श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय नववा
एकलव्याची कथा
श्रीगणेशायनमः
भीमधृतराष्ट्रांप्रती । कौरव पांडव आदरें सांगती ।
विद्यासमुद्र जैसा बृहस्पती । धनुर्वेद जाणता ॥ १ ॥
पूर्वी भार्गव कीं रघुवीर । तैसाची हा तिसरा धनुर्धर ।
इटी मुद्रिका जेणें सत्वर । कूपांतून काढिली ॥ २ ॥
द्रोणाचार्य नाम तया । सत्वर शिबिका पाठवूनियां ।
माने आणून आचार्या । सर्वोपचारें तोषविजे ॥ ३ ॥
भीष्में पाठवूनियां वाहन । द्रोण आणिला मानेंकरुन ।
श्रेष्ठासनीं बैसवून । वस्त्राभरणीं पूजिला ॥ ४ ॥
भीष्म म्हणे आजि सुदिन । जाहलें स्वामी तुमचें दर्शन ।
कीर्ति ऐकोन तृप्त श्रवण । दर्शनें नेत्र आजि धाले ॥ ५ ॥
काय कार्यार्थ कल्पून । स्वामींचें जाहलें आगमन ।
मग बोले गुरु द्रोण । ऐकें सर्वज्ञा सुभटा ॥ ६ ॥
पीडलों दरिद्रेंकरुन । पुत्र मागतां क्षीरपान ।
पिष्टोदक शुभ्र करुन । पाजितां तृप्ति मानितो ॥ ७ ॥
चित्तास वाटला खेद । गुरुबंधु आमचा द्रुपद ।
पूर्व ओळखसंबंध । ध्रुन गेलो त्यापाशीं ॥ ८ ॥
तेणें केला अपमान । हृदयीं चेतला चिंताग्न ।
तूं मेघ उदार कुरुभूषण । म्हणोनि आलों तव दर्शना ॥ ९ ॥
भीष्म बोले नेमवचन । हे राज्य तनुमनधन ।
तुज केलें समर्पण । शिष्य जाण तुझे आम्ही ॥ १० ॥
तुज ऐसें निधान । जोडलें पूर्वभाग्यें संपूर्ण ।
शरीर सांडणे करुन । तुजवरुन टाकावें ॥ ११ ॥
तूं सर्वज्ञ गुरुमूर्ति । मागणें हेंचि तुजप्रति ।
आयुष्य सरे तोम्वरी प्रीति । संरक्षून असावें ॥ १२ ॥
विशाल पाहोनि एक सदन । सर्व संपत्ति आंत भरुन ।
धन धान्य वसनें पूर्ण । दास दासी अपार ॥ १३ ॥
अश्वशाला रथ कुंजर । गाईम्हैशीखिल्लारें अपार ।
रत्नजडित शिबिका सुंदर । गुरुलागीं बैसावया ॥ १४ ॥
आपुले संपत्तीसमान । घर भरुन दिधलें दान ।
परम आनंदला द्रोण । म्हणे धन्य धन्य कुरुवर्या ॥ १५ ॥
कुटुंबी जाहले आनंदभरित । वस्त्राभरणीं मंडित ।
पाहूनि भीष्में शुभ मुहूर्त । राजकुमार आणिले ॥ १६ ॥
पूजाकरुन विधियुक्त । कौरव पांडव समस्त ।
पायांवरी घालून गंगासुत । हातीं देत द्रोणाच्या ॥ १७ ॥
सकळांस सांगे द्रोण । विद्या जाहलिया संपूर्ण ।
जे एक इच्छितसे मन । कामना माझी पुरवा ते ॥ १८ ॥
ऐसें बोले भरद्वाजकुमार । दुर्योधनादि राजसुत समग्र ।
खालीं पाहती प्रत्युत्तर । नदेती ते कोणीही ॥ १९ ॥
तों गर्जोन बोले फाल्गुन । जें शक्रासी दुर्घट कारण ।
तें सिद्धीस पाववीन संपूर्ण । चरणप्रतापें तुमचेनि ॥ २० ॥
ऐसें ऐकतां वचन । द्रोणें हृदयीं धरिला अर्जुन ।
म्हणे तुज हो अनंत कल्याण । विजय नाम सफल हो ॥ २१ ॥
अवघ्राणून मस्तक । शिरीं ठेविला वरद हस्तक ।
श्रेष्ठ पट्टशिष्य देख । पार्थ करुन ठेविला ॥ २२ ॥
अश्वत्थाम्यास सांगे द्रोण । तुजहून मज प्रिय अर्जुन ।
विद्या होईल यासी पूर्ण । ऐक्यें स्नेहें वर्तत जा ॥ २३ ॥
ऐसें बोलोनि द्रोण । शस्त्रें अस्त्रें धनुष्य बाण ।
करुन त्यांचे पूजन । आरंभ केला सांगावया ॥ २४ ॥
धनुर्वेदअन्नसत्र । भारद्वाजें घातलें पवित्र ।
देशोदेशींचे राजपुत्र । विद्यार्थी क्षुधित पातले ॥ २५ ॥
सूर्याची अपर प्रतिमा दुसरी । तो कर्ण उदार अभ्यास करी ।
पार्थ जिंकावया समरीं । कौरवांसी मित्रत्व करीतसे ॥ २६ ॥
शस्त्रास्त्रविद्याभ्यासरत । अवघेच जाहले पारंगत ।
