श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय आठवा


भीमाला विषारी मोदक दिले


श्रीगणेशायनमः
कुंतीमाद्रीउदरगगनांत । उदय पावले पंच आदित्य ।
कीं पंचशावकांशीं ऐरावत । पंडु विचरे काननीं ॥ १ ॥
वस्त्रभूषणांवीण । दिसती परम शोभायमान ।
क्रीडा करिती कौतुकेंकरुन । माता पिता संतोषती ॥ २ ॥
ऋषि आणि ऋषिकामिनी । देवस्वरुपें म्हणूनी ।
फलें मूलें उपचार देऊनी । क्रीडाकौतुक विलोकिती ॥ ३ ॥
पंच कुमारांसहित कुंती । दिव्य वनीं कौतुकें विचरे ती ।
माद्री आणि पंडुनृपती । अन्य काननीं वसती हो ॥ ४ ॥
वृक्ष भेदीत गेले गगन । माजी न दिसे सूर्यकिरण ।
वसंत अवतरला संपूर्ण । शोभे वन फलपुष्पीं ॥ ५ ॥
कोकिलांचे सुस्वर । कमलीं भ्रमरांचे झंकार ।
हंसहंसिणी प्रीतीं थोर । सुरतानंदें क्रीडती ॥ ६ ॥
करी आणि करिणी । मृग आणि कुरंगिणी ।
चक्रवाक त्यामधूनी । अति संतोषें विचरती ॥ ७ ॥
बाप रे न चुके होणार । हृदयीं संचरला कामविखार ।
रक्षिला होता दिवस फार । तो फुंफाटत ऊठिला ॥ ८ ॥
घ्यावया पंडूचे प्राण । मनीं उद्धवला पंचबाण ।
आधींच ते एकांतवन । वनितामंडन माद्री सवें ॥ ९ ॥
मरण विसरोन पतंग । दीपावरी पडे सवेग ।
तैसें माद्रीचें अंग । पंडुराज स्पर्शितसे ॥ १० ॥
वामहस्तें आकळी नारी । सव्यहस्तें आसुडी निरी ।
अहा म्हणे तदा माद्री । मरण तुम्हांसी या कर्मे ॥ ११ ॥
परी नायकेची नृपती । बळेंच मिसळला सुरतीं ।
वीर्य होता अधोगती । गेले प्राण निघोनियां ॥ १२ ॥
माद्रीचे शरीरावरी अद्‍भुत । पसरलें पंडुनृपाचें प्रेत ।
दीर्घ स्वरें रोदन करित । ऐकतां कुंती धांविन्नली ॥ १३ ॥
कुंतीस म्हणे माद्री । कुमार ठेवून बाहेर दूरी ।
तूं जवळ येईं झडकरी । अनर्थ थोर जाहला ॥ १४ ॥
अंतरे ठेवून पंचसुत । जवळी येतां देखिलें राजप्रेत ।
हाहाकार पृथा करित । नाहीं अंत शोकांते ॥ १५ ॥
मग म्हणे माद्रीप्रती । म्यां बहुत दिवस रक्षिला नृपती ।
मूर्खे तुवां आजि एकांतीं । परम प्रलय केला हा ॥ १६ ॥
माद्री म्हणे म्यां वारिले बहुत । परी नायकेच नृपनाथ ।
अहो होणार बळवंत । हरिहरांसी टळेना ॥ १७ ॥
आतां वल्लभासांगातें जाण । मी करीन सहगमन ।
कुंती म्हणे तूं अज्ञान । मीच जाईन समागमें ॥ १८ ॥
माद्री बोले प्रार्थून । माझा काम जाहला नाहीं पूर्ण ।
राव ऐसाच हृदयीं धरुन । प्रवेश करीन हुताशीं ॥ १९ ॥
मजकरितां जाहलें मरण । तरी मीच त्याची सांगातीण ।
नकुल सहदेव दोघे जण । करीं पालन तूं माये ॥ २० ॥
ते तुवां दिधले तुझेच नंदन । तरी मी प्रार्थूं कासयालागून ।
हें बोलून न लागतां क्षण । माद्रीनें प्राण सोडिले ॥ २१ ॥
कुंती म्हणे कर्म गहन । क्षणांत गेली सृष्टि टाकून ।
अपार मिळाले ऋषिजन । करिती सांत्वन कुंतीचें ॥ २२ ॥
ऋषि म्हणती पंडुभूपाल । आमुचे संगतीं क्रमूनि बहुकाल ।
परमप्रतापी पुण्यशील । भाग्यें लाधला सुपुत्रांतें ॥ २३ ॥
समागमें कुंती आणि कुमार । दोन्हीं प्रेतें घेऊनि ऋषीश्वर ।
लंघित देश अपार । हस्तनापुरा पातले ॥ २४ ॥
नगराबाहेर गंगातीरीं । ऋषिमेळा थोकला ते अवसरी ।
प्रेतशिबिका भूमीवरी । उतरली कीं ते कालीं ॥ २५ ॥
पंचकुमारांसह कुंती । प्रेतें घेऊन आली नगराप्रती ।
राजहेरीं त्वरितगतीं । वार्ता नेली नगरांत ॥ २६ ॥
भीष्म बाल्हीक धृतराष्ट्र । कृपाचार्य आणि विदुर ।
यांस हेरीं सांगितला समाचार । त्यांहीं स्त्रियांसी जाणविलें ॥ २७ ॥
अंबिक अंबालिका सत्यवती । हृदय पिटीत धांवती ।
सकल स्त्रियांसीं गांधारी सती । कुंतीपाशीं धांवत ॥ २८ ॥
गजबजलें हस्तनापुर । बाहेर धांवती नारी नर ।
