॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १८ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः देहात्मधीवद् ब्रह्मात्मधीदाढ्ये कृतकृत्यता । यदा तदायं म्रियतां मुक्तो नास्त्यत्र संशयः ॥ १८ ॥
श्लोकार्थ : मीच देह आहे या विचाराप्रमाणेच मी ब्रह्म आहे हा निश्चय दृढपणे करण्याने कृतकृत्यता लाभते, आणि असा हा ज्ञानी पुरुष केव्हाही मृत्यू पावला तरी तो मुक्तच असतो, यात काही संशय नाही. ॥१८॥

इतिश्रीमच्छंकराचार्यविरचिता लघुवाक्यवृत्तिः समाप्त ।
श्रीमच्छंकराचार्यविरचित लघुवाक्यवृत्ती इथे समाप्त झाली.

देह आपण जैसें सर्वत्रांसी । सदृढचि बैसलेंसे बुद्धीसी ।
ब्रह्मात्मत्व सदृढबुद्धि जरी ऐशी । तरी कृतकृत्यता जाहली ॥ ७६ ॥
आपण देहच आहोत असे सर्वांच्या बुद्धीमध्ये ठामपणे बसलेले असते. तशाच प्रकारे ब्रह्मात्मबुद्धी (मी म्हणजे ब्रह्मच अशी बुद्धी) जर दृढ झाली तर कृतकृत्यता प्राप्त होते. (५२७६)

ऐशी दृढबुद्धियोगें कृतकृत्यता । उत्थानरहित जाहली असतां ।
मग तो जेधवां मरे कर्म सरतां । तेधवां मरो सुखें ॥ ७७ ॥
अशा प्रकारच्या दृढ झालेल्या उत्थानरहित बुद्धीमुळे कृतकृत्यता प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर आपले प्रारब्ध कर्म संपल्यानंतर साधक केव्हाही मरण पावो. (५२७७)

परंतु तो जन्ममरण संसृतीपासून । मुक्त जाहला निःसंशयेंकडून ।
यदर्थी संशयरूप अनुमान । सहसा कवणें न करावें ॥ ७८ ॥
परंतु तो जन्म मृत्यूरूपी संसारापासून निःसंशयपणे मुक्त झालेला असतो. या संदर्भात संशयरूप तर्क कोणीही करू नये. (५२७८)

अगा रविदत्ता सावध अससी । निरूपण आकळिलें की मानसीं ।
स्मृतिरूप साधनाचे अभ्यासीं । ब्रह्मात्मत्व दृढ होय ॥ ७९ ॥
अरे रविदत्ता, सावध आहेस ना? मी केलेले निरूपण मनाने पक्के समजून घेतलेस ना? स्मृतिरूप साधनाच्या अभ्यासाने ब्रह्मात्मत्व दृढ होते. (५२७९)

देहात्मधीवन्द्रह्मात्मधीदाढ्य कृतकृत्यता ॥ १८ ॥ (पूर्वार्ध)
अर्थ : देहात्मबुद्धीप्रमाणे ब्रह्मात्मबुद्धी दृढ झाली म्हणजे कृतकृत्यता प्राप्त होते. ॥१८॥ (पूर्वार्ध)

पाहें तुजला जैशी देहबुद्धि । सदृढचि बैसली अनवधि ।
ऐशीच अभ्यासें ब्रह्मात्मसिद्धि । बुद्धि निश्चया येतसे ॥ ८० ॥
असे पहा की, तुझ्या ठिकाणी देहबुद्धी अमर्याद दृढ झाली आहे. त्याचप्रमाणे अभ्यासाने ब्रह्मात्मबुद्धी दृढ होईल. (बुद्धीचा ब्रह्मात्मसिद्धी संबंधीचा निश्चय पक्का होईल.) (५२८०)

प्रथम अभ्यासें की विचारें । लयसाक्षिज्ञान जाहलें साचारें ।
त्यावरी वृत्तीचा खल होतां निरि । निश्चय दृढ होय बुद्धीचा ॥ ८१ ॥
प्रथम अभ्यासाने अथवा विचाराने लयसाक्षीज्ञान झाले. त्यानंतर वृत्तीचा खल झाल्यानंतर बुद्धीचा निश्चय दृढ होतो. (५२८१)

वृत्तीचा खल येथवरी केला । कीं निमिषार्ध अवसर नाहीं दिधला ।
एकतान ब्रह्मात्मत्व वृत्तीला । विस्मृतिविण दृढ केलें ॥ ८२ ॥
वृत्तीचा खल एवढा केला की, तिला अर्धा निमिष इतकाही अवसर दिला नाही. आणि एकतान, ब्रह्मात्मवृत्तीला विस्मृती होऊ न देता दृढ केले. (५२८२)

ब्रह्मात्मत्वाचेंचि चिंतन । ब्रह्मात्मत्वाचेंचि कथन ।
परस्परें अन्योन्य संवादन । जें बोलिलें पूर्वश्लोकीं ॥ ८३ ॥
ब्रह्मात्मत्वाचेच चिंतन, ब्रह्मात्मत्वाचेच कथन, ब्रह्मात्मत्वाविषयीचाच परस्पर संवाद, इ.चे वर्णन अगोदरच्या श्लोकात आले आहेच. (५२८३)

तेंचि एकपरत्वरूप अनुसंधान । भलते अवस्थेसि राखिलें स्मरण ।
तेणेंचि अभ्यासें देहात्मभान । तुटोनि जाय ॥ ८४ ॥
ते एकपरत्वाने केलेले अनुसंधान होय. कोणत्याही अवस्थेत हे स्मरण अखंडपणे चालू ठेवले, तर त्याच अभ्यासाने देहात्मभान तुटून जाईल. (५२८४)

पहिला बुद्धीसी निश्चय जाहला । अज्ञाने नेणून ब्रह्मात्मयाला ।
मी हा देहचि अभिमान धरिला । असे सदृढ ॥ ८५ ॥
अगोदर बुद्धीचा निश्चय झाला तो असा, अज्ञानाने ब्रह्मात्म्याला न जाणता 'मी हा देहच आहे' असा अभिमान सुदृढपणे धरला. (५२८५)

अनंत कल्पांमाजी अनंत । सान थोर देह जाहले बहुत ।
तितुकीयाही देहांसी मी मी करित । अभिमान वाहतचि आला ॥ ८६ ॥
अनंत कल्पांमध्ये अनंत लहान थोर देह झाले. त्या सर्व देहांना मी मी म्हणत अभिमानांचे ओझे वाहतच येथपर्यंत आला. (५२८६)

एका देही अवस्था तीन । जागृति सुषुप्ति आणि स्वप्न ।
या तिहींमाजीही देहाचे मीपण । बळकट धरिलेंसे ॥ ८७ ॥
एका देहात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा तीन अवस्था असतात. या तीन्ही अवस्थांमध्ये देहाचे मीपण बळकटपणे धरलेले असते. (५२८७)

या तिहीं अवस्थेत तीन अभिमान । हे जाहलें असे मागां निरूपण ।
परी मागुतीं तेंचि आतां अल्प कथन । कीजे कळावया ॥ ८८ ॥
या तीन अवस्थांमध्ये तीन अभिमान असतात, याचे निरूपण मागेच झालेले आहे. तरीपण सुसंगतीने कळावे म्हणून तेच निरूपण थोडक्यात पुन्हा करतो. (५२८८)

जागृतींत जोंवरी व्यापारत । प्रत्यक्ष देहासी प्रत्यक्ष भोग घडत ।
तेव्हां या सर्व संघासी मी म्हणून धरित । सदृढ साभिमानें ॥ ८९ ॥
जागृतीत जोपर्यंत व्यापार होत असतात तोपर्यंत प्रत्यक्ष देहाला प्रत्यक्ष भोग घडत असतात तेव्हा या सर्व देहसंघाताला अभिमानाने मी मी असे म्हटले जाते. (५२८९)

ऐसा देह आपण सदृढ जाहला । न विसरेचि ऐशिया अभिमानाला ।
आणि संपादित सर्व विषयांला । माझें माझें म्हणे ॥ ९० ॥
अशा प्रकारे मी देह हा अभिमान बळकट झाला. या अभिमानाचे विस्मरणच होत नाही. आणि या देहाने प्राप्त केलेल्या विषयांना तो माझे माझे म्हणतो. (५२९०)

एवं देहाचे मीपण हे हे माझें । बळकट घेऊन बैसला वोझे ।
ऐसा हा उभयरूपी साभिमान बुझे । विश्व नाम पावला ॥ ९१ ॥
अशा प्रकारे देहाचे मीपण आणि दुसरे हे हे माझे, असे माझेपण हे ओझे तो जीव घेऊन बसतो. अशा दोन प्रकारांनी जो अभिमान धरला जातो त्याला विश्व हे नाव प्राप्त होते, हे जाणून घे. (५२९१)

तेचि प्रत्यक्ष विषय नसतां । इंद्रियद्वारा बहिर्मुख न होतां ।
स्वप्नअवस्था होतसे आंतोता । ध्यासें जागृतीच्या ॥ ९२ ॥
तेच विषय प्रत्यक्ष नसताना, इंद्रियद्वारे बहिर्मुख होऊन कार्यरत न होता, आपल्या मनातल्या मनातच जागृतीच्या ध्यासाने जी अवस्था होते ती स्वप्न अवस्था होय. (५२९२)

मागें केलें तितुकें स्मरे । पुढें अमुक करीन साचोकारें ।
ऐसा कर्तेपणे उगा हुंबरे । एकरूप सदा ॥ ९३ ॥
मागे जे जे काही केले ते ते या स्वप्न अवस्थेत आठवते. आणि पुढे काय काय करायचे त्याचेही मनोरथ तो पाहत असतो. या सर्व कर्मांचा मीच कर्ता असा अभिमान धरून त्यांच्याशी एकरूप होऊन तो सारखा हंबरत असतो (धुंदीत असतो) (५२९३)

पुण्यपाप जें जें केलें । तें तें भोगीन अवश्य पहिलें ।
येथूनही करीन सामर्थ्य आपुले । पुढें सुख भोगावया ॥ ९४ ॥
आता मी जे जे पुण्य अथवा पाप केले असेल ते ते प्रथम भोगीन आणि पुढील सुखे मिळवण्यासाठी आपल्या सामर्थ्यानुसार पुढेही करत राहीन, असे तो म्हणत असतो. (५२९४)

ऐसा कर्तेपणा की भोक्तेपणाचा । अंतरी ध्यास सदृढ साचा ।
हाचि तैजस अभिमान जन्ममृत्यूचा । दायक होय ॥ ९५ ॥
अशा प्रकारे कर्तेपणाचा अथवा भोक्तेपणाचा ध्यास तो आपल्या अंतःकरणात सदैव बाळगत असतो. हाच तैजस अभिमान होय. तोच जन्ममृत्यू देणारा असतो. (५२९५)

मुख्य नेणपणाचा अभिमान । लयही पावतां जागर स्वप्न ।
सुषुप्तिकाळी उरे तोचि प्राज्ञ । बीज उत्पत्तीचें ॥ ९६ ॥
जेव्हा जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्था लय पावलेल्या असतात तेव्हा नेणतेपणाचा अभिमान सुषुप्तीच्या काळात धरला जातो. तोच प्राज्ञ अभिमान होय. हा अभिमान म्हणजे उत्पत्तीचे बीजच होय. (५२९६)

एवं जागरी मी माझेपणे विश्व । स्वप्नी कर्ता भोक्ता तैजस नांव ।
सुषुप्तींत मी नेणता प्राज्ञ स्वयमेव । ऐसे अभिमान तीन ॥ ९७ ॥
अशा प्रकारे जागृतीच्या अवस्थेत मी - माझेपण असे म्हणणारा विश्व अभिमान, स्वप्नावस्थेत कर्ता, भोक्ता मानणारा तैजस नावाचा अभिमान आणि सुषुप्तीत नेणतेपणा धारण करणारा प्राज्ञ अभिमान असे हे तीन देहांचे तीन अभिमान होत. (५२९७)

हे साभिमान कदाही त्यागीना । देहाचा सदृढ धरिला मीपणा ।
तेणेंचि नसतां पावे जन्ममरणा । कोटि कोटि कल्पें ॥ ९८ ॥
हे अभिमान जीव केव्हाही सोडत नाही. त्याने देहाबद्दल धरलेला मीपणाचा अभिमान फार बळकट असतो. त्यामुळेच कोटी कोटी कल्पेपर्यंत तो जन्म मरण भोगत राहतो. (५२९८)

हे असो अज्ञानाची वार्ता । परी अभ्यासें की विचारें तत्त्वतां ।
जरी लयसाविज्ञान जाहलें आतां । तरी पूर्वाध्यास न सोडी ॥ ९९ ॥
ही अज्ञानी जीवाची गोष्ट राहू दे, पण अभ्यासाने अथवा विचाराने लयसाक्षित्व झाले तरी पूर्वाध्यास (पूर्वीची सवय) तो सोडत नाही. (५२९९)

देह प्राण इंद्रियें मन बुद्धि । मूळस्फूर्ति विद्या अविद्यासंबंधीं ।
जीवेशही प्रतिबिंबें त्यामधीं । इतुकेही विवेचिले ॥ ५३०० ॥
आतापर्यंत देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी, मूळ स्फूर्ती, विद्या आणि अविद्या, त्यांमधील जीव आणि ईश्वर ही प्रतिबिंबे, या सर्वांचे विवेचन केले आहे. (५३००)

हा इतुकाही सर्व समुदाय । मिथ्यात्वें विवेचिला की मी न होय ।
मी ब्रह्मात्मा एकरूप अद्वय । त्रिधा प्रतीतीने कळला ॥ १ ॥
हा एवढा सर्व समुदाय हा मिथ्या आहे तो मी नाही, मी अद्वय असा ब्रह्मात्माच आहे हे त्रिविध प्रतीतीने (शास्त्रप्रतीती, गुरूप्रतीती आणि आत्मप्रतीती) कळले. (५३०१)

तरीही एकाएकी पूर्वाध्यास । न सोडी यया देहादिकास ।
भलते प्रसंगें अहंदेबुद्धीस । घेत प्रगट की गुप्तत्वें ॥ २ ॥
तरीसुद्धा पूर्वाध्यासामुळे या देहादिकांचा अभिमान जीवाला सोडवत नाही. कोणत्याही प्रसंगी 'मी देह' ही बुद्धी प्रगटपणे अथवा गुप्तपणे जागृत होतेच. (५३०२)

ऐसाही दुस्तर साभिमान । निःशेष निमे जरी घडे साधन ।
जें निरोपिले स्मरणरूप अनुसंधान । तच्चितनादि सदा ॥ ३ ॥
असा हा अभिमान दुस्तर असला तरी काही साधन घडले तर; निःशेष नष्ट होऊ शकतो. ते सतत स्मरणरूप अनुसंधान, चिंतन इ. चे निरूपण नुकतेच केलेले आहे. (५३०३)

अहंब्रह्मास्मि हें चिंतन । जें जाणिलें लयसाक्षिज्ञान ।
तेंचि निश्चयेंसी ब्रह्म आपण । न विसरतां स्मरावें ॥ ४ ॥
'अहं ब्रह्मास्मि'चे चिंतन, लयसाक्षित्वाचे ज्ञान, हेच आपण ब्रह्म आहोत या दृढ निश्चयाने न विसरता स्मरत जावे. (५३०४)

आणि देहादि आपण कदा नव्हे । याचेही विस्मरण न पडावें ।
एकतान अनुसंधान असावें । ब्रह्म सत्य जग मिथ्या ॥ ५ ॥
आणि आपण देह इ. कधीही नाहीत, याचेही विस्मरण कधी होऊ देऊ नये, 'ब्रह्म हेच सत्य असून जग मिथ्या आहे' याचे एकतान अनुसंधान असावे. (५३०५)

बत्तीस प्रकार हे जग । सर्व मिथ्याचि रज्जुभुजंग ।
ब्रह्मात्माचि सत्य सत्य अभंग । आपणही तेंचि ॥ ६ ॥
बत्तीस तत्त्वांचे हे जग रज्जूवरील (दोरीवरील) सर्पाप्रमाणे संपूर्णपणे मिथ्या असून ब्रह्मात्माच फक्त अभंग स्वरूपात सत्य आहे; आणि आपणही तेच (ब्रह्मात्मस्वरूप) आहोत. (५३०६)

इतुक्या निश्चयाचें सदा स्मरण । एकतान राखावें अनुसंधान ।
निद्रा लागे तों जागें जाहलियापासून । यावत्प्राणही राखावें ॥ ७ ॥
या निश्चयाचे सदा स्मरण असावे, त्याचेच एकतान अनुसंधान राखावे. जागे झाल्यापासून ते झोप लागेपर्यंत, जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत ते अनुसंधान ठेवावे. (५३०७)

केव्हां मननरूप चिंतन । केव्हां वाणीने घडावें कथन ।
मुख्य कारण की न पडावें विस्मरण । लयसाक्षित्वाचें ॥ ८ ॥
कधी मननरूप चिंतन करावे, केव्हा वाणीने निरूपण करावे; मुख्य कारण म्हणजे लयसाक्षित्वाचे कधीही विस्मरण होऊ नये. (५३०८)

नुसधी ध्येयाकारवृत्ति असावी । तदाकारेंचि उठोनि निमावी ।
परी तथापि उद्भवतां स्मृति असावी । ब्रह्मात्मयाची बुद्धीसी ॥ ९ ॥
केवळ ध्येयाकार वृत्ती असावी. ती तदाकार होऊनच उठावी आणि निमावी. ती उद्भवली तरी बुद्धीला ब्रह्मात्म्याची स्मृती असावी. (५३०९)

ऐसा ध्यास सदृढ लागतां । कोठे उरेल देहबुद्धीची वार्ता ।
निपटून पूर्वाध्यासाचे होय घाता । ब्रह्मात्मत्वचि दृढ होय ॥ १० ॥
असा पक्का ध्यास लागला असेल तर देहबुद्धीची वार्ता कोठे उरेल? ती पूर्वाध्यासासह संपूर्णपणे नष्ट होते आणि ब्रह्मात्मत्व दृढ होते. (५३१०)

जैशी जैशी ब्रह्मात्मबुद्धि वाढे । तैशी तैशी देहबुद्धि मोडे ।
निःशेष निमतां सहजस्थिति जोडे । जे पूर्ण ज्ञातया सदा ॥ ११ ॥
जसजशी ब्रह्मात्मबुद्धी वाढत जाईल तसतशी देहात्मबुद्धी नष्ट होत जाते. ती निःशेष नष्ट झाल्यावर सहजस्थितीची प्राप्ती होते. पूर्ण ज्ञानी लोकांची ती नेहमीची स्थिती असते. (५३११)

परी अभ्यास मात्र स्मरणाचा । केलाचि करावा साधकें साचा ।
पूर्वाध्यास होतांचि देहादिकाचा । मोडून ब्रह्मत्मत्व स्मरावें ॥ १२ ॥
परंतु स्मरणाचा अभ्यास मात्र साधकाने नित्य केला पाहिजे. पुनःपुनः केलेलाच अभ्यास करावा. देहादिकांना पूर्वाध्यास (पूर्व परिचयाने आठवण) होताच तो मोडून काढून आपल्या ब्रह्मात्मत्वाचे स्मरण करावे. (५३१२)

देहादिक आपण नव्हेचि नव्हे । मग कासया त्याचे वर्तन घ्यावें ।
भलते अवस्थेत असेना स्वभावें । आपुलें काय गेलें ॥ १३ ॥
आपण निश्चितपणे देहादिक नाही आहोत. मग त्यांची वर्तणूक आपण का स्वीकारावी? ते त्यांच्या स्वभावधर्मानुसार कोणत्याही अवस्थेत असेनात का? त्यामुळे आपले काय नुकसान होणार आहे? (५३१३)

ऐसा निश्चय केलाचि करावा । ब्रह्मात्मा स्वयें स्मरलाचि स्मरावा ।
हा समुदाय त्यागिलाचि त्यागावा । बलात्कारें स्फुरतांची ॥ १४ ॥
असा निश्चय एकदा केला असेल तर पुनःपुन्हा करावा, आपण स्वतः ब्रह्मात्म्याचे स्मरण वारंवार करत असावे आणि देहादिक समुदायाचे स्फुरण होताच बळजबरीने त्याचा त्याग करावा. पुनःपुन्हा तो करत जावे. (५३१४)

ऐशिया स्मरणरूप अभ्यासें । त्रिविधा मीपण गळे आपैसें ।
देहात्मत्व बुद्धीसी होतें जैसें । तैसें ब्रह्मात्मत्व होय ॥ १५ ॥
अशा स्मरणरूप अभ्यासाने विश्व, तैजस आणि प्राज्ञ असा तीन प्रकारचा मीपणा (अहंकार) आपोआप गळून पडतो. बुद्धीच्या ठिकाणी जसे देहात्मत्व होते त्याप्रमाणे त्याच्या जागी ब्रह्मात्मत्व येते. (५३१५)

