजऽवतीः इषः अश्विना युवं दोषाः अस्मभ्यं उषसः च पिन्वतम् ॥ ३॥

एकाच दिवसांत तीन वेळां आपण भक्तांची पातकें नाहीशी करतां. आजच्या दिवसभरांत तुम्ही आमच्या यज्ञावर तीन वेळा मधुसिंचन करा. दिवसा तीनदा आणि रात्री तीनदा अशा क्रमाने तुम्ही आम्हांस पुष्टिकारक अन्न द्या. ॥ ३ ॥


त्रिर्व॒र्तिर्या॑तं॒ त्रिरनु॑व्रते ज॒ने त्रिः सु॑प्रा॒व्ये त्रे॒धेव॑ शिक्षतम् ।
त्रिर्ना॒न्द्यं वहतमश्विना यु॒वं त्रिः पृक्षो॑ अ॒स्मे अ॒क्षरे॑व पिन्वतम् ॥ ४ ॥

त्रिः वर्तिः यातं त्रिः अनुऽव्रते जने त्रिः सुप्रऽअव्ये त्रेधाऽइव शिक्षतम् ।
त्रिः नान्द्यं वहतं अश्विना युवं त्रिः पृक्षः अस्मे इति अक्षराऽइव पिन्वतम् ॥ ४॥

हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही आमच्या घरी, तसेच तुमच्या अनुयायांच्या आणि सुरक्षणीय व्यक्तींच्या घरी प्रत्येकीं तीनदा येऊन त्यांस उपदेश करा. तुम्ही आमच्याकडे तीन वेळा अन्न आणि सुख घेऊन या, आणि उदकाप्रमाणे पातळ केलेले अन्न आम्हांस द्या. ॥ ४ ॥


त्रिर्नो॑ र॒यिं व॑हतमश्विना यु॒वं त्रिर्दे॒वता॑ता॒ त्रिरु॒ताव॑तं॒ धियः॑ ।
त्रिः सौ॑भग॒त्वं त्रिरु॒त श्रवां॑सि नस्त्रि॒ष्ठं वां॒ सूरे॑ दुहि॒तारु॑ह॒द्रथ॑म् ॥ ५ ॥

त्रिः नः रयिं वहतं अश्विना युवं त्रिः देवऽताता त्रिः उत अवतं धियः ।
त्रिः सौभगऽत्वं त्रिः उत श्रवांसि नः त्रिऽस्थं वां सूरे दुहिता रुहत् रथम् ॥ ५॥

हे अश्विनहो, आमचेकडे तीन वेळा संपत्ति घेऊन या; देवांचे तीन वेळा यजन चालले असतां तीन वेळां आमच्या सद्विचारांत, सुदैवास व सत्कीर्तिस भरती आणा. ॥ ५ ॥


त्रिर्नो॑ अश्विना दि॒व्यानि॑ भेष॒जा त्रिः पार्थि॑वानि॒ त्रिरु॑ दत्तम॒द्‍भ्यः ।
ओ॒मानं॑ शं॒योर्मम॑काय सू॒नवे॑ त्रि॒धातु॒ शर्म॑ वहतं शुभस्पती ॥ ६ ॥

त्रिः नः अश्विना दिव्यानि भेषजा त्रिः पार्थिवानि त्रिः ऊं इति दत्तं अत्ऽभ्यः ।
ओमानं शंऽयोः ममकाय सूनवे त्रिऽधातु शर्म वहतं शुभः पती इति ॥ ६॥

हे शुभाधिपति अश्विनीकुमारांनो, तुम्ही आम्हांस तीन्ही वेळां दिव्य, पार्थिव व अंतरिक्षातील औषधी द्या. शयु नामक भक्ताला दिलेल्या कृपाप्रसादाच्या तिप्पट प्रसाद आमच्या मुलांसाठी घेऊन या. ॥ ६ ॥


त्रिर्नो॑ अश्विना यज॒ता दि॒वेदि॑वे॒ परि॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीम॑शायतम् ।
ति॒स्रो ना॑सत्या रथ्या परा॒वत॑ आ॒त्मेव॒ वातः॒ स्वस॑राणि गच्छतम् ॥ ७ ॥

त्रिः नः अश्विना यजता दिवेऽदिवे परि त्रिऽधातु पृथिवीं अशायतम् ।
तिस्रः नासत्या रथ्या पराऽवतः आत्माऽइव वातः स्वसराणि गच्छतम् ॥ ७॥

पृथ्वीची प्रतिदिनी तीन वेळां प्रदक्षिणा करणाऱ्या हे रथगामी, नासत्य अश्विनीकुमारांनो, तुमच्या प्रित्यर्थ मी प्रतिदिनी तीन वेळां यज्ञ करतो. शरीरांत संचारणाऱ्या प्राणवायूप्रमाणे तुम्ही अखंडप्रणे तिन्ही लोकीं भ्रमण करीत असतां. ॥ ७ ॥


त्रिर॑श्विना॒ सिन्धु॑भिः स॒प्तमा॑तृभि॒स्त्रय॑ आहा॒वास्त्रे॒धा ह॒विष्कृ॒तम् ।
ति॒स्रः पृ॑थि॒वीरु॒परि॑ प्र॒वा दि॒वो नाकं॑ रक्षेथे॒ द्युभि॑र॒क्तुभि॑र्हि॒तम् ॥ ८ ॥

त्रिः अश्विना सिन्धुऽभिः सप्तमातृऽभिः त्रयः आऽहावाः त्रेधा हविः कृतम् ।
तिस्रः पृथिवीः उपरि प्रवा दिवः नाकं रक्षेथे इति द्युऽभिः अक्तुऽभिः हितम् ॥ ८॥

त्रैलोक्यांत भ्रमण करीत रात्रंदिवस द्युलोकांच्या शिखरांचे रक्षण करणाऱ्या, आणि त्यास स्थिर ठेवणाऱ्या हे अश्विनीकुमारांनो, सप्तमातृक सोमाने आणि हविर्द्रव्यांनी भरलेले तीन कलश दिवसातून तीन वेळा मी तुम्हाप्रित्यर्थ सिद्ध केले आहेत. ॥ ८ ॥


क्व१॑त्री च॒क्रा त्रि॒वृतो॒ रथ॑स्य॒ क्व॑१त्रयः॑ व॒न्धुरः॒ ये सनी॑ळाः ।
क॒दा योगो॑ वा॒जिनो॒ रास॑भस्य॒ येन॑ य॒ज्ञं ना॑सत्योपया॒थः ॥ ९ ॥

क्व त्री चक्रा त्रिऽवृतः रथस्य क्व त्रयः वंधुरः ये सऽनीळाः ।
कदा योगः वाजिनः रासभस्य येन यज्ञं नासत्या उपऽयाथः ॥ ९॥

तीन चाकांच्या त्रिकोणी रथातून यज्ञस्थानी येणाऱ्या हे सत्यवत् अश्विनीकुमारांनो, तुमच्या रथाची तीन चाके, तसेंच त्यांच्या बैठकींची तीन लाकडे कशाने बनली आहेत ? ज्यावर आरोहण करून तुम्ही यज्ञाप्रत आगमन करता, अशा शक्तिवान् रासभास तुम्ही केव्हां जोडणार आहांत ? ॥ ९ ॥


आना॑सत्या॒ गच्छ॑तं हू॒यते॑ ह॒विर्मध्वः॑ पिबतं मधु॒पेभि॑रा॒सभिः॑ ।
यु॒वोर्हि पूर्वं॑ सवि॒तोषसो॒ रथ॑मृ॒ताय॑ चि॒त्रं घृ॒तव॑न्त॒मिष्य॑ति ॥ १० ॥

आ नासत्या गच्छतं हूयते हविः मध्वः पिबतं मधुऽपेभिः आसऽभिः ।
युवोः हि पूर्वं सविता उषसः रथं ऋताय चित्रं घृतऽवंतं इष्यति ॥ १०॥

हे सत्यस्वरूप अश्विनहो, इकडे या. हा हवि आपणांस अर्पण करण्यांत येत आहे. आपल्या मुखास मधुपान करण्याची चटकच आहे, तेव्हां आपण मधुर सोमरसाचें स्वमुखाने प्राशन करा. आपला अवर्णनीय व घृतसमृद्ध रथ सवितादेव उषेच्याही अगोदर आमच्या यज्ञाकडे पाठवून देत आहेत. ॥ १० ॥


आ ना॑सत्या त्रि॒भिरे॑काद॒शैरि॒ह दे॒वेभि॑र्यातं मधु॒पेय॑मश्विना ।
प्रायु॒स्तारि॑ष्टं॒ नी रपां॑सि मृक्षतं॒ सेध॑तं॒ द्वेषो॒ भव॑तं सचा॒भुवा॑ ॥ ११ ॥

आ नासत्या त्रिऽभिः एकादशैः इह देवेभिः यातं मधुऽपेयं अश्विना ।
प्र आयुः तारिष्टं निः रपांसि मृक्षतं सेधतं द्वेषः भवतं सचाऽभुवा ॥ ११॥

हे सत्यस्वरूप अश्विन हो, तेहतीस देवांसहवर्तमान ह्या मधुर पेयांकडे या. आमच्या आयुष्याची वृद्धि करा, पातकांचे क्षालन करा, आमच्या शत्रूंचा निरोध करा व आम्हांस नेहमी आपल्या सहवासाचा लाभ होऊं द्या. ॥ ११ ॥


आ नो॑ अश्विना त्रि॒वृता॒ रथे॑ना॒र्वाञ्चं॑ र॒यिं व॑हतं सु॒वीर॑म् ।
शृ॒ण्वन्ता॑ वा॒मव॑से जोहवीमि वृ॒धे च॑ नो भवतं॒ वाज॑सातौ ॥ १२ ॥

आ नः अश्विना त्रिऽवृता रथेन अर्वाञ्चं रयिं वहतं सुऽवीरम् ।
शृण्वंता वां अवसे जोहवीमि वृधे च नः भवतं वाजऽसातौ ॥ १२॥