दाटी जहली अपार । जावया मार्ग फुटेना ॥ २९ ॥
भीष्म विदुर धृतराष्ट्र । धांवले वेगें नगराबाहेर ।
चतुरंगसेना अपार । गंगातीरीं धांवतसे ॥ ३० ॥
तापसमेळा पाहून समस्त । साष्टांगें नमित गंगासुत ।
गर्जोन तापसी बोलत । ऐका समस्त पौरजन हो ॥ ३१ ॥
शतश्रृंगीं बहुकाल । तप आचरला पंडुभूपाल ।
पंचदेवतास्वरुप अचल । पंचपुत्र जाहले ॥ ३२ ॥
पंडु पावला निधना । पांडव आणिले स्वस्थाना ।
आतां यांवरी करुनि करुणा । पालन करांवे सर्वांहीं ॥ ३३ ॥
पंडूनें सोडून प्राण । आज जाहले सप्तदश दिन ।
उत्तरकार्य यथाविधि करुन । करा पालन पाचांचे ॥ ३४ ॥
ऐसे बोलून ते वेळा । गुप्त जाहला तापसांचा मेळा ।
आश्चर्य वाटे सकळा । म्हणती धन्य तपस्वी ॥ ३५ ॥
भीष्म म्हणे आम्हां दर्शन देऊन । पूजा न घेतां गेले निघोन ।
ईश्वरी पुरुष सभाग्य पूर्ण । चाड त्यां काय आमुची ॥ ३६ ॥
आम्ही राजे आणि दीन । दोन्ही दृष्टीं त्यांचे समान ।
द्रव्य संपदा तृणवत पूर्ण । वैराग्यभावें सभाग्य ते ॥ ३७ ॥
असो हृदयीं धरुनि पंडुसुत । धृतराष्ट्र आक्रोशें रडत ।
कुंतीच्या गळां मिठी घालित । सत्यवती गांधारी ॥ ३८ ॥
अंबा अंबालिका सत्यवती । शोकसमुद्रीं करिती वस्ती ।
असो बारादिवस भागीरथी- । तीरीं शिबिरें उभविलीं ॥ ३९ ॥
भार्येसहित पंडूचें शरीर । आग्नींत घालिती सत्वर ।
चंदनकाष्ठें आणि कर्पूर । शेज यांची रचियेली ॥ ४० ॥
मलयागर कृष्णागर । तुलसीबिल्वकाष्ठें पवित्र ।
कस्तूरी चंपक समग्र । सुवासवस्तु बहुतची ॥ ४१ ॥
गंगेत न्हाणून झडकरी । मग चर्चिली चंदनकस्तूरी ।
दिव्यांबरीं अलंकारीं । श्रृंगारिलीं दोघेंही ॥ ४२ ॥
छत्र चामर मकरबिरुद । श्रृंगारुन उभीं केलीं सिद्ध ।
राजचिन्हें नानाविध । विद्युत्प्राय झळकती ॥ ४३ ॥
गर्जती वाद्यांचे गजर । गंगातट पाहून पवित्र ।
चिता रचून सत्वर । शरीरें दोन्हीं ओपिली ॥ ४४ ॥
तेरा दिवसपर्यंत । दानें केलीं यथोक्त ।
न्यून कांहीं न पडे तेथ । धन अमित वांटिलें ॥ ४५ ॥
मग प्रवेशलीं नगरांत । मुख्य राजगृहीं कुंती राहत ।
संपत्ति भरिल्या अमित । वर्णितां अंत न लागेची ॥ ४६ ॥
पांडव जें जें मागती । तें तें देऊनि करी तृप्ती ।
धृतराष्ट्र येऊन गृहाप्रती । सांभाळित क्षणाक्षणां ॥ ४७ ॥
घडिघडि गंगासुत । बालकांचे लळे पुरवित ।
विदुर अहोरात्र वसत । पांडवगृहीं आवडीं ॥ ४८ ॥
सत्यवतीस एकांतीं । व्यासदेव येऊन सांगती ।
येथून संतोषगभस्ती । मावळत चालला ॥ ४९ ॥
क्लेशकाळ येथून बहुत । धर्मक्रिया लोपेल समस्त ।
वाढेल अनाचार अत्यंत । वैराग्यविवेक लोपेल ॥ ५० ॥
अविद्येचे धुराळे उठती । तेथें कोणा कोणी नोळखती ।
बदरीवना ऋषि जाती । सिद्ध न देती दर्शन ॥ ५१ ॥
पृथ्वी ग्रासील रत्‍नें धन । यथाकालीं न वर्षें घन ।
मंत्रवीर्ये होती अप्रमाण । औषधें गुण त्यागिती ॥ ५२ ॥
दैंवते सांडिती देवपण । राहती होऊन पाषाण ।
कुलीं कैल उपजेल दारुण । भूभुज सर्व संहारती ॥ ५३ ॥
गांधारीचा वडिल सुत । तो कुरुकुल जाळील समस्त ।
तरी तूं माते त्वरित । निघें आतां येथूनि ॥ ५४ ॥
हे एकदांच मरती समस्त । याचीं माया सोडीं यथार्थ ।
पुढें दिसतो महा अनर्थ । ऊठ त्वरित आतांची ॥ ५५ ॥
सत्यवती म्हणे व्यासातें । हा प्रलय न देखवे मातें ।
मी येईन तुजसांगातें । सार्थक आपुलें करावया ॥ ५६ ॥
उभयस्नुषा हातीं धरुन । पुसे भीष्मविदुरींसी येऊन ।
व्याससंगेंकरुन । बदरीवनीं सुखी राहूं ॥ ५७ ॥
सत्समागम सच्छास्त्रश्रवण । आचरुं खडतर तप पूर्ण ।
साधूं परत्रसाधन । न राहूं आतां क्षणभरी ॥ ५८ ॥