परंतु हळु हळु साधेल सर्व । एकदाचि न मोडे पूर्व स्वभाव ।
विश्वतैजस प्राज्ञाचाहि ठाव । अशेषे मोडे अनुक्रमें ॥ १६ ॥
परंतु हळूहळू सर्व साध्य होईल. पूर्वीचा स्वभाव एकदम मोडत नसतो. (बदलत नसतो) विश्व, तैजस प्राज्ञ यांचीसुद्धा वसती अनुक्रमाने संपूर्ण नष्ट होईल. (५३१६)

आधीं विश्वाभिमानी हा मरे । त्यामागून तैजसही वोसरे ।
पुढें प्राज्ञ अभिमान एकसरें । मावळून उरे ब्रह्मात्मा ॥ १७ ॥
प्रथम विश्वाभिमानी मरतो, त्यामागून तैजसही ओसरतो. पुढे प्राज्ञ अभिमान एकदम मावळून एकटा ब्रह्मात्मा मागे उरतो. (५३१७)

परी स्मरणरूप जो अभ्यास । सोडूच नये ब्रह्मात्मध्यास ।
तच्चितनादि एकपरत्वास । केलेंचि करावें ॥ १८ ॥
परंतु ब्रह्मात्मध्यासाचा स्मरणरूप अभ्यास कधीच सोडू नये. त्यांचे चिंतन, कथन इ. तत्परतेने एकदा केले तरी पुनःपुन्हा करावे. (५३१८)

हे साधकासी भाष्य आमुचें । देत असों हे मानोनि करा साचें ।
निसंतान होऊन तिन्ही अभिमानांचें । ब्रह्मात्मत्व दृढ होय ॥ १९ ॥
साधकाला आम्ही आश्वासन देत आहोत की, आमचे वरील निरूपण ऐकून आणि स्वीकारून त्याप्रमाणे करा. तेव्हा तिन्ही अभिमानांचे निःसंतान होऊन (ते नष्ट होऊन) ब्रह्मात्मत्व दृढ होईल. (५३१९)

हे सत्य सत्य सत्यत्वें प्रमाण । अन्यथा नव्हे आमुचे वचन ।
परी केले पाहिजे एकतान । अनुसंधान सर्वदा ॥ २० ॥
हे त्रिवार सत्य आहे. आमचे बोलणे कधी खोटे होणार नाही. परंतु त्यासाठी ब्रह्मात्मत्वाचे अनुसंधान एकतान होऊन सर्वकाळ केले पाहिजे. (५३२०)

अभ्यासाविण न घडे कदा । न तुटे देहबुद्धीची आपदा ।
न जोडे वस्तुतंत्रत्वें संपदा । हेही सत्य सत्य ॥ २१ ॥
अभ्यासावाचून मात्र ते केव्हाही होणार नाही. अभ्यासावाचून देहबुद्धीचे संकट केव्हाही नष्ट होणार नाही. तसेच वस्तुतंत्रत्वाची संपत्तीही कधी प्राप्त होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. (५३२१)

तस्मात् खरें जयासी तरणें । तेणें सदा असावें अनुसंधानें ।
तरी ब्रह्मत्व दृढ होऊन जाणे । गळून देहबुद्धि ॥ २२ ॥
त्यामुळे ज्याला खरोखरच उद्धार करून घ्यायचा असेल त्याने नेहमी अनुसंधानयुक्थ असले पाहिजे. तरच ब्रह्मत्व दृढ होऊन जाईल आणि देहबुद्धी गळून पडेल. (५३२२)

आतां असावें सावधान । अनुक्रमें गळती तिन्ही अभिमान ।
तयांचे अवघीची वोळखण । बोलिजे अवधारा ॥ २३ ॥
आता इकडे लक्ष द्या. हे तीन अभिमान क्रमशः गळून पडतील. त्यांच्या नष्ट होण्याच्या क्षणाची ओळख कशी पटते, ते लक्ष देऊन ऐका. (५३२३)

आरंभी मी माझेंपण जें असे । जयासी विश्वाभिधान ठेविलेंसे ।
तेंचि क्षीण होय या अभ्यासें । ध्यासें ब्रह्मात्मयाच्या ॥ २४ ॥
ब्रह्मात्म्याच्या ध्यासाने आरंभी मी माझे या स्वरूपाचा विश्वाभिमान या अभ्यासाने क्षीण होत जाईल. (५३२४)

अपरोक्ष ज्ञान ब्रह्मात्मयाचें । जाहलें विचारें लयसाक्षित्वाचें ।
तत्क्षणींच निर्मूळ मी माझेपणाचें । नव्हे सहसा ॥ २५ ॥
ब्रह्मात्म्याचे अपरोक्ष ज्ञान झाले. विचाराने लयसाक्षित्वाचे ज्ञान झाले. पण लगेच त्याच क्षणी मी आणि माझेपण यांचे एकदम निर्मूलन होणार नाही. (५३२५)

पूर्वील ध्यासें देहासी मीपण । घेऊन उठेल वृत्ति उद्भवून ।
जरी कळलें अहंब्रह्म ह्मणून । तरी घेतां न राहे ॥ २६ ॥
पूर्वीच्या ध्यासाने देहाबद्दल मीपणा घेऊन वृत्ती उत्पन्न होईल. मग अहंब्रह्म म्हणून कळले तरी मीपणा घेतल्याशिवाय ती राहात नाही. (५३२६)

हाचि विक्षेप आवरणही गेलिया । उद्भवेल गुप्त की प्रगट तया ।
देह मी म्हणून उठतां आपसया । माझेपणा धरील ॥ २७ ॥
विक्षेप (भास) आणि आवरण (अज्ञान) हे दोन्ही गेल्यानंतरसुद्धा हा मीपणा प्रगटपणे अथवा गुप्तपणे उद्भवेलच. मी देह हा अभिमान उठताच माझेपणाही आपोआप येईलच. (५३२७)

अमुक कुळी अमुक आश्रमाचा । अमुके स्थळी अमुक वर्णाचा ।
ऐसा उद्गार होय जरी बुद्धीचा । हा प्रगट विक्षेप ॥ २८ ॥
मी अमुक कुळातला आहे, मी अमुक आश्रमाचे पालन करतो, मी अमुक ठिकाणी राहतो, मी अमुक वर्णाचा आहे, असा बुद्धीकडून उद्गार होईल तर त्याला प्रगट विक्षेप म्हणावे. (५३२८)

ऐसाही उद्गार न होता । सहजगतीं चांगुलपणा तत्वतां ।
देहादिकांचा वाटे जरी आंतोता । हा गुप्तत्वें विक्षेप । ॥ २९ ॥
असा उद्गार प्रगटपणे केला नाही, तरी सहजगत्या देहादिकांबद्दल आतून चांगुलपणाचा भाव निर्माण होईल तर हा गुप्त विक्षेप होईल. (५३२९)

गुप्त अथवा प्रगट मीपण । होतां ब्रह्मात्मबुद्धीचे होय हनन ।
आणि मीपणे धरीतसे माझेंपण । जें संपादित पूर्वापार ॥ ३० ॥
मीपणाचा अभिमान प्रगटपणे होवो अथवा गुप्तपणे होवते, त्यामुळे त्या साधकाच्या ब्रह्मात्मबुद्धीचा विनाश होतो. आणि दुसरीकडे पूर्वापार परंपरेने प्राप्त झालेल्या गोष्टीबद्दल माझेपणाचा भाव तो स्वीकारतो. (५३३०)

माझेपणीही दोनचि प्रकार । एक प्रगट उठे माझें म्हणून उद्गार ।
एक सहजगतीं कळवळे अंतर । हेंचि गुप्तत्वें उठे ॥ ३१ ॥
माझेपणाचेही दोन प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल माझे म्हणून प्रगटपणे उद्गार निघतो तो प्रगट माझेपणा होय. दुसरा प्रकार म्हणजे मनातल्या मनात तो जेव्हा माझेपणाचा अभिमान बाळगतो तो गुप्तपणे उठलेला माझेपणा होय. (५३३१)

असो ऐसें मीपण की माझेपण । गुप्त अथवा प्रगट उद्भवण ।
हे गळती या अनुसंधानेकरून । चिरकाळ अभ्यासें ॥ ३२ ॥
असो असे गुप्तपणे अथवा प्रगटपणे उठलेले मीपणा आणि माझेपणा हे. उपरोक्त अनुसंधनाच्या दीर्घकाळच्या अभ्यासाने गळून पडतात. (५३३२)

ब्रह्मात्म्याहून जें जें वेगळं । तें तें मिथ्यात्वें विवेचिलें सकळं ।
यावरी स्मरतसें मिथ्यात्वें निर्फळे । तरी येणे गळे माझेपण ॥ ३३ ॥
ब्रह्मात्म्याहून जे जे वेगळे असेल ते ते सर्व मिथ्या म्हणून विचार केला, त्यावर ते मिथ्या आहेत म्हणून निष्फळ आहेत, असे स्मरण केले की माझेपणा गळून पडतो. (५३३३)

माझें म्हणून विक्षेपें स्फुरतां । मिथ्या ऐसें स्मरतसे तत्त्वतां ।
तत्क्षणी मावळे परी मागुता । माझेपण उफाळे ॥ ३४ ॥
विक्षेपामुळे माझे म्हणून एखादी गोष्ट आठवली की तो लगेच ती मिथ्या आहे असे स्मरण करतो. त्यामुळे तो माझेपणाचा भाव त्याचक्षणी मावळतो. परंतु पुन्हा मागाहून तो माझेपणा उफाळून येतोच. (५३३४)

पुन्हां उठतांचि मिथ्यात्वें स्मरावें । तयासी पुरतें उठोंचि न द्यावें ।
ऐसेंचि सर्वदा अभ्यासावें । निःशेष निमे तोंवरी ॥ ३५ ॥
असा तो माझेपणा पुन्हा उठताच तो मिथ्या आहे, असे स्मरण करावे. त्या भावनेला पूर्णपणे उठण्याची संधीच देऊ नये. अशाच प्रकारे तो निःशेष (पूर्णपणे नष्ट होईपर्यंत) सर्वकाळ अभ्यास करावा. (५३३५)

निःशेष निमाल्याची वोळखण । कळावया बोलिजे सावधान' अलभ्य पदार्थ जाती नासून ।
परी अंतर कळवळेना ॥ ३६ ॥
निःशेष नष्ट झाला आहे, हे कसे ओळखावे? त्याची खूण काय? हे कळण्यासाठी मी जे सांगतो ते सावध होऊन ऐका. जे पदार्थ न मिळणारे आहेत, ते नष्ट झाले तरी अंतःकरणात त्याबद्दल कळवळा वाटणार नाही. (५३३६)

अति दुःखरूप होतें तें गेलें । अति सुखकर इंद्रपद प्राप्त जाहलें ।
तरी हर्षेना गुप्तत्वेही पहिलें । जैसे अंतःकरण ॥ ३७ ॥
अतिशय दुःखरूप जे होते ते गेले, आणि जे अतिशय सुखकर होते ते इंद्रपद प्राप्त झाले, तरी अंतःकरण गुप्तपणे सुद्धा हर्षित होत नाही, ते अगोदर जसे होते तसेच राहते. (५३३७)

अथवा अति सुखकर पद जातां । अति दुःखकर पदार्थ मीनतां ।
खेद उद्भवेना अंतरा आंतौता । गुप्तत्वेंही ॥ ३८ ॥
किंवा अतिशय सुखकर असे पद गेले, आणि अतिशय दुःखकर असे पद मिळाले तरी साधकाच्या अंतःकरणात खेद गुप्तपणेदेखील उत्पन्न होत नाही. (५३३८)

जैसा पांथस्थ राहिला पराचे घरीं । त्याचे द्रव्य हरोन गेलें तस्करीं ।
अथवा मृत्यु पावली पद्मिनी नारी । आपण दृष्टीने पाहतसे ॥ ३९ ॥
ज्याप्रमाणे एखादा वाटसरू दुसऱ्यांच्या घरात राहिला आणि त्याचे द्रव्य चोरांनी हिरावून नेले, अथवा त्याची अतिशय सुंदर पत्नी मरण पावली तरी माणूस स्वतः स्वस्थ दृष्टीने त्याकडे पाहतो. (५३३९)

परी किमपि खेद न वाटे जैसा । स्वस्थ निवांत असे मानसा ।
तैसें निजधन की स्वकुटुंबहानि सहसा । होतां न कळवळावें ॥ ४० ॥
परंतु त्याला थोडासुद्धा खेद वाटत नाही, आणि तो मनाने स्वस्थ आणि निवांत असतो, त्याप्रमाणे स्वतःचे धन गेल्यावर अथवा स्वतःची पत्नी मरण पावल्यावरसुद्धा न कळवळता तो स्वस्थ राहतो. (५३४०)

अथवा परस्थळी एखादिया । अलभ्य लाभ जाहला भलतिया ।
तो पाहत असतांही जैसा यया । हर्ष वाटेना ॥ ४१ ॥
किंवा दुसऱ्याच्या घरी एखाद्याला अलभ्य लाभ झाला, तो पाहत असतानाही जसा याला आनंद वाटत नाही, (५३४१)

तैसाचि हर्ष जरी इंद्रसंपत्ति । मीनतांही उद्भवू नये चित्तीं ।
एवं परकीयापरी पहावें आपणाप्रती । तरी हर्ष खेद कैंचे ॥ ४२ ॥
त्याचप्रमाणे इंद्राची संपत्ती जरी प्राप्त झाली तरी मनात आनंद उद्भवू नये, त्याप्रमाणे स्वतःकडे नेहमी परकीय असल्याप्रमाणे पहावे. मग हर्ष अथवा खेद या भावना कशा उठतील? (५३४२)

बहु कासयासी विस्तार । कळवळाचि नुठावा अणुमात्र ।
जो कां पिळतसे सहज अंतर । देंठ नाभीचा ॥ ४३ ॥
जास्त विस्तार कशाला हवा? मुळात बेंबीचा देठ आतल्या आत पिळवटून टाकील असा कळवळा साधकाच्या मनात कणभरसुद्धा निर्माण होऊ नये. (५३४३)

मग असो महालाभ की हानि । परी कळवळीच ना अंतःकरणीं ।
जैशी पराची देखतांही नयनीं । तैशीच सहज स्वदेहाची ॥ ४४ ॥
मग महालाभ असो की हानी. अंतःकरणात थोडासुद्धा हेलावा उठू देऊ नये. परक्याचा लाभ किंवा हानी पहाताना अंतःकरण जसे निर्विकार राहते तसे स्वतःच्या देहाबद्दल वाटले पाहिजे. (५३४४)

ऐशी दृढता जरी आपुली । खरेपणे असेल जाहली ।
तरी जाणावी निःशेष तुटली । भुली माझेपणाची ॥ ४५ ॥
जर खरोखरच आपल्या मनाची दृढता झाली असेल तरच माझेपणाची भुरळ संपूर्णपणे नष्ट झाली असे समजावे. (५३४५)

ऐशी प्रतीति जयाची तेणें । वोळखावी आपुले अंतःकरणें ।
जरी कळवळीच ना दृढ समाधानें । असतां माझेपण गळालें ॥ ४६ ॥
अशी प्रतीती ज्याची झाली असेल त्याने आपले आपणच पहावे की दृढ समाधानाच्या योगाने आपल्या अंतःकरणात काहीच हेलावा निर्माण होत नाही आहे तर समजावे की माझेपण गळाले आहे. (५३४६)

नातरी माझें कांही नाहीं वरी वरी । बोलतसे परी कळवळे अंतरीं ।
तोचि जाणावा आत्महत्यारी । जो न तारी आपणा ॥ ४७ ॥
नाहीतर उगीच वरवर मला काही वाटत नाही, असे म्हणत असेल आणि अंतःकरणात सुखदुःखाने हेलावून जात असेल तर तो माणूस आत्महत्यारा समजावा. कारण तो स्वतःचा उद्धार करत नाही. (५३४७)

तरी ऐसें साधकें न करावें । अंतरीचें यथार्थ वोळखावें ।
की हानिलाभे न कळवळावें । सहसा गुप्तही ॥ ४८ ॥
तरी साधकाने असे करू नये. आपल्या अंतःकरणात काय चालले आहे हे ओळखावे. आणि हानिलाभांमुळे अंतःकरणात काय चालले आहे हे ओळखावे. आणि हानिलाभांमुळे अंतःकरणात गुप्तपणेसुद्धा हेलावून जाऊ नये. (५३४८)

तथापि कळवळा जरी उठे । तरी अभ्यास करावाचि नेटें ।
जेव्हा निपटून हर्षविषाद तुटे । तेव्हांचि निवांत व्हावें ॥ ४९ ॥
तथापि अंतःकरणात असा कळवळा उठलाच तर नेटाने अभ्यास चालू ठेवावा. आणि अंतःकरणातील हर्ष अथवा खेद जेव्हा समूळ नष्ट होतील तेव्हाच स्वस्थ बसावे. (५३४९)

ऐसा माझेपणा निपटून गेलियाचा । अवधि सांगितला असे साचा ।
परी मीपणा जाईल जेव्हां देहाचा । तेव्हांचि माझेपणा गळे ॥ ५० ॥
अशा प्रकारे माझेपणा संपूर्णपणे नष्ट होण्याचा कालावधी तुला सांगितला. जेव्हा देहाबद्दलचा मीपणा जाईल तेव्हाच माझेपणा गळून पडेल. (५३५०)

मीपण गुप्तत्वे जरी देहाचें । तरी माझेपण निमाले नवचे ।
परंतु आधी सांगितलें अवघीचें । लक्षण कळावया ॥ ५१ ॥
देहाबद्दलचा मीपणा गुप्तपणाने जरी राहिला तरी माझेपण नष्ट होणार नाही. परंतु तो नष्ट होण्याच्या अवधीचे लक्षण कळण्यासाठी त्याचे निरूपण केले आहे. (५३५१)

तस्मात् आधी मीपण तुटावें । तरी माझेपण अपैसया गळावें ।
तें मीपण जावया अभ्यासावें । अहंब्रह्मास्मि स्वयें ॥ ५२ ॥
म्हणून अगोदर मीपण नष्ट झाले पाहिजे, तरच माझेपण आपोआप गळून पडेल. ते मीपण जाण्यासाठी स्वतः 'अहं ब्रह्मास्मि' या महावाक्याचा अभ्यास करावा. (५३५२)

वृत्तीनं लयसाक्षित्व लक्षावें । बुद्धीने तेंचि निश्चया आणावें ।
मनेही तेंचि आपण चिंतावें । उच्चारावें वाणीनें ॥ ५३ ॥
वृत्तीने लयसाक्षित्व साधावे, बुद्धीने त्याचा निश्चय करावा, मनानेही आपण त्याचेच चिंतन करावे आणि वाणीनेही त्याचाच उच्चार करावा. (५३५३)

स्फूर्तीपासून देहापर्यंत । हा मी नव्हेचि सर्व संघात ।
अहमात्मा मी स्वयें अनंत । एकतान स्मरावा ॥ ५४ ॥
स्फूर्तीपासून देहापर्यंतचा हा सर्व समुदाय मी नाहीच, मी स्वतः अनंत आत्मा आहे, याचे एकतान स्मरण करावे. (५३५४)

पूर्वाध्यासें जरी देहाचें । मीपण गुप्त की प्रगट उठू लागे साचें ।
तरी तें विवेचून त्यागावें अंतरींचें । अहंब्रह्मास्मि स्मरोनी ॥ ५५ ॥
पूर्वाध्यासाने जरी देहाचे गुप्त अथवा प्रगट मीपण उत्पन्न होऊ लागले तरी त्याचा विवेकपूर्वक त्याग करावा आणि त्याचबरोबर अंतरात 'अहं ब्रह्मास्मि'चे स्मरण करावे. (५३५५)

अहंब्रह्मास्मीचा विसर । पडोंचि नये निमिषमात्र ।
मग कैंचा होईल यया अवसर । देहाचे मीपणासी ॥ ५६ ॥
'अहं ब्रह्मास्मि'चा क्षणमात्रदेखील विसर पडू देऊ नये. मग या देहाच्या मीपणाला अवसरच कसा मिळेल? (५३५६)

अहंब्रह्मात्मा निश्चय वाढे । अहंदेहात्मा निःशेष मोडे ।
परी साधकें अभ्यासावें कोडें । बोलिल्या रीतीं ॥ ५७ ॥
'अहं ब्रह्मास्मि'चा निश्चय वाढला, 'अहं देहात्मा' (मी म्हणजे हा देहच)चा निश्चय पूर्णपणे मोडून पडला तरी साधकाने आता सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास निष्ठेने करावाच. (५३५७)

आतां मीपण गेलियाची खूण । बोलिजे अंतरी पहावी वोळखून ।
भलते अवस्थेसी देहाचे वर्तन । परी मी ह्मणून स्फुरेना ॥ ५८ ॥
आता मीपण गेल्याची खूण मी सांगतो. ती मनाने ओळखून पहावी. देह कोणत्याही अवस्थेत राहो, पण 'मीपण' मात्र स्फुरण पावत नाही. (५३५८)