परि अवघ्यांत आगळा पार्थ । शस्त्रास्त्रविद्येमाझारी ॥ २७ ॥
समस्तांस सांगे द्रोण । अंधारे न करावें भोजन ।
अवश्य म्हणे अर्जुन । आज्ञा प्रमाण स्वामींची ॥ २८ ॥
एकदा रात्रौ करितां भोजन । दीप गेला वारा लागोन ।
अर्जुनें अग्निमंत्र स्मरोन । दीप तत्काल लाविला ॥ २९ ॥
एकद गुरु आज्ञा करित । कीं अंधारांत जेवा समस्त ।
पात्रीं वाढून नाना पदार्थ । पुढें आणून ठेविले ॥ ३० ॥
अवघीं आवरिले हस्त । अर्जुन निःशंक जेवित ।
पदार्थावरी हस्त पडत । वक्र नोहे सर्वथा ॥ ३१ ॥
दीप आणिला जों तेथ । तों जेवून बैसलासे पार्थ ।
म्हणे हा लक्ष न चुके यथार्थ । अचुक हस्त निश्चयें ॥ ३२ ॥
वरकडांची पात्रें पाहत । तों ते उगेच बैसले तटस्थ ।
कोणीं विदारिले पदार्थ । एकांत एक मेळविले ॥ ३३ ॥
गंगेंत स्नान करुन द्रोण । वेगें परतला शिष्य घेऊन ।
वटवृक्षाखालीं येऊन । उभा ठाकला नावेक ॥ ३४ ॥
म्हणे अग्रोदक आणीं झडकरी । अर्जुनाचे करीं देत झारी ।
येरु आला गंगातीरीं । तों मागें काय वर्तलें ॥ ३५ ॥
द्रोणास म्हणे दुर्योधन । एके बानें समस्त शिरें जाण ।
छेदावीं हें पार्थास न कळतां पूर्ण । मजलागीं शिकवावें ॥ ३६ ॥
अवश्य म्हणे द्रोण । मांडविलें त्या हातीं ठाण ।
म्हणे देंठ राखून पर्णें संपूर्ण । वटाचीं या छेदीं कां ॥ ३७ ॥
दुर्योधनें सोडिला बाण । किंचित पर्णें गेलीं झडोन ।
गुरु म्हणे न साधे संधान । व्यर्थ श्रम करुं नको ॥ ३८ ॥
गुरु पुढें गेला तेथून । तों वटाखालीं आला अर्जुन ।
देखिलें गुरुचें ठाण । पर्णें विलोकून वर पाहे ॥ ३९ ॥
तो म्हणे कोठें वटपत्रें । झडलीं दिसती अणुमात्रें ।
म्हणे हे संधान शरें । भेदून पाहों कैसें पां ॥ ४० ॥
बाणावरी ठेऊन झारी । ऊर्ध्व पाठविली अंबरीं ।
देंठ राखोन पर्णें धरित्रीं । छेदून पाडिलीं एकसरें ॥ ४१ ॥
तों धांव पुरोन परतली झारी । अर्जुनें झेलिली वरिच्यावरी ।
मग पुढें जाऊन झडकरी । दिधली करीं गुरुच्या ॥ ४२ ॥
म्हणे कां उशीर लागला । येरें वर्तला वृत्तांत कथिला ।
द्रोण वटाखालीं आला । आश्चर्य करी मानसीं ॥ ४३ ॥
अर्जुनास म्हणे अग्रोदकझारी । तुवां कैशी ठेविली भूमीवरी ।
येरु म्हणे धाडसी अंबरीं । इतुक्यांत पत्रें पाडिलीं ॥ ४४ ॥
मागुती झारी भरुन । पूर्ववत करीं म्हणे द्रोण ।
देंठ अवघे छेदून । पाडीं आतां धरेवरी ॥ ४५ ॥
झारी धाडिली अंबरांत । तों देंठ तोडून समस्त ।
झारी झेलून ठेवित । मस्तक गुरुपदाब्जी ॥ ४६ ॥
गुरुनें हृदयी धरिला अर्जुन । अश्रुधारा स्त्रवती नयन ।
सव्यसाचीवरी अभिषेचन । प्रेमोदकें गुरु करी ॥ ४७ ॥
बाप बाप वीर पार्थ । म्हणोन पाठी थापटित ।
पदक कंठींचें घालित । अर्जुनाचे गळां तेधवां ॥ ४८ ॥
अर्जुनभांडारीं विद्याधन । अवघें माझें सांठवीन ।
दुर्योधन दुःशासन । अधोवदनें पाहती ॥ ४९ ॥
म्हणे या लोकत्रयांत । समर्थ एक वीर पार्थ ।
एसें करीन यथार्थ । तरीच द्रोन नाम माझें ॥ ५० ॥
रथ कुजंर अश्वयानीं । बैसोन कैसें फिरावें समरांगणीं ।
तें समस्तांसी फेरुनी । अश्वत्थामा शिकवित ॥ ५१ ॥
सिंह व्याघ्र रीस गज । वृक नक्र उरग सतेज ।
शरभवानरांशीं सहज । युद्ध करुं शिकवित ॥ ५२ ॥
झोटधरणी युद्ध करणें । जलांत अंतरिक्षीं झुंजणें ।
वज्रठाण न हालणें । रणांगणीं सर्वथा ॥ ५३ ॥
अस्त्रें शस्त्रें नानाविध । मल्लमेषवृषभयुद्ध ।
