नारद भक्तिसूत्रे

फलरूपत्वात् ॥ २६ ॥


अर्थ : (ती भक्ती) फलस्वरूप आहे म्हणून (सर्व साधनापेक्षा श्रेष्ठ आहे)


विवरण : मागील सूत्रात भक्ती ही कर्म-ज्ञान-योग यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले. कर्म-ज्ञान-योग इत्यादि साधनांना भक्तीची अपेक्षा आहे, पण भक्ती ही स्वतः निरपेक्ष आहे. सहसा मनुष्याची स्वैर-विषय सेवनाकडे प्रवृत्ती असते. ती दूर करून मल म्हणजे पापवासना या दोषातून मुक्त होण्याकरिता वेदाने विहित कर्माचे विधान सांगितले आहे. पण भक्ताचे चित्त सदैव भगवंताच्या ध्यानात, चिंतनातच असते.
भक्ताचे विषयी नाही चित्त । त्याचा विषय तो मी भगवंत ।
ते सदा मजमाजी लोलुप्त । नित्य मुक्त या लागी ॥ एभा. ११.६६३ ॥
असे श्रीकृष्ण उद्धवास सांगतात. ज्याची सर्व कायिक, वाचिक, मानसिक कर्मे भगवंताप्रीत्यर्थच होतात त्याला पुन्हा वेगळे विहित कर्म करण्याची आवश्यकताच काय ? मागे सूत्र एकोणवीसमध्ये ' तदर्पिताखिलाचारता ' हे लक्षण सांगितलेच आहे. तसेच योग हा चित्तवृत्तिनिरोधस्वरूप आहे, पण भक्ताचे चित्त सहजच भगवद्‌रूप बनलेले असते.

विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे जनधन माता पिता ॥ महाराज तुकाराम
ज्याचा सहजयोग भगवत्स्वरूपाशी जडला आहे त्याला अन्य योग कशाला ? तसेच ज्ञान हे साधन भवबंधनाशाला उपयुक्त आहे.

अज्ञानमूलक संसारबंध ज्ञानानेच नष्ट होतो व तत्‌द्वारा जीवाला आत्यंतिक दुःख निवृत्तिस्वरूप व परमानंदाप्राप्तिरूप मोक्षाची प्राप्ती होते. पण भक्ताला भवबंध आहेच कोठे ? जे प्रेम प्राप्त झाले असता तो पुरुष सिद्ध होतो, तृप्त होतो, अमृत होतो असे आरंभाच्या सूत्रांतून नारदांनी सांगितले आहे तेथे भवबंध कोठला ? अतएव भक्तांकरिता सर्व अनिष्ट निवृत्ती व इष्ट प्राप्ती घडवून आणणारी भक्ती आहे. म्हणून ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे सांगितल्यानंतर आता ती भक्ती फलरूपा आहे म्हणून तिचे श्रेष्ठत्व सांगत आहेत. मागील सूत्रात सांगितलेली कर्म, ज्ञान व योग ही साधनेच राहतात, कारण याचे साध्य त्या साधनाहून वेगळे असते, ते साध्य प्राप्त झाल्यानंतर साधन म्हणून त्याचे महत्त्व उरत नाही. कर्म हे साधन चित्तशुद्धिरूप फलाचे आहे. (पण पुढे चित्तशुद्धी हेही साधनच होते !) योग हे साधन चित्तवृत्तिनिरोध किंवा सविकल्प; निर्विकल्प समाधीकरिता सांगितले आहे; व ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे. साध्य-प्राप्तीनंतर साधन नाहीसे होते; पण भक्तिप्रेम हे साधन नसून फल आहे. त्यांत गोणी भक्ती ही साधनरूपा आहे, पण परा, मुख्या, प्रेमलक्षणा भक्ती ही फलस्वरूप आहे. जे अंतिम असते, ज्याच्या पुढे काही नसते त्यास फल असे म्हटले जाते. जसे वृक्षास पाने, फुले आल्यानंतर फळ येते पण फळापुढे काही येत नाही. वेदान्त- शास्त्रात ज्ञान ही अंतिम स्थिती सांगितली आहे, पण गीता, भागवत आदी भक्तिशास्त्राचे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथात ज्ञानोत्तरही भक्ती आहे असे स्पष्ट सांगितले आहे.
श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति ।
समः सर्वेषु भूतेः मद्‌भक्ति लभते पराम् ॥ गीता १८.५४
' ब्रह्मस्वरूप झालेला, प्रसन्न अंतःकरणाचा, तो कोणाबद्दल शोक करीत नाही व कशाची इच्छाही करीत नाही सर्व भूतांच्या ठिकाणी समत्वभावाला प्राप्त झालेला तो पुरुष, श्रीकृष्ण म्हणतात, माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त करून घेतो.'