जागरी व्यापार होत असतां । परी मी अमुकवर्णाश्रमी तत्त्वतां ।
अथवा सुखीदुःखी की नांवें बाहतां । मी ह्मणून स्फुरेना ॥ ५९ ॥
जागृतीत व्यापार होत असता मी अमुक वर्णाचा आहे, मी अमुक आश्रमाचा आहे, अथवा मी सुखी आहे, मी दुःखी आहे, किंवा मी अमुक नाव धारण करणारा आहे' यापैकी काहीच स्फुरण पावत नाही. (५३५९)

ऐसा जागृतींत दृढ जाहलिया । स्वप्नींही मीपण स्फुरेना तया ।
अहंब्रह्मास्मीच येतसे प्रत्यया । भास देहाचे ठाईं ॥ ६० ॥
जागृतीत असा अनुभव दृढ झाल्यावर मग स्वप्न अवस्थेतही त्याला मीपण स्फुरत नाही. त्याऐवजी भासमान देहाच्या जागी 'अहं ब्रह्मास्मि' (मी ब्रह्म आहे) हाच अनुभव त्याला येत राहतो. (५३६०)

बहु कासया गाढ झोंपेआंत । लयसाक्षित्व उरे नेणीवरहित ।
ते समईं कोणीही रविदत्त । ह्मणोनि बाहे ॥ ६१ ॥
जास्त कशाला? गाढ झोपेतसुद्धा नेणीवरहित केवळ लयसाक्षित्व उरलेले असते. त्यावेळी कोणी 'रविदत्ता' म्हणून हाक मारिली (५३६१)

तेव्हां उठोनि बोले तयासी । परी मी नव्हे हा नामरूपी आकारेंसी ।
अहंब्रह्म प्रतीति की अविनाशी । स्मरोनि व्यापारही संपादी ॥ ६२ ॥
तेव्हा लगेच उठून तो त्या हाक मारणाऱ्याशी बोलू लागतो. परंतु "मी हा नामरूपधारी आकार धारण करणारा नाही तर 'अहं ब्रह्म' या प्रतीतीने अविनाशी ब्रह्मच आहे" असे स्मरण करून व्यापारही करू लागतो. (५३६२)

ऐसें भलते अवस्थे भलते व्यापारी । देहादि वर्ततां त्या त्या अनुकारी ।
परी गुप्तही स्फुरेना अंतरीं । मी देह ह्मणोनि ॥ ६३ ॥
अशा त-हेने कोणत्याही अवस्थेमध्ये कोणतेही व्यापार करत असताना तो त्यांचे अनुसरण करतो (त्यांची कार्ये पार पाडतो. परंतु 'मी देह आहे' अशी भावना गुप्त रूपानेसुद्धा त्याच्या मनात स्फुरत नाही. (५३६३)

स्वप्नी की सुषुप्तीचे अंतीं । जरी न स्फुरे देहादि अहंस्फूर्ति ।
मा जागरीं तो प्रबोधाची उन्नति । तेव्हां तो अवसर कैंचा ॥ ६४ ॥
स्वप्न अवस्थेत अथवा सुषुप्ती संपत असताना 'देहादी मीच आहे' अशी भावना साधकाच्या मनात स्फुरत नसेल तर जागृतावस्थेत ती कशी स्फुरेल? कारण जागृत अवस्था तर पूर्ण प्रबोधाची अवस्था असते. तिच्यात अशी देहात्मभावना निर्माण व्हायला अवसर कसा मिळेल? (५३६४)

या रीती जेधवां देहबुद्धीचा । मीपणा मावळेल निपटून साचा ।
ऐसा अंतरी प्रत्यय जयाचा । तेणेंचि पहावा ॥ ६५ ॥
अशा प्रकारे देहबुद्धीचा मीपणा जेव्हा संपूर्णपणे मावळेल तेव्हा तो अनुभव आपल्या अंतःकरणात ज्याचा त्यानेच पहावा. (५३६५)

निःशेष मीपण उठू राहिल । आणि देह तरी वर्ते रीतीं पहिले ।
तरी मग जाणावें मीपण गेलें । माझेपणासहित ॥ ६६ ॥
मी पण पूर्णपणे उठणे बंद झाले, आणि देह तर पूर्वीच्या रीतीप्रमाणे वागतो आहे अशी परिस्थिती असेल तेव्हा समजावे की मीपण माझेपणासहित गेले आहे. (५३६६)

मीपणाचि जरी न स्फुरे देहाचा । तरी मग माझेपणा उद्भवे कैंचा ।
एवं मी माझें या उभयात्मकाचा । विश्वाभिमान एक ॥ ६७ ॥
देहाबद्दल तर मीपणाच स्फुरण पावला नाही तर माझेपणा कसा उद्भवेल? तेव्हा अशा प्रकारे मी आणि माझे या दोघांचाही विश्वाभिमान एकच आहे. (५३६७)

ऐसा विश्वाभिमानी निमाल्याचा । अंतरी प्रत्यय पहावा साचा ।
मग वरुती बोलेना वाचा । मी माझेंही ह्मणोनि ॥ ६८ ॥
असा विश्वाभिमानी नष्ट झाला आहे की नाही, याचा प्रत्यय आपल्या अंतःकरणात पहावा. मग वरवर मी-माझे अशी भाषा बोलला तरी काही हरकत नाही. (५३६८)

अंतरींचे मात्र निपटूनि जावें । देहात्मबुद्धीचा मोडही नुद्भवे ।
तरी मग पराकाष्ठेसी साधकें जाणावें । की निमाला विश्वाभिमान ॥ ६९ ॥
पण अंतःकरणातील विश्वाभिमान समूळ गेला पाहिजे. देहात्मबुद्धीचा अंकुरही उठता कामा नये. असे झाले तरच साधकाने समजावे की विश्वाभिमान निमाल्याची ही पराकाष्ठा झाली. (५३६९)

ऐसें न घडतां उगा वरी वरी । मी माझें ह्मणून कदा नुच्चारी ।
परी म्यां सुखी असावें वाटे अंतरीं । तो निरभिमानी न ह्मणावा ॥ ७० ॥
असे झाले नसताना उगीच वरवर मी, माझे असे म्हणत नाही आणि अंतःकरणात मात्र मी सुखी असावे अशी इच्छा धरतो त्या साधकाला निरभिमानी म्हणू नये. (५३७०)

तस्मात् साधकें खरेंचि तरावें । मी माझेपण खांडून काढावें ।
नातरी पूर्वरीतीच अभ्यासावें । निःशेष निमेल तोंवरी ॥ ७१ ॥
म्हणून साधकाने मी माझेपण मुळासह खांडून काढावे आणि मगच खरे खरे तरून जावे. नाहीतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे तो विश्वाभिमान पूर्ण जाईपर्यंत अभ्यास करावा. (५३७१)

निःशेष मीपण उठतां राहिलें । ऐसें खरेपणे प्रत्यया आलें ।
तरी मग जाणावें निःसंतान जाहलें । विश्वाभिमानाचें ॥ ७२ ॥
मीपणाचे उठणे कायमचे थांबले, असे खरेपणाने अनुभवाला आले तरच विश्वाभिमानाचे समूळ उच्चाटन झाले, त्याचे निःसंतान झाले, असे समजावे (५३७२)

ऐसा विश्वाभिमान जेव्हां निमाला । तरी जाणा स्थूल वोलांडिला ।
अन्नमय देहापासून सुटला । अहंब्रह्म अभ्यासें ॥ ७३ ॥
असा विश्वाभिमान जेव्हा नष्ट होतो, तेव्हा समजावे की, आता आपण स्थूलदेहाची सीमा ओलांडली आहे. 'अहं ब्रह्मा'च्या अभ्यासाने अन्नमय देहापासून आता आपण मुक्त झालो आहोत. (५३७३)

जरी विश्वाभिमानही निमतां । तैजस अभिमानी उरे आंतौता ।
ध्यासें स्फुरतसे मी कर्ता भोक्ता । गुप्त किंवा प्रगट ॥ ७४ ॥
आता विश्वाभिमान जरी नाहीसा झाला तरी अंतःकरणातील तैजस अभिमानी राहिलेलाच असतो. तो ध्यासामुळे आपण कर्ता आहोत, भोक्ता आहोत असे गुप्तपणे अथवा प्रकटपणे मानत असतो. (५३७४)

या देहादिकांचे संघेकडून । सर्व होतां न राहे वर्तन ।
आणि चतुष्टयाचें उगें चिंतन । कदापि न राहे ॥ ७५ ॥
या देहादिकांच्या संघाताकडून सर्व प्रकारचे व्यापार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि प्रगट मीपणा, गुप्त मीपणा, प्रगट माझेपणा आणि गुप्त माझेपणा या चतुष्टयाचे चिंतनही झाल्यावाचून उगीच राहात नाही. (५३७५)

हे तो सहजगतींच होत असे । परी साधक संकोचून मानसें ।
ह्मणे हे होतां न राहे तरी आपैसें । केलें तें भोगा येईल ॥ ७६ ॥
हे सहजरीत्या होत असते, पण साधक मात्र मनामध्ये संकोचून जातो. तो म्हणतो की, हे होण्याचे जर थांबले नाही तर आपल्याला स्वाभाविकपणेच केले ते आपोआप भोगावे लागेल. (५३७६)

केलें तें कदापि चुकेना । ऐसें बोलती शास्त्रे नाना ।
तरी भोगा येतील अवश्य आपणां । तस्मात् क्रिया रहावी ॥ ७७ ॥
कारण जे केले ते केव्हाही चुकणार नाही, असे निरनिराळी शास्त्रे सांगत असतात. तर ते सर्व आपल्याला अवश्य भोगावेच लागतील म्हणून देहादिकांच्या क्रिया थांबल्या पाहिजेत. (५३७७)

पुण्यात्मक घडतां उत्तम गति । पापात्मक होतां अधम गती ।
ऐसें स्फुरूं लागेल जरी स्फूर्ति । हाचि प्रगट तैजस ॥ ७८ ॥
पुण्यात्मक कर्म घडले असता उत्तम गती प्राप्त होते, पापात्मक कर्म घडले असता अधम गती प्राप्त होते, हा विचार मनात स्फुरू लागेल तर ही स्फूर्ती म्हणजेच प्रगट तैजस होय. (५३७८)

जरी ब्रह्मज्ञानही जाहलें । सर्वांवेगळे लयसाक्षित्व कळलें ।
तरीही पूर्वाध्यासें शुभाशुभ घडलें । घेईल माथां ॥ ७९ ॥
आणि तो मनात कायम राहिल्यास जरी ब्रह्मज्ञान देखील झाले असले, सर्वांहून भिन्न असे लयसाक्षित्वही कळलेले असले तरीही पूर्वाध्यासामुळे जे काही शुभाशुभ घडले असेल ते माथ्यावर येऊन बसेल. (५३७९)

कांही पुण्यात्मक घडतां । पापात्मकासी अव्हेरितां ।
आल्हादें हर्ष होय चित्ता । हाही प्रगट तैजस ॥ ८० ॥
काही पुण्यात्मक घडले किंवा पापात्मकाचा आपण अव्हेर केला तर त्याच्या समाधानाने मनाला आनंद वाटतो. हादेखील प्रगट तैजस होय. (५३८०)

पुण्यात्मक कांही न घडलें । कर्मबळे पापचि घडून आलें ।
तेव्हां अति खेदासी चित्त पावलें । हाही प्रगट तैजस ॥ ८१ ॥
पुण्यात्मक काहीच घडले नाही, कृत कर्माचे फळ म्हणून हातून पापच घडले, तेव्हा मनाला अतिशय खेद होतो. तेव्हा हा देखील प्रगट तैजसच होय. (५३८१)

क्षण एक वाटे मी असंग । अकर्ता निर्विकार अभंग ।
क्षणा एका चित्तासी लागे डाग । अहं कर्तृत्वाचा ॥ ८२ ॥
एक क्षणभर असे वाटते की मी असंग आहे, मी अकर्ता, निर्विकार आणि अभंग आहे. पण दुसऱ्या क्षणी चित्ताला अहंकर्तृत्वाचा (मी कर्ता आहे) अशा अभिमानाचा डाग लागतो. (५३८२)

असो ऐसा प्रगट अभिमानी । जन्मासी होईलचि दानी ।
परी गुप्तत्वें उठे जो अंतःकरणीं । तोही संसृतींत पाडी ॥ ८३ ॥
असो, पण असा प्रगट अभिमानी नवीन जन्माचा दाता ठरणारच. पण जो अभिमानी अंतःकरणात गुप्तत्वाने उठतो तोही जन्ममृत्यूच्या संसारात जीवाला टाकतो. (५३८३)

तया गुप्तरूपें तैजसाचें । रूप बोलिजे संकेतें वाचे ।
मनबुद्धीसी तो विशेषं नवचे । परी सामान्यवृत्तीसी स्फुरे ॥ ८४ ॥
त्या गुप्तरूप तैजसाचे रूप थोडक्यात सांगतो. तो मनबुद्धीला विशेषत्वाने कळत नाही. पण सामान्य वृत्तीमध्ये मात्र तो स्फुरतो. (५३८४)

सहजगतीं पुण्यात्मकासी । अथवा पापात्मका न घडतां वृत्तीसी ।
विशेषं न घेताही सहजत्वेंसी । हर्षाकारता उठे ॥ ८५ ॥
पुण्यात्मक अथवा पापात्मक असे काही घडले नसताही, वृत्तीने विशेषत्वाने घेतले नसतानाही, अगदी सहजरीतीने वृत्तीमध्ये हर्षाचा अनुभव उठतो. (५३८५)

कर्मबळे पापात्मक घडलें । पुण्यात्मक नाहीं घडून आलें ।
विशेषे बुद्धीसी नाही स्पर्शलें । परी सहज खेदावे वृत्ति ॥ ८६ ॥
पूर्वकर्मानुसार काही पापात्मक घडल, अथवा पुण्यात्मक घडून आले नाही, बुद्धीलाही विशेषत्वाने स्पर्श झाला नाही तरीसुद्धा वृत्तीला स्वाभाविकपणे दुःख वाटते, (५३८६)

एवं विशेषे निश्चया तरी न येतां । हर्षखेदात्मक स्फुरतां ।
हाचि गुप्त साभिमान तत्त्वतां । तैजस सूक्ष्म देहाचा ॥ ८७ ॥
अशा त-हेने बुद्धीचा विशेष प्रकारचा निश्चय झाला नसताना तिला सहज हर्ष अथवा खेद होतो, हाच सूक्ष्म देहाचा गुप्त तैजस अभिमान होय. (५३८७)

ह्मणसी प्रगट विशेषे नव्हे जरी । तरी बाधक असेल कवणे परीं ।
परंतु विचारून पाहें अंतरीं । हेंचि बीज उत्पत्तीसी ॥ ८८ ॥
तू म्हणशील की, जर हा अभिमान प्रगट नसेल, आणि विशेष प्रकारचा नसेल तर तो बाधक कसा असेल? परंतु जरा अंतःकरणात विचार करून पहा. हेच तर उत्पत्तीचे मूळ बीज होय. (५३८८)

हे बीज जरी गुप्तत्वें उरतां । विशेषासी उद्भव होय तत्त्वतां ।
तस्मात् गुप्तत्वेही हर्षखेदाकरता । वृत्तीसी नुरावी ॥ ८९ ॥
हे बीज जर गुप्तपणाने वृत्तीत राहिले असेल तर विशेषाची उत्पत्ती होणारच. म्हणून वृत्तीच्या ठिकाणी हर्षरूपता अथवा खेदरूपता गुप्तत्वानेसुद्धा उरली नाही पाहिजे. (५३८९)

यासी अभ्यास हाचि करणे । अहंब्रह्मास्मि एकतान स्मरणें ।
येर हे मिथ्यात्वें स्मरावें वृत्तीनें । किमपि विस्मर न होतां ॥ ९० ॥
यासाठी हाच अभ्यास करायला पाहिजे, 'अहं ब्रह्मास्मि'चे अखंड एकतान स्मरण केले पाहिजे, बाकीचे सर्व काही मिथ्या आहे याचे वृत्तीला न विसरता स्मरण असावे. (५३९०)

अगा ऐशिया अभ्यासापुढें । तैजस अभिमानाचे होय महें ।
कदाही गुप्तत्वें नुठे सांकडें । सहजचि हर्षखेदाचें ॥ ९१ ॥
अरे, अशा अभ्यासाच्या योगाने तैजस अभिमान प्रेतवत् होतो, तो पुन्हा केव्हाही उत्पन्न होत नाही आणि सहजच हर्ष अथवा खेदाचे संकटही केव्हाही गुप्तत्वाने उठत नाही. (५३९१)

तस्मात् अभ्यास वास्तविक करावा । निपटून तैजस अभिमान दवडावा ।
तरीच हा भवपाश तुटावा । लयसाक्षीही कळल्यावरी ॥ ९२ ॥
तेव्हा खरा अभ्यास करावा. तैजस अभिमान मुळासकट संपूर्णपणे उपटून दूर घालवावा. तरच लयसाक्षीचे ज्ञान होईल आणि त्यानंतर संसाराचा पाश तुटून जाईल. (५३९२)

जरी लयसाक्षिज्ञान होऊनी । गुप्तत्वें उरे तैजसाभिमानी ।
तरी कैवल्य पावेल बोले जो वाणी । तयाचा गुरुही लटिका ॥ ९३ ॥
लयसाक्षित्व झाल्यानंतरही तैजसाभिमानी गुप्तत्वे उरतो आणि तरीसुद्धा कैवल्याप्राप्ती (मोक्षप्राप्ती) होईल असे जो म्हणेल त्याचा गुरूही खोटा समजावा. (म्हणजे जोपर्यंत गुप्त तैजस अभिमान उरलेला असतो, तोपर्यंत साधक मोक्षाला पात्र ठरत नाही.) (५३९३)

यास्तव खरें जयासी तरणे । तरी तेणें यथार्थ अभ्यास करणे ।
अभ्यासें निपटून नाश होणे । हे सत्य सत्य त्रिवाचा ॥ ९४ ॥
यासाठी ज्याला खरोखरच उद्धार करून घ्यावयाचा आहे, त्याने बिनचूकपणे (न चुकता) अभ्यास करावा, त्या अभ्यासाने गुप्त तैजस अभिमान संपूर्णपणे नष्ट होईल. हे त्रिवार सत्य आहे. (५३९४)

निःशेष तैजसाभिमान निमाला । याची अवधी सांगू साधकाला ।
तैशी ओळखण पहावी अंतराला । गुप्तत्वेही उठे की नुठे ॥ ९५ ॥
तैजस अभिमान संपूर्णपणे गेला याची खूण साधकाला सांगतो. त्याप्रमाणे तो अहंकार गुप्तपणे उठला आहे की उठला नाही, याची ओळख साधकाने आपल्या अंतःकरणात पहावी. (५३९५)

भलतैसा देह हा वर्तो । पुण्य की पापात्मका प्रवर्तो ।
भनबुद्धीही पाहिजे तें चिंतो । वाणी बडबडो भलतैशी ॥ ९६ ॥
देह कसलेही व्यापार करो, तो पुण्यमार्गाने जावो, की पापमार्गाने जावो, मन आणि बुद्धी त्यांना वाटेल त्याचे चिंतन करोत, आणि वाणीही कशाही प्रकारची बडबड करो; (५३९६)

बहु कासया जग सर्व संहारों । आपुलें हातें निपटून मारो ।
अथवा सर्वां वांचवों की निर्माण करो । परी हर्ष खेद नुठे ॥ ९७ ॥
जास्त काय सांगू, सर्व जगाचा संहार होवो; आपल्या हातांनी सर्वांचा संपूर्ण संहार घडो अथवा सर्वांचे संरक्षण करून त्यांना ते त्यांना वाचवोत अथवा नव्याने निर्माण करोत, पण हर्ष अथवा खेद मनात उत्पन्न होत नाहीत. (५३९७)

काय हो हे मी पाप करिता जाहलों । काय हो पण्य नाही आचरलों ।
अथवा पापासि नाही स्पर्शलों । पुण्यचि केलें उदंड ॥ ९८ ॥
काय हो, मी पापाचरण केले आहे. पुण्याचे आचरण केले नाही; अथवा मी पापाला स्पर्श केला नाही, आणि खूप पुण्यकर्मेच केली; (५३९८)

ऐसा खरखरा हर्षशोकाचा । गुप्तही नुठे अंतरी साचा ।
उगाचि सहजगतीं वर्तणुकीचा । परोक्षरीतीं तमाशा पाहे ॥ ९९ ॥
अशा प्रकारचा हर्षशोकाचा खरखरा (टोचणी) अंतःकरणात गुप्तपणेसुद्धा उठत नाही आणि सहजरीतीने चाललेला देहवर्तनाचा तमाशा अलिप्त वृत्तीने जेव्हा साधक पाहतो; (५३९९)

स्फूर्तीपासून देहापर्यंत । जैसा परकीय कोणी असे वर्तत ।
आणि हे स्वपर जग समस्त । कळसूत्रापरी पाहे ॥ ५४०० ॥
स्फूर्तीपासून देहापर्यंत सर्व समुदाय जणू काही कोण्या परकीय व्यक्तीचाच असून ती व्यक्तीच त्या समुदायाच्या साहाय्याने वर्तन करत आहे असे त्याला वाटते. आणि हे सर्व स्वकीयांचे आणि परकीयांचे जग त्याला कळसूत्री बाहुलीप्रमाणे दिसते. (५४००)