भविष्य जाणोन समग्र । आज्ञा देती भीष्मविदुर ।
व्याससंगें तिघी सत्वर । बदरिकाश्रमीं पातल्या ॥ ५९ ॥
श्रवण मनन निदिध्यास । साक्षात्कारें जाहला समरस ।
गंगेंत शरीर ठेवून निर्दोष । कैवल्यपद पावल्या ॥ ६० ॥
यावरी प्रज्ञाचक्षु राजेश्वर । कौरव आणि पंडुकुमार ।
मौंजीबंधन वेदसंस्कार । करी तेव्हां सर्वांसी ॥ ६१ ॥
भोजनपानें सुरवाडती । वस्त्राभरणीं मिरवती ।
दिवसेंदिवस वाढती । शुल्कशशीसारिखे ॥ ६२ ॥
नाना यानीं आरुढती । लोक फिरतां विलोकिती ।
कुमारदशेचे खेळ खेळती । नानागति विचित्र ॥ ६३ ॥
दक्षत्वें पांडव आगळे होती । डावमात्र कौरव हरती ।
जैसा श्वापदात ऐरावती । भीमसेन तेवीं दिसे ॥ ६४ ॥
पळतां अवघे मागें सांडी । झोंबीं अवघ्यांस एकला पाडी ।
पृष्ठीं वाहून तांतडी । शिवोनि हारी आणित ॥ ६५ ॥
माणिकगोटिया रत्‍नकंदुक । भोंवरे चक्रें विटिया सुरेख ।
सर्व खेंळी हारी आणी अधिक । अजाशब्दें बाहे तयां ॥ ६६ ॥
म्हैसा करुन भीमसेन । शकुनि आणि दुर्योधन ।
दुःशासनादिक मिळोन । हस्तपाद कवळिती ॥ ६७ ॥
मुसंडी देऊनि सबल । मस्तकें फोडून पाडी सकल ।
चरणकरखुरें केवळ । अंगें चूर्ण करी त्यांचीं ॥ ६८ ॥
एका झुगारीत गगनीं । एकास आपटीत मेदिनीं ।
बाहीं बहुसाल कवळूनी । अगाध डोहीं बुडवित ॥ ६९ ॥
नाकीं तोंडीं पाणी भरत । मग बाहेर टाकी प्रेतवत ।
वृक्षावरी कौरव चढत । फळें तोडितां देखिले ॥ ७० ॥
लत्ताप्रहारें वृक्ष मोडी । एकदांच तितुके खालीं पाडी ।
टेंकावरुन बळें ओढी । पाठी खरडी सर्वांच्या ॥ ७१ ॥
आपण एडका होत । थडका कौरवांस देत ।
धर्मास राजा करित । आपण होत कुंजर पुढें ॥ ७२ ॥
चोर करुन कौरव । आपुले चरणीं बांधी सर्व ।
शिलासंधीत घेत धांव । तेव्हा मस्तके फुटती पैं ॥ ७३ ॥
कौरवांस म्हणे अवधारा । असंख्य मुष्टिघातें मज मारा ।
मग ती मुर्खें आठवूनि वैरा । हाणतां मागें न पाहती ॥ ७४ ॥
हाणतां भागती त्यांचे कर । मग त्यांस म्हणे वृकोदर ।
आपुलें उसणें घ्या समग्र । व्याजासहित येधवां ॥ ७५ ॥
मग मुष्टिप्रहारें हाणी बळी । तेणें कुंभिनी डळमळी ।
मूर्च्छित पडती कौरव सकळी । उसणें देतां तयांचें ॥ ७६ ॥
म्हणे उसणें घेतां हांसतां । देतां कां रे अवघे रडतां ।
मग म्हणे उठा आतां । रडी खेळतां नका खाऊं ॥ ७७ ॥
धर्मासी भवानी करित । कौरव ओढून आणी बस्त ।
न खेळतां बडवित । सोडवीत धर्म तेव्हां ॥ ७८ ॥
विशाल गर्ता करुनी । आपण बैसे अनुष्ठानीं ।
कौरव आहुती मानूनी । अग्नींत ढकली बळानें ॥ ७९ ॥
मत्स्यावतार होय भीमसेन । म्हणे शंखासुर हा दुःशासन ।
म्त्स्याकार तळपोन । पायीं धरुन ओढी तया ॥ ८० ॥
कूर्मपृष्ठी करुन आपुली । म्हणे मुष्टिघातें मारा सकलीं ।
मारितां मुष्टी फुटल्या ते वेळीं । परिसहसाहि डळमळेना ॥ ८१ ॥
आपण वराह होत । म्हणे हे हिरण्याक्ष समस्त ।
त्यांचे हृदयीं रोंवी दांत । मुसंडी देत नाटोपे ॥ ८२ ॥
आपण नरसिंह होत । दुःशासनास आडवें घेत ।
म्हणे नखें पोट फोडूं येथ । किंवा पुढें विदारुं ॥ ८३ ॥
आपण त्रिविक्रम दुःशासन बली । म्हणे आंतां घालितों पातालीं ।
भार्गव होऊन म्हणे सकली । कौरव क्षत्रिय मारीन ॥ ८४ ॥
आपण राघव होय देखा । जयद्रथा करी शूर्पणखा ।
पार्थ हा लक्ष्मणासखा । प्रतिष्ठानासिक छेदील पुढें ॥ ८५ ॥
कृष्णावतारींचे खेळ । माजेल जेव्हां रणमंडळ ।
तेव्हां दाखवूं सकळ । रथीं घननीला बैसवून ॥ ८६ ॥
तेरा वर्षेंपर्यंत । बौद्धरुप धरुं यथार्थ ।
पुढें कलि माजवूनि समस्त । कौरवम्लेच्छ संहारुं ॥ ८७ ॥
ऐसा भीम खेळ खेळत । कौरव विशाद पावती समस्त ।