म्हणून भक्ती ही फलरूपा असे म्हटले आहे. कित्येक ठिकाणी पुराण व अन्य संतवाङ्‍मयातून भक्ती ही मोक्षाचे साधन असे सांगितले आहे. गीतेमध्ये-
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ गीता ७
' श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जे मला शरण येतात ते या मायानदीतून तरून जातात '

पुढे सूत्र शेहेचाळीस ते पन्नासमध्ये या विषयाचा विचार येणार आहे. मोक्ष भक्त्यैक सिद्ध आहे. श्रीएकनाथ महाराज सांगतात-
सायुज्यादि चारी मुक्ती । अंकी वाहवी भगवद्‌भक्ती ।
ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मुक्ती न घडे कदा । नाभा. .४७४
न करितां भगवद्‌भक्ती । सज्ञानाही नातुडे मुक्ती ।
तेचि अर्थीच्या दृष्टांती । ब्रह्मयाची उक्ती दाविली येथे ॥ नाभा ३.१८६ ॥

ब्रह्मदेव भगवस्तुती करताना म्हणतो-
येइन्येरविंदाक्ष विमुक्त मानिन त्वय्यस्तभावादविशुद्धबुद्धयः ॥
आरुह्य कृच्छ्रेण परंपदं तत पतन्त्यधोऽनाट्टतष्मदङ्घ्र्य ॥ भागवत, १० .२

'हे कमलनेत्रा ! जे पुरुष स्वतःस मुक्त समजून तुझ्या ठिकाणी भाव नसल्यामुळे ज्यांची बुद्धी शुद्धतेला प्राप्त झाली नाही, कदाचित ते परमपदापावेतो कष्टाने गेले तरी तुझ्या चरणांचा अनादर केल्यामुळे अधःपाताला जातात.' म्हणजे भक्तीवाचून अन्य साधनाने जीवाचा उद्धार होत नाही म्हणून भक्ती हे साधन आहे असे म्हटले जाते. हे जरी खरे आहे तरी तो मोक्ष प्राप्त करून देणारी भक्तीही उपासनास्वरूप सामान्य अशी आहे. ती पराभक्ती नाही. श्रीनारद महर्षी ' परम- प्रेमरूपा ' असे जिचे वर्णन करतात ती भक्ती स्वतंत्र पुरुषार्थरूपा अशी आहे. शास्त्रात चारच पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे सांगितले आहेत. भक्ति, योग ज्ञान ही सर्व साधने म्हटली आहेत. पण भक्तिशास्त्रप्रतिपादक भागवत ग्रंथामध्ये मोक्षापेक्षाही भक्तीचे श्रेष्ठत्व अनेक ठिकाणी प्रतिपादिले आहे.

भागवत एकादश स्कंधामध्ये श्रीकृष्ण उद्धवास सांगतात-
न किञ्चित्साधवो धीरा भक्ताह्येकान्तिनो मम ।
वाञ्छन्त्यपि मया दत्तं कैवल्यं अपुनर्भवम् ॥ २०-३४
' श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ! जे साधु धीर व माझे आत्यंतिक भक्त असतात ते मी दिलेल्या जन्ममृत्युरहित मोक्षाचीही इच्छा करीत नाहीत.' (त्यांना माझ्या प्रेमभक्तीतच आनंद प्राप्त होतो, त्या आनंदापुढे ते सर्व तुच्छ वाटते.)

श्रीतुकाराम महाराज म्हणतात -
मोक्षपदे तुच्छ केली या कारणे ।
आम्हां जन्म घेणे युगायुगी ॥ १॥
विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस ।
पुढला पुढती आस सेवावी हे ॥ २ ॥
श्रीमद्‌भागवत पुराणात प्रत्येक स्कंधातून अशी प्रेमभक्तीच्या श्रेष्ठत्वाची वचने सापडतात.

