श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एकोणिसावा


यज्ञात विघ्न आले, कृष्णकृपेने ते गेले


श्रीगणेशाय नम: ॥
माझें हृदय दिव्य कमळ ॥ जें तेजोमय परम निर्मळ ॥
अष्ट कर्णिका अति कोमळ ॥ मध्ये घननीळ विराजे ॥ १ ॥
हृत्पद्यगर्भीं देखा ॥ श्रीरंग नांदे भक्तसखा ॥
अष्ट कर्णिका वरिष्ठनायिका ॥ त्याही स्थापूनि निजस्थानीं ॥ २ ॥
रुक्मिणी जांबवती सत्यभामा ॥ कालिंदी मित्रविंदा मनोरमा ॥
याज्ञजिती लक्ष्मणा पूर्णकामा ॥ मद्रावती ते आठवी ॥ ३ ॥
मध्यभागी श्रीकरधर ॥ कर्णिकांवरी नायिका सुकुमार ॥
ऐसा हृदयकमलीं यादवेंद्र ॥ सर्वदाही पूजावा ॥ ४ ॥
अठरावे अध्यायीं कथा जाणा ॥ धर्में अग्रपूजा दिधली श्रीकृष्णा ॥
तेणें क्षोभ आला दुर्जनां ॥ शिशुपालादिकांसी ॥ ५ ॥
चैद्य आणि कौरव ॥ एके सभेसी बैसले सर्व ॥
क्षुद्रदृष्टीं लक्षिती माधव ॥ परमद्वेषी दुरात्मे ॥ ६ ॥
शिवलिंग देखतां दृष्टीं ॥ शिवद्वेषी जेविं होती कष्टी ॥
विष्णुप्रतिमा पाहतां पोटीं ॥ दुःख वाटे जंगमां ॥ ७ ॥
कीं देखोन साधूचें पूजन ॥ परम क्षोभती जैसे कूजन ॥
कीं पतिव्रतेची राहटी देखोन ॥ जारिणी जेविं निंदिती ॥ ८ ॥
कीं दृष्टीं देखतां राजहंस ॥ वायसां उपजे अति त्रास ॥
कीं पंचानन देखोनि सावकाश ॥ जंबुकास सौख्य वाटेना ॥ ९ ॥
कीं सभेत देखतां पंडित ॥ मूर्ख मतिमंद संतापत ॥
कीं दृष्टीं देखतां समीरसुत ॥ वाटे अनर्थ रजनीचरां ॥ १० ॥
कीं ऐकतां हरिनामघोष ॥ भूतप्रेतां उपजे त्रास ॥
तैसें पूजितां श्रीरंगास ॥ दुर्जन परम संतापले ॥ ११ ॥
अंतरींच कष्टी दुर्योधन ॥ परि चैद्यांमाजी दमघोषनंदन ॥
परम खवळला दुर्जन ॥ कालसर्प जयापरी ॥ १२ ॥
भीघास म्हणे कुंतीनंदन ॥ आतां करूं कोणाचें पूजन ॥
गंगात्मजें बोलावें जों वचन ॥ तो शिशुपाल जल्पे भलतेंचि ॥ १३ ॥
म्हणे रे धर्मा ऐक वचन ॥ तुम्ही नीच मूर्ख अवघे जण ॥
गोरक्षक आधीं पूजोन ॥ अपयश माथां घेतलें ॥ १४ ॥
योग्यायोग्यविचार ॥ मुढां तुम्हां न कळे साचार ॥
अग्रपूजेसी अधिकारी जार ॥ करितां पामर पांडव तुम्हीं ॥ १५ ॥
दोघे जनक या गोरक्षकातें ॥ पंच तात तुम्हां पांडवातें ॥
यालागीं दोघांचीं चित्तें ॥ ऐक्य पावलीं परस्परें ॥ १६ ॥
परम शतमूर्ख युधिष्ठिर ॥ बुद्धिभ्रष्ट गंगाकुमार ॥
पूजेस अधिकारी तस्कर ॥ केला साचार यज्ञमंडपीं ॥ १७ ॥
ऋत्विज सांडोनि सत्यवतीकुमार ॥ कपिल याज्ञवल्य वसिष्ठ पवित्र ॥
द्रोण कृपाचार्य गुरु शूर ॥ टाकोनि जार पूजिला ॥ १८ ॥
भीष्म बाल्हीक वृद्ध थोर ॥ शल्य एकलव्य भगदत्त वीर ॥
जयद्रथ शकुनि महावीर ॥ सांडोनि तस्कर पूजिला ॥ १९ ॥
धृतराष्ट्र सांडोनि वृद्ध ॥ सोयरा सांडोनि दुपद ॥
कोण्या विचारें बुद्धिमंद ॥ हा गोविंद पूजिला ॥ २० ॥
अश्वत्यामा गुरुनंदन ॥ पूजावा होता अर्कज कर्ण ॥
पृथ्वीपति दुर्योधन ॥ सांडोनि कृष्ण पूजिला ॥ २१ ॥
