श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय सातवा
कौरव आणि पांडव यांची जन्मकथा
श्रीगणेशायनमः ॥
पुण्य तोय गुहा गुण । अप्रमेय चारही वस्तु पूर्ण ।
भारत समुद्र मेरु नारायण । अंत न कळे शोधितां ॥ १ ॥
जनमेजय म्हणे वैशंपायना । विचित्रवीर्याच्या अंगना ।
तिघे पुत्र प्रसवल्या जाणा । पुढें रचना बोलें कैशी ॥ २ ॥
येरु म्हणे तिघे पुत्र । व्यासवीर्यं परम चतुर ।
शास्त्रविद्याभ्यास अपार । भीष्म करवी तयातें ॥ ३ ॥
पंडु धृतराष्ट्र दोघे जण । झाले वेदशास्त्रप्रवीण ।
सकल विद्येमध्यें निपुण । विदुर ज्ञानी साधु तो ॥ ४ ॥
चौदा विद्या चौसष्ट कला । धनुर्वेद मंत्रमाला ।
अस्त्रविद्यागुणागळा । पंडुराज निपुण तो ॥ ५ ॥
यथाकालीं मेघ वर्षती । अष्टादश धान्यें पिकती ।
वृक्षीं सदा फळें विराजती । नाहीं गणती उद्यानां ॥ ६ ॥
त्रिकाल गायींस क्षीर । शोधितां तिळमात्र नाहीं दरिद्र ।
आधिव्याधिरहित समग्र । प्रजा अपार सुखी सदा ॥ ७ ॥
चारी आश्रम चारी वर्ण । स्वविद्येंत सकल निपुण ।
कोणासही नसे मरण । हरिकीर्तन घरोघरीं ॥ ८ ॥
वेदशास्त्रध्वनी । ब्राह्मण गर्जती अनुदिनीं ।
पतिव्रता सकल कामिनी । पुरुष स्वपत्नीरत सदा ॥ ९ ॥
प्रजा ऋषि प्रधान उत्तम । त्यांसी पुसे एकांती भीष्म ।
राज्यास योग्य परम । कोण असे सांगा पां ॥ १० ॥
अंधत्वें उणा धृतराष्ट्र । क्षेत्रविरुद्ध उणा विदुर ।
सकल म्हणती राज्याधिकार । पंडुरायासि देईजे ॥ ११ ॥
सर्व विषयीं चतुर विदुर । भीष्म पुसे क्षणोक्षणीं विचार ।
कनिष्ठ म्हणोनि अव्हेर । सहसाही करीना ॥ १२ ॥
तिन्ही प्रबुद्ध झाले तरुण । आतां करावें यांचें लग्न ।
सकलकर्ता गंगानंदन । विचार करी विदुराशीं ॥ १३ ॥
चित्रपटीं रेखिल्या तिघी जणी । बहुत वाखाणिल्या विचक्षणीं ।
एक गांधारी सौबलनंदिनी । वसुदेवभगिनी कुंती दुजी ॥ १४ ॥
मद्रदुहिता माद्री । तिघी विख्यात पृथ्वीवरी ।
विदुर म्हणे माझे विचारीं । योग्य तिघी याच पैं ॥ १५ ॥
भीष्मासी सांगती ऋषीश्वर । गांधारीनें अर्चिला अपर्णावर ।
शतपुत्र होतील निर्धार । दिधला वर त्रिनेत्रें ॥ १६ ॥
भीष्म ऐकतां संतोषत । म्हणे वंशवृद्धि व्हावी बहुत ।
प्रज्ञाचक्षुतें निश्चित । भार्या तीच करावी ॥ १७ ॥
पुरोहित सुबुद्ध पाठविला । गांधार नृपतीस भेटला ।
भीष्मवाक्य राव ते वेळां । शिरीं वंदी आवडीं ॥ १८ ॥
अंधत्वदोष धरुन चित्तें । कन्या नेमिली धृतराष्ट्रातें ।
गांधारीनें ऐकतां गोष्टी ते । पट नेत्रांतें बांधिला ॥ १९ ॥
सेनेसहित शकुनी । रथी बैसवून आपुली भगिनी ।
कुंजरपुरा नेऊनी । देत सुलग्नीं अंधातें ॥ २० ॥
चार दिवस उत्साह थोर । याचक सुखी केले अपार ।
आंदण दिधलें साचार । कुबेरसंपत्तीसारिखें ॥ २१ ॥
परम पतिव्रता गांधारी । सौंदर्यासी उण्या निर्जरनारी ।
पतिसेवेसी सादर अहोरात्रीं । वाढवी प्रीति विशेष ॥ २२ ॥
शूरसेन वसुदेवपिता । कुंती जाण तयाची दुहिता ।
स्नेहवादें कन्या तत्वतां । पंडुराया दिधली ती ॥ २३ ॥
पितृगृहीं असतां कुंती । तों उदय पावला भाग्यगभस्ती ।
अनुसूयानंदन गृहाप्रती । दुर्वासमुनि पातला ॥ २४ ॥
कुंतिभोजें राहविला मंदिरीं । कुंती सेवा करी अहोरात्रीं ।
जें जें मागे जे अवसरीं । तें तें देऊनि तोषवित ॥ २५ ॥
संतोषोनि अत्रिपुत्र । कुंतीस ओपिले पाच मंत्र ।