महिषसूकरमुसंडी सुबद्ध । चुकवून युद्ध करावें तें ॥ ५४ ॥
शूल तोमर गदा शक्ती । चक्र लहुडी पाशगती ।
असिलता मुदगल पाशुपतगती । विद्या सांगती गुरु तेव्हां ॥ ५५ ॥
लक्ष्य भेदून शर । परतोन यावा सत्वर ।
दलसिंधूचें पैलतीर । भेदून मागुती परतावें ॥ ५६ ॥
उदार धनिकद्वारीं येऊन । मिळती जैसे याचक जन ।
तैसे देशोदेशींचे राजनंदन । द्रोनापाशीं सर्वदा ॥ ५७ ॥
हिरण्यधन्वियाचा सुत । एकलव्य नामें किरात ।
विद्या शिकावया अद्भुत । गुरुजवळी पातला ॥ ५८ ॥
राजकुमार म्हणत । आम्हां क्षत्रियांत किरात ।
योग्य नव्हे यथार्थ । म्हणोनिया दवडिला ॥ ५९ ॥
तेणें वंदून गुरुचरण । हृदयीं रेखिलें तेंचि ध्यान ।
महावनीं प्रवेशोन । मूर्ति केली द्रोणाची ॥ ६० ॥
सरोवरतीरीं उद्यान । वंशजाळीपरिघ घालून ।
मृत्तिकेची गुरुप्रतिमा निर्मून । भावेंकरुन विद्या शिके ॥ ६१ ॥
धन्य कोळियाचा भाव । विद्या साधली त्यास सर्व ।
अर्जुनाहून विशेष वैभव । विद्येचें त्यास लाधलें ॥ ६२ ॥
पूर्ण विद्या व्हावया प्राप्त । मुख्य भांडवल भावार्थ ।
तयावीण सर्व व्यर्थ । साधनसंभार कासया ॥ ६३ ॥
एकलव्य पारधीसी । एक्दा गेला महवनासी ।
तों द्रोण शिष्यभारेंसी । त्याचि वना पातला ॥ ६४ ॥
एक करिती अचुक संधान । श्वापदें पाडिती विंधोन ।
एकाचे चुकती बाण । हांसती एक तयातें ॥ ६५ ॥
इकडे किरात फिरुन वनीं । येत आश्रमालागुनी ।
तों सारमेय वदन पसरुनी । पुढें धांवत त्वरेनें ॥ ६६ ॥
एकलव्य सोडून बाण । सारमेयाचें खिळिलें वदन ।
माघारें येत परतोन । कौरवपांडवीं देखिलें ॥ ६७ ॥
म्हणती कोण्या वीराचें संधान । खिळिलें ग्रामसिंहाचें वदन ।
मुखामाजी भरले बाण । अंगास ढका न लागतां ॥ ६८ ॥
अर्जुन चकित पहात । तों पुढें देखिला किरात ।
त्यास अर्जुन पुसत । गुरु तुझा कोण असे ॥ ६९ ॥
येरु म्हणे माझा गुरु द्रोण । मग अर्जुन माघारां परतोन ।
जात नरयानीं बैसोन । तों भारद्वाज तेथें पातला ॥ ७० ॥
पार्थ म्हणे मजहून विशेष । विद्या दिधली किरातास ।
गुरु म्हणे चल वनास । दावीं आम्हांस किरात तो ॥ ७१ ॥
आले तयाच्या आश्रमा । तों गुरु देखे आपुली प्रतिमा ।
एकलव्या नावरे प्रेमा । लोटागंणीं येतसे ॥ ७२ ॥
घालूनियां तृणासन । प्रेमें करी चरणक्षालन ।
फलें पुष्पें आणून । गुर्वर्चन करीतसे ॥ ७३ ॥
गुरु म्हणे तूं माझा शिष्य जाण । दे दक्षिणा अंगुष्ठ छेदून ।
येरें न करितां अनुमान । उतरुन पुढें ठेविला ॥ ७४ ॥
ते आज्ञा अजून चालत । जितके पृथ्वींत किरात ।
ते सर्व बोटींच ओढिती शित । अंगुष्ठ न लाविती सहसाही ॥ ७५ ॥
संतोषला गुरु द्रोण । एकलव्यास वनीं स्थापून ।
एवं विशेष केला अर्जुन । कोळियाहून जाणिजे ॥ ७६ ॥
असो अवघे राजनंदन । जाहले धनुर्वेदनिपुण ।
गदायुद्धीं सुजाण । दुर्योधन भीम पैं ॥ ७७ ॥
धनुर्विद्येविषयी कर्ण । अर्जुनासी तोरा दावी पूर्ण ।
शकुनि खड्ग धरुन । सहदेवासीं ईर्ष्या करी ॥ ७८ ॥
नकुलासी युद्ध अद्भुत । करुं इच्छी शकुनिसुत ।
रथारोहिणीं धर्म समर्थ । शल्य भावी त्याशीं भिडाया ॥ ७९ ॥
असो परीक्षा पहावयास । वटवृक्षीं उभवूनि वंश ।
त्यावरी काष्ठकीर विशेष । सुरंग करुन स्थापिला ॥ ८० ॥
शिष्यांस सांगे द्रोण । कीर पाडा रे विंधोन ।
तों पंडूचा ज्येष्ठ नंदन । धर्मराज ऊठिला ॥ ८१ ॥
गुरु म्हणे पाहें न्याहाळून । वरी काय दिसतें सांग खूण ।