हे अश्विनहो, आपल्या त्रिकोणाकृति रथांतून वीर्यवान् संततीने युक्त अशी संपत्ति अमचेकडे घेऊन या. आपण आमची प्रार्थना ऐकण्यांस सिद्धच आहांत, म्हणून आपणांस स्वरक्षणासाठी पुनः पुनः हांक मारतो. जेव्हां पराक्रमाच्या योगाने संपत्ति प्राप्त होण्याचा संभव असेल ते आमच्या वैभवांत भर पडेल असे करा. ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३५ (सवितृ सूक्त )

ऋषी - हिरण्यस्तूप अङ्गिरस : देवता - सवुतृ : छंद - त्रिष्टुभ्, जगती


ह्वया॑म्य॒ग्निं प्र॑थ॒मं स्व॒स्तये॒ ह्वया॑मि मि॒त्रावरु॑णावि॒हाव॑से ।
ह्वया॑मि॒ रात्रीं॒ जग॑तः नि॒वेश॑नीं॒ ह्वया॑मि दे॒वं स॑वि॒तार॑मू॒तये॑ ॥ १ ॥

ह्वयामि अग्निं प्रथमं स्वस्तये ह्वयामि मित्रावरुणौ इह अवसे ।
ह्वयामि रात्रीं जगतः निऽवेशनीं ह्वयामि देवं सवितारं ऊतये ॥ १ ॥

आमच्या कल्याणार्थ प्रथम अग्नीस पाचारण करतो. आमच्या रक्षणार्थ मित्रावरुणासही मी येथे बोलावतो. सर्व जगतास आपापल्या स्थानापर्यंत घेऊन जाणाऱ्या रात्रिस मी आमंत्रण करतो. आमचे प्रतिपालन करण्याकरतां मी सवितादेवासही हांक मारतो. ॥ १ ॥


आ कृ॒ष्णेन॒ रज॑सा॒ वर्त॑मानो निवे॒शय॑न्न॒मृतं॒ मर्त्यं॑ च ।
हि॒र॒ण्यये॑न सवि॒ता रथे॒ना दे॒वो या॑ति॒ भुव॑नानि॒ पश्य॑न् ॥ २ ॥

आ कृष्णेन रजसा वर्तमानः निऽवेशयन् अमृतं मर्त्यं च ।
हिरण्ययेन सविता रथेन आ देवः याति भुवनानि पश्यन् ॥ २ ॥

कृष्णवर्ण आकाशांतून मार्ग आक्रमण करीत व अमर्त्य व मर्त्य ह्या सर्वांस आपापल्या उद्योगांत प्रवृत्त करीत सर्व भुवनांचे अवलोकन करणारा सवितादेव आपल्या सुवर्णमय रथांत बसून येतो. ॥ २ ॥


याति॑ दे॒वः प्र॒वता॒ यात्यु॒द्वता॒ याति॑ शु॒भ्राभ्यां॑ यज॒तो हरि॑भ्याम् ।
आ दे॒वो या॑ति सवि॒ता प॑रा॒वतोऽ॑प॒ विश्वा॑ दुरि॒ता बाध॑मानः ॥ ३ ॥

याति देवः प्रऽवता याति उत्ऽवता याति शुभ्राभ्यां यजतः हरिऽभ्याम् ।
आ देवः याति सविता पराऽवतः अप विश्वा दुःऽइता बाधमानः ॥ ३ ॥

उंच व पुरोगामी मार्गाने सवितादेव गमन करतो तो यजनीय आहे, तो आपल्या शुभ्र अश्वांवर आरोहण करून जात असतो. सर्व दुरितांचा नाश करीत सवितादेव फार दूर प्रदेशांतून इकडे येतो. ॥ ३ ॥


अ॒भीवृ॑तं॒ कृश॑नैर्वि॒श्वरू॑पं॒ हिर॑ण्यशम्यं यज॒तो बृ॒हन्त॑म् ।
आस्था॒द्रथं॑ सवि॒ता चि॒त्रभा॑नुः कृ॒ष्णा रजां॑सि॒ तवि॑षीं॒ दधा॑नः ॥ ४ ॥

अभिऽवृतं कृशनैः विश्वऽरूपं हिरण्यऽशम्यं यजतः बृहन्तम् ।
आ अस्थात् रथं सविता चित्रऽभानुः कृष्णा रजांसि तविषीं दधानः ॥ ४ ॥

सवितादेव आपणांस पूज्य आहे. त्याचे किरण चित्रविचित्र रंगांचे आहेत. कृष्णवर्ण अंधकार नाहींसा करण्याचे त्याचे अंगांत सामर्थ्य आहे. तो पहा आपल्या सुवर्णभूषित रथांत बसला. ह्या रथाची शिवांळ सुद्धा सुवर्णाची केलेली आहे. रथाचे जितके म्हणून निरनिराळे आकार आहेत तितके सर्व ह्या रथाचे ठिकाणी आढळून येतात. ॥ ४ ॥


वि जना॑ञ्छ्या॒वाः शि॑ति॒पादो॑ अख्य॒न्रथं॒ हिर॑ण्यप्रऽउगं॒ वह॑न्तः ।
शश्व॒द्विशः॑ सवि॒तुर्दैव्य॑स्यो॒पस्थे॒ विश्वा॒ भुव॑नानि तस्थुः ॥ ५ ॥

वि जनान् श्यावाः शितिऽपादः अख्यन् रथं हिरण्यऽप्रऽउगं वहंतः ।
शश्वत् विशः सवितुः दैव्यस्य उपस्थे विश्वा भुवनानि तस्थुः ॥ ५ ॥

ज्यांचे जूं सुवर्णाचे आहेत, अशा रथास वाहून नेणारे सवितादेवाचे अश्व - ज्यांची पावलें शुभ्र आहेत - त्यांनी सर्व लोकांवर स्वच्छ प्रकाश पाडला आहे. सर्व लोक व मनुष्ये ही सवितादेवाच्या समीपच निरंतर वास करीत असतात. ॥ ५ ॥


ति॒स्रो द्यावः॑ सवि॒तुर्द्वा उ॒पस्थाँ॒ एका॑ य॒मस्य॒ भुव॑ने विरा॒षाट् ।
आ॒णिं न रथ्य॑म॒मृताधि॑ तस्थुरि॒ह ब्र॑वीतु॒ य उ॒ तच्चिके॑तत् ॥ ६ ॥

तिस्रः द्यावः सवितुः द्वौ उपऽस्था एका यमस्य भुवने विराषाट् ।
आणिं न रथ्यं अमृता अधि तस्थुः इह ब्रवीतु यः उं इति तत् चिकेतत् ॥ ६ ॥

एकंदर द्युलोक तीन आहेत. त्यांपैकी दोन सवितादेवाच्या संनिध असतात व एकाचे स्थान यमाच्या प्रदेशांत आहे. सर्व अमर विश्व चाकाच्या कुणीप्रमाणे सवितादेवावर अवलंबून आहे. ज्यास ह्या गोष्टीचें ज्ञान असेल त्यास बोलण्यास पुढें येऊ द्या. ॥ ६ ॥


वि सु॑प॒र्णो अ॒न्तरि॑क्षाण्यख्यत्गभी॒रवे॑पा॒ असु॑रः सुनी॒थः ।
क्वे३॑दानीं॒ सूर्यः॒ कश्चि॑केत कत॒मां द्यां र॒श्मिर॒स्या त॑तान ॥ ७ ॥

वि सुऽपर्णः अन्तरिक्षाणि अख्यत् गभीरऽवेपाः असुरः सुऽनीथः ।
क्व इदानीं सूर्यः कः चिकेत कतमां द्यां रश्मिः अस्य आ ततान ॥ ७ ॥

ज्याची गति फार सुंदर आहे, ज्याच्या प्रयाणपद्धतींत फार गंभीरपणा आहे, जो शत्रूंचा संहारकर्ता आहे व ज्याचे अंगी उत्तम मार्गदर्शकत्व आहे, अशा त्या सवितादेवाने सर्व अंतरिक्षावर प्रकाश पाडला आहे. ह्यावेळीं सूर्य कोठें असेल बरें ? त्याच्या रश्मीने कोणत्या द्युलोकांपर्यंत मजल मारली आहे हे कोणास माहित असेल ? ॥ ७ ॥


अ॒ष्टौ वि अख्यत्क॒कुभः॑ पृथि॒व्यास्त्री धन्व॒ योज॑ना स॒प्त सिन्धू॑न् ।
हि॒र॒ण्या॒क्षः स॑वि॒ता दे॒व आगा॒द्दध॒द्रत्ना॑ दा॒शुषे॒ वार्या॑णि ॥ ८ ॥

अष्टौ वि अख्यत् ककुभः पृथिव्याः त्री धन्व योजना सप्त सिन्धून् ।
हिरण्यऽअक्षः सविता देवः आगात् दधत् रत्ना दाशुषे वार्याणि ॥ ८ ॥

पृथ्वीच्या आठही दिशा, तिन्ही निर्जल प्रदेश व सातही नद्या ह्यांस त्यानें सुप्रकाशित केले आहे. ज्याचे नेत्र सुवर्णाप्रमाणे चमकदार आहेत असा हा सवितादेव आपल्या उपासकासाठीं उत्तमोत्तम रत्नें बरोबर घेऊन अगदी जवळ येऊन ठेपला आहे. ॥ ८ ॥


हिर॑ण्यपाणिः सवि॒ता विच॑र्षणिरु॒भे द्यावा॑पृथि॒वी अ॒न्तरी॑यते ।
अपामी॑वां॒ बाध॑ते॒ वेति॒ सूर्य॑म॒भि कृ॒ष्णेन॒ रज॑सा॒ द्यामृ॑णोति ॥ ९ ॥

हिरण्यऽपाणिः सविता विऽचर्षणिः उभे इति द्यावापृथिवी इति अंतः ईयते ।
अप अमीवां बाधते वेति सूर्यं अभि कृष्णेन रजसा द्यां ऋणोति ॥ ९ ॥