कर्णीं सांगोनि पवित्र । मस्तकीं हात ठेविला ॥ २६ ॥
आपत्काल होतां प्राप्त । पंचमंत्रस्वरुपें दैवत ।
दिव्य तेजें प्रकटत । पुत्र देती स्वरेते ॥ २७ ॥
मित्र वैवस्वत पवन । बिडौजा अश्विनीकुमार पांच जण ।
ज्याचें करिसी आवाहन । होईल प्रसन्न दैवत तें ॥ २८ ॥
न्यास बीज प्रणव ध्यान । हृदयीं धरी कुंती आपण ।
लोभी जीवेंसीं आवरी धन । तेवीं जतन करीं सदा ॥ २९ ॥
आश्रामास गेला दुर्वासमुनी । एके पर्वकाळीं देवतटिनी - ।
तीरा आली कुंतीभोजनंदिनी । दुजें कोणी नसे तेथें ॥ ३० ॥
म्हणें मंत्राची पहावी प्रतीत । जपें आव्हानिला आदित्य ।
तों प्रत्यक्ष सविता मूर्तिमंत । उभा ठाकला तत्काल ॥ ३१ ॥
अर्क म्हणे कुरंगनयनी । कां पाचारिले नितंबिनी ।
येरी घाबरली अधोवदनी । मंजुळ वाणी बोलत ॥ ३२ ॥
कोणासही न कळत । मज भोग देऊन व्हावें गुप्त ।
न भंगावें कुमारित्व । न व्हावें श्रुत उभयपक्षीं ॥ ३३ ॥
कुंतीस म्हणे आदित्य । गांठीं पुण्याचे महापर्वत ।
तेव्हां माझे दर्शन होत । भाग्य अद्भुत तुझें हो ॥ ३४ ॥
माझा संग होतां जाण । कुमारित्व न भंगे पूर्ण ।
पुढें महाभूभुज येऊन । तुज वरील आदरें ॥ ३५ ॥
मग कुंतीस दिधली भेटी । सुरतानंदें पडिली मिठी ।
पुत्र उपजला तात्काळ पोटीं । प्रतिसूर्य दुसरा तो ॥ ३६ ॥
किरीटकुंडलें कटीं मेखळा । सर्वभूषणीं तेजागळा ।
सुवर्णकवच स्वयंभू लेइला । तेज दश दिशा न समाये ॥ ३७ ॥
भय आणि संतोष । कुंतीआंगीं उपजे विशेष ।
स्वस्थाना गेला चंडांश । साशंकित कुंती मनीं ॥ ३८ ॥
बाल टाकूनि गंगाजलीं । कुंती पितृसदनीं प्रवेशली ।
इकडे बाल न बुडे कदाकाळीं । रक्षिती झाली जान्हवी स्वयें ॥ ३९ ॥
उत्तंग लहरी उसळत । त्यांशींच बाल असे खेळत ।
तों राधापति किरात । प्रीतीनें उचली तयातें ॥ ४० ॥
कडिये घेतला बाल सत्वर । उचंबळला स्नेहसमुद्र ।
रुंजी घालिती नेत्रभ्रमर । मुखकमळीं तयाच्या ॥ ४१ ॥
पाहतां बाळकाच्या वदना । धणी न पुरे किरातनयना ।
बोलावूनि आपली राधा अंगना । ओटीं घातला तियेच्या ॥ ४२ ॥
राधेनें पाळिला आर्तें । म्हणोनि राधेय म्हणती तयातें ।
वसुसेन नाम किरातें । ठेविलें अति आवडीं ॥ ४३ ॥
साक्षात्कारेंकरुन । ऋषि करविती वेदाध्ययन ।
धनुर्वेद शिकला पूर्ण । झाला निपुण वेदशास्त्रीं ॥ ४४ ॥
अर्जुनापासोनि न व्हावा मृत्य । ऐसे जाणोनि आदित्य ।
सूर्योपस्थानमंत्र जपत । प्रकटे अर्क त्यापुढें ॥ ४५ ॥
कर्णाचे कर्णीं मित्र सांगत । तूं सूर्योपस्थान जपीं नित्य ।
याचक देखतां त्वरित । उदार होईं सर्वस्वें ॥ ४६ ॥
परि अंगी कवच जडलें अहर्निशीं । तें सहसा नेदीं कोणासी ।
शत्रुशस्त्रें निश्चयेंसीं । मरण तुज नव्हे कदा ॥ ४७ ॥
ऐसें सांगोनि ते वेळीं । स्वस्थळा गेला अंशुमाळी ।
असो महाउदार कर्ण बळी । सूर्योपासक निश्चयें ॥ ४८ ॥
आपुला पुत्र जो पार्थ । इंद्र धरुनि त्याचा स्वार्थ ।
अनुष्ठानीं बैसतां सूर्यसुत । आला त्यातें छळावया ॥ ४९ ॥
ब्राह्मणरुप धरुन मघवा । म्हणे कर्णराया सुदैवा ।
दीनवचनें मागतों एधवां । कवच देईं अंगीचें ॥ ५० ॥
दधीचि निजास्थि देत । कपोत्यास शिबी मांस अर्पित ।
त्याहूनि तूं दाता अद्भुत । देईं कवच अक्षय्य ॥ ५१ ॥
ऐसें ऐकतां वचन । महाराज उदार तो अर्कनंदन ।
त्वचेसहित कवच काढून । ब्राह्मणासी दिधलें ॥ ५२ ॥