येरु म्हणे वंशी कीर पूर्ण । दृष्टीमाजी भासतसे ॥ ८२ ॥
गुरु म्हणे न साधे संधान । ठेवीं खाली धनुष्यबाण ।
दुर्योधनादि राजनंदन । ऐसेंच करु पाहती ॥ ८३ ॥
मग उठिला अर्जुन । चापास वेगें लाविला बाण ।
मग म्हणे गुरु द्रोण । काय दिसतें सांग पां ॥ ८४ ॥
येरु म्हणे कीराचे कंठीं । तीन रेषा दिसती दृष्टीं ।
आज्ञा द्यावी मज श्रेष्ठीं । मध्यरेषा भेदितों ॥ ८५ ॥
हूं म्हणतांच गुरुवर । अर्जुनें तत्काल सोडिला शर ।
मध्यरेषा भेदून कीर । धरणीवरी पाडिला ॥ ८६ ॥
संधानीं बैसला हस्त । देखोन गुरु अलिंगत ।
भला रे भला वीर पार्थ । पाठ थापटी संतोषें ॥ ८७ ॥
गंगें स्नान करितां गुरु द्रोण । महाजलचरें धरिले चरण ।
कंठापर्यंत गिळिला जाण । सर्वांगालागून गुरु सांगे ॥ ८८ ॥
म्हणे हा मगर मारुन येधवां । पुत्रहो मज सोडवा ।
ऐसें समस्त ऐकती तेधवां । परि जलीं न प्रवेशे कोणीही ॥ ८९ ॥
एक कौरव आड लपती । एक तेथेंच शस्त्रें सांडिती ।
मग हांक मारी गुरुमुर्ती । धांवें अर्जुना सोडवीं मज ॥ ९० ॥
घेऊनिया धनुष्यबाण । लगबगें धांविन्नला अर्जुन ।
उदकांत बुडी देऊन । शिशुमार तो छेदिला ॥ ९१ ॥
गुरुस ढका न लागतां पूर्ण । त्यासीच भेदिले पांच बाण ।
पृष्ठीं घेऊन गुरु द्रोण । जलाबाहेर आणिला ॥ ९२ ॥
गुरु म्हणे धन्य कुंती माउली । तुजचि एका प्रसवली ।
गजेंद्रास सोडवी वनमाली । केली तैसी ख्याति तुवां ॥ ९३ ॥
प्रसन्न जाहला गुरु द्रोण । ब्रह्यशिर जय अभिधान ।
सबीजमंत्र सांगोन । अस्त्र दिधलें अर्जुना ॥ ९४ ॥
ज्याचें प्रतापतेज अद्भुत । साहूं न शके कृतांत ।
ब्रह्मांड ग्रासील समस्त । क्षणमात्र न लागतां ॥ ९५ ॥
द्रोण म्हणे ते क्षणीं । वीरचक्रचूडामणी ।
हें अस्त्र रक्षीं बहुप्रयत्नीं । सोमवंशविजयध्वजा ॥ ९६ ॥
मग पार्थास करीं धरुन । सभेस आला गुरु द्रोण ।
भीष्म धृतराष्ट्रांलागून । आज्ञापीत तेधवां ॥ ९७ ॥
विद्या कुमारांसी जाहली पूर्ण । त्यांची परीक्षा पहा बैसोन ।
रंगागार एक निर्मून । समस्त मिळा एकदा ॥ ९८ ॥
मग प्रधानास सांगून गंगाकुमार । बोलावूनि चतुर सूत्रधार ।
रंगधाम निर्मिलें सुंदर । विद्यापरीक्षा पहावया ॥ ९९ ॥
पुढीलवृक्षगुल्में तोडून । भूमिका केली अवघी समान ।
भूमिदैवतें शांतवून । बलिदानें समर्पिलीं ॥ १०० ॥
रथ गज तुरंग सबल । फिरावया स्थल केलें विशाल ।
विद्युल्लतेसारिखे चपल । तळपती वीर ते ठायीं ॥ १०१ ॥
चंदन कर्पूर कस्तुरी चूर्ण । मृत्तिकेमाजी मिश्र करुन ।
सुवासिक केली संपूर्ण । बाहूस लावून पिटावया ॥ १०२ ॥
नवरत्नमंडित मंडप गुणी । उंच निर्मिला शतखणी ।
ऋषि राजे प्रजा येऊनी । पहावयासी बैसले ॥ १०३ ॥
सोमकांतसूर्यकांतपाषाणी । सभा रचिली तये क्षणीं ।
स्फटिकांच्या श्रेणी । झळकती सूर्यासारिख्या ॥ १०४ ॥
सुवर्णाचे तुळवट । हिर्यांचे खांब सदट ।
गरुडपाचूंचे दांडे नीट । किलचा तेथें माणिकांच्या ॥ १०५ ॥
असो दिव्यास्तरणें घालून । सुमुहूर्तें बैसले येऊन ।
प्रज्ञाचक्षु गंगानंदन । कृपाचार्य शिष्यांसीं ॥ १०६ ॥
बाल्हीक आणि विदुर । व्यास वैशंपायन शुकेंद्र ।
जैमिनी संजय ब्रह्मपुत्र । नारदस्वामी बैसले ॥ १०७ ॥
तों अकस्मात घनश्यामवर्ण । शुभ्रयज्ञोपवीत शुभ्रवसन ।
श्वेत पुष्पमाला घालून । शुभ्र चंदन चर्चिला ॥ १०८ ॥
शुभ्र हिर्यांचें पदक । मुक्तामाला रुळती देख ।