अद्वैतवेदान्ततत्त्वज्ञानात शिवावतार-जगद्‌गुरू श्रीशंकराचार्य यांच्यानंतर श्रीमधुसूदन सरस्वती या नावाने प्रसिद्ध एक थोर तत्त्वज्ञानी होऊन गेले. अद्वैत तत्त्वज्ञानावर श्रीशंकराचार्यानंतर जे जे द्वैती शास्त्रकार होऊन गेले, ज्यांनी आपली सर्व बुद्धिमत्ता व शास्त्रज्ञान पणाला लावून अद्वैताचे खंडण केले, त्या सर्वांचे अद्वैत- मतानुसार खंडण आपल्या ' अद्वैतसिद्धी ' नामक अद्वितीय विद्वत्ताप्रचुर ग्रंथात त्यांनी केले आहे. अद्वैतवेदान्त शास्त्रात त्या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अनेक शास्त्रांवर महत्त्वपूर्ण अशा अनेक ग्रंथांची रचना त्यांनी केली आहे.

त्या मधुसूदन सरस्वतींनी ' भक्तिरसायन ' नावाचा एक ग्रंथ भक्तिशास्त्रावर रचला आहे. त्यात अनेक उपपत्तींनी भक्तियोगाचा विचार केला आहे. साहित्याच्या अंगानीही भक्तीचे अनेक प्रकार स्पष्ट केले आहेत. त्यांत साधनभक्ती व प्रेमलक्षणा पंचमपुरुषार्थरूपा भक्तीचा शास्त्रीय दृष्टीने फार सखोल विचार केला आहे. त्यात रसशास्त्राच्या दृष्टीने भक्ती हा स्वतंत्र रस आहे, पूर्वीच्या रसशास्त्रज्ञांनी तो केवळ भाव ठरविला आहे पण भक्ती हा केवळ भाव म्हणजे रसनिर्मितीचे साधन नसून रस-आनंद-स्वरूप आहे असे अनेक उपपत्तींनी सिद्ध केले आहे, म्हणून भक्ती हा स्वतंत्र पुरुषार्थ आहे.

भक्तिरसायनाच्या प्रथम श्लोकात श्रीमधुसूदनसरस्वती म्हणतात-
नवरसमिलितं वा केवलं वा पुमर्थं परममिह मुकुंदे भक्तियोग वदन्ति ।
निरुपमसुखसंविद्‌रूपमस्पृष्टदुःख तमहमखिलतुष्ट्यै शास्त्रदृष्ट्याव्यनज्मि ॥ १ ॥
'सर्वत्र सत्तारूपाने विद्यमान मुकुंद (परमेश्वर) विषयक भक्तियोगास नवरसाने युक्त अथवा केवल स्वतंत्र रसरूपाने परमपुरुषार्थ असे म्हणतात, कारण अनुपम सुखाची प्राप्तिस्वरूप व दुःखच ज्याला स्पर्शही करू शकत नाही, अशा त्या भक्तियोगाचे सर्वांना संतुष्ट करण्याकरिता शास्त्र दृष्टीने विवेचन करतो.'

भक्तिशास्त्रावरील भक्तिरसामृतसिंधू व उज्ज्वलनीलमणी आदी ग्रंथांतून श्रीरूपगोस्वामी यांनी प्रेमभक्ती हा स्वतंत्र रसच मानला आहे. त्याचे तात्पर्य भक्ती ही स्वतःच सुखस्वरूप आहे, कारण-
भगवान्‌परमानंदस्वरूप स्वयमेव हि ।
मनोगतस्तदाकारो रसतामेति पुष्कलम् ॥ भ. र. १-१०
परमानंदस्वरूप भगवान स्वतः द्रवावस्था प्राप्त झालेल्या मनात स्थित होऊन स्थायीभावरूपाने पूर्ण रसस्वरूप होतो.

म्हणजे भक्ती ही केवळ आनंदाचे साधन नसून ती स्वतः आनंदरूपच आहे; म्हणजे साध्यस्वरूप, पुरुषार्थस्वरूप म्हणून फलस्वरूप आहे. पुढेही 'शांतिरूपात्परमानंदरूपाच्च' असे साठाव्या सूत्रात म्हटले आहे.