आश्चर्य करी निर्जरपती । प्रसन्न होऊनि दिधली दिव्य शक्ती ।
म्हणे संकट मांडल्या प्राणांतीं । समरांगणीं प्रेरावी ॥ ५३ ॥
ऐसें बोलोनि देवराणा । गेला आपुले स्वस्थाना ।
कर्णाचिया उदारपणा । तुलना नाहीं त्रिभुवनीं ॥ ५४ ॥
मंत्रें अस्त्रें शस्त्रें मंडित । दुजा नाहीं रणपंडित ।
धनुर्धरांमाजी विख्यात । जामदग्न्यासारिखा ॥ ५५ ॥
जयाचें सौंदर्य पाहतां अद्भुत । लाजोनि जाय रतिकांत ।
चंद्र अधोवदन होत । कर्णस्वरुप देखोनी ॥ ५६ ॥
स्त्रियांनी दृष्टीं देखतां कर्ण । अंगी तत्काळ द्रवे मदन ।
उपमेस एक रुक्मिणीरमण । मग दुसरा नसेची ॥ ५७ ॥
क्षत्रियांसी विद्यादान । कदा नेदी जामदग्न्य ।
धनुर्वेद पहावया पूर्ण । कर्ण गेला विप्ररुपें ॥ ५८ ॥
नमस्कारुनि ते काळीं । पुढें उभा बद्धांजळी ।
रेणुकानंदन म्हणे ते वेळीं । बोले वर्ण कोण तुझा ॥ ५९ ॥
येरु म्हणे मी श्रेष्ठवर्ण देख । राहें म्हणे भृगुकुलतिलक ।
कविगुरुसमान त्याचा तर्क । विद्या सकळिक शिकला तो ॥ ६० ॥
इंद्र चिंता करी मनांत । पार्थासी करील हा पुढें अनर्थ ।
अपाय योजी अमरनाथ । तों अपूर्व वर्तलें ॥ ६१ ॥
एकदा कर्णाचे अंकीं देख । शिर ठेवूनि निजतां क्षत्रियांतक ।
निद्रा लागली मुहुर्त एक । तों शचीनायक पातला ॥ ६२ ॥
खालीं भ्रमर होऊन ते अवसरीं । काष्ठवत कर्णाची मांडी कोरी ।
रक्तप्रवाह चालिला धरणीवरी । परी न हाले अणुमात्र ॥ ६३ ॥
मांडी अवघी कोरुन क्षोभें । भार्गवाच्या कर्णास झोंबे ।
जागा झाला सवेगें । तों रक्तप्रवाह देखिला ॥ ६४ ॥
कर्णास म्हणे एवढा धीर । धरिलासी तूं नव्हसी भुसुर ।
महाक्षत्रिय समरधीर । नाम सांग आपुलें ॥ ६५ ॥
येरु म्हणे मी वीर कर्ण । मग म्हणे मी रेणुकानंदन ।
तुझे कीर्तीनें भरेल त्रिभुवन । उदारपण अगाध ॥ ६६ ॥
क्षत्रियांसी विद्या पाहीं । मी सर्वथा देत नाहीं ।
तूं चोरुन शिकलासि सर्वही । परी शेवटीं निष्फल ॥ ६७ ॥
तुझी विद्या मिरवेल सर्वां ठायीं । परी पर्थापुढें निष्फळ सर्वही ।
आज्ञा मागूनि कर्ण लवलाहीं । स्वस्थलासी पातला ॥ ६८ ॥
सिंहावलोकनेंकरुन । मागील पहा कथानुसंधान ।
पंडूचें आरंभिलें लग्न । ऐका कथानक श्रोते हो ॥ ६९ ॥
जो पद्मनाभ पद्मजजनक । त्याचे पदपद्मीं उद्भवली सुरेख ।
तिचा तनय देवव्रत देख । विचार करी विदुराशीं ॥ ७० ॥
कुंतिभोजापाशीं ब्राह्मण । साधावया लग्न कारण ।
पाठवीत गंगानंदन । सुलग्नमुहूर्त पाहोनी ॥ ७१ ॥
कुंतिभोजास भेटला विप्र । सांगे सर्वही समाचार ।
म्हणे धन्य भाग्य साचार । पंडु जामात जाहला ॥ ७२ ॥
वसुदेवपिता शूरसेन । कुंतीस गेला घेऊन ।
पंडूसहित गंगानंदन । तेथें आला दळभारें ॥ ७३ ॥
विधियुक्त जाहलें लग्न । दिधले अपार आंदण ।
हस्तनापुरा परतोन । वोहरें घेऊन पातला ॥ ७४ ॥
यावरी पंडूस अंगना दुसरी । भीष्म करीत ते अवसरीं ।
मद्ररायाची माद्री । परम सुंदर पृथ्वींत ॥ ७५ ॥
भीष्मेम पाठविला पुरोहित । कन्येसहित मद्रनाथ ।
गजपुरास येऊनि त्वरित । विधीयुक्त लग्न केलें पैं ॥ ७६ ॥
विदुरानुमतें गंगानंदन । अश्वमेध आरंभी यज्ञ ।
अपार दळभार घेऊन । पंडु चालिला दिग्विजया ॥ ७७ ॥
जगतीस सेनावसन । नेसवूनि जिंकी संपूर्ण ।
भीष्मभयेंकरुन । करभार देती भूभुज ॥ ७८ ॥
छप्पन्न देशींचे राजे सहज । जिंकीत जात पंडुराज ।
कोणी युद्धासी बांधिती पैज । हारी येतां भेटती ॥ ७९ ॥