शिष्यांसहित सुरेख । द्रोनाचार्य पातला ॥ १०९ ॥
धृतराष्ट्र गंगानंदन । उठोनि देती अभ्युत्थान ।
श्रेष्ठासनीं बैसवून । केलें पूजन तेधवां ॥ ११० ॥
कुंती गांधारी असंख्य स्त्रिया । सबेसी पाहूं पातलिया ।
जेथें लाविल्या मुक्तजाळिया । आड बैसती पहावया ॥ १११ ॥
गजपुरींच्या प्रजा बहुत । नारी नर पातले तेथ ।
देशोदेशींचे नृप धांवत । परिवारांसीं पहावया ॥ ११२ ॥
बहुत ऋषींचे संभार । एके पंक्तीं बैसती समग्र ।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । चार्ही वर्ण पाहती ॥ ११३ ॥
तंतवितंतघनसुस्वर । लागले वाद्यांचे गजर ।
पातले महावीरांचे भार । शस्त्रास्त्रीं सिद्ध होऊनी ॥ ११४ ॥
कडाडिल्या महाशक्ती । तडक यंत्रांचे ध्वनि गाजती ।
महावीर हाका देती । बाहु पिटिती सत्राणें ॥ ११५ ॥
बळें ठोकिल्या राजभेरी । तो नाद न मावे अंबरीं ।
उर्वीमंडल थरारी । धाके अंतरीं भोगींद्र ॥ ११६ ॥
मग नमूनियां गुरु द्रोण । शस्त्रें पूजिलीं संपूर्ण ।
आरक्त पुष्पमाला घालून । रक्तचंदन चर्चिला ॥ ११७ ॥
आचार्याची आज्ञा घेऊन । दाविती शस्त्रविद्यासंधान ।
आवेशें करिती वीर गर्जन । नाद गगनीं न समावे ॥ ११८ ॥
अचूक वीरांचें संधान । संकेतें पाडिती विंधोन ।
एक झांकोनियां नयन । मग लक्ष्य भेदिती ॥ ११९ ॥
एक पाठमोरे विंधित । लक्ष्य भेदीत नेमस्त ।
शस्त्रमंत्राच्यां समस्त । विद्या दाविती खेळोनी ॥ १२० ॥
यमदंष्ट्रा अति तीक्ष्ण । भाले काठिया गुप्तिया जाण ।
कातिका शक्ति दारुण । खड्ग बाण सूरिया ॥ १२१ ॥
दशघ्नी शतघ्नी तिधारें पाशुपत । परशु पट्टिश दुधारें तळपत ।
पाश लहुडी वज्र तोमर झळकत । चक्रें चेंडु मुदगल गदा ॥ १२२ ॥
अर्गला सानखंडें भिंडिमाला । हस्तपाषाण लोहश्रृंखला ।
लोहवृश्चिक कंटकमाला । उल्हाटयंत्रें अचूक ॥ १२३ ॥
अस्त्रें सोडूनि आवरिती । जें अस्त्र धरिलें हातीं ।
त्याच अभिमानें तेच तळपती । गति दाविती विशेष ॥ १२४ ॥
रहंवरीं कुंजरीं बैसती रथीं । अलातचक्रवत फेरविती ।
एक चरणीं चमकती । गति दाविती अनेक ॥ १२५ ॥
एक जेठी अनिवार । करीं कदा न धरिती अस्त्र ।
शस्त्रासहित कर । मोडिती अकस्मात येऊनि ॥ १२६ ॥
पक्ष्यासारिखे येऊनी । अंगें टाकिती मोडूनी ।
शस्त्रें न्यावीं हिरोनी । मणगटें त्वरें मोडूनियां ॥ १२७ ॥
महाराज आचार्य द्रोणें । शिकविलीं नाना शस्त्रसाधनें ।
वीररस माजला तेणें । दिवस रजनी आठवेना ॥ १२८ ॥
तों हाक वाजली अत्यद्भुत । वाटे हृदयीं दचके कृतांत ।
सभा जाहली भयभीत । हाकेसरसी तयांच्या ॥ १२९ ॥
कीं दोघे आले ऐरावती । कें सिंहचि दोघे गर्जती ।
आरोळी ऐकोनियां चित्तीं । महावीर त्रासले ॥ १३० ॥
तों भीम आणि दुर्योधन । प्रचंड गदा हातीं घेऊन ।
विचित्र मंडलें दावून । बलें परजिती हस्तकीं ॥ १३१ ॥
मुखें गर्जना करुन । महीवरी पिटिती चरण ।
हुंकारें उफाळती पंचानन । तैसे दोघे अनिवार ॥ १३२ ॥
दशनीं चाविती अधर । आरक्तवर्ण जाहले नेत्र ।
श्म्श्रु पिळून सत्वर । पदें पुढारां टाकिती ॥ १३३ ॥
एक एकाचे प्राण । घ्यावया सिद्ध गदा उचलून ।
तों हाहाकार जाहला पूर्ण । महावीर गजबजले ॥ १३४ ॥
एक वर्णिती दुर्योधन । एक म्हणती धन्य भीमसेन ।
कृतांतही येऊन । उभा न राहे यांपुढें ॥ १३५ ॥
द्रोणें सांगितलें स्वपुत्रालागून । दोहीं करीं दोघे धरुन ।
आचार्यपदाची आण घालून । युद्ध त्यांचें वारावें ॥ १३६ ॥