बल न चाले पाहती तटस्थ । न दाविती बोलोनियां ॥ ८८ ॥
दुर्योधन संतापत । शकुनिस संकेत दावित ।
येरु त्याचा हस्त दडपित । याचें उसणें घेऊं पुढें ॥ ८९ ॥
कौरव जाऊन अंधास सांगती । निजांगींचीं क्षतें दाविती ।
न खेळूं म्हणतां आम्हांप्रती । ओढून नेतो भीमसेन ॥ ९० ॥
धृतराष्ट्रास शकुनि सागंत । आतां न वांचती तुझे सुत ।
खेळतां मेले कीं जित । भीमसेन न पाहे ॥ ९१ ॥
धृतराष्ट्र तें न आणि मना । म्हणे पंडु गेला स्वर्गभुवना ।
विपरीत बोलतां जना । माजी भेद दिसेल पैं ॥ ९२ ॥
मनांत म्हणे दुर्योधन । हा एक मारावा भीमसेन ।
मग उरले चौघे जण । त्यांचा लेखा कायसा ॥ ९३ ॥
सुयोधन कर्ण दुःशासन । चौथा शकुनि एकांतीं बैसून ।
म्हणती नाना उपाय करुन । भीमसेन मारावा ॥ ९४ ॥
एक म्हणे पाश घालावे । दुजा म्हणे विष चालवावें ।
व्क म्हणे महासर्प आणावे । करवावे दंश बळानें ॥ ९५ ॥
शकुनि म्हणे प्रकट न होय । ऐसा करावा कांहीम उपाय ।
भीमास मोदक वाटती प्रिय । विषमिश्रित करावे ते ॥ ९६ ॥
वनक्रीडेस जाऊनियां । त्यास द्यावे भक्षावया ।
अवघ्यास मानवली हे क्रिया । खणे प्रकट बोलूं नका ॥ ९७ ॥
सूत्रधारां सांगे सुयोधन । गंगातीरीं निर्मावें दिव्य सदन ।
गुप्त ओवर्‍या निद्रास्थान । माड्या बहुत निर्माव्या ॥ ९८ ॥
सांगितल्याहूनि विशेष सूत्रधारीं । क्रीडाधाम रचिलें गंगातीरीं ।
सुयोधन धर्मासी विनंती करी । म्हणे चला जाऊं जलक्रीडे ॥ ९९ ॥
अजातशत्रु धर्मराज । अवश्य म्हणोन उठला तेजःपुंज ।
बंधु चौघे सहज । समागमें चालती ॥ १०० ॥
षड्रस आणि चतुर्विधान्नें । सवें घेतलीं सुयोधनें ।
विषमोदक भीमाकारणें । अति प्रयत्‍नें करविले ॥ १०१ ॥
बचनाग सोमल अहिफेण । जेपाळ राजविषें दारुण ।
याचां वास घेतां पूर्ण । तात्काल मरण जीवांसी ॥ १०२ ॥
ऐशीं विषें मिळवून देख । भीमालागीं वळिले मोदक ।
इकडे सेनेसहित सकळिक । गंगातीरा पातले ॥ १०३ ॥
नाना यानीं बैसले । फिरुन वाहनीं श्रमले ।
मग जलक्रीडे प्रवर्तले । कौरव पांडव तेधवां ॥ १०४ ॥
परस्परें जल शिंपिती । अगाध नीरीं बुड्या देती ।
एकास एक शोधिती । हांका फोडिती आवेशें ॥ १०५ ॥
भीमास बुडवावया जळीं । कौरव झोंबती सकळी ।
येरु अवघियां वाहे पृष्ठीं मौळीं । वारणापरि पोंहत ॥ १०६ ॥
नाना जलचरें धरिती । ओढून बाहेर काढिती ।
तों अस्ता पावला गभस्ती । कडेस येती सर्वही ॥ १०७ ॥
परम स्नेहें दुर्योधन । वस्त्रें ओपी पांडवांलागून ।
सकल परिवार गौरवून । अन्नपानें सुखी केले ॥ १०८ ॥
यावरी एकांतस्थानीं । पांडव कौरव बैसले भोजनीं ।
सुवर्णताटें झळकती सदनीं । रत्‍नवाटिया प्रकाशती ॥ १०९ ॥
सुस्वाद अन्नें ते वेळां । एकपंक्तीं वाढिलीं सकळां ।
जया जो पदार्थ आवडला । तो तो वाढिती साक्षेपें ॥ ११० ॥
आपुले हस्तें दुर्योधन । भीमसेनास वाढी अन्न ।
असंख्य मोदक वाढून । मधुरान्नातें भक्षवी ॥ १११ ॥
तृप्त होऊन भीमसेन । एकांतसदनीं करी शयन ।
अर्धनिशा लोटतां पूर्ण । भेदलें विष सर्व गात्रीं ॥ ११२ ॥
उडोन गेलें सर्व स्मरण । एकवटले पंचप्राण ।
सुयोधन कर्ण शकुनि दुःशासन । जवळी आले तेधवां ॥ ११३ ॥
तयांसी म्हणे सुयोधन । भले गवसलें अनुसंधान ।
आतां याचा घ्यावा प्राण । नाना यत्‍नेंकरुनियां ॥ ११४ ॥
मग दृढ लतापाशीं बहुत । बांधिले माघारें हस्त ।
कंठचरणांसी गांठी देत । केली मोट सर्वांगाची ॥ ११५ ॥
चौघे मिळोन ते वेळां । सबल शिला बांधिली गळां ।
गंगाजली बुडविला । मध्यभागीं नेऊनियां ॥ ११६ ॥
वाहत गेला भीमसेन । परम आनंदला सुयोधन ।
इकडे प्रवाहीं जातां कुंतीनंदन । समुद्रजीवनीं मिळाला ॥ ११७ ॥