कोणी नामप्रताप ऐकोन । अगोदर भेटती येऊन ।
आनर्तदेशींचा नृप पूर्ण । बलभीम जिंकिला ॥ ८० ॥
शाकलद्वीपींचा प्रतिधान । गंधर्वदेश जिंकिला संपूर्ण ।
सवालक्ष प्रर्वत घेऊन । राजे सांगातें चालविले ॥ ८१ ॥
हिमवंत श्वेतपर्वत । किंपुरुषखंड जिंकिलें समस्त ।
गोरक्षपर्वत सुवर्ण प्रसवत । द्रव्य अमित मेळविलें ॥ ८२ ॥
जेथींचा पाट निश्चित । शरयु अयोध्येपुढें विराजित ।
तें मानससरोवर अद्भुत । पंडु विस्मित देखतां ॥ ८३ ॥
दिव्य रत्नांच्या खाणी तेथ । प्रवालवल्ली तेजें अद्भुत ।
गजमौक्तिकें पसरलीं बहुत । जेवीं गगनीं उडुगण ॥ ८४ ॥
करिशावक खेळती । कस्तुरीमृग विराजती ।
कर्पूरकदली डोलती । कोकिला कूजती सुस्वरें ॥ ८५ ॥
ज्यास जी आवडे वस्त । ती अवश्य घ्यावी तेथ ।
सागरवलयांकित पृथ्वी समस्त । पंडुनृपनाथें जिंकली ॥ ८६ ॥
एवं दिग्विजय करुन समस्त । गजपुरा आला पंडुनृपनाथ ।
दलभारेंसीं गंगासुत । भेटावया जात सामोरा ॥ ८७ ॥
समोर देखतां देवव्रत । पंडु रथाखालीं उतरत ।
भीष्माचीं पदाब्जें नमित । आलिंगीत आवडीं ॥ ८८ ॥
पंडूसहित देवव्रत । मिरवत आले गजपुरांत ।
सत्यवतीस नमून सांगत । वर्तमान सर्वही ॥ ८९ ॥
द्रव्य रत्नें अलंकार । वस्तु आणिल्या अपार ।
नगरांत न मावे मग बाहेर । पर्वताकार रचिल्या ॥ ९० ॥
मग धृतराष्ट्राचे हातीं । शत याग करवी पंडुनृपती ।
तो पसरा सांगतां नाहीं मिती । पुढें ग्रंथ परिसिजे ॥ ९१ ॥
यावरी पंडुनृपनाथ । उभयदारांसमवेत ।
मृगयामिषें वास करित । काननामाजीं स्वेच्छेनें ॥ ९२ ॥
हिमवंत गिरीचे पाठारीं । कितीएक दिवस वास करी ।
उभयदारांसमवेत कांतारीं । क्रीडाकौतुकें विचरत ॥ ९३ ॥
भोगसामग्री समस्त । प्रज्ञाचक्षु पुरवित ।
लेह्य पेय खाद्य चोष्य बहुत । भक्ष्य भोज्य षड्रस पैं ॥ ९४ ॥
शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध । हीं चतुर्विध अन्नें प्रसिद्ध ।
धृतराष्ट्र पाठवी करुन सिद्ध । दूताहाती सर्वथा ॥ ९५ ॥
महापार्श्वराजनंदिनी । भीष्में आदरें आणोनी ।
विदुरास केली पत्नी । यथासांग विवाहें ॥ ९६ ॥
तिचे पोटी परम चतुर । विनयनामा जाहला कुमार ।
पितयातुल्य विवेकसमुद्र । सारासारजाणता ॥ ९७ ॥
धृतराष्ट्रासी शतपुत्र । होते जाहले महावीर ।
वेश्यागर्भीं जन्मला निर्धार । युयुत्सु यांचे वेगळा ॥ ९८ ॥
पंचदेववीर्यें वनांत । पंडूस जाहले पांच सुत ।
धृतराष्ट्रासी एक शत । एकदा जाहले ॥ ९९ ॥
जनमेजय म्हणे वैशंपायना । तीक्ष्णप्रज्ञाकुठारधारणा ।
संशयकाननखंडना । कथा कैशी सांग पां ॥ १०० ॥
एकदाच शत पुत्र गांधारी । कैशी प्रसवली कोणे परी ।
पंच पुत्र कुंतीच्या उदरीं । देव कैसे अवतरले ॥ १०१ ॥
मग म्हणे वैशंपायन । एकदा गांधारीची भक्ति देखोन ।
प्रसन्न जाहला कृष्णद्वैपायन । म्हणे शत पुत्र तुज होतील ॥ १०२ ॥
व्यास वदोन गेलियावरी । गर्भिणी जाहली गांधारी ।
पंचविंशति मासांभीतरी । प्रसूत नोहे सर्वथा ॥ १०३ ॥
तों वार्ता सांगती विप्र । कुंतीस जाहला पुत्र युधिष्ठिर ।
जैसा उदयाचळीं बाळमित्र । तेवीं तेजस्वी जन्मला ॥ १०४ ॥
ऐसें ऐकतां गांधारी । ईर्षा उपजली अंतरीं ।
अंधास न कळतां निर्धारीं । उदर ताडीत पाषाणें ॥ १०५ ॥
तों लवथवीत रक्तवर्ण । पिशवी पडली पोटांतून ।
जाहलें देखोनि गर्भपतन । सौबले रडे आक्रोशें ॥ १०६ ॥