विद्यापरीक्षा पहावयालागून । समारंभ केला कौतुकें जाण ।
तों तुम्हीं मांडिलें निर्वाण । प्राण घेऊं इच्छितां ॥ १३७ ॥
चातुर्यावीण विद्या सकल । क्षणांत होऊनि जाय विकल ।
समय पाहून भूपाल । कार्य आपुलें साधिती ॥ १३८ ॥
जेवीं एका मंत्रें करुन । दोन भुजंग आकळिजे दारुण ।
तैसे सुयोधन भीमसेन । आचार्यसुतें वारिले ॥ १३९ ॥
तों त्या रंगांत अकस्मात । जडित मुकुट शिरीं तळपत ।
जडित कुंडलें ओप देत । विद्युल्लतेसारिखीं ॥ १४० ॥
रत्नमंडित आभरणें । कटिमेखलेवरी दिव्य रत्नें ।
कनकवर्ण दिव्यवसनें । उजेड पडे सभेवरी ॥ १४१ ॥
रत्नजडित धनुष्य परिकर । शरें दाटले रत्नजडित तूणीर ।
आंगीं कवचतेज अपार । प्रलयचपलेसारिखें ॥ १४२ ॥
अकस्मात उगवे सहस्त्रकिरण । तैसा आला वीर अर्जुन ।
करीत आवेशें गर्जन । ऐकतां वीर खवळले ॥ १४३ ॥
धडकती वाद्यांचे कल्लोळ । संपूर्ण भरला ब्रह्मगोळ ।
पार्थाचें प्रतापबळ । भाट वर्णिती गर्जोनि ॥ १४४ ॥
धृतराष्ट्र पुसे विदुरालागून । गर्जत जैसा पंचानन ।
वाटे डळमळिलें त्रिभुवन । वीर हा कोण सांग पां ॥ १४५ ॥
विदुर म्हणे तुझा नंदन । कुंतीबाल धनंजय जाण ।
येरु म्हणे वंशभूषण । भीमार्जुन धन्य हे ॥ १४६ ॥
यानंतरें वीर पार्थ । शस्त्रास्त्रविद्या दावित ।
अग्न्यस्त्र त्वरें सोडित । शांतवीत पर्जन्यास्त्रें ॥ १४७ ॥
वरुणास्त्रें जललोट । वातास्त्रें प्रभंजन धुंधाट ।
भौमास्त्रें भूमीचें पोट । रथाशीं जावें भेदूनि ॥ १४८ ॥
काळे रात्रीं अंधार विशेष । सूर्यास्त्रें पाडी प्रकाश ।
सर्पास्त्रावरी खगेश । सोडून निवटी प्रतापें ॥ १४९ ॥
त्रिविक्रमतुल्य दिसे अर्जुन । सवेंच होय जेवीं वामन ।
सवेंचि दिसे सर्षपप्रमाण । अगोचर होय क्षणांत ॥ १५० ॥
पाताळा जाय क्षणांत । सवेंचि भूमंडलीं उमटत ।
क्षणांत रथावरी बैसत । तुरंगीं चढत न कळे केव्हां ॥ १५१ ॥
केव्हां बैसला कुजंरीं । दृष्टीस न ये झडकरी ।
अलातचक्राचियेपरी । कोणे दिशे ठेला न कळे तो ॥ १५२ ॥
लोहस्तंभावरी वराह फिरत । दंतांत जिव्हा लळलळित ।
खालीं पाहोन अकस्मात । जिव्हा छेदीत पार्थ पैं ॥ १५३ ॥
पुढें पाहोन मागें विंधी । खाली निरखून वरी भेदी ।
शिंगावरी ठेवून गुंज छेदी । ओवी वेगीं बाणमुद्रेंतून ॥ १५४ ॥
वामसव्य उभयहस्तकें । संधान चाले समान सारिखें ।
अंधारीं जेथें शब्द ऐके । शर मारी तेच ठायीं ॥ १५५ ॥
एके बाणेंकरुन । वटपत्रें पाडी छेदून ।
कार्य साधून बाण । परतोन आणीं माघारां ॥ १५६ ॥
सेवक धुंडिती जैसे तस्कर । तैविं शत्रु शोधिती शर ।
असो विधीनें निर्मिले अस्त्रमंत्र । अर्जुनें तितुकेही पर्णिले ॥ १५७ ॥
ऐसें अर्जुनाचें संधान । तटस्थ पाहती सभाजन ।
तों कृतांतकिंकाळीसमान । हांक बाहेर गाजली ॥ १५८ ॥
डळमळलें भूमंडल । वाटे तडकला कनकाचल ।
किंवा आटलें समुद्रजल । मेघ दचके अंतरीं ॥ १५९ ॥
उर्वी डळमळे क्षणोक्षणीं । उबा राहों न शके कोणी ।
महावीर शस्त्रपाणी । एकावरी एक पडियेले ॥ १६० ॥
तों महाधाडक उन्मत्त । रंगीं येऊन लोळत ।
दोर्दंड पिटितां लोक भावित । वीज आली सभेवरी ॥ १६१ ॥
बंधूंसमवेत सुयोधन । सामोरा जात उठोन ।
जैसा मध्यान्हीं चंडकिरण । तैसा कर्ण सभेस दिसे ॥ १६२ ॥
सूर्यपुत्र कर्ण उदार । ज्याशीं स्वरुपें उणा पंचशर ।
किरीटकुंडलें तेजाकार । वदनचंद्र न वर्णवे ॥ १६३ ॥