पूज्य अपमानूनि थोर थोर ॥ अपूज्या पूजिलें साचार ॥
तरी तुमची यश कीर्ति समग्र ॥ बुडोनि भ्रष्ट जाहली ॥ २२ ॥
येणें कोणतें केलें अनुष्टान ॥ कीं केलें जपतपव्रतसाधन ॥
किंवा याणें केलें वेदपठन ॥ म्हणोनि आधीं पूजिला ॥ २३ ॥
यासी म्हणावें रायासमान ॥ तरी नाहीं छत्रसिंहासन ॥
आचार्य नव्हे हा ब्राह्मण ॥ भ्रष्ट पूजन व्यर्थ केलें ॥ २४ ॥
आम्ही बैसलों असतां नृपवर ॥ आधीं पूजिला पशुपालकुमार ॥
आमचीं घ्राणें छेदिलीं समग्र ॥ परम अपवित्र पांडव तुम्ही ॥ २५ ॥
पूजणें होता जरी गोवळा ॥ तुजला कुष्ठिपुत्रा अमंगळा ॥
तरी आम्हां कां येथें आणिलें खळा ॥ व्यर्थ यज्ञ गेला तुझा ॥ २६ ॥
म्यां तुज दिधला करभार ॥ कीं तूं बहु दुर्बळ कुष्ठिपुत्र ॥
धर्मकृत्यास साह्य व्हावें साचार ॥ विवेकी नर बोलती ॥ २७ ॥
तुवां अपमानूनि भूपाळ ॥ येथें थोर केला गोवळ ॥
इतुके तुम्ही नीच असाल ॥ ऐसें सर्वथा न वाटलें ॥ २८ ॥
यज्ञपुरोडाश अरण्यांत पडिला ॥ तो एका जंबुकास लाधला ॥
तितुकेनें तो काय जाहला ॥ मृगेंद्राहूनि थोर पै ॥ २९ ॥
जैशी राजकन्या परम सुंदर ॥ षंढाप्रति दिधली साचार ॥
हिंसकास गोदान निर्धार ॥ दिधलें तुवां पंडुपुत्रा ॥ ३० ॥
जन्मांधासी हिरा दाखविला ॥ सूकर सिंहासनीं बैसविला ॥
येणें जरासंध कपटे वधिला ॥ कोणता केला पुरुषार्थ ॥ ३१ ॥
ऐसें बोलोनि पापमती ॥ खड्ग आपुलें उपसून हातीं ॥
म्हणे उठा रे आमुचे सांगाती ॥ जे असतील ये सभे ॥ ३२ ॥
ऐसें बोलतां शिशुपाल ॥ तत्काल उठले अवघे खल ॥
कृष्णद्वेषी परम चांडाल ॥ अति कोल्हाळ करिती तेव्हां ॥ ३३ ॥
धर्में धांवोनि तत्काळ ॥ हृदयीं कवळिला शिशुपाळ ॥
म्हणे तूं बंधु आमुचा केवळ ॥ यज्ञ हा सकल तुझा असे ॥ ३४ ॥
ऋषि तापसी वृद्ध राजेंद्र ॥ त्यांसी कृष्णपूजनें आनंद थोर ॥
तूंही कृष्णभजनीं सादर ॥ अनन्य होईं शिशुपाला ॥ ३५ ॥
परम जाणता गंगानंदन ॥ वृद्ध वडील सर्वांस मान्य ॥
त्याचे आज्ञेने केलें पूजन ॥ तूं कां दूषण ठेविसी ॥ ३६ ॥
तुजहून जाणते पंडित ॥ कृष्णपूजनें आनंदत ॥
तुझे हृदयीं हा अनर्थ ॥ काय म्हणून प्रवेशला ॥ ३७ ॥
तो भीष्म काय बोले वचन ॥ परम दुष्ट हा दमघोषनंदन ॥
त्याचें कासया करिसी सांत्वन ॥ त्यासी मरण जवळी आलें ॥ ३८ ॥
कां त्याचें करिसी समाधान ॥ तो न मानी तुझें वचन ॥
जैशी प्रेतास वस्त्रें भूषणें पूर्ण ॥ लेववूनि काय सार्थक ॥ ३९ ॥
मतिमंदापुढें ठेविलें शास्त्र ॥ षंढाहातीं दिधलें शस्त्र ॥
मसणीं मंडप विचित्र ॥ व्यर्थ जैसा उभविला ॥ ४० ॥
वायसासी अमृतफळें ॥ कीं उष्ट्रापुढे समर्पिलीं केळे ॥
कीं रासभाचें अंगास लेपिलें ॥ मृगमदाचे उटणें पै ॥ ४१ ॥
द्राक्षाफलें अर्पिलीं सूकरा ॥ आदर्श दाविला जन्मांधनरा ॥
कीं ज्वरियासी समर्पिली शर्करा ॥ तैसा या पामरा बोध काय ॥ ४२ ॥
भग्नपात्रीं जैसें जीवन ॥ कां श्रमावे व्यर्थचि घालून ॥