दूरपर्यंत संचार करणारा व कांचनाप्रमाणें सुंदर वर्णाच्या हस्तांनी सुशोभित असा सविता स्वर्ग व पृथिवी ह्या दोहोंमधून आपला मार्ग आक्रमण करीत असतो. तो रोगांचे निर्मूलन करतो, सूर्याकडे गमन करतो व कृष्णवर्ण अंतरिक्षांतून द्युलोकांपर्यंत जाऊन पोहोंचतो. ॥ ९ ॥


हिर॑ण्यहस्तो॒ असु॑रः सुनी॒थः सु॑मृळी॒कः स्ववाँ॑ यात्व॒र्वाङ्‍ ।
अ॒प॒सेध॑न्र॒क्षसो॑ यातु॒धाना॒नस्था॑द्दे॒वः प्र॑तिदो॒षं गृ॑णा॒नः ॥ १० ॥

हिरण्यऽहस्तः असुरः सुऽनीथः सुऽमृळीकः स्ववान् यातु अर्वाङ्‍ ।
अपऽसेधन् रक्षसः यातुऽधानान् अस्थात् देवः प्रतिऽदोषं गृणानः ॥ १० ॥

ज्याचे हस्त सुवर्णाप्रमाणें सुंदर आहेत, जो शत्रूंचा नाश करणारा आहे, जो उत्तम मार्गदर्शक आहे, ज्याच्या कृपेने सर्व सुखें प्राप्त होतात, व जो स्वकीयांचा अभिमान धारण करणारा आहे तो सविता आमचेकडे येवो. प्रत्येक सायंकाळी ज्याची कीर्ति गाइली जाते तो सवितादेव राक्षस व यातुधान ह्यांचा संहार करीत येथें येण्यास सिद्ध झाला आहे. ॥ १० ॥


ये ते॒ पन्थाः॑ सवितः पू॒र्व्यासो॑ऽरे॒णवः॒ सुकृ॑ता अ॒न्तरि॑क्षे ।
तेभि॑र्नो अ॒द्य प॒थिभिः॑ सु॒गेभी॒ रक्षा॑ च नो॒ अधि॑ च ब्रूहि देव ॥ ११ ॥

ये ते पन्थाः सवितरिति पूर्व्यासः अरेणवः सुऽकृताः अंतरिक्षे ।
तेभिः नः अद्य पथिऽभिः सुऽगेभिः रक्ष च नः अधि च ब्रूहि देव ॥ ११ ॥

हे सवितादेवा, जे अंतरिक्षांतील प्राचीन मार्ग त्यांतील धूळ वगैरे काढून चांगले करून ठेवले आहेत त्या सुगममार्गांनी आज येथें येऊन आमचे रक्षण कर व आम्हांस आशीर्वचन दे. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३६ (अग्नि सूक्त )

ऋषी - कण्व घौर : देवता - अग्नि छंद - १६ प्रकारचे


प्र वो॑ य॒ह्वं पु॑रू॒णां वि॒शां दे॑वय॒तीना॑म् ॥
अ॒ग्निं सू॒क्तेभि॒र्वचो॑भिरीमहे॒ यं सी॒मिद॒न्य ईळ॑ते ॥ १ ॥

प्र वः यह्वं पुरूणां विशां देवऽयतीनां ॥
अग्निं सुऽउक्तेभिः वचःऽओभिः ईमहे यं सीं इत् अन्ये ईळते ॥ १ ॥

देवाच्या दर्शनाची उत्कंठा बाळगणारे तुमच्यासारखे हे अनेक लोक आहेत, त्यांचा अभिमान बाळगणारा जो अग्निदेव त्यास सौन्दर्यपरिप्लुत स्तोत्रांनी मी आळवीत आहे. इतर मनुष्येंसुद्धां ह्याचेंच स्तवन करीत असतात. ॥ १ ॥


जना॑सो अ॒ग्निं द॑धिरे सहो॒वृधं॑ ह॒विष्म॑न्तो विधेम ते ॥
स त्वं नो॑ अ॒द्य सु॒मना॑ इ॒हावि॒ता भवा॒ वाजे॑षु सन्त्य ॥ २ ॥

जनासः अग्निं दधिरे सहःऽवृधं हविष्मन्तः विधेम ते ॥
सः त्वं नः अद्य सुऽमनाः इह अविता भव वाजेषु संत्य ॥ २ ॥

सामर्थ्याची वृद्धि करणार्‍या अग्नीची लोकांनी संस्थापना केली आहे. त्यास हवि अर्पण करून आम्हींही त्याला प्रकट व्हावयास लावूं. हे अत्युदार अग्निदेवा, पराक्रमाच्या कृत्यांत आमचा तूं ह्या ठिकाणी प्रसन्न अंतःकरणानें संरक्षणकर्ता हो. ॥ २ ॥


प्र त्वा॑ दू॒तं वृ॑णीमहे॒ होता॑रं वि॒श्ववे॑दसम् ॥
म॒हस्ते॑ स॒तो वि च॑रन्त्य॒र्चयो॑ दि॒वि स्पृ॑शन्ति भा॒नवः॑ ॥ ३ ॥

प्र त्वा दूतं वृणीमहे होतारं विश्वऽवेदसं ॥
महः ते सतः वि चरंति अर्चयः दिवि स्पृशंति भानवः ॥ ३ ॥

सर्व देवांस त्यांचे हवि पोहोंचविणारा आणि अखिल ज्ञानसंपूर्ण असा जो तूं त्या तुला आम्ही आपला प्रतिनिधी निवडतो. तूं मोठा आहेस. तुझी दीप्ति सर्वत्र संचार करते व तुझे प्रकाशरश्मि स्वर्गलोकास जाऊन भिडतात. ॥ ३ ॥


दे॒वास॑स्त्वा॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा सं दू॒तं प्र॒त्नमि॑न्धते ॥
विश्वं॒ सो अ॑ग्ने जयति॒ त्वया॒ धनं॒ यस्ते॑ द॒दाश॒ मर्त्यः॑ ॥ ४ ॥

देवासः त्वा वरुणः मित्रः अर्यमा सं दूतं प्रत्नं इंधते ॥
विश्वं सः अग्ने जयति त्वया धनं यः ते ददाश मर्त्यः ॥ ४ ॥

तूं देवांचा अतिशय पुरातन प्रतिनिधी आहेस. वरुण, मित्र, व अर्यमा हे सर्व तुला प्रज्वलित करीत असतात. हे अग्निदेवा, जो मानव तुला धन अर्पण करतो तो तुझ्या साहाय्यानें सर्व विश्वावर विजय मिळवितो. ॥ ४ ॥


म॒न्द्रो होता॑ गृ॒हप॑ति॒रग्ने॑ दू॒तो वि॒शाम॑सि ॥
त्वे विश्वा॒ संग॑तानि व्र॒ता ध्रु॒वा यानि॑ दे॒वा अकृ॑ण्वत ॥ ५ ॥

मन्द्रः होता गृहऽपतिः अग्ने दूतः विशां असि ॥
त्वे इति विश्वा संऽगतानि व्रता ध्रुवा यानि देवाः अकृण्वत ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, तूं आमचा हवि आनंदाने देवांप्रत पोहोंचविणारा असून गृहांचा स्वामी व सर्व लोकांचा प्रतिनिधी आहेस. देवांनी जे सनातन नियम केले ते सर्व तुझे ठायी एकत्र झालेले आहेत. ॥ ५ ॥


त्वे इद॑ग्ने सु॒भगे॑ यविष्ठ्य॒ विश्व॒मा हू॑यते ह॒विः ॥
स त्वं नो॑ अ॒द्य सु॒मना॑ उ॒ताप॒रं यक्षि॑ दे॒वान्त्सु॒वीर्या॑ ॥ ६ ॥

त्वे इति इत् अग्ने सुऽभगे यविष्ठ्य विश्वं आ हूयते हविः ॥
सः त्वं नः अद्य सुमना उत अपरं यक्षि देवान् सुऽवीर्या ॥ ६ ॥

हे अत्यंत तरुण अग्निदेवा, तूं उत्तम भाग्याने युक्त आहेस. तुझ्या ठिकाणी सर्व हवि अर्पण करण्यांत येतात. यास्तव आज आणि इतःपर सुद्धां आम्हांस अतिशय सामर्थ्याचा लाभ करवून प्रसन्न अंतःकरणानें आमचा यज्ञ देवांस प्राप्त होईल असें कर. ॥ ६ ॥


तं घे॑मि॒त्था न॑म॒स्विन॒ उप॑ स्व॒राज॑मासते ॥
होत्रा॑भिर॒ग्निं मनु॑षः॒ समि॑न्धते तिति॒र्वांसो॒ अति॒ स्रिधः॑ ॥ ७ ॥

तं घ ईं इत्था नमस्विनः उप स्वऽराजं आसते ॥
होत्राभिः अग्निं मनुषः सं इंधते तितिर्वांसः अति स्रिधः ॥ ७ ॥

भक्तिनम्र उपासक स्वतःच्या तेजाने देदीप्यमान अशा अग्नीचें अर्चन करतात. शत्रूंच्यावर ज्यांनी जय मिळविलेला आहे असे पुरुष हवि अर्पण करून अग्नीस प्रदीप्त करतात. ॥ ७ ॥


घ्नन्तो॑ वृ॒त्रम॑तर॒न्‌रोद॑सी अ॒प उ॒रु क्षया॑य चक्रिरे ॥
भुव॒त्कण्वे॒ वृषा॑ द्यु॒म्न्याहु॑तः॒ क्रन्द॒दश्वो॒ गवि॑ष्टिषु ॥ ८ ॥

घ्नंतः वृत्रं अतरन् रोदसी इति अपः उरु क्षयाय चक्रिरे ॥
भुवत् कण्वे वृषा द्युम्नी आऽहुतः क्रन्दत् अश्वः गोऽइष्टिषु ॥ ८ ॥