तों बहुत जलविखारीं ओढून । पाताळा नेला भीमसेन ।
सर्पदंशें संपूर्ण । विष अंगींचें उतरलें ॥ ११८ ॥
गंगाजले जाहला शीतल । विखारीं विष शोषिलें सकल ।
सावध जाहला कुंतीबाल । तोडीतसे पाशबंधनें ॥ ११९ ॥
देखतां भीमाचे परम बल । दंदशूक पळाले सकल ।
वासुकीस जाणविती तत्काल । प्रचंड पुरुष एक आला ॥ १२० ॥
बांधून गंगाजलीं टाकिला । प्रेतत्व जाऊन सावध जाहला ।
वासुकी परिवारेंसीं निघाला । तेथें आला पहावया ॥ १२१ ॥
सावध देखून भीमसेन । म्हणे महापुरुषा तूं आहेस कोण ।
कोण्या दुर्जनें तूज मारुन । गंगाजलीं टाकिलें ॥ १२२ ॥
येरु म्हणे मी पंडुनंदन । वासुकी देत आलिगंन ।
बोले तूं श्रीकृष्णप्रिय पूर्ण । चल आमुच्या सदनासी ॥ १२३ ॥
मग गृहास नेऊन । नागराज करी पूजन ।
म्हणे महाविषें संपूर्ण । अंग तुझें जळतसे ॥ १२४ ॥
एलापत्र म्हणे वासुकीस । यासी पाजावा सुधारस ।
समयोचित देणें निर्दोष । महायश जोडे तेणें ॥ १२५ ॥
कन्यादान तरुणास । मिष्टान्न वाढिजे क्षुधितास ।
द्रव्य ओपिजे दरिद्रियास । महायश जोडे येणें ॥ १२६ ॥
नातरी कामातुरासी संन्यास देणें । क्षुधातुरास उपवास करविणें ।
धालियास दिव्यान्न वाढणें । समयोचित हें नव्हे ॥ १२७ ॥
तृषाक्रांतासी घृतपान । नवज्वरितासी दुग्धदान ।
शीतें पीडिल्यासी लावणे चंदन । समयोचित हें नव्हे ॥ १२८ ॥
तरी यासी सुधारसपान । हेंचि समयोचित पूर्ण ।
मग वासुकीनें भीमसेना नेऊन । अमृतकुंडें दाविलीं ॥ १२९ ॥
अष्टकुंडें भरलीं अमृतें । भीम हळूहळू नेला तेथें ।
विकल शरीर जाहलें होतें । सर्पीं धरिलें सांवरुन ॥ १३० ॥
एक कुंड दाविलें भीमास । म्हणती प्राशीं आतां सुधारस ।
तों अष्टही कुंडें सावकाश । शोषिलीं क्षणन लागतां ॥ १३१ ॥
समाचारसांगती सेवक । आश्चर्य करी भोगिनायक ।
म्हणे यासबल चढलें अधिक । पहिल्याहून शतगुणीं ॥ १३२ ॥
तृप्त जाहला धर्मानुज । मग सेजेवरी निजवी नागराज ।
भीम चिंतारहित सहज । काळजी कांहीं असेना ॥ १३३ ॥
इकडे कौरव उठोन प्रातःकालीं । स्नानें करुन गंगाजलीं ।
दलासमवेत सकलीं । नगरामाजी प्रवेशती ॥ १३४ ॥
आनंद परम कौरवमानसीं । मग बोलती येरयेरांशीं ।
पांडव बंधु होती आम्हांसी । परी मानसीं स्नेह नसे ॥ १३५ ॥
भावंडें टाकूनमागें समस्त । आपण एकला गेला नगरांत ।
भीम निष्ठुर अत्यंत । सुहृत्संग नावडे ॥ १३६ ॥
आमुचें मन त्यावरी बहुत । त्याचें आम्हांकडे नाहीं चित्त ।
चतुरपणें डोलोनि बहुत । कर्न यथार्थ म्हणतसे ॥ १३७ ॥
ऐशा कपटयुक्ति बोलून नाना । जाणविती धर्मार्जुनां ।
ते न देती प्रतिवचना । चिंताक्रांत मानसीं ॥ १३८ ॥
जैसें दीपविण सदन । तैसे म्लान दिसती चौघे जण ।
हृदय जाहलें उद्विग्न । परि बोलून न दाखविती ॥ १३९ ॥
वहनें धांवडीत ते वेळे । कौरव स्वसदनीं प्रवेशले ।
इकडे धर्म दुःखें तळमळे । भीमसेना आठवूनी ॥ १४० ॥
धर्म पुसे कुंतीप्रत । भीम आला काय गृहाप्रत ।
कीं कांहीं कार्यार्थ । तुवां प्रेरिला सांग पां ॥ १४१ ॥
माता म्हणे नाहीं आला । धर्माचा कंठ दाटला ।
अश्रुधारा वाहती डोळां । धनंजयाच्या तेधवां ॥ १४२ ॥
नकुल सहदेव तळमळती । भीमा तुझी काय जाहली गती ।
घात केला अर्धरात्रीं । अंधपुत्रें वाटतें ॥ १४३ ॥
जननी पिटी वक्षःस्थल । शोकें आंग टाकी विकल ।
विदुरही पातला तत्काल । स्थिर स्थिर म्हणतसे ॥ १४४ ॥
यादवी विदुरास म्हणत । वाटे दुर्योधनें केला घात ।
येरु म्हणे न बोलें मात । करितील निःपात उरलियांचा ॥ १४५ ॥
धीर धरुनियां चित्तीं । हृदयीं चिंतीं कमलापती ।