दुग्धामाजी हरळपे रांधून ॥ काय व्यर्थ जाण पां ॥ ४३ ॥
उकरडीं ओतिला सुधारस ॥ सुमनशेजेवरी निजविला महिष ॥
दुग्धें न्हाणिला वायस ॥ शुभ्र नव्हे कदापि ॥ ४४ ॥
जैसा तस्कर विटे देखतां निशाकस ॥ तैसा हा सुबुद्धि न धरी पामर॥
हिंसकास धर्मशास्त्र ॥ कदा नावडे जाण पां ॥ ४५ ॥
आम्हीं ज्याचें केलें पूजन ॥ त्यासी हृदयीं ध्याय ईशान ॥
जलजोद्‌भव सस्रनयन ॥ अनन्य शरण जयासी ॥ ४६ ॥
जो जगद्‌गुरू इंदिरावर ॥ प्रतापमित्र समरधीर ॥
ऐसा कोण आहे पामर ॥ कीं पूजा इच्छी त्याआधीं ॥ ४७ ॥
भवगजविदारक पंचानन ॥ सनकादिक ज्यासी शरण ॥
तयासी आम्ही पूजितां पूर्ण ॥ हा कां दुर्जन खवळला ॥ ४८ ॥
जो अनंतब्रह्मांडनायक ॥ भोगींद्र जाहला जयाचा तल्पक ॥
जो पुराणपुरुष निष्कलंक ॥ जगद्‌वंद्य अनादि जो ॥ ४९ ॥
हा एवढी आगळीक बोलत ॥ कोठे यानें केला पुरुषार्थ ॥
महागज देखोनि भुंकत ॥ श्वान जैसें अनिवार ॥ ५० ॥
ऐसें बोलतां शंतनुकुमार ॥ तों सहदेवास आवेश आला थोर ॥
जैसा गर्जे मृगेंद्र ॥ उभा राहोनि बोले तेवीं ॥ ५१ ॥
आम्ही सभास्थानीं निश्चित ॥ यथार्थ पूजिला वैकुंठनाथ ॥
असत्य मानील त्याचे पूर्वज समस्त ॥ चरणांतळीं माझिया ॥ ५२ ॥
जो श्रीकृष्णास निंदी दुर्जन ॥ त्याची जिव्हा घ्राण छेदीन ॥
वृषभावरी बैसवून ॥ पिटीन जाण दिगंतरीं ॥ ५३ ॥
ऐसें सहदेवें बोलतां आगळे ॥ जयजयकारें देव गर्जिन्नले ॥
पुष्पांजली ओपिते जाहले ॥ माद्रीपुत्रावरी तेधवां ॥ ५४ ॥
आकाशीं देववाणी गर्जत ॥ धन्य सहदेव कृष्णभक्त ॥
नारद म्हणे ऐका समस्त ॥ मोठा अनर्थ होईल येथें ॥ ५५ ॥
जेणें निंदिला द्वारकानाथ ॥ त्यासी जवळी आला रे अनर्थ ॥
तो प्रेतप्राय निश्चित ॥ जननी व्यर्थ प्रसवली ॥ ५६ ॥
ऐसें ऐकोनि ते वेळां ॥ शिशुपाल अत्यंत क्षोभला ॥
घेऊनि दुर्जनांचा मेळा ॥ उभा ठाकला संग्रामा ॥ ५७ ॥
म्हणे आजि यादव पांडव भीष्म ॥ कृष्णासमवेत करीन भस्म ॥
अवघे खल मिळोन परम ॥ कोल्हाळ करिती तेधवां ॥ ५८ ॥
जैसा दृष्टीं देखतां राजहंस ॥ एकदांचि कोल्हाळ करिती वायस ॥
युधिष्ठिर म्हणे भीष्मास ॥ कैसें आतां करणें जी ॥ ५९ ॥
मग बोले गंगाकुमार ॥ तूं स्वस्थ राहें न सांडीं धीर ॥
कैसा तरेन मी सागर ॥ कुंभोद्‌भवें कां विचारावे ॥ ६० ॥
निद्रित श्रीरंगपंचानन ॥ तंव हे जंबूक करिती गर्जन ॥
अरे हा धडधडीत कृशान ॥ दुर्जनकानन जाळील पै ॥ ६१ ॥
श्रीकृष्णवडवानलावरी एके वेळे ॥ चैद्य उठले तृणपूतळे ॥
शिशुपाल हा कर्पूर बळें ॥ पुढें धांवे विझवावया ॥ ६२ ॥
याचा जो परिवार सकळी ॥ तीं मेणाचीं जैशी बाहुलीं ॥
श्रीरंग हा ज्वालामाली ॥ भस्म करील क्षणार्धे ॥ ६३ ॥
ऐसें ऐकतां शिशुपाल ॥ क्रोधें खवळला जैसा व्याळ ॥
कुशब्द तेचि सांडी गरळ ॥ भीध्या समोर लक्षोनि ॥ ६४ ॥
म्हणे रे भीष्मा दुष्टा वद्धा ॥ परमहीना बुद्धीमंदा ॥