झाला थोर आकांत । तों व्यास पातला अकस्मात ।
म्हणे माझें वचन नव्हे व्यर्थ । चिंताग्रस्त होऊं नको ॥ १०७ ॥
उदकें पिशवी प्रोक्षित । तों शत भाग जाहले तेथ ।
फणसगर्भींचे गरे निघत । तैसे निवडत वेगळाले ॥ १०८ ॥
अंगुष्ठपर्वप्रमाण । शतकुंभीं घृत भरुन ।
त्यांत घातले भिन्न भिन्न । व्यासदेवाचे आज्ञेनें ॥ १०९ ॥
तंव शतपुत्रांवरी । त्यांत एक निघाली कुमारी ।
दुःशीला नामें निर्धारीं । परमप्रिय सर्वांतें ॥ ११० ॥
व्यासदेवें मंत्रून । एकांती कुंभ ठेविले नेऊन ।
कुंभाप्र्ति दीप ठेवून । रक्षणा नारी बैसविल्या ॥ १११ ॥
नऊ मास भरतां पूर्ण । प्रथम उपजला दुर्योधन ।
रासभध्वनिऐसा पूर्ण । टाहो फोडिला ते काळीं ॥ ११२ ॥
मेघ वर्षे रक्तधारीं । प्रळयवायु सुटला ते अवसरीं ।
थरथरां कांपे धरित्री । आले शहारे जनांतें ॥ ११३ ॥
दिग्दाह होत कैसा । धुंधरल्या दशदिशा ।
दिवाभीतें बोभाती दिवसा । श्वाने रडती दीर्घ स्वरें ॥ ११४ ॥
रासभस्वर ऐकतां ते अवसरीं । अवघीं रासभें बाहती नगरीं ।
भालू भुंकती वोखटे स्वरीं । गजपुरी हलकल्लोळ ॥ ११५ ॥
भविष्य सांगती ऋषी सकळी । वडील सुत सर्वांचे मूळीं ।
करील स्ववंशाची होळी । सकळ रायांसमवेत ॥ ११६ ॥
महाविष्णूशीं करील द्वेश । दीर्घ दुःख देईल वडिलांस ।
परमाग्रही तामस । कापट्यसागर दुरात्मा ॥ ११७ ॥
नायकेल श्रेष्ठांचें वचन । यावरी बोले विदुर सुजाण ।
प्रज्ञाचक्षो ऐकें पूर्ण । त्याग करीं जेष्ठाचा ॥ ११८ ॥
वांचवीणे असेल आपुले कुळ । तरी हा टाकावा चांडाळ ।
जैसा बोटासी डंखितां व्याळ । बोट तत्काळ खंडिती ॥ ११९ ॥
त्यागोनि मोह अनुमान । गंगाजळीं देई टाकून ।
सर्वाचें होईल कल्याण । आनंदघन लोक होती ॥ १२० ॥
दुर्योधनातें हृदयीं आलिंगोन । धृतराष्ट्र बोले गर्जोन ।
मी तुमचें वचन प्रमाण । कदापिही नायकें ॥ १२१ ॥
मुख्य धुर वडील नंदन । मी त्यावरुन ओंवाळीन प्राण ।
अरिष्टें उदेलीं तीं कालेंकरुन । शांत होतील आपेंआप ॥ १२२ ॥
असो दुर्योधन जन्मला ये रीतीं । मग एकामागे एक निपजती ।
परम पुष्ट बलाढय होती । धार्तराष्ट्र अवघे पैं ॥ १२३ ॥
गांधारी असतां गर्भीण । रायासी पीडित मीनकेतन ।
अंधें केले वेश्यागमन । तो युयुत्सु जन्मला ॥ १२४ ॥
असो इकडे पंडुराज वनीं । मृगया खेळतां दिव्य काननीं ।
.मृगमृगींसी सुखमैथुनीं । क्रीडतां विंधूनि पाडिलीं ॥ १२५ ॥
तंव तो कुरंगरुपें तापसी । पंडु धांवोनि आला त्यापाशीं ।
ऋषि म्हणे पापराशी । महा हिंसक पापिष्ठ तूं ॥ १२६ ॥
मैथुनीं गुंतला भोजनीं बैसला । कीं दुश्चिंत पाठमोरा निजला ।
त्यांसी वधितां लागला । क्षात्रधर्मा कलंक ॥ १२७ ॥
कुंरुंग करी हाहाकार । मी कर्दमनामा जाण विप्र ।
लोकशंकें साचार । मृगवेष धरियेला ॥ १२८ ॥
पूर्ण न होतां मैथुन । पापिया घेतलासी आमुचा प्राण ।
राजा म्हणे मी नेणोन । मृगें म्हणोनि वधियेलीं ॥ १२९ ॥
आमुच घेईं शाप दारुण । तुज स्त्रीसंग होतां येथून ।
तात्काळचि जातील प्राण । पळमात्र न लागतां ॥ १३० ॥
ऐसें बोलूनि दोघे जणीं । प्राण दिधले तेच क्षणीं ।
पंडुराज उद्विग्न मनीं । म्लान जाहला अति दुःखें ॥ १३१ ॥
ब्रह्महत्येचें पाप पूर्ण । वरी अंतरलें विषयमैथुन ।
दोघी स्त्रियांसी पाचारुन । वर्तमान सर्व सांगे ॥ १३२ ॥
आक्रोशें बोले नृपवर । मज कासया व्हावा राज्यभार ।