अथवा भिंतीवरील चित्रे सर्व । त्यांतचि आपुले देहाचा गौरव ।
काढिले की मोडिले अपूर्व । तरी पापपुण्या ठाव कैंचा ॥ १ ॥
अथवा भिंतीवरील सर्व चित्रांमध्ये त्याचा देहही समाविष्ट झालेला त्याला दिसतो. आता ती चित्रे काढली अथवा पुसून टाकली तरी त्याचे त्याला काही अपूर्व वाटत नाही. मग पाप अथवा पुण्य यांना त्यात जागा कशी असेल? (५४०१)

आपुले देहासी मी ह्मणेना । हे जग सर्व मिथ्यात्वें गंधर्वरचना ।
तरी कोण मारी कोण पावे मरणा । कोण जीवे कोण जीववी ॥ २ ॥
तो आपल्या देहालाही आपला म्हणायला तयार नसतो, हे सर्व जगच त्याला गंधर्वनगरीप्रमाणे मिथ्या दिसते. अशा परिस्थितीत कोण मारतो आहे, कोण मरण पावतो आहे, कोण जिवंत राहिला आहे, कोण जीवदान देतो आहे, यांचा विचार तो कसा करील? (५४०२)

ऐसा कर्तेपणाच किमपि नुद्भवे । केले ऐसेंही कदा न संभवे ।
सर्व व्यापार तरी होती स्वभावें । शुभ किंवा अशुभ ॥ ३ ॥
अशा प्रकारे कर्तेपणाचा लेशही त्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही, काही केले अशी भावनाही त्याच्या मनात संभवत नाही; पण त्या देहादी समुदायाचे शुभ अथवा अशुभ सर्व व्यापार होतच राहिलेले असतात. (५४०३)

कर्तेपण की केलें ऐसें । नुद्भवेचि वर्ततांही भलतैसें ।
मग हर्ष खेद उद्भवतील कैसे । गुप्त की प्रगट ॥ ४ ॥
कर्तेपण म्हणजे आपण जे काही आचरण करू त्याबद्दल आपण ते केले अशी भावना, पण ती उत्पन्नच होत नाही. मग गुप्त अथवा प्रगट हर्ष आणि खेद कसे उद्भवतील? (५४०४)

ऐसा खरखरा कर्तेपणाचा । वर्तताही निपटून जावा साचा ।
गुप्तही थारा हर्षखेदाचा । मोडोनि जावा ॥ ५ ॥
असा हा कर्तेपणाचा खरखरा आपण व्यापार करत असतानाही संपूर्णपणे नाहीसा व्हावा आणि गुप्तपणे होणाऱ्या हर्षखेदांनाही थारा मिळू नये. तो संपूर्णपणे नष्ट व्हावा (५४०५)

कर्तेपणा जरी निपटून गेला । तरी भोक्तेपणा अर्थात निमाला ।
पुढीलही सर्व धोका हरला । आणि प्रस्तुत भोग माईक ॥ ६ ॥
कर्तेपणा जर पूर्ण नष्ट झाला तर त्याबरोबर भोक्तेपणाही नाहीसा होतो. त्यामुळे पुढील धोकाही नष्ट होतो आणि वर्तमानकालीन प्रस्तुतचे भोगही मायिक ठरतात. (५४०६)

एवं कर्तृत्व भोक्तृत्व उभयरूपी । तैजस अभिमान विक्षेपी ।
याचे निसंतान जाहलें किमपि । लेश उरला नाही ॥ ७ ॥
अशा प्रकारे प्रगट अथवा गुप्त असे कर्तृत्व आणि भोक्तृत्व आणि कर्ता आणि भोक्ता या दोन प्रकारचा विक्षेप निर्माण करणारा तैजस अभिमान या दोहोंचे पूर्ण निरसन झाले आणि त्यांचा अंशदेखील राहिला नाही. (५४०७)

ऐसा निःशेष निमाला खरा । तो जयाचा तेणे पहावा अंतरा ।
की भलतैसे होत्सातां व्यापारा । अहंस्फूर्ति स्फरूं नये ॥ ८ ॥
इतपत संपूर्णपणे नष्ट झाला की नाही हे ज्याचे त्याने आपल्या अंतःकरणात पाहावे. हेतू हा की, व्यापार होत असताही अहंस्फूर्ती (मी पणाची भावना) स्फुरण पावू नये. (५४०८)

व्यापार होत असतांचि न व्हावी । व्यापार न होतां रोधस्थिति नसावी ।
कारण की जोंवरी निर्व्यापारता बरवी । तोंवरी देहात्मत्व न स्फुरे ॥ ९ ॥
व्यापार होत असतानाच ही स्फूर्ती होऊ नये. व्यापार होत नसताना तिचे निरोधन केलेले नसावे. कारण की जोपर्यंत खरी व्यापाररहितता असेल तोपर्यंत देहात्मत्व स्फुरण पावत नाही. (५४०९)

निर्व्यापार समाधि विसर्जून । होईल जेधवां बुद्धीचे उत्थान ।
तेधवां उठेल मी देह म्हणून । तस्मात् नसावा निरोध ॥ १० ॥
व्यापाररहित अशा समाधीचे विसर्जन झाल्यानंतर जेव्हा बुद्धीचे उत्थान होईल त्यावेळी मी देह आहे, अशी भावना उठेल. म्हणून निरोध करू नये. (जेव्हा व्यापार नसतो तेव्हा देहाभिमान उत्पन्न होतच नाही. असे असताना जर साधक निरोध करील तर समाधी उतरल्यावर बुद्धीबरोबर देहाभिमान उठेलच म्हणून निर्व्यापार समाधीत निरोध करू नये.) (५४१०)

जे पाहिजे ते व्यापार व्हावे । बुद्ध्यादि देहान्त आघवे ।
तिहींही अवस्थांमाजी न स्फुरावें । देहात्मत्व गुप्तही ॥ ११ ॥
बुद्धीपासून देहापर्यंत वाटेल तितके व्यापार होऊ देत. पण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये गुप्त स्वरूपातसुद्धा देहात्मत्व स्फुरण पावू नये; (५४११)

किंचितही न स्फुरेसें जाहलें । तें जयाचे तपाशी प्रत्यया आलें ।
म्हणिजे जाणावें क्षयातें पावलें । उत्थान तैजसाचें ॥ १२ ॥
ते किंचितसुद्धा स्फुरेनासे झाले, अर्थात हे ज्याचे त्यालाच प्रत्ययास येते, म्हणजे तैजस अभिमानाचे उत्थान होण्याचे थांबले - त्याचा क्षय झाला असे जाणावे. (५४१२)

नातरी अभ्यासाविरहित । उगाचि एखादा अकर्तेपणा दावित ।
अंतरीं अहंस्फूर्ति असे उठत । तो मुक्त कदा न म्हणावा ॥ १३ ॥
नाहीतर अभ्यास न करताच एखादा उगीचच व्यापार थांबवतो. आणि स्वत:चा अकर्तेपणा प्रकट करतो. पण त्याच्या अंतःकरणात अहंस्फूर्ती उठतच असते. त्याला मुक्त असे कधी म्हणू नये. (५४१३)

तस्मात् तैजस निमाला असे खरा । ऐसा प्रत्यय बाणावा अंतरां ।
बोलिल्या रीती भलतैसे व्यापारा । नुद्भवावा गुप्तही ॥ १४ ॥
म्हणून तैजस खरोखरच मावळला आहे असा अंतःकरणाला प्रत्यय आला पाहिजे आणि आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यापारात त्याचे गुप्तरूपाने सुद्धा उत्थान होऊ नये. (५४१४)

तोंवरी अभ्यास कदा सोडूं नये । निःसंशयेंसी पावेल क्षय ।
वास्तविक निमाल्याचा आला प्रत्यय । तरी साध्यरूप जाहला ॥ १५ ॥
असा प्रत्यय येईपर्यंत अभ्यास केव्हाही सोडू नये. तर तो (तैजस) निःसंशयपणे क्षय पावेल. खरोखरच तो निमाला असल्याचा प्रत्यय आला तरी अभ्यास सोडू नये. तो अभ्यासच साध्यरूप समजावा. (५४१५)

एवं ऐसा तैजस जरी निमाला । सर्व व्यापारी विक्षेप नाहीं स्फुरला ।
तरी जाणावा सूक्ष्मभेद वोलांडिला । स्वप्नासहित साधकें ॥ १६ ॥
अशा प्रकारे हा तैजस लय पावला आणि कोणत्याही व्यापारामध्ये देहात्मबुद्धीचा विक्षेप स्फुरला नाही तर समजावे की साधकाने सूक्ष्म तैजसावरही मात केली व त्याने स्वप्न अवस्थेसहित सूक्ष्मदेह ओलांडला आहे. (५४१६)

जरी तैजस निःशेष सरे । तरी प्राज्ञ अभिमान उरे ।
कैंसा म्हणसी तरी अति आदरें । श्रवण करावें ॥ १७ ॥
आता तैजस जरी संपूर्णपणे लोप पावला तरी प्राज्ञ अभिमान उरतोच. त्याचे स्वरूप कसे असते, असे विचारशील तर सांगतो. तू लक्ष देऊन ऐक. (५४१७)

अकर्तेपण वास्तविक जाहलें । तैजसाचे स्फुरण मावळलें ।
सहजस्थितीने वर्ते लागलें । हे सहज समाधि ॥ १८ ॥
खरोखर सर्व व्यापार बंद होऊन अकर्तेपण प्रत्यक्षात आले, तैजस अहंकाराचे स्फुरणही मावळले, आणि साधक सहजपणे वागू लागला तर त्याची ती सहज समाधीची अवस्था होय. (५४१८)

सदा एकतान ब्रह्माकार । दुजा स्फुरेना किंचित् उद्गार ।
हे जग की हा मी नव्हेचि अनुकार । ओतप्रोत ब्रह्मात्मा ॥ १९ ॥
सर्वकाळ एकतान ब्रह्माकार झाला, त्याला दुसरा कोणताही उदार किंचितसुद्धा फुटत नाहीसा झाला, हे जग आहे. हा मी आहे, अशा त-हेचा अनुभवच येईनासा झाला आणि सर्वत्र आत्माच ओतप्रोत भरलेला आहे; अशी अवस्था होणे म्हणजेच सहज समाधी होय. (५४१९)

ऐशिया सहज समाधिमाजीं । किंचित् स्फूर्ति नसतांही दुजी ।
परी तेथें मूलाज्ञान असे सहजीं । ध्येय ध्यान त्रिपुटिरूपें ॥ २० ॥
अशा या सहजसमाधीमध्ये दुसरी कोणतीही स्फूर्ती नसते. परंतु तेथे ध्येय, ध्यान, ध्याता अशा त्रिपुटीच्या रूपाने मूल अज्ञान सहजपणे असते. (५४२०)

तें मूलाज्ञान कोणतें म्हणसी । तरी आवधारावें निश्चित मानसीं ।
मी अकर्तेपणे अखंडैकरसीं । समाधान पावलों ॥ २१ ॥
ते मूल अज्ञान कोणते, असे म्हणशील तर नीट लक्षपूर्वक ऐक. मी अकर्ता होऊन अखंड एकरस अशा ब्रह्मामध्ये समाधान पावलो. (५४२१)

ऐसा समाधानरूप अनुभवाचा । स्फुरत असे मीपणा साचा ।
तो ब्रह्मात्मा नव्हे प्रत्येक्ष देहादिकांचा । अध्यास घेतला ॥ २२ ॥
अशा समाधानरूप अनुभवाचा मीपणा त्यावेळी स्फुरत असतो. तो ब्रह्मात्मा नसतो तर त्याने प्रत्यक्ष देहादिकांचा आरोप (अध्यास) घेतलेला असतो. (५४२२)

आपण अनुभाव्यरूप स्वतां असोनी । अनुभविता जाहला वेगळेपणीं ।
केंचि विसरणे ब्रह्मात्मयालागूनी । हेंचि मूलाज्ञान ॥ २३ ॥
आपण स्वतः अनुभाव्यरूप असून जीव अनुभविता बनून वेगळा होतो. हेच ब्रह्मात्म्याचे विस्मरण होय. हेच मूलाज्ञान होय. (५४२३)

येरव्ही ब्रह्मात्मा या मायेकडून । केव्हां जाहला होता निर्माण ।
तरी पावला अनुभवरूप समाधान । हे सहसा न घडे ॥ २४ ॥
येरव्ही मायेकडून ब्रह्मात्मा कधी निर्माण झाला होता? आणि तरीही त्या ब्रह्मात्म्याला अनुभवरूप समाधान प्राप्त झाले! असे सहसा घडणार नाही. (५४२४)

तस्मात् अन्याचा ध्यास घेतला । मी पावलों ब्रह्मसुखाला ।
हेंचि विस्मरणरूपें भिन्न पडिला । कारणाभिमानी प्राज्ञ ॥ २५ ॥
म्हणून दुसऱ्या पदार्थाचा ध्यास घेतला, आणि मी ब्रह्मसुखाला प्राप्त झालो असा मीपणा घेतला, अशा रीतीने स्वतःच्या ब्रह्मत्वाचे त्याला विस्मरण पडले आणि तो स्वतःहून भिन्न पडला. हाच कारणदेहाचा अभिमानी प्राज्ञ जीव होय. (५४२५)

या प्राज्ञाचेही प्रकार दोन । एक गुप्त एक प्रगट पावे उत्थान ।
जो मी सुखी ऐसे वृत्तीचे भान । हा अभिमान प्रगट ॥ २६ ॥
या प्राज्ञाचेही एक प्रगट आणि दुसरे गुप्त असे दोन प्रकार होत. मी सुखी आहे असे वृत्तीला जे भान होते ते प्रगट अभिमान होय. (५४२६)

मी धन्य जाहलों मुक्त आतां । विसर्जूनियां सर्व संधाता ।
धन्य मीच पावलो अभिन्नता । हा प्रगट की प्राज्ञ ॥ २७ ॥
मी धन्य झालो, मी आता मुक्त झालो, देहादी सर्व समुदायाचे विसर्जन करून मीच अभिन्नता प्राप्त करून घेतली, हाही प्रगट प्राज्ञ अभिमानच होय. (५४२७)

ऐसा विशेष भाव नसतां जरी । उगी समाधानाची तृप्ति वरी ।
सामान्यवृत्ति ब्रह्मसुखानुकारी । हा गुप्ततें प्राज्ञ ॥ २८ ॥
असा विशेष भाव नसताना उगीच समाधानी वृत्तीचा स्वीकार करतो. ती सामान्यवृत्ती होय. ती ब्रह्मसुखाचे अनुकरण करते. (म्हणजे ब्रह्मसुखासारखी वाटते) हा गुप्त प्राज्ञ होय. (५४२८)

ऐसा उभयरूपी प्राज्ञ असतां । ते म्हणं नये पूर्ण अभिन्नता ।
केवळ अभिन्न जे वस्ततंत्रता । होणे उरली असे ॥ २९ ॥
अशा दोन्ही प्रकारातला प्राज्ञ असताना तिला पूर्ण अभिन्नता म्हणू नये. ती केवळ वस्तुतंत्र अभिन्नता व्हायची राहिली आहे. म्हणून ती अपूर्ण अभिन्नता होय. (५४२९)

आणि हे मूलाज्ञानचि उत्पत्तीसी । कारण असे की बीजरूपेंसी ।
या प्राज्ञापासून जन्म उभयांसी । तैजसविश्वाचा ॥ ३० ॥
हेच मूलाज्ञान उत्पत्तीला बीजरूपाने कारणीभूत असते. या प्राज्ञापासूनच विश्व आणि तैजस या दोन्ही अभिमानांची उत्पत्ती होते. (५४३०)

हे मूळबीज तैसेंचि उरलें । आणि विश्व तैजस जरी निमाले ।
तरी ते जाणावे उद्भवतील पहिले । रीतीं मागुतींही ॥ ३१ ॥
हे मूळ बीज तसेच राहिले आणि विश्व आणि तैजस जरी लोप पावलेले असले तरी ते पुन्हा पूर्वीप्रमाणेच उद्भवतील. (५४३१)

तस्मात् ऐशिया मूलाज्ञानासहित । प्राज्ञ अभिमानाचा व्हावा घात ।
तरीच वस्तुतंत्रत्वें कैवल्या पावत । साधकत्व त्यागें साध्या ॥ ३२ ॥
म्हणून या प्रकारच्या मूलाज्ञानाबरोबरच प्राज्ञ अभिमानाचाही नाश झाला पाहिजे, तरच वस्तुतंत्रत्वाने साधक साधकपणाचा त्याग करून साध्य जे कैवल्य (म्ह. मोक्ष) ते प्राप्त करील. (५४३२)

ऐसें हे मूलाज्ञान जावया । वस्तुतंत्र अभिन्न व्हावया ।
अभ्यासचि पाहिजे शिष्यराया । चिरकाळ ब्रह्मास्मीचा ॥ ३३ ॥
असे हे मूलाज्ञान जाण्यासाठी आणि अभिन्नपणे वस्तुतंत्र होण्यासाठी हे शिष्यराया, 'अहं ब्रह्मास्मि'चा दीर्घकाळ अभ्यासाचीच गरज आहे. (५४३३)

हा जो ब्रह्मींचा अनुभविता । पावला सहज सुखाकारता ।
तो मी ब्रह्म नव्हेचि स्वतां । केवळ निर्विकार ॥ ३४ ॥
हा जो ब्रह्माचा अनुभव घेणारा आहे तो सहजरीत्या सुखाकारता प्राप्त करतो, तो 'मी ब्रह्म' नसतो तर स्वतःच केवळ अनंत, व्यापक ओतप्रोत असे निर्विकार ब्रह्म बनलेला असतो. (५४३४)

यापरता जो स्वयें निर्विकार । लयसाक्षी अभंग निर्धार ।
ध्याता ज्या सुखें सुखाकार । तो मी ब्रह्मात्मा स्वयें ॥ ३५ ॥
'मी ब्रह्म' या अनुभवापलीकडचा जो स्वतः निर्विकार, अभंग असा लयसाक्षी आहे आणि ध्याता ज्या सुखाने सुखाकार आहे तो मी स्वतः ब्रह्मात्माच आहे (५४३५)

त्या माझा मज कैंचा अनुभव । सुख सुखी हे दोन कैंचें नांव ।
तस्मात् हा अवघा मायीक समुदाव । देहाध्यासरूप ॥ ३६ ॥
त्या माझा मला कसला आहे अनुभव? सुख आणि सुखी अशी दोन नावे तरी कुठली? त्यामुळे हा सगळा देहादी समुदाय मायिक आहे. तो देहाध्यासरूपच आहे. (५४३६)

समाधियोगें ब्रह्मानुभव होणे । जेणे लयसाक्षी ज्ञानें वोळखणे ।
ते सर्वही अभ्यासाची लक्षणे । निरोपिलीं मागां ॥ ३७ ॥
समाधीच्या मार्गाने ब्रह्मानुभव कसा घेता येतो. ज्ञानमार्गाने लयसाक्षी ओळखणे, ही सर्व अभ्यासाची लक्षणे मागे सांगितलीच आहेत. (५४३७)

ब्रह्मसुखें सुखी जाहला । ज्ञाता ज्ञाने मुक्ती पावला ।
तो हा जीव ऐक्यरूपें ठेला । ब्रह्मा-ब्रह्माभित्र होऊनी ॥ ३८ ॥
मग ब्रह्मसुखाच्या योगाने जीव सुखी झाला, ज्ञाता ज्ञानाच्या योगाने मुक्त झाला, असा तो जीव ब्रह्मामध्ये ब्रह्माशी अभिन्न होऊन त्याच्याशी एकरूप होऊन राहिला. (५४३८)

तस्मात् हे सर्व आभासाचे रूप । केवळ ब्रह्मात्मा नव्हे सच्चिद्रूप ।
निर्विशेष जें पूर्ण निर्विकल्प । तें आपण स्वयें ॥ ३९ ॥
त्यामुळे हे सर्व आभासाचे रूप आहे. ते सच्चिद्रूप असा केवळ ब्रह्मात्मा नव्हे. निर्विशेष, पूर्ण, निर्विकल्प असे जे ब्रह्म तेच तो स्वतः असतो. (५४३९)

जाणिलें अनुभविलें असे जेणें । तें कदा आपण ऐसें न स्फुरणें ।
यापरतें अनुभाव्य ज्ञेय जें संचेलपणे । तें स्वयें निश्चय व्हावा ॥ ४० ॥
पण जे आपण जाणले, जे अनुभवले. ते आपण आहोत असे केव्हाही स्फुरू नये. त्याच्यापलीकडे जे अनुभाव्य आहे, जे ज्ञेय आहे, जे सर्व व्यापून आहे, असे जे ब्रह्म तेच आपण आहोत असा निश्चय व्हावा. (५४४०)