कपटिया आमुची करितोसी निंदा ॥ तुझी जिव्हा झडो कां ॥ ६५ ॥
कोणता कृष्णें केला पुरुषार्थ ॥ म्हणोनि जल्पसी सभेआंत ॥
पूतना वृद्ध स्त्री मारिली सत्य ॥ म्हणोनि वाढीव बोलसी ॥ ६६ ॥
केशी एक अश्व मारिला देख ॥ कालिया अघासुर दंदशूक ॥
बकासुर पक्षी एक ॥ मारोनि जाहला पुरुषार्थी ॥ ६७ ॥
गोवर्धन तरी वल्मीक ॥ कपटी म्हणूनि गिळिला पावक ॥
कपटेंचि कालयवनादिक ॥ मारिले येणें गोवळे ॥ ६८ ॥
हा तस्करांमाजी अति श्रेष्ठ ॥ जारांमाजी अति वरिष्ठ ॥
कपटी नाटकी परम नष्ट ॥ स्वधर्मभष्ट गोवळा ॥ ६९ ॥
अरे भीष्मा तूं दुर्जन ॥ काशीपतीच्या कन्या नेल्या हिरोन ॥
त्यांत एके स्त्रीनें दिधला प्राण ॥ तुजवरी नपुंसका ॥ ७० ॥
स्नान संध्या अनुष्ठान ॥ यज्ञ तप दान देवतार्चन ॥
सर्व व्यर्थ गेलें तुझें वदन ॥ संतानहीना पाहों नये ॥ ७१ ॥
लोकांस निरोपिसी धर्म ॥ मूढा तूंच करिसी कीं अधर्म ॥
ऐशी निंदा ऐकतां भीम ॥ गदा सावरोनि सरसावला ॥ ७२ ॥
जैसा केवळ खदिरांगार ॥ तैसे आरक्त दिसती नेत्र ॥
म्हणे हे दुर्जन अपवित्र ॥ चूर्ण करीन गदाघायें ॥ ७३ ॥
भीष्में धरून भीमाचा हस्त ॥ म्हणे क्षण एक राहें तूं निवांत ॥
याचें आयुष्य उरलें किंचित ॥ जवळी अनर्थ पातला ॥ ७४ ॥
शिशुपाल भीष्मास म्हणे अवधारीं ॥ सोडीं भीम येऊं दे मजवरी ॥
जातवेद पतंगासी भस्म करी ॥ तैसें करीन निर्धारे ॥ ७५ ॥
कृष्ण आणि भीमार्जुन ॥ एकदांचि येऊं द्या शस्त्र घेऊन ॥
विलंब करितां षंढ पूर्ण ॥ नाम तुझें निर्धारे ॥ ७६ ॥
ऐशीं दुष्ट उत्तरें बोलत ॥ तितुकीं क्षमा करून गंगासुत ॥
भीमास म्हणे ऐक वृत्तांत ॥ पूर्वींचा तुज सांगतो ॥ ७७ ॥
दमघोषाची पत्‍नी सात्वती ॥ ती वसुदेवाची भगिनी निश्चिती ॥
तिचे उदरीं हा पापमती ॥ शिशुपाल उपजला ॥ ७८ ॥
उपजतां पाहे बालक जननी ॥ तो भुजांवरी भुजा दोनी ॥
कपाळी नेत्र अवगुणी ॥ हा पापखाणी उपजला ॥ ७९ ॥
लोक म्हणती हें अवचिह्न ॥ माता म्हणे टाका बाहेर नेऊन ॥
तो आकाशीं देववाणी बोले गर्जोन ॥ न टाकीं बालक सर्वथा ॥ ८० ॥
हा होईल महाभूपती ॥ शिशुपाल नाम ठेवीं याप्रती ॥
माता विस्मित जाहली चित्तीं ॥ काय पुढती बोलत ॥ ८१ ॥
कोणाच्या हातें यास मृत्य ॥ है देवदूता वदे निश्चित ॥
तो आणीक प्रतिध्वनि होत ॥ माय ऐकत सादर ॥ ८२ ॥
ज्या पुरुषाचे दृष्टीकरून ॥ दोन्ही भुजा आणि तृतीयनयन ॥
खालीं पडेल गळोन ॥ यास मरण त्याचे हातें ॥ ८३ ॥
ऐसें बोलोन आकाशवाणी ॥ गुप्त राहिली तये क्षणीं ॥
मग बाल घेती जाहली जननी ॥ विरूपनेत्र चतुर्बाहु ॥ ८४ ॥
देशोदेशींचे भूपती ॥ बालक पहावयालागीं येती ॥
प्रतीति विलोकावया सात्वती ॥ शिशुपाल देत सर्वांपुढे ॥ ८५ ॥
तो बलभद्र आणि घननीळ ॥ तेही पाहावया आले बाळ ॥
बंधुपुत्रां देखतां तुंबळ ॥ आनंद जाहला सात्वतीसी ॥ ८६ ॥
तो शिशुपाल आणि वक्रदंत ॥ दोघे कृष्णापुढें आले रांगत ॥