श्री तुकाराम महाराज ही भक्ती फलरूपा आहे असे सांगतात -
तुका म्हणे भक्ति । सुखरूप आदि अंती ॥

ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या मोक्षापेक्षाही या प्रेमभक्तीत अधिक आनंद प्रतीत होतो म्हणूनच मोठे मोठे ऋषिमुनीही या भगवंताची अहैतुकी भक्ती करीत असतात, असे श्रीशुकाचार्य सांगतात.
आत्मारामश्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरुक्रमे ॥
कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिमित्थं भूतगुणो हरिः ॥ भागवत १.७.२०
'आत्मरूपाच्याच ठिकाणी रममाण होणारे, ज्यांचा हृदयग्रंथिभेद झाला आहे असे मुनीही ज्याची अहैतुकी भक्ती अखंड करतात असा हा हरी आहे.'

पुढेही सूत्रात नारदांनी 'स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमारा' म्हणजे सनकादिक- देखील या भक्तीस फलरूप आहे, असे म्हणतात, असे सांगितले आहे.

येथे फल शब्द वापरला आहे, फलामध्ये रस, माधुर्य, सौंदर्य, पोषण, पुढील वृक्षाचे बीज अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट असतात, तसेच फळ हे ज्या वृक्षाला ते लागले त्या वृक्षाचे सर्व सार आहे, तसेच भक्तिप्रेम हे आजपावेतो जन्मजन्मात जी काही अनेक साधने केली असतील त्या साधनवृक्षाचे फळ आहे. तिच्यात अनंत माधुर्य, सौंदर्य पोषण आहे, इतर साधने साधकासच आकृष्ट करीत असतात, पण भक्ती ही भक्त व भगवान दोघांनाही आकृष्ट करीत असते. अखिलाण्डकोटीव्रह्मांडनायक भगवानही भक्तिप्रेमाने मोहित होतो. इतकेच नव्हे तर 'भक्तांचे येथे राहून प्रेमाने त्यांची सर्व कामे करतो.

श्रीकृष्णच म्हणतात-
जया भक्तिची येतुली प्राप्ती । जे कैवल्याते परते सर म्हणती । ज्ञा. ९
अशा भक्तिच्या श्रेष्ठत्वापुढे मोक्षालाही तुच्छ समजणाऱ्या प्रेमळ भक्ताकरिताच देव ही भाषा वापरत असतो.

भक्तिशास्त्रात भक्ती ही स्वतंत्र पुरुषार्थरूप आहे, ती केवळ साधन नाही म्हणून श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ' चहू पुरुषार्था शिरी' असे म्हटले आहे पुरुषार्थस्वरूपा भक्ती असेल पण ती धर्म, अर्थ, कामादिकाप्रमाणे मोक्षाच्या पूर्वी असेल अशी कोणी कल्पना केली तरी तिला गौणत्व येईल म्हणून 'शिरी' असे म्हटले आहे. श्रीएकनाथ महाराजानी तर तिला 'पंचम पुरुषार्थ' असे स्पष्टच सूचित केले आहे.
चहू पुरुषार्थाते त्यागिती । चारी मुक्ति उपेक्षिती ।
पंचम पुरुषार्थाची भक्ती । मज पढियंती उद्धवा ॥ ३७२ ॥
तंव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा ।
तुज म्या सांगितला कणवा । पुरुषार्थ पाचवा या नांव ॥ ४०१ ॥
नाभा. अ. २४ सर्वच संतांचे असे भक्तिविषयक उद्‌गार प्रसिद्ध आहेत.

भगवद्‌पूज्यपाद श्री शंकराचार्यही श्रीकृष्णप्रेमात रंगून गेलेल्या अवस्थेत खालील उद्‌गार काढतात -
काम्यीपासनयार्थयन्त्यनुदिनं किंचित्फलं सेप्सितं ।
केचित्स्वर्गमथापवर्गमपरैर्योगादि यज्ञादिभिः ।
अस्माकं यदुनंदनाघ्रियुगुल ध्यानावसानायिनां ।
किं लोकेन दमेन किं नृपतिना स्वर्गापवर्गेश्च किम् ॥ १ ॥
' काम्य उपासनेने काही लोक सतत काही काही फलाची अपेक्षा ठेवतात व अखंड काम्यकमें करत असतात. काही स्वर्गाची अपेक्षा यज्ञादी कर्मांच्या द्वारे करतात, काही योगाच्या मार्गाने मोक्षाची इच्छा धारण करतात, पण भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमळाचे सतत ध्यान करीत आयुष्य घालविणाऱ्यांना लोकांतराशी, ऐहिक राजपदाशी, किंबहुना स्वर्ग व मोक्षाचेही काय प्रयोजन आहे ?'