स्वस्तिक्षेम मागुती । भीम भेटेल तुजलागीं ॥ १४६ ॥
त्रिकालज्ञानी महाराज विदुर । त्याचे वचनें राहिली ती स्थिर ।
इकडे वासुकीसदनीं वृकोदर । अष्ट दिवस निद्रित पैं ॥ १४७ ॥
उदयाचलीं उगवे तरणी । तैसा भीम बैसला उठोनी ।
वासुकी म्हणे सखया ये क्षणीं । सोयरा होईं आमुचा ॥ १४८ ॥
मग आपुली कन्या पद्मावती । ते दिधली भीमसेनाप्रती ।
तिचें स्वरुप रतिपती । देखोनियां तटस्थ ॥ १४९ ॥
बहुत देऊन आंदण । गौरविला भीमसेन ।
वासुकी म्हणे त्वरेंकरुन । हस्तनापुर जाइजे ॥ १५० ॥
माता बंधु विदुर भक्त । तुजकारणे परम दुःखित ।
शोकसमुद्रांतून त्वरित । काढी सत्वर जाऊनि ॥ १५१ ॥
भीमास करवून मज्जन । दिधलें दिव्यान्नभोजन ।
अलंकार वस्त्रें देऊन । गौरवून बोळविला ॥ १५२ ॥
सांगातें देऊन रक्षक सर्प । पावविला गजपुरासमीप ।
भीम निर्भय निःशंक । नगरामाजी प्रवेशला ॥ १५३ ॥
अवघीं बैसलीं चिंताग्रस्त । तों भीम देखिला अकस्मात ।
हर्षे अंगीम रोम उभे ठाकत । माता बंधु धांवलीं ॥ १५४ ॥
मग साष्टांग नमस्कार । कुंतीस घाली वृकोदर ।
वासुदेवभगिनी सत्वर । गळां मिठी घाली तेव्हां ॥ १५५ ॥
विदुर आणि धर्म । यांसी साष्टांग नमी भीम ।
आवडीं दिधलें क्षेम । न मावे प्रेम दशदिशां ॥ १५६ ॥
पार्थ नकुल सहदेवराय । वंदिती तेव्हां भीमाचे पाय ।
कंठीं मिठी घालून मोहें । प्रेमेंकरुनि स्फुंदती ॥ १५७ ॥
सकलांसी बैसवून वृकोदर । विदित करी समाचार ।
वासुकी कृपाळू थोर । उपचार केला तेणें मज ॥ १५८ ॥
कुंती जीतवण करुन । भूषणें टाकी ओंवाळून ।
करुनियां अपार दान । याचक ब्राह्मण सुखी केले ॥ १५९ ॥
येथूनि विदुरमतें कुंतीनंदन । सदा वर्तती सावधान ।
न करिती कौरवांशीं भाषण । संगें गमन सोडिलें ॥ १६० ॥
पांच जण सदा एके ठायीं । वेगळे न होती कदाही ।
सखोलबुद्धि सर्वदाही । मर्यादेनें वर्तती ॥ १६१ ॥
कृष्णचरित्र करिती श्रवण । सदा कृष्णमूर्तीचें भजन ।
अखंड कृष्णनामस्मरण । सदा ध्यान कृष्णाचें ॥ १६२ ॥
कृष्ण प्रतिमा करून । त्रिकाल पूजिती पांचही जण ।
कृष्णमंत्राचे अनुष्ठान । करिती गायन कृष्णाचे ॥ १६३ ॥
नाना कला राजयुक्ती । विदुर शिकवी धर्माप्रती ।
बहुभाषा संकेतरीती । पढवीत त्यांतें तेधवां ॥ १६४ ॥
स्वदेशभाषा दुर्जनांत । बोलावया शंका वाटत ।
यालागीं बर्बरभाषा शिकवत । विदुर तेव्हां पांचांतें ॥ १६५ ॥
यावरी पुढें ऐक कथा । अंध मनांत होय कल्पिता ।
धनुर्वेद शिकवावा या समस्तां । राजगुरु ठेवूनि ॥ १६६ ॥
शतकौरव आणि वैश्यासुत । कर्ण पांडवांसहित एकशें सात ।
इतुक्यांस कृपाचार्य शिकवित । धनुर्वेद सर्वदा ॥ १६७ ॥
कृपाचार्य गौतमपुत्र । शरस्तंभीं जन्मला पवित्र ।
राजा म्हणे ते चरित्र । वैशंपायना सांगे का ॥ १६८ ॥
वक्ता म्हणे सर्व ऋषीत । गौतम मुनि परम विख्यात ।
तप खडतर आचरत । जान्हवीतीरीं सर्वदा ॥ १६९ ॥
मुखीं चतुर्वेदांचें पारायण । पृष्ठीं सदा धनुष्य्बाण ।
क्षत्रियधर्म ब्राह्मण्पण । शापें शरें समर्थ जो ॥ १७० ॥
जैसा धनुर्धर भार्गवराम । तैसेच जाणिजे योद्धा गौतम ।
मघवा भयभीत परम । तपास हानि करुं इच्छी ॥ १७१ ॥
धनुष्यबाण घेऊनी । विपिनी हिंडे गौतममुनी ।
ज्वालावती कन्या निर्मूनी । अमरनाथें पाठविली ॥ १७२ ॥
तिचें विलोकिता वदन । आंगीं द्रवला मीनकेतन ।
चाप शर भाता गळोन । भूमीवरी पडियेला ॥ १७३ ॥
वीर्य द्रवलें अद्‍भुत । शरस्तभांवरी पडत ।
दोन भाग जाहलें रेत । कुमार कुमारी जन्मलीं ॥ १७४ ॥
इंद्रें ठकविलें परम । जाणोन तपा गेला गौतम ।
मृगयामिषें राजोत्तम । शंतनु तेथें पातला ॥ १७५ ॥