कृष्णदृष्टि पडतां अकस्मात ॥ भुजा गळोन पडियेल्या ॥ ८७ ॥
कपाळींचा तृतीयनयन ॥ तत्काल गेला जिरोन ॥
मातेस चिंता उद्‌भवली दारुण ॥ देववाणी आठवूनि ॥ ८८ ॥
मग हरीपुढें पदर पसरून ॥ पितृभगिनी मागे पुत्रदान ॥
म्हणे यास मी न मारीं म्हणोन ॥ भाव देईं मजलागीं ॥ ८९ ॥
श्रीकृष्ण बोले साच वचन ॥ शत अपराध क्षमा करीन ॥
अधिक जाहलिया बोळवीन ॥ मोक्षसदना निर्धारे ॥ ९० ॥
ऐसें बोलतां गोविंद ॥ मातेस जाहला आनंद ॥
म्हणे हा कासया करील शतापराध ॥ मग राममुकुंद बोळविले ॥ ९१ ॥
यालागीं ऐक भीमा निश्चित ॥ त्या शतापराधांचें होय गणित ॥
यालागीं श्रीकृष्ण निवांत ॥ वाट पाहे समयाची ॥ ९२ ॥
हा शिशुपाल आणि वक्रदंत ॥ पूर्वींचे महाराक्षस उन्मत्त ॥
रावण कुंभकर्ण निश्चित ॥ रामावतारीं वधियेले ॥ ९३ ॥
हा पूर्वी येऊन मिथिलेसी ॥ धावला वरावया सीतेसी ॥
भार्गवचाप नुचले मानसीं ॥ परम खेद पावला ॥ ९४ ॥
तो हा शिशुपाल पापखाणी ॥ वरावया धांवला रुक्मिणी ॥
तेथें पराजय पावला रणीं ॥ जरासंधासमवेत ॥ ९५ ॥
तोच द्वेष धरून मनांत ॥ दुर्जन कृष्णनिंदा करित ॥
परी शतापराध आले भरत ॥ जवळी अनर्थ पातला ॥ ९६ ॥
ऐकतां भीष्माचें वर्मवचना ॥ क्रोधें भडकला दमघोषनंदन ॥
जैसा स्नेहें शिंपितां कृशान ॥ अधिकाधिक प्रज्वळे ॥ ९७ ॥
म्हणे रे बुद्धिहीना नपुंसका ॥ किती वानिसी गोरक्षका ॥
जे येथें स्तवनास योग्य देखा ॥ न वानिसी तयांतें ॥ ९८ ॥
चोर जार कपटी केवळ ॥ बहु माजला हा गोवळ ॥
गोकुळ चौढाळिलें सकळ ॥ कपटी खळ अमंगळ हा ॥ ९९ ॥
जालंधराची पत्‍नी वृंदा सती ॥ ती याणें भगिनी मानिली होती ॥
तिसींच रतला निश्चितीं ॥ न भी चित्तीं पापातें ॥ १०० ॥
परदारागमनी आणि कपटी ॥ यासमान दुजा नाहीं सुष्टीं ॥
याची काय सांगसी गोष्टीं ॥ वारंवार मूढा तूं ॥ १०१ ॥
मग म्हणे उठा रे अवघे जण ॥ आधीं घेऊं भीष्माचा प्राण ॥
तिलप्राय तुकडे करून ॥ येथें याचे टाकावे ॥ १०२ ॥
याज्ञिक मिळोनि भोंवते ॥ यज्ञपशु वधिती मुष्टिघातें ॥
तैसें वधावें वृद्धातें ॥ याणें आम्हांतें निदिलें ॥ १०३ ॥
तैलकढई तावूनि परम ॥ हा जितचि आत घालावा भीष्म ॥
की शस्त्रें तावूनि उत्तम ॥ खंडे याचीं करावीं ॥ १०४ ॥
मग बोले गंगासुत ॥ बोलिला बोल न करी सत्य ॥
त्याचे पूर्वज समस्त ॥ महानरकीं पचतील ॥ १०५ ॥
तुझिया माथींचा मुकुट ॥ तो मी पदघातें करीन पिष्ट ॥
जरी बोलिलें वचन स्पष्ट ॥ खरें करून न दाविसी ॥ १०६ ॥
भीष्मसिंहापुढें जंबुक समस्त ॥ करितां युद्धाची तुम्ही मात ॥
वज्रधारा धगधगित ॥ तृणेंकरून न खंडे ॥ १०७ ॥
अजा जयाची जननी ॥ तो सिंहाशीं भिडों पाहे रणीं ॥
पिपीलिका म्हणे थडका हाणोनी ॥ दिग्गजां खालीं पाडीन ॥ १०८ ॥
बळें उडोनि अलिका ॥ विदारीन म्हणे विनायका ॥
मशक म्हणे हाणोनि थडका ॥ मेरुमांदार डोलवीन ॥ १०९ ॥
घुंघुरड्याऐसें ज्याचें वदना ॥ तो म्हणे मी पर्वत ग्रासीन ॥