तात्पर्य, अनेक ऋषिमुनींनी तसेच भागवतधर्मीय सर्व संतांनी मोक्षनिरपेक्ष होऊन केवल प्रेमभक्तीचीच मागणी केली आहे.

श्रीमद्‌भागवतपुराणामध्ये शेकडो भक्तांचे असे उद्‌गार प्रसिद्ध आहेत इतकेच नव्हे तर 'भक्तिरसामृतसिंधू ' या भक्तिशास्त्रावरील ग्रंथात श्रीरूपगोस्वामी म्हणतात-
ब्रह्मानंदो भवेदेष चेत्परार्ध गुणीकृतः ।
नैति भक्ति सुखाम्भोधे परमाणुतुलामपि ॥ १-१९॥
' ब्रह्मानंद हा उपनिषदातून सर्व आनंदांपेक्षा श्रेष्ठ मानला आहे. त्या ब्रह्मानंदाची परार्धपट केली तरी तो या भक्तिसुख सागराच्या परमाणूएवढाही होणार नाही'

भक्ती हे भक्ताच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. हंसदूतनामक एका भक्तिविषयक ग्रंथात एक कथा आहे. एकदा देवर्षी नारद हे गोकुळात आले, तेथील तो सर्वांच्या ठिकाणी प्रवाहित होत असणारा भक्तिप्रेमानंदाचा पूर पाहिला. उपनिषत्प्रतिपाद्य ब्रह्मच श्रीकृष्णवेषाने तेथे नृत्य करीत आहे. गोप, गोपी, गोपबालक, गाई या सर्वच त्याचा तो अनिर्वचनीय आनंद लुटीत आहेत. त्या प्रेमात निमग्न होऊन नारद रुदन करू लागले. एका गोपीची दृष्टी त्यांच्याकडे गेली, तिला ते पाहून आश्चर्य वाटले. ती मनात म्हणाली की, हे तर ब्रह्मपुत्र भक्ताचार्य नारद आहेत ! अप्रतिहत यांची गती आहे. मनात येताच हे भगवद्‌भामास भगवच्चरणाजवळ पोहोचू शकतात. असे असता हे रडतात का ? जवळ जाऊन नम्रतापूर्वक नमस्कार करून तिने नारदाना त्यांच्या रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिला नारद म्हणाले, मला याकरता वाईट वाटते की, आतापावेतो जे जीव अनेक साधने करून मुक्त झाले ते फार भाग्यहीन होते, या गोकुळातील अलौकिक आनंदाचे त्यांना दर्शनही घडू शकले नाही, निदान हा आनंद भोगून ते मुक्त झाले असते तर त्यांची मुक्ती सफल झाली असती. हा आनंद जो आज आम्ही भोगत आहो तो दुर्दैवाने त्यांना मिळाला नाही !

धर्माचे फल मेल्यानंतर किंवा परलोकाला गेल्यानंतर मिळते, ज्ञानाचे फल भवबंधनिर्मुक्ती आहे, पण भक्तीचे फल असे अगाध आहे की, ती नित्यशुद्धबुद्धमुक्त जो भगवान त्याला बद्ध करते. श्रीमद्‌भागवतात नवयोगेश्वर जनक संवादात म्हटले आहे -
विसृजति हृदयं न यस्य साक्षाद्
  हरिः अवशाभिहितोऽप्यघौघनाशः ।
प्रणयरशनया घृताङ्‌घ्रिपद्मः
  स भवति भागवतप्रधान उक्तः ॥ ५५ ॥
'न समजता जरी भगवन्नाम स्मरण केले तरी त्याच्या पापप्रवाहाचा नाश करणारा असा भगवान आपल्या प्रेमी भक्ताच्या हृदयाचा कधीही त्याग करू शकत नाही, आपल्या प्रेमरूपी रज्जूनी भगवंताचे चरणकमळ ज्याने दृढ धरून ठेवले आहेत तोच भक्त श्रेष्ठ होय.'

