॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १७ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः तच्चिंतनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनं । एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः ॥ १७ ॥
श्लोकार्थ : त्या ब्रह्माचेच चिंतन, त्याचेच विवेचन, त्याचेच एकमेकांना समजावून देणे, अशा प्रकारे त्याच एकाचा ध्यास घेऊन राहणे याला ज्ञानी लोक ब्रह्माचा अभ्यास म्हणून ओळखतात. ॥१७॥

तेंचि स्मरणरूप घडावें चिंतन । तेंचि अधिकारिया करावें कथन ।
अथवा ज्ञात्यासी परस्परें संवादन । जेणे प्रबोध दुणावे ॥ ६२ ॥
त्या ब्रह्मात्मबुद्धीचेच चिंतन व्हावे, अधिकारी व्यक्तींसमोर त्याचेच विवेचन करावे, किंवा ज्ञानी माणूस भेटताच त्यासंबंधी त्याच्याशी दोन गोष्टी कराव्यात, त्या योगाने आपले ज्ञान दुणावल्याचा अनुभव घ्यावा. (५१६२)

हेंचि एकपरत्व समाधानरूप । मग असो सविकल्प की निर्विकल्प ।
हाचि अभ्यास जेथें उत्थान नसे अल्प । जाणती पूर्ण ज्ञाते ॥ ६३ ॥
यालाच एक परता म्हणतात. ती समाधानाच्या स्वरूपाची असते. हे समाधान सविकल्प असो की निर्विकल्प, यालाच अभ्यास असे म्हणतात. या अभ्यासात उत्थान मुळीच नसते. पूर्ण ज्ञानी लोकांना त्याचे ज्ञान असते. (५१६३)

आतां चिंतन जें कां मननात्मक । कैसें करीत असती साधक ।
तेंचि श्रवण करून निश्चयात्मक । तैसेंचि अभ्यासावे ॥ ६४ ॥
आता मननाच्या स्वरूपाचे जे चिंतन साधक करत असतात ते श्रवण करून निश्चयपूर्वक त्याचा अभ्यास करावा. (५१६४)

पद : तच्चितनं । तत् ाणिजे तेंचि लयसाक्षि ब्रह्म ।
जें अनुभविलें अभ्यासें परम । वृत्ति आणि सांडोनि शून्याचा भ्रम । अपरोक्षे निजांगें ॥ ६५ ॥
पदार्थ : त्याचे चिंतन तत् म्हणजे मननाच्या साहाय्याने ज्या लयसाक्षी परम (श्रेष्ठ) ब्रह्माचा, वृत्ती आणि शून्याविषयीचा भ्रम यांचा त्याग करून जो अभ्यास केला जातो आणि स्वतः तेच ब्रह्म आपणच साक्षात बनतो तो प्रकार होय. (५१६५)

तेंचि मागुती मायादि तृणान्त । स्फूर्ति उठतांही समस्तांत ।
नामरूप विसर्जून सबराभरित । अनुभविलें ब्रह्म ॥ ६६ ॥
नंतर पुन्हा स्फूर्ती उठून मायेपासून तृणापर्यंत सर्व पदार्थात भरून राहिलेले नामरूपविरहित जे ब्रह्म त्याचा अनुभव घ्यावा. (५१६६)

ऐसें जें ब्रह्म तेंचि स्वयें आपण । त्रिविधा परी प्रतीतीकडून ।
बाणलें तया ब्रह्मात्मयाचे चिंतन । सदा ध्यासें करी ॥ ६७ ॥
असे जे ब्रह्म ते आपण स्वतःच असतो. तेच आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती आणि गुरूप्रतीती या तीन प्रतीतींच्या द्वारे दृढ बाणल्यावर त्या ब्रह्मात्म्याचे ध्यासपूर्वक चिंतन करावे. (५१६७)

अहो अहोजी सद्गुरुनाथ । केवढा मोक्षध्वजरूप परमार्थ ।
गगनीं उंचावला किंचित अनर्थ । जेथें उरला नाहीं ॥ ६८ ॥
यावर रविदत्त संतुष्ट होऊन म्हणतो, "अहो गुरुमहाराज, या विवेचनामुळे आमचा मोक्षध्वजरूप परमार्थ आकाशाला जाऊन भिडण्याइतका उंचावला आहे! आता तेथे कसलाही अनर्थ उरला नाही. (५१६८)

धन्य धन्य आह्मीं परमार्थी । लागलों पावलों वेदान्त सार्थी ।
अन्य मायादिकांचा अर्थाअर्थी । संबंध उरला नाहीं ॥ ६९ ॥
खरोखरच आम्ही परमार्थाला लागून धन्य झालो आहोत. कारण आम्हाला वेदान्ताचा अर्थ प्राप्त झाला. (म्हणजे आम्हाला वेदान्ताचा अर्थ समजला.) त्यामुळे इतर मायादिकांचा अर्थाअर्थी काही संबंध राहिला नाही. (५१६९)

अहो कायहो शास्त्र वेदान्त । संशयचि दवडिला अज्ञानासहित ।
एकाएकी सर्वात्मा मी अनंत । तया चुकलिया भेटविलें ॥ ७० ॥
अहो; काय हो हे वेदान्तशास्त्र, त्याने आमच्या अज्ञानासह सर्व संशयाचे निरसन केले! वास्तविक पाहता मी सर्वांत्मा असून अनंत आहे. पण माझ्या त्या स्वरूपाला विसरलो होतो. या वेदान्ताने त्या माझ्या विसरलेल्या अनंतरूपाशी - माझ्या स्वरूपाशी माझी गाठ घालून दिली! (५१७०)

मी केवढा किती हो परिपूर्ण । जयातें जाणेना वृत्यादि मन ।
शेखीं स्वयें आपणासी आपण । जाणावया दृश्य नव्हे ॥ ७१ ॥
आता मी किती परिपूर्ण झालो! वृत्ती, मन ही त्याला म्हणजे मला जाणू शकत नव्हते, आपणच आपल्याला जाणून घ्यावे असे म्हटले तर ब्रह्मात्मस्वरूप असल्याने मी दृश्य नव्हतो. त्यामुळे त्याला जाणणे शक्य होत नव्हते. (५१७१)

परी सर्वज्ञ मी सर्व वृत्तीसहित । अकृत्रिमपणें असें जाणत ।
शेखीं लयही शून्यरूप प्रकाशित । माझिया प्रकाशें होय ॥ ७२ ॥
परंतु मी मात्र आता सर्वज्ञ आहे. वृत्तीसहित सर्व पदार्थ मी अकृत्रिमपणे स्वाभाविकरीत्या जाणत आहे. शेवटी शून्यरूप लयदेखील माझ्याच प्रकाशाने प्रकाशित होत असतो. (५१७२)

तोचि मी स्वप्रकाशरूप अपरोक्ष । न जाणोनि जाणतसे स्वयें प्रत्यक्ष ।
ऐशिया मज ब्रह्मात्मया मोक्ष । तरी कोठे बंधाभावीं ॥ ७३ ॥
ती मी स्वयंप्रकाशरूप असून सर्वांना अपरोक्ष म्हणजे साक्षात् प्राप्त होणारा आहे. मी जाणण्याच्या क्रियेपासून दूर राहनही (न जाणता) सर्वांना प्रत्यक्षपणे जाणतो. अशा मला बंधनच नसल्यामुळे मोक्ष तरी कसा असेल? (५१७३)

ऐसा मी अनंत कल्पें जरी होता । तरी स्पर्शलीच नव्हती मज द्वैतवार्ता ।
वाउगीच की धरिली होती अहंता । देहबुद्धीची अज्ञानें ॥ ७४ ॥
मी असा आहे अनंत कल्पे लोटली तरी त्या मला द्वैताची वार्ता स्पर्श करू शकली नाही. देहबुद्धीमुळे निर्माण झालेली अहंता अज्ञानामुळे मी उगीचच बाळगून होतो. (५१७४)