पतंग अग्नीस म्हणे गिळीन ॥ सूड घेईन खांडवींचा ॥ ११० ॥
स्वतंतुसूत्रवसनेंकरूनी ॥ ऊर्णनाभि म्हणे झांकीन धरणी ॥
वृश्चिक अभिमान वाहे मनीं ॥ तोडून फोडीन वज्रातें ॥ १११॥
मजपुढें काय आदित्य ॥ म्हणोनि निंदा करी खद्योत ॥
मरणकालीं होय संनिपात ॥ तैसें तुज जाहलें रे ॥ ११२ ॥
कालमृत्यूच्छाया पडली ॥ मृत्युवेळा जवळी आली ॥
ऐकोनि शिशुपाल तये वेळीं ॥ क्रोधें बहुत आवेशला ॥ ११३ ॥
शस्त्र काढोनि वेगेशी ॥ म्हणे रे कृष्णा ऊठ झुंज मजशीं ॥
नपुंसका काय बैसलासी ॥ लाज कैशी नुपजे तूतें ॥ ११४ ॥
तुझें रुसणे समजणें दोन्ही ॥ मी शिशुपाल तृणप्राय मानीं ॥
गोरक्षका तुज अजूनी ॥ लज्जा कां रे न वाटे ॥ ११५ ॥
उपजोनियां गोवळा ॥ वृष्णिकुला डाग लाविला ॥
तुवां चोरूनि नेली रुक्मिणी वेल्हाळा ॥ नोवरी माझी निर्धारें ॥ ११६ ॥
रुक्मिणी आधीं अर्पिली मातें ॥ म्यां मनींच भोगिलें तियेतें ॥
मग ते प्राप्त जाहली तूतें ॥ माझें उच्छिष्ट गुराखिया ॥ ११७ ॥
जैसें भोगिलें वस्त्र बहुत ॥ तें भाटास देती भाग्यवंत ॥
तैसी रुक्मिणी भोगिली म्यां निश्चित ॥ मग ते प्राप्त जाहली तूतें ॥ ११८ ॥
पुष्पहार भोगून टाकिला ॥ तो भणंगे जैसा उचलिला ॥
कीं रावणें चोरून नेली जनकबाला ॥ तैशी रुक्मिणी तुवां नेली ॥ ११९ ॥
शाल्व पवित्र तुजपरीस ॥ कदा नातळे अंबेस ॥
नवरी जे नेमिली आणिकास ॥ ते सर्वथा न पर्णावी ॥ १२० ॥
ज्याचे नांवें पात्र वाढिलें ॥ आणिके सेवितां उच्छिष्ट जाहलें ॥
ऐसें धर्मशास्त्री बोलिलें ॥ तें तुज न कळे कर्मभ्रष्टा ॥ १२१ ॥
श्रीकृष्ण म्हणे रे दुर्जना ॥ महानिंदका दुष्टा मलिना ॥
तूं अग्रपूजा इच्छितोसि हीना ॥ तरी आतांचि घेई निर्धारें ॥ १२२ ॥
ऐसें बोलोनि क्षीराब्धिजारमण ॥ केलें सुदर्शनाचें स्मरण ॥
तंव तें अकस्मात येऊन ॥ कृष्णहस्तीं संचरलें ॥ १२३ ॥
जैसा कल्पांतींचा आदित्य ॥ तैसें सुदर्शन धगधगित ॥
तें शिशुपालावरी अकस्मात ॥ वैकुंठनाथें सोडिलें ॥ १२४ ॥
तत्काल शिशुपालाचे शिर ॥ निराळपथे उडालें सत्वर ॥
मुखें गर्जना करी थोर ॥ म्यांचि यदुवीर जिंकिला ॥ १२५ ॥
शिर मागुती उतरले ॥ तें श्रीकृष्णचरणीं येऊन पडलें ॥
अंतर्ज्योति निघाली ते वेळे ॥ ती श्रीकृष्णमुखीं प्रवेशली ॥ १२६ ॥
बालसूर्यासारिखें तेज अद्‌भुत ॥ ज्योति श्रीकृष्णहृदयीं प्रवेशत ॥
जैसें लवण जलीं विरत ॥ कीं गगनांत नाद जैसा ॥ १२७ ॥
सांडोनि जीवदशा संपूर्ण ॥ शिशुपाल जाहला श्रीकृष्ण ॥
त्वंपद तत्पदीं जाय हरपोन ॥ तैसा लीन जाहला ॥ १२८ ॥
कीं जलीं जलबिंदु पडिला ॥ तो माघारा नाहीं परतला ॥
तैसा शिशुपाल गोपाळ जाहला ॥ नाहीं उरला वेगळेपणे ॥ १२९ ॥
वैकुठपीठींचे द्वारपाल ॥ जय विजय हे निर्मल ॥
सनकादिकीं शापितां तत्काल ॥ दैत्ययोनीत अवतरले ॥ १३० ॥
तेचि हिरण्याक्ष हिरण्यकशिपु जाण ॥ तेचि जाहले रावण कुंभकर्ण ॥