सौंदर्यसिंधु हेलावला पूर्ण । तैसा रणांगणीं उभा कर्ण ।
कृपाचार्यद्रोणचरण । वंदून उभा राहिला ॥ १६४ ॥
सभारंग पुनः दाटत । जैसा मेघ ओसरोन वर्षत ।
तैसा पार्थापाठीं अद्भुत । कर्नें रंग भरियेला ॥ १६५ ॥
कर्ण म्हणे ते वेळां । रे रे अर्जुना कुंतीबाळा ।
तुवां विद्या दाविल्या सकळा । त्यांचे चौगुणें दावीन मी ॥ १६६ ॥
श्लाघ्यता धरुं नको अंतरीं । गर्व सांडीं ये अवसरीं ।
अभिमानें तव शिर निर्धारीं । पायांतळीं माझिया ॥ १६७ ॥
अर्जुनें विद्या दाविली । त्याहून कर्णें विशेष केली ।
सुयोधनाचा आनंद ते काळीं । गगनमंडळीं न समावे ॥ १६८ ॥
तेव्हां कर्णाचिये कंठीं । दुर्योधन घाली मिठी ।
म्हने प्राणसखया गोष्टी । अज्ञापीं मज आवडे ते ॥ १६९ ॥
येरु म्हणे वाटतें मनी । पार्थाशी भिडावें समरांगणीं ।
सुयोधन म्हणे कालें करुनी । इच्छा पूर्ण होईल ॥ १७० ॥
करुन राज्याचा अर्धभाग समान । तुज म्यां दिधला प्रीतींकरुन ।
सहृदांच्या माथां पाय देऊन । भोग भोगीं मजाऐसे ॥ १७१ ॥
तवं क्रोधें बोलत अर्जुन । तो पुरुष शतमूर्ख पूर्ण ।
जो ईर्ष्या वाढवी कार्यावीण । धरुन अभिमान बोले जो ॥ १७२ ॥
पंचाननासन्मुख हस्ती । कुभंस्थळींचीं मुक्तें दाविती ।
कस्तूरीसुवास मिरविती । व्याघ्रापुढें हरिण जैसे ॥ १७३ ॥
कीं मद्यपी शस्त्रें झाडित । आपलें अंग आपण छेदित ।
तैसे अहंकारें उन्मत्त । क्षीण तुम्हीच व्हाल पैं ॥ १७४ ॥
आम्हांवरी गोष्टी घालून । कपटें बोलतां तीक्ष्ण ।
परि क्षणांत मस्तकें छेदून । धरातळीं पाडीन मी ॥ १७५ ॥
ऐसें बोलतां अर्जुन । युद्धास उभा ठाकला कर्ण ।
तो पांडव पांचही जण । सिद्ध झाले झुंजावया ॥ १७६ ॥
दुर्योधन बंधूंसहित । कर्णाचे पाठीं उभा ठाकत ।
द्रोण कृपाचार्य गंगासुत । पांडवांकडे जाहले ॥ १७७ ॥
सभा दोन भाग होता । तों भास्कर आणि पुरुहूत ।
अंतरिक्षीं कौतुक विलोकित । निजपुत्रांचें तेधवां ॥ १७८ ॥
युद्धासी कर्ण अर्जुन । उभे ठाकले जाणून ।
कुंतीहृदयीं चिंताग्न । परम दारुण पेटला ॥ १७९ ॥
मन जाहलें व्याकुल । नेत्रीं वाहे अश्रुजल ।
मुर्च्छना येत तात्काल । विदुर तेव्हां सांवरी ॥ १८० ॥
म्हणे चिंता नसे कांहीं । स्वस्थ होऊन कौतुक पाहीं ।
इकडे कृपाचार्य ते समयीं । काय गर्जोन बोलत ॥ १८१ ॥
सोमवंशमुकुटावतंस । पंडुनृपति विख्यात निर्दोष ।
त्याचा पुत्र अर्जुन विशेष । सर्वलक्षणीं परिपूर्ण ॥ १८२ ॥
कुंती माता वसुदेवभगिनी । आत म्हणे चक्रपाणी ।
तैसीं कर्णाचीं कुलें उच्चारा दोनी । ऐकती कर्णीं समस्त ॥ १८३ ॥
समसमान योग्यता बल । अर्जुनाशीं मांडावें सकल ।
ऐकतां कर्ण तत्काल । तेजहीन जाहला ॥ १८४ ॥
मग बोले सुयोधन । शौर्यबळें आगळा कर्ण ।
कय कुलाशीं कारण । विद्याभूषण थोर असे ॥ १८५ ॥
सुकुलीन परि विद्याहीन । काय व्यर्थ वांचोन ।
कृपाचार्या विपरीत वचन । वडील होऊन बोलसी ॥ १८६ ॥
राजा नोहे हा कर्ण । जरी म्हणत असेल अर्जुन ।
तरी अंगदेशाचा संपूर्ण । राजा करीन हा आंता ॥ १८७ ॥
सकल सामग्री आणून । कर्णास रत्नपीठीं वैसवून ।
समस्त राजचिन्हें देऊन । अभिषेक केला तेधवां ॥ १८८ ॥
मांडलिक रायांसी म्हणे सुयोधन । मजसमान मानून कर्ण ।
मेदिनी हातें स्पर्शोन । करा नमन उठा आतां ॥ १८९ ॥
समस्त करिती नमन । मग बोले उदार कर्ण ।
सुयोधना माग मजलागून । कांही तरी ये वेळे ॥ १९० ॥