तुम्हां ऐशा स्त्रिया सुंदर । कासया मज आतां पैं ॥ १३३ ॥
मज काय आतां हस्तिनापुर । मज कासया वस्त्रालंकार ।
व्यर्थ गेला जन्मसंसार । नाहीं पुत्रसंतानही ॥ १३४ ॥
आतां तुम्हीं दोघीं नगरासी । जावें सत्यवतींपाशीं ।
अंबिका अंबालिका तेजोराशी । त्यांसमीप असावें ॥ १३५ ॥
भीष्म आणि विदुर । यांची सेवा करावी सादर ।
तुमचा आमचा निर्धार । ऋणानुबंध तुटला हो ॥ १३६ ॥
मी सेवीन दृढ कानन । देह अनुतापें दंडीन ।
पावेन परलोकसदन । तें साधन करीन मी ॥ १३७ ॥
तों कुतीं आणि माद्री । विनविती जोडिल्या करीं ।
आम्ही सेवा करुन अहोरात्रीं । जवळी राहूं शिष्यत्वें ॥ १३८ ॥
आम्ही दारा तूं कांत । हे भावना विसरुं समस्त ।
अष्टभोग त्यागूनि त्वरित । राहों सेवेसी शिष्यत्वें ॥ १३९ ॥
त्यांचें ऐकतां निश्चयवचन । अवश्य म्हणे अंबालिकानंदन ।
चित्रींचीं नारी नर जाण । तैशीं वर्तूं लागलीं ॥ १४० ॥
आपलीं वस्त्रें भूषणें समस्त । पंडु ब्राह्मणांस देत ।
जैसा चंपक सुमनें वर्षत । उदारत्वें पांथिकां ॥ १४१ ॥
वेष्टुनियां वल्कलांबर । भस्में चर्चिलें कलेवर ।
ऐसा देखूनि पंडुनृपवर । कुंती माद्री काय करिती ॥ १४२ ॥
आम्रवृक्ष आपुलीं । पाडा येतां फलें सकलीं ।
टाकी तैशीं काढलीं । वस्त्रें भुषणें सतींनीं ॥ १४३ ॥
पाचारुनि ऋषीश्वर । वांटिती वस्त्रालंकार ।
वेष्टूनियां वल्कलांबर । पतिसन्निध तिष्ठती ॥ १४४ ॥
चातुरंग दल बहुत । त्यासी आज्ञापी नृपनाथ ।
गजपुरा जाऊन समस्त । भीष्मधृतराष्ट्रांसी सांगिजे ॥ १४५ ॥
आमुचा ऐसा जाहला विचार । आपुला सांभाळा राज्यभार ।
आतां भेटी हेचि निर्धार । साधूं परत्र यावरी ॥ १४६ ॥
रोदन करित गेले समस्त । जाणविती भीष्मराष्ट्राप्रत ।
वर्षला एकचि आकांत । शोका अंत नाहीं तेथें ॥ १४७ ॥
इकडे घेऊनि उभय पत्नी । पंडु प्रवेशे महाकाननीं ।
वल्कलें वेष्टुनि तृणासनीं । शय्या करिती उघडीच ॥ १४८ ॥
नागेशगिरीश ओलांडून । विलोकिती चित्ररथवन ।
कालकूटगिरीवरी जाण । दारांसहित ओळंघला ॥ १४९ ॥
पुढें हिमाचलीं वास करिती । वाहे दुग्धवर्ण भागीरथी ।
जिच्या बिंदुमात्रें उद्धरती । महापातकी हिंसक ॥ १५० ॥
तेथें तापसाचें वृंद । ठायीं ठायीं होत आनंद ।
पुढें इंद्रद्युम्नसरोवर अगाध । पंडुराव पाहतसे ॥ १५१ ॥
पुढें स्वर्गासी लगटला । शतश्रृंगपर्वत देखिला ।
जेथें ऋषींचा वसे मेळा । वेदध्वनि गर्जत ॥ १५२ ॥
जेथें दिव्यवृक्षीं सदा फल । गंधर्व गायन निर्मल ।
जें ऐकतां मंजुल । पंचप्राण तोषती ॥ १५३ ॥
जेथें चंद्रसूर्यकांतपाषाण । विमानीं दिसती सुरगण ।
भूमिका सुवर्णासमान । नवरत्नांची वाळू जेथें ॥ १५४ ॥
जेथें मणिमय मंडप झळकती । अष्टनायका सदा क्रीडती ।
प्रत्यक्ष देवांच्या मूर्ती । येती जाती सर्वदा ॥ १५५ ॥
असो संतसंगती नृपनाथ । श्रवणमननें काल क्रमित ।
उभयकालीं होम देत । अतिथिपूजा यथाविधी ॥ १५६ ॥
देखोनि पंडूचें तप खडतर । ऋषि आश्चर्य करिती थोर ।
मोठा तपस्वी पंडु नृपवर । ब्रह्मर्षीसारिखा ॥ १५७ ॥
तपोबलेंकरुन वेगें । ऋषी चालिले स्वर्गमार्गें ।
पंडुराज त्यांचेनि संगें । चालें मागें हळूहळू ॥ १५८ ॥
ऋषी पंडूसी म्हणती समस्त । परम कठिण स्वर्गपथ ।
पुण्याचे महापर्वत । गांठीस तेणेंच चढावें ॥ १५९ ॥
येथें वाट न चाले मनपवनासी । तूं दारांसहित केविं येसी ।