आपल्या शत्रूचा नाश करून त्या संकटांतून ते पार पडले. स्वर्ग, पृथ्वी आणि जलप्रवाह ह्यांना आपलें निवासस्थान बनविण्याकरितां त्यांनी त्यांचा विस्तार केला. ह्या सामर्थ्यवान् अग्नीचा धावा केला असतां तो कण्वास संपत्तिदायक होवो आणि गोधनादि वैभवाविषयीं आम्हांस इच्छा उत्पन्न झाली असतां गाईंचाच शब्द काय अश्वाचेंही खिंकाळणे ऐकूं येवो. ॥ ८ ॥


सं सी॑दस्व म॒हाँ अ॑सि॒ शोच॑स्व देव॒वीत॑मः ॥
वि धू॒मम॑ग्ने अरु॒षं मि॑येध्य सृ॒ज प्र॑शस्त दर्श॒तम् ॥ ९ ॥

सं सीदस्व महान् असि शोचस्व देवऽवीतमः ॥
वि धूमं अग्ने अरुषं मियेध्य सृज प्रऽशस्त दर्शतं ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, तूं श्रेष्ठ आहेस. तूं आपल्या आसनावर विराजमान हो. देवसमुदायाकडें तुझें सदोदित आगमन असतें. तुझें तेज प्रकट होऊं दे. तूं यज्ञार्ह आहेस व तुझें स्तवन अतिशय होत असतें तूं आपला शीघ्रसंचारी व रमणीय आकार धारण करणारा धुराचा लोट सोडून दे. ॥ ९ ॥


यं त्वा॑ दे॒वासो॒ मन॑वे द॒धुरि॒ह यजि॑ष्ठं हव्यवाहन ॥
यं कण्वो॒ मेध्या॑तिथिर्धन॒स्पृतं॒ यं वृषा॒ यमु॑पस्तु॒तः ॥ १० ॥

यं त्वा देवासः मनवे दधुः इह यजिष्ठं हव्यवाहन ॥
यं कण्वः मेध्यऽअतिथिः धनऽस्पृतं यं वृषा यं उपऽस्तुतः ॥ १० ॥

सर्व देवांना हवि पोहोंचविणार्‍या हे अग्ने, तूं अतिशय पवित्र आहेस. मनूकरितां देवांनी ज्यासाठी तुझी येथें स्थापना केली; कण्व, मेध्यातिथी, वृषा आणि उपस्तुत ह्यांनीही तुला याच कार्यासाठी सुस्थापित केले आहे. ॥ १० ॥


यम॒ग्निं मेध्या॑तिथिः॒ कण्व॑ ई॒धे ऋ॒तादधि॑ ॥
तस्य॒ प्रेषो॑ दीदियु॒स्तमि॒मा ऋच॒स्तम॒ग्निं व॑र्धयामसि ॥ ११ ॥

यं अग्निं मेध्यऽअतिथिः कण्व ईधे ऋतात् अधि ॥
तस्य प्रेषः दीदियुः तं इमाः ऋचः तं अग्निं वर्धयामसि ॥ ११ ॥

मेध्यातिथी काण्वाने यज्ञकार्यार्थ प्रदीप्त केलेल्या अग्नीला आम्ही हविर्द्रव्ये अर्पण करीत आहोत. त्यास उद्देशून या ऋचांचे पठण आम्ही करीत आहोत. त्याच अग्नीची थोरवी आम्ही गात आहोत. ॥ ११ ॥


रा॒यस्पू॑र्धि स्वधा॒वोऽ॑स्ति॒ हि तेऽ॑ग्ने दे॒वेष्वाप्य॑म् ॥
त्वं वाज॑स्य॒ श्रुत्य॑स्य राजसि॒ स नो॑ मृळ म॒हाँ अ॑सि ॥ १२ ॥

रायः पूर्धि स्वधाऽवः ऽस्ति हि ते अग्ने देवेषु आप्यं ॥
त्वं वाजस्य श्रुत्यस्य राजसि सः नः मृळ महान् असि ॥ १२ ॥

देव, आप्त आणि स्वधा यांनी संपन्न अशा हे थोर अग्ने, ज्या प्रख्यात संपत्तीचा तूं स्वामी आहेस, ती तूं आम्हांस दे. तूं आम्हास सुख दे. ॥ १२ ॥


ऊ॒र्ध्व ऊ॒ षु ण॑ ऊ॒तये॒ तिष्ठा॑ दे॒वो न स॑वि॒ता ॥
ऊ॒र्ध्वो वाज॑स्य॒ सनि॑ता॒ यद॒ञ्जिभि॑र्वा॒घद्‌भिर्वि॒ह्वया॑महे ॥ १३ ॥

ऊर्ध्वः ऊं इति षु नः ऊतये तिष्ठा देवः नः सविता ॥
ऊर्ध्वः वाजस्य सनिता यत् अञ्जिऽभिः वाघत्ऽभिः विऽह्वयामहे ॥ १३ ॥

हे अग्ने, आम्ही घृतपूर्वक आणि ऋत्विजाद्वारा तुला आवाहन करीत आहोत. सवितृदेवाप्रमाणे तू आमच्या संरक्षणार्थ उभा राहून आम्हास धन दे. ॥ १३ ॥


ऊ॒र्ध्वो नः॑ पा॒ह्यंह॑सो॒ नि के॒तुना॒ विश्वं॒ सम॒त्रिणं॑ दह ॥
कृ॒धी न॑ ऊ॒र्ध्वाञ्च॒रथा॑य जी॒वसे॑ वि॒दा दे॒वेषु॑ नो॒ दुवः॑ ॥ १४ ॥

ऊर्ध्वः नः पाहि अंहसः नि केतुना विश्वं सं अत्रिणं दह ॥
कृधी नः ऊर्ध्वान् चरथाय जीवसे विदाः देवेषु नः दुवः ॥ १४ ॥

हे ऊर्ध्वगामी अग्ने, पापांपासून तू आमचे रक्षण कर, आणि स्वतेजाने आमच्या सर्व शत्रूंना तू एकसमयावच्छेदेकरून दग्ध करून टाक. पृथ्वीलोकी आनंदाने जगण्यासाठी आणि संचरण्यासाठी तू आमची उन्नती कर, आमची सेवा देवांप्रत पोहोचव. ॥ १४ ॥


पा॒हि नो॑ अग्ने र॒क्षसः॑ पा॒हि धू॒र्तेररा॑व्णः ॥
पा॒हि रीष॑त उ॒त वा॒ जिघां॑सतो॒ बृह॑द्‍भानो॒ यवि॑ष्ठ्य ॥ १५ ॥

पाहि नः अग्ने रक्षसः पाहि धूर्तेः अराव्णः ॥
पाहि रीषतः उत वा जिघांसतः बृहद्‍भानो इति बृहत्ऽभानो यविष्ठ्य ॥ १५ ॥

हे तेजस्वी, आणि तरुण अग्ने, राक्षसांपासून, धूर्त शत्रूंपासून, द्वेष्ट्यांपासून, तसेच आमचा वध करूं इच्छिणार्‍यांपासून तू आमचे रक्षण कर. ॥ १५ ॥


घ॒नेव॒ विष्व॒ग्वि ज॒ह्यरा॑व्ण॒स्तपु॑र्जम्भ॒ यो अ॑स्म॒ध्रुक् ॥
यो मर्त्यः॒ शिशी॑ते॒ अत्य॒क्तुभि॒र्मा नः॒ स रि॒पुरी॑शत ॥ १६ ॥

घनाऽइव विष्वक् वि जहि अराव्णः तपुःजंभ यः अस्मऽध्रुक् ॥
यः मर्त्यः शिशीते अति अक्तुऽभिः मा नः सः रिपुः ईशत ॥ १६ ॥

हे ज्वालादंष्ट्र अग्ने, शत मार्गांनी नाहिंशा होणार्‍या धनाप्रमाणे तूं आमच्या शत्रूंचे खंडन कर. आमचा द्वेष करणार्‍या तसेच रात्रीच्या वेळी आमच वध करणार्‍या शत्रूंच्या स्वामित्वापासून तूं आमचा बचाव कर. ॥ १६ ॥


अ॒ग्निर्व॑व्ने सु॒वीर्य॑म॒ग्निः कण्वा॑य॒ सौभ॑गम् ॥
अ॒ग्निः प्राव॑न्मि॒त्रोत मेध्या॑तिथिम॒ग्निः सा॒ता उ॑पस्तु॒तम् ॥ १७ ॥

अग्निः वव्ने सुऽवीर्यं अग्निः कण्वाय सौभगं ॥
अग्निः प्र आवत् मित्रा उत मेध्यऽअतिथिं अग्निः सातौ उपऽस्तुतं ॥ १७ ॥

अग्नीने कण्वाला वीर्यशाली संतती आणि सौभाग्य दिले. त्याने मित्राचे, मेध्यातिथीचे, तसेच उपस्तुताचे युद्धामध्यें रक्षण केले. ॥ १७ ॥


अ॒ग्निना॑ तु॒र्वशं॒ यदुं॑ परा॒वत॑ उ॒ग्रादे॑वं हवामहे ॥
अ॒ग्निर्न॑य॒न्नव॑वास्त्वं बृ॒हद्र॑थं तु॒र्वीतिं॒ दस्य॑वे॒ सहः॑ ॥ १८ ॥

अग्निना तुर्वशं यदुं पराऽवतः उग्रऽदेवं हवामहे ॥
अग्निः नयत् नवऽवास्त्वं बृहत्ऽरथं तुर्वीतिं दस्यवे सहः ॥ १८ ॥

दस्युसंहारक अग्नीच्या द्वारा मी तुर्वश, यदु, उग्रदेव, तसेच नववास्त्व, बृहद्रथ आणि तुर्वीति आदि पूर्वख्यात राजर्षींना पाचारण करतो. ॥ १८ ॥


नि त्वाम॑ग्ने॒ मनु॑र्दधे॒ ज्योति॒र्जना॑य॒ शश्व॑ते ॥
दी॒देथ॒ कण्व॑ ऋ॒तजा॑त उक्षि॒तो यं न॑म॒स्यन्ति॑ कृ॒ष्टयः॑ ॥ १९ ॥