अग्निहोत्रपात्रें टाकूनी । गेला तेथें गौतममुनी ।
कुमार कुमारी तान्हीं । शंतनुराव देखत ॥ १७६ ॥
जाणून ब्रह्मवीर्य हें अद्‍भुत । कृपेनें राव दोघां उचलित ।
कृप कृपी नांवें ठेवित । पालन करित दोघांचें ॥ १७७ ॥
वर्तमान जाणून गौतममुनी । रायास भेटला येऊनी ।
मग द्रोणाचार्यालागूनी । कृपी दीधली संभ्रमें ॥ १७८ ॥
कृपाचार्य आपुला सुत । त्यास विद्या दिधली बहुत ।
धनुर्वेद शिकवित । मंत्रास्त्रविद्येशीं ॥ १७९ ॥
कृपी द्रोणाची रामा । तिसी पुत्र जाहला अश्वत्थामा ।
पुढें ऐकें राजोत्तमा । कथा कैसी वर्तली ॥ १८० ॥
कृपाचार्य गुरु कृपार्णव । विद्या शिकती कौरव पांडव ।
आणिकही राजकुमार सर्व । देशोदेशींचे पातले ॥ १८१ ॥
भीमार्जुनांची प्रज्ञा फार । कृपाचार्य सांगे अणुमात्र ।
जैसा बहुत क्षुधातुर । अल्प त्यासी वाढिजे ॥ १८२ ॥
शिष्याची प्रज्ञा गाढी । गुरुची सर्वज्ञता थोडी ।
तरी विद्यासागराची पैंलथडी । सर्वथाही न देखिजे ॥ १८३ ॥
तों निजभाग्यें अकस्मात । द्रोणाचार्य आले तेथ ।
त्या द्रोणाची कथा किंचित । ऐक राया आदरे ॥ १८४ ॥
तपियाशिरोमणि भारद्वाज पूर्ण । गंगाद्वारीं करी अनुष्ठान ।
तों घृताची देवांगना जाण । पर्वकाळीं आली स्नाना ॥ १८५ ॥
स्नान करुन हेमवसन । नेसतां देखे भारद्वाज पूर्ण ।
हृदयीं चेतला मीनकेतन । अहि खवळे ज्यापरी ॥ १८६ ॥
सुरतानंद आठवित । अधोमुखें चालिलें रेत ।
ऋषि पर्णद्रोणी धरित । तेथेंच द्रोण जन्मला ॥ १८७ ॥
पितयापासून संस्कार । वेदशास्त्रें पढला समग्र ।
अग्निवेशनामा अग्निकुमार । धनुर्वेद पढे तेथें ॥ १८८ ॥
तों तेथें राव द्रुपद । पढून शिकला धनुर्वेद ।
गुरुबंधु जोडला प्रसिद्ध । पांचालरायासारिखा ॥ १८९ ॥
दोघां विद्या जाहली पूर्ण । द्रुपद गेला आज्ञा मागून ।
तों गुरुबंधु बोलिला द्रोण । द्रुपदाप्रति तेधवां ॥ १९० ॥
जनकें राज्य ओपिल्या तूतें । सांभाळावें आम्हांतें ।
द्रुपद म्हणे गुरुबंधुतें । विसरु सर्वथा न घडे हें ॥ १९१ ॥
अहिच्छत्रा द्रुपद गेला । पिता त्याचा परत्र पावला ।
द्रुपद राज्य करुं लागला । पितयाऐसें सर्वही ॥ १९२ ॥
इकडे द्रोणें प्रजोत्पत्ती । व्हावया वरिली शारद्वती ।
कृपी तेच निश्चिती । शंतनुरायें दीधली ॥ १९३ ॥
कृपीचे पोटी जन्मला सुत । जन्मकाळीं टाहो फोडित ।
उच्चैःश्रवा जैसा गर्जत । देव सर्व तोषले ॥ १९४ ॥
तो रुद्राचा अंश पूर्ण । विद्यासमुद्र बल गहन ।
अश्वत्थामा अभिधान । देवीं ठेविलें तेधवां ॥ १९५ ॥
चिरंजीव केला पूर्ण । विद्या अपार शिकवी द्रोण ।
तों परशुरामें निःक्षत्रिय करुन । पृथ्वी ब्राह्मणा दीधली ॥ १९६ ॥
सभाग्य केले ब्राह्मण । हें ऐकोन निघाला द्रोण ।
महेंद्रपर्वतीं जाऊन । भार्गवरामा भेटला ॥ १९७ ॥
राम कल्याण पुसत । काय इच्छा आहे मनांत ।
येरु म्हणे दरिद्रानलें संतप्त । कुटुंबासहित जाहलों ॥ १९८ ॥
भार्गव म्हणे सर्वही । ब्राह्मणांस दिधली मही ।
पूर्वीं तुम्ही आलां नाहीं । आतां काय देऊ तुम्हांतें ॥ १९९ ॥
सकल पृथ्वी सभाग्य करुन । कश्यपास दिधली दान ।
आतां शरीर अस्त्रविद्या पूर्ण । उरली जाण मजपाशीं ॥ २०० ॥
दोहींत जें आवडे । तेंच मागा रोकडें ।
द्रोण म्हणे अस्त्रविद्येचें गाढें । भाग्य ओपीं मजलागीं ॥ २०१ ॥
अवश्य म्हणे रेणुकानंदन । मग शिष्य केला तेव्हां द्रोण ।
अस्त्रविद्यासूर्य पूर्ण । हृदयाकाशीं उगवला ॥ २०२ ॥
म्हणे क्षत्रिय आणि ब्राह्मण । यांवांचून विद्या न सांगें कोणा जाण ।
मग आज्ञा घेऊनि द्रोण । निजाश्रमी पातला ॥ २०३ ॥
पीडला दरिद्रेंकरुन । जवळीं धनवंतांचे नंदन ।