तेंचि सद्गुरुनाथें माझें मजला । निजरूप दाऊनी भ्रम निवारिला ।
आतां मज म्यां जाणतां स्वकीयत्वाला । अज्ञान निपटून गेलें ॥ ७५ ॥
श्री सद्गुरूनाथांनी तेच माझे खरे निजरूप मला दाखवून मला झालेल्या भ्रमाचे निवारण केले. आता मी माझ्या स्वरूपाला जाणत असल्यामुळे माझे अज्ञान समूळ नष्ट झाले आहे. (५१७५)

तें अज्ञान हे सर्व ब्रह्मांड धुंडितां । आढळेना की कोठे तत्त्वतां ।
हेंही बोलणेंचि न शोभे आतां । नवतें तें गेलें कैसें ॥ ७६ ॥
आता अज्ञान शोधण्यासाठी सर्व ब्रह्मांड पालथे घातले तरी कोठेही ते सापडले नाही. खरे म्हटले तर असे म्हणणेही आता शोभून दिसणार नाही. कारण जे मुळात कधी नव्हतेच ते गेले असे तरी कसे म्हणावे? (५१७६)

हें असो अज्ञान तों नाहींच नाहीं । परी या ब्रह्मांडी दुजें नसेचि कांही ।
नामरूप नाढळेचि सर्वथाही । मज ब्रह्मात्मयावांचूनी ॥ ७७ ॥
हे राहू द्या. अज्ञान तर नाहीच नाही. पण या ब्रह्मांडात ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही. जो मी ब्रह्मात्मा आहे त्यावाचून नामरूपादी दुसरे काहीच आढळत नाही. (५१७७)

मी ब्रह्मात्मा स्वयमेव उघडा । जेथें दुजेपणाचा न ये शिंतोडा ।
ओतप्रोत सबराभरित रोकडा । अनभाव्य परिपर्ण ॥ ७८ ॥
मी स्वतःच ब्रह्मात्मा असून सदैव उघडा आहे. माझ्या ठिकाणी दुजेपणाचा शिंतोडाही स्पर्श करत नाही. मी ओतप्रोत असून सर्वत्र व्यापलेला असून पूर्णपणे प्रत्यक्ष अनुभवास येणारा असा आहे. (५१७८)

ऐसा उघड परिपर्ण असोनी । जाणवेना कवणा लागोनी ।
न जाणवे परी परता सारी कोणी । ऐसा त्रिभवनीं नाहीं ॥ ७९ ॥
असा मी उघडा आणि परिपूर्ण असूनही कोणालाही मी जाणण्याचा विषय होत नाही. मी जाणण्याचा विषय होत नाही म्हणून मला दूर सारील असा कोणीही या त्रिभुवनात नाही. (५१७९)

तस्मात् लोपलों ना प्रगटलों । परिपूर्ण आद्यंत तैसाच संचलों ।
अनंत अनंतत्वीं दाटलों । एकरूप तिहीं काळीं ॥ ८० ॥
त्यामुळे मी लोपलोही नाही अथवा प्रगटही झालो नाही. मी परिपूर्ण असून आरंभापासून अंतापर्यंत (अर्थात ब्रह्मांडाच्या) मी असाच परिपूर्ण भरून राहिलो आहे. अनंत असून मी अनंतत्वामध्ये दाटून राहिलो आहे. मी तीन्ही काळी (भूत, भविष्य आणि वर्तमान) एकरूपच असतो. (५१८०)

मेरु आदि जंबुद्वीपी असें । अथवा काश्यादि तीर्थी वसें ।
आणि अन्य द्वीपी की कुग्रामी नसें । ऐसा देशपरिच्छेद नाहीं ॥ ८१ ॥
मी मेरूपर्वतावर अथवा जंबुद्वीपामध्ये आहे, अथवा काशीसारख्या तीर्थक्षेत्रात वास्तव्य करीत आहे, आणि एखाद्या दुसऱ्याच बेटावर अथवा लहानशा खेड्यात नाही, अशा प्रकारचा देशपरिच्छेद माझ्या ठिकाणी नाही. (५१८१)

कृतयुगाच्या ठाईं प्रगटे । अथवा शीतकाळीं की पर्वणीसी उमटे ।
आणि कलियुगीं की दुर्दिनी वाहटे । ऐसा कालपरिच्छेद नाहीं ॥ ८२ ॥
मी कृतयुगामध्ये प्रकट होतो, किंवा थंडीच्या दिवसात अथवा पर्वणीच्या प्रसंगी प्रगट होतो आणि कलियुगामध्ये किंवा एखाद्या खराब हवामानाच्या दिवशी मी ओसरतो, अशा प्रकारचा कालपरिच्छेद माझ्या ठिकाणी नाही. (५१८२)

उत्तम पदार्थी की शिवादिकांचे देहीं । वसून राहिलों सर्वदाही ।
हीन पदार्थी की कीटकीं नाहीं । ऐसा वस्तुपरिच्छेद नसे ॥ ८३ ॥
उत्तम पदार्थामध्ये अथवा शंकर इ. पवित्र देवतांच्या शरीरात मी सर्वकाळ बसून राहिलो आहे, आणि हीन पदार्थामध्ये किंवा कीटकांमध्ये मी नसतो, अशा प्रकारचा वस्तुपरिच्छेदही माझ्या ठिकाणी नाही. (५१८३)

सर्व देशांसहित पिंडब्रह्मांड । व्यापोनि उरलों असें उदंड ।
भलतेकाळी असेंचि अखंड । आणि सानथोर पदार्थी ॥ ८४ ॥
सगळ्या देशांसह पिंडब्रह्मांड व्यापूनही मी बाहेर पुष्कळ उरलो आहे. कोणत्याही काळी मी अखंडच राहिलो आहे, आणि लहान थोर सर्वच पदार्थात मी व्यापून राहिलो आहे. (५१८४)

अमुक एक पदार्थ असे रिता । ऐसा नाढळे अणुही धुंडितां ।
क्षण एक लोटेना मज परता । आणि देश कैंचा उरे ॥ ८५ ॥
अमुक एक पदार्थ मी न व्यापता राहिलेला आहे, असे अणू अणू शोधून पाहिले असताही आढळत नाही. मी सर्वकाळी असल्यामुळे एक क्षणही माझ्यावाचून जात नाही. मग प्रदेश कसा माझ्यावाचून कोरा असेल? (५१८५)

ऐसा मी त्रिधा परिच्छेदविहीन । परिपूर्ण अनंत एक चिद्घन ।
कोण तो दुजा असे मजसमान । सच्चिदानंदरूपी ॥ ८६ ॥
मी अशा प्रकारे देश, काल, वस्तु या तीन प्रकारच्या परिच्छेदावाचून असतो. मी परिपूर्ण, अनंत आणि एकरूप असा चिद्घन आहे. माझ्यासारखा सच्चिदानंद स्वरूप दुसरा कोण आहे? (५१८६)

चेतनाविशी जरी जीवशिव । चिद्र दिसती एक स्वभाव ।
परी ते माझी प्रतिबिंबे स्वयमेव । वास्तविक कैंचे मजऐसे ॥ ८७ ॥
चेतनत्वाचा विषय घेतला तर जीव आणि शिव चिद्रूपाने एकाच गुणधर्माचे म्हणून सारखेच वाटतात. पण ते दोघे स्वतः माझीच प्रतिबिंबे आहेत. मग ते वास्तविक माझ्यासारखे कसे असतील? (५१८७)