नि त्वां अग्ने मनुः दधे ज्योतिः जनाय शश्वते ॥
दीदेथ कण्वे ऋतऽजात उक्षितः यं नमस्यंति कृष्टयः ॥ १९ ॥

यज्ञामध्यें उत्पन्न झालेल्या आणि वृद्धिंगत झालेल्या हे अग्ने, मनूने पृथ्वीलोकी तुझी स्थापना केली. तोच तू आज कण्वाच्या निवासस्थानी प्रकाशत आहेस. समस्त भक्त तुला वंदन करीत आहेत. ॥ १९ ॥


त्वे॒षासो॑ अ॒ग्नेरम॑वन्तो अ॒र्चयो॑ भी॒मासो॒ न प्रती॑तये ॥
र॒क्ष॒स्विनः॒ सद॒मिद्या॑तु॒माव॑तो॒ विश्वं॒ सम॒त्रिणं॑ दह ॥ २० ॥

त्वेषासः अग्नेः अमऽवंतः अर्चयः भीमासः न प्रतिऽइतये ॥
रक्षस्विनः सदं इत् यातुऽमावतः विश्वं सं अत्रिणं दह ॥ २० ॥

हे अग्ने, तुझ्या ज्वाला बलिष्ठ आणि भयंकर असून त्यांना कोणीही अडवू शकत नाही. म्हणूनच तू बलवान राक्षस आणि समस्त शत्रूंना एकसमयावच्छेदेकरून दग्ध करून टाक. ॥ २० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ३७ (मरुत् सूक्त )

ऋषि - कण्व घौर : देवता - मरुत् : छंद - गायत्री


क्री॒ळं वः॒ शर्धो॒ मारु॑तमन॒र्वाणं॑ रथे॒शुभ॑म् ॥ कण्वा॑ अ॒भि प्र गा॑यत ॥ १ ॥

क्रीळं वः शर्धः मारुतं अनर्वाणं रथेऽशुभं ॥ कण्वा अभि प्र गायत ॥ १ ॥

हे कण्वहो, मरुद्‍गणांस उद्देशून गायन करा. हे मरुद्‍गण रथावर सुंदर रीतीनें विराजमान झालेले आहेत. परंतु ते आपल्या रथास अश्व जोडीत नसतात. ह्यांस क्रीडा फार आवडते. ॥ १ ॥


ये पृष॑तीभिर्‌ऋ॒ष्टिभिः॑ सा॒कं वाशी॑भिर॒ञ्जिभिः॑ ॥ अजा॑यन्त॒ स्वभा॑नवः ॥ २ ॥

ये पृषतीभ्ः ऋष्टिऽभिः साकं वाशीभिः अंजिभिः ॥ अजायन्त स्वऽभानवः ॥ २ ॥

हे मरुद्‍गण स्वयंप्रकाशित असून आपल्या ठिपकेदार रंगाच्या हरिणी, आपल्या तरवारी, आपले भाले, व आपली आभरणें, ही सर्व बरोबर घेऊन ह्या जगांत प्रकट झाले. ॥ २ ॥


इ॒हेव॑ शृण्व एषां॒ कशा॒ हस्ते॑षु॒ यद्वदा॑न् ॥ नि याम॑ञ्चि॒त्रमृ॑ञ्जते ॥ ३ ॥

इहऽइव शृण्वे एषां कशाः हस्तेषु यत् वदान् ॥ नि यामन् चित्रं ऋंजते ॥ ३ ॥

ज्यावेळी आपल्या हातांनी ते आपल्या चाबकाचा आवाज काढतात त्यावेळीं जणूं काय तो चाबूक येथेंच वाजला अशा तऱ्हेने मला तो ऐकूं येतो. मार्गक्रमण करीत असतां ते मोठ्या ऐटदार पद्धतीने त्यास आपल्या हातांत वागवतात. ॥ ३ ॥


प्र वः॒ शर्धा॑य॒ घृष्व॑ये त्वे॒षद्यु॑म्नाय शु॒ष्मिणे॑ ॥ दे॒वत्तं॒ ब्रह्म॑ गायत ॥ ४ ॥

प्र वः शर्धाय घृष्वये त्वेषऽद्युम्नाय शुष्मिणे ॥ देवत्तं ब्रह्म गायत ॥ ४ ॥

तुम्हांस प्रिय असणाऱ्या ह्या मरुद्‍गणा प्रित्यर्थ एखाद्या दैविक स्तोत्राचें गायन करा. हे मरुद्‍गण शत्रूंस चिरडून टाकणारे, तेजोवैभवानें युक्त व अत्यंत प्रबल आहेत. ॥ ४ ॥


प्र शं॑सा॒ गोष्वघ्न्यं॑ क्री॒ळं यच्छर्धो॒ मारु॑तम् ॥ जम्भे॒ रस॑स्य वावृधे ॥ ५ ॥

प्र शंसा गोषु अघ्न्यं क्रीळं यत् शर्धः मारुतं ॥ जंभे रसस्य ववृधे ॥ ५ ॥

धेनूंची प्राप्ति करून घेण्याकरितां पराक्रमी व क्रीडानिपुण अशा मरुद्‍गणांचे स्तवन कर. स्वादिष्ट रसांचे सेवन करून हे वीर्यवान् झाले. ॥ ५ ॥


को वो॒ वर्षि॑ष्ठ॒ आ न॑रो दि॒वश्च॒ ग्मश्च॑ धूतयः ॥ यत्सी॒मन्तं॒ न धू॑नु॒थ ॥ ६ ॥

कः वः वर्षिष्ठः आ नरः दिवः च ग्मः च धूतयः ॥ यत् सीं अंतं न धूनुथ ॥ ६ ॥

स्वर्ग व पृथिवी ह्यांस हालवून सोडणाऱ्या हे मरुद्देवांनो, ह्या विश्वांत असा कोण श्रेष्ठ आहे कीं ज्यास तुझी पृथ्वीच्या टोकापर्यंत फेकून देऊं शकला नाही ? ॥ ६ ॥


नि वो॒ यामा॑य॒ मानु॑षो द॒ध्र उ॒ग्राय॑ म॒न्यवे॑ ॥ जिही॑त॒ पर्व॑तो गि॒रिः ॥ ७ ॥

नि वः यामाय मानुषः दध्रे उग्राय मन्यवे ॥ जिहीत पर्वतः गिरिः ॥ ७ ॥

आपण अगमन करीत असतांना आपल्या उग्र कोपाला भिऊन माणसे प्रत्येकवेळां आधार शोधूं लागलेली आहेत. कठिण शिखरांचा पर्वतसुद्धां आपला कोप पाहून भयकंपित होईल. ॥ ७ ॥


येषा॒मज्मे॑षु पृथि॒वी जु॑जु॒र्वाँ इ॑व वि॒श्पतिः॑ ॥ भि॒या यामे॑षु॒ रेज॑ते ॥ ८ ॥

येषां अज्मेषु पृथिवी जुजुर्वान्ऽइव विश्पतिः ॥ भिया यामेषु रेजते ॥ ८ ॥

ह्या मरुद्देवांचा संचार सुरू होतांच वार्धक्याने क्षीण झालेल्या एखाद्या नृपतीप्रमाणें ही पृथ्वी त्यांचे आगमन होत असतां भितीने लटलट कापू लागते. ॥ ८ ॥


स्थि॒रं हि जान॑मेषां॒ वयो॑ मा॒तुर्निरे॑तवे ॥ यत्सी॒मनु॑ द्वि॒ता शवः॑ ॥ ९ ॥

स्थिरं हि जानं एषां वयः मातुः निःऽएतवे ॥ यत् सीं अनु द्विता शवः ॥ ९ ॥

जेथें ह्यांचा जन्म झाला तें स्थान अतिशय स्थिर आहे. आपल्या मातेच्या उदरांतून बाहेर निघण्याकरितां ते पक्षीच बनले. कारण त्यांचे सामर्थ्य द्विगुणित होते. ॥ ९ ॥


उदु॒ त्ये सू॒नवो॒ गिरः॒ काष्ठा॒ अज्मे॑ष्वत्नत ॥ वा॒श्रा अ॑भि॒ज्ञु यात॑वे ॥ १० ॥

उत् ऊं इति त्ये सूनवः गिरः काष्ठाः अज्मेषु अत्नत ॥ वाश्राः अभिऽज्ञु यातवे ॥ १० ॥

शिवाय ह्या वाग्देवीच्या पुत्रांनी धेनूस आपल्या वत्साकडे नीट जातां यावे म्हणून विश्वाच्या सीमा फार दूरपर्यंत वाढवल्या. ॥ १० ॥


त्यं चि॑द्घा दी॒र्घं पृ॒थुं मि॒हो नपा॑त॒ममृ॑ध्रम् ॥ प्र च्या॑वयन्ति॒ याम॑भिः ॥ ११ ॥

त्यं चित् घ दीर्घं पृथुं मिहः नपातं अमृध्रं ॥ प्र च्यवयन्ति यामभिः ॥ ११ ॥

ते आपल्या मार्गानें जात असतां मेघाच्या बालकास खाली कोसळून पाडतात. ह्या मेघाच्या बालकाचा आकार दीर्घ व विस्तृत असून त्यास प्रायः कोणालाही इजा करतां येत नाही. ॥ ११ ॥


मरु॑तो॒ यद्ध॑ वो॒ बलं॒ जना॑ँ अचुच्यवीतन ॥ गि॒रीँर॑चुच्यवीतन ॥ १२ ॥

मरुतः यत् ह वः बलं जनान् अचुच्यवीतन ॥ गिरीन् अचुच्यवीतन ॥ १२ ॥

हे मरुद्देवांनो, तुमचे सामर्थ्य इतकें मोठें असल्याकारणानें तुम्ही सर्व लोकांस हालवून सोडतां आणि पर्वतासही कंपित करता. ॥ १२ ॥