दुर्योधन म्हणे राजोत्तमा । जोंवरी आयुष्य आहे तुम्हां आम्हां ।
तोंवरी मैत्री स्नेह प्रेमा । दिवसें दिवस वाढविजे ॥ १९१ ॥
अवश्य म्हणोन कर्ण । सव्यहस्त उचलून ।
दे दृढ भाषदान । तों राधारमण पातला ॥ १९२ ॥
राज्य आलें पुत्रासी । म्हणोन पातला वेगेंसीं ।
कर्णें उठोन त्यासी । नमस्कारिलें तेधवां ॥ १९३ ॥
मग मस्तक अवघ्राणून । पुत्रास दिधलें आलिंगन ।
तों उगा न राहे भीमसेन । काय गर्जोन बोलत ॥ १९४ ॥
म्हणे रथसारथि किरात । त्याचा तूं केवळ कर्ण सुत ।
आजि कळलें निश्चित । उभयकुलीं शुद्ध तूं ॥ १९५ ॥
तुवांही रथसारथ्य करावें । क्षत्रियधर्मी कासया व्हावें ।
अर्जुनाशीं द्वंद्वयुद्ध करावें । मनीं धरिशी मतिमंदा ॥ १९६ ॥
राजहंसाशीं काग देख । कीं श्रोत्रियासंमुख हिंसक ।
कीं महिषापुढें मशक । अर्जुनापुढें तैसा तूं ॥ १९७ ॥
तुजकाय राज्यासन । योग्य नव्हेशी अवर्ण ।
नट संन्यासी जाहला एक क्षण । परी तया कोणी वंदीना ॥ १९८ ॥
ऐसें बोलतां भीमसेन । करकरां दांत खाय कर्ण ।
अवलोकून चंडकिरण । कुंतीकडे पाहतसे ॥ १९९ ॥
म्हणे सभेंत बैसून । कोणासी काय बोलावें वचन ।
हें ज्यासी न कळे पूर्ण । मनुष्य कोण म्हणे तया ॥ २०० ॥
ऋषि नदी नृप शूर । यांचा शोध न कीजे समग्र ।
मुखें निंदा करी तो निर्धार । महाकंटक जाणावा ॥ २०१ ॥
वृक्षमूलीं दृष्टि न घालून । फलीं ठेविजे चित्त पूर्ण ।
मिलिंद कर्दम सोडून । सुवास घेती कमलांचा ॥ २०२ ॥
केसरी जन्मेल अजेचे पोटीं । हे कालत्रयीं न घडे गोष्टी ।
हनुमंत केवळ धूर्जटी । तो काय वानर म्हणावा ॥ २०३ ॥
मुंगीचिया विवरांत । कैसा सामावेल ऐरावत ।
तैसा नीचक्षेत्रीं मी सूर्यसुत । निपजेन कैसा नेणा तुम्ही ॥ २०४ ॥
समुद्रवलयांकित धरणी । ओवाळावी नखावरुनी ।
तेथें अंगराज्यास कोण गणी । नेणा मनीं मूर्ख हो ॥ २०५ ॥
ऐसें बोलता वीर कर्ण । गदा सांवरी भीमसेन ।
तों सभा खळबळली संपूर्ण । हाहाकार जाहला ॥ २०६ ॥
अर्जुनाचे भयेंकरुनी । कौरव उभे कर्णास वेष्टूनी ।
तों वरुणदिग्वधूचे सदनीं । सहत्रकिरण प्रवेशला ॥ २०७ ॥
संध्याकाल जाणून । ते संधींत उठला गुरु द्रोण ।
कर्ण आणि भीमसेन । दोघे वारिले दों पक्षीं ॥ २०८ ॥
प्रलयीं जैसा फुटे समुद्र । तैसी सभा उठिली समग्र ।
आपुलाल्या स्थला सत्वर । नर नारी जाती तेव्हां ॥ २०९ ॥
एक वर्णिती दुर्योधन कर्ण । एक म्हणती धन्य भीमार्जुन ।
एक म्हणती कलह दारुण । होतहोतां वारला ॥ २१० ॥
कुंतीस आनंद जाहला पूर्ण । कलह वारला म्हणोन ।
वंदी विदुराचे चरण । म्हणे धन्य धन्य ज्ञानी तूं ॥ २११ ॥
गुरुस गुरुदक्षिणा यथार्थ । देईल आतां वीर पार्थ ।
धरुन आणील नृपनाथ । द्रुपद पांचालदेशींचा ॥ २१२ ॥
तें पंडित चतुर जन । ब्रह्मानंदें करोत श्रवण ।
श्रीधर संतांचा दीन । चातुर्यसाहित्य नेणेचि ॥ २१३ ॥
परी दयालु ब्रह्मानंद सत्य । तेणें मस्तकीं ठेविला हस्त ।
त्या वर प्रसादें श्रीधर बोलत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ २१४ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । नवमाध्यायीं कथियेला ॥ २१५ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
विद्यापरीक्षा समस्त । कर्णाभिषेचन कथियेलें ॥ २१६ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
अध्याय नववा समाप्त
GO TOP
|