तरी सजातीय भेद मजवरी । कोण बलात्कारें आरोप करी ।
मी एकलाचि एकपणे चराचरीं । आद्यंत तैसाचि मध्ये ॥ ८८ ॥
ते दोघेही माझ्यासारखे नाहीत. मग माझ्यावर सजातीय भेदाचा आरोप बळजबरीने कोण करील? सर्व चराचर विश्वात मी एकटाच एकपणे राहतो, मी आदि, अंत आणि मध्ये सर्वत्र एकरूपच आहे. (५१८८)

जड चंचळही पदार्थ दोनी । सत्यत्वें नसतीच मजहनी ।
तरी विजातीय भेद कल्पील कोणी । कैसा तो नेणवे ॥ ८९ ॥
माझ्याखेरीज जड चंचळ असे दोन पदार्थ सत्यत्वाने नाहीतच मुळी. मग माझ्यावर विजातीय भेदाची कल्पना कोण कशी करील ते मला कळत नाही. (५१८९)

मायादि तृणान्त गाझींच अंगें । नाना प्रकारे उमटली सोंगें ।
परी ते जाहलेचि नाहींत रज्जुभुजंगें । तरी स्वगतभेद कैंचा ॥ ९० ॥
मायेपासून ते तृणापर्यंत सर्व माझीच अंगे आहेत. सर्व जगाच्या रूपाने माझ्यावरच सर्व सोंगे निर्माण झाली आहेत. पण ती वास्तविक पाहता रज्जूवर (म्ह. दोरीवर) भासणाऱ्या सापाप्रमाणे मुळात जन्मलेलीच नसतात. तर माझ्यावर स्वगत भेदाचा आरोप तरी कसा करता येईल? (५१९०)

जीवेश मिथ्यात्वें सजातीय । जड जग नसतां भेद विजातीय ।
मायादि नुद्भवतां स्वगत भेद जाय । ऐसे भेदत्रय नसती ॥ ९१ ॥
जीव आणि ईश्वर हे मिथ्या असल्याने माझ्या ठिकाणी सजातीय भेद नाही. जड जग सत्यत्वाने नसल्यामुळे माझ्या ठिकाणी विजातीय भेदही नाही. माया इ. तत्त्वे खरे पाहता उत्पन्नच झाली नाहीत. त्यामुळे स्वगत भेदही झाला नाहीच. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी तीन भेद नाहीत. (५१९१)

एवं त्रिधा भेदरहित आद्यंत । त्रिधा परिच्छेदेंविण ओतप्रोत ।
आणि कवणासीच नलगे अंत । म्हणोनि अनंत मी पूर्ण ॥ ९२ ॥
अशा प्रकारे मी आरंभापासून ते अंतापर्यंत त्रिविध भेदरहित आहे. माझ्या ठिकाणी देश, काल, वस्तु इ. त्रिविध परिच्छेदांचाही अभाव आहे. त्यामुळे सर्वत्र ओतप्रोत म्हणजे भरून राहिलेलो आहे. माझा अंत कोणालाही लागत नाही. म्हणून मी अनंत आणि परिपूर्ण आहे. (५१९२)

मज व्याप्याविण व्यापकता । दृश्याविण द्रष्टा देखता ।
तैसेंचि साक्ष्याविण साक्षित्व आता । सहसा बोलूं नये ॥ ९३ ॥
व्याप्य (जे व्यापायचे ते) नसतानाही मला व्यापकत्व आले आहे. दृश्य नसतानाही मी पहाणारा द्रष्टा झालो आहे. साक्ष्य (पहाण्यासारखा प्रसंग) नसतानाही मला साक्षित्व आले आहे. माझे हे धर्म सांगता येत नाहीत. (५१९३)

तस्मात् कोणताचि निर्देश मज । नव्हेच असें तैसा असें सहज ।
परोक्षापरोक्षही म्हणणे अचोज । ऐसा अनिर्वाच्य स्वयें ॥ ९४ ॥
त्यामुळे माझ्यासाठी कोणताही निर्देश लागू होत नाही. मी जसा आहे तसाच सहजपणे आहे. मी परोक्ष (दृष्टीआडचा) की अपरोक्ष (दृष्टीपुढचा) याबद्दल काहीच सांगता येत नाही. मी स्वतः मात्र अनिर्वाच्य आहे. (५१९४)

हे मायादि उद्भवती की नासती । संबंधचि नाही मजप्रती ।
जैसा परिपूर्ण आदिअंती । तैसाचि पूर्ण मध्येही ॥ ९५ ॥
हे माया इ. उद्भवोत अथवा नष्ट होवोत, माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. मी आरंभी जसा परिपूर्ण आहे तसाच शेवटीही परिपूर्ण आहे आणि मध्येही परिपूर्ण आहे. (५१९५)

ब्रह्मात्मा मी केवळ चित्सागर । मायादि तृणान्त तरंगाकार ।
उद्भवो की नासो सर्व प्रकार । परी मज उद्भव ना हानी ॥ ९६ ॥
मी ब्रह्मात्मा असून केवळ चैतन्याचा सागर आहे. मायेपासून तृणापर्यंतचे सर्व पदार्थ माझ्यावर उठणारे तरंग आहेत. ते उद्भवोत अथवा नष्ट होवोत, परंतु मला मात्र उत्पत्तीही नाही की नाशही नाही. (५१९६)

ब्रह्मात्मा स्वयें एकरूप चिद्गगन । मायामेघ जग वर्षे जीवन ।
अतिवृष्टि अनावृष्टि होतां परिपूर्ण । त्या मज हानि ना लाभु ॥ ९७ ॥
ब्रह्मात्मा स्वतः एकरूप चिद्गगनरूपी आहे. मायारूपी मेघ जगरूपी पाण्याचा वर्षाव करीत आहेत. त्यामुळे अतिवृष्टी होवो अथवा अनावृष्टी होवो. मी परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या त्या वृष्टीमुळे मला लाभही होत नाही अथवा हानीही होत नाही. (५१९७)

तस्मात् हे सर्व उद्भवे की नासे । अथवा होईना का भलतैसें ।
मी जैसा असें तैसाचि असें । अखंड परिपूर्ण ॥ ९८ ॥
त्यामुळे हे सर्व ब्रह्मांड उत्पन्न झाले काय, अथवा नाश पावले काय, अथवा त्याचे काहीही झाले तरी मी जसा आहे तसाच आहे. म्हणजे परिपूर्ण आणि अखंड असा. (५१९८)

ऐसा ब्रह्मात्मा स्वयें एकरसें । आपण आपणामाजी विलसे ।
स्मरतां न स्मरतां असेंचि असे । भलतैसे प्रसंगी ॥ ९९ ॥
असा मी ब्रह्मात्मा असून स्वतः एकरूप असा आहे. मी स्वतः स्वतःमध्येच विलास करतो आहे. म्हणून स्मरण करत असताना किंवा स्मरण करत नसताना कोणत्याही प्रसंगी मी असतोच असतो. (५१९९)

नेत्र झांकितां ओतप्रोत । उघडितां अंतर्बाह्य सबराभरित ।
शब्द ऐकतां ब्रह्मीं ब्रह्म विलसत । नायकतां तेंचि तें ॥ ५२०० ॥
डोळे मिटून पाहत असता मी ओतप्रोत असतो, आणि डोळे उघडून पाहिल्यानंतरही मी सर्वत्र व्यापलेला असतो. शब्द ऐकतो तेव्हाही ब्रह्म होऊन ब्रह्मामध्येच विलास करत असतो आणि ऐकत नसतानाही माझी तीच क्रीडा चालू असते. (५२००)

स्पर्शतां ब्रह्मसुख उचंबळे । न स्पर्शतां केवळत्वें निवळे ।
रसीं सुगंधी निजात्म सोहाळे । अभावी एकरस ॥ १ ॥
स्पर्श करत असताना माझ्या ठिकाणी ब्रह्मसुख उचंबळून येते आणि स्पर्श नसतानाही मी केवलत्वाचा अनुभव घेत शांत होतो. रसाचा आस्वाद घेतो तेव्हा, सुगंधाचा गंध घेत असताना माझ्या ठिकाणी निजात्मरूपाचे सोहळे असतात आणि या विषयांचा आस्वाद घेत असतानाही मी एकरूपच असतो. (५२०१)