तेचि हे शिशुपाल वक्रदंत पूर्ण ॥ कृष्णावतारीं जन्मले ॥ १३१ ॥
परमभक्त शिशुपाल ॥ बळेच हरिरूप जाहला तत्काल ॥
हातींची वस्तु आसडूनि ने बाल ॥ तैसेंच केलें यथार्थ ॥ १३२ ॥
तिसरे जन्मीं निश्चिती ॥ कृष्णें दिधली अक्षय्य मुक्ती ॥
हृदयीं ठेविली अंतर्ज्योती ॥ महाभक्त म्हणोनियां ॥ १३३ ॥
असो जाहला जयजयकार ॥ देव वर्षती सुमनसंभार ॥
दुष्ट पळाले समग्र ॥ वक्रदंतासहित पै ॥ १३४ ॥
कौरव अंतरीं चिंताक्रांत ॥ म्हणती आमुचें उणें पडलें बहुत ॥
एक आनंदें टाळिया वाजवित ॥ बरें जाहले म्हणोनियां ॥ १३५ ॥
ऐसा शिशुपाल पावला निजधाम ॥ पार्थाप्रति निरोपी धर्म ॥
म्हणे याचें प्रेत करा भस्म ॥ जातवेदामाझारीं ॥ १३६ ॥
मग शिशुपालाचे राज्य जें होतें ॥ तें दिधलें त्याचिया पुत्राते ॥
धर्मराज सकल राजयांतें ॥ वस्वें अलंकार समर्पीं ॥ १३७ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ सर्वांस गौरवी युधिष्ठिर ॥
पूजा मान पावोनि समग्र ॥ गेले नगरा आपुलिया ॥ १३८ ॥
मग अवभृथस्नान धर्में केलें ॥ तेथें जन सकल सुस्नात जाहले ॥
सहपरिवार ते वेळे ॥ श्रीरंग निघाला द्वारकेसी ॥ १३९ ॥
धर्मास म्हणे कमलोद्‌भवपिता ॥ आम्हांस निरोप देई आतां ॥
धर्में चरणीं ठेविला माथा ॥ कंठ जाहला सद्‌गदित ॥ १४० ॥
न बोलेचि प्रेमें स्फुंदत ॥ जा ऐसें न म्हणवे निश्चित ॥
पुढती लौकर यावें म्हणत ॥ धन्य भक्त धर्मराज ॥ १४१ ॥
भीमार्जुन नकुल सहदेव ॥ तयांस पुसत वासुदेव ॥
कुंतीद्रौपदीसुभद्रांप्रति माधव ॥ स्नेहें आज्ञा मागतसे ॥ १४२ ॥
तंव त्या म्हणती श्रीपती ॥ जेथें तुझीं पदे उमटती ॥
तेथें आमुचें मस्तक असो निश्चितीं ॥ ऐसेंचि करीं रमावरा ॥ १४३ ॥
हृदयांतूनि आमच्या श्रीपती ॥ परता जाऊं नको अहोरात्रीं ॥
ज्या ज्या दिसती भूताकृती ॥ तीं तुझीं रूपें भासोत पै ॥ १४४ ॥
श्रीकृष्णासी बोळवूनी ॥ पांडव परतोनि आले सदनीं ॥
जागृती सुषुप्ती स्वप्नीं ॥ कृष्णचिंतनीं सादर ॥ १४५ ॥
राजसूययज्ञ जाहला समास ॥ द्वारकेसी पावला वैकुंठनाथ ॥
तो पौंड्रक आणि वक्रदंत ॥ वेढा घालिती नगरातें ॥ १४६ ॥
शिवें दिधलें वरदविमान ॥ त्यांत वक्रदंत सेनेसहित बैसोन ॥
द्वारकेवरी येऊन ॥ युद्ध करी शस्त्रास्त्रीं ॥ १४७ ॥
तो इतक्यांत पावला जगज्जीवन ॥ तत्काल सोडिलें सुदर्शन ॥
वक्रदंताचें शिर छेदून ॥ आकाशपंथें उडविलें ॥ १४८ ॥
पौंड्रकासहित सेना समस्त ॥ हरीनें संहारिली तेथ ॥
ऐसा प्रताप करून अद्‌भूत ॥ कृष्णे सुदर्शन ठेविलें ॥ १४९ ॥
वधियेले शिशूपालवक्रदंत ॥ इतुक्यानें सकल अवतारकृत्य ॥
पूर्ण जाहले यथार्थ ॥ या दोघांसी मारितांचि ॥ १५० ॥
आम्हांस शस्त्र धरणें नाहीं आतां ॥ उरले जे दैत्य तत्त्वतां ॥
सारथ्य करूनियां पार्था- ॥ हातीं सर्व वधीन ॥ १५१ ॥
जो देवादिदेव पुरातन ॥ जो पूर्णब्रह्म सनातन ॥