त्याहीवरी निपुत्रिकासी । मार्ग सहसाही फुटेना ॥ १६० ॥
देव ऋषी दारा पितर । या चहूं ऋणांपासून मुक्त साचार ।
तोचि येथें चढेल नर । इतरां मार्ग न चले हा ॥ १६१ ॥
आता नाना उपाय करुन । वाढवीं आपुले संतान ।
जाहलें जैसें द्वैपायनापासून । जनन तुमचें त्यापरी ॥ १६२ ॥
उदरीं होतील सुत । ते सत्क्रिया आचरतील समस्त ।
मृगशापापासाव होशी मुक्त । मग स्वर्गपंथें चालसी ॥ १६३ ॥
ऐसें ऐकुन गजपुरपती । खेद पावला परम चित्तीं ।
नमस्कारुनि ऋषिपंक्ती । स्त्रियांसहित परतला ॥ १६४ ॥
एकांतवनीं बैसून । कुंतीप्रति बोले वचन ।
तूं महर्षीस प्रार्थून । संतती वाढवीं ममाज्ञें ॥ १६५ ॥
शंका न धरावी मनांत । आम्ही झालों व्यासापासून सुत ।
तैसेंच तूंही करीं त्वरित । तरीच मुक्त तुम्ही आम्ही ॥ १६६ ॥
शास्त्रीं सांगितले विचार । बहुपरींचे असती पुत्र ।
त्यांत ऋषिवीर्य पवित्र । दिव्यसुत उपजवीं ॥ १६७ ॥
कुंती म्हणे पितयाचे घरीं । मी असतां बालपणीं निर्धारीं ।
दुर्वासऋषीची सेवा करीं । पित्राज्ञेंकरुनियां ॥ १६८ ॥
सेवेनें संतोषला अत्रिपुत्र । मज दिधले पाचं मंत्र ।
पुढील भविष्य जाणता पवित्र । महा उदार ऋषि तो ॥ १६९ ॥
एका मंत्राची मी प्रचीत । पाहिली कुमारीदशेंत ।
प्रसन्न जाहला आदित्य । कर्ण तत्काल जन्मला ॥ १७० ॥
तो राधाचे घरीं वाढे पुत्र । आतां उरले चार मंत्र ।
तुमची आज्ञा होईल पवित्र । तरी बालकें जन्मवीन ॥ १७१ ॥
ऐसें ऐकता पंडुराज । हृदयीं धरिली तत्काल भाज ।
म्हणे तूंची उद्धरिसी मज । उभवीं ध्वज सोमवंशी ॥ १७२ ॥
दरिद्रियासी जोडलें धन । मरतियास अमृतपान ।
कीं जन्मांधासी आले नयन । तैसा पंडु संतोषला ॥ १७३ ॥
तृषाक्रांत सोडितां प्राण । मुखीं घालिजे शीतल जीवन ।
कीं दुष्काळीं मिळे मिष्टान्न । पंडु तैसा आनंदला ॥ १७४ ॥
असो ते पृथादेवी आपण । सारुनियां गंगास्नान ।
करुनि पंडुरायासी नमन । करी आवाहान धर्माचें ॥ १७५ ॥
आदरें जोडूनियां हात । नेत्र लावून मंत्र जपत ।
तंव सूर्यप्रभेसम अकस्मात । सूर्यसुत उतरला ॥ १७६ ॥
दिव्य अंग कनकवर्ण । कनककिरीट कनकवसन ।
कनकांगद ओप देती पूर्ण । कनकदंड कमलकरीं ॥ १७७ ॥
कुंती उदित देहदानीं । सुरतानंदें मिसळली दोन्ही ।
वीर्य पडतां तेच क्षणीं । युधिष्ठिर जन्मला ॥ १७८ ॥
देववाणी गगनीं गर्जत । सार्वभौम हा होईल सत्य ।
पुण्यश्लोक दयावंत । धर्मपुत्र धर्मात्मा ॥ १७९ ॥
गांधारी गर्भवती असता । वर्ष एक पूर्ण भरतां ।
धर्म जन्मला तत्वतां । कुंतीउदरीं अगोदर ॥ १८० ॥
तिथि वार नक्षत्र । शुभ करण योग पवित्र ।
सोमवंशी पंडुपुत्र । छत्रपति जन्मला ॥ १८१ ॥
धर्मराज देखोनि दृष्टी । पंडूच्या आनंद न समाये पोटीं ।
म्हणे यासी पाठिराखा उठाउठी । वल्लभे वेगें प्रसवें कीं ॥ १८२ ॥
यावरी वसुदेवभगिनी । वायुमंत्र जपे ते क्षणीं ।
लोकप्राणेश येऊनी । सुरतयुद्धा प्रवर्तला ॥ १८३ ॥
सुरत संपतां समग्र । पुत्र एक बलसमुद्र ।
तेजस्वी जैसा भास्कर । भीमसेन जन्मला ॥ १८४ ॥
मातृहस्तीं न मावे बाल । हातींचा निसटला तात्काल ।
खालीं पडतां सबल । शिला चूर्ण जाहली ॥ १८५ ॥
सिंहगर्जनाऐसा टाहो फोडित । कुंती थरथरां भयें कांपत ।
गगनीं देवभेरी गर्जत । पुष्पवृष्टि होत तेव्हां ॥ १८६ ॥
तों देववाणी गर्जत । बळिया बाळ पंडुसुत ।
पूर्वीं एक हनुमंत । भीमसेन दुसरा हा ॥ १८७ ॥