बोलतां की अन्य क्रिया करितां । ब्रह्मीं ब्रह्म विलसे तत्त्वतां ।
अक्रियकाळी तों ब्रह्मात्मैक्यता । सहजी सहज ॥ २ ॥
बोलताना अथवा अन्य क्रिया करत असताना ब्रह्मच ब्रह्माच्या ठिकाणी क्रीडा करत असते आणि काहीही क्रिया करत नसताना तर सहजच ब्रह्मात्मैक्याचीच स्थिती झालेली असते. (५२०२)

मन बुद्धिआदि जेव्हां उद्भवे । तेव्हां ब्रह्मात्मरूपत्वेंचि हेलावे ।
जेवीं ज्वाळेसहित अग्नीने भडकावें । तेवीं अभेदरूपीं ॥ ३ ॥
मन, बुद्धी जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा ब्रह्मात्मस्वरूपानेच मी हेलावत असतो आणि ज्वालेसहित अग्नी भडकलेला असतो तेव्हाही माझ्या स्वरूपात काही भेद निर्माण होत नाही. (तेव्हाही मी अभिन्न रूपानेच असतो) (५२०३)

मनबुद्ध्यादि जेधवां मावळती । तेधवां निर्विकारचि निश्चितीं ।
जैसा ज्वाळेविण गार्हपति । तेवीं स्वयंज्योति एकट ॥ ४ ॥
मन, बुद्धी इ. जेव्हा मावळतात तेव्हाही मी निश्चितपणे निर्विकारच असतो. जसा अग्नी ज्वालेवाचून, (ज्वालारहित) असतो तेव्हा जसा एकटा असतो तसा मीही स्वयंज्योती असा एकटेपणाने असतो. (५२०४)

वृत्ति उठतां की पसरतां निमतां । ब्रह्मात्मा ब्रह्मात्मत्त्वीं ऐता ।
तिहींकाळी जरी एकात्मता । तरी उठो की निमो ॥ ५ ॥
वृत्ती उठो, पसरो अथवा मावळो ब्रह्मात्मा मात्र आपल्या ब्रह्मात्मत्वात तिन्ही काळी एकात्मत्वाने व्यापून असतो. वृत्ती उठली काय आणि मावळली काय, तो निर्विकार असतो. (५२०५)

एवं वृत्ति मन बुद्धि इंद्रिय । प्राणासहित उद्भवे समुदाय ।
आपुलाले घेतांहि विषय । परी द्वैतभाव न स्पर्शे ॥ ६ ॥
अशा प्रकारे वृत्ती, मन, बुद्धी, इंद्रिये, आणि प्राण हा समुदाय उत्पन्न होऊन आपापले विषय घेऊ लागला तरी ब्रह्मात्म्याच्या ठिकाणी द्वैतभावना स्पर्श करत नाही. (५२०६)

जेव्हां जेव्हां वृत्यादि उद्भवत । तेव्हां तेव्हां सहज मिथ्याभूत ।
नामरूप नाहींच मी सबराभरित । तरी समानचि उद्भव लय ॥ ७ ॥
जेव्हा जेव्हा वृत्त्यादी समुदाय उद्भवतो तेव्हा तेव्हा तो स्वाभाविकपणे मिथ्याच असतो. नामरूपे वास्तवात नाहीतच. मी मात्र नामरूपरहित असा सर्वत्र व्यापून असतो. अशा मला उत्पत्ती आणि लय सारखेच असतात. (५२०७)

कवणेही काळी मज ब्रह्मात्मया । द्वैतचि न स्पर्श अवस्थे भलतिया ।
एकला एकचि पर्ण अद्रया । माजीं अद्रय सघन ॥ ८ ॥
मी जो ब्रह्मात्मा आहे त्याला द्वैत कोणत्याही काळी, कोणत्याही अवस्थेत स्पर्श करत नाही. मी एकटाच पूर्ण आणि अद्वय असतो आणि माझ्या ठिकाणी अद्वयभाव दाटलेला असतो. (५२०८)

मी ब्रह्मात्मा येवढा घनदाट । की अणसी दैतपणे नव्हे वाट ।
सर्व नामरूप तो नामरूपचि अविट । जललहरी जेवीं ॥ ९ ॥
मी ब्रह्मात्मा एवढा घनदाट आहे की माझ्यामध्ये द्वैतभावाने शिरण्यास अणूलाही वाव नाही. सर्व नामरूपे अखंडपणे एकरूपच असतात. पाणी आणि त्यावरील लाटा या जशा एकरूपच असतात तसाच हा प्रकार आहे. (५२०९)

ऐसा मी परिपूर्णत्वे एकला । आदि मध्य अवसानी संचलों भला ।
आहा अज्ञानाचा कैसा घाला । गमावलों होतों कीं ॥ १० ॥
मी असा परिपूर्ण असल्याने आदी, मध्य आणि शेवट या सर्व अवस्थात एकटा व्यापून राहिलेला असतो. पण पहा, अज्ञानाचा घाला कसा असतो! असा जो मी तो अज्ञानामुळे स्वतःला हरवून बसलो होतो. (५२१०)

ऐसा असून होतों हारपलों । तो सद्गुरुकृपें मज मी गवसलों ।
आहा आतां केवढा किती संचलों । तो अंत नसे माझा मज ॥ ११ ॥
असा एकरूप, अद्वय, परिपूर्ण, निर्विकार असा असूनही स्वतःला हरवून बसलो होतो. तो आज सद्गुरुकृपेने स्वतःला सापडलो अहाहा! आता मी केवढा आहे, किती पसरलो आहे, त्याचा माझा मलाच अंत लागत नाही. (५२११)

अहो आश्चर्यसा मी अनंत असोनी । बैसलों होतों देहायेवढा होवोनी ।
तया अज्ञानाचा मी घोट भरोनी । उरलों परिपूर्ण ॥ १२ ॥
अहो मीच स्वतः एक आश्चर्यासारखा अनंत असून देहाएवढा होऊन बसलो होतो. आता त्या अज्ञानाचा घोट घेऊन मी परत परिपूर्ण होऊन उरलो आहे. (५२१२)

ऐशी मागील संकोचता आठवे । प्रस्तुत जाहलें ज्ञान तें हेलावे ।
तेव्हां वृत्ति खळबळून रडूंच यावें । की हसावें गदगदूनी ॥ १३ ॥
अशा परिस्थितीत मला माझी मागील संकुचित स्थिती आठवते त्या आठवासरशी आता जे ज्ञान झाले आहे त्याला हेलकावे बसत आहेत. तेव्हा वृत्ती खळबळून येतात आणि मग रडायलाच होते किंवा गद्गदून हसावेसे वाटते. (५२१३)

भेदें शिणविलें होतें ह्मणूनी । रडूं लागे दीर्घ निर्लज्ज जनीं ।
आहा आतां मी मजमाजी पूर्णपणीं । तेव्हां हांसे निःशंक ॥ १४ ॥
भेदबुद्धीने खूप त्रास दिला होता म्हणून लोकांमध्ये लाज सोडून खूप रडू आले. आणि आता मी पूर्णपणे आपल्यामध्येच आहे या विचाराने निःशंक होऊन हसत आहे. (५२१४)

अहो धन्य मी सद्गुरुकृपें । भवसिंधु हा मारिला थापें ।
मायेसहित ब्रह्मांड लोपे । माझिये वृत्तीमाजीं ॥ १५ ॥
अहो, सद्गुरूंच्या कृपेने मी धन्य झालो आहे, मी संसाररूपी सागराला एक थापड मारली आहे, त्यामुळे सर्व ब्रह्मांड मायेसहित माझ्या वृत्तीत लोप पावले आहे. (५२१५)