समाधिसुख ब्रह्मानुभव । ध्यान तरी असावें सर्वदैव ।
ब्रह्मचिंतनिका स्मरणरूप आठव । वृत्तीसी सदा असावा ॥ ४१ ॥
पण त्याचबरोबर समाधिसुख, ब्रह्मानुभव, ध्यान हे सर्व नेहमी करत असावे; ब्रह्मचिंतनिका, वृत्तीने सदा स्मरणरूप आठवण हे नेहमी असावे. (५४४१)

परी ज्ञाता घ्याता आठविता । स्मरता चिंतिता अनुभविता ।
हा मी नव्हे आभासरूप तत्त्वतां । यापरता मी ब्रह्मात्मा ॥ ४२ ॥
परंतु ज्ञाता होऊन जाणणे, ध्याता होऊन ध्यान करणे, स्मरण करणे, चिंतन करणे, अनुभव घेणे इ. क्रिया करत असता मी या गोष्टी करणारा नव्हे कारण त्या सर्व आभासरूप आहेत. मी त्यांच्या पलीकडचा ब्रह्मात्मा आहे. (५४४२)

ब्रह्म तरी सदा अनुभवावें । परी अनुभवितें आपण न व्हावें ।
हेंचि मुख्यत्वें वर्म जाणावें । समाधानाचें ॥ ४३ ॥
ब्रह्माचा तर सदा अनुभव घ्यावा, पण आपण अनुभवणारा होऊ नये. हेच समाधानाचे मुख्य वर्म जाणावे. (५४४३)

हे सर्व असे आभासकार्य । हे मी नव्हेची ब्रह्म अद्वय ।
मुख्य आभासचि मिथ्या तरी धर्म होय । त्याचा सत्य कैसा ॥ ४४ ॥
हे सर्व आभासकार्य आहे. हे मी नव्हेच. मी तर अद्वय ब्रह्म आहे. मुख्य आभासच जर मिथ्या असेल तर त्याचा धर्म (गुणधर्म) सत्य कसा असेल. (५४४४)

एक अनुभविता आपण नव्हे । आणि स्वतां ब्रह्म तें निजांगें व्हावें ।
ऐशियापरी सदा आठवावें । विस्मरण न होतां ॥ ४५ ॥
अशा प्रकारे आपण अनुभविता नाही आहोत. पण आपण स्वतःच ब्रह्म व्हावे. असेच नेहमी स्मरण करावे, त्याबाबतीत केव्हाही विस्मरण होऊ देऊ नये. (५४४५)

हाचि अभ्यास सदा असतां । गळून जाय द्वैताची वार्ता ।
निपटून मूलाज्ञानाचे होय घाता । प्राज्ञाभिमानासहित ॥ ४६ ॥
हाच अभ्यास सतत केल्याने द्वैताची गोष्टच मिटून जाते. आणि प्राज्ञ अभिमानासहित मूलाज्ञानाचा घात समूळ होतो. त्याचा लेशही राहत नाही. (५४४६)

हे निपटून गेलियाचि अवधि । अंतरीं साधकें वोळखावी आधीं ।
की ब्रह्म अनुभवित असतांही कधीं । अनुभविता आपण न वाटावा ॥ ४७ ॥
ते मूल अज्ञान संपूर्णपणे नष्ट झाल्याची खूण साधकाने प्रथम ओळखून घ्यावी. ती ही की ब्रह्माचा अनुभव घेत असताना कधीही आपण स्वतःला अनुभविता समजू नये. (५४४७)

जैसा आरसा पाहात असतां । आभासचि मी ऐशी कदा वार्ता ।
कवणासीही नुद्भवेचि तत्त्वतां । यारीतीं आठवावें ॥ ४८ ॥
ज्याप्रमाणे आरसा पाहात असताना त्यातील प्रतिबिंब मी असे कोणाच्याही मनात येत नाही, त्याप्रमाणे ब्रह्माचा अनुभव घेताना स्मरण ठेवावे. (५४४८)

भलते समयींही चुकूनी । अनुभविता स्फुरूं नये मी ह्मणोनी ।
अनुभाव्य जें कां पूर्णपणीं । तें निःसंशयें आपण ॥ ४९ ॥
कोणत्याही वेळी चुकूनसुद्धा मी अनुभविता आहे असे वृत्तीत स्फुरू नये. आपण अनुभाव्यच (अनुभवाचा प्रत्यक्ष विषय) पूर्णपणे आहोत. याबद्दल संशय नसावा. (५४४९)

ऐशी दृढता उत्थानरहित । जरी जाहली एकरूप सदोदित ।
तरी जाणावा जाहला असे घात । प्राज्ञ अभिमानाचा ॥ ५० ॥
अशी उत्थानरहित एकरूप अवस्था नित्याची व दृढ झाली की प्राज्ञ अभिमानाचा घात झाला आहे असे समजावे. (५४५०)

हाही प्रत्यय जयाचा तेणें । जाहला तो ओळखूनी पाहणें ।
निपटून प्राज्ञ मावळतां होणें । वस्तुतंत्र निश्चयेंसी ॥ ५१ ॥
हा अनुभव ज्याचा त्याने ओळखून पहावा. प्राज्ञ अभिमान निपटून मावळल्यावर निश्चितपणे वस्तुतंत्र होणे शक्य होते. (५४५१)

प्राज्ञ अभिमान निःशेष निमाला । तेणें कारणदेहही ओलांडिला ।
पुढे साधकही ह्मणूं नये तयाला । साध्य जाहला निःसंशयें ॥ ५२ ॥
ज्याचा प्राज्ञ अभिमान लोप पावला त्याने कारण देहाचा अडथळा पार केला असे समजावे. त्यानंतर त्याला साधक म्हणण्याची आवश्यकता नाही. कारण तो स्वतःच आता निःसंशयपणे साध्यच झालेला असतो. (५४५२)

जोवरी श्रवणादि संपादी । विवेचून लयसाक्षित्व अनादि ।
वोळखी जाहली तोवरी विशदी । तो पूर्वांग मुमुक्षु ॥ ५३ ॥
जोपर्यंत श्रवण इ. करत असतो, अनादी लयसाक्षित्व विचाराने समजून घेत असतो तोपर्यंत त्याला पूर्वांग मुमुक्षू समजावे. (५४५३)

पुढें अभ्यासें मी माझेंपण । गळाला हा विश्वाभिमान ।
तेव्हा मुमुक्षुत्व संपलें पूर्ण । तोंवरी उत्तरांग मुमुक्षु ॥ ५४ ॥
पुढे अभ्यासाने मी-माझेपण गळून पडले की त्याचा विश्वाभिमान गळाला असे समजावे. तेव्हा त्याची मुमुक्षुदशा संपते. ही उत्तरांग मुमुक्षुत्वाची खूण झाली (५४५४)

त्यापुढे कर्तृत्व भोक्तृत्व निमे जोवरी । पूर्वांग साधक ह्मणावा तोंवरी ।
उत्तरांग साधकता असे निर्धारी । प्राज्ञ निमे तोपर्यंत ॥ ५५ ॥
त्यापुढे जोपर्यंत त्याचे कर्तृत्व भोक्तृत्व (म्हणजे मी कर्ता आहे. मी भोक्ता आहे अशी भावना) संपत नाही तोपर्यंत त्याला पूर्वांग साधक म्हणावे आणि प्राज्ञ अभिमान निमेपर्यंत त्याची उत्तरांग साधकता असते हे समजून घ्यावे. (५४५५)

प्राज्ञ निःशेष जेव्हा निमाला । मूलाज्ञानाचा घात जाहला ।
तेव्हां तो साधकत्वापासून संचला । साध्यरूप वस्तुतंत्र ॥ ५६ ॥
जेव्हा प्राज्ञ अभिमान निःशेषपणे नष्ट होतो, तेव्हा त्याचे मूळ अज्ञान नष्ट होते. तेव्हापासून त्याची साधकदशा संपून तो साध्यरूप वस्तुतंत्र होऊन राहतो. (५४५६)

त्रिपुटी क्षीण होय तोपर्यंत । कर्तृतंत्रत्वे साधक ह्मणवित ।
मूलाज्ञानरूपी प्राज्ञाचा घात । होतां साध्य ब्रह्म अंगें ॥ ५७ ॥
जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत तो कर्तृतंत्र असतो तोपर्यंत त्याला साधक असे म्हटले जाते, आणि मूळ अज्ञानरूपी प्राज्ञ अभिमानाचा घात होताच तो साध्य जे ब्रह्म तेच होऊन जातो. (५४५७)

ब्रह्म न ब्रह्मवित् स्वयें अंगें । ब्रह्मवेत्ता नव्हे ऐसें श्रुति सांगे ।
तरी तो केवळ ब्रह्मचि अभंगें । सिद्धत्वें विराजे ॥ ५८ ॥
ब्रह्म जाणणारा तो प्रत्यक्ष ब्रह्मच असतो. तो ब्रह्मवेत्ता नसतो, असे श्रुतीनेच सांगितले आहे. तेव्हा तो केवळ ब्रह्मच असून सिद्ध होऊन विराजतो. (५४५८)

ऐसा तिहीं देहांसी वोलांडूनी । तिही अवस्थांतें त्यागूनी ।
तिहीं अभिमानांते विसर्जूनी । निजांगें ब्रह्म जाहला ॥ ५९ ॥
याप्रमाणे तीन्ही देहांना ओलांडून, तीन्ही अवस्थांचा त्याग करून, तीन्ही अभिमानांचे विसर्जन करून तो स्वतः ब्रह्मच होतो. (५४५९)

अभ्यासें इतकें दृढ जाहलें । की देहादि भलते अवस्थे व्यापारले ।
परी आपुलें ब्रह्मात्मत्व तें संचलें । देहात्मभावा त्यागूनी ॥ ६० ॥
अभ्यासाने इतकी दृढता झाली की, देहादी समुदाय कोणत्याही अवस्थेमध्ये व्यापार करत राहिला, तरी त्याने देहात्मभावाचा त्याग केलेला असल्यामुळे त्याचे ब्रह्मात्मत्व अढळ राहते. (५४६०)

समाधिकाळीं की जागृती आंत । स्वप्नीं असो की सुषुप्तींत ।
या संघातासी मी ह्मणून न स्फुरत । ब्रह्म अगें त्या विसरूनी ॥ ६१ ॥
समाधिकाळी असो, की जागृतीमध्ये असो; स्वप्नात असो, की गाढ झोपेत असो देहादिसंघाताला मी असे म्हणण्यांचे स्फुरण त्याला होत नाही, त्या संघाताचा त्याला विसर पडलेला असतो आणि स्वतःच ब्रह्म झालेला असतो. (५४६१)

जैसा देहचि आत्मा दृढ जाहला । तैसा ब्रह्मात्मनिश्चय सदृढ केला ।
भलते अवस्थे देहभाव नाहीं गेला । तैसा ब्रह्मात्मभाव सदृढ ॥ ६२ ॥
ज्याप्रमाणे देह हाच आत्मा असा अभिमान दृढ झाला तसाच ब्रह्म हाच आत्मा असा निश्चय पक्का केल्यानंतर, जसा कोणत्याही अवस्थेत देहात्मभाव जात नाही, त्याप्रमाणे कोणत्याही अवस्थेत ब्रह्मात्मभाव जाणार नाही इतपत सदृढ झाला. (५४६२)

देहात्मबुद्धि ऐसा ह्मणोनी । दृष्टांत जो दिधला पूर्णपणीं ।
तो अति युक्त असे जाणती ज्ञानी । निश्चयरूप ॥ ६३ ॥
देहात्मबुद्धीसारखा ब्रह्मात्मभाव सदृढ झाला पाहिजे असे म्हणताना हां जो देहात्मबुद्धीचा दृष्टान्त दिला तो पूर्णपणे अतिशय योग्य आहे हे सर्व जाणते लोक निश्चितपणे जाणतात. (५४६३)

जो देह जया प्राप्त जाहला । तो जैसा मी ह्मणून बैसला ।
भलते अवस्थेसीही पालटला । न जाय किंचित् ॥ ६४ ॥
ज्याला जो देह प्राप्त होतो त्याला तो मीच आहे म्हणून धरून बसतो,आणि हा त्याचा समज कोणत्याही अवस्थेत पालटत नाही. (५४६४)

बाल तारुण्य की वृद्धपणीं । गर्मी किंवा मरणावसानीं ।
श्रीमान की करंटा असो जनीं । परी मीपण न त्यागी किंचित् ॥ ६५ ॥
बाळपणी, तारुण्यात किंवा म्हातारपणात; गर्भात असो की मृत्यूच्या दारात; श्रीमंत असो की कंगाल, कोणत्याही अवस्थेत कोणीही माणूस मीपणाचा थोडादेखील त्याग करत नाही. (५४६५)

पांचाही व्यापारी जागृतींत । स्मरता न स्मरतां अबाधित ।
देहाचे मीपण असे सदोदित । विसरूनही त्यागीना ॥ ६६ ॥
जागृतीतील पाचही व्यापारामध्ये स्मरण करत असो अथवा स्मरण करत नसो देहाबद्दलचा मीपणाचा भाव नेहमी अबाधित असतो; तो कदाचित् ते विसरून जाईलही पण तो त्याचा त्याग करत नाही. (५४६६)

हे असो जागृतीची कथा । परी मी ह्मणून भोगी स्वप्नावस्था ।
सुषुप्तीमाजीही सर्वथा । नेणिवाभिमान न त्यागी ॥ ६७ ॥
ही जागृतीची कथा सोडून द्या, पण स्वप्नाच्या अवस्थेतही मीच सूक्ष्मदेह असे म्हणून ती अवस्था तो भोगत असतो. सुषप्तीच अवस्थेतही तो नेणिवेचा अभिमान सोडत नाही. (५४६७)

समुदायीं की असे एकला । जरी मदिरादि पानें भ्रमला ।
तरीही मी ह्मणेना भलत्याला । हा इतुकाचि आपण दृढ ॥ ६८ ॥
समुदायात असो की एकटा असो, मदिरा इ. च्या सेवनाने त्याला भ्रम झालेला असो, तो चुकूनही दुसऱ्या देहाला मी म्हणत नाही. इतका तो देहात्मभाव दृढ असतो; (५४६८)

ऐसी देहात्मबुद्धि सर्व जनांसी । आणि असे ज्ञानापूर्वी आपणा जैशी ।
ज्ञान जाहलिया बुद्धि व्हावी तैशी । ब्रह्मात्मा आपण म्हणोनी ॥ ६९ ॥
अशी देहात्मबुद्धी सर्व लोकांना असते. तीच देहबुद्धी ज्ञानपूर्व (अज्ञानी) अवस्थेत आपल्यालाही असते. ज्ञान झाल्यानंतर आपण ब्रह्मात्मा आहोत अशी बुद्धी देहात्मबुद्धीइतकीच दृढ व्हावी. (५४६९)

जागृतीचे दशधा व्यापार । होताति देहाचे जैसा कोणी पर ।
त्याचे मीपण स्फुरेना अणुमात्र । आपण ब्रह्मात्मा स्वयें ॥ ७० ॥
जागृतीचे दहा प्रकारचे व्यापार होत असतात. आपण ब्रह्मात्मा झाल्यानंतर मीपण कणमात्रही स्फुरत नाही. ते दशधा व्यापार जणू काही परक्या देहाचेच आहेत अशा भावनेने तो त्यांच्याकडे पाहतो. (५४७०)

हे असो स्वप्नीं स्वप्नभासातें । मी ह्मणून स्फुरेना देहातें ।
लयसाक्षित्व में सर्वांपरतें । तें स्वयें निश्चय जाहला ॥ ७१ ॥
हे असो, स्वप्नामध्येही जे स्वप्नभास तो पाहतो त्यांच्याकडेही तो मीपणाने पाहत नाही. सर्व अनुभवांच्या पलीकडचे जे लयसाक्षित्व तेच तो स्वतः झालेला असतो. (५४७१)

सुप्तीमाजीं तों देताची विस्मृति । परी निश्चयें जाणतसे नेणिवेप्रती ।
समाधि घेतांही सुखानुभूति । अनुभविता मी न स्फुरे ॥ ७२ ॥
सुषुप्तीच्या अवस्थेत देहाचे विस्मरण होत असते. पण तो साधक मात्र त्या नेणिवेलाही निश्चयपूर्वक जाणतो. समाधी घेतल्यानंतरही तिच्यातील सुखानुभूती घेत असता त्याच्या ठिकाणी मीपण स्फुरत नाही. (५४७२)

असो भलतैसे व्यापार देहाचे । वर्तणे घडो शुभाशुभ कर्माचें ।
परी मी ह्मणून यया संघाचें । गुप्तही स्फुरण नसे ॥ ७३ ॥
हे असू द्या. देहाचे कोणतेही शुभ किंवा अशुभ प्रकारचे व्यापार होत असोत, परंतु या देहादी संघाबद्दल गुप्त स्वरूपाचे सुद्धा मीपणाचे स्फुरण ज्ञात्याच्या ठिकाणी होत नाही (५४७३)

मी ब्रह्मात्मा निश्चय सदृढ । वृत्तीनें खलून जाहला अतिदृढ ।
जैसा इतरांसी देहाचा मीपणा वाड । निश्चय बैसला बुद्धीसी ॥ ७४ ॥
मी ब्रह्मात्मा असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. तो वृत्तीचा खल झाल्यानंतर अधिकच दृढ झालेला असतो. ज्याप्रमाणे इतर लोकांना देहाचा मीपणा दृढ असतो तसा मी ब्रह्मात्मा' असा त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला असतो. (५४७४)

देहात्म निश्चयचि जयासी । तो कदा मी ह्मणेना अन्यासी ।
तैसा ब्रह्मात्मनिश्चय जया ज्ञात्यासी । तो देहादिकां मी ह्मणेना ॥ ७५ ॥
देहात्मबुद्धीचा निश्चय ज्याला होतो, तो केव्हाही दुसऱ्या कुणाला 'मी' असे म्हणत नाही. त्याप्रमाणे ज्या ज्ञात्याचा ब्रह्मात्मबुद्धीचा निश्चय झालेला असतो तो देह इ.ना कधीही 'मी' म्हणणार नाही. (५४७५)

ऐशिये देहात्मबुद्धीचे परी । ब्रह्मात्मबुद्धि जाहली खरी ।
भलतैसेही देहाचे व्यापारीं । देहात्मबुद्धि नव्हे ॥ ७६ ॥
अशा रीतीने देहात्मबुद्धीसारखी ब्रह्मात्मबुद्धी खरोखर झाल्यावर देहाच्या कोणत्याही प्रकारच्या व्यापारात देहात्मबुद्धी स्फुरणार नाही. (५४७६)

ऐशी दृढता जे होणें तत्त्वतां । हेचि साफल्यता गा रविदत्ता ।
यथार्थचि जाहली कृतकृत्यता । प्राप्य तें प्राप्त जाहलें ॥ ७७ ॥
अरे रविदत्ता, खऱ्या अर्थाने ब्रह्मात्मबुद्धी दृढ झाली तर ती सफलता होय. तीच खरी कृतार्थता होय. जे प्राप्त करायचे तेच प्राप्त झाले, असे म्हणता येईल. (५४७७)

जाहली साधनाची पराकाष्ठा । कांही उरली नाही कृतीची क्लिष्टा ।
चरमस्थिति प्राप्त जाहली स्पष्टा । जे भूतभविष्यज्ञात्याची ॥ ७८ ॥
आता साधनांची पराकाष्ठा झाली; कोणतीही क्लिष्ट कृती उरली नाही; तो भूतकाळ, भविष्यकाळ यांचा ज्ञाता बनतो. हीच त्याची चरमस्थिती (टोकाची स्थिती) आहे, हे स्पष्ट आहे. (५४७८)

नव्हतें तें जन्ममरण चुकलें । लटिके बंधनपाश गळाले ।
भवभय मृगजळवत् तें आटलें । धोका स्थाणुपुरुष मेला ॥ ७९ ॥
जे मुळातच नव्हते ते जन्ममरण आता टळले, खोटे बंधनपाश गळून पडले, संसाराचे भय मृगजळाप्रमाणे ठरून आटून गेले, धोकादायक असा, खांबाच्या जागी भासणारा पुरुष मरण पावला; (५४७९)

अजन्माचा चुकला जन्म । अमराचा मरोनि गेला यम ।
निष्कर्माचे तुटलें कर्म । संचित क्रियमाण प्रारब्ध ॥ ८० ॥
जो मुळात जन्मरहित होता त्याचा जन्म आता टळला. जो अमर होता त्याला मरण देणारा यमच आता मरून गेला. जो मुळात निष्कर्म होता त्याची संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ही कर्मे संपुष्टात आली. (५४८०)

अज्ञान मायारूप भुली । खपुष्पवत् ते जीवें मेली ।
तिची संतति तेही निमाली । विद्या अविद्यारूप ॥ ८१ ॥
अज्ञान हे मायेप्रमाणेच एक भुरळ आहे. तीसुद्धा रवपुष्पाप्रमाणे (आकाशाला आलेल्या फुलाप्रमाणे) जिवानिशी मेली. त्या मायेची विद्या आणि अविद्या यांच्या रूपाने असलेली संततीही नष्ट झाली. (५४८१)