यद्ध॒ यान्ति॑ म॒रुतः॒ सं ह॑ ब्रुव॒तेऽ॑ध्व॒न्ना ॥ शृ॒णोति॒ कश्चि॑देषाम् ॥ १३ ॥

यत् ह यांति मरुतः सं ह ब्रुवते ऽध्वन् आ ॥ शृणोति कः चित् एषां ॥ १३ ॥

ज्या वेळीं मरुद्देव गमन करीत असतात त्यावेळी मार्गांत असतांना त्यांचे एकमेकांशी संभाषण होते. कोणातरी भाग्यवान पुरुषास ते ऐकूं येत असेल काय ? ॥ १३ ॥


प्र या॑त॒ शीभ॑मा॒शुभिः॒ सन्ति॒ कण्वे॑षु वो॒ दुवः॑ ॥ तत्रो॒ षु मा॑दयाध्वै ॥ १४ ॥

प्र यात शीभं आशुऽभिः संति कण्वेषु वः दुवः ॥ तत्रो इति सु मादयाध्वै ॥ १४ ॥

आपल्या शीघ्रसंचारी वाहनावर बसून त्वरेनें इकडे या. कण्वमंडळींत तुमच्याकरितां हवि ठेवलेला आहे, त्यांत आनंद माना. ॥ १४ ॥


अस्ति॒ हि ष्मा॒ मदा॑य वः॒ स्मसि॑ ष्मा व॒यमे॑षाम् ॥ विश्वं॑ चि॒द् आयु॑र्जी॒वसे॑ ॥ १५ ॥

अस्ति हि स्म मदाय वः स्मसि स्म वयं एषां ॥ विश्वं चित् आयुः जीवसे ॥ १५ ॥

आनंद व्हावा ह्याकरितांच खरोखर हा येथें ठेवला आहे. आम्ही मनोभावानें केवळ ह्यांचेच भक्त आहोंत. आम्हांस दीर्घकालपर्यंत ह्या जगांत वास्तव्य करतां यावे म्हणून सर्व जीवन ह्यांनी आमच्या स्वाधीन करून ठेवले आहे. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ३८ ( मरुत्‌सूक्त )

ऋषि - कण्व घौर : देवता - मरुत् : छंद - गायत्री


कद्ध॑ नू॒नं क॑धप्रियः पि॒ता पु॒त्रं न हस्त॑योः ॥ द॒धि॒ध्वे वृ॑क्तबर्हिषः ॥ १ ॥

कत् ह नूनं कधऽप्रियः पिता पुत्रं न हस्तयोः ॥ दधिध्वे वृक्तऽबर्हिषः ॥ १ ॥

ज्याप्रमाणे आपल्या पुत्राचे बोबडे बोलणें ऐकण्याविषयी लोलुप असलेला पिता त्याचा प्रेमानें हात धरतो त्याप्रमाणे, हे मरुद्देवांनो, आपण आम्हांस खरोखर कधीं हातांत धरणार आहांत बरें ? आपणांकरितां आम्ही सोमरसांत पडलेले दर्भाचे तुकडे काढून टाकून तो तयार करून ठेवला आहे. ॥ १ ॥


क्व नू॒नं कद्वो॒ अर्थं॒ गन्ता॑ दि॒वो न पृ॑थि॒व्याः ॥ क्व वो॒ गावो॒ न र॑ण्यन्ति ॥ २ ॥

क्व नूनं कत् वः अर्थं गंत दिवः न पृथिव्याः ॥ क्व वः गावः न रण्यंति ॥ २ ॥

खरोखर - कोणत्या प्रदेशास उद्देशून - आपण स्वर्गांतून जाण्यास निघाला आहां ? आपण पृथ्वीकडून आलां नाही काय ? आपल्या धेनु कोठें आहेत ? त्यांचे हंबरणे ऐकूं येत नाही. ॥ २ ॥


क्व वः सु॒म्ना नव्यां॑सि॒ मरु॑तः॒ क्व सुवि॒ता ॥ क्वो३॑ विश्वा॑नि॒ सौभ॑गा ॥ ३ ॥

क्व वः सुम्ना नव्यांसि मरुतः क्व सुविता ॥ क्वो३इर्ति विश्वानि सौभगा ॥ ३ ॥

हे मरुद्द्वांनो तुम्ही आणलेले अपूर्व वैभव कोठें आहे ? आपणांपासून प्राप्त होणारी संपत्ति कोठें आहे ? आपणांपासून जी सर्व सुंदर भाग्यें आम्हांस प्राप्त होणार तीं कोठें ठेवली आहेत ? ॥ ३ ॥


यद्यू॒यं पृ॑श्निमातरो॒ मर्ता॑सः॒ स्यात॑न ॥ स्तो॒ता वो॑ अ॒मृतः॑ स्यात् ॥ ४ ॥

यत् यूयं पृश्निमातरः मर्तासः स्यातन ॥ स्तोता वः अमृतः स्यात् ॥ ४ ॥

हे पृश्नींच्या पुत्रांनो, जर तुम्ही मर्त्यांमध्येंच गणले जात असाल आणि तुमची स्तुति करणारा तुमचा उपासक मात्र अमरत्व पावत असेल, ॥ ४ ॥


मा वो॑ मृ॒गो न यव॑से जरि॒ता भू॒दजो॑ष्यः ॥ प॒था य॒मस्य॑ गा॒दुप॑ ॥ ५ ॥

मा वो मृगः न यवसे जरिता भूत् अजोष्यः ॥ पथा यमस्य गात् उप ॥ ५ ॥

तर खरोखर, ज्य्प्रमाणे एखाद्या हरिणाला गवत खाण्याकरितां कोणी प्रतिबंध करणर नाही, त्याप्रमाणे तुमच्या सेवकाबरोबरही कोणाचीच अवकृपा होणार नाही व यमाच्या मार्गाने जाण्यास त्यास केव्हांही भाग पडणार नाही. ॥ ५ ॥


मो षु णः॒ परा॑परा॒ निर्‌ऋ॑तिर्दु॒र्हणा॑ वधीत् ॥ प॒दी॒ष्ट तृष्ण॑या स॒ह ॥ ६ ॥

मो इति सु नः पराऽपरा निःऋतिः दुःहना वधीत् ॥ पदीष्ट तृष्णया सह ॥ ६ ॥

निर्दयपणाने नुकसार करणारी व एकसारखी वृद्धिंगत होणारी साडेसाती आम्हांस नाशाप्रत न नेवो. मत्त्वाकांक्षेबरोबर तिचाही निःपात होवो. ॥ ६ ॥


स॒त्यं त्वे॒षा अम॑वन्तो॒ धन्व॑ञ्चि॒दा रु॒द्रिया॑सः ॥ मिहं॑ कृण्वन्त्यवा॒ताम् ॥ ७ ॥

सत्यं त्वेषा अमऽवंतः धन्वन् चित् आ रुद्रियासः ॥ मिहं कृण्वंति अवाताम् ॥ ७ ॥

खरोखर हे बलशाली परंतु भिती उत्पन्न करणरे देव, अतिशय नापीक प्रदेशामध्यें सुद्धां वृष्टी करीत आहेत व त्या वृष्टीस वाऱ्याकडून खंड पाडूं देत नाहींत. ॥ ७ ॥


वा॒श्रेव॑ वि॒द्युन्मि॑माति व॒त्सं न मा॒ता सि॑षक्ति ॥ यदे॑षां वृ॒ष्टिरस॑र्जि ॥ ८ ॥

वाशाऽइव विऽद्युत् मिमाति वत्सं न माता सिसक्ति ॥ यत् एषां वृष्टिः असर्जि ॥ ८ ॥

जेव्हां यांच्याकडून पर्जन्याची वृष्टि होते तेव्हां वासराकरितां हंबरणाऱ्या धेनूप्रमाणे वीज गर्जना करते व माता ज्याप्रमाणे आपल्या लेकरास पोटाशी धरते त्याप्रमाणे सर्व जगतास ही घट्ट कवळून धरते. ॥ ८ ॥


दिवा॑ चि॒त्तमः॑ कृण्वन्ति प॒र्जन्ये॑नोदवा॒हेन॑ ॥ यत्पृ॑थि॒वीं व्यु॒न्दन्ति॑ ॥ ९ ॥

दिवा चित् तमः कृण्वंति पर्जन्येन उदऽवाहेन ॥ यत् पृथिवीं वि उंदंति ॥ ९ ॥

ज्यावेळी हे पृथ्वीस पाण्याने चिंब करून टाकतात त्यावेळीं उदकाची वृष्टि करणाऱ्या पर्जन्याकडून हे दिवसांसुद्धां काळाकुट्ट अंधकार पाडतात. ॥ ९ ॥


अध॑ स्व॒नान्म॒रुतां॒ विश्व॒मा सद्म॒ पार्थि॑वम् ॥ अरे॑जन्त॒ प्र मानु॑षाः ॥ १० ॥

अध स्वनात् मरुतां विश्वं आ सद्म पार्थिवम् ॥ अरेजंत प्र मानुषाः ॥ १० ॥

मरुतांची गर्जना ऐकल्याबरोबर ह्या पृथ्वीवरील एकूण एक घरे हादरून जातात. एवढेंच काय पण मनुष्यसुद्धां थरथर कांपू लागतो. ॥ १० ॥


मरु॑तो वीळुपा॒णिभि॑श्चि॒त्रा रोध॑स्वती॒रनु॑ ॥ या॒तेमखि॑द्रयामभिः ॥ ११ ॥

मरुतः वीळुपाणिभिः चित्राः रोधस्वतीः अनु ॥ यात ईं अखिद्रयामऽभिः ॥ ११ ॥

हे मरुद्देवहो, मार्गांत क्लेश न होतां नानाप्रकारच्या मनोहर नदींच्या काठाकाठाने आपल्या सामर्थ्यवान् हस्तांचा प्रताप गाजवीत गमन करा. ॥ ११ ॥