विद्या अविद्या ऐशिया दोनी । निःशेष बैसलों मी गिळूनी ।
त्यांतील प्रतिबिंबें तों मिळोनी । गेली माझी मजमाजीं ॥ १६ ॥
विद्या आणि अविद्या या दोन्ही मी पूर्णपणे गिळून बसलो. त्यातील माझी जीव आणि शिव ही प्रतिबिंबे माझ्यामध्ये मिळून गेली. (५२१६)

येर हे बापुडे वृत्यादिक । निस्तत्वें उठती निमती सकळिक ।
परी मी द्वैतेंविण एकला एक । सर्वात्मा सर्वरूपीं ॥ १७ ॥
बाकीची वृत्ती इ. बिचारी सगळी तत्त्वे निःसत्त्व असल्यामुळे उत्पन्न होतात आणि लय पावतात. पण मी मात्र द्वैतरहित होऊन, सर्वात्मा होऊन सर्वांमध्ये व्यापून असतो. (५२१७)

अहो ऐसा जो मी तया ऐशिया । माझें नमन सर्वस्वी सर्वात्मया ।
माझें मजचि आलिंगन अद्वया । गगनीं गगना स्थिति जेवीं ॥ १८ ॥
अहो, असा जो मी आहे, अशा त्या सर्वस्वी सर्वात्मा झालेल्या मला माझे नमन असो. आकाशात आकाशाची जशी भेट असते त्याप्रमाणे अद्वय अशा मला माझेच आलिंगन आहे. (५२१८)

धन्य शास्त्र धन्य विचारु । धन्य आह्मी धन्य सद्गुरु ।
धन्यचि धन्य धन्य निर्धारु । धन्य समाधान ॥ १९ ॥
खरोखरच हे शास्त्र धन्य आहे, विचार धन्य आहे, आम्ही शिष्य धन्य आहोत, आमचे सद्गुरू धन्य आहेत. आमचा निर्धार धन्य आहे, तसेच आमचे समाधानही धन्य आहे. (५२१९)

अहो कैसें होतें कैंसे जाहलें । जें कधीं देखिलें ना नव्हतें ऐकलें ।
तेंचि एकाएकी गुरूनें केलें । काहींच्याबाहीं ॥ २० ॥
अहो, माझी स्थिती अगोदर कशी होती आणि कशी स्थिती झाली आहे! असे यापूर्वी कधी पाहिले नव्हते, आणि ऐकलेही नव्हते! पण सद्गुरूंनी एकदम काहीच्या बाही केले! (५२२०)

देवपद धुंडावयासी गेलों । तंव देवांचा देवचि होऊन बैसलों ।
शेखीं देवत्वत्यागें सहज संचलों । अनिर्वाच्य अद्वय ॥ २१ ॥
मी देवपदाचा शोध घेत गेलो आणि देवांचाही देव होऊन बसलो. शेवटी त्या देवत्वाचाही त्याग केल्यानंतर अनिर्वाच्य आणि अद्वय होऊन सहज सर्वत्र व्यापून राहिलो आहे. (५२२१)

येर लोक उगेचि कष्टती । देवदेव म्हणून प्रयत्न करिती ।
वाउगेचि एकदेशी असेल ह्मणती । वैकंठी की कैलासीं ॥ २२ ॥
इतर लोक देव देव म्हणून खूप प्रयत्न करतात आणि उगीच कष्ट करतात आणि उगीचच त्याला एकदेशी ठरवून कैलासात अथवा वैकुंठात देव भेटेल असे म्हणतात. (५२२२)

परी तो एकदेशी देव कैंचा । वाउगाचि स्वभाव या मायेचा ।
अज्ञानें भ्रमले तया ज्ञानाचा । लेश कदा नुद्भवे ॥ २३ ॥
पण असा जो एकदेशी म्हणजे विशिष्ट स्थळापुरता मर्यादित असतो तो देव कसला? पण हा या मायेचा उगीचच निरर्थक स्वभाव आहे. ती लोकांना फसवत असते. जे लोक अज्ञानाने भटकत असतात. त्यांना ज्ञानाचा कणसुद्धा प्राप्त होत नाही. (५२२३)

असो परोपदेशी बापा मज । काय हो किंचित् असे काज ।
माझें मज सदगुरूनें गुज । यथार्थ तें दिधलें ॥ २४ ॥
असो, परोपदेश करून मला काय मिळणार आहे? माझ्या सद्गुरूंनी माझे यथार्थ गुज (गूढ साध्य) मला प्राप्त करून दिले आहे. (५२२४)

आतां द्वैत कोठेचि आढळेना । माझा मी मजमाजी पूर्णपणा ।
तिहींकाळी नव्हे अधिक उणा । जैसा तैसा सहज ॥ २५ ॥
आता मला द्वैत कोठेच आढळत नाही. मी माझ्यात पूर्णपणाने सामावेलेलो आहे. तीन्ही काळात माझ्यात कमी अधिकपणा होत नाही. मी जसा आहे तसाच सहजपणाने आहे. (५२२५)

अनंत ब्रह्मांडे माझिये पोटीं । मजमाजी सर्वांची राहटी ।
आणि सर्वांमाजी माझीच दाटी । निर्विकारत्वें पूर्ण ॥ २६ ॥
माझ्यामध्ये अनंत ब्रह्मांडे सामावलेली आहेत. माझ्यामध्ये त्या सर्वांची रहाटी चालू असते. त्या सर्वांच्यामध्ये मी दाटून सामावलो आहे. (त्या सर्वांना पूर्णपणे व्यापून राहिलो आहे.) मी निर्विकार राहून सर्वांना व्यापून राहिलो आहे. (५२२६)

ऐसा मी एकपणेंविण एकला । समष्टिरूपें सर्वात्मा संचला ।
अनुभूतीविण आपआपणाला । आपुलेपणे असें ॥ २७ ॥
असा हा मी एकपणावाचून एकटाच असून समष्टीमध्ये सर्वात्मा होऊन व्यापून राहिलो आहे. आपणच आपल्याला न अनुभवता आपलेपणाने मी राहतो. (५२२७)

ऐसें अनेका प्रकारें जैसे जैसें । जें जें आठवेल प्रसंगाऐसें ।
तें तें चिंतावें तैसें तैसें । विस्मृति न होतां ॥ २८ ॥
अशा अनेक प्रकारांनी जसे जमेल तसे, प्रसंगानुसार जसे आठवेल तसे विस्मरण होऊ न देता चिंतन करावे. (५२२८)

मुख्य ऐक्यत्व कदा न भंगावें । नामरूपादि भेद न व्हावे ।
मग स्मरेल त्या युक्तीनें स्मरावें । ब्रह्मात्मत्व दृढ व्हावया ॥ २९ ॥
मुख्य ऐक्याचा भंग होऊ देऊ नये, नामरूपादी भेद उत्पन्न होऊ देऊ नयेत. त्यानंतर आपले ब्रह्मात्मत्व दृढ व्हावे म्हणून जसे आठवेल त्या प्रकाराने ब्रह्मात्मत्वाचे स्मरण ठेवावे. (५२२९)

ऐसा प्रकार ज्ञानिया सहजगती । अपैसा होय तेचि सहजस्थिति ।
परी बळ करणे लागे साधकाप्रती । या रीतीं ब्रह्मचिंतनिका ॥ ३० ॥
असा प्रकार ज्ञानी माणसाला सहजगतीने साध्य होतो. ती त्याची सहजस्थिती होय. परंतु साधकाला मात्र वर सांगितलेली ब्रह्मचिंतनिका बळेच करावी लागते. (५२३०)