जीवशिव प्रतिभास ते हारपलें । की प्रतिबिंब मुख्यात्मत्वीं मीनलें ।
सर्व सृष्टीचे कर्ते भोक्ते मेले । आतां उत्पत्ति स्थिति कैंची ॥ ८२ ॥
जीव आणि शिव हे प्रतिभास हरपले, किंवा ही प्रतिबिंबे मुख्यात्म्यामध्ये मिळून गेली. सर्व सृष्टीचे कर्ते आणि भोक्ते तेच नष्ट झाल्यानंतर आता उत्पत्ती, स्थिती कशाची? (५४८२)

असंगासी केलें असंग । अभंगासी केले अभंग ।
अरोगियाचा गेला रोग । ज्ञानमात्रा मीनतां ॥ ८३ ॥
जो असंग होता त्याला असंग केले, अभंगाला अभंग केले, जो निरोगी होता त्याचा रोग घालविला. हे सर्व फक्त ज्ञानरूपी मात्रा प्राप्त होताच घडले. (५४८३)

अज्ञानतमी आत्मा सूर्य । पडिला होता द्वैतीं अद्वय ।
त्याचे निज प्रकाशाचा दाऊनि प्रत्यय । काढिला पावे स्वस्थळा ॥ ८४ ॥
अज्ञानरूपी अंधकारात आत्मारूपी सूर्य पडला होता. तो अद्वय असूनही द्वैतात पडला होता. त्या आत्मारूपी सूर्याला त्याच्या स्वतःच्या प्रकाशाचा अनुभव प्राप्त करून देऊन त्या द्वैतरूपी अज्ञानातून बाहेर काढला. त्यामुळे तो स्वस्थळी गेला. (त्याला त्याचे पूर्वरूप प्राप्त झाले.) (५४८४)

ऐशी कृतकृत्यता खरी जाहली । पावावयाची ते स्थिति लाधली ।
वरुती देहाची क्रीडा ते असे बोलिली । जीवन्मुक्तदशा ॥ ८५ ॥
अशी जी स्थिती प्राप्त करावयाची होती ती प्राप्त झाली आणि खरी कृतकृत्यता झाली. आता यापुढे जी देहाची क्रीडा होत राहील, तिला जीवन्मुक्तदशा असे म्हटले आहे. (५४८५)

तयाचा देह वर्तो भलतैसा । अमुक करणे हा विधि नसे सहसा ।
अमक न करणे हा निषेध आभासा । नसे तयाप्रती ॥ ८६ ॥
त्या साधकाचा देह कसेही वर्तन करो, त्याने अमुकच करावे असा नियम नाही, अमुक करू नये असा निषेधही त्याला लागू नाही. कारण तो देहरूपाने आभासच क्रीडा करत असतो. (५४८६)

तो करीत तोचि विधि त्याचा । न करील तोचि निषेध साचा ।
तयासी नेम करील ऐसा वेदाचा । बडिवार नसे ॥ ८७ ॥
तो जे करील तोच त्याचा विधी होय. तो जे करणार नाही, तोच त्याचा निषेध होय. त्याला नियम घालून देईल एवढे सामर्थ्य वेदांचे देखील नाही. (५४८७)

तो नियम कवणासी असेना । प्रेरकाचाही प्रेर्य होईना ।
बहत कासयासी हो वल्गना । काळासीही न गवसे ॥ ८८ ॥
तो कोणाच्याही नियमाचा विषय होऊ शकत नाही (कोणीही त्याला नियमात बसवू शकत नाही). प्रेरक जो ईश्वर त्याच्या प्रेरणेची त्याला गरज भासत नाही.जास्त काय बडबड करावी, तो काळाच्याही तावडीत सापडत नाही. (५४८८)

ब्रह्मात्मया कोठे असे काळ । तोरि काळाचाही महाकाळ ।
तथापि देहाचा अंत जो होणे बरळ । तो प्रारब्ध क्षयीं होईल ॥ ८९ ॥
ब्रह्मात्म्याला काळ कुठून असणार? तो तर काळाचाही महाकाळ आहे. तरीसुद्धा त्याचा जो भ्रामक देह असतो, त्याचा अंत त्याच्या प्रारब्धाचा क्षय होताच होईल. (५४८९)

पद : यदातदायं म्रियतां ॥ १८ ॥
चरणार्थ : तो देह जेव्हा केव्हा मृत्यू पावणार असेल तेव्हा पावो; ॥१८॥

ज्या क्षणी प्रारब्धकर्म बिघडे । त्या क्षणीं देहाचे पडे महें ।
तेव्हां हा मरेना कां सांकडें । असे ब्रह्मात्मया केवीं ॥ ९० ॥
ज्या क्षणी त्याचे प्रारब्ध संपेल त्या क्षणी त्याचा देह प्रेत होऊन पडेल. तो देह मरेना का! ब्रह्मात्म्याला त्याचे साकडे पडत नाही. (५४९०)

कल्पवरी कर्मवशें राहिला । की आजचि कर्म क्षयें मेला ।
तरी संबंध काय असे तयाला । जो निजांगे ब्रह्म ॥ ९१ ॥
तो कर्माच्या प्रभावामुळे कल्पवर राहिला काय किंवा कर्मक्षय झाल्यामुळे आजच मृत्यू पावला काय, तरी जो स्वतः ब्रह्म झालेला आहे त्याला त्या देहाशी काय संबंध उरतो? (५४९१)

जैसें आकाशीचिये सूर्याप्रती । मृगजल आटलें की आली भरती ।
हा संबंध नसे येणेंचि रीतीं । देहादिक ब्रह्मात्मया ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणे आकाशातील सूर्याला मृगजळ आटून गेले काय किंवा त्याचा भरती आली काय, सारखेच! याच रीतीचा ब्रह्मात्मा आणि देहादी संघात यांचा संबंध असाच नव्हे काय? (५४९२)

पाहिजे तेव्हां कर्म हे सरो । पाहिजे तेव्हां प्राणवियोगें मरो ।
अथवा चिरकाळ कर्माधारें वावरो । शेवटी महाकल्पी जळो ॥ ९३ ॥
त्याचे कर्म पाहिजे तेव्हा सरो, त्यावेळी प्राणांची ताटातूट झाल्यामुळे तो मरो, किंवा कर्माच्या बळावर दीर्घ काळपर्यंत वावरो, आणि महाकल्पाच्या शेवटी जळून जावो (५४९३)

परी ब्रह्मात्मा जो निजांगें । अनिर्वाच्या संचला अभंगें ।
तयासी ही न स्पर्शती सोंगें । जे अज्ञानजनित ॥ ९४ ॥
परंतु जो स्वतः ब्रह्मात्मा झालेला आहे, जो अभंग असून अनिर्वाच्य होऊन राहिला आहे, त्याला ही सर्व अज्ञानातून निर्माण झालेली सोंगे स्पर्श करत नाहीत. (५४९४)

देह हा केवळ प्रारब्धाधीन । कर्म तोवरी होय वर्तन ।
कर्म सरतांचि पावेल मरण । असा मरे तेव्हां मरो ॥ ९५ ॥
देह हा केवळ प्रारब्धाधीन आहे, जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत त्याचे व्यापार होत राहतील, ते कर्म सरताच तो मरेल तेव्हा मरो (५४९५)

कर्म पाहतां त्रिधा प्रकारे । त्यांत ज्ञान जाहलिया द्वय वोसरे ।
तिजें प्रारब्ध देहासी उरे । तेंही सरे भोगोनी ॥ ९६ ॥
कर्म हे तीन प्रकारचे आहे. संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. ज्ञान झाल्यानंतर त्यातील दोन प्रकार म्हणजे संचित किंवा क्रियमाण ही कर्मे गळून पडतात. तिसरे प्रारब्ध कर्म देहाला लागू असते. तेही भोगल्यानंतर शेवटी संपून जाते. (५४९६)

अपरोक्ष ज्ञान जेधवां जाहलें । तेधवांचि संचित निपटून जळालें ।
जैसें जागे होतांचि स्वप्न मावळलें । भासलें जें शुभाशुभ ॥ ९७ ॥
जेव्हा अपरोक्ष ज्ञान होते तेव्हाच संचित कर्म संपूर्णपणे जळून जाते. ज्याप्रमाणे जागृती होताच आभासरूप शुभ अथवा अशुभ अशी स्वप्ने मावळतात. (५४९७)

कर्तेपणा जरी उद्भवेना । तरी व्यर्थत्व येतसे क्रियमाणा ।
तथापि घडे जें शुभाशुभ नाना । त्याचे विभागी केले ॥ ९८ ॥
कर्मे करताना जर कर्तेपणाची भावना निर्माण झाली नाही तर क्रियमाण कर्मही व्यर्थ होते. तरीसुद्धा त्या पुरुषाच्या हातून जी निरनिराळी शुभ-अशुभ कर्मे घडतात त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे होते. (५४९८)

ज्ञातयानें जें शुभाशुभ करावें । प्रारब्धानुकारें बळें घडावें ।
त्याचे अकर्तेपणे संचित नव्हे । तें भोगा या दोघांच्या ॥ ९९ ॥
पूर्वप्रारब्धाच्या बळजबजरीने ज्ञात्याच्या हातून जी शुभ अथवा अशुभ कर्मे होतात, ती कर्मे त्याच्या अकर्तेपणामुळे संचित कर्मामध्ये जमा न होता, दोघेजण त्यांच्या भोगाचे वाटेकरी होतात. (५४९९)

ज्ञात्यासी निंदिती गांजिती । व्यर्थ दुराग्रहें हेळसिती ।
ते पापाचे वांटेकरी होती । ज्ञाता अकर्ता अलेप ॥ ५५०० ॥
जे लोक ज्ञानी माणसाची निंदा करतात, त्यांना छळतात, व्यर्थ दुराग्रहाने त्यांचा तिरस्कार करतात, ते ज्ञानी माणसाकडून झालेल्या पापाचे वाटेकरी होतात. आणि स्वतः ज्ञाता मात्र अकर्ता ठरतो, निर्लेप ठरतो. (५५००)

जे स्तविती पूजिती एकभावें । सदा प्रवर्तले असती सेवे ।
तयांसी ज्ञात्याचे पुण्य जें आघवें । प्राप्त होतसे ॥ १ ॥
याउलट जे त्या ज्ञानी माणसाची स्तुती करतात, त्याची एकभावाने पूजा करतात, त्यांच्या सेवेसाठी नेहमी प्रवृत्त होतात, त्यांना ज्ञात्याच्या हातून घडलेले सर्व पुण्य प्राप्त होते. (५५०१)

ऐसा श्रुतीने नेमचि केला । विभागी ज्ञात्याचे पापपुण्याला ।
संबंध नाही ज्ञातयाला । क्रियमाणाचा ॥ २ ॥
श्रुतीने असा नियमच केला आहे. ती ज्ञानी माणसाच्या हातून घडलेल्या पापपुण्यांची विभागणी करते. ज्ञानी माणसाच्या हातून घडणाऱ्या क्रियमाण कर्मांचा त्याच्याशी काही संबंध येत नाही. (५५०२)

एवं संचित क्रियमाण दोनी । ज्ञातयाचे गेले निपटूनी ।
प्रारब्धमात्र तयालागनी । भोगार्थ उरले ॥ ३ ॥
अशा प्रकारे ज्ञानी माणसाची संचित आणि क्रियमाण अशी दोन्ही कर्मे मुळासह नष्ट झाली. प्रारब्ध कर्म मात्र त्याच्या भोगण्यासाठी उरले. (५५०३)

तेंही अज्ञानजनाचे बोधास्तव । उरलेंसे श्रुति सांगे गौरव ।
की अरे मूर्ख हो ज्ञात्याचे वर्तणें जें अपूर्व । शेष प्रारब्धामुळे ॥ ४ ॥
हे जे प्रारब्ध उरलेले असते ते अज्ञानी जनांना ज्ञान देण्यासाठीच. त्यासाठीच ज्ञानी माणसाला प्रारब्धभोग दिलेला आहे, असे श्रुती मोठ्या गौरवाने सांगत आहे. वास्तविक पहाता ज्ञानी माणसाला कोणत्याही कर्माचे बंधन नसते. पण हा प्रारब्धाचा शेष ठेवला आहे तो केवळ अज्ञानी लोकांना मार्ग दाखवण्यासाठीच होय. त्यामुळे ज्ञात्याचे जे अपूर्व अलौकिक वागणे असते ते त्या शेष (शिल्लक) राहिलेल्या प्रारब्धामुळेच होते. (५५०४)

येन्हवी ज्ञाता तो नव्हे देहादिक । तो केवळ निजांगें ब्रह्म एक ।
तेथे प्रारब्धाचा कैंचा कुतर्क । स्थापावया अन्यासी ॥ ५ ॥
एरव्ही ज्ञानी माणूस देहादी संघातामध्ये कोणी नसतो. तो केवळ स्वतः ब्रह्म झालेला असतो. तेथे प्रारब्धाविषयीचा कुतर्क कसा लागू होईल? तो प्रारब्धभोग केवळ इतर लोकांना मार्गावर आणण्यासाठीच असतो. (५५०५)

तया ज्ञातयासी श्रुति सांगे । अशेष कर्मा नाश जाला वेगें ।
बहुवचनें त्रिविधाही प्रसंगें । भस्मोनी गेलें ॥ ६ ॥
त्या ज्ञात्याबद्दल श्रुती सांगते की, त्या ज्ञात्याची सर्व कर्मे जळून गेली आहे. श्रुतिवचनात सर्व कर्माणि असा बहुवचनी प्रयोग आहे. त्याअर्थी तीनही कर्मे जळून भस्म झाली असा श्रुतीचा अभिप्राय आहे. (५५०६)

देह मात्र उरला असे ह्मणोनी । प्रारब्धास्तव बोलिलें वचनीं ।
हेही मुमुक्षूच भाग्य उदेलें गगनीं । उपदेशास्तव उरले ॥ ७ ॥
पण त्याचा देह फक्त उरलेला असतो म्हणून तो प्रारब्ध भोगण्यासाठीच उरला आहे, असे म्हटले आहे. खरे तर ज्ञानी पुरुष उपदेशासाठीच देहाच्या रूपाने उरला हे मुमुक्षूचे भाग्यच म्हणावे लागेल. (५५०७)

जरी सुखदुःखें देहा घडती । तरी काय उणीवता ज्ञानाप्रती ।
आ–आप भोग देऊन मावळती । तरी बाध काय उरतां ॥ ८ ॥
आता देहामुळे ज्ञात्याला सुखदुःखे भोगावी लागतात. पण ज्ञात्याला त्यामुळे काय फरक पडतो? त्याला काहीही उणे पडत नाही. सुखदुःखे येतात आणि भोग देऊन आपोआप मावळतात. मग बाधा कसली? (५५०८)

प्रारब्धं देहासी भोग द्यावे । ज्ञानासी नासावया सामर्थ्य नव्हे ।
मिथ्या बाहणें तेंही न नासावें । तरी ज्ञान विरोधी नसे ॥ ९ ॥
प्रारब्धकर्मे फक्त ज्ञात्यास भोग देण्यासाठीच असतात. पण त्याचे ज्ञान ती नष्ट करू शकत नाहीत. जे मिथ्या आहे (म्ह. देह) त्याचाही नाश प्रारब्धास करता येत नाही. मग ते ज्ञानाचा नाश कसा करू शकेल? म्हणून प्रारब्ध कर्मे ज्ञानास विरोधी नाहीत. (५५०९)

ज्ञानही प्रारब्धकर्मासी । विरोधी असेना स्वभावेंसी ।
म्हणोनि प्रारब्धातें न नाशी । तस्मात् भोगून सरे ॥ १० ॥
बरे, ज्ञान देखील प्रारब्ध कर्माच्या विरुद्ध नाही. म्हणून ते प्रारब्धकर्मांचा नाश करू शकत नाही. म्हणून प्रारब्ध कर्मांचा नाश भोगूनच होतो. (५५१०)

ऐसे परस्परें अविरोध दोहींचा । यापरी निश्चय असे ज्ञातयाचा ।
म्हणोनि घात करिती ना प्रारब्धाचा । भूतभाविज्ञाते ॥ ११ ॥
अशा प्रकारे ज्ञान आणि प्रारब्ध ही एकमेकांच्या विरोधी नाहीत. असे ज्ञानी लोक निश्चयपूर्वक मानतात. म्हणून ते भूत, भविष्य जाणणारे असूनही प्रारब्धाचा नाश करत नाहीत. (५५११)

आणि भोगिल्याविणही न सरे । ऐसें जाणोनियां विचारें ।
उगे वर्तती प्रारब्धानकारें । आग्रह त्यागूनी ॥ १२ ॥
आणि प्रारब्धकर्मे भोगल्यावाचून नष्ट होणार नाहीत. हे विचाराने जाणून ते ज्ञानी महात्मे आग्रह सोडून प्रारब्धानुसार उगे राहून वर्तन करतात. (५५१२)

ऐसें असतां कोणी अविचारी । प्रारब्ध नासावें इच्छी अंतरीं ।
तरी काय तो शाहणा जाहला त्यावरी । मागील काय सर्व वेडे ॥ १३ ॥
असे असताना कोणी अविचारी माणूस प्रारब्ध नष्ट व्हावे अशी मनामध्ये इच्छा बाळगील तर तो त्यामुळे शहाणा ठरेल काय? आणि मागे होऊन गेलेले ते सर्वजण काय वेडे होते? (५५१३)

तस्मात् साधके आग्रह त्यागूनी । प्रारब्धे वर्तावें सुखें जनीं ।
सर्व सरतांचि देह पावे मरणीं । तेव्हां विदेह कैवल्या मिळे ॥ १४ ॥
त्यामुळे साधकाने आग्रह सोडून द्यावा, आणि प्रारब्धानुसार लोकांत वर्तन करावे. सर्व प्रारब्ध संपताच देह मरण पावतो आणि ज्ञात्याला विदेह कैवल्याची प्राप्ती होते. (५५१४)

ह्मणसी प्रारब्धाचे प्रकार तीन । इच्छितां न इच्छितां परापेक्षेकडन ।
भोग घडती त्यांत अबाधक दोन । परी इच्छून भोगणें बाधक ॥ १५ ॥
तू असे म्हणशील की, प्रारब्ध तीन प्रकारचे असते. इच्छा करून आलेले, इच्छा न करता आलेले आणि दुसऱ्या व्यक्तीने इच्छा केल्याने आलेले. आता जे भोग घडतील त्यामध्ये शेवटची दोन अबाधक असतात आणि पहिल्या प्रकारचे इच्छा करून आलेले भोगणे मात्र बाधक असते. (५५१५)

तरी याचे उत्तर अवधारावें । इच्छून भोगी तरी बाधक नव्हे ।
काय सत्यत्वें स्थापिल भोग्य आघवें । कीं भोक्ता खरा जाहला ॥ १६ ॥
तर या शंकेचे उत्तर ऐकावे. इच्छा करून प्रारब्ध वाट्याला आले तरीही ते बाधक ठरत नाही. कारण भोगणारा आणि भोग्य या दोहोंपैकी सत्य म्हणून कोणाची स्थापना करणार? सर्व भोग्य विषय की भोक्ता यापैकी कोण खरे आहे? (अर्थात कोणीही नाही) (५५१६)

जरी मिथ्यासी सत्यत्व स्थापिलें । अथवा भोक्तेपण सत्यत्वें उद्भवलें ।
तरी मग जाणावें बाधक जाहलें । इच्छारूपही कर्म ॥ १७ ॥
जर मिथ्या गोष्टीला सत्य ठरविले, अथवा भोक्तेपणा सत्य म्हणून उद्भवले तर मग इच्छारूप कर्मही बाधक ठरेल, असे समजावे (५५१७)

चिदचिद् ग्रंथि जेधवां तुटली । तेधवांचि भोक्तेपणाची मुळी खांदिली ।
आणि सर्वांसी मिथ्यता सदृढ जाहली । सत्यता कल्पांतीं न ये ॥ १८ ॥
जेव्हा चित् आणि अचित् यांची गाठ तुटते तेव्हा भोक्तेपणाच समूळ नाहीसा होतो. आणि सर्व भोग्य पदार्थांची मिथ्यता दृढ होते. त्यांना कल्पान्तापर्यंतसुद्धा सत्यता येणार नाही. (५५१८)

भोक्ता ठाईंचि उद्भवेना । सत्यता भोग्यासी संभवेना ।
तरी मग कोटि इच्छा कां करीना । ते इच्छाचि नव्हे ॥ १९ ॥
भोक्ता मुळातच उत्पन्न झालेला नसतो, भोग्य पदार्थांना सत्यता संभवत नाही. तेव्हा कोणी कोट्यवधी इच्छा केल्या तरी त्या इच्छाही सत्य ठरत नाहीत. (५५१९)

असो इच्छितां कीं न इच्छितां । अथवा भोग घडती परापेक्षता ।
ते सुखें घडोत देहासी आतां । ज्ञातया संबंध नाहीं ॥ २० ॥
असो, इच्छा करून अथवा इच्छा न करता, अथवा परक्याच्या इच्छेनुसार भोग घडले तरी ते खुशाल घडू देत. ज्ञात्याचा आता देहाशी काहीच संबंध उरलेला नसतो. (५५२०)