पूर्वीं ऐसा जाहला नाहीं । पुढें कदा न होय पाहीं ।
दैत्य राक्षस सर्वही । संहारील निजबलें ॥ १८८ ॥
याचे बलें सर्वेश्वर । उतरील सकळ भूभार ।
भविष्य ऐकोनि पंडुनृपवर । परमानंद पावला ॥ १८९ ॥
मग म्हणे अंगनेप्रती । आतां प्रार्थीं अमरपती ।
एक वर्षपर्यंत निश्चितीं । मी आराधीन इंद्रातें ॥ १९० ॥
ऊर्ध्व जोडोनिया पाणी । उभाराहिला एके चरणीं ।
पृथेसहित अनुष्ठानीं । एकवर्ष पर्यंत पैं ॥ १९१ ॥
मग प्रकटला देवराज । कां कामिनी बोलाविलें मज ।
येरी म्हणे पुत्र दे तेजःपुंज । कौसल्यादेवकींसारिखा ॥ १९२ ॥
पाकशासन म्हणे कुरंगनयनी । बोलसी त्याहून विशेष गुणी ।
उपमेसी एक चक्रपाणी । ऐसा पुत्र देईन ॥ १९३ ॥
कुंती आणि अमरपती । सुरतानंदीं निमग्न होती ।
तों नरेश्वर दिव्यमूर्ती । पार्थ जन्म पावला ॥ १९४ ॥
तों गंभीर गिरा गर्जत । आकाशवाणी बोलत ।
जैसा शास्त्रांमाजी वेदांत । तैसा पार्थ सोमवंशी ॥ १९५ ॥
नर आणि नारायण । द्विधारुपें रमारमण ।
भूभार उतरावयालागून । मृत्युलोकीं अवतरले ॥ १९६ ॥
पूर्वीं एक वीर भार्गव । दुसरा भूभुजावतार राघव ।
तैसा सोमवंशी नरपार्थिव । पार्थ वीर जाणिजे ॥ १९७ ॥
निवातकवच वधूनी । संतोषवील वज्रप्राणी ।
खांडववन देऊन आग्नी । तृप्त करील पुरुषार्थे ॥ १९८ ॥
संग्रामठेव पाहूनि विशेष । आनंद पावेल व्योमकेश ।
पाशुपत देईल निर्दोष । महदस्त्र ते कालीं ॥ १९९ ॥
कृष्णमित्र हा अद्भुत । ध्वजीं बैसवील अंजनीसुत ।
ऐकोनी पंडु ऋषि समस्त । जयजयकारें गर्जती ॥ २०० ॥
भूपाल जिंकूनि समारांगणीं । बांधील निजाज्ञेचे दावणीं ।
भूपवृषभांच्या पाठीवर गोणी । करभारांच्या आणील ॥ २०१ ॥
सुरेश दुंदुभि त्राहाटी । वर्षत दिव्य सुमनवृष्टी ।
स्वर्गींची जितकी सृष्टी । तितुकी पाहावया पातली ॥ २०२ ॥
ऐसा जन्मला वीर पार्थ । तों माद्रीचें मन दुश्चिंत ।
ममोदरीं नाहीं सुत । म्हणोनि खेद करीतसे ॥ २०३ ॥
पंडुं म्हणे कुंतीतें । तुवां तिषविलें बहुत आम्हांतें ।
परी खेद जाहला माद्रीतें । तो परिहारीं वल्लभे ॥ २०४ ॥
जाणोनियां पतिमानस । एक मंत्र दिधला माद्रीस ।
समवेत बीजन्यास । जप करवी तिजहातीं ॥ २०५ ॥
तों अश्विनीकुमार तेथें आले । स्वरेत देऊन तये वेळे ।
पुत्र आवळेजावळे । जन्मविते जाहले तेधवां ॥ २०६ ॥
नकुअल आणि सहदेव । एकरुप एकठेव ।
एवं पंचपुत्रांचें वैभव । पंडुराज भोगीतसे ॥ २०७ ॥
धर्म भीम अर्जुन । तिघे कुंतीचे नंदन ।
नकुल सहदेव सुजाण । माद्रीउदरीं जन्मले ॥ २०८ ॥
जाहलें पांडवांचें जनन । जें बोलिला कृष्णद्वैपायन ।
तेंच प्राकृत भाषेंकरुन । तुम्हांपुढें निरोपिलें ॥ २०९ ॥
शतश्रृंगनामक पर्वतीं । राहिला असे पंडुनृपती ।
सुधारसाहूनि निश्चितीं । कथा पुढें गोड असे ॥ २१० ॥
पांडुरंगनगर पुण्यरुप । श्रीविठ्ठलमूर्तीसमीप ।
निपजलापांडवप्रताप । ग्रंथ परम गोड हा ॥ २११ ॥
मूळ भारत प्रमाण । तेचि कथा येथें संपूर्ण ।
निर्मत्सर हृदय करुन । पंडितभक्तीं पहावें ॥ २१२ ॥
ब्रह्मानंदा अवधूता । श्रीधरवरदा पंढरीनाथा ।
पुढें वदवीं रसाळ कथा । व्यासभारताअन्वयें ती ॥ २१३ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । सप्तमाध्यायीं कथियेला ॥ २१४ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
अध्याय सातवा समाप्त
GO TOP
|