ऐशी ब्रह्मचिंतनिका अल्प सांगितली । या रीतींच साधकं पाहिजे साधली ।
येथे मानिसील की न बोलतां बोली । तरी मौनें चिंतन घडे ॥ ३१ ॥
अशी ब्रह्मचिंतनिका थोडक्यात सांगितली. साधकाने याच पद्धतीने ती साधावी. अशी ब्रह्मचिंतनिका शब्दांनी न बोलता मौनपूर्वक चिंतनानेच घडेल असे तू मानत असशील तर (५२३१)

कवणासी जरी बोलणे लागे । अनेकधा व्यापारप्रसंगें ।
तरी कैसें चिंतावें लागवेगें । तरी येविषईं बोलूं ॥ ३२ ॥
कोणाशी व्यापारातील अनेक प्रकारच्या प्रसंगांनी बोलण्याचा प्रसंग आला तर त्याप्रसंगी वरीलप्रमाणे चिंतन लगबगीने कसे करावे त्या संदर्भात काही सांगतो. (५२३२)

पद : तत्कथनं ।
पदार्थ : त्याच्याबद्दल बोलणे

कवणासी जरी बोलणें पडे ।
तरी तेंचि कथन करावें कोडें । ब्रह्मात्मत्व न विसरावें रोकडें । द्वैतभाव नुठतां ॥ ३३ ॥
कोणाशी बोलण्याचा प्रसंग आला तर त्या ब्रह्मात्म्याच्या संदर्भातच कौतुकाने (हौसेने) कथन करावे. आणि द्वैतभाव उठू न देता प्रत्यक्ष ब्रह्मात्मत्वाचा विसर पडू देऊ नये. (५२३३)

नाना दृष्टांत युक्तीकडून । बहुधा श्रुतीचे घेऊन वचन ।
तेंचि साधकाप्रती करावें कथन । ब्रह्मात्मा ऐक्यरूप ॥ ३४ ॥
निरनिराळे दृष्टान्त, युक्तिवाद यांचे साहाय्य घेऊन, बहुतकरून श्रुतिवचनांचा आधार घेऊन त्या एकरूप ब्रह्मात्मत्वाचेच साधकांपुढे निरूपण करावे. (५२३४)

संयुक्तिक दृष्टांताचि योजना । श्रुति अनुभवा योग्य सांग रचना ।
करावी जेणें संतोष साधुजना । होय ब्रह्मानुभवाचा ॥ ३५ ॥
युक्तिवादासहित दृष्टान्तांची योजना करून, श्रुतिवाक्यांचा अनुभव येईल अशा प्रकारची योग्य मांडणी करून साधुजनांना जेणेकरून ब्रह्मानुभवाचा संतोष प्राप्त होईल, असे निरूपण करावे. (५२३५)

कवणेही प्रकारे द्वैत नुद्भवावें । ब्रह्मात्मत्वचि सदृढ दुणावे ।
ऐसेंचि सदृष्टांत सर्व बोलावें । अन्य त्यागावें बाष्कळ ॥ ३६ ॥
कोणत्याही प्रकारचे द्वैत उत्पन्न होऊ देऊ नये; ब्रह्मात्मत्वाचा अनुभव दृढ होऊन दुप्पट व्हावा, अशाच प्रकारे दृष्टान्तयुक्त बोलावे; बाकीचे बाष्कळ बोलणे टाळावे. (५२३६)

दृष्टांताकारणे ब्रह्मांड विवरावें । मनें कल्पून युक्तसे योजावे ।
परी वक्तृत्वाचे साहित्य न भंगावें । आणि विरोधही न यावा ॥ ३७ ॥
दृष्टान्तांसाठी सर्व ब्रह्मांड धुंडाळून विवरण करावे, अनेक कल्पना करून योग्य असेल तिचा स्वीकार करून सांगावे, वक्तृत्वाची सामग्री कमी पडू देऊ नये, आणि आपल्या बोलण्यात विरोध येऊ देऊ नये. (५२३७)

मागील प्रसंगी एक बोलिला । दुजियाविषई त्या विरोधा आला ।
ऐसें न बोलावें पूर्वापर निरूपणाला । एकरूपता असावी ॥ ३८ ॥
मागील एखाद्या प्रसंगी आपण एक सांगितलेले असते. दसऱ्या प्रसंगाच्या वेळी त्याला विरोध येईल असे बोलू नये; पूर्वीचे बोलणे आणि नंतरचे बोलणे यात एकरूपता असावी. (५२३८)

साधकासी जया निरूपणे । अधिकाधिक समाधान बाणे ।
आणि पूर्ण ज्ञात्यासी संतोष जेणें । ऐसें सांग बोलावें ॥ ३९ ॥
ज्या निरूपणाने साधकाला अधिकाधिक समाधानाचा अनुभव येईल; आणि पूर्ण ज्ञानी जो असेल त्याला ज्या योगाने संतोष होईल असेच यथासांग बोलावे. (५२३९)

म्हणसी साधक की ज्ञात्यासी बोलतां । ब्रह्मानुभव बोलावा जो तत्त्वतां ।
परी अन्य अज्ञानासी प्रसंग पडतां । कैसें बोलावें ॥ ४० ॥
तू असे विचारशील की, साधक आणि ज्ञानी माणसांशी बोलताना ब्रह्मानुभव बोलावा, हे बरोबर आहे. पण अज्ञानी माणसाशी गाठ पडली तर कसे बोलावे? (५२४०)

तरी अवधारी तया अज्ञानासी । प्रसंगें बोलावें प्रस्ताविकासी ।
ब्रह्मज्ञानही कथितां सारांशीं । बाधही नाहीं ॥ ४१ ॥
तर लक्ष देऊन ऐक. त्या अज्ञानी माणसास बोलण्याचा प्रसंग आलाच तर प्रास्ताविक स्वरूपाचे बोलणे करावे, वाटल्यास त्याला ब्रह्मज्ञानही सारांशाने सांगितल्यास काही हानी होणार नाही. (५२४१)

तयासी मात्र नव्हे ग्रहण । नव्हे तरी व्यर्थ जाय निरूपण ।
परी स्वयें आपुलें तो दृढ समाधान । दुणावे बोलतां ॥ ४२ ॥
पण त्याला ते ग्रहण होत नसल्यास सांगितलेले निरूपण व्यर्थ जाईल. पण त्याचा एक फायदा असा होईल की, आपले दृढ झालेले समाधान त्या ब्रह्मज्ञानाच्या निरूपणाने दुप्पट होईल. (५२४२)

तथापि तया अज्ञान जनासी । बोलूंचि नये सांग स्थिति जैशी ।
बोलणे पडे तरी रूपकेंसी । वर्जून बोलावें! ॥ ४३ ॥
तरीसुद्धा त्या अज्ञानी माणसाला समग्र विषय सांगूच नये. पण सांगणे भागच पडले तर रूपकांच्या साहाय्याने वर्णन करून बोलावे. (५२४३)

तयासी तों काही न कळे । आणि आपुला तरी स्वानुभव उफाळे ।
मुख्य भलतैसे प्रसंगी ऐक्य निवळे । तैसें घडावें आपणा ॥ ४४ ॥
त्याला तर काहीच कळणार नाही आणि आपला स्वानुभव मात्र उचंबळून येईल. मुख्य गोष्ट ही की, कोणत्याही प्रकाराने आपले ऐक्य सिद्ध होईल, अशाच प्रकारची मांडणी करावी. (५२४४)

बहुधा अज्ञानासी संवादन । घडूच नये वेदांतनिरूपण ।
तयापुरतें तयास बोलून । उगें मौने असावें ॥ ४५ ॥
बहुतकरून अज्ञानी व्यक्तीबरोबर वेदान्ताविषयीचे संभाषण करूच नये. त्याला तात्पुरते बोलून आपण मौनानेच राहावे. (५२४५)