ऐसें कर्मेकडून देह वर्तत । तरी सुखें वर्तो कल्पपर्यंत ।
अथवा आजचि कर्मांचा होऊन घात । मरण पावो ॥ २१ ॥
अशा प्रकारे कर्मामुळे जर देहाचे वर्तन चालत असते, तर ते कल्पान्तापर्यंत सुखाने चालू देत, किंवा आजच कर्माचा घात होऊन तो मरण पावो; (५५२१)

तो मृत्युही होवो भलते स्थळीं । सक्षेत्री की कुग्रामीं लेंड वोहळीं ।
येकट किंवा बहु स्वजनमंडळीं । दिवा किंवा रात्रीं ॥ २२ ॥
तो मृत्यूदेखील कोणत्याही ठिकाणी चांगल्या क्षेत्रात, वाईट गावात, लेंडी ओहळात, एकटा असताना किंवा सभोवती नातेवाईकांची गर्दी असताना, दिवसा अथवा रात्री कधीही होवो; (५५२२)

देह हा काश्यादि क्षेत्रीं पडावा । उत्तरायणी शुक्ल पक्ष दिन असावा ।
स्मरण करीत समुदायांत मरावा । हे अज्ञानाचे मत ॥ २३ ॥
हा देह काशी इ. तीर्थक्षेत्रात पडावा, उत्तरायणातील शुक्लपक्षात दिवसा तो पडावा, स्मरण करत असताना तो पडावा, भोवताली समुदाय असताना तो पडावा हे अज्ञानी माणसाचे मत झाले. (५५२३)

पहा पहा जन कैसे आंधळे । ह्मणती पिंडासी जरी शिवले काउळे ।
तरीच तो उत्तम गतीसी मिळे । नातरी अधमगति ॥ २४ ॥
लोक तरी किती आंधळे असतात पहा. ते म्हणतात, पिंडाला कावळे शिवले तरच त्या गेलेल्या जीवाला सद्गती मिळते, नाहीतर त्याला अधमगती मिळते. (५५२४)

असो जनाचे अनुभव पाहतां । ज्ञात्यासी विरोधचि तत्त्वतां ।
आणि ग्रंथासी विस्तार बहुतां । प्रकारें जाहला ॥ २५ ॥
असो, सर्वसामान्य जनांचे अनुभव पाहता ज्ञानी माणसाच्या मताविरुद्धच ते असतात आणि आता ग्रंथाचा विस्तारही खूप होत आहे; (५५२५)

म्हणोनि अन्य काही नुच्चारितां । ज्ञात्याचा अनुभव जो तत्त्वतां ।
बोलावा साधका संशयाचि वार्ता । नुरावी यास्तव ॥ २६ ॥
म्हणून अधिक काही न बोलता, साधकाच्या मनात संशय अजिबात राहू नये यासाठी ज्ञात्याचा जो खरा अनुभव आहे तेवढाच सांगतो. (५५२६)

जयासी स्वर्गाप्रती जाणे । उत्तरायण दिन शुक्लपक्ष अपेक्षावें तेणें ।
ज्ञाता स्वरूपी स्वरूप तरी होणें । इत्यादी कासया ॥ २७ ॥
ज्याला स्वर्गात जायची इच्छा असेल त्याने उत्तरायण, दिवस असताना, शुक्लपक्ष इत्यादींची अपेक्षा करावी. पण ज्ञात्याला स्वरूपात स्वतःचे रूप मिळून जावे एवढीच अपेक्षा असताना या बाकीच्या गोष्टींची काय गरज आहे? (५५२७)

उपासक सालोक्यादि इच्छिती । म्हणोनि अंती देवासी स्मरती ।
हा निजांगे देवाचा देव तरी अंतीं । कवणा स्मरावें ॥ २८ ॥
भक्त उपासक सलोकता इ. मोक्षप्रकारांची इच्छा धरतात, म्हणून अंतकाळी देवाचे स्मरण करतात; ज्ञानी माणूस हा स्वतःच देवांचाही देव झालेला असतो, त्याने कोणाचे स्मरण करावे? (५५२८)

सत्यलोकादि वास इच्छूनी । योगी जाती ब्रह्मरंध्र भेदोनी ।
पूर्ण ब्रह्म निजांगें ज्ञानी । तरी प्राण उत्कामतीना ॥ २९ ॥
सत्यलोकाची आशा धरून योगी ब्रह्मरंध्र भेदून देहत्याग करतात. ज्ञानी माणूस स्वतःच पूर्णब्रह्म झालेला असतो, तर ब्रह्मारंध्राचा भेद न केल्यामुळे त्याचे प्राण जाणार नाहीत काय? (५५२९)

आणीक जनाच्या नाना कल्पना । काश्यादि क्षेत्री पावावें मरणा ।
इत्यादि नलगे वाउग्या वल्गना । अज्ञानाच्या ज्ञानियां ॥ ३० ॥
अशा रीतीने निरनिराळ्या लोकांच्या निरनिराळ्या कल्पना असतात. काशी इ. क्षेत्रामध्ये मरण यावे इत्यादी. या अज्ञानी लोकांची व्यर्थ बडबड ज्ञानी लोकांच्या कामाची नाही. (५५३०)

ज्ञात्याचा देह भलतेही देशीं । भलत्या निमित्तें भलते समयासी ।
पडो प्रारब्धाची गति जैशी । परी ते निश्चयेंसी मुक्त ॥ ३१ ॥
ज्ञानी माणसांचा देह कोणत्याही देशात, कोणत्याही कारणाने, कोणत्याही काळी त्याच्या प्रारब्धाच्या गतीनुसार पडो, परंतु तो निश्चितपणे मुक्त होतोच. (५५३१)

असो मृत्यु तयाचा भलतैसा । परी वर्तणुकीचा प्रकार असे जैसा ।
शुभ की अशुभ वर्ततां सहसा । विकल्प न करावा कोणें ॥ ३२ ॥
त्याचा मृत्यू कसाही होवो, तो मुक्तच असतो. तसेच त्याची वर्तणूक कशाही प्रकारची असो, शुभ असो किंवा अशुभ असो, त्याच्याबद्दल कोणीही विकल्प मनात आणू नये. (५५३२)

पद : मुक्तो नास्त्यत्र संशयः ॥ १८ ॥
पदार्थ : ज्ञाता मुक्तच असतो. याबद्दल संशय नाही. ॥१८॥

तयाचा सदाचार की दुराचार । पाहों नये भलतैसा विहार ।
तो मुक्त येविशी संशय अणुमात्र । नसावा सहसा ॥ ३३ ॥
त्याचा सदाचार (चांगली वर्तणूक) अथवा दुराचार (वाईट वर्तणूक); अथवा त्याच्या वाटेल त्याप्रकारची लीला यांच्याकडे पाहू नये. तो मुक्तच आहे याविषयी कणभरदेखील संशय मनात ठेवू नये. (५५३३)

जयाचा ग्रंथिभेद खरा जाहला । अभ्यासें अभिन्नत्वीं समरसला ।
मीपण न स्फुरे भलते अवस्थेला । जयासी देह जाहला परोक्ष ॥ ३४ ॥
ज्याचा ग्रंथिभेद (चित् आणि अचित् यांच्याबद्दलचा निश्चय) खरा झालेला आहे, अभ्यासाने जो ब्रह्मात्म्याशी अभिन्नत्वाने एकरूप झाला आहे, ज्याच्या मनात कोणत्याही अवस्थेत मीपण स्फुरत नाही, आणि ज्याला स्वतःचा देहही परका झालेला आहे; (५५३४)

देहात्मबुद्धीचिये परी । ब्रह्मात्मबुद्धि जाहली खरी ।
तयाची क्रिया जरी यथेष्टाचारी । परी मुक्त निःसय ॥ ३५ ॥
ज्याच्या ठिकाणी देहात्मबुद्धीप्रमाणे खरी ब्रह्मात्मबुद्धी झाली आहे, त्याच्या कृती यथेष्ठ स्वैर आचरणाच्या वाटल्या तरी तो मुक्त असतो, हे निःसंशय. (५५३५)

यथेष्ठाचारी जरी तो वर्ते । परी नाचरे कदा प्रारब्धापरतें ।
अथवा सदाचरणही लोकरीतीतें । घडे प्रारब्धानुसार ॥ ३६ ॥
तो यथेष्ट आचरण करत असला तरी प्रारब्धाच्यापेक्षा निराळे आचरण केव्हाही करणार नाही, त्याचप्रमाणे त्याचे सदाचरणही प्रारब्धानुसारच लोकरीतीला धरून होत असते. (५५३६)

असो देह वर्तो भलतैसेपरी । सदाचरणीं की दुराचारी ।
परी तो मुक्त निःसंशयें अंतरीं । साधकें वोळखावा ॥ ३७ ॥
हे असो, त्याचा देह सदाचार अथवा दुराचार यापैकी कोणत्याही प्रकारचे वर्तन करत असो, परंतु तो निःसंशयपणे मुक्त असतो. हे साधकाने आपल्या मनात समजून असावे. (५५३७)

ज्ञानियासी संशय असेना । ते न पाहती कवणाचेही आचरणा ।
मग अभ्यासें पावला जो अभिन्न ज्ञाना । त्याचे आचरण केवीं पाहती ॥ ३८ ॥
ज्ञानी माणसाच्या मनात संशय नसतो. तो कोणाच्याही आचरणाकडे पाहत नाही; मग ज्याने अभ्यासाच्या योगाने अभिन्न ज्ञान प्राप्त करून घेतले आहे, त्याचे आचरण तो कशाला पाहील? (५५३८)

म्हणोनि साधकाप्रति सांगितलें । की देहात्मवत् ब्रह्मात्मत्व जाहलें ।
तयाचें वर्तणें अशुभ किंवा भलें । परी तो मुक्त निःसंशयें ॥ ३९ ॥
म्हणून येथे साधकासाठी असे सांगितले आहे की, ज्याच्या ठिकाणी देहात्मत्वाप्रमाणे ब्रह्मात्मत्व झाले आहे, त्याचे वर्तन अशुभ असो वा चांगले असो, परंतु तो निःसंशयपणे मुक्त असतो. (५५३९)

तयाचे आचरणावरूनी । उणीवता मानील साधक कोणी ।
तरी तयाचीच होईल हानि । दृढापरोक्षा न पावे ॥ ४० ॥
त्याच्या आचरणावरून जर कोणी साधक त्याला कमी समजत असेल तर त्याचेच नुकसान होईल. त्याला दृढ असे अपरोक्ष ज्ञान (साक्षात् दर्शन) होणार नाही (५५४०)

ह्मणोनि साधकासीच सांगितलें । की संशय न करावा ठाईं आपुले ।
जयांचे ग्रंथींचे भेदन खरें जाहलें । तेही मुक्त होती ॥ ४१ ॥
म्हणून साधकालाच असे सांगितले आहे की, आपल्या मनात संशय ठेवू नये. ज्यांचे खरे ग्रंथिभेदन झाले आहे (चिदचिद्ग्रंथिभेदन) तेही मुक्तच झालेले असतात (५५४१)

येर जे अज्ञानी सदा भ्रांत । देहात्मबुद्धीचे ठाईं रत ।
तयांप्रति बोलिलें तरी जात । व्यर्थचि अवघे ॥ ४२ ॥
बाकीचे जे लोक अज्ञानी असून नेहमी गोंधळलेले असतात, आणि नेहमी देहात्मबुद्धीमध्ये मग्न असतात, त्यांना वरीलप्रमाणे सत्य सांगितले, तरी ते सर्व वाया जाते. (५५४२)

ते तयाचे आचरणचि पाहती । शुभ तरी वाहवा वाहवा ह्मणती ।
अशुभ तरी उगें नाक मोडिती । परी न पाहती आपुली क्रिया ॥ ४३ ॥
असे अज्ञानी लोक त्याचे फक्त आचरणच पाहतात, ते चांगले असेल तर वाहवा वाहवा म्हणतील, अशुभ (वाईट) असेल तर नाके मुरडतील. परंतु स्वतःची कृती पहाणार नाहीत. (५५४३)

आपण तरी भलतैसें वर्तावें । परी अन्याप्रति नांव ठेवावें ।
शास्त्रसंपन्न जरी असावें । परंतु हेचि रीती सर्वांची ॥ ४४ ॥
आपण कसेही वागलो तरी चालते. पण दुसऱ्यांना मात्र नावे ठेवावीत. स्वतः शास्त्रसंपन्न विद्वान असला तरी त्याचीही हीच वृत्ती असते. सर्वांची हीच वागण्याची त-हा असते. (५५४४)

ऐसे जे भ्रांत अज्ञान लोक । तयांसी काय कळे अंतरविवेक ।
देहाचीच पाहती वर्तणूक । शुभ अथवा अशुभ ॥ ४५ ॥
असे जे भ्रांत, अज्ञानी लोक असतात त्यांना आंतर विवेक (आतला सूक्ष्म विचार) कसा कळणार? ते देहाचीच वरवरची चांगली अथवा वाईट वागणूक तेवढी पहाणार. (५५४५)

पूर्ण ज्ञात्याची निंदा करिती । साधक मुमुक्षूसी हेळसिती ।
ह्मणती पापी जन्मले भूमीवरुती । यांची गति काय नेणों ॥ ४६ ॥
पूर्ण ज्ञाता जो आहे त्याची ते निंदा करतात, साधक मुमुक्षू लोकांची हेटाळणी करतात. ते म्हणतात की, या भूमीवर ह्या साधक मुमुक्षूच्या रूपाने पापी लोक जन्माला आले आहेत. यांची पुढे काय गती होणार ते देव जाणे! (५५४६)

ऐसा द्रोहचि अंतःकरणा । गांजिती भलत्या करिती वल्गना ।
तरी तयाच्या वाणीसी की मना । कोणे अर्गळा घालावी ॥ ४७ ॥
असा ते आपल्या अंतःकरणात द्रोह बाळगतात, आणि त्या सत्प्रवृत्त लोकांचा छळ करतात. त्यांच्याबद्दल नाही नाही ते बोलतात. अशा लोकांच्या बोलण्याला अथवा मनाला कोण आगळ घालू शकेल? (आगळ = दाराला आतून लावण्याचा अडसर) (५५४७)

असो तयाप्रति काज काय । द्रोहें उत्तम गतीचा होय क्षय ।
परी साधकं असावें निःसंशय । की ज्ञाता मुक्त सर्वदा ॥ ४८ ॥
असो, आपल्याला त्यांच्याशी काय काम आहे? असा द्रोह केल्याने त्यांना मिळू शकणाऱ्या उत्तम गतीचा क्षय मात्र होईल. पण साधकाने मात्र संशयरहित होऊन मनाशी पक्की खूणगाठ बांधावी की, ज्ञानी माणूस सर्वकाळ मुक्तच असतो.(५५४८)

जैसा आकाशामाजी वृक्ष विरूढला । कोणी एक पुरुष त्यावरी बैसला ।
तो वृक्ष कवणे समूळ उपडिला । तो पडेल भूमीवरी ॥ ४९ ॥
ज्याप्रमाणे आकाशातच एक वृक्ष उगवला, एक माणूस त्याच्यावर बसला. आता तो माणूस भूमीवर पडेल म्हणून त्या शंकेने कोणी तो वृक्ष उपटून टाकील काय? (५५४९)

त्या वृक्षासीच भूमीपरती गति । नाहीं नाहीं बापा कल्पांती ।
मा तो पुरुष राहेल गगनीं निश्चिती । हें केवीं घडेल ॥ ५० ॥
आता त्या वृक्षालाच भूमीखेरीज पडायला दुसरे ठिकाण कल्पान्त झाला तरी भेटेल काय? मग तो पुरुष आकाशातच राहील, हे कसे घडेल? (५५५०)

हाचि दृष्टांत पहा विवरून । माया द्वैतरूपी शून्य गगन ।
कांही आधार नसतां देहवृक्ष विस्तीर्ण । वाढला अफाट ॥ ५१ ॥
हाच दृष्टान्त विवरणपूर्वक पहा. द्वैतरूपी माया म्हणजे शून्य आकाश होय. त्यामध्ये काही आधार नसलेला देहरूपी वृक्ष अफाट वाढला. (५५५१)

अज्ञानाचे आळं केलें । त्यांत कल्पनेचे जळ भरिलें ।
कर्मवासनेचे बीज पेरिलें । तेव्हां देहवृक्ष सरसावला ॥ ५२ ॥
त्याच्याभोवती अज्ञानाचे आळे केले. त्यात कल्पनेचे पाणी भरले आणि नंतर कर्मवासनारूपी बी पेरले. तेव्हा त्यातून देहरूपी वृक्ष जोमाने वाढला. (५५५२)

तया वृक्षाची परिपक्कता । हेचि उद्भवली खरी मुमुक्षुता ।
सद्गुरु सच्छास्त्र तया मीनतां । आयुष्य त्याचे तारलें ॥ ५३ ॥
त्या वृक्षाची परिपक्वता म्हणजे त्याच्या ठिकाणी सद्गुरू आणि सच्छास्त्र यांची जोड मिळून मुमुक्षत्व निर्माण झाले. या सर्वांचा मेळ जमल्याने त्या वृक्षाचे आयुष्य कृतार्थ झाले. (५५५३)

सद्गुरूने सच्छास्त्र कुठारी घेऊन । याचे मुमुक्षतेचा दांडा बैसवून ।
विवेचन घाव घातिला योजन । तेणें देहवृक्ष उन्मळला ॥ ५४ ॥
सद्गुरूंनी सच्छास्त्र (खरे शास्त्र) रूपी कु-हाड घेऊन तिला त्याच्या मुमुक्षुतेचा दांडा बसवून विवेचनरूप घाव अगदी योजनापूर्वक घातला. त्यायोगाने तो देहरूपी वृक्ष उन्मळून खाली पडला. (५५५४)

अज्ञान आळे निःशेष फोडिलें । वासना समूळबीज उपडिलें ।
मीपणाचें जुंबाडें होतें गुंतलें । तें खांदिलें अभ्यासें ॥ ५५ ॥
त्यामुळे अज्ञानाचे आळे संपूर्णपणे नष्ट झाले. वासनेचे बीज समूळ उखडून काढले. तेथे मीपणाचा गुंता (जुवाडे-फांद्या व मुळ्या यांचा गुंता) वाढला होता, तो अभ्यासाच्या साहाय्याने खांदून काढला. (५५५५)

ऐसा देहवृक्ष निराधार जाहला । तो मायागगनीं न राहे स्थिरावला ।
वरी जीवरूपें हा पुरुष बैसला । तरी तो द्वैती राहे केवीं ॥ ५६ ॥
असा देहवृक्ष निराधार झाला. तो मग मायारूपी आकाशात स्थिर राहीना. त्यात भर म्हणून त्यावर जीवरूपी पुरुष बसला होता. तो त्या द्वैतात स्थिर कसा राहील? (५५५६)

ब्रह्मात्मा हे निजकैवल्य भूमी । येथेंचि येऊन पडेल अनुक्रमीं ।
ह्मणिजे देहाची क्रीडा ते संभ्रमीं । खरी जीवन्मुक्तदशा ॥ ५७ ॥
ब्रह्मात्मा ही आपली जी कैवल्यभूमी (मोक्ष सिद्धीचे स्थान) तो पुरुष साहजिकच त्या ब्रह्मात्म्यातच पडून मिळून जाणार. म्हणजे त्या देहाच्या तदनंतरच्या क्रिया म्हणजे त्याची जीवन्मुक्त दशा होय. (५५५७)

ऐसा देहवृक्ष कैवल्यातें पावला । तरी केवीं गति होय अन्य जीवाला ।
अभिन्नज्ञानें स्वरूपी समरसला । हेचि कैवल्यमुक्ति ॥ ५८ ॥
अशा रीतीने देहवृक्षाला कैवल्याची प्राप्ती झाली. मग त्याच्यावर बसलेला जो जीवरूपी पुरुष त्याला अन्य गती कशी प्राप्त होईल? (त्यालाही कैवल्यच प्राप्त होणार) तो अभिन्न ज्ञानयुक्त होऊन कैवल्यामध्ये समरसून गेला. हीच त्याची कैवल्यमुक्ती होय. (५५५८)

जैसा वृक्षासहित पुरुष भूमीवरी । तुटून पडे न स्थिरे अंबरीं ।
तैसा ज्ञाता अभिन्न भक्तिभूमीवरी । सदेह जीवपुरुष ॥ ५९ ॥
ज्याप्रमाणे वृक्षासहित पुरुष आकाशात स्थिर न राहता जमिनीवर कोसळून पडतो, त्याप्रमाणे ज्ञाता अभेदरूपी भक्तिभूमीवर देहरूपी वृक्षाबरोबरच जीवरूपी पुरुषाप्रमाणे पडतो. (५५५९)

वृक्ष तुटोनि भूमीवरी न पडे । ऐसा संशय नुद्भवेचि कोडें ।
तैसाचि नसावा जयासी जोडे । अभिन्न ज्ञान ॥ ६० ॥
वृक्ष तुटल्यानंतर भूमीवर पडत नाही, असा संशयसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे ज्याला अभिन्न ज्ञान प्राप्त होते त्याच्याबाबतीतही नसावा. त्याला अभेदभक्तीच प्राप्त होते. (५५६०)