स्थि॒रा वः॑ सन्तु ने॒मयो॒ रथा॒ अश्वा॑स एषाम् ॥ सुसं॑स्कृता अ॒भीश॑वः ॥ १२ ॥

स्थिराः वः संतु नेमयः रथाः अश्वासः एषाम् ॥ सुऽसंस्कृताः अभीशवः ॥ १२ ॥

तुमच्या रथांच्या चाकांच्या धावा भंग न पावणाऱ्या असोत. तुमचे रथ आणि त्यांना जोडलेले अश्व खंबीर असोत. तुमच्या हातांतील लगाम नक्षीदार असोत. ॥ १२ ॥


अच्छा॑ वदा॒ तना॑ गि॒रा ज॒रायै॒ ब्रह्म॑ण॒स्पति॑म् ॥ अ॒ग्निं मि॒त्रं न द॑र्श॒तम् ॥ १३ ॥

अच्छ वद तना गिरा जरायै ब्रह्मणः पतिम् ॥ अग्निं मित्रं न दर्शतम् ॥ १३ ॥

स्तुति करण्याच्या इच्छेनें ब्रह्मणस्पतीस उद्देशून आणि त्याचप्रमानणे अग्नि व हा सुंदर मित्र ह्यांसही अनुलक्षून स्तोत्रांनी निरंतर आळवीत जा. ॥ १३ ॥


मि॒मी॒हि श्लोक॑मा॒स्ये प॒र्जन्य॑ इव ततनः ॥ गाय॑ गाय॒त्रमु॒क्थ्यम् ॥ १४ ॥

मिमीहि श्लोकं आस्ये पर्जन्यःऽइव ततनः ॥ गाय गायत्रं उक्थ्यम् ॥ १४ ॥

सतत कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे उच्च घोष करून स्तोत्रपाठ करा. स्तुतींनी परिपूर्ण अशा एखाद्या सुंदर गानाचें गायन करा. ॥ १४ ॥


वन्द॑स्व॒ मारु॑तं ग॒णं त्वे॒षम् प॑न॒स्युम॒र्किण॑म् ॥ अ॒स्मे वृ॒द्धा अ॑सन्नि॒ह ॥ १५ ॥

वंदस्व मारुतं गणं त्वेषं पनस्युं अर्किणम् ॥ अस्मे इति वृद्धाः असन् इह ॥ १५ ॥

सामर्थ्यवान्, स्तुतीस योग्य आणि अनेक स्तोत्रांनी ज्याचे माहात्म्य वर्णन केले आहे अशा मरुतांच्या समुदायास वंदन कर. ते श्रेष्ठ मरुत् येथें आमच्यावरच अनुग्रह करण्याकरितां बसलेले आहेत. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ३९ ( मरुत्‌सूक्त )

ऋषि - कण्व घौर : देवता - मरुत् : छंद - सम-सतोबृहती; विषम बृहती


प्र यदि॒त्था प॑रा॒वतः॑ शो॒चिर्न मान॒मस्य॑थ ॥
कस्य॒ क्रत्वा॑ मरुतः॒ कस्य॒ वर्प॑सा॒ कं या॑थ॒ कं ह॑ धूतयः ॥ १ ॥

प्र यत् इत्था परावतः शोचिः न मानं अस्यथ ॥
कस्य क्रत्वा मरुतः कस्य वर्पसा कं याथ कं ह धूतयः ॥ १ ॥

सर्व जगास हालवून सोडणाऱ्या हे मरुतांनो, ज्याअर्थी आपण एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे आपले प्रतिबिंब लांबच्या प्रदेशापासून अशा रीतीनें पुढें फेंकित आहां, त्याअर्थी कोणाच्या करामतीमुळें, कोणाच्या आग्रहाने, कोणास उद्देशून - खरोखर कोणावर अनुग्रह करण्याकरितां आपण चालला आहां बरें ? ॥ १ ॥


स्थि॒रा वः॑ स॒न्त्वायु॑धा परा॒णुदे॑ वी॒ळू उ॒त प्र॑ति॒ष्कभे॑ ॥
यु॒ष्माक॑मस्तु॒ तवि॑षी॒ पनी॑यसी॒ मा मर्त्य॑स्य मा॒यिनः॑ ॥ २ ॥

स्थिरा वः संतु आयुधा पराऽनुदे वीळु उत प्रतिस्कभे ॥
युष्माकं अस्तु तविषी पनीयसी मा मर्त्यस्य मायिनः ॥ २ ॥

शत्रूंची दाणादाण करण्याकरितां तुझी आयुधें एकसारखी चालोत, आणि तुझे बळ त्यांचा योग्य प्रतिकार करो. प्रशंसनीय सामर्थ्य केवळ तुझ्याच जवळ असो, कपटी मनुष्याजवळ कधींही नसो. ॥ २ ॥


परा॑ ह॒ यत्स्थि॒रं ह॒थ नरो॑ व॒र्तय॑था गु॒रु ॥
वि या॑थन व॒निनः॑ पृथि॒व्या व्याशाः॒ पर्व॑तानाम् ॥ ३ ॥

परा ह यत् स्थिरं हथ नरः वर्तयथा गुरु ॥
वि याथन वनिनः पृथिव्याः वि आशाः पर्वतानाम् ॥ ३ ॥

हे वीरांनो, जेव्हां स्थिर पदार्थांना तुम्ही त्याच्या स्थानापासून हलवितां, आणि ज्या वस्तु अतिशय जड आहेत, त्यांना भिंगरीसारखे फिरावयास लावतां, तेव्हां आपले गमन पृथ्वीवरील वृक्षांमधून व पर्वताच्या दरीखोऱ्यांमधून होत असते. ॥ ३ ॥


न॒हि वः॒ शत्रु॑र्विवि॒दे अधि॒ द्यवि॒ न भूम्यां॑ रिशादसः ॥
यु॒ष्माक॑मस्तु॒ तवि॑षी॒ तना॑ यु॒जा रुद्रा॑सो॒ नू चि॑दा॒धृषे॑ ॥ ४ ॥

नहि वः शत्रुः विविदे अधि द्यवि न भूम्यां रिशादसः ॥
युष्माकं अस्तु तविषी तना युजा रुद्रासः नू चित् आऽधृषे ॥ ४ ॥

हे शत्रुसंहारक मरुद्देवहो, स्वर्ग अथवा पृथ्वी ह्यावर खरोखर आपणास कोणीही शत्रु उरलेला नाही. हे भयप्रद देवांनो, शत्रूवर झडप घालतां यावी म्हणून सामर्थ्याची आपणांस सदैव जोड मिळो. ॥ ४ ॥


प्र वे॑पयन्ति॒ पर्व॑ता॒न्वि वि॑ञ्चन्ति॒ वन॒स्पती॑न् ॥
प्रो आ॑रत मरुतो दु॒र्मदा॑ इव॒ देवा॑सः॒ सर्व॑या वि॒शा ॥ ५ ॥

प्र वेपयंति पर्वतान् वि विञ्चंति वनस्पतीन् ॥
प्रो इति आरत मरुतः दुर्मदाःऽइव देवासः सर्वया विशा ॥ ५ ॥

ते पर्वतांना कंप उत्पन्न करतात आणि मोठठ्या वृक्षास भग्न करतात. मदोन्मत्त मनुष्याप्रमाणे हे मरुद्देव आपल्या परिवारांसहवर्तमान इतस्ततः संचार करीत असतात. ॥ ५ ॥


उपो॒ रथे॑षु॒ पृष॑तीरयुग्ध्वं॒ प्रष्टि॑र्वहति॒ रोहि॑तः ॥
आ वो॒ यामा॑य पृथि॒वी चि॑दश्रो॒दबी॑भयन्त॒ मानु॑षाः ॥ ६ ॥

उपो इति रथेषु पृषतीः अयुग्ध्वं प्रष्टिः वहति रोहितः ॥
आ वः यामाय पृथिवी चित् अश्रोत् अबीभयंत मानुषाः ॥ ६ ॥

चित्रविचित्र वर्णाच्या हरिणींना आपण आपल्या रथास जोडले आहे, आणि प्रमुखत्वानें एक रक्तवर्ण मृग तो रथ ओढीत आहे. आपण याल म्हणून पृथ्वी लक्षपूर्वक ऐकत बसली आहे व मनुष्यें भयव्याकुल होऊन गेलेलीं आहेत. ॥ ६ ॥


आ वो॑ म॒क्षू तना॑य॒ कं रुद्रा॒ अवो॑ वृणीमहे ॥
गन्ता॑ नू॒नं नोऽ॑वसा॒ यथा॑ पु॒रेत्था कण्वा॑य बि॒भ्युषे॑ ॥ ७ ॥

आ वः मक्षु तनाय कं रुद्राः अवः वृणीमहे ॥
गंत् नूनं नः अवसा यथा पुरा इत्था कण्वाय बिभ्युषे ॥ ७ ॥

हे रुद्रहो, आपण ज्याप्रमाणे आमचें संरक्षण करतां तशा प्रकारच्या संरक्षणाची याचना आम्ही नेहमी नेहमी आणि तीही ताबडतोब कोणाजवळ करावी ? पूर्वी ज्याप्रमाणे आमच्या संरक्षणाच्या तजविजीने तुम्ही येत होतां त्याप्रमाणें आतां ही ह्या भयविह्वल कण्वा प्रित्यर्थ इकडे या. ॥ ७ ॥


यु॒ष्मेषि॑तो मरुतो॒ मर्त्ये॑षित॒ आ यो नो॒ अभ्व॒ ईष॑ते ॥
वि तं यु॑योत॒ शव॑सा॒ व्योज॑सा॒ वि यु॒ष्माका॑भिरू॒तिभिः॑ ॥ ८ ॥

युष्माऽइषितः मरुतः मर्त्यऽषितः आ यः नः अभ्वः ईषते ॥ वि तं युयोत शवसा वि ओजसा वि युष्माकाभिः ऊतिभिः ॥ ८ ॥

कोणीही मनुष्य, मग तो तुम्ही पाठविलेला असो अथवा इतर मनुष्यांनी चिथवलेला असो, आम्हांवर हल्ला करण्याकरितां येत असेल त्याचे आपल्या सामर्थ्याने, शक्तीने अथवा भक्तजनसंरक्षक आपल्या शस्त्रांनी दोन तुकडे करा. ॥ ८ ॥