मुख्य ज्ञात्यासी किंवा साधकासी । बोलावें सांग स्वानुभवासी ।
अथवा बोधावें अधिकारी मुमुक्षूसी । प्रबोधशक्तीच्या बळें ॥ ४६ ॥
मुख्यतः ज्ञात्याबरोबर अथवा साधकाबरोबर आपल्या अनुभवाबद्दल सांगोपांग बोलावे. किंवा अधिकारी व्यक्ती पाहन आपल्या प्रबोधशक्तीनुरूप त्यास ज्ञानाचा उपदेश करावा. (५२४६)

मुख्य मिळतां प्रतीतीचा संत । तो तरी एकांतापरीस एकांत ।
तेथे निःशंक बोलावें यथायुक्त । गोप्य तेंही ॥ ४७ ॥
मुख्यत्वेकरून अनुभवयुक्त संत भेटताच तो एकांतापेक्षाही जास्त एकान्त होतो, त्यावेळी निःशंकपणे यथायुक्त गौप्य गोष्टीपण बोलाव्यात. (५२४७)

पद : अन्योन्यं तत्प्रबोधनं ।
पदार्थ : ते ब्रह्म एकमेकांना समजावून सांगणे.

आपण तयासी स्पष्ट बोलावें ।
नातरी तयाचें निरूपण ऐकावें । ऐसें परस्परें प्रबोधन घडावें । जेणे दुणावे समाधान ॥ ४८ ॥
आपण त्याला स्पष्ट सांगावे, किंवा त्याचे बोलणे ऐकावे. अशा प्रकारे एकमेकाला सांगावे. त्यामुळेच एकमेकाला ज्ञान प्राप्ती होऊन प्रबोधन घडते आणि आपले समाधान दुणावते (दुप्पट होते) (५२४८)

प्रबोधन म्हणिजे बोध आपुला । प्रकर्षे पाहिजे दुणावला ।
ऐसाचि पाहिजे संवाद जाहला । उभयक्षींही ॥ ४९ ॥
प्रबोधन म्हणजे आपल्याला झालेले ज्ञान प्रकनि वाढणे. असाच उभयपक्षी संवाद झाला पाहिजे. (५२४९)

आपणाहून उणीवता असतां । तयाची प्रघोधून करावी पूर्णता ।
अथवा समान असलिया तत्त्वतां । तैसेंचि परस्परें बोलावें ॥ ५० ॥
आपणापेक्षा त्याच्याकडे उणीवता असेल तर त्यास बोध करून त्याची पूर्तता करावी. अथवा त्याचे आणि आपले ज्ञान समान असेल तर उभयतांनी परस्परांशी तसेच समान पातळीवरून बोलावे. (५२५०)

त्याचे समाधान आपण घ्यावें । आपुलें तयासी निरूपावें ।
त्याचे उणेपण उरो न द्यावें । आणि आपुलें त्यामुळे ॥ ५१ ॥
त्याचे समाधान आपण घ्यावे, आपले समाधान त्याला सांगावे, त्याच्यातील कमतरता राह देऊ नये आणि आपलेही न्यून त्याच्या साहाय्याने राह देऊ नये. (५२५१)

जैसे दोन दीप असतां समोर । फेडिती तळींचा अंधःकार ।
तैशी गुप्त उत्थाने परस्पर । फिटती एकमेकांची ॥ ५२ ॥
ज्याप्रमाणे दोन दीप समोरासमोर तेवत असतील तर ते परस्परांच्या तळाशी असलेला अंधार नाहीसा करतात. त्याप्रमाणे अशा परस्परांच्या देवाणघेवाणीने एकमेकांची गुप्त उत्थाने (चिंतनातील अडथळे) परस्पर दूर होतात. (५२५२)

आपणाहून जे ज्ञाते अधिक । उत्थानरहित निश्चयात्मक ।
तयांचा होऊनियां सेवक । सहजस्थिति आकळावी ॥ ५३ ॥
आपल्यापेक्षा जे अधिक ज्ञानी आहेत, ते निश्चितपणे उत्थानरहित (अडथळ्यांपासून मुक्त) आहेत, त्यांचा सेवक होऊन सहजस्थिती समजून घ्यावी. (५२५३)

ऐसें परस्परें प्रबोधासी । संवादसुख होतां दिनदिशीं ।
वृद्धीच होय अखंडैकरसीं । त्रिकाली उत्थानरहित ॥ ५४ ॥
अशा प्रकारे रात्रंदिवस संवादसुख घेतल्यामुळे परस्परांच्या ज्ञानामध्ये अखंडतिपणे वृद्धीच होत जाते. त्यामुळे आपले ज्ञान तिन्ही काळी उत्थानरहित होते. (५२५४)

एवं एकट असतां घडावें चिंतन । दुजें मिळतां करावें कथन ।
ज्ञाते साधक तरी संवादन । परस्परें प्रबोधाचें ॥ ५५ ॥
अशा प्रकारे एकटे असताना चिंतन घडावे, दुसरे कोणी भेटता त्याला निरूपण करावे, ज्ञानी साधक भेटले तर त्यांच्याशी संवाद करून परस्परांच्या ज्ञानाची देवाणघेवाण करावी. (५२५५)

श्लोकः एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासं बुधाः विदुः ॥ १७ ॥ (उत्तरार्ध)
अर्थ : अशा त-हेने त्याच एकाचा ध्यास घेऊन राहणे याला ज्ञानी लोक ब्रह्माचा अभ्यास म्हणून ओळखतात. ॥१७॥ (उत्तरार्ध)

ऐशियापरी चिंतन कथनात्मक । सदा होणे जरी निश्चयात्मक ।
हाचि ब्रह्माभ्यास एकपरत्वें एक । पूर्ण ज्ञाते जाणती ॥ ५६ ॥
अशा प्रकारे निश्चयपूर्वक चिंतन कथनात्मक संवाद नित्य होत राहिला तर हाच एक प्रकारचा ब्रह्माभ्यास होय, असे पूर्ण ज्ञानी असलेले लोक जाणतात. (५२५६)

सदा श्रवण अथवा मनन । एकरूप चिंतने अनुसंधान ।
यापरतें साधन असे कवण । मुमुक्षु साधकासी ॥ ५७ ॥
सतत श्रवण अथवा मनन किंवा एकरूप अनुसंधानपूर्वक चिंतन करणे याखेरीज मुमुक्षू साधकाला दुसरे कोणते साधन आहे? (५२५७)

तस्मात् हेंचि साधन हाचि अभ्यास । हाचि योग ध्यानही असे नाम यास ।
मात्र विस्मरण न व्हावें बुद्धीस । हेचि एकपरत्व ॥ ५८ ॥
म्हणून हेच साधन होय, आणि हाच अभ्यास होय. हाच योग असून यालाच ध्यान असेही नाव आहे. मात्र बुद्धीला कधीही विस्मरण होऊ देऊ नये, ही एकपरता होय. (५२५८)

ऐसाचि अभ्यास साधका जरी । तरीच सहजस्थिति अपैसा वरी ।
ऐशिया अभ्यासा मानवती अंतरीं । पूर्ण ज्ञाते सहज ॥ ५९ ॥
साधकाने असाच अभ्यास जर केला तर त्याला सहजस्थिती आपोआप प्राप्त होते. असा अभ्यास पूर्ण ज्ञानी लोकांना सहज मनापासून मान्य होतो. (५२५९)

ह्मणती भला भला त्या साधका । ब्रह्माभ्यास आरंभिला निका ।
अपरोक्षं जाणोनियां तवका । तञ्चितनादि करिसी ॥ ६० ॥
ते त्या साधकाची भला भला म्हणून भलावणी करतात. “ब्रह्माभ्यासाचा चांगला आरंभ केला आहे, मोठ्या धैयनि (तवका) ब्रह्माची समक्ष ओळख करून घेऊन त्याचे चिंतन, निरूपण इ. करत आहेस. (५२६०)