जो मायाचक्रचालक शुद्ध चैतन्य ॥ तो कृष्टारूपें अवतरला ॥ १५२ ॥
दानव बहुत माजले ॥ तिहीं भक्तजन गांजिले ॥
यालागीं निर्गुण सगुणत्वा आलें ॥ तेंच अवतरले श्रीकृष्णरूपा ॥ १५३ ॥
दुष्ट कलीचे रूप सगळे ॥ तें दुर्योधनरूपें जन्मले ॥
काम क्रोध मद मत्सर आगळे ॥ त्याचे हृदयी नांदती ॥ १५४ ॥
दुःशासनादि बंधु शतवरी ॥ ते राक्षस अवतरले अवनीवरीँ ॥
जे पौलस्त्यादिक लंकेमाझारीं ॥ तेचि हस्तनापुरीं जन्मले ॥ १५५ ॥
जयविजयांश रावण कुंभकर्ण ॥ तेचि शिशुपाल वक्रदंत पूर्ण ॥
जरासंधादिक कालयवन ॥ दैत्यांश सर्व जन्मले ॥ १५६ ॥
एवं मागध चैद्य कौरव सकल ॥ भौमासुर बाणासुर दुष्ट भूपाल ॥
हे दैत्यांश सबल ॥ द्वापारयुगीं जन्मले ॥ १५७ ॥
वसुवीर्ये गंगेच्या उदरीं ॥ भीष्ममहाराज पृथ्वीवरी ॥
जो प्रतापसूर्य ब्रह्मचारी ॥ महायोद्धा जन्मला ॥ १५८ ॥
शिवहृदयींचा क्रोध सबल ॥ तो अश्वत्यामा बळें प्रबल ॥
सूर्यांश तो कर्ण निर्मल ॥ कुंत्युदरीं जन्मला ॥ १५९ ॥
जो कां देवगुरु बृहस्पती ॥ द्रोणाचार्य तोचि निश्चितीं ॥
कृपाचार्य रुद्ररूप क्षितीं ॥ गौतमवीर्ये जन्मला ॥ १६० ॥
यम समीस शचीवर ॥ अश्विनौदेव दोघे सुंदर ॥
यांचे धर्म भीम अर्जुनवीर ॥ नकुल सहदेव जन्मले ॥ १६१ ॥
पांच सूर्य पृध्यीवरी ॥ अवतरले कुंतीच्या उदरीं ॥
उजळली सकल धरित्री ॥ प्रतापतेजें ज्यांचिया ॥ १६२ ॥
पांच मुख्य मंत्रसमीर ॥ तेणें फुकोनि कुंतीचें कर्णद्वार ॥
पंच दीप एकाहून एकसर ॥ पाजळिले धरेवरी ॥ १६३ ॥
पतंग ते कौरव निश्चितीं ॥ या पंचदीपांवरी झेंपावती ॥
परी पक्षांसहित दग्ध होती ॥ राज्यलोभें झुंजतां ॥ १६४ ॥
श्रीकृष्ण द्वारकेची भवानी ॥ पांचही दिवट्या हातीं घेऊनी ॥
ब्रह्मांडमंडपी गोंधळ घालूनी ॥ दैत्य सर्वही रगडील ॥ १६५ ॥
शची भवानी उभयांश मिळोनी ॥ हे द्रौपदी याज्ञसेनी ॥
जिचा कैवारी चक्रपाणी ॥ होऊनी धरणी' निर्वैर करी ॥ १६६ ॥
जनमेजयास सांगे वैशंपायन ॥ धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण ॥
पांडवपालक जगज्जीवन ॥ रात्रंदिन रक्षीतसे ॥ १६७ ॥
पुढें कथा आहे सुरस ॥ नारद आणि वेदव्यास ॥
बुद्धिवाद सांगतील धर्मास ॥ शत्रुविश्वास न धरावया ॥ १६८ ॥
पुढें द्यूतारंभ दारुण ॥ द्रौपदी सभेंत आणून ॥
परम पीडा करितील दुर्जन ॥ जगज्जीवन धांवेल पै ॥ १६९ ॥
पांडवप्रतापग्रंथ सत्र ॥ श्रोते तुम्ही ऋत्विज पवित्र ॥
सावधानें स्वाहास्वधाकारा ॥ अव्यग्रमनें चालों द्या ॥ १७० ॥
तेथींचा पुरोडाश पवित्र ॥ ब्रह्मानंदे सेवूनि श्रीधर ॥
तृप्त होऊनि निरंतर ॥ हरिचरित्र सांगतसे ॥ १७१ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकोणिसाव्यांत कथियेला ॥ १७२ ॥
इति श्रीधरकृतपाण्डवप्रतापे सभापर्वणि एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
अध्याय एकोणिसावा समाप्त



GO TOP