असा॑मि॒ हि प्र॑यज्यवः॒ कण्वं॑ द॒द प्र॑चेतसः ॥
असा॑मिभिर्मरुत॒ आ न॑ ऊ॒तिभि॒र्गन्ता॑ वृ॒ष्टिं न वि॒द्युतः॑ ॥ ९ ॥

असामि हि प्रऽयज्यवः कण्वं दद प्रऽचेतसः ॥ असामिऽभिः मरुतः आ नः ऊतिऽभिः गंता वृष्टिं न विद्युतः ॥ ९ ॥

हे अत्यंत ज्ञानशील व यज्ञार्ह मरुद्देवांनो, आपण कण्वास जे कांही वैभव अर्पण करणार असाल तें संपूर्ण अर्पण करा आणि आमच्या संरक्षणाची संपूर्ण साधने घेऊन, ज्याप्रमाणे विद्युल्लतेचा ओढा पर्जन्यवृष्टीकडे असतो त्याप्रमाणे, आमचेकडे आगमन करा. ॥ ९ ॥


असा॒म्योजो॑ बिभृथा सुदान॒वोऽ॑सामि धूतयः॒ शवः॑ ॥
ऋ॒षि॒द्विषे॑ मरुतः परिम॒न्यव॒ इषुं॒ न सृ॑जत॒ द्विष॑म् ॥ १० ॥

असामि ओजः बिभृथ सुऽदानवः ऽसामि धूतयः शवः ॥ ऋषिऽद्विषे मरुतः परिऽमन्यवे इषुं न सृजत द्विषम् ॥ १० ॥

सर्व जगतास हालवून सोडणारे व दानकर्मनिपुण मरुद्देवहो, आपले सर्व सामर्थ्य व शक्ति आपल्याजवळ ठेवा, आणि जो क्रोधाविष्ट पुरुष ऋषींचाही द्वेष करीत असेल त्यावर बाण सोडल्याप्रमाणे एखादा शत्रु सोडा. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ४० ( ब्रह्मणस्पति सूक्त )

ऋषि - कण्व घौर : देवता - ब्रह्मणस्पति : छंद - सम-सतोबृहती; विषम बृहती


उत्ति॑ष्ठ ब्रह्मणस्पते देव॒यन्त॑स्त्वेमहे ॥
उप॒ प्र य॑न्तु म॒रुतः॑ सु॒दान॑व॒ इन्द्र॑ प्रा॒शूर्भ॑वा॒ सचा॑ ॥ १ ॥

उत् तिष्ठ ब्रह्मणः पते देवऽयंतः त्वा ईमहे ॥
उप प्र यंतु मरुतः सुऽदानवः इन्द्र प्राशूः भवा सचा ॥ १ ॥

हे ब्रह्मणस्पति देवा, ऊठ, देवांची भक्ति करणारे उपासक तुझ्या दर्शनाची इच्छा करीत आहेत. अत्यंत उदार असे मरुत् इकडे येवोत. हे इंद्रा, त्यांचेसह सोमरसाचा आस्वाद घेणारा हो. ॥ १ ॥


त्वामिद्धि स॑हसस्पुत्र॒ मर्त्य॑ उपब्रू॒ते धने॑ हि॒ते ॥
सु॒वीर्यं॑ मरुत॒ आ स्वश्व्यं॒ दधी॑त॒ यो व॑ आच॒के ॥ २ ॥

त्वां इत् धि सहसः पुत्र मर्त्यः उपऽब्रूते धने हिते ॥
सुऽवीर्यं मरुतः आ स्ऽअवश्व्यं दधीत यः व आऽचके ॥ २ ॥

सामर्थ्यांहून प्रादुर्भूत होणाऱ्या हे देवा, धनाची प्राप्ति करून घेण्याचे प्रसंगी प्रत्येक मनुष्य तुलाच बोलावतो. हे मरुतांनो, जो भक्त आपणांस हांक मारील त्याचेसाठी सुंदर अश्वांनी युक्त असें उत्तम सामर्थ्य तयार करून ठेवा. ॥ २ ॥


प्रैतु॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॒ प्र दे॒व्येतु सू॒नृता॑ ॥
अच्छा॑ वी॒रं नर्यं॑ प॒ङ्‍क्तिरा॑धसं दे॒वा य॒ज्ञं न॑यन्तु नः ॥ ३ ॥

प्र एतु ब्रह्मणः पतिः प्र देवी एतु सूनृता ॥
अच्छ वीरं नर्यं पङ्‍क्तिऽराधसं देवाः यज्ञं नयंतु नः ॥ ३ ॥

ब्रह्मणस्पति इकडे येवो, देवी सूनृता इकडे आगमन करो. देव आम्हांस असा यज्ञ करण्याची स्फूर्ति देवोत की जो उत्साहाने चालेल, जो मनुष्यांस हितकारी होईल, व ज्याचे पासून अनेकांस संतोष प्राप्त होईल. ॥ ३ ॥


यो वा॒घते॒ ददा॑ति सू॒नरं॒ वसु॒ स ध॑त्ते॒
अक्षि॑ति॒ श्रवः॑ ॥ तस्मा॒ इळां॑ सु॒वीरा॒मा य॑जामहे सु॒प्रतू॑र्तिमने॒हस॑म् ॥ ४ ॥

यः वाघते ददाति सूनरं वसु सः धत्ते अक्षिति श्रवः ॥
तस्मै इळां सुऽवीरां आ यजामहे सुऽप्रतूर्तिं अनेहसम् ॥ ४ ॥

मनुष्याजातीस अत्युपयुक्त असे धन जो भाविक पुरुषास अर्पण करतो तो अक्षय्य कीर्ति प्राप्त करून घेतो. त्याचे कल्याणार्थ आम्ही इळादेवीस हवि अर्पण करतो. ही इळादेवी वीरांचा लाभ करविणारी, शत्रूंचा निःपात करणारी व कोणाकडूनही अपाय न पावणारी अशी आहे. ॥ ४ ॥


प्र नू॒नं ब्रह्म॑ण॒स्पति॒र्मन्त्रं॑ वदत्यु॒क्थ्यम् ॥
यस्मि॒न्निन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा दे॒वा ओकां॑सि चक्रि॒रे ॥ ५ ॥

प्र नूनं ब्रह्मणः पतिः मंत्रं वदति उक्थ्यम् ॥
यस्मिन् इन्द्रः वरुणः मित्रः अर्यमा देवाः ओकांसि चक्रिरे ॥ ५ ॥

खरोखर ज्याचे ठिकाणी इंद्र, वरुण, मित्र व अर्यमा ह्या देवांनी आपला वास केलेला आहे असा अत्यंत प्रशंसायोग्य मंत्र ब्रह्मणस्पति म्हणत आहे. ॥ ५ ॥


तमिद्वो॑चेमा वि॒दथे॑षु श॒म्भुवं॒ मन्त्रं॑ देवा अने॒हस॑म् ॥
इ॒मां च॒ वाचं॑ प्रति॒हर्य॑था नरो॒ विश्वेद्वा॒मा वो॑ अश्नवत् ॥ ६ ॥

तं इत् वोचेम विदथेषु शंऽभुवं मंत्रं देवा अनेहसम् ॥
इमां च वाचं प्रतिऽहर्यथ नरः विश्वा इत् वामा वः अश्नवत् ॥ ६ ॥

यज्ञामध्यें आम्ही, हे देवांनो, तोच कल्याणकारक व अविनाशी मंत्र म्हणत जाऊं. हे वीरांनो, तुम्ही ह्याही स्तुतीचा अंगीकार करीत आहां त्याअर्थी तुम्हांपासून प्राप्त होणारीं सर्व सुखें तुमच्या भक्तास निःसंशय उपभोगण्यास सांपडतील. ॥ ६ ॥


को दे॑व॒यन्त॑मश्नव॒ज्जनं॒ को वृ॒क्तब॑र्हिषम् ॥
प्रप्र॑ दा॒श्वान्प॒स्त्याभिरस्थितान्त॒र्वाव॒त्क्षयं॑ दधे ॥ ७ ॥

कः देवयंतं अश्नवत् जनं कः वृक्तऽबर्हिषम् ॥
प्रऽप्र दाश्वान् पस्त्याभिः अस्थित अंतःऽवावत् क्षयं दधे ॥ ७ ॥

भक्तिमान मनुष्यास कोण ग्रासूं शकेल ? सोमरसांतील दर्भांची अग्रें काढून टाकणाऱ्या उपासकास कोण पराभूत करील ? हवि अर्पण करणाऱ्या मनुष्याचा त्याच्या सर्व परिवारांसह आजपर्यंत नेहमी उत्कर्षच झालेला आहे व त्यानें नेहमींच सर्व समृद्धीने भरलेली अशी घरें उभारलेली आहेत. ॥ ७ ॥


उप॑ क्ष॒त्रं पृ॑ञ्ची॒त हन्ति॒ राज॑भिर्भ॒ये चि॑त्सुक्षि॒तिं द॑धे ॥
नास्य॑ व॒र्ता न त॑रु॒ता म॑हाध॒ने नार्भे॑ अस्ति व॒ज्रिणः॑ ॥ ८ ॥

उप क्षत्रं पृंचीत हंति राजऽभिः भये चित् सुऽक्षितिं दधे ॥
न अस्य वर्ता न तरुता महाऽधने न अर्भे अस्ति वज्रिणः ॥ ८ ॥

तो ब्रह्मणस्पति आपलें सर्व बल एकत्र करील, कारण राजांकडून तोच शत्रूस मारवीत असतो. भितीप्रसंगी देखील तो निर्भय निवासस्थान तयार करून ठेवतो. लहान अथवा मोठ्या युद्धांतही ह्या वज्रधारी देवास तोंड देणारा अथवा त्याचा पराभव करणारा कोणी नाही. ॥ ८ ॥


ॐ तत् सत्


GO TOP