सुवर्णवाटींत क्षीरपान । स्वेच्छें करिती कौतुकें ॥ २०४ ॥
तें दृष्टीं देखोन । अश्वत्थामा करी रोदन ।
म्हणे मज करवीं क्षीरपान । म्हणोनि आळी घेतली ॥ २०५ ॥
मग पिष्टोदक शुभ्र करुन । माता पाजी तयालागून ।
म्यां दुग्ध प्राशिलें म्हणून । अश्वत्थामा नाचतसे ॥ २०६ ॥
तें देखोन हृदयांत । द्रोण दुःखे दाटला बहुत ।
म्हणे मी दरिद्री अत्यंत । पिष्टोदक बाळ प्यालें ॥ २०७ ॥
आपुलें कुटुंब दरिद्रें कष्टी । मीच पाहतों आपुले दृष्टीं ।
मणे हे शिव हे परमेष्ठी । काय संसारीं घातलें ॥ २०८ ॥
मग आठविलें मनांत । द्रुपदाचें दर्शन घ्यावें त्वरित ।
बालकासी क्षीरपानार्थ । धेनु एक मागावी ॥ २०९ ॥
मग निघाला वेगेंकरुन । पांचालपुराप्रति येऊन ।
सबेस बैसला द्रुपद पूर्ण । तों द्रोण तेथें पातला ॥ २१० ॥
उत्साहें आशीर्वाद देत । परी प्रत्युत्तर नेदी नृपनाथ ।
तूं कोण म्हणोन पुसत । द्रोण मनांत लाजला ॥ २११ ॥
तुम्हां आम्हां गुरु निःशेष । महाराज ऋषि अग्निवेश ।
तूं गुरुबंधु होसी आम्हांस । नोळखसी राजेंद्रा ॥ २१२ ॥
दरिद्रें बहु केलें कष्टी । म्हणोन आलों बंधूंचे भेटी ।
द्रुपद म्हणे तुज दृष्टीं । देखिलें नाहीं कधीं म्यां ॥ २१३ ॥
मी राव द्रुपद जाण । तूं भिकारी अनाथ ब्राह्मण ।
तुझें बंधुत्व आम्हांलागून । घडेल कैसें सांग पां ॥ २१४ ॥
गुरु कैंचा कोठील तूं कोण । बोलसी अवघें कृत्रिमवचन ।
मूर्खा शंका तुजलागून । मित्र म्हणसी भूपातें ॥ २१५ ॥
द्रुपद मातला मदेंकरुन । म्हणे माघारां जा येथून ।
नाहीं तरी दूत लावून । बाहेर घालीन क्षणार्धें ॥ २१६ ॥
परम अपमानिला द्रोण । माघारां फिरला तेथून ।
म्हणे राया धन्य तुझें वचन । ऐकोन मन निवालें ॥ २१७ ॥
अंतरीं यथार्थ जाणसी । परी ऐश्वर्यमदें मातलासी ।
मज द्रोणास अपमानिसी । फळ पावसी शेवटीं ॥ २१८ ॥
एका शिष्यास सांगोन । तुज मी नेईन बांधोन ।
तरीच मी होईन द्रोण । कौतुक दावीन तुजलागीं ॥ २१९ ॥
ऐसें बोलोन निघाला । विषाद संगाती दृढ जाहला ।
हस्तिनापुराप्रति आला । खेदें जाहला क्षीण बहु ॥ २२० ॥
हातीं धरिली गौतमी दारा । पाठीसिं बांधिलें कुमारा ।
गजपुरांत येऊन सत्वरा । वस्तीस राहिला गुप्तरुपें ॥ २२१ ॥
धृतराष्ट्र गंगात्मज सुजाण । त्यांचें घेऊं इच्छी दर्शन ।
तों अकस्मात राजनंदन । बाहेर आले खेळावया ॥ २२२ ॥
नगराबाहेर भूमिका समान । तेथें खेळती इटी घेऊन ।
दुरुन पाहतसे द्रोण । कौतुक राजपुत्रांचें ॥ २२३ ॥
खेळतां इटी उसळली । कूपामाजी जाऊन पडली ।
राजकुमारामची पाळी । कूपाभोंवती पाहतसे ॥ २२४ ॥
कूप अवघड आंत अंधार । तटस्थ पाहती राजकुमार ।
तों मुद्रिका गळोन सत्वर । धर्महस्तींची पडियेली ॥ २२५ ॥
तोम तेथें पातला द्रोण । म्हणे क्षत्रिय तुम्ही राजनंदन ।
व्हावें असाध्यवस्तुसाधन । ऐसा गुरु केला नाहीं ॥ २२६ ॥
मग तेणें टाकिला दर्भ मंत्रून । इटी तात्काल बाहेर काढून ।
सवेंच लाविला धनुष्या बाण । दिधला सोडून कूपांत ॥ २२७ ॥
धर्ममुद्रिका मुखीं धरुन । परतोन वरतीं आला बाण ।
राजकुमार धरिती चरण । धर्म भीम अर्जुनादि ॥ २२८ ॥
म्हणती चलावें राजमंदिरा । आवडीं भेटावें राजेश्वरा ।
द्रोण म्हणे आधीं श्रुत करा । गंगात्मजा जाऊनियां ॥ २२९ ॥
पुढें कथा सुरस गहन । सादर परिसोत पंडित जन ।
ब्रह्मानंदेंकरुन । श्रीधर विनवी समस्तां ॥ २३० ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । अष्टमाध्यायीं कथियेला ॥ २३१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
अध्याय आठवा समाप्त



GO TOP