यापरें साधनचि नलगे । येणेचि वस्तुतंत्र होय निजांगे ।
ऐसेंचि अनुमोदन देती वेगें । ययाभ्यासा ॥ ६१ ॥
यासारखे दुसरे साधन नाही, याच अभ्यासाने तू स्वतः वस्तुतंत्र होशील" असे म्हणून ते या अभ्यासाला लागलेच अनुमोदन देतात. (५२६१)

तस्मात् पूर्ण ज्ञाते याचि अभ्यासा । जाणत असती एकपरत्व सहसा ।
येर रोधादिकां साधनां फोसां । अनुमोदन न देती ॥ ६२ ॥
म्हणून पूर्ण ज्ञानी लोक याच अभ्यासाला एकपर होण्यास सांगतात. इतर निरोधन करणे इ. व्यर्थ (पोकळ) साधनांना ते अनुमोदन देत नाहीत. (५२६२ )

एक पूर्ण ज्ञाते किंवा साधक । जे स्मरण अभ्यासा प्रवर्तक ।
तेचि ऐशिये अभ्यासा निश्चयात्मक । एक परत्व म्हणती ॥ ६३ ॥
एक पूर्ण ज्ञाते असतील ते आणि या स्मरण अभ्यासाला प्रवृत्त झालेले साधक हे दुसरे हेच अशा अभ्यासाला निश्चयाने एकपरत्व म्हणतात. (५२६३)

येर उपासक कर्मी की योगी । हा अभ्यास नावडे तयांलागीं ।
परंतु जे ज्ञाते ब्रह्मात्मसंयोगी । त्यांसी हाचि आवडे ॥ ६४ ॥
बाकीचे उपासक, कर्ममार्गी, योगाभ्यासी इ. अन्य मार्गाचे अवलंबन करणाऱ्या लोकांना हा अभ्यास आवडत नाही. परंतु जे ज्ञानी लोक ब्रह्म आणि आत्मा यांचा संयोग करू पाहतात त्यांना हाच अभ्यास आवडतो. (५२६४)

स्नानसंध्या यागादि नसतां । होपळ वाटे कर्मियां समस्तां ।
भजन पूजन मूर्तिध्यान न होतां । उपासका अनावडी ॥ ६५ ॥
स्नानसंध्या, याग इ. कर्मे नसतील तर सर्व कर्ममार्गी लोकांना हा अभ्यास निष्फळ (होपळ) वाटतो. त्यामध्ये भजन, पूजन, मूर्तीचे ध्यान इ. होत नसल्यामुळे उपासनामार्गी लोकांना तो आवडत नाही. (५२६५)

* मुद्रादि साधने की प्राणायाम । अथवा मूळबंध धारणा नेम ।
बुद्धिरोध नसतां हा योग परम । योगियासी नावडे ॥ ६६ ॥
मुद्रादी साधने अथवा प्राणायाम, किंवा मूलबंध, धारणा (अष्टांग योगातील सातवे अंग) इ. नेम त्यात नसतात. बुद्धीचे निरोधन त्यात नसते. त्यामुळे हा ध्यानयोग श्रेष्ठ असूनसुद्धा योग्यांना तो आवडत नाही. (५२६६)

तस्मात् सर्व कर्मही त्यागूनी । भजन पूजन अव्हेरूनी ।
आणि निरोधादि उपेक्षूनी । श्रवणादि करिती ॥ ६७ ॥
त्यामुळे सर्व कर्माचा त्याग करून; भजन, पूजन इ. चा अव्हेर करून, तसेच प्राणनिरोध, इ. मार्गाची उपेक्षा करून ज्ञानी आणि साधक लोक श्रवण इ. करतात. (५२६७)

श्रवण चिंतन कथन ध्यान । एकरूप सर्व अनुसंधान ।
हा ब्रह्माभ्यास साधका पूर्ण । असतां आवडे ज्ञानिया ॥ ६८ ॥
श्रवण, चिंतन, कथन, ध्यान इ. मार्गांनी सर्व अनुसंधान एकरूप करून ब्रह्माचा अभ्यास करण्याचा हा मार्ग साधक आणि पूण ज्ञानी लोकांना आवडतो. (५२६८)

अगा ऐशिया सदा अभ्यासापुढें । देहबुद्धि राहील कोणीकडे ।
प्रज्वल अग्नीत जेवीं न दडे । कापूसपणे कापूस ॥ ६९ ॥
अशा या नित्याच्या अभ्यासापुढे देहबुद्धी कशी टिकाव धरील? पेटलेल्या अग्नीमध्ये आपला कापूसपणा सांभाळून कापूस कधी तरी टिकाव धरील काय? (५२६९)

देहबुद्धि जाळावया जगीं । हेचि ब्रह्मचिंतनिका दांडुगी ।
या अभ्यासें निसंतान होऊन वेगीं । सहजस्थिति बाणे ॥ ७० ॥
देहबुद्धी जाळण्यासाठी जगामध्ये ही ब्रह्मचिंतनिकाच समर्थ आहे. या अभ्यासाच्या योगाने देहबुद्धी निसंतान (पूर्णपणे नष्ट) होऊन अंगी सहजस्थिती बाणते (५२७०)

त्रिविध अभिमानासगट । मूलाज्ञानाचा भरी घोट ।
सर्व असतांचि समाधान अविट । उत्थानरहित बाणे ॥ ७१ ॥
हा अभ्यास सर्व प्रकारच्या अभिमानांसह मूल अज्ञानाचा नाश करतो; आणि सर्व परिसर आणि परिवार सभोवती असतानाच उत्थानरहित, कधीच न विटणाऱ्या समाधानाची प्राप्ती करून देतो. (५२७१)

तेंचि समाधान कैसें निर्धारा । देहबुद्धि सदृढ जैशी येरा ।
तैशी ब्रह्मबुद्धि सदृढ अंतरा । हेचि ज्ञानाची पराकाष्ठा ॥ ७२ ॥
ते समाधान कसे असते हे लक्षात घ्या. इतर लोकांना जशी देहबुद्धी दृढ असते, तशी साधकाच्या मनात ब्रह्मबुद्धी सदृढ झालेली असते. हीच ज्ञानाची पराकाष्ठा होय. (५२७२)

हेचि आतां एका श्लोकीं । दृढापरोक्षता बोलिजे निकी ।
जेथें सिद्धसाधकता सकौतुकीं । भेद निपटूनि जाय ॥ ७३ ॥
हीच दृढापरोक्षता (ब्रह्मांचा प्रत्यक्ष साक्षात्कार) पुढे एका श्लोकात सांगितली आहे. त्या दृढ अपरोक्ष ज्ञानामुळे सिद्ध आणि साधक यांच्या मनातील भेद सहज नाहीसा होईल. (५२७३)

आणि ध्वनितार्थे मुमुक्षुत्वाची । अथवा अवघी साधकत्वाची ।
प्रसंगें कळेल स्थिति पूर्णतेची । बाणतां दृढ ॥ ७४ ॥
आणि त्या अनुषंगाने (ध्वन्यथर्थान) मुमुक्षुत्वाची, अथवा साधकत्वाची सीमारेषा कळेल आणि पूर्णतेची स्थिती दृढ बाणेल. (५२७४)

इतुकें एका श्लोकाचे निरूपण । सांग साकल्यत्वे करून ।
वक्तृत्व अवधारा संपूर्ण । एकाग्रभावें साधक ॥ ७५ ॥
हे एवढे एका श्लोकाचे सांग आणि साकल्याने निरूपण करून हे वक्तृत्व आवरते घेऊ. तेव्हा साधकहो, एकाग्रभावाने ते सर्व लक्षपूर्वक ऐका. (५२७५)

GO TOP