हरिनाम प्रेमप्रीतीवरी । हृदयी रिगाला जो हरी ।
तो निगो विसरे बाहेरी । भक्त प्रीतिकरी कृपाळू ॥
भक्ते प्रणय प्रीतीची दोरी । तेणे चरण धरोनि निर्धारी ।
निज हृदयी बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥ नाभा २८० .२
'भक्ती केली, भगवान प्रसन्न झाला, प्रगट झाला, भक्ताचे मनोरथ पूर्ण झाले, आता भक्तीचे प्रयोजन राहिले नाही असे होत नाही. भक्ती करून जो वैकुंठ, गोलोक वा साकेत लोकाची तसेच सालोक्य, सामीप्य, सारूप्य, सायुज्यादिकांची अपेक्षा करील तर ती मुक्ती होईल व तिचे भक्ती हे साधन होईल, व साधन झाली तर ती नीरस होईल कारण वृक्षाचा सर्व रस, गोडी फलात असते, वृक्षाच्या फांद्या, पाने, फुले यात नसते. भक्ती ही तर मधूरात मधुर आहे, ती साधनरूप नीरस नाही.

बहुतेक भक्त म्हणविणारे विशेष अशा वरील मोक्षादिकाच्या अपेक्षेनेच भक्ती करणारे असतात, पण त्यांना भक्तिसुखाची खरी माधुरी व रस भोगावयास मिळत नाही. एका ठिकाणी म्हटले आहे-
मुक्ति मुक्ति स्पृहायावत्पिशाची हृदि वर्तते ।

तावद्‌भक्ति सुखस्थास्य कथमभ्युदयो भावेत ॥ भक्तिरसामृतसिंधू
'भोग वा मोक्षप्राप्ती कामनारूप पिशाची हृदयात जोपावेतो बसली आहे तोपावेतो हृदयात भक्तिप्रेमाच्या आनंदाचा अभ्युदय कसा होईल ?' म्हणून सर्व भक्ताग्रणींनी सेवेचीच अपेक्षा केली आहे कारण तो मेवेचा आनंद अनिर्वचनीय आहे

हा रस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा ।
कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥
असे श्रीतुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात.

प्रेमभक्तीचे श्रेष्ठत्व एवढे आहे की, प्रत्यक्ष भगवानही त्याची अपेक्षा करतो. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. 'आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ (ज्ञा). भक्तवर्य उद्धवास भगवान प्रेमाचे श्रेष्ठत्व सांगत आहेत. ते म्हणतात प्रेमाचे मोल माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.
प्रेम मजसी मोलें अधिक । संवसाटी करितां नव्हे देख ।
यालागी वरीव देता सुख । न ये तै सेवक सेलेचा होय ॥
मज प्रेमळांची अति आवडी । ते लोकेषणा लाज दवडी ।
महत्त्वाच्या विसरवी कोडी । त्याच्या सेवेची गोडी मजलागी ॥
ऐसा प्रेमाचेनि अति पांगें । म्या पंगिस्त होईईजे श्रीरंगे ।
यालागी तया पुढे मागे । सदा सर्वांगे तिष्ठत ॥ नाभा २४-३७७-२

पुढे श्रीकृष्ण उद्धवास म्हणतात-
भक्तिं लब्धवतः साधोः किमन्यदवशिष्यतें ।
मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानंदानु भवात्मनि ॥ भागवत ११-२६-३०
'अनंतगुणपूर्ण, केवळ ब्रह्मरूप आणि आनंदानुभवात्मक असा जो मी त्या माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती जडली आहे अशा साधुपुरुषाला आणखी काय मिळवावयाचे बाकी राहिले आहे ?'

भावे करिता माझी भक्ती । भाविका कोण पा अप्राप्ती ।
विवेकवैरागज्ञानसंपत्ति । पाया लागती भक्ताच्या ॥
देव सप्रेमें मुलाला । म्हणे मी त्याचाचि अंकिला ॥
जीवेंभावे त्यासी विकिला । मी त्यांचा जाहला तिही लोकी ॥ नाभा. २६-४०४-५
असे भक्तिप्रेमाचे श्रेष्ठ स्वरूप असल्याने तिला फलरूप म्हटले आहे. जरी फलाची उपमा दिली तरी उत्कृष्ट आम्रफलातही आतील कोय व वरील साल असा काही टाकाऊ भाग राहतो, तसा प्रेमभक्तीत त्याज्यभाग मात्र काही नाही. ती सर्वच्या सर्व मधुर स्वरूपच आहे.


GO TOP