येथे संशय सहसा न करावा । ज्ञाने मुक्त जाहला असे बरवा ।
देहाचा आचार असेना स्वभावा । प्रारब्धानुकारें ॥ ६१ ॥
तो ज्ञानाने मुक्त झालेला असतो. याबाबतीत संशय धरू नये. प्रारब्धानुसार त्याचा देह व्यापार करत असला म्हणून काय झाले? (५५६१)

देहात्मबुद्धीचिये समान । ब्रह्मात्मबुद्धि दृढ जाहली पूर्ण ।
हेचि बापा दृढ अपरोक्षज्ञान । निःसंशयें जाहलें ॥ ६२ ॥
देहबुद्धीप्रमाणेच आत्मबुद्धी दृढ होणे हेच दृढ अपरोक्ष ज्ञान त्याला झालेले असते हे निःसंशय, (५५६२)

अगा रविदत्ता मंद की तीव्रतर । अभ्यासें की सूक्ष्म विचार ।
पावले जेव्हां अपरोक्ष निर्विकार । आतां भेद नुरे किंचित् ॥ ६३ ॥
अरे रविदत्ता, मंद अभ्यासाने, तीव्र अभ्यासाने किंवा सूक्ष्म विचाराने निर्विकार ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान झाल्यावर किंचितसुद्धा भेद उरत नाही. (५५६३)

हा पहिला अभिन्नतेसी पावला । दिसंदिसा त्या स्थितीसी आला ।
ऐसा भेद किमपि न जाय उरला । मुक्तस्थिती समान ॥ ६४ ॥
याला प्रथम अभिन्न स्थिती प्राप्त झाली, याने दिवसेंदिवस अभ्यास करून त्या स्थितीची प्राप्ती करून घेतली. असा या अभिन्न स्थितीमध्ये किंचितसुद्धा भेद रहात नाही. कारण मुक्तस्थिती ही सर्वांना समानच असते. (५५६४)

तस्मात् तुजशी विवेचन जाहलें । लयसाक्षित्व ज्ञानही ठसावलें ।
त्यावरी अभ्यासें खलणे निरोपिलें । आतां उठी करीं तैसें ॥ ६५ ॥
त्यामुळे आता तुला विवेचन करून सांगितलेले आहे. लयसाक्षित्वाचे ज्ञानही तुझ्या मनात ठसलेले आहे. त्यानंतर अभ्यासाच्या साहाय्याने वृत्तीचा खल कसा करावा हेही तुला सांगितलेले आहे. आता तू उठ आणि सांगितल्याप्रमाणे कर. (५५६५)

अवघी ही विश्वतैजसादिकांची । सांगितली निपटून गेलियाची ।
तोवरी अभ्यास करूनी अपरोक्षाची । दृढता संपादावी ॥ ६६ ॥
विश्व, तैजस इत्यादींचा समूळ नाश झाल्याच्या खुणा तुला सांगितल्या, तेव्हा तू आता त्या त्या खुणा जाणवेपर्यंत अभ्यास करून दृढ अपरोक्षज्ञान प्राप्त करून घे. (५५६६)

देहाची वर्तणूक असो भलतैसी । हे पाहोचि नको सोडून अभ्यासासी ।
पावशील पूर्ण समाधान सहजस्थितीसी । आमुचे आशीर्वादें ॥ ६७ ॥
देहाची वागणूक कशीही असू देत, तू तुझा अभ्यास सोडून ती पाहात बसू नकोस. आमच्या आशीर्वादाने तुला पूर्ण समाधान प्राप्त होईल. (५५६७)

ऐशी आज्ञा वदोनी स्वामी । निवांत ठेले अंतर्यामीं ।
सअभ्यास निरूपण अनुक्रमी । आकळिलें रविदत्ते ॥ ६८ ॥
अशी आज्ञा करून स्वामी अंतर्यामी स्थिर झाले. अभ्यासासह केलेले ते निरूपण रविदत्ताने क्रमशः समजून घेतले. (५५६८)

आनंदें टाळी पिटूनियां । मस्तकी आज्ञा वंदोनियां ।
साष्टांग नमितसे पायां । वारंवार प्रदक्षिणा ॥ ६९ ॥
तेव्हा त्याने आनंदाने टाळी वाजविली आणि सदुरूंची आज्ञा शिरोधार्थ मानून त्यांना वंदन केले. पुन्हा त्यांना साष्टांग नमस्कार घातला, आणि त्यांच्याभोवती वारंवार प्रदक्षिणाही घातल्या. (५५६९)

पुन्हां साष्टांग पुन्हां प्रदक्षिणा । आनंदाश्रु भरले नयना ।
बहु प्रकारे करूनि स्तवना । मागील चरणा निघाला ॥ ७० ॥
पुन्हा साष्टांग नमस्कार घातला, पुन्हा प्रदक्षिणा घातल्या, त्याचे डोळे आनंदाश्रूनी भरून आले, आणि निरनिराळ्या प्रकारांनी सद्गुरूंचे स्तवन करून तो मागल्या पायांती निघाला. (५५७०)

प्रारब्धानुकारें देह वर्ते । परी स्मरेना दुजें लयसाक्षीपरतें ।
भलते अवस्थेसी नामरूप हे तें । उद्भवू नेदी सहसा ॥ ७१ ॥
त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करत राहिला, पण लयसाक्षीच्या पलीकडे त्याला दुसऱ्या कशाचेही स्मरण नव्हते. कोणत्याही अवस्थेत असला तरी तो मनात नामरूपांची उत्पत्तीच होऊ देत नव्हता. (५५७१)

ऐसा चिरकाळ अभ्यास करूनी । निर्दाळिलें तिन्ही अभिमानी ।
पावला पूर्ण समाधानीं । जे चरमस्थिति ज्ञात्याची ॥ ७२ ॥
असा अभ्यास दीर्घकाळ करून त्याने तीन्ही अभिमानी जीवांचा नाश केला, आणि त्याने पूर्ण समाधानाची स्थिती प्राप्त करून घेतली. हीच ज्ञानी माणसाची चरमस्थिती शेवटची प्रकृष्ट अवस्था होय. (५५७२)

ऐसा मंदाधिकारी रविदत्त । अभ्यासद्वारा जाहला मुक्त ।
सहजस्थितीने असे वर्तत । भूतभविष्यज्ञात्यापरी ॥ ७३ ॥
अशाप्रकारे मंदाधिकारी असलेला रविदत्त अभ्यासाच्या साहाय्याने अभिन्न भक्त झाला. आणि भूत, भविष्य जाणणाऱ्या ज्ञात्यांप्रमाणे सहजस्थितीत राहू लागला. (५५७३)

हें ऐसें वाक्यवृत्तीचे निरूपण । आकळून आचार्य गुरूपासून ।
अभ्यास विचारें होती पावन । रविदत्ता ऐसे बहु ॥ ७४ ॥
हे या प्रकारचे वाक्यवृत्तीचे निरूपण आचार्य सदुरूंपासून ऐकून समजून घेऊन अभ्यास आणि विचार यांच्या साहाय्याने रविदत्ताप्रमाणेच अनेक साधक पावन होऊन जातात. (५५७४)

श्रोते साधक मुमुक्षु अधिकारी । तीव्रप्रज्ञ की मंदप्रज्ञ अंतरीं ।
परी जयां तरावें ऐशी आवडी खरी । ते तरती अभ्यासें ॥ ७५ ॥
श्रोते मुमुक्षू असोत, साधक असोत वा अधिकारी असोत, तीव्रप्रज्ञ असोत की मंदप्रज्ञ असोत, ज्यांना आपण तरून जावे अशी आवड मनामध्ये खरी बाणली असेल, ते अभ्यासाने तरून जातात. (५५७५)

येथे कोणीएक रविदत्त असे । कोणीएक आचार्याचे कृपेसरिसें ।
पावला समाधान परोक्ष ऐसें । सहसा मानूं नये ॥ ७६ ॥
आता येथे कोणी एकटा रविदत्ता होता, त्याने कोणा एका आचार्यांच्या कृपेने पूर्वीच्या काळी (परोक्ष) असे समाधान प्राप्त करून घेतले, असे मानू नये (५५७६)

जयासी वास्तविक अधिकार प्राप्त । तोचि आपण की स्वयें रविदत्त ।
उपदेष्टा गुरु तोचि विख्यात । शंकराचार्य स्वामी ॥ ७७ ॥
ज्याला खरा अधिकार प्राप्त झाला आहे, तो कोणीही असो, तो स्वतःच रविदत्त आहे असे समजावे; आणि त्याचे उपदेश देणारे गुरू असतील तेच साक्षात् शंकराचार्य स्वामी आहेत, असे समजावे. (५५७७)

निजगुरूची जे सहज वचनोक्ति । हे वेदांतसार वाक्यवृत्ति ।
आकळोनियां सर्व अभ्यास युक्ति । वृत्तीने खल करावा ॥ ७८ ॥
आपल्या सद्गुरूंचे सहजोद्गार असतील ते म्हणजेच वेदान्ताचे सार असणारी ही लघु वाक्यवृत्ती आहे असे समजावे आणि सर्व प्रकारचे अभ्यास, त्यातील निरनिराळ्या युक्त्या समजून घेऊन वृत्तीने खल करावा. (५५७८)

विवेचन यथासांग करावें । अभ्यासें सविकल्प निर्विकल्प साधावें ।
पूर्ण विचारें लयसाक्षित्व आणावें । स्वानुभवें प्रतीतीसी ॥ ७९ ॥
यथासांग विवेचन करावे, अभ्यासाने सविकल्प, निर्विकल्प ध्यान साधावे, पूर्ण विचाराने आणि स्वानुभवाने लयसाक्षित्व प्रतीतीत आणावे. (५५७९)

पुढे देहबुद्धीची क्षीणता व्हावया । अभ्यासें वृत्तीचा खल करोनियां ।
तिन्ही अभिमानांतें वधोनियां । पावावें सहजस्थितीसी ॥ ८० ॥
पुढे अभ्यासाने वृत्तीचा खल करून देहबुद्धी क्षीण करावी. नंतर तीन्ही अभिमानांचा वध करून सहजस्थिती प्राप्त करून घ्यावी. (५५८०)

ऐसाचि अनुक्रम साधोनी । जो मुमुक्षु आदरील अंतःकरणीं ।
तो मुक्त होईल निःसंशयपणीं । येथे संदेह नाहीं ॥ ८१ ॥
हाच अनुक्रम धरून जो मुमुक्षू अंतःकरणाने तो स्वीकारील तो निःसंशयपणे मुक्त होईल यात काहीही संशय नाही. (५५८१)

हे वाक्यवृत्ति वेदांतसार । असे तो कैसा ऐका प्रकार ।
सर्व सारांशरूप वाक्यें चार । चहूं वेदांची ॥ ८२ ॥
ही वाक्यवृत्ती सर्व वेदान्ताचे सार आहे, तो कसा काय प्रकार आहे, ते सांगतो. चार वेदांची सारांशरूप चार वाक्ये आहेत.(५५८२)

प्रत्यगात्माचि ब्रह्म परिपूर्ण । हाचि सारार्थ चहूंमाजीं गहन ।
तोचि अर्थ अष्टादश श्लोकेंकडून । विवेचन अभ्यासें बोलिला ॥ ८३ ॥
त्या चारीमध्ये प्रत्यगात्मा हाच परिपूर्ण ब्रह्म आहे, हा गहन पण साररूप अर्थ आहे. तोच अर्थ अठरा श्लोकांमध्ये विवेचनरूप अभ्यासाद्वारे सांगितला आहे. (५५८३)

हा अर्थ वेदांतरहस्याचा । लोपला होता आजवरी साचा ।
वाउगाचि गलबला जाहला परोक्षाचा । नाना मतें वाढलीं ॥ ८४ ॥
वेदान्ताच्या रहस्याचा हाच अर्थ आजपर्यंत लुप्त झाला होता. आणि त्यामुळे अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मार्गांचा उगीचच फार गलबला झाला होता. आणि अनेक मते निर्माण झाली. (५५८४)

हे सदाशिवें पूर्ण पाहोनी । अवतार धरिला मानवी जनीं ।
नाना मतें सर्वही खंडोनी । वेदांत प्रतिपादिला ॥ ८५ ॥
श्रीशंकरांनी हे सर्व पाहन मानवांच्या मध्ये अवतार धारण केला. आणि इतर सर्व मतांचे खंडन करून वेदान्ताचे प्रतिपादन केले. (५५८५)

शारीरभाष्य गीताभाष्य । मुख्य सार उपनिषद्भाष्य ।
ऐसे प्रस्थानत्रय सरहस्य । वाक्यार्थांचे काढिलें ॥ ८६ ॥
शारीरभाष्य, गीताभाष्य, मुख्य मुख्य सारभूत उपनिषदांचे भाष्य असे त्या महावाक्यांच्या अर्थाचे रहस्य स्पष्ट करणारी प्रस्थानत्रयभाष्ये निर्माण केली. (५५८६)

परी ते समुद्रा ऐसे ग्रंथ थोर । कवण आकळितील मंद नर ।
ह्मणोनि आदि करूनी सदाचार । सुलभ ग्रंथ केले ॥ ८७ ॥
पण ते ग्रंथ समुद्रासारखे विस्ताराने मोठे असल्याचे पाहून त्यांचे आकलन कोणाला होईल? म्हणून सदाचार इत्यादी सोपे ग्रंथ आचार्यांनी लिहिले. (५५८७)

सान ग्रंथ म्हणोनी कधीं । अर्थ सान नव्हे त्रिशुद्धि ।
वाक्यार्थ रूप चहं वाक्यांची प्रसिद्धि । सर्वांमाजी सारिखी ॥ ८८ ॥
हे ग्रंथ लहान असले तरी त्यांचा अर्थ लहान निश्चित नाही. त्या महावाक्यांचा अर्थ सांगणारे ग्रंथ म्हणून त्या सर्व ग्रंथांची प्रसिद्धी सारखीच आहे. (५५८८)

त्यामाजीं ही लघुवाक्यवृत्ती । चहं महावाक्यांची सार अनुभूति ।
विवेचन आणि अभ्यास रीती । बहु स्पष्ट येथे असे ॥ ८९ ॥
त्यांमध्ये ही लघुवाक्यवृत्ती चारी महावाक्यांची साररूप अनुभूती आहे. या ग्रंथात विवेचन आणि अभ्यासाचे प्रकार येथे खूप स्पष्ट करून सांगितले आहेत .(५५८९)

इतर सदाचार आत्मबोधादि । उत्तम अधिकारिया ज्ञानसिद्धि ।
परी मंद अधिकारियाची बुद्धि । येथे न पवाडे ॥ ९० ॥
इतर सदाचार, आत्मबोध इ. ग्रंथ उत्तम अधिकाऱ्यांना ज्ञानसिद्धी करून देणारे आहेत. परंतु मंद अधिकाऱ्यांची बुद्धी येथे प्रवेश करू शकत नाही. (५५९०)

तस्मात् हे वाक्यवृत्ति अतिसुलभ । मंदप्रज्ञासीही अलभ्य लाभ ।
कारण की अभ्यासद्वारा स्वप्रभ । निजांगें ब्रह्म होती ॥ ९१ ॥
म्हणून ही लघुवाक्यवृत्ती अतिशय सुलभ असून मंदप्रज्ञ अधिकाऱ्यालाही अलभ्य लाभ देणारी आहे. कारण की, ते सुद्धा अभ्यासाच्या साहाय्याने स्वतःच स्वयंप्रभ ब्रह्म होऊन जातात. (५५९१)

अभ्यास आणि विवेचन । केवळ स्पष्ट असे परिपूर्ण ।
अष्टादश श्लोकही सघन । ब्रह्मात्मरसे भरले ॥ ९२ ॥
तिच्यातील अभ्यास आणि विवेचन अगदी स्पष्ट आणि परिपूर्ण आहे. सर्वच्या सर्व अठराही श्लोक ब्रह्मात्मरसाने काठोकाठ भरलेले आहेत. (५५९२)

अठरा श्लोकींही सार संकलित । वाक्यार्थ असे विस्तारेंविण गुप्त ।
तोही निघेना मंद जयाचे चित्त । ह्मणोनि प्राकृती विस्तारिलें ॥ ९३ ॥
त्या अठराही श्लोकातील भावार्थ संकलित रूपाने विस्तार न करता सांगितल्यामुळे गुप्त झाला आहे. ज्याची बुद्धी मंद आहे त्याला तो कळत नाही, म्हणून प्राकृत (मराठी) भाषेत त्याचा विस्तार केला आहे. (५५९३)

वटबीज तरी अल्पप्राय । परी विस्तार होतसे शाखाविटपमय ।
तैसाचि आठरा श्लोकांचा अभिप्राय । विस्तीर्ण जाहला प्राकृतीं ॥ ९४ ॥
वडाचे बी अतिशय सूक्ष्म असते पण त्याचा पुढे फांद्या, वृक्ष, पारंब्यांमध्ये केवढा विस्तार होतो! त्याचप्रमाणे मूळच्या अठरा श्लोकांचा प्राकृतात (मराठीत) विस्तार झाला आहे. (५५९४)

प्राकृत भाषेत आला जरी । तरी अर्था नव्हे सानथोर परी ।
तो अनादि जैसा तैसा निर्विकारी । तया हेळसी कवण ॥ ९५ ॥
तो प्राकृत (मराठी) भाषेत आला असला तरी अर्थाच्या बाबतीत लहानथोर असा प्रकार नाही. तो अर्थ अनादी जसा आहे तसा, निर्विकार ब्रह्मरूपच आहे. त्याला कोण कमी ठरवील? (५५९५)

सुवर्णाचे जरी नग केले । वरी भूषणार्थ व्याघ्र सिंह काढिले ।
तरी ते सुवर्ण नवचे उणे जाहलें । परीक्षवंत जाणती ॥ ९६ ॥
सोन्याचे दागिने केले, त्यावर अधिक शोभा यावी म्हणून वाघ, सिंह काढले तरी सोन्यात काही कमतरता येत नाही. परीक्षवंतांना हे चांगले ठाऊक आहे. (५५९६)

तैसा अर्थ जो संस्कृताचा । तोचि प्राकृती विस्तारला साचा ।
हे जाणती ज्ञाते अन्य येरांचा । भाव असे भलतैसा ॥ ९७ ॥
त्याप्रमाणे जो संस्कृत श्लोकांचा अर्थ आहे तोच प्राकृतमध्ये विस्ताराने सांगितला आहे. ज्ञानी लोक हे जाणतात. बाकी इतरांचा अभिप्राय काहीही असू शकेल. (५५९७)

प्राकृत भाषारूप सुवर्ण नगीं । अठरा श्लोकरत्ने जडली अभंगीं ।
हे सुशोभित होतील गुरुपुत्रालागीं । शंकरस्वामींचे प्रसादें ॥ ९८ ॥
प्राकृत भाषारूप सोन्याच्या दागिन्यामध्ये अठरा श्लोकरूपी रत्ने जडलेलीआहेत. असा हा दागिना स्वामी शंकराचार्यांच्या कृपाप्रसादाने गुरुपुत्राला चांगला शोभेल. (५५९८)

शके सत्राशें एकाहत्तरीं । सौम्यनामक संवत्सरीं ।
आश्विन शुक्ल सौम्यवासरी । विजयादशमीसी संपूर्ण ॥ ९९ ॥
शके सतराशे एकाहत्तरच्या सौम्य नावाच्या संवत्सरामध्ये आश्विन शुद्ध दशमी सोमवार, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा ग्रंथ संपूर्ण झाला. (५५९९)

आकाश गगन रसबाण । इतुकें प्राकृत वोवीचें गणन ।
श्लोक जरी नागधरा पूर्ण । संख्या प्रसिद्ध ॥ ५६०० ॥
आकाश, गगन, रस, बाण म्हणजे अंकानां वामतो गतिः या सूत्रानुसार ५६०० इतकी प्राकृत ओव्यांची गणना होते. आणि श्लोक नाग, पृथ्वी इतके म्हणजे १८ ही संख्या तर प्रसिद्ध आहेच. (५६००)

इति श्रीशंकराचार्य उक्ति । अषटादशी लघुवाक्यवृत्ति ।
विस्तारें कथिली असे प्राकृतीं । टीका पदबोधिनी ॥ ५६०१ ॥
अशी शंकराचार्यांनी सांगितलेली अठरा श्लोकांची लघु वाक्यवृत्ती प्राकृतमध्ये विस्ताराने सांगितली आहे. त्या टीकेचे नाव पदबोधिनी आहे. (म्ह. ती प्रत्येकपदाचा अर्थ स्पष्ट करून सांगते आहे.) ती टीका इथे पूर्ण झाली. (५६०१)

इति वाक्यवृत्तिः समाप्ता ।
। श्रीमत्सद्गुरुचरणारविंदार्पणमस्तु ।
वाक्यवृत्ती येथे समाप्त झाली. ती सद्गुरूंच्या चरणकमलांवर समर्पित असो